रेवा पर्व-खंड - परिक्रमा दुसरी - सौ सुरुचि नाईक
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
रेवा पर्व-खंड - परिक्रमा दुसरी - सौ सुरुचि नाईक
रेवा पर्व- खंड परिक्रमा - परिक्रमा दुसरी, भाग १ -
नर्मदे हर! जय नाना माऊली!
सर्वप्रथम आपण सर्व वाचकाचे मनापासून आभार मानू इच्छिते. *नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती* या अनुभव मालिकेला आपण मनापासून दाद देत आहात. माझ्या मुखातून, माझ्या लेखणीतून ही नर्मदा माई वाहती ठेवण्याचं श्रेय तुम्हा वाचकांनाच! तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रेम मला माझ्या नर्मदा माई पासून दूर होऊच देत नाही, तर ह्या अनुभव कथनामुळे मला तिच्या माझ्यावर केलेल्या कृपेची सतत आठवण राहते आहे. माझ्या लेखणी आणि वाणी ला अहंकाराचा स्पर्श होऊ न देता, हे नर्मदा माई, तुझ्या परिक्रमेच्या अनुभव कथनाचे हे पुष्प, रेवापर्व म्हणून तू स्वीकार कर आणि या रेवापर्वाचं लेखन माझ्या कडून होऊ दे हीच प्रार्थना.
आज सौ प्रांजली ताई लोणकर यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या मुखातून जणू माईचा आदेशच आला..”नर्मदा परिक्रमा अनुभव २८ झाले, २९ वा कुठेय?” थोडंसं बंधन असलेल्याने भाग २९ व यापुढचे भाग दर रवीवारी प्रकाशीत होतात त्यामुळे रवीवारची वाट बघावी लागेल असे मी ताईंना सांगीतले खरे, पण नर्मदा माई सारख्या वाहत्या राहणा-या नर्मदा नामाला देखिल खंड पडू नये, किमान मी परिक्रमेला जाईस्तोवर तरी तिच्या बद्दल चे लिखाण माझ्या लेखणीतून तीच्याच सारखे झरत राहावे असंच म्हणतेय ती, असं वाटतय, आणि म्हणून आज हा “रेवापर्व” चा भाग लिहायला घेतला.
मी आता कशाबद्दल लिहितिये ते आधी सांगते. पहिली नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली एप्रील २०१८ मधे, मात्र त्या माऊलीची आठवण काही कमी होत नाही. तिला सोडून रहावतच नाही. अगदी लहान मुलासारखी मनाची अवस्था होते आणि मन तिच्याकडे जाण्याचा हट्ट धरू लागतं. माझं ही तसच झालं. मात्र यावेळी सलग ५-६ महिने परिक्रमा करणं मला शक्य नसल्याने काहीतरी मार्ग शोधायचा म्हणून खंड परिक्रमा करण्याचा निर्णय झाला.
खंड परिक्रमा म्हणजे काय? तर परिक्रमा ही पूर्ण मात्र तुकड्या तुकड्या नी करायची. म्हणजे आपल्याला शक्य असेल तेवढे दिवस परिक्रमा मार्गावर चालायचं, मग परत यायचं, पुढच्या वेळी जिथून परिक्रमा सोडली तिथून ती पुन्हा सुरु करायची..असं करत करत ती पूण करायची. मग असं केलं तर चालतं का? असे प्रश्न पडलेत. पण खरं सांगू का, जिथे श्रद्धा आहे तिथे अजून काय हवे? असा बालबोध वीचार माझ्या मनाने केला आणि खंड परिक्रमा करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय घेण्याचं कार्य तर मी केलेलं आहे आता तो पूर्ण्त्वाला नेण्याची जवाबदारी मात्र त्या माऊलीची आहे. असा वीचार करून गेल्या २७ डिसेंबर २०१८ रोजी मी खंड परिक्रमेला सुरवात केली. यावेळी ओंकारेश्वर वरून सुरू न करता मी अमरकंटक वरून सुरु केली. यावेळी संकल्प असा काहीच केला नाही, सगळं काही तिच्यावर सोडून दिलं. मात्र अनवाणि आणि किना-यावरून परिक्रमा घडू दे अशी प्रार्थना केली. साधारण १२० किमी चालणं झालं असेल पहिल्या भागात. तेच अनुभ इथे द्यावे असं वाटतय. पहिल्या परिक्रमेच्या अनुभव मालिकेला आपण *”नर्मदा परिक्रमा –एक विलक्षण अनुभूती”* असं नाव दिलं होतं. यावेळी आपण या म्हणजे दुस-या परिक्रमेच्या अनुभव कथनाला *” रेवा पर्व- खंड परिक्रमा (परिक्रमा दुसरी)”* असं नाव देऊ म्हणजे वाचकांचं कन्फ़्यूजन होणार नाही.
तर आता रेवापर्वाला सुरुवात करूयात. यावेळी देखील नर्मदा परिक्रमा सुरू करण्या आधीपासूनच माई चे अनुभव यायला सुरवात झाली. नागपूर हून २३ डिसेंबर २०१८ ला मी परिक्रमेसाठी निघाले. मी एकटीच निघाले होते. बिलासपूर पर्यंत चं बुकिंग झालं होतं. तिथून पुढे पेंड्रा रोड पर्यंत वेळेवर गाडी पकडायची होती, तिचं रिझर्वेशन केलेलं नव्हतं. मी बीलास्पूर पर्यंत पोचले मात्र माझी गाडी लेट झाली होती. त्यामुळे पेंड्रा रोड पर्यंतची कनेक्टेड गाडी कदाचित निघून गेली असेल असं मला वाटलं आणि मी पुढच्या गाडीची चौकशी करायला चौकशी खिडकीशी गेले. तिथे जाताच तिथल्या माणसाने मला बोट दाखवून धावत जाऊन गाडी पकडायला सांगीतले, ती दुसरी गाडी ही थोडी लेट झाल्यामुळे अजून उभी होती.. “तिकट गाडी मे ले लेना” त्या माणसाने मला ओर्डूनच सांगितलं आणि मी गाडीत जाऊन बसले. माझी गाडी लेट होऊनही मला कनेक्टेड ट्रेन मिळाली, अन्यथा मला वाट बघावी लागली असती. पेंड्रा रोड हून देखील पुढे अमरकंटक ला जाण्यासाठी टॅक्सी करावी लागते आणि दुपार नंतर टॅक्सी मिळत नाहीत असे मी ऐकले होते. संध्याकाळ्च्या आत मला मुक्कामी पोचणे गरजेचे होते, अशात ही गाडी चुकली असती तर खरच उशीरच झाला असता.. पण माईची कृपा.. गाडी चुकेलच कशी?
इथे नं अजून एक गम्मत झाली. मी एका ठिकाणी बसले, कुणाची जागा होती माहित नाही, पण मला कुणी हटकलं नाही, उलट “बैठो बैठ” असं एक दोन जण म्हणालेत. बसल्या बसल्या माझा डोळा लागला आणि टीटीई कधी येऊन गेला कळलच नाही… एकतर कुणीतरी माझं तिकिट काढलं किंवा टिटीई नीच तिकिट माफ़ केलं, पण मी आजुबाजुच्यांना विचारलं तर ते म्हणाले, “वो आके चला गया”… काही समजेना.. हा अनुभव इथेच संपत नाही…
पेंड्रा रोड आलं तसं मी दाराशी जाऊन उभे राहिले. माझ्या मागे एक बंगाली मध्यमवर्गीय महिला, तिची मुलगी आणि तिची म्हातारी आई बरच समान घेऊन उभ्या होत्या. इथे गाडी फ़क्त मिनिटभरच थांबते. या तिघींजवळ खूप सामान असल्याने त्या काळजीत होत्या. गाडी थांबली तसं मी आजी अन मुलीला खाली उतरवलं, आणि दोन चार बॅग्स पण उतरवून दिल्या. आता मला अमरकंटक ला जायला गाडी बघायची होती. त्या बंगाली आजी ला नर्मदे हर म्हणून पुढे निघणार तेवढ्यात ती मध्यमवर्गीय बाई म्हणाली “ अकेले के गाडी मत बनाओ, हमारी गाडी आ रही है, हम जालेश्वर महादेव और अमरकंट्क दर्शन करके मृत्युंजय आश्र्अम जायेंगे…तुम भी चलो हमारे साथ, तुमको जहा जाना है वहा छोड देंगे”.. मला देखिल मृत्युंजय आश्रमातच जायचं होतं. घरून निघून आश्रमापर्यंत सुखरूप पोचवण्याची व्यवस्था माईनी करूनच ठवली होती की नाही बघा..
मी आश्रमात सुखरूप पोचले. मला परिक्रमा उचलण्या आधी किना-या मार्गाची माहीती घेणं आवश्यक होतं, कारण ह्या मार्गावरून कुणी परिक्रमा करताना दिसत नाही कारण या मार्गावर सोयी नाही, घनदाट जंगलं आहेत, आणि म्हणून मार्गांची माहिती असणं आवश्यक होतं… मी इथे ३ दिवस होते आणि मग किना-या मार्गाने आणि आनवाणि परिक्रमा सुरु केली. ही परिक्रमा सुरु केल्यावर काय अनुभव आलेत ते सांगते “रेवा पर्व- खंड परिक्रमा (परिक्रमा दुसरी, भाग २)” मध्ये.
नर्मदे हर
सौ सुरुचि नाईक.
रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग २
नर्मदे हर
अमरकंटक ला राहून आधी किनारा मार्गाची माहिती मिळवणं गरजेचं होतच पण नीट माहिती मिळत नव्हती. कुणी म्हणायचं जाऊ नका, फ़ार भयंकर मार्ग आहे, रस्ता नाही आश्रम नाही, आणि तुम्ही एकट्या, शिवाय अनवाणी…तर कुणी म्हणायचं जा हरकत नाही. इथपर्यंत ठिक आहे हो, पण तिस-या वीचारसरणीचे लोक जास्त बरोबर बोलत असून तिथेच मन कच्च व्हायचं… हा हा.. ते म्हणायचेत.. “जाना है तो जाओ, जो होगा सो होगा..ज्यादा से ज्यादा क्या मर जाओगे, वो तो एक दिन मरना ही है” त्यांचं बोलणं अतिशय खरं होतं आणि पहिल्या परिक्रमेत अनेक अनुभव आल्याने काहीही होणार नाही याची खात्री ही होतीच…पण रात्री जंगलात राहावं लागलं तर झेपेल का असा एक विचार मनात येऊन गेला. तरीही या वेळी किनारा सोडायचा नव्हताच.. अगदी जे होईल ते होऊ देत हेच ठरलं होतं… ठरवलं… जितकं जास्त विचार करावा तितकं जास्त कन्फ़्यूजन! आपण किनारा मर्गा करायला आलो आहोत आणि तो करायचा…. निर्णय झालाच होता….मग मात्र मी काहिही चौकशी केली नाही.
