अभिजित पानसे
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
अभिजित पानसे
अभिजित पानसे - नर्मदातिराकडे ,गरुडेश्वरकडे वाटचाल मुंबई- बरोडा ..नर्मदे हर
नर्मदे हर
गरूडेश्वर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची पुण्यतिथी
आज वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी.
दत्त संप्रदायात वासुदेवानंद स्वामींचं स्थान किती महत्वाचं आहे हे महाराष्ट्रीय,गुजराती,कन्नड,तेलगु दत्त भक्तांना इ. सर्वांनाच माहिती आहे.
2013 मध्ये मी पहिल्यांदा टेंब्ये स्वामींचं मराठी संक्षिप्त चरित्र वाचलं होतं.तेव्हापासुन त्यांचं जन्मगाव असलेलं सावंतवाडीजवळ माणगावला आणि समाधीस्थान गरूडेश्वर येथे जाण्याची खुप इच्छा होती.
ते त्यांचं समाधीचं शंभरावं वर्ष होतं.गरूडेश्वर येथील संस्थानाने 11 कोटी मंत्रजप संकल्प केला होता.त्यामुळे सर्व दत्तक्षेत्री, कारंजा लाड,नृसिंह वाडी,पिठापुर....क्षेत्री रोजचा ''दिगंबरा...श्रीपादवल्लभ..चा जप सुरू होता.
त्यावर्षी काहीही कल्पना नसताना अचानक माणगावला जाता आलं होतं.पण त्याही पुर्वीपासुन #गरूडेश्वरला जाण्याची इच्छा खुप होती.
कारण गरुडेश्वर हे नर्मदा परिक्रमेतलं महत्वाचं तीर्थस्थान आहे.त्याबद्दल पुस्तकांमधुन कितीतरी वाचलं होतं.
पुढे कधी जमेल माहिती नव्हतं म्हणून त्या दिवशी रात्रीतुन ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं!ते डिसेंबर 2014 होतं.
सकाळी डेक्कन ने मुंबईला पोहचलो जो मित्र येणार होता त्याचं जमलं नाही. मग मी वडोदरा च वेटिंगचं तिकीट काढलं. ट्रेन रात्री उशीराची होती म्हणुन मग टिटवाळ्याचा गणपती आणि खुप दिवसांपासुन बघण्याची इच्छा असलेलं स्थापत्य शिल्पाचा अप्रतिम नमुना असलेलं अंबरनाथाचं शंकराचं मंदिर बघितलं.
रात्री कल्याणला ट्रेन मध्ये एका डब्यात शिरलो.संपूर्ण डबा संपूर्ण भरलेला होता. त्यामुळे मी आधीच दरवाज्यापाशी जाऊन बसलो.रात्र तेवढी काढायची होती.थोड्या वेळात एक पन्नाशीतला,पांढरा कुर्ता पायजमा घातलेला सर्व बाजुने सुटलेल्या देहाचा माणूसही शेजारी येऊन बसला.
तो त्याच्या साडीच्या व्यापराबद्दल, तसंच बांद्रा वरून जाणाऱ्या ट्रेन ने गेलो असतो तर जागा मिळाली असती वगैरे सांगत होता.मी फक्त ऐकण्याच्या भूमिकेत होतो.
मी एरवीही फार जास्त बोलण्याच्या बाबतीत दगड आहेच. त्यात त्या दिवशी तर दिवसभरामुळे खूप थकलो होतोच.त्यातल्या त्यात खाली स्थानापन्न झाल्याने व शौचालयाचे निकट सानिध्य असल्याने आधीच कसंतरी वाटत होतं.
तो माणूस मात्र बिनधास्तपणे आपल्या बॅगेची उशी करून पाय पसरून तिथेच खाली झोपला.
मला अश्या मोकळ्या लोकांचा हेवा वाटतो मला तर नवीन ठिकाणी मऊ गादीवरही झोप लागत नाही.
सेल मधलं चैतन्य संध्याकाळीच संपल्याने तो निर्विकल्प समाधीत गेला होता.अश्यावेळी मग माझ्यासाठी पाउलो कोयेल्हो Paulo Coelho नेहमीप्रमाणे धावून आला आणि अगणित वेळा पारायण करूनही दरवेळी नवं काहीतरी गवसणारं "द अलकेमिस्ट" पुस्तक काढलं.
रात्रभर जागणं गरजेचंच होतं कारण पहाटेच बडोदा येणार होतं.झोप लागली तर सरळ अहमदाबादलाच पोहचलो असतो.
कोणीतरी खांद्या हलवत आहे जाणवलं आणि
आणि काही ''...छे...नथी..'' शब्द कानावर पडलेत. दोन तीन लोकं सामानासकट उभे होते.
बडोदा आलेलं होतं.
मला बसल्या बसल्याच बॅगेवर डोक टेकवल्या स्थितीत झोप लागली होती.
