आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा - संजीव कोकीळ
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा - संजीव कोकीळ
आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा - संजीव कोकीळ
भाग 1..
कैवल्यधाम आश्रम द्वारा बसने आयोजित होणार्या "आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा" यात्रेत दरवर्षी सामिल होणारे मुंबई पोलिस चे से.नि. वरिष्ठ अधिकारी ठाणे निवासी श्री संजीव जी कोकीळ ह्यांचे मैय्याबद्दल चे प्रेमळ अभिमत :-
अमरकंटक.
नर्मदा माई दूधधारा प्रपात. बाजूलाच विख्यात मुनी दुर्वासांची गुहा. अतिशय रम्य स्थळ. पवित्र वातावरण. अशा ठिकाणी हजारो वर्षे तपस्वी ध्यान धारणा करित होते त्यामुळे वातावरणात त्या पवित्र लहरी आजही कायम असल्याच्या जाणवतात. आध्यात्मिक जाणीवा समृद्ध करून टाकतात. भारतीय पुरातन संस्कृती जाणून घ्यायची तर नर्मदा तटावर भटकंती केल्याबिगर पर्याय नाही. त्यात परिक्रमा सर्वोत्कृष्टच. पण पायी परिक्रमा करायची म्हणजे मनाची तयारी हवी. नर्मदा माईबद्दल प्रेम ,आदर ,समर्पण हवं. कष्ट झेलण्याची तयारी हवी. तितकाच तिच्या साक्षात अस्तित्वाबद्दल जबर विश्वासही हवा. देवांच्या पापक्षालनार्थ जिचं अवतरण झालं तिनं आपल्या पित्याकडून मानव, पशुप्राणी, वनस्पती, कीटपतंग इतक्या सर्वच जीवांचं कल्याण व्हावं म्हणून वर मागून घेतला. देवाधिदेव महादेवाची ती लाडकी पुत्री... पिताजी नाकारतील कसे ?मागितलं ते सगळं दिलं. अगदी कल्पांतानंतरही शाश्वत अस्तित्व बहाल केलं. म्हणून ती जीवोद्धारक ढ
ठरली... देव, यक्ष, गंधर्व किन्नर येवढच नाही तर राक्षसांनी सुद्धा तिच्या तटावर वेळोवेळी घोर तप करून महादेवास प्रसन्न केलय. तिला तसं वरदानच होतं.. तिच्या तटावर तपस्वी साधकास हवी ती सिद्धी प्राप्तीचं वरदान तिनं पित्याकडून घेतलच होतं. रावण /मेघनाद/हिरण्याक्श /सहस्रार्जुन ही काही उदाहरणं... तिच्या तटावर तप केल्यानं महादेवास वर देणं क्रमप्राप्तच असायचं. त्याचं निराकरण नंतर भगवान विष्णुना करावं लागायचं. असो. आध्यात्मिक मुमुक्षु जनांचं तिनं कल्याणच केलय. मार्कंडेयांपासून ,भृगु, दुर्वास, अगस्ति, जमदग्नि, अत्रि या सर्व रथीमहारथींचं वास्तव्य नर्मदे काठी होतं. अवधूत श्री दत्तात्रेयांचं अवतरण तिच्याच तटी झालय. वाल्मिकींचा आश्रम इथेच उत्तर तटावर. नर्मदेच्या जंगलात परिक्रमावासीना लुटणा-यांपैकीच वाल्या होता. वाल्मिकी इथेच झाला. तपस्वी झाला .सिद्ध मुनी म्हणून पावन झाला. श्रीरामाचंही काही काळ वास्तव्य असणारे नर्मदा नदीचे दोन्ही तट म्हणूनच पवित्र आहेत. आजही कितीतरी भक्तांना /परिक्रमावासींना मैय्या अद्भुत लीला दाखवते. धन्य धन्य करून टाकते. १९५२ ते ५५ च्या काळात बंगाली बाबू शैलेन्द्र नारायण घोषाल या पठ्ठ्यानं केवळ वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करायचं म्हणून तीन ते साडेतीन वर्षे पायी अनवाणी परिक्रमा केली. स्वत:वेदशास्त्र संपन्न असल्यानं व तरूणपणातच परिक्रमा केल्यानं आलेले अनुभव असे कांही शब्दबद्ध केलेयत की वाचणारा हादरून जावा. मी चकितच झालो. केवळ एकदाच परिक्रमा करून त्यांनी आलेले अनुभव प्रत्यैकी तीनशे पानाचे आठ खंड लिहून नंतरच्या कित्येक पिढ्यांवर उपकारच केलेयत. इतकी समग्र परिक्रमा माझ्या वाचनात नाही. अगदी अलिकडच्या काळात भारती ठाकूर /जगन्नाथजी कुंटे/प्रतिभाताई चितळे /अण्णा महाराज बावस्कर या सर्वांची परिक्रमेवर लिहिलेली पुस्तकं वाचून /व्हिडियो क्लीप्स यू ट्युबवर पाहून ऐकून आता महाराष्ट्रातून नर्मदा तटी झुंडीच्या झुंडी जात आहेत. मीही त्यातला एक.
मैय्याचं दर्शन हवं तिच्या दिव्य अनुभूती हव्या तर पायी परिक्रमा केली पाहिजे यात संशयच नाही. पण प्रकृति कारणास्तव खूपजण पायी नाही जाऊ शकत. बसने परिक्रमा करतात. करावी लागते. पर्यायच नाही. पण ती परिक्रमा गणली जाऊ शकत नाही असा बराच जणांनी दावा केला. मला कसलाही विवाद करायचा नाही किंवा त्यांचा दावा खोडायचाही नाही. पण तुम्ही निर्मळ मन अहंकारविरहीत करून जर तिला भक्तिभावाने समर्पित होणार असाल तर ती तुम्हाला बसच्या परिक्रमेतही दिव्य अनुभूती देते. अनेकजणांनी त्याचा अनुभव घेतलाय.
मीही नर्मदा मैय्याकडे आकर्षित झालो. तिकडे धावलो. तिनं स्वीकारलं. भरभरून दिलं. मला धन्य करून टाकलं .अहो, दर्शनमात्रे प्रसन्न होणारी म्हणून ख्यातीच आहे तिची. ते तिनं मला गरूडेश्वर मुक्कामी दाखवून दिलं.
मी २०१८/२०१९ या दोन वर्षात कैवल्यधाम आश्रम,( ग्राम कटघडा, तहसील -बडवाह जिला.. खरगोन,)मध्य प्रदेशच्या माननीय अविनाशजी महाराज व त्यांचे सुपुत्र अनय रेवाशीष आयोजित आध्यात्मिक नर्मदा परिक्रमेत बसने सामिल झालो. ( यांचं परिक्रमा आयोजन अतिशय सुंदर /प्रामाणिक आहे.) दोन्ही वेळेस मैय्यानं भरभरून प्रेम दिलय. सविस्तर पुन्हा कधीतरी या विषयावर लिहिनच.
तूर्त, नुकतीच दि. १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१९ची दुसरी परिक्रमा त्यांच्याबरोबर घडली.
अमरकंटक म्हणजे साक्षात देवभूमीच. तिथे नर्मदामैय्याची जलधारा अतिशय लहान निमूळती व अवखळ आहे. ती नेमकी दुर्वास मुनींच्या गुहे समोरूनच जाते. अतिशय रम्य परिसर. पवित्र वातावरण. साधक असेल तर लगेच ध्यानास बसल्याशिवाय राहणार नाही. मी मंत्रमुग्ध झालो. पंधरा एक मिनिटं डोळे मिटून बसलो. आनंद घेतला. परत निघालो तर जिथून नर्मदा मैय्या धारा बनून कोसळते तिथला पाण्याचा खळखळाट मनास भावला म्हणून मोबाईल फोटो घेतला. तिथल्या शिळेस दुर्वास शिळा नाव आहे. फोटो घेतला. परतल्यावर पाहून मीही चकित झालो... त्यात कोणाचा चेहेरा प्रकट झालाय ?हे आता आपणच ठरवायचय. तो फोटो सोबत देतोय. जरूर पहा. मैय्या कितीतरी प्रकाराने आपणास तृप्त करत असते. अनुभूती देत असते. मी बहु संतोष पावलो.
आता आणखी येणे जाणे होतच राहील. मीही तिला अंतरणार नाही आणि तीही मला अंतर देणार नाही. हा विश्वास !
पश्चात जीवनात.. वानप्रस्थाच्या ह्या काळातील आनंददायी घटना आपणासर्वांसोबत वाटून घेताना विलक्षण समाधान व आनंद होतो आहे. तो तुमच्याही वाट्यास येवो. ही सदिच्छा.
नर्मदे हर ! ... संजीव कोकीळ.
( 9820462853 )
भाग २..
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर...! (लेखांक२)
नोव्हेंबर २९ ते १५ डिसेंबर. सन २०१८
कैवल्यधाम आश्रम .(9826764226).संस्थापक - श्री अविनाशजी महाराज. सह- श्री अनय रेवाशीष (नर्मदा पुऱाण प्रवचनकार). ग्राम -कटघडा. तालुका -बडवाह. जिला-खरगोन. म. प्र. येथून पहिल्यांदा बसने परिक्रमा सुरू करण्याआधीच्या वर्षातील हकिकत. ......!
यू ट्यूब चैनेलवरून मी अनयजींना गाठलं... एव्हाना जगन्नाथजी कुंटे /प्रतिभाताई चितळे/अण्णामहाराज बावस्कर /सतीश चुरी विरार ह्यांची परिक्रमेवरची पुस्तकं पुन:पुन: वाचून झाली होती. यू ट्यूब वर सारखं ऐकत होतो पण मन भरतच नव्हतं. नर्मदा दर्शनाची अनिवार ओढ खेचत होती पण नेमका दिवस नेमकी दिशा गवसत नव्हती. त्यातच श्री दाजी पणशीकरांना प. प. श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या चरित्रावर ऐकता आलं.. स्वामींच्या चरित्र ग्रंथात अनेकवार नर्मदा माईचे उल्लेख आहेत. शेवटी स्वामींचा देह नर्मदा माईतच सामावून गेला हेही त्यांचं वैशिष्ट्य.. कुठे तरी मन हेलावून गेलं... त्यात पुन्हा स्वामींना शूळपाणेश्वर जंगलातून गरूडेश्वरी जाण्यात अश्वत्थाम्यानं मदत केली...तेही कुतूहल... मी अश्वत्थामा आहे.. अशी ओळख आतापर्यंत त्यानं फक्त स्वामींनाच दिलीय. इतरांना मदत करून तो लगेचच गुप्त होत गेलाय. त्यामुळं मन सतत गरूडेश्वरी धाव घेत होतं. स्वामींबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी म्हणून श्री मकरंद परचुरे , बलवंत पुस्तकालय, गिरगाव ह्यांना गाठलं. त्यांनी स्वामींच्या चरित्राचे नऊ खंडांचा एकच संच शिल्लक असल्याचेसांगितले.म्हटलंमाझ्यासाठीच उरलाय देऊन टाका. आणला. वाचन सुरू झालं तेव्हा चौथा खंड संपल्यावर मी नर्मदा तटी कधी पोहोचलो कळालेच नाही. भाच्याचं लग्न होतं बडोद्याला. कारनं निघालो. सोबत पत्नी माधुरी होतीच. भरूच आलं आणि मैय्याचं विशाल पात्र नजरेस पडलं. चकित व्हायला झालं. माहितच नव्हतं कोणती नदी? विचारलं एकाला रस्त्यावर थांबून.. त्यानं माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं, हसला.. म्हणाला ये तो नर्मदाजी हैं... मला सुखद धक्का! तशीच गाडी खाली घाटाकडे वळवली. कपडे बदलले ते थेट पात्रात जाऊन स्नान केलं. काठवर आलो तिथे एक जोडपं उभं होतं शुभ्र वस्त्रांवरून ते परिक्रमेत असावेत. विचारपूस केली. त्यांना नमस्कार केला. दक्षिणा दिली. त्यांनी मावळतीलाच मैय्याच्या आरतीसाठी चलण्याची विनंति केली. गेलो. आरती हिंदीत होती. बरं वाटलं. परत प्रवास बडोद्याला सुरू केला. ही मैय्याची पहिली भेट. प्रथम दर्शन. दर्शन मात्रच ती प्रसन्न होते ही तिची ख्याती. बडोद्यात लग्नाला वेळ होता. सहज चौकशी केली गरूडेश्वर किती दूर? म्हणाले.. ८० किमी... दुस-या दिवशी दहा वाजता गाडी काढली एकट्यानेच दुपारी साडे बारा पर्यंत गरूडेेश्वर गाठले. मनात प्रचंड उत्सुकता साठली होती. मैय्यानं मनाचा केव्हांच ताबा घेतला होता .