आता उद्या संकल्प घ्यायचा आणि निघायचं.. मागे सांगीतल्या प्रमाणे काहिही संकल्प घेतलाच नाही.. म्हणजे किनारा न सोडणे आणि अनवाणी हे जे ठरलं तेच. किती चालायचं कसं वगैरे दिलं सोडून तिच्यावर. मला दुपारी २ वाजता मुंबई च्या सुरेश पित्रें यांचा फ़ोन आला. “ताई तुम्ही किनारा मार्गाने परिक्रमा करताय नं, मी पोचतोय उद्या अमरकंटक ला. तुमच्यासोबत आलो तर काही हरकत आहे का तुमची?”… घ्या मी निर्णय पक्का केला आणि त्या मैयाने पुढची सोय केली… मला सोबत दिली.. अगदी न मागता. जंगलात एकटं राहावं लागेल का असा विचार माझ्या मनात आला होता… तो खोडून निघाला..ठरल्या वेळेवर पित्रे दादा आले. आम्ही संकल्प आणि कन्या पूजन केलं आणि साधारण १२ वाजता चालायला सुरवात केली. डिसेंबर चा महिना असल्याने उन्हाचा त्रास होणार नव्हता मात्र अनवाणी चालत असल्याने पावले मोजून चालतेय की काय असं वाटू लागलं होतं. प्रत्येक पावला खडी बोचत होती मात्र सवय करणं गरजेचं होतं. आपण सतत छोटा मोठा त्रास देतच असतो लोकांना नाही का, तशीच खडी बोचलीत.. रक्त लागलं नाही मात्र अधे मधे अगदी जीव कळवळून यायचा…
अजून आम्ही काहीही अंतर चाललो नव्हतो, जेम तेम २ किमी वर यशोधन ट्रॅवल्स नी यावर्षी चालवलेल्या म्हणजेच मागच्या वर्षी जिथे माई बाबा होते त्या आश्रमापर्यंत आलो असू. मला मागे गेल्यासारखं वाटू लागलं. आता कुठूनशा माई येतील आणि “ तुझी बॅग नेऊन देऊ बाहेर का तू आत येणारेस?” असं म्हणून मला आत बोलावतील असं क्षणभर वाटून गेलं, पण तसं काही होणार नव्हतं, मला पुढे जायचं होतं. गुळाचा काळा चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. आता कबीर चबुतरा मार्गाने न जाता आरंडी संगम वरून पुढे कपिल धारा, पंच धारा असं जायचं होतं. आरंडी संगम पर्यंत छान डांबरी रस्ता आहे त्यामुळे चालणं सहज शक्य झालं, वाटलं आज पंच धारा ला पोचता येईल..ते साधारण १५ किमी आहे.
आरंडी संगमावरून एक स्थानीय माणूस आमच्या सोबत रस्ता दाखवायला म्हणून आला. म्हणाला तुम्हाला रस्ता समजणार नाही. आम्ही देखिल येऊ दिलं. मात्र बरच अंतर चालवून, खाली वर उतरवऊन तीन लहान लहान डोंगर पार करवून तो अम्हाला कपिल धारा पर्यंत घेऊन आला आणि मग पैसे मागू लागला. गरजू असावा असं समजून आम्ही ही पैसे दिले, आणि मी येतो थोड्या वेळात म्हणून तो जो गायप झाला तो आजतागायत आला नाही… बर नाही आला तर हरकत नाही, पण पंच धारा चा रस्ता सांगायला सुद्धा अम्हाला कुणी म्हणून सापडलं नाही,आणि एव्हाना साडेचार झालेले. निवारा शोधायचा आणि उद्या जायचं पंच धाराला असं आम्ही ठरवलं. कारण इथून पुढे किती अंतर आहे आणि कसा रस्ता आहे याची काहिही माहिती नव्हती.
इथे थांबायचं ठरवलं खरं पण कुठे थांबणार.. इथे एखादं नावाला म्हणून पण घर नाही, दुकान नाही, अगदी काहीतरी म्हणून एक बस स्टॉप फ़क्त दिसत होता. डिसेंबर चा महिना, या वर्षी थंडी अजून सरायचं नाव घेईना, रात्री मायनस मधे जात असावं तापमान इतकं थंड, आणि इथे काहिही नाही. मग जरा डावीकडे वळून आम्ही मैया किनारा गाठायचं ठरवलं, एखादं लहानसं मंदिर तरी असेल या आशेनी तिथे गेलो खरं पण काये माहितिये का, सगळी मंदिरं, दुकानं हे सगळं धबधब्याकडे..प्रेक्षणीय स्थळ आहे ना ते..सगळं उत्तर तटावर, पण आम्हाला कुठे मैया ओलांडता येतेय? मग आता काय करायचं?
तिथे एक उसाच्या रसाचा ठेला होता, आणि कडेला हिरवं कापड बांधून आडोसा केलेली जागा होती. टपरी म्हणू हवं तर.. तिथे रात्र काढायची ठरली. तिथे जो माणूस होता त्याला विनवणी केली आणि त्यानी ऐकली हे विषेश! डोक्यावर कापडाचं का होईना, छत होतं…जवळ एक चूल पण होती मातीची.. व्व्वा म्हणजे भोजन व्यवस्था होईल.. पण शिधा कुठे होता आमच्याजवळ? पात्र? साधन?काहीही नाही. तो माणूस आपल्या घरी निघून गेला. मग एक कल्पना सुचली. मैयाची धारा इथे जरा लहान असल्याने पूल ही फ़ार मोठा नाहीये. काही लोक हा पूल पार करून ये जा करत होते. त्यातले बहुतांश हे पर्यटक होते. “आम्हाला सामान आणून द्या, आम्ही पैसे देतो” असं विनवूनही फ़ायदा झाला नाही. कुणी आमच्याकडे लक्षच दिलं नाही तर कुणी परत यायला त अयार नाही. मग मात्र मी दक्षीण तटावर उभी राहून मोठ्या मोठ्याने नर्मदे हर करत उत्तर तटावरच्या लोकांना आवाज देऊ लागले. एक ऑटोवाला थांबला. त्यानी आम्हाला कणीक आणून दिली आणी ज्या टपरीमधे आम्ही आसन लावलं होतं त्याच्या मागे एक खोली होती ती दाखवली. तिथे एक कुटुंब राहात होतं. आम्हाला मात्र ती खोली दिसलीच कशी नाही काय माहीत! त्या कुटंबानी आम्हाला मीठ साखर आणि तेल दिलं. तवा आणि परात पण दिली आणि अशा प्रकारे आमची भोजनाची व्यवस्था झाली. आज टिक्कड..तेही साखर मिठाचे.. सोबतीला पाणी..आम्ही थोडं गरम करून घेतलं होतं त्यामुळे बरं वाटत होतं. पोटात भूक असली की सगळं छान लागतं. जाड जळके टिक्कड सुद्धा आम्ही पोटभर खाल्लेत. मैया उपाशी राहू देत नाही आणि खरच सांगते, ते टिक्कड वाईट लागले असते तर गिळवले गेले असते का? ते आपल्या कडच्या गाकरांसारखे लागत होते..जरा कोरडे होते इतकच!
जेवण करून आम्ही झोपलो. पहिली झोप बरी झाली. सधारण १२ च्या सुमारास सोसट्याचा वारा सुटला,,जोरात आणि खूप थंड.. थर्मल वेअर, एक चादर आणि एक ब्लॅंकेट घेऊन सुद्धा खूप थंडी वाजत होती. आपल्या अंगावर जणू कुणी बर्फ़ घासतय असं वाटावं इतकी थंडी. अंगाचं मुटकुळं करून झालं, होते नव्हते ते कपडे अंगावर चढवून झाले…काही उपाय नाही. त्या रात्री माझ्या जवळचे तीनही ड्रेस मी एकावर एक असे घालून घेतले होते. एक स्वेटर होतं, आतून थर्मल होतच आणि वर चादर आणि ब्लॅंकेट होतं. यापेक्षा जास्त सामान आम्ही उचलून चालू शकणार नसल्याने सोबत घेतलं नव्हतं. आज पहिलाच दिवस आणि आमची अवस्था अतिशय दयनीय होती. झोप काही लागेना.
मग मातीची चूल पेटवऊन तिच्या बाजूला बसूयात असं ठरलं. लाकडं नव्हती. रात्री १ वाजता मी आणि पित्रे दादा बाहेर जाऊन लाकडं शोधू लागलो..लाकडं मिळालीत पण दव इतकं पडलं होतं की ती लाकडं पेटेनात. दव काय, बर्फ़च पडत होता… म्हणजे स्नो फ़ॉल नाही बरं का…दवाचा बर्फ़ होत होता. इकडे त्याला “पाला गिरा” असं म्हणतात. चुलीचा प्लान पार फ़सला होता. मात्र लाकडं शोधायला बाहेर गेल्याने शरीराची हालचाल झाली आणि थोडी ऊब आली होती. आता दुसरा उपाय नव्हता. रात्री २ वाजता आम्ही बसल्या बसल्या हाताचे, पायाचे व्यायाम पण करून झाले होते, थोडं बरं वाटायचं….. मग शेवटी थोडा वेळ गप्पा कर, थोडा वेळ जप कर असं करत करत आम्ही ती रात्र कशी बशी घालवली. दुस-या दिवशी एका तरूण गाडी वाल्या मुलाला पैसे दिलेत आणि २ ब्लॅंकेट मागवून घेतलीत. त्यानेही आणून दिलीत म्हणून बरं झालं… पण आता पाटीवरचं वजन चांगलच वाढणार होतं…कर्माचं ओझं, आणिक काय?
दुस-या दिवशी त्या खोलीतल्या कुटुंबानं आमची अवस्था पाहिली आणि आंघोळी ला गरम पाणी करा असं सुचवलं. शिवाय आग्रहाने बालभोग दिला. आज ५ किमी जाऊन पंचधाराला थांबायचं होतं. जास्त चालणं अशक्य होणार होतं. रात्रीची झोप झाली नव्हती. मात्र पंचधाराला चांगला आश्रम आहे हे माहीत होतं. त्याचं कारण असं की मागच्या परिक्रमेत दमगड पासून कपिल्धारा पर्यंत जंगल मार्गाने येत असताना, म्हणजे आम्ही उत्तर तटावरून येत असताना दक्षीण तटावरच्या याच आश्रमातल्या महाराजांनी आम्हाला चहा पाजला होता. आमच्या साठी ते मैया ओलांडून आले होते. आणि ते आमच्या विदर्भाचे महाराज होते… अर्थात हे सगळं माहित असल्याने आशा बळावल्या होत्या. आम्ही पंचधाराला पोचलो. झालेला वृतांत सांगीतला आणि कनवाळू मैयानी इथे जी व्यवस्था केली ती ऐकल्यावर वाचकांचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
ती परिक्षा पाहते, पण त्रास होऊ देत नाही. ती आई आहे, कनवाळू आहे आणि आपल्या बाळाची थोडी शी गंमत करते ती कधी कधी. तर झालं असं की आदली रात्र आम्ही थंडीत कुडकुडत घालवली होती आणि इथे आल्या आल्या इथल्या महाराजांनी मला पाय धुवायला आणि अनवाणी चालतेय म्हणून पाय शेकायला गरम पाणी आणून दिलं. सुरवातच अशी राजेशाही म्हंटल्यावर पुढे काय विचारायचं? आम्ही अजून कुटी च्या बाहेर बसलो होतो. गरमा गरम चहा आणि कालचं जेवण टिक्कड वर झालं म्हणून की काय सोबतीला भजे अशी न्याहारी मिळाली. आणि कुटीच्या आत गेल्यावर तर काय पाहिलं माहितिये?.. नाही.. या भागात नाही सांगायची ते मी… पुढच्या भागात सांगेन कुटीच्या आतली गंमत..आणि हो पुढचा घनदाट जंह्गलाचा २२ किमी चा प्रवास.. रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग ३ मधे.
नर्मदे हर.
रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग ३
पंचधारा चा आश्रम हा फ़ार रमणीय जागी आहे. आश्रमाच्या चारही बाजूला डोंगर आहेत, जंगल आहे. शहराच्या ७ किमी जवळ इतकी निवांतता असेल हे सांगुनही पटणार नाही अशीच ही जागा. इथे आल्या आल्या पाय धुवायला आणि पाय शेकायला गरम पाणी मिळालेलं. चहा आणि सोबत भजी मिळाली आणि कुटीच्या आत गेल्यावर इतकं छान वाटलं म्हणून सांगू? आत गेल्यावर अगदी मध्य भागी एक शेकोटी होती. तीच चूल, तीच धुनी. कुटीच्या आतलं वातावरण छान ऊबदार होतं. आदली रात्र थंडीनी कुड्कुडत काढलेल्या व्यक्तीला थोडीही ऊब किती आनंद दायी असेल? वा आजची रात्र छानच जाणार..विचारानीच झोप येऊ लागली आणि वाटलं अस्सं, या धुनी च्या बाजूलाच आसन लावावं. मी असा विचारच करत होते, तितक्यात महाराजांचा आवाज आला, “मी काय म्हनतो मावसी, हितं लावून दे आसन धुनीच्य बाजूले, मस्त रायतं मंग झकास पैकी नै”.. वा मी विचारायच्या आत महाराजांनीच मला धुनीच्या बाजूला आसन लावायला सांगीतलं. आजची रात्र खरच खूप छान होणार होती.
