अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल मराठे - 51 - 100
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल मराठे - 51 - 100
अनुभव नर्मदा परिक्रमेचा - सुनिल वसंत मराठे - 51 - 100
नर्मदा परिक्रमा अनुभव ५१ –
भालोद हून सकाळी लवकर उठून आम्ही ६ं.३० पर्यंत प्रतापे महाराजांच्या आश्रमातून निघालो. बाहेर तसे अजून पूर्ण उजाडलेही नव्हते. निघताना परत दत्त महाराजांसमोर ऊभे राहीलो आणी काल आम्ही जेव्हा भजनं म्हंटले तेव्हा उदयन मला जे भजन म्हणण्याचा आग्रह करत होता त्यां भजनाचे शब्द मनात येऊ लागले.
जीवा तु दत्तनाम घे रे अमृताहूनी गोड रे॥धृ॥
माझ्या आईच्या भजनी मंडाळात हे भजन म्हंटले जात असे व घरी आईचे ऐकून ऐकून मलाही हे भजन म्हणता येऊ लागले. तसेही ते भजन माझ्या आवडीचे होते कारण त्यात असे सांगितले आहे की आपल्या शरीरातील संगळ्या अवयवांचा उपयोग जर गुरू सेवेसाठी किंवा परमेश्वर सेवेसाठी केला तर त्या जीवाचे व त्या अवयवाचे कल्याण किंवा सार्थक झाल्यासारखे आहे .अन्यथा हे सर्व अवयव हे एखादया निर्जीव वस्तुप्रमाणे आहेत.
खरच जन्मभर त्या परमेश्वराने दिलेल्या ह्या जन्माचा उपयोग आत्मोधार करण्याएवजी, दृष्य जे कायम नाश पावणारे आहे पण माझ्यासारख्याला कायम तेच खरे वाटते व ह्या जन्म मराणाच्या चक्रात फिरण्यास धन्यता वाटते आशा माझ्यासाठी हे भजन म्हणजे माझ्यां मनाला कायम एक ताकीद देत असते की तुला खर तर कायं करावयास हवे आहे.
दत्त माउलींकडे बघत त्या भजनाचे अर्थ पूर्ण शब्द मनात म्हणत असतानाच बापूचे शब्द कानावर आले ' चल दादा निघायचे आहे, महाराज आपल्याला सोडावयास येत आहेत .त्याला ' हो ' म्हंटले व एकवार माऊलींना कळवळून विनंती केली की त्यां भजनातील शब्दाप्रमाणे माझ्याकडून आचरण होऊ देत. दत्त माऊलींना व नंतर प्रतापे महाराजांना नमस्कार करून आम्ही आश्रमातून बाहेर पडलो. महाराजानी निघताना आम्हाला परिक्रमा करताना लगाणाऱ्या गोष्टी पैकी आपणास काही हवे आहे का ?अशी विचारणा केली व म्हणाले " मी आग्रह करत नाही कारण मला कल्पना आहे की जेवढे तुमच्या पाठीवरचे वजन कमी तेवढे तुम्हाला चालणे सोपे हाईल पण काही हवे असल्यास निःसंकोचपणे सांगा' .पण आम्हाला कुठल्यां गोष्टीची आवश्यकता नसल्याचे त्यांना सांगीतल्याने तो विषयं तिथेच संपला.
आम्हालां थोडया अंतरापर्यंत सोडण्यास स्वतः महाराज व बोरीवलचे परिक्रमा वासी श्री फाटक वं त्यांचे स्नेहीही आले होते.
आता आमच्या पुढच्या परिक्रमे चा टप्पा होता जगदीश मढी .
पाय परिक्रमा मार्ग चालू लागले व त्या पायांकडे बघून मन मगाशी मनातं येतं असलेल्या भजनात परत वळू लागले कारण त्यात पायांचे खरे कर्तत्व किंवा खरे काय काम आहे हे अगदी यथार्थपणे सांगीतले आहे .
पाय दिले तुज यात्रा करण्या
नाही तर वाटती खांब रे ॥ जीवा तु दत्त नाम घे रे, अमृता हूनी गोड रे
मग सहजच भजनात सांगीतलेले शरीराचे इतर अवयवं व त्याचे योग्य कर्तव्य काय आहे याचे वर्णन केलेल्या सहज सुंदर ओळी मी मनात गुणगुणू लागलो
हात दिले तुज दत्तात्रय़ा नमण्या, नाहीतर काठ्या रे॥ जीवा तु दत्तनाम घे रे
नेत्र दिले तुज दत्ता बघण्या, नाहीतर या कवडया रे॥ जीवा तू दत्तनाम ....ःः
कान दिले तूज दत्तनाम ऐकण्या नाहीतर या सुपल्या रे॥ जीवा तू दत्तनाम ... ः
मस्तक दिधले दत्ता नमण्या नाहीतर हा नारळ रे॥ जीवा तू दत्तनाम ...
जीव्हे घ्या दत्त नाम थोडे "दिगंबरा दिंगबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा "
चुकतील चौऱ्याशींचे फेरे ॥ जीवा तु दत्तनाम घे रे अमृता हूनी गोड रे, गोड रे.
अमृता हूनी गोडं ! असे हे नाम आहे असे म्हंटले आहे, ज्ञानेश्वर माउली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करूणा येईल तुझी,.मग ते नाम कुठल्याही देवाचे असो, असे अनेक संर्दभ अनेक ग्रंथ, श्लोक, भजन यातून निरनिराळ्या अधिकारी व्यक्तीनी हेच सांगीतले आहे व याचे कारण त्यांना ते तसे गोड, मधुर, प्रचूर असे वाटते. सगळे संत इतके प्रेमाने, आपुलकीने, पोटतिडकीने सांगतात कारण आईंनीही एका भजनात म्हंटले आहे 'हरी हरी बोल बोल बोल Iहा मंत्र नाही खोल I(या भजनात तीन तीन वेळा 'बोल ' हा शब्द घातला आहे ,एकदा नाही तुझ्या लक्षात आले, तर दूसऱ्यांदा, तरीही नाही लक्षात आले तर तिसऱ्यांदा तरी आम्हाला काय म्हंटले पाहीजे हे लक्षात यावे हा त्यांचा उद्देश) पण मी विचार करतो की असा मधुर, गोड अनुभव मी किती वेळा घेतो व याचे उत्तर नक्कीच शुन्य हे येते.कारण ते नाम घेताना सद्गुरूनी सांगीतले आहे म्हणजे ते नक्की गोड ,मधूर , प्रचूर असणार हा दृढ विश्वासच नाही, कारण बाकी सगळे विषय समरसून भोगणारा मी ते नाम या जीवचे कल्याण करणारे आहे हा पूर्ण विश्वास अजून बसलेला नाही कारण शरीराची ताकद वाढण्यासाठी पौष्टीक गोष्टी खाणे अगदी मनापासून होते पण नाम हे मनासाठी पौष्टीक आहे हे अजूनही मला कळलेले नाही किंवा पचनी पडलेले नाही. विचारांची तंद्री चालत होतो तेव्हड्यात 'नर्मदे हर ' चा पुकारा झाला व मी भानावर आलो . जगदीश मढीला पोहचण्या आधी आपल्याला लागते लडवावड जिथे जगन्नाथ मंदीर आहे. त्याचे दर्शन घेउन थोडा विश्राम करून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.
आज परत त्यां करुणांसागर रामरायांपाशी जाण्याचा योग आला होता. कारण जगदीश बापुंच्या इथेही रामरायांचे वास्तव्य आहे हे उदयनच्या बोलण्यातून कळले होते.आम्हाला तो म्हणाला की आपला तिथे आज थांबण्याचा विचार नाही पण बापू नाही म्हणाले तर मात्र आपल्याला तिथुन निघता येणार नाही कारण ते कुठलेही कारण सांगुन प्रेमाने तिथे आपल्याला अडकवून ठेवतात हा त्याचा व बापूचा पहिल्या परिक्रमेतील अनुभव होता. त्यामुळे बघुया काय होईल ते असा विचार करून आम्ही त्या दिशेन मार्ग आक्रमत होतो.
साधारणपणे साडेदहा आकारच्या बेताने आम्ही जगदीश मढीला पोहचलो. जसे त्या स्थानाच्या जवळ जाऊ लागलो तशी तशी ती सुंदर रामधुन कानावर येऊ लागली. इथे अखंड रामधून वं आखंड रामायणाचे पठण चालू असते.
माईच्या किनारी हा भला मोठा आश्रम आहे त्यामुळे इथुन माईचे सुंदर दर्शन होते.
पोहचल्यावर हात पाय स्वच्छ धुवुन घाटावरून माईचे ते सुंदर रूप पाहू लागलो. आता धरणामुळे या ठीकाणी समुद्राचे पाणी माईच्या प्रवाहात मिसळले आहे तरीही तिचे अथांग रूप मनाला आनंद देत होते.
तिथुन मग रामरायांचे दर्शन घेण्यास आम्ही मंदीरात गेलो पण रामरायांचे मुखकमलाचे दर्शन तेव्हा बंद होते त्यामुळे तिथे बसून थोडा वेळ ती श्रीराम जय राम जय जय ही रामधुन मनात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढयात तिथला सेवेकरी आम्ही परिक्रमावासी आहोत हे बघुन आम्हाला म्हंणाला " आपकी भोजन प्रसादी हो गयी क्या? आप पहले भोजन प्रसादी पा लो तब तकं दरवाजा भी खुला हो जायेगा'. इथे अखंड अन्नदान चालू असते.
जगन्नाथ मंदीरात थोडा नाश्ता झाल्याने खूप भुकं लागली नव्हती पण इथे मुक्काम नसल्याने भोजन प्रसादी घेउन पुढे जायचे असल्याने आम्ही आपले ताट व पाण्याचे भांडे घेऊन भोजन प्रसादीच्या ठिकाणी गेलो.
सेवेकऱ्यांनी ताटात भोजन प्रसादी डाळ, भात व सब्जी वाढली. हरी मंदीरात नेहमी भोजन प्रसादीच्या आधी म्हंटला जाणारा श्लोक आम्ही म्हंटंला व प्रसादी घेण्यास सुरवात केली . पहिले थोडे खाउन झाले व एका वाडग्यात भातं घेउन डोक्याला पांढरे पागोटे , पांढरी बंडी व लुंगी बांधलेले एक सदगृहस्थ ज्याच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळां आनंद ओसंडून वाहत होता आम्हाला वाढण्यास आला मला खर तर तिथला कुणीतरी सेवेकरी असावा असेच वाटले पण उदयनी खुणेनेच मला सांगीतले की बापू स्वतः वाढायला आले आहेत व मी आश्चर्यचकीत झालो कारण एवढया मोठ्या आश्रमाचे महाराज अगदी साधेपणाने आम्हाला भात वाढावयास आले होते व हे माझ्यासाठी वेगळे व नवीन होते. कारण एखादया एवढया मोठया आश्रमाचे महतं स्वतः अगदी सहजपणे व साधेपणाने परिक्रमावासीयांना जेवण वाढण्याची सेवा करतात तेव्हा मनात जाणवले की खरे सेवा व्रत काय आहे हे ह्यानी जाणले व आपल्या स्वतःच्या आचरणातून ते सगळ्याना हा धडा देत आहेत किंवा पटवून देत आहेत की खरा सेवेकरी कसा असावा. कुठे मोठपणाची , महंतपणा असल्याचा अहंपणा नाही तर खरा सेवाव्रत घेतलेला हा माणूस ! ह्याचे हे ज्वलंत उदाहरण होते. आमची भोजन प्रसादी झाली.
अखंड रामायणाचा पाठ किंवा वाचनं जिथे चालू आहे तिथे असलेल्या छोटया कुटीवजा मंदीरात आम्ही नमस्कार करून परत आम्ही राम मंदीरात आलो.
सेवेकऱ्यानी म्हंटल्याप्रमाणे आता रामरायांसमोरील दरवाजा व पडदा बाजूला झाला होता, डोळे भरून प्रभु रामचंद्रांचे आम्ही दर्शन घेतले व मन तृप्त झाले.
आता इथुन निघून पुढ्च्या मुक्कामाला पोहचावयाचे होते ते ठिकाण होते गुमान देव मंदीर.
इतक्यात बापूं मंदीरात आलेले दिसले त्यामुळे त्यांना सांगुन इथुन पुढे प्रस्थान करवायाचे असे आम्ही ठरवले.
आम्ही त्यांना भेटलो व आता इथुन आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत असे सांगीतले व तिघांनी त्यांना नमस्कार केला . 'ठीक है जैसी आपकी इच्छा " असे म्हणून त्यानी एक गोष्ट सांगण्यास सुरवात केली.आपण ती गोष्ट या आधी कुठे वाचलेली किंवा एकलेली असेल .ती गोष्ट होती एका अश्रध्द डॉक्टरची व एका दृढ श्रध्दा असलेल्या गरीब आईची. बापू अतिशय तन्मयतेने आम्हास सांगुं लागले की एका रानातल्या खेडेगावात हि श्रधावान आई आपल्या लहान लेकराबरोबर रहात असते, घरची खूप गरीबी, नवरा गेलेला, दुसरे आधार देणारे घरात कुणीही नाही. त्या मुलाला एक असाध्य आजार झालेला असतो ,तो म्हणजे ह्रदयाला एक ठिकाणी जन्मजात त्याला एक बारीक छिद्र असते. त्यामुळे त्या मुलाला खूप त्रास होत अस. जवळपासच्या गावातील डॉक्टरांना तीने बाळाला दाखवुन झालेले असते. सगळ्यानी एकच सांगीतलेले असते की हे उपचार व ऑपरेशन इथे होऊ शकणार नाही त्यासाठी शहरात जाउन एखादया चांगल्या डॉक्टरांकडे ह्याचा इलाज वं ऑपरेशन होऊ शकते त्यामुळे तिने त्याला शहरात घेऊन जावे . त्यांत त्या बाईची परिस्थीती अतिशय गरीबीची,हलाकीची थोडक्यात हे उपचार व ऑपरेशनही खर्चाच्या दृष्टीने तिच्या आवाक्याबाहेरचे होते. मग ती आपले गाऱ्हाणे आपल्या झोपडीतील देवासमोर ( कृष्णा ) समोर सांगते असे की माझी तुझ्यावर खरी श्रध्दा व भक्ती आहे असे तुला वाटत असेल तर तुच ह्या महत संकटातून मला बाहेर काढशील. मुलाला होणाऱ्या त्रासाने खर तर तिला खूप दुःख व वेदना होत असत पण तिच्यापुढे दूसरा काही इलाज नसतो. ती रोज ही कहाणी आपल्या देवाला सांगत असते वं एके दिवशी स्वनात तिच्या कानावर शब्द पडतात 'लवकरच तुझ्या मुलाचे संकट दूर होईल'. तिला अतिशय आनंद होतो .दिवस असेच जात असतात ती त्यां एका वेड्या आशेवर आता तक धरून असते की कुणीतरी माझ्या बाळाला लवकर बरे करणार आहे.
इकडे शहरात एक नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टर , देव या शब्दावरही साधा ज्वाचा विश्वासं नसलेला पण त्याची खूप मोठी प्रक्टिस चालू असते. एकदा या डॉक्टरला त्याच्या कुठल्या कामासाठी विमानाने बाहेर जायचे असते म्हणुन ड्रायवरला घेऊन तो शहरातून स्वतःची गाडी घेउन विमानतळाकडे जाण्यासाठी निघतो व संध्याकाळची वेळ झालेली असते वं त्याची गाडी एका गावाजवळ बंद पडते , ड्रायवर खूप प्रयत्न करून पाहतो पण गाडी काही चालू होत नाही , या सगळ्यात इतका वेळ जातो की बाहेर काळोख पडायला लागला असतो. योगायोग असा असतो की त्याची गाडी ज्या ठिकाणी बंद पडलेली असते तिथुन हया बाईंचे छोटेगाव सगळ्यात जवळ असते. आता रात्रं कुठे जाणार किंवा कुठे काढणार म्हणून तो डॉक्टर त्या रात्रीच्या वेळी या खेडेगावात त्या गावच्या मुखीया कडे येउन त्याला आपण कोण आहोत व आपल्याला काय अडचण आली आहे हे कथन करतो. गाव खूप छोटे असल्याने वं इतका मोठा नामवंत डॉक्टर गावात आल्याची बातमी सह्जच त्या छोट्या गावातं लवकरच पसरते. हीच गोष्ट ह्या बाळाच्या आईच्या कानावर जाते वं तिला आपल्याला पडलेल्या स्वप्नाची व ऐकलेल्या शब्दांची आठवण होते व तेव्हा कुठलाही इतर विचार न करता ती आई आपल्या बाळासाठी पाठवलेला हाच देवदूत असावा असे मानून बाळाला घेउन डॉक्टर जिथे असतात तिथे बाळाला घेऊन जाते व त्यांना आपल्या बाळाला होत असलेल्या आजाराची व त्रासाची पुर्ण कहाणी व त्याच बरोबर आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दलही त्यां डॉक्टरांना सांगते.
डॉक्टर हे सगळे ऐकुन अंचबित होतात, लगेच बाळाला आपल्याकडे सध्या असलेल्या उपकरणांनी तपासतात व ह्याला ह्या आधीच शहरात उपचारासाठी का आणले नाही ? असा त्यां आईकडे प्रश्न करतात.
त्या बाळाची आई आपली आर्थिक वं कौटुंबीक परिस्थितीमुळे मला हे शक्य नाही पण माझा त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे की जाने आज आपल्याला आमच्या गावात माझ्या बाळासाठीच नक्की पाठवले आहे.
ही त्या आईची आपल्या तान्हुल्यासाठी परमेश्वरावर असलेली दृढ श्रध्दां बघुन तो डॉक्टरही आश्चर्यचकीत होतो
व मनात कुठेतरी त्या श्रधेला सलाम करून त्या मुलाच्या उपचारांची व ऑपरेशनची सर्व जबाबदारी आपल्याकडे घेऊन , त्या छोटया मुलाचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडतो .
गोष्ट संपते, आम्ही बापूंचा निरोप घेतो वं त्यानी सांगीतलेल्या गोष्टीच्या विचारात तिथुन बाहेर पडतो. पाउलांनी परिक्रमा मार्ग चालणे चालू असते पण मनात मात्र बापूंनी आता सांगितलेल्या गोष्टीतील दृढ निष्ठेचा भाग काही केल्या जात नसतो. आता निघताना ही गोष्ट बापूनी आपल्याला का सांगीतली ? काही त्यांना आपल्याला सांगावयाचे किवा सुचवायचे आहे का? का आम्ही परिक्रमा अशीच दृढ श्रद्धेना करावी असे त्यांना सुचवायचे होते हे काही कळत नव्हते.आम्ही तिघेहीं निशब्दपणे गुमानदेवची वाटं चालतं होतो.
पण याचे उत्तर माईनी पुढे एका ठिकाणी आम्हाला परिक्रमा मार्गावर दिले ते पुढे केव्हा तरी सांगीन .
पुढच्या भागात गुमान देव येथील महाबली हनुमंतांचे भव्य दिव्य रूप कसे आहे ते पाहू पण तापर्यंत नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव ५२-
जगदीश मढीहून बापूंचा आर्शिवाद घेऊन आम्ही बारा वाजेपर्यंत तिथुन निघालो. गमत मला अशी वाटली की सकाळी जो शरिराचा यथार्थ उपयोग कसा केला म्हनजे जीवाचे कल्याण होते या अर्थाचे भजन मला आठवले व लगेच तसे सेवाव्रत घेऊन आपले जीवन कृतार्थ केलेल्या बापूंची भेट आम्हाला माईने घडवून आणली हा योगायोग होता का काय होते ते माईच जाणे.
पण आम्हाला ती गोष्ट सांगुन त्यांनी परिक्रमेवरील म्हणजेच माईवरचा विश्वास हा कसा दृढ असावा याचा संकेतही आम्हाला दिला असावा.
आता गुमान देवच्या दिशेने आम्ही मार्ग आक्रमण करू लागलो. दूपारच्या रणरणत्या ऊनातून आमचे मार्गक्रमण माझ्या सुट्टीच्या गणितामुळे चालू होते. या सुट्टीवरून आठवले मला कधी कधी कुणा गावातल्या माणसांच्या बालण्यावरून, किंवा कधी अधे मधे मी चालू करत असलेल्या मोबाईवरून आजची तारीखं काय आहे ते लक्षात येई व परिक्रमा सुरू करून आता किती दिवस आपले झाले हे लक्षात येउन मन थोडे उदास हाई कारण परिक्रमेतील आपले आनंदी क्षणांचे एवढे दिवस संपले व आता एवढेचं दिवस बाकी आहेत हे लक्षात येई पण दुसरे मन लगेच धीर देई की ते परिक्रमेचे दिवस जरी गेले तरी त्यां आनंदी क्षणांचा सहवास तर तुझ्या बरोबर आता कायमचा असणारच आहे. खरे सांगतो की आता परिक्रमा अनुभवं लिहीताना माई त्या आनंदी क्षणांची सफर मला सहज घडवून आणताना परत एकदा परिक्रमेत घेऊन जाते.त्या आनंदी क्षणांची उजळणी होऊन ते सगळे चित्रच माझ्या डोळ्यासमोर ऊभे करून एक वेगळाच आनंद माई मला देऊन जाते. कधी सकाळी लवकर लोकलनी प्रवास करताना बाहेरचा निर्सग, दिवा मुंब्रा इथली खाडी, मुंबा देवीचा डोंगर बघत बघत माझे मन सहज माईच्या तिराकडे, तिथल्या डोंगरदऱ्यांकडे त्पा अनुभवलेल्या अप्रतिम निर्सग सौंदर्याकडे खेचले जाते. मागच्या कुठल्या तरी लेखात म्हंटल्याप्रमाणे हे इन टॅनजीबल अॅसेट मला टॅनजीबल आनंद देऊन जाते.
आज खूप दिवसानी लांबवर रेल्वेचा ट्रॅक दिसत होता कारण तो ट्रॅक व स्टेशन पार करूनच रस्ता गुमानदेव मंदीराकडे जात होता. इतक्यात इंजीनचा आवाज येउन एक पॅसेंजर किंवा थ्रुट्रेन धाड धाड आवाज करत नियून जाताना दिसली व मीही खूप दिवसानी गाडी दिसल्याने लहान मुलासारखा तिच्याकडे बघत परत एकदा बालपणात काही क्षण रमून गेलो.
ट्रॅक व स्टेशन पार करून आम्ही अर्धा तासात मंदीरात शिरलो. भले मोठे प्रवेशद्वार असलेले हे मंदीर जवळ जवळ ४०० वर्ष पुरातन आहे. उजव्या बाजूला पक्के बांधकाम असलेली पडवी वजा फरशा घातलेली मोकळी जागा किंवा मोठी बाल्कनी, छान पक्या बांधकामाची मोठी धर्मशाळा,इतके पुरातन असुनही अतिशय व्यवस्थित ठेवलले असे हे मंदीर.आम्ही त्या खालच्या मोकळ्या व्हरंडयात सॅग पाठीवरून काढून दोन मीनीटे जरा टेकलो कारण जवळ जवळ तीन साडेतीन तास सलग उन्हातून चालल्याने आमची तिघांचीही चांगलीच दमणूक झाली होती.
सॅग तिथेच ठेवल्या व हात पाय स्वच्छ धुवुन तोंडावर थंडगार पाण्याचा हबका मारून ताजेतवाने होऊन मंदीरात शिरलो. आत शिरून थोडे चालल्यावर एका छोटया खिडकीतून आपल्याला एका निर्गण स्वरूपातील मारूतीरायांचे समोरून नाही तर साईडने दर्शन होते . आपल्याला समोरून महाबलीचे दर्शन होण्यासाठी थोडे उजव्या बाजूला जावे लागते . त्या बाजूने गेल्यावर त्या महाकाय महारुद्राचे निर्गण, निराकार रूप आपल्या समोर येउन मन आनंदाने तृप्त होते. दोन तीन तासाचा सगळा शीण त्या दर्शनाने कुठल्या कुठे पळुन गेला.
पंढरीच्या पांडुरंगाचे ते गोजीरे रूप बघुन तुकोबांच्या वाणीतून सहज शब्द आले 'सुंदरते ध्यान उभे विटेवरी , कर कटावरी ठेऊनी या ' तसाच काहीसा आनंद आम्हाला हे महाकाय रूप बघून मिळत होता.
दर्शन घेऊन परत सॅग जिकडे ठेवल्या होत्या तिथे आम्ही परत आलो व निवातपणे भिंतीला टेकुन थोडा वेळ विश्राम केला. आम्ही आज तिथे साडेतीनपर्यंत पोहचल्याने अजून कुणी परिक्रमावासी आलेले दिसत न्हवते. आजचा आमचा मुक्काम याच मंदीरात हनुमंतगृही होता. थोड्यावेळाने आमचे बापू महाराज परत तिथल्या सेवेकऱ्यांकडे का पुजाऱ्याकडे जाउन आला व तो त्यांच्याशी काय बोलला ते माहीती नाही पण आमची रहावयाची सोय वरच्या एका मोठया हॉलमधे झाली. तिथे एका बाजूला एका परिक्रमावासी साधुचे आसन आमच्या येण्यापुर्वी लागले होते. आम्ही पण एका बाजूला आमची आसने लावली.आज सकाळी बालभोग व नंतर बापूकडे भोजन प्रसादी यामुळे नकळत मन झोपेकडे एकाग्र होऊ लागले. नेहमी कसे, दुपारची भोजन प्रसादी नसे वं दूपारी उन्हात चालणे होई त्यामुळे निद्रा देवीचा अमंल आम्हाला जाणवतं नसे पण आज खोलीत आसन, अकरा वाजता झालेली भोजन प्रसादी यामुळे लगेच रजोगुणाने आपले डोके वर काढले. थोडा वेळ विश्रांती घेऊन साडेपाच वाजता थंड पाण्याने साय:स्नान करून माईची सायंपुजा ,आरती व नर्मदाष्टक म्हणून झाले व नंतर मी रोजच्या नेमानुसार हनुमान चालीसा म्हणण्यासाठी माझा मोर्चा मारूतीरायांकडे वळवला. आताही तिथे त्याचे रोजचे भक्त मंडळी दर्शनास येत होते त्यामुळे समोर असलेल्या मोकळ्या जागेत किंवा समोरच्या पडवीत जाउन त्याचे दर्शन घेत हनुमान चालीसाचा ,रामरक्षा व मारूती स्तोत्राचा पाठ म्हणून मी परत वरती आमच्या हॉलमधे आलो. बापूनी तोपर्यंत आम्हा तिघांचे पंचे वं लुंगी साबण लाउन स्वच्छ धुवुन दोरीला वाळत घातलेले दिसत होते. बापू मात्र कुठे खोलीत दिसत नव्हता त्यामुळे तेव्हा मनातल्या मनात त्याला शाबासकी दिली कारण आम्ही काहीं न म्हणताही प्रेमाने व आपुलकीने हे काम करून तो मोकळा झाला होता.
सातं वाजता घंटा वाजू लागली तसे आम्ही तिघेही परत खाली आलो व खाली बघतो तर काय मारूतीरायांच्या डाव्या बाजूला थोडया उंचावरच्या मंदीरात प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई विराजमान झालेले दिसतं होते. ते मोहक रूप बघुन मन आनंदाने भरून गेले. मगाशी मंदीराचा दरवाजा बंद असल्याने त्याच्यासमोर बसुनच मी हनुमान चालीसा व रामरक्षा म्हंटली हे मला आता ध्यानात आले . मगासपासुन मारूतीरायाचे मुख्य द्वार या बाजूला का आहे याचे कोडेही मला आता उलगडले. रामरायांची पुजा व आरती झाल्यावर त्याच्या भक्ताच्या म्हणजेच त्या पवनपुत्राच्या आरतीला सुरवात झाली वं आम्ही सगळे वेगळयाच आनंदात न्हाहून निघालो..आरती झाली व प्रसाद घेउन मी वर आलो. बापू व उदयन तिथे असलेल्या सेवकऱ्याशी बोलतं खाली थांबले होते. पंधरा वीस मीनटांनी बापू रसोईत काही भोजन प्रसादी बनवण्याची सेवा आहे म्हणून मला बोलवाण्यास वरती आमच्या खोलीत आला . मग त्याच्या बरोबर मंदीराच्या मागच्या बाजूला आम्ही गेलो . तिथे मी पोहचण्यापुर्वीच उदयनने वबापू ने चार पाच किलोची कणीक भिजवून ठेवली होती.आता तिथला सवेकरी व उदयन पुऱ्या लाटत असताना दिसत होते.पुऱ्या लाटत असताना उदयन मला म्हणाला ' अरे सुनिल तु थोडया पुऱ्या लाटावयास घे म्हणजे हे तळायला बसतील व हे कामही लवकर हाईल जाईल व तुझी थोडी सेवाही हाईल. ' बाकीची भोजन प्रसादी तयार होती फक्त पुऱ्यांचेच काम बाकी होते. मी भीत भीतच लाटायला सुरवात केली कारण पुरी जास्त पातळ झाली तर फुगत नाही व जाड राहीली तर खालचा भाग कच्चा राहतो त्यामुळे या सगळ्याचा समन्वय साधत मी हळुहळु पुऱ्या लाटण्यास सुरवात केली व तीन चार पुऱ्या लाटून झाल्यावर आपल्याला पोळ्या नाही तरी पुरी इतके गोल लाटणे जमत आहे हे बघून माझाच मला हरूप आला. पाऊण तासात ती सेवा संपली व त्या सेवेकऱ्याने भोजनासाठी आम्हाला आमची थाळी, कमंडलू व भांडे घेऊन येण्यास सांगीतले व अजून कुणी परिक्रमावासी तिकडे असतील त्यांनाही घेउन येण्यास सांगीतले.
आम्ही आमची थाळी घेऊन यईस्तो पर्यत अर्धगोलाकार परिक्रमावासी पंगत बसली होती.आज खूप दिवसानी परत चंद्र व चांदण्यांच्या प्रकाशात भोजन प्रसादी घेण्याचा योग किंवा एक वेगळीच मजा येणार होती. असा हा आनंद माझ्यासारख्या शहरवासीयाला ही माईची परिक्रमा देत होती.आम्ही साधारणपणे वीस पंचवीस परिक्रमावासी तेव्हा तिथे भोजनास उपस्थित होतो. गरम गरम पुऱ्या, डाळ ,सब्जी व कढी असा मेजवानीचा बेत होता . सगळे पोटभर जेवले व कुणीही पुऱ्यांबद्दल काही बोलले नाहीत म्हणजे मी बऱ्या लाटल्या अशी मीच मला शाबासकी दिली .
आमच्या थाळ्या धुवुन झाल्यावर त्या सेवेकऱ्याला आता अजून काही आपणास मदत हवी असल्यास आम्हास सांगावे ? असे विचारले. "नही भाई अब मै संभाल लुगा ' असे सांगीतल्यावर आम्ही परत आमच्या निवासस्थानी आलो. थंडीचा कडाका आता पोटात गरम गरमं अन्न गेल्यामुळे जास्त जाणवत होता. मगाशी आल्या आल्या आम्ही पहिल्यांदी जिथे थोडावेळ बसलो होतो तो भाग परिक्रमा वासीयांनी पुर्ण भरला होता.
आम्ही वर आलो तेव्हा आमच्या खोलीत अजून तीन चार परिक्रमावासीची आसने लागली होती. आम्हीही खाली प्लास्टिक घालून त्यावर आमच्या स्लिपींग बॅग मोकळ्या करून त्यात शिरलो. तेव्हा उदयनने या मंदीरा संदर्भात आम्हाला एक गोष्ट सागण्यास सुरवात केली . पुर्वी कुणा एका राजाच्या काळात राजपिपलापर्यंत मुख्य रस्ता जोडण्याचे काम चालू झाले व या मार्गातच हे मंदीर येत होते. राजाच्या लोकांनी या मुख्य रस्त्यासाठी हे मंदीर इथुन हाटवून दूसरीकडे बसवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला पण प्रत्येक वेळी त्याना हे करणे शक्य झाले नाही व प्रत्येक वेळी त्यां हनुमंतरुपी मुर्तीची उंची मात्र वाढत गेली. पण राजाचे कारभारी प्रत्येक वेळी गर्वाने पुढच्या वेळेला आम्ही हे मंदीर नक्की हलवू या घमेंडीत राहीले. शेवटी तिथल्या सर्व स्थानिक लोकांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली व हे मंदिर इथुन हलविल्यास राज्याला व राजाला नक्कीच नुकसान होऊ शकते ही गोष्ट राजाला पटवून दिली .सरतेशेवटी ही गोष्टं त्या राजास पटली व त्याने त्याच्या कारभाऱ्यांना रस्त्याचा मार्ग बदलावयास सांगीतला .असा घमंड किंवा गर्वाचे हरण करणारा म्हणुन याला गुमानदेव असे नाव या महाबलीला पडले . अतिशय जागृत असे स्थान असून श्रावण महिन्यात दर शनीवारी इथे मोठी जत्रा भरते व या यात्रेसाठी भक्त मंडळी चालत ( गाव खूप लांब असले तरी ) येतात त्यांची श्रध्दा आहे की असे केल्याने प्रभु रामचंद्र त्यांच्या पापांचे निराकारण किंवा त्यांना क्षमा करतात.
म्हणुनच आम्हालाही त्याच्या दर्शनाने मगाशी तसाच आनंद मिळाला ही त्याच्या जागृतपणाचीच साक्ष असावी असे मी मनोमन जाणले व त्याच्या अगाध लिला आठवत आम्ही झोपी गेलो.
सकाळी लवकर साडेचार ला उठून कडक्याच्या थंडीत थंड पाण्याचा आनंद घेत आमच्या सगळ्याच्या आंघोळी झाल्या त्यानंतर मैय्या पूजन आरती करून पुढे प्रस्थान करण्याची तयारी केली व परत त्या महाबली पुढे जाऊन उभे राहीलो. कालच्यासारखे किंवा सकाळच्या प्रहरी अजुनच शांत, आनंद किंवा मनाला एकाग्र करणारे वातावरण त्या वेळी तिथे जाणवतं होते. त्यावेळी सुचले नाही पण हा लेख लिहीताना सहजच मन आनंदाने भरून आले व मनात साधेच त्याचे गुणवर्णन होउ लागले.
गुमान देवी उभा महारुद्र हनुमान ॥
अतुल सार्मथ्य तुझेच चरणी
रामनाम मनी ध्यानी धरूनी
दास्य भक्तीचे प्रतिक असुनी
घमंड कृती करी नाश ॥१ ॥
गुमान देवी उभा महारूद्रं हनुमान
रुद्र अकरावा तुजसी म्हणती
अंश शंकराचा तुझ्यास पाशी
कौतुक करूनी शब्द ही थकती
हे वायुपुत्र भगवान ॥२॥
गुमान देवी उभा महारूद्र हनुमान
संजीवन रूप तुझेच ठाई
चैतन्य ठासूनी भरले हृदयी
भीक मागतो हे दास माऊली
घाल भक्तीरसाचा घास ॥३॥
गुमान देवी उभा महारूद्र हनुमान....नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ५३-
गुमान देव मंदीरातून पुढच्या मार्गासाठी आज आम्ही सकाळी लवकर सहा वाजताच बाहेर पडलो. कारण अंकेलेश्वरला पोहचण्या आधी सगळा रूक्ष असा एमआडीसी औद्योगीक वसाहत असलेला टप्पा आपल्याला पार करावा लागतो त्यामुळे जेवढे लवकर हा भाग आपण पार करू तेवढे आपल्याला चालणे कमी कंटाळवाणे होईल असे उदयननी त्याच्या आधीच्या परिक्रमेच्या अनुभवावरून आम्हास सांगितले होते. ह्या भागातील मार्ग म्हणजेच आजचा प्रवास हा खूपसा डांबरी रस्ताने होता..
तोंडानी सद्गुरूंनी दिलेले गोड नाम व पायात निर्जीव, निरस अशा डांबरी काळ्याभोर रस्ताची साथ , काय मस्त काँबीनेशन होते ना?या कॉबीनेशन मधुन
माई हे शिकवत आहे की असाच या जीवनातील रस्ता कसाही असो तुमच्या मनासारखा किंवा मनाविरद्ध भगवंताचे नाम मात्र प्रेमाने व जाणून म्हणजेच हे नामच माझे कल्याण करणारे आहे ह्या श्रध्देने तुम्ही घ्या.
तसेही आपल्या आयुष्यातही काही वेळेला अशाच रूक्ष किंवा निरस माणसांशी आपली गाठ पडते पण ते आपले म्हणुन आपण सांभाळून घेऊन पुढे जातो तसाच आपल्याला माईच्या परिक्रमेत पुढे रेवासागरापर्यंत नेणारा हा मार्ग त्यामुळे या मार्गालाही आपले मानून घेउन आम्ही मार्ग चालत होतो.
सकाळी साडेसहा पर्यंत लाल भगव्या रंगांची छटा आकाशात हळुहळु पसरू लागली व भास्कराचे आपल्या आगमनाचे संकेत येऊ लागले. खर तर आज हा इतक्या लवकर येऊच नये असे वाटत होते कारण तो जेवढा लवकर प्रखर होत जाईल तेवढे हया मार्गावरील चालणे त्रासदायक व कंटाळवाणे होणार होते.
उदयनचा शुलपाणीनंतर पिंपळखुटयापासून सुरू झालेला खोकला कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला होता.दिवसा पेक्षा रात्रीच्या वेळी खोकल्याची खूप वेळा ऊबळ येत असे पण या बद्दल कधीही तोंडांतून ब्र न काढता तो आमच्याबरोबर परिक्रमा मार्ग चालत होता हेच मला असे वाटते की तिच्याबद्दलचे त्याचे खरे प्रेम होते की ज्यामुळे याही परिस्थितीत तो परिक्रमेचा आनंद घेत होता.या बाबतीतही त्याचे हे वागणे कौतुकास्पद होते नाहीतर दुसरा एखदा असता तर परिक्रमा सोडून सरळ घरी परत गेला असता.
या बाबतीत फक्त एकच गोष्ट मी सांगुनही ते दोघे अजूनही एकतं नव्हते व ती म्हणजे खोकल्यावरील एक साधा उपाय जो मी ऐकला होता व जो मी अजुनही करत आहे तो म्हणजे स्नान सुरू करण्यापुर्वी तोंडात जेवढे पाणी भरून ठेवता येईल तेवढे भरून घेणे व पुर्ण स्नान झाल्यावर ते पाणी किंवा तो चुळ धुंकुन देणे की ज्यामुळे आपल्याला कधीही खोकला होत नाही पण इतका साधा उपायही ते दोघही अजिबात करत नव्हते . पुढे परिक्रमेत ती गोष्ट त्याना माझ्यावरून पटली व नंतर ते दोघेही तो साधा उपाय करू लागले ही गोष्ट निराळी.
सकाळची वेळ असल्याने उन्हाचा फटकारा अजून तितकासा जाणवतं नव्हता माई तर आता आमच्या ह्या परिक्रमा मार्गापासून खूपच लांब होती. अर्धा पाऊण तासानंतर अंकेलश्वर एमआडीसीचा मार्ग सुरू झाला व रस्ता अजुनच जास्त कंटाळवाणा झाला.शहराकडे जाणारा हाच एकमेव रस्त्या असत्यामुळे वाहनांची वर्दळ या मार्गावर बरीच होती. थोडयावेळाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका छोटया स्टॉलवर आमचे परिक्रमेतील एक टॉनीक चहा याची पहिली फेरी झाली व चालायला एक नवीन उर्जा मिळाली.
या सबंध मार्गावर रस्त्याच्या आजुबाजुला खूप तुरळक ठिकाणी झाडे होती, काही ठिकाणी तर अजिबात नव्हती त्यामुळे एकुणच वातावरणातील खूप रूक्षपणा आम्हाला जाणवत होता. कदाचीत आम्हाला आमच्या आधीच्या परिक्रमेतील दिवसांची आठवण होऊन हे जास्त जाणवत असावे.
लांबवर दिसत असलेल्या छोटया मोठया शेड व त्यात असलेले निरानिराळे लहान मोठे उद्योग, थोडक्यात आपल्या सारखे वातावरण आता जाणवू लागले होते. सुर्य जसा जसा वर येउ लागला तसे तसे चालणे अजुनच कंटाळवाणे झाले.आज उदयनच्या खोकल्याचा जोर अजूनच वाढला होता .
साधारण साडेदहाच्या बेताने आम्ही अंकलेश्वरच्या जवळपास पोहचलो अजून मुख्य शहर तर बरेच लाब होते.
थोडयावेळाने रस्ताच्या बाजूला असणाऱ्या एका हातगाडी वजा नाश्त्याच्या स्टॉलवरून हाक आली " बाबाजी इधर आ जाओ, नाश्ता करके जाओ. आम्ही आतल्या बाजूला त्याची गिऱ्हाईक सोडून उभे राहीलो. गरम गरम मुग वं मिक्स भजीची प्लेट आमच्या प्रत्येका समोर आली. ही पहिली प्लेट देतांनाच त्यानी सांगीतले वाक्य असे होते 'ये' खत्म होने बाद आपको वापीस जितनी चाहीये ऊतनी भजी माँग के लेलो ' ते त्यांचे सांगणेही इतके मनापासून होते की एका फ्लेट मधेच आमचे पोट भरले.
भज्यांचा खमंग वास व खर तर खूप दिवसानी अशी गरम गरम भजी डोळ्यासमोर दिसत होती व ती खाणे म्हणजे लग्नातील एखादया पक्वान्नासारखेच होते त्यामुळे त्याने दिलेली भजी म्हणजे माईने दिलेला आजचा छानसा बालभोगाच असे समजून आम्ही आनंदाने व चवीने खाल्ली.
जवळजवळ चार साडेचार तास चालल्यामुळे पोटात भूक खर तर छान लागली होती त्यामुळे अजुन एक प्लेट सहज खाता आली असती पण त्याने प्रेमाने बोलवून आम्हाला भजी देणे हे त्याच्या दृष्टीने परिक्रमावासीयांची सेवा ह्या सदरात मोडतं होते पण आमच्यासाठी तो आजचा माईचा प्रसाद होता त्यामुळे किती खावा हे आम्हीच ठरवायचे होते.
आमची एक प्लेट संपल्यावर त्याने इतर गिं-हाईकांच्या गर्दीतून भज्यांबदल परत विचारले पण आम्ही खूणनेच आमचे पोट भरले असे सांगीतल्यावर त्याने तिथल्या मुलाला आम्हाला गरम गरम चहा देण्यासं सांगीतले. गरम गरम चहा घेऊन आम्ही परत पुढच्या मार्गाला लागलो.
जमतेम दहा मिनीट पुढे गेलो असू तेवढयात एका छोटया मुलीनी व तिच्या बाबांनी आम्हाला हाक दिली " आओ बाबाजी चायं ले लो '. खर तर नुकताच चहा झाला होतो पण त्यांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांच्या त्या छोट्या गाडीपाशी थांबलो. चहा देण्यापुर्वी प्रत्येकाच्या हातात देता यईल अशी पंजाबी सामोस्याची छोटी डीश घेऊन ती छोटीशी मुलगी आमच्या समोर उभी राहीली व हसत हसत म्हणाली " बाबाजी पहले ये पालो फिर मै चाय देती हूँ ' असे म्हणून आमच्या हातात ते ठेवुन ती आपल्या बाबांपाशी जाऊन उभी राहीली.आम्ही त्यांच्याकडे बघीतले तर तेही हसत हसत म्हणाले ' लेलो बाबाजी बच्चीने दिया है " काय बोलावे ते कळेना हातावर पोट असलेली ही माणसे पण त्यांची दानत एखादया डोंगराएवढी.लहानपणापासून मुलांवरही हे असे संस्कारही किती महत्वाचे ?कारण यामुळे आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणे किंवा दुसऱ्याला आपल्यातील काही तरी अडीअडचणीच्या वेळी देणे हे विचार सहजचं त्यांच्यावर बिंबवला जातो. त्यांनी ती आत्मकेंद्रित न राहता पुढे समाजासाठी आपलेही काही देणे आहे ह्या विचाराची मुळे सहजच त्यांच्यात रूजवली जातात . खरतर हीच काळाची खरी गरज आहे पण आपल्या शहरातून मात्र ती खूप प्रमाणात लोप पावलेली दिसत आहे.
त्याच्या पहेरावरून व त्या गाडीवरून त्याची परिस्थीती कशी असेल हे लक्षात येत होते पण देवाने त्यांच्याकडे एक दुर्लभ गुण दिला होता व तो म्हणजे मनाने ते खूप श्रीमंत होते , ही मनाची श्रीमंती ज्याच्या कडे आहे त्याच्याकडे हा आनंद वं समाधान कायमचेच वास्तव्यास असतात. हा ठेवा मिळवण्यासाठी माझ्यासारखा वयाची पंन्नास चौपन वर्षे फुकट घालवतो कारण ती दगदग,भगभग ,कायम घडयाळ्याच्या काटयावर चालून तो पैसा मला कायम सुख देईल हा ठाम झालेला विश्वास व त्यामुळे दूसऱ्याला काही र्निहेतुक देण्यातला आनंद,समाधान गमवून बसतो.याचे धडे माई या परिक्रमेच्या मार्गातून देत होती किंवा दाखवत होती की बघ त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधानाचा तो भाव, तो आनंद जो मिळवण्यासाठी तुला परिक्रमा करावी लागत आहे पण तेच सुख माझ्या जवळच्या लेकरात किती सहजच आहे.आजही हया विचारानी सहजच अर्त:मुख व्हायला होते .
आम्ही परत त्यांच्या इथे घोटभर चहा घेतला व निघण्यापूर्वी आमच्या तिघांच्याही मनात एक सहज विचार आला व आम्ही तो लगेच आंमलातही आणला.त्यां छोटया मुलीच्या हातात ती माईरुप समजून आपण आताच कन्याभोजनची दाक्षिणा म्हणुन तिला काहीतरी दयावे असे आम्हाला वाटले त्यामुळे तीला जवळ बोलवले व आम्हाला दाक्षिणा मिळालेले जे थोडे पैसे होते ते तिच्या हातात ठेऊन तिला नमस्कार केला व नर्मदे हर चा पुकारा केला व तिचे लोभस हसणे आठवून आम्ही पुढे चालू लागलो.
आता आम्ही मुख्य शहरात आलो होतो तेव्हा उदयन अचानक म्हणाला की मला असे वाटते की तुम्ही परिक्रमा मार्गावर पुढे जावे व मी आज इथेच थांबुन विश्राम घेतो, एक दोन दिवसात माझा खोकला जर कमी झाला नाही तर सरळ मी घरी परत जातो. कारण आज मला खोकल्याची ऊबळ खूपच जास्त येत आहे. त्याचे हे असे अनपेक्षित बोलणे ऐकुन मला दोन मिनीटे काही कळेचना ,माईवर इतके उत्कट प्रेम कराणारा माझा मित्र आज अचानक हे काय बोलत आहे. मी दोन मिनीटे शांतपणे विचार करून त्याला म्हंटले की त्यापेक्षाआपण असे करूया आता माझ्या फोनला रेंज आहे तर आपण आपल्या डोंबिवलीच्या डॉ.पिंपुटकर यांना फोन करू व त्याना तुझ्या खोकल्याबद्दल सांगु .आता आपण शहरातच आहोत त्यामुळे त्यांनी सांगितलेली औषधे आपल्याला इथे सहज मिळून जातील. ' माझे हे म्हणणे मात्र त्याला लगेच पटले . मी असे म्हटले खरे पण लगेच एक अडचण माझ्यां लक्षात आली की डॉक्टरांचा मोबाईल नंबर तर आमच्या दोघांकडेही नव्हता व डॉक्टरांचा दवाखान्यांतील लॅंडलाईन नंबर लागेल याची तर अजिबात खात्री नव्हती त्यामुळे पुढे कसे करावे असा एक क्षणभर प्रश्न पडला.
पण आपली खरी मनापासून जर काही चांगली इच्छा असेल तर तो ऊपरवाला आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवतो या ऊक्तीनुसार दूसरा एक ऊपायं मला सहज सुचला तो असा की तो वार होता शुक्रवार म्हणजे आमचा मित्र कुलदीप याच्या आठवडयाच्या सुट्टीचा वार त्यामुळे त्याला फोन करून आपण त्यालाच दवाखान्यात जाण्यास सांगु व तो तिकडे पोहचला की तो माझ्या फोनवर कॉल करेल व तुला डॉक्टराशी बोलता येईल . लगेच कुलदीपला फोन लावला वं त्याला लगेच डॉक्टरांकडे जाण्यास विनंती केली. तोही माईवर असेच प्रेम करणारा असल्याने पठ्या लगेच गाडीवरून डॉक्टरांकडे गेला व तात्काळ उदयनचे डॉक्टरांशी माझ्या फोनवरून संभाषण झाले .त्यांनी एक तिनच्यार प्रकारच्या गोळ्या असलेले प्रिस्क्रिपशन कुलदीपला लिहून दिले व याने तुझा खोकला नक्की बरा हाईल असे आश्वासक शब्द उदयनला दिले जे आता त्याला जास्त मौलीक होते. कुलदीपने लगेच प्रिस्क्रिपशनचा फोटा काढून माझ्या वॉटसॅप पाठवला व तो फोटो तिकडे मेडिकल स्टोअरमधे दाखवुन ती औषधे दोन तीन वेगवेगळ्या दूकानातून आम्हाला मिळाली व आमचा जीव भांड्यात पडला. आपण नीट ठरवलेल्या एखादया कार्यक्रमाची कामे कशी व्यवस्थित पार पडतात( त्यातही अनपेक्षितपणे काही वेळा अडचणी येतात ) तशी ही गोष्ट एक अर्धा तासात माईने अचनाक घडवून आणून दाखवून दिले की इच्छा आहे तर मार्ग आहे. पण या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडवून आणायचे अजुन एक कारण असेही आहे की उदयनची परिक्रमेबद्दल असलेली खरी ओढ व आमचीही परिक्रमा र्निविघ्न पार व्हावी ही सदिच्छा की जी त्या आईनेच जाणली असेच मला नक्की वाटते .
खर तर आज लिखाणातून तुम्हा सगळ्यांना बलबलाकुडापर्यंत घेऊन जायचे होते पण एकदा लिहायला सुरवात केली की आधी आठवत नसलेले हे प्रसंग, अनुभव एखादया चित्रपटाप्रमाणे सहज डोळ्यासमोर येतात. प्रसंग साधाचं असतो पण त्यातील त्या लोकांचे प्रेम, जिव्हाळा किंवा आपुलकी हे खूप खरे असते व ते तेव्हाहीं मला खूप काही शिकवुन गेले व आताही एक वेगळ्या विचारांचा धागा मनाला नविन गोष्ट शिकवतो त्यामुळे हे प्रसंग जरी खूप साधे असले तरी आजही ते प्रसंग आठवून डोळे सहजच पाणवतात. त्यामुळे ते लिहल्याशिवाय माझी गाडी काही पुढे सरकत नाही त्यामुळे आज इथेच थांबतो पुढच्या भागात आपण पाहू आमचा बलबलाकुंडापर्यंतचा प्रवास तापर्यंत, नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ५४-
उदयनची औषधे घेउन त्यातील आता लगेच कुठली त्याला घ्यायला हवी आहेत हे प्रिसक्रिपशन मधे बघुन त्याने ती लगेच घेतली व आम्ही अंकलेश्वरच्या मुख्य शहरातून चालू लागलो. अंकलेश्वर एक खूप मोठे शहर त्यामुळे खूप दिवसानी ट्राफीक, गर्दी, निरनिराळी दुकाने , बाजार बघुन आपल्याकडील ठाणे, दादर या शहरांची आठवण झाली. इथे असताना अशा शहरात कामासाठी जाणे होते त्यामुळे ते काम आटपून झाले की लगेच वाहन पकडून परत जाणे इतकेच होते. इथे मात्र आज आम्ही अगदी निवांतपणे, त्रयस्थपणे या सगळ्याचा आनंद घेत चाललो होतो कारण इथे कुठल्या ऑफीशयल कामासाठी आलो नव्हतो, कुठे गाडी पकडायची नव्हती थोडक्यात डोक्याला काही टेंशन नव्हते.त्यामुळे तोंडाने फक्त सदगुरूनी दिलेले नाम घेत चालणे हे तेव्हा आनंद देणारे होते. साधारणपणे एक दीड तासात आम्ही मुख्य शहरापासुन थोडे बाहेर आलो. थोडे पुढे गेलो की एक रामकुंड म्हणुन ठिकाण आहे पण तिथे न जाता अजून थोडया अंतरावर असलेल्या देवीच्या देवळापाशी आम्ही थांबलो म्हणजे तेव्हा साधारणपणे दीड वाजला होता. रामकुंड कडे न जाण्याचे कारण असेही होते की उदयनाच्या आधीच्या परिक्रमा अनुभवावरून तिथे खूप अस्वच्छता आहे व ते बघुन आमच्या मनात त्या स्थानाबद्दल काही विकल्प येण्यापेक्षा तेथे न जाणे चांगले असा विचार करून आम्ही ते ठीकाण टाळले व देवीच्या देवळाजवळ थांबलो. दूपारची वेळ असल्याने शांत वातावरण होते. देवळात व आजूबाजूलाही कुणाची वर्दळ नव्हती. सॅग खाली काढल्या ,आमच्याच एकाच्या कमंडलूतून हातं पाय तोंड स्वच्छ धुतले व आत देवीच्या दर्शनास गेलो. दुपारची वेळ असल्याने देवीसमोरील दार लावलेले होते पण दाराच्या वरच्या भागात अल्युमीनीयम रॉड बसवले असल्याने त्या शक्तिरूपी जगतजननीचे दर्शन मात्र आम्हास झाले. परब्रम्हाशी अत्यंत समरसुन जाणारे हे शक्तीरूप की जे त्याच्या इतकेच अनंत, अफाट व आपल्या कल्पनाशक्तिच्या बाहेर आहे. जी अंनत विश्वे निर्माण करून त्या परमात्मास्वरूपाला झाकण घालण्यासारखे सामर्थ्य जिच्याकडे आहे, त्या निश्चिल ब्रम्हा मधे जी काही हालचाल झाली ती ही मुळमाया व एवढे सगळे करूनही ही त्या आत्मस्वरूपापासुन किंचीतही जी बाजूला सरत नाही व आपल्या आविष्काराने हे सगळे जग चालवते असे कितीही प्रकारे तुझे वर्णन करू आई! हे शब्द अपुरे पडतील पण तुझे वर्णनं संपणार नाही अशा ह्या जगजननी आईला माझा सादर प्रणाम.
आमची कुलदेवी मराठवाडयात आंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी, हे ही एक जगदंबेचे रूप त्यामुळे देवीला बघुन तिचा ध्यान मंत्राचीही सहज आठवण होऊन ते शब्द ओठावर आले.
देवी भक्तजनप्रियां सुवदनां खड्गंच पात्रं तथा I
स्वर्णालंकृत लांगलं सुमुसलं
हस्तैर्दधानांश्रियं |
विद्युत्कोटि रवीदुकांती धवलां
दंतासुरोन्मूलिनीम् |
ब्रम्हेंद्राद्यभिवंदितांच वरदां
योगेश्ववंरी संभजे |
उदयनचे तर देवी हे दैवत म्हणजे अगदी जिव्हाळ्याचे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर तर विशेष आनंद दिसत होता.
नमस्कार करून आम्ही सॅग घेऊन बाजूच्याच सभामंडपात टेकलो. इकडे रात्री थंडीचा कडाका जसा जास्त तसेच दूपारचे ऊनही खूप कडकडीत. आज सकाळी सहापासून बरेच चालणे झाले असल्याने आता अर्धा तास तरी खरी विश्रांतीची गरज होती. उदयन दोन्हीं परिक्रमेत इथेच उघडयावर एक रात्र थांबला असल्याने त्याला हे मंदीर चांगलेच माहीतेचे होते.
पाच मिनीटातच जवळच्या घरात रहात असलेले पटेल नावाचे २५ ते ३० वर्षाचे गृहस्थ तिथे आले. " नर्मदे हर बाबाजी " कब आये. असे विचारले.उदयन पाठमोरा असल्याने प्रथम त्याना तो कोण आहे ते समजले नाही पण जसे ते समोरून आले तसे म्हणाले " अरे बाबाजी आप! ये बरस फिरसे निकले हो परिकमा करने, बहोत अच्छे. " असे म्हणत त्यानी उदयनजीच्या पायावर आपले डोके ठेवले व नंतर आम्हा दोघांच्याही पाया पडले. आता इतक्या दिवासांच्या सवयीमुळे आज त्यांनी नमस्कार केल्यावर अवघडल्यासारखे झाले नाही कारण तो नमस्कार आपल्याला नसुन माईला असतो हे पक्के ध्यानात आले होते कारण त्यांच्या दृष्टीने परिक्रमावासी म्हणजे माई हेच गणीत असते ,त्या भावनेने व त्या प्रेमापोटी ते आपले आदरातिथ्य करत असतात.
आमच्याशी बोलत असतानाच त्यांची पत्नी पण तिथे आली व तिनेही नमस्कार करून पाहिला प्रश्न विचारला ' भोजन प्रसादी हो गयी बाबाजी? " तिने आल्या आल्या इतक्या अनपेक्षितपणे हा पहिला प्रश्न केल्याने आम्हाला पटकन काय उत्तर दयावे हेच लक्षात आले नाही व आम्ही पटकन काहीच बोललो नाही त्यातून ती काय ते समजली व हसत हसत पटेल काकांना म्हणाली " आप इन के साथ बाते करो मै आधे घंटे मे खाना बनाती हूँ " तेव्हा वेळ होती दिड पावणे दोनची म्हणजे त्यांचे तेव्हा जेवण झालेली ती वेळ .त्यामुळे आम्ही लगेच म्हंटले " हमे इतनी भुक भी नही है भाभीजी, सुबह का बालभोग पेटभर हुआ है ' त्यावर ते पटेल म्हणाले " सुबह का बालभोग बाबाजी अब किधर पेट मे होगा ,अभी किताने बजे है ये तो देखो बाबाजी? 'ऐसे खाली पेट थोडी आगे जाने देंगे हम आपको. " भाभीजी तर आम्ही बोललेले वाक्य ऐकालाही तिथे न थांबता स्वयंपाक करायला घरात गेल्या होत्या.
बोलता बोलता समजले की ते पटेल काका अंकलेशवरच्या एमआडीसीत एका कंपनीत नौकरी करतात . त्यामुळे त्यांना सहज विचारले ' आज आप घर में कैसे ? " त्यावर त्यांचे उत्तर आले ' कल नाईट करके आज सुबह आया हूँ ' हे ऐकून तर मनाला जास्तच वाईट वाटले कारण नाईट करून आलेला माणूस ज्याची झोपही अजून पुर्ण झालेली नाही पण परिक्रमावासी आले म्हणून दूपारी बाहेर येऊन आमची चौकशी करतो , जेवावयाचा आग्रह करतो व अजून पुढचे म्हणजे घरी जाऊन न झोपता आमच्याशी बोलत थांबतो.
काय आहे हा हो प्रेमभाव ! कुठल्या शाळेत शिकवला असेल ह्यांना, कुठून आला असेल, आपल्याकडे मिळेल हे प्रेम ? दुसऱ्यांचे कशाला माझा मी माझ्या मनाला परिक्रमेत हा प्रश्न विचारी ' तुला जमेल असे करायला ? नाईट करून आल्यावर जेवण झाल्यावर ऊठून करशील कुणा परिक्रमावासीची विचारपूस,करशील असे आदरातिथ्य? बाहेर सांगण्यासाठी जरी ' हो ' म्हंटले तरी खरे अंर्त:मनातील उत्तर आपले मन आपल्याला लगेच देते असतेच की हो. मला तर वाटते की जरी बाहेर आलो असतो तरी मी नाईट करून आलो आहे हे माझ्या बोलण्यातून इतके वेळा दाखवले असते की त्यातून हे वागणे प्रेमाने असण्यापेक्षा समोरच्यावर मी किती उपकार किंवा त्यात स्वतः त्यांच्यासाठी किती करतो आहे हे दाखवण्याचा खटाटोप जास्त झाला असता. पण इथे सगळेच उलटे आम्ही विच्यारल्यावर कळते ते नाईट करून आले आहेत . ते गृहस्थही आपणहून असे म्हणत नाहीत की आप इधर मंदीर मे बैठो , मै खाना होने तक थोडा टाईम घर मे विश्राम करता हूँ. त्यांची पत्नीही त्यांना तसे करण्यास न सागता आमच्या बरोबर थांबण्यास सांगते.आपल्या इकडल्या बायका म्हणतील असे ?दीड वाजता नव्याने जेवणं करण्याचा पश्न तर खूप लांबचा कारण कोण कुठला माणूस ना नात्यातला, ना गोत्यातला , परत कधीही भेटण्याची किंवा आपण त्याच्याकडे जाण्याची शक्यता तर फार दूरची ( शेवटची ओळ तर जास्त महत्वाची) जिथे नात्यातील लोकांनीही सांगुन येण्याचा आपल्याकडील दंडक तिथे आगंतुकाला हे असे आदरातिथ्य व प्रेम देऊ शकतील? मला कुणाला इथे असे लिहून दुखवण्याचा हेतू नक्कीच नाही तरी पण हा प्रश्नं मात्र अनउत्तरीच राहतो.
असे प्रश्न परिक्रमेत खूप वेळेला मी माझ्या मनाला विचारले कारण सबंध परिक्रमा ही आपल्याला जसे तिचे निरनिराळे किनारे,तिथली जागृत देवस्थाने, संत ,महात्मे, बैरागी , साधु यांची भेट नक्कीच घडवते , तिथले अनेक साधुसंतांच्या ऊपासनेचे मार्ग व त्यांचे विचार हे ही आपल्याला उलगडून दाखवते पण त्याचबरोबर तिथल्या संसारी लोकांची माईवरील श्रध्दा , तिच्यावरचे निस्सीम प्रेम जे ते आपल्यावर परिक्रमावासी म्हणून ते करतात अशा अनेक गोष्टी ती आपल्याला अगदी नकळत दाखवते व त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून माई आपल्याला खूप काही सांगुन जाते.आपल्या मनावर पदोपदी ह्या निष्काम, र्निहेतुक प्रेमाच्या छन्नीने हळुवारपणे घावं घालून ती एखादया सुंदर शिल्पाप्रमाणे त्या मनालाही तसे घडवण्याचा अथक प्रयत्न करते, ती आपल्या विचारांना प्रगल्भ करून ते सहज व्यापक करते.
काही वेळा इतकी आपुलकी, प्रेम हे एखादया मोठया आश्रमातही मिळणार नाही, त्यात त्यां आश्रमाचा दोष नक्कीच नाही कारण ती एक व्यवस्था आहे व व्यवस्था म्हंटली की तिथला प्रत्येक माणूस हा माईच्या प्रेमाने तितकाच न्हाहून निघाला असेल असे नाही तो ते काम म्हणून पण करतं असेल पण हेच प्रेम या प्रपंचात असलेल्या साध्यासुध्या माणसात खूप ठिकाणी पहावयास मिळाले व याचे दाखले मी पुढे येत राहणाऱ्या भागात आपल्याही नक्कीच देईन.
मनात सहज विचार येतो काय फरक आहे आपल्या इकडल्या माणसात व यांच्यात? हाडामासाने तर आपल्यासारखेच, सांपत्तिक स्थीतीत तर आपणच त्यांच्यापेक्षा कितेक वेळा सरस असू मग हे कुठे गेले आमच्यातले प्रेम? का पैशासाठी इतके आम्ही घडाळयाच्या काटयावर चालू लागलो की हा विचार करण्याचे सुध्दा आम्ही पूर्ण विसरून गेलो आहोत. अजुनही उत्तर शोधत आहे कारण क्यलक्युलेटीव वागणे इतके आंगवळणी पडले आहे की तेच देहबोलीतून अगदी सहज बाहेर पडते.
ते नाईट करून आले म्हटल्यावर आम्ही त्याना लगेच आपण विश्रांती घ्या असे सांगीतले पण त्यावर त्याचे उत्तर तयार होते ,का माई त्यांना अशीच तयार करते काय माहीत पण म्हणाले ' अरे सोना तो रोज काही है, आपका सहवास थोडी रोज मिलनेवाला है ' आपल्यासमोर यावर गप्प बसण्याशिवाय दूसरा काही पर्याय नसतो.
थोडयाच वेळात भाभी परत भोजन तयार झाले आहे तर आपण चलावे असे सांगण्यास आल्या. आपकी थाली मत लावो मैने थाली लगाई है हे पण सांगुन गेल्या कारण आम्ही थाळी नेली की आम्ही ती जेवण झाल्यावर धुवुन टाकू तेही श्रम आम्ही करू नये अशी प्रामाणीक इच्छा.
परत त्याच्या घराबाहेर हातपाय धुवुन आम्ही आत शिरलो आत तीन थाळी लावलेल्या होत्या समोर बसायला बस्तान. त्यांचे घर म्हणजे आत स्वयंपाकघर व बाहेर एक छोटी खोली त्यातच त्यांचे दिवाण टिव्ही पासून सगळे सामान. तसेच जेवणाचे पानही पुर्ण भरलेले आमटी, भात, भाजी, गरम गरम पोळ्या, बाजूला गुळ व लोणचे . उशीर झाला म्हणुन त्यात कुठे काटछाट नाही.आपले घर छोटे आहे त्यांना कसे बालवू हा आपल्याकडे असणारा नस्ता विचार नाही. खुल्या दिलाने, आपल्याकडे जे आहे ते प्रेमाने परिक्रमावासीला पोटभर जेऊ घालणे हा फक्त एकचं विचार , इतका सरळ साधा विचार असलेल्या या माणसाना परिक्रमा, यात्रा करण्याची गरज आहे? माईच आपल्याला असे अनेक प्रश्न विचारते .असो
आम्ही त्या अन्नपूर्णने प्रेमाने बनवलेले जेवण पोटभर जेवलो. जेवताना आम्हीही त्यांना मुंबईला येण्याचे आग्रहाचे निमत्रण दिले त्यांनी ही 'हा हा पक्का आयेंगे ' म्हणत आपला नंबर पाठ नाही म्हणून तुमचा नंबर द्या आम्ही नक्की फोन करून येऊ असे म्हणून आमचे नंबर लिहून घेतले.
जेवण करून आम्हीं लगेच निघालो कारण बलबलाकुंडला लवकर पोहोचावयासं हवे होते कारण आश्रमाचे काम चालू असल्याने तिथे विश्रामाची काय सोय आहे याची काही कल्पना नव्हती.
पुढचा पूर्ण रस्ता डांबरी असल्याने त्यावर चालण्यास आम्ही वाघ होतो अंतरं जरी जास्त असले तरी भराभर चालत आम्ही साधारणपणे साडेपाचच्या सुमारास तेथे पोहचलो. आश्रमाच्या दोन तीन खोल्या बाधुनं झाल्या होत्या बाकीच्या भाग वरून स्लॅप व खाली घातलेला तसाच सीमेंटचा बेस असा होता. आज तिथे भरपूर परिक्रमावासी येण्याची शक्यता दाट होती आम्ही यायच्या आधाही काही परिक्रमावासीयांची आसने तिथे लागलेली होती.त्यामुळे आम्हीही एका भींतीच्या आडोशाला आमची आसने लावली. हातपाय स्वच्छ धुवुन त्या बलबला कुंडाचे दर्शन घेण्यास गेलो. बलबला कुंड ही कश्यप ऋषींची तपोभुमी तसेच तारा देवीचे ते एक पीठ व नीलकंठ महादेवाचेही ते स्थान आहे.असा एक विश्वास आहे की या कुंडात माईचा एक प्रवाह येतो. त्यामुळे नर्मदे हर असे म्हंटले की त्या कुंडातून बडबुडे येतात. आम्ही गेलो तेव्हा हा कुंड पूर्णपणे नीट बांधलेलाही नव्हता.
कुणाचा भावं काय आहे हे माहीत नाही पण मला ते कुंड काही स्वच्छ वाटले नाही कारण त्याचे पाणी हे किंचीत पिवळसर तर कुठे काळसर निळसर दिसले कदाचीत खूप दिवसात कुंड साफ केलेले नसेल किंवा कदाचीत येणारे इतके परिक्रमावासी हे त्या कुंडाची पुजा करण्याच्या हेतूने त्या कुंडाच्या पाण्यात हळद कुंकु व फुल वाहत असतील तर ते स्वच्छ राहणेही शक्य नाही कारण ते वाहते पाणी नसून एक कुंडं आहे.आमच्या समोरच तीन चार मध्य प्रदेशातील परिक्रमावासीयांनी तिथे कुडांची पुजा केलेली वं ते पाणी अंगावर प्रोक्षण केलेले आम्ही बघीतले. बुडबुडयांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ते नर्मदे हर न म्हणताही काही वेळा ते येत होते त्यामुळे फारसे खोलात न शिरता मी लांबुनच नमस्कार करून आमच्या आसनस्थानी आलो., थोडयावेळाने नेहमीप्रमाणे माईची पुजा आरती झाली.आज दूपारी ऊशीरा व पोटभर जेवण झाल्याने फारशी भुक नसल्याने रात्रीच्या भोजनप्रसादीस सुट्टी दिली. उद्याचा या तिरावरचा परिक्रमेतील शेवटचा दिवस होता तो विमलेश्वरला, मग भरतीप्रमाणे बोटीने रेवा सागर संगम पार करून आम्ही उत्तर तटावर पोहचणार होतो. त्यामुळे उद्याच्या भागाचे वर्णन आता पुढल्या भागात तो पर्यंत नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ५५-
मी काल म्हंटल्याप्रमाणे बलबलाकुंड आश्रमात त्या दिवशी जवळ जवळ आम्ही ६० ते ७० परिक्रमावासी होतो. म्हणजे आज आमच्या आधी इथुन पुढे गेलेले ,आजचे व उद्या मागाहून येणारे असे बरेच परिक्रमावासी उद्या विमलेश्वराला असणार होते. त्यामुळे दूसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून माईची पुजा ,आरती केली व परिक्रमेच्या पुढच्या टप्प्याला सुरवात केली.
पुढेही सगळा मार्ग हा डांबरी रस्त्याचा होता. खूप तुरळक ठिकाणी झाडे व आजुबाजुचा प्रदेशही रखरखीत असाच होता. त्यामुळे जोपर्यंत ऊन कमी होते तोपर्यंत तो डांबरी मार्ग सोपा वाटत होता. पण जसा जसा सुर्याच्या किरणांचा फटकारा वाढू लागला व थंडी कमी हाऊ लागली तसतसे त्या ऊन्हातून चालणे खूप त्रासदायक होऊ लागले . देवाचे नामं गोड आहे, मुखाने ते अखंड घ्यावे व त्याकडे पूर्ण लक्ष देऊन जर ते घेतले तर ते नाम आपले दुःख,त्रास नक्की कमी करते असें खूप वेळा घरी पुस्तकात व मंदीरात मी छान स्पीडमधे फिरत असलेल्या फॅन खाली बसून वाचलेले व ऐकलेले होते तरी आता तशी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र माझ्या सारख्या सर्वसामान्याच्या ते पचनी पडणे कठीण जात होते. शरिराला होणारा त्रास किंवा व्याधींचे महत्व माझ्यासारख्या सर्वसाधारण परिक्रमावासीयाला त्यावेळी इतके महत्वाचे होते की बाकी सगळ्या गोष्टी अगदी नामाचे महत्वही त्यावेळी विसरावयास झाले होते .कारण हे शरीर म्हणजे मी ही भावना इतकी दृढ झालेली आहे की आता परिक्रमेसाठी शरीर हे एक साधन आहे हे ही विसरलो होतो. म्हणून असे वाटते की इकडे वाचत असलेली थेअरी माई तिकडे प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या रूपात करून घेऊन आपला खरा कस लावते. म्हणून परिक्रमा ही एक प्रयोगशाळा असे मानून प्रत्येक दिवासाच्या प्रयोगात मग तो दिवस अनकूल असो व प्रतिकुल आपण प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा हेच तर ती आपल्याला शिकवत असते.इथे प्रत्येकाने आपल्याशी प्रामाणीक राहून आपल्या अंर्त:मनाला जाणायचे असते. माई तर मला या आध्यात्मिक शाळेच्या कुठल्या पायरीवर आहोत हेच तर दाखवत होती. खर तर माझी तयारी हया शाळेच्या अगदी सुरवातीच्या पायऱ्या चढण्याइतकीही झालेली नाही ही सत्य परिस्थिती तर तीने अनेक वेळा दाखवलीच पण त्याचबरोबर आईच्या कोमल ह्रदयामुळे व या लेकरावरील मायेपोटी नाठाळ मुलाला परिक्रमेत ती पदोपदी सांभाळतही होती.
आता या उन्हाच्या झळा खूप लागत होत्या व येणारे गरम वारेही शरीराची काहिली करतं होते. आता आम्ही समुद्राच्या जवळ जात असल्याने दमट हवेमुळे घामानी जास्त थकल्यासारखे जाणवत होते . तरी अजूनही ही सकाळचीच वेळ होती म्हणजे भरदूपारी काय परिस्थीती असेल याची कल्पनाही करवतं नव्हती . आता पाहिला टप्पा होता हनुमान टेकडी व तिथुन पुढचा टप्पा होता विमलेश्वर .
एकूण आज येणाऱ्या परिक्रमावासीवाची संख्या बघता तिथे लवकर पोहचणे गरजेचे होते कारण उद्याची येणारी भरतीची वेळ ,त्याप्रमाणे ठरणारे बोटीचे वेळापत्रक, बोटीतून जाण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था व आजच्या रात्रीच्या विश्रामाची सोय हे सगळे तिथे वेळेत गेले तरच व्यवस्थित होण्यासारखे होते. त्यामुळे उन्हाचा कितीही त्रास झाला तरी न थांबता चालत राहणे एवढेच आमच्या हातात होते. सकाळी साधारणपणे सहा ते साडेसहापासून आम्ही चालण्यास सुरवात केली होती व आता जवळजवळ साडेनऊ होऊन गेले होते . नेहमीप्रमाणे आमचे सकाळचे नेहमीचे टॉनीक (चहाही) आज झाला नव्हता , नजरेच्या टंप्प्यातही तशी कुठे सोयही दिसत नव्हती. आमच्याकडे असलेले कमंडलू मधील जलही आम्हाला हनुमान टेकडीपर्यंत पुरवायचे होते कारण अजून तरी रस्त्याच्या बाजूला कुठे पाण्याची सोय किंवा एखाद दूसरे घरही दिसले नव्हते . कदाचीत उजव्या बाजूस छोटी गावे असतीलही पण रस्त्याच्या जवळपास मात्र त्याचा काही मागमुस लागतं नव्हता.
वर मी म्हंटल्यांप्रमाणे त्या आईचे ह्रदय ह्या लेकरांसाठी कायम कळवळले कारण तासाभरातच म्हणजे साडेदहाला आम्हाला लांबवर एके ठिकाणी सिमेट क्राँक्रीटच्या बसच्या थांब्यासारखे काहीतरी दिसू लागले. म्हणजे तिथे दहा मीनीटे आडोशाला जरा टेकायची तरी आपली सोय झाली असा सहज विचार मनातं डोकाऊन गेला.कारण खूप वेळ असे सॅग घेऊन चालणे झाले की खांदयानाही चांगली रग लागतं असे व माझी सॅग माईच्या काहीं अमौलीक ठेवींमुळे थोडी जास्तच जड झाली होती. त्यात ह्या उन्हाचा मारामुळे मला कदाचीत ते जास्तच जाणवत होतें. हे सगळे परिक्रमेतील चालणे आता आठवले की असे वाटते आपण तेव्हा कसे चाललो हे मैय्याच जाणे , त्या प्रेमळ माईलाच तिच्या हया लेकराची लाज राखायची होती अन्यथा ही गोष्ट खरच अशक्यप्राय होती. शाळेत ढ विद्यार्थाकडे कडे कसे शिक्षकाना विशष लक्ष दयावे लागते कधी छडी मारून तर कधी गोड बोलून तशीच काळजी ती परिक्रमेत पदोपदी घेत राहीली . त्यामुळे भराभर पाऊले टाकत आम्ही रस्ता चालण्यास प्रारंभ करून त्यां आडोशाला पोहचलो.
ध्यानीमनी नसताना एक सुखद धक्का तिथे आम्हाला मिळाला. एक बाबाजी वयाने साधारण सत्तरीच्या जवळपास आले असतील ते त्या बस थांब्यात परिक्रमावासीयांठी चहा देण्याची सेवा करत होते. आम्ही त्या ठीकाणी पोहचल्या पोहचल्या ते म्हणजे " आओ बाबाजी बैठो इधर, दस मीनीटमे मै आपको गरमागरम चाय पिलाता हूँ ' हे वाक्य ऐकुनच मन सुखावले. शेवटी कलियुगातील अन्नमय देह असल्याने याचे अप्रुप मला नक्कीच वाटले .दहा मीनटात त्याने मस्त गरमागरम चहा युज अँड थ्रो असलेल्या छोटया कागदी कपातून दिला व बरोबर छोटे पारले जीचे पुडेही आमच्या समोर ठेवले. खर सांगु त्या क्षणाला त्यानी दिलेल्या त्या चहाचे मुल्य कशाचीच होऊ शकणारे नव्हते.पोटात खूप भुकही लागलेली होती कारण काल रात्री भोजन प्रसादीला छुट्टी दिल्याने कालच्या दुपारच्या जेवणानंतर पोटातं काहीच नव्हते नंतर काल व आज चालणेही बऱ्यापैकी झाले होते. त्यानी दिलेल्या चहा बिस्कीटचा स्वाद आम्ही घेतला तेव्हा परत त्यानी आमच्या कपात थोडा थोडा चहा ओतला. चहा पीतापीता सहज माझे लक्ष वर ठेवलेल्या एका मोठया पॅस्टिक पिशवीकडे गेले, लांबून तरी त्यात छोटी फरसाणची किंवा चिवड्या पाकीटे असावीत असे वाटत होते.परिक्रमेत असल्याने कुठलीही गोष्ट मागायची नाही ही मनाशी पक्की खुणगाठ होती पण खरंच सांगतो भुकेमुळे खाण्याचा विचार सहज मनात आला वं त्यानी विच्चारले " बाबाजी कुछ खाओगे ? असे म्हणत त्यानी त्यातील एक एक पाकीट आमच्या समोर ठेवले. नुसता मनात विचार यायचा अवकाश माई तो पुरवीत होती, असे प्रसंग परिक्रमेत खूप वेळा आले.
ते खाता खाता सहज त्यांना विचारले " बाबाजी आप किधर, पास के गॉवं से हो क्या?ते इथे जवळपासच कुठेतरी रहात असल्याने इथे येऊन परिक्रमावासीयांना चहा देण्याची सेवा करत असावेत अशी आपल्या शहरी पद्धतीने आम्ही विचार केला कारण माईची सेवा जरी असली तरी ती सोईची असेल तरच व तेवढीच करणे हा आमचा सेवेबद्दलचा विचार पण त्यानी जे काही सांगीतले ते ऐकुन आम्ही चाटच पडलो व मनात विचार आला की खरे माईवर प्रेम करणारे, तिचे भावीक आम्ही परिक्रमावासी आहोत का ही आम्हाला सेवा देणारी ही व्रतस्थ मंडळी ?कारण हे बाबाजी दररोज २० ते २५ किलोमीटर लांब असलेल्या त्याच्या गावावरून इथे येतात दिवसभर ही सेवा करतात व परत त्यांच्या गावाला जातात, परत उद्या सकाळी येणे हे ठरलेले आहेच .मनाने त्या क्षणी त्याच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो कारण आजही इकडे बरेच जण आमची परिक्रमा पुर्ण पायी झाली म्हणून कौतुक करतात तेव्हा मनात जाणवते की या सगळ्या माईच्या खऱ्या भक्ता पुढे आपण किती छोटे आहोत कारण कुठेही त्यांच्या मनात आपल्या कामाचा गवगवा करण्याचा विचार नाही आहे तो फक्तं तिच्या परिक्रमावासीयांची सेवा करणे एवढाच उदात्त हेतू! अशी सेवा एक दिवस नाही तर रोज तीन चार महिने इथे येऊन करणे तेही आपल्या पदराला चाट देऊन.कशी असेल ह्याच्या अर्त: मनाची स्थिती ?कशी एक एक माणसे माई इथे घडवते असते.विचार करा दळणवळणाची साधने पूरेशी नाहीत, वयाची सत्तरी जवळ आलेली, सांपत्तिक स्थितीने बेताची, हा थंडीचा एवढा कडाका हया कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता फक्त प्रेमाचे सेवाव्रत घेतलेली ही माणसे खरच किती मोठी आहेत हे आपणच आपले ओळखावे.
त्यांना सहज विचारले की आपण येता कसे ,एवढया सकाळी इकडे? कारण बससेवा तर कितीतरी वेळानी असते.तर हसत हसत म्हणाले " ऐसा कुंछ् कह नही सकता कभीं दुध की गाडीवाला, कभी बस मिल जाये बस, या और कुछ साधन ,पर मैया पोहचाही देती है यहाँतक " दुधाबद्दल विचारले तर म्हणाले खरीदना पडता है, कभीं काई दुधवाला प्यार से सेवाभाव करके देता है "म्हणजे बघा ,सांगण्यात कुठे लपवाछपवी नाही, मोठेपणा घेण्याची हाव नाही की मीच माझा सगळा खर्च करतो आहे तो फक्त तिच्याबद्दलचा प्रेमभाव, सारे काही स्वच्छ ,लखलखीत एखादया आरशासारखे.
हे सर्व करण्यामागचे कारण असे की त्याचे गाव हे परिक्रमा मार्गावर येत नाही मग आपल्याकडून तिची काहीतरी सेवा व्हावी हा त्यांचा एकच उदात्त हेतू .
हे सगळे ऐकून आम्हाला अजुन त्यांच्याशी काय बोलावे हे सुचेना. सरळ पुढे होऊन आम्ही त्यांना नमस्कार करायला गेलो तसे म्हणाले ' अरे बाबाजी ये क्या कर रहे हो , आप तो परिक्रमावासी हो, आपकी सेवा करना तो हमारा धर्म है " तरीही त्याचे काहीही न ऐकता आम्ही त्यांना नमस्कार केला , 'नर्मदे हर ' चा पुकारा केला व सॅग परत पाठीला लाऊन आम्ही पुढे चालू लागलो पण मनातून त्या बाबाजींचे विचार काही जात नव्हते त्यामुळे पुढचा प्रवास पुढच्या भागात नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ५६-
मागच्या भागात मी आपल्याला सांगीतले की त्या बाबांजींचा सेवाव्रताचा विचार करीत मी पुढे चालू लागलों तेव्हा मनात विचार आला की मी परिक्रमेत असुन मला ह्या शरीराला होणारा त्रास इतका महत्वाचा वाटतो पण तेच हे बाबाजी मात्र ती गोष्ट मनापासून व आनंदाने ईथे करीत आहेत. मी आधी म्हंटल्याप्रमाणे माई मला लगेच दाखवत होती की बघ तु परिक्रमेत असून तुला तुझ्या शरीर व्याधीचे इतके कौतुक तोच हा लेक, सेवा करताना येणाऱ्या अडचणी, त्रास हे सर्व गोड मानून परिक्रमावासीयांच्या सेवेसाठी आनंदाने इथे येतं आहे. कृष्णाने महाभारतात अर्जुनाला जयद्रथाला मारण्यासाठी जसे " हा घे सुर्य वं हा जयद्रथ' दाखवला तसेच काही माई माझ्या शरिराच्या कौतुकावर, अभिमानावर लगेच घाव घालुन उदाहरणासाहित दाखवुन म्हणत होती " हे बघ, आता तुझे काय म्हणणे आहे,? मी खरचं काय उत्तर देणार यावर हे खरे प्रेम कसे असावे हे कळण्यासाठीच तर माझा हा सगळा अट्टाहास चालू आहे. बघुया आता आत किती उतरते ते.
आपल्या शहराकडे ,या बाबाजींची ही गोष्ट नक्कीच अव्यावहारीक आहे असे ठरवून चेष्टेचा विषय झाली असती, पण खऱ्या प्रेमाची गमंत काय असते ती इथल्या लोकांना कशी आगणार, त्या खऱ्या सुखातील आनंद , त्यातील गमंत याचा अनुभव ते बाबाजी इथे रोज घेत होते.
आता भराभर पाय उचलत लवकरात लवकर हनुमान टिकरी गाठयची होती कारण तिथे मारूतीरायांचे दर्शन घेउन पुढचा मुक्काम आज विमलेश्वरला होता. त्यामुळे त्यां रणरणत्या उन्हात आम्ही चालत होतो .
साधारणपणे साडेबारापर्यंत आम्ही तिथे पोहचलो. काल मुक्कामालाच इथे बरेच परिक्रमावासी आले होते जे आता भोजन प्रसादी घेऊन पुढे निघणार होते.
हनुमान टेकरीला दोन मंदीर आहेत उजव्या बाजूला महाबली हनुमंताचे व डाव्या बाजूला शनी महाराजांचे. दोन्ही मंदीर ही उंचावर बांधलेली असून त्यासाठी छान पायऱ्या बांधलेल्या आहेत. आज दोन्ही मंदीरात जास्त वेळ थांबुन त्या स्थानांचा आनंद घेता येणार नव्हता कारण आम्ही गेलो तेव्हाच तिथल्या सेवकऱ्याने आम्हाला सांगीतले की 'आप जल्दी दर्शन करके आ जाईये अभी जल्दीही भोजन प्रसादी की शुरुवात होने वाली है '.आम्ही प्रथम आमच्या सॅग योग्य ठिकाणी ठेउन दिल्या व त्यानंतर हात, पाय, तोड स्वच्छ धुतले कारण उन्हात चालल्यामुळे सगळे शरीर एकदम घामट्ट झाले होते.
