रेवानुभूति - 2
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
रेवानुभूति - 2
नर्मदा परिक्रमेचे अनुभव- नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ - सुरुचि नाईक - 101-150
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०१
नर्मदे हर
मागच्या शंभराव्या भागात मी तुम्हाला गायत्री पुरश्चरण यज्ञा बद्दल सांगितलं होतं. सोहागपूर शिव मंदिरातून साहू यांच्या घरी आमची रवानगी मैया ने किती ती विलक्षण पद्धतीने केली ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. साहू परिवाराकडून पुढे निघते वेळी संपूर्ण परिवार आम्हाला निरोप देण्यासाठी चार ते पाच किलोमीटर चालत गावाच्या वेशीपर्यंत आला होता. आता इथून पुढे जाऊयात.
अरे हो मागच्या भागात मी एका मूर्तीबद्दल बोलत होते नाही का? सांगते सांगते. सोहागपूरला आम्ही ज्या मंदिरात थांबलो होतो तिथली ही मूर्ती. अत्यंत पुरातन आणि स्वयंभू. एका दगडातून कोरलेली. एकसंध. ज्या कोणा शिल्पकारांनी ती केली असेल त्या कलाकृतीला शतशः प्रणाम! आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये, पूर्वजां मध्ये जी कला, जे ज्ञान होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नाहीये असं अनेकदा वाटून जातं. ही जी मूर्ती आहे त्यामध्ये शिवपार्वती मध्यभागी असून शिव पंचायतन व शिव परिवार ही सर्व एकत्रितपणे कोरल्या गेलेली आहेत. प्रत्येक देवतेचे वाहन सुद्धा ह्या मूर्ती मध्ये आहे. खरंतर असे फोटो काढायला चांगले कॅमेरे असावे लागतात.. मी मोबाईल कॅमेराने फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे तो इथे देत आहे.
याच वाटचालीमध्ये रस्त्यात कुठेतरी पिंपळाच्या झाडाखाली एक शनी मंदिर दिसलं. त्याचाही फोटो काढला तोही देते.
आता आम्ही हळू हळू होशंगाबाद कडे सरकत होतो मात्र अजूनही बराच वेळ होता. सिमरी वरून पुढे जाण्यासाठी गावागावातून एक रस्ता जातो. तिथे कुठेशी एक गोडाऊन आहे त्या गोडाऊन च्या बाजूला एक आजोबा भेटलेत. त्यांची गंमत सांगते. कोणीतरी आम्हाला दिलेला केळ्यांचा घड आमच्याकडे होता. एवढ्या केळांचं करायचं काय? मग वाटेत येणार्या-जाणार्या लोकांना आम्ही केळ देऊ लागलो. हे आजोबा देखील भेटले त्यांना ही केळ दिलं आणि थोड्या गप्पा झाल्या. आजोबा बरेच म्हातारे ऐंशीच्या वर. घरी कंटाळा येतो म्हणून या रस्त्यावर येऊन बसतात. परिक्रमावासी भेटले की बोलतात. आमच्या गप्पा सुरू असतानाच आभाळ आलं. बोलता-बोलता आजोबा म्हणाले.. “बहुत बाते करती हो मैया, ऐसेही ही बाते करती रहोगी तो मुकाम पर नही पोहोच पाओगी… मै तो घर चला जाऊंगा लेकिन तू भीग जायेगी… तेरी मिठी बाते सुनने का मन तो है.. चल मे भी तेरे साथ आता हुं…” असं म्हणत पुढची दोन गाव ते आजोबा माझ्या सोबत पायी चालत चालत आले.. थोडक्यात काय तर. “फारच गप्पिष्ट आहेस, तू बसशील गप्पा मारत आणि होशील ओली.. त्यापेक्षा मी तुझ्याबरोबर येतो…” असं म्हणत हा ऐंशी वर्षाचा म्हातारा बारा तेरा किलोमीटर आमच्यासोबत चालला…त्यांनीही परिक्रमा केलेली त्यामुळे गप्पांना नुसतं उधाण!
पुढे जरासा चढाव होता.. जरासा काय पुष्कळ चढाव होता. ह्या आजोबांचा निरोप घेऊन आम्ही पुढे चालू लागलो मात्र थकवा जाणवायला लागला होता. बढाणा गावाच्या जवळ आलो तेव्हा ची गंमत. एक कुणी शेतकरी गाईंसाठी चारा घेऊन जात होता. त्यांनी आम्हाला चहा साठी विचारलं. खरंतर चहा प्यायची इच्छा होत नव्हती तर तो जेवायला थांबवू लागला.. जेवायची तर अजून वेळ झाली नव्हती मग त्याच्या समाधानासाठी काहीतरी घ्यावं म्हणून आणि त्याच्या घरी गाई आहेत म्हणजे दूध किंवा ताक नक्कीच मिळेल असा विचार करून ताक चालेल असं सांगितलं. तो म्हणाला तुम्ही थांबा मी ताक आणतो. तिथेच एका ओढ्याच्या पुलावर आम्ही विश्राम करण्यासाठी थांबलो. जवळजवळ तास होऊन गेला तरी हा काही ताक घेऊन आला नाही. विसरला असेल असं वाटून आम्ही पुढे निघालो. आमच्या जवळचं पाणीदेखील आता संपलं होतं. पुढच्या गावात गेलो आणि पाणी मागितलं. तिथे ही आम्हाला जेवायचा आग्रह केला. आणि तिथेही आम्हाला ताक चालेल असंच आम्ही सांगितलं. एका घरासमोर एका ओट्यावर आम्ही बसलो होतो. या गावातील एकाने भरपूर ताक करून आणलं. तरी लिटर भर नक्कीच. ताक मला प्रचंड आवडतं… दोन-अडीच ग्लास ताक प्यायले देखील मी… तृप्त वाटलं अगदी. बाबाही भरपूर ताक प्यायला. आम्ही छान तृप्त होऊन पुढे निघणार तोच मागच्या गावातला तो ताक आणतो म्हणून घरी गेलेला माणूस दोन हातांमध्ये दोन बरण्या घेऊन आला. त्यांनी जवळजवळ तीन लिटर ताक आणलं होतं. अरे बापरे आता काय करणार? गावात कुठे ताक मिळालं नाही म्हणून हा माणूस मागच्या गावात जाऊन आमच्यासाठी घेऊन आला होता… नुसतं इतकंच नाही तर तो मागच्या गावातही पायी गेला तिथून ताक घेऊन स्वतःच्या गावात गेला, हिरवी मिरची कोथिंबीर वाटण करून सुंदर मसाला ताक घरी तयार केलं आणि पुन्हा आमच्यासाठी पुढच्या गावामध्ये पायी आला! इतके कष्ट, इतकी मेहनत त्यानी घेतल्यानंतर ‘पोट भरलं’ असं सांगून त्याचा अपमान करणं म्हणजे केवढी दुष्टता? पोटात मात्र थोडीही जागा नाही… तरीही मी आणि बाबा केवळ त्या माणसानी एवढे कष्ट करून ताक आणलं म्हणून पुन्हा दोन दोन ग्लास ताक प्यालो. आता इतकं ताक प्यायल्यानंतर पोटाचं पुढे काय झालं ते काही सांगू नये…. असो पण तरीही त्याच्या मेहनतीचं चीज झालं यातच खरं काय ते समाधान.
पुढे बढाणा गाव त्यानंतर आलं तेलसरी गाव. आता आम्ही दोघांनीही लिटर लिटर ताक पिऊन झालं असल्यामुळे जो काही त्रास झाला त्यानंतर आम्ही अगदी गळून गेलो होतो. कुठेतरी तेलसरीतच मुक्काम बघावा आणि आराम करावा असं वाटत होतं. आमची अवस्था पाहून एक तरुण मुलगा आम्हाला स्वतःच्या घरी येण्यासाठी आग्रह करू लागला. तुम्ही हळूहळू चालत या, मी पुढे जाऊन तयारी करतो असं सांगून पुढे गेला. इथे गंमत अशी झाली की न त्याने आम्हाला नाव विचारलं आम्ही त्याला नाव विचारलं, पत्ता देखील विचारला नाही.. आम्ही चालत राहिलो आणि तेलसरी गाव संपत आलं तरी ह्या माणसाचा काही अत्ता पत्ता नाही, उलटं येता येत नाही त्यामुळे थोडावेळ एका शाळेच्या जुन्या इमारती पाशी विश्राम करायचं ठरवलं. गावातली लोक जमा झाली. अमुक एक मुलगा आम्हाला शोधत शोधत येईल त्याची आम्ही वाट बघतो आहे असं सांगितल्यावर अख्ख गाव शोध घेऊ लागलं. तो मुलगा कसा होता? त्याची गाडी कोणत्या रंगाची होती, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांनी आम्हाला विचारले. आम्ही जे वर्णन सांगत होतो ते मात्र गावकऱ्यांना समजतच नव्हतं. तुम्ही सांगता तसा माणूस या गावात नाहीच असं गावकरी सांगत होते… मनात एक प्रश्न निर्माण होत होता. आम्ही जर इथून पुढे निघून गेलो तर ज्या घरी तयारी केली असेल त्यांचे कष्ट वाया जातील.. गावातली तरुण मंडळी पुढे आली आणि प्रत्येक घरोघरी चौकशी केली. साटोगी चाचा च्या सुने चा भाऊ गावात नवीन होता आणि त्यानेच आम्हाला बोलावलं होतं. साटोगी चाचा आणि त्यांचा मुलगा बाहेरगावी गेले होते. त्यांची सून बाळांतीण होती. अशाही परिस्थितीत त्यांनी त्यांच्या घरी आम्हाला बोलावलं होतं. आपल्या घरी रेवा माई ने जन्म घेतला आहे आणि म्हणून परिक्रमावासींनी आपल्या घरी यावं अशी त्यांची इच्छा. … आम्ही घरी गेलो तो ही बाळांणतीन पोरगी स्वयंपाकासाठी तयारीला लागली होती. तिला तसच थांबवून फक्त खिचडी टाक असं सांगितलं. भरपूर ताक प्यायल्यामुळे आमचंही पोट जरा गडबड झालं होतं. घरची दुधी भोपळ्याची साधीशी जिरे-मोहरी घातलेली तेलावरची भाजी आणि खिचडी असं जेऊन विश्राम करून मग आम्ही पुढे निघालो. खरंच या लोकांच्या श्रद्धेचं मोल नाही बाबा!
पुढे गेलो ते रामनगर ला. त्याआधीच्या पुरातन शिवमंदिराची एक गंमत झाली. याशिवाय मंदिराची अवस्था अगदी मोडकळीला आलेली. सगळे खांब तिरपे झालेले. सगळी माती खचलेली. मंदिराच्या समोरील अंगणामध्ये कंपाऊंडच्या भिंती वाहत येऊन आडव्या पडलेल्या. तरीही ही शिवपिंडी मात्र जशीच्या तशी. खोलवर रुजलेली असावी. फोटो सापडला तर नक्कीच देते. या मंदिरातला पुजारी मंदिरात न राहता गावात राहतो. कधी कुठल्या क्षणी कुठला खांब कोसळेल याचा नेम नाही. मंदिराचा जीर्णोद्धार करायला हवा तसा पैसा नाही. या अर्ध भग्न मंदिरामध्ये भयानणता ही प्रचंड. लाईटची व्यवस्था नाही आणि गर्भगृहात प्रचंड अंधार. मिणमिणते दिवे तेवढाच काय तो आधार. तरी या मंदिरात एक वेगळं आकर्षण वाटत होतं. या खांबांवर केलेलं शिल्पकाम बघावसं वाटत होतं. इथे थांबावं का थांबू नये हे दोन्ही प्रश्न सारख्याच जोरावर मनात येत होते. एक मन तिथे थांबावं असं सांगत होतं तर दुसरं मन अजिबात थांबू नये असं सांगत होतं. काय करावं काही सुचेना. एक वेगळी भयानणता आणि त्या भयाणते पलीकडलं आकर्षण हे गणित काहीतरी वेगळं होतं.. एक मात्र नक्की..इथून पुढच्या प्रवासात मला अनेकदा अशा भयाणते कडे ओढल्या गेल्याचं जाणवलं. चांगलं किंवा वाईट ते काही माहिती नाही.. वेगळं किंवा अनयुजुअल असं काहीसं हे आकर्षण होतं हे नक्की.
आम्ही इथे थांबायचा निर्णय घेतला का? का आम्ही इथून पुढे गेलो? तिथे थांबलो असताना आम्हाला नक्की काय वाटलं? काय जाणवलं? इथे न थांबण्याचा पश्चाताप झाला? थांबण्याचा पश्चाताप झाला? याचा उलगडा या भागात करणार नाही. पुढच्या भागात नक्की कारण तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सुहागपुर ची मूर्ती दाखवली होती. पुढे मी एका अतिप्राचीन आणि मोडकळीस आलेल्या शिव मंदिराबद्दल बोलले होते. तिथे थांबावे की थांबू नये या द्विधा मनस्थिती मध्ये मी होते. त्या मंदिराची भयाणता, त्यामागचं कुतूहल आणि त्या या भग्न इमारतीचे सौंदर्य, शिवाय गर्भगृहातला उबदार अंधार या सगळ्याच गोष्टी एकमेकांच्या विरोधात असून सुद्धा आकर्षित करत होत्या हे नक्की.
या मंदिराचा पुजारी मात्र अगदीच न्यूट्रल होता हे आणिक एक वेगळंच. तुम्ही थांबत असाल तर डब्बा घेऊन येतो. किंवा माझ्या घरी भोजन प्रसादी ची व्यवस्था करतो, पण मी इथे थांबत नसतो असं तो बोलला. थांबा अथवा थांबू नका असा कुठलाही इशारा त्यानी दिला नाही. हाताची घडी घालून खाली मान घालून आमच्या निर्णयाची वाट बघत तो उभा होता. “यहा रुक सकते है क्या” बाबानी विचारलं. “आपकी मर्जी” तो म्हणाला… कुठलाही निर्णय देण्यासाठी त्याला परवानगी नसल्यासारखं त्याचं बोलणं वाटलं. युद्धभूमी किंवा स्मशानभूमी मधल्या भयाणतेशी ही भयानकता जवळची वाटत होती. अस्ताव्यस्तता, भग्न झालेल्या भिंती, खचलेली जमीन हे सगळं बघितल्यानंतर, फक्तच गर्भगृहातला उबदार अंधार आणि त्याच्या आकर्षणाला दूर सारून आम्ही तिथून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
पुढे गेल्यानंतर “अच्छा किया शिव मंदिर में नही रुके” अशा प्रतिक्रिया मिळाल्या. आम्ही मात्र कारणं शोधत बसलो नाही. जे होतं ते योग्यच होत असतं याची आता सवय झाली होती. इथे राधाकृष्ण मंदिरात रात्रभर रामायण माइक वर सुरू असतं असं समजलं. मागच्या एका अनुभवाची आठवण झाली. ठीक आहे बघूयात असा विचार करून आम्ही आसन लावलं. काय झालं कोण जाणे, त्यादिवशी माइक वर रामायण झालंच नाही. परिक्रमावासी आले म्हणून गावातल्या सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन हनुमान चालीसा चं अकरा वेळा पठण केलं. आजची रात्र छानच गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुढे जायचं ठरवलं. पण आता इथे मारू नदीला बरंच पाणी होतं. नाव करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नाव लवकर मिळेच ना. निघायला बारा वाजलेत. आता सांगा खेडा कडे जायचं. इथे आम्ही रस्ता चुकलो. एका शेतातून एक छोटं लाकडी फाटक ओलांडून पुढे जायचं होतं ते न जाता आम्ही सरळ वाटेने गेलो. या रस्त्यावर आजूबाजूला शेतं होती, मध्ये पाऊलवाट होती. इथे एक गंमत झाली, खरंच त्यावेळी काळजाचा ठोकाच चुकला असता. दारामागे लपून लहानपणी आपण एक खेळ खेळायचो बघा, कोणालातरी “भो”करायचं.. तसंच झालं.
आम्ही आपलं मन लावून चालत असताना झाडाझुडपा मधून एक लठ्ठ, सावळी, मध्यमवयीन बाई अचानक समोर येऊन उभी राहिली. ती बाई वाजवी पेक्षा जास्त लठ्ठ आणि जास्त उंच होती. तिचे केस कमरेपर्यंत लांब होते आणि मोकळे सोडलेले होते. कपाळावर भलंमोठं लाल कुंकू होतं. ती समोर आली त्यावेळेस तिच्या आणि माझ्यामध्ये जेमतेम दोन फुटाचं अंतर असेल! तिच्या हातात गवत कापायचा कोयता होता. ती इतक्या झटकन माझ्या समोर आली की त्यावेळी जणूकाही ती माझ्यावर हल्ला करते की काय असा विचार क्षणभर मनात येऊन गेला आणि मी किंचाळलेच! डोळे बंद केले आणि कानावर हात ठेवून तिथेच जमिनीवर खाली बसले, तशी ती बाई मोठ्याने हसू लागली… तिने हातातला कोयता बाजूला फेकला आणि माझ्या केसावरून हात फिरवला.. “रास्ता भटक गई है बेटा वापस जाना होगा”.. ती म्हणाली… “कोनसी धुन मे चल रही थी तुम, मेरी जगह कोई जानवर सामने आता तो क्या करती?.. वहा एक छोटा गेट मिलेगा उस्मे से कूद के जाना”.. आपला कोयता उचलून पुन्हा ती झाडाझुडपात निघून गेली. मला काही समजलंच नाही. काळजाचा ठोका चुकवणारं तिचं ते वागणं होतं. कोण कुठून आली, कुठे गेली काही.. काही माहीत नाही…आम्ही पुन्हा उलट फिरून त्या गेटकडे गेलो. आता पुढे सांगा खेडा खुर्द कडे जाऊ लागलो.
सत्वासा नंतर एक गंमतच झाली बरं का. एका घरातून आम्हाला लिंबू सरबतासाठी बोलावलं. एरवी चहा किंवा मही विचारतात आज लिंबू सरबत म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणून आम्हालाही आनंद झाला. हे घर थोडसं वाड्यासारखं होतं. आम्ही आतमध्ये जाऊन बसलो. बाबाला काय झालं काय माहित..! तो म्हणाला हे घर मी आधीही पाहिलं आहे. बोलता बोलता बाबाने त्या घराचा नकाशाच सांगितला… त्याच्या लागूनच घरही तसंच आहे असंही सांगितलं. कधी कधी वाटतं असं बघितल्यासारखं वगैरे,बरेचदा जाणवतो तो असा सारखेपणा, काही विशेष नाही त्यात.. असा विचार करून आम्ही पुढे निघालो. झालसर नावाचं गाव आहे हे. जरा पुढे गेल्यानंतर एका आजोबांनी आम्हाला थांबवलं. ठार बहिरे असलेले हे आजोबा बाबाला मिठी मारू लागले. ते म्हणाले “इस साल फिरसे परिक्रमा क्या बाबाजी?” खरंतर बाबानी पहिल्यांदाच परिक्रमा उचललेली… सारखे चेहरे असतात, असं समजून आम्ही पुन्हा पुढे निघालो.. पण या गावातून काही बाबाचा पाय निघेच ना! इथेच थांबू असं बाबा म्हणू लागला. पण अजून बराच वेळ हातात होता त्यामुळे पुढे जायचा निर्णय आम्ही घेतला.
बरेचदा आपण संदर्भ शोधत बसतो आणि संकेत विसरतो असं काहीसं बाबाच्या या अनुभवावरून आमचं मत झालं बरं का. सांगते. खरं तर बाबाची झालसरला राहण्याची इच्छा होती, पण आम्ही पुढे निघालो होतो. संध्याकाळ पर्यंत बछवाडाला पोहचू असं वाटत होतं, म्हणून तसा निर्णय घेतला होता. मात्र थोड्याच वेळात आपण बछवाडा पर्यंत पोचू शकत नाही असं आम्हाला वाटू लागलं. मारा, सर्रा, केमली, बछवाडा कोलनी आणि मग बछवाडा… बरच अंतर होतं. कदाचित झालसर चे ते संकेत आम्हाला थांबवून घेण्यासाठीच असतील… एकंदर असंच आम्हाला वाटू लागलं, त्याला कारणही तसंच! मारापर्यंत येतानाच आम्हाला थकायला झालं. आता माराला थांबू असा विचार केला तर इथे व्यवस्था नाही, सात किलोमीटर आत जावं लागेल असं समजलं. सात किलोमीटर आत जाण्यापेक्षा सात किलोमीटर पुढे जावं असा आम्ही विचार केला. मात्र सात किलोमीटर पुढे जाऊन आम्हाला काही मिळेल की नाही हा विचार मनात आलाच नाही. सात किलोमीटर पुढे गेल्यावरही आम्हाला काही मिळणारच नसेल तर? तोपर्यंत अंधार झाला तर? आणि हो थोडंसं असंच झालं म्हटलं तरी चालेल. पुढे सर्रा ला देखील काही व्यवस्था नव्हती. मग काय अजून पुढे जायचं.. आता थोड्या वेळात अंधार पडणार. आम्ही अजून केमलीला सुद्धा पोहोचलेलो नाही. बच्छवाडा तर फार दूर राहिलं अजून! पण असं असताना देखील आम्ही आज ज्या ठिकाणी थांबलो ते ठिकाण अतिशय रमणीय व प्रसन्न शांत तरीही एकट असं होतं. या ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचलो कसं ते सांगते.
सर्रा ते किमली या रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही निवारा शोधत होतो. नाही म्हणायला काही दुकानं होती पण दुकानदारांच्या चेहऱ्यावरती मोठाली प्रश्नचिन्ह! मग एक मध्यमवयीन, हट्टा कट्टा माणूस आम्हाला म्हणाला “मेरे पीछे पीछे आओ थोडा अंदर जाना है लेकिन अच्छी जगह आपको ले जाता हूं” आता दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही त्याच्या मागे मागे चालू लागलो. सात किलोमीटर आत मध्ये जायला आम्ही नाही म्हटलं होतं आणि पुढे निघालो होतो, मात्र आता पाच किलोमीटर आत जावंच लागलं आम्हाला. छान मैयाच्या किनाऱ्यावर एक भलं मोठं वडाच झाड होतं. दूर दूर पर्यंत चिटपाखरूही नाही अशीही जागा. वडाच्या झाडाखाली मारुतीचं मंदिर. मंदिर म्हणजे काय, एक मोठं शेड आणि शेडच्या खाली ओटा बसवलेला. शेडच्या बाजूला एक झोपडी. अगदी टेन्ट म्हणावं अशा प्रकारची. शेडमध्ये एका कोपऱ्यात विटांची चूल बनवलेली. बाजूलाच एक सिमेंटची रॅक बनलेली आणि त्यात भांडी ठेवलेली. स्वयंपाक घर तयार होतं. आसन शेडमध्येच लावायचं होतं आणि झोपडीत फक्त अंथरूण-पांघरूण आणि शिधा सामान ठेवलेलं होतं. आम्ही ज्या वाटेने आलो तिकडे बघितलं तर शेतांमध्ये वाट लपून गेली होती आणि नजर जाईल तिथवर फक्त शेतातली हिरवळ किंवा जमीन दिसत होती. माणूस नावाच्या प्राण्याचा कुठलाही नामोनिशान त्या शेड आणी झोपडी व्यतिरिक्त आम्हाला जाणवत नव्हता.
इथे या मध्यमवयीन माणसाने संध्याकाळी शंखनाद केला तो क्षण अंगावर काटे आणणारा होता. शंखनाद करून झाल्यानंतर सुद्धा काही क्षण त्या शंखाचा आवाज वातावरणात मुरतोय की काय असं वाटत होतं. काचेच्या नाजूक पट्टीतून पहावं तसं संधीप्रकाशातलं हे विश्व! मारुतीच्या मूर्तीसमोर ठेवलेला दिवा या संधीप्रकाशात विशेष ठसठशीत दिसत होता. मंत्रमुग्ध करून टाकणारं वातावरण होतं. इथला अंधार काळा नसून जांभळट निळा होता. झाडं मैया, शेतं हळू हळू जांभळी होतायेत असं वाटत होतं. पूजाअर्चा आणि भोजन प्रसादी झाल्यानंतर आसन लावून मी जपाला बसले. खूप छान जप झाला. डोळे उघडले त्यावेळी जे पाहिलं ते विलक्षण होतं. सव्वा दोन -अडीच ची वेळ असेल साधारण. मैया च्या पाण्याचा आवाज येत होता. उत्तररात्री मंद हवा वाहत होती. आणि अशावेळी अंगावर आनंदाचे धुमारे उठावेत असं काहीतरी माझ्या नजरेला पडलं. पण नक्की काय ते पुढच्या भागात सांगेन. तोवर नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०३
मागच्या भागात मी तुम्हाला सुहागपूरच्या गायत्री पुरुश्चरण यज्ञा बद्दल सांगितलं होतं. साटोगी चाचा कडच्या जेवणाबद्दल सांगितलं होतं. रामनगर ला नाव मिळाली नाही तोही भाग सांगितला होता आणि शेतात अचानक समोर आलेली ती बाई, तो अनुभव देखील सांगितला होता. आम्हाला बछवाडा येथे जायचं होतं परंतु मारा ला येतायेताच आम्ही थकून गेलो. पुढे जाणे आवश्यकच होते, असं वाटून केमली पर्यंत जाऊ असं ठरवलं. मात्र मध्येच आत मध्ये जाऊन एका वटवृक्षाच्या खाली आजचा मुक्काम केला. आता इथून पुढे सांगणार आहे.
या जागेचं वर्णन मी मागच्या भागात केलं होतं. अतिशय प्रसन्न, शांत आणि एकट अशी ही जागा होती. इथे फक्त एक मध्यमवर्गीय माणूस काय तो राहत होता. तसं पहाता इथे कोणी राहत असेल अशी शंकाही येऊ नये… कुणीतरी राहतंय त्याच्या खुणा म्हणजे निदान काही वस्तू, कपाटं, नाही म्हटलं तरी थोडं स्वयंपाकाचं सामान एवढं तरी असायला हवं नाही का? पण बहुधा हा माणूसही अवलियाच असावा. एक छोटासा टेन्ट आणि भलंमोठं शेड यातच त्याचं सारंकाही होतं. खाण्यापिण्याच्या वस्तू, थोडेफार धान्य आणि थोडे कपडे असावेत, हे त्या टेन्ट मध्ये ठेवलेलं, आणि शेडमध्ये चूल आणि आसन… झाली की व्यवस्था अजून काय लागतंय आयुष्य जगायला?.. असो पुढे सांगते
तर भोजन प्रसादी झाल्यानंतर मी जपाला बसले. छानच जप झाला ईथे. मी नक्की किती वाजता जपाला बसले ते काही आठवत नाही. मात्र डोळे उघडले त्यावेळी सव्वादोन-अडीच झाले असावेत. छान मंद झुळका वाहत होत्या. मन अतिशय प्रसन्न होतं. ओलसर चांदणं पडावं तसा प्रकाश पसरला होता. काय तिथी होती माहित नाही पण हलक्या चांदण्या मध्ये देखील आजूबाजूचं स्पष्ट दिसत होतं. अशात माझी नजर वातावरणावर अलवार बोट फिरवल्यासारखी फिरू लागली, आणि एका दृश्यावर जाऊन खिळली. ते दृश्य बघताना अंगावर अक्षरशहा आनंदाचे धुमारे उठत आहेत असं वाटत होतं. सांगते.
माझ्या उजव्या हाताकडे बरंच दूर अंतरावर हे दृश्य होतं. जमिनीपासून साधारण तीन-चार फूट उंच असं एक आनंदाचं झाड म्हणा ना.. हे झाड असंख्य अग्नि कणांनी चमकत होतं. आता नक्की कसं सांगू? झाडाचं मधलं खोड काही चमकत नव्हतं, मात्र अचानक त्या खोडाला अग्नि फुलांच्या फांद्या फुटा व्यात अशी मध्येच एकेक फांदी फुटत होती. आपण फटाक्यात लावतो ते अनार पाहिले ना, ते जर अतिशय स्लो-मोशनमध्ये चालवलं तर कसं दिसेल, तसा थोडासा हा प्रकार होता. कधी खालची फांदी तेजाळून उठायची तर कधी वरचे तुरे तेजाळून उठायचेत… असंख्य ठिणग्या एका ठिकाणी जमा होऊन आनंदाचा कसलातरी उत्सव साजरा करत आहेत की काय असं वाटत होतं. वाटलं, पिऊन घ्यावं ते दृश्य.. फोटो काढायचा प्रयत्न केला पण कॅमेरा मध्ये काही टिपल्या जाईना. जवळ जाऊन बघावसं वाटलं, पण अंतर तसं लांबचं आणि वेळ रात्रीची… मग मनात आलं, जे दिसतंय ते आनंदाने बघावं, ते धरण्याचा मोह केला तर जे आहे ते ही जाईल, नाही का? साधारण तासभर तरी मी त्या झाडाकडे बघत राहिले. बाबाला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला खरा पण ते भाग्य फक्त माझं होतं बहुधा. हळूहळू ती अग्नि फुलं सुकू लागलीत. सुरवातीला फांद्यांचं तेज कमी होत गेलं, आणि मग तेजाळणाऱ्या फांद्यांची संख्या कमी कमी होत गेली. मग मध्येच कधीतरी तुरा चमकून जायचा. खेळून खेळून थकलेलं आनंदाचं झाड साधारण साडेतीन चार ला झोपी गेलं… मात्र मग आजूबाजूला झुंजुमुंजु चा खेळ सुरु झाला. कधी ऐकले नसतील ते आवाज हलके-हलके ऐकू येऊ लागले. हवेतला गारवा वाढला आणि पुन्हा एकदा नकळत माझे डोळे बंद झाले. शेड साठी बांधलेल्या पायरीवर मी बसले होते. खांबाला टेकून. सहा साडेसहा ला डोळे उघडले… ह्या तासा-दोन तासात ते आनंदाचं झाड माझ्या आत कितीदा उगवलं असेल, तेजाळलं असेल, रूजलं असेल ते सांगता येत नाही. आता हे लिहिताना सुद्धा डोळे बंद करून ते झाड डोळ्यासमोर आलं की अंगावर त्या अग्नी फुलांसारखे असंख्य रोमांच उभे राहतात. या अग्नी फुलांनी तेजाचं बीज पेरलं की काय माझ्यात,माहित नाही, पण आता ही थकायला झालं की हे झाड आठवावं, मग सगळा थकवा दूर होतो, पूजा करते वेळी डोळे बंद करावे आणि याचं स्मरण व्हावं की हवेत तरंगल्यागत हलकं वाटू लागतं. जप करायला घेतला आणि हे झाड डोळ्यासमोर आलं की या चमकणाऱ्या प्रत्येक ठिणगीनिशी सद्गुरुंच्या आशीषांचा वर्षाव होतोय असं जाणवतं. ही अग्नी फुलं म्हणजे नक्की काय? आजूबाजूला बरीच झाड असताना ते एकच झाड का चमकून उठलं? हा मनाचा खेळ का निसर्गाची किमया? या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाही. खरं सांगू? ती शोधावी असंही वाटत नाही. त्या झाडाने माझ्यात जे कसलं बीज पेरलं त्याची फळ मात्र मी नक्कीच जगतेय, अनुभवतेय!
सकाळी सहा साडेसहाला डोळे उघडले तो आमच्या सोबत असलेला माणूस आपल्या आसनावर नव्हता. मी बाबाला उठवलं, आणि आम्ही मैया दर्शनासाठी गेलो. स्नानादी आटोपलं सकाळची पूजा विधि झाली आणि पुढे निघालो. मूळ रस्त्यावर आल्यानंतर आजूबाजूला शेती आणि मध्ये डांबरी रस्ता. वळणावळणांचा हा रस्ता आहे. करत करत आज आम्ही बछवाडा कॉलनी ला पोहोचलो. चार साडेचार झाले असतील. मध्ये एक-दोन ठिकाणी चहा झाला तेवढाच! आता भूक लागली होती. पण इथे लोक पाणी देताना सुद्धा गांगरत होते. ही वस्ती बहुधा निम्न जातीयांची. आपण शहरांमध्ये राहणारे लोक जात-पात फारसं पाळत नाही, पण छोट्या गावांमध्ये अजूनही हा प्रकार फार बघायला मिळतो. आपल्या मुळे यांचा धर्म नष्ट होईल, यांची परिक्रमा भ्रष्ट होईल असा विचार हे लोक करत असतात, त्यामुळे पाणी मागितलं की ते एकमेकांकडे नुसतं बघतच असतात… द्यावं किंवा न द्यावं या विचारात ते तसेच उभे राहतात.. आम्ही बछवाड्याला गेलो. आश्रमाची व्यवस्था पाहिली.. बरा होता..आसन लावणार तोच बाजूच्या म्हाताऱ्या आजी ने आवाज दिला… “ईधर हमारे घर मे रहो” मग काय आमची रवानगी त्यांच्या घरी! पण इथे एक गंमतच झाली. आम्हाला आश्रमात आलेलं पाहून एका आजोबांनी आम्हाला न विचारताच आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. आणि या व्यवस्थेबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हतं म्हणून या म्हाताऱ्या आजींच्या घरीसुद्धा जेवणाच्या व्यवस्थेचं विचारलं तर आम्ही हो म्हणून सांगितलं. पूजाअर्चा झाल्यानंतर आम्ही पानावर बसणार तेवढ्यात ते दुसरे गृहस्थ सुद्धा डबा घेऊन आले. मग आता काय, आम्ही सकाळी जेवलो नव्हतो ना… आता रात्री दोन्ही वेळचं जेवलो आम्ही! कठीण असतं पण असं दोन्ही वेळचं एकदम जेवणं… मैया ची ईच्छा… असो.. आजची रात्र छान गेली.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो तो चहासाठी गणेराला थांबलो. तिथे पण एक गंमत झाली बरं का! इथे आमच्यासाठी आधीच तयारी करून ठेवली गेली होती. वाटच बघत होते आमची हे लोक.. यांना कसं कळलं आम्ही येणार ते? अगदी आमचे कपडे, बॅगचे रंग सगळं इतंभूत माहित होतं या लोकांना… कसं? पुढच्या भागात सांगते न! पुढच्या भागात अजून एका छान जागेशी ओळख करून देईन. नर्मदामय्याच्या एका रुपाची ओळख करून देईन. नर्मदा किनाऱ्यापासून दूर असूनही या जागेला “घाट” या नावाने संबोधलं जातं. इथे मैयाचं अस्तित्व आहे मात्र दिसत नाही अशी ही जागा… आणि या जागेच्या या कंपनांबद्दल तर विचारूच नका. आणि इथे मला जे काय मिळालं ते पण अलौकिक आहे… सांगणार आहे पण पुढच्या भागात.. नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०४
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला आनंदाच्या झाडाची अनुभूती देणारा अनुभव सांगितला होता. तिथून पुढे आम्ही आता गणेरा कडे निघालो होतो. पण त्या आधी बच्छवाडाच्या ज्या घरी आम्ही थांबलो होतो त्या घरच्या म्हाताऱ्या आजी बद्दल एक गंमत सांगणार आहे. या आजी जख्खड म्हातार्या, मात्र यांना रोज नर्मदा किनारी जायचं असतं. काही वर्ष आधी पर्यंत त्या एकट्या जात असत, मात्र मग वृद्धापकाळामुळे चालणं होत नसे,तरीही या आजी हट्ट करून घरातून लपून मैया किनारी जात. एकदा त्या पडल्या आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तेव्हापासून मुलांनी त्यांना घराबाहेर पडू देणं बंद केलं. झालं, आजी बंधनात अडकलेल्या आणि मग मुलाचा सुनेचा नातवांचा राग करू लागल्या. त्यांना रोजच्या रोज घेऊन जाणं खरं तर कठीण होतं, तरीही त्यांच्या नातीने ही जबाबदारी उचलली, मात्र आजीचा वेगळाच हट्ट सुरु झाला. त्यांना अख्खा दिवस मैया किनारीच बसायचं असायचं… आता असं कसं चालेल? इतका वेळ कुठे कुणाला… म्हणून पुन्हा आजी घरातच बंद झाल्या… पण मैयाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही.. आमच्या समोरची गोष्ट…
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयार झालो, तेव्हा आजी म्हणाल्या… “जरा गाय और बछडे की रस्सी खोल दो, मेरा बेटा सोया है, उसको नही जगाती तुम मेरा यह काम कर दो” आम्हालाही त्यात काही वावगं वाटलं नाही. दोन गाई आणि दोन बछड्यांना आम्ही मोकळं केलं आणि आणि फाटक उघडून दिलं. फाटकाचा आवाज झाला असेल म्हणून आजी ची नात उठली…. काय झालं बघायला बाहेर आली तो गायी आणि बछडे गोठ्यात नसलेले तिने पाहिले आणि ती बछड्यांच्यामागे धावली. जाता जाता तिने आपल्या आई-वडिलांना आवाज दिला. आम्हाला काही कळेना.. आजींनीच तर सोडायला सांगितले बछडे! लगेचच आजींची सून बाहेर आली आणि बछडे कुणी सोडलेत म्हणून विचारलं असता आम्ही आजींनी सोडायला सांगितल्याचं सांगितलं… त्याबरोबर सूनबाईंनी कपाळाला हात लावला आणि आजींची गोष्ट आम्हाला सांगितली ती अशी….
त्या म्हणाल्या; आजी आम्हाला त्रास देतात, घरी काहीतरी मुद्दाम गोंधळ करतात… आम्ही त्यांना घराबाहेर जाऊ देत नाही म्हणून उपद्व्याप करतात… आणि असं बोलता बोलताच त्या सून बाईंच्या लक्षात आलं की आजी कुठे दिसत नाहीत… हा सगळा गोंधळ तयार करून आजीबाईंनी वातावरण निर्मिती केली आणि सगळ्यांचं लक्ष बछड्यांकडे वेधून गुपचाप पळ काढला… मग त्या आजींचा मुलगा त्यांना शोधत शोधत मैया किनार्याकडे गेला तेव्हा त्या रस्त्यात सापडल्या….