जसं जसा वेळ जाऊ लागला तसतसा इथे अंधार जास्त आणि लवकर होतोय असं वाटू लागलं. स्वाभाविक आहे, चारही बाजूला डोंगर असल्यामुळे मावळतीचा सूर्य इथून दिसतच नाही. शिवाय जंगल झाडीमुळे गारवा आणि अंधार दोन्ही भरपूर. लवकरच अंधार पडला, आम्ही त्याच धुनीवर स्वयंपाक केला आणि तिथेच बाजूलाच आसन लावून झोपी गेलो. सकाळी जाग आली तो अजून उजाडलं नव्हतं म्हणून घड्याळ पाहिलं तर चांगले सात वाजले होते! पण मग अजूनही बाहेर अंधार? कुटीचं दार उघडून पाहिलं तर वर आभाळ चांगलंच उघडलं होतं मात्र पूर्वेकड्च्या बाजूचा डोंगर फ़ारच उंच असल्याने इथे आश्रमात अजून दिवस उजाडलाच नाहीये असं वाटत होतं.जवळ जवळ आठ वाजता इथे उन्हाची पहिली तिरीप येऊ घातली, आणि मग बाकीची हालचाल सुरू झाली. आम्हाला आंघोळ वगैरे आटोपून जायचं म्हंटलं तरी १० वाजणारच होते, शीवाय महाराज बालभोग घेतल्याशिवाय जाऊ देणार नाहीत हे माहितच होतं. पुढची वाट म्हणजे २२ किमी (हे अंतर आधी माहित नव्हतं) जंगलाची, आणि मधे काहिही नाही… पण इलाज नव्हता… आम्ही साधारण १०.३० च्या सुमारास निघालो.
जाताना महाराजांनी पोळ्या आणि लोणचं बांधून दिलं. सोबत आगपेट्या दिल्यात २..आणि म्हणाले “झपाझप जा, अंधाराच्या आत बाहेर पडा”… आम्ही चालू लागलो, ३ किमी वर वाटेत उत्तर तटावर राम कुटिर म्हणून आश्रम आहे. तिथे मी मागच्या परिक्रमेत थांबले होते. तिथल्या महाराजांनी आवाज दिला, ओळख ही दिली आणि कंपांऊड ला लागून लागून जा असं सांगितलं. फ़ोरेस्ट च्या नर्सरी चं कंपाऊंड आहे तिथे, ते सोडू नका असं ते म्हणाले.
आम्ही बरच अंतर कंपाउंड ला धरून जाऊ लागलो होतो मात्र एका ठिकाणी कंपाऊंड डावीकडे आणि मैया उजवी कडे गेली होती. मग आता कंपाउंड धरलं तर मैया पासून दूर जाणार नं.. काय करावं काही समजेना. आम्ही कंपाउंड सोडलं. मैया चा आवाज येत होता तसं तसं चालू लागलो. एक तर आधीच डिसेंबर महीना, तसही ऊन जरा कमी आणि झाडी इतकी जास्त की जमिनीवर ऊन पडेना. अशात नेमकं कुठे जातोय हे कळायला काही मार्ग नाही. कुठला बाणाचा निशाण नाही की की कसली पाटी नाही..काही नाही. पाऊल वाट मात्र जात होती, तीच पकडून जाऊ लागलो. मधेच दूर वर एकदम उजेड दिसायचा, वाटायचं संपत आलं जंगल..पण ज्या पाऊलवाटेनी आम्ही चालत आलो होतो ती भलतीकडे वळून पुन्हा जंगलात जायची. असं चार पाच दा झालं… वाटलं आम्ही रस्ता चुकलो… पण मग जेव्हा मैया किना-याला गेलो तेव्हा उत्तर तटावर दूर शेतात माणसं काम करताना दिसली..थोडा धीर आला.. त्यांना आवाज देऊन विचारलं तर म्हणे अजून बरच लांब आहे…. किना-यानेच जा, नाहीतर रस्ता चुकाल…अजिबात कुठेही वळू नका…
आम्ही किनारा धरला, इथे किना-याने जात असल्याने एक अडचण सतत यायची. या जंगलाच्या वाटेत कमित कमी १० ते १२ ओढे मैया ला येऊन मिळतात, ते सगळे पार करून जावं लागलं. काहींना थोडं पाणी होतं, काहींना अगदीच कमी, मात्र काही ओढे हे बरेच खोल, म्हणजे ६ ते ७ फ़ूट खोल देखिल होते, ते उतरून मग चढायचं, किंवा काहिंवर लाकडं रचून पूल केला होता तो पार करायचा. शेवटच्या ओढ्याची गम्मत सांगते. हा ओढा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात खोल होता. यावर एक लाकूड पुलासारखं रचलं होतं, ते मधून तुटायला आलं होतं. शिवाय त्या लाकडाची दोन्ही टोकं मातीत खोलवर रुतलेली पण नव्हती, ती हलत होती. आणि गंमत म्हणजे आधीच अंधा-या वातावरणात आभाळ खूप ढगाळून आलं होतं, अजूनच अंधार झाला होता, आता आम्हाला जंगल पार करायची घाई झाली होती, कारण पाऊस आला तर आम्हाला काहीही निवारा नव्हता. आम्ही खाली उतरून ओढा पार करता येईल का याचा थोडा शोध घेतला पण हा ओढा बरच अंतर खोलच होता. आता या तुटक्या लाकडावरून चालत जाऊनच तो पार करायचा…दुसरा इलाज नाही…
मग मी पुढे झाले..माझ्या दंडाचं एक टोक मी पित्रे दादांना पकडायला सांगितलं आणि दुसरं मी पकडलं… त्या दंडावर पूर्ण वजन देत आणि आडवी पावलं टाकत, मन अतिशय स्थीर करून, हळू हळू मी लाकडाच्या मध्यावर आले. सगळा जीव पायात गोळा करून तिथून पलिकडच्या काठाकडे अक्षरश: झेप घेतली आणि त्या किना-याला साष्टांग नमन करत मी किना-यावर आडवी पडलेच…. मला काहीही लागलं नाही, आणि मी सुखरूप काठावर पोचले. मग वाकून मी माझ्या दंडाचं माझ्याकडचं टोक पकडलं. त्यावर पित्रे दादांचं सामान अडकवून ते आधी ओढून घेतलं आणि मग ते माझ्या दंडाचा आधार घेत इकडे आले. त्यांच्याजवळ सामान नसल्याने त्यांना थोडं सोपं गेलं… हुश्श्श.. आम्ही तो ओढा पार केला…
पण विचार करायला वेळ नव्हता, आम्ही पुढे चालू लागलो..मधेच खूप घाण वास आला, कुणीतरी मोठं जनावर मेल्यासारखा…त्या वासाला आणि त्या बरोबर येणा-या विचाराला इग्नोअर करणं ह्या एकमेव उपायाखेरीज आमच्यकडे काहीही नव्हतं.. आम्ही पुढे निघालो तो एक झेंडा दिसला… वाटलं इथे काहीतरी असेल… छे जवळ जाऊन बघतो तर ती लालसर वाळकी पानं होती. झेंडा समजून आम्ही वाकडी वाट करून काही अंतर चालतही गेलो होतो, तसच परत आलो आणि आता मात्र मनातल्या मनात पण अतिशय तीव्रपणे “मार्ग दाखव” म्हणून त्या नर्मदा माई ला विनवू लागलो…नर्मदे हर पण केलं, पण इथे काही प्रत्युत्तर आलं नाही.
पण नर्मदा मैया कनवाळू आहे हे मी नेहमीच म्हणते. एका झाडावर इथे बाण कोरलेला आम्हाला दिसला. त्या दिशेने काही अंतर गेलो खरं पण पुन्हा दोन वाटा दिसू लागल्या. आता आम्ही दोघंही बोलत नसलो तरी मनातून गोंधळलेलो होतो. गंमत माहितिये का, मी अनवाणी चालत होते, मला अजिबात सवय नव्हती, आजचा दुसराच दिवस होता, पण आज माझ्या मनात माझ्या पायाचा विचारही आला नाही. झपाझप पावलं उचलत होती मी..कशी कोण जाणे…
इथे मात्र मैयानी एक गंमतच केली. इथून पुढे आम्ही एका दिशेने चालू लागलो पण कुठलाही बाण किंवा तत्सम निशाण तिथे तयार केलेलं नव्हतं.. तरीही कुठे जायचय याचा अंदाज येत होता. पण नक्की काय होतं? आम्ही पडलो का जंगलाबाहेर लगेच.. का भरकटलो? किती वेळ लागला पुढे?.. हो हो…सांगते, पण पुढच्या भागात!
नर्मदे हर.
मागच्या भागात मी तुम्हाला पंचधारा आणि त्या पुढच्या जंगलाबद्दल सांगत होते. आम्हाला एका ठिकाणी एक झेंडा असल्याचा भास झाला होता, मात्र ती वाळकी पानं निघाली. आम्ही पुन्हा रस्ता शोधू लागलो मात्र या वेळी एक गंमत झाली होती. ती अशी की आम्हाला गाईच्या गळ्यातील घंटा वाजतेय असं वाटू लागलं. गाईच्या गळ्यातील घंटा वाजणे म्हणजे आपण गावा जवळ असण्याचा संकेतच नाही का! खूप आनंद झाला खरा, पण सुरवातीला आवाज नेमका कुठून येतोय ते समजलच नाही. खूप दुरून आवाज येत होता मात्र काहिही दिसत नव्हतं. आम्ही खूप वेध घेऊन आवाजाकडे कान देत होतो आणि हळू हळू त्या दिशेकडे जात होतो. बरच अंतर चालून गेल्यावर तो आवाज जरा स्पष्ट येऊ लागला. तरी साधारण तीन ते चार किमी अंतर आम्ही फ़क्त त्या आवाजाच्या आधाराने चालत असू. आणि मग पुन्हा एक गंमत झाली. जे कंपाऊंड आम्ही सोडून मैयाकडे गेलो होतो, ते आम्हाला पुन्हा लागलं. राम कुटीर मधला तो सन्यासी म्हणाला होता, कंपाउंड लगेगा, ते कंपाउंड लागलं मात्र ते आमच्या डावीकडून उजवी कडे कसं काय गेलं ते काही समजलं नाही.
आम्ही आवाजाच्या दिशेला जात राहिलो. थोड्या वेळाने समोर मेन रोड दिसू लागला. साधारण एक किलोमिटर वर असेल. जीव भांड्यात पडल्यासारखं झालं. आवाज अजूनही येत होता. आम्ही आवाजाच्या दिशेने बघू लागलो. या मेन रोडच्या ही पलीकडे एका शेतात एकच गाय चरत होती. तिच्या गळ्यातल्या घंटेचा हा आवाज! म्हणजे हा आवाज कमीत कमी पाच किलोमिटर अंतरावरून आम्हाला येत होता? इतक्या दुरून आवाज येऊ शकतो? दिशा दर्शक होऊ शकतो असा आवाज? कमाल आहे की नाही? पण हे झालं होतं आणि हे असच झालं होतं.. मैयाची कमाल, दुसरं काय?