Paulo Coelho, आणि सँटियागो त्याच्या मेंढ्यांसकट शेजारीच खाली पडले होते. त्याला उचलुन बॅगेत भरला.उजवीकडचं पांढऱ्या कपड्यातलं अजस्त्र धूड दरवाजा अडवून झोपलेलंच होतं. त्यांनी त्यालाही गुजरागी हिंदीत उठवलं आणि रस्ता मोकळा झाला.थंडी भरपूर होती.
प्रथमच गुजरातमध्ये आलो होतो.
महाराष्ट्राशी जवळचा संबंध असलेलं सांस्कृतीक बडोदा शहर.#गायकवाड_राजेंचं शहर.
प्रेक्षणीय राजवाडा असलेलं...
तिथून बस स्टॅन्डला आलो.
गुजरातच्या डेव्हलपमेंट बद्दल खरी खोटी ऐकीव वाचिक माहितीच आजवर होती.ती पहिल्यांदा पाहत होतो.
बडोद्याच बस स्टँड हे ''बस स्टँड'' वाटतच नव्हतं.
स्वच्छ शुभ्र इमारत. ठिकठिकाणी मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, बसण्याची व्यवस्थाही वेगळीच होती.
आजवर पाहिलेलं सर्वोत्तम बस स्थानक हेच!
सगळ्यात जास्त आवडलेली आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे;
आपल्याकडे बसच्या जागेचं आरक्षण करण्याच्या दोन पद्धती असतात.एक ऑफिशयल आणि दुसरी बसच्या खिडकीतुन रूमाल किंवा बॅग टाकून संपुर्ण सीटचे आरक्षण करणे.
तिथे मात्र एक कर्मचारी खास लोकांच्या चढण्याच्या देखरेखीसाठी होता. बस लागे पर्यंत कोणालाही फलाटाच्या काठवरही येऊ देत नव्हता.ही गोष्ट विशेष आवडली.
साडेसहाला सरदार सरोवर डॅम ला जाणारी बस आली.
तिकडे बसचा दरवाजा बसच्या मधोमध होता.बस सुरू झाली आणि थोड्याच वेळात माझंही "म्हैस " मधल्या रत्नागिरी-मुंबई बसमधल्या प्रवास्यांसारखं नाही नाही नाही हो हो हो
सुरु झालं कारण रात्रभर झोप झाली नव्हतीच.
साडेदहाला अहमदाबाद हायवे वरील एका छोट्या गावी बस थांबली. तेच गरुडेश्वर होतं.
प्रथमच नर्मदा नदीचं जवळुन दर्शन..स्नान करणार होतो..टेंबे स्वामींचं..त्यांच्या जवळ नेहमी असलेली छोटी दत्त मुर्ती..यांचं दर्शन करणार होतो म्हणुन आनंदी होतो.
तिथल्या छोटेखानी संस्थानात पोहोचलो.मला राहायला एक साधी खोली मिळाली.खोलीत पाठीवरची सॅक टाकुन कधी स्मामींच्या समाधी दर्शनाला आणि नर्मदा किनारी जातो असे झाले.
त्या तीन दिवसातील तिथलं वातावरण,परिक्रमावासींच येणं जाणं..आणि नाशिकच्या पवार आडनाव असलेल्या शिक्षक असलेल्या परिक्रमावासी नवरा बायकोंनी सांगितलेला त्यांचा अनुभव कधीच विसरणार नाही.
अभिजित पानसे
नर्मदेत दिवे..तो माणूस..
दुपारचा महाप्रसाद घेउन गाव कसं आहे ते पाहायला गेलो तेव्हा एका रस्त्यात एक गोरा फॉरेनर दिसला. मला खुप आश्चर्य वाटलं कारण विदेशींना ऋषिकेश बनारस इ. ग्लॅमराइज्ड भारतीय धार्मिक स्थळांचे आकर्षण असतं.मग या आदिवासी भागात हा कसा काय याचं आश्चर्य वाटलं.
त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याचं नाव अँड्र्यू सिम्पसन. तो ऑस्ट्रेलियन होता. त्याने सांगितलं की तो ट्रेकर आहे.आजवर तो अमेरिकेत 10000 किमी चालला आहे.
त्याला भारतात हिमालयात चालायच होतं.त्याच्या इंग्लंडमधील मथुरा दास नावाच्या मित्राने त्याला नर्मदा परिक्रमेबद्दल सांगितलं.
तो ट्रेकर जे बोलला ते मला स्पष्ट अस्पष्ट काहीसं त्याच्याच शब्दात आठवतं तो म्हणाला होता ''आय बिलॉन्ग टु नो रिलीजन बट स्टिल आय फेल्ट एनर्जी अँड पॉवर ऑफ नर्मदाजी व्हेन आय बेद इन हर अँड सीट ऑन द बँक ऑफ नर्मदाजी!!'' याबद्दल मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्यांची भावना श्रद्धा असते म्हणुन त्यांनी असं म्हणणं..उचित वाटलं असतं. पण इथे हा असं बोलतोय!!