मुलाबाळांचा विचार करता त्यांचं चुकत नव्हतंच खरं, आणि आपल्या चालत्या फिरत्या अवस्थेपर्यंत जी बाई रोज मैया दर्शन घेत होती तिला मैया ला भेटू दिल्या जात नव्हतं, तेव्हा तिची अवस्था कशी होत असेल हेही आपण समजू शकतो. तिथेच मैया किनारीच्या गावातच मैयाच्या ह्या अशा लीला पाहिल्या की वाटतं तिची आपल्यावर खरंच खूप कृपा आहे.
असो… आजींना सुखरूप घरी आलेलं पाहून मग आम्ही तिथून पुढे निघालो. हे अंतर साधारण आठ ते दहा किलोमीटर. आम्ही जसं गावाजवळ येत होतो तसं लोकांच्या चेहऱ्यावर आमच्यासाठी ओळखीचे भाव दिसू लागले. लोक आपुलकीने चौकशी करत होते. स्वतःच पुढचा रस्ता सांगत होते. एका बाबाजींनी तर नागपूर वाली माताजी असा उल्लेखही केला, तेव्हा मात्र या लोकांना आपल्याबद्दल कसं काय माहितीये? याचं आश्चर्य वाटून गेलं.. पण तो उलगडा हे पुढे लगेचच झाला. तुम्हाला सेलवाड्याचे गुड्डा ठाकूर आठवतात का? त्याच गावातल्या एका ची मुलगी आणि जावई इथे गणे-याला राहणारे. पण हे मुलगा आणि जावई यावेळी गावात नव्हते. सेलवाडा च्या दादांनी आपल्या मुलीला आमच्याबद्दल कळवलं, आणि मुलगी आणि जावयांनी गावाला आमची माहिती दिली. “आम्ही गावात नाही त्यामुळे परिक्रमावासीयांची योग्य ती सेवा तुम्हीच घ्यायची” असं गावकऱ्यांना सांगण्यात आलं होतं.” बहु के मायके से परिक्रमावासी आये है, उनका खयाल बहुत अच्छे से रखना है” असं गावकऱ्यांनी ठरवलं होतं.. आणि म्हणून ते आमची वाट बघत होते.
गणे-याला एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो तो घरच्या माताजींनी थोडा वेळ अजून थांबा माझे पती येतात आहे त्यांना भेटून जा असा आग्रह केला. जरा वेळ विश्रांती घेतो न घेतो तोच माताजी आतून वांग्याची रस्सा भाजी आणि मके की रोटी असं भरलेलं ताटच घेऊन आल्या… “खाना बन गया तो खा भी लो” समोर आलेल्या अन्नाचा आदर केला जेवून घेतलं बाबाजींची भेट घेतली आणि पुढे निघालो. आता पुढचा सगळा रस्ता नहर च्या बाजूबाजूने… नहर किंवा कॅनल, मध्ये झाड आणि शेतं असा हा रस्ता. ऊन वाढत चाललेलं, त्यामुळे थकवा येणारच.. आम्ही आपलं न बोलता चालत राहायचं ठरवलं.. मी पुढे आणि बाबा मागे. मी माझ्या गुरु मंत्राचा जप करत होते आणि बाबा त्रयोदशाक्षरी मंत्राचा. बाकी वातावरण शांत होतं. अचानक बाबा मोठ्यामोठ्याने जप करू लागला आणि लगेचच पुन्हा शांत झाला. शांत झाला तसा मटकन जमिनीवर बसला… मला कळेच ना. बाबाची तब्येत बरी नाही बहुतेक, असं वाटून मी ही घाबरले… मात्र बाबाची तब्येत बरी होती. तो फक्त घाबरला होता. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. .. मला मात्र काही केल्या कारण समजत नव्हतं.
बाबा थोडा शांत झाला, पाणी प्यायला आणि मग मी त्याला विचारलं…”एवढं घाबरायला काय झालंय” तर मग त्यानी मला रागवायला सुरुवात केली. “मूर्ख मुलगी आहेस तू, तुझं लक्ष कुठे असतं? दिसत नाही का तुला? डोळे की बटन आहेत तुझे?” आता तर मी अजूनच गोंधळात पडले.. मी काय केलं होतं? बरं माझा बाबाच्या पायावर पाय पडावा एवढं काही आमच्यात अंतर कमी नव्हतं. मग बाबाला चिडायला एवढं काय झालं होतं? तो काही सांगायला तयार नाही! मग बाबा उठला, माझ्या डोक्यावर हात ठेवला, एक मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाला “चला आता, मध्येमध्ये खाली बघत चला”…. खूप विनवणी केल्यावर बाबांनी सांगितलं, ते ऐकून मला आश्चर्य वाटलं पण खरच भीती वाटली नाही..
बाबा म्हणाला, तू चालत असताना उजव्या बाजूला एक मोठा नाग फणा काढून बसला होता. त्याला बघताच माझ्या तोंडून शब्द फुटेना, आणि मी मोठ्याने जप करायला सुरुवात केली, तर तू मागे वळलीस. त्या नागाला काय माहित तू मागे वळणारेसते? तुझ्या दोन पायांच्या मधून तो नाग गेला आणि तुला समजलं पण नाही? तुझा एक पाय पुढे आणि दुसरा पाय मागे होता,तो पाय उचलून चुकून त्या नागाच्या अंगावर पडला असता तर तिथेच डसला असता ना तुला….” तो नाग निघून गेला होता, त्यामुळे असेल पण मी शांत होते. मी नाग बघितलाच नव्हता, त्यामुळे मला भीती वाटलीच नाही…. मी आपला जप करत पाय उचलत होते…. हा अनुभव माझा नव्हता तो बाबाचा होता. एक मात्र समजलं.. एखादी गोष्ट ध्यानीमनीही नसली की तिच्याबद्दल काहीच नसतं. अस्तित्वच नसतं तिचं. आणि एखादी गोष्ट मनात असली की ती सर्वत्र असते. आणि म्हणूनच प्रयत्नपूर्वक वेगळं व्हायचं असतं. विशेषतः मनात घर करून राहणाऱ्या आकर्षणा पासून आसक्तीं पासून….एकदा त्यांचं अस्तित्व संपलं की मग त्यांच्या निगडित असलेल्या सगळ्यांचंच अस्तित्व संपणार! असंच एक एक गळत जाणार!..असो..
आजचा भाग भराच लांबला म्हणायचा… ती मैयाच्या अस्तित्व असणाऱ्या पण न दिसणाऱ्या जागेची गोष्ट पुढच्या भागात सांगते. मला काहीतरी अलौकिक मिळालं तेही पुढच्या भागात सांगते… तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला गणेरा येथील गंमत सांगितली होती. त्याच बरोबर म्हाताऱ्या आजींची देखील गोष्ट सांगितली होती. आता पुढे जाऊयात
आम्ही नर्मदा केनल च्या बाजूला जात होतो. मागच्या भागात, ‘मैयाचं अस्तित्व आहे मात्र मैया दिसत नाही’ असं मी म्हणाले होते, त्याबद्दल सांगते. एका ठिकाणी एक पाटी लागली होती. “कृपया पैदल परिक्रमावासी यहासे न जाये” असं त्या पाटीवर लिहिलं होतं. अशा प्रकारची ही पहिलीच पाटी संपूर्ण परिक्रमेत पाहिली होती. नाही म्हणायला अमरकंटक च्या मंदिरात अशा पाट्या लागलेल्या आहेत पण तेथे मैया पात्र अगदीच एका ढांगेत ओलांडता यावं असं होतं म्हणून तशी पाटी लिहिली होती. इथे खरं असं लिहिण्याचं काहीही कारण नाही… पुढे गेल्यावर या पाटीबद्दल खुलासा झाला. लोकांनी सांगितलं, “वहा से ‘वृद्ध नर्मदा जाती है. परिक्रमा वासियोंकी परिक्रमा खंडित हो जायेगी, इसलिये ऐसा लिखा है.” आता वृद्ध नर्मदा म्हणजे काय? थोडं समजायला कठीण होतं म्हणून आम्ही प्रश्न विचारला, तर काही वर्षांपूर्वी, आधी मैया चं पात्र इथून वाहत होतं, मात्र ते आता दोन अडीच किलोमीटर पुढून वाहतं आहे,आणि अजूनही या भागाला मैयाच्या पात्राचा भागच समजतात त्यामुळे पायी परिक्रमा वासियांना इथून जाऊ नये असं सांगण्यात येतं. याबद्दल अधिक माहिती पुढे मिळाली ती अशी. नर्मदा मैयाचं पात्र अनेक वर्षानंतर काही किलोमीटर पुढे सरकल्या नंतर या भागात बांधकाम करण्याचं ठरवलं गेलं. मात्र बांधकाम करताना अनेक ठिकाणी छोटे-छोटे झरे जमिनीखालून फुटू लागले. त्यावरून नर्मदामय्याची एक जलधारा अजूनही जमिनीखालून वाहात आहे असा निष्कर्ष काढला गेला. आणि म्हणून पायी परिक्रमावासी ना येथून जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या. इथे मैयाचं मोठं पात्र तर दिसत नाही मात्र तिचं अस्तित्व आहे हे निश्चित. तर अशी ही वृद्ध नर्मदामैया ची गोष्ट.
पुढे कॅनल पासून उजवीकडे आत मध्ये वळून आम्ही एका अतिशय पवित्र ठिकाणी जाऊन पोहोचलो. या स्थानावर तेरा योगिनींचा आणि तीन सिद्धांचा वास आहे असे मानले जाते. अतिशय रमणीय असं हे स्थान आहे. याचं नाव गौ घाट. इथे वृद्ध रेवा कुंड आहे. हे कुंडही अतिप्राचीन आहे. साधारण शंभर मीटर लांबी असलेलं आणि 30 ते 50 मीटर रुंदी असलेलं असं हे कुंड आहे. कुंडाच्या चारही बाजूंना पायऱ्या आहेत. दगडी पाय-यांची बांधणी जुन्या धाटणीची आहे आणि अनेक पायऱ्या कुंडाच्या दिशेने कललेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळी पायर्यांवर बसून आम्ही नर्मदाष्टक म्हटलं होतं ते आठवलं. परिसरात रामाचं, नर्मदेचं, आणि हनुमंताचे मंदिर आहे. अतिशय पवित्र कंपनं याठिकाणी जाणवतात. आजचा मुक्काम इथेच करायचा याबाबत आम्ही दोघंही निशंक होतो. इथे मंदिरात सुरवातीला मोठे मोठे नक्षीकाम केलेले खांब आहेत. तिथून थोडं आत गेलं की आश्रमाच्या महंतांची खोली आहे. सभामंडपाच्या मागचा भाग म्हणायला हरकत नाही या जागेला. यावर कौलं आहेत आणि खाली काळी दगडी फरशी बसवलेली आहे. इथेच एक धुनी सुद्धा आहे. ही धुनी बघताच बाबा ह्या धुनीच्या जवळ जाऊन स्तब्ध बसला. अर्थात कोणीही तिथे निशब्द, चिरकाल, शांत बसून राहावं अशीच ती जागा. जरा वेळानी चहासाठी आवाज दिल्यावर बाबा महंतांच्या खोलीसमोर आला आणि त्याने महंतांना प्रश्न विचारला. “हो ना हो, इस जगह पर नवनाथों में सें किसी का वास हुआ है ऐसा प्रतीत होता है.” इथे खूप काळापर्यंत अखंड दत्तोपासना झाली असली पाहिजे असं बाबाला जाणवत होतं. बाबाचं बोलणं ऐकून महंत उठून आपल्या खोलीत गेले आणि आतून एक फोटो घेऊन आले. तो फोटो ह्या महंतांच्या गुरूंचा. परमपूज्य श्री कृष्णानंदजी महाराजांचा. कृष्णानंदजी महाराज दत्तभक्त होते. या महंतां जवळ त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेली नवनाथांची पोथी आणि बाशिंग देखील होतं. आम्हाला त्यांचं दर्शन झालं.
संध्याकाळी धुनी जवळ जप करत बराच वेळ बसून होतो आम्ही. त्या जागेवरून उठावंसच वाटत नाही. महंतांच्या खोली पुढेच आम्ही आसन लावलं. सकाळी लवकर निघू असं ठरवलं खरं पण तिथून पायच निघेना. सकाळची भोजन प्रसादी झाल्यानंतर साधारण एक वाजता आम्ही इथून पुढे गेलो. या परिसराचे काही फोटो देतेय.
इथला संपूर्ण परिसर आणि आजूबाजूचा परिसर देखील अतिशय भारलेला आहे असं वाटतं. गौ घाट सोडून आम्ही पुढे बागल खेडी येथे पोचलो. साधारण तीन-चार किलोमीटर अंतर पुढे चालून आलो असू. रस्त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी झाडी असली तरीही भरपूर सूर्यप्रकाश पसरलेला होता. रस्ता, म्हणजे पाय वाटच पण जरा मोकळी चाकळी, जाड… समोर टेकडीवजा भाग होता. त्या टेकडी च्या पायथ्याशी थोडी सपाट जागा होती, रस्त्या पासून साधारण 50 फूट आत मध्ये. तिथे जे दृष्य आम्ही पाहिलं ते बघण्यातच आमचा तासभर तरी गेला असावा. आमच्या दोघांच्याही मोबाईल मध्ये बॅटरी नसल्यामुळे ते रमणीय दृश्य फक्त डोळ्यातच साठवू शकलो आहोत. सांगते.
रस्त्याच्या आजूबाजूला झाडी होतीच. अधून मधून पक्ष्यांचे आवाज येत होते. या परिसरात मोर भरपूर प्रमाणात आहेत. मोरांचे देखील आवाज येतच होते मात्र दिसत कुठेच नव्हते मोर. आम्हाला तसं मोरांचं अप्रूपच, कारण आमच्या भागामध्ये मोर काही बघायला मिळत नाही. मोरांचा इतका म्हणून आवाज येत होता की कमीत कमी विस तरी मोर आजूबाजूला असावे. आमच्या नजरा मोरांना शोधत होत्या आणि एका क्षणाला टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या त्या भागाकडे नजर गेली. चाळीस तरी मोर तिथे आनंदाने बागडत होते. त्यांना आमचं अस्तित्व जाणवतच् नसावं. मधेच एखादा मोर पिसारा फुलवायचा आणि लगेच बंद करायचा. बराच वेळ ते रमणीय दृश्य बघत बसलो आम्ही. यांच्या अंगावरची मोरपंखी मखमल सूर्यप्रकाश पडला की चमकत असे. राष्ट्रीय पक्षी म्हणून हा मोर सेठी मिरवून घेतोय की काय अशा ऐटदार हालचाली खरंच मनमोहक होत्या. पण आम्हाला निघायला हवं होतं. आधीच गौ घाट होऊन निघायला उशीर झालेला. आम्ही पुढे निघालो पण आजचा दिवस आणि हा परिसर काही आम्हाला सोडायला तयार नव्हते.
जरा पुढे गेलो तो बागलखेडीचं खेडापती मंदिर समोर दिसलं. या मंदिराचा आणि आश्रमाचा फोटो मी देणार आहे. या मंदिराकडे आणि आश्रमाकडे नजर जाताच कुणीही व्यक्ती या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. तुम्ही नुसता फोटो बघाल ना तरी प्रेमात पडाल या जागेच्या.
आजूबाजूला पवित्र कंपन, रमणीय स्थान, नीरव शांतता, हे असं उंचावर सुंदर पायऱ्यांचं मंदिर, चातुर्मास करण्यासाठी अतिशय योग्य जागा आहे ही. आम्हाला आता निर्णय घेणे होते. इथून पुढे जायची अजिबात इच्छा होत नव्हती आणि आम्ही गौ घाटापासून फक्त तीन-साडेतीन किलोमीटर दूर चालत आलो होतो. पाय तर पुढे उचलत नव्हता.. पण मग आम्ही इथे थांबलो की थांबलोच नाही… सांगणारे पण पुढच्या भागात…
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०६
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला गौ घाटाबद्दल सांगितलं होतं. तिथलं रमणीय वातावरण आणि अतिशय पवित्र कंपनं अनुभवून नंतर आम्ही जंगलातल्या वाटेने पुढे गेलो असता मनमोहक असं मोरांचं दृश्य आम्हाला बघायला मिळालं व नंतर एका मंदिराचा फोटो मी दाखवला होता. आम्ही तिथे थांबलो की नाही याबद्दल आपण विचार करत होतो.
खरं तर ही जागा इतकी सुंदर होती की या जागेला डावलून आम्हाला पुढे जाताच आलं नाही. या पायऱ्या चढत आम्ही सरळ वर गेलो. वरचं दृश्य तर अधिकच रमणीय होतं. ही जागा उंचावर असल्यामुळे आजूबाजूचा भाग व्यवस्थित दिसत होता. इथे वर एक खेडापती हनुमानाचं मंदिर होतं. आम्ही गेलो त्यावेळी इथे ब्रम्हानंद गिरी म्हणून एक महाराज वास्तव्यास होते. ते खरं तर इथले महंत नव्हते मात्र काही काळासाठी ते इथे आले होते. मध्यम वयाचे हे महाराज अतिशय शांत चेहऱ्याचे होते. सतत कुठल्यातरी गहन विचारात असावेत असं वाटायचं त्यांच्याकडे बघून. त्यांचा आवाज देखील खूपच मृदू आणि स्वर खालच्या पट्टीतला असायचा. इथली शांतता जराही भंग होऊ देऊ नये याची ते काळजी घेताना दिसायचेत. सकाळ संध्याकाळची आरती तेवढी धमाकेदार, बाकी अगदी निरव शांतता.
संध्याकाळची आरती पूजा झाल्यानंतर आज माझ्या हातचं भोजन करायचं ठरलं. खिचडी आणि टमाट्याचं पिठलं केलं. या महाराजांना पिठलं हा प्रकार माहित नव्हता.. त्यांना पिठलं मनापासून आवडलं, आणि मग भोजन प्रसादी नंतर महाराजांचे वेगळं रूप समोर आलं. खरं तर आम्ही आसन लावलेलं. महाराजांच्या खोलीसमोर एक वर्हांडा वजा खोली होती, तिथेच आम्ही आसन लावलं होतं. आम्हाला शुभरात्री आणि नर्मदे हर करून महाराज आपल्या खोलीत गेले. मात्र थोड्याच वेळात अतिशय सुमधुर आवाजात संस्कृत श्लोक ते गाऊ लागलेत. त्यांची तल्लीनता त्यांच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होती. आम्ही महाराजांच्या खोलीच्या दारासमोर जाऊन बसलो. २-४ श्लोक म्हटल्यानंतर महाराजांचं आमच्याकडे लक्ष गेलं. “सोयी नही आप? मेरी आवाज ज्यादा हो गयी शायद” ते म्हणाले. “नही नही, बहुत ही सुंदर गा रहे थे आप, सुननेका मन किया इसलिये आ गये”.. मी सांगितलं.
महाराज गात असलेले श्लोक संस्कृत भाषेतले असले तरीही त्यातला रिदम, त्यांची लय ओळखीची वाटत होती. मी सहजच विचारलं ” यह श्लोक सुनकर मुझे आदि शंकराचार्य जी की रचनाओंकी याद आ गई, मैने ज्यादा तो कुछ पढा नही है फिर भी उनकी रचनाओं में जो लय देखी जाती है, वेसी लय आपके गाये हुए श्लोकों मे नजर आ रही है इसलिये….” मला मध्येच थांबवत आनंदाने ते म्हणाले..”सही कहां, उनकी ही रचना का भाग है”… मग ते सांगू लागले.. गीतेच्या पंधराव्या अध्यायावर शंकराचार्यांनी जे भाष्य केलं त्याचा हा अंश. शंकराचार्यांच्या महत्त्वाच्या रचनांपैकी एका रचनेचा 145 वा भाग! ते म्हणाले, शंकराचार्य वाचण्यासारखा आनंद नाही.. कधीही कुठलीही रचना काढावी, वाचावी, समजून घेण्याचा प्रयत्न करावा… समजलं किंवा समजलं नाही तरीही त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. “अब यही श्लोक देखो ना..” असं म्हणत त्यांनी पुन्हा एक श्लोक म्हंटला… मी तो नंतर लिहून घेतला, आता इथे सांगते आहे..
बिजं संसृति भूमिजस्य तु तमो देहात्मधीरंगरो राग: पल्ल्वमम्बु कर्मतु वपु: स्कंधोसव शाखिका:
अग्राणिन्द्रियसंहतिश्च विषया पुष्पाणी दु:खंफलं नानाकर्म समुद्भवंबहुविधं भोक्तात्र जीव: खग:
भगवत गीता के अध्याय में अश्वत्थवृक्ष के रूप की प्रतिमा को कितना सरल बताया है शंकराचार्य जी ने… ते हिंदीत सांगत होते, मी मात्र मराठीत लिहिणार आहे.महाराज सांगत होते, आणि आम्ही ऐकत होतो.
बीज, अंकुर, झाडाचं खोड, पानं, फांद्या, फुलं आणि फळं तसंच हे झाड ज्यावर पोषल्या जातं ते पाणी ह्या सगळ्या बद्दल आणि त्यांच्या भूमिकांबद्दल या श्लोकात सांगितले आहे. या संसार रुपी वृक्षाचं बीज हे अज्ञान आहे. अज्ञानातूनच ह्या वृक्षाचा जन्म झालेला आहे. या अज्ञानात जेव्हा देह या संकल्पनेचा विचार उत्पन्न होतो त्यावेळी या अज्ञान रुपी बीजाला अंकुर फुटते. या अंकुराची वाढ होण्यासाठी म्हणजेच या देहाच्या संकल्पनेच्या वृद्धीसाठी कल्पना, इच्छा, आणि आकांक्षा ची निर्मिती होते ती म्हणजे या संसाररूपी वृक्षाचे खोड,त्यातून वाहणारे पाणी,व वृक्षाची पाने होत. या पानांना आधार देण्याचे काम करणाऱ्या फांद्या म्हणजेच प्राण! या वृक्षावर आलेल्या कळ्या म्हणजे पंचेंद्रिय, तर ह्या पंचेंद्रियांनी ग्रहण केलेले सार म्हणजे या वृक्षाची फुले होत. पंचेंद्रियांच्या विविध क्रियांपासून उत्पन्न झालेल्या दु:ख, उदासीनता, नैराश्य म्हणजे या वृक्षाची फळे होत तर, केवळ काही काळासाठी या फळांवर, या वृक्षावर विसावलेला पक्षी म्हणजे आत्मा!… प्रारब्ध कर्म असलेला हा पक्षी या वृक्षांच्या फळातील बियांचे इच्छा-आकांक्षा रुपी पाण्याने पुनश्च सिंचन करतो म्हणून ह्या वृक्षाचा अंत होता होत नाही….
महाराज श्लोकाचा अर्थ सांगता सांगता मध्ये मध्ये गात होते.
अज्ञान मूलो यमनात्मबंधो नैसर्गिको ना दिरनन्त ईरित: जन्माप्ययव्याधिजराधीदु:ख: प्रवाहपातं जनयत्यमुष्य:
अज्ञानाच्या मुळापासून तयार झालेल्या या वृक्षाचा आणि या वृक्षाच्या फळांपासून तयार झालेल्या बियांना येणाऱ्या अंकुरांना अंत नाही.. म्हणजेच बियांपासून वृक्ष आणि वृक्षांपासून पुन्हा बिया हे चक्र सातत्याने सुरू आहे, त्यामुळे या दुःखरुपी फळांमधून उत्पन्न होणारे हे वृक्ष फक्त दुःखाची उत्पत्ती करू शकते आणि म्हणूनच आरंभ आणि अंत नसलेले हे चक्र फक्त दुःखच देऊ शकते.
खरंतर महाराज सांगतील ते फक्त ऐकावं असं वाटत होतं. पण बराच उशीर झाला होता. महाराजांनी सुद्धा वाचन आणि गायन थांबवलं. थोडा सत्संग झाला आणि आम्ही पुन्हा आसनावर आलो. विचार करता करताच कधी झोप लागली ते समजलंच नाही. पहाटेलाच जाग आली. वातावरण अजूनही काल सारखंच प्रसन्न होतं. पूजाअर्चा झाली, महाराजांनी चहा आणि मुरमुरे याचे लाडू असा बालभोग दिला आणि आम्ही पुढे निघालो.
आता आम्ही शुक्करवाडा या गावाजवळ होतो. त्याआधी सूर्यकुंडाला गेलो. तिथे खरंतर भोजन प्रसादी मिळणार होती, म्हणजे मला मिळाली, आज बाबाच्या नशिबात भोजन प्रसादी नव्हतीच बहुधा.. किंवा माई बाबा ची परीक्षा बघत होती. मी मात्र पोटभर जेवले. आम्ही दोघं सोबतच होतो खरं..मग मला भोजन प्रसादी मिळाली आणि बाबा ला मिळाली नाही असं का झालं? गंमतच झाली खरी… सांगणारे पण पुढचा भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला खेडापती मंदिरातल्या महाराजांबद्दल सांगितलं होतं. महाराजांचा गोड आवाज आणि त्यांनी गायलेले शंकराचार्य लिखित श्लोक देखील मी सांगितले होते. त्यांची समजावून सांगण्याची पद्धत, हावभाव, तल्लीनता या विषयावर ही आपण बोललो होतो. दुसर्या दिवशी आम्ही लवकरच तिथून निघालो. आज आम्ही सूर्यकुंड ला आलो होतो. इथे मी तुम्हाला बाबाच्या भोजन प्रसादी बद्दल काय गंमत झाली ते सांगणार होते. इथुन आता पुढे सांगते.
सुर्यकूंड चा परिसर बराच मोठा परिसर होता. तिथपर्यंत जाता जाता चांगलीच दमछाक झाली. काही तरी गडबड झाली असावी माझ्या सामान उचलण्यात, पण आज माझी कंबर लागून येत होती. माझ्याकडून फारसं चालणं देखील होत नव्हतं. रस्त्यात बसायला जागा नव्हती. एखादा मोठा दगड, एखादा कट्टा, अगदी वीट सुद्धा दिसत नव्हती. आता समोर दूरवर उजव्या हाताला एक घर दिसत होतं. तोच आता थांबण्याचा एकमेव पर्याय! कसं बसं आम्ही त्या घराजवळ गेलो पण बघतो तो घराला कुलुप. फाटकाच्या बाहेर एक बैल बंडी भिंतीला टेकवुन उभी केली होती, त्यावर मी जाऊन बसले. थोड्या वेळात काही शाळकरी मुली तिथून गेल्या. जाता जाता त्यांनी आम्हाला नर्मदे हर केलं. थोड्याच वेळात एक मुलगी परत आली. तिच्या हातात तीन पाण्याने भरलेल्या बाटल्या होत्या. “अरे वा गार पाणी आणलेले दिसतय मैया जींनी आम्ही विचार केला”, झाकण उघडलं आणि एक घोट तोंडात टाकताच सुमधूर लिंबू सरबताचा आस्वाद तजेला देऊन गेला. मुलींशी काही बोलणं नाही, काही विचारणं नाही, कसं त्याला नर्मदामैया ला कळतं देव जाणे! असो…
अजून सूर्यकुंड तीन किलोमीटर बाकी होतं. सरबत तर पिऊन झालं होतं पण भूक लागणारच होती थोड्यावेळात. भोजन प्रसादी ची वेळ तशी टळली होती, आता बघायचं काय ते. मी मघा सांगितलं त्याप्रमाणे बाबाच्या भोजन प्रसादीची गंमतच झाली. आम्ही सूर्यकुंडला पोचलो. भला मोठा परिसर, आडवा उभा पसरलेला.. एक रस्ता मैया कडे जात होता तर दुसऱ्या रस्त्याला उजव्या हाताला एक कुटी दिसत होती. आम्ही सरळ मैया वर गेलो, हात पाय तोंड धुतले, थोडावेळ तिथेच शांत बसून राहिलो आणि नंतर कुटी च्या दिशेने पुढे सरकलो. आत बघते तो कोणीच नव्हतं. कूटीच्या बाहेरचा परिसर छान फुलझाडांनी सजवला होता. आम्ही नर्मदे हर आवाज दिला आणि कूटीच्या मागून एका साधुमहाराजांनी प्रत्युत्तर दिलं. गोल चक्कर मारून आम्ही मागच्या दरवाजापाशी पोहोचलो. चहाचे ग्लास आमच्यासाठी वाटच बघत होते. खरंतर भूक लागली होती पण महाराजांनी चहा आणला… तो मैयाचा प्रसाद. चहा झाल्यावर बाबाजींनी विचारलं, “भोजन प्रसादी तो हो गई थी ना आपकी?” आम्ही नकारार्थी मान हलवताच बाबाजी म्हणाले “अरे ऐसे कैसे, आपने बताया भी नही और चाय पा लीया, कोई बात नही, एक टिक्कड बाकी है, आधा आधा पा लो.. टिक्कड के साथ दूध ही मिल पायेगा..” मी हो म्हणाले आणि बाबा नको म्हणाला. चहा प्यायल्यावर त्याला जेवावसं वाटलं नाही, पण जे मिळतंय ते दोन घास खाऊन घेऊ या विचाराने मी मात्र दूध टिक्कड खाऊन घेतलं. थोड्या वेळाने आम्ही शुक्करवाड्याच्या रस्त्याने निघालो. वाटेत एका शेतकऱ्याने आम्हाला ताजी ताजी काकडी काढून दिली. मी काकडी देखील खाल्ली आणि बाबा काकडीला देखील नकोच म्हणाला. उपाशीपोटी काकडी खाऊ नये, असं त्याचं मत होतं.
शुक्करवाड्याच्या आधी एका ठिकाणी आम्हाला चहा घ्यायला बोलवलं.खरंतर चहा घेण्याची इच्छा नव्हती मात्र तिथल्या म्हाताऱ्या आजीबाईंचा शब्द मोडवला नाही. इथे एक गंमत झाली बरं का. समोरचा गाईंचा मोठा गोठा ओलांडून आम्ही आतल्या मोठ्या हॉलमध्ये बसलो होतो. हॉल मध्येच एक लोखंडी पलंग टाकलेला होता त्याला टेकून बाबा बसला होता आणि पलंगाच्या विरुद्ध दिशेला मी बसले होते. घरातल्या मैयाजींनी चहा आणला, चहाचे पेले खाली ठेवले, आणि बाबाच्या मागे पलंगावरून पलंगाच्या खाली काहीतरी पडलं. आधी दोरी असल्यासारखं मला वाटलं पण तो छोटा नागराज होता. मी काही बोलायच्या आत बाबाच्या बाजूने तो माझ्या दिशेने सरकू लागला. त्याला बघताच बाबा दचकला आणि बाबा चा हात लागून चहाचे पेले लवंडले. तो छोटा नाग मात्र माझ्याही बाजूने गोठ्याच्या दिशेला निघून गेला. मला उठून उभं राहण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही. मागच्या सापाच्या अनुभवानंतर बाबा जरा सावधच राहात असे. ..असो तर सांगायचं हे की हा चहा सुद्धा नशिबात नव्हता बाबाच्या… माताजी पुन्हा चहा ठेवायला गेल्या खऱ्या पण त्यांच्या घरची चाय पत्ती संपलेली होती, “दूध पा लोगे माता राम? चाय पत्ती खतम हो गई है!”पुन्हा एकदा मी ‘हो’ म्हणाले आणि बाबा ‘नाही’ म्हणाला…. माझ्या कमंडलूत कमंडलू भरून दूध माताजींनी दिलं… थोडं मी प्यायले आणि थोडं शिल्लक होतं…
इथून निघून आम्ही शुक्करवाड्याला खेडापती मंदिरात गेलो. बाबाला चांगलीच भूक लागली होती, आणि मला मात्र अजिबात भूक नव्हती. माझ्याजवळ थोडं दूध शिल्लक होतं तेवढ्याने माझं भागणार होतं. तिथे गावातले लोक भोजन प्रसादीचं विचारायला आले. एका घरी आज कोणीतरी पाहुणे येणार होते, म्हणून खीरपुरीचा बेत होता, त्या घरचे दादा म्हणाले, “मै बाबाजी के लिये घर से भोजन प्रसादी लेकर आऊंगा”. हे ऐकून बाबाला फारच आनंद झाला. रात्रीच्या जेवणात शिरापुरी म्हणजे दिवसभर उपाशी राहण्याचं फळ….. आमचं स्नान पूजा आदी झाल्यानंतर आम्ही बाबाच्या डब्याची वाट बघू लागलो. आठ वाजले, साडे आठ वाजले, नऊ झाले, साडेनऊ झाले… करता-करता साडेदहा झाले.. एव्हाना माझ्या जवळचं दूध मी संपवलं होतं, आणि आता अजूनही बाबा चा डब्बा आलाच नव्हता.. मग तिथल्याच घोळक्यात ला एक माणूस डबा देणाऱ्या माणसाच्या घरी “बघून येतो” म्हणून गेला.. त्याची वाट बघत पुढचा अर्धा तास सुद्धा निघून गेला.. डब्बा देणारा आला नाही, त्याला बघायला गेलेला माणूस ही आला नाही…. मग बाबाच्या डब्याचं काय झालं? बाबाला उपाशीच राहावं लागलं का? मैया उपाशी ठेवत नाही असं ऐकलं होतं, मग मैया फारच रागवली का बाबावर? बाबा जेवला की जेवलाच नाही त्या दिवशी?जेवला तर कसं काय जेवला आणि नाही जेवला तर इतका उपाशी राहिला का? सांगणार आहे पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सूर्यकुंड बद्दल सांगितलं होतं. बाबा चा चहा कसा हुकत जात होता हेही मी सांगितलं होतं. आता आपण शुक्करवाड्याच्या खेडापती मंदिरात बाबाच्या जेवणाच्या डब्याची वाट बघत होतो. बराच उशीर झाला तरी डबा आलाच नाही. मी मात्र दूध पिऊन तृप्त झाले होते. आता पुढे सांगते.
आता काही जेवण येत नाही असं लक्षात यायला लागलं होतं. आपण मैया प्रसादाला नाही म्हणालो म्हणूनच आपल्याला आज भोजन प्रसादी मिळत नाहीये असा बाबाचा ठाम विचार होत होता. गंमत म्हणजे यावेळी बाबाची अजिबात चिडचिड झाली नाही. आपल्या हातून काहीतरी अक्षम्य घडत आहे आणि म्हणूनच मैया ने आपल्याला शिक्षा दिली असं समजून तो शांतपणे आसनावर डोळे बंद करून बसला होता. बस आता थोड्या वेळात आडवं व्हायचं! पण अशावेळी आपण आईचं हृदय विसरून जातो. ती परीक्षा घेते मात्र उपाशी झोपू देत नाही. गावातली मंडळी आता आपापल्या घरी पोहोचली होती. हे खेडापती मंदिर अगदी गावाच्या मध्यभागी असल्याने लघुशंकेसाठी देखील लांब जावं लागेल असा अंदाज होता. मी आणि बाबा एखादा जवळपास आडोसा दिसतो आहे का या शोधात निघालो असता रात्री सव्वाअकरा वाजता एका मैयाजीने आवाज दिला..”अरे हमारे यहां पक्का टॉयलेट बनाया है, चले जाव” मला कुठे जायचे आहे ते तिला समजलं होतं…ती दार उघडून बाहेर आली आणि विचारू लागली..” भोजन हो गया बाबाजी? चावल दूध पाओगे?” बाबाला काय म्हणून आनंद झाला होता! पोटभर दूधभात खाताना बाबाला अश्रू आवरत नव्हते… आणि उगाच असेल, पण ती मैया गालातल्या गालात हसतेय की काय असा भास मला होत होता.
आम्ही परत येताना अचानक मी बाबाला म्हणाले “गेला बरं मैयाचा राग, आता उद्या बघ लाड होतील तुझे” खरं तर असाच अनुभव होता या आधीचा. मैयाने परिक्षा घेतली किंवा ती रागावली तर ती दुसऱ्या दिवशी खूप लाड करते. आता उद्या बाबाचे काय लाड होतात बघू, असं बोलत बोलत आम्ही येतानाच बाबाला हलकीशी ठेच लागली. रक्त नाही आलं पण पडता पडता तोल सावरला… आणि हा विषय अर्धाच राहिला. उशीर झाला होता, सकाळी लवकर उठायचं होतं कारण आज आपण उघड्या मंदिरात होतो. डोक्यावर एक शेड आणी आपण गावाच्या मध्यभागी…आम्ही झोपलो.
खरंतर गावात लोक लवकर उठतात, पण आम्ही साडे पाचला उठलो तरी गावात शुकशुकाट! आमची तयारी झाली आणि आम्ही निघालो तरी आजूबाजूच्या घरांमधे कसलीही हालचाल नव्हती.असो… आज आमचं काहीच झालं नव्हतं. गावाबाहेर च्या हापशीवर स्नान आटोपून पुढे निघालो. उजाडल्यावर बाबाच्या पायाकडे लक्ष गेलं तो अंगठा चांगलाच सुजलेला. कालची ठेच तशी जोरात लागली होती! पुढे एका गावात एका ठिकाणी चहा ला बोलावलं, तिथे गेलो तर एक माणूस एका आजोंबाच्या पायाला तेल लावत होता. त्याने बाबाच्या अंगठ्याला लेप लावून दिला… अर्ध्या तासात बाबाच्या पायपची सूज उतरली. मैयाने परिक्षा घेतली किंवा रागावली तर दुस-या दिवशी लाड करते हे सिद्धच झालं होतं.