आम्ही मजल दर्मजल करत पकरी सोंढा गावाच्या आश्रमात पोचलो. चित्रामधल्या गावासारखं हे गाव. भुस्याचे ढीग, लहान लहान झोपड्या, त्यांच्यावर वेली, पायवाटा, संध्याकाळ्च्या उन्हात आणि निरभ्र आकाशाखाली हे गाव खूप सुरेख दिसत होतं.आम्ही थकलो होतो. मी अनवाणी चालत होते. आणि आतापर्यंत गावी पोहचणे ह्या एकाच गोष्टिकडे लक्ष असल्याने माझ्या पायांकडे माझं लक्षच गेलं नव्हतं मात्र आता लक्षात आलं होतं की पायांची आग होतेय, पाय खूप मळले आहेत आणि दुखतात ही आहेत. ओढा पार करताना मी जमीनी वर पडले होते त्यामुळे कपडे पण खराब झाले होते. तेही धुवायचे होते. भूक देखिल लागली होती. पंचधारा च्या महाराजांनी बांधून दिलेली लोणचं आणि पराठे तसेच होते. बस आता अश्रमात जायचं, आंघोळ, आरती करायची, कपडे धुवायचे, जेवायचं आणि झोपायचं….पण आपण ठरवतो तसं होत असतं का?
आम्ही आश्रमात पोहचलो पण आश्रमाला कुलूप लागलेलं. आजूबाजूला विचारलं तर “माहित नाही” असं उत्तर आलं. सुदैवाने आमच्याकडे जेवण होतं. आम्ही जेवून घेतलं. बाजूला हापशी होती, तिथेच आंघोळ आणि कपडे धूता येतील असं वाटलं, पण ती हापशी ऐन रस्त्यात असल्यामूळे माझ्या आंघोळीचं तंत्र जरा जमेना. बादली किंवा तत्सम काही पण नव्हतं, म्हणून सहज आश्रमाच्या अवती भवती चक्कर मारली. तिथे काही सामान होतं, आणि शेजारच्या घरून मी मागून आणलं. त्यात एक मोठं पातेलं, एक बादली, साबण पावडर चा डब्बा , थोडी सरपणाची लाकडं, मातीची चूल असं आणि बरचस सामान जमा झालं…आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण! आजची सगळी सोय झाली होती, आता फ़क्त रात्रीच्या थंडीचं काय ते बघायचं.. तसं चूल आणि लाकडं असल्यामुळे तो ही प्रश्न मिटलाच होता म्हणा!
मी चूल पेटवली, पातेल्यात आंघोळीसाठी पाणी गरम करून घेतलं, तिथेच माझ्या दोन लुंग्या झाडाला बांधून एक आडोसा तयार केला आणि आंघोळ आटोपून घेतली. हापशीवर कपडे पण धुवून झाले आणि तिथेच झाडावर वाळत पण घातलेत. आता झोपण्याची तयारी. पित्रे दादांचं पण सगळं आटोपलं होतं. आम्ही आरती करण्यासाठी जागा बघत होतो तेवढ्यात तिथल्या आश्रमाचे साधू महाराज आले. आम्ही आत गेलो. आत खूपच ऊबदार वाटत होतं. थंडी ची सुद्धा नीट व्यवस्था झाली आणि दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री निवांत झोप लागली.
खोलीत इथेही पंचधारा सारखी धुनी होती. थंडीच इतकी जास्त की या शीवाय पर्याय नाही. सकाळी जागच उशीराने आली. तरी ७ वाजायला आले होते. आम्ही बाहेर पडून पाहिलं तो नजारा वेगळाच होता. इथे सगळीकडे जमीन पांढरी दिसत होती. पाला पडलेला होता. इथे दवाचा जो बर्फ़ होतो त्याला पाला म्हणतात. याचा अनुभव आम्ही कपिलधाराला घेतला होता मात्र त्या एका परीक्षेच्या रात्रीनंतर मैयानी आमची व्यवस्था खूपच ऊबदार ठिकाणी केली होती. आम्ही आंघोळी पूजा आटोपून पुढे निघालो.
आता इथून पुढे जाताना आम्हाला एक साधू महाराज भेटलेत. एक सांगू का? परिक्रमेत जे जे कुणी म्हणून वेगळे साधू भेटलेत नं ते सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी खूपच वेगळे होते हे नक्की. आता मला रस्त्यात भेटलेले साधू महाराज नक्की कोण हे माहित नाही, पण हा माणूस एक अवलीयाच होता. कुरळे केस, बारिक डोळे, जवळ जवळ ६ फ़ुट उंची आणि सडसडीत बांधा होता त्यांचा. अंगात एक लांब वूलन कोट घातला होता आणि खांद्याला जुन्या काळचा, बेल्ट वाला एक मोठा रेडीओ लटकवलेला होता. दुस-या खांद्यावर एक झोला, बस इतकच सामान. बाकी काही नाही.
“परिक्रमा मे हो माताजी?” त्याने विचारलं…
म्हंटलं हा..
साधू- अब कहा जाओगे?
मी-जहा शाम होगी वही रुक जायेंगे”,
साधू- कितना चल लेती हो?
मी- यही कोई १०- १२ किमी
साधू- चप्पल पहन लो आप तो, कांटे बडे है, नही चल पाओगी
मी- बाबाजी चप्पल तो नही पहनेंगे, बाकी अगर काटे लगेंगे तो लगेंगे.. रुक जायेंगे, कौनसी जल्दी है?
साधू- अच्छी बात है, रामघाट आ जाओ, इंतजार करता हू..
इतका संवाद झाल्यावर तो पुढे निघून गेला. रामघाट म्हणजे डिंडोरी जवळ चं नाही बरं, ते दुसरं, हे भर्रा टोला च्या नंतर येतं. तिथवर चालून होईल की नाही हे काही महित नाही, आम्ही आपलं त्या साधू ला हो म्हंटलं आणि तो पुढे गेला. पुढे भीमकुंड वगैरे मागे टाकून आम्ही रामघाट ला पोहचलो खरं पण इथे ज्या आश्रमात आम्ही नर्मदे हर केलं ते एक मंदिर होतं आणि तिथेच एक खोली होती. तिथे कुणी आश्रम धारी बाबा पण नव्हता. एक पुजारी होता फ़क्त. तो ही रात्री चा घरी जाणार. लाईट नाही..आणि माहितिये का, तिथे नं काहीतरी भयाण थंड पणा जाणवत होता. ती खोली सुद्धा खूप विचित्र वाटली. मी आणि सुरेश दादा, दोघही तिथे राहण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आम्ही दुसरा आश्रम शोधायला निघालो.
दुसरा आश्रम अगदीच समोर होता मात्र इथे कुणीच नाही. आता मागे जाऊन गावातच कुणाकडे राहावं लागेल की काय असं वाटत होतं. नुसतच राहणं नाही तर थंडी पासून बचाव आणि भोजनप्रसादी ची व्यवस्था हे ही बघणं होतच की. आम्ही पलटून गावाकडे जाऊ लागलो तितक्यात बरच दूरून नर्मदे हर ऐकू आलं. बघतो तर हा मघाचा साधू आम्हाला मोठ्या मोठ्याने आवाज देत होता. “अरे देबी जी, इधर आ जाओ”.. त्यानी वाट दाखवली आणि आम्ही त्या आश्रमात गेलो.
तिथे एकच खोली होती आणि ती देखिल तट्ट्याची. बाहेर चारही बाजूला ओटा आणि छत. भिंती नाहीत. मात्र एका ठिकाणी जाड सतरंजी लावून आडोसा तयार केला होता. “ इधर लगाओ आसन” त्या साधू नी मला सांगीतलं. आज पुन्हा एकदा थंडी ला तोंड द्यावं लागेल या विचारानीच अंगावर काटा आला. मात्र या साधू नी माझ्या मनातला वीचार कसा ओळखला माहित नाही, तो म्हणाला, “अभी दरी लगाया है मैने आपके लिये, अब थंडा कम लगेगा.. महात्मा जी को बोला मेरी देबी जी आ रही है, उनका खयाल रखना है मुझे, दरी दे दो” त्याच्या या बोलण्यात आपले पणा तर होताच पण खूप अधिकार होता असं मला वाटू लागलं. कुणाचा आपल्यावर अधिकार असणं हे फ़ार भयंकर बरं का!. का ते सांगते मग, पण आता आधी आताचं सांगते. माझ्या मनात विचार आला मात्र मी दूर्लक्ष केलं. वाटलं बोलला असेल बाई, परिक्रमा वासींची सेवा करतात लोक, तसं असेल काहीसं.. पण तसं नव्हतं हं… तो जे बोलत होता ते तो करून दाखवत होता. “ मेरी देबी जी” मधल्या या “मेरी” शब्दाची मला जाम भिती वाटली… आणि घडलं ही तसच… अर्थात त्या साधू चा उद्देश काय होता ते मला माहित नाही, जस जसा वेळ जात गेला, तस तस माझी भिती वाढत गेली… असं काय होत होतं? ते सांगते पुढच्या भागात.
रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग ४
नर्मदे हर.
आम्ही राम घाट्ला पोह्चलो, त्या साधूनी सतरंजी लावून आमच्या साठी आडोसा तयार केला होता, तिथे आसन लावलं आणि आश्रमधारी साधूंनी आमच्या साठी चहा केला होता, तो चहा घेतला. आम्ही थकलो होतोच, शिवाय संध्याकाळ झाली तसा गारठा वाढला होता, त्यामुळे बराच आळ्स आला होता. चहाचा पेला विसळणं बाकी होतं “उठली की विसळते” असा विचार करून मी जरा वेळ बसून राहण्याच्या मूड मधे होती, तितक्यात तो साधू आला आणि माझा चहाचा पेला उचलून घेऊन गेला “ आप रहने दो देबी जी, मै हू ना आपकी सेवा मे” असं म्हणून माझा चहाचा पेला चक्क घासून आणला. बरं परिक्रमा वासींची सेवा करायची असेल त्याला असं म्हंटलं तर पित्रे दादांचा ही पेला त्यानी न्यायला हवा होता, तसं काही केलं नाही त्यानी. मी म्हणाले मग त्याला “बाबाजी हमारी इतनी सेवा मत किजीये, हमे नही अच्छा लगता, हमे पसंद नही है” त्यावर तो म्हणतो कसा “अरे देबीजी, मुझे तो शंकर जी ने खास आपके लिये भेजा है, आदेश है मुझे आपकी सेवा करने का, करने दीजीये”.
काय करावं मला खरच कळेना, कारण ह्याची सेवा फ़ारच जास्त होत होती. मला संकोच होणं बंद झालं होतं, आणि आता काळजी वाटू लागली होती, “ इतकं काय याला प्रेम उतू जातय माझ्याबद्दल?” संध्याकाळी जे झालं नं त्या नंतर तर मी जाम घाबरले! आणि रात्री तर अक्षरश: हादरले! भोजन प्रसादी चं बघायचं म्हणून मी आश्रमधारी साधूंना विचारलं. ते म्हणाले “आप बना लो”.. मी स्वयंपाक करायला घेतला तसा हा साधू धावत आला, माझ्या हातचं सामानच ओढू लागला..”मेरी देबीजी, पाप कराओगी मुझसे क्या?, बैठ जाओ यहा चूपचाप से”.. अहो हा माणूस चक्क मोठ्या आवाजात दरडावलाच मला! त्या वेळी त्याच्या त्या आवाजाची भिती वाटली.. मी ती दाखवली नाही पण मनातून वाट्लं “काय वीचार आहे याचा नक्की? मेरी देबीजी, मेरी देबीजी करतोय, हवय काय याला? अर्थात माईवर विश्वास होता त्यामुळे काही वेडं वाकडं होणार नाही हे माहित होतच, पण आता मला उद्या इथून पळून जायचं होतं.