त्याने सांगितलं की त्याला आता वेळ नसल्याने तो परत जातोय पण पुन्हा तो परत येऊन परिक्रमा पूर्ण करणार आहे.त्याने त्याचा मेल आयडी ही दिला होता.
मी काही पुस्तकात तसंच ''सौ प्रतिभाताई चितळे'' यांनीही नर्मदेत दिवे सोडण्याबद्दल बरंच सांगितलं आहे.
मलाही ते आठवुन खुप इच्छा झाली की पहिल्यांदाच आलोय तर आपण पण नर्मदेत दिवे सोडावेत.
अग्निबद्दल तर मला विशेष आकर्षण आहे. निरंजन, पणती, यज्ञातील , होमातील अग्नी, मशिदीतील जळणारा गोवऱ्यावरील ऊद, मंदिरातील राळ, उदबत्ती, धूप प्रचंड आवडतं..लहानपणी नदीत दिवे सोडलेले बघायचो तेव्हाही विलक्षण आनंद व्हायचा, दिवे प्रवाहसोबत तरंगत हळुवारपणे वाहत जाताना बघून..
खूप इच्छा झाली दिवे सोडावेत नर्मदेत!
पण माझ्याकडे काहीही नव्हतं, कोणत्याही तयारीशिवाय मी गेलो होतो.
पण गावात दुकानात काहीतरी नक्की विकत मिळेलच असं वाटलं.
म्हणून पुन्हा परत गावात फिरलो पण अगदी छोटं खेडेगाव. ठरावीक दुकानं ते हायवेपाशी!
गावात छोट्या घरात किंवा झोपडीत चिप्स, खरमुरे, कुरकुरे टांगलेले असायचे म्हणुन त्याला दुकान म्हणायचं.
मी प्रवाहात सोडायला दिवे मिळतील का सगळीकडे विचारलं पण कुठेच काहीही मिळालं नाही कोणी म्हटलं की फुलवाती मिळतील पण त्याचा उपयोग काहीच नव्हता मला. सगळे म्हणायचे की दिवे लोक घरूनच आणतात, तयारीने येतात.
माझा विमोड झाला, मी परत खोलीत आलो. खूप वाईट वाटत होतं. इच्छा अपुर्ण राहिली म्हणून. पुन्हा कधी येता येणार माहिती नव्हतं.
संध्याकाळचे 5 वाजले होते मी नर्मदा किनारी खाली गेलो. प्रथमच याची देही याची डोळा दर्शन घेत होतो. सरळ पाण्यात पाय कसा टाकावा!! कारण ती तर नर्मदा मैय्या असते परिक्रमावासीं ची! तिथल्या सर्व लोकांची! मी परिक्रमावासी नव्हतो, पण भाव आणि आदर दाटला होता.
अश्यावेळी श्रद्धा उचंबळून येते म्हणुन मी प्रवाहाला प्रथम नमस्कार केला. मनापासुन धन्यवाद म्हटलं. हाताने पाणी घेऊन डोळ्यांना लावलं मग आत उतरलो.
थोड्यावेळाने बाहेर येऊन काठावर पायरीवर बसलो.
एव्हाना सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलत होता. आकाशात केशरी रंग दाटला होता. मी हा विचार करत होतो याक्षणी दिवे सोडले असते तर किती सुंदर आणि प्रसन्न वाटलं असतं. मागुन एक माणूस आला माझ्या शेजारीच त्याची नायलॉन ची पिशवी ठेऊन नर्मदेत एक बुडी मारून क्षणात बाहेर आला आणि हात कोरडे करून पिशवीतून सामान बाहेर काढलं त्यात छोटे छोटे द्रोण होते आणि फुलवाती होत्या. प्रत्येक द्रोणात एकेक फुलवात ठेऊन ती पेटवू लागला. मला प्रचंड आनंद झाला!!
मला खुप इच्छा झाली विचारण्याची की मी यातील काही दिवे सोडु शकतो का? पण मला अवघडल्यासारखं वाटत होतं मी कसं म्हणावं त्याला! थोडं अवघडुन शेवटी विचारलच तर तो म्हणाला ''हां जी बिलकुल!उसमे क्या पुछ ने की बात है समझो आपके लिए ही लाए है!''
सांगु शकत नाही किती आनंद झाला मला!!मी त्यातील अर्धे दिवे सोडले. बाकी त्याने.
मी त्यांना म्हटलं की तुम्ही पैसे घ्या याचे! पण मी इथे तीन दिवस आहे तोवर तुम्ही रोज आणु शकाल का!
त्याने पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला म्हणाला ''जब तक आप हो हम रोज आपके लिए दिए लाते रहेंगे..!
त्यांनी सांगितलं की जवळच्याच एका खेड्यात राहतात.