पायऱ्या चढून महाबली मारूतीरायांचे दर्शन घेण्यास गेलो फार थाबांवयाचे नाही असे ठरवुनही त्याच्याकडे बघितल्यावर श्री सर्मथ रामदास स्वामींनी लिहीलेल्या मारुती स्तोत्राच्या आळी सहज तोंडावर आल्या. त्यानंतर काळ्या पाषाणातील शनी महाराजांचे दर्शन घेतले. त्या मंदीरातील मुर्ति काचेच्या तावदानात बंदिस्त होती. परत दूसऱ्या सेवकऱ्याची भोजन प्रसादीची सुचना कानावर आली. कारण आज तिथे खूप परिक्रमावासी आले असल्याने गोंधळ होऊ नये म्हणून आधी संगळ्याना व्यवस्थित बसवून नंतर भोजन प्रसादी वाढायची होती . खूप भली मोठी पंगत त्या दिवशी तिथे बसली होती, आम्हीही आमची थाळी, पाण्यासाठी मग व कमंडलू घेऊन एका रांगेत बसलो.
आज तिथे माझ्या आवडीचा खिचडीचा बेत होता व त्याबरोबर होती खारी बुंदी. उदयन काही बोलला नाही पण खिचडी बघून बिचाऱ्याचा आज नक्कीचं हिरमोड झाला असणार .पण काही इलाज नव्हता कारण सकाळपासून इतके चालणे झाले होते की पोटाला काहीतरी नक्की द्यायला हवे होते. गुजाराथी पद्धतीची सुंदर अशी खिचडी त्यांनी तिथे बनवली होती. मध्यंप्रदेशमधील परिक्रमावासीयांनाहि हा बेत फारसा आवडत नसे हे आम्ही परिक्रमेत बरेच वेळा बघीतले होते. चपाती किंवा जाड टिकर असले की त्यांची गाडी एकदम खुश दिसे.
परिक्रमेत दर दिवशी आमचे इतके चालणे होई की ताटात वाढलेले काहीही गोड लागत लागे , हेच आम्ही घरी असताना करत असलेली सगळी नाटक आठवून खूप हसु यई. मी फक्त जेव्हा जाडं टिकर असतील तेव्हा ते पचतील की नाही ही भिती वाटून जेवण सुरू करण्याआधी उदयनला किंवा बापूला पास करीत असे.
भोजन प्रसादी झाली व आम्ही आमचे कमंडलू तिथल्या पाण्याने भरून घेतले व लगेच पुढे मार्गस्थ झालो. खर तर इतकी पोट भर खिचडी खाउन झाल्यावर त्या उन्हातून निघण्यास आमच्या मनाची आजिबात तयारी नव्हती पण विमलेश्वरला वेळेत पोहचणे गरजेचे आहे हे आठवून आम्ही पुढे निघालो. साधारणपणे साडेचारच्या बेतानी आम्ही विमलेश्वरच्या मंदीरापाशी पोहचलो. संगमरवरी सुंदर असे हे मंदीर आहे.आधीच मंदीराच्या आवारात ,आजुबाजुला बऱ्याच ठिकाणी परिक्रमावासीयांनी आपली आसने लावलेली होती. आम्हीही एका ठीकाणी आमच्या सॅग ठेवल्या व एकुण अंदाज घेऊन मग आपली विश्राम करावयाची जागा ठरवावी असे ठरले.परिक्रमा सुरू केल्यापासुनं आधे मधे भेटलेले बरेच चेहरे आज पुन्हा तिथे दिसत होते. कुणी हसुन नर्मदे हर असे म्हणत होते.
त्यानंतर आम्ही हात पायं धुवुन मंदीरात गेलो . पायऱ्या उतरून खाली आयताकार असे हे मंदीर आहे. त्यात मधे दोन शिवपिंडी असून त्यातील एका शिवपिंडीवर पहारीने प्रहार केल्याची खुण आहे व तिथुन सतत थोडे जल येत असलेले आपल्याला दिसते याची आख्यायीका अशी आहे की प्राचीन काळी या शिवपिडीवर अभिषेक चालू असताना एका मुसलमान माणसाने त्यावर पहारीने आघात करुन त्याचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून लालरक्त मिश्रीत पाणी येऊ लागले. ही गोष्ट त्या माणसाच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यास आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होउन त्यांनी महादेव शंकराला शरण जाऊन आपण केलेल्या या कृत्याबद्दल आपणास क्षमा करावी अशी मनापासून याचना केली. तेव्हापासून ते लालमिश्रीत जल यायचे बंद होऊन झुळझुळ पांढरे जल वाहू लागले. असे हे एक जागृत स्थान असून असे सांगतात की पूर्वी समुद्राचे पाणीही या मंदीरातील शिवलिंगांपर्यंत येत असे. आता ह्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटते कारण आता समुद्राचे पाणी किती तरी आत म्हणजे आपण जवळ जवळ अर्धा पाउण तास चालत गेल्यावर आपल्याला दिसते.
मंदीरात अजुनही निरनिराळ्या देवतांच्या मुर्ती विराजमान आहेत. पण तेव्हा जास्त वेळ न थांबता आरतीच्या वेळी आपण परत येऊ असा विचार करून आम्ही परत जिथे सॅग ठेवल्या होत्या तिथे आलो. परत एकदा संबंध मंदीराच्या पुढे मागे अशी एक चक्कर मारून मंदीराच्या मागच्या बाजूला असलेल्या संगमरवरी मार्बलचा ओट्याची जागा आम्ही रात्रीच्या विश्रामासाठी पक्की करून तिथे आमच्या सॅग लावल्या.आधीच्या जागेत आजूबाजूला बरेच एमपी मधील परिक्रमावासी असून त्यातील कुणी बिडी पिणारे निघाले तर रात्री ते आम्हाला त्रासदायक होणार होते. म्हणुन ती काळजी घेउन आम्ही मागच्या बाजूस मुक्काम गेलो. तेवढयात आमच्या बरोबर नंदगावाला गणपती मंदीरात राहीलले पाच सहां परिक्रमावासीही तेव्हा तिथे पोहचले. मग आजुबाजुच्या आधी आलेल्या परिक्रमावासीयांपाशी उद्याच्या भरतीच्या व बोटीच्या टाईमींग बद्दल चवकशी केली. तेव्हा त्याच्याकडून भरतीची वेळ आठ ते साडेआठपर्यंत आहे असे कळले.
पचवीस तीस जणांचा ग्रुप करून एका कागदावर सगळ्यांची नावे वं पैसे असे पुढे असलेल्या ऑफीस मधे जमा करायचे आहेत असे त्यांच्याकडून समजल्याने मग तशा ग्रुपची जमवाजमवं केली . उदयनला दोन परिक्रमामुळे ह्याची थोडी बहोत कल्पना होती त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या .त्यामुळे आमची ओळख असलेले परिक्रमावासी व ज्याचे अजून कुठल्या ग्रुप मधे पैसे देऊन झाले नव्हते अशा सगळ्यांचे नाव ,पत्ता व पैसे घेऊन ते ऑफीसमधे जाउन तिथले सगळे सोपस्कार पूर्ण केले.
तिथे पध्दत अशी आहे की बोटीतून जाण्यासाठी प्रथम पायी चालणाऱ्या परिक्रमावासीना प्राधान्य दिले जाते व नंतर वाहनातून जाणाऱ्या परिक्रमावासीयांचा विचार केला जातो. कारण बोटींची संख्या मर्यादीत असून जर एखाद दिवशी परिक्रमावासी खूप जास्त संख्येने आले व बोटीत तेवढया जागा शिल्लक नसल्यास त्या परिक्रमावासीयांना पुढच्या भरतीपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे ते सगळे काम आटोपून आम्ही आरतीच्यावेळेपर्यंत मंदीरापाशी हजर झालो . आज मंदीरात जवळ जवळ १०० एक माणसांची गर्दी होती त्यामुळे पायऱ्यावरून खाली उतरावयास अजिबात जागा नव्हती त्यामुळे तेव्हा आम्ही बाहेरच उभे राहीलो व आरती झाल्यावर थोडया वेळाने जेव्हा मंदीर रिकामे झाले तेव्हा दर्शन घेण्यास खाली उतरलो. शिवपींडी छान बेलपत्र वं फुलानी सजवली होती. माझा रोजच्या नेमाचे हनुमान चालिसां व रामरक्षा तिथे हनुमंता पुढे मी म्हंटले. मधुन मधुन भक्तगणांची ये जा चालू होती पण मगाशी गर्दी होती त्यापेक्षा खूप कमी गर्दी असल्याने निवांतपणे दर्शन झाले. त्यांनंतर आमच्या आसनस्थानी येऊन नेहमीची माईची सायंपुजा व नर्मदाष्टक व आरती झाली.
रात्रीच्या भोजनाची हरीहर झाली आज इथेही भोजनास खिचडी असल्याने उदयने भोजनाचा बेत रहित केला. दूपारचे भोजन व्यवस्थित झाल्याने माझी ही खूपं काहीं खाण्याची इच्छा नव्हती पण उदयन प्रमाणे मीही प्रसादीस गेलो नसतो तर आमचे बापूसाहेब मात्र नक्की ऊपाशी राहीले असते कारण आम्ही दोघेही जेवावंयला येत नाही असे समजल्यावर मग तोही जेवावयासं न जाता व भुक असुनही तसाच झोपला असता. म्हणून त्याच्यासाठी म्हणुन शास्त्र म्हणुन थोडे खायचे असा मनात विचार करून आम्ही दोघे भोजन प्रसादीच्या ठिकाणी गेलो.
भोजन प्रसादी घेऊन आम्ही थोडया वेळात आमच्या आसनापाशी आलो. उद्या सकाळी इथे लवकर ऊठावे लागणार होते कारण आज इथे एवढे परिक्रमावासी होते म्हणजे उद्याचे सकाळचे सगळे आवरायला प्रत्येक ठीकाणी तोबा गर्दी होणार होती त्यामुळे त्या सगळ्यांच्या आधी ऊठून सगळे प्रातः विधी, आंघोळ आटोपून आपल्या आसनापाशी नामस्मरण करत बसणे सोयीचे होते . त्यामुळे सकाळी लागणांऱ्या सगळ्या गोष्टी सॅगमधे वर करून ठेवल्या वं साडेनऊपर्यंत आम्ही सगळे स्लीपींग बॅगमधे शिरलो. आज आमची खरी कसोटी होती कारण थंडीचा कडाका आताच चांगल्या पैकी जाणवत होता. मधुनच थंड येणारी वाऱ्याची झुळक त्यात अजून भर घालत होती.रात्र अजून जशी पुढे जाणार होती तसा थंडीचा कडाका अजून वाढणार होता.
अंगाखालच्या गादीचा मार्बल मस्त थंडगार पडला होता .वर छान निळसर काळ्या रंगाच्या आकाशाचे छत आम्हाला खुणावत होते. आज खूप दिवसानी म्हणजे भवाणानंतर असे बाहेर मोकळ्यावर झोपण्याचा प्रसंग आला होता. भवाणा गावात तरी खाली पेंढयाची गादी व वर पेंढयांचे छत होते पण आज तर वर सगळीकडे अफाट पसरलेले आकाश व खाली छान संगमरवर दगडाची गादी असे वेगळेच कॉबीनेशन होते. स्लिपींग बॅगमधे शिरून मी वरच्या निळ्याभोर आकाशाकडे कितीतरी वेळ वेडयासारखा बघत राहीलो. आज उन्हातून खूप चालणे झाले असल्याने आम्ही खूप थकलो होतो पण वर असे मोकळे र्निलेप आकाश त्यात बारीक चमकणाऱ्या चांदण्या, आजूबाजूचा सगळा मोकळेपणा हे सगळे वातावरण मनाला झोपेकडे नेण्याऐवजी ताजेतवाने करत हा वेगळा आनंदाचा उपभोग घेण्यास उदयुक्त करत होते.
हा परिणाम कदाचीत त्या आकाशतत्वाचा असेल कारण हे तत्व परब्रम्हाच्या अतिशय जवळ जाणारे असे तत्व आहे की जे स्वतः इतके अलिप्त, निर्लेप आहे की सुर्य , चंद्र ,तारका,ढग त्याच्यावर आले वं गेले तरी त्याच्यात यचकिंचितही फरक न पडता ते आहे तसेच राहते . आज आम्ही त्याचं तत्वाखाली असल्याने थंडीचे, उद्याच्या सागर प्रवासाचे असे कुठलेही विचार मनाला स्पर्श न करता ते मला एका वेगळ्याच आनंदाकडे नेत होते. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ५७-
त्या रात्री त्या निळ्याभोर अथांग पसरलेल्या आकाशाचे असीम सौंदर्यं बघता बघता मन कधी निद्रेच्या अधीन झाले ते माझे मलाच कळले नाही. तसही आहेच म्हणा की मन एकाग्र झाले की योगी लोकांची लागते समाधी किंवा ध्यान व माझ्यासारखा मात्र जातो निद्रा देवीच्या कुशीत,नाम घ्यायला बसले की ह्याचा अनुभव येतोच की म्हणा. साधारण पहाटेचे साडेतीन होऊन गेले असतील कुठलाही आवाज किंवा मोबाईलचा गजर न वाजताही मी सहज जागा झालो. हवेत मस्त गारवा , अंगाखालची मार्बलची गादीही बर्फासारखी थंडगार पडलेली, आजुबाजुला असलेली नीरव शांतता मनाला स्पर्शून जाणारा हा वेगळा सुंदर एकांत मी त्या पहाटे अनुभवत होतो. त्यामुळे मन झोपकडे जाण्याऐवजी त्यां थंड,शांत वातावरणात सहज प्रसन्न झाले. जागेवरच १० ते १५ मिनीटे बसुन या सगळ्या सुंदर एकांताचा एक वेगळा अनुभव घेतला.परिक्रमेत बरेच वेळा असे अलौकीक आनंदाचे क्षण येतात की ज्याचे वर्णन शब्दातून व्यक्त करता येतं नाही कारण ते स्वतःने अनुभवाण्याचे क्षण असतात त्यामुळे आताही एवढेच म्हणेन की तो आनंद अवर्णनीय होता कारण त्याला एका आईचा परिस स्पर्श होता.
त्यानंतर मात्र ह्या दोघांपैकी कुणी जागे होण्याची काहीं चिन्हे आहेत का?हयाचा अंदाज घेतला. जेव्हा तशी काही चिन्हे दिसेनात तेव्हा मात्र प्रथम बापूला हळूच हलवून जागे केले व त्याला खुणेनेच विचारले उठतोस का? जाऊन सगळे आटोपून येऊ मग आपण आलो की हा जाईल. त्यालाही ते पटले त्यामुळे तो ही उठला. जाताना उदयनला सांगीतले आम्ही आधी जाउन येतो मग तु जा.
अजून खूप परिक्रमावासी उठले नव्हते त्यामुळे प्रातःविधी आटोपून तिथे असलेल्या कॉमन बाथरूम मधे एका धबधबत्या नळाखाली थंडगार पाण्याने एकदम फ्रेश झालो. या थंडगार पाण्यावरून आठवले परिक्रमेत बरेच वेळा अशा थंडगार पाण्यामुळे मन एक क्षणभर जरा काचकूच करत असे पण एकदा का पहिला पाण्याचा तांब्या अंगावर पडला की सगळी थंडी कुळल्या कुठे पळुन जाऊन आम्ही एकदम ताजेतवाने हाऊन जायचो.
परत मी व बापू आमच्या आसनापाशी आलो व मग बापू व उदयन परत तिकडे गेले व ते ही सर्व आटोपून आले. तापर्यंत थोडा वेळ त्या पहाटेच्या थंडीत नामस्मरणात छान मन लागले. अजून निघायला बराच वेळ होता त्यामुळे परत एकदा सॅग व्यवस्थित लाऊन घेतल्या. फक्त दोन प्लॅस्टीक थैली , एक मोठी की ज्यात सॅग मावेल व एक छोटी ज्यात चपला ठेवता येतील अशा वर हाताशी ठेउनं दिल्या. कारण प्लॅस्टीक थैलीत सॅग अशासाठी ठेवावी लागते ,बोटीत चढताना तो बोटीवरील माणूस सगळ्या परिक्रमावासीयाना नीट बसता यावे म्हणून बॅग आपल्याकडे न देता बोटीत खाली ठेवतो .आपल्याकडे असते ती फक्त परिक्रमा उचलताना माईचे रोजच्या पुजेतील जल भरभेली कुपी , नारळ व इतर पुजचे साहीत्य. पद्धत अशी आहे की सागर जिथे नर्मदा माईला येऊन मिळतो म्हणजेच संगमापाशी आपल्याला आपल्याकडील थोडे जल त्या संगमात अर्पण करावयाचे असते व तिथले थोडे जल आपल्या कुपीत परत भरून घ्यायचे असते व पुजा करावयची असते.
त्यामुळे बोटीत जिथे खाली बँग ठेवल्या जातात तिथे काही वेळा पाणी वं चिखल असण्याची शक्यता असते ज्यामुळे सॅग व आतील कपडे खराब हाऊ शकतात .छोटी प्लास्टिक थैली चपलांसाठी घ्यावी लागते कारण बोटवाले आपल्याला चप्पल घालून बोटीवरं चढू देत नाहीत त्यामुळे चपला त्या छोट्या थैलीत घालून ती थैली व सॅग असे मोठया थैलीत घालावे लागते. त्याआधी माईची नेहमीप्रमाणे पुजा,आरती केली व आम्ही तयार होऊन बसलो.
सकाळी परत एकदा मंदीरात जाऊन विमलेश्वराचे दर्शन घेतले व साडेसहाला आम्ही तिथुन पुढच्या मार्गाकडे (खाजणाकडे )जाण्यास निघालो. दिवस लहान असल्याने अजून उजाडले नव्हते पण मंदीरापासुन पुढे बोटीपर्यंत जाण्यासाठी जवळ जवळ पाउण एक तासाची सगळी खाजणाची अरूंद पायवाट होती. मोठा रस्ता संपला वं जशी अरूंद बांधाची पायवाट सुरू झाली तेव्हा ठरल्याप्रमाणे चपला प्लास्टिक थैलीत वं ती थैली व सॅग मोठया प्लास्टिक थैलीत घालून ते बोजे खांदयांवर घेऊन सगळी वानरसेना पुढची वाट चालू लागलो .आता पुढची सगळी वाट ही खाचखळग्यांची , चिखलाची व सततच्या छोटया चढ उताराची व बाजूला साथ होती काटेरी झुडपांची. त्या खाजणाच्या अरूंद वाटेवरून आम्ही दिडशेहून अधीक परिक्रमावासी त्या अंधुक प्रकाशात वाट काढत पुढे चालत होतो आता अशा स्थानावर पोहचण्यासाठी की जिथे छोटया बोटी उभ्या होत्या आम्हाला पुढच्या सागर प्रवास घडवण्यासाठी. !
कारण आता उत्सुकता होती ती थोडयावेळाने येणाऱ्या भरतीची व त्यानंतर बोटीने सुरू होणाऱ्या सुमद्र प्रवासाची .
मला ती प्लस्टीक थैली खांद्यावर टाकून भराभर काही चालता येत नसल्याने उदयने माझ्याकडून माझी थैली घेतली व तो आता त्याची व माझी दोघांची थैली खांद्यावर घेऊन चालू लागला.मी दोन तीन वेळा त्यास मी थैली धरून चालतो असे सांगीतले पण साहेबांनी माझे म्हणणे काही ऐकले नाही मला म्हणाला तु फक्त आपल्या दोघांचे कंमंडलू व दंड घेऊन नीट खाली बघून चाल, मी बरोबर येतो. ( मी आमच्या तीघात पोक्त परिक्रमावासी त्यामुळे मला ही स्पेशल ट्रीटमेंट होती )
एका तासाभरात आम्ही सगळे परिक्रमांवासीयांसाठी जिथे बोटी लागतात त्या मोठया बांधापाशी पोहचलो. आता बऱ्यापैकी उजाडले होते.आता आम्ही सगळे वाट पहात होतो भरती कधी येते याची .
मला जास्त उत्सुकता होती ती भरती येते कशी याची कारण आता खूप रिकामा किवा खूप कमी पाणी असलेला मोठया खळग्यासारखा लाबंच लांब भाग भरती आल्यावर कसा भरतो व त्यानुन बोटी कशा बाहेर पडतात ह्याचे प्रात्याक्षीक आज प्रत्यक्ष डोळ्यानी बघता येणार होते थोडक्यात शाळेत भुगोलात शिकलेला भरती ओहटीचा पाठ माई परिक्रमेत आम्हाला प्रत्यक्ष दाखवतं होती.
आठ वाजून गेले पण अजून भरतीचा काही पत्ता नव्हता. साडेआठ होऊन गेले मग जाणवू लागले की पाणी त्या लाबंट भागात हळु हळु येउ लागले आहे माझ्या मनात काही वेगळ्या कल्पना होत्या, मला वाटत होते की भरती आली म्हणजे लोटसारखे पाण्याचे एकदम लोंढच्या लोंढे तिथे येऊन तिथे पाणी भरत असावे पण तसे न होता पाणी शिस्तीत, शांतपणे त्यां लाब असलेल्या जागेत हळु हळु येत होते व तिथले पाणी हळुहळु वाढत होते व खाली तळात असलेल्या बोटी मग आपोआप पाण्यात वर येत होत्या.
किती शिस्तीत वं नियमीत काम चालते ना ह्या निर्सगचक्राचे !रोजचा सुर्यादय, सुर्यास्त अशा अनेक गोष्टीतून तो आपल्याला धडे देत असतो शिस्तीचे व नियमीतपणाचे पण आपण माणसे मात्र निर्सगाने घातलेले नियम सर्रास तोडत असतो अशा अनेक गोष्टी परिक्रमा करताना खूप जाणवल्या कारण इथे आपण घडाळ्याच्या काटयावर आपण धावत नसतो तर ती आपल्या विचाराना प्रगल्भ करून एक नवीन दिशा देत खरा आनंद कशात आहे हे आपल्याला दाखवत असते.
बोटी जिथे लागत होत्या तिथे जवळजवळ गुडघाभर किंवा त्याहून जास्त चिखल होता त्यामुळे त्याचे मदतनीस तिथे, तिथेच उगवलेल्या खारफुटीसारख्या झाडाच्या मोठ्या फांद्या टाकून त्यावरून बोटीत चढण्यासाठीचा एक जेटीसारखा छोटासा मार्ग करत होते. तरीही तिथपर्यंत जाण्यासाठीही पाय थोडया चिखलात जात होतेच. म्हणूनच मला असे वाटते की ते बोटीवर चप्पल घालून येण्यास मज्जाव करत असावेत कारण पायांपेक्षा चपलांना तंर अजून जास्त चिखल चिकटून राहत असे.
बोटी जशा निरनिराळ्या जागी लागुं लागल्या तशी परिक्रमावासीयांची गडबड सुरू झाली. तेव्हा या सगळ्या व्यवस्थापनाचा तिथे असलेल्या माणसाने ( मुखीयाने ) सगळ्याना सांगीतले ' काई धक्काबुक्की नही , आरामसे जाओ सबको जाने को मिलेगा ' तो परत परत हे सांगत होता
आजच्या परिक्रमावासीयात मध्य प्रदेश , गुजराथ मधील परिक्रमावासी बरेच होते त्यामुळे त्याचे तीस पस्तीस जणाचा ग्रुप लगेच झुंबड करून तिथे त्या बोटीसमोर जाऊन उभा राहात होता. एक एक बोट पस्तीस तर कधी चाळीस परिक्रमावासीयांना घेऊन पाण्यातून पुढच्या प्रवासाला सुरवात करत होती अशा तिथे असलेल्या चारही बोटी त्यां परिक्रमावासींनी भरल्या व पुढे गेल्या. आता राहीलेला ग्रुप होता जमतेम सहवीस सत्तावीस जणांचा जे झुंबड न करता शांतपणे त्या माणसाने सांगितल्या प्रमाणे शिस्तीत थांबले होते.
पण याच्यातून एक कळले की आमच्यातील काही जण त्या बोटीत चढले होते.
आता तिथे आम्हाला घेउन पुढच्या प्रवासासाठी जाणारी एकही बोट नव्हती. हि सगळी व्यवस्था बघणारा तो मुख्य माणूस तिथेच होता. आम्ही त्याला विचारल्यावर तो शांतपणे म्हणाला 'आज तो चारही बोट जानेवाली है ,अभी तो काई बोट नही जायेगी ' समोर आम्ही एवढे सगळे परिक्रमावासी जायचे राहीलेले दिसत असूनही तो हे वाक्यं बोलत असेलेला पाहून .आम्हाला आश्चर्य वाटले.
आता राहीलेल्या परिक्रमावासीयांत आम्ही आठ जण महाराष्ट्रातले व बाकीचे एमपीचे असे सगळे मिळुन आम्ही २६ जण होतो. आता मात्र त्याच्याशी थोडा आवाज चढवून म्हणजे थोडक्यात भांडल्या शिवाय काहीं पर्याय नव्हता. परिक्रमेत आहोत त्यामुळे अजूनपर्यत शांत राहून आम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेउन इतरांसारखी हुल्लडबाजी केली नव्हती पण आता आमच्यासमोर दूसरा काही इलाज नव्हता.
आम्ही त्याला त्यानंतर काल पैसे भरलेली पावती दाखवली व विच्यारले " अरे भाई आपने अभी बोला ,सबको जाने को मिलेगा इस लिये हम चूपचाप खडे रहे और अभी बोल रहे हो अभी और काई बोट नहीं जायेगी. ऐसा कैसे चलेगा,हम लोगोंने कल सबका पैसा भरा है, आपकी रेकॉर्डसे आपको मालूम है कितने लोग आज जानेवाले है तो वो हिसाबसे आपको ऊतनीं बोट की व्यवस्था करना आपका काम है ". आता उदयने आवज चढवला व म्हणाला ' ऐसी दादागीरी नही चलेगी नहीं तो हमको कलेक्टर के पास आपकी शिकायत करनी पडेगी ' असे म्हंटल्यावर तो थोडा वरमला कारण अशा त्याच्या तक्रारी जर कलेक्टर गेल्या तर त्याचे हे कॉन्ट्रक्ट जाउ शकते. त्यानंतर मात्र तो म्हणाला' ऐसा मत करो भाईसाहब कुछ तो बंदोबस्त करता हूँ"
आम्ही तक्रार करू असे जोरात सांगितले होते खरे पण मनातून सगळ्याचा मुड ऑफ झाला होता.
पाच मिनीटांनी म्हणाला ' ठीक है मै देखतां हूँ पर उसं बोटवाले के पास मशीन के लिये डीझेल है के नही मालूम नही" असे म्हणून त्याने त्या होडीवाल्याला फोन लावला व त्याच्याशी बोट व डिझेल संबधी तो काही बोलतं होता. म्हणजे अजूनही आमच्या डोक्यावर टांगती तलवार होतीचं त्यामुळे बघु पुढे काय घडले ते पुढच्या भागात तोपर्यत नर्मदे हर
स्थान विमलेश्वर
नर्मदा परिक्रमा अनुभव ५८
त्या मुखीयाचे कुणाबरोबर बोलणे झाले ते काही माहीत नाही पण तो आम्हाला म्हणाला " देखते है उसको कहाँ से पेट्रोल मिले जायेगा तो वो आ जायेगा, वो फोन करेगा, असे म्हणत म्हणत तो थोडा पुढे जाउ लागला. मग तर आम्हाला जास्तच टेंशन येऊ लागले . कारण हा जर निघून गेला व बोटवाला आला नाही तर मग आम्ही तिथे थांबुन काहीच करू शकणार नव्हतो म्हणून आम्ही त्याला म्हंटले " भाईसाहव आप किधर जा रहे हो " आमच्या बोलण्याचा रोख त्याच्या बहूतेक लक्षात आला असावा त्यामुळे तो म्हणाला " अरे मै किधर नही जा रहा हूँ आप के लिये बोटं का प्रबंध करके ही मै यहाँ से जाउँगा ' आता आम्हाला जरा धीर आला कारण आज रेवा संगम पार करून उत्तर तटावर जायचे ही सगळ्यांचीच मानसीकता झाली होती. अजून फोन आला नव्हता , प्रत्येक क्षण हा तेव्हा खूप मोठा वाटत होता. कुणीं फोन न येता डायरेक्ट बोट आली तर म्हणून वाट बघत होते . दहा पंधरा मिनीटे तशीच गेली , आता आमच्या समोर माईला पार्थना करण्याशिवाय दूसरा काही मार्ग नव्हता , मनोमन सगळे आम्ही तिचेच स्मरण करत होतो तेव्हा त्याच्या फोनची रींग वाजली व त्याच्या बोलण्यावरून प्रथम काही कळले नाही पण फोन ठेवता ठेवता त्याच्या चेहऱ्यावरून तरी बोटीची सोय झाली असे वाटत होते.
फोन खिशात ठेऊन म्हणाला " आ रही बोट दस मीनीट मे ' त्पाचे वाक्यं ऐकले व माईचे मनोमन आभार मानले. दहा मिनीटात बोटीचा आवाज येऊ लागला , थोडयाचं वेळात ती त्या खाजणापाशी थांबली. पाच मिनीटांनी अजून एका बोटीचा आवाज झाला व ती ही बोट तिथे येऊन थांबली. आता आम्हाला कळेना की नक्की कुठल्या बोटीतून आम्हाला प्रवास करायचा आहे " तेव्हा तो माणूस म्हणाला " आपको इस बोटसेही जाना है , इसमे डिझेल कम है करके वो दूसरी बोट आयी है " त्यां बोटीतून एक मोठा कॅन या बोटीत ठेवला गेला. आता आम्ही सहवीस जण त्या थोडया चिखलातून, त्यां फांदयांवरून चढून सगळे व्यवस्थीत त्या बोटीत बसलो. उदयनच्या सागण्यानुसार बोटीत मधल्या भागात आम्ही बसलो कारण पुढे बोट एकदा समुद्रात गेली की समुद्राच्या पाण्याचे फटके पुढे वं कडेला बसण्याची शक्यता जास्त असते व मागे मशीनचा आवाज व डिझेलचा वास खूप येतो त्यामुळे मधोमध खाली असलेल्या फळीवर आम्ही तिघे बसलो. खरं म्हणजे मला कडेला किंवा पुढे बसायला आवडले असते कारण तेवढेच मला त्या सागरलाटांशी खेळायला व हितगुज करता आले असते कारण मनात येते की अशी एखादी लाट जेव्हा आपल्या पर्यत येते तेव्हा कदाचीत तिलाही आपल्याला काही सांगायचे असेल किंवा ती तीच्या भाषेत म्हणतही असेल की , अरे मलाही घेऊन चल परिक्रमेला माईकडे. पण आमचे आधीच तिघांनी एकाच ठिकाणी बसावयाचे असे ठरले असल्याने त्यावरून वाद नको म्हणून मीही मधे त्यांच्याबरोबर बसलो. 'नर्मदे हर ' चा जयजयकार झाला , बोटीचे मशीन चालू झाले व बोट त्या भागातून बाहेर पडली. बोटीने एक छोटे वळण घेतले वं खाजणापासुन बोट लांब जाऊ लागली. दहा मीनंटानी आम्ही जिथे ऊभे होतो तो मोठा बांधही आता दिसेनासा झाला. आता सगळीकडे होते फक्त पाणी, शांत फारशी हलचाल न करणारे.मी मनातं विचार केला की उदयनने गेल्या वेळेला रात्रीच्या समुद्र प्रवासाचे केलेले वर्णन इतके भयानक होते की त्या मनाने आज सागरजी एकदम शांत आहेत, आपल्यावर कृपा आहे बहूतेक तेवढयात उदयन म्हणाला 'आपण अजून खाडीच्या भागात आहोत एकदा समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ देत मग बघ, कशी मजा येते ते '
बोटीने आता चांगलाच वेग घेतला होता , सुर्यही आता चांगलाच वर आला होता पण वाऱ्यामुळे व समुद्र प्रवासचे असलेल्या कुतुहूलामुळे म्हणा उन्हाचा त्रास जाणवत नव्हता.
वर पसरलेले निरभ्र आकाश, आजूबाजूला अथांग पसरलेला सागर ,हे दोन्हीही खूप विशाल व त्याच्या विरूध्द त्यात आमची ही छोटी बोट व त्याहुन छोटे आम्ही बसलेले परिक्रमावासी. त्या विशालतेपुढे अहंला धरून बसलेला मी किती छोटा आहे याची प्रार्कशाने जाणीव झाली. त्या आकाशात मधुनच पक्षाचे थवेच्या थवे आनंदाने विहार करत असेलेले दिसत होते. काही बदकांसारखे करडया, काळ्या रंगाचे पक्षी हवेत उडून परत पाण्यावर येऊन मस्त पोहत होते. कधीतर ते मला पाण्याच्या थोडया हलचालीने त्याच्यावर छान डोलत आहेत की काय असाच भास होई.
.आम्ही सगळे या सगळ्याचा आनंद घेत चाललो होतो. आता दूर दूर पर्यंत फक्तं पाणीच पाणी होते आमच्या आधी निघालेल्या बोटीचा काही लाबपर्यंत कुठे मागमुसही नव्हता.
थोड्या वेळाने मात्र जाणवले की आता मात्र आपण समुद्रात आलो आहोत कारण लाटाचा वेग व त्यामुळे बोटीची त्यावर वरखाली होणारी हलचाल आता चांगलीच जाणवत होती. प्रतिस्पर्धी कसा चढाया करतो तशा सागराच्या लाटा बोटीवर आदळ्त होत्या व ती बोटही त्यावर आनंदाने स्वार होऊन परत पुढच्या चढाईची वाट बघत होती. हे सगळे बघून मला त्या निर्सगाची व माणसाच्या कल्पतकेची खूप गंमत वाटत होती. खर तर इतक्या पाण्यात भीती वाटावयास पाहिजे होती कारण आता काही उलटसुलट झाले तर त्यां अथांग पसरलेल्या पाण्यात माझ्या सारखा पुढे काहीच करू शकणार नव्हता खर सांगायचे झाले तर अगदी वाईट परिस्थीतीत शेवटी तो नावाडी आमच्या जीवा पेक्षा स्वतःचाच जीव वाचवणार होता तरीही त्या वेळी मनाला त्या नावाड्यावर पूर्ण विश्वास होता त्यामुळे मन या दृष्याचा शरीरच्या निरनिराळ्या भागानी आता आनंद घेत होते डोळे दूरवर पसरलेला अथांग सागर , भिरभिरत येणारा वाऱ्याचा स्पर्श , नाकाने सुमद्रच्या पाण्याचा येणारा एक खारा वास ह्मा सगळ्या गोष्टी अगदी सहज घडत होत्या त्या वेळी सहज जाणवले की नित्योपासनेत मी म्हणतो की
भवनदी तारक भक्ती नौकेचा सदगुरू यजमान
तो तुज सुकाण्या तारक असता कैसे भव भय भान॥
पण खरोखरच मला असे वाटते ?
कारण आता त्या नावडयावर जेवढा विश्वास वाटतो तेवढा किंवा थोडासा जास्तच विश्वास मला माझ्या सदगुरूबद्दल वाटतो?कारण त्यानी अनेक प्रकारे नामाचा महिमा सांगीतला असूनही इंद्रियाच्या बाकीच्या गोष्टी प्रमाणे मुखाने सहज नामाचा रस पीणे मात्र होत नव्हते त्याला आठवण करून द्यावी लागत होती की तुला नाम घ्यायचे आहे . ही परिक्रमा पदोपदी अशा कित्येक प्रात्याक्षिकातून मला किती तरी गोष्टी सुचवत होती.
आता मधेच कधीतरी समुद्रात एकदम छोटया बेटासारखा भूभाग ज्यावर भरपूर झाडे आहेत असे दिसत होते ते बघून निसर्गाच्या या कलाकृतीचे आश्चर्य वाटत होते. लाटांचा लडिवाळ खेळ चालू झाला होता , मधेच कधीतरी एखादी मोठी लाट कडेला बसलेल्या परिक्रमावासीयाला भिजवून जात होती. मधे मधे एमपी मधील मंडळी ( पुरुष व स्त्रिया ) माईची अपरिचीत गाणी म्हणत होती. दिड तास गेला व नावेवराचा माणुस ओरडला ' अभी संगम आ जायेगां पर काई जगहसे हिलना नही , सबका थोड़ा जल मेरे पास दे दो मै वो अर्पण करके संगम का जल आपको दे दूँगा '. त्याचे सांगणे बरोबर होते कारण दहा बारा परिक्रमावासीयांनी एकाच ठिकाणी गलका केला तर बोटीचा बॅलन्स जाऊ शकत होता. त्यामुळे सगळ्यांनी बसलेल्या जागेवरचं त्याच्याकडे असलेल्या मगात आपले थोडे जल ओतले व संगमापाशी थोडा बोटीचा स्पीड कमी करून ते तिथे अर्पण केले गेले व तिथले जल आता त्यानी एका मगात भरून घेतले. बोटीत कडेला बसणाऱ्यांपैकी कुणी तिथे फुले, वस्त्र, नारळ अर्पण केले. आम्ही बसल्या जागेवरूनच फक्त नमस्कार केला. तो जेव्हा जल देण्यासाठी आमच्याकडे आला तेव्हा त्याला आमच्याकडील वस्त्र, नारळ व दक्षिणा त्याला अर्पण केली. कारण सागरात अर्पण करण्यापेक्षा कुणाच्या मनीमुखी लागल्याने त्याला जो आनंद होणार होता तो सागरापर्यंत नक्कीच पोहचणार होता. आता आम्ही सगळ्यांनी आमच्या चालीत तिथे नर्मदाष्टक व आरती म्हटली . बोटीचा प्रवास आता पर्यत पावणेदोन तासापर्यतचा झाला होती अजुन सव्वां , दिड तासाचा प्रवास बाकी होता.
आता सगळे थोडे मरगळलेले झाले होते कारण सकाळी या प्रवासासाठी सगळ्याचेच लवकर ऊठणे झाले होते, व आता ह्या प्रवासातील पहिली उत्सुकता थोडी कमी झाली होती. जवळजवळ साडेअकरा झाले होते .उन्हाचा तापही आताही थोडा जाणवत होता पण वाऱ्यामुळे सगळे थोडे पेंगुळल्यासारखे झाले होते. सकाळपासून पोटातही काही नसल्याने आता हळु हळु भुकेची जाणीव होउ लागली होती. सॅगमधे एकदा बिस्कीटचा पुडा असला तरी ती खाली थैलीत होती त्यामुळे कंमडलू मधील जलाचाच पोटाला थोडा आधार होता . उदयन वं बापू तर मधुन मधुन डुलक्या घेत होते. उदयनच्या गेल्या परिक्रमेतील सुमद्र प्रवासाच्या भयानक अनुभवामुळे आता शांत असलेल्या समुद्रामुळे तो ही बऱ्यापैकी निश्चिंत होता. सकाळी लवकर उठल्यामुळे माझेही डोळे कधीमधी मिटत होते पण हे सगळे परत बघायला मिळणार नाही म्हणून मी लगेच त्याना झोपेकडे जाउनं देत नव्हतो.
समुद्राचे अथांग रूप बघता बघता तास सव्वा तास कसा गेला ते कळले नाही. लांबवर आता कंपन्यांच्या जेट्टी दिसू लागल्या , इतक्यात कुणीतरी लांबवर डॉल्फीन मासे दिसतआहेत ते दाखवु लागले.
आमच्या बोटीचा स्पीड जास्त होता की काय कोण जाणे पण आमच्या आधी अर्धा तास निघालेल्या सगळ्या बोटी आता अचानक दृष्टीक्षेपात येऊ लागल्या व काही वेळात आम्ही त्यांना गाठून आता आमची बोट त्यांच्यापुढे व बाकीच्या बोटी मागे असे चित्र दिसू लागले.
एकुण सकाळपासुन साडेतीन चार तासात आम्ही आता उत्तर तटावर पोहचणार होतो . खाजगी कंपन्याच्या जेट्टीपाशी उतरायची परवानगी नसल्याने त्याने गुडघ्याभरं पाण्यात आमची बोटं थांबवली. एकमेकांच्या आधाराने थैली खांदयावर किवा डोक्यावर घेऊन आम्ही पाण्यात उतरलो वं त्या पाण्यातूनच चालत किनाऱ्यावर आलो. काही वेळेलां इथेही खूप चिखल असतो पण आज कर्मधर्मसंयोगाने तो नसल्याने आमची फारशी पंचाईत झाली नाही. बाकीच्याही बोट हळुहळु पोहचू लागल्या. आता इथुन सगळे परिक्रमावासी वळतात मीठीतलाईकडे पण आम्हाला करावयाची होती परिक्रमा समुद्र पंचकोशीची त्यामुळे बघुया काय होते या समुद्र पंचकोशी परिक्रमेत पण तापर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ५९
आम्ही किनाऱ्यावर उतरलो आमच्या बरोबर असलेल्या अजून पाच सहा परिक्रमावासीयांनी पण आम्हास सांगीतले की आम्हीही तुमच्या बरोबर या परिक्रमेला येणार आहोत. प्रत्येकजण आपल्या पायानी चालणार होते त्यामुळे नाही म्हणायचा काही प्रश्चन नव्हता.चला म्हंटले व आम्ही आठ नऊ जणानी डाव्या बाजूचा रस्ता पकडला व बाकीचे सर्व परिक्रमावासी मीठीतलाईच्या उजव्या बाजूच्या रस्त्याला लागले. डाव्या बाजूला अगदी समोर एक आश्रम दिसतो त्याचे नाव आहे हरीधाम आश्रम. बाहेरून आश्रम छान बांधलेला दिसत होता. आम्ही तिकडे गेलो तेव्हा आश्रमाच्या बाहेरच एक आजोबांच्या वयाचे एक सेवकरी आश्रमाच्या दारात उभे होते. त्यानी खुणेनेच इशारा केला इधर मत आओ आगे जाओ ' त्याना बहूतेक आम्ही आश्रमात भोजन प्रसादीसाठी आलो असावेत असा समज झाला असावा व ते सहाजिक होते कारण जवळ जवळ दोन वाजत आले होते व आमच्या पेहरावावरून आम्ही समुद्र प्रवास करून आलो आहोत हे कळत होते त्यामुळे त्यानी काही गैरसमजूत व्हायच्या आधीच इथे काहीं मिळणार नाही हे आम्हास सांगुन टाकले.पण इथे आम्ही वळलो होतो कारण कमंडलूत आता पिण्यासाठी पाणी शिल्लक नव्हते. बोटीवर उन्हात बराच वेळ बसल्याने खूप तहान लागली होती व दूसरे म्हणजे बोटीवरच्या खाऱ्या हवेमुळे कधी एकदा हात ,पाय व तोंड स्वच्छ धुवुन जरा फ्रेश होतो असाही मनात विचार आला होता. म्हणून त्यां सेवेकऱ्यांना पाण्याबद्दल विचारल्यावर त्याने बाहेर असलेला नळ दाखविला. म्हणजे थोडक्यात कुणी आश्रमाच्या आतही येऊ नये हे त्याच्या चेहऱ्यावरून व नजरेतूनही कळत होते. आम्ही तिथल्या थंडगार पाण्याने हातपाय धुवुन प्रेश झालो,तिथेच पाणी पिऊन कमंडलू पण भरून घेतले व बाहेर येऊन सॅगेमधील बिस्कटचा पुडा सागळ्यांनी मिळून फस्त केला. तिथुन आम्ही थोडया अंतरावर असलेल्या मौनी बाबांच्या आश्रमाकडे गेलो. मौनी बाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. मौनी बाबां आश्रम आज बंद होता, आता मौनी बाबा नाही त्यामुळे तिथे कुणी सेवेकरी असतील तरच हा आश्रम सकाळी उघड़ला जातो असेही कळले त्यामुळे परत आम्ही समुद्र किनारी आलो. आता आम्ही आमचा मोर्चा वळवला तो परशुराम तपस्थळी आश्रमाकडे जाण्यासाठी. तसा हा आश्रम किंवा तपस्थळी नवख्या माणसाला लांबुन दिसण्यासारखा किवा कळण्यासारखा नाही कारण जमीनीच्या बरोबरीला इथे मंदीराचा कळस आहे व त्याखाली मंदीर आहे त्यामुळे जमीनीवर मंदीर व त्यावर कळस असा प्रकार इथे नसल्याने लांबुन या जागेचा मागमुस पण लागत नाही.
आता हा सगळा रस्ता वाळुचा होता.उन्हामुळे ती वाळूही तप्त झाली होती. समुद्राच्या किनारी असलेल्या पिवळ्या वाळुमधुन आम्ही चालत होतो. मऊ मऊ असलेल्या या वाळूत पाय रूतत असल्याने हा एक नवीन अडथळा चालताना जाणवत होता.दूपारचे सणसणते ऊन , वाळुमुळे कुठेही ओडोशाला उभे राहण्यासाठी एकही झाड नाही सारे कसे एकदम ओसाड, परत त्या मऊ वाळूच्या आत पाय जात असल्याने पाय ओढतच आमचे तिथे चालणे होत होते त्यामुळे चालण्यास वेगही मिळत नव्हता. उदयन आधी इथे आला असल्याने त्याला हा साधारण रस्ता माहीत होता त्यामुळे आम्ही थोडे निश्चिंत होतो कारण इथे कुठे चुकलो तर या उन्हात परत उलटे सुलटे चालणे खूप कठीण काम होते. या मार्गावर इतकी माणसांची वर्दळही नव्हती.वीस पंचवीस मिनीटे असे चालल्यावर आम्ही तो वाळुचा सगळा रस्ता पार केला तेव्हा राजस्थान मधील वाळवंट कशी भयानक असतील याची एक झलक आम्हाला मिळाली. आता आम्ही आतल्या बाजूच्या रस्त्याला लागलो व तिथे आजुबाजूला असलेल्या थोडया फार झाडीमुळे आता आमच्या जीवात जरा जीव आला.
दहा मीनीटानी आम्ही त्या आश्रमापाशी पोहचलो. आश्नमात बाहेरून कुणा सेवेकऱ्याची थोडक्यात माणसांची काही चाहुल लागत नव्हती त्यामुळे बाहेरूनच आम्ही एकदा 'नर्मदे हर ' असा मोठ्याने पुकारा केला. तेव्हा आतुन आवाज आला ' अंदर आ जाईये बाबाजी ' मग आम्ही त्या आश्रमात शिरलों. आतं पच्च्यात्तरीच्या पुढचे एक साधुंजी होते. हसत हसत म्हणाले 'आओं आओ '. त्यांच्या चेहऱ्यावरील वेगळेच पण सौम्य तेज व आपलेपणाचे हास्य बघुन उन्हाने भाजून निघालेल्या आमच्या मनावर चांदण्यां रात्रीतील सौम्य किरणांचा शिडकावा झाल्यासारखे वाटले. आम्ही सगळ्यानी सँग दरवाज्याजवळ ठेवल्या व त्यांना पाय धुवावयाच्या जागेबद्दल विचारले. तिथे जाऊन हातपाय धुतले व त्यांना नमस्कार करून सगळे जण आम्ही खाली त्यांच्या पुढे बसलो. ' अभी नावडी से आये हो क्या? ' त्यांनी प्रश्न विचारला. आम्ही हो म्हंटल्यावर ' ठिक है , बैठो. मै चाय बनाता हूँ, " खर तर इतक्या वयाच्या माणसाकडून काहीं करून घेणे हे योग्य वाटत नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना म्हंटलेही . 'नही गुरूजी रहने दो ' पण ते कसले ऐकतात ' अरे अभी हो जायेगी चाय ,कितना वक्त लगता है ' थोडे वाकलेले असे ते साधुजी चहा करता करता आमच्याशी बोलत होते. नकळत मनात हरीधाम मधील मागशाच्या सेवकऱ्याशी आठवण झाली व हसू आले. ते बोलत होते 'आज कल जादा काई पारिक्रमामार्ग ये मार्ग से आते नही है, सिधे मीठीतलाई होके चले जाते है, आपको किसने बताया इस मार्ग के बारे मे ' आम्ही उदयनजीची ही तीसरी परिक्रमा आहे वं दोन्ही वेळेला त्यानी ही परिक्रमा केली आहे असे सांगीतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आश्वर्य वं आनंद आम्हाला बघावयासं मिळाला. एका मोठया भांड्यात ते चहा घेउन आले व बापूंनी मग संगळ्यांच्या मगात तो ओतला. परत ते खुर्चीत बसले वं म्हणाले ' नीचे दर्शन करना है?, और भोजन प्रसादी का वया है,?.
तपस्थळीचे दर्शन हे तर मुख्य लक्ष होतेच कारण इथे श्रीपरशुरामांनी ज्या शिळेवर बसून तप केले तीचे दर्शन तर घ्यायचे होतेच त्यामुळे त्यांना दर्शनाला खाली जातो असे सागीतले. सगळ्यांचाच पोटात आता कावळे ओरडत असल्याने खालून दर्शन घेउन आल्यावर खिचडीचे सामान असेल तर आम्हीच खिचडी करतो असे त्यांना सांगीतले. बरण्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले, '' हां हां सब है, वहाँ डाल, चावल सब रखा है.'
आठ दहा पायऱ्या उतरून आम्ही खाली उतरलो वं एका बाजूला ती शिळा आहे व समोर खूप पुरातन काळातील शंकराची पिंडी तिथे होती. सकाळी साधुंजीनी छान पुजा केलेली दिसत होती. तिथले वातावरण एकदम थंड, शांत व प्रसन्न. खाली काहीतरी वेगळे आहे हे जाणवत होते, इतक्या वर्षापासून तिथे चालत असलेल्या उपासनेने त्या वातावरणात आम्हा सगळ्यांना एक वेगळीच अनुभती जाणवत होती.आत कुठेतरी एक वेगळी स्पंदने मनाला आनंद देत होती. उदयनने त्या शांत वातावरणात श्रीमहादेवाचा एक संस्कृत श्लोक म्हंटला. पाच मिनीटे तिथे थांबून आम्ही परत वर आलो. आमच्याबरोबर असलेले परिक्रमावासी श्री बालेकर व अजुन एक परिक्रमावासी मला आता नाव आठवत नाही पण पुण्याचा एक तरुण युवक होता तो त्यांनी खिचडी बनवायची सेवा घेतली. साधुजींकडून त्यासाठी लागणारे सामान कुठे आहे हे विच्यारून घेउन त्यांनी खिचडी प्रसादी बनवण्यास सुरवात केली. त्या वेळेत आम्ही त्यांचाकडून त्यांनी केलेल्या परिक्रमेविषयी व या स्थानाविषयी त्यांच्याशी बोलण्यास सुरवात केली. त्यांनी तीस चाळीस वर्षापुर्वी परिक्रमा केली होती तेव्हाच्या शुलपाणीतील अनुभवांविषयी सांगतांना ते म्हणाले की दारिद्र् वं गरिबीमुळे मामा परिक्रमावासीयांना लुटत हे कारण तर होतेच पण त्याचबरोबर ते त्यां परिक्रमावासीयाची त्यांच्या पद्धतीने परिक्षाही घेत , अनुभव सांगताना म्हणाले शुलपाणीत पूर्ण लुटल्यावर त्यां मामानी त्यांना लज्जा रक्षणाइतके एक पोतेऱ्या सारखे वस्त्र म्हणून दिले व त्या रात्री त्यांना त्याच्या घरी अशा ठिकाणी झोपावयास सांगीतले की त्यांच्या एका बाजुला वयात आलेली त्याची मुलगी व दुसऱ्या बाजूला त्या मामाची बायको, यांच्या मधे त्यांनी झोपावयाचे होते. सकाळी उठल्यावर मुलीकडून व बायकोकडून यांनी रात्री काही त्रास दिला नाही ना ?याची खात्री करून घेतली. मग त्याला हा खरा परिक्रमावासी आहे हे पटल्यावर त्यांना पुढे जातांना अन्न म्हणून त्याच्याकडील कुठलीशी पीठी व पाणी पिण्यासाठी दुधी भोपळा वाळवून त्यांचे बनवलेले पात्र कमंडलू म्हणून देऊन पुढे जाऊ दिले. हे सगळे ऐकून आम्ही तर चाटच पडलो . कारण मामा लोक लुटतात हेच कायम ऐकत आलो होतो. अशी कस लागणारी परिक्षा ही ते घेत असतील हे मात्र नवीन होते. अशा रीतीने तो परिक्रमावासी किती सच्चा आहे, का परिस्थीतीचा गैरफायदा घेतो हे ही बघीतले जात होते.
पुढे म्हणाले की दोन्ही शुलपाणीतील जंगल तर तेव्हा इतके घनदाट होते की तिथुन जांताना जंगली प्राण्यापासुनहीं जीवास खूप धोका असे.
या जागेच्या विषयी अनुभव सांगाताना म्हणाले की 'परशुरामजी स्वयंः यहाँ बहोत बार आते है ,उनका अस्तित्व मालूम पडता है,कोई साधारण आदमी इधर टीक नही सकता . एक बार एक आदमी इधर सेवा करने के लिये आया था मैने उसको बताया था की ये स्थल तो बहोत जागृत है , कुछ गलत करोगे तो वो जरूर दंड देते है. इसलिये आप इधर के वास्तव्य के बारे मे सोच समझकर निर्णय ले लो. उसको मेरा कहना सच नही लगा की ,क्या मालुम? उसने कहाँ ठीक है, काई बात नही , आज रात को मै छत पे सो जाता हूँ. मैंने उसको छ्त पे सोने के लिये तो बिल्कुल मना किया थां पर मेरी बात उसने नही मानी.रात को क्या हुआ मालुम नही पर आधी रात को बहोत घब्रायासा हुआँ निचे गद्दीबिस्तर लेके आया और मुझे कहने लगा "मै यहाँ एक पल भी नही रूकुंगा,उप्पर किसीने मेरे मुंह पे बहोत जोर से थप्पड मारा. ' मैंने उसको पुछा 'रात को तुने कुछ गलत सोचा क्या? ' इसके उपर वो कुछ बोला नही पर रातोरात चुपचाप यहाँ से निकल पडाँ.' यहाँ रूक के सेवा करना काई साधारण आदमी के बस की बात नही. जो आदमी मनसे निर्मल है उसको यहाँ कुछ तकलिफ नही होती '.
तेवढयात बालेकर खिचडी घेउन आले , तापर्यंत तीन वाजलेच होते त्यामुळे तो विषय तिथेच थांबवून आम्ही सगळे भोजन प्रसादी खाण्यास बसलो.साधुजींनाही आम्ही परत परत खाण्यांविषयी आग्रह केला तर ते म्हणाले ' मै तो एकबार ही खाता हूँ , वो तो सुबह साडेदस बजे हो गया, अभी कुछ नही खाउंगा,श्याम को एक लडका दुध लेके आता है वो आयेगा तो रात को दुध पी लेता हूँ, वो नही आयेगा तो कुछ भी नही ".
आम्ही त्यांना हेही सांगीतले की यातील थोडी खिचडी आम्ही आपल्याला ठेवतो ती तुम्ही रात्री खाउन घ्या. पण त्यास ही त्यांनी नकार देऊन ती सगळी खिचडी आम्हाला संपावयास सांगीतली.
आम्ही खूप आग्रह करूनही त्यांनी आमच्या आग्रहाला बळी न पडता मनाच्या संयमनाचा एक छान पाठ आम्हाला दिला .
मनात विचार आला असा मनाचा संयम आपण परिक्रमेत असून आपल्याला जमतं नाही व इथे असे अनेक साधु हे सयंम सहज पाळुन उपासना करत आहेत.
आजचा आमचे मुक्कामाचे स्थान होते लखाबाबा आश्रमातील राम मंदीरात. त्यामुळे भोजन प्रसादी झाल्यावर आम्ही तिथुन लगेच पुढे प्रस्थान करावयाचे ठरवले कारण नियमाप्रमाणे सुर्यास्ताच्या आधी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचणे गरजेचे होते . पुढे ते खरच किती योग्य होते ते बाहेर पडल्यावर लक्षात आले त्यामुळे त्या साधुंजीना आम्ही नमस्कार करून त्यांचे आर्शिवाद घेतले व 'नर्मदे हर 'म्हणून आमच्या पुढचा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा सहज माझ्या मनात आले की समजा आपण आधी इथेच मुक्काम करावयचे ठरवले असते व आता साधुंनी सांगीतलेला हा वरचा अनुभव ऐकल्यावरही आपण इथे मुक्कामास थांबलो असतो?
मन काहीच उत्तर देत नव्हते. नर्मदे हर
परशुराम तपस्थळी
नर्मदा परिक्रमा अनुभव ६०-
आम्ही परशुराम तास्थळीहून निघालो तेव्हा साधारण साडेतीन होउन गेले होते. आम्ही सगळे आता उदयनला थोडा फार लक्षात असलेल्या पुर्वी त्याने ज्या मार्गाने ही परिक्रमा केली होती त्या एका शॉर्टकटच्या रस्त्याने चालत होतो .थोडे अंतर आम्ही चालत गेलो व आम्हाला पुढे एक कंपांउड लागले, त्याच्या बाजूलाच एक छोटा बंद दरवाजा होता व त्या दरवाजातून पुढे जाण्यास एक मार्ग दिसत होता . कंपाऊडच्या त्या बाजूला कंपनीचे सुरक्षा कर्मचारी फिरत असताना दिसत होते.आम्ही त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की हा सगळा भाग आता रिलायन्स कंपनीच्या मालकीचा आहे व तुम्हाला या रस्त्याने काही लखाबाबा आश्रमाकडे जाता येणार नाही. आम्ही परिक्रमावासी आहोत म्हणून तरी आम्हाला इथुन जाऊ दयावे अशी त्यास आम्ही विनंती केली. त्यावर तो 'ठीक आहे मी वरच्या साहेबांना विचारून सांगतो ' असे सांगुन आत गेला. दहा मिनीटात परत तिथे आला व म्हणाला . 'मला आपल्याला इथुन सोडता येणार नाही . त्यासाठी आपल्याला कंपनीच्या या भागाला पूर्ण फेरी मारून मुख्य गेटमधुन सिक्युरीटीची परवांनगी काढून मग कंपनीच्या आतून जाणाऱ्या रस्त्यांनी पुढे जाता येईल. मी तुम्हाला इथुन जर जाऊ दिले तर माझी नोकरीही जाऊ शकते.
आता काही इलाज नव्हता कंपनीच्या त्या बाजूला पूर्ण फेरी मारून म्हणजे जवळजवळ एक तासानी आम्ही मुख्य गेटपाशी पोहचलो. तिथल्या ऑफीसरने आमची रीतसर चौकशी केली व मग कंपनीच्या आतून जाणाऱ्या रस्तानी आम्हाला जाऊ दिले. त्यामुळे जिथे अर्धा पाऊण तासात आम्ही लखाबाबा मंदीरापाशी पोहचणार होतो त्यास या रस्त्यामुळे आम्हाला दिड तासाचा अवधी लागला. हा सगळा रस्ता सिमेंट कॉक्रिटच्या जंगलाचा असल्याने जरा जास्तच कंटाळवाणा झाला.
आश्रमात पोहचल्यावर तिथल्या तरूण सेवेकऱ्यानी आमचे स्वागत केले .'आपण स्नान, पुजा व दर्शन घेउन या आल्यावर मी आपल्याला शीधा देतो असे सांगीतले त्यामुळे भोजन प्रसादी बनवण्याचे काम आता आमच्याकडे होते.आम्ही स्नान करून नित्यनेमाची पुजा ,आरती करून शिवमंदीर व लखाबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यास गेलो. आम्ही गेलो तेव्हा सांयकाळ झाली होती, इथे समाधी मंदीरात लाईटही नव्हते , बर मंदीरात शिरल्यावर समाधी मंदीर बरेच आत असल्याने थोडया संधीप्रकाशातच आम्ही समाधी मंदीराचे दर्शन घेतले व परत आलो. आजचा आमचा मुक्काम राममंदीर होता.
परत आश्रमात आल्यावर सगळ्यांनी खूप दिवसानी नळांचे भरपूर पाणी वं कपडे धुण्यास मुबलक जागा मिळाल्याने आपले कपडे छान साबु घालून खळबळुन धुतले. सकाळी खिचडी झाली होती त्यामुळे आता रोटीं सब्जी, चावल व डाल असा बेत होता. आज तिथल्या सेवकऱ्यालाही आम्ही आमच्या भोजनप्रसादीतच भोजन घेण्यास सांगीतले .पोळ्याचे कॉट्रक्ट नेहमीप्रमाणे उदयनेकडे होते. वांगी बटाटा मी चिरून दिला व मला त्यांचे आता नाव काय आहे ते आठवत नाही पण आमच्या बरोबर या पंचक्रोशी परिक्रमेसाठी असलेल्या दूसऱ्या परिक्रमावासीने आमटी ,भात, भाजी याची तयारी केली. तापर्यत मी नित्यनेमाचे हनुमान चालीसा, रामरक्षा, मारूती स्तोत्राचे पठण रामरायां समोर केले. आज भोजन प्रसादीत रोटी, सब्जी ,डाल व चावल असे बरेच दिवसानी असल्याने स्गळे जण खुश होते.
सकाळी समुद्रं प्रवासाला निघण्यासाठी म्हणून सगळे लवकर उठलो या कारणास्तव त्या दिवशीचे आमचे निद्राख्यान नेहमीपेक्षा लवकर लागले .
सकाळी तिथुन आम्ही प्रस्थान पुढच्या स्थाना कडे केले व ते स्थान होते भुतनाथ मंदीर.
आश्रमातून बाहेर पडल्यावर थोडया वेळानी थोडा गावासारखा भाग दिसू लागला त्यामुळे आम्ही तिथे एका ठिकाणी भूतनाथ मंदीराकडे जाण्याचा मार्ग कुठुन आहे असे विचारते. तेव्हा समोरच्या बाजूला एक सत्तीराच्या जवळपास असलेला माणूस आम्हाला न्याहळत आम्हाच्या जवळ आला व म्हणाला ' आपको को किधर जाना है? आम्ही ते स्थान सांगीतल्यावर म्हणाला ' चलो मै आपको वहाँ लेके जाता हूँ, पर उसके पहले आप थोडी चाय तो पी लो ' जवळच असलेल्या चहाच्या स्टालपाशी आम्ही चहा प्यायला थांबलो.त्याच्या एकूण पेहराव व कपडयांवरून त्याला आमच्या आठ नऊ जणांच्या चहाचा बुरदंड नको म्हणून आम्ही पैसे काढू लागल्यावरं म्हणाला ' बाबाजी चाय के लिये तो मैने बोला है तो पैसा भी मै ही दूँगा 'असे म्हणत त्यानी चहावाल्याला यांच्याकडून पैसे घेऊ नयेत असे सांगीतले.
चहा पिऊन आम्ही पुढे निघालो व थोडयाच वेळात जंगला सारख्या मार्गाला लागलो, सगळा कच्चा रस्ता, भरपूर झाडे, घनदाट जंगलाला सारखा भाग लागला. अर्धा पाउण तास चालल्यावर आम्ही भुतनाथ आश्रमापाशी पोहचलो. आज इथेच माझ्यासाठी एक विलक्षण गोष्ट घड़ली व माईची लीला अगाध आहे याचा प्रत्यय आला.
इथे येण्यापूर्वी उदयनकडून इथे खूप मोर आहेत असे कळले होते. मोर दिसत नव्हते पण त्याचे प्रत्यंतर रस्तात मधे मधे पडलेल्या मोरपीसांवरून येत होते. मी रस्त्यात पडलेली ती छोटी छोटी मोरपीस एखादया लहान मुलासारखी उचलून घेत चालत होतो. अशी सहा सात पिसे मला त्या रानातल्या रस्त्यातच मिळाली होती.आम्ही आश्रमात पोहचलो. खूप मोठा आवार असेलला हा आश्रम. भरपूर झाडे, निर्सगरम्य वाटतावरण ,डाव्या बाजूला वर शंकाराचे मंदीर. त्याच्या बाजूला ती बंद केलेली गुहा जिच्याबद्दल बऱ्याचं गुढ गोष्टी ऐकल्या होत्या . तिथुन थोडे खाली उजव्या बाजूला तो आश्रम त्याला लागुन पुढे पत्र्याची मोठी शेड. समोरच एक मोठे झाड व त्याखाली बसण्यासाठी केलेली सोय. आम्ही पोहचलो तेव्हा तिथले महंत आश्रमातच होते. हसतमुख चेहरा ,भगवी वस्त्र नेसलेले , दाढी , जटा वाढवलेले असे त्यांचे आनंदी मोकळे ढाकळे व्यक्तिमत्व. परिक्रमेत फारच तुरळक ठिकाण सोडली तर सगळ्या महंतांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असलेला दिसे, त्याला कारण होते की मी हे सर्व काही करतो यापेक्षा माईच सर्व करते हा विषेश भाव त्याच्यांत असे.
आम्ही सगळ्यानी मंदीरात जाउन शंभु महाराजांचे दर्शन घेतले .त्याच्या बाजूच्या गुहेबद्दल उदयननी थोडी माहीती दिली की आता तिथे कुणाला आत जाता येत नाही व ती गुहा आता बंद केलेली आहे.
आम्ही परत आश्रमापाशी आलो व तो आजुबाजुचा सगळा मोकळा परिसर बघुन मी सहजच उदयनला म्हंटले 'मी जरा एक चक्कर मारून येतो ' .मनात असेही आले होते की अजून कुठे थोडी मोरपीस पडलेली मिळाली तर बघू म्हणून मी तिकडे जायला निघणार तेव्हाड्यात ते महंत बाहेर आले व माझ्या हातातील ती सहा सात मोरपिसे बघून म्हणाले " ये मोरपंखडीया क्यु ये जमा कर रहे हैे? ' उदयन त्यांना म्हणाला ' ये तो , रामजनम के उत्सव मे कुछ डेकोरेशन के काम मे आयेंगे कर के वो जमा कर रहा है' गोष्ट अशी झाली होती की परिक्रमेला जाण्याआधी घरी झालेल्या एक दिवसाच्या अखंड रामनामाच्या आधी मी डोंबिवलीला दूकानातून काही मोरपीसे विकत आणली होती, मनात होते की याचा उपयोग आपण या वर्षी रामनामाच्या वेळी सजावटीत करू पण तेव्हा काय झाले ते आठवत नाही पण त्याचा उपयोग काही सजावटीत झाला नाही व ती मोरपीस तशीच कपाटात राहीली. थोडे दिवसानी उदयन माझ्या घरी आला होता व आम्ही दोघे देवघरात असताना मी त्याला त्या मोरपीसांविषयी सांगीतले व या वर्षी रामनवमी उत्सवात तरी आपण त्या मोरपीसांचा उपयोग सजावटीत नक्की करू असेही त्यास तेव्हा मी म्हंटले कारण उदयनला सजावट करण्याचे चांगले अंग आहे.
इथे महंतांनी उदयनचे ते वाक्य ऐकले व मला म्हणाले 'रूक जाओ बाबाजी ' ते चटकन आत गेले व बाहेर येताना एक मोठा लहान मोठया मोरपीसांचा एक गठ्ठा घेउन बाहेर आले वं तो माझ्या समोर ठेवत म्हणाले ' ये ले लो आपको ' आधीच माझ्या मनात तो सजावटीचा विचार होता व एवढी सगळी सुंदर लहान मोठी मोरपीस बघुन तर मी अतिशय खूष झालो.
तरी माझ्या डोक्यात आले की ते म्हणत आहेत म्हणून आधाशासारखी सर्व मोरपीस न घेता त्यातून थोडी मोरपिस आपण घ्यावीत म्हणून मी त्यातून थोडी लहान , मोठी निवडून घेऊ लागलो. दोन मिनिटं त्यांनी माझे हे सगळे बघीतले व म्हणाले' ये क्या कर रहे हो आप, ये सारी की सारी तो आपके के लिये रखी है'. ते जरी असे म्हणाले तरीही ती सगळी मोरपीस घेणे मला योग्य वाटेना मी म्हंटले 'नही महाराजजी मै थोडीसी लेता हूँ ' हे वाक्यं ऐकल्यावर ते म्हणाले ' वो मुझे कुछ मालूम नही , मैने तो आपको देने के लिये ही ये सारी की सारी निकालके रखी है ' अवघडून मी उदयनकडे बघीतले . त्यानी पण मला डोळ्यांनी 'घे 'म्हणून खुणावल्यावर मी ती सगळी मोरपीस हलकेच उचलून माझ्या जवळ घेतली व मनात एकच विचार आला काय सुंदर दिसतील ना रामराय या मोरपीसांत.? खरच त्या क्षणी इतका आनंद झाला की असे वाटले की ती सर्व मोरपीसही माझ्याकडे बघून आनंदाने हसुन विचारत आहेत की ' काय नेतोस ना आम्हालाही रामरायांकडे ? '. डोंबिवलीत रामरायांसमोर व्यक्त केलेली मनापासूनची साधी इच्छां पण ती माई इथे त्यां महंताकडून पूर्ण करून मला म्हणत होती ' म्हणत होतास ना रामनवमी उत्सवात मोरपीसांची सजावट करावयाची आहे म्हणून , बघ तुझी ती ही सोय झाली आहे ' आज हे सर्व लिहतानाही तो प्रसंग आठवून आनंदाने डोळे पाणावले. परिक्रमा पूर्ण झाली रामनवीचा उत्सव जवळ आला तेव्हाच माझ्या बँकेतील स्टाफ मी.अल्पे आपल्या पत्नीसह मला परिक्रमेची माहीती व परिक्रमा कशी झाली हे सगळे विचारण्यास माझ्या घरी आले. बोलण्याच्या ओघात हा सहज मोरपीसांचा विषय निघला व वरील अनुभव मी त्यांना कथन केला ते ऐकून ते मला म्हणाले की माझ्याकडेही पुष्कळ मोरपीस आहेत मी तीही तुला आणून देतो तु छान डेकोरेशन कर. आजच्या लेखाच्या खाली आम्ही केलेली सजावट आपल्याला दिसेलच पण तरीही माझ्या मनात एक शंका होती की आपल्याला माईने दिलेल्या मोरपीसांनी ही पूर्ण सजावट होईल का ? का अजून मोरपीस लागतील. पण या शंकेचे समधानही तिनेच केले.तीनेच त्यांना रामनवमीच्या उत्सवा आधी घरी बोलवून घेतले व मी काहीहीं न म्हणताही त्यांच्याकडून स्वतःहूनं वरील वाक्य म्हणवून घेतली.
आज हे लिहत असताना परत जाणवले की काय प्रेम आहे त्या आईचे या लेकरांवर !मी रामरायांसाठी व्यक्त केलेली एक साधी इच्छा पण तीने आईच्या वात्सल्याने ती साधी इच्छाही पूर्ण केली होती. आज हे लिहीतांना अशा कितीतरी माईच्या प्रेमाच्या,ओलाव्याच्या आठवणी आठवून मी कितीतरी वेळ निशब्द झालो त्यामुळे पुढे काहीं न लिहता आज इथेच थांबतो.नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ६१-
भूतनाथ मंदीराच्या आवारात आम्ही जवळ जवळ तासभर होतो. तिथल्या महंतांशी गप्पा झाल्या,त्यांच्याबरोबर सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले.त्यांनी तर तिथे गेल्या गेल्याच आम्हाला आपण आज इथे मुक्कामास थांबणार आहात का? असे विचारलेही होते. कारण त्यांनाही आज कुठल्या कामासाठी बाहेर जायचे होते त्यामुळे आम्ही तिथे थांबणार आहोत असे सांगीतले असते तर त्यांनाही काही पर्यायी व्यवस्था करणे भाग होते. पण आमचाही आज सुवा गावापर्यंत पोहचण्याचा विचार असल्याने आम्ही त्याना आम्ही थोडया वेळात पुढे निघणार आहोत असे सांगीतले . तिथे प्रसादी म्हणून आमचा थोडा चहा झाला व त्या सुंदर मोरपीसांना घेऊन आम्ही तिथुन पुढे प्रस्थान केले. आता पुढचे स्थान होते मखलेश्वर .सकाळी भेटलेल्या बाबानी आम्हाला तिथेही मीच तुम्हाला घेऊन जाणार असे सांगीतले. त्या स्थानाला जाताना परिक्रमातील मार्गात थोडा मीठागराचा भाग येतो त्यामुळे मीठागरात असलेल्या छोटया बांधवरून चालताना आम्हा सगळ्यांची बरीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी बांध एकमेकांना जोडले नसल्याने पाण्यात उतरून खोलीचा अंदाज घेत आम्ही पुढच्या बांधापर्यंत गेलो. असे करत करत आम्ही बारा वाजेपर्यंत मखलेश्वरला पोहचलो. ईथे छोटसे शिवमंदीर असून ,बाजूला एक छोटीशी पण सुंदर बाग आहे .यात निरनिराळ्या प्रकारचे व रंगाचे झेंडू , इतरही शोभेची फुलझाडे लावलेली होती. झेंडू लावतानाही इतका व्यवस्थितपणे लावला होता की एका वाफ्यात शेंदरी तर त्याच रंगाचे झेडू, दूसऱ्यात पिवळा, काही गोलाकार वाफे लाल झेंडूचे,डेलियाचे निरनिराळे प्रकार, अतिशय सुंदर रितीनी सजवलेली अशी ती बाग होती. मंदीरातून दर्शन घेऊन आम्ही बागेत एका छोट्या मांडवाखाली सगळे जमलो. तो मांडवही पानांनी अतिशय सुंदर सजवला होता.
इथे भोजन प्रसादी घेऊन आम्ही पुढे जायचे असे ठरल्याने आम्ही थोडा वेळ त्या मांडवातच गप्पा मारत थांबलो. खाली असलेल्या मऊ हिरव्यागार हिरवळीचा स्पर्श खूप छान वाटत होता.
इथे ते सकाळी भेटलेले बाबाजी तिथे जवळपास असलेल्या निलकंठेश्वर मंदीराकडे आपण जाऊ असा सारखा आग्रह करत होते पण तिथे जाऊन मग सुवा गावापर्यंत आम्ही चालत जाण्याने आम्हाला आश्रमात पोहचावयास नक्की उशीर होणार होता त्यामुळे तो बेत रद्द करून आम्ही इथुन सरळ सुवा गावाकडे जाण्याचे ठरविले.
भोजन प्रसादी झाली,इथे आज जेवणात खिचडीचा बेत होता.
निघण्याची जशी वेळ आली तशी ते बाबाजी आम्ही त्यांना इथे सोडून पुढे परिक्रमा मार्गावर जाणार म्हणून खूप भाऊक झाले आणी म्हणूनच ते मगाशी आम्हाला निलकंठेश्वर मंदीराकडे आपण चलावे असा आग्रह करत होते व ही गोष्ट आता आम्हाला त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत होती.त्यांना अजूनही आमच्या सहवासात रहावयाचे होते पण आम्ही त्यांना तिकडे येण्यास नकार दिल्याने त्याचा आता नाईलाज झाला होता . उदयनचा हात जेव्हा त्यानी आपल्या हातात घेतला तेव्हा तर त्यांच्या डोळ्यात पाणीच आले. उदयने प्रेमाने विच्यारले ' क्या बात है बाबाजी? क्यां ,कुछ तकलिफ है ' त्यावर ते म्हणाले ' बेटा, मेरा अभी इस दुनियाने मे काई नही, मेरे सामने मेरा बेटा गया, पोती गयी, सब चले गये ,तो अब मेरे को क्यो रखा है यहाँ माईने, आप ऊसाको पुछो ,कुछ बोलो ऊसको ' त्याच्या त्या शब्दानी दोन मिनीटात तिथले सगळे वातावरण बदलून गेले. त्यांचे ते दुःखं बघुन आम्ही सगळे निशब्दच झालो. उदयनी तेव्हा त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्या क्षणी त्यांना हवा असलेला प्रेमाचा,मायेचा आधार त्यांना दिला. काही वेळा शब्दांपेक्षा हा स्पर्शातील विश्वासच मला असे वाटते खूप काही सांगुन जातो. पाच मिनीटात त्यानी स्वतःला सावरले.खर सांगायचे तर हा विश्वास किंवा आधार याशिवाय आपण त्यांना त्यावेळी काय देऊ शकत असतो?विधीलिखीत तर बदलणे आपल्या हातात नाही. एक माईचा परिक्रमावासी म्हणून त्यांना आमच्या बद्दल वाटत असलेल्या विश्वासाची परतफेड माईच देत असलेल्या प्रेमानेच तर आम्ही भरून काढू शकत होतो. काही वेळला ते फक्त शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा अशी आश्वासक कृतीच त्या माणसाला खूप आधार देउन जाते.
थोडया वेळात आम्ही सगळे तिथुन निघालो निघताना त्या बाबाजींना आम्ही नमस्कार केला व आमच्याकडील काही पैसे त्याच्या हातात ठेवले.ते बघून ते आधी 'नाही नाही ' म्हणाले पण जेव्हा आम्ही त्यांना हा माईचाच प्रसाद आहे असे समजा असे म्हंटल्यावर मात्र त्यानी ते ठेउन घेतले. आम्हालाही त्यामुळे आनंद झाला कारण पदरी एवढे दुःख व त्यांची स्वतःची परिस्थीती बेताची असुनही ती कुरावळत न बसता दिवसभर मार्ग दाखवायाच्या निमीत्ताने ते बाबाजी आनंदाने माईच्या विचारात ,तिच्याच सेवेत राहीले होते. अशा या त्यांच्या मनापासूनच्या सेवेला पुढे येणाऱ्या परिक्रमावासीसाठी आमच्याकडून फुल नाही पण फुलाच्या पाकळीची मदत जरी झाली तरी ती आम्ही नक्की करू शकत होतो.हे इतके काही आम्ही करू शकतोय किंवा त्यापेक्षा मी म्हणेन माई आमच्याकडून करून घेत आहे यापेक्षा दूसरा आनंद काय आहे हो या जीवनात?हीच तर खरी शिदोरी आहे आयुष्याची !
ही प्रेमाची, वात्सल्याची शिकवणी तीच तर देत असते तिच्या तिथल्या लेकरांना व माझ्यासारख्या नवीन येणाऱ्या मुलांना.तीच जीवनातले निरनिराळे पैलू दाखवून परिक्रमेत माझ्यासारख्या दगडालाही पैलू पाडण्याचा प्रयत्न करते .
तीच सुचवते, तीच तीच्या सर्व लीला दाखवते आपण फक्त त्या परिक्रमारूपी क्लासमधे बसुन ती जे दाखवते किंवा शिकवते ते आत्मासात करण्याचा प्रयत्न करावयाचा असतो कारण तेवढेच फक्त आपल्या हातात असते. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ६२-
मखलेश्वरहून आम्ही निघालो आता पोहचायचे होते सुवा गावापर्यंत. या ठिकाणी परिक्रमावासीयांची मुक्कामाची सोयं एका साधुची समाधी व शंकराचे मंदीर असलेल्या आश्रमात होत असे.
सुवा गावापर्यंत जाण्यासाठी खर तर एक दूसरा नाकासमोर जाणरा रस्ता होता पण त्या दिवशी मात्र आम्ही तो रस्ता चुकलो व आतल्या कुठल्यातरी एका रस्त्यानी आम्ही पुढचा मार्ग चालत होतो . त्या दिवशी आम्ही अशा रस्त्यानी चालत होतो की जिथे वेगवेगळ्या कंपनीतील कामगारांची रहावयाची सोय कंपनीतर्फ या इमारतीं मधे होत असावी ,थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनीच्या कॉर्टर. पण त्या सगळ्या इमारातींच्या आजुबाजूचा परिसर ईतका घाणेरडा व गलिच्छ होता की काही विचारायची सोय नव्हती. सगळीकडे घाण, प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढीग, प्लास्टिकच्या बाटल्या इततस्त पडलेल्या, जुने घाणेरडे कपडे की जे बघुनच किळस येत होती.कितेक महिन्यात तिथे साफसफाईचे काम झाले नसावे, ते कामगारही तिथे कसे राहात होते याचे मला आश्चर्य वाटले. जवळजवळ पाऊण तास तरी आम्ही तिथुन जाताना नाकावर रूमाल बाधुन चालत होतो कारण तिथल्या अस्वच्छतेमुळे आम्ही सगळेच पार हैराण होऊन गेलो होतो .तिथुन बाहेर पडून परत आम्ही मुख्य रस्त्याला आलो.थोडयावेळाने आम्ही सुवा गावात जिथे परिक्रमावासीयांची सोय होते त्या आश्रमात पोहचलो. आज तिथे खूप परिक्रमावासी मुक्कामास होते. पत्र्याच्या एका मोठया शेड मधे मुक्कामाची सोय होती. इथे काही महाराष्ट्रातील नवे परिक्रमावासी भेटले. त्यातील एक होते नागपूरचे श्री देशमुख काका, माझ्या बाजूलाच त्यांचे आसन व महाराष्ट्रामधले त्यामुळे थोडयाच वेळात आमची त्यांच्याशी छान मैत्री झाली.तेजस्वी चेहरा, शिडशिडीत अंगाकाठी , सत्तांरीच्या आसपास असलेले हे काका मोठे भावीक होते. गप्पामधे सहज विषय येऊन मी माझ्या घरच्या रामरायांचा फोटो त्यांना दाखवला, काका रामरायांना बघून एकदम खुश झाले , माझा मोबाईल मधला फोटो आपल्या कपाळाला लावून म्हणाले खूप भाग्यवान आहात आपण. रात्री झोपा झोप झाली. पहाटे मी जेव्हा उठलो तेव्हा काका माझ्या आधीच उठून , स्नान संध्या करून बसले होते. माझे पहिले आटोपल्यावर माझ्यापाशी आले व म्हणाले, मराठे, मला परत एकदा रामरायांचा फोटो बघावयाचा आहे,दाखवाल मला?. अहो पहाटे उठल्यापासून मला चैन पडत नाही आहे, सारखी त्यांची आठवण येत आहे,कधी एकादा परत त्यांना बघतोय असे झाले आहे, हे मला सांगतांना ते इतके भाउक झाले होते की मी त्यांना म्हंटले, 'अहो काका दाखवतो ना, त्यात काय एवढे 'असे म्हणून मी त्यांना रामरायांचा फोटो दाखवला, फोटो बघतानाही त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलवल्या, म्हणाले काय सुंदर रूप आहे हो, डोळे भरून पाहून घेतो ' खरच ,काय हा सगुणामधील आनंद आहे ना हा?ह्या प्रेमातील गंम्मत आता मी परत काकांवरून अनुभवत होतो कारण खर तर काल मी एकदा त्यांना फोटो दाखवलेला होता, पण काका खरे सत्वगुणी असल्याने त्यांना ही अशी ओढ लागली. अशी एकदा का ओढ लागली की त्या परमेश्वरालाही आपल्या भक्ताशिवाय करमत नाही. खर तर हा किती छोटा प्रसंग पण माई त्यातून मला किती छान बोध करून दाखवत होती की असा जीव एकदा परमेश्वरासाठी तळमळला की मग त्याने कळवळून मारलेली हाक परमेश्वराजवळ नक्की पोहचते ,कारण तोही या भावाचाच तर भुकेलेला असतो, त्याला तरी आपल्या भक्तांशिवाय कुठे करमत असते.
असे हे कडोनिकडीचे प्रेम आम्हासही लागो हीच माझी माईचरणी पार्थना, कारण हे सगळे धडेही आम्हास तुच देत आहेस, त्यामुळे त्या परिक्षेत पास करणे हेही केवळ तुझ्याच हाती आहे.
दूसऱ्या दिवशी सकाळी सहाला आम्ही पुढे प्रस्थान केले तेव्हा बाहेर काळोख होता.सगळीकडे रस्ताचे काम चालू असल्याने खडी पडलेली होती. तेव्हा परत एक श्वान आमच्या बरोबर चालू लागला. मागे आलेल्या अनुभवामुळे माझे लक्ष परत परत त्याच्याकडे जाऊनं आता हा परत आपल्या बरोबर येतो की काय ?असा मनात विचार चालू झाला.जवळ जवळ अर्धा तास तो आमच्या बरोबर चालत आला व नंतर मात्र एका वळणावर कुठेतरी दिसेनासा झाला . कदाचीत त्या श्वानांनाही आता रोज येत असणाऱ्या इतक्या परिक्रमावासीयांची सवय झाल्याने ते कदाचीत रोजचं असे माईचे हे पाव्हणे म्हणून गावाच्या बाहेर पर्यंत सोडावयास येत असावेत.
सुवा गावातून निघताना परत आता आम्ही तिघेच जण पुढे मार्ग चालू लागलो.आजचां सगळा मार्ग परत डांबारी रस्त्याने होता. शेवटी भारभुतला वळण्याआधी हायवेला असलेल्या नेवडा या गावी आम्ही एका देवीच्या मंदीरात साडेबारापर्यंत पोहचलो. आम्ही पोहचायच्या आधी तिथे काही परिक्रमावासी आलेले होते आम्ही तिथे पोहचल्यानंतर मागाहूनही काही परिक्रमा वासी तिथे पोहचले. आमची इथे परत देशमुख काकांशी भेट झाली.
खाली उतरून आम्हीं देवीचे दर्शन घेतले पण आज तिथे जास्त वेळ न थांबता लगेच वर आलो कारण तिथे भोजन प्रसादी बनवण्यासाठी पुरसे मनुष्यबळ नसल्याने टिक्कर बनावयची सेवा आमच्याकडे आली होती.एक मध्य प्रदेशातील परिक्रमावासी व उदयन यानी ते पोलपाट व थाळीच्या उलटया बाजूला थापले व नंतर चुलीवरच्या तव्यावर थोडेसे भाजून खालच्या निखाऱ्यात कसे शेकायचे हे प्रात्यक्षिक त्या एमपीतील परिक्रमावासीयानी मला दिले. तिकडे भोजन प्रसादी घेऊन तिथुन आत असलेल्या भारभुतकडे आम्ही वळलो. भारभूत कडे जाण्यासाठी अंदाजाने दहा बारा किलोमीटर अंतर आत जावे लागते हा सगळा रस्ता शेताशेतामधुन आहे. पण ते स्थान अतिशय शांत व मनाला आनंद देणारे आहे असे कळल्यामुळे आम्ही तिकड़े जाण्याचे ठरवले.परिक्रमेत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जिथे मुक्कामाला परिक्रमावासीयांची गर्दी कमी तिथे आपल्याला उपासनेचा आनंद जास्तीस जास्त मिळतो कारण तिथे गडबड, गोधळ हे सगळे कमी,त्यामुळे त्या स्थानांचा खराखुरा आनंद आपणास नक्कीच तिथे अनुभवास येऊ शकतो.
