अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल मराठे - 1 - 50
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल मराठे - 1 - 50
अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल वसंत मराठे - 1 - 50
कशी सुरवात करू काही कळत नाही पण मला असे वाटते की नर्मदा परिक्रमा असे म्हणण्यापेक्षा माईचे प्रेम आणि निसर्गसौंदर्याच्या उधळणीचा आलेला अनुभव असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. लिहिणे हा माझा काही प्रांत नाही पण मैयाच्या प्रेमामुळे केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रथम माझ्या गुरुमाऊलीला वंदन करून त्या जे काही सुचवतील ते आपल्यासमोर मांडतो...
नर्मदा परिक्रमा अनुभव १ –
सगळ्या रामसेवकांना ही नमंस्कार करतो कारण आपण माझ्यापेक्षा खूप जाणते आहात त्यामुळे माझे हे साधे साधे अनुभव तुम्ही समजून घ्याल. स्त्रीशक्तीबद्दल आपण खूप वाचतो ,ऐकतोही काही वेळा हसण्यावरी नेतो म्हणतो काय आहे एवढे त्यात ,पण मला आलेला , परिक्रमा पूर्ण झाल्यावर प्रकर्शाने जाणवलेला अनुभव तुमच्या समोर ठेवतो. स्त्रीशक्ती, काय ताकद आहे हे तेव्हा समजले आणी मनाने मी तिच्यापुढे नतमस्तक झालो . कारण माझी काय बिशाद की माईची एवढी मोठी परिक्रमा इंतक्या सुखरूप पणे पार व्हावी ! त्यामागे हीच शक्ती होती. माझ्या गुरुमाऊलींच्या म्हणजेच परमपूज्य आईंच्या रूपाने हीच शक्ती माझ्या पाठीशी ऊभी होती, कारण खूप वेळेला जाणवायचे की त्या माझ्या बरोबर आहेत. त्यावेळी एका वेगळ्याच आनंदानी नाचावे असे वाटायचे . तुम्ही हसाल कदाचीत काय लिहीतोय की नाचवेसे वाटायचे पण एक वेगळाच आनंद त्या देऊन जायच्या की जो या धाकाधकीच्या जीवनात आपल्याला कधीच मिळत नाही. माझ्या सारख्या अतिशय सामान्य भक्ताला ( भक्तपण आहे की नाही माहित नाही) त्यांनी एवढे सांभाळून घ्यावे हे मी माझे भाग्य समजतो.
माईचा किनाऱ्यारIवरील लोकांचे अनोखे प्रेम हे मैय्याच्या शक्तिचेच एक प्रतिक आहे.परिक्रमा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत त्याचा अनुभव कायमच येत राहीला. परिक्रमेत असताना बरेच वेळेला ज्यांनी आम्हाला सेवा म्हणून घरी नेल त्या घरचे आदारातिथ्य व प्रेम पाहून मला कायम वाटयचे काय अजब रसायन आहे हे ,कसे इतके पराकोटीचे प्रेम करू शकतात ही माणसे ,की जो माणूस परत त्यांच्या आयुष्यात कधीही यायची शक्यता नाही त्याच्यावर इतके निस्वार्थी प्रेम? मला असे वाटते असं प्रेम फक्त माईच्या किनाऱ्यावरच मिळेल. ज्यांच्या घरी जायचो त्या घरची माई आम्ही जेवायला बसलो की इतकी प्रे्माने ,आनंदाने वाढत असे की जणू आपण त्यांच्या घरातलेच आहोत. मला तर प्रत्येक वेळी मैय्या भेटल्याचा आनंद होत असे . खर सांगा आपण करू शकू इतके प्रेम? ते ही अशा माणसांवर जे आपल्या अजिबात ओळखीचेे नाहीत. मी तर त्या पुढे जाऊन सांगतो की इतके प्रेम आपण आपल्या माणसांवरती पण करणार नाही. कारण शहरात राहून या मायानगरीत आपण खूप कॅलक्युलेटेड झालो आहोत. आपण आपल्या माणसात पण याला थोडे कमी, त्याला थोडे जास्त असा भेदभाव करतो याला कारण आपले प्रेम निस्वार्थी नाही .राग मानू नका कदाचीत मी स्वतः तसा असेन त्यामुळे मला जग तसे दिसत असेल. सकाळी सकाळी गावातून, तर कधी शेतातून जात असतांना मैय्याची हाक यायची बाबाजी चाय प्रसादी पाके जाओ त्या वेळ ला त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझ्या डोळ्यात पाणी यायचे व मी सरळ त्यांना नमस्कार करून मोकळा व्हायचो, कारण माझ्यासाठी हीच नर्मदा माई आता या रूपात आलेली असायची. माई मगरीवर बसून, दिव्य स्वरूपात येईल आणि आपल्याला दर्शन देईल असे मी कधीच चित्र रंगवले नव्हते . याचे कारणही आपली काय योग्यता आहे हे मी जाणून होतो. आज इथे थांबतो परत मी वर लिहीलेल्या वाक्यांमुळे कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमा मागतो . नर्मदे हर..
( लेखक : सुनिल वसंत मराठे )
नर्मदा परिक्रमा अनुभव 2 –
मार्ईच्या प्रेमाचा अगाध महिमा ज्याला कळला तो कृतार्थ झाला. शब्दातीत आहें तो खास अनुभवाचा खजीना !. कालच्या लेखात मी म्हंटल की तिच्या अंगा खांद्यावर आम्ही १०१ दिवस खेळलो ही कल्पना काय सुंदर आहे ना? इथे परत मला गुरूचा महिमा सांगावासा वाटतो. सद्गुरु किती जाणीव करून देतात आपल्या शिष्यांना की तुमची ही, फक्त परिक्रमा नाही तर तुम्ही तुमच्या आईकडे आला आहात तेव्हा त्या प्रेमाने तिच्या प्रेमाची जाण ठेऊन तिला कुठेही न दुखवता वागा. हृदयातल्या परमपूज्य आईनी हे छान बोधामृत पाजले तिलकवाडयाच्या विष्णुगीरी महाराजांच्या माध्यमातून.
विषय असा झाला की आम्ही तिलकवाड्याला पोहोचलो आणि जोरदार पावसाला सुरवात झाली महाराजांनी तर गेल्या गेल्या प्रेमाने सांगीतले की आता चार दिवस इथुन जायचे नाही. दुपारची जेवण झाली आणी अजून काही परिक्रमावासी आले व महाराज आमच्या बरोबर जरा वेळ जरा बोलावयास बसले. तेव्हा विषय असा निघाला की परिक्रमावासीयां साठी काही नियम आहेत की नाहीत (कपडे चपला पेहराव वगैरे) तेव्हा महाराज म्हणाले की खरे असे कुठले नियम नाहीत. अरे लहान मुलाला आपल्या आईच्या अंगा खांद्यावरती इकडे धरू नकोस इकडे बसू नकोस असे कुणी सांगु शकतो का ? ते तिच्या अंगाशी कितीही खेळले तरी त्याचा तिला जसा कधी त्रास होत नाही किंवा जाणवत नाही तसेच ही परिक्रमा म्हणजे काय तर तिच्या अंगाखांद्यावर खेळणेच आहे. मग त्या लहान मुलाला जसे आपल्या आईसाठी काही नियम नसतात तसेच तुमचे आहे. नियम हे आपल्या शारीरीक तपासाठी आहेत त्यामुळे आनंदाने सगळ्याचा आनंद घेत परिकमा करा. बघा किती छान विचार दिला त्यांनी आमच्या पुढच्या प्रवसासाठी.
लहान मुलासाठी त्याची आई हे त्याचं सर्वस्व असतं, तिच्या शिवाय ते निराधार , आणि शक्तिहीन असतं. मला परिक्रमेत जाणवलेली स्त्रीशक्ती म्हणजे जिच्या अंगाखांद्यावर आम्ही १०१ दिवस खेळलो ती प्रत्यक्ष नर्मदा मैय्या. काय प्रेम व वेड लावले आहे तिच्या तिरावरच्या लोकांना व आपल्या सारख्या तिच्यापासून खूप लांब असलेल्या लोकांना हे खर तर शब्दात सांगणे कठीण आहे. मला खास कौतुक करावंस वाटंतं ते माझ्या मित्रमंडळातील दोन जणांचे, ज्यांचे माईवर असलेलं खास प्रेम मला नेहमीच प्रेरणादायी ठरलंय. पण त्या आधी एक गोष्ट माझ्याकडून काल अवधानतेने सांगायची राहीली होती ती म्हणजे हे मैय्याचे प्रेम आम्हा सगळ्यांना ज्या व्यक्तींने लावले त्याचे मी शतश: आभारी म्हणा किंवा ऋणी आहे म्हणा तो म्हणजे आपला सगळ्यांचा व माझा खास मित्र उदयन कारण जगन्नाथजी कुंटे काय किंवा चितळे मावशी काय ह्या फार उच्च आध्यात्मिक विभूती आहेत त्यांचे पुस्तक वाचले, अनुभव ऐकले तरी आपल्या सारख्या सामान्य माणसाला हे कसं जमेल अशी शंका मनात असायचीच. पण खरे इन्सपिरेशन मिळाले ते उदयनच्या दुसऱ्या परिक्रमेच्या अनुभव कथना नंतरच आणि मग परिक्रमेचा निश्चय पक्का झाला. कारण तेव्हा खरच मनाला पटले की हे आपण केले पाहिजे. थोडे विषयांतर होत आहे पण काही खऱ्या गोष्टी मला इथे सांगाव्यात असे मनापासून वाटते. पहिल्या परिक्रमेला बरेच जण गेले होते उदयन बरोबर ,पण त्या वेळी माझ्या मनाची इतकी तयारी झाली नव्हती म्हणा किंवा कदाचीत इतके महत्वाचे वाटले नसेल म्हणा किंवा घरी विचारायचे धाडस नव्हतं म्हणून म्हणा माझं काही त्याच्या बरोबर जाणं झालं नाही .पण एक गोष्ट त्या वेळेपासून सुरु झाली होती ती म्हणजे माझ्याकडून घरी रोज नर्मदाष्टक म्हंटले जात होते. त्यामुळे असेल कदाचीत की मैयाने ही परिक्रमा माझ्याकडून करून घेतली.
आपला मुळ विषय आपल्या ग्रुपमधील दोघे जण कोण?, आपले समीर व सुजाता मला त्यांचे खरच खूप कौतुक वाटते की दोघंची परिक्रमा या वेळेला पूर्ण झाली नाही तरी दोघांनी घेतलेला खूप चांगला व महत्वाचा निर्णय हा की अमरकंटकला जाऊन पंधरा दिवस चितळे मावशींच्या इथे केलेली परिक्रमा वासीयांची सेवा. खरच मी आताही या गोष्टीसाठी मनापासून नमस्कार करतो त्या दोघांना. कारण समीरला पायामुळे अर्धवट सोडावी लागलेली परिक्रमा व सुजाताला बँकेने चार महिने सुट्टी देण्यास दिलेला नकार, किती मनाला त्रास झाला असेल दोघांच्या? तरीही या दोघांनी घेतलला सकारात्मक निर्णय खूप कौतुकास्पद आहे. कारण मी माझ्या मनाशी त्यावेळी विचार केला की मला जमले असते का असे करायला? झ्तका पॉझीटीव डिसीजन कदाचीत माझ्याकडून झाला नसता. पण हे माईचे प्रेमच त्यांना तिकडे खेचून घेऊन गेले. अशी प्रेमरसवाहिनी मैय्या! तिच्या प्रेमाच्या गोष्टी पुढच्या भागात बोलू.
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव - ३
आज रामसेवक ग्रुपंवर च्या भगिनी मैय्याची चालत परिक्रमा करणार असे वाचले व आनंद झाला अशी ओढ लागली की तीला ही आनंद होत असेल, की माझ्या इतक्या लेकी माहेरी येत आहेत. मला विश्वास आहे की तुमचं खास माहेरपण नर्मदामाई नक्की करेल. तिच्यावरचा हा विश्वास , प्रेम हेच तर खरे तुमचे दागिने आहेत. आज मी असेच अकृत्रिम प्रेम असलेल्या एका मैय्यांचा अनुभव सांगतो. मला गाव आठवत नाही आता पण सकाळी एका शेतातून जात असताना एका माईची हाक आली बाबाजी आ जाओ अंदर.पाहिलं तर एक छोटीशी शेतातली झोपडी, आम्ही आत गेलो. बोलावल्यावर नाही म्हणायचे नाही हा एक आमचा नियम होता. बाबाजी छास पाओगे?गंमत वाटली! खूप दिवासात आम्ही ही ताक प्यायलो नव्हतो, त्यामुळे सकाळची थंडी असूनही आम्ही लगेच होकार दिला. लगेच ती आमचे चहाचे मग भरून ती घेऊन आली , एक मग फस्त केल्यावर परत आग्रहाने प्रेमाने विचारले बाबाजी और ले लो खर तरं एक मग प्यायल्यावर माझ्या मनात आले अरे बापरे अजून? त्रास नाही ना होणार? म्हणजे बघा हा प्रसाद मैय्याच देत आहे यावरही आमचा पूर्ण विश्वास नाही, नाहीतर त्रास होईल हा विचारच आला नसता मनात. असा माझा डळमळीत विश्वास असूनही तिचा तो प्रेमाचा आग्रह आम्हाला मोडता आला नाही आणी आम्ही परत मग भरून ताक प्यायलो. त्यावेळी आमच्या मागून काही परिक्रमा वासी पण तिथून जात होते त्यांना पण तिने तशाच हाका मारल्या पण कुणीही आले नाही परत तिने हाका मारल्या तरी कुणी आले नाही मग ती आम्हाला म्हणाली, क्यु नही आये होंगे वो? मैने तो कितने बार बुलाया. हे जेव्हा ती म्हणत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते की ते परिक्रमावासी आले नाहीत याचे तिला खूप वाईट वाटत होते. माझ्या सहज मनात आले की आपण असे कुणाला बोलवल्यावर कुणी आले नसते तर वाईट वाटले असते का? मनाने लगेच नकार दिला कारण मी बोलवायचे काम केले, ते आले नाहीत म्हणजे आपण फक्त फॉर्मलिटी पार पाडली असती पण प्रेमाचा अंश? तो त्या मैय्याच्या बोलण्यातून दिसला आणी तोच मला शिकला पाहिजे हे जाणवले. अजून एक गोष्ट मला जाणवली की ते काही खूप श्रीमंत पैसेवाले वाटत नव्हते तरी पण तिने तिथे रांजणंभर ताक करून ठेवले होते म्हणजे देण्याची दानत पण वाखाणण्याजोगी होती. हे सर्व शिकायला तिच्या किनारी जावेच लागेल, तरच कळेल की खरे प्रेम काय आहे.
अशी ही प्रेमळ माई ! माईंच्या प्रेमामुळे, आपलेपणामुळे परिक्रमा सुखरूप पूर्ण झाली. ही प्रेमाची शक्ती फक्त तिथल्याच माई मधे आहे? इथे नाही? असे मुळीच म्हणता येणार नाही नाहीतर मला सुप्रिया मुळे, उदयनला त्याच्या आईमुळे परिक्रमा पूर्ण करता आली नसती. कारण सुप्रिया ने मला व उदयन्च्या आईने त्याला जर मोडता घातला असता तर हे सुख आम्हा दोघांना कधीच अनुभवता आले नसते. त्यामुळे त्या दोघींचा पण मी शतशः ऋणी आहे व ते ऋण कसे उतराई होणार ते मै्याच जाणे. कारण माझ्याकडे माझ्या वडिलांचे वय ८७ आणि उदयंनकडे त्याच्या आईचे वय ७५ असल्याने त्या दोघांना सोडून घराबाहेर चार महिने पडणे कठीण होतं. पण दोघांच्याही मागे ही स्त्री शक्ती ठाम पणे ऊभी असल्यामुळे एक सुखद प्रेमाचा अनुभव आम्हाला घेता आला. नाही तर एखादी बायको म्हणाली असती की काही नको ही परिक्रमा, आपण मस्त कुठेतरी पंघरा वीस दिवस फिरून येऊ. काय उगाच वेड्यासारखे चालायचे,कुठेही राहायचे त्यापेक्षा आपण मस्तपैकी एंजॉय करू ! कारण माझ्या परिक्रमेच्या काळातच आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस होता तरी कुठलाही हट्ट न करता आनंदाने मला जाण्यास होकार दिला व जबाबदारी अतिशय उत्तमपणे सांभाळली याचे खरच करावे तेवढे कौतुक थोडे आहे. तिकडे उदयनकडे त्याची आई एकटी असतानाही तिने त्याला तिसऱ्या परिक्रमेसाठी होकार दिला व तु इकडची काही काळजी करू नकोस माई माझी काळजी घेईल असा त्याला विश्वास दिला. खरंच कुठली ताकद, प्रेम आहे हे समजत नाही, कारण त्या दोघींना परीक्रमेच ते सुख, आनंद अनुभवाला मिळणार नाही तरी आनंदाने दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्या इच्छा ना मुरड घालायची हे मला घेण्यासारखे वाटतं, हे मला या परिक्रमेमुळे प्रकर्शानं जाणवलं आणि या शक्तीपुढे नतमस्तक व्हावेसे वाटले हाच खरा तर खूप मोठा अनुभव माझ्यासाठी होता. म्हणूनच मी पहिल्या लेखापासून या घराघरात राहणाऱ्या स्त्रीशक्ती रूप नर्मदेचा ऊल्लेख वारंवार करत आलो. माईचा मी खूप आभारी आहे की याची जाणीव मला तिने करून दिले तिला माझे शतशः प्रणाम .
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ४ –
खरच प्रेम काय चीज आहे हे मानवी जीवनात म्हणा किवा सबंध विश्र्वात म्हणा न उलगडणारे कोडे आहे . माणूसच काय सबंध जीवजंतू, वनस्पती, प्राणी पक्षी सगळेच या प्रेमाचे भुकेलेले असतात. बरेच वेळा या प्रेमात प्रत्येकाचा स्वार्थ दडलेला असतो त्यामुळे त्याला पुढे दुःख, निराशा,त्रास भोगावा लागतों पण जेव्हा हे प्रेम निस्वार्थी होते तेव्हाचं ते भगवंत म्हणा, ईश्वर म्हणा किवा परब्रम्ह म्हणा त्या विश्वप्रेमाशी एकरूप होते. ते प्रेम जाणण्यासाठी तर आपल्या सगळयांचीही धडपड म्हणा खटपट म्हणा चालू आहे. हे निस्वार्थी प्रेम आपल्याला माईच्या किनारी खूप वेळा परिक्रमेत मिळते व ती शिदोरीच आपल्याला आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी उपयोगी पडणारी असते.
मैय्याच्या प्रेमाचा अजून एक अनुभव मला मंडलेश्वरहून निघालो आणि आला साधारणपणे दूपारची साडे बारा एक ची वेळ असेल एका छोट्या घरातून आवाज आला बाबाजी चाय पिने आ जाओ. साधारण सत्तरीच्या जवळपास असलेली एक मैय्या घरातून बाहेर आली, बाबाजी चाय पिके जाओ. वेळ चहाची नव्हती तरी तिच्या प्रेमाखातर आम्ही हो म्हणालो. बाहेर ओसरीवजा जागा होती तिथे टेकलो, दहा मिनटात त्या आजी चहा घेउन आल्या. आमच्या ग्लासात चहा ओतला आणि आपल्या दोन छोट्या नातवंडाना पण चहा कपातून पाजत आमच्याशी बोलू लागल्या ,हमने भी तीन साल की परिक्रमा की है अपने पती के साथ, बहोत आनंद मिलता है ,अब वो नही रहे तो मै थोडी मैय्या की सेवा करने का प्रयास करती हूँ. पुढे ती जे बोलली ते ऐकण्यासारखे होत, म्हणाली की मी अशा परिक्रमा वासीयांना बोलवते पण ते जर नाही म्हणाले किंवा थांबले नाहीत तर मला खूप वाईट वाटते. असं वाटतं की मैय्या माझ्या कडून इतकी छोटी सेवाही का करून घेत नाही? माझं काय चुकलं ? म्हणजे तो परिक्रमा वासी किती सहजपणे नाही म्हणतो किवा थांबत नाही त्याच्या गावीही नसते की आपल्या नाही म्हणण्याने एका आजीला किती वाईट वाटले असेल. मला हीच गोष्ट विचार करण्यासारखी आहे असे वाटले की मैय्याची आपल्या कडून सेवा होत नाही याचे तिला वाईट का वाटावे ?,मला असे वाटते की हेच ते प्रेम आहे, कारण मैय्यावर जर असे अतूट प्रेम नसते तर त्या आजीना इतके वाईट वाटले नसते .
हे प्रेम एकदा लागले की माणूस त्या प्रेमाने वेडा होतो. हेच अनुभव ही परिक्रमा आम्हाला देत असते, प्रेम काय चीज आहे. असे प्रेम आम्हालाही लागो हीच गरूचरणी प्रार्थना करून आज इथेच थांबतो.
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ५ -
या लेखाच्या सुरवातीलाच मला आपल्याला सांगावेसे वाटते की या भागात मला आमच्या परिक्रमेची तुलना कुठेही आपल्या गुरूंशी करायची नाही. परिक्रमा चालू असतांना प्रकर्शा जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आंईंनी बारा वर्ष केलेली किर्तनसेवा. आम्ही तीन चार महिने माईची परिक्रमा केली त्याचे खूप जणांना कौतुक वाटले , कसे चालले असाल तुम्ही , अरे बापरे इतके किलो मीटर चालायचे! खूप त्रास झाला असेल ना? असे उद्गार ऐकावयास मिळाले . पण मला परिक्रमेत असतांना खूप वेळा चरित्रात वाचलेली आईंची किर्तन सेवा आठवली. मी व उदयन खूप वेळा परिक्रमेत या विषयावर बोललो ही , कशी केली असेल आईंनी ही सेवा आनंदाने, आपल्या गुरूंच्या आज्ञेखातर, आवघ्या सहा महिन्यात गुरूकृपा संपादन करून वयाच्या वीस एकवीसाव्या वर्षी आई गुरूआज्ञेने १२ वर्ष किर्तन सेवेला बाहेर पडल्या होत्या हे आठवले की मी नतमस्तक होत असे. किती प्रतिकूल परिस्थीती होती कधी जनांवरांच्या गोठयात रहावे लागे, तर कधी कुणाकडे पूर्ण स्वयंपाक करावा लागे पण कुठेही तक्रार न करता आनंदाने तीही सेवा करून आईंनी किर्तन सेवेने अनेक लोकांची मने हरिप्रेमाने भरून टाकली आणी नंतर बेळगाव येथील अनगोळ माळी स्थिर होऊन हरिप्रेमाचे कमळ " श्रीहरिमंदिरम " नावाने फुलवले. त्यां फुलाच्या सुगंधाने आजही आईनी सुरू केलेली भजनसेवा ठिकठिकाणी आईंच्या मंदीरात नियमीतपणे चालू आहे आणि भक्तगण हरिप्रेमात रंगून जात आहेत. हे आठवण्याचे कारण म्हणजे परिक्रमेत असताना आम्ही कधी देवळात, कधी आश्रमात पोहचल्यावर आपल्याला खाली घालायला सतरंजी, पांघरूण मिळेल कि नाही यांची चिंता असायची, प्रसाद शक्यतो आयता मिळाला तर बरा असे वाटायचे. झोपायला व्यवस्शीत म्हणजेच शरीराला जास्त त्रास होणार नाही याची नितांत काळजी घ्यायचो . मग वाटायचे असा कसा मी आईंचा शिष्य? खूप राग यायचा स्वतःचा. कधी होणार आपल्या आत हा बदल, कधी वाटणार पूर्ण विश्वास आपल्या गुरूंवर? कशी जाणार ही काळजी, चिंता?त्या माझ्या हिताचेच करतील हा कधी येणार विश्वास? अजूनही तो विश्वास तसाच डळमळीतच आहे. पण त्या माऊलीने माझ्या परमपूज्य आईंनी मात्र सबंध परिक्रमेत आम्हाला खूप सांभाळले, अगदी जिवापाड जपले ,कशाचीही तोशिष पडू न देता अगदी आजारी पडल्यावर डॉक्टर पाठवण्यापासून ते दुध प्यायची इच्छा झाल्यावर तेही पाजून आमची परिक्रमा आमचे बोट धरून पूर्ण करून घेतली. गुरूचा महिमा अगाध आहे, किती सांगू म्हणले तरी शब्द संपतील पण त्या महिम्याचे वर्णन संपणार नाही. तरी शेवटी दोन ओळी म्हणायचा मोह आवरत नाही
"या दिनेची करूणा येऊ आई, चरणावरी ठेवितो डोई"
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ६ -
सुजाता चा निरोप घेऊन आम्ही सगळे जण मैयाच्या किनां-यानी जायचे म्हणून आडवाटेने चालू लागलो आणी थोडेसे चाललो असू, लांबवर आमच्या समोर एका झाडाखाली आमची वाट बघत उभी असलेली व्यक्ती आम्हाला दिसली ती आमच्याकडे बघून हासत होती , मी पट्कन ओळखले नाही कारण ते तिथे आम्हाला भेटतील अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. उदयन्ने जवळ गेल्यावर ओळखले, अरे लक्ष्मणदासजी, बहोत खूब, आप आ गये. मग माझ्या लक्षात आले की आपल्याकडे आलेले व मागील भागात ज्यांच्या प्रेमळपणा बद्दल मी आपणास सांगीतले होते ते लक्ष्मणदास बाबा उभे होते. ते आता माईच्या परिकेमेत तीन चार दिवस आम्हाला साथ देणार होते. त्या उत्साही व आनंदी व्यक्तीमत्वाला बघून मला खूप आनंद झाला. उदयनशी पहिल्यां परिक्रमेतील ओळखीमुळे त्यांच्या व उदयन च्या परिक्रमा व मैय्या विषयी, त्यांच्या गुरुविषयी गप्पा सुरू झाल्या , आम्ही त्या ऐकत त्याचा आनंद घेत त्यांच्याबरोबर चालू लागलो. दिनेश, शिवाजी, निखील यांची परिक्रमेतील तीन दिवसाची मिनी परिक्रमा उद्या तेलिभट्याणला महान संत सियाराम बाबांच्या आश्रजवळ संपणार होती कारण त्यांना नौकरीमुळे उद्या डोंबिवलीस परत जाणे आवश्यक होते. मीच एक खूप भाग्यावान होतो की ज्याला बँकेने सुट्टीही मंजूर केली होती व घरी वडिलांनी , मिसेस व मुलगा प्रथमेशने परिक्रमेस जाण्यास पूर्ण परवांगनगी दिली होती .त्यामुळे आता फक्त सद्गुरुनी सांगीतलेले नाम आनंदाने घेत चालणे एवढेच माझ्याकडे काम होते. साधारण सकाळी आठ , साडेआठ वाजता निघाललो आम्ही दोन तें तीन तास परिक्रमेंचा आनंद लुटत चालत होतो. दुपार नंतर निखीलला चालवयास त्रास होऊ लागला व त्यामुळे चालण्याचा वेग परत मंदावला. निखीलचा पाय चांगलाच दूखत असल्याने त्याला पटापट चालायलाही येत नव्हते त्यामुळे परत आमच्यात व त्याच्या चालण्यात खूप अंतर पडू लागले. तीन चार दिवस चालत परिक्रमेतील एक छोटा टप्पा पार करायचे त्यांनी ठरवले होते पण त्यातही माईने त्यांची परिक्षा घ्यायची ठरवले होते असेच दिसत होते. (अशीच पण थोडी वेगळी परिक्षा पारिक्रमेला जायचे ठरवल्यापासून माझी पण घेतली त्याबद्दल पुढे कधीतरी सांगीन )म्हणजे एकूण परिस्थितीही अशी होती की होती की वेळेत तेलिभट्याणला पोहचून त्या थोर महात्म्याचे दर्शन घेऊन त्यांना परत खांडवा स्टेशन उद्या गाठायचे होते त्यासाठी आजही आम्हाला काही ठरावीक अंतर चालणे गरजेचे होते, तरच उदया दुपार पर्यंत तेलिभट्याणला पोहचू शकत होतो. त्यामुळे आम्ही आता जात होतो त्याहीपेक्षा जवळचा मार्ग कुठला आहे का? याची उदयन चौकशी करत होता. मधे बकावा म्हणून गाव लागले (जिथे तयार शिवलींगे मिळतात लहान, मोठी मशिनने छान आकार दिलेली ) तिथे गाडी किवा बसची चवकशी करून झाली, शुभम, म्हणजे राजराजेश्वरी मंदीराचा पुजारी आणि पहिल्या परिक्रमे पासून उदयन्शी घट्ट मैत्री झालेला मित्र, याला फोन करून निखिलला बाईकवरून पुढे सोडता यईल का याचीही विचारणा झाली, त्या वेळला माझी थोडी चिडचिड झाली कारण चार ठिकाणी पुढे जायचा रस्ता परत परत विचारून जास्तच वेळ गेला होता . तेव्हा माझ्या सहज मनात आले की आपले कसे असते बघा की शरिराला थोडा जरी त्रास झाला तरी आपण लगेच त्याची काळजी घेतो पण अशी आपली रोजची जपाची माळ किंवा त्यांनी सांगीतलेले नाम नाही झाले तर सद्गुरुंना काय वाटत असेल अशी काळजी आपल्याला वाटते का ? मनाने नकार दिला कारण त्यांना काय वाटत असेल असे मनात येतच नाही म्हणून तर आपण आहे तिथेच आहोत. थोडे विषयांतर झाले खरे ! असो. मग आम्ही त्याच्या बरोबर चालावयास दिनेशला ठेऊन, आम्ही पुढचा मार्ग चालू लागलो. खूप अंतर पडले तर जरा वेळ थांबून त्यांची वाट बघून परत पुढे चालावयाचे असे चालू होते. त्या दिवशी दूंपारी जेवणासाठी आम्ही टोकसरला नर्मदा अन्नक्षेत्र, आश्राम इथे पोहचलो. इथे माईच्या दर्शनाला जाणे झाले नाही कारण माईचा एक गुप्त प्रवाह तिथून जातअसल्याने माई ओलांडली जाण्याची शक्यता असते असे सांगण्यात आल्याने आम्ही सगळ्यानी तिथुनच मैय्याला नमस्कार केला. नंतर थेट आश्रमाच्या ऑफिसमधे गेलो, वहीवर स्टैंप मारून घेतला. उन्हात बरेच चालल्यामुळे खूप तहान लागली होती ,माईच्या थंडगार जलाचे पोटभर प्राशन केले आणी सगळी मरगळ निघून गेली, अमृतच ते आपला गुण दाखवणारच! नंतर त्या सेवकांनी सांगीतले त्या ठिकाणी आम्ही सगळे प्रसादास बसलो. त्या ठिकाणी प्रथमच आयुष्यात मध्य प्रदेश मधला टिक्कड़ हा प्रकार काय आहे तो बघीतला व अस्वाद घेतला. तिथे आम्हाला महाराष्ट्रातील पाखरे , पवार, चव्हाण माऊली अशी पंढरीची वारी करणारे प्रेमळ परिक्रमावासी भेटले. पुढे परिक्रमेत जेव्हा जेव्हा ते भेटत गेले तेव्हा त्यांनी कायमच आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला ज्याची आठवण परिक्रमे नंतर पण आम्ही विसरू शकलो नाही. आता या पुढच्या प्रेमाच्या, आनंदच्या प्रवासाची गोडी पुढच्या भागात बघू , आज इथेच थांबतो.
नर्मदे हर
अनुभव नर्मदा परिक्रमा भाग ७ –
सकाळी सकाळी नंदगावहून निघालेलो आम्ही साडेआठ नऊ वाजेपर्यंत विश्वानाथ खेडिला पोहाचलो तिथे महादेवाचे खूप जूने मंदीर आहे, भोलेनाथांचे भाव भक्तिने दर्शन घेऊन तिथल्या महंताना भेटलो ,उदयन गेल्या परिक्रमेत या स्थानाला येऊन गेलेला असल्यामुळे त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाले .उदयने त्यांना गेल्या वेळचा अमुक अमुक सेवेकरी आता नाही का? अशी विचारणा केली. त्याने मला दोन तीन वेळा फोन करून परिक्रमावासीयासाठी काही मदत कराल का? असेही विचारले असल्याचे सांगितले तेव्हा त्या मंहतांनी सांगितले की बरेच लोकांकडून असे पैसे घेऊन तो आता पसार झालाय म्हणजे नर्मदाष्टकात म्हटंल्याप्रमाणे शठेनटे इथे आहेत याची जाणीव माईंनी करून दिली. मग त्या आचार्यांनी आम्हाला सांगीतले की आता चहा व बाल भोग घेतल्या शिवाय मी आपल्याला इथून पुढे जाऊ देणार नाही. त्यांचा प्रेमाचा आग्रह ,आम्हालाही मोडता आला नाही. त्यांनी तिथे नव्याने सेवेला आलेल्या मैयाला आम्हाला प्रथम चहा व नंतर गरम गरम कांदा भजी करून देण्यास सांगीतले. तिही तोंडभर हो हो म्हणून स्वयंपाक खोलीत गेली , आणी थोडया वळाने गरम गरम चहा घेऊन आली . आता त्यानंतर भजी म्हणजे आता तास दिड तासाची निश्चिती होती व सकाळचा चालायचा वेळ असा फुकट जाणार त्यामुळे रोजच्या ठरवलेल्या किलोमीटरमधे परक पडणार ( नवीन परिक्रमावासी ) म्हणून मीच उदयनला म्हटंले की मी आत जाऊन त्यांना थोडी मदत करतो ( थोडी मदत असा माझा विचार होता ) त्याप्रमाणे उदयन त्यांच्याशी बोलत बसला व मी आत खोलीत गेलो , खर तर आदल्या दिवशी उपवास असल्याने तो कांदा खाऊन सोडावा अशी इच्छा नव्हती पण परिक्रमेत असताना जे काही मिळेल ते माईचा प्रसाद म्हणून सेवन करणे असे आम्ही ठरवल्याने तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही ,पण आत गेल्यावर फक्त उपवास कांदयाने सुटू नये असे मनोमन वाटत असल्याने मी मैय्याला बटाटयाची करूया का? पटकन होतील, मी मदत करतो असे विचारले.पण त्या मैय्या महाराष्ट्रातील असल्याने म्हणाल्या , नाय वो त्यांनी कांदा भजी म्हटलय , मी करते भाऊ.पंण एकूण अंदाज घेता कांदा चिरून भजी मिळायला खूप वेळ लागेल म्हणून मी त्यांना म्हंटले 'मी कांदा चिरून देतो, तुम्ही पीठ , मीठ, तिखट बाकीचे सगळे सामान काढा ' तेव्हा त्या म्हणाल्या' जीर नाही ओवा नाही कशी हो भजी करणार' हे त्यांचे पालू पद ती भजी होईपर्यंत किमान पंचवीस ते तीस वेळा तरी ऐकले. मलाही घरी विळीवर कांदा चिरायची सवय असल्याने, सुरीवर कांदा बारीक कापायला थोडा जास्तच वेळ गेला .मधे बापू येऊन थोडे कांदे कापून त्याची साले काढून गेला .मी कांदा चिरत असंताना माझ्या सल्लाने त्या भाऊ पीठ इतके पूरे ना , इतके मीठ घालते बघा इतके पीठ पातळ , बरोबर आहे ना, असं विचारू लागल्या कि जसा मी इकडे वडे व भजीचाच स्टॉल चालवतो की काय असे मला वाटायला लागले. त्यांचे पीठ कालवून होईतो पर्यंत माझाही बऱ्यापैकी कांदा कापून झाला आणी मी एक नको तो सल्ला त्यांना दिला.'मावशी थोडे गरम गरम मोहन घाला पिठात म्हणजे मस्त कुरकुरीत होतील भजी ( आईकडून ऐकले होते हे )' माहीती साठी हे चांगले होते पण आता माझ्यावर हे बुमरँग सारखे येणार हे माहीत नव्हते,त्या ते वाक्य संपता संपताच म्हणाल्या, भाऊ अस करता का, तुम्हीच कढईत तेल ओता व गरम झाले की पीठात घाला. तुम्ही थोडी तळा तापर्यंत मी बाकीची तयारी करते .माझ्या पुढे हो म्हणण्याशिवाय इलाज नव्हता. मी चूलीपाशी मुकाट्याने बसलो व तेल गरम झाल्यावर मोहन घालून भजी तळायला घेतली . मावशींचा अजूनही जीरे व ओव्याचा पाढा चालूच होता त्या शिवाय भजी कशी चांगली होतील, आमाच्याकडे मी नेहमी हे सगळे घालते हे ही वारंवार सांगणे चालू होते. माझी अर्धी भजी तळून झाल्यावर बापूलाच बाहेर सगळ्यांना दे असे सांगीतले . कारण इतके विचारूनही पीठात मावशीनी किंचीत मीठ जास्त घातलेच होते ,गरम असताना दिली की खारटपणा इतका जाणवणार नाही हा त्या मागचा हेतू . मावशी इतक्या हुषार होत्या की हात धुण्यासाठी नळ बाहेर होता पण मला म्हणाल्या की भाऊ हात ईथेच धुवा. प्रथम माझ्या लक्षात आले नाही पण नंतर त्या मागचे कारण लक्षात आले .मी बाहेर जाउन हात धुतले असते तर त्या महंता ना कळले असते की मीचं भजी करत होतो व मावशींना त्यावरुन ओरडा खायला लागला असता. माझे समाधान एवढेच झाले की सगळ्यानी पोटभर भजी खाल्ली अगदी आपल्या जलब्रम्ह ग्रुपंवरील मंहेश सावंतदादांसकट . भजी खाऊन झाल्यावर त्या महंतानी आम्हाला तिघांना माईचा प्रसाद म्हणून ऊपरणे दिले ज्याचा उपयोग माईनेच पुढे योग्य रीतीने करून घेतला .आम्ही तिथून निघालो व बोलता बोलता उदयन म्हणाला महंत म्हणत होते मैया थोडी सुस्त है इस लिये मैने उनको भजीया बनाने को कहा. मी मनात मावशींच्या हुशारीवर हसलो. या एकच माईने माझ्याकडून गोड बोलून काम करून घेतले नाही तर सबंध परिक्रमेत मला मैय्याचे फक्त व फक्त निर्व्याज प्रेमच मिळाले .एक गोष्ट चांगली झाली की माझीही खऱ्या अर्थाने नर्मदा माईने तिथे थोडी सेवा करून घेतली. आता पुढची छानशी आठवण पुढच्या भागात . नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८ –
गेल्या भागात सांगीतल्या प्रमाणे प्रेमाचे अनुभव परिक्रमेत मला खुप वेळा अनुभवास मिळाले कित्येक महंतांकडून, रामानंदी साधु कडून, तिच्या तिरावरच्या लेकरांकडून .कुठल्या शाळेत शिकवले असेल हो त्यांना हे प्रेमाचे धडे, हे प्रेम अशा लोकांकडून मिळाले जे फार शिक्षणाने शिकलेलेहीं नाहीत, म्हणजेच शिक्षण माणसाला सुशिक्षीत, सुसंकृत बनवते हे निश्चित पण हे निष्काम प्रेमाचे दार ते उघडेल असे नाही, ते माझे मलाच उघड़ायचे आहे त्या निर्गण निराकार परमेश्वराचे आभार मानून .त्यांचा कायम मनात ध्यास ठेऊन ,त्याला प्रत्येक चराचरात पाहून .त्या साठी ही संत मंडळी सतत आपल्याला सगुणाच्या उपासनेचे धडे देतात कारण जर या द्ष्य सगुणावर आपण निश्काम प्रेम करू शकलो तरच त्याच्या पलिकडे असलेल्या निर्गुण निराकार विश्वप्रेमाशी आपण एकरूप होऊ शकू.त्यासाठीच परिक्रमा हा एक मार्ग निर्सगाच्या सानिध्यात आपल्या मनाला ताजेतवाने,धंष्टपुष्ट करण्याचा.शहरात जीम मधे जाऊन आपण शरीर धष्टपुष्ट करू, त्याला चांगले चुंगले खाऊंपिउं घालू पण मनाला पुष्ट करण्यासाठी लागणारे टॉनीक आपल्याला माईच्या किनारी नक्की मिळेल . रोजच्या बोअरींग, रूटीन जीवनामुळे बंद झालले हे आपले ह्रदय कमळ माईच्या प्रेमळ अनूभवातून नक्की उघडेल, कारण खरे प्रेम कायं असते ते आपल्याला परिक्रमेत तिच्या लेकरांकडून , निर्सगाकडून, प्रत्यक्ष मैय्या कडून अनूभवास यईल. आज एक असाच प्रेमाचा अनुभव आपल्यासाठी घेऊन आलोय एका रामानंदी साधुचा.
प्रेमाचा सुखद अनुभव देणारे एक रामानंदी साधू म्हणजे लक्ष्मणदास बाबा.उदयन, कुलदिप , कांदबरी, विजया , मंजू , योगेश यांच्या सगळ्यां बरोबर थोडे दिवस असलेले पहिल्या पlरिक्रमेतील त्यांचे साथीदार . मोराट्क्याहून आम्ही सकाळी निघालो व मागच्या बाजूच्या रस्तावर आमची वाट पहात उभे असलेल एक व्यक्तिमत्व . सडपातळ बांधI धारधार नाक , कमरेला एक पंचाटाईप उपरणे, अंगावर एक पातळसा रुमाल. खांदयाला एक झोळी व त्यात एक लंगोटी व कमरेला बांधायला अजून एक टॉवेल वजा उपरणे , बास एवढाच काय तो त्यांचा संसार . उदयनचे ही परिक्रमा सुरू करण्या आधी फोनवर त्यांच्याशी बालणे झाल्यामुळे आमच्या बरोबर चार ते पाच दिवसआम्हाला मार्गदर्शन करत चालणारे एक आनंदी , प्रेमळ , वेळ आली तर सडेतोड बोलणारे एक छान व्यक्तिमत्व. एक वेगळेच तेज होते त्यांच्यात.बरेच वेळेला त्या भागात वावरणे झाल्या मुळे त्यांना त्या भागातील बरीच माहीती होती. माझ्याही घरी रामरायांच्या दर्शनाला येऊन गेल्यामुळे माझ्याशीही थोडी ओळख होती .काय माहीत नाही पण त्या चार पाच दिवसात त्यांचा एक वेगळाच आधार वाटला. त्यांच्या प्रेमाविषयी सांगायच्या आधी थोडे विषयांतर करतो कारण पुढे परिक्रमेत अशी एक गोष्ट घडली होती की ज्यांचा साठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल . उदयनच्या दुसऱ्या परिक्रमंतील वॉटसॅप वर येणाऱ्या अनुभवांच्या लेखांबद्दल, एका लेखात त्यांने दुसऱ्या परिक्रमेत असतांना नदी ,नाले पार करताना दोन तीन वेळेला कसा पाण्यात, चिखलात पडला याचे मजेशीर वर्णन केले होते. रोजचा त्यांचा अनुभव वाचला की मी त्याला त्यावर माझा अभिप्राय पाठवत असे किवा बोलत असे .त्याही दिवशी मी त्याला म्हटले की आपण दोघे जेव्हा परिक्रमेला जाऊ तेव्हा आपल्या दोघात कुणीही पडले किवा आपण दोघेही एकदम जरी पडलो तरी दोघांनी भरपूर हासायचे , कुणीही कुणावर रागवायचे नाही. नर्मदा माईने बहूतेक माझी इथे व्यक्त केलेली ही ईच्छाही पूर्ण करावयची ठरवले असल्यामुळे शालीवानहून आम्ही लक्ष्मदास बाबांच्या सांगण्यावरून मैय्याच्या किनाऱ्यानी चालू ,लागलो. खूप ठिकाणी किनाऱ्याला चिखलच चिखल होता , चालणे चांगलच अवघड जात होत कारण खाली पाय घसरून पडायची भीती जास्त होती व बऱ्याच ठिकाणी जवळच्या गावातील लोकांनी मैय्याचें पाणी खेचून घेण्यासाठी वरून विजेच्या तारा सोडल्या होत्या व खाली चिखलात छोट्या छोट्या पाण्याच्या पाईप लाईनमुळे खूप जपून चालावे लागत होते.परिक्रमेला दोन तीन दिवस झाले असल्याने हातातील काठीचा चालताना बरोबर कसा उपयोग करायचा हेही माझ्या अजून लक्षात आले नव्हते. जास्त उगाऊपणा मुळे की काय मी एका ठिकाणी चिखलात घसरलो व पूर्ण पडू नये म्हणून की काय मी .माझ्या डाव्या हातावर माझा सर्व भार देऊन कलंडलो , त्यावेळी हातातून अशी काय कळ मस्तकात गेली की काही विचारयची सोय नव्हती . हातातील कमंडलू पण बाजूला चिखलात पडून पूर्ण बरबटले होते . डावी बाजू चिखलाने चांगलीच माखली होती तसाच ऊठलो ,मागून लगेच बापू उदयन लक्ष्मणदास बाबा मदतीस आले पण मीच म्हटले अरे काही नाही, काही नाही, मी ठीक आहे , तोंडाने असे म्हटले खरे पण डाव्या हातातून चांगल्याच सणका मारत होत्या. मनात हसायलाही येत होते.माझा मीच घसरल्याने दूसऱ्याला कुणाला दुषणेही देता येत नव्हती , तेव्हा वरपांगी हसत हसत मी चला जाऊ या पुढे असे म्हटले. चार ते पाच पाऊल चाललो असेल आम्ही आणी उदयनही मी कसा पडलो याचा विचार करत घसरला म्हणा किंवा पड्ला . मग त्याच्या जवळ गेलो आणी हातात हात घेऊनआम्ही दोघंही मनापासून हसलो. उदयनचेही कपडे बऱ्यापैकी चिखलाने बरबटले होते त्यामुळे माझ्याच सारखा कुणीतरी आहेे या विचारानी हसू येत होते. थोडयावेळाने मात्र मनगटाला बऱ्यापैकी सुज आली हातातून कळा ही येत होत्या , मनगटापासून बोटपर्यंतचा भाग काळा निळा झाला होता. दूपारी मध्ये थांबलो तेव्हा मी जरा गप्प गप्प होतो तेव्हा ते म्हणाले क्या सुनिल जी बहोत दर्द हो रहा? मी मानेनेच हो म्हटले व चालत असताना सारखी बोटांची व हाताची हलचाल चालू ठेवली , एक चांगली गोष्ट होती की उदयनला कुठेही लागले नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बलगावला भुतेश्वर शिवमंदिरात पोहाचलो. हात आता चांगलाच दुखायला लागला होता . संध्याकाळी अंघोळ करून झाल्यावर कपडे पिळाला गेलो तर कपडे पिळायला हातात जोर होताच कुठे. (नंतर महिना ते सव्वा महिना तरी मला कपडे पिळता येत नव्हते ते माझे काम आनंदाने बापू व उदयन करत होते. ) शिवमंदीरात जेवण झाल्यावर लक्ष्मुनदास बाबा म्हाणले चलो सुनिल जी आपके हात को हलदी का लेप लगायेगे, असे म्हणून त्यांनी त्या आश्रमातील भंडारी बाबाला थोडे तेल व हळ्द देण्यास सांगितले स्वतः बाहेर जाऊन काटक्या गोळा करून छोटासा विस्तव तयार केला त्यावर वाटीतले तेल गरम कले व त्यात हळद घालून स्वताच्या हातानी गरम गरम लेप माझ्या हाताला लावला , ते लावतांना पण मला विचारले कुछ तकलीफ तो नही हो रही है ना? नंतर त्या विस्तवांवर हात शेकायला लावला व घट्ट रूमालाने हात बांधला व म्हणाले अब कुछ नही होगा , ठीक हो जायेगा एक दो दिन में. पण ते हाताला जेव्हा तेल लावत होते तेव्हा त्यांचा त्या तेल लावण्यात व चेहऱ्यावर जो काही आनंद होता तो काही वेगळाच होता ते जे प्रेम होते ते मला शब्दानी सांगता येणार नाही , त्या प्रेमाची जाणीव (ऐहसास ) मात्र आयुष्यभर माझ्याकडे असणार . खर सांगू दोन तीन दिवसानी माझे दुखणे खरच खूप कमी झाले . . किती दिवसांचा होता हो आमचा असा सहवास की त्यानी इतक्या प्रेमाने करावे. खूप विचार करण्या सारखी गोष्ट आहे कारण इथे आपण आपल्याच माणसांसाठीच खूप काही करतो , ते लक्षात ठेवतो व वेळ आली तर ते बोलून दाखवतो किंवा आपण खूप काही केले असे मनात साठवतो. हे साठवणे जेव्हा संपेल तेव्हाच खरे प्रेम काय आहे ते कळेल ,म्हणूनच माझ्या गुरुमाऊलीनी मला असे प्रेमाचे अनुभव घेण्यासाठी ही छानशी निर्सगा यात्रा घडवून आणली . आता राहीला प्रश्न माझ्यात बदल होण्याचा, तो मलाच करायचा आहे या मी ला मारून पण त्यांच्या कृपा आर्शिवादाने, त्यासाठी हया दासाची कळकळीची विनंती
देवा माझे मन लागो तुझे चरणी ॥
संसार व्यसनी पडो ने दी ॥
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९ -
कालच्या लेखात मी निर्सग यात्रा असे म्हटले कारण परिक्रमेत असतांना माईच्याा किनाऱ्यावरून जात असताना तिथला सुर्यादय , सुर्यास्त म्हणजे निर्सग कलाकाराची एक सुंदर कलाकुसरी असे. आभाळात व माईच्या पात्रात पडणाऱ्या सर्याच्या किराणाच्या छटा इतक्या सुंदर दिसत की आम्ही देहभान हरपून ते सौदर्य डोळ्यानी टिपण्याचा एक वेडा प्रयत्न करायचो. किनाऱ्यावर व गावातील रस्तातून जातांना अनेक प्रकारची शेते म्हणजे सौंदर्याचा एक वेगळाच अविष्कार !
गव्हाची , मुगाची , तुरीची, चण्याची ,कोथींबीरीची हिरवी शेते व त्याला आलेली पिवळी , निळी, पांढरी फुले म्हणजे जणू निर्सगाचा एक सुंदर नजाराणाच. ते निर्सगाचे लेणे बघून मनाला एक सुखद आनंद मिळून जायचा. निर्सगालाही माईचा किनारा प्रिय असणार म्हणून त्यानेही तिथे आपल्या मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली दिसे. काँक्रिटच्या जंगलात वाढलेला मी ते सौंदर्य बघून वेडा होऊन जायचो . सकाळी माईची पूजा,आरती करुन आम्ही चालायला सुरवात करायला व सुर्य देवाचे आगमन व्हायला बरेच वेळा एक गाठ पडायची. त्याच्या त्या दिमागदार सौंदर्याने आमचे हात आपोआप नमस्कारासाठी जोडले जायचे व डोळ्यांत ते असीम सौंदर्य साठवण्याचा प्रयत्न करायचो . त्या वेळीही मनात कल्पना अशी यायची की मारूतीराय पण त्या वेळी अशाच सौदर्याने मोहीत होउन त्याला पकडावयास गेले असावेत. आम्ही ते सौंदर्य बरेच वेळा मोबाईलच्या कॅमेरात पकडून ठेवायचा प्रयत्न करायचो. हे सगळे सौंदर्यच आम्हाला दिवसभरा साठी एक वेगळी ऊर्जा देऊन जायचे. माईच्या किनाऱ्यावरून जाताना बरेच वेळा बापू, उदयन व माझ्या चालण्यात अंतर पडायचे कारण माईच्या किनारी पडलेले निरनिराळ्या रंगाचे कंकर बघून मला लहानपणी बघितलेल्या मेकानाज गोल्ड चित्रपटाची आठवण व्हायची व त्यात सोने बघुन सगळे वेडे होतात इथे मी निरनिराळ्या रंगाचे , आकाराचे कंकर बघून मला हा घेऊ का तो असा प्रश्न पडायचा , असे कितीतरी रंगाचे, आकाराचे कंकर मी माईच्या किनाऱ्यावर गोळा करुन पिशवीत ठेवले, शेवटी उदयन ओरडायचा ' अरे तुला हे आझे घेऊन संबंध परिक्रमा भर चालायचे आहे' तरीही मन सांगायचे असू देत, असा सुर्वण साठा परत मिळेल नं मिळेल. पण माईनी मला तो त्रासही होणार याची काळजी घेतली व अंकलेशवरला आमचे काही गुरूबंधू आम्हास भेटण्यास आले व त्याच्या बरोबर हा सर्व खजिना माझ्या घरी पाठवून देता आला. अशीच परिस्थीती माझी निरनिराळ्या झाडांना, वेलींना आलेली फुले बघून होत असे. ती निरनिराळी फुले व त्यांचे रंग मनास आनंद देऊन एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची.असे वाटायचे की जणू एखादया निरागस बालकाच्या हास्याप्रमाणे ही फुले ही हसत आहेत, बागडत आहेत . बऱ्याच रानटी वेलीना आलेल्या फुलाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा असायच्या की जणू काही निरनिराळ्या रंगांची ऊधळणच.कित्येक फुलझाडांच्या बियाही मी काढून पिशवीत ठेवायचो आणी पळत पळत त्या दोघाना गाठायचो. सकाळी सकाळी माईच्या किनाऱ्याने हिरव्यागार गव्हाच्या शेतातून जाताना त्यावर पडलेले दवबिंदू जणू काही त्यांच्या अंगा खांद्यावर खेळताय की काय असा भास व्हायचा व ती हीरवीगार शेतेही आम्ही माईचे परिक्रमावासी म्हणून की काय आम्हाला आपल्या प्रेमाचा ओलावा दवबिंदूंच्या रूपाने देऊन जायची. कित्येक रंगाचे निरनिराळे पक्षी त्यांची ती ओरडण्याची पध्दत जणूू काही तेही त्यांच्यात, आमच्या येण्याचे त्यांच्या पध्दतीने स्वागत करत आहेत असे वाटे . आपल्याकडे खूप दुर्लभ असलेला व ज्याचे दर्शन म्हणजे शुभशकून, असे मानले जाणारा पक्षी म्हणजे भारद्वाज पक्षी, त्याचे दर्शन तर माईने परिक्रमेत आम्हाला खूप वेळा दिले. सुतार पक्षाची तर खूप गंमत वाटयची कारण तो रस्तात अगदी आम्ही त्याच्या जवळ येईपर्यत बसून असायचा व अगदी जवळ गेलो की ऊडून परत पुढे रस्तात बसायचा की जुण आम्ही त्याच्याशी पकडापकडीच खेळतोय. हा अनुभव खूप वेळा रानातील छोटया रस्तांवर यायचा. पोपटाचे थवे, निळया गार व आकाशी रंगाचे किंग फिशर ,मधूनच कधीतरी शेतांतून डौलाने चालणारे मोर , तर कधी आमची चाहूल लागल्याने भरकन रस्ताच्या कडेने शेतात शिरणारे मोर दिसायचे .सबंध परिक्रमेत मला कुठेही माईच्या किनारी लांबुनही (मैय्याचे वाहन ) मगरीचे दर्शन घेण्याचा योग आला नाही. कधी जंगलात अस्वल किवा कुठल्याही हिंस्त्र प्राणीही बघण्याचा योग आला नाही, हा फक्त कोल्हांची कुईकुई पहाटे व रात्री खूप वेळा ऐकू यायची तर कधी एक दोन प्रसंगी अगदी जवळून बघायचाही योग आला. शूलपाणी जंगलाच्या आधी ऐका साधूच्या झोपडीत मुंगूस व तिची पिल्ले त्यांनी दिलेला चहा पित असंताना त्यांनी दाखवली.
गावांमधून जात असताना कित्येक घरांच्या अंगणात गुलाबी , लाल गावठी गुलाब पूर्ण फूलांनी डवरलेला असायचा. माईच्या किनाऱ्यानी जातांना किनाऱ्याच्या उंचसखलपणामुळे थंडीमुळे पायांना पडलेल्या भेगा चालतांना त्रास दयायच्या, पण या सगळ्या सौंदर्या पुढे तिकडे फारसे कधी लक्ष जायचे नाही. रात्री आडवे झाल्यावर मात्र हया भेगा खूप दुखायच्या , त्याचीही काळजी माईने कशी घेतली ते पुढे ओघाने सांगेनच .पण कायम बुटात वावरणारा मी तिथे साध्या सँडलवर रस्ताने जाताना तिस पस्तीस किलोमीटर आणी माईच्या किनाऱ्यानी वीस पंचवीस किलोमीटर अगदी सहज चालायचो.खर सांगायचे तर हे सगळे वर्णन न संपणारे आहे कारण साक्षात विश्वकर्मा आपल्या सगळ्या कारागीरांना घेऊन तेथे अवतरला आहे .मी फक्त माझ्या शब्दात थोडे मांडण्याचा प्रयत्न केला इतकेच .पण खरा आनंद आपल्या स्वतः च्या डोळ्यांच्या कॅमेरात बंद करून आपल्याला पाहीजे तेव्हा पहायचा असेल तर आपल्याला मैया किनारीच जावेच लागेल..नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग १० -
आज खूप दिवसांनी एका वेगळ्या मैयाचा मजेशीर नमुना तुम्हाला सांगतो ,खूप गमतीशीर आहे आम्ही चतुर्थीच्या दिवशी नंदगावला संध्याकाळी पोहचलो , त्या दिवशी उपवास असल्याने दोन्ही वेळेला आIम्हा दोघांना ( उदयन व मी ) डालबाटीने ठेंगा दिला होता, बापूचा ( आमचा गुरूंबंधू तिसरा परिक्रमावासी ) उपवास नसल्याने त्याने मस्त तावं मारला. म्हणजे माईने आम्हाला उपाशी ठेवले नाही हं , मारूतीच्या मंदीरात दूपारी भरपूर खायला घातले आणि संध्याकाळी बाप्पाच्याच मंदीरात रहायची सोयही केली .बप्पाचा प्रसाद म्हणून की काय उदयनाला त्या दिवशी माईच्या किनारी खूप छान शिवलींग मिळाले , थोड क्रेडिट मलाही आहे कारण मैयाकडे गावातून जाणाऱ्या रस्तावर खूप चिखल होता म्हणून उदयन रस्ताच्या बाजूला असलेल्या एक नळ वजा शॉवर खाली आंघोळ करू म्हणत होता पण तेव्हा तसा परिक्रमेत मी नवखा असल्याने इतक्या गावाच्या ठिकाणी रस्ताच्या बाजूला आंघोळ करायला मला लाज वाटत होती. ( पुढे गुवारच्या आश्रमापासून ही लाज इतकी गेली की पुढे सराईतपणे लंगोटी वंर रस्त्याच्या बाजुच्या हापशावर मी अंघोळ करू लागले ) तिथे रस्ताच्या बाजूला बरीच लहान शाळकरी मुले होती, त्यामुळे तिथे आंघोळ केली तर ही सगळी मुले एखादया सर्कशीतील प्राण्याकडे बघावे तसे बघत राहतील म्हणून मैया किनारी जाण्याचा माझा आग्रह होता. चिखलाचा रस्ता उतरल्यावर मैयाच्या किनाऱ्या जवळच उदयनला बप्पाचा प्रसाद म्हणून छानसे पांढरे शिवलींग मिळाले ,आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला मला तो पर्यंत असे शिवलिंग मैया किनारी मिळते हे माहीतच नव्हते . तेव्हा पासून मलाही माई असे शिवलींग देईल म्हणून माझीही माईच्या किनारी शोधाशोध सुरू झाली , उदयनने दगडी रंगाची खूप शिवलिंग दाखवली ही पण मी ती घेण्यास नकार दिला व सरतेशेवटी तिला माझी दया आली व जबलपूर जवळ मला तिने संगमरवर शिवलींग बहाल केले. शेवटी तुम्ही म्हणाल की मैयाची मजेशीर गोष्ट सांगतो म्हणाला आणी ही काय लंबावळ लावली आहे ,पण पहिले वाक्य लिहिले आणी हे सगळे चित्रच डोळयासमोर आले. अंघोळ करून वर आलो मैयाची , बप्पाची आरती केली आणी रात्रीचा उपवासाचा फराळ नसल्याने, मीे व उदयन पोट भरण्यासाठी थोडे भांडून झोपी गेलो. पहाटे कुणी गावातले उठलेले नसल्याने हापशावर आंघोळ करून पुजा आरती करून सहा साडेसहाला पुढच्या प्रवासाला निघालो, सकाळाचा चहा नंदगाव झाला असल्याने दोन तास तरी आता चालायला हरकत नव्हती त्यामुळे साडेआठ पर्यंत आम्ही विश्वनाथ खेडीला पोहोचलो. इथे तो वर म्हंटलेला मैय्याचा गमतीशीर प्रसंग झाला. तो आठवला की आजही मला हसायला येते आणी एखादी हुशार मैय्या गोड बोलून तिला महंतानी सांगितलेले काम माझा'कडून कसे करून घेते याचा अनुभव आला तो किस्सा पुढल्या भागात. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ११ -
गेल्या भागात आपण माईच्या किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्याची उधळण बघीतली . आता या भागात आपण थोडे माईच्या त्या किनऱ्यांवर परिक्रमेत चालतांना येणाऱ्या अडचणी म्हणण्यापेक्षा आपल्या परिक्षेबद्दल किवा कठीण,दूर्गम परिक्रमामार्गा बद्दल जाणून घेऊ . किनाऱ्यावरून चालणे हे डोळयांना व मनाला सुख देणारे असले तरी काही वेळेला खूप जिकिरीचे व्हायचे व माई आपली परिक्षा तर घेत नाही ना? असा मनात विचार येई. परिक्रमेतील सगळ्यात कठीण पेपर कोणता असेल तर तो म्हणजे शुलपाणीतील खापरमाळच्या डोंगर रांगा व भवाना डोंगर . त्या ठिकाणी परिक्रमावासीयाचा खरा कस लागतो असे मला वाटते. कारण शुलपाणीचा भाग म्हणजे माईचे ह्रदयस्थान. आपल्या सारख्यांना कुणाचेही ह्रदय जिंकणे किंवा काबीज करणे म्हणजे कर्मकठीण काम. इथे तर माईचे ह्रदय जींकावयाचे आहे तर त्यासाठी आपल्याला ही कठीण परिक्षा आनंदाने पास होणे अत्यंत गरजेचे आहे. काही परिक्रमेचे किनाऱ्यावरील मार्ग डोंगराळ भागातून होते व त्या ठिकाणच्या पाऊलवाटा बऱ्याच उंचावर होत्या. त्या इतक्या अरुद, तिरक्या व छोट्या होत्या की जरा जरी पाय घसरला तरी थेट जल समाधीच. पाठीवरच्या सँगचे ७ ते ८ किलोचे ओझे आम्हाला चालताना पुढे ढकलायचे त्यामुळे तोल जाऊन पडायची जास्त भीती असायची. किनाऱ्यावरील रस्ता शेतातून जर जात असेल आणी शेताला जर स्प्रिंक्रलने पाणी चालू असेल तर चालणे जास्त कठीण व्हायचे कारण वरून कारंजा सारखे उडणारे पाणी व खाली रबडी सारखी झालेली चिखलाची पायवाट.एक वेळ ते अंगावर पडणारे पाण्याचे तुषार परवडले पण खाली चिखलात घुसलेला पाय काढून पुढे टाकण्यासाठी नेला की सँडलला केवढा तरी चिखलाचा थर चिकटून यायचा . हिंदीत (पाय भारी हो गये ) दूसऱ्या अर्थाने वापरतात पण इंथे पाय खरच चिखलाने चांगलेच भारी व्हायचे व पुढे जाणे अशक्य होऊन जाई . मग मात्र ती वाट सोडून देऊन आम्हाला थोडी वरची, गावातील वाट पकडून मार्ग आक्रमित जावे लागे . बऱ्याच ठिकाणी बाभळीचे मोठे माठे काटे असलेली झाडे , झुडपे असायची, त्यांना चुकवत , पायात काटे जाणार नाही याची काळाजी घेत चालावे लागे. असे म्हणतात की आपण आतापर्यंत इतरांना जितके टोचून बोललो असू तितके काटे आपल्याला जास्त टोचतात व माई दोन्ही अकांऊट टॅली करते . त्यामुळे मला जास्तच लक्षपूर्वक चालेणे भाग होते. जेव्हां माईच्या अगदी किनाऱ्या वरून रस्ता नसेल तेव्हा काही वेळेला गावातल्या, रानातल्या रस्तावरून जावे लागे , त्या दोन तीन वेळेला बाभळीचे काटे सँडलमध्ये घुसून पायाला चांगलेच टोचले होते. किनाऱ्यावर वाळु सारखी माती असेल तेव्हा पण चालणे खूपच संथ गतीने हाई कारण पाऊल त्या मऊ वाळूत रूतल्याने भराभर चालणे खूप कठीण जाई. किनाऱ्यावरील बराचसा भाग हा सरळ एक सारखा नसे ,खूप चढउतार असल्याने थंडीने पायाला पडलेल्या भेगा तेव्हाही व रात्रीही खूप छान बोलत. पण हा त्रास ही फार होऊ नये म्हणून माईनेच काळजी घेतली होती असे म्हणावे लागेल कारण तीन महिन्यापासून आम्ही या वर्षी परिक्रमा करायची असे ठरवून सर्वं तयारी करत होतो आणी हा आमचा गुरूबंधू बापू, या पठ्याचे मात्र परिक्रमा सुरू करायच्या जेमतेम आठ ते दहा दिवस परिक्रमेला येण्याचे निश्चीत झाले किंवा माईनेच आमच्यासाठी निश्चित केले असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आमच्या बरोबर अजूनही काही जणांचे येण्याचे ठरले होते पण पंरिक्रमेचा दिवस जसा जवळ येत गेला तसे त्यांचे परिक्रमेला येणे रहित होत गेले .पण मनमाडचा हा गुरूबंधू वयाने आमच्या पेक्षा वीस बावीस वर्षाने लहान असलेला हा प्रेमाचा झराच माईने आमच्या बरोबर पाठवला होता. या प्रेमळ मुर्तिने लहान असूनसुद्धा संबंध परिक्रमेत आमची खूप काळजी घेतली. आपण चित्रपटात बघतो की एखादा छोटा भाऊ आपल्या मोठया भावांवर खूप प्रेम करतो व त्यांची काळजी घेतो , तसेच काहीसे आमच्या बाबतीत माईने घडवले होते .कारण रात्री झोपायची वेळ झाली की कितीही दमलेला असला तरी हा प्रेमळ बापू आम्ही वयाने वडील म्हणून आमचे पाय चेपून देई व या भेगाना मलम ही लावून देई.पण आम्ही मोठे म्हणून आम्हांला मात्र त्यांच्या पायांना कधीही पठयाने हात लावू दिला नाही .कधी आम्ही तसा प्रयत्न केलाच तर म्हणे नको दादा , तुम्ही पाय चेपलेत तर माझे पाय जास्त दुखतील असे सांगून आमचे हात धरून ठेवी. थोडे विषयांतर झाले पण माईची अशी ही प्रेमळ माणसे आठवली की सहजच त्यांच्या बद्दल लिहीणे होते. आता परत आपल्या विषयाकडे वळतो
किनाऱ्याचा रस्ता पकडला व परत काही कारणानी तो मार्ग सोडून वरच्या, गावातल्या रस्तानी जाणे भाग पडले तर वर जाणारा चढणीचा रस्ता चढणे खूप कठीण जाई .जसे जसे परिक्रमेत आम्ही मार्ग आक्रमत होतो तसे तसे हे चढ खूप दमछाक करणारे होत गेले. गावातून जाणारे रस्ते चालयला तसे सोपे असत पण निर्सग सौंदर्य फार दिसत नसल्याने ते कंटाळवाणे होत , दूपारी तर उन्हाची झळ इतकी त्रास देई की पूर्ण घामटा निघत असे .तेच किनाऱ्यानी चालू लागलो की माईच्या प्रवाहाचा गारवा, शेतांचा हिरवेगार पणा मनाचा व शरीराचा सगळा शीण घालवून एक वेगळाच उत्साह देत असत. त्यामुळे माईच्या किनाऱ्यावरची सौंदर्याची उधळण बघायची असेल तर तिच्याच ध्यासात , आपल्या गुरूनी दिलेले नाम आनंदाने घेत स्वतःला त्यात पूर्ण झोकून देऊन शरीराला होणाऱ्या त्रासाचा फार विचार न करता मार्गक्रमण करत राहणे हीच तर परिक्रमेतील एक पायरी आहे . अशा वेगवंगळ्या पाय-या आपल्या गुरू माउली म्हणा किंवा माई म्हणा आपल्या कडून सर करून घेतात फक्त त्यासाठी पाहीजे आपली त्यांच्यावरची पराकोटीची श्रध्दा व आपल्या मनाची तयारी . माझी ती होती की नाही खरच माहीत नाही (,खर सांगायचे तर पराकोटीची श्नध्दा ही तर खूप पूढची पायरी आहे )तरीही त्या माऊलीने या अजाण लेकराची परिक्रमा खूप आनंदाने व प्रेमाने ,एखादया लहान मुलाचे बोट जसे आई प्रमाने ,काळजीने धरते
तसेच धरून माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली , त्याबद्दल तिला शतःशा प्रणाम.