(हाच तो दिवे आणणारा माणूस)
मी किती तरी वेळ किनाऱ्यावर बसायचो. किनाऱ्यावर भयंकर डास असायचे.त्याकाळात डेंग्युची साथ प्रचंड होती.म्हणुन मी अंगाला ओडोमाॅस फासुन किनाऱ्यावर भरपुर वेळ बसायचो..
पलीकडे दुर प्रसिद्ध शूलपाणेश्वराचं जंगल आणि पर्वत दिसायचे.
प्रवाहात सोडलेले दिवे शांतपणे खुप वेळ तेवत राहायचे. दोन महाभूतांचं ते निकट ते निकट सानिध्य खूप सात्विक आनंद देऊन जायचं.
सूर्यास्त व्हायचा..त्या सांजवेळी अंधारात पाण्यातील दिवे तेवत राहायचे आणि वर चंद्रकोर प्रकाशित व्हायची..ते दृश्य खुप आवडायचं. तेवढ्यात पलिकडच्या तिरावरील एका खेड्यातील मंदीरात आरती सुरू व्हायची. ढोल वाजायचा..ते ऐकायला खूप मस्त वाटायचं. तो ढोल आणि आरती संपली की या तीरावरील वर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समाधी मंदीरात आरती सुरू व्हायची.ती संपली की त्याच्या वरील दत्त मंदिरातील आरती सुरू व्हायची.मग ''अघोरकष्टोद्धरण स्तोत्र'' म्हटलं जायचं.
रात्री 9 नंतर सर्व सामसुम व्हायचं.
तो माझा तिथला पहिला दिवस होता.त्यामुळे मला तिथली रात्रीच्या जेवणाची वेळ माहिती नव्हती.त्या संबंधीत एक अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी नाशिकचे परिक्रमावासी नवरा बायको भेटलेत त्यांचा अनुभव न विसरण्यासारखाच!!
नर्मदे हर "तुज आहे तुजपाशी..तिसरा भाग
गरूडेश्वर नर्मदेहर
प्रवास वर्णन तिसरा भाग
रात्रीच्या आरतीला मी हजर राहिलो.रात्रीच्या जेवणाची सशुल्क व्यवस्था असते हे वाचलं होतं.पण नंतर कळलं की फक्त दुपारीच महाप्रसाद असतो.रात्री फक्त परिक्रमावासींसाठीच जेवणाची व्यवस्था असते.
रात्री साडे नऊ वाजता त्या खेडेगावात मला खायला कुठे काय मिळणार होतं!!
2 अडीच किमी हायवेपर्यंत जाण्याचा कंटाळा आला होता. आणि तिथेही सर्व सामसुम झालंच असणार होतं!!
जवळपास काही मिळतं का शोधलं.एक म्हातारी टेंभ्याच्या प्रकाशात खरमुरे कुरकुरे असलेलं काही समान आवरत आपली दुकानाची झोपडी मोठा निळा प्लास्टिकचा कापड टाकुन बंद करत होती. तिच्याकडून मी 3 4 कुरकुरेचे पाकिटं घेउन परत आलो.
पोटातील ओरडणारे कावळे कावकाव करत एकमेकांवर तुटून पडले होते.आपापल्या चोचींनी माझ्या जठरावर प्रहार करत होते.
मनात तेव्हा विचार आला की लोकं तर फार म्हणतात की नर्मदा माता तिच्या किनाऱ्यावर राहिलेल्याला कधी उपाशी ठेवत नाही.
रात्री एका व्यक्तीशी फोनवर बोललो तेव्हाही तिला मी हेच म्हणालो.
उपाशी पोटी रात्रभर झोप लागणं अशक्यच त्यामुळे वाचत बसलो.दर एक तासाने मंदिराच्या बाहेर एक तिथला कर्मचारी घंटा वाजवायचा. जितके वाजले असतील तितका घंटानाद करायचा.रात्रभर मी त घंटानाद ऐकलेत.खूप मस्त वाटायचं शांत गंभीर रात्री तो घंटानाद ऐकताना!
सकाळी सुर्योदयावेळी खाली घाटावर गेलो. गावातील बरेच लहान मुलं अंघोळीला पोहायला अाली होती.मी खाली किनाऱ्यावर उतरून प्रवाहाच्या काठाकाठाने बराच दुर चालत गेलो.किनाऱ्याकाठचा सूर्योदय पूर्णपणे अनुभवला.
पाण्याचे बदलणारे रंग बघितलेत. सूर्योदयापूर्वी च्या अंधुक प्रकाशात राखाडी दिसणार प्रवाह उदयासोबत केशरी होताना व जसजसा सूर्य वर येत गेला सूर्याचं सोनेरी प्रतिबिंब नर्मदेत दिसू लागलं. सूर्य सुद्धा प्रातःकाळी नर्मदा स्नान करायला नर्मदेत उतरला होता.त्याच्या तेजाने नर्मदा माई झळाळून निघाली होती.
