महेश सावंत - नर्मदा परिक्रमा
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
महेश सावंत - नर्मदा परिक्रमा
महेश सावंत - नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा - महेश सावंत
।।नर्मदा परिक्रमा 1।।
नर्मदे हर! १नोव्हेंबरला परिक्रमा उचलण्याची माझ निश्चित झाले. पुण्यात आलो. शंकर महाराजांचा आशीर्वाद घेतला. तेथून कडगंचीला गेलो. जिथे "गुरू चरित्र" लिहिले गेले,तिथे ३दिवसांचे पारायण केले. डॉ. होनकाळसें यांनी केलेल्या"दत्तयागा" मध्ये सहभागी झालो. त्यांच्या बरोबर गाणगापूरला जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले.तिथे महाभिषेक व रूद्राभिषेक झाला. आणि मी ओंकारेश्वरला निघालो.
ओंकारेश्वरच्या "गजानन महाराजांच्या"आश्रमात उतरलो. महाराष्ट्रातील अनेक परिक्रमा वासी इथे उतरतात.त्यांची ओळख झाली. आणि कन्या पूजन- कन्या भोजन करून १नोव्हेंबरला आम्ही ८ जणांनी सुनील शास्त्री कडून एकत्रित संकल्प सोडून परिक्रमेला सुरुवात केली.
सात जण मोरटक्का पर्यंत रस्त्याने निघाले.मी मय्याचा किनारा धरला. प्रथम मार्कँडेय आश्रमात गेलो आणि दत्तगुरूंचे दर्शन घेतले.आश्रमांत भोजनासाठी थांबलो. तर दत्तगुरूंच्या नैवेद्याचे ताट मला प्रसाद म्हणून दिले!
११.३० वा. आश्रमातून निघालो.२तासाने मौनी बाबांच्या आश्रमात पोहचलो. तिथे थोडा वेळ थांबून पुढे निघालो. आता सोबत व्रूंदावनचे तीन साधू होते. काही वेळाने एक बिकट वाट लागली. एका बाजूला डोंगर कडा व दुसऱ्या बाजूला खाली खोल मैय्या!तोल गेला तर जलसमाधी नक्की!आजूबाजूला वाढलेले गवत व निसरडे दगड!दहा मिनिटाचीच वाट पण थरारक!पार केली . पण त्या दरम्यान माझे कमंडलू पडले , सर्व पाणी सांडले. खूप तहान लागली होती. पायात मांड्यांना गोळे भरले होते. दम लागला होता. आणि जीव कासाविस झाला होता. काही वेळेत एक आश्रम लागला आणि तेथे पाणी प्यायलो.जीवात जीव आला.
पाच वाजता मोरटक्क्याला "भक्तराज"आश्रमात पोहचलो.सकाळी ८ जण निघालो होतो, त्यापैकी आम्ही ५ जण आश्रमात पोहचलो.तर तिघे वाट चुकले! रात्री साग्रसंगीत "तुलसी विवाह" पार पडला. चितळे मैय्यांजींनी छान मार्गदर्शन केले.
रात्री पंचपक्वांनांचे जेवण झाले. आणि परिक्रमेचा पहिला दिवस पार पडला.
नर्मदे हर!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग-२
सकाळी चितळे मैय्याजींनी किनाऱ्याचा रस्ता दाखवला. मैय्या किनाऱ्याने जाताना खरच आनंद वाटतो. वाटेत एक बाबाजी भेटले. म्हणाले, पुढे आमचा आश्रम आहे. चहा घ्या ,मगच पुढे जा.हो म्हणालो. पण गेलो नाही. बडी आली गावातून थेट "टोकसर"गाठले. तर तेथे पुष्कळ गर्दी! कारण इथे दशमी ते (त्रिपुरारी)पौर्णिमा या सहा दिवसात इथे पंचक्रोशी परिक्रमा करतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होती. इथली व्यवस्था एक माजी आमदार बघत होते. त्यांनी माझी चहा-बिस्किटची सोय केली.
तेथून निघालो आणि पितनगरला हनुमान मंदिर मध्ये थांबलो.तेथे काही संन्याशी परिक्रमा वासी होते व ते तेथे काही दिवस थांबणार होते. दुपारी भोजन झाल्यावर तेथील बाबाजींनी जगदीश मढीच्या जगदीश महाराजांची गोष्ट सांगितली.
जगदीश महाराज हे रोज ५०किलो आटा माशांना खिलवतात. त्यांच्या आश्रमात रोज शेकडो लोक जेवण करतात. अन्नक्षेत्रा मुळे त्यांचे वर दुकान दाराचे कर्ज झाले होते. एके दिवस दुकान दाराने ऊधारी देण्यासाठी नकार दिला. महाराज परत गेले.
त्या संध्याकाळी एक म्हातारी त्या दुकानात गेली. आणि दुकान दाराला म्हणाली, "मैं जगदीश की माँ हूँ। बताओ ऊसके उपर कितना कर्जा है।" तिने सर्व ऊधारी चुकवली.
दुसऱ्या दिवशी जगदीश बाबा दुकान दाराचे पैसे घेऊन गेले. तर दुकान दार म्हणाला, काल तुमच्या आईने तुमची सर्व ऊधारी चुकवली.
जगदीश बाबांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. कारण प्रत्यक्ष मैयाने त्यांचे कर्ज फेडले हे त्यांनी ओळखले.
मैय्या आपल्या लेकराला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. फक्त आपली निष्ठा हवी!
महेश सावंत
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ३
सकाळी रावेर खेडा वरून निघालो. रात्री नाहरू पटेल यांच्या "माँ गंगा आश्रम"मध्ये होतो. तेथे सियाराम बाबांचा फोटो बघितला. पटेल म्हणाले, हे माझे गुरू. इथे प्रत्येक घरात त्यांचा फोटो दिसेल!
बकावा, मर्दाना करत मी तेली भट्याणला पोहचलो. आणि आपण मी या जागेच्या प्रेमातच पडलो. अत्यंत प्रसन्न वातावरण. समोर मैय्या अथांग स्वरूपात शांत पणे वाहतेय. मैय्याचा प्रशस्त घाट. घाटावरील वड-पिंपळाची मोठी झाडे.त्याभोवतालचे प्रशस्त पार. भाविकांची रेलचेल. अत्यंत अल्हाददायक वातावरण!मला कुरवपुरची आठवण झाली. पण कुरवपुर पेक्षाही थोडे ऊजवेच!
कपडे काढून मी मैय्यामधे सामावून गेलो. पुढे पुढे जातच होतो. पटकन लक्षात आले की, आपण परिक्रमेत आहोत. काठावर बसून स्नान केले. सियाराम महाराजांचे दर्शन घेतले. धन्य झालो.
८५-९०च्या आसपास वय असलेल्या महाराजांना इथे देव मानतात. त्यांच्या दर्शनानेच सगळा क्षीण पळून जातो. भट्याण गाव आता 'डूब' (धरणाच्या पाण्यात बुडणे) आले आहे. महाराजांना आश्रमाचे अडीच कोटी रुपये मिळाले. त्या पैकी त्यांनी दोन कोटी रूपये दुसऱ्या आश्रमाला दिले. केवढा हा निस्प्रूहपणा!
दुपारी आश्रमात भोजन प्रसाद घेतली. पारावर थोडा आराम केला.महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो.
संध्याकाळी "अमलथा" इथे राम मंदिरात आलो. इथे "बजरंगी " बाबांचे वास्तव्य होते. बजरंगी बाबा म्हणजे सियाराम बाबांचे गुरू!माझे भाग्य की, मी एका महान शिष्याचे व अलौकिक गुरूच्या सानिध्यात एकाच दिवशी आलो.
नर्मदे हर!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग ४
आज ४नोव्हेंबर. त्रिपुरारी पौर्णिमा. ओंकारेश्वरला लाखो भाविक जमले असतील.मंदिरातील पुजाऱ्याने सकाळी गरमागरम चहा दिला. आणि मी पुढे निघालो. सातपिपली, लेपा घाट, वेदा संगम करत बडगावच्या "मांडव्य" आश्रमात आलो. किनाऱ्यावरून येताना मधे एक नाला लागला. वळसा घालून जाण्याचा मी कंटाळा केला. आणि ढोपरभर पाण्यात उतरलो. पाय चिखलाने पूर्ण माखले होते. आश्रमात जाण्यापुर्वी मैय्यामधे छान स्नान केले. एखाद्या सिरीयल मधे दाखवतात तसा हा आश्रम आणि येथील संन्यासी होते. मी एका कोपऱ्यातील कुटीत आसन लावले. पुजापाठ केला.इथे असलेल्या गुंफेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्या गुंफेत जाऊन आलो. अनेक ऋषी पत्न्यांनी इथे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या. एक चैतन्य इथे जाणवत होते. अशा ठिकाणी सिद्धधात्मांचा सतत वास असतो.
आज प्रथमच माझे पुर्ण अंग थरथरत होते. उलटी सारखे वाटत होते. थकवा जाणवत होता.
बाबाजींनी मला भोजनासाठी बोलावले. उठतानाच मला उलटी झाली. तोंड धुतले. थोडा जेवलो.आराम केला आणि तीन नंतर दोन कि.मी. दूर असलेल्या "शालीवाहन" आश्रम कडे निघालो.
ज्या शालीवाहन राजाने स्वतःच्या नावान 'शक' सुरू केला, त्या शालिवाहन आश्रमात आलो.आश्रमात फाटक व कापरेकर भेटले. दोघेही मुंबई जवळचे.संध्याकाळी आम्ही घाटावर गेलो. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून मैय्याला दीपदान केले. समोरच पलीकडे माहेश्वर आहे.अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला घाट व परिसर दिव्यांनी उजळलेला दिसत होता. अतिशय सुंदर असे ते द्रूष्य होते.
रात्री शेजारी नाशिकचे वारकरी होते. त्यांना माझ्या कडील एक सदरा दिला, जो मला गजानन महाराज आश्रमात मिळाला होता. सदरा देण्यातही माझा स्वार्थी पणा होता. तेवढे माझ्या सँक मधील वजन कमी झाले.
नर्मदे हर!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ५
आज खल घाटला मुक्काम करायचा असे ठरवून मी शालिवाहन सोडले. पण खरे सांगतो, आपण ठरवू तसे होईलच असं नाही. कारण आपण जेव्हा परिक्रमेला सुरुवात करतो तेव्हाच आपला सगळा चार्ट तयार झालेला असतो. आपण कुठे जाणार, कुठे राहणार, कुठे जेवणार,कुठे थांबणार ते सगळं मैय्या ठरविते.त्यामुळे आपण कसली चिंता करायची नसते.
दुपारी बलगावला मौनी बाबांच्या आश्रमात आलो. इथे "भूतेश्वर" महादेव आहे. तटावर स्मशान आहे. त्यामुळे इथला महादेव भूतेश्वर झाला.
इथे मला देवेंद्रभाई भेटले. गुजराती परिक्रमा वासी. मी ओंकारेश्वर वरून"नंगापैर" (अनवाणी)निघालो होतो. माझी स्किन ड्राय असल्यामुळे तळवे बरेच फाटले होते. त्याचा त्रासही चांगलाच जाणवत होता. ते बघितल्यावर देवेंद्रभाई म्हणाले, काल इथे मौनीबाबा आले होते. त्यांचा दुसरा आश्रम "निमराणी"ला आहे. तुम्ही तिथे विश्रांती घ्या. पाय बरे झाले की पुढे निघा.खलघाट व निमराणी दोन्ही अंतर जवळ जवळ सारखे आहे.
मी हो म्हणालो आणि भोजन प्रसाद घेऊन पुढे निघालो. खलघाटचा रस्ता फाटा लागला. पुर्ण कच्चा रस्ता. दगड दिसत होते. पाय टाकायला भिती वाटली. विचार केला,वळसा पडला तरी चालेल, आपण डांबरी रस्त्याने जाऊया. एके ठिकाणी चहा घ्यायला थांबलो, तर तोपर्यंत देवेंद्र भाई आले. म्हणाले, चला एकत्रित निमराणीला जाऊया. गेलो.
निमराणीला सिध्द हनुमान मंदिर आहे. इथेच मौनी बाबांचा आश्रम आहे. यांचे नाव 'लक्ष्मण गिरी' ! चर्चेत कळले की, हे जयंत गिरींचे गुरु बंधू. जयंतगिरी म्हणजे ऊज्जैनच्या कुंभमेळ्यात मी ज्यांच्या आखाड्यात उतरलो होतो ते.
बाबाजींनी आम्हाला एक स्पेशल रूम दिली. माझ्या पाया साठी औषधे मागवली. आणि कितीही दिवस रहा , म्हणाले.
बाबाजी स्वतः नंगेपैर फिरतात.फलाहारी आहेत. यांच्या गोशाळेत सुमारे अडीच शे गाई आहेत. पण दुध काढत नाहीत. सारे दुध वासरे पितात.
सिध्द हनुमान समोर मी "सुंदर कांड" पाठ केला. आणि दोन दिवसांनी 'नर्मदे हर' केले. तसही या छोट्या परिक्रमेत तीन दिवसां पेक्षा जास्त दिवस एका ठिकाणी राहू नये.
नर्मदे हर!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग ६
निमराणी वरून निघालो ते अकराच्या दरम्यान कठोराला पोहचलो. इथे पहिल्या दिवशी वाट चुकलेले नागपूरचे श्री. सुरेश खापेकर भेटले. इतर दोघे पुढे गेले होते. इथेच मला जळगावच्या एका परिक्रमावासीने मिलिंद शिरगोटकरांचा नर्मदा परिक्रमा मार्गाची झेराँक्स प्रत दिली.
खापेकर व मी दुपारी तीन वाजता कठोरा हून निघालो. वाटेत "बुराड" नदी लागली. आमच्या पुढे गेलेले जळगावकर नदी पलीकडे पोहचले होते. एका मुलाच्या मदतीने मी नदी पात्र ओलांडू लागलो. तर मधेच धपकन पडलो.पण कोणी हसले नाही,कारण ते ही पडले होते.
रात्री नंदगावात मुक्काम होता. इथे सदाव्रत (शिधा मिळतो.आपण शिजवायचा)मिळते. पण जळगावकरांच्या बोलबच्चन पणा मुळे सर्व मराठी परिक्रमा वासियांना "बनी बनाई" (तयार भोजन)मिळाले. इथे डोंबिवलीच्या उदयन् आचार्य याचेशी भेट झाली.
मी आणि खापेकर सकाळी आरामात निघालो. नऊच्या दरम्यान विश्वनाथ खेडाला पोहचलो. आश्रमातील बाबाजींनी आम्हाला चहा, बिस्किट दिले.बाबाजींनी एकच पण सात वर्षांची परिक्रमा केली होती. तसेच मैय्या किनारी आठ आश्रम बांधले होते. थोड्यावेळाने आम्ही निघालो , तर म्हणाले, रूको. बालभोग(नाष्टा) करके जाव.
आम्ही थांबलो. मी स्नाना करीता मैय्या किनारी गेलो. तर पायाला खुपच त्रास होऊ लागला. मी मैय्याला विनंती केली,''मैय्या, माझ्या पायांना फार त्रास होतोय. मला चप्पल घालायची परवानगी दे!"
मी स्नान करून आश्रमात आलो.तर भजी तयार होती. मी आश्चर्य चकीत झालो. कारण काल मला भजी खायची इच्छा झाली होती! पोटभर भजी खाल्ली. उरलेली भजी बाबाजींनी बांधून घ्यायला सांगितली.त्या दिवशी आम्हाला दुपारी जेवणासाठी कुठे थांबता आले नाही. कारण बँक वाँटर मुळे लोहाराला जायला मोठा वळसा मारावा लागला.
खापेकर व मी विश्वनाथ खेडाहून निघालो. कच्चा रस्ता. त्यावरील बारीक कंकर पायात रूतत होते. मस्तकात कळा जायच्या. मैय्याला म्हटले, मैय्या, आताच्या आता चप्पल देशील? मग मीच माझा हसू लागलो. या जंगलात तुला कोण चप्पल कोण देणार?
तेवढ्यात मागून एक बाइक स्वार आला. म्हणाला, बाबाजी , आप नंगे पैर क्यों चलते हो। मेरा जुता पहनो । मी त्याला बोललो की, पुढे दुकान लागले की मी चप्पल घेइन. पण तो ऐकेचना. त्याने चप्पल काढली आणि निघून गेला. खापेकर म्हणाले, मैय्याने पाठविली आहे. आता चप्पल घाला! मैय्याचा हा प्रसाद मी आनंदाने स्विकारला!
संध्याकाळी लोहाराला पोहचलो तेव्हा मस्त पैकी मैय्यात पाय सोडून एक तास बसलो. खापेकरांचा आवाज छान आहे. ते सुंदर गीत गात होते.
तू प्यार का सागर है.....
का कुणास ठाऊक पण माझे डोळे भरून आले होते.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ७
लोहारा वरून सकाळी निघालो. दुपारी कुठे थांबायचे ते नक्की नव्हते. खापेकर व मी दत्त वाड्याला आलो . मी पुढे , मागे खापेकर. तर माझे स्वागत एका नागाने केले. मी थांबलो. तो ही थांबला. नंतर एका झुडपात जाऊन पुन्हा पुन्हा वळून मागे बघत होता. मी निर्भयपणे त्याच्या कडे बघत होतो. तेवढ्यात खापेकर आले. कदाचित त्यांच्या चाहूलीने तो निघून गेला. खापेकर म्हणाले, मला दर्शन घ्यायचे होते.
दत्त वाड्यात एका दाक्षिणात्य महात्म्याने सुंदर आश्रम बांधला आहे. "मातंगी आश्रम"!इथे छान जेवण मिळाले. आधुनिक पध्दतीचा आश्रम बघून खापेकर म्हणाले, मी आज इथे राहतो. मात्र मी निघाल्यावर ते ही निघाले.
काही अंतरावर चंगाबाबांची समाधी व आश्रम होता . शेजारी मैय्यावर एका दगडात खोदलेला घाट होता. इथे जमदग्नींनी स्थापन केलेला कपालेश्वर महादेव आहे. पण हेही स्थान 'डुब' मध्ये जाणार म्हणून येथील महंताने ते शिवलिंग आश्रमात आणून ठेवले आहे. हजारो वर्षांची अशी अनेक तिर्थे डुबणार आहेत!
चार वाजता छोटा वर्धाला पोहचलो. आणि गायत्री मंदिरात आसन मांडले. पाचच्या दरम्यान मी स्नानाला मैय्यावर गेलो. खापेकरांची इच्छा नसतानाही त्यांना नेले.
मीे स्नान करत असतानाच घाटावरून विमलदास महाराज आले.(विमलदास महाराज हे ३वर्ष३तीन महीने १३ दिवस या मोठ्या परिक्रमेत होते. ते गुजराती असले तरीही गिरगावकर होते.)येताना त्यांनी १५ली. दुध आणले होते. मी ओलेताच त्यांच्या शेजारी बसलो. आज गुरुपुष्याम्रुत योग होता. मला त्यांनी मैयाचा बिज मंत्र (ओम ऱ्हिं क्लिं नर्मदायै स्वाहा)म्हणायला सांगितला. आणि घाटावरील सर्वांकडून ते दुध अर्पण करून घेत होते. एक तास मी तसाच मंत्र पठण करीत होतो. त्यानंतर आम्ही दीपदान केले. माझ्या कडील तुपाच्या वाती मी सर्वांच्या हाताने मैय्याला अर्पण केल्या.माशांना कणकेचे गोळे खाऊ घातले. मग आरती झाली.
आजची संध्याकाळ पवित्र झाली. खापेकर म्हणाले, सावंत, तुमच्या मुळे हा लाभ मला मिळाला. पण तसे नसते. प्रत्येकाच्या प्रारब्धात लिहीलेला योग घडून येतो. नाहीतर आश्रमात बसलेल्या इतर परिक्रमा वासीयांना घाटावर येण्याची बुध्दी झाली असती.खापेकरांसाठी मी निमित्त ठरलो.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग ८
विमलदास महाराज म्हणाले, आज तुम्ही बडवानीच्या "योग माया" आश्रमात रहा. तेथे पुर्ण माहिती घेऊन शूलपाणी जंगलातून जायचे की रस्त्याने ते ठरवा.
निघालो. नेहमी प्रमाणे मार्गाचा घोळ झाला. पाणी भरलेय, वळसा घेऊन जा. अंतर वाढत जाते.
पिपलुदला उत्तर तटवरील "कैवल्यधाम" चे आश्रमाधिपती भेटले. नाव.. अनय रेवाशीष.मारूती व्हँन मधून जात होते. आम्हाला बघितल्यावर ते थांबले. आमच्याशी मराठीत बोलू लागले. ते मुळचे पुण्याचे. पण गेली २५ वर्षे मैय्या किनारी आहेत. नर्मदा पुराणचा दांडगा अभ्यास आहे. म्हणाले, उत्तर तटावर आलात की आमच्या आश्रमात या.(सोमवती अमावस्येला मी त्यांच्या आश्रमात गेलो होतो. महाम्रूत्युंजय यज्ञात सहभाग घेतला होता.)त्यांनी सांगितले कसरावदला जा.व तेथून राजघाटला जा.
खापेकरांना राजघाटला जायचं नव्हते. ते कोण्डान वरून सरळ बडवानीला गेले. व शूलपाणी जंगला ऐवजी पाटी-बोकराटा मार्गाने रस्त्याने गेले.
मी एकटाच कसरावदला सदानंद बापूंच्या "मेकल सुता" आश्रमात गेलो. तेथे भोजन करून आराम केला. आणि थोड्यावेळाने राजघाटला निघालो.