हा तर स्वयंपाकाचा भाग, मला आग्रहानी त्याचं ते वाढणं काय, आधी मला काय हवं नको ते बघणं काय, अहो कहर तर तेव्हा झाला जेव्हा माझा शेवटचा घास मी हातात घेतला.. मी अजून माझा शेवटचा घास तोंडातही ठेवला नाही तसं या साधूनी माझ्या समोरचं ताट ओढून घेतलं आणि धुवून आणून दिलं. “देबीजी, आपको बाहर हो आना है?” भैया जी, देबी जी को बता दिजीये किधर तरफ़ जाना है” त्यानी पित्रे दादांना ओर्डर दिली. नशीब माझं की इथे तरी तो स्वत: आला नाही. मी बाहेर जाऊन फ़्रेश होऊन आली. पायावर पाणी घेतलं तशी चार फ़ूट वर उडाले. बादलीतल्या पाण्यात बर्फ़ाची लेयर तयार झाली होती. माझ्याकडे पाहात तो साधू मोठ्यांदा हसला, म्हणाला “इसीलिये तो आपकी थाली हम धोकर के लाये थे, मेरी देबी जी, हमे आदेश है, आपको कोई कष्ट नही होने चाहिये. स्वयं शंकर जी ने हमे आपके लिये भेजा है, हमारे साथ रहोगी तो कोई तकलीफ़ आपके पास तक नही आयेगी”… “बाई गं..त्या शंकर भगवानांना म्हणावं आता बस करा बाबा”.. पण आपण ठरवतो तसं होतं का काही?
मी झोपायला म्हणून आडोस्याकडे गेले, बघते तो माझं आसनच नाही तिथे! आतून, म्हणजे खोलीतून आवाज आला “अरे मेरी देबीजी,ठंड से आपकी क्या हालत होती है देखा है हमने, आप यहा अंदर सोयेगी.” आता म्हणजे कमाल.. मी कुठे झोपायचं हे ही तो ठरवणार? आता मी घाबरलेच होते, आणि खरं सांगू का मला त्याचा राग ही आला होता. “नही मै बाहर ठिक हू, आप सो जाईये अंदर” मी उत्तरले.. त्यावर तो म्हणतो “मेरी देबी जी, मै साधू हू, मुझे ठंड, धूप बारीश से कोई डर नही, मै तो बाहर ही सोऊंगा.. आप चैन से सोईये अंदर, कुंडी लगा लिजीयेगा” माझा जीव जरा भांड्यात पडला, तसं अजून धीर करून मी पित्रे दादांना पण खोलीत आसन लावायची विनंती केली. आता मी, पित्रे दादा आणि आश्रमधारी साधू असे आम्ही तिघे जण खोलीत झोपणार होतो. किस्सा इथेच संपत नाही हं, तो साधू जरा वेळ तिथे खोलीतच बसला. त्यानी पित्रे दादांशी जरा वेळ गप्पा केल्या..मी मात्र एकही शब्द बोलले नाही, कधी एकदा हा बाहेर जातो आणि मी झोपते असं झालं होतं मला.. अरे हो, संध्याकाळ्च्या वेळ्चा एक अजून किस्सा सांगायचा राहिलाच. आम्ही पूजा केली त्यावेळी जे रोजचे श्लोक असतात ते म्हणून झल्यावर आश्रमधारी महारांनी दत्त बावनी म्हंटली. मला ती पाठ येत असल्याने मी पन म्हणत होते, हा साधू माझ्या समोर येऊन बसला मांडी घालून! त्यालाही दत्त बावनी येत होती, म्हणू लागला माझ्याकडे बघत बघत…पण एक सांगते, त्याची नजर स्थीर आणि खोल होती हे नक्की, ती वाईट नक्की नव्हती हे त्या वेळी मला जाणवलं. आता ही माझ्या दत्तगुरुंची कृपा म्हणा किंवा खरच त्या बाबाच्या मनात वाईट काही नसेल असं म्हणा, पण माझी भिती कमी झाली, राग काही कमी झाला नाही.
हो, एक किस्सा अजून आहे. आम्ही पूजेला बसायच्या आधीचा.मी अनवाणी चालत असल्यामुळे माझ्या पायाला दगडं बोचत होते. अजून सवय नव्हती झाली त्यामुळे थोडा त्रास होत होता. मी पायाला तेल लावत बसले होते. हा साधू आला आणि माझा पाय खसकन ओढून तळपायाला तेल लावलं. मी ओरडले त्याच्या अंगावर जोरात “ऐसे कैसे हाथ लगा रहे हो हमे आप? बिल्कूल दूर रहिये हमसे” तर तो तितक्याच शांतपणे म्हणाला “देबी जी, मा हो आप मेरी, मेरी जगह आपके चरणो मे ही तो है, गुस्सा मत होना मेरी मैया…मै तो तेरा बच्चा हू” मी ओरडल्याचा एकच फ़ायदा झाला की त्यानी माझा पाय सोडला आणि तो मागे सरकला… पण हा काही सांगून ऐकणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. रागावून चिडून काही होणार नव्हतं. आजची रात्र संयमाने काढून उद्या याच्यापासून पिच्छा सोडवून घेणं हेच योग्य होतं. हा साधू एकतर इथेच थांबो उद्या नाही तर निघून जाओ मात्र आमच्या सोबत राहू नये यानी अशी प्रार्थना मी मैयाला करत होते. तो मात्र एकच पालूपद लावत होता “मेरे साथ रहोगी तुमको कोई कष्ट नही होने दुंगा.. आदेश है मुझे, शंकर भगवान का”…. मात्र मग पूजा झाली त्या वेळी समजलं होतं मला की याची नजर वाईट नक्की नाहीये ते…तरीही हो, आपल्या इतक्या मागे पुढे करावं कुणी हे असह्य होत होतं मला.
आता झोपतानाची गोष्ट सांगते. तर तो आपला बसलेला. आणि तो जाईल याची वाट बघत मी बसलेली. बराच वेळ झाला तरी हा जाईना, आणि मला काही तो तिथे असताना अंग टाकायचं नव्हतं..पण पुन्हा तेच… आपण ठरवतो तसं होत नाही. बोलता बोलता तो माझ्याकडे वळला “ अरे मेरी देबी जी….” मला आता हे शब्द ऐकले की कसंसं व्हायला लागलेलं.. पण त्याला काय त्याचं? त्याचा पट्टा सुरू.. “अरे मेरी देबी जी सो जाओ अब, कितना देर जागोगी? हमे भी तो जाना है सोने? … म्हणजे हा माझ्या झोपण्याची वाट बघतोय?..” आप जाईये, हम सो जायेंगे”.. मी उत्तर दिलं.. “अरे मेरी देबी जी, ऐसे कैसे जाये, ये देखिये कितनी मोटी दरी लाया हू आपके लिये, आप लेटीये, अपनी चादर ओढीये, उपर से इसे ले लीजीये, बिलकुल ठंडी नही लगेगी…आप को चैन से सोता देखूंगा तब तो सो पाऊंगा!” म्हणजे ह्यानी मला अंगाई गायचीच बाकी ठेवली होती आता.. “जी मे ले लुंगी” असं म्हणत नाईलाजाने मी माझी चादर पांघरली, पण याला धीर नाही अजिबात.. मी माझी चादर पांघरून घेत नाही ते यानी ती जाड सतरंजी माझ्या अंगावर पांघरली. फ़र असलेली ती जाड सतरंजी इतकी ऊबदार होती की त्या रात्री मला जराही थंडी वाजली नाही हे ही खरं..मला ती संतरजी पांघरून दिल्यावर त्याच्या चेह-यावर खूप समाधानचे भाव दिसत होते. “ मेरी देबीजी, आराम से सोना, आराम से उठना, कोई जल्दी नही है… अब मेरी देबी जी को जरा भी तकलीफ़ नही होगी” असं म्हणत तो आनंदानी बाहेर गेला.
तो तिकडे बाहेर आनंदानी झोपला असेल पण मी मात्र खूप मोठ्या कोड्यात होते. काय नक्की प्रकार आहे हा हे काही मला समजेना. इतका आनंद, इतकं समाधान कसं काय मिळावं याला माझी सेवा करून? माझ्यात हा ज्या मैया जी ला बघतोय ती मैयाजी मी नाहीये हे मला समजत होतंच! मी त्याची ती मैयाजी नाही तर असं काय पाहिलं यानी माझ्यामधे? आता तर मलाच शंका येऊ लागली.. वाटलं मीच तर या अवलीया ला ओळखत नाहीये असं काही आहे का? काय संदेश देऊ पाहतेय मला मैया? काही काही कळत नव्हतं. छान उबदार पांघरूणात मला झोप लागली. बिचारे पित्रे दादा मात्र कुड्कुड्त होते..अगदी तिथेच, त्याच खोलीत… काय पण न मैया ची योजना असते काही समजत नाही.एकाच खोलीत असलेल्या आम्हा दोघांच्या वाटेला परस्पर विरोधी परिस्थिती आली होती. मला ऊबदार पांघरूण आणि पित्रे दादांना थंडी! काय बोलावं?
सकाळी उठले ते खोलीत मी एकटीच होते..खरच खूप बरं वाट्लं, पण लगेच “बेड टी” असं म्हणत साधू महाराज आले. त्यांनी चहा दिला, मी घेतला.. पण आता माझ्या मनात त्यांच्या बद्दल राग नव्हता. जे आहे ते आणि तसं मी स्वीकारलं होतं. आता फ़क्त एक वाटत होतं मला. माझी इतकी सेवा कुणी करावी ही माझी लायकी नाही, तशी माझी सवय ही नाही आणि म्हणून त्या साधू महाराजांचं माझी अशी सेवा करणं मला असह्य होत होतं. आमचं आवरून झालं, आता निघायचं.. साधू महाराज पण तयार.. “देबी जी, अब तो आपको लेकर ही जाउंगा.. चलो मेरे एक परिचित है, उनके यहा भोजन करवाउंगा” आता हे महाराज आमच्या सोबत येणार.. कठीण आहे.. पण इलाज नाही. तसं ही माझी चाल अगदीच हळू, कारण मी अनवाणी.. पित्रे दादा माझ्या सोबतीने चालणार हे माहित होतं.. साधू महाराज थोडं पुढे चालत होते… थोड्या वेळाने मी पित्रे दादांना “ चहा हवा होता” असं म्हणाले…” इधरसे आना देबी जी” म्हणत त्या साधू महाराजांनी आम्हाला गावा कडच्या दिशेला वळवलं आणि आम्ही पोह्चायच्या आत चहा आणि फ़रसाण ची सोय केली देखील! आणि पुन्हा त्या महाराजांचं ते वाक्य.. “अरे मेरी देबी जी, मेरे साथ रहोगी तो आपको कोई कष्ट नही होने देउंगा…आदेश है मुझे, शंकर भगवान ने आपके लिये ही तो भेजा है”..
“हो बाबा, खरय.. चला आता..” आम्ही पुढे निघालो आणि इतक्यात माझ्या पायाला खडा बोचला. तो खडा जरा टोकदारच होता, जीव कळवळला माझा..आणि हो त्या साधू महाराजांचा ही जीव कळवळलाच.. “ हे हे हे..हा हा हा.. लग गया रे पैर मे, मेरी देबी जी को लग गया रे” मी जितका आक्रोश केला नाही तितका त्या साधू महाराजांनी केला.. आणि आता ते माझ्याकडे हट्ट करू लागले “देबी जी, चप्पल पहनो” मी एक दोन दा त्यांना नाही म्हणून सांगितलं, आणि तिस-यांदा मी त्यांना चक्क धमकी दिली. “ अभी तक ठिक था बाबाजी, चप्पल पहनने के लिये कहोगे तो हम आपके साथ चलेंगेही नही…बोल दिया तो बोल दिया बस, आप चले जाओ, हमको हमारे स्पीड से आने दो.. आणि काय आश्चर्य माहितिये का, ते साधू महाराज चक्क “ठिक है” असं म्हणाले. मला तर वाटलं होतं की आता माझं भांडण च होईल.. पण त्यांना माझी सेवा करायचीच होती.. “मी सोबत चालणार नाही” ची धमकी हा उपाय रामबाण ठरला.. आणि मी तो आता अधुन मधून वापरू लागले..पण फ़ार काळ ही युक्ती कामी आली नाही.