तेथूनच श्री दाजी पणशीकरांना फोन केला त्यांचे आशीर्वाद घेतले. म्हणाले रिकाम्या हाताने जाऊ नकोस. सोबत नारळ व फुले घेतली. कपडे बदलले अन् घाटावर टळटळीत उन्हात उतरलो. घाटावर डावीकडे दोन महिला कपडे धूत होत्या मी उजवा कोपरा गाठला. शेवटची पायरी.
समोर अथांग मैय्या. डोळे तृप्त. मनात अनामिक आनंद, हुरहूर सुद्धा. भारल्यागत मी हातात नारळ घेतलं, फुलं घेतली. डोळे बंद केले मैय्याला नमस्कार केला... काय मागायचं तिला? मी नवीन.. तीही मला तशी अनोळखीच. आपल्या संसारातल्या अडचणींचा पाढा वाचायचा? पोलीस खात्यातल्या संघर्षाचा अहवाल वाचायचा? नक्की काय करावं? मन गोंधळलेलं. त्याला बळेबळे स्थिर केलं. शांतपणे माय तुझी कृपा असू दे लेकरांवर म्हटलं , अन् भाविकपणे श्रीफळ फुलांसहीत तिला अर्पण केलं..... नारळ पाण्यात पडला.. छपाक्.... असा आवाज करूनच. तेवढ्यात... एकदम पाठीमागून एकजण ओरडलाच... अरे, साहब आपने मैय्याको क्या मांगा ? मी चमकलो.....
तो तसा का ओरडला? कोण होता तो? मैय्या दर्शनमात्र प्रसन्न हेाते ती कशी? मैय्यानं दिलेला पहिलाच थरारक दर्शनानुभव पुढील भागात.. लवकरच. नर्मदे हर !
- संजीव कोकीळ 9820462853
भाग:- ३ ..
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर !....लेखांक ३
कैवल्यधाम आश्रम. (नर्मदा उत्तर तट. ग्राम-कटघडा, ता. बडवाह, जि. खरगोन. मध्य प्रदेश.)
संस्थापक.. श्री अविनाशजी महाराज. सह.. सुपुत्र अनय रेवाशीष (नर्मदा पुराण प्रवचनकार)
फोन - 9826764226
नर्मदामाईशी माझा परिचय अलिकडच्या तीन चार वर्षातीलच. पण सर्वच विलक्षण, सगळं अद्भुत... संबंध इतका घनिष्ट झाला की- गरूडेश्वरात प्रथम दर्शनातच आगळ्यावेगळ्या रूपात दर्शन दिल्या दिवसापासूनचा प्रवास काल परवा म्हणजे दिनांक २७ नोहेंबर २०१९ ला नेमावर घाटावर तिचं सगुणसाक्षात दर्शन घडलं वरती तिचं सान्निध्य काही सेकंदापुरतं का होईना प्राप्त झालं.. अनुभवता आलं, हे काय कमी? मी पायी परिक्रमावासी नव्हतो. बसने परिक्रमा घडली. दोन्ही वेळा कैवल्यधाम आश्रम आयोजित बस परिक्रमेत सामील होतो. ती हकिकत नंतर येईलच. त्या आधीच्या काळातील घडलेल्या तीन चार घटना आधी सादर करतोय. म्हणजे मैय्याचं प्रेम कसं वृद्धिंगत होत गेलं.. आसुसल्यागत मीही कसा तिच्या तटा कडे खेचला गेलो हे आपल्या लक्षात येईलच. असो.
तर त्या दिवशी टळटळीत दुपारी बहीण सीमा अंदोरे चं बडोद्यातील लग्नघर सोडून मी गरूडेश्वरी धावलो. घाटावर उतरून मैय्यास नमस्कार करून श्रीफळ मनोभावे अर्पण केलं.... छपाक्कन आवाज पाण्यात पडल्याचा आला अन्......
तो ओरडला.... अरे.. साब आपने मैय्यासे क्या मांगा ? मी चमकलो होतो... मागे वळून बघितलं तर एक पंचवीशीतील तरूण उभा होता.. मला पुन्हा विचारत होता.. साब.. मैय्यासे आपने क्या मांगा? देखो मैय्याने कुबूल कर लिया.. मला कळालेच नाही त्याला नक्की काय म्हणायचय ?मी जरा गोंधळलो होतो. मला वाटले मी नवा.. माझ्या हातून काही चूक तर नाही घडली? पण तो तर म्हणाला की मैय्याने कुबूल कर लिया. माझा गोंधळ आणखी गडद झाला. मी त्याला प्रश्न केला आप कौन हो भाई?.. तो सेकंदभर घुटमळला... म्हणाला मै परकम्मावासीयों की गाडी का ड्रायव्हर हूं... देखो मैय्या तुम पर प्रसन्न हो गयी... देखो बलबले आ रहें है... मला परत प्रश्न पडला की नक्की काय?.. तो माणूस माझ्या पाठी दहा फूटावर उभा आणि कसले बलबले? मी त्याला म्हणालोच भाई आप क्या बोल रहे हो मेरी समझ मे नही आया. आता तो माझ्या जवळ आला. पाण्यात त्यानं बोट दाखवलं पण मला काहीच उलगडा झाला नाही. मी पुन्हा प्रश्नार्थ मुद्रा केली.. त्यानं मला मग वाकून मैय्याच्या नितळ स्वच्छ पाण्याकडे अंगुलीनिर्देश करून म्हणाला वो देखो बलबले उपर आ रहे हैं.... मी जरा निरखून पाहिलं.. मी शेवटच्या पायरीवर कडेला उभा होतो.. तिथेच पाया जवळ पाण्यातून बारीक सूक्ष्म अशी बुडबुड्यांची रांग हळूहळू वरती येताना दिसत होती... अगदी बारीक नगण्य... जशी स्प्राईटची बाटली उघडल्यावर येते तशी बुडबुड्सांची रांग... मग! मी म्हटलं.. यह क्या है.... अरे साब. तो उत्तेजित होऊन म्हणाला.. मैय्या जब भी किसीपर प्रसन्न होती है तो यह रूप मे दर्शन देती है... मला काही पटेना.. व कळेनाही... त्याला ते समजले.. त्यानं मला तिथेच बसकण मारायला लावली. म्हणाला साब अभी आपको यह बलबले बिल्कुल छोटे दिखते है ना आप अभी जोरजोरसे मैय्या को पुकारो.. फिर देखना... बलबले बडे बडे होते जाएंगे.. हां ! मी चक्रावलो.. हे सगळं चमत्कारिकय याचा अंदाज आला पण मैय्याची कृपा, हा अनुभव एकदम वेगळा... क्षणभर मनात आलं की दहा फुटावरून याला इतके बारीक बुडबुडे दिसलेच कसे? पण मी लगेच भानावर आलो आणि त्यानं सांगितल्याप्रमाणं नर्मदे हर.. नर्मदे हर.. नर्मदे हर असा जोरात पुकारा केला... आवाज मैय्याच्या जलावर तरंगत होता... मी सहज खाली पाहिले.. अन् चमकलोच.. आता लहान बुडबुडे मोठे मोठे होत होते.. अगदी आपण फिश टैंक मधे जसे हवेचे बुडबुडे पाहतो तसे.... मी चकित झालो... क्षणात मागे पुन्हा वळून पाहिलं... पुन्हा आश्चर्याचा धक्काच.... तो माणूस तेथे नव्हताच.. घाट परत चढतानाही कुठे पाय-यांवर नजर नाही आला... मी सुन्न... इकडे नर्मदा माईचं रूप मोठे मोठे बुडबुडे धारण करत होतं.. मी त्या माणसाचा विचार मनातून झटकला अन् आपसुक मोठ्या आवाजात नर्मदे हर... नर्मदे हर पुकारत राहिलो.... तो काय , पाण्यात आता मोठ्या बुडबुड्याची दुसरी रांग जोरात पाण्यातून वर झेपावत होती.... माझं माईला पुकारणं आता हर्षभरीत झालं होतं... मी आनंदून गेलो.... आता तिसरी चौथी रांग वेगवेगळ्या ठिकाणातून वरती झेपावत होती..... मी माईचा पुकारा सुरूच ठेवला... तेवढ्यात माझा हात मोबाईलकडे गेला मी झट्कन एक दोन फोटो खेचलेच.. सोबत दिले आहे.. जरूर अवलोकन करा.... आता माझा आनंद वाढीस लागला. पण म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती! मी जरा निरखून पाहिलं कुठल्याच सांदीकोप-यातून बुडबुडे वर येत नव्हते तर चक्क दगडी फरशीच्या मध्यातून येत येत होते.... माझं नर्मदे हर.. नर्मदे हर.. सुरूच होतं.... हा आनंद मी जवळ जवळ पाचएक मिनिटं घेतला. माझे डोळे पाणावले.... मैय्याला किती त्रास द्यायचा... विचार मनात आला... मैय्याला मनापासून प्रणाम केला व म्हणालो मैय्या.. मी तृप्त झालो... बास्स.....! आणि काय सांगू माझ्या तोंडातून स्स चा उच्चार झाला आणि सेकंदात सगळ्या बुडबुड्याच्या रांगा ठप्पकन् बंद झाल्या... मी आता शहारलो होतो.. मोहोरलो होतो.. मैय्याच्या अस्तित्वाची चुणूक दाखवून ती आता निवांत संथपणे वहात होती. तिच्या विशाल पात्रास मी मनोभावे पुनः पुन: प्रणाम केला. उठून बसलो... त्या माणसाचं पुन्हा दर्शन झालं नाही... कोण होता तो...? त्यानं मला बलबले म्हणजे काय हे समजावून सांगितलं नसतं तर? नर्मदे हर जोरात पुकारण्याची माहितीच दिली नसती तर?... कोण सांगणार होतं मला? मैय्याच्या ह्या लीलेनं मी भरून पावलो होतो.. मनोमन त्या अनोळखी माणसास प्रणाम केला.. खरच कोण होता तो?... मी अंग पुसलं कपडे बदलले आणि एका विलक्षण उन्मनी अवस्थेत प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींच्या समाधी मंदिरात पोहोचलो.. साष्टांग दंडवत घातला.. समोरच्या पादुकांवर डोकं ठेवलं... सदैव कृपादृष्टी या पामरावर ठेवा म्हणून साकडं घातलं... वरच्या श्री दत्त मंदिरात आलो पण मंदिर बंद असल्यानं जाळीतूनच महाजांना मनोमन दंडवत घातला. महाराजांची कृपा १९७५ पासून होत होती. ती आता फळास आल्याची जाणीव मनाला उल्हसित करून टाकत होती. तसाच वळालो... गाडीकडे परत... तेथून मैय्याचं विशाल पात्र पुन्हा डोळेभरून पाहिलं. दोन्ही हात उंचावून नर्मदे हर चा जोरदार पुकारा केला... पुन्हा तटावर मला बोलाव ग माई.. म्हणून कळकळीची विनंति केली आणि परत बडोद्यास लग्नघरी दाखल झालो. माझा प्रफुल्लित चेहरा सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता... मलाही राहवलं नाही... पत्नी, बहिणीसकट सर्वांना ही आनंदाची घटना साॉगितली... लग्न नंतर निर्विघ्न पार पडले.
मी ठाण्यास परतलो ते देवघरात नर्मदाजलाची कुपी घेऊनच. मैय्या घरी विसावली.. आता मलाही चैन पडत नव्हते.... आणखी मजकुर शोधून वाचत होतो... पुन:पुन: व्हिडियो क्लिप्स ऐकत होतो.... मनाची तगमग आणखी वाढत होती... मैय्याला ते समजत होतं.. तिनं तिच्य खास यादीत आता माझं नाव समाविष्ट केलं होतं.... माझी प्रार्थना ती ऐकत होती... मला पुन्हा नर्मदातटावर बोलावण्याचं तिनं ठरवलं होतं... मला पुन्हा तिच्या अस्तित्वाचं वेगळ्या रूपात दर्शन देण्यासाठी.... मित्रहो.. मला तरी आणखी काय हवं होत ?मीही त्याचीच वाट पहात होतो ना..!
तो सर्व कथा भाग पुढील लेखात लवकरच.
नर्मदे हर !
भारतीय पुराणकाळातील सर्वोच्च मानबिंदू.. नर्मदा मैय्या.... नर्मदे हर !
- संजीव कोकीळ (9820462853)
मैय्यानं दिल्या अनुभवाचे फोटो दिले आहेत.. कुणाला ते निव्वळ बुडबुडे वाटतील.... माझ्यासाठी मात्र ती साक्षात मैय्या आहे.. जय हो!
नंतर माहिती मिळाली की.. अंकलेश्वरला एक कुंड असून त्याला बलबला कुंड असं नाव आहे. सर्व पायी परिक्रमावासी तिथे भेट देतातच. त्या कुंडात वाकून नर्मदे हर म्हणत जोरात पुकारा केला की मोठे बुडबुडे वरती येतात... बलबला कुंडातील चमत्कारी लीला मैय्यानं मला गरूडेश्वरी दाखवून दिली. हा मोठा आनंद.