निर्मनुष्य झाडीतून मी एकटाच चाललो होतो. एक-दीड तासात मी राजघाटात पोहचलो. घाट पुर्ण बुडला होता. समोरचा पुलही बुचकळ्या खात होता. मी स्नान केले. एक मुखी दत्ताचे (टेंबे स्वामी स्थापीत)दर्शन घेतले . थोडा वेळ थांबलो आणि बडवानीला निघालो.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ९
बडवानीच्या योग माया आश्रमात आम्ही आठ जणांनी शूलपाणीतून जायचे ठरवले. तिघे नंदुरबारचे, दोघे पुण्यातील, एक नासिक,एक सांगलीचा व मी चिपळूणचा !
सकाळी लवकर निघालो. रस्त्यात लोकांनी सांगितले की, शूलपाणीतून जाऊ नका. पाणी भरलेय, लुबाडतात. पण आम्ही पुढेच चाललो. मुलांना गोळ्या वाटत.कल्याण पुरा, चिछोडी,अवलादा, भामटा करीत अकरा वाजता भोवतीला पोहचलो. तेथेच एका घरात जेवण झाले. मोरकट्टाला एका दुकानात थांबलो असता तेथे हिरालाल रावत भेटला. याच्या बद्दल पुष्कळ काही ऐकून होतो. बोरखेडीला आम्ही याच्याच कडे जाणार होतो. तो म्हणाला, "या." आणि बाईक वरून पुढे गेला.
५ वाजता आम्ही बोरखेडीला पोहचलो. इथ पर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. पुढे रस्ता बनत आहे.
आमच्या अगोदर M.P.चे काही परिक्रमावासींनी आपली आसने लावली होती. हिरालाल रावत सर्वांना सदाव्रत देतो. गेली कित्येक वर्षे तो ही सेवा करतोय. जुन्या सर्व गोष्टी आता इतिहास जमा झाल्यात.
स्नान, पुजापाठ करून आम्ही मार्गस्थ झालो.रस्त्याने जाताना आठवले की, या शूलपाणी जंगलात बिजासनला रावणाने , जांगरवा येथे मेघनादाने, तर हिरणपाल डोंगरावर हिरण्यकश्यपाने तपश्चर्या केली होती.
"कुली" गाव आले . या गावात पुर्वी लुटमार व्हायची. पैसेच नव्हे तर कपडे देखील काढून घेत. समोर एक 'मामा' आला. हसत आणि नाचत गेला. आता इथे कच्चा रस्ता आला आहे. पुलाचे काम सुरू आहे. कामतादास महाराज इथेच रहातात. परिक्रमा वासियांना चहा पाणी देतात. पुर्वीचे लुटीचे प्रकार आता बंद झाले. यात लखणगिरी बाबांचा मोठा हातभार आहे.(घोंघसाला त्यांचा आश्रम आहे. ६-७ वर्षापूर्वी ते "शांत" झाले. नर्मदा किनारी त्यांचा पुतळा बसवीला आहे.) तसेच गाव डुब मधे आल्याने यांना चांगले पैसे मिळाले आहेत. त्या मुळे आता कुली निर्धोक पणे पार होते.
दुपारी आम्ही घोंघसाला लखणगिरी बाबांच्या आश्रमात पोहचलो. बाबांच्या पश्चात आता "नर्मदागिरी" बापू आश्रमाची देखभाल बघतात. बापू बाहेर गेले होते. रात्री येणार होते. आम्हीही येथे थांबणार होतो.
आश्रमा समोर मैय्या होती. पुर्वी आश्रम खालच्या बाजूला होता. पण आता धरणामळे पाणी तीन पहाडी ऊंच चढले आहे. मी लखणगिरी बाबांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत होतो. लुटून येणाऱ्या परिक्रमा वासींना त्यांचा केवढा आधार होता! कुलीचा तो आश्रम ही लखणगिरींनीच काढलेला. येथील मामा लोकांना व त्यांच्या कुटुंबाला त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत करीत.
लखणगिरी बाबांनी जरी देह सोडला असेल तरी चैतन्य स्वरूपात ते इथेच असतील. सौ. चितळे मैयाजीनी सांगितलेल्या उत्तम महाराजांच्या कथेप्रमाणे मैय्या किनारी कुठल्या तरी खडकावर बसून तपश्चर्या करत असतील. (जिज्ञासूंनी यू ट्युब वरील चितळे मैय्याजींचा दहावा भाग ऐकावा.)आणि आपल्या सारख्या असंख्य परिक्रमा वासींवर मायेची छाया धरत असतील.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग १०
शूलपाणी
सर्व प्रथम सर्वांना गुडी पाडव्याच्या व चेत्र नवरात्रीच्या शुभेच्छा! हे वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियांस सुखाचे, सम्रूद्धीचे, आनंदाचे व आरोग्य संपन्नतेचे जावे हि नर्मदा माते चरणी प्रार्थना!
तर नर्मदागिरी बापू संध्याकाळी ऊशीरा आले. येताना नावेतून जिन्नस आणला होता. आम्ही सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. रात्री त्यांनी स्वतः भोजन वाढले. अगदी आग्रहाने! सर्व आटपून ते शेजारील उघड्या कुटीत विश्रांतीला गेले.
सकाळी मैय्या मधे स्नान करून आम्ही पुढे निघालो. आजचा रस्ता बिकट होता. तसे शूलपाणीला मैय्याचे ह्रदय म्हणतात. ह्रदयात जायचा मार्ग सोपा कसा असणार? खैरवाणी, सिमलेट गावातून आता जायचं आहे. खैरवाणीचा डोंगर पार केला तर समोर डांबरी रस्ता. तो ही उताराचा! आम्ही आनंदाने भराभर रस्ता उतरू लागलो. आम्हाला बघितल्यावर इथल्या मुलांना ही आनंद झाला.'नर्मदे हर आ गए । नर्मदे हर आ गए ' म्हणून ओरडू लागले. आम्ही त्यांना गोळ्या दिल्या. डोंगराच्या कुठल्या कपारीतून ती येत होती कोणास ठाऊक. मी एकटाच पुढे जात होतो. तर एक लहान मुलगी मागून ओरडत आली."बाबाजी रूको।"मला वाटले चाँकलेट साठी ती थांबवत असेल. खिसा रापला तर चाँकलेट संपल्याचे जाणवले. म्हटलं, मैय्याजी, चाँकलेट खतम हो गयी है।" तर म्हणाली, "नही बाबाजी, हमारे घर चाय पिने आइए।" मी फ्रिज झालो.जिथे फक्त दारिद्रच नांदते, तेथील हि आठ वर्षाची मुलगी मला मोठ्या आपुलकीने चहाला बोलावते !बघितले तर डोंगराच्या टोकाला तिचा "महाल" होता.मला काही सुचेना.एवढ्या वर जाण्याची माझी इच्छा नव्हती. खिसातील एक गोळी हाताला लागली. ती तिला दिली. ती माझ्या कडे बघत होती. पण तिच्या नजरेस नजर देण्याचे धारिष्ट माझ्यात नव्हते.मी पुढे निघालो. पण आताही मला अपराधी वाटतय!
सिमलेटला दुपारी बारा वाजता पोहचलो. तेथील सरपंचाने सदाव्रत दिले.इथून पुण्यातील मोडक दांपत्यानी धडगाव पर्यंत गाडीने जायचं ठरवलं.
आज आम्ही महाराष्टात पोहचणार होतो.शूलपाणीतील डोंगर चढत... उतरत पाच वाजता आम्ही भादलला पोहचलो. आलो महाराष्ट्रात ! अक्षरशः दम निघाला. कालू वर्माच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेतील उघड्या मंडपात आम्ही आसन लावले. आमच्या मागून इतरही परिक्रमा वासी आले. सगळ्यांना सदाव्रत मिळाले. लाईट नसल्याने लवकर खिचडी बनवून घेतली.
कालू वर्मा कालच्या परिक्रमा वासींना सोडायला गेलेला. तो पुर्ण काळोख पडल्यावर आला. आल्या आल्या सर्वांची विचारपुस केली. म्हणाला, मी आज रस्त्यावर लाल मार्किंग केले आहे. भवाना पर्यंत जाणार होतो, पण कलर संपला. ठिक आहे. पुढच्या वेळी मी झेंडे लावीन....... यांना कोण काय देते. ही खरी निस्वार्थ सेवा!खरी तपश्चर्या यांची!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग११
शूलपाणी
सकाळी कालू वर्माचा निरोप घेऊन निघालो. आज एकादशी होती. म्हणजे खडतर उपास घडणार होता. कालचा प्रवास बरा होता, असे म्हणायला लावणारा आजचा मार्ग होता. उभ्या डोंगर वाटेवर पाय खाली घसरत होते. उभी चढाई. आणि खाली खोल दरी!त्यात फुट भर पायवाट! बसत, दम खात पुढे जात होतो.मागे बघितल्यावर कळले की, कुठल्या दिव्यातून आपण पार पडलो! बऱ्याच वेळाने एक दुकान लागले. त्याला विचारले, हे कुठले गाव. तो म्हणाला, खप्परमाळ! चला. म्हणजे आता चढ संपला. आम्ही खुष!
दुकानात उपासाचे म्हणून फक्त शेंगा होत्या. दहा रु.च्या शेंगा घेतल्या. त्या सोलून शेंगदाणे खायचे म्हणजे कंटाळवाणा फराळ! थोडे खाल्ले आणि ठेवून दिले.
थोडे थांबून पुढे निघतोय तर एक मैय्याजी पाण्यावर कपडे धुत होती. म्हणाली, बाबाजी, आगे का गाव आने तक शाम हो जाएगी। आज इधरही रूको।
तिने आपल्या मुलीला आपले घर दाखवायला आमच्या बरोबर पाठवले. घरी आल्यावर तिने विचारले, रात कहा रुके थे।
सांगितले, भादल में।कालू वर्मा के यहां।
ती म्हणाली, तो माझा भाऊ. काल येऊन गेला.
म्हणजे आम्ही आज कालू वर्माच्या बहीणीच्या घरी .
मी थोड्या शेंगा खाल्ल्या . बाकीच्या मुलांना दिल्या.
सकाळी कालू वर्माच्या बहीणीच्या घरातून एकटाच निघालो. शूलपाणी तून एकट्याने प्रवास करण्याची हि शेवटची संधी होती. कारण पुढे एवढे निर्जन जंगल मिळणार नव्हते. त्यात कालूजीने मार्किंग केल्या मुळे चुकण्याची भिती नव्हती.
भवानाचा डोंगर उतरतानाही माझी घसरगुंडी चालू होती.आता कालचा उपास जाणवू लागला. पण आनंद ही होत होता. मी चालतच होतो. तोच समोर भवानाचा रस्ता दिसला. म्हणजे मी भवानाला पोहचलो!
पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटले. परवा कालूजी बोलला होता की, कलर संपल्यामुळे मी भवाना पर्यंत मार्किंग करू शकलो नाही. मग ही मार्कींग कोणी केली????????
भवानाच्या एका दुकानात शेव खाल्ली.आणि सावरीया कडे निघालो. अकरा वाजता सावरीयाच्या आश्रम शाळेत पोहचलो.हि शाळा मेघा पाटकरांनी आदीवासी भागात काढलेल्या आश्रम शाळा पैकी एक होती.
शाळेच्या स्टाफ रुम मधे थांबलो. दुपारी जेवण झालं. आणि तीन वाजता बिलगावला जायला निघालो. वाटेत "उदय" नदी आडवी आली. एका बोटीतून ती पार केली. किनाऱ्यावर उतरलो तर वर सागाच्या झाडांचे जंगल, मधे अरूंद पायवाट आणि खाली उदय नदी!मजा आली.
एका तासाने बिलगावला आश्रम शाळेत पोहचलो.सर्व मुले-मुली-शिक्षक याच परिसरात रहातात.एक वेगळेच वातावरण मी प्रथमच अनुभवत होतो.
रात्री शाळेच्या वऱ्हांड्यांत छान झोप लागली.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग १२
बिलगाव वरून सकाळी ११वाजता धडगावला पोहचलो. धडगाव हि तालुका प्लेस आहे. आणि दुसरे म्हणजे पाटी- बोखराटा मार्गाने येणारेही धडगावला भेटतात.
धडगावला सुरवातीलाच लखणगिरी बाबांच्या नावाने एक आश्रम आहे. तेथे अमरावतीचे बालेकर गुरुजी भेटले. (लक्कडकोटच्या झाडी अगोदर बडेल पासून आम्ही जवळपास महीनाभर एकत्रित होतो. पुढे ठरवून वेगळे झालो.)
त्यादिवशी परिक्रमेत असलेले MP चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग धडगावला येणार होते. म्हणून आश्रमात गडबड होती. पण त्यामुळेच मला पुष्कळ दिवसाने गार क्युरीफाय पाणी मिळाले!
तिसऱ्या दिवशी सकाळी ९ नंतर वडफळीला पोहचलो. हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव. विचार केला होताकी, येथील "श्रीपाद सेवा " आश्रमात थांबून नंतर पुढे जाऊ. तर आश्रमातील सेवेकऱ्याने नदी पलिकडील "गिरनार" आश्रमाकडे बोट दाखवले."गिरनार" म्हटल्यावर जावेच लागणार!
तत्पूर्वी नदीत स्नान केले. आणि आश्रमात गेलो. आश्रमात गेल्या वर कळले की, आपण गुजरात मध्ये प्रवेश केला आहे. आणि डूनखल गावात आहोत. स्नान केलेल्या नदीचे नाव " देव नदी" आहे. आणि पुढे तिचा "सूर्या नदीशी" संगम झाला आहे!
हा आश्रम एक गुजराती महात्मा चालवितात. खर तर ते व्यापारी. दोन वेळा परिक्रमाही केली आहे. तिसऱ्या परिक्रमेला ते निघाले तेव्हा मुलांनी त्यांना एका जागेवर राहून सेवा करायला सुचविले. यानाही ती कल्पना आवडली. आणि ते इथल्या मारूती मंदिरात सेवा करू लागले.
पुढचा टप्पा "माथासर"!नावावरूनच लक्षात आले की, उभा चढ असणार! डूनखल वरून २वाजता निघालो. साधारण १२किमी. अंतर चाललो. माथासरच्या सरपंचा कडे ५.३० ला पोहचलो. सरपंच "दिग्गी राजाच्या"(MPमाजी मुख्यमंत्री)गडबडीत होते. माझ्या मागोमाग १४मुर्ती आल्या. नागपूरचे खापेकर इथून पुढे गेल्याचं माझ्या लक्षात आले. कारण त्यांच्या कडे असलेली केळकर सरांच्या पुस्तकातील रूटची झेराँक्स ते इथे विसरले होते. सरपंचांनी चांगली सोय केली होती.
इथून गोरा काँलनी २०किमी. अंतरावर!आता "शूलपाणेश्वरा"चे वेध लागले!नर्मदा परिक्रमेतील महत्त्वाचे तिर्थ!
अजूनही १०किमी. चा चढ चढायचा होता. सतत ३तास चालल्यावर झरवाणीला आलो. इथं एका दुकानात थांबलो. चहा-बिस्कीट चा नाष्टा केला.
गोराकाँलनी अजूनही १०किमी आहे. चढ-उतार रस्ता असला तरी रस्ता डांबरी होता. झपाट्याने चालत होतो. गोराकाँलनीच्या दुकान दाराने थंडगार ताक दिले. मंदिर अजूनही १किमी वर होते. बरोबर दुपारी १वाजता मंदिरात पोहचलो. पुष्कळ वेळ एकटाच बसलो होतो. मुखातून शिवस्तोस्त्र चालू होते. मन आनंदाने हिंदोळे घेत होते.
पोटाने भुकेची जाणीव करून दिली. आणि "हरिधाम" आश्रमाकडे माझे पाय वळले!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग १३
हरिधाम वरून दुसऱ्या दिवशी दुपारी निघालो. आता माझ्या बरोबर अमरावतीचे बालेकर गुरुजी होते. मैय्या किनारा धरला. इंद्रवरणा लागले. पलीकडे तटावर गरूडेश्वर! टेंबे स्वामींचे समाधी स्थान. त्यामुळे मराठी परिक्रमा वासींच्या भावना इथं गुंतलेल्या! शेजारी अजून एक धरण होतेय. पण गरूडेश्वरला काही धोका नाही.
नानी रावलला छान मंदिर दिसले. वरती गेलो. तर तेथे अश्विनी कुमार व व्यासांची तप गुहा होती. हा महादेव व्यासेश्वर म्हणून ओळखला जातो. व्यासांच्या गुहेत काही वेळ ध्यानस्थ राहीलो.एक प्रसन्न ऊर्जा इथं होती. इथे एक बंगाली संन्याशी होते. नाव.. चंद्रनाथ ! गेली अडीच महीने ते इथं आहेत. त्यांना इथे योगाश्रम सुरू करायचा आहे. सरकारशी त्यांची बोलणी सुरू आहेत.
थोड्यावेळाने आम्ही पुढे निघालो. फुलवाडीला पोहचल्यावर वरून आवाज आला. बाबाजी, ऊपर आइए।
वर गेलो. हे आनंद महादेवाचे स्थान. आजचा मुक्काम इथेच .गेल्या गेल्या महाजांनी एक लाडूचा डबा आमच्या कडे सोपवला. म्हणाले, सकाळी कोणा भक्तांने आणून दिला आहे. मुख्य म्हणजे आम्ही जेवढे परिक्रमा वासी होतो, तेवढेच लाडू होते.
सकाळी बालेकर गुरुजी पुढे निघून गेले. मी गोवारला थांबणार होतो. मला कसलीही घाई नव्हती. गोवारला दोन मोठे आश्रम आहेत. एक.... तपोवन ,दुसरा..... स्वामी रामानंद आश्रम. इथे मैय्या 'उत्तर वाहीनी' आहे.
तपोवन आश्रम.. इथे"पुर्णानंद" स्वामींचा वास आहे. पुर्णानंद स्वामी म्हणजे नित्यानंद स्वामींचे शेवटचे शिष्य.मी ऐकून होतो की, महाराज रात्री अकरा नंतर खिडकीतून दर्शन देतात. पण इथे आल्यावर कळले की, ते फक्त गुरुवारी दर्शन देतात.ते ही देतीलच असही नाही. मी गेलो तो दिवस मंगळवार होता. ठिक आहे. त्यांच्या सानिध्यात तरी आहे!
संध्याकाळी मैय्याकिनारी छान पैकी २तास होतो. स्नान, पुजापाठ,जप, आरती ..अगदी काळोख पडे पर्यंत होतो.
तटावर नासिकचे प्रल्हाद भांड भेटले. यांची ही चौथी परिक्रमा.रोज नर्मदा पुराणचा एक अध्याय वाचतात.
स्वामी रामानंद आश्रमातही छान सत्संग झाला. "परमहंस" म्हणून नाव सांगणारे तरुण संन्यासी भेटले. ते काशीचे म्हणून सांगत असले तरी ते पुण्याकडील असावेत, असे मला वाटते. पण त्यांच्या बरोबर आनंद वाटला. ते काही दिवस रहायला सांगत होते. पण आम्ही घोड्यावर!पुढे जायला उतावीळ झालेले.
गोवार वरून निघालो, ते दुपारी रूंडच्या जलाराम आश्रमात पोहचलो. इथे करजण नदीचा संगम आहे. आज प्रथमच ""दाल वाफले" (हा इकडला खास पदार्थ.)खायला मिळाले.
करजण नदी पार करून ओरी कोटेश्वरला "क्रुपालू आनंद आश्रम "मधे आलो. आश्रम एक मैय्याजी चालवीतात. प्रेमळ आहेत. त्या कोट्याधीश असाव्यात. त्यांच्या कुटुंबाचा मोठा व्यवसाय आहे. मैय्याजी स्वतः रोटी बनवीत होत्या.आरती नंतर रात्री छान भोजन झाले.
सकाळी चहा बरोबर फरसाण मिळाले. हा बालभोग करून मी पुढच्या मार्गाला लागलो.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग१४
कोटेश्वरहून निघालो. पुन्हा जंगल मार्ग. पण मार्गावर झेंडे लावले होते. त्यामुळे अगदी न चुकता जात होतो. मनोमन झेंडा लावणाऱ्यांना धन्यवाद दिले. वरछा गावात प्रवेश करताच एक आश्रम लागला. काही वेळ थांबू या,म्हणून मी आश्रमात गेलो. पाणी प्यायलो.आणि घरी फोन लावला. माझा फोन झाल्यावर म्हणाले, मी ही मुंबई मधे काही दिवस होतो.
यांचे नाव विनोदगीरी बापू. यांची गौ शाळा आहे. आश्रमात रोज ठराविक वेळेला हवन होते.चहा- पाणी झाल्यावर मी पुढे निघालो.
दुपारी वेलुग्रामच्या "विजय क्रुष्ण कुटीर" मध्ये जेवण झाले. इथे एक भ्रमणात असलेला मैय्या भक्त भेटला. का कुणास ठाऊक पण सुरुवातीला माझ्याशी नाहक हुज्जत घालत होता. पण नंतर प्रेमाने बोलू लागला. संध्याकाळी सरसाडच्या "गुप्त गोदावरी " आश्रमात पोहचलो.आश्रम म्हणजे दोन रुमचं घर होते. पुढे पडवी. मात्र या घराला लागूनच नवीन बांधकाम सुरू होते. तिथे परिक्रमा वासींची सोय होणार होती. आश्रमात बाबाजी व एक मैयाजी होत्या. त्यांचा एक शिष्य आणि एक संन्यासी होता. दिवस मावळताना अजून दोन संन्यासी परिक्रमा वासी आले. सयसाडला दुध डेअरीवर प्रत्येक परिक्रमा वासींना पाव लिटर दुध देतात. आम्हाला ही मिळाले.