आम्ही संध्याकाळी पाचपर्यंत रंगावदूत स्वामीच्या आश्रमात पोहचलो. तिथे सुंदर असे श्री दत्त मंदीर व श्रीरंगावधूत स्वामीचे मंदीर अशी दोन मंदीर आहेत. अतिशय शांत, स्वच्छ व नीटनीटका असा आश्रम.त्या दिवशी आम्ही तिथे तिघेच परिक्रमावासी होतो. अतिशय सुंदर व शांत अशा तिथल्या वातावरणाने मन प्रसन्न झाले. आश्रमाच्या मागच्या बाजूला लाबंवर जाणारा माईचा संथपणे वाहणारा प्रवाह मनाला खूप आनंद देउन जातो. तिथे माईला शांतपणे बघत बसण्यासाठी आश्रमानी छानं क्राँक्रिटचे बेंचही घातलेले आहेत. आम्ही सध्याकाळची नेहमीची उपासना करून तिथे माईकडे शांतपणे बघता येईल म्हणून थोडा वेळ बसलो पण तो आनंद खूप वेळ काही उपभोगता आला नाही कारण तिथे इतके डास चावत होते की थोडयावेळाने नाईलाजास्तवं आम्ही परत आमच्या खोलीत आलो. सात वाजता आश्रमातील दोन्हीं मंदीरातील आरती झाली व पोटपुजा करून आम्ही निद्रस्त झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथुन निघून भारभुतेश्वर, महाकालेश्वर, सर्वणबिंदेश्वर,डीमडीमेश्वर या सर्व तिर्थस्थानाचे दर्शन घेतले. आज संकष्टीं चतुर्थी असल्याने पोटाला आराम होता त्यामुळे दूपारीच आम्ही बरूच शहरात पोहचलो. दत्तजयती जवळ आली होती व त्या दिवशी आमच्या देवीचाही वाढदिवस असतो. या वर्षी तिकडे जाण्यास जमेल असे नाही म्हणून सौं.नी मला एक ड्रेस मटेरीयल विकत घेऊन ते त्या दिवशी गावातल्या एखादया होतकरू गरीब मुलीला वस्त्र म्हणून अर्पण करा असे फोनवर सांगीतले होते.पुढे इतके मोठे शहर लागेल याची शाश्वती नसल्याने तिथल्या बाजारात आम्ही ते विकत घेतले व सोडचार पर्यंत आम्ही बरूचला गायत्री मंदीरात मुक्कामास पोहचलो. इथे बरेच परिक्रमावासी निलकंठेश्वर आश्रमात जातात त्यामुळे तिथे परिक्रमावासीयांची खूप गर्दी होते म्हणून उदयनच्या आधीच्या अनुभवावरून आम्ही हे ठिकाण मुक्कामासाठी ठरवले होते. या ठिकाणी आम्हाला भेटावयास गाडी घेऊन येणार होते आलीबागचा सचिन,व त्याचा भाचा व दुबईचा गुरूबंधु अवदूत दादा व त्याच्या सौ. वैशालीताई.आमच्या आधीच ते आश्रमात पोहचले होते.
तिथे आमची सोय आधी कॉमन हॉलमधे झाली होती.
संध्याकाळी आम्ही तिथल्या मुख्य साध्वी महंत यांचे दर्शन व्हावे व त्यांच्याशी थोडीं बातचीत व्हावी या उद्देशाने आश्रमातील त्याच्या स्थानापाशी गेलो. अतिशय शांत व तजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या त्या माताजी तिथल्या मुख्य महंत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर उपासनेचे एक वेगळेच तेज होते. बोलण्यात व चेहऱ्यात एक मार्दव.सगळ्यांची त्यांनी आस्थेने चवकशी करून आमच्याशी थोडा वेळ त्यानी परिक्रमेबाबत चर्चा केली. तेव्हा आम्ही त्यांना अशी विनंती केली की आम्हाला वेगळी एक किंवा दोन खोल्याची सोय मुक्कामासाठी झाली तर उत्तम हाईल कारण या आलेल्या गुरुबंधुंना रात्री आमच्याशी परिक्रमेबाबत बोलावयाचे आहे त्यामुळे त्यांनाही बराच वेळ बोलता येईल व इतर परिक्रमावासीयांनाही आमच्यामुळे त्रास होणार नाही.तीही विनंती त्यांनी हसत हसत मान्य करून सेवकऱ्यांना सांगुन आम्हाला खोलीच्या चाव्या दिल्या.थोड्याच वेळात भोजन प्रसादी ही आपण करून घ्यावी असेही आम्हास सांगीतले. आमचा उपवास होता तरी आम्ही नको म्हणत असतानाही आम्हाला काही फराळाचे करावयाच्या सुचना तिथल्या सेवकऱ्यास दिल्या. त्यांच्या या सगळ्या वागण्यात इतका सहजपणा व आपलेपणा होता की दासबोधात लिहलेल्या महंतांच्या लक्षणांची सहज आठवण होत गेली. पण त्याचबरोबर चेहऱ्यावर असलेल्या विलक्षण तेजामुळे समोरच्या व्यक्तिच्या मनात एक आदरयुक्त दरारा वाटावा असे हे व्यक्तिमत्व मला वाटले. त्यामुळे तिथला मुक्काम व उद्याचे शुक्ल तिर्थ व मांगलोर येथे झालेली श्रीमती मंगलाबेन यांची भेट उद्याच्या भागात तापर्यंत नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा भाग ६३-
साध्वी महांताशी बोलून झाल्यावर आम्ही आसने आम्हाला दिलेल्या खोलीत लावली व नंतर आश्रमात सायंस्नान केले कारण इथे माईच्या प्रवाहात समुद्राचे पाणी आल्याने कुणी स्नानास माईवर जात नाहीत.नंतर खाली असलेल्या गायत्री मंदीरात दर्शनाला गेलो .इथे पंचंमुखी गायत्री देवीचे स्वरूप आपल्याला पहावयास मिळते. गायत्री देवीचे दर्शन घेऊन तिथेच बाजूला असलेल्या अजून दोन मंदीरात आम्ही दर्शन घेण्यास गेलो. एका मंदीरात आपल्याला दर्शन होते ते महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती देवींचे व दुसऱ्या मंदीरात आहेत श्री गुरुदेव दत्त महाराज. या सगळ्यांचे दर्शन घेऊन बाहेर आलों तेव्हा आम्हाला कळले की इथे रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा माईचे पुजन प्रत्यक्ष तिच्या आश्रमाच्या मागे असलेल्या पात्रामधे करतात. आज प्रत्यक्ष माईचे पुजन करण्याचा योग आम्हाला या आश्रमामुळे आला होता. रोज आम्ही आमच्या कूपीतील माईच्या जलाचे पुजन करत होतो पण ह्यां आश्रमाच्या मागेच माईचे पात्र असल्याने रोज आश्रमातर्फे माईचे पुजन,नैवद्य व आरती सकाळ व सध्याकाळ तिच्या पात्रापाशीच जाउन करतात . त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या त्यांच्या सेवेकऱ्याबरोबर झांजा वाजवत पायऱ्यांवरून खाली उतरून माईपाशी आलो. गुरूजींनी माईची मंत्र,पुष्प दिप लावून पुजा केली, नंतर तिला भोग चढवला व त्यांनतर नर्मदा माईच्या आरतीला सुरवात झाली
ॐ जय जगदानंदी ,मैय्या जय आनंदकंदी ब्रम्हा हरी हर शंकर , रेवा शिव हरी शंकर रूद्री पालन्ती ॥धृ॥
आम्ही सगळेही तीचे आनंदाने गुणगान गाऊ लागलो.
आरती झाली व आम्ही परत आमच्या खोलीत आलो. त्यानंतर प्रथम बाकी सगळ्या मंडळींची भोजन प्रसादी झाली व मग आमची उपवासाची स्पेशल पंगत बसली. खूप चविष्ट अशी बाटाटयाची भाजी, ताक व केळ असा छान बेत होता. दिवसभरच्या चालण्याने आमचाही जठराग्नी पेटला होता त्यामुळे त्या रुचकर अन्नाने तो शांत झाला.
मग रात्री उशीरापर्यंत आमची परिक्रमेच्या गप्पांची मस्त मैफिल रंगली. त्याना आमचे सगळे हे प्रवासवर्णन व अनुभव ऐकून खूप आश्चर्य व आंनद झालेला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होता. माझ्यापेक्षाही उदयनशी असलेल्या त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्याना खूप दिवसांनी तो भेटला,याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून नकळत बाहेर डोकावत होता. त्या गप्पांच्या ओघात वैशालींताईंनी मला एक वेगळा प्रश्न विचारलेला मला आठवत आहे. ती म्हणाली "सुनील,कसे वाटत आहे तुला आता़ परिक्रमेत?, कसे काय जमतंय रे तुला एवढे चालायला काही त्रास ?'मी तिला प्रथम म्हंटले की 'आई आहेत आपल्या, त्या घेतात सगळे करून. ' पण हे वाक्य जर तेव्हा मी खरच मनापासून बोललो असतो तर तेवढेच बोलून गप्प बसलो असतो. पण माझ्यातला मी, तो अहं आहे ना ,तो कुठला गप्प बसायला , तो लगेच पुढे आला व मी म्हटले ' आधीपासून तशी मला पंचवीस एक वर्ष जॉगींगची सवय आहे त्यामुळे इतके जाणवत नसेल ' ही घटना मी आता मुद्दामून इथे लिहीत आहे कारण या बाबतीत पुढे काय झाले ते माझ्या पुढे येणाऱ्या अनुभवातून आपल्याला सांगीनच.
झाले, तो विषय तेव्हा तिथेच संपला .रात्री उशीरापर्यंत परिक्रमेतील इतर गमतीजमती खूप साऱ्या रंगल्या.
सकाळी माईची पुजा आरती करून आम्ही खाली तिन्ही मंदीरात जाउन परत तिथे दर्शन घेतले व थोडा वेळ तिथेच बसून शांतपणे जप केला. आता परिक्रमा मार्गावर आम्हा तिघांना चालत जायचे असल्याने आम्ही तो आश्रम लवकर सोडला तर गुरूबंधू नंतर निघून गाडीने शुक्लतीर्थापर्यंत पोहचले. आजही आमचा प्रवास डांबरी रस्त्याचाच होता फक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी गार झाडी असल्याने चालावयास एक वेगळाच उत्साह आला होता. परिक्रमेत असतांना बरेच वेळा आमचे सकाळच्या वेळात बरेच अंतर चालणे होई , कारण दूपारी एकदा का उन्ह चढली की सहाजिकच चालण्यास तेवढा वेग येत नसे. ते सगळे दिवस छोटे असल्याने संध्याकाळ पण लवकर हाई त्यामुळे सकाळच्या वेळातच आमचे जास्तीसजास्त अंतर चालणे होत असे.
एकादा डांबरी रस्ता सुरू झाला की आमचे चालणे तसेही सुपरफास्ट गतीने होत असे. सकाळी नऊ वाजता एका आश्रमातून चहाची हरीहर झाली त्यामुळे तिथे चहा व कुरमुरे चिवडा असा बालभोग घेुउन आम्ही पुढे शुक्ल तीर्थाला पोहचलो.
या तिर्थाला पाच वर्षापुर्वी आम्ही एकदा नर्मदा जयंतीच्या वेळी आलो होतो. इथुनच पुढे आहे कबीरवड. इथे असलेल्या विशाल अशा वडाखाली संत कबीरांनी बरीच वर्षे तपर्चया केली त्यामुळे या स्थानाला कबीरवड असे नाव पडले आहे. फार पुर्वी तिथे हे एक वडाचे झाड होते व ते वाढत जाउन आता या एका वटवृक्षाची शेकडो वटवृक्ष आपणास पहावयास मिळतात. ही झाडे इथे एकमेकांना इतकीं जोडली गेली आहेत की कडक उन्हातही सुर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहचत नाही. इथे संत कबीरांचे एक मंदीर आहे. या ठिकाणी आपल्याला परिक्रमेत असल्यामुळे जाता येत नाही कारण त्यासाठी मैय्याला होडीत बसून पार करावे लागते. आज होडी बंद असल्याने आमच्या गुरू बंधूनाही या स्थानाचे दर्शन झाले नाही.
शुक्ल तिर्थावर आपल्या बऱ्याच देव देवतांची मंदीरे आहेत प्रामुख्याने श्रीमहादेव मंदीर, श्रीविष्णू मंदीर, यांचा समावेश होतो. शुक्लतिर्थ हे सर्व पापातून मुक्त करणारे पावित्र स्थान मानले जाते.आम्ही तिघांनी या देवतांचे दर्शन घेतले. इथे मात्र आमच्या गुरुबंधूशी आमची भेट झाली नाही त्यामुळे त्यांच्याशी फोनवरून संर्पक केला व अकरा वाजेपर्यंत त्यापुढे असलेल्या राममंदीरापाशी आम्ही त्यांना भेटलो. हे मंदीर व आजुबाजूचा परीसरही खूप शांत व सुंदर आहे. रामरायांचे दर्शन घेऊन इथे सगळ्यांनी मिळून रामरायांचे थोडे गुणगान केले. संत तुलसीदासांचे पद
श्रीरामचंद्र कृपाळू भज मन हरण भव दारूणं
नव कंज लोचन कंज पद कर कंज पद कंजारूणं ॥ श्रीरामचंद्र
हे आम्ही सर्वानी मिळून त्याच्यासमोर गायले. रामरायांसमोर भजन झाले त्यामुळे सहाजीकच नंतर प्रसादी आलीच त्यामुळे आमचे एक प्रेमाचे सहभोजन तिथे झाले. परिक्रमा सुरू हाऊन आता जवळ जवळ एक महिना व्हायला आला होता त्यामुळे आमच्या गुरूबधुंनी आमच्यासाठी प्रेमाने खूप सारी मिठाई इथे खाण्यास आणली होती.त्यांनी ते सर्व आग्रहाने राममंदीराच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेत बसून आम्हाला खायला लावली. ते खाणे इतके पोटभर झाले की आता परत दूपारी भोजन प्रसादी करण्याची आमची इच्छा राहीली नाही.
आता इथुन पुढे आमचा परिक्रमा मार्ग जाणार होता मांगरोळच्या श्रीमती मंगलाबेन व ज्योतीबेन यांच्या आश्रमात.
एक अर्धा तासात आम्ही सगळे मांगरोळला त्या आश्रमात पोहचलो. आम्ही गेलो तेव्हा आश्रम परिक्रमावासींनी भरलेला होता.मंगलाबेन यांची आम्हाला भेट झाली, त्यांनी त्याच्या घरालाच आश्रमात बदलून टाकले आहे. आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी आमचे खूप प्रेमाने स्वागत केले. आम्ही कुठून आलो, कधी परिक्रमा सुरू केली अशी सगळी चवकशी केली.आता दूपारची वेळ झाली आहे त्यामुळे इथेच भोजन प्रसादी घेऊन पुढे जा असेही सांगीतले.इथे संगळ्यांना सदाव्रत दिले जाते व ते घेऊन आपण आपली भोजन प्रसादी तयार करावयाची असते.आमचे पोटभर खाणे झालेले असल्यामुळे आम्हाला भोजन प्रसादी घ्यायची नव्हती त्यामुळे त्यांना आम्ही तसे सांगितल्यावर त्यां म्हणाल्या ' ऐसे कैसे खाना खाये बिगरही आप यहाँसे जायेंगे '. आम्ही मुंबईचे ,त्यामुळे आम्हाला कदाचीत स्वयंपांक करावयाचा कंटाळा आला असेल, म्हणून आम्ही नाही नाही म्हणत आहोत असे वाटून त्या दिवशी दूसरे कुणी परिक्रमावासी तिथे जिलभीची प्रसादी बनवणार होते त्यामुळे त्याच्या भोजन प्रसांदीत मी त्यांना तुमचेही बनवायला सांगते असेही त्यांनी आग्रहाने आम्हाला सांगीतले .पण आमचे पोटच इतके पॅक होते की आता तिथे काही खाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही सगळ्याला नाही म्हणतो असे दिसल्यावर मग थोडा चहा किंवा दुध तरी आपल्याला घ्यावेच लागेल असे त्यांनी आम्हाला बजावले. यावर नाही म्हणणे हे शिष्टाचाराला धरून नव्हते किंवा ते करत असलेल्या आदरातिथ्याचा अपमान करण्यासारखे होते त्यामुळे आम्ही त्यांना घोटभर चहा किंवा दूध काहीही चालेल असे सांगितले.
त्यांच्याशी बोलत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरील तो उत्साह व आपूलकी बघून शेवटी न राहवून मी त्यांना विचारलेच की 'ताई कभी ऐसा नही लगता है की अभी बस, आज हम बहोत थक गये है, तो कल काई परिक्रमावासी नही आयेगा तो भी चलेगा या अच्छा रहेगा. ' हे माझे शहरी विचार कारण आपल्याकडे दूसऱ्यांचे सोडा पण आपल्या घरी आपल्या घरचे जरी एखादे कार्य झाले तरी ते झाले की आपण एकदम हुश करतो व आपला भावही आपण किती दमलो असा असतो पण इथे तर सेवावृत्तीने कित्येक वर्षापासून खंड न पडता त्यांच्याकडून परिक्रमावासीयांची सेवा घडत आहे. त्यावर त्यांनी आम्हाला दिलेले उत्तर एकण्यासारखे होते ' नही नही ऐसा हमे कभी लगता ही नही, उल्टा बारीश मे परिक्रमावासी नही रहते है तो हमे घर सुना सुना लगता है, तब हम माई को प्रार्थना करते है की बारीश जल्दी खत्म हो जाये और फिरसे परिक्रमावासीयोंसे अपना घर भर जाय इसलिये हम तो बारीश खत्म होने का बेसबंरीसे इंतजार करते है "
हे ऐकुन मलाच खूप लाजल्यासारखे झाले. मनाला पटले की इथली सगळी समीकरण वेगळी आहेत , ही सगळी माणसे एका वेगळ्या विश्वात आहेत की जिथे पैशापेक्षा, व्यवहारापेक्षा माणूसकीला खूप किंमत आहे थोडक्यात आपल्या बुध्दीच्या बाहेरचे हे सगळे काम आहे. त्यांच्या आईला व त्यांना नमस्कार केला तोपर्यत ग्लास मधे दुध आलेच ते प्रसाद म्हणून घेतले कारण त्यात माईच्या प्रसादाबरोबर त्यांच्या प्रेमाचा ओलावाही होता .आम्ही तिथुन नर्मदे हर करून बाहेर पडलो, आता आमचे गुरूबंधू इथुन परत मुंबईला परतणार होते व आमचा परिक्रमेचा पुढचा प्रवास पुन्हा सुरू होणार होता.
मला इथे अजून एक गोष्ट आपल्याला सांगवी असे वाटते की माईला माझी किती काळजी होती म्हणून सांगु ' ! की माझ्याकडे असलेली मोरपीस संबध परिक्रमेभर जर आमच्याकडे राहीली असती तर ती पुढे खराब होऊनं सजावट करण्यात योग्य राहीली नसती म्हणून तिने ती दिल्यापासून चार दिवसात ह्या मंडळींच्या मनात आम्हाला इथे भेटावयास येण्याची इच्छा निर्माण केली, इथे पाठवून आमची भेट घडवून आणली व ती मोरपीस माझ्या घरी व्यवस्थित पाठवण्याची व्यवस्थाही तिने केली. मी वर म्हंटले ना की इथली सगळी समीकरणच वेगळी आहेत , माई आपली सगळी गणिते परिक्रमेत पार मोडून काढते व एका नवा अध्याय आपल्याला शिकवते की तु इथे काहीच ठरवू नकोस तु इथे फक्त परिक्रमा अनुभवाण्यासाठी आला आहेस, तो आनंद काय आहे हे तु इथे अनुभावयाचे आहेस व त्या अनुभवातून पुढे आपल्याला घडवायचे आहेस. म्हणून आता इतकच म्हणतो की 'माई तेरी लीला अपरंपार है ' नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ६४ -
माझ्याकडील मोरपीस व माईच्या किनाऱ्यावरील मी जमा केलेले निरनिराळे कंकर असा माझ्याकडील अनमोल खजाना सचिनकडे सूपुर्त केला. तेव्हा त्या कंकरांकडे बघुन मला पोयचा पासून ते नलेश्वर निलेश्वर पर्यंतचा आमचा माईच्या किनाऱ्यावरील प्रवास सहजच डोळ्यासमोर आला. जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी आम्हाला तो किनारा पार करण्यास गेला होता. इतके वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे ते अनमोल कंकर बघून तर मी तेव्हा वेडाच झालो होते.प्रत्येकाचे एक वेगळे सौंदर्य ,कुणाला वाटेल कदाचीत की दगडात कसले आले आहे एवढे सौंदर्य, दगडा सारखें दगड, पण हे इथे बिलकूल लागू पडत नव्हते. प्रत्येकाची वेगवेगळी रंगसंगती,वेगळा आकार बघून मला असे वाटे की प्रत्येक कंकर तीने किती कल्पकतेने घडविला आहे.मला तर त्यांचे सौंदर्य बघुन असे वाटे की याच्यातील माझ्यापाशी हा कंकर ठेऊ का तो ठेऊ. कित्येक मोठया आकाराचे कंकर तर मी चालताना वाकुन उचलून घेतले होते व त्यांच्या वजनामुळे परत खाली ठेवले होते कारण ते सॅगमधे घालून घेऊन जाणे म्हणजे खूप कठीण होते. जर परिक्रमेत नसतो तर मी ती पूर्ण सॅग भरून हा माईचा एक वेगळा आविष्कार म्हणून नक्कीच इकडे आणला असता. उदयकडून तर तिथे मी खूप वेळा ओरडा खाल्ला . त्याचेही ओरडणे रास्त होते कारण तो ते माझ्या काळजीपोटी बोलत होता. पहिली गोष्ट म्हणजे ते बघण्यात व उचलून घेण्यामुळे माझ्यात व त्यांच्या चालण्यात खूप अंतर पडत होते व दूसरे म्हणजे तेवढे ओझे मला कितीतरी दिवस घेऊन पुढे चालवयाचे होते. त्याला ते कंकर मी ऊचलत नाही असे बरेच वेळा म्हंटले खरे पण काही ठिकाणी मात्र मला ते बघत राहण्याचा व उचलण्याचा मोह काही टाळता आला नाही. मग आवडील ते पटापट गोळा करून मी धावत धावत त्यांना गाठत असे.मनात विचार येई की किनाऱ्यावरच तिचे इतके आलौकीक सौंदर्य आपल्याला दिसत आहे तर तिच्या गर्भात अजून किती निरनिराळे आविष्कार दडलेले असतील याची तर काही गणतीच न केंलेली बरी. माई हे तिचे आलौकीक सौंदर्य दाखवून परिक्रमेत मनाला एक सुखद आनंद देऊन ताजातवाना करत असे.
गुरुबंधुंची गळाभेट घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला व आमचे परिक्रमेतील पुढचे मार्गक्रमण परत चालू झाले. त्यानंतर दूपारी आमचे तासाभर तरी चालणे झाले असेल आणी अचानक माझ्या उजव्या अंगठ्याची वर पायाकडे येणारी शिर अचानक दुखावयास सुरवात झाली. प्रथम थोडा वेळ तर मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, म्हंटल 'थांबून जाईल की ते आपोआप '. पण थोड्यावेळाने, मात्र प्रत्येक पाऊल उचलून टाकताना मला अंगठ्याच्या वर येणाऱ्या शिरेतून खूप कळा येऊ लागल्या. यां दुखण्याने तर माझ्या चालण्याचा वेगही कमी झाला. थोडया वेळानी तर जिथे जागा मिळेल तिथे मी बसत होतो. उदयनला हे माझे वागणे जरा विचित्र वाटतं होते कारण डोंबिवलीत कुठेही कधीही रिक्क्षाला नाही म्हणणारा मी आज असे शंभर ठिकाणी थांबत थांबत चालत होतो. खर सांगायचे तर थोडाफार मी रडकुंडीलाच आलो होतो कारण प्रत्येक पाउलागणीक कळ मस्तकात जात होती.
आज आमची मुक्कामाची जागा होती नारेश्वरला किंवा मोटी कोरल. हे अंतरही तसे बरेच होते. मला थोडा वेळ काही कळेना की आता हा अचानक माझा उजवा पाय कसा दुखावयासं लागला? कुठे पाय तर वाकडा तिकडा पडलेला आठवत नव्हता कारण आजचे सगळे चालणे हे डांबरी रस्ताने झाले असल्याने ही शक्यता अजिबात नव्हती .आमची परिक्रमा सुरू होउन जवळ जवळ महिना होत आला होता , त्यात शुलपाणीसारख्या डोंगरदऱ्याही पार करून झालेल्या होत्या.तेव्हाही मला असा त्रास कुठे जाणवला नव्हता आणी आज मात्र अचानक असे काय होत होते हे काही मला कळत नव्हते.दहा मिनीटा तशीच गेली आणी एकादम माझी ट्युब पेटली व माझेच मला हसू येऊन मी वैशालीताईला म्हंटलेले माझे वाक्य आठवले , 'तशी मला २५ वर्ष जॉगींगची सवय आहे त्यामुळे पण मला चालण्याचे इतके जाणवत नसेल '
जॉगींगची सवय आहे ना २० ते २५ वर्षाची ,मग चाल आता त्याच कर्तुत्वावर, आता कशाला रडतोस.
मी आधीच्या भागात म्हंटल ना की इथे माई लगेच आपले सगळ्याचे प्रॅक्टिकल करून घेते,आहे ना तुला सवय चालावयाची २५ वर्षाची मग चाल आता त्याच बळावर.
जशी मनात आलेली गोष्ट पूरवून परिक्रमेत तीने लाड केले तसेच हे असेही धडे देऊन माझ्या अभिमानावर घाव घालायलाही त्या आईने कधी मागे पुढे पाहीले नाही. ती शिकवत असते की तुं इथे परिक्रमेतं आपल्या आईकडे आला आहेस ना? तर मग तुझे स्वतःचे कतृत्व, मीपणा कशाला?ते विसर व मी ठेवीन तसे व त्यांत आनंद मानायला शीक. संपुर्ण शरणागती किंवा इंग्लिश मधे आपण म्हणतो ना सरंडर होणे म्हणजे काय असते हे तीने परिक्रमेत बरेच वेळा शिकवले. शेवटी प्रत्येक आईचा हेतू हा असतोच की ,आपल्या सर्व लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून तर तिला अनेक स्तोत्रातून,काव्यातून जगतजननी असे म्हटले आहे .
मी मनापासून तीची क्षमा मागीतली, की हे माई मी असे चूकून बोललो आहे आता तुच ठरव पुढे काय करावयाचे ते.
मधे कुठे मुक्कामाची सोय नसल्याने आम्ही एका गावात मोटीकोरल कडे जाण्याच्या मार्ग विचारला. मोटी कोरला पुनीत आश्रम असून तिथल्या मंदीरात प्राचीन शिवलींग आहेत.
पायामुळे कसेही करून लवकरात लवकर कुठल्या तरी आश्रमात पोहचून विश्रांती घेणे माझ्यासाठी महत्वाचे होते कारण पाय तर प्रत्येक पावलागणीक दूखत होता .त्यामुळे ह्या दूखण्याने व खूप अंतर चालण्याने माझी गाडी आता सुपरफास्टची पॅसेंजर सारखी होऊन हळु हळु प्रत्येक स्टेशन घेत कशीतरी रखडत चालतं होती.
त्या दिवशी दूपारनंतर काय झाले होते हे माहीत नाही पण सगळी गणीते चूकत होती कारण त्यांनी सांगीतलेला मार्ग चुकीचा होता का आमच्या ऐकण्यात काहीं चूक झाली होती हे माहीत नाही पण पुढे एका गावात जेव्हा आम्ही परत मोटी कोरलचा रस्ता विचारला तेव्हा आमच्या लक्षात आले की आता मोटी कोरल जाण्यापेक्षा आपण नारेश्वरला जाणे जास्त सोयीचे होते. चालताना माझा पायांत येणाऱ्या सणका काही थांबण्याचे नाव घेत नव्हते, माझ्याजवळ असे काही औषध ही नव्हते त्यामुळे तसाच लंगडत,पाय ओढत मी ,उदयन व बापू बरोबर जीवावर उदार होउन कधी एकदा नारेश्वरचा आश्रम यईल अशी वाट बघत बघत चालत होतो.
साधरणपणे नारेश्वरला आम्ही सहा वाजेपर्यंत पोहचलो. त्या दिवशी आमचे जवळ जवळ ४० कीलोमीटर तरी चालणे झाले होते. त्यामुळे मंदीराच्या आवारातच एका पायरीवर शेवटी मी फतकाल मारून बसलो व उदयनला नारेश्वर मंदीराच्या ऑफीसमधे जाऊन आमच्या मुक्कामाची चवकशी करण्यास सांगीतले. उदयनने तिथे जाऊन अगदी आदबशीरपणे आम्हाला आज मुक्कामास इथे खोली मिळेल का? व उद्या सकाळी मंदीरात पादूका अभिषेक करता येईल का ? अशी विचारणा केली. आम्ही खोली साठी केलेली विनंती त्यांनी मान्य केली पण पादूंका पूजन मात्र उद्या करता येणार नव्हते कारण दूसऱ्या दिवशी नारेश्वरच्या मंदीरात दत्तंजयंतीचा उस्तव असल्याने पादूका पुजन बंद होते त्यामुळे ऑफीस मधे अन्नदान सेवेसाठी म्हणून पावती फाडून आम्ही पाच मनिटांवर असलेल्या आम्हला दिलेल्या खोलीत पोहचलो.
थोडक्यात सांगायचे झाले तर माईने आज माझी चांगलीच खोड मोडली होती.
संध्याकाळी सायं स्नान, पुजा, आरती झाली. आता त्या पायला थोडी सुजही आलेलीही मला जाणवत होती त्यामुळे मी चक्क साडेआठलाचं माझ्या स्लिपींग बॅग मधे शिरलों . आज पायाच्या दुखण्यामुळे माझे पोटातील भुकेकडेही लक्ष नव्हते. काल गप्पांमुळे झालेले जागरण व हे दुखणे यामुळे कधी एकदा आडवे होउ असे झाले होते, त्यामुळे पाहू पुढे काय होते ते पुढच्या भागात पण तोपर्यंत नर्मदे हर हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव ६५ -
नारेश्वर येथील मुक्काम पुढे चालू - कालचा झालेला जवळ जवळ ४० किलोमीटरचा प्रवास व खूप दिवसानी बंद खोलीची मिळालेली ऊब व माझ्या पायाचे दुखणे या सगळ्याचा अंमल म्हणजे दूसऱ्या दिवशी सकाळी शरीराने लवकर उठण्यास सुट्टी दिली. नेहमी सहा साडेसहाला परिक्रमा सुरू करणारे आम्ही त्या दिवशी सातपर्यंत रंगावदूत महाराजांचे (बाबजींच्या ) समाधीचे दर्शन घेण्यास गेलो. मंदीरात बाहेर फुलांचे छान डेकोरेशन केले होते. गुलाबाच्या फुलांचा सुंगध सगळीकडे दरवळत होता.आज तिथे दत्तयंतीचा उत्सव असल्याने एक वेगळीच लगबग होती. समाधीसमोर दोन्ही बाजूला त्याचे अनेक भक्तगण बसलेले दिसत होते.आम्हीं मधल्या मोकळ्या जागेतून थोडे पुढे जाऊन लांबूनच समाधीचे दर्शन घेतले.
रंगावदूत स्वामीं उर्फ बाबजीनी गुजराथमधे दत्त संप्रदायाचा खूप मोठा प्रचार व प्रसार केला. त्यांचे सदगुरू स्थान हे वासूदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी हे होत .त्यानी श्रीदत्तात्रयांवर अनेक सुंदर भजने लिहीली. त्यातील त्यांनी लिहिलेली दत्तबावनी हे संकट हरण करणारे स्तोत्र तर खूप प्रसिध्द आहे. त्यात दत्त महाराज व त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीं वल्लभ व श्रीनृसिहं सरस्वती स्वामींच्या लिलांचे सुंदर वर्णन कलेले असून हे ५२ओळींचे स्रोत्र मुळ गुजराथीत आहे .
तिथुन जवळच असलेल्या त्याच्या मातोश्रींच्या मंदीरात जाउन तिथेही दर्शन घेतले.दत्त मंदीरात जाउन स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही नारेश्वरहून पुढे प्रस्थान केले. आज पायाला अजून थोडी सुज होती पण चालण्यास मात्र कालच्यासारखा त्रास होत नव्हता.
खर तर सुप्रियाच्या बोलण्यातून दत्तजयंती ही आम्ही ज्या दिवशी नारेश्वरला पोहचलो त्यानंतर एक का दोन दिवसानी आहे असे मला ऐकल्यासारखे वाटत होते पण आम्ही जेव्हा नारेश्वरला पोहचलो तेव्हा दत्तजयंतीं उद्या आहे हे एकल्यावर माझी ऐकण्यात नक्कीच काहीतरी चूक झाली असावी असे मला वाटले. त्यामुळे आज दत्तजयंती म्हणजे आमची देवी योगेश्वरीदेवी हिचाही वाढदिवस, त्यामुळे मी बरूचला घेतलेले पंजाबी ड्रेसचे कापड आजच इथुन पुढे जात असताना लागणाऱ्या एखादया गावातील कुमारिकेला दयावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले. मजा तर आता इथुनच पुढे सुरू झाली ,मला जिला हे कापड दयायचे आहे ही कुमारीका कशी असावी, तिचे निरागस रूप कसे असावे,तिने आमच्या समोर कसे यावे ह्याचे चित्र मी मनोमन लगेच रंगवून टाकले व त्यानंतर माझ्या कल्पनेप्रमाणे मात्र मला तिची भेट आपण घडवून आणावी अशी निघतांना सदगुरूपी माईला मी प्रार्थना केली .खर तर ही माझी प्रार्थनाही म्हणणेही मला आता चूकीचे वाटते कारण त्यात प्रार्थनेपेक्षाही तिला फक्त सांगणे हाच भाव जास्त होता. कारण एखादा भक्त जर असता तर त्याने आपल्या मनातील इच्छा खरतर किती प्रेमाने,लाडीगोडीने आईला सांगीतली असती ,म्हणाला असता ' हे आई ,आज आमच्या देवीचा म्हणजेच तुझ्या विविध रूपाने नटलेल्या एका शक्तिचा जन्मदिवस आहे त्यामुळे माझ्या व सुप्रियाच्या मनात अशी इच्छा आहे की तुला आज आम्ही वस्त्र अर्पण करावे , तर आमची ही इच्छा तू पूरवशील ना? ' असे हे भक्ताचे आपल्या आईशी खरे हितगुज झाले असते पण,माझे तर सगळेंच उलटे होते त्यात प्रेमाच्या ओलाव्यापेक्षा, दाखवण्याचीच भक्ती जास्त होती. त्यामुळे झाले असे की मीच माझ्या मनाने आधी सगळे ठरवून आता फक्त तिला हे सांगत होतो की मी माझ्या कल्पनेने ठरवलेल्या कुमारीका रूपातील देवीला मी म्हंटल्यावर तीने माझ्यासमोर हजर करावे. थोडक्यात त्यांत होती फक्त एक फॉरमॅलीटी.अशा दिखाऊ भक्ताची ही इच्छा खरच तिने पूरवावी काहो? साधे आपल्या आजुबाजूच्या माणसांनाही आपल्या बोलण्यावरून कळते की हो की याचे बोलणे वरवरचे आहे का आतून आलले आहे?. इथे तर प्रत्यक्ष चराचरात असलेल्या त्या चिदशक्तीशी हा संवाद चालला होता मग तिला तर हे नक्की कळणार होते की माझा खरा भाव कायं आहे. असो
आम्ही आठ वाजता चालण्यास सुरवात केली. माझे सगळे लक्ष आता माझ्या मनात असलेल्या त्या देवीरूप कुमारीकाकडे लागले होते. छोटी छोटी गावे येत होती, मागे पडत होती, कधी उदयन एखादी मुलगी दाखवून सांगत असे की ' दे हिला तु आणलेले ते वस्त्र, पण माझ्या मनात असलेल्या चित्राशी ते काही जुळतं नव्हते ,कारण कुणी एखादी मुलगी मोबाईल वर बोलत बसलेली असे, तर एखादी स्वतःलाच आरशात निहारत असलेली दिसे ,कुणी आपल्याच नादात कामाच्या तोऱ्यात दिसे. उदयने अशा बऱ्याच कुमारीका मला दाखविल्या पण मला त्या कुणालाच हे वस्त्र द्यावे असे वाटत नव्हते. शेवटी उदयनही कंटाळला म्हणाला 'तुच बघ आता,आणी दे पुढे कुणाला . तुला योग्य वाटेल अशा कुमारिकेला'. मीही त्याला बर म्हंटले.
दूपारचे बारा वाजत आले होते ,आम्ही परिक्रमा मार्ग चालतं होतो, म्हणजे थोडक्यात चालून चार तास होऊन गेलेले होते.माझाही संयम आता थोडा सुटत चालला होता. याचे कारण मात्र थोडे वेगळे होते माझ्या मनात असलेली कुमारीका न भेटल्यापेक्षाही मी माईला एवढें सकाळी सांगुनही तिने मला अजून अशा मुलीला भेटवले नाही हा भाव त्यात जास्त होता. कशी गमंत आहे ना आपणच मनात इच्छा ठरवायची, नंतर ती तिला सांगायची फ्ण तिने मात्र ती मला पाहिजे असलेल्या वेळेत लगेच पूरवायची. मग मी परत संगळ्यांना अनुभव सांगायला मोकळा की मी माईला असे असे सांगीतले व तिने लगेच तशी कुमारीका माझ्या समोर हजर करून माझी इच्छा पुर्ण केली.म्हणजेच समोरचेही माझे कौतुक करणार की खरच काय आहे रे तुझी भक्ती ,माईने तु म्हणताक्षणी तिला तुझ्या समोर हजर केले? थोडक्यात माझा अहं त्याने सुखावणार होता एवढेच काय ते खरे होते.
खर सांगायचे तर साध्या व्यवहारी जगातील आपली नेहमीची कामेही इतक्या सहजतेने होत असताना आपल्याला दिसत नाहीत पण इथे मात्र मी एवढे सांगुनही माझ्या मनासारखे घडत नाही याचे वैषम्य जास्त होते.
असा संबध परिक्रमेत माईशी खूप वेळा भांडलो , ती असे अनुभव देत असतानाही त्याकडे दूर्लक्ष करून आपली सगळी कॅलक्युलेशन चालवली पण तीने मात्र कधीही राग न धरता माझ्या सगळ्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार सर्व काही मोडून काढले व मला दिले ते फक्त प्रेम व प्रेमच !. आता हे सगळे आठवले की माझीच मला, माझ्या या अशा वागण्याची खूप कीव करावीशी वाटते व तिच्या बद्दलच्या आदरभाव मात्र अजूनच वाढत जातो.
दहा मीनीटे तशीच गेली मी थोडा शांत झालो तसे दूसरे मन सांगु लागले ' अरे तिला सांगीतले आहेस ना तु,मग ठेव की तिच्यावर विश्वास ,अजून अर्धा दिवस आहे ना, मग करणार नाही का ती तुझ्या मनासारखे ?अरे नक्कीच करेल फक्त विश्वास व संयम ठेव. ' दूसरे असेही आहे की अशी काय तुझी योग्यता आहे की तु सांगावेस की तिने लगेच ऐकावे.तीही बघत असेल ना की होतोय का हा पास माझ्या परिक्षेत.
आता मनाला विवेकाची जोड मिळाल्याने ते सकारात्मक विचार करू लागले. आपली इच्छा माई नक्की पुर्ण करेल अशा विचाराने मी पुढे चालू लागलो.
हया विचारात पंधरा ते वीस मीनटे गेली आम्ही ऐका वळणावर आलो व समोरच्या चाळीच्या एका खोलीतून बाहेर व्हरांडयात एक कुमारिका आली व मोठयाने आनंदाने हसत हसत म्हणाली 'नर्मदे हर हर बाबाजी ' व लाजून चेहऱ्यावर हात ठेवत खांबाआड लपली.
मला दोन क्षण काही कळेना कारण जे चित्र मी मनात सकाळपासून रंगवले होते की अशी एखादी मुलगी आपल्यासमोर यावी की जिने अगदी आनंदाने हसत हसत आपल्यासमोर यावे व फक्त म्हणावे 'नर्मदे हर बाबाजी 'आणी आता हे प्रत्यक्षात घडत होते. कारण या गोष्टींसाठीच तर मी सकाळपासून खरतर खूप आसूसलेला होतो की माईबद्दलचे जिला प्रेम आहे तीलाच हा तिचा प्रसाद अर्पण करावा व आता हेच माईने माझ्यासाठी प्रत्यक्षात आणले होते.
मला खूप आनंद झाला त्याच्या घरापाशीं गेलो तिच्या आईला आमच्या देवी बद्दल व माझ्या मनातील असलेल्या या इच्छे बद्दल सांगीतले. कारण देण्याआधी हे सांगणे अत्यंत गरजेचे वाटले कारण दूपारची एकांताची वेळ ,आम्ही जरी परिक्रमावासी असलो तरी अचानक त्यां मुलीच्या हातात मी काही देणे यातून गैर अर्थही निघू शकत होता.तीच्या आईने आनंदाने यास होकार दिला. मग तर माझ्या आनंदाला पारावारच राहीला नाही. सॅग पाठीवरून काढली.पायातील चपला बाजूला काढल्या तिला त्या व्हरंडयात बसवून ड्रेसला कंकू लावून तिच्या हातात दिले व वाकून नमस्कार केला. हे सगळे करत असताना मला खूप आनंद होत होता.
इतक्यात तीची मोठी बहीण बाहेर आली, आता माझी खरी पंचाईत झाली होती कारण मी ड्रेस तर एकच घेतला होता, पण काय कुणास ठाउक पण माईनेच सुचवले व बॅगेत सगळ्यात खाली अगदी तातडीची गरज लागली तरच त्याला आपण हात लाववयाचा म्हणून मी काही पैसे ठेवले होते ते काढून तीच्या हातावरं ठेवले व नमस्कार केला .
आज मी आनंदाचे अगदी क्रुतार्थ झालो होतो. कारण माझ्यासारख्या फॉरमॅलीटीचे प्रेम करणाऱ्यावरही तीने आज कृपेचा हा वर्षाव केला होता. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तीच या रूपात माझ्या समोर आली होती नर्मदे हर हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव ६६-
त्या कुमारिकेच्या घराबाहेरून आमची आता पुढे प्रस्थान करण्याची वेळ आली, आम्ही निघणार तेवढ्यात त्यां मुलींची आई आमच्यासाठी पातेल्यातून दुध घेऊन आल्या. त्यानी ते आमच्या तिघांच्या मगात ओतले दूपारच्या वेळी मिळालेल्या त्या थंडगार दुधाने आमाचा आत्माराम शांत झाला. तिथेच आम्ही आमच्या कमंडलूतही आम्ही पाणी भरून घेतले व पुढे मार्गस्थ झालो. आता पुढचा सगळा रस्ता कधी माईच्या किनाऱ्यानी तर कधीं माईपासून थोडे वर असलेल्या गावातून जात होता. काही ठीकाणी आम्हाला किनारा सोडून थोडे वरून जावेच लागे कारण माईच्या किनाऱ्याजवळ काही शेतकऱ्यांनी शेताला कुंपण घातलेले असे त्यामुळे किनारा सोडून थोडे वरून जावे लागे. काही ठीकाणी शेतात काही वेळा लावलेल्या स्प्रिंकलनी उडलेल्या पाण्यामुळे इतका चिखल झालेला असे की तिथुन चालणेच अशक्य हाई, तर कधीकधी ती कारंजी इतकी लावलेली असत की त्यातून उडणारे पाणी आपल्याला पूर्ण भिजवून टाकत असे.
दरमजल करत आम्हीं किनाऱ्यानी चालत साडेतीन चार पर्यंत मालसरला पोहचलो. माईच्या किनारी मालसर हे गाव वसलेले असून इथे आहे पंचमुखी हनुमान मंदीर, प.पु. डोंगरे महाराजांचे मंदीर व त्याच्या बाजूला असलेले भगवान श्रीराधाकृष्ण कनैह्माचे मंदीर .
प्रथम आम्ही पंचमुखी श्री हनुमतांच्या मंदीरात पोहचलो. तिथेच बाहेर असलेल्या नळाच्या थंडगार पाण्याने तोड, हात पाय धुवुन फ्रेश झालो. वाचकाच्या असे मनात येईल की याच्या बऱ्याच लेखात हे वाक्य खूप वेळा लिहीले आहे पण खर सांगु ईतक्या उन्हातून बराच वेळ चालून एखाद्या स्थानाला पोहचल्यावर त्या ठीकाणी असलेल्या थंडगार पाण्याने तोंड,हात पाय धुणे यातील आनंदही मला खूप आर्वणनीय वाटे व तेव्हा सहजच चातक पक्षाची आठवण होऊन त्याला पावसाळ्यातील पावसाच्या पहिल्या थेंबानी काय मजा येत असेल याचा काहीसा अनुभव यई हे एक कारण झाले. दूसरे म्हणजे हरीमंदीरामुळे ही एक इतकी चांगली सवय लागली होती की त्याशिवाय कुठल्याही मंदीरात दर्शनाला आमचे जाणेच होत नसे. आता कोव्हीडच्या महामारीत लोकांना परत परत देत असलेल्या हात,पाय व कपडे या बाबतच्या स्वच्छतेच्या सुचना ऐकून आपल्या गुरूंनी या बाबतीत आपल्याला आधीच किती यथार्थ शिकवण दिली आहे याची जाणीव पुन्हा पुन्हा झाली. मंदीरात पूर्ण शांतता होती, खूप मोठे आवार असलेले हे मंदीर इथे आपल्याला दर्शन होते महाकाय श्री पंचमुखी हनुमंताचे. संध्याकाळची वेळ जवळ येत असल्याने आम्ही तिथे मारूती रायांसमोर बसुन हनुमानचालीसा चा पाठ व रामरक्षा व मारूती स्तोत्र म्हटले.
आपल्या इष्ट देवतांसमोर बसून त्याचे गुणगान करण्याचा आनंद परिक्रमेत आपल्याला खूप वेळा अनुभवता येतो. एखादे लहान मुल जसे बराच वेळ बाहेर उन्हातन्हात खेळून आल्यावर घरी आपल्या आईच्या कुशीत शिरून एक मायेचा ओलावा अनुभवते तसाच काहीसा आनंद आम्हाला या शांत फारशी कुणाची वर्दळ नसलेल्या निरनिराळ्या मंदीरात त्यांचे गुणगान करताना मिळत असे.
इथुन जवळ असलेल्या प.पु. श्री डोंगरे महाराजांच्या मंदीरात आम्ही गेलो. प.पु. श्री डोंगरे महाराज ऊर्फ श्री रामचंद्र केशवभाई डोंगरे. वयाच्या आठव्या वर्षी ते पंढरपूर येथे पुराण, वेद वेदांत व धर्म यासंबंधी अभ्यास करण्यासाठी गुरूआश्रमी येऊन राहीले.७ वर्ष हे वेद अध्यायन झाल्यावर जेव्हा भागवत कथेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले तेव्हा प्रथम भागवत कथेचा महिमा त्यानी पुण्यात वर्णन केला. नंतर गुजराथी मधे भागवत कथेचा महिमा अंहमदाबाद जवळील शरयु मंदीर येथे कथन केला.असे सांगतात की ते भागवत कथा इतके तल्लीन होऊन सांगत की समोरचा सगळा श्रोतु वर्ग मंत्रमुग्ध होऊन जाई.त्यांचीं तुलना शुकदेवांशी केली जात असे कारण ते आपले संपूर्ण जीवन अतिशय निस्वा:र्थ पणे जगले. त्याची एक अशी विचारधारा होती की कुणाकडून आपण काहीही दक्षिणा घ्यायची नाही व त्याप्रमाणे त्यानी कुणाकडून कधीही दक्षिणा घेतली नाही,कुठल्याही बँकेत खाते उघडले नाही, कुणाकडून एक पैसा घेतला नाही व कुठल्याही प्रकारचा ट्रस्ट बनवाला नाही. ते सांगत की माझा कुणी शिष्य नाही व मी कुणाचा गुरु नाही.असे हे संत १९९१ साली ब्रम्हपदी लीन झाले. त्याच्या इच्छेनुसार त्याचा पार्थीव पुण्यमयदेहला जल समाधी मालसर येथे माईच्या प्रवाहात दिली गेली. अशा वैराग्यसंप्पन महाराजांकडे येण्याचा योग माईच्या परिक्रमेमुळे आला. त्यांच्या त्या शांत ध्यानमयमुर्तीने मनाला एक वेगळाच आनंद दिला.
त्यानंतर त्याच्या अगदी जवळ असलेल्या राधाकुष्ण मंदीरात आम्ही गेलो. अतिशय सुंदर पध्दतीने बांधलेले हे संगमरवरीमंदीर जागोजागी त्याच्या वैभवाच्या खूणा दाखावत होते.आतील राधा कृष्णाची मुर्तिही अतिशय रेखीव वं सुंदर होती. इथे भक्तगणांची बऱ्यापैकी वरदळ असल्याने जो आनंद व समाधान महाराजांच्या मंदीरामधे मिळाले तो अनुभव इथे मात्र आला नाही.
बाहेर पडल्यावर परिक्रमा वासीयांच्या मुक्कामाची व्यवस्था करणारा कुठला आश्रम इथे आहे का याची चवकशी केली. तशी व्यवस्था पंचमुखी हनुमान मंदीरात होते हे उदयनकडून कळले होते कारण त्याने गेल्या परिक्रमेत इथेच मुक्काम केला होता. पण दिवस मावळायला अजून बराच वेळ असल्याने आम्ही पुढे प्रस्थान करण्याचे ठरवले.आता आमचे इंथुन पुढचे परिक्रमेतील मुक्कामाचे ठिकाण होते शिनोरचे गणपती मंदीर. खूप दिवासानी आज बप्पाच्या घरी जायला मिळणार या आनंदाने आमचे पाय भराभर मार्ग चालत होते. मन तर केव्हाच त्याचे तिथले लोभस रूप कसे असेल याचा विचार करत होते.
खरतर हा मार्ग आम्ही माईच्या किनाऱ्यानी जाणार होतो म्हणजे त्या मार्गाला वळलो ही होतो कारण उदयनच्या माहीती नुसार या मार्गावर माईच्या किनारी ताटंबरी बाबा हे महात्मा वास्तव्य करून आहेत त्यामुळे त्याची भेट व आर्शिवाद घेऊन आम्ही पुढे जाणार होतो. पण तिथे असलेल्या गावातील लोकांनी आम्हाला सांगीतले की आता तुम्ही किनाऱ्यानी जाऊ नये कारण दिवस लहान होत असल्याने लवकर अंधार होतो त्यामुळे त्या मार्गानी तुम्ही पुढची वाट नक्की चुकाल त्यापेक्षा तुम्हीं वरच्या रस्तानी शिनोरकडे जावे.
अर्धापाउण तासानी मोठे गाव आल्याच्या खाणा खुणा दिसू लागल्या आम्ही तेव्हा शिनोरगावात शिरत होतो. आता खर तर गणपती बाप्पाचे वेध जास्तच लगाले होते त्यामुळे कधी एकदा तिथे पोहचू असे आम्हाला झाले होते. शिनोर गाव बऱ्यापैकी मोठे आहे. मंदीराकडे जाणारा सगळा मार्ग हा मुसलमान वस्तीतून आहे व तो रस्ता मात्र काही संपता संपत नव्हता, कदाचीत बाप्पाच्या ओढीमुळे ही तसे मला वाटत होते. पण मला तिथुन जाताना मुंब्रा, भिवंडीतील रस्तांची आठवण येऊन तो मार्ग लवकारत लवकर कसा संपेल असे झाले होते, थोडक्यात ते एकुण वातावरण नकोसे वाटत होते.पंधरा वीस मीनटांनी ते सगळे पार करत आम्ही खूप उंचावर असलेल्या गणपती मंदीरापाशी पोहचलो.त्यामुळे बघुया आता बाप्पा पुढला आनंद सोहळा पुढच्या भागात तोपर्यंत हर हर नर्मदे..
नर्मदा परिक्रमा अनुभव ६७
शिनोर मंदीराच्या आश्रमात आम्ही ५ .३० पर्यंत पोहचलो.माईच्या अगदी समोर पण बऱ्याच उंचीवर असलेले हे गणपती बाप्पाचे मंदीर .परिक्रमा सुरू झाल्यापासून आमचे दूसऱ्यांदा वास्तव्य हे गणपती बप्पाच्या मंदीरात होते. पहिले एकदा नंदगावला व आज शिनोरला. आश्रमात जाऊन आम्ही आमची आसने लावली व लगेच सायं स्नांनाला खाली उतरून माईपाशी आलो.आम्ही खाली ज्या ठीकाणी स्नानास आलो होतो तिथले माईचे पाणी फारसे वाहते नसल्याने मला ते स्नानासाठी स्वच्छ वाटात नव्हते,माझ्या चेहऱ्यावरील तो भाव जाणूनं उदयन माझ्याकडे बघत म्हणाला ' चल हे माईचे जल आहे, काही होणार नाही तुला ' यावर मात्र मी काहीही न बोलता माईचे नाव घेत चार पाच वेळा कमंडलू मधून पाणी डोक्यावरून घेऊन स्नान केले व आम्ही परत वर आमच्या आसनांपाशी आलो.आमची नेहमीची उपासना करून ७ वाजता गणपती मंदीरात आरतीसाठी हजर झालो. पेशवेकालीन हे सुंदर मंदीर पुर्ण दगडातील असून इथे बाप्पा रिद्धीसिद्धिसहीत स्थापन झालेला आहे.
आज इथे मुक्कामास परिक्रमावासी भरपूर असल्याने मंदीरात आरतीसाठी बरीच गर्दी होती.आपण दिवाळीत लावतो तशा भरपूर दिव्यांच्या माळा गाभाऱ्यात व बाहेर सोडलेल्या होत्या.आरती झाली,दर्शनासाठी गाभाऱ्यापाशी आलो पण त्या झगमगत्या रोषणाईमुळे बाप्पाचे सौंदर्य , त्याच्या चेहऱ्यावरील लोभस भाव हे मला काहीच कळत नव्हते, तेव्हा मनात आले की, अरे ह्याच्या डोळ्यांना किती त्रास होत असेल या दीव्याच्या माळांचा, ह्या लोकांच्या हे कसे लक्षात येत नाही? तो जर खरच तिथे बसलेला आहे तर ...., पण जाऊ दे तिथे काहीच न बोलता मी हिरमुसला होऊन नमस्कार करून खाली आलो.
आमचे सगळ्याचे बाप्पासहीत सिद्धि सिध्दींचे दर्शन झाले व भोजन प्रसादीसाठी अजून वेळ असल्याने मंदीराच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आलो. प्रथम थोडया दगडी पायऱ्या व पुढे परत खाली गॅलरी सारखी जागा त्याला कठडा व तिथुन पुढे खाली दिसणारा माईचा शांतपणे वाहणारा प्रवाह. वर अथांग पसरलेले काळेनिळे आकाश व त्यावर लांबवर पसरून नक्षीकाम केलला टपोऱ्या चमचमत्या चांदण्याचा गालीचा.अहाहा, खरच काय सुख वाटतं होते म्हणून सांगू, आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी धरलेला फेर म्हणजे तर एक अप्रितम सौंदर्याची आदाकारी होती व हे सौंदर्य बघून कुणाचेही मन अगदी नकळत त्या चांदण्यांच्या फेरात सहभागी होणार होते.तर समोर संथ,शांतपणे वाहणारी माई जी फेर धरून चंचल झालेल्या मनाला परत परब्रम्हातील एकाग्रतेकडे घेऊन जाणार होती. सगळाच मुळमायेचा मोहक आविष्कार, तीच चंचळ रुपाने चांदण्यात व शांत रूपाने मैय्यात.फक्त प्रत्येकाने ठरवावयचे होते की आपण नक्की कुठे जावे.
माई तर चराचरात असलेल्या ह्या इश्वराचे दर्शन घडवत होती.हवेत असलेला मस्त गारवा त्यात मधुनच येणारी बोचरी वाऱ्याची झुळकही हा आनंद वाढवत होती. त्या चमचमत्या गालीचाच्या साक्षीने आम्ही खाली एका पायरीवर बसून म्हटलेला ललिता सहस्त्रनामाचा पाठ मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. मला आठवताय की मी कितीतरी वेळ त्या आकाशातील चांदण्यांचे सौंदर्य डोळ्यांनी टीपत होतो व नंतर शांतपणे वाहणाऱ्या माईंकडे बघताना जणू ती विचारत होती की बघ अजून काय काय बघावयाचे आहे तुला?
भोजन प्रसादीस बोलाावल्याने आम्ही नाईलाजस्तवं परत आश्रमातील आमच्या आसनापाशी आलो व आमचे ताट वाटी व मग घेउन भोजन प्रसादीस बसलो.
भोजन प्रसादी झाली ,आज चालण्याच्या नादात व पाय दुखत नसल्याने माझे दिवसभरात त्या पायाकडे काही लक्ष गेले नव्हते. पण रात्री झोपताना स्लिपींग बँग मधे शिरताना सहज बघीतले तेव्हा लक्षात आले की उजव्या पायाच्या बोटांच्या मागे पायावर बऱ्यापैकी सुज आलेली दिसत होती. ह्या दुखण्यासाठी तर आम्ही बरोबर कुठलेही मलम किंवा तत्सम औषध घेतले नव्हते त्यामुळे विचार केला की बघुया, उद्या सकाळी काय होते ते,फक्त पाय दुखला नाही म्हणजे माझ्यासाठी सगळे ठीक होते.
सकाळी उठल्यावर आश्रमात वर कुठेही स्नानाची सोय नसल्याने आम्ही परत खाली उतरून माईवर स्नानास आलो. त्या मस्त पडलेल्या थंडीत माईवर स्नान करण्याची मजा काही और होती. स्नान करण्यास जेमतेम पाच सात मीनीटे जात कारण माईवर स्नान म्हणजे अंगाला साबु किवा तत्सम काही लावण्याचा पश्नच नसे त्यामुळे तीन चार कमंडलू मधे मस्त सचैल स्नान हाई, कपडे ही माईच्या प्रवाहात न धुता बाजूला कुठेतरी आम्ही ते पिळून घेत असू.
स्नान करून वर आलो व आमची संध्या,माईची पुजा,आरती करून परत बाप्पाच्या दर्शनाला आलो.आता तो माळेचा झगमगाट नव्हता, पुढे असलेला रॉडचा दरवाजा बंद होता पण आत बसलेल्या गणपती बाप्पाच्या ध्यानाचे आता शांतपणे दर्शन घेता आले.कालची माझी अर्धवट राहीलेली दर्शनाची ओढ आज तो पूर्ण करत होता.कारण लहानपणापासून गणपती माझे आवडते दैवत, त्यामुळे मी बी.कॉम झाल्यावर घरी भाद्रपदात जेव्हा आमच्याकडे गणपती बसवायला सुरवात झाली तेव्हाही मराठयांकडे दिड दिवसाचा गणपती असुनही, आई वडीलांना दीड दिवसा ऐवजी गौरी विर्सजनाच्या दिवशी आपल्या गणपतीचे विर्सजन करावयाचे असा हट्ट धरणारा मी, त्यामुळे आज आत्ता त्याचे शांतपणे दर्शन घेताना खूप आनंद होत होता. मोरया मोरया पासून ते सिंधूरालिप्त सर्वांगंम
सिद्धी बुध्दी सम्नवीतंम, भुस्वानंद स्थितम ध्याये ,
भक्तानां वरदायकं॥पर्यंत जे जे काही त्याचे श्लोक म्हणता येत होते ते सगळे म्हणून एक आर्थवशिष्याचा पाठ केला. आईंच्या नित्योपासनेतील आळींची त्याला बघता बघता सहज आठवण झाली, आई सांगतात
इंद्रियादी गणांचा पती ,हाची असे प्रभु गणपती गा। स्मरता टळती विघ्न संकटे, दृढ श्रद्धेने त्यासिच गाI
बाहेरच्या मोकळ्या जागेतून परत माईचे दर्शन घेउन तिला नमस्कार करून आम्ही तिथुन पुढे प्रस्थान केले.
आता आमचा पहिला टप्पा होता कनजेठा सौभाग्य सुंदरी मंदीर. आता सगळा रस्ता माईच्या किनाऱ्यानी होता, उंचसखल सतत चढउतारचा .
माझ्या पायाची सुज काही कमी झाली नव्हती ऊलट परत चालताना नारेश्वरला जाताना जशी कळ येत होती तशीच पण कमी प्रमाणात मला पाऊल टाकताना जाणवत होती. पाहिला टप्पा होता साधारण पाऊण एक तासाचा होता, रात्रीच्या विश्रांतीमुळे तेवढा होलपाटून नेण्यास पूरेसा होता.सकाळच्या वेळी नामस्मरण करत चालण्यातही एक वेगळीच मजा किवा वेगळाच आनंद मिळत असे.दररोज सकाळी होणारे सुर्याचे आगमन ,त्याआधी आकाशात पडणाऱ्या शेंदरी लाल छटा, मग हळु हळु पण ऐटबाजपणे होणारे महाराजांचे आगमन हे प्रत्येक दिवशी आम्हाला एक वेगळाच आनंद देत. थोडयाच वेळात आम्ही कनजेठाला सौभाग्य सुंदरी देवीच्या देवळात पोहचलो व देवीचे दर्शन घेतले व पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर एरंडी संगमाजवळ आपल्याला लागते अनुसुया माता मंदीर. अनुसुया मातेने इथे बरीच वर्षे तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्री ब्रम्हा, विष्णु व महेश यांनी मातेला इथे दर्शन दिले.मातेचे इथे सुंदर मुर्तीरूपात आपल्याला दर्शन होते.आम्ही पोहचलो तेव्हा कोणा यजमानाहस्ते तिथे पुजाविधी सोहळा चालू होता, आम्ही घेतलेले पुजेच्या साहित्याचे ताट गुरूजींजवळ दिले.मातेची मुर्ती फुलानी सुंदररीत्या सजवलेली होती. आम्ही तिथे थोडा वेळ थांबुन त्या आनंदाचा लाभ घेतला व पुढे मार्गस्थ झालो.
आता पुढचे परिक्रमा मार्गातील आम्हाला लागणारे ठिकाण म्हणजे बद्रिकाश्रम. हा चालण्याचा टप्पा बऱ्याच अंतराचा असून जवळजवळ दीड दोन तास चालल्यावर आम्ही साडेदहापर्यंत बद्रीकाश्रमला पोहचलो. हा सुध्दा माईच्याच समोर पण खूप उंचावर असलेला भला मोठा आश्रम. गंमत अशी इथे आज दत्तजयंतीचा उत्सव होता.म्हणजे सौ.नी सांगीतल्या प्रमाणे, महाराष्टाप्रमाणे इथेही दत्तजयंतीचा ऊत्सव आज साजरा होत होता.नंतर आम्हाला कळले की गुजराथमधे हा उत्सव काहीं ठीकाणी एक दिवस आधी साजरा केला जातो त्यामुळेच तो नारेश्वरला काल होता.
आम्ही मंदीरात दर्शन घेतले, आज दत्तजयंतीमुळे तिथे थोडी गडबड दिसत होती त्यामुळे तिथुनच थोडे पुढे असलेल्या सिमेटक्रॉक्रीटच्या बाकड्यावरती जरा टेकून माईचे आताचे रुप आम्ही न्हाळत होतो. एवढयात तिथले एक महंत बाहेर आले व आम्हाला उद्देशुन म्हणाले 'चलीये बाबाजी, आप दत्तजयंतीकी भोजनप्रसादी ग्रहण किजीये '. आम्ही मागे वळुन बघीतले तर एक तरूण उंच साधु , छान दाढी वाढवलेली,चेहऱ्यावर तेजस्वी भाव आम्हाला आग्रहाने भोजन प्रसादीस बोलवत होता.
आज तिथे कुणा गुजराथी व्यक्तीकडून दत्त महाराजांची पुजा व नंतर भोजन प्रसादी होती. भोजन प्रसादीगृहात सुग्रास भोजन मांडलेले होते. जुन्या काळी लग्नात आपल्याकडे जसे खाली बसून भोजन ग्रहण करीत असत थोडक्यात भारतीय बैठक पध्दतीने सगळी ताट मांडलेली होती व त्यापुढे बसायला बस्तान. त्या व्यक्तिच्या घरचे बरेचसे नातेवाईक मंडळी व आम्ही तिघे परिक्रामावासी, असे भोजनास होतो. ताट परिपूर्ण अन्नानी भरलेले होते,फळांचे तुकडे घातलेले श्रीखंड, बटाटा भाजी , अजून एक रसभाजी, वाटीत आमटी ,चटणी, कोशिंबीर, भाताची मुंद, त्यावर साधवरण व वर तुपाची धार. त्यावर अजून म्हणजे जेवणापूर्वी आम्हा सगळ्यांना गंध लावून प्रत्येकाला पन्नासं रूपये दक्षणा, असे सुग्रास जेवण आज दत्तरूपीमाई आम्हाला भरवत होती. परिक्रमेत हे असे सुग्रास जेवण आपल्याला मिळेल असा साधा कधी विचारही मनात नसल्याने माईच्या हया लिलेचे पण मनापासून कौतुक वाटले कारण परिक्रमावासीयांसाठी भोजन प्रसादीची सोय खरतर दूसरीकडे होते पण आज माईच्या मनात आमचे असे कोडकौतुक व्हावे असे दिसत होते.
भोजन प्रसादी झाली व आम्ही परत त्याच बाकड्यावर येऊन बसलो, माझ्या पायामुळे आज आपण इथेच थांबावे व विश्रांती घ्यावी का? असा आमच्यात एक विचार चालू होता व दूसरे म्हणजे आल्याआल्या माईचे झालेले सुंदर दर्शन व या आश्रमाची केलेली मांडणी यामुळे या ठिकाणाच्या प्रेमात तर आम्ही आल्याआल्याच पडलो होतो .
माईची लिला कशी चालू असते हे आपल्याला परिक्रमेत कधीच कळत नाही कारण आपल्या विचारशक्तीच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी ती घडवत असते. आम्ही तिथे बसलेलो असताना आधी एक दोनदा परिक्रमेच्या मार्गात व शुलपाणीत भेटलेला एमपीमधले परिक्रमावासीयांचा ग्रुप परत तिथे आम्हाला भेटला, थोडी परिक्रमेच्या मार्गाबद्दल विचारपूस झाली, बोलता बोलता सहज चालण्यावरून आमच्यात विषय झाला.तेव्हा त्याच्यातील एका परिक्रमावासीयांच्या पायालाही मला झालेल्या त्रासासारखा किंबहुना त्याहून थोडा जास्त त्रास झालेला त्यानी आम्हास सांगीतला. तेव्हा उदयने ह्यालाही तसाच त्रास होत असल्याचे सांगुन माझा सुजलेला पाय त्यांना दाखवला. तेव्हा तो माणुस सहज म्हणाला 'अरे बाबाजी एक डॉक्टरने मेरे को इस दर्द को ठिक करने के लिये ये ट्युब दी है. ' मग मीही त्याला त्या क्रिमचे नाव काय आहे हे विचारून " आगे के किसी गॉव मे मै खरीद लेता हूँ ' असे सांगीतले.कारण आपल्याला नाव माहीत असेल तरच पुढे ते विकत घेता येईल हा विचार मनात होता. तेव्हा तो परिक्रमावासी आपल्या बॅगेतील क्रिमची ट्युॅब काढत म्हणाला ' अरे भाईसाहब आप को दर्द हो रहा है ,तो अभी लगा लो ये मलम, बाद का बांद मे देख लेना '. तरीही मला संकोचल्यासारखे झाले हे बघून परत म्हणाला 'अरे ये माईने तो दिया है मुझे ,आप इस मलम को अभी के अभी लगा लो ' मग मी काही न बोलता ते थोडे क्रीम त्या अंगठयाच्या शिरेवर व सुज आलेल्या भागाला लावले व मोबाईलमधे त्या खोक्याचा फोटो काढून घेतला त्यानंतर ते परिक्रमावासी पुढे निघून गेले . तेव्हा मनात विचार आला की काल रात्री आपल्या मनात नुसता हा विचार आला की आपल्याकडे असे काही औषध नाही व आज ते औषध तीने माझ्यासमोर इतक्या सहजपणे हजर केले होते.
खरच ते परिक्रमावासी इतक्या लगेच इथे भेटायला, त्याच्यातील एकाला आधी माझ्या सारखाच पायाचा त्रास व्हायला, काय गणिते आहेत ही ?मी वर म्हंटले ना की आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी ती घडवून आणते.
अजूनही आम्ही तिथेच बसून होतो. तेवढयात ते मगाचेच साधु महंत परत बाहेर आले व शांत स्वरात विचारले ' आप इधर रूकनेवाले हो क्या , ' कारण परिक्रमावासीयांसाठी मुक्कामाची सोय आश्रमात शिरल्यावर एका बाजूच्या इमारतीत होतं असे. त्यांनी विच्यारल्यावर उदयने त्यांना माझ्या पायाबद्दल थोडक्यात सांगुन ,आमचा आज इथे थांबण्याचा विचार आहे असे सांगत बाजूलाच असलेल्या कुटीत आम्हाला रहावयास मिळेल का? अशी विचारणाही केली. कारण आल्यापासून आम्हाला तिघांनाही ती छोटी कुटी खूप आवडली होती. ती अशा जागी होती की माईच्या किनाऱ्यापासून ते वर कुटीपर्यंत निरनिराळ्या प्रकारची झाडे त्या उतरणीवर दोन्ही बाजूला लावलेली होती व कुटीपुढे असलेल्या गॅलरी वजा पडवीसारख्या जागेतून माईचे कायम दर्शन आम्हाला होणार होते. तशीच कुटी दूसऱ्या बाजूला होती या दोन कुटींमधून खाली उतरणारा पायऱ्याचा रस्ता माईच्या किनाऱ्यापर्यत जात होता. मागे थोडया अंतरावर शंकराचे मंदीर व भोंजन प्रसादी कक्ष.उदयन असे विच्यारल्यावर ते म्हणाले ' हां हां क्यु नही, अभी तो वो खाली है, वो साधक थोडे दिन के लिये बाहर गये हैे , आप निश्चिंत होकर वहाँ विश्राम किजीये, मै उपर आश्रम मे बोल देता हूँ ' हे सांगुन ते निघूनही गेले.आमचे त्यांना धन्यवाद म्हणावयाचे ही राहून गेले कारण ते वाक्य ऐकूनच आम्ही तिघे अतिशय आनंदीत झालो होतो की काय विचारायची सोय नव्हती . आता आज दूपारपासून उद्या निघेपर्यंत माईचे ,या निर्सगाचे सतत दर्शन घडणार होते. जेथे साधकाला साधना करण्यासाठी रहावयाची सोय होते तिथे आज आम्हाला रहावयास मिळणे म्हणजे आमच्यासाठी माईने दिलेली एक पर्वणीच होती. नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव ६८
महंताच्या होकारानंतर आम्ही लगेच आमच्या सॅग घेउन त्या कुटीपाशी गेलो. खर तर सगळे स्वप्नवत वाटत होते, पुण्याला जाताना खंडाळा, लोणावळा येथे अशी पहाडाच्या टोकावरची ५ स्टार हॉटेलस बघीतली होती पण आज ही छोटीशी कुटी आम्हाला तशीच वाटत होती.बापूने झाडू घेउन ती कुटी लगेच आतून झाडून काढली.तिथे आत असलेल्या रिकाम्या कॉटवर आमच्या सॅग ठेवल्या व परत बाहेरच्या गॅलरीवजा पडवीत येऊन छान मांडी घालून आम्ही माईकडे बघत बसलो. दूपारचे जवळजवळ साडेबारा झाले होते, सुर्य पूर्ण डोक्यावर आल्याने सुर्याच्या किरणानी माईचा प्रवाह नुसता लखलखत होता.खालच्या उतारावर असलेल्या निरनिराळ्या झाडाच्या फांदया मंद वाऱ्याने हळुवारपणे डोलत होत्या.माईच्या प्रवाहात लांबवर मच्छिमारांची होडी जात असताना दिसत होती. त्या दिवशी इथल्या मुक्कामामुळे माईची वेगवगळी रूपे इथे बसून आम्हाला शांतपणे बघावयास व अनुभवास मिळाली. प्रत्येक वेळी एका वेगळ्याच रूपात ती डोळ्यासमोर येत होती.इथुन खाली माईच्या किनाऱ्यापर्यत जरी चालत जायचे म्हंटले तरी वीस पंचवीस मीनीटें सहज लागणार होती.आम्ही कितीतरी वेळा तिथले हे सगळे सृष्टीसौदर्य बसून न्याहळत होतो.शांतपणे निर्सगाचा आनंद अनुभवणे म्हणजे काय असते हे ह्या परिक्रमेमुळे आम्हाला कळत होते.आमच्या कुटीच्या उजव्या बाजूला थोडे खाली थोडया अंतराने खूप उंच अशा दोन रेखीव मुर्ती उभ्या केलेल्या दिसत होत्या , त्यातील एक होती अर्धनारीनटेश्वराची व दूसरी पवनपुत्र हनुमंनताची. मधे मधे निरनिराळ्या रंगांच्या गुलाबाची झाडे ज्याला भरपूर फुलांचा बहर आलेला होता.इतरही शोभेची भरपूर झाडे व त्याला आलेली निरनिराळ्या रंगाची फुले असा हा फुललेला नयनरम्य निर्सग मनाला खूप आनंद देत होता व या सगळ्या गोष्टींचे सौंदर्य आश्रमाची शोभा वाढवत होते.साधकाच्या मनाला सहज एकाग्र कराणारा व त्याला हवा असलेला निर्सगाच्या सानिध्यातील एकांत इथे सहज अनुभवाला मिळत होता.
माझ्या पायची रग व सुजही त्या औषधाने व विश्रांतीमुळे थोडी कमी झाल्यासारखी वाटत होती. बराच वेळाने आम्ही कुटीच्या आत जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली.संध्याकाळी परत बाहेर आलो तेव्हा निरनिराळ्या पक्षांचे आपल्या घरट्याकडे येणे सुरू झालेले दिसत होते,त्याचे निरनिराळ्या आवाजात चाललेले संभाषण,ओरडणे हे ऐकणे म्हणजे एक वेगळीच गमत होती. आश्रमातील सातची आरती व त्यानंतर भोजन प्रसादी घेऊन आम्ही परत त्या कुटीत आलो.उद्या सकाळी या नयनरम्य स्थानातून आमचे पुढे प्रस्थान होणार होते.
सकाळी सातलाच आम्ही हा आश्रम सोडला कारण आज संध्याकाळपर्यंत तिलकवाड्यापर्यंत पोहचण्याचा आमचा विचार होता.
आताचा सगळा परिसर हिरवागार झाडीचा होता, साडेआठच्या सुमारास भीमपूराजवळच्या नंदेरीया गावात असलेल्या आश्रमातून ' नर्मदे हर बाबाजी ' असा पुकारा झाला.आम्ही आश्रमापाशी आलो, आश्रमाचे नाव होते साईरेवा आश्रालय.आम्ही आश्रमात शिरलो,तेव्हा आश्रमाच्या आवारात अतिशय व्यवस्थितपणे निरनिराळी लावलेली शोभेची झाडे बघून मन एकदम प्रसन्न झाले. आश्रमाच्या बांधकामावरून आश्रम आता नवीन बांधलेला दिसत होता.आपल्या शहराप्रमाणे सर्व सुखसोयीनी सज्ज असलेला असा हा आश्रम आहे. डाव्या बाजूला छोटी कुटी व उजव्या बाजूला एक मोठा हॉल,बाजूला तसेच मोठे स्वयंपाकघर सगळे कसे स्वच्छ,लखलखीत व ते बघून हरिमंदीराची सहज आठवण झाली.
एखादया घराला गृहीणीचा हात लागलेला असला की ते घर कसे निटनेटके दिसते तसाच हा आश्रम स्वच्छ , निटनेटका ठेवलेला दिसत होता.हसत हसत माताजींनी आमचे स्वागत केले 'आई ये बाबाजी चायप्रसादी और भालभोग पालो 'त्याच्या बरोबर अजून एक सेवेकरी तिथे सेवेसाठी होता.त्यानी चहा व चूरमूऱ्याचा चिवडा आम्हास दिला. माताजी परिक्रमेबद्दल बरेच प्रश्न विचारत होत्या,त्यांच्या बोलण्यावरून त्या तिथल्या मुळच्या रहिवासी आहेत असे वाटत नव्हते. माताजींचे नाव आहे दर्शना माताजी.अतिशय गोड बोलणे व शांत,सोज्वळ भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्याना आम्ही विचारलेही की आपण इथल्या रहिवासी दिसतं नाही तरी आपण इथे परिक्रमावासीयांची सेवेसाठी कशा?. तेव्हा त्यांनी सांगीतले की माझे यजमान व मी असे दोघे मिळुन ही माईची थोडीफार सेवा करतो. मी या मार्गात तर माझ्या यजमानामुळे आले. प्रेमविवाह झालेल्या या माताजीच्या यजमानाचे नाव आहे विजयस्वामी. त्यांनी आम्हाला परमार्थाविषयी खूप छान मार्गदर्शन केले.आम्ही आश्रमात शिरलो तेव्हा खरतर अर्धा तासातच आपण इथुन पुढे प्रस्थान करावयाचे असे ठरवले होते कारण आज कसेही करून मुक्कामाला तिलकवाड्याला पोहचावयाचे असे आम्ही ठरवले होते.पण माईला ते बहूतेक मान्य नव्हते त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात, त्यांचा व दर्शनामाताजीचा परमार्थ मार्गातील प्रवास ऐकता ऐकता आमचे तीन साडेतीन तास कसे गेले हे आमचेच आम्हाला कळले नाही. गुरू सेवा कशी करावी लागते, ती किती खडतर असते ह्या विषयीचे त्यांचे अनुभव ऐकून तर तेव्हा आमच्या डोळ्यात पाणीच आले. तेव्हा श्री विजयस्वामींनी एक महत्वाची गोष्ट सांगीतली तेवढीच इथे सांगतो ते म्हणाले की माझा पुर्वीपासून असा एक विचार किंवा विश्वास होता की आपण या परमतत्वाला केवळ ज्ञानाने जाणु शकतो त्यामुळे त्या मार्गाने गेल्याने माझा खूप वेळ वाया गेला पण तो अभ्यास केल्यावर जाणवले की त्या परमेश्वराला ज्ञानापेक्षाही प्रेमानेच खरे ओळखता येईल किंवा आपलासा करून घेता यईल.
पण त्यांनी सांगीतलेल्या सगळ्या गोष्टीवरून ,त्याच्या सगळ्या विचारांवरून एक गोष्ट आमच्या नक्की लक्षात आली होती की हे दोघे म्हणजे साधेसुधे काम नसून उच्च कोटीचे साधक आहेत. सोनार जसे तापवून व इतर प्रक्रिया करून सोने व इतर धातू गोळ्यापासून वेगळे करतो व खरे कसदार सोने बाजूला काढतो तसे ह्या परमार्थ मार्गातील ज्ञानी कसदार अशा उच्च साधकांची भेट आज माईने आम्हाला इथे घडवून आणली होती. ते आम्हाला म्हणाले दररोज कितीतरी परिक्रमावासी येतात व जातात पण आज तुमच्याशी जसे मोकळेपणाने बोलणे झाले तसे कुणाशी या विषयावर बोलावे असे मनापासून वाटले नाही.
त्याचे मार्गदर्शनीय विचार ऐकण्यात आम्ही इतके रंगुन गेलो की बारा कधी वाजले ते आमचेच आम्हाला कळलेच नाही शेवटी त्यानी सांगीतले की आता भोजन प्रसादी घेतल्याशीवाय आम्ही तुम्हाला इथुन पुढे जाऊन देणार नाही.आम्ही पटकन भोजन प्रसादी बनवतो तोपर्यंत आपण साईबाबांच्या कुटीत बसून थोडा वेळ नामस्मरण करा.स्वामीजी स्वतः आम्हाला कुटीत घेऊन आले. काय माहीत नाही पण आत शिरल्यावरच काहीतरी वेगळी स्पंदने तिथे जाणवत होती.कुटीच्या मध्यमागी साईबाबांचा एक तेजस्वी फोटो ठेवला होता. कुठे भपकेबाजपणा नव्हता , फार डेकोरेशन केलेले तिथे दिसत नव्हते. पण आतले वातावरण खूप शांत ,मनाला एकाग्र करणारे असे होते. नक्कीच हा चांगल्या साधकांच्या उपासनेचा परिणाम असणार. स्वामीजीनी आम्हा तिघांना तीन जाड आसन बसण्यास दिली व म्हणाले तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्हीं इथे बसा. ते स्वतः आमच्या व इतर काही परिक्रमावासीयांचे जेवण बनवण्यासाठी स्वयपाकघरात गेले.
तिथे आम्ही डोळे मिटून शांत बसलो व एका वेगळ्याच ट्रान्समधे गेलो.खर म्हणजे आपल्या मनाची अशी धारणा झालेली आहे की या सगळ्या खोट्या पण खऱ्याचा आभास करणाऱ्या विषयापासूनच आपल्याला आनंद मिळणार पण इथे तर काहीं तरी वेगळेच होत होते , एवढेच मी म्हणेन जे काही होते ते शब्दातीत होते.पाऊण एक तास आनंदात कसा गेला हे तर मला कळलेच नाही,दारूडा जसा दारूचा अंमल चढला की त्या नशेत असतो तशी ही काहीतरी वेगळ्या आनंदाची नशा आम्ही अनुभवत होतो.
तासाभरानीं सुध्दा मला या मिळणाऱ्या आनंदाला मुकावे असे वाटत नव्हते. इथे मुक्कामाची सोय होत नसल्याने आम्ही मनाविरूध्द भोजन प्रसादी घेण्यास म्हणून बाहेर आलो ती सोय जर असती तर आजचा आमचा मुक्काम नक्कीच ह्या स्वर्गात झाला असता.
आमची भोजन प्रसादी झाली तेव्हा अजून काही परिक्रमावासी तिथे प्रसादी घेण्यास आले. मग उदयने पोळ्या लाटण्याची सेवा घेतली व स्वामीजी स्वतः पोळ्या भाजावयास बसले.माताजी बाकीची तयारी करू लागल्या व आम्ही दोघांनी परिक्रमावासीयांना प्रसादी वाढण्याची सेवा घेतली.
अर्धा तासाने आमची निघण्याची वेळ आली , मनात असूनही आज इथे थांबता येत नव्हते त्यामुळे त्यांना साष्टांग नमस्कार करून आम्ही तिथुन पुढे निघालो. नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ६९
नर्मदा परिक्रमा अनुभव ६९- साई रेवा आश्रयातील स्वामीजी व माताजी यांनी सांगीतलेले त्यांचे सर्व अनुभव व मांडलेले विचार , तिथुन बाहेर पडल्यावरही काही केल्या मनातून जात नव्हते. त्यामुळे त्याच विषयांवर बोलत आम्ही पुढचा मार्ग चालू लागलो. तेव्हा आईंनी नित्योपासनेत सांगीतलेल्या ओव्या सहज आठवल्या व जाणवले की या व्यवहारीक जगात राहून नित्य आनंदी राहण्याची कला त्यांनी लिलया साधली आहे व खरे सुख कुठे व कशात आहे हे त्यांनी पक्के जाणले आहे.आईनी त्यात स्वरूपाकार होणाऱ्या साधकाची स्थिती कशी असावी याचे सुंदर वर्णन आले आहे त्या सांगतात
अंतरी रहा सदा सावध, बाहेर दिसोदे नाना रंग I
साक्षीरूपी जगासी पाहता, अखंडता न पावे भंगI
निद्रे माजी निवृत जसा तू, राही तसा जागेपणी सदा I
तु सुख सिंधू विश्व लहरी, जाणूनी भोगी सुख सदा I आज आम्ही इथे आल्यावर प्रथम त्याना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तोच या सगळ्या विषयावर बोलताना दिसत होता , तोच आनंद पोळ्या भाजत असताना होता व तेच समाधानाचे , आनंदाचे भाव आम्ही निघताना होता.त्या स्वरूप स्थितीशी एकरूप राहून जगतव्हवहार करणे हे खरे तर किती कठीण काम मात्र ते दोघे ते लीलया पार पाडत होते.
प्रथम आपल्याला या परिक्रमा मार्गात लागते चाणोद, चंदोद या नावाने हे स्थान ओळखतात,चंड वधाचे क्षेत्र, चंड मुंड राक्षसातील चंडाचा इथे वध करण्यात आला, इथेच चंडिका देवीचे मंदीर आहे. तिचे दर्शन घेतले व जवळ असलेल्या रंगांवधूत स्वामींनी बांधलेल्या श्री दत्तात्रयांच्या मंदीरात जाऊन त्या स्थानाचेही दर्शन घेतले.
इथे उदयनच्या लक्षात आले की आपण आपला मोबाईल दूपारी आश्रमात पोळ्या करताना स्वयंपाकघरात ठेवला होता व नंतर ते डोक्यातून निघून गेल्याने तो तिथेच राहीला आहे. माझ्या मोबाईलवरून मातांजीना फोन लावण्याखेरीज दूसरा काही उपाय नव्हता. इथपर्यंत चालत येण्यास आम्हाला जवळ जवळ तास सव्वातास लागला होता, त्यामुळे नियमानूसार मागे फिरूनही परत आश्रमात शक्य नव्हते. फक्त मोबाईल त्याच्याकडेच आहे हे एकदा नक्की झाले की परिक्रमा संपल्यानंतर तो त्याच्याकडून आणता येणार होता.उदयनने माझ्या मोबाईलवरून मातांजींना फोन लावला व उदयन बोलत असल्याचे सांगीतल्यावर पलिकडून आवाज आला 'भाईसाहेब आप किधर तक पौहच गये हो , मैने एक आदमी को आपका मोबाइल लेके पहलेही मोटरबाईकसे भेज दिया है, आप अभी किधर तक पौहंच गये हो?आप बतायेंगे तो मै उसको फोन करके आपको मिलने के लिये बोल देती हूँ ' त्यांना आम्ही चाणोदला असल्याचे सांगुन आम्ही इथेच थांबतो असेही सांगीतले.