आणखी एक महत्वाची माहिती.....
बंगालचे परिक्रमावासी श्री शैलेंद्रनारायण घोषाल.. ज्यांनी तीन वर्षे परिक्रमा केल्यानंतर अनुभवाचे आठ खंड लिहिले... तपोभूमी नर्मदा!!
त्यांना गरूडेश्वर मुक्कामी याच घाटावर मध्यरात्री मैय्यानं साक्षात दर्शन दिल्याचं नमूद केलय... तसच दुस-या वेळेस मैय्यानं जो अनुभव देऊन मला संपन्न केलं तशाच अनुभवाचा त्याना परिचय झाला तो तसा नमूद केला आहे.... तो सविस्तर पुढच्या भागात.
एकूणच गरूडेश्वर तट अतिशय पवित्र असून विशेष महत्व पावता झालाय तो श्री थोरल्या स्वामींच्या समाधी मंदिरामुळे !
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे s s s हर !
(लेखांक ४).
नर्मदा माईची कृपा , दुस-यांदा... गरूडेश्वरी !
मी ठाण्याला घरी परतलो खरा पण चित्त मात्र तिथेच गरूडेश्वरी मैय्याच्या तटावर लागून राहिलं ते कायमचं. माझी ओढ वाढतच होती. वाचनात मैय्याबद्दल मिळेल ते वाचत होतो. यू ट्यूबवर तिच्या संबंधित जेवढ्या क्लिप्स होत्या त्या चाळून झाल्या.. प्रतिभाताई चितळे /अण्णामहाराज बावस्कर /जगन्नाथ कुटेंना किती वेळा ऐकलं असेल त्याची गणती नाही. पुस्तकांच्या प्रमुख दुकानांना भेट देत होतो मिळेल ते पुस्तक वाचत होतो. अधाशीपणे. भूख वाढत होती. मैय्याविषयी आणखी माहिती कुठे मिळेल. मराठीत तशी तिच्याबद्दल सविस्तर माहिती देणारी ग्रंथसंपदा जवळ जवळ नाहीच. चार पाच महिन्यातच मी अस्वस्थ होत पुन्हा गरूडेश्वर गाठले. दोन दिवस मुक्कामच केला. निवांत पणे तिच्या तटावर बसत तिला सतत अनिमिष नेत्रांनी न्याहाळत बसायचो. पण मनच भरत नव्हतं. सकाळी तिच्या जलात निर्मळ स्नान व्हायचं. तिथले दत्त मंदिरातील मुख्य पुजारी श्री दिगंबर नवरे ह्यांच्याबरोबर जरा सख्य जमलं त्यांनी मैय्याबद्दल खूप काही चांगली माहिती दिली. आजूबाजूच्या परिसराचीही महती सांगितली. पण प्रथमदर्शनी ते सगळं काही मला उमजलं नाही. नाही म्हणायला त्यांच्या करवी मी मैय्याची विधीवत शोडषोपचारे पूजा केला. तिला ओटी नारळ श्री सूक्ताच्या आवर्तनासह अर्पण केलं. दिगंबररावांनी गरूडेश्वर नावामागचा इतिहास सांगितला. एकदा पक्षीराज गरूड वरून जात होते. भूक लागली. त्यांची नजर खाली तप करणा-या गजासुरावर पडली. त्यांनी त्याला भक्ष करून भूक भागवली व परत उडताना त्यांच्या चोचीतून त्याची कवटी थेट मैय्याच्या जलात पडली. तेवढेही पुरेसे होते. गजासुराला पापयोनीतून मुक्ति मिळाली. या पापक्षालनार्थ गरूडानं तिथं तप केलं व महादेवास प्रसन्न करून तिथे शिवलिंग स्थापित केलं... ते गरूडेश्वर. (फोटो दिला आहे). हे शिवलिंग पुराणोक्त असून, श्री दत्त मंदिरापासून पाच मिनिटे चालत वरती टेकडीवर आहे. ब-याचदा भक्तमंडळी श्री दत्तमहाराजांचे व थोरल्या स्वामी महाराजांच्या समाधी दर्शनानंतर विसरून जातात.. गरूडेश्वराचे दर्शन आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर भक्तांनी घाटावर स्नान करून लोटीत नर्मदा जल घेऊन ते गरूडेश्वरावर अर्पण करणे आवश्यक आहे. (इति.. तपोभूमी नर्मदा! लेखक.. शैलेंद्रनारायण घोषाल शास्त्री ,कलकत्ता.).मीही त्यानुसार नर्मदाजल गरूडेश्वरास अर्पण केले. तेथूनच जवळ पश्चिमेस तटावर अगस्तेश्वर महादेव आहे. त्यालाही जरूर भेट द्यावी. ते अगस्ति मुनींनी स्थापन केलं असून इथूनच त्यांनी विंध्य पर्वतास रोखून धरलं होतं... ह्यापुढे पर्वतराजी संपते. दिगंबर नवरे यांनी सांगितलं की गरूडेश्वर व अगस्तेश्वर दोन वेगवेगळ्या टेकड्यांवरती असे स्थापित झालेयत की दोघांचीही उंची समसमान एकमेकासमोर आहे. अतिशय रम्य परिसर गरूडेश्वर, मन करतच नाही तेथून जाण्यासाठी... दोन दिवसात मैय्याला मनसोक्त डोळे भरून पाहिलं... इकडे कोर्टकचेरीची कामं वाट पहात होती. परत जाणं आवश्यकच होतं. तिचा निरोप घेतला. पुन्हा मला बोलावून घेण्याची मनोमन विनंति केली. ती तिनं ऐकली असावी. तिच्या मनात आल्यावर मग काय? पण.. पुढच्या खेपेस तिनं काहीतरी वेगळाच विचार केला असावा... मला अनुभूत करण्यासाठी तिनं दुसरं माध्यम निवडलं.... सगळीच गंमत.. तीही अवखळपणे भक्तांबरोबर खेळत असते... आनंद तीही घेत असते... आपल्याला देतही असते. पण यासाठी मला पाचसहा महिने आणखी वाट पहावी लागणार होती. मी ठाण्यात. नंतर मुंबई कोर्टात चकरा होत होत्या. पाच सहा महिने कसे सरले कळाले नाही.
श्री दाजी पणशीकर , रामायण महाभारताचे धुरंधर अभ्यासक व व्याख्याते. त्यांचं महाभारतावरचं व्याख्यान तीन दिवस ऐकून माझ्यात आमुलाग्र बदल झाले व सिस्टम मधला संघर्ष मी समर्थपणे झेलू शकलो. त्यांचा स्नेह मला लाभला हे माझे भाग्य. त्यांच्याकडून आध्यात्मातले बरेचसे बारकावे मला कळू शकले... म्हणतातना... संत संग देई सदा! ही आज आपल्या समाजातील संत मंडळीच आहेत... त्यांचेशी बोलता बोलताही ते आपल्याला बरेच काही शिकवण सतत देत असतात. त्यांचे बरोबर नाशिकला संत शिवबाबा ह्यांचेकडे जाण्याचा योग आला.. आम्ही त्यांचे आश्रमात पोहोचलो. दर्शन घेतलं. त्यांनी दाजींना जवळ बसवून घेतलं. त्यांचा योग्यतो आदर सत्कार केला. त्यांच्यात बोलणीही झाली. दरम्यान मला समजले त्यांचं वय दीडशेहून जास्त आहे.. त्यांचा फोटो सोबत दिलाय..... त्यांना श्री साईबाबा व समकालीन सर्व संतांचा प्रत्यक्ष सहवास लाभलाय. मी थक्क झालो... खडखडीत शरिरयष्टी.. अंगावक मांस नाहीच... डोळे तेजस्वी व नजर भेदक.. स्मृती धारदार. त्यांनी गरूडेश्वर मुक्कामी उत्तर तटावर श्री दत्तात्रेय व शूळपाणेश्वर शिवलिंगाची स्थापना केली होती.. त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंधरा दिवसानंतर संपन्न होणार होता. बोलता बोलता त्यांनी दाजींना निमंत्रण दिलं व गरूडेश्वरी येण्यास फर्मावलं... त्या विशिष्ट मुहुर्ताला मध्यरात्री अवकाशात नवग्रह काही काळासाठी एका सरळ रेषेत येणार असून त्यावेळी मध्यरात्रा दोन वाजता नर्मदा स्नानाचं पुण्य पदरात पाडून घ्या असे सांगितले. नर्मदा मैय्यानं मला तटावर परत आणण्यासाठी ह्या दोन संतांकरवी सूचना दिल्याचं माझ्या लक्षात आलं... जेव्हां दाजींनी विचारणा केली मी तत्काळ होकार दिला व पुन्हा पंधरा दिवसांनंतर मी दाजींसह गरूडेश्वरात दाखल झालो. शिवबाबांची शंभरएक तरी भक्त मंडळी तिथे आला होती .खूप चांगली व्यवस्था होती. थोरले स्वामींच्या समाधिमंदिरापासून दोनएक हजार फूटावर उत्तर तटावर शिवबाबांनी हे मंदिर स्थापन केलय. त्याची विधीवत स्थापना दोन दिवसात पार पडली. त्या मध्यरात्री सर्वांनी दोन वाजता नर्मदा घाटावर पर्वकाळातील स्नानासाठी उतरण्याच्या सूचना झाल्या. आम्ही रात्री दोनपर्यंत झोप काढली व दीड वाजता खडबडून उठलो व समाधिमंदिरामागच्या घाटावर उतरलो. माझ्याबरोबर शिवबाबांच्या भक्तांपैकी पाच सहा जण होते. त्यांचे बरोबर मैत्री जुळली. एक दोघांनी टॉर्च आणली होती. मिट्ट अंधारात आम्ही घाटावर शेवटच्या पायरीवर पोहोचलो. मैय्या संथ वहात होती. तिच्या मनात काय होतं याचा थांग कुणाला तरी लागेल काय? दुपारी घाटाजवळ मगरींबाबत सावधान पाटी वाचली होती. आम्ही कावरेबावरे होतो. आमच्याशिवाय घाटावर कोणच नव्हते मग बाकीचे?.... तेवढ्यात आम्हाला दिसले की पश्चिमेस जिकडे मंदिर उभे केले त्याच्याच खाली बाकी शे सव्वाशे मंडळी शिवबाबांसह स्नानाच्या तयारीत होती. तिथे पोहोचेपर्यंत परत वेळ जाईल म्हणून व पर्व काळ चुकू नये म्हणून आम्ही पाच सहा जणांनी आहे त्याच घाटावर स्नान करावे असे ठरले. आम्ही कपडे उतरवले. मैय्याला अंधारातच नमस्कार केला.. एकमेकाचे हात हातात घट्ट धरले. पाण्यात उतरायचं होतं. किना-यावर कुजलेल्या गवताचा उग्रदर्प पसरलेला, तिकडे नजरअंदाज करून एकएकजण पाण्यात उतरलो. थमडगार मैय्याच्या जलस्पर्शानं अंग शहारून गेलं पण मैय्याच्या स्नानाचा आनंद होता पण मध्यरात्री दोन वाजता स्नानाचा असा पहिलाच प्रसंग... पाण्यात दगडांवर पाय ठरत नव्हता. तोल जात होता पणा हात घट्ट असल्याने सांभाळलं जात होतं. सगळ्यांनी मिळून रिंगण केलं व जोरदार पणे नर्मदे हर चा गजर केला व बुडी मारली ...पुन्हा नर्मदे हर.. ! असे तीनवेळा केल्यानंतर स्नानानंतरची तरतरी लाभली... मनस्वी आनंद झाला... चला पर्वकाळात पुण्यस्नान घडले या आनंदात आम्ही एक एक जण प्रत्येकाला आधार देत अंधारातच घाटावर आलो... मी जसा घाटावर ओलेत्याने चढलो तर.......काय?.... मी चक्क जोरात ओरडलोच , अरे... या वेळी अत्तर इथे कुणी लावलय.... पण मला कुणीही प्रतिसाद दिला नाही..... अत्तराची मोठी कुपी खळ्ळकन् फुटावी अन् अत्तराच्या सुगंधानं सारा आसमंत भरून जावा असाच अप्रतिम दिव्य सुगंध त्या तटावर पसरला होता. मी पुन्हा गोंधळून गेलो.
......परत ओरडलो अरे अत्तर कोणी लावलय? तेवढ्या एका सोबत्यानं अंधारातच माझा हात कच्कन दाबला.. कानात कुजबुजला... साहेब गप्प बसा ..ओरडू नका.. अनुभव घ्या...