सरसाड वरून सकाळी ६.४५ ला निघालो. आणि प्रथमच वाटांच्या भुलभुलैयात फसलो.वाटच सापडेना. मागे पुढे ,इकडे तिकडे नुसता भटकत होतो. शेतातील लोक वाट चुकली म्हणून सांगायचे. पण त्यांनी सांगितलेला बरोबर रस्ता मला सापडत नव्हता.पण भिती वाटत नव्हती. मैय्या व शंकर महाराज बरोबर असल्याची जाणीव होती. अखेर एक- दीड तासाने योग्य मार्गाने चालू लागलो.
या जंगलात मैय्या किनारी दोन मोठे आश्रम अगदी शेजारी शेजारी आहेत. पहिला.... शाश्वत मारूती धाम आणि दुसरा..... मणी नागेश्वर मंदिर. दोन्ही ठिकाणी बालभोग झाला.
भालोदला साडे अकरा दरम्यान दत्त मंदिरात पोहचलो. आश्रमात पाऊल ठेवताच शंकर महाराजांचे दर्शन झाले. जवळ आलेल्या दत्त जयंती करीता साफ सफाई सुरू होती. म्हणून फोटो उतरवून ठेवला होता. प्रतापे महाराजांना म्हणालो, पुष्कळ दिवसांत महाराजांचे दर्शन झाले. आनंद वाटला. महाराज म्हणाले, तर मग आता तुम्हीच तो फोटो योग्य ठिकाणी लावा. लावला....
फाटक व कापरेकर इथे दोन दिवस राहीले होते. आज कन्या पूजा करून ते निघणार होते. महाराजांकडे मी ही थोडे पैसे दिले व कन्या पूजन मधे सहभागी झालो.
पुष्कळ दिवसांने महाराष्ट्रीयन जेवण मिळाले. दोन घास जास्तच खाल्ले!
पोटभर जेवून जगदीश मढी कडे निघालो.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग१५
संध्याकाळी सहा वाजता जगदीश मढीला पोहचलो तेव्हा तेथील भलामोठा हाँल परिक्रमा वासींनी भरला होता. मी एका बाजूला आसन लावले.
जगदीश मढीच्या मंदिरात अखंड रामधून सुरू असते. मंदिरा समोर एक प्राचीन वटव्रुक्ष आहे. असं म्हणतात की, शंकराने कामदेवाला भस्म केल्यावर कामदेवाने इथे शरीर विरहीत असतानाही तपश्चर्या केली. आणि ब्रम्हदेवा कडून सिद्धी प्राप्त करून घेतली. म्हणून हे सिद्धीदाता तीर्थ आहे!
दक्षिण तटावरील मैय्या किनाऱ्या वरील हा शेवटचा आश्रम!फार जुना आश्रम. त्यात जगदीश महाराजां सारखे श्रेष्ठ मैय्या भक्त! सकाळी नऊ पासून जिथे अन्नसत्र सुरू होते. ज्या जगदीश महाराजांना या नर्मदा खंडात मोठा सन्मान आहे ,त्या आश्रमात मी मुक्कामाला होतो.
सकाळी नेहमी सारखे लवकर उठून स्नान, पुजा पाठ आटपला. आश्रमातील आयुर्वेदिक काढा चहा म्हणून घेतला. मस्त चविष्ट चहा ! पुन्हा घेतला. आणि निघालो. तेवढ्यात महाराज आले. म्हणाले, "कुठे जाताय ? जेवूनच जायचं. नाहीतर कट्टी!"
त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे सगळेच थांबले. खर तर अंकलेश्वर पर्यंत आज पोहचायचे होते. त्यामुळे सकाळचे दोन- तीन तास फुकट घालविणे योग्य वाटत नव्हते. कारण सकाळीच बऱ्यापैकी अंतर कापले जाते.
जेवण आटपून दहाच्या दरम्यान निघालो. तेवीस किमी.चा टप्पा चालायचा होता. पण रस्ता असल्याने जास्त चिंता नव्हती.
उचडीयाला साई मंदिर लागले. गुमानदेवचे हनुमान मंदिर आले. दुपारी एका छोट्या मंदिरात आराम केला.
अंकलेश्वर जसे जवळ येऊ लागले तसे ऊसाचे चरखे दिसू लागले. दोन ठिकाणी ऊसाचा रस प्यायलो.
पाच वाजता अंकलेश्वरच्या रामकुंड आश्रमात पोहचलो. तर माझ्या अगोदर फाटक व कापरेकर "अन्नपूर्णेत" मदत करीत होते. मी ही हातपाय धुतले आणि त्यांच्या बरोबर सामील झालो.रात्री आम्ही छान गप्पा मारल्या. ते सकाळी उशीरा निघणार होते. त्यांचे कुणी नातेवाईक त्यांना भेटायला येणार होते. आता दीड मुक्काम दूर "विमलेश्वर" होते.(समुद्र किनारा).लवकरच उत्तर तटावर पोहचणार याची उत्सुकता होती.........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग १६
नर्मदे हर! उद्या श्रीराम नवमी ! रामलल्लाचा जन्म सोहळा. त्यामुळे उद्या दिवसभर त्याच्या सेवेत! म्हणून उद्या नर्मदा परिक्रमा पोस्ट लिहू शकणार नाही. सर्वांना राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!
तर अंकलेश्वर वरून सकाळी नेहमी सारखा एकटाच निघालो.येथून आठ किमी वर "बलबला" कुंड आहे. दोन तासात तेथे x पोहचलो. येथे कश्यप ऋषींनी तप केले होते. त्यांच्या तप सामर्थाने रोग - पिडा हरणार्थ हे कुंड निर्माण झाले. कुंडातून 'बुलबुला' असा आवाज येतो म्हणून बलबला कुंड!इथं थोडावेळ थांबलो.
पुढे नुसता रस्ताच होता. सरळ चालत जायचं होते. चालतच होतो. बाराच्या दरम्यान हसोट नावाचे तालुका ठिकाणी पोहचलो. येथे "सूर्य कुंड " आहे.इथे एक आश्रम आहे. तेथे पुष्कळ वेळ एकटाच होतो. अखेर दीड तासाने निघालो. बाजार पेठेत "पुरोहीत" हाँटेल दिसले. तिथे नाष्टा केला. आणि पुढे निघालो.
आज मी हनुमान टेकडी अगोदर असलेल्या बडोदराच्या "विश्वमंगल" मधे थांबणार होतो.
बडोदराच्या काही किमी अंतरावर एका पिकअप शेड मधून आवाज आला, बाबाजी, आओ , चाय पाओ। . . . गेलो.
यांनी पुर्वी एक परिक्रमा केली होती. आता ते पत्नी सह परिक्रमा वासींची सेवा करतात.वास्तविक यांच गाव येथून ३०किमी वर . तरीही गेली ३वर्षे सातत्याने त्यांची सेवा सुरू आहे!पंधरा मिनिटे बसलो. गप्पा मारल्या. त्यांनी आता जेवणाचा आग्रह केला. नम्र पणे नकार दिला. आणि निघालो.
बरोबर चार वाजता "विश्वमंगल" मध्ये आलो. आश्रमात पोहचताच नटुभाईने प्रश्न केला, दोपहर का खाना हुआ?
म्हटले, नाही. हसोटला नाष्टा केला.
म्हातारा वैतागला, हासोटला आमची सत्ता आहे. RSS ,बजरंग दल आहे. त्यांना किती वेळा सांगितले की ,परिक्रमा वासिंची सोय करा. पण ऐकतच नाहीत.
आश्रमात मी आणि एक संन्यासी!रात्री नटुभाईने कोणाच्या तरी लग्न मांडवातून आमची छान भोजन व्यवस्था केली.
इथून विमलेश्वर फक्त तेरा किमी! हनुमान टेकडीचे रस्त्यावरूनच दर्शन घेतले. साडे नऊ वाजता वीमलेश्वरला पोहचलो. वरच्या शेड मध्ये आसन लावले.इथं बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतीकात्मक मंदिर आहे. हळूहळू गर्दी वाढत होती.
चार वाजता फाटक व कापरेकर आले. त्यांना आसन लावायला जागा करून दिली. आश्रम फुल!साधारण ३५०-४०० लोक होते. पायी जाणारे, गाडी वाले सगळे इथूनच जातात.
रात्री MP च्या भाविक स्त्रियांचे भजन सुरू झाले. छान भजन. भजन ऐकता ऐकता "समाधी" लागली.
जय श्रीराम ! नर्मदे हर!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग१७
परवा हनुमान टेकडीचा उल्लेख झाला. आणि एक प्रसंग आठवला.
उत्तर तटावर गरूडेश्वरला दोन दिवस मुक्काम होता.येथे संजय महाराज , अण्णा महाराज यांचे बरोबर रहात होतो.३८ वर्षाचे संजय महाराज आता ही परिक्रमेत आहेत. हे मुळचे गुहागरचे. पण आता ओंकारेश्वरला असतात. त्यांनी वयाच्या २०-२२ व्या वर्षी पहिली ३ वर्षे३महीने१३दिवस अशी परिक्रमा केली. त्यावेळी एक चातुर्मास हनुमान टेकडीवर केला.
चातुर्मास संपत आला. कन्या पूजन करायला यांचे कडे काही नव्हते. त्यांनी आपली अडचण आश्रमातील महाराजांना सांगितली. स्वामीजी म्हणाले, ठिक है।मैय्या सब इंतजाम करेगी।
अजून काही दिवस गेले. संजय महाराज बेचैन होते. एके दिवशी एका मोटार गाडीतून एक व्यापारी आश्रमात आला. खरं म्हणजे तो वाट चुकला होता. आश्रम दिसला म्हणून पाणी प्यायला आला.पाणी प्यायला. आणि काही वेळ असाच बसला.
नंतर एकदम बोलू लागला, बाबाजी, मुझे यहाँ कन्याओंको भोजन खिलाने का है। आपके आश्रम मे मैं सब सामान भिजवा दुँगा। लेकीन मेरी एक इच्छा है।
बाबाजींनी विचारले, कोणती?
व्यापारी म्हणाला, मै तो भंडारे के वक्त आ नही पाऊँगा । तो किसी परिक्रमा वासीसे संकल्प छोडो।
स्वामीजी आणि संजय महाराज एकमेकां बघतच राहीले. स्वामीजी हळूच गालात हसले.
एक दिवस टेंपोतून सामान आले. संजय महाराज सामान उतरवत होते. सर्व सामान उतरवून झाल्यावर त्यांना एक कागद दिसला. त्यावर लिहिले होते"नर्मदे हर!". महाराजांनी मैय्याचे आभार मानले.आजुबाजूच्या २-४ गावातील कन्यांना बोलावून आणले. आणि छान पैकी कन्या पूजन केले!
स्वामीजी असे कन्या भोजन यापूर्वी कधीच झाले नव्हते. मैय्याकी क्रिपा।
असो. तर सकाळी आम्ही उठून समुद्रावर निघालो. मी, फाटक,कापरेकर आणि शेकडो परिक्रमा वासी. वाटलं होतं दहा पंधरा मिनिटात पोहचू. पण आमचा अंदाज चुकला.दोन - अडीच किमी चालल्यावर जिथे भरतीचे पाणी भरते तिथे पोहचलो.
नाल्यासारख्या कोरड्या जागेत नावा बांधल्या होत्या. हळूहळू भरतीचे पाणी त्या ठिकाणी भरू लागले. नावा पाण्यावर तरंगू लागल्या आणि "नर्मदा मैय्या की जय" चा घोष सुरू झाला. काही भाविकांनी दीप - अगरबत्ती पेटवून समुद्राची पूजा केली.
खर म्हणजे आपला समुद्र प्रवास दिवसा की रात्री होणार हे अमावस्या- पौर्णिमा वर अवलंबून असते. त्यामुळे १५ दिवस दिवसा व १५ दिवस रात्री असा प्रवास होतो. आणि रात्री प्रवास करणाऱ्यांना थोडा त्रास सहन करावा लागतो. पण रात्रीच्या प्रवासाची मजा काही औरच असते!आमचा प्रवास दिवसा झाला.
आमची नाव ९.३० ला निघाली. नावेत चढण्यापूर्वी प्रत्येकाला चपला किनाऱ्यावरच फेकायला लावल्या.कित्येकांचा हा पहिलाच समुद्र प्रवास होता. खास करून MPतल्या परिक्रमा वासींचा. मी नावेच्या मुखावर बसलो होतो.आनंद घेत होतो. वाटलं उभे राहून "टायटँनिक" पोज घ्यावी.
मैय्या जिथे समुद्राला मिळते ती जागा आली. त्या रेवा सागर मध्ये मी माझ्या बाटलीतील अर्ध जल त्या संगमात अर्पण केले. आणि पुन्हा बाटली भरून घेतली.
अडीच तासात आम्ही "मीठी तलाई"ला पोहचलो. बरोबर १२ वाजता. कित्येकदा यापेक्षा अधिक वेळ लागतो.
एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आणि आम्ही उत्तर तटावर दाखल झालो!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग १८
मिठी तलाईच्या आश्रमात पोहचलो . छान पैकी हात पाय धुतले. आश्रमात सदाव्रत मिळते.पण आता कोण जेवण बनवतोय? म्हणून सदाव्रत घेतले नाही. आश्रमातीलच टपरीवर चहा बिस्कीट खाल्ली. तोपर्यंत फाटक व कापरेकर आले. त्यांनी ही तसेच केले. आता पुढे जायचं.
मला समुद्र परिक्रमा करण्याची इच्छा होती. पण सोबत कोणी नव्हते, म्हणून तो विचार सोडून दिला.
पायात चपला नव्हत्या . आता प्रथम त्या घेणं गरजेचं होते. एका दुकानात गेलो. तेथे कापरेकरांना चपला मिळाल्या. फाटकांनी आपली चप्पल गुपचुप आणली होती. मी पुन्हा "नंगेपैर"!
दुकानातून बाहेर आल्यावर एकाने आम्हाला जेवणा बद्दल विचारले. फाटक पटकन नाही म्हणून बोलून गेले. खर तर तिघांनाही भूक लागली होती.पण तसेच पुढे निघालो. फाटकांनाही मग चुकचुकल्या सारखे झाले.
हा पूर्ण भाग इंडस्ट्रीअल एरिआ आहे. आम्ही दहेजला थांबण्याचं ठरविले. दहेजच्या "हरसिद्धी" आश्रमात आसन लावले. तिथल्या सेवकाने छान पैकी चपाती भाजी वाढली.पोट भर खाल्ली. आणि बाहेर जाऊन चप्पल विकत घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी फाटक व कापरेकर सावकाश निघणार होते. मी पुढे निघालो..........
उत्तर तटावरील आजचा पहिला दिवस. एक फरक जाणवला. सकाळचे चालताना तोंडावर ऊन मारत होते. दक्षिण तटावर ते संध्याकाळी मारतं.
हाय वे ने चाललो होतो. अटालीला आलो तेव्हा अमरावती चे गुरुजी पुन्हा भेटले. यांनी उदयन् आचार्यां बरोबर समुद्र परिक्रमा केली होती. म्हणाले, कंपन्यांमुळे अंतर तर वाढलेच पण परिसरही प्रदुषीत झाला आहे.मात्र स्थांनामधे आजही ऊर्जा जाणवतेय!
दुपारी केसरोलला विश्रांतीसाठी थोडावेळ थांबलो. तोच पाठोपाठ नागपूरचे खापेकर व परिक्षित आले. ओंकारेश्वर नंतर परिक्षित आज भेटला. तर खापेकर कोण्ड्यान नंतर.
अडीच वाजता आम्ही नवेठातील "सदानंद अवधुत" आश्रमात पोहचलो. छान जेवलो. इथे शर्मा कुटुंबीय परिक्रमा वासींची जिव्हाळ्याने सेवा करतात.
आज उदयन् आचार्य ग्रुप, घुघे काका ग्रुप, आम्ही चौघेजण, फाटक, कापरेकर असे अनेक मराठी परिक्रमा वासी प्रथमच एकत्रित होतो !आचार्यजी जेवून पुढे भाडभूतला जाणार होते. आम्ही मात्र तिथेच थांबलो.
रात्री छान सत्संग झाला. एक बंगाली परिक्रमा वासी होते.सुंदर व्यक्तिमत्व ! त्यांचे अनुभव ऐकले.
दुसऱ्या दिवशी एकादशी होती. भरूचला, झाडेश्वरला जायचं होते. सकाळी नेहमी सारखाच एकटा निघालो. हायवे होता. पण कंटाळवाणा प्रवास वाटत होता.
भरुच शहर फाटा आला. शहरात जाणार तर एक जण म्हणाला, हायवेने सरळ जा.... निघालो. सकाळ पासून नुसतेच चालतोय!
पाऊण वाजता झाडेश्वरच्या "निळकंठेश्वर"ला पोहचलो. हे तस पिकनिक पाँंईंट आहे. मंदिराचा परिसरही मोठा आहे. त्यामुळे गर्दीही बऱ्यापैकी होती. मोठे हाँल भरले होते.
तेवढ्यात चौघे "माळकरी" परिक्रमा वासी भेटले. मला म्हणाले, जेवण सुरू आहे. जेवून घ्या.
मी म्हणालो, अहो, आज एकादशी. आम्ही माळकरी नसतानाही उपास करतो. तुम्ही तर....।
ते पटकन तिथून सटकले. दुकानातून एक ताकाचे पाउच घेतले. आणि भूक शमवली.
तेवढ्यात कापरेकरांचा फोन आला. म्हणाले, आपण आज "तवरा" गावात मुक्काम करू. रस्त्यात भेटा.
तवराला प्रतापभाई गोवील सेवा करतात. अगदी मनापासून. परिक्रमेत असताना नरेंद्र मोदी इथं माझ्या घरी येऊन गेल्याच अभिमानाने सांगत होते. फाटकांचा दुखरा पाय हातात घेऊन मालीश करत होते.
मला मस्त पैकी साबुदाणा खिचडी खाऊ घातली. त्यांच्या गप्पांत अकरा वाजून गेले!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग१९
नांदच्या कुबेर आश्रमात मी अकरा वाजताच आलो. आश्रमातील बाबाजी जवळच कुठे तरी बाहेर गेलेले. थोड्यावेळाने आले. म्हणाले, भोजन बनाने पडेगा।
म्हटलं, नही बाबाजी, थोडी देर आराम करके निकल जाऊँगा।
खर म्हणजे एकट्या साठी लाकडे- गोवऱ्या बघणे , चूल पेटवणे, परत भांडी घासणे याचा मला कंटाळा. पूर्ण परिक्रमेत मी चार पाच वेळ जेवण बनवले. त ही दुसऱ्यांच्या मदतीने.
आश्रमात बसलो असतानाच एक गाडी आश्रमात घुसली. मस्त पैकी करकचून ब्रेक लावला. आणि गाडीतून एक ४५-५०वर्षाच्या साध्वी उतरल्या.प्रसन्न हसतमुख चेहरा, भगवे कपडे, बारीक केस एकूण आकर्षक व्यक्तिमत्व.
बाबाजींनी एक खुर्ची मागवली. त्यावर त्या बसल्या.त्यांच्या चर्चेवरून लक्षात आले की, मैय्याजी आश्रम बांधताहेत.
नंतर माझ्या कडे मोर्चा वळला. यांच आडनाव बहुतेक जोशी असावे. यांनी स्वतः चालत तर परिक्रमा केलीच ,दुसरी सायकलनेही केली होती!त्या बांधत असलेल्या आश्रमात दत्ताची मूर्ती स्थापन करणार होत्या. मला म्हणाल्या, ऊगाच पळू नका. व्यवस्थित- सावकाश परिक्रमा करा. पुन्हा आलात तर इथे नक्की थांबा.
माझ्या माहिती नुसार या नांदच्या आश्रमात पहिली चूल सुरेखा डोंगरे, स्मिता कुलकर्णी यांनी पेटवली.
दीड वाजता मी तेथून निघालो. आता थोडा शेती तून रस्ता होता. वाटेत एक शेतकरी भेटला. म्हणाला, आगे मार्कण्डेय ऋषी का मंदिर है। दर्शन करके आगे जाओ।
आता मला भूक जाणवू लागली. मार्कण्डेय मंदिरात गेलो. हात पाय धुतले आणि दर्शन घेतले. इतर दिवशी मंदिरात बाबाजी एकटेच असतात. पण आज एक भक्त त्याच्या कुटुंबासह आला होता. आणि महाराजांना छान पैकी जेवण आणले होते. त्यांचे जेवण संपल्यावर मी तिकडे पोहचलो. तरीही मला भोजन प्रसाद पाने की "आँर्डर" निघाली. आमरस, ठोकळा, समोसा,बटाट्याची भाजी, ताक,चपाती असे पक्वान्न होते. भरपेट जेवण झाले.इतके की, रात्री नारेश्वरला जेवणाला सुट्टी दिली!
निघताना बाबाजी म्हणाले, आगे शिवजी का मंदिर है। दर्शन करके ही आगे जाना.मंदिर उंचावर होते, पण दर्शन घेऊनच पुढे गेलो.