किनाऱ्या वरुन चालता चालता , मन अंतर्मुख झालं आणि आईच्या पुण्यतिथी उत्सवातल भजन माझ्या मनात रुंजी घालू लागलं.
प्रणव ची सद्गुरू देती धारणा त्याला ,
ढकलून घालविती आत शबलाला ,
हात धरुनी नेती हळूची मोक्ष नगराला ,
कृष्ण सुत चित्त ऐशा गुरु पदी बैसे .
बाबा गर्दे म्हणजेच कृष्णसुत हे सिद्धारूढ स्वामींचे शिष्य म्हणतात की, सद्गुरु ॐकार रुपी नाम आपल्याला देतात , आणि बहिर्मुख असलेल्या शबलाला, म्हणजे मनाला अंतर्मुख करतात आणि अंतर्मुख झालेल्या साधकाला अगदी अलगद मोक्षनगराला नेतात .
अशा या प्रेमळ सद्गुरुंपाशी , या वेड्या मनाला कायम रुंजी घालू देत अशी मनोमन प्रार्थना करून आज इथे थांबतो.
परत अशीच एखादी अवघड वाट उदयाच्या भागात. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव १२-
गेल्या भागात सांगीतल्याप्रमाणे तीन चार महिन्यापासून नर्मदा माईच्या परिक्रमेची तयारी मी सूरू केली होती. बँकेत बाकीच्या सहकाऱ्यांबरोबर बोलून एवढी सुट्टी मिळेल किवा कसे याची चवकशी करून ठेवत होतो. माझ्या विभागाच्या ऐ्.जी.एम.शी बोलून मला एवढी सुट्टी मंजूर कराल ना? अशी विचारणाही केली होती.कारण ते जर रजा मंजूर करत असतील तरच मला आमच्या एच.आर. ऐम. विभागाकडे माझ्या या चार महिन्याच्या विषेश सूट्टी विषयीचा अर्ज मंजूरी साठी पाठवता येणार होता. पण गुरूंची माझ्यावर विशेष कृपा म्हणूया आमच्या विभागाच्या वरिष्ठानीही मला सुट्टीसाठी लगेच होकार दिला, फक्त एवढेच सांगीतले की एच.आर. एम. विभागाच्या डीजी.एम शी बोलून घे, ते जर रजा मंजूर करत असतील तर माझी काहीच हरकत नाही. चला, अडथळ्याच्या शर्यतीतील पहिल्या मंजूरीचा अडथळा दूर झाला होतो.आता मी डी .जी.एम शी बोलून पुढचा मार्ग निश्चित करावयाचा बाकी होता. मनात थोडी अजूनही धाकधूक होतीच त्याचे एक कारण म्हणजे या कारणासाठी अजून पर्यंत कोणी इतक्या दिवसाची सुट्टी घेतली नव्हती, आणी दूसरे म्हणजे तोंडाने कितीही वेळा गुरूंचे गुणगान गायले तरी त्या प्रेमळ आई आपली इच्छा पूर्ण करतील असा पूर्ण विश्वास तेव्हाही नव्हता, कारण आमची वृत्ती किवा स्थिती म्हणा ही अर्धवट पाण्याने भरलेल्या भांडयासारखी. रिकामे भांडे नळाखाली पाणी भरावयास ठेवले की पाणी जसे भरू लागते तसा त्या भांडयाचा पण तडतड असा मोठा आवाज येतो ,तसे आमचेे बोलणे , वागणे म्हणजे त्या भांडयाच्या आवाजासारखे , सगळ्यांना मला गुरूंबद्दल किती आदर आहे ,प्रेम आहे हे कळेल असे. पण मनात मात्र अपूर्ण विश्वास किवा श्रद्धेचा अभाव . मग भांडे एकदा पाण्याने पूर्ण भरले की मग कसे सगळे शांत शांत, कुठे गडबड नाही गोंधळ नाही , सद्गुरू चरणी पूर्ण विश्वास. सद्गुरू माझ्या हिताचेच करणार असा ठाम भरवसा. तशी वृत्ती होण्यासाठी ,विश्वास येण्यासाठी माईची परिक्रमा हा एक मार्ग, तिच्यावर पूर्ण श्रध्दा ठेवून, साधू संत महंत यांच्या सहवासात परिपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचा व त्यातून बरेच काही शिकण्यांचा.
मग एक दिवस त्या साहेबांशीही या विषयावर बोललो तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगीतले की आपल्या संस्थेच्या नियामानूसार तूला दोन मंहिने भर पगारी व पुढील दोन महिने बिनपगारी ( म्हणजे १२० दिवस )रजा मंजूर करता येईल . मी त्यानां त्यासाठी तात्काळ होकार दिला. कारण माझ्यासाठी त्यावेळी पगारी, बिनपगारी यापेक्षा सुट्टी मंजूर होणे हे फार महत्वाचे होते. कारण मन परिक्रमा सुरू होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. मनाला एक परिक्रमेची वेगळीच ओढ लागली होती, नामाच्या गोडीचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे त्यांचे त्याबद्द्ल आभार मानले व मनोमन आईंना साष्टांग नमस्कार केला. म्हणजे मंजूरीच्या दूसऱ्या अडथळ्यातूनही गाडी पार झाली होती. सुट्टी मंजूर झाल्याने आता मनानेही निर्धास्त झालो होतो , कारण परिक्रमेत असतांनाही तिथल्या लोकांना जेव्हा मी बँकेत आहे हे कळत असे तेव्हा त्यांनाही एवढे दिवस बँकेने सुट्टी कशी मंजूर केली याबद्दल आश्चर्य वाटत असे. खरच माझ्या बँकेचा, माझ्या वरिष्ठांचा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तर मी आभारी आहेच, पण ऋणीही आहे कारण जर काही कारणाने रजा मंजूर झाली नसती तर हे सुंदर सत्य जे तेव्हा स्वप्नवत होते ते कधी पाहू शकलो नसतो. माईच्या प्रेमाच्या शिदोरीचे भांडवल आज जे माझ्याकडे आहे ते साठले नसते. माझा उर्वरीत आयुष्यात जीवनाकडे बघण्याचा एक नविन दृृष्टिकोन मला मिळाला नसता. त्यामुळे हे भांडवल, हा अनमोल साठा आता माझ्यासाठी फार मोलाचा आहे.
उदयन बरोबर असल्याने मला परिक्रमेच्या तयारी विषयी तशी काळजी वाटत नव्हती. त्याला दोन परिक्रमांचा अनुभव असल्याने परिक्रमेत ,काय लागते , कशी तयारी करावी याची बरीच माहीती त्याच्याकडे होती. त्यामुळे तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही सर्व पाच जण तयारी करत होतो.
बँकेच्या सुटीच्या अडथळ्याची परिक्षा जरी सहज पार पडली असली तरी नंतर मला अजून एका परिक्षेला सामोरे जावे लागले. कदाचीत सद्गुरुनी असाही विचार केला असेल की मी याची एवढी सोय तर करून दिली आहे, आता पुढे याला खरोखरच परिक्रमेला जायची ओढ आहे का नाही हे बघावे. का आपली नूसतीच तोंडाची बडबड त्या भांडयासारखी .अन ती परिक्षा कशी व काय होती हे आपण पाहू , पुन्हा पुढच्या भागात नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव १३
गेल्या भागामधे मी सुरवातीला गुरुची माझ्यावर कृपा आणी बरेच काही सांगीतले , पण त्या भागाचा शेवट करतांनाच परत म्हंटले की आई बघत असतील की खरच परिक्रमेची ओढ लागली आहे किवा नाही म्हणजे काय तर परत त्यांच्या बद्दल माझ्या मनात संशय आला. म्हणजे त्या भागाचा शेवटच्या ओळीपर्यंत ही माझा त्यांच्यावरचा विश्वास टिकला नाही , खरतर माझे मलाच खूप वाईट वाटते की माझा त्यांच्यावर चा श्रध्दाभाव दहा ओळीपर्यतही टिकला नाही .नाहीतर मी खरे असे लिहावयास हवे होते की माझ्या हिताचे होते म्हणूनच त्यांनी ही पुढची परिक्षा ठरवली किवा ठेवली होती. कारण यात असे की आपण ज्याच्याशी असे श्रद्धेचे संबंध जोडतो त्याच्या बद्दल यत्किंचितही संशय असू नये ,यालाच खरा भाव असे म्हणतात. पण या कच्या मडक्याचे भाव व लिखाण असेच असणार कारण सत्वगुणांची झुळक आली की खूप चांगले विचार , नंतर परत ये रे माझ्या मागल्या.
यावरून मला श्री बेलसरे आजोबांनी गोंदवलेकर महाराजांची सांगीतलेली आठवण आठवली. महाराजांना एकदा त्यांनी विचारले की परमार्थ या शब्दाचा अर्थ एका शब्दात सांगावयचा झाला तर काय असेल ? महाराज म्हणाले "सावधानता ". सावधान म्हंटल्या वर सारखे मनावर लक्ष ठेवून राहणे किती कठीण आहे. किती विलक्षण व अचूक उत्तर आहे ना मनाची कायम सावध अवस्था म्हणजे भगवंताशी कायम अनुसंधान. कारण त्याचे विस्मरण झाले की लगेच हा "मी 'हजर आहेच. मग हे असे माझ्यासारखे केवळ वाजणारे भांडे काहीतरी लिहून जाते. तरीही गुरूमाउली अजूनही लिहून घेत आहते ,म्हणजे किती दयाळू अतःकरण आहे बघा, थोडे चूकीचे लिहिले आहे, तरीही काही हरकत नाही माझेचं लेकरू आहे ते, सुधारेल.हा दयाळू व प्रेमळू भाव फक्त सदगुरूंपाशीच असू शकतो.शेवटी संतांचे ह्रदय आहे ते व त्यातून परत एका सहदय प्रेमळ आईचेे. म्हणून त्याची इथेच मनापासून क्षमा मागतो व कालच्या विषयाला सुरवात करायची अनुमती घेतो.
बँकेच्या सुटीचा अडथळा संपला आणी मी आनंदाने बाकीच्या तयारीला लागलो.
साधारण पणे जूलै महिन्यातील गोष्ट असेल ही एक दिवशी माझा मुलगा प्रथमेश जो इंजीनीअर आहे, फुटबॉलच्या मैदानावर खेळत असताना पाय ट्वीस्ट होऊन पडला. महाराज लगडतच घरी आले होते, आम्हाला हे नवीन नव्हेत कारण गेली चार पाच वर्षे फुटबॉल मुळे हे धडपडणे चालूच होते. अभ्यासात खूप हूषार असून, चारही वर्ष सगळ्या सेमना फस्ट क्लास असल्याने "खेळू नकोस " असे कॉलेज मधे असतानाही म्हणण्यास त्याने जागा ठेवली नव्हती. इंजिनीअर झाल्यावर लगेच टी.सी.एस. मधे नोकरीला लागल्याने आता खेळू नकोस असेही म्हणू शकत नव्हतो. तोही पठ्ठया शनिवार, रविवार व आठवडयातील एक संध्याकाळ त्या खेळासाठी काढत होता, म्हणजे त्याचे हे असे फुटबॉल प्रेम होते.
माणूस आयुष्यात काय,हे प्रेम ,आनंद याचाच सतत शोधत करीत फिरत असतो या सर्व गोष्टींमधून व या शोधात आपल्या पाशी असलेल्या खऱ्या प्रेमाच्या साठयाला पूर्ण विसरून जातो . पण हे ज्ञान फक्त सदगुरूच त्याला देऊ शकतात. असो
पण यावेळची गोष्ट थोडी वेगळी दिसत होती, चालता येत नसल्याने दोन तीन दिवस ऑफीसलाही दांडी मारून महाशय घरी बसले होते. हजार वेळा सांगुन ही एकत नसल्याने मी ही थोडया रागाने या वेळेला त्याला त्याच्या या दुखण्या बद्दल काहीच विचारले नव्हते. शेवटी स्वतःच डॉक्टरांकडे जाऊन एक्सरे काढून आला.एक्सरे मधे पूर्ण लेगामेंट फाटलेला आहे, असा रिपोर्ट आला.आता मात्र ऑपरेशन शिवाय दूसरा काही पर्याय नव्हता कारण दोन वर्षापुर्वी दूसऱ्या डॉक्टरांनीही त्याला या पुढे फुटबॉल खेळू नये असे बजावून सांगीतले होते. हे सगळे होईपर्यत साधारणपणे ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उजाडला होता.मला आता काहीतरी त्वरीत हलचाल करण्यावाचून गत्यंतर नव्हते कारण २ नव्हेंबरपासून मलाही माईच्या परिक्रमेचा आनंद लुटण्यास सुरवात करायची होती. शेवटी सेकंड ओपीनीयन घेऊन आम्ही २ स्प्टेंबरला डॉ. करंदीकरांकडे ऑपरेशन करावयचे निश्चित केले. म्हणजे त्याच्या ऑपरेशन नंतर साधारण दोन महिने मी इथे असणार होतो. डॉक्टरांना पण माझा परिक्रमेचा सगळा प्लॅन सांगीतला तेव्हा त्यांनाही तो ऐकून "तो या दोन महिन्यात एकदम ओके हाईल हो, अहो माझे सुद्धा हे ऑपरेशन झाले आहे ", तुम्ही काही काळजी करू नका ,तुम्ही नक्की परिक्रमेला जा असे ठणकावून सांगीतले होते . म्हणजे मी ठरल्या प्रमाणे आता परिक्रमेला नक्की जाऊ शकत होतो.
ऑपरेशनचा दिवस उजाडला , सकाळी साडे दहा अकरा वाजता त्याला ऑपरेशन थिअटर मध्ये नेले .म्हणजे आता एक ते दिड तासानंतरच तो बाहेर येणार होता. ऑपरेशन सुरू होऊन जेमतेम पंधरा वीस मीनटे झाली असतील तेव्हा "डॉक्टरांनी तुम्हाला त्यांच्या केबीन मध्ये बोलावले आहे " असा निरोप पाठविला.मलाही कशासाठी बोलवले आहे याचा काही अंदाज येत नव्हता. डॉक्टर ऑपरेशन रूम मधून बाहेर आले व त्याच्या केबीन मधे येऊन सांगीतले की त्याची गुडघ्यावरची कुशन म्हणजेच (कारटीलेज) ही फाटली आहे.एक्सरे मधे ते कळत नव्हते पण आता ओपन केल्यावर दिसत आहे. त्याचेही ऑपरेशन करणे गरजेचे आहे कारण त्याला पुन्हा थोडे दिवसानी किवा वर्षानी परत गुडघे दुखीचा त्रास होऊ शकतो. त्या कारटीलेज रीप्लेसमेंट साठी आताच आपल्याला त्याचे तिथले काही चांगले टिशूज काढून घेणे गरजेचे आहे. त्यांनी असे सांगीतले की हे टिशुज आम्ही आज लगेच लॅब मधे पाठवून देतो व लॅब मध्ये त्या टिशुवर काही प्रक्रिया करतात व
महिन्याभरात त्याला आवश्यक असलेले अजून टिशुज तिथे डेव्हलप केले जातात(कलचर असे म्हणतात )व ते आपल्याला त्यांनंतर म्हणजे महिन्या भरानी परत ऑपरेट करून तिथे रिप्लेस करता येतात. आपला निर्णय मला सांगावात कारण पुढे कधीही हे ऑपरेशन करावयाची वेळ येईल तेव्हा मला दोनदा ऑपरेट करावे लागेल एकदा टिशुज काढाण्यासाठी व एकदा रिप्लेसमेंटसाठी .आता ऑपरेशनमुळे तो भाग ओपनं झालेला आहे त्यामुळे आत्ताच ते काढून ठेवणे सोयीचे आहे. एका क्षणासाठी मलाही हा यक्ष प्रश्न माझ्या समोर आल्या सारखा वाटला कारण इतके व्यवस्थित माझ्या परिक्रमेच्या जाण्यात आड येणार नाही अशा रितीने ऑपरेशनची तारीख ठरवुनहि हे मधेच परत काय लंचाड मागे लागले असा मनात विचार येऊन गेला. कारण अजून एक मिहीन्यानंतर परत ऑपरेशन म्हणजे साधारण ऑक्टोंबर च्या पहिल्या आठवडयात ऑपरेशन असणार व त्यानंतर जेमतेम पंचवीस दिवसच मी इंथे, पुढे चार महिने मी इथे नसणार होतो. एक क्षण माझ्यातल्या बाबानी डोके वर काढले होते पण दुसऱ्या क्षणी त्यांना मी सांगीतले की तुम्ही
त्याचे टिशुज आता काढून ठेवा ऑपरेशन झाल्यावर आपण त्याच्याशी बोलू व पुढचे काय ते ठरवू. ऑपरेशन झाल्यावर परत त्यांनी मला सांगीतले की आपल्याला लगेच ठरवावे लागेल की ऑपरेशन करावयाचे आहे अथवा नाही कारण मला त्या लॅब वाल्यांना बोलवून ते टीशुज आजच्या आज त्यांच्याबरोबर पाठवावे लागतील नाही तर ते खराब होतील.
ऑपरेशन नंतर तासाभरानी प्रथमेशला या सगळ्याची कल्पना दिली व तुला आताची महिनाभर व नंतर परत सव्वा ते दिड महिना सुट्टी ऑफीस कडून मिळू शकते का? हे ठरव म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढचे ठरवता येईल असे सांगीतले. त्यावर त्याचे त्याच्या साहेबांशी फोनवर बोलणे होऊन त्याने सुट्टीचा इशू येणार नाही असे म्हंटल्यावर मग मी पुन्हा डॉक्टराशी बोलावयास गेलो. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवडयातच ऑपरेशन करण्यास हरकत नाही असे त्यांना सांगीतले. पण मला परिक्रमेला २ नोव्हेंबरला नक्की जाता यईल ना ? हे ही कनर्फम केले कारण मलाही आता परिक्रमेचे वेध लागले होते.
काहीही झाले तरी परिक्रमेच्या सुर्वण संधीला हातातून निसटून दयायचे नव्हते. संसाराचा हा रामरगाडा कधीही न संपणारा आहे त्यामुळे त्यातून मार्ग काढून आपल्या जीवनाचे कल्याण करावयाचे असेल तर थोडे मनाला घट्ट करणे गरजेचे होते. अशी ही मनाची तयारीही माझ्या गुरूनीच माझ्याकडून करून घेतली , कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यानी आपल्या ३ महिन्याच्या मुलालाही गुरू सेवेसाठी आपल्या पासून दूर केले होते .त्याचं माझ्या आईनी माझ्याकडून तेवढी नाही तरी काही अंशी तयारी हया प्रसंगांत करून घेतली असे म्हणण्यास हरकत नाही. मनाचा थोडा जरी डळमळीतपणा झाला असता तरी एका सुंदर व प्रेमळ सुखाला मला कायमचे मुकावे लागले असते.
आताही कुणाच्या मनात किवा माझा मनात त्यावेळी असा विचार आला असता की ,त्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षीही किवा पुढे कधीही जाता आले असते की परिक्रमेला .पण आज या भागात याचे उत्तर मी सांगत नाही व तेव्हाही ते मला माहीत नव्हते की पुढे काय घडणार होते. फक्त ते माझ्या प्रेमळ गुरूमाऊलीनाच ठाऊक होते म्हणून त्यांचे कितीही उतराई व्हावे असे वाटंले तरी शब्द अपूरे पडतील , तरीही मनात शब्द येतात
तो मज आठवतो गुरूराया | प्राण विसावा माझा | श्रवणी पाजुनिया अमृतI मस्तक ठेवी हस्तI१। अखंड देऊनिया,स्मरणासी |द्वैत भयाते नाशी I२ | विवेकसिंधुची, चिद्ररत्ने Iलेवविली मज यत्ने |३ | अक्षय परमात्मा, अविनाशी I अचल सुखाची राशी।४ Iसदगुरू भवत्राता सुखदाता। केशव स्वामी म्हणे आता I५ I
तो मज आठवतो गुरुराया , अशा या माझ्या गुरुमाऊलीला त्यांच्या ऋषीपंचमी उत्सवात माझे शतःशतः प्रणाम
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव १४
गेल्या भागात माझा अनुभव वाचून बरेच जणांच्या मनात असे आले असेल की हे परिक्रमेचे अनुभव आहेत की याच्या अडचणींचा पाढा. कोणाच्याही मनात येणारा हा विचार अतिशय रास्त आहे. कारण माईच्या परिक्रमेचे अनुभव लिहीतांना परिक्रमा करण्यापूर्वी असलेल्या माझ्या मनाच्या अतःस्थितीला प्रामाणीक राहण्याचा हा एक प्रयत्न आहे. माईच्या परिक्रमेने सर्वार्थाने मनाला एक वेगळाच विश्वास दिला, खऱ्या प्रेमाची जाणीव दिली, तिच्या सहवासाचे प्रेम दिले, पण ही स्थिती परिक्रमेला जाण्यापूर्वी नक्कीच नव्हती व त्याचेच यथार्थ वर्णन कालच्या भागात होते. कारण आपला मी पणा, आपली कॅल्युलेशन किती फोल आहेत याची जाणीव परिक्रमेत खूप वेळा झाली. त्यामुळे आता मनाची स्थिती जरी बदललीे असली तरी तेव्हा ती खास तशी नव्हती याबांबत माझ्या मनात अजिबात दूमत नाही.
मी आपल्या पुढे माझ्या समोर असलेल्या अडचणींचा पाढा सांगायचे एक कारण असेही आहे की माझ्या सारख्या सांसारिक लोकांना या अडचणींचा खूप बाऊ करायची सवय असते व या अडचणीचे खूप महत्वही वाटते . दूसरे कारण असेही आहे की माई काय किवा माझ्या गुरू , 'आईं 'काय, या अडचणीतून मला व्यवस्थित पार नेतील असा पूर्ण विश्वास ठेवण्यातही आम्ही खूप कमी पडतो .आम्ही तोंडाने खूप वेळा गुरूगुणगान करतो पण अजून या मी चा पूर्ण बिमोड झाला नसल्याने त्यांच्यावर पूर्ण भार टाकून कुठलीही गोष्ट करणेही आम्हाला जमत नाही . पूराणात, संत वाड़मयात , आताच्या या युगात फेसबुक, वॉटसँप वर अशा अनुभवाच्या गोष्टी वाचतो, ऐकतोही पण स्वतःवर वेळ आल्यावर हा पूर्ण श्रध्दाभाव किंवा विश्वास डळमळीत असल्याने तसे वागणे मात्र माझ्यासारख्यां कडून होत नाही .खर सांगायचे झाले तर एकदा त्यांच्या हातात आपले बोट दिलेे की एखादा लहान बालका प्रमाणे आपले वागणे झाले की आपली नैय्या ते सहज पार करतात. माझ्या गुरुमाऊलींचे नित्सोपासना असे एक पुस्तक आहे त्यात या संर्दभातील ईतक्या सुंदर ओव्या दिल्या आहेत की त्याची संहजच हे लिहित असताना आठवण होते.
त्यात गुरुमाऊली सांगतात,
भंवनदी तारक भक्तीनौकेचा, सद्गुरू यजमान |
तो तुज सुकाण्या तारक असता, कैचे भवभयभान ॥
कुपाळू सद्गुरू माउली , भक्तिमुक्तीचे भांडार ।
हाकेसरशी धावत येई सदैव देई आधार ॥
हाकेसरशी ! फक्त आपल्या आर्त हाकेची गरज ,की भक्तिमुक्तीच्या भांडाराचे सगळे द्वार ते आपल्याला समोर मोकळे करून द्यायला व धावत येऊन आपल्याला आधारही द्यायला त्या तयार असतात, त्यांना आपल्या संसारातील अडचणी तर एक शुल्लक गोष्ट ! पण अशी हाकच मारत नाही हो आपण, त्यामुळे होते असेे की आपली अडचण दूर न झाल्याने आपण दुःखी होतो, पण त्यांना आपण अशी हाकच मारली नाही याचे त्यांना किती वाईट वाटले असेल याचा साधा विचारही आपल्याकडून होत नाही पण हा विचार आता येतो परिक्रमेच्या अनुभवाने.
अशी ही आर्त हाक आपल्याकडून येण्यासाठी व त्यांच्यावर पूर्ण विश्वास निर्माण करण्यासाठी माईची परिक्रमा हा एक खास सुंदर मार्गं.माझ्या सारख्या शहरात राहणाऱ्या ला थोडा खडतर असेलही पण माईरूपी सदगुरूना पूर्ण सरंडर होण्याचा सुंदर आनंदही आपल्याला यावेळी नक्की मिळून जातो .
त्यामुळे हा भाग लिहीतांना एवढेच सांगेन की दोन्ही ऑपरेशन सद्गुरूकृपेने व्यवस्थीत पार पडली व दूसऱ्या ऑपरेशन नंतर थोडी जास्त काळजी घ्यावी लागली पण माईने मला पहिला ग्रीन सिग्नल दिला की आता तु निश्चित मनाने परिक्रमा कर.
परिक्रमेला जायच्या आधीचे पाच सहा दिवस तर मी कसे ढकलले ते माझे मलाच ठाउक. कारण घरच्या आठवणी पेक्षा माझ्या डोळ्यासमोर व मनात सारखे परिक्रमेचे विचार तरंग चालू असत.अखेरीस १ नव्होंबर हा माझ्यासाठी असलेला खूप छान दिवस उगवला, घरच्या सगळ्या मंडळींचा निरोप घेउन आम्ही डोंबिवलीतून कल्याण मार्गे खाडवा स्थानकाकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. खांडव्याहून बसने माईच्या किनारी असलेल्या ऑकारेश्वर नगरीत गजानन माहाराजांच्या धर्मशाळेत, विश्रांती साठी थांबलो.
उदयन, मी,समीर, ,वैभव,भीष्म अशा आम्ही पाच जणांनी ३ नव्हेंबरला आँकारेश्वरहून परिक्रमा सुरू करण्याचे ठरवले होते. आमच्या बरोबर दोन दिवस परिक्रमेचा आनंद लुटण्यासाठी सुजाता, निखिल, दिनेश व शिवाजी हे गुरुबंधुही सगळे डोंबिवलीहून आले होते. परिक्रमा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २ तारखेला ऑंकारेश्वर व ममलेश्वराचेे दर्शन घेतले, गुरुमाउली गजानन महाराजांचे आर्शिवचन घेऊन एक दिवसाची ७.५ किलोमीटरची मांधाता परिक्रमाही पूर्ण केली .
३ नव्हेंबर . ज्या दिवसाची आम्ही चार महिने चातका सारखी वाट बघत होतो तो आमच्यासाठी असलेला सोनीयाचा दिवस आज उजाडला ,एक वेगळीच हूरहूर मनाला लागली होती कसली ते माहित नव्हते पण आता चार महीने आम्हाला एका वेगळ्या सुखाच्या ,आनंदाच्या दुनियेत जायचे होते जिथे निर्सगाच्या सानिध्यात ,माईच्या सहवासात जिव्हेला, मनाला फक्त एका सुदगुरुंच्या नामात आनंदाने आडकवून ,आपण आपल्याला ओळखायचा किंवा जाणून घेण्याचा एक अथक प्रयत्न करायचा होता. म्हटल तर परिक्षा खूप कठीण होती पण आमच्यातही एक वेगळाच कैफ, एक झिंग आली होती माईच्या प्रेमाची, जीने आम्हाला आमचे घरदार सोडून या तपोभुमीकडे खेचून आणले होते . परिक्रमेचा सगळा विधी सकाळी पूर्ण झाला. गुरूजींनी संगळयांना संकल्प दिला, आम्ही संगळ्यानी मैयाची मनापासून पार्थना करून परिक्रमा पूर्ण करून घेण्याची विनती केली. मैय्याला जल स्वरूपात कुपीत घेऊन ,कन्याभोजन घालून त्यांचा आर्शीवादही घेतला.
दुपारी बाराच्या सुमारास परिक्रमेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या टप्याला माईच्या पक्या बांधलेल्या घाटावरून सुरवात केली. एक वेगळाच आनंद , उत्साह सर्व शरीराला व मनाला भरून राहीला होता. उदयने व वैभव (बापू ) यांनी या मार्गने परिक्रमा केली होती तरी मी व बाकींच्यासाठी हा मार्ग नवीन होता त्यामुळे एक वेगळीच उत्सुकता होती. त्यातच चितळे मावशीनी त्यांच्या सीडीत या मार्गाचे वर्णन खूप कठीण , खडतर असे केल्याामुळे एक थोडेसे मनावर दडपण ही होते. हा पहिला टप्पा होता साधारण पणे १३ ते १४ किलोमीटरचा व टप्याचे नाव होते ऑकारेश्वर ते मोरटक्का.
दोन मार्गनी मोरटक्या ला जाता येत असे एक माई च्या किनार्यानी जो डोंगराळ खडकाळ, चढ़ उताराचा आणी दूसरा डांंबरी रस्ता. आम्ही किनाऱ्याचा मार्ग निवडल्याने माईच्या किनाऱ्यानी चालण्यास सुरवात केली, पक्का घाट संपला व आता कधी थोडा पक्का, थोडा कच्चा रस्ता सुरू झाला. माणसांची वर्दळही कमी झाली,आम्ही व अजून काही परिक्रमावासी यांचे आता मार्ग भ्रमण सूरू झाले. पाठीवर ८ ते ९ किलोची सँक, एका हातात जाडजूड दंड व एका हातात कमंडलू , डोक्याला पागोटेवजा पांढरा पंचा , अंगावर पांढरा पंचा, खाली पांढरी लुंगी व पायात सँडल असा परिक्रमावासीयांचा पंहेराव घालून आमची माईच्या किनाऱ्यानी वाटचाल सुरू झाली. आता तीन ते चार मंहिने एका वेगळ्या जीवनाला सुरवात झाली होती आणी जे स्वप्नवत वाटत होते. याला कारण असे की मी आणी उदयने आधी २०१९-२० मध्ये परिक्रमा करण्याचे ठरवले होते . माझ्या घरी वडिलांना व उदयनचे त्याच्या आईला विचारूनही झाले होते .पण उदयनच्या परिक्रमे वरील ऐका लेखाने असे काय झाले माहीत नाही की त्या क्षणाला अगदी मनापासून असे वाटले की पुढल्या वर्षीचा काय भरवसा आपण या वर्षीच परिक्रमेला गेले पाहिजे. काही वेळला आपले अंर्तमन आपल्याला किती योग्य निर्णय देते हे आता पटताल, कारण आता माझा मुलगा दोन वर्ष शिकावयास परदेशात गेलाय त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे २०१९-२० मध्ये व पुढे तीन चार वर्ष तरी मला चार महिने घरा बाहेर रहाणे अशक्य आहे हे जाणून माझ्या सद्गुरूंनी गेल्या वर्षीच माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली. काय सद्गगुरूंचे प्रेम बघा, की आपल्या नाठाळ शिष्याच्या मनात आलेली ही इच्छा सुध्दा त्यांनी पूरवली .खरच संतांपाशी फक्त प्रेम,कुपाळुपणा, कनवाळुपणा यां शिवाय बाकी काही नसतेच, प्रेमाचा अलौकीक वर्षाव आपल्यावर करीत असतात.या आठवणीने आताही डोळ्यात पाणी येते व ओठावर शब्द येतात, किती प्रेमळ तू गुरू माय माय ,माय किती प्रेमळ तु गुरुमाय. या सुंदर आठवणी पुढे आमचे प्रवास वर्णन ही फिके वाटते त्यामुळे पुढचा भाग पुन्हा कधीतरी . नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव १५ -
हरि हरि बोल बोल बोल| हा मंत्र नाही खोल।धृ I
हरि म्हणता पाप ताप निवारण वद हे नाम अमोल अमोल अमोल ॥१ I
हरिरस सेविता अमर होसी बापा।
देशील प्रेमे डोल डोल डोलI२I
खाता पिता उठता बसता। नाम घेता न लगे मोल मोल मोल| ३I
तिर्थव्रतादि करूनी देह दंडिसी।
परि ते नामाविण फोल फोल फोल | ४ I रुक्मिणी हरिपदी तल्लीन झाली| पाहता रूप सखोल सखोल सखोल I५I
कालच्या भागातील कच्चा रस्तावरून चालत असताना मंदीरात म्हटलेल्या भजनाची आठवण येत होती व माझ्या गुरूंनी हरिच्या नामाचे केलेले इतके यर्थाथ वर्णन आठवून आपल्याला किती परिपूर्ण सदगुरू मिळाले आहेत की जे आत्ताही आपल्याला नामाची आठवण करून देउन जणू सूचवत आहेत की मंदीरात भजन म्हंटल्याप्रमाणे आता चार महिने तुम्ही असेच नामात रंगून जाऊन नामाचा प्रत्यक्ष आनंद घ्या. किती विलक्षण प्रेम बघा त्यांचे ,की आपली लेकरे आता वेगळ्या प्रवासाला निघाली आहेत तर त्यांची नामाच्या धुंदीत परिक्रमा पूर्ण व्हावी. हेआठवून आताही डोळ्यात पाणी येते व आपण कसेही असलो तरी त्यांचे आपल्याकडे किती लक्ष आहे या जाणीवने एक वेगळाच आनंद होतो.
मै्याच्या किनाऱ्यानी चालताना असे नामचे पाढे आमची माऊली आमच्याकडून म्हणून घेत होती. आता आम्ही मै्य्याच्या किनाऱ्यानी पण थोडे डोंगराळ भागातून चालू लागलो होतो . रस्ता असा नव्हताच सगळ्या पायवाटाच आपण आपल्या सोयीने जायच्या. कधी खडकाळ भाग चढा होता तर कधी झाडाझुडपातून उताराची पाउलवाट होती .आता मै्या खाली व आम्ही सारे उंचावर असा प्रवास चालू झाला.मी या आधी दोन तीन वळेला अशा प्रकारचे ट्रेक केलेले असल्याने मला तितके कठीण वाटत नव्हते तरीही दोन, तीन ठिकाणच्या जागा इतक्या अरूंद व उताराच्या होत्या की जरा पाय घसरला की थेट खूप खालपर्यंत घसरत जायची भीती होती. कन्याभोजनाच्या खीरीच्या जेवणाने चालण्यास थोडे कष्ट पडत होते.उन्हाच्या फटकाऱ्याने व पोटभर जेवण झाल्यामुळे तहान पण सारखी लागत होती, पण पाहिल्या दिवासाच्या उत्साहामुळे सगळे छान वाटत होते. सुजातामुळे समीर थोडा मागे पडत होता कारण बधुंपेक्षा भगिनीना चालवयास व चढावयास ही वाट अवघड होती. पण सुजाता ही न घाबरता , चिकाटीने समीर बरोबर येत होती. बाकीचे साथीदार शिवाजी, निखिल, दिनेश हे ही त्यांच्या छोटया परिक्रमेचा आनंद घेत होते. काही वेळा आमच्यात व समीर, सुजाता यांच्यात बरेच अंतर पडले तर नर्मदे हर चा पुकारा करून आम्ही एकमेकांचा अंदाज घेत पुढे चालत होतो . संध्याकाळ पर्यंत मोरटक्याला पोहोचायचे म्हणून चार साडेचार नंतर आमच्या चालण्याला चांगला वेग आला. रस्ता असा नव्हताच पण झाडाझुडपातून वाट काढत आम्ही पुढे मार्ग आक्रमण करत होतो. आता मात्र समीर , सुजाता व भीष्म आणी आमच्यात बरेच अंतर पडले होते. साधारण मोर टक्का यायच्या आधी आम्हीही चुकलो व माईच्या किनाऱ्यानी पुढे जाण्यास कुठेही मार्ग सापडेनासा झाला .खूप ठिकाणी काटेरी झाडे पुढे जाऊन देत नव्हती तर काही ठिकाणी कंपाउड घातल्यामुळे जाता येत नव्हते. अर्धा तास झाला तरी माईच्या किनाऱ्याचा मार्ग काही मिळत न्हवता. उदयनला ही दोनदा या मार्गाने जाऊन वाट सापडत नसल्याने नवल वाटत होते. शेवटी वरुन जाणारा एक रस्ता दिसला जो डांबर रस्ता होता पण आता काही इलाज नव्हता कारण सुर्यं अस्ताला जायच्या आधी भक्तराज माहराजांच्या आश्रमात आम्हाला पोहचावयाचे होते. मग किनाऱ्याचा नाद सोडून दिला व पाण्याच्या मोठया पाईप लाईन वर चढून त्याच्या बाजूच्या असलेल्या पायऱ्यानी वर चढत चढत आम्ही डांबरी रस्ता पकडला व भराभर चालत मोरटक्याला भक्तराज महाराजांच्या आश्रमात सहाच्या सुमारास येऊन पोहचलो. पहिल्या दिवशी पहिल्या टप्यातच माईनी मार्ग चुकण्याचा चांगला दणका दिला होता.
आश्रमात चितळे मावशी व काका परिक्रमा वासीयांच्या सेवेसाठी हजर होते .ऊदयनची आधीच्या परिक्रमेमुळे त्यांच्याशी चांगली ओळख होती. चहा पिऊन फ्रेश झाल्यावर माई म्हणाल्या "अरे मुलांनो आजचा दिवस खूप चांगला आहे, माईच्या किनाऱ्यावर स्नान करून दिप दान करून या ".आमचीही ईच्छा तशीच होती पण आम्ही समीर सुजाताची वाट पहात होतो. आमची अडचण सांगीतल्यावर त्या म्हणाल्या "अरे एवढेच ना ,मी सांगीन त्यांना तुम्ही मैय्या किनारी गेला आहात म्हणून, जा व्हा पुढे ,आजच्या दिवसाची संधी दवडू नका "मग आम्हीही स्नानाची तयारी , थोडे दीप बरोबर घेऊन माईच्या किनाऱ्यावर गेलो, मोरटक्याचा घाट चांगला बांधलेला आहे. आमचे परिक्रमेतील पहिले सायं स्नान, घाट माणसांनी भरलेला होता. कुणी स्नांन करत होते कुणी दिप दान करत होते प्रत्येक जण आपल्या परीने माईच्या किनाऱ्यावर पुज्य भावनेने आनंद लुटण्यात मग्न होता. आम्हीही कमी गर्दी असलेली जागा बघून स्नानास उतरलो. खर तर आम्हालाही थोडा उशीर झाला होता कारण सुर्यदेवअस्ताला गेले होते,पण चितळे मावशींनी सांगीतले होते की आजच्या दिवशी रात्रीपर्यंत जरी स्नान केले तरी ते चालेल,माईचा आर्शिवाद तुम्हाला नक्की मिळेल. आम्हीही भक्तिभावाने माईला वंदन करुन माईच्या जलाला स्पर्श केला, तो स्पर्श तना मानला वेगळ्याच आनंदाची अनुभुती देऊन गेला. माईचा शांतपणे वाहणाऱ्या प्रवाहाचे रूप जुण काही ज्ञान , भक्ती , मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या सद्गुरूंची आठवण करून देत होता . आम्ही ऐका वेगळ्याच भाव विश्वात तिच्या त्या निर्मळ रुपाला पाहत होतो , थोडा काळोख झाला होता तरी माई च्या प्रवाहाचा तो शांत आवाज आणी ऊबदार स्पर्श जणू काही आम्हाला एक हळूवार मायेची, आपल्या आईच्या प्रेमळ ऊबदार स्पर्शाची आठवण करून देत होता .जणू काही ती सांगत होती बाळांनो, निर्धास्तपणे , आनंदाने परिक्रमा करा मी कायम तुमच्या सोबत आहे. थोड्या वेळाने उदयानच्या वाक्यानी भानावर आलो, "चला दीप सोडू या माईच्या पात्रात "दीप प्रज्वलीत करून आम्ही ते माईच्या पात्रात सोडू लागलो आणी ते ही आनंदाने माईच्या अंगावर लहान मुलांप्रमाणे नाचू ,डोलूू लागले. जणू काही त्यांनाही खूप दिवसांनी त्यांच्या आईच्या अंगावर खेळावयास मिळत होते. आम्हालाही ते बघून आनंद होत होता. पण आता तिथून निघणे क्रमप्राप्त होते कारण काळोख झाला होता व आश्रमात जाऊन मैयाची पुजा व आरती करावयाची होती . समीर सुजाता पण इकडे आलेत की नाही यांचाही काही अंदाज येत नव्हता त्यामुळे घाईघाईने पाऊले टाकत आम्ही आश्रमात पोहचलो . आश्रमात समीर , सुजाता आमची वाट बघत बसलेले दिसले. सुजाताच्या चेहऱ्यावरून तिला आलेला थोडा राग दिसत होता , तरी पण मी तिला विच्यारले, अरे तुम्ही आला नाहीत ,तेव्हा तीने आम्हाला तुम्ही तिकडे गेल्याचे माहित नसल्याचे सांगुन,तुम्ही आम्हाला सोडून गेलातच कसे? अशी विचारणा केली. आम्ही त्यांना ,आपण या विषयावर नंतर बोलू असे सांगून माईची पूजा व आरती करण्यास गेलो .थोडा गोंधळ आमचा निरोप न मिळाल्यामुळे झाला होता पण ते त्यांना नंतर कळल्यावर त्यांचाही गैरसमज दूर झाला. रात्रीची भोजन प्रसादी झाली व सगळ्यांची झोप झोप झाल्यावर मी, उदयन , सुजाता , चितळे मावशी ( माई )व काका यांची एक छोटीशी गप्पांची माफिलच रमली. तेव्हा एक जाणवले की माई म्हणजे एक वेगळंच चैतन्य, उत्साह आहे. त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता की जो नवीन प्ररिक्रमावासीला खूप काही शिकवून जाणारा होता. बोलण्यात एक वेगळाच ऑडरींग टोन पण त्यातही पूर्ण प्रेम की जे दूसऱ्याला आपलेसे करून टाकेल. परिक्रमे बाबत खूप छान माहीती त्यांनी सांगीतली की जी आम्हाला पुढे उपयोगी पडणारी होती. त्यांचे यावेळचे पुढचे परिक्रमावासीयांसाठी असलेले सेवाछत्र अमरकंटकला असल्याने आम्हाला चार दिवस परिक्रमेत तिथे थांबण्याचे आग्रहाचे, प्रेमाचे आमत्रण देऊन आमची त्या रात्रीची सुंदर मैहफिल संपली. दूसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुढच्या प्रवासाला सुरवात करायची असल्याने आम्ही ही मावशीनी सांगीतलेले अनुभव आठवत निद्रेच्या अधीन झालो . नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा भाग १६ -
काल चितळेताईं बद्दल बोलण्याच्या नादात मी आपल्याला एक गोष्ट सांगायची विसरून गेलो, आमचा डोंबिवलीचा परिक्रमावासी भीष्म, ज्याने आमच्याबरोबर परिक्रमा उचलली व जो दोन दिवस आमच्या बरोबर होता त्याने अनवाणी चालत परिक्रमा करण्याचे ठरावल्याने मोरटक्याच्या स्थानापर्यंत पोहचू शकला नाही , त्यामुळे पहिल्या दिवशीच आमचा एक साथीदार आमच्यापासून दूर गेला.
परिक्रमेतील आजचा आमचा दूसरा दिवस ,सकाळी लवकर उठून आम्ही सगळेजण माईच्या घाटावर स्नानाला गेलो. आज खूप अल्दाददायक वाटत होते,कालचे १४ ते १५ किलोमीटर चालणे होऊनही कुठलाही थकवा जाणवत नव्हता. आज माईच्या घाटावर कालच्या सारखा गडबड, गोंधळ काहीही नव्हता. आज माई खूप आनंदाने, उत्साहाने वाहत आहे असे आपले मला वाटत होते.जणू काही आई आपल्या छोट्या लेकरांची आनंदाने वाटत पाहत असावी व ती आपली सगळी लेकरे भेटल्यावर तिला जो आनंद होतो तसाच आनंद माईकडे बघून वाटत होता.तिचा वसाच आहे की जो कुणी यईल त्याचे आनंदाने स्वागत करून त्याला पूर्ण आनंद, समाधानाने तृप्त करून सोडायचे. लहानपणी शाळेत, मराठी धड्यात गावातील नदी किनाऱ्याचे लेखकाने केलले वर्णन आता आठवले आणी हसू आले कारण असा आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात कधी यईल असे कधीही वाटले नव्हते व ते स्वप्नवत सुख आज माईच्या किनारी परिक्रमेमुळे मी अनुभवत होतो.
आम्ही सगळ्यानी उदयनी शिकवलेला माईचा ध्यानमंत्र जो आद्य शंकराचार्य यांनी सांगीतला आहे तो असा
आदौ ब्रम्हाडखण्डे त्रिभुवविवरे कल्पदा सा कुमारी I
माध्यान्हे शुध्दरेवा वहीत सुरनदी वेदकण्ठोग्रकण्ठेः॥
श्री कण्ठे कन्यरूपा लालित शिवजटा शाडःकरी ब्रम्हशान्ति : |
सा देवी वेदगडःगा ऋषिकुलता रणौ नर्मदा मां पुनातू ॥
त्याचे स्तवन केले,जलाला स्पर्श करून नमस्कार केला आणी सगळे माईच्या कुशीत शिरलो.एक आनंदाची वेगळीच लहर सगळ्या अंगाखांद्यावरून गेली जणू स्वर्गसुखाचा आनंदच माई आज आम्हाला देत होती. फार काळ त्या सुखात राहत आले नाही कारण आज मोरटका सोडून पुढे जायचे होते त्यामुळे नाईलाजाने आईच्या कुशीतून बाहेर पडून परत भक्तराज महाराजांच्या आश्रमात आलो. माईची पूजा, आरती केली, महाराजांच्या आश्रमातून चितळेमाईच्या हातचा चंहा घेऊन संगळ्यांचा निरोप घेतला व तिथेच असलेल्या राजराजेश्वरी मंदीरात आलो, शुभम मंदीराचा पुजारी व आमचा मित्र असल्याने आमच्या स्वागतासाठी दारात हजरच होता . सगळे मंदीरात आईचे दर्शन घ्यायला गेलो , सकाळी आईच्या निर्गुण स्वरूपाचे दर्शन झाले होते व आता सगुण स्वरूपात आई आमच्यापुढे उभी होती. शुभमने खूप सुंदर रीतीने आईला सजवले होते , सहजच मनात आईचा श्लोक आला
" सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके
शरण्ये त्रिंबके गौरी नारायणी नमो स्तुते "
तिचे ते सुंदर रूप मनात व डोळ्यात साठवत आम्ही मंदीराच्या बाहेर पडलो. आज सकाळ पासून आंनदाचा पर्व काळच चालू होता पण आता त्या आनंदावर थोडे विरजण पडणार होते, कारण आज आम्हाला आमच्या दुसऱ्या एका साथीदाराचा निरोप घ्यायचा होता. जिच्या माईच्या प्रेमाबद्दल मी तुम्हाला सुरवातीच्या लेखात सांगीतले होते ती सुजाता आज परत डोंबवलीला परत जाणार होती. खूप आनंदाने ,मनाची पूर्ण तयारी करून सुजाताने परिक्रमेला येण्याचे ठरवले होते पण बँकेने चार महिने सुट्टी देण्यास दिलेल्या नकारघंटे मुळे तिला तिचा सगळा कार्यक्रमच बदलून टाकायला लावला होता. तरीही त्यातही आनंद मानून समीर बरोबर या दोन, तीन दिवसाच्या माईच्या आनंदयात्रेत ती उत्साहाने सहभागी झाली होती. पण आता तो क्षण आला होता की आम्ही पुढे जाणार होतो व सुजाताला माघारी फिरायचे होते त्यामुळे सुजाताच्या डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या, त्या दुःखात माईचा होणारा विरह, मैय्यावरचे प्रेम जाणवत होते. आम्हालाही मनापासून खूप वाईट वाटत होते कारण परिक्रमेला जाण्याचे ठरल्यापासून तीने ज्या उत्साहाने आमच्या बरोबर परिक्रमेबाबत बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्या त्या न करता आज तिला माघारी फिरावे लागत होते. आम्हाला पुढे जाणे क्रमप्राप्त होते त्यामुळे आम्ही सगळयानी जड अतःकरणाने सुजाताचा निरोप घेतला.पण सुजाताच्या त्या वेळच्या माईच्या विरहाच्या दुःखात माईनेच तिच्यासाठी पुढे किती सुंदर स्वर्गसुख ठेवले होते याची कल्पना तेव्हा सुजाताही नव्हती व आम्हालाही. माईची लिला काही औरच! त्याचे वर्णन कितीही केले तरी शब्द अपुरे पडतील पण तो महिमा काही संपणार नाही. असा तिचा महिमा आपण पुन्हा पाहू पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव १७ -
टोकसरहून प्रसाद घेऊन निघालेलो आम्ही त्या दिवशी संध्याकाळपर्यंत रावरखेडीला राजारामजी पटेल यांच्या माँगंगा का आर्शिवाद या सदाव्रत आश्रमात पोहचलो. तो आश्रम म्हणजे ,एका धनाडय शेतकऱ्याचे घर.घराच्या वरच्या मजल्यावर माईचे सुंदर मंदीर व खाली परिक्रमावासीयांची सोय अशी व्यवस्था होती. मागच्या बाजूस बऱ्यांच गायी म्हशींचा गोठा , खूप मोठा आवार असलेले ते घर. मी बापू, उदयन, समीर , लक्ष्मणदास बांबा सगळे प्रथम पोहोचल्याने व्यवस्थित आसने लावली व सायं स्नान कले. मागोमाग शिवाजी, दिनेश व निखील पण तिथे पोहोचले.आम्हा सगळ्यांना त्यांना बघून खूप आनंद झाला कारण निखीलचा पाय दूखत असूनही न कंटाळता दिनेश व शिवाजी यांच्याबरोबर तोही माईच्या प्रेमाखातर इथेपर्यंत चालत आला होता. आता उद्याचा टप्पा पार पडला की त्यांनी ठरवलेली त्यांची छोट्या टप्याची परिक्रमा पूर्ण होणार होती. म्हणजे माईने त्यांचीही चार दिवस चालत परिक्रमेचा आनंद लुटण्याची ईच्छा पूर्ण केली होती.आमच्या पाठोपाठ मागच्या लेखात ज्या महाराष्ट्रातील परिक्रमावासीयांचा उल्लेख आला होता ते पाखरे, पवार,चव्हाण माऊलीही आले .साधारणपणे त्यादिवशी तीस ते पस्तीस तरी परिक्रमावासी तिथे मुक्कामस होते. संध्याकाळी आम्ही माईची पुजा ,आरती व संत तुलसीदास यांनी रामरायांना उद्देशून म्हंटलेले श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरण भव भयं दारूणमI हे सुंदर भजनही म्हंटले.आरती व भजन झाल्यावर मागे बसलेले पाखरे माउली म्हणाले "वा !,खूप छान, आनंद झाला आरती , नर्मदाष्टक व भजन ऐकून,मन अगदी तृप्त झाल".आम्हालाही आनंद झाला , मैय्याला आरती पोहचली असे म्हणावयास हरकत नव्हती कारण कुणाच्यातरी आंतरआत्म्याला आनंद मिळाला, तो तृप्त झाला, मग अजून काय मिळवायचे आहे हो या परिक्रमेत? हा आनंदच तर खरे टॉनिक आहे या परिक्रमेचे ,जे ऐकमेकांना आपल्याला वाटायचे आहे.कारण माई जसा आपल्याला परिक्रमेत आनंद, समाधान देत आहे , तोच मेवा आपल्याबरोबरच्याना परिक्रमेत व नंतर आयुष्यभर वाटत राहणे हीच मला असे वाटते की परिक्रमेची खरी पलश्रृती आहे. असो, रात्री आठ वाजता त्याच्या पध्दतीने माईची आरती झाली , सगळे परिक्रमावासी वर हजर झाले, सगळ्यांनी त्या आरतीचा आनंद लुटला व माईची रात्रीची भोजन प्रसादी घेतली .दिवसभर अनुभवलेला मै्याचा आनंद आठवत आठवत आम्ही सगळे त्या रात्री निद्रादेवीच्या कुशीत अधीन झालो.
सकाळी लवकर उठायचे होते कारण दूपारपर्यंत तेलीयाभट्टन पर्यत पोहचणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे पहाटे पाच, साडेपाचला आम्ही उठलो.अजूनही परिक्रमेत नवीन असल्याने मी बाथरूमंच्या आडोशानेचं आंघोळ केली.आम्ही सगळ्यांनी माईची पुजा आरती केली व सहा साडेसहाला तिथून पुढच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झालो.साधारणपणे सकाळी निघालेलो आम्ही सलग सहा साडेसहा तास चालून त्या महान महात्माच्या संत सियाराम बाबांच्या आश्रमात पोहचलो. ती अशी जागा आहे की जिथे फक्त आनंदच आनंदाशी खेळत असतो. सगळी चालण्याची आलेली थकान त्या आनंदी परमात्माच्या दर्शनाने पार नाहीशी झाली. सहजच आईंच्या नित्योपासनेतील ओव्या मनात आठवून गेल्या
जया दर्शने ह्रदयी आनंद नाचे | जया स्पर्शने दुःख निरसे भवाचे |
जया भाषणे समुळ संशय गेला I जयाचे मुख अवलोकिता मन होय राजी ।
जो उदारपणे भक्तां प्रेमामृत पाजी
जो निजांगे संकटी रक्षि सकलां I विसरू कसा मी अशा श्रीगुरूला...
मनात सहज विचार आला काय स्थीती असेल हो ह्या सगळ्या माहत्मांची ,संतांची ? कारण या सगळ्या महात्म्यांपाशी फक्त आनंद व समाधानच आतप्रोत भरलेले असते.भय,लाज, राग, लोभ, द्वेश या सगळयाच्या पलिकडे गेलेले हे परमयोगी फक्त त्या परमतत्वाशी एकरूप झाल्याने माझ्यासारखे सर्वसाधारण जीवही तिथे गेले की वेगळ्याच आनंदात न्हाऊन निघतात.अंगाला फक्त लंगोटी व भस्म लावलेला तो प्रेमळ परमयोगी पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळाली व मनोमन त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्याचवेळी मला कपड्यांबद्दल असणाऱ्या माझ्या चोखंदळीबद्दल पण खूप किव करावीशी वाटली.
नंतर हातपाय धुवून त्यांच्या पदकमलांचे दर्शन घेतले व त्याच्याच हातानी बनवलेल्या चायप्रसादीचे सेवन केले. नेहेमी येणाऱ्या सर्व भावीकांना हा महान योगी स्वहस्ताने प्रसादरूपी चहा बनवून त्यांचा आत्मा तृप्त करत असतो.आपल्याच आनंदात मग्न असलेला हा परमयोगी म्हणजे माईच्या किनाऱ्यावरील एक महान संत आहे.
त्यांच्या सेवकांनी आम्हा प्रत्येक परिक्रमावासीयांना खिचडीसाठी लागणारे सर्व शिधा व माईच्या पुजेसाठी म्हणून लागणारे सर्व सामान अर्पण केले व आता भोजन प्रसादी घेऊनच पुढे जायचे असे आग्रहाचे निमत्रणही दिले. आम्हीही सकाळपासून काही खाल्ले नसल्याने त्या अमृततुल्य प्रसादाचा मनापासून आस्वाद घेतला. तिथल्या सेवकांनीही आम्हाला खूप आग्रहानी व प्रेमाने जेऊ घातले. सुजाता नंतर आता परत निरोप घायची वेळ आली होती निखील, शिवाजी, दिनेशची यांची. अँकारेश्वरहून तीन चार दिवस आमच्या बरोबर आनंदाने चालणारे सवंगडी आज डोंबीवलीला परत जाणार होते. निरोपाची वेळ आली तेव्हा त्यांचे व आमचेही डोळे पाणवले. त्यावेळीही माईनी माझी परत खूप काळजी घेतली पण त्याची जाणीव मात्र पूढे झाली.
झाले असे की दिनेश त्यांच्याकडे असलेले अँकल बँडेज तुझ्याकडे ठेव असा आग्रह करू लागला , निखीलला आत्ताही चालताना पावलात घातल्यावर त्याचा चांगला उपयोग झाला होता.पण मी त्याला म्हटंले 'अरे चार दिवस झालेत नवीन चपलांमध्ये चालून, आता त्या नाही चावणार मला'. ( मला नवीन चपला थोडे दिवस नेहमी त्रास देतात पण आता चार दिवस चालणे झाले तरी त्यांनी काही कुरबूर केली नव्हती त्यामुळे आता काही लागणार नाहीत हा माझा अंदाज होता ).पण त्याने खूप वेळा प्रेमाने परत परत सांगीतल्याने व त्यासाठी फारशी जागा लागत नसल्याने सॅकच्या बाहेरच्या खणात मी पिशवीमधे घालून ते खूपसले. पण पुढे परिक्रमेत ते माझ्यासाठी इतके वेळा उपयोगी पडले कारण चालताना बरेच वेळा सँडलचा मागचा पट्टा पायाला घासून घासून रक्त येऊ लागे ,तेव्हा हे अँकल बँडेज पावलात घातले की पट्टा लागत नसे. तसेच बापूलाही काही वेळा पाय दुखांवयास लागला की ह्यानी आराम पडत असे. बघा , किती काळजी होती मैय्याला आमची !पुढे आम्हाला त्रास होऊ शकतो हे जाणून तीने आताच त्या साठीची तजवीज करून ठेवली. माई तेरी लिला अपरंपार है. अशा या प्रेमळ माईचे गुणगान पुढच्या भागात. नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव १८-
मागच्या भागात गुरबंधूंना निरोप घेण्याच्या गडबडीत एक महत्वाची गोष्ट आपणास सांगावयाची राहून गेली असल्याने ती मी इथे प्रथम नमूद करतो व मग पुढे जातो.आम्ही जेव्हा या गुरुबंधुंशी निरोपाचे बोलत होतो तेव्हा संत सियाराम बाबा फळांचे छोटे छोटे तुकडे केलेले प्रसादाचे ताट घेऊन त्यांच्या खोलीतून वाटत वाटत बाहेर आले .जरी प्रसादाचे पोटभर भोजन झाले होते तरी संतांच्या हातून प्रसाद मिळत आहे हे आमच्यासाठी परमभाग्यचे आहे हे जाणून आम्हीही धावत धावत जाऊन त्यांच्या हस्त कमलातून मिळणाऱ्या अमृतरूपी प्रसादाचा आनंदाने स्वीकार केला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा अवर्णनीय आनंद व प्रसाद देण्याची त्यांची पध्दत हा अनुभव मी लिहीत असतानाही माझ्या डोळयासमोर येत आहे.