अनवाणी चालत असल्याने अधुन मधून खडे बोचणं मला अपेक्षित होतं, आणि मी आह ऊह केलं की साधू महाराज चपलेचा विषय काढणार.. ते टाळायचं असेल तर तोंड दाबून बोचलेला दगड सहन करायचा.. हळू हळू जमू लागलं ते ही मला, पण प्रत्येकच वेळी असं होत नाही. पुन्हा एकदा एक दकड रुतला तो पायातून निघेच ना.. अस्सा जीव कळवळला म्हणून सांगू.. मी कळ्वळले तसं साधू महाराज धावत आले. माझ्या पायातला दगड ओढून काढला. रक्त लागलं नव्हतं पायाला, नुसताच चिकटुन बसला होता तो दगड मासात. मी उभी होते आणि साधू महाराज माझ्या पायाशी, मातीत, कशाचीही पर्वा न करता बसलेले, माझा पाय चोळत.. मला बरं वाटलं तसं वर माझ्याकडे बघत ते म्हणाले “क्यू अपने आप को तकलीफ़ देती हो देबी जी ?” त्यांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहात होत्या.. ते म्हणाले “ठिक है, नही पहननी है न चप्पल तो ये लो, मेरे हाथ पर पैर रख के चलो आप तो.. अब मै आपको जमीन पर पैर ही नही रखने दुंगा!”.. आता मला सुचेनासं झालं होतं…. काय हे प्रेम? काय ही सेवा? काय म्हणू मी नक्की?… मी आता मैयाला साकडच घातलं… “ माई गं.. काय आहे नक्की तुझ्या मनात? का करतेय्स असं? नाही बघवत मला हे असं या माणसाचं माझी सेवा करणं? कुठला गं खेळ तुझा? तू जर आज च्या आज याला दूर केलं नाहीस न, तर मी अन्नत्याग करेन…हा दूर जाईपर्यंत एक कण देखिल खाणार नाही”… आता पुढे काय.. माझं त्या मैयाला सारखं विनवणं सुरूच होतं….
कसं बसं मी साधू महाराजांना समजवलं आणि “ज्यादा तकलीफ़ हुआ तो पहन लुंगी चप्पल” असं सांगितलं. त्यांना थोडं पुढे चालायला सांगितलं आणि मी मागे चालत राहिले… मग कय झालं पुढे? मी उपाशी राहिले? किती दिवस राहिले मी उपाशी? का मैयानी ऐकलं माझं साकडं? साधू महराजांचं काय झालं पुढे?..सांगते.. पुढच्या भागात.
नर्मदे हर
रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग ५
नर्मदे हर.
मागच्या भागात मी तुम्हाला माझी सेवा करणा-या साधू महाराजांबद्दल सांगत होते. मला आता ते सेवा करणं असह्ह्य झालं होतं. साधू महाराज हानिकारक नव्हते तरीही मला आता सेवा नको होती आणि “आता तू ह्या साधू महाराजांना दूर कर” असं मी मैया ला साकडं घातलं होतं. आता इथून पुढे काय झालं ते सांगते.
तर आम्ही मागे आणि साधू महाराज पुढे असं जात होतो. आम्ही मागे दिसू अश्या अंतरावर ते चालत होते. ते थांबले की आम्ही पण थांबून विश्रांती घायायचो… म्हणजे उगाच बोलायला आणि सेवेला वाव च द्याय्चा नाही असं मी ठरवलं. त्या साधुच्या ते लक्षात आलं की नाही माहित नाही मात्र मध्ये मध्ये हाक मारून ते “सब ठीक है ना देबी जी” असं विचारायचे. आम्ही पण हो म्हणून उत्तर द्यायचो. मध्ये एक दोन दा चहा साथ म्हणून त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं तेव्हा मात्र आम्हाला जावं लागलं, कारण अन्नाचा अपमान करणं योग्य नव्हतं. साधू महाराजांनी पुन्हा सेवा देण्याचा प्रयत्न केलाच पण आता मी पण हट्टाला पेटले होते. सेवा घ्यायची नाही म्हणजे नाही. मग काहीही होऊ दे तिकडे. आणि बहुधा ते साधू महाराज पण हट्टाला पेटले होते. सेवा करायचीच. मग जे वाट्टेल ते होऊदे तिकडे. मग कधी न मागता चहाच बोलवा कुठून तरी, कधी शेव फरसाण च आणून दे, कधी उगाच बातालीताल्म पाणी रिकामं करून “ ताजा पानी पियो न देबी जी” करत गाच आमच्या बाटल्या नेऊन भरून आण असे त्यांचे प्रयत्न चालू होते. शीत युद्ध असावं असं वाटत होतं, आणि मैयाला मी साकडं घातलेलं.. आजचा दिवस कसा संपतो आता याकडे सगळ लक्ष लागलेलं..
ते पुढे आमी मी मागे. बराच अंतर मध्ये ठेऊन, हा प्रयोग सुरूच होता. करत करत आम्ही गारका मट्टा च्या पुढे आलो. इथे छोटे छोटे कसबे आहेत. त्यातलं एक म्हणजे भीमकुंडी. या परिसरात दोन भीमकुंडी, दोन बंजर टोला, आणि दोन रामघाट आहेत. हे दुसरं भीमकुंडी माल.. आम्ही इथे पोचण्याचा आधी एकदा पुन्हा साधू महाराज आले. “माताजी चप्पल पाहन लो. अभी और ५ किमी है आश्रम” मी अवाक्षर बोलले नाही. मग ते साधू स्वत:च म्हणाले “मी जाकर व्यवस्था देखता हु”… आणि ते पुढे गेले. आम्ही अजून गावात पोहचलो नव्हतो मात्र गावाबाहेर जे शेतं असतात तिथपर्यंत आलो होतो. सीताराम आश्रम गावापासून ५ किमी दूर होता आणि गाव किती दूर आहे अजूनही आम्हाला माहित नव्हतं पण २ ते ३ किमी असावं. आम्ही हळू हळू च चालत होतो कारण अनवाणी चालण्याची सवय अजून तरी मला झाली नव्हती. आम्हाला अजून ७ किमी चालनं बाकी होतं. तसे चारच वाजले होते. आम्ही २ तासात जाऊ शकत होतो, पण आपण जसं ठरवतो तसं होत नसतं.
आम्ही चालतोय, चालतोय तरी गाव यायला तयार नाही. एक तास होऊन गेला तरीही गाव अजून दूर दिसत होतं. आमच्या लक्षात आलं, गावात पोहोचेस्तोवरच आपल्याला अंधार होणारे. आपण आश्रामा पर्यंत जाउच शकणार नाहीये. त्यामुळे गावातच राहणं योग्य होईल. आम्ही हा विचार केला आणि आता आमची चालण्याची गती पण थोडी हळू झाली कारण आता आम्ही गावातच राहणार होतो.तरी साधारण अर्ध्या तासात आम्ही गावात पोहोचलो. इथे आलो आणि मैयाला भरभरून धन्यवाद दिला. का माहितीये? साधू महाराज पुढे आश्रमात निघून गेले होते. ते इथे गावात थांबले नव्हते. आणि आता अंधार होत आला असल्याने आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. मैयानी माझी मागणी पूर्ण केली होती. आता फक्त उद्या ते आमची वात बघत तिथेच थांबू नयेत म्हणजे मिळवली. चला आता गावात कुठे राहता येतंय ते बघू.
आम्ही ज्या चौकात आलो होतो तिथेच एक शाळा होती. नळ होता, लाईट होते.वाटलं इथे सोय होईल. पण शाळेची किल्ली उपलब्ध नव्हती. मग आता काय करायचं? मग आम्ही सरपंचां कडे जायचं ठरवलं. बरच अंतर चालून म्हणजे अख्खा गाव पार करून आम्ही सरपंचां कडे गेलो तर त्याच्या घराला कुलूप! आता गावातल्या लोकांना विचारलं कुठ राहता येईल? तर एका गृहस्थाने एक शेड दाखवलं. ते अगदीच अस्वच्छ होतं हे एक आणि तिथे आम्हाला खूप थंडी वाजली असती हे दुसरं. ती ही जागा फायनली ठरवता आली नाही. आता गावातले लोक जमू लागले. कुणी काही सांगे तर कुणी काही..आणि त्यांचं आपसात एकमत होईना. मग कुणीतरी म्हणालं, “मैया किनारे एक खोली है, वहा एक बाबा राहता था. वो किसीसे बात नाही करता था. अपने खोली मे दरवाजा बंद करके बैठा राहता था. देख लो अगर आपको ठीक लागे तो”. त्याच्या बोलण्यात मला ती जागा ठीक नसावी असा काहीसा वास आला. तरी आता पर्याय नाही. त्यांच्यातलाच एक आम्हाला पुन्हा एकदा अक्खा गाव ओलांडून नदी किनारी घेऊन गेला. त्या खोलीला टीणाचं दार होतं. खोलीबाहेर एक शेड होतं आणि त्या शेडमध्ये चूल होती. खोली बघून निदान आडोसा मिळाल्यासारखं वाटलं. एव्हाना अंधार झाला होता. खोलीचं दार उघडून मी आत डोकावलं आणि मोबाईल चा टाँर्च सुरु केला तशी मी उडालेच. त्या खोलीत हळद. कुंकू. गुलाल, बुक्का यांचे ढीग रचून ठेवले होते. पोळीचे वाळके तुकडे पडलेले होते. अर्धी लिंब वाळून काळी पडलेली होती. मी इथे राहणार नव्हतेच. पण करायचं काय? मला त्या साधु चं ते वाक्य आठवलं… “देबी जी मेरे साथ रहोगे तो कोई दिक्कत नाही आयेगी”.. पण दुस-राच क्षणी समोर वाहणा-या माझ्या मैयांनी मला धीर दिला. होईल सोय… आणि झाली!.. सांगते कशी ते..
जो माणूस आम्हाला घेऊन आला होता त्यालाच आम्ही विचारायला सुरवात केली. बोलता बोलता तो म्हणाला “मै इस गाव मे नही रहता, नाही तो अपने घर ले जाता”.. मग तो आत्ता रात्री आपल्या गावात जाणार का विचारलं तर म्हणे नाही, इथे तो आटा चक्की मध्ये झोपेल. आम्ही फारच खुश झालो “ हम भी अगर वही आये तो कोई दिक्कत है क्या”… आम्ही तिथे झोपू शकणार नाही अस्म त्याला वाटत होतं. आम्ही म्हम्ताल्म बघू तरी देत आम्हाला.. नाही आवडलं तर झोपू त्या गावातल्या शेड मध्ये, काही उपाय नाही.. अस्म किती वेळ भरकटत फिरणार? आम्ही त्या शेड च्या बाजूनीच जात होतो, तेव्हा तिथे आसपास लाकडं आहेत हे आम्ही पासून ठेवलं होतं. म्हणजे रात्री शेकोटी पेटवून झोपायचं झालं तर साधन होतं. आता एकतर चक्की नाहीतर शेड.. दोन पैकी एक, बस.. भोजन प्रसादिचा इतका प्रश्न नव्हता कारण गावकरी तसे सेवा भावी लोक होते. थंडी हा एकमेव प्रश्न असणार होता… जशी मैयाची इच्छा, आम्ही त्या माणसासोबत चक्की बघायला गेलो.
चक्की मध्ये सगळीकडे पिठाचे ठार साचले होते. गिरणी मशिनच्या आजूबाजूला बरच सामान पसरलेलं होतं. खूप पोटी ठेवली होती आणि काही लाकडाचे तुकडे पडलेले होते. त्या तुकड्यांना डोक्याशी घेतलं तर आम्ही दोघं ही व्यवस्थित झोपू शकू एवढी जागा होती मात्र ती साफ करून घेणं गरजेचं होतं. हो, एक मात्र खरं, गिरणी चारही कडून बंद होती. तिला एकही खिडकी नव्हती फक्त एक दार होतं.. म्हणजे थंडी फक्त दारातूनच आत येणार, आणि हे दार आम्ही ठरवलेल्या झोपायच्या जागेपासून हे ब-यापैकी दूर होतं, म्हणजे थंडी वाजणार नाही. आम्ही झाडू मागितला, तसा तो माणूस म्हणाला, “आप चाय पियो तब तक मी जागाह साफ करके देता हु, अगर पहले पता होता की आप चक्की मी भि रह लोगे तो आपको भटकने ही नही देता”. त्यांनी गरमा गरम काळा चहा आणून दिला. आमच्या जवळ पारले जी चा एक पुडा होता, तेच आमचं जेवण झालं, कारण वणवण करून आता आम्ही थकलो होतो. चक्कित आत गेलो तर त्या माणसाने जागा अपेक्षेपेक्षा खूपं साफ केली होती. खाली पोते अंथरले होते, त्यावर एक सतरंजी पण घातली आणि मग आम्ही आमचं अंथरून अंथरल. पण आमच्या अंथरुणा पाम्घारुनाने थंडी जाणार नव्हती. पण मैया नी आमची सोय आधीच करून ठेवली होती.