(नर्मदा घाट, गरुडेश्वर, प्रातःकाळी)
मी परत घाटावर आलो. काही म्हातारे परिक्रमवासी घाटावर पायरीवर बसून त्यांची पूजा करत होते.त्यांचा तो नियमच असतो याबद्दल सौ प्रतिभाताई चितळे यांनी बरंच सांगितलं आहे.
त्या वृद्ध परिक्रमावासींनी सांगतीलं की ते मध्य प्रदेशातील एका खेड्याचे रहिवासअसुन 2 महिन्यापूर्वी परिक्रमेला निघालेय. त्यांच्यात एक म्हातारा होता त्यांची गुडघेदुखी प्रचंड होती इतकी होती तो एका वर्षापासुन उभाही राहू शकायचा नाही!! हे लोकं परिक्रमा ला निघालेत म्हणुन ह्यानेही म्हटलं मरायचं आहे आता तर पलंगावर झिझुन मारण्यापेक्षा नर्मदा किनाऱ्यावर मरू. म्हणुन हा यांच्यासोबत आला.हे तिघं जण त्याला घ्यायला तयार नव्हते.पण एकाच गावातील असल्याने नंतर कबुल झालेत.
तो म्हातारा उभा न राहता अंग घासत एक महिना जसा जमेल तितकं अंतर पार केलं पुढे हळुहळु त्यांच्यात सुधारणा होऊ लागली.आता तो म्हातारा माणूस झपझप चालू शकतो हे त्या दोघांनी आणि नंतर त्यांनी स्वतः सांगतीलं.
या मागे काहीही रॅशनल कारण असेल पण तेव्हा विचार आला कि श्रद्धा पक्की असेल तर कसे अनुभव येतात लोकांना!! (त्यांचा फोटो खाली आहे.)
सकाळी सकाळी असं काही ऐकल्यावर फ्रेश मूड मध्ये वर खोलीत गेलो.माझी खोली मंदिर कॅम्पस च्या थोडी बाहेर होती अगदी साध्या टिनाच्या छप्पर असलेल्या 4 खोल्या होत्या.त्यातील एक.समोर छोटं अंगण त्यात मोठं कडूलिंबाचं झाड, समोर एक मंदीर.
मी त्या मंदिरात तीन दिवस गेलोही नाही पण शंकराचं असावं वाटायचं कारण छोटा नंदी बाहेरून दिसायचा.
मी अंघोळ करून दत्त मंदिरात गेलो.याच दत्त मंदिरात टेम्ब्ये स्वामी च्या पूजेतील आणि तेव्हा त्यांच्या सतत सोबत असणारी अंगठयाच्या अाकाराइतकी दत्त मूर्ती ठेवली आहे.हीच मूर्ती एकदा उमरेडला वैनगंगेत पडली असता टेम्ब स्वामींनी शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता,
करूणात्रिपदी रचली होती.
परत निघायचा आदल्या दिवशी त्या मंदिराच्या प्रमुख
पूजाऱ्यांना विनंती केल्यावर त्यांनी त्या दत्त मूर्तीचं दर्शन करवलं होतं.
मी मग खाली स्वामींच्या समाधी मंदिरात गेलो डोक्यात विचार सुरू होतंच टेन्शन होतंच की रोज 3 रात्री मी काय खाणार!!
मेन रोड वरून थंड तेलकट कचोरी,फाफडा वगरे प्रकार मी रोज रात्री खाऊ शकणार नाही.
पारायणाचे अध्याय वाचुन उठलो तर समाधी मंदिरातील पुजाऱ्यांनी आवाज देऊन थांबवलं आणि सांगितलं आज गिरनार के काश्मिरीबापु और उनके अहमदाबाद जामनगर से लोग गाडीसे परिक्रमा के लिये जाने वाले है! यहां तीन दिन के लिये रहने आने वाले है तो अगले तीन दिन रातको सभी परिक्रमावसी और यहां पारायण करने के लिये आए हुये सबको खाना के लिये बुलाया है! तो आप रोज उधर ही रात को खाना खाने जाना!!पहले वो नारेश्वरसे जाने वाले थे लेकिन सुबह ही फोन आया था की यहाॅ से परिक्रमा शुरू करने वाले है!''
मला खुप आनंद झाला पण अवघडलोही असं मी कुठेही जेवायला कसं जाणार!मी तर सख्ख्या नातेवाईकांकडेही स्वत:हुन खायला न मागणारा आहे.
थोड्याच वेळात खूप सारे वाहनं येऊ लागलेत.
दिवसभर तिथे अधुन मधुन फटाके किंवा ब्लास्टिंगसारखे मोठे आवाज यायचे.नंतर कळलं की सरदार सरोवर डॅमच्या बांधकामासाठी खडक फोडण्यासाठी ब्लास्टस होताहेत.