प्रसाद देत असताना संत सिमाराम बाबा तो प्रसाद अगदी आनंदाने , प्रेमाने भरभरून वाटत होते. कुणाला कमी किंवा कुणाला जास्त , हा माझा सेवेकरी, हा जवळचा, हा लांबचा असा भेदभाव न करता, अतिशय प्रमाने त्यांचे प्रसाद वाटणे चालू होते. त्यांच्या दष्टीने प्रत्येकाच्या अतःकरणात तोच परमात्मा आहे ही सहज भावना असल्यामुळेे त्यांच्याकडून सगळ्यांना अगदी तृप्त होईस्तोपर्यंत प्रसाद देणे झाले. त्यावेळी सहजच माझ्या डोळ्यासमोरे चित्र आले की माझ्यासारख्या संसारीक माणसांला जर असा प्रसाद वाटण्याचे काम मिळाले असते तर तो मी कसा वाटला असता ? पहिली गोष्ट ही की ईतका भरभरून प्रसाद माझ्याकडून वाटलाच गेला नसता याचे पहिले कारण हे की हा प्रसाद 'मी ' देत आहे हा भाव त्यात नक्कीच आला असता, दूसरे म्हणजे प्रसाद मैय्याचा किवा भगवंताचा आहे त्यामुळे ज्याच्या भाग्यात असेल त्याला तो मिळेल ही कल्पनाच तेव्हा माझ्या मनाला शिवली नसती. तिसरे कारण असे की थोडेसे हातचे राखुनच प्रसाद देणे झाले असते कारण डोक्यात अजून एक कनसेप्ट हा की आता जे हजर आहेत ते व नंतर येणाऱ्याना पण हा प्रसाद पुरला पाहिजे. त्यामुळे ही काळजी, वर म्हंटले तसे हा मी पणा जेव्हा संपेल तेव्हा सहजपणे आपलेपणाचे, प्रेमाचे वागणे होईल कारण देणारा मी नाही तो परमात्मा आहे त्यामुळे पुढे येणाऱ्याची सोयही तोच करेल हा भाव तेव्हा राहील. चौथे व महत्वाचे कारण म्हणजे माझ्यातही असलेली सांसारीक लोकांची साठवणूक करण्याची जी वृत्तीे ,ते संस्कारही सहजच यावेळीहीं बाहेर आले असते.
सदगुरू सांगतात की असे अनेक जन्मातील कितीतरी संस्कार आपल्या आत जे आहेत ते सहजच वळोवेळीे आपले डोके बाहेर काढतात व त्याप्रमाणे आपले वागणे होऊन आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सराच्या अधीन व्हावे लागते.हे असे अनेक जन्मातील संस्कार घालवण्यासाठी तर सदगुरूला अन्यन्यभावे शरण जाऊन त्यांच्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तरच् या नर जन्माचे काही सार्थक झाल्यासारखे होईल.
संत कबीरांच्या अभंगातील ओळी सहज ओठावर येतात
संगत संतनकी कर ले | जन्मका सार्थक कछु कर ले1धृ I
उत्तम नर देह पाया प्राणी इसका हित कछु कर ले| सदगुरू शरण जाके बाबा जनम- मरण दूर कर लेI
कहाँ से आया कहां जावेगा ये कछु मालूम करना I दो दिनकी जिंदगानी बंदे हुशार होकार चलना |
माईच्या परिक्रमेत असे हे अनेक संत,महात्मे आपल्याला भेटतात की ज्यांच्याकडून आपल्याला असे खूप काही शिकावयास मिळते ज्याने आपले पुर्वजन्मीचे अनेक संस्कार गळून पडतात व चांगले संस्कार त्याची जागा घेतात. जाचा उपयोग नक्कीच आपण आपल्या पुढील आयुष्यात करू शकतो.
सबंध परिक्रमेत मला जागोजागी माईनेे इतके प्रेम व आनंद दिला की सहजच माझ्या मनात असा विचार येई की या प्रत्येक जागी मी असतो तर माझे वागणे कसे झाले असते? तेव्हा मला माझे सारे अवगुणच डोळयासमोर दिसत. त्यामुळे परिक्रमेत मिळालेले सुंदर प्रेमाचे अनुभव लिहीत असतानाही परत आत असलेल्या या अवगुणाची जत्राच मला माझ्या डोळ्यासमोर येई ,त्यामुळे माईच्या परिक्रमेच्या निमीत्ताने हे जाणवलेले अवगुण फक्त माझे आहेत म्हणून आपल्यासमोर ते प्राजळपणे कबुल करून मला माझ्या मनाशी प्रामाणीक रहाण्याचा माझा हा प्रयत्न आहे . अवधानतेने मागील भागात मी कुणाला दुखावले असेल त्यांची मी या भागात मनापासून या गोष्टीसाठी माफी मागतो.
आशा या सुंदर परिक्रमेत आम्ही पाच जणानी साधारणपणे दूपारी अडीच -तीनच्या सुमारास तेलीयाभट्टनहून पुढील परिक्रमेच्या मार्गासाठी प्रस्थान केले. नोव्हेंबर महिना असला तरी दूपारी उन्हाच्या झळा शरीराला चांगल्याच जाणवत होत्या , पोटभर आग्रहाने,प्रेमाने वाढलेल्या प्रसादाने पोट तट्ट झाले होते , पाठीवर आठ ते नऊ किलो सॅकचे ओझे, परिक्रमेतील दूसराच दिक्स व ऑफीसमधे कायम एसी मधे बसुन काम करावयाची सवय असलेल्या मला ते चांगलेच जाणवत होते. पण मनानी तपण्यासाठी हे शरीराने तापणे गरजेचे आहे अशी मनाची समजूत घालून मजल दरमजल करीत त्या दिवशी आम्ही वेदासंगमच्या आश्रमात साडेपाच सहा पर्यंत पोहोचलो. समीर थोडा मागे पडल्याने आश्रमात आसने लावून त्याची वाट बघत बसलो. साधारणपणे पाऊण तासानी समीरही आश्रमात पोहचला. त्यांनंतर साय स्नान, माईची पुजा आरती झाली. दूपारी पोटभर जेवण झाल्यामुळे आता रात्री जेवावयाची अजिबात ईच्छा नव्हती त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या मार्गाची थोडी पुस्तकात बघून चर्चा केली. त्यावेळी समीरच्या बोलण्यातून त्याला उशीर होण्याचा उलगडा झाला. त्याने सांगीतले एका ठिकाणी मधेच त्याला चक्कर आल्याने तो रस्तावर पडला होता, त्यामुळे त्याला कुठे लागले नाही ना ? याची चौकशी केली व त्यास पाय चेपून देतो असेही विचारले .पण त्याने त्यास सष्ट नकार दिला व म्हणाला " मला आवडत नाही असे पाय चेपून दिलेले. " मनाला थोडे वाईट वाटले कारण आता चार महिने परिक्रमेत एकमेकांची साथ असल्याने अशी एकमेकांची थोडी सेवा किवा मदत करणे व लागणे हे स्वाभाविक होते.त्यामुळे माझ्या स्वभावानूसार परत एकदा त्याला मी पाय़ चेपून देऊ का ? असे विचारले पण त्याने परत नकार दिल्याने , पुढे परिक्रमेत त्याचा हा असा निग्रह नक्की बदलेल असे मानून तो विषय तिथेच सोडून दिला.परिक्रमातील दूसराच दिवस व साधारण २० ते 2५ किलोमीटर अंतर चालायची सवय नसल्याने आम्ही सगळे चांगलेच दमलो होतो.पाठीवर असलेल्या सॅकच्या आठ नऊ किलोच्या वजनाचे ओझे घेउन चालावयाची सवय नसल्याने पाठीलाही चांगलीच रग लागली होती. आमच्या बापूजीनी त्या दिवशीही माझी व उदयनची सेवा करण्याचा नेम काही सोडला नाही. त्यामुळे रात्री कधी डोळा लागला हे कळलेच नाही.
सकाळी माईची पुजा,आरती करून आम्ही वेदासंगमहून निघालो .आता परत माईच्या किनाऱ्याचा भाग थोडा चिखलाचा, डोंगराळ होता. सकाळी नऊ वाजेपर्यत आम्ही सगळे बड़गावला मांडव्य आश्रमात पोहोचलो. तिथल्या महतांनी थाबवून आम्हाला चायप्रसादी दिली.तिथल्या प्राचीन गुंफेमधे थोडा वेळ बसलो व मन तिथल्या शांततेने प्रसन्न झाले. त्यावेळी मनात सहज असा विचार आला की खरच, कीती सुयोग्य व सुंदर जागा निवडल्या होत्या ना आपल्या ऋषी मुनींनी. इथे सगुणाचीही उपासना करून इथेच सहज त्या निर्गुण व निराकार अशा परमेश्वराशीही ते सहज एकरूप होत असत.
अशा या जागा नामस्मरणालाही अगदी योग्य कारण कित्येक योग्यानी केलेल्या तपांमुळे जागेला एक वेगळाच पवित्रपणा कि ज्यामुळे आपले मनही सहज एकाग्र होऊन मनाला एक वेगळाच आनंद मिळे.बाहेरचा सुंदर निर्सग , माईचा किनारा या सगळ्या गोष्टीही मनाला निकोप करायला पुरेशा होत्या. त्यामुळे तिथून पाय निघत नव्हता पण माझे दिवसाचे गणीत चूकू नये म्हणून तिथल्या मुख्य मंहंतांची आज्ञा घेउन आम्ही पुढच्या टप्पाला चालावंयास सुरवात केली, पुढचा टप्पा होता शालीवाहन .सकाळची वेळ असल्याने मोठया उत्साहात व आनंदात सदगुरुनी दिलेले नाम घेत आमचे पदभ्रमण माईच्या किनाऱ्यानी सुरू झाले. आतापर्यंत बरोबर असलेला आमचा साथीदार समीर आता परत थोडा मागे पडत होता. साधारणपणे दोन तासानी आम्ही चौघे शालिवाहन पोहचलो व पाठीवरच्या सॅक काढून समीरची वाट बघू लागलो. समोर आश्रमात प्रसादाची वेळ झाल्याने तिथले सेवेकरी आम्हाला आपण प्रसादाला चला म्हणून सांगू लागले, पण इकडे समीर बराच वेळ झाला तरी आला नसल्याने आम्हालाही त्याची चिंता वाटू लागली.आमचा एक साथीदार आला की लगेच आम्ही पुढच्या पंगतीला येतो असे त्या संवेकऱ्यांना सांगून परत आम्ही समीरची वाट पाहू लागलो. कालच्या सारखी परत चक्कर तर आली नसेल ना ? अशी शंकाही मनात त्या वेळी येऊन गेली.
मधल्या वेळेत आम्ही हातपाय धुवून तिथल्या मंदीरातील सगळ्या देवतांचे दर्शन घेतले. परत थोडया वेळानी आश्रमातील सेवेकऱ्यानी सांगीतले की आता दूसरी पंगत बसेल तेव्हा आपण प्रसादाला चला. आता त्यांना नाही सांगणे योग्य नव्हते कारण त्यावेळी आम्ही चौघेे व काही परिक्रमावासी असेच प्रसाद घेण्याचे बाकी होते. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही आमची ताटे घेऊन प्रसादास बसलो. आम्ही जेववयास सुरवात केली व लांबूनच समीर लगडत लगडत येताना दिसला. तो आलेला दिसल्यामुळे आनंदही झाला, पण त्याच वेळी तो इतका का लंगडतोय?अशी मनात शंकेची पालही चुकचुकली.त्यामुळे आम्हीही माईचा प्रसाद पटकन घेतला, आम्ही जेव्हा माईचा प्रसाद घेत होतो तेव्हा तो लंगडत लंगडत ऐका ठिकाणी जाऊन बसला. त्याचा डावा पाय चांगलाच दुखत होता, त्याचा तो पाय त्याला टेकवताही येत नव्हता. तिथल्या महंतांना विचारून एका देवळाच्या आवारातच फॅस्टिक घालून त्यावर त्याला थोडी विश्राती घेण्यास आडवे केले.थोडया वेळानंतरही त्याचा पाय तसाच अजून चांगला ठणकत होता व पुढे चालणे काय पाऊल टेकवणे ही त्याच्याचाने अजिबात शक्य नव्हते.
आता प्रश्न होता की पुढचे काय करायचे ?कारण परिक्रमेला निघताना जरी आम्ही ठरवले होते की कुणीही कुणासाठी थांबावयाचे नाही , तरी आता ते प्रत्यक्षात कृतीत आणण्याची वेळ आल्याने मनाची थोडी घालमेल होत होती.
थोडया वेळाने परत त्याच्या पायाचा अंदाज घेतला पण त्याच्या दुखण्यात अजुनही काही फरक नव्हता,त्याला उभे राहून पाय टेकवणेही शक्य नव्हते. त्यामुळे आता काहीतरी निश्चित निर्णय घेणे गरजेचे होते.त्याला तिथल्या महंतांकडे सोपवून , अजून काही दिवस त्याने तिथेच विश्रांती घेउन मग परत परिक्रमा सुरू करणे हाच एक पर्याय दिसत असल्याने समीर बरोबर त्या सर्दभात बोलणे केले व तिथल्या महतांशी पण आम्ही या विषयावर बोललो. त्यांनीही आम्हाला सांगीतले की तुम्ही निसंकोचपणे पुढे जा आम्ही याची व्यवस्थित काळजी घेतो व त्याला पूर्ण बरे वाटले की मगच त्याला पुढे पाठवतो.
लहानपणापासून माझ्या शेजारी समीर रहात असल्यामुळे आता त्याला एकटयाला सोडून पुढे जाणे मला जरा जास्त त्रासदायक होत होते.
पण तेव्हाही समीरने कालच्याच निग्रही वृत्ती प्रमाणे आम्हाला कुणालाही न आडवता पुढे जाण्याची परवांनगी दिली. कालच त्याचा हा निग्रही स्वभाव पुढे परिक्रमेत बदलेल असा विचार करणाऱ्या मला आज आता त्याच्या याच स्वभावामुळे परिक्रमेत पुढे जाता येत होते त्यामुळे मनोमन त्याला या गोष्टीसाठी सलाम केला.आम्हाला जसे वाईट वाटत होते तसे त्यालाही आम्हाला पुढे पाठवताना नक्कीच वाईट वाटत होते पण त्याहीपेक्षा आपल्याला या पायाच्या दुखण्याामुळे पुढे चालत परिक्रमा पूर्ण करता यईल की नाही या विचाराने तो जास्त दुःखी होता.त्याचे हे माईवरचे व परिक्रमेवरचे प्रेम पाहून माईनेच त्याच्याकडून पुढे अमरकंटकला परिक्रमावासीयांसाठी खूप छान सेवा करून घेतली . मी ही गोष्ट आपल्याला मागच्या भागात सांगीतली आहेच पण त्याच्या त्यां सकारात्मक निर्णयासाठी त्याचे या भागात मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. पहिल्याच दिवशी भिष्म व आज तिसऱ्या दिवशी समीरही त्याच्या पायामुळे आता आमच्या बरोबर परिक्रमेत नसल्याने माई काय इच्छा आहे हे माहीत नसल्याने आम्ही जड अंत:कराणाने त्या दिवशी आश्रमातून पुढील मार्गासाठी बाहेर पडलो. पुढे समीरच्या पायच्या दुखण्याचे काय झाले ते आपण पाहू परिक्रमेच्या पुढच्या भागात तोपर्यंत विश्राम. नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग १९-
मागच्या भागात समीरच्या पायच्या दुखण्यामुळे समीरला शालिवाहनला सोडून आम्ही परिक्रमेच्या मार्गावर प्रस्थान केलेे. तर इकडे समीरच्या पायाच्या दुखणे त्या दिवशीही अजिबात कमी झाले नाही. तिथले महंत आनंद महाराजजी यांनी पण त्याची इतकी काळजी घेतली म्हणून सांगु ,कांद्याचा रस काढून तो गरम करून त्याच्या गुडघ्याला, पायाला लावला, त्यांच्याकडले वेदनाशामक मलम त्याच्या पायाला लावून दिले ,की कसेही करून माईने पाठवलेले तिचे लेकरू बरे होऊन पुढे परिक्रमेसाठी मार्गस्थ हाईल व माईने आपल्याला दिलेली सेवा पूर्ण होईल .तिची सेवा पूर्ण झाली की तिचा आर्शिवादही नक्की मिळेल, किती पुज्य भावना आहे ना ही ?
हा त्यांचा सेवा भाव परिक्रमेत व आता माझ्या रोजच्या जिवनात पदोपदी मनाला जाणवतो.हे असे माईवरचे तिकडल्या महंतांचे, लोकांचे प्रेम बघीतले की वाटते की काय किमया आहे या दुधाची. ' दुध 'हा शब्द इथे मुद्दामून लिहीण्याचे कारण असे की किनाऱ्यावरून जात असताना कितेकदा तिच्या भक्तांकडून म्हंटले गेलेले वाक्य आपल्याला सांगतो "ये मैय्या जल नही दूध है दूध " . किती हा उदात भाव किंवा तिच्यावरची अपार श्रध्दा आहे ना !
मी मारे बढाई मारून लोकांना सागतो की नर्मदा परिक्रमेला जातोय किंवा माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली, पण जिच्या परिक्रमेला आपण जात आहोत तिच्या बद्दलची तिथल्या लोकांची इतकी पराकोटीची प्रेमाची भावना बघीतली की माझेच मला माईवरचे प्रेम खरे आहे की नाही याबद्दल शंका येत असे. कारण माईच्या परिक्रमेला जायचे ठरवल्यानंतरही माझ्या डोक्यात जी भावना आली नाही ती तिथल्या लोकांच्या रगारगामध्ये आहे , मला असे वाटते की हेच ते खरे अकृत्रिम प्रेम, तिच्यावरची पूर्ण श्रध्दा.
पूरण प्रेम लगा दिलमे , जब नेम का बंधन छूट गया
पूरणपोळीसाठी आत लागणारे सारण म्हणजे पुरण, गुळडाळ एकत्र असलेले. ते जसे एकदा एकत्र केले की वेगळे होऊच शकत नाही, पूर्ण एकजीव होऊन गेलेले असते व तेच त्या पोळीत पूर्ण भरलेले असते ,तसे एकादा पूर्ण प्रेम लागले की काय कायम पूर्ण आनंद व परिपूर्ण समाधान . असे तिथल्या लोकांचे मैय्यावरचे असलेले प्रेम परिक्रमेत पदोपदी जाणवले. असे हे त्यांचे मै्यावर असलेले प्रेम बघीतले की मी खूप छोटा, कोता, स्वार्थी आहे याची जाणीव होऊन माझीच मला लाज वाटे.
तसेच त्याचवेळी आईंच्या भजनाच्या पुस्तकातील भजनेही किती अर्थपूर्ण आहेत हहीे लक्षात येईे. कारण इथे ते म्हणताना मी खूप छान भजन म्हणतो, छान म्हणजे, माझा आवाज चागला लागतोय ना? मी त्यातील स्वर चांगले घेतले ना?तालात बरोबर झाले ना ? झांज बरोबर वाजवली ना ?हया गोष्टीना प्राधान्य देऊन भजन म्हणणे होई.आई सांगतात की भजन म्हणजे काय तर देवाला भजणे,त्याची करूणा भाकणे, त्याला मनापासून आळवणे, पण हा विचार बाजूला राहून फक्त सुरेल भजन म्हणणे हाच एक विचार असे . त्याची दूसरी सुंदर बाजू या परिक्रमेतील अनुभवांनी दिली . भजन सुरेल म्हटले पाहिजे यात काही वाद नाही कारण कुणाचेही कान व मन त्यानी तृप्त होते.पण माझे प्राधान्य त्यातील परिपूूर्ण अर्थाकडे , त्या परमेश्वराकडे असावे हेे प्रत्यक्ष अनुभवास आले या परिक्रमेच्या शाळेत.
शाळेत असताना आपणास सायन्समधे प्रॅक्टिकल करतांना कसे दोन रासायनीक द्रव्ये एकत्र केली की तात्काळ त्याचा परिणाम दिसून येऊन तिथल्या तिथे उत्तर मिळते , तेच उत्तर परिक्रमा मला प्रत्यक्ष अनुभवाने देत गेलीे.त्यामुळे सूदगुरू सांगतात तसे अर्थाकडे लक्ष देऊन देवाला आळवणे किवा भजणे झाले पाहिजे हे ह्या प्रॅक्टिकल अनुभवांनी अजून पक्के झाले व त्यामुळे आता मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.
या लेखात परिक्रमेंच्या पुढच्या मार्गाच्या वर्णनापेक्षा हेच लिहीले गेले कारण आज परिक्रमा करून आल्यावर मीच माझे अवलोकन करताना जाणवत आहे की ही परिक्रमा आपल्याला किती सुंदर लेण देऊन गेली आहे , आता त्या त्याप्रमाणे फक्त कृती करणे ही माझी जबाबदारी आहे.
आता परत सदगुरूच्या प्रेमाबद्दल बोलतो कारण आता खूपदा हे जाणवते व हे अनुभव लिहीत असताना त्याची जाणीव खूप प्रार्कशाने होते आहे की आम्हा सगळ्या लेकरांवर त्या माईचे किंवा त्या गुरूतत्वाचे किती अलोट प्रेम आहे, कारण समीर शालीवानच्या आश्रमात माझ्या हिशोबानी दीड ते दोन दिवस होता पण त्याच्या पायाच्या दुखण्यात काही परक न पडल्याने शेवटी नाईलाजास्तव त्याला परिक्रमेचा बेत रहित करून डोंबीवलीला परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. याचे कारण दोन दिवसांनीही त्याला पाय टेकवून चालता येईंना.आम्ही त्याची फोनवरून चवकशी करत होतो पण मला तेव्हाही जाणावलेली व आता पूर्ण पणे पटलेली एक गोष्ट म्हणजे माईने म्हणा किंवा त्याचे गुरू स्वामिनी म्हणा हयाची इतकी काळजी घेतली की त्याचा पायाचा त्रास त्याला अशा ठिकाणी दिला म्हणा किवा त्याला जाणवू लागला की जिथून तो सहजपणे माघारी फिरू शकेल . कारण शालिवानहून होडीतून सहज महेश्वरला पोहचून, तिथून धामनोदला पाहोचून तिथून स्लिपर कोच बसने कल्याणपर्यंत येऊन नंतर त्याच्या घरी डोंबिवलीला सहज पोहचता आले.हाच त्याचा त्रास जर अजून थोडे दिवसानी झाला असता तर तेव्हा आम्ही कदाचीत राजघाटच्या जवळपास किवा शुलपाणीत पोहचलो असतो व तिथून त्याला परत येणे तितके सोपे तर नाही पण खूप कठीण होऊन बसले असते. आम्हालाही त्याला तिथे तसेच सोडून पुढे जाणे शक्य झाले नसते .
खूप विचार करण्या सारखी गोष्ट आहे ही की आपल्याकडे माईरूपी सदगुरूंचे किती बारीक लक्ष असते ,त्यांना आपली किती काळजी असते की आपल्या लेकरांला हा त्रास पुढे होऊन तिथून परत येणे त्याला त्रासदायक होऊ शकते हे .जाणून त्यानी त्याची काळजी इथेच घेतली. धन्य ती प्रेमळ गुरूमाउली, धन्य तिचे उपकार , हे आठवून मनात शब्द येतात
सदगुरू माझा सखासोयरा
जीवीचा जीवलग भक्तराज|
पुण्य माझे आले उदयाला
भेटला प्राणसखा गुरूराजI
मस्तक ठेविता त्याच्या चरणी
उमजले मज एक काज|
जन्मोजन्मी दास करोनी शुध्दज्ञानकळा द्यावी मज खास ।
मग जन्म येऊ दे वेळोवेळा चरणसेवा घडो सर्वकाळ |
हिच भिक मागतो हा रामसेवक
तृप्त करा या दिन पामरास I
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव 20 -
शालीवानहून निघालेलो आम्ही संध्याकाळी बलंगावला पोहचलो व बलगावला जातानाच मी मागे सांगीतलेला माझा व उदयनचा चिखलात पडण्याचा मजेशीर किस्सा झाला व पुढे बलगावला पोहचल्यावर लक्ष्मदासबांबानी प्रेमानी माझ्या हाताची घेतलेली विशेष काळजीही आपणास मागच्या एका भागात सांगुन झाली.सकाळी बलगाँवहून निघाल्यावर तासा दिड तासानी लक्ष्मणदासबाबांचे गुजरीच्या आश्रमात जायचे ठरल्याने त्यानीही आमची रजा घेतली व जसे अकस्मात येऊन परिक्रमेत ' एक वेगळा आनंद घेऊन आले तसेच आज मनाला एक चटका लाऊन ते त्यांच्या मार्गाने मार्गस्थ झाले.
आता माईच्या परिक्रमेच्या आनंदसागरात विहार करून सुंदर अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधायला माझी, उदयनची व बापूची भ्रमंती सुरू झाली.त्या दिवशी नंदगावला मुक्काम करून सकाळी विश्वनाथाखेडीला भज्यांचा मजेशीर अनुभव घेऊन आम्ही दत्तवाडा येथे संध्याकाळी श्रीविद्या आश्रमात पोहचलो.
आता आमची परिक्रमेची वाटचाल राजघाटच्या दिशेने सुरू झाली .परिक्रमा मार्गावरून जाताना माईच्या अमृतमय जलाने सगळा भाग कसा हिरवागार सुजलाम सुफलाम झालेला दिसत होता .कधी ऊसाचे मळे, तर कधी केळीच्या मोठया मोठया बागा, तर कधी तूरीची शेते यामधून परिक्रमा मार्ग जात असल्याने हिरवागार निर्सगाची एक वेगळीच झलक पहावयास मिळत होती.केळीच्या झाडाला लगडलेले हिरवेगार केळ्याचे मोठे घड बघून लहान बालके आपल्या आईच्या कडेवर बसल्यानंतर कशी खूष असतात तशीच ही हिरवी केळीही त्यां वृक्षरूपी आईच्या अंगाखांदयांवर रेलून आनंद लुटत आहेत अशी सहज कल्पना मनाला शिवून गेली व परमेश्वरच्या या किमयागीरीचे मनापासून खूप कौतुक वाटले.शेतातून माईचे झुळझुुळपणे वाहणारे जल मनाचा उत्साह व तजेला वाढवणारे होते,हा भाग माईच्या किनाऱ्यापासून बऱ्यापैकी दूर असला तरी निरनिराळ्या शेतातून, बांगांमधून जावे लागत असल्याने मनाला आनंद देणारा होता.परिक्रमेत अशा कितीतरी गोष्टी अनुभवास मिळाल्या की ज्याची मी आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती. संबंध परिक्रमेत माझ्या ठरलेल्या सुट्टीमुळे आम्हाला रोजचे काही ठरावीक अतंर चालणे क्रमप्राप्त होते त्यामुळे परिक्रमेत असताना आम्ही दूपारच्या जेवणाला बराचवेळा फाटा दिला होता. दूंपारी कुठेतरी थोडावेळ विश्रांती घुउन पुढे जाणे हा आमचा नित्याचा कार्यक्रम असे. राजघाटच्या मार्गावर असताना एका दूपारी असेच चालून दमल्याने एका डेरेदार वृश्राखाली विश्रांती घेण्यासाठी आम्ही थांबलो. जमीनीवर छानपणे प्लास्टिक घालून त्यावर आडवे होऊन शरिराला व मनाला निर्सगाच्या सानिध्यात विश्रांती देण्यात काय आनंद असतो ही कल्पनाही न केलेला मी, ते अदभूत सुख अनुभवू लागलो. गावाकडे राहणाऱ्याना याची नवालाई नसेलही पण माझ्या सारख्या शहरवासीयासाठी हे अगदी नवीन होते.जमीनीचा असलेला वेगळाच रांगडेपणा , वाऱ्याची मधून मधून येणारी मंद झुळूक , झाडांवरील पक्षाचा आपल्या पध्दतीने चाललेला संवाद, आईंच्या नित्योपासनेतील ओव्या परत मनात रुंजी घालू लागल्या
पक्षिरुपे किलबिल करिसी, उडसी गगनात हरी I पशु रुपे वनात फिरसी,गिरी गुहेत राहसी हरी I जलचर होऊनी निशदीनी खेळसी, रमसी जलामाजी हरी। किटक रूपे फुला माजी तू, आवडीने मध सेविसी हरी । वृक्ष होउनि पर्ण पुष्प फल, भारे हालसी तू हरी |गर्व रहित होउनि निरंतर, ब्रम्हानंदी डोलसी हरीI
आईंनी केलेल्या यथार्थ वर्णनाचा इथे अनुभव घेत होतो आणी माई पण आम्हा सगळ्या लेकरांना असेच एक वेगळ आनंदी विश्व ऊलगडून,खऱ्या सुखाची एक छोटीसी झलक दाखवत प्रत्येक चराचरात असणाऱ्या परमेश्वराचा अनुभव घ्यायला शिकवत होती. कदाचीत भौतिक सुखापेक्षा या सुखात दडलेल्या आनंदाचा आस्वाद देऊन आम्हाला विचार करण्यास भाग पाडत होती की खरच ,खरे सुख या तपोभुमीत आहे की सुधारलेल्या शहरात?
राजघाटच्या जवळपास जसे आम्ही जाऊ लागलो तसे उसाचे भरपूर मळे लागत गेले, दूपारची वेळ असल्याने या ऊसाच्या मळ्यावरून जाताना माझ्या मनात उगाचच रस पिण्याचा विचार खूप वेळा येऊन गेला. असे वाटायचे की हा मळा संपला की पुढे रस काढायचे मशीन नक्की कुठेतरी असेल.😃हसूही येत असे कारण इतक्या आत असे मशीन असायची खर तर अजिबात शक्यता नव्हती पण मनाला ते पटत नसल्याने डोळे परत परत तेच शोधीत गेले. असे सगळे उसाचे मळे संपले व आम्ही एका मुख्य रस्ताला लागलो आणी रस्तालगत असलेल्या छोट्याशा हॉटेलमधून आवाज आला " बाबाजी आ जाओ, माई की प्रसादी पालो" आत गेल्यावर त्यानी आपणहून आम्हाला विचारले "बाबाजी,चाय दे दूँ या गन्ने का रस ? उदयन व बापू यांनी काही सांगायच्या आधीच "रस मिलेगा तो चलेगा" असे पटकन सांगून मी मोकळा झालो. त्यांनी विच्यारल्यानंतर आपण " आप जो उचीत समझे वो दे दो " असे सांगण्याऐवजी आपण पटकन हे काय बालून बसलो आपण आता परिक्रमेत आहोत हे आठवून मलाच माझ्या हावरटपणाची थोडी लाज वाटली , पण शब्द तर बाहेर पडून गेले होते. त्यानीही मोठया आनंदाने रसाने भरलेले मोठे ग्लास आमच्या पुढे ठेवले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात परिक्रमावासीयांच्या बाबतीत असलेली भावना इतकी पुज्य व कौतूकाची होती की माईला मी मनोमन वंदन केले कारण हे सगळे प्रेम त्या आईवर होते व आम्ही तिची लेकरे म्हणूनच आमचे हे कोडकौतूक चालू होते.
एक ग्लास संपल्यावर त्यांनी अजूनं एकं ग्लासं रस पिणार का ? म्हणून विच्यारले वआम्हीही एकमेकांकडे बघत हसत हसत त्याला मुक संमती दिली.😊
अशी तिच्या लेकरांची इच्छा त्या प्रेमळ माईने परिक्रमेत किती वेळा पूर्ण केली याची खरच काही गणती नाही. शेवटी आईचे कोमल हृदय हो ते, आपल्या लेकरांच्या मनात आलेली छोटीशी इच्छा आपल्या सगळ्यांच्या माताही आपल्या जीवाचा आटापीटा करून आनंदाने पूर्ण करतात ,इथे तर ही साक्षात जग्गजननी , संबध विश्वाची आई ! त्यामुळे सबंध परिक्रेमेत हीच आई वेगवेगळ्या रूपाने आपली काळजी घेत आपली परिक्रमा आनंदाने ,प्रेमाने कशी पूर्ण होईल याकडे पदोपदी लक्ष देऊन असते.
तिथून निघतांना नर्मदे हरचा पुकारा केला व अर्धातास चालत मेकलसुता आश्रमात पोहचलो. तिथल्या महंतांनी आमची सगळी चवकशी करून आता भोजन प्रसादी घेउन मग पुढे जाण्याचे करावे असे अगत्याने सांगीतले.
हातपाय धुवून माईला नमस्कार केला व माईच्या प्रसादाचा कधीही अव्हेर करू नये म्हणून खरतर भोजनास बसलो .कारण त्या प्रेममय रसाने तर आत्मा केव्हाच पूर्ण शांत झाला होता , पण सकाळपासून काही खाल्ले नसल्याने थोडसे खाऊन आम्ही तिथून निघण्याची तयारी केली. प्रसाद घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आज येथे विश्राम करून उद्या येथून प्रस्थान करावे असे खूप वेळा आग्रहाने सांगीतले पण राजघाटच्या महादेव मंदिरात आज मुक्काम करावयाचा असे ठरवले असल्याने आम्ही तिथून पुढे निघालो. निघताना तिथल्या सेवेकऱ्यांनी माईचे बॅक वॉटर बरेच ठिकाणी आत आले असल्याने आपण राजघाटहून शुलपाणीतून न जाता प्रकाशा शहादा मार्गे जावे असा सल्लाही आम्हाला दिला.
आम्हीही मनोमन माईच्या या ह्रदयस्थानातून ( शूलपाणीतून )जायचे ठरवले असल्याने त्यांना फक्त तोंडाने होकार दिला व राजघाटच्या मार्गाने प्रस्थान केले. साधारणपणे पाऊण एक तास चालल्यावर आम्ही राजघाटला सूर्यनारायण अस्ताला जात असताना शिव मंदीरात पोहचलो . आता या पुढचा माईच्या ह्रदय़स्थानातील आनंददायी प्रवास पाहू पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव २१-
राजघाटला आम्ही साडेपाच पावणेसहा पर्यंत पोहोचलो, सर्य अस्ताला जात असल्याने सगळ्या नभात कशी छान लाल पिवळसर प्रभा पसरली होती, एखादे सुंदर चित्र बघावे तसेच सारे आकाश भासत होते. मनाला खूप आनंद देणारे ते दृष्य बघत बघत आम्ही शिवमंदीरात प्रवेश केला. आजूबाजूला निरनिराळ्या प्रकारची भरपूर झाडे असलेल्या या सुंदर शंभुमहादेवाच्या मंदीरात मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळाली. तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला एक खोली उघडून दिली व त्यात आमच्या सॅग ठेवण्यास सांगीतल्या.
आम्ही सांयंस्नान करून तिथे असलेल्या प्रमूख महंतांना आमच्यासाठी काही सेवा असल्यास आम्हाला जरूर सांगावे अशी विनंती केली. कारण आमाच्या सारखे किमान पंधरा वीस परिक्रमावासी तरी तेव्हा तिथे मुक्कामास आले होते. महंतानी संध्याकाळच्या प्रसादात असलेली टॉमेटो,वांग,बटाटा ही भाजी चिरून देण्यास सांगितले. त्यांच्या रसोईत जाण्यास आपल्याला ते परवांनगी देत नाहीत हे माहीत असल्याने मी बाहेर बसून त्यांना त्या भाज्या चिरून दिल्या.
त्या दिवशी त्या सवेकऱ्यानी दिलेल्या खोलीत मांजरीने घाण करून ठेवली होती ती घाण जरी काढून टाकली तरी तो वास काही त्या खोलीतून जात नव्हता त्यामुळे त्यानी दिलेल्या खोलीत न राहता तिथल्या महंतांना विचारून आम्ही महादेवाच्या मंदीरा संमोर असलेल्या मंडपात आमच्या सॅग ठेवून तिथेच माईची संध्याकाळची पुजा व आरती करून तिथेच विश्राम करण्याचे ठरवले. महंतांनी पण या गोष्टीला होकार दिला .तेव्हा सहज मनात अशी कल्पना आली की आज एका (बाबाला) शंभुंमहादेवांना पण नक्कीच आनंद होणार ,कारण गाभाऱ्यात बसून त्यांना आज आपल्या लेकीचे होणारे कोडकौतूक स्वतःच्या डोळ्यानी बघावयास मिळणार होते. प्रथम शुंभुमहादेवाचे दर्शन घेतले व नंतर मैय्याची पुजा , नर्मदाष्टक, आरती व थोडा जप करून मी माझा मोर्चा तिथल्या मोठया गोशाळेकडे वळवला. दूपारी मेकलसूता अश्रमात उशीरा भोजन प्रसादी झाल्याने आता परत प्रसाद घेण्याची अजिबात इच्छा नव्हती, उदयन वं बापू यांनी आश्रमात पाणी भरपूर असल्याने आज धोबी घाट काढला होता पण मला मात्र गोशाळेत जाउन त्या सगळ्या गोमांतां बरोबर मिळणाऱ्या प्रेमाचा सहवासाची ही अर्वणनीय संधी काही आज दवडायची नव्हती. त्यांचे ते प्रेमळ रूप व डोळ्यात असलेले कारूण्य पूर्ण भाव मला नेहमीच त्यांच्याकडे खेचून नेतो. इथे तर आज कितीतरी गोमाता (गीर जातीची गाई ) होत्या , पूर्वी गोकुळात श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी यांनी या गोवत्सरांबरोबर किती आनंदांचे क्षण अनुभवले असतील याची पुसटशी कल्पना मी या आनंदाने अनुभवणार होतो. श्रीकृष्णाच्या सहवासाचे अलौकीक प्रेम या गोमातांना श्रीहरी वर असलेल्या दृढ भक्तीमुळे नकळत मिळत गेले वे ते अनमोल प्रेम आजही त्यांच्यात तितकेच जागृत आहे की ज्यामुळे मला त्याच्या सहवासात त्याच प्रेमाचा आनंद मिळतो. मला काय माहीत नाही पण त्यांच्या डोक्यावर, अंगावरून, आयाळीवर आपण हात फिरवल्यावर त्यांच्या डोळ्यात दिसणारी प्रेमाची , आपलेपणाची भावना मला आज परत अनुभवण्यास मिळणार होती.गोमातेला नमस्कार केला व हळुवारपणे तिच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवला. तिला काय वाटले असेल माहीत नाही पण मलाच त्या स्पर्शाने खूप आनंद झाला. एक क्षणभर मी थांबलो असेल पण तिनेच माझ्याकडे प्रेम पूर्ण नजरेने बघून माझ्या हाताला परत डोके घासून तिलाही झालेल्या आनंदाची पावती दिली. मग काय विचारता मीही तिच्या अंगावर आनंदाने थोपटून परत परत तिच्या डोक्यावर ,मानेखाली , अंगावर हात फिरवत राहीलो. जवळ अर्धातास हा आमचा प्रेमाचा सुखसोहळा चालू होता. शेवटी माझाच हात दुखुन आल्याने मी थांबलो पण त्या क्षणाचा अवकाश तिने माझा तो संबध हात चाटण्यास सुरवात केली आणी नकळत माझ्या डोळ्यात आले, गोशाळेत त्यावेळी सगळे भोजन प्रसादी घेत असल्याने मी एकटाच होतो त्यामुळे मीही नि :संकोचपणे माझ्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. मी माझ्याकडून केलेला एक छोटासा प्रेमाचा प्रयत्न पण त्याला मिळालेल्या हया प्रेमळ प्रतिक्रियेने मी ही भाराउन जाउन तिच्या गळयाशी हळुच बिलगलो. तिनेही कुठेही प्रतिकार न करता मला मुक संमतीच दिली. माझ्या संकोची स्वभावानूसार मीच पाच मिनीटांनी तिच्यापासून दूर झालो ,तर तिने परत खादयापासून ते बोटापर्यंत चाटण्यास सुरवात केली, खर तर तिच्या जिभेचा तो खरखरीत स्पर्श पण मला त्यात फक्त प्रेमच प्रेम जाणवत होते. माझ्या हाताला आपले डोके परत परत घासून ती तिच्या पध्दतीने आपले प्रेम व्यक्त करीत होती. जवळजवळ तासभर तरी मी तिथे होतो तिचे ते भावपूर्ण प्रेमळ डोळे हा अनुभव लिहीत असताना व परिक्रमेची आठवण झाली की माझ्या डोळ्यासमोर येतात.प्रेमाची लिला काही अगाधच आहे नाही. मला त्या इश्वरात असलेल्या मुळमायाचेही इथे अजून एक नवल वाटते की आपल्याकडे स्त्री शृंगार करताना डोळ्यात काजळ किंवा सुरमा घालते तसे जन्मजात कायम स्वरुपी काजळाचे एक सुंदर लेणे त्यानाा तिने बहाल केले आहे. तिच्या स्तनातून मिळणाऱ्या सात्विक व पौष्टीक दुधाबद्दल तर लिहावे तितके थोडे आहे कारण पुराणातील ऋषीमुनीपासून ते आजच्या युगातही सर्वनाही त्या अवीट दुधाच्या गोडीचा अजून कंटाळा आला नाही.
तिचे निस्वार्थी प्रेम इतके की असे अवीट चवीचे तिचे दुध युगांयुगे ती मानवाला देत आहे, माणूसच स्वार्थी असल्याने तिच्या नवजात बछडयास सुध्दा थोडेच दुध पाजायला देऊन बाकीचे सगळे आपल्यासाठी वापरतो व गोमातां भाकड झाली की कसायास देतो. अशा तिच्या निस्वार्थी प्रेमामुळे ती अनादी कालापासुन सर्वांसाठी पुजनीय आहे.
असो ,बराच वेळ झाला असल्याने आता भोजन प्रसादी घेतेलेली मंडळी कुणीही इकडे येतील व म्हणतील की काय चालले आहे या येड्याचे म्हणून मनाला आवर घातला व तिच्यापासून दूर झालो . परत तिला नमस्कार केला व मंदीराकडे वळलो. सहजच नजर वळवून मागे बघीतले तर ती त्याच प्रेमळ दृष्टीने माझाकडे बघत होती. तिच्या त्या भावपूर्ण नजरेने मी ही न रहावून मागे वळलो व परत तिच्या जवळ जाउन तिला बिलगलो, हळूवारपणे थोपटले व आता मात्र तिच्याकडे न बघता मी मंदीराकडे वळलो कारण तो प्रेमळ भाव मला तिथचे बांधून ठेवण्यास समर्थ होता. दिवसभराचे भरपूर चालणे व पहाटे उठून पुढे लवकर मार्गस्थ होणार असल्याने गाभाऱ्यातच कडेला आमच्या पाथऱ्या पसरून आडवे झालो. खरतर आजुबाजाला दोन्हीकडे कुठलाही अडोसा नव्हता तरीही मनाला कुठलीही भिती शिवली नाही की काही सरपटणारे जनावर किवा अजून कोणी यईल की काय , हा त्या मंदीराचा महिमा असतो की जो माझ्या सारख्या सर्वसामान्य परिक्रमावासीयालाही असा विश्वास देत असतो.
दूरवर नभात चमचमणाऱ्या चांदण्याचा सुंदर फेर, मधूनच वाऱ्याची येणारी खंडगार झुळूक व त्यामुळे होणारी पानांची सळसळ , मागे शंभुमहादेवांचा भरभक्कम आधार , मगाशी गोमातेचे अनुभवलेल अनोखे प्रेम, दासबोधात वाचलेले प्ररब्रम्हा मध्ये असलेल्या ह्या मुळमायचे हे निरनिराळे रूप पडल्या पडल्या डोळे मिटून अनुभवत त्याचा आनंद घेत होतो व त्याचबरोबर त्या शक्तीरूपीणीच्या या आचाट सार्मथ्याचे मनोमन खूप कौतुक वाटत होते कारण ईथेही ती इश्वराची शक्ती माईच्या रूपात माझ्या सारख्या सर्वसामान्याला हे दृष्य पण नाश पावणाऱ्या तिच्या विलक्षण ,आचाट, सुंदर गोष्टीनी भुलवत असते पण त्याचवेळी ऋषी,साधु, संत, योगी जे या दृष्य पसाऱ्याचे जाळे बाजूला करून त्या निर्गण परब्रम्हांला जाणण्याचा प्रयत्न करीत असतात त्याना त्या तिरावर नेण्यास सर्वतोपरी सहाय्य करते म्हणूनच अनादी कालापासून कित्येक ऋषी, मुनी, संत, महात्मे यानी या भुमीत वर्षांवर्ष तप करून या भूमीला पावन केले आहे, माई तुझी लिला खरोखर अपरंपार आहे . माझ्यासारख्या अति सामान्याला ही आई आज तिच्या या तपोभुमीची परिक्रमा घडवत आहे या बदल त्या स-हदय मातेला मनोमन प्रणाम..
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग - २२
राजघाटच्या शिवमंदीरात पहाटे साडेचार लाच जाग आली , परिक्रमेत प्रथमच दोन्ही बाजूला कुठलाही आडोसा नसलेल्या जागेत झोपल्यामुळे रात्री खूप वेळा मला जाग येत गेली , खरतर प्रत्येक वेळेला जाग आली की खूप छान वाटत होते कारण निर्सगाचा सानीध्याचा एक वेगळाच शांतपणा मनाला सुख व आनंद देऊन जात होता. कालचे माईरूपांतील गोमातांचे प्रेम आठवले व मनात सहज शब्द उमटले
नमन माझे हे जगतजननी वंदीतो तुज मी पुण्यदायीनी॥
निर्गुण रूपी तु नीरवाहीनी
रूप तुझे हे प्रेमदायीनी
सगुण रूपी तु मोक्षदायीनी
साधुसंतास मुक्तिरूपीणी॥१॥ नमन माझे हे
अक्षयरूपी तु गुरूमाऊली
ध्यास राहू दे अं:तकरणी
थारा दे मज तव चरणी
तूच तूच सर्वसाक्षीणी॥२॥ नमन माझे हे जगत् जननी नमन माझे हे जगत् जननी
कालचा तो प्रेममय प्रसंग व आता निर्सगाच्या सानिध्याचI मनाला मिळत असलेला सुखद अनुभव , निर्सगाच्या कुशीत खरचं किती सुख दडलेले आहे हे या परिक्रमेत खूप वेळेला जाणवले. शहरात च्यार भिंतींच्या आत ऐसी, पंख्यांच्या जोडीला मऊशार गादीचा बेड जे सुख , सामाधान देणार नाही ते सुख, समाधान साध्या झोपडीवजा आश्रमात , तर कधी एखादया घराच्या ओसरीत ,तर कधी मंदीराच्या आवारात परिक्रमेने खूप वेळेला दिले. पहाटे लवकर उठून स्नान , नित्यनेम, माईची पुजा, आरती करून आम्ही सुर्यंनारायणच्या साक्षीने शिवमंदिरातून बाहेर पडलो नोव्हेंबर महिन्यामुळे हवेत एक सुखद गारवा होता, त्या निर्सगाच्या सुंदर वातावरणात चालताना मन सहजच नामाच्या सुंदर लयीत रमून गेले. तेव्हा जाणवले की आपल्या सद्गुरूंनी आपल्यापाशी किती मौल्यवान ठेव दिली आहे की जी आपल्याला एका अलौकीक सुखाचा आनंद देत आहे.आता माईची परिक्रमा मार्ग कुली घोंगशाच्या दिशने सुरू झाला.
उदयन सारखा अनुभवी परिक्रमावासी बरोबर असल्याने परिक्रमा मार्गाची चिंता नव्हती तरी आता पुढे जायचे दोन मार्ग होते एक बावनगजा मार्ग व दूसरा माईच्या ह्रदयकमळातून जाणारा मार्ग ,शुलपाणीचा थोडा खडतर , रांगडा.हा मार्ग कठीण होता यात काही वाद नव्हता पण आईच्या जवळ जायचे असेल तर तिचे ह्रदय काबीज केलेच पाहीजे.
पण उदयनच्या मनात काही वेगळाच विचार चालू होता त्याला बावनगजा मार्गे जावे असे वाटत होते त्यामुळे तो त्यां रस्तानी जाऊ, असे म्हणत होता. पण आम्ही आधीच रस्तानी जाताना कुली घोगशा मार्गे शुलपाणीचा मार्ग विचारलेला असल्याने''त्या मार्गाने कशाला ?आपण आधी ठरवलेल्या मार्गानी जाऊ '' असे त्याला म्हटले व लगेचच मार्गावरील काही लोकांना परत पुढचा रस्ता विचारला. त्यांनी पुढ़ेच एक डाव्यां बाजूला मातीचा रस्ता लागेल त्या रस्ताने जा असे सांगीतले. आता आमचा प्रवास त्या मातीच्या रस्ताने सुरू झाला, मातीचा रस्ता म्हणजे पाउलापेक्षा जास्त भाग त्यां मऊ मातीत जात होता. पुढे कुठेतरी रस्ताचे काम चालू असल्याने मातीचे ट्रक पण तिथुन जात असल्याने रस्तावर मातीही खूप उडत होती. उदयनना हे त्रासदायक होत होते पण आमचे या मार्गानेच जायचे असे पहिल्यापासून ठरलेले असल्याने तो त्यावेळी काही बोलला नाही. पुढे रस्तात मातीत पाय गुडघ्यापर्यत जाऊं लागले, मऊ मातीमुळे पायाला ग्रीप पण येत नसल्याने थोडे जपून चालावे लागत होते, भराभर चालले तर माती उडत होती त्यामुळे आमच्या चालण्याने उदयाला त्रास होऊ नये म्हणून उदयन आता पुढे ,त्याच्या मागे बापू व नंतर मी असा प्रवास सरू झाला व एका उतारावर उदयनला रस्तावरील खडयाचाअंदाज न आल्याने तोल जाऊन त्या मुलायम मातीच्या रस्त्यात तो पुर्ण आडवा झाला. डोक्यापासुन ते पायापर्यंत पुर्ण लाल मातीने अगदी लडबडून गेला.मी व बापू थोडे मागे असल्याने त्याला सावरायलाही जाऊ शकलो नाही. खोलीचा अंदाज न आल्याने त्याची तिथे जवळ जवळ कोलांटीउडीच झाली होती. बापू माझ्या पुढे असल्याने पटकन जाउन त्याने त्याला उठवले पण तापर्यंत आतापर्यत आत खदखदत असलेला साहेबांचा पारा चटकन बाहेर आला, कपडे झटकतच म्हणाला "म्हणून मी सांगत होतो की दुसऱ्या मार्गाने जाऊ, पण तुम्हाला माझे एकायला नको,"तापर्यंत मी ही त्याच्या पर्यंत येऊन पोहचलो होतो. पण त्या वेळी त्या विषयावर मी काही न बोलता मी त्याला कुठे लागले नाही ना रे? एवढेच विचारले व हातानी कपडयांना , सँगला लागलेली धुळ झटकून दिली व त्याचा हात धरून 'आपण पुढे जाऊन थांबुया 'असे सांगीतले.
इतर चांगल्या गुणांप्रमाणे उदयनकडे हा एक चांगला गुण आहे तो हा की जेवढा पटकन रागवतो, तेवढाच पटकन राग विसरून आम्हालाही हासवतो. मीही असाच राग विसरून जायचे असे आतापर्यंत खूप वेळा ठरवले पण अजून तरी काही ते कृतीत आणता आलेले नाही. हे असे आपले सगळे र्दुगुण घालवण्यासाठीच तर यायचे माईच्या किनारी, परिक्रमेच्या माध्यमातून ,आपल्याला अंर्त:बाह्य शुध्द व्हायला व आपल्याला परिक्रमेत मिळालेला आनंद इतरांना वाटयला, तरच माईलाही आनंद हाईल ना.असो, आता मातीचा रस्ता संपला आणी आम्ही चांगल्या डांबरी रस्ताला लागलो.
दुपार झाल्याने आता उन्हाचाही चंटका चांगला जाणवू लागला.माझ्या सॅगचा एका बंदाची शिलाई सात, आठ दिवसातच ऊसवली होती त्यामुळे तीही शिवून घ्यायला हवी होती कारण एकदा शुलपाणी सुरू झाले की चार पाच दिवस तरी बॅगेचा बंद शिऊन मिळयची शक्यता नव्हती. शिलाई पूर्ण उसवली असती तर चालणेही कठीण झाले असते कारण सॅग पाठीवर अडकवताही आली नसती. ही अडचण उदयनला सांगीतल्यावर तो म्हणाला 'या रस्तावर पुढे एक भवती गाव आहे तिथे एक गॅरेजवाले आहेत , गेल्यां परिक्रमेत त्यांच्याशी ओळख झाली आहे त्यामुळे त्याना विचारूया आपण कुठे बॅग शिवून मिळेल ते '? पुढे त्या माणसाचे गॅरेज व घर आले, उदयननी गेल्या परिक्रमेतील ओळख सांगीतल्यावर त्यांनी त्यांच्या घराच्या मोठया वऱ्हंडयात गोधडी घालून आम्हाला बसावयास जागा दिले, तेव्हा दूपारचे साधारण एक ते दीड वाजले होते.सकाळपासून कुठेही न थांबता चालतं असल्याने आम्हालाही थोडी विश्रांतीच गरज होतीच त्यामुळे आम्हीही त्या मऊ गोधडीवर टेकून जरा निवांत झालो. पाणी देऊन त्यानी आम्हाला न विचारताच चहाची ऑडरही दिली व "अभी थोडा विश्राम करके आगे जाओ " असे सांगीतले. परिक्रमेत सात आठ दिवस झाललेे असल्याने आता मलाही केव्हाही हे अमृत (चहा ) प्यायची सवय झाली होती. त्यां गृहस्थाची पत्नी महाराष्ट्रातील असल्याने त्यांना महाराष्ट्रातील परिक्रमावासीयांचे जास्त अप्रुप होते त्यामुळे आम्ही तिथे आल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला ,म्हणाल्या माझ्या माहेरची माणसे आली,आता जेऊनच पुढे जा मी लगेच करते पण त्याचे जेवण नुकतेच झाले असल्याने आम्ही त्यांना जेवावयास नकार दिला , आम्ही थोडा वेळ थांबतो व निघतो असे सांगीतले. माझ्या बॅगेबद्दल विचारल्यावर ते म्हणाले ' दस मिनिटपर एक दर्जी है वो देगा आपको बॅग सिलाके, उसको मेरा नाम बोलना'. थोडा फराळ व चहा पिऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
थोडे चालल्यावर उजव्या बाजूला एका शिंपी कम किराणा मालाचे दूकान होते. त्याला आम्ही विचारल्यावर आम्ही परिक्रमावासी आहोत हे जाणून तो लगेच हो म्हणाला , "र्सिफ बॅग खाली करके दे दो दस मिनीट मे देता हूँ. " मी लगेच बॅग खाली करून त्याला दिली व आम्ही तिथेच झाडाखाली बसलो. दहा ते पंधरा मिनीटात त्यानी तो बंद शिउन दिला तो अजूनही व्यवस्थित आहे . आम्ही त्याला पैशाबद्दल विचारल्यावर त्यांनी त्याला चक्क नकार दिला म्हणाला 'इतनी तो मैय्या की सेवा करने दो हमे ' दोन तीन वेळेला विचारल्यावरही नाही म्हणल्याने दुकानातून काही बिस्कटचे पुडे आमच्यासाठी व छोट्या बच्चे कंपनीसाठी विकत घेतले, सहज मनात आले की आपल्याला माईने विश्वनाथ खेडीला तिथल्या मंहातांकडून मिळालेले वस्त्र आहे तेच याला त्याच्या या सेवेचा प्रसाद म्हणून दयावे , कदाचीत यासाठीच माईने ते आपल्याला दिले असेल. बॅगेतून सगळे सामान अनायसे काढलेले होतेच त्यामुळे उदयनशी बोलून त्याला ते वस्त्र माईचा प्रसाद म्हणून दिले, ते मात्र त्यांनी माईचा प्रसाद म्हणून आनंदाने स्विकारले . आम्हालाही या गोष्टीचा आनंद झाला की माईने, माईसाठी सेवा करणाऱ्या तिच्या लेकरांला त्यांनी प्रेमाने केलेल्या सेवेचे फळ म्हणून आशिर्वादरूपी प्रसाद कसा लगेच दिला. याचा प्रत्यय तिने तिथे आम्हाला दिला याला कारणही त्यांची निश्काम सेवा हेही होते , आम्ही फक्त माध्यम होतो ,र्कती करवती सगळी तीच.असेच बरेच धडे माई आपल्याला परिक्रमेत बरेच वेळा देऊन शिकवत असते ते आचरणात आणणे हे खर तर माझे काम आहे.
तिथुन निघून आम्ही पुढे चालू लागलो व तासभरानी आम्ही अमलाली या गावापाशी आलो .एक गृहस्थ थोडया अंतरावर रस्ताच्या कडेला उभा होता ,मी पुढे असल्याने जसा मी पुढे त्याच्या जवळ गेलो तसा पुढे येउन तो माझ्या पाया पडला व मला थांबण्यास सांगून मागून येणाऱ्या उदयन व बापूच्याही पाया पडला व म्हणाला ' मेरा घर इधर पासमेही है, आप तीनों चाय पिने घर चलो महाराज ' आम्हाला आज संध्याकाळ पर्यत पुढच्या हिरणपाल या गावापर्यत पोहचवायाचे असल्याने आम्ही त्याना 'धन्यवाद चाचाजी ,हम आगे चलते है ' असे म्हंटल्यावर त्या गृहस्थाच्या आमच्या बद्दलच्या भावना ऐकून आम्ही चाटच पडलो. म्हणाला 'नही नही साक्षात ब्रम्हा विष्णू महेश आये है आपके रूप मे, मै आपको ऐसे आगे कैसे जाने दूंगा,चलीये चलीये महाराज घर चलिये ' त्यांचे ते प्रेमळ , आर्जवपूर्ण बोलावणे मात्र आम्ही आता टाळू शकलो नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या घरी गेलो, इथेही माईच्या मनात काही वेगळेच होते, कारण माझ्या व उदयनच्या मनात मागे राहिलेली एक इच्छा की जी पुढे लगेच काही पूर्ण होणारी नव्हती व ती पूर्ण करूनच तिला आम्हाला पुढे शुलपाणीत पाठवायचे होते त्यामुळे मला असे वाटते की या काकांना तिने इथे पाठवले होते .काय राहीली होती आमची इच्छा व तिने ती कशी पूर्ण केली हे पाहूया पुढल्या भागात, तोपर्यंत नर्मदे हर 🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव - २३
मागच्या भागात मी म्हटल्या प्रमाणे अमलालीला आम्ही त्या गृहस्थाच्या घरी त्याच्या बरोबर चहा प्यावयास गेलो. जुन्या पद्धतीच्या मांडणीप्रमाणे असलेले घर होतेे ते, आपल्या भाषेतील पडवी, माजघर अशा पद्धतीचे. आम्हाला हातपाय धुवावयास देऊन घोंगडीवर बसण्यास सांगीतले व प्रथम थंडगार पाणी वं नंतर गरम गरम चहा प्यावयास दिला. त्यांनी घरातल्या सगळ्यांशी आमची ओळख करून दिली आम्ही परिक्रमावासी म्हणून सगळ्यांनी आम्हाला आदराने नमस्कार केला. त्यांची पत्नी, दोन मुलगे, नातू, नात असा परिवार असलेल्या त्या गृहस्थाचे अडनाव पटेल होते. अतिशय शांत पण हसतमुख असलेल्या हया गृहस्थाने आम्ही कुठले, काय करतो ,कठून परिक्रमा उचलली,आज आता पुढे कुठे जाणार हे सगळे विचारून घेतले व सगळे ऐकल्यावर आम्हाला म्हणाले " आज इधरही रूक जाओ महाराज, सुबहसे इतना चलेे हो, मेरे घरके सामनेही एक पंचायत का हॉल है ,वहाँ आपकी सब व्यवस्था कर देता हूँ, आज इधर आराम करो ,रातको
खाना खाओ, कल सुबह निकल जाना आगे ,थोडा आगेही तो आज आप विश्राम करने वाले थे ना ? तो आज यहाँ रूककर हमे भी माई की सेवा करने का कुछ मौका दे दो महाराज, चलो आज का खाना हमारे साथ खाओ" त्या माणसाच्या व त्याच्या पत्नीच्या बोलण्यात इतके आगत्य व प्रेम होते की विचारायची काही सोय नाही. ते परत परत आर्वजून व प्रमाने आम्हाला " रूक जाओ , रूक जाओ"असे बोलताना सांगत होते.
पुढे जाऊनही खूप परिक्रमावासीयांच्या गडबड गोंधळात माईची पुजा व पाठ करण्यापेक्षा इथे शांतपणे हे सगळे हाईल म्हणून मी सहजपणे उदयनकडे बघीतले ,कारण दोन परिक्रमामुळे तो आमाचा आता अनुभवी म्होरक्या होता. त्याच्याही मनात बहूतेक हाच विचार चालू असल्याने आम्ही त्यांना सहजपणे हो म्हंटले . समोरचा हॉल त्यानी ऊघडून दिल्यावर आम्ही तिथे
जाऊन आमची आसने लावली .त्याआधी आपल्या बापू महाराजांनी हॉलला एक झाडू मारून तो स्वच्छ केला. मग तिथून थोडयाच अंतरावर असलेल्या एका हपाशावर आम्ही सायं स्नानास गेलो. तिथुन परत आल्यावर माईच्या सायंपुजेची सगळी तयारी केली तोपर्यंत पटेलजीही कौतुकाने माईची पुजा, आरती बघावयास त्यांच्या नातवंडाना बरोबर इथे हॉल मधे आले होते. तो हॉल नुकताच बाधुन झाल्याने तिथे अजून लाईटचे कनेक्शन आले नव्हते त्यामुळे अंधार पडल्यावर आम्हाला त्रास होऊ नये म्हणूनं येताना एक मोठी चिमणीही ते स्वतः घेऊन आले होते.
आम्ही केलेली माईची पुजा, आरती ,नर्मदाष्टक अगदी आनंदाने त्यांनी ऐकले , त्यांच्या चेहऱ्यावरून ते हे सर्व ऐकून खूप खुष झाल्याचे जाणवत होते.
हे सगळे होईपर्यंत साधारण सात वाजले. पुजेचा प्रसाद बापूने आम्हाला व त्या सगळ्यांना दिला. आमच्या कडे असलेली चॉकलेट व बॉलपेन त्या बच्चे कंपनीला दिले. यानंतर त्यांनी सांगीतले की " चलो खाना तयार है, अब आप खाना खाने चलो" दूपारचे आमचे जेवण झाले नसल्याने आमच्याही पोटात आता कावळे ओरडत होते, त्यामुळे आम्हीही लगेच त्याच्या बरोबर त्यांच्या घरी जेवावयास गेलो. जातांना उदयनने त्याच्याकडे असलेले विश्वनाथ खेडीला मिळालेले माईचे प्रसादरूपी वस्त्र आता या माईभक्ताला देण्यासाठी बरोबर घेतले.
त्यांच्या घरी गेलो तेव्हा जेवणाची ताटे मांडलेली होतीच. ' आओ महाराजजी , इधर बैठ जाओ ".
आम्ही ताटावर बसलो व पुढे आलेला पदार्थ काय असेल म्हणून सांगा ! तर मध्यप्रदेशाचा खास पदार्थ "डालबाटी "
मध्यप्रदेशाची फेमस डीश. मागच्या एका लेखात मी म्हंटल्याप्रमाणे मला व उदयनला ब्राम्हणगावाला चतुर्थीच्या ऊपवासामुळे दोन्ही वेळेला डाळ बाटीच्या मेजवानीवर पाणी सोडावे लागले होते .आमच्या ही मनात राहीलेली इच्छा ती कशी विसरेल .माईच आहे ना हो ती शेवटी ! तिच्या लेकरांच्या त्या वेळी मनात राहीलेली इच्छा मला असे वाटते की माईने आता इथे पूर्ण करून घेऊन मगच आम्हाला पुढच्या परिक्रमेच्या प्रवासासाठी पाठवायचे असेच तीच्या मनात होते. याला कारणही असहीे होते की आता दोन दिवसात आम्ही शुलपाणी झाडीत जाणार होतो, म्हणजेच मग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात व पुढे गुजराथ मधे. म्हणजे परत उत्तर तटावर जेव्हा आम्ही गुजराथ मधून मध्यप्रदेशात जाऊ तेव्हा हा पदार्थ मिळायची शक्यता होती त्यामुळे आमच्या मनात राहून गेलेली ही इच्छा अपूरी राहू नये म्हणून माईनीच त्यांना हे बनवायची बुद्धी दिली होती.
सगळ्यात कौतकाची व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बनवली होती त्याच्या धाकटया मुलाने ,की जो असतो जबलपूरला , एम.बी.बी.एसच्या दूसऱ्या वर्षाच्या शिक्षणासाठी .
कॉलेजला सुट्टी असल्याने घरी आलेल्या या डॉक्टरने आमच्यासाठी प्रेमाने हा खास बेत आखला होता. किती प्रेम आहे बघा या तरूण पिढीचेही त्या आईवरती !की ही अशी परिक्रमावासीयांची म्हणजे खऱ्या अर्थाने तिची सेवा करण्याची आलेली संधी त्याने ती फुकट न घालवता सार्थकी लावली होती.