रात्री गावाचा सरपंच परतला. त्याला आम्ही वणवण फिराल्याची वार्ता समजली. तो आम्हाला भेटायला चक्कीपाशी आला. जेवणाचा दाबा पाठवू का म्हणून विचारलं, काय सेवा करू सांगा असा आग्रह धरला, माझ्याच घरी चला अस्म ही म्हणाला, पण आम्ही आसन लावलं होतं.. आम्ही त्याला सहज शक्य असेल तर पाम्घारायाला काही देता आलं तर द्या असं सांगितलं. त्यांनी आम्हाला ४ रजया आणून दिल्या. ती रात्र देखील व्यवस्थित गेली. अशा प्रकारे साधू महाराजांपासून सुटका झाली.
दुस-या दिवशी सीताराम बाबांच्या आश्रमात गेलो. हा आश्रम ५ नाही चांगला ७ किमी दूर आहे गावापासून. म्हणजे काल आम्ही जाऊ शकलो नसतोच. बरं झालं थांबलो. इथे ते साधू महाराज थांबलेले नव्हते, ते पुढे निघून गेले असावेत. अखंड रामायण सुरु असतं इथे, आम्ही ही तासभर त्याचं वाचन केलं.. खूप प्रसन्न वाटलं. अरे हो, एक गम्मत तर राहिलीच सांगायची. गावातून या बाबांबद्दल जी माहिती मिळाली ती अशी होती की हे बाबा इथे आजकाल येत नाही. ते अमरकंटक ला असतात. इथे त्यांचं दर्शना होणं म्हणजे भाग्य. दुसरं अस्म समजलं की बाबा अमरावती चे, म्हणजे आपल्या विदर्भातले आहेत, आणि अचानक माझ्या आईनी सांगितलेल्या सीताराम बाबांची गोष्ट आठवली. माझी आई अमरावतीची. माझी आई तरुण असताना तिची भेट सीताराम बाबांशी झाली होती. तिनी तिच्या मनातले प्रश्न विचारले असता “तेरा सब कुशल मंगल होगा बेटी” असं ते म्हणाले होते. माझ्या पहिल्या परीक्रमे नंतर मी आईला जेव्हा सियाराम बाबांच्या दर्शनाला घेऊन गेली होती तेव्हा आईला सीताराम बाबांची खूप आठवण झाली होती आणि त्यांचं वर्णन तिनी मला सांगितलं होतं, आणि आता पायी पायी चालताना मी विचारच करत होते की ते सीताराम बाबा हेच तर नाही? त्यांची भेट झाली पाहिजे. त्यांचं दर्शन घेता आलं पाहिजे असाच मला वाटत होतं. आम्ही आश्रमापासून ५०० मि. वर असू. तोच आश्रमातून एक कार निघाली. मला काय वाटलं माहित नाही, मि कार थांबवली आणि ती थांबली. आत समोर ड्रायवर च्या बाजूला बाबाजी बसले होते. माझं दर्शन झालं होतं… मी नागपूरची आहे त्यांना सांगताच त्यांनी अमरावती चा विषय काढला. मी माझ्या आई बद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले, ते माझे गुरु. मी सीताराम बाबा नाही. मी त्यांचा शिष्य आहे. मात्र आईनी सांगितलेल वर्णन तंतोतंत जुळत होतं. या महाराजांच वय शंभरी पलीकडे होतं नक्कीच, आणि आईच्या सीताराम बाबांचाही तसच… मला नाही माहित ते नक्की कोणते महाराज होते पण एक नक्की, मला ते आईच्या सीताराम बाबांसारखेच वाटत होते. माझ्या दृष्टीनी मला सीताराम बाबांचं दर्शनच झालं होतं.
इथून पुढे आम्ही निघालो दुपारच्या भोजन प्रसादी नंतर पुढे निघालो. इथून सगळा रस्ता मुरुमाचा. पण गम्मत म्हणजे पायाला खाडी बोचेनात आता.सवय झाली असावी. किना-यावरच्या प्रवासाची नाम एक मजा आहे. आपलं देस्तीनेषण आपल्याला समोर दिसत असतं अगदी पण जावं म्हटल तर ते फार दूर असतं. सांगते. इंग्रजी एस अक्षराची कल्पना करा. त्याच्या खालच्या टोकापासून वरच्या टोका पर्यंत एक सरळ रेषा ओढा. हा झाला रस्ता मार्ग. थोडं अंतर चालून देखील आपण पोहचू शकतो जर आपण सरळ मार्गांनी गेलो तर, आणि आता कल्पना करा एस अक्षरावरून आपण चालतोय अशी. म्हणजे जशी मैया गेलीये तसाच वळून वळून जाणारा हा मार्ग. शिवाय रस्ता मार्गावर डांबरीकरण किंवा निदान पाउलवाट तरी असते, इथे शेतं तुडवत जावं लागतं. दगडा पेक्षा जास्त जोरात मातीच बोचते मी म्हंटल तर विश्वास ठेवाल का? पण खरं सांगतेय.. मातीची ढेकळ खूप टोकदार असतात. त्यांच्या आत बरेश काटे असतात आणि आपण पाय दिले की ती फुटतात आणि त्यावेळी इतकी जास्त बोचतात न की जीव कळवळतो. तर असा रस्ता पार करून जायचं होतं बंजर टोला इथे. असा समोर दिसत होता हा कसबा पण आमच्या आणि त्याच्या मध्ये नर्मदा माई नी दोन मोठी वळणं घेतलेली. अगदी किना-यावरून रस्ताच नाही, थोडं वरून चालावं लागतं इथे, आणि विचारावं कुणाला तर चिटपाखरू पण नाही. आम्ही संध्याकाळ पर्यंत पोहोचतो की नाही असं वाटत होतं…. मध्ये एक संगम लागतो तो ओलांडताना पण जरा मजाच आली. त्या नदीचं नाव विसरलेय मी.. पण सांगेन आठवलं की.. सिवनी संगम नाही हा हे नक्की, तो नर्मदा टोला च्या पुढे… असो.. तर बंजार टोला मध्ये आम्ही जिथे राहिलो ती पण एक मजाच आहे. रात्रभर आमच्या सोबत अजून कुणीतरी होतं त्या आश्रमात…न दिसणारं, पण जाणवत असणारं…सतत आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारं.. कोण? ते सांगते पुढच्या भागात.
नर्मदे हर
रेवा पर्व- खंड परिक्रमा, प्रथम खंड – भाग ६
नर्मदे हर.
तर मागच्या भागात मी तुम्हाला बंजर टोला बद्दल सांगत होते. मातीची ढेकळ तुडवत तुडवत आम्ही खूप सुंदर निलगिरी च्या झाडांशी पोहचलो. तिथून पुढे हा कसबा दिसत होता. इथे गेल्यावर मैया नी खूप लकबदार वळण घेतलंय. इथला आश्रम हा थोडा वरच्या अंगाला. त्यामुळे इथून मैया दिसते ती आश्रमाला वळसा घालून गेलेली. चंद्रभागा जशी पंढरी ला वळसा घालून गेलीये न तशी. त्यामुळे किती तरी वेळ नुसतं बघत राहावं असं हे ठिकाण.
आम्ही आश्रमात गेलो त्यावेळी तिथे एक म्हातारे साधू होते. ते म्हणाले इथे जी जागा आहे तिथेच राहावं लागेल. आश्रमात शिधा नाही भिक्षा मागून आणावी लागेल. गावात दुकान नाही, किंवा दूर आहे फार. चुलीसाठी लाकडं आणावे लागतील. आम्ही जागा पाहिली. दोन खोल्या होत्या. समोरच्या खोलीत एक धुनी होती त्याच्या बाजूला साधू महाराजांच आसन लागलेलं होतं, आणि त्यांच्या सेवाकाच आसन दुस-या बाजूला होतं. आतल्या खोलीत अडगळी चं सामान आणि बांधकामाचं सामान ठेवलेलं होतं. दार उघडेल न उघडेल एवढीच जागा होती. दारा च्या बाजूला खूप लाकडी फळ्या आणि खांब पडले होते. महाराजांकडे एकाच चटई होती. ती ही बरीच लहान. माझ्या जवळ हिटलो`न शीट असल्याने माझं भागणार होतं पण दादांना मात्र थंडी वाजणार होती. त्यात गम्मत अशी की दादांना सरपटणा-या प्राण्याची फार भीती वाटायची आणि इथला वातावरण त्यांच्या निवासाठी अगदी योग्य ठिकाण होतं. पण या सगळ्याकडे लक्ष न देता आम्हाला आधी पोटा पाण्याची सोय करणं आवश्यक होतं.
आम्ही गावाकडे निघालो तसं गावात कुठे राहता येईल का याची सोय ही बघू असं ठरवलं पण दर वेळी ते शक्य होत नाही. गावातल्या लोकांनी आश्रम बांधला आणि परिक्रमा वासी तिथेच राहाला हवेत अशी गावातल्या लोकांची धारणा होती आणि “ यहा तो कोई आता ही नही” म्हणून आश्रमाचा उपयोग अडगळीच्या खोलीसाराखाकेल्या जात होता. आमच्या सारख्या एकट्या दुकट्या येणा-या परिक्रमा वासियाला इथेच राहणं भाग होतं. आम्ही (परिक्रमा वासी) इथे ४ महिन्या नंतर आलो होतो म्हणे. आमच्या आधी इतक्या दिवसात इथे कुणीच आलं नाही. हे एक दुष्ट चक्र आहे असं समजलं. मी चितळे माई आणि बाबांना म्हणाले देखिल, “इतका सुंदर रस्ता आहे, का नाही जात किनारा मार्गाने लोक?” दोन उत्तरं आहेत. एक हा मार्ग लांबचा पडतो नं मैयाच्या वळणांमुळे आणि इथे सोयी नाहीत फारश्या. परिक्रमावासी येताच नाही तर सोयी कुणासाठी करायच्या?.. असो.. आम्हाला काही गावात जागा मिळाली नाही. शिधा मात्र मिळाला. आणि हो, आम्ही या गावात चक्क पांघरूणाची भिक्षा मागितली.. ती मिळायला त्रास झाला थोडा, पण मिळालीत शेवटी, तीन घरांतून मिळाली.