संध्याकाळी पुन्हा सुर्यास्ता समयी तो माणूस आला.नर्मदेत दिवे सोडले मग वर आरतीला गेलो तेव्हा तिथे बरेच लोक होते. आरतीनंतर अनेकांनी जेवायला चलण्याचा आग्रह केला.
मी गेलो राजस्थानी जेवण्याचा थाट होता.दाल_बाटी,पोळ्या इतर भाज्या,गुळाचा खडा,ताक,नंतर मसाला दूध.असं अत्यंत चविष्ट अन्न होतं.विचार केला काल उपाशी रात्री झोपलो आणि आज हा थाट आणि एकदम मला माझंच आदल्या रात्रीचं वाक्य आठवलं की लोक तर फार म्हणतात नर्मदा मैय्या कोणाला उपाशी ठेवत नाही. अंगावर रोमांच दाटले.पुढचे तीन रात्री रोज वेगवेगळे चविष्ट पक्वान्न खाल्लेत.मी ज्या जिवशी सकाळी परत निघालो त्याच दिवशी तेही निुघुन गेलेत.
''गरुडेश्वर हे एक पूर्ण पॅकेजच आहे''असंच मी नेहमी म्हणतो. ते प्रमुख नर्मदास्थान आहे ते वासुदेवानंद सरस्वतींचं समधीस्थान आहे.प्रमुख दत्तक्षेत्रही आहे तसंच तिथे मुळात गरुडेश्वर आणि इतर दोन पुरातन शिव मंदीरेही आहेत. त्यामुळेच त्या स्थानाचं नाव गरुडेश्वर आहे.
जसं शेगाव चं मूळ नाव शिवगाव होतं कारण तेथील मोटेंचं पुरातन शिव मंदिर. पुढे #गजानन_महाराज तिथे आल्यानंतर त्यांच्यामुळे शेगाव ओळखल्या जाऊ लागलं.तसेच गरुडेश्वर हे नाव व पहिली ओळख मुळात तिथल्या तीन शिवमंदिरांमुळे.पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामीनी तिथे समाधी घेतल्याने त्यांच्यामुळे गरूडेश्वर ओळखु जाऊ लागलं. मी ते तीन मंदिर शोधायचं ठरवलं 1 गरुडेश्वर 2 नर्मदेश्वर 3 कपालेश्वर.
यातील नर्मदेश्वर घाटावर खाली जातानाच डावीकडे पायऱ्यांना लागुनच आहे ते मी रोजच बघायचो.
गरूडेश्वराचं मंदीर विचारत 2 किमी दुर पायवाटेने गेलो.मंदीराच्या बाहेर नर्मदेतील बाणलिंगे ठेवली होती.आता उरलं होतं फक्त करोटेश्वर. लोकांना विचारल्यावर म्हणायचे ते मंदीर गावातच दत्त मंदिरापाशी आहे.मला खुप शोधुनही काही सापडलं नाही.
शेवटी खोलीत परत आलो.पलंगावर लेटलो होतो.आणि डोक्यात एकदम एक विचार विजेसारखा चमकुन गेला.मी वेगाने दरवाजा उघडुन बाहेर आलो आणि अंगणातील त्या समोरच्या मंदिराकडे गेलो.वर बघितलं कमानीवर नाव लिहिलं होतं ''करोटेश्वर''.
चार दिवस मी त्या मंदिरापासुन पाच पावलांवर राहत होतो पण मी लक्ष दिलं नाही.खरंच बरेचदा प्रश्नांची उत्तरे..शोधत असलेल्या गोष्टी..हवा असलेला खजिना आपल्या जवळपासच असतो पण आपण "द अॅल्केमिस्ट" मधील 'सँतियागो' सारखं तो दुरवर शोधत राहतो.
धक्कादायक अनुभव नाशिकच्या नवरा बायको परिक्रमावासींचा, नर्मदे हर
अंतिम भाग
संध्याकाळी खाली नर्मदेवर स्नानास गेलो त्यादिवशी पाण्यात उतरताना मगरींचं भय वाटलं नाही. नर्मदेत मगरी आहेत हे गावात प्रवेश करतानाच पाटीवर लिहिलंय.रोज नर्मदेत उतरताना मी तिथल्या कोणालातरी मगरींबद्दल सुरक्षिततेबद्दल विचारयचोच. ते सांगायचे की या भागात वर्दळ असल्यानेइकडे मगरी नाही येत,दुसया तीरावर आहेत. त्यामुळे तरीही नदीत उतरताना थोडंसं कॉन्शियस असयचोच. रोजच्याप्रमाणे तो माणुस आला; त्यांना सांगीतलं उद्या परत चाललोय.
शेवटचा दिवस म्हणून त्या दिवशी घाटावर बराच वेळ बसलो. वर नेहमीप्रमाणे चढत्या क्रमांकाने आरती झाली.