माझ्या त्या वेळी सहज मनात आले की अशी मनापासून माझी इच्छा जर नामात रंगण्यााची झाली तर ती पूरवली जाणार नाही का हो? लगेच दूसरे मन म्हणाले "नक्की पूरवली जाईल " पण त्यासाठी हवी असलेली ती तळमळ, ती तडफड लागली नाही ना अजून, माझी नुसती महाराजांची, आईची वाक्ये पाठ आहेत, महाराज म्हणतात १)तुम्ही फक्त नाम घ्या , मी तुमच्या पाठी पुढे उभा आहे २ ) जिकडे नाम चालू आहे तिकडे मी कुत्र्याासारखा लोळत पडलेला असतो.
आई नित्योपसानेत सांगतात नाम स्मरा तुम्ही ,नाम स्मरा तुम्ही ,नाम स्मरा तुम्ही भरा भरा॥नामरूपात्मक विश्व विसरूनी सेवाल आनंद खरा खरा, मंगलमय हे नाम प्रभुचे अशुभासी बा शुभ करी, रोग चिंता विघ्न संकटे, क्षण न लागता पळती दूरी ॥वाक्य अगदी तोंडपाठ आहेत हो ,पण त्यावर पाहिजे असलेला दृढ विश्वास, त्या नामाची गोडी अजून लागलेली नाही त्यामुळे अजूनही मी या डालबाटीतच अडकलेला आहे. अशीच नामाचीही तळमळ वाढत जाऊन नामात रंगण्याची इच्छाही माईने नक्की पूर्ण करावी अशी माईचरणी प्रार्थना करून आपल्या अनुभवाच्या विषयाकडे वळतो.
भूक लागल्याने डालबाटीवर मस्त ताव मारला, कारण ती चविष्ट तर होतीच पण त्याचबरोबर ते करणाऱ्याच्या हृदयात माईबद्दलचे खरे प्रेम होते. परिक्रमेत प्रथमच व आयुष्यात दूसऱ्यांदा हा पदार्थ खात असल्याने त्याचे थोडे जास्त अप्रुप होते.
सगळ्यांचे पोटभर जेवण झाली व नंतर त्यांनी आम्हाला आमच्याकडे उद्याच्या कार्यक्रमाविषयी चौकशी केली.आम्ही त्यांना आमचा सकाळचा बेत म्हणजे आम्ही सकाळची माईची पुजा व आरती करून लवकरात लवकर म्हणजे साडेपाच पावणे सहा पर्यंत आम्ही इथून पुढे जाण्यास निघू कारण ऊद्या कसेही करून आम्हाला लखनगीरी महारांजांच्या आश्रमात संध्याकाळ पर्यंत पोहोचयाचे होते. इतक्या लवकर निघणार म्हंटल्यावर ते म्हणाले .' इतना जल्दी मत जाओ महाराज इधर रात को कभी कभी शेर आ जाता है, आप इतना जन्दी स्नान करने के लिये बाहर कैसे जाओगे? चाहिये तो मेरे बडे बेटे से पुछो वह रात को खेत पर सोने के लिये जाता है तभी ऊसने शेर की आवाज सुनी है के नही ?. मगाशी आम्ही गेलो तेव्हा त्यांचा मोठा मुलगा नव्हता तोही आता आला होता, त्यांनेही वडिलांच्या बोलण्याला दुजोरा दिला, मग मात्र आम्ही आमचा निघण्याचा कार्यक्रम थोडा ऊशीरा केला कारण अजून तरी निधड्या छातीने व माई वर पूर्ण विश्वास ठेऊन वाघासमोर जाण्याची मनाची तयारी झाली नव्हती😀. तेवढ्यात आम्हाला सगळ्यांना ग्लास मधून गरम गरम दूध आले संध्याकाळी घरच्या गाईचे काढलेले ताजे दुध ! दूपारचा चहा हा कोरा म्हणजे बिन दुधाचा होता, आणी आता गाईचे दुध घरात असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना दुग्धर्शकरापान दिले जात होते, किती घेण्यासारखे आहे ना, दुध घरात नाही तेव्हाही प्रेमाने,आपलेपणाने चहाचा आग्रह , आता दुध आहे तर ते ही उद्यासाठी म्हणून राखून न ठेवता आनंदाने देण्याची वृती. किती सरळ मन आहे या माणसांचे कुठेही बडेजाव , दिखावा नाही आपल्याकडे आहे त्यात प्रेमाने , उदार अतःकरणाने देण्याची वृत्ती . कुठे वेगळ्या ठिकाणी माईला (देवाला) शोधायचे आहे हो, या लोकांच्या अंतः रंगात शोधायला व शिकायलाच तर माई पाठवत असते परिक्रमेला . अशा खूप देव माणसांना माई पाठवत असते परिक्रमेत आपल्या अतःकरणात त्यांचा ठसा उमटविण्यासाठी, त्याच्या निष्काम प्रेमाला जाणण्यासाठी .
असा हा प्रेमाचा धडा घेऊन आम्ही त्या रात्री परत हॉल वर आलो. या निर्मळ आपलेपणाच्या नाजूक शिडकाव्याने मन खूप व्याकूळ झाले व सहज शब्द आले
खजीना उद्भूत अनुभवाचा ॥
द्वारी सापडे तुझ्या प्रेमाचा ॥
फिके भासती हिरे,माणके, ॥
सोहळा तो नित्य आनंदाचा ॥
ऋषी मुनी थोर गात आले ॥
महिमा तुझ्या कर्तुत्वाचा ॥
जरी अज्ञानी मुढमती मी ॥
दिधला आनंद तु परिक्रमेचा॥ किती सांगु मी तुझा महिमा ॥
आनंदअसेतोअनुभवण्याचा॥गतजन्मीचे पुण्य फळाले ॥ भेटला सदगुरू सखासोयरा॥
मागणे मागतो मी तवचरणी॥ ध्यास लागो मजतव चरणाचा॥
अखेरच्या श्वासात स्पुरू दे॥
आठव तुझ्या स्पंदनांचा ॥
हृदयकपाटी जपून ठेऊनी ॥
होईन मग मी तुझा तीराचा ॥
होईन मग मी तुझा तीराचा ॥😢 नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग -२४
गेल्या भागात म्हंटल्याप्रमाणे आमचा सकाळचा निघण्याचा कार्यक्रम आम्ही वाघाच्या भीतीने थोडा उशीरा केल्याने साधारण सात पर्यंत पुढे जाण्यास निघावे असे ठरले. त्याप्रमाणे पाच साडेपाचला ऊठून स्नान व पुजा, आरती , पाच अभंग असे म्हणून आम्ही साडे सहा पावणे सात पर्यंत तयार झालो. आम्ही तयार होईसतोपर्यंत त्यांचा धाकटा मुलगा तिथे आला व म्हणाला " बाबाजी चलिये ,चाय तैयार है ,चाय पीने आप घर चालिये, " मनापासून त्या थंड वातावरणात चहाचा घोट हवाहवासा वाटतच होता, त्यामुळे त्यांनी म्हटल्यावर फारसे आढेवेढे न घेता आम्ही त्यांच्या घरी गेलो.
घरी ते काका , त्यांच्या पत्नी सगळे वाट पहातच होते. कालच्या सारखी घोंगडी घातलेली होतीच आम्ही त्यां वर बसलो आणी आमच्या समोर प्रथम आली गरम गरम पोह्याची डीश व त्याच्या बरोबर वाफाळलेला गरमा गरम चहा, बाहेर हवेत थंड गारवा आणी पुढे आलेला हा सुंदर,लाजाबब मेवा. एखादया पीकनीकच्या नाश्तालाही लाजवेल अशी आमची सरबराई मैय्याने ईथे ठेवली होती. छान गरम गरम वाफा येत असलेले ते पोहे बघून पोटातली भुक चाळवून तोंडाला पाणी सुटले , पण त्याचवेळी आपल्यासाठी या सगळ्यांना इतक्या सकाळी सकाळी हे सगळे करण्याचा त्रास घ्यावा लागला त्यामुळे वाईटही वाटले. आम्ही त्यांना म्हंटले " चाचाजी चाय काफी था, पोहा बनाने की क्या जरूरत थी " त्यावर ते म्हणाले " इसमे कौनसी बडी बात है जी ,खाली पेटं थोडी हम आगे जाने देते ,पेटंभर के खालो महाराज " पहिलेच वाढलेले पोहे एवढे भरपूर होते की परत घेण्याची वेळच आली नाही. वाफाळलेला चहा मात्र परत घेतला .😊
खर सांगायचे तर संबंध परिक्रमेत मी इतका चहा प्यायलो असेल की जेवढा मी माझ्या ऊभ्या आयुष्यातही कधी प्यायलो नसेल .पण खर सांगु ते तेव्हा अमृतच वाटे कारण प्रत्येक ठीकणची चहाची लज्जतच काही औरंचं, कधी अद्रकवाला, कधी तुळशीची पाने घातलेला, कधी तुळशीच्या मंजीऱ्या घातलेला, कधी घरच्या ताज्या दुधाचा, कधी कोरा आणी या सगळ्याबरोबर अवीट गोडीचेे जे माईचे प्रेम होते ना त्यात त्यामुळे त्याला एक वेगळीच गोडी किवा चवं असायची, आईच्या नित्योपासने मधे दिलेली ओवी किती यथार्थ आहे हे जाणवले .
प्रेमाचे देणे दुधापरी ते
मागुनी घेता जलापरी
हट्टाने घेता अशुद्धापरी ऐसे कथीले गुरूवरी
त्या सगळ्या कुटुंबाची एक प्रेमाची ऊब बरोबर घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो .ते नको नको म्हणत असतानाही त्यांना निघण्याआधी नमस्कार केला कारण त्यांच्या दृष्टीने आम्ही परिक्रमावासी जरी होतो तर आमच्यासाठी माईच त्यांच्या रूपात आमच्या समोर होती .
आता पुढचा प्रवास परत सुरू झाला तो डांबरी रस्ताचा एक ते दोन तास तरी आम्ही डांबरी रस्ताने चालत होतो . मग मात्र थोडा मातीचा, उखडलेला ,खाली वर असा रस्ता सुरू झाला. आता तिथे रस्ताचे, ब्रिजचे काम सुरू झाल्याने चालणे तितके अवघड जात न्हवते.
पटेल कुटंबाच्या प्रेमाच्या शिदोरीमुळे आता कितीही वेळ चालवयास लागला तरी हरकत नव्हते.
चालत चालत साधारण अकरा साडे अकारच्या सुमारास थोड्याशा टेकाडावर एक झोपडीवजा आश्रम दिसू लागला , बाहेर झेंडा फडकत होता, उदयनी सांगितले आपण आता कुलीला कांता दासबाबाच्या आश्रमा पर्यत आलो , लांबुनच आम्ही नर्मदे हर केले, तिकडून आवाज आला नर्मदे हर, आ जाओ बाबाजी, वर चढून आम्ही त्या आश्रमात गेलो, उदयाला त्यांनी पाहिल्याबरोबरच ओळखले कारण दोनदा परिक्रमेमुळे त्याचे येथे येणे झाले होते. ते बाबाजी त्या दिवशी पुढच्या एक दोन दिवसात आश्रमात होणाऱ्या पुजा ,होम अशा कार्यक्रमाच्या तयारीत बिझी होतें, काम करत असतानाच त्यांनी विचारले , बाबाजी चाय पाओागे, आम्ही त्यांच्या कामाच्या गडबडीवरून ते त्या कामात खूप बिझी असल्याचे जाणले व त्यांना सांगीतले " नही महाराजजी, दस पंधरा मीनीट बैठके आगे चले जाते है हमे "
बराच वेळ चालल्याने थोडा वेळ थांबुन मग पुढे परत चालण्यास सुरवात करावी असे वाटत असल्याने थंडगार पाण्याने हातपाय , तोड स्वच्छ धुतले , आतमधे असलेल्या देवांना नमस्कार करून पत्र्याच्या सावलीत छान मातीने सारवलेल्या जमीनीवर टेकलो, एक वेगळाच आनंद मनाशी पिंगा घालू लागलां ,कारण चालताना फक्त सदगुरूंनी दिलेले नाम एक वेगळीच मजा आणत होते, डोळे मिटून स्वस्थ बसलो आणी डोळ्यासमोर घरामधील सुंदर गोजीरवाणे रामराय आले व सहज तोंडात भजनाच्या ओळी येऊ लागल्या
जप तू रामनाम किती
मधूर मधूर मधूर मधूर ॥धृ॥
रामनाम ध्वनि उमटे
तेथे लक्ष लाउनी नेटे
ब्रम्हानंद सहज भेटे
प्रचूर प्रचूर प्रचूर प्रचूर॥१॥
उदयनची त्यांच्याशी ओळख असल्याने त्यांचे काही बोलणे चालू होतेे पण माझ्या कानात मात्र त्यातले काहीच शिरत नव्हते.पण नंतर उदयन म्हणाला त्यावरून महाराजजीना आज आपल्याशी बोलायला निवांतपणा नसल्याने पंधरा वीस मिनीटांची विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो.
परत चालून पंधरा वीस मिनीटे झाली नसतील तेवढयात एका टेकाडावरून आवाज आला, नर्मदे हर बाबाजी, आम्ही पण ओरडून नर्मदे हर चा पुकारा केला.परत पुकारा आला "नर्मदे हर बाबाजी, ऊपर आ जाओ, ऐसे आगे मत जाना, ऊपर आ जाओ "
खर सांगायचे तर आताच पंधरा वीस मिनीटांची विश्रांती झाल्याने परत त्या उंच टेकाडावर चढायला खर तर कंटाळा आला होता व पुढेही वेळेत पोहचावयाचे होते कारण लखनगीरी महाराजांचा आश्रम म्हणजे एक मोठा टप्पा होता. पण ते साधु परत परत वरून पुकारा करू लागल्याने त्या खाचखळग्यांच्या चढणाने आम्ही चढत वर गेलो. वर छोटासा आश्रम आणी स्वागताला समोर आले हसतमुख रामानंदी साधु, मी हे परत परत लिहीतो कारण कुठले टॉनीक त्या रामानंदी साधुंकडे असायचे कोण जाणे, आनंद नुसता ओसंडून वाहत असे. मला असे वाटते की आता पत्र्याखाली मला आठवलेला अभंग ते कोळून प्यायलेले असावेत.
वर गेल्यावर हसत हसत म्हणाले "ऐसे ही आगे जा रहे थे बाबाजी, बैठ जाओ थोडा, विश्राम करो, मै अभी गरमा गरम चाय बनता हूँ, बाद मे भोजन प्रसादी पाके आगे जाना ". किती सहजपणे ते बोलत होते . सवय नाही हो आम्हा शहरवासींना याची. आमच्याकडे कुणाकडे नुसते जरी जायचे झाले तरी आधी फोनवर कळवून मग जाणे होते आणी इथे रस्तावरून जात असलेल्या बाबाला बोलवून चहा, जेवणाचा आग्रह चालू होता. आता परत चहाची विचारणा झाली म्हणजे माईला आम्हाला आता चहा पाजवायचाच आहे या विचाराने आम्ही काहीच बोललो नाही . आम्ही तिथे बसलेलो असताना एक मुंगुस इकडून तिकडे गेले. ते आतूनच म्हणाले " हा हा तुम्हें भी देने वाला हूँ " आम्हाला काही कळेना , आतून आवाज कुणाचाच येत नव्हता. बाहेर चहा घेऊन आले व म्हणाले " चलो बाबाजी ग्लास है आपके पास " आम्ही आमचे स्टीलचे मग बाहेर काढले, आमच्या सगळ्यांच्या ग्लास मधे चहा ओतून राहीलेला थोडा चहा कोपऱ्यात असलेल्या डिश मधे ओतला व म्हणाले " आ जाओ अभी पिने " आम्हाला काही टोटल लागेना, कुणाला सांगत आहेत, दिसत तर कुणीच नाही, आमच्या चेहऱ्यावरून ते समजले व म्हणाले " अरे वो मुंगुस आ गया है ना अभी ,उसको रखा है, ' आप है इसलिये अभी आगे नही आ रहा है , आप थोडा पिछे हो जाओ और कमाल देखो " आम्ही खरच थोडे मागे सरकलो व पाहू लागलो तर खरच ते मुंगुस व तिची चार पाच पिल्ले बशीमधील चहा चटाचटा पीत होती.आम्ही बघतच राहीलो कारण शहरात रस्तावर कधीतरी लांबावर या झाडीतून तिकडच्या झाडीत झरकन जाताना दिसणारा हा प्राणी वं लहानपणी तर हा प्राणी दिसला तर म्हणायचे की आज काहीतरी गोड खायला मिळणार, इतका दूर्मिळ प्राणी ! या बाबाकडे त्याच्या मुलांसकट चहा पीत होता.
आम्हाला ते सांगत होते " मै अकेला रहता हूँ तो ,मेरे मेरे पीछे घुमता रहता है यहाँ वहाँ , कभी कभी चाय मिलने तक" एखादया लाहान मुलाचे कौतुक कसे सांगावे तसे ते कौतुकाने सांगत होते .
काय प्रेमाची ताकद आहे हो ही ! कधी करता यईल असे निष्काम प्रेम ?
सध्यातरी गुरूमाऊलीला विनवून फक्त एवढेच सांगता यईल
सर्व चराचरी ठासले हे प्रेम॥
पाहू जाता त्यांस दिसू आले ॥
मी माझे म्हणूनी बंद केले आत॥
उघडा हो यास तुम्ही मायबापा॥
निष्काम प्रेम आवडे हो देवा॥
दावी ती प्रेम कळा मजलागी ॥
विनवूनी सांगतो हा रामाचा सेवक ॥
पूरवावी आस येकवेळा ॥😭
बघा, इथे आनंद आनंदाशी कसा खेळत आहे हा सुंदर धडा शिकवण्यासाठी मला असे वाटते माईने आम्हाला इथे पाठवले होते. त्या प्रेमाचा गोडवा मनात आठवत आम्ही त्या आनंदी बांबांचा निरोप घेउन पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवासात आता प्रथम भेटणार होते शुलपाणीतील माईचे मार्गदर्शक श्री हिरालाल रावत. कसे पोहचलो आम्ही संत लखनगारी महाराजांच्या आश्रमात ते पाहू पुढल्या भागात तो पर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग २५ -
आनंदी बाबांच्या आश्रमामधील आनंदाचे क्षण आठवत आम्ही पुढे चालूं लागलो व थोडया वेळातच आम्ही श्री हिरालाल रावत यांच्या घरापाशी पोहाचलो. श्री हिरालाल रावत यांची इथे पीठाची गिरणी आहे व बाजूलाच त्यांचे घर. तिथे गेल्यावर त्यांनी आमचे " आओ बाबाजी " म्हणत स्वागत केले. " आज यहाँ विश्राम करेंगे " आम्ही त्यांना आज आम्हाला लखनगीरी महाराजांच्या आश्रमातपर्यंत पोहचायचे आहे असे सांगितले. " ठीक है बाबाजी चायप्रसादी लेके जाना ". या काळात खूप परिक्रमावासी इथे येत असल्याने त्यांची विचारपूस करण्यात ते बिझी असावेत कारण आताही आमच्याशी बोलताना गडबडीत होते.
श्री हिरालाल रावत हे आता पारिक्रमेच्या शुलपाणीच्या टप्याचे मार्गदर्शक म्हणून काम करतात, पुर्वी ते त्यां आदीवासी भागातील सावकार म्हणून काम करीत आणी आता माईचे सेवक. पुढचा प्रवास आता खरच खूपच खडतर व कठीण होता. त्यामुळे आपली सात ,आठ किलोची सॅग घेउन डोंगराची चढण चढणे व उतरणे ही तर खरी कसोटी होती त्यामुळे ज्यांना हे आपले सामान घेऊन चालणे शक्य नसेल त्यांना श्री रावंत झ्थपासून ते धडगाव पर्यंत तरूण वयाची मुले आपल्या बरोबर देतात ते आपले सामान घेऊन आपल्या बरोबर चालतात, त्यासाठी काही ठरावीक पैसे श्री हिरालाल यांना दयावे लागतात.त्यामुळे ज्यांना वयोमानानुसार सामान घेऊन चालणे शक्य नसेल व ज्यांना शुल्रपाणी मधून परिक्रमा करायची असेल त्यांच्यासाठी मला असे वाटते की ही एक चांगली सोय आहे. शहरवासी परिक्रमावासीयांना खरतर शहरात रेल्वचे ब्रीज व घरांचे मजले चढण्याची फक्त सवय असल्याने ,त्यांना हा पुढचा सगळा चढ उताराचा भाग म्हणजे खरी कसोटी आहे, हे मी घाबरवण्यासाठी सांगत नसून ही खरी वस्तुस्थिती आहे. कारण माझा सारख्याला पण ज्याला ट्रेकीगची मनापासून आवड, लोकलचा प्रवास करताना मुंब्राचा डोंगर बघीतला की मला असे वाटे की हा सुध्दा डोंगर आपण वेगळ्या मार्गाने अजून चढलो नाही ,त्यालाही हया वाटेने जाताना काही ठिकाणी डोळ्यात पाणी आले होते.
पुर्वी इथपासून पुढे परिक्रमावासीयांना मामांकडून लुटले जात असे. त्यामुळे डोंबीवलीहून निघतांना काही जणांनी तिथल्या आश्रमांसाठी किंवा आदीवासी शाळेसाठी म्हणून आमच्याकडे काहीे दिलेले पैसे आम्ही श्री रावत यांच्या घरी कपड्यात गुंडाळून सॅग मधे अगदी खाली ठेवले, हेतू फक्त हाच होता ते पैसे योग्य ठिकाणी पोहचावेत.
इथे आम्ही चहा घेतला, मला असे वाटते की आम्ही जेमतेम पंधरा वीस मीनीटात तिथून निघालो. इथेही उदयनचे त्याच्या आधीच्या भेटीमुळे त्यांच्याशी काही त्यांच्या शरिराच्या व्याधी बाबत बोलणे झाले, उदयने त्यांना जयपूरच्या डॉक्टरांचा एक रेफरनस दिला व नर्मदे हर चा पुकारा करत आम्ही पुढच्या ट्प्याला निघालो.
आता खरा रस्ता कसोटीचा सुरू झाला कारण रस्ता असा होताच कुठे, सगळ्या पायवाटा दरवर्षी पावसानंतर बदलणाऱ्या, आपल्याला योग्य वाटेल तो मार्ग किंवा जिथे ह्या आदीवासी लोकच्या, गाई गुरांच्या जाण्यामुळे झालेल्या पाऊलवाटा असतील त्या किंवा अजून ज्या सोईच्या पाऊलवाटा दिसतील त्या मार्गाने जाणे एवढेच. पाठीवरचे आठ किलोचे ओझे आता खरतर प्रवास खडतर करण्यास मदत करणारे होते. मजल दरमजल करत पहाडी इलाका चढत उतरत निर्सगाच्या सानिध्यात नामाचा आस्वाद घेत आम्ही एका मोठया नाल्यापाशी किवा ऐका छोटया नदीपाशी आलो.
संबध लक्ष नजर त्यां झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यावर गेले , मन शांत झाले कारण खूप दिवासानी असे वाहणारे पाणी बघत होतो. आता आपल्यापासून माई खूप लांब आहे कारण धरणामुळे बँक वॉटरचे पाणी खूप ठिकाणी आल्याने माईच्या किनाऱ्याचे मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे घोंगशानंतर माईचे दर्शन खूप कमी वेळा व लांबून होते. लांबवर वाहणारा उथळ प्रवाह खाचखळग्यातून उतरत उतरत खाली वाहत जात होता. ह्या पाण्याचा हळुवार प्रवाहाने डोळे शांत झाले. किनाऱ्यावरील निरनिराळ्या रंगाचे दगड, त्याचे आकार त्यावरून वाहणारे पाणी हे बघून मी जरा तिथेच रेंगाळल्याने माझ्या चालण्याचा स्पिड कमी झाला , तेव्हाच उदयन म्हणाला "आपल्याला आजच पोहचायचे आहे लखनगीरी महाराजांच्या अश्रमात " 😡
आतले शडरीपू लगेच जागे झाले 😃 मी ही पुटपुटलो " हो माहीत आहे " वेळ घालवायचा नव्हता हे मान्य होते पण एक म्हणजे हे सुख प्रथमच अनुभवत असल्याने त्याचा आनंद काही वेगळा होतो व दूसरे असे की असे ऐकुन शांत रहायची अजून सवयं नव्हती. त्यामुळे आता उदयन वं बापू पुढे व मी मागे असे चालत होतो. पुढे पाण्याचा प्रवाह दिसत होता पण जाण्यासाठी मार्ग कुठे दिसत नव्हता, जवळपास मार्ग सांगणारेही कुणी दिसत नव्हते. तेवढयात लांबवर एका दगड़ाच्या आडोशाला एक माई स्नान करत असलेली दिसली मग आम्ही तिलाच पुढचा रस्ता विचारला. तिनेही " हां हां इधसे जोओ " असे सांगितले. प्रथम त्या प्रवाहाला नमस्कार केला कारण माईला कित्येक नदया , प्रवाह जाउन मिळतात , फक्त मार्कंडेय ऋषींनी अशा प्रत्येक नदीच्या ऊगमा पर्यंत जाऊन परिक्रमा पूर्ण केली होती त्यामुळे ते शक्य नसल्याने निदान त्या येणाऱ्या प्रत्येक नदीला, मोठया प्रवाहाजवळ ऊदबत्ती लाऊन व नमस्कार करून आम्ही पुढे जात होतो त्यामुळे त्यां पध्दतीनुसार नमस्कार करून प्रवाहात प्रवेश केला, पाणी खूप नव्हते पण खाली असलेल्या दगडांचा अंदाज घेत चालावे लागतं होते , पाण्याचा थंडगार स्पर्श सबंध शरीराला एक वेगळाच उत्साह देत होते. आता समोरच्या भागात पाणी व उजव्या बाजूला गाळ असलेला भाग असा रस्ता पलिकडे जाण्यासाठी होता. उदयन वं बापूने गाळ घट्ट जमीनी सारखा असेल असे गृहीत धरून थोडे जास्त चालावे लागले तरी चालेल पण आपला मोर्चा उजव्या बाजूच्या मार्गाला वळवला . मी मात्र शॉर्टकट थोडे पाणी असलेला सरळ मार्ग पकडला कारण आतल्या अहं ने लगेच सांगीतले "मला उदयन हळू चालतो म्हणतो काय ? "😃 त्यां रागाने आता त्यांच्या आधी आपण त्या तीरावर पोहचायचे . पाण्यातून चालतांना अजून एक अडचण अशी होती की प्रत्येक वेळेला पायतल्या चपला काढून त्यां हातात घेऊन दंड, कमंडलू व्यवस्थित धरून आपली पांढरी लुंगी भिजणार नाही याची काळजी घेत तारेवरची कसरत करत चालावे लागे. चप्पल काढण्याचा हेतूं हा होता की हा प्रवाहही माईला जाऊन मिळणार आहे त्यामुळे आपल्या चपलांचा स्पर्श या जलालाही होऊ नये .
त्यामुळे उदयन बरोवर बापू त्या मार्गाने वळला व मी त्यां पाण्याचा अंदाज घेत , वर सांगीतलेली कसरत करत काठा जवळच्या चीखालाचा अंदाज घेत त्या तीरावरच्या छोट्या पाउलवाटेवर चढलो. इकडे उदयन व बापू पाच सहा पावले चालत गेले असतील आणी त्यांचे पाय त्या रेती कम गाळात जवळ जवळ पोटऱ्याच्यावर पर्यंत घुसले अजून सात आठ पावले चालल्यावर ते त्या बाजूला पोहचणार होते. पण इथेच पाय इतके आत जायला लागल्यावर ते परत मागे फिरले व मी ज्या मार्गाने आलो त्या मार्गाकडे वळले. मी त्यांच्या आधी त्या बाजूला असल्यामुळे थोडा असूरी आनंद झाला क्षणभर आपण त्यांच्या आता पुढे असण्याचा😃 .पण लगेच त्यांना मी या इथुन असा आलो तसेच तुम्ही या असे सांगुन मोकळा झालो. एकमेकांच्या आधाराने ते त्या काठापर्यंत आले व नंतर मी हात देऊन त्यांना वर घेतले व आलेला राग मावळून गेला. किती शुल्लक गोष्टीवरून मला राग आला होता ना ?आता लिहीतांनाही हसायला येते की किती आत हा आपला अहंम बसलेला असतो, जरा त्याला डोके बाहेर काढयला मिळाले की लगेच बाहेर येतो . परवा अनघोऱ्याच्या उन्मेशानंद स्वामीनी फेसबुक वर व्हिडीओ क्लीप मधे अग्निहोत्राची माहीती सांगतांना हेच सांगीतले की परिक्रमा शरिराबरोबरच तुमच्या अंर्त स्थितीत बदल होण्यासाठी झाली पाहीजे नाहीतर परिक्रमा फक्त शरिराची हाईल. दूसरी गोष्ट अशी असे कुणी बोललेल लवकर विसरणे होत नाही ना बघा अजूनही माझ्या लक्षात आहे😃 हाच एखादा श्लोक किवा भजन जेव्हा बरेच दिवस म्हटले नाही की त्यातील कुठला शब्द किंवा ओळ लगेच विसरायला होते कारण त्याची आत्मीयता किंवा ज्याच्यासाठी आपण हे म्हणत आहोत त्या परमेश्वरा बदलचे खरे प्रेम अजून लागले नाही. असो
त्या काठावरून चिखलातून ऐकामेकांच्या आधाराने चालत आम्ही घोंगशाच्या दिशेने चालू लागलो, आता पुढे चांगले चढण असलेला तो डोंगर होता, दोन तीन चढणापर्यंत काही वाटले नाही पण नंतर मात्र चांगलीच धाप लागत होती, श्वास फुलणे म्हणजे काय हे तेव्हा अनुभवत होतो. दूपारचे ऊनही त्रासदायक वाटत होते, साधारणपणे दूपारचे तेव्हा दोन अडीच वाजले असतील, सकाळचे पोहे तर चालून आता केव्हाच जीरले होते , उन्हात चालून आता घशालाही कोरड पडत होती. कमंडलूतील पाणी संपत आले होते कारण चढताना तेवढेच ओझे कमी म्हणून पाणीही पूर्ण भरून घेतले नव्हते. प्रत्येक चढ चढल्यावर असे वाटत होते की आता संपेल मग संपेल, पण असे वेटोळे आठ नऊ चढ चढल्यावर लांबवर आश्रम दिसू लागला . पण परत तिथे जायला वाट काही दिसत नव्हती. तेव्हा साधारण चार वाजत आले होते आजूबाजूला भरपूर झाडी ,थोडया लांबवर आता मैय्या दिसत होती, तिला बघून आनंद झाला पण आश्रमात जायला काही वाटत दिसत नव्हती.आम्ही मोठयानी नर्मदे हर चा पुकारा केला, तिकडून ही नर्मदे हर . म्हणत "ये बाजूसे आ जाओ बाबाजी "बघीतले तर पाय ठेवता येईल एवढीच पायवाट डाव्या बाजूला होती.एका बाजूला . ऊभी भिंत तर दुसऱ्यां बाजूला खोल उतार. पाठीवरची सॅग, एका हातात दंड, दूसऱ्या हातात कामंडलू सांभांळात आम्ही ते पाच सात मिनीटाचे अंतर कसेतरी पार केले व एकदाचे आश्रमात पोहचलो.
आमच्या आधी आश्रमात मध्य प्रदेशमधील परिक्रमावासी आलेले होते, आत भोजन प्रसाही तयार होत होती. परत "नर्मदे हर " चा पूकारा झाला " आ जाओ बाबाजी आ जाओ, आसन लगाओ, थोडीही देर मे भोजन प्रसादी तयार हो जायेगी"
हे वाक्य ऐकूनच खूप बरे वाटले .😃बॅगा आत ठेऊन माईच्या थंडगार पाण्यानी तोड, हात पाय धुतले व चालून आलेली सगळी मरगळ निघून जाऊन एकदम प्रेश झालो . परत आत जाऊन सॅग व्यवस्थित ठेवल्या. बाहेर येऊन लखनगीरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.आंता हा सगळा भाग डुब क्षेत्रात जाणार असल्याने तिथेच वरती नवीन मंदीराचे काम चालू आहे. इथले महंत तिथे असल्याचे कळल्याने त्यांना भेटूण्यास वर गेलो, ते स्वतः प्लास्टरींगचे काम करीत होते त्यांना भेटून, नमस्कार करून परत जुन्या आश्रमात आलो. तोपर्यत भोजन प्रसादी तयार झाली होती. त्यांनी सांगीतल्यावर आपपली थाळी काढून प्रसादास बसलो. प्रचंड भूक लगल्याने समोर जे काही येईल ते आज गोड लागणार होते. आजचा बेत होता टिक्कर,डाल ,भात आणी सब्जी. ही टिक्कर पुढे परिक्रेमेत उदयनकडे कायम पास ऑन करणारा मी त्या दिवशी अगदी आनंदाने खाल्ली. पोटभर जेवण झाल्याने आत्मा तृप्त झाला मग परत नंतर उदयन बरोबर बाहेर आलो त्यानी त्याच्या पहिल्या व दूसऱ्या परिक्रमातील तिकडल्या आठवणी सांगीतल्या. माईच्या किनारी असलेली पत्राची शेड जिथे ते पहील्या परिक्रमेत रात्री उशीरापर्यत बसले होते आता तीही पाण्यामधे होती. इंथे पाण्याच्या जवळ जाता येत नाही कारण इथे मगरींचा निवास खूप आहे.
परंत लखनगीरी महाराजांच्या समाधीसमोर येऊन डोळे मिटून शांतपणे बसलो त्या त्यां जागांची स्पंदने जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो कारण हा सगळा आनंद तर परिक्रमेत घ्यायचा असतो. संध्याकाळ होत आल्याने परत आश्रमात परत आलो. तोपर्यंत पाखरे, पवार, चव्हाण माउली पण तिथे येऊन पोहाचले होते. त्या सगळ्यांना बघून आम्हाला व त्यांनाही आनंद झाला. म्हणजे आता शुलपाणीचा प्रवास आमचा सगळ्यांचा एकत्र होणार होता.
सायं स्नान करून आता माईची पुजा, आरती करावयाची होती. संध्याकाळ च्या जेवणाचा प्रश्न नव्हता कारण दूंपारचे जेवण पाचला झाले होते. माईची संध्याकाळची पुजा आरती झाली तोपर्यंत ते महंतही तिथे आले. रात्रीच्या भोजन प्रसादीत खिचडीचा बेत होता . साडेसात आठ वाजता बाकी सर्व परिक्रमावासीयांची भोजन प्रसादी झालीे . आम्ही त्या महंतांना लखनगीरी महराजांबदल काही सांगावे अशी विनंती केली. त्यांनी खुलेपणाने खूप गोष्टी सांगीतल्या.
महाराज जेव्हा परिक्रमेत होते तेव्हा मांमांनी त्यांना येथेच लुटले तेव्हा त्यांनी इथेेच माईला सांगीतले की परिक्रमा पूर्ण करून येईन व या सर्व भिल्ल आदिवासी लोकांचे लोकजीवन सुधारीन. पुढे ते इथे येऊन स्थायीक झाले व त्यांनी या लोकांना परिक्रमावासीयांना लुटण्याच्या विचारापासून परावृत केले, मुलाच्या शाळेसाठी प्रयत्न करून सरकारकडून इथे शाळा सूरू केली. इथल्या लोकांना ह्या . लुटालुटीच्या प्रवृत्तीपासून परावृत करून शेती किवा इतर काही कामे करावयास सांगून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न त्यांनी शेवटपर्यत चालू ठेवला व त्याची परिणीती म्हणजे आम्ही गेल्या वर्षी शुल्याणीतून जाताना कुठेही न लुटता किंवा कुठलाही अशा प्रकारचा त्रास नं होता सुखरूपपणे बाहेर पडलो. आम्ही जेवलो नाही हे त्यांनी बाघितले होते त्यामुळे हे सांगुन झाल्यावर म्हणाले " आपकी थाली निकालो अभी , थोडी खिचडी की भोजन प्रसादी पा लो, ऐसे खाली पेट थोडी सोते है " बोलण्यात आधिकाराबरोबर प्रेम ही होते त्यामुळे मुकाटयानी आम्ही आमच्या थाळी काढुन त्या चविष्ट खिचडीचा त्यांच्याबरोबर आस्वाद घेतला.
भोजन प्रसादी झाल्यावर आमच्या स्लीपींग बॅग काढून त्यात शिरलो कारण आज चालून व चढण चढून खूप दमायला झाले होते.पडल्या पडल्या माईनी लखनगीरी महारांजाच्या कडून या आदिवासी लोकांसाठी किती मोठे कार्य करून घेतले ते आठवत होतो. कशी ती निरनिराळ्या व्यक्ति कडून ती वेगवेगळ कार्य करुन घेत आहे हे आठवून मनोमन तिल प्रणाम केला .
आज आम्हाला माईने शुलपाणी प्रवासाची थोडी चणूक दाखवली होती आता पुढचा दोन दिवसाचा खडतर प्रवास कसा होता ते पाहू पुढल्या भागांत तोपर्यत नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग २६-
सकाळी लखनगारी आश्रमात माईची पूजा , आरती करून आम्ही सगळे पुढच्या मार्गासाठी प्रस्थान केले.आजपासून परत तीन वारकरी माउली ( पाखरे, पवार, चव्हाण ) आमच्या बरोबर होत्या, वयाने आमच्या पेक्षा दहा पंधरा वर्षानी मोठे असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सगळे नोकरी धंदा करून निर्वत्त झालेले, एका पंढरीच्या वारीत एकमेकांना भेटले वं त्यांची मैत्री द्रूढ झाली व या वर्षी आता ते तिघहीे परिक्रमेला आले होते. पाखरे माउली तर हातात कायम कॅमेरा घेऊन माईचे वेगवेगळे रूप वं निर्सग सौंदर्य टिपण्याचे काम करीत. आमचेही बरेच फोटो आमच्या नकळत काढत व नंतर आम्हाला दाखवत. चालताना नेहमी आमच्या हातात त्यांच्याकडील सुकामेवा ठेऊन देतं अशी ही प्रेमळ माणसे माईने परिक्रमेत दिली. आमच्याकडे खाण्याचे असे काहीच नसल्याने आम्हाला हा पौष्टीक आहार माई त्यांच्या करवी देत असावी.आम्ही वयाने लहान व चालण्याच्या स्पीडमुळे त्यांच्या पुढे असायचो एवढेच.
या सगळ्या डोंगरमार्गात चालताना निर्सगाचा एक वेगळाच आनंद मनाला ताजेतवाना करत असे. एकीकडे लांबवर पसरलेल्या उंचच उंच डोंगररांगा तर खाली लांबवर दिसणारा माईचा शांत व संथ प्रवाह. काय विश्वनिर्मात्याची देणगी आहे ना ही? सगळ्या चराचरात त्याने चैतन्य ,आनंद भरून ठेवला आहे आपण फक्त त्यांचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायचा आहे. पण आपण तो माझेपणाने आनंद घेण्याचा प्रयत्न करतो व त्यामुळे सुख दुखःच्या हिदोळ्यावर झोके घेत राहतो. खरच तेव्हा आईंच्या बोधामृतातील एका स्तवनाची आठवण झाली त्यात त्यांनी सांगितले आहे की हे सगळे सुख, आनंद लुटण्यासाठी त्या परमेश्वराने आपल्यालाा किती अमौलीक गोष्टी दिल्या आहेत,पाहण्यास डोळे , ऐकण्यास कान, काम करावयास हात ,चालण्यास पाय, चागले वाईट ठरवण्याची बुद्धि , काय नाही दिले आहे हो त्याने ! त्याचे अनंत ऊपकार आहेत की ज्यामुळे माझी ही आज माईची परिक्रमा होत आहे. त्याचे करावे तितुके कौतुक थोडेच.
कालच्या सारखा खूप चढणाचा भागा आता नसल्याने व सकाळच्या ताजेतवानेपणामुळे थोडे चढ उतार असुनही पायांची कसरत करत चालण्यात मजा येत होती. फारसे बोलायचे नसल्याने माझे सकाळचे सगळे श्लोक, बालोपासना . हनुमान चालीसा हे सगळे छान म्हणून झाले. हे एकं चालताना माझ्यासाठी टॉनिकच असे .
आजचा पुढचा प्रवास होता खापरमाळ मधील काळुरामच्या घरापर्यंतचा, कारण त्याच्या घरी परिक्रमावासीयांच्या निवासाची सोय होते व पुढील नवीन मार्गाची माहिती पण त्याच्याकडून सगळ्यांना समजते .आधीचे मार्ग आता डुबश्रेत्रात गेल्याने आता हा मार्ग सगळयांसाठी नवीन होता. उदयनही गेल्या दोन परिक्रमेत ज्या मार्गानी गेला तो भाग आता डुब श्रेत्रात गेल्याने त्यालाही हा मार्ग माहीत नव्हता.
साधारण अकरा वाजेपर्यंत आम्ही सेमलड्याला पोहोचलो. आता थोडा वेळ इथे विश्रांतीसाठी थांबुन मग पुढे जाण्याचे ठरले. समोरच्या घरातून सगळ्या परिक्रमावासीयांसाठी खिचडीचे सामान दिले गेले इथे सदाव्रत देतात त्यामुळे आपल्याला अन्न शिजवावे लागते . त्यामुळे पंधरा वीस जणांसांठी लागणारे सामान दिले गले. पाखरे माउलींनी आज सगळ्यांसाठी खिचडी बनवण्याची जबाबदारी घेतली.आम्ही तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीखाली थंडगार पाण्याने स्वच्छ तोंड , हात पाय धुतले व मोठया झाडाच्या पाराखाली सगळे परिक्रमावासी विश्रांती घेण्यास थांबले .आम्हीही आमच्याकडले प्लास्टीक जमीनीवर घालून त्यावर मस्तं मांडी घालून बसलो, सकाळपासून चालत असल्याने त्यां झाडाच्या सावलीत असे हे निवांत बसणे ही सुखावह वाटत होते. तेवढयात एक भिल्ल मामा तेथे एक मोठे धनुष्य, बाण घेऊन आला, छोटया प्राण्यांना मारण्यासाठी याचा उपयोग ते करत असावेत. मी उस्तुकतेपोटी त्यांच्याकडे ते हातात धरावयास देता का? म्हणून विचारले, त्यांनीही आनंदाने ते माझ्या हातात दिले. मी हातात धरून बाण न लावता त्यांची दोरीला ताण देउन बधीतले😃, कारण बाण लावून तो चूकून सुटण्यापेक्षा हे बरे होते.
अर्धा पाउण तासात खिचडीचा बेत तयार झाला, चुलीवरच्या अन्नाची चवही काही वेगळीच असते. सगळे जण आपली थाळी काढून बसले, पाहिल्या राऊंडची खिचडी सगळ्यांच्या पानांत वाढली गेली नंतर मात्र पातेले ज्याला पाहिजे तसे सरकवले गेले. काही लोकांनी खिचडी थोडी कच्ची आहे म्हणून कूरकूर केली पण मला मात्र खूप आवडली. सकाळपासून भरपूर चालण्याने भूकही छान लागली होती व माउलींच्या प्रेमाचा एक वेगळाच गोडवा त्यात आला होता. तेव्हा सहज मनात आले की आता ही नुसती खिचडीही मला खूप छान लागत होती पण घरी असलो की मात्र मला त्याच्यावर साजूक तुपाची धार, कोशिंबीर, पापड किवा मिरगुंड असे असल्याशिवाय चालत नाही, माझेच मला हसावयास आले . माई परिक्रमेत आपल्याला असाही धडा शिकवत असते की बाळांनो सगळ्याची तयारी ठेवा, कधी पंचपक्वानाचे जेवण तर कधी साधी खिचडी खायची ही तयारी आत्ता व या पुढच्या आयुष्यात ठेवा.
सगळ्यांची जेवणे झाली, आवराआवर करून आम्ही पुढच्या मार्गासाठी परत चालूं लागलो.
सगळा डोंगरदऱ्या याचा मार्ग आता सूरू झाला .कुठे भरपूर झाडी तर कुठे ओसाड डोंगर. मधे मधे आदीवासीं लोकांची गावे व त्यांची छोटी छोटी घरे व त्या घरातून नर्मदे हर म्हणून आवाज देणारी भरपूर छोटी मुले. खूप गरिबी, प्रत्येक घरात मुलांची भरपूर संख्या ,आपल्याकडे आशेने बघणारी .गोळ्या चॉकलेट सुध्दा त्यांच्यासाठी एक मोठी चंगळ होती. खूप मुले शाळेत न जाणारी हे चित्र बघून मनात खूप कालवा कालवं होई. आम्ही घेतलेली गोळ्या, चॉकलेट तर लगेच संपून जाई व पुढे नाही सांगायची वेळ यई. निर्सगाचे इतके सुंदर लेणे मिळालेला हा भाग अजून शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र खुप मागे आहे. डीजीटील युगाचे कौतूक करणारे आम्ही इथे आल्यावर कळते की आजून हा भाग किती मागासलेला आहे.
सकाळपासून निघालेलो आम्ही छोटे छोटे पहाङ, त्यातील दगड़ मातीचे रस्ते, कधी घनदाट झाडी तर कधी उघडे डोंगर, निर्सगाचे वेगवेगळे रूप डोळ्यात साठवत चालत होतो. आता मै्याचा खूप खाली व आम्ही वर . मधुनच तिचा लांबवर प्रवाह दिसत असे. छोट्या छोटया पहाडातील वेडावाकडा रस्ता, कधी छोटासे ओहोळ पार करत चार वाजेपर्यंत परत एका मोठया ओहळापाशी आलो, आता इथुन त्या डोंगरावर काळुरामचे घर जवळ होते म्हणजे साधारणपणे दीड ते दोन तासावर😃. इथे आता खूप परिक्रमावासी होते काही दिवसभर चालून तिथे विश्रांतीला थांबलेले तर काही आमच्या पुढे मागे असलेल महाराष्ट्रातीेल, मध्य प्रदेशातील .मला असे वाटते की जवळ जवळ १५ ते २० परिक्रमावासी आता आम्ही काळुरामच्या घरी कुच करणार होतो. तिथे खूप लहान मुलेही होती की जी आमच्या सॅग, बॅग घेऊन वर काळुरामच्या घरापर्यंत येण्यासाठी तयार होती वं त्यासाठी ती आमच्या मागे मागे येत होती. कारण त्यातून त्यांना पैसे मिळणार होते, सात आठ वर्षाची ही मुले पण गरीबीमुळे इतक्या कष्टाचे काम करण्यास तयार होती. खूप वाईट वाटले आम्हा सर्वांना त्यांना नाही म्हणून सांगताना पण काही इलाज नव्हता , बर थोडे पैसे या मुलासाठी म्हणून द्यावेत तर ते त्यांच्यासाठी खर्च होतील याची खात्री नाही कारण इथे दारूचे व्यसनही खूप मोठया प्रमाणात आहे. आता सगळा मार्ग हा डोंगर चढण्याचा होता. पाठी वरचे ओझे आता मणाचे ओझे आहे असे वाटत होते पण आज काहीही झाले तरी तिथे पोहचणे गरजेचे होते कारण मधे कुठे वस्ती करायला जागा नव्हती , उद्या एका दिवसात हया खापर माळच्या डोंगररांगा चढून उतरायच्या होत्या व भवाणा डोंगरही उतरायचा होता . पण तो टास्क किती कठीण होता याची आत्ता काहीच कल्पना नव्हती.
आजचा हया डोंगराची वाट चढायला पण खूप कठीण होती,.खूप सरळ सरळ चढ, दगड गोट्याच्या वाटा,मधे थोडासा ऊतारं वं त्याच्या दुप्पट उंचीचा चढ नाकात दम आणत होता. पाठीवरच्या सॅगचे ओझे खूप त्रास देत होते. सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत सतत चालत असल्याने पाय ही आता या चढणाच्या रस्ताला कुरकुर करू लागले होते, थोडक्याात आता स्टॅमिना संपत चालला होता .पण डोंगराचे चंढ काही संपतं नव्हते. मनोमन माईला प्रार्थना करत होतो की आता लवकरात लवकर आम्ही मुक्कामाच्या जागेवर जाऊन पोहचू. सगळेच खरे तर खूप दमले होते पण मधे कुठे थांबावयास जागा नसल्याने आम्ही जीव तोडून चालत होतो.
साधारणपणे साडेपाचच्या बेताने आम्ही त्यां काळुरामच्या घरासमोर पोहचलो. घरासमोर एक गवताचा पेंढा शेडवर घालून बसण्यास वं झोपण्यास सोयं केली होती. त्या दिवशी तिथे आम्ही साधारण तीस ते पस्तीस जण परिक्रमावासी जमले होतो. उदयनही माझ्यासारखाच दमला होता. बापूसाहेब आमचे तरूण असल्याने तसे फ्रेश होते.
तिथे गेल्यावर प्रथम मी पाठीवरची सॅग काढून दहा मिनीटे तसाच बसून राहीलो. काही करण्याचे त्राणच शारिरात नव्हते. आज सायं स्नानाला सुट्टी होती कारण इथे परिक्रमावासी होते तीस ते पस्तीस वं इतक्या उंचावर त्यांच्यांकडे एवढया सगळ्यांसाठी पाण्याची सोय असण्याची शक्यता नव्हती त्पामुळे थोडयाशा पाण्यात हातपाय धुवून प्रेश झालो.सगळ्यांची आसन लावून झाली तापर्यंत संध्याकाळच्या माईच्या आरतीची वेळ झाली. आज परत आमच्या बरोबर पुजा वं आरतीसाठी पाखरे,पवार व चव्हाण माउली होते. पुजेची सगळी मांडमांड करून आम्ही माईची पुजा व आरती केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी उदयाच्या परिक्रमेच्या मार्गाविषयी थोडी चर्चा केली. आता पूर्ण अंधार झाला होता, लाइट वैगरे असण्याचा तेथे काही संबध नव्हता, आभाळात छान टिपूर चांदणे पडले होते, परिक्रमेच्या गप्पाना एक वेगळाच मुड आला होता. काळुरामच्या मुलाशीही बोलणे झाले होते. एक गोष्ट चांगली कळली होती की उद्या तो आमच्याबरोबर भवाणा डोंगरांपर्यतच्या परिक्रमेच्या मार्गावर येणार होता कारण त्यांला या परिक्रमेच्या मार्गावर परिक्रमेचा मार्ग सगळ्यांना कळावा म्हणून काही खुणा किवा मार्गदर्शक लावण्यास यायचे होते. म्हणजे भवाणा डोंगरापर्यतच्या मार्गची आता काळजी नव्हती. रात्री डाल चावलची प्रसादी त्या मोकळ्या डोंगरावर झाली हा ही एक वेगळा अनुभव. शहरात हॉटेल मधे कँडल लाईट डिनर असते इथे चांदण्यात व चंद्राच्या प्रकाशात जेवणाची मजा काही औरच होती.भोजन प्रसादी झाल्यावर सगळे आपल्या आसनावर आडवे झाले कारण प्रत्येक जणच आज खूप दमला होता. गारठा पण आता चांगलाच जाणवत होता, स्लिपींग मधे शिरून मी आजचा सगळा प्रवास आठवत होतो. बाहेर नजर टाकली तर लांबवर निळ्याशार आभाळात चांदण्या चमचम करत होत्या, ते बघता बघता परिक्रमेच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंतचा प्रवास एखादया चित्रासारखा झरकन डोळ्यासमोरून गेला व क्षणभर हे सगळे सप्नवतच आहे असेच वाटले. पुर्वी कधी विचारही केला नव्हता असा एक सुखद अनुभव आठवत त्या दिवशी डोळे कधी मिटले ते कळले नाही. उद्याचा कठीण प्रवास कसा होता ते पाहू पुढच्या भागात . नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग २७-
नेहमीच्या सवयीनुसार पहाटे साडेच्यार पाचलाच जाग आली पण आज इतक्या लवकर उठून तसा काही उपयोग नव्हता कारण सात नंतरचं इथुन निघायचे असे ठरले होते पण त्याआधी स्नान व नंतर पुजा हया सगळ्याला इथे आज सुट्टी होती कारण पाण्याचा साठा नसल्याने पुढे कुठेतरी ओहळ लागेल किंवा पाणी मिळेल तिकडे आंघोळ करून मग तिथे माईची पुजा करायची असे ठरले होते. त्यामुळे जागेवर पडूनच सदगुरूंनी दिलेले नाम घेणे इतकेच काय ते करू शकत होतो.
साडेपाच सहा नंतर हळु हळुं सगळीकडे जाग येऊ लागल्यावर आम्ही उठलो व प्रातः विधी उटोपून सगळी तयारी करून तयार होऊन बसलो .
आज भास्करराजाचे पृथ्वीतलावरील आगामन यां डोंगरावरून पहाण्याचा एक सुंदर योग किंवा एक वेगळीच मजा येणार होती. रोज सकाळी रस्तावरून चालत असताना त्याचे दर्शन होई पण आज ईतक्या उंचावरून त्याचे दर्शन घेण्याचा आनंद काही निराळाच होता. सकाळचे सहा सहवासहा झाले व आभाळात सगळीकडे लाल शेंदरी रंगाची रांगोळी घातली जावी तशी लालसर छटा पसरू लागली व लवकरच एक शेंदरी तांबुस रंगाचा सुंदर गोळा गरगर फिरत फिरत हळूहळू आभाळात येऊ लागला , तेव्हा त्याचे ते येणेही खूप विलोभनीय वाटत होते. सुस्त झालेली पृथ्वी त्याच्या आगमनाने एकदम चुस्त झाली. हा लेख लिहून झाला आणी सहजच दासबोधातील सुर्यस्तवन हा समास वाचनात आला.
रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायाचा दूसरा समास तर पूर्ण सर्य स्तवनावर लिहाला आहे. त्यात समर्थ सुर्यनारायणाला कौतुकाने म्हणतात
धन्य धन्य हा सुर्यवौंश॥
सकळ वौंशामध्ये विशेष ॥
मार्तंड मंडळाचा प्रकाश ॥
फाकला भूमंडळी ॥
असा हा तेजोमय सुर्य सर्व जगाला जीवंत ठेवतो कसा? तर आपल्या ज्ञानमय प्रकाशाने ! कारण प्रकाश ज्ञानमय तर अंधार अज्ञानमय. म्हणून ते म्हणतात
वेदशास्त्र आणी पूराणे ॥ मंत्र यंत्र नाना साधने ॥ संध्या स्नान पुजाविधाने ॥ सूर्येविण बापूडी ॥
ती एक वेळ व सुर्य अस्ताला जातो त्यावेळी आपण त्याचे हे असे सौंदर्य निट निरखून बघू शकतो. त्याचे नित्यनियमीत येणे हा ही माझ्यासाठी एक धडाच होता, या सगळया सृष्टीच्या गोष्टी किवा क्रिया किती नियमीतपणे चालत असतात ना? कुठे खंड नाही, अनियमीतपणा नाही नाहीतर माझे, चार दिवस पहाटे नाम घेण्यास उठणे झाले की पाचव्या दिवशी चार दिवस लवकर उठल्याचे अप्रुप वाटून किवा कंटाळा येऊन आज थोडा आरम करू असे म्हणून झोपणे होते😀.
सगळ्यांची तयारी झाली व आम्ही काळुरामच्या मुलासोबत सातला तिथुन निघालो. आता डोंगर उतरणीचा भाग बराच असल्याने व सकाळच्या वेळी आम्ही प्रेश असल्याने आईनी दिलेले नाम आनंदाने घेत पटापट खाली उतरू लागलो. तेव्हाही मनाची गंमत वाटली की सगळे मनाप्रमाणे होत असताना नाम घेणे किती सहजपणे होत होते तेवढे ते काल हा डोंगर चढत असताना मला ( माझ्या शरिराला ) किती त्रास होत आहे हे मनाने ठरवले असल्याने ते तेवढे मनापासून होत नव्हते किंवा काही वेळा नाम घेतलेहीे जात नव्हते. याला कारणही एक म्हणजे मी म्हणजेच हा देह त्याला होणारा त्रास तो माझा त्रास हाच भाव अजून दृढ आहे. कारण पूर्णपणे त्या अंतरात्माशी किंवा आत्मतत्वाक्षी जेव्हा साधक एकरूप होतो तेव्हा त्याला शरीर दुःखाचे काही सोयरसुतक रहात नाही जे काही घडत आहे ते त्यांची इच्छा अशा भावनेत असल्याने तो आपल्याच आनंदात निमग्न असतो. ( परत सगळी थेअरी पाठ पण प्रॅक्टीकल शुन्य ) दूसरे कारण म्हणजे मी नाम घेतो हा एक भाव अजून गेला नसल्याने ही सगळी गमत होते पण ग्हणतात ना कळते पण वळत नाही. आई प्रवचनात पण हेच सांगतात की जेवढे खोड जूनं तेवढे त्याला वळवणे कठीण , कारण मला सगळे कळते हा भाव असतो हेच लहानपणी हा भाव कमी असल्याने त्याला चांगल्या गोष्टीकडे वळवणे सोपे जाते म्हणूनच आईंनी प्रत्येक मंदीरात दर रविवारी बोलापासना हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला.
त्यांच्या घरापासून ते कालच्या मोठया ओढ्यापर्यंत उतरणीचे मार्ग असल्याने आम्ही भरभर चालत साधारण पाऊण तासात तिथे पोहचलो. आता इथेच स्नान करून माईची पुजा,आरती करून मग पुढे निघावयाचे असे ठरले. आम्ही त्या थंडगार वाहत्या पाण्याला प्रथम वंदन करून त्यात स्नान केले व एकदम प्रेश झालो कालचा चढणीच्या मार्गामुळे आलेला थकवा कुठल्या कुठे पळुन गेला.एका मोठया दगडावर पुजेची मांडणी केली व पुजा, आरती, नर्मदाष्टक म्हणून माईला मनोभावे वंदन कले व खडीसाखरेचा प्रसाद ग्रहण करून आता परत पुढच्या प्रवासासाठी साडेआठ तयार झालो.
पुढचा सगळा रस्ता आता छोटया मोठया डोंगरातून चढ उतरणीचा होता पण अजून तरी खूप त्रासदायक किंवा भीती वाटावी असा मार्ग काही आहे असे तरी वाटत न्हवते, मधून मधून मोठे खडकाळ चंढ येत होते पण थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालत होतो. लांबच लांब डोंगराच्या रांगा दिसत होत्या कुठेही मनुष्य वस्ती नाही . त्यातील किती चढायच्या व उतरायच्या याचा काहीच अंदाज येत नव्हता. काही ठिकाणी एका बाजूला खूप खोल उतार वं दूसऱ्या बाजूला डोंगराची भिंत तर काहीं ठिकाणी पायं ठेवता यंईल एवढीच पायवाट तर काही वेळेला दोन्हीं बाजूला खूप खोल दरी. अकरा साडेअकरा पर्यंत हा असा प्रवास चालू होता. मधे एक छोटे गाव आले तिथे परत आता भोजन प्रसादीचा बेत ठरला याचे कारण नंतर लक्षात आले की पुढे जेवण बनावायला कुठे जागाच नव्हती .आज ही खिचडी बनावयाची जबाबदारी होती काळूरामचा मुलगा व मध्यप्रदेशातील परिक्रमावासीयांवर. कारण चूल पेटवून जेवण बनवणे म्हणजे खरचं एक दिव्य काम आहे हे पुढे परिक्रमेत लक्षात आले. आम्ही पुन्हा एकादा एका झाडाखाली जरा खाबड खुबड भाग कमी असेल असे बघून प्लास्टीक अंधरून बसलो. कुणीतरी कुठनसे छान थंडगार पाणी आणले, ते सगळ्यांनी पिऊन प्रथम आत्मा शांत केला. पाऊण तासात सगळ्यासाठी खिचडी तयार झाली व आम्ही आमची थाळी काढून तिथेच बसलो, बाकीचे सगळे तिथेच दाटीवाटीने बसून सगळयानी भोजन प्रसादी ग्रहण केली. अर्धा तासात सगळे फॅकअप करून आम्ही परत पुढच्या परिक्रमेच्या मार्गासाठी तयार झालो.पुढचा प्रवास खूप होता पण चालायला सोपे पडावे म्हणून आता अर्ध कमंडलू भरून पाणी घेतले व पुढच्या रस्तासाठी परत आम्ही मार्गस्थ झालो ,आता पाय पटापट उचलायला लागणार होते कारण संध्याकाळ व्हायच्या आत भवाणा गावात पोहचावयाचे होते.
आता यापुढचे वर्णन खर तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे कारण ते सगळे चढ ऊतार ,त्या सर्व छोटया निमुळत्या तिरक्या पाउलवाटा , दोन्ही बाजूला असलेला सरळसोट उतार दगडातील उताराचे रस्ते, दिवसभर असे सतत डोंगर रस्तांतून चालणे हे सगळे मी आज लिहीत असतांनाही आठवले की वाटते कसे पार केले ते दिव्य !हे आठवून आजही तिला मनापासून वंदन करतो कारण ती सर्व जगाताची आई ह्या भुमिकेला अनुसरून आमच्या सगळ्या वरती असलेल्या वात्सल्यामुप्रेमामुळच तिच्या हदयापर्यंत पोहचणे शक्य झाले, आता प्रयत्न फक्त हा असेल की तिला आपल्या ह्रदायात कायम विराजमान करणे . त्यामुळे पुढे केलेले वर्णन हे शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न करीत आहे , काहीं कमी जास्त वाटले तर ती माझ्या मनाची स्थिती समजून गोड मानून घ्या.
दुपारपासूनचा सगळा रस्ता आता डोंगरातून होता. दोन्ही बाजूला खूप खोल उतार ,मधे पाय ठेवता येईल एवढीच पाऊलवाट असा सगळा मार्ग सुरू झाला. सगळीकडे पावसाळ्यात वाढलेले हिरवे गार गवत आता पिवळे झालेले उभे होते.पाठीवरची सँग सांभाळात चालणे म्हणजे एक खूप कठीण काम आहे हे त्या वेळी जाणवत होते. सुरवातीला थोडी मजा वाटली कारण मागे केलेल्या ट्रेक सारखा आता परत अनुभव घेता येणार असे वाटत होते पण नंतर मात्र ते खूप कठीण वाटत गेले. कारण कित्येक वळणाच्या पाउलवाटा हया अशाच पाउल ठेवण्या इतकी जागा असलेल्या. काही वेळेला डोंगर उतरताना पाउलवाट ही नसे , तेव्हा दगडांच्या खाचखळग्यातून उतरताना पाठीवरची सॅग पुढे ढकलत असे तेव्हा मात्र खूप सांभाळून उतरावे लागे कारण तोल जाऊन पडायची भीती जास्त होती.
हा सगळाच डोंगराळ प्रदेश त्यामुळे लांबवर सगळीकडे पसरलेल्या दऱ्या व डोंगर, माणसांचा कुठे मागमूस नाही . बघायला खूप छान, सुंदर एकांत असलेले ठीकाण , मन त्या निसर्गाच्या सानिध्यात सहज एकाग्र हाईल पण तो आनंद घ्यायला आता वेळ कुठे होता. उदयनयी स्थिती पण खूप वाईट होती. कारण त्याला हाईट फोबीया असल्याने डोंगर उतरताना त्याची खूप त्रेधा तिरपट उडत होती. बापू त्याच्या बरोबर कायम राहून त्याला सांभाळून खाली उतरवत असे.मी त्यांच्या पेक्षा पुढे असायचो कारण मला त्यांच्या स्पिडने हळू हळू चालणे जमत नसे, एक दोन वेळेला मी त्या स्पिडने चालण्याचा प्रयत्न केला तर मला चालताना व उतरताना पडू की काय अशी भिती वाटू लागली त्यामुळे मी माझ्या स्पीडने चालू लागलो व खूप पुढे आलो असे वाटले की जरा थांबून त्यांची वाट बघत बसे.