माझे विचारचक्र पुन्हा सूरू झाले, की आम्ही तो मोबाईल परिक्रमेनंतर तरी आणण्याबद्दल विचार करत होतो पण इथे तर सगळेच काम वेगळे होते. परिक्रमावासीयांच्या सोयीसाठी चहा, भोजन प्रसादी , मुक्कामाची व्यवस्था हे तर नित्याचे होतेच पण फोन विसरला तर तो पोहचावण्याची व्यवस्थाही आपणहून केली जात होती. काय म्हणावे या गोष्टीला, इथले सगळे कामच अजब !
आम्ही परिक्रमा झाल्यावर तो घेउन जाऊ असे काही बोलावयच्या आधीच मोबाईल आम्हाला परत मिळणाच्या मार्गावर होता.आपल्याकडे जर असा मोबाईल राहीला असता तर आधी थोडा वेळ तो बंद करून नंतर त्याचे सीम बदलून परत वापरला गेला असता किवा अगदी कुणा सभ्य माणसाकडे तो राहीला असता तर त्याच्याकडून असे सांगीतले गेले असते की मोबाईल आहे माझाकडे पण आपण आपल्या सवडीने माझ्याकडे येऊन तो घेउन जावा. पण इथे मात्र आमचा खोळंबा होऊ नये म्हणून आधीच माणूस मोबाईल घेऊन निघाला होता. मनात विचार आला या लोकांमधे हे प्रेम, ही आपुलकी किती सहजपणे भरून राहीलेली आहे ना?.माई असे रोज नवीन नवीन धडे शिकवत होती, आमच्यासाठी तो रोजचा नवीन गृहपाठ होता.संबध परिक्रमेत असे धडे वारंवार देत व्यवहारी जगातल्या तिच्या लेकरांना ती आपुलकीचे दर्शन घडवून त्याच्यात ही ज्योत नक्की पेटवली जाईल अशी तीला आशा होती.
पंधरा वीस मीनीटात आम्ही ज्या चहाच्या स्टालपाशी उभे होतो तिथे तो माणूस मोबाइल घेऊन हजर झाला.त्याने घेतलेल्या ह्या तसदीबद्दल त्यास धन्यवाद दिल्यावर तो म्हणाला 'उसमें क्या है ,आपकी सेवा करना इसका मतलब माई की सेवा करने जैसा है 'आम्ही माताजींनाही पुन्हा फोन करून आम्हाला मोबाईला मिळला असे कळवले.आज सकाळपासून आम्ही आतापर्यत चाणोद पर्यंत पोहचलो होतो यावरून आज तरी आम्ही तिलकवाडयाला पोहचण्याची शक्यता आता धुसर वाटत होती.
माईच्या किनाऱ्यावरील हा सगळा भाग बऱ्यापैकी उंचावर असून आपल्याला कुबेरभंडारी या स्थानाकडे पोहचण्यासाठी थोडया उंचावरून दोरीच्या मदतीने खाली उतरावे लागते.खाली पाणी फार नाही पाऊलभरच लागते व त्यातून आम्ही चालत ह्या स्थानापाशी आलो. उदयने सांगीतले की इथली अशी आख्यायिका आहे की एकादा कुबेराने पार्वतीदेवीकडे वाईट नजरेने बघीतले तेव्हा शंकाराने क्रोधीत होऊन त्यास कैलास पर्वता वरून ताबडतोब निघुन जाण्यास तर सांगीतलेच पण परत या भुमीवर कधीही पाय ठेवण्यास मज्जाव केला तेव्हा कुबेराने पश्चातापाने शंकराची झालेल्या चुकीबद्दल माफी मागीतली व इथे परत येण्यासाठी आपण काय करावे अशी विचारणा केली , तेव्हा श्री शंकराने त्याला नर्मदा किनारी जाऊन तप करण्यास सांगीतले. पुढे कुबेराने इथे येउन बरेच वर्ष तप केले तेव्हा त्याला श्री शंकर व विष्णू प्रसन्न झाले. म्हणून इथे कुबेरेश्वर हा शीवलींग स्वरूपात व विष्णुनी त्याला आपल्या भांडारगृहाचा अधिपती केल्याने भंडारेश्वर हा विष्णुरूपी शालीग्रामच्या स्वरूपात आपल्याला दर्शन घडते. असे म्हणतात की अनंत चर्तुथीला इथे सप्त चिरंजीव म्हणजे अश्वथमा, बली, परशुराम, बिभीषण,महर्षी व्यास,हनुमान व कृपाचार्य इथे स्नानास येतात त्यामुळे या पैकी एखादया चिरंजीवाचे दर्शन तेव्हा तिथे येणाऱ्यांना भावीकांना होण्याची शक्यता असते व यामुळे या दिवसाला इथे विशेष महत्व आहे. या दोन्ही मंदीरात जाउन आम्ही दर्शन घेतले. मंदीर अतिशय सुंदर रीतीने मीनावर्कने सजवलेले आहे. इथे कधीही भोजन प्रसादीची सेवा चालू असते पण आमचे आश्रमात व्यवस्थित प्रसादी झाली असल्याने आम्ही तिथुन पुढे निघालो.
इथुन पुढे आपल्या या मार्गांवर एक भव्यं दिव्य त्रिलोकसुंदीरीचे मंदीर लागते ह्या ठीकाणी देवीची अतिशय भव्य व सुंदर अशी मुर्ती आहे.तिथल्या मुख्य महंत मीराकुमारी माताजी तेव्हा तिथे नसल्याने आम्ही देवीचे दर्शन घेउन ते सुंदर रूप डोळ्यात साठवत पुढे निघालो. बाहेर सगळीकडे आता ढगाळ वातावरण झालेले दिसत होते. त्यामुळे लवकरात लवकर एखादया मुक्कामाच्या ठिकाणी पोहचणे गरजेचे होते त्यामुळे आता मुख्य रस्ता सोडून एका डोगराळ मार्गातून आमचा परिक्रमेचा मार्ग चालू झाला.पुढची सगळी वाट परत चढउताराची किधी मातीच्या रस्त्याची तर कधी दगडांच्या खाचखळग्याची हे सगळे पार करत जवळजवळ दीड तास चालत आम्ही मोरीयाच्या हनुमान मंदीरात पाहचलो.आजचा आमचा मुक्काम होता हनुमान मंदीरात म्हणजे एक वेगळाच आनंद होता पाहूया तो पुढल्या भागात नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा अनुभव ७०
मोरीयाच्या हनुमान मंदिरात आम्ही पोहचलो तेव्हा तिथे आमच्या आधी काही एमपी मधील परिक्रमावासी आलेले होते. मंदीराच्या बाजूला असलेल्या शेडवजा खोलीत आम्ही आमच्या सॅग ठेवल्या. मंदीराच्या बाबाजीनी आम्हाला हासत हासत 'आओं बाबाजी, आसन लगाईये ' म्हणून सांगीतले.
त्यानंतर सगळ्याचा घोटभर चहा झाला. बाहेर आकाशात ढगांनी खूप गर्दी केली दिसत होती, त्यामुळे साडेपाच वाजले अजूनही खूप अंधारल्यासारखे झाले होते. हे मुक्कामाचे ठीकाण म्हणजे एक छोटे श्री हनुमंताचे मंदीर त्याच्या बाजूला अर्धा कठडा असलेली छोटी शेड वजा खोली व त्याच्या बाजूला तिथल्या मुख्य महंतांची रहावयाची खोली अशी एकुण मंदीर कम आश्रमाची रचना होती. चहा पिऊन आम्ही सायं स्नानाला मंदीराच्या मागे दहा मीनीटावर असलेल्या स्वच्छ पाण्याच्या नाल्यापाशी गेलो. त्याच्या आजुबाजूला सगळीकडे भरपूर रानटी झाडे , उंच गवत उगवलेले होते.आम्ही तिथे पोहचलो तेव्हाही पाउस पडावयास सुरवात झाली नव्हती फक्त आभाळात काळ्या ढगांनी मस्त गर्दी केल्याने खूप काळोख झाला होता. तेव्हा मला परिक्रमा मार्गात पींपळखुटयाला असताना ओहळावर केलेल्या स्नानाची सहज आठवण झाली, फक्त तेव्हा पाऊस रिमझिम पडत होता आज फक्त त्याने काळोखी करून ठेवली होती. हा नाला दोन्ही बांजूनी सिमेट कॉक्रीटने बांधलेला व तेवढा खोल नव्हता पण खाली उरतून त्यात स्नान करणे मात्र क्रमप्राप्त होते. तिथे आम्हाला शिर्डी नाशीक बाजूचा महाराष्ट्रातील एक तरूण परिक्रमावासी भेटला जो पुढेही खूप ठिकाणी परिक्रमा मार्गात भेटत गेला. तोही तेव्हा तिथे स्नानास आला होता. आम्ही आज तिथे स्नान झटपट करून मंदीरात आलो. आपल्या प्रमाणे इथेही पाऊसाळी वातावरणाने आश्रमातील लाईट गेली होती किंवा घालवली होती. कंदील मेणबतीच्या प्रकाशात आमचा सगळा कारभार चालू होता.थोडया वेळातच सगळे मारूतीरायांसमोर आरतीसाठी जमले, दमदार आवाजात सगळ्या आरत्या झाल्या. त्यानंतर सगळे परिक्रमावासी बाजूच्या खोलीत गेले.भोजन प्रसादीस वेळ असल्याने मी मंदीरात रोजच्या नेमाचे म्हणावयास परत गेलो. मस्तपैकी मारूतीरायांसमोर बसुन हनुमान चालीसा, रामरक्षा व मारूती स्तोत्राचा पाठ झाला.मी एकटाच तिथे असल्याने आज हे गुणगान करताना एक वेगळीच मजा आली.
रामरक्षा म्हणताना स्तोत्रात असलेले मारूतीरायांचे सुंदर गुणगान
मनोजवं मारूततूल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् I
वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
मारूती स्तोत्रात सर्मथानी त्याचे कलेले कौतुक कीती यथायोग्य आहे याची जाणीव तेव्हा खूप प्रार्कशाने झाली.
या विश्वाचा सर्व कारभार शक्तिच्या कर्तुत्वाने चालू असतो व या शक्तिचे दृष्य स्वरूप म्हणजे पंचभुतातील हा वायुदेव. त्याचा हा पुत्र महाबली हनुमान तर त्याच्या इतकाच पराक्रमी म्हणुन सर्मथ त्याच्या सार्मथ्याचे वर्णन करताना म्हणतात
काळाग्नीं काळ रूद्राग्नी
देखता कापती भये ॥
तर दूसऱ्या ठिकाणी त्याला सौख्याकारी, दुःखहारी, लोकनाथा, जगन्नाथ,प्राणनाथ अशा किती तरी गुणानी त्याला मारूती स्तोत्रात संबोधले आहे.त्याला प्राणनाथ म्हणून दिलेले बिरूद तर त्याच्या गौरवाचे सर्वोच्य स्थान दर्शवते. कारण जीवसृष्टीमधे जीवाचा प्राण हाच आधार ,तो जर नसेल तर त्या जीवाचे असणे हे नसल्यासारखे म्हणजे व्यर्थ आहे त्यामुळे असा हा सर्वांचा प्राणनाथ !
या इश्वररूपातील प्राणनाथाचे स्थान इतके मोठे की देवानांही त्याचा कायम आधार वाटला कारण रावणाच्या बंदी शाळेतून यानेच सगळ्या देवतांची सुटका केली. अशा ह्या पराक्रमी वीराने आपले तन, मन सदा श्रीरामचंद्रांच्या स्मरणात त्याचा चरणांचा दास होऊन गुंतवुन ठेवले व नवविधा भक्तितील दास्य भक्ती म्हणजे केवळ व केवळ हनुमान हे आपल्या कर्तुत्वाने दाखवुन दिले व आज त्याचे गुणवर्णन मनात येताना खूप आनंद होत होता, तेव्हा सहज मनातं आले की आज आपल्याला या मारूतीरायांच्या मंदीरात त्याच्या सानिध्यात रहावयास मिळाले तर काय बहार येईल ! , पण हे महंत परवानगी देतील किंवा कसे याचा काही अंदाज येत नव्हता त्यामुळे नंतर त्यांना विचारून बघु असा विचार केला.थोडया वेळात बाहेर असलेल्या अंगणात सगळे भोजन प्रसादीस गोलाकार बसले. र्शिडीवाल्या परिक्रमावासीयाचा आज कसलासा उपवास असल्याने त्याने उपवासाची बटाट्याची भाजी केली होती व इथे आज भोजनप्रसादीस खिचडी असल्याने उदयन आज उपवास गटात सामील झाला होता. आमचे अर्ध जेवण झाले व पाउसाने आपल्या बारीक थेंबांनी हजरी लावण्यास सुरवात केली, हवेतील गारवा त्यामुळे अजूनच वाढला.
संगळ्याची भोजन प्रसादी झाली, आता पाउसाचा जोर थोडा वाढला पण फार वेळ न पडता थोडयाच वेळात पाउसाची रिमझिम थांबली.खूप महिन्यानी हा पाऊस पडत असल्याने उन्हाने तापलेली धरणीमाताही मनोमन खूष झाली व त्या आनंदाच्या भरात तिच्या उदारातून मस्त सुवास सगळीकडे दरवळू लागला .
इथे लाईट नसल्याने आज सगळ्यांची लगेच झोपावयाची तयारी सुरू झाली. परिक्रमेत बरेच वेळा साडेसहा सात पर्यंत भोजन प्रसादी होत असे, दिवसभर आमचे भरपूर चालणे होत असल्याने शरीर थकुन जाई व साडेआठ नऊ पर्यंत कधी डोळा लागत असे ते कळतही नसे. पण त्याचा फायदा मात्र असा होई की पहाटे चार साडेचार पासून अगदी सहज जाग यई.
आम्हीही त्या मुख्य साधुना विचांरून मारूतीरायांच्या मंदीरात एका बाजूला निजावयाची परवानगी मागीतली,त्यांनीही ती परवानगी आनंदाने दिली त्यामुळे माझ्या मनात मगाशी आलेली इच्छा मारूतीरायांनी पूर्ण केली, उदयन व बापूलाही आज मारूतीरायांच्या सानिध्यात आपल्याला रहावयास मिळणार असल्याने खूप आनंद झाला. तिथे आम्ही तिघेच असल्याने इतर वायफळ बडबड नव्हती त्यामुळे रात्री झोपताना त्यांच्या मुखकमलाकडे बघता बघता कधी डोळा लागला ते कळलेच नाही.
सकाळी लवकर उठून स्नान, संध्या,पुजा करून मारूतीरायांचा निरोप घेतला व आम्ही आता पुढच्या म्हणजेच तिलकवाडयाच्या मार्गाला लागलो, आताही आभाळ पुर्ण काळ्या ढगांनी अच्छादलेले होते पाऊस कधीही परत बरसायला सुरवात करू शकत होता. त्यामुळे भराभर पाय उचलत आम्ही तो मार्ग आक्रमित होतो. माझ्या उजव्या पायाला परत थोडी सुज येऊन मधुनच कधीतरी ती शिरही दुखावयास सुरवात झाली होती. त्यामुळे आता लवकारात लवकर आम्हाला तिलकवाड्याचा विष्णुगीरी महाराजाचा आश्रम गाठायचा होता. साधारण नऊ साडेनऊच्या बेताने आम्ही तिलकवाड्याला पोहचलो. गावातून जात असताना पुढे सहजच एका बाजूला पाणीपुरीची गाडी घेऊन एक माणूस उभा असलेला आम्हाला दिसला. उदयन सहज आम्हाला म्हणाला की बाकीचे सगळे लोक कसे आपल्याला सकाळी चहा, बिस्कीट किवा कधी नाश्ता विचारतात तशी ह्यानी आपल्याला पाणीपूरी विचारली तर काय बहार यईल ना? त्याच्या गाडीवरून आम्ही पुढील मार्गावर जाण्यासाठी चालू लागलो पण त्यांनी काही आम्हाला पाणीपूरी खाण्यासाठी विचारले नाही या गोष्टीवरून आम्ही तिघही तेव्हा पुढे जाऊन सहजच मनापासून हसलो.
दहा मिनीटात स्वामींच्या आश्रमात पोहचलो. विष्णुगीरी महाराजांनी आनंदाने आमचे स्वागत केले. 'आता पावसाचे चिन्ह दिसत आहेत त्यामुळे चार दिवस तरी आपण पुढे न जाता इथेच मुक्काम करायचा ' असे गेल्या गेल्याच महाराजांनी आग्रहाने सांगीतले. उदयने माझ्या पायाबद्दल सांगीतल्यावर तिथे असलेल्या सेवेकऱ्यांला त्यानी मला गाडीवरून डॉक्टरांकडे घेउन जाण्यास सांगीतले. माझ्या चेहऱ्यावरून मी गाडीवरून जाणार नाही हे त्यांच्या लगेच लक्षात आले असावे ,म्हणाले ' गाडीवरून नको का? ' ठीक आहे तु यांच्याबरोबर जा, डॉक्टर सांगितले काय ते. चालत दहा मीनीटावर असलेल्या डॉक्टरांच्या दवाख्यानात गेलो, डॉक्टरांनी पाय बघितला ,मला बद्रिकेश्वर आश्रमात असताना ज्या परिक्रमावासीयानी मलम लावण्यास दिले होते त्या ट्युबचा फोटा त्यांना दाखवला. तेव्हा त्यांनीही तसे काहीं घाबरण्याचे कारण नाही असे सांगुन,थोडी विश्रांती घेतली की सर्व काही ठीक होईल व ह्याच ट्युब मधील मलम रोज लावत जा असे मला सांगितले.
दवाखान्यातून परत आश्रमात आलो, तोपर्यंत तिथे सेवेत असलेल्या भगीनीनी आम्हाला गरम गरम चहा आणला. त्या चहाचा आस्वाद घेत असताना बाहेर धुमधडाक्यात पाउसाला सुरूवात झाली व त्यामुळे त्या गरमागरम चहाची लज्जत अजूनच वाढली.त्यामुळे पाहूया तिलकवाड्यातील विष्णुगीरी महाराजांबरोबरचे आनंदाचे श्रण पुढच्या भागात, नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव ७१
बाहेर जोरदारपणे पाउसाची झालेली सुरवात बघुन असे वाटले की तो आमची वासुदेव कुटी आश्रमात पोहचण्याची जणु काही वाटच पहात होता की काय कोण जाणे.कारण आम्ही पोहचलो व एक अर्धा तासात पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसत होती. धुमधडयाकात पाऊस बाहेर कोसळत होता.ह्या पावसानी मधे कुठे रस्तात जर आम्हाला गाठले असते तर आम्ही पूर्ण भिजलो असतोच पण सॅगमधील सगळे कपडे, स्लिपींग बॅगपासून सगळेच ओले चिंब झाले असते. कारण आज सकाळी चालत असताना मधल्या काही परिक्रमा मार्गात कुठेही आडोसा नव्हता,अशीच डोंगराळ पायवाट होती.त्यामुळे नंतर कुठेही जरा आडोशाला पोहचलो असतो तरी ओल्या कपडयानी तिथे थांबावे लागले असते. इतर वेळी मात्र हे पावसात चिंब भिजणे म्हणजे माझ्यासाठी एक सुखद पर्वणी झाली असती, पण आता परिक्रमेत असल्याने हे शक्य नव्हते.त्यामुळे वरूणराजाचे मनोमन आम्ही आभार मानले.
बाजूला असलेल्या मंदीरात जाऊन प.पु.वासुदेवानंद सरस्वतींचे दर्शन घेतले. पुर्वी टेंबे स्वामीनी इथे एक चार्तमास केला असल्याने ह्या स्थानाचे महत्व काही वेगळे आहे. महराजांशी थोडा वेळ परिक्रमेबाबत आमच्या गप्पा झाल्या कारण ओंकारेश्वरहुन आम्ही परिक्रमेला सुरवात केली त्या दिवशीही महाराज तिथे आम्हाला भेटले होते. शुलपाणीतील डोंगररांगा मधील थरार ते समुद्र पंचकोशी परिक्रमे पर्यंतच्या सगळ्या मार्गाबद्दल थोडे बोलणे झाले.
दूपारची भोजन प्रसादी झाली आज खूप दिवसांनी मराठी पध्दतीच्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेत होतो.दूपारच्या जेवणातच महाराजांनी आम्हाला सध्यांकाळच्या जेवणात पिठले भाकरी चालेल ना?, आवडते ना तुम्हाला? अशी आर्वजून विचारणा केली.आम्हा तिघांना तर तो बेत म्हणजे मेजवानीसारखाच होता त्यामुळे आम्हीही त्याला हसत हसत होकार दिला.
दूपारपासून महाराजांना फोनवर बातम्या येऊ लागल्या की गुजराथ किनारपट्टीवर जोरदार वादळ आल्याने आता परिक्रमावासीयांना समुद्र प्रवास पार करणाऱ्या बोटी सहा सात दिवस तरी बंद राहणार होत्या.सहजच माझ्या डोळ्यासमोर हनुमान टिकरीं, विमलेशश्वर इथले चित्र उभे राहीले ,आम्ही परिक्रमा मार्गात असतांना तिथे आलेल्या परिक्रमावासीयांची संख्या आठवून आता तिथे असलेल्या परिक्रमावासीयांना ही वादळाची परिस्थिती निवळेपर्यंत या थंडी पावसात असेच ताटकळत थांबावे लागणार होते याचे वाईट वाटले.त्यामुळे तिथे असणाऱ्या आश्रमांवरही सहाजीकच त्यांच्या व्यवस्थेचा ताण पडणार होता. बाहेर मस्तपणे पडत असलेल्या पाऊसाने आलेला गारवा व .आश्रमातील गरम गरम जेवण यामुळे दूपारी थोडा वेळ आमची झोप काढून झाली.
दूपारी तीन साडेतीनला अजून काही परिक्रमावासी आले. आमचा बरोबर समुद्र पंचक्रोशी परिक्रमा केलेले पाच सहा जण , भालोदला भेटलेले फाटक व त्यांचे स्नेही असे एकूण आठ नऊ जण एकदम त्या दूपारी आश्रमात आले. सगळ्यांना बरेच दिवसानी परत एकत्र भेटलो याचा आनंद झाला.
दूपारचा चहा झाल्यावर विष्णुगीरी महाराजांनी नर्मदा परिक्रमा,त्यातले नियंम या विषयी आमच्या मनात असलेल्या शंका किंवा आमच्या मनातले प्रश्न याचे छान निरसन केले. ह्या संर्दभातचे महाराजांचे विचार मी माझ्या सुरवातीच्या भागात लिहिले असल्याने इंथे थोडक्यात सांगतो.
महाराज म्हणाले नर्मदा परिक्रमेचे महत्व तर तुम्ही सगळे जण जाणताच त्यामुळे आता तुम्ही या आईची परिक्रमा तिचे अजाण लेकरू या नात्यानी करत आहात. परिक्रमच्या नियमांबद्दल म्हणाल तर मला सांगा आई व तिचे लकेरू ह्या प्रेमबधांत कुठले नियम असतात?तुमची परिक्रमा म्हणजे तरी काय आहे, एखादया तान्ह्या लेकराचे त्याच्या आईच्या अंगाखादयावर खेळणे आहे. मग त्या तान्हुल्याला जसे आपल्या आईच्या अंगाशी जाऊ नकोस असे सांगता येत नाही व ते आपल्या आईच्या कुशीतच अगदी निर्धास्त असते तशीच तुम्ही ही परिक्रमा करत आहात आपल्या आईसोबत, तिच्याशी खेळत ,बागडत , कधी हट्ट करत तर कधी तिच्याशी भांडत व दमलो भागलो की हट्टाने तिच्याच कुशीत आनंदाने विसावत . त्यामुळे त्यातून आनंद घ्या,नवीन नवीन गोष्टी ती ज्या काही दाखवील त्याचा विचार करा, त्यावर मनन करून आपल्या अंतरंगात बदल करण्याचा प्रयत्न करा. ती तुमचे आईच्या मायेने सर्व लाड पुरवील, कायम तुमच्या पाठीशी असेल. हे सगळे ऐकून खूप छान वाटले , परिक्रमेच्या पुढच्या मार्गासाठी एक नवीन दृष्टी महराजांनी दिली. पुढे म्हणाले नियम तर आपल्या शारिरीक तपासाठी आहेत, पण नियमांचे अवडंबर माजवू नका ,नाही तर त्यात फक्त रुक्षपणा येईल , नियम करायचे म्हणून होत राहतील पण त्यात ती माझी आई व मी तिचे लेकरू हे प्रेमाचे अतुट नाते राहणार नाही. ते नाते तुम्ही विसरून जाल व मग हाईल परिक्रमा फक्त शरीराने. तसे न करता तिच्यावर असलेल्या उत्कट प्रेमाने ही परिक्रमा होऊ द्या. ती माझी आई आहे ही प्रेमाची हट्ट करण्याची जागा तुम्ही विसरून नका.
आम्हा सर्वाना पुढच्या परिक्रमेतील मार्गासाठी हा एक मौलीक सल्ला होता.
त्यांनी सांगितलेल्या वरील गोष्टीवरून मला लक्षात आलेला मतितार्थ म्हणजे जे काही घडत आहे ते तीची इच्छा आहे असे समजून त्यात आपला अहंपणा, अट्टाहास न घालणे. म्हणजे थोडक्यात संपूर्ण शरणागती, किंवा सरंडर हा भाव ठेवला म्हणजे आपली परिक्रमा त्या लहान मुलाप्रमाणे तिच्यावर विसंबुन होईल. कारण त्या लहानग्याचे विश्व फक्त त्याची आई , बाकीचे तो काहीच जाणत नाही तिच्याशीच ते खेळते,हट्ट करते,हक्काने तिच्या मांडीवर बसते, आपले बोबडे बोल बोलते व तिच्याच कुशीत र्निधास्तपणे विसावतेही. आपलीही परिक्रमा अशीच निर्धास्तपणे,तिच्यावर असलेल्या प्रेमाने व आनंदात पूर्ण झाली म्हणजे तिलाही आनंद हाईल की माझे लेकरू परिक्षेत खऱ्या अर्थाने पास झाले.
संध्याकाळी दत्त मंदीरात आरती झाली तेव्हाच असे ठरले की आता आलेल्या परिक्रमावसीयात श्री खापेकर हे उत्तम र्कितन करणारे आहेत त्यामुळे आताच्या भोजन प्रसादी नंतर त्यांनी थोडा वेळ प .पु.वासुदेवानंद सरस्वतींपुढे र्किंतन सेवा करावी.
आम्ही सगळे रात्रीच्या भोजन प्रसादीला बसलो, दूपारी म्हणल्याप्रमाणे पिठले भाकरी या ऐवजी आता बरेच परिक्रमावासी आल्याने मस्त गरम गरम खिचडीचा बेत होता. आमच्या जेवणाच्य थाळी मधे एक छोटा बाऊल ठेवला होता, कशासाठी तो आहे ते कळत नव्हते,कदाचित कढी किंवा ताकासाठी असेल असा आम्ही अंदाज केला. पण बघता बघता सवेकरी पाणीपुरीच्या पुऱ्याची पिशवी व पाणी असे घेऊन आले व आम्हा तिंघांना खूप हसायला आले.बाकीच्याना व महाराजांना दोन मीनटे आम्ही का हसतो ते कळेना तेव्हा उदयननी सकाळच्या पाणीपुरीच्या गाडीजवळचा प्रसंग सगळ्यांना सांगीतला व मग मात्र महाराजांपासुन सगळेच मनापासून हसले. अगदी सहजपणे व गमतीने उदयननी सकाळी व्यक्त केलेली इच्छा माईने इथे आश्रमात आशा रीतीने पूर्ण केली होती. त्यामुळे हा एक नवीन धडा आमच्यासाठी होता की यापुढे तरी आपण परिक्रमेत तिच्याकडे काय मागावे, आपल्या या जन्माचे कल्याण का आपल्या जीभेचे कल्याण?हा अनुभव जरी आला तरीही पुढे परिक्रमेत जन्मोजन्मीच्या संस्कांरामुळे सहजच या अशा इच्छा आमच्याकडून व्यक्त झाल्या व तीनेही त्या प्रेमाने सहज पुरवल्या.
भोजन प्रसादीनंतर मंदीरात श्री खापेकरांचे सुंदर र्कितन झाले. सगळ्याचे मन त्याच्या र्किंतनाने भगवत प्रेमात रमून जाऊन एक छान आनंद सगळ्यांना मिळाला.
आम्ही परत आमच्या आसनस्थानी निजावयास आलो. रात्री मधुन मधुन जेव्हा पायात कळ आल्याने जाग येत होती तेव्हा बाहेर पाउसाची रीप रीप तर कधी जोरदार सर चालू असलेले कळत होते.
दूसऱ्या दिवशी सकाळनंतर मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे आम्ही महाराजांपाशी पुढे जाण्यासाठी विचारणा केली तेव्हा त्यानी दूपारच्या भोजन प्रसादी नंतर आपली इच्छा झाल्यास आपण निघावे असे सांगीतले. त्यामुळे दूपारच्या भोजन प्रसादी नंतर आम्ही महाराजांना नमस्कार केला त्याचे आर्शिवाद घेतले व त्यांच्या आदीवासी आश्रमशाळेच्या कार्यासाठी म्हणून आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे अर्पण केले. हे मी इथे मोठेपणासाठी लिहीत नाही कारण ती रक्कम खरतर ते करीत असलेल्या कार्यापुढे खूप छोटी होती, पण मनात हेतू फक्त हाच होता की आमच्याकडूनही या त्यांच्या कार्याला खारीच्या वाटी इतका हातभार लागावा.
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ७२-
तिलकवाडयाहून आम्ही दूपारी निघालो व आज आम्ही ठरवलेले मुक्कामाचे ठीकाण होते आखतेश्वर. आगस्त्य मुनीची ही तपोभुमी, खरं त्या जागेचे नाव होते आगस्तेश्वर त्याचा अपभ्रंश होत होत आता ते झाले आहे आखतेश्वर.
अजूनही बाहेर वातावरण तसे ढगाळलेलेच होते मात्र पाऊसाच्या सरी पडावयाच्या मात्र थांबल्या होत्या. आम्ही तिथे साडेपाचपर्यंत पोहचलो. हे ठिकाणही थोडे उंचावरच आहे. खूप शांतता असलेला हा स्वच्छ व छान आश्रम. तिथल्या महंतांनी आम्हाला दिलेल्या खोलीत आमची आसन लावून, आमची सायं स्नान, माईची पुजा , आरती केली. नंतर बाहेरच्या आवारात येऊन पायऱ्या वर बसलो. सहा साडेसहाला जवळच्या गावातील मुले मुली एकापाठोपाठ एक येऊ लागली,अगदी बालवाडीपासून ते सातवी आठवीपर्यत सर्व वयोंगटातील मुले मुली जमा झाली.बाहेरच्या व्हरंड्यात सगळे मुले मुली शिस्तीत बसली. आता त्याची नित्याची पार्थना म्हणावयास सुरूवात झाली. त्यांची ती सांघीक उपासना ऐकून खूप छान वाटले .किती सहजपणे मुलांवर हे चांगले संस्कार होत होते व ते ऐकता ऐकता माझे लहानपण सहज डोळ्यासमोर आले. आता हया सगळ्या गोष्टी शहरात तर बंद झाल्यासारख्याचं आहेत कारण घरात या सगळ्याची जागा आता टिव्ही, काँप्युटर, मोबाईलने घेतली आहे, आई वडील ऑफीसमधून घरी ऊशीरा येत असल्याने, संध्याकाळचे शुभंकरोती, श्लोक, रामरक्षा हे सगळे आता बाद फेरीत गेले आहे त्यामुळे या सगळ्या मुलांचे मनापासुन खूप कौतुक वाटले. सगळेजण हसत खेळत,आनंदाने तिथे हजर झालेले होते कुणाच्या चेहऱ्यावर जूलमाचा रामराम नव्हता, हा थोडी फार काही मुलांची दंगामस्ती चालू होती पण ते वयानुसार चालणार होते पण तिथे ती येत होती हे जास्त महत्वाचे होते कारण दररोज कानावर पडणाऱ्या प्रार्थनेमुळे व म्हणण्यामुळे त्याच्यातील ते अवगुण आपसुकास गळून पुणार होते.रोज मिळणाऱ्या प्रसादाच्या ओढीने तरी, ही सगळी तीस एक मुलामुलींची वानरसेना रोज इथे येउन करीत असलेल्या सांघीक ऊपासनेमुळे नकळत चांगल्या संस्काराचे बीज त्यांच्यात रुजत होते. हे सगळे चित्र बघुन मला सहज हरिमंदीरात आईंनी लहान मुलांसाठी सुरू केलेल्या "बोलापासना " ह्या उपासनेची आठवण झाली. मुलांना शाळेला रविवारी सुट्टी असते म्हणुन दर रविवारी सकाळी बोलापासना ही एक तासाची उपासना हरिमंदीरात घेतली जाते.आई देहात असताना अनेक भजनाला येणाऱ्या भगिनी आईंसमोर आपल्या मुलांच्या खोड्या किंवा तक्रारी सांगत व त्या खोड्या कमी होण्यासाठी म्हणुन आम्ही काय उपाय करू असा प्रश्न विचारीत. तेव्हा आईंनी ही बालोपासना म्हणजे छोटी उपासना सर्वासांठी व विशेषतः छोटया बाळगोपाळांसाठी म्हणुन मंदीरात सुरू केली.त्यामुळे बालगोपाळांकडून सहजच एका जागी बसून तासभर देवाचे नाम घेणे होई व लहान वयात मुलांचे लक्ष सहजच त्या म्हणण्याकडे एकाग्र होऊन त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण होऊन पुढे शिक्षणातही त्यांची चांगली प्रगती झालेली आहे हे अनेक पालकांच्या लक्षात आले. सदगुरूंनी दिलेल्या भगवंताच्या नामाचा महिमा हा अगाध असायचाच.
ह्या उपासनेमुळे लहान वयात त्यांच्यावर चांगले संस्कार तर झालेच पण अशी उपासना करवून घेऊन भगवंताच्या नामाची गोडी त्याच्यात निर्माण करणे हा ही त्यामागील आईंचा एक हेतू होता.
प्रसाद घेऊन सगळी मुले पसार झाली.ती सगळी मुले गेल्यावर तिथल्या महंताशी बोलताना कळले की रोज ही सगळी मुले इथे संध्याकाळी येऊन प्रार्थना म्हणून जातात.
सकाळी आमचा नित्यनेम आटोपून लवकरच आम्ही तिथुन निघालो व मार्गक्रमण करत पुढे गुरुडेश्वरला पोहचलो .
गरूडेश्वर - गरूडेश्वर या स्थानाचा अपार महिमा आपल्या पुराण काळापासुन आहे.पूराणात असे सांगीतले आहे की इथे गजासूर नावाचा दैत्य राहत असे.हत्तीच्या रूपात गरूडाशी झालेल्या युद्धात गरूडांनी या दैत्याचा नाश केला .तेव्हा त्याची हाडे या डोंगरवर तशीच पडून राहीली व पुढे काळाच्या ओघात ती हाडे नर्मदा माईच्या जलात वाहुन आल्याने माईच्या अलौकीक स्पर्शाने त्या राक्षसाला पुन्हा दिव्य देह प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी इथे केलेल्या घोर तपश्चर्येला श्री महादेव प्रसन्न झाले व त्यास त्यानी वरदान दिले की जो मनुष्यप्राणी या ठिकाणी स्नान ,संध्या, देवपूजा, दान, तर्पण करेल त्याच्या सर्व पापांचे क्षालन होईल.
गजासुराने मागीतलेल्या वरानुसार त्यास त्यांच्या गणात स्थान देउन त्याच्या शरिराचे चर्म शंकराने धारण केले.
गरूडामुळे मला मृत्यु आला व माईच्या जलाने हा दिव्य देह मला प्राप्त झाला म्हणून श्री शंकराचे नाव गरूडाबरोबर जोडून त्यांनी इथे कायम वास्तव्य करावे व आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात या मागीतलेल्या वरासही त्याच्यावर संतुष्ट होऊन महादेवांनी त्यास दोन लींगांची स्थापना करण्यास सांगीतली त्यातील एक गरूड लींग ज्याची स्थापना गजासूराने पर्वतावर केली जे आज गरूडेश्वर महादेव या नावानी प्रसिद्ध आहे व दूसरे लींग माईच्या किनारी स्थापन केले ,त्याचे कारणही महादेवांनी सांगीतले की तुझ्या देहाची कवटी माईच्या जलात पडली व त्या दैवीजलाने तुला हा पुण्यमय देह प्राप्त झाला म्हणून माईची किनारी एक लिंग स्थापन कर जे करोटेश्वर महादेव या नावानी प्रसिध्द आहे.
या ठिकाणी नारंदांनीही तपश्वर्या करून हरीहरांना प्रसन्न करून एका लिंगांची स्थापना केली ते आज नारदेश्वर महादेव मंदीर या नावाने प्रसिध्द आहे.
नर्मदा पुराणात असा उल्लेख आहे की एकदा गरुडाला गर्व झाला की मी विष्णुचे खास वहान ,माझ्याशिवाय देवाचे पानही हलत नाही, मीच त्यांचा सगळ्यात जवळचा व लाडका. हा त्याचा गर्व दूर करण्यासाठी श्रीविष्णुनी त्यांस इथे तपसाधना करण्यास सांगीतली म्हणुन या स्थानाचे नाव गरुडेश्वर असे पडले.
गरूडेश्वर या स्थानाचे अजून एक महत्व म्हणजे हे स्थान वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी याचे वास्तव्य स्थान. दत्तप्रभुंचे उपासक व ज्यांनी श्रीदत्तात्रयांवर मराठी व संस्कृत मधे खूप मोठ्या प्रमाणात काव्यरचना, श्लोक असे ज्ञानभांडार निर्माण केले की जे आजही सर्वसामान्य लोकांना उपासनेसाठी उपलब्ध आहे. असे हे आचारनिष्ठ दंडी सन्यासी श्री टेंबे स्वामीं यांनी इथे खूप वर्ष उपासना व तपश्चर्या केली.महाराजांनी १९१४ मधे नर्मदा माईच्या कुशीत येथे समाधी घेतली त्यामुळे त्यांचे समाधी मंदीर व समाधी समोर असलेले पाषाणातील पादूका मंदीर ह्याचे आपल्याला दर्शन होते. या पादुकांविषयी एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे अशी की महाराजांच्या अंतिम समयी तेथे सेवेस असणाऱ्या सेवेकऱ्यास महाराजांनी कमंडलू, छाटी व वस्त्र यापैकी तुला काय हवे असेल ते तु माझी आठवण म्हणून मी तुला देतो असे सांगीतले. पण तो भक्त मात्र त्यांच्या पादूकांसाठी हट्ट धरून बसला. महाराज तर पायात कधीही पादत्राण धारण करीत नसल्याने त्याच्या प्रेमळ हट्टासाठी त्यांना त्यास नर्मदेतील एक मोठा गोटा आणावयास सांगीतला व त्यावर महाराज आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी तीन तास उभे राहिले. तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या गोटयावर महाराजांच्या पदकमलाच्या खुणा उमटल्या. पुढे त्या भक्तानी त्याची स्थापना इथेच केली व पुढे मंदीराच्या जीर्णोध्दार प्रसंगी त्याची स्थापना समाधी मंदीरासमोर झाली.
दत्त मंदीर- महाराजांच्या एका भक्ताने ही दत्त महाराजांची सुंदर मुर्ती महाराजांना अर्पण केली व त्याची प्रतिष्ठापना दत्त आज्ञने येथे झाली, पुढे अशा या भव्य दिव्य वास्तूची स्थापना झाली. आजही अनेक दत्तभक्त या स्थानाला आर्वजून प्रेमाने भेट देण्यास येतात.
गरूडेश्वरला मंदीराच्या आवारात पोहचलो व मनाला परत एकदा वेगळाच आपलेपणाचा बांध जाणवला. दोन तीन वर्षापुर्वी जेव्हा गरूडेश्वर व नारेश्वरच्या भेटीस आलो होतो तेव्हापासून गरूडेश्वर ह्या स्थानाचा एक वेगळाच आपलेपणा जडला होता. लग्न झालेल्या मुलीला जसे माहेर व सासर अशी दोन घरे असतात त्यात तिला माहेरचे आपलेपणा कायम वेगळे वाटते तसा त्यां भेटीपासून माझे गरुडेश्वरशी एक माहेरचे नाते जुळले होते.
हातपाय धुवुन दत्त मंदीरात प्रवेश केला.दत्त जयतीच्या भजनात म्हंटले जाणारे व घरीही माझ्या तोंडात सहज येणारे दत्त प्रभुंचे भजन मी सहज गुणगुणु लागलो
दावी रे दत्ता चरण तुझे सुखधाम व्रत आचरीले I नेमही केले |नोहे बा आराम॥१॥
दावी रे दत्ता शास्त्री धुंडिले| योगही साधिलेI कर्में ती निष्काम ॥२॥
दावी रे दत्ता धन्य दर्शन| करिसी दत्ताI होईन पुर्णकाम॥३॥
दावी रे दत्ता चरण तुझे सुखधाम
आज हे पुर्ण सुखधाम परिक्रमेत प्रत्यक्ष डोळ्यानी पहात होतो, त्याचा आनंद अनुभवत होतो., दत्तात्रयांची सुंदर हसरे तेजस्वी ध्यान मनाला आनंद देत होते. त्यांना परिधान केलेली वस्त्रे ,फुलांचे हार यानी दत्त महाराजांचे सौंदर्य अजूनच खुलले होते. मंदीरातील शांत व पावित्र वातावरणाने आमचे मन प्रसन्न झाले ,खर तर याचे सारे गमक तर टेंबे स्वामींच्या उपासनेत व तपश्चर्चेत आहे.
स्वामींच्या समाधी मंदीराचे दर्शन घेतले व मन शांत झाले. उपासनेचे सार्मथ्य, तेज काय असते ते या अशा स्थानाला गेल्या वरच कळते.मंदीरामागे माईचा वाहत असलेला शांत ,संथ प्रवाहही आनंदात भर घालत होता.
तिथुन बाहेर परत आवारात आलो तेव्हा परत तिलकवाडयाचे आमचे सगळे परिक्रमावासी भेटले. श्री.फाटकांचा सर्व मित्रपरिवार व नातेवाईक त्यांना इथे भेटावयास आले होते.त्यांच्याशी आमची ओळख फाटककाकांनी करून दिली. बाहेरच्या स्टॉलवर मस्त गरमागरम चहा घेउन आम्ही परत मंदीरात आरतीसाठी आलो.
उदयन गेल्या परिक्रमेत चार दिवस यतींच्या सेवेसाठी इथे मुक्कामास असल्याने तिथल्या गुरुजींनी उदयनची विचारपूस केली.आम्हाला तिघांना दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून वस्त्र अर्पण केले.
निघताना परत दत्त प्रभुंचे ध्यान डोळे भरून पाहताना आईने लहानपणी पाठ करून घेतलेली दत्त प्रभुंच्या स्तुतीच्या ओळी मनात आठवल्या
दत्तासी गाईन,दत्तासी पाहिन , वाहीन हे मन दत्ता पायी , दत्त स्वयंरूप, दत्त मायबाप, माझे त्रिविध ताप, दत्त वारी, दत्त ज्ञानज्योती, दत्त गुरू मुर्ती ,दत्त हरि भ्रांती,माणीकाची
लहानपणी म्हणताना त्याचा अर्थ तितकासा कळत नसे, फक्त आई सांगत आहे की हे चांगले आहे म्हणून म्हणावयाचे असे म्हणून म्हणणारा मी, ते संस्कार आपल्या आत लहानपणी किती छान रुजत असतात याचा अनुभव घेत त्याचा खराखुरा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो.
आज इथे न थांबता परत कधीतरी शांतपणे फारशी गर्दी नसताना परत येण्याचा मनोमन आम्ही निश्चय केला व परिक्रमेच्या पुढच्या मार्गासाठी प्रयाण केले. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा ७३-
गरूडेश्वरहून १०.३० वाजता आम्ही परिक्रमेच्या पुढच्या मार्गासाठी निघालो.आज कुठे मुक्कामाला पोहचावयाचे असे नक्की काही ठरवले नसल्याने सध्यांकाळ पर्यंत कुठपर्यंत पोहचतो तिथे आज विश्राम करावयाचा असे मनोमन ठरले.
डोळ्यासमोर मात्र आताच ज्यांचे दर्शन घेतले त्या गरूडेश्वर मंदीरातील दत्तगुरूंचे ध्यान येत होते त्यामुळे ते आठवत परिक्रमेचा पुढचा मार्ग आम्ही चालत होतो.आता पुढचा सगळा रस्ता हा छोटया छोट्या गावातून जात होता त्यामुळे तो सगळा मार्ग मातीच्या रस्त्याचा तर कधी बारीक वर आलेल्या खडीचा होता. हा बारीक खडीचा किंवा दगडांचा रस्ता चालण्यास खूप त्रासदायक होई ,एक वेळ माईच्या किनाऱ्यावरील उंचसखल भाग जो कधी थोड्या काटया कुटयांचा तर कधी शेतातल्या चिखलातला तर कधी वाळूतला असे पण तोही आम्ही अगदी उत्साहाने व आनंदाने चालत पार करावयचो. खर तर याचे सारे श्रेय आहे त्या माईकडे ! बाजूने शांत पणे वाहत असलेला माईचा नयनरम्य पण अश्वासक प्रवाह व मिळणारा तिचा सहवास हे मनाला असीम आनंदाची अनुभुती देत असे. तीच्या जलाचा होणार स्पर्श म्हणजे एक वेगळीच गंमत असे, एखादा लहान अवखळ बालक आपल्या आईबरोबर जसे आपले खेळ खळतो व तेव्हा त्याची आईही जशी त्याच्या बरोबरची होउन त्याच्या खेळात सामील होते तशीच ही वाहणारी माई आम्ही परिक्रमेत तिच्या बरोबर खेळत असलेल्या खेळात सहभागी होऊन एक वेगळाच आनंद देत असे. तिचा वाहणारा स्पर्श मनाला व डोळ्यांना आनंद व उत्साह देउन जाई.पण हा अर्धवट वर आलेल्या दगडांचा व खडीचा रस्ता म्हणजे धड एका लयीत चालणेही होत नसे व पायाला पडलेल्या भेगाही त्या खडीमुळे ,दगडांच्या उंच सखलपणामुळे खूप दुखत ,कधी कधी तर या दुखण्यामुळे चालणेही नकोसे वाटे.
आम्ही उंड़वा मार्गाने जाऊन प्रथम लागणाऱ्या हनुमंतजीच्या मंदीरात त्या महाबली हनुमानाचे दर्शन घेतले व साडे बारापर्यंत नानी अंबाजी मंदीरापर्यंत पोहचलो. नानी अंबाजी मंदीराला जाण्यासाठी आपल्याला थोडया पायऱ्या ऊतरून खाली जावे लागते. एका बाजूला मंदीर असून त्यांत तांदळा स्वरूपातील देवीचे आपणास दर्शन होते. आम्ही तिथे आईचे दर्शन घेतले व बाहेरच्या आवारात आलो. मंदीरातील सेवेकऱ्यांनी आता आपण इथुन भोजन प्रसादी घेऊनच पुढे जावे असे आम्हास सांगितले कारण तिथे पंधरा वीस मीनीटात भोजन प्रसादी तयार होत होती.
आज सकाळी आमचे कपडे म्हणजे लुगी व डोक्याला बांधायचा छोटा पंचा हे आखतेश्वरहुन निघताना पूर्ण वाळले नव्हते ,तिथे सकाळी असलेले धगाळ वातावरण व आमचे तिथुन लवकर झालेले प्रस्थान यामुळे ते अर्धवट ओले कपडे तसेच सॅगमधे भरले होते त्यामुळे ते कपडे वाळणेही गरजेचे होते त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या एका दोरीवर ते वाळत घातले व परत एकदा शांतपणे मातेचे दर्शन घेण्यास गेलो. अर्धा तासानी आम्ही व अजून काहीं परिक्रमावासी तिथे भोजन प्रसादीस बसलो.
भोजन प्रसादीसाठी इथेही उदयनची मनापासून आवडती अशी खिचडी होती.सकाळपासून आमचे खर तर काहीच खाणे झाले नव्हते पण मलाही त्या दिवशी फारशी भुक नसल्याने थोडी खिचडी खाऊन आम्ही तिथुन पुढे प्रस्थान केले.आता इथुन पुढे सरदार सरोवर डॅम असल्याने माईच्या बाजुने जायचा रस्ता नाही त्यामुळे छोट्या गावागावातून आम्ही संध्याकाळी साडेपाच पर्यंत वगाचला पोहचलो.वगाचला आहे वाघेश्वर महादेव मंदीर. मंदीराचा परिसर बागेसारखा असून त्यात एका बाजूला आश्रम आहे.तिथेच थोडया उंचावर महादेवाची भलीमोठी जूनी मुर्ती असून ती लांबुनही कुणाच्या दृष्टीश्रेपात पडते. आत मंदीर असून त्यात शिवपींडी स्थापन केलेली आहे. एका बाजूला स्वच्छतागृह आहे यात संडास ,बाथरूमची सोय केलेली आहे पण जे खूप अस्वच्छ आहेत. पण या अस्वच्छतेला थोड्या फार प्रमाणात परिक्रमावासीही कारणीभूत आहेत पण त्या बाबतीत मी इथे काही जास्त लिहीत नाही.
आम्ही त्या मंदीराच्या आवारात शिरलो , ह्या मंदीराच्या आवार हा भरगच्च झाडीने भरलेला आहे. थोडे आत शिरल्यावर डाव्या बाजूला एक पत्र्याची खोली होती व आत महाराष्ट्रातील दोन तीन वारकरी परिक्रमावासी खोलीत आडवे झालेले दिसत होते.त्यांची आसने खोलीच्या मागच्या बाजूला लावलेली दिसत होती व खोलीची पुढची बाजू मोकळी दिसत असल्याने आम्ही सहज त्यांना हया खोलीत पुढच्या बाजूला कुणी परिक्रमावासी आलेले आहे का? असे विचारले पण त्यांच्या चेहऱ्यावरून व देहबोलीवरून असे जाणवले की त्यांना आम्ही त्या खोलीत आमची आसने लाऊ नयेत असे वाटत होते त्यामुळे त्यांनी आम्हाला जरा उडवाउडवीची उत्तर देत म्हणाले ' ते आम्हाला काही माहीत नाही, तुम्ही आश्रमातील मुख्य सेवेकऱ्याला हे विचारा व ते जिथे सांगतील तिथे तुमची तुम्ही आसने लावा '. आम्ही थोडे पुढे जाऊन त्या मुख्य माणसाला भेटलो व आमची आसने त्या पत्र्याच्या खोलीत पुढे असलेल्या माकळ्या जागेत लावु का ?असे त्यास विचारले. त्यांनी आम्हाला त्या खोलीत आपण आपली आसने लावण्यासं हरकत नाही असे सांगीतले.
दोन तीन दिवस आधी पडलेल्या पाऊसामुळे हवेत आत्ताच चांगल्या पैकी गारठा होता त्यामुळे या पत्र्याच्या खोलीत मुक्कामाची सोय झाल्याने आम्ही सगळे एकदम खुश झालो.आम्ही खोलीत येऊन दरवाजाच्या उजव्या बाजूला एका रांगेत आमची आसने लावली.
मी सायंस्नान त्या बाथरूम मधे तर उदयन व बापूने मात्र बाहेर पाईप लावून केले. आमची नेहमीची पुजा व आरती करून मंदीरातील रात्रीच्या आरतीसाठी गेलो.
आरती झाल्यावर जेव्हा भोजन प्रसादीसाठी मागे गेलो तेव्हा बघीतले की एमपी मधील खूप सारे परिक्रमावासी आमाच्या नंतर तिथे आलेले दिसत होते. त्यामुळे मागे असलेली एक खोली व त्या पुढील व्हरांडा परिक्रमावासीयांनी पूर्ण भरलेला होता म्हणजे आज काही जणाना त्यां थंडीत व्हरंड्यात रात्री मोकळ्यावर झोपावयास लागणार होते.
सकाळी स्नान झाले, माईची पुजा आरती करावयाच्या आधी ,बाहेर व खोलीत थंडगार वातावरण असूनही माझ्यात व उदयनमधे असलेल्या तमोगुणानी आपले डोके वर काढल्याने आमच्यामधे थोडी शाब्दिक चकमक झाली. त्याची परिणीती म्हणजे सकाळी साडेसहाला जेव्हा आम्ही पुढचा मार्ग चालावयास सुरवात केली तेव्हापासून ते दूपारच्या बारा वाजेपर्यत आम्हा दोघात एकही शब्दाची देवाणघेवाण तर दूरच पण रस्तावरून चालतानाही रस्ताच्या एका बाजूने मी तर दूसऱ्या बाजूनी उदयन,आमच्या मागे बापूजी कधी त्याच्या बाजूनी तर कधी माझ्या बाजूने चालत होते. त्यामुळे एक गोष्ट मात्र छान झाली की सकाळपासून ते बारावाजेपर्यंत छान नामस्मरण झाले. आता भाखा हे शिवमंदीर असलेले स्थान आपणास लागते.
दूपारी साडेबारा वाजता चापरीया गावात रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या आश्रमातून भोजन प्रसादीसाठी बोलवण्यात आले. मां नर्मदा परिक्रमा आश्रम हे आश्रमाचे नाव असून, हा बंगला वजा आश्रम रस्त्याच्या अगदी बाजूला असून त्याचे आयोजक श्री प्रदिपकुमार जयस्वाल हे आहेत.
दूपारी तिथे भोजन प्रसादी होण्यास जवळ जवळ तास दिड तास गेला कारण आमच्या नंतरही अजून काही परिक्रमावासी तिथे पोहचल्याने सगळ्यांसाठी जेवण तयार होण्यात तेवढा वेळ लागणे हे नक्कीच अपेक्षीत होते.
दूपारच्या प्रसादी नंतर कवांट यथे असलेल्या कामेश्वर महादेव मंदीराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो इथुन पुढे आपल्याला दोन मार्गानी जाता येते. कारण हा भाग उत्तर तटावरील शुलपाणी झाडीच्या मध्यभागात येत असून, पुढे असलेले हाफेश्वर मंदीर सरदार सरोवरामुळे जलमय झालेले असल्याने माईच्या किनाऱ्यावरून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे कडीपानी वरून थोडे मागे जाऊन पुढे असलेल्या एक रस्त्याने एक परिक्रमा मार्ग जातो व दूसरा रस्ता उमराली वरून वखदगड कडे जातो. पहिल्या मार्गावर माईच्या बॅकवॉटरेचे पाणी खूप ठिकाणी भरले आहे त्यामुळे त्या मार्गाने आपण जाउ नये असे बऱ्याच स्थानीक रहिवाशांनी सांगीतल्यामुळे आम्ही दूसरा मार्ग जो वखदगडकडे जातो त्यामार्गाने पुढे गेलो. इथे आपण गुजराथ राज्यातून मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करतो. या ठिकाणी एक मजेशीर संवाद झाला, त्या बॉरडरला गस्त घालण्याऱ्या पोलीसाला आम्ही सहज विचारले ' यहाँ से एमपी राज्यकी शुरवात होती है ना ?' तेव्हा त्यांनी गमतीशीरपणे हसत हसत उत्तर दिले ' हां, महा पागल प्रदेश चालू हो गया ' आम्हीही तेव्हा त्याच्या बोलण्यार हसलो पण पुढे चालू लागलो. पण पुढे गेल्यावर त्याच्या त्या वाक्याचा उदयन व मी जसा विचार करू लागलो तसे लक्षात आले की खरच किती खरे बोलला होता तो पोलीसवाला. एक वेगळाच अर्थ लक्षात आला.उदयन म्हणाला महा पागल किती छान उपमा दिली ना त्याने जीसने भगवान को पा लिया , जो उसमे गला गया है वही सच्चा पागल है ,वोही सचा भक्त है जो उसकी भक्ती मे पागल हो गया है. खरच किती यथार्थ विश्लेषण केले उदयननी ,जो भगवंताच्या काय किंवा माईच्या प्रेमात पुर्णपणे रममाण झाला त्याच्या आतबाहेर प्रेमाशिवाय दुसरे काय असणार ?कारण परिक्रमेतील बराच मार्ग हा मध्यप्रदेश मधुन जातो व तिथे तिच्यावर प्रेम करणारे,तिच्या प्रेमाने न्हाहून निघालेले असे कितीतरी बाबा, बैरागी, साधु,सर्वसामान्य संसारी माणसे आम्ही परिक्रमेत खूप बघीतली की ज्याच्या शब्दाशब्दांतून तिच्या बद्दलचे फक्त प्रेमच प्रेम दिसले. जे तिच्यावर जीवापाड आपली आई या नात्याने प्रेम करतात व परिक्रमावासी म्हणून आपल्यावरही तशाच प्रेमाचा वर्षाव करतात.अशा मध्यप्रदेशमधील महापागल माणसांचे प्रेम आम्ही परिक्रमेत खूप वेळा अनुभवले.त्यांच्या बोलण्यातून ,वागण्यातून ते प्रेम खूप जाणवले. तो आपलेपणा, परिक्रमावासीची प्रेमाने करत असलेली सेवा म्हणजे माईची सेवा असे समजून ते आपल्यावर करत असलेले ते सरळ,सच्चे प्रेम बघून आम्ही परिक्रमेत खूप वेळा भारावुन तर गेलोच पण नंतर कधी परिक्रमेचा विषय निघाला की किंवा आत्ता हे लिहीतानाही ते सगळे मिळालेले प्रेम आठवले की मन त्या धाग्यात गुंतुन राहते. आशा ह्या सर्वं लोकांकडून मिळालेल्या ह्या प्रेमाच्या धाग्याची ताकद काय आहे हे इथे मला खूप वेळा जाणवते कारण परिक्रेमत मिळालेले हे प्रेम आता इथे रोजच्या व्हवहारात वागताना कळत नकळत सहज तसे व्यक्त व्हायचा प्रयत्न करते व मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. आईनी नित्योपासनेत या चराचरात असलेल्या परमेश्वराच्या प्रेमाबदल लिहतांना म्हंटले आहे
हरि प्रेमरूप, भक्त प्रेमरूप, अखिल जगत् प्रेमरूप | प्रेमाविण दुजे नाही चराचरी,
प्रेमचि सच्चिदानंद रुप I प्रेमरूप हरी, प्रेमरूप जग, अखंडैक्यत्वे नांदती l
प्रेमावाचुनि न दिसे काही निरखुन पाहता सारी क्षिती I
या स्थीतीचा अनुभव परिक्रमेत आपल्याला खूप वेळा येऊन मनाला एका विशाल प्रेमाची अनुभुती देण्याचे काम माई करते.
त्या दिवशी सध्यांकाळपर्यंत आम्ही थोडे ऊशीरा उमरीपर्यंत पोहचलो जिथे काजल मातेचे मंदीर आहे. पाहूया तिथला मुक्काम पुढच्या भागात. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ७४-
उमरीच्या काजल माता मंदीरात आम्ही ५.३० पर्यंत पोहचलो. तिथले महंत गिरीजानंदगीरी हे काही कामानिमित आम्ही तिथे पोहचलो तेव्हा दोन तीन दिवसांसाठी बाहेर गेले असल्याने त्यांची भेट मात्र त्या वेळी झाली नाही. तीन चार वर्षापूर्वी ते डोंबीवलीत उदयनकडे आले होते तेव्हा रामरायांच्या दर्शनाच्या निमीत्तानी आमच्याकडे येण्याचा योग आला होता त्यामुळे माझी त्यांच्याशी थोडी बहोत ओळख होती. आम्ही तिथे पोहचलो तेव्हा एम.पी.मधील काही परिक्रमावासी दूपारीच तिथे पाहचले होते असे त्यांच्या बोलण्यावरून समजले.त्यांची संध्याकाळच्या भोजन प्रसादीची तयारी तिथे चालू होती. हे सगळे परिक्रमावासी आम्हाला शुलपाणीत ,विमलेश्वर अशा बऱ्याच ठिकाणी भेटत गेल्याने आता त्यांच्याशी बऱ्यापैकी तोंडओळख झाली होती.त्यामुळे त्यांनी गेल्या गेल्या आमचे हसत हसतं स्वागत केले व उदयनला म्हणाले ' आओं महाराजजी' आमच्या तिघात महाराज किंवा आचार्य सारखी दिसणारी भारदस्त व्यक्ति म्हणजे उदयनच होती. गमतीचा भाग सोडा पण ज्ञान या दृष्टीने तो महाराज या पदासाठी खरच योग्य आहे.
आम्ही आतल्या खोलीत सगळ्यातं शेवटी आमची आसन लावली व खोलीच्या बाहेरच्या पॅसेजमधे सगळ्यात शेवटी असलेल्या भागात पाईप लावुन मस्त आंघोळी केल्या. इथुन माईं बरीच लांब असल्याने बोअरवेलच्या पाण्याला मशीन लावलेले असून ते पाणी पाईपने सगळीकडे फिरवले आहे. या पाण्याचे वैशिष्ठ म्हणजे पहाटेच्या थंडीतही यातून येणारे पाणी कायम उबदार असते.आम्ही आमची संध्याकाळची नित्याची पुजाअर्चा , नर्मदाष्टक, आरती केली.
त्या परिक्रमावासीयांनी आम्हाला तुमची संध्याकाळची भोजन प्रसादी आम्ही आमच्या बरोबर बनवणार आहोत असे गेल्या गेल्या अगदी आर्वजून व प्रेमाने सांगीतले असल्याने तिथे जाऊन आम्ही त्याना 'आपणास आम्ही काय मदत करू? 'असे विचारले. पण त्यानी त्यावर आम्हाला असे सांगीतले की 'हम बना लेंगे महाराजजी,आप तो अभी आये हो, थोडा विश्राम करो '.
त्याच वेळी महाराष्ट्रातील पुण्याच्या एका तरुण परिक्रमावासीचे तेथे आगमन झाले. आम्ही समोरच असलेल्या काजल मातेच्या म्हणजेच काली मातेच्या मंदीरात पोहचलो.
मध्य प्रदेशात धार प्रदेशातील पवार वंशाची ही कुलस्वामीनी. ह्या मंदीराची व मुर्तीची स्थापना त्याच्यांच वंशातील पुर्वजांनी केलेली आहे.
काली माता, हिंदू धर्मातील देवीच्या अनेक आवतारातील हा एक देवीचा प्रमुख अवतार . जगन्मातेच्या विविध अवतारातील दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी घेतलेला हा एक ऊग्र अवतार.रक्तबीज नामक दैत्याचा नाश करण्यासाठी मां दुर्गादेवीच्या नऊ अवतारातील हा एक अवतार.थोडक्यात म्हणजे अतिसुंदर अशा भगवती देवीचेच हे काळे शक्तिशाली रूप. कालीमाता म्हणजे माता जगदंबेचे महामाया रूप. कालीमाता म्हटल की आपल्या डोळ्यासमोर मुर्ति येते ती काळ्या कभीन्न रंगाची, रक्तानी लाल होऊन पूर्ण बाहेर आलेली तीची जीभ,चेहऱ्यावरील व डोळ्यातील उग्र भाव ,गळ्यात मुंडक्याची माळा , चार हातापैकी वरच्या एका हातात खडग, खाली असलेल्या हातात मुंडक, दूसऱ्या बाजूचा एक हात वर देणारा तर दूसरा हात अभय देणारा , तर कटी प्रदेशावर वस्त्र पण ते कसले तर खांदयापासून तुटलेल्या हातांचे ! असे हे शंकराच्या छातीवर ऊभे असलेले रुद्ररूप.
रामकृष्ण परमहंसांची हीच ती आई जिने त्यांना साध्या पुजारी या पदापासून पसमहंस या पदापर्यंत नेले म्हणजेच तिच्यावर अनन्य भक्ती व दृढ विश्वास ठेवणाऱ्या भक्तावर पुर्ण कृपा करणारी दयामय आई पण हीच. आताही आम्ही त्या शक्तिचे तेच विराट रुप गाभाऱ्यात पाहत होतो.
सात वाजता मंदीरात देवीची व नर्मदा माईची आरती झाली.आरतीनंतर प्रसाद म्हणून मंदीराच्या आवारात लावलेल्या पपईच्या फोंडींचा प्रसाद सगळ्यांना मिळाला. प्रसाद म्हणून मिळालेली पपईची फोड म्हणजे नुसती साखर होती साखर ! अगदी मिठ्ठास,त्याची सालही कडू नव्हती. प्रसाद म्हणून ती दिली होती नाहीतर परत मागण्याचा मोह मला नक्की टाळता आला नसता .
त्यानंतर एमपी मधील परिक्रमावासीयांनी बनवलेल्या भोजन प्रसादीचा आस्वाद घेतला.त्यानी छानपैकी सब्जी, टिकर,डाल व चावल असा चविष्ट बेत केला होता. हा नवीन पुण्याचा परिक्रमावासी आम्ही सगळ्यांनी त्याला परत परत बोलवले म्हणून भोजनप्रसादी आला नाहीतर तो इतका वेळ थंडीत एकटाच त्या आवारातील क्राँक्रीटच्या थंड बाकड्यावर बसून होता.रात्रीहीं त्याने आसन खोलीत न लावता मी बाहेरच थंडीत झोपणार असे सांगीतले.
रात्री जेवणानंतर सगळयांची झोपाझोप झाली तेव्हा मी परत मंदीरात हुनामान चालीसा व रामरक्षा म्हणण्यास आलो तेव्हा हा पुण्याचा परिक्रमावासी तिथे मंदीरात बसलेला मला दिसला.माझे सगळे म्हणून झाल्यावर मी परत त्याला झोपण्यास खोलीत येण्याची विनंती केली .पण तेव्हाही तो म्हणाला ' नाही काका मी नाही येणार ,मी बाहेर असलेल्या त्या काँक्रीटच्या बाकड्यावरच झोपणार'' तेव्हा त्याला मी परत म्हंटले की 'अरे आताच बाहेर किती थंडी आहे, नंतर तर अजून थंडी वाढत जाईल व सगळे गार पडेल , तेव्हा खोलीत झोपावयास चल. ' तर म्हणाला नाही काका मी इथे, बाहेरच झोपणार. बघुया मैय्या किती दिवस परिक्षा बघते ते, असा जीवाला त्रास दिल्याशिवाय मैय्या काही दर्शन देणार नाही मला कसेही करून तीचे दर्शन हवे आहे ,पुस्तकातही असेच दिले आहे ' त्याच्या बोलण्यावरून जीवनात त्याच्या वाटयाला खूप दुःख आले असावे असे वाटत होते. त्याच्याकडे नर्मदा परिक्रमेचे महत्व व अनुभव असलेले एक छोटे झेरॉक्स केलले पुस्तक होते व ते पुस्तक प्रमाण मानून तो ही परिक्रमा व त्याप्रमाणे आचरण करत होता. असो.
मनातून त्याला बरेच सांगण्याची किवा समजवण्याची ईच्छा झाली पण त्याच्या आताच्या विचारांवरून त्याला मी सांगीतलेले काही पटेल असे वाटत नव्हते हे लक्षात येऊन मी त्याला 'नर्मदे हर ' म्हटंले व खोलीत आलो. पाहुया उद्याचा उमरीपासूनचा पुढचा प्रवास पुढच्या भागात. नर्मद हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ७५-
दूसऱ्या दिवशी सकाळी उमरीहून आम्ही लवकरच त्या एमपी मधल्या परिक्रमावासीयांचा निरोप घेऊन निघालो.आम्ही निघालो तेव्हा तो पुण्याचा परिक्रमावासी कुठे गेला होता हे मात्र काही केल्या कळले नाही.
आज मातेकडे राहायला होतो म्हणून की काय तीने तीच्याकडील ऊत्साहाचे टॉनीक आम्हाला प्रेमाने पाजले होते का माहीत नाही पण सकाळपासून वेगळाच आनंद, उत्साह चालताना जाणवत होता, खर तर आजचा रस्ता हा छोटया छोटया टेकडयांमधून जाणारा, चढ उताराचा रस्त्याला फारशी झाडे नसलेला, ओसाड, मनुष्य वस्ती पण खूप तूरळक असलेला हा रस्ता कधी नागमोडी वळण तर कधी थोडा उताराचा,चढणीचा असा होता, पण माझ्या आत एक वेगळाच आनंद सळसळत होता, मी उदयनला तसे म्हणालोही की आज मला चालताना खूप वेगळा आनंद मिळतोय, काय आहे ते मला शब्दात नाही सांगता येत, पण काहीतरी वेगळ आहे. तेव्हा त्यानेही माझ्या मनातीलच गोष्ट सांगीतली , म्हणाला की आज कुठुन निघाला आहेस तु? मग ती तीची अनुभुती म्हणून काहीतरी देणारच ना आपल्या बरोबर, मनोमन मातेला नमस्कार केला.
आम्ही सकाळपासून चालत अटा, उमरठ पर्यंत गेलो.उमरठला आम्हाला भोजन प्रसादीसाठी बोलवण्यात आले श्री गरसीया भगत हे सद्गृहस्थ परिक्रमावासीयांसाठी अन्नक्षेत्र चालवतात तिथे भोजन प्रसादी घेऊन आम्ही गुलवट, कुलवट असे पार करून हतनी नदीचा ब्रीज पार करून आम्ही टेमल्याला पोहचलो.काही मुख्य गावांची नावे सोडली तर परिक्रमा मार्गावरील आतली गावांची नावे मला परिक्रमेत व आताही खर तर आठवत नाही, ते सगळे कॉट्रॅक्ट उदयनकडे दिलेले आहे. परिक्रमेतही मी पुढच्या गावाचे नाव विचारताना काही तरी चुकीचे किवा कुठले तरी भलत्याच गावाचे नाव विचारत असे. उदा सुवा म्हणताना वसा असे काहीतरी माझ्याकडून होई त्यामुळे पुढच्या गावाचा रस्ता विचारण्याचे काम बरेच वेळा उदयन नाही तर बापूच करे, अगदी तशीच काही वेळ आली की माझा नंबर लागे किंवा कधी उदयनला माझी गम्मत करायची लहर आली की तो मुद्दामून मला विचारण्यास सांगे.
आम्ही टेमल्यावरून पुढे निघालो तेव्हा दूपारचे जवळजवळ तीन वाजत आले होते व पुढे गेल्यावर रस्त्यानी चालत असताना समोरच्या छोटया टेकडीवर काही परिक्रमावासी बसलेले आम्हाला दिसत होते. आम्ही व त्यांनीही नर्मदे हर चा पुकारा केला. त्यानी वर या असा इशारा केला, खर तर आता थोडसे अवघड चढण चढून वर जाणेही नकोसे वाटत होते . आज कसेही करून कवडयाच्या मारूती मंदीरात आम्हाला पोहचावयाचे होते. बोलण्यावरून मराठी आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही तो चढ चढून वर गेलो. तिथे हे पुण्याचे काही परिक्रमावासी भोजन प्रसादी व विश्रांतीसाठी थांबलेले दिसत होते. त्यात होता एक तरूण परिक्रमावासी श्री र्दुगेश मोकाशी व त्याचे वडील. सत्तरीच्या जवळपास असलेल्या बाबांना घेउन तो परिक्रमा करत होता, व्यवसायाने याज्ञीकी करणारा हा र्दूगेश गृहस्थी असुन ते सर्व कार्य बंद ठेऊन आपल्या बाबांची अतिशय प्रेमाने काळजी घेत तो परिक्रमा करत होता. खर तर आम्ही त्या दिवशी दूपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांच्याबरोबर होतो पण तेवढया वेळातही तो बाबांची प्रेमानी करत असलेली सेवा बघून खूप आनंद झाला. धन्य ते बाबा ज्यांना परिक्रमा घडविणारा असा गुणी लेक मिळाला.आम्ही वर गेलो तेव्हा त्यांची भोजन प्रसादी चालू होती. उमरठला आमची भोजन प्रसादी झाली असल्याने पोटात जागा नव्हती पण त्यानी खूप आग्रह करून आम्हालाही थोडी भोजन प्रसादीचा स्वाद तिथे घ्यायला लावला. तेही आज कवड्यापर्यंत पोहचणार होते पण त्याआधी इथे थोडा वेळ बाबांसाठी म्हणून इथे विश्राती घेऊन मग ते पुढे येणार होते. त्यामुळे आम्ही तिथुन पुढे निघून कवडयाच्या हनुमान मंदीरात पाच पर्यंत पोहचलो.आधीच्या परिक्रमेतील अनुभवावरून इथले महंत स्वाभावाने बऱ्यापैकी कडक आहेत असे उदयनने सांगीतले होते तसे याही वेळेस अनुभवास आले. आम्ही आश्रमात शिरल्या शिरल्या लगेच गेटच्या बाजूलाच चपला काढल्या,हातपाय धवुन त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी चेहऱ्यावर कुठलाही भाव न आणता आम्हाला समोरच्या झाडाखाली आसन लावण्यास सांगीतले. म्हणजे आजची सबंध रात्र व रात्रीची निद्रा मस्तपैकी आज निले निले अंबर के नीचे अशी होती खुल्या आसमंताखाली राहण्याचा आम्हाला पुन्हा एकदा अनुभव यां आश्रमात मिळणार होता.
सायस्नान,माईची पुजा, आरती झाली तोपर्यंत ते मगाशी भेटंलेले सगळे परिक्रमावासीही तिथे पोहचले.
संध्याकाळची इथली मारूतीरायांसमोरची आरती झाली,आरतीसाठी गावातील बरेचसे ग्रामस्थ तिथे आलेले दिसत होते.
इथे परिक्रमांवासीयांना सदाव्रत दिले जाते त्यामुळे संध्याकाळी भोजन प्रसादी बनवणे हे एक काम होते.मला दूपारची भोजन प्रसादी व परत तीन वाजता झालेले थोडे आग्रहाचे खाणे पोटात गेल्याने फारशी भुक नव्हती. त्यातून आता टीकर , रस असलेली सब्जी व भात असे करावयचा बेत ठरला होता. इतक्या सगळ्या जणांसाठी टिकर बनवणे हेच मोठे काम होते व माझा या टिकर बनवण्यात काही फारसा उपयोग नव्हता.
ते बनवण्याचे काम दुर्गेश व उदयनने घेतल्याने मी व बापू नंतर नेहमीप्रमाणे मारूतीरायांसमोर हुनुमान चालीसा , रामरक्षा म्हणण्यास बसलो. थोडयावेळाने उदयनही आमच्यात सामील झाला.
रात्रीची भोजन प्रसादी झाल्यावर आम्ही सगळे परिक्रमावासी थोडया वेळ परिक्रमेतील गप्पा मारत बसलो व थोडयावेळाने सगळेजण आपल्या आसनावर आडवे झाले तसेच आम्हीही आमच्या स्लिपींग बॅगमधे शिरलो. पडल्या पडल्या उदयनचा खास मित्र मिलींद वैद्य याचा आज वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही फोन लावला. प्रथम उदयनने व माझीही त्याच्याशी ओळख असल्याने मीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा तो म्हणाला ' तुम्हा लोकांना मानले पाहिजे यार, इतके दिवस तुम्ही एवढे चालत आहात,कुठे व कसेही विश्राम करत परिक्रमा करत आहात. सोपे नाही रे हे, मला तर कल्पनाही करता येत नाही,हॅटस ऑफ टू ऑल ऑफ़ यु '' उदयने त्याला आज आम्ही मस्त उघडयावर, निरनिराळ्या लहान मोठया झाडांच्या, वेलींच्या सहवासात झोपलो आहोत असे सांगीतल्याने तो हे सगळे माझ्याशी बोलत होता. मी त्याला म्हंटले ' अरे खूप झकास वाटत आहे आता,माईची परिक्रमा खूप वेगळा आनंद देत आहे.' फोन बंद केला व पडल्या पडल्या त्याच्या त्या वाक्याने वर आकाशाकडे बघता बघता सहज परिक्रमा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचे चित्र डोळ्यासमोर आले, खरच तो म्हणाला ते खरे आहे ? कदाचीत मीही आता परिक्रमेला न येता शहरात असतो तर मलाही या सगळ्या गोष्टींचा खूप बाऊ वाटला असता पण आज मात्र त्याच्या या वाक्याने परत जाणीव झाली कारण परिक्रमा तर आम्ही त्या ध्यासात नक्कीच करत होतो,तो आनंद, ते सुखद क्षण अनुभवत होतो पण आपल्याला माई काय देत आहे व आपण त्या अनुभवानी किती समृध होत आहोत हा विचार मात्र आज शांतपणे त्या मोकळ्या आभाळाखाली आडवे झाल्यावर आज मनात डोकावत होता. मिलीदच्या त्या वाक्याने आज आपण काय वेगळे सुख अनुभवत आहोत हे त्या दिवशी पडल्यापडल्या मी शांतपणे अनुभवत होतो. त्या वेळी मनात हे ही येत होते की हे सगळे अनुभव ,त्यातील आनंद, मजा जे आम्ही मनात टिपून घेत आहोत, ते तिथे शहरात राहून कसे समजणार होते उलट मी तर म्हणीन ते खूप काही मीस करत होते. माई आपल्याला हे सगळे वेगळे सुख किती भरभरून देत आहे हे पुन्हा पुन्हा तेव्हा प्रत्ययास आले.
ही सगळी तपोभुमी , इथे असलेले पुण्यात्मे,माईचा मिळत असलेला सहवास, तिचे प्रेम, इथल्या माणसांचे माईवर व आपण तिचे परिक्रमावासी म्हणून आपल्यावर असलेले प्रेम, हा निर्सग, कित्तेक अनुभवलेल्या नवीन गोष्टी, थोडक्यात परिक्रमेत जगलेला प्रत्येक क्षण किती मोलाचा व पुढील आयुष्य प्रगल्भ करणारा आहे हे सत्य त्या रात्री मला खूप आतपर्यंत जाणवले. परमार्थात आत्मप्रचीतीने माणूस परमपदास पोहचतो,अशा या परमतत्वावर विश्वास, श्रध्दा दृढ करायला ही परिक्रमा आम्हाला शिकवत होती. त्या रात्री मिलीदला मनोमन धन्यवाद दिले. या विचारातून बाहेर आलो तेव्हा समोर र्दुगेश आपल्या बाबांचे पाय चेपत असताना दिसत होता ते बापलेकाचे प्रेम बघुन खूप आनंद झाला.बाबांचे पाय चेपून झाल्यावर त्याने उदयनचेही पाय चेपून दिले.
आजुबाजुची शांतपणे उभे असलेली झाडे,त्या वेली,वर असलेले तारकांनी भरलेले आकाश सगळे बघुन मन खूप शांत होत होते.पडल्या पडल्या त्या रामदूताला परत नमस्कार केला. त्या महंतांचे मनोमन आभार मानले कारण माईने त्याना आज आम्हाला इथे निर्सगाच्या सानिध्यात आसन लावण्याची बुध्दी दिल्यामुळेच तर आज हे आनंदी क्षण आम्ही परत अनुभवत होतो. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ७६-
सकाळी कवाड्याहून मारूतीरायांचा निरोप घेउन आम्ही निघालो व जवळ जवळ बारा पंधरा किलोमीटरचा परिक्रमा मार्ग चालत आम्ही डहीला पोहचलो. सकाळची वेळ असुनही हा मार्ग कंटाळवाणा झाला कारण डहीपर्यंत सगळा मार्ग हा रहदारीच्या रस्त्याचा होता मधुन मधुन तुरळक ठिकाणी छोटी छोटी गाव आम्हाला आपले तोंड दाखवत होती.पण हया सततच्या रहदारीच्या रस्त्यामुळे सकाळी चालताना नामस्मरण करण्यास मनाला हवी तशी शांतता काही मिळत नव्हती. छोटया गावातून जाताना त्या गावातील घराघरातून छोटी छोटी मुले, मुली 'नर्मदे हर ' चा 'पुकारा करत होती पण आमच्याकडे त्यांना दयायला चॉकलेट किंवा बिस्कीट असेही काहींच नव्हते, त्यामुळे त्या मुलाना आपल्याकडून जा गोष्टींची अपेक्षा आहे ते आपण त्यांना देऊ शकत नाही यामुळे अजुनच चीङचीड होत होती.
डही - डंहीला कमलदास महाराजांनी स्थापन केलेले हनुमान मंदीर आहे. इथे वीरहनुमाना बरोबरच महाकाली, दुर्गादेवी यांच्याही विशाल मुर्ती स्थापना केलेल्या आहेत.त्या सगळ्या देवदेवतांचे दर्शनं घेतले व मारूतीरायांसमोर बसून मारूतीस्तोत्र म्हणून थोडा वेळ शांतपणे डोळे मीटून त्याचे ध्यान मनात आठवत गेलो. तोपर्यंत तिथे असलेल्या महंताची पण उपासना संपली त्यानी आम्हाला "आज दौपेर की भोजनी प्रसादी लेकर आप आगे जाना .'असे आग्रहानी सांगीतले पण आम्ही त्यांना आज इथे न थांबता लगेच इथुन पुढे जाणार आहोत असे सांगीतल्याने ,त्यानी सेवेकऱ्याला आम्हाला बोलभोग किंवा नाश्ता प्रसादी म्हणून द्या असे सांगीतले. तो घेऊन आम्ही पुढे निघालो,व बडवान्याला पोहचलो ही जागा माझ्यासाठी खूप महत्वाची होती कारण इथली एक आठवण उदयनने दसऱ्या परिक्रमेहून आल्यावर आम्हाला जेव्हा वॉटसॅप वर पोस्ट केली व तेव्हा ती मनाला इतकी भिडली होती की असे वाटले खरच काय आनंद आहे हा ! इथला प्रत्येक जीव हा माईच्या प्रेमात आकंठ बुडलेला आहे व त्यांच्यातील हे प्रेमच उत्सफुर्तपणे बाहेर पडून परिक्रमावासीयांलाही त्या प्रेमाचा आस्वाद, आनंद इथे उत्कटपणे जाणवतो.तेव्हाच माझ्या अंर्तमनाने मला सांगीतले की पुढील वर्षी परिक्रमा करण्याची वाट का बघतोस ?,याच वर्षी परिक्रमेला निघ.उदयनचा हा अनुभव त्याच्या ' नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा ' या पुस्तकातही आला असल्याने मी इथे परत तो सांगत नाही. त्यामुळे इथे आल्यावर उदयने जेव्हा त्याची आठवण करून दिली की हे ते स्थांन व ही ती गोमाता , तेव्हा प्रथम त्या गोमातेपाशी जाऊन मनापासून तिला वंदन केले कारण या वर्षी मी परिक्रमेस येण्यास तीच निमीत्त होती.उदयन तिथे बाजूला असलेल्या एका दूकानात गेला, गेल्या वर्षी तो इथेच परिक्रमेत त्या गृहस्थांकडे आलेला असल्यानी त्या गृहस्थानी त्याला बघितल्यावर " आओ बाबाजी , नर्मदे हर नर्मदे हर ' करत आम्हाला आत बोलावले. त्याच्याशी थोडया गप्पा झाल्या. त्यानी भोजन प्रसादीचा आम्हाला आग्रह केला पण तेवढा वेळ नसल्याने आम्ही चहा घेऊन तिथुन पुढे प्रस्थान केले. पुढे आम्ही पडियालला पोहचलो. इथे आम्हाला परत चहासाठी थांबवण्यात आले.त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी आम्ही राहवयला कोठे असतो?,आमचा व्यवसाय काय आहे? याची चवकशी केली.अशी चवकशी परिक्रमेत बऱ्याच ठिकाणी आधेमधे कुठे थांबणे हाई तेव्हा आमची होत असे.तेव्हा बऱ्याच ठिकाणी मी बँकेत असीस्टंट मॅनेजर असून परिक्रमा करत आहे याचे नवल वाटे पण त्याही पेक्षा मला बँकेने परिक्रमेसाठी एवढी सुट्टी कशी दिली याचे त्यांना जास्त आश्चर्य वाटे.त्यांना वाटणारे सुट्टी बद्दलचे आश्चर्य खरोखर वावगे होते, कारण बऱ्याच व्यवस्थापनात इतक्या दिवसांची सुट्टी व ती ही या कारणासाठी मंजूर होणे म्हणजे एक महाकठीण कामच. कारण आता सुध्दा आमच्या बरोबर या परिक्रमेसाठी येणाऱ्या एका भगीनीला तीची सुट्टी शिल्लक असुनही बँकेने आपणास इतक्या दिवसांची सुट्टी आम्ही या कारणासाठी देऊ शकत नाहीं असे सांगीतल्याने आपला परिक्रमेचा बेत रद्द करावा लागला होता पण आमच्या अभ्युदय काँ बँकेने मात्र माझी अशी रजा मंजूर करून मला हा परिक्रमेचा सुंदर अनुभव घेण्याची एक अनोखी संधी दिली असेच मला वाटते व या गोष्टीसाठी मी माझ्या बँकेचा सदैव ऋणी आहे.
इंथुन पुढे आम्ही जवळ जवळ वीस किलोमीटरचा परिक्रमा मार्ग पार करून संध्याकाळी पाच पर्यंत निसरपूरला पोहचलो. इथे उदयनला थोडा पीत्ताचा त्रास जाणवू लागला , पोटात आग पडल्यासारखे त्याला जाणवत होते त्यामुळे तिथल्या एका दुधाच्या डेअरीत आम्ही आमच्याकडील पैशाने थंडगार दूध प्यायले. या ठीकाणी तिथे असलेल्या गावकऱ्यांनी आम्हाला आपली व्यवस्था इथल्या एका मंदीरात करतो आपण इथेच थांबावे म्हणून आग्रहाने सांगीतले पण आम्हाला आज काही झाले तरी कोटेश्वर महादेव मंदीरा पर्यंत पोहचावयाचे होते, तेथील महादेवाचे मंदीर व तिथेच असलेले श्री रामरायांचे व इतर मंदीरे यांचेही दर्शन घ्यायचे होते. हा तीर्थक्षेत्राचा भाग लवकरच डुब श्रेत्रात जाणार असल्याने हे दूर्लभ दर्शन घेऊनच पुढे जायचे असे आम्ही ठरवले होते.