पाचच्या दरम्यान नारेश्वरला पोहचलो.हा श्रीरंग अवधुत स्वामींचा आश्रम. दोन दिवसांने दत्त जयंती होती. म्हणून भरपूर गर्दी होती. भोजन कक्षाच्यावर असलेल्या मोठ्या हाँल मधे आसन लावले. आणि संध्याकाळच्या आरती साठी मंदिरात हजर झालो!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग २०
उद्या दत्त जयंती होती. ती कुठे साजरी करायची, काहीच नक्की नव्हते. मैय्या ठरवेल. आपण का विचार करायचा, असे मानून नारेश्वर वरून निघालो.
त्या दिवशी मुस्लीमांचा कुठलातरी त्यौहार होता. शिणोरला पोहचलो, तेव्हा बाजारात, शहरात त्यांची गर्दी होती. पोलीस बंदोबस्त होता. एका पोलिसालाच विचारले,"सिध्दी विनायक" मंदिर कहाँ है। त्यांनी रस्ता दाखवला. साडे अकरा दरम्यान गणेश मंदिर मध्ये पोहचलो. मैय्या किनारी ऊंचावर आश्रम होता. घाटही छान बांधला होता.
माझ्या पाठोपाठ अजूनही परिक्रमा वासी आले. कोल्हापूरच्या "शंकराचार्यांच्या" मठातील भावे भेटले. मठात ते गोसेवा करतात. मुळचे ते संगमेश्वर मधील कळंबुशी गावातील. म्हणजे माझ्या जवळचेच निघाले. शंकराचार्यांच्या परवानगीने ते परिक्रमेला निघाले होते. मात्र मी कोल्हापूरमध्ये २-४वेळा मठात गेलो होतो, तेव्हा आमची भेट झाली नव्हती.
जेवण झाल्यावर मी सर्वात उशिरा निघालो. मंदिरातील बाबाजी बोलले ,आगे ४ किमी पर अनसुया माता का मंदिर है। वहा रुक जाना।
तीन नंतर घाटावरील दगडी पायऱ्या उतरून किनाऱ्यावर आलो.किनाऱ्यावरून चालताना एके ठिकाणी पायात काटा रूतला. वरच्यावर होता. काढला. पण त्याने आपला गुण दाखवलाच. फार वेळ झोंबत होता.
तोच मधे एक नाला आला. काही अंतरावर नावेत केवट लोक होते. म्हणाले, बाबाजी , सीधा जाव।
पाण्यात उतरलो तर ढोपरभर चिखलांत पाय फसले . वाटले, हळूहळू चिखलात रूतणार तर नाही!
केवट काही तरी सांगत होते. पण कळत नव्हते. शेवटी टेकडी कडे बोट दाखवले. बघतो तर किनाऱ्यावरील टेकडीवर एक दहा-बारा वर्षाची मुलगी उभी होती. तिने मला कसे बाहेर यायचे ते सांगितले. आणि मी बाहेर आलो. तो पर्यंत ती मुलगी तेथून गेली होती.
माझे सर्व कपडे चिखलाने माखले होते. प्रथम ते धुतले.ऊन बऱ्यापैकी असल्याने कपडे ही पटकन सुकले.
पाच वाजता अनसुया मातेच्या दरबारात हजर झालो.मंदिराच्या बाजूला परिक्रमा वासींसाठी शेड आहे. पण आज ती फुल होती. मी माझी सँक एका कोपऱ्यात ठेवली. आणि बाहेर थांबलो. स्वयंपाक रूम मधे उद्याच्या जेवणाची तयारी सुरू होती. संध्याकाळी आरती नंतर विश्वस्तांच्या खोली जवळ माझ्या भोजनाची व्यवस्था झाली.
रात्री अनसुया मातेच्या मंदिरात होतो.इथं वरच्या बाजूला दत्तगुरुचे मंदिर आहे आणि खालच्या बाजूला अनसुया मातेचं मंदिर आहे.मातेच्या मंदिरात एका बाजूला आईचा गाभारा आहे तर दुसऱ्या बाजूला बाल दत्तात्रयेचे मंदिर! त्यांच्या बाजूला मी झोपलो. जणू आईच्या कुशीत!
सकाळी स्नान करून मंदिरात आलो तर तेथे पुजाऱ्यांपैकी कोणीतरी होते. त्यांनी मातेची मूळ मुर्ती दाखवली.!
मी माझा पुजापाठ सुरू करणार तेवढ्यात वरच्या दत्त मंदिरात आरतीला सुरुवात झाली. तसाच उठून आरतीला गेलो. दत्त जयंती दिवशी पहाटे दत्त आरतीचा लाभ मिळाला.
आरती संपवल्यावर खाली अनसुयेच्या मंदिरात आलो . पूजापाठ केला. आणि निघालो.....
बाराच्या दरम्यान कुबेर भांडार जवळील संगमावर आलो.ओरसंग नदीचा इथे संगम आहे. संगमावर हात पाय धुतले आणि कुबेर भांडार आश्रमात प्रवेश केला.
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग २१
कुबेर भांडार मंदिरात गच्चीवर मला आसन मांडायला सांगितले. भली मोठी गच्ची, आणि वरून समोर मैय्याचं दर्शन!....... त्यात मी एकटा!....... आनंदी!.......आनंद! खुप वेळ मैय्याच रुप मनात साठवत होतो.
हात पाय धुतले आणि कुबरेश्वराच्या दर्शनाला गेलो. कुबेरेश्वराच्या गाभाऱ्यात फक्त धोतर नेसलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी जाऊ देतात. आम्ही परिक्रमा वासी!सफेद वस्त्रातले.गाभाऱ्यात गेलो आणि शंकराचार्यांच्या शिव पंचाक्षर स्तोत्राने शंकराची स्तुती केली.
मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांच्या पिंडी स्थापन केल्या आहेत. वैद्यकीय सेवाही पुरवली जाते.आलेल्या प्रत्येक भक्तांला जेवण दिले जाते. कुबेराच ऐश्वर्य इथे जाणवते!
मंदिराच्या मागील जागेतून मैय्या पर्यंत सुंदर घाट आहे. संगमाच्या किनाऱ्यावर अनेक भाविक ब्राह्मणां कडून विविध विधी करत होते.
मैय्या घाटावर महाकाली मंदिर आहे. मंदिरात एक गुंफा आहे. याच गुंफेत महर्षि अरविंद यांनी साधना केली आणि त्यांचे जीवनच ३६० अंश डिग्रीने बदलून गेले!त्यांचा राजकीय जीवनातून अध्यात्मिक जीवनात प्रवेश इथे झाला. याच मंदिरात !मंदिरात कुबेराचेही स्थान आहे.
दुपारच्या नंतर MP चे परिक्रमा वासी आले. ते ही अनेकदा भेटले होते. मला बघितल्यावर त्यांनाही आनंद झाला.
सकाळी पुजापाठ करून कुबेर भांडारी वरून तिलक वाडा कडे निघालो. आणि मधेच शेतामधे वाटांच्या चक्रव्यूहात फसलो! वाटच सापडेना!मोठ मोठ्याने "नर्मदे sss हर "चा नारा दिला. पण काहीच प्रतिसाद मिळेना. पुष्कळ वेळ मी नारा देत होतो. तेवढ्यात मला कोंबड्याची बांग ऐकू आली,'नर्मदे sss हर' अशी!.परिक्रमे मधे चालताना मला कोंबड्याची बांग, गाईचं हंबरणं, इत्यादी पशु पक्षांच्या आवाजातून "नर्मदे हर"च ऐकू येत होते!
कोंबड्याने नर्मदे हर केलेल्या दिशेला मी निघालो. आणि वरवाडा गावात पोहचलो!पुढे तिलक वाडा पर्यंत बऱ्यापैकी रस्ता होता. रस्त्यावर माणसे होती.याच रस्त्यावर एक बंगाली परिक्रमा वासी भेटले. ते उलट दिशेला जात होते. त्यांना मी"नर्मदे हर"केले. ते थांबले. विचारले, आप उलट दिशा मे क्यो जा रहे हो?
म्हणाले, नही, मै सही दिशा जा रहा हुँ।
नंतर लक्षात आले की, हे जलहारी परिक्रमा करताहेत. जलहारी परिक्रमेत रेवासागर (समुद्र) पार करत नाहीत. सोप्या शब्दात सांगायचे तर, असे परिक्रमा वासी अमरकंटक दक्षिण तटावरून परिक्रमा सुरू करतात. समुद्रा पर्यंत म्हणजे विमलेश्वर पर्यंत येतात. आणि तिथून परत फिरून अमरकंटकला येतात. पुढे माईचा बगीचा पार करून उत्तर तटावरून मिठी तलाईला येतात. व पुन्हा परत फिरून अमरकंटकला येतात!
पण अशा परिक्रमेत परत फिरताना मैय्या डाव्या हाताला राहते.जे परिक्रमा नियमाच्या विरूद्ध आहे. मैय्या नेहमी उजव्या हातालाच हवी. आणि दुसरे म्हणजे समुद्र पार करीत नसल्याने परिक्रमा पुर्ण कशी होणार?
पण तरीही यांचे तपही महान आहे. बंगाली बाबाजी माझ्याशी थोडा वेळ बोलले आणि नंतर आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने निघालो!
तिलक वाड्यात प्रवेश करताच एकाने मला शंभर रु. दक्षिणा दिली. (त्याची गरज मला नंतर पडणार होती.).
"वासुदेव कुटीर" मध्ये आलो. वासुदेव कुटीमधे दत्त जयंती दिवशी दत्तात्रयांची स्थापना झाली होती. त्याचा प्रसाद मिळाला.
विष्णु गिरी महाराज आले. महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी एक परिक्रमेच पुस्तक दिले. शेजारी असलेल्या श्री. पांडे यांचे घरातील टेंबे स्वामींच्या वस्तुंचे दर्शन घेतले. प्रेमळ भोजनाचा आस्वाद घेतला आणि गरुडेश्वर कडे निघालो......
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग२२
वासुदेव कुटी बाहेर असलेल्या एका छोट्या कुटीत एक संन्यासी होते. कोल्हापूरचे भावे तिथे थांबले होते. भावेंना बघायला गेलो असता मला त्यांनी खीर खायला दिली. प्रसाद म्हणून मी ती खाल्ली. आणि भावें बरोबर गरूडेश्वरला निघालो.
तिलक वाड्या वरून उतरताच मेण (मणी) नदी लागली. ती ओलांडून मणिनागेश्वरला गेलो. तिथे थांबावे असे काही वेळ वाटले. पण बेत बदलला. दर्शन घेऊन आम्ही दोघे पुढे निघालो.
आता गावाचं नाव आठवत नाही. पण त्या गावात प्रवेश करताच एका झोपडीतून आवाज आला, अंदर आओ।
खर तर आम्ही अजून त्या झोपडी पासून दूर होतो.त्यांना कसं कळलं आम्ही येतोय ते...! मी झोपडीत गेलो .....तर एक म्हातारा चुली जवळ बसलेला. दिसायला....... शंकर महाराजां सारखे. मी पटकन पायावर डोके ठेवले. भावे माझ्या कडे बघत बसले. त्यांना कदाचित काही लक्षात आले नसेल.
त्या झोपडीत दुसरी कोणतीही वस्तू दिसत नव्हती. ते काही तरी बोलत होते. मी ऐकत होतो. पण काय ते कळत नव्हते.
थोड्यावेळाने आम्ही निघालो. निघताना पुन्हा पाया पडलो.
बाहेर आल्यावर वाटले, खरचं महाराज असतील? दोन्ही बाजूला मुस्लीम वस्ती होती. काही समजेना.....!
भावे पुढे निघाले. मी मागे. गरूडेश्वरला पोहचलो. रस्त्यात संजय महाराज भेटले.( ज्यांचा हनुमान टेकडीचा प्रसंग सांगितला ते.)त्यांनी मला ते जिथे उतरले होते तेथे नेले. येथे आण्णा महाराजांशी माझी भेट झाली.
आम्ही रूम मध्ये चौघे होतो. संजय महाराज, आण्णा, मी आणि पुण्यातील एक तरुण होता. त्याचा वाढदिवस त्याने कन्या पुजन करून साजरा केला.
याच दरम्यान पाऊस सुरू झाला. वातावरण बदलले होते.
मी मंदिरात आरतीला गेलो होतो. आरती संपली . माझ्या मागच्या माणसाने लोटांगण घातले. मला माहित नव्हते. मी दोनच पावलं मागे गेलो आणि त्यांच्या हाताला माझा पाय लागला आणि मी खाली पडलो. माझ्या चष्म्याची काच तर फुटलीच, फ्रेमही तुटली. आता मी अर्धा आंधळा झालो होतो!
सुदैवाने मला माझा काचेचा नंबर माहिती होता. एका हाँस्पिटल मध्ये तयार चष्मा मिळाला. तिलक वाड्यात मिळालेले शंभर रुपये इथे उपयोगाला आले!
पावसामुळे जास्त बाहेर पण जाता येत नव्हते.दोन दिवसात चांगला सत्संग झाला. या दोन्ही परिक्रमा वासींनी अनेक प्रसंग सांगितले.
त्यातील आण्णांचा एक किस्सा सांगतो.
ती त्यांची पहिली परिक्रमा होती. शूलपाणी जंगलातून एकटेच चालले होते. आपण वाट चुकलोय हे त्यांच्या लक्षात आले होते तरीही पुढेच जात होते.
एका टेकडीवर एक १०-१२ वर्षांची मुलगी दिसली. आण्णांनी "नर्मदे हर" केले. ती गप्पच.
ते तिच्या जवळ गेले . तेव्हा ती म्हणाली, बाबाजी, आप रास्ता भटक गए हो।
आण्णा म्हणाले, हाँ मैय्याजी, मुझे पता है।आप मुझे सही राह बताइए।
ती मुलगी सुंदर हसली. आण्णा म्हणाले, मी इतकी सुंदर मुलगी कधी बघितली नव्हती. शुभ्र दात,मोहक डोळे, देखणा चेहरा, लाघवी हास्य!
आण्णांनी तिला गोळ्या देऊ केल्या.
ती म्हणाली, बाबाजी, मुझे चुडीयाँ लेना है। दस रुपये दीजिए।
आण्णांचे तिच्या केसांकडे लक्ष गेले. तिचे केस उडत होते. आणि यांना वारा लागतही नव्हता! डोक्यात क्लिक झाले की, ही मैय्या असावी. ते तिचे पाय धरू गेले. तर ती मागे झाली. आण्णांनी दहाची नोट काढली, तिच्या हातात दिली आणि पटकन तिचे पाय धरले!
ती पटकन ओरडली,बाबा, पाव छोडो।
आता तिचा आवाज वेगळा होता. त्यांनी वर बघितलं, तर एक वेगळंच तेज चमकत होते!
तिने जायची वाट दाखवली. आण्णा तीन पावले पुढे गेले. आणि सहज मागे वळून बघितलं तर तिथे कोणी नव्हते.(यांची आताच्या परिक्रमेची सांगता रामनवमी नंतर एकादशीला झाली! )
आण्णांची कथा संपताना संध्याकाळ झाली होती. तेवढ्यात काळोखातून भिजलेले दोन परिक्रमा वासी, बाप व मुलगी आमच्या खोलीत आले. त्यांचे साथीदार पुढे आले होते.त्यांना ते शोधत होते. संजय महाराज म्हणाले, चला, त्यांना शोधायला मी तुम्हाला मदत करतो.........
संजय महाराज गेले आणि मी सायंपाठ सुरू केला!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग२३
गरूडेश्वरला पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री जनक बेन मैय्याच्या आश्रमात भोजन केले होते. वांग्याची भाजी पोटाला डाचली होती. गार हवेमुळे मी वांग्याच्या भाजीचा रस्सा प्यायलो. पण सकाळी पोट बिघडले. अजून एक- दुसऱ्याला हाच त्रास झाला. दुपारी मग थोडेच खाल्ले. आता पाऊसही बंद झाला होता. पुढे जायला हरकत नव्हती.संजय महाराज म्हणाले, छोटी अंबाजीला अवश्य जा!
डांबरी रस्ता होता. सरळ चालायचं होते.पुस्तकात होते की, उंडवाला हनुमान मंदिरात अन्नक्षेत्र आहे. पण बघितले तर मंदिरात कुणीही नव्हते. विचार केला, संजय महाराजांनी सांगितले नुसार छोटी अंबाजीला जाऊया.....निघालो. साडे पाच- सहाच्या दरम्यान पोहचलो असेन.
आसन लावले. हातपाय धुतले. मातेचं दर्शन घेतले. सुंदर परिसर होता. आरती नंतर भोजन झाले. उपाशी झोपू नये म्हणून मी थोडे खाल्ले. आम्ही आसन लावलेल्या शेड मधे धुनी पेटवली होती. धुनीच्या भोवती बसून गप्पा चालल्या होत्या. एकाने आपल्या पुतण्याला मुल व्हावे म्हणून मैय्याला नवस बोलला होता. नवसाच्या पूर्ती करता त्याची परिक्रमा होती!आम्ही केवट. प्रभू रामाला नदीतून पार करणारे. आम्ही मासे खात नाही, असे अभिमानाने सांगत होता.
रात्री कालच्या वांग्याच्या रस्स्याने प्रताप दाखवायला सुरुवात केली. पोट पार बिघडले होते. रात्रभर धावत होतो. सकाळी पावणे सहा पर्यंत!
स्नान, पुजा पाठ करून पुढे निघालो. मुख्य म्हणजे रात्रभर एवढा त्रास होऊनही थकवा जाणवत नव्हता! त्या दिवशी २०-२२किमी चाललो होतो.एवढी शक्ती, एनर्जी माझ्यात कुठून आली??
दुपारी बोरीयादला आलो. हनुमंताच्या मंदिरा शेजारी परिक्रमा वासीं करीता मोठा हाँल बांधला आहे. तेथे थांबलो. काही खाण्याची इच्छा नव्हती. तरीही पुजाऱ्याने मक्याची रोटी आणि भाजी दिली. खाल्ली.
चारच्या अगोदरच भाखाला पोहचलो. शिव मंदिरा बाहेर सँक ठेवली. कपडे धुतले. मंदिरातील पुजारी त्यांच्या गावी गेले होते. शेजारी असलेल्या घरातील युवक पुजाऱ्यांच्या पश्चात देखरेख करतो. इतरही परिक्रमा वासी आले. माझी तब्बेत ठीक नाही म्हणून त्याने मला एक गोळी दिली. आणि मला ऊलटी झाली. दुपारची भाजी - भाकरी बाहेर आली! तो मुलगा घाबरला. म्हटलं, ठीक आहे. चिंता नको करू.
रात्री थोडे दुध घेतले. हे शिव मंदिर अगदी लहान होते. गाभारा आणि आठ बाय सहाचा हाँल. बस!
सगळ्या परिक्रमा वासींनी मंदिरा बाहेर आसन लावले होते. मला मात्र मंदिराच्या हाँल मधे जागा दिली. शिवजींच्या कुशीत!
सकाळी मी चांगला तरतरीत झालो. दुपारी कवाट पर्यंत पोहचण्याचे ठरविले. म्हणजे १८ किमी अंतर!
एका दुकानदाराने चहा प्यायला बोलावले. गेलो. गरमागरम चहा पोटात गेल्यावर जरा बरं वाटले. पुढे चापरियाच्या "माँ नर्मदा परिक्रमा" आश्रमात थांबलो. पंधरा मिनिटांनी तेथून निघालो. आणि कवाटला पोहचलो.
कवाट मध्ये मुख्य बाजार पेठेतच "कामनाथ महादेव"चे मंदिर आहे. गेल्या गेल्या बाबाजींनी "भोजन प्रसाद" पाने का आदेश दिला. पुरी, भाजी, चावल होते. बाबाजींची नजर चुकवून मी काही पुऱ्या लपवल्या, कारण मला त्या संपणार नव्हत्या.
आता कडिपानी तून जायचं की, मिलिंद शिरगोटकरांच्या रूटने ते ठरवायचं होते.
बाबाजी म्हणाले, रास्तेसे जाव।
........ आणि मी छकतालचा मार्ग धरला!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग २४
त्यावेळी गुजरात मध्ये निवडणूकांचे वातावरण होते. पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या होणार होते.
कवाट वरून पुल ओलांडून उजव्या हाताला वळलो.सरळ डांबरी रस्ता छकताल कडे निघालेला.
आज मी थोडा हळू चालत होतो. दर एक तासाने कुठे तरी थांबायचो.
चारच्या दरम्यान एक दुकान लागले. जाऊन बसलो. बाजूला पोलीस चौकी होती. रस्त्यावर कँमेरे बसवत होते. बँरीकेट्स लावले होते. निवडणूक सुरक्षेची ती उपाय योजना होती.
थोड्यावेळाने मी निघालो. पोलीस चौकीतले क्युरिफाय पाणी बाटलीत भरले आणि निघालो.
काही अंतर जाताच "मध्य प्रदेश मे आपका स्वागत है" या बोर्डाने माझे स्वागत केले. आता परिक्रमा संपे पर्यंत आपण मध्य प्रदेशातच असणार याची जाणीव झाली.
छकतालच्या बाजार पेठेतून गायत्री मंदिर कडे निघालो. मध्य प्रदेशात श्रीराम शर्मा यांनी अनेक गायत्री मंदिरांची स्थापना केली आहे. आजही त्यांचे बऱ्यापैकी कार्य सुरू आहे. श्रीराम शर्मा अध्यात्मिक क्षेत्रात जसे होते तसेच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता."हमारी वसियत और विरासत" हे त्यांचे पुस्तक मी परिक्रमेला निघण्यापूर्वी वाचले होते.
गायत्री मंदिरात त्या रात्री मी एकटाच होतो!
सकाळी एका चहाच्या दुकानात चहा घेतला. नेहमी सारखे पैसे घ्यायला दुकान दाराचा नकार.