यांची वाट बघत असल्यामुळे बाकीचे परिक्रमावासी बरेच पुढे निघून जात असेच ऐका ठीकाणी मीही एकटाच या दोघांच्या खूप पुढे आलो, पुढे एक ठिकाण असे आले की मला खाली कसे उतरावे ते काही कळत नव्हते. सगळा दगडांचा उतार, त्यावर मऊसर लाल मातीचा थर, त्यामुळे सँडल त्याच्यावरून घसरत होत्या. पुढे वं मागे विचारायला कुणी नाही, एकदा वाटले की त्या मोठया दगडावंरून खाली चक्क उडी मारावी, पण आता पन्नाशी उलटून गेल्याने मन त्यालाही तयार होईना, मी मटकन खालीच बसलो, कसे उतरावे , काय करावे काही कळेना. एक सांगू तेव्हा खर तर मला रडायलाच आले. कारण उदयन व बापू साठी थांबलो तर बापूला उदयन बरोबर मलाही उतरण्यास मदत करावी लागली असती त्यामुळे आपण प्रयत्न करू बघू असा विचार चालू होता. तेवढयात एक भिल्ल मामा खालून वर येताना दिसला, त्याला बघून माझ्या जीवात जीव आला, पण तो जसा वर येऊ लागला तसे त्यांच्या एकूण हालचालीवरून व चालण्या वरून तो पूर्ण प्यायलेला दिसत होता. तरीही त्याला मी खुणेने विचारलेच. त्यावर तो म्हणाला " आ जाओ ऐसे,नही तो यहाँ से कुद जाओं ". त्याले हे चढणे उतरणे मला असे वाटते की आम्हाला जसे मुंबईत चालत्या लोकल मधे चढणे, उतरणे सहज व सोपे वाटते तसे वाटत असावे. उडी मारणे हे काहीजमणारे नव्हते , कारण लहानपणी एका छोट्या झाडावरून खाली उडी मारल्यावर पायात काय कळा येतात हे अनुभवले होते , आता तर तेव्हां सारखा लहान व वजनाने हलका फुलाकाही नव्हतो. तो सांगत होता तिथून उतरण्याचा मी आधीच प्रयत्न केला होता पण सँडलमुळे त्या दगडावर असलेल्या लाल मातीवर घसरायला होत होते व तो मार्ग जिथे उतरत होता त्यांच्या थोडे बाजूलाच एक खूप खोल दरी होती, त्यामुळे तिथे जर मी घसरलो तर डायरेक्ट खोल दरीत जाण्याची शक्यता जास्त होती. तिथुनच तो मामा माझ्या जवळ आला व माझा हात धरू लागला पण तो जसा जवळ आला तसा दारूचा इतका उग्र दर्प आला की त्याच्या भरवशांवर मी खाली उतरणे म्हणजे आम्ही दोघेही त्याचा किवा माझा तोल जाऊन गडगडत खाली जाण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मी लगेच त्याला म्हंटले" मै बराबर उतर जाता हूँ, आप जाईये, ". अजून उदयन व बापूंही मागे दृष्टीक्षेपात नव्हते, त्यामुळे जी गोष्ट मी अजून केली नव्हती ती करणे आता क्रमप्राप्त होते. लगेच पायातील सॅडल काढल्या एका हातात सँडल व दंडा, एका हातात कमंडलू , पाठीवर भरभक्कम सॅग असा हळूच त्या दगडावरील मातीत पायं ठेवला वं हळू हळू उतरू लागलो, पायाच्या ग्रीपमुळे आता घसरायला होत नव्हते त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळत हळूच खाली आलो व माझा जीव एकदाचा भांडयात पडला. परत तशीच उतरण पण माती कमी असल्याने व सँडल हातात असल्याने मगाच सारखा परत खाली उतरलो.आता मात्र पुढे न जाता त्याची वाट पहात मी तिथेच थांबलो. गेले दोन दिवस अशी सतत चढ उतार चालू असल्याने आपल्या स्वःताच्या पायावरचा कंट्रोल कमी झाल्याचे मला चांगलेच जाणवत होते म्हणजेच पटकन कुठेही तोल जाऊन पडायाची शक्यता जास्त वाटू लागली होती. असे घडून चालणारे नव्हते कारण आम्ही अजून भवाणा डोंगरावरही आलो नव्हतो, व तो पूर्ण उतरून मग गावात पोहचणार होतो. आता दूपारचे साधारण दोन वाजत आले होते म्हणजे साधारण चार साडेचार तासात आम्हाला हे अंतर पार करणे गरजेचे होते कारण एकदा का अंधार झाला की चालणे अजून जीकीरीचे होणार होते. त्यामुळे मनापासून माईला परत प्रार्थना केली की आता पुढचा टप्पाही आमच्याकडून असाच व्यवस्थित पार करून घे. पुढचा टप्पा बघूया पुढच्या भागात तोपर्यंत हर हर नर्मदे..
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग २८-
गेल्या काही भागात मी म्हंटले होते की शुलपाणीचा हा सगळा पट्टा म्हणजे माईचे ह्रदय स्थान. आपण आपले मानलेल्या माणसांचे ह्रदय जिंकण्यासाठी किती कष्ट घेतो ना?अगदी जीवाचा आटापीटा करतो. इथे तर प्रत्यक्ष माईच्या हृदय स्थानापर्यंत पोहचायचे ! म्हणजे थोडा त्रास सोसायला पाहिजेच नाही का? किंवा मी म्हणीन की तो थोडा गोड मानून तरी घेतलाच पाहिजे. कारण प्रत्यक्ष तिला आपल्या ह्रदय कमळात प्रेमाने कायमचे विराजमान करण्यासाठी तर प्रत्येकाला आपले वेगळे प्रयत्न करावे लागतील यात काही शंका नाही पण निदान तिच्या या स्थानापर्यत येण्यासाठी तरी आपल्याला आपल्या मनाची थोडी तयारी तरी करण्याची खरच खूप गरज आहे.
कारण आपल्या मनाचे कसे असतेे त्याला जितकी सुट द्यावी तीतकी हवी असते, एरवादी गोष्ट सुखासुखी कशी मिळेल याची ते वाट पहात असते त्यामुळे परिक्रमा करताना या मार्गाने जाऊन ह्या मिळणाऱ्या वेगळ्या थराराचा आनंद प्रतेकाने जरूर लुटावा.
माझी ह्या मार्गाने परिक्रमा तिने करून घेतली म्हणून मी हे लिहीत नाही पण एक निर्सगाचे एक वेगळेच रूप ,ते सौंदर्य , पंचमहाभूतातील पृथ्वी ह्या तत्वाचा वेगळा रांगडेपणा आपण ह्या मार्गाने नक्की अनुभवतो. तो सुंदर निर्सग, उंचसखल डोगर दऱ्या , कधीतरी लांबवर दिसणारा माईचा शांत प्रवाह व त्यामुळे सहजच होणारा आपला आपल्या अंत:र्मनाशी व निर्सगाशी होणारा संवाद, कदाचीत आपलेच आपल्याला पडलेले प्रश्न व त्याला तिथेच मिळणारे उत्तर हे सारे या सुंदर एकांतात नक्कीच होऊ शकते. म्हणूनच मला असे वाटते की पुर्वीपासून ऋषीमुनी , साधुसंत हे अशाच जंगलात, गरीकांदरात जाऊन राहत व आपली उपासना इथे पूर्ण करत. खरच, ना मोबाईल, ना वॉटसँप ,ना फेसबुक वा कुठली इटरनेट साधने, कुणाला रिप्लाय नको, कुणाचे लाईक नको, कुणाचे किती आलेले चांगले ,वाईट कमेंटस बघणे नको ,आपणच आपल्या मनाच्या मस्तीत राहून त्या चैतन्याशी, परब्रम्हाशी एकरूप होण्याची मजा काही औरच असेल नाही. या संर्दभात स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या एक सुंदर कवितेच्या ओळी किती सार्थ आहे बघा ते म्हणतात
चलो मन जाये घर आपन झ्स परदेस मे ओ परदेस मे
क्यूं परदेसी रहे ॥ धृ॥
आँख जो भाये वो कोरा सपना
सारे पराये है काई ना अपना
ऐसे झुटे प्रेम मे पडना
भुल मे काहे जीये ॥१॥
साचे प्रेम की ज्योत जलाके
मन सुन मेरी तान लगाके,
पाप और पुण्य की गठरी ऊठाके,
अपनी राह चले ॥२॥
मग हा दिसणारा दृष्य पसाराही खरच किती खोटा आहे हे ही लक्षात येईल .
कदाचीत मी वर लिहीले ते तेवढे सोपे नसेलही कदाचीत कारण या सगळ्या गोष्टींना इतके अॅडीक्ट झालेले मन तो मिळणारा एकांत फार काळ सहन करू शकणार नाही किंवा मन सहज त्याला अॅडजेस्ट होऊ शकणार नाही, ते घाबरून जाईल. पण पूर्ण आर्ततेने हाक व त्या विश्वमनाशी एकरूपता मात्र इथेच होउं शकते.
हा सगळा दूर्गम भाग बघून या मार्गातून जात असताना खूप वेळा मनात यई की जेव्हा इथे घनदाट जंगल होते तेव्हा या मार्गाने ज्यांनी ही परिक्रमा केली त्यांनी ती कशी केली असेल कारण इतक्या वरून जरी तेव्हा मार्ग नसला तरी माईच्या किनाऱ्यानी घनदाट जंगलातून जाणे किती कठीण असेल, हिंस्त्र प्राणी, पोटासाठी लागणारे अन्न रस्तातून जात असताना लुटणारे भिल्ल मामा, की जे आपल्याकडील सर्व काही लुटून नेत व प्रतिकार केला तर मारून टाकत ,तेव्हा ज्या साधुनी या मार्गानी परिक्रमा केली त्यांना खरच माझा मनापासून दंडवत. परिक्रमेत असताना भालोदच्या प्रतापे महाराजांना व सुमुद्र पार करून गेल्यावर मीठीतलाई पासून सुरू होणारी समुद्र पंचक्रोशी परिक्रमा करतांना परशुराम तपोभुमीच्या साधुंना हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सागीतलेले कठीण अनुभव ऐकून मला असे वाटले की आता त्या मनाने ही परिक्रमा खूप सोपी झाली आहे. त्या कठीण अनुभवात माईवर पूर्ण विश्वास ठेवल्यानें त्यांच्या गाठीशी काही अलौकीक अनुभव आले .त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी दिलेला एक मौलीक सल्ला म्हणजे शक्यतो परिक्रमा एकटयानी करावी कारण आपण जेव्हा एकट्यानी परिक्रमा करतो तेव्हा आपण आपला पूर्ण विश्वास किंवा पूर्ण भार त्या आईवर ठेऊन आपली परिक्रमा करतो.
या पूर्ण पायी परिक्रमेमुळे मनाची ही खात्री मात्र नक्की झाली की ती आई इतकी प्रेमळ आहे की आपल्या सगळ्या लेकरांचे मनोगत ती जाणते वं ज्याला जे इच्छित आहे ते देऊनही मोकळी होते त्यामुळे आपण काय़ मागावे हे ज्याने त्याने ठरवून आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. पण एक मात्र नक्की आहे की माणूस एकदा का माईपाशी आला की तो या आईच्या प्रेमातच पडतो वं नंतर त्याचे मन परत परत तिच्याकडे धावं घेते.
परत मागच्या विषयाकडे वळतो , साधारण पधरा वीस मिनीटांनी दोन परिक्रमावासी त्या वरच्या उतरावर असावेत असा अंदाज आला कारण पुढचा उतार उतरून मी पुढे आल्याने मला आता मागचा ऊतार दिसत नव्हता. इथे उतरून तर माझे डोळे आता त्यांच्या वाटकडे लागले होते. बोलण्यानरून नंतर पक्के झाले की ते दोघे उदयन व बापूच आहेत. जोरात ओरडून त्यां दिशेने नर्मदे हर म्हटेल, त्यांचाही नर्मदे हर चा पुकारा आला व जीव भांड्यात पडला. "सावकाश या रे " असे त्यांना ओरडून सांगीतले. दहा मिनीटांनी ते खाली आले तेव्हा उदयनही खूप दमलेला दिसत होता. या सगळ्या ऊतार रस्ताचे टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. आता मात्र मी त्यांना पुढे ठेऊन त्यांच्या मागून उतरू लागलो. परत एक डोंगर संपला व असे वाटले की आता बहूतेक आता तरी हा चढ उतरणीचा खेळ संपत आला असावा . पण कसले काय एका तिरप्या टोकावरून पाहिले तर लांबवर दूसऱ्या डोंगराच्या उतारावर काही परिक्रमावासी उतरताना दिसत होते त्याही पुढे अजून तसाच डोंगराळ भाग बाकी होता.
मधे काही ठीकाणी मध्यप्रदेशातील परिक्रमावासी आराम करीत बसलेले दिसले. मला या एमपीमधील परिक्रामावासी यांचे या ठिकाणी कौतूक वाटते की हे सगळे तसे वयाने मोठे पण सहजपणे हे डोंगर चढत वं उतरत होते. शेतीच्या कामामुळे किंवा छोटया प्रमणात अशा मार्गाची कदाचीत नेहमीची सवय असल्याने ते सहजपणे हा प्रवास करत होते.आमच्या तीनी माउलीही बहूतेक भरपूर पुढे गेल्या होत्या.
पुढे दोन तीन ठीकाणी मातीचे तसेच खूप घसरणारे उतार आले. पण आता चप्पल काढून ती हातात घेऊन मी ते उतरत होतो .प्रत्येक वेळेला सॅन्डल काढून ते हातात धरणे हे काम पडे पण त्याला काही इलाज नव्हता. दगडाच्या निरनिराळ्या आकाराच्या उताराची आता डोळ्याना जणू काही सवयच झाली होती , पाऊलवाटांचे रस्ते म्हणजे आता आम्हाला एखादे मशीन ट्रॅक वरून कसे जावे तसे आमच्या पायाचे चालणे होत होते. पण तरीही उतारावर खूप जपून उतरावे लागत होते कारण जरा जरी तोल जाऊन घसरलो किंवा गडगडलो तर थेट खाली जाण्याची किवा शरिराला दुखापत होण्याची शक्यता दाट होती. पुढच्या डोंगरावर काळुरामचा मुलगा लांबवर थांबलेला दिसला आणी लक्षात आले की आपण आता भवाणा डोंगरावर पोहचणार आहोत व तिथून पूर्ण भवाणा डोंगर ऊतरून नाला पार करून मग आम्ही भवाणा गावाच्या रस्ताला लागणार होतो. खाली लांबवर दिसत असलेल्या परिक्रमावासींवरून एक अंदाज येत होता की आपल्याला अजून किती उतरायचे आहे. असे हळू हळू चालत, उतरत, चढत त्या भवणा डोंगराच्या माथ्यावर पोहचलो.
आता तो मुलगां वं त्याचा साथीदार इथून परत मागे जाणार होते .त्याला निरोप देऊन त्याचे आभार मानले व आता भवाणा उतरायला सुरवात केली. पाठीवरच्या सॅगमुळे पाठीला व खांदयांना चांगलीच रग लागली होती. उतरताना सॅगचे आझे हा एक मोठा अडसर वाटत होता.
उतरत आसताना मागे सहज वळून बघीतले व माईने आपल्याला ह्या इतक्या कठीण मार्गातून इथपर्यंत कोणतीही अडचण न आणता कसे आणले हे आठवून त्यां प्रेमळ सह्रदय मातेच्या आठवणीने डोळे भरून आले.
भवाणा उतरायला सुरवात केली व मधे मधे आधी पुढे गेलेले परिक्रमावासी आता एरवादया ठिकाणी विश्रांतीसाठी थांबल्याने भेटत गेले म्हणजेच आपण फक्त शेवटचे उतरणारे नाही हे आठवून जरा बरे वाटले . कारण उदयनच्या हळू हळू उतरण्याच्या स्पीडमुळे आम्हीच या मार्गावर सगळ्यात शेवटी होतो. बापूच्यां सॅगचे वजन खूप कमी असल्याने तो उदयनला सांभाळून, हात देउनं खाली उतरण्यास मदत करत असे. बरेच वेळा मनात यई वं मी उदयनला म्हटलेही की अजून खालून कुठून तरी मार्ग नसेल का रे या शुलपाणीतला? कारण या मार्गाने सगळ्यांना येणे हे खरच कठीण आहे. भगीनीना व साठ किंवा त्याच्या वरच्या वयाच्या माणसांसाठी या मार्गाने येणे तर खूपच कठीण आहे.
परत दोन तीन दगडातून उतरायच्या ठीकाणी मला उतरणे तसेच खूप कठीण गेले कारण पायं ठेउं तिथे घसरायला होत असे, हे सगळे मार्ग पावसाळ्यात जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले असावेत कारण त्यां दगडाच्या गुळगुळीतपणामुळे हे मार्ग माणसे जाऊन झाले असावेत असे अजिबात वाटत नव्हते.
एका मातीच्या उतारावर पायातील सँडल न काढता असेच मी पटकन उतरायला सुरवात केली व पाठीवरच्या सँगमुळे असा काही वेग शरीराला आला की क्षणभर वाटले की संपलेच सारे.पटकन डाव्या बाजूच्या एका दगडाला घट्ट धरून तसाच तिथे प्रथम उभा राहिलो व नंतर खाली बसलो.इतक्यात मागुन येणारा एमपीचा परिक्रमावासी ओरडलाच " नही उतरताना है आपको तो क्यु बीच मे बैठे हो, "त्याचे म्हणणे रास्त होते पण त्या वेळी जे सुचले ते करून मी मोकळे झालो होतो. परत बसूनच पायातल्या चपला हळुच काढल्या व नंतर ऊभे राहून हळू हळू त्यां उतारावरून खाली येत गेलो.
भवाणा उतरता उतरता साडेपाच पावणेसहा झाले होते. दिवस छोटा असल्याने लवकर अंधार पडायला आता सुरवात झाली होती. अजूनही आम्ही हा पूर्ण डोंगर उतरलोही नव्हतो. सगळा खाच खळगयाचा रस्ता , दिवसभरच्या या अशा प्रवासाने आता खर तर उतरण्याचा कंटाळा आला होता . पण आता भवाणा गावापर्यंत पोहचण्याशिवाय आता काही इलाज नव्हता. आता लांबवर एक भला मोठा ओढा दिसत होता लांबुन ते अंतर खूप नाही असे वाटत होते पण नंतर जाणवले की ते अंतरही बरेच होते.सगळे ऊतार हे अनियमीत व खूप खाचखळग्याचे असल्याने चालण्याला वेगही येत नव्हता.ओढयाकडे सरळ जाणारा जो मार्ग दिसत होता तिथे खूप खड्डे होते त्यावर खूप मोठे मोठे रानटी गवत उगवले होते त्यामुळे तेथे किती उतार किवा खड्डा असेल याचा काहीच अंदाज येत नव्हता त्यामुळे तिथून उतरणे शक्य नव्हते , थोडाफार प्रयत्न मी करून बघीतला होता पण ते खूप कठीण जात होते.गवतातून चालतांना ते गवत पायला टोचल्याने पायांना खूप खाज येऊ लागली होती ,तिथे बाभळी सारखे मोठे मोठे काटे असलेली खूप झाडे होती त्यामुळे त्या मार्गाने न जाता थोडया लांबच्या मार्गाने खाली उतरणे चालू केले.उदयनलाही हे काही जमणारे नव्हते व आता आमच्यात जास्त अंतर ठेऊन पण चालणारे नव्हते कारण थोडा अंधार पडायला सुरवात झाली होती. जेवढे डोंगर चढणे कठीण तेवढेच उतरणे पण किती कर्म कठीण आहे हे आता जाणवत होते.सरतेशेवटी त्यां मोठया ओढयापाशी आम्ही पोहचलो. पाणी फारसे नव्हते , पायं पाण्यात जातील एवढे तर काही ठीकाणी पायाचे तळवे बुडतील एवढेच पाणी त्या ओढयाला होते. त्यामुळे खालच्या दगड गोट्याचा अंदाज घेत झपझप पावले टाकत ओढा पार करून आम्ही भवाणा गावाकडे जाणाऱ्या लाल मातीच्या रस्ताला लागलो. आमच्या हळु चालण्यांमुळे अजुन मागे कुणी परिक्रमावासी असण्याची अजिबात शक्याता नव्हती. खापर माळ व भवाणा डोंगराचा थरार तर आज अनुभवला होता, आता पुढे भवाणा गावातील रात्र कशी होती ते पाहू पुढल्या भागात. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव २९-
दहा पंधरा मिनीटे लाल मातीच्या रस्तावंरून चालल्यावर आम्ही सगळे ज्या ठिकाणी परिक्रमावासी विश्रांती घेत थांबले होते तिथे पोहचलो. एक छोट्या घराच्या दोन खोल्या इथे परिक्रमावासीयांच्या निवसासाठी उपलब्ध होत्या.इथे अजून कुणालाही आश्रम किंवा मठ झालेला नाही. इतर ठीकाणांप्रमाणे इथेही खूप गरीबी असल्याने कुठल्याही परिक्रमावासीची सोय इथे कुणाच्या घरी होत नाही.
आम्ही भवाणा गावात पोहचणारे सगळ्यात शेवटचे परिक्रमावासी असल्याने बऱ्याच परिक्रमावासायांनी पहिल्या खोलीत आपली आसने लावली असल्याने तेथे अजिबात जागा शिल्लक नव्हती. त्याच्या बाजूच्या खोलीतही परिक्रमावासीयांची तशीच आसने लागल्याने आम्हा तिघांना तिथहीे जागा नव्हती. त्यामुळे थोडे पुढे काही अजून आहे का ?हे बघण्यास आम्ही अजून थोडे पुढे गेलो व अगदी थोड्याच अंतरावर एका पेंढयाच्या छपराखाली आमच्या तिन्ही माउली बसलेल्या आम्हाला दिसल्या. आम्हाला बघूनच त्या आनंदाने ओरडल्या "या उदयनजी, सुनिलजी , बापूसाहेब, आम्ही केव्हापासून वाट बघतोय आपली ". आम्हालाही त्यांना बघून खूप आनंद झाला.
इतका वेळ सँग घेऊन चालत असल्याने खर तर पाठीला चांगलीच रग लागली होती त्यामुळे प्रथम पाठीवरच्या सँग काढल्या व खाली असलेल्या पेंढयाच्या गादीवर आम्ही सगळे चपला काढून पाच मिनीटे नुसते निवांत बसलो. कारण माईने आमची नैय्या इथपर्यंत पार केल्याचा एक आनंद व इतका कठीण मार्ग आपण कसा पार केला याचे आश्चर्य ह्या दोन्ही गोष्टीची दाटी त्यावेळी मनात झाली होती. ही सगळी तिचीच लिला किंवा कृपा म्हणूया आपण .पण इथे रामकृष्ण परमहंसांचे एक वाक्य आठवले ते आईला (काली मातेला) म्हणायचे "तु यंत्री मी यंत्र "
आता बऱ्यापैकी अंधार झाला होता त्यामुळे असेच नूसते बसून चालणारे नव्हते. जरी ऊशीर झाला असला तरी सायंस्नान माईची पुजा ,आरती करावयाची बाकी होती. पाखरे माउलींनी थोड्या अंतरावर असलेल्या ओढ्यावरून थोडे पाणी आणले होते , आम्हालाही पिण्याच्या पाण्याची गरज होती कारण सगळ्यांचे कमंडलू आता खाली झाले होते. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या मार्गाकडे आम्ही लगेच रस्ता ओलांडून चालू लागलो . आम्ही त्या दिशेने जाण्यास सुरवात केली खरी पण अंधुक प्रकाश मुळे काही अंदाज येत नव्हता, सगळा रान झुडपाचा उंचसखल रस्ता, जरी बॅटरी बरोबर होती तरी ज्या मार्गाने जात होतो तोच मार्ग लक्षात ठेऊन परत येणे हे ही तेव्हा आम्हाला आव्हानात्मक वाटत होते. जवळ जवळ पंधरा ते वीस मीनीटे आम्ही त्या झाडाझुडपातून, उंचसखल अशा मार्गातून अंदाज घेत चालत होतो. पण पाण्याचा कुठेही मागामुस किवा काही आवाजही येत नव्हता . अंधार अजून वाढू लागला होता , जवळ कुठे मनुष्य वस्ती किंवा माणसांचाही काही कानोसा लागत नसल्याने आम्ही अजून पुढे जाण्यापेक्षा मागे फिरण्याचा निर्णय घेतला. हया मार्गवरून येत असताना आम्हाला एक, दोन घरे दिसली होती आता त्यांच्याकडे पाणी मागण्याशिवाय दूसरा काही पर्याय नव्हता. परत या मार्गावरून येत असताना त्यां सगळया झाडीमुळे एकदा आम्ही रस्ता चुकलोच पण परत मार्ग सापडून त्या घरासमोर जाऊन उभे राहीलो. त्या माईकडे पिण्यासाठी थोडे पाणी मागीतले. त्या घरातून एक कमंडलू व दूसऱ्या घरातून एक कमंडलू असे पाणी घेऊन आम्ही परत आमच्या विश्रामस्थळी आलो. तोपर्यंत पाखरे माऊलींनी किराणा मालाच्या दुकानातून खिचडीचे सगळे सामान व त्याच्याकडूनचं खिचडीसाठी पातेले व दुसऱ्या पातेल्यात पाणी आणून ठेवले होते. आजही पाणी नसल्याने सायं स्नानाला सुट्टी दिली व थोडयाशा पाण्यातच हात, पाय व तोंड धुतले. तोपर्यंत चव्हाण माऊलींनी पुजेची सगळी मांडामांड केली होती मग आमच्या सगळ्याच्या माईच्या कुपी त्यांच्याकडे सुपुर्द केल्या . आज चव्हाण माऊलींनी माईची पुजा केली व आम्ही सगळ्यांनी माईची आरती व नर्मदाष्टक म्हंटले.
आजचे रात्रीचे जेवण थंड वातावरणात व चंद्राच्या शांत प्रकाशात अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद परिक्रमा देत होती. हे लिहीत असतानाही ती संध्याकाळ वं रात्र अजुनही तशीच डोळ्यासमोर तरळत आहे. पुर्वी वाचलेली वर्णने किवा कविता , चित्रपटात बघितलेले सीन हे त्या लेखकाचे , कवीची कल्पना असे समजून दुर्लक्ष करणारा मी ती वर्णने आज स्वतः अनुभवत होतो.
लगेच पाखरे माऊलींंनी खिचडीसाठी थोडी लाकडे जमा करून छोटीशी चूल पेटवली.आम्हीही आमची आसने व्यवस्थीत लाऊंन सगळे त्यांच्या मदतीला गेलो.
आज तांदुळ धुण्यापासून सगळेच काम ह्या चंद्राच्या प्रकाशात करायचे होते . मुगाची डाळ न मिळाल्याने माउलींनी पूर्ण मुग आणले होते , ती पिशवी उघडून पाण्यात टाकली तर त्यात केवढे तरी पोरकीड़े फिरत असलेले दिसले. त्यामुळे जे मुग एकदा धुऊन चालले असते ते च्यार ,पाच वेळा धुण्याची वेळ आली. जेव्हा आमच्या दृष्टीने ते मुग स्वच्छ झाले तेव्हा माऊलींनी पातेल्यात तांदूळ, मुग थोडे तिखट मीठ वं पाणी असे घालून ते शिजावयास ठेवले. तेव्हा पवार माउली मजेने म्हणालीच " माउली आज खिचडी चांगली शिजू देत हो, कालच्या सारखे नको ". सगळे जण पवारांच्या
मिष्कीलपणा वर हसले. आज पूर्ण मुग व तांदूळ असल्याने खिचडी शिजावयास भरपूर वेळ लागणार होता. खर तर केव्हा जमनीवर आडवे होऊन निद्रेच्या अधीन होऊ असे झाले होते.आमच्या नॅचरल टेन्ट मधे येऊन जमीनीवरील पेंढयाचे गवत जरा सारखे केले, त्या जमीनीला बऱ्यापैकी उतार होता पण आता दूसरा काहीं इलाज नव्हता, पेंढया खालील दगड गोटे झोपल्यावर उंगाला रेंगसू नयेत म्हणून बाजूला काढून ठेवले. मला असे वाटते की नेहमी या जागी गुरांना विश्रांतीला बांधुन ठेवत असावेत😃 आज आमची विश्रांती घेण्याची वेळ तिथे होती. खालची सगळी जागा व गवत स्वच्छ होते. दिवसभर चालून व चढउतार कल्याने आम्ही सगळे इतके दमलो होतो की पडल्या पडल्याच डोळे मीटतील याची पूर्ण खात्री होती. त्यामुळे आज सगळेजण आता बिरबलाच्या गोष्टीतील खिचडीप्रमाणे या खिचडीच्या शिजण्याची वाट पाहू लागलो.
थोडया वेळाने पवार माऊलींनी मगाशी मंजेत खिचडीच्या शिजण्याबद्दल बोलल्याने पाखरे माऊलींनी मला 'खिचडी झालीे का बघा हो आपण 'असे सांगीतले. खर तर दमल्यामुळे आता तेवढा उठायचाही कंटाळा आला होता पण आता माऊलींना नाही म्हणणे शक्य नसल्याने मी ऊठून चमच्यात थोडी खिचडी घेऊन हातानी मुगाचा दाणा दाबून बघीतला पण अजूनही थोडी व्हायला हवी होती त्यामुळे खालची लाकडे थोडी सारखी केली व परत पातेल्यात थोडे पाणी घातले . आता पातेल्यावर ताटलीत थोडे पाणी घेवून ते त्यावर आधण म्हणून झाकण ठेवले ,की वाफेने ती लवकर शिजावी. दहा मिनीटांत खिचडी तयार झाली, गोलाकार पंगत केली , सदगुरूना ह्या साध्या बेताचा नैवद्य अर्पण केला व प्रसादरूपी ती खिचडी आम्ही सगळ्यानी फस्त केली. दोन दिवसापासून भात किवा खिचडी हाच मेनू झाल्याने माझी मजा व उदयनचा नाईलाज झाला होता,बापूला पोळी, टिक्कड किंवा भात काहीही चालत असल्याने त्याचा काहीच प्रश्न नव्हता. अन्न हे पूर्णब्रम्ह याचा खरा खरा अर्थ या परिक्रमेत अनुभवत होतो, कुठलेही जीभेचे चोजले न पुरवता सगळे गोड लागत असे.
सगळयांची जेवणे झाली, प्रत्येकानी आपपली थाली धुवून टाकली व पाच मिनीटात सगळे आपपल्या स्लीपींग बॅगच्या कुशीत शिरले, या बेताच्या थंडीत ह्या स्लीपींग बॅग खूप ऊपयोगी पडल्या पण पुढे पुढे परिक्ररमेत जसा थंडीचा कडाका वाढत गेला तशा तशा हया स्लीपींग बॅगही कुचकामी ठरल्या कारण पुढे पुढे परिक्रमेत गारठा इतका वाढत गेला की खालून थंडगार झालेली जमीन त्यामुळे खाली काहीतरी अंथरल्याशिवाय व वरून काहीतरी ऊबदार घेतल्या शिवाय थंडी निघत नसे.
पेंढयाच्या मऊशार गादीचा फील अनुभवत आम्ही आडवे झालो व मनात सहज विच्यार आला की कसे आहे ना आपल्या मनाचे व शरीराचे खेळ, त्याला घरी मऊमऊ गादी, डोक्याखाली ऊशीच लागते पण आज इथे जमीनीवरील पेंढयालाही गोड मानून ते झोपण्यास तयार आहे.परिक्रमेत अशा सात आठ रात्री बाहेर उघडयावर झोपायची वेळ आली पण कधीही तेव्हा मनाला कसली भिती शिवली नाही , प्रत्येक रात्र ही एक वेगळा आनंद किवा अनुभव देऊन गेली.
दूरवर काळसर निळ्या आकाशात पसरलेल्या चमचमणाऱ्या चांदण्या व चंद्र यांच्या साक्षीने आज निद्रा देवीच्या कुशीत शिरताना सहजच लहानपणी रेडीओवर ऐकलेल्या रात्रीच्या 'आपली आवड ' व 'बेला के फुल ' या कार्यक्रमातील चंद्र व चांदण्यावरील गाण्यांची एक सुरेख गुंफण मनात बांधली गेली.
तोच चंद्रमापासून ते चंद्रिका ही जणूपर्यंत तर चाँद फिर निकला पासून ते वो चाँद खिला वो तारे हँसे पर्यंत. त्या कवी मनाचे , संगीतकार व गायक ज्यानी ती गाणी गाऊन अजरामर केली त्यांचे मनोमन कौतुक वाटले. ते प्रत्यक्ष अनुभवण्याची मजा व या आनंदाचा साक्षीदार होण्याची गंमत आता ह्या परिक्रमेमुळे मला मिळाली होतो.
असा हा सगळ्यांतला आनंद घ्यायला मला ज्याने शिकवले तो आहे माझा मित्र उदयन.
लहानपणानंतर मोठेपणी गुरूघरी खेचून नेणारा व सगुणावरील प्रेमात काय सुख, काय आनंद दडलेला आहे हे आजही ज्याच्यामुळे मला शिकण्यास मिळत आहे असा माझा मित्र, कारण त्याच्या पुढाकारानेच आमच्या गावच्या रामरायांना डोंबिवलीत आणता आले व नंतर आईंच्या वाङमय व बोधामुळे मी आजही ते सगुणातील प्रेम काय आहे हे समजण्याचा, जाणण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात या सगळ्यात घरच्यांची, आई ,वडिल , मुलगा वं विशेतःहा माझ्या पत्नीची साथ मिळाली की ज्यामुळे मी हा अभ्यास आजही करत आहे. शेवटी म्हणजे मला परिक्रमेत मिळालेले एक अलौकीक सुख , तिथल्या लोकांचेे मैय्यावरचे व परिक्रमावासीयांवर असलेले निस्पुह प्रेमही हे ही अनुभवास मिळालेे ते त्याने माहीती करून दिलेल्या व स्वतः केलेल्या परिक्रमेमुळे. आज मी हा आनंद आपल्यापुढे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे तेही त्याच्या बरोबर केलेल्या या परिक्रमेमुळेच. काही वैचारीक मतभेद आमच्यात नक्कीच असतात व त्यावर आम्ही भांडतोही पण ते असावेत या मताचा मी आहे कारण प्रत्येक माणूस जर देवाने वेगळा केला आहे तर प्रत्येकाची विचार करण्याची पध्दती ही पण वेगळी असणार, त्यामुळे दुसऱ्याकडे असलेले चांगले घेऊन त्यातून आपल्याला आनंद कसा मिळवता यईल हे प्रत्येकाने प्रत्येकाचे ठरवावे .परत थोडे विषयांतर झाले पण काय करू, हा सगळा आनंद मला ज्याच्यांमुळे मिळाला त्याचे कौतुक किंवा उतराई हा विषय निघाला की होणे व ते सहजच लिखाणातून व्यक्त होणे मला वाटते की स्वाभाविकच आहे.
त्या सुरेख गाण्यांच्या आठवणीत कधी डोळे मिटले ते माझे मलाच कळले नाही.
सकाळी एकदम सहा सव्वासहाला जाग आली .आज इथे पाण्याची जवळपास कुठे सोय नसल्याने कालच्या सारखे परत पुढे कुठेतरी माईच्या किनारी किंवा ऐखादया ओहळावर स्नान, पुजा करून पुढे जायचे असे ठरल्याने तिथे लवकर पॅकअप करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. त्या दिवशी एकादशी होती, परिक्रमेतील ही पहिली एकादशी, डोंबिवलीत हा ऊपवास मी करीत नाही पण परिक्रमेत करावी म्हणून आजचा हा उपवास होता. तिन्ही माऊली व आम्ही तिघे असे त्या लाल रस्त्याने चालावयास सुरवात केली. आजच्या मुक्कामाची जागा ठरली होती धडगाव.आज तिथे आम्हाला भेटणार होते आमच्या डोंबीवलीचे करंदीकर काका. उदयनमुळे माझी त्यांंच्याशी ओळखं झालेले एक थोर तपस्वी,खूप मोठे कार्य करत असुनही त्याचा कुठेही बडेजावपणा किंवा गाजावाजा न दाखविणारी ही साधी , मनमिळाऊ व्यक्ति म्हणजे शबरी सेवा समीतीचे सचीव श्री प्रमोद करंदीकर. अशा ह्या थोर व्यक्ति बाघितल्या की त्या परमेश्वराचे खरच कौतुक वाटते. खर तर प्रत्येक माणसाकडे देवाने काही ना काहीतरी विशेष गुण दिलेले असतात , काहीं कडे थोडे जास्त तर काहीं कडे कमी. पण ते गुण ओळखून त्या माणसाने ते विकसीत करणे व समोरच्याने ते आत्मसात करणे हीच खरी कसोटी आहे. परिक्रमेला निघायापूर्वी त्यांनी आम्हाला आपण परिक्रेमत असताना धडगांवला साधारणपणे कधी पोहचाल ?म्हणजे मी माझ्या कामानिमित्त तिथे आपणास अवश्य भेटीन. आपली भेटही हाईल व तिथ्यल्या काही माझ्या ओळखीच्या लोकांना परिक्रमेबाबतची माहिती आपण सांगावीत अशी प्रेमाची गळ आम्हाला घातल्याने आज धडगावला मुक्कामाला पोहचावयाचे होते. त्यांच्या कार्याची माहीती मी आपल्याला पुढच्या भगात नक्की सांगीन.
पाऊणतास ते एक तास त्या रस्ताने चालल्या नंतर आम्ही आशा जागी पोहचलो की जिथुन पुढे जाण्यास रस्ताच नव्हता , माईचे बॅकवॉटरचे पाणी मधल्या खोलगट भागात शिरल्याने दुसऱ्या बाजूला जायला रस्ता बंद झाला होता त्यामुळे छोटया नावेत बसून पलिकडे जाणे हा एकमेव उपायच असल्याने आम्ही तिथे नावेची वाट बघू लागलो. आमच्या आधी तिथलीे काही तरूण मुले की ज्यानाही पलिकडे जायचे होते ती तिथे ऊभीे होतीच .दहां मीनटात नावाडी नाव घेऊन आला त्यात ती मुले व आम्ही तिघे असे बसून पुढे गेलो व मागाहून आमच्या तीनही माऊलीेही आल्या.आता पुढचा प्रवास परत माईच्या किनाऱ्यानी छोटया पाऊवाटेने सूरू झाला , खूप चढउताराची छोटी पाऊलवाट ,काही ठीकाणी चिखलाची छोटी पाऊलवाट सुरू झाल्याने परत कालच्या प्रवासाची आठवण झाली. आता फक्त एक बाजूला डोंगराळ मातीची भिंत किंवा काही वेळा तीही नसे , नुसती झाडे झुडपे व दूसऱ्या बाजूला खोल उतार किंवा दरीच्या ऐवजी पाणी होते, पंचमहाभुतातील दूसरे तत्व .काल पृथ्वी तत्वाचा अनुभव की जे आपल्या स्थुल शरीरशी जुळणारे आज जलतत्वचा अनुभव, त्याचाही पसारा आपल्या शरीरात तर आहेच पण ज्यापासून आपल्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली ते हे तत्व. . सृष्टीत ही पाचही तत्वे एकमेकात इतकी मिसळलेली आहेत की एकापासून दूसरे वेगळे काढणे कठीण तसेच आपल्या शरीरातही हयाच पाच तत्वांची सरमिसळ बघीतली खरच त्या नियंत्याचे कौतुक वाटते. असो
पाणी किती खोल होते याचा काहीच अंदाज नसल्याने कालच्या सारखे खूप जपून चालावे लागत होते. पाठीवरच्या सॅगचाही अंदाज घेत उतरावे लागत होते. जरा जरी तोल गेला तर पाण्यात पडण्याची भिती होती. उदयनला परत कालच्या सारखेच टेंशन आलेले दिसत होते. थोडा वेळ हा चढउताराचा खेळ झाल्यावर एका ठिकाणी थोडा सपाट दगडाचा भाग आला जिथे आम्हाला स्नान करून माईची पूजा करण्यास जागा होती त्यामुळे तिथे थांबून आम्ही स्नान व माईची पुजाअर्चा केली तेवढयात तिनही माऊलीही आल्या त्यांचेही सगळे झाल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला प्रस्थान केले. थोडयावेळाने हा डोंगराळ रस्ता संपला वं आमचा प्रवास डांबरी रस्ताने बिलगावच्या दिशेने सुरू झाला. हा पुढचा प्रवास पुढच्या भागात तोपर्यंत हर हर नर्मदे🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३०
डांबरी रस्त्याचा प्रवास चालावयास सोपा पण कंटाळवाणा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठेही झाडे नसलेला हा रूक्ष प्रवास. जसा जसा उन्हाचा फटकारा वाढू लागला तसा तसा हा प्रवास अजुनच कटाळवाणा होत गेला. तेव्हा संत रामदास स्वामींच्या एका अंभंगांची आठवण झाली ते म्हणतात
चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचेे ॥
तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे ॥
पुढच्या कडव्यात ते म्हणातात
आम्हा काय त्याचे चंद्र सुर्य प्रकाशता
हाई काया शुध्द स्वच्छ हरिनाम घेता
काय सुंदर अवस्था असते ना ह्या संतांची, नामाशिवाय दूसरे काही गोड वाटत नाही किंवा नामापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी नगण्य.
माझी गोष्ट बघा
मी परिक्रेमेत होतो ,नाम ही घ्यायला कशाची आडकाढी नव्हती , ते घेणे चालूही होते पण मनाची अशी अवस्था कुठे होती की असून देना उन्हाचा फटकारा, ते गोड मंगलमय नाम तर आहे ना माझ्या बरोबर ,मग त्या उन्हाचा फटकारा असला काय किंवा नसला काय.
पण अजून मनाची स्थिती तशी नाही, नामावर जिवापाड तळमळीचे प्रेम जडले नाही त्यामुळे अजून नामाची वाटावी तशीत्याची गोडी वाटत नाही ,अजूनही असा प्रवास नाम बरोबर असूनही कंटाळवाणा वाटतो. असो
लांबवर एखादया सुस्त अजगरासारखा पसरलेला डांबरी रस्ता कधी सरळ तर कधी नागमोडी वळणाचा होता. बिलगावच्या दोन निवासी आदीवासी शाळेत आम्ही पंधरा वीस मिनीट विश्रांतीसाठी थांबुन पुढच्या मार्गाला लागलो. आदीवासी शाळेतील सर्व शिक्षकांची परिक्रमावासीयांबद्दलची आत्मीयता व प्रेम या दोन्ही ठिकाणी खूप जाणवली पाहिल्या शाळेतच आम्हाला भोजनासाठी आग्रह झाला पण एकादशीचा उपवास आहे असे सांगीतल्यावर "चहा घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही " असे सांगुन आम्हाला चहा देऊनच त्यांनी पुढे जाऊ दिले.
त्यांचे ते प्रेमाचे सहजसुलभ बोलणे मनाला खूप भाऊन गेले कारण खरं तर आम्ही परिक्रमावासी, आमच्याकडून मिळण्यासारखे काही नाही तरीही इतक्या आपुलकीचे, प्रेमाचे बोलणे म्हणजे एक खरच खूप मोठे वरदान माईने या सर्वाना दिले आहे.
सकाळी साडेदहा अकरा पासून चालणारे आम्ही त्या दिवशी पाच वाजता धडगावला पोहचलो. मधे रस्त्यात शबरी सेवा समीतीचे दोन कार्यकर्ते गाडीवरून बिलगावकडे जाताना भेटले. करंदीकर काकांनी त्यांना आमच्याबद्दल काही खुणा सांगितलल्या होत्या का काय कोण जाणे पण त्यांनी आम्हाला बघून गाडी थांबवली व विचारले " आपण डोंबिवलींचे का ? काका आपली वाट पहात आहेत ,आम्हीही आमचे काम करून संध्याकाळी आपणास भेटतो "असे सांगुन ते पुढे गेले. आज ऊपवासामुळे काही खायचे नसल्याने एका ठिकाणी उदयनने नुसते पाणी पिण्यापेक्षा साखर व मीठ घातलेले पाणी आपण आज पीऊ म्हणजे आपल्याला टॉनीक सारखे होउन दिवसभर चालण्यास ताकद व उत्साह राहील त्या मुळे तसे पाणी कमंडलूत तयार करून घेतले. मी ते पाणी जास्त प्यायले नाही कारण नुस्त्या पाण्याने होणारे समाधन त्यांनी होत नाही असे मला जाणवले .उदयनने मात्र ते पाणी खूप वेळा प्यायले .काही माहीत नाही पण त्यांनतर लगेच उदयनला झालेला खोकला हा बरूच पर्यंत काहीकेल्या गेला नाही खोकल्याची एकदा का ऊबल आली की खूप वेळा त्याचा खोकला थांबत नसे.
डांबरी रस्ता चालवयास सोपा व आज काकाही भेटणार होते त्यामुळे चालण्याला एक वेगळाच वेग त्या दिवशी आला, नामस्मरणही बाकी काहीं बोलायचे नसल्याने छान चालू होते.सगळयात पुढे मी, दहा बारा पावले सोडून उदयन व त्यानंतर दहा बारा पावले सोडून बापू असा चालण्याचा क्रम परिक्रमेत बऱ्याच ठीकाणी असल्याने खूप कमी वेळेला बोलणे होई. कधी आधे मधे बोलणे झालेच बालणे तर एखादया ठीकाणावरून किंवा आईंच्या आठवणीवरून किंवा एखादया भजनाच्या अर्थावरून होत असे.
पाच वाजता धडगावला आम्ही त्यांच्या शिवणचे क्लास जिथे चालतात त्या घरात पोहचलो. थंडगार पाण्याने हातपाय धुवुन आम्ही एकदम प्रेश झालो.
आज आमची राहावयाची व्यवस्था त्या घरातच केली होती. तिथे तिथल्या भगीनींना शिवणकामाचे धडे मशिनवर दिले जातात त्यातून त्या शिकून थोडे बाहेरचे शिवणाचे काम मिळवून त्यातून रोजगार व आपल्या घरच्यासाठीही शिवणकाम करीत असत. काकांनी आमची ओळख त्या सगळ्यां भगीनींना करून दिली. थोडावेळ सगळ्यांशी परिक्रमेविषयी गप्पा, अनुभव यात गेला. त्यांच्याशी गप्पा मारता मारता एक मस्त गरम गरम चहा झाला.
थोडावेळ बोलून झाल्यावर त्या सर्व भगीनी गेल्या. आमचा ऊपवास म्हणून केळी, चिक्कू, सफरचंद, द्राक्ष याचा फलाहार आम्हाला तिथे देण्यात आला. आम्ही बरेच दिवसात गरम पाण्याने आंघोळ केली नसेल म्हणून आम्हां तिघांना आंघोळीसाठी गरम पाणी दिले गेले , आम्हीही आज बाथरूममधे आंघोळ असल्याने बरेच दिवसाचा धोबीघाट काढून साबणाने स्वच्छ कपडे धुतले. कारण पुढे परत कधी असा योग यईल अशी आता तरी शक्यता वाटत नव्हती.
थोडयावेळाने तिथले काही शाळेतील शिक्षक आम्हाला भेटावयास आले त्यांनाही परिक्रमेबद्दल ऊच्छुकता होती व ही परिक्रमेची माहीती गोळा करून पुढे योग येईल तेव्हा त्यांचीही परिक्रमेला जाण्याची ईच्छा होती.
माझा परिक्रमेतील अनुभव तो काय दहा बारा दिवसांचा त्यामुळे मी असे किती ते सांगणार त्यामुळे ती जबाबदारी आम्ही आमच्या बरोबर तिसरी परिक्रमा करत असलेल्या उदयनवर सोपावली व थोडा वेळ त्यांचे प्रश्न उत्तर ऐकत बसलो. पण अर्धा तासानी मात्र मी तिथुन उठलो कारण रात्रीच्या फराळाला साबुदाणा खिचडी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. उपवासाचे आम्ही तिघेच होतो , काकांचा व शबरी समीतीच्या बाकीच्या लोकांचा स्वयंपाक त्यांचा एक कार्यकर्ता करणार होता.
माझी मोठी अडचण अशी होती की साबुदाणा भिजवलेला नव्हता त्यामुळे आता इतक्या कमी वेळात तो भिजवून त्यांची छान खिचडी करणे म्हणजे माझी एक परिक्षाच होती . पण हे करणे तर क्रमप्राप्त होते कारण सकाळपासून पोटात फक्त चहा व आत्ताची खाललेली काही फळे एवढेच होते व त्या मनाने आज चालणहीे बरेच झाले होते.
तेव्हा मागे आईच्या व मिसेसच्या बोलण्यातून ऐकलेली गोष्ट सहज आठवली की साबुदाणा भिजायला जर कमी वेळ असेल व साबुदाणा खिचडी लगेच करायची असेल तर तो गरम पाण्यात भिजवावा. आता हा प्रयोग करण्याशिवाय मला काही गत्यंतर नव्हते त्यामुळे स्वयंपाक घरात गेलो व पातेल्यात पाणी घेऊन गॅसवर आधण येण्यासाठी ठेवले.बाजुच्या शेगडीवर तो मुलगा बाकीच्यांचा स्वयपाक करत होतो.
पाणी चांगले गरम झाले तेव्हा ते एक पसरट पातेल्यात ओतले व मनातल्या मनात ॐ नमः शिवायचा उच्चार करीत साबुदाणा त्या गरम पाण्याच्या पातेल्यात ओतला व काही मिनीटे तसाच ठेऊन दिला. नंतर एका मोठया चमच्यानी चागंला हालवून त्यातील पाणी हळूहळू काढून टाकले. सगळे पाणी निपटून काढले व साबुदाणा तसाच त्यां पसरट पातेल्यात ठेवला. परत एक ब्रेक म्हणून परिक्रमेचे अनुभव ऐकावयास गेलो. ते विचारत असलेल्या प्रश्नाना मी माझ्या मनातच उत्तर देत तिथे थोडावेळ थांबलो पण परत भिजलेला साबुदाणा डोळ्यासमोर येऊ लागाला😊 त्यामुळे ऊठून परत आत स्वयंपाकघरात गेलो .आता हात स्वच्छ धुवुन हाताने साबुदाणा परत हालवून पाणी राहीले नसल्याची पूर्ण खात्री करून घेतली. कारण जरा जरी पाणी त्या साबुदाण्यात राहीले असते तर खिचडी एखादया गम सारखी चिकट झाली असती . उदयने बापूने माझ्यावरील प्रेमाखातर तोंडाने त्या खिचडीचे नक्की कौतुक केले असते पण मनातल्या मनात मात्र नक्कीच शिव्या घातल्या असत्या.😄
आता खिचडीसाठी लागणाऱ्या दाण्याच्या कुटाचा प्रश्न आला कारण खल, बत्ता किंवा मिक्सर यापैकी तिथे काहीच नव्हते . दाणे तर त्यांनी खिचडीसाठी आणून ठेवले होते ,त्यामुळे एका खोलगट भांडयात थोडे दाणे घेउन ते पेल्याने दाबून कुटल्या सारखे करून भरडसर कुट करण्याचा एक प्रयत्न करून बघितला. फारसा यशस्वी झाला नाही तरी पण त्यात थोडेफार यश आले😄
आता फक्त खिचडीत घालायला बटाटयाच्या पातळ काचऱ्या करायच्या बाकी होत्या. साबुदाणा पण आता बऱ्यापैकी फुलून हसत असल्याचा भास मला होत होता.😜
सुरीवर बटाट्याचे पांतळ काप करण्याचा आणखी एक प्रयत्न केला पुढे ते व्यवस्थित शिजल्यावर प्रयत्न यशस्वी झाल्याचे लक्षात आले 😄मीरचीचे थोडे तुकडे केले व मनात 'ॐ नमः शिवाय 'चा परत ऊच्यार करत ते तूप जीऱ्याच्या फोडणीवर हे सर्व पदार्थ म्हणजे पूर्ण दाणे , भरड दाण्याचे कुट, बटाटा , मीरची व मीठ घातले. आईंनी नामाचे महत्व इतके सांगीतले आहे की मनापासून नाम घेत तुम्ही कुठलीही गोष्ट करा ती व्यवस्थित झालीच पाहीजे कारण नामामुळे ती सर्व जबाबदारी आपल्यावर न राहता त्या भगवंतावर जाते. थोडे बटाटा शिजेपर्यंत ते सर्वं परतून घेतले व नंतर साबुदाणा घालून परत चमच्यानी परतून गॅस च्या मंद आचेवर पातेल ठेवले .थोडया वेळात एकादाची खिचडी तयार होऊ लागली व मी मनातून आईंचे मनोमन आभार मानले कारण त्यांनीच आज माझी लाज राखली होती.
त्यांचा थोडा स्वयंपाक करायचा बाकी होता त्यामुळे त्याला काही माझी मदत हवी आहे का ? असे विचारले . त्यावर तो नको म्हणाला कारण त्यांच्या डोक्यांत परिक्रमावासीयांकडून काम करून घेणे म्हणजे एक पाप हा विचार असल्याने मी जास्त आग्रह न धरता परत बाहेरच्या खोलीत आलो. तापर्यंत त्या शिक्षकांचीही निघण्याची वेळ झाली होती.
आम्हाला सगळ्यांना नमस्कार करून ते सगळे शिक्षक निघून गेले. त्या नंतर करंदीकर काका ,शबरी सेवा समीतीचे कार्यर्कते व आम्ही अशी एक गप्पाची बैठक जमली. काकांकडे त्यांच्या कार्याच्याअनुभवाचे खूप मोठे भांडवल होते त्यामुळे ते त्यांच्या पोथडीतून एक एक काढून आम्हास सांगत होते. त्याचे ते चालू असलेले कार्य व या आदिवासी पाडयात चाललेले हे महान कार्य ऐकून आम्ही तिघेही अंचंबित होत होतो. तास दिड तास कसा गेला ते कुणालाच कळले नाही इतक्यात तो मुलगा जेवण तयार झाल्याची वर्दी घेऊन आला .
आज आमचीही गप्पाच्या नादात माईची पुजा व आरती करण्याचे राहून गेले होते त्यामुळे काकांना सांगून पुजा, आरती व नर्मदाष्टक म्हणून आम्ही फराळाला दुसऱ्या खोलीत गेलो.
एका बाजूला आम्ही उपवासवाले व एका बाजूला ते सर्व अशी गोलाकार पंगत बसली. अजूनही मला खिचडीचे टेन्शन होतेच कारण घरी चुर्तथ्रीच्या उपवासाला खिचडी करण्याची व खाण्याची वेळ खूप कमी येते (डब्यात गारगुट्ट खिचडी घशाखाली उतरत नसल्याने नेहमी तिखट मीठाचे वरी तांदूळच खाणे होते) त्यामुळे आज खरी परिक्षा होती कारण खाणारे जरी आपलेच होते तरी त्यांच्या चेहऱ्यावर खाताना येणारे आनंदाचे , समाधानाचे क्षण टिपणे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते. दोघांनी मनापासून दाद देत खिचडी खाल्ली व छान झाल्याची मला पावती ही दिली तेव्हा कुठे जीव भांडयात पडला.
फराळानंतर परत थोडा वेळ परिक्रमेच्या गप्पा झाल्या, काकांनी आमच्या कडून ऊदयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली कारण त्यांनाही उद्या त्यांच्या कामासाठी तिथून निघायचे होते त्यामुळे आपल्या स्थानीक कार्यकत्यांना 'यांना पुढच्या मार्गात काही अडचण आल्यास मदत करा ' असे आर्वजून सांगुन 'आम्हालाही आपण दिवसभर चालून दमला असाल आता विश्रांती घ्या ' असे प्रेमाने व हक्कानी सांगीतले.
आम्ही आसनावर आडवे झालो वं माझ्या मनात पडल्या पडल्या काकांच्या या कार्य बद्दलचे विचारचक्र सुरू झाले . खरच त्या परमेश्वराने कसे एक एक सत्पुरूष निर्माण केलेत व त्यांच्याकडून वेगवेगळी कार्य तो करून घेत आहे त्या भगवंताच्या या लिलेचेही वर्णन करावे तितके कमी ! कारण कुणाकडून काय कार्य करायचे है त्यांनी आधीच ठरवलेले असते त्यामुळे त्यांच्या कार्याला वं त्यांना मनोमन नतमस्तक होऊन मी निद्रा देवीच्या कुशीत अधीन झालो.
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३१-
दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥
तेथे कर माझे जुळती ॥
ही ओळ आज मुद्दामूनच लिहीली कारण धडगाव मोलगी व आजुबाजुचा इतर दुर्गम आदीवासी परिसर ,या परिक्रमा मार्गात कार्य करणारे एक थोर व्यक्तिमत्व आज परिक्रमेत भेटले होते की ज्यांचे कार्य सांगीतल्या शिवाय मी पुढे जाउच शकत नाही.
नंदूरबार जिल्हयातील आदिवासी भागात ,तसेच कर्जत जवळ कशेळ्याला, जव्हारला ज्यांचे हे कार्य अथक प्रयत्नाने आजही चालू आहे त्यांचे हे कार्य मी माझ्या शब्दात मांडायचा एक वेडा प्रयत्न आज करणार आहे. वेडा प्रयत्न अशासाठी म्हंटले की ते कार्यच इतके मोठे आहे की माझे शब्द तोकडे पडतील पण ते कार्य संपणार नाही. कारण शब्दाला पण काही मर्यादा असतात व त्यातून माझ्या सारखा सर्वसामान्य माणूस कितीस लिहीणार तरी पण त्या कार्याची माहीती सगळ्यांना व्हावी म्हणून या भागात मी आपल्याला ते कथन करणार आहे.
हे महान कर्मयोगी आहेत श्री प्रमोद करंदीकर, आमंचे करंदीकर काका.
ज्यांची आमची भेट डोंबीवलीत तर त्यांच्या या कार्यामुळ झाली होतीच पण परिक्रेमेच्या मार्गात आज ते आम्हाला धडगावला परत भेटणार होते. कारण होते ते त्यांच्या काही कामसाठी तेथे आले होते व आम्ही परिक्रमेत आहोत हे माहीत असल्याने आम्हाला मुद्दामून भेटावयास तिथे थांबले होते.आम्हाला परिक्रमेला जाण्यापूर्वी प्रेमाचे वं आगत्यांचे निमंत्रण देऊन गेलेलेे असे हे नम्र, मनमिळाऊ, शांत पण तितकेच आपल्या कार्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलेले एक कर्ममार्गातील तपस्वी व्यक्तिमत्व . त्यांना पाहून त्या परमेश्वराच्या या कार्याचेही
खूप कौतुक वाटले. गेली १९ वर्ष अथक प्रयत्नाने चालू असलेले हे एक महान कार्य ज्या संस्थेतर्फ चालते त्या संस्थेचे नाव आहे "'शबरी सेवा समीती " मला असे वाटते ज्या शबरी मातेनेे आपल्या प्रेमाने व भक्तिभावाने श्री रामचंद्रांचे ह्रदय जिंकले तसेच प्रेम व वात्सलमय भाव या संस्थेने आपल्या कार्यामधून दाखवून अनेक देवाघरच्या फुलांना एक नवजीवन देऊन एका अर्थाने त्यां विश्वरूपी परमेश्वराचे ह्रदय माईच्या परिक्रमा मार्गातही जिंकले आहे . माईच्या परिक्रमा मार्गात चाललेल्या अशा या थोर कार्याचा महिमा काही अगाध आहे.
मी पहिल्या भागापासून सांगत असलेली ही स्त्रीशक्ती इथेही प्रमोद काकांच्यामागे त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांच्या या कार्यात ऊभी राहिली व त्या म्हणजेे सौ रंजनाताई प्रमोद करंदीकर . विधात्याचे हे कार्य कसे ,कुठे कुणाकडून करून घ्यायचे, हे त्याचे त्यांनीच ठरवलेले असल्याने या प्रमोदजींच्या कार्यात त्यांच्या सहचारणीने दिलेली मोलाची साथ बघून खरच पुन्हा या स्त्रीशक्तीपुढे मी नतमस्तक होतो.
ही स्त्रीशक्ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याने प्रमोदजींचे कार्य इतके व्यवस्थित व मोठया प्रमाणात अव्याहात चालू आहे.
श्री प्रमोद काकांचे शिक्षण M.COM.पर्यंत १९७८ साली जेव्हा हे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्यांचा पहिला धडाडीचा निर्णय म्हणजे संघ प्रचारकाचे पूर्णवेळ काम. खर तर तेव्हा हे शिक्षण त्यांना कुठल्याही उच्च पदावरील नौकरीस व गलेलठ्ठं पगारास अनुकुल असणारे ,म्हणजे सगळ्या अर्थीक सुबत्ता, ऐहीक, मानलौकीक देणाऱ्या गोष्टींकडे पाठ फिरवून त्यांनी संघाच्या कार्यात स्वताला पूर्णपणे झोकून दिले . संघाच्या माध्यमातूनच पुढे तब्बल २६ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य चालविले, तिथेही त्यांना तितकीच मोलाची साथ त्यांच्या सौभाग्यवतींनी दिली. पण हे वनवासी आश्रमाचे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की आपण ज्या भागात काम करतोय तिथे कितीतरी लहान मुले कुपोषित आहेत की जी या देशाची पुढची पिढी आहे तिच जर अशी असेल तर पुढे काय?हा विचार त्यांना खूप त्रास देऊ लागला , त्यांच्यासाठी आपल्याकडून काहीतरी कार्य झाले पाहिजे ह्या दुर्गम भागातील पुढची पिढी सुदृढ झाली पाहिजे या गोष्टीकडे सतत मन धाव घेऊ लागले यां विचारातूनच या संस्थेची मुहुर्तमेढ मनात रचली गेली.
२६ वर्षाच्या या दृढ तपचर्येत आलेल्या अनुभवातून मनात एक संकल्पना दृढ होऊ लागली .एक दिवस वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यातून स्वतःला मुक्त करून प्रमोदजींनी कुपोषीत बालकासाठी, त्यांच्या निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी एका वेगळ्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला. खर तर त्यांना या गोष्टीसाठी शुन्यातून सुरवात करायची होती. फक्त शिदोरी होती अनुभवाच्या परिपूर्ण साठ्याची व मनाच्या ठाम निर्धाराची. निर्धार होता दुर्गम भागातील या पुढच्या पिढीला सुदृढ करण्याचा .
मन सागत होते की नाही हे माझे कार्य आहे , मला करायचे आहे . असा दृढ संकल्प असेल तर मला असे वाटते की त्या विश्वनियंत्यांलाही या कर्मयोग्याला साथ देण्याशिवाय गत्यंतर नसते पण हे गत्यंतर जबरदस्तीचे नाही तर त्यांच्या या कार्याला प्रेमाची पावती होती.किंवा मी म्हणेन की तो हात पुढ़े करून ऊभाच असतो हो वाट बघत, की कोण असा दिलदार माणूस येईल व इतके सुंदर कार्य चालू करेल त्यामुळे अशा या इश्वरी संकल्प असलेल्या कार्याला यश तर नक्कीच मिळते. कारण इथे स्वार्थ नसतो असते ते फक्त फक्त निस्वार्थी प्रेम.