साडेपाच सहा पर्यंत आम्ही सुर्याचे मावळतीचे दर्शन घेत कोटेश्वरला पोहचलो. इथे उरी बागली व माईचा संगम आहे.आश्नमाच्या मागेच माईचा चांगला बांधलेला घाट आहे.
आश्रमात आमची सोय आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या गच्चीवरील शेडमधे करण्यात आली होती. त्या दिवशी तिथे बरेच परिक्रमावासी मुक्कामास होते.वरची सगळी शेड परिक्रमावासीयांच्या आसनानी भरली होती.आश्रमात खाली येऊन आम्ही सायंस्नान केले , वर आसनापाशी येऊन माईची पुजा व आरती केली. इतक्यात तिथल्या सवेकऱ्यांकडून लगेच आपण रात्रीच्या भोजन प्रसादीस यावे असे सांगण्यात आल्याने ताट, कमंडलू घेउन आम्ही परत खाली गेलो.
भोजन प्रसादी झाली नंतर आम्ही रामरायांच्या मंदीरात बसून त्याच्या सुंदर रूपाचे दर्शन आपल्या अर्त:मनात साठवत हनुमान चालीसा, रामरक्षेचा पाठ म्हणून परत आमच्या आसनापाशी आलो. तेव्हा तिथे पोहचलेल्या एका परिक्रमावासायाचे पाच सहा नातेवाईक त्याला भेटावयास व भजन करण्यास तिथे वाद्य घेउन आलेले दिसत होते त्यामुळे तास दिड तास उच्च स्वरात एम.पी स्टाईने ढोलकीवर भजन झाले. खर तर टाळ व ढोलकीमुळे भजनाचे शब्द काय आहेत हे मला काहीच कळत नव्हते, ते सगळे तल्लीन होऊन उत्साहाने म्हणत असताना दिसत होते पण मला मात्र थोडयावेळाने ते भजन लवकर संपावे असे वाटू लागले कारण एक म्हणजे परिक्रमा सुरू झाल्यापासून इतक्या शांततेची सवय झाली होती व दूसरे म्हणजे हरिमंदीरात आईंच्या शिकवणुकीप्रमाणे हळुवारपणे झांज वाजवून अर्थाकडे लक्ष देऊन भजन म्हणण्याची लागलेली सवय व इथे ढोलकी व टाळ याच्यावर ते भजन म्हणत होते पण ज्याचे गुणगान करत होते ते शब्दच कळत नसल्याने काही भावार्थ लागत नव्हता. थोडा वेळाने ते भजन संपले व आम्हीही आमच्या स्लिपींग बँग मधे त्या थंड वातावरणात गुडूप झालो.
सकाळी कोटेश्वर महादेवाचे, कनक बिहारीचे व इतर सर्व देव देवतांचे दर्शन घेऊन माईवर आलो. त्या सकाळच्या शांत,थंड वातावरणात माईच्या विशाल पात्राच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. पुढे डुब क्षेत्रात गेल्यास परत हे क्षेत्र बघण्याचा योग येईल की नाही हे माहीत नसल्याने ते सर्व परत परत डोळ्यात साठवत आम्ही आमचे तिथुन पुढे प्रस्थान केले.
कोटेश्वरहून चिखलदाला जायला दोन मार्ग आहेत एक गेहल गाव मार्गे चिलखदा व दूसरा आम्ही काल ज्या मार्गानी आलो तो म्हणजे निसरपूर ,कडमाल, नर्मदा नगर मार्गे चिखलदा.
आम्ही सकाळी सुर्योदया पुर्वी कोटेश्र्वर हुन परत निसरपूरकडे निघालो व रस्त्यात चालत असताना भास्कराचे इतके सुंदर आगमन झाले की काय विचारायची सोय नाही. सुंदर शेंदरी तांबुस रंगाचा गोळा गरगर फिरत फिरत वर येताना दिसत होता, ते त्याचे दिमाखदार सौंदर्य इतके विलोभनीय होते की आम्हीही क्षणभर ते बघत राहीलो. निरनिराळे पक्षीही त्याच्या आगमनाने आनंदीत होऊन,तो आनंद आपल्या उंच भरारीने व्यक्त करत त्याचे स्वागत करत होते.
टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघताना स्लो अॅक्शन रीप्ले मधे फिरकी गोलंदाजाकडून हवेत फिरकी घेत येणारा चेंडू जसा दिसतो तसा हा चैतन्यमय गोळा गोल फिरत फिरत वर येताना दिसत होता फक्त फरक इतकाच होता की क्रिकेट मधील चेंडूला स्वतःचे चैतन्य नसते .गोलंदाजाकडून फेकल्यावर एक तर तो फलंदाजाला क्लिन बोल्ड तरी करतो किंवा फलंदाज त्यावर सीस्कर तरी ठोकतो. तसाच हा चैतन्यमय गोळा रोज आकाशात गरगर फिरत येउन आपल्या वेगवेगळ्या सौंदर्यमय आदाकारीने परिक्रमेत आमच्या डोळ्यांची कायम विकेट काढत असे. आजच्या दिवसाची सुरवात तर महेश्वराच्या व कनक बिहारीच्या दर्शनाने झाली होती व आता भास्करदेवाच्या दर्शनाने त्याला चार चाँद लागले होते. आम्ही परत निसरपूरला आलो, रस्त्याच्या कोपऱ्यावर एक नाश्त्याचा स्टॉल होता ,त्या स्टॉलच्या मालकाने आम्हाला गरमागरम कचोरी व चहा दिला, आम्ही पैशाबद्दल विचारल्यावर म्हणाला " मै किसी परिक्रमा वासीको यहाँ से खाली पेटं जाने नहीं देता ".
आज दिवसाची सुरवात तर निर्गण निराकार अशा परमेश्वराच्या दर्शनाने होऊन पुढे ते सगुण साकाराच्या रूपात कसे प्रगटते हेही माईने दाखवले होते व आता गरम गरम प्रसादरूपीं बालभोग देऊन आमच्या जठराग्नीलाही आहूती दिली होती त्यामुळे पुढेही आमचा आजचा दिवस कसा गेला ते पाहू पुढच्या भागात, तो पर्यंत नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव ७७
निसरपूर वरून आम्ही बाल भोग घेऊन पुढे निघालो आता पुढचा मार्ग कडमाल मार्गे चिखलदा. कडमाल पर्यंत पोहचण्यास साधारण १० ते १२ किलोमीटसचा रस्ता पार करावा लागणार होता म्हणजे साधारण तास, दिड तास तरी चालण्याची आता निश्चिती होती.सकाळची सुखद थंडी अनुभवत मुखाने सद्गुरूंनी दिलेले नाम घेत आम्ही मार्गभ्रमण करत होतो. वर म्हंटल्याप्रमाणे साधारणपणे नऊ वाजता कडमाल जवळ पोहचलो. इथे आहे सिध्देश्वर महादेव मंदीर , लक्ष्मणपूरी नागा बाबा ज्यांचे वय १०९ वर्ष आहे त्यांचे दर्शन घेतले , बाबा फारसे बोलत नाहीत, थोडया वेळात खिचडी होणार आहे आपण खाऊन जा असे सांगीतले, पण सकाळचा बालभोग पोटभर झाल्याने आता आमची काही खायची इच्छा नसल्याने त्यांना तसे सांगीतले. निघताना त्यांना नमस्कार केला व आर्शिवाद घेऊन आम्ही पुढे निघालो. नर्मदा नगरमार्गे आम्ही चिखलदयाला पोहचलो. इथे आहे निलकंठेश्वर महादेव मंदीर , स्वामी वासुंदेवानंद सरस्वती यांनी इथे चातुर्मास केलेला असल्याने या स्थानाला विशेष महत्व आहे. या स्थानाच्या बरोबर समोर येते दक्षिण तटावरील राजघाट. इथुन पुढे मलवाडा , बोधवाडा करत आज सेमरदापर्यत पोहचायचे असा आमचा विचार होता कारण इथे परिक्रमावासीयांची मुक्कामाची व्यवस्था दिप्तिकेश्वर महादेव मंदीरात होते व तिथपर्यंत पोहचून आमचे नित्याचे चालण्याचे टारगेटही पूर्ण होणार होते.
दूपारी दोन सव्वा दोनवाजेपर्यंत आम्ही ऐकलबारा गावात पोहचलो.गावातून रस्ता जात होता, रस्त्याच्या दोन्हीं बाजूला छोटी घरे व मधुन छोटा गल्ली वजा रस्ता व त्या घरांच्या मागे उजव्या बाजूला खाली उतरून गेले की माई.
आताचे दूपारचे ऊन व सकाळी कोटेश्वरहून निघाल्यापासून आतापर्यंत जवळ जवळ २४ एक किलोमीटरचे चालणे झाले असल्याने मी उदयन व बापूला म्हटले की जरा दहा मिनीटे कुठे तरी टेकुया आपण, पाणी पिऊन मग जाऊ पुढे. एक घर सोडून एक छोटी गल्ली खाली माईकडे जात होती व त्याच्या बाजूलाच छोटे मंदीर असल्याचे लांबुन दृष्टीस पडले, बघून आनंद झाला. चला मंदीराच्या दारातून तर आपल्याला कुणी उठवणार नाहीं . जवळ गेलो तसे सहज वर असलेल्या पाटीकडे लक्ष गेले ,पाटीवर लिहीले होते 'राममंदीर 'आनंद झाला , मनात विचार आला 'चला, रामरायांच्या दारी आपली थोडा वेळ विश्रांती होणार आहे तर. ' मंदीराचा मुख्य दरवाजा बंद होता फक्त दाराच्या वरच्या जाळीतून व मंदीराच्या अर्धा भागात भिंत व अर्धा भागात गज असल्याने आत मुर्ती आहेत एवढेच दिसत होते पण गाभाऱ्याच्या दरवाजावर पडदा असल्याने रामरायांचे दर्शन होत नव्हते, बाहेर ओटयासारखी जागा होती तीथे आम्ही निवांत टेकलो व कमंडलूतील पाण्याने आत्माराम शांत केला.थोडया वेळाने आमच्या मागे असलेले काही परिक्रमावासी आमच्या समोरून 'नर्मदे हर ' करत पुढे गेले. पण आम्ही अजूनही तिथेच बसुन होतो. तीन वाजत आले म्हणजे जवळजवळ पाऊण तास आम्ही मंदीराबाहेर सावलीत त्या ओटयावर बसलो होतो, मनात आता इच्छा होती की इतका वेळ आपण थांबलो आहोत तर आता जाताना रामरायांचे दर्शन घेऊन मगच पुढे जावे. इतक्यात एक आजोबा मंदीर उघडायला आले. दरवाजा उघडता उघडता आमच्याकडे बघत प्रेमाने म्हणाले ' आप कितने देर से बाहर बैठे हो, मुझे मालुम रहता तो मै जल्दी आ जाता, हररोज तीन बजे हम मंदीर खोलते है. इंधर पास में ही हमारा मकान है ' आम्ही बाहेर ठेवलेल्या मातीच्या माठाच्या नळावर हातपाय धुवुन आत गेलो. तोपर्यंत त्यानी रामरायांसमोरील पडदा बाजूला सारला होता, आम्ही दर्शन घेउन पाच मिनीटे त्याच्यासमोर बसलो तेव्हा त्यांनी विचारले 'आज कहाँसे आ रहे हो आम्ही त्यांना 'कोटेश्वर 'म्हणून सांगीतल्यावर म्हणाले ' तो फिर आज के लिये तो बहोत चल दिये , तो फिर अभी, चाय पियेंगे ' आम्ही 'हो 'म्हंटल्यावर ते लगेच लगबगीने घरी गेले. पाच मिनीटात परत आले व म्हणाले ' आपकी भोजन प्रसादी हो गयी क्या? ' आम्ही ' नही हुआ ' म्हणून सांगीतल्यावर म्हणाले ' फिर आप खाना खाने के बादही आपके के आगे के मार्ग के बारे मे सोचो' तेवढयात त्यांची छोटी नात सिया आमच्यासाठी चहा घेउन आली.आम्ही चहा घेतला, ते तिच्याबरोबर आमच्या तिघांच्या भोजनाचा प्रबंध करण्याचा निरोप सांगण्यास परत घरी गेले. आम्ही मंदीरात रामरायांसमोरंच बसलो होतो, तेव्हा मनात विचार आला ही काय सगळी ही जुळवाजुळव आहे तोच जाणे, कारण गावात शिरताना आमच्या बरोबर काही परिक्रमावासी होते तेही इथे थांबले नाहीत,आम्ही इथे बसलो होतो तेव्हाही काही परिक्रमावासी इथे न थांबता इथुन पुढे गेले ,आम्हाला मात्र त्यानेच इथे थांबण्याची बुद्धी देऊन आता आमच्या भोजनाची व्यवस्थाही तो करत होता. किती दयाळू आहेत रामराय?त्याला म्हंटले 'कीती काळजी घेतोस रे आमची, आम्ही तर फक्त तुझे दर्शन व्हावे म्हणून बाहेर वाट बघत थांबलो होतो, पण तु तर आमची इथे भोजन प्रसादीचीही सोय़ केलीस की रे '' खरच आता जेवणाचे कुणी विचारेल असे आमच्या ध्यानीमनीही नव्हते कारण हा काही आश्रम नव्हता.पण आत बसलेले करुणेचा सागर, तो कसा आम्हाला असाच ऊपाशी पुढे जाऊन देणार ?म्हणूनच तर रामरक्षेत त्यांचे किती सार्थ वर्णन केले आहे 'सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ' तर दुसऱ्या ठिकाणी 'कारुण्यरूपं करूणा करं तं ' असे त्यांचे गुणवर्णन आहे.
पाऊण तासानी आजोबा परत आम्हाला देवळाच्या मागे असलेल्या त्यांच्या घरी घेऊन गेले.
घरात पान मांडलेली होती भाजी, आमटी, लोचणे,खीर व ताटात गरम गरम एकच फुलका असा परिपुर्ण प्रेमाने बनवलेला रामरायांचा प्रसाद आमच्या समोर आला.मी एकच फुलका लिहीण्याने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण ते तसे का लिहीले याचे कारण मी पुढे देतो.
घरात माणसे म्हणजे जे आम्हाला घेऊन घरी आले ते आजोबा म्हणजे त्यांना घरात नाना म्हणत होते ते नाना,नानी, त्यांची मुलगी व तिच्या दोन मुली.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला भेटल्यावर जणू काही त्यांचे जवळचे नातेवाईक भेटत आहेत असा आनंद !
वाढणे ही इतके आगत्याचे होते की पानत एकच फुलका वाढला जाई तो गरम फुलका आम्ही खाल्ला की ती छोटी नात सीया लगेच आम्हाला परत गरम मऊसूद फुलका न विचारता वाढत होती. तिच्या आईने ती पाहिल्यांदा फुलका वाढत असतानाच सांगीतले ' आप शरमाना नही ,आप सबको हम ऐसेही गरमा गरम फुलके खिलायेंगे, भोजन को थोडी देरी हुई है, पर आप पेटभर के खाना खाईये ' तिने गरम गरम फुलका वाढण्यासाठी म्हणून आम्हा तिघांसाठी अशा किती वेळा आत बाहेर खेपा मारल्या असती कोण जाणे.आत मोठी नात गरम गरम फुलके बनवत होती व ही बाहेर आणून वाढत होती. नानी, त्या मुंलीची आई आमच्याशी जेवताना अतिशय प्रेमाने गप्पा मारत होत्या की जशी आमची त्यांच्याशी खूप वर्षांची ओळख आहे. मुलींना आम्हाला आग्रहाने वाढण्यास सागंत होत्या.सगळ्यात शेवटी गरमगरम पुलावासारखा भात वाढण्यात आला.
जेवणही इतके चविष्ट बनवले होते की मी काय सांगु, रामरायांचे परिपुर्ण प्रेमच होते हो त्यात.
आमचे जेवण झाले तेव्हा त्या मुलींच्या आईने सांगीतले की आजचे सगळे जेवण हे मोठी मुलगी शैलुने बनवले आहे, तोपर्यंत ती स्वयपाकघराच्या बाहेरही आली नव्हती.मंदीरात करूणासागर श्रीरामांचे दर्शन झाले होते तर इथे घरात या निर्मळ ,निर्गवी, प्रेमळ माणासांमधल्या देवाचे दर्शन आम्हाला होत होते.
या सगळ्यांमधले हे विशेष गुण माई आम्हाला दाखवत होती व सांगत होती 'बघ ,कुठे बाहेर शोधायचे आहे का देवाला ? इतके निष्कपट,अहेतूक प्रेम जिथे असते तिथे तो असतोच, पण जेव्हा हे प्रेम हृदयात जागे होईल तेव्हा कळेल की तो आपल्या आतच बसलेला आहे '
माई परिक्रमेत कितीतरी ठिकाणी हे र्निव्याज प्रेम आपल्याला दाखवत असते, ती शिकवत असते तिच्या परिक्रमेच्या शाळेतून
आज आता यापुढे अजून तीन चार किलोमीटर समेरदयाला सगळ्या परिक्रमावासीयांच्या गर्दीत जाण्यापेक्षा आम्ही इथेच मुक्काम करावयाचे ठरवले. नानाजींना तसे विचारल्यावर ते म्हणाले ' हा हा क्यु नही, आप ठहेर जाईये राम मंदीर मे ' मला तर आनंदच झाला आज परत त्यांचा सहवास उद्या सकाळपर्यंत मिळणार होता.
तेव्हा संध्याकाळचे पाच वाजत आले होते त्यामुळे आता परत आम्ही रात्रीचे भोजन काही घेणार नाही असे तेव्हाच नानाजींना सांगुन टाकले तेव्हा ते हसत हसत म्हणाले ' अभी तो रात के भोजन को बहूत समय है ' .
साडेपाच वाजता गावातील भगीनींचे एक तासभर भजन रामरायांसमोर झाले. भजने आमच्या परिचयाची नव्हती पण अर्थपूर्ण होती ,नानींही त्यात एक छान भजन म्हंटले. भजन संपल्यावर आम्ही साडेसहा वाजता हनुमानाचालीसा, रामरक्षा व मारूती स्तोत्राचा पाठ केला. सात वाजता त्यांची संध्याकाळची मंदीरातील आरती झाली.
रात्रीच्या भोजनाचा तर आज प्रश्नच नव्हता, कारण संसारी माणसांच्या घरातील सात्विक अन्नाने पोट तुडुंब भरले होते . नानाजीना तशी परत कल्पना दिली तेव्हा ते म्हणाले ' हा ,ठीक है सोने से पहले थोडा दूध पी लेना ' थोडयावेळाने मी परत त्यांच्या घरी गेलो, दूपारी जेवताना माझ्या घराच्या रामरायांबद्दल सांगीतल्यावर त्यानी मला त्यांचा फोटो दाखवा असे सांगीतले होते . मगाशी मोबाईल जवळ नसल्याने आता त्यांना ते दाखवण्यास परत घरी गेलो. फोटो पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. माझ्या घरची सगळी चवकशी केली, मला परिक्रमेला जायला परवानगी दिली म्हणुन सौ.चे मनापासून कौतुक केले व परिक्रमा पूर्ण झाल्यावर आम्हाला नक्की फोन करा असे आग्रहाने सांगीतले.परिक्रमेहून परत आल्यावर मी त्यांना परिक्रमा पुर्ण झाल्याचे कळवले.अजुनही त्या मुलीं मधुन मधुन फोन किंवा वॉटसॅपवर खुशाली विचारतात,आजच्या या करोनाच्या महामारीतही मी त्यांना करोना बद्दल विचारण्याआधीच त्या मुलीनी आठवणीने फोन केला "'आपके इधर करोनाकी क्या स्थीती है, आपके घर मे सब कैसे है? परिक्रमा में आपके साथ बो दो्नो थे वो कैसे है? 'अशी आठवण ठेऊन चवकशी केली.तेव्हा परत मला माझीच खूप लाज वाटली ,अजूनही ते प्रेम आपल्यात उतरले नाही याची जाणीव झाली. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ७८
रात्री झोपण्या आधी नानाजीनी दूपारी सांगीतले होते तसे आमच्या समोर गरम गरम दुधाचे ग्लास आले, त्या थंडगार वातावरणात गरम दुधानी शरीरात छान उब आली , आमचे दुध पिऊन झाल्यावर घरी निघतांना नानाजीनी रामरायांसमोरच्या दरवाजावरील पडदा आता देवही विश्रांती घेतील म्हणून परत पडदा ओढून घेतला व ते आपल्या घरी झोपावयास गेले. मी मंदीराचा दरवाजा आतून लावून घेतला व स्लिपींग बॅग मधे शिरलो. स्लिपींग बॅगमधे आडवे झालो खरे पण मनातून दूपारपासून रामरायांनी केलेल्या आजच्या आदरातिथ्याचा विचार काहीं मनातून जात नव्हता, मनात दोन्ही भावना दाटून येत होत्या , प्रभुंच्या आदरातिथ्याने नक्कीच सुखावलो होतो पण त्याचबरोबर आपल्या इष्ट देवतेला आपल्यासाठी कष्ट तर दिले नाही ना?हाही विचार मनात येत होता. रामरक्षेतील त्याचे केलेले वर्णन 'कारुण्यरूपं करूणा करं तं' म्हणजेच कारुण्याचा सागर हे शब्द मनात आठवुन परत पडल्या पडल्या रामरक्षा स्त्रोत मनात सूरू झाले मी डोळे मीटून रामरक्षेतील त्याच्या गुणांचे एक एक वर्णन व कारुण्यसिंधुच्या प्रेममय आठवणींना पुन्हा पुन्हा अनुभवु लागलो.आज खरतर इथे त्यांच्याच घरीच होतो तरीपण घरच्या रामरायांची खूप आठवण आली.
मंदीराचा अर्धा भाग गजांचा असल्याने बरेच वेळा बाहेर भुंकणाऱ्या, गुरगुर करून भांडणाऱ्या कुत्र्याच्या आवाजानी रात्री बरेच वेळा जाग येत होती पण त्यामुळे एक गोष्ट चांगली होत होती ती म्हणजे जाग आली की पुन्हा रामरायांची आठवण होत होती.पहाटे साडेचारला आम्ही उठलो आमचे प्रातः विधी आटोपले. साधारणपणे पाच सव्वापाचच्या बेताने गावातील पाच सहा माताजी व तेवढेच पुरूष भजन म्हणत मदीरात आली, रामरायासमोर बसून थोडा वेळ त्यानी त्याचे गुणगान करणारी अपरिचीत भजने म्हटली व परत निघताना पण देवाची गाणी म्हणत ते दूसऱ्या मंदीरात गेले, अशी ही प्रभातफेरी मध्यप्रदेशात आम्ही खूप ठीकाणी छोट्या छोटया गावातून पहाटेच्या वेळी बघून आश्चर्यचकीत झालो . आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा ही सगळी मंडळी किती कडोनिकडीने प्रयत्न करत आहेत याची जाणीव होऊन आनंद झाला. तेव्हा त्या मंडळीत आलेल्या एका माताजींनी तिथुन निघताना आम्हाला आठवणीने सांगीतले की मी आपल्याला थोडया वेळाने चहा पाठवते. थोडयावेळात आमची स्नान पुजा झाली. सकाळच्या थंडीत मंदीराजवळील त्या माताजींच्या घरातून प्रेमाने केलेला गरमा गरम चहारूपी अमृत आले व चहा पिताना रामरायांच्या प्रेमाने मन परत एकदा भरून आले. रामरायांना साष्टांग नमस्कार घालून आम्ही तिथुन निघालो.निघताना खरतर नाना नानीना नमस्कार व शिलू सिया यांचा निरोप घ्यावा असे मनोमन वाटत होते, मात्र नानाजींच्या घराचे दार बंद असल्याने ते ठोठावून त्यांना त्रास देण्यापेक्षा मनाला आवरून आम्ही एकलबाराहून पुढच्या प्रवासाला निघालो. थोडे पुढे जाउन परत ते मंदीर, ती गल्ली मागे वळुन डोळे भरून बघीतली कारण हे संपूर्ण प्रेमळ गावही पुढे डुब क्षेत्रात जाणार आहे असे नानाजींच्या बोलण्यातून कळले होते. त्या सर्व गावकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सरकारकडून दूसऱ्या ठिकाणी पुर्नवसनासाठी म्हणून रहावयास जागा मिळाल्या आहेत पण अजून कुणीही इथुन तिकडे स्थलांतरीत झाले नाहीत.जेव्हा माईचे जल इथपर्यंत यईल तेव्हा बघू तोपर्यंत इथेच राहावयाचे असे सगळ्यांनी ठरवले आहे. अजूनही तो भाग डूब क्षेत्रात गेलेला नाही त्यामुळे या वर्षी परिक्रमेला जाणाऱ्यांना त्याच्या प्रेमाच्या आदारातीथ्याचा अनुभव नक्की येईल.
आता पुढचा दिवसभरचा आमचा मार्ग होता सेमरदा, पेरखड,बडा बडदा, मिर्झापूर, तकलाई, धरमपूरी व खुजावा.या ठिकाणी आम्ही तिघांनी एकमताने एक निर्णय घेतला होता की आपण मांडवगढमार्गे जाणाऱ्या परिक्रमा मार्गाने न जाता , खुजावा च्या थोडे पुढे असलेल्या एका मार्गाने जाउन पुढे खलघाटला पोहचायचे.याला कारणही असे होते की नर्मदा पूरणात जी सारी स्थाने सांगीतली आहेत त्यात या स्थानाचा उल्लेख परिक्रमा मार्गात कुठेही नाही म्हणजे नंतर कधीतरी हा मार्ग परिक्रमेत आला आहे.
पुढेही परिक्रमेत काही साधु आम्ही मांडवगडला गेलो नाही असे सागीतल्यावर नाराज झाले होते, कुणी असेही म्हणाले की मांडवगढ के बिना आपकी परिक्रमा पूरी कैसी होगी. पण आम्ही त्यांना त्यावर पुराणाचा कुठलाही दाखला न देता गप्प राहून तो विषय टाळला. कारण जेव्हा आम्ही मनानी तिथे न जाण्याचे ठरवले होते तेव्हा परत कुठल्याही गोष्टीचा खुलासा कुणाला करण्याचा काही प्रश्नच नव्हता व त्यामुळे मनाचीही कुठे द्विधा अवस्थाही झाली नव्हती .नर्मदा पुराणात कुठेही याचा उल्लेख नाही त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला होता.
आजचा हा मार्ग कधी माईच्या अगदी किनाऱ्यांनी तर कधी माईच्या जवळील गावातून असा जाणारा होता. ऐका अगदी छोटयाश्या खेडेगावात झालेल्या अतिशय साध्या पण छोट्या प्रसंगाने मला परत काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडले. साधारण दूपारचे दोन अडीच वाजले असतील, आम्ही मांडवगडला जाणार नसल्याने या मार्गावर परिक्रमावासी कुणीही नव्हते, विचारत विचारत आम्ही पुढचा मार्ग चालत होतो, तेव्हा एका छोट्या गावात एक छोटीसी टपरी आम्हाला दिसली ज्यात गोळया बिस्कीटे या सारखे सटर फटर विकले जाणारे जिन्नस ठेवलेले दिसत होते.आजूबाजूला कुठेही घर नाही,माणसे नाही, रहदारी नाही भरपूर मोठी झाडे असलेल्या जागी एका झाडाला टेकून त्याचे ते टपरीवजा दुकान होते.आम्ही त्याला खुजावाकडे जाण्याचा मार्ग विचारला. त्या तरूण मुलाने पुढे जाण्याचा रस्ता आम्हाला दाखवला व बाबाजी 'थोडा रूक जाईये ' असे म्हणत प्रत्येकाच्या हातात एक मोठा पारले जी पुडा ठेवला. खर तर आज सकाळचा एकलबारच्या चहानंतर पोटात काही नव्हते, आदल्या दिवशी दुपारी जेवण उशीरा झाल्याने रात्रीचे भोजनही घेतले नव्हते त्यामुळे पोटात भुक तर खूप होती पण त्याचे दुकान ज्या ठिकाणी होते त्यावरून त्याने आज सकाळपासूनचा काय धंदा केला असेल व त्याला फायदा काय झाला असेल असा शहरी विचार करून आम्हीं त्याला म्हटले की 'भाई साहब, एक पारले जी मे हम तीनों को काम हो जायेगा ' त्यावर तो म्हणाला 'नही ,नहीं, ऐसा नही चलेगा, ये तो आपको लेनाही है ' आम्ही पुडे घेतले नर्मदे हर म्हणून पुढे चालू लागलो.चालत असताना प्रत्येकाने आपल्या स्वत :च्या हातातील बिस्कीटचा पुडा फोडला.पाहिले बिस्किट पुड्यातून घेतले व तोंडात टाकताना सहज मनात विचार आला माईने आपल्या पोटात सकाळपासुन काही नाही म्हणून ही सोय केली हे सगळे ठीक , पण आजचा त्याचा तिथला सकाळपासून धंदा तो काय झाला असेल?.आमच्या प्रत्येकाच्या हातात एक एक पुडा त्याने ठेवला म्हणजे त्याचा आजचा तीस चाळीस रुपयांचा माल तर आमच्यासाठी खर्च झाला .दूसरे असे की इतके आत असलेले त्यांचे दूकान, आजूबाजूला फारशी घरे नाहीत आम्ही त्याला एक पुडा पुरे असे म्हणूनही ते नाकारत प्रत्येकाला एक एक पुडा देणारा हा माणूस मनाने किती श्रीमत असावा? त्याच्या मनाची श्रीमंती तर खूप मोठी होती पण हे सोडले तर हे सगळे माझे विचार एकांगी आहेत हे नंतर जाणवले कारण माईने जसा आमच्या भुकेचा विचार केला होता तसेच जाच्याकडून हे आम्हाल्या पुडे दिले त्याचाही विचार तिने नक्कीच केला असणार व हा विश्वास त्याच्यात खूप आधीपासून रूजलेला आहे. मला ही गोष्ट खूप विचार करावयास लावणारी होती, म्हटले तर खूप साधी होती,म्हंटले तर खूप मोठी कारण ही दानत, हा मनाचा मोठेपणा ही मनाची श्रीमंती, त्याला त्याची माईवर असलेल्या पूर्ण श्रध्देमुळे आलेली होती व त्याच गोष्टीची माझ्याकडे कमतरता आहे हे या लोकांकडे बघीतले की लक्षात येते. हे माईवरचे प्रेम, श्रध्दा छोटया छोट्या गावात खूप साध्या व परिस्थीतीने गरीब असलेल्या लोकांमधे पहावयास मिळाले कारण त्यांच्या डोक्यात आपल्याला काय फायदा, तोटा होत आहे यापेक्षा आपल्या घासातला घास परिक्रमावासीयाला देणे म्हणजेच माईला देणे किंवा तिची मनोभावे सेवा करणे हा असतो. मग जाणवते की आपण माईला अजून कुठल्या वेगळ्या रूपात दर्शन देईल म्हणून पहावयाचे कारण ती तर या सगळ्यांच्या तनामनात वसलेली आहे.
तसे पाहीले तर फायदा तोटा हे सगळे आपले शहरावासीयांचे कॉन्सेप्ट, हातचे राखून देणे हा इथे विचारच नाही.अजूनही शहरात धनाढ्य लोकात ही देण्याची वृत्ती खूप कमी दिसते, आपल्या स्टेटसाठी मोठया पाटर्या करणारी ही मंडळी तिथे वाटेल तसा पैसा खर्च करतील , पार्टीत अन्न फुकट घालवतील पण गरजवंताला काही दयायची वेळ आली की मात्र आपला हात आखडता घेतील.
अशी मनाची श्रीमंत असलेली पण परिस्थीतीने गरीब असलेली माणसे परिक्रमेत पुढे सुध्दा खूप वेळा मिळाली व तेव्हा त्याचे ते प्रेम,मनाचा मोठेपणा बघून डोळ्यात पाणी येत असे. असे माणूसकीचे,प्रेमाचे हे धडे देते ही परिक्रमा, आपण किती छोटे आहोत, मनाने कोते आहोत हे दाखवते ही परिक्रमा. या लोकांच्या प्रेमातून बरेच काही शिकवतेही हीच परिक्रमा, म्हणून मी कायम म्हणतो की परिक्रमा हे चालती बोलती शाळा आहे जिथे माई आपले प्रक्टिकल घेते,थेअरी घेते, आईच्या प्रेमाने आपले लाडही खूप करते.
शरिर व मन या सगळ्याचा कस लावणाऱ्या हया आध्यात्मीक प्रयोगशाळेमधुन आपल्याला आतून कसे बदलायचे हेही तीच शिकवते फक्त त्याप्रमाणे बदलणे हेच माझ्यासारख्याला शिकायला असते.
संध्याकाळपर्यंत आम्ही खुजावा ला पोहचलो, हा आश्रम व मंदीर दोन्ही नवीन बांधलेले दिसत होते.आजही मुक्काम कुठे करावयाचा हे काहीही न ठरवताही परत रामरायांच्या मंदीरात आलो होतो. प्रशस्त आवार असलेल्या मंदीराच्या पायऱ्यापाशी व हॉलच्या बाजूने रॉड बसवण्याचे काम चालू होते. प्रथम आम्हाला गाभाऱ्यासमोरील मोकळ्या जागेमधे आसन लावण्यास सांगीतले होते त्यामुळे हॉलच्या पायऱ्यांवर एका बाजूला आम्ही सॅग ठेवल्या व हातपाय धुवावयास गेलो, आम्ही परत आलो तेव्हा तिथले मुख्य महंत तिथे चालू असलेले काम कुठपर्यंत झाले आहे हे बघण्यासाठी तिथे आलेले दिसत होते .आम्ही रामरायांना नमस्कार केला व त्या महंतानाही नमस्कार केला. वयाने तरूण असलेले ही ब्रम्हचारी व्यक्ती तिथली महंत होती. त्यानी आमची चवकशी करून म्हणाले 'आप इथर आसन लगायेंगे ? रात को यहा आपको कितनी थंड लगेगी, आप ऐसा करो पिछे कमरे है .वहाँ आपके आसन लगाईये. ' तिथल्या सेवेकऱ्याला आम्हाला मागे कोणती खोली रिकामी आहे ती देण्यासं सांगीतली.आश्रम नवीन असल्याने खोल्या स्वच्छ व मोठया होत्या.आम्ही आमचे आसन खोलीत लावले.पाहूया खुजावातील मुक्कामाचे क्षण पुढच्या भागात, नर्मदे हर
आज हा भाग पोस्ट करण्याआधी मध्यप्रदेश मधे बऱ्याच किनाऱ्याच्या ठिकाणी पावसामुळे माईचा जलस्तर खूप वाढलेले आहे असे व्हिडीओ व्हॉटसॅपवर आले. ते व्हिडीओ व फोटोही मी इथे पाठवले आहेत. मी ही वॉटसॅप वरून एकलबारच्या छोटया सिया बैरागी कडे माईच्या वाढलेल्या पाण्याबद्दल चवकशी केली तेव्हा त्यांच्या गावपाशीही माईचा जलस्तर खूप वाढलेला आहे हे कळले, कदाचीत सगळ्या गावाला आपली घरे सोडून नवीन जागेतही जावे लागेल असेही तिच्या बोलण्यातून कळले. नवीन जागेत गेलो तर तिकडून आपल्याला नक्की फोन करते असेही तीने सांगीतले. नर्मदे हर .
नर्मदा परिक्रमा अनुभव ७९
राम मंदीरात थोड्याच वेळात आरती होणार आहे असे सेवेकऱ्यानी सांगितल्यामुळे सायं स्नान करून प्रथम मंदीरात हजर झालो. ति तीथली आरती व प्रसाद घेऊन आम्ही परत आमच्या खोलीत आलो.माईची पुजा,आरती, नर्मदाष्टक म्हटले,नेमाचे आमचे हनुमान चालीसा , रामरक्षा म्हणणे झाले, बापुने त्याचे नित्याचे वाचन केले. तिथे सेवेला असलेल्या रामानंदी साधु सीतारामदासजी यांची भेट म्हणजे एक आनंदमय माणूस कसा असावा याचे परिपुर्ण उदाहरण होते.अतिशय शांत, लाघवी बोलणे , मुखावर एक वेगाळाच आनंद, कपाळाला मोठे उभे गंध, पांढरी शुभ्र दाढी तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची शोभा अजून वाढवत होती. काही माहीत नाही पण त्याच्याकडे बघीतल्यावर एक वेगळाच आनंद,समाधान मनाला जाणवत होते. आजही हा अनुभव लिहीताना त्याचा तो आनंदी चेहरा,त्यांचे ते हसणे सहज डोळ्यासमोर आले.परिक्रमेत एखादा अपवाद वगळा तर जवळ जवळ ९९ टक्के रामानंदी साधु ह्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज असे.मनाने खूप प्रेमळ,आनंदी असलेले साधु त्यांच्या मधुर बोलण्यामुळे तर परिक्रमेत व आजही आमच्या मनात त्यांचे एक वेगळेच स्थान निर्माण करून गेले.
थोड्यावेळात भोजन प्रसादीची वेळ झाली.आश्रमाचा आवार बराच मोठा असल्याने त्याच्या भंडारखान्याच्या खोलीच्या बाहेर मोकळ्यावर आमची सगळ्यांची पंगत खाली फरशी घातलेल्या जागेवर झाली.आज सकाळपासुन पोटात तो दूपारी मिळालेला बिस्कीटचा एक पुडा व थोडा चुरमुऱ्याचा चीवडा एवढेच होते पण चालणे मात्र जवळजवळ तीस बस्तीस किलोमीटर झाले होते त्यामुळे भुक तर सडकून लागली होती. पानात सुरवातीलाच टिक्कर व डाळ वाढण्यात आली,आता झाली का पंचाईत, कारण पोटात तर कावळे ओरडत होते व आजच्या भोजनात भात आहे किंवा नाही याचा काही अंदाज येत नव्हता, तसे विचारणे योग्य वाटत नव्हते त्यामुळे आज वाढलेला टिक्कर उदयन किवा बापूकडे पास करण्याची इच्छा असली तरी करता येत नव्हता. मग काय तो टिक्कर बारीक कुसकरून डाळीत घालून मी खाल्ले, तरीही भोजन संपण्यास उदयन व बापू पेक्षा माझे जवळ जवळ पंधरा मिनीटे जास्त लागली कारण आज जर व्यवस्थित चावून खाल्ला नाही तर उद्या काहींतरी दूसरा प्रॉब्लेम झाला तर माझी अजुनच पंचाईत होणार होती.
जस जसे परिक्रमेतील दिवस पुढे जात होते तस तसे दिवसागणीक थंडीचा कडाकाही वाढत चालला होता. आज बंद खोली होती व खाली सतरंजीसारखे घालायची सोयही बापूने नेहमीप्रमाणे आश्रमातील सेवेकऱ्यांशी बोलून केली होती. माझ्याकडे पायात घालायचे दोन जोडी सॉक्स होते, एक थोडे वापरलेले व दूसरे नवीन कोरे करकरीत. रात्रीच्या वेळी हे पायात घातले की थंडी थोडी कमी वाजत असे.थोडे वापरलेले सॉक्स माझ्यासाठी ठेवुन दूसरा जोड या दोघांपैकी कुणालातरी वापारावयास दयावयचा असे मी मनोमन ठरवले.आमच्या दोघांच्या स्लिपींग बॅग पेक्षा बापूची स्लिपिगं बँग थोडी जाड व ऊबदार असल्याने बापूने ते सॉक्स उदयन दादाला दे असे लगेच सांगीतले. मी ते उदयनला दिले खर पण मी दिल्यापासून त्याने ते रात्री कधी पायात झोपताना घातले आहेत असे मात्र मला कधी दिसले नाही. ह्याही संर्दभात माईने पुढे कशी मजा आणली ते मी पुढे कधीतरी सांगीन.
आज बंद खोली मुळे थंडी वाजण्याचा फार प्रश्न नव्हता व दिवसभर भरपूर चालणे झाले असल्याने स्लिपींग बँग मधे शिरल्यावर कधी डोळे मिटले ते कळलेच नाही. सकाळी या सगळ्या ऊबदार वातावरणाने नेहमीपेक्षा थोडे उशीरा उठाणे झाले. आम्ही आमचे प्रातःविधी आटोपून स्नान, संध्या माईची पुजा आरती करून बाहेर येऊन मंदीरात रामरायांचे दर्शन घेउन नेहमींप्रमाणे पुढे प्रस्थान करावयाचे असे ठरवले होते . आम्ही मंदीरात गेलो तेव्हा त्या रामानंदी साधुंशी परत भेट झाली. त्यानीं प्रेमळ आग्रहाने आम्हाला सांगीतले 'अरे इतने जल्दी आप यहाँ से प्रस्थान कर रहे हो , अभी चाय बन जायेगी आश्रम मे,आज ग्यारस भी है, थोडा आरामसे जाओ. ' आज आम्हाला खलघाट,सहस्त्रधारा करत महेश्वरपर्यंत पोहचावयाचे होते त्यामुळे ते म्हणतात तसे थोडे उशीराने निघून चालणारे होते. इकडल्या बऱ्याच साधु व महंतांची ही एक खासीयत आहे की आपल्या प्रेमळ आदरातिथ्याने कसेही करून त्या परिक्रमावासीला आपल्या आश्रमात दोन दिवस ठेऊन घेऊन मगच ते पुढे पाठवतात कारण त्यांच्या दृष्टीने ही परिक्रमा प्रत्येकाने परमेश्वराच्या चिंतनात, नामात,कुठेहीं घाई ,गडबड न करता माईच्या प्रत्येक स्थानाचा व प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगत आपण पुर्ण करावी मग त्यासाठी परिक्रमावासीयांच्या सेवेसाठी आपल्याला थोडी तोशीश पडली तरी ते ती सेवा आनंदाने करतात. त्या भावनेतून ते परिक्रमां करणाऱ्याचे प्रेमाने, सेवाभावाने आदारातीथ्य करतात. हा अनुभव आम्ही गुवारलाही घेतला होता व उदयनला आधीच्या परिक्रमेमधेही आला होता. जमदीश बापूंची तर महाराष्टातील परिक्रमावासीयांबद्दल एक गोड तक्रार आहे ते म्हणतात 'ये महाराष्ट्र के परिक्रमावासी भागभाग के भागभाग के परिक्रमा करने आते है और भागभाग के भागाभागकेही परिक्रमा पूरी कर लेते है '. तसे हे मत पुर्ण परिक्रमेत बऱ्याच ठीकाणी बोलले जाई. त्याला कारण म्हणजे आपले लहानपणापासून ते पुढे आयुष्यभर फक्त घडाळ्याच्या काटयावर धावणे चालू असते, लहानपणी शिक्षणासाठी व मोठे झाल्यावर अर्थाजनासाठी.अर्थात आता माझेही तेच चालू होते, पण या वेळच्या परिक्रमेत तरी त्याला काही इलाज नव्हता पण याच परिक्रमेत मनाशी एक पक्के ठरवले होते की पुन्हा कधी माईने परिक्रमा करून घेतली तर ती अशी वाघ पाठीमागे लागल्यासारखी न करता शांतपणे करायची, बघुया पुढे माईची इच्छा.
साधु जरी म्हणाले चहा आता लगेच हाईल तरी तो होण्यासही बराच वेळ गेला तो पिताना त्यानी सांगीतले, आज एकादशी आहे त्यामुळे आश्रमात लावलेल्या झाडाला पपई आली आहे , ती खाउन झाल्यावर मगच आपले जायचे ठरवा. बघा परत प्रेमाचा गळ त्यांनी टाकला होता.
उदयनची आत्या समाजवादी विचारांची असल्याने त्याच्या लहानपणी त्याची भेट आत्याबरोबर श्री मधु दंडवते, सौ.प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यासारख्या समाजवादी नेत्यांशी झाली होती. हे रामनंदी साधुही त्यांच्या तरूणपणी या विचारसरणीचे असल्याने सेवादल या संस्थेच्या माध्यमातून हे साधुही सामाजीक कार्य करीत असत, त्यातूनच त्यांच्या परिचय दंडवते परिवाराशी झालेला होता, काही काळ त्यांच्याकडे दंडवते कुटुब या कार्यासाठी राहीले होते. त्यामुळे बोलता बोलता उदयनशी त्या विषयावरही बोलणे झाले. 'दंडवतेजी का बेटा अब किधर हे, आपको पता है क्या?, परिक्रमा पुरी होने पर आप उनसे एक बार मिल लो ' असही त्यांनी सांगितले. थोडया वेळातच पपईचा प्रसाद आम्हाला मिळाला ते खाउन आम्ही तिथुन पुढे निघालो . निघताना त्या साधुंना मुंबईत आलात की आमच्याकडे रामरायांचे दर्शन घेण्यास नक्की या असे सांगुन त्यांना माझा मोबाईल नंबर दिला, त्यांना नमस्कार केला व तिथुन आम्ही निघालो.
काही झाले तरी आम्हाला आज महेश्वरला पोहचावयाचे होते. तिथे माझ्या बँकेतील माझे कलीग श्री निलेश बिवंडकर ,ज्याना आम्ही बुवा म्हणतो ,याचे कारण म्हणजे अतिशय उत्तम प्रवचन, किर्तन करण्याचा त्यांचा हतखंडा आहे. आर्गनवर तर हात पाण्यासारखा चालतो, अनेक संगीत नाटक व बाबा महाराज सातारकरांनाही ज्यांनी कित्येक वर्षे किर्तनात पेटी व आर्गनची साथ केली असे आमचे बुवा उद्या सकाळी महेश्वरला आम्हाला भेटावयास येणार होते. त्यांचा तसा आम्हाला फोनही आला होता. नंतर ते आमच्या बरोबर एक दोन दिवस परिक्रमा मार्ग चालून परत मंबईला परतणार होते. खरतर बुवा ही परिक्रमा करण्यास येणार होते पण प्रकृती कारणास्तव त्यानी आपला बेत परिक्रमा सुरू करण्याच्या काही दिवस आधी रहीत केला होता. पण आत कुठेतरी माईला भेटण्याची इच्छा होती त्यामुळे आम्ही साधारणपणे महेश्वरला कधी येत आहोत याचा अंदाज घेते त्यांनीही हा माईला भेटावयाचा छोटा बेत आखला होता.
दूपारी दीड वाजेपर्यत आम्ही खलघाटला पोहचलो. उपवास असल्याने बाकी काही खाण्याचा आज प्रश्न नव्हता त्यामुळे फक्त थोडीं केळी व पेरू विकत घेऊन आम्ही माईच्या किनाऱ्यानी पुढे निघालों.
माईच्या किनाऱ्याचा हा पूर्ण भाग भरपूर बारीक पांढऱ्या वाळुचा असा आहे सोबतीला बऱ्याच ठिकाणी आहेत खूप मोठे काटे असलेली काटेरी झुडपे. काही ठिकाणी मातीतही नारंगी रंगांची सुंदर फुले असलेली काटेरी झुडपे दिसत होती. खर तर हातात घेऊन फुलांची रंगसंगती बघण्यासारखी होती त्याला कातरल्यासारखी मोठी पाने होती पण त्याला असलेल्या त्या मोठ्या पिवळ्या, पांढऱ्या काट्यांकडे बघुन मी ते धाडस कधी केले नाही. इथुन जाताना आमचा चालण्याचा वेग बारीक वाळु मुळे परत कमी झाला कारण खूप भरभर चालण्याचा प्रयत्न केला तर बारीक मातीसारखी वाळु वाऱ्यानी उडून नाकातोंडात जाई.
साडेतीनला आम्ही जलकोटीला पोहचलो इथे माई,कारम व बुटीया नंदयाचा त्रिवेणी सगंम आहे. इथे असलेल्या एकमुखीं दत्त मंदीरात आम्ही पोहचलो. हे खूप मंदिर मोठे असून साधारपणे दहा हजार स्केवरफीट जागेवर हे बांधले आहे.दुपारची वेळ असल्याने मंदीरात अजिबात गर्दी नव्हती. शांतपणे दंत्त माऊलींसमोर आम्ही बराच वेळ बसलों. आत दत्त माऊलींची तेजस्वी, सुंदर एकमुखी संगमरवर मुर्ति आहे, माऊलींच्या बरोबर खाली एक भव्य दिव्य शिवपींडी आहे. तिथे खाली जाण्यास पायऱ्या असुन पुढे भुयारी मार्ग पुर्ण सिमेंट कॉक्रीट नी गोलाकार बांधलेला आहे. त्याचे दर्शन घेऊन परत दत्त महाराजांसमोर आलो, किती वेळ जरी आपण त्याच्याकडे बघत बसलो तरी आपले समाधान होत नाही असे हे शांत ,मनाला आनंद देणारे स्थान. तेव्हा तिथे असलेल्या महंतांनी आज तिथेच थांबण्याचा खूप आग्रह केला पण आम्ही त्यांना आज आम्हाला काही झाले तरी महेश्वरला पोहचावयाचे आहे असे सांगीतले. आमचा आज उपवासं म्हणुन त्यांनी दूपारी केलेली साबुदाणा खिचडी खाण्यास दिली.
साडेचार पर्यत आम्ही सहस्त्रधाराला पोहचलो ,परिक्रमेत इथे फार पुढे जाता येत नाही त्यामुळे लांबुनच अंथांग भागावर पसरलेल्या सहस्त्र धारानी वाहत असलेल्या माईचा हा जलप्रपात बघण्याचा एक वेगळा आनंद आम्ही घेतला. परिक्रमेत माईच्या किनारी अशी खूप स्थान आहेत की जिथले सौंदर्य बघुन आपला पाय तिथुन लवकर निघत नाही. थोडा वेळ आम्ही तिथे थांबून माईच्या किनाऱ्यानी चालत महेश्वर मुक्कामी पोहचलो. नर्मदे हर .
नर्मदा परिक्रमा अनुभव ८०
महेश्वरच्या सप्तमात्रुका मंदीराच्या आश्रमात आम्ही सहा वाजेपर्यंत पोहचलो.हा आश्रमही माईच्या अगदी किनारी थोडया उंचावर आहे.तिथले महंत श्री नरगीरी महाराज हे त्यांच्या दक्षिणेतील गुरूंच्या आश्रमस्थानी गेल्याने तेव्हा त्या आश्रमात नव्हते.उदयन गेल्या एक दिड वर्षापासून श्रीविद्या उपसनेसाठी इथे दोन, तीन वेळा येऊन गेला होता. श्री नरहरगीरी महाराज हे त्याचे श्रीविद्या उपासनेतील गुरू आहेत.
तिथला सेवेकरी श्रीनिवासने आमचे स्वागत केले. खाली पायऱ्या उतरून परिक्रमावासीयांच्या मुक्कामासाठी बांधलेला मोठा हॉल, संडास व बाथरूम व त्या हॉलच्या वर बांधलेले देवीचे मंदीर ,भंडारगृह त्याच्या पुढे कोबा घातलेली मोकळी जागा की जिथे उभे राहीले की समोर आपल्याला दिसते अथांग पसरलेले माईचे विलोभनीय पात्र. इथे फक्त चालत परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासीयांची मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था होते.
खालच्या मोठया हॉलमधे आम्ही
आसन लावले, स्नान करून माईची पुजा व आरती करून वर असलेल्या सप्तमात्रुकां मंदीराचे दर्शन घेण्यास गेलो.तीन वर्षापुर्वी मी इथे उदयन बरोबर आलो होतो तेव्हा इथे फक्त एक छोटी कुटी होती,आम्ही कुटीच्या बाहेर मोकळ्या जागेत बसुन महाराजांशी साधलेला संवाद, उदयन, मी व महाराजांनी तेव्हा म्हंटलेली भजने सगळे सहज आठवत गेले. श्रीनिवासने गरम गरम चहां आणला व आम्हाला भोजन प्रसादी बद्दल विचारले. तेव्हा आम्ही त्याला आज तर ग्यारस आहे त्यामुळे उपवास असल्याचे त्यास सांगीतले. पण तो म्हणाला 'अपने इधर तो ग्यारस कल है ' आज तो स्मार्थ ग्यारस /एकादशी है 'आम्ही त्याला आधीच्या आश्रमातील साधुंनी आज एकादशी आहे असे सांगीतल्याने आम्ही आज उपवास केला आहे पण जर एकादशी उद्या असेल तर आम्ही आज आता संध्याकाळी उपवास सोडतो व उद्या परत एकादशीचा उपवास करतो त्यामुळे आश्रमात आजची जी काही भोजन प्रसादी असेल त्याचे आम्ही सेवन करु.परिक्रमेत कुठेही व कधीही आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये ही आमची त्या मागची भावना होती. भोजन प्रसादीस थोडा वेळ असल्याने देवी समोर बसून रोजच्या नेमाचे म्हणुन झाल्यावर त्या मोकळ्या जागेच्या पुढच्या कठडयापाशी येऊन शांतपणे वाहणाऱ्या माईकडे आम्ही कितीतरी वेळ बघत असताना तीची निरनिराळी रूपे मनात आठवत गेलो.परिक्रमेच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचा तिच्या बरोबरच्या प्रवासाने आता तिचाशी वेगळेच भावपूर्ण नाते निर्माण झाले होते. कुणीतरी दिप प्रज्वलीत करून माईच्या पात्रात सोडलेले दिप पाण्यावर तंरगत असताना दिसत होते व त्यामुळे माईचे पात्र अजूनच मोहक दिसत होते .तो माईचा शांत स्पर्श जणू त्या छोट्या छोट्या दिपकांनाही एक आश्वासक आधार देत होता त्यामुळे ते ही छोटया बालकांप्रमाणे तिच्या अंगावर सहज बागडत आपल्याच आनंदात निमग्न होते. तेव्हा मनात त्यांच्या बद्दल थोडी असुया निर्माण झाली,
काश हम भी एक दिपक रहते पवनके झुले, झुलेमे बैठते,
माईकी गोदी मे झुमकर टहलते, उसकी जलके बुंदो से खेलते
उसके प्यार मे पागल होके हसते गाते माईमे समाते
हसते गाते माईमे समातेहे लिहीत असतानाही नकळत माईच्या जलाचा स्पर्श तनामनाला जाणवून गेला व लिहीता लिहीता मी सुखावलो.
रात्रीची भोजन प्रसादी झाली व आम्ही खालच्या हॉलमधे निजावयास आलो. उद्या सकाळी सकाळी बुवाचे आगमन होणार होते तेव्हा त्यांना परिक्रमेतील, माईच्या किती गोष्टी सांगाव्यात हे आठवत असताना कधी डोळा लागला ते कळलेही नाही.
सकाळी सकाळी मोबाईलची रींग वाजली, माझ्या बँकेतील श्री भिवंडकर /बुवा महश्वरमधे पोहचले असल्याची ही खुण होती. प्रेश होऊन मी त्याना आश्रम कुठे आहे हे लक्षात यावे म्हणून आश्रमाच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यावर येऊन ऊभे राहिलो. दहा मीनीटात बुवा मी जिथे ऊभा होतो तिथे पोहचले.सकाळचे स्नान, माईची पुजा व आरती करून झाल्यावर वर असलेल्या सप्तमात्रुका मंदीराचे दर्शन घेतले.तापर्यंत श्रीनिवासने मस्त गरमागरम चहा आणला तो घेउन मी व बुबा महेश्वरचे वैभव बघावयास बाहेर पडलो. उदयन व बापू मात्र आश्रमातच थांबले. खर तर उदयनच्या गेल्या परिक्रेत मी व कुलदीप खलघाट पासून त्याच्या बरोबर दोन, तीन दिवस परिक्रमा मार्ग चालावयास आलो होतो. महेश्र्वरला हा आश्रम तेव्हा झाला नसल्याने माई समोरच्या दुसऱ्या एका आश्रमात आम्ही थांबलो होतो तेव्हा इथुन निघताना महेश्वरचा राजवाडा, तिथे असलेली निरनिराळी शस्त्रे,मंदीर,देवघर, त्यातील देव,अनेक प्रकारची शीवलींग याचे दर्शन घेतले होते आज बुवांबरोबर पुन्हा तिथे जाण्याचा योग आल्याने मला आनंद झाला. प्रथम बुवांना घेऊन आश्रमां समोरील छोटया घाटावर घेऊन गेलो.सकाळच्या कोवळ्या सुर्याच्या उन्हात माईचे संथपणे वाहणारे जल त्या कोवळ्या उन्हानी मधुनच चमचमत होते. माईच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा होणारा थंडगार स्पर्श व त्याच वेळी सकाळचे पडलेले कोवळे ऊन या जोडगोळीने एक छान फिल मनाला आला.
महेश्वर- माईच्या किनाऱ्यावर विस्तीर्ण पसरलेला महेश्वरचा सुंदर घाट, दगडाच्या कलाकुसरीने नटलेली देवळे पाहीले हे वैभव पाहीले की आपल्या डोळ्यासमोर येते एक कर्तव्यदक्ष ऊतुंग व्यक्तिमत्व राणी अहिल्याबाई होळकर. एक असाधरण कर्तुत्व, दानशुर, अजातशत्रु, धर्मपरायण अशी कितीतरी विशेषणांही त्यांना कमी पडतील. १७२५ ते १७९५ हा एक काळ असा आहे की जो आपल्याला सुर्वण अंक्षरांनी लिहीवा लागेल कारण या काळात आपल्या कार्यानी त्यांनी राणी अहिल्याबाईं हे नाव मराठयांच्या इतिहासात अजरामर केले. कुशाग्र बुध्दीच्या जोरावर त्यांनी पेशव्यांनी दिलेली जहागीर अतिशय सर्मथपणे सांभाळली . आपल्या पतीच्या म्हणजेच खंडेराव यांच्या मुत्युनंतर त्या वेळच्या पध्दतीनुसार केवळ सासरे मल्हारराव होळकर यांच्या इच्छेला मान देउन व 'प्रजाजनांच्या , राज्याच्या हितासाठी ' सती न जाता राणींनी हे राज्य पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले.
सासऱ्यांच्या व मुलाच्या मृत्यु नंतर त्यांच्या कर्तुत्वाची खरी कसोटी लागली. एक बाई हे राज्य व राज्यकारभार कसा काय सांभाळणार हा दरबारातील मत्र्यांच्या पुरूषी अहंकाराला अस्मान दाखवत त्यांनी तोही गाडा आपल्या सैन्याच्या सहकार्याने सर्मथपणे सांभाळला.
माझ्या पहिल्या लेखापासून मी ज्या स्त्रीशक्तीचा गौरव केला ती शक्ती काय कार्य करू शकते यांचे असामान्य उदाहरण म्हणजे राणी आहिल्याबाई होळकर.
अतिशय चाणाक्ष असलेल्या अहिल्याबाई,त्या काळातही सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या, काळानुरूप जनतेच्या हितासाठी त्यांनी कायदयातही अनेक बदल केले. लोकहीतार्थासाठी राज्याच्या तिजोरीत भर कशी पडेल याकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले व त्यातून अनेक सामाजीक कार्य हाती घेतली. राज्यात विहीरी खोदणे, अनेक ठीकाणी धर्मशाळा, अन्नछत्रे, आश्रमशाळा बांधल्या.आपल्या जहागीर पुरते मर्यादीत न राहता सबंध भारतभर त्यानी अनेक मंदीरांच्या जीर्णोध्दाराचे कामही हाती घेतले ज्यात, सोरटी सोमनाथ, औंढा नागनाथ, जेजुरी,आयोध्या, नाशिक, द्वारका, हृषीकेश महाकाळेश्वर,काशी विश्वेश्वर यासारख्या अनेक मंदीरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. वाराणसी, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा अनेक नदीकीनारी विस्तीर्ण व सुंदर घाट, बागा, कुंडे, पाणपोय्या, यात्रींकांसाठी धर्मशाळा अशी अगणीत कामे त्यांनी राज्याच्या तिजोरीतील पैशामधुन केल्या.
१७७२ मधे इंदूरहुन राजधानी हलवून ती त्यानी नर्मदा किनारी महेश्वरनगरीत आणली.म्हणजेच एका कर्ततुत्वान स्त्रीला माईच्या आर्शिवादाची साथ मिळाली. हे सगळे त्यांचे कार्य बघीतले की असे वाटते की माईनेच या शक्तीरूपात येऊन हे महान कार्य केले असावे. राणी अहिल्याबाई ह्या थोर शिवभक्त होत्या.
महेश्वरला त्यानी विणकरांचे मध्यवर्ती केद्र बनविले, वस्त्रोद्योगास चालना देऊन मोठी बाजारपेठ महेश्वर नगरीत निर्माण केली. धर्मपरायण असुनही राजकारण व सामाजकारण कसे करावे याचा आर्दश धडा त्यांनी पुढच्या पीढी पुढे ठेवला. त्यांच्या ह्या निःस्पृह कार्याला परमेश्वराचे सहाय्य कसे मिळते गेले हे ज्वलंत उदाहरण राणी अहिल्याबाईंनी आपल्या कार्यातून जगाला दाखवून दिले. दासबोधात महंत किवा नेता कसा असावा याचे विवरण सर्मथानी खूप ठीकाणी केले आहे त्यातील खूप लक्षणे राणी अहिल्याबाईना तंतोतंत लागु पडतात. लोकांचे अतःकरण कसे साभाळावे, त्या सर्व लोकांना संतुष्ट कसे ठेवावे याची कला साधणे ही काही सोपी गोष्ट नाही पण ती कला त्यांना शिवभक्तिमुळे सहज साध्य झाली. त्यामुळे २८ वर्ष त्या रयतेच्या खऱ्या समाजनेता, राणी, आई होऊ शकल्या.
आज बुवांबरोबर हे त्यांचे वैभव बघताना खूप आनंद होत होता व मनातून त्यांना व त्यांच्या कार्याला दंडवत करून आम्ही बाहेर आलो. बाहेर राणींचा खूप मोठा पुतळा उभा केला आहे त्याला वंदन करून, आम्ही परत पायऱ्या उतरून माईच्या किनारी आलो. जगताला आनंद देणारी आई निखळपणे वाहत असताना हसत हसत विच्यारत होती, ' काय आलास माझे तेहीं कार्य बघून ' मी फक्त तीच्या कडे बघत होतो कारण सर्वसामान्य मी , याला काय उत्तर देणार.
संबंध घाट चालून परत आश्रमात आलो तोपर्यंत बारा वाजत आले होते. त्या दिवशी पुर्ण वेळ महेश्वर मधेच आम्ही थांबलो. दूपारी ४.३० वाजता मडलेश्वरचे श्री जहागीरदार काका आम्हाला भेटावयास म्हणून आश्रमात आले.आम्ही कालपासून इथे आलेले असुन सुद्धा अजून तिकडे त्याच्या आश्रमात का पोहचलो नाही हे आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी व लवकर तिकडे या हे सांगण्यासाठी ते तिथे आले होते.थोडया वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. उघा सकाळी इथुन निघाल्यावर आम्ही त्यांच्याकडेच आले पाहिजे असे आमच्याकडून प्रेमाने कबुली घेऊन काका परत गेले .पाहुया दूसऱ्या दिवशीचा सकाळपासुनचा प्रवास पुढच्या भागात .नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८१
महेश्वर हून सकाळी लवकर निघायचे असे आदल्या रात्री ठरले खरे पण सकाळी सकाळी निरोप आला की मोरटक्क्याचा शुभम जो तेथील ललितांबिकेच्या मंदीराची पुजा व इतर व्यवस्था बघतो, उदयनला तो खूप मानणारा , याही परिक्रमेत ज्याच्याकडे आम्ही मोरटक्क्याहून निघताना गेलो होतो , असा आमचा सगळ्यांचा मित्र ,ज्याचे कालच लग्न झाले होते व तो आम्हाला भेटायला व आशिर्वाद घ्यायला सपत्निक येत आहे, त्यामुळे आता तो आल्याशिवाय इथुन निघता येणार नव्हते.जहागीरदार काकांना तर काल ते निघत असताना आम्ही उद्या सकाळी इथुन लवकर निघतो व मंडलेश्वरला लवकर पोहचतो असे सांगीतले होते. आता मात्र ते लवकर पोहचणे शक्य दिसत नव्हते कारण ही कंपनी येउन गेल्याशिवाय तरी आम्हाला इथुन निघता येणार नव्हते.
साधारणपणे नऊ वाजता शुभम, ती नववधु, त्याचा मोठा भाऊ असे सगळे पाच सहा जण आले. उदयनची भेट झाली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर सहजच जाणवत होता,मीही उदयन बरोबर त्याच्याकडे दोन तीन वर्षापुर्वी दोन दिवस गेलो होतो त्यामुळे माझीही त्याच्याशी ओळख होती. थोडयावेळ गप्पा, नमस्कार, आर्शिवाद हे सगळे सोपस्कार होऊन आम्ही त्या मंडळींचा निरोप घेउन आश्रमातून निघालो.माईच्या किनाऱ्यानी महेश्वर ही वैभवशाली नगरी व राणी अहिल्याबाईंची कर्तुत्वगाथा आठवत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो .आज हा परिक्रमा मार्ग चालण्यास आमच्या तिघांबरोबर अजून एक नवीन भिडू बुवांच्या रूपाने आला होता.निघण्यास उशीर झाल्याने कांकाना सांगितलेल्या वेळेपेक्षा पोहचण्यास आपल्याला उशीर होणार हया विचाराने मला जास्त त्रास होत होता कारण कुठेही आपण सांगीतलेल्या वेळेत पोहचणे हे आता हरिमंदारामुळे इतके रक्तात भिनले असल्याने मी अजून उशीर होऊ नये म्हणून पाहिल्यापासूनच चालण्यांचा वेग चांगला ठेवला. पण त्यामुळे झाले काय तर माझ्या चालण्याच्या गतीमुळे उदयन, बापू व बुवांमधे व माझ्या मधे चांगलेच अंतर पडू लागले.त्यामुळे मधे मधे थांबुन ते दृष्टीक्षेपात आले की पुढे चालत राहणे असा हा प्रवास चालू होता. बापूलाही आज काय झाले होते ते मला माहीत नव्हते पण तोही आज चालताना खूप मागे पडत होता व बुवा तर सगळ्यात शेवटी होते. बुवानी पाठीला लावायची सॅग आणली नसल्याने खांदयाला बॅग लावुन ते चालत असल्याने व एवढे भराभर चालण्याची सवय नसल्याने ते बरेच मागे पडत होते. त्यामुळे उदयनला त्यांची काळजी वाटत होती, 'ते नवीन आहेत,बरोबर येतील की नाही ' म्हणून तो त्याच्यासाठी थांबत होता. मी खूप भराभर चालत असल्याने उदयन माझ्यावर थोडाफार चिडला होताच. पण बुवा विषयी मी निश्चिंत होतो कारण त्याच्या स्वभावानुसार ते काही चुकण्यातले नव्हते व जरी चुकले तरी तोंड उघडून आमच्या पर्यंत ते नक्की पोहचणार हे मला पेक्के माहीती होते.दोन अडीच तासानंतर आम्ही मंडलेश्वरच्या जवळपास पोहचल्याच्या खुणा दिसु लागल्या तसे मी तिथेच एका झाडाखाली थांबलो. थोडयावेळाने उदयन व बापू तिथे पोहचले व त्यावेळी मला बापू आज का मागे पडत होता याचे कारण समजले. महेश्वरला आल्या दिवसांपासून बापूचा पाय थोडा दूखतं होता पण पठ्याने त्या विषयी एकाही चकार शब्द काढला नव्हता. आज चालताना त्याचा पाय जास्त दुखावयास लागल्याने व त्यातच त्याची चप्पलही आज तुटल्याने त्याला चालावयास खूप त्रास होत होता. पण मी पुढे चालत असल्याने मला त्याच्या चपलेचे काही कळले नव्हते व त्याया पायाचे दुखणे तर डोक्यातही आले नव्हते. फक्त काकांकडे पोहचावयास खूप उशीर होऊ नये हा एकच ध्यास डोक्यात असल्याने मला त्याच्यासाठी थांबुन त्याला आज काय झाले आहे अशी विचारपूस करण्यास आपण थांबावे असेही तेव्हा सुचले नव्हते. थोडया वेळाने बुवा ही तिथे पोहचले.
गावाजवळ जसे आम्ही आलो तसे एक चपलांचे दुकानं लागले ,बापूला त्या दूकानात चप्पल विकत घेतली.उदयन मलाही तेव्हा चप्पल घेण्याचा आग्रह करत होता पण मी त्याला म्हंटले की जो पर्यंत ह्या चपलांनी चालू शकतोय तोपर्यंत ह्याच वापारायच्या व दुसरे कारण म्हणजे आता कुठे पाय दुखावयाचा बंद झाला होता त्यामुळे पुन्हा नवीन चपलां घेऊन परत काहीतरी नवीन त्रास सुरू होण्यापेक्षा आता चालु आहे तसेच पुढे चालू देणे मला योग्य वाटले त्यांमुळे त्यास नकार देउन फक्त बापूंसाठी नवीन चपला घेतल्या . दुकानदाराने मस्त गरम गरम चहा पाजला, तो पिऊन आम्ही जहागीरदार महाराजांच्या वासुदेवकुटीत गेलो.प्रशस्त आवार, आत शिरलो की थोडयाच अंतरावर उजव्या बाजूला महादेवाचे सुंदर, जुने पंचायतन मंदीर,अशा प्रकारची मंदीरे गौंड राज्याच्या कार्यकाळात बाधली जात असल्याने हे मंदीरही तितके जुने असावे किंवा इतके जुने असण्याची मला शक्यता वाटते. महादेव मंदीराच्या मागील बाजूस डाव्या बाजूला सुंदर गणपती मंदीर तर उजव्या बाजूला देवीचे मंदीर, पुढे सुर्यदेव व विष्णुचे मंदीर. थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला थोडी लांबट अशी वासूदेव कुटी ज्यात वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामीच्या पादुका व फोटो) त्याच्या बाजूला साईबाबांचे मंदीर ,मधे थोडी जागा सोडून काकांचे राहावयाचे छोटेखानी घर.
आम्ही गेलो तेव्हा काकाकडे गावातील कुणीतरी आलेले असल्याने ते त्याच्याशी बोलत होते,आम्ही जसे गेलो तसे काकानी प्रसन्नपणे आमचे " या, या " म्हणुन स्वागत केले, 'सकाळपासून वाट बघत आहे तुमची ' यावर मात्र आम्ही काहींच बोलू शकलो नाही कारण आमच्याकडून उशीर तर झालाच होता.आम्ही तिथे पोहचेपर्यंत जवळ जवळ दूपारचे बारा वाजत आले होते.
गेटच्या आत शिरल्यावर थोडया अंतरावर डाव्या बाजूला परिक्रमावासीयांच्या मुक्कामासाठी एक खोली बांधली आहे त्यात काकांच्या परवानगी घेऊन आम्ही आमची आसने लावली.
उदयनच्या दुसऱ्या परिक्रमेत इथे येऊन गेल्याने काकांशी आमची चांगली ओळख झाली होती. त्यानंतरच्या रामनवमी उत्सवात ते काकूंना घेउन डोंबिवलीला रामजन्माच्या आदल्या दिवसापासून आले होते त्यामुळे एक वेगळेच आपलेपणाचे नाते निर्माण झाले होते.काका स्वतः टेंबे स्वामींचे भक्त, स्वभावानी एकदम स्पष्ट, मोकळे ढाकळे पण खूप प्रेमळ त्यामुळे त्याच्याशी दुपारच्या चहा नंतर वेगवेगळ्या विषयांवर बऱ्याच वेळ मनसोक्त गप्पा झाल्या.संध्याकाळचे जेवण झाले व आम्ही समोर असलेल्या दत्त मंदीरात दर्शनास गेलो, दत्त महाराजांचे दर्शन घेतले व बाहेर रस्त्यावर आलो त्याच रस्त्यावर थोडे मागे असलेल्या राममंदीरात तेव्हाच जाण्याचे ठरवले. हे मंदीर प .पु.गोंदवलेकर महाराजांच्या अंतरंगातील शिष्य ब्रम्हानंद महाराज व श्री भैय्यासाहेब मोडक यांनी हे माईच्या तीरावर बांधलेले आहे.
प.पुं ब्रम्हानंद महाराज /बुवा
महाराजांचा या पटशिष्याला महाराज कौतुकाने बुवा म्हणायचे.आमच्या बुवांचे वैराग्य शुका सारखे आहे असे सद्गुरू आपल्या शिष्याचे कौतूक करावयाचे व हे कौतुक किती खरे आहे हे बुवांनी आपल्या आचरणातून कायम दाखवुन दिले. विजापूरात जालिहाल गावात बुवांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अनंत , लहानपणीच त्यांची खूपशी संस्कृत, कानडी स्त्रोत्र तोंडपाठ होती, पुढे चार पाच वर्ष त्यांनी साहित्य, व्याकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर वेदांतशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते गदग येथे गेले. तो अभ्यास पुर्ण होत असतांना त्यांच्या हातावर अचानक कोडाचे पांढरे डाग दिसू लागले , खूप उपचार करूनही फारसा फरक पडला नाही. कष्टाने,मेहनतीने मिळवलेली ही विद्या आता फुकट जाणार व नुसते शास्त्र शिकण्यात असलेली व्यर्थता तेव्हा त्यांच्या लक्षात आली. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना वैराग्य प्राप्त झाले, खरा जीवनाचा अर्थ काय?हा प्रश्न त्यांना पडला. हे मला सांगणारे कोण भेटेल, माझ्या मनाचे समाधान कुणाकडून हाईल ही मनाला तळमळ लागली, त्यासाठी तासोंतास ते वनात जाऊन जप करू लागले, सदगुरू भेटण्याची तळमळ आता वाढू लागली. पहिल्यांदा इंदूरला महाराजांची भेट होउनही सदगुरूंची आळेख पटली नाही पुढे श्री दत्त महाराजांच्या आदेशानूसार ते परत इंदूरला आले व तेथे त्यांना महाराजांकडून अनुग्रह मिळाला. अनुग्रह झाल्यावर त्यांच्या चित्तात होत असलेली तळमळ, तडफड शांत झाली .महाराजांनी त्यांचे नामाभिधान 'ब्रम्हानंद ' या नावाने करून त्यांना तपचर्येसाठी नर्मदाकाठी जाण्याची आज्ञा केली. माई किनारी केलेल्या अडीच वर्षाच्या तपाने त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले .पुढे महाराजांच्या आज्ञेनूसार रामनामाचा प्रसार त्यांनी कर्नाटकात केला.
भय्यासाहेब मोडकांमुळे मला महाराज मिळाले म्हणून ब्रम्हानंद बुवांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. महाराज इंदूरला आले की भय्यासाहेबांकडे उतरत, त्यांनाही महाराजांनी मार्गदर्शन केले. "विकल्प सोडून आपण नाम घ्या म्हणजे मनाची आपोआप तयारी होईल व मग नको म्हणत असतानाही राम पाठीमागे लागेल " हा मौलीक उपदेश त्यांनी भय्यासाहेबांना केला.
महाराजांचे अनेक शिष्य होते जसे, श्री भाऊसाहेब केतकर, आनंद सागर, डॉ शंकराचार्य कुर्तकोटी या सर्व मंडळींप्रमाणे हे दोघेही त्यांचे आवडते शिष्य होते. आज त्यांनी बांधलेल्या ह्या राम मंदीराबद्दल लिहीतांना त्यांचे आपल्या सदगुरूवर असलेले अतीव प्रेम आठवून हे लिहायचा मोह मलाआवरता आला नाही. अशा सदगुरूंना व सतशिष्यांना मनापासून दंडवत.
हे अतिशय सुंदररीत्या बांधलेले राम मंदीर म्हणजे एक आनंदाची खाण आहे. प्रभु रामचंद्र , सीतामाई व लक्ष्मण, मारूतीराय यांच्या आखीव रेखीव मुर्ती, मुर्तींच्या बाजुला गाभाऱ्यात संगमरवर दगडातील सुंदर कलाकुसर बघुन मन आनंदाने भरून आले.त्यांचे ते सुंदर पोषाख, त्यावरील दागीने, हार व मुर्तीच्या चेहऱ्यावरील विलोभनीय हास्य व तेज बघुन मन आनंदाने नाचू लागले.आज हा लेख लिहताना परत ते सगळे दृष्य डोळ्यासमोर आले व मनात श्री समर्थ रामदास स्वामींनी एकदा पंढरपुरात पांडूरंगाला पाहून श्रीरामचंद्राचे केलेल्या गुणवर्णनाचे शब्द इथे लिहावे असे वाटले ते प्रेमाने म्हणतात
येथे का उभा श्रीरामा | मनमोहन मेघश्यामा| ॥धृ ॥
काय केली आयोध्यापूरी Iयथे वसवली पंढरी ॥१॥
काय केली सितामाई | यथे राहे रखमाबाई ॥२॥
काय केली शरयुगंगा Iयेथे आणिली चंद्रभागा ॥३॥
धनुष्यबाण काय केले I कर कटावरी ठेविले ॥४॥
काय केले वानरदळ I यथे मिळविले गोपाळ॥५॥
काय केला हनुमंत Iयेथे उभा पुंडलिक भक्त ॥६॥
रामी रामदास भाव Iजैसा भाव तैसा पंढरीराव ॥७॥
तेव्हा परत घरच्या रामरायांची खूप मनापासून आठवण झाली.मंदीरात थोडे उशीराने गेल्याने दर्शनासं येणाऱ्या भक्तांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे गाभाऱ्यासमोर असलेल्या प्रशस्त हॉलमधे रामरायांसमोर आम्ही तिघेजण अगदी निवांतपणे बसून त्यांचे ते सौम्य,हसतमुख मुखकमल बघण्याचे सुख आज अनुभवत होतो . आज कसली घाई नव्हती किंवा पुढे कुठे मुक्कामास जायचे हा ध्यास नव्हता.तेव्हा तेही खूप आनंदाने आमच्याकडे बघत हसत आहेत असे मनात आले. मग विचार केला हा तर आपल्याच मनाचा खेळ आहे, पण एक वेगळाच आनंद मिळुन गेला.
मंदीराचे व्यवस्थापक श्री मोडक हे उदयनच्या लाबच्या नात्यातील असल्याने त्यांना भेटलो. त्यांच्या परवानगीने आम्ही तिघांनी तिथे खडया स्वरात हॉलमधे बसून रामरक्षा, मारूती स्तोत्राचा पाठ केला. ते म्हणत असताना मिळालेला आनंद तर अर्वणनीय होता.थोडयावेळाने आम्ही मंदीरातून बाहेर आलो,बाहरेच्या आवारातून खाली शांतपणे वाहणाऱ्या माईला बघताना आज खूप छान वाटत होते.मनात आले की माई इथे हळुवारपणे येऊन मंदीराच्या पायाला स्पर्श करून एकप्रकारे आपल्या जलाने रामरांयांच्या पदकमलांनाच आभिषेक घालत असावी.
मुख्य मंदीराच्या डाव्या बाजूला ध्यानसाधना करण्याची एक छोटी खोली आहे तिचा दरवाजा मंदीराच्या बाहेरून आहे, मोडक काकांनी तो उघडून दिला पण आत लाईट नसल्याने थोडया वेळात आम्ही तिथुन परत बाहेर आलो. बाहेर मंदीराच्या समोर डाव्या बाजूला मारूतीरायांचे मंदीर आहे त्याचे दर्शन घेतले.मोडक कांकांनी आम्हाला प्रसाद दिला तो घेउन त्यांचा निरोप घेतला व मंदीराच्या बाहेर येऊन वर जाण्याच्या पायऱ्या आम्ही चढू लागलो. चढता चढता वर बघीतले तर समोरून येत होते आमचे पाखरे, पवार व चव्हाण माऊली.धडगाव नंतर आज खूप दिवसांनी आमची अनपेक्षितपणे भेट होत होती त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आम्ही सकाळी तर ते आज संध्याकाळी मंडलेश्वरला पोहचले होते.काकांच्या घराच्या समोर असलेल्या दत्त मंदीरात ही सगळी मंडळी मुक्कामास होती त्यामुळे त्यांना रामरायांचे दर्शन घेऊन आपण वासुदेव कुटीत गप्पा मारण्यास या असे सांगुन आम्ही परत काकांकडे आलो.थोडयावेळाने तिन्ही माऊली आल्या मग कुटीत मस्तपैकी माई, परिक्रमा व थोडे आध्यात्मा या विषयी जहागीरदार काकांचे अनुभव असा गप्पांचा छान फड जमला त्यामुळे रात्रीचे बारा साडेबारा कधी वाजले ते कळलेच नाही. काकांना तर अजुनही बोलण्याचा उत्साह कमी झाला नव्हता पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला इथुन पुढे प्रस्थान करावयाचे असल्याने ती गप्पांची मैहफील आम्ही तिथेच थाबावली. पाहुया उद्या काकांनी आम्हाला दिलेला प्रेमाचा निरोप पुढल्या भगात. नर्मदे हर .
नर्मदा परिक्रमा अनुभव ८२
मंडलेश्वर मुक्काम पुढे चालू - त्या दिवशी पहाटे सव्वापाचलाच मला जाग आली, काकांना मी आदल्या रात्री झोपण्याच्या आधी विचारून ठेवले होते की कुटीला रात्री कुलूप घालत नाही ना? मी सकाळी जाऊन बसलो तर चालेल कि कसे ?'हो, हो जरूर जाऊन बसा, कुटीला फक्त बाहेरुन कडी असते, फक्त आत गेलात की दार व्यवस्थित ओढून घ्या,, म्हणजे झाले ' असे काकांनी मला सांगीतले त्याप्रमाणे वासुदेव कुटी उघडून आत जाऊन महाराजांसमोर बसलो. काल रात्री उशीरा झोपूनही आज पहाटे लवकर जाग आल्याने माझेच मला आश्चर्य वाटंले व आनंदही झाला की सकाळचा वेळ आपला सार्थकी लागत आहे.कुटीत तासभर कसा गेला ते कळलेही नाही. सव्वासहापर्यंत काका कुटीत आले,एक छानसी अगरबत्ती लावली,त्याच्या मंद सुवासाने सगळी कुटी भरून गेली. मग मीही तिथे वेगळ्याच आनंदात बडून गेलो.
सातवाजेपर्यंत कुटीच्या बाहेर आलों तोपर्यंत ही सगळी कंपनी उठलेली होती.काकांनी सकाळी चहा घेत असतानाच आम्हाला प्रेमळ अधिकाराने सांगीतले की आता तुम्ही इथुन लगेच निघायचे नाही , जेवण करून किंवा पोटभर नाश्ता करून मगच पुढे जाण्याचे ठरवा. मी तुम्हाला त्याशिवाय पुढे जाऊन देणार नाही.
य़ा आधी मी , उदयन व कुलदीप इथे दोनदा येऊन गेलो होतो तेव्हा काका व काकूंनी आमचे खूप प्रेमाने आगात स्वागत केले होते.काकांच्या या परिक्रमावासीयांच्या सेवेला काकू स्वतः जातीने राबुन सगळ्यां परिक्रमावासीयांचे जेवण, आल्या गेल्याचा चहा पाणी, नाश्ता हे सगळे खूप आनंदाने करून काकांच्या या सेवेला खूप उत्तम प्रकारे साथ देतात.खरतर काकांचे वय आता ७५ च्या पुढे व काकूंचे वय सत्तरीच्या जवळपास आलेले तरीही दोघे जण आलेल्या परिक्रमावासीयांची सेवा खूप आनंदाने , प्रेमाने करतात. काका म्हणजे तर एक धबधबा आहेत आनंदाने व उत्साहाने वाहणाराव त्याला तितकीच समरसून साथ मीळाली आहे या ओहळरूपी काकूंची ! आता जरी काकुंचे वय झाले तरी त्या काकांच्या प्रत्येक गोष्टीत आनंदाने, प्रमाने व समरसून साथ देतात. इथेही तीच स्त्रीशक्ति काकांच्या या कार्याला खूप मोलाची साथ देत असताना दिसत होती. त्यामुळे त्या दोघांनाही आमच्या सगळ्यांकडून मनापासून नमस्कार .
आमची स्नान, पुजा, आरती झाली व काकांनी आम्हा तिघांना परत त्याच्या घराच्या परसात पुन्हा एकदा चहा प्यायला म्हणून बालावले.गप्पा मारत असतानाच काकूंना हाक मारून सांगीतले की 'कपाटातील ती सोवळी , धोतर व बंडया घेऊन ये ग जरा , मी काही यांना असेच पुढे जाऊन देणार नाही '. काकूंनी ढीग आणून बाहेर ठेवला तेव्हा म्हणाले यातील कुठले सोवळे, धोतर तुम्हाला काय आवडत असेल ते तुमचे तुम्ही निवडून घ्या नाहीतर मी देईन ते तुम्हाला घ्यावे लागेल.आता या पुढे थंडीचा कडाका खूप वाढत जाणार आहे त्यामुळे अंगावर असा नुसता पंचा घेऊन कसे चालेल ?तुमच्या गुरूमाउलीनाही आवडेल का? त्यांना काय वाटेल जर तुम्ही असे अंगावर पंचा घेऊन पुढचा परिक्रमा मार्ग चालत राहिलात तर ?,म्हणून मी आता तुम्हाला एक एक बंडी देणार आहे व ती आज इथे घालूनच तुम्ही पुढे जायचे आहे. त्यांचे ते प्रेमळ अधिकारवाणीचे बोलणे ऐकून डोळ्यात सहज पाणी आले, वाटले किती ही आपुलकी, प्रेम! नंतर मनात एकक्षण असेही वाटून गेले की नाही आता हे माईच आपल्याला काकांकडून सांगत आहे, इथपर्यंत आपण अंगावर फक्त पंचा ओढून आलो ,पण आता त्या आईला या लेकरांची काळजी त्यामुळे तीच काकांच्या रूपाने आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. मग विचार केला की आपल्या मनात असा कुठेलाही बंडी किंवा तत्सम वस्त्र घालण्याचे डोक्यात आले नसताना जाअर्थी काका आपल्याला हे देत आहेत त्या अर्थी ही तीचीच इच्छा त्यामुळे तिचा हा प्रसाद असे मानून मी एक बंडी व एक कॉटनचे धोतर असे तिचा प्रसाद म्हणून घेतले. डोंबिवलीहून निघताना लुगी म्हणून लावण्यासाठी घेतलेला मोठा राजापूरी पंचा हा मला तिथे चालताना तितकासा सोयीस्कर वाटला नव्हता, शिवाय तो वाळण्यासही जास्त वेळ लागत असे. उदयनला मात्र तेच वस्त्र खूप पसंद पडत असल्याने मी माझा एक मोठा पंचा केव्हाच त्याला दिला होता त्यामुळे काकांनी दिलेल्या या छोट्या धोतराचा मला रोजच्या नेसण्यासाठी आता छान उपयोग होणार होता. बापूनेही बंडी घेतली फक्त उदयने बंडी न घेता एक छान सोवळे घेतले. परिक्रेमत कुठलीही शिवलेली गोष्ट घालायची नाही असे त्याचे मत होते त्यामुळे त्याने बंडी घेण्यास नकार दिला. तसेही तो उष्ण प्रकृत्रीचा असल्याने त्याला आमच्यापेक्षा थंडीही कमी वाजत असे .