कडीपानी वरून व छकताल वरुन येणारे परिक्रमा वासी अट्टा गावातून पुन्हा एकाच रस्त्याने जातात. मला रस्त्याने जाताना शाळेतील मुले भेटली. त्यांना गोळ्या दिल्या. शाळे पर्यंत ते माझ्या बरोबरच होते. काही ग्रामस्थ थट्टेने म्हणाले, बाबाजी, इनको भी साथ लेके जाव। आणि दोन्ही कडून हास्याचा फवारा.......
दहा वाजता उमरठला आलो. इथे गरासिया भगत नावाचे नर्मदा भक्त अन्नक्षेत्र चालवतात. त्यांची दहावीत असलेली मुलगी अंगणात बसून अभ्यास करत होती. आणि आल्या गेल्या परिक्रमा वासींची विचार पुसही करत होती. मला जिलेबी खायला दिली. तेवढ्यात दरवाजात आचार्य आणि कंपनी आली. मला बघितल्यावर म्हणाले, हे बघा, महेश सावंत इथे आहेत!
मी विचारले काय झाले?
आचार्यांनी सांगितले, रस्त्यात आमच्या पुढे तुमच्या सारखे कुणी तरी दिसले. आम्हाला वाटलं तुम्ही. म्हणून वेग वाढवून त्या व्यक्ती जवळ गेलो, तर ते दुसरेच कुणी तरी होते. आणि अचानक तुम्ही समोर दिसलात!
आचार्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यां समोरही जिलेबी आली. ते एकमेकां कडे बघून हसत होते. आचार्य म्हणाले, काल यांना जिलेबी खायची इच्छा झाली होती. आणि आता पुढ्यात जिलेबी!
आम्ही एकमेकांचा फोन नंबर घेतला . ते पुढे निघाले. एका तासाने मी ही निघालो.
आज मी टेमलाला थांबणार होतो.चारच्या दरम्यान टेमलाला पोहचलो. पाठोपाठ जळगावचे तिघे परिक्रमा वासी आले.इथे व्यवस्था बघणारे पुरुषोत्तम राठोड बाहेर गेले होते. आज ते येणार नव्हते. शेजारच्या घरात सुएर असल्याने त्यांचे कडून काही मिळणार नव्हते.
आम्ही समोरच्या शाळेत मुक्काम हलवला. एकाने सदाव्रत दिले. मी, जळगावकर आणि एक संन्यासी पाच जणांनी मिळून खिचडी बनविली.
खिचडी खाल्ली. संन्यासी बाहेर उघड्यावर झोपले. आणि आम्ही चौघे शाळेत!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा ।।भाग२५
टेमला वरून निघताना आम्हाला सांगितले की, जवळच मैय्याचे बँक वाँटर आहे. ओलांडून जाऊ नका. इथल्या लोकांनी दगडांना चुना लावून परिक्रमा मार्गावर ठेवले आहेत. त्यामुळे चुकायला होत नाही.आज बरोबर जळगावकर होते.
डांबरी रस्ता लागला. ( रस्ता लागला की, मी माझ्या बरोबर असलेल्या व्यक्तीचे नाव घेऊन म्हणायचो , उदा. बालेकर गुरुजी रस्त्यावर आले . ते ही उलट उत्तर देत, हो. सावंतांसह !) हथणी नदीच्या पुलावर आम्ही बसलो. बिस्कीटं खाल्ली. मुद्दाम वेळ करत होतो. कारण कवडाला लवकर पोहचलो, तर चहा घेऊन पुढे जावं लागले असते. काल आचार्य त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलताना मी ऐकले होते की, डहीला मुक्काम करायचे ठरवतोय पण बाबाजी फार कडक आहेत!म्हणून ठरवलं जास्त लवकर वा जास्त उशीरा जायचं नाही!
पूल ओलांडला. तर डाव्या हाताला टेकडी वर हनुमानाच मंदिर होते. तिथल्या बाबाजींनी हाक मारून आम्हाला बोलावले.आम्ही वर गेलो.
हनुमानाच छोटसं टुमदार मंदिर होते. बाबाजी स्वतः परिक्रमे मध्ये होते. इथेच चातुर्मास केला. या जागेत ते गुंतले होते. मला वाटत ते हरिद्वारचे होते.
बाबाजींनी मस्त पैकी चहा बनवून दिला. खाली हथणी नदीवर वाळू उपसा चालू होता.त्यांना उद्देशून बाबाजी म्हणाले, हे गाववाले. पण या मंदिरात कोणी येत नाही. बाहेरचीच लोक मला मदत करतात.
बाबाजींनी समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून सांगितले, तिथे पार्वती मातेची गुंफा आहे. गणपती साठी इथेच हत्ती मारला. म्हणून ही हथणी नदी!
कवडाला दहा वाजताच पोहचलो. हनुमान मंदिरात गेलो. हातपाय धुवून मारूती रायाचे दर्शन घेतले आणि आसन लावले.
बाबाजींनी विचारले कहा से हो ।...... महाराष्ट्र से।
बस. बाकी काही विचारले नाही. त्यांनी आचाऱ्याला सांगितले, चार मुर्तीं भोजन पायेंगे।
नंतर आलेल्या परिक्रमा वासींना सदाव्रत दिले गेले. आम्हांला मात्र बनीबनाईचा लाभ झाला.
जळगावकर जेवून पुढे गेले. मी थांबलो. आरामात निघालो.........
संध्याकाळी डहीला पोहचलो. पुन्हा हनुमान मंदिरात मुक्काम! उंचीवर असणाऱ्या मंदिरात राधाक्रिष्ण, कालीमाता, शिवजी यांची ही मंदिरे होती.मंदिर थोडे उंचावर होते.मंदिराचा आवारही प्रशस्त होता. सर्व सोयी होत्या.रात्री छान सायंपाठ झाला. पेटी, नगाऱ्यांच्या गजरात आरती झाली. भोजन करताना प्रत्येकाला दक्षिणा दिली!
सकाळी निघताना बाबाजींचे दर्शन घेतले. बाबाजी म्हणाले, कोटेश्वर जाओगे तब कनकबिहारी मे रूकना। वो भी अपनाही आश्रम है।
आणि मी कोटेश्वरला निघालो...........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग२६
डहीच्या हनुमान मंदिराच्या पायऱ्या उतरून मी बाहेर रस्त्यावर आलो.जवळच चहाचे दुकान होते. नेहमी प्रमाणे चहाच्या टपरीवर फुकटची चहा भुरकली. आणि कोटेश्वरच्या दिशेने निघालो.
सकाळचा अंगाला गार वारा झोंबत होता.मस्त....!
मी चालत होतो. गावं मागे जात होती. अकराच्या दरम्यान एका देवीच्या मंदिरात थांबलो. इथे भोजनाची सोय होते ,असे कळलं होते. पण गेले वर्षभर ते बंद होत. आता गावात एक किमी वर जेवणाची व्यवस्था होती.... नाही गेलो. त्या पेक्षा निसरपुरला जाऊ असे ठरवले.दुकानातून बिस्कीट पुडा घेतला आणि खाल्ला.... निघालो निसरपुरला......!
एकटा असल्याचा हा एक फायदा असतो. चुकीचा असो वा बरोबर आपला निर्णय घ्यायला आपण मोकळे असतो!
निसरपुर सात किमी! दीड तासानंतर निसरपुर टप्प्यात आले. निसरपुरच्या सुरुवातीलाच विटांच्या भट्ट्या धगधगत होत्या.
पुढे गेलो. एक हनुमान मंदिर लागले. भुकेची जाणीव झाली होती. आज प्रथमच भोजन प्रसाद मिळेल का? अशी विचारणा मंदिरात केली. मंदिराचे बाबाजी म्हणाले, वो देखो, वहा भोजन पक रहा है।
पुण्यातील एक व MP चे दोघे मिळून टिक्कड बनवत होते. त्यांच्या जेवणात मी सामावून गेलो.......
इथून फक्त पाच किमी वर कोटेश्वर!
कनक बिहारी आश्रमात गेलो. बाबाजींना विचारले, आसन कहा लगाऊ?
त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी आसन लावले. आश्रमात सर्व संन्यासी. सुंदर आश्रम. आश्रमाला लागून मैय्या पर्यंत घाट.
बरोबर चार वाजता चहा मिळाला. तोही डबल पेला!
मी स्नान करायला घाट उतरू लागलो.वरून कोणी तरी बोलले, जादा आगे मत जाना। यहां मगरमछ है। मैय्याला नमस्कार केला. आणि कमंडलूने स्नान केले. बरं वाटले...
नंतर शेजारच्या दगडू महाराजांच्या आश्रमात गेलो. इथे अखंड रामधून सुरू असते. कोटेश्वराचे दर्शन घेतले. आता त्या महात्म्याचे नेमके नाव आठवत नाही. पण एक तेजस्वी मुर्ती होती. त्यांचे दर्शन घेऊन कोटीनाथला गेलो.......
....असं म्हणतात, कोटेश्वरा पेक्षाही जुने मंदिर कोटीनाथाचे आहे. थोडे एका बाजूला आहे. मंदिरात कुणी नव्हते. मी आणि कोटीनाथ! संध्याकाळ होत आली होती. मला शंकर महाराजांची आठवण आली........
आश्रमात आल्यावर घाटावर बसून पुजा पाठ केला. घाटावर आता मी व आश्रमाचे मुख्य बाबाजी!बाबाजी म्हणाले, इस बारीश के पहले हमे यहां से जाना पडेगा. यह स्थान डूब मे आया है।
त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आश्रम बनवला आहे. पण इथले स्थान महात्म्य तिथे नसेल!
संध्याकाळची आरती, आरती नंतरचे 'दंडवत', त्या नंतर भोजन, सर्व उत्तम!
तामिळनाडूचा एका संन्यासी परिक्रमा वासीच्या शेजारी मी होतो. चांगला सत्संग झाला.
उद्या सकाळी पुन्हा पाच किमी मागे निसरपुरला जाऊन चिखलदाच्या मार्गाला लागायचे होते.मनात विचार आला, पुन्हा मी परिक्रमा केली ,तर कोटेश्वर इथे असेल का?
अशी कितीतरी तिर्थे नर्मदेत डुबली. अजूनही काही डुबणार आहेत!एका आश्रमात एक बाबाजी उद्वेगाने बोलले होते, मुस्लीमांनी आपली देवळे लुटली. पण आज आमचीच लोकं आपला धर्म डुबवताहेत!
काही प्रश्नांची उत्तरे दुखदायक असतात. काळाच्या हातात ती सोपवायची असतात! आपण मात्र चालतच रहायचं. त्यात कुचराई करायची नाही!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग २७
धरणांमुळे विकास होतो, हे मान्यच. पण श्रद्धा स्थानांची हानी होते, हे वाईट. काल शूलपाणी गेल, आज कोटेश्वर जातय, उद्या तेली भट्टयाणही जाणार!शूलपाणीत आज लुटमार होत नाही त्याच जास्तीत जास्त श्रेय हे लखणगिरी महाराजांचे आहे! काळाच्या ओघात काही गोष्टी जाणार, नव्या येणार, हे सुरूच राहील. त्यामुळे त्याचा स्विकार करणे क्रमप्राप्तच ठरते.तरीही मनात कुठे तरी सल राहतोच!
असो,सकाळी पूजा पाठ आटोपून कनकबिहारी मंदिरातून निघालो. चहाच्या टपरीवर गेलो. तेथे गाडीने परिक्रमा करणारे एक परिक्रमा वासी होते. आजची चहा त्यांच्या कडून...!
पुन्हा मागे निसरपुरला आलो.चिखलदा कडे निघालो. एक साईबाबांचे मंदिर लागले. बाबांचे दर्शन घेतले. पाच मिनिटे बसलो.....
चिखलदाला आल्यावर एकाने हाक दिली. गेलो. मस्त पैकी चहा झाला.
निघालो. रस्त्यात एक "त्यागी" जी मुलांना गोळ्या वाटत होता. मला बघितल्यावर बोलावून घेतले. म्हणाला, चलो।
चलो तर चलो.. निघालो त्याच्या बरोबर. तो परिक्रमेत नव्हता. भ्रमण करत होता. यापूर्वी त्यांनी परिक्रमा केली होती. भ्रमण म्हणजे मैय्या किनारी अनिर्बंध फिरणे. परिक्रमा वासींसारखे भ्रमण करताना नियम पाळायची गरज नसते. थोडक्यात "स्वछंदी" यात्रा!
किनाऱ्याने आम्ही मलवाड्या कडे निघालो. वाटेत एक मंदिर लागले. आजूबाजूला विरळ झाडी, पण घर नाहीत. निर्जन ठिकाणी असे ते मंदिर होते. शांत, निरव, प्रसन्न वातावरण! मंदिरात थोडा वेळ थांबलो. काही वेळाने मी उठलो.म्हणालो, बाबाजी, चलो। आगे जाऐंगे।
बाबाजी बोलले, आप आगे जाइए। मै तो इधरही रूकुंगा।
निघालो....
एका ठिकाणी शेतात काही माणसे होती. त्यातील एक व्रुद्ध व्यक्ती मला बघितल्यावर पुढे आली. म्हणाले, पुढे उजव्या हाताला टेकडी वर कोटेश्वराचे नवीन मंदिर आहे. तिथे एक बाबाजी पण आहेत .तुम्ही नक्की जा तिथे. तुमची चांगली व्यवस्था होईल.
पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक बोर्ड दिसला,"न्यू कोटेश्वर"! मला कससच वाटलं. न्यू मुंबई, न्यू दिल्ली सारखे न्यू कोटेश्वर?? मनाला कुठेतरी टोचलं!दुरूनच नमस्कार केला....... कदाचित काळाच्या ओघात हे ही मंदिर प्रसिद्धीस येईल. नव्हे यावच. पण......
मलवाडा मागे गेले. बोधवाडा आले. थांबलो.
हे देवपथ लिंग तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. देवांनी जेव्हा परिक्रमा केली, तेव्हा ती इथून उचलली. आणि इथेच पुर्ण केली. परिक्रमा पुर्ण केल्यावर त्यांनीच स्थापन केलेल्या देवमय शिवलिंगाची व मैय्याची पूजा केली. हे मंदिर श्री यंत्रावर स्थापित असावे, असं मला वाटले. कदाचित असेलही....
गरमागरम रोटी, भाजी आणि भात.. छान जेवण होते. थोडा वेळ आराम करून निघालो.
गांगलोद, कवटी, अकलबाडा....आणि सेमरद . चार वाजताच थांबलो. मैय्या किनारी मैय्याचं छान मंदिर आहे. मंदिरा समोर भला मोठा हाँल आहे. "रेवा कुटी"जिथे परिक्रमा वासी उतरतात.
आज मी एकटाच होतो. आरती झाली की, इथला पुजारी ही रात्री घरी जातो.मी इथल्या गँस वर मस्त पैकी पुलाव बनविला. पुर्ण परिक्रमेत स्वताहून बनवलेला एकमेव स्वयंपाक!
आरतीच्या नंतर पुजाऱ्याने दिलेली खीर अप्रतिम होती. डबल घ्यायचीच तर हातावर का?....वाटग्यातच घेतली!
या भल्या मोठ्या हाँलला दरवाजा नव्हता. मी एकटा म्हणून पुजारी म्हणाला, पाहिजे तर मागच्या खोलीत झोपू शकता.
परिक्रमा आपल्याला निर्भय बनवते. उघड्या हाँलमधे मस्तपैकी झोपलो. सकाळी पुजारी येण्यापूर्वी मी निघण्यासाठी तयार होतो. एवढ्यात एका ग्रामस्थाने दुध आणून दिले. दुधाचा चहा झाला. आणि मी सेमरदा सोडले.......
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा ।।भाग २८
काल सेमरदाच्या 'नर्मदा मंदिर'मधे मला सांगण्यात आले की, बाकानेरला जायचं असेल तर शरीफपुरला जाणाऱ्या उजव्या रस्त्याकडे न वळता ,डाव्या बाजूला वळा.पेरखेडी, जोतपूर, एहमतपूर आणि तेथून बाकनेर !जवळचा रस्ता आहे.
पुजाऱ्याने दिलेला चहा घेतला. आणि काल सांगितलेल्या रस्त्याने निघालो.
साधारण नऊच्या दरम्यान जोतपूर आले. चांगले श्रीमंत गाव वाटत होते.गावात पाटीदारांची वस्ती होती. एका पाटीदाराने मला घरी नेले. चहा पाजला. निघताना दक्षिणा दिली म्हणाले,आज आपका व्रत है।इसका कुछ फलहारी लेना। पुन्हा दुसरी सुचना, पुढे माझा मुलगा राहतो. तो ही बोलावेल. त्यांच्या कडेही जा.
निघालो...... आणि खरच एका वळणावर घरातून मैयाने हाक दिली, बाबाजी, आइए।
मैयाजी, अभी चाय पा ली। आपके ससुरजी के घर मे।
आणि नर्मदे हर करून पुढे निघालो.
अकरा वाजता बाकानेर! बडा बर्धा वरून येणारा रस्ताही इथेच मिळतो.
त्या दिवशी एकादशी होती. बाकानेरला प्रवेश करताच एका दुकानदाराने बटाटा चिप्स व चहा पाजला. इतर ही परिक्रमा वासी तोपर्यंत आले. त्यांनी ही फराळ केला.
मी बाकानेरच्या "गजानन बाबा आश्रम" मध्ये थांबलो. तेथे UP चे एक परिक्रमा वासी संन्यासी होते. त्यांचा पाय फँक्चर असल्यामुळे महिना भर ते इथेच होते.
थोडा वेळ थांबून पुढे निघालो. आज लुन्हेराला मुक्काम करायचा होता. लुन्हेरा इथून फक्त आठ किमी!
वाटेत एक बाइक स्वार भेटला. विचारले, बाबाजी, कहा तक जाओगे?
मी-- लुन्हेरा.
तो-- भारत माता सेवाश्रम मे रूकना।
म्हटलं, ठिक है।
भारत माता सेवाश्रम मध्ये पोहचलो. वरती पहिल्या मजल्यावर आसन लावायला सांगितले. माझ्या शेजारी एक बाबाजी होते. स्थूल देहयष्टी,वामन मुर्ती , सावळा रंग, जटा वाढलेल्या आणि खणखणीत आवाज!
नाव.... हरी ओम महाराज, आमच्या रत्नागिरीतलेच होते. तेथे त्यांचा "दत्ताई" मठ आहे.महाराज ३वर्षे३महीने १३दिवसांच्या परिक्रमेत आहेत. त्यांचे शिष्य गण ही आहेत.संध्याकाळी त्यांनी गायलेले 'नर्मदाष्टक' अप्रतिम होते. त्यांच्या आवाजात आर्तता होती.
आश्रमात प्राचीन हनुमान मुर्ती आहे. इथे वर्षातून एकदा तरी पुराण-कथा वाचन होते.
आश्रमात एक कश्मिरी पंडित भेटला. तो भ्रमणात होता. माझी वाढलेली दाढी, लांब सदरा ,लुंगी पाहून त्यांनी मला मिठी मारली. म्हणाला, आप तो साईबाबा जैसे दिखते हो।
म्हटलं, कुठे साई .कुठे मी. त्यांच्या पुढे मी साधा रजःकणही नाही. हा, लेकीन उनका भक्त जरूर हूँ।
रात्री बाबाजींनी साबुदाणा खिचडी बनवली.
बाबाजींनी विचारले, क्या कल मांडु पहुँच पाओगे?
म्हटलं, मैय्या की इच्छा।
मग त्यांनी कालीबावडीला जायचा शाँर्ट कट सांगितला.त्यामुळे चार किमी अंतर वाचले. सकाळी लवकर उठून तयार झालो. बाबाजींनी दिलेली चहा घेतली. आणि काली बावडीच्या मार्गाला लागलो.बालीपूर, नयापुरा,अहेरवास करीत अकरा वाजताच कालीबावडीच्या राममंदिर मधे गेलो. दर्शन घेतले. थोडा वेळ थांबून पुढे निघालो.
बडी छितरीला जेवण मिळते असे मला समजले होते. तिथे गेल्यावर बाबाजी कुठेतरी बाहेर निघाले होते.
म्हणाले, आज ग्यारस है। आश्रम मे भोजन नही बना है। और वैसे भी हम सदाव्रत देते है।
मी म्हणालो, ग्यारस तो कल थी।
ते म्हणाले, आम्ही दुसरी एकादशी पकडतो.
त्यांनी मला दोन-तीन केळी दिली.आणि दोघेही निघालो.
रस्ता संपून आता घाट लागणार होता. रस्त्याच्या कडेलाच हनुमान मंदिर होते. तेथे संजय दास बाबाजींची कुटी होती. कुटीत गेलो .तर काही परिक्रमा वासी सदाव्रत घेऊन जेवण बनवत होते.
बाबाजींनी विचारले, कहाँ से हो।
महाराष्ट्र से।
दुसरा प्रश्न.... अकेले हो?
हाँ।
त्यांनी मला कुटीतील जेवण दिले.
म्हणाले, आज रूकना चाहोगे।
म्हटलं, आता तर दोन वाजताहेत. मांडवला पोहचू शकतो.
बाबाजी हसले,...ठिक है। जाव।
दोन नंतर मी मांडुचा घाट चढायला सुरुवात केली. तसा चार किमी चा चढ आहे. पुढे सपाट रस्ता आहे.
निळकंठ महादेवाचे दर्शन घेतले. शिव पिंडीवर नैसर्गिक जलाभिषेक होत होता.
