रूपाली पारखे- देशिंगकर- नर्मदा जयंती
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
रूपाली पारखे- देशिंगकर- नर्मदा जयंती
रूपाली पारखे- देशिंगकर- नर्मदा जयंती
आज नर्मदा जयंती . मैय्याचा वाढदिवस. आई सगळ्यांना सगळं देते , सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवते, आनंद सोहोळे साजरे करते पण आई चा वाढदिवस लक्षात ठेवून तो साजरा होतोच असं नाही. आईपासून लांब राहात असलो तरी तिचा आनंद दिवस साजरा करायलाच हवा म्हणून आज घरात गोडधोड करायचं.
जन्मापासून सोबत असणारी आणि आत्मबल वाढवणारी पुण्यदा नर्मदा . जगदानंदी आनंदकंदी नर्मदा... जिच्या स्मरणानेही पापक्षालन होतं ती माझी नर्मदा मैय्या . प्रवाही राहणं हा नदीचा स्थायी गुणधर्म आणि हक्क आहे. आपल्या वाहण्याचा मधुर आवाज अर्थात मधुरारव करणारी ती रेवा अर्थात माझी नर्मदा मैय्या. मध्यप्रदेशातल्या अमरकंटकच्या जंगलात उगम पावणारी मैय्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून गर्जत, प्रवाही राहात, खळखळत अविरत वहाते. सुमारे तेराशे किलोमीटर्सचा प्रवास करून मैय्या गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या भरूच शहराजवळ खंबातच्या आखातात अरेबियन समुद्राला मिळते. गुजरातच्या सीमेवर असलेल्या खान्देशातल्या माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या जवळून मैय्या वहाते. माझ्या पूर्वजांचा आणि मैय्याचा हा पहिला संपर्क. पोटापाण्यासाठी गुजरातेत स्थलांतर केलेल्या माझ्या कुटुंबाची नाळ मागच्या पिढीतच मैय्यासोबत जुळली आणि तिच्या कृपेने आमची आयुष्यं संपन्न झाली. मोठ्या महाराजानी गरुडेश्वराला आणि सद्गुरूंनी नारेश्वरला कायम निवास केल्याने मैय्येसोबत स्नेहाचं त्रिदल पूर्ण झालं आणि त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे या जाणिवेला जोपासलं गेलं.
जन्मदात्री आईखेरीज अजून कुणीतरी आहे जिच्या स्पर्शासाठी मन आसुसलेलं असतं ...त्या स्पर्शात असलेली ताकद.... आश्वस्त संवेदना जाणवणं म्हणजे हेच ते. त्या स्पर्शातल्या सतत जाणवणाऱ्या शुभंकर संवेदना... अगदी निर्मल वाहत्या. ... निखळ निवळकंच... मनाचा वेध घेणाऱ्या.. मनाला खंगाळून निथळून काढणाऱ्या ... रिकाम्या पोटाची खळगी ओंजळभर पाण्याने भरणारा मैय्याचा "किनारा तुज पामराला, आवर्त मन पाखराला" म्हणत अविरत वाहता असलेला हा स्पर्श ... मनाच्या आंदोलनाला शांतावणारा .... कोऽहं ? कोऽहं ? कोऽहं ? विचारल्यावर उत्तर एकच....त्वदीयपादपङ्कजं |
"प्रवाही राहिल्याने मनाचं डबकं बनत नाही" हे सांगणारी आणि मन प्रवाही ठेवणारी माझी मैय्या .... तिच्या स्पर्शाने माझी किल्मिषं , मनाची आवर्तन, आंदोलनं ,तगमग संपू दे .... मैय्याच्या सोबतीने दूर दूर वाहत जाईन .... पसरलेली निबिड अरण्य , जंगल पाहीन ...नर्मदा का हर कंकर, कहलाये शंभो शंकर म्हणत माणसातला देव माणूस शोधेन .... तो मिळाल्यावर "पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम्" म्हणत मैय्याच्या पदराला अंगावर पांघरून शांतपणे निजून जाईन . अर्थात पुन्हा ह्या रौरव नरकात परत न येण्यासाठी .....
"हे जगदानंदी, माझ्या ह्या मागणीवर तू "तथास्तु" म्हण एवढंच तुला विनवतेय"....
"नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे " |
नर्मदा जयंतीच्या शुभेच्छा . एका तरी नदी बरोबर स्वतःला जोडून घ्या आणि नदी सोबत स्वतःला जगवा.
नर्मदे हर ।