मी आरतीला गेलोच नाही.
आठ वाजता वर वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या समाधी मंदिरात गेलो.
प्रदक्षिणा घालताना खाली प्रवाहात सोडलेले दिवे दिसत होतेच.
मंदिरात पुजारी आणि त्यांच्या पत्नीसोबत एक नवरा बायको जोडपं बोलत होतं.मी पाच मिनीटं तिथे बसुन जेवायला जाणार होतो.पण कानावर पडणाऱ्या शब्दांवरून ते परिक्रमावासी आहेत कळलं आणि काहीतरी महत्वाचं सांगताहेत हे जाणवलं.एरवी मी कधीच कोणाशी स्वत:हुन बोलत नाही किंवा कोणी एकमेकांशी बोलत असताना त्यांच्यात स्वत:हुन मध्येच काही बोलत नाही.पण त्यावेळी त्यांचं बोलणं ऐकुन न राहवुन मी थोडं त्यांच्याकडे सरकुन बसलो.व थोड्या वेळातच त्यांच्याशी बोलण्यात सामिल झालो.
पन्नास ते पंच्चावन त्या काकांचं वय असावं.परिक्रमेतील चालण्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावरील त्वचा रापलेली काळवंडलेली होती.एकंदर त्यांच्या शांतपणे बोलण्यावरूनच ते समंजस genuine वाटत होते.मी बोलण्यावरून बॉडी लँग्वेज वरून व्यक्ती फेक आहे कि genuine याचा अंदाज प्रथम घेत असतोच. ते #नाशिकचे होते पवार आडनाव होतं.शाळेत शिक्षक होते.
त्यांना अवघडलेलं वाटु नये म्हणुन त्यांना कळणार नाही अशा पद्धतीने सेल कॅमने त्यांचं बोलणं शुट करू लागलो.
ते दोघे 2 महिन्यापूर्वी परिक्रमेला निघाले होते.त्याचीही एक गंमत होती मुळात पहिले फक्त ते काकाच परिक्रमा करणार होते. त्यांनी सांगितलं ''माझी खुप इच्छा होती की आम्ही दोघांनी सोबत परिक्रमा करावी.पण हिच्या गुडघेदुखीमुळे ही घराच्या बाहेरही पडत नाही.तर परिक्रमा कशी करणार!त्यामुळे ते काकाच ओंकारेश्वरहुन परिक्रमा सुरू करायला निघाले.
त्यांची पत्नी मुलगी आणि त्यांचा जावई छोटा नातू हे त्यांना ओंकारेश्वर पर्यंत सोडायला आलेत. तिथुन दुसऱ्या दिवशी ते सुरु करणार होते.दुसऱ्या दिवशी ते परिक्रमेला निघु लागले तेव्हा त्या काकू रडायला लागल्या त्या काकांनी म्हटलं चलतेस का तु?त्या काकु हो म्हणल्या आणि अंगावरच्या कपडयनिशी निघाल्या दोन महिन्यांनी ते शुलपाणी च्या जंगलपर्यंत आलेत.जंगलाबाहेरून डांबरी रस्त्यानं न जाता पारंपरिक शुलपाणी झाडी मार्गाने निघाले. कमीत कमी आठ दिवस जंगलातून बाहेर पडायला लागणार. आत सेल ला रेंज नसणार.. खायला प्यायला मिळेल कि नाही माहिती नाही..कारण गाव नाही एखाद दुसरी झोपडी जंगलात असणार होती. सोबत अस्वल आणि इतर जंगली प्राणी त्यामुळे जिवंत बाहेर पडु की नाही याची शाश्वती नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला आणि सर्व परिस्थिती समजावून सांगितली त्यामुळे त्यांची मुलगी आणि त्या काकू फोनवर रडू लागल्या.त्यांनी नातवाशी कदाचित शेवटचं बोलणं म्हणुन बोलुन घेतलं.आठेक दिवसाने जिवंत बाहेर पडलो तर फोन करून सांगितलं नंतर ते जंगलात शिरलेत पाच सहा दिवस हाल होऊन त्यांना एक झोपडी दिसली.
दिसली त्यात एका तरुण संन्यासी राहत होता त्याने त्यांना 3 दिवस थांबवून घेतलं त्यांनाही तिथे थोडा आराम मिळाला जेवायला मिळालं ते काका सांगत होते.
सुर्यास्तापूर्वीच ते जेवायचे..कारण एकदा सुर्य मावळला की झोपडीत अंधार.एक दिवस उशीर झाल्याने ते टेंभ्याच्या प्रकाशात जेवले होते.पण त्या काका काकुंचं मन लागत नव्हतं.ताण होता की तिकडे मुलीची स्थिती कशी झाली असेल.एकदा रात्री त्यांनी त्या संन्यासीला बोलताना सांगितलं की त्यांची मुलगी त्यांच्यासाठी खुप टेन्शनमध्ये असेल.त्यामुळे त्यांचही मन थाऱ्यावर नाही.