मांडव हे ऐतिहासिक गाव असल्यामुळे टुरिस्ट स्पाँट आहे.इथे अनेक महाल आहेत. जामा मशिद आहे. त्यामुळे देश-विदेशातील अनेक पर्यटक इथे येतात.
मांडव गडावर" चतुर्भज राम" हे प्रमुख आकर्षण आहे. संपूर्ण भारतात चतुर्भुज रामाची मुर्ती इथेच आहे.सुमारे अडीच शे वर्षे जुने मंदिर!आणि या मंदिराचा थोडा फार संबंध महाराष्ट्राशी आहेच!म्हटलं चला आज या राम दरबारातच आसन लावूया.... लावले............!
महेश सावंत
।।नर्मदा परिक्रमा।।भाग २९
चतुर्भुज राममंदिर परिसरातील इमारतीत पहिल्या माळ्यावर मी आसन लावले. माझ्या बाजूला असलेले एम्.पी. चे परिक्रमा वासी खुश होते. कारण त्यांच्या घरातील मंडळी त्यांना भेटायला आली होती. येताना जेवण ही आणले होते. पुष्कळ दिवसांनी घरचे जेवण मिळाल्याने ते आनंदी होते.
खर तर मला रात्री एका व्यापाऱ्याने जेवायला बोलावले होते. पण गेलो नाही. बाहेर जिलेबी आणि दुध प्यायलो.
मांडुतील रेवा कुंडा बद्दल काही प्रवाद आहेत. काही परिक्रमा वासी इथे येत नाहीत. ते दुसऱ्या मार्गाने जातात. नर्मदा पुराणात 'रेवा कुंडा'चा उल्लेख नाही, असे काही म्हणतात. तर दुसरे म्हणाले, मुळात "नर्मदा पुराण" हे पुराणच नाही आहे.एकूण पुराणं अठराच आहेत. अनेक पुराणातुन नर्मदा मैय्या बद्दल सांगितलेल्या गोष्टी एकत्रित करून हे पुराण बनवले आहे.
नियमानुसार मैय्या पासुन सात मैल पेक्षा जास्त दूर जाऊ नये. मांडव आठ मैलावर आहे!
काही जण म्हणतात, आरतीत मांडव गडाचा उल्लेख आहे. जायलाच पाहिजे.
जाऊ नका म्हणणाऱ्यां पेक्षा जा म्हणणारे अधिक आहेत!
असो. या भानगडीत आपण न पडलेलं बरे!
तर सकाळी साडे सहाला राम मंदिरातून निघालो.जैन लोकांची कसली तरी मिरवणूक निघाली होती. एवढ्या सकाळी ही चांगलीच गर्दी होती.
एका तासात रेवाकुंडा वर पोहचलो.सकाळी स्नान केले होते. आता फक्त अंगावर पाणी शिंपडून घेतले.आणि किल्ल्याच्या मागील बाजूने रस्ता उतरू लागलो. उतारावर पाय घसरत होते. पण तेवढे कठीण नव्हते. वरून एक रस्ता दिसू लागला. काही गुराखी गुरे चरवायला नेत होती. मला एक अभंग आठवला,
गोधन चारावया
जातो शारंगपाणी ।
क्रुष्ण आपल्या सवंगड्यांसह शेकडो गाई-गुरांना घेऊन असाच जात असणार!आणि आसमंतात गोखुरांचा धुरळाही असाच उडत असणार!
आता मी हिरापुर गावात आलो होतो.
हिरापुर ते बगवानीया अंतर फक्त तीन किमी. बगवानीयाला पोहचताच हाँटेल मालकाने बोलावून पोहे व चहा दिला. तसा तो प्रत्येक परिक्रमा वासींना देतो.तोच तेथे कश्मिरी पंडित आला.
विचारले, यहां कब पहुँचे?
तो म्हणाला, कल शाम कोही. एक बाईक स्वार मिला उसने यहां आश्रम मे छोड दिया । आप भी दोपहर तक रूक जाइए।
त्याला 'नर्मदे हर' केले आणि पुढे निघालो. धामनोदच्या अलबेला हनुमान मंदिरात पोहचायचे होते. साडे अकरा दरम्यान आरामात पोहचलो. मंदिरात भोजन प्रसाद घेतला आणि पुढे निघालो.
जलकोटीचा रस्ता चुकला आणि सरळ महेश्वर कडे निघालो.
महेश्वर!अत्यंत प्राचीन शहर.! मैय्या किनारी भव्य- प्रशस्त घाट असलेले शहर.राजा सहस्त्रार्जुनाची हि राजधानी!शंकराचार्यांनी मंडन मिश्र बरोबर केलेला शास्त्रवाद इथेच!अहील्याबाई होळकरांची राजधानी हीच होती. असे पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ असलेले हे शहर!कुणीही प्रेमात पडावं असे!
आचार्यजींना फोन लावून विचारले , कोणत्या आश्रमात उतरू?.... त्यांनी सांगितले, "सप्त मात्रुका" मंदिर मध्ये जा.
अगदी मैय्या किनारी असलेला हा आश्रम छान आहे. आश्रमातील व्यवस्था ही चांगली होती. आणि मुख्य म्हणजे येथील पुजाऱ्याला सप्त देवींची नावेही माहिती होती!(कारण एक-दोन ठिकाणचा अनुभव मला आला होता.) इथले मुख्य महंत दक्षिणे कडील आहेत. ते इथे नव्हते.
आश्रमात पुण्यातील मोरे भेटले. पुण्यातील फिल्म इंस्टिट्यूट मधून नुकतेच बाहेर येऊन परिक्रमेचा आनंद घेत होते . फोटोग्राफी हा त्यांचा विषय. त्यांनी या सुंदर घाटावर माझे ७२ फोटो काढले. मी ही "माँडेल" व्हायची माझी हौस भागवून घेतली!
रात्री आम्ही दोघे पुन्हा घाटावर गेलो. एके ठिकाणी काही परदेशी साधक साधना करत होते. रात्री घाटाची शांतता मनभावक होती. आम्हीही थोडा वेळ तेथे बसलो. पुढच्या वेळी जाऊ तेव्हा एक दिवस महेश्वरलाच थांबायचे ठरवलं.........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग३०
सकाळी दहा वाजताच मंडलेश्वरला पोहचलो. टेंबे महाराजांच्या कुटीत आज मैय्या किनारी मुक्काम करूया असं ठरवलं. जहागीरदार महाराजांनी आपुलकीने स्वागत केले. उदयन् आचार्यजी तेथेच होते. त्यांनी माझी ओळख करून दिली. जहागीरदार महाराज म्हणजे प्रसन्न व सडेतोड बोलणार व्यक्तिमत्व!
आसन लावले. कपडे धुतले. आणि मी उघडाच त्यांचेशी गप्पा मारत होतो.म्हणजे जहागिरदार महाराज व आचार्यजी बोलत होते, मी ऐकत होतो.तोच एक फुलपाखरू आले आणि माझ्या छातीवर काही क्षण बसले. आचार्यजी आनंदाने म्हणाले, छान!
आचार्यजी तेथून बारा वाजता निघाले. मला वाटत, ते त्या दिवशी पितामलीला थांबणार होते.
जहागिरदार महाराज मुंबईत जाण्याच्या गडबडीत होते. दरम्यान येणाऱ्या परिक्रमा वासींना चाँकलेट देऊन गप्पाही मारत होते. अखेर दोन वाजता त्यांचा ड्रायवर आला. आणि ते निघाले........त्यांच्या पाठोपाठ मी देखील निघायचे ठरवलं. जेवण झालच होते. निघालो.....!
जवळच गुप्तेश्वर महादेवाचे स्थान आहे. अस म्हणतात की, मंडन मिश्रांच्या पत्नीला कामशास्त्रा बद्दल उत्तर देण्यासाठी शंकराचार्यांनी इथेच म्रुत राजा अमरकच्या शरीरात (परकाया प्रवेश) प्रवेश केला होता. या गुप्त महादेवाचे दर्शन घेऊन पुढे चाललो. आज कुठे थांबायचे हे नक्की नव्हते.
जलूद,सुलगाव,गोगाव,पथराड. पथराड.... १४किमी. चाललो!. सहा वाजायला आले होते. इथल्या हनुमान मंदिरात परिक्रमा वासींची सोय होते. इथले बाबाजी म्हणजे अति कडक! त्यात त्यांचा जबरदस्त आवाज! काही परिक्रमा वासींची दुपारी जेवणाची व्यवस्था झाली नव्हती. ते भुकेलेले होते. बाबाजींनी हुकूम सोडला, पुजापाठ बाद मे। पेहली भोजन प्रसादी होगी।
आवाजात जरब होती. जरबेत प्रेम होते. प्रेमात परिक्रमा वासींची काळजी होती!
रात्री बाबाजी स्वतः गावात फिरले. गावात त्यांचा दरारा आहे. त्यांना बघितल्या बघितल्या घराघरातून भाजी, भाकरी घेऊन आले. बाबाजी म्हणाले, रोटी नही दुध चाहीए।
भाकऱ्या गेल्या दुध आले. आणि परिक्रमा वासींची सकाळची चहाची सोय झाली!
दुपारी धारेश्वरला थांबायचे ठरविले. अंतर तसे जास्त नव्हते. दहा किमी असेल. वाटेत एक स्थानिक भेटला. त्याने वाट दाखवली. बेगाव, पितामली आणि धारेश्वर !वाटेवरच आश्रम होता... गेलो आश्रमात ! तर आश्रमात संजय महाराज!मला बघितल्यावर त्यांनाही बरं वाटले. संजय महाराज अण्णा महाराजांची वाट बघत होते. कारण त्यांच्या साठी एकाने दिलेली वस्तू संजय महाराजांच्या कडे होती.आश्रमात भोजन केले आणि पुढे निघालो. जवळच एक आश्रम होता. आश्रमात गेल्यावर कळले की, धारेश्वरचा आश्रम हा होता! मागे गेले तो दुसरा आश्रम होता. ठिक आहे. येथेही थोडा वेळ थांबलो. मंदिरात अभिषेक सुरू होता. अर्ध नारी नटेश्वराचे हे मंदिर. अस म्हणतात की, जगातील पाप धुनारी गंगा मैय्या या पापां पासून मुक्त होण्यासाठी याठिकाणी ,थोडे पुढे येते! आणि पाप मलीनतेतून शुद्ध होऊन पुन्हा जगोद्धारा करीता सज्ज होते. नर्मदा मैय्याची महानता यातच आहे! वातावरणात प्रसन्नता व ऊर्जा होती. येथेही जेवणाचा आग्रह झाला. पण नुकतेच जेवण झाले होते. क्षमा मागीतली आणि चाललो पुढच्या प्रवासाला.........!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग ३१
काल सज्जनगडावर गेलो होतो. समर्थांचं दर्शन घ्यायला! महाप्रसाद घेताना परिक्रमेतील पंगत आठवली. तिथेही आम्ही असेच पंगतीत बसत होतो!नर्मदा मैया आता आयुष्यभर अशी कुठे ना कुठे भेटत राहणार!
तर, धारेश्वर वरून निघालो तेव्हा आम्ही चौघेजण होतो.मी व जळगावचे तीघेजण. गंगा खेडी, सेमलदा करीत पाच वाजता विमलेश्वरला आलो . विमलेश्वरच्या मंदिरात एकटा पुजारी होता. आम्ही हातपाय धुवून दर्शन घेतले. पुजाऱ्याला विचारले, जेवणाची व्यवस्था होईल का? ....तर त्यांनी नकार दर्शवला.... ठिक आहे...! आम्ही निघालो. अजून बऱ्यापैकी दिवस होता. थोडे पुढे गेलो तर एका टेकडीवर मंदिरात ३२०किलोची घंटा आहे. याच डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याजवळ "बर्फानी बाबांचा" आश्रम आहे. जळगावकर पुढे गेले होते. मी एकटाच मागे होतो. दिवस मावळत येत होता. बर्फानी बाबांच्या आश्रमातून मला हांक आली, बाबाजी आइए।।
मी मुर्ख! त्या जळगावकरांना गाठण्याच्या गडबडीत त्यांना नर्मदे हर करून पुढे गेलो. मग कधीतरी एकदा स्मिता कुलकर्णीचा फोन आला की, मोरटक्क्याच्या आश्रमात सांगितले की, बर्फानी बाबा व पगली मैय्याचं अवश्य दर्शन घ्या ! पण तोपर्यंत मी पुष्कळ पुढे गेलो होतो......!
तर,जळगावकरांना गाठून आम्ही रामगढच्या आश्रमात थांबलो. मैय्या किनारी आश्रम. आश्रमातून समोरच रामसेतू दिसत होता ! उद्या सोमवती अमावस्या होती. म्हणून इंदौरवरून काही लोक येणार होते. मैय्या किनारी बहुतेक आश्रमात अमावस्या मोठ्या पद्धतीने साजरी करतात. अभिषेक, यज्ञ,कन्या पुजन ,भंडारा असे कार्यक्रम असतात. धारेश्वरला संजय महाराजांनी सांगितले होते की, सोमवती अमावस्येला तुम्ही "कैवल्यधाम" आश्रमात थांबा. तेथे महाम्रुत्युंजय यज्ञ असतो. त्यानुसार मी उद्या तेथे जाणार होतो.
सकाळी आम्ही सर्व निघालो. आठ वाजताच मी कैवल्यधामला पोहचलो. बाकीचे सर्व पुढे निघून गेले. हळूहळू लोकांची गर्दीही वाढत गेली. मंडपात चार बाजूला चार व मधे एक अशा पाच यज्ञवेदी होत्या. नऊ ते बारा पर्यंत हा महायज्ञ सुरु होता.मलाही या यज्ञात सहभागी होता आले. त्या नंतर कन्या पुजन कन्या भोजन झाले. कन्या पुजनाचे थोडे पुण्य मी ही कमावले.एकंदरीत सोमवती अमावस्या छान पार पडली !
कटघडाच्या कैवल्यधाम मधे महाप्रसाद घेऊन निघालो. मेहता खेडी, खेडी घाट...... . खेडी घाटला समर्थ कुटीत गेलो. श्री राम महाराजाचे दर्शन घेऊन पुढे चारूकेश्वरला जायचं होते. श्री राम महाराज विश्रांती घेत होते. चार वाजता महाराजांचे दर्शन झाले. अगदी आपुलकीने बोलत होते. शूलपाणीचा परिसर आता कसा दिसतो, याची त्यांना उत्सुकता होती. बेळगावच्या एका परिक्रमा वासींने आपल्या कडील शूलपाणीचे फोटो दाखवले. महाराजांनी मला आपुलकीने मैय्याचा फोटो दिला. आमच्या विनंती वरून आम्ही त्यांच्या बरोबर फोटो ही काढला. निघताना आम्हाला म्हणाले, परिक्रमा संपली कि अवश्य या.त्यांचा आशीर्वाद घेऊन निघालो.
हि गोष्ट १८ डिसेंबर २०१७ ची. अमरकंटकच्या दक्षिण तटावर सौ. चितळे मैय्याजींच्या आश्रमात आम्ही २० जानेवारी २०१८ ला होतो. तेथे कुणी तरी म्हणाले की, श्री राम महाराज अपघातात गेले.......!प्रचंड धक्का! नर्मदा तटावर ऋषीतुल्य जीवन जगणारा एक महान तपस्वी अनंतात विलीन झाला होता. विश्वास न बसणारी घटना ....... पण घडली होती. .........!नर्मदे हर!!नर्मदे हर!!!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग ३२
चारूकेश्वरला संध्याकाळी पाच वाजता पोहचलो. श्री.दगडू महाराजांच्या आश्रमात गेलो. तर आश्रमात शेकडो भाविकांची गर्दी होती. हरी सप्ताह सुरू होता.कुणी तरी किर्तनकार छान किर्तन सांगत होते. सारा समुदाय किर्तनात दंग झाला होता.
मी सिद्ध वटव्रूक्षा कडे गेलो.वटव्रूक्षा आतील शिवलिंगाचे दर्शन घेतले. अत्यंत ऊर्जा असलेला हा परिसर!नास्तिकालाही आस्तिक बनविण्याची ताकद याठिकाणी आहे! सिद्धवट म्हणजे काय?.... तर ज्या वटव्रुक्षाच्या शंभर पेक्षा जास्त पारंब्या जमिनीवर येतात तो सिध्दवट ! दगडू महाराजांनी जिथे साधना केली ती ही पवित्र जागा!
जास्त गर्दी असल्याने मी "भक्त महाल "आश्रमात गेलो. परिक्रमा वासी म्हणून मी तेथे एकटाच होतो. एका मोठ्या हाँल मध्ये मी आसन लावले. जेवणाची व्यवस्था ही छान होती. इथं नासिकचे श्री. व्यास बाबाजी ट्रस्टी म्हणून कारभार बघतात. मला त्यांनी विचारले, किती दिवस राहणार?
म्हटलं, आजची रात्र.सकाळ झाली की नर्मदे हर!
रात्री गरमागरम पोळ्या, भाजी, आमटी, भात,असा जेवणाचा बेत होता.
सकाळी छान पैकी गरमागरम चहा झाला. आणि मी बडवाह कडे निघालो.......
बडवाह हे तहसीलाचे ठिकाण आहे. माझ एक अँफिडेविड मला घरी पाठवायचे होते. म्हणून मी इथे काम होई पर्यंत थांबणार होतो. इथे मला पुन्हा संजय महाराज, आण्णा महाराज भेटले. त्यांना मी म्हणालो, आपण एकत्रित च्यवन आश्रमात जाऊ या.
पण त्यांचा बेत वेगळा होता. ते मधल्या रस्त्याने कुंडाला जाणार होते.
बडवाहला दत्त मंदिरात सामान मी ठेवले होते. शेजारीच नागेश्वर महादेव आहे. मंदिरात जाताना मंदिरातील "रेवा कुंड " ओलांडून जावे लागते. म्हणून परिक्रमा वासी नागेश्वराचे बाहेरूनच दर्शन घेतात. जवळच अष्टभुज गोपाळाचे सुंदर मंदिर आहे.
माझे काम आटपून मी बारा वाजता दत्त मंदिरातून निघालो. निघताना केळी व चुरमुरे दिले.ते मी घेतले आणि निघालो.
आता जंगलातील मार्ग सुरू झाला. पण रस्ता पूर्णतः डांबरी होता. मी अकेलाच.....सुंदर निसर्गाच्या सोबतीने माझी सुहाना सफर सुरू होती. नामस्मरणात दंग असतानाच एक स्काँर्पिओ गाडी माझ्या पुढ्यात थांबली. गाडीतून एक सरदारजी उतरले.एका डिश मध्ये पुरी- भाजी दिली. आणि निघूनही गेले!
बडवाह पासून च्यवन आश्रम अकरा-बारा किमी. चालताना पुढे काही परिक्रमा वासी दिसले. थोडा वेग वाढवला....... गाठले. चौकशी केली तर ते पुण्याचे निघाले. ते ही च्यवन आश्रमात येत होते.
आश्रमात पोहचलो. आणि त्या आश्रमाने मला भुरळच घातली. एवढे छान वातावरण! त्यात थंडीचा गारठा! व्वा, मस्तच! मला क्षणभर मी हिमालयातच आहे असे वाटले!
एक पंचवीस-सव्वीस वर्षाचा परिक्रमा वासी बसला होता. विचारले, कहा से हो।
म्हणाला, महाराष्ट्र. औरंगाबाद.
छान! मी चिपळूणचा.
थोड्यावेळाने 'चाय की सिताराम' झाली. चहा पीत बसलो. हा इथे गेले पाच-सहा दिवस असल्याचे कळले.
दुसरा एक जण थोडा मंद(?)वाटला. मला म्हणाला, मैने भगवान को देखा है।नंतर कळले की, परिक्रमेत असताना अचानक याला वाघाचे दर्शन झाले. आणि हा घाबरला. आणि तेव्हा पासून हा असा वागतो. रात्रीचा सहसा झोपत नाही.
च्यवन आश्रम म्हणजे ज्यांनी च्यवनप्राशचा शोध लावला ते! इथे त्यांची सुंदर मुर्ती बसवली आहे.
कुणी तरी म्हणाले, इथे साप, विंचवांचा मुक्त संचार असतो. लेकिन डरने की कोई बात नही। असे म्हणून त्यानं बादलीत भरलेले मोठमोठे विंचू दाखवले...... !
परिक्रमा वासींसाठी इथे मोठी आणि चारही बाजूने बंद असलेली पक्की शेड आहे . त्या रात्री आम्ही बारा परिक्रमा वासी होतो. संध्याकाळची आरती छान रंगली होती.
जेव्हा आम्ही जेवायला बसलो तेव्हा प्रथम आमचे हात एका भांड्यात धुतले गेले. मला वेगळ्या अर्थाने हसू आले. जेव्हा आपण हाँटेलात जेवायला जातो तेव्हा जेवणानंतर फिंगर बाऊल दिले जाते. आश्रमात अगोदर......!
पोटभर जेवलो. लक्कडकोटच्या झाडीतून सकाळचा प्रवास करायचा असेल तर जयंती माता मंदिरात कसे व कधी पोहचायचे याचा विचार करत मी निद्राधीन झालो.....!
. महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग३३
च्यवन आश्रमात मी पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठलो. थंडी मी म्हणत होती. एका मोठ्या घमेल्यात निखारे पेटवून बाबाजी शेक घेत होते. त्यांच्या बरोबर राजस्थानचे गाडीतून परिक्रमा करणारे दोघे बसले होते. त्यात माझी भर पडली. शेजारी गरम चहाची किटली होती. चहाचे घुटके घेत, निखाऱ्यांच्या उबेत त्यांची चर्चा ऐकत होतो.