तेव्हा माझी ट्यूब एकदम पेटली अन् मी क्षणात बधीर झालो. ..पुतळ्यागत हात जोडून उभा राहिले साधारण पाचएक मिनटं झाली असतील आम्ही पाच सहा जण त्या दिव्य दैवी सुगंधात न्हाऊन निघालो... त्या नंतर भानावर येत चटकन् कपडे बदलले.. त्या अंधारातही सगळ्यांनी मैय्याचा जोरदार गजर केला.. नर्मदे हर ! अलौकिक अशा दैवी सुगंधाची दिव्य अनुभूती मैय्यानं त्या पर्वकाळात बहाल केली. त्यासाठी तिनं श्री दाजी पणशीकर व नाशिकचे शिवबाबांना माझ्यासाठी कष्ट देऊन द्राविडीप्राणायमच केला असे वाटते..... आम्ही आनंदात रूमवर परतलो. चादर ओढून गुडूप झोपायचा प्रयत्न केला. झोप कसली येतेय. मैय्याला परत परत धन्यवाद देत होता... अशा दिव्य व दैवी सुगंधाबाबत मी श्री प्रमोद केणेंच्या गिरनार वारी अनुभव पुस्तकात वाचलं होतं... तो विषय सतत चित्तात घिरट्या घालायचा... असा दैवी सुगंध आपल्या वाट्यास कधी येईल का? ती खूप काळाची इच्छा मैय्यानं आता पूर्ण केली होती. मैय्या आता हळूहळू तिच्या मायेच्या, प्रेमळ छत्राखाली मला घेत होती. मीही संतृप्त होऊन मैय्याच्या अधिकाधीक प्रेमाची, अनुभूतीची अधाशाप्रमाणे वाट पहात होतो.. की... मैय्या, आता पुढे काय?
मित्रहो.... तपोभूमी नर्मदा ! आठ खंडात परिक्रमेचे अनुभव लिहिणारे श्री शैलैन्द्रनारायण घोषाल... १९५२ ते ५५ च्या काळात पायी परिक्रमेत असताना जेव्हां गरूडेश्वरला आले तेव्हां रात्रीच्या काळात मैय्याच्या तटावर ध्यानस्थ बसले असताना मैय्यानं त्यांना ह्याच दैवी दिव्य सुगंधाची अनुभूती दिल्याचं त्यांनी लिहिलय. विशेष म्हणजे... दोन्ही तटावर साडेतीन हजार किलोमीटर चालल्यावर त्यांना इतरत्र कोठेही घाटावर ही अशी दिव्य सुगंधी अनुभवास आली नसल्याचं त्यांनी म्हटलय..... ती फक्त गरूडेश्वरीच..... धन्य धन्य ती मैय्या अन् तिची अगाध लीला .
पुराणकाळापासून नर्मदामैय्याचे दोन्ही तट हे ब्रम्ह्याचे मानसपुत्र, ज्योतिष शास्त्राचे अध्वर्यु महर्षि भगवान भृगु मुनींच्या अधिपत्यखाली आजही आहेत... ही मला मिळालेली नवी माहिती... ती आपल्या सर्वांसोबत आनंदाने शेअर करतोय.... नर्मदे हर !
- संजीव कोकीळ,
9820462853
.
( लेखांक ५)
अश्वत्थामा ... एक शापित आत्मा !
गरूडेश्वरला श्री दत्त मंदिराजवळ एक चहावाला टपरी चालवतो. चहा फार छान करतो.. ऑर्डर दिली तर पोहेसुद्धा करून देतो.. मंदिराचे प्रसादभोजनालय सोडले तर तेथे खाण्याची व्यवस्था अशी नाहीच. थोडी आबाळ होऊ शकते. त्याच टपरीत तो नर्मदे विषयी कांही पुस्तकेही ठेवतो. त्यात मला मराठी अनुवादित नर्मदा पुराण दिसलं मी ते घेतलं. वाचलंही... त्यात अधिकतर नर्मदेकाठच्या असंख्य तीर्थांविषयी माहिती दिलीय. प्रत्येक तीर्थाशी कुठल्या ना कुठल्या देवतेची /तपस्वी मुनींची /अथवा राक्षस राजा़च्या कहाणीचा संदर्भ येतोच. त्याची पडताळणी /त्याची सत्यार्थता आज जरी कठीण असली तरीही.. तिथली पुरातन पण आकर्षक देवालयं आपणास ती कथा मूकपणे सांगतच असतात.
अशीच शापाची एक विदारक कहाणी घेऊन जवळपास गेली पाचएक हजार वर्षे तो नर्मदेच्या दक्षिण तटावरील शूळपाणेश्वर जंगलात फिरतोय.. याच जंगलात जर परिक्रमावासी रस्ता चुकले किंवा संकटग्रस्त झाले तर तो तात्काळ त्यांच्या मदतीस धावतो. सोडवतो व त्वरित नाहीसाही होतो काही बोलायच्या आतच ! परिक्रमावासीची त्या संकटातून सुटका झालेला असते... पुढे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी. ही नर्मदामाईची सेवा तो अविरत तत्परतेने हजारों वर्षापासून करतोच आहे ....होय... तोच.. अश्वत्थामा !
महाभारताचा अंतिम काळ ह्यानं व्यापून टाकलाय.. मृत्यू शय्येवर असताना दुर्योधनानं त्याला सेनापतीपद बहाल केलं होतं. तो शूर योद्धा होता. त्याच्याकडे अस्त्रविद्या विपुल होती. वडिल द्रोणाचार्यांनी त्याला बाकी सर्वांच्या नकळत खूप काही शिकवलं होतं. वडिलांचा तो निस्सीम चाहता होता. तो शिवाचा अंश होता. अर्जुनावर त्याचं विशेष प्रेम होतं. श्रीकृष्णावरही त्याची श्रद्धा होती. पण वडिलांच्या धोक्यानं केले गेलेल्या मृत्युनं तो दुखावला होता. पांडवांचा निर्वंश हे एकच ध्येय बाळगून होता. युद्धाचे सर्व नितीनियम बाजूस सारून त्यानं पांडवांची उगवती पिढी कापून काढली.. पांडव केवळ कृष्णनितीमुळे बचावले. पण उत्तरेच्या पोटात वंश वाढतोय हे समजताच त्यानं तेवढ्यासाठी ब्रम्हास्त्राचा वापर करून आपली दुर्दैवी दशा ओढवून घेतली. आता मात्र कृष्णासकट सर्वच संतापले.. अर्जुनास अश्वत्थाम्याला शोधून काढण्यास सांगितले गेले.. त्यांनं त्याला बंदी करून द्रौपदीसमोर आणलं पण द्रौपदीनं आईच्या ममतेनं त्याला माफ केलं.. त्याला ठार मारण्यास मनाई केली.. कृष्ण संताप आवरता झाला पण त्यानं अर्जुनाला आदेश दिला त्याच्या कपाळावर विराजमान दैवी मणि कापून टाकण्यास फर्मावले... तोच अश्वत्थाम्याचा अमोघ शक्तिस्त्रोत होता. मणी कापून त्याला शाप दिला.. पुढची पाचहजार वर्षे तू मृत्युला वंचित होशील. लोक तुझा तिरस्कारच करतील. तुझ्यापासून दूर पळतील... ! तू एकांतवास भोगशील! हरीचा शाप तो...! तात्काळ अंमलबजावणी झाली. मणी कापलेल्या जागेवरून कपाळावर.... भयानक दुर्गंधीयुक्त द्रव स्त्रवू लागला.... त्यानं तोही पळत राहिला व लोकही त्यापासून दूर पळत गेले. त्याचा वनवासातला एकांतवास सुरू झाला होता. तो एकट्यानेच भोगायचा होता... कपाळावर जखमेची वेदना त्याला असह्य असह्य होत गेली... तळमळत्या अवस्थेत त्यानं नर्मदा दक्षिणतट गाठलं... शिवाची आराधना सुरू केली.. धावा केला मुक्तिसाठी, पण श्री विष्णुचा शाप ! त्यात देवाधिदेव महादेव सुद्धा दखल कशी देणार.... पण कठोर तपानं महादेव प्रसन्न झाले व कळवळून त्यांनी अश्वत्थाम्याला दर्शन दिलं... शापमुक्त करण्यास असमर्थता दर्शवली पण मस्तकी भळभळत्या जखमेचा दाह शांत व्हावा म्हणून स्वयं महादेवानं एक लोण्याचा गोळा त्याच्या जखमी मस्तकावर ठेवला ....दाह कमी झाला.... अश्वत्थामा दुख-या वेदनांपासून निवळला...! तिथेच त्यानं शिवलिंगाची स्थापना केली. ते माखनेश्वर महादेव मंदिर (फोटो सोबत दिले आहेत).इथल्या शिवपिंडीचा आकार चक्क लोण्याच्या गोळ्यासारखा असून... ते शिवलिंग आकारात सतत वाढते आहे.
गरूडेश्वरला घाटावर दत्तमंदिराचे श्री दिगंबर नवरे यांच्या बरोबर गप्पा करताना... इंद्रवरूण गाव समोरच दक्षिण तटावर असल्याचे त्यांनी सांगितले... मला त्याबरोबर अण्णामहाराज बावस्कर यांनी अश्वत्थाम्याबद्दल सांगितलेली हकिकत आठवली.. दिगंबररावांना घेऊन मी दुस-या दिवशी माखनेश्वर मंदिर गाठलं... शिवलिंगाचं दर्शन घेतलं.. शिवलिंगाचं रूप एखाद्या लोण्याच्या गोळ्यागत आहे. तिथे श्री मकरंद महाराज बापट आहेत त्यांनी तिथे वाल्मिकी आश्रम चालवलाय. त्यांची ओळख करून घेतली व पुढील पौर्णिमेस मा तिथे येण्याची परवानगी घेतली. परतलो.
पुढच्या पौर्णिमेस मी माखनेश्वर मंदिर संध्याकाळचं गाठलं. पौर्णिमेला रात्री अश्वत्थामा पूजेला येतो असं समजलं होतं. चला.. आपण पण पाहू या हीच उत्सुकता. आता श्री मकरंद महाराजांबरोबर निवांत गप्पा करता आल्या. ते गेल्या तीसएक वर्षापासून तेथे वाल्मिक आश्रमशाळा चालवतायत. गप्पा मारताना समजले की त्यांनीही नर्मदा परिक्रमा पायी केली होती साधारण सत्तरच्या दशकात... तेव्हा शूलपाणेश्वर घनदाट जंगल होतं.. भिल्ल आदीवासींनी त्यांना पूर्ण लुटलं होतं .अगदी विवस्त्र करून सोडलं होतं.... तशा विवस्त्र अवस्थेत उपाशी तापाशी राहून त्यांनी सात दिवस रात्र घालवले होते. पण मनात कसलीही द्वेषभावना नाही... उलट त्यांनी पण केला... ज्या आदीवासींनी त्यांना लुटलं त्यांच्या पुढच्या पिढीस सुशिक्षित करून समाजप्रवाहात आणायचं हा संकल्प मनोमन केला व परिक्रमा संपताच नर्मदे हर म्हणत त्यांनी ह्याच ठिकाणी आश्रम सुरू केला.... स्वत: डोंगरात, द-याखो-यात फिरत त्यांनी आदीवासींचा विश्वास संपादीत केला.. त्यांच्या मुलाना आणलं व आश्रमात शिकवायला सुरू केलं.. नंतर सरकारी विद्यालयात भरती करत त्यांची शैक्षणिक प्रगति साधली. आज त्यांच्या आश्रमातील विद्यार्थी समाजात विविध स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत... या साठी ते सरकारचं अनुदानही घेत नाहीत. त्यांना भ्रष्टव्यवस्थेची चीड आहे.. समाजातून त्यांना आता मदत मिळते त्यावरच आश्रम चालतो. जंगलात राहणा-यांना त्यांनी माणसात आणलं हे त्यांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे.
मी त्यांना अश्वत्थाम्याबद्दल विचारलं.... ते किंचित हसले ...! मौन बाळगलं त्यांनी! मी त्यांना त्या पौर्णिमेच्या रात्री तिथे मंदिरात झोपण्याची परवानगी मागितली. ती त्यानी दिली. मी माखनेश्वराला नमस्कार केला व तिथेच एका खाटेवर लवंडलो. धावपळीनं थकलो होतो. गाढ झोप लागली. पहाटेच्या प्रहरी खाड्कन डोळे उघडले... स्वप्नात अश्वत्थाम्यानं काही सेकंदापुरतं दर्शन दिलं होतं.. मोबाईल मधे वेळ पाहिली.. बरोबर साडेतीन वाजले होते... गाभा-यात दिवा मंद मंद तेवत होता. मी महादेवास नमस्कार केला.. पहाटेच्या थंड वा-यात बाहेर झोपाळ्यावर बसलो.... ! मनात विचाराची आंदोलनं सुरू झाली होती....
मला अश्वत्थाम्याचं दर्शन का हवं होतं? मी कशासाठी येवढा खटाटोप केला? काय मिळालं?
महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर अश्वत्थामा ह्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड आकर्षण आहे... परिक्रमा पूर्ण झाली की लोक पहिला प्रश्न करतात... काय, अश्वत्थामा भेटला की नाही? ते हे विचारत नाहीत की मैय्या भेटली की नाही? असं का..? मला असं वाटतं की लोकांना नेहमी नायकापेक्षाही खलनायकाचच आकर्षण जास्त असतं. एक न समजणारी , अनाकलनीय उत्सुकता असते त्याबाबत ...एका दुरात्म्यास भेटण्याकरिता आपण का उद्युक्त होतो.... ह्या नकारात्मतेचं आपल्याकडे उत्तर नसतं... महाभारतातील एक व्यक्तिरेखा आजही जिवंत आहे व जंगलात फिरते आहे... मला बघायला मिळेल का? हेच....
माननीय दाजी पाणशीकर व नर्मदा पुराण प्रवचनकार अनय रेवाशीष (कैवल्यधाम आश्रम) यांनी व्याख्यानातून सतत हेच सांगितलय की जो स्वत:च शाप भोगतोय तो तुम्हाला काय देणारय? बरं.. त्याचे अपराध स्वयं श्रीकृष्णाने निश्चित करून त्याला शिक्षा दिलीय त्यात आपण ढवळाढवळ करणार? आपण काहीच करू शकत नाही. तोही आपल्याला कसलंही वरदान देऊ शकत नाही... तो भेटला तरी काहीच बोलत नाही... संकटात असाल तर जंगलात फक्त मार्ग दाखवायला हात देतो. त्याचं पाप कमी करण्यासाठी एवढी तो नर्मदा माई़च्या भक्तांची सेवा करून पुण्यप्राप्ती करतो. तरीही आपलं नकारात्मक आकर्षण कमी होत नाही. ही आपली चूक. त्याच्याबद्दलचा निर्णय कृष्णसख्यानं घेतलाय, मग आपण कोण? तरीही आपल्याला प्रचंड आकर्षण, का? प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती टेंब्ये स्वामी महाजांनाही त्यानं जंगलातून वाट दाखवत गरूडेश्वर दाखवलं होतं. स्वामींना नंतर संशय आला व त्या धिप्पाड व्यक्तिमत्वाला त्यांनी विचारलं.. तू कोण? तेव्हा अतिशय नम्र होऊन त्यानं कबूल केलं की मी अश्वत्थामा... स्वामीनींही तो विषय तिथेच संपवला.... व त्वरेने गरूडेेश्वरी रवाना झाले.
तो त्याचे भोग भोगतोय... सुटका लवकर व्हावी या साठी आपण प्रार्थना करू शकतो, करावी.. एव्हढेच !
पहाट सरत आली होती... मला माझी चूक कळून आली होती... या पुढे मी अश्वत्थाम्याच्या भेटीचा विचार सोडून दिला... स्वप्नात दृष्टांत झाला तेवढा पुरेसा आहे... या पुढे चित्तात फक्त नर्मदे हर !
सूर्योदय झाला होता. माखनेश्वर मंदिराचा परिसर प्रसन्न उजळून निघाला होता. हवेत रम्य गारवा. किलबिलाट पक्ष्यांचा त्यात भर टाकीत होता. एवढ्यात श्री मकरंदजी समोर आले. खूप गप्पा झाल्या. चहा झाला. दोनअडीचशे आदिवासी मुलांबरोबर रमणारा एक नवीन आजोबा मला अनुभवायला मिळाला... नातवासम त्यांना प्रेम देऊन... त्याना वाढवत.. सुशिक्षित करत.. माणसात आणणारा एक देवमाणूस मला पहाता आला... आणखी काय हवं? स्वत:चं आयुष्य विसरून रममाण होणारा.... समाजाकडून आदीवासींना मिळणारी तुच्छ वागणूक ध्यानात घेऊन... समाजाच्याच मस्तकावरची ही भळभळणारी जखम स्वत:च्या मस्तकावर धारण करीत समाजाकडूनच मदत घेत घेत समाज घडवणारा हा अवलिया त्या अश्वत्थाम्याहूनही सरस ठरत नाही काय?
मी आता अश्वत्थाम्याचा विचार कायम सोडून दिलाय. त्याच्याशी माझं काहीही दुमत असण्याचं कारण नाही. तो आपल्या कर्माची फळं भोगतोय... त्यातून तो लवकर मुक्त व्हावा ही हरीचरणी प्रार्थना.
इथून पुढे चित्तात.. एकच !
नर्मदे हर. ! नर्मदे हर ! नर्मदे हर !
- संजीव कोकीळ.
9820462853
(सोबत माखनेश्वर महादेव मंदिर .वाल्मिकी आश्रमशाळा यांचे फोटो दिले आहेत. वाल्मिकी आश्रमशाळा चालवणा-या मकरंद बापट सरांची समाजानं जरूर दखल घ्यावी. त्यांच्या या असिधाराव्रतास होईल तितकी मदत करावी. मी माझा सहभाग उचलला आहे. श्री मकरंद बापट सरांना सैल्युट! धन्यवाद.माखनेश्वर मंदिर ...9727888315 )
नर्मदे हर.. ! नर्मदे हर ! नर्मदेs s s हर !
लेखांक ५ (अ)
अश्वत्थामा ...एक शापीत आत्मा (पुढे चालू)
मित्रहो,
मी अश्वत्थाम्यावर माझं मनोगत स्पष्ट केलं होतं. लेखांक ५ मधे. फेसबुकवर उपलब्ध आहे. यू ट्यूबवर मान्यवर परिक्रमावासींचे अनुभव ऐकून उत्सुकता माझीही ताणली गेली होती. कैवल्यधाम आश्रम आयोजित बसने परिक्रमा करण्याआधीच्या काळात मीही त्याचं दर्शन होईल का? या धडपडीने गरूडेश्वरात थोडी पायपीट केली होती.
त्याच्या मस्तकावरचा मणी अर्जुनानं श्रीकृष्णाच्या आदेशावरून कापून काढल्यानंतर ती भळभळती जखम घेऊन.. श्रीकृष्णाचा शाप घेऊन रानोमाळ शतकानुशतके महाभारत संपल्यानंतर फिरत राहिला. त्याच्या मस्तकावरची जखम आता तीव्र दुर्गंधीयुक्त द्रावानं स्त्रवत होती ,त्याची भयंकर दुर्गंधी त्याच्या भोवताली सदैव पिंगा घालत राहिली. दुर्गंधीमुळे त्याच्या जखमेभोवती सहसा न आढळणा-या माशा /कीटक घोंगावत रहायचे. त्यामुळे कोणीही सामान्य मनुष्य त्याच्या जवळपास उभाही राहू शकत नव्हता. जखमेच्या ठसठसण्यानं त्याला असह्य वेदना होत होत्या. त्यानंतर तो तेलासाठी /तुपासाठी तडफडत राहिला. तेल मिळालं की तो त्या जखमेवर ओतून द्यायचा. तेवढीच वेदनेपासून सुटका. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.... तो जिथे जाईल तिथे त्या माशा त्याच्याबरोबर असायच्या. तो असीरगढ नंदुरबार ,तसेच शूळपाणेश्वर जंगलात वणवण भटकताना आढळला. क्वचित तो वाट चुकलेल्या परिक्रमावासींना दिसायचा. त्यांना वाटेला लावून हा गायब व्हायचा. न बोलता. न सांगता. तो गेल्यावर कळायचं की तो... हाच होता.
परिक्रमावासींच्या व्हिडियो क्लिप्स पाहून मी गरूडेश्वरच्या दक्षिण तटावर शोध घेत फिरलो. शेवटी वाल्मिकी आश्रमजवळील माखनेश्वर मंदिरात पोहोचलो. मी नवीन. अनोळखी. लगेच कोण माहिती देणार. पण त्यांच्या ओळखीने रात्रभर त्या माखनेश्वर शिवाच्या मंदिरात खाटेवर झोपून राहिलो होतो. ज्येष्ठ पौर्णिमा असावी. पहाटे साडेतीन ला त्यानं स्वप्नात दर्शन दिलं. मी समाधानानं परतलो होतो. पण एकंदरीत परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर मी नमस्कार केला. त्याचा पाठपुरावा करणं सोडून दिलं. नर्मदे हर.. करत तिचं चिंतन अधिक करू लागलो.
आज हा सर्व लेख प्रपंच करायचं कारण. म्हणजे... माखनेश्वर महादेव मंदिरातून व्हाट्सप वर निरोप आला की आज दि.२१/१/२०२०, पहाटे षट्तिला एकादशीच्या मुहुर्तावर अश्वत्थामा ह्या मंदिरात येऊन पूजा करून गेला. तो येऊन गेल्याची पक्की खूण म्हणजे त्याच्या जखमेभोवती फिरणा-या माशा तिथे मागे रेंगाळतात....! तीच तो येऊन गेल्याची खूण असते ! ( सोबत फोटो दिले आहेत)
अश्वत्थाम्याला तप केल्यानंतर ह्याच ठिकाणी महादेव प्रसन्न झाले होते व त्याच्या जखमेचा दाह कमी व्हावा म्हणून स्वयं शिवानं त्याच्या मस्तकावर लोण्याचा गोळा ठेवला होता. ती स्मृती... अश्वत्थाम्यानं तिथं शिवलिंग स्थापन केलं.. माखनेश्वर !अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं शिवलिंग आहे. आता त्यावर शिवाचा मुखवटा ठेवला जातो.
ही पहाटेची.... ब्रेकिंग न्युज..... सर्व नर्मदा प्रेमींना कळावी म्हणून देत आहे.
तो तगमग करीत विमनस्क होऊन फिरतोय. शापमुक्त व्हावं म्हणून तडफडतोय. श्रीकृष्णच ठरवणार त्याला कधी ह्यातून मुक्त करायचं ?
महाभारत युद्धात कोण खरा कोण खोटा हे ठरवत बसण्याचा आपल्याला अधिकार नाही...! ते व्यासांनी अधोरेखीत केलच आहे.
तरीही... त्याच्या शिक्षेची परमावधी झाली असेल.. कालावधी संपत आला असेल तर तो लवकर मुक्त होवो... केला जावो... एवढीच हरिचरणी प्रार्थना करू शकतो... शेवटी तोही शिवाचाच अंश... नर्मदेच्या सान्निध्यात भटकतोय. त्याचं हे भटकणं लवकर संपू दे रे महादेवा !
नर्मदे हर ! ... संजीव कोकीळ 9820462853
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे s s s हर!
( लेखांक ६)
मैय्यावर पुस्तक लिहिण्याइतका अनुभवसाठा माझ्याकडे नाही. अलिकडच्या चार पाच वर्षातील ह्या सर्व घडामोडी आहेत. जशीजशी माहिती मिळत गेली तशीतशी माझीही उत्सुकता /ओढ प्रचंड ताणली गेली. मी मैय्याच्या तटावर पोहोचलो तेव्हांपासून परवा परवा दिनांक २७/११/२०१९ पर्यंतचा तिचा सगुण साक्षात्कारी अनुभव माझ्यासाठी थरारून टाकणारा पण तेवढाच प्रचंड आनंदाचा भाग माझ्या जीवनातला आहे. मी पायी परिक्रमावासी नाही. दोनदा घडली ती बसने, तिला नियमानुसार परिक्रमा म्हणायचं की नाही याबद्दल बरीच मतमतांतरे आजच्या घडीस आहेत. पण तिकडे पाठ फिरवून मैय्याच्या सान्निध्यात रहायला मिळतय ना? तिचं दर्शन रोज घडतय ना? एवढ्यावरच खुष होतो. आंधळ्यास कोण तरी हात देऊन पुढे नेतय ना? जवळपास तसच.
माखनेश्वरला अनुभव मिळाल्यानंतर मी परतलो खरा पण नर्मदा पुराण वाचतच होतो, यू ट्युब आता आणखी उत्सुकतेनं धुंडाळत होतो. आता यू ट्यूबवर परिक्रमावासी आपले लहानलहान अनुभव किंवा प्रवास वर्णन चित्रीत करून प्रसारित करत होते... त्यात अपूर्वानंदांचे मैय्याच्या बाबतीत खूप सविस्तर वर्णन पहायला मिळत होते... त्यातच पंडित श्री अनय रेवाशीष ह्यांच्या कांही चित्रफिती ऐकायला मिळाल्या त्या इतरांपेक्षा मलातरी फार वेगळ्या जाणवल्या. शांत चेहेरा, अस्खलित शुद्ध हिंदी, विषयाची जाण व नर्मदा पुऱाणात वर्णन केलेल्या एकएक तीर्थांबदल त्यांनी केलेलं सुंदर निरूपण.. मला आवडून गेलं... मी त्यांच्या बहुतेक क्लिप्स ऐकल्या.. नर्मदा तीर्थस्थानांबद्दल अशी परिपूर्ण माहिती कोणीच दिलेली नाही. यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ह्यांचा नर्मदा पुराणाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. त्यांच्याकडून आणखी काही माहिती मैय्याबाबत मिळेल हा अंदाज बांधून मी त्यांना फोन लावला. अतिशय मधुर वाणीत त्यांनी संभाषण केलं. मी त्यांचे क्लीप्सबद्दल आभार मानले आनंद व्यक्त केला. माझी मैय्यैबद्दल माहितीची भूक कांही अंशी भागली होती... त्यांनाही त्यांच्या क्लिप्स मुंबईकरापर्यंत पोहोचल्याचा आनंद झाला.... बोलता बोलता त्यांनी त्यांच्या कैवल्यधाम आश्रम तर्फे आयोजित बसने परिक्रमा बाबत माहिती दिली... नियोजन सांगितलं.... मी सगळी माहिती ऐकून नंतर कळवतो म्हणालो खरे , पण माझ्या डोक्यात ते पक्के बसले .साधारण जुलै २०१८ चा महिना असावा.