ह्या माईने दिलेल्या प्रेमळ ,उबदार बंडीचा मला पुढे परिक्रमेत इतका उपयोग झाला की पुढे पुढे सकाळच्या कड्याक्याच्या थंडीत आंघोळ करून झाल्यावर ही बंडी घातली की असे वाटे की एखादी आई जशी आपल्या लेकराला थंडी लागु नये म्हणुन आपल्या साडीच्या पदरात मायेने जवळ करते, तसेच काहीसे ही काकांनी दिलेली प्रसादरूपी बंडी अंगात घातल्यावर काम करीत असे. असे वाटे की माईच आपल्या उबदार स्पर्शाने माझी थंडी कमी करत आहे.हे सगळे सांगण्याचे अजून एक कारण असे आहे की त्या बंडीचा मला इतका छान उपयोग होऊ लागल्यामुळे कधीतरी संध्याकाळच्या स्नानानंतर धुतलेली बंडी रात्रीच्या गारठ्यामुळे वाळत नसे व त्यामुळे मला कधी कधी ती घालता येत नसे म्हणुन पुढे मी एका दुकानात अजुन एक बंडी विकत घेतली , खर तर ती विकत घेतलेली बंडी परिक्रमा पुर्ण होण्यास बराच अवधी असताना घेतलेली असूनही तिचा वापर मात्र जेमतेम दोन तीन वेळाच पुढे माझ्याकडून झाला इतर सगळ्या दिवशी हि प्रसादरूपी बंडी थोडी अर्धवट ओली असली तरी घालणे होई कारण त्यात होती माईच्या प्रेमाची ऊब.
हे सगळे होईस्तापर्यंत सकाळचे दहा साडेदहा झाले, त्याआधी कालच्या तिन्ही माउली काकांनी काल आग्रहाने सांगीतले होते म्हणून, सकाळी परत वासुदेव कुटीत दर्शनास आल्या व काकांकडला प्रसादरूपी चहा घेऊन त्यानी आमचा निरोप घेऊन पुढे प्रस्थान केले.आम्ही जर सकाळची भोजन प्रसादी घेउन जर पुढे निघालो तर पुढच्या मुक्कामास पोहचण्यास उशीर होईल असे आम्ही काकुंना सांगीतले. त्यामुळे त्यांनी सगळ्यासाठी पोटभर स्वादिष्ट पोहे केले . तुम्ही इथुन जेवण करून जात नाही आहात त्यामुळे हे पोहे मात्र तुम्हीं पोटभर खायचे व मगच निघायचे आहे असे काकानी परत आग्रहाने आर्वजून सांगीतले .त्यामुळे ते चविष्ट पोहे खाऊन आम्ही आता परिक्रमेच्या पुढच्या मार्गास निघणार होतो. आज बुवा मात्र आमच्याबरोबर पुढे येणार नव्हते कारण आज रात्रीच्या बसने ते पस्त मुंबईस परतणार होते. उद्यापासून त्याना पुन्हा ऑफीस जॉईन करायचे होते.पण माईच्या मनात मात्र काही वेगळेच चालू होते.बुवानीही खर तर आमच्या बरोबर परिक्रमेस येण्याचे ठरवले होते पण प्रकृती कारणास्तव त्याना हा परिक्रमेचा बेत पंधरा दिवस आधी रद्द करावा लागला होता. पण आत कुठेतरी माईबद्दल लागलेली ओढ त्याना मुंबईत स्वस्थ बसून देत नव्हती त्यामुळे तिच्यावरच्या प्रेमाने ते मुंबईहून खास तीन दिवस तिच्या सानिध्यात राहण्यासाठी, तिच्या दर्शनासाठी व परिक्रमा मार्ग चालण्यासाठी इथे आले होते. पण ह्या त्यांच्या तीन दिवसाच्या उपासनेचे फळ म्हणुन की काय माईनी बुवाना साईबाबांचे दर्शन देण्याचा योग जुळवुन आणला होता. आज आम्ही इथुन पुढे निघाल्यावर दुपारी काकाही तिकडच्या एका व्यक्तिने बोलावल्यावरून आपली गाडी घेउन शिर्डीला जाण्याचे ठरवले होते. बुवांनाही मुंबईला जायचे असल्याने काकांनी त्यांनाही आपल्या बरोबर येण्याचा आग्रह केला.बुवांचेही साईबाबांवर मनापासून खूप प्रेम, श्रध्दा .रामनवीच्या उत्सवात ऑफीस करून फोर्टवरून डोंबिवलीला रामनवमी उत्सवात किमान दोन तीन दिवस तरी संध्याकाळच्या भजनात प्रवचन सांगायची सेवा करण्यास ते अगदी आनंदाने न कंटाळता येतात व परत रात्री घरी गिरगावात जातात. श्रोतेही त्यांच्या प्रवचनात अगदी मनापासून तल्लीन होऊन जातात.बुवांचे प्रवचन हे वारकरी पद्धतीचे 'जय जय राम कृष्ण हरी ' या नाम घोषात सुरू होणारे पण त्या नामानंतर प्रत्येक दिवशी बुवा प्रवचन सुरू करण्या आधी इतर जयजयकारां बरोबर 'सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ' असा जयजयकार नेहमी करीत असत, थोडक्यात असे त्याचे साईबाबांवरही तितकेच खरे प्रेम त्यामुळे मला असे वाटते की माईने हा सगळा योग जुळवून आणून त्यांना साईबाबांच्या दर्शनाचा लाभ अचानकपणे देण्याचे ठरवले होते. कारण रात्री बसने मुंबईला परत जायचे असे ठरवुन आलेले बुवा आज काही ध्यानीमनी नसताना दुपारीच शिर्डीच्या दिशेने जाणार होते. खरच काय तिच्या लिला असतात तीच जाणे.
आजही बुवा मनापासून सांगतात की त्या दिवशी मला शिर्डीला जायला मिळत आहे हे कळल्यावर मनापासून खूप आनंद झाला व जाणवले हे सगळे तीचेच काम ,माईनेच हे सगळे माझ्या आनंदासाठी घडवून आणले कारण निघताना फक्त माईकडे जायचे म्हणून निघालेलो मी पण परत येताना मात्र तीने सगळी सुत्रे आपल्या हातात घेऊन मला अगदी आरामात शिर्डीला घेऊन गेली.त्यामुळे बघुया तिच्या अशाच काही लिला पुढच्या भागात. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८३-
मंडलेश्वरहून आम्ही निघालो तेव्हा जवळजवळ साडेदहा वाजुन गेले होते, काका व बुवा आम्हाला परिक्रमेच्या मार्गावर सोडायला म्हणून पाच सात मिनीटे चालत पुढच्या रस्त्यापर्यंत आले व तिथेच आम्ही त्यांचा निरोप घेतला. पुढे चालत असताना मनात आले की काकांचे वय खर तर पंचात्तरच्या पुढे म्हणजे त्यांनी इतक्या पुढपर्यंत आम्हाला सोडावयास नाही आले तरीही चालण्यासारखे होते पण हा त्यांचा आपलेपणा गेल्या परिक्रमेतही आम्ही जेव्हा उदयनला भेटावयास धामनोद ते मंडलेश्वरपर्यंत आलो होतो तेव्हा अनुभवला होता कारण तेव्हाही काका आम्हाला घेऊन उदयन व इतर परिक्रमावासीयांना सोडण्यास आजच्या स्थानापर्यंत आले होते व नंतर आम्ही परत आश्रमात परतलो होतो.आजही ते बुवांना बरोबर घेउन आम्हाला सोडावयास आले होते. हा त्याचा उत्साह एखादया तरूणालाही लाजवणारा होता.एखादया नातेवाईकास जसे सोडावयास जावे तसे ते परिक्रमावासीयांबद्दल असलेल्या प्रेमामुळे, आपलेपणामुळे आम्हाला इथपर्यंत सोडावयास आले होते. आज निघण्यास इतका उशीर झाल्याने संध्याकाळपर्यंत फार काहीं चालणे आज होणार नव्हते.
त्या दिवशी गंगाझीरा, पथराड, बेगांव करत पितामली आधी एक दूसरा रस्ता पकडून आम्ही त्या दिवशी सेजगावला पोहचलो. खर तर पितामली आधी आम्हाला दोन तरूण मुलांनी विचारलेही होते की ' बाबाजी आज किधर पितामली ठहरेंगे क्या? 'आम्ही त्यांना हो म्हंटल्यावर ते आम्हास म्हणालेही होते की 'हम आपाको वहाँ रात मे मिलते है 'आम्ही त्यांना त्यावर बरही म्हंटले.पण काय माहीत त्या दिवशी आमची पाऊले सेजगावाकडे वळली होती. त्या रस्त्यावरून जात असताना संध्याकाळी चार वाजता एका गृहस्थाने आम्हाला त्याच्या घरापाशी थांबवले. त्याचा व त्याच्या लहान भावाचा तिथे दुधाचा खूप मोठा व्यवसाय आहे. स्वःताची खूप मोठी गोशाळा, पन्नास साठ म्हशी असा उद्योग असलेल्या माणसानी आम्हाला चहासाठी थांबवुन जवळ जवळ पंधरा वीस मिनीटे तो आमच्याशी परिक्रमेविषयी बोलत होता. आपण परिक्रमा करीत आहात म्हणजे आपण किती भाग्यवान आहत, आम्ही इथे राहत असुनही आमची परिक्रमा या व्यवसायामुळे होऊ शकत नाही असे सांगत तो आपल्या मनातील बोच आमच्यापाशी व्यक्त करत होता. त्यांचे घर व गोठा सेजगावच्या आधी असल्याने, उदया सकाळी इथुन पुढच्या मार्गाला लागताना आमच्याकडे नाशत्याला आपण नक्की या व मगच पुढे प्रस्थान करा असे आग्रहाचे निमत्रण त्यानी आम्हाला दिले. त्यासाठीआमचा फोन नंबर ही त्यानी घेऊन ठेवला. म्हणाला फक्त एकच करा " कल सुबह थोडी देरसे आप सेजगाव से निकलो और यहाँ सात बजे तक आप हमारे घर पहुंच जाओं तब तक हम हमारा सुबह का दुध का सब काम भी निपटा लेते है , बाद मे आप के साथ वापीस थोडी बहूत बाते भी कर लेंगे. '
आम्ही तिथुन पुढे निघालो परत पुढे एका गावकरी 'नर्मदे हर ' करत आम्हाला त्याच्या घरापाशी घेऊन गेला व आपल्या सुनेला आमच्यासाठी चहा टाकावयास सांगीतला. खर तर थोडया वेळापुर्वीच चहा झाला होता पण इथेही त्याचा चहाचा आग्रह आम्हाला काही मोडता आला नाही. त्याच्या घराच्या बाहेर फरशा घातलेल्या असून खूप मोठी मोकळी जागा होती त्यामुळे तिथे बाहेरच आम्ही मांडी घालुन त्याने आणलेला गरम गरम चहा प्यायलो. तेव्हा मनात आले की यानाच आपण म्हणावे का ? आम्हीं इथेच बाहेर आज आमची आसन लावतो व उद्या सकाळी पुढे जातो.पण तेवढयात तोच म्हणाला 'थोडे आगे मंदीर है, उधर आपकी रहने की, भोजन की सारी व्यवस्था हो जायेगी, परिक्रमा जो आते उनकी व्यवस्था वहाँ ही की जाती है, मैं भी वहाँ आरती के वक्त तक आ जाउंगा ' आम्ही लगेच तिथुन निघालो कारण अंधार पडायच्या आत मुक्कामाच्या जागी पोहचणे गरजेचे होते व पुढचा सगळा रस्ता चिखलाचा व घाणीचा होता. थोडया वेळात आम्ही मंदीरात पोहचलो आणी आत बघतो तर आमचे रामजी स्वागताला आत उभे होते. आजही पुन्हश्च राममंदीरात मुक्काम हे बघुन मला खूप आनंद झाला. आम्ही मंदीरात आसन लावली व तेवढयात पवार माउलीही मंदीरात पोहचल्या.त्यांची पाखरे व चव्हाण माउलींबरोबर चुकामुक झाली होती. पवार माउली इकडे आल्या होत्या व पाखरे व चव्हाण माऊलींचा मुक्काम दुसऱ्याच गावात झाला होता. पवारांचे त्याच्याशी फोनवरून बोलणे झाले व उद्या आपण पुढच्या गावात भेटू असे ठरले .आम्ही सगळ्यानी सायं स्नान , पुजा आरती करुन मंदीरात रोज होणाऱ्या रामरायांच्या आरतीची वाट पहात मंदीरात रामरायांसमोर बसलो. सात वाजता रोज आरतीला येणारे गावातील तरूण, वृध्द रहिवासी मंदीरात जमा झाले व त्यांनी रोजची रामरायांसमोर आरती केली. काही जणांनी आमच्या परिक्रमे बदल आमच्याकडे चवकशी केली,आम्ही कुठुन आलों आहोत ,कधी परिक्रमा सुरु केली अशी थोडा वेळ बातचीत त्या गावकऱ्यांशी झाली नंतर ते सगळे प्रसाद घेउन घरी गेले. त्यात मगाशी ज्यानी आम्हाला मंदीरात आपली सोय होईल असे सांगीतले होते व जांच्याकडे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो ते गृहस्थ ही होते, जाताना आपली भोजनाची सोय समोरच्या एका घरात झाली आहे असे आम्हास सांगुन तेही घरी गेले.सगळे जण बाहेर पडल्यावर मग आम्ही सगळ्यांनी रामरायांसमोर हनुमान चालीसा, रामरक्षा व मारूती सोत्राचा पाठ केला. आज परत रामरायांसमोर बसून म्हणताना मनाला खूप आनंद मिळत होता. असेच सुंदर गुणगान आईनी बधुवारच्या नित्योपासनेच्या ओव्यात रामरायाचे केले आहे की काय सागु
त्या म्हणतात.....
एकवचन, एकबाण, एकपत्नीव्रत ज्या रामाचे । त्यासी एकोभावे ध्याता, दुःख जाय बहुजन्माचे |
विषय न रमवू शकती मनासी,रमवु शके एक राम I दाम देता सर्व मिळे परि, निष्कामी मिळे राम | दुसऱ्या ठिकाणी
पृथ्वी प्रदक्षिणा प्रथम पुर्ण करणाऱ्याला अग्र पुजेचा मान मिळेल ह्या गण्णपतीच्या गोष्टीतही रामनामाचा महिमा किती अपरंपार आहे हे सांगताना त्यांनी म्हंटले आहे.
सदाशीवाने पार्वतीप्रती, राम मंत्र उपदेशिला | तोची मंत्र तीने गणुबाळासी, बहुयुक्तीने सांगीतला | राम अक्षरे लिहून म्हणे ती, ह्यासी प्रदक्षिणा घाली बाळ| माऊलीचे वचन ऐकूनी ,,तेवि आदरे करी गणुबाळ l उमासुतराजे म्हणता श्रीराम जयराम जय जय राम I त्रैलोकी पुजनिया झाला, पावला दूर्लभ परमधाम I यापरी रामनाम प्रतापे मान मिळविला मोरयाने | म्हणून प्रतिकार्यारंभी गणेश पुजती बहू माने |
अशा ह्या रामरायांच्या घरी आज परत एकदा आमचा मुक्काम होता.वरील महिमा आम्ही आज परत त्याच्या समोर बसून अनुभवत होतो.
आमचें सगळे म्हणुन झाले व मंदीरा समोर राहत असलेला एका व्यक्ति आम्हाला त्याच्या घरी भोजनास घेउन गेला. या गावात अशी पद्धत होती की प्रत्येक दिवशी एका घराने परिक्रमावासीयांची भोजनाची व्यवस्था पार पाडावयाची. आज तिथे जाणवलेली एक महत्वाची गोष्ट आपणास सांगतो व आज इथेच थाबतो. आम्ही ज्या घरी भोजन प्रसादी घेण्यास गेलो होतो ते एका गडगंज शेतकऱ्याचे घर होते, त्याची मुले चांगली शिकलेली होती.आम्ही जेवावयास बसल्यावर त्या घरातील शाळेत जाणारी मुलगा व मुलगी आम्हाला जेवण वाढण्यास येत होती व तीही अगदी आनंदाने, जुलमाचा रामराम म्हणून नाही. म्हणजे इतक्या लहान वयात त्यांच्यावर माईची परिक्रमा व परिक्रमावासीयांची सेवा असे संस्कार या पुढच्या पिढीत सहज रूजवले जात होते. असे हे उत्तम संस्कार तिथल्या बुर्जग व्यक्तींकडून पुढच्या पीढीकडे पोहचवले जात होते. ज्यामुळे माईबद्दलचे प्रेम त्यांच्या मनात सहज दृढ होत जात होते. तेव्हा हे जाणवले की हेच संस्कार आज शहरातून हद्दपार होत आहेत, नकळतपणे आम्हीच त्याला खतपाणी घालत आहोत. आपल्याकडे आपण अशा गोष्टीसाठी लहान मुलाना कधी पुढे येऊनच देत नाही .त्यांचा अभ्यास, नाहीतर क्लास या नावाखाली किंवा काहीच नसेल तर आपण मोठया फुशारकीने सांगतो की त्याला हे असे काही करण्यास आवडत नाही. पण यामुळे होते काय तर आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो किंवा सेवाभाव काय असतो हा विचारच त्यांच्यात रुजत नाही व त्याची परिणीती म्हणजे पुढची पिढी ही आत्मकेद्रिंत होत जाते. मग आपण म्हणतों की ही पुढची पिढी ही फक्त स्व:ताचाच विचार करते पण ह्या गोष्टीला बरेसचे आपणच कारणीभुत असतो कारण आम्ही त्यांच्यावर आपण दुसऱ्यासाठी प्रेमाने काहीतरी र्निहतूकपणे करावे हे लहानपणापासून बिंबवत नाही. हीच गोष्ट मात्र इथे अगदी सहजपणे या लहान मुलात बिंबवली जात आहे की आपण आपल्या घासातला घास दूसऱ्याला प्रेमाने दयायचा आहे, त्यांच्याशी नम्रपणे प्रेमाने गोड बोलायचे आहे .असो..
जेवण झाल्यावर बराच वेळ ते काका आमाच्याशी माईबद्दल, परिक्रमेबद्दल भरभरून बोलत होते. थोडया वेळात परत आम्ही विश्राम करण्यासाठी मंदीरात आलो. बघुया उद्याचा प्रवास काय होता ते पुढच्या भागात तोपर्यंत र्नमदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८४ -
रात्रीची भोजन प्रसादी करून आम्ही परत राममंदीरात आलो.
आज पवार माऊलीही आमच्या बरोबर होत्या. थोडया फार त्यांच्याबरोबर परिक्रमेतील गप्पा झाल्या.उद्या परत ते त्यांचे सवंगडी पाखरे व चव्हाण माऊली त्यांना पुढच्या गावात भेटणार होते.
आज राममंदीरात रामरायांच्या अगदी समोर नाहीं पण थोडी बाजूला अशी आमची आजची आसन व्यवस्था होती. थोडक्यात आज त्यांच्या दालनात त्यांच्या मायेच्या उबदार कुशीत आम्ही निद्रस्थ होणार होतो .घरी असताना रामराय घरातच असल्याने जाता,येता सहजच प्रत्येक गोष्टीत त्याची आठवण,ध्यास लागत असे.परिक्रमेत ही उणीव भरून काढण्याची जबाबदारी जणू काही त्यानी स्वतःकडेच घेतली होती कारण स्वतः जातीने लक्ष घालून बऱ्याच ठिकाणी आमची मुक्कामाची सोय त्याच्या नाहीतर त्यांच्या प्रिय भक्ताच्या म्हणजेच मारूतीरायांच्या मंदीरात ते करत होते.
सकाळी माईची पुजा आरती करून रामरायांचा निरोप घेउन आम्ही पुढचा मार्ग चालू लागलो व पवार माऊलीनी त्यांच्या साथीदारासांठी बाजूच्या गावाचा रस्ता पकडला. काल दूपारी जिथे आम्ही पहिल्यांदी चहा प्यायला थांबलो होतो,त्यांनी सकाळचा नाश्ता आफ्ण आमच्याकडे करावा व मगच पुढे जावे असे काल आग्रहाने सांगीतल्याने आम्ही सकाळी सातपर्यंत त्यांच्या घरी पाहोचलो.आम्ही पोहचेस्तोपर्यत त्यांचे सकाळचे दुध काढण्याचे व गोठयातील इतर कामेही झाली होती.आम्ही तिथे पोहचलो तेंव्हा त्या दोन भावातील मोठ्या भावाने आमचे ''नर्मदे हर 'म्हणत स्वागत केले.काल इथे घराबाहेर बसूनच चहा पिणे झाले होते त्यामुळे आता नाश्त्यासाठी आम्ही सगळे त्यांच्याबरोबर घरात गेलो. बाहेरून कळत नव्हते पण आतून घर मोठे ऐसपैस होते. घरात नवीन पध्दतीनी सजविलेले फर्निचर, आपल्या भाषेत वेलफर्निश अशा प्रकारातले काही नव्हते,साधेच पण जुन्या पद्धतीचे त्यांचे घर होते.आम्हाला बसायलाही जमीनीवर कांबळे पांघरले होते.थोडयावेळात त्या घरातील माई मोठया स्टीलच्या डिशमधे गरमागरम पोहे व चहा घेऊन आल्या.वाफाळलेल्या चहाबरोबर गरम गरम पोहे म्हणजे त्यावेळी मला ते एका लग्नातील मेजवानीसारखेच वाटले.पोटभर पोहे ,घरच्या दुधाचा चहा व या सगळ्यात असलेले माईबद्दलचे प्रेम यामुळे त्या नाश्ताने पोट गच्च भरून गेले.दूसरा भाऊ मधेच येउन आम्हाला भेटून गेला कारण आता त्याला दुध पोहचावयला जवळच्या गावत जायचे होते पण घरी परिक्रमावासी आले म्हणजे माई आली हा भाव असल्याने आमच्याशी थोडेसे बोलून , नमस्कार करून तो त्याच्या कामासाठी बाहेर पडला. त्यांच्याकडे चहा, नाश्ता व थोडया परत परिक्रमेतील गप्पा झाल्या व नंतर आम्ही 'नर्मदे हर ' चा पुकारा करत आठ साडेआठच्या सुमारास पुढच्या मार्गाला लागलो .
थोड्या वेळानी धारेश्वरला पोहचलो.इथे आहे अर्धनारीश्वर नटेश्वर महादेव मंदीर,महादेवाचे दर्शन घेऊन समेलदा या गावाच्या पुढे असलेल्या गंगात खेडी या गावी पोहचलो. जिथे गंगानदीचा प्रवाह अनेक धारातून एका खडकाळ भागातून प्रगट झाला आहे ,या स्थानापर्यंत आम्ही साडे नऊपर्यंत पोहचलो. गंगा नदी प्रगट झाली तो भाग थोडा खाली आहे. वर एक छोटा आश्रम असुन तिथे असलेऱ्या एका ताटंबरी बाबांशी आमची तिथे भेट झाली.आमच्या सॅग वर आश्रमात ठेऊन आम्ही पंचा व कमंडलू घेउन त्या डोंगराळ, उंचसखळ भागातून खाली उतरून त्या उगमापाशी गेलो.एका मोठया खडकाळ दगडाच्या कपारीतून प्रवाह अनेक धारांनी झुळुझुळु वाहत असलेला दिसत होता. प्रथम त्या धारांना नमस्कार केला व बाहेर पडणाऱ्या जलाखाली हात धरला. तळहाताला झालेला तो पाण्याचा थंडगार स्पर्श मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. सकाळी मंदीरातून जरी स्नान करून आम्ही निघालो होतो तरी आता परत या गंगेच्या जलात स्नान करण्याचा मोह काही आवारता आला नाही मग लुंगी बाजूला काढून ठेवली व लंगोटीवर मस्तपैकी त्या पाण्यात स्नान केले. त्या पाण्याला खूपसा जोर नसल्याने व ते प्रवाह जमीनीपासून फार उंचावर नसल्याने कमंडलूत पाणी पुन्हा पुन्हा भरून आम्हाला स्नान करावे लागले. दहा पंधरा मीनीट तो वेगळा आनंद अनुभवून आम्ही परत वर आलो. एक वेगळाच तजेला मनाला व शरिराला जाणवत होता. हे लिहीत असताना आज लहानपणी बघीतलेली टिव्हींवरील लीरील या साबण्याच्या जाहीरातीची सहज आठवण आली त्या मुलीला त्या निर्सगरम्य वातावरणात व त्या निळाशार पाण्यात आंघोळ करतानाही तो साबु लावुन फ्रेश व्हावे लागत होते पण इथे साबु,निळशार पाणी असले काहीच नव्हते, झाला होता फक्त स्पर्श त्या गंगामाईच्या थंडगार पाण्याचा! या थंडगार पाण्यानी तनाबरोबर मनालाही एक वेगळाच आनंद ,उत्साह मिळाला होता. ती जाहीरात आहे असे कुणी म्हणेलही व ते बरोबरही आहे पण तोच आनंद ह्या परिक्रमेत आम्हाला अनुभवास येत होता ,निर्सगाच्या सानिध्यात मिळणारी एक वेगळी अनुभुती होती. वर गेलो तेव्हा ताटंबरी बाबांनी मस्तपैकी गरमा गरम चहा केला होता,तेव्हा त्या कोऱ्या चहाची गंमतही काहीं वेगळी वाटली. परिक्रमेत कोरा चहा पिण्याची वेळ पण बरेच वेळा यई, कारण जिथे दूधाची उपलब्धता नसे तिथे हे कोरे अमृतही बुस्ट ड्रींकसारखे काम करी.थोड्यावेळ त्या बाबांशी गप्पा मारून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. साधारणपणे साडेबारा ते एक वाजेपर्यत आम्ही विमलेश्वरला पोहचलो. आम्ही ज्या आश्रमापाशी पोहचलो त्याचे नाव मला आठवत नाही पण तो नवीन पद्धतीने बांधलेला बंगला वजा आश्रम होता.उदयनला दूसऱ्या परिक्रमेत भेटलेले एक परिक्रमावासी तिथे सेवा करण्यास आलेले होते.आम्ही त्या आश्रमाच्या जवळून जात असताना त्यानी उदयनला ओळखले व 'आओ बाबाजी 'म्हणून आम्हाला हाक मारली. बराच वेळ चालल्याने आता आम्हालाही थोडा वेळ कुठेतरी विश्रांतीसाठी थांबावयाचे होते त्यामुळे आम्ही त्या आश्रमाच्या आत गेलो. साडेबारा एक म्हणजे भोजन प्रसादाची वेळ झाली होती त्यामुळे तिथे असलेल्या परिक्रमावासीयांची भोजन प्रसादी चालू होती. तिथे सदाव्रताची पद्धत असल्याने त्या आधीच्या परिक्रमावासीयांनी त्यांच्यासठी भोजन बनवलेले होते. तिथे असलेल्या मुख्य महंतानी आम्हालाही आपण सदाव्रत घेउन आपली भोजन प्रसादी बनवा असे आम्हास सांगीतले. खरतर माझ्या मनात तेव्हा असे काही जेवण आता बनवावे असे नव्हते कारण सकाळी पोटभर पोहे खाऊन झाले होते त्यामुळे आता काही नाही खाल्ले तरी चालण्यासारखे होते. पण त्या दूपारी उदयनला काय झाले होते माहीत नाही ,कदाचीत पोळ्या बनवून खाण्याची व खिलवण्याची त्याला बहूतेक इच्छा झाली होती की काय कोण जाणे किंवा त्या महंतांचा शब्द कसा मोडयाचा हा विचारही त्याच्या मनात आला असावा. त्यामुळे त्यांने लगेच त्यांना हो म्हणून सांगीतले. मला म्हणाला की ' तू भाजी कर, मी पोळ्या करतो आपण भोजन करून पुढे जाऊ ' ते महंत समोरच असल्याने मलाही हो म्हणण्याशिवाय दूसरा काही पर्याय न्हवता.
आमची आसने आम्ही बाहेर असलेल्या एका व्हरांडयात लावली.तोपर्यंत स्वयंपाकघरही मोकळे झाले होते त्यामुळे आम्ही त्याचा आता ताबा घेतला. उदयन पोळ्यांसाठी कणीक भिजवू लागला व मी भाजी म्हणून टॉमेटोबटाटा रसभाजी करण्यास सुरवात केली. उदयन इथेही पोळ्या करता करता मला रस्सा कसा कर याच्या सुचना देत होता पण आज मात्र मी भालोद सारखी चूक न करता, न रागवता त्याच्या हो मधे हो मिळवत, आपल्याला माहीत असलेल्या पद्धतीने रस्सा बनवण्याच्या मागे लागलो. अर्धापाऊण तासात आमची पोळी भाजी तयार झाली.
सगळे स्वयंपाकघर साफ करून आम्ही आमची आसन व्यवस्था असलेल्या जागी त्या पोळ्या व भाजी घेऊन गेलो. तिथे आमची गोलाकार बैठक बसली. भोजना आधी नेहमी मंदीरात म्हंटला जाणारा श्लोक आम्ही तिथे म्हंटला
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे I तव चरण कमली मन हे व निजू दे I
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया I नमस्कार माझा तुला गुरुराया |
व जेवावयास सुरवात केली.इतक्यात पवार माउलीची स्वारी त्यांच्या सवंगडयाशी परत चुकामुक झाल्याने दत्त म्हणून हजर झाली. आम्हाला तिथे बघून ते एकदम आनंदाने आरडेलच 'अरे वा,आज आपली परत भेट! ' समोर असलेली गरम गरम पोळी व भाजी बघुन तर ते जास्तच खुश झाले .आता तेही आमच्या पंक्तीत थाळी घेऊन सामील झाले.पाहिला घास तोंडात घेतल्या घेतल्या म्हणाले 'वा! उदयन ,झकास केल्यात की हो पोळ्या , अगदी घरच्या सारख्या मऊसुद. रस्साही अगदी ऐ वन, आज बरेच दिवसानी अगदी घरी जेवण जेवत असल्या सारखे वाटताय,मजा आली!
बापूनेही मी केलेल्या रस्सा भाजीचे खूप कौतुक केले , तो प्रथमच माझ्या हातची भाजी खात होता कारण उदयनच्या पोळ्या आम्ही सगळ्यांनी भालोदला खाल्ल्या होत्या पण तेव्हा भाजीचे काम आमच्याकडे नसल्याने प्रथमच माझी परिक्रमेत भाजी करण्याची वेळ आली होती.
भोजन प्रसादी झाल्यावर आम्ही परत जेव्हा भांडी स्वयपाकघरात ठेवत होतो तेव्हा तिथल्या महंतांनी आमची सगळी चवकशी केली, आम्ही कुठुन आलो, काय करतो, माझी कुठली बँक, पोस्ट काय, इतके दिवस सुट्टी काढून आलात? मग आता पुढचे प्रमोशन कधी ? असे बरेच प्रश्न विचारले.त्यांनतर त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. तिथुन पुढे थोडयाच अंतरावर आपली भेट होते बर्फानी बाबांशी. त्यांचे वय कोण म्हणते १०९ वर्ष आहे तर कोण म्हणते त्याहून जास्त आहे .पण त्यांच्याकडे बघुन मात्र ते इतक्या वयाचे आहेत असे अजिबात वाटत नव्हते.एका बाजेवर ते बाबा हसत हसत आपल्याच आनंदात बसलेले दिसत होते.कुठे मोठेपणाचा दंभ नाही, कसला आग्रह नाही. कुणी फोटा काढायचे म्हटले तर त्यातही ते आनंदाने हसत हसत सामील होत होते. असे हे आपल्याच आनंदात निमग्न असलेले बर्फानी बाबा. इतक्यात त्यांच्या शिष्याने आम्हा सगळयांसाठी चहा बनवला,तो प्रसादरूपी चहा व त्यांचे आर्शिवाद घेउन आम्ही पुढे निघालो.आजचे मुक्कामाचे स्थान होते खेडीघाट येथील श्रीराम महाराजांचा आश्रम. तिथुन पुढे बराच वेळ आम्ही मातीचा, चढ उताराचा असा रस्ता पार करून साडेपाचच्या बेताने श्रीराम महाराजांच्या आश्रमात पोहचलो. आम्ही गेलो तेव्हा महाराज नव्हते पण ऑफ़ीस मधे आईसाहेब होत्या. आमची व्यवस्थित चवकशी करून आम्हाला दूसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉलमधे आमची आसने लावण्यास सांगीतले. बघुया तिथला रामरायांकडील पाहुणचार पुढच्या भागात पण तोपर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८५-
दुसऱ्या मजल्यावरील हॉल मधे आम्ही आमचे आसन लावले व सायस्नांन करून माईची पुजा व आरती केली.
खेडीघाटचा श्रीराम महाराजांचा आश्रम हा खूप मोठा, प्रशस्त व ऐसपैस. माईच्या किनारी वसलेला हा आश्रम महाराजांनी दिलेल्या रामनामाची पुर्ण प्रचिती देतो.हा एक आश्रम आहे जिथे सुंदर असे राममंदीर, ज्यांनी सबंध आयुष्यभर नामाचे गुण गाऊन अनेक जीवाचे कल्याण केले व त्यांना या भवनदीतून पार लावले असे थोर संत प.पु गोंदवलेकर महाराजांची इथे सुंदर मुर्ती आहे ,अतिशय शांत वातावरण जे मनाला एकाग्र करून ऐका वेगळ्या आनंदाची अनुभुती देऊन मन प्रसन्न करते.
खाली प्रशस्त असा भोजन प्रसादीचा हॉल मधे मोकळी जागा. बाजुला ऑफीस त्यावर भक्तगणांची, परीक्रमावासीयांची राहावयची सोय ,असे सगळे ऐसपैस काम.
आमची माईची पुजा करून झाली इतक्यात माथासरला आमच्या बरोबर मुक्कामास असलेले गोव्याचे परिक्रमावासीयांचे तिथे आगमन झाले. त्यांनी त्यांचे आसन आमच्या पुढे एका बाजूला लावले. आमची एकमेकांना खुशाली विचारुन झाली. थोडया वेळानी दोन्ही काका खाली आफिसमधे गेले तेव्हा त्याच्या बरोबर असलेल्या ताईंशी थोडा वेळ आमचे बोलणे झाले.त्या दिवशी मला त्या खूप दमलेल्या दिसत होत्या , म्हणाल्या 'आमचा आता इथे मुक्काम बरेच दिवस होईल असे वाटत आहे, आता महाराज सांगतील तेव्हाच इथुन आम्ही पुढे प्रस्थान करणार आहोत ' त्याच्यातील वयस्कर काकांची तबेतही जरा ठीक नव्हती ,तळपायाला व पायाला थोडे लागल्याने त्यांना चालण्यासही त्रास होत होता. त्यामुळे त्यांना थोडी विश्रांतीची गरज होती.पण त्यांही दिवशी मी पाहिले की त्या बरोबरच्या दोन्ही काकांची सेवा अगदी मनापासून आपल्या माणसांसारखी करत होत्या.खर तर त्यांच्यात तिघेही जण फक्त गोव्यातील एवढीच ओळख होती. माथासर असताना आमच्या कडील कपडे धुवावयाचा ब्रश आम्ही त्यांना कपडे धुवावयास दिला होता व नंतर तिथेच विसरलों होतो पण त्यांनी मात्र तो आठवणीने त्यांच्याबरोबर घेउन आम्ही पुढे कुठे परिक्रमेत भेटलो की आम्हाला तो परत देता यईल म्हणुन त्या त्यांच्याबरोबर घेउन आल्या होत्या. म्हणाल्या ' तुम्ही एक माथासरला विसरलेली गोष्ट माझ्याकडे आहे, असे म्हणत तो ब्रश आठवणीने आम्हाला त्यांनी परत दिला. आम्ही त्यांना म्हंटले की आमच्याकडे अजून एक ब्रश आहे, त्यामुळे आपण हा ठेवा आपल्यापाशी, पण म्हणाल्या ' नको, आपण आणलेली गोष्ट आहे त्यामुळे तो आपल्या पाशी ठेवा '.
एक दिवस सोडून सोमवती अमावस्या असल्याने महाराजांचे बरेच भक्तगण आश्रमात आले होते त्यामुळे आश्रमात बऱ्यापैकी गर्दी होती.काही भक्त त्या दिवशी तिथुन परिक्रमा उचलणार होते .आम्ही मात्र उद्या इथुन पुढे प्रस्थान करणार होतो.
रात्री आठ वाजता जेवणाची हरीहर झाली, आपपल्या थाळ्या, कमंडलू घेऊन आम्हीही तिथे हजर झालो. त्या दिवशी भली मोठी पंगत हॉलमधे होती.आज छान मसालेभात किंवा त्या सारखी खिचडी, पापड , मिरगुंड ,कोशींबीर असा छान मराठी बेत होता. प्रसादीची चव तर अप्रतिम होती. पण अजुन एक छान गोष्ट म्हणजे तिथे अशी पद्धत आहे की भोजन प्रसादीं चालू असताना भोजन करता करता कुणालाही येणारे छोटे श्लोक, ओव्या असे भोजन करत असताना म्हणता येते. त्यामुळे जेवताना बाकीच्यांचे भगवंताचे नाम ऐकणे होते व म्हणणाऱ्याच्या मुखातून प्रसादी घेता घेता भगवंतांचे नाम घेणे होते व त्यामुळे एकुणच वातावरण आनंदी ,भगवतमय होऊन जाते.उदयनही त्याच्या गोड गळ्यातून दोन तीन श्लोक खणखणीत आवाजात म्हंटले. मलाही त्याने आग्रह केला पण आपले म्हणताना कुठेतरी चुकेल ही भीती असल्याने माझ्याकडून येत असूनही म्हणणे झाले नाही.पंक्तीत बसलेल्या बऱ्याच जणांनी एका पाठोपाठ असे श्लोक म्हंटल्याने आम्ही भजना बरोबर भोजन असा खरा आनंद तिथे घेतला. कारण कित्येकवेळी भोजनाला बसताना मी आठवणीने ठरवायचो की आज सबंध भोजनात आपण नाम घेत भोजन करूया पण एकादा भोजन सुरू झाले की त्या पदार्थांच्या चविष्ट स्वादात मन इतके रमुन जाई की घेत असलेले नाम कधी थांबत असे ते लक्षातही येत नसे. पण आज मात्र भोजन करता करता कुणी कुणी म्हणत असलेले भगवंताचे गुणगान ऐकता ऐकता मन त्या शब्दांकडे गेल्याने हरीनाम बरोबर भोजनाचा आनंद काय आहे हे अनुभवास येत होते.
रात्री जेवणानंतर थोडा वेळ श्रीराम महाराजांचा सत्संग झाला. या आधी दीड वर्षापुर्वी मी व उदयन जागेसंदर्भात महाराजांना भेटावयास आलो होतो. महाराजांनी स्वतः गाडी चालवून आम्हाला त्यांच्या ट्रस्टच्या काही जागा विकावयाच्या होत्या त्या दाखवल्या होत्या. तेव्हा ज्या ठिकाणी त्यांनी बरेच वर्ष साधना केली त्या ठिकाणीही ते आम्हाला घेउन गेले होते. पुढे ते आमचे जागेचे काम काहीं कारणास्तव झाले नाही पण त्या वेळी महाराज स्वतः वेळात वेळ काढून आमच्या बरोबर आले होते. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळेच ते तिथे सगळ्यांना आदरणीय आहेत. सत्संग झाल्यावर आम्ही त्यांना नमस्कार करून आमच्या आसनस्थळी आलो.
सकाळी सात वाजता पुढे जाण्यास आम्ही निघालो तेव्हा काही कामास्तव आमचे आश्रमाच्या ऑफीसमधे जाणे झाले .आमचे दंड ऑफीसच्या समोरील गॅलरीत भिंतीला उभे करून आम्ही ऑफीस मधे असताना महाराज आम्ही जेथे दंड ठेवले होते तिथे आले व तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद होता जो काल संत्संगाच्या वेळी होता .हसत हसत एक दंड हातात घेऊन म्हणाले ' हे कुणाचे राजदंड? ' म्हणजे मी महाराज आहे त्यामुळे मी फक्त धीर, गंभीर ,स्थितप्रज्ञ राहून फक्त लोकांना उपदेश करावयाचा ह्या पठडीत न राहता गंमतीने कौतुक करून प्रत्येकात समरस होऊन जाणे व त्याला आपलासा करून घेणे हा सतांपाशी असलेल्या अनेक आलौकीक गुणापैकी एक गुण आम्ही तेव्हा तिथे अनुभवला.आधीच्या वेळी आलो तेव्हा त्यांचा प्रेमळ स्वभाव, अतिशय गोड बोलणे व मुख्य म्हणजे मी महाराज आहे ,कुणीतरी मोठा आहे असा यत्किंचीत ध्यास त्यांच्या ठिकाणी नसल्याने सर्वांशी आपलेपणाचे बोलणे,वागणे त्यांच्याकडून सहज घडत होते .त्यामुळे आईसाहेब कुणीतरी ड्रायवर घेउन जा असे सांगत असतानाही महाराज स्वतः आमच्यासाठी गाडी घेउन जागा दाखवावयास आले होते. पुढे आतल्या रस्त्यानी जात असतानाही कुणी गरीब, वृद्ध आजी, नवरा बायको रस्त्यात चालत असताना दिसले तर त्याच्यासाठी गाडी थांबवून त्यांना गाडीत बसवुन आपण जात असलेल्या रस्त्यावर त्यांना त्यांच्या घराकडे जाण्यासाठी कमीत कमी किती अंतर चालवे लागेल हे बघत होते.तो कुणाचा शिष्य आहे ?तो माझ्याकडे येत आहे का? हा आपपर भाव ह्या विभुंतींच्या ठिकाणी नसल्याने प्रत्येकात तो भगवंत आहे ह्या भावनेने त्यांचे वागणे, बोलणे सहजपणे घडत होते.
आम्ही पुढे होऊन त्यांना नमस्कार केला व ते दंड आमचे आहेत असे त्यांना सांगीतले, तेव्हा हसत हसत हळुवारपणे म्हणाले 'किती वजनदार आहेत हो हे, हात दुखत असतील तुमचे हे धरून .' म्हणजे आताही त्यांच्या बोलण्यात तोच प्रेमभाव होता जे संतांचे खरे लक्षण आहे. गोंदवलेकर महाराजांचे चरित्रही असेच प्रेमाने भरलेले आहे , महाराज म्हणत "माझ्यातील प्रेम काढून टाकले तर मी नाहीच " अशा सदगुरूच्या या शिष्यानेही हा गुण आपल्या गुरूंकडून पूर्णपणे आत्मसात केला आहे हे त्यांच्या वागण्यातून व बोलण्यातून पदोपदी जाणवत होते.
आमचे हे दंड थोडे वजनदार होते , यात काही शंका नाही .पण संबध परिक्रमेत माईच्या किनाऱ्यावरील गावातील तरुणांना, काही वयस्कर कांकाना मात्र खूप आवडत असत, चालत असताना आम्ही कुठे थांबलो की आमच्याकडून ते मागुन घेउन आपल्या हातात ते स्वतः धरून बघत असत. काहीं तर आम्हाला असेही म्हणाले होते की 'आपको क्यों जरूरत है इतने भारी दंडे की , हम आपको पैसा नहीं तो दूसरा साधावाला दंड देते है ' त्याच्याकडे बघून व हातात घेउन त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच म्हणजे कुणी वजनदार माणूस झाल्याचा भाव दिसत असे. मग त्यांना सांगावे लागे की 'नही इसकी पुजा की है, ये पूरी परिक्रमा मे हमारे साथ ही रहेंगे. ' मग अनिच्छेने ते आमच्याकडे परत देत असत.
सकाळी आश्रमातून निघताना परत वर राममंदीरात जाऊन रामरायांचे दर्शन घेतले.
आम्ही निघताना खाली ऑफीसमधे आलो तेव्हा आईसाहेब तिथेच होत्या आम्ही निघणार हे कळल्यावर त्या परत म्हणाल्या ' अहो आपण सगळे सोमवती अमावास्या करून मगच जा इथुन , उद्या प्रसादीत सगळा मराठी बेत करणार आहोत, कीतीतरी दिवसात महाराष्ट्रीय भोजन झाले नसेल तुमचे,तेव्हा उद्या सोमवती स्नानाचा मैयावर जाउन लाभ घ्या व दूपारी भोजन प्रसादी घेऊन मग आपण पुढे जावे ' पण माझ्या सुट्टीचे कारण सागितल्यावर मात्र त्या "बर ' 'म्हणाल्या व आम्ही आश्रमातून बाहेर पडलो.
आश्रमातून बाहेर पडलो व एका मुख्य रस्त्याला लागलो व डाव्या बाजूच्या एका सिमेंटच्या भितीवर सबंध भींतभर हिरवे, पोपटी पोपट दाटीवाटीने बसलेले दिसले व क्षणभर चालता चालता मी त्यांच्याकडे बघतच राहीलो. इतक्या दाटीवाटीने बसलेले पोपटं त्यांच्या आवाजात किलकलाट करत आपल्याच आनंदात मग्न झालेले दिसत होते. ते बघून मात्र फोटो काढायचा मोह मला आवरता आला नाही, कॅमेरात ते नजरबंद करून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.
पुढे चारूकेश्वर या तीर्थावरून पुढे जात आपल्याला चोरल नदीचा प्रवाह भुतेश्वर महादेव मंदीराच्या बाहेर लागतो पण त्याला ओलांडून परिक्रमावासीयांनी जायचे नसल्याने तिथुनच नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. त्याच्या पुढे दत्त मंदीर आहे, दत्तात्रयांचे दर्शन घेतले तेव्हा तेथील सेवंकऱ्यांनी बालभोगासाठी आम्हाला तिथे थाबवुन घेतले, चहा व कुरमुऱ्याचा चिवडा खाऊन आम्ही मग पुढे निघालो. पुढे चवनाश्रम ,करत दूपारी बारापर्यंत आम्ही परत एका गावातील राममंदीरात पोहचलो. थोडया वेळात तिथे आमच्या तिन्ही माउली व अजून काही परिक्रमावासी तिथे पोहचले.इथे रामरायांच्या छोटया मुर्ती असून बाजूला असणाऱ्या एका व्यक्तिच्या घरी परिक्रमावासीयांची भोजनप्रसादीची सोय होते. त्यांनी मंदीरात आम्हाला थोडा वेळ थाबावयास सांगीतले. सकाळ सात पासून ते बारा पर्यंत भरपूर चालणे झाले असल्याने आम्हीही चटई टाकून तिथे निंवात बसलो.थोडया वेळातच आपणास मी भोजन प्रसादी करण्यास बोलवतो असे सांगुन तो सेवेकरी तिथुन गेला. पाउण तासात बाजूला असलेल्या घरात आम्हा सगळ्या आठ दहा जणांची भोजन प्रसादीची सोय त्यांनी केलेली होती. गरम गरम पुऱ्या, भरपूर तुप असलेला मध्य प्रदेशात केला जाणारा गव्हाच्या पिठाचा गोड शिरा, सब्जी व डाळ भात असा चविष्ट बेत होता. गरम गरम पुऱ्या व खमंग शिरा खाऊन सगळ्याचा जठराग्नी तृप्त झाला. माझे तर थोडे जास्तच जेवण त्या दिवशी झाले. तिथे त्यांच्या घरात असलेल्या वजन काटयावर सगळ्यांनी वजन केले, प्रत्येकाला उत्कंठा होतीच की आपले एवढे चालणे झाले आहे म्हणजे किती वजन कमी झाले असेल?साधारणपणे सगळ्यांचे वजन पाच सहा किलो कमी झालेले दिसत होते.
तिथुन पुढे कोठावा इथे महादेवाचे मंदीर आहे व इथे सोमारच्या तिरावर ओंकारेश्वर येते म्हणजे आपली अर्धी परिक्रमा इथे पुर्ण होते. पण आम्ही त्या रस्त्याने न जाता त्याच्या आधीच्या गावातून संध्याकाळपर्यंत कुंडीला राममंदीरात पोहचलो. इथे डोंगरे ताई परिक्रमावासीयांची सोय बघतात.मंदीर छोटसे आहे, पुढच्या बाजूला पुर्ण गज व तीन बाजूंनी बंद असे हे राममंदीर. बाजूलाच डोंगरेताईंचे घर अशी सगळी व्यवस्था आहे.
आज थंडीचा कडाका आत्ताच खूप जाणवत होता. संध्याकाळपासूनच वातावरण चांगलेच थंड झाले होते व थंडगार बोचरा वारा त्यात अजून भर घालत होता.त्यात मंदीराची एक बाजू पूर्ण गंजाची म्हणजे रात्री आमची खरी मजा होती.आम्ही साडेपाचपर्यत मंदीरात पोहचलो व आमच्या नंतर अर्धा तासानी तिन्ही माउली व अजून एक दोन पारिक्रमावासी तिथे पाहचले.आज मंदीर छोटे व आम्ही मेंबर जास्त असे व्यस्त प्रमाण होते. बघुया तिथला मुक्काम पुढच्या भागात त्यामुळे आता म्हणतो नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा ८६-
आजचाही आमचा मुक्काम कुंडीला राम मंदीरात होता. आज थंडीमुळे गारठा संध्याकाळपासूनच जाणवू लागला.गार वाऱ्याची झुळुक त्यात अजून भर घालत होती. मंदीराच्या पुढच्या बाजूला असलेल्या पुर्ण गजांमुळे ही बोचरी थंडी जास्त जाणवत होती. त्या गजांवर डोंगरेताईंनी साडी सारखा आडेसा लावला होता, तो तेव्हा थंडी घालवण्यास पुरेसा आहे असे वाटले खरे पण नंतर मात्र त्याचा काही उपयोग नाही हे लक्षात आले.
थोडया वेळात माईची पुजा, आरती, रामरायांसमोर हनुमान चालीसा, रामरक्षा हे सगळे म्हणून झाले.
दूपारी पोटभर जेवण झाल्यामुळे आता संध्याकाळी तशी फारशी भुक नव्हती. मला मात्र इथे पोहचल्यापासून आतून खूप थंडी वाजून खूप थकल्यासारखे वाटत होते त्यामुळे रात्री कधी एकदा आडवे होऊ असे त्या दिवशी मला झाले.डोंगरेताईंनी खूप आग्रह केला म्हणून रात्री फक्त घासभर खिचडी खाउन आम्ही आज रामरायांसमोर आमची झोपण्याची आसने लावली .आज त्यांच्यासमोर झोपावयाची आसन लावण्याशिवाय दूसरा काही पर्याय नव्हता कारण मंदीराबाहेर अंगणात झोपणे हे बोचऱ्या वाऱ्यांमुळे शक्य वाटत नव्हते. त्यामुळे मंदीरातच दाटी वाटीने आम्ही सगळे निद्रस्थ झालो.मला आज मनातून ज्या गोष्टीची भिती वाटत होती तीच गोष्ट तिथे घडली.रात्री साडे बारा नंतर अचानक थंडी वाजून मला जाग आली, तेव्हा आतून नूसते कुडकुडायला होत होते. लहानपणी अशी थंडी वाजून आली की मला थोडया वेळाने खूप ताप येत असे हल्ली खूप वर्षात मात्र तसे काही झाले नव्हते. दिवसभर भरपूर चालणे झाले असल्याने बाकीचे सगळे सवंगडी मस्त झोपलेले होते त्यामुळे त्याना कुणाला उठवून मला असा त्रास होत आहे हे सांगणेही मला नको वाटत होते. उदयनला एखादा जागे करण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही छान झोप लागलेली दिसत असल्याने पुन्हा त्याला उठावण्याचा प्रयत्न केला नाही.रात्री साडेबारापासून ते पहाटे पाचपर्यंत मी तशीच कुडकुडत रात्र काढली. खर तर अशा मस्त थंडीमधे इतकी गाढ झोप लागते की डोळे उघडणेही नको वाटते पण याच थंडीमुळे आज माझी झोप गेली होती.दातांचा कडकड अशा आवाजाने कुणाला त्रास होऊ नये म्हणून मी स्लिपींग बॅग डोक्यापर्यंत घेऊन ती रात्र कशीबशी काढली.पहाटे माउलीपैकी कोणीतरी उठले तेव्हा बाहेर जाऊन प्रात :विधी करून परत एकदा मी येऊन झोपलो. थोडयावेळाने एक एक जण हळु हळु ऊठू लागले पण तेव्हा मात्र माझ्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता. पहाटे पासून अंगात थोडा तापही होता त्यामुळे उदयनला सांगुन मी एका कोपऱ्यात झोपी गेलो. मी त्याला 'मला थोडया वेळाने उठव रे ' असे झोपताना सांगीतले होते पण मनातून मात्र त्याने आपल्याला हाक मारल्यावर आपण उठू की नाही याची काही खात्री वाटत नव्हती. झालेही तसेच मला आरतीच्या वेळी बापूने हाक मारली तेव्हा मी बघितले की उदयनची माईची पुजाही करून झाली होती व आता ते मला आरतीसाठी उठवत होते. आज परिक्रमेतील पहिला असा दिवस होता की मी आंघोळ न करता आरती करण्यासाठी बसलो होतो . तेव्हा खूप वाईट वाटले पण काही इलाज नव्हता कारण अंगात ताप व अट्टाहासाने आंघोळ करून पुढे आजारी पडण्यापेक्षा आरती झाल्यावर मी त्या दिवशी फक्त थंड पाण्याने हात पाय व तोंड स्वच्छ धुतले. अजुनही बाहेर थंडीचा गारठा चांगलाच जाणवत होता.आरती झाल्यावर मी हात पाय स्वच्छ धुवुन आलो खरा पण तरीही मला उठून आपले आवरावे असे काही वाटतं नव्हते त्यामुळे उदयन म्हंटले की तुमचे सगळ्यांचे पायनल पॅकींग होईस्तो पर्यत मी परत जरा वेळ पडतो. तरच मला पुढे येता यईल. कारण काल इथे सगळ्यांचे असे ठरले होते की आता लक्कडकोट झाडी पार होईस्तो पर्यत आपण सगळ्यांनी एकत्र चालायाचे.त्यामुळे आज आम्हा तिघांनाच इथे थांबताही येत नव्हते. त्यामुळे मी परत आडवा झालो, पण जसा मी आडवा झालो तसे पोटातून कळा येउन मला परत दोन नंबरला जाण्याची वेळ आली. म्हणजे तापाबरोबर आता बहूतेक पोटही बिघडल्याची चिन्ह दिसत होती.
तिकडे जाउन तर मी आलो पण आल्यावर पुर्ण ताकदच निघून गेल्या सारखे झाले. परिक्रमा सुरु झाल्यापासून पोट बिघडू नये म्हणून मी जी काही काळजी घेत होतो ती घेउनही आज पोटही बिघडले होते.
मग आता उपाय काय तर आता रोको गोळी शिवाय काही पर्याय नव्हता .गोळी घेतली , निघतांना रामरायांना नमस्कार करून माझे आवरून आम्ही पुढे जाण्यासं निघालो.तिन्ही माउली व इतर परिक्रमावासी तर थोडे आधीच बाहेर पडले होते कारण आमचे चालणे त्यांच्यापेक्षा जलद असल्याने पुढे हे आपल्याला नक्की गाठतील याची त्यांना पूर्ण खात्री होती पण आज मात्र गोष्ट थोडी वेगळी होती.
आता आमचे बापूजी माझी काळजी घ्यायला पुढे सरसावले. मी सॅग उचलायच्या आधीच त्यानी माझी सॅग पाठीला व त्याची बॅग खादयावर उडकवून माझ्या समोर उभा राहीला व म्हणाला " दादा,आज तु फक्त तुझा दंड घेऊन चालावयाचे काम कर, तुझी सॅग व कमंडलू मी तुला आज काही घ्यायला देणार नाही. ' मी परत परत म्हणूनही त्यानी माझी सॅग व कमंडलू मला काही दिली नाही. मी मागेही हे सांगीतले व आज परत सांगीन की आम्ही दोघे त्याचे मोठे भाऊ या भावनेने तो उदयनची व माझी काळजी परिक्रमेत घेत असे कदाचीत माईने त्याला त्याची परिक्रमा व आमची योग्य काळजी घेणे अशी दोन्ही गोष्टी करण्याची प्रेरणा दिली होती.
जसे उजाडत चालले होते तसे थंडीचा गारठा कमी होत गेला,रोको मुळे पोटातील गडबडही थांबली होती. पण रात्रीची झोप पुर्ण झाली नसल्याने व थोडयाश्या तापाने इतक्या निर्सगरम्य वातावरण मला तितका उत्साह व आनंद मिळत नव्हता. तासाभरानंतरचा
सगळा रस्ता मातीचा, छोट्या जंगल भागासारखा सुरू झाला इथेच परत तिन्ही माऊली आम्हाला भेटल्या,सगळे बरोबर आता आम्ही चालू लागलो.आता सगळा भाग भरपूर झाडी असलेला मातीच्या रस्त्याचा व मोठया रानाचा होता. मोठया झाडाच्या सावली मुळे ऊन फारसे जाणवत नव्हते हे माझ्या दृष्टीने खूप सोयीचे होते.तीन चार तास चालल्यावर आम्ही तरान्या या गावापाशीं पोहचलो.म्हणजे हा ही भाग जंगला सारखाच होता, खूप तूरळक वस्ती असलेल्या या भागात आम्ही एका कुटीपाशी पोहचलो. 'नर्मदे हर ' चा पुकारा केला, आतून 'नर्मदे हर ' म्हणत हसत हसत नाथ बाबाजी बाहेर आले. 'आई ये महाराजजी,अंदर आईये ' असे म्हणत त्यांनी आम्हाला सगळ्यांना आत बोलावले.बराच वेळ चालल्याने व अंगात थोडा ताप व थकवा असल्याने मलाही कुठे तरी थोडा वेळ विश्रांती घ्यावे असे वाटतच होते.
बारा साडेबारा झाले असल्याने नाथबाबानीं भोजन प्रसादी आता इथेच घ्या असे आम्हाला सांगीतले.शिधा इथे आहे फक्त तुम्हाला बनावून घ्यावे लागले असे बाबाजीनी सांगितले.
काल रात्री बाकी कुणाचे जेवण झाले नव्हते व आज सकाळपासून तर पोटात काही गेले नसल्याने सगळ्यांनाच खूप भुक लागली होती.इतरवेळी दुपारी जेवण बनवणे म्हणजे तास दिड तासाची निश्चिंती असे, त्यामुळे आम्ही ते टाळत होतो. पण आज मात्र सगळ्यांनाच खूप भुक लागली होती व माझा स्वार्थ म्हणजे मलाही थोडा वेळ विश्रांती हवी असल्याने मीही तेव्हा काहीच बोललो नाही. आता पोटामुळे आपण काही खायचे नाही हे मी मनोमन ठरवले असल्याने तसे उदयन,बापूला सांगीतले तेव्हा त्यानी 'तु आता बाजूच्या खोलीत जरा वेळ विश्रांती घे, असे सांगीतले.बापूने तर मला आग्रहाने सांगीतले की 'माझी सिंल्पींग बॅग तुमच्यापेक्षा थोडी जास्त उबदार आहे त्यामुळे तु आत्ता तीच घे ' असे म्हणून मला ती काढून मोकळीही करून दिली.
ते सगळे जण भोजन प्रसादीच्या मागे लागले व मी त्या आतल्या खोलीत स्लिपींग बॅगमधे गुडूप झालो.
रात्री झोप न लागल्याने त्यांची सगळ्यांची भोजन प्रसादी कधी झाली, कुणी काय बनवले हे मला काहीच कळले नाहीं.
निघण्याआधी अर्धा तास उदयनने मला उठवले व पोळी खायची आहे का? आजही मीच केल्या आहेत, असे तो म्हणाला .पण तेव्हाही मी त्याला 'आता मला काहीच नको ' असे सांगीतले कारण अजून पिपारिया पर्यंत परत चालत जायचे होते व पुन्हा जर पोटाची गडबड सुरू झाली तर ती मला परवडणारी नव्हती. "मी तुझ्या साठी तीन चार पोळ्या बांधुन घेतो, पुढे भूक लागली की मला सांग ", असे मात्र त्यानी मला आर्वजून सांगीतले.
निघण्याची वेळ झाली,आम्ही बाबाजींना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले " मै नेपाल गया था, वहाँसे मै बहोत सारे शालिग्राम लाया हूँ, आप देख लो और पसंद आये तो आपके लिये लेके जाओं, असे म्हणत त्यांनी एका कपाटातून बरेच सारे शाळीग्राम बाहेर काढले व आम्हाला दाखवले. त्यात काही छोटे तर काही मोठे शाळीग्राम होते. पुढे ते परत आम्हाला म्हणाले की 'आपणास पाहिजे असल्यास, आपण यातील कुठलाही घेऊ शकता ' . तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी त्यांना 'आपणच आपल्या हातानी प्रत्येकाला एक एक प्रसाद म्हणून दया ' असे सांगीतले.
माई किनारी शिवलिंग मिळते पण शाळीग्राम मिळणे जरा दुर्लभ त्यामुळे असा काही अलभ्य लाभ आपल्याला होईल हा विचार कुणाच्याही मनात नसल्याने अचानकपणे मिळालेल्या शाळीग्रामचे प्रत्येकाला विशेष अर्प्रुप वाटत होते व एक वेगळा आनंद मिळाला होता. दहा पंधरा मिनीटात आम्हीं सगळयांनी तिथुन पुढे प्रस्थान केले .माझी तिथे चांगली तासभर झोप झाली असल्याने व वर हे शाळीग्रामरूपी दैवत मिळाल्याने सकाळपासून आलेला थकवा कुठल्या कुठे पळुन गेला.
ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी मी या माझ्या अनुभवात मुद्दामून नमूद करतो आहे कारण परिक्रमेतील प्रत्येक दिवस हा काही भव्य दिव्य अनुभवानी भरलेला नव्हता. माझ्यासारख्या सर्वसामान्य परिक्रमावासीयाला ही प्रत्येक दिवसाची आठवण खूप आनंद देणारी व प्रत्येक छोट्या छोटया गोष्टीतून खूप काही शिकवून जात होती.त्यामुळे कदाचीत कुणा वाचणाऱ्याला असे वाटेलही की यात काय आहे अनुभव म्हणून लिहण्यासारखे पण मोठेपणा म्हणून मी सांगत नाही पण परिक्रमेत काही वेळला खरोखर आपल्या मनाचा कस लागे किंवा ती कदाचीत परीक्षाही बघत असे की काय कोण जाणे पण काय करतो हा माझा लेक या परिस्थीत?ठरवले आहे याने परिक्रमा चालत पूर्ण करण्याची पण अशा काही गोष्टी ती घडवून आणत असे की आपली तबेत्त तरी बरी नसे व तेव्हाच कुणीतरी गाडीवाला आपल्याला अगदी आग्रहाने पण प्रेमाने गाडीवरून पुढच्या गावापर्यत सोडतो म्हणून सांगत असे, मग मात्र आपण आपल्या निर्णयाशी किती ठाम राहतो किंवा कसे हे मात्र ती नक्कीच बघत असे कारण एकदा की आपण त्या परिक्षेत पास झालो की ती आपल्याला नक्की काहीतरी वेगळी अनुभुती देत असे. हे असे अनेक प्रसंगातून मला जाणवले. तिथला निर्सग, माई व तिचा किनारा हे म्हणजे आनंदाची खाणच आहे पण परिक्रमेत कित्तेक दिवस हे आपल्या शरिराची व मनाची कसोटी घेणारे असत.आज मागे वळून बघताना हे सगळे आठवले म्हणजे जाणवते की केवळ सद्गुरूपी मैयामुळे आपण हे करू शकलो अन्यथा हे सगळे अशक्यप्राय होते.
परिक्रमेत असे काही दिवस नक्कीच आले की ज्या दिवशी विशेष असे काहीच घडले नाही पण शरीराचा कस मात्र पूर्ण लागला. पण तेही तेव्हा खूप आनंद देणारे असे कारण मनात ती आपल्या बरोबर आहे हा ध्यास एक वेगळा उत्साह देई.
साधारणपणे आम्ही पाच वाजेपर्यंत पिपरीला पोहचलो. इथे माईच्या परिक्रमावासीयांसाठी एक नवीन माईचे निवासस्थान झाले आहे तिथे आम्ही सगळ्यांनी आमची आसने लावली.
आमच्या पवार माऊली जळगावच्या व इथे डॉक्टर चौधरी म्हणून आहेत, ज्यांचेही मुळ गाव जळगाव ,पण गेली पंचवीस तीस वर्ष ते इथे येऊन स्थाईक झालेले आहेत व ज्यांना परिक्रमावासीयांबद्दल विशेष प्रेम आहे असे पवारांना परिक्रमा सुरू होण्यापूर्वी कुणीतरी सांगीतले होते, त्यामुळे त्यांना भेटण्यास व आता ते डॉक्टर असल्याने सुनीलचीही तबेत त्यांना दाखवुन ते काही त्यास औषध देतील असे पवार माऊलीना वाटत असल्याने आम्ही अर्धा तासानी सगळेजण त्यांना भेटावयास गेलो. पाहुया तो भाग पुढच्या भागात पण तोपर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८७-
आसन लावुन आम्ही डॉ. चौधरींच्या घरी गेलो. विश्रांती स्थानापासून साधारण पंधरा मिनीटांच्या अंतरावर चौधरी डॉक्टरांचे घर होते. घर जुन्या पद्धतीचे, घरासमोरील मोकळ्या जागेत वरून पत्रे घालून करण्यात आलेली शेड .तिथेच खुर्चा मांडलेल्या होत्या.एका बाजूला थोडे आडोशासारखे कुणी पेशंट आले तर त्याला तपासायला जागा, बाहेरच्या मोकळ्या जागेत एक बाकडे ,डॉक्टरांसाठी ठेवलेली टेबल व खुर्ची.
आम्ही गेलो तेव्हा डॉक्टर घरातच होते.आम्ही त्यांच्या घरी गेलो तसे त्यांनी बाहेर येऊन आमचे ' या, या ' म्हणून आमचे स्वागत केले. आम्ही मोकळ्या जागेतील खुर्चामधे बसलो. पवार साहेबांनी आपली स्वतःची व आमच्या सगळ्यांची ओळख डॉक्टरांना करून दिली. त्यांच्या थोडयावेळ जळगाव व तिथे राहत असलेल्या लोकांबद्दल बोलणे झाले. तेवढयात गावातील कुणी पेशंट त्यांच्याकडे तपासायला म्हणून आला. त्याला तपासून औषध देऊन डॉक्टर परत आमच्याशी परिक्रमेतील गप्पा मारायला बसले. 'कशी चालू आहे परिक्रमा ' असे त्यांनी विचारले मग तर काय सगळ्यांनाच बोलायला तोंड फुटले.पण थोडया वेळात पवार काकांनी माझ्याकडे बोट करून याला सकाळ पासून बरे वाटत नाही त्यामुळे याला आधी तपासून काही औषध दयावे असे डॉक्टरांना सांगीतले. त्यांनी मला तपासून 'काही विशेष नाही ' असे सांगात फक्त मला सांगा सकाळपासून काय काय होते आहे ' अशी चवकशी केली. चार गोळ्या देऊन म्हणाले यातील आज एक घ्या, म्हणजे तुमचे पोट एकदम ओके होईल. पुढच्या गोळ्या घ्याव्याही लागणार नाहीत पण अजुन तुमची परिक्रमा बरीच बाकी आहे त्यामुळे त्या आता नाही लागल्या तरी ठेउन द्या. तेव्हा मला लगेच गोळी घेणे शक्य नव्हते कारण सकाळपासून पोटात काहीच नव्हते. परत थोडया गप्पा झाल्या मग आम्हीही त्यांना आपण जळगाव सोडून इतक्या नवख्या ठिकाणी येऊन इथे स्थाईक कसे झालात याबद्दल आम्हाला थोडे सांगा असे त्यांना विचारले. मग तेही थोडे भुतकाळात शिरले म्हणाले 'डॉक्टर झाल्यानंतर आपण जळगावमधे किंवा अजुबाजुच्या प्रतिष्ठीत ठिकाणी आपला डॉक्टरकीची प्रॅक्टिस न करता, खडेगावात जाउन आपण तिथल्या लोकांची सेवा करावयाची हे एक स्वप्न होते, त्यामुळे सगळ्यांवर पाणी सोडून आम्ही इथे आलो. सुरवातीच्या काळात खूप झगडावे लागले. जवळपासच्या छोटया छोटया गावातून जाउन पेशंटला तपासणे व औषध देणे म्हणजे एक दिव्य काम होते. सुरवातीला भाषेचाही थोडा प्रॉब्लेम यई, गरीबी तर इथे खूप त्यामुळे खूप वेळा परिस्थीती बघुन पैसे न घेता ही औषध दयावे लागत असे. पण मनाला मिळणारा आनंद व समाधान काही वेगळेच असे. त्यामुळे आपण तेव्हा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे मला कधीच वाटले नाही. खोऱ्यानी पैसा नाही ओढता आला पण इथल्या लोकांचे मला मिळालेले प्रेम व त्यांना माझ्या कामाबद्दल वाटत असलेला विश्वास, आदर हीच माझ्या आयुष्याची खरी दौलत आहे.. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, मी बाहेरून आलेलो असल्याने पहिल्यादी त्या लोकांचा मनात माझ्याबद्दल व माझ्या वैद्यकीयं ज्ञानाबद्दल विश्वास संपादन करण्यात थोडा वेळ गेला. त्याचबरोबर वैदकीय औषधाविषयी जनजागृती करणे हे तर माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते कारण लोक अशिक्षित, अज्ञानी त्यामुळे सायन्सपेक्षा बाकीच्या गोष्टींवर जास्त विश्वास पण हळु हळु यश मिळत गेले व आज मी पूर्ण समाधानी आहे की बघितलेले स्वप्न मला काही अंशी तरी पूर्ण करता आले. आम्हीही सारे भारावुन गेल्या सारखे ते ऐकत होतो, परत एकदा त्या परमेश्वराचे कौतुक वाटले की तो प्रत्येक व्यक्तीत किती सकारात्मक उर्जा देऊन या भुतलावर पाठवतो, ती उर्जा माणसाने योग्य ठिकाणी वापरली की त्याचे सोने होते हे ज्वलंत उदाहरण आम्ही आमच्या समोर पहात होतो.
उद्या निघतांना इथे येऊन चहा घेऊन मगच पुढे जायचे असे आम्हाला त्पानी आग्रहाचे निमंत्रण दिले व तसे त्यांनी आमच्याकडून कबुलही करून घेतले.वेळेअभावी आम्ही आमची त्यादिवशीची बैठक तिथेच संपवली.
आश्रमात येऊन परत माईची पुजा, आरती करावयाची असल्याने आमची पावले आता परत भराभर आश्रमाकडे वळली.आज तापामुळे सकाळी स्नान झाले नव्हते, त्यातून तरान्याचे दोन तास सोडले तर दिवसभर चालणे झाले होते. सकाळ नंतर ताप नसल्याने व आता आश्रमात बाथरूम असल्याने छानपैकी आंघोळ करून फ्रेश झालो. आता जरा पोटात भुकेची जाणीव व्हायला सुरवात झाली होती. सकाळी चालताना भीत भीत खालेली चार बिस्किटे व आश्रमात आल्यावर पोटात गेलेला थोडा चहा एवढेच काय ते पोटात होते.आज चालणे मात्र त्यामानाने खूप झाले होते. उदयने बरोबर घेतलेल्या पोळ्या आश्रमात आल्यावर आम्ही जेव्हा हात पाय धुवत होतो तेव्हा बापूने चूकून तिथेच बाजूला ठेवल्या व हे जेव्हा थोडया वेळाने त्याच्या लक्षात आले तसा तो लगेच तिथे परत पहावयासही गेला होता पण तोपर्यंत कुणी भुकेल्या परिक्रमावासीयाच्या किंवा अजून कुणाच्या तरी मनीमुखी त्या लगाव्यात अशीच त्या दिवशी माईची इच्छा असावी.कदाचीत माझ्यापेक्षा आज त्याला त्याची गरज जास्त असावी म्हणून तर बापूकडून त्या ठेवल्या गेल्या असाव्यात.माझी नाही पण त्या दिवशी दूसऱ्या कुणाची तरी भूक त्याने शमली या विचारानी मात्र आम्हाला खूप समाधान वाटले म्हणूनच म्हणतात ना ' दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम '
संध्याकाळची पुजा व आरती झाली. हॉलमधील एका कोपऱ्यात बऱ्याच पातळ अशा गाद्या ठेवलेल्या होत्या त्यातील एक गादी बापू उदयनच्या सांगण्यावरून माझ्यासाठी घेऊन आला.मी नको नको म्हणत असतानाही ' नाही, आज तु खाली सतरंजीवर न झोपता याच्यावरच झोपावयाचे आहे कारण उद्याचा प्रवास अजून खडतर व बराच आहे , त्यामुळे जास्त नाटक तू आता करू नकोस' असे त्यानी मला दाटवून सांगीतले.
आता डॉक्टरांनी दिलेली गोळी घ्यायची म्हणजे थोडेफार खाणेही क्रमप्राप्त होते, तसेच उद्या सकाळपासून सगळा प्रवास हा लक्कडकोट झाडीतून जयंती माता मंदीरापर्यंत करावयाचा होता त्यामुळे ताकद राहण्यासाठी काहीतरी खायला तर नक्कीच हवे होते.आश्रमात आज रात्रीच्या भोजनप्रसादीला भात किंवा खिचडी असेल किंवा काय याचा मी विचार करत होतो पण काही अंदाज येत नव्हता.फक्त टिक्कर समोर आले तर मात्र माझे कठीण होते.
थोडया वेळात आम्ही सगळे आश्रमातील माईच्या सायं आरतीसाठी जमा झालो.
रात्रीची भोजन प्रसादीची वेळ झाली,थाळी ,वाटी ,भांडे व कमंडलू घेऊन आम्ही सगळे बाहेर भोजन प्रसादीस बसलो. समोरून सेवेकऱ्याने पातेल्यातून आणलेली भोजन प्रसादी होती 'खिचडी '.परत एकदा जाणवले की तुला प्रसादीस काय असेल हे काळजी करण्याची गरज आहे? तिला नाही तुझी काळजी. पण जन्मोजन्माच्या संस्कारामुळे ही काळजी, हे विचार करणे मात्र काही केल्या थांबत नाही. पण हे जेव्हा थांबेल तेव्हाच तिच्यावर पूर्ण विश्वास किंवा पूर्ण भार टाकल्यासारखे हाईल व तेव्हाच खऱ्या अर्थाने पूरिपूर्ण परिक्रमा झाली असे म्हणावयास हरकत नाही.
रात्रीची भोजन प्रसादी झाली, दिवसभर पोटात काही नसल्याने थोडी खालेली खिचडीही खूप चविष्ट लागली. नंतर डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतली व त्या थंडगार वातावरणात आम्ही सगळे स्लीपींग बँग मधे गुडूप झालो. त्या रात्री बऱ्याच दिवसानी गादीवर झोपल्यामुळे किंवा दूपारी तरान्याच्या कुटीत घेतलेल्या विश्रांतीमुळे की काय पण मला मधुन मधुन सारखी जाग येत राहीली.
सकाळी लवकर उठून स्नानं पुजा करून आम्ही परत सगळे डॉक्टरांकडे चहा घेण्यास गेलो. चहा घेऊन अर्धा तासानी आम्ही परिक्रमेच्या पुढच्या मार्गास रवाना झालो. हे वर्णन लिहीताना तिथे . अनुभवलेले शांत निरामय क्षण गद्यरूपाने सुचेनात मग जसे शब्द सुचत गेले तसे वर्णन मी लिहीत गेलो त्यामुळे काही कमी जास्त झाल्यास आपण गोड मानून घ्यावे ही विनंती.
सगळा दिवस आजला होता रानावनातला, अरण्य नसले निबिड तरी मार्ग होता तो झाडीतला ,
पाऊलवाटा सगळ्या मातीच्या फिरत गेल्या दशदिशात, शोधावी लागत होती तिथे कोणती आपुली ती पाऊलवाट?
वृक्ष वेली पान फुलेही दावीत गेले नुतन आविष्कार संपता गर्दी माणसांची साकारले नव भावविश्व ते आज.
आपल्याच नादात बागडत गेली पायाखालची पाऊलवाट, वारा स्पर्शूनी हळूच वेलींना झंकारीत होता सुमधुर गीत गान,
कधी हातानी राकटपणे तो गाळत होता वृक्षलतास , पक्षीही तिथे गायन करूनी गात होते सुमधूर तान,
निरव शांतता कधी तिथली वेधीत होती आपुल्या मनास, तिथुनच सुरू झाले मग ते साद घालणे अंर्त:मनास,
साद मिळता आंर्त:मनाची उघडते कवाड शांतीसमाधनरूपी खाण , पाऊलवाट ही परिक्रमेची
करीते जाते आपुले मन विशाल, मग चराचरी वसलेल्या परमतत्वाचे अगाध दर्शन होत जाते तुज खास अगाध दर्शन होत जाते तुज खास
सीता बन= साधारणपणे नऊ वाजण्याच्या बेताने आम्ही सीता बन या ठीकाणी पोहचलो. कोण्या एका पर्वात इथल्या पवित्र भुमीत वाल्मीक ऋषींचा आश्रम होता. बाजूला पूर्ण रामदरबार, श्रीराम लक्ष्मण ,सीता, भरत, शुत्रघ्न , लव कुश असा सगळा राम परिवार असलेले हे एकमेव मंदीर. प्रभु रामचंद्रानी सीतेचा त्याग केल्यानंतर सीतामाईंना आश्रय दिलेली ही ती पावन भुमी. प्रभु रामचंद्रांचे सुपुत्र लवकुश यांचा ह्याच जन्मभुमीतला जन्म व त्याच्या दुडहुड्त्या पाऊलांचा स्पर्शही ह्याच भुमीला झालेला. असे आहे हे पवित्र सीता बन. आम्ही तिथे पोहाचलो तेव्हा तिथे असलेल्या कुटीत साधु माधवदास बाबा आत त्यांची काही साधना, पुजा करत बसलेले होते. आम्हाला तिथल्या सेवेकऱ्यांनी थोडा वेळ तिथेच बाहेर थांबावयास सांगीतले. मग आमचा तिथे एक चहा झाला. थोडयावेळाने ते साधु महाराज बाहेर आले. केसांच्या मोठया म्हणजे जवळ जवळ पाच सहा फुट जटा वाढवलेले ते साधु जसे बाहेर आले तसे हसत हसत आम्हाला म्हणाले 'नर्मदे हर ' चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जसे आपले जवळचे कोणीतरी आल्या सारखा.आम्ही सगळ्यानी त्यांना नमस्कार केला. ते परत आत गेले व येताना एक डबा बाहेर घेउन आले. त्यांतून त्यांनी आम्हाला प्रत्येकाला एक एक रूदाक्ष मणी भेट म्हणून दिला अगदी आनंदाने ,मनात त्यांबद्दलचे कुठलेही ममत्व न ठेवता. तेव्हा वाटले की असे कुठल्याही गोष्टीत ममत्व न ठेवता पुढील आयुष्य जर जगता आले तर खऱ्या अर्थाने परिक्रमेचे व जीवनाचे सार्थक झाल्या सारखे आहे.
थोडया वेळात आम्ही तिथुन निघालो कारण संध्याकाळपर्यंत कसेही करून आम्हाला जयंतीमाता मंदीरापर्यंत पोहचावयाचे होते. मधे कुठेही आता वस्ती किंवा थांबण्याची जागा नाही. सगळा भाग हा एकांताचा, मोठी मोठी झाडे , झुडपे असलेला मातीच्या ओबड थोबड रस्त्याचा, पण तरीही मनाला आनंद देणारा, कारण इथे सहजच तुम्ही त्या निर्गण,निराकार, निर्सगाशी नकळत एकरूप होऊन जाता. मग तोही आपल्याला मुक्तहस्ताने भरभरून प्रेम व आनंद खुल्या मनाने देउन त्यातील खरी गंमत काय आहे ते आपल्याला दाखवतो, शिकवतो की बघ, यात किती आनंद आहे. इथे कुठलीही स्थुल गोष्ट न घेता किंवा देता आपण एका निरपेक्ष प्रेमाची खरी ताकद काय आहे हे अनुभवतो. त्यातून तो आपल्याला सांगत असतो की अशी विश्वप्रेमाची ठिणगी तुही सर्व ठिकाणी चेतव, निर्सगाच्या ह्या प्रक्रियेत तु स्वतः सामील हो व इतरानाही सामील करू घे हाच एक धडा तो आपल्याला शिकवत असतो. त्यामुळे त्यां निर्सगाचा आनंद घेत आम्ही सध्याकाळपर्यंत जयंती माता मंदीरा पर्यत पोहचलो. त्यामुळे पाहुया तिथला मुक्काम पुढल्या भागात. नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा अनुभव ८८-
आजचा अनुभव सांगण्याआधी थोड्या वेगळ्या विषयावर चार शब्द मांडण्याचा माझा हा एक छोटा प्रयत्न.
आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की महेश्वर येथील सप्तमातृका मंदारातील ज्ञानसुर्य ५ नोव्हेंबर २०२० रोजी स्थूल रूपाने माई चरणी विलीन झाला. पण आपल्या ज्ञानाच्या तेजाने त्यांनी किरणांच्या रूपाने लावलेली आपल्या शिष्यांची बाग मात्र लवकरच त्यांनी दिलेल्या ज्ञानकिरणांनी नक्कीच उजळुन निघेल यात मला अजिबात शंका नाही. हीच त्या ज्ञानाची खरी महती आहे. त्या पुण्यात्माला मिळालेले खरे समाधान, खरी शांती ही तेव्हाच आहे, जेव्हा त्यांनी लावलेल्या बागेतील प्रत्येक फुल हे ज्ञानरूपाने फुलुन त्याचा सुगंध त्यांनी दिलेला ज्ञानाचा वसा पुढे घेऊन जाईल.मला खात्री आहे की त्यांची पुढील सर्व शिष्य मंडळी त्यांचे हे कार्यही नक्कीच पुर्ण करतील.म्हणूनच म्हंटले आहे की ' मरावे परी किर्ती रूपी उरावे ' ही त्यांची ज्ञानरूपी कीर्ती सबंध नर्मदा खंडात कायम गायली जाणार आहे यात काही शंकाच नाही.
त्यांनी महेश्वरला माईच्या किनारी सुरू केलेली माईची शक्तीस्वरूपातील उपासना व त्याच बरोबरीने सप्तमातृका मंदीरात चालत जाणाऱ्या माईच्या लेकरांसाठी सुरू केलेले सेवाकार्य म्हणजे माईनी त्यांच्यावर दाखवलेला दृढ विश्वासच आहे कारण कुठे तमिळनाडू राज्यात राहाणारा हा ज्ञानी महंत ,माईच्या किनारी येतो काय व इथे येऊन उपासना व कार्य करतो काय हे केवळ त्यांनी त्या विश्वशक्तीवर दाखवलेल्या दृढ विश्वासाचे फळ आहे. त्यामुळे माईनी त्यांच्याकडून सुरू केलेले हे कार्य यापुढेही आपल्या सगळ्यांकडून महाराज नक्की पुर्ण करून घेतील व हीच आपली सगळ्यांची खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे.
अतिशय ज्ञानी, तेजपुंज व्यक्तिमत्व की ज्याच्या संभाषणातून सहज एखादा सर्वसामान्य जीवही भगवंताशी सहज जोडला जाई. प.पु .नरहरगीरी महाराज म्हणजे एक ज्ञानाचा अथांग सागर होता. आपल्याकडील हे ज्ञान फक्त आपल्यात समीत न ठेवता ते सर्व जिज्ञासुंना वाटून तेही त्या परमतत्वाच्या परिघ रेषेत यावेत यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत. संस्कृत वर अतिशय प्रेम असलेला हा पुण्यात्माचा इतरही अनेक ग्रंथांचा दांडगा अभ्यास होता.महाराज हे श्रीशक्तीचे थोर उपासक होतेच पण त्याचबरोबर इतर सर्व देवदेवतांची पुजाअर्चा, संस्कार,तर्पण शास्त्रोक्त पध्दतीनेच कसे असावे ह्याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. गोड गाता गळा, कर्नाटकी संगीताचा शास्त्रीय अभ्यास व त्याचा भजन म्हणताना केलला सहज उपयोग यामुळे त्यांचे भजन नेहमी भावपूर्ण असे.
माझी व महाराजांची प्रत्यक्ष झालेली भेट तर फक्त एकदाच चार वर्षापुर्वी व नंतर चार पाच वेळा त्यांच्याशी फोनवर झालेले संभाषण,फ्ण त्याच्या बरोबर झालेल्या तेवढया संभाषणातूनही मला त्यांच्या प्रत्येक शब्दातून विद्वता,परिपूर्ण ज्ञान ,प्रेमाचा ओलावा व गोड बोलून माणसे कशी जोडून ठेवावीत हे इश्वरी गुण जाणवले.भगवतीची तर त्यांच्यावर पूर्ण कृपा होतीच कारण आमची पहिल्यांदी जेव्हा त्यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी सांगीतलेली एक आठवण मला आजही आठवत आहे, म्हणाले ' मै आया था यहाँ माई किनारी सेवाभावसे,पर मेरे विचार और इस गाँव के लोगों के विचारों मे कुछ वैचारीक मतभेद आ गये. इस कारण मै यहाँ से वापीस चला गया था मेरे गाव, तमीळनाडू कभी यहाँ वापीस न आने के लिये.पर माई की लिला अगाध है, मैय्याने यहाँ के काई अच्छे लोगों को फिरसे मेरे पास वापीस भेज दिया ,और मै यहाँ वापीस आ गया 'त्यामुळे मला असे वाटते की माईही या गुणी लेकराच्या प्रेमात पडून त्याला कधी एकदा आपल्या किनारी आपल्या कुशीत घेऊन येते असे तिला झाले असावे. माईबद्दल असलेला त्यांचा अपार आदरभाव व प्रेम हे तेव्हाही त्यांच्याशी बोलताना जाणवले. कारण तेव्हा आम्ही तिथे पाहिलेली छोटीशी उपासना कुटी व आत्ता तिथे झालेला भव्य आश्रम की जिथले वातावरण अतिशय मंगलमय व भक्तिपूर्ण आहे व हे केवळ त्यांचे माईवरील असलेले प्रेम व त्याला तिच्याकडून मिळालेली पोचपावती असेच म्हणावे आहे.