नंतर स्नान, पुजा पाठ करून बालभोग केला. आणि निघालो. आता माझ्या बरोबर तो पंचवीस वर्षाचा तरुण परिक्रमा वासी होता. याचे नाव दिपक खरात.
दिपकची कथा अद्भुतच होती. याचे गुरूं याला ओंकारेश्वरला घेऊन आले. म्हणाले, जगात फक्त नर्मदा मातेची परिक्रमा होते. ती ही पुर्ण करायला तीन वर्ष तीन महीने तेरा दिवस लागतात. मला वाटतं तू ही परिक्रमा करावी. करशील?
दिपक म्हणाला, हो.
गुरू म्हणाले, ठिक आहे. तू सहा महीन्यात परिक्रमा पुर्ण कर. करशील?
हो....
तो पर्यंत दिपकला नर्मदा मैय्याचं महात्म्य माहित नव्हते..... परिक्रमा म्हणजे काय याची पुसटशीही कल्पना नव्हती....... पण आपले गुरू आपले भलेच करतील हि त्याला खात्री होती!
गुरूनी याचा मोबाईल मागीतला....... दिला.
चप्पल मागीतली .........दिली. खिशातील पाकिट मागितले........ दिले!....
कपडे काढून घेतले... आणि सफेद लुंगी व सदरा दिला. आणि हा निघाला........ आपली फाटकी सँक घेऊन .
...... चालतोय. नुसता चालतोय........झपाझप!कारण तीन वर्षे तीन महीने तेरा दिवसांची परिक्रमा सहा महीन्यात पुरी करायची होती! आणि हा अवघ्या पंधरा दिवसात समुद्र किनारी विमलेश्वरला पोहचलाही.!
समुद्र पार केल्यावर याला कोणी तरी बोललं की, आपली आता२०-२५% परिक्रमा पुर्ण झाली. तसा हा सावध झाला.
हळूहळू त्यालाही परिक्रमा म्हणजे काय ,ती का करावी, कशी करावी...... हे समजून आलं. मग त्याचा वेग कमी झाला. आश्रमात तो आता चार चार- पाच पाच दिवस राहू लागला. आश्रमात सेवाही देऊ लागला.
आज सकाळी निघताना आश्रमातील बाबाजी त्याला पाठवीत नव्हते. पण तो निघाला. निघताना याला आश्रमातून अर्धा किलो तूप आणि धोतर देऊ केले. याने फक्त धोतरच घेतले आणि नर्मदे हर केले!(दिपकची परिक्रमा आता दहा दिवसा पुर्वी संपली.)
वाट जंगलातून होती. दिपक अनवाणी, माझ्या पायात चप्पल. तरीही दोघांचा चालण्याचा वेग सारखाच! जंगलात झाडांवर परिक्रमा मार्गाचे फलक लावले होते. तरीही आम्ही एका ठिकाणी चुकलोच!
पण कुंडीचे अंतर जास्त नव्हते. आम्ही अकरा वाजता कुंडीत पोहचलो. इथे श्रीमती किरण डोंगरे नावाच्या मैय्याजी सेवा करतात. आम्हाला त्यांनी छान पैकी पोहे दिले. बराच वेळ आम्ही तिथे थांबलो. कारण पुढे जास्त लांब जायचं नव्हते. आमचा पुढचा मुक्काम होता बडेल!
बडेल इथून फक्त चार एक किलो मिटर. अगदी आरामात पोहचलो. चार पुर्वीच.हनुमान मंदिरा शेजारी असणाऱ्या रुम मधे आसन लावले. बऱ्याच वेळाने पुणेकर परिक्रमा वासी आले. पण ते इथे थांबणार नव्हते.
आम्ही एका दुकानात चहा घेत होतो. तोच एक ओळखीचा आवाज ऐकू आला, महेश सावंत इथं आहेत का?
मी बाहेर आलो. तर बालेकर गुरूजी ! त्यांच्या बरोबर कल्याणचे दत्तात्रय पाटील होते. गुरुजी म्हणाले, कुंडीत डोंगरे मैय्याजीं कडे तुमचे नाव वाचले. अंदाज होता की तुम्ही इथे भेटाल. भेटलात.(आश्रमात वही मध्ये नाव ,फोन नंबर ,पत्ता लिहिण्याची पद्धत आहे.)
रात्री सदाव्रत मिळाले. पाटील उत्साही! ते म्हणाले, आज मै खाना पकाऊँगा। आम्ही आनंदाने परवानगी दिली. तिक्कड छान होती. पण भाजी झणझणीत....।त्या थंडीतही घाम आला!
उद्या पिपरी पर्यंत जायचं, असे सर्वांनी ठरवलं. लक्कडकोटची झाडी आपण एकत्रित पार करू, असही ठरले.
समोरच्या दुकानात टि. व्ही. वर भारताची क्रिकेट मँच सुरू होती. विनींग शाँट नंतर एकच मोठा आवाज झाला.भारत जिंकला होता...........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग३४
आता मी प्रवासात आहे. गाडी कामाख्याच्या दिशेला वेगाने धावतेय आणि तरीही मन नर्मदा किनाऱ्यावर रेंगाळतय.गाडीतही मी चंद्रकांत पवारांच नर्मदा परिक्रमे वरील पुस्तक वाचतोय.मुळात माझीच तेथून बाहेर येण्याची इच्छा नाही!
असो ,बडेल वरून आम्ही निघालो. आता आम्ही चौघेजण होतो. बालेकर गुरूजी, पाटील, दिपक आणि मी. तराण्याला ×××× महाराज (त्यांच्या आज्ञेनुसार नाव सांगू शकत नाही.)आहेत. दुपारी आपण तेथे थांबू, असे गुरुजी म्हणाले. अकरा वाजताच तराण्याला पोहचलो. तर तेथे आण्णा महाराज व संजय महाराजांचे दर्शन झाले. ते कालच इथं आले होते.
सर्वांनी मिळून स्वयंपाक बनवला.एकत्रित भोजनाचा आनंद उपभोगला. आश्रमातील पीठ संपत आले होते. संन्याशी महाराज स्वतः गहू नीट करायला बसले. मी व गुरूजी म्हणालो, थोडी सेवा आम्हालाही करू द्या. महाराज म्हणाले, ठिक आहे. पण गव्हात एकही कंकर राहता कामा नये. नाहीतर सर्व पीठ खराब होईल !
गहू नीट करताना महाराज बोलत होते. आम्ही ऐकत होतो.......
दुपारी आम्ही निघालो. महाराजांनी विचारले रात्री मुक्काम कुठे करणार?
मी म्हणालो, सीतावनला जायची इच्छा आहे.
महाराज म्हणाले, त्यापेक्षा पिपरीत मुक्काम करा. इथं तुमची चांगली व्यवस्था होईल.
ठिक आहे, असे म्हणून निघालो. मी व दिपक पुढे आणि गुरुजी व पाटील मागे. परिक्रमेत प्रवास करताना आपले काही ठोकताळे तयार होतात. त्यानुसार एखादा मोबाईल टावर दिसला की समजायचं ,आता बऱ्यापैकी मोठे गाव लागेल. साडे चारच्या दरम्यान आम्हाला दुरून एक टावर दिसला. चला... पिपरी आले!
पिपरीला मैय्याचं सुरेख मंदिर आहे. खाली मोठा हाँल आणि वरती मैय्याच मंदिर! समोर भव्य पटांगण, पटांगणात पाण्याने भरलेला टँकर, एका बाजूला प्रशस्त पाकशाळा . सुंदर व्यवस्था!
पिपरी मध्ये डॉ. पवार हे मराठी सज्जन आहेत. ते मंदिराचे विश्वस्त आहेत. परिक्रमा वासींची निःशुल्क सेवा करतात.दिपकच्या पोटात दुखत होते. म्हणून त्यांच्या दवाखान्यात गेलो. तर औषधांसह चहाही पाजला!
संध्याकाळी ते मंदिरात आले . त्यांचे काही मैय्याचे अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केले. पुष्कळ वेळ गप्पा रंगल्या..... आता आरतीची वेळ झाली. आरती झाली. भोजन झाले. डॉक्टर म्हणाले, सकाळी चहाला या.
सकाळी थंडी मी म्हणत होती. पटांगणातील थंड पाण्याचा टँकर आमच्या कडे बघून हसत होता. म्हणत होता, आव मैदान में।
पण आम्हीही आता तयार झाले होतो. आमच्या शरीरानेही या गोष्टी स्विकारल्या होत्या. त्यामुळे गोठवणाऱ्या थंडीत गार पाण्याने स्नान आता नित्याचेच झाले होते!
पिपरीच्या आश्रमातून बाहेर पडलो. तर समोर चहाचे दुकान होते. गेलो चहा प्यायला. चहाच्या दुकानात एक ठेकेदार भेटला. त्याने "जय गजानन" केले. अमरावतीच्या गुरुजींनीही "जय गजानन" केले. आम्हीही सुरात सुर मिसळला. त्याने गजानन महाराजांचा छान अनुभव सांगितला. चहाचे पैसेही त्यानेच दिले.
पिपरी पासून दोन एक किलो मिटरवर सीतावन! इथं वाल्मिकी आश्रम आहे. लव- कुशासह सीता माता इथं राहीली होती. म्हणून सीतावन! आश्रमाच्या मागे खालील बाजुला नर्मदा कुंड आहे. आख्यायीका आहे की, नर्मदा मैय्या इथे सीतामातेचं दर्शन घ्यायला आली आणि इथंच कुंडामधे वास्तव्य केले. कुंडाच्या पलीकडे एका बाबाजींचा वास होता. बाबाजी आलेल्या परिक्रमा वासींना चहा देतात.नर्मदा कुंडात पाणी नव्हते. तरीही एका बाजूने जाऊन ,कुंड न ओलांडता महाराजांचे दर्शन घेतले.दर्शना बरोबर चहाही झाला!
वाल्मिकी आश्रमातून निघताना प्रश्न पडला, खरच ही वाल्मिकांची तपोभूमी असावी?उत्तरही पटकन मिळाले. काही अंतर चालून गेल्यावर चार चार फुटाची उंच असलेली अनेक वारूळे दिसली. अशाच वारुळातून वाल्याचा वाल्मिकी जन्माला आला होता! त्याच वेळी मला कर्दळी वनाची आठवण झाली. जेव्हा मी कर्दळी वनात गेलो होतो तेव्हाही अशीच वारूळे पाहीली होती!
रतनपुरला एका दुकानदाराने चहा पाजला. पुढे बावडी खेडा! इथल्या राममंदिरात गेलो. एका घरात सदाव्रत घेतले. पाटलांनी कालच्या सारखीच झणझणीत भाजी बनवली. कशी तरी अर्धी तिक्कड खाल्ली. आणि सदाव्रत मिळालेल्या घरातून ताक मागीतले! ताक प्यायलो तेव्हा कुठे बरे वाटले!
दुपारच्या नंतर आम्ही निघालो. आता जयंती मातेचं मंदिर गाठायचं होते. आठ एक किमी अंतर! बऱ्यापैकी जंगल आहे. मंदिरात जाणाऱ्या भक्तांची थोडी फार वर्दळ होती.
आम्हाला वाटेत एक संन्यासी भेटले. ते परत फिरत होते. विचारले, बाबाजी, आप कहा जा रहे हो।
संन्यासी म्हणाले, नदीवर बळी देत आहेत. त्यामुळे मला पुढे जाता येत नाही. दुसरे म्हणजे मी ही इथलाच. त्यामुळे मला माझ्या गावातील नदी ओलांडून पुढे जाता येत नाही. माझी परिक्रमा भंगेल. मी आता परत ओंकारेश्वरला जातो!
वाटेत एक नदी लागली. तीच नाव खांड! खांड नदीवर काही आदीवासी खरच "बळी" देत होते. तिकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे गेलो. थोडासा चढ चढल्यावर "जयंती मातेचं "मंदिर लागले. आज मंदिरात बरीच गर्दी होती.पाठोपाठ गुरुजी आले. त्यांच्या पाठोपाठ तोे संन्यासीही आला!आम्ही आसन लावले आणि चहा साठी पुकारा झाला............"चाय कि सिताराsssम".........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।। भाग३५
कामाख्याचा तीन दिवसाचा ट्रेन प्रवास ! आजचा दुसरा दिवस ! आम्ही एकूण आठ जण वेगवेगळ्या डब्यात विखुरलेले ! माझ्या बरोबर विष्णुगिरी महाराज . प्रवासात उत्तम साथ !
असो. तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जयंती मातेच्या मंदिरात एका लग्नाची गडबड सुरू होती. मातेचं दुरूनच दर्शन घेतले. मंदिरापासून काही अंतरावर काल भैरव गुफा आहे. अत्यंत रमणीय परिसर! आजूबाजूला ओहळ वाहताहेत. दाट , ऊंच झाडी.त्यावर माकडांच्या चाललेल्या लीला! गुहेच्या माथ्यावरूनही झऱ्याच्या पाण्याचा वर्षाव आहे. म्हणजे गुहेत जायचे तर भिजनूच जावे लागते. काल भैरव जणू सांगतोय की, माझ्या दरबारात यायच तर शुद्ध होऊनच या!भान हरपून जावे असा परिसर!
काळोख होण्यापुर्वी आम्ही मंदिरात आलो. आता वऱ्हाडी मंडळी गेली होती. मंदिर शांत होते. मंदिरात काही परिक्रमा वासी, आश्रमातील चार पाच लोक आणि धीर-गंभीर वातावरणात जयंती माता! मी आणि गुरुजी पुष्कळ वेळ मातेच्या समोर बसलो. मन प्रसन्न झाले.
आरतीची वेळ झाली तसे बाबाजी मंदिरात आले. आरती झाली. आता थंडी खुणावू लागली.तिकडे दिपक स्वयंपाक घरात तिक्कड बनवायला मदत करीत होता. त्याच्या जवळ बसलो. ऊबेचा आनंद लुटत!
सकाळच्या गारठ्यात स्नान झाले. पुजा पाठ केला. मस्तपैकी चहा झाला आणि
आम्ही चौघे निघालो. जंगलात एकटाच चालायला मला आनंद वाटतो..... हळूहळू वेग वाढवला आणि सर्वांच्या पुढे गेलो. कुठल्या कुठल्या प्राण्यांच्या पायाचे ठसे मातीत उमटले होते.लक्कडकोटचे निर्जन जंगल आणि त्या जंगलात मी एकटा! २१किलो मीटर अंतर! निर्भय पणे नुसते पुढे जायचं. परिक्रमा निर्भयता शिकवते .
दहा किमी वर एक हनुमानाची मुर्ती आहे. एका झाडा खाली! झाडा भोवती सुंदर पार बांधलेला आहे.अस ऐकून होतो की, एक बाबाजी इथे परिक्रमा वासींना चहा देतात. पण आज इथे कोणी नव्हते. मारूती पुढे ,भीम रुपी.... बोललो. तेवढ्यात दिपक आला. खाण्यासाठी सँक मधून मी बिस्कीट पुडा काढला. तर काही पक्षी आले. अगदी बिनधास्त पणे आमच्या भोवती होते. आम्ही त्यांना बिस्कीटे खाऊ घातली!
मला माझाच कैलास परिक्रमेचा प्रसंग आठवला.कैलास परिक्रमा करताना एका ठिकाणी काही पक्षी होते. रूचीराने दिलेला केक माझ्या जवळ होता. तो मी त्यांना खाऊ घातला. एक पक्षी आला आणि माझ्या अंगठ्यावरच बसला! मी तसाच उभा राहीलो. काही वेळाने तो उडून गेला.....!
तर.... जवळ जवळ अर्धा तास आम्ही तिथे थांबलो. निघणार तेवढ्यात गुरूजी व पाटील आले. पुन्हा बसलो. आता गुरूजीनी बँगेतून फरसाण काढले. पक्षांच्या बरोबर आमचीही मजा! गुरूजींची हि दुसरी परिक्रमा. म्हणाले, पुढे भिम कुंड आहे. पाणी संपले असेल तर भरून घ्या.
मी आणि दिपक पुढे निघालो. रस्त्यात दोघे आदिवासी भेटले. म्हणाले, पुढे डाव्या हाताला रस्ता फुटला आहे. तेथून जा. पामाखेडीला लवकर पोहचाल.
निघालो.... काही अंतरावर फाटा फुटला होता. डोंगराचा उतार! झपाट्याने चालत होतो. बरोबर साडे अकरा वाजताच पामाखेडीला पोहचलो.रस्त्यावरच पंचमुखी हनुमान आश्रम आहे. गेल्या गेल्या बाबाजींनी खिचडी दिली. पाठोपाठ गुरूजी, पाटील आले. आश्रमातील बाबाजी हसतमुख होते. सर्वांना खिचडी दिली.
पंचमुखी आश्रमातून आम्ही दोनच्या दरम्यान निघालो. काही अंतर गेल्यावर एका दुकानातून पुकारा झाला. गेलो..! हे दुकानदार माजी सरपंच. परिक्रमा वासिंची सेवा करतात. आम्हाला चहा पाजली. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो.
पोखरच्या धर्मेश्वर आश्रमात आज मुक्काम करणार होतो. नंदाणा मधे एका मैय्याने घरी बोलावून चहा पाजला.इथून धर्मेश्वर सहा एक किमी वर.
एका वळणावर दुरून धर्मेश्वरच्या मंदिराचा कळस दिसला. पायांनी आता वेग वाढवला. मंदिराच्या दरवाजा जवळच ९१ वर्षांचे बाबाजी बसले होते. समोरच्या हाँलकडे बोट दाखवून म्हणाले, ऊधर आसन लगाओ।
आम्ही गेलो. आणि आसन लावले........!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ३६
दुपारच्या नंतर ट्रेन रिकामी झाली आणि सर्व एकत्रित आलो. दुपारी ट्रेन जंगलातून जात होती. दोन्ही बाजूला गर्द झाडी! डॉ. होनकळसेंना म्हटले, "झाडी" लागली! पुन्हा परिक्रमेच्या खुणा खुणवायला लागल्या!
तर काल कुठे होतो, हां तर ९१ वर्षाचे बाबाजी, काशीमुनी स्वामी मंदिराच्या दरवाजा समोर बसले होते. मंदिरात गेलो. आत अत्यंत प्राचीन शिवलींग! स्वतः धर्म राजाने स्थापन केलेले! पांडव जेव्हा वनवासात होते, तेव्हाची ही गोष्ट!
खरं म्हणजे पुर्वी हे शिवलींग मैय्या किनारी धरमपुरी गावात स्थापन होते. ओंकारेश्वरला धरण झाले आणि मंदिर डूब मध्ये गेले. अशी अनेक प्राचीन मंदिरे धरणांमुळे "विस्थापीत" झाली आहेत. त्यातील हे एक!काशीमुनींनी अपार मेहनत घेऊन पोखरा इथं धर्मेश्वराची पुनर्स्थापना केली.
इथं गोष्ट सांगायला पाहिजे. जी प्राचीन मंदिरे डूब मधे गेली, त्यांच्या पुनर्स्थापने करीता काही नियम धर्माचार्यांनी बनवीले होते. जबलपुरच्या जलहरी घाटावरील स्वामी प्रेमानंदांच्या आश्रमात नर्मदा जयंतीला एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शंकराचार्यांसह अनेक महात्मे आले होते. या बैठकीत ठरले होते की, जी तीर्थे डुबणार आहेत, ती १५ किलो मीटरच्या आत (म्हणजे पंचक्रोशीत)स्थापन करायची! संतांच्या या निर्णयानुसारच पोखरला धर्मेश्वराची स्थापना झाली!
काशीमुनी महाराज आज ९१ वर्षांचे आहेत. पण चेहऱ्यावर अफाट तेज आहे.अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. माझ्याशी त्यांनी मराठीत संवाद साधला. त्यांची कथाही रोचक आहे.
हे पस्तीस वर्षापूर्वी सद्गूरूच्या शोधा साठी बाहेर पडले. फिरता फिरता काशीच्या मणिकर्णिका घाटावर आले. तेथे त्यांना एका दिव्य महापुरूषाने दर्शन दिले. त्यांनी सांगितले, तू ताबडतोब नर्मदा किनारी उत्तर तटावर असलेल्या धरमपुरी गावात जा. तेथे ३०० वर्षे वयाचे सिद्ध पुरुष बाबा वनखंडी यांची जीवंत समाधी आहे. तेथेच तुला तुझ्या गुरूचे दर्शन होईल.
काशीमुनी धरमपुरीला आले. आणि पाचव्या दिवशी त्यांच्या गुरूचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी साधना केली. तेव्हा जयंती मातेचे मंदिर आजच्या सारखे नव्हते. अगदी साधं मंदिर होते. तेथे त्यांनी तीन वर्षे ऊन, पाऊस, थंडी, वारा या कशाचीही पर्वा न करता कठोर साधना केली.
त्यांच्या गुरूनी आज्ञा केली की, तू नर्मदा खंडात परिक्रमा वासींची निष्काम सेवा कर.अन्नक्षेत्र सुरू कर.
त्याच्याच परिणामी आज हा धर्मेश्वराचा प्रचंड मोठा आश्रम आहे.बोलताना सहज बोलून गेले की, मी मार्च नंतर कामाख्याला जाणार आहे. सुदैवाने मी आता तेथेच जातोय. पण भेट होईल कि नाही माहीत नाही!
असो,काशीमुनी स्वामी संध्याकाळी सात वाजता त्यांच्या कुटीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आठ नंतर बाहेर येणार होते. आम्ही त्यांचे दर्शन घेतले.