आता आम्ही हळू हळू बांद्राभान च्या दिशेने जात होतो. वाटेत एका ठिकाणी एका माणसाने आम्हाला उजव्या बाजूचा आतला रस्ता सुचवला. चिचलोन, कढैया, चांदला असा हा रस्ता. हा रस्ता लाटा लाटांचा होता. म्हणजे लाटेवर चढायचं आणि खाली उतरायचं असा मध्येच उंच मध्येच खाली असा हा कच्चा रस्ता होता. एखादं जहाज कसं लाटेवर वर-खाली हिंदोळे खात असतं, असा काहीसा हा रस्ता. सुरूवातीला जरासा रुक्ष, आणि मग मात्र अतिशय रमणीय. रस्त्यात आम्हाला ससे, हरणं,माकडं दिसलेत. यातला प्रत्येक प्राणी स्वतःमध्येच इतका मग्न होता की त्याला आजूबाजूच्या अस्तित्वाचं भानच नसावं. या सगळ्या प्राण्यांच्या हालचाली ते आनंदात आहेत असं दर्शवणाऱ्या होत्या. टुणकन उडी मारत इकडे तिकडे पाहणारं हरीण, लहानशा नाकपुड्या इकडेतिकडे हलवत आधी स्तब्ध रहाणारा आणि अचानक उड्या टाकणारा ससा, तर एकमेकांची खिल्ली उडवणारे माकडं… खरंच जितकं आपण स्वतःमध्ये रमत जातो तितका जास्त आनंद मिळत असावा! लोनलीनेस आणि सॉलिट्यूड मधला हा फरक…असो..
पुढे चांदल्याला एका ठिकाणी भरपूर ताक मिळालं. अजून पुढे आलो तशी तवा मैया बाजूने वाहताना दिसली. तिचं ते भलंमोठं पात्र पाहून घाबरायला झालं. आणि अगदी नकळत मनात विचार येऊन गेला, अगदी काहीही म्हणा… आई ती आईच असते. तेव्हापासून माझ्या मनात एक विचार पक्का झाला. बुडनेर, सिवनी, कनई आणि इतर सगळ्या या मावश्या.. पण आई ती मैयाच! करत करत आम्ही बांद्राभान सिताराम आश्रमात गेलो, आणि तिथून पुढे सेठानी घाट... पण यावेळी मी थोडा वेगळा अनुभव लिहिणार आहे. खरंतर परिक्रमेच्या वेळी आम्ही होशंगाबादच्या पुढे कुठेतरी थांबलो होतो पण मी आता जो अनुभव सांगणार आहे तो थोडा वेगळा ही आहे आणि थोडा नंतरचा ही आहे! तरी राहावत नाही म्हणून सांगणार.
इथे खर्रा घाटावर सिताराम महाराजांनी बांधलेलं दत्त मंदिर आहे, तिथला हा अनुभव. “सद्गुरू सारखा असता पाठीराखा” चा जिवंत प्रत्यय! जिवाचा, आत्म्याचा थरकाप व्हावा असं काहीतरी याची देही याची डोळा, संपूर्णपणे शुद्धीत असताना पाहिलं आणि अनुभवलं देखील! आम्ही बसलो होतो त्या स्थानाच्या चहूबाजूला एका भयाण शक्तीचा वावर त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष अनुभवला होता! थोडा थोडका नव्हे तर चांगला तासभर तरी नक्कीच… नक्की काय आणि कसं झालं होतं ते पुढच्या भागात सांगेन. तोवर नर्मदे हर!
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १०९
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला शुक्करवाड्याची गोष्ट सांगितली होती. दिवसभर बाबा चा चहा हुकत जात होता आणि शुक्करवाड्याच्या खेडापती मंदिरामध्ये बाबाच्या भोजन प्रसादी चा मुहूर्त लागत नव्हता, ते मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर ‘सद्गुरु सारखा असता पाठीराखा’ हा अनुभव मी याची देही याची डोळा घेतला असं मी आपल्याला सांगितलं होतं. आता पुढे सांगते.
शुक्करवाड्याहून पुढे निघालो. आता बांद्राभान आणि नर्मदापुर असा रस्ता होता. आता मला गावाचं नाव आठवत नाही पण एका घरातून एक छोटा मुलगा आणि त्याची आजी आम्हाला बघून बाहेर आलेत. त्यांनी आम्हाला चहासाठी बोलावलं. आजचा दिवस बाबा साठी पुन्हा एकदा वेगळा होता. आता बाबा कशालाही ‘नाही’ म्हणणार नव्हता. आम्ही चहासाठी आत गेलो. या कुटुंबात दोन मुलं आणि आई-वडील असे राहत होते. आजींच्या लहान सुनेनी चहा केला. आजी आम्हाला परिवाराची माहिती सांगत होत्या. मोठ्या मुलाला दोन मुलं आहेत. लहान मुलाला देखील एक मुलगाच आहे. आम्हाला कुटुंबाची माहिती देता देता आजींचे सारखे फोन येत होते. आजींची धाकटी सून गर्भारशी होती. ती थोडी टेन्शनमध्ये वाटत होती. आजी मात्र प्रेमळ असाव्यात… आजींना येणाऱ्या फोन मध्ये कुणीतरी हॉस्पिटल ला असल्याचं समजलं. “सब कुछ ठीक तो है ना माताजी” आम्ही विचारताच त्या म्हणाल्या.. “ठीक तो सब कुछ है, अब आप आ गये हो तो माई भी आ जायेगी, बडी बहूं तिसरी बार पेट से है, होसंगाबाद में अस्पताल मे है, अभी सीजर करने वाले है, बस आशीर्वाद देदो की मैया जी घर पधारे… बडी बहू के दो बेटे है, छोटी का भी एक बेटा है, और हम लोग तो मैया जी के आने का इंतजार कर रहे है. अब दोनो बहूए बेटीया ले आयें तब समझू की माता रानी की कृपा है”
आम्ही चहा घेऊन पुढे निघालो. खरंच किती श्रद्धा असते मैया वर. इथे लोक मुलगा होण्यासाठी प्रयत्न करत असतात, आणि या आजी आमच्या घरी नर्मदामैया यावी म्हणून प्रार्थना करत होत्या. आम्ही निघते वेळी घरच्या मंडळींनी नमस्कार केला… परिक्रमावासी ना नमस्कार करण्याची पद्धत आहेच.. असा नमस्कार केल्यावर “मैया जी आपको सुखी और समृद्ध रख्खे, मातारानी की कृपा आप पर बनीं रहे” असेच शब्द बाहेर पडतात. असा आशीर्वाद देण्यामागचा देखील एक सत्संग आहे. हा अनुभव पूर्ण करते आणि मग तो संवाद देखील सांगते. तर असा आशीर्वाद देऊन आम्ही पुढे निघालो. आजींनी बाबाचा फोन नंबर घेऊन ठेवला होतख, रात्री फोन करतेच असं आवर्जून सांगितलं, आणि त्या प्रमाणे रात्री आजींचा फोन आला.
“बाबाजी, मैयाजी, हम तो कैसे नासमझ निकले.. आप को चाय पिला दी और कोई सेवा भी नही करी… आपकी आशीर्वाद से घर मे रेवा मैया आई है” आजींचा आनंद ओसंडून वाहत होता. अर्थात यात आम्हा पामरांच्या आशिर्वादाचा काय संबंध? पण आजींना फार हळहळ होत होती. मैया येऊन आशीर्वाद देऊन गेली म्हणूनच आपल्याकडे कन्यारत्न प्राप्त झालं हा त्यांचा दृढ विश्वास होता. … यात आमचा मोठेपण असणण्यातला काहीही भग नव्हता पण आता ‘तो’ संवाद झालेला मी तुम्हाला सांगणार आहे.
मागे एकदा एका छोट्याशा देवळात थांबलो असताना, एका आजीशी सत्संग झाला होता. कोटेश्वराच्या आधी विमलेश्वर च्या प्राचीन मंदिरातला सत्संग. आधी लिहायचा विसरलेले असणार मी.. सांगते. आम्ही इथून निघत असताना या म्हाताऱ्या आजींनी आम्हाला नमस्कार केला होता. आशीर्वाद दे असा हट्ट त्या करत होत्या तेव्हा मी बोलून गेले होते ” मैं कौन होती हूं आशीर्वाद देने वाली, वह तो मैया ही देगी” .. असं म्हटल्यावर त्यांनी मला खाली बसवलं, आणि म्हणाल्या, “वह तो सच है माताजी, आशीर्वाद तो मैया ही देती है, लेकिन तुम लोगो में हम मैया को ही देखते है, तुम्हारे मुख से निकला हुआ शब्द, हमारे लिए मैया का शब्द होता है, इसलिये तुम परिक्रमावासीओंने हमेशा ही सबको आशीर्वाद देनाही चाहिये, क्या पता कब किसी के जीवन-मरण की समस्या हो और आपका आशीर्वाद काम कर जाये? और वैसेभी, निस्वार्थ आशीर्वाद हमेशा ही देना चाहिये, किसी का शुभ चिंतन करना काफी नही है… जब आप मन ही मन में किसी और के शुभ की कामना करते हो, तो उसे शब्द में परिवर्तन करनें में कैसे तकलीफ? आज तो आपके साथ मैया जी चल रही है, लेकिन हमारे आजूबाजू से, हमारे जानकारी के बाहर अनेक शक्तीया चलती रहती है. आपके आशीर्वाद भरे शब्द को वें सत्यमें परावर्तित करने की क्षमता रखती है. आंप जब शब्द से आशीर्वाद देते हो, तब हमेशा उस शक्ती का, उस ईश्वर का स्मरण करें ताकी आपको यह पता रहे की आशीर्वाद आप खुद नहीं दें रहे हों, आपके मुख से केवल शब्द आ रहें हैं, आशीर्वाद देनेवाला तो वह उपरवाला है”
आजींच्या या सत्संगानंतर मी आणि बाबा कोणीही नमस्कार केला की “मैया की कृपा आप पर बनी रहे” हा आशीर्वाद अगदी भरभरून देतो. आजही हा आशीर्वाद दिल्यानंतर रेवा मैयाचा जन्म झाला ही मैया ची कृपा असली तरीही त्या आजी चा आनंद पाहताना जे समाधान मिळत होतं ते मिळणं ही आमच्यावर नर्मदा माईची कृपाच नाही का? असो.. आता जुना अनुभव सांगितला तसा एक वेगळा अनुभव देखील सांगते. खरंतर हा अनुभव पहिल्या परिक्रमेतला नाही. पहिल्या परिक्रमेत होशंगाबाद ला सेठानी घाटावर थांबलो होतो मात्र खर्रा घाटाच्या मंदिरात झाणं झालंच नव्हतं. तो योग आला त्यावेळी माझ्याबरोबर एक दादा होते. यावेळी जयू दादा पाटणकर आम्हाला दत्त मंदिरात घेऊन गेले.
सकाळी दत्त मंदिरात जाताना पासूनच या अनुभवाला सुरुवात झाली. खर्रा घाटाकडे जाताना दत्त मंदिराच्या बरंच आधी पासून झाडीवजा भाग सुरू होतो. इथे मध्ये एक इलेक्ट्रिकचं सबस्टेशन लागतं, तिथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता घेतला आणि मला वेगळाच अनुभव आला. आपण अनाहूतपणे जात आहोत, किंवा आपल्याला चक्क ओढून नेण्यात येत आहे, असं मला तीव्रपणे वाटू लागलं. त्या शक्तीकडे चुंबकाचा सारखी मी ओढली जात होते. साधारण अर्धा किलो मीटर चा हा रस्ता असेल. मंदिरापाशी पोचलो. बाहेर एक मोठं प्रांगण, आत दुसरं प्रांगण त्या प्रांगणाच्या मध्यभागी मंदिर. बाहेर मोठा उंबराचा वृक्ष.. त्याखाली सिमेंटचा पार. अतिशय शांत आणि रमणीय जागा… आणि खरं सांगायचं झालं तर अतिशय गूढ वातावरण.
मंदिरात गेले तो समोर दत्त मूर्तीच्या आजूबाजूला सिताराम महाराज आणि टेंबेस्वामी महाराजांच्या पादुका ठेवलेल्या. भिंतीवर अनेक संतांचे फोटो लावलेले. माझे गुरु, नाना महाराज तराणेकर हे टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य. आम्ही टेंबे स्वामी महाराजांना मोठे महाराज असंच संबोधतो. गुळवणी महाराज, सिताराम महाराज, अशा बऱ्याच संतांचे फोटो लावले असताना मात्र माझ्या नानांचा फोटो मला तिथे लावलेला दिसला नाही, त्यामुळे माझी थोडी निराशा झाली. मी विचार करत होते.. “असं कसं काय शक्य आहे, इथे नानांचा फोटो कसा नाही? जाऊदे…” असं म्हणत मी जपाला सुरुवात केली.. जप तर फारच छान झाला मात्र जपाननंतर इथली गूढता जास्त जाणवू लागली. या गूढतेचा शोध घेत घेत माझी नजर गाभार्याच्या भिंतीवर फिरली असतानाच एका क्षणाला मी रडू लागले… ज्या भिंतीला टेकून मी जप करत बसले होते, ज्या भिंतीला टेकून बसले असताना माझ्या नानांचा फोटो नाही म्हणून मी निराश झाले होते, त्याच भिंतीवर माझ्या डोक्याच्या अगदी सरळ वर माझी नाना माऊली माझ्यावर लक्ष देत बसली होती. समोर मोठे महाराज, मागे नाना महाराज, आणि मध्ये मी, असं माझ्यासोबत आज तिसऱ्यांदा होतं… पण यावेळी मात्र सद्गुरु सारखा असता पाठीराखा… ही प्रचिती आली.
इथे नानांचा फोटो पाहिल्यानंतर या मंदिरात उद्या श्रीमार्तंड महिमा या नाना महाराजांच्या चरित्राचं पारायण करावं असा विचार मनात आला… त्यानंतर त्या पारायणा पूर्वी आणि पारायणा मध्ये आलेल्या अडचणी आणि त्यातून पाठीराख्या सद्गुरु ने केलेले रक्षण हे माझ्या पुनर्जन्मा पेक्षा कमी नाही. गूढ भयाण वातावरण, या मंदिरात राहू नका म्हणून हातापाया पडणारा पुजारी, त्या पुजाऱ्याची मरणासन्न गाय आणि तिचा मृत्यू, पारायण करताना अचानक पणे समोर प्रकट झालेल्या शक्तिशाली संकटाचा सामना आणि त्यातून सहजसुलभ सुटका हे सद्गुरू पाठीशी होते म्हणूनच शक्य झालं… ते पाठीशी आहेत हे सकाळीच त्यांनी सुचवलं होतं… दोन-अडीच टन वजनाचे हे अदृश्य संकट स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तत्पर होतं… आणि पुढे अजून काय काय करण्याचं त्याच्या मनात होतं ते तेच जाणे! भयानकतेची परिसीमा काय असते हे मला त्या दिवशी समजलं होतं… नक्की काय झालं होतं ते पुढच्या भागात सांगेन… तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११०
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला बाबा च्या चहा ची गंमत सांगितली होती. त्यानंतर होशंगाबाद ला एका संकटाचा सामना केला असंही सांगितलं होतं. सद्गुरु सारखा असता पाठीराखा ही प्रचिति, किंबहुना हिचा पहिला भाग मी तुम्हाला सांगितला होता. एका मोठ्या अदृश्य आणि वजनी संकटा बद्दल मी मागच्या भागात बोलत होते. आता पुढे सांगते.
मंदिरात जाण्याच्या आधीपासूनच एक गुढ शक्ती मला आकर्षित करत होती. मंदिरात गेल्यानंतर नाना महाराजांचा फोटो तिथे दिसला नाही त्यावेळी मी नाराज झाले होते, मात्र नंतर पाठीशी सद्गुरु आणि समोर मोठे महाराज या दोघांच्या मध्ये मी अशी प्रचिती आली त्यावेळेला सद्गुरु कायम आपल्यावर लक्ष ठेवतात आणि आपल्या पाठीशी आहेत ही भावना उचंबळून वर आली. आता मात्र मला मार्तंड महिमा, नाना महाराजांचे चरित्र, याठिकाणी वाचावं असं वाटू लागलं. आज रात्री इथेच आसन लावून उद्या पहाटे लवकर उठून मार्तंड महिमाचं पारायण करायचं असं मी ठरवलं. तशी चौकशी करायला सुरुवात केली.
खरंतर या मंदिरात बाजूला एक हॉल होता आणि एक खोली देखील होती मात्र तिथे स्वच्छता नव्हती. आपण स्वच्छ करून घेऊ हरकत नाही असं ठरवून तिथल्या पुजा-याशी संपर्क साधला. सुरवातीला पुजाऱ्यांनी किंचित उदासीनता दाखवली. मी आग्रह केला तसा नंतर त्याने होकारही दिला. आम्ही दोघं तिथे राहण्यापेक्षा पुजारी आणि जयू दादाने देखील इथे राहिलं तर छानच होईल असं वाटलं मात्र जयू दादांना ते शक्य नव्हतं. पुजारी मात्र मी संध्याकाळी किल्ल्या घेऊन येतो असं म्हणाला. आता आम्ही सामान न घेता आलो होतो. घरी परतलो आवरासावर केली पूजेची तयारी केली आणि ठरल्या वेळेला आम्ही पुन्हा दत्त मंदिरात दाखल झालो.
मंदिराच्या किल्ल्या घेऊन पुजारी आला नव्हता. त्याला फोन केला तर तुम्ही इथे राहू नका असं तो आम्हाला विनवू लागला. अगदी तुमच्या हाता पाया पडतो पण इथे राहू नका, कारणही विचारू नका अशी त्यांनी गळ घातली. माझी गाय मरणासन्न आहे आणि मी जास्त वेळ देऊ शकणार नाही तेव्हा आले तसे तुम्ही परत जा असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. इतकं हातापाया पडणं कोणी उगाच करेल का? इतकं म्हणतोय तो तर सकाळी येऊयात, असं म्हणून आम्ही देखील परत पाटणकरांकडे गेलो, आणि सकाळी लवकर उठून दत्तमंदिरात पारायणाला सुरुवात केली. इथून खरं काय ते अदृश्य संकट अदृश्यपणे समोर येऊ लागलं… सांगते सांगते..
पारायणासाठी आम्ही समोर पूजा मांडली. आमचे दोघांचे दोन पाट, त्यावर दिवे ठेवले. दत्त मूर्तीसमोर दोन आणि खाली एक मोठा असे एकूण पाच दिवे लावले. मंदिरातले सगळे ट्यूबलाईट लावले. अध्याय वाचायला सुरुवात केली. जेमतेम आठ दहा ओळी वाचून झाल्या असतील नसतील तो दिवे गेलेत, आता फक्त पाच दिवे तेवढे तेवत होते. लगेचच काही वेळाने आभाळ भरून आलं, विजा चमकू लागल्या, हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला. आधीच गूढ असलेल्या वातावरणात कमालीची भर पडली आणि पुन्हा गूढतेच्या पलीकडे जाऊन आजूबाजूचं वातावरण आता भयाण वाटू लागलं. खरंतर उजाडल्यानंतरचीच वेळ होती तरीही बाहेर बर्यापैकी अंधारल्या सारखं दिसत होतं.
थंडी वाजू लागली होती. पावसाला सुरुवात झाली नव्हती पण कधीही कोसळेल असो जाणवत होतं. आता जर पाऊस आला तर किमान तीन-चार तास थांबणार नव्हता इतकं भरून आलं होतं. दिसेल त्या उजेडात आम्ही पोथी वाचत होतो. अशातच, अचानक पणे, कुणीतरी फुंकर घालावी इतक्या जोरात, दत्त मूर्ती समोर ठेवलेले दोन्ही दिवे एकाच वेळी विझले. आता खाली ठेवलेला मोठा दिवा आणि आमच्या पाटावरचे दोन दिवे एवढेच शिल्लक होते.
खरंतर आता पोथी वाचताना आमचं लक्ष थोडं उडालं होतं म्हटलं तरी चालेल. तरीही मनाचा निर्धार पक्का ठेवून फक्त वाचत राहायचं असं आम्ही मनातल्या मनात ठरवलं. जे घडत होतं ते नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं. आमच्या भोवताली कुठल्यातरी वेगळ्या शक्तीचं अस्तित्व आहे हे आम्हाला जाणवत होतं. त्या शक्तीने अजून तसं सिद्ध केलं नसलं तरीही कुठल्याही क्षणी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही शक्ती तत्पर आहे याची आम्हाला जाणीव होत होती. अशातच गाभाऱ्याच्या उजव्या अंगाला असलेल्या खोलीच्या छतावरच्या टीना वर प्रचंड वजनी असं काहीतरी धडाधड नाचायला सुरुवात झाली. माकडं किंवा पक्षी असतील असं वाटावं तर त्यांच्या उड्या मारण्याने येणाऱ्या आवाजापेक्षा हा आवाज कितीतरी पट जास्त होता. या आवाजाने येणाऱ्या कंपनांमुळे दत्तमूर्ती समोरचा खालचा दिवा देखील भस्सकन् विझला. दातखिळी बसणं शिल्लक राहिलं होतं असा भयंकर आवाज होता तो. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली आता मात्र फक्त वाचत राहायचं…. अगदी जे होईल ते होईल… वाचन मात्र सोडायचं नाही असं ठरवत आम्ही पोथी वाचतच राहिलो.
जवळजवळ पंधरा मिनिटांच्या थैमानानंतर तो आवाज थांबला. आम्ही बसलो होतो त्या गाभाऱ्याच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला दोन मोठाल्या खिडक्या होत्या. जरा वेळ शांतता जाणवली मात्र ही शांतता निश्चितच वादळा पूर्वीची शांतता होती. दोन्ही बाजूच्या दोन खिडक्यांमधून आम्हाला पावलांचा आवाज ऐकू आला. पुजारी आले असतील असं वाटलं मात्र हा आनंद क्षणभरसुद्धा टिकला नाही. अगदी पुढच्याच क्षणी माझ्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीतून कोणीतरी डोकावतंय असा भास झाला आणि म्हणून माझी नजर खिडकीकडे गेली. त्याच क्षणी हृदयाचे ठोके बंद पडावेत असं वाटलं. मिट्ट काळ्या रंगाची एक मानवाकृती, भली मोठी, उंच सावली खिडकीतून आत डोकावत होती मात्र खिडकीच्या बाहेर कोणीही नव्हतं. आमच्या पाटासमोर पडणाऱ्या सावलीत त्या मानवाकृती सावलीने खिडकीच्या गजांना घट्ट आवळून धरल्याचं स्पष्ट दिसत होतं…. अचानक ती सावली दिसेनाशी झाली आणि मग डावीकडच्या खिडकीत पुन्हा तेच दृश्य समोर आलं. हा भास नव्हता कारण या मानवाकृती सावलीने घातलेल्या तीन प्रदक्षिणा आणि सहा वेळा त्या सावलीला खिडकीतून डोकावताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं होतं.
आता मात्र कुठल्या क्षणी प्राण त्यागला जायचा एवढंच बाकी होतं. घशाला कोरड पडली होती. तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. पोथी वरून नजर अधाशासारखी फिरत होती, आणि अशातच मला शिंका यायला सुरुवात झाली. डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी, एकही अक्षर वाचता येईना. ह्यांना पोथी वाचूच द्यायची नाही असा चंग बहुतेक त्या शक्तीने बांधला होता. कोण कशी सुबुद्धी माझ्यासोबतच्या दादांना झाली देव जाणे आणि एक ओळ ते दोनदा वाचू लागले. काही वेळ असा गेल्यानंतर माझ्या सारखाच त्रास त्यांना सुरू झाला आणि मग मी एक ओळ दोनदा वाचू लागले. पोथी मध्ये एकूण एकोणवीस अध्याय आहेत, आमचा जेमतेम सहावा अध्याय सुरू होता. अजून इतके अध्याय वाचून होणं बाकी होतं, आणि ही बलाढ्य शक्ती सतत आमचं मनोधैर्य खच्ची करत होती. आता फक्त सद्गुरूंचा धावा आम्ही करत होतो…. पोथीतले शब्द केवळ जिभेवर होते, आणि धावा मात्र आकंठ सुरू होता. आता एक तर पोथी संपूर्ण वाचायची किंवा या शक्तीच्या हाती मृत्यूमुखी पडायचं, हे ठरणं बाकी होतं. जोवर आम्ही पोथी वाचत होतो तोवर कुठलीतरी अद्भुत शक्ती आमच्या आत प्रज्वलित होती आणि आमचं मनोधैर्य वाढवत होती…. या युद्धात आम्ही केवळ पुतळ्यासारखे होतो मात्र आमच्या हातातली अद्भुत शक्ती आणि गाभाऱ्याच्या बाहेरची शक्ती यातलं हे युद्ध आहे हे आम्हाला समजत होतं. पण आमची पोथी पूर्ण वाचून झाली का? त्या बलाढ्य शक्ती चं काय झालं? तिने आम्हाला कितपत इजा केली? आमचं पारायण पूर्ण होऊ शकलं की आम्हाला अर्धवटच सोडावं लागलं? आम्ही वाचलो हे तर जाहीर आहे कारण त्यानंतर मी हे भाग आपल्यासमोर मांडतेय, पण ती वेळ, ती अवस्था, ती शक्ती, तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, थरकापही होतो आणि गहिवरून ही येतं…. असं नक्की काय झालं होतं आणि त्याचा उलगडा मला कसा मिळाला हे सांगणं देखील महत्त्वाचं आहे. हा भाग लांबतोय त्यामुळे हा बलाढ्य शक्तीचा अर्धवट राहिलेला प्रसंग पुढच्या भागात नक्की पूर्ण करते. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १११
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला होशंगाबाद चा अनुभव सांगत होते. अतिशय थरकाप होणारा हा प्रसंग होता. आम्ही पारायण करण्यासाठी खर्रा घाट येथील दत्त मंदिरात बसलो होतो. अचानक पणे गेलेले लाईट, वातावरणात गारठा आणि वाढलेली भयाणता, अगदी हिंदी भुताटकी सिनेमात दाखवतात तसे भसकन विझलेले दिवे, पंधरा मिनिटं दणादण आवाज करणारं थैमान आणि एका मानवाकृती सावलीच्या तीन प्रदक्षिणा, त्या सावलीने खिडकीच्या गजांना धरल्याची जाणीव, हे सगळं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. आता अधिक वेळ वाया न घालवता पुढे काय झालं ते सांगते.
माझ्या नाकातोंडातून, डोळ्यातून पाणी यायला लागलं. मला खूप शिंका येऊ लागल्या. तसं दादांनी एक ओळ दोनदा वाचायला सुरुवात केली होती. पुढे थोड्यावेळाने तोच त्रास दादांना सुरू झाला आणि मग मी एक ओळ दोनदा वाचायला सुरुवात केली. सावलीचं अधून-मधून डोकावून बघणं सुरूच होतं. हे युद्ध आमचं आणि सावलीचं नव्हतंच मुळी. हे युद्ध दोन कुठल्यातरी अतिशय ताकतवर अशा शक्तींचं आपसातलं युद्ध होतं. एक शक्ती आम्हाला पारायण करू देत नव्हती तर दुसरी शक्ती आमच्या पारायणाला पाठिंबा देत होती. आमचं दुबळेपण आमच्या लक्षात आलेलं होतंच. तसं पाठीशी गुरुराया असल्यावर आपण तिथेच टिकून राहणार आहोत याची एक खात्री होती, पण तरीही साक्षात मृत्यूला समोर पाहिल्यावर मन विचलित झाल्याशिवाय राहिलं नाही हेही सत्य होतं.
एक एक शब्द, एक एक ओळ, न सुटू देता, गडबड-गोंधळ घाई न करता, आणि जितके शक्य होईल तितके त्या बाहेरच्या शक्तीकडे दुर्लक्ष करत करत, कसं बसं आम्ही ६ अध्याय पूर्ण केले. आता सातव्या अध्यायाला सुरुवात झाली होती. इथून काहीतरी चमत्कार व्हायला सुरुवात झाली. सर्वप्रथम इलेक्ट्रिसिटी आली आणि मंदिरात लखलखाट झाला. आमची भीती आता थोडी कमी झाली. थोड्याच वेळात हवेतला गारठा सुद्धा कमी झाला. छान सूर्य प्रकाश पडू लागला. आता खिडकीच्या बाहेर सुद्धा बऱ्यापैकी मोकळं वातावरण जाणवत होतं. पाऊस पडलाच नव्हता, आणि आता आभाळही गेलं होतं. आमच्या दोघांच्याही तब्येती पूर्ववत झाल्या होत्या. वातावरणातली भयाणता जवळजवळ संपली होती. सातवा अध्याय संपेस्तोवर वातावरणात कमालीची प्रसन्नता जाणवू लागली.
आम्हाला पारायण करण्यासाठी पाठिंबा देणारी ती शक्ती निश्चितच टिकून राहिली होती आणि म्हणूनच आम्हीही टिकू शकलो होतो. या शक्तीनेच आमचं रक्षण केलं होतं. सद्गुरू पाठीशी होतेच… अर्थात त्या बाहेरच्या शक्तीशी लढणारी ही शक्ती सद्गुरुं शिवाय दुसरी कोणती असणार बरं? कालच मला “मी तुझ्या पाठीशी आहे” असा संकेतही सद्गुरुंनी दिला होता. आमचं पारायण अगदी व्यवस्थितपणे पूर्ण झालं होतं. आता फक्त एकच प्रश्न माझ्यापुढे शिल्लक होता तो असा की इतक्या पवित्र स्थानी ही अशी शक्ती का म्हणून आमचं पारायण होऊ नये यासाठी आम्हाला त्रास देत होती? याचं उत्तर मला मिळालं… सांगते.
श्री मार्तंड महिमा या नाना महाराजांच्या चरित्रातला सातवा अध्याय वाचायला घेतल्याबरोबर दुष्ट शक्तीचा नाश झाला. याला कारणही आहेच. या सातव्या अध्यायामध्ये सिन्नोर या नर्मदाकाठी असलेल्या गावामध्ये नाना महाराज धनदेशवर मंदिरात मुक्कामाला असताना एका ब्रह्म संबंधाला त्यांनी त्रासातून मुक्त केले होते, या घटनेचे वर्णन केलेले आहे.
म्हणूनच कदाचित हा अध्याय वाचल्यानंतर सगळं वातावरण प्रसन्न झालं. पुढे हा अनुभव मी नाना महाराज तराणेकर यांचे नातू बाबा महाराज तराणेकर यांना सांगितला. माझ्या प्रश्नाचे उत्तर मला बाबा महाराजांकडून मिळालं. इतक्या पवित्र स्थानी देखील अशा शक्ती का? असा माझा भोळा भाबडा प्रश्न होता. बाबामहाराज म्हणाले “सिताराम महाराजांनी बांधलेल्या या मंदिरात नंतर सिताराम महाराज कितीवेळा गेलेत? या मंदिरात कधी मोठे महाराज गेले आहेत का? तू दत्त स्थानांना फारशा भेटी दिलेल्या दिसत नाहीत? काही दत्तस्थान ही अतिशय गूढ असतात हे तुला माहित नाहीये बहुधा… सांगतो..”
ते पुढे सांगू लागले… बरेचदा, बऱ्याच शक्तींना आपले भोग पूर्ण करण्यासाठी अनेक योनितून प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांना आपल्या या विश्वात राहून स्वतःचे भोग पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. अशा वेळी त्यांच्यावर काहीतरी कंट्रोल असणे गरजेचे आहे की नाही? आणि म्हणूनच अशा शक्तींना दत्तप्रभूंच्या पायांना बांधून ठेवण्यात येतं. मुक्ती मिळेपर्यंत आपले भोग भोगत असताना ह्या शक्ती किंवा या हे जीव आपल्या बांधून दिलेल्या स्थाना वरच वावरू शकतात. ही दत्तस्थानं सोडून त्यांना कुठेही जाता येत नाही”
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं मात्र मला अजून एक गोष्ट बाबा महाराजांनी सांगितली. ते म्हणाले “तू इथे मार्तंड महिमा पारायण करणार आहेस हे मला माहीत असतं तर मी तुला आधी सातवा अध्याय वाच असं सांगितलं असतं. यापुढे लक्षात ठेव, कुठेही अनोळखी ठिकाणी जर कुठलीही पूजा करावयाची असेल, किंवा त्या स्थाना विषयी काही शंका मनात असतील, किंवा अशा काही शक्तींच्या जाणिवेचा भास जरी होत असेल तरीही सातवा अध्याय वाचत जा. आम्ही मुद्दाम हा अध्याय वाचायला सांगत असतो.” हे ऐकून तर माझ्या मनातले सगळेच प्रश्न मिटले होते. माझे सद्गुरू, माझे नाना, आणि माझी नर्मदामैया कायम माझ्या पाठीशी आहेत याची पुन्हा एकदा खात्री पटली होती.
खरंतर दक्षिण तटावरचा या नंतरचा प्रवास हा थोडासा संभ्रमातच टाकणारा होता. होशंगाबाद ते ओंकारेश्वर या प्रवासाचं नीट असं वर्णन मला कदाचित करताच येणार नाही. या भागात अनेक गोष्टी घडल्यात खऱ्या, त्यातल्या काही अक्षरशहा मिटून गेल्यात. काही शिल्लक आहेत मात्र त्या खूपच वेगळ्या आहेत. आणि काही तर माझ्या सुद्धा आकलना बाहेरच्या आहेत. असं नेमकं काय झालं होतं? सांगणारे पण पुढच्या भागांमध्ये…. तोवर नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला खर्रा घाट येथील दत्त मंदिरातला अनुभव आणि श्री मार्तंड महिमा या नाना महाराजांच्या चरित्रातील सातवा अध्याय का वाचावा व संपूर्ण पारायणाच्या आधी सातवा अध्याय का वाचावा हे सांगितले होते. तसंच दत्त ठिकाणं गूढ का असतात आणि अति पवित्र ठिकाणीसुद्धा वाईट प्रकारच्या शक्तींचे अनुभव का येतात याचं स्पष्टीकरण देखील मी तुम्हाला मागच्या भागात दिलं होतं. आता पुढे जाऊयात.
होशंगाबाद शहर तसं मोठं च्या मोठं.. लांबच लांब पसरलेलं. सेठानी घाटावरून निघून आम्ही पुढे रंढाल मार्गे जायचं ठरवलं. निघायला तसा उशीरच झाला होता. इथून हायवेनीच पुढे जा असं आम्हाला सांगण्यात आलं असल्यामुळे आम्ही देखील त्याच मार्गाने गेलो. आज कोण जाणे का पण चालवतच नव्हतं. एका मोठ्या पहाडाला वळसा घालून हा हायवे जातो. तिथे थोडा चढाव लागतो. मी आणि बाबा दोघही कसे कोण जाणे खूपच थकलो होतो. जवळच असलेल्या एका चांभाराच्या दुकानात थोडावेळ आश्रय घेतला. थोड्या वेळात तिथे एक आई आणि साधारण आठ-दहा वर्षांची तिची मुलगी अशा दोघीजणी आल्या. आता पावसाला सुरुवात झाली होती, त्या दोघीही आमच्याच बाजूला येऊन बसल्या. छोट्याशा मैयाला पाहून सहजच माझ्यातली शिक्षिका जागी झाली आणि मी तिला प्रश्न विचारू लागले. लहान मुलं दिसले की माझं नेहमी असंच होतं, माझ्याही नकळत मी त्यांच्याशी गप्पा मारू लागते. दर वेळी मीच प्रश्न विचारत असते, यावेळी मात्र माझा डाव माझ्यावर उलटा पडला. या छोट्याशा मैयाने मला खूप प्रश्न विचारले. तिच्या प्रश्नांची उत्तर देता देता परिक्रमेचे मार्फत मैयानी दिलेल्या शिकवणीची उजळणीच जणू ती करून घेत होती. परिक्रमे नंतर मी नक्की काय करणार आहे हा प्रश्न त्या चिमुरड्या मैयाने विचारून मला निशब्द केलं होतं. या प्रश्नाचे उत्तर मला अजिबातच माहित नव्हतं. मैया च्या हातात अकरा रुपये घालून मी तिच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा अगदी मोठ्या समंजस मुलीसारखा तिने मला आशीर्वाद दिला, म्हणाली, “अब तुम्हारी परिक्रमा थोडीही बची है ना, बहुत अच्छी तरह से हो जाएगी… आज तुम पर शिवजी प्रसन्न है”.
शिवजी आज क्यू प्रसन्न है? असं मी तिला विचारल्यावर ती मला म्हणाली, मै तो अभी अभी शिव मंदिर से आई हूं, आज वह सभी पर प्रसन्न है, तो तुम पर भी तो होगे ना”… नुकत्याच त्या दोघी मायलेकी शिव मंदिरातून आल्या असल्यामुळे त्या मंदिरातील प्रसन्नता अजूनही या छोट्या मैयाच्या मनात रूळते आहे, आणि म्हणूनच इतका छान आशीर्वाद आपल्याला मिळाला, असं माझं आणि बाबाचं म्हणणं पडलं. थोड्या वेळाने आम्ही पुढे निघालो. इथे थोड्या थोड्या अंतरावर बऱ्याच वस्त्या दिसत होत्या. आम्ही अजूनही होशंगाबाद शहराच्या फार बाहेर पर्यंत गेलो नव्हतो. त्यामुळे आज कुठे थांबायचं हा फारसा प्रश्न नव्हता. कुठल्यातरी वस्तीत व्यवस्था होईलच असा विचार करून आम्ही पुढे पुढे जात राहिलो.