अहो माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या ऐहीक गोष्टीचा संकल्पही दृढ निश्चयाचा असेल व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर तो पूर्णत्वास आलेला आपण बघतो ,इथे तरं हा इश्वरी संकल्प त्यामुळे हा पूर्ण करण्याची सारी जबाबदारी त्याची त्यामुळे तो सर्वातपरी त्यास सहाय्य करतोच. त्यांचा हा संकल्प तर माईच्या परिक्रमा मार्गातला मग त्याला व त्यांना माईचा आशिर्वाद मिळणार नाही हे कसे शक्य आहे ती तर जग्नमाता या जगताची आई , आपल्या बालकाने बघितलेले हे सुंदर स्वप्न ती कसे पुर्णत्वास नेते ते पाहू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३२-
नभात आला रवी उदयाला
आज्ञान तिमीर दूर कराया ॥
प्रमोदजींच्या स्वप्नवेलीचा
सरसरता कल्पवृक्ष झाला ॥
वृक्ष बहरला हसूं लागला
हासता हासता त्या हास्याला
शुभ्र कळ्या खुलू लागल्या ॥
कळ्या खुलल्या फुल हसले फुल हसुनी खेळू लागले
स्वप्न वेलीचा हा खेळ पाहूनी
विश्वनियंता कृतार्थ झाला
विश्वनियंता कृतार्थ झाला ॥
काव्यात्मक वाचनातून स्वप्नकळीपासून कल्पवृक्षाचा खेळ जरी सोपा वाटला तरी प्रत्यक्षात मात्र हे कार्य अथक मेहनीतून उभे राहीले. याला कारण म्हणजे तिथे असलेली अत्यंत गरीबी व अज्ञान. अज्ञानामुळे बाबाजी ,मांत्रीक यांचा मनावर असलेला पगडा, दारूच्या नशेत र्तर असलेले अनेक घरचे कर्ते पुरूष,एकुणच त्या समाजाची मानसिकता यामुळे सुरवातीच्या काळातील हे कार्य म्हणजे प्रमोदजींसाठी एक आव्हान होते. संघाच्या माध्यमातून असेलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा एक सेटअप तयार झालेला होता. रहावयची , जेवणाची, झोपण्याची, कार्यालयाची सगळ्या जागा ठरलेल्या असत त्यामुळे ते कार्य करताना या गोष्टींची काही चिंता नसे पण आता तसे नव्हते पाठीमागे कुठला सेटअप नव्हता , या सगळ्या गोष्टींची पुर्तता करून कार्य करायचे होते म्हणजेच आता आव्हान अजून कठीण होते. कित्येक पालकही इतके स्वार्थी होते की आपले बालक कुपोषीत राहीले तर सरकारकडून मदत , धान्य,मिळेल व त्यामुळे ते त्याला तसेच कुपोषीत राहू देत म्हणजे त्या कुटुंबाच्या पोटाची भ्रांत सुटेल हा एक स्वार्थी विचार असे व हे खूप क्लेशदायक होते .ही मानसीकता बदलणे हे खरे आव्हानात्मक होते कारण माणसाचा स्वार्थ मोठा वाईट असतो .त्यामुळे ही मानसीकता बदलून नव्या विचारांचे बीज पेरणे हे खूप अवघड पण कठीण काम करणे क्रमप्राप्त होते.
काकांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे वनवासी कल्याण आश्रमच्या २६ वर्षाच्या कार्यकाळामुळे हा भाग, इंथला परिसर, इथली माणसे, त्यांचे विचार किवा मानसिकता याचा त्यांचा चांगला अभ्यास झाला होता. मुळातच काकांचा स्वभाव मनमिळावू असल्याने लोकसंग्रह करायला किंवा व्हायला फारसा वेळ लागला नाही.
सन २्००० पासून मनात असलेले स्वप्न आता कार्याकडे वाटचाल घेऊ लागले. कार्याची आखणी, या सगळया कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची उपलब्दता, जनसंर्पक, कार्यकर्ते, आर्थिक पाठबळ अशा कितीतरी गोष्टींची तयारी होत गेली कारण कार्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या होत्या.
सन २००३ ला प्रमोदजींच्या मनात असलेली आई 'शबरी सेवा समिती ' या नावाने उदयास आली. जिने कित्येक लहान ,मोठया जीवाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
२००८ पर्यत जिचे कार्यक्षेत्र फक्त कर्जत तालुक्या पूरते मर्यादीत राहीले.
कार्यकर्ते तयार झाले तरी गावात जाउन त्यां लोकांचा विश्वास संपादन करणे ही मोठी दिव्य परिक्षा होती कारण काही गावात काही लोकांनी अशा संस्था सुरू केल्या होत्या की ज्या हेच काम करत होत्या पण त्या मागे पण राजकारण होते कारण सरकारकडून आशा कामासाठी मदत मिळत होती त्यामुळे ती मदत घेऊन बालकांपेक्षा आपले चांगभले कसे हाईल हाच हेतू त्यात होता.
त्यामुळे त्यांची त्यां गावात चांगलीच जरब किंवा दहशत असे अशावेळी अशा गावात या मुलांना पालकांच्या सहमतीने गुपचूप घेऊन जाउन त्याच्यावर उपचार करून परत आणणे व त्यां बाळाच्या तबेत्तीत झालेला बदल त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन करणे हाच एक मार्ग होता.
काही वेळा बालकांच्या माता उपचारासाठी थांबण्यास तयार नसत कारण घरूनच त्यांना तशी तंबी असे की संध्याकाळ पर्यंत आली तर घरी जायचे नाही तर दूसरा आसरा शोधायचा त्यामुळे आपल्या संसारापुढे त्यांचे मातृत्व दुबळे पडत होते.
समीतीचे कार्यकर्त्यांचे मात्र आता अशा बालकांचा शोध घेणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधणे, मेडिकल कॅम्पची ऊभारणी करणे, औषधोपचार, पोषक आहार व त्याचे महत्व व सतत त्या बालकांच्या पालकांशी पाठपूरावा करणे हे काम चालू झाले.
जनजागृतीसाठीची अनेक कार्य समिती करू लागली कुपोषीत बालक जन्मास येऊ नये म्हणून त्यांचे प्रंबोधन, त्यांना चांगल्या आहाराचे महत्व पटवून देणे, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची समुदायीक डोहाळजेवणे, किशोरवयातील मुलींची शिबीरे , सदृढ बालक स्पर्धा असे कीतीतरी उपक्रम या माध्यमातून सूरू झाले.
एखादी आई आपल्या लेकीचे जेवढे म्हणून कोडकौतुक करेल तितकेच कोडकौतुक ही जग्नमाता हसत हसत शबरी आईच्या माध्यमातून अनेक लेकींचे करू लागली. ५ ते ६ वर्षात या प्रेमळ धडपडीचा फरक दिसू लागला. जिथे दरवर्षी ७०ते ८० कोवळ्या कळ्या सुकून जात होत्या ते प्रमाण ५ ते ६ वर आले. ग्रामीण व आदीवासी महिला जनजागृती व प्रेबाधनामुळे स्वतःच्या आरोग्या विषयी जागरूक झाल्या .कोवळी फुले हसू लागली व त्यातूनच त्या आईच्या व तिच्या लेकरांच्या चेहऱ्यावर एक असीम आनंद , समाधान वाहू लागले .
आता आपल्या पुढल्या धेय्याकडे समीतीची धडपड सुरू झाली. स्वप्नवेलीची वाटचाल आता कल्पवृक्षाकडे होऊ लागली. त्यांला धडगाव ,अक्कलकुवा सारखे अति दुर्गम जिल्हे खुणावू लागले त्यां बालकांचे आक्रोष ,कण्हणे , हाडाच्या सापळ्यांसारखे दिसणारी त्याची देहयष्टी, त्यांचे आतल्या आत कोमेजून गेलेले हास्य मनाला अतीव दुखः देऊ लागले.यातूनच पुढचे पाउल आता नव्या क्षितीजाकडे झेप घेऊ लागले. प्रमोदजींना माईच्या परिक्रमा मार्गातील दुर्गम भागाचे वेध लागले किवा मला असे वाटते की माईच त्यांना आपल्याकडे बोलवत होती , म्हणत होती " बाळ आता इकडे ये , इथे कितीतरी लहान मुलेबाळे तुझी वाट पहात आहेत व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कोमेजण्या आधी फुलव, माझा आर्शिवाद सदैव तुझ्या पाठीशी आहे " आता तिलाच स्वप्न वेलीचा कल्पवृक्ष करायचा होता व तो तिने कसा केला ते पाहू पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३३
धडगाव, मोलगी , अक्कलकुवा व आजुबाजुचा दूर्गम परिसर की जिथे सगळ्याच सुविधांचा वानवा होता व आहे अशा ठीकाणी आता शबरी सेवा समितीचे कार्य सुरू झाले . पण आता त्याच्या समोर किती मोठे आव्हान होते हे आपल्याला पुढील समस्यांतून दिसेल म्हणून याचा ऊहापोह ईथे प्रथम करत आहे.
या भागातील आदिवासींची आर्थिक किंवा पैशाची बाजू इतकी बिकट होती की काही विच्यारण्याची सोय नव्हती. शिक्षणाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचाची कमतरता व अनेक अनिष्ट व कालबाह्य रूढी, परंपरा ह्या गोष्टीही या संमस्येच्या मुळाशी होत्या.
डोंगराळ भाग असल्याने दूरवर पसरलेले आदीवासी पाडे व तिथपर्यंत न पोहचलेली वाहतूकीची साधने किंवा व्यवस्था ही या गोष्टीत अजून भर घालणारी होती.
हा समाज अनेक जमातींमधे विभागाला आहे व प्रत्येकाची बोली भाषा ही निरनिराळी आहे , आता मराठीचा वापर थोडया फार प्रमाणात होऊ लागला असला तरीही आजही ते आपापसात आपली हीच बोली भाषा वापरतात वं हा खूप मोठा अडथळा आपले चांगले विचार त्यांच्यापर्यत पोहचवण्यात येत होता.त्यामुळे त्यांचे हे मागासलेपण तसेच कायम राहीले.
हा आदीवासी समाज अजुनही रूढी व परंपरांच्या जोखाडयात अडकलेला आहे.धार्मिक कर्मकांड ,भगताचा आर्शिवाद, देवीला कोंबड्याचा बळी देणे याच गोष्टीत धन्यता मानणारा आहे. त्यामुळे कुणीही आजारी पडले की प्रथम भगत त्याचे अंगारे , धुपारे व शेवटी डॉक्टरांचे उपचार हा प्रकार इथे सर्रास घडतो.याच परांपरांमधे त्यांचे आर्थिक मागासलेपणही अडकलेले आहे कारण विवाहानंतर प्रत्येक आदिवासी जोडपे वेगळे राहते किंवा त्याचे वेगळे कुटुंब असते त्यामुळे त्याच्या वाटयाला आलेला जमीनीचा तुकडा यावरच त्याला त्याची गुजराण करावी लागते व हा तुकडा कधी कधी इतका छोटा असतो की त्यावरील मिळणारे उत्पन्न हे अतिशय तुटपुजे असते. या मिळाणाऱ्या उत्पन्नातून म्हणजेच ज्वारी, हरबरा, उडीद, मका, भाजीपाला यातून पौष्टीक आहार कसा तयार करता येईल याची त्यांना माहितीही नसते .
लहान वयात झालेले विवाह, शिक्षणाच्या अभाव व त्यामुळे शरीराचा विकास व सज्ञान या गोष्टीचा काही गंधही त्यांना नसतो.मुल म्हणजे देवाचे देणे हा विचार दृढ असल्याने खाणारी तोंडे व उत्पन्न याचे प्रमाण कायम व्यस्तच राहते .कुठे मोलमजूरी करावयाला गेल्यास अंगी कोणतेही कौशल्य नसल्याने मिळणारी मजूरीही अल्प असते त्यामुळे परिस्थीतीशी झुंजत राहणे हेच त्यांच्या नशिबी येते त्यामुळे गर्भारपणात मातेची घ्यायची काळजी, सकस व पौष्टीक आहाराचे महत्व ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ध्यानीमनीही येत नाहीत किंवा कवडीमोलाच्या ठरतात.
शिक्षणाच्या अभावामुळे समाजात आलेले भित्रेपणा किंवा कमीपणा यामुळे हा समाज स्वतःविषयी मोकळेपणाने बोलावयास तयार होत नाही. आपण त्यांना तसे विविध मार्गानी बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्या मनातील विचारांची अजिबात दाद लागु देत नाहीत.
शुध्द पिण्याच्या पाण्यासाठीही हा समाज अजून तरसलेला आहे.
स्वतःच्या आरोग्याविषयीही असलेले अज्ञान, स्वच्छतेचा अभाव या सर्व गोष्टीनमुळे कुपोषणचे लोण घरांघरात पाहाचंलेले आहे.
वरील परिस्थीती व तिथली आव्हाने इतकी बिकट व भायवह होती की ती छोटी छोटी मुले, नवजात बालके आपल्या आईच्या पदराखाली केवळ श्वासोश्वास चालू आहे म्हणून जीवंत आहेत असे म्हणायचे अशी स्थिती होती. कण्हण्याचा चिरका आवाज , खोल गेलेले डोळे जणू मृत्युच्या दाढेत चाललेले आहेत असे हे भिषण दृष्य बघून जिवाची खूप घालमेल होत असे. एकदा तर काकानी बोलता बोलता सागीतले की दिवसभर आयोजकाचे काम करत असताना मनांत आलेला वेदनेचा हुंदका केवळ आयोजक म्हणून दाबून ठेवला व रात्री त्या सर्व भावनांना पूर्ण मोकळी वाट करून दिली. किती भयावह असेल ना ती स्थीती!
कर्जत कशेळी भागात 'शबरी सेवा समीतीच्या ' कार्यामुळे तो भाग जितका काकांना परिचीत होता तेवढा हा भाग तितका परिचयाचा नव्हता. | नवीन माणसे, कार्यर्कत्यांचा नव्याने शोथ म्हणजे थोडक्यात परत नवा विटी नवा दांडू शोधणे अशी स्थिती होती.पण काकांकडे होता ठाम विश्वास व या मुलांसाठी काम करण्याची अंतिरीची तळमळ, ही अशी तळमळ लागली की मग कुठल्याही आव्हानाचा बाऊ वाटत नाही , मार्ग मिळतं जातात व कार्य पुर्णत्वास जाते.
मेळघाट इथे पण परिस्थीती अशीच होती. पण तिथे अशा मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था बऱ्याच होत्या त्यामुळे काकांनी मुद्दामून हा भाग निवडला होता.
अशा या काकांच्या नवसंजीवनी कार्याला त्या माईरूपी इश्वराने चांगल्या कार्यकर्त्याची व डॉक्टरांची जोड कशी मिळुवुन दिली व कार्य कसे सिध्दीस नेले ते आपण पाहू पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा भाग 3५-
धडगाव मुक्काम पुढे सुरू - खूप दिवसानी बंद खोलीत झोपण्याची सोय झाल्याने नेहमी अगदी सहजपणे पहाटे उठणारा मी त्या दिवशी त्या सुखद ऊबदार खोलीत नकळत परत परत त्या निद्रेच्या कुशीत जाण्यास अधीन होत होतो. गंमत वाटली मला माझ्या मनाची उघडयावर गवताच्या पेंढ्यावर झोपलो होतो तेव्हाही जाग आल्या आल्या ऊठून बसणारा मी आज मात्र अगदी सुरक्षीत जागी झोपायला मिळाले तरीही ऊठायला कंटाळा करत होते.किती महत्वाची आहे ना ही झोप सर्व जीवांना?. ह्याही स्थितीत आपल्याला त्या सुखाचा, आनंदाचा भास होतो व त्या भासाला खरे मानून गाढ झोपेतून उठायला नको वाटते. त्या विचार विरहीत सुखाच्या स्थीतीचा अनुभवातून बाहेर पडायला नको वाटते कारण तिथे मन चंचल नसते, विचार नसतात व विचार जिथे नाही त्या वेळेला खऱ्या सुखाचा अनुभव येतो. हेच सुख ,हाच आनंद मिळण्यासाठी मनुष्य जन्मभर धडपड करतो पण त्यासाठी त्याला विश्वास असतो या दृष्य व नाशवंत वस्तूंचा व त्यातच तो सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण खरे सुख तर त्याच्यापाशीच असते. म्हणून आई नित्योपासनेत सांगतात
मृग नाभी कस्तुरी असुनी शोधीत दाही दिशा फिरे॥
तेवी ह्रदयस्थ प्रभू त्यजूनी
मन विषयानंदासी झुरे ॥
आईच्या सांगीतलेली प्रवचने आठवली, आई त्यात गमतीने सांगातात की अगदी खूप वर्षानी , नवस सायास करून झालेले मुल असू देत, दिवसभर खांद्यावर कडेवर घेउन फिरणारी आई रात्री मुल झोपले नाही तर मात्र कशी वैतागते ह्याचे अगदी मजेशीर वर्णन करतात त्या सांगतात रात्री झोपल्यावर मुल रडले तर त्याची आई आपले डोळे बंद ठेऊनच त्याला थोपटते,म्हणजे कस ही करून तु ही झोप मी ही झोपते. तरीही रडले तर जोरा जोरात थोपटते किंवा बडवते त्या बाळातही आपल्या प्रमाणे सुप्तपणे कामक्रोध हे गुण असतातच मग ते ही अजून जोरात रडते मग त्याला झोपवण्यासाठी व घरातले, शेजारी उठू नयेत म्हणून पाय पसरून पायावर जे घालते व थोपटते व तेव्हा ती तोंडाने पुटपुटते " किती जन्माचा वैरी आहे कोण जाणे ?स्वस्थ मला घटकाभर निजावयास पण देत नाही . दिवसभर काम काम होते व चार तास निजाव म्हणजे हे एक आणि पिडा !म्हणजे बघा दिवसभर जे 'माझा राजा माझा राजा ' जे सोन्यासारखे वाटते ते आत्ता मात्र जे जड. का? तर माझ्या सुखाचा आड येते.
तर अशी ही निद्रा माणसाला त्याच स्वरूपस्थितीकडे नेते पण अज्ञानातून .
पण ह्या स्थितीचा अनुभव संत मात्र कायम अनुभवत असतात.
थोडा वेळ त्या आनंदाचा अनुभवं घेत शेवटी ऊठलो , तेवढयात कांका पण ऊठून आमच्या इथे आले वं म्हणाले 'तुम्हाला आंघोळीला पाणी गरम करून द्यायला सांगतो, घाई करू नका गार पाण्यानी अंघोळ करण्याची ' आम्ही नको म्हंटले तर म्हणाले ' अहो आज आहे सोय म्हणून सांगतो, पुढे सोयं नाही तिथे करायचीय आहे आंघोळ गार पाण्यानी ' मग आम्ही काहीच बोललो नाही कारण आज माईने परत गरम पाण्यानीच स्नान घालावयाचे ठरवले असावे. तोंड धुऊन होईस्तो पर्यंत गरम गरम वाफाळलेला चहा आला . त्याचा स्वाद घेऊन गरम पाण्यानी आंघोळी करून आम्ही माईची पुजा, आरती केली, तोपर्यत काकाही तयार झाले आज त्यांचाही मुक्काम काही कामानिमीत्त इथूंन हालणार होतो. तेवढ्यात आमच्या तिनही माऊली तिथे आल्या, आदल्या दिवशी ते ही धडगावला पोहचल्यावर आमच्याशी फोनवरून संर्पक करून आम्ही कुठे उतरलो आहोत व सकाळी सगळे आपण एकदम निघू म्हणून कळवले होते त्यामुळे ते ही तिथे आले .त्यांचीही काकांशी ओळख करून दिली. परत एकदा चहा घेऊन आम्ही सगळे पुढच्या मार्गाला प्रस्थान केले.
परत तिन्ही माऊली , आम्ही ' व अजून काही परिक्रमावासी असा प्रवास सुरू झाला. अजुनही मधुनच खापर माळ, शुलपाणीच्या गोष्टी निघत होत्या व सगळयांना त्या दिव्यातून पार झाल्याचा आनंदही होत होता.
परत डांबरी रस्ताने आमची वाटचाल चालू झाली. मधुनच शबरी सेवा समितीचे कार्यकर्त मोटार बाईकवरून येऊन खुशाली विचारून . आम्ही प्रसादास कुठे थांबांवयाचे आहे हे ही सांगून गेले.
या सगळ्या पतिक्रमा मार्गात राजस्थान राज्यातील एक ब्रम्हचारी युवक जो परिक्रमा करण्यास आला होता तो आम्हाला अधुन मधुन भेटत असे. भगवे कपडे घातलेला हा युवक म्हणजे एक मजेशीर माणूस होता.परिक्रमेची व त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्ण माहीती नसल्याने म्हणा त्याच्याकडे थाळी, पाणी पिण्यास पेला, चपला ञशा बऱ्याचं काही गोष्टी नव्हत्या , हां बरीच वेगवेगळी पुस्तके त्याच्या झोळीत असायची की जी आम्ही माईची पूजा करण्यास थांबलो की तो ते मांडून बसलेला दिसे. खर सांगायचे तर ते चित्र बघून मला मंबईच्या फोर्ट भागात बसून जूनी पूस्तके विकणाऱ्या माणासांची आठवण येई.😄 बरेच वेळा असे होई की बाकीच्या सगळ्या परिक्रमावासीयांची पुजा आरती होईन जाई तेव्हा याची सगळीमांड झालेली असे मग आमच्या सगळ्यांबरोबर परत निघायचे म्हणून पटापट पुजा व आरती करून आवरत असे. पण हे सगळे आवरण्याच्या नादत कधी कपडे ,कधी दंड असे काही विसरून जाई व हे त्याला पुढच्या स्थानावर गेल्यावर लक्षात यई.
त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी नाहीत ही गोष्ट संत सियाराम बाबांच्या इथे आम्हा बऱ्याच जणांच्या लक्षात आली मग हे त्याला बाबांना सांगायला लावून , बांबांच्या इथुनच त्याला ताट, पेला,चपला या सगळ्या वस्तू परिक्रमेसाठी भेट स्वरूपात मिळाल्या.
एकदा ऊदयने तर त्याच्याकडील नवीन पांघरायाची शालही त्याला दिली कारण हा एका मुक्कामाला त्याची शालही विसरून पुढे आला होता तर ऐका स्नानाच्या ठिकाणी लंगोट विसरल्याने आमच्याकडील न वापरलेली लंगोटीही त्याला दिलेली मला आठवत आहे. तर एकदा संत सियाराम बाबा यांच्या इथे मिळालेला दंड कुठेतरी विसरला होता . असा हा गडबडया व वेधळा बच्चू आमच्याबरोबर परिक्रमेत होता. उदयने मला एक दोन वेळेला सांगीतलेही की तुझ्याकडले काही जास्तीचे कपडे असतील तर त्याला दे पण काय माहीत नाही पण त्याचा वेंधळेपणा मला आवडला नव्हता किंवा संतानी दिलेली भेट ज्याला जिवापाड जपता येत नाही म्हणून कदाचीत आलेला राग असेल व तो तरूण सच्चा वाटला नाही म्हणून की काय पण मला काही त्याला माझ्याकडचे देण्याची इच्छा झाली नाही. मी उदयनला सांगीतले की मला ज्या क्षणी तसे वाटले तेव्हा मी त्यां वक्तीला ते मी नक्की देईन.
आपण बोलता तसे वागतो की नाही याची परिक्षा किंवा आठवण माई परिक्रमेत करून देते की काय कोण जाणे पण तशी वेळ तिने लगचेच आणली, त्या दिवशी सकाळी आम्ही कुठल्पा मुक्कामाहून निघालो ते आठवत नाही पण त्या दिवशी हवेत चांगलाच गारवा होता सकाळी सकाळी आम्हीं एका खडकाळ रस्तानी चालत होतो तेवढयात एक म्हातारी आजीबाई फक्त शरीराचा खालाचा भाग झाकण्यासाठी एकं छोटे वस्त्र नेसलेली रस्ताच्या कडेला उभी असलेली आम्हाला दिसली. तिचे खर तर आमच्याकडे लक्षही नव्हते ,ती तिच्याच नादात कदाचीत एखादी ऊन्हाची तिरीप अंगावर पडले म्हणजेच थोडक्यात ऊन खाण्यासाठी तिथे ऊभी असावी. सबंध अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजी थंडीने चांगल्याच कुडकुडत होत्या. त्या क्षणी मनात विच्यार आला व उदयनला म्हटले ' माझ्या बॅगेत वरच कॉटची लुंगी आहे ती कांढ आणी तुच तिच्या अंगावर गुरफटून घाल' तो म्हणाला 'अरे तुच घाल की ' मी म्हटले नको तुच घाल तिच्या अंगावर मला फक्त लांबून तिच्या डोळ्यातील आनंद, समाधान बघायचे आहे ' उदयने लगेच बॅगेतून लूंगी काढून तिच्या अंगावर पूर्ण लपेटून दिली तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंदची एक चमक आजही माझ्या डोळ्यासमोर हा प्रसंग लिहताना येत आहे. आम्हाच्या तिघांच्याही डोळ्यातून नकळत अश्रु वाहू लागले, मनाला खूप आनंद व समाधानही वाटत होते ,काही वेळा खरच काही न बोलता मिळाणारा आनंद आम्ही अनुभवत होतो, कुणी काहीच न बोलता आम्ही तिघेही अंर्तमुख होऊन बराच वेळ चालत राहीलो.
आता त्या राजस्थानी परिक्रमावासीयाची आठवण व्हायचे कारण की आम्ही जिथे ११.०० ते ११.३० पोहोचलो तिथे एक गमतीशीर किस्सा झाला , तो काय झाला ते पाहू पुढच्या भागात तो पर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३६-
अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही ज्या ठिकाणी पोहचलो त्या ठिकाणाचे नाव होते खुंटामोडी. या ठिकाणी शंकराचे एक छोटे मंदीर आहे व गावकरी इथे परिक्रमावासीयांसाठी प्रसादाची सोय करतात. मंदीरात जाऊन शंकर महाराजींचे दर्शन घेतले व गाभाऱ्यातच आम्ही जरा वेळ बसलो. उन्हातून चालल्याने ती शांतता व जमीनीचा थंड स्पर्श मनाला व शारिराला एक थंडक देऊन गेला.जरा वेळ बसून आम्ही परत मंदीराच्या बाहेर आलो . तेवढयात तिथला सेवेकरी आमच्यापाशी येऊन सांगु लागला
'बाबाजी अभी भोजनप्रसादी पाकेही आगे जाना है ', आधे घंटे मे सब तयारी हो जायेगी ' मंदीराच्या आजुबाजुचा परिसरात परशा घातल्या असल्याने परिसर एकदम स्वच्छ होता त्यामुळे मंदीराच्या मागच्या बाजूला साऊली बघून आम्ही सगळे त्या ठिकाणी जरा टेकलो. चार तास सतत चालत असल्याने पायांनाही थोडी रग लागली होती त्यामुळे खाली बसुन पाय पसरून बसल्यावर सगळे जरा रिलॅक्स झाले.
आम्ही जेव्हा मंदीराच्या मागे बसलो होतो तेव्हा हा राजस्थानचा ब्रम्हचारीही दहा मिनीटाने तिथे पोहचला.
आम्ही मंदीराच्या मागे बसलो होतो तेव्हा पवार माऊलीही शंकराच्या पिंडीवर वाहिलेले जल ज्या गोमुखातून बाहेर पडते त्याच्या बरोबर खाली बसल्या होत्या. तेव्हा त्यांना काय माहीती होते पुढे काय होणार आहे ते?
दहा मिनीटांनी हा विसराळू विनू हसत हसत आला व पाय धुऊन मांदिरात शंकराच्या दर्शनाला गेला. प्रसादास वेळ होता म्हणून आम्हीही तिन्ही माऊलींशी गप्पा मारतं मागेच बसलो होतो.
ब्रम्हचारी महाराज दर्शनाला आत गेले व काय सणक आली याच्या मनात कोण जाणे. बाहेर आला व तिथल्या सेवेकऱ्यापाशी त्याने एका छोटया बादलीत पाण्याची मागणी केली.त्या बिचाऱ्या सेवेकऱ्यानेही पराक्रमावासी मागत आहे म्हणून लगेच त्यास ते आणून दिले.परत महाराज गाभाऱ्यात गेले व आता १२ वाजता ह्यांचा शंकराला पाण्याने अभिषेक घालण्याचा मानस होता. बादलीतले सगळे पाणी घेतले व त्या पिडींवर वाहून सोडले. ती धार पिंडीवर पडून तशीच गोमुखातून पवार माऊलींच्या अंगावर वाहू लागली.एक दोन मीनीटे आम्हा कुणालाच काही कळेना. मजेशीर स्वभावाच्या पवार माऊली त्याही स्थितीत हसत हसत ओरडल्या ' अरे अरे काय रे हे, आज सकाळी आंघोळ केली आहे मी ' मग मात्र आमची सगळ्यांची पण हसून हसून मुरकुंडी वळली.😆😆 बाहेर काकांची अशी गमंत तर आत त्या भोलेनाथचीही योगनिद्रा या अक्समात व भसकन पडलेल्या जलाने खंडीत होऊन तोही बहूतेक खडबडून जागा झाल्याचे मजेशीर चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन गेल्याने मला अजूनच हसू आले. बाहेरची गडबड त्या विसराळू विनुच्या कानावर गेल्याने तोही गडबडत मागे आला . आपण काय केले आहे हे त्याच्या लक्षात आल्याने अगदी काकूळतीला येऊन काकांना म्हणू लागला ' काकाजी, मुझे मालूम नही था आप इधर बैठे हो ' त्याचा स्वरही घाबराघुबरा झाला होता .हे पाहून मात्र काकांनी नाटकीपणाने खोटा रागाचा आव आणला व त्याच्यावर ओरडले ' अरे तुम्हे समझता है की नही कुछ, वो शंकर भोले है करके कभीभी ऊनके ऊपर जल अर्पण करते हो, अभी बजे कितने है? और तुम क्या कर रहे हो, अभी मेरे सारे कपडे गिले हो गये, आप मुझे दूसरे कपडे दे दो, ' हे म्हणत असतानाही माऊली डोळा मिचकवून आमच्याकडे बघत होत्या.हे बघून आम्हाला अजूनच हसू आवरेनासे झाले. मनात म्हटले या विसराळुला स्वतःचे कपडे सांभाळता येत नाही हा यांना काय कपडे देणार!. इतक्यात ते सेवेकरी आम्हाला प्रसादाला बोलवण्यास आल्याने पवार माऊलींनी आपले नाटक आटोपते घेतले.
आम्ही सगळे प्रसाद घेण्यासाठी आपल्या थाळया, कमंडलू घेऊन जेवणाच्या ठिकाणी गेलो .साधारणपणे एक वाजता आम्ही तिथुन प्रस्थान केले.तिन्ही माऊली मात्र थोडा वेळ तिथे विश्रांतीस थांबणार होत्या त्यामुळे आम्ही तिघांनी चालण्यास आता सुरवात केली .दूपारी तीन वाजण्याच्या सुमारास परत शबरी सेवा समितीचे तेच दोन कार्यकर्त बाईकवर भेटले व म्हणाले 'आपण आज पिंपळखुट्याला असणाऱ्या मारूतीच्या मंदीरातील आश्रमात जाऊन तिथे मुक्कामास थांबावेत , आपण तिथे येत आहात म्हणून आम्ही आधीच सांगून आलो आहोत असेही सांगीतले. खर तर आम्ही सुरगसच्या शाळेत निवासाची सोयं होते म्हणून तिथे थांबणार होतो पण त्यानी सांगितल्यामुळे आम्ही पुढे पिंपळखुट्या पर्यत जाण्याचे ठरवले. 'आपणास मी पुढे परत भेटतो आपण आपल्या सॅग माझ्याकडे द्याव्यात व आपण निवांत चालत यावे 'अशी गळ तो आम्हास घालू लागला. तेव्हा मात्र आम्ही त्यास या गोष्टीसाठी नकार दिला व आपण पुढे भेटू असे त्यास सांगीतले.
साधारणपणे साडेपाचच्या सुमारास परत तो आम्हाला सुरगसच्या जवळपास भेटला. तेव्हा त्याने एका केळीवाल्याकडून आमच्यासाठी डझनभर केळी घेतली होती . ती घेउन तो आमच्या हातात देऊन म्हणाला, राहू देत ही तुम्हाला. तिथे त्यानी आम्हाला दोन दिवसापूर्वी हॉस्पीटलमधून घरी आलेल्या पाच सहा महिन्याच्या लहान तान्या कुपोषीत मुलाची भेट घडवून दिली.आज त्याच्या व आईच्या चेहऱ्यावरील तो आनंद, उत्साह बघून त्यांमागे असलेल्या शबरी सेवा समितीच्या महान कार्याची परत आठवण झाली. त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य बघून मला एखादया झाडावरील फुल उन्हाने व पाणी न मिळाल्याने जसे मालवून जाते व त्यास अचानक पाणी मिळाल्याने पुंन्हा एकदम टवटवीत होते तसा भास झाला. त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद मी परत माझ्या डोळ्यात टिपत गेलो कारण एक नवीन चैतन्य माझ्या डोळ्यासमोर हसत खेळत होते. नकळत परत काकांची परत आठवण येऊन मनोमन त्यांना नमस्कार केला.
तेव्हा साधारण साडेपाच झाले होते म्हणजे अजून साधारण अर्धा तासात तरीआम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचावयास हवे होते. आता मात्र पाय भराभर उचलावयास लागणार होते कारण दिवस लवकर मावळत असल्याने वं सबंध कच्या रस्ता हा चढ़ उतरणीचा खडकाळ व जंगलं मार्गातून जाणारा होता.थोडा जास्त उशीर जरी झाला तरी पुढचा रस्ता ऊमगाण्यास अडचण येणार होती. त्यात थोडी पावसाचीही चिन्हे दिसू लागली होती, त्यामुळे भराभर पाय ऊचलत आम्ही सव्वासहाला पिंपळखुटयाला पोहचलो .तापर्यंत बारीक बारीक पावसानेही तिथे हजेरी लावण्यास सुरवात केली होती.
तिथल्या महंतानी आम्हाला एका छोटया झोपडीवजा खोलीत सॅग ठेऊन आसन लावण्यास सांगीतले. पुढे बलभीम हनुमंताची भव्य दिव्य मुर्ती होती . मंदीरे काही पक्या बांधकामाचे नव्हते, रानातील लाकडांचे खांब व त्यावर पत्र्याची शेड व त्यावर झाडाच्या फांदया, पेढा अशा प्रकारातले होते. प्रसाद बनवण्यासाठी मागे एक छोटी वेगळी खोली होती . त्यावेळी त्यां तिन चार साधुंची जेवण बनवण्याची तीच गडबड चालू होती. स्नानाची सोय स्वयकपाक घरच्या थोडे पुढे जाऊन एका ओहळात होती. तो ओहळही चांगला दोन तीन पुरूष खाली खोल होता. फक्त पाणी खूप नसल्याने बुडण्याची भिती तिथे नव्हती.उतरण्यास दगडाचेच खाचखळगे होते. त्यामुळे मारूतीरायांना लांबुनच नमस्कार करून आम्ही स्नानाच्या तयारीनेच ओहळापाशी गेलो. हवेत आलेला चांगलाच गारवा , पावसाची सुरू असलेली बारीक बारीक रीपरीप व झालेला संधी प्रकाश त्यामुळे आम्ही एकमेकांना सांभाळत त्यां ओहळात उतरलो.
काकांच्या सकाळच्या गरम पाण्याबद्दलच्या वाक्याची तेव्हा आठवण झाली. पण त्या आनंदाप्रमाणे हा ही आनंद काही वेगळा होता. दगडातील निसरडया खाचंखळग्यांना सांभाळत या नैर्सगीक थंडगार पाण्याची मजाही काही और होती, काल वं आज सकाळी माईने ऊबदार गरम पाण्याचा आनंद दिला होता व आता थंडगार वाहत्या झुळझुळणाऱ्या पाण्याची मजाही काही और आहे हेच ती दाखवत होती. दहा पंधरा मिनीटातच आम्ही आटोपते घेतले कारण काळोख झाला होता व वर जाऊन माईची पुजा आरती पण करायची होती. परत तारेवरची कसरत करत करत आम्ही वर आलो व त्या झोपडीवजा खोलीत जाऊन माईची पुजा व आरती केली व नंतर मारूतीरायांच्या दर्शनाला मंदीरात गेलो. खूप मोठी मारूतीरायांची मुर्ति बघून मनाला खूप आनंद झाला व तो ही आमच्याकडे बघत हसत हसत ' या या बाळांनो ' असे म्हणत असावा.
आईनी दिलेल्या हनुमान जयंतीच्या भजनांतील पहिले भजन सहज ओठावर आले.
मारूतीराया बलभीमा ॥ भजनालागी दया प्रेमा ॥
तेवढयात तिथले साधु भोजन प्रसादी घेण्यासाठी चला हे सांगण्यास आले त्यामुळे नाईलाजाने हुनुमानचालीसा न म्हणता आम्ही प्रसाद घेण्यास गेलो.
भोजन प्रसादी झाली व मी उदयनला म्हटले ' चल परत जाऊन बसूया त्यां महाबली पुढे, मला हुनुमान चालीसा व रामरक्षा म्हणायची आहे ' समोर धुनी पेटलेला होता त्याच्या बाजुलाच त्यां महाकाय हनुमंता पुढे आम्ही बसलो. तिथे बसलेल्या रामानंदी साधुंकडून हे सगळे म्हणण्याची परवानगी घेऊन मग आम्ही दोघांनी हनुमान चालीसा म्हणण्यास सुरवात केली. रोज माझे दिवसातून सकाळी व संध्याकाळी चालत असताना हे म्हणणे हाई पण आज कसे त्याच्या समोर बसून त्याचे कोडकौतुक त्याच्याच स्तुतीनें करण्याचा योग आला होता.हनुमानचालीसा रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणत एक आनंदाचा पर्व काळ आम्ही तिथे साधुन घेतला. आमचे सगळे म्हणून झाले व त्यानंतर आम्ही थंडीपासून ऊब मिळावी म्हणून त्या धुनीपाशी शेकत बसलेलो असताना एक रामनंदी साधु आमच्या जवळ आला म्हणाला ' किधर से आये हो आज ?' आम्ही सांगीतले 'धडगाव से ' त्यावर तो म्हणाला ' इतना लंबा सफर करके आये हो, चलो आज मै आपके पैरों की मालीश कर देता हूँ ' आम्ही त्याला 'नही नही महाराज ' म्हंटल्यावर तो म्हणाला ' अरे ऊसमे क्या है, कल भी आपको वापीस चलना है ना और मेरी भी मैया की कुछ सेवा हो जायेगी' असे म्हणत त्याने त्याच्या कडल्या तेलाने माझे पाय, मांडया, पाऊले, खांदे चेपून देण्यास सुरवात केली. मलाच थोडे अवघडल्यासारखे झाले, कारण अशा प्रेमाच्या वागण्याची सवय नाही हो आम्हा शहरवासीयांना. पण तो रामानंदी साधू मात्र अगदी आनंदाने सेवाभाव वृत्तीने हे करत होता.पंधरा वीस मिनीटानी मीच त्याला म्हंटले 'बहोत हो गया महाराजजी,अभी बहोत अच्छा लग रहा है ' असे सांगीतल्यावर तो थांबला व म्हणाला ' अभी थोडा वक्त आप इधर ही धूनी के पास बैठकर शरीर को सेख लो ' थोडा वेळ तिथे थांबून आम्ही त्यां सर्व साधुंना नमस्कार केला व आमच्या खोलीत गेलो. पावसामुळे हवेतला गारवा चांगलाच वाढला होता. बापू ने जमीनीवर गोधडी सारखे काहीतरी घातले होते त्यामुळे आम्हीही पटकन स्लिपींग बॅगमधे शिरलो. पडल्या पडल्या परत माझ्या मनात मारूतीरायांचे विचार सूरू झाले व सहज शब्द मनात आले
जिवीचा जिवलग राम माझा
तुझा जिवलग हनुमान ॥ दास्य भक्तीने ह्रदय अर्पिले
रामचंद्रासी अंकीत केले
अंजनीसूत महाबली तू
धीरोदत्त बलवान॥जीवीचा जीवलग
गगनी गेला भुभुकार केला
तेजस गोळ्यास धरू लागला
पाहूनी त्याच्याअचाट कृतीला त्रिभुवन थरथरे खास॥ जीवीचे जीवलग ...
इंद्र खुण ही मुखी शोभे
द्रोणागीरी तो हाती विराजे
लक्षुमणास संजीवनी लेऊनी
काळासही धरी हा खास॥
जीवीचा जीवलग ...
प्रभुची आज्ञा शिरोवंद्य ती
उल्लुघुनी समुद्रा लंकादहसी
अशोकावटी जानकीस तू दावीसी ह्रदय खूण आज ॥ जीवीचा जीवलग ...
पराक्रमाच्या अनेक गोष्टी
देव,भक्त, वीर अनेक गाती
आर्ततेने आज मागतो मी
दास्यभक्तीचे गुज खास॥जीवीचा जीवलग .....
भक्तांचा तुज काज म्हणसी
राम ह्रदय ही तुझाच पाशी
मग पूरवी रे ही आस माझी
हे वायुपत्र हनुमान॥ 😢जीवीचा जीवलग राम माझा तुझा जिवलग हनुमान🌹
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३७-
सबंध परिक्रमेत काय माहीत नाही पण सदगुरुनाच माझी काळजी असावी म्हणून की काय किंवा माझे आराध्य दैवत प्रभु रामचंद्र आहेत त्यामुळे मला त्यांचा विरह फार जाणवू नये म्हणून की काय पण खूप ठिकाणी आमाची मुक्कामाची व भोजन प्रसादीची सोय ही श्री रामचंद्रांच्या मंदीरात किंवा हनुमतांच्या मंदीरात झाली. त्यामुळे आपल्याला जशी त्यांची ओढ़ आहे, प्रेम आहे तसेच त्यांनाही आपण त्यांच्या जवळ असावे असे वाटत असावे या कल्पनेनेच मी खूप आनंदीत होत असे . माझ्या तोडक्या मोडक्या भक्तिचा देखावाही ते गोड मानून घेत आहेत हे आठवून मनं भरून येई
इथेही सकाळी लवकर ऊठून खालच्या ओढयातील थंडगार जलधाराशी खेळत आम्ही स्नानाचा परत वेगळा आनंद घेतला. पाऊसामुळे हवेत चांगलाच गारठा आला होता. माईच्या किनारी किंवा असे ओढ्यावरती स्नान करताना मला जितकी थंडी पाण्यात असताना वाजत नसे तितकी थंडी पाण्यातून बाहेर पडल्यावर वाजत असे. थंडीने मी नुसता कुडकुडून जात असे .ती पाच दहा मिनीटे मला अगदी नकोशी हाऊन जात. कोरडे कपडे घातल्यावर माझ्या जीवात जरा जीव यई. पुढे पुढे थंडीचा जोर जसा वाढत गेला तसे सकाळच्या स्नानांनंतर पाण्याच्या थंडगार स्पर्शाने व थंड पडलेल्या कोब्यामुळे किंवा फरशांमुळे तळपायातून इतक्या जबरदस्त सणका मारीत की काही विचारायची सोय नसे. पायाला पडलेल्या भेगा त्यात अजून भर घालीत. मग जरा वेळ पायाचे तळवे कपडयात गुंडाळून ठेवण्याशिवाय मला काही गत्यंतर नसे.
परिक्रमेत प्रत्येक दिवशी माई एक वेगळा आनंद अनुभवास देत असे त्यामुळेच की काय एकदा माणूस इथे आला की तिच्या कायमचा प्रेमात पडतो. माईची पुजा , आरती व मारुतियांना वंदन करून आम्ही सकाळी साडेसहाला त्या आश्रमाचा निरोप घेतला. तत्पूर्वी निघताना परत एकदा मारूतीरायांना डोळे भरून पाहून घेतले व आईच्या नित्यापासनेतील ओवीची आठवण झाली, आई सांगतात
आपुला म्हणोनी एकवार मज
कृपादृष्टीने पाही हरी॥
जवळी घेउनि मुख कुरवाळूनि, अपराध माझे साही हरी॥ दूसऱ्या ठिकाणी तर ही तळमळ इतक्या सुंदर शब्दात वक्त झाली आहे , आई म्हणतात
आपला म्हणूनि जवळी बसवुनी, एकवारं मुख कुरवाळशील ना?, बहू जन्मीची आस .पुरवुुनी , तळमळ माझी घालवशील ना? देवाशी तळमळीने व आर्तपणे गुजगोष्टी करणाऱ्या किती यर्थाथ ओव्या आहेत ना या ? चालताना याच विचारांची एक लय मनात चालू झाली . इतके आर्तपणे , प्रेमळपणे त्या परमात्म्याला आळवले गेले किंवा त्याच्याशी संभाषण झाले तर का नाही भेटणार हो तो?. प्रेमळ वागण्याने व संभाषाणाने माणूसही जिथे वश होतो तिथे हा परम दयाळू परमात्मा !तो तर नक्कीच भेटणार. हेच धडे सदगुरू आपल्याला त्यांच्या बोधतून कायम देत असतात पण माझ्यासारखा ते नेहमी वाचतो ही पण अजून आचरणात आणणे काही जमलेले नाही.
खरतर आपल्या आत असलेल्या त्या परमेश्वराला तर जाणायचे आहे पण तो ही फक्त निर्मळ मन ,शुध्द अतःकरण म्हणजेच निष्कपट प्रेम करणाऱ्यालाच भेटतो. म्हणून सदगुरुंना मी नेहमी विनवणी करतो की आई, अशी आर्त हाक माझ्याकडून आपल्यालाही मारली जावी की जेणे करून आपण माझेे बोट धरून या भवसागररूपी नदीच्या पैलतिरावर मला नक्कीच घेऊन जाल कारण ही गोष्ट आपल्या सहाय्या शिवाय कुणासही साध्य होणारी नाही.
दूपारपर्यंत आम्ही असेच चालत होतो कधी उंच सखल मातीच्या रस्तावरून, कधी छोटेसे ओहोळ पार करून. दूपारी परत कालचाच शबरी सेवा समितीचा कार्यकर्ता आम्ही एका घरापाशी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो तैव्हा त्याच्या सहकाऱ्याबरोबर भेटला. आम्हाला तो म्हणाला " आप इधर बॅग रखकर अंदर जाके आरामसे पानी पिके आ जाईये, तब तक हम आपके सॅग को संभालते है " बराच वेळ आम्हीही बॅगा न काढल्याने पाठीला चांगलीच रग लागली असल्याने आमच्या सॅग त्याच्यापाशी ठेऊन आम्ही आत पाणी पिण्यास गेलो. आम्ही पाणी पिऊन परत येईपर्यंत त्या दोघांनी आमच्या दोन सॅग त्यांच्या पाठीला व एक सॅग मोटारबाईकच्या हँडलला अडकवलेली आम्हास दिसली. आम्ही सॅग त्यांच्यांकडे मागीतल्यावर तो म्हणाला ' इतनी तो माई के परिक्रमावासीयोंकी सेवा करने का मौका दे दो, परिक्रमा नही कमसे कम सेवाका आनंद तो हमे लेने दो" ' तरीही आम्ही परत त्याच्याकडे सॅग मागीतल्या व त्याला म्हणालो ' अरे नहीं भाई, हम परिक्रमा है , हमारी बँग , दंड,कमंडल हमे हमारे साथही लेके चलना है, यह परिक्रमा का नियम है ' त्यावर तो म्हणाला " आज मै आपकी कुछ नही सुनुगा , आपका आज का विश्राम किधर ' माथासर' है ना? आप तिनोंकी सॅग, दंड और कमंडल मै स्वयः वहाँ लेके आता हूँ " तो काही आम्ही सांगीतलेले ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता त्यामुळे मग त्याच्याकडून आमचे दंड व कमंडल मात्र आम्ही आमच्याकडे मागून घेतले. आमचा निरोप घेत तो साथीदारासह मोटार बाईक वरून पुढे निघून गेला.
ही पण तिचीच लिला किवा इच्छा असे समजून आम्हीही परत चालण्यास सुरवात केली. आता पाठीवर सॅग नसल्याने आमचेही चालणे भराभर हाऊ लागले. आज संध्याकाळपर्यंत आम्हालाही माथासर पर्यंतचा टप्पा पार करयचा होता. तिथे विश्रमाची सोय त्या गावच्या सरपंचाच्या घरी होते असे कळले होते. पाठीवर ओझे नसल्याने आम्हीही मधून मधून येणारे खूप चढाव असलेले रस्ते अगदी सहज पार करत त्या सरपंचाच्या घरी साडेपाच पर्यंत पोहचलो. आम्ही पोहचल्यानंतर साधारण अर्ध्या तासानी ते दोघे कार्यकर्तेही बाईकवरून तिथे पोहचले. आमची त्यां गावच्या सरपंचाशी भेट झाल्यावरच त्या दोघांनी आमची रजा घेतली. थोडयाच वेळाने गोव्याचे तीन परिक्रमावासीही तिथे आले आमची व त्यांची सोयं त्यांनी एका बाजूच्या खोलीत केली व नंतर आलेल्या बाकी सगळ्या परिक्रमावासीयांची सोय त्याने त्याच्या घराच्या मोठया हॉलमधे केली.आम्हाला दिलेल्या खोलीचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते पण आसऱ्यास जागा उत्तम असल्याने आम्हीही तिथे आसने लावून स्नान केले व माईची पुजा ,आरती केली . नंतर गोव्याच्या परिक्रमावासीयांबरोबर परिक्रमेच्या मार्गाबद्दल थोडया गप्पा झाल्या . त्या गोव्याच्या प्रारिक्रमावासीयांतील दोन परिक्रमावासी पासष्ट ते सत्तरीतील होते वं त्याच्या बरोबर असलेल्या भगिनी साधारणपणे आमच्या वयाच्या होत्या.त्यांच्या बोलण्यावरून त्या भगिनी या दोन्ही वयस्कर परिक्रमावासीयांची काळजी खूप मायेने घेत होत्या. मला त्यांचे खूप कौतुक वाटले कारण त्या परिक्रमा तर करत होत्याच पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबरच्या वयस्कर परिक्रमावासीयांची आपलेपणाने सेवा व काळजीही घेत होत्या व ते खरच वाखाणण्याजोगे होते. थोडया वेळाने आमची भोजन प्रसादी झाली व त्यानंतर उद्याचा परिक्रमा मार्गाची आम्ही थोडी चर्चा केली.उद्यां खऱ्या अर्थाने शुलपाणी संपून आम्ही नवीन शुलपाणेश्वराचे दर्शन घेणार होतो. त्यामुळे पाहुया पुढच्या भागात काय झाले ते कारण एक विचित्र घटना उद्या घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही आम्हाला तेव्हा नव्हती. नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३८
माथासर हे नावाप्रमाणेच थोडे उंच ठिकाणी वसलेले गाव , आदल्यां दिवशी रात्री झोपतानाच जेव्हा आमची पुढच्या मार्गाची चर्चा झाली तेव्हाच उदयने आम्हाला सांगीतले की उद्या आपल्याला नेहमीपेक्षा थोड़े ऊशीरा निघावे लागेल कारण मधाला रस्ता थोडा घनदाट झाडीचा वं उंच सखल असा आहे त्यामुळे सकाळी पूर्ण उजाडल्यावरच आपण इथून पुढे जाण्यास निघू .त्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे माईची पुजा आरती करून आम्ही सव्वासातला सुमारास चहाची हरिहर करून सरपंचाच्या घरातून पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ झालो. आजचा टप्पा होता माथासर ते गोरा कॉलनी नवीन शूलंपाणेश्वर मंदीर .मगाशी म्हंटल्याप्रमाणे आजचा प्रवास बराच चढ ऊताराचा , दाट झाडीचा होता. कधी मधेच सकाळचे गाई म्हशींचे कळप चरावयास निघाले असल्याने त्यांना आम्हाला रस्त्याच्या बाजूला थांबून वाट मोकळी करून द्यावी लागे. विशेतः हया म्हशींची खूप मजा येई ,परिक्रमा वासीयांच्या पहेरावामुळे की काय कोण जाणो पण त्या आम्हाला बघून सैरावैरा पळत सुटत ,त्यामुळे त्यां गुराख्यांना त्यांना सांभाळणे खूप कठीण जाई. त्यामुळे त्यांचा आदर ठेवत आम्ही रस्ताच्या बाजूला ऊभे राहून त्या पुढे मार्गस्थ झाल्या की मार्गक्रमण करत असू. कधी कधी माझे वं उदयनचे या म्हशींवरून खूप विनोद होत. कारण त्या काही वेळा इतक्यां रमत गमत चालत व त्यांच्या चेहऱ्यावर वं डोळ्यात असलेल्या भावांमुळे की काय कधी कधी आम्हाला एखादया लग्नाच्या वऱ्हाडाची आठवण हाई. मग मुलाकडले मुलीकडले त्यात कोण कुणाचे नातेवाईक असतील यावर आमचे विनोद होउन सहजच पु.ल.च्या कथाकथनातील विनोदांची आठवण होई. साधारणपणे दीड तासानंतर आम्ही एका खूप दाट झाडी असलेल्या पाऊलवाटेने चालू लागलो. खूप झाडी व चढ ऊताराचा रस्ता असल्याने आज आम्ही तिघे मागे पुढे न चालता एकमेकांबरोबरच चालत होतो. तेव्हा रस्ताच्या एका बाजूला दोन श्वान उभे असलेले दृष्टीस पडले. एक पांढरा व तपकिरी रंगाचा उंच व दूसरा काळ्या रंगांचा. त्यांना लाबून बघूनच उदयन थोडा मागे झाला😄उदयनचे श्वानप्रेम म्हणजे काय विचारायची सोय नाही.इतके की डोंबिवलीतही आम्ही रस्ताच्या ज्या बाजूनी चालत असू त्या बाजूला जर लांबवर एखादा श्वान दृष्टीस पडला तरी तो मला घेउन रस्ताच्या विरूध्द बाजूने
चालत असे, इतके त्याला त्यांच्या बदल प्रेम. कारण सगळे श्वान आपल्याकडे बघून भूकंत असतात यावर त्याचा ठाम विश्वास .😄 त्यामुळे आता चालताना मी पुढे (एकदा कुत्रा चावण्याचा अनुभव येऊन सुध्दा😄 ) मधे उदयन आणी मागे बापू असे आमचे चालणे सुरू झाले. सकाळचे सगळे नित्याचे म्हणणे झाले असल्याने आम्ही निर्सगाचा आनंद घेत मार्गक्रमण करत होतो. पंधरा वीस मिनीटांनी मी सहज मागे वळून बघितले तर ते दोन्ही श्वान आमच्या मागोमाग येत असलेले मला दिसले. त्यातील पांढऱ्या तपकीरी रंगांच्या श्वानात एक वेगळीच चमक होती उंच , शिडशिडीत पण एक वेगळाच ऐट किवा चमक. परत दहां मिनीटांनी बघीतले तर तेव्हाही ते आमच्या पाठोपाठ येत असलेले मला दिसले. मनात विचार केला असतील जवळपासच्या गावातील पाळलेली , त्यांची हद्द संपली की जातील नाही यायचे ते पुढे. कारण त्यांचे ही काही अलिखीत नियमं असतात व त्यानूसार ते वागतात. त्यानंतर पंधरा मिनीटांनी त्यातील काळा श्वान मात्र गायब झाला आता पांढरा तपाकिरी रंगांचा श्वान मात्र आमच्या मागोमाग चालत येत असलेला मात्र दिसत होता.
आता मात्र माझे लक्ष सहजच सारखे मागे जाऊ लागले. उदयनला ही गोष्ट सांगीतल्यानंतर तो लगेच म्हणाला "तु कशाला सारखा मागे बघतोस ,जाईल तो ' आपल्याकडील बिस्कीटे वगैरे काही त्याला आता देत बसू नकोस नाही तर तो सारखाच आपल्या मागे यईल " खर तर त्यावेळी आमच्या कुणाकडेच बिस्कीटे किंवा तस्तम खाण्याचे काहीच नसल्याने त्याला काही देण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर तो आमच्या बरोबर कधी मागे, पुढे असाच चालत होता.कधी कुठल्या झुडपात जाई तिथे हुंगल्यासारखे करून परत यई. आमच्या मागे पुढे असेच त्याचे चालणे चालू झाले. कधी चढ आला व आमचा चालण्याचा वेग कमी झाला तर भरभर पुढे धावत जाऊन आमच्यासाठी पुढे थांबून राहत असे.आता मात्र मला या गोष्टीचे खूप आश्चर्य व कुतुहूलही वाटू लागले, कारण नाही त्याची आमची काही आळेख किवा परिचय, हल्ली ओळखीची माणसे सुद्धा रस्ताने चालताना आपल्याच नादात चालत असल्या सारखे दाखवत ओळख दाखवत नाहीत ,हा तर प्राणी तरीही तो आम्हा परिक्रमावासीयांबरोबर आता दोन तास झाले तरी साथ देत होता. नक्कीच आमचे त्याचे गत जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत त्यामुळे त्याला आमच्या बरोबर यावे असे वाटत असावे.
सहजचं मला आमच्या चार वर्षापूर्वी झालेल्या आमच्या मोरगावच्या द्वारयात्रेची आठवण झाली व त्यातील चौथ्या द्वाराचे चित्रच डोळ्यासमोर आले. कारण मोरगावच्या द्वार यात्रेत चौथ्या द्वाराला आम्हाला अशाच ऐका श्वानने जवळ जवळ द्वार यात्रेच्या त्या मार्गाच्या ८५ % भागात अशीच साथ दिली होती. त्या दिवशीचा मोक्ष द्वाराचा चालण्याचा टप्पांही मोठा म्हणजे जवळ जवळ सोळा सतरा किलोमीटरचा होता. मोरगावंहून बाप्पाचे दर्शन घेउन आम्ही सकाळी सात वाजता त्या द्वारासाठी मार्गस्थ झालो होतो. त्या द्वाराच्या मार्गावर सकाळी ९ वाजल्या पासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत म्हणजेच मोरगावला परत येईस्तो पर्यंत आमच्या बरोबर चालत येउन त्या श्वानाने आमच्या बरोबर त्या द्वाराची यात्राही अशा प्रकारे पूर्ण केली होती.
मोरगावच्या द्वार यात्रेत भेटलेला हा श्वान कुणीतरी पाळलेला असावा कारण त्याचे कान एका विशिष्ट कोनात कट केलेले होते ,असाच उंच , ऐटबाज असा होता. द्वारयात्रेतील आधीच्या तीन द्वारांचा श्वांनांचा अनुभव याच्या अगदी विरूध्द होता. कारण या तिन्ही द्वारांच्या मार्गावर आम्ही सोवळे नेसून चालत असल्याने आमच्या पहेरावामुळे , उदयन व अजून एक साथीदार कुलदीप यांनी नेसलेल्या लाल रंगांच्या सोवळ्यामुळे त्या मार्गावरील छोटया छोटया गावातून जात असताना तिथले श्वान आमच्या अंगावर भुंकत तरी किवा सरळ अंगावर धावून तरी येत असत. पणं आजच्या द्वार यात्रेतील या द्वाराचे चित्र एकदम उलटे होते हा श्वान आमच्या बरोबर आमच्या एखादया ओळखीच्या साथीदाराप्रमाणे चालत होता. छोट्या गावातून जाताना हाच त्या इतर श्वानांच्या अंगावर धाऊन जाई त्यामुळे ते त्याच्याशीच भांडत व आम्ही त्या द्वाराचा रस्ता अगदी निर्धास्तपणे चालत जात होतो. अजून एक वैशिष्ठ म्हणजे त्या द्वाराच्या मार्गावर इतर देवतांची छोटी छोटी मंदीर आहेत वं त्यांची पुजा ,दर्शन व नैवेद्य दाखवून मगच पुढे जायचे हा नियम असल्याने प्रत्येक ठिकाणी साधारणपणे दहा ते पंधरा मीनीटे असे चार ते पाच ठिकाणी आम्ही थांबलो होतो तेव्हाही हा श्वानही तिथेही बाहेर थांबून राही व आम्ही निघालो की आमच्या बरोबर परत चालत यई. खरं तर त्याला खायला देण्यासारखे ही आमच्याकडे काही नव्हते कारण मोरगावच्या द्वार यात्रेत चारही दिवस उपवास असतो व मोरगावला महाराजांच्या घरी येऊनच आम्ही तो फराळ करून सोडत होतो .त्यामुळे त्याला खायला देण्यासारखेही आमच्याकडे काहीच नव्हते. मोक्ष द्वाराच्या शेवटी बाप्पाच्या देवळात तर आम्ही जवळ जवळ अर्धा पाऊण तास पुजा, अर्थवशीष्य आरतीसाठी थांबलो होता तेव्हाही हा पठ्ठया मंदीराच्या बाहेर आमची वाट बघत तसाच बसला. तेव्हा मात्र आम्ही त्याला तिथल्या दुकानातून बिस्कीटचे पुडे विकत घेऊन भरवले होते कारण आमचा जरी उपवास होतो तरी त्याला अजून उपाशी ठेवणे हे काही मनाला पटत नव्हते.आम्ही परत मोरगावला येण्यासाठी निघालो तेव्हाही आमच्या बरोबर तो मोरगाव पर्यंत तसाच चालत आला होता. परती मार्गावर परत एकादा दोन तासानी एका गावातील छोटया दूकानात त्याच्यासाठी बिस्कीटे विकत घेतली तेव्हा त्या दुकानदाराने प्रथम त्याचे पैसे घेतले पण आम्ही ती बिस्किटे स्वतः न खाता त्याला खायला देत आहोत व सकाळपासून हा आमच्याबरोबर मोरगावच्या यात्रेतील हे द्वार चालत आला आहे हे कळल्यावर त्यांनी माझ्याकडून घेतलेले पैसे परत केलेले मला आजही स्मरणात आहे. बप्पा किती दयाळू बघा, नकळतपणे त्याच्याकडून झालेल्या पुण्यामुळे त्यानी त्याला ऊपाशीही ठेवले नाही वं आम्ही द्वार यात्रा करत आहोत म्हणून आम्हाला त्या दहावीस रुपायांचीही तोषीष पडू दिली नाही.
शेवटी मोरगावात परत आल्यावर आमची जिथे निवासासाठी सोय झाली होती त्यांना हा आलेला आवडणार नाही हे जाणून आम्हीच त्याची नजर चुंकवून एका छोटया गल्लीतून आमच्या निवास स्थानापर्यंत पोहचलों होतो.
त्यामुळे आता या परिक्रमा मार्गातील श्वानाचा प्रवास आमच्याबरोबर किती काळापर्यंत होता हे तेव्हा माईलाच माहीत होते त्यामुळे आम्ही परिक्रमा मार्ग चालत होतो तोही आम्हाला साथ देत आमच्या बरोबर दूपारी बारा वाजेपर्यंत चालत होता. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास आमच्या बरोबर किती वेळ वं कुठपर्यंत झाला हे पाहू आपण पुढच्या भागात तोपर्यत हर हर नर्मदे.
नर्मदा परिक्रमा अनुभव भाग ३९-
सकाळी नऊ वाजल्यापासून ते आता साडेअकरा पर्यंत तो मुक जीव आमच्या बरोबर परिक्रमा मार्ग चालत होता.तेव्हा सहजच मनात मधे आईंनी नित्योपासनेत लिहीलेल्या ओव्या किती सार्थ आहेत याची खात्री पटली.
आई सांगतात
विश्वामाजी नटूनी नाटक ,दाविसी तु मधूकैटभारि॥ झालास पाषाण, वृक्ष, कृमी, पशु पक्षी आणी नरनारी ॥
सुर रूपे तुं स्वर्गलोकी, करिसी सदा अमृत पान I अप्सरा होऊनी गासी नाचसी , करिसी सुरांचे मनरंजन॥
मानवरूपे मर्त्य लोकी सुखदुःखाते भोगीसी Iदानवरूप धारण करूनी,पाताळी तू राहसी
पक्षी रूपे किलबील करसी, उडसी गगनात हरी I पशुरूपे वनात फिरसी, गिरी गुहेत राहसि हरी
जलचर होऊनी निशिदीनी खेळसी, रमसी जलामाजी हरिI
कीटकरूपे फुलामाजी तू, आवडीने मध सेविली हरी॥
वृक्ष होउनि पर्ण पुष्प-फल, भारे हालसी तू हरी | गर्वं रहित होउनी निरंतर , ब्रम्हानंदी डोलसी हरी॥
दृष्य तुचि दृष्टा तुचि,असूनि सुखदुःख भोगिसी हरी I सर्वं कर्ता करविता असूनि, जगन्नाटक दाविसी हरि॥
चराचरात व्यापलेल्या त्या परमतत्वाचे या जगतजननी केलेले इतके अचूक वर्णन आठवून मन आंनंदाने भरून आले.
असाच एक त्याचा अंश आज आमच्याबरोबर चालत होता याचा आनंदही झाला.
लांबवर झरवाणीचा माईचा वाहत असलेला प्रवाह मनाला एक वेगळ्याच सौंदर्याची जाणीव करून देत होता.आता बराचसा भाग डोंगराळ पण उताराचा असल्याने चालण्याचा शीण असा जाणवत नव्हता.
मनातून त्या जीवाचे खूप कौतुकही वाटत होते कारण मनुष्य जन्मात कित्येक जणांचे ठरवूनही चालत परिक्रमेचे स्वप्न पूर्ण होत नाही आणी हा पठ्ठया आमच्याबरोबर त्याला कुणीही न सांगता , परिक्रमेचे असलेले महत्व न जाणूनही आमच्या बरोबर परिक्रमा मार्ग चालत होता, खरच त्यां परमेश्वराची लीला काही अगाध आहे!