इतकं फिरून आम्ही आश्रमात परत आलो तेव्हा लक्षात आलं, लाकडं आणली नाहीत. आता अंगात त्राण नव्हते. शिधा होता पण करून खायचि ताकतच नव्हती. अशा वेळी पार्ले जी फार कामी येतात. चितळे मैमचे अनुभव ऐकताना त्या म्हणाल्या होत्या “मैया जी और पार्ले जी आपल्या सोबत कायम असतात” ते खरच आहे. आजही आम्ही पार्ले जी वर भूक भागवली. आता झोपी जाणार तोच मागची लाकडं खडबड खडबड वाजू लागली. त्यात नुकतेच दिवे गेलेले. मग मोबाईल चा लाईट सुरु करून आम्ही काय आहे ते शोधायचा निष्फळ प्रयत्न केला पण आमच्या हाती काही लागे ना’. असं दोन तीन दा झालं. मग ते जे काही होतं ते बरच धीट झालं होतं, कारण आवाज अगदी कानाच्या अवती भवती यायला लागला होता. उंदीर असावा बहुतेक असं वाटलं पण उंदरा एवढा लहानसा जीव इतका मोठा आवाज नाही हो करायचा..घूस असेल कदाचित.. आम्ही आपलं विचार करायचो, आणि डोक्यावर पांघरूण घेऊन झोपायचो. आमची रात्र तर अशीच गेली. सकाळी उठून पित्रे दादा आवारायाला लागलेमाझं आवरून झालं सहज म्हणून मी त्या रात्रीच्या साथीदाराचा शोध घेऊ लागले. मला जे सापडलं ते मि पित्रे दादांना आजवर सांगितलं नाहीये, आता जेव्हा ते हा लेख वाचतील तेव्हा विचारातील मला नक्की. मला एका लागडाखाली चांगली चार पाच फुट मोठी सापाची कात पडलेली दिसली. मात्र ती वाळलेली होती. म्हणजे ज्याची कात होती तो साप इथे नव्हता. असं म्हणतात सापाची कात असेल उंदीर आदी प्राणी येत नाहीत.. म्हणजे ते ही नसणार.. मग ते आवाज करणारं होतं तरी काय?… जाउदे रात गई बात गई.. मी जास्त विचार केलाच नाही..काल रात्री मागून आणलेल्या शिधाची खिचडी करून आम्ही खाल्ली आणि पुढे निघालो.
इथून पुढे मला कनक धारा ला जायचं होतं. त्यासाठी मला किनारा सोडावा लागणार होता पण तो नक्की कुठे सोडायचा हे समजत नव्हतं. अर्थात मला किनारा का सोडायचा आहे हे कारण ही तितकच महत्वाचं होतं. मी पहिल्या परिक्रमेत असताना या कनक धारा ला मी एका घरी थांबले होते. तो अनुभव थोडक्यात सांगते, तसा पहिल्या परिक्रमेच्या अनुभव मालिकेत तो येणारच आहे, तरीही इथे देते. आम्ही जागा शोधात होतो. त्यावेळी माझ्यासोबत तांबे बाबा होते. आमचे कपडे धुवून व्हायचे होते आणि आम्हाला एका ठिकाणी एक हापशी दिसली. आम्ही कपडे धुवायला घेतले. कपडे आधी भिजवून झाल्यावर जरा आराम केला तिथेच झाडाखाली. आज काही पुढे जायची इच्छा होईना म्हणून जागा बघू लागलो. तर एका घरातून एक २५-२७ वर्षांची मुलगी बाहेर आली. तिनी आम्हाला घरी बोलावलं. चहा पाजला, थोडं बोलण झाल्यावर म्हणाली “पम्प से पानी बहोत कम आयेगा, आप हमारे घर कपडे धो लीजिये, यहा नल है” आम्ही होकार दिला. मी कपडे धुवायला घेतले तितक्यात त्या मुलीची आई आली आणि मला कपडे धुताना पाहून म्हणाली “अरे मशीन निकाल देती मैया जी को”, असं म्हणत या मुलीला लग्नात देण्यासाठी घेतलेली नवीन कोरी मशीन काढली, तिचं पँकींग माझ्या समोरच उघडलं. आणि स्वत: आमचे कपडे धुवून दिले. त्यानंतर तिनी तिथेच राहण्याचा आम्हाला आग्रह केला. जेवताना तिने आमच्यासाठी खीर पुरी भाजी आणि मसालेभात असा स्वयपाक केला होता. आधी आम्हाला जेवायला वाढून मग त्या दोघी जेवायला बसल्या. घरची मंडळी जेवायला बसली तेव्हा त्यांनी खीर घेतली नाही, मी विचारलं कारण तर काहीच बोलली नाही मात्र , जेवण खाण सगळं झाल्यावर तीनी जे सांगितलं ते ऐकून माझे डोळेच भरून आले. तेव्हा समजलं, १८ दिवसा पूर्वी या मुलीचे वडील वारले होते. सगळं आटोपून कालच पाहुणे आपापल्या घरी गेले होते. मुलीचं लग्न लांबणी वर टाकलं होतं, घरच्यांनी गोड सोडलं होतं. फक्त आमच्यासाठी आज त्या घरी पक्वान्न शिजवण्यात आलं होतं… हे सांगताना त्या आई ला रडू आवरत नव्हतं.. ती माझ्या गळ्यात पडली, म्हणाली, “मेरे पती परीक्रमावासियोकी बहोत सेवा करते थे. कोई बाहर दिखा तो उनको हाथ पकड कर ले आते थे. एक रात हमारे घर ही रुकवाते थे, जब मेरे पती बिमार थे तब कहां करते थे, मेरे बाद परीक्रमावासियो की सेवा करना, उनके जाने के बाद आप ही पहले परिक्रमा वासी हो जो यहा आये हो”.. काय बोलावं मला सुचत नव्हतं, मी त्या माउली ला छातीशी धरून फक्त बसले होते, आणि मैयाला प्रार्थना करत होते की हे दु:ख पेलायची यांना शक्ती दे…
तर आता दुस-या परिक्रमेत जेव्हा मी त्याच भागातून जात होते तेव्हा त्या माउली च्या चेह-यावरचं सावर्लेपण मला बघायचं होतं. त्या मुलीला आपल्या सासरी नांदताना बघायचं होतं. मला त्या आई चा दर्शन घ्यायचं होतं जिनी आपल्या हृदयावरच ओझं दिवसभर आम्हाला जाणवू सुद्धा न देता आमची खूप सेवा केली. या माउलीच दर्शन घेण्यासाठी मला किनारा सोडून ५-७ किमी बाहेर यावं लागणार होतं. पण माझ्या नर्मदा माई ला ते चालणार होतं नक्कीच. कारण तिच्या भेटीची इच्छा मला नर्मदा माईनीच दिली होती न शेवटी. काही न बोलता निर्माण होणारी नाती असतात.. निस्वार्थ… त्या आईनी माझी सेवा केली ती ही निस्वार्थ, आणि आज मला तिची भेट घ्यायची होती त्या मागे ती आनंदी आहे पाहण्यात मला जे समाधान मिळणार होतं तोच माझा स्वार्थ होता. आणि यासाठी १२- १५ किमी चालून जाणं म्हणजे काहीच नव्हतं.
मी आणि पित्रे दादा तिथे गेलो. मागच्या वेळी पेक्षा मैया सावरलेल्या दिसत होत्या. बघता क्षणी त्यांनी मला ओळखलं. मला बघून त्या माउलीला खूप खूप आनंद झाला. आज इथेच राहून जा असा आग्रह ही तिनी केला पण अजून बराच दिवस बाकी होता. मुलीचं लग्न झालं होतं. तिला दिवसही होते. ती आपल्या घरी सुखात होती. मुलाला नोकरी लागली होती आणि तो ही समाधानी होता. या माऊलीनी काही क्लासेस लावून मन रमवण्याचा प्रयत्न केला होता. मुलांनी आईला नवा मोबाईल घेऊन दिला होता आणि ही माउली आपाल्याकडे आलेल्या परीक्रमावासी मंडळी चे फोटो काढून त्यातच आनंद मानत होती. एक व्हात्साप्प गृप पण तयार केला होता तिनी सगळ्या परिक्रमावासी मंडळी चा आणि या वेळी त्यात तिनी माझं ही नाव जोडलं. तिला आनंदी पाहून माझं मन खूप सुखावलं हे नक्की.
आता इथून आम्ही पुन्हा किना-याकडे गेलो. शिवाला घाट आणि रुद्राणी घाट करत माजिया खार ला आता आम्हाला जायचं होतं. इथे एक गम्मत झाली. माझ्या पायात एक काटा गेला. तो देखील बाभळी चा. हा काटा काही निघेना. अर्धा आत राहिला आणि अर्धा तुटून बसला, पण निघाला नाही. आता हा काटा अजून जर पायात राहिला तर एक म्हणजे तो बोचत राहील, आणि दुसरं म्हणजे पायाला इजा झाली तर मला पुढे ही परिक्रमा करता येणार नाही. त्यामुळे या काट्याला पायातून काढून टाकणं फार गरजेचं झालं होतं. माझ्याकडे जे होतं त्यांनी हा काटा काही निघेना. मला आता औषध घ्यावं लागेल की काय असं वाटू लागलं आणि म्हणून मी गाडासाराई ला जायचं ठरवलं. रस्ते माहित नव्हते, लोकांना विचारून विचारून आम्ही गाडासराई ला पोहोचलो, तिथे प्लकर विकत घेतलं. इथे नेटवर्क भरपूर असल्याने घरी फोन करून घेऊ असं ठरवलं. घरी फोनही झाले मात्र आता संध्याकाळ होत आली असल्याने तिथेच रस्त्यात असलेल्या एका आश्रमात थांबून उद्या मेजीयाखार ला जाऊ असं ठरवलं. आम्ही आसन लावून जेमतेम तासभर झाला असेल. मला माझ्या घरून फोन आला. माझा नवरा फोनवर होता “ अगं आज आई पडली. तिचे दोन्ही हात फ्रेक्चर झालेत, तिला खूप दम पण लागतोय” अरे बापरे. दुपारीच तर मी माझ्या माझ्या सासूबाईंशी बोलले होते. तेव्हा ब-या होत्या त्या.. पण आता काय करायचं? घरी जाणं तर आवश्यक होतं च.. म्हणजे माझ्या पायात काटा का गेला आणि तो का निघाला नाही हे मला समजलं. मी नेटवर्क झोन मध्ये राहावं म्हणून हा सगळा खेळ मैया नी मांडला होता. मला परिक्रमा सोडून घरी जाणं भाग होतं. ती माझी जबाबदारीच होती. निर्णय पक्काच होता. आता फक्त कसं जायचं ते ठरवणे बाकी होतं.
तिथले साधू महाराज मी आणि पित्रे दादा, सगळी हालचाल करू लागलो. सकाळी ४ वाजताची बस आहे असं समजलं. मी रात्रीच माझं सगळं सामान बांधून घेतलं. माझ्या जवळची झोपण्याची शीट आणि पांघरूण मि पित्रे दादांना दिलं. थंडीमुळे बचावासाठी ते त्यांच्या कामात येणार होतं. सकाळी पाच च्या बस नी मी अमरकंटक आणि तिथून पुढे जबलपूर ला गेले. मला रस्त्यात काहीही त्रास झाला नाही. जणू माझ्या साठीच बसेस लागून तयार होत्या, इतक्या सहज मला त्या मिळाल्या. माझ्या वडिलांनी जबलपूर नागपूर चं तिकीट काढलं आणि ते ही मिळालं हे विशेष. मी त्याच दिवशी रात्री एक वाजता नागपूर ला येऊन पोहोचले. माझ्याकडे परीक्रमेचे म्हणून फक्त पांढरे कपडेच होते, कारण आता मी इंदोर ला असते, त्यामुळे नागपुरात फक्त घरी घालण्याचे एक दोन ड्रेसेस च ठेवले होते, आणि आता आईंना घरी ठेवून मला बाजारात जाऊन कपडे घेणं ही शक्य नव्हतं, पण तिची जी इच्छा तेच होतं. माझ्या नवा-याने माझ्या दिरासोबत माझे कपडे आणि सामान नागपूर ला पाठवलं आणि आईंच्या आजारपणात जानेवारी आणि फेब्रुवारी महिने पूर्ण गेले.
माझा पहिला खंड डिसेंबर २०१८ मध्ये सुरु होऊन जानेवारी २०१९ मध्ये संपला. ११ मार्च २०१९ ते २८ मार्च २०१९ असा दुसरा खंड पण झाला आहे. आता तिस-या खंडाला जाण्याची इच्छा आहे. कधी योग येतात माहित नाही मात्र दुस-या खंडातील अनुभव मी तुम्हाला लवकरच सांगेन.
नर्मदे हर
सुरुचि नाईक