पुढे गेल्यावर एका मोठ्या सोसायटीच्याजवळ आम्ही पुढचा मुक्काम कुठे करावा अशी चौकशी केली. अजून रंढाल बरंच लांब आहे आणि तुम्ही पोहोचू शकणार नाही असं तिथल्या चौकीदाराने सांगितलं. बाजूलाच एक हनुमान मंदिर होतं तिथेच आसन लावायचं ठरलं. आत डोकावून पाहतो तर या मंदिरामध्ये जराही स्वच्छता नव्हती आणि स्वच्छता करून घ्यावी म्हटलं तर साधनं नव्हती. भोजन प्रसादी चा प्रश्न तर पुढे राहिला. आधी आसन लावण्याची व्यवस्था करावयाची होती. समोरच्या सोसायटीमध्ये झाडणी मागून स्वच्छता करून घेऊ असा विचार केला. तिथला चौकीदारही आनंदाने हो म्हणाला, “मी माझ्या एका पोराला पाठवून स्वच्छता करून घेतो तोवर तुम्ही सोसायटी मधल्या मंदिरात बसू शकता” असं त्याने सांगितलं. सोसायटी मधलं मंदिर अगदी लहानसं मंदिर होतं. जेमतेम चार माणसं बसू शकतील एवढं सभामंडप, आणि दोन माणसं बसू शकतील एवढा गाभारा. गाभार्याचं काचेचे दार बंद होतं. आम्ही सभामंडपात बसलो.
बराच वेळ झाला तरी तो सफाई करण्यासाठी गेलेला पोरगा परतून आला नाही. आता अंधारही पडू लागला होता. ज्या चौकीदाराने आम्हाला मंदिरात बसा असं सांगितलं होतं त्याची ड्युटी संपवून तो घरी गेला होता आणि आता दुसरा चौकीदार त्याच्या ड्युटीवर आला होता. आम्हाला तिथे बसलेलं पाहून त्यानी चौकशी करायला सुरुवात केली. घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर सुद्धा तो काही आम्हाला तिथे बसू द्यायला तयार होईना. आप कुछ भी करो, सोसायटी मे आप नही बैठ सकते. “आता अंधार पडला आहे आणि आम्ही पुढे कुठे जाणार? सोबत मैया जी आहेत त्यांना घेऊन मी कुठे जाऊ?” असं बाबा वारंवार विनवू लागल्यानंतर सुद्धा चौकीदाराने आम्हाला गेटच्या बाहेर जायला सांगितलं. आता आम्ही सोसायटीच्या गेटच्या बाहेर बसण्यासाठी केलेल्या ओट्यावर बसून राहिलो. आज बहुधा अशीच रात्र काढावी लागेल. समोरच्या मंदिरात एक दिवा सुद्धा नव्हता. स्वचछता नव्हती, पाचोळ्याचा ढीग पडला होता, अशातच अंधारात किडा किटकुल असण्याची शक्यताही होतीच तेव्हा आता आम्ही ज्या ओट्यावर बसलो होतो तो शेड खाली येत होता हीच जमेची बाजू होती. पाऊस कोसळला तरी आम्ही ओलं होणार नव्हतो.
मला तिथेच बसवून बाबा एखादं दुकान आजूबाजूला आहे का ते बघण्यासाठी गेला. अगदी काही नाही तो दोन बिस्कीटचे पुडे तरी आणावे म्हणजे रात्रीच्या भोजन प्रसादी ची व्यवस्था होईल. त्या बाहेरच्या ओट्यावर बसून मी त्या चौकीदारांचं आपसातलं संभाषण ऐकत होते. त्यातल्या एका चौकीदाराने मंदिरातल्या पुजाऱ्यांना फोन करून आमच्याबद्दल विचारू असं दुसऱ्या चौकीदाराला सुचवलं. तसं माझ्याजवळ येऊन मला थोडासा धीर देखील दिला. “अगर पुजारीजी परमिशन दे तो आप मंदिर में रह लेना” .पण यांचे पुजारी जी काही फोन उचलेना. मघा बिस्किटाचे पुडे आणण्यासाठी गेलेला बाबा तसाच परत आला. जवळपास दुकान वगैरे नव्हतं. सोसायटीच्या पलीकडच्या गेटच्या बाहेर दुकानं होतीत, पण फिरून जायचं म्हणजे तीन किलोमीटर दूर होतं, आणि सोसायटी च्या फाटकाच्या आत जाण्याची परवानगी आम्हाला नव्हती. थोड्या वेळाने एका चौकीदाराचा फोन पुजारीजींनी उचलला. ते अत्यंत घाईत होतेत. चौकीदाराला काही न बोलू देता क्षणार्धात त्यांनी फोन ठेवला. आमचा विषय निघालाच नाही. म्हणजे आता आज इथे ओट्यावरच बसून राहायचं होतं. आडवं होण्याइतका तो मोठा मोठा नव्हता. ठीक आहे जशी मैयाची इच्छा! थोड्या वेळात तो चौकीदार पुन्हा माझ्याजवळ आला. म्हणाला “पुजारी जी के घर गमीं हो गई है, वो तो नही आयेंगे. आरती करने के लिए भी दूसरे पुजारी जी को बुला रहा हू… वह दुसरे पुजारी हमारी सोसायटी के नही है, तो उनको मै नही बोल सकता, और वह कोई निर्णय भी नही दे सकते. आप देख लो अब क्या करना है, चाहो तो हमारी कुर्सिया दे सकता हूं, उस पर पैर लंबे कर के सो जाना, हम तो जागते ही रहते हैं रात भर, सामान की कोई चिंता नही करना, यहीं पडे रहने दे ना, भोजन की भी चींता मत करना, हमारे पास घरसे लाये टिफिन है”
आपल्या घासातला घास आम्हाला देऊ करणारे हे चौकीदार मनाने निश्चितच वाईट नव्हते. आम्हाला इथे बाहेर बसण्याची परवानगी मिळाली होती. खुर्च्या सुद्धा मिळणार होत्या. भोजन प्रसादी ची व्यवस्था सुद्धा होणार होती. फक्त सोसायटीच्या आत जाण्याची आम्हाला परवानगी नव्हती. खरंतर त्या गरीबाच्या डब्यातलं अन्न आम्ही खाऊन तो उपाशी राहिल, हे काही आम्ही होऊ देणार नव्हतो, आणि आम्हाला उपाशी ठेऊन ते चौकीदार आमच्यासमोर जेवणार नव्हते हेही आम्हाला माहीत होतं. हवं तर थोड्यावेळाने या चौकीदाराला पैसे देऊन पलीकडच्या गेटच्या बाहेरच्या दुकानातून काहीतरी मागवावं असा विचार करून आम्ही शांत राहिलो.
थोड्यावेळाने आभाळ चांगलच भरून आलं. पाऊस पडू लागला. आम्ही ज्या ओट्यावर बसलो होतो त्या ओट्याच्या चारही बाजूंना पाऊस पडत होता. मधली अगदी थोडीच जागा कोरडी राहिली होती. खुर्च्या वगैरे घेऊन काहीही उपयोग होणार नव्हता. आजची रात्र अशीच बसून, गुडघे पोटाशी घेऊन, वरून पांघरून लपेटून घेऊन काढायची होती. पाऊस पडत असल्यामुळे त्या चौकीदाराला सुद्धा दुकानात पाठवता येत नव्हतं…. दुसऱ्या दिवशी अंग अगदी लागून येणार होतं. झोप होणार नव्हती त्यामुळे उद्या चालणं देखील कठीण होणार होतं. अजून तरी भोजन प्रसादी चे काही रंग दिसत नव्हते…. त्यामुळे सकाळपर्यंत आमची अवस्था काय होईल याचा विचार सुद्धा करवत नव्हता. मात्र सगळं काही मैया ठरवेल तसं होत असतं. तिच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. ती तसे संकेत देते मात्र आपल्याला ते संकेत समजत नाहीत. आजही एक असाच संकेत मिळाला होता. पण तो मिळाला तेव्हा तो मला समजला नाही. मात्र जे काय झालं त्या वरून त्या संकेत मिळण्याची खात्री पटली. असा कोणता संकेत मिळाला होता मला आज? नक्की काय खात्री झाली मला? सांगणार आहे पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११३
मागच्या भागात मी तुम्हाला होशंगाबाद मधील अनुभव सांगत होते. रंडाल च्या आधी असलेल्या एका मोठ्या सोसायटीच्या आतील मंदिरातून चौकीदाराने आम्हाला उठवून बाहेर बसावयास सांगितले होते. त्याही आधी चांभाराच्या दुकानात झालेल्या छोट्याशा मैयाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. आता इथून पुढे सांगते.
चौकीदाराने सांगितल्याप्रमाणे आम्ही बाहेर बसलो होतो. एकंदरीत पहाता चौकीदार काही वाईट वृत्तीचे नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या नोकरीची काळजी होती. आमच्या एका दिवसासाठी ते त्यांची नोकरी धोक्यात घालू शकत नव्हते. ही गोष्ट आम्हाला समजत असल्याकारणाने त्यांचा राग येत नव्हता. आम्ही बाहेरच्या ओट्यावर असून आजची रात्र काढायला मानसिक दृष्टीने तयार झालो होतो. मात्र मैया काही तरी संकेत देत असते ते आपल्याला समजत नसतात हे मी मागच्या भागात म्हणाले होते ते कसं काय ते सांगायची आता वेळ आली आहे.
पाऊस पडायला सुरुवात झाली होती. आमच्या जवळ भोजन प्रसादी साठी काहीही नव्हतं. आम्ही बसलेल्या ओट्यावर तीन बाजूने व्यवस्थित पाऊस येत होता. अंगावरचं पांघरूण गच्च आवळून घेत कोरड्या जागेत आम्ही कसेबसे बसलो होतो. साधारण आठ सव्वा आठ झाले असतील. पाऊस सुरूच होता. एक पांढर्या रंगाची गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून धोतर नेसलेला, सिल्क चा कुर्ता घातलेला एक माणूस उतरला. चौकीदाराशी काहीतरी बोलून तो मंदिराच्या दिशेने निघाला. त्याने मंदिरात जाऊन दिवा लावला. आज जे पुजारी येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी या पुजाऱ्यांना फोन करून पाठवलं होतं. थोड्या वेळापूर्वी चौकीदार आणि इथल्या पुजाऱ्यांचं बोलणं झालेलं मला आठवलं. इथल्या नेहमीच्या पुजाऱ्याकडे सुतक असल्यामुळे ते येऊ शकणार नव्हते, म्हणून हे पुजारी पूजा करायला आले असतील! विचार करता करताच मी त्या पुजाऱ्यांकडे बघू लागले. पाचच मिनिटात पुजारी पुन्हा गेटच्या दिशेने चालत आले. त्यांनी चौकीदाराजवळ आमची चौकशी केली. आम्हाला मंदिरात बोलवलं. चौकीदार पुजार्यांना म्हणाला “जब तक आप पूजा कर रहे हो तबतक ही यह मंदिर में बैठ सकते है, उसके बाद उनको फिर से बाहर बैठना पडेगा”. हे ऐकताच हा नवीन पुजारी चौकीदारावर ओरडलाच! तो चौकीदाराशी भांडू लागला. “परिक्रमावासीओंको बाहर रखते हो और अंदर भगवान की पूजा करते हो? कभी भगवान प्राप्त नही होगे. भगवान का तो छोड दो अगर परिक्रमा वासियों को अंदर नही बिठाया तो मै पूजा नही करूँगा. तुम्हारे पुजारीजी को बोल दो आज भगवान बिना पूजा के ही रहेंगे. अगर परिक्रमावासी भुखे रहेंगे तो भगवान भी भुखे रहेंगे. भगवान यहा से चले जायेंगे! अगर तुम परिक्रमावासीओंको बाहर रखोगे तो भगवान भी बाहर रहेंगे! मै तो इन्हे अपने घर ले जाता लेकिन मै परिक्रमा के नियम जानता हूं. अब यह उलटा वापस नही आ सकते. तुम सोच लो क्या करना है…. अगर परिक्रमावासी मंदिर में आसन लगायेंगे तो ही मै शाम की पूजा आरती करूँगा.” असं म्हणून तो आमच्या दिशेने येऊ लागला, म्हणाला, “मंदिर किसी के बाप का है क्या? तुम परिक्रमावासी हो, तुमको मंदिर में आने के लिए कोई नही रोक सकता. चलो मंदिर में जाओ. भोजन प्रसादी की चींता मत करो. मैने अपने घर से डिब्बा मंगाया है. एखाद घंटे में आपके लिये पर्याप्त भोजन आ जायेगा. नीचे बिछोने के लिए मोटी चटाई और दरी भी मंगाई है. ब्लांकेट भी मंगाई है. आपको कोई दिक्कत नही होगी.
आता त्या चौकीदाराचा चेहरा फारच छोटासा झाला. त्याचा प्रश्न मला समजत होता. तो बिचारा भांडू ही शकत नव्हता आणि बोलूही शकत नव्हता. तो हतबल होऊन माझ्याकडे पाहू लागला. मग सोसायटीच्या लोकांचं मत घेण्याचा त्याचा विचार पडला. रहिवाशांपैकी अनेक लोकांना त्याने बोलावून घेतलं. त्यांच्या सहमतीने आम्हाला मंदिरात राहण्याची परवानगी मिळाली.मंदिराचं काचेचे दार बरंच मोठं होतं त्यामुळे थंडी आणि पावसापासून आडोसा मिळाला.बटाट्याची भाजी पुरी, खीर आणि पुलाव असं साग्रसंगीत जेवण पुजारीजींच्या घरून आलं होतं.अगदी अपेक्षाच नसताना, आमची बाहेर झोपण्याची पूर्ण तयारी झाली असताना, पाऊस पाणी असताना देखील या पुजारीजीं मुळे आम्हाला भोजन प्रसादी ही मिळाली होती आणि व्यवस्थित आसरा ही मिळाला होता.
आता प्रश्न आहे संकेताचा. मी मागच्या भागात म्हणाले होते की मैया आपल्याला संकेत देते मात्र ते आपल्याला समजत नाहीत.याही वेळेला असंच झालं. मला संकेत मिळाला होता. त्याचा अर्थ मला समजला नाही. आजच दुपारी चांभाराच्या दुकानात भेटलेल्या छोट्याशा मैयाने मला सांगितलं होतं की आज तुमच्यावर शिव जी कृपा असेल ! आता हा उलगडा कसा झाला ते सांगते. खरंतर आम्हाला बाहेर झोपावं लागणार होतं मात्र सोसायटीत असलेल्या शंकराच्या मंदिरात आम्हाला फायनली आसरा मिळाला. आता सांगते पुजाऱ्यां बद्दल. हे पुजारी काही या सोसायटीचे नेमलेले पुजारी नव्हते. या पुजार्यांनी खरंतर पौरौहित्य सोडलं होतं आणि ते आता फक्त साधना करतात. कोणाच्या अडीअडचणीला जाऊन तेवढी पूजा करून द्यावी म्हणून ते या सोसायटीत येत असतात. मात्र या पुजाऱ्यांचा एक साधक म्हणून आणि एक मोठी व्यक्ती म्हणून खूप मान आहे. यांचा शब्द सहसा खाली पडत नाही. हे शिवभक्त आहेत… म्हणजे पुन्हा शिवजींची कृपा आलीच की… अजून एक गंमत म्हणजे या पुजाऱ्यांचा नाव होतं शिवशंकर चतुर्वेदी!… आहे की नाही संकेताची गंमत… असो.. काही जण याला निव्वळ योगायोग समजतील… कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा निव्वळ योगायोग असेलही, मात्र माझ्यासाठी चांभाराच्या दुकानात भेटलेल्या छोट्या मैयाचं वाक्य हे अगदी संकेत असल्यासारखं खरं ठरलं होतं.आजची रात्र अगदी आनंदातच गेली. व्यवस्थित जेवण, जराही थंडी न वाजता पार पडलेली रात्र, डोक्यावर छत… अजून काय लागतं?
आता पुढे कोकसर ची वाट धरायची. इथे गौरी शंकर महाराजांची समाधी आहे. कोकसर च्या साधारण तीन साडे तीन किलोमीटर पुढे पट्टे घाट म्हणून एक घाट लागतो. इथे सहसा परिक्रमावासी जात नाही कारण हा घाट जरा आडवाटेला येतो. मात्र माझा इथला मुक्काम, इथलं वातावरण, इथले महाराज आणि सगळंच अगदी भारावून टाकणारं होतं. इथली मंदिरे अत्यंत सुरेख बांधलेली आहेत. इथे जे भाग्य मला मिळालं, जे जे सुख मला मिळालं ते अवर्णनीय आहे. पुढच्या भागात नक्की सांगते. नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११४
मागच्या भागात मी तुम्हाला चांभाराच्या दुकानात भेटलेल्या छोट्याशा मैया बद्दल सांगितलं होतं. रंडाल च्या अलीकडे असलेल्या एका सोसायटी मध्ये असलेल्या शिवमंदिरात आमची सोय कशी झाली तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. आपल्याला संकेत मिळत असतात मात्र ते आपल्याला समजत नाही याबद्दल मी मागच्या भागात बोलले होते. पुजारी शिवशंकर चतुर्वेदी यांचा उल्लेख आणि मैया ने दिलेल्या संकेत तंतोतंत जूळून आला होता. आता पुढे बघू यात.
आता इथून आम्हाला रंडाल मार्गे कोकसरला जायचे होते. तसे अंतरही फार नव्हते. बराचसा रस्ता महामार्गाने जात होता. वाटेत एक-दोन ठिकाणी आम्हाला चहाची बोलावणी आली होती. त्यातल्या एका घराची गोष्ट सांगते. घरातल्या आजोबांनी आम्हाला चहासाठी बोलावलं. मात्र घरी बहुतेक चहा संपलेला. त्या घरची परिस्थिती देखील ठीक नसावी. आता परिक्रमावासींना बोलावलेलं, चहा नाही, दूध नाही मग काय करता? घरात दुधही नसावं, किंवा अगदीच थोडं असावं. मग त्या घरच्या बाईने बऱ्यापैकी पाणी दुधात घातलं, साखर घातली, आलं घातलं आणि आमच्या समोर आणलं. घरची परिस्थिती वेगळी सांगायची गरज नव्हती. तिने आणलेला तो बिना चहा चा चहा हा तिने देखील निसंकोचपणे आमच्यापुढे ठेवला आणि आम्हीदेखील तितक्याच सहजतेने गप्पा मारत मारत चहा प्यायला. या दोन्ही वागण्यामध्ये कमालीची सहजता होती. न तिच्या चेहऱ्यावर कुठला चहा नसल्या चा, परिस्थिती नसल्याचा, भाव होता, न आमच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं पुढ्यात आल्याबद्दल चा भाव होता. जणू काही हीच जगरहाटी आहे अशाच पद्धतीने आणि इतक्यात सहजतेने हे दोन्ही भाग होते. मुख्य म्हणजे या विषयावर आजतागायत कधी काही अवाक्षरही निघालं नाही. न बाबा कडून, न माझ्याकडून. आज आठवलं म्हणून लिहिते आहे. खरंतर प्रसंग खूप लहानच आहे. त्यात विशेष असं देखील काहीच नाही. मात्र त्यातून मिळालेलं, किंवा लक्षात आलेलं स्वतःच्या विचार प्रक्रियेचं बदलणं, आणि आपल्या नकळत त्या प्रक्रियेचं अंमलात येणं फार जास्त महत्त्वाचं आहे. आता ह्या या प्रसंगानंतर स्वीकार किंवा संपूर्ण स्वीकार या तत्वाची कदाचित सवय झाली असावी असं वाटतं. जेव्हा परिक्रमा झाल्यानंतर या परिक्रमेचा तुमच्यावर काय परिणाम झाला असा प्रश्न लोक विचारतात तेव्हा कदाचित आत्मचिंतननाने स्वतःमध्ये आणि स्वतःसाठी झालेला फरक लक्षात येणं हेच जास्त महत्त्वाचं वाटतं. माझ्या दृष्टीने स्वीकार हा बदल माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे… असो
करत करत आम्ही कोकसर ला पोहोचलो. इथे गौरी शंकर महाराजांची समाधी आहे. अत्यंत शांत हे ठिकाण आहे. मला इथे विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे कृष्ण मूर्ती. या छोट्याशा मंदिराबाहेर थोडावेळ ध्यान लावून बसले होते. या जिवंत समाधी चा प्रभाव की काय माहित नाही पण इथे खूप शांत वाटतं. आम्ही इथे पोचलो त्यावेळेस दुपारचे अडीच वाजले होते. आम्ही थोडावेळ विश्राम केला, चहा घेतला आणि पुढे निघालो. खरंतर आता आवरी घाटाकडे जायचं होतं. पण ज्यावेळी आम्ही मुक्कामाचं विचारलं त्यावेळी तिथल्याच एका व्यक्तीने आम्हाला दुरूनच तीन किलोमीटर दूर असलेला एक दगडी घाट दाखवला. या पुढच्या घाटावर लोक सहसा जात नाहीत. परिक्रमावासी देखील जात नाहीत. याला एक महत्त्वाचं कारण असलं पाहिजे. इथे मैया थोडी वळण घेते. त्या घाटाकडे पाहिल्यावर हा घाट पलीकडच्या तटावर आहे असा भास होतो. शिवाय इथून डांबरी रस्ता आवरी घाटाकडे जात असल्यामुळे पटे घाटाकडे कोणी वळतच नाही. मला मात्र तो दगडी घाट फारच भुरळ घालत होता. आम्ही पटे घाटाकडे जायचं ठरवलं. थोडी शेतातून आणि थोडी पाऊलवाट असं करत करत, अगदीच आरामात, रमत गमत आम्ही पटे घाटाला पोचलो.
आधी एक छोटसं गाव. त्या गावातून गल्लीबोळातून वाट काढत काढत आम्ही एका खूप मोठ्या शेडमध्ये जाऊन पोहोचलो. एखादं मोठं कार्यालय असावं असं लांबच्या लांब शेड. शेडच्या डाव्या अंगाला छोटी छोटी ५-६ मंदिरं. खूप सुंदर आणि प्राचीन. मंदिरांच्या समोर आणि शेडच्या जरा बाहेर स्लॅप घालून बनवलेला मोठा ओटा. या ओट्याच्या तिन्ही बाजूला छान रेलिंग लावलेली. मागच्या बाजूला तर थेट मैया दिसत होती इथून. खरं म्हणजे मैयाच्या पात्रावर आपण बसलोय की काय असं वाटायचं. आम्ही आश्रमात गेलो त्यावेळी विश्रांतीसाठी याच ओट्यावर बसलो होतो. आसन कुठे लावू असं विचारताच तिथले मोठे महाराज म्हणाले ” जहा बैठे हो वही आसन लगा लो. हा ओटा उघड्यावर होता आणि शेड जवळ जवळ पंधरा वीस फूट उंच. पण इथे आसन लावण्याची एक मजा ही होती की त्याच्या तिन्ही बाजूंनी मैया दिसत असे. याहून दुसरी चांगली जागा आसन लावण्यासाठी कोणती असेल?
तिथल्या सन्यास्यांसाठी तिथे एक मोठा हॉल होता त्यामागे पाक घर. बाकी राहण्याची विशेष म्हणून व्यवस्था नाही. कदाचित म्हणूनच माझी व्यवस्था बाहेरच्या ओट्यावरच झाली. इथून थोडं खाली उतरलो की अतिशय सुंदर जुना दगडी बांधकाम असलेला घाट बांधलेला आहे. लालसर रंगाचे हे दगड खूपच सुंदर दिसतात. या घाटावर विशेष म्हणून कुणी नसतं त्यामुळे कमालीची शांतता असते. इथे मैया जी चा प्रवाह चांगलाच तेज होता. इथे बसलं की बसूनच रहावसं वाटतं. चहापाणी झाल्यावर आम्ही खाली घाटावर उतरलो. तिथे बसल्यावर तिथून उठायची इच्छा होईना. तरीही आश्रम धारी स्वामीजींची भेट घ्यायला म्हणून आम्ही पुन्हा वर गेलो. त्यावेळी तिथे स्वयंपाकाची घाई सुरू होती. “आम्ही काय मदत करू?” मी आणि बाबांनी स्वामीजींना प्रश्न विचारला… त्यावर ते म्हणाले.. “आप तो नीचे मैया जी पे जाकर भजन करो, वैसे आपके लिए एक और कार्य है, लेकिन वह कल सुबह करना है.. करोगी माताजी?” काय काम करायचं होतं ते मला माहित नव्हतं तरीही मी होकारार्थी उत्तर दिलं. संध्याकाळी तिथल्या मंदिरांची आरती, मैया ची आरती पाहून मन प्रसन्न झालं. अशा प्रसन्न अवस्थेतच आम्ही जपाला सुरुवात केली. आज माझ्या डोळ्यासमोर निमरानी राम मंदिरातली मूर्ती येत होती… खूप छान वाटत होतं. अरे हो, स्वामीजींना बद्दल सांगायचं राहिलं. सांगते.
हे स्वामीजी रामाचे उपासक. उंचेपुरे, गोरे पान, धिप्पाड, भगवे वस्त्र धारी, उंच कपाळ, खोल तेजस्वी डोळे असलेले, पांढरीशुभ्र दाढी छातीपर्यंत लोंबत असलेली, केसांना फेटा घातला असावा असं दिसणारं कापड गुंडाळलेलं, त्यातून मानेवर पाठीवर रुळणारे त्यांचे सरळ आणि संपूर्ण पांढरे केस… साधारण पंच्याहत्तरी च्या आसपास त्यांचं वय असेल. अतिशय शांत स्वर आणि अतिशय मृदू भाषेत ते बोलतात. त्यांना पाहून क्षणभर रामदास स्वामींची आठवण यावी. आम्ही ओट्यावर बसलो असताना त्यांची कुठल्याशा यज्ञाची तयारी सुरू होती. महिना दीड महिन्यांनी यज्ञ करावयाचा होता. त्यासाठी अनेक कार्यक्रम आखणं सुरू होतं. जितके वेळा स्वामीजी आमच्या ओट्या वरून पुढे जात असत, तितके वेळा एक स्मित हास्य देत असत. हात वर करून “चालू देत, चालू देत” असा इशारा करत असत. तो इशारा आशीर्वाद पर असल्यासारखा वाटत होता. अगदी शेवटच्या फेरी ला ते म्हणाले..”कल जल्दी जग जाईयेगा माताजी, आपसे कुछ सेवा लेनी है…
ही जी सेवा त्यांना माझ्याकडून हवी होती ते खरं तर माझं भाग्य होतं. माझ्या हातून हे घडवून आणलं ते मैया ने. खरंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुढे प्रस्थान करणार होतो. पण तसं झालं नाही… तिसऱ्या ही दिवशी आम्ही तिथेच थांबलो… चौथ्या दिवशी देखील आम्ही तिथेच थांबलो होतो…. अशी कुठली सेवा त्यांनी माझ्याकडून घेतली होती? अगदी चार दिवस थांबून मी असं काय केलं होतं? सांगणार आहे पण पुढच्या भागात. इथले काही फोटो आपल्या सगळ्यांसाठी देतेय. फोटोवरून कदाचित इथल्या वातावरणाची किंचित कल्पना येईल, पण शक्य असल्यास कधीतरी या ठिकाणाला नक्की भेट द्या.
देवासारखा धावून आलीस!
आज मी तुम्हाला अगदी नुकताच घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. तुम्ही माझ्या नर्मदा परिक्रमेतील काही अनुभव ऐकून आहात. त्यापेक्षा बराच वेगळा असा हा अनुभव आहे.
अगदी कालचीच गोष्ट. मी गाडीवरून संध्याकाळी घरी परतत होते. त्यावेळेला अचानक कुठल्या तरी शक्तिने मला रस्त्यात थांबायला भाग पाडलं. बरेचदा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो. मनाविरुद्ध म्हणण्यापेक्षा अचानक आपलं मन मुळात इच्छा नसताना देखील एखादा निर्णय चटकन घेतंच. त्यावेळी तो निर्णय घेण्या पलीकडे आपल्याला काहीही सुचत नसतं. तसंच काहीसं माझं झालं.
आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनुभवलेली आहे. कधी एखाद्या वेळेस जर आपण एखाद्या संकटात असलो तर नेमकी त्यावेळेला आपल्याला कुठून तरी काहीतरी मदत मिळतेच. बरेचदा एखाद्या गोष्टीसाठी आपपण प्रामाणिकपणे प्रार्थना करत असलो तर ती गोष्ट कुणातरी मार्फत पूर्ण होते. हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेलच. बहुतांश वेळा आपण प्रार्थना करणाऱ्या लोकांपैकी असतो. यावेळेला मात्र माझ्यासोबत जरा वेगळं घडलं.
याला आदेश म्हणू, आज्ञा म्हणू ,किंवा संकेत म्हणू ते समजत नाही. त्यावेळेला ती तीव्र इच्छा, नेमकं त्याच वेळेला मनात येणारे विचार, आपले नाहीत हे समजून येतं. … काल काय झालं ते सविस्तर सांगते.
तर झालं असं की मी साधारण साडे आठच्या सुमारास माझ्या गाडीवरुन घराकडे येत होते. आता थंडी बरीच वाढली आहे, त्यामुळे रस्त्यांवर गर्दी नव्हती. माझ्या घरा जवळचा हा रस्ता बरच अंतर खोदून ठेवलेला आहे. तरी साधारण मी माझ्या घरापासून आठ किलोमीटर दूर असेन. रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे देखील इथे फारशी ये-जा नाही. एकतर दिवे सुद्धा फारसे नाहीत या रस्त्यावर, त्यामुळे थोडा एकट वाटतो हा रस्ता.
मी बऱ्यापैकी स्पीडने गाडी चालवत होते. मला लवकर घरी जायचं होतं. गाडी चालवता चालवता माझ्या नकळत मी करकचून ब्रेक लावले. खरंतर थांबण्याचं मला काहीच कारण नव्हतं. मी का थांबते ते मला क्षणभर समजलं नाही. मात्र माझी नजर मागे वळली. मागून पन्नाशीची एक बाई झपाझप पावलं टाकत येत होती. माझी नजर तिच्यावर रोखल्या गेली होती. ती जवळ येताच मीच स्वतःहून तिला विचारलं “मावशी कुठे जायचंय तुम्हाला… बसा मागे मी सोडून देते”. का कोण जाणे एका क्षणात त्या झपाझप चाळणाऱ्या बाईकडे बघून माझ्या मनात खूप करुणा दाटून आली. अशा अंधार्या रस्त्यावर, अशा एकट रस्त्यावर, अशा थंडीच्या वेळी या बाईला मी एकटं सोडू शकत नाही .. फक्त हाच विचार माझ्या मनात होता.
मी तिला पहिल्यांदा बघत होते. आमची काहीही ओळख नव्हती. ज्या ओढीने मी घराकडे जात होते त्याच ओढीने तिची पावलं झपाट्याने तिच्या घराच्या दिशेने जात असली पाहिजेत इतकच मला समजत होतं. तिने जो पत्ता सांगितला तो माझ्या घराच्या जवळच होता. म्हणजे पुढचे आठ किलोमीटर हे ही बाई एकटीच जाणार होती! बापरे मला तर कल्पना ही करवेना.
मागे बसा म्हटल्यावर तीसुद्धा चटकन गाडी वर बसली. या वेळी आम्हा दोघींच्याही मनात कुठला संकोच, कुठली भीती नव्हती हे निश्चित. अन्यथा एका अनोळखी बाईला मी माझ्या गाडीवर का बसवेन? आजकालच्या वातावरणात ते सेफ नाही हे मला समजतं हो! त्याच प्रमाणे ती बाई सुद्धा माझ्या मागे का बसली असेल?
गाडीवर थोड्याफार गोष्टी झाल्यात, त्यात तिचा नेमका पत्ता, खोदलेला रस्ता आदि विषय होते. थोड्याच वेळात तिने सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेने मी गाडी वळवली. तिच्या घराच्या जवळपास पोहोचताच एका पायी येणाऱ्या मुलाला पाहून तिने मला गाडी थांबायला सांगितले.
हा पायी येणारा मुलगा तिचा मुलगा होता. ह्या दोघा मायलेकांची परिस्थिती विशेष चांगली नसावी. दोघांजवळ आहे मोबाईल फोन देखील नव्हते.
त्याला पायी येताना पाहून तिने आवाज देऊन विचारलं “सायकल कुठे? तू मला घ्यायला का आला नाहीस? ही ताई भेटली म्हणून लवकर आले मी, नाहीतर खूप वेळ झाला असता, मला भितीही वाटत होती” … त्यावर तिचा मुलगा म्हणाला “सायकल दुकाना समोर ठेवली होती, दिसतच नाहीये… माझा मित्र पण घरी नाही, माझ्या जवळ पैसे पण नाही, म्हणून तुला घ्यायला पायीच येत होतो”..
ती खाली उतरली, तिने माझे आभार मानले आणि आम्ही दोघीही आपापल्या रस्त्याला लागलो.
मला मात्र काल पासून एक प्रश्न पडतो आहे. मी अचानक का थांबले? मला तिच्याबद्दल इतकी करुणा का वाटली? एका अनोळख्या बाईला अशा अंधार्या एकट रस्त्यावर मी माझ्या गाडीवर बसवलंच कसं?
खरंतर जसं अनेक वेळा माझ्या मदतीसाठी कुणी ना कुणी धावून आलं, तसंच आज तिच्या मदतीसाठी ईश्वराने मला निवडलं होतं. “देवासारखा धावून आला माझ्या मदतीला” असं मी अनेकदा म्हणत होते, आज तिच्या मदतीला देवाने मला देवा सारखं पाठवलं असावं कदाचित!… एक मात्र नक्की… आज संकटाच्या अलीकडची आणि पलीकडची अशा दोन्ही भूमिका व्यवस्थित समजल्यात्!
मी अतिशय सर्वसाधारण असले तरी त्यावेळी मात्र माझा देह, बुद्धी आणि विचार चालवणारी शक्ती सर्वसाधारण नव्हती. तिच्या प्रार्थनांच्या कंपनांच्या वर्तुळामध्ये मी ओढल्या गेले आणि म्हणून माझ्याकडून तिची मदत होऊ शकली. ही तिच्या प्रार्थनांची शक्ती होती… ही तिची तिच्या ईश्वरावरची श्रद्धा होती आणि माझ्यासाठी ती माझ्या ईश्वराची आज्ञा होती, आदेश होता…. काय म्हणता येईल?
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११५
मागच्या भागात मी तुम्हाला पटे घाटाबद्दल सांगितलं होतं. इथली कंपन, इथली देवळे, ओट्याच्या तीनही बाजूंनी दिसणारी मैया, इथला विलोभनीय लाल दगडी अतिप्राचीन घाट… सगळंच काही भुरळ घालणार होतं अशातच पावसाळी वातावरणामुळे मैया ने जणूकाही धुक्याची शाल पांघरली आहे असं भासत होतं. वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती.
महंतांनी काल सांगितल्याप्रमाणे मी सकाळी लवकरच उठले होते. मी ओट्याच्या पायऱ्या उतरून खाली आले तो मला एक मोठा कुंचा पायरीशी उभा केलेला दिसला. अच्छा! तर आज माझ्या हातून आश्रमाची, मंदिराची स्वच्छता करून घेण्याचं काम महंतांनी मला दिलेलं दिसतंय तर! मला अगदी मनापासून आनंद झाला. इतक्या प्रसन्न आणि पवित्र ठिकाणी माझ्याकडून जी सेवा होते आहे त्यामुळे माझ्याच कुकर्मांचे काही प्रमाणात तरी निश्चितपणे खंडन होणार आहे याची मला खात्री होती. महेश्वरच्या माताजींनी मागेच मला याबद्दल सांगितलं होतं. मी आश्रमाचं अंगण झाडलं, तिथे सडा घातला. अजून महंत त्यांच्या खोलीतून ते बाहेर आले नव्हते. शिष्य सुद्धा बाहेर आले नव्हते. मग मी स्नानादी आटोपून मंदिरांच्या स्वच्छतेला लागले. थोड्या वेळाने महंत बाहेर आले. “अरे वा माताजी, आपने तो पुरी सफाई कर दी… लेकीन मुझे आपसे जो सेवा लेनी है वह यह सेवा नही है… आप उन महत जी के पास जाये, उन्हे कहे हम ने बुलाया है; आप की सेवा को भी थोडा समय है” असं म्हणत त्यांनी स्वयंपाक घराच्या दिशेकडे बोट दाखवलं. तिथे भोजन प्रसादी सिद्ध करीत असलेले एक महंत होते, त्यांना निरोप देण्यासाठी मी तिथे गेले. ते खीर बनवत होते, “माताजी मेरे आने तक इसे हीलाते रही है” असं म्हणत ते मुख्य महंताकडे निघून गेले… माझ्या मनात पुन्हा विचार सुरू झाले…”अच्छा तर आज नैवेद्य माझ्या आजचा होणार! भाग्यवानच आहे मी!” बराच वेळ झाला तरी ते खीर करणारे महंत आलेच नाहीत. आता मात्र माझ्याकडून घेतल्या जाणाऱ्या सेवेची मला खात्री वाटू लागली.
मला पाक घरात पाहून मुख्य महंत तेथे आले. खीर तो हो गई है, मंदिर मे आ जाओ आपसे सेवा लेने का समय आ रहा है”.. अरे? म्हणजे नैवेद्याची सेवा नव्हती तर! मग आता काय असेल? मंदीराच्या मागच्या बाजुला एक काचेचं केबिन केलेलं होतं. त्याच्या आत जवळजवळ सहा ते सात फूट उंचीची श्रीरामांची एक तस्वीर लावलेली होती. खाली एका चौरंगावर तुलसी रामायणाची एक प्रत बंद करून ठेवली होती. तिथेच पुढे दुसर्या चौरंगावर तुलसी रामायणाची एक उघडी प्रत होती. तिच्यासमोर माईक ठेवलेला होता. मला महाराजांनी तिथे बसायला सांगितलं. उघड्या असलेल्या डावीकडच्या पानावर असलेल्या पहिल्या चौपाई वर बोट ठेवत त्यांनी मला “वाच” अशी खूण केली. “मी थांब म्हणेल तेव्हा थांबायचं” असंही त्यांनी खुणेनेच सांगितलं. मी वाचायला सुरुवात केली.