त्याच वेळी मनातून खूप वाईटही वाटत होते की त्या भुकेल्याला द्यायला आता आपल्याकडे काहीच नाही पणआमच्या मनातील ही तळमळ त्या ईंश्वराला कळला की काय कोण जाणे पण लगेचच त्या रस्त्याच्या बाजूला एका टेकाडावर दूकानवजा छोटी टपरी दिसली. तिथून आता नवीन शुलपाणेश्वर मंदीर साधारण अर्धापाऊण तासाच्या अंतरावर आहे अशी माहीती आमच्या टीम लीडरने दिली. 😊
इतक्यात टपरीतून हाक आली " बाबाजी चाय की हरिहर , आ जाओ बाबाजी चाय पिने ' सकाळपासून आमचेंही काहीं उदरभरण झाले नसल्याने आम्ही लगेच मोर्चा त्यां दुकानापाशी वळवला. चहा येईस्तोपर्यंत सॅगमधून मिळालेल्या पैशातून दोन तीन पारले -जी चे पुडे घेतले कारण आता त्या जीवाला काही दिल्याशिवाय आमच्या घशाखाली काही ऊतरणार नव्हते. दूकानवजां टपरी थोडी उंचावर होती , हा पठ्ठया एखादया शहाण्या मुलाप्रमाणे खालीच उभा होता. तोंडाने आवाज करून त्याला वर बोलवले व भरपूर बिस्किटें खायला दिली त्याला असे खाताना बघून मन एका वेगळ्याच समाधानाने भरून गेले. चह आला पोटात सकाळपासून काहीच नसल्याने अजून एक पारले जीचा पुडा आमच्या तिघांसाठी घेतला. चहा बिस्किट असे पोटात ढकलून आम्ही परत सँग पाठीला लावल्या. आता तो श्वान परत आपल्या मागे येणार नाही कारण आपण त्याला आता खायला मिळाले आहे म्हणजे आता त्याचे व आपलेही काम झाले यां मनुष्य स्वभावाला अनुसरून आम्ही पुढचा मार्ग चालू लागलो. कारण शुलपाणेश्वराचे दर्शन घेउन आजचा मुक्काम तिथुन पुढे असलेल्या वसंतपूराच्या आनंद आश्रय धाम या राजराजेश्वरी मंदीरात करावयाचा होता.
पाच ते दहा मीनटे आम्ही चाललो असू तर हे महाशय परत आमच्या बरोबर चालू लागले. 'अरे आता दिले ना तुला खायला? आता परत का पाठी येतो आहेस् ' सहज माणसाशी बोलावे तसे वाक्यं निघून गेले. म्हणजे आपल्याकडून काही तरी खायला मिळेल म्हणून हा आपल्या मागे येत आहे हा गोड गैरसमज ही आता दूर झाला व आपण किती तोकड़ा विचार करतो या जाणिवेने खर तर लाज वाटली. थोडया वेळात आम्ही नवीन शुलपाणेश्वराच्या मंदीरापाशी पोहचलो.
अतिशय सुंदर व रेखीव पध्दतीने बाहेरून दिसत असलेले हे मंदीर बघून मनाल खूप प्रसन्न झाले. जूने मंदीर आता धरणाच्या पाण्यामुळे माईच्या प्रवाहात जलमय झालेले असल्याने या नवीन मंदीराची उभारणी झाली आहे. महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही मंदीरात शिरलो तेव्हा आता तरी हा पठ्ठया आत येणार नाही असा मी कयास केला. आम्ही दूपारच्या रणरणत्या उन्हातून मंदीराच्या गाभ्यारात शिरलो व मनाला एक वेगळाच शांत थंडपणा जाणवला. शिवपिंडी अतिशय सुंदरपणे सजवलेली होती .आंईंचे प्रवचनातील वाक्यं आठवले शीवपिंडी म्हणजे तरी काय ?त्या परमेश्वराचे निर्गण निराकार रूप. दृष्य रूपातून तुला या निर्गण रूपाकडे जायचे आहे हे दाखवणारे प्रतीक. खरच संत किती सोप्या वं साध्या शब्दात माझ्या सारख्या सामान्य जनांला ही खऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याचा प्रयत्न करतात ना. ही त्या आईची आपल्या लेकरांसाठी असलेली तळमळ बघून मन आनंदाने भरून आले . थोडे त्या पद्धतीने विचार करत गाभाऱ्यातच बसून राहीलो.
थोडयावेळाने गाभाऱ्यातून बाहेर सभा मंडपात आलो तर तिथे हे महाशय परत दत्त म्हणून हजर होते.
आता आम्ही तिथे न थांबता पुढे वसंतपूराला असलेल्या आनंद आश्रय़ या आश्रमाच्या दिशिने चालू लागलो. दूपारचे ऊनाचा फटकारा चांगलाच जाणवत होता, सकाळपासून पोटात घोटभर चहा वं चार बिस्किटे एवढेच असल्याने भुकेची जाणीवही चांगल्या पैकी जाणवत होती. उदयने सांगीतले होते की तिथुन आश्रम जवळ आहे ,त्यामुळे " जवळ " या शब्दाचा खरा अर्थ घेऊन मी त्याच्या मागे चालत होतो, माईच्या किनाऱ्याने जायचे असल्याने सगळा रस्ता आता बारीक वाळूचा होता, त्यामुळे पाय ही त्या वाळूत रुतत असल्याने चालण्याचा वेगही कमी होऊ लागला होता. हे पाव्हणे तर आमच्या बरोबर येतच होते. आता मनात प्रश्न होता की आपण आश्रमात गेल्यावर हा तिथेही मंदीराप्रमाणे आवारात आला तर काय करायचे. उदयनने गेल्या परिक्रेमत इथेच विश्राम केला असल्याने आम्ही त्याच्या मागे चालत होतो. त्यातच ऊदयने असे ही सांगीतले होते की आपण त्यांच्या भोजन प्रसादीच्या वेळेत गेलो तरच आपल्याला भोजन प्रसादी मिळेल. त्यामुळे भराभर पाऊले टाकत आम्ही तो वाळुतील रस्ता तुडवत चाललो होतो. तोंडाने नामस्मरण बंद झाले होते😃 कारण वेध सगळे आश्रम व भोजनाचे लागले होते.
जवळजवळ अर्धा पाऊण तासानी आम्ही आश्रम जवळ पोहोचलो, अतिशय सुंदर स्वच्छ आवार असलेले तो आश्रम बघून हरिमंदीराची आठवण झाली. काय माहीत नाही पण ते महाशय मागे मात्र दिसत नव्हते त्यामुळे गेटचे दार उघडून लगेच गेट परत बंद करून आम्ही आश्रमात शिरलो. बोहरच्या भितींवरच छानसा गणपती बाप्पाची मुर्ती बघून सगळी मरगळ निघून गेली. इतक्यात एक सेवेकरी आला व म्हणाला " आप जल्दी से हात, मुँह धो कर आ जाईये भोजन प्रसादी तैयार है. " मनाला खर सागु खूप हायसे वाटले😊. आत हॉल मध्दे पंगत मांडलेलीच होती, त्यामुळे आम्हीही आमच्या सॅग, कमंडलू , दंड हॉलच्या बाहेरच्या ऐका कोपऱ्यात ठेऊन ,हातपाय तोड स्वच्छ धुऊन राजराजेश्वरी मंदीराच्या हॉल मधे शिरलो व माडलेल्या चटईच्या पट्यावर स्थानपन्न झालो. दोन मिनीटात संपूर्ण परिपर्ण भरलेले ताट आमच्या समोर आले व ते बघूनच खर तर अर्ध पोट भरले कारण अगदी भज्यापासून ते दोन भाज्या, आमटी, लोणचे भात वरण व एक गोड असे जेवण समोर आले.त्यां सेवेकऱ्याने आता सुरू करा असेही आम्हास सांगीतले , हरिमंदीरात म्हणत असलेला श्लोक मनातल्या मनात म्हंटला व पहिला घास तोंडांत घेणार इतक्यात त्याची परत आठवण आली, अरे तो बाहेर आला असेल तर, त्याला न देता आपण खायचे? काही सुचेना , काय करूया?शेवटी उदयनला म्हंटले त्यां सेवकऱ्याना विचार रे की बाहेर आमच्या मागे एक श्वान माथासरहून इथपर्यंत आला आहे त्याला थोडी पोळी देता का?उदयनच्याही मनात त्यावेळी हीच गोष्ट येत असल्याने त्यानेही मी म्हंटल्यावर लगेच एका वाढणाऱ्या सेवेकऱ्याला आमच्या जवळ बोलाविले, कारण आता पानावरून उठणे योग्य नव्हते, किंवा आपल्या पानातील अन्न त्याला बाहेर जाऊन देणे ही गोष्ट ही आश्रमातील लोकांना खटकू शकत होती. उदयनने त्याच्या मार्दव स्वरात त्यांना ही अडचण सांगितल्यावर तो ही लगेच म्हणाला " हा हा, क्यु नही, मै बाहर जाकर देखाता हूँ , और वो रहेगा तो ऊसको भी चपाती खिलाता हूँ, आप निश्चिंत हो कर भोजन प्रसादी ग्रहण करो ,मै अभी देखता हूँ " लगेच तो एका वाडग्यात फुलके घेऊन बाहेर गेला.
मनाला खूप आनंद झाला माईचे मनोमन आभार मानले व प्रसाद ग्रहण करण्यास सुरवात केली.
पाच मिनीटांनी त्याने आम्हाला सांगीतले की त्याला मी पाच फुलके वाढले वं त्यानेही ते लगेच खाल्ले. परत मनाला हायसे वाटले, आता निश्चिंत पणाने आम्ही भोजन प्रसादीचा आस्वाद घेत होतो, कारण खूप दिवासानी असे भोजन स्वरूप प्रसाद मिळाला होता.
आमचे जेवण संपतच आले होते शेवटचा भाताचा घासच मी खात होतो तेव्हा अचानक श्वानाचा कर्शक ओरडून रडण्यासारखा किंवा जोरात " क्यां क्यां "करत केकाटण्याचा आवाज आला. दोन मिनीटे मला काही कळेच ना, एकदा वाटले की हा आश्रमात कुठेतरी आत घुसला व त्याला कुणीतरी मारले असावे.
जेवण झाले व आश्रमातील सेवकेरी आमच्या जवळ सांगत आला की "आपके साथ जो कुत्ता आया था उसके मुँह के उपर से गाडी का पैया चला गया व अब वो जिदा नही रहेगा"
हे ऐकले आणी छातीत एकदम धस्स झाले. अरे काय हे, हा आमच्या बरोबर माथासरहून इथे येतो काय आणी त्याच्या वाटेला हे येते काय ?
मनाने आम्ही खूप खट्टू झालो, बाहेर गेलो पण तो पर्यंत तो जवळच्या कुठल्या झुडपात गेला असा तो बाहेरचा सेवकरी सांगू लागला. आता त्याचा आवाजही कुठुन येत नव्हता. पण तो सवेकरी म्हणाला " अब असकी बचने की काई गुंजाइश नही , वो ये कार के पीछे के दाहिने पैये के टायर के पास कुछ सुंघने के लिये गया , अंदर ड्रायवर को कुछ मालूम नही था, उसने गाडी पिछे ले ली और गाडी का पिछला टायर ऊसके मुहॅ के ऊपर से चला गया " ऐकूनच खूप वाईट वाटले, त्या लोकांनी त्याच्या रक्तानी भरलेली फरशी नुकतिच साफ केली होती.
आता मात्र खूप हळहळ वाटू लागली , आपल्यामुळे तो आज मरणाच्या दारात उभा आहे, तो जर आज आमच्या बरोबर आला नसता तर वर कुठे तरी छान राहीला असता, मनात माईला ही म्हंटले की ' माई का गं असे व्हावे, आमचे काही चूकले का ? तेवढयात तिथला सेवेकरी आम्हाला म्हणाला की "आपके रहने की जगह आपको दिखाता हूँ " विष्पण मनाने त्याच्या मागे चालू लागलो, डोळ्यासमोरून तो आमचा साथीदार जात नव्हता. सॅग, कमंडलू व दंडा घेऊन आश्रमाच्या खोली पाशी पोहचलो. सेवकरी खोलीची चावी देऊन गेला, दरवाजा उघडणारा इतक्यात बाजूच्या खोलीत राहत असलेला एक म्हातारा परिक्रमावासी ओरडला " आपको समजता नही, आप परिक्रमा है, कुत्ते को आप आपके साथ लेकर कैसे परिक्रमा करते हो, ?आपको समझना चाहीये परिक्रमा के नियम"
आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही तो काही आमचे सांगीतलेले ऐकण्याच्या मन :स्थीतीत नव्हता वं खर सांगायचे तर आम्हालाही झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत होते, कुठे तरी आत टोचणी वाटत होती की आपल्यामुळे हे सगळे झाले.
पण ही सल माईने त्या संध्याकाळीच कशी दूर केली ते पाहू आपण पुढच्या भागात, तो पर्यंत हर हर नर्मदे.
नर्मदा परिक्रमा अनुभव ४० -
आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे दूपारी आम्ही आश्रमाने दिलेल्या निवासस्थानात थोडा वेळ विश्रांती घेतली. कारण सकाळपासून आज बरेच चालणे झाले होते, तसेच पोट भरून झालेले प्रसादाचे जेवण व त्यानंतर झालेला तो श्वानाचा असा शेवट त्यामुळे थोडा वेळ शांतपणे डोळे मीटून बसल्याशिवायं किवा पडल्याशिवाय मनाला शांतता मिळणार नव्हती.. मनाला कितीही पटवले असले की कुठलाही देह हा नश्वर आहे आणी त्याला कधी ना कधी ह्या जगातून जावेच लागते तरीही आपण एखादयाला आपले मानले की त्याचे जाणे मनाला जसे क्लेशदायक होते तसेच वाईट यां श्वानाला आपले मानल्याने झाले होते. खरतर आमचा संबंध किती ? फक्त चारपाच तासांचा ,पण त्यांचे अचानक येणे, आमच्या बरोबर माथासर पासून इथपर्यत काहीही ओळख नसताना चालणे हे कुठेतरी मनाला जास्त भावून गेले होते व आता त्याचे अशा प्रकारे जाणे ही मनाला थोडे अस्वस्थ करणारे होते. आईंच्या प्रवचानातील सगळी वाक्य आठवत होती,आई सांगतात जोपर्यंत पायातील वहाण ही त्या मोच्याच्या दूकानात असते तापर्यंत तीचे काय होईल याच्या बद्दल आपल्याला काहीही चिंता नसते पण जेव्हा आपण ती पैसे देउन आपली म्हणून घेतो तेव्हा मात्र तिला आपले मानल्याने तिचा ध्यास मात्र आपल्याला लागतो व तो इतका असतो की देवळात गेल्या वरही देवाला नमस्कार करतांनाही चपला देवळा बाहेर असतील तर देवाला नमस्कार करतांनाही मनात आपल्या देवळाबाहेरच्या चपला कुणी नेणार नाहीत ना? 😊हा विचार सहज मनात येउन जातो व याला कारण म्हणजे मनाला लागलेला त्यांचा सुप्त ध्यास किंवा त्या चपलांना आपले मानलेले असल्याने ही गडबड होते.इथेही माझे थोडे हेच झालेले होते त्या श्वानाला आपले मानल्याने त्याला झालेला त्रास किवा इजा माझ्यामुळे झाली ह्या विचारांचे चक्र अजून डोक्यात चालू होते, वाचलेले सगळे आठवत होते पण मनावर मात्र आपले मानलेल्या गोष्टीचा पगडा पक्का असल्याने मन अस्वस्थ झाले होते. अर्धा पाऊण तास विश्रांती घेऊन आम्ही चार वाजेपर्यंत परत राजराजेश्वरी देवीच्या मंदीरात गेलो. मगाशी सगळे प्रसादास बसले असल्याने प्रत्येक देवातांच्या समोर पडदा होता पण आता पडदा बाजूला सारल्याने तीनही गाभाऱ्यातील देवदेवतांचा दर्शन घेण्याचा योग आला होता. पाहिल्या गाभाऱ्यात त्रीपूरसुंदरी राजराजेश्वरी, दूसऱ्या गाभाऱ्यात मनकामनेश्वराची पांढऱ्या शुभ्र स्फटिकाची महाकाय शिवपिंडी , व तिसऱ्या गाभाऱ्यात पंचमुखी महाबली वीरहनुमान असे विराजमान झालेले दिसत होते. ते बघुनच मन प्रसन्न झाले. नुसत्या दर्शनानेच मनाला झालेला घाय थोडा कमी झाल्या सारखा वाटला. प्रथम शिवपिंडीला नमस्कार केला व नंतर त्या जग्नमाते आई पुढे डोळे मिटून हात जोडून ऊभा राहीलो व त्या आदिशक्तीचे रूप मनात साठवू लागलो व जसे ते रूप मनात साठवू लागलो तसे मनाच्या एका कप्यातील विचार हसून बोलू लागले, काय रे ,अरे कुणाला नमस्कार ?कुणाचे रूप आठवत आहेस, तुझ्यामुळेच जर त्या श्वानाचा अंत झाला आहे तर मग इथे नतमस्तक कशासाठी ?आणी कुणापुढे? कशाला हे नाटक?प्रश्नावर प्रश्न एखादया भात्यातील बाणाप्रमाणे बाहेर पडत होते . आपली ही जगतजननी, जगाचे कल्याण करणारी आहे ही वाक्य फक्त दूसऱ्यांना सांगण्यासाठीच का ? हा दृढ विश्वास आहे तुझ्या अंर्त :मनात ? कारण तसा जर विश्वास असता तर त्या जीवाचेही कल्याण करणारी तीच आहे असा विचार सर्वप्रथम तुझ्या मनात उठला असता.तीचा मिळालेला प्रसाद सेवन करून तो जीव तिच्याचं कुशीत विसावला म्हणजे खरतर किती भाग्याचे लक्षण! हा पहिला संकल्प मनात येण्याची गरज होती . कारण तिच्या किनारी, तिच्या कुशीत मिळालेली कायमची सुखद विश्रांती म्हणजे तो किती पुण्यवान जीव असणार? कारण अजून काही वर्षानी देहाला विकार होऊन लोळा गोळा होऊन मरण्यापेक्षा तिच्या परिक्रमा वासीयांबरोबर चालून तिच्या दारात मरण येणे म्हणजे खर तर अहः भाग्यच, पण असा विचार नं करता स्वतःकडे कतृत्वं घेउन आपल्यामुळे हे झाले असा शुद्र विचार करून तिच्या कर्तुत्वाचा खर तर अपमानच तुझ्या कडून झाला. नुसते तोंडांने संतांचे अभंग " चाले हे शारिर कुणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिविण"म्हणून काय कामाचे ते स्वतःसाठी लागुं कधी होणार,आत कधी मुरणार, मीपणाच्या मनाला तिच्या विचारांचे फटके तीच देत होती कारण इतके खरे व परखड विचार तीच्या शिवाय माझ्या मनात येणे शक्य नव्हते. मीपणाची एक एक खपली हळूहळू गळून पडत होती व त्या बरोबरीने मनाचा घाय मात्र कमी होत जाऊन तिच्या अचाट कर्तुत्वाच्या अगाध लिलांनी मन आनंदाने नाचत होते. थोडा वेळ तसाच गेला, मग मात्र मन खूप हलके झाले असल्याचे वाटू लागले. मगाशी स्वतःच घेतलेले मणाचे ओझे आता एखादया हलक्या फुलक्या कापसासारखे वाटत होते. आता सहज डोळे उघडून परत तिच्या मुर्तिरूप स्थूल स्वरूपाकडे लक्ष गेले व ललिता सहस्त्र नामात तिच्या केलेल्या वर्णनाचे स्तोत्र सहज ओठावर येऊ लागले,
श्रीमाता श्रीमहाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी॥ चिदग्निकुंण्डसंम्भुता देवकार्यसमुद्यता ॥
उद्यभ्दानुसहस्त्राभा चतुर्बाहूंसमन्विता ॥ राग स्वरूपपाशाढया क्रोधाकारा कुशोज्वला ॥
ह्या सगळ्या तिच्या स्वरूपाच्या ओव्या मनाला आनंद देत होत्या. थोडा वेळ तसाच गेला व बापू कानाजवळ पुटपुटला . ' दादा चल तिकडे ते चहा प्यायला बोलवत आहेत. ' नाईलाजाने डोळे उघडले व आम्ही तिघेही त्यांच्या चहापानकक्षाकडे गेलो. तिथे वास्तव केलेले ते दोन दिवस मनाला खूप आनंद व वेगळाच उत्साह देउन गेले. सकाळ संध्याकाळ त्यांच्या पद्धतीने त्यांचे गुणवर्णन , श्लोक आरती मनाला एक वेगळाच आनंद देत होते.
आंनंदाचे डोही आनंद तरंग
आनंद तरंग आनंद तरंग आनंदाचे ॥ धृ॥ तुकाराम महाराजांनी लिहिलेला व अनुभवलेला तो अविट आनंद काय असेल याचे किंचितसे स्वरूप आम्ही तिथल्या मुक्कामात अनुभवत होतो. आमच्या मारूतीरायांसमोर हनुमान चालिसा, रामरक्षा व मारूती स्तोत्राचे श्लोक मनात आठवताना एक वेगळ्याच आनंदाच्या दुनियेत विहार केल्याचा आनंद मिळत होता. त्या अवीटं गोडीचे आनंदाचे ते दोन दिवस भुरकन कसे निघून गेले ते कळलेच नाहीत पण माझ्या दिवसाच्या गणितामुळे आम्हाला तिथून पुढे जाणे क्रमप्राप्त होते . त्यांमुळे पुढील मुक्कामातील गुआर मधील रामरायां समोरील आनंद सोहळा बघू पुढच्या भागात. तापर्यंत नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४१-
वसंतपूराच्या राजराजेश्वरी त्रिपूरसुंदरीच्या आनंदआश्रय मधील अवीट प्रेमाच्या आनंदाची गोडी चाखत आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी पुढल्या मार्गासाठी प्रस्थान केले. दोन दिवस मनाला आनंद देणारा समाधानाचा खुराक व त्याच बरोबर पोटासाठी प्रसादाचे रुचकर अन्न या सगळ्यामुळे आज एखादे एर्नजी ड्रिक घेतल्यावर जसे आपण एकदम ताजेतवाने होतो तसा एक फिल मनाला जाणवतं होता. मनाचा खुराक या शब्दावरून सहजच आईंच्या बोधामृतातील मनाच्या स्थितीच्या वर्णनाची आठवण झाली व ते मी त्यांच्याच शब्दात सांगतो .आई म्हणतात की परमेश्वराने जीवनरूप बागेतील मानवदेह वृक्षाला लोभाचा पाळणा बांधला असून त्यात मन हे मुल निजवले आहे. इच्छा व तृप्ति हे त्या पळण्याचे झोके होत. पाळण्याच्या वरच्या बाजूला ब्रम्हानंद नावाचे मधाचे पोळे असून झोका थांबला की त्यातील मध मनाच्या तोंडात पडण्याची त्याने सोय केली आहे . पण क्षणभर जर झोका थांबला तर मन कासावीस होते . त्यामुळे पाळणा निरंतर हलत असतो. मध तोंडात पडण्यास अवकाश नसल्याने मनाला सदा असमाधानात राहावे लागते. कीती यर्थाथ उपमा देऊन सदगुरुनी ही मनाची स्थितीचे वर्णन केले आहे ना?आपल्याला पटेल व कळेल इतक्या सोप्या पण सुंदर शब्दात मनाचे लिहीलेले हे रूपक प्रत्यक्ष जीवनात अगदी तंतोतंत जुळते. अशा आमच्या मनाला मधाचा छोटा थेंब त्या आश्रमात मिळाल्याने एक वेगळाच आनंद आतमधे जाणवत होता .माईच्या किनाऱ्यावरील प्रसन्न सकाळ , तो निर्सग व माईची आपल्या बरोबर असलेली साथ मनाला अजून एक वेगळाच तजेला देत होती.आजचा आमचा मुक्काम आम्ही ठरवला होता गुआर येथील संत अभिरामदासजींच्या श्री स्वामी रामानन्द सन्त आश्रमात. त्या आश्रमात मागे आमच्या बरोबर चार दिवस परिक्रमा मार्ग चाललेले श्री लक्ष्मुणदास बाबा व उदयनच्या पहिल्या परिक्रमेत त्याच्या बरोबर काही काळ असलेले महेश बाबा हे दोघेही तिथे सेवेसाठी व उपासनेसाठी थांबलेले होते. लक्ष्मदासजीनी तर निरोप घेताना अगदी प्रेमाने आर्वजून सांगीतले होते की मी तिथे थोडे दिवस आहे आपण तिथे नक्की दोन दिवस उपासनेच्या दृष्टीने या. श्री लक्ष्मुणदास बाबा तिथे रासाईतील सेवेत होते व उपासनाही चालू होती तर महेश बाबा तिथे उपासनेसाठी चार महिने थांबले होते. त्या आश्रमात उपसाना करणाऱ्या बाबांसाठी छोटया छोटया कुटयांची सोय केली आहे.
सकाळी सकाळी आम्ही आईच्या आनंद आश्रय आश्रमातून निघून दूपारपर्यत रामपूरा येथे पोहचलो तिथे योगानंद तिर्थ आश्रमातील महंतानी आग्रहाने भोजनास थाबवून घेतले. आम्ही गेल्यानंतर थोडया वेळाने अजून काही परिक्रमावासी तिथे आल्याने भोजनप्रसादीस तिथे थोडा ऊशीर झाला.
तिथे एका खोलीत व आश्रमातील एका भिंतीवर मला माईच्या परिक्रमा मार्गाचा एक मोठा फोटो पहावयास मिळाला त्यामुळे एक अंदाज आला की आपण आत्ता कुठे आहोत व अजून आपल्याला समुद्रापर्यंत पोहाचावयास किती परिक्रमा मार्ग चालावयाचा आहे व एकूण परिक्रमेचाही मार्ग आपणास किती चालावयाचा आहे. कारण मधुन मधुन मला माझ्याकडे परिक्रमेसाठी असलेल्या एकूण दिवसांची आठवण होई व त्यातील आतापर्यंत आपल्याकडे असलेल्या एवढ्या दिवसांची परिक्रमा सदगुरूनी पूर्ण करुन घेतली याचा खूप आनंदही होई व आता अजून असे स्वर्गीयं सुखाचे, माईच्या सहवासाचे सखुद, आनंददायी, नामात रमून स्वतःला जाणण्याचे एवढेच दिवस बाकी राहीले आहेत या आठवणीने मन खट्टू होई. कारण परत इकडे आले की तेच घडयाळ्याच्या काटयावरचे धावपळीचे जीवन, रोजचा कंटाळवाणा रूटीन जॉब, तोच लोकलचा प्रवास ,तीच गर्दी , अगदी रोजची पुजा ही अगदी ठरावीक टाईमात या मायानगरीत करवी म्हणण्यापेक्षा ऊरकावी लागते. कारण जरी एखाद दिवशी हे मन त्या परमेश्वरापाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूं लागले तरी लगेच दूसरे मन त्या रोजच्या रुटीन गोष्टींची आठवण करून देउन त्यामागे धाववयास लावते.एखादा घाण्याला जूपलेला बैलही बरा कारण त्याच्या धन्याने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने त्याला आपण कुठे फिरतोय याची जाणीव नसते पण इथे मोहरूपी पट्टी बांधून माझ्यासारखे, कर्तव्य या गोड लेबल खाली तीच तीच कंटाळवाणी गोष्ट पुन्हा पन्हा अगदी नियमीत किंवा एखादया मशीनप्रमाणे करतो. ही आठवण होउनं आता आपण अनुभवत असलेल्या स्वर्गीय सुखाचे दिवस सुंपच नयेत असे वाटे.
भोजन प्रसादी घेऊन आम्ही तिथे विश्रांतीसाठी न थांबता पुढे गुआरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलो. साधारणपणे एक दीड ते दोन तासानी आम्ही गुआर आश्रमाच्या जवळ पोहचलो. तेवढयात एका बंगला वजा घरातून परत एक हाक आली " बाबाजी चायप्रसादी लेने के लिये घर आ जाओ " उदयनं आम्हाला म्हणालाच होता की ईथे आपल्याला चहा प्यायला कोणीतरी नक्कीच हाक मारेल व अगदी तसेच झाले. कारण गेल्याही परिक्रमेत इथेच त्यांना चाय प्रसादी साठी बोलवले होते. एका वयस्कर जोडप्याने अगदी प्रेमाने, आनंदाने आमचे स्वागतं केले, आमच्याशी परिक्रमेच्या गोष्टी केल्या , अमृततुल्य चहा तर दिलाच पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला माईबद्दलचा एक प्रेमभाव आजही मनाला परत परिक्रमेत नेतो. हिऱ्या मोत्याच्या दागिन्यानाही लाजवेल असा त्यांच्या चेहऱ्यावरील माईच्या प्रेमाचा आनंदाचा साज व ते खरे वैभव माझ्या मनाला आजही भुलवते . आताही मला परिक्रमेतील माईच्या प्रेमात अखंड बुडलेले अनेक चेहेरे डोळ्यासमोर येऊन त्यानी आमच्यावर केलेल्या अकृत्रीम प्रेमाने डोळे सहज पाणवतात. असा बघा ,एखादया प्रसिध्द मल्टीनॅशनल कंपनीच्या बॅलनशीट मधे अॅसेट साईडला एक गुडवील म्हणुन एक अॅसेट असते. म्हणजे ते त्या बॅलनशीट मधे असते पण कुणाला फिजिकली ते दाखवता येत नाही अगदी तसेच माईच्या प्रेमाचे ईनटॅनजीबन अॅसेट आमच्याकडे आहे ,ही परिक्रमा आम्हाला ते देऊन गेली आहे व ते असे एक अॅसेट आहे की या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्या बरोबर राहणार आहे व आम्हाला ते वारंवार अनुभवास मिळणार आहे. खरच ही परिक्रमा मला खूप काही शिकवत होती.
त्यां आजी आजोंबा बरोबर काही आनंदाचे क्षण अनुभवून आम्ही माईच्या तीरी असलेल्या छोटया आयोध्या नगरीत म्हणजेच संत अभिरामदासजींच्या स्वामी रामानन्द सन्त आश्रमात प्रवेश केला. तिथल्या श्रीरामचंद्रांच्या सहवासाचे म्हणजेच छोटया आयोध्येच्या रामदरबारातील आनंदाचे क्षण अनुभवू पुढच्या भागात . हर हर नर्मदे🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४२-
साधारणपणे साडेतीन ते चार वाजले असतील ,आम्ही गुआरच्या आश्रमात पोहचलो. माईंच्या किनारी वसलेला हां एक खूप मोठा आश्रम. आत शिरल्यावर आश्रमाचा विस्तारच खूप मोठा असल्याचे आपल्या लक्षात येते.आश्रमात शिरल्यावर थोडया अंतरावर एक छोटी ,निटनेटकी पण बांधलेली कुटी, जेव्हा संत अभिरामदासजी महाराज त्या आश्रमात असतात तेव्हा त्यांचे दर्शन तिथे साधकांना होते. थोडसे पुढे गेले की खाली क्रॉक्रिटचा गोलाकार खूप मोठा पाया व वरही तसेच गोलाकार छत असलेली व एका खांबावर ऊभी असलेली कुटी , कमरेपर्यंतच त्याला कठडा किवा अडोसा असलेली एक मोठी मोकळी कुटी .डाव्या बाजूला सगळयांसाठी असलेले स्वच्छ एक मजली स्नानगृह व शौचालय. त्यापुढे समोरच छोटेसे आर्कषक दगडांनी बांधलेला पाण्याचा छोटासा तलाव.भरपूर लहान मोठी झाडे.डाव्या बाजूला उपासना करण्यासाठी आलेल्या साधकांसाठी एका रांगेत बांधलेल्या चार ते पाच कुट्यांचा समुह, मधे मधे छोटी बांधलेली पायवाट परत त्यामागे बांधलेले चार पाच कुटयाचा समुह , खूप छान वं व्यवस्थित रचना केलेली जागा, मधे मधे छोटी मोठी निरनिराळ्या प्रकारची झाडे, साधकाचे निर्सगाच्या सानिध्यात सहज मन एकाग्र होऊ शकेल असे छान ,सुंदर वातावरण. त्या पलीकडे रामानंदी साधु ,सेवा करण्यासाठी आलेले सेवेकरी, साधु, बैरागी यांच्यासाठी सोय असलेल्या दोन मजले असलेल्या दोन इमारती वं उजव्या बाजूला प्रभु रामचंद्राचा दुसऱ्या मजल्यावर असलेला राम दरबार, खाली प्रशस्त रसोई घर वं प्रसादासाठी असलेला खूप मोठा हॉल. सगळच काम प्रशस्त व ऐसपैस . छोटया छोट्या साधकांच्या कुटी जिथे होत्या त्याच्या मागच्या बाजूला थोडया अंतरावर असलेला माईचा छोटासा स्वच्छ पण पायऱ्याचा बांधलेला घाट. असा निर्सगाच्या रम्य वातावरण असलेला प्रभु रामचंद्राचा आश्रम, म्हणुनच काल त्याला मी छोटी आयोध्या असे संबोधले होते. अनेक प्रकारची फुलझाडे, फळझाडे.रानामधले किंवा गावासारखे फिल आणणारे वातावरण,काही ठिकाणी रुद्राक्षाची झाडे.निरनिराळ्या सेवेकऱ्यांची निरनिराळ्या कामांसाठी चाललेली लगबग .थोडक्यात आद्यावत सोयींयुक्त पण त्याचबरोबर उपासनेस पोषक असे वातावरण असणारे सुंदर आश्रम की जिथे तुम्ही गेलात की तिथल्या वातावरणानी, सुक्ष्म स्पंदनानी तुमचे मन सहजच रामचरणी एकाग्र व्हावे, शेवटी प्रभु रामचंद्रांसारख्या करूणा सागराचे हे स्थान त्यामुळे त्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच.
आम्ही बाहेर असतानाच महेश बाबाना त्यांनी सांगीतल्या प्रमाणे फोन केला असल्यामुळे महेश बाबा आम्ही आश्रमात गेल्यावर आम्हाला सामोरे आले. खरं तर परिक्रमावासीयांची आसने त्यां मोकळ्या गोल कुटीत लावली जातात पण आम्ही त्या आश्रमाच्या आनंद सोहळ्यात दोन तीन दिवस हजर राहणार असल्याने महेश बाबां आम्हाला घेऊन प्रथम त्यांच्या उपासना कुटीत गेले. उदयनशी फोनवर जरी बोलणे होत असले तरी प्रत्यक्ष भेट दोन वर्षानी झाल्यामुळे उदयन भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता.आम्हाला त्यांनी त्यांच्या कुटीत बसवून घेतले व लक्ष्मणदास बाबांनाही तिथेच बोलावून घेऊन ते स्वतः तिथल्या मुख्य महंतांना भेटावयास गेले. आमाच्या निवासासाठी वर सांगीतलेल्या त्या दोन मजली इमारतीत एखादी खोली आम्हाला मिळू शकते का? अशी मुख्य महंतांकडे विचारणा करून त्यांचा होकार घेऊनच ते परत आले होते. खोलीची चावी त्या सेवकऱ्याकडून मिळण्यास थोडा वेळ लागणार असल्याने आम्ही महेश बाबांच्या कुटीतच बसलो . ते तिकडून येताना आमच्यासाठी दोन ग्लास भरून गरम दुध घेऊन आले. गेल्यापासूनच रामरायांची आमच्यासाठी चाललेली अशी खातीरदारी बघून रामनवमीच्या ऊत्सवात आम्ही त्यांच्या समोर म्हणत असलेल्या भजनाच्या ओळीं सहज आठवत गेल्या
तु माझा यजमान रामा॥धृ ॥ जननी जठरी रक्षीयले मज |पोसुनी पंचहि प्राण ॥ १॥
बाहेर येता मातेच्या स्तनी I पय केले निर्माण ॥2॥
ऐसे असता या पोटाची I का करू चिंता जाण ॥३॥
मध्वमुनीश्वर स्वामी रमापति I धरी माझा अभिमान ॥४॥
आता ही तो करूणासागर रघूनंदन आमची किती काळजी घेतो आहे याची जाणीवेने मन भरून आले कारण आम्ही परिक्रमावासी, त्याच्या दारी आलेलो, त्यामुळे भजनात म्हंटल्याप्रमाणे आमची पूर्ण सरबराई करून आम्हाला पूर्ण आनंद देण्याची काळजी घेत असताना तो दिसत होता.
आता आपले दोन दिवस परत त्या चैतन्यमय कृपाळूच्या सानीध्यात जाणार असल्याचे आठवून मनाला एक वेगळाच आनंद झाला वं घरच्या रामरायांची खूप आठवण झाली. महेश बाबा व लक्ष्मणदास बाबांशी थोडा वेळ परिक्रमेतील गप्पा गोष्टी झाल्या. मधेच लक्ष्मणदास बाबा बाहेर जाऊन खोलीची चावी घेउन आले व त्यानंतर आम्ही वेळ न घालवता आमच्या खोलीत जाऊन आसने लावली. कारणं आज सायं स्नान मैयावर करून तिथेच ललिता सहस्त्रनाम, नर्मदाष्टक व माईची आरती असा कार्यक्रम गप्पा मारताना ठरला होता. त्यामुळे अर्धा तासात आम्ही सारे जण परत माईपाशी पोहचलो. आज खूप दिवसानी माई मधे स्नान करण्याचा योग आल्याने आम्ही तिघेही जण खूप आनंदीत झालो होतो.
उदयनने खडया आवाजात नर्मदा माईचे सुंदर गुणगौरव केलेले स्तोत्र त्याच्या भावपूर्ण व मधूर आवाजात सुरू केले
नम : पुण्यजले देवी नम : सागर गामीनी I नमोस्तु पापनिर्मोचे,नमो देवी वरानने ॥१॥
नमोस्तुते ऋषिवर संघ सेवितेI नमोस्तुते त्रिनयनदेहनिस्तृते |
नमोस्तुते सुकृतवतां सदावरे|नमोस्तुते सततपवित्रपावनी॥२॥
उदयनच्या भावपूर्ण आवाजात अशी काही जादू आहे की त्यामुळे तिथले वातावरण व आमचे सगळ्यांचे मनही सहजच माईशी एकरूप झाले कारण परमेश्वराकडून चांगल्या आवाजाची देगणी जरी मिळाली असली तरी त्या स्वररचनेत असलेल्या शब्दाशी एकरूप होऊन , भावपूर्ण स्वरात म्हणणे ही एक खूप कठीण कला आहे ती त्याने सहज़ साध्य केली आहे , मी तर म्हणीन की त्याला ही एक दैवी देगणीच मिळालेली आहे.
आज खूप दिवसानी माईच्या पवित्र जलाला स्पर्श करण्याचा योग आल्याने प्रथम त्या जलाला प्रणाम करून काठावर बसूनच स्नानाला सुरवात केली. आपल्या पावित्र जलाने माई आज परत या तिच्या बालकांना स्नान घालून म्हणत होती, या बाळांनो या ,आज माझी लेकरे मला खूप दिवसानी भेटत आहेत. त्या प्रेमळ आईचा तो मायेचा स्पर्श तनामनाच्या प्रत्येक अणूरेणूवरून हळूवारपणे फिरत एक मायेची उब आम्हाला सहजच देत होता. तिच्या त्या पुण्यजलाने शरीराची सगळी थकान एका क्षणात दूर झाली. थोडा वेळ तो आनंद घेऊन आम्ही परत वरच्या कठडयाच्या पायऱ्यांवर येऊन कपडे बदलले' व् जवळच असलेल्या एका मोठया व सपाट दगडावर आमच्या जलाच्या कुप्या ठेऊन प्रथम पुजा व नंतर ललिता सहस्त्रनामाला माईच्या साक्षीने सूरवात झाली.
सिन्दरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्य मौलिस्फुरत
तारानायकशेखरां स्मितमुखी आपीन वक्षोरूहामI .........
निर्सगरूपी मंदीराच्या दिव्य गाभाऱ्यातील जलरूपी सिहासनावर वसलेल्या त्या महाराज्ञी लिलितादेवीसमोर आज तिचे गुणगान करताना मनाला वेगळीच मजा व आनंद मिळत होता. ती ही नक्की खुष झाली असणार कारण भक्ताला जसे त्या परमेश्वराबद्दल प्रेम असते तसेच त्यां आईलाही आपल्या लेकरांकडून होत असलेल्या कौतुकाने नक्कीच आनंद झाला असणार . ते सगळे म्हणून आम्ही परत खोलीवर सहा वाजेपर्यत आलो .
थोडयावेळाने परत प्रभुं रामचंद्रांच्या दरबारात सायंआरतीला जाण्याचा योग असल्याने आता मनाला त्यांच्या दर्शनाचे वेध सुरू झाले . उदयन व बापू येथे या आधीही येऊन गेलेले असले तरी मी प्रथमच या स्थानात येत असल्याने मला एक वेगळीच ओढ़ किंवा उत्सुकता लागून राहीली होती. कसा होता तो दोन दिवसाचा आनंदसोहळा पाहूया पुढच्या भागात तापर्यंत नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४३-
॥श्रीराम जयराम जय जय राम॥
राम का गुणगान करिये रामजी की भद्रता का
सभ्यता का ध्यान धरिये आज श्रीरामचंद्राचे गुणगान करताना मन एका असिम आनंदाने भरून येत आहे.
अहः भाग्य उदयले माझे I मर्यादापुरूषोत्तमाचे गुणगान सुचविले॥
अवीट सुखाची गोडी चाखवून |नर्मदा परिक्रमी आली घेऊन॥
माईच्या प्रेमास नाही सीमा I सेवाभाव हाच तिचा मेवा
दावीते सर्वांसी निष्काम प्रेमा ॥ देहात लपलेल्या या देवाला
तुझा तुच शोधुनी घ्यावा ॥ प्रयत्न करीतो मी हे गुरुआई
होऊ कसा तुजसी उतराई I आर्शिवचन दे या लेकारासी
शोधुन जाणीन त्या आत्मारामासी नमन माझे या गुरुमाऊलीसी
नमन माझे या गुरुमाऊलीसी ॥ खोलीवर येऊन आमचे सगळे आवरून आम्ही श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालो.
मनात एक सुखद आनंद व त्याचंबरोबर उत्सुकताही होती, कसा असेल तो रामदरबार ?प्रत्येक पायरीगणीक एक वेगळाच आनंद जाणवत होता. पाहिल्या पायरीपासूनच त्याच्या वैभवाची जाणीव होत होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी चिऱ्यातून केलेले बांधकाम ,सजावट व नक्षिकाम . मनाच्या कॅमेरात सर्वं आनंदाचे क्षण साठवून ठेवत होतो कारण माणसाकडे मन हा असा एक कॅमेरा आहे की जो तो पाहिजे तेव्हा उघडून ते सुंदर आनंदाचे क्षण पुन्हा पाहू किंवा उपभोगू शकतो, आता ही हाच कॅमेरा ओपन करून ते आनंदाचे क्षण परत अनुभवत होतो. रामनामाच्या विचारात पायऱ्या कधी संपल्या व आम्ही कधी त्या दरबारात पोहचलो ते कळलेच नाही.दरबार अशा साठी म्हणतोय कारण हॉल इतका प्रशस्त व दैदिप्यमान होता, ठीकठीकाणी केलेले सुंदर नक्षीकाम, खाली अंथरलेला सुंदर गालीचा, चांगल्या प्रकारच्या संममखरानी सजविलेला संपूर्ण हॉल, सुंदर पडदे, नक्षीदार खांब ठीकठीकाणी केलेले मीना वर्क !या सगळ्यामुळे दरबार अतिशय सुंदर किंवा मोहक दिसत होताच पण गाभाऱ्यात सिहांसीनारूढ झालेल्या रघुकुलभुषण श्री प्रभु रामचंद्रांच्या राजस सुकुमार सतेज मुखामुळे जणु काही त्या सगळ्या वैभवाची शोभा अजुनच वाढली होती.वामांगी श्री रामचंद्राच्या वैभवाने व आनंदाने नटलेली सीतामाई ,रामनामाचे शांत पण सुंदर तेज तिच्या चेहऱ्यावर विलसत होते. अंगावर उंची वस्त्र, दागीने, मुकुट, फुलाचा सुंदर हार, डोक्यावर छ्त्र सारेच काही विलोभनीय होते. हॉलच्या एका बाजूला महाबली श्रीहनुमान दास्य भावाने परिपूर्ण नटलेला.🙏 किती वर्णन करू तेवढे कमीच! शब्द रिघाव संपेल पण ते गुणवर्णन संपणार नाही. तरीही ते सुंदर रूप बघून मनात शब्द गुणगुणू लागले
काय सुंदर रघुराय तव रूप हे माय तु आमची पाय दावी |
जवळी भ्राता बसे अंकी सीता बसे लोकमाताचीही शरण आम्हां॥
तुझ्या दर्शने जाहलो धन्य राम भक्त कैवारी आनंद धामा ॥
रामनवीच्या उत्सवातील भजन सहज आठवू लागले व त्या दर्शनाने सहजच डोळे पाझरू लागले.हा आनंद न संपता त्या आनंद सागरात असेच कायम डोलत रहावे हीच इच्छा होत होती पण संध्या स्तुतिला सुरवात झाली व नकळत मन भक्तगण म्हणत असलेल्या स्तुतिकडे गेले.
खर तर आम्ही सायं स्तुति व आरतीच्या थोडे आधीच तिथे पोहचलो होतो .कारण रामरायांचे सुकुमार राजस रूप व तो आनंदकंद जास्ती जास्त वेळ डोळ्यात साठवून ठेवण्याचा हा एक गोड प्रयत्न होता. त्यामुळे जसी जसी पार्थनेची व आरताची जवळ येत गेली तसे अनेक रामानंदी साधु, बैरागी, सेवेकरी दरबारात हजर हाऊ लागले. सगळेजण आनंदाच्या एका वेगळ्याच मस्तीत किंवा रामरायांच्या सहवासाची व रामनामाची चढलेली एक वगळीच कैफ सगळ्यांच्या
चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दाखवत होती. दरबार सर्वं भक्तजनांनी भरून गेला त्यामुळे आता त्याची शोभा अजूनच वाढली. सायंस्तुतीला सुरवात झाली आम्ही डोळे मिटून ते सुख मनात साठवत होतो. त्याच्या वेगवेगळ्या रूपाचे म्हणजेच श्रीराम, श्री नारायण व श्री केशव या अवताराचे वर्णन असलेले एक स्तोत्र मनाला आनंद देत होते, खरच इतर वेळा कुठे असतो हा आनंद,हे सुख ? कुठल्याही दृष्य किवा बाहय गोष्टीवर अवलंबुन नसलेला हा आनंद अनुभवताना परत आईच्या पुस्तकातील वाक्य आठवले , तु आनंद स्वरूपच आहेस. हे इतर वेळला वाचत असे पण आज ते अनुभवास येत होते. पहिली स्तुति संपली व आता प्रभु रामचंद्रांची स्तुतिचे वर्णन केलेले
श्री रामचंद्रं कुपालु भज मन महरण भव भय दारूण
नव कंज लोचन कंज मुख कर कंज पंद कंजारूण ॥
तुलसीदासांचे आपल्या आराध्य दैवताबद्दलचे असलेले प्रेम प्रत्येक शब्दातून व्यक्त झालेले दिसत होते. त्यांची म्हणण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी घरी रोज हे म्हणत असल्याने शब्द पाठ होते त्यामुळे त्यांच्याबरोबर म्हणतांना वेगळाच आनंद मिळत होता. त्यांनतर तुलसीदासांनी लिहलेली महारानी सितामाई चे स्तुतिगान व दोहा शेवटी श्लोक व जयजयकार व शंखनादाने संध्याकाळच्या उपासनेची सांगता झाली. तिथे सगळे जण प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमस्कार त्याच्या समोर उभ्याने आडवे न होता आडव्याने आडवे होऊन घालतात. त्यांनंतर मारूती रायांना नमस्कार करून ते आनंदाचे क्षण आठवतं आम्ही रामदरबारातून प्रसाद घेऊन बाहेर पडलो.
खाली उतरल्यावर सांय भोजनाचा प्रसाद तयारच होता त्यामुळे परत खोलीवर जाऊन आपली थाळी, मग असे घेउन आम्ही प्रसादाच्या हॉल मधे हजर झालो.
प्रसादाच्या वेळीही प्रसादाच्या प्रत्येक जिन्नसाला रामनामाने गुंफुन तो वाढण्याची एक अभिनव पध्दत तिथे पाहीली उदा. रामरस,सब्जीराम, लंकाराम की जेणे करून प्रत्येक गोष्टीत त्याची आठवण त्याचा ध्यास ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न बघून आनंद झाला. रामनामाच्या सुंदर अशा भोजनप्रसादी नंतर तो आनंद अनुभवत आम्ही परत आमच्या निवासस्थानी आलो. आता वेध लागले होते सकाळच्या उपासनेचे, कसा असेल हा अवर्णनीय सोहळा? आताच अनुभवलेल्या त्या सुंदर आनंदाची झींग अजूनही ऊतरली नव्हती त्यामुळे तो आनंद बराच वेळ अनुभवत आम्ही त्यां दिवशी निद्रेच्या अधीन झालो. नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४४-
दूसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाग आली, काल संध्याकाळी झालेला रामरायांचा सहवास व रामगुणगानाचा परिणाम म्हणा हवे तर पण सहजच पहाटे जाग येऊन कालचे रघुरायांचे राजस रूप डोळ्यासमोर आले.
प्रातः विधी आटोपण्यास मी खाली स्नान करण्यासं गेलो.स्नानास इथे वेगवेगळी बाथरूम नसून खांदयाच्या उंचीवर एका लाईनीत थोडया अंतरावर नळ लावलेले असून त्याखाली सगळ्यांनी स्नान करावयाचे अशी पध्दत होती .तिथले सगळे साधु ,बैरागी, सगळेच लंगोटीवर किंवा तस्तम कपडयावर तिथे स्नान करीत असल्याने ह्या जागेपासून ते नंतर परिक्रमेत अगदी रस्ताच्या बाजुला असलेल्या हापशावर ,कुठेही मी लंगोटीवर मी निःसंकोचपणे स्नान करू लागलो कारण शहरात कायम बंद बाथरूम मधे स्नान करण्याची सवय असल्याने प्रथम प्रथम परिक्रमेत मला ही गोष्ट थोडी जड गेली पण ह्या स्थानापासून ती लाज, शरम सगळीच निघून गेली व हे पुढे परिक्रमेत हे मला खूप फायदेशीर झाले. तिथे अजुनही एक नियम असा होता की कुणीही शौचास गेले तर त्यास आंघोळ केल्याशिवाय कुठेही आश्रमात जाता येत नसे. त्यामुळे दिवसभरात कधीही संडास या जागी गेल्यास पुन्हा आंघोळ करण्याशिवाय गत्यंतर नसे.असो
सकाळचा स्नानविधी झाला व वर येऊन माईची पुजा, आरती नेहमीची ऊपासना करून आम्ही सकाळच्या प्रातःकाळच्या उपासनेला मंदीराकडे निघालो.
बाहेर सकाळच्या शांत, थंड वातावरणात पंक्षांचा किलबिलाटही ऐकावयास खूप छान वाटत होता. ते सर्व पक्षीही प्रभात काळी ऊठून नक्कीच रामनाम घेत , रघुरायांचे स्मरण करत ,आपल्या वाणीतून आपल्या जिवाचे सार्थक करून घेउन प्रभु रामचंद्रांना आपल्या भाषेत उठवत असावेत . त्यांची भाषा समजण्याची माझी योग्यता जरी नसली तरी तो किलकिलाट मात्र मला ऐकावयास सुंदर वाटत होता.
मनात उदयन कडून शिकलेले हनुमान जयींतीच्या उत्स्वातील भुपाळीचे शब्द व आईंनी त्याला लावलेली सुरेल चालीचे स्वर उठत गेले
जागीये रघुनाथकुंवर| पक्षी बन बोले॥धृ॥
चंद्रकिरण शितल भयी, चकई पिया मिलन गयी | त्रिविध मंद चलत पवन,पल्लवद्रुम डोले ॥१॥
प्रात भानू प्रगट भयो, रजनी को तिमिर गयो| भृंग करत गुंज गान कमल वदन खोले॥२॥
ब्रम्हादीक धरत ध्यान, सुर नर मुनी करत गानI जागन की बेर भयी, नयन पलक खोले|
तुलसीदास अती आनंद, निरखी कै मुखारविंदIदीनन को देत दान भूषण बहु मोले॥४॥
काय संत तुलसीदासाचे शब्द ! एखादी आई आपल्या बाळाला मायेने, प्रेमाने,हळुवार पणे उठवतांना तिच्या मुखातून जसे शब्द बाहेर पडतील तसेच तुलसीदासजींनी रामरायांना उठवले नाही का? तो देव ही अखंड जागरूक असूनही आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर, प्रेमाचे नाटक करून नक्कीच उठला असेल .
हे आहे खऱ्या भक्ताचे निस्सीम प्रेम ! असे प्रेम आमच्या सगळ्यांच्या ह्रदयी प्रगट होवो हीच रामचरणी आज मी प्रार्थना करतो.
या नादात रसोईपाशी कधी आलो ते कळलेच नाही , आमच्यासाठी वाफाळलेला मधुर चहाचा कप घेऊन बापूजी समोर ऊभे राहीले वं म्हणाले 'दादा चहा घ्या ' खूप वेळा बापू आम्ही त्याच्यापेक्षा वयाने बरेच मोठे म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी करत असे. त्या थंडीत गरम चहाचा आस्वाद घेउन आम्ही वर रामदरबारात गेलो. वरही वातावरण एकदम शांत मनाला एकाग्र करणारे, कुठेही गडबड, गोंधळ नाही.दरबार जरी उघडला असला तरी प्रभु रामचंद्रासमोरील पडदा अजून दूर झाला नव्हता. त्यामुळे मनाला आनंद देणारे सुंदर कमलमुख अजूनं दिसत नव्हते. त्यामुळे खाली अंथरलेल्या गालीचावर बसून रामरक्षेत सांगीतलेल त्याचे सुंदर ध्यान मनात आठवू लागलो
ध्यायेदाजानूबाहुं धृतशरधनुषं बध्दपद्मासनस्थम॥
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धीनेत्रं प्रसन्नम्॥
वामांकारूढ सीता मुखमकलमिल लोंचनं नीरदाभं॥
नानालंकारदीप्तं दधतमरूजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
इति ध्यान
रामरक्षेत वर्णन केल्याप्रमाणे सुंदर ध्यान डोळ्यासमोर येत गेले वं मनाला खूप आनंद झाला. पार्थनेची वेळ जसी जवळ येत गेली तशी सगळे भक्तजन जमू लागले. पडदा बाजूला झाला व प्रभू रामचंद्रांचे करुणाघन सुंदर ध्यान डोळ्यासमोर आले. कपाळाला लावलेली सुवासीक उटी, त्यामधे लावलेले उभे गंध, नुकत्याच ऊमलेल्या कमल पाकळ्याप्रमाणे त्यांचे नेत्र, मस्तकावर रत्नजडीत मुकुट, गळ्यात निरनिराळ्या आभुषणांनी युक्त नटलेला सुंदर रघुनंदन, मधे ठेवलेले रत्नजडीत धनुष्य, हे सगळे अनमोल रूप हृदयाच्या कप्यात साठवून ठेऊ लागलो.आज त्यांचा पुर्ण पोषाख आकाशी निळ्या रंगाचा होता. ते रूप बघुन खर तर मन आनंदाने नाचू लागले. बाजुला असलेल्या महारानी सीतामाईच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य , चाफेकळीसारखे नाक, मुकुट , कानात, नासीकेतं, गळ्यात घातलेली आभुषणे इतकी सुरेख होती की लक्ष्मी रूपातच सीतामाई अवरतली आहे की काय असा भास होत होता.
ऊपासनेला सुरवात झाली प्रथम रामचंद्रजीचे प्रातःकाल स्तुती
भये प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी I त्यानंतर जानकीजींची स्तुति व त्यानंतर श्री कृष्ण महाराजांची स्तुति मग आरती , मनाला आनंद देणारा शंखनाद सारे काही स्वर्गीय सुखाचा आनंद देत होते. त्यांना साष्टांग नमन करून आम्ही विराट मारूतीरायांच्या दर्शनाला गेलो . महाबली समोर मारूती स्तोत्र म्हंटले त्याची दास्यं भक्ती आठवत आम्ही प्रसाद घेऊन खाली परत आमच्या खोलीवर आलो.
दूपारी महेश बाबांना उद्या सकाळी आम्ही इथुन पुढे प्रस्थान करू असे बोलताना सांगीतले. त्यावर ते म्हणाले तुम्ही असे काहीच ठरवू नका आता महंत सांगातील तेव्हा जायचे.
संध्याकाळी मारूतीरायांसमोर हनुमान चालीसाचा पाठ सुरू झाला त्यामुळे माझ्या नेहमीच्या उपासनेत खंड पडला नाही. संध्याकावच्या सायं स्तुतीनंतर जेव्हा महेश बाबा आम्हाला त्या मुख्य महंतांकडे घेऊन गेले व त्यांना आम्ही उद्या सकाळी इथुन निघणार असल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले " कल सुबह जानेवाले है ना, तो कल सुबह की आरती के बाद देखेंगे. "
सकाळची उपासना झाली व परत त्यांचा निरोप घेण्यास गेलो तेव्हा ते म्हणाले " अरे सुबह सुबह किधर निकलते हो, दोपैर का प्रसादी तो लेके जाओ " असे सांगून प्रसाद म्हणून त्यांच्या उपासनेची पुस्तिका व फळ दिले. आता त्यांचा शब्दाचा मान ठेवणे गरजेचे होत वं तेवढेच रामरायांच्या सहवासातील आमचे क्षण वाढत होते. परत खोलीवर जाऊन सगळी आवराआवरी केली वं दुपारच्या भोजन प्रसादी नंतर पुढच्या स्थानासाठी प्रस्थान केले. निघताना मनाची द्विधा अवस्था होती कारण आजपासून रामरायांच्या आनंदमय वातावरणाला मुकणार म्हणून दुःख होत होते तर दुसरीकडे परिक्रमा मार्ग पुढच्या प्रवासाची ओढ लावत होता. बघुया पुढचा मार्गात कसे आनंदमय क्षण आले ते पुढच्या भागात . तापर्यंत नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४५-
दुपारची भोजन प्रसादी झाली व मुख्यं महंताची परवानगी घेऊन आम्ही गुआरच्या आश्रमातून जड अतःकरणाने बाहेर पडलो कारण आजपासून रामरायांच्या प्रेमळ सहवासाला आम्ही मुकणार होतो .माईच्या परिक्रमेच्या पुढच्या मार्गाची परत सुरू झालेली वाटचाल हीच एक आमच्यासाठी जमेची बाजू होती नाहीतर अशा आश्रमाच्या सुंदर वातावरणातून बाहेर पडून आमच्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात परत जायचे असते तर मनाला अजून जास्तच त्रास झाला असता. दोन दिवास रामनामचे मिळालेले पोष्टीक टॉनीक हे आम्हाला आता एक वेगळाच उत्साह देत होते
आश्रमातून बाहेर पडून पंधरा वीस मिनीटाच्या अंतरावरील रस्तावर आम्ही पोहचलो व पुढे जाण्यासाठी आता दोन रस्ते दिसत होते, पण आपला रस्ता कुठला किवा कुठला रस्ता हा आमच्या परिक्रमा मार्गाचा आहे हे मात्र काही केल्या कळत नव्हते .कुणाला विचारावे तर जवळपासही कुणी दिसत नव्हते . 'नर्मदे हर ' चा पुकारा दोन तीन वेळा आम्ही करून बघीतला पण त्याला कुठूनही ' नर्मदे हर बाबाजी ' असा पुकारा न आल्यामुळे आता आम्ही आतला रस्ता हा माईच्या किनाऱ्याने जात असावा असा कयास करून त्या रस्त्याने चालू लागलो.
परिक्रमेत असताना बऱ्याच वेळा आपण ज्या मार्गानी जात असतो तो मार्ग परिक्रमेचा मार्ग आहे कीवा नाही हे आपल्याला ठरवता येत नसेल व पुढे कसे जायचे हा प्रश्न पडला की जवळ दोन मार्ग असत ,एक जवळपास कुणी येणारा, जाणारा , शेतात काम करणारा असेल अशा व्यक्तिला रस्ता विच्यारून पुढे जाणे किंवा कुणीही जवळपास नसेल तर 'नर्मदै हर 'चा पुकारा करून त्याला येणाऱ्या प्रत्युतरची वाट बघणे. कारण जवळपास जर कुणी असेल तर तोही तसाच पुकारा करून आपल्याला पुढचा मार्ग सांगत असे .अगदी सहा सात वर्षाची मुलेही आपल्याला अगदी सहज पुढचा मार्ग सांगत.
त्यामुळे आता तसे काहीच प्रत्युतर न आल्याने आम्ही आतला रस्ता हां माईच्या किनाऱ्याचा असेल असा कयास करून त्या मार्गाने चालू लागलो. पंधरा वीस मिनीटे झाल्यावर त्यां पायवाटेवर कुणाचा काही मागमोस लागेना व रानटी ,काटेरी झुडपेझुडपे चालताना सारखी आडवी येऊ लागली. माईचा प्रवाहाचाही जवळपास काही थांग पत्ता लागेना ,तेव्हा लक्षात आले की आपण रस्ता चुकलो आहोत .आता मधून कुठल्या झुडपातून जाउन तो रस्ता परत परिक्रमेच्या मार्गाला लागतो किंवा नाही याचाही काही अंदाज येत नसल्याने आम्ही सरधोपट मार्गाने म्हणजे जसे पुढे गेलो तसेच परत त्या मार्गाने वीस मिनीटे मागे चालतं येऊन पुढचा मार्ग हा परिक्रमा मार्ग असल्याचे मनात पक्के करून त्या मार्गावर चालू लागलो.
थोडे अंतर चालून गेल्यावर आमचा कयास खरा ठरला व आम्ही छानशा टार रोड लागलो . आता आमचा प्रवास पक्या डांबरी रस्ताने सुरू झाला. आज आमचे मुक्कामाचे आम्ही ठरवलेले स्थान होते ओरीचे कोटेश्वर महादेवमंदीर, व तिथे असलेल्या माँताजीचे दर्शन.
त्यामुळे आता आमचा प्रवास त्या पक्या रस्त्यानी सुरू झाला. मधून मधून रस्ताच्या दोन्ही बाजूला कधी ऊसाचे मळे, तर कधी लांबच लाब केळीच्या बागा अशाच बऱ्याच ठिकाणी दिसत असल्याने डांबरी रस्त्यावरून चालत असूनही दोन्ही बाजूच्या हिरव्या गार वनराईमुळे हा प्रवास ही सुखकर वाटत होता. दूपारी रस्ता चुकल्याने जवळजवळ पाउण तासाचा वेळ फुकट गेल्याने आज ओरी येथे पोहोचेस्तोपर्यंत थोडा ऊशीरच झाला पण त्याला काही इलाज नव्हता.
हा आश्रम चांगला बांधलेला असा आहे . आत शंकराचे वं भगवान श्रीकृष्णाचे मंदीर आहे, त्यामुळे आत गेल्यावर आसन लाऊन आम्ही स्वच्छ हातपाय धुऊन शिवपींडीचे व कान्होबाचे दर्शन घेतले .तिथल्या सेवेकऱ्यांजवळ आम्हाला आता मातांजीचे दर्शन होईल का? अशी विचारणा केली. त्यावर त्यानेही आम्हाला 'मांतांजीना विच्यारून आपणास कळवतो ' असे सांगीतले. माताजीना तसे तो विचारण्यासही लगेच गेला परंतु माताजी त्यावेळी तिथल्या जवळपासच्या गावातील काहीं प्रतिष्ठीत व्यक्तीशी कामांसंर्दभात बोलत होत्या . त्यामुळे त्यांचा त्या लोकांशी दहा पंधरा मिनीटे वार्तालाप झाल्यावर त्या सेवेकऱ्यानी मातांजीना आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे कळवले . हे सांगितल्यावर , मातांजीनी त्याला आम्हाला लगेच घेऊन येण्यासं सांगीतले.