गरूडेश्वरची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. प. प. श्री वासुदेवानंद स्वामींची समाधीस्थळी गारूड केल्यागत मला बोलावत होती. श्री जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचली जात होती. त्यातल्या श्री वासुदेव निवास बद्दलचे त्यांनी केलेले उल्लेख माझ्या चित्तात गडद होत गेले... पूज्य योगिराज गुळवणी महाराजांबद्दल थोडीशी माहिती होती तशी.. माझी बहीण नीता व भाऊ ह्यांनी वासुदेव निवास मधून पूज्य श्री दत्तमहाराज कवीश्वर ह्यांच्याकडून दीक्षा घेतली होती. पण सविस्तर माहिती मला नव्हती. श्री जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकामधून मात्र बरच कांही समजलं जे मनाला खूप भावलं. मी खूण गाठ बांधली.
आता मी पुन्हा गरूडेश्वरी पोहोचलो ते कासारवाडी ,बार्शीतल्या बाल वेदाश्रम चे श्री केतन काळे गुरूजी व त्यांच्या वेदशास्त्रसंपन्न सहकारी पुरोहितांसह .गरूडेश्वरला समाधिसमंदिरामागे संस्थानची यद्न्यशाळा आहे. तिथे श्री दत्त याग संपन्न झाला. अतिशय पवित्र जागा. त्यात एक कडूलिंब वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली प. प. श्री टेंब्येस्वामी ध्यानास बसत असल्याची माहिती श्री दिगंबर नवरे यांनी दिली. त्या वृक्षाची एक मोठी शाखा झाडापासून थेट समाधिमंदिराच्या दिशेने गेली आहे. त्या शाखेची पाने गोड असल्याचीही माहिती मिळाली. असाच चमत्कार शिर्डीच्या साईमंदिरातही पहायला मिळतो.
त्या दिवशी सकाळी आम्ही नर्मदा स्नान केलं ते घाटापासून पश्चिमेस जरा दूर पुलाच्याही पलिकडे. घाटाच्या पूर्वेस धरणाचं काम सुरू असल्यानं पाणी रोखलं होतं. पाणी अतिशय स्वच्छ व नितळ होतं. लांब असल्याने गाडी न्यावी लागली होती. स्नान संपल्यानंतर अचानक एक वेडसर इसम गाडी जवळ आला त्यानं हात पुढे केला. मी पाकिट वगैरे आणले नव्हते.. पण गाडीत दहा रू होते ते त्याच्या हातावर ठेवून गाडी वळवली तर तो पुन्हा दाराजवळ आला... त्याला बोलता येत नसावं.. त्याच्या अंगावर मळकट फाटके कपडे होते.. आता त्यानं त्याची कॉलर खेचून माझ्याकडे शर्टाची मागणी केली... मी सगळे कपडे रूमवरच ठेवून आलो होतो... त्याला मी नाही म्हटलं खरं पण तो हटेचना... कपड्याची मागणी करू लागला... नर्मदा तटावर दानाचं पुण्य असल्याचा विचार डोक्यात आला खरा... पण त्या वेळी माझ्याकडे काहीच नव्हतं... मी असमर्थता दर्शवली.. गाडीचा वेग हलकेच वाढवला.. पण तो पठ्ठ्या काही सोडायला तयारच नव्हता... ऑं.. ऑंं.. करून परत परत शर्टच मागायला लागला... आता मीही जरा अस्वस्थ झालो त्याला द्यायची इच्छा तर होती.. नर्मदे काठी पुण्याचा क्षणही सोडायचा नव्हता... मी सरळ अंगावरचा शर्ट काढला त्याला दिला.... तो आनंदात नाचत गेला... त्याच्या चेह-यावरचं समाधान मनाला खूप काही अलौकिक दान देऊन गेलं. मी मैय्याकडे पाहुन नमस्कार केला... नारा दिला... नर्मदे हर... आणि उघड्यानेच गाडी चालवत रूमवर परतलो... बघायला गेलं तर ही काही फारशी महत्वाची घटना नाही... पण मैय्याच्या तटावर दानधर्माचा श्रीगणेशा झाला होता... तिला हवं तसं ती आता माझ्याकडून करून घेणार होती... मला भविष्यात बरच काही देण्यासाठी ...दाखवण्यासाठी! मी हळूहळू का होईना पण तिच्या विश्वासास पात्र होत होतेा... तसे संकेतही मिळत होते.... श्रद्धा विश्वास वरचेवर दृढच होत होता!
मी आता बसने परिक्रमा करायचा मनोमन पक्कं केलं... कैवल्यधाम आश्रमला अनयजींना फोन लावला व दोन बर्थ नक्की केल्या... २९ नोव्हेंबर २०१८ कैवल्य घाम आश्रमात पोबोचायचं होतं.. परिक्रमा तेथूनच सुरू होणार होती.
ऑगस्ट २०१८... मी थेट पुण्यात श्री वासुदेव निवास गाठलं. मध्यंतरीच्या काळात यू ट्युबवर वासुदेव निवास बद्दल खूप व्हिडियो नजरेखालून घातले होते.... रविवार होता त्या दिवशी, सकाळी अकरा वाजता पोहोचलो.. आत शिरताच पूज्य श्री शरदशास्त्री महाराजच भेटले... दंडवत घातला... विनंति केली.... मला अनुग्रह मिळावा. ते प्रसन्न हसले...!
आध्यात्मिक मार्गक्रमणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.. तो खूप भाग्याचा दिवस होता.. माझ्या पश्चात जीवनातला...! श्री गुरूदेव दत्त!
नर्मदे हर ! -संजीव कोकीळ
9820462853
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे s s s हर !
( लेखांक ७ )
श्री वासुदेव निवास.. अनुग्रह !
.............................................................
नर्मदा माईची ओढ दिवसागणिक वाढत होती. आता ती कैवल्यधाम आश्रम, ग्राम.. कटघडा.. तहसील.. बडवाह तर्फे आयोजित आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा बस यात्रेच्या बुकिंग पर्यंत येऊन ठेपली होती. २९ नोहेंबर २०१८ ला प्रस्थान त्यांच्या आश्रमातून निश्चित झाले होते. परिक्रमेची हुरहूर होतीच.. या ना त्या निमित्ताने पं. अनय गुरूजी व श्री अविनाशजी महाराजांशी फोनवर बोलणं होत होतं.. यात्रेसंबंधी माहितीचं आदानप्रदान होत होतं.. तशी जवळीकही वाढत होती व आपुलकीही. नर्मदा माई बद्दल त्यांचीही श्रद्घा दृढ व प्रामाणिक असल्याचे जाणवत होते. ते व्यावसायिक यात्रा आयोजक नाहीत याची जाणीव मनास झाली ..ते यात्रेदरम्यानही पटले.. आणि आपण योग्य माध्यमाच्या संपर्कात असल्याचा विश्वास दुणावला. आध्यात्मिक मार्गावर वाटाड्या प्रामाणिकच मिळावा लागतो.. तभी आगे सफर का आनंद मंझिल तक दुगना होते रहता है. मजा आने लगता है. तस्सेच माझ्या बाबतीत घडत गेले. नर्मदा माय मला चुकीच्या हातात बरी पडू देईल? तिलाही आता आपल्या प्रामाणिक ओढीचा अंदाज आला होता. तुमची तिच्याविषयी असणारी तळमळ प्रामाणिक/ निर्मळ /अहंकारविरहीत असली की मग ती उभीच असते ना द्यायला तुम्हाला भरभरून. तसं पहायला गेलो तर मी होतोच कोण? पण तिच्यापासून कोण काही लपवू शकेल? तिचा सीसीटीव्ही स्वच्छपणे टिपत असतोच तुम्हाला. मी निश्चिंत होतो. घरी यू ट्यूबवर आता जगद्गुरू शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक एकदा तरी ऐकल्याशिवाय दिवस जात नव्हता. काय सुंदर रचना केलीय आचार्यांनी?... वेगवेगळ्या संगीतकारांनी वेगळ्या चाली रचल्यात.. सर्वच अप्रतिम! ऐकता ऐकता आपण नर्मदा जलात विरघळूनच जातो. भानावर येतो तेव्हा डोळे हमखास पाणावलेले असतात. दिवस भराभर संपावेत असेच वाटत होते...२९ नोहेंबर ची आतुरतेने वाट पहात होतो. जातच आहोत तर महाकालेश्वर दर्शनही करून घेऊ असा विचार करून उज्जैनसाठी रेल्वेची तिकीटं बुक करून टाकली.
श्री जगन्नाथ कुंटे यांनी त्यांच्या पुस्तकात वासुदेव निवासचे उल्लेख केलेयत ते मनात खोलवर रूतले होते. आध्यात्मिक मार्गावर पुढे चालायचं तर गुरूमहाराजांकडून तशी शक्ति मिळणं अत्यावश्यकच. माझे मित्र श्री रविंद्र मोहिरेंसकट ,पुण्यात थेट वासुदेव निवास गाठलं. पूज्य श्री शरदशास्त्री महाराजांना दंडवत केला.
..अनुग्रहाबद्दल विनंति केली. त्यांनी सुहास्य वदनाने ती मान्य केली. जवळ बसवून घेतलं. प्रसाद ग्रहण करण्याबद्दल सुचवलं व एका सेवकास बोलावून आम्हा दोघांना वरच्या खोलीत घेऊन जाण्याबद्दल सांगितले. आम्ही पहिल्यामजल्यावर जाण्यासाठी पायरी चढू लागलो.. आणि.. पहिल्या पायरी पासूनच प. पू. श्री गुळवणी महारांजाच्या सामर्थ्याची /भक्तावरील त्यांच्या प्रेमाची झलक अनुभवयास सुरूवात झाली... मी थरारून गेलो... पायरीगणिक अंगावर रोमांच तीव्र होत राहिले. मला समजेना नक्की काय होतय. अंग थरथरू लागले... जड होत गेले... मी प. पू.गुळवणीमहाराजांच्या गादी समोर. दंडवत घातला. मन भरून आलं. कधीही न भेटलेला मी त्यांनी प्रथमदर्शनी मला आपलसं केलं. एक प्रकारे अभयच दिलं. सेवकानं आम्हाला तिथेच शांतपणे मांडी घालून डोळे मिटून बसण्याची सूचना केली... पुढचा अर्धातास कसा संपला ते समजलेच नाहा. डोळे उघडले.. जड झाले होते... तस्बीरीतून महाराज मंद मंद हास्य करत होते. नमस्कार केला... उठलो.. खाली पूज्य शरदशास्त्री महाराजांना पुन्हा दंडवत केला... ते गालातल्या गालात हसत होते. त्यांनी सेवकास माझा फॉर्म भरून घेण्याबाबत सांगितले. मी फॉर्म भरून दिला. आवश्यक त्या सूचना घेतल्या... महाराजांना नर्मदा परिक्रमा बसने करणार असल्याचं सांगितलं त्यांनीही क्षणभर डोळे बंद करून मान डोलावली .मी निरोप घेतला. साधारण ऑगस्ट २०१८ असावा.
मी ठाण्यात परतलो.. मन आता पुण्यात वासुदेव निवास भोवती रूंजी घालत होतं. दिवस भराभर सरत होते. एके दिवशी श्री वासुदेव निवासचा लखोटा हाती पडला... अनुग्रहाची तारीख ठरली होती. दिनांक १० सप्टेंबर. सकाळी सहा वाजता. सोबत गुरूमंत्र व श्री टेंब्ये स्वामी महाराजांची सुंदर तस्बीर होती. काही सूचना होत्या. मला घरबसल्या अनुग्रह मिळणार होता. श्री जगन्नाथ कुंटेंना मनोमन धन्यवाद दिले. प्रतिभाताई चितळेंचेही आभार मानले. नर्मदामाईचं महत्व त्यांच्यामुळेेच तर परिचित झालं होतं. उत्सुकता वाढत होती.
नऊ सप्टेंबरला मला कामासाठी लातूर गाठावं लागलं. अनुग्रह प्राप्तीसाठी मी ठाण्याचा पत्ता दिला होता. पण नाईलाज होता. सूचना मिळाल्याप्रमाणे मी दहा सप्टेंबरला सकाळी पावणेसहा वाजता शुचिर्भूत होऊन लोकरीचं आसन घातलं. मांडी घालून बसलो. समोर श्री टेंब्ये स्वामींचा फोटो.. उदबत्ती निरांजन. श्रीफळ, दक्षिणा ठेवली. रूम बंद करून घेतली होती. प्रसन्नमुद्रेने महाराजांना नमस्कार केला. मला सांभाळून घेण्याबद्दल विनंति केली. अनुग्रहासाठी प्रार्थनासुद्धा. श्री दत्तमहाराजांना साकडं घातलं... पाच पंचावन्न झाले होते. मी शांतपणे डोळे बंद केले... डोळ्यासमोर दत्त महाराजांची छबी... शांत.. शांत... शांत... आणि बरोब्बर पाच मिनिटांनी... बहुतेक सहा वाजले असावेत... सहाचाच मुहुर्त सांगितला होता.... एक सुखद जाणीव.. बारीकशी कळ मूलाधारातून उठली.. वर सरकू लागली... शरिर डोलायला सुरूवात झाली... अवयवांत हालचाल व्हायला लागली... आता मी इच्छा असूनही डोळे उघडू शकत नव्हतो... डोलणं, घुमणं वाढत गेलं... मी माझा राहिलो नव्हतो... त्या अद्वितिय प्राणशक्तिनं माझा ताबा घेतल्याचे जाणवत होते. ..जाणीव अस्पष्ट होत गेली.. मी माझ्यातच नव्हतो.. काही काळानंतर शरिर स्थिर झालं.. श्रांत झालं... डोळे आपोआप उघडले गेले... जड झाले होते... विश्वाचं एक वेगळं दालन उघडल्याचा प्रसन्न अनुभव आता शांत मन घेत होतं... महाराजांच्या तस्बिरीला मी दंडवत घातला... अनुग्रह मिळाला होता..! तो शब्दात वर्णन करणं खरच कठीण !
आता रोज पहाटे उठून आसनस्थ होत सराव करत होतो. दोन तीन दिवसातच माझ्या लक्षात आलं. साधारण पहाटेस तीन च्या आसपास आता डोळे आपोआप उघडत होते. मी आसनस्थ होऊन सराव करत होतो. तासभर शारिरीक क्रिया घडत होत्या.. मनाला आनंद देऊन जात होत्या. मार्गक्रमण यथायोग्य सुरू झालं होतं. आता गुरूमहाराजांनी माझं बोट धरलं होतं. फक्त सहा दिवस ओलांडले.. मी झपाटल्यागत सराव करत होतो.. आसनावर सैल मांडी घालत डोळे मिटून बसत होतो.. आणि सोळा सप्टेंबर ची पहाट ह्या आध्यात्मिक मार्गाला फार मोठं वळण देणारी ठरली. पूज्य गुळवणीमहाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं.. दोनच शब्दांचा संवाद झाला. मी धन्य झालो... मी योग्य हातात सोपवला गेलो होतो. त्या प्रसन्न सकाळी मी पुण्यात पूज्य शरदशास्त्री महारजांना फोनवर ही माहिती दिली त्यांनीही आनंद व्यक्त केला.. व्यवस्थेच्या संघर्षात भाजून निघालेल्या पोलीस अधिका-याला स्वामी महाराजांनी आपलंसं केलं होतं. प्रेमाच्या शीतल वर्षावास प्रारंभ झाला होता... भाजलेल्या जखमांवर फुंकरच जणू !
दोन अडीच महिने कसे सरले कळालेच नाही. २६ नोहेंबरला सर्व सामान सुमान घेऊन आम्ही अवंतिका एक्स्प्रेस गाठली. दुस-या दिवशी उज्जैन. दोन दिवस थांबलो. महाकालेश्वराचं दर्शन घेतलं... पहाटे भस्मारतीचाही लाभ घेतला.. प्रचंड गर्दी... गाभारा लहान... पण त्यातही पहाटे महादेवावर जलार्पण करता आलं हेच समाधान. दर्शन घेऊन आम्ही थेट पोहोचलो ते ग्राम कटघडा.. तालुका बडवाह. कैवल्यधाम आश्रम. दोन तीन महिन्यांपासून फक्त फोनवर बोलत होते ते पूज्य अविनाशजी महाराज व पं. श्री अनय गुरूजींनी सुहास्यवदने स्वागत केलं. जेवण करून रात्री विश्रांती. सकाळी उठून प्रथम मैय्याला नर्मदे हर केलं. थंडी भरपूर तरीही... मैय्या स्नान केलं. गुडघाभर पाणी असल्यानं बैठक मारली. ओंजळीत मैय्याजल घेऊन प्रणाम केला. आणि गेल्या दोन महिन्यात जो विषय मनात सारखा रूंजी घालत होता. त्याचं स्मरण केलं आणि मैय्यास साक्षी ठेवून संकल्प केला. काय होता तो ? सांगतो...!
श्री वासुदेव निवासातून अनुग्रह मिळाल्यानंतर ठाण्यास परतलो. व्हाट्सप वर विरारचे श्री सतीश अनंत चुरी ह्या परिक्रमावासींचे काही लेख वाचायला मिळाले. मी प्रभावीत झालो होतो. त्यांचेशी फोनवर बोललो. आनंद वाटला. ते अभ्यासू परिक्रमावासी आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेयत. पुस्तक मागवलं. दोन तीन वेळा वाचून काढलं. वेगळी लेखनशैली. अभ्यासपूर्ण माहिती. त्यात एक गोष्ट माझ्या मनात रूतली. त्यांनी मैय्याच्या पोटात कोट्यावधी दिव्य शिवलिंग /बाणलिंग असल्याचे नमूद केलय. मी ती माहिती वाचताना हरवून गेलो. धावडी कुंडावर त्यांनी स्वतंत्र लेख लिहिलाय. तो जरूर वाचा.
मी झपाटलो गेलो होतो... ओंजळीत मैय्या जल घेऊन मैय्याला मनापासून प्रार्थना केली , म्हटलं.. माय तुझ्या पोटात इतकी अगणित दिव्य शिवलिंग आहेत... एक मला घरी पुजायला देशील? देच ! मात्र मला त्यातली माहिती काहीही नाही तेव्हां मी पात्रात हात घालून चिवडत नाही बसणार ! तूच द्यायचंस ! मी अनाडीय ! आणि संकल्प मागणी करून मी मैय्यास जलार्पण केलं. स्नान करून आश्रमात परत.. आज पासून सुरू होणार होती..... कैवल्यधाम आश्रम आयोजित आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा..बसने ! ८० सहयात्रींसकट मी ही सज्ज होतो.
नर्मदे हर ! - संजीव कोकीळ
9820462853
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे s s s हर !
(लेखांक ८)
श्री वासुदेव निवासचे प. पू . योगिराज गुळवणी महाराजांनी कुंडलिनी शक्तिपात योग अतिशय सोपा करून सामान्य जनांसाठी उपलब्ध करून दिलाय तो श्री दत्तमहाराजांच्या आदेशाने. हठयोगात जो करावा लागतो तो सिद्धयोगात गुरूकृपेने आपोआप होत असतो. त्याची संपूर्ण जबाबदारी / काळजी श्री गुरूमहाज घेतात. साधकास फक्त नियमित बैठक करायची असते. योगिराजांना शक्तिपाताचा अधिकार प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांकडून प्राप्त झाला तो श्री दत्तमहाराजांच्या आदेशाने व तोही नर्मदा मैय्याच्या तटावर... होशंगाबाद जवळच्या खर्रा घाटावर ! या दोन थोर विभूतिंची भेट खर्रा घाटावर झाली. श्री वासुदेव निवासचा हा असा संबंध नर्मदा मैय्याशी आला. माझ्यासाठी आणखी आनंदाची बाब. पूज्य योगिराजांनी नंतर महाराष्ट्रभर या सिद्धयोगाचा प्रसार केला. लाखो जनांना अनुग्रह देऊन त्यांचे जीवन धन्य केले.
२९ नोहेंबर २०१८. कैवल्यधामहून बसने आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथे ममलेश्वर मंदिराच्या प्रांगणात सामूहिक संकल्प पार पडला. प्रत्येकाला मैय्याजल कुपीत दिलं गेलं. विधीवत कंकण बाधून संकल्प करवला गेला. परिक्रमा आता ख-या अर्थाने प्रारंभ झाली. बसने का होईना, आता आम्ही परिक्रमावासी होतो... काही नियम समजावून दिले.. मैय्याला कुठेही ओलांडायचं नाही. दाढी करायची नाही. तेल साबण नाही. रोज मैय्याजल स्नान...तिच्या नामाचा जप.. आणि श्री अनय गुरूजी रोज दोन तास नर्मदा पुराण सांगणार होते. तेही साग्रसंगीत. संगीत मंडळी ढोलक /तबला/ऑक्टोपैड/ सह सोबत होती. रोज सकाळी पुराणकथा /भजन/आरती ...नंतर भोजन व मग पुढचा दरदिवशी दोन तीनशे किमी प्रवास. असा ढोबळमानाने कार्यक्रम होता.
ओंकारेश्वरला संकल्प करताना मी पुन्हा मनोमन मैय्याला प्रार्थना केली.. माय... तुझ्याकडचं दिव्य शिवलिंग दे...नित्य पूजेसाठी. मी नवीन आहे. माहित नाही तेव्हां तूच द्यायचंस.. असा हट्टच धरला.
दोनही बसेस रवाना. पहिलं दर्शन रावेरखेडी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समाधीचं घेतलं. नतमस्तक झालो. यवनी सत्तेला धडकी भरवणारा.. इंग्रजांना नामोहरम करणारा चिरविश्रांती घेत होता. ज्याच्या युद्धकैाशल्याची वाहव्वा आजही ब्रिटनच्या विद्यापीठात होते.. अभ्यासली जाते... तो महाराष्ट्राचा सुपुत्र !
नंतर दर्शन घेतलं ते संत सियाराम बाबा.. तेलीभट्ट्यान येथे.. वय १०५ च्याही पुढे. कृश काया.. पण दिव्यता अंगभर ओसंडून वहातेय. ते आजही पहाटे पाचला रोज नर्मदास्नान करतात. चहा बनवतात व भक्तांना देतात.. चहा एका छोट्या भांड्यात बनतो पण शंभर जरी परिक्रमावासी समोर आले तर तो त्यांना पुरून उरतो. ही सिद्धी.
नंतर दुस-या दिवशी मुक्काम राजघाट. रोहिणी तीर्थ. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत नर्मदा स्नान केलं... नंतर दोन तास अनय गुरूजींच्या रसाळ प्रवचनात कसे संपले कळालेच नाही. नर्मदा पुराण आता उलगडत होते. तिची अवतरण कथा रंगत आणत होती. सोबत नर्मदाष्टक /भजन/आरती संगीत मंडळीच्या साथीनं रंगत दररोज वाढतच होती. भोजन उरकले की अकरानंतर प्रवास. हा दिनक्रम ठरलेला. राजघाटावर प. प. श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेले एकमुखी दत्तमंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले. आता ते मंदिर बैकवॉटर मधे बुडून गेले आहे.
नंतर प्रकाशा.. त्यानंतर शूळपाणेश्वर मंदिर. जे आता नव्यानं बांधलं गेलय. सरदार सरोवर बांधल्यानं पाणी वाढून मूळ मंदिर बुडालं .ते शिवलिंग स्थलांतरीत करण्याचा खूप प्रयत्न झाला म्हणतात , पण शिवलिंग हलवता आले नाही. त्याचा दर्जा ज्योतिर्लिंगासमानच होता असे सांगतात. आता नव्या मंदिरात नवीन शिवलिंग आहे पण त्यावरचा चांदीचा अकरा फड्यांचा नाग जुनाच आहे. तिथले पुजारी त्रिवेदींनी महत्व सांगितलं. तो चांदीचा नाग सरकवून दाखवला व सगळ्यांना उचलायला सांगितला.. तीन तीन चार जणांनी मिळूनही तो नाग कोणालाच वर उचलता आला नाही. शूळपाणेश्वरच्या प्रांगणात नर्मदा पुराणकथा खूपच रंगली होती. पुराणात नमूद महत्व अनय गुरूजींनी समजावून सांगितलं. सहयात्री आता मोकळेपणाने वावरत होते. कथा संगीताचा आनंद घेत नाचतगात होते. आम्ही आता घर विसरलो होतो. नर्मदाभक्तिचा आनंद वर्धिष्णु होत होता.. प्रत्येक दिवशी !