चौपाई : पुनि सप्रेम बोलेउ खगराऊ। जौं कृपाल मोहि ऊपर भाऊ॥।
नाथ मोहि निज सेवक जानी। सप्त प्रस्न मम कहहु बखानी॥
मी याआधी कधीही रामचरितमानस वाचलं नव्हतं. हो, काही ठिकाणी परिक्रमेत संधी आली होती पण संपूर्ण रामचरितमानस मात्र वाचून झालं नव्हतं. मला भेटलेल्या चार अशी संन्याशांची मला आठवण झाली. राम को मत छोडना…. असं वाक्य चार वेगवेगळ्या संन्याशांनी मला सांगितलं होतं. अधून-मधून कुठल्या ना कुठल्या ठिकाणी, कुठल्या ना कुठल्या आश्रमात, कुठल्या ना कुठल्या मंदिरात, माझी रामचरितमानसाशी गाठ भेट व्हायचीच. पण यावेळी मात्र वेगळं होतं. मास पारायणाच्या तिसाव्या मासाच्या शेवटच्या भागातल्या, म्हणजेच उत्तर कांडाच्या शेवटी गरुड आणि काकभुशुंडी च्या संवादातून गरुडाच्या सात प्रश्नांची उत्तरे, यानंतर भक्तीचा महिमा, रामायणाचा महिमा, फलश्रुती आणि आरती हा भाग माझ्या वाट्याला आला होता.
यात गंमत अशी की एक दोहा मी वाचत असे आणि मुख्यमंहत् तो समजावून सांगत असत. आज जवळजवळ चार साडेचार तास सलग मी वाचत होते, आणि महंत समजावून सांगत होते. या चार-साडेचार तासामध्ये घसा कोरडा पडू नये म्हणून कोमट पाण्याची व्यवस्था देखील मोठ्या महंतांनी केली होती. मला सलग वाचायची सवय नसणार हे त्यांना माहीत असावं! एका तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पुढचे तीन तास आमचं वाचन झालं. त्यानंतर मात्र संपूर्ण विश्राम.
रामायणाची आरती करताना माझ्या डोक्यावर रामायणाची प्रत ठेवून आरती करण्यात आली. तो क्षण खरोखर खुप समाधानाचा क्षण होता. रामायण पारायणाची सांगता माझ्या हस्ते व्हावी हे माझं भाग्य नाही का? मात्र या वेळेस माझं पुण्य अजूनच जास्त होतं. माझी सेवा अजूनही पूर्ण झालेली नव्हती. माझ्या वाट्यात आणि काहीतरी पडणं बाकी होतं. आज आश्रमातल्या सगळ्यांनीच उपास केला होता. संध्याकाळी देखील भोजन प्रसादी साठी फराळी पदार्थ होते… दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा लवकर उठावं असं महंतांनी मला सांगितलं. आज तर रामायणाचं पारायण पूर्ण झालं होतं, मग आता उद्या काय करायचय? आता अजून कोणती सेवा माझ्या हातून घडावयाची आहे, असा विचार मी करत होते.
खरंतर माझ्या हातून सेवा घडणं हे जरी माझं भाग्य असलं तरी माझ्या नशिबी एक मोठं पुण्य येऊन पडणार होत तेदेखील अतिशय विनासायास! म्हणजे आपण काही करू नये तरीही फळ मात्र संपूर्ण मिळणार!… सांगते, सांगते! दुसऱ्या दिवशी मंदिरांची पूजाअर्चा आटोपल्यानंतर पुन्हा मला रामायण वाचन कक्षात बोलवण्यात आलं. काल पारायण संपलं आणि आज पासून पुन्हा सुरू करायचं होतं. तेदेखील माझ्याच हस्ते! याचा अर्थ मला महंतांनी समजावून सांगितला त्या वेळेला लक्षात आलं… रामायणाची सुरुवात आणि शेवट, हे दोन्ही जर लागोपाठ करण्यात येत असतील तर तो रामायण पूर्ण वाचल्याचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे आज बालकाण्डाचा काही भाग वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा फलश्रुतीचा भाग माझ्याकडून महंतांनी वाचून घेतला. पटे घाटावर माझ्यासाठी एवढं मोठं पुण्य सांभाळून ठेवलं होतं. मला गोंदवलेकर महाराजांचे शब्द आठवले.. ते म्हणतात, “रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर दोन्ही वेळेला न चुकता, न विसरता जर तुम्ही श्रीरामाचं नाव घेतलं तर तुमचा रात्रभराचा जप मी स्वतः पूर्ण करेन” मांडू च्या शिवमंदिरात भेटलेल्या संन्याशाने मला “एकदा तरी रामचरितमानस वाचून पुण्य प्राप्त करा” असं सांगितलं होतं… अर्थात परिक्रमा झाल्यानंतरच ते शक्य होतं मात्र ते पुण्य इथे अशा पद्धतीने माझ्या पदरी पडलं!
पटे घाटावरचे तीन दिवस अगदी मंतरलेल्या दिवसांच्या सारखे होते. चौथ्या दिवशी आम्ही आता आवली घाटाच्या दिशेने निघणार होतो. इथे रस्त्यात एक नदी पार करावी लागते. त्या नदीच्या किनाऱ्यावर आणि तिथून थोडं पुढे गेल्यावर एक वेगळीच घटना घडली. समोर प्रकट होणं काय असतं ते प्रत्यक्ष बघायला मिळालं. एकदा नाही तर दोनदा अनुभवायला मिळालं. एक आणखी गंमत झाली. अर्थाचा अनर्थ कसा होतो आणि तो कसा प्रचलित होतो हेदेखील बघितलं. पण या भागात सांगता यायचं नाही. पुढच्या भागात सांगेन
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११६
मागच्या भागात मी तुम्हाला माझ्या पटे घाटावरच्या वस्तव्या बद्दल सांगितलं होतं. तिथलं रमणीय वातावरण तसंच सद्गुरुंने आणि मैयाने माझ्याकडून करून घेतलेली सेवा याबद्दल ही मी तुम्हाला सांगितलं होतं. आता पुढे सांगते.
तीन दिवसांच्या मुक्कामानंतर आम्ही पुढच्या दिशेने निघालो. पटे घाट जरा आडबाजूला असल्यामुळे आम्हाला काही अंतर चालल्यानंतर मार्ग विचारावा लागला. मागच्या भागात अगदी शेवटी मी अर्थाचा अनर्थ कसा होतो याबद्दल लिहेन असं सांगितलं होतं, ती गंमत आता सांगते. आम्ही एका सायकल वाल्या माणसाला पुढचा मार्ग विचारला. तो माणूस घाईत असावा. “आगे नदी कुदके पुछ लेना” असं त्याने सांगितलं.
पुढे अजून एकाला मार्ग विचारला असता “हत्यारन के बाद सीधे हात को मुडना” असं त्याने सांगितलं. दोघांच्या बोलण्याचा तालमेल लावत पुढे एक नदी आहे जिचं नाव हत्यारन आहे असा आमचा समज झाला. एक एक गाव मागे पडत होतं आणि मध्ये दोन्ही बाजूला तुरळक झाडे असलेली मैदानंच्या मैदानं होती. पुढे काही अंतराने थोडासा जंगलाचा भाग लागला. आणि अशातच दूरवर आम्हाला नदीचा पूल दिसला. उजव्या हाताला अगदी लांब वर एक मोठा मंदिराचा कळस देखील आम्हाला दिसत होता. तो कळस आकर्षक वाटत होता. आम्हाला जायचं देखील उजव्या हातालाच असल्याने शक्य झाल्यास त्याच मंदिरात वास्तव्य करावं असं आम्हाला वाटलं. आम्ही आता पुलाजवळ येऊन पोहोचणारच होतो.
परिक्रमा करताना वाटेत येणाऱ्या कुठल्याही जलस्त्रोता पुढे म्हणजे नदी किंवा ओढा लागला तर तो ओलांडून पुढे जात असताना उदबत्ती लावण्याची प्रथा आहे. मैया स्वरूप समजल्या जाणार्या या वाहत्या प्रवाहांना ओलांडून आपण पुढे जात असतो म्हणून ही क्षमायाचना. दरवेळी आम्ही खरं तर न चुकता उदबत्ती लावत असू. यावेळी मात्र त्या आकर्षक कळसाकडे बघता बघता उदबत्ती लावण्याचं मी विसरले आणि मी पुलावर पाय ठेवणार त्याच क्षणाला, पुलाच्या कठड्यावरून मला एका माणसाने मोठ्याने आवाज देऊन हटकलं…. “धूप नही जलाओगी मैया? हत्यारन नदी है यह! बहुत तेज बहती है… धूप जलाये बिना आगे मत बढना”
उदबत्ती तर लावायची होती, मात्र आम्ही बराच वेळा पासून पुलाकडे आणि मंदिराच्या कळसाकडे बघत होतो त्यावेळी त्या पुलावर कोणीही नव्हतं. पुलावर पाय ठेवण्याच्या अगदी त्याच क्षणाला जर माझ्या बाजूला कुणी बसलं असेल तर मला दिसणार नाही का? एक वेळ मला दिसणार नाही पण माझ्या मागे असलेल्या बाबाला तर नक्की दिसेल? किंबहुना पुलावरून उजवीकडे वळल्यावर मेडीकल शॉप आहे का हे विचारण्यासाठी आम्ही कोणालातरी शोधत होतो, अशा परिस्थितीत समोर बसलेला माणूस दिसणारच नाही असं कसं होईल? पण तो माणूस तिथे एका क्षणात आमच्या डोळ्यासमोर प्रकट झाला. खरंतर आधी मला भास झाला किंवा माझं लक्षच नव्हतं असंच मला वाटलं… मात्र जेव्हा काही वेळाने हाच प्रसंग आणि हाच माणूस दुसऱ्यांदा प्रकट झाला तेव्हा खात्री बसली… सांगते.. त्याआधी अर्थाचा अनर्थ कसा होतो ते सांगते… तर त्या हत्यारण नदी पुढे उदबत्ती लावून आम्ही त्या माणसाशी बोलू लागलो.
जरा इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्यावर अचानक मी त्याला त्याचं नाव विचारतात तो बुचकळ्यात पडल्यासारखा झाला. त्याने नाव सांगायचं टाळलं आणि पुन्हा नदीविषयी बोलू लागला… अच्छा किया आपने धूप जलाई… यह हत्यारन नदी है…. ! त्याचं हे बोलणं ऐकून बाबाच्या मनात विचार आला की या नदीच नाव हत्यारन असं का असावं? अर्थात हा प्रश्न त्याने यावेळी विचारला नाही मात्र नंतर उलगडा झाला तो मजेशीर होता. ज्या पद्धतीने हत्यारन शब्द त्या माणसाने उच्चारला त्याप्रमाणे ही नदी हत्या करणारी आहे असा कोणाचाही समज झाला असता. .. मात्र या नदीचे नाव हत्यारन नाही… तर हत्याहरण असं आहे…. आहे की नी अर्थाचा अनर्थ?
आता त्या माणसाबद्दल सांगते. अक्षरशः एका क्षणापूर्वी पुलाच्या कठड्यावर कोणीही बसलं नव्हतं. तो प्रकट झाला, आम्ही त्याच्याशी गप्पा केल्या उदबत्ती लावली आणि पुढे निघालो. निघते वेळी पुन्हा एकदा मी त्याला नाव विचारताच तो गोंधळला आणि त्याने आधी शिव आणि नंतर शंकर असं नाव सांगितलं. “आपका नाम शिव है या शंकर? या शिव शंकर? असं मी विचारताच म्हणाला कुछ भी बोलो…वैसैभी अब कब मिलोगे आंप मुझे?
त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो. रस्त्याचा हा भाग, म्हणजे रस्ता आणि पूल अगदी सरळ आहे. एक-दीड किलोमीटर अंतर आपण सहज बघू शकतो इतका हा भाग सरळ आहे. आम्ही पुढे गेल्यानंतर शिवशंकर उतरून आमच्या विरुद्ध बाजूने निघून जाताना आम्ही पाहिला होता. आम्हीदेखील पूल पार करून पुढे गेलो. त्यावेळी मी सहज म्हणून मागे बघितले. शिवशंकर दूर गेलेला दिसत होता. आम्ही उजवीकडे वळून मेडिकल शॉप शोधू लागलो. साधारण दहा मिनिटात आम्हाला मेडिकल शॉप दिसलं. दुकानात बरीच गर्दी असल्यामुळे आम्ही दुकाना बाहेरच थोडावेळ वाट बघत होतो. इतक्यात बाबाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवून म्हणालं.. “आगे भी एक दुकान है”.. त्या माणसाकडे बघताच आम्ही दोघंही अवाक झालो होतो… तो शिवशंकर होता!
जेवढ्या वेळात आम्ही पूल पार करून उजवीकडे दहा मिनिट चालून आलो होतो त्या आधी मी शिवशंकर ला आमच्या विरुद्ध दिशेने बरंच दूर वर गेलेले पाहिलं होतं. मग इतक्या कमी वेळात तो आमच्यापर्यंत पोहोचलाच कसा? आम्ही गर्दी आहे म्हणून रस्त्यावर उभा होतो त्याही वेळेला तो आम्हाला दिसला कसा नाही? खरं सांगायचं तर तो प्रकट झाला हे खरं आहे हे सांगण्यासाठीच तो आला असावा… कारण आगे दुकान है असं सांगून तो पुढे निघाला. मी त्याच्याकडे बघतच होते…अंधार होत आला होता. समोरून दोन-चार गाड्या आल्या, त्या गाड्यांचा लाईट माझ्या डोळ्यावर आला आणि शिवशंकर दिसेनासा झाला. हे असं का झालं ते मला माहित नाही. हे असं झालं एवढं मात्र मी बघितलं…याचं उत्तर शोधून सापडणार नव्हतं आणि सापडायचं असेल तर ते पुढे सापडेलच असा विचार करून आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा उजव्या हाताला वळल्यानंतर दादाजी धुनिवाले यांचा आश्रम आहे. त्या आश्रमाच्या ही पुढे या मंदिराचा कळस दिसत होता.
आता अंधार पडू लागला होता. त्या मंदिरात वास्तव्य करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही लोकांना त्या मंदिराबद्दल विचारत विचारत पुढे जात होतो. थोड्या अंतरात आम्हाला एक म्हाताऱ्या साध्वी पायी चालताना दिसल्या. आम्ही त्यांचेकडे मंदिराची चौकशी केली असता त्या म्हणाल्या, “उस मंदिर मे कोई नही रहता, पीपल की जडो ने मंदिर को पकड रखा है. कभी कबार साफ सफाई होने के बाद पूजा होती है अन्यथा कोई दीया भी नही जलाता. तुम वहा क्यूं रहना चाहते हो?” तो मंदिराचा कळस बऱ्याच वेळापासून मला आकर्षित करत असल्याचं मी त्या साधवींना सांगितलं. त्या चालता-चालता थांबल्या आणि माझ्याकडे नजर रोखून पाहू लागल्या. काहीच क्षण गेल्यावर काही न झाल्याचा आव आणून त्या म्हणाल्या, “अब शाम हो रही है, जो पूजापाठ करना है आश्रम में ही कर लेना. अभी नर्मदा जी पे जाने की जरूरत नही है”
आम्ही साध्वींसोबत आश्रमा पर्यंत गेलो. संध्याकाळी मैयाजी वर कदाचित एकट असेल म्हणून जाऊ नको असं सांगितलं असेल असा माझा समज झाला. मात्र बघतो तो मैया किनाऱ्यापर्यंत छोटी छोटी दुकाने लागलेली होती. हा आश्रम मैया किनाऱ्यापासून जेमतेम अर्धा किलोमीटर दूर असेल. साध्वी पुढे आपल्या दिशेने निघून गेल्या आणि आम्ही आश्रमामध्ये थांबलो. चहापाणी होईतो अंधार झाला होता. म्हणून आम्ही आमचा दैनंदिन पूजा पाठ आश्रमातच केला. आज बहुधा आठवडी बाजार असावा. भोजन प्रसादी झाल्यानंतर देखील दुकानं लागलेलीच होती. आम्ही सहज दुकानांमध्ये चक्कर मारायचं ठरवलं. पहिल्याच दुकानात एक लठ्ठ काळीसावळी बाई बसली होती. तिचं वागणं देखील जरा विक्षिप्त वाटलं… “माताजी आगे मत जावो.. आपको क्या चाहिये? मेरी दुकान मे सब कुछ मिल जायेगा; नही मिलेगा तो मै जाकर आपके लिए ले आऊंगी …आप आगे मत जाना” असं ती आम्हाला कळवळून सांगू लागली.. आता याचं काय कारण होतं ते देव जाणे पण आम्ही काही पुढे गेलो नाही.
आम्ही आश्रमात आलो त्या वेळी मध्य प्रदेशातले काही परिक्रमावासी दादाजी धुनिवाले आश्रमात आलेले होते. भोजन प्रसादीला ते आमच्या सोबत होते. आम्ही फेरफटका मारून परतलो तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. भोजन प्रसादी झाल्यानंतर अंधार पडल्यानंतरही ते 6-7 परिक्रमावासी आश्रमातून निघून गेले होते. ते इतक्या रात्री का निघून गेले असं आश्रम धारकांना विचारावं तर “हमे क्या मालूम उनको जाना था चले गये” असं उत्तर मिळालं. आज सगळं काही विचित्रच वाटत होतं. आणि समजत काहीच नव्हतं. भीती वगैरे वाटत नव्हती पण वेगळं वाटत होतं एवढं नक्की.
दुसर्या दिवशी एका ऑटो वाल्यांनी या जागेबद्दल आम्हाला एक वेगळीच माहिती दिली. दुसऱ्या दिवशी मैया स्नानाला जातेवेळी आकर्षित करणारं ते मंदिर आम्ही पाहिलं आणि खरोखर अवाक् झालो. इथे मैयावर पूल बांधण्याचं कार्य सुरु होतं. त्यात खूप अडचणी येत होत्या. तिथे मंजूर टिकतच नाही असं समजलं. स्नानाला आलेल्या पुजारी बाबांनी ऑटो वाल्याच्या माहितीला दुजोरा खरं-खोटं देव जाणे…. जे सांगण्यात आलं ते मी आधी ऐकलं नव्हतं… पुढच्या भागात सांगते.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११७
मागच्या भागात मी तुम्हाला अचानक पणे प्रकट झालेल्या माणसाबद्दल सांगितलं होतं. आवली घाटावरचा मला आकर्षित करणारा मंदिराचा कळस मला त्या मंदिरात मुक्काम करण्यास प्रवृत्त करत होता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. हत्या हरण नदीच्या पुलावरून आवली घाटापर्यंत चा प्रवास हा भितीदायक नसला तरी असाधारण नक्कीच होता. रस्त्यात भेटलेल्या म्हाताऱ्या साध्वी, दादाजी धुनिवाले आश्रमातील अचानक पणे निघून गेलेले परिक्रमावासी, मैया किनारी दुकान लावलेली ती काळीसावळी लठ्ठ बाई…. सगळंच काहीतरी वेगळं होतं, मात्र त्या मंदिराचा कळस आणि ते मंदिर पाहून आम्ही अवाक झालो होतो. सांगते.
दुसरे दिवशी सकाळी मैया दर्शनासाठी आम्ही घाटावर जाऊ लागलो. मैया स्नानासाठी बरेच लोक घाटावर येत होते. बहुतेक पुरुष मंडळी असल्याने मी जरा दूर जाऊन स्नान करण्याचा विचार करत होते. उजव्या हाताला पूल बांधण्याचं काम सुरू होतं. त्या अर्धवट बांधलेल्या फुलाच्या पिलर चा आडोसा घेऊन स्नान करता येईल या विचाराने मी त्या दिशेला वळले. थोडं पुढे जाते न जाते तोच एक पुजारी मला आवाज देऊ लागले. लागलीच तीच कालची काळीसावळी लठ्ठ बाई देखील मला आवाज देऊ लागली. “मैया जी उधर तरफ स्नान मत बनाना… आपको दूर जाना है तो उलटी हात को जाओ”….. असं म्हणत ती मला डाव्या दिशेला घेऊन जाऊ लागली… “मुझे भी स्नान बनाना है मै भी आती हू…” चालता चालता तिने मला जे सांगितलं त्यावर सर्वप्रथम माझा विश्वास बसला नाही. मात्र ऑटोवाला आणि पुजारी बाबा या दोघांनीही तसंच काहीसं सांगितल्यामुळे विश्वास ठेवावा लागला.
ती बाई सांगत होती.. ” ऐसा कहते है की जिस जगह पर पुल का काम हो रहा है वहा मैया जी के पात्र मे एक यक्ष कुंड हुआ करता था. यक्ष यक्षिणी स्नान करने आते थे. वह इस जगह के रक्षक थे. पुल की खुदाई का काम शुरू करने से पहले उनके बारे में किसी को कुछ नही पता था. लेकिन इस जगह पे कभी कोई दुर्घटना नही घटी थी. उस कुंड मे स्नान करने वाले सभी लोग और परिक्रमावासियों को बहुत आनंद मिला करता था. तब तो लोग वही पर स्नान बनाया करते थे. लेकिन जब से पुल का कार्य शुरू हुआ तब से कुछ ना कुछ अनहोनी होती रहती है. कभी किसी की जान नही गयी है, लेकिन बहुत एक्सीडेंट हुए है. यहा काम करने वाले मजदूर टिकते ही नही. भाग जाते है. पंडित जी का कहना है की वह यक्ष यक्षिणी पुल के काम मे बाधा डालकर अपनी कुंड की रक्षा कर रहे है. वह कभी भी कोई भी रूप ले सकते है, और किसी भी वक्त कही भी आ जा सकते है… बहुत से परिक्रमावासीयोंको उनके अचानक से मिलने के अनुभव आये है. वह बुरे तो नहीं है, क्युकी आज तक उन्होने किसी को कभी कोई हानी नही पहोचाई हैं, उलटा कई जानें बचाई है… एक बार किसी मजदूर का बच्चा मैया जी मे बह रहा था, वह अचानक ही किनारे आगया मानो जैसे किसी ने उसे पकडकर किनारे पर लाकर छोडा हो… पंडित जी का कहना है की हमें उनके कुंड के आस पास नही जाना चाहिए…. इसलिये हम वहा नही जाते!
हीच कथा त्या पुजाऱ्यांनी बाबाला सांगितली. स्नानादि आटोपून आम्ही परत येताना त्या मंदिरात डोकावून बघायचं ठरवलं. मंदिराच्या मुख्य द्वारावर समोर पिंपळाच्या झाडाची मुळे अस्ताव्यस्त पसरलेली होती. त्यामुळे या मंदिराचे मुख्यद्वार गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे की काय असं वाटत होतं. दिवसाउजेडी सुद्धा दोन मुळांच्या मध्ये खोचून ठेवलेला मोठा मातीचा दिवा व्यवस्थितपणे तेवत होता, जणूकाही तो कुणी आताच लावून गेलेला असावा, मात्र मंदिराच्या फाटकाला अतिशय जीर्ण झालेलं जंगलेलं कुलूप लावलं होतं, जे निश्चितच अनेक वर्षांपासून उघडल्या गेलं नसावं. मंदिराच्या वरच्या मजल्यावर काही खिडक्या उघड्या होत्या आणि काही खिडक्या बंद होत्या. बंद खिडक्यांच्या काचांवर कोळीष्टकं जमली होती मात्र उघड्या खिडक्यांची तावदानं पुसून काढावी इतकी स्वच्छ होती. या मंदिरात आतल्या आतच कुणीतरी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे की काय हा विचार मनात आल्या वाचुन राहिला नाही…. दोन-तीन मिनिट त्या मंदिरा समोर उभं राहून मी त्या कळसाला मनोमन नमस्कार करुन पुढे निघाले.
आम्ही आश्रमात परत आलो आणि पुढे निघण्याची तयारी करू लागलो. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर एका ऑटो वाल्यांनी आम्हाला चहासाठी थांबवलं. त्याने आमचे अनुभव विचारायला सुरुवात केली. गप्पा गप्पांमध्ये काल प्रकट झालेल्या माणसाच्या अनुभवाबद्दल आम्ही बोललो असता अगदी असाच अनुभव काही दिवसापूर्वी एका वयोवृद्ध परिक्रमावासी ला आल्याचं त्यांनी सांगितलं. “वह बाबाजी बुढे थे इसलिये वाहन से परिक्रमा कर रहे थे. मेरे ऑटो में बैठे तो ऐसा ही एक आदमी अचानक उनके सामने आगया, और चाय के लिये पाच रुपये दे गया, यही बात बता रहे थे, थोडी देर बाद जब मे उन्हे उतार रहा था, तब उसी वक्त एक आदमी सामने की और से चल के आ रहा था. परिक्रमावासी बाबा जोर से चिल्लाये, अरे ऐसे कैसे हो सकता है, अभी तो पीछे इसे देख के आया…. इसी ने तो मुझे चाय पीने के लिये पैसे दिये थे!”
पुढे नर्मदा अभ्यासक सतीश जी चूरी यांना या अनुभवाबद्दल सांगितलं असताना अशा प्रकारच्या घटना होणं आणि अशा योनींचं अस्तित्वात असणं फार मोठी गोष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलं. या गोष्टी का होतात? त्या ठराविकच लोकांसोबत होतात का? त्याच्यामागे काही विशेष कारणं असतात का? ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करणार मी सोडून दिलेले आहे. अशा उत्तरांचा शोध घेता घेता कदाचित आपल्या मुळ स्वरूपाच्या शोधाच्या मार्गावरून आपण दूर भरकटल्या जाऊ असं वाटतं. आम्ही तसंही हा भूभाग सोडून आता पुढे निघालो होतो. जे घडत होतं घडलं होतं, ते फक्त बघितलं आणि अनुभवलं होतं, आणि तसंच तिथेच सोडून आम्ही पुढे निघालो होतो.
पुढे एका साधू महाराजांची भेट झाली. एका अतिशय सुंदर रचनेशी त्यांनी आमची ओळख करून दिली. अतिशय महत्वपूर्ण, लयबद्ध आणि सत्याचा परिचय करून देणारी ही रचना आणि हे साधू मला काही गोष्टींची आठवण करून देत आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. आपल्यापैकी आपण सर्वजण साधू आहोत आणि नसलो तर आपल्याला केवळ साधू बनावयाचे आहे… असं ते सांगत होते… त्यांच्या सांगण्या मध्ये आत्मिक कळवळी चा भाव होता…. सांगते पण पुढच्या भागात……
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला आवली घाटावरील अनुभव सांगितले होते. यक्ष कुंड, ऑटोवाला, काळी सावळी बाई या सगळ्यांनीच आम्हाला पुला खालच्या यक्षकुंडाबद्दल माहिती दिली. आम्हाला आलेले अनुभव असे का यावेत यावर विचार न करता आम्ही पुढे निघालो. पुढे एका साधूंची भेट झाली असे मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. आता पुढे सांगते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं होतीत. मध्ये मध्ये लहान लहान गावं लागत होती. रस्ता फार रमणीय नसला तरी अगदीच भकास नव्हता. गोवाडी गावा नंतरचं कुठलंतरी गाव. मला आता त्या गावाचं नाव आठवत नाहीये. आठवडी बाजारासाठी असतो तसा सिमेंटचा मोठा ओटा बांधलेला होता. ओट्याच्या मध्यभागी पिंपळाचं झाड होतं. थोडा आराम करण्यासाठी आम्ही तिथे विसावलो. ओट्याचा दुसऱ्या कडेला एक साधू बसलेले होते. जरा वेळाने ते साधू आमच्याजवळ आलेत. ” बहोत थक गये क्या माई… थोडा सुस्तालो” ते म्हणाले. त्यांनी एक चटई अंथरली, आणि मी थोडावेळ अंग टाकलं. जरा वेळाने तिथल्याच एका चहाच्या दुकानदाराने आम्हाला चहा आणून दिला आणि मग गप्पा गोष्टींना सुरुवात झाली.
विश्राम हो गया मैया; अच्छा है, अच्छा है… साधूबाबा अधेमधे बोलत होते. कोण कुठून याची चौकशी झाली आणि मग बोलता-बोलता साधूबाबा एक गोष्ट सांगू लागले. “बहुत अच्छा है माई जो मैया की परिक्रमा में निकले हो.. नसीबोवालें हो… माई सब सिखा देती है.. अब् बस तुम्हे सावधान हो कर ज्ञान बटोरने की जरूरत है… सावधान होना तो समझती होना… एक कहानी सूनाता हू” बाबांनी गोष्ट हिंदीत सांगितली पण मी इथे लिहिताना मराठीतून लिहिते आहे.
एक चांडाळ होता. मात्र तो सतत नामस्मरण करीत असे. चांडाळ असल्याकारणाने त्याला पुढे जन्म घेणे आवश्यक होते. त्याला पुढचा जन्म एका चौकीदाराचा मिळाला. रात्रभर राज्याच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरून सावध व्हा, सावध व्हा, जागते रहो, जागते रहो, अशा आरोळ्या घालणं हेच त्याचं काम. मात्र पूर्वजन्मीच्या नामस्मरणामुळे त्याला एक विशेष असं ज्ञान प्राप्त झालं होतं, आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तो रात्री करत असे. लोकांना मात्र त्याच्या या ओरडण्याचा त्रास होत असे. म्हणून लोकांनी त्याला राजाच्या स्वाधीन केलं. राजा संमंजस होता. नीट लक्ष देऊन चौकीदाराच्या त्या ओळींकडे बघता ह्या ओळी काही सर्वसाधारण ओळी नसून हे फार मोठं ज्ञान आहे असं राजाच्या लक्षात आलं आणि राजाने त्या चौकीदाराला आपल्या राजदरबारात कार्य देऊ केलं. चौकीदाराने मात्र ते कार्य नाकारलं आणि ‘मला तुरुंगाच्या समोर देखरेखीचे कार्य द्यावं’ अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली आणि तुरुंगाचा चौकीदार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.
नेहमीप्रमाणे तुरुंगा समोर उभा राहून हा चौकीदार पुन्हा त्याच ओळी म्हणू लागला. यावेळी त्या ओळींना साजेशी अशी चित्र चौकीदाराने तुरुंगाच्या भिंतीवर काढलीत. सुरुवातीला मृत्युदंड झालेले ते सगळेच कैदी वैतागले, मात्र त्यांच्याजवळ काहीही पर्याय नसल्याने हळूहळू ते त्या चित्रांमध्ये व ओळींमध्ये लक्ष देऊ लागले. काही दिवसांनी कैद्यांनी त्या चौकीदाराला ह्या ओळी बद्दल विचारलं असता… “तुमचा मृत्यू येण्याआधी तुम्हाला याचा अर्थ नक्की कळेल”असं चौकीदाराने सांगितलं. आता मात्र कैदी बेचैन होऊ लागले. आज ना उद्या फाशीची वेळ येणार, आता तरी आम्हाला या प्रश्नांतून मोकळं करा असं ते चौकीदाराला विनवू लागले. चौकीदार म्हणाला ” तुम्ही या एका प्रश्नातच किती गुंतले आहात…. खरं तर तुम्ही भाग्यवान आहात कारण या कैदेतून तुमची सुटका केव्हा होणार हे तुम्हाला माहीत आहे, याउलट तुरुंगाबाहेर ची सर्व मंडळी अनभिज्ञ आहेत. तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हाला तुमच्या सुटके बद्दल संपूर्ण खात्री आहे”. … आता मात्र कैदी पेचात पडले होते.. ते म्हणाले “आम्ही अक्षम्य गुन्हे केले, म्हणून आम्हाला हा कारावास मिळाला, इथे आम्हाला न आमच्या माणसांना भेटता येत, न पुढे आम्ही इथून सुटून आमच्या घरी जाऊ शकत, आम्ही इथे राहून आमच्या आशा अपेक्षा देखील पूर्ण करू शकत नाही, आम्हाला इथून फक्त मृत्यूच सोडवू शकतो, असे असताना देखील आम्ही बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त भाग्यवान कसे काय?”
यावर चौकीदाराचं उत्तर ऐकून त्या कैद्यांची मनस्थिती पालटली. चौकीदार म्हणाला, तुम्ही जे आयुष्य जगत आहात, खरंतर तेच खरं आयुष्य आहे, कारण तुम्हाला या आयुष्याची जाणीव झालेली आहे. आपण अक्षम्य गुन्हा केलेला आहे, आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला हे आयुष्य, हा आजन्म कारावास, मिळाला आहे, याची तुम्हाला जाणीव झाली व हे आयुष्य जिवंत असेपर्यंत केवळ जगावयाचे आहे, मात्र येथे आपले म्हणावे असे काहीही नाही हे तुम्ही मान्य केले त्या क्षणी त्या गुन्ह्याच्या पापातून तुमची सुटका झाली होती. गुन्हा करतेवेळी तुम्हाला त्याच्या परिणामांची जाणीव नव्हती, मात्र आता तुम्ही जागृत आहात. अशा जागृत अवस्थेत आता तुमच्याकडून पुन्हा असा गुन्हा घडणे नाही, आणि म्हणूनच ही जागृत अवस्था असणे गरजेचे आहे. केलेल्या गुन्ह्याचे फळ तर तुम्हाला भोगावेच लागणार आहे मात्र तुम्ही जागृत आहात हे फार महत्त्वाचे आहे… माणसाने नेहमीच जागृत असावे… आणि हेच तर मी रोज रात्री गात असतो..हेच त्याचे मर्म आहे… सावध व्हा.. सावध व्हा… जागे राहा… हेच तर मी सांगत नसतो का…. असं म्हणून त्या चौकीदाराने त्या ओळींचा अर्थ त्या कैद्यांना समजावून सांगितला.
पुढे एकदा राजा तुरुंगाची फेरी करायला आला असताना सर्व कैदी अतिशय शांत आणि आनंदी असलेले त्याने पाहिले. इतकेच नव्हे तर सर्व कैदी नामस्मरणात लीन असलेले त्याने पाहिले… त्यावेळी “तू असे काय केले ज्यामुळे कैद्यांमध्ये असा फरक पडला” असे चौकीदाराला विचारले असता; मी त्यांना जागे केले असे उत्तर चौकीदाराने दिले.
साधू बाबा बोलता-बोलता मध्येच एखादा प्रश्न विचारत. इथवर गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी मला विचारलं “माई अगर तुम्हारे घर चोर आने की संभावना है तो तुम क्या करोगी?.. जहांसे चोर आ सकता है उन सारे दरवाजे को बंद रखोगी ना… ? उन दरवाजोंकी कडी कुंडिया बार बार टटोल कर देखोगी ना? अगर रात भर सोती रही तो तुम दरवाजे को टटोलकर कैसे देखोगी? तो इसके लिये तुम्हे सावध रहना होगा…. तुम्हें जागते रहना होगा..
माई, तुम्हारे पास सबसे अनमोल चीज कौन सी है? पैसा, घर, संपत्ती, गाडी यह तो क्षणिक है; एक ज्ञान है ऐसी चीज है जो अनमोल है. लोग कहते है ज्ञान की चोरी कोई नही कर सकता… कुछ हद तक यह बात सही है, लेकिन अगर चोर तुम्हारे अंदर हो तो? वह तो तुम्हारे अंदर से ज्ञान चुरा कर ले जायेगा…. और इसके लिए तुम्हे भीतर से भी जागृत रहना जरूरी है… है ना? वर्ना जिस ज्ञान के भरोसे तुम्हे तुम्हारा अंतिम सत्य, तुम्हारा अंतिम ध्येय मिल सकता है, वह ज्ञान ही अगर ना रहे तब तो तुम भटकती रह जाओगी! माई चोर अगर बाहर का हो तब तो तुम कडी कुंडिया लगाकर बैठ सकती हो, लेकिन चोर अगर अंदर का हो तब तो तुम्हे निश्चित ही पूर्ण रूप से जागृत रहना जरूरी है…
साधु महाराज सांगत होते आणि आम्ही ऐकत होतो. वेळ कसा जात होता समजत नव्हतं. दिसायला अगदी सर्वसाधारण असणारे हे साधू, व्यवहारिक दृष्ट्या शिक्षित देखील वाटत नव्हते, मात्र त्यांच्या बोलण्यातली आर्तता खरोखर एखाद्याला झोपेतून उठवून खडखडा जागं करावं अशीच होती….
माई तुम्हे पता है तुम्हे कहा जाना है…. लेकिन अगर तुम सो रहे हो, उसवक्त तुम्हे यह ज्ञान नही होता के तुम्हे किस दिशा के और आगे बढना है…. उसके लिये तुम्हे जागना ही होगा… और मानो, इस सोती हुई अवस्था मे अगर किसी ने तुम्हे बांध दिया तो? तब तो तुम्हारा आगे बढना ही मुश्किल हो जायेगा. तुम्हारा जीवन ऐसेही, बंधन मे मिट जायेगा! तो अगर तुम्हे आगे बढना है तो तुम्हे जागृत रह कर बंधनसे दूर जाना होगा या बंधन को तुमसे दूर रखना होगा …. लेकिन इसलिये सबसे जरुरी है तुम्हें सावधान रहना होगा, तुम्हे जागृत रहना होगा….