आम्ही तिघेही त्यांच्या खोलीमधे त्यांना भेटण्यास गेलो.
एक शांत हसतमुख तेजस्वी व्यक्तिमत्व खोलीत खुर्चीवर बसलेले दिसत होते. पांढरी शुभ्र साडी, केस नवीन पध्दतीने कापलेले पण चेहऱ्यात एक आईच्या वात्सल्याची भावना, डोळ्यात वं चेहऱ्यावर एक आगळावेगळाआनंद.
उदयनशी त्यांची भेट गेल्या परिक्रमेत झाली होती. तरी पण परत आम्हा तिघांचीही व्यवस्थित चौकशी करून, म्हणजेच आम्ही कोण,कुठून आलो आहोत कधी परिक्रमा ऊचलली व इतक्या लवकर इथपर्यंत पोहचल्याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटतं होते. त्या म्हणाल्यां ' कितने चलते हो हर दिन '. 'इतनी जल्दी जल्दी मे परिक्रमा मत करो ' पण माझ्या सुट्टीचे कारण सांगीतल्यावर म्हणाल्या "फिर आपके पास दूसरा कोई चारा नही है. "आम्हीही अगदी त्यांच्या पायापाशी बसुन त्यांच्या चेहऱ्यावरील एक अपरिमित आनंद आमच्या नजरेत टिपण्याचा प्रयत्न करत होतो व त्यां प्रेमळ हास्य वदन मुखाकडे बघत आम्हाही सुखावलो. साधना कशी वं किती करावी, नामाकडे , श्वासाकडे लक्ष देउन ते नाम कसे घ्यावे याचे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला त्या भेटीत केले. त्यांना बापूचे खूप कौतुक वाटत होते व हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. त्याचे कारणही बरोबर होते कारण बापू वयाने आमच्यापेक्षा लहान, म्हणजे तीशीतला वं असे असूनही तो आमच्याबरोबर दूसऱ्यांदा परिक्रमेला निघाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील वं मनातील निरागस भाव हाही त्याचा कुणालाही आवडणारा गुण होता.
त्यानंतर थोडा वेळ आमच्याशी त्यांनी परमार्थीक गप्पा केल्या, पाऊण एक तासाचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळलेच नाही. परत सेवेकरी काही कामासाठी त्यांना बोलावयास आला व कधीही संपू नये असे वाटणारी आमची आनंदाची मैफल तिथेच संपली. त्यांच्या पायावर डोके ठेऊन आम्ही तिघांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनीही तितक्याच मायेने व वात्सल्य भावनेने आम्हाला प्रेम व कौतूकाचे आर्शिवचन दिले,.बापूला त्यांनी परत एकदा ऐरवादया छोट्या मुलाला जसे जवळ घ्यावे तसेच जवळ घेतले व त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला परत आर्शिवाद दिला.
आम्ही तिघेही त्यांच्या खोलीतून आनंदात बाहेर पडलो व आमच्या आसनांपाशी येऊन थांबलो. थोडया वेळात आम्हालाही सायं स्नान करून माईंची पूजा, अर्चा करावयाची होती त्यामुळे स्नान करून आम्ही माईची पुजा व आरती केली. दिवस छोटा होत असल्याने बाहेर लवकर काळोख पडला होता . बाहेर आकाशात दिसत असणाऱ्या टिपुऱ्या चांदण्यानी वं चंद्र प्रकाशाने आम्ही नकळत आश्रमाच्या बाहेर खेचले गेलो. आश्रमाच्या गेटच्या बाहेर थोडया अंतरावर आम्ही मोकळ्या वातावरणात त्या चादण्या रात्रीचा परत एक सुंदर अनुभवं अनुभवु लागलो.वर आकाशात पडलेले टिपूर चांदणे प्राजक्ताच्या झाडावरील फुलाची आठवण करून देत होते तर .आकाशातील चंद्र आमच्याकडे बघत गालातल्या गालत खट्याळापणे हासत असल्याचा भास होत होता.बाहेर थंडी असल्याने थंडगार वाऱ्याची झुळुक शरीराला एक शिरशिरी आणत होती .तरीही त्या मोकळ्या वातावरणच्या सुंदर वातावरणाने आम्ही मनोमन सुखावुन गेलो. खर तर डोळ्यांना दिसत होते फक्त त्या काळोखात आकाशातील चांदणे व चंद्र. चंचल डोळ्यांना खर तर कायम सारख्या वेगवेगळ्या गोष्टीं बघण्याची सवय,पण इथे अंधारात त्या मोकळ्या वातावरणात बघण्यापेक्षा अनुभवण्याची मजा काय आहे किंवा हिदींत आपण म्हणतो ना 'एहसास ' तेच परिक्रमा आम्हाला शिकवत होती.
हे आनंदाचे क्षण अनुभवत असतानाच कोणीतरी म्हणाले ! "जादा टाईम बाहर मत रूको कभी कभी चित्ता,नही तो जगली जानवर आ जाता है. " हे वाक्यं ऐकले व आतापर्यंत वाटत असणाऱ्या आंनंदाने आता थोडया भितीची जागा घेतली व त्या अंधाऱ्या जागेत आता चित्ता. बिबटया असे काही तरी असल्यासारखे दिसू लागले😃😃. माझेच मला हसू येउ लागले, काय आपल्या मनाची कमाल आहे. आत्ता वाटत असणारा काळोखातील आनंद आपल्याला आता भितीदायक वाटतं होता. सगळेच आपल्या मनाचे खेळ असे मनाला समजवले व आम्ही आश्रमात येण्यास निघालो कारण आपल्याला कुणीतरी एखादी योग्य गोष्ट सांगीतल्यावरही मुद्दामून बाहेर थांबणे हे काही योग्य नव्हते .त्यामुळे आश्रमात येउन आम्ही आमच्या आसनांपाशी येउन बसलो. भोजन प्रसादीसत् थोडा वेळ असल्याने थोडे भजन करावयाचे सगळ्यांनी ठरवले. माताजीही भजन ऐकण्यास खुर्चीवर येऊन बसल्या. आश्रमात दोन मंदीरे अगदी बाजूबाजूला आहेत एक भोलेनाथाचे व दुसरे गोपाळकृष्णाचे ,आम्ही सारे गोपाळकृष्णाच्या मंदीरात त्या लोभसवाण्या कन्हैयापुढे येऊन बसलो.
आज पेटी, ढोलक यावर भजन रंगणार होते खर तर असा योग बऱ्याच दिवसानी येत होता. त्या दिवशी आम्ही जवळ जवळ वीस एक परिक्रमावासी तिथे मुक्कामास होतो. या सगळ्यात पेटी वाजवणारा फ़क्त एक उदयन असल्याने पेटीच्या मोहक स्वरात एक छोटी पण सुरेल आलापी घेऊन उदयनने भजनास सुरवात केली, त्याच्या त्यां भावपूर्ण आलापीनेच खरतर सारे वातावरण मधूर सुरांनी भरून गेले व अशा भक्तीमय वातावरणात श्री नारायण महाराज श्रीगोंदेकरांच्या भजनाचे शब्द कानावर पडू लागले
कैसी रे बजाई बंसी
प्राणों का पिया ॥धृ॥
तनु मनु हर लीनो
भेदाभेद द्वैत छाीनो
अब सुचत नाही बिना
नंद के कुमार ॥१॥
कुष्णानंद तु मुरारी
सोहंम बीज बन्सीधारी
किया करो बिनती मेरे
हृदय मे विहार॥२॥
काय सुंदर आहेत ना काव्य पंक्तीतील शब्द !
शब्द म्हणणे म्हणजे खर तर खूप रखरखीतपणा आल्यासारखे वाटते कारण त्यानी आर्तपणे मारलेली हाक किंवा त्यांच्या कृष्णप्रेमाची किंव त्यांचे सद्गुरू श्रीकृष्णानंद महाराजांना मारलेली ती आर्त भावना सहजच आपल्या आंर्त मनालाही .साद घालते.प्रत्येक शब्द म्हणजे पूर्णपणे ओथंबून भरलेले कृष्ण प्रेम! सगळ्याच काव्यपंक्तीत परमेश्वराबद्दल लागलेली तळमळ किवा ओढ त्यामुळे 'अब सुचत नाही बिना नंद के कुमार ' किंवा 'किया करो बिनती मेरे हृदयं मे विहार' म्हणताना आपलेही हृदय त्या दिव्य प्रेमाने भरून जाते. हीच तर खरी खासीयत आहे संतकाव्याची🙏
या साऱ्या भावपूर्ण पंक्तिंना उदयनने दिलेला भावपूर्ण साजाने सारे वातावरण कृष्णप्रेमाने भरून गेले. मातांजींच्या चेहऱ्यावरही भावं ही कृष्णप्रेमाने भरून गेले होते व त्यात एक उदयनबद्दलचा कौतुकाचाही भावही दिसत होता. पहिले असे सुंदर भजन संपले व पुढे अजून काही म्हणणार इतक्यात मागून कोणीतरी म्हणाले " अरे हनुमान चालीसा बोलो भाई " उदयनने मला डोळ्यांनी खूण करून माझ्यासाठी काळी एक स्वर दिला व स्वतः समोरील माईक मोठया मनाने माझ्या समोर ठेवला, क्षणभर मी गांगरलो , कारण आपल्याला आता हनुमान चालीसा म्हणण्याची वेळ येईल हे तेव्हा डोक्यातच नव्हते कारण अजूनही त्या पाहिल्या भजनातील ओळीच मनात चालू होत्या पण उदयने परत पेटीचा सुर दिला व माझ्यकडून सहजच आधीच्या भावपूर्ण भजनामुळे मारूतीरायाचे गुणगान सुरू झाले
🌷श्री गुरुचरण सरोजरज
निजमन मुकुर सुधारी
बरनऊ रघुबर बिमल जसू
जो दायक फलचारी
बुध्दी हीन तनु जानीके
सुमीरो पवनकुमार
बलबुध्दी विद्या देउ मोही
हरहू कलेश विकार
जय हनुमान ज्ञान गुनसागर......
मी संत तुलसीदासांच्या भावपूर्ण ओव्या म्हणत होतो व खरा प्रेमाचा आनंद अनुभवत होतो. जेव्हा चालीसा म्हणून पूर्ण झाला त्यांवेळी मला खर तर इतका आनंद झाला , कारण कायं माहीत नाही पण आज माझे संध्याकाळाचे हनुमान चालीसा म्हणावयाचे राहून गेले होते व तो रोजचा नेम चुकु नये म्हणुन की काय आज मारूतीरायांनीच त्या परिक्रमावासीकडून माझी रोजची म्हणावयाची सेवा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. तोपर्यंत आठ वाजत आले होते त्यामुळे अजूनं काही न म्हणता माईचे नर्मदाष्टक व आरती घेउन त्या दिवशीचा भजनाचा आंनद सोहळा संपला. थोड्या वेळात सगळे परत आम्ही भोजन प्रसादीसाठी जमलो. आज गरम गरम खिचडी, सब्जी व चपाती असा बेत होता त्यामुळे त्याचा छान अस्वाद घेऊन उदरभरण झाले व मगाशी ऐकलेल्या भजनाचे भावपूर्ण स्वर आठवत माझे त्या दिवसाचे निद्राख्यान सुरू लागले😃😊. नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४६-
ओरीच्या आश्रमातून सकाळी साधारणपणे साडेसहा पर्यंत आम्ही पुढच्या मार्गासाठी प्रस्थान केले. खर तर तेव्हा बाहेर पूर्ण उजाडलेही नव्हते पण रस्ता डांबरी असल्याने मार्गस्थ होण्यासाठी तशी काही अडचण नव्हती. सकाळी माताजींशी परत बातचीत किवा त्यांचे दर्शन मात्र काही झाले नाही याचे कारण मला असे वाटते की माताजी त्या वेळेत त्यांच्या नित्य उपासनेत असाव्यात. आश्रमातून निघतांना सकाळच्या थंड गार वातावरणात गरम गरम चहा व पारले जीची सुर्फतिली बिस्किट खाऊन आम्ही पुढच्या मार्गासाठी निघालो. या ठीकाणी आम्हाला महाराष्ट्रातील एक परिक्रमावासी भेटले, जे आधी त्यांच्या इतर साथीदारांबरोबर होते पण तबेत्तीमुळे ते आता मागे पडल्याने त्यांच्या साथीदारांपासून बिछडले होते. त्यांनी ओरीच्या आश्रमातून निघताना आम्हाच्याकडे विचारणा केली की मी आपल्या बरोबर पुढील परिक्रमा चालू का? आम्ही त्यांना लगेच सांगीतले की आम्हाला तशी काहीच अडचण नाही फक्त आमचा चालण्याचा वेग थोडा जलद असल्याने आपल्याला आमच्या बरोबर चालावयास जमते आहे का नाही तेवढे मात्र आपण बघावे. दहा मीनटे आमचे चालणे झाले तर पुन्हा एका एकदा बंगला वजा आश्रमातून परत चहाची हरी हर झाली, बाबाजी चाय पिने चलो, खर तर दहा मीनटांपूर्वी चहा झाला असल्याने इतक्या लगेच चहा प्यायची इच्छा नव्हती पण ते बोलवणारे इतक्या आपूलकीने बोलवत की त्यांचे मन मोडणे जीवावर येई त्यामुळे तिथे दहा मीनटात प्रेमळ चहाचा आस्वाद घेउन आम्ही पुढे मार्गस्थ झालो .त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रीयन परिक्रमावासीयाची ओळख आम्ही एका मध्यप्रदेशातून आलेल्या परिक्रमावासीयांच्या ग्रुपशी करून दिली कारण त्यां ग्रुपमधे थोडे वयस्कर वयाचे परिक्रमावासी वं भगिनी पण होत्या त्यामुळे त्यांच्या चालण्याच्या वेगामधे हा परिक्रमावासी बसणारा होता, भाषेचा थोडा विषय होता पण पुढे तीन चार ठिकाणी आम्हाला ते भेटले गेले तेव्हा ते त्या परिक्रमावासीयांबरोबर आनंदात परिक्रमा करत होते. पुढे एखाद महिन्यांनी तर त्यांना त्याचे पुढे गेलेले त्यांचे साथीदारही भेटले होते .
आम्ही साधारणपणे नऊ साडेनऊपर्यंत आसाला दगडूजी महाराजांच्या आश्रमापर्यंत पोहोचलो. तिथल्या सेवकऱ्यांनी लगेच आमचे स्वागत करून आम्हाला विश्राम करण्यास व आता सकाळचा नाश्ता व दूपारी भोजन प्रसादी घेऊनच आम्ही मग पुढे प्रस्थान करण्याची विनंती केली. इतका वेळ तर आम्ही तिथे थांबणार नव्हतो त्यामुळे तिथे दर्शन घेऊन ,नाश्ता करून पुढे जायचा आम्ही विचार केला. त्याप्रमणे दर्शन घेऊन आम्ही जिथे नाश्ता किंवा बालभोग होता तिथे पोहचलो.आज तिथे नाश्ताला होती आपल्या सगळ्यांचीच आवडती डिश म्हणजेच बटाटे वडे 😃. त्यामुळे त्या गरम गरम बटाटेवडयांच्या खमंग वासाने तर पोटाला लागलेल्या भूकेची जाणीव अजूनच झाली. पण त्या दिवशी होती विनायकी चतुर्थी , उदयनचा उपवास😃 म्हणजे बप्पा त्यालाही विचारत होता की काय करतोस बेटा आता?कारण बटाटेवडे म्हणजे उदयनचे जीव की प्राण , डोंबीवलीतही सध्याकाळी फिरताना रस्ताला कुठे गाडी किंवा बटाटे वडयांचा स्टॉल किंवा दूकान लागले तर खूप वेळा तो मला आग्रह करून खायला लावी ,मी अगदीच नाही म्हंटले तर आमचे त्यावरून थोडे भांडण होई पण मग तो पार्सल घेऊन घरी जाई , थोडक्यात काय तर इतकी आवडती गोष्ट समोर होती व विनायकीचा उपवास होता. आम्ही दोन तीन वेळा त्याला सांगुन पाहीले की आज सांग बाप्पाला की आज नो उपवास😊 , फक्त बटाटेवड्यांचा समाचार.
यामागे अजूनही एक कारण असेलही होते की पुढेही काही उपवासाचे मिळेल की नाही याची काही शाश्वती नव्हती.कारण त्या सगळ्या भागात एकादशीच्या उपवासाचे महत्व किंवा उपवास करणारे जितके लोक आहेत तेवढे संकंष्टी किवा विनायकीचा उपवासं करणारे नाहीत .त्यामुळे तु ही आत्ता खाऊन घे पण तेव्हा त्यांनी मनावर दगड ठेउन आम्हाला सांगीतले की तुम्ही खा, मी खाणार नाही. मग मात्र काहीही विचार नं करता मी व बापू ने त्या गरम गरम वडयांचा परामर्ष घेण्यास सुरवात केली .मस्त ताव मारून खाताना उदयनाला खाता येत नाही म्हणून वाईट वाटत होते पण दूसरा काही इलाज नव्हता. माझे खाणे संपता संपता मी परत त्यांला म्हंटले की " मला असे वाटते की तु आज उपवास करूं नयेस कारण एक तर आपल्याला दिवसभर भरपूर चालावयाचे आहे व संध्याकाळी आपण जिथे पोहचू तिथेही तुला काही उपवासाचे मिळेल याची शाश्वती नाही . (विनायकींचा उपवास हा दोन्ही वेळचा असतो) त्यामुळे मला असे वाटते की आता आपल्याला जो काही भंडाऱ्याचा प्रसाद मिळत आहे तो तु खाउन घ्यावास ". काय माहीत नाही पण आता त्याला माझे हे बालणे पटले त्यामुळे त्यावर तो बर म्हंणाला. मी लगेच बापूला एक वड्याची डीश घेऊन यायला सांगीतली, न जाणो परत त्याचा विचार बदलायचा😃. मग त्यानीही तो बालभोग सेवन केला त्यामुळे त्याच्या पोटातही तो बालभोग गेल्याने आम्हा दोघांनाही खूप बरे वाटले कारण अजून संध्याकाळपर्यंत बरेच चालवयाचे होते व त्यासाठी पोटात काही आधार असणे गरजेचे होते.
चालत चालत आम्ही दूपारी साडेबारा एकच्या सुमारास शाश्वत मारूतीधाम या ठीकाणी पोहचलो. मंदीराचा दरवाजा ढकलून आम्ही आत शिरलो तो समोर सुंदर विशाल व महाकाय बसलेले श्री हनुमानजी .बघुनच खूप आनंद झाला, आत अगदी शांतता,बाकी कुणीही नव्हते त्यामुळे आम्ही तिघांनी खडया स्वरात मस्त हनुमान चालीसाचा पाठ केला. पाठ झाला व थोडा वेळ आम्ही तिथेच तिघेही डोळे मिटून शांतपणे बसलो व मनात त्या बलदंड पण ज्ञानी ,गुणी, व नवविधा भक्तीतील दास्यभक्तीने परिपूर्ण असलेल्या त्या आनंदकंदाला मनात आठवत गेलो .तो आनंद मनात साठवतच आमचे पुढच्या मार्गाकड़े प्रस्थान झाले. आजचे मुक्कामाचे ठिकाण होते, मणीनागेश्वर.
साधारणपणे साडेचार ते पाच पर्यंत आम्ही आश्रमात पोहचलो माईच्या अगदी समोर असलेला हा आश्रम. भरपूर झाडी व थोडा वर चढत जाणारा असा हा भाग.
आश्रमात तरुण वयातील ब्रम्हचारी सेवेसाठी म्हणून इथे तीन, चार कुणी सहा महिन्यासाठी येतात वं इथे पूजा,अध्ययन इतर सेवा करतात.सवेकऱ्यांनी आम्हाला इथे आमची रहावयाची खोली दाखवली ,तिथे आम्ही आमची आसने लावली व सायंस्नाना थोडा वेळ असल्याने खोलीच्या बाहेर येऊन माईचे संध्याकाळचे रूप डोळ्यात साठवतं गेलो . संध्याकाळच्या शांत धीर गंभीर वातावरणात माई ही तशीच शांत, ध्यानस्त झाल्यासारखी वाटत होती. लांबवर सुर्यही हळूहळू अस्ताला चालला होता त्यामुळे ती गंभीरता अधीकच जाणवत होती.थोडा वेळ त्याही शांत, धीरगंभीर वातावरणाशी समरस होऊन त्याचा एक फिल घेण्याचा प्रयत्न केला.
संध्याकाळी सात वाजता मंदीरात आरती असते हे सेवेकऱ्याकडून कळल्यामुळे आम्ही परत सायं स्नानाला आमचा मोर्चा खाली आश्रमातील बाथरूमकडे वळविला . यापुढील मणी नागेश्वरमधील आनंदाचे क्षण पुढच्या भागात.नर्मदे हर🙏
नर्मदा परिक्रमा अनुभव ४७-
आमची नेहमीची सायंपुजा व आरती करून आम्ही सात वाजेपर्यंत मणीनागेश्वर आश्रमाच्या मंदीरात जायला निघालो. किनाऱ्यालगतचा आश्रम व आजूबाजूला बऱ्यापैकी झाडी असल्याने आज थंडीचा कडाका चागल्यापैकी जाणवत होता. साधारण पावणे सात वाजेपर्यंत आम्ही मंदीरात आलो. परमेश्वराचे निर्गण निराकार रूप इथे शिवपिंडीच्या रूपाने समोर आले. निरनिराळ्या फुलांचे हार घातलेले व सजावट केलेले ते भगवंताचे रूप मनाला खूप आनंद देत होते. आम्ही तिघे, अजून काही परिक्रमावासी वं त्यां आश्रमाचे सेवेकरी असे सर्व आम्ही मंदीरात जमा झालो. प्रथम त्याचे नित्याचे काही श्लोक पठण झाले व नंतर वादयांच्या गजरात आरतीला सुरूवात झाली. घंटा , ढोल, झांजा या सगळ्या वादयानी त्या थंडीने गारठणाऱ्या वातावरणातही एक वेगळेच चैतन्य आले, डोळ्यासमोर सहजच भोळे सांबसदाशीव ऊभे राहीले, अंगावर भस्माचे पट्टे, कमरेला व्याघ्रचर्माचे वस्त्र , हातात त्रिशुळ, डमरू, गळ्यात रुंडमाळा , कमरेला वं गळ्यात नागराजांनी दिलेला सुंदर व मोहक वेढा, मस्तकावरी जटा, त्यावर सुंदर अशी चंद्रामाची कोर, मस्तकावरील जटेतून झुळझुळ पणे वाहणारा गंगामातेचा प्रवाह व मुखावर प्रसन्न तेज व रामनामात निमग्न असलेले ते रूप सहजच डोळ्यासमोर साकार झाले. नर्मदाष्टक ,आरती असे सगळे म्हटल्याने मनाला त्याचे टॉनीक मिळाल्याने ते प्रसन्न झाले .आरती झाली व त्यांनतर थोडयाच वेळात रात्रीचे उदरभरण झाले , साधेच पण रुचकर जेवणानी मन तृप्त झाले. भोजन प्रसादी घेऊन बाहेरच्या भागात आलो , समोर माई संथपणे वाहात असताना दिसत होती.चंद्राच्या मंद प्रकाशात माईच्या संथपणे वाहणाऱ्या प्रवाहाला मधुनच एक चंदरी चमकणारी झाक खूप छान दिसत होती. हे तिचे शांत रुप मनाला , डोळ्यांनाही आनंद देणारे. सकाळी सुर्याच्या लखलखत्या उन्हात एका वेगळ्याच तेजाने चमकणारी माई. परिक्रमेत किनाऱ्यानी जात असताना तिची दिसणारी वेगवगळी रूपे कधी अवखळपणे वाहणारी, तर कधी खळखळत्या रूपात, कधी रूद्र रूपात तर कधी मायेच्या वात्सल्याचे सौम्यं रूप तर कधी पहाटेच्या धुक्यामुळे आलेले गहिरे व गुढ रुप ! सगळीच तिचीच रूपे जी मनाला ताजेतवानी करून शरीराचा व मनाला कायम आल्हाद देणारी व परिक्रमा जीवंत ठेवणारी. हे वर्णन करताना मला सहजच उदयने हल्ली महेश्वरला माईच्या किनारी असताना माईच्या अशाच निरनिराळ्या रूपावरील केलेले एक कIव्य आपणासमोर मांडण्याचा मोह मला आवरत नाही. त्याच्या शब्दांची चपखल गुंफण व माईचे सुंदर सौदर्यं यांचा एक सुरेख मिलाफच मला असे वाटते की हे काव्य वाचताना आपल्याला अनुभवास येईल.🙏
नर्मदे हर !
होता पहाटेची वेला॥ नेसे केशरी पाटोळा॥
माझ्या डोळ्यांच्या ज्योतीने॥ रेवे ओवाळितो तुला॥
सूर्य चढता माध्यान्ही॥
नेसे सोनेरी पैठणी ॥
रेवा त्रैलोक्याची राणी॥ चाले लाटा लाटातूनी ॥
ऊन्हे कलता जराशी॥
साडी नेसते आकाशी॥ मिळे रत्नसागराशी॥ जशी वृत्ती ती आत्म्याशी ॥
मध्यरात्रीचा चंद्रमा ॥
पूर्ण भरा मधे आला ॥ त्याच्या स्वागताला नेसे॥ रेवा काळी चंद्रकळा ॥
रात्रंदिवस पाहून ॥
नाही भरत हे मन ॥
माय रेवेच्या वेडात ॥
वेडावला उदयन् ॥
किती यथार्थ वर्णन आहे ना माईचे ! व हे आतून तेव्हाच येऊ शकते जेव्हा कडोकडीचे प्रेम तिच्यावर जडते. त्याचे हे काव्य वाचून आताही माईची ती निरनिराळी रूपे डोळ्यासमोर आली व मनात माईच्या असीम सौंदर्याचे कधी हळुवार तर कधी गंभीर, कधी अवखळ तर कधी कलकलत वाहणारे रूप डोळ्यासमोर आले व त्यासाठी उदयनला धन्यवाद देण्यासाठी मनात सहज शब्द स्फुरले
🌷माई🌷
आपके आँखीयोके झरोकेसे
फिरसे माई की सुंदरता निहरती गयी ।।
परिकमा के यादों की झालर मे .
फिरसे ताजगी आने लगी ॥
बहूत भाग्यशाली है वो लोग जीनको माईं का किनार मिला ॥
पर हम भी कुछ कम नही
हमे माईका सच्चा प्रेमी मिला ॥
माया के मायानगरी मे हम मरते है हर दिन ॥
पर माईं अपने प्रेम की वर्षासे सँवारती है हर दिन ॥
जनमजनमका नाता है उससे ये साथ कभीना छुटेगा ॥
मेरी आईकेही गोदमें हमरा आखरी श्वास छुटेगा ॥
मेरी आईकेही गोदमें हमरा आखरी श्वास छुटेगा ॥🙏
असे हे माईचे निखलास सौंदर्य त्याही रात्री मनात आठवत आम्ही खोलीत स्वतःला स्लिपिंग बॅगमधे गुरफटून घेतले . प्रेमाचा हळुवार हात फिरवायला माईं होतीच आमच्या समोर व मनातही. नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ४८-
मणीनागेश्वरला त्या दिवशी निद्रेच्या कुशीतून आम्ही पहाटे साडेचार पाचलाच जागे झालो. आमची नित्यकर्म आटोपून आज इथुन परत पुढच्या प्रवासाला निघायचे होते त्यामुळे स्नान, माईची पुजा आरती करून सकाळच्या सातच्या त्यांच्या नित्यउपासनेला आम्ही तिघे तिथे हजर झालो. सकाळची प्रसन्न वेळ, बाहेर पक्षांचा छानसा किलबिलाट,समोर माईचा प्रसन्न वाहता प्रवाह , थंडीचा गारठाही चांगलाच होता पण तरीही हे सगळेच मनाला आनंदीत करत होते .सकाळची मंदीरातील आरती झाली. कालचे जगदीश्वराचे रूप वेगळे, आजचे सकाळचे रूप वेगळे, प्रत्येक वेळी एक नवा आनंद देणारे!
बाल भोग झाला, आता इथुन पुढे प्रस्थान करण्याची वेळ आली तेव्हा तिथल्या मुख्य महंताना आम्ही भेटावयास गेलो. त्याच्याशी थोडी बहोत परिक्रमा व माईविषयी बातचीत झाली. उदयन गेल्याच वर्षी इथे येऊन गेला असल्याने त्यांची त्यांच्याशी थोडीफार ओळख होती.आमच्याशीही ते बोलले ,काही प्रश्नही त्यांनी विचारले. उदा.तुम्हाला ही परिक्रमा करण्याची इच्छा कशी झाली.?उदयने व मी जेव्हा पुढेमागे माईच्या किनारी कायमचे येऊन रामरायांचे मंदीर बांधुन परिक्रमावासीयांच्या सेवेचा विचार त्यांना सांगीतला तेव्हा म्हणाले . 'माई की इच्छा होगी तो जरूर होगा ' मगर आश्रम के बारे सोचते हों क्या?पुढे म्हणाले " आश्रम बनाने मे बहोत झंझट,झमेला है, सब जगह पर ध्यान देना पडता है, अभी मेरा ही देखो , यहा आश्रम की खेती है कल शाम को मुझे वहाँ जाना पडा, सब देखना पडता है, कभी कभी खुद को भी खेती काम करना पडता है,किसेके भरोसे पे हम नही रह सकते. आश्रम की व्यवस्था मे भी ध्यान देना पडता है, इस के कारण उपासना करने के लिये वक्त कम मिलता है , ये सारी बाते पहले आप सोच लो और फिर इधर आने का निर्णय ले लो" . मला म्हणाले ''आप जल्दी किसी के विचार से संमोहित हो जाते हो क्यां?ऐसा मत करो ,जो कुछ करना है वो सोच समझ कर करो,नही तो फिर आपको यहाँ कुछ नहीं मिलेगा, ना उपासना होगी ना सेवा " कदाचीत मी परिक्रेमेला का आलो असा प्रश्न मला विचारल्यावर मी त्यांना उत्तर देताना सांगीतले होते की मी उदयनच्या दोन परिक्रमा , त्याने केलेले परिक्रमचे सुंदर वर्णन, त्यातील त्याचे अनुभव ऐकले वं मनात इच्छा झाली की आपणही अशी परिक्रमा करावी वं त्यां आनंदाचा, अनुभुतीचा आस्वाद घ्यावा व त्यासाठी बँकेतून चार महिन्याची सुट्टी काढून आलो आहे त्यामुळे त्यांना कदाचीत तसे वाटले असावे. पण त्यांच्या बोलण्यातून त्यानी सत्य स्थितीची जाणीव आम्हाला करून दिली. पुढे असेही म्हणाले की जर तुम्हाला उपासना करायची आहे तर आश्रम किंवा मंदीर साठी अशी जागा निवडा की ज्या जागेपासून थोडयाच अंतरावर पुढे व मागे मोठे आश्रम असतील कारण तरच तुम्हाला उपासना करण्यास वेळ मिळेल, अन्यथा तुम्ही त्या व्यवस्थेत अडकून पडाल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करावयचे आहे, आश्रम चालवायचा आहे की इथे येऊन उपासना करावयाची आहे.
खूप सडेतोडपणे पण सत्य परिस्थितीची जाणीव त्यांनी आम्हाला त्यांच्या संभाषणातून करून देऊन एक विचार करण्याची नवी दिशा आम्हाला दिली असे मला वाटले .
बराच वेळ त्यांच्याशी चर्चा होऊन आम्ही ८.३० वाजे पर्यंत त्यांचे आर्शिवाद घेऊन पुढच्या मार्गासाठी रवाना झालो. आजचा टप्पा तसा खूप छोट्या अंतराचा होता कारण आजचे आमचे ठिकाण होते भालोद. या स्थानाची विशेष ओढ होती कारण पहिले म्हणजे दत्तगुरूंचे स्थान व दूसरे कारण म्हणजे इथे असलेले मराठी महंत 'प्रतापे महाराज ' आज खूप दिवसानी एका मराठी महंताशी मराठीत मनमोकळेपणाने परिक्रमा व माई विषयी बोलता येणार होते. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. कारण त्यांनी इतक्या वर्षापुर्वी केलेली परिक्रमा , त्यातील त्यांचे अनुभव , त्यांच्या या स्थानाचे अनुभव , या स्थानाला परिक्रमेत झालेले येणे व इथुनच पुढे मिळालेली दत्तसेवा हे सगळे त्यांच्याकडून ऐकण्याची एकुणच खूप उत्सुकता होती. परिक्रमेचे अनुभव त्यांच्या मुखातून ऐकण्याची मजा काही औरंच होती. त्या काळात केलेली परिक्रमा ही आत्ता आम्ही करत असेलेल्या परिक्रमेपेक्षा खूप कठीण होती असे मला वाटते. त्यामानाने आत्ता परिक्रमावासीयांची सेवा करणारे बरेच आश्रम माईच्या निरनिराळ्या ठिकाणी झाले आहेत. शुलपाणीत मामांकडून लुटण्याची भिती नाही, पुर्वी असलेली घनदाट झाडी, खूप कठीण मार्ग यामुळे माझ्या मते आत्तापेक्षा तेव्हा परिक्रमा खूप कठीण होती. असो
या परिक्रमेच्या अनुभवाच्या विचारात व अवधुतचिंतन श्री दत्तगुरू महाराजांच्या विचारात आम्ही मार्गाने चालू लागलो. मनात दत्त जयंतीच्या उत्स्वातील भजनांची आठवण होऊ लागली. संतांचे सगळे अभंग किंवा भजने म्हणजे भगवंतावर असलेल्या असीम प्रेमाने न्हाहलेले काव्य,जणू काही त्यांचा तो प्राणच ! हे ओघवते काव्य केवळ त्यांचे त्या परमेश्वरावर असलेल्या आत्यंतिक प्रेमामुळेच सहजच आलले असते यात काही शंका नाही .त्यामुळच त्यांचे हे शब्द सहजच आपल्या मनाला भारूड घालतात व ते म्हणाताना किंवा ऐकताना आपण सहजच भगवंताच्या प्रेमात बडून जातो.
आईनी भजनासाठी निवडलेले सगळेच अभंग म्हणजे एक एक मौल्यवान रत्नाची खाणच असल्याचे मी समजतो. उदा. दयावयाचे झाले तर
दत्त निरंजन गा सदोदीत दत्त निरंजन गा॥
दत्ता विसरूनी किती फिससी तु जन्ममरण पिंगा ॥
दत्ता दिगंबरा या हो॥
सावळ्या मला भेट दया हो॥
दत्तासी गाईन दत्तासी पाहीन वाहीन हे मन दत्ता पायी॥
दावी रे दत्ता चरण तुझे सुखधाम ॥
आला आला गुरू राज वैद्य आला ॥नाडी ज्ञाने भव रोग ओळखिला॥
मागे गरूडेश्वरला आलो असताना दत्त माऊलीसमोर म्हंटलेले हे सगळे अभंग म्हणताना मिळालेला आनंद आठवून परत मी आज ताजातवाना झालो. पण त्या आधी मणीनागेश्वर हून निघाल्यावर थोडया अंतरावर आपली भेट होते अशाच एका माईच्या प्रेमाने परिपूर्ण न्हाहलेल्या एका प्रेमळ विभूतीची वं ती म्हणजे कार्ष्णि वसूआनंद,एक आनंदी एक छोटेसे शांत पण परिपुर्ण आनंदाने नटलेले स्थान. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही तिथे पोहचलो. आम्ही पोहचलो तेव्हा फक्त महाराजच होते , महाराज म्हणण्यापेक्षा बघताक्षणी ते मला आपल्या सगळ्यांचे आजोबा असल्यासारखेच वाटले . अतिशय प्रेमळ, चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज, प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांनी प्रसन्नपणे हासून आमचे स्वागत केले . त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघुनच मला आम्ही इथे आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आम्ही हात पाय धुवुन त्यांच्या समोरच बसलो. त्यांनीही आनंदाने आमची सगळी चवकशी केली. त्यांच्दा त्यां बोलण्यात व चेहऱ्यावर तेव्हा जो काही आनंद होता त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही कारण ते एक अनुभवण्याचे क्षण होते. आमच्याशी बोलून झाल्यावर अतिशय प्रेमळपणे म्हणाले 'आप यहाँ रूकेंगे ना आज " पुढे परिक्रमेत असताना त्यांची जेव्हा जेव्हा आठवण झाली तेव्हाही वं आजही असे वाटते की ही एक चुक आम्ही त्या दिवशी केली खर तर आम्ही तिथे थाबांवयास हवे होते, पण कायं माहीत नाही सकाळपासून भालोद ठरल्यामुळे की काय, किंवा ११० दिवसाच्या गणीताचे मुळ डोक्यात असल्यामुळे की काय माहीत नाही पण आमच्याकडून पटकन होकार आला नाही. त्यावर ते लगेच हळुवार आवाजात म्हणले ' काई बात नही , आप बैठ जाईये मै आपके लिये चाय बनता हूँ " असे म्हणत हळु हळु स्वयंपांकघरातील शेगडीपाशी गेले. खर तरं एवढया मोठया माणसाने आमच्यासाठी चहा बनवणे योग्य वाटत नव्हते त्यामुळे आम्ही करू का असे त्यांना विचारलेही पण आम्ही तिथे चहा बनवणे त्यांना पटत नसावे कारण आम्ही परिक्रमावासी , माईची लेकरे त्यामुळे त्यांचे लाड करणे हा हया सगळ्यांचा भाव,त्यामुळे काही न बोलता आम्ही शांतपणे बसून राहीलो. ते चहा बनवत असताना मी सहजच त्यां छोटया कुटीच्या बाहेर जाउन थोडा त्या निर्सगरम्य वातावरणाचा आनंद घेतला. छानपणे वरून खाली उतरलेले वेगवगळया रानटी फुलांचे वेल, खारूताईची झाडावरून होणारी लगबग, धावपळ.निरनिराळ्या झाडांना आलेली फुले, तीही एका वेगळ्याच आनंदाने हसत आहेत असाच भास मला त्यावेळी झाला. सगळच आनंदी, समाधान देणारे वातावरण, तेवढयात बापूने आतून चहासाठी हाक मारली त्यामुळे नाईलाजाने त्यां सुखद वातावरणातून मी परत आत गेलो. मी आत गेलो तेव्हा ते पातेल्यात चहा घेऊन येत होते , आम्ही आमच्या सॅग मधून आमचे मग काढले व त्यांनी आमच्या मगात तो चहा ओतून दिला. तेवढयात एक मनीमाऊही तिथे आली वं त्यांच्या पायाशी चिकटून तिच्या भाषेत बोलू लागली व तेही तेवढयाच आनंदाने व हळुवारपणे तिच्याशी संवाद साधत होते, ते दृष्य बघुनच मला गंमत वाटत होती की मला ज्याना बघून इतका आनंद किवा समाधानं मिळत आहे तेच आपलेपण त्यां प्राण्यालाही त्यांच्या बद्दल वाटत होते. खरच काय हया प्रमाची ताकद आहे ना?
त्याच्याशी थोडा वेळ बोलून त्याचाही निघताना आर्शिवाद घेऊन आम्ही आता परत भालोद च्या दिशेने प्रयाण केले, आता भालोदच्या दत्त माऊलीचे वर्णन व प्रतापे महाराजांबरोबर झालेला संवाद पुढल्या भागात, नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ४९-
आम्ही भालोदच्या आश्रमात पोहचलो तेव्हा साधारण १० वाजले होते. महाराज आश्रमाचा दूरुस्तीच्या कामा संर्दभात एका कारागीरीला काही सुचना देत होते. मधेच आमच्याकडे बघुन आम्हाला हसत हसत 'या या ' असे म्हणाले.त्याच्याशी पूर्ण बोलून झाल्यावर आम्हाला म्हणाले ' कुठून महाराष्ट्रतून आलात का? ' आम्ही ' हो ' असे म्हटल्यावर 'चला मी दाखवतो तिथे तुमची आसने लावा व मागे जाउन हातपाय धुवुन या ' असे त्यांनी आम्हाला सांगीतले.आम्ही त्यांनी दाखविलेल्या जागी आमच्या सॅग ठेवल्या व हातपाय धुवुन आम्ही आज इंथेच मुक्कामी आहोत याची कल्पना त्यांना दिली.
नंतर बाजुलाच असलेल्या दत्त माउलींच्या दर्शनाला गेलो. काळ्या पाषाणातील सुंदर एकमुखी दत्ताचे ध्यान बघता बघता मन आनंदाने भरून गेले. दत्तजयंतीच्या उत्सवातील तुकाराम महाराजांचा अभंगाचे शब्द ओठावर आले
नमन माझे रे गुरूराया I महाराजा दत्तात्रया I १ । तुझी अवधूत मूर्ति I माझ्या जीवाची विश्रांति I२ I नमन माझे
माझ्या जीवीचे साकडे l कोण उगवेल वो कोडे I३ I नमन माझे
अहो अनसुया सुता I तुका म्हणे पाव आता I४ I
किती भावपूर्ण शब्द, शुध्द भक्तिरस. भगवंताबद्दलचे प्रेम प्रत्येक शब्दातून प्रगट होते. हे दत्ता,माझ्या जीवाच्या विश्रांतीचे स्थान , माझ्या जीवीचे कोड ऊलगडणाऱ्या अनुसया सुता मला तु पाव म्हणजेच तुझ्या नामाच्या प्रेम रसाने मला पूर्ण तृप्त कर. दूसरे काही त्यांच्याकडून मागणे होणे शक्य नव्हते कारण दूसऱ्या एका अभंगात त्यानी अगदी सहजणे म्हंटले आहे की
न लगे मुक्ति धनसंपदा
संत संग देई सदा ॥
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालवे आम्हासी॥
गुण गाईन आवडे हेची माझी सर्व गोडी ॥.
तुझे गुणगान करण, तुझे नाम मुखाने घेणे हे एकच माझे ध्येय , माझ्या जिवीचे कर्तुत्व आहे हा एकच ध्यास त्यांच्या ठीकाणी होता.
खर तर तुकोबाराय विठ्ठलाचे निस्सीम भक्त पण सर्व चराचरात तोच भरलेला आहे ही भावना दृढ असल्याने तितक्याच प्रेमाने त्यांनी दत्तमाऊलीशी केलेला हा काव्यरूपी प्रेमाचा संवाद आठवून डोळे भरून आले. कुठे पंथापथ भेद नाही की आभिमान नाही, आहे ते फक्त त्या इश्वरी शक्ति बद्दलचे प्रेम मग ते कुठल्याही रूपात असो.
थोडा वेळ आम्ही तिथेच डोळे मिटून बसून राहीलो .
नंतर महाराजांना परत भेटावयास गेलो कारण आज़ दुपारच्या भोजन प्रसादीला तिथे असल्याने तिथे सेवा म्हणून काही मदत हवीं आहे का ?हे ही विचारणे आवश्यक होते. आम्ही त्यांच्याशी बोलत असताना बोरीवलीचे अजून दोन परिक्रमावासी श्री फाटक वं त्यांचे स्नेही असे आश्रमात आले. त्याचाही आज इथेच मुक्काम आहे हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्यांच्याशी बोलल्यावर महाराज आम्हाला म्हणाले 'तुम्हीच रसोईत जाऊन विचारून या की त्यांना तिथे काही मदत हवी आहे का? त्यामुळे आम्ही लगेच तिथल्या स्वयंपाकगृहात गेलो.तिथे एक वयस्कर मावशी ही सगळी रसाईची सेवा करत होत्या त्यामुळे त्यांच्याशी आम्ही या बाबतीत बोललो .सगळ्याच स्वयंपाक व्हायचां बाकी होता. त्यामुळे एवढया सगळ्या जणांच्या पोळ्या व आमटी ,भात व भाजी असे संगळेच करावयाचे बाकी असल्याने पोळ्यांची जबाबदारी उदयनने त्या मावशींकडून मागून घेतली व बाकीचे सर्वं करण्याची जबाबदारी त्य मावशींवर ठेवली. आम्ही साधारण सगळे जण मिळून तिथे दहा ते बारा जण असल्याने तीस ते पस्तीस पोळ्या करावयास लागणार होत्या .उदयनच्या भरोशावर हे पोळ्या करण्याचे शिव धनुष्य आम्ही पेलणार होतो .कारण बाकीचे सगळे स्वयंपाकाचे मला येत असले तरी पोळ्या कधी केल्या नव्हत्या त्यामुळे या सेवेत तसा काही मी कामाचा नव्हतो त्यामुळे उदयनला फक्त पोळ्या भाजून देण्यापूरतीच काय ती मदत मी करू शकत होतो, तेही एखाद दूसरी पोळी व्यवस्थित भाजावयास जमल्यानंतर . इकडे डोंबिवलीला कधी पोळ्या करण्याची वेळ माझ्यावर अजून आली नसल्याने किंवा कधी चुकून माकून तशी वेळ आली तरी भाजी घरी तयार करून व पोळ्या दूकानातून घेऊन येई .डोंबिवलीत भरपूर पोळी भाजी केंद्रे हाकेच्या अंतरावर असल्याने पोळ्या विकत आणून माझे काम चाले.
स्वयंपाकात रोज पोळी किंवा भाकरी बनवण्याच्या या कामाबद्दल संगळ्या भगीनी वर्गाचे मी मनापासून कौतुक व आभार मानतो कारण रोज न कंटाळता या पोळ्या काय किंवा भाकऱ्या काय, बनवणे म्हणजे खरच किती कौशल्यपूर्ण पण तितकेच जिकीरीचे काम आहे हे तेव्हा जास्त लक्षात आले.घरी रोज आम्ही मऊ , लुसलुशीत पोळ्या सकाळ, संध्याकाळ खातो पण त्यामागे असलेले घरच्या स्त्रीचे प्रेमाचे पण तितकेच कष्टाचे फ्ण कंटाळवाणे काम किती आहे हे ह्या पोळ्या जेव्हा केल्या तेव्हा जास्त प्रार्कषाने जाणवले. ( फक्तं भाजून देण्याया इतकी सेवा करूनही ) त्यां स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करण्यास चुली होत्या म्हणजे आमच्यासाठी अजूनच कठीण काम होते. पण आमचे भाग्य चांगले की त्यां आश्रमात अजून एका ठीकाणी ओटा व गॅसची सोय केलेली होती त्यामुळे पोळ्यांसाठी लागणारी कणीक, तेल, मीठ व पाण्यासाठी लागणारे भांडे असे घेऊन आम्ही त्या खोलीत गेलो.
तसऱ्याळ्यात ऊदयनने त्याच्या अंदाजाने कणीक काढली व भिजवली. त्याला या गोष्टीत बापु ने मदत केली. कणीक चागली मळून झाल्यावर बापूजी नेहमीच्या नेमाच्या वाचनासाठी परत बाहेर गेले व आता मीच एक लंगडा असिस्टंट ऊदयनच्या मदतीला राहीलो. उदयनने चार पाच पोळ्या लाटण्यासाठी लागतील तेवढे गोळे करून घेतले व त्याच आकाराचे पुढचे गोळे तुं कर असे मला सांगीतले. मी जरा भीतभीतचं पाहिले एक दोन गोळे बनविले कारण पाहिली गोष्ट म्हणजे ही सवय नाही व दूंसरे म्हणजे माझ्या हाताला ती कणीक चिकटेल की काय हा विचारं डोक्यात होता. पण तेलाच्या वाटीत थोडी बोटे बुडवून घे म्हणजे कणीक हाताला चिकटणार नाही असा एक सोपा ऊपाय त्याने सांगीतल्याने मला ते गोळे बनवणे सोपे झाले. एकदा ऊदयन ओके म्हटंल्यावंर मग मला जरा धीर आला व बाकीचे सगळे त्याच आकाराचे गोळे बनवून घेऊन आम्ही एक अंदाज घेतला की जेव्हढया पोळ्या आत्ता लागणार आहेत तेवढीच कणीक बरोबर भिजवली आहे किवा कसे?पण उदयनचा अंदाज बरोबर होता. मी कणकेचे गोळे करीत होतो तोपर्यंत उदयनच पोळ्या लाटून भाजत होता पण माझे ते काम झाल्यावर मीच त्याला म्हंटले की यापुढच्या पोळ्या मी भाजतो. थोडया नाखुशीने त्याने ते भाजण्याचे काम त्याने मला दिले(अप्रशिक्षित कामगार )पुढच्या सगळ्या पोळ्या भाजून होईस्तो पर्यंत प्रत्येक पोळी भाजतांना मला तो एक एक इनस्ट्रेकशन देत गेला . कदाचीत त्याच्या मनासारखे पोळी भाजणे माझ्याकडून होत नसावे कारण त्याच्या चेहऱ्यावरूनच ते कळत होते पण मलाही एकं दोन पोळ्या भाजून झाल्यावर थोडा बहूत भाजण्याचा अंदाज आला होता व पोळ्या लवकर होण्याच्या दृष्टीने हे करणे गरजेचे होते. नेहमीच्या सवयीमुळे उदयनने पोळ्या अतिशय पातळ , सुंदर गोलाकार लाटल्या होत्या .पण त्यात त्यां दिवशी काही न्यून राहीले असेल तर ते माझ्या भाजण्यानेच. एकुणच उदयनमुळे आम्ही ही बाजी मारली होती. मावशींचाही तोपर्यत बाकीचा सगळा स्वयंपाक तयार झाल्याने आम्ही सगळे जण एक वाजता भोजन प्रसादीस बसलो. आज सकाळपासून काही खाणे झाले नसल्याने सगळे पोटभर जेवले .पोळ्याही सगळ्यानी खाल्या म्हणजेच पोळ्या नक्की चांगल्या झाल्या होत्या व भाजल्याही . खर तर आज महाराजांशी झालेल्या गप्पा हे लिहावयाचे ठरवले होते पण लिहावयास सुरवात झाली व तुकाराम महाराजांचा अभंग लिहीला व सौं नी समोर गरम गरम लुसलुशीत ज्वारीची भाकरी व त्यावर साजुक तूप व वाटीत गरम गरम आमटी असे ताट माझ्या समोर ठेवले व हा भालोदचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला .त्यामुळे प्रथम त्या प्रमाने बनवलेल्या गरम , रुचकर भाकरीचा आस्वाद घेतला. पण त्यां भाकरीच्या स्वादामुळे की काय ,महाराजांशी झालेल्या गप्पांच्या एवजी हा पोळी प्रपंच लिहीण्याचा मोह झाला . त्यामुळे संध्याकाळच्या परत केलेल्या पोळ्या व महाराजांशी झालेल्या छान गप्पा बघुया पुढच्या भागात नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव ५०-
दूपारची भोजन प्रसादी झाली , आज गुआरच्या आश्रमानंतर परत आम्ही असे निवांत होतो त्यामुळे जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही दत्त मंदीरात आलो . कुणी तिथे गुरूचारीत्राचे पारायण करतं होते, कुणी नामस्मरण, तर कुणी नित्याच्या दर्शनाला आले दिसत होते. आम्हीही तिघे दत्त माऊली पुढे येऊन बसलो. तिथल्या पावित्र वातावरणाने मन सहजचएकाग्र झाले.
त्यानंतर संध्याकाळी आमच्या नंतर आलेले श्री फाटक व त्यांचे सहकारी यांच्याबरोबर परिक्रमेबाबत म्हणजे, परिक्रमा कधी व कुठून उचलली, शुलपाणीतून आलात की कसे?, इथुन पुढे प्रस्थान कधी आहे अशा गप्पा झाल्या. त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा उद्याही इथेच मुक्काम होता कारण या आश्रमात ते उद्या कन्याभोजन घालणार होते. आमचे प्रस्थान मात्र उद्या सकाळी येथुन होणार होते.
आता रात्रीच्या भोजन प्रसादीची वेळ आली त्यासाठी उदयने परत सकाळ सारखी पोळ्यांची जबाबदारी त्याच्यावर घेतली. संध्याकाळी साय स्नान करून आम्ही माईची पुजा ,आरती , नर्मदाष्टक म्हंटले. नंतर पुन्हा पोळ्यां बनवण्याचा कार्यक्रमं सुरू झाला. आता मलाही पोळ्या भाजण्याचा सकाळचा अनुभव असल्याने मी ही परत त्याच्या मदतीलां गेलो आता फक्त फरक एवढाच होता की मलाही हे आता येत आहे हा अहः भाव त्यात आला होता व त्याचीच परिणीती म्हणजे माझ्या कडून दोन तीन पोळ्या भाजून झाल्यावर परत उदयनकडून त्या बाबतीत काही सुचना आल्याने मला हे येत असताना हा मला हे सांगतो थोडक्यात शिकवतो म्हणजे काय? थोडक्यात माझ्या अहंचे पर्यावसन राग येण्यात होऊन मी त्याला सांगीतले " ठीक आहे, यापुढे तुच लाट व तुच भाज" असे म्हणून बाहेर सगळे जिथे बसले होते तिथे येऊन बसलो. आता महाराज एकटेच पोळ्या लाटत व भाजत होते. आतून त्यानी दोन तीनदा 'सुनिल, सुनील ' म्हणुन मला हाक दिली , तेव्हा बापूं एकदा आत जाउन आला, नंतर ते फाटककाकाही आत जाउन आले पण माझ्या डोक्यावर रागाचे भूत (तमो गुण ) बसल्यामुळे मी तिथेच हातात जपाची छोटी माळ घेऊन बसून राहिलो . जप कसला तो , म्हणजे तोडानी नाम चालू होते पण भात तयार होत आल्यावर जसा खदखदतो तसा माझा राग आत खदखदत होता, हा मला शिकवतोय , एवढी साधी गोष्ट मला येत नाही.सकाळी सगळ्या पोळ्या मीच नाही का भाजल्या , किती गमतीशीर आहे ना हा राग, जरा वाट मिळाली की लगेच आपला फणा काढून वर येतो. असो, पोळ्या करून उदयन महाराज बाहेर आले व हसत हसत माझ्यापाशी येऊन प्रेमाने म्हणाले 'काय इतका राग धरतोस, चल पटकन ताट वं पाण्याचा मग घेउन ये, आता जेवायचे आहे वं मी भाजलेल्या पोळ्याही खायच्या आहेत ' परत अहं सुखावला , सगळा राग कुठल्या कुठे पळुन गेला हे असे प्रसंगही सागण्याचे प्रामाणीक कारण हे की असे आपल्या आतील कितीतरी अवगुण माई परिक्रमेत आपल्याला पदोपदी दाखवत असते की ज्यांना आपण एखादया अलंकाराप्रमाणे आपल्यापाशी कवटाळून बसलेलो असतो व माई त्यावर आईच्या नात्याने घाव घालत असते कारण शेवटी आई हो ती ,लेकराचे कल्याण व्हावे हाच तिचा खास हेतु असतो.त्यामुळे असा अनुभव सांगतात की परिक्रमा आपण एकत्र करायची म्हणून निघालेले मित्र, ओळखीचे परिक्रमेत बरेच वेळा एकमेकांपासून विभक्त होण्याचे हे ही एक महत्वाचे कारण असते कारण वारंवार अवगुणांची अशी खटपट सुरू झाली की कितीही जिवलगं मित्रही बरोबर नकोसा होतो. असो
सुग्रासं पुर्णब्रम्ह उदरात गेले. आम्ही ज्या गोष्टीची मनापासून वाट पहात होतो ती वेळ जवळ आली,म्हणजेच कधी महाराजांशी प्ररिक्रमेच्या अनुभवा विषयी बोलता येईल असे वाटत होते ती वेळ आता जवळ येउन ठेपली. त्यां दिवशी परिक्रमावासी असे आम्ही पाच ते सहा जणच होतो. रात्रीची भोजन प्रसादी झाली, महाराज वर खुर्चीत वं त्यांच्या बाजूला आम्ही सगळे असे गोलाकार बसलो . तेव्हा महाराज हसत हसत म्हणाले हा बोला, काय बोलायचे आहे तुम्हाला माझ्याशी? मग आम्ही विचारलेल्या प्रश्नांना अतिशय शांतपणे ते उत्तर देत होते कारण स्वानुभावाचे बोल ते ,प्रत्यक्ष दत्तगुरूनी त्यांना इथे बोलवून घेऊन इतके वर्ष त्याच्याकडून ही सेवा अथक चालू आहे त्यामुळे आम्ही सारे भाराऊन जाउन त्यांचे विचार ऐकत होतो.
प्रथम त्यांनी सांगीतले की खर तर परिक्रमा ही शक्यतो एकटयाने करावी, हल्ली करतात ग्रुपने किंवा तीन ते चार जण मिळून. पण माईचे विषेश आईपण अनुभावयचे असेल तर शक्यतो एकटयाने परिक्रमेला निघावे व एकट्यानेच रहावे. कारण त्यात असे आहे कि जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे तिच्यावर विसंबुन असता. जसे लहान बाळाचे विश्व त्याची आई तसे आता फक्त माझी आई माझ्याबरोबर आहे ही भावना झाल्याने सतत तीचा विचार, तिच्याशी संभाषाण , काही वाटले तरी तिलाच हक्काचे सांगणे, सारे काही तीच असे असल्यामुळे ती आई आपल्याबरोबर कायम आहे ही भावना दृढ राहते.
त्यामुळे त्या करणामय, आनंदरूप आईलाही आपल्या लेकराची परीपूर्ण काळजी किंवा जबाबदारी घ्यावी लागते. मला असे वाटते की थोडक्यात परिक्रमा म्हणजे नवविधा भक्तीची एक सुंदर चाचणी परिक्षा परिक्रमावासी देतो. कारण परिक्रमेत श्रवण, कीर्तन,नामस्मरण,पादसेवन, अर्चन,वंदन,दास्य, सख्य व सर्वात शेवटी आत्मनिवेदन ह्या सगळ्याचं गोष्टीं परिक्रमावासी मनापासून करू शकतो व त्यातून आपल्याला योग्य वाटणाऱ्या भक्तीने तो सद्गुरूरूपी माईचे किंवा भगवंताचे परिपुर्ण प्रेम मिळवु शकतो.
परिक्रमेत असते संपूर्ण प्रेमाची शरणागती ती आपली आई म्हणून व त्याच नात्याने छोटया मुलाप्रमाणे तो तिच्यापाशी हट्ट ही करत असतो . मग आपल्या लेकाराचे सर्व कोडकौतुक करण्यास ती प्रेमळ माई संपुर्ण परिक्रमेत निरनिराळ्या रूपात आपल्या समोर येते.
त्यांचे असेही सांगणे होते की एकट्याने परिक्रमा आपण जेव्हा करतो तेव्हा आपण केलेल्या कर्मानुसार आपल्याला वेगवेगळे दिव्य अनुभव येत असतात पण त्यावेळी तुमच्या बरोबर असलेले परिक्रमा करणारे परिक्रमावासी यांचे असणारे कर्म तुम्हाला येणाऱ्या चांगल्या अनुभवांच्या आड किंवा तुम्ही सुध्दा त्यांच्या चांगल्या अनुभवांच्या आड येऊ शकता.
दूसरे असे की परिक्रमेतअजून कोणी आपल्या बरोबर असले की आपल्या मनात नकळत तो आपल्या बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काही झाले तर त्याचा अधार आपल्याला आहे ही भावना दृढ झाल्याने आपला तिच्यावर असलेला विश्वास किंवा तिच्यावर पूर्ण विसंबुन राहणे कमी होते.
आम्ही जेव्हा त्यांना शुलपाणीतील अनुभवांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगीतले " तेव्हा शुलपाणीत मामांकडून परिक्रमावासी पूर्णपणे लुटले जात म्हणजे अंगावर लज्जा रक्षणासाठी सुध्दा कपडां नसे " थोडक्यात आपला या सगळ्या गोष्टीत अडकलेला जीव माई कदाचीत अशा रितीने बाहेर काढत असावी.
मग आपण पुढे कसे गेलात असे विच्यारल्यावर म्हणाले " कुणीतरी आपल्याला धान्याचे पोते देईं व ते एका बाजूने शिवलेले असते , मग त्याचा मधला शिवलेला भाग डोक्याच्या आकाराचा फाडून , व हात जिथे येतात तिथे तो तेवढा भाग फाडून झग्या सारखा घालून पुढे जाणे हाच एक पर्याय असे.
तयार भोजन प्रसादी तर परिक्रमेत फार कमी वेळा मिळे. कुणीतरी तांदूळ किंवा इतर शिधा दिला तर तो बनवुन आमची भोजन प्रसादी होई. कधी काही नाही मिळाले तर माईचे निर्मळ जळ असेच की बरोबर .पण त्यातही एक वेगळा आनंद असे.
काही धनाढ्य माणसे कुठलाही गवगवा न करता आम्हा परिक्रमावासीयांची सेवा करून जात मग पुढे कुणाकडून तरी कळत असे ती व्यक्ति किती गडगंज श्रीमंत आहे. असे असुनही त्यांच्याकडे असलेल्या त्याहून महत्वाच्या मनाच्या श्रीमंतीचे खूप कौतुक वाटे.
नाहीतर माणसाचे असे असते की एखादे चांगले काम त्याच्याकडून झाले तर ते कधी एकदा सगळ्यांना सांगतो याकडे त्याची प्रवृती असते , असे बरेच प्रबोधनाचे निरनिराळे धडे परिक्रमेत माई आपल्याला देत जाते.
पुढे त्यांनी सद्गुरूंचे आपल्या जीवनातील स्थान किती महत्वाचे आहे ह्या बाबतीतही थोड़े विवेचन केले.
एखादा सतपुरूष कसा ओळखावा याबाबत सांगताना ते म्हणाले राखेला फुंकर मारली की कसा त्यातून शमलेला अग्नी परत प्रज्वलित होतो तसा आत्मज्ञानी सतपूरषाच्यापाशी असे काही सामर्थ असते की तो कित्येक मुमुक्षु , साधक व सर्व सामान्याच्या हृदयातील भगवंतांच्या प्रेमाच्या ठिणगीला प्रज्वलीत करून त्यांचे ह्रदय भगवंताच्या प्रेमाने भरून टाकतो.
पुढे म्हणाले 'परिक्रमा तरी कशासाठी करायची हो? 'तर
आपले पाप कर्म घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मग परत जर तेच पापकर्म माणूस करत असेल तर मग परिक्रमा कशासाठी केली हे त्याला कळलेच नाही असेच म्हणावे लागेल '. ते जेव्हा हे सांगतं होते तेव्हा मला आई प्रवचनात एक गोष्ट कायम सांगतात त्याची आठवण झाली. आई सांगतात की भजनं, पुजन, वाचन किंवां इतर सर्व भगवंताची सेवा कशासाठी ?तर आपल्या जन्मापासून करीत असलेल्या पापाच्या प्रायशाचित्तासाठी.
वर प्रतापे महाराजांनी परिक्रमा करून परत पाप कर्म करू नये असे सांगीतले त्याबाबत आईं प्रवचनात हत्तीचे एक मजेशीर उदाहरण देत , त्यां सांगत की हत्ती कसा समोर मातीचा ढीगारा दिसला की घे माती सोंडेने अंगावर, पुढे पाणी दिसले की तेही घे सोंडेने अंगावर, परत पुढे माती दिसली कि परत तेच, म्हणजे त्याला हे ही कळत नाहीं की पाण्याने अंग स्वच्छ झाले आहे त्यावर परत माती घातली की अंग खराब होईल तसेच काहीचे महाराजांचे परिक्रमा व परिक्रमावासीयाबाबत सांगणे होते .
त्यांचे परिक्रतेत झालेले इथे येणे वं तेव्हापासुन मिळालेली दत्तसेवा सगळेच काही आश्चर्यकारक होते हे सगळे ऐकण्यात दोन अडीच तास कसे गेले हे कळलेच नाही. संगळ्यात शेवटी माझ्या व उदयनच्या भजनानी त्या दिवशीच्या महफिलीची सांगता झाली.
नंतर झोपण्यासाठी आमच्या स्लीपींग मधे आम्ही शिरलो पण तेव्हा त्यांनी सांगितलेली परिक्रमा व आता आम्ही करतं असलेली परिक्रमा याची मनात नकळत तुलना सुरू झाली व मनाला जाणवले की आताची आपली परिक्रमा खूप सुखात चालू आहे. नर्मदे हर..
लेखक : सुनिल वसंत मराठे