उदयन त्यांच्या सहवासात खूप वेळा आला व त्याच्या बोलण्यातून मला त्यांच्या व्यक्तिमत्वाची झालेली ओळख मी वरील च्यार शब्दात मांडून त्यांच्या ज्ञान कार्याला माझ्याकडून एक आदरांजली देण्याचा हा एक प्रयत्न करतो व त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला माझा दंडवत.आजचा माईच्या परिक्रमेचा पुढचा भाग त्यांच्या चरणी अर्पण करून मी भावपूर्ण सुमनांजली त्यांना अर्पण करतो.
नर्मदे हर..
परिक्रमा मार्ग पुढे चालू- दिवसभर त्या निर्मनुष्य झाडीतून चालत असताना आम्ही निर्सगाच्या सौंदर्याचा एक वेगळा अनुभव घेत होतो. त्या शांत वातावरणात निरनिराळ्या विशाल वृक्ष ,वेलींच्या साथीने चालण्याची मजा काही और होती. खूप गर्द झाडी नसली तरी मोठी मोठी झाडे बऱ्याच अंतराअंतरा वर दिसत होती.झाडांवरील निरनिराळे पक्षी , त्यांचे आपसात चाललेले हितगुज ऐकत व ते ऐकण्यात असलेला एक वेगळा आनंद तेव्हा आम्ही अनुभवत होतो. निर्सगाच्या सानिध्यात . दगड मातीच्या उंच सखल भागातून मार्ग आक्रमित आमचे पुढे चालणे सुरू होते. मधुन मधुन पावसाच्या पाण्यामुळे तेव्हा तयार होत असलेले नाले, ओहळ व त्या प्रवाहांमुळे नंतर तयार झालेले ओबड धोबडं मार्ग की ज्यात आता पाणी नसल्याने उघडे बोडके पडलेले दिसत होते. तेव्हा सहज मनात आले की पावसाळ्यात इथले सौंदर्य अजूनच वेगळे असेल नाही?तेव्हा सगळीकडे हिरव्या,पोपटी रंगांची शालच जणू ही भुमाता पांघरत असावी. पाण्याने भरून वाहणारे नाले ,ओहळ तेव्हा इथली शोभा अजून वाढवीत असतील.इथले रस्तेही तेव्हा आपल्या अंगावर कुठे चिखलाचा तर कुठे रानगवताचा अंगरखा परिधान करीत असतील.त्यामुळे जंगल पार करणे हे तेव्हा खरतर दिव्य काम असेल पण त्यातही काही वेगळीच मजा असेल त्यामुळे कधीतरी इथे पावसाळ्यातही नक्की यायचे असे मनाशी मी तेव्हाच ठरवले.
आज तिन्ही माउली,अजून दोन परिक्रमावासी व आम्ही तिघे असे हा मार्ग चालत होतो. पवार माउली स्वभावाने थोडया मिशिकल असल्याने आज चालताना थोडया गप्पा, चेष्टामस्करी करत आमचे चालणे होत होते. पाखरे माउलींकडे पौष्टीक खाण्याचा स्टॉक भरपूर असल्याने ते खूप मायेने अधुन मधुन तो आमच्या हातावर ठेवत असत. हाच काय तो त्या संबंध दिवसात आमच्या पोटाला आधार होता. त्यामुळे आधेमधे झाडाखाली थोडी विश्रांती घेत आम्ही संध्याकाळपर्यंत जयंती माता मंदीराच्या आवारात पोहचलो.असे सांगतात की पुर्वी इथे आता सारखे मोठे मंदीर नव्हते. पुर्वी फक्त इथे एक चौथरा होता व त्यावर तांदळारूपी देवीची स्थापना केलेली होती.या शक्तीस्वरूपाची साक्ष म्हणजे परिक्रमावासीच्या मनात तेव्हा भोजनप्रसादीची जी काही इच्छा होत असे तशा स्वरुपातील भोजन प्रसादी तेव्हा त्यास मिळत असे. तयार भोजन किंवा शीधा अशा ज्या स्वरूपात भोजनाची अपेक्षा तो आपल्या मनात धरत असे त्या भोजनाची व्यवस्था तिथे झालेली असे. मातेला भेटण्यासाठी वाघही अधुन मधुन इथे येतो अशीही एक आख्यायीका आहे.आता त्या ठिकाणी मंदीराचे बांधकाम झाले असून तीची नित्यनियमीत पुजाअर्चा केली जाते. बाजूला एका मोठ्या शेड सारख्या जागेत परिक्रमावासीयांची निवासाची सोय होते.आमच्या आधीही तिथे बरेच परिक्रमावासी पोहचलेले होते.आमाची आसने आम्हीही त्या शेडमधे लावली.
तेवढयात कुणीतरी म्हणाले इथुन जवळच भैरव स्थान ( गुफा ) म्हणून आहे आपण सर्वजण तिथे जाऊन आज स्नान करूया.ते स्थान थोडे पाण्यात आहे. संध्यांकाळ होत आली होती, हवेतही आताच चांगला गारवा जाणवत होता.
कालच येऊन गेलेला ताप,आज दिवसभर झालेले चालणे,आता ही पडलेली थंडी यामुळे मला मात्र मनातून आता तिथे जाण्याची इच्छा नव्हती.पण सगळ्यांचा होकार आल्याने एका पिशवीत कोरडे कपडे घेऊन आम्ही त्या स्थानाकडे लगेच निघालो. संधिप्रकाश पडायला सुरवात झाली होती त्यामुळे अंधार पडयच्या आत इकडे परत पोहचणे गरजेचे होते. त्यात थोडे आभाळही भरून आल्यासारखे झाले होते.
थोडे चढण चढत आम्ही त्या स्थानापर्यंत पोहचलो.सगळा खडकाळ भाग असलेल्या या ठिकाणी थोडे खाली पाण्यात उतरून त्या गुंफे पर्यंत जाता येते. पण मला त्या दिवशी काय माहीत नाही पण त्या पाण्यात डुंबावयाची फारशी इच्छा होत नव्हती त्यामुळे कमंडलूने चार वेळा 'नर्मदे हर ' म्हणत डोक्यावरून पाणी घेऊन मी तिथुन बाहेर पडलो व वर आलो. मी वरती आलो व भुरभुर पावसाला सुरवात झाली.तिथे वर खूप झाडी असल्याने प्रथम हे जाणवले नाही पण जसे त्या पानांतून पाणी खाली येऊन अंगावर पडू लागले तसे मला अजूनच कुडकुडायला झाले.बर आता कपडेही बदलता येईनात. आता थोडा काळोखही पडू लागल्याने मी उदयनला हाक मारून 'चला लवकर, आपण लवकर परत जाऊया '. असे म्हंटलेही .पण तेव्हा ते सगळे मस्तपणे पाण्यात डुंबत त्या सगळ्याचा व वरून येणाऱ्या बारीक पावसाचा आनंद घेत होते व मलाही परत तुही आत ये असे सांगत होते.
थोडया वेळात संगळ्यांनी त्या स्थानाला नमस्कार केला. दहा मिनीटात पाउसही थांबला, सगळे तोपर्यंत पाण्याबाहेर आले, कपडे बदलून आम्ही सगळे परत आमाच्या आसन स्थळी पोहोचलो.
आज लगेच आसन मांडून आम्ही माईची पुजा व आरती केली. कारण उदयनला आज देवीसमोर सप्तशतीचा पाठ करावयास मंदीरात जायचे होते. त्यामुळे तो आमची पुजा व आरती झाल्यावर जयंती माता मंदीरात गेला.मी व बापूने आमचा नित्याचा हनुमान चालीसा व रामरक्षेचा पाठ केला. इथे आज लाईट नसल्याने किंवा त्या दिवशी तिथे काही लाईटचा प्रॉब्लेम होता की काय हे माहीत नाही पण बॅटरीच्या उजेडात व बाहेरून येणाऱ्या थोडया चांदण्याच्या प्रकाशात आमचे सगळे व्यवहार चालू होते. आमची रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणून झाले व मंदीरातून भजनाचा आवाज ऐकू येऊ लागला.त्यामुळे बापू व माऊलीना आपण येता का मंदीरात ? असे मी विचारले .पण आज भरपूर चालणे झाल्याने तीनही माऊली दमल्या होत्या, भोजनासही अजुन वेळ असल्याने त्या आपल्या आसनावर जरा आडव्या झाल्या होत्या. बापूही 'नको ' म्हणाल्याने मी एकटाच देवीच्या देवळात आलो. देवळाच्या बाहेरच्या जागेत बरेच परिक्रमावासी भजन गात बसलेले होते ,साथीला ढोलकही होता. भजन म्हणजे माझा जीव की प्राण कारण सर्व संतांनी आपल्या काव्यातून भगवतांला इतक्या प्रेमाने आळवले आहे की त्यांच्या अभंगाच्या प्रत्येक शब्दातून प्रमेश्वरावरील फक्त प्रेमच प्रेम व्यक्त होत असते. त्यांमुळे आपले मन सहजच त्या इश्वराशी समरस होऊन जाते.मग मीही यांच्यात सामील झालो.एमपी स्टाईलने म्हणणारे जास्त असल्याने आपल्यापेक्षा थोडी म्हणण्याची पद्धत वेगळी होती.खणखणीत व तार सप्तकात म्हणत असल्याने, अभंगाचे शब्द काय आहेत हे मात्र कळत होते.बाकीचे सगळे परिक्रमावासीही भजन मनापासून म्हणत असल्याने म्हणण्यात एक वेगळा आनंद मिळत होता. दोन तीन जणांनी भजन म्हंटले व तिथल्या पुजारी काकांनी विचारले ' और किस को भजन गाना है? एवढे त्यांनी विचारल्यावर मात्र मला काही राहावले नाही मग मी त्यांना सांगीतले ' मुझे एक भजन गाना है ' खर तर मला देवीचे एकही भजन पूर्ण येत नव्हते, मला जास्त येणारी भजने होती मराठीतील ,इथे तर हिंदी भाषीक जास्त,त्यामुळे मराठी भजन काही आत्ता म्हणता येणार नव्हते कारण त्या सगळ्यांना मराठीतून मला साथ देता येणार नव्हती. त्यामुळे आईंच्या भजनाच्या पुस्तकातील संत कबीरांनी रामरायांना उद्देशुन म्हंटलेला व मला मनापासून आवडणारा अभंग मी तिथे म्हणण्याचा प्रयत्न केला. संत कबीर इतक्या आर्तपणे या अभंगात रामाला म्हणत आहेत ,की हे रामा, अरे मी तुझा गुलाम आहे रे , तु व फक्त तुच माझा खरा साहेब आहेस, तुझे गोड नाम घेणे एवढेच मी जाणतो, बाकीचे मला काही कळत नाही.
असा परीपुर्ण दास्य भाव व पुर्ण शरणांगती त्याच्यात असल्याने त्यांना सहज शब्द स्फुरतात
मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा तु साहेब मेरा सच्चा नाम लेऊ तेरा ॥धृ॥
रुप नही रंग नही ,नही बरन छाया निर्विकार निर्गुण तु एक रघुराया॥१॥
एक रोटी दे लंगोटी, द्वार तेरा पाऊ काम, क्रोध छोडकर हरी गुन गाऊ॥२॥
शेवटच्या कडव्यातं ही आर्तता इतकी वाढते की ते प्रेमाने म्हणतात
महेरबान महेरबान , महेर करो मेरी दास कबीर चरण खडा नजर देख तेरी ॥३॥
किती व्याकुळता आहे त्या सांगण्यात की देवा , मी उभो आहे रे इथे तुझ्या पायापाशी, एकवार तरी नजर टाक की रे माझ्याकडे?
अशी व्याकुळता ,असे प्रेम त्या परमेश्वराबद्दल एकदा का लागले की मग तो का नाही आपल्याकडे कृपादृष्टीने पाहणार.नक्की पाहतो कारण तो तर आहे दयेचा सागर.
कलावती आईंनीही बालोपासनेत हेच मागणे मागीतले आहे त्या म्हणतात दासपणाचे सुखसोहाळे भोगवी प्रभु निरंतर.
त्यांना स्फुरलेल्या कित्येक भजनात हीच व्याकुळता परत परत डोकावते जसे
गुरुराया मजवरी करी करुणा |तुजविण शरण मी जाऊ कुणा |
किवा
गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी दयाळा| मी अनाथ मज सनाथ करूनी लज्जा रक्षावी I
ही सगळी भजन म्हणताना आपलेही मन सहजच व्याकुळ होते. अशीच व्याकुळता आम्हाला लागो हीच त्यांच्या चरणी आज इथे पार्थना करतो.
भजन संपले, तोपर्यंत उदयनचा पाठ ही झाला होता. रात्रीची भोजन प्रसादी झाली. पोटात गरम गरम प्रसाद गेल्याने सगळे तृप्त झाले.
आता थंडीचा कडाका अजूनच जाणवत होता कारण मंदीराच्या चहूबाजूने जंगल.आम्ही जिथे आसन लावले होते त्याच्या डोक्याकडल्या बाजूला होती अर्धी भिंत व वरचा सगळा भाग मोकळा त्यामुळे आज रात्री चांगल्या पैकी गारठा जाणवणार होता. उदयनला म्हंटले तुला दिलेले सॉक्स आज तरी पायात घाल ,सार्थक होईल त्याचे पण त्यावर 'आज नको, आता काळोखात कुठे शोधू 'असे म्हणत त्याने ते टाळले.उद्या सकाळी लवकर उठून २१ किलोमीटरचा लक्कडकोटच्या झाडीचा मार्ग पार करावयाचा होता त्यामुळे आम्हीही सगळे आमच्या स्लिपींग बॅगमधे शिरून त्या जंगलातील नीरव शांततेचा ठाव घेऊ लागलो. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ८९-
जवळ जवळ सगळेच परिक्रमावासी त्या दिवशी आपल्या पांघरूणात गुडूप झालेले दिसत होते.
अजुबाजूनी सगळीकडे जंगलच जंगल त्यामुळे थंडीचा कडाका चांगल्या पैकी जाणवत होता.आम्ही त्या दिवशी तिथे जवळजवळ ३० ते ४० परिक्रमावासी होतो. आम्हा सगळ्यांनाच उद्या ही लक्कडकोटची झाडी पार करावयाची होती.त्यामुळे सगळ्यांनाच उद्या सकाळी उजाडल्यावर उठून सगळे आवरून इथुन पुढे निघणे क्रमप्राप्त होते.तरच दूपारपर्यंत हया झाडीचे अंतर पार करता येणार होते.
त्यामुळे जंगलातील शांततेचा आनंद काय आहे हे डोळे मिटून अनुभवताना डोळे कधी निद्रेच्या अधीन गेले ते कळलेच नाही.त्या रात्री हवेतल्या गारव्यामुळे व शेड पुर्ण बंदिस्त नसल्याने मधुन मधुन येणाऱ्या वाऱ्यांच्या थंडगार झुळकीमुळे मला बरेच वेळा रात्री जाग येत गेली.
दूसऱ्या दिवशी सकाळी त्या थंडीमधे ,मस्त गार पाण्याची आंघोळ म्हणजे काय वेगळेच सुख होते हे आता आठवले की जाणवते की कसे घडले तेव्हा हे सगळे आपल्याकडून? लगेच आत जाणवते की तीच तर करून घेत होती हे सगळे आमच्याकडून. कारण पुढे पुढे थंडीचा जोर जसा जसा वाढत गेला तसतसे त्या थंडीतही कधी मै्याच्या वाहत्या पाण्यात तर कधी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हात पंपावर पहाटे पाच, साडेपाच सहाला स्नान करावे लागे.काय माहीत नाही पण ती आपल्याला असे काही भारून टाकते की काही विचारायची सोय नाही. मग आपणही ते सगळ्या गोष्टी सहजपणे करत जातो म्हणजेच ती आपल्याकडून सहजपणे ते सगळे करून घेते. ह्यात एक मात्र नक्की असते की 'करती करवती असते मात्र तीच ,आपण असतो नाम मात्र '.ती देत असते आपल्याला एक वेगळाच आनंद व दाखवत असते तिचे नयनरम्य अफाट व अचाट रुप! आता ते सगळे जेव्हा आठवते त्या प्रत्येक वेळी हे जाणवते की हे दिव्य आपण पार करूच शकलो नसतो हे सगळे कौतुकाने करत होती ती माय या आपल्या सगळ्या लेकरांसाठी.
त्या दिवशी काय आठवत नाही पण आमच्या तिघांपैकी कुणाला तरी आवरायला ऊशीर झाला त्यामुळे पुजा आरती करून सगळ्यात शेवटी तिथुन निघणारे आम्हीच तिघेच होतो.तिन्ही माउलीही आमच्या आधीच मार्गस्थ झाल्या होत्या.निघताना सकाळी परत आम्ही जयंती माता मंदीरात गेलो कारण काल संध्याकाळी उशीर झाल्याने त्या संधीप्रकाशात तीचे निटसे रूप कळले नव्हते त्यामुळे आज सकाळी निघताना परत तिच्या दर्शनाला गेलो. मातेचे दर्शन घेतले व आम्ही तिथुन पुढे मार्गस्थ झालो. त्यावेळी चालत असताना उदयनने जयंती या शब्दाचा अर्थ व तिची महती,कार्य काय आहे हे थोडक्यात सांगीतले.
जयंती माता -जयंती म्हणजे जन्म देणारी, आखील विश्वाला जिने जन्मास घातले व ज्याचे लालन पालनही जी करते ती ही आई किंवा जननी. हेही त्या दुर्गामातेचेच रूप, पण हे तिचेच सौम्य किंवा प्रेमळ रुप.हिची मंदीरे बऱ्याच म्हणजे इंदौर,मोहीडा,बडवाह,हिमाचल प्रदेश हया सर्व ठिकाणी आहेत.
हे सगळे मातेचे वर्णन सकाळच्या रम्य वातावरणात ऐकत ऐकत आम्ही पुढे चालत होतो. सुर्यदेव जसे जसे वर येत गेले तसा आमचाही चालण्याचा वेग वाढत गेला. साडेनऊपर्यंत आम्ही आमच्या पुढे निघालेल्या आमच्या माउलींनाही गाठले. तेव्हा माऊली हसत हसत म्हणाल्याच 'आम्हाला माहीत होते की तुमची एक्सप्रेस गाडी आम्हाला पुढे कुठेतरी नक्कीच गाठणार म्हणून तर आम्ही तुमच्या आधी सकाळी तिथुन निघालो '.
अकरा वाजपर्यंत आम्ही मारूती मंदीरापर्यंत पोहचलो, मंदीर म्हणजे हे बंदिस्त मंदीर नाही, उघडयावरच एका चौथऱ्यावर भर जंगलात हे मारूतीचे स्थान आहे . मारूतीरायांचे दर्शन घेतले,बराच वेळ चालणे झाले असल्याने तिथे पंधरा मीनटें आमचे सगळ्यांचेच थांबणे झाले. माउलींनी आजही तिथे आम्हाला पौष्टीक मावा दिला. तो खाऊन मग आम्ही पुढच्या मार्गाला निघालो कारण दुपारपर्यंत या झाडीतून बाहेर पडून पुढचे मुक्कामाचे स्थान गाठावयाचे होते. दूपारी दोन वाजेपर्यंत झाडी पार करून आम्ही पामाखेडीला पोहचलो. थोडया अंतरावर एक छोटा आश्रम आहे तिथे सगळ्या परिक्रमावासीयांची भोजन प्रसादीची सोय होते.आम्ही गेलो तेव्हा आमच्या आधी काही परिक्रमावासी तिथे पोहचलेले होते.आमच्यानंतरही काही परिक्रमावासी आश्रमात येत गेले त्यामुळे भोजन प्रसादी तयार होण्यास थोडा वेळ गेला.काही जणांचे सकाळपासून भरपूर चालणे झाले असल्यानेे ते दमले होते त्यामुळे आश्रमात जिथे कुठे जागा मिळाली तिथे ते आडवे झाले, तर कुणी कुठे जागा मिळाली तिथेच जरा टेकुन विश्रांती घेऊ लागले.थोडया वेळात भोजन प्रसादी तयार झाली,सगळ्यांना गरमागरम खिचडी वाढण्यात आली.
ती भोजन प्रसादी घेऊन आम्ही लगेच तिथुन पुढच्या मार्गाला लागलो, तीन्ही माउली मात्र थोडा वेळ तिथेच विश्रांती घेऊन मग पुढे येणार होत्या.
संध्याकाळपर्यंत आम्ही डंठा, नन्दाणा करत पोखरला धर्मेंश्वर महादेव प्राचीन सिध्दमंदीर धरमपूरी येथे पोहचलो. इथे पाहेचण्याच्या पाच ते दहा मिनीटे आधी रस्तातून चालत असताना उदयनला एकदम थरथरल्यासारखे व्हायला लागले. व तो अनईझी फिल करू लागला.
त्याचे थरथरणे म्हणजे त्याला खूप भुक लागली की असा त्रास होतो हे माहीत होते.दूपारी जेवणात खिचडी होती व ती आवडत नसल्याने त्याने फारशी खाल्ली नसावी, त्या मनाने चालणे तर जवळ जवळ २८ ते ३० किलोमीटर झाले होते त्यामुळे त्याला हा त्रास तेव्हा होत होता. आमच्या बॅगेत तिघांकडे एकही बीस्कीटचा पुडा नव्हता, त्या रस्त्यावर एकही ठिकाणी किराणा माल किंवा जनरल स्टोअर दिसत नव्हते त्यामुळे आम्ही भराभर चालत मंदीरात आलो.आमच्या बॅगा एका कोपऱ्यात लावून मंदीराच्या दुसऱ्या बाजूला कुठे टपरीवजा बिस्कीटचे दूकान आहे का ?हे शोधण्यासाठी तिघेही आश्रमातून बाहेर पडलो. कर्मधर्मसंयोगाने मंदीराच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर एका कॉर्नरवर एक टपरीवजा दूकान होते व त्याच्याकडे बिस्कीटचे पुडेही होते. पैसे देऊन तीन चार पुडे विकत घेतले. प्रथम त्याला त्यातील बिस्कीटे खाण्यास दिली. थोडी बिस्किटे खाऊन झाल्यावर त्याचे थरथरणे एकदम थांबले मग त्याने आग्रहाने आम्हाला त्यातील काही बिस्किटे खायला लावली.ते खाऊन आम्ही परत मंदीरात आलो तेव्हा अजून बरेच परिक्रमावासी मंदीरात आलेले दिसत होते. आता हॉल परिक्रमावासीयांच्या आसनानी पूर्ण भरला होतो.
आमच्या बाजूलाच एका एमपीमधील परिक्रमावासीयानी आसन लावले होते व तो तेव्हाच तिथे बीडी पीत बसला होता. त्यामुळे त्याला आधी गोडीगुलाबानी व नंतर थोडा आवज चढवून हॉलच्या दूसऱ्या बाजूला आसन लावण्यास सांगितले. म्हणजे आता रात्री परत त्या बिडीचा वास येण्याची शक्यता कमी होती.
सायंकाळचे स्नान तिथल्या टाकीच्या नळावर झाले व आम्ही स्नान करून परत हॉलमधे आलो. माईची पुजेला सुरवात करणार इतक्यात तिथला सेवेकरी हॉलमधे आला व म्हणाला 'चलो , चलो,सब भोजन प्रसादी पाने के लिये बाजू के हॉल मे चलो ' बाकीच्या बऱ्याच परिक्रमावासीयांची पुजा,आरती झालेली होती.आम्ही आल्या आल्या त्या टपरीवर गेल्याने आम्हालाच थोडा उशीर झाला होता.सेवेकऱ्यानी या म्हणून सांगीतल्याने त्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून जाणे क्रमप्राप्त होते. तेवढयात कुणी परिक्रमावासी जेवणाच्या हॉलमधे जाउन आलेला होता तो म्हणाला ' चलो आज भोजन मे टिक्कर है ' हे मी ऐकले व उदयन व बापूला म्हंटले 'नाहीतरी जेवणात टिक्करच आहेत, मगाशी तुझ्याबरोबर माझी थोडी बिस्किटेही खाउन झाली आहेत, म्हणजे पोटात काहीतरी गेले आहे, मी आता नाहीतरी तिथे येऊनही फारसे काही खाऊ शकणार नाही त्यामुळे मी इथे बसून पुजा व आरती करतो , तुम्ही दोघे भोजन प्रसादी करून या '. उदयनला तर जेवण घेण्याची गरज होतीच , बापूचे वय तर भुक लागण्याचे होते त्यामुळे त्यांनाही ते पटले व ते दोघे ताट ,कमंडलू व मग घेउन बाजूच्या हॉलमधे गेले. मी हॉल मधे एकटाच असल्याने निवांतपणे माईची पुजा केली व नर्मदाष्टक व आरती म्हंटली. तोपर्यत सगळे परिक्रमावासी प्रसादी घेऊन परत आले.
पण माईच्या मनात काही वेगळेच होते कारण शेवटी आईचे हृदय हो ते, त्यामुळे तिला माझी काळजी नसणार?
कारण मी प्रसादी घेण्यास येत नाही हे फक्त उदयन व बापूलाच माहीत होते. तिथे मी सोडून सगळ्यांची भोजन प्रसादी झाली होती तरीही सगळ्यांची भोजन प्रसादी झाल्यावरही तिथले सेवेकरी परत दहा मीनटांनी हॉलमधे आले व त्यांनी मोठयानी विचारले 'किस किसने भोजन प्रसादी नही की? नुकतेच आलेले परिक्रमावासी तर दोनच होते व ते त्यानाही माहीत होते मग ते आज इथे परत असे विचारण्यास कसे आले ? मला काही कळेना, उदयन म्हणाला ते इथे परत विचारण्यास आले आहेत त्यामुळे तु आता सांगुन मोकळा हो की मी भोजन प्रसादी घेतली नाहीं.मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सांगीतले ' महाराजजी मैने प्रसादी नहीं पाई है क्यु की टिक्कर, मेरे को जमता नही है, ' त्यावर ते म्हणाले ' इतनीसी बात है ना, सुबह के चावल है वो चलेंगे आपको ?' मला असा काही प्रश्न विचारला जाईल ही कल्पनाच नव्हती कारण संध्याकाळी कुणालाच भोजन प्रसादीत भात नव्हता त्यामुळे आपल्याला तो मिळेल ही कल्पनाही मी केली नव्हती. मला वाटले होते ते म्हणतील ' एक दिन खा लो टिक्कर, आप परिक्रमा मे हो, जो आपको मिलेगा वो माईका प्रसाद समझे खाना चाहिले '
पण इथे तिला काळजी होती ना माझी , टिक्कर नको आहे ना तुला, भात खायचा आहे ना? मग मी भात देते तो खाऊन घे,पण कसेही करून माझे एकही लेकरू उपाशी झोपता कामा नये .त्यामुळेच मी मनातून समजून गेलो की हे माईच आपल्याला विचारत आहे त्यामुळे तीचा प्रसाद आपल्याला मिळत आहे हे समजून मी लगेच त्यांना 'हो 'म्हंटले व माझे ताट घेऊन लगेच त्यांच्याबरोबर जेवणाच्या खोलीत गेलो. त्यावेळी मनातून खूप आनंदही होत होता व त्याचवेळी हे जाणवतही होते की आपण फुकट सगळ्याची काळजी करत बसतो, तीला नाही आपली काळजी ? असे धडे जरी ती परिक्रमेत कायम आपल्याला देत असते. हे असे धडे जरी ती मला कायम देत होती तरी माझ्यात असलेल्या जन्मजन्मीच्या संस्कारांमुळे पुढे परत मी मागचाच धडा गिरवायचो, याला कारणही सतत आपलीच कॅलक्युलेशन लावून सगळे ठरवायची झालेली सवय. तोंडाने फक्त म्हणणे होत असे की तिला आहे आमची काळजी पण वेळ आली की परत मी आपलीच कॅलक्युलेशन चालवत असे.
तिथे त्या रात्री मी एकटयानेच मनसोक्त आमटी भात खाल्ला.
पाहूया अशाच तिच्या अगाध लिला पुढच्या भागात पण तो पर्यंत नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९०-
धर्मेश्वर महादेव मंदीर- एक प्रशस्त मंदीर ,बाहेरचा सगळा आवार स्वच्छ व टापटीप. हॉलच्या पुढच्या बाजूला आहे महादेवचे मंदीर. सगळ्या आवारात छान फरशा घातलेल्या असल्याने,आवार कसे एकदम स्वच्छ , छान ! .संध्याकाळी घाईघाईने मंदीरात जाऊन जरी आम्ही महादेवाचे दर्शन घेतले होते तरी त्यावेळी असलेल्या संधीप्रकाशामुळे गाभाऱ्यात थोडा काळोख होता त्यामुळे त्यावेळी नीटसे दर्शन काही झाले नाही. त्यानंतर सायंस्नान, पुजा व नंतर भोजन यामुळे सकाळी निघण्यापुर्वी परत मंदीरात जाऊन दर्शन घेण्याचे आम्ही ठरवले.
आजही थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता.हॉल जरी बंदिस्त होता तरीही बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडी चांगल्यापैकी जाणवत होती. रात्री झोपताना आजही मी परत उदयनला म्हंटले 'आज तरी पायात घाल ते सॉक्स आता , त्या स्कॉक्सनाही बरे वाटेल इथे लाईटही आहे, तुला शोधायला लागणार नाही. नाहीतर मी देऊ का काढून ? पण यावरही तो परत काही बोलला नाही. त्यावर बापू मला म्हणाला 'सॉक्स त्याच्याकडे नाहीत रे दादा, त्यामुळे तो ते कसा घालेल?, ते त्यांनी बुवांना मंडलेश्वरलाच देऊन टाकले." दोन मिनीटे मला काही कळेचना? मी म्हंटले ' बुवांना '? ' कारण बुवांना तर आता सॉक्स दयायचे काहीच कारण नव्हते, एक तर ते परिक्रमेत नव्हते, दूसरे म्हणजे मंडलेश्वरहुन तर ते सरळ आपल्या घरीच जाणार होते. मुंबईत असताना मी व बुवा जेव्हा एकाच डिपार्टमेंटला होतो तेव्हाही त्यांना कधी मी पायात बुट घातलेले बघीतले नव्हते, कायम चप्पलवर फिरणाऱ्या बुवांना यांनी सॉक्स देऊन नक्की काय साधले, मला काही कळेनाच. बर त्यांची सांपत्तीक स्थितीही अतिशय उत्तम आहे की ते एकावेळी असे शंभर जोडही घेऊ शकतात. आता तर मला या गोष्टीचे तर जास्त नवल वाटत होते कारण इथे स्कॉस्कची अतिशय गरज असताना ते त्यांना देऊन याने नक्की काय साधले होते. पायात जर घालावयाचे नव्हते तर मी देत होतो तेव्हाच चक्क नाही म्हणून सांगावयास काही हरकत नव्हती. बर, त्यातून एखादया परिक्रमावासीयाला दिले असते तरीही ते मान्य झाले असते. त्यामुळे त्या क्षणी मला त्याच्या या गोष्टीचा खूप राग आला होता. आता मी जेव्हा हे सारे लिहीत आहे तेव्हा शांतपणे या गोष्टीचा विचार करीत असताना जाणवले की मी वर लिहीलेले जरी अतिशय खरे व पटणारे दिसत होते तरी मला आलेला खरा राग हा या कारणांपेक्षाही दुसऱ्याच गोष्टींसाठी होता. याचे खरे कारण होते "मी " 'माझातला अहं '. तो आत असलेला ' मी ' ,खर तर कुठेतरी जास्त दुखावला गेला होता. मन सांगत होते 'मी, मी एवढे त्याला माझ्याकडे असलेले नवीन सॉक्स दिले ( स्वतःकडे जुना ठेऊन, देताना मी मारे अगदी मोठेपणाने इथे म्हंटले होते की दूसऱ्याला देताना नेहमी चांगले काय असेल ते दयावे. )पण तेव्हा सत्वगुणाच्या झुळकेमुळे रूजलेल्या चांगुलपणाच्या रोपट्याचे आता तमोगुणाच्या वर्चस्वामुळे एक अहंकाररूपी झाड झाले होते.
खर तर माझ्या गुरू, कलावतीआईंनी एका प्रवचनात दान या गोष्टीबद्दल किवा आपण कुणालाही आपल्याकडील काहीं दिले तर त्याबद्दलचे आपले विचार काय असावेत याबद्दल खूप छान सांगीतले आहे. त्या सांगतात ' दान किंवा अशा प्रकारची कुठलीही गोष्ट, ( वस्तु , पैसा ) जेव्हा आपण दुसऱ्या कुणाला देत असतो तेव्हा ती गोष्ट आपल्या ह्या हातावरून घेणाऱ्याच्या त्या हातावर गेली की आपण केलेले हे कर्मही विसरून जावे,मग ती गोष्ट कितीही मोलाचीअसू देत. दूसरे म्हणजे ते आपले देणेही इतके गुप्त असावे की हया कानाचे त्या कानालाही कळू नये. हे प्रवचनात वाचताना व ऐकताना मला खूप छान वाटले होते, मनाला तेव्हा ते पटलेही होते पण आज मात्र तसे घडूनही आईंनी सांगीतलेला तो बोध मनाला पटवणे खूप जड जात होते.
खरतर त्या सॉक्सची किमंत ती किती? अतिशय शुल्लक गोष्ट होती,बर मी ते सॉक्स देतानाही त्याला मनापासून दिले होते.मग एकदा मी त्याला ते दिले असे म्हंटल्यावर मला ती गोष्ट विसरायला काय हरकत होती. पण इतक्या साध्या गोष्टीत अडकलेल्या ''मी ' रूपी अंहकारने तेव्हा बरोबर आपला फणा बाहेर काढल्याने मला तेव्हा त्याचा अतिशय राग आला होता.आता यापुढे परत याला काहीही दयायचेही ऩाही असेही लगेच मनाने ठरवले होते.
तेव्हापासून आत खदखदणाऱ्या अंहकाररूपी रागाने सकाळी उठल्यांवर त्याला त्या गोष्टीवरून थोडे ऐकवुन एका रागाची मस्त तान घेतली आणी मग कुठेतरी आत जीवाला थोडी थंडक मिळाली.
माई परिक्रमेत कितीतरी वेळा मला माझ्या आत बसलेल्या या षडरिपूची गडबड दाखवुन सांगत होती की आता तु परिक्रमेत आहेस त्यामुळे आता तरी या र्दुगुणांकडे दर्लक्ष कर,नाहीतर मग तिथे काय किंवा इथे काय त्यात फरक तो काय राहिला,शरीर तिथेही नौकरीधंदयासाठी फ़िरते, तसेच ते इथे पारिक्रमेसाठी फिरले. मग परिक्रमेची फलक्षृती काय म्हणाल तर फक्त शरीराचे तीन चार महिने भ्रमण.आपल्या आतल्या चित्तवृती तपासून बदलण्याचा काही प्रयत्न होत नसेल तर मग या परिक्रमेच्या परिक्षेत तु कसा पास होणार, तिचे सगळे सवाल एकदम रोखठोक.
दुसऱ्या दिवशी सकाळी माईची पुजा,आरती करून आम्ही परत मंदीरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले व परिक्रमेच्या पुढल्या मार्गाला लागलो.
साधारणपणे दोन अडीच तासानी एका खेडेगावातून जात असताना एका छोटया घराच्या बाहेर उभ्या असलेल्या आजोबांनी ' नर्मदे हर ' असा पुकारा करत आम्हाला 'आओ बाबाजी, चायप्रसादी लेने के लिये आईये ' असे म्हणत आम्हाला घरात बोलवले. आम्ही त्यांच्या घरात गेलो,घर छोटेसेच पण छान मातीने सारवलेले, स्वच्छ व टापटीप. घरात फक्त ही दोघच आजी आजोबा सत्तर पंच्यातर वयाची, मुलीचे लग्न होउन ती तिच्या सासरी गेलेली.आम्हा परिक्रमावासीयांना बघुन दोघांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदाचे, कौतुकाचे भाव दिसत होते. ' आईये, आईये, बाबाजी ' असे म्हणत त्या आजोबांनी आम्हाला बसावयास सांगीतले. आम्हाला म्हणाले " बाबाजी मैने आपको चायके लिये बुलाया तो है , पर हम ठहरे नीचे जात के लोग,आपको हमारे घर की चाय चलेगी? ' त्यांच्या चेहऱ्यावरील तोआनंद व बोलण्यातला सच्चेपणा बघुन आम्ही त्यांना हसत हसत होकार दिला. कारण संबंध परिक्रमेत त्या लोकांचे माईवरील निस्सीम प्रेम, भक्ती हीच तर जाती पेक्षा त्याची खरी ओळख होती त्यामुळे ते जे काही देतील ते प्रमाने स्वीकारणे हा विचार कायम ठेवला होता.
दोन अडीच तास उन्हात चालल्यावर आम्हालाही त्याच्या त्या मातीने सारवलेल्या घरात एकदम थंडगार वाटत होते, माती बरोबरच त्या माणसात असलेल्या माईच्या प्रेमाच्या ओलाव्याने आम्ही जास्त सुखावलो. घरात दोघच वृध्द व्यक्ति त्याशिवाय दूसरे कोणी नाही असे दिसल्यावर आम्हीच त्यांना म्हंटलेही की फक्त जल दिलेत तरी चालेल. त्यावर ते म्हंटले' 'नही नही, ऐसे कैसा चलेगा, चाय तो अभी बन जायेगी " आजी लगेच उत्साहाने हसत हसत चहा करायला आत गेल्या. आजोबा आमच्याशी परिक्रमा व त्यांच्या परिवाराविषयी भरभरून बोलत होते. दहा मिनीटात आजी चहा घेऊन आल्या. त्यांनी या वयात आमच्यासाठी घेतलेल्या त्रासबद्दल आम्हालाच वाईट वाटले, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक विलक्षण आनंद दिसत होता. आमचा चहा घेऊन झाल्यावर त्या म्हणाल्या ' बाबाजी और थोडी देर रूक जाईये, मै आपके लिये भोजन प्रसादी बनाती हूँ '. त्यांचा प्रेमाचा आग्रह जरी मनापासून होता तरी त्यांना अजून आमच्यासाठी श्रम देणे हे काही आम्हाला योग्य वाटत नव्हते व तसेही दूपारचे जेवण आम्ही कितीतरी वेळा आम्ही घेतच नव्हतो त्यामुळे " नही नानीजी हमे आज नेमावर तक जाना है " असे कारण सांगुन आम्ही त्यांच्या गोड आग्रहातून सुटका करून घेतली. निघताना त्या दोघांचा आनंदाने फुललेला चेहरा माझ्या मोबाईच्या कॅमेरता बंद केला.त्यांच्याकडून आम्ही पुढे निघालो. मधे मोबाईलच्या बिघाडामुळे आम्ही काढलेले हे काही फोटो डिलीट झाले त्यामुळे आज ते मला आपल्यासमोर ठेवता येत नाहीत पण मनाच्या कॅमेरात दडलेला त्यांचा तो हसरा आनंदी चेहरा आजही त्या घरात सहज घेऊन जातो.
पुढे आपल्याला एक असे गाव लागले की ज्याचे नाव आहे रेतीया,जिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घरे अशी आहेत की सगळी साधारण एकाच प्रकाराची व सगळ्यांना साधारण एकच प्रकाराचा रंग, हे उदयने इथे डोंबीवलीमधे असताना मला एकदा परिक्रमेचा विषय निघाला होता तेव्हा सांगीतले होते त्यामुळे तिथे पोहचल्यावर त्या गोष्टीची सत्यता पटली. खरच काही छोटी काही मोठी अशी बरीचशी घरे एकाच रंगाने (गुलाबी ) रंगाने रंगवलेली त्या गावात दिसत होती. तो घरांच्या रंगाचा एकसारखेपणा बघायलाही फार छान वाटत होता. इथल्या सर्व लोकांनाही माईबद्दल व परिक्रमावासीयांबद्दल खुप प्रेम, जिव्हाळा आहे हेही उदयन तेव्हा सांगीतलेले होते व त्याचा प्रत्यय थोडया वेळातच आला. एका मोठया वाडयासारख्या घरातून आम्हाला 'नर्मदे हर , बाबाजी इधर आ जाईये ' असा आवाज देत ते आम्हाला त्यांच्या घरी बोलवत होते. आम्ही एकमेकांकडे पाहीले कारण थोडया वेळापूर्वीच आम्ही त्या आजी आजोबांच्या घरातून निघालो होतो पण उदयनने खुणेनेच आम्हाला 'चला आत' असे सांगीतले कारण नंतर त्याने सांगीतले की इथले गावकरी आपल्याला तसेच पुढे जाउन देतं नाहीत त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी आपल्याला त्या गावातल्या एका घरी तरी जावे लागते. वेळ साडेदहाची होती आम्ही एका मोठया दरवाजातून आत गेलो. एक भले मोठे घर, आत शिरल्या शिरल्या दोन्ही बाजूला छोट्या छोट्या बांधलेल्या दोन खोल्या त्यांनर मधे एका चौकानाकार खूप मोठी मोकळी जागा व त्यापुढे त्यांचे खूप मोठे राहते घर. बाहेरून कुणाला कळणारही नाही की आतं किती मोठी जागा असेल?
आम्ही आत गेलो तसे त्यांनी आत शिरल्या शिरल्या असलेल्या एका बाहेरच्या खोलीत बसण्यास सांगीतले. पण लगेच निघायचे असल्याने आम्ही खोलीबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत आमच्याकडील प्लास्टीक काढणार इतक्यात त्यांनी एक सतरंजी देउन त्यात वर बसण्यास सांगीतले. नेहमीप्रमाणे त्यानी आम्हाला आम्ही कुठून आलो आहोत, किती दिवस झाले, आज सकाळी कुठून आलात, असे सगळे प्रश्न विचारले तोपर्यंत त्याच्या घरातून चहा आला. खर तर थोडया वेळापूर्वी चहा झाला होता पण नाही म्हणून ते काही ऐकणारे नव्हते. चहा पिऊन झाला व त्यानी आतल्या खालीतून दोन ब्लँकेट, दोन कॉटनचे लुंगीसारखे म्हणून नेसता यईल असे कापड असे घेऊन बाहेर आले व म्हणाले ' आपको इसमें से कुछ ना कुछ तो लेनाही पडेगा , हम माईका प्रसाद करके सब परिक्रमावासीयों को देते है ' आम्ही त्यांना आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत असे सागंण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकावयास तयार होईनात. मग शेवटी तिघांनीही ते कॉटनची लुंगी म्हणून वापरता यईल असे कापड घेतले कारण ते घडी करून सॅगमधे तरी राहण्यासारखे होते, ते जाड रग घेऊन पुढे चालणे व सांभाळणे म्हणजे कर्मकठीण काम होते. कारण परिक्रेमेत जसे जसे आपण पुढे जात असतो तसे तसे ते बॅगचे वजनही आपल्याला जास्त वाटत जाते.निघताना त्यांनी सांगीतले की आगे आश्रम है ऊधर आपकी भोजन प्रसादी की व्यवस्था हो जायेगी.पहले हम गाव मे बारी बारी से हर एक के घर मे व्यवस्था करते थे पर अब सब गाँव वालों ने मिलके ऊधर भोजन प्रसादीकी व्यवस्था की है आमचा आज ग्यारसचा उपवास होता त्यामुळे उपवासाचे काही मिळाले तरच काही खाता येणार होते.अर्ध्या तासात आम्ही त्या आश्रमात पोहचलो,आमच्या आधी तिथे कितीतरी परिक्रमावासी आलेले होते व तिथे तयार भोजन प्रसादी नसल्याने आपण सदाव्रत घेऊन बनवणे भाग होते.तयार चुलीही दोन का तीन होत्या व त्यावर त्या परिक्रमावासीयांचा स्वयंपाक चालू होता. त्यामुळे मी उदयन म्हंटले 'दोनदा आपला चहा झाला आहे त्यामुळे आता तर भूक नाहीच आहे ,तर इथे काही करत बसण्यापेक्षा आपण पुढे कुठल्या गावात मुक्कामासाठी लवकर पोहचूयात '. त्यालाही ते पटले कारण भांडी व चूली मिळून काही उपवासाचे बनवण्यात खूप वेळ जाणार होता, तेव्हाढ्यात बापूने तिथल्या मुख्य सेवेकऱ्याकडून थोडे दाणे व गुळ आणला. ते तोंडात टाकून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. दूपारपासून वातावरण एकदम बदलत गेले व संध्याकाळपर्यंत ,पावसाळी ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडीचा जोर अजुनच वाढला. आज त्यामुळे आमचे नेमावर पर्यंत पोहचणे मात्र कठीण वाटत होते.संध्याकाळी पाच वाजताच ढगाळ वातावरणाने खूप कोळोखी केल्यासारखे झाले. तेव्हा माईने एक वेगळीच गोष्ट तिथे घडवून आणली, काय होती गोष्ट पाहुया पुढच्या भागात, तोपर्यंत नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा अनुभव ९१
त्या दिवशी पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे आमची संध्याकाळपर्यंत नेमावर पर्यंत पोहचण्याची शक्यता आता धुसर होत चालली होती.कारण साडेचार पाच पासूनच इतका काळोख व कुंद वातावरण झाले होते की काही ठिकाणी ढग खूप खाली आल्याने पहाटेचे धुके पसरलेल्या सारखे दिसत होते .आम्ही एका छोटया रस्त्यावरून जात होतो व समोरुन सायकलवर एक माणूस चादरी,रग,कानटोप्या असे सर्व थंडीत ऊब देणारे सामान त्यावर लादून येत असताना दिसत होता. थंडीचे हे सगळे सामान सायकल किंवा दुचाकीवर लादून विकावयास निघालेले कितीतरी फेरीवाले या आधीही आम्ही चालत असताना अधुन मधुन बघीतले होते. तो लांब होता तेव्हाही तो या सगळ्या वस्तुंची नावे घेत ओरडत येत होता.आम्हाला त्याच्याकडून तेव्हा कुठलीही गोष्ट घ्यायची नव्हती ,आम्ही आपले याच विचारत होतो की पाउस सुरू होण्याआधी लवकरात लवकर आपण जवळच्या कुठल्याही गावात मुक्कामाला पोहचावे त्यामुळे भराभर पाऊले उचलत आम्ही आमचा मार्ग आक्रमण करीत चाललो होतो. इतक्यात तो माणूस आमच्यांपाशी थांबला व म्हणाला ' बाबाजी कुछ खरीदना है, थंड बहोत है, आज बारीश भी हो सकती है, बारीश के बाद थंड तो और भी बढेगी. ' पण आम्हाला काही घ्यायचे नसल्याने आम्ही त्याला 'नही भाई हमे कुछ नही लेना है, ' असे म्हणालो. कारण नवीन सामान विकत घेऊन अजून वाढीव ओझे घेऊन चालणे आता नको वाटत होते. मग त्याला काय वाटले कुणासं ठाऊक म्हणाला ' ठीक है बाबाजी, आप आपको जो कुछ चाहिये वो इस सामानमेसे ले लिजीये ,और आप मुझे उसका पैसा नही देना ,बो तो मै मेरी तरफ से माई की सेवा मे करके आपको दे रहा हूँ,आप परिक्रमा मे है ना 'तरीही त्याला आम्ही आम्हाला काही नको म्हणूनच सांगीतले . एक कारण तर वजन जे मी वरच सांगीतले व दूसरे कारण म्हणजे तो जरी ढीग म्हणात असला तरी त्याचे हातावरचे पोट या वस्तुंच्या विक्रिकर होते व ते आम्ही त्याच्याकडून फुकट घेणे आम्हाला योग्य वाटत नव्हते. तरीही तो काही केल्या आमचे ऐकावयास कुबल हाईनां, तो आम्हाला म्हणाला, ' बाबाजी, आज आपको मेरे पाससे कुछ तो लेनाही पडेगा, मै आपको ऐसेही जाने नही दूँगा ' तरीही आम्ही नाही म्हणत पुढे जाण्यास निघालो तसे तो परत परत आम्हाला काहीतरी घेण्याचा आग्रह करू लागला, या सगळ्यातच पाच सात मिनीटे गेली. शेवटी आम्ही नाईलाजास्तव त्याला म्हंटले " ठीक है भाईसाहब इसमेसे आपको जो चीज हमे देने के लिये उचीत लगती हैे,वो आप हमे आपके हाथ से दे दिजीये. ' त्याने त्यांच्या त्यां सगळ्या सामानातून आमच्या तिघांसाठी तीन सॉक्सचे जोड काढले व आमच्या प्रत्येकाच्या हातात एक एक जोड ठेवत म्हणाला 'अभी आगे आगे थंड और बढेगी ,आप हर रोज ये सॉक्स आपके पैरमे पहनते जाईये,यही मेरी आपके लिये मेरी तरफ से छोटीसी भेट'
मी दोन मिनीटे स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघतच राहीलो ,कालपासून मी ज्यां गोष्टीसाठी माझाच माझाशी भांडलो, उदयनला बोललो तीच गोष्ट माई त्याच्याकडून आम्हाला देत होती. मी हसुन उदयनकडे बघीतले व म्हंटले ' बघ तु जरी मी दिलेले सॉक्स कुणाला देउन टाकलेस तरी मी ते मनापासून दिले असल्याने माईने तुला परत सॉक्सच दिले ' आम्ही दोघेही मनापासून हसलो. मला तर विशेष आनंद झाला व या गोष्टीची खूप गंमत वाटली कारण मी नुसते तोंडाने म्हणतो की तिचे सगळयांकडे लक्ष असते पण तेवढा विश्वास मात्र तिच्यावर नसतो ,पण तिचे मात्र आपल्या सगळ्या लेकरांकडे पुर्ण लक्ष असते हे दाखवुन देऊन सॉक्सच्या रूपाने ती जणू काही याची प्रचीती देत होती .मग चालताना मात्र जाणवले की ही अशी गोष्ट घडवून ती मला एक नवीन धडा शिकवीत होती , त्यात तीच्या या हट्टी मुलासाठी असलेले प्रेम तर होतेच कारण असे माझे बरेच हट्ट तीने परिक्रमेत पुरवले पण त्याचबरोबर एक नवीन विचारही ती देते होती कारण या सॉक्ससाठी खर तर किती जीव आटवला होता मी त्यामुळे हे सॉक्स मला परत देऊन ती सांगत होती की तु तुझे म्हणून त्याला दिले होतेस ना, सॉक्स?मग त्याने त्याचे काय करावे हे तु का ठरवतोस, हे माझे,मीपणाने गुंतणे जेव्हा संपेल तेव्हा तुला माझी खरी परिक्रमा झाल्याचा आनंद मिळेल. घे ,तु दिले होते म्हणतोस ना सॉक्स,मग घे तुला तुझे नवीन सॉक्स.आता परिक्रमेत तरी हे सगळे सोडायला शीक, नाहीतर तिथे जसे वागणे होते तसेच इथेही वागणे होईल.मग परिक्रमा करायची ती कशासाठी नुसते देहानी फिरण्यासाठी,अंर्तःमन बदलणे किंवा त्याला हळु हळु मोल्ड करणे हे खरे परिक्रमेचे इप्सित आहे. परिक्रमेच्या पाठयपुस्तकातील एक नवीन धड्याचे पान ती माझ्यासाठी उघडत होती ,या सर्व गोष्टीतून ती एक झणझणीत अंजन घालून मला विचारांना एक नवीन दृष्टी देत होती , काही गोष्टींचा नव्याने विचार करावयास सांगत होती. म्हणून मला असे वाटते की
सगळा व्हवहार इथला रोकडा॥ नसे इथे उधारीचा माल ॥
अंजन घालूनी डोळ्याती॥ पुरवीते लेकराचे काज ॥
उदयनलाही तीने यातुन काहीतरी नक्कीच नवीन विचार दिला असेल.
तिने उलगडून दाखवलेला हा धड़ा मी किती आत्मसात करतो ही आता माझी खरी कसोटी आहे.
आम्ही भराभर चालत एका छोटया गावापाशी आलो. संध्याकाळी पाच साडेपाच झाले होते तरी खूप अंधारून आल्यासारखे झाले होते. सगळीकडे धुक्या सारखे ढग खाली पसरलेले दिसत होते. तेव्हा थोड्या अंतरावर आम्हाला दोन तरुण युवक रस्त्याच्या बाजूला आपपसात बोलत ऊभे असलेले दिसले.असतील ते कुणी याच गावातले असा विचार करून आम्ही रस्त्यानी चालत होतो.आता लवकारत लवकर कुठेतरी मुक्कामाला थांबणे अत्यंत गरजेचे होते. आम्ही जसे त्यांच्या जवळ पोहचलो तसे त्यातील एक जण आमच्यापाशी आला व म्हणाला ' नर्मदे हर बाबाजी, आज हमारे कुटिया मे आप रूकेंगे,यही रास्ते पर थोडे आगे नर्मदा मैयाका अन्नक्षेत्र और कुटी है , आज आप वही विश्राम करो '
आम्हाला तसेही आता कुठेतरी मुक्कामास थांबवायचे होते त्यामुळे आम्ही त्याच्या बोलण्याला होकार दिला.
आम्ही त्याच रस्त्याने पुढे चालत राहीलो व ते तेवढयात गाडीवरून येऊन त्या कुटीपाशी जाउन पोहचले.
कुटी छोटीशी होती विटांचे बांधकाम केलेले ,अजून बाहेरून पूर्ण प्लास्टरही झाले नव्हते. कुटीच्या दुसऱ्या बाजूला सगळीकडे हिवरे गार शेत, ज्यात हरणांचे कळप धावत असताना दिसत होते.
त्यांनी पुढे येऊन आम्हाला कुटी उघडून दिली.परिक्रमावासीचा तिथे मुक्काम असल्याने कुटी आतून स्वच्छ व साफ होती .आम्ही आमच्या सॅग आत ठेवल्या,आता आज तरी अजून कुणी तिथे येण्याची शक्यता नव्हती .कारण पावसाळी वातावरणाने चांगलाच काळोख झाला होता.
कुटीच्या शेताच्या बाजूला असलेल्या भागात एक पाण्याचा ड्रम भरून ठेवलेला होता व तिथेच असलेला एक पाईप ज्याला इलेट्रीकची मोटर सुरू केली की पाणी येत असे असे सर्व त्यांनी आम्हाला सांगीतले व भोजन प्रसादीची सोय करण्यासाठी ते त्यांच्या घरी जाण्यास निघाले . परिक्रमावासीयांची सगळी भोजन व्यवस्था त्याच्या घरी त्यांच्या सौभाग्यवती करतात म्हणजे पूर्ण कुंटब माईच्या सेवेत असते. हे असे माईवरचे यांचे प्रेम बघीतले की वाटते कुठल्या शाळेत शिकले असतील हो हे सगळे लोक प्रेमाचे धडे. अजुनही मधुन मधुन मला त्यांचा फोन येतो, मेसेज येतो आता परिक्रमेसाठी नाही तर असेच नर्मदा माईचे दर्शन घ्यायला आमच्याकडे नक्की या असे आग्रहाने सांगतात.
त्या दिवशी खर तर होती एकादशी, म्हणजे रात्रीचाही उपास पण आम्ही त्याना आमचा आज उपास आहे असे सांगीतले नाही,आज ते जे काही येऊन येतील ते माईचा प्रसाद आहे असे समजून आपण तो ग्रहण करायचे असे तिघांनी मनोमन ठरवले. पाहुया नवड़याचा मुक्काम पुढच्या भागात नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९२-
कालच्या पेक्षा आज थंडीचा कडाका आत्ताच चांगल्यापैकी जाणवत होता. पावसाळी वातावरणामुळे बाहेर काळोखही खूप झाला होता.आता त्या बाहेर ठेवलेल्या ड्रममधील पाण्याने सायं स्नान करणे म्हणजे एक परिक्षाच होती कारण इथे आल्या आल्या हातपाय धुवत असताना त्या पाण्याचा झालेला थंडगार स्पर्श मगाशी अनुभवला होता त्यामुळे आता पूर्ण स्नान करण्यास मन जरा कचरत होते. उदयन व बापूचे स्नान झाले होते आता माझे स्नान झाले की मग माईची सायंपुजा आरती करता येणार होते त्यामुळे मनाचा हिय्या केला व कुटीच्या मागे स्नानासाठी म्हणून असलेल्या जागेत गेलो. डाव्यां बाजूला असलेल्या ड्रम मधील पाण्याने कमंडलू भरून घेतला व सरळ डोक्यावर 'नर्मदे हर ' म्हणत उलटा केला. एक क्षणभर पाण्याचा तो थंडगार स्पर्श व उजव्या बाजूला पसरलेलल्या हिरव्यागार शेतातून येणारा थंडगार वारा या सगळ्या गोष्टींमुळे शरिर चांगलेच गारठून गेले .मग मात्र न थांबता पुढचे चार पाच कमंडलू तसेच डोक्यापासून घेतले व तेव्हा मात्र त्या थंडीची काय वेगळीच मजा आहे हे जाणवले व त्याचबरोबर आपले हे शरीर किती लवकर या सगळ्या गोष्टींशी सहज जळवून घेते हे ही लक्षात आले. नाही म्हणायला आधी ते बघते व आपले चोचले पुरवुन घ्यायला प्रयत्न करते पण आता आपली काही डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर मात्र आहे त्या परिस्थितीशी ते जुळवून घेते. घरी बंद बाथरूममधे गिझरच्या गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्याला, ही माईची परिक्रमा मोकळ्यावर, ह्या शेतात थंडीतील थंडगार पाण्याची मजा काय आहे ते दाखवत होते. इतक्यात बारीक पाउसाचे तुषार पडण्यास सुरवात झाली व नैसर्गीक शॉवरचे थंडीतले काय सुख आहे हे मी आज या मोकळ्या शेतात अनुभवत होतो. कारण इथे सगळेच नॅचरल होते, नाही भिंतीचा आडोसा, खाली बसण्यास वाकडा तिकडा दगड, व आजूबाजूला पाण्यामुळे झालेला चिखल , वाहणारा थंडगार वारा पण या सर्वातूनही मनाला या निर्सगाच्या सानिध्यात मिळणारा एक वेगळा आनंद कधीही न अनुभवलेला. फार वेळ काही तो आनंद घेता आला नाही कारण आता काळोख खूप झाला होता , माझ्यासाठी ते दोघे माईच्या पुजेसाठी थांबले होते त्यामुळे कोरडया दगडावर ठेवलेला पंचा अंगावर आढून मी आमच्या कुटीत परत आलो.
आज कुटीत आम्ही तिघेच होतो. ते दोघे भाऊ आताच भोजन प्रसादी आणण्यास गेले असल्याने त्यांनाही यायला तसा बराच वेळ होता त्यामुळे आज अगदी निवांतपणे कुठे गडबड, गोंधळ, घाई न करता आम्हाला आमची सगळी उपासना करता येणार होती.आजूबाजूला दहा मिनीटाच्या अंतरावर तरी वस्ती नव्हती त्यामुळे त्या शांत वातावरणात माईची पुजा आरती, नर्मदाष्टक, रोजचा हनुमान चालीसा, रामरक्षा, मारूती स्तोत्र यथासांग पार पडले.
साडेसातपर्यंत ते दोघेही भाऊ श्री शैलू , श्री योगेश शर्मा व अजून एक मध्यम वयाचा मुलगा असे जेवणाचा एक मोठा डबा घेउन आले. थोडा वेळ परिक्रमेविषयी तर थोडे त्यांच्या , आमच्या व्यवसायाविषयी असे बोलणे झाले. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून कळले की ते दोघेही भाऊ आम्ही जिथे त्यांना आज भेटलो तिथे रोज उभे राहतात व परिक्रमावासीयांना बोलवून आपल्या या कुटीत त्यांची सेवा करण्यासाठी घेऊन येतात.
आम्ही जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कायम माईबद्दलची आदरयुक्त भावना जाणवली.आज जे काही आमच्याजवळ आहे ते केवळ माईच्या कृपाप्रसादामुळे आहे हाच भाव त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होता. परिक्रमावासी सेवा म्हणजे माईची सेवा त्यामुळे आमच्याशीही बोलत असताना त्यांचे त्याच आबदीने किवा प्रेमयुक्त आदर भावनेने सगळे व्यवहार चालू होते.
थोडया वेळात आमच्या भोजन प्रसादीची त्यांनी तयारी केली.आम्ही फक्त आमच्या थाळ्या घेउन बसलो व पुर्ण जेवण वाढण्याचे काम त्यांनी केले. सुरवातीलाच योगेश म्हणाला ' इस डब्बे में जो कुछ लाये है बो पुरा आपकोही खाना है , हम खाली डब्बे यहाँसे लेके जानेवाले है.'
भाजी,आमटी, भात व मऊशार गरम फुलके,लोणचे असे परिपूर्ण चविष्ट जेवण त्यांनी आग्रह करून प्रेमाने आम्हास वाढले.भोजन प्रसादी झाल्यावर शैलुभाईने एक छोटीशी शेकोटी बाहेर अंगणात पेटवली व तिथे परत आमच्या थोडया वेळ गप्पा झाल्या तेव्हा मगाशी बघीतलेल्या हरणाच्या कळपाचा त्यांच्यापाशी सहज विषय निघाला तेव्हा ते म्हणाले ''बहोत परेशान करते है वो, कभी कबार तो सारा खेत खराब कर देते है' तेव्हा लक्षात आले की आपल्याला ज्या गोष्टीचे अप्रुप वाटत आहे ती गोष्ट ( सांबर, हरीण) यांचे इथे येणे झाल्याने यांचे किती नुकसान होत आहे.
त्या छोटयाश्या शेकोटीमुळे सहजच तेव्हा कुलु मनालीच्या ट्रेकच्या वेळचे कॅम्प फायर डोळ्यासमोर आले.
थोडया वेळाने ते गाडीवरून घरी जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी आठवणीने विचारले ' महाराजजी, कल सुबह आप इधर से कितने बजे आगे जाने वाले है ' आम्ही नेहमीप्रमाणे साडेसहा पर्यंत निघू असे सांगीतल्यावर त्यातील एक म्हणाला ' मै नही तो भाई, काईभी आपके लिये सुबह का चाय और बाल भोग लेके यहाँ आ जायेंगे ,आपको बाल भोग की प्रसादी लेकरही यहाँ से आगे जाना है. ' दोघांनी आपले फोन नंबर मला दिले म्हणाले 'रात को कुछ भी दिक्कत आ जायेगी तो हमे जरूर फोन करना .' असे सांगुन ते मोटरबाईकवरून घरी निघुन गेले.
आता त्या रात्री त्या पुर्ण टापूत आम्ही तिघेच जण होतो . झोपण्याआधी बाहरून काही विटांचे छोटे तुकडे घेतले व कुटीच्या आत काही ठिकाणी बांधकामाच्या वेळी बेताच्या आकाराच्या विटा काढल्याने भोक पडलेली दिसत होती तिथे ते तुकडे दाबुन ठेवले. कारण शेतातून काही सरपटणारे आत आले तर ही भीती? म्हणजे जीची परिक्रमा करत आहोत तिच्यावर किती परिपुर्ण विश्वास होता बघा माझा?हे आज आठवले की वाटते, जीने आमच्या रात्रीच्या आसऱ्याची काळजी घेतली, ती ही काळजी नाही घेऊ शकत?,पण नाही तेव्हा मनात शंका कुशंकाच जास्त, याच माईने मारुतीच्या मंदीरात उघडयावर आजूबाजूला झाडे असतानाही आपली योग्य ती काळजी घेतली हे सगळे तेव्हा हे मन विसरून जाते कारण मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली असते, तिच्या कर्तुत्वाचा विसर पडलेला असतो व तिथे माझ्यातील मी चे कर्तुत्व सुरू झालेले असते. त्यामुळे ,इथेही या कुटीत ती आपली काळजी घेणार नाही का ?असा विचारच मनात येत नाही व हे कुशंकांनी भरलेले मन आपलेच घोडे पुढे दामटवते.
रात्री झोपण्याआधी पाखरे माउलींचा फोन आला की आपण कुठे विश्राम केला आहे?त्यांचा आजचा विश्राम आम्ही थांबलो होतो त्याच्या मागच्या गावात झाला होता. ' त्यामुळे आपण सकाळी नेमावरला किंवा मधे कुठे रस्त्यात नक्की भेटू, असे त्यांनी सांगीतले पुढे म्हणाले ' तिथे आम्ही उद्या कन्याभोजन घालणार आहोत तेव्हा तुम्हीही उद्या नेमावरलाच थांबा.
ती भोके वीटांच्या तुकडयानी बुजवून झाल्यावर शंकेने भरलेले मन निर्धास्त झाले व ते स्लिपींग बॅगमधे निद्रस्थ झाले.
पहाटे लवकर उठून आमचे नित्यनेमाचे सगळे आवरून आम्ही सोडसहाला पुढे जाण्यास तयार झालो. त्या दोन भावांनी तर आम्ही कुणीतरी साडेसहापर्यंत बालभोग व चहा घेऊन नक्की इथे येतो असे सांगितले होते त्यामुळे आम्हाला तिथुन निघताही येत नव्हते. अजून दहा पंधरा मीनीटे त्यांची वाट बघून दाराला कडी घालून आपण पुढे निघावे असे ठरले. पंधरा मीनीटांनीही कुणी न आल्याने उदयन म्हणाला त्याप्रमाणे त्यांना एकदा फोन लावला , पण तोही न उचलल्यावर मात्र दाराला बाहेरून कडी घालून आम्ही पुढे जाण्यास निघालो. आम्ही थोडा रस्ता चाललो इतक्यात त्यातील शैलु भैय्याचा फोन आला ' मै इधर कुटी मे आ गया हूँ, आप कहाँ हो?, मैने आपको बताया था महाराज जी , आप बालभोग खाने से पहले यहाँसे कैसे आगे निकल गये, हमारे इधर बहुत भारी कोहरा होने के कारण मै घर से निकल नही पाया और मोबाईल भी सायलेंट पे था, इस कारण आप का फोन कब आया पताही नही चला , पर अब आप कृपा करके वापीस आ जाईये, हमारी गलती हो गयी हमे क्षमा कर दो,पर आप ऐसेही आगे जायेंगे तो हमे बहोत दुखः होगा.' दोन मिनीटें काय सांगावे हे सुचेना,कारण खर तर नियमानुसार परत फिरणे योग्य नव्हते. पण तो फोनवर पुन्हा पुन्हा आर्जव करून परत कुटीत येण्यास सांगत होता . शेवटी आम्ही तिघांनी परत मागे जाण्याचा निर्णय घेतला कदाचीत तो चुकीचा असेलही पण त्यावेळी नियमापेक्षा, खाण्यापेक्षाही त्याच्या प्रेमाचा, शब्दाचा मान राखणे जास्त महत्वाचे वाटले कारण आम्ही नाही म्हणून नियामानुसार पुढे गेलोही असतो पण त्याच्या मनाला मात्र ते कायमचे दुःख देउन गेलो असतो . आज आपल्याला थोडा ऊशीर झाल्याने आपण परत परत सांगुनही परिक्रमावासी बालभोग न येता रिकाम्या पोटी पुढे निघून गेले.
या मागे दुसरे कारण असेही होते की मागे मी एका भागात एका आजींचा सांगीतलेला एक प्रसंग की ज्यात कुणी परिक्रमावासी त्यांच्याकडे चहासाठी थांबला नाही तर त्यांना त्याचे किती वाईट वाटत असे किंवा त्या शेतातील आजी , की त्यांनी बोलावूनही परिक्रमावासी त्यांच्या इथे आला नाही किंवा थांबला नाही तर त्यांना त्याचे वाटणारे दुःख हे आम्ही त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून, चेहऱ्यावरून अनुभवले होते त्यामुळे त्यांना होणारा तो त्रास, ते दुःख हे त्या नियमांपेक्षा आम्हाला जास्त महत्वाचे वाटले.आज आम्हीही जर नियमानुसार वागलो असतो तर त्यां अनुभवातुन आम्ही नक्की काय घेतले किंवा काय शिकलो हा प्रश्न नक्कीच मनाला पडला असता. त्यामुळे आम्ही परत मागे कुटीत आलो.तो तर आमची अगदी मनापासून वाट पहात होता, कारण जेव्हा त्यानी आम्हाला तिथे परत आलेले बघीतले तेव्हा आम्हाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता तो आम्हाला त्या क्षणी अधिक मोलाचा वाटला.
त्यांनी गेल्या गेल्या आम्हाला सांगीतले की तुम्ही तुमच्या सॅग मधून आता काहीच काढू नका मी सगळे काही बरोबर आणले आहे असे म्हणत त्यानी पिशवीतून नाश्त्यासाठी असलेला डबा , मोठे द्रोण, चमचे , चहाचा र्थमास, ग्लास असे सगळे बाहेर काढले. अन्न गरम राहणाऱ्या डब्यातून त्यानी गरमागरम मऊसर वाफाळलेली खिचडी आम्हाला त्या मोठया द्रोणात वाढून दिली. ग्लास मधे एकीकडे चहा ओतला व म्हणाला 'महाराजजी आपको बहोत, बहोत धन्यवाद ', नमस्कार करत म्हणाला 'मुझे इधर आने मे देरी हो गई फिर भी आज मेरे कहने पर आप यहाँ वापीस आ गये , इसलिये आपका बहोत बहोत आभारी हूँ ,आप ऐसेही आगे जाते तो मुझे बहोत दुःख होता ' त्याच्या बोलण्यातील ते प्रेम , तो आनंद बघून माईच्या प्रेमाची परत एकदा आठवण झाली व आम्ही घेतलेला आजचा निर्णय खरच सार्थकी लागल्यासारखा वाटले. त्या खिचडी बद्दल तर काय सांगु, कुणाला वाटेल की किती पदार्थाचे हे कौतुक पण खर सागु कितीतरी दिवस त्या खिचडीची चव तो स्वाद माझ्या जिभेवर रेंगाळत होता.या सगळ्याचे कारण एकच होते की त्यात होते फक्त आणी फक्त माईबद्दलचे प्रेम,जिव्हाळा, नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९३-
सकाळचा अवीट गोडीच्या खिचडीची चव जिभेवर ठेवत आम्ही शैलु भैयाचा नेवाड्याहून निरोप घेतला. निरोप घेतानाही त्यानी आम्हाला आर्वजून सांगीतले " आप दाक्षिण तट के हंडिया स्थान पे आ जायेंगे, जो हमारे सामने है तो आप मुझे जरूर फोन करना, मै वहाँ आपको मिलने आ जाउंगा" आम्ही त्याला ' हो ' म्हणून सांगीतले व तिथुन पुढे निघालो.
आम्ही थोडे मागे येऊन त्याच्या शब्दाचा मान राखला व त्याला मैय्याच्या परिक्रमावासीयांची सेवा करण्याचा मौका आज परत सकाळी दिला याचा आनंद अजुनही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता व हिच प्रेमरूपी ठेव घेऊन आम्ही परिक्रमेच्या पुढच्या मार्गाला लागलो.
आम्ही विचार केला की जर तिन्ही माउली सकाळी लवकर निघाल्या असतील तर आपल्याला या मार्गात आता नक्की भेटतील कारण परत मागे येऊन व बाल भोग खाऊन निघण्यात जवळ जवळ आमचा अर्धा पाउण तास गेला होता. काल रात्री माऊलींचा फोन येऊन गेला असल्याने आज आम्ही त्यांना फोन लावला व विचारले 'माऊली आपण कुठपर्यंत पोहयलात '? पण ते अजूनही नेवाड्यापर्यंत पोहचले नसल्याने आम्ही आमच्या गतीने पुढे मार्गस्थ झालो. साधारणपणे साडेनऊपर्यंत नेमावर पर्यंत पोहचून तिथे थोडा वेळ प.पु. गाडगीळ महाराजांच्या आश्रमात थाबुन, मग सिधेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे तूरनालला परशुमरामतीर्थ ह्या ठिकाणी श्रीपरशुरामजींचे दर्शन घेऊन आज छाीपानेरला माताजीकडे मुक्कामास पोहचावयाचे असा आम्ही बेत ठरवला होता. त्याप्रमाणे साडेनऊ दहापर्यंत आम्ही नेमावरला ब्रम्हचारी आश्रमात पोहचलो. हा आश्रमही माईच्या किनाऱ्यावर आहे.
प. पु. विश्वनाथ महाराज गोसावी यांनी या मठाची स्थापना केली आहे. पुढे त्यानी त्या आश्रमाची धुरा प.पु गाडगीळ महाराजांकडे सोपवली.
प.पु.गाडगीळ महाराज - एक महान संत,तपस्वी, ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य रामनामाच्या संगतीत सार्थकी लावले. त्यांना फक्त राम व रामनामाचा कायम ध्यास असे. त्यांनी प. पु. गोंदवलेकर महाराजांप्रमाणे अनेकांना रामनामाला लावले. छीपानेरच्या माताजींशी जेव्हा या संतांबद्दल बोलणे झाले तेव्हा त्या म्हणाल्या ' क्या बताऊ मै उनके बारे मे सुनिलजी,उनका महिमा कहते कहते मेरे शब्द अधुरे रह जायेंगे,पर उनका महिमा खत्म नही होगा.अभी के युग मे उनके जैसा संत हुआ है न होगा, वो तो महान विभुती है. शरीर रुप मे अभी नही रहे पर उनका दर्शन, सुक्ष्म रूप मे ऊनका सहवास ,अभी भी उनके भक्तो को होता है. मै उनके संस्तंग मे २२ साल तक थी.उनके साथ मुझे बहोत सारी यात्रा मे जाने का अवसर मिला. मै बहोत बार उनके साथ गोंदवले गयी हूँ .चारधाम यात्रा,बहोत सारे शिवलिंग का दर्शन करने का सौभाग्य मुझे उनके साथ मिला.मै जभी नेमावरमे मेरी कडी तपस्यां कर रही थी तभी उनका मुझे बहोत मार्गदर्शन मिला. "
पुढे माताजी म्हणाल्या "प्रत्यक्ष हनुमतंजीने उन्हे दर्शन दिया है और श्रीरामजीने उन्हे बहोत बार संभाला है. युवा अवस्था मे वो जभी परदेस जाने की सोच रहे थे तभी प्रत्यक्ष हनुमंतजीने उन्हे दर्शन दिया और बताया की यह तुम्हारा मार्ग नही, रामनाम के प्रेम मे मस्त रहके, रामनामका आनंद खूद लुटना और दूसरों को देना यह आपका परम कर्तव्य है. फिर उन्हाने परदेस जाने का विचार छोड दिया और भिक्षा मांगके ,जमीन पे सोके अपनी कडी तपस्या पूरी की. उस समय के बहोत सारे लोगो का ऐसा कहना है की उनके दर्शन से साक्षात समर्थ रामदास स्वामीजी का अनुभव होता था.नेमावर आने के बाद भी वो हमेशा रामनाम लेकर रामजी के ध्यान मे लगे रहते थे.एक बार किसी पीठ के शंकराचार्यजी नेमावर के आश्रम मे आये थे तब वो महाराजजी को बोले 'आप इतने साल इस आश्रम मे है ,फिर भी आपने आश्रम को बढाने की, या भक्तगणो की संख्या बढाने की कुछ कोशीश नही की ' पर इसके ऊपरभी महाराजजी ने कुछ उत्तर नही दिया.महाराजजी ध्यान हमेशा उपासना और राम नाम मे लगा रहता था. एक दिन रामजी का अनुभव कहते वक्त उनके आँखों मे आसू आ गये, कहने लगे 'एक दिन हमे रामजी ने गोद मे उठाकर हमारी जान बचाई थी. एसे ही हम रास्तेसे चल रहे थे की अचानक सामनेसे बडा ट्रक सामने आ गया, हमे क्या करना हैे वो समझ में नही आया, थोड़ी देर होती तो वो ट्रक हमे कुचलकर निकल जाता पर तभी काईं शक्तीने हमे गोद मे उठाकर रास्ते के ऊस पार किया, वो तो प्रत्यक्ष रामजीही थे, उन्होंने हमारी जान बचाई थी' ऐसे राममय हो गये थे महाराजजी. उन्हको रामजी और राम नाम के बीना कुछ सुझता ही नही था. "
असे आहे प. पु. गाडगीळ महाराजांचे चरीत्र ,जे माताजींनी मला सांगीतले व त्यांनी मला सांगीतलेले अनुभव मी आपल्या शब्दात मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न .अशा सर्व संतांचे कितीही गुणगान केले तरी आपले शब्द अपूरे पडतील कारण हा आत्मज्ञानी कर्ता असून अर्कता असतो. त्यांची मानसीक व वैचारिक भुमीका इतक्या उच्च पातळीवर असते की तिथे माझ्या सारख्याची पोहच जाउच शकत नाही. ते द्वैताच्या पलिकडे गेलेले असतात. माझ्या गुरू श्रीकलावती आई प्रवचनात सांगत की संतांना आत्मबद्धीतून देहबुध्दीवर येण्यास खूप वेळ लागत असतो तर संसारी जिवाला देहबद्धीतून आत्मबुब्दी जाणेच खूप कठीण होते. त्यांच्या वैचारिक पातळी पर्यंत माझ्या सारखा सर्व सामान्य जीव जाऊ शकात नाही म्हणून त्या सर्व संत गणांना मनापासून सांष्टांग नमस्कार करतो व आपले आर्शिवाद असेच आमाच्या सर्वाच्या पाठीमागे राहोत ही मनोमन पार्थना करतो.
साडेनऊपर्यंत आम्ही आश्रमात पोहचलों, या आश्नमात मी दोन वर्षापुर्वी एकदा येऊन गेलेले होतो.आश्रमात गेल्यावर एका ठिकाणी आम्ही आमच्या सॅग ठेऊन तिथे असलेल्या प्रभु रामचंद्रांच्या दर्शनाला मंदीरात गेलो .गाभाऱ्या बाहेर श्री विठठल महाराजांची भेट झाली. या मंदिरात पण गोंदवल्यासारखी उपासना चालते .आसन अंथरून आम्ही रामरायांसमोर बसलो. रणरणत्या उन्हातून चालून आल्यावर थंड पाणी जसे जीवाला थंडक देते तसाच काहीसा अनुभव आम्ही रामरायांच्या दर्शनाने घेत होतो. महाराजांकडून प्रसाद घेतला व मंदीराबाहेर आलो. इथेच बाजूला असलेल्या छोट्या मंदीरात जाऊन पाषाण रूपातील टेंबे स्वामींच्या पादूकांचे दर्शन घेतले.स्वामींनी इथे चार्तुमास केला आहे त्यामुळे या स्थानालाही विशेष महत्व आहे. तिथुन बाहेर आलो व थोडयाच वेळात तिन्ही माऊलींचे तिथे आगमन झाले.आज माऊली इथे मुक्कामास थांबणार होते.या मागचे कारण असे होते की त्यांचा इथे कन्या भोजन करण्याचा मानस होता.
माईचे नाभी स्थान नेमावर - असे सांगीतले जाते की इथे किनाऱ्या पासुन आत थोडया अंतरावर एक खोलगट भाग आहे की जो नाभी समान भासतो व इथे माईच्या प्रवाहाचा मध्य भाग येतो त्यामुळे या भागाला माईचे नाभी स्थान समजले जाते.
नेमावर व सिद्धनाथ महादेव मंदीर- माईच्या किनारी वसलेले हे अतिशय प्राचीन शहर .माईच्या किनारी वसलेले हे शहर प्राचीन काळात नाभीपूर ह्या नावाने प्रसिद्ध होते. तेव्हा हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. .नंतर मात्र हे शहर पर्यटन स्थल म्हणून नावारूपास आले .तेव्हा शासन दप्तरी या शहराला नाभापट्टम या नावाने ओळखले जाई. अशां ह्या पुण्यवान नगरीत एक अतिशय प्राचीनकालीन मंदीर आहे ज्याचे नाव आहे सिद्धनाथ महादेव मंदीर. मंदीरातील शिल्पकला म्हणजे एक अदभूत नजराणा, अतिशय कोरीव काम असलेले हे मंदीर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे .सत्ययुगात स्थापीत केलेल्या हया शिवलींगांची स्थापना चार सिध्द ऋषींनी केलेली आहे. हे सिद्ध ऋषी म्हणजे सनक, सनंदन, सनातन व सन्तकुमार होत. म्हणुन या शिवलींगाचे नाव सिद्धनाथ महादेव मंदीर असे आहे.
आम्ही आश्रमात माऊलींशी बोलत असताना आश्रमातून चहा आला .आम्ही सगळ्यांनी चहां घेतला तेव्हा तिन्ही माउली आम्हाला परत परत आज इथेच मुक्काम करण्याविषयी आग्रह करत होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज ते इथे घालत असलेल्या कन्याभोजनालाच्या कार्यक्रमाला आम्ही थांबुन उद्या सकाळी आपण सगळ्यांनी पुढे प्रस्थान करावे असे होता. पण आम्ही मात्र आज छीपानेरपर्यंत पोहचण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे माताजींशी फोनवरून बोलणेही झाले होते त्यामुळे आम्हाला आज नेमवारला थांबणे शक्य नव्हते.
तरीही तिन्ही माऊलींचा आम्हाला परत परत इथे थांबण्याचा आग्रह चालूच होता. मंडलेश्वरपासून आमचे साधारणपणे परत परत भेटणे झाले होते. मधे चार दिवस आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे त्यांना आताही आम्ही पुढे जाऊ नये असे वाटत असावे.
पंधरा वीस मिनीटानी आम्ही पुढे निघण्याची तयारी केली, श्री विठ्ठल महाराजांचा निरोप घेतला व आश्रमातून बाहेर पडण्यास निघालो. तेव्हा पाखरे माउली आम्हाला आश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत सोडण्यास आल्या. आता आम्ही खरोखरच पुढे जाणार हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेले दुःखी भाव बघून आम्हालाही खूप वाईट वाटले. बाहेर आल्यावर परत एकदा आम्हाला माऊली म्हणाल्या 'थांबा हो आज माउली कन्याभोजनाला,उद्या सकाळी निघा की इथुन पुढे ' हे म्हणत असतानाही त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.
मनावर दगड ठेउन आम्ही पुढचा मार्ग पकडला, नर्मदे हर
परिक्रमा अनुभव ९४-
परिक्रमेत या ठिकाणी झालेली आमची व तिन्ही माऊलींची भेट ही परिक्रमेतील शेवटची भेट होती यानंतर मात्र आम्ही व ते परत परिक्रमा मार्गात कधीही भेटलो नाही.अजुनही श्री पाखरे माउलीशी कधी मेसेजवर तर कधी फोनवर बोलणे होते. चव्हाण माउलींनी उदयनच्या पुस्तक प्रकाशनच्या सोहळ्यात अगदी आर्वजून हजेरी लावुन उदयनला शाबासकी दिली होती. पवार माउलींनी फोनवरून अभिनंदन केले होते.
नेमावरला ब्रम्हचारी आश्रमातून आम्ही निघालो व प्रथम पोहचलो ते सिध्देश्वर महादेव मंदीरात .तिथे असलेल्या भव्य शिवपींडीचे दर्शन घेतले. बऱ्याच ठिकाणी महादेवाच्या मंदीरात शिवपींडी समोर बसल्यावर एक गोष्टीमुळे मनाला खूप आनंद मिळत असे व ती म्हणजे गाभाऱ्यात गेल्यावर भजनाच्या पुस्तकातील एखादे शंकराचे छोटे भजन सहजच ओठावर यईं. कधी जय शिव, जय शिव परात्परा शिव, ओंकारा शिव तव शरणम् नमांमि शंकर भवानी शंकर तव शरणम्, उमा महेश्वर तव शरणम् तर कधी सांब सदाशीव ,सांब सदाशीव सांब सदाशीव, सांब शिवा, हर् हर हर हर सांब सदाशीव, सांब सदाशीव सांब शिवा तर कधी ॐ नम: शिवाय ह्या नाममंत्राला आईनी निरनिराळ्या चालीत इतक्या छानपणे गुंफले आहे की ते मनात म्हणत असताना सहज आनंदाने मन भरून जाई. सदगुरूंच्या परमार्थ निकेतन शाळेचा महिमा किती मोठा आहे हे परिक्रमेत खूप वेळा खूप ठिकाणी प्रार्कशाने जाणवले. आता सदगुरूंचा सहज विषय आला म्हणून हे लिहावेसे वाटले
श्री बेलसर आजोबांनी ह्याचे सुंदर उदाहरण ज्ञानेश्वरीवरील निरूपणात सद्गुरूंच्या प्रेमाबद्दल त्यांच्या अगाध कार्याबद्दल एक छानसे रुपक देऊन सांगीतले आहे. ते सांगतात एखादे काटेरी झुडप आहे व त्यावर आपले एखादे वस्त्र चुकुन पडले व ते वस्त्र आपण पटकन काढावयास गेलो तर वस्त्र हातात येताना फाटते, त्याचे काही धागे किंवा त्या वस्त्राचा तुकडांही त्या काटयामधे अडकून राहतो ,तेच जर त्या वस्त्राला हळुवारपणे त्या काटयातून बाहेर काढले तर ते वस्त्र जसे आहे तसे हाती लागते त्याचप्रमाणे षडरिपुरूपी काटेरी झुडपाला लिप्त झालेले आपले मन व शरीर सद्गुरू अतिशय हळुवारपणे त्या सर्व विषयरूपी काट्यातून किंवा बंधनातून अगदी सहजपणे बाहेर काढतात किंवा इंग्रजीमधे आपण म्हणतो ना डिट्यचमेंट, तेच काम सदगुरू करतात.