नंतर अंकलेश्वर. अंकलेश्वरला बलबलाकुंडास भेट. नर्मदे हर... जोराचा नारा दिला की पाण्यातून बुडबुडे वर येणं हे इथलं नवल. अर्थात हा चमत्कार मला मैय्यानं गरूडेश्वरी आधीच दाखवून दिला होता. त्यानंतर कठपोर, विमलेश्वर. तेथून समुद्र ...रत्नासागर ...यांत्रिक बोटीने नर्मदेस वळसा घालून मिठीतलाई गाठलं. आता दक्षिण तटावरून आम्ही उत्तर तटावर. दररोज सकाळी नर्मदा स्नान व नंतर दोन तास प्रवचन नित्य होत होतं. नर्मदा पुराण ऐकायला मिळाल्याने आता नर्मदेविषयी साद्यंत हकिकत कळत होती. तिच्या बद्दलची आत्मियता /भक्ति वाढत होती. प्रवचन/भजन/आरतीत सगळेच रंगून जात होते. तल्लीन होत होते. नंतर नारेश्वर, तिलकवाडा ठिकाणी दर्शन मुक्काम होत होत गरूडेश्वर /कुबेर भंडारी करून आम्ही परत कैवल्यधाम आश्रमी पोहोचलो. ती अमावास्या होती. तिथे महामृत्युंजय होम /कुमारी कन्या पूजन /भोजन संपन्न झाले. कैवल्यधाम आश्रमाचे हे वैशिष्ट्य आहे. आता पर्यंत जवळजवळ दोनशे अमावास्येला तिथे अशाप्रकारे हवन याग संपन्न झाले आहेत. त्याचा पुण्यप्रभाव आश्रमात जाणवतोच. असो.
पुढील प्रवास असाच दैनंदिन कार्यक्रमासह संपन्न होत गेला. पण माझ्या ह्या प्रवासात लक्षणीय ठरला तो मुक्काम जबलपूर. तो मी सविस्तर कथन करतो. नर्मदा माईची असीम कृपा कशी होते व ती आपलं आयुष्य व्यापून, कशी बदलून टाकते हे खरोखर आपणास धन्य करून टाकणारे असते. तो प्रसंग घडला आणि माझं आध्यात्मिक जीवन उजळून निघालं. पुढचा मार्ग स्पष्ट व सोपा झाला.
जबलपूरला पोहोचायला आम्हाला रात्र झाली.. रस्ते खराब लागल्याने मध्यरात्र उलटत आली होती. त्यात आयोजकांना जरा अडचण आली.. ग्वारी घाटाजवळ उतरण्याची जागा ऐनवेळी मालकानं दुस-याला दिली. त्यामुळे कालीघाटावर गाडी वळवली गेली. तिथे सोय झाली. हे का घडलं ते नंतर सांगतो. सगळा खेळ मैय्या व्यवस्थित खेळत होती. आम्ही दमलो होतो. लगेच झोपी गेलो. सकाळी उजाडताच स्नानासाठी घाटावर पोहोचलो. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. आतापर्यंतच्या प्रवासात इतके प्रसन्न वातावरण मला कुठेच आढळले नाही. सूर्य उगवायचा होता. धुक्याची दाट नर्ममुलायम शाल पांघरून मैय्या शांतपणे पहुडली होती. स्वच्छ नितळ पाणी.. की.. तळातली वाळूसुद्धा स्पष्ट दिसत होती. त्यात भर म्हणजे बगळ्यांचे थवे दर दोन मिनिटाला मैय्यास समांतर पूर्वेकडून पश्चिमेस उडत जात होते. अतिशय रमणीय दृश्य. मी हरखून गेलो. भान हरपून गेलो. तिथेच बैठक मारली. मैय्याचं ते अप्रतिम सौंदर्य न्याहाळत बसलो .काली घाटाच्या सौंदर्यानं मला भुरळ पाडली होती. हे नेमकं इथच का घडावं..(त्या साठीच तर मैय्यानं ग्वारी घाटावर सोय होऊ न देता इकडं कालीघाटावर येण्यास भाग पाडलं) . त्या क्षणीतरी मला माहित नव्हतं पण, पुढं काय घडणारय ते मैय्याला माहिती होतं नं.. ! त्याचीच ही पूर्व तयारी असावी.. हे नंतर समजलं.... वेळ होत आली होती. बाकीचे सहयात्री स्नान करून परतत होते. त्यातले एकदोघे मला म्हणाले.. चला लवकर आता प्रवचन सुरू होतेय... मी त्यांना आलोच म्हणून सांगितलं आणि जलस्पर्श करून मैय्याला नर्मदे हर केलं.. पाण्यात शिरलो. बैठक मारली.. पाणी तसं उथळ होतं. त्या पवित्र स्पर्शानं थरारून गेलो. मैय्याशी थोडा संवाद साधला.. डोळे मिटून ध्यान केलं .नित्य महादेवाचा जप केला. सर्व देवीदेवतांनाही नमस्कार करून त्यांना अर्घ्य देऊन मी तृप्त होऊन उठलो. बाहेर येण्यासाठी उजवीकडून जरा वळालो... अन्... माझी नजर तिथेच थिजली.... अंग शहारले.. रोम रोम पुलकित झाले ... क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसेना... मी अत्यानंदानं पुढे सरकलो.. तिथे पाण्या बाहेर डोकावणारे, तीन चार फुट उंचीचे पाषाण खडक होते.. शंक्वाकृती..! त्यातील एक खडकाच्या अगदी टोकावर बारीक खाचेवर एक शिवलिंग ठेवल्याचे स्पष्ट दिसले. मी अवाक्.. कोठे मैय्या दिसतेय का? म्हणून पाहिलं... सगळं कसं शांत शांत होतं.. पलिकडून पत्नी माधुरी स्नान करून येत होती. मी झट्कन ते पिवळसर झाक असणारं तीन साडेतीन इंचाचं शिवलिंग दोन्ही हातांनी आदरपूर्वक उचललं... हर्षभरित होऊन मस्तकी लावलं आणि पत्नीच्या स्वाधीन केलं म्हणालो पर्समध्ये ठेव... उत्तेजित स्वरात बोललो.. आपली यात्रा सफल झाली..! नर्मदे हर... नर्मदे हर... मी जोरात पुकारा दिला. मैय्याला दंडवत घातला. मैय्यानं माझी विनंति मान्य केली होती. तिच्या जवळचं दिव्य शिवलिंग.... साक्षात देवाधिदेव महादेवच तिनं माझ्या झोळीत दिला होता, दररोज घरी पुजण्यासाठी. मी मोहरून गेलो. पत्नीला ह्यातलं माहित नव्हतं. मी नंतर माहिती दिली. प्रवचन रंगून गेलं. तो दिवस धन्य धन्य अविस्मरणीय झाला होता माझ्यासाठी. मनाची कवाडं आता आणखी विस्तारली होती. अध्यात्माचा राजमार्ग आणखी स्वच्छ झाला होता. माझ्यासाठी हा सुवर्णक्षणच.
मी ही माहिती कुणालाच दिली नाही. मात्र परिक्रमा संपल्यावर समारोपाच्या वेळी एवढच बोललो की ज्यासाठी मी परिक्रमेत आलो होतो. ती इच्छा मैय्यानं पूर्ण केली. मी तृप्त आहे.
जबलपूरहून पुढे अमरकंटक.. माई का बगिया... तिथे नर्मदा पूजन.. जलपरिवर्तन... तेथून उत्तरतटावरून परत दक्षिण तटावर येत जोगी टिगरिया... तेथून पुन्हा होशंगाबाद. येथे सेठानी घाट अतिशय विस्तिर्ण व सुंदर आहे. परत आम्ही ओंकारेश्वरला... परिक्रमा समाप्ती .दुस-या दिवशी होडीने मांधाता पर्वतास प्रदक्षिणा घातली... नंतर..तेथून खंडवा... रेल्वेने परत ठाणे. परिक्रमा सुंदररित्या संपन्न झाली. दिव्य शिवलिंग प्राप्तीचा अपार आनंद होता. ऑपेरा हाऊसला माझे गुरूगृह गाठले. सर्व हकिकत कथन केली. आदेश झाला की श्रावण महिन्यात शिवलिंगाची स्थापना करून नित्य पूजा सुरू करावी. तो पर्यंत ते शिवलिंग देवघरात वाटीत ठेवून दिले. ते दिव्य शिवलिंग कसे दिव्य आहे त्याचा प्रत्यंतर लवकरच आला.
ही हकिकत मी विरारचे श्री सतीश चुरींना सांगितली. त्यांना ह्यातली बरीच माहिती आहे. त्यांनीही आनंद व्यक्त केला.
त्यानंतर फेब्रुवारीत मी सपत्निक...श्री विक्रम पणशीकरांसह ओंकारेश्वरला पुन्हा गेलो. मैय्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही हेच खरे. दोन दिवस मुक्काम. तिथं विष्णुपुरीत मंदिरात विष्णुयाग संपन्न केला... श्री विष्णुची अतिशय रेखीव मूर्ती आहे तेथे. आनंद भरून घेतच परतलो. आता मैय्याशी जवळीक आणखी घट्ट झाली होती.
श्री विक्रम पणशीकरांनी कलकत्त्याचे श्री शैलेन्द्रनारायण घोषाल यांच्या ' तपोभूमी नर्मदा ' या पुस्तकाबद्दल कळवलं.त्याचे आठही खंड मागवले... वाचले... अक्षरश: हादरून गेलो. परिक्रमा काय असू शकते? याचं उत्कृष्ट उदाहरण ! तीन वर्षे परिक्रमा करून एकाच परिक्रमेत जे दिव्य अनुभव त्यांना मिळाले त्यावर त्यांनी सलग आठ खंड लिहिले आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांना मैय्याकडून असेच दिव्य शिवलिंग प्राप्त झाल्याबद्दल नमूद केले आहे. ते शिवलिंग सतत आकार बदलते.. रंग बदलते.. व त्यावर पवित्र चिन्हेही बदलत राहतात, असं त्यांनी नमूद केलय. श्री सतिश चुरींच्याही पुस्तकात हे वाचावयास मिळते. मी मंत्रमुग्ध झालो. श्री शैलेंद्रनारायण घोषाल यांनी १९५२-५५ च्या काळात परिक्रमा केली. त्यांना गरूडेश्वर घाटावर मध्यरात्री नर्मदामैय्याचं साक्षात दर्शन झाल्याचं त्यांनी नमूद केलय.. त्याच घाटावर तिथे मैय्यानं भरदुपारी मला बलबला कुंडाचा चमत्कार दाखवला होता. मी सुखावलो. त्याच घाटावर घोषालांना दिव्य सुगंधाची प्रचिती आली. ती इतरत्र कुठेही मिळाली नाही.. मैय्यानं तीही अनुभूती मला तिथे दिली होती ह्याचे स्मरण झाले. कांही संदर्भ पक्के झाले.
मी आता देवघरात ठेवलेले शिवलिंग निरखत होतो... श्रावण जवळ येत होता.. हळू हळू शिवलिंगाचा आकार बदलत होता... सुरूवातीस ओबडधोबड वाटणारे ते शिवलिंग आता नाजूक व पॉलिश्ड झाले होते आपोआप. त्याचा रंगही आता बदलला आपोआप. पिवळसर वाटणारे ते शिवलिंग चक्क कर्पूरगौर झाले होते... त्यावर कडी म्हणजे त्यावर आता स्वयंभू , ठळक ओंकार चिन्ह प्रकट झाले होते. पहिल्या श्रावण सोमवारी.. बार्शीचे श्री केतन काळे गुरूजी व सहकारी पुरोहितांचे हस्ते.. रूद्र संपन्न झाला... शुभ्र शिवलिंगावर ओंकार चिन्हावर दुधाचा मंत्रोक्त अभिषेक होताना मन प्रसन्न झाले होते... वारंवार नर्मदे हर, नर्मदे हर म्हणत तिला प्रणाम करत होते... कलियुगात अशक्य वाटणारी घटना घडली होती... मैय्यानं स्वत: दिव्य शिवलिंग बहाल केलं होतं. आणखी काय हवं ह्या पामराला?
आता त्या शिवलिंगावर स्यंभू ओंकारच्या सोबतीला ठळक व ठसठशीत त्रिशूळ चिन्ह प्रकटले आहे. मी शब्दात हा आनंद वर्णू़च शकत नाही. अहोभाग्य.. मैय्याची कृपा /तिचं प्रेम.... इतकेच !
ह्या शिवलिंग स्थापनेत /पूजेत ठाण्याचे श्री अभय मराठे , ज्वेलर ह्यांची मोलाची मदत झाली हे मी आनंदाने नमूद करू इच्छितो.
नर्मदा मैय्याच्या भक्तिचा प्रवास आता वाढत राहिला... आता तिच्या दर्शनाची तळमळ वाढीस लागली.... नित्य पूजा होत राहिली. घरातील प्रत्येक अनुष्ठान आता मैय्याच्या आरतीनेच पूर्ण होतेय. मात्र दर्शनासाठी तिनं वर्षभर वाट पहायला लावली. पुन्हा कैवल्यधाम आश्रम आयोजित परिक्रमेत सामिल व्हायला लावलं.. कसं ते पुढे देतोच आहे.
पण.. मैय्यानं.. वर्षभर वाट पहायला लावली हे मात्र खरे !
नर्मदे हर ! ... - संजीव कोकीळ
9820462853