ते संन्यासी म्हणाले की आता 2 दिवसांनी तुम्ही शुलपाणीमधुन बाहेर पडालच!तेव्हा फोन करा!काळजी करू नका! तुमचा प्रवास आता सुखरूप होइल.दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुढच्या प्रवासाला निघाले. 3 दिवसांनी शुलपाणी जंगलातुन बाहेर आलेत.
तेव्हा त्या काकु त्यांना म्हणाल्या की ''काय हो लोकांना शूलपाणीमध्ये कितीतरी अनुभव येतात म्हणतात. #अश्वत्थामा वगैरे भेटतो म्हणे.आपल्याला तर काहीच अनुभव आला नाही! ''ते काका म्हणले की आपण जिवंत सुखरूप बाहेर आलो..त्या संन्याश्याने आपल्याला खाउ घातले हाच तर मोठा अनुभव आहे.चल पहिले .... ला (मुलीला) फोन कर!''
त्यांनी मोबाईलला रेंज मिळाल्याबरोबर त्यांच्या मुलीला फोन केला.आणि सांगितलं की ते सुखरूप आहेत.त्यांची मुलगी खुप टेन्शनमध्ये असणार हे माहिती होतंच.पण त्यांना ती फोनवर शांत आणि प्रसन्न वाटली.
ती म्हणाली की ''तुम्ही आलेत ना जंगलातुन बाहेर!मला दोन दिवसापुर्वी तुम्ही ज्यांच्याकडे राहिले त्या महाराजांचा मला फोन आला होता त्यांनी कळवलं की तुम्ही त्यांच्याकडे राहिलात, आणि सुखरूप आहात!
आणि 3 दिवसांनी जंगलाबाहेर येउन फोन करतील.
ते काका काकु आश्चर्यचकीत झाले की त्या जंगलात रेंज नसताना त्यांनी फोन केला कुठुन?आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काका काकुंनी त्या संन्यासी महाराजांना आपल्या मुलीचा मोबाईल नंबर तर दिलाच नव्हता! "आमचा मोबाईल तर कधीचाच आॅफ झाला होता त्यामुळे सॅकमधुन बाहेरही काढला नव्हता!!"
हे सांगताना त्यां काकुंना गहिवर दाटला होता.
दुसऱ्या दिवशी मी दहा वाजताच्या बरोड्याच्या बसने निघणार होतो म्हणुन पहाटे साडेपाचला थंडीत उठलो कारण मला पुर्वेकडील दोन किमी दुर उंचावरील एका जागेवरून सुर्योदयाचे फोटो घ्यायचे होते.मी थोड्याश्या माझ्या नेहमीच्या आवडीच्या पहाट आणि सुर्योदयापुर्वीच्या संधीप्रकाशात वेगाने निघालो.दोनेक किमी चालल्यावर एका उंच जागी पोहोचलो.तिथुन अगदी शाळेत चित्रकला विषयातील ठरलेलं चित्र जसं काढलं जायचं तसं दृश्य होतं.
दुर अंतरावरील डोंगराआडुन नर्मदा दक्षिणेकडुन पश्चिमेकडे डावीकडे वळण घेत होती.तिच्या स्वत:च्या भल्या मोठ्या खडतर प्रवासातील हे शेवटचं वळण होतं.तिचीही शेवटची विश्रांतीची मंजील आता नजीक आली होती.समुद्र आता जवळ आला होता.लकरच काही अंतरानंतर तीही समुद्रात स्वत:ला विसर्जीत करणार होती..तिथुन पुन्हा परतणे नाही.मोक्ष प्राप्ती!
त्या वळणाच्या पुर्वेकडे काही पर्वत होते.थोड्या वेळाने सुर्योदय झाला.सुर्य अगदी त्या दोन टेकडींच्या मधुन वर येत होता.शेजारी नदीचे वळण!अगदी शाळेतील चित्रकलेतील चित्र!
मला दिसलं की नर्मदेत एक जण नाव वल्हवत आहे.सुर्योदयाच्या केशरी आकाशाच्या पार्श्वभुमीवर ती शांतपणे चाललेली नाव!खुपच सुंदर डिव्हाइन दृश्य होतं ते.
अर्धा पाउण तासाने मी परत घाईत परत निघालो कारण तो सरदार सरोवरचा ब्लास्टिंगचा भाग होता.जागोजागी डेंजरचे बोर्ड्स लावले होते त्यावर ब्लास्ट्सचेे वेळ लिहिली होती.त्यात सकाळचीही वेळ होती.
सॅक पॅक करून दहा वाजता पुन्हा मंदिरात जाउन नमस्कार केला.नर्मदा मैय्याला पुन्हा बोलाव म्हणुन प्रार्थना केली.आणि परत निघालो........
समाप्त.
-अभिजित पानसे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------