कधी कधी एखादा प्रापंचीक माणुस अचानकपणे सत्पुरुषाच्या किंवा संतांच्या सहवासात येतो त्याला देवाबद्दल इतके प्रेम किंवा ममत्व नसते तर आपला प्रपंच कसा सुखाचा हाईल,व्यवस्थित हाईल हाच त्याचा प्रधान हेतू असतो तर हे सद्गुरू किंवा सत्पुरुष काय करतात तर म्हणाले एखादी शेतजमीन जशी दगड किंवा मुरुमानी भरलेली असेल तो कसणारा शेतकरी जसा दोन चार फुट खणून ते दगड व मरूम काढून टाकतो व त्यात नवीन कसदार माती व खत घालतो व त्यानंतर तिथे छानसे पीक काढतो तसे हे संत किवा सद्गुरू हळुहळु या माणसाच्या मनातील प्रपंचाची आवड हळु हळु बाजूला करून त्याच्या मनात नामरूपी बीज पेरून त्या जीवाचे कल्याण करतात व अशा अनेक जीवांचा उद्धार करण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात जणु काही हेच त्यांचे सेवाव्रत असते. म्हणुनच तर म्हंटले आहे की सद्गुरू महिमा किती वर्णवावा.
सिध्देश्वर महादेव मंदीरात महादेवाचे दर्शन घेतले. मंदीराची शिल्पकला तर फारच सुंदर आहे. इथे मला एक सांगावेसे वाटते की या मंदीरा बदल व नेमवार बदल आमचे मित्र श्री महेश सावंत यांनी थोडया दिवसांपुर्वी एक सुरेख माहीतीपुर्वक लेख लिहीला आहे , जमल्यास सगळयांनी तो जरूर वाचावा अशी मी विनंती करतो .
इथुन निघून आम्ही साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत तुरनालला परशुराम तीर्थापाशी पोहचलो. उदयनच्या पहिल्या परिक्रमातील शालीमार या स्थानाचे महंत भंडारी बाबा इथे महंत म्हणून तेव्हा होते.आपल्याला जरी आज भूक नसली तरी ते भोजन प्रसादी घेतल्याशिवाय आपल्याला तिथुन पुढे सोडणार नाहीत असे उदयनने नेमावरहून निघाल्यावर चालत असतानाच आम्हाला सांगीतले होते.श्री भंडारी बाबा महाराष्ट्रातील मराठी माणूस त्यामुळे पाहिल्या परिक्रमेत या सगळ्यांची त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती.
तिथे गेल्यावर त्यांनी उदयनला अगदी सहज ओळखले. आम्ही आमच्या सॅग मंडपात ठेऊन श्री परशुरामजींचे दर्शन घ्यावयास मंदीरात गेलो .
मंदीरात छानशी छोटीशी परशुरामजींची मुर्ति स्थापन केलेली आहे त्याला वंदन करून आम्ही मंदीरातून बाहेर पडलो व भंडारी बाबांना भेटाण्यास गेलो. त्यांच्याकडे गेल्या गेल्याच ते उदयनाकडे बघत म्हणाले "आता भोजन प्रसादी घेतल्याशिवाय तुम्हाला इथुन पुढे जाता येणार नाही.थोडया वेळातच भोजन प्रसादी तयार हाईल." सकाळच्या पोटभर खिचडीमुळे तेव्हा खरतर अजिबात भुक लागली नव्हती पण उदयने आम्हाला आधी रस्त्यातून चालत असताना हे सांगीतलेले असल्याने आम्ही शास्त्र म्हणून काही खाउन पुढे जाण्याचे ठरवले.आज संध्याकाळपर्यंत छिपानेरला मुक्कामास पोहचण्याचे ठरवले असल्याने इथे थोडा वेळ थांबलो तरीही चालण्यासारखे होते. थोडया वेळात भोजन प्रसादीची तयारी झाली , मंडपात परिक्रमावासीयांची मोठी पंगत बसली मग आम्हीही आमचे ताट घेऊन त्यात सामील झालो. आमची भोजन प्रसादी झाली व आम्ही जेवणानंतर थोडया वेळात परिक्रमेच्या छिपानेरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. साधारणपणे चार साडेचार तास खडकाळ, बारीक खडीसारख्या असलेल्या रस्याने चालत आम्ही छिपानेरला साडेचार पर्यंत पोहचलो. इथे दोन तीन आश्रमात परिक्रमावासीयांची सोय होते. माईच्या किनाऱ्याजवळच इथे दादाजी धुनीवाला यांचा खूप मोठा आश्रम आहे. त्याच्या थोडे बाजुला असलेल्या माताजींच्या घरी आज आम्ही मुक्कामास जात होतो.
आमचा मित्र कुलदीप व त्याची सौ कादंबरी हे उदयन बरोबरच्या पाहिल्या परिक्रमेत माताजींकडे मुक्कामास थांबले होते. नंतर उदयनही त्यांना भेटण्यास इथे एकदा येऊन गेला होता त्यामुळे त्यांना जेव्हा उदयन क्डून आमच्या परिक्रमेबदल कळले तेव्हा त्यांनी ही परिक्रमा सुरू करण्याआधीच यावेळी छिपानेरला आलात की मुक्कामास आमच्याकडे या असे आग्रहाचे निमंत्रण उदयनकडे दिले होते. मी व बापू माताजींना प्रथमच भेटत होतो.
माताजींचे घर बंगलावजा असून त्यात लल्ला म्हणजे गोपाळ कृष्णाचे सुंदर मंदीर आहे. आम्ही साडेचार पाच पर्यंत यांच्या घरी पोहचलो. घरी माताजींचे आई, बाबा व त्यांची मोठी बहीण सौ शोभा दीदी ज्या इंदोरला असतात त्याही तेव्हा तिथे आलेल्या होत्या. त्या सगळ्यांनी आनंदानी आमचे स्वागत केले. आम्ही घरी असलेल्या गोपाळकृष्णाच्या मंदीरात जाऊन त्याच्या नटखट रूपाचे दर्शन घेतले. तेव्हा त्याच्याकडे बघताना तो आपल्याकडे बघुन गोड हसत आहे असेच आम्हाला वाटत होते. चहापान झाले व थोडया आमच्या परिक्रमेच्या गप्पा झाल्या. नंतर त्यांनी आम्हाला आमची विश्रांतीची खोली दाखवली. पहिल्या मजल्यावर एका बाजूला असलेली ही खोली पुढे माकळी गच्ची व गच्चीतून दिसणारी अथांग वाहणारी माई. आम्ही सगळे समोरच असलेले माईचे रूप बघुन खुष झालो.
आज बरेच दिवसानी प्रत्येकाला आपल्या कपडयांचा धोबी घाट काढण्यास पुर्ण स्कोप होता. माताजी व त्यांची मोठी बहीण ह्यांना थोड़े काम असल्याने त्या थोडा वेळ बाहेर जाऊन येणार होत्या तेवढया वेळात आम्ही आमचे सायंस्नान व धोबी घाट साबण लावुन स्वच्छ धुवुन काढला. माताजी जाताना आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी म्हणून हिटर देऊन गेल्या होत्या त्यांमुळे आज धडगाव नंतर परत गरम पाण्याची आंघोळ होती .आमचे माताजी बाहेरून येईस्तो पर्यत माईची सांय पुजां नित्यनेमाचे म्हणुन झाले व परत आम्ही खालच्या खोलीत आलो. त्यानंतर परमार्थ विषयी गोष्टीचा असा काही फड जमला की काही विचारू नका.
माताजींनी दोन तीन भजन अतिशय भावपूर्ण पध्दतीने म्हंटली.त्यांचा आवाज तर खूप गोड आहेच पण त्यात भगवंताला आळवण्याचा जो काही भाव आहे की ज्यामुळे आमचे डोळे सहज पाणावले.त्यातील एक भजन तर त्यांनी मराठीत म्हंटले होते त्याचे शब्द अजुनही लक्षात आहेत धरीला पंढरीचा चोर वेगळया चालीतला. मग उदयनने त्याच्या गोड आवाजात
जय जय जगत् जननी देवी,
सुर नर मुनी असूर सेवी,
भक्ती मुक्ती दायीनी हे भजन सुरू केले व त्या देवीच्या वर्णनानी माताजी, त्यांच्या आई, दीदी हे सगळे ऐकून एकदम खुष झाले .सरतेशेवटी मी माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेले भजन
गोवींद गोवींद गोवींद गोवींद
मना लागलीया छंद हे संत तुकाराम महाराजांनी रचलले भजन म्हटले.नुकत्याच झालेल्या गोपालकृष्णाच्या दर्शनामुळे आज भजन म्हणताना एक वेगळा आनंद मिळत होता.
नंतर संतांच्या अभंगावरील बोलणे चालू असताना त्यांच्या आईनी वेगवगळ्या संतांच्या अभंगातील ओव्या तोंडपाठ म्हणून दाखवल्या. त्यांचे वय तर जवळ जवळ सत्तर पंच्यातरीला पोहचलेले पण खणखणीत आवाजात त्या दोहे, ओव्या म्हणत असताना बघून, मला त्यांच्या पाठांतराचे खूप आश्चर्य वाटले.
त्यानंतर उपासनेबद्दल बोलणे चालू असताना मांताजींनी नेमवार येथे पुर्वी केलेली कडक साधना याबद्दल माताजींच्या आई व त्याच्या दिदी कौतुकाने व भरभरून बोलत होत्या.माईच्या पात्रात चार पाच तास उभे राहून साधना, जप अनेक प्रकारची व्रते तेव्हा माताजींनी केली होती. त्यांची दिदी सागंत होती की तेव्हा एखादया लहान मुलासारखे तिला सांभाळावे लागे, कारण तेव्हा त्यांच्या शरीराचे काही त्यांना भान नसे, जेवणही त्यांना जबरदस्तीने भरवावे लागत असे कारण त्याचीही आठवण तेव्हा त्यांना नसे.संत श्रीं गाडगीळ महाराजांच्या सहवासात मातांजींचा बराच काळ गेला, त्या काळात माताजींची खूप साधना नेमावर येथे झाली. महाराजांबरोबर निरनिराळ्या तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी त्यांचे जाणे झाले, चार धाम यात्रा, अनेक संतांची ठिकाणे, गोंदवल्याला महाराजांकडे तर गाडगीळ महाराजामुळे खुप वेळेला जाणे झाले. गाडगीळ महाराजांच्या सांगण्यावरून माताजी आता छिपानेरला स्थाईक झाल्या आहेत. ते दोन तास त्यांच्या बरोबर कसे गेले ते कळलेही नाही. मनाला एक वेगळे समाधान जाणवत होते. माताजींचे हळुवार, मृदू बोलणे तर प्रतेकवेळी एक वेगळा आनंद व अनुभुती देत होते.
भोजन प्रसादीची वेळ झाली आज प्रसादीमधे विशेष चंगळ होती माईच्या आवडीचा कणकेचा साजुक तुपातील शिरा जेवणात होता.
माईने इथे आल्यापासून आमची अशी काही सरबराई केली होती की काही विचारायची सोय नव्हती.रात्री झोपाण्यासाठी आजचा थाट म्हणजे मऊ गादी, पांधरायला रजई असा होता. आम्ही नको म्हणत होतो तरीही आग्रहानी त्यांनी हे सगळे घ्यायला लावले व म्हणाल्या "नही, इधर इतनी थंड है और आप क्या जमीनपे सोयेंगे? यहा की ये सब चीजे आपके के लिये ही रखी है. "
खोलीचा समोरील मोकळ्या गच्चीत संध्याकाळी वाळत घातलेले कपडे उलटे करायला म्हणून आलो तेव्हाही बाहेर थंडगार वारा वहात होता पुढे सगळीकडे माईचा किनारा असल्याने थंडगार वारा जोराने वाहत होता. आता रात्री तर थंडी अजूनच वाढली होती.
खोलीत आल्यावर आज खूप दिवसानी रजईच्या मऊ ऊबेदार स्पर्शामुळे झोपताना खूप सुख वाटत होते. उद्या सकाळी दहा पर्यंत इथुन आम्ही निघून पुढच्या मार्गाला लागणार होतो. त्या रजईच्या उबदारपणात कधी डोळे मिटले ते कळले नाही पाहुया पुढचा मार्ग पुढच्या भागात, नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९५
छिपानेर मुक्काम पुढे चालू-आज सकाळी छिपानेरहुन आम्ही परिक्रमेच्या पुढच्या मार्गासाठी प्रस्थान करणार होतो. बरेच दिवसानी बंद खोलीत झालेला मुक्काम व त्यावर कडी म्हणजे अंगावर असलेली उबदार रजईं त्यांमुळे त्या स्वर्गसुखातून बाहेर न पडता त्या थंडीत आंथरूणात गुरफुटून पडून राहावे असेच एकूण वातावरण होते पण आज मुक्काम इथुन पुढे हलणार असल्याने नाईलाजास्तव सकाळी पांघरूणातून बाहेर आलो. त्या कडाक्याच्या थंडीत हिटरच्या गरम पाण्याने शरिराबरोबर मनालाही एक सुखद आनंद मिळाला. स्नान करून आम्ही सगळे माईची पुजा करण्यास सुरवात केली व तेव्हाच खाली असलेल्या गोपाळकृष्णाच्या मंदीरातून इलेट्रीक वर वाजत असलेल्या नगाऱ्याचा आवज येउ लागला . इथे बऱ्याच मंदीरात अशी सोय केलेली आम्ही परिक्रमेत पहात होतो. एकदा इलेट्रीकचे बटण दाबले की लगेच त्याला अँटच असलेला छोटा नगारा अँटोमेटीक चालू होत असे. खालच्या लडुगोपालच्या मंदारातील आरती संपली व आमच्या पुजेत व आरतीमधे सहाभागी होण्यासाठी माताजी स्वतः वरच्या खोलीत आल्या. पुजा व आराती झाली आम्ही खोलीच्या बाहेर येउन मोकळ्या गच्चीतून समोर दिसत असलेल्या नर्मदा माईचे दर्शन घेतले.बाहेर अजूनही पूर्ण उजाडले नव्हते,गगनात भास्कराचे आगमनही झाले नव्हते पण माईवरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे आम्हाला तेव्हाही चांगले काकडायला झाले. दोरीवर आता धुतलेले पंचे व कपडे वाळत घालून आम्ही परत खोलीत आलो. बाकीच्या सगळ्या सामानाची आवराआवर केली व खाली लडुगोपालाचे दर्शन घेण्यास गेलो. माताजींनी अतिशय सुंदरपणे कान्हाला सजवले होते , माताजींच्या प्रेमामुळे तो ही खूष होऊन मिस्किलपणे हसत आहे असेच तेव्हा जाणवत होते.
कान्होबाचे दर्शन झाले , माताजींनी प्रसाद दिला. त्या सकाळच्या थंडीत दिदीनी तेव्हा मस्त गरमागरम चहा आमच्या समोर ठेवला व म्हणाल्या " अभी नाश्ता करकेही आप इथरसे आगे जाने की सोच सकते हो, बाहर थंड भी बहोत है, मै अभी नाश्ता बनती हूँ तब तक आप सब बाते करो '.मग चहा पीत असताना परत गप्पा सुरू झाल्या व तेव्हा माताजींना सहज विचारले 'आप के यहाँ लडुगोपाल का कैसे आना हो गया " तेव्हा माताजी म्हणाल्या " छिपानेरमे आश्रम बनने के बाद बहोत सारे लोगों ने इधर मंदीर बनाने के बारे मे बहोत सारे अलग अलग सुझाव दिये". पुना में रहनेवाले श्री मिलींदजी ने कहाँ " हम यहाँ नर्मदा माईका मंदीर बनायेंगे ' " कोई बोला शिवजी का मंदीर बनाओ, तो कोई बोला, लक्ष्मी और विष्णु का मंदीर बनाते है "माताजीने कहाँ की मै तो उलझन पड गईं की क्यों करू, कैसे करू ?
माताजींची आधीपासून उपासना देवीची म्हणजे महालक्ष्मीची त्यामुळे माताजींनी विचार केला की 'महालक्ष्मी जैसा निर्देश देगी वैसाही अब हमे करना है. '
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे माताजींना महालक्ष्मीने दृष्टात देउन सांगीतले " तु कान्हाला तुझ्या घरी घेऊन ये म्हणजे मी त्याच्या रुपात तुझ्याकडे यईन , तिथे त्याच्या ह्रदायात माझे कायम वास्तव्य राहील. " मग काय ह्या छानशा लडुगोपालची इथे स्थापना झाली.
नंतर माताजी आज परत दोन तीन भावपूर्ण भजन गायल्या जे ऐकून आमचेही कान तृप्त झाले व त्यानंतर बालभोग घेउन आम्ही तिथुन पुढे जाण्याच्या तयारीला लागलो. काल संध्याकाळपासून ते आज सकाळपर्यंत खर तर खूप कमी वेळ आम्ही तिथे होतो पण जो काही काळ तिथे होतो त्याने मनाला समाधान, आनंद, शांती मिळाली.आज पहिल्यांदा असे वाटत होते की अजून इथे थांबावे , माताजीनी बोलत राहवे व आपण फक्त ते सारे ऐकत राहावे. पुढे ती इच्छाही माईनी पुढील वर्षी पुर्ण केली व माताजींचा सत्संग सलग सहा दिवस आम्हा सगळ्यांना माझ्या घरी मिळाला.
जड अंतःकरणाने आम्ही छिपानेर सोडले व पुढे मार्गस्थ झालो. काय माहीत नाही पण तेव्हा चालत असताना खूप वेळा असे वाटले व हे मी उदयनला म्हंटलेही की आता असे वाटत आहे की झाली आपली परिक्रमा पूर्ण, आता अजून पुढे जायची गरज आहे ?कारण त्यावेळी मनाला एक वेगळे समाधान ,आनंद माताजींच्या आश्नमात मिळाला होता.
छिपानेरच्या थोडे पुढे माईच्या किनारी आपल्याला दर्शन होते पगली माईचे. या माताजींबद्दल पण खूप ऐकले होते त्यामुळे त्यांचे दर्शन व काही बातचीत व्हावी अशी इच्छा होती.
आम्ही त्यां स्थानाला पोहचलो तेव्हा तिथे एक माणूस आम्हाला दिसला म्हणून त्याला या पगली माई माताजींबद्दल विचारले. तेव्हा तो म्हणाला मी त्यांचाच सेवेकरी आहे पण आपल्याशी बातचीत तर दूरच पण त्यांचे दर्शन पण आपण लांबून घ्या .माताजीना हल्ली कुणी दर्शनाला, भेटायला आलेले आवडत नाही. त्या समोरच्या झोपडीवजा घरात त्या आहेत जर तुमच्या नशीबात दर्शनाचा योग असेल तर दर्शन होईल, पण काही बोलू नका फक्त लांबुन दर्शन घ्या. आम्ही त्या झोपडीवजा टपरीपाशी गेलो .झोपडी म्हणजे वर छप्पर व चारी बाजूच्या काठयांना बांधलेली कापडाची भींत अशी त्या झोपडीची अवस्था. तो कपड्याचा अडोसा व वरचे छप्पर यांच्या मथल्या गॅप मधुन आम्ही त्यांना आत शोधु लागतो. तेवढयात आत् एका दगड मातीच्या ठिगाऱ्यावर डोके ठेऊन पहुडलेल्या माई आम्हाला दिसल्या.डोळ्यांवर आडवा हात असल्याने त्यांचे डोळे उघडे आहेत का बंद हे सुरवातीला नीटसे कळत नव्हते पण आपल्याकडे त्यांचे लक्ष जावे व आम्हाला त्यांनी आत बोलवावे अशी मात्र मनोमन आमची इच्छा होती. त्यांचा पेहराव म्हणाल तर शरीर झकण्यासाठी लागते तेव्हढेच अंगावर वस्त्र, त्या वस्त्रालाही ठिकठिकाणी लागलेला माईच्या किनाऱ्यावरील माती व चिखल. शिरीरालाही ठीक ठीकणी लागलेला व आता कोरडा पडलेला माईच्या किनाऱ्यावरील चिखल थोडक्यात ज्याला कुणाला त्यांच्या बद्दल काहीच माहीत नाही त्यांना ह्या कुणीतरी अर्धवट किंवा वेड्या बाई असाव्यात असे त्यांचे बाहय रुप.अशा अनेक विभुती आजही तिथे आहेत की जे आपले अंतः स्वरूप लपविण्यासाठी असे सर्वसामान्यांना न पटणारे, न आवडणारे बाहय रूप घेउन तिथे असतात. असे सांगतात की आता माई त्या लोकांना, परिक्रमावासीयांना टाळतात कारण लोक त्यांना येऊन त्रास देतात, आपले वैयक्तिक अडचणी,प्रश्न विचारतात , माईचे खरे प्रेम कुणाला नाही त्यामुळे त्या सर्वसामान्यांपासून दूर राहतात.त्यांच्या मते कुणीही माईच्या प्रेमानेसाठी इथे येत नाहीत. असो
आम्ही तिघेही ज्या पुज्य भावनेने त्यांच्या दर्शनास गेलो होतो ती इच्छा त्यांनी प्रत्येकाचा जो काही भाव होता त्याप्रमाणे पुर्ण केली. मधुनच आम्हाला जाणवले की त्यांनी थोडे डोळे किलकिले करून आमच्याकडे बघितले आहे, त्यामुळे मनास आनंद झाला.झोपडीला जिथुन आत जाण्यास मार्ग होता तिथे आम्ही आणलेली सफरचंदाची पिवशी ठेवली, लांबुनच नमस्कार केला व आम्ही पुढे निघालो. आज कुठपर्यंत जायचे असे काही ठरवले नव्हते त्यामुळे संध्याकाळपर्यत कुठपर्यंत पोहचू ते गाव आजच्या मुक्कामाचे असा आजचा बेत होता.
सकाळी छिपानेरला माताजींकडून निघण्यास नेहमीपेक्षा खूप उशीर झाला होता , सकाळी जवळ जवळ १० वाजता आम्ही तियुन निघालों होतो. तिथुन निघण्याआधी . माताजींच्या घराजवळ माईच्या किनारी असलेल्या दादाजी धुनीवाले या पुण्य स्थानाचे दर्शन घेऊन आलो. हा आश्रम व हे स्थान अतिशय प्रशस्त व पुण्यस्थान आहे.
पुढे पगली माईचे दर्शन यामुळे नेहमी सारखा सकाळचा चालण्याचा कोटा पूर्ण झाला नव्हता पण तरीही आज सकाळपासून आत कुठेतरी एक वेगळेच समाधान व आनंद मनाला' जाणवत होता. दूपारी असेच शेतातून चालत असताना माझा मोबाईल खणखणू लागला.आता दिवसा कुणाचा फोन आला म्हणून रस्त्याच्या बाजूला थांबुन सॅग पाठीवरून काढून त्यातील फोन काढला कारण रात्री फक्त माझ्या वडिलांच्या व उदयनच्या आईच्या तबेत्तीसाठी घरी फोन करणे होई त्यातून परिक्रमेच्या बऱ्याच मार्गत बरेच वेळा बऱ्याच ठिकाणी वोडाफोनला रेंज नसे त्यामुळे बरेच वेळा मोबाईल असून नसल्यासारखां असे त्यामुळे आज दिवसां माझ्या फोनला आलेली रेंज बघुन आश्चर्य व आनंद झाला .आमच्या गुरुभगीनी व उदयनच्या कॉलजपासूनच्या मैत्रीणी विजया व मंजूश्री यांचा हा फोन होता. परिक्रमा सुरू झाल्या पासून आज पहिल्यांदी त्यांच्याशी संवाद होत असल्याने त्यांनी आमची चवकशी केली.आता तुम्ही कुठपर्यंत पोहचलात व आतापर्यंतची परिक्रमा कशी झाली या विषयी सगळी चवकशी केली.
संध्याकाळी पाच सव्वापाचच्या सुमरास रस्तानी आम्ही चालत असताना एक बाईक आमच्या समोर येउन थांबली व त्यावरील वयस्कर गृहस्थाने विचारले ' नर्मदे हर बाबाजी, आगे दस मीनट पे हमारा गांव है, आज आप हमारे घर रुक जाईये बाबाजी,परिहार हमारा नाम है, आप दस मीनट आगे जाके एक मोड पे किसको भी पुछ लेना मै मेरा थोडा काम करके तूरंत आ जाता हूँ. आप पक्का हमारे घरही जाईयें, मै अभी और किसी परिक्रमावासी को पुछता नही हूँ. आम्ही त्यांना 'हो ' म्हणून सांगीतले कारण तसेही तेव्हा सव्वापाच झाले होते म्हणजे अजून आम्ही जास्तीत जास्त अर्धा तास चालू शकतं होतो त्यामुळे हे गाव सोडून पुढच्या गावापर्यंत पोहचू शकू याची शाश्वती नव्हती.रस्त्याचे काम चालू असल्याने तो ही फारसा चालण्यायोग्य नव्हता त्यामुळे या गावात मुक्काम करणे योग्य होते.
ते गृहस्थ बाईकवर बसून विरूध्द दिशेला गेले व आम्ही त्या गावाकडे चालू लागलो. पाच मिनीटे पुढे गेल्यावर एका चहाच्या टपरीवरील माणसाने चहा प्यावयास थांबवले , तिथे आम्ही चहा घेतला व पुढे थोडे चालल्यावर एका वळणावर बरेच ट्रक,डंम्पर थांबलेले दिसत होते व रस्त्यावरील माती भरण्याचे काम चालू होते. तिथे समोर थोडे उंचावर परिहार यांचे घर आहे. थोडी चवकशी केल्यावर एका माणसाने त्यांचे घर दाखविले.
घर जुन्या पध्दतीचे घरासमोर अंगण,स्वच्छ, सारवलेले त्यावर पत्र्याची छोटी शेड. घरात आम्हाला ज्या काकांनी रस्त्यात थांबवले होते त्यांच्या सौभाग्यवती घरात होत्या.आम्ही तिथे पोहचल्यावर आम्ही त्याना सांगितले 'काकाजी हमे रास्ते मे मिले थे ,और उन्होने हमे आज इधर रूकने के लिये बोला है ' अशी माहीती दिली. 'हां ठिक है ' एवढच त्या म्हणाल्या व घराबाहेर ओसरीवर आम्हाला आसन लावण्यास सांगीतले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून असे आम्हाला उगाच वाटले की आपण आलेले यांना आवडले आहे की नाही, पण त्या काकांना तर आम्ही हो म्हणून सांगितले होते म्हणजे तिथे थांबणे भाग होते. पण थोडयावेळाने हा आमचा गैरसमज दूर झाला.
सॅग बाहेरच्या पडवीत ठेउन आम्ही त्यांना हात पाय धुवावयाची सोय कुठे आहे ह्या बद्दल विचारले .तेव्हा माईनी थोडे खाली उरतून उजव्या बाजूला एक हातपंप आहे तिकडे जाण्यास सांगीतले. खाली येऊन एका दुकानाच्या मागे असलेल्या हातपंपावर स्वच्छ हातपाय धुतले व सगळी मरगळ एकदम निघून गेली.
परत वर आलो तर समोर कपात गरम गरम चहा घेउन माई उभ्या होत्या. ' बाबाजी चाय लिजीये, असे सांगत 'आपके रात के भोजन का प्रबंध साडेसात बजे तक हो जायेगा, आपको चलेगा ना बाबाजी ? असेही विचारले. आम्ही त्यांना आपण आपल्या सोईने जेव्हा भोजन प्रसादी होईल तेव्हा वाढा असे सांगीतले. चहा पान झाल्यावर परत सायं स्नानासाठी आम्ही आमचा मोर्चा हपाशाकडे वळवला. हपाशा पुढे एक छोटी टपरी व पुढे रहदारीचा रस्ता होता त्यामुळे लोकांचे जाणे येणे चालू होते त्यामुळे लंगोटीवर तिथे स्नान करायला मला थोडे अवघडल्यासारखे झाले ,मनात एक क्षणभर आले की हे सगळे लोक काय म्हणतील ( शहरातील बंदीस्त स्नानाची सवय )तेव्हा जाणवले की कुणालाही आपण इथे काय करत आहोत लंगोटीवर, स्नान का अजून काही हे बघण्यासही वेळ नाही. आपणच उगाच मनात हया सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो आहोत. आज हा सगळा प्रसंग लिहाताना ते सगळे चित्र डोळ्यासमोर आले व हसायला आले.तेव्हा आंघोळ करताना मात्र मनात अजून एक गोष्ट सहज आली , खर तर ते होणे शक्य नव्हते तरीही मनात आले की आता माझा मुलगा प्रथमेश तिथे समोर आला असता व आमचे असे हापशावर लंगोटीवर उघडयावर स्नान करताना बघून तो म्हणाला असता " काय हे बाबा, कुठेही अंघोळ " व ते आठवून तेव्हाही मनापासून हसलो व हा हापशाचा अनुभव किती सुखद आहे ह्याची परत जाणीव झाली.
मन मस्त सदा तु रहना,
सबका आनंद यहाँ तु लेना
सुखआंनद की गोठरी भरकर
साथ आपने तु ले जाना॥
परिक्रमा किती तरी गोष्टींची परिक्रमेत पुन्हा पुन्हा रीवीजन करून घेत होती , प्रत्येक वेळी काही नव्याने शिकण्यास सुचवत होती.किरकोळ गोष्टीला किती महत्व दयावे हयाचा जणू हा माझ्यासाठी परिपाठ देत होती.
स्नान झाले, उद्यासाठी लागणारे कपडे तिथेच पाण्यातून बचूकळून वर येऊन दोरीवर वाळत घातले. माईची पुजा आरती झाली. तापर्यंत मगाशी भेटलेले काकाजीही आले. साडेसातला गरम गरम जेवण झाले. थोडयावेळाने त्यांचे सगळे आवरल्यावर बाहेर अंगणात सगळे जमा झाले व माईचे गुणगान व तिने त्यांना दिलेला अनुभव किंवा दृष्टांत ह्याचे त्यांनी कथन केले. मगाशी माईबद्दल केलेला विचार किती चुकीचा आहे याची जाणीव झाली. त्याच्या बोलण्यातील ठामपणा, निग्रह व पण माईबद्दल असलेले नितांत प्रेम याची जाणीव झाली. त्या म्हणाल्या ' आप कौन हो, कैसे है इससे हमे काई मतलब नही रहता,आप का ये सफेद पोशाख धोती, दंड, कमंडलू से आप माई के रूप मे हमारे घर आये है इतना हम समझते है.आप काई दुसरे भेस मे आयेंगे तो कोई आपको पुछेगा भी नहीं , इसका कारण आप परिक्रमावासी नही हो ".
काकाजींनी त्यांचा अनुभव सांगीतला ' आमची चार एक एकर शेत आहे पण त्यातून तेव्हा फारसे काही उत्पन्न निघत नसे, एक दिवस असाच शेताकडून येत होतो,संध्याकाळ किंवा अंधुकसा अंधार पडत आला होता व मी मधे कुठे रस्ता भरकटलो ते माझे मला समजले नाही , मला तिथे एक पाण्याचा गोल फिरणारा प्रवाह दिसत होता व तिथुन पुढे कसे जायचे काही कळत नव्हते तिथेच एका झाडापाशी एका आजीबाई सारख्या बाई बसलेल्या दिसत होत्या पांढऱ्या साडीत, त्या मला काहीतरी सांगण्यासाठी बोलवत होत्या. प्रथम मला त्यांची भीती वाटली , मग त्याच म्हणाल्या तुला इथुन बाहेर पडायचे आहे ना मी सांगते तुला एका अटीवर परिक्रमावासीयांची सेवा करत जा, तुझी सगळी भरभराट होईल. मी तिथुन बाहेर पडण्यासाठी 'हो ' म्हणालो व कसाबसा घरी आलो. घरी कुणाशी काही या सर्दभात बोललो नाही.त्या आजींनी सांगीतलेल्या गोष्टीकडेही दूर्लक्ष केले. दोन दिवसानी माझ्या मिसेसलाही माईच्या सेवेबद्दल स्वप्न पडले व ते तीने सकाळी मला सांगीतले व मला माझ्या आलेल्या अनुभवाची खात्री पटली. मलाही आलेला अनुभव व त्या आजींचे वाक्य तिला सांगीतले व मग आम्ही दोघांनी यापुढे माईच्या परिक्रमावासीयांची सेवा करण्याचा निश्चय केला त्या आजीनी सांगीतल्याप्रमाणे तेव्हापासून आमच्या शेतात चांगले पीक येऊ लागले वं आता आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आता यापुढेही माईने ही सेवा अशीच शेवटपर्यंत करून घ्यावी हीच आमची दोघांची इच्छा आहे. त्यांच्या मिसेसने सांगीतले की दिवसा हे घरी नसतात तेव्हा मला इथून रस्त्यावरून जाणारा परिक्रमावासी दिसला तर त्याला मी इथुन मोठयांनी ओरडून बोलवून घेते व आमचे सेवाव्रत चालू ठेवण्याचा प्रयत्न करते. माईच्या लिलेचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ती कुणाला कशी आपल्याकडे खेचून घेईल हे काही सांगता येत नाही.
ठरवूनही होणार नाही असे माईचे गुणगान इथे आज सहज घडून आले. ते काकाजी व माई घरात निजण्यास गेले व आम्हीही बाहेरच्या अंगणात आमच्या स्लिपींग बॅगच्या कुशीत शिरत या माईच्या लिला आठवत निद्रस्त झालो. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९६-
आमचे सगळे नित्य कर्म आटोपून, पहिहार परिवारने दिलेला सकाळचा चहा घेउन आम्ही छितगावरून सकाळी सात साडेसात पर्यंत पुढे जाण्यास निघालो.
सकाळच्या थंडगार उत्साही वातावरण,चालत असताना आजुबाजूला दिसत असलेले निर्सगाचे सौंदर्य न्याहळत आम्ही पुढे चालत होतो.आजुबाजुची झाडे, झुडपे,शेतातील रोपे यांच्यावर पडलेले दवबींदू व आता त्यावर पडत असलेल्या सर्यकिरणांनी ते चमचमत होते. त्यांचे ते चमकणारे सौंदर्य मनास सुखद आनंद देत होते.
खर तर इथेही रोज सकाळी ऑफीससाठी घराबाहेर पडतो तेव्हा असे काही सौंदर्य इथेही आजुबाजूला नक्कीच असेल पण या डोळ्यांवर लागलेल्या घडळ्याच्या काट्यांच्या झापडांमुळे ही सौंदर्य बघण्याची दृष्टीच आम्ही इथे विसरून गेलेलो असतो.
थोडे अंतर आम्ही पुढे चालत आलो,आता मोठा रस्ता संपला व आम्ही एका पायवाटेने आता पुढे चालू लागलो .अर्धा तास गेला असेल व ह्या पायवाटेपासून थोडे आत एक घर आम्हाला दिसू लागले.जसे आम्ही घरच्या समोर आलो तसे घराच्या बाहेर एका बाजूला गाय व थोडे लांबवर गाईच्या छोटया वासराला बांधून ठेवलेले आम्हाला दिसले. ते ही सकाळी सकाळी भुकेसाठी म्हणा किंवा आपल्या आईकडे जाण्याच्या ओढीने दावणीला हिसके देत मस्ती करत होते. ते गोरेपान सुंदर वासरू, त्याच्या डोळ्यातील ते नीरागस भाव व त्याची ती चाललेली धडपड बघीतल्यावर तर मला त्याच्या जवळ जाउन त्याला गोंजरण्याचा मोह काही आवरता आला नाही.त्याच्या मालकांची परवांनगी घेऊन मी व उदयनन त्याला जवळ गेलो व त्याला प्रेमाने गोंजारले. तेही अगदी आनंदाने त्याचे हे कौतूक करून घेताना दिसत होते. तेव्हा जाणवले की आपल्या आत असलेला व सृष्टीतील चराचरात विसावलेला हा अंतरात्मा खरच किती आनंदमय आहे. फक्त आपली बघण्याची दृष्टी व जाणीव तशी झाली की त्याचे व्यक्त स्वरूप आपल्याला या सृष्टीच्या चराचरात जाणवते. हा आनंदाचा कंद शोधण्यासाठी मनुष्य जन्मभर जीवाचा आटापीटा करतो, धडपडतो.पण हे जाणण्याचे ज्ञान त्याला फक्त एक सद्गुरू देऊ शकतात .असा एखादा सतशिष्य त्यांना मिळाला की तेही आनंदाने आपल्याकडील अमुल्य, न संपणारा ठेवा त्याला देऊन त्या जीवाचे सोने करतात व तो सतशिष्य कृतार्थ होतो.
माझ्यासारखा ही गोष्ट नेहमी जाणत नसल्याने त्या कंदांची अवीट गोडी क्वचीत प्रसंगी अनुभवतो व इतर वेळी मायेने सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडतो.
दहा पंधरा मीनटें मी ते सुखद आनंदाचे क्षण आज राजघाटनंतर परत अनुभवत होतो, त्याचे लाड करत होतो व तेही आनंदाने माझ्याकडून करून घेत होते.उदयन व बापूने 'चला आता,आपल्याला पुढे जायचे आहे, का आम्ही होऊ पुढे ? 'असे मला विचारले .त्याआधी मी व उदयने वासरा बरोबर आमचे फोटो काढले .जरी आम्ही त्याच्या बरोबर आमचे फोटो काढले होते तरी निघताना मी परत परत त्याचे ते निरागस रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
आज कुठपर्यंत जायचे असे काही ठरवलेले नव्हते त्यामुळे संध्याकाळपर्यत जिथे कुठे पोहचू ते गाव आजच्या मुक्कामाचे स्थान असा आजचा बेत होता. तसेही परिक्रमेत एखादे ठिकाण आजचे आपले डेस्टीनेशन हे ही खर तर माझ्या सुट्टीमुळे आम्ही ठरवत होतो नाहीतर तिला जिथे आम्हाला घेऊन जायचे असेल तिथेच आमचे जाणे होई. दुपारपर्यंत असेच छोटया गावातून आमचे मार्ग आक्रमण झाले.आता आम्हीं ज्या मार्गाने जात होतो त्या मार्गावर समोर लांबवर
सलखणपूर माताजीचे स्थान ज्या डोंगरावर आहे तो डोंगर दिसत होता .'त्या डोंगरावर माताजींचे स्थान आहे 'असे उदयनने तेव्हा आम्हाला सांगीतले व त्यांच्या पहिल्या परिक्रमेत ते सगळे तिकडे गेले होते 'असेही तो पुढे म्हणाला.पण ते परिक्रमेच्या मार्गावर येत नसल्याने आमचा तिकडे जाण्याचा काही प्रश्न नव्हता.चालता चालता दुपारचे दोन वाजत आले होते आम्ही डोंगराळ, ओबडधोबड रस्त्यावरून चालत होतो. इतक्यत थोडशा उंचावरून हाक आली ' ंनर्मदे हर ' बाबाजी,आइये आइये ' आम्ही पण मोठयानी 'नर्मदे हर ' असा पुकारा केला व वर बघीतले तर एक रामानंदी साधु हसत हसत आम्हाला वर येण्यास सांगत होता. आमचेही सकाळपासून बरेच तास चालणे झाले असल्याने आम्हालाही आता थोडा वेळ कुठेतरी विश्रांती घेण्यास थांबणे गरजेचे होते त्यामुळे साधुजी आता बोलवत आहेत तर थोडा वेळ इथे थांबुन मग पुढे जाऊ असा विचार करून आम्ही त्या थोडया उंचावर असलेल्या टेकाडावर चढलो. वर त्याची छानशी औटकी कुटी होती ,एका भागात भोजन प्रसादीसाठी जागा तर दूसऱ्या भागात विश्राम करण्याची जागा. हे साधु महाराज बहूतेक इथुन रोज जाणाऱ्या परिक्रमावासीयांची नक्की सेवा करीत असावेत असे वर गेल्यावर जाणवले. आम्ही वर गेलो तर त्यानी आनंदाने आमचे स्वागत कले व म्हणाले 'आईये, आईये महाराज जी ' त्याचां तो हसतमुख चेहरा, कपाळावर लावलेले मोठे गंध, डोक्यावर नारदमुनींसारखे बांधलेले केस, सर्वांगावर लावलेले पांढऱ्या भस्माचे पट्टे व चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ,तेज बघूनच आनंद झाला .त्यांनी हातपाय धुवावयाची जागा दाखवुन त्यांच्या कुटीत विश्राम करण्यास सांगीतले. तिकडे रात्रीची जितकी कडयाक्याची थंडी असते तेवढेच दुपारचे उन्हही कडकडीत असते त्यामुळे तिथे असलेल्या थंडगार पाण्याने हातपाय धुतल्यावर दुपारच्या उन्हाने आलेला भागोटा कुठल्या कुठे पळुन गेला.आम्ही हात पाय धुवुन कुटीत येऊन बसलो तो पर्यंत ते साधुबाबा पिण्यास पाणी घेउन आले व म्हणाले " बाबाजी भोजन प्रसादी हो गई क्या " आम्ही नाही म्हटंल्यावर म्हणाले " फिर अभी भोजन प्रसादी करके आगे जाओ, चावल,डाल, सब्जी तो तैयार है, सिर्फ पंधरा मिनटमें मै आपके के लिये रोटी बनाता हूँ " आम्ही चावल चालेल असे म्हटल्यावर म्हणाले " नही महाराज जी मै अभी बनाता हूँ, चावल से थोडी पेट भरता है , तब तक आप यहाँ विश्राम करो, बस पंधरा मीनट में सब हो जायेगा." आम्ही तिथेचं बसलो कारण या बऱ्याच आश्रमात व रामानंदी साधुंना त्यांच्या भंडारखान्यात असे कुठुन बाहेरून येउन त्यांना मदत करायला गेलेले आवडत नसे हे लक्षात आले होते.पंधरा वीस मीनीटात रोटया तयार झाल्या.आम्ही आमच्या थाळ्या, भांडे काढून बसलो व त्या साधु बाबाना म्हंटले की आपले भोजन प्रसादी झाले नसेल तर आपणही आमच्या बरोबर भोजनास बसा, कारण आता अडीच वाजून गेले आहेत तर म्हणाले " नही नही महाराजजी आपका भोजन हो जाने के बादही मै खां लुगा, माईने सुबह सबुह संकेत दिया था की आज तीन परिक्रमावासी आयेंगे , उनको आप भोजन प्रसादी खिलाना, वैसे सुबह तीन मुर्ती यहाँ आयी भी थी पर थोडी देर के बाद उन लागों मे किस कारण झगडा हुआ कुछ मालुम नही , फिर बो सब यहाँ से चले गये. मै वही सोच रहा था की सुबह माई ने संकेत तो दे दिया फिर ऐसा क्युं हुआ?,और फिर आप तीनो यहाँ आ गये, इसलिये आपको पहले खिलाऊंगा,उसंके बाद आज मेरी भोजन प्रसादी होगी ' त्यांनी स्वतःच्या हातचे बनवलेले ते रुचकर भोजन आम्ही तिथे ग्रहण केले. हा प्रसंग लक्षात राहण्याचे कारण असे की आम्ही परिक्रमेत चालत असताना बऱ्याच ठिकाणी मला तिथल्या स्थानीक लोकांचे अनुभव ऐकत असताना कानावर येत असे की मैयाने आज त्यांना दृष्टांत दिला व तिथे तेवढे परिक्रमावासी त्या दिवशी आले यामुळे दोन दिवसापुर्वीच आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा मी उदयनला म्हंटले की असा अनुभव कधी आपल्या बाबत कुणाला आला असे आपल्याला कुणाक़डून ऐकावयास मिळाले नाही , असे मी त्याला म्हंटले म्हणजे ते लोक सांगतात तसे होत असेल यावरही माझा अजून पूर्ण विश्वास बसला नव्हता त्यामुळेच की काय तिने दोन दिवसातच त्याचे प्रत्यंतर मला लगेच दाखवुन दिले.
आम्ही तिथुन निघत असताना एक वीस बावीस वर्षाचा परिक्रमावासी तिथे आला, त्यालाही त्यानी भोजन प्रसादी बाबत विचारले, पण तो नाही म्हणाल्याने त्यांनी त्याला थोडे कुरमुऱ्याचा चिवडा खाण्यस दिला.आम्ही तिथुन निघत असताना तो आत्ता तिथे पोहचलेला तरूण परिक्रमावासी आमच्या कडे सारखा बघत होता पण आम्हाला त्याला कुठे भेटल्याचे आठवत नसल्याने आम्ही 'नर्मदे हर 'करून तिथुन पुढे निघालो.
आज संध्याकाळच्या मुक्काम नक्की कुठे करावयाचा हे अजून काही ठरत नव्हते आता साडेपाचपर्यंत ज्या गावापर्यंत आपण पोहचू तिथेच आजचा मुक्काम होता.आम्ही त्या साधु बाबांकडून इथुन निघालो व पुढचा मार्ग चालू लागलो व एक पंधरा मीनटात तो मगाशी साधु बांबाकडे आलेल्या तरूणाने आम्हाला गाठले व आमच्या बरोबरीने आता तोही चालू लागला, एकमेकांना 'नर्मदे हरे ' परत म्हणून झाले .तो तरुण असल्याने त्यांचा चालण्याचा वेगही चांगला होता.आता रस्त्याच्या एक बाजूला एक छोटा कॅनल व त्याच्या बाजूने एक पायवाटेचा रस्ता होता, जवळ जवळ दीड तास आम्ही सलग तसेच चालत होतो,जवळपास कुठे गावाचा मागमुसही दिसत नव्हता. डिसेंबर महिना असल्याने तिथे साडेपाचपासून काळोख पडायला सुरवात होत असे त्यामुळे अजून अर्धा ते पाउण तास आम्हाला चालता येणार होते. तो तरूण परिक्रमावासी आता मागे किंवा पुढे न चालंता आमच्या बरोबरीने चालत होता, पाऊणे सहा झाले व आमच्या उजव्या बाजूला लांबवर काही माणसे आम्हाला दिसू लागली म्हणजे आता आम्ही नक्की कुठेल्या तरी गावाजवळ पोहचलो आहोत असे जाणवले .जसे त्या माणसांच्या दिशेने जाउ लागलो तसा खूप माणसांचा घोळका दिसू लागला.त्या दिवशी त्या गावाचा कुणी रहिवासी परीक्रमा करण्यास सुरवात करणार होता का परिक्रमा करून आला होता ते मला नक्कीसे आठवत नाहीं पण त्या परिक्रमावासीला भेटण्यासाठी गावातले लोक तिथे जमले होते. त्या गावाचे नाव होते जहाजपूरा. त्यातील काही रहिवासी आमाच्यापाशी आले 'नर्मदे हर ' करून 'आईये बाबाजी ' असे म्हणत आमचे स्वागत केले. आम्ही त्यांना आज आम्हाला इथे मुक्कामास कुठे जागा मिळेल का? असे विचारल्यावर ' हा, हां बाबाजी, माताजी का मंदीर है,वहाँ आपकी सभी व्यवस्था हो जायेगी ' असे सांगीतले. त्यामुळे पाहुया जहाजपूरा येथील मुक्काम पुढच्या भागात, पण आता नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा अनुभव ९७-
जहाजपूराला आम्ही पोहचलो तेव्हा जवळ जवळ ६ वाजत आले होते,तीथले दोन तीन गावकरी आमच्या बरोबर आम्हाला मंदीर दाखविण्यास आले.आज खूप दिवसांनी आमचा मुक्काम देवीच्या मंदीरात होता.आज आमच्या बरोबर इथे मुक्कामास एक नवीन परिक्रमांवासी होता, जो आम्ही रामानंदी साधूच्या इथून निघत असताना तिथे आला व ह्याचे नाव आहे भावेश महंत , व्यवसायाने याज्ञीकी करणारा हा २२ वर्षाचा गुजराथी परिक्रमावासी.
यानंतर याची जवळ जवळ १ महिन्यांपेक्षा जास्त परिक्रमा आमच्या बरोबर झाली.त्यानंतर मात्र म्हणजेच रामनगर नंतर त्यांने होशंगाबादकडे हायवेने जाणारा परिक्रमा मार्ग पकडला व परिक्रमा पुर्ण केली. हायवे पकडून चालण्याचे कारण म्हणजे त्याला लवकरात लवकर परिक्रमा पूर्ण करावयची होती व जेवढे किलोमीटर चालणे डांबरी रस्त्याने होई त्यापेक्षा कितीतरी कमी किलोमीटर चालणे माईच्या किनाऱ्याच्या मार्गाने होत असे . कारण किनाऱ्याने चालताना चढ उतार,खाच खळगे, चिखल, वाळु यामुळे डांबरी रस्त्यासारखा वेग घेणे तिथे जमत नसे.
त्या वेळी आम्ही माईच्या किनाऱ्याने जाण्याचे ठरवल्याने आमची परिक्रमा त्याच्या परिक्रमे नंतर जवळ जवळ पाच ते सहा दिवसांनी पूर्ण झाली.
जहाजपूरच्या मुक्कामाच्या दिवशी त्याने सांगीतले की तुरनालला भंडारी बाबांच्या इथे त्यांनी जेव्हा प्रथम आम्हाला बघीतले तेव्हा त्याला असे वाटले की जर यांच्याबरोबर आपण राहीलो तर आपली परिक्रमा वेळेत पूर्ण होईल. या मागे कदाचीत हेही कारण असेल की मी बँकेत नौकरी करत आहे व ठरावीक दिवसात मला परिक्रमा पुर्ण करावयाची इच्छा आहे, हे मी तिथे कुणाला सांगत असताना त्याने ऐकले असावे , पण त्याने मात्र मनोमन ठरवले होते की पुढे जिथे जमेल तिथे यांना गाठावयाचे व आपली पुढची परिक्रमा यांच्याबरोबर पूर्ण करावयाची .तो सध्या ज्या परिक्रमावासी बरोबर परिक्रमा करत होता तो ग्रुप खूप संथ गतीने परिक्रमा करत होता व त्याच्याकडे इतक्या संथपणे परिक्रमा करण्यास वेळ नव्हता. तूरनाल नंतर आम्ही छािपानेरला मातांजी कडे थांबलों त्यामुळे त्याला त्या दिवशी आम्ही त्याला भेटलो नाही, पण जहाजपूराच्या आधीच्या मार्गात त्याने आम्हाला गाठले व पुढे महिना सव्वा महिन्याची परिक्रमा त्याने आमच्या बरोबर केली.
जगदंबेच्या मंदीराच्या बाहेर असलेल्या ओसरीवर आम्ही आमची आसने लावली.तेवढयात गावातील अजून काही रहिवासी मंदीरात आले ,त्यातील श्री केशवजींनी आपणहून सांगितले की आजच्या आपल्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था माझ्या घरी होणार आहे.मंदीराच्या आवारात कुठे स्नानाची व्यवस्था दिसत नसल्याने आम्ही त्यांच्याकडे त्यां संर्दभात विचारल्यावर समोर रस्त्याच्या बाजूला एक हातपंप (हापशा )आहे तिथे आपण स्नान करून घ्यावे असे सांगण्यात आले. हापशांपाशी बादली किंवा ड्रम किवा प्लाटीकचा डबा असे काहीच नसल्याने समोर असलेल्या एका घरातून बापूने प्लास्टीकचा टब मागून आणला. आमचे स्नान झाल्यावर थोडया वेळात टब आपणास परत देतो असे बापूने सांगीतल्यावर 'अभी मत दे दो, कल सुबह आपका स्नान होने के बाद भी आप देंगे तो भी चलेगा, ' असे त्यांनी आपणहून सांगितले. त्यामुळे पहाटेच्या स्नानाच्या वेळी परत कुणाकडे पाण्यासाठी काही मागण्याचा पश्न राहीला नाही. आता बऱ्यापैकी काळोख झाल्याने रस्त्याच्या कडेला जरी हापशा होता तरी फारशी वरदळ नसल्याने आमचे एकापाठोपाठ एक असे स्नान झाले. बापू बरेच वेळा आम्हाला त्रास होऊ नये म्हणून हापशाचे पाणी आम्हाला बादलीत आधीच काढून देई. पण त्या बदल्यात आम्ही त्याला पाणी काढून दयावे ही त्याची कधीही अपेक्षा नसे याचे मला कौतुक वाटे, कारण कधी मधी आमच्या नंतर जरी त्याचे स्नान व्हायचे बाकी असले व आम्ही त्याला हापशाचा दांडा मारुन पाणी काढून देऊ लागलो तर आम्हाला तो तसे करून देत नसे. म्हणत असे ' नको दादा, तुला त्रास हाईल, मी काढतो पाणी 'असे म्हणुन आमच्या हातातून हापशाचा दांडा काढुन घई. परमेश्वराने प्रत्येकात कितीतरी गुण, चांगुलपणा देउन त्यांना या भुतलावर पाठवलेले आहे याचे प्रत्यंतर परिक्रमेत खूप वेळा खूप ठिकाणी आले. जणू काही निःस्प्रुह सेवा कशी असावी हेच माई मला जणू काही मला शिकवत होती.
सायंस्नाना नंतर आम्ही माईची पुजा सुरु करणार इतक्यात देवळातील आरतीची वेळ झाली असल्याने गावातील गावकरी मंदीरात जमा झाले त्यामुळे आम्हीही देवळातील उपासना झाल्यावर मग माईची पुजा व आरती करण्याचे ठरवले.परिक्रमा सुरू झाल्यापासून आम्ही हा दंडक पाळण्याचा प्रयत्न खूप वेळा केला की तो आश्रम किंवा मंदीर ज्या ठिकाणी आपण थांबलो आहोत तेथील उपासनेला आपण प्रथम हजर राहणे व नंतर आपली नित्यर्कम अगदी आपली नित्य उपासनाही नंतर करणे. यामागचे व्यवहारीक पहिले कारण असे होते की परिक्रमेत आपली मुक्काम किंवा भोजनाची व्यवस्था हया मंदीरातून किंवा आश्रमातून होत असे त्यामुळे त्या ठिकाणी होत असलेल्या उपासनेला प्रथम प्राधान्य देऊन त्या उपासनेचा मान ठेवणे हा त्यामागचा विचार नक्कीच असे पण दूसरा महत्वाचा आमचा स्वार्थ हा होता की अशा ऊपासनेत आपण मनापासून भाग घेऊन त्या श्रध्दास्थानाचे व तेथील विभुतींचे आर्शीवादही आपल्याला सहज मिळावेत. हे झाले मंदीर किवा आश्रमाचे पण जर कुठे संसारी माणसाच्या घरी आपला मुक्काम झाला तरी त्यांचेही लक्ष आपण कसे वागतो, कसे बोलतो. कशी व किती उपासना करतो याकडे नक्कीच असे हे आमच्या खूप वेळा लक्षात आले. ते आपल्याशी त्या बाबतीत कधीच बोलत नाहीत किंवा टिका करीत नाहीत पण त्यांचे लक्ष आपल्याकडे जरूर असे व हे लक्ष असणे सहजीकच होते कारण ही काही ट्रीप किंवा सहल नसून परिक्रमा होती त्यामुळे परिक्रमावासी कसा असावा याबाबत गावातील लोकांचे काही ठोकताळे होते. असे जरी असले तरी परिक्रमावासी आला म्हणजे माई आली या पुज्य भावनेने ते आपली सेवा नक्कीच करीत कारण त्यांच्या दृष्टीने परिक्रमावासीची सेवा म्हणजे माईची सेवा या व्यतिरीक्त त्यांना दूसरे काहीच ठाउक नसे.
मंदीरात आरती आता लगेच . सुरू होणार असे म्हंटल्यावर आम्ही जगदंबेच्या गाभाऱ्यासमोर हजर झालो. सिहांरूढ असलेल्या व त्रिभुवनाला चालना देणाऱ्या त्या जगत्जननी पुढे तिचे कौतुक, गुणगान सुरू झाले.प्रथम गणपती, नंतर देवी, माईची आरती झाली व सगळे वातावरण चैतन्यमय झाले. उपासनेला आलेल्या बऱ्याच जणांना आमच्याशी तेव्हा परिक्रमे संर्दभात बोलायचे होते पण आम्ही नुकतेच तिथे पोहचलो होतो व आमची नित्याची पुजा, सायंसाधना बाकी असल्याचे त्यांना सांगीतल्यावर त्यानी रात्री आम्ही परत भोजनानंतर इथे येतो असे सांगीतले.
माईची पुजा, आरती झाली व थोडया वेळात केशवजी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायला परत मंदीरात आले व आम्हाला भोजनास त्यांच्या घरी घेउन गेले.
परिक्रमेत असताना मी हे खूप वेळा बघितले व मनास जाणवले की गृहस्थीच्या घरी जेव्हा आमची भोजन प्रसादी होत असे तेव्हां त्या घरची अन्नपूर्णा अतिशय आनंदाने व प्रेमाने आम्हास भोजन प्रसादी वाढत असे ,तसे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत असे.त्यांचा भाव असा असे की परिक्रमावासी म्हणजे माईची लेकरे व त्यांची सेवा करणे म्हणजे माईची सेवा करणे व हा लाभ आपणास मिळाला म्हणून त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून , त्यांच्या वागण्यातून , बोलण्यातून, जाणवत असे .
पण माझ्या मनात मात्र त्यावेळी काही वेगळेच यई, असे वाटत असे की माईच इतक्या रूपानी नटून आम्हा परिक्रमावासीयांची आई या नात्याने अशी काळजी घेत आहे व हे मी माझे भाग्य समजतो की अशा अनेक रूपाने नटलेल्या माईचे दर्शन मला परिक्रमेत अनेक वेळा झाले कधी डॉक्टरांच्या सौभाग्यवतींच्या रूपात तर कधी शेतकऱ्याच्या पत्नीकडून, तर कधी अतिशय प्रतिकुल परिस्थीतीतही परिक्रमावासीयांची सेवा करणाऱ्या तनसानीया गावातील भोळ्या भाबडया माईकडून तर कधी सकाळी सकाळी गावातून जात असतांन आम्हाला चहा पाजण्यासाठी हाक मारणाऱ्या प्रेमळ आजीपर्यत. कारण तीच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपाने येऊन या लेकरांचे लाड पुरवीत होती.
जेवणात काय आहे यापेक्षा माई इतक्या आपूलकीने वाढत आहे हे बघुनच अर्ध पोट भरे व मनापासून आनंद व समाधान मिळत असे. आम्ही निघालो की त्या आमच्या पाया पडत पण आम्ही त्यांच्या पाया पडावयास गेलो की दोन पावले मागे सरकुन म्हणत " नही नही बाबाजी, आप ये क्या कर रहे हो, आप हमारे पैर मत छुओ" इतके माई बद्दलचे प्रेम, आदर त्यांच्या मनात बिंबलेला आहे.
जेवण करून परत मंदीरात आलो, थोडयावेळात जवळपासचे गावकरी मंदीरात जमा झाले. मग परिक्रमे संर्दभात गप्पा झाल्या. उदयनची ही तिसरी परिक्रमा त्यामुळे त्याला आमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहीती होती व मुद्देसुद एखादी गोष्ट मांडण्याची त्याची सवय यामुळे त्या दिवशी जवळ जवळ तास दिड तास परिक्रमेच्या गप्पा रंगल्या. आता मी प्रांजळपणे सांगतो की दिवसभर चालल्यामुळे काही वेळेला रात्री कधी एकदा पाठ टेकतो असे होई आणी अशा वेळी असे कुणी समोर बसले की त्यांचा ऐकण्याचा उत्साह बघुन बोलत बसावे लागे ,नाही तर मन कधीच स्लीपींग बॅगमधे जाण्यास आतूर झालेले असे. पण त्यांच्या डोळ्यात मात्र आम्ही सगळे काही तिकडे सोडुन पूर्ण परिक्रमा पायी करण्यास इथे आलो आहोत याचे खूप कौतुक त्यांच्या डोळ्यात दिसे व आम्हाला ते खूप भाग्यवान समजत. त्या दिवशीही दहा वाजेपर्यंत अशाच गप्पा रंगल्या. आम्हीही त्यांच्याकडून उद्याच्या परिक्रमा मार्गाची माहीती करून घेतली. त्यातील काही जणांना अजून बोलायचे होते पण बाकीच्यांना माझ्या मनातील गोष्ट कळली असावी त्यामुळे त्या दिवशी गप्पा तिथेच संपल्या.
आज देवळाच्या बाहरेच्या पडवीत आमची आसन व्यवस्था होती त्यामुळे एक बाजू सगळी मोकळी होती व पुढे भरपूर झाडे त्यामुळे रात्री थंडीचा कडाका चांगलाच जाणवणार होता.
रात्री झोपण्या आधी परत देवीचे बाहेरून दर्शन घेतले व आपपल्या स्लिपींग बॅग मधे शिरलो. आजही एक बाजू पूर्ण मोकळी होती तरीही कुठलीही शंका, कुशंका मनात आली नाही तेच नेवाड्याला बंद खोलीतही आपण छोटी छोटी भोके विटांच्या तुकडयांनी भरत बसलो होतो हे आठवून मनोमन हसू आले.
सकाळी स्नान, पुजा करून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आवरी घाट, तालपूरा करत दुपारी बारा पर्यंत आम्ही बुधनीला पोहचलो. उदयनने गेल्या परिक्रमेत याच मार्गावर बुधनीला गुलाबजामुन खाल्ले होते. आमेचेही आज सकाळपासून चहाशिवाय बाकीचे काही खाणे झाले नव्हते व आता दूपारचे बारा साडेबारा झाले असल्याने भुकेची जाणीव सगळ्यांना व्हायला सुरुवात झाली होती. सकाळपासून चालणेही भरपूर झाले होते त्यामुळे अर्धा तास कुठेतरी थांबुन आज बांद्राभान पोहाचावयाचे असा आमचा मानस होता.ब्राद्रांभानला तेव्हा महान योगी ,तपस्वी प .पु . राम स्वरुपांनंद महाराजांचे वास्तव्य आहे असे कळले होते त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊन तिथे असलेल्या धर्मशाळेत मुक्काम करण्याचा विचार होता. इथुन बांद्राभान जवळजवळ आठ दहा किलोमीटर वर आहे असे कुणी तरी म्हणाल्याने उदयन म्हणाला की मग इथे गुलाबजामुन खाऊन मग आपण पुढे जाऊ , भुकेमुळे सगळ्यांनी लेगच त्याच्या म्हणण्यास होकार दिला . माझ्याकडे थोडे दक्षिणेचे पैसे होते त्यातुन आम्ही गुलाबजाम विकत घेतले व तिथेच सगळ्यांनी खाऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.
आता सगळा रस्ता टार रोडचा व डोक्यावरती रणरणते ऊन,असा प्रवास सुरू झाला. थोडया थोडया वेळाने आम्ही बांद्राभान किती लांब आहे असे तिथल्या लोकांना विचारत होतो व तेही ' ये इधर आगे ' असे अगदी जवळ असल्याचे सांगत होते. पण रस्ता मात्र काही केल्या संपत नव्हता. पुर्ण रस्त्यापासुन थोडया अंतरावर घनदाट झांडीचा भाग दिसत होता पण तिथुन जाणे शक्य नव्हते कारण व्याघ्र प्रकल्प असे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लावले असल्याने तिथुन जाण्यास परवानगी नव्हती त्यामुळे रटाळ टार रोडवरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्हाला जवळ जवळ ' ये इधर आगे है ' असे सांगत असलेले अंतर चालून जाण्यास जवळ जवळ दोन ते अडीच तास गेले. आता ही हे लिहीतांना तो सगळा दुपारचा प्रवास डोळ्यासमोर आला. कदाचीत महाराजांच्या दर्शनाच्या ओढी मुळेही तेव्हा तो रस्ता खूप जास्त लांब वाटला होता व तिथे लवकर पोहचावे म्हणून त्या दिवशी आमच्या चालण्याचा वेगही खूप जास्त होता. एकीकडे त्यांच्या दर्शनाची लागलेली ओढ , दुसरीकडे दुपारचे रणरणते ऊन व रस्त्याला कुठेही नसलेली सावली किंवा झाडे व प्रत्येक वेळी विच्यारल्यावर 'यहाँ नजंदीक है, ये यहाँ है ' ह्या उत्तरांमुळे ते ठिकाण अगदी जवळ आले असावे असे वाटावे पण पुढे त्याचा मागमूसही नसे. त्या दिवशीचा रस्ता टार रोडचा असुनही अगदी जीवावर उदार होउन चालल्यासारखा मी चालत होतो. साधरण चार साडेचार पर्यंत आम्ही तिथे पोहचलो असू, तसेच पायऱ्या चढून आश्रमापाशी गेलो. थोडया उंचावर पायऱ्या चढून हा आश्रम आहे व त्याच्या समोरच परिक्रमावासीयांसाठी धर्मशाळा आहे व त्यापुढे माईचा वाहणारा अथांग प्रवाह होता. आम्ही त्या पायऱ्या चढून वर गेलो व तिथे महाराजांच्या दर्शनाविषयी चवकशी केली. तेव्हा तिथे आम्हाला समजले की महाराज बराच वेळ ऐकांतात असतात त्यामुळे महाराजांच्या दर्शनाचा योग आज आहे की नाही काही सांगता येत नाही. हे ऐकले व खूप वाईट वाटले तरीही आम्ही सगळ्यांनी ठरवले की बघुया थोडा वेळाने दर्शन होते का? त्यासाठी रस्त्याच्या दूसऱ्या बाजूला समोर असलेल्या धर्मशाळेतही मुक्काम करण्यास काही हरकत नव्हती. म्हणून खाली उतरून आम्ही धर्मशाळेत गेलो. धर्मशाळेत कोणीच परिक्रमावासी नव्हते. सगळ्यांनी आपल्या सॅग धर्मशाळेच्या हॉलमधे काढून ठेवल्या. सॅग ठेवून बापू व भावेश जरा बाहेर बघून येतो म्हणून बाहेर पडले. उदयनही म्हणाला की मी पण परत वर जाऊन बघतो, त्यामुळे इथे सॅगपाशी कुणीतरी थांबांवे म्हणून मी उदय़नला म्हंटले की मी जरा इथे थांबतो, तु जाऊन ये. आज त्या ऊनातून चालण्यामुळे का काय माहीत नाही पण मला खूप दमल्यासारखे वाटत होते.त्यामुळे जसा उदयन बाहेर पडला तसे मी बॅगमधील प्लॉस्टीक बाहेर काढून खाली हंतरले व त्यावर मटकन बसलो. असे वाटत होते की आता लगेच इथेच आडवे व्हावे,अंगातील सगळा त्राण निघून गेल्या सारखे झाले होते. त्यामुळे सॅगला टेकून मी डोळे मीटून बसलो. दोन मीनटे झाली असतील बापू धावत बोलवायला आला ' दादा, दादा चल लवकर, महाराज बाहेर आले आहेत ' मी धडपडून उठून त्याच्या बरोबर धावत परत वर गेलो. पण तोपर्यंत उशीर झाला होता. महाराजांनी दोन मिनीटासाठी एक छोटी खिडकी वजा दरवाजा उघडला होता , उदयन तिथे समोर होता त्यामुळे त्याला त्यांचे दर्शन झाले.उदयनने माझ्या बरोबर माझे तीन सहकारी आहेत असे सांगीतल्यावर त्यांनी उदयनच्या हातावर आमच्या चौघांसाठी लाडूचा प्रसाद ठेवला व खिडकी बंद केली.आम्ही वर गेलो तोपर्यंत खिडकी बंद झाली होती, जीव खूप चुटपुटला, पण काही इलाज नव्हता. उदयनच्या नशीबात दर्शनाचा योग होता , आमच्यासाठी नव्हता असे म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते.
उदयने आमच्या हातावर लाडूचा प्रसाद ठेवला. तो घेउन आम्ही बराच वेळ तिथे उभे राहिलो. सेवेकऱ्यांकडे परत परत भेटावयाची परवानगी मागीतली. पण ती मिळाली नाही. इतक्यात आमच्या समोर पाच सहा लोक (तिथल्या सेवेकऱ्याच्या ओळखीचे होते ) ते आत गेले, मनातून खूप राग आला, पण मग मनाला समजवले की नाही आज आपल्या नशीबात फक्त प्रसादाचा योग होता,दर्शनाचा नव्हता. त्यामुळे पायऱ्या उतरून खाली आलो व परत समोरच्या धर्मशाळेच्या हॉलमधे शिरलो. तरीही मनाची थोडी चिडचिड होत होती, बापूवर पण थोडा रागावलो ' अरे मला बोलावायला खाली येऊन तु तुला होत असलेला महारांजांच्या दर्शनाचा योग घालवुन बसलास. मी आज थोडा आळस केला त्याची शिक्षा मला मिळाली पण तु पुन्हा असे मात्र करू नकोस '
खर तर मला तो आपलेपणाने बोलवायला आला होता पण त्यामुळे तोही महाराजांच्या दर्शनास मुकला होता त्यामुळे आपल्यामुळे त्यालाही दर्शन झाले नाही याचा राग आता जास्त येत होता. नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा ९८-
संध्याकाळ होत आली होती, पुढे मुक्कामाची जागा कुठे आहे हे काही माहीत नसल्याने आज इथल्या धर्मशाळेत मुक्कामास थाबणे योग्य आहे असे मनात ठरवुन आम्ही धर्मशाळेच्या हॉलमधे घुसलो. उदयन थोडा मागाऊन आला व म्हणाला " बाहेर एका काकांनी इथुन पुढे थोडया अंतरावर असलेल्या त्यांच्या राहत्या घरी आपल्याला मुक्कामास बोलवले आहे त्यामुळे आपण लगेच निघूया म्हणजे त्यांच्या घरी वेळेत पोहचू " असे म्हणून तो सॅग घेउन बाहेर पडला. आज इथे येऊन महाराजांचे दर्शन न झाल्याने माझा मुड तर आधीच गेला होता. स्वामींजींचे आपल्याला दर्शन होईल ह्या विचारात आज दूपारच्या उन्हातून बराच वेळ चालणे झाल्याने मला तर खूप दमायला झाले होते त्यामुळे सगळे आवरून बाहेर पडायला व त्यावेळी आवराताना मी बापूशी बोलत राहील्याने बापूलाही तयार होऊन बाहेर पडायला थोडा वेळ गेला. इतक्यात उदयनमहाराज परत आले व म्हणाले " तुम्हाला जायचे नाही का ?तसे सांगा, राहू इथेच आपण,सांगतोय चला लवकर चला लवकर, पण ऐकत नाही तुम्ही ' आम्हाला दोन मिनीटे काय झाले ते काही कळलेच नाही मग लक्षात आले की पारा चढलेला आहे.
मुकाटयानी आम्ही धर्मशाळेतून बाहेर पडलो व रस्त्यानी पुढच्या मार्गाला चालू लागलो.इतक्यात समोरून बाईकवर एक गृहस्थ आमच्या दिशेने येत असलेले आम्हाला दिसले व उदयनकडे बघत म्हणाले ' इधरसे थोडीही दूरी पे हमारा घर है, आप आगे चलिये, मै अभी वापीस आता हूँ . " ज्याअर्थी ते हे सगळे बोलणे उदयनकडे बघून बोलत होते त्या अर्थी मगाशी उदयनला भेटलेले गृहस्थ हेच असावेत असा मी अंदाज बांधला.कारण हा प्रश्न त्याला विचारून अजून काहीतरी ऐकून घेण्यापेक्षा आता गप्प बसणे मला योग्य वाटले.पंधरा वीस मिनटात आम्ही त्यांच्या त्या राहत्या बंगल्यापाशी पोहचलो. मागेपुढे खूप मोठे आवार असलेला त्यांचा बंगला होता तो.बंगल्याला लागुनच एक बेताची शेड होती व त्यात परिक्रमावासीयांच्या मुक्कामाची व्यवस्था त्यांनी केलेली होती . आमच्या आधी तिथे दोन तीन परिक्रमावासीयांनी येऊन आपली आसने लावलेली दिसत होती.आम्ही पोहचल्यानंतरही रात्री उशीरापर्यंत तिथे बरेच परिक्रमावासी येत गेले.
बंगल्याच्या बऱ्याच पुढे असेलल्या आंघोळीच्या जागी आमचे सायंस्नान झाले,पाण्याची उपलब्धता भरपूर असल्याने कपडेही धुउन झाले व थोडया वेळात आमची नित्याची सायंउपासना झाली.थोड्यावेळाने पुण्यातील काही वयस्कर परिक्रमावासीयांचे तिथे येणे झाले , ते शंकर महाराजांचे शिष्यगण होते ,त्यांच्याशी थोडावेळ परिक्रमा व शंकर महाराजांविषयी छान गप्पा झाल्या. रात्रीची भोजन प्रसादी झाल्यावर बंगल्याबाहेर असलेल्या एका मोठया झोपाळ्यावर मी बऱ्याच वर्षानी बसलो.हल्ली जागेअभावी इतके मोठे लाकडी झोपाळे फार ठिकाणी असतात त्यामुळे मोठा झोका न घेता मी त्यावर बसलो. झोपाळ्यावर बसल्या बसल्या सहजच मनामधे लहानपणीच्या आजोळच्या आठवणी ताज्या होत गेल्या. सगळी भावंडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जमून मस्त धमाल करायचो ह्या आठवणीनी सहजच हसू आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही तिथुन निघालो. थोडयावेळातच आम्ही एका मोठया हायवेला लागलो ,तिथे असलेल्या एका चहावाल्याने आम्हाला थांबवून सकाळी मस्त गरमागरम चहा पाजला .ते घेऊन आम्ही पुढे निघालो साधारण चार साडेचार तासाच्या परिक्रमा मार्गानंतर साधरणपणे ११ वाजता आम्ही एका राममंदीरापाशी आलो. त्या ठिकाणाचे नाव मला आठवत नाही पण गुवारसारखे इथेही श्री राम लक्ष्मण व सीता यांचे सुंदर मुखवटे आहेत. ते रूप बघुनच मन प्रसन्न झाले. तिथल्या सेवकऱ्याची परवानगी घेऊन मी व उदयनने मिळून तुलसीदासांनी लिहीलेले पद तिथे गायले.
श्रीरामचंद्र कुपाळू भजमन॥
हरण भव भयदारूण
नवकंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजारूणम ॥ श्रीरामचंद्र कृपाळु भज मन
पद म्हणून झाल्यावर आम्ही तिघेही तिथेच त्यांच्यासमोर थोडा वेळ बसून त्यांच्या त्या सुंदर मुखकमलकडे बघत राहीलो. थोडयावेळाने तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला सांगीतले की आता थोडयावेळात भोजनप्रसादी तयार होईल तेव्हा ती घेऊन मग आपण पुढे जाण्याचे ठरवावे. थोडया वेळात एक तरूण सन्यासी तिथल्या मोकळ्या जागेत आले, तिथल्या सेवेकऱ्याकडून ते आश्रमाचे मुख्य महंत आहेत असे कळल्याने त्यांना भेटावयास आम्ही तिथे गेलो.त्यांना नमस्कार करून त्यांच्याशी थोड़ा वेळ बोलणे झाले.आमच्याकडील रामरायांबद्दलही मग झाला. तेव्हा रामरायांचे व देवीचे मंदीर माईच्या किनारी बांधुन तिथेच एक आश्रम बांधुन राहण्याचा आमचा विचार आहे असे आम्ही त्यांना सांगीतले. तेव्हा ते म्हणाले ' क्यूं इस झंझट,झमेले मे पडते हो, आश्रम और मंदीर की व्यवस्था रखना बहोतही कठीण काम है.पुजा पाठ, परिक्रमांवासीयांकी सेवा, मंदीरकी देखभाल और आश्रम की देखभाल ये सब आपकोही करना पडेगा. आजकल सेवाभावंसे सेवा करनेवाले लोग मिलना बहूत कठीण काम है . इससे अच्छा आप ऐसा काई आश्रम ढुंड लिजीये ,जहाँ आप कभी भी जायेंगे तो आप चाहे जितने दिन आपके रहने का प्रबंध हो सके, उसके लिये आपको उस आश्रम को कुछ रक्कम दानरूप मे देनी होगी. इससे होगा क्या, आपकी नर्मदा किनारे साधना भी हो जायेगी और जिस आश्रम मे आप रहोगे उस आश्रम मे कुछ सेवा करनेका मौकाभी आपको मिल जायेगा. "
आम्ही बोलत असताना सेवेकऱ्याने भोजन प्रसादी तयार आहे असे महंताना सांगीतले. तिथल्या मुख्य सेवेकऱ्यानी रामरायांना भोजन प्रसादीचा भोग दाखवला व आम्हाला आमचे ताट, भांडे घेऊन तिथल्या हॉलमधे येण्यास सांगीतले.काल भेटलेले वयस्कर वयातील परिक्रमावासी आमच्या आधीच तिथे येऊन विश्रांती घेत असलेले आम्हाला दिसले.सकाळी त्यांना चालावयास त्रास होऊ लागल्याने ते वाहनाने इथे येऊन पोहचले होते व इथे त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली होती. भोजनप्रसादीच्या वेळी ते हॉलमधे आल्याने आमची परत भेट झाली. इथे मला असे वाटते की ११ वाजेपर्यंत पोहचाणाऱ्या परिक्रमावासीयांची भोजन प्रसादीची व्यवस्था होत असावी कारण सव्वाबारा सोडबाराच्या पुढे आलेल्या मध्यप्रदेशमधील १० ते १२ परिक्रमावासीयांना त्यांनी आपणास तयार भोजन प्रसादी नाही तर कोरडा शिधा मिळेल असे सांगीतले. त्यामुळे ते दहा बारा परिक्रमावासी तिथे न थाबता पुढे निघून गेले. आमची भोजन प्रसादी तिथे झाली. या प्रसादी किंवा प्रसाद या शब्दावरून श्री बेलसरे आजोबांनी 'प्रसाद ' या शब्दाचा सांगीतलेला अर्थ सहज आठवला त्यांनी या शब्दाचा अर्थ इतका यथार्थ सांगीतला आहे त्याला तोड नाही. ते म्हणतात प्रसाद म्हणजे प्र+सद् म्हणजे अंतःकरण निर्मल होणे. आपल्या अंतःरंगात जे बाह्मांग भरलेले आहे, त्याने आत जी घाण झालेली आहे, ती बाहेर जाऊन आपले अतःकरण निर्मल होणे याचे नाव ' प्रसाद '. आपल्या मनात ज्या बाहेरच्या वस्तूंच्या वासना आहेत, त्या वासनेने जी घाण झालेली आहे ती नाहीशी होणे. राग द्वेष , आवड निवड, ज्याची नाहीशी झाली आहे त्याला प्रसाद "झाला " त्यांचा मते हा भगवंताचा खरा प्रसाद हा आहे. पण आपली प्रसादाची जी कल्पना आहे ती म्हणजे खायला मिळणे , ते म्हणतात ती पूर्ण चुकीची आहे.
त्यांनी शब्द वापरला आहे 'झाला ' व माझ्यासारखा म्हणतो प्रसाद मिळाला.आता 'मिळाला 'पासून 'झाला ' पर्यंत प्रवास करणे व त्यासाठी प्रयत्न करणे एवढे माझ्यासारख्याच्या हातात आहे व त्यासाठी सद्गुरूंना अनन्यभावे शरण जाऊन त्यांनी दिलेले नाम अथक पूर्व घेत राहाणे हाच एक उपाय आहे.
प्रसादी घेऊन आम्ही लगेच आमच्या पुढच्या प्रवासाला सुरवात केली.दुपारची वेळ व त्यात झालेली भोजन प्रसादी त्यामुळे चालताना हवा तसा वेग येत नव्हता , दुपारच्या भोजन प्रसादीची नसलेली सवय ही गोष्टीही त्यास कारणीभुत होती.आमचे जवळ जवळ अडीच ते तीन तास राममंदीरात थांबणे झाल्याने सकाळच्या वेळात आमचे नेहमी जेवढे अंतर चालणे होत असे तेवढे आज काही झाले नव्हते.त्यामुळे त्या दिवशी आम्ही संध्याकाळपर्यंत कुसुम खेड्यापर्यंत पोहचलो. सकाळी नित्यकर्म व माईची पुजा पाठ करून लवकरच आम्ही कुसुम खेडयाहुन निघुन परिक्रमेच्या मार्गाला लागलो. आज अजून सुर्यदेवानी गगनात आपली हजेरी लावली नव्हती त्यामुळे हेवत बऱ्यापैकी गारवा होता,थोडया उंधुक उजेडात आम्ही पुढचा रस्ता चालत होतो.
एक पंधरा वीस मिनीटाचे अंतर चालल्यावर दोन रस्ते दोन वेगवगळया दिशेला जाताना आम्हाला दिसत होते त्यामुळे कुणाला तरी विचारूनच मग पुढे जाण्याचे ठरले. नेहमीप्रमाणे उदयन ती चवकशी समोरून येणाऱ्या ग्रामस्थांकडून करून घेतली व आम्ही पुढे निघालो . आता इथुन पुढे रायसन जिल्हा सुरू होतो,थोडे अंतर चालून गेल्यावर आम्ही रस्त्याच्या जवळच असलेल्या एका गुळाच्या छोटा कारखाना किवां रस काढावयाच्या गाळप केंद्रापाशी आलो.आत ऊसाचा रस काढण्याचे काम इतक्या सकाळी ही चालू होते.हवेत गारवा असल्याने तेव्हा उसाचा रस प्यावा अशी इच्छा आम्हा कुणाला झाली नव्हती .आम्हाला रस्त्यावर बघून आतल्या माणसाने 'नर्मदे हरे 'बाबाजी 'अंदर आईये.' असे म्हणत आम्हाला आत बोलावले व म्हणाला 'बाबाजी अंदर आईये, आपको बढियासा गन्ने का रस पिलाता हूँ, तबीयत खुश हो जायेगी आपकी ' मग त्यांनी त्यांच्या बरोबरच्या माणसाना नवीन ऊस मशीनमधे घालण्यास सांगीतले व तो ताजा रस घेऊन तो माणूस आमच्या समोर उभा राहीला व म्हणाला बाबाजी 'आपके गिलास निकालीये, ' आम्ही आमचे मग त्याच्या पुढे केले तेव्हा त्यानी पुर्ण ग्लास भरून रस आमच्या मगात ओतला. नेहमीप्रमाणे इतका रस सकाळी प्यावा की कसे असे सहज मनात आले. पण तो विचार मागे ढकलला व आज सकाळी सकाळी माईला बहुतेक आपल्याला चहा ऐवजी ऊसाच्या रसपानातला आनंद काय आहे हे दाखवण्याची इच्छा झाली असावी असा सहज विचार आला. नर्मदे हर म्हणत ग्लास ओठांना लावला व तो पहिला रसाचा घोट इतका चविष्ट व अप्रतिम होता की आजपर्यत रसाच्य गुऱ्हाळात आपण नक्की कुठला रस प्यायलो असा क्षणभर प्रश्न पडला. त्या चविष्ट चवीमुळे पाहिला ग्लासभर रस कसा पोटात गेला हे समजलेच नाही ,आमचे ग्लास खाली झाल्यावर परत त्याचा माणूस आमाच्या समोर येऊन उभा राहीला व म्हणाला '' बाबाजी और एक एक ग्लास लीजीये , इससे कुछ नही होगा, मी थोडा भीत भीतच ग्लास पुढे केला कारण इतका रस तेही सकाळच्या थंड वेळी, हे सगळे शहरी चौकटीत बसणारे नव्हते .
प्रेमाच्या शुद्ध भावनेने दिलेला तो रस त्यांच्या त्या भावनेमुळे उसाच्या गोडीतही किती मिठास आणू शकतो या अनुभवाची गोडी आम्ही त्या वेळी घेत होतो. रस पिऊन झाल्यावर रसापासून गुळ कसा बनवतात हे थोडे पुढे जाऊन आम्ही पाहून आलो. तेव्हा त्यांना शेवटी न राहवून मी विचारलेच की 'काकाजी आपने रस मे क्या मिलाया था की वो इतना बढिया हुआ था '. तेव्हा ते हसत हसत म्हणाले ' कुछ नही बाबाजी , थोडा अद्रक, थोडीसी मिरची और लिंबू , और बनाऊ क्या? अभी दो मीनट हो जायेगा '.आम्ही हसत हसत त्यांना'नको ' म्हटले कारण सकाळी सकाळी प्यायलेल्या दोन ग्लास रसाने आताच पोट पूर्ण भरले होते. मग त्यांनी त्यांच्या माणसाला बोलवून आम्हाला भरपूर खमंग गुळ देण्यास सांगीतले. गुळही जरी अतिशय चविष्ट होता तरी तोही आम्ही थोडाच घेतला कारण सॅगमधे त्याचे वजन तेव्हा सगळ्यांना जास्त वाटत होते.
आम्ही तिथुन पुढच्या मार्गाला लागलो .आज सकाळी सकाळी चहा ऐवजी माईने हे उत्साहवर्धक पेय आम्हाला दिले होते. अर्धा पाउण तास तर आमचा तिथे आज सहज गेला होता. काय माहीत नाही पण त्या दिवशी दूपारपर्यंत आमचे नेहमी इतके काही चालणे झाले नाही. उदयन आम्हाला म्हणालाही की आता संध्याकाळपर्यंत आपल्याला हे अंतर कव्हर केले पाहीजे.
आम्ही आता रायसन जिल्हातून जात असताना एका थोडया घनदाट अशा वनराईत एका नवीन बांधलेल्या आश्रमापाशी पोहचलो. आजूबाजूला भरपूर झाडे , बसावयास एक छान पार यामुळे सहजच आमचे तिकडे थांबणे झाले.तेथील सेवेकऱ्यांनी आम्हाला अतिशय गोड अशी पपई कापून आणून दिली व आज आम्ही तिथेच विश्रांती घ्यावी म्हणून तो आग्रह करू लागला. आपण थोडी विश्रांती घ्या मी आता आपल्यासाठी भोजन प्रसादी बनवतो हेही त्याने सांगीतले. मगाशी बालणे झाल्यामुळे आता कुठही जास्त न थांबता आज राहीलेल्या वेळात जास्तीस जास्त चालून पुढे जायचे हे तोपर्यंत डोक्यात अगदी फीट झाले होते त्यामुळे मी, बापू व भावेश निघण्याची घाई करू लागलो व उदयनला मात्र तेव्हा काय झाले होते ते माहीत नाही पण त्याच्या देहबोलीवरून आपण आज इथे थांबुया असे वाटू लागले होते.पाहूया आम्ही तिथेच राहीलो का पुढे गेलो पुढच्या भागात. नर्मदे हर
लेखक : सुनिल वसंत मराठे