खूप वेळ पर्यंत साधूबाबाजी वेगवेगळ्या उदाहरणातून जागृती चे महत्व आम्हाला पटवून देत होते. ते सगळंच्या सगळं इथे लिहिणं खरंच खूप कठीण आहे मात्र ते ज्या या विषयावर बोलत होते, ते ज्या जागृती बद्दल बोलत होते, ते ज्या ओळींबद्दल बोलत होते ती रचना मात्र मी तुमच्या सगळ्यांसाठी देणार आहे. मागच्या भागात मी ह्या रचनेचा उल्लेख केला होता. कळत नकळत मैया च्या किनारी आपल्याला असं काही मिळतं, हेच आपलं भाग्य असतं. ही रचना त्यावेळी मी पहिल्यांदाच ऐकली होती. साधू महाराजांनी, अतिशय स्पष्ट उच्चारात आणि खड्या आवाजात ती रचना गाऊन ऐकवली होती. ती रचना ऐकताक्षणी मला निर्वाण षटकम् या शंकराचार्यांच्या रचनेची आठवण झाली… मात्र ही रचना निर्वाण षटकम् नाही…. खरंतर ही रचना इथे आत्ताच द्यावी असं मला वाटत होतं… पण मग ‘पुढच्या भागात सांगेन’ असं लिहिण्यासाठी काहीतरी हवं नं…. म्हणून मग ती रचना आणि पुढे साधुमहाराजांनी अजून काय सांगितलं, पुढचा प्रवास कसा कुठे झाला याबद्दल पुढेच लिहेन… तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ११९
मागच्या भागात मी तुम्हाला एका साधू बद्दल सांगत होते. त्या साधुमहाराजांनी आम्हाला चांडाळाची गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला सांगितली होती. त्या चांडाळा चा पुनर्जन्म आणि त्या चौकीदाराचं कैद्यांना समजावून सांगणं हे आपण मागच्या भागात पाहिलं होतं. ज्या रचनेमुळे कैद्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं आणि ते मृत्युदंड झालेला असतानादेखील अतिशय शांत चित्ताने आणि भक्तिभावाने उरलेलं आयुष्य जगत होते हे आपण पाहिलं होतं. ती रचना कोणती हे आपण या भागात बघणार आहोत. मात्र त्याआधी साधुमहाराज काय काय म्हणाले ते सांगते.
साधु महाराज जागृती चे महत्व पटवून देत होते. ते वेगवेगळी उदाहरणे देत होते. ते म्हणाले ” आप तो हैं जानती हैं कि इस दुनिया मे कुछ भी स्थीर नही हैं. हम सभी यह बात भलीभांती जानते हैं, फिर भी हम किसी ना किसी चीज के पीछे पडे ही रहते है… हम जिन चीजो के पीछे पडे रहते है उनमें सबसे महत्वपूर्ण दों ही चीजें है, एक है संपत्ती, और दुसरा है बल, शक्ती याआजकल जिसे पॉवर कहां जाता है वह क्षमता. वास्तविकता में यह दोनों ही हर पल विनाश की तरफ बढ रही है, लेकिन हमें इसका कोई अंदाजा ही नही है. … हम इस बात से संपूर्णतः अंजान बन रहें है, जब की जागृत रहकर हमें इसके बारेंमे सोचना चाहिए.
देखा जाये तो हमे जागृत रहना चाहिए क्योंकि, जागृती के अलावा हमारे पास और कुछ भी नही है. मूलतः हम एक ऐसी निद्रावस्था में है जहां हमें केवल भ्रम हो रहा है. यह बडा ही विचित्र भरम हैं जिस मे सब कुछ उलटा दिखाइए पडता है. यहा हमें आनंददायी बाते समज में हीं नहीं आती, और दुःख देने वाली सारी चीजो को, दुःख देने वाली सारी बातो को, हम आनंददायी बाते समजते रहते हैं… क्यूं कीं हम भरम में हैं… क्यूं कीं हम एक गहरी, जहरी, विषैली निद्रावस्था में हैं, और इसीलिये हमे जागृत हो जाना चाहिये.
अब तुम्हारे मन में जो सवाल आ रहां हैं उसे मैं समझ रहा हूं.. बहुत ही सामान्य और सरल सवाल है. जागृत अवस्था में आने के बाद क्या होगा? या जागृती में आने के बाद हमे क्या करना चाहिए? इस प्रश्न की तऱ्हा ही इसका जवाब मी एकदम सरल है. जब जागृत अवस्था में हम आ जायेंगे तब हमें कुछ भी करने की जरूरत ही नही पडेगी.. क्युंकीं जागृत अवस्था में जो ज्ञान प्राप्त होगा वही पर्याप्त भी होगा!
हे सगळं समजावून सांगता सांगता मध्ये-मध्ये साधुमहाराज काही संस्कृत श्लोक म्हणत होते. ते संस्कृत श्लोक म्हणजेच ती रचना… त्या ओळी.. ज्या ऐकल्यानंतर कैद्यांचं आयुष्य पालटलं होतं…. त्या ओळी आता आधी लिहिते आणि मग जागृत अवस्थेनंतर काय ज्ञान प्राप्त होईल त्याबद्दल साधु महाराज जे म्हणाले ते सांगेन…मागच्या भागापासून आपण ज्या रचनेचा विचार करतो आहे ती रचना आता खाली देते आहे.
माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धुः सहोदरः। अर्थं नास्ति गृहं नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥१
जन्म दुःखं जरा दुःखं जाया दुःखं पुनः पुनः। संसारसागरं दुःखं तस्मात् जाग्रत जाग्रत॥२
कामः क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठन्ति तस्कराः। ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जाग्रत जाग्रत॥३
आशया बध्यते जन्तुः कर्मणा बहुचिन्तया। आयुः क्षीणं न जानाति तस्मात् जाग्रत जाग्रत॥४
क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं जीवितमावयोः। यमस्य कर्णा नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥५
यावत् कालं भवेत् कर्म तावत् तिष्ठन्ति जन्तवः। तस्मिन् क्षीणे विनश्यन्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥६
ऋणानुबन्धरूपेण पशुपत्निसुतादयः। ऋणक्षये क्षयं यान्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥७
संपदः स्वप्नसङ्ख़ाशाः यौवनं कुसुमोपमं। विद्युत् चञ्चलं आयुष्यं तस्मात् जाग्रत जाग्रत॥८
पक्वानि तरुपर्णानि पतन्ति क्रमशो यथा। तथैव जन्तवः काले तत्र का परिदेवना॥९
एकवृक्षसमारूढाः नानाजाति विहङ्गमाः। प्रभाते क्रमशो यान्ति तत्र का परिदेवना॥१०
अशा या रचनेचे नाव वैराग्य डिण्डिम असं आहे. डिण्डिम म्हणजे काय असा प्रश्न मला पडला होता. अर्थात त्यावेळी मी फक्त एक-दोन श्लोक लिहून घेतले होते आणि नंतर संपूर्ण रचनेचा शोध लागला. डिण्डिम म्हणजे दिंडोरा पिटवून, किंवा ढोल वाजवून एखादी गोष्ट सर्वांना सांगण्याची पद्धत. पूर्वी ज्याला दवंडी पिटणे असं म्हणायचे, तेच डिण्डिम. हे शंकराचार्यांनी लिहिलेलं वैराग्य डिण्डिम. “तस्मात जाग्रत जाग्रत” अशी वैराग्याबद्दल जागृती निर्माण करणारी आणि जनमानसाला निद्रावस्थेतून जागं करणारी ही रचना !
अगदी प्रत्येक श्लोकातून एका लयबद्धतेतून जी दवंडी पिटवटल्या जाते आहे त्यामागची तळमळ सुद्धा या रचनेतून जाणवते की नाही? मला तर खूप आवडली ही रचना, आणि साधुमहाराजांनी ज्याप्रमाणे समजावून सांगितली ती पद्धत पण खूप खूप आवडली.
आता साधू महाराज म्हणाले तसं ‘इस जागृती के बाद क्या?’ हा प्रश्न सर्वसाधारणपणे आमच्या समोर उभा राहतो. वरच्या रचनेतील सगळेच श्लोक साधू महाराजांनी कसे समजावून सांगितले ते मला आता आठवत नाही. जे जे आठवलं ते ते तसं तसं मी लिहिलं आहे. पण रचना वाचल्यानंतर, ती समजावून घेतल्यानंतर विशेषतः नवव्या आणि दहाव्या श्लोका मधील अर्थ पुढे येणाऱ्या आपल्या प्रश्नाचा दुवा आहे एवढं मी समजू शकले. “तत्र का परिवेदना” ही कदाचित या जागृत अवस्थेची पहिली पायरी असेल? असो…
पुढे ज्यावेळेला साधुमहाराज बोलू लागले त्यावेळेला मी मागे विचार केला होता त्याच दिशेने आता महाराज काहीतरी सांगतात आहे असं मला वाटू लागलं. या जागृती अवस्थेनंतर आता काय? जागृत झाल्यावर नक्की काय करायचंय? मघाशी महाराज म्हणाले, “कुछ करने की जरूरत नही है; जो ज्ञान आपको प्राप्त होगा वही पर्याप्त होगा…..” म्हणजे तरी नक्की काय असणार आहे? म्हणजे ज्ञान मिळालं आणि तेवढंच पुरेसं आहे, असा अर्थ आहे का? ही जागृत अवस्था, किंवा ही जागृती, म्हणजेच हे ज्ञान आहे का? त्या कैद्यांना ही जागृती मिळाली असेल …. कारण ते अतिशय शांत चित्ताने आपलं पुढचं आयुष्य घालवत होते. खरंतर दुसरं काहीही करता येणं त्यांच्या हातात नव्हतंच… म्हणजे खरं तर ते काहीच वेगळं करत नव्हते…. म्हणजे फक्त जागृत अवस्था आणि त्या जागृत अवस्थेमुळे प्राप्त झालेलं ज्ञान हेच त्यांच्या बदललेल्या आयुष्याचं कारण होतं तर….
साधू महाराजांचं वाक्य माझ्या मनात घोळत होतं… “जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा…”आणि नंतर साधू महाराजांनी जे सांगितलं त्या दोन मधला दुवा म्हणजे ही जागृती आहे असं मला वाटू लागलं आहे… पण पुढे साधुमहाराजांनी काय सांगितलं हे या भागात सांगता यायचं नाही… जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा… म्हणजे नक्की काय ते आपण पुढच्या भागात बघूया!
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२०
नर्मदे हर
मागच्या भागात आपण शंकराचार्यांनी लिहिलेलं वैराग्य डिण्डिम बघितलं होतं. वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधाराने साधुमहाराजांनी वैराग्य डिण्डिम समजावून सांगितलं होतं. जागृत अवस्था ही का महत्वाची आहे आणि आपण का जागृत राहायला हवं हे साधुमहाराज अत्यंत कळकळीने सांगत होते. सांगता सांगता पुढे जागृती नंतर काय हा प्रश्न समोर येऊन ठेपला होता. त्यावेळेला महाराजांनी एक वाक्य उच्चारलं होतं जे माझ्या मनात सतत घोळत होतं. ‘जो प्राप्त होगा वह पर्याप्त होगा’ असं हे वाक्य! आता इथून पुढे साधू महाराजांचा आणि आमचा काय संवाद झाला ते सांगते.
साधु महाराज म्हणाले “इस जागृती के बाद जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा” पण ही प्राप्ती नक्की कशाची असणार होती? हा संपूर्ण संसारच दुःख देणारा संसार आहे आणि म्हणून हे मर्म तू जाणून घे, आणि या निद्रेतून बाहेर निघ आणि जागृत हो. जागृत अवस्था प्राप्त होता क्षणी तुझा सुखदुःखाचा भ्रम नाहीसा होईल. हा भ्रम नाहीसा झाल्यानंतर तुझ्याजवळ या दुःखाने भरलेल्या संसारात रमण्यासारखं काहीही उरलेलं नसेल. त्यानंतर तुझा खरा शोध सुरू होईल. म्हणजेच या संसाराच्या क्लिष्ट चक्रव्यूहातून बाहेर आल्यानंतर तुला एक वेगळी दिशा लाभलेली असेल ज्या मार्फत आता पुढे काय पासून तर पुढे कुठपर्यंत म्हणजेच कुठल्यातरी एका स्थिर मुक्कामापर्यंत पोहोचण्याचा तुझा मार्ग तुला शोधावयाचा असेल.
ज्यावेळी तू या क्लिष्ट चक्रव्यूहातून बाहेर निघशील आणि तुझ्या ध्येयाचा शोध घ्यायला लागशील त्याआधी तुला अजून काही प्रश्न पडतील. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंबहुना तुझ्या अस्तित्वाचं कारण जाणून घेणे हीच तुझ्या जागृती नंतर ची पहिली प्राप्ती असेल… आणि ही प्राप्ती म्हणजेच तुझ्या अस्तित्वाचं कारणही असेल… महाराज हिंदीतून बोलत होते पण मी तुम्हाला मराठीतून सांगते आहे.. जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा… तुला तुझ्या अस्तित्वाचं कारण, तुला तुझ्या जन्माचं कारण समजल्यानंतर यापुढे अजून काहीही समजणं बाकी नसेल आणि म्हणून मै हमेशा कहता हूं जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा.
फिर तुम सोचोगे संसार मे तो मेरा मन नही है, क्यूकी मै जानती हू यह एक क्लिष्ट चक्रव्यूह है और मुझे दुःख ही प्रदान कर सकता है, जागृती के बाद अब मुझे सुख या दुःख की प्राप्ति से कोई मतलब ही नही है… फिर तुम्हारी खोज एक और दिशा लेगी… जो तुम्हारे बाहर नही, तुम्हारे भीतर होगी…. सोचते सोचते तुम ऊपर उठती जाओगी… हम से अहं, और अहं स्वयम् की और बढती जाओगी…. इसी खोज को ही तो स्वयम् की खोज या आत्म खोज कहते है. तुमने आत्मन् शब्द तो सुना ही होगा… एस आत्मन के आगे क्या है और इस आत्मन के पीछे क्या है? इस आत्मा का मुल स्वरूप क्या है? इसको अंत में कहा जाना है? इसका अस्तित्व क्या है? क्या इसका कोई आरंभ है? क्या इसका कोई अंत है? अगर है तो क्या है? और अगर नही है तो इस की व्याप्ती कहा से कहा तक है? इसकी क्या कोई सिमाये है? इन सारे प्रश्न के उत्तर की खोज यही तुम्हारा ध्येय रह जायेगा… जो सुखदुःख के परे होगा…
सच कहू तो बहुत सारे संत-महात्माओंने इस प्रश्न के उत्तर दिये भी है, लेकिन प्रश्न का उत्तर जानना काफी नही क्यूकी यह उत्तर शब्द के बंधन मे मात्र बस कर रहे जाता है. अनुभूतीही एक मात्र उपाय हैं. स्वामीजी सांगत होते आणि आम्ही ऐकत होतो… लहान मुलाला अनेकदा सांगितल्यावर सुद्धा चटका बसल्याशिवाय दिवा गरम असतो हे समजत नाही, त्याच प्रमाणे जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं आपण अनुभवत नाही तोपर्यंत ती आपल्याला फक्त माहीत असतात, समजलेली मात्र नसतात…आणि ज्या वेळेला त्या प्रश्नांची उत्तरं समजतात त्या वेळेला इतर कुठलेही प्रश्न आपल्याला कधीच पडत नाहीत. आणि म्हणूनच जे प्राप्त होतं ते अगदी पुरेसं म्हणजे पर्याप्त असतं…
असं म्हणून महाराज पुन्हा काही संस्कृत श्लोक म्हणू लागलेत. यावेळेला मी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून हे संस्कृत श्लोक म्हणत होते. अगदी महाराज म्हणतात तसं… ही संस्कृत रचना माझ्या अत्यंत आवडीची रचना आहे. दिवसातून कमीत कमी तीन वेळ आणि अगदी रोज ही रचना ऐकत असते.. मात्र महाराज म्हणतात तसं शब्दातून कितीही बोध घ्यायचा झाला तरी आपण फक्त त्या शब्दात अडकून असतो, ती अनुभूती मिळणं जास्त महत्वाचं असतं, तसंच माझं होतं आहे हे मला समजत होतं. खरं पाहता मी अजूनही एका निद्राधीन अवस्थेतच वावरते आहे याची जाणीव मला होते आहे. मात्र ही जागृती येण्यासाठी काय करावे लागते…. किंबहुना काय आपोआप व्हावे लागते हे समजून घ्यावे लागेल…. मला तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अजून खूप मार्गक्रमण करावं लागणार आहे हे निश्चित ! ते शक्य होईल की नाही, ते कसं शक्य होईल हे सगळे प्रश्न देखील पडेपर्यंतचीही माझी अवस्था नाही… एक मात्र नक्की… शब्दात अडकून का असेना, मी ह्या रचनेचा मनमुराद आनंद काही क्षणांसाठी तरी निश्चित घेत होते. अगदी दररोज दर वेळेला भारावून टाकणारे हे शब्द आणि विशेषतः वैराग्य डिंण्डिमा नंतर एकसलग पणे महाराजांनी गायलेली ही रचना काही काळापर्यंत एका निर्विकार अवस्थेत मला नेऊन ठेवत होती. आता ही रचना कुठली ही मात्र पुढच्या भागात सांगेन.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२१
नर्मदे हर
मागच्या भागात वैराग्य डिण्डिमा नंतर साधू महाराजांनी गायलेल्या एका रचनेबद्दल मी बोलत होते. जागृती नंतर काय हे सांगताना जो प्राप्त होगा वही पर्याप्त होता असं महाराज म्हणाले होते, आणि त्यानंतर एका विशिष्ट शोधाबद्दल ते बोलत होते. हा शोध स्वतःचा शोध असून त्याच्या उत्तरार्थ गायलेली ही रचना म्हणजे निर्वाण षटकम् होय. आपल्यापैकी अनेकांनी निर्वाण षटकम् ऐकलं असेल. “चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम”… निद्रावस्थेततून जागृत होऊन जेव्हा स्वतःचा शोध घेण्यासाठी ची दिशा तुला मिळेल त्यावेळी हा शोध म्हणजेच तुझं अंतिम सत्य असेल, आणि हे प्राप्त झालं की मग यापुढे काहीच उरत नाही कारण त्यावेळेला तू सर्वव्यापी असशील. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सृष्टीच्या कणाकणा मध्ये असलेलं शिवस्वरूप म्हणजे तूच असशील.. त्यावेळी बाकी म्हणून ते काय उरेल? जिथे द्वैत नसून केवळ अद्वैतच आहे तिथे उरणार तरी काय?… जो प्राप्त होगा वही पर्याप्त होगा म्हणजे नक्की काय ते आता मला समजत होतं…. कळत होतं अर्थात पण वळणार नव्हतं एव्हाना तरी, हेही माहीत होतं… आणि मागे म्हणाले तसं शब्दात अडकून का होईना मी काही वेळ निर्विकार स्थितीत जात होते… आजही जाते!
आजचा दिवस कसा निघून गेला समजलंच नाही. आधी त्या चौकीदाराची गोष्ट, मग वैराग्य डिण्डिम, मग निर्वाण षटकम्, आणि त्यानंतर नर्मदामय्याच्या काठावर बसून तिच्या पाण्यात मिसळणारा, किंबहुना विरघळणारा तो रक्तीम, जांभळट ऊर्जेचा स्त्रोत दिसेनासा होईस्तोवर बघत राहण्या मागची विचार प्रक्रिया मला अजूनच निर्विकार आणि कदाचित अस्तित्वाच्या पलीकडे असलेल्या शून्यामध्ये घेऊन जात होती. या विचारातून बाहेर पडावंसच वाटत नव्हतं. तिथेच मैया किनारी बसून बाबाने सायंपूजेला सुरुवात केली त्यावेळी अगदीच मनाविरुद्ध असतानादेखील मी बाबासोबत सायंप्रार्थना आरती करू लागले. मन मात्र अजूनही कुठल्याशा प्रकाशमान मात्र निर्विकार पोकळीत वावरत होतं.
आम्ही पिंपळपारावर परत गेलो तो साधुमहाराजांनी स्वयंपाक करून ठेवला होता. पिंपळपाराच्या थोडं पुढे एक हनुमान मंदिर होतं तिथेच गावकऱ्यांनी सगळं सामान ठेवलेलं होतं. परिक्रमावासी येतात, स्वयंपाक करतात, विश्राम करतात आणि पुढे निघून जातात. काही दिवसांपासून हे साधुमहाराज इथे थांबले होते. दिवसभर साधू महाराजांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी नुसत्या डोळ्यासमोर येत होत्या, आणि प्रत्यक्ष मात्र आम्ही तिघं असून सुद्धा मंदिरात गहरी शांतता होती. फराळी असणाऱ्या बाबाजींनी आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला होता आणि ते आपल्या साधनेत मग्न होते. आम्ही दोघ अक्षरशः मुकाट्याने दोन घास खाऊन आपापल्या आसनावर आडवे झालो होतो. इथून पुढच्या प्रवासाची गती, दिशा, याबद्दल आता आम्ही दोघेही अनभिज्ञ तर होतोच मात्र कुठल्याही प्रकारची उत्सुकता, कुठल्याही प्रकारचे प्रश्न, काळजी, आनंद, किंवा कुठलीच भावना मनातून बाहेर येत नव्हती. आता या क्षणाला डोळे बंद करून जे दिसणार होतं ते निर्विकारतेपेक्षा कुठेही कमी नव्हतं. माणूस असं ब्लॅंक असू शकतं यावर माझा या आधी कधीच विश्वास बसला नव्हता… आज मात्र न ठरवता सुद्धा विचारांनी मनाचा रस्ताच सोडला होता. मला ती अवस्था वर्णनच करता येत नाहीये, कारण त्यात वर्णन करण्यासारखं काहीच नाहीये….. न प्रकाश अंधार, न सुख न दुःख, काही म्हणजे काहीच नाही….. कधीतरी निद्रादेवीच्या कुशीत आल्यानंतर ही अवस्था आपोआप शांतवली गेली असली पाहिजे, मात्र तिचा इम्पॅक्ट जायला बरेच दिवस लागले, किंबहुना दुर्लक्ष करून तो घालवावा लागला असं म्हटलं तरी चालेल.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बाबरी घाट, भिलाडिया करत करत आम्ही चिचोड कुटी ला आलो. इथला आश्रम खूपच छान आहे. हनुमानाच मंदिर, नयनरम्य परिसर, आणि पुढे मैया चा घाट. आजचा मुक्काम इथेच केला. दुसऱ्या दिवशी मैया स्नान करून पुढे जायचं ठरलं त्यावेळची गंमत सांगते. मैया स्नान करतेवेळी घाटावर एका ठिकाणी एक नाव बांधून ठेवली होती, तिथून थोडं पुढे जाऊन मोकळ्या प्रवाहात स्नान केलं तेव्हा मैया च्या पाण्याला तीर्थाचा स्वाद जाणवला. किंचीत अष्टगंधाचा वास असल्यासारखा. अगदी दोन-तीन वेळा पाणी पिऊन बघितलं मी.. अगदी तसाच मधुर… नुकताच कुठल्यातरी सिद्ध मूर्तीला अभिषेक घालून आल्यासारखा… खुपच छान वाटलं. तसा नर्मदा जला चा स्वाद मधूरच असतो मात्र हा तीर्थाचा स्वाद पहिल्यांदाच जाणवला. पूजापाठ करून बालभोग करून आम्ही पुढे निघालो.
इथून पुढे दोन रस्ते. एक सरळ हांडिया ला जाणारा आणि दुसरा हरदा ला जाणारा. आम्ही हरदा मार्गे जायचं ठरवलं. हरद्याला असणारं गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेलं राम मंदिर ऐकून होते. त्या गोंदवलेकर महाराजांच्या श्रीरामाच्या दर्शनाची इच्छा होती. हा अंदाजे पन्नास किलोमीटरचा फेरा पडणार होता; तरीही आम्ही हाच मार्ग निवडला. यात आमचे मैया किनाऱ्यावरची काही स्थानं सुटली खरी, पण एक तर ते प्रारब्ध असतं आणि एक काही मिळत असेल तर दुसरं काहीतरी सुटतच असतं… आणि खरोखर तिथे जाऊन जे काही मिळालं ते केवळ भाग्य होतं म्हणून! आणि म्हणूनच पन्नास किलोमीटरचा फेरा घेऊन सुद्धा त्याच मार्गाने येण्याची बुद्धी आम्हाला झाली असावी. आता या मंदिरात नेमकं कसं काय मिळालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे, मात्र या साधारण तीस किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आम्हाला एका ठिकाणी थोडा वेळ विश्राम करावा लागला. हा विश्राम अतिशय साधा असला तरी अतिशय खास होता. निष्पाप जिवांशी आमची भेट झाली होती. इथे आम्ही मेंढीच्या दुधाचा चहा प्यालो होतो.. खूप विचित्र आणि असह्य वास असतो त्या दुधाला! पण मेंढीच्या दुधाचा चहा प्यावा लागेल असं कुठे थांबलो होतो आम्ही? पुढच्या भागात सांगते.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२२
नर्मदे हर
मागच्या भागात आपण निर्वाण षटकम् या साधू महाराजांनी गायलेला रचनेबद्दल बोलत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पिंपळाच्या पारा च्या जवळ असलेल्या हनुमान मंदिरात पूजा आदि आवरून आम्ही पुढे निघालो आणि चिचोड कुटी येथे मुक्काम केला होता. तिथे स्नान करताना मैया च्या पाण्याला तीर्थासारखा स्वाद येत होता. चिचोड कुटीचं हनुमान मंदिर, तिथलं अतिशय प्रसन्न वातावरण, या सगळ्याचा मौन आनंद अधिक आनंददायी होता. तिथून सरळ हांडियाला जाण्याऐवजी हरदा मार्गे हांडिया ला जायचं ठरवलं. वाटेत अतिशय निष्पाप जीवांची मैत्री झाल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि हो, अतिशय तीव्र वासाचा, घट्ट, मात्र अतिशय प्रेमाने पुढे आलेला मेंढीच्या दुधाचा चहा आम्हाला घ्यावा लागला होता तेही सांगितलं होतं. आता पुढे सांगते.
चिचोड कुटी होऊन थोडच अंतर पुढे गेल्यावर एक भला मोठा परिसर लागला. इथे संस्कृत विश्वविद्यापीठाची स्थापना होणार असल्याचं समजलं. आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो. उन्हाच्या वेळी वाटेत कुठेतरी विश्राम करावा लागत होता कारण आता ऊन हळूहळू वाढू लागलं होतं. चिचोड ते हरदा हे अंतर साधारण तीस किलोमीटर. हरद्याला पोहोचलो तर बरं कारण वाटेत कुठे व्यवस्था नाही असं समजलं होतं. उन्हाच्या आधी जितकं जास्त अंतर कापता येईल तितकं बरं म्हणून आम्ही झपाझप पावलं उचलत होतो.
साधारण दुपारचे बारा सव्वाबारा झाली असतील. आम्ही अर्ध अंतर कमी नक्कीच पार केलं होतं. सूर्य डोक्यावर होता. आम्ही अजून जेमतेम तासभर चालू शकणार होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भकास शेतं होती. अगदी विश्रांती करायला सुद्धा एकही झाड नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला जरा आतमध्ये थोडी हिरवळ दिसली. अजून पुढे गेलो तो त्या हिरवळीच्या जरासं पुढे काही तंबू लागलेले दिसले. चार खांब ठोकून वर कापड बांधून शेड सारखं तयार केलेले दिसलं आणि आमच्या दुपारच्या विश्रामाची व्यवस्था झाली. अगदी कुणाचीही परवानगी न घेता आम्ही त्या शेड खाली जाऊन बसलो.
थोड्यावेळाने लहान मुलं आणि दोन चार बायका आमची विचारपूस करायला आले. राजस्थानी बंजारा लोकांचे हे तंबू होते. घरातली तरुण पुरुष मंडळी मेंढ्या चरायला घेऊन गेली होती, अगदीच लहान मुले आणि बायका तंबूमध्ये होत्या. तिथून अजून पुढे गेलं ही एक छोटासा पाणवठा आहे असं समजलं. हा पाणवठा म्हणजे ह्या चार-पाच कुटुंबांचा सध्याचा पाणी पुरवठा. इथली हिरवळ संपत आली की ही कुटुंब पुढे जाणार. मेंढ्या चरायला घेऊन जात असताना, तरुण पुरुष मंडळी पुढच्या मुक्कामाची जागा निश्चित करणार.
त्यांच्या राजस्थानी हिंदीत आणि आमच्या मराठी मिश्र हिंदीमध्ये जो काय तुटपुंजा संवाद झाला त्यातून त्यांचा हा जीवनक्रम समजला होता. आता मला त्यांच्यात आणि माझ्यात खूपच साम्य वाटू लागलं होतं. अर्थात माझ्यापेक्षा मोठी आणि नशिबाने मांडून दिलेली आयुष्याची परिक्रमा ही कुटुंब जन्म झाल्यापासून तर आमरण करत असतात. स्थान संन्यास घेतल्याप्रमाणे काही ठराविक कालावधी पर्यंतच एकाच ठिकाणी थांबायचं. नंतर पुढचा प्रवास करायचा. प्रवास त्रासदायक होऊ नये म्हणून मुळातच सामान कमी. मी तरी काही महिन्यांसाठी माझ्या गरजा कमी केल्या होत्या, मात्र ह्या भटक्या कुटुंबीयांच्या कायमच गरजा कमीच... मला तो एक शेर आठवला बघा
जितना कम सामान रहेगा
उतना सफर आसान रहेगा….
हजारोंनी मेंढ्या, दोन-चार उंट, दोन-चार तंबू, थोडेफार कपडेलत्ते, मोजकेच भांडेकुंडे… एवढंच त्यांचं जीवनावश्यक सामान.. असं असूनसुद्धा माणुसकी म्हणाल आभाळाएवढी. त्यांच्याजवळ जेवणाखाण्याची काय व्यवस्था होती माहिती नाही मात्र आम्ही जेवणार असू तर स्वयंपाक करून देते असं त्यातली एक बाई म्हणाली. जेवायचं नाही म्हटल्यावर त्या बाईने आमच्या समोर एक चहा वजा पेय आणलं. गोड आणि अत्यंत तीव्र वासाचं… चहाचा स्वाद होता की नाही हे सुद्धा कळणार नाही इतका तीव्र वास त्या दुधाचा होता. मात्र तिने ते इतक्या प्रेमाने आम्हाला दिलं होतं की चेहऱ्यावरची रेषही बदलू न देता जमेल तसं हळूहळू ते पिण्या पलिकडे पर्याय नव्हता… तो चहा प्यायल्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. वाटेत पुरुष मंडळी हजारोनी मेंढ्या घेऊन मुक्कामाला परत येताना दिसली. अतिशय बिनधास्तपणे रस्त्यावरून चालणारे, अधुन मधून मेंढ्यांना हुर्रर्र करणारे, आपल्याच मस्तीत वावरणारे हे मेंढीपाळ तरुण या मेंढ्या इतकेच निष्पाप वाटत होते.
करत करत आम्ही हरद्याला येउन पोचलो. आता गोडबोलेंच्या राम मंदिरा बद्दल विचारपूस केली. तिथे गोडबोलेंचं राम मंदिर फारसं कुणाला माहीत नाही मात्र मराठी राम मंदिर विचारल्यावर किंवा गोंदवलेकर महाराज राम मंदिर विचारल्यावर मात्र लोक झटकन सांगतात. यातच गोडबोले परिवाराने कुठल्या ही प्रसिद्धी विना केलेल्या सेवेचा अंदाज येतो. वाट शोधत शोधत संध्याकाळच्या सहा साडेसहा पर्यंत आम्ही राम मंदिरात येऊन पोहोचलो. अतिशय प्रेमाने आणि आनंदाने आमचं स्वागत करण्यात आलं. गोर्यापान, चेहऱ्यावर अतिशय सात्विक भाव असलेल्या, अत्यंत मधुर, प्रेमळ आणि आपुलकीची वाणी असलेल्या गोडबोले वहिनींनी आमचं स्वागत केलं. नर्मदे हर झालं, हात पाय तोंड धुतले आणि गरम गरम वाफाळदार चहाचे कप आमच्यासमोर आले.
अरे हो त्या आधीची एक गोष्ट सांगायची राहिलीच की. मंदिराच्या आत प्रवेश करण्या आधीच सुंदर उदबत्तीचा वास आला. आणि मंदिरात पहिलं पाऊल टाकता क्षणीच गोंदवलेकर महाराजांची अतिशय प्रसन्न मूर्ती दृष्टीस पडली. त्या क्षणी गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य सुद्धा आठवलं. “माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा” असं गोंदवलेकर महाराज सांगत असत. आता देखील त्यांच्या मूर्तीतले तेच भाव माझ्या दृष्टीस पडले होते. हा हरद्याचा राम म्हणजे पट्टाभीराम! आपल्या पंचायतना सकट इथे मंदिरात विराजमान होता. या राजा रामासमोर, महाराणी सीतामाई समोर महाराज विराजमान होते.
मंदिरात गेल्या गेल्या पहिल्यांदा गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर त्यांच्या श्रीरामाचं. इथल्या श्रीराम मूर्तीची एक वेगळीच कथा आहे बरं का. हे मंदिर दीडशे वर्षांपेक्षाही जुनं आहे. हे मंदिर ज्या वेळेला बांधण्यात आलं होतं आणि मूर्तीची स्थापना करण्यात आली होती त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांनी आधी एक वेगळी मूर्ती बनवायला सांगितली होती. मात्र लगेच काहीच दिवसानंतर त्यांनी ही मूर्ती करू नकोस मात्र आता अशा पद्धतीची वेगळी मुर्ती कर असं मूर्तीकाराला सांगितलं. त्यावेळेस मूर्तिकारांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीची मूर्ती केली आणि इतरांसाठी तो विषय तिथेच संपला. मात्र आत्ताच अलीकडेच म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षांपूर्वी हे असं महाराजांनी त्या वेळेला का सांगितलं याचा उलगडा झाला. दीडशे वर्षांपूर्वी, दिलेल्या मूर्तीची ऑर्डर कॅन्सल करून दुसऱ्या पद्धतीची मूर्ती करण्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी का सांगितलं असावं? आपला खरंच विश्वास बसणार नाही पण गोडबोले दादांनी ज्यावेळेला ही गोष्ट सांगितली त्यावेळेला अंगावर अक्षरशः काटा आला. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या रामाचं मंदिर बांधण्यासाठी हीच जागा का सिलेक्ट केली? मूर्ती ची ऑर्डर देऊन ती कॅन्सल करून दुसऱ्या पद्धतीची मूर्ती का स्थापन केली? या मूर्तीची एक विशेषता आहे… मी तरी अशा प्रकारची श्रीरामाची आणि सीतामाईची मूर्ती या आधी कुठेही पाहिलेली नाही. पण हे सगळं मी तुम्हाला या भागात सांगणार नाहीये. हो पण गोंदवलेकर महाराजांचे दर्शन मात्र नक्कीच करवणार आहे. खाली दिलेला फोटो हरद्याच्या गोंदवलेकर राम मंदिराचा फोटो आहे. मूर्तीचा फोटो, मूर्तीचे वैशिष्ट्य आणि त्या मागची एक विलक्षण कथा मात्र पुढच्या भागात! तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२३
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मेंढपाळांच्या तंबूमध्ये आम्ही केलेल्या विश्रामाबद्दल सांगितलं होतं. मेंढीच्या दुधाच्या चहा बद्दल आणि तो चहा करून आणणाऱ्या प्रेमळ राजस्थानी बंजारा मैया बद्दल देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मजल दरमजल करत आम्ही हरदा येथील गोडबोलेंच्या मंदिरामध्ये आलो होतो. गोडबोले वहिनींनी आमचं स्वागत अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने केलं हेदेखील मी तुम्हाला सांगितलं होतं. मागच्या भागाच्या शेवटी इथल्या एका रहस्याबद्दल मी बोलत होते आणि मागच्या भागात अगदी शेवटी गोंदवलेकर महाराजांची अतिशय प्रसन्न मूर्ती मी तुम्हाला दाखवली होती. आता पुढे जाऊयात.
संध्याकाळचे सहा सव्वासहा झाले असतील. आरतीला तसा अजून वेळ होता. आम्ही हात पाय तोंड धून समोर घातलेल्या सतरंजीवर येऊन बसलो. मागच्या भागात फोटो मध्ये दिलेली गोंदवलेकर महाराजांची मूर्ती आता अजूनच निरखून पाहिली असता की अतिशय बोलकी होती हे जाणवत होतं. वहिनी चहा पाण्याचं बघायला स्वयंपाक घरात गेल्या होत्या आणि दादा आत गाभाऱ्यात काहीतरी काम करत होते. आम्ही अगदी शांतपणे समोर सभामंडपात बसलो होतो. अशा ठिकाणी आणि अशा वेळी आपोआप डोळे बंद होतात आणि लक्ष कुठे तरी वेधल्या जाऊ लागतं. तसंच काहीसं झालं असावं. उन्हाच्या झळांनंतर एखादे हलकीशी थंड झुळूक आली की कसा जीव शांतावल्यासारखं वाटतं नं तसं वाटू लागलं. रक्तचंदनाचा माफक आणि मोहक गंध दरवळत होता. एक अतिशय सूक्ष्म लहर तिचं अस्तित्व जाणवून देत होती मात्र श्रुतीं पर्यंत पोहोण्याइतकी तीव्र नव्हती. अजून उलगडून सांगायचं झालं तर भरलेल्या पाण्याच्या बादलीत अगदी छोट्या आकाराचे थेंब सातत्याने पडत असतील तर त्याचा आवाज तितकासा येत नाही मात्र तो रिदम आपण पकडू शकतो…. तसं काहीसं हे होतं. गोडबोले वहिनींननी चहा आणला. त्यांच्या आवाजाने मी डोळे उघडले.
थोड्यावेळाने आमची पूजा झाल्यानंतर आरती साठी आम्ही छोट्या सभामंडपात गेलो. इथल्या मूर्तीची एक गंमत आहे असे मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. आता त्या बद्दल सांगते. या मूर्तीमध्ये श्रीरामा बरोबर त्यांचे पंचायतन देखील आहे. गंमत म्हणजे या मंदिरामध्ये सीतामाई श्रीरामांच्या मांडीवर बसलेल्या आहेत. असं का? असं विचारल्यावर गोडबोले दादांनी सांगितलं ही मूर्ती श्रीरामांच्या अभिषेकाच्या वेळेचा प्रसंग दर्शविते. पट्टाभिषेकाच्या वेळी राणीला पट्टराणी बनविण्याचा एक विधी असतो. या विधी अंतर्गत राज्याभिषेकाच्या वेळी राणीला राजा च्या मांडीवर बसवण्यात येतं तो हा प्रसंग. या प्रसंगाच्या वेळी उपस्थित असलेल्या परिवाराचं वर्णन असं केलेलं आहे बघा! यात श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत शत्रुघ्न याबरोबर अष्टदिक्पालांचाही उल्लेख केलेला आहे.