नेहमी सारखे सकाळी लवकर उठलो. नित्यपाठ आटपला. धर्मैश्वराचे दर्शन घेतले . काशीमुनींच्या कुटी बाहेर प्रणाम केला. आणि पुढच्या मार्गाला लागलो.....
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग३७
धर्मेश्वर मंदिरातून रस्त्यावरून निघालो. हे मंदिर राजमार्गावर होते. आम्ही चौघेही चांगले चालणारे होतो. पण पाटलांना मधेच शाँर्टकट मारण्याची सवय होती. ते आमच्या मागे रहात आणि शाँर्टकटच्या नादात वाट चुकून भलती कडेच जात.
आम्ही तीघे म्हणजे मी, गुरूजी व दिपक. अकराच्या दरम्यान फतेहगढला पोहचलो. मैय्या किनारी लहानसा पण छान आश्रम आहे. हा आश्रम एक कुटुंब चालवते. आम्ही त्यांच्या कडून सदाव्रत घेतले आणि खिचडी बनविली. तरीही पाटलांचा पत्ता नव्हता!वाट बघून आम्ही खिचडी खाल्ली. पाटलांच्या वाटणीची खिचडी एका परिक्रमा वासी संन्यासाच्या पोटात गेली. म्हणतात ना, दाणे दाणे पर लिखा है.......
दुपारी एकच्या दरम्यान आम्ही निघालो. आता आम्ही दतोनी नदीच्या संगमावर होतो. दतोनी नदी पार करायची होती. किनाऱ्यावर वाळू उपसा सुरू होता. त्यांच्या पैकी एका नावेतून आम्ही पलिकडे जाणार होतो. तेवढ्यात किनाऱ्यावरील ट्रँक्टरवाले वेगाने ट्रँक्टर पळवून नेत होते. आम्हाला काही कळेना की, काय होतय..... धुम स्टाईलने ट्रँक्टर पळवत होते..... एवढ्यात एक जण म्हणाला, बाबाजी, पुलीस आई है,इसिलिए सब भाग रहे है। आप जल्दी उस नाव मे बैठिए।
आम्ही त्यांने दाखवलेल्या नावेत बसलो. बसल्या बसल्या त्यानेही त्याची नाव सुरू केली. आम्हाला पलीकडे सोडले. बरं, पैसेही घेतले नाही आणि तो निघून गेला.
आज कुठे थांबायचे ते नक्की नव्हते. साडे पाच वाजता राजीरला पोहचलो. इथे हनुमान मंदिरा लगत एक आश्रम आहे. आम्ही आसन लावले. सहा वाजता बघितलं, पाटील रस्त्यावरुन वेगाने पुढे जात होते. दिपकने त्यांना हाक मारली. ते आश्रमात आले. पाटलाना म्हटलं, पाटीलजी, एवढा शाँर्टकट बरा नव्हे....!
सगळे हसले!
पण पाटीलही हार मानण्यातले नव्हते. म्हणाले, पुढच्या गावात एक पाटीदार कुटुंब आहे. उद्या मी तुम्हाला तिथे नेतो. बघा कशी सेवा होते ती!
मी म्हटलं, ठिक आहे. पण शाँर्टकटने नेऊ नका......
हास्याच्या गडगडातात जेवणाची "सिताराम" झाली. आणि सर्व जेवायला उठलो...
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग३८
राजीरच्या बाबाजींनी सकाळी पंप सुरू केला. पंपाच्या ऊबदार पाण्याने आम्ही स्नान केले. आज नेमावर पर्यंत जायचं होते. अंतर फक्त १२ किलो मीटर!
चौघे एकत्रित निघालो. दोन किमी वर पाटलांच्या "पाटीदारां"चे घर आले. या पाटीदाराने घरा बाहेर एक माणूस बसवला होता. येणाऱ्या प्रत्येक परिक्रमा वासींने घरी यावे, हि त्यांची इच्छा! यांचा एक भाऊ जिल्हा परिषदेत सदस्य आहे.शेकडो एकर जमिनीचे ते मालक आहेत. जवळपास ३५० एकर जमिनीचे! मध्य प्रदेशात सामाजीक विषमता फार आहे. परिक्रमा करताना शेकडो एकर जमीन तुम्हाला ओलिता खाली दिसेल. पण ती काही मूठभर लोकांच्या मालकीची आहे. इतर लोक जे शेतात राबतात, त्यांना शंभर दिडशे पेक्षा जास्त मजूरी मिळत नाही.
चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. मी पुढे, मागे गुरूजी, दिपक आणि पाटील नेहमीप्रमाणे अद्रुष्य!
चालताना एका आश्रमातून "नर्मदे हर" झाले. आश्रमात गेलो. बाबाजींनी विचारले, बालभोग पाओगे।
नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. बाबाजींनी मस्त पैकी पोहे बनवले. चहा झाला. थोडा वेळ थांबलो.निघताना बाबाजींच्या पायाला स्पर्श केला. बाबाजींनी पटकन पकडले. ,"बदमाश!पाव मत छूना।"तरीही बाबाजींनी आशीर्वाद दिला. साधुंचे मन फार मोठे असते. आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो.......
बजवाडा आले.इथून नेमावर दोन किलो मीटर! एका गव्हाच्या शेतात राखणेला असणाऱ्या तरुणांनी हाक दिली., बाबाजी आइए।
हे तरुण परिक्रमा वासींना चहा पाणी करतात. शेतात हरणांचा कळप शिरला होता. इथे हरणांची शिकार करत नाहीत. त्यांना फक्त दूर हाकलतात. आमच्या कोकणात शेतीची नासधूस डुक्कर करतात. त्यांना मात्र बंदूकीने......
असो. चहा घेऊन निघताना जेवणासाठी थांबण्याचा आग्रह झाला. पण आम्ही निघालो. नेमावरला........!
नेमावर! मैय्याच नाभी स्थान!अनेक सिद्धांची सिद्ध भूमी!परशुरामाचं जन्म स्थान!नेमावरच महात्म फार आहे.
नेमावरचा ब्रम्हचारी आश्रम म्हणजे मराठी माणसाचे हक्काचे स्थान!परिक्रमेत अशी काही स्थाने आहेत, जिथे मराठी माणूस गेला नाही तर त्याची परिक्रमा पुर्ण झाल्यासारखी वाटत नाही!नेमावरचे ब्रम्हचारी आश्रम त्यापैकी एक! शिवाय इथे श्री.टेंबे स्वामींचे पदचिन्ह आहे! आश्रमातून मैय्याचं छान दर्शन होते. शेजारी मुंगफली बाबांचे व अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे.
इथे कर्नाटकातील स्वामीजी आश्रमाची देखभाल बघतात. त्यांनी नर्मदा परिक्रमेवर एक कानडी भाषेत पुस्तकही लिहिले आहे. स्वामीनी आम्हाला एक खोली दिली. तेथे आम्ही आसन मांडले.जेवणाची वेळ झाली. आम्ही भोजन कक्षात गेलो. तेवढ्यात पाटील आले!
वदनी कवळ ...... झाले आणि आम्ही पुष्कळ दिवसांनी महाराष्ट्रींयन जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो............
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग ३९
नेमावरच्या आश्रमात आम्ही बसलो असताना एक परिक्रमा वासी आले. ते ३ वर्षे ३ महिने १३दिवसांच्या मोठ्या परिक्रमेत होते.आमच्याशी त्यांची जुजबी चर्चा झाली. आणि ते निघून गेले....।।
संध्याकाळी मी घाटावर गेलो. एकटाच बसलो होतो. एवढ्यात काही मुले आली. ते आरतीची तयारी करीत होते. काही वेळाने त्यांचे गुरूजी आले आणि मैयाच्या आरतीला सुरुवात झाली. मी ही पंचारती ओवाळली.मैय्याची आरती झाली.आणि आश्रमात आलो.....
आश्रमात गुहेसारख्या तळघरात करुणा त्रिपदी सुरू होती. गेलो.... त्यांच्या सुरांत माझाही सुर मिसळाला....
रात्री जेवणानंतर आम्ही आमच्या खोलीत बसलो होतो. दुपारचे परिक्रमा वासी आमच्या खोलीत आले. त्यांनी आपले नाव वैद्य सांगितले. आम्ही त्यांचा अनुभव विचारला.
वैद्यजी म्हणाले, मी रिटायर्ड झाल्यावर परिक्रमा करण्याचे ठरवलं होते. त्यानुसार नर्मदा परिक्रमेचा अंदाज घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या गाडीने परिक्रमा केली. आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये अमरकंटक वरून परिक्रमा उचलली.
परिक्रमा करताना किनारा सोडायचा नाही हा माझा निर्धार!किनाऱ्यावरून चालत होतो. खाली मान घालून चालतोय........ ! अचानक समोर एक मोठा दगड आडवा आला. खाली मैय्या..... वरती डोंगर....! गेलो वरच्या बाजूला... तर वाटच सापडेना...!काट्याने कपडे फाटले. रक्त येत होते. कमंडलूतील पाणी संपले होते. आणि मार्ग सापडत नव्हता...!पुष्कळ वेळ फिरून फिरून दमलो. जंगलात कोणीही नव्हते. वाटलं, संपलं सारं....!
त्याचवेळी चक्कर आली की निद्रा आली काही कळलं नाही. पण अर्धा एक तास तेथेच शुद्ध गेल्यासारखा पडून होतो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा वरच्या बाजूला एक छोटासा झरा दिसला....वाटलं हा झरा नक्कीच मैय्यापर्यंत जात असणार....! काट्यांची पर्वा न करता खाली उतरलो. मैय्याच दर्शन झाले. पुन्हा किनाऱ्याने पुढे गेलो . एक आश्रम दिसला. आश्रमातील बाबाजींनी माझी हालत बघून प्रथम पाणी दिले. जेवण दिले.आणि झोपायला सांगितले....!
झोपलो... अगदी गाढ झोपलो....
वैद्यजी सांगत होते, झोप झाल्यावर बाबाजींना सर्व हकिकत सांगितली. पण हा मोठा प्रसंग सोडला तर मला पुन्हा कधीही त्रास झाला नाही. मैय्याने जी परिक्षा घ्यायची ती पहिल्या पाच सहा दिवसात घेतली. नंतरची परिक्रमा राजेशाही थाटात सुरू आहे......!
पुष्कळ वेळ ते बोलत होते. गुरूजींना पेंग आली होती. वैद्यजी निघून गेले...!
नंतर परिक्रमेत कळलं की , हे सुभाष वैद्य. यांनी अनेक वेळा "कैलास मान सरोवर" परिक्रमा केली आहे. आता मला आठवले, की, मी कैलासला जाण्यापूर्वी मला सौ. उषाताई जाधव यांनी दोन पुस्तके पाठवली होती. त्यात एक होते."अद्भुत कैलास"! या पुस्तकाचे लेखक सुभाष वैद्यजी होते..!जवळ जवळ २४ वेळा कैलास परिक्रमा करणारे वैद्यजी आमच्या बरोबर होते. पण त्यांचे मोठे पण त्यावेळी आम्हाला कळलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा मी पुढे निघून गेलो होतो..!
वैद्यजी आजही परिक्रमेत आहेत.३वर्षे ३महिने १३दिवसांत परिक्रमा पुर्ण झाल्यावरही ते २१ दिवस अमरकंटकला थांबणार आहेत. काही दिवसापुर्वी ते उत्तर तटावर सहस्त्रधाराला होते. माझ्या मते ते १ जूनला त्यांच्या घरी जातील...!
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग४०
नर्मदे हर! आज अक्षय त्रितीया! परशुराम जयंती!"अक्षय" परशुरामांचा जन्मोत्सवा निमित्ताने सर्वाना
शुभेच्छा!
काय योगायोग आहे पहा, आज मी अरुणाचलमला "परशुराम कुंडा" मध्ये स्नान करणार आहे. आणि आजच्या परिक्रमा भागात परशुरामांचा उल्लेख येणार आहे.
असो. तर, नेमावरला दिपक आणि पाटील थांबणार होते. मी आणि गुरूजी आश्रमातून निघालो. मला आठवले , रात्री वैद्यजी बोलले होते की, आज पर्यंतच्या परिक्रमेत मला दोन महात्मे भेटले. त्यापैकी एक इथेच आहेत. रेणुका मातेच्या मंदिरात!(वैद्यजी परशुरामा बद्दल खोल वर अभ्यासपुर्ण माहिती गोळा करत होते.)जमल्यास दर्शन घ्या.
मी आणि गुरूजी रेणुका मातेच्या मंदिरात गेलो. मंदिर रस्त्यावर असले तरी पटकन कोणाचे लक्ष जाईल, असे नव्हते. गेट लावलेला..... जणु जगाशी काही देण घेण नाही....... गेट उघडून आम्ही आत गेलो. समोरच स्वामीजी बसलेले. नर्मदे हर झाले. स्वामीजी म्हणाले, रेणुका मातेचं दर्शन घेऊन या. शेजारी मातेचं लहानसं मंदिर आहे. मनात आलं, जमदग्नी ऋषींची हि तपोभूमी......! परशुरामांचं बालपण इथेच फुलले असणार...... विद्येचे काही पाठ आपल्या वडीलांकडून , जमदग्नीं ऋषींकडून इथेच गिरवले असणार.... रेणुका माते कडून संस्काराचे बालकडू इथेच मिळाले असणार...! सगळ्या गोष्टी मनात तरळत होत्या. मंदिरातील रेणुका मातेच्या चरणावर मस्तक टेकले.... कुठली तरी उर्जा... शक्ती..... आपल्या शरीरात प्रवेश करतेय असं जाणवलं!
गुरूजी म्हणाले, चला... पाय निघत नव्हता. गुरूजी पुढे गेले. मंदिराच्या बाहेर.....मी तिथेच.! स्वामीं जवळ बसलो होतो. काय ते आता आठवत नाही. पण काही तरी विचारले आणि स्वामी त्यावर बोलत होते. तेवढ्यात गुरूजी बाहेरून पुन्हा आले.दोघांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि निघालो......
परिक्रमेत कधी कधी आपलीच आपल्याला लाज वाटते. अजून थोडा वेळ तिथे थांबलो असतो तर..... पण नाही. पुढे जायचं असते. परिक्रमा वेळेत "आटपायची" असते. मग खंत करत बसण्या पलीकडे आपल्या हाती काही नसते!
नेमावर संपताना एका संस्कृत पाठशाळेतून नर्मदे हर झाले.. गेलो. मुलांचे पठण सुरू होते. ते संपताच सर्वांना चहा दिला गेला.
पुढे गौनी नदी लागली. गौनी संगम! गौनी नदी पार केली. काही अंतर पार केले. आणि परशुरामाचे मंदिर लागले. मी देखील परशुराम भूमीतलाच! चिपळूणचा...! त्यामुळे परशुरामा बद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा अधिक! मंदिरात गेलो. दर्शन घेतले...... समोर द्रुक्ष्य तरळू लागले... परशुराम आपल्या वडीलांच्या मारेकऱ्याला.... सहस्त्रार्जुनाचा वध करतोय...! हो. इथेच सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला आणि पुढे २१ वेळा धरती निःक्षत्रिय केली..... त्याची सुरुवात इथून झाली.!
मंदिरालगत "नर्मदा आश्रम" आहे. इथे जे बाबाजी आहेत ते पुर्वी शालिवाहन आश्रमात होते. काही कारणांमुळे त्यांनी शालिवाहन सोडले. आता इथं परिक्रमा वासींची सेवा करतात. बाबाजी गुरूजींचे ओळखीचे होते. म्हणाले, थांबा! नऊ वाजताच आम्ही थांबलो. छान पैकी कपडे धुतले.आश्रमात समोरच्या इमारती मधे अखंड धुनी आहे. तीचे दर्शन घेतले.
बाबाजी स्वतः स्वयंपाक तयार करीत होते. अकरा वाजता आमची पंगत बसली.नर्मदे हरssssss!
भोजन करून आम्ही निघालो.जवळच मैय्या किनारी "पाच लड्डू" आहेत. म्हणजे एका दगडावर पाच लाडूच्या प्रतिमा आहेत. इथं परशुरामाने आपल्या वडीलांचे पिंडदान केले होते. श्राद्ध तर्पण केले होते. त्याची स्मृती म्हणून हे पाच लड्डू! आजही लोक इथे नर्मदा किनारी पिंडदान करतात!
आता वेळेवर पोटात गेले होते. त्यामुळे चिंता नव्हती. इथून पंधरा एक किमी वर छिपानेर! अगदी आरामात जाऊ याची खात्री! आणि गेलोही......!
साडे चारलाच छिपानेरला पोहचलो. गावाच्या सुरुवातीलच आश्रम होता. "निम्बार्क आश्रम"!आश्रमात पुण्यातील मंडळी सेवेकरी होती. काही दिवसांनी होणाऱ्या यज्ञा साठी यज्ञ मंडप उभारण्यात येत होते. काम करणारेही पुण्यातील होते! चहा आला. मस्त चहा!अगदी फक्कड! पुन्हा घेतला. आणि समोरच्या इमारतीत तळघरात आसन लावले........
महेश सावंत.
।।नर्मदा परिक्रमा।।भाग४१
निम्बार्क आश्रमात आल्यावर गुरूजींना तापाची कणकण जाणवली. गोळी घेऊन ते अंथरूणात पडून राहीले. त्यांना चहा दिला आणि मी बाहेर गेलो. आश्रमात काही पुस्तके होती. त्यातील एक पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तकाचे नाव होते"ज्ञानगंज"!
मला वाटतं हे मूळ पुस्तक गुजरातीत असावे. अंदाजे पाऊणशे वर्षापूर्वीचे लिखाण असेल!सिद्धभूमी व सूर्योपासने बद्दल यात विश्वास बसणार नाहीत, अशा गोष्टी आहेत!(परिक्रमे वरून आल्यावर मी हे पुस्तक मागवले.)
रात्री आमचे जेवण झाले तरीही आश्रमाचे मुख्य स्वामी आले नव्हते. होणाऱ्या यज्ञाच्या तयारी करीता ते बाहेर गेले होते. रात्री उशीरा आले.
सकाळी गुरूजींचा ताप उतरला होता.आम्ही पुजापाठ आटोपून निघालो. निघताना महाराजांचे दर्शन घेतले आणि निघालो.......
छिपानेरला जरा पुढे धुनीवाले दादाजींचा आश्रम आहे.गुरूजी म्हणाले, दर्शन घेऊन जाऊ. धुनीवाले दादांचे दर्शन घेऊन पुढे निघालो.
दुपारी सीलकंठला हनुमान मंदिरात थांबलो. प्रशस्त परिसर होता. पण मंदिराला कुलूप होते. मात्र आमच्या जेवणाची सोय होणार होती. मला वाटते आश्रमाचे बाबाजी सरदारजी असावेत. जेवण झाले.जेवून थोडे पुढे जात नाही तेवढ्यात मागून एक गाडी आली. गाडीतील व्यक्ती बोलली, आगे एक किलो मीटर पे मंडी गाव है। मंडी के आश्रम मे नर्मदा पुराण चल रहा है। आप वहाँ रूकीए।
मी होकार दिला.गुरूजी पुढे निघून गेले. खरं म्हणजे गुरूजीना टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला होता!कारण मला एकट्याला चालायचं होते. पण गुरूजींनाही दुखवायचे नव्हते. म्हणून मंडीला गेलो. नर्मदा पुराण ऐकायला बसलो. पुराण संपताच थांबण्याचा आग्रह मोडून निघालो.
चालण्याचा वेग वाढवला! रस्त्यात पुन्हा एक गाडी थांबली.त्यांनी विचारले, बाबाजी, कहाँ रूकने वाले हो?
मी....... मालूम नही।
तो म्हणाला, "छिंदगाव मे राम मंदिर है। वहा अच्छी व्यवस्था होगी। ऊधरही रूकिए।"
ठिक है।..... असे म्हणून पुढे निघालो.
चालण्याच्या गडबडीत चपलेचा अंगठा तुटला.
वाटेत एक जण भेटला. म्हणाला, इस शाँर्टकट से जाओगे ,तो सीधा बावरी घाट पहुंच जाओगे । लेकीन खेत मे से रास्ता हो।
त्याच्या कडे दुर्लक्ष करून मी पुढे निघालो. कारण बावरी घाटला गुरूजी थांबणार होते. छिंदगाव आले. आता राम मंदिरात जायचे. म्हणून एकाला विचारले, राम मंदिर कहाँ है?
तर तो म्हणाला, आओ।
.... त्याच्या पाठोपाठ गेलो. वाटलं ,हा आपल्याला राम मंदिरात घेऊन जाईल. पण त्याने स्वतःच्या घरी नेले. यांच नाव कमलसींग सेन!कमलसींगच्या घरी एक गाव कामगार चप्पल दुरुस्त करत होता.मी माझ्याही चप्पलेचा अंगठा लावून घेतला!
कमलसींग अनेक वर्षे परिक्रमा वासींची सेवा करत आहेत. कमलसींग नेहमीच या वेळेवर रस्त्यावर थांबतात. आणि परिक्रमा वासींना घरी आणून त्यांची सेवा करतात !
मला घरी सोडून ते पुन्हा बाहेर गेले. येताना अजून चार परिक्रमा वासी बरोबर होते! हे परिक्रमा वासी नाशिकचे. एक ६५वर्षाच्या मैय्याजी आणि तिघे वारकरी पंथातील होते. पुर्वी भेट झाल्यामुळे ओळख होती.
कमलसींग सेनच्या पडवीत आम्ही आसन लावले. हात पाय धुतले.गरम चहाचा कप पोटात रिझवला. आणि सायंपाठाच्या तयारीला लागलो.......
. महेश सावंत.