वैदेहीसहितं सुरद्रुमतले हैमे महामण्डपे मध्ये पुष्पकमासने मणिमये विरासने सुस्थितम।
आग्रे वाचय्तति प्रभंजनसुते तत्त्वं मुनिभ्यः परं व्याख्यान्तं भरतादिभिः परिवृतं रामं भजे श्यामलम्।।
वामे भूमिसुता पुरश्च हनुमान् पश्चात् सुमित्रासुतः श्त्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयो-र्विय्वादिकोणेषु च।
सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जांबवान मध्ये नीलसरोजकोमलसुचिं रामं भजे श्यामलम्।।
मी तरी याआधी श्रीरामांच्या मांडीवर बसलेल्या सीतामाईला कधीही पाहिलं नव्हतं. मला फारच वेगळी वाटली ही मूर्ती. अतिशय मोहक अतिशय रमणीय. तुमच्यासाठी या मूर्तीचा फोटो देते आहे.
तर संध्याकाळची आरती पूजा भोजन इत्यादी झाल्यानंतर आता विश्रामा ची वेळ. संध्याकाळी महाराजांच्या समोर बसले असताना रक्त चंदनाचा गंध आला होता. त्यावरून मला लेलेकाकांनी सांगितलेलं आठवलं, आणि इथे असलेला महाराजांचा वास स्पष्ट जाणवला. मध्यरात्री केव्हातरी माझ्या आसनाच्या बाजूने महाराज शतपावली केल्यासारखे फिरत आहेत असा भास झाला. आता दर्शन झालं का भास झाला ते सांगता यायचं नाही. जे झालं ते मी तुम्हाला सांगणार बाकी तुम्ही ठरवायचं. तर दोन्ही खांद्यावरून खाली लांबलेली जांभळट काळपट रंगाची शाल त्यांनी पांघरली होती. त्यांच्या हातात जपमाळ होती, आणि मग आता संध्याकाळी जाणवली तशी सूक्ष्म लहर मला पुन्हा जाणवली होती. मागे एकदा परिक्रमेत दर्शनाबद्दल मी विचारलं असता एका महाराजांनी मला सांगितलं होतं की त्या ठिकाणची कंपन जेव्हा आपल्या कंपन लहरींच्या फ्रिक्वेन्सी शी मॅच करतात त्यावेळी त्या ठिकाणी घडलेली दृश्य आपल्याला जशीच्या तशी दिसतात. थोडक्यात सांगायचं तर आपल्यामधला कुठलातरी एक हिस्सा त्यावेळी घडलेल्या त्या प्रसंगाशी एकरुप झालेला असतो, त्या प्रसंगाचा प्रत्यक्षदर्शी बनून जातो. म्हणून ते दृश्य आपल्या डोळ्यांसमोर अगदी जिवंत असल्याप्रमाणे उभं रहातं. अर्थात ही फ्रिक्वेन्सी फक्त काही काळापुरतीच किंबहुना काही क्षणांपुरती मॅच होते. म्हणून हा दर्शनाचा कालावधी अगदी थोडा असतो. तर म्हणून हरद्याला मला गोंदवलेकर महाराजांचा दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही!
सकाळी उठले त्यावेळेस या दर्शनाच्या आठवणी अगदी व्यवस्थित ताज्या होत्या. पुसट वगैरे नाही तर अतिशय स्पष्टपणे जे घडलं ते मला आठवत होतं. अजूनही माझ्या मनात श्रीरामांच्या मांडीवर बसलेल्या सीतामाईच्या मूर्ती बद्दलचे कुतूहल कायम होते. गोडबोले वहिनींना विचारलं असता एक वेगळीच गोष्ट समोर आली. मागच्या भागात तुम्हाला इथल्या मूर्तीबद्दल चे रहस्य काय आहे ते सांगेल असे म्हणाले होते ना… ते आता सांगते.
हे मंदिर दीडशे वर्ष जुनं मंदिर आहे. गोडबोले वहिनी सांगत होत्या. गोंदवलेकर महाराजांनी आधी एका वेगळ्या प्रकारच्या मूर्ती ची ऑर्डर मूर्तीकाराला दिली होती मात्र लगेच दोन-तीन दिवसात ती ऑर्डर कॅन्सल करून अशी रामाची मूर्ती तयार कर असं त्यांनी मूर्तीकाराला सांगितलं, आणि याचा उलगडा आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी गोडबोले परिवाराला झाला. पाहुणे आणि परिक्रमावासींच्या सोयीसाठी टॉयलेट बाथरूम बांधावयाचे म्हणून गोडबोले परिवाराने मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या जमिनीवर बांधकाम सुरू केलं. या बांधकामासाठी खोदकाम करायला घेतलं असताना हिरव्या ग्रॅनाईट सारख्या रंगाच्या काही मूर्ती सापडल्या. त्या मूर्तीत विष्णूंच्या मांडीवर अशाचप्रकारे बसलेली लक्ष्मी देखील होती. श्री विष्णू लक्ष्मीची ही मूर्ती खंडलेली मूर्ती होती, म्हणून कदाचित ती विसर्जित केल्या गेली असावी. पण तिचं याच स्थळी सापडणं आश्चर्यकारक नाहीये का?
म्हणजे त्यावेळी गोंदवलेकर महाराजांना काहीतरी लक्षात आलं असणार म्हणूनच दिलेल्या मूर्तीची ऑर्डर कॅन्सल करून अशी श्री रामाच्या मांडीवर बसलेली सीतामाई म्हणजेच श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी चा प्रसंग वर्णन करणारी मुर्ती गोंदवलेकर महाराजांनी मूर्तिकाराकडून करवून घेतली. जणू काही त्या खंडलेल्या मूर्तीचा पुनरुद्धार म्हणून की काय ही जागा आणि हे मंदिर अत्यंत विचारपूर्वक गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलं असावं. तसंच या मंदीराच्या सेवा करणाऱ्या गोडबोले वहिनींचं सुद्धा झालं असावं. त्यांची पुनर्जन्माची पुण्याई म्हणून की काय त्यांचा जन्म झाल्यापासून त्या श्रीरामांची सेवा करत आहेत. मंडलेश्वर च्या राम मंदिराची सेवा करणाऱ्या परिवाराची ह्या कन्यका. लग्नानंतर श्रीरामांनी त्यांना दुसरी तिसरी कडे जाऊच दिलं नाही.. स्वतःच्या सेवेपासून त्यांना दूर केलं नाही… ही पुण्याई नाही तर काय म्हणायचं? अतिशय प्रेमाने आदराने त्यांची अविरत सेवा सुरूच आहे. तर अशी ही हरद्याच्या श्रीरामांची गोष्ट.
इथून पुढे आम्ही हांडिया ला गेलो. इथून पुढचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी खरोखर एक दिव्यच होतं. माझी तब्येत पुन्हा एकदा ढासळली होती. नक्की काय काय आणि कसं कसं झालं होतं हे मला सुद्धा फारसं आठवत नाही. लिखाण तर कधीच बंद पडलं होतं. मुक्कामाच्या जागा काय त्या आठवत होत्या थोड्याफार. जस जमेल तस आठवेल तसं पुढच्या भागांमधून लिहायचा प्रयत्न करते. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२४
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला हरदा येथील पट्टाभीराम मंदिराबद्दल सांगितलं होतं. गोंदवलेकर महाराजांनी त्यावेळी मूर्ती बदलण्याचा निर्णय घेतला ते एकशे वीस वर्षानंतर गोडबोले कुटुंबाला कसं उमजलं तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. महाराजांचं साक्षात दर्शन झाल्यामुळे मी आनंदातच होते. दुसऱ्या दिवशी बालभोग करून आम्ही हांडिया च्या दिशेने निघालो. हे अंतर साधारण वीस बावीस किलोमीटर असेल.
उन्हाचा तडाखा आता वाढला होता. मध्ये मध्ये थांबत, कुठे उसाचा रस तर कुठे थंडगार सरबत देऊन लोकांनी बरीच सेवा केली होती. रिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पाचातलाई मार्गाला लागलो. आज पासून पुढचे दिवस माझ्यासाठी फारच कठीण गेलेत. उन्हाचा फार त्रास होत होता मला. दिवसेंदिवस ऊन वाढतच जाणार होतं आणि म्हणून आज आराम करु आणि उद्या निघू असं करूनही अर्थ नव्हता. जिथे कुठे पाणी मिळेल तिथे रुमाल, ओढणी ओली करून डोक्याला बांधून घ्यायची असा प्रकार चालू होता. आधी कानाला एक कोरडा रुमाल बांधायचा आणि मग थंड व्हावं म्हणून घट्ट पिळलेली ओढणी बांधयाची! सकाळी लवकर उठलो तरी साडेनऊ दहा च्या वर चालता येणे शक्य होई ना. आणि इथला रस्ता म्हणजे केवळ भकास मार्ग. न दुकान, न शेत, न झाड, न मंदिर…. दोन गावांच्या मध्ये अतिशय भकास आणि वळणावळणांचा मोठा रस्ता! मध्ये कुठे काहीच नाही!
आम्ही हंडिया वरून निघालो त्यावेळेला दुपारचे चार सव्वाचार झाले असतील. दिवस मोठा होता त्यामुळे सहा साडेसहा पर्यंत चालता येणं शक्य होतं. पण त्या आधीच पाचातलाई मार्गावर एका छोट्या गावात एका शाळेत आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. गावकऱ्यांनी भोजन प्रसादी ची व्यवस्था केली. हा एकच दिवस काय तो जरा बरा गेला म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशीपासून परीक्षेला सुरुवात! सांगते..
दुसऱ्या दिवशी सकाळी समोरच्या दुकानदाराने चहाची व्यवस्था केली. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. अगदी भरपूर चालून झाल्यानंतर देखील गाव येईच ना. वाटेत एका टेकडीवर जाणारा पायर्यांचा मार्ग दिसला. पुढे काय मिळेल माहित नाही, ऊन वाढतच होतं म्हणून टेकडीवरच्या मंदिरात दुपारचा विश्राम करायचं ठरवलं. सुरुवातीला सोप्या वाटणाऱ्या पायऱ्या वर वर जातांना कठीण वाटू लागल्या. आता इथे विचारायचं तरी कुणाला? बरं वर मंदिरात गेल्यावर निदान विश्रामाची तरी व्यवस्था होईल का हेही माहीत नाही… एकदा तर वाटलं खाली उतरून परत यावं. ईश्वराच्या कृपेने तीन-चार पायऱ्यांवर सावली धरणारं एक झाड या टेकडीवर होतं. तिथेच बसून आराम करायचं ठरवलं. डोक्यावर रणरण ऊन आणि पोटात फक्त चहाचं पाणी. वाटेत पुढे काही मिळणार नाही हे माहीतच नसल्यामुळे सोबत काहीही घेतलं नव्हतं. आणि आता तर आमच्या जवळचं पाणीदेखील संपत आलं होतं. थोडा वेळ थांबायचं आणि उलट पावलांनी खाली उतरू लागायचं असा आम्ही ठरवलं. सकाळचे साडे दहा अकरा झाले असावे. जास्त ऊन ह़ोण्याच्या आत निर्णय घेणं आवश्यक होतं. आम्ही खाली उतरण्यासाठी बॅगा पाठीवर लावल्या तोच खालून एक जण वर येताना दिसला.
“परिक्रमावासी तो उपर तक आते नही बाबा जी. लेकिन कोई बात नही चलो उपर हनुमान जी का दर्शन करलो. कौन समाज से हो?” … आम्ही ब्राह्मण समाजाचे आहोत हे समजल्यानंतर त्याने आम्हाला वर पर्यंत येण्याचा आग्रह धरला. तो माणूस म्हणजे या वरच्या मंदिराचे पुजारी. अगदी नाही नाही म्हणत असतांना या पुजाऱ्यांनी माझी बॅग उचलून घेतली. वर पोहोचल्यावर त्यांनी आमची बसण्याची व्यवस्था केली . इतक्या उंचावर ही नळ होता हे पाहून आश्चर्य वाटलं. आम्ही हात पाय तोंड धुतले, छोट्याशा मंदीराच्या छोट्याशा सभामंडपामध्ये आसन लावून विश्राम करू लागलो.
पुजाऱ्यांनी मंदिराची साफसफाई केली आणि ते आपली पूजा करू लागले. आम्ही तिथेच विश्राम करत होतो थोड्यावेळाने एक तरुण मुलगा हातात मोठाल्या दोन पिशव्या घेऊन आला. तो पुजाऱ्यांचा मुलगा होता. त्याने घरून आमच्यासाठी जेवणाचा डबा आणला होता. मैया च्या कृपेचं नवल तर वाटलं नाही पण मन भरून आलं. एक वेळ रस्त्यावर येत जात असणाऱ्या कोणाचं लक्ष आमच्याकडे जाऊन काहीतरी भोजन प्रसादिची व्यवस्था झाली असती पण इथे टेकडीवर हे पुजारी आम्हाला भेटले नसते तर पिण्यासाठी थेंबभर पाणी सुद्धा मिळालं असतं की नाही देव जाणे… अशा ठिकाणी आम्हाला पुरी बटाट्याची भाजी वरण भात कोशिंबीर आणि खीर असं भरपूर आणि चविष्ट जेवण मिळावं ही मैयाची कृपा! इतकेच नव्हे तर त्या रात्रीचा मुक्काम देखील या पुजाऱ्यांच्या ओळखीने पुढच्या एका गावात करता आला.
पुढचा मुक्काम राहतात अन् आईला केला मौर्य यांच्या घरी. तिथवर जाईस्तोवर आणि त्यांच्या घरी काय काय झालं ते मात्र पुढच्या भागात सांगणार आहे. एक मात्र नक्की आम्ही तिथे गेलो होतो आम्हाला तिथे नेण्यात आलं होतं… पुढच्या भागात सांगते.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला पुजारी महाराजांचा अनुभव सांगितला होता. हंडीयावरून निघाल्यावर मांगरुल, राता तलाई करत पुढे पाचा तलाई या गावी आम्ही मुक्काम केला. हा प्रवास साधारण बावीस किलोमीटरचा असेल. पण उन्हाचा तडाखा आणि रस्त्यात कुठे नावासाठी देखील सावली नाही असा हा भाग. त्यात माझी तब्येत सारखी बिघडत होती. माझ्या प्रकृतीला ऊन सहन होत नाही हे मला माहीत होतं. पण काहीही इलाज नव्हता. थांबतो म्हटलं तरी विश्राम करण्यासाठी देखील काहीही नाही. मधून नागमोडी जाणारा डांबरी रस्ता आणि आजूबाजूला ओसाड झालेली शेतं. हे असं अजून किती दिवस चालणार देव जाणे. पण आपली काळजी मैयालाच असते. ती वारंवार तसे अनुभव देतेच. आता हनुमान मंदिरातून पाचा तलाई या प्रवासात देखील मैया ने कशी काळजी घेतली बघा…
या रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा दिसेना. मागच्या भागात पुजारी बाबा जसे डोंगरावर जाणाऱ्या मंदिराच्या पायऱ्यांवर अचानक पणे भेटले तसंच काहीसं इथेही झालं. पण इथे जे काही झालं ते अचानक झालं नाही हे आम्हाला पाचातलाई ला पोहोचल्यावर समजलं. आम्ही रस्त्याने जात असताना एक कार आमच्या पाशी येऊन थांबली. त्यांनी त्यांच्या जवळ असलेलं थंडगार पाणी आम्हाला दिलं. कार ने सोडतो असा आग्रहदेखील केला. मात्र नंतर ती मंडळी पुढे निघून गेली. हा प्रसंग एक योगायोग असू शकतो मात्र यानंतर जे काही झालं तो योगायोग निश्चित नव्हता.
थोड्या वेळाने म्हणजे साधारण तासाभराने एका दुचाकीवर एक बावीस पंचवीस वर्षाचा तरुण आम्हाला भेटला. आमचं पाणी पुन्हा संपलं होतं. या समोरून येणाऱ्या मुलाकडे पाणी असेल असं वाटलं, असा विचारच मनात आला आणि तो मुलगा आमच्या शेजारी येऊन थांबला. आम्ही नं विचारतात त्याने पिशवीतून एक बाटली बाहेर काढली. ” वा गं मैया, न मागताच पाणी पाठवलं” माझे डोळे भरून आले. पिशवीतून पाण्याची बाटली बाहेर काढल्या नंतर त्याच पिशवीतून त्याने दोन डिस्पोजेबल ग्लास देखील बाहेर काढले. बाटलीतलं गारेगार पाणी पेल्यात ओतलं. तो पेला तोंडाला लावताच लक्षात आलं, ते पाणी नव्हतंच तर अमृताहून मधुर आणि गारेगार असं लिंबाचं सरबत होतं. … आता मात्र नं राहवून मी त्याला विचारलं, “थोडी देर पहले यहासे एक कार गई थी, उसके बाद तो कोई वाहन नही गया.. हमारे बारे मे आपको उस कार वाले लोगो ने बताया क्या?” त्यांनीसुद्धा मनमोकळेपणाने उत्तर दिलं ” हा दीदी, वो हमारे ही गाव वाले है, बोल रहे थे शायद दीदी की तबियत ठीक नही, इसीलिए शरबत लेकर आया हूं.. आप अपना सामान दे दो.. मे गाडी पर ले जाता हू..” मनातून तर सामान द्यायची फारच इच्छा होत होती मात्र शूलपाणी च्या झाडी मधलं वाक्य सारखं आठवत होतं. “आपल्या कर्माचे ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायचं असेल तर परिक्रमा करू नको” त्यालासुद्धा नम्रपणे नकार देऊन त्याचा निरोप घेतला आणि आम्ही पुढे निघालो.
पुन्हा तासा-दीड तासाने एक मध्यमवयीन स्त्री आणि तिचे यजमान टू व्हीलर वर आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी आमच्यासाठी गूळ, पाणी आणि मुरमुर-याचे लाडू देखील आणले. आता यांना त्या सरबत वाल्या मुलाने सांगितलं असेल… खात्रीच होती आमची तशी. आणि तेही खरंच होतं. गुळ आणि लाडू खाऊन आम्ही त्या दोघांचा निरोप घेतला आणि पुन्हा पुढे निघालो. आपण ज्या गावाला जातो आहोत ते गाव फारच सेवाभावी दिसतंय. त्या गावातली जी जी मंडळी आपल्याला भेटत आहेत ती ती मंडळी आपल्याबद्दल पुढच्यांना सांगतायत आणि आपली सेवा करताहेत… खरंच कमाल आहे!
काल मंदिरात पुजारी महाराजांनी जेवायला वाढलं त्यावेळेस वाटलं होतं आजचा दिवस तर चांगला गेला, पण उद्यापासून परीक्षाच आहे, कारण हा असा भकास रस्ता, सावली नाही की पाणी नाही, उन्हाचा तडाखा, तब्येत सुद्धा व्यवस्थित नाही, अशात कसा निभाव लागायचा? पण आज तर कालपेक्षा ही जास्त सेवा केली जात होती. तासा-दोन तासांनी पाणी, सरबत, लाडू, गुळ…. ऊन लागू नये याची संपूर्ण काळजी घेतली जात होती. असं वाटत होतं ती मैय्या सारखं कोणालातरी पाठवते आहे… माझ्या लेकीची तब्येत बरी नाही तिची काळजी घ्या असं सांगते आहे… आणि गंमत सांगू का… हे अक्षरशहा खरं होतं.
पुन्हा तासा दोन तासात अजून दोघं मुलं आमच्यापर्यंत आलीत. आता त्यांच्याजवळ आमच्यासाठी चहा होता. आणि यावेळी आम्हाला घरी मुक्काम करायचं निमंत्रण सुद्धा मिळालं होतं. “आपको हमारे घर आज विश्राम करना है. हमारी मां ने आप को बुलाया है. अब ज्यादा दूर नही है, घंटा दो घंटा लगेगा. हम आपको देखने आयेंगे” खरंतर एक उलगडा होणं अजूनही बाकीच होतं. त्या दोन मुलांनी सांगितल्याप्रमाणे तासा-दोन तासात आम्ही पाचातलाई या गावाजवळ येऊन पोहोचलो. गावाची सुरुवात झाली तीच अलिशान मोठामोठ्या वाड्यांनी! प्रत्येक वाड्याला भलंमोठं बाहेरचं दार. काही वाड्यांचे दारं उघडी दिसली तेव्हा समजलं आतमध्ये मोठं अंगण आणि अंगणाच्या दुसऱ्या टोकाला घरं… सगळीच्या सगळी घरं पांढऱ्या आणि निळ्या रंगाने रंगवलेली. प्रत्येक घराच्या बाहेर मोठा ऐसपैस ओटा. आपण कुठल्यातरी प्लांड सिटीमध्ये आलो आहोत की काय असं वाटत होतं. आम्ही गावात शिरलो मात्र आपल्याला कुठे जायचंय हेही आम्हाला माहीत नव्हतं. ती दोन मुलं आम्हाला शोधत येणार होती. अभी त्यांची वाट बघत होतो.
बराच वेळ झाला तरी आम्हाला शोधत कोणीही आलं नव्हतं. विसरले असतील कदाचित किंवा काहीतरी अडचण आली असेल… असूदेत गावात तर पोचलो आहोतच आपण… ईथवर मैयानी सोय केली, आता काय करणार नाही? बसू इथेच कुठेतरी थोडा वेळ. असा विचार करत आम्ही एका ओट्यावर बसलो. घरातल्या बाईने आमचं चहापाणी केलं. भोजन प्रसादिच विचारलं. आमच्याच कडे राहा असा आग्रह पण केला. पण माझं मन काही मानेना… एका कुठल्यातरी माईंनी आमच्यासाठी स्वयंपाक केला असणार…. बघुया थोडा वेळ अजून वाट… आम्ही तिथेच बसलो. थोड्याच वेळात ती दोघं मुलं आम्हाला शोधत शोधत आम्ही बसलो होतो तिथे आलीत. त्या घरच्यांचा निरोप घेऊन या दोन मुलांच्या मागे मागे आम्ही चालू लागलो.
अशाच एका भल्यामोठ्या वाड्याच्या दरवाजासमोर आम्हाला उभा करून ती दोघं आत गेलीत. इथून पुढे आमच्या अंगावर अक्षरशहा काटा येणारे प्रसंग एकापाठोपाठ एक घडत घेलेत. घरातली प्रत्येक मंडळी फाटकाशी येऊन आमच्याशी बोलत होतीत, मात्र कुणीही आम्हाला घरात बोलवलं नाही. जी मैया आमच्या घरी या असं निमंत्रण देते, ती मैया समोर देखील आली नव्हती. तिची जाऊ येऊन गेली, तिची मुलगी येऊन गेली, तिची सासू येऊन गेली… पण ही काही आली नाही? असं काय झालं असेल? आताच सांगू म्हणताय…. नाही नाही पुढच्या भागात सांगते… तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२६
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला त्या ओसाड रस्त्याबद्दल सांगत होते. अधेमधे जी काही मंडळी आज मला भेटली त्यांच्या सेवा भावा बद्दल मला फारच आदर वाटत होता. गावातली सगळी मंडळी एकमेकांना सांगून आमच्यासाठी काही ना काही सेवा पाठवत होती. मी मागच्या भागात शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं होतं की आम्ही इथे जात नव्हतो तर आम्हाला इथे आणलं जात होतं. आम्ही फाटकापाशी येऊन थांबलो होतो तरीही घरातली मैयाजी मात्र समोर आली नव्हती. आता पुढे सांगते.
ती दोन मुलं जी आम्हाला अगदी शेवटी बोलवायला आली त्यांच्यामागोमाग आम्ही घराच्या फाटकाशी गेलो. घरातील सगळी मंडळी आम्हाला नर्मदे हर करण्यासाठी बाहेर आली मात्र घरातील मैय्याजी काही आली नाही. आम्ही फाटकाशी येऊन उभे होतो तरीही कोणीही आम्हाला फाटका च्या आत बोलावलं सुद्धां नाही. निमंत्रणाचं घर तर हेच होतं. मी विचारच करत होते तो आम्हाला सेवा देण्यासाठी आलेले नवरा बायको पुढे आले. “अरे हे दोघं पण इथेच आलेले दिसताहेत आपल्या स्वागतासाठी” असा विचार मनात आला तोच ती दोघं म्हणाली… “वही पर रुकिये माताजी. मौसी जी बस आ ही रही है”. तर घरातील मैयाजी ची ही भाची असावी.. म्हणजे हे नातेवाईक आहेत तर. थोड्याच वेळात समजलं की आमची सेवा देण्यासाठी आम्हाला रस्त्यात भेटलेले सर्व जण याच घरची मंडळी होती.
आमची प्रतिक्षा लवकरच संपली आणि घरातील मैयाजी हातात ओवाळणी ची थाळी घेऊन पुढे आल्या. तुकडा पाणी ओवाळून त्यांनी आमची दृष्ट काढली. पाठोपाठ दोन तीन तरुण मुलांनी साड्यांच्या पायघड्या घातल्या. लगेच एका जोडप्याने आमचे पाय धुतले आणि मग पाय घड्यांवरून आम्हाला आत बोलवण्यात आले. हा असा इतका मोठा पाहुणचार पाहून मला सारखं सारखं एकच जाणवत होतं. ही आपली लायकी नाही… आपल्या सोबत जी मैया सातत्याने चालते आहे हे सगळं तिच्यासाठी आहे. ते तिच्या पर्यंत पोहोचू दे ग आई….. खूप भरून येत होतं.
आम्हाला एका खोलीत नेण्यात आलं तिथलं सगळं फर्निचर हलवून खाली सतरंजी आणि त्यावर गाद्या घातल्या होत्या. बाजूलाच एक छोटा टेबल होता त्यावर छोटा आरसा आणि वेणी-फणी चं सगळं सामान ठेवलं होतं. “हमे मालूम है माताजी परिक्रमावासी उच्चासन पर नही बैठते. व्यवस्था मे कुछ कमी हो तो बताईयेगा”. मनात विचार आला; ओसाड रस्ता विश्राम करायला सावली सुद्धा नाही अशा ठिकाणाहून आम्हाला चालायला लागलं म्हणून की काय नर्मदा मैयानी पुढे आमची राजेशाही थाटातील व्यवस्था केली.
आम्ही फ्रेश झालो. चहापाणी झालं. आता आमच्या सायंपूजेची वेळ. घरातल्या मैया जी ने आम्हाला देवघराच्या खोलीत नेलं. “माताजी, बाबाजी, आज से हमारे भगवान जी आपके हवाले. उन्ही के सामने बोल रही हूं. घर मे मेरे नातीन की शादी है. आपको तीन दिन तक यह ही रहना होगा. मेरी नातीन की बिदाई के समय आपके आशीर्वाद की जरूरत है. आप से हात जोड कर यही मांगती हूं कि आप तीन दिन यहीं रुके.” पुढे त्यांनी जे सांगितलं त्यानंतर आम्ही तिच्या विनंतीला टाळू शकलो नाही. ही तिची नात म्हणजे तिच्या मुलीची मुलगी. या माताजींचे जावई फौजी होते. ते काश्मीर मध्ये कुठेशी असताना शहीद झालेत. त्यावेळी ही मुलगी जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल. यांच्या मुलीला काही वर्ष सासू-सासर्यांनी सांभाळले. मात्र सास-यांच्या निधनानंतर घरच्यांचा तिच्याशी वागण्यात फरक पडला. तरीही यांची मुलगी आणि नात दोघींनी कधीच काही तक्रार केली नाही. एकदा ह्या माताजींचा मुलगा आपल्या बहिणीला भेटायला गेला असता त्याला सर्व वार्ता समजली आणि तो या दोघींना घरी घेऊन आला. तेव्हापासून ती इथेच आहे. या मुलीचे तीनही मामा-मामी आपल्या भाचीवर जिवापाड प्रेम करतात. तरीही त्यांना नेहमी एक खंत असते. ह्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळू शकलं नाही याची. याचंच घरी सगळ्यांना वाईट वाटतं. घरातील प्रत्येक जण आपली जबाबदारी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने पार पाडत असलो तरीही या मुलीच्या बाबतीत आता ही सगळ्यांची मोठी जबाबदारी आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने पार पडली पाहिजे यासाठी सगळे झटत आहेत. अशात तुमचं आमच्या घरी येणं हे कुठल्या सौभाग्यापेक्षा कमी नाही. माहेरी जे तिच्या नशिबात होतं ते झालं. तिच्यासाठी अतिशय योग्य घर आम्ही निवडलं आहे आणि ती तिच्या जीवनाची नवीन सुरुवात करीत आहे. अशावेळी तुमचं असणं हे सौभाग्याचे लक्षण आहे. म्हणून तुम्हाला विनंती करते उसकी बिदाई होने तक आप यही रुकिये”
पुढचे तीन दिवस अक्षरशः राजेशाही थाटात गेले. तसं हे गाव फार मोठं नाही. पण या गावात भरपूर श्रीमंती आहे. भले मोठाले वाडे आहेत. एका एका शेतकऱ्याकडे 50 50 एकर जमिनी आहेत. त्यातील काही डूब क्षेत्रात गेल्यामुळे त्यांचा मुहावजा देखील मिळाला आहे. असे असून सुद्धा अजून जमिनी डूब मध्ये गेल्या नसल्या म्हणून त्यावर शेती व्यवस्थितपणे सुरूही आहे. गाई म्हशी, दूध दुभते भरपूर आहे. आणि इतकं असूनही जराही गर्व जाणवला नाही. मनात अत्यंत सेवाभाव आहे. नर्मदामय्याच्या कृपेनेच आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही यावर संपूर्ण विश्वास आणि संपूर्ण श्रद्धा आहे. गावाची संस्कृती अतिशय उत्तम अशी आहे.
या तीन दिवसांमध्ये दोन वेळेची जेवण सोडली तर आम्हाला कितीतरी घरांमध्ये चहापाणी आणि नाश्त्याला निमंत्रणं आलीत. रोज सकाळ संध्याकाळची देव पूजा आमच्या हातून झाली. दाग दागिने, कपडालत्ता, अगदी सेफ्टी पिन पासून तर जावयाच्या शृंगारापर्यंतचा सगळी खरेदी केलेली आम्हाला दाखवण्यात आली. आम्ही आलो त्यावेळी मांडव घालण्याचं सामान येऊन पडलं होतं. त्यातला पहिला बांबू बाबाच्या हातून ठोकून घेतला. घरातलं कोणी काही कामासाठी बाहेर पडत असेल तर आम्हाला सांगितल्याशिवाय जात नसे. अगदी काही आणायचं असेल, कुणाचं औषध आणायचं असेल तरी आम्हाला काही हवंय का याची विचारपूस केली जायची. खरंच मौर्य कुटुंबात घालवलेले ते तीन दिवस अविस्मरणीय आहेत.
ठरल्याप्रमाणे लग्न समारंभ पार पडला. बिदाई झाली. आपल्या आई आणि आजी इतकच दुःख तीन दिवस भेटलेल्या या लेकीला मला सोडून जातानाही होत होतं. “परिक्रमा के बाद हमारे घर भी आना माताजी” ती वारंवार सांगत होती. नवरीचे सासू नणंद ह्या ही येऊन आमंत्रण देऊन गेल्या. या मुलीसाठी मनातून असंख्य आशीर्वाद निघालेत हे काही वेगळं सांगायला नको.
तिची विदाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमची तयारी केली. आम्हाला वेशीपर्यंत सोडायला घरची जवळजवळ सगळी मंडळी आली होती. भरपूर फराळाचे साहित्य सोबत दिलं होतं. वजन खूप वाढलं होतं पण ते सोबत घेतलं नसतं तर ते न घेण्याचं ओझं या सामानाच्या वजनापेक्षा नक्कीच खूप जास्त वजनदार, भारी राहिलं असतं. खांद्यावरच्या ओझ्या पेक्षा मनावरच्या ओझ्याचं वजन जास्तीच नाही का! थोडी वाकडी वाट करून करणपुर या गावाला आता जायचं होतं. तसा पत्ताही सांगितला होता लोकांनी, पण आम्ही रस्ता चुकलो, ते वळण मागे सुटलं आणि करणपुर मधील आश्रमात जाणं काही झालं नाही.
तीन दिवसाच्या आरामा नंतर तब्येतीत बरीच सुधारणा आली होती मात्र उन्हाचा तडाखा जास्त जाणवू लागला होता. मला आता गावांची नावं नीटशी आठवत नाही आणि माझ्याकडे ती लिहूनही ठेवलेली नाहीत. बरंच चालून आल्यानंतर आम्ही एका मोठ्या पुलावर येऊन पोहोचलो. जवळजवळ एक किलोमीटरचा हा पूल आणि आजूबाजूला पाणीच पाणी. हे बॅकवॉटर्स असावं. अजून आम्ही मुंदी ला पोहोचलो नव्हतो. छनेराच्या आसपास असावं. नक्की असं आठवत नाहीये. पण नजर जाईल तितकं पाणी. ईश्वराच्या कृपेने थोड्या वेळाने बरीच शिळाण आली आणि ह्या पुलावरचा आनंद मनसोक्त घेता आला. अन्यथा उन्हाच्या झळांमुळे हवेत असलेल्या पाण्याच्या वाफेने आमच्या जीवाचं निश्चितच पाणी पाणी झालं असतं.
आमचा पुढचा मुक्काम हा अमित तिवारी यांचेकडे होता. ते शाळेत शिक्षक होते. त्यांच्या घरी देखील उत्तम व्यवस्था आणि पाहुणचार झाला. खरं सांगू का हा प्रवास जितका कठीण वाटत होता तितका कठीण तो प्रत्यक्षात नव्हताच. हो, नाही म्हणायला रस्ते अजूनही भकास होते पण या भकास रसत्यावर चालल्यानंतर प्रेमाची फुंकर ही जास्त आनंददायक होती. करत करत आम्ही एका गावात येऊन पोहोचलो. गंमत अशी आहे की यापुढे फार कमी गावांची नावं मला सांगता येतील. डोळ्यासमोर चित्र उभी आहेत पण आतापर्यंत सातत्याने लिहून ठेवलेली वहीच हरवल्यामुळे आता डीटेल्स काही सांगता येणार नाही. असो तर या गावात आल्यावर आम्हाला एक वेगळाच प्रश्न पडला. एका मोठ्या भांडणाला आम्हाला सामोरं जावं लागलं. परिक्रमावासी आणि भांडण? काय घोळ आहे हा? असच वाटत असेल ना तुम्हाला… सांगते पण या भागात नाही सांगणार…
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मौर्य कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. आम्ही इथे आलो नव्हतो तर आम्हाला इथे आणण्यात आलं होतं. आम्ही रस्त्यावरून पायी चालत असताना या घरातली अनेक मंडळी आम्हाला येऊन भेटत आणि आमची सेवा करत होती. या कुटुंबातले तीन दिवस अतिशय आनंदाचे असे झाले होते. प्रेम, आदरातिथ्य, सन्मान हे सगळं मैय्या इतकं भरभरून देत होती, त्या प्रत्येक क्षणाला हे आपण कमावलेलं नसून आपल्या झोळीत घातलेलं आहे याची जाणीव होत होती. जे काही आहे ते तिचं तिला समर्पित हीच भावना मनामध्ये दाटून येत होती. अशाच पद्धतीने पुढे छनेरा येथे तिवारी यांच्या घरातही खूप प्रेम आणि आदरातिथ्य मिळालं होतं. आता पुढे मुंदी गावाच्या जवळ असलेल्या सिंगाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं होतं.
या ठिकाणी दोन मुंदी गावं आहेत असं समजलं. एक देवला खुटला च्या जवळपास आहे तर दुसऱ्या गावाला सिंगाजी मुंदी असं म्हणतात. इथे चारूखेडा येथे संत सिंगाजी महाराजांच्या गुरूंचं, श्री मनरंगगिरी जी महाराजांचं समाधी स्थळ आहे असं समजलं होतं. पण म्हणतात ना योग असेल तरच संत दर्शन देतात. अभी बहुधा तिथून पुढे निघून गेलो आणि नंतर आम्हाला कोणीतरी हे सांगितलं. असो.. आता सिंगाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. मजल दर मजल करत आम्ही चालत होतो. इथे नवीन रेल्वे लाईन बनवण्याचं काम सुरू होतं आणि रेल्वे छोट्याशा टेकड्या वरून घेऊन जाण्यात येत होती. अगदी पुल नाही म्हणता येणार पण असे उंचवटे बरेच होते. बाजूला रस्त्याचा बांधकाम सुरू होतं कदाचित पुढेमागे वरून रेल्वे आणि खालून रस्ता अशा पुलाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हे उंचवटे चढून जाताना फार थकायला होत होतं. आता थोडा वेळ आराम करणं गरजेचं होतं.
चालता चालताच उजव्या बाजूला दोन घरांच्या मधून एक छोटीशी पायवाट जाताना दिसली होती. मी गावाचं नाव विसरलेले आहे. त्या पायवाटेच्या टोकावर मुंदी 10 किमि असं लिहिलं होतं. आम्ही तिथून जायचं ठरवलं. पण इथून जाऊ नका असं आम्हाला सांगण्यात आलं. खरं तर बुखारदास आश्रमात आज आपण राहावं असं वाटत होतं पण इथे आश्रमात कुणीही नाही, सध्या महाराज कुठेतरी बाहेर गेले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं याशिवाय समाधीस्थळावर राहण्याची परवानगी नाही असंही आम्हाला सांगण्यात आलं. तुम्ही जा दर्शन घ्या आणि परत इथेच या. इथून पुढे समोर जाऊन डाव्या हाताला वळल्यावर मुंदी, देवला, खुटला ही गावे लागतात. तोच परिक्रमावासी चा मार्ग आहे त्यामुळे तुम्ही तिथे राहू नका, इथेच कुठेतरी राहा असं आम्हाला सांगण्यात आलं. दहा किलोमीटर जाऊन दर्शन घेऊन पुन्हा परत येण्याची आमच्यात काही ताकत नव्हती. पुढे जाऊन देखील सिंगाजी महाराज समाधी साठी रस्ता आहे असं कळलं, आम्ही पुढे शारदा मंदिराच्या शोधात निघालो.
मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की मला एका मोठ्या भांडणाला सामोरं जावं लागलं ते… तो प्रसंग इथे आला बघा. शारदा मंदिर शोधता-शोधता आम्हाला वाटेत एक माणूस भेटला. त्याने आम्हाला उसाचा रस पाजला. शारदा मंदिराचा रस्ता सांगितला, आणि पुढे हनुमान मंदिराचा ही रस्ता सांगितला. “आपको जहा भी जाना है आप जा सकते हो”. पुढे सिंगाजी महाराजांच्या समाधीला जायचं असेल तर हनुमान मंदिरावरून जावंच लागतं, मग उद्याचं थोडं अंतर कमी करूयात म्हणून आम्ही हनुमान मंदिरात जायचं ठरवलं. शारदा मंदिराचा विचार आता टाळला आणि सरळ हनुमान मंदिरात गेलो. तिथे छान व्यवस्था झाली. खडेश्वरी महाराजांची तिथे समाधी आहे. तिथे अखंड धुनी आहे. जवळजवळ दोनशे वर्ष जुनं हे मंदिर आहे. आमचं संध्याकाळचा पूजा पाठ झाल्यानंतर आता तो भांडणाचा भाग पुढे आला.
मघाशी ज्या माणसाने आम्हाला उसाचा रस पाजला होता आणि शारदा मंदिराचा शिवाय हनुमान मंदिराचा पत्ता सांगितला होता तो माणूस हनुमान मंदिरात आला. “चलो हम आपको लेने आये है, आपका सामान लेलो, शारदा मंदीर जाना है ना?”. आम्ही तर आसन सुद्धा लावलं होतं त्यामुळे आता इथून उठून दुसरीकडे जाणं अशक्य होतं. आणि हा माणूसच म्हणाला होता की तुम्हाला हवं तिथे जा, मग आता हा आपल्याला घ्यायला का आला आहे? आम्ही त्याला अतिशय नम्रपणे नकार दिला. तो शारदा मंदिराचा ट्रस्टी होता, आम्ही शारदा मंदिरातच उतरू असा त्याचा समज झाला होता. तेवढ्यात हनुमान मंदिरातील पुजारी देखील तिथे आले. आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. “मला परिक्रमावासी रस्त्यात भेटले होते मीच त्यांना पत्ता सांगितला म्हणून आता त्यांच्या भोजनाची सोय माझ्याकडे आहे. शारदा मंदिराचा ट्रस्टी हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याला सांगू लागला तर “आमच्याकडे भोजन प्रसादी तयार आहे, परिक्रमावासींनी आसन सुद्धा लावले आहे, तेव्हा आता ते शारदा मंदिरात जाणे शक्य नाही” असं हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याचं मत होतं. या दोघांमध्ये बहुधा नेहमीच अशी भांडण होत असतात असं त्यांच्या भांडणावरून वाटत होतं. दोघंही एकमेकांना वरच्या पट्टीत बोलत होते. यातून काहीतरी तोडगा काढायला हवा होता. यांचा नेहमीचाच तोडगा देखील ठरलेला असला पाहिजे. तुम्ही आरती ला शारदा मंदिरात चला असा आग्रह शारदा मंदिराच्या ट्रस्टीने आम्हाला केला.
कोणाचंही मन मोडायचं नसल्यामुळे मंदिरात आरतीसाठी गेलो. प्रसाद म्हणून समोर जेवायचं ताटच आणून ठेवलं त्यांनी. आता मात्र खरंच पंचाईत झाली. प्रसाद तर नाकारता येणार नव्हतं आणि हनुमान मंदिरात आम्ही जेवणार असं सांगितल्यामुळे भोजन प्रसादि आधीच तयार करून ठेवण्यात आली होती. मग बाबानी यावर चांगलीच युक्ती शोधून काढली. आम्ही दोन दोन घास त्यांच्या समाधानासाठी जेवलो. तिथले कर्मचारी आणि ट्रस्टींना सर्व स्वयंपाक घेऊन हनुमान मंदिरात येण्याचा आता आग्रह धरला. असाच आग्रह आम्ही हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांना देखील केला. खरंतर हे फार मोठं इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे, पण आम्हाला कुणाचंही मन मोडायचं नव्हतं. “हमने आपके शब्दो का सम्मान रखा है, आपके खातिर हम शारदा मंदिर आये है, प्रसाद भी ग्रहण किया है. अब आप सभी हनुमान मंदिर चल के हमारे साथ भोजन कीजिए, वर्ना जो दो निवाले मैया के प्रसाद के खाये है, आज हमारा भोजन हम वही तक सिमीत रखेंगे…” थोडक्यात सगळे एकत्र जेवणार असतील तर आम्ही जेवू नाहीतर आम्ही तुमच्या दारातून न जेवताच निघून जाऊ अशी धमकीच काय ती दिली असं म्हटलं तरी चालेल. दोघांनीही आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि अशाप्रकारे एक मोठं भांडण बाबाच्या युक्ती मुळे संपुष्टात आलं. दोन्ही मंदिरातली पंच पकवान्न मिळून आज दहा पक्वानांचं आम्ही जेवण जेवलो.
आता उद्या सकाळी लवकर उठून सिंगाजी मुंदी ला जाऊन परत यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर उठलो. संपूर्ण सामान् न घेता फक्त पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या. मोबाईल आणि मोबाईल चार्जर घेतले. सकाळी सकाळी लवकर निघाल्यामुळे जरा बरं झालं. ऊन टाकायच्या आत आमचं बरंच अंतर कापून झालं होतं. सगळा सिमेंटचा बांधलेला रस्ता. आजूबाजूला अगदी ओकं बोकं पडलेलं खुलं मैदान. पण तरीही ऊन तापलं नसल्यामुळे या उसाला पाण्याची तीव्रता जाणवत नव्हती.
गणपती चं मंदिर लागलं. तिथल्या पुजाऱ्यांनी आत बोलावून आमचं चहा पाणी केलं. पुढे खूप रंगीबेरंगी असं अजून एक मंदिर लागलं पण कुणाचं ते नीट आठवत नाहीये. आणि पुढे लागलं सिंगाजी मुंदी गाव. इथून पुढे दोन किलोमीटरवर सिंगाजी महाराजांची समाधी आहे. ह्या सिंगाजी मुंदी गावापासून पुढे एक मोठाच्या मोठा पूल आहे. दोन्ही बाजूला नजर जाईस्तोवर अथांग पाणी आणि मधे पूल. त्या पुलावरून आपण सिंगाजी महाराजांच्या समाधी कडे जातो. या पुलावर अगदी चिटपाखरू देखील नाही. संपूर्ण पुलावर आम्ही दोघेच होतो. पुलावर मध्ये मध्ये विश्राम करण्यासाठी काही ठिकाणी बेंचेस लावलेले आहेत. समोर गेल्यावर एक मोठं फाटक. आम्ही गेलो तेव्हा ते फाटक उघडायला वेळ होता. बराच वेळ त्या फटका समोर आम्ही बसून होतो. इथे मात्र आमच्यासोबत जवळपासच्या गावांमधली काही मंडळी आली होती. आज रविवार होता हे त्यांच्याकडूनच समजलं. सुट्टीचा दिवस म्हणून सिंगाजी महाराजांचं दर्शन आणि पिकनिक असा त्यांचा बेत होता. या मंडळी कडून सिंगाजी महाराज समाधी बद्दल एक माहिती कळली. हे स्थान पुनर्निर्मित स्थान आहे. मात्र याच्या पुनर्निर्माणाच्या वेळेस असं काहीतरी झालं की पुनर्निर्माणाचा ठरलेला प्लान संपूर्णपणे बदलावा लागला. असं काही झालं की आपल्याला जाणवतं, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे देखील एक मोठी शक्ती अस्तित्वात असते. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, तुम्ही माना किंवा मानू नका, मात्र वेळ पडेल तेव्हा ती शक्ती आपलं अस्तित्व दाखवते हेच खरं. या पुनर्निर्माणास च्या वेळी असं नक्की काय झालं? आज काही सांगणार नाही मी तुम्हाला… पुढच्या भागात नक्की सांगेन. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२८
नर्मदे हर
आमचा प्रवास आता सिंगाजी मूंदी पर्यंत आला होता. सिंगाजी महाराजांच्या समाधी पर्यंत जाणारा रस्ता मी तुम्हाला सांगितला होता. दोन्हीकडे अथांग पसरलेलं बॅक वॉटर. जणूकाही जिकडेतिकडे नजर फिरे स्तोवर मैयाच मैया. अगदी शांतता भंग करायचा पण जरी कुणी घेतला तरीही ते शक्य होणार नाही, इतकी कमालीची शांतता. मैयाच्या पाण्यावर मजेत आनंदात हेलकावे घेणार्या लाटा, त्यातून मधेच मान वर करून बघणारे छोटे-छोटे मासे, आणि त्यांना पकडायला येणारे वेगवेगळे पक्षी…. हा सगळा खेळ बघत बघत, बघत बघत, आम्ही मुख्य द्वारावर पोहोचलो आणि ती ती गोष्ट समजली जी मी तुम्हाला मागच्या भागात सांगणार होते, पण सांगितली नव्हती. आता सांगते.
या भागात संत सिंगाजी महाराजांचं खूप नाव आहे. अनेकांना अनेक अनुभूती सुद्धा आहेत. खरंच आश्चर्य याचं वाटतं की सियाराम बाबा झालेत, सिंगाजी महाराज झालेत, असे कितीतरी संत होऊन गेले ज्यांच्या बद्दल त्यांच्या त्यांच्या प्रदेशा व्यतिरिक्त बाहेर कुणाला माहीतच नाही. आणि जेव्हा मध्यप्रदेशा बाहेरच्या माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला या संतांबद्दल माहिती कळते तेव्हा खरच वाटतं, संत हा फक्त संत असतो… त्या संताची साधना, त्या संताचा त्याच्या ईश्वरावरचा विश्वास, त्याच्या ईश्वराचं त्याच्यावर असलेलं प्रेम, आणि जनमानसाचं कल्याण याव्यतिरिक्त या संतांना काहीच नको असतं. हे संत स्वतःसाठी कधीच काही करत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी जे काय करतो तो ईश्वरच करतो.. सिंगाजी महाराजांच्या समाधीची ची गोष्ट घ्या ना!
मैया वर बांध बांधायचं ठरलं, तसा बॅकवॉटरचा एरिया निश्चित करण्यात आला. या क्षेत्राला डूब शेत्र म्हटल्या जातं. इथे असलेली वस्ती, घरदार, जंगलं मंदिर, सगळं काही पुनर्स्थापित करण्याची काम सुरू झालीत. ठरल्याप्रमाणे सगळं काही पुनर्स्थापित झालं सुद्धा. त्यांच्या जागा बदलण्यात आल्या. मात्र सिंगाजी महाराजांची समाधी तिथून दूर होण्यास तयारच नाही! अगदी अथक प्रयत्न करून झाल्यानंतरसुद्धा सिंगाजी महाराजांची समाधी त्या जागेवरून दूर हलवू शकण्यात सरकार अयशस्वी ठरलेले आहे ते आजतागायत! मग आता काय, सिंगाजी महाराजांचा भक्तवर्ग समाधी पाण्याखाली जाऊ द्यायला तयार होईना… मग कुठेच नसलेला वेगळाच प्लॅन तयार करण्यात आला.
ज्याठिकाणी सिंगाजी महाराजांची समाधी आहे तिथूनच, चारही बाजूंनी कितीतरी फूट उंच भिंती उभारण्यात आल्या. गोलाकार विहिरी सारखं स्ट्रक्चर तयार झालं. त्याच्या आत समाधी. विहिरी सारख्या दिसणाऱ्या इमारतीची उंची ही बॅकवॉटर नंतर साठलेल्या पाण्याच्या पातळीपेक्षा उंच असेल याची खबरदारी घेतली गेली. सिंगाजी मूंदी गावापासून या समाधी क्षेत्रापर्यंत एक ते दीड किलोमीटर चा मोठा पूल बांधण्यात आला. मघा मी ज्या पुला बद्दल बोलत होते त्याच्या दोन्ही बाजूला अथांग मैयाच बॅकवॉटर पसरलेलं दिसतं तोच हा पूल. सिंगाजी महाराजांच्या जिवंत समाधीतून त्यांना हलवण्यात येऊ नये, त्यांच्या चिर साधनेत व्यत्यय येऊ नये याची जणू ईश्वरानेच घेतलेली ही काळजी. सिंगाजी महाराजांना त्यांच्या नर्मदा मैयापासून दूर करण्याची शक्ती कुणातच नाही! इतकच काय तर स्वतः नर्मदा मैयाने सिंगाजी महाराजांना स्वतःच्या कुशीत ठेवलेलं आहे… ! मला शूलपाणेश्वर मंदिराची आठवण झाली. जेव्हा शूलपाणेश्वराचं मंदिर पुनर्स्थापित करण्यात आलं त्यावेळेला अकरा फूट खोल खोदून झाल्यानंतर देखील स्वयंभू असलेलं शिवलिंग तिथून काढून पुनर्स्थापित करता आलं नव्हतं. आजही ते शिवलींग तसंच जुन्या मंदिराच्या ठिकाणी नर्मदेच्या तळाशी विसावतं आहे. पुनर्स्थापित मंदिरात दुसर्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सिंगाजी महाराजांचे दर्शन घेऊन, नयनरम्य परिसराचा आनंद घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार होतो. तिथेच पिकनिक साठी अजून एक ग्रुप आला होता. त्यांनी आम्हाला भोजन प्रसादिचा आग्रह केला. पुरी, बटाट्याची भाजी, लिंबाचं लोणचं आणि जिलबी असा भोजन प्रसादिचा आस्वाद घेऊन नंतर थोडावेळ मैयाच्या सान्निध्यात आराम केला, आणि संध्याकाळच्या आत पुन्हा मुक्कामी पोचण्याची तयारी केली. मगाशी पुलावरून येताना त्या पुलाबद्दल मनात वेगळे असे काहीच भाव नव्हते, मात्र आता त्या पुलाचं महत्त्व समजत होतं. सिंगाजी महाराजांची भक्त मंडळी आणि सिंगाजी महाराज यांच्यातला दुवा म्हणजे नर्मदामैया, आणि तिच्या बॅकवॉटर्स वर बांधलेला हा पूल.. एक वेगळी दिशा दर्शवित असल्यासारखा भासला. पुलाच्या एका बाजूला अविरत साधनेत मग्न सिंगाजी महाराज, त्याचं चहूबाजूने रक्षण करणारी नर्मदा मैया, तिथला आनंददायी एकांत, तिथलं मैया मध्ये सामावून जाण्याला प्रवृत्त करणारं वातावरण…. आणि दुसरीकडे मैया जवळ, तरीही मैया पासून बरच लांब, सिंगाजी महाराजांच्या आशीर्वादात असलेलं तरीही, प्रारब्धाच्या संसार सागरात संपूर्णपणे बुडालेलं असं एक वेगळं विश्व असल्यासारखं वाटत होतं… या दोन विश्वाला जोडणारा हा पूल होता. खरंतर या पुलाला नक्की काय म्हणावं हे समजतच नव्हतं. आणि खरं सांगू आता माझी अवस्था अगदीच वेगळी होती. न मी पुलाच्या या काठावर होते न मी पुलाच्या त्या काठावर होते… तो पूल, त्याच्या मधोमध उभी असलेली मी, माझ्या दोन बाजूला नर्मदामैया, पाठीशी सिंगाजी महाराज, आणि समोर प्रारब्ध सागरातलं ते विश्व. गंमत म्हणजे माझे पाय आपोआप त्या विश्वाकडे पडत होते… प्रारब्ध सागरातलं विश्वच ते, माझे भोग भोगणं शिल्लक आहे याची आठवण मला मैय्या आणि सिंगाजी महाराज करून देत होते…
आम्ही मुक्कामी परत पोचलो. उद्याच्या प्रवासाची तयारी केली आणि ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघालो. आता सगळा डांबरी रस्ता. नाही म्हणायला वाहनांची ये-जा होती. उन्हाचा खूपच त्रास होत होता. जसजसे दिवस जात होते तसं तसं मन भारावल्यासारखं होत होतं. कळतं पण वळत नाही अशी अवस्था होत होती. आता आमची परिक्रमा लवकरच पूर्ण होणार होती. परिक्रमेत ले सगळे दिवस आठवले तर मैयानी शिकवलेली एक एक शिकवण, तिची उजळणी, आणि तिची अंमलबजावणी करण्याची ही वेळ. पण माझ्या मनात भलतच काहीतरी सुरू होतं. दिलेल्या शिकवणीच्या पार पार दूरचं…. गंमत म्हणजे जसजसं एकेक गाव मागे पडत होतं तसं माझ्या या अवस्थेचा आवेग वाढत जात होता. असं नक्की काय होत होतं मला?.. नाही म्हणायला तब्येतीचा थोडा त्रास होत होता, पुन्हा अंगावर छाले येऊ लागले होते, उष्णतेचा त्रास होत होता, ऊन लागत होतं, पण ही अवस्था म्हणावी तितकी वाईट नव्हती… कारण ही फक्त शारीरिक अवस्था होती… माझ्या मनात जे सुरू होतं ते नेमकं काय होतं… ते असं वेगळं का होतं? मला खरंतर अजूनही समजत नव्हतं, पण समजलं हळू हळू. ते नक्की काय होतं ते मी तुम्हाला या भागात सांगणार नाहीये… पुढच्या भागात सांगते तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १२९
नर्मदे हर
मागच्या भागात आम्ही तुम्हाला सिंगाजी महाराजांच्या समाधी बद्दल सांगितलं होतं. मैया च्या कुशीत सिंगाजी महाराजांची कशी अविरत साधना अजूनही सुरू आहे हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. सिंगाजी मुंदी गावापासून तर समाधी पर्यंतचा पूल आहे त्या पुलाबद्दल माझे बदललेले विचार हेही मी तुम्हाला मागच्या भागात सांगितले होते. प्रारब्ध विश्वाकडे माझी होत असलेली वाटचाल सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. जसजसे दिवस जात होते तसतशी माझ्या मनाची एक वेगळीच अवस्था होत होती त्याबद्दल आपण मागच्या भागात बोलत होतो. आता पुढे सांगते.
ऊन वाढत होतं तशी मनाची तळमळही वाढत होती.अगदी काहीच दिवसात आम्ही ओंकारेश्वर ला पोहोचणार होतो. परिक्रमा पूर्ण होण्याचा आनंद होत होताच, मात्र इतके दिवस मैयाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर, तिने दिलेल्या इतक्या शिकवणी आणि अनुभवानंतर तिला सोडून जायची अजिबात इच्छा होत नव्हती. दुसरीकडे आई वडील, नवरा, लेकरू या सगळ्यांची भेट होणार होती. आनंद गगनात मावेनासा होता, तरीही मैय्याला सोडून जाण्याचं दुःख मोठं का आप्तेष्टांना भेटण्याचा आनंद मोठा हेच समजत नव्हतं. जे समोर येईल ते स्वीकार करायचं, ही मैयाने दिलेली शिकवण अमलात आणायची हीच वेळ होती. मनात प्रचंड घालमेल होत होती. एका लेकीला आईपासून दूर व्हायचं नव्हतं, आणि एका आईला लेकरा पासून दूर राहायचं नव्हतं. पण शेवटी आई ती आईच असते, आपल्या लेकरासाठी आई अगदी काहीही करू शकते. निर्णय मला माहीतच होता, स्वीकार्य ही होताच, तरीही घालमेल सुद्धा होतीच. महेश्वरला साधू महाराजांनी बोललेले वाक्य मला सारखं आठवत होतं. ईंदोरला शिफ्ट होण्याचा मिस्टरांनी घेतलेला निर्णय देखील मला माहित होता. पण माझं येणं अजूनही नक्की नव्हतं. मुलाचं शिक्षण पूर्ण व्हायचं असल्याने कदाचित मी त्याच्या सोबत नागपूरलाच असणं देखील अनेक पर्यायांपैकी एक पर्याय होता. मी जोवर घरी जात नाही तोवर अजून काहीही नक्की नसणार होतं.
देवला, खुंटला, डुडगांव… एकेक गावं मागे पडत होती. विचारांची गाडी मात्र पार नागपुर पर्यंत गेली होती. आता सगळा डांबरी रस्ता होता. अधे मध्ये छोटी छोटी दुकानं लागत होती. उसाचा रस, चहा समोसा, अशी सेवा अनेंकाकडून होत होती. ऊन असलं तरीही आम्ही चालतच होतो. असं का करत होतो देव जाणे, पण कधी एकदा ओंकारेश्वर ला पोहोचतो असं होत होतं. आजचा दिवस जरा विचित्र आणि शांत गेला. गावाचं नाव आठवत नाही, पण आम्ही एका हनुमान मंदिरात मुक्काम केला. तिथल्या पूजा-यांनी आमच्या भोजन प्रसादिची व्यवस्था केली. मंदिर अगदी छोटं होतं. बाजूच्या घरामध्ये अंगणातच टॉयलेट बाथरूम बांधलेले होते, त्यामुळे उद्या सकाळच्या आंघोळ पाण्याची सोय झाली होती. उद्याचा दिवस इथेच थांबण्याचा हट्ट पुजाऱ्यांनी केला आणि आम्ही ही तो मान्य केला त्यावेळी उद्या गुढीपाडवा आहे याची कल्पना नव्हती. रात्री झोपताना देवळातल्या कॅलेंडर वर लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं. पण आता काही पुजारी आपल्याला जाऊ देणार नाहीत हे माहीत होतं. दुसऱ्या दिवशी मंदिराच्या स्वच्छतेपासून, तर शेजारी राहणाऱ्या शर्मा मैयांच्या च्या घरी प्रसाद तयार करण्यापर्यंत, गुढी उभारण्या पासून तर नैवेद्या पर्यंत सगळ्याच कार्यात त्यांचा हातभार लागल्यामुळे आनंद झाला. मनाची घालमेल जरा कमी झाली. नवीन वर्षाची सुरुवात आनंदी झाली. आता मैय्याच्या शिकवणीप्रमाणे ह्या आनंदाचा उपभोग घ्यायचा, आणि समोर येणाऱ्या सत्याचा स्वीकार करायचा, हेच महत्वाचं. शर्मा मैया निरोप देताना एक वाक्य बोलून गेल्या.. म्हणाल्या, “ओंकारेश्वर पहुच जाओगी तो परिक्रमा पूर्ण हो जायेगी, लेकिन खत्म नहीं होगी…वह तो अब शुरू हो रहीं है”.. शर्मा मैयांनी २०११ मध्ये पायी परिक्रमा केली होती. त्यांचे काही अनुभवही सांगितले होते, मात्र हे वाक्य त्या अतिशय आत्मविश्वासाने आणि स्वानुभवाच्या जोरावर सांगत होत्या हे लक्षात येत होतं…. खरंच झालं ही असंच आहे..आज, म्हणजे एप्रिल २०२१ मध्येही, म्हणजेच परिक्रमा पूर्ण होऊन तीन वर्ष झाली आहेत तरीही मी अजूनही परिक्रमेत असल्यासारखं मला वाटत असतं. तुमच्या समोर ज्या वेळेला परिक्रमेचा अनुभव लिहीत असते त्यावेळेला मीही परिक्रमेतच असते. शर्मा मैया म्हणतात ते मला आज पटतं आहे.
आता दोन दिवसात आमची परिक्रमा पूर्ण होणार होती खरी पण मैयाची लागलेली ओढ काही संपणार नव्हती. इतके दिवस मैयाचं प्रत्यक्ष सानिध्य मिळत होतं, आणि आता तिच्या अप्रत्यक्ष सान्निध्याची प्रचिती येणार होती. मैया आधीही होती, परिक्रमेत तर तिची सोबत सातत्याने जाणवत होती, आणि पुढे ही ती असणारच आहे… मात्र आधी तिची सोबत ओळखण्याची माझी कुवत नव्हती. परिक्रमेत तिने जे संस्कार केलेत त्यानंतर तिच्यावरचा विश्वास, प्रेम, तिच्याबद्दलची आपुलकी याची मला जाणीव होऊ लागली आहे. मैया आता कायमच सोबत असणार आहे. मैय्या सोबत असली की शुचिता आलीच, मैय्या सोबत असली की स्वीकार आला, मैय्या सोबत असली की मनाचा खंबीरपणा जो एका विशिष्ट ओलाव्याच्या आवरणात जपून ठेवल्या सारखा वाटतो, तो ही आलाच…. खरं सांगायचं झालं तर मैया सोबत असताना इतर कशाचीही कुणाचीही गरजच भासत नाही. असं असलं तरीही सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, गोष्टीचा, प्रसंगाचा, प्रारब्धाचा, काहीतरी रोल आपल्या आयुष्यात आहे हे कुठेतरी मनाच्या तळाशी माहित असतं. मैय्याच्या भोवताल प्रदक्षिणा करण्याव्यतिरिक्त सगळ्या अवस्था सारख्याच आहेत असं मला वाटतं. त्यामुळे शर्मा मैयाचं वाक्य अगदी मनापासून पटलं. नर्मदा मैया भोवताल केलेली शारीरिक प्रदक्षिणा आता पूर्ण होणार होती मात्र संपणार निश्चितच नव्हती. कारण ही शरीराने घातलेली प्रदक्षिणा जरी पूर्ण होत असले तरी मग मात्र आयम नर्मदामय्याच्या अवतीभवती असणार होतं… आता मानसिक परिक्रमेची सुरुवात होती. या मानसिक परिक्रमेला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. त्याच प्रमाणे या परिक्रमेला कुठलाही अंत देखील नाही. कुठलेही नियम नाहीत. दोनच गोष्टी महत्वाच्या, मी आणि माझी नर्मदामैया. हे असे सगळे विचार मनात घोळत असताना काल पर्यंतची होत असलेली घालमेल संपूर्णपणे निवळून पडली होती. शर्मा माताजींचे एकच वाक्य या घालमेलीला दूर करण्यासाठी परिपूर्ण होतं. आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता ओढ लागली ती अंमलेश्वराची. जवळ असलेल्या नर्मदामय्याच्या कुपी मधलं जल त्या ईश्वराला चढवायचं, परिक्रमेची सांगता करायची… ऋणमुक्तेश्वराचं दर्शन घ्यायचं, या कालावधीत अनेकांनी केलेल्या ऋणांबद्दल त्यांचे आभार मानायचे, ते ऋण चुकवण्याची संधी मागायची, समोर असलेल्या वाटेचा स्वीकार करायचा आणि पुढे पाऊल टाकायचं… अशी छान कोरी पाटी घेऊन आम्ही ओंकारेश्वर च्या दिशेला जाऊ लागलो.
एक मात्र छान समजलं. ज्या वेळेला मनाच्या पाटीवर काहीही लिहिलेलं नसतं त्यावेळेला पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद हा कितीतरी पटीने जास्त असतो. पाटीवरची अक्षरे नीट पुसल्या गेली नाहीत तर नवीन अक्षरं लिहिल्यानंतर सुद्धा ती जूनी अक्षरं दिसत राहतात. मात्र पाटी स्वच्छ पुसून घेतली तर नवीन लिहिलेली अक्षर ताजीतवानी आणि ठळक दिसतात तसंच काही… फक्त ही पाटील पुसता येणं आवश्यक… माझ्या मनातल्या घालमेलीची ही पाटी बऱ्यापैकी पुसल्या गेली असल्यामुळे समोर आलेल्या क्षणांना दिव्यत्वाचं वरदानच मिळालं. झपाझप पावलं उचलत आम्ही शिव कोठी पर्यंत येऊन पोहोचलो. आता अवघ्या काही किलोमीटरवर ओंकारेश्वर. दुपारचे चार सव्वा चार झाले होते. खरं तर आज शिव कोठे ला मुक्काम. आज चालूनही बरंच झालं होतं… पण समोरून ओंकारेश्वराची हाक ऐकू येत होती, आणि दुसरीकडे आश्रमातल्या मंडळींची विनवणी… “अब तो आ गये हो माताजी, अब रुक जाओ सुबह चले जाना एक दिन और सही…” बाबाचं मन मात्र अजिबात थांबायला तयार नव्हतं… “अगं लगेच निघालो तर तासा-दीड तासात पोहोचू सुद्धा आपण”.. मला मात्र दोन्ही मान्य होतं… पण निर्णय माझ्यावर सोपवण्यात आला होता… आणि असं काही तरी झालं की मला तात्काळ निर्णय घ्यावा लागला. माझ्यासमोर एक दिव्य क्षण माझी वाट पाहत होता. आम्ही त्या दिव्य क्षणाला सामोरे जाण्यासाठी उत्सुक होतो. पण या भागात सांगणार नाही… आता परिक्रमेची सांगताच काय ती सांगेन… तोवर नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १३०
मागच्या भागात आपण शिव कोठी पर्यंत पोहोचलो होतो. आता ओंकारेश्वर अगदीच काही किलोमीटरवर होतं. डोळ्यासमोर दिसत होतं. शिवकुटी येथे मुक्काम करायचा, नाही करायचा नाही यावर माझी आणि बाबांची चर्चा सुरू होती. एक फोन वाजला. चटकन निर्णय घेण्यात आला. जरा उशीरच झाला होता, तरीही निर्णय घेतला. आश्रमातल्या महाराजांनी सुद्धा अनुमती दिली. पुन्हा एकदा चविष्ट वाफाळदार चहा आमच्या समोर आला. आमच्यात पुन्हा एकदा नवीन उत्साह संचारला गेला… आम्ही सामान उचललं आणि ओंकारेश्वर च्या दिशेने पावलं ओढल्या गत चालू लागली.
वाटेतलं सगळंच आपलं आपलं वाटू लागलं. बाजूच्या काही शेतांच्या पलीकडे नर्मदा मैयाचा प्रवाह होता, जणू हात धरून आई लेकराला घेऊन जाते तसं काहीसं वाटत होतं. आज परिक्रमा पूर्ण होणार होती. परिक्रमा ज्या वेळेस सुरू केली त्यावेळेस ते सगळे प्रसंग एक एक करून डोळ्यासमोर उभे राहात होते. काळ कसा सर्कन पुढे लुटल्या जातो नाही? परिक्रमा उचलतांना संकल्प घेतेवेळी मनात कितीतरी प्रश्न होते, कितीतरी कुतूहल होतीत, आज पाच महिन्यांनी त्याच ठिकाणी परत येताना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. त्यावेळी नर्मदे हर या जपाची सवय करावी लागत होती, आता श्वासाश्वासात नर्मदे हर भिनलेलं आहे. त्यावेळेला ओंकारेश्वर ही भूमी अतिशय नवीन होती… आज मात्र वेलकम होम बॅक म्हणायला इथली एक एक इमारत, इथल्या घाटाची एक एक पायरी माझी वाट बघत होती. मी मघा सांगितल्याप्रमाणे आम्हाला उशीरच झाला होता. साधारण दीड तासात आम्ही ओंकारेश्वराच्या कमानी जवळ येउन पोहोचलो. इथून एखाद दोन किलोमीटर पुढे गजानन धाम असणार. आता मात्र आमच्या पायांची चाल फारच मंदावली होती. थोड्याच वेळात आमचं परिक्रमावासीपण संपणार होतं… आम्ही पुढे पावले टाकत होतो, तितक्यात तिथे असलेल्या एका उसाच्या रसाच्या दुकानदाराने आवाज दिला… “नर्मदे हर बाबाजी आओ ज्यूस पी लो… पूरी हो गई परिक्रमा?…. अब तो सफेद चोला उतर जायेगा, उसके पहले आवो ज्यूस पी लो…”
आम्ही परिक्रमा संपवून येत आहोत हे त्यांनी ओळखलं. पांढरी वस्त्रे उतरणार आणि आमचं परिक्रमावासीपण देखील उतरणार होतं. अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी मैयाचा प्रसाद म्हणून आम्हाला एका ताक वाल्यांनी ताक देऊ केलं होतं, आज परिक्रमेची सांगता उसाच्या रसाने झाली होती. गंमत आहे की नाही… तेव्हा माझ्यासोबत ताकाच्या मधुर रसासोबत एक आंबटपणा देखील होतं… आज मात्र सगळा चोथा बाजूला सारलेल्या गोड मधूर उसाच्या रसाने परिक्रमेची सांगता होत होती. हा केवळ योगायोग आहे असं मला वाटत नाही. माझ्यामधल्या अपरिपक्वतेवर सातत्याने प्रक्रिया करून माझ्यामधील शक्य तेवढा चोथा दूर काढण्यात आला होता. माझ्या मधली मधुरता मला वेगळी काढून दाखवण्यात आली होती. आणि आता ती सांभाळून ठेवणं, अजूनही जी अशुद्धता माझ्यामध्ये आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करत राहणं हे माझ्यासाठी शिल्लक ठेवलं होतं. शरीरावरचं पांढरं वस्त्र जरी उतरणार होतं तरी ते मनावर कायम कसं राहील याची जबाबदारी मैया ने आता माझ्यावर टाकली होती. माणूस म्हटलं की चुका करणारच… त्याला कोणीही अपवाद नाही… मी तर मुळीच नाही.. मात्र एक नक्की, प्रामाणिकपणा….स्वतःशी, गुरुंशी आणि मैया शी… समर्पण, तेही स्वतःशी गुरूंशी आणि मैया शी… इतकच जरी मी सांभाळलं, तरीही माझ्या चुका पदरात घालून घ्यायला, त्या निस्तरून न्यायला, त्यातून मला सावरून घ्यायला माझी मैया सतत माझ्या पाठीशी आहे ही मला खात्री आहे. इथून परतत असताना, माझ्या हातून जे काही सुकर्म कुकर्म होणार असेल ते सर्व “नर्मदे हर” म्हणून तिच्या कुशीत विसावणार आहे हे निश्चित…. त्यामुळे मला कशाचीच काळजी किंवा चिंता असणार नाहीये…. आता फक्त एक पाऊल उचलायचं आणि पुढे टाकायचं… दिशा दर्शन ती करणारच आहे….
उसाचा रस पिऊन झाल्यावर पावलं अधिकच रेंगाळली. आता अंधार पडायला लागणार होता. सरळ घाटावरच जायचं ठरलं. आज खूप दिवे सोडावेसे वाटत होते. मला वाटेल आणि माझी इच्छा पूर्ण होणार नाही? आम्ही सरळ गोमुख घाटावर गेलो. खूप सारे दिवे विकत घेतले आणि हळूहळू एकेक दिवा मैया मध्ये सोडत गेले. त्या एकेका दिव्या सोबत एक एक अनुभव, परिक्रमेला एक एक दिवस, चांगल्या वाईट विचारांच्या शृंखला, आपल्या हातून घडलेले चांगले वाईट कर्म, सगळं सगळं मैयाला अर्पण होत होतं. दिव्याच्या ज्योती सोबत ते सगळेच आधी उजळून आणि नंतर जळून जात होतं. प्रत्येक दिव्याकडे आम्ही दोघही अतिशय निर्विकार मनाने नुसतच बघत बसलो होतो. मन कधी संपूर्ण रिकामं असू शकतं का, याचं होकारार्थी उत्तर मला मिळालं होतं. इथे खरंतर सगळंच संपूर्ण झालं होतं. मी पुर्ण झालं होतं हा शब्द वापरणार नाही संपूर्ण झालं होतं हा शब्द वापरेन… कारण संपूर्ण या शब्दात स्वयंपूर्णतेचा आभास जाणवतो मला….
बऱ्याच वेळाने आम्ही तिथून उठलो आणि गजानन धाम च्या दिशेने चालू लागलो. मला वाटतं माझ्यापेक्षा बाबा चटकन ऍडजेस्ट होणारा आहे. मी अजूनही त्या दिव्यांच्या विचारातच होते. बाबा मात्र अचानक एका दुकानापाशी थांबला. ” अगं मस्त खमंग वास येतोय ना, चल गरम-गरम जेऊन घेऊया काहीतरी, आपल्याला उशीर झालाय आधीच, आश्रमाचे जेवायची वेळ तरी असेल तर पुन्हा परत यायला लागेल… चल नं भूक पण लागली आहे”… खूप दिवसांनी आम्ही विकत घेऊन तंदुरी रोटी, दाल फ्राय आणि जीरा राईस असं जेवलो”. जेवण झाल्यावर आश्रमात गेलो. छान फ्रेश झालो आणि आराम केला. उद्या सकाळी लवकर उठायचं होतं. मांधाता ची परिक्रमा करायची होती. ओंकारेश्वर अमलेश्वर आला जल चढव्हायचं होतं. ऋणमुक्तेश्वराला प्रार्थना करायची होती. मन भरून कडकडून मैयाला मिठी मारायची होती. संकल्पपूर्ती पूजा करायची होती आणि हे सगळं नऊ वाजताच्या आत करायचं होतं. आज संध्याकाळी चा फोन आला होता, त्यात काही दिव्य क्षण कैद झाल्याचे मी तुम्हाला सांगितलं होतं… ते क्षण आता पुढे येणार होते. उद्याची सकाळ माझ्यासाठी निश्चितच वेगळी सकाळ होती. ती नक्की काय होते ते पुढच्या भागात सांगते. आजचा भाग लहान झाला असेल कदाचित, आणि पुढे चा शेवटचा भाग फारच लहान असेल…. पण तरीही अजून एक रविवार तुमच्याशी संपर्कात राहता येईल याचं समाधान वाटतं. म्हणूनच हा भाग येथे संपवते… तोवर नर्मदे हर.
डॉ. सुरुचि नाईक
© डॉ. सुरूची अग्निहोत्री नाईक – (रेवारुचि सुरुचि) - विदर्भ गट*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीभाषामाझीशाळा*