नर्मदा परिक्रमा - विलास वैद्य
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदा परिक्रमा - विलास वैद्य
नर्मदा परिक्रमा - विलास वैद्य
नर्मदा परिक्रमेसाठी प्रेरणा व परिक्रमा आरंभ...
२०१७ मध्ये यूट्यूब वर चितळे मातांचा परिक्रमा व्हिडिओ बघीतला .सरळ आणि सोप्या भाषेत त्यांनी आपल्या परिक्रमा प्रवासाचे दिव्य वर्णन केले होते. तो एक व्हिडिओ बघीतल्यावर बाकीचे व्हिडिओ पाहण्याचा मोह आवरला नाही. सर्व कामे बाजूला सारून मी ऊरलेले सर्व नर्मदा परिक्रमा भाग १८ पर्यंत व्हिडिओ पाहून समाधान करून घेतले. त्यांचे परिक्रमा अनूभव ऐकून मला एक अलौकिक आनंद मिळाला .नंतरही मी रिकाम्या वेळात चितळे मातांचे परिक्रमा अनूभव खूप वेळा ऐकले. परिक्रमेत मैया आपल्या सोबतच असते प्रत्येक कठीण परिस्थितीत कोणत्या न कोणत्या रूपात ती आपल्या भक्तांसाठी धावून येते .असे चितळे मातांचे परिक्रमा अनूभव ऐकून मी धन्य झालो. आपणही मा नर्मदा परिक्रमा करायचीच असा ठाम निर्णय घेतला .
डिसेंबर २०१८ रोजी सर्व पूर्वतयारी करून मित्र व परिवारातील नातेवाईकांचा निरोप व आशिर्वाद घेऊन मी "आत्मा मालिक ध्यानपिठ "येथे गूरूदर्शन व गूरूदेवांची परवानगी घेण्यासाठी आलो आश्रमातील बाकी संतांना मी परिक्रमा साठी जातोय म्हणून आनंदाने सांगितले .मैयाला भेटायला जाण्याचा आनंद माझ्या बोलण्यातून त्यांना जाणवत होता.
बाहेर गावी गेलेल्या गुरूदेवांचे दुसर्या दिवशी आश्रमात आगमन झाले. संध्याकाळी गूरूदेवांची पूजा करून परिक्रमेला जाण्यासाठी मी गूरूदेवांची परवानगी व आशिर्वाद मागितले. गूरूदेवांनी मला जवळ बसवून सांगितले की "परिस्थिती आता पहिल्यासारखी नाही आहे ,आम्ही सूद्धा परिक्रमा केली आहे. तूझ्या मनात मैया विषयी नितांत श्रद्धा असेल तर तुला येथेही मैया दर्शन होईल" तू येथेच १ महिन्याच "अनुष्ठान" कर व नर्मदा मैयाच ह्रदयात ध्यान कर .
मग मी "आत्मा मालिक ध्यानपिठ" येथे गूरूदेवांच्या मार्गदर्शनाखाली "एक वेळ वरण भात २५ दिवस, ३ दिवस फक्त पाणी पिऊन, व २ दिवस अन्न पाण्यावाचून ,राहून अनुष्ठान पूर्ण केले. "सद्गूणानंद" नामकरण झाले. व अनूष्ठानाची सांगता झाली .
घरी आलो पून्हा आपल्या परिवारात संसारात रमलो. परिक्रमा करण्याची इच्छा तशीच मनात राहून गेली .दोन वर्ष अशीच निघून गेली .२०१९ रोजी मी ठाम निर्णय घेतला की परिक्रमा करायचीच . मी आता मैया पासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत .डिसेंबर महिन्यात परिक्रमा सुरू करायची ठरल पूर्व तयारी झाली .
डिसेंबर २०१९ मध्ये शिर्डी येथे कामावर होतो .कामावरून राजीनामा दिला. गावी आलो परिवारासोबत वेळ दिला सर्व मित्र परिवाराला भेटलो.
मित्र व परिवारातील नातेवाईक म्हणाले "तिर्थ यात्रा संसार पूर्ण झाल्यावर म्हातारपणात करतात हे वय आहे का परिक्रमा वगैरे करण्याच, चांगले काम सोडले ६ महीने परिवारापासून हजारो किमी दूर जातोय तू पून्हा विचार कर" त्यांच्या बोलण्यावर विचार करून मी परिक्रमेला जाण्याचा विचार रद्द केला होता तेव्हा माझे दिल्लीचे गूरूदेव कुलदीप सिंग फोन करून मला म्हणाले .
आप बहूत भाग्यशाली हो जो आपको "नर्मदा परिक्रमा" करने का शूभ अवसर प्राप्त हूआ है। इस अवसर को मत छोडो । इसी मैया के किनारे तूम्हे भगवान के दर्शन होंगे । दो साल बाद तूम्हे फिर से यह शूभ अवसर प्राप्त हूआ है।
गूरूआज्ञा झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता घरातून बाहेर पडलो .रात्रभर प्रवास करून ६ जानेवारी २०२० सोमवार एकादशी च्या दिवशी सकाळी ओंकारेश्वर येथे पोहोचलो .
मैयाच दर्शन घेतल्यावर अलौकिक आनंदाची प्राप्ति झाली या क्षणाची मी गेली दोन वर्षे वाट पाहीली होती
नर्मदे हर...
६ जानेवारी ते 12 जानेवारी २०२० -
सकाळी स्नान करून गोमूखाजवळील गूरूजींच्या मार्गदर्शनानुसार ओंकार मांधाची परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा उचलण्यासाठी एका बाटलीत मैयाच जल घेऊन पूजेसाठी बसलो .पूजाविधी पूर्ण झाल्यावर मैयाच पात्र ओलांडायचे नाही, नख, केश कापायचे नाही, असे अजूनही काही नियम गूरूजींनी सांगितले व परिक्रमेला सुरूवात केली.
परिक्रमा सूरू करताना कन्या भोजन कराव लागत .पण मी कन्या भोजन न करताच परिक्रमेला सुरूवात केली होती. तेवढ्यात एक कन्या माझ्या समोर आली व तिने एक बिस्कीट पूडा माझ्या कडे मागितला .तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण कन्या भोजन न करताच परिक्रमेला सुरूवात केली आहे. मी त्या कन्येला सांगितले की मला परिक्रमा सूरू करण्याअगोदर कन्या भोजन करायचे होते. ती म्हणे तूम्ही काही काळजी करू नका. तिने अजून ६ कन्यांना बोलावून आणले व म्हणे तूम्ही जवळच्या हाॅटेलमधून आम्हाला एक एक समोसा घेऊन दिला तरी कन्या भोजन झाले समजा. मला ही कल्पना आवडली मी लगेच त्या ७ कन्यांना घेऊन हॉटेलात गेलो व हाॅटेलवाल्याला सांगितले की या कन्यांना हव ते खाण्यासाठी द्या गरमागरम समोसे व पोहे खाऊन तृप्त झालेल्या कन्यांना जाताना एक एक फ्रूटी सूद्धा सोबत दिली. त्या जाणारच होत्या तेवढ्यात अगोदर भेटलेल्या कन्येने मला दर्शन घ्यायला सांगितले .घाईगडबडीत मी दर्शन घ्यायला विसरलो होतो मी लगेच त्या ७ कन्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतले व परिक्रमेला सुरूवात केली .
गजानन आश्रम येथे जाऊन भोजन प्रसाद घेतला त्यांनी प्रमाणपत्र मागितले. माझ्या कडे ते नव्हते म्हणून मला भोजन प्रसादासाठी ३५ रूपये मोजावे लागले. नंतर मी रस्याने जाताना मला आठवले की आपल्याला किनार्यापासून ५ किमतीपेक्षा जास्त दूर जायचे नाही .मॅप पाहील्यावर कळले की मी किनार्यापासून दूर आलोय .मी मूख्य रस्ता सोडून किनार्याकडे चाललो .तासाभरात पून्हा मैया किनारी आल्यावर एका आश्रमासमोर आल्यावर त्यांनी "नर्मदे हर" म्हणून स्वागत केले. व आसन लावायला सांगितले "आसन लावणे" म्हणजे काय मला माहीत नव्हते. ध्यानासाठी जे आसन घेऊन बसतात त्याबद्दलच ते बोलले असावेत असे समजून मी आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसलो. पंधरा वीस मिनिटे ध्यान केल्यानंतर पूढे जाण्यासाठी निघालो. तेव्हा महाराज म्हणाले "रूकना नहीं है क्या" तेव्हा मला समजले की आसन लावणे म्हणजे आज आपल्याला येथे थांबण्यासाठी महाराज म्हणत होते .
पूढील रस्ता संपून किनार्याने छोटे झाडेझूडपे बाजूला करून किनार्याने जाताना कपड्यांना बरेच काटे चिकटले पूढे एका आश्रमात मला चहा मिळाला व त्यांनी चहाचा कप मलाच धुवायला सांगितला .प्रत्येक आश्रमाचे असेच नियम असतात हे मला ऊशीरा कळाले .
संध्याकाळी रस्ता चूकून एका शेतातून ओढ्यात ऊतरलो तर अंधार पडला. सोबतीला कोणी नाही पायात चप्पल नाही .७ वाजता "नजर निहाल आश्रम"वर पोहोचलो. पूजा पाठ करून भोजनासाठी त्यांनी दरवाजाजवळ बसवले. चपाती देताना दूरूनच फेकली .मला हे अपमानास्पद वाटले आलेल्या अतिथींचा कोणी असा अपमान करत का. मी दिल तेवढे खाऊन जेवणाची प्लेट धूवून आपल्या आसनावर जाऊन झोपून घेतले .सकाळी चहा न घेताच पूढे मार्गस्थ झालो .
रोजनिशी लिहायला १३ जानेवारी पासून सुरूवात केली. त्यामुळे दुसर्या दिवशीची काही आठवण नाही तिसर्या दिवशी किनार्याने जाताना दूपारचे १ वाजले कोठेही जेवण मिळाले नाही. मी किनार्याने वर चढून लोकवस्ती कडे गेलो एका घरी आश्रमाची चौकशी केली. जेवणाची सोय कोठे होईल म्हणून विचारले .तर घरातील माताजी म्हणाल्या, परिक्रमेत आहेस का प्रमाणपत्र आहे का मी नाही म्हटल्यावर त्या म्हणे तूला पूढे खूप अडचणी येतील. प्रमाणपत्राशिवाय आश्रमात प्रवेश नसतो. मी तर घाबरून गेलो आता काय करायचे. त्या माताजींनी सकाळच्या चपाती व भाजी खायला दिली. नंतर पूढे जाताना मी माझे परिक्रमा मार्गदर्शक अपूर्वानंद कुलकर्णी महाराज यांना फोन केला. व माझी समस्या सांगितली ते म्हणाले पूढे "मा नर्मदा सद्भावना अन्न क्षेत्र शालिवाहन शिव मंदिर बावडाटौडी" येथे भंडारी बाबा यांना भेट व त्यांच्या कडून प्रमाणपत्र बनवून घे .महाराजांची भेट घेतल्यावर ते म्हणाले आधार कार्ड आहे ना सोबती मग काही काळजी करू नको माझा फोन नंबर असूदे काही अडचण आली तर फोन कर
११ तारखेला अनवाणी चालताना पायाला जखमा झाल्या व त्यात डांबरी रस्त्यावरील बारीक रेती जाऊन चालायला त्रास होऊ लागला .मी "अपूर्वानंद कुलकर्णी महाराजांना" फोन केला व मी चप्पल घालणारच नाही म्हणून सांगितले ते म्हणाले परिक्रमा करताना मैया सोबतच असते तूम्हाला त्रास झाला तर मैयाला सूद्धा त्रास होणारच आणि पायाला जास्त दुखापत झाली आणि त्यामुळे परिक्रमा थांबवण्याची वेळ आल्यावर काय करणार .एवढे सामजाऊन सांगितल्यावर मी चप्पल घालण्यासाठी तयार झालो .पूढे मी दोन तासात दोन किमी चालल्या वर मला एक परिक्रमावासी भेटले. "मला आता चपलांची आवश्यकता नाही, माझ्या पेक्षा या चपलांची तूम्हाला आवश्यकता आहे. असे मला मैयाने सांगितले" तेव्हा तुम्ही या चपलांचा स्विकार करावा. त्यांनी दिलेल्या चपला घालून आम्ही पूढे एका हनुमान मंदिरात आलो .माझ्या मूळे त्यांना अनवाणी चालताना पाहून मला दूख्ख झाले. कारण अनवाणी चालताना काय त्रास होतो हे मला ठाऊक होते .त्या गावातील गावकऱ्यांकडून दुसर्या जून्या चपला घेऊन मी त्यांच्या चपला त्यांना पुन्हा सुपूर्त केल्या.
पूढे मला तीन परिक्रमावासी संत सोबती झाले. आम्ही एका राममंदिरात रात्री साठी थांबलो .मला बर वाटत नव्हते मी गेल्याबरोबर झोपून घेतले. तेथे सदाव्रत होते महाराजांनी खिचडी भात बनवून मला भोजन प्रसादासाठी झोपेतून ऊठवले .
१२ तारखेला बरवाणी येथे मी चपला खरेदी केल्या त्या दिवशी संध्याकाळी खूप उशिरा पर्यंत चाललो पण कोठे आश्रम किंवा राहण्याची सोय झाली नाही पूढे ५ किमी दूर आश्रम होता तिथे पोहोचायला रात्रीचे नऊ वाजले असते म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरी रात्री राहण्याची सोय करा म्हणून विनंती केली त्या शेतकऱ्याने आमची खूप आदराने विचारपूस केली रात्री दाळ चपाती भोजन प्रसाद दिला व झोपण्याची ऊत्तम सोय केली .
नर्मदे हर..
!! १४ जानेवारी २०२० !!
१३ जानेवारी दुपारी चार वाजता "रम्या परिक्रमावासी आश्रम दत्तवाडा "येथे पोहोचलो .महाराजांचे दर्शन झाले, निवासाची व भोजन प्रसादाची ऊत्तम व्यवस्था महाराजांनी केली. महाराजांच्या देखरेखीखाली गरमागरम चपाती वरण भात बटाटा सुकी भाजी व फळे अशी उत्तम व्यवस्था त्यांनी केली. गेली पाच सहा दिवस आम्हाला फक्त दाळ तिक्कड भोजन प्रसाद म्हणून मिळाला होता मैयाच्या कृपेने आज दाळ भात भाजी पोळी मिळाली होती. तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही मातेच चिंतन करत झोपी गेलो.
१४ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता उठलो .आज थंडी खूप होती स्नान पूजापाठ करून बाालभोग घेऊन पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली .दोन ठिकाणी चहाचा पाहुणचार झाला. 12 जानेवारी पर्यंत मला तीन परिक्रमावासी संत सोबती होते .एका गावात मी त्यांच्यापासून दुरावला गेलो व पुढे मला पाच परिक्रमावासी संत सोबती झाले. जतीन त्रिवेदी महाराज, मीठ्ठू महाराज, नानूजी महाराज व इतर दोन संत असे आम्ही सहा परिक्रमावासी संत सोबतीने प्रवास करत होतो. पुढे मी व मिठू महाराज बरेच पुढे निघून गेलो .नंतर मी एकटाच सर्वांना सोडून" नाखून वाले बाबा आश्रमात" पोहोचलो. वीस मिनिटानंतर बाकीचे सर्व संत आले. आम्ही सर्वांनी डाळ व तिक्कड भोजन प्रसाद घेतल्यानंतर थोडा आराम केला. दुपारी तीन वाजता चहा मिळाला .चार वाजता पुढे जाण्याचा रद्द झालं. म्हणून मी आश्रम पाठीमागील पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो .तासाभराने परत आलो तर बाकीचे सोबती मला सोडून निघून गेले होते .दुपारी मी त्यांना सोडून आलो कारण तीन-चार किलोमीटर चालल्यानंतर आरामासाठी व स्मोकिंग करण्यासाठी ते थांबायचे आणि आता संध्याकाळी ते मला सोडून गेले होते. माझ्याजवळ मार्गदर्शिका नव्हती म्हणून मला पुढे कोणत्या गावात जायचं हे माहीत नव्हतं .त्यांना जाऊन 30 मिनिटे झाली होती एक ते दीड तासात मी वायू वेगात त्यांच्यापर्यंत पोहोचलो .पोहोचल्यावर त्यांना म्हणालो "छोटे बच्चो को ऐसे कोई छोड के आता है क्या" माझ्या बोलण्याच त्यांना हसू आल .
आम्ही दोन-तीन दिवसापासून सोबत होतो .पण आज पहिल्यांदाच मी त्यांच्याशी फ्रेंडली बोललो होतो. याचा त्यांना आनंद झाला .ते सर्व संत वयस्कर होते स्मोकिंग करणारे होते पण मनाने फार चांगले होते .मला कमी बोलणे व एकांत अधिक प्रिय आहे. म्हणून मी त्यांच्या पासून थोड दूरच होतो जेव्हा मी त्यांना म्हणालो "छोटे बच्चे को कोई एकेला छोडके आता है क्या ! तेव्हा पासून त्यांनी माझी खूप काळजी घेतली .मी थोडा मागे राहीले ना तरी मिठ्ठू बाबा म्हणायचे "अरे बच्चा कहा रह गया ! ऊसका ध्यान रखो". बच्चे चलो मोबाइल छोडो भोजन का समय हो गया । असे खूप प्रेम दिले
संध्याकाळचे ५ वाजले आम्ही निवासस्थानाची चौकशी करायला सुरुवात केली . एका घरी आम्हाला चहा मिळाला त्यांनी आम्हाला "अंजड" या गावात राममंदिरात तूमची निवास व्यवस्था होऊ शकते म्हणून सांगितले. तासाभरात आम्ही राममंदिरात पोहोचलो .राममंदिरातील पुजार्याने आमचे स्वागत केले .रात्री भोजन प्रसाद म्हणून खिचडी भात व कढी बनवली .भोजन प्रसाद घेऊन रात्री रोजनिशी लिहून सोबतच्या संतांबरोबर आध्यात्मिक विषयावर चर्चा केली .मी परिक्रमेला कसा आलो .प्रेरणा कोणाकडून मिळाली वगैरे .नंतर मैयाचे नामस्मरण करत झोपी गेलो
नर्मदे हर
!! १५ व १६ जानेवारी २०२० !!
१५ जानेवारी सकाळी ५ वाजता स्नान पूजापाठ करून बडवाणीच्या दिशेने निघालो .रस्त्याने बर्याच ठिकाणी बालभोग व चहा मिळाला. दूपारी १२ वाजता बडवाणी शहरात आलो. योगमाया मंदीरात भोजन प्रसादाची व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही २ किमी पूढे रम्या नर्मदा परिक्रमावासी आश्रमात पोहोचलो .भोजन प्रसाद घेउन मी पूढे जाण्याचा निर्णय घेतला. दूपारनंतर परिक्रमावासींना पूढे प्रवासासाठी बंदी होती. कारण पूढील रस्ता जंगलातून जातो १३ किमीच जंगल पार करून "पाटी"नावाच्या गावी जावे लागते .
पुढे जाण्यात रद्द झाल्यावर आश्रमाच्या पाठीमागील तीन किलोमीटर दूर "जैन तीर्थ क्षेत्र" येथे जाऊन दर्शन घेऊन आलो. संध्याकाळी पूजा पाठ भोजन प्रसाद व शुभ रात्री.
१६ जानेवारी सकाळी पाच वाजता उठलो स्नान पूजापाठ प्राणायाम करून महाराष्ट्रातील परिक्रमावासीन सोबत पुढील प्रवासासाठी निघालो . खूप दिवसांनी मराठी, बोलण्यासाठी सोबती मिळाले .मकरंद महाराज बिल्दीकर ,मंदार महाराज बिल्दीकर , व पद्मभूषण महाराज आळंदीकर, बावनगजाजी मंदिरासमोर एका स्टाॅपवर आम्ही चिवडा व मूरमूरे बालभोग म्हणून खाल्ले .डोंगर चढून जाताना खूप विनोद करत गेलो. तिघेही महाराज खूप मनमिळावू स्वभावाचे होते .पूढे लहान मुलांना चाॅकलेट देऊन त्यांचे " नम्मदे हल "असे बोबडे बोल कानावर घेत आनंदाने प्रवास करत चाललो .
पूढे एक ३ वर्षांची लहान मुलगी दिसली .तिच्या कडे गेल्यावर चाॅकलेट देण्यासाठी बॅग उतरवताना ती घरात निघून गेली. परत येताना तिचा भाऊ पण सोबत घेऊन आली. त्या मुलाच्या हातात पाण्याचा ग्लास होता .त्या दोघांचा सेवाभाव पाहून मी थक्क झालो. किती ऊच्च संस्कार मिळाले होते त्यांना आपल्या आईवडिलांकडून .जय हो मा नर्मदा.
दूपारी एका हनुमान मंदिरात आम्ही चौघांसाठी खिचडी भात बनवणार होतो. तोच पाठीमागून माझे जूने परिक्रमा वासी सोबती आले .मग मंदार महाराज व जतीन त्रिवेदी महाराज यांनी खिचडी भात बनवला. भोजन प्रसाद घेऊन आराम करून आम्ही ५ वाजता पाटी या गावात पोहोचलो. मी गावात फेरफटका मारून आलो .संध्याकाळी सेवेकर्यांसोबत मी व मकरंद महाराज आम्ही चपाती बनवण्यासाठी सेवा दिली. भोजन प्रसाद घेऊन मोबाइल चार्जर वायर चिकटवण्यासाठी मला फेवीक्वीकची गरज होती. घेण्यासाठी एका दुकानात गेलो तर त्यांनी मी परिक्रमावासी म्हणून माझे चार्जर ठीक करून दिले व लहान मुलांना चॉकलेट घेतले त्याचे सूद्धा पैसे घेतले नाही. आनंदात हा प्रसंग मी मकरंद महाराज यांना सांगितला त्यांना ही आनंद झाला. शुभ रात्री.
नर्मदे हर
!! १७ जानेवारी २०२० !!
सकाळी ५ वाजता ऊठलो .स्नान पूजा पाठ प्राणायाम केल्यानंतर चहा घेऊन सकाळी ७ वाजता "पाटी" गावातून "बोकराटा"गावच्या दिशेने मार्गस्थ झालो. पूढे आम्हाला प्रत्येकी दोन दोन बिस्किट पूडे मिळाले.
मकरंद महाराजांसोबत चालताना परिक्रमासाठी आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळाली या विषयावर चर्चा केली. लहान असताना आजोबा "नर्मदाष्टक" म्हणायचे. आम्हाला समजत नव्हते पण ऐकायला गोड वाटायचे. जग्गनाथ कूंठे यांचे "नर्मदे हर "पुस्तक वाचले. त्यातील अद्वितीय अनूभव वाचून एकदा तरी मैयाची परिक्रमा करावी अशी इच्छा होती .
मकरंद महाराज १४ वर्षापासून आॅस्ट्रेलियात सिडनी येथे ओकामा इंडस्ट्री येथे सर्विस मॅनेजर या पदावर जाॅब करत होते. त्यांनी परिक्रमेसाठी ३ महिन्यांची सुट्टी मागीतली. सुट्टी नामंजूर झाल्यावर राजीनामा देऊन खास परिक्रमा करण्यासाठी मकरंद महाराज भारतात आले होते . मी त्यांना विचारले आपल्या परिवाराला (आई, पत्नी ,दोन मुली ) सोडून ,नर्मदा परिक्रमेसाठी भारतात येण्याचा एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर कोणी विरोध केला नाही का ? महाराज म्हणाले - मित्रांनी विरोध केला म्हणाले तूझ खूप नूकसान होते आहे. जाॅब सोडलाय पून्हा मिळेल की नाही. महीन्याला ५० ते ६० हजार डाॅलर चे नूकसान थोडे नाही. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो .महाराजांचे अनुभव ऐकून मी थक्क झालो. शेवटी मोठे निर्णय घेण्यासाठी काळीजही मोठेच लागते.
मला परिक्रमा साठी प्रेरणा कोणाकडून मिळाली या विषयावर महाराजांशी बोलत दुपारी १ वाजता आम्ही बोकराटा येथे पोहोचलो. आम्ही चौघे होतो थकलो होतो व जोराची भूक पण लागली होती. परिक्रमावासींना सेवा देणार्या किराणा दुकान वाल्या माताजींनी सदाव्रत साठी दाळ तांदूळ देऊ का म्हणून विचारले. सदाव्रत बनवण्यासाठी तिथे ना चूल होती ना चूलीसाठी लाकडे .बनवण्यासाठी खूप वेळ जाईल त्यात जोराची भूक पण लागलीय .हा विचार करून आम्ही माताजींना खिचड़ी भात बनवण्यासाठी विनंती केली. हो नाही करत माताजींनी खिचड़ी भात बनवण्यासाठी हो म्हटले. माताजी आमच्या साठी भोजन बनवण्यासाठी गेल्या अन पाठीमागून अजून ७ ते ८ परिक्रमा वासी आले. ते सुद्धा भूकेलेले होते त्यांना सकाळपासून काही मिळाले नव्हते. मी माताजींना अजून परिक्रमा वासी आल्याचे सांगितले. दोन किलोच्या तांदळात १२ लोकांना खिचड़ी भात बनवण्यात आला .साहजिकच तो कमी पडणार होता. मकरंद महाराजांनी नंतर आलेल्या परिक्रमावासींना अगोदर भोजन प्रसाद देऊ केला व नंतर उरलेल्या खिचड़ी भातावर आम्ही चौघांनी भूक भागवली. नंतर आलेले परिक्रमावासी आराम करून पुढे मार्गस्थ झाले आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला .
संध्याकाळी भोजन प्रसाद काय बनवायचा यावर विचार विनिमय करण्यात आला .मंदार महाराजांनी आलू पराठेच बनवायचे यावर जोर दिला .मग काय ठरल संध्याकाळी आलू पराठे बनवायचे. तासाभरात पराठे बनवून होतील हा विचार करून आम्ही निवांत होतो. पण पराठे बनवण्यासाठी आम्हाला चूल बनवायची होती ,लाकडे गोळा करून आणायचे होते ,भांडी घेऊन यायचे होते ,अनेक समस्या होत्या हा विचार आम्ही केला नाही. त्यात कढाई करण्याच ठरल. संध्याकाळी ४ वाजता मंदार महाराज व पद्मनाभ महाराज बाजारात जाऊन रवा ,तूप व पराठे बनवण्यासाठी बटाटे घेऊन आले .मी लाकडे गोळा करून आणली .मकरंद महाराजांनी माताजींंकडून भांडी घेऊन आले. चूल पेटवायला अर्धा तास गेला, बटाटे उकडून होईपर्यंत सूर्यास्त झाला .लाईटची सोय नाही, दूपारी अर्धपोटी जेवलो होतो म्हणून भूक लागली होती. आता हे पराठे बनवण्याअगोदर कढई बनवायची कन्या पूजन व भोजन व नंतर पराठे खायला मिळणार .साधारण ९ वाजेपर्यंत वाट पहावी लागणार .पद्मनाभ महाराजांनी मोबाइल ची लाईट पकडली. मकरंद महाराजांनी कढई बनवण्यासाठी घेतली .तर मी चूल पेटती ठेवण्याची सर्वात कठीण जबाबदारी स्वीकारली. मंदार महाराज पराठे बनवण्याची तयारी करत होते .
रात्रीचे ७.३० वाजले" कन्या झोपी जाण्याअगोदर त्यांना बोलावून आणा व कन्या पूजन व कन्या भोजन लवकर करून घ्या "असे माताजींनी सांगितले.कन्या भोजन वेळेत पार पडले.
आता आम्हाला आमच्या कष्टाचे फळ म्हणजे पराठे मिळणार होते. ज्याच्यासाठी आम्ही एवढे कष्ट सहन केले होते. मंदार महाराज व पद्मनाभ महाराजांनी पराठे बनवले व पहीले मला खायला दिले .कारण मला खूप भूक लागली होती. नंतर मी व मकरंद महाराजांनी पराठे बनवले. मग बाकी तिघे महाराजांनी पराठ्यांचा आस्वाद घेतला.
अशा प्रकारे आजची संध्याकाळ आम्हाला एक अविस्मरणीय आठवण देऊन गेली .
नर्मदे हर
!! १८ जानेवारी २०२० !!
सकाळी ६.३० वाजता ऊठलो .नित्यकर्म आटोपून प्रवासाला सुरवात केली. पूढे सर्व जंगल रस्ता होता .रात्री ऊरलेले शिरा व पराठे सकाळी बालभोग व जेवणासाठी सोबत घेतले .
रस्याने प्रवास करताना मैयाच नामस्मरण करत चालायचे असे मकरंद महाराजांनी निक्षून सांगितले. पण पद्मनाभ महाराज आपल्या जुन्या आठवणी सांगण्यात हरवले. स्वतः तर बोलायचेच पण मंदार महाराजांचा एकांत सूद्धा त्यांनी भंग केला .मंदार महाराजांनी त्यांना सांगितले की प्रवासात आपल्या बडबडीमूळे माझे नामस्मरण होत नाहीए तर पद्मनाभ महाराजांना मंदार महाराजांच्या बोलण्याच वाईट वाटल व ते एकटे आम्हाला सोडून पूढे गेले .पूढे एका ठिकाणी आमची त्यांच्याशी भेट झाली. तर त्यांनी अबोला धरला. आम्ही सोबतच एक नदी ओलांडत असताना पद्मनाभ महाराज पाय घसरून पडले. आम्ही त्यांना आधार दिला.पूढे एका ओढ्यावर आम्ही स्नान केले .दूपारचे भोजन म्हणून रात्रीचे पराठे खाल्ले. पद्मनाभ महाराज पराठे न खाताच पूढे गेले .
पूढे आम्ही महाराष्ट्र जन्मभूमी असलेले "बालमूकूंददास महाराज" यांचे दर्शन घेतले. त्यांनी आम्हाला पूढील प्रवासासाठी मार्गदर्शन केले .ज्यामूळे आमचे २५ ते ३० किमी अंतर वाचले. संध्याकाळी ५ वाजता आम्ही चौघे "राणीपूरा" येथे आलो .एका गावकऱ्याने आम्हाला चहा दिला. रात्रीसाठी सरपंचाच्या घरी व्यवस्था केली. रात्री भोजन प्रसाद म्हणून मसाला भात मिळाला.
रात्री मकरंद महाराज यांच्या सोबत आध्यात्मिक चर्चा केली. जगन्नाथ कूंठे यांचे परिक्रमा व्हिडिओ पाहीले त्यातील कूंठे यांची परिक्रमा पूर्ण झाल्यावर कन्या पूजन वेळी नर्मदा नावाच्या मूलीने डोक्यावर हात ठेवून मराठीत विचारले "झाले का समाधान" तो प्रसंग अंगावर शहारे आनणारा होता. आपल्यालाही मैया कोणत्याही रूपात येऊन दर्शन देऊ शकते म्हणून आपण सतत नामस्मरण करायला हवे असा विचार करत झोपी गेलो .
नर्मदे हर
!! १९ जानेवारी २०२० !!
आजची सकाळ पद्मनाभ महाराज व मंदार महाराज यांना एकत्र आणून ऊजडली होती. त्याच श्रेय मकरंद महाराजांना ज्यांनी रात्री पद्मनाभ महाराजांना उपदेश केला व त्याचे परिणाम सकाळी दिसले.
चहा घेऊन "ऊनबदेव" च्या दिशेने निघालो. रस्ता विचारत आम्ही दूपारी १२ वाजता "ऊनबदेव" ला पोहोचलो .तिथे गरम पाण्याचा कूंड जो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला व त्याजागी पाईप जोडला आहे .आता त्यातून गरम पाणी येते आहे .तिथे आम्ही स्नान करून शिवमंदिरात तासभर शिवाभिषेक व पूजा केली .
दूपारी २ वाजता मार्गस्थ झालो .पूढे आम्हाला एक श्वान सोबती झाले .आज दिवसभर आम्ही बिस्किट खाऊन भूक भागवली. एक अवघड रस्ता उतरून आम्ही हनुमान मंदिर येथे आलो. तिथे नक्की काहीतरी खायला मिळेल अशी अपेक्षा होती .पण तेथील राजेश्वर महाराजांची भाषाशैली फारच अश्लील होती.तिथे सदाव्रत होते. त्यांची भाषा ऐकून भोजन न बनवताच पूढे जायचे म्हणून मी सांगितले. राजेश्वर महाराज थोडे तापड स्वभावाचे होते. म्हणून बाकी सोबतींनी मला पूढे जाऊ नये म्हणून समजावले .पण मला त्या महाराजांची भाषाशैली न आवडल्या मूळ मी पूढे जातोय .हे पाहून मकरंद महाराज, मंदार महाराज, पद्मनाभ महाराज सोबत पूढे जायला तयार झाले. तोपर्यंत अजून ७ ते ८ परिक्रमावासी संत आले. त्यांनी अगोदर चहा बनवला मग आम्ही चहा घेऊन पूढे मार्गस्थ झालो.
संध्याकाळी ६ वाजता आम्ही "काकरदा " येथे पोहोचलो. निवासाची चौकशी केल्यावर एक खूप दिवसापासून साफसफाई न केलेले हनुमान मंदिर दाखवण्यात आले. तिथे लाईट सूद्धा नव्हती .मकरंद महाराज व पद्मनाभ महाराज गावात गेले व त्यांनी रात्रीच्या भोजनासाठी एका दुकानात १५ पाववड्यांची आॅर्डर दिली.गरमागरम वडे खाल्ले .नंतर मकरंद महाराजांनी झोपण्यासाठी आदीवासी मुलांचे शासकीय आश्रम येथे सर्वांची व्यवस्था केली होती .नाही तर अंधारात हनुमान मंदिरात झोपावे लागले असते. आश्रमात झोपण्यासाठी आम्हाला एक हाॅल उघडून देण्यात आला.सोबत आलेल्या श्वानाला थंडीत बाहेर राहाव लागले, म्हणून मी थोडा नाराज झालो होतो. पण मकरंद महाराजांनी समजून सांगितले त्या श्वानाने होस्टेल मध्ये शीसू केली तर त्याचा आपल्याला त्रास होईल .नंतर आम्ही दिवसभराच्या प्रवासाची चर्चा करत झोपी गेलो .
नर्मदे हर
!! २० जानेवारी २०२० !!
होस्टेल अधिक्षकांनी सकाळी चहा दिला, पूढील प्रवासासाठी मार्गदर्शन केले .चहा घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. पूढे एका दुकानात मकरंद महाराज यांनी सर्वांसाठी चहा बिस्किट सांगितले .सकाळचे ८ वाजले तरी थंडी खूप होती दुकानासमोर शेकोटी करून थोडावेळ शेकत बसलो .पूढे घाट चढून जाताना शाॅर्टकट रस्त्या चढून गेलो .
सकाळी १०.३० वाजता पद्मनाभ महाराजांच्या ओळखीचे गोविंद गूरूजी यांच्या घरी थांबलो .गूरूजी येण्याची खूप वेळ वाट पाहीली .तोपर्यंत गूरूजींच्या परिवाराने आमच्यासाठी भोजन प्रसाद बनवला. चटनी भाजी भाकरी एकदम घरच्यासारखेच भोजन प्राप्त करून आम्ही तृप्तीचा ढेकर दिला
कारण काल आम्हाला फक्त बिस्किट व वडे मिळाले होते .
आम्ही जेवढा वेळ गूरूजींच्या घरात होतो श्वान ( भैरव )आमच्या सोबतच होते. पण पद्मनाभ महाराजांनी ते घरात आल्यावर त्याला बाहेर हाकलले .ते काही मला आवडले नाही. भोजन करताना सूद्धा भैरव ( श्वान) ला बाहेर हाकलून दिले .घरातील सदस्यांना भैरव घरात असल्याने काही अडचण नव्हती. पण पद्मनाभ महाराजांनी त्याचा अती द्वेष केला म्हणून मी लवकर भोजन करून एकटाच न सांगताच भैरव ला घेऊन पूढे निघून गेलो .बाकीचे सोबती घरात बसलेले होते मी बरेच अंतर कापून पूढे आलो होतो .
पूढे एका ठिकाणी शेळ्या गवत खात होत्या भैरव ने त्यांना पाहीले व त्यांच्या कडे धाव घेतली व एका लहान बकरीच्या मानेचा चावा घेतला त्या बकरीची प्राणांतिक आरोळी ऐकून मी पूर्ण ताकदीने दगड शेतातील काटे यांचा विचार न करता तिकडे धावलो व त्या बकरीची सूटका केली ऐरव्ही ज्याची तुलना युधिष्ठिराबरोबर स्वर्गाला जाणार्या श्वानाशी करत होतो आमच्या बरोबर परिक्रमा करतोय म्हणून त्याला आमच्या बरोबरीचा समजत होतो तो श्वान एक हिस्र पशु निघाला. मला राग आला आज एक शेळी पकडली उद्या अजून एक पकडेल त्याला त्याच्या चूकीची शिक्षा मिळायलाच हवी मी त्याला एका दाव्याने पकडून ठेवले व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळविले एक शेतकरी येऊन त्याला ओढत घेऊन गेला मी त्याला फाशी द्या म्हणून सांगितले. असे केल्याने कित्येक शेळ्या त्याच्या हातून मृत्यू होण्यापासून वाचतील .
त्याला दूर घेऊन गेल्यावर मी घाबरलो माझ्या मूळ ते श्वान मरणार जे दोन दिवसापासून माझ्या सोबत होते .ज्याची मी काळजी घेतली मला मिळालेल्या एका रोटीतली अर्धी मी त्याच्या साठी बाजूला काढून ठेवली होती. भैरव ला घेऊन गेलेल्या शेतकर्याबरोबर गेलेली लहान मूलगी परत आल्यावर मी तिला विचारले की त्या लोकांनी भैरव सोबत काय केले. तिची भाषा मला समजली नाही तिच्या बोलण्यावरून वाटले की त्या लोकांनी नक्की भैरव ला फाशी दिली असणार.
माझ्या मनात विचारांच द्वंद्व सूरू झाले योग्य काय आणि अयोग्य काय ? एक वेळ वाटे की मी योग्यच केलय ते हिंस्र पशु कितीतरी शेळ्यांच्या मृत्यू स कारणीभूत झाले असते .मी त्याला पकडून देऊन योग्य च काम केले आहे .तर दुसऱ्या वेळी मनात असा विचार यायचा की त्याच कर्म तो जाणे तो चूकीचा आहे तर त्याला देव शिक्षा देईल तूला तो अधिकार कोणी दिला .मी डोक्याला हात लावून बसलो मला काही सूचत नव्हते. नंतर मी माझे परिक्रमा मार्गदर्शक" अपूर्वानंद कुलकर्णी "यांना फोन करून परिस्थिती सांगितली .त्यांनी सांगितले मैया च्या मनात जे होते ते झाले ,तूम्ही काळजी करू नका नामस्मरण करत प्रवास सुरू ठेवा. नंतर मी पद्मनाभ महाराजांना फोन केला व सर्व वृत्तांत कथन केला मकरंद महाराजांना भैरव ला फाशी दिल्याच कळल्यावर फार दूख्ख झालेे .दोन तास वाट पाहीली मी मकरंद महाराज व बाकी सोबती यांच्या येण्याची. तोपर्यंत मी फक्त मैयाचा धावा केला की मला या धर्म संकटातून सोडव म्हणून .
दोन तासानंतर तीघे महाराज आले व त्यांच्या सोबत भैरव सूद्धा .भैरव ला पाहून माझ्या आश्चर्याला पारावर राहीला नाही. मी मैयाचे मनोमन आभार व्यक्त केले. तिने मला धर्म संकटातून सोडवले होते पण मी बाकीच्यांच्या नजरेत अपराधी ठरलो होतो . मंदार महाराजांनी माझ्याशी अबोला धरला होता .कारण मकरंद महारांनी त्या दोघा महाराजांना सूनावले होते की तूमच्या मूळ वैद्य महाराज आपल्याला सोडून पूढे गेले म्हणून. पद्मनाभ महाराजांनी सांगितले की मकरंद महाराज रस्त्याने येताना भावूक होऊन भैरव ला आवाज देत आले .तेव्हा भैरव डोंगरावरून उतरून त्यांच्या कडे आला होता. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी भैरव ला दूर नेऊन सोडून दिले होते. मैयाची कृपा
नंतर आम्ही सोबतच पूढे "धडगाव "पर्यंत आलो तिथे मकरंद महाराजांचे सोबती "कल्याणी माताजी झगडे", "प्रमोद महाराज झगडे "व 'महाबळेश्वर महाराज" ( पप्पा) हे आले होते. त्यांनी परिक्रमा पूर्ण केली होती पण दक्षिण तट शूलपाणी जंगल मधून जाता आले नाही म्हणून परिक्रमा पूर्ण करून ते दक्षिण तट शूलपाणी जंगल पार करून धडगाव मध्ये आले होते. मकरंद महाराज व मंदार महाराजांना त्यांना भेटून आनंद झाला .रात्री त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. पण मी निशब्द होतो. मी मकरंद महाराज व मंदार महाराज यांचा अपराधी होतो. पूजापाठ करताना मला दिवसभराच्या घटना आठवल्या व डोळे भरून आले होते.
भोजन प्रसाद घेऊन आम्ही झोपी गेलो .रात्री एक दोन वेळा बाहेर जाऊन मी भैरव व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घेतली.
नर्मदे हर
!! २१ जानेवारी २०२० !!
काल रात्री प्रमोद झगडे महाराज, कल्याणी प्रमोद झगडे माताजी यांचे शूलपाणी जंगलातील अनूभव ऐकल्यावर मकरंद बिल्दीकर महाराज जास्त दुखावले गेले. कारण मकरंद बिल्दीकर महाराज शूलपाणी जंगलातून जाण्याऐवजी पाटी बोकराटा मार्गे आले होते .आणि त्यांना या मार्गे घेऊन यायला पद्मनाभ महाराजांच चूकीच मार्गदर्शन जबाबदार होत. मंदार बिल्दीकर महाराज व मकरंद बिल्दीकर महाराज बंधूंची ही पहिली परिक्रमा होती. त्यात त्यांच्या कडे मार्गदर्शन पुस्तक नव्हते .प्रवासात सोबत झालेल्या पद्मनाभ महाराजांची ही दूसरी परिक्रमा होती ,म्हणून पद्मनाभ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बिल्दीकर बंधूंचा प्रवास चालू होता. मंदार महाराज पुण्यात राहतात ते पुन्हा परिक्रमा करताना शूलपाणी जंगलातून परिक्रमा करू शकतात. पण मकरंद महाराजांना पून्हा परिक्रमा साठी आॅस्ट्रेलियाहून येण शक्य नाही. म्हणून महाराज दुखावले गेले .शक्यतो शूलपाणीतून न जाण्याची खंत त्याना कायम सतावत राहील .
धडगाव मध्ये सकाळी दूध बिस्किट मिळाले. बिल्दीकर महाराज बंधू व झगडे महाराज व माताजी सोबत आपल्या प्रवासाविषयी गप्पा मारत चालले होते. मी त्याच्या पासून खूप पूढे गेलो .भैरव सोबत होता .भर ऊन्हात चालून थकलेल्या व तहानेने व्याकूळ झालेल्या भैरवला मी माझ्या कमंडलू मधून पाणी पाजले .दूपारी १२.३० वाजता "मा नर्मदा सेवाभाव आश्रम" खूंटामोडी येथे पोहोचलो. काही वेळाने बाकीचे सोबती .आले मंदार महाराज व पद्मनाभ महाराजांनी खिचडी भात बनवला. भोजन प्रसाद घेऊन थोडा आराम केला. पूढे" मोलगी "या गावात संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. "श्री ढोले सोमनाथ भगवान '९४२२२३३१२५" यांनी आश्रम शाळेत आमची ऊत्तम व्यवस्था होती. बाकी सोबती खूप ऊशीरा पोहोचले .रात्री भोजन प्रसाद म्हणून गरमागरम ज्वारी बाजरी मिक्स भाकरी व दाळ मिळाली .
नर्मदे हर.
!! २२ जानेवारी २०२० !!
सकाळी ५ वाजता ऊठलो. नित्यक्रम आटोपून मार्गस्थ झालो. सकाळी ६.३०वाजता एका चहा टपरीवर सर्वांनी चहा बिस्किट खाल्ले. अप्रतिम सुर्योदय पाहायला मिळाला. सकाळच्या निसर्गाचे वर्णन शब्दात करने शक्य नाही .साक्षात स्वर्ग पृथ्वीवर अवतरला होता .
सकाळी १०.३० वाजता" आदिवासी आश्रम शाळा 'सूगरस" येथे पोहोचलो .ओढ्यावर स्नान करून शाळेच्या आवारात पूजापाठ केला .शिक्षकांनी आमच्या साठी भोजन प्रसाद म्हणून खिचडी भाताची व्यवस्था केलीकेली. मंदार महाराजांनी साईबाबांच्या वेशभूषेत सर्वांचे मनोरंजन केले ते क्षण कायम आठवणीत राहतील.
पूढे सोबत प्रवास करत असताना भैरव ने पून्हा एका शेळीला पकडले .मी भान विसरून तिकडे धावलो. पळताना कमंडलू ,दंड ,पाठीवरील बॅग ,बाजूला भिरकावली गेली. याचही भान राहिले नाही .आता भैरव चा सर्वांना राग आला होता. आपल्या सोबत आहे काही झाले तर आपल्याला शेतकरी जबाबदार धरतील .भैरव च्या चूकीला शिक्षा व्हायला पाहीजे .आम्ही त्याच्यावर दगड भिरकावले. पूढे आम्ही "मोकस "च्या आश्रम वर आलो .चहा घेऊन थोडा वेळ आराम केला .बरेच अंतर चालून आल्यामुळे भैरव सर्व विसरून पून्हा आमच्या जवळ आला .पद्मनाभ व मकरंद महाराजांनी एकाच वेळी त्याच्या वर दंड उगारला .मकरंद महाराजांपासून वाचलेला भैरव पद्मनाभ महाराजांच्या वाराने पाय मोडून अपंग झाला व मागे पळून गेला .नंतर तो आम्हाला कधीही दिसला नाही.
पूढे मी सर्वात आधी चैतन्य आश्रम वडफळी येथे पोहोचलो .आश्रमात सेवा करण्यासाठी एकच व्यक्ति होती .रात्री उशिरा चपाती मिक्स भाजी भात भोजन प्रसाद मिळाला .आश्रमाचे चालक "कुलकर्णी "यांच्या बरोबर मकरंद महाराजांनी आदिवासी परिसरातील समस्या विषयी चर्चा केली .नंतर आम्ही झोपी गेलो.
नर्मदे हर
!! २३ जानेवारी २०२० !!
सकाळी ६.३० चैतन्य आश्रम मधून बाहेर पडलो .झगडे महाराजांबरोबर जंगलातून प्रवास करत एका छोट्या आश्रमात पोहोचलो .तोपर्यंत मंदार महाराज मकरंद महाराज व पद्मनाभ महाराज आले .झगडे परिवाराची सोबत येथपर्यंतच होती ते येथून पुढे घरी जाणार होते .
घनदाट जंगल तूडवत मी दुपारी १२ वाजता माथासर येथे पोहोचलो .भोजन प्रसाद घेऊन मार्गस्थ झालो. तोपर्यंत बिल्दीकर महाराज बंधू व पद्मनाभ महाराज आले. दुपारी २.३० वाजता झरवाणी येथे पोहोचलो .४ ते ५ दिवसानंतर मोबाईल ला रेंज आली होती .घरच्यांना खूशाली कळवली .थोडा आराम करून ५.३० वाजता गोरागाव (गुजरात) येथे पोहोचलो. शूलपाणेश्वर महादेव नवीन मंदिर दर्शन घेतले .पूढे हरीधाम आश्रम येथे आलो .५ ते ६ दिवसानंतर मैयाचे दर्शन झाले होते. डोळे भरून मैयाला डोळ्यात साठवून घेतले .व पुढील प्रवास किनार्यानेच करायचा निश्चय केला.
नर्मदे हर
!! २४ जानेवारी २०२० !!
हरीधाम आश्रम येथून सकाळी ७ वाजता मैयाच्या किनार्याने चालत एका पूरातन मंदिराजवळ पोहोचलो. भूक लागली होती. तिथे काही मिळेल या अपेक्षेने गेल्यावर पाहीले की मंदिर खूप दिवसापासून बंद होते. तिथे साफसफाई नव्हती मंदीरा मागच्या रस्त्याने जाताना एक बोराचे झाड दिसले. तिथे जाऊन मनसोक्त बोरे खाल्ले. व पुढे प्रवास सूरू केला ११.३० वाजता "तपोवन आश्रम गूवार"येथे पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की आश्रमातील" पूर्णानंद महाराज" प्रत्येक शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालखी सोहळ्या नंतर दर्शन देतात म्हणून .माझे नशीब चांगले की मी आज शुक्रवार असताना येथे पोहोचलो होतो. पालखी सोहळ्यात सहभागी होऊन भजनाचा आनंद घेतला. १२ वाजता महाराजांचे दर्शन घेतले भोजन प्रसाद घेतला .
दुपारी २ वाजता रामानंद आश्रम येथे आलो .मंदिर बंद होते ४ वाजता उघडणार होते. पुढे किनार्यावर मगर पाहायला मिळेल म्हणून किनार्याने चालत गेलो .आरामासाठी एका वडाच्या झाडाखाली बसलो होतो.एका गूराख्याने मला पपई खायला दिली. तिची चव अप्रतिम होती .खूप गोड फळ खायला दिले म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानले. मगर पाहायला मिळेल अशी विचारणा केली .ते म्हणाले मैयाची कृपा असेल तर नक्कीच मगरीचे दर्शन होईल.
दुपारी ४ वाजता अखंड धून आश्रम गाव तुंबडी येथे पोहोचलो. तिथे १८ वर्षापासून" सीताराम सीताराम "अखंड धून चालू होती. चहा घेऊन पूढे मार्गस्थ झालो. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मैयाला पाहत किनार्याने प्रवास चालू होता. म्हणून मी खूप आनंदी होतो .अर्धा तासाने किनार्यापासून १० मिनीट दूर "वरीष्ठ आश्रम बांदरीया"येथे पोहोचलो. तिथे पूण्याचे काळे नावाचे परिक्रमा वासी माझ्या अगोदर येऊन थांबले होते .आश्रम खूप सुंदर होता तिथे एक महाराज होते. साफसफाई ची विषेश काळजी त्यांनी घेतली होती. रात्री बाजरीची भाकरी तूप लावून दाळ, शेव असा भोजन प्रसाद मिळाला .
नर्मदे हर
!! २५ जानेवारी २०२० !!
मैया चे वाहन मगर दर्शन
सकाळी चहा बरोबर पतंजलि बिस्किट मिळाले .चहा घेतल्यानंतर काळे महाराज व मी किनार्याने प्रवास करत "कूंभेश्वर "पर्यंत पोहोचलो .दर्शन घेतले तिथे आम्हाला चहा मिळाला. पूढे किनार्याने जाण्यासाठी पाऊलवाट नव्हती. स्थानिक लोकांनी रस्त्याने जायला सांगितले. मला वाईट वाटले. किती दिवसानंतर मैया च्या किनार्याने मैया सोबत चालण्याच भाग्य लाभले होते .आता पुन्हा दूरावा, थोडे अंतर चालून गेल्यावर मी काळेंना सोडून पून्हा किनार्याकडे वळलो. एका घरासमोर मूलगी होती .तिने किनार्यावर पाऊलवाट नाही म्हणून सांगितले .एका पाऊलवाटेकडे बोट दाखवून सांगितले की तिकडे "प्रभू श्रीराम तपोभूमी" आहे. दर्शन घेऊन परत या म्हणून .मी त्या पूरातन श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन परत येण्या ऐवजी किनार्याकडे गेलो. माझ्या दिल्ली च्या गूरूदेवांना फोन करून सांगितले. की मी नर्मदा मैयाला माझ्या डोळ्यासमोर ठेवून प्रवास करेन जसे एक बालक आपल्या आईपासून दूर होण्याचा विचारही करू शकत नाही .तसे मी मैया पासून दूर होऊन रस्त्याने प्रवास करणार नाही .
पूढे मी झाडाझूडपातून रस्ता काढत बराच पूढे आलो .एक वेळ अशी आली की रस्ता संपला .व काही पावले मागे येऊन वर चढून मी किनार्याने चालत गेलो .पूढे एका घाटावर पायरीवर बसून पाण्यातील रंगीबेरंगी लहान मोठे मासे व कासव पाहत बसलो .मागून २ माणसे आंघोळीसाठी आले याचेही मला भान राहिले नाही. "नर्मदे हर" च्या आवाजाने भानावर आलो. त्यांनी विचारले काय पाहत आहात .मी सांगितले मगर पाहायला मिळते का पाहतोय .त्यांना माझ्या बोलण्याचे हसू आले. मला एक व्यक्ति म्हणे चला माझ्या सोबत आंघोळ करताना खोल पाण्यात मगर पाहायला मिळेल .खोल पाण्यात जायच ऐकून मी दूरूनच हात जोडले व पुढे चालता झालो.
दुपारी १२.३० वाजता मी श्रीरंग ब्रीज जवळ पोहोचलो .भूक लागली होती नंतर २.४५ वाजेपर्यंत चाललो पण भोजन मिळाले नाही .मी ऊदास होऊन एका दगडाच्या आडोशाला सावलीत बसलो .जवळील गूराख्याने सांगितले की अर्धा तास चालून गेल्यावर आश्रम मिळेल .मी विचार केला यांचे अर्धा तास म्हणजे दोन तासाप्रमाणे आहेत .कमंडलू तिल पाणी पिऊन बसून राहीलो .
आराम करून पुढे गेल्यावर तासाभरात आश्रम दिसला .काळे महाराज येताना दिसले .त्यांनी मला पाहील्यावर आश्रमात जाऊन भोजन घ्यायला सांगितले. मी विचार केला यांना काय माहित मी भुकेला आहे ते .आश्रम जवळ गेलो तिथे कोणी दिसले नाही तसाच पुढे गेलो. मला एक बोराचे झाड दिसले .मी पोटभर बोरे खाल्ले .भूक लागल्यावर बोर खायला मिळणे असे आता दोन तिन वेळा प्रसंग आले होते .
नंतर मी "कार्वन नदी " पार करून आलो .नावाड्याला अगोदरच सांगितले माझ्या जवळ पैसे नाहीत म्हणून. त्या महात्म्याने विनामूल्य नदी पार करून दिली. पूढे शुकदेव आश्रम होता .तिथे न जाता किनार्यावरून जाताना मी विचार करत चाललो होतो .की आज मैयाला ५ दिवे अर्पण करून मगच जेवण करायचे .तेवढ्यात समोर मला "मगर" दिसली .अगोदर मी घाबरलो नंतर आजूबाजूला पाहीले कोणी आहे का .दूरवर एक माताजी शेतात काम करत होत्या .मी त्यांना ओरडून सांगितले .की मला मगर दिसली म्हणून .त्यांनी जपून राहायला सांगितले. मी दूरून काही फोटो घेतले .
पूढे मी ओशोंच्या "स्वर्ग आश्रम "येथे पोहोचलो .तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते .तिथे फाॅरेनर पाहूणे आलेले होते. तिथे कोणी परिक्रमा वासी थांबत नाही हे मला नंतर समजले. मी गेल्यावर म्हणालो माझी येथे थांबायची सोय होऊ शकते का. तेथील सेवक विचारून सांगतो म्हणे. तोपर्यंत तूम्ही थोडा चिवडा नाष्टा म्हणून घ्या .ते परत आल्यावर म्हणाले की आपण येथून पुढे "ओरी "या गावात जा ,तिथे तूमची सोय होईल म्हणून. मी नाष्टा न करताच पूढे निघून गेलो .
पूढे चालत असताना माझ्या समोर चालत असलेल्या आजीबाई ने थांबून मला ५ केळी दिली व म्हणे "आप को भूक लगी होगी ये केले खालो " मी पूढे जाताना दोन तिन वेळा त्या आजीबाईंना वळून पाहिले की यांना काय माहित मला भूक लागली म्हणून .
संध्याकाळी खूप ऊशीरा "ओरी "गावातील आश्रमात पोहेचलो .ऊत्तम सोय केली तेथील सेवेकर्यांनी दीपदान साठी दिवे दिले. दीपदान करून भोजन प्रसाद घेऊन झोपी गेलो .
नर्मदे हर
!! २६ जानेवारी २०२० !!
सकाळी चहा घेऊन किनार्यावर आलो किनार्यावरून पाऊलवाट नव्हती झाडाझूडपातून जाण्यासाठी भरपूर कसरत करावी लागती .पूढे एका केळीच्या शेतात पोहोचलो .दवबिंदू मूळ कपडे ओलो झाले होते. पुढे कांदरोजच्या "मौनी बापू आश्रमात "पोहोचलो.वशिष्ठ आश्रम वर भेटलेले काळे महाराज अगोदरच तिथे पोहोचले होते. काय योगायोग वेगवेगळ्या रस्त्याने प्रवास करत आम्ही पून्हा एका ठिकाणी भेटलो .
भोजन प्रसाद घेऊन पूढे मी "दगडू महाराज आश्रम' असा" या ठिकाणी पोहोचलो. एका हाॅलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. संध्याकाळी आरती नंतर भोजन प्रसाद खिचडी भात छास घेऊन रात्री आराम.
नर्मदे हर
!! २७ जानेवारी २०२० !!
दगडू महाराज आश्रम वर सकाळी चहा बरोबर चिवडा मिळाला. ७.३० वाजता मार्गस्थ झालो .पूढे "वेळूगाम" या गावात जायचे होते .मोबाईल मॅपवर रस्ता शोधत चाललो .तर मॅप व्यवस्थित न चालल्यामुळे मी रस्ता चूकलो .कोणत्या दिशेला जायचे हे न समजल्या मूळे मानसिक त्रास झाला. पूढे मी एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथून" वेळूगाम" ५ किमी दूर होते .व वेळूगाम वरून पूढील गाव "सरसाड" पण ५ किमी दूर होते .मी वेळूगाम ला न जाता सरसाड च्या दिशेने पश्चिमेकडे निघालो .
सकाळी १०.३०वाजता मला कानूभाई म्हणून गृहस्थ भेटले .मी पण परिक्रमा केली आहे तूम्ही माझ्या घरी जेवण करून पुढे जावे म्हणून प्रार्थना केली .मी पश्चिमेकडे चाललो होतो ,आता मी कानूभाईंच्या घराकडे ऊत्तर दिशेला चाललो. मकरंद महाराजांना फोन केला त्यांना माझ्या पर्यंत पोहोचायला २ तास तरी लागणार होते. रस्त्याने त्यांना भोजन मिळेल की नाही या काळजीपोटी मी कानूभाईंना अजून दोन माणसांचे भोजन बनवायला सांगितले .तेव्हा कानूभाई म्हणाले तूमचे सोबती आल्यावर सर्व सोबत भोजन करा .मी म्हणालो २ तास वाट नाही पाहू शकत. मला तूम्ही आत्ता भोजन द्या नाहीतर मी पूढे जातो .
पूढे मला मनीनागेश्वर या ठिकाणी जावे लागेल असे कानूभाईंनी सांगितले .नर्मदा मंदिर पासून २ किमी दूर मनीनागेश्वर आहे .नर्मदा मंदिर जवळून पूढे एका रस्त्यावर आलो . मॅप मूळ पून्हा दिशाभूल झाली पश्चिम दिशेला जाण्याऐवजी मी पूर्वेकडे चाललो .तर मी रस्ता चूकलो असे एका वयस्क व्यक्ति ने सांगितले .परत मागे आलो एका मोटारसायकल वाल्याने पण मला चूकीचा रस्ता सांगितला .मी पुन्हा त्या ठिकाणी पोहोचलो जेथून सुरूवात केली होती .मी जाम वैतागून गेलो नक्की कोठे जावे कळेना .तेव्हा एका शिक्षकाने मला मनीनागेश्वर च्या कच्या पाऊलवाटेपर्यंत चालत येऊन पूढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले .पूढे कच्या रस्त्यावर अनेक पाऊलवाटा जोडलेल्या होत्या पून्हा यक्षप्रश्न कोठे जावे.
एका वाटसरू च्या मागे जात मी "हनुमान गढी "येथे पोहोचलो. आश्रमात न जाता मागच्या रस्त्याने जाताना एका कन्येने भोजन प्रसाद घेऊन पूढे जा म्हणून सांगितले. पण मी भोजन करण्याच्या मनस्थितीत नव्हतो .भोजन न करताच पूढे चाललो .आज भोजन घ्यायचेच नाही असे ठरवले .पूढे "मनीनागेश्वर "जवळून जाताना सूद्धा भोजन प्रसाद साठी सेवेकर्यांनी विनंती केली .मी नाही म्हणून पुढे चाललो. " भालोद" येथे पोहोचल्यावर ठरवले की संध्याकाळ पर्यंत "गूमांदेव" पर्यंत पोहोचायचे. दूपारचे २ वाजले तहान लागली पण जवळ पाणी नाही. चालून आता पण भूक लागली होती .
पूढे चालताना एक बोरीचे झाड दिसले .मी धावतच तिकडे गेलो .पोटभर बोरे खाल्ले. विशेष म्हणजे एवढे गोड बोरे असून सुद्धा त्या बोरीच्या झाडाकडे कोणी भिरकले सूद्धा नव्हते .२ किलोच्या आसपास बोरे सोबतीला घेतली .पूढे एका ठिकाणी पाणी पिऊन "अविधा" "झगडीया" च्या दिशेने निघालो .मोबाइल डिस्चार्ज झाला आता मार्गदर्शन साठी मॅप नव्हते. "झगडीया" गाव विचारत जाताना एका व्यक्तीने सांगितले ३ किमी दूर "अविधा" गावात चांगली व्यवस्था आहे. तिथे थांबू शकता .
अविधा गावात पोहोचलो मंदीराच्या पाठीमागे धर्मशाला मध्ये गेल्यावर तिथे एक महाराज होते. ते आळंदी येथील सूनील महाराज ३ वर्षाची परिक्रमा करत अविधा गावात चातुर्मास पर्यंत थांबणार होते. त्यांनी मला चहा बनवून दिला सोबतीला बिस्किट सूद्धा .रात्री त्यांनी बाजरीची भाकरी व मिक्स भाजी बनवली प्रवासाविषयी चर्चा केली. व नंतर आराम
नर्मदे हर
!! २८ जानेवारी २०२० !!
मकरंद महाराज व मंदार महाराज दुपारपर्यंत "अविधा" ला पोहोचणार होते .म्हणून दुपारपर्यंत "अविधा "मध्ये थांबून होतो. सुनिल महाराजांनी भाजी बनवली व मी चपाती बनवल्या.मकरंद बिल्दीकर महाराज आल्यावर सर्वांनी सोबत भोजन केले .
आम्ही यूट्यूब वर पूणे येथील बावसकर महाराजांचे समुद्र परिक्रमा व्हिडिओ पाहील्यानंतर ठरवले होते की आपण सूद्धा समुद्र परिक्रमा करायची म्हणून. मीठी तलाई नंतर परशुराम तपोभूमी ,मौनी बाबा आश्रम, व नंतर" ७२० वर्ष वय असलेलें गूफेमध्ये शिवलिंगा वर अधांतरी ध्यान करणारे 'लख्खा बाबा' यांचे दर्शन फक्त माघ पौर्णिमेलाच होते. असे अनुभवातून ऐकले होते. माघ पौर्णिमा जवळ आल्यामुळे आम्हाला समुद्र परिक्रमेला जाण्यासाठी नियोजन करायचे होते.
मकरंद महाराजांनी बावसकर महाराजांचा फोन नंबर मिळवला. फोन वर बोलल्यावर कळले की १६ वर्षापूर्वी समुद्र तटावर जंगल होते. आता त्या ठिकाणी कंपन्या झाल्या आहेत .
नशीबात असेल तर लख्खा बाबांचे दर्शन होईल .
नंतर आम्ही सूनिल महाराजांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो. "लाडवा वड" येथे चहा घेऊन संध्याकाळी "जगदीश मढी" येथे पोहोचलो .खूप सुंदर आश्रम, मंदीरात अखंड रामधून चालू होती. मैया किनारी स्नान व पूजा केली .यानंतर मैयाचा किनारा ऊत्तर तटावर लाभणार होता. म्हणून मैया किनारी थोडा जास्त वेळ दिला. रात्री भोजन प्रसाद व आराम.
नर्मदे हर
!! २९ जानेवारी २०२० !!
"जगदीश मढी" येथून "गूमानदेव" येथे पोहोचलो.अतिशय सुंदर मंदिर ,दर्शन घेतल्यावर या तिर्थ स्थानाला "गूमानदेव" नाव का पडले म्हणून चौकशी केली. 'गूमान 'म्हणजे 'अहंकार को हरने वाली देवता'
काही वर्षापूर्वी या ठिकाणी एका व्यक्तीने तपस्या करून भगवान हनुमान यांना प्रसन्न करून घेतले. म्हणून या ठिकाणी गूमानदेव हनुमानाची स्थापना करण्यात आली .
पूढे आम्ही मूख्य रस्त्याने गेलो .एके ठिकाणी चहा भजे मिळाले. एका कापड दुकानात चहा बिस्किट मिळाले व दूकान मालिक बरोबर प्रवासाविषयी चर्चा केली . पूढे ४ वाजता आम्ही रामकुंड अंकलेश्वर येथे पोहोचलो .तिथे जेवण पाण्याची सोय नव्हती . आम्ही थोडा आराम करून बलबला कूंड च्या दिशेने निघालो.
संध्याकाळी ६.३० वाजता बलबला कूंड येथे पोहोचलो. ४ परिक्रमा वासी अगोदर आलेले होते .बलबला कूंड वैशिष्ट्य म्हणजे बलबला कूंड जवळ "नर्मदे हर" बोलल्या वर पाण्यात बुडबुडे निघतात. असे अद्वितीय अद्भुत तीर्थ स्थानाचे दर्शन घेण्याचे सद्भाग्य प्राप्त झाले घेतले .शिर्डी येथील भावीक बसने परिक्रमा करत बलबला कूंड वर आले होते. त्यांच्याशी प्रवासाविषयी चर्चा केली.
रात्रीचे ८ वाजले पण भोजन प्रसाद बनवण्याची तयारी करताना कोणी दिसले नाही .म्हणून मी जाऊन तेथील महाराजांकडे विचारपूस केली. नंतर त्यांनी भाजी बनवली व आम्ही चपाती बनवल्या. मंदार महाराजांनी पिठ मळले .मी व मकरंद महाराजांनी चपाती बनवल्या. रात्री ९.३० वाजता भोजन प्रसाद घेतला . व नंतर आराम . थंडी खूप होती जिथे आम्ही झोपलो तिथे ऊबदार चादरी व ब्लॅंकेट ठेवलेल्या होत्या त्या घेऊन आम्ही थंडीपासून बचाव केला .
नर्मदे हर
!! ३० जानेवारी २०२० !!
सकाळी ७.३० वाजता चहा बिस्किट खाऊन पुढच्या प्रवासाला सुरवात केली. १२ वाजेपर्यंत चालत" सूर्य कूंडावर "आलो तिथे जेवणाची सोय नव्हती.मकरंद महाराजांनी अर्धा डझन केळी घेतली.मी व मंदार महाराज पूढे कूठे तरी वडा पाव घेऊन भूक भागवू या अपेक्षेवर चालत राहीलो .पण कूठे काही मिळाले नाही. मकरंद महाराजांनी अर्धा डझन केळी घेतली होती ती तीघांनी मिळून खाल्ली.
दुपारचे २.३० वाजले भोजन नाही .हनुमान टेकडी पासून ३ किमी मागे एका मंदीरात आराम करण्यासाठी थांबलो. तर तेथील महाराजांनी विचारपूस केली नाही. आज बहुतेक उपाशी रहावे लागणार. हा विचार करून मकरंद महाराज पूढे चालू लागले .तेवढ्यात एक गाडी मंदिरासमोर ऊभी राहीली .ते मंदीराचे मालक होते त्यांनी मंदार महाराजांना विचारले" भोजन केले का "महाराज नाही म्हटल्यावर, त्यांनी त्या मंदीरात काही दिवसांपूर्वी येऊन राहणाऱ्या महाराजांना सदाव्रत द्यायला सांगितले . त्यांनी दाळ, तांदूळ ,मसाले दिले. नंतर आम्ही खिचडी भात बनवला. भोजन दूपारी ३.३० वाजता करून थोडा आराम केला .
५ वाजता हनुमान टेकडी कडे मार्गस्थ झालो. ६ वाजता पोहचवलो .खूप सुंदर आश्रम रात्री भोजन प्रसाद "खिचडी भात "लोणचे ,गूळ ,मिळाले .
नर्मदे हर
!! ३१ जानेवारी २०२० !!
आज विमलेश्वरला पोहचायचे व बोट पकडून ऊत्तर तटावर जायचे असे आम्ही रात्री नियोजन केले होते .रात्री बोटीच्या वेळेविषयी चौकशी केली .सकाळी ७ वाजता बोट सूटते कळल्यावर आम्ही पहाटे ३.३० वाजता विमलेश्वरच्या दिशेने निघालो .थंडी खूप होती .सकाळी ५.३० वाजता विमलेश्वरला पोहोचलो .चहा घेतला व थोडा आराम केला .
आज सकाळी बोट सुटणार नव्हती कळल्यावर सकाळी ९ वाजता मकरंद महाराज मंदार महाराज व मी समूद्रावर फेरफटका मारायला निघालो. मिठाची शेती पाहीली, सोबतच जीथे बोट लागते ते ठिकाण पाहून आलो .अडीच किमी दूर होते ते ठिकाण जिथे बोट लागते. सकाळी ११.४५ वाजता परत आलो. गरम पाण्याने आंघोळ केली. नंतर दाळ भात चपाती भोजन प्रसाद घेतला .
दुपारी आराम केला .उद्या सकाळी बोट सुटणार समजल्यावर आम्ही सर्वांकडून पैसे जमा केले व नाव नोंदणी केली .उद्या सकाळी समुद्र पार करून ऊत्तर तटावर जाणार म्हणून उत्सुकता होती. रात्री आमटी भात भोजन प्रसाद नंतर आराम
नर्मदे हर
!! १ फेब्रुवारी २०२० !!
नर्मदे हर नर्मदा जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
आज सकाळी ५.३० वाजता थंडीत आम्ही बोटीकडे निघालो. चपला बूट यांना बोटीत परवानगी नव्हती. सकाळी बोट येईपर्यंत किनार्यावर सर्वांनी भजन व आरती केली. ७ वाजता बोटीत बसलो .लाईफ जाकेट विना प्रवास करत होतो.बोटीने हा माझा पहीला प्रवास होता. म्हणून उत्सुकता खूप होती व भिती सूद्धा. आम्ही 3 तासापासून समुद्रातून प्रवास करत होतो .त्यामुळे भिती वाटण स्वाभाविक होत. नंतर अर्धा तासाने किनार्यावर आलो. घाई गडबडीत माझे सोबती मकरंद बिल्दीकर व मंदार बिल्दीकर आपली बॅग बोटीत विसरले ज्यात मैयाच्या पूजेच साहीत्य व मैयाच जल होत. जे परिक्रमा करताना सोबत असाव लागत .त्याशिवाय परिक्रमा खंडीत होणार, म्हणून आम्ही चिंतातुर झालो ,पळतच आम्ही पून्हा किनार्यावर गेलो .ज्या बोटीत आम्ही आलो ती दूरवर निघून गेली होती. तिच्या सोबत आलेली बोट निघण्याच्या तयारीत होती .मकरंद महाराजांनी विचारपूस केली पण ते आम्ही काय बोलतोय हे न समजल्या मूळ निघून गेले .आम्ही निराश होऊन परतलो .
किनार्यावर असलेल्या सिक्युरिटी गार्ड ला आमची समस्या सांगितली, तर तो म्हणाला जवळील चहावाल्याकडे जा त्याच्या कडे बोटीवाल्याचा नंबर असू शकतो. त्याच्याकडे गेल्यावर त्याने हातातील काम सोडून पहिला कुणाला तरी फोन केला, गुजराती मध्ये काय बोलला माहीत नाही. ऊद्या बोट परत आल्यावर तूमचे साहित्य तूम्हाला परत मिळेल असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही आमच्या बॅग घेऊन निघणार तेवढ्यात आम्हाला समुद्रात दूरवर एक बोट येताना दिसली .ती आमच्यासाठीच येत असेल म्हणून आम्ही थोडे थांबलो. दृष्टीक्षेपात आल्यावर कळले ही तिच बोट आहे जी आम्ही प्रवास करत असलेल्या बोटी सोबत होती. आम्ही धावतच तिच्या कडे गेलो. ती बोट आमच्यासाठीच आली होती नर्मदे हर मैयाचीच कृपा दूसरे काय चहावाल्याने फोन केल्याबरोबर ते माघारी फिरले होते फक्त आमच्यासाठीच आम्ही आनंदाने "नर्मदे हर" चा गजर केला .आमची मैया आम्हाला परत मिळाली होती.आभार मानण्यासाठी आम्ही चहावाल्याकडे गेलो. तर तो म्हणाला की बोटचे चालक चहा घेण्यासाठी येतात व उत्तर तटावरील किती प्रवासी दक्षिण तटावर येणार म्हणून चौकशी साठी मला फोन करतात म्हणून त्यांचा नंबर होता .
आज नर्मदा जयंतीच्या दिवशी आम्हाला मैयाचा साक्षात्कार झाला की मैया भक्तांच्या प्रत्येक संकटात सोबत असते.
नंतर आम्ही मिठी तलाई येथे गेलो नर्मदा जयंती निमित्त तिथे भंडारा चालू होता स्नान पूजा करून आम्ही भोजन प्रसाद घेतला संध्याकाळी सूद्धा आम्ही तिथेच थांबलो .कारण उद्या आम्ही समुद्र परिक्रमा साठी प्रस्थान करणार होतो .
नर्मदे हर
!! २ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी चहा घेतला व आम्ही समुद्र परिक्रमा करण्यासाठी समुद्रावर आलो. किनार्याने सर्वात प्रथम आम्ही "हरी का धाम" तिर्थ दर्शन घेतले .आश्रमात कोणीही नव्हते .तेथून पुढे दहा मिनिटाच्या अंतरावर" मौनी बाबा समाधी" दर्शन "समुद्र महादेव" दर्शन घेऊन किनार्याने "परशुराम तपोभूमी "कडे आलो.रस्ता थोडा अडचणीचा होता .
परशुराम तपोभूमी जवळ पोहोचलो. मंदीराचा कळस फक्त जमीनीवर दिसत होता. मंदिर तळघरात होते. दर्शन घेऊन तेथील पूजारीशी परशुरामांनी तप केलेल्या शिले विषयी चौकशी केली .
४० ते ५० वयाच्या पूजारी ने" मी लहानपणापासून येथे आहे पण मी अशी कोणतीही शिला येथे पाहीली नाही "म्हणून सांगितले . या परिसरात कंपन्या झाल्या मूळ शक्यतो ती शिला हटवण्यातही आली असेल .मला सांगता येणार नाही असे ते म्हणाले. नंतर आम्ही तळघरात शिवाभीषेक पूजा केली . आता आम्हाला लख्खा बाबा तिर्थ स्थानाकडे जाण्यासाठी आम्हाला एक कंपनी मधून जायचे होते .त्यांनी परवानगी न दिल्यामुळे आम्ही ३ किमी दूरून जावे लागले .
दुपारी आम्ही लख्खा बाबा तिर्थ शेजारील" रामेश्वर मंदिर" येथे पोहोचलो. तिथे महाराजांनी भोजन प्रसाद व्यवस्था केली. नंतर आम्ही लख्खा बाबा विषयी चौकशी केली .५०० वर्षापासून येथे लख्खा बाबांची समाधी आहे. मग तूमच्या बावसकर महाराजांनी लख्खा बाबांचे दर्शन केव्हा घेतले .
रात्री आम्ही लख्खा बाबा समाधी मंदिरासमोर असलेल्या धर्मशाळेत थांबण्यास जातोय .असे रामेश्वर मंदिरातील महाराजांना सांगितले. तर ते म्हणाले तिथे कोणाला थांबू देत नाही .काही वर्षापूर्वी येथे एका सन्यासी ने पूजारी ला चाकू मारून पुजारी चा खून केला होता. तेव्हा पासून येथे कोणालाही थांबून देत नाही .
आम्ही समाधी मंदिर दर्शनासाठी गेलो. तिथे माताजी होत्या रात्री येथे राहायचे आहे असे त्यांना सांगितले. त्यांनी सूद्धा तेच सांगितले काही वर्षांपूर्वी येथे.... पण तुम्ही गृहस्थी आहात सन्यासी नाहीत तूम्ही येथे थांबू शकता. नंतर आम्ही लख्खा बाबांविषयी चौकशी केली .पण पदरी निराशा पडली .आम्ही बावसकर महाराजांना फोन केला .महाराज म्हणे मी जेव्हा येथे आलो तेव्हा जंगल होते त्या दिवशी माघ पौर्णिमा होती व आंध्र प्रदेश चे दोन सन्यासी तिथे आले होते. त्यांनी रात्री ११ वाजता झोपेतून जागे करून मला २ किमी दूर चालत नेले .नंतर एका गूफेचा दरवाजा दूर करून त्या दोन सन्यासींसोबत गूफेतून तळघरात गेलो. तिथे शिवलिंग वर अधांतरी ध्यान करताना लख्खा बाबांचे दर्शन मला झाले .
माघ पौर्णिमेला अजून ६ दिवस बाकी होते .तोपर्यंत येथे थांबायचे की पुढे जायचे यावर विचारविनिमय झाला. तेथील लहान कन्यांनी आमचे मनोरंजन केले .रात्री एका कन्येची आम्ही पूजा केली. व प्रसाद म्हणून आम्हाला सफेद पेढा त्या कन्येने घरून आणून दिला. मकरंद महाराज मला म्हणे आपल्याला सफेद पेढा प्रसाद म्हणून मिळालाय. काही आठवल का सफेद पेढ्या विषयी, मी म्हणालो नाही. तेव्हा त्यांनी सांगितले हा तोच पेढा जो जगन्नाथ कुंटे यांना परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर ला नर्मदा नावाच्या कन्येने प्रसाद म्हणून दिला होता. व तो पेढा ओंकारेश्वर मध्ये कोठेही मिळत नाही. अगदी तसाच आपल्याला ही मिळाला आहे .तेव्हा मला आठवले, हो हा अगदी तसाच सफेद पेढा आहे. नर्मदे हर मैयाची कृपा
रात्री भोजन प्रसाद म्हणून भात भाजी मिळाली .
नर्मदे हर
!! ३ फेब्रुवारी २०२० !!
लख्खा बाबा समाधी मंदिरात थांबायचे की नाही .यावर पून्हा विचार करण्यात आला. आम्ही गेटवरील चहावाल्याकडे गेलो. तिथे एक पंडित होते त्यांनी सांगितले की तुम्ही थांबून काही उपयोग होणार नाही. मी लहानपणापासून येथे आहे ,मी फक्त लख्खा बाबांची समाधी पाहीली आहे .७५० वयाच्या अंधातरी ध्यान करणार्या लख्खा बाबांचे दर्शन कोणाला झाले आहे, असे मी अजून तरी ऐकले नाही .
मी "भूतनाथ महादेव "मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मकरंद महाराज व मंदार महाराज तिथेच होते .त्यांचा निरोप घेऊन मी काटेरी बाभळींच्या रानातून चालत एका कंपनी जवळ आलो. गेटवर नाव नोंदवून पूढे जाण्यासाठी परवानगी मिळाली . दुपारी १२ वाजता "भूतनाथ" ला पोहोचलो .तिथे स्नान करून जाणारच होतो. मकरंद महाराज व मंदार महाराज पोहोच झाले .त्यांनी स्नान करून सदाव्रत भोजन बनवायचे ठरवले. मकरंद महाराज मला 'जेवण करून जाऊया 'म्हणाले .मला लख्खा बाबांचे दर्शन न झाल्याने मी थोडा नाराजच होतो. त्यासाठी आम्ही नर्मदा जयंती साजरी केली नाही .खूप धावपळ झाली आमची .व पदरी निराशा पडली, मी भोजन न करताच पूढे गेलो .
"दहेज" मधून पूढे सर्व हायवे मार्ग होता .मला संध्याकाळ पर्यंत रस्त्याने दोन वेळा चहा व बिस्किट मिळाले. त्यावर भूक भागवून चाललो होतो .एक व्यक्ति जवळ येऊन थांबली. गाडीवरून उतरून पाणी दिले व म्हणे मोटारसायकल वर भरूच पर्यंत सोडू का ? मी" नाही "म्हणालो. गाडीवर बसायचे नाही असा परिक्रमा चा नियम आहे. मैया परिक्षा पहाते कोणत्याही रूपात येऊन .
संध्याकाळी ७.३० वाजता "केशरूड "गावात आलो .रात्री एका मंदीरात थांबलो .दिवसभर मला फक्त २ वेळा चहा बिस्किट खाऊन प्रवास करावा लागला.
नर्मदे हर
!! ४ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ६ वाजता मार्गस्थ झालो. पूढे एका मंदीरात आरामासाठी थांबलो. तिथे स्नान पूजा करून चहा घेतला. सकाळी ११ वाजता मार्कंड आश्रमात भेटलेले परिक्रमा वासी "काळे" भेटले .सोबतच आम्ही हनुमान मंदिरात आलो तेव्हा १२ वाजले होते .मंदीरात काही सेवक होते .तिथे भोजन प्रसाद मिळेल अशी अपेक्षा होती .आसन लावले व थोडा आराम केला. नंतर मी विचारले भोजन मिळणार आहे की नाही .पूजारी म्हणे तूम्हाला सदाव्रत बनवावे लागेल तेही चूलीवर .सकाळी ६ वाजल्यापासून चालत होतो थकून गेलो होतो .भोजन बनवायची ईच्छा नव्हती .आसन ऊचलले व पुढे निघालो .तर काळे यांनी उपदेश केला "कोणाकडे काही मागायचे नाही जे मिळेल ते खायचे नाही तर उपाशी राहायचे" मी म्हणालो विनाकारण का उपदेश करताय ५ घरे भिक्षा करायचा नियम आहे आणि भिक्षा आणि भिक यातला फरक कळतो मला" वयान जास्त होते म्हणून मी जास्त काही न बोलता पुढे निघून गेलो .
पूढे दुपारी १ वाजता" त्रिगूणातीत ध्यान आश्रम" येथे पोहचलो मैयाकिनारी हा खूप सुंदर आश्रम होता. ५ दिवे मैयाला अर्पण करून मग भोजन ग्रहण करायचे ठरवले. पण जवळ ना दिवे होते ना वाती. आश्रमातील महाराजांनी मला दिवे व वाती दिल्या. मैया किनारी जाण्यासाठी रस्ता नव्हता. आश्रमातील फोटो समोर ५ दिवे लावले व नंतर भोजन प्रसाद घेतला .तांदळाची खिर पराठे एक भाजी खिचडी भात व २० रूपये मिळाले .
थोडा आराम करून पुढे मार्गस्थ झालो .संध्याकाळी" विश्व गायत्री परिवार झाडेश्वर " येथे पोहोचलो .एका हाॅलमध्ये राहण्याची व्यवस्था केली .८.३० वाजेपासून आश्रमात सभा चालू झाली रात्री खूप ऊशीरा भोजन प्रसाद मिळाले. चपाती बटाटा भाजी दाळ भात भोजन प्रसाद घेऊन आराम.
नर्मदे हर
!! ५ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ७ वाजता स्नान पूजा करून मार्गस्थ झालो. पूढे एका व्यक्तीने घरी चहा घेण्यासाठी थांबा म्हणून विनंती केली. त्यांच्या घरी चहा व चिवडा मिळाला .
पूढे मैया अर्ध चंद्राकार वळण घेऊन पूढे जाते. म्हणून मी शाॅर्टकट घेऊन एक गावातून जाताना काही व्यक्तींनी सांगितले. की मी रस्ता चूकलोय म्हणून, मी त्यांना सांगितले .या रस्त्याने मला" झणोर "ला पोहोचायचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले हा रस्ता निर्मणूष्य आहे. तरीही मी पूढे मार्गस्थ झालो .एका मूलाने मला "झणोर" कडे जाण्यासाठी जवळील रस्ता दाखवला. त्या रस्त्यावर तूम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय होईल पण जेवणाची नाही .
एका घरातून दुपारी १२ वाजता चहा साठी आवाज दिला. चहा देऊन त्यांनी "भोजन केले का "म्हणून विचारले. मी म्हणालो मला आता भूक नाही. तूम्ही मला भाजी भाकर बांधून द्या .भूक लागल्यावर खातो .त्यांनी एका पिशवीत भात भाजी बांधून दिली. पूढे एका बोरीच्या झाडाखाली भोजन केले व बोरे खाल्ली .
दोन वाजता "झणोर" ला पोहोचलो. मॅप वर शाॅर्टकट घेताना रस्ता चूकलो .एका मुस्लीम व्यक्ती ने रस्ता दाखवला .पूढे एका वाॅटर प्लांट जवळून जाताना सिक्युरिटी गार्ड ने पाणी पिण्यासाठी थांबवले .मी वेळेत पोहचायचे म्हणून पुढे जाऊ लागलो .तर तिथे एक बाबा बसलेले होते. त्यांनी आवाज दिला, बसण्यासाठी आसन दिले .व आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली .
बाबा म्हणाले किती धावपळ करता तूम्ही. तूमच्या सोबत मैया चालते तिला किती थकवता. मी १२ वर्षापासून परिक्रमा करतोय २ वर्षापासून नांद गावात राहतोय. मी बोललेला शब्द कधी खोटा ठरत नाही .गावातील ठाकूर यांची मुलगी पळून गेली तेव्हा मी ती कोठे आहे हे अचूक सांगितले होते. तूम्ही ३ वर्षा शिवाय घरी जाणार नाही. मैया बद्दल चे काही अनूभव सांगितले .आपल्या परिवाराविषयी सांगितले .पूढे नांद गावात रात्री साठी थांबून घ्या सांगितले .
संध्याकाळी ५ वाजता" नांद "गावात आलो .आश्रमात सदाव्रत व्यवस्था होती. सहा सात परिक्रमा वासी थांबलेले होते. मी दहा लोकांसाठी भात बनवला .आश्रमातील सेवकाने भाजी बनवली .
संध्याकाळी" नांद माता " मंदीरात दर्शन घेऊन आलो .गावात नांद माता मंदिर विषयी विचारले ,कोणी काही सांगितले नाही. रात्री भोजन प्रसाद घेतल्यावर आश्रमातील ८० वर्ष वयाच्या महात्म्यांना नांद मातेचे महत्त्व विचारले. त्यांनी सांगितले बरेच परिक्रमा वासी येतात व धावपळ करत निघून जातात. कोणी विचारले नाही आजपर्यंत .
माता पार्वतीने राक्षसांचा संहार केला .तेव्हा मातेचे शरीर व त्रिशूळ काळ्या रंगाचे झाले. तो रंग पूर्ण ब्रम्हांड फिरून आल्यावर ही गेला नाही .तेव्हा पार्वती मातेने मा नर्मदेची परिक्रमा सुरू केली .सोबत त्रिशूळाने गाईचे रूप घेतले. परिक्रमा करताना जेव्हा या ठिकाणी आले .तेव्हा मातेला आपले पूर्व स्वरूप प्राप्त झाले .तेच हे ठिकाण या ठिकाणाला "नांद "हे नाव पडले.
भोजनानंतर आम्हा सर्व परिक्रमा वासींना नांद माता महत्त्व महाराजांनी समजावून सांगितले म्हणून आम्ही सर्वांनी महाराजांचे मनपूर्वक आभार मानले
नर्मदे हर
!! ६ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ६ वाजता ऊठलो. स्नान पूजा पाठ नंतर चहा घेतला. रात्रीचा भात व भाजी शिल्लक होती. बालभोग होऊ शकतो. म्हणून मी भाजी गरम करून बालभोग (नाश्ता ) केला .
साडेआठ वाजता किनाऱ्याने जाताना एक नाला आडवा आला. त्या नाल्याच्या किनाऱ्याने जाताना बरेच अंतर मैयाच्या किनाऱ्यापासून दूर जावे लागले. पूढे एका व्यक्तीने नाला ओलांडून जाण्यासाठी रस्ता दाखवला. २ फूट पाण्यातून नाला पार करताना चिखलाने पाय व सफेद वस्र खराब झाले. म्हणून खूप चिडचिड झाली. पुढे एका मूलाने गावातून रस्ता आहे तिकडून जायला सांगितले. पण किनाऱ्याने जाण्याच्या हट्टापायी एका शेतातून जाताना रस्ता चूकलो. व एक काटेरी कुंपण आडवे आले. जिथे चूकलो तिथेच बसून राहीलो. म्हटल येईल कोणीतरी रस्ता दाखवायला तेव्हा जाऊ पूढे. बराच वेळ मोबाईल वर वेळ घालवला .तेव्हा पलीकडे शेतात चरत असलेल्या म्हशींमधून एक म्हैस काटेरी कुंपण ओलांडून अलिकडे आली व पुन्हा परत गेली. त्यामूळे रस्ता तयार झाला व मी त्या रस्त्यावरून पलीकडे गेलो.
आज मी जास्त वेळा रस्ता चूकलो खूप चिडचिड झाली. असाच पाय आपटत मी ३ वाजता" पूरण आश्रम मोती कोरल" येथे पोहोचलो .भोजन प्रसाद घेतल्यावर स्थानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला .पुढे १० मिनिटाच्या अंतरावर "आशापूरा माता" मंदिराकडे गेलो. तिथेही रस्ता चूकलो ,चूकून मंदीरापाठीमागे गेलो .नंतर वैतागून पूढे आलो. मंदीरात बरेच भावीक बसलेले होते. देवघर बंद होते दर्शनाच्या प्रतिक्षेत मी सुद्धा बसून राहिलो .बरेच वेळाने दर्शन झाले. पुढे जाण्याचे रद्द केले व परत 'पूरण आश्रम' येथे आलो. एका हाॅलमध्ये परिक्रमा वासींची व्यवस्था केली होती .सहा सात परिक्रमा वासी अगोदर तेथे थांबले होते. मला त्यांची सोबत झाली .
रात्री चपाती भोपळा भोजन प्रसाद घेतला व नंतर आराम.
नर्मदे हर
!! ७ फेब्रुवारी २०२० !!
पूरण आश्रम येथून सकाळी ८ वाजता" सायर "गावच्या दिशेने निघालो .पुढे "काशी विश्वेश्वर "दर्शन घेतले. सकाळी १० वाजता "नारेश्वर" येथे पोहोचलो. अतिशय सुंदर मंदिर परिसर. नागेश्वर महादेव दर्शन घेतले .
एका व्यक्तीने आपुलकीने विचारपूस केली व १०० रूपये दिले. सकाळी ११.४० वाजता भोजन प्रसाद घेऊन थोडा आराम केला .दुपारनंतर प्रवासाला सुरुवात केली .हरियाणा चे एक परिक्रमावासी महाराज सोबती झाले. सोबत प्रवास करताना एका प्रवासी भाविकाने दोघांना प्रत्येकी ५० रूपये दिले .
एका आश्रमात चहा साठी आवाज दिला. आम्ही ४० मिनीटे वाट पाहीली पण चहा आला नाही .मी चहा न घेता पूढे मार्गस्थ झालो .त्यांनी थांबवले पण मी त्यांना माझा वेळ वाया घालवल्याबद्दल बोललो. व्यवस्थित पाहुणचार करू शकत नाही तर बोलावणे चूकीचे आहे
संध्याकाळी ६ वाजता "दरोली बकूल आश्रम "येथे पोहोचलो. मैया किनाऱ्यावर खूप सुंदर आश्रम . एक बाबाजी व माताजी सेवा देतात. संध्याकाळी बराच वेळ मी मैया किनाऱ्यावर ध्यान केले . नंतर आश्रमात येऊन पूजा व भोजन प्रसाद चपाती भाजी भात वरण .
.आज फक्त ८ किमी प्रवास केला .
नर्मदे हर
!! ८ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ८ वाजता चहा बिस्किटे खाऊन पूढे मार्गस्थ झालो. ९.३० वाजता एका घरासमोर चहा साठी थांबवले. चहा व चिवडा घेऊन आम्ही बरेच वेळ गप्पा मारल्या. कोठून आले कधी परिक्रमा सूरू केली वगैरे .
पूढे बरेच अंतर किनाऱ्याने चालत गेलो . किनाऱ्यापासून दूर व आश्रमात भोजनाची व्यवस्था असते म्हणून बरेच परिक्रमा वासी किनाऱ्यापासून दूरावतात पण मी भोजनाची चिंता न करता किनाऱ्याने मैयाला पाहत चाललो होतो . दूपारचे २.३० वाजले भूक लागली होती .मैयाला प्रार्थना केली. गजानन आश्रमातून दोन मूले किनाऱ्यावर नैवेद्य दाखवण्यासाठी आले होते. मला पाहील्यावर आदराने "नर्मदे हर" म्हणाले .व एक विद्यार्थी मला आश्रमाकडे घेऊन गेला. तूम्ही थोडा आराम करा भोजन तयार झाल्यावर मी बोलावतो म्हणून निघून गेला .
मी तासभर वाट पाहीली पण कोणी आल नाही .म्हणून बाहेर आलो तर सर्व भोजन करत होते .मी आसन उचलून मार्गस्थ झालो. तेव्हा दोन तीन विद्यार्थी धावत आले व भोजन करून जावे म्हणून विनंती करू लागले. तूम्ही आराम करत होते म्हणून आम्ही सांगितले नाही .नंतर मी भोजन प्रसाद घेतला विद्यार्थ्यांनी खूप सेवा दिली .
मी संध्याकाळ पर्यंत किनाऱ्याने प्रवास केला .मकरंद महाराजांना फोन केला .मी सिनोरला पोहोचतोय म्हणून सांगितले .महाराज सूद्धा सिनोरला येणार होते .किनाऱ्यावरील गणेश मंदिरातून एका महाराजांनी आवाज दिला. मी वरती जाऊन गणेश मंदीराचे दर्शन घेतले .तोपर्यंत मंदार महाराज व मकरंद महाराज किनाऱ्यावर आले होते. दोघा महाराजांना भेटून आनंद झाला .आम्ही भूतनाथ महादेव आश्रम नंतर आज भेटलो होतो .
संध्याकाळचे ६ वाजले होते. आणि आम्हाला ५ किमी दूर अनूसया माता तिर्थ येथे पोहोचायचे होते .आज माघ पौर्णिमा होती .आज रात्री तिथे रात्री १२ ते २ च्या दरम्यान मंदीरात प्रकाश दिसतो. असे मकरंद महाराजांनी सांगितले .अंधार पडला तेव्हा आम्ही मंदीरात पोहोचलो .आमची रात्रीची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मकरंद महाराजांच्या परिचयाचे एक व्यक्ती येणार होते .आल्यानंतर त्यांनी एक रूम उघडून दिला .
रात्री भोजनासाठी तांदूळ, दाळ ,हळद, मिठ, व मिरची पावडर दिली. सर्व मिळून आम्ही त्याचा गॅस वर खिचडी भात बनवला .
आम्ही लवकर झोपणार होतो कारण रात्री आम्हाला मंदीरात जायचे होते .मी व मंदार महाराज उशीरा झोपी गेलो .त्यामूळे रात्री जाग आली नाही. मकरंद महाराज रात्री मंदीरात गेले. त्यांनी रात्री १२ वाजता तिथे ध्यान केले . पण त्यांना असा कोणताही प्रकाश तिथे दिसला नाही .
नर्मदे हर
!! ९ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी आम्ही त्या व्यक्तीला भेटलो ज्यांनी आमची राहण्याची सोय केली होती.त्यांचे आभार व्यक्त करून आम्ही अनूसया माता दर्शन घेतले .पूढे आम्ही किनाऱ्याने २ किमी प्रवास केला. रस्ता अडचणीचा होता, नंतर वाळूतून चालत गेलो .एके ठिकाणी स्नान व पूजा पाठ केला .
मी किनाऱ्याने जाण्याचा निर्णय घेतला व मंदार महाराज व मकरंद महाराजांनी रस्याने जाण्याचा निर्णय घेतला. पूढे मी "नर्मदा कूटी" जवळ आलो. तिथे कोणी दिसले नाही म्हणून मी पूढे गेलो .किनाऱ्यावर महादेव मंदिरात दर्शन घेतले .तिथे काही पेढे ठेवलेले होते .प्रसाद म्हणून मी काही पेढे घेतले ३ खाल्ले व ४ पेढे मी मकरंद महाराजांसाठी ठेवले. त्यांना फोन केला तूमची कोठे भोजनाची सोय झाली की नाही म्हणून .त्यांनी सांगितले आम्ही "नर्मदा कूटी" मध्ये भोजन घेतले. मी पण तेथूनच आलो पण मला तिथे कोणी दिसले नाही .मकरंद महाराजांनी नर्मदे हर आवाज दिल्यावर कूटी मधून एक महात्मा मकरंद महाराजांच्या स्वागतासाठी गेटवर आले होते .
पूढे किनाऱ्याने काही मिळेल की नाही माहित नाही. आहे त्यावर भूक भागवूया म्हणून मी उरलेले ४ पेढे खाल्ले व किनाऱ्याने चालत एका छोट्या अरूंद पाऊलवाटेवर आलो पाय सरकला की खाली मैयाच खोल पात्र .मैयाचे नामस्मरण करत मी ती पाऊलवाट पार केली.
दुपारचे १ वाजले होते एका झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबलो. तिथे एक माकड आले. मी आराम करून पूढे मार्गस्थ झालो. व ते माकड एक चढा चढून वरती गेले .मी पूढे पंधरा वीस पाऊले गेल्यावर समोर पाऊलवाट संपली होती .पाठीमागे येण्या शिवाय पर्याय नाही .मागे येऊन मी माकड ज्या रस्त्याने गेले तिकडे पाहीले ते अजूनही तिथेच बसलेले होते मी वरती चढून गेल्यावर मला एक पाऊलवाट दिसली .मी त्या रस्त्याने एका शेतात पोहोचलो. तिथे काही माताजी बोरे पाडताना दिसल्या .नक्कीच येथे लोकवस्ती असेल म्हणून मी अजून पूढे गेलो .समोर गूप्तेश्वर महादेव मंदिर होते तिथे काही कार्यक्रमानिमीत्त भोजन प्रसाद चालू होता.भोजनासाठी आदराने विचारपूस केली. मी तिथे पूरी भाजी, दाळ, भात, लापशी ,भोजन प्रसाद घेतला व आराम केला. आज दुपारी भोजन मिळेल अशी आशा नव्हती .पण मैयाची कृपा त्या माकडाने रस्ता दाखवला म्हणून मला गूप्तेश्वर महादेव मंदिर दिसले व मी दूपारचे भोजन करू शकलो .
दुपारनंतर किनाऱ्याने जाण्याचा प्रयत्न केला .पण किनाऱ्याने रस्ता नसल्याने मला रस्याने जाणे भाग पडले .पूढे मी" बद्रीकाश्रम "येथे आलो .आश्रमात न जाता मी किनाऱ्याकडे गेलो .किनाऱ्याने रस्ता नव्हता, मी मागे परतलो. रस्याने जाताना एका महादेव मंदिरात दर्शन घेतले. तिथून पुढे किनाऱ्याने रस्ता होता. "भिमापूरा "नंतर कूबेर भंडारी येथे पोहोचलो .मकरंद महाराजांना फोन केला महाराज बद्रीकाश्रम येथे थांबले होते. मी आश्रमात न गेल्यामुळे आमची भेट झाली नाही.
कूबेर भंडारी मैया किनाऱी सूंदर मोठा आश्रम .माझी सर्वात वरच्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. जेथून मी मैयाचे दर्शन घेऊ शकतो .रात्री भोजन प्रसाद चपाती भाजी व कढी व रात्री आराम.
नर्मदे हर
!! १० फेब्रुवारी २०२० !!
मकरंद महाराज ७ किमी मागे बद्रीकाश्रम येथे काल रात्री थांबले होते .आज सकाळी १० वाजेपर्यंत कूबेर भंडारी येथे ते पोहोचणार होते. मी स्नान पूजा पाठ करून मूख्य मंदीरात दर्शन घेतले. व महाराजांच्या येण्याची वाट पाहत बसलो. १० वाजता मंदार महाराज व मकरंद महाराज आले .दर्शन घेऊन आम्ही साडेदहा वाजता मार्गस्थ झालो. पुढे एका शिवमंदिरात आम्ही आराम केला .आराम केल्यानंतर आम्ही तिलकवाडा कडे जाण्यासाठी निघालो.
जवळचा रस्ता विचारण्यासाठी मकरंद महाराज एका घरी विचारपूस करण्यासाठी गेले. व मंदार महाराजांनी एका मोटारसायकल वाल्याला विचारले. दोघांनी वेगवेगळे रस्ते सांगितले. मकरंद महाराज म्हणाले मी ज्यांना विचारले ते स्थानिक आहेत त्यांना या परिसराची जास्त माहिती असली पाहिजे. व मंदार महाराज म्हणाले की मॅपवर सूद्धा तोच रस्ता जवळील दाखवतोय जो मोटारसायकल वाल्याने सांगितला आहे. मकरंद महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते .
मी व मंदार महाराज मोटारसायकल वाल्याने सांगितलेल्या रस्त्याने गेलो . व मकरंद महाराज वेगळ्या रस्त्याने आले. पुढे आम्ही दोघे "मीरा वेलवेट अँड रिसर्च फाउंडेशन" येथे पोहोचलो. मकरंद महाराज दहा मिनिटांनी पोहोचले. तिथे सदाव्रत ची व्यवस्था होती .पण मैयाच्या कृपेने आम्हाला तयार भोजन मिळाले .
दूपारी भोजनानंतर आराम करून मी व मंदार महाराज किनाऱ्याने तिलकवाडा कडे निघालो .मकरंद महाराज वेगळ्या रस्त्याने आले. पुढे आम्हाला एक ओढा आडवा आला .ती नर्मदा मैयाची वेगळी वाहत आलेली धार तर नसावी ही शंका मनात आली. एखादा वाटसरू आला तर त्याला विचारूया म्हणून आम्ही तिथे वाटसरू येण्याची वाट पाहत बसलो. बरेच वेळ झाली तरी कोणी आले नाही .म्हणून मी "नर्मदे हर" आवाज दिला .तिसरे वेळी आवाज दिल्यावर मकरंद महाराज आमच्या मागे प्रगट झाले. त्यांच्या येण्याची आम्हाला चाहूल देखिल लागली नाही. त्यानी तो ओढा आहे म्हणून सांगितले व आम्ही सोबतच तो ओढा पार केला.
दुपारचे २ वाजले होते. पायाखालची वाळू तापून लाल झाली होती .फेब्रुवारीच्या चा उन्हाळ्यात आम्ही चक्क भाजून निघालो होतो. ऊन्हाचा दाह कमी करण्यासाठी आपण स्नान करूया का मी मकरंद महाराजांना विचारले. त्यांनी संमती दिल्यावर मग काय आम्ही तिघांनी नर्मदा मैयाच्या थंड पाण्यात मनसोक्त आंघोळीचा आनंद घेतला .
तिलकवाडा आता जास्त दूर नव्हते. वासुदेव कूटीर कडे जाण्यासाठी मी मॅपवर जवळील रस्ता शोधला .त्या रस्त्याने जाताना आम्ही एका शेतकर्याचे घरी पोहोचलो. आम्ही रस्ता चूकलोय असे त्यांनी सांगितले .चला त्या निमित्ताने मला तूमच्या सेवेची संधी तरी मिळाली असे ते शेतकरी म्हणाले. आदराने आमचे स्वागत केले . एका झाडाखाली बसण्यासाठी आसन दिले. व चहाचा पाहूनचार देखील केला. परिक्रमा करण्याची माझा खूप इच्छा आहे पण मी पारिवारिक बंधनात अडकलो आहे असे ते म्हणाले .
पुढे ते सद्गृहस्थ आम्हाला वासुदेव कूटीर कडे जाणाऱ्या रस्त्या पर्यंत सोबत आले. संध्याकाळी ६ वाजता आम्ही वासुदेव कूटीर येथे पोहोचलो . फ्रेश होऊन चहा घेतला. मोटारसायकल वर परिक्रमा करत "नाशिक "येथील "अनुराधा आगाशे" वासुदेव कूटीर येथे आमच्या अगोदर आल्या होत्या .आम्ही त्यांच्या बरोबर प्रवासाविषयी गप्पा मारल्या. रात्री महाराष्ट्रीयन भोजन मिळाले चपाती, भाजी, खिचडी भात ,शिरा, लोणचे .भोजनानंतर आम्ही स्वामीजींसोबत परिक्रमा व आध्यात्मिक विषयावर गप्पा मारल्या .
नर्मदे हर
!! ११ फेब्रुवारी व १२ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ५.३० वाजता जाग आली. थोडा वेळ ध्यान केले.सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळाले .पूजा पाठ केल्यानंतर बालभोग साठी "ऊपमा" मिळाला .
विष्णूगीरी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही गरूडेश्वरच्या दिशेने निघालो. वाटेत" मणीनागेश्वर "महादेव दर्शन घेतले .मकरंद महाराज व मंदार महाराज रस्त्याने गरूडेश्वरच्या मंदिराकडे आले. व मी किनाऱ्याने प्रवास करत गरूडेश्वरच्या किनाऱ्यावरील घाटावर आलो. एक महाराज तिथे स्नान करत होते त्यांनी मला थांबवले स्नान झाल्यावर मी तुम्हांला भोजनालयाकडे घेऊन जातो असे ते म्हणाले. आम्ही भोजनालयाकडे निघालो .तोच मकरंद महाराज व मंदार महाराज किनाऱ्यावरील घाटावर हजर झाले .सोबतच जाऊ म्हणून मी महाराजांसोबत मकरंद महाराजांची प्रतीक्षा करत थांबलो तर मकरंद महाराज ऊन्हाचा दाह कमी करण्यासाठी स्नान करण्यासाठी गेले .महाराजाजांचे स्नान झाल्यावर आम्ही सोबतच "हनुमान गूफा आश्रम" येथे गेलो. तिथे एका हाॅलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली .
मकरंद महाराज टेंबे स्वामी समाधी दर्शन घेऊन भोजन प्रसाद घेऊन येतो म्हणाले,तूम्ही भोजन करून घ्यावे .मी व मंदार महाराज भोजनासाठी बसलो. मकरंद महाराज दर्शन न करता परत आले. दूपारी १२ नंतर दर्शन बंद होते .नंतर आम्ही सोबतच भोजन प्रसाद घेतला चपाती, भाजी ,वरण ,भात, श्रीखंड .
भोजनानंतर आम्ही खूप वेळ आराम केला. मंदार महाराजांना passport document संबंधित काही कागदपत्रे पाठवायचे होते. म्हणून आम्ही आज गरूडेश्वरमध्ये थांबणार होतो . दूपारी ४ वाजता मी व मंदार महाराज एका फोटो स्टूडीओ मध्ये गेलो .फोटो काढून आम्ही परत आश्रमात आलो. संध्याकाळी पूजा पाठ नंतर "खिचडी भात "भोजन प्रसाद व आराम .
!! १२ फेब्रुवारी !!
सकाळी स्नान पूजा पाठ करून आम्ही कालचे passaport document चे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पून्हा फोटो स्टूडीओ मध्ये गेलो .आल्यावर भोजन प्रसाद व दूपारी आराम .
दुपारनंतर आम्ही आश्रमातील महाराजांसोबत बसलो होतो. हाॅलमध्ये आमच्या सोबत राहणारे एक महाराज फार विचीत्र बडबड करत होते .त्यांच्या बोलण्यात उद्धटपणा व आई बहीणी वरून शिव्या होत्या. तिथे अजूनही लोक होते पण मला त्यांच बोलण सहन न झाल्याने मी त्यांच्या बोलण्याला विरोध केला . मी रागावलो हे पाहून आश्रमातील महाराजांनी मला शांत बसायला सांगितले. ते विचित्र महाराज दूर निघून गेल्यावर आश्रमातील महाराजांनी आम्हाला त्या महाराजांबद्दल सांगू लागले .
हे व्यर्थ बदबड करणारे महाराज पहीले चांगले होते. त्यांचा मित्र जो सन्यासी होता. त्याने काही महिन्यांपूर्वी दक्षिण तट तपोवन पासून पुढे राममंदिर जवळ एका आश्रमात आत्महत्या केली. तेव्हा पासून तो आश्रम बंद आहे .व तिथे विचित्र घटना घडतात. शेतातील बंद ट्रक्टर चालू होणे .वेगवेगळे आवाज येणे वगैरे .काही दिवसांपूर्वी हे महाराज त्या बंद पडलेल्या आश्रमात राहायला गेले .त्यांनी तो आश्रम स्वच्छ केला .थोड्याच दिवसात त्याच्या वागणूकीत बदल झाला . व ते अस्थिर मनस्थिती मूळे भटकंती करू लागले . तूमचे नशीब बलवत्तर तूम्ही त्यांच्या वर रागावल्यावर त्यांनी तूम्हाला इजा पोहोचवली नाही .
कालपासून सर्दी घसादुखी मूळ मी जाम झालो होतो सोबतच मंदार महाराज सूद्धा. मकरंद महाराज मला व मंदार महाराजांना दूपारी सरकारी दवाखान्यात घेऊन आले गोळ्या औषध घेऊन आम्ही परत आलो संध्याकाळी पूजा पाठ व भोजन प्रसाद घेऊन आराम
नर्मदे हर
!! ऊत्तर तट शुलपानी जंगलातील ७ दिवस !! १ ला दिवस १३ फेब्रुवारी २०
दोन दिवस गरूडेश्वरमध्ये थांबल्यानंतर ,आम्ही १३ फेब्रुवारी रोजी पूढील प्रवासासाठी सुरूवात केली. मी मैयाचा किनारा सोडायचाच नाही असा संकल्प केला .अन समोर दोन मोठे विघ्न माझा संकल्प तोडण्यासाठी खंबीरपणे ऊभे होते. एक "सरदार सरोवर डॅम" दूसरे "ऊत्तर तट शुलपानी जंगल" मा "नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका" पुस्तकात सूचना देण्यात आली होती. सरदार सरोवर डॅम मूळे किनार्यावरील रस्ता व लोकवस्ती संपुष्टात आली आहे . तरीही मी किनार्याने जाण्याचा निर्णय घेतला .मी व मंदार बिल्दीकर महाराज ,मकरंद बिल्दीकर महाराज बंधू आम्ही झरीयामध्ये आलो ,मी किनार्याने शुलपानी जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला. व त्यांनी "झरिया ,ऊडवा ,बोरीयाद "सड़क मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला .मला जाताना सांगण्यात आले की तुम्हाला त्या जंगलात पाणी सूद्धा मिळणार नाही . कोणीही परिक्रमावासी त्या रस्त्याने जात नाही .पण मी मैयापासून दूर जाण्याचा विचार सूद्धा करू शकत नव्हतो .
गूगल मॅपवर रस्ते पाहून घेतले .कारण पूढे जंगलात रेंज आहे नाही मॅपवर गूलवाणी गावात काही लोकवस्ती आहे असे दिसत होती. आणि पूढे फक्त जंगल
मी दुपारी २ वाजता गूलवाणी गावापासून ४ किमी मागे होतो. एका झाडाखाली आरामासाठी ध्यानस्थ बसलो. भूक लागली होती, मनोमन मैयाला प्रार्थना केली . काही वेळाने एक व्यक्ति डोंगर ऊतरून खाली आला ,मी विचारले येथे मला काही खायला मिळेल ? ते म्हणाले शक्यता कमी आहे ,पण मी प्रयत्न करतो .तूम्ही येथून जाऊ नका.
१५ मिनीटात ३ मूले मोटारसायकलवर माझ्या दिशेने आले. ते माझ्या साठी जेवण घेऊन आले होते .२ मकाच्या गरम भाकरी व बटाट्याची भाजी खाऊन तृप्त झालो. व मैयाचे मनोमन आभार मानले. कारण या दुर्गम भागात जेवण मिळणे अशक्य होते .
४ वाजता गूलवाणी गावात पोहचवलो. २५ घरे असलेल्या त्या गावात एका छोट्या मंदीरात आरामासाठी बसलो .तोच एक वयस्क व्यक्ति आले विचारपूस केल्यानंतर "पूढे चापड गावात लोकवस्ती आहे व रात्री तूमची तीथे राहण्याची सोय होऊ शकते" असे त्यांनी सांगितले. अजून वेळ होता म्हणून मी चापड गावच्या दिशेने निघालो .जाताना खूप मोठा डोंगर चढून जावे लागले. खूप मेहनत घेतली व तिचे फळ सूद्धा लगेच मिळाले. डोंगर चढून गेल्यावर लगेच मैयाचे दर्शन झाले .मी जोराने "नर्मदे हर "जयघोष केला. मैयाकडे जेव्हा पाहीले तेव्हा जणू ती सांगत होती "बेटा तू जंगलात असो किंवा वाळवंटात जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तूला उपाशी राहू देणार नाही "या विचाराने मन भरून आले.
पूढे चापड गावात शाळेतील मूलांचे आदीवासी नृत्य पाहीले. नंतर चापड गावातून गढी गावाकडे निघालो .दिवस मावळतीला गेला होता .माझी कोणी विचारपूस केली नाही. म्हणून आता काळजी वाटायला लागली. एका घरी गेलो तर ते पुढे जा म्हणाले .अजून एका घरी रात्री थांबण्याची विनंती केली तर, त्यांनी हनुमान मंदिरात जायला सांगितले. चला मंदिर तर आहे ना ,या विचाराने काळजी मिटली व मी त्या व्यक्तीबरोबर हनूमान मंदिराकडे चाललो. समोर पाहतो तर काय ,एका झाडाला तीन झेंडे बांधले होते. तेच त्यांच्या साठी हनुमान मंदिर होते .मी म्हणालो मी नाही येथे थांबू शकत. तेवढ्यात एका वयस्क व्यक्ति ने त्या माणसाला "मला रामभक्ताकडे घेऊन जायला सांगितले ".नंतर सोबत आलेलीं व्यक्ति मला रामभक्ताकडे घेऊन आली तिथे गेल्यावर चहा घेतला त्यांनी सांगितले "कोणीही परिक्रमावासी या जंगलातून येत नाही" म्हणून तूम्हाला त्रास झाला. त्यांची गुजराती भाषा मला समजत नव्हती. पण ते असेच काही म्हणाले असतील .रात्री त्यांनी माझ्या साठी भात भाजी बनवली. झोपण्याची ऊत्तम सोय केली मी जंगलात आदीवासी लोंकासोबत होतो याची भीती वाटत होती. मैयाचे नामस्मरण करत झोपी गेलो नर्मदे हर
आजचा प्रवास गावे -गूलवाणी, चापड ,गढी
!! ऊत्तर तट शुलपानी जंगलातील ७ दिवस !! २ रा दिवस . १४ फेब्रुवारी २०
सकाळी ८.३० वाजता चहा घेऊन रामभक्तांचा निरोप घेऊन "डब्बा "या गावच्या दिशेने निघालो. पूढे रस्त्याच्या कडेला हौदावर स्नान करून पूजापाठ केल्यानंतर .काही अंतर चालून गेल्यावर एका छोट्याशा दूकानाजवळ आलो .या ठिकाणी दूकान असेल याची कल्पना सूद्धा मनात आली नाही. कारण गूलवाणी गावानंतर पूढे लोकवस्ती आहे .असे गूगल मॅपवर दाखवले नव्हते .असो मैयाची कृपा .
सकाळचे ११.४० वाजले ,भूक लागली होती. दूकानवाल्याला विचारले पूढे खायला काही मिळेल का .त्याने थोडा विचार करून मला "पारले बिस्कीट" पूडा दिला .त्यांला पाहून दुकानातील एका व्यक्तीने सूद्धा मला १ पारले पूडा दिला. आता माझ्या कडे २ पारले होते .म्हणजे मी आज खूप श्रीमंत होतो .
आनंदाने निवांत बसून खाण्यासाठी जागा शोधत पूढे चाललो होतो .एका घरासमोर बाकड्यावर बसून मी १ पारले पाण्यात भिजवून खाल्ला .तेवढ्यात घरातून एक १८ ते १९ वयाच्या मूलाने अनाहूतपणे विचारले ." महाराज खाने मे मका की रोटी और ऊडद की दाल चलेगी क्या । " मी "हो" म्हणताना विचार केला की याला कसे माहिती मला भूक लागली म्हणून.
मिळालेल्या ३ रोटी पैकी १ रोटी बांधून घेतली. पूढे जंगलात रात्री काही मिळेल किंवा नाही .ते पाहून त्या मूलाने मला अजून २ रोटी , चिवडा व २ पारले दिले. नंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या .ते "वाडीया "गाव होते .त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १२ किमी दूर प्रवास करावा लागत असे. मका हरभरा तूर ही प्रमुख पिके .
पूढे त्या मूलाचा व त्याच्या परिवारातील लोकांचा निरोप घेऊन मी सोटींबर गावच्या दिशेने निघालो .दूपारी झाडाखाली थोडा आराम केला .तहानेने व्याकूळ झालो होतो. म्हणून दूपारी २ वाजता मार्गस्थ झालो. तासाभरात मी डोंगर ऊतरून खाली आलो .आता पुन्हा डोंगर चढून पूढे जायला दीड ते दोन तास लागणार होते. तेव्हा कूठे पाणी मिळेल अशी अपेक्षा होती.
उंचीवर गेल्यावर मैयाच्या दर्शनाने आनंद मिळायचा. तिथूनच पूढील मार्गाची पहाणी करून डोंगर ऊतरून खाली यायचे असा दिनक्रम .
डोंगर चढून गेल्यावर तरी पाणी मिळेल या आशेने मी भर ऊन्हात डोंगर सर केला .पण पदरी निराशा आली .मी मैयाला विनवणी केली की मी तहानेने व्याकूळ झालोय .नंतर डोंगर ऊतरताना मला दोन घरे, दिसली तिथे नक्की पाणी मिळेल या आशेने मी झपाझप चालत गेलो .अर्धा तास चालून गेल्यानंतर मी तिथे पोहोचलो .येथील वयस्क व्यक्ती ने खूप आदराने विचारपूस करून मला थंड पाणी प्यायला दिले, व जाताना दहा रुपये सुद्धा .मी "सोटींबर "गावात होतो,त्या गावात दोन घरे होती.
पुढे "अंतरास "या गावाच्या दिशेने निघालो .रस्ता खूप अवघड होता .तोल गेला की शंभर फूट घसरत गेलो म्हणून समजा. "अंतरास" नंतर "कूंडा" या गावी आलो. तिथे बर्यापैकी लोकवस्ती होती शाळा होती. दूपारी ४.३०वाजता एका व्यक्तीने थांबण्याची विनंती केली .पण मला हे जंगल लवकरात लवकर पार करून जायचे होते .म्हणून मी वेळ आहे तर पूढे जाण्याचा निर्णय घेतला .
पूढे मी" कडदा" गावच्या दिशेने निघालो , जसजसा दिवस मावळतीला गेला तसा मी डोंगर ऊतरून खाली घनदाट जंगलात चाललो होतो .आता काळजी वाटू लागली होती. ५.३०वाजता मला त्या जंगलात काही माणसे दिसली.त्यांच्या कडे गेल्यावर ,मला दिसले की ते एक मोठे झाड तोडून त्यापासून मोठा ढोल बनवण्याची तयारी करत होते. मला त्यांनी "ताडी पिणार का "म्हणून विचारले. मी त्यांना माझी रात्री झोपायची सोय करा म्हणून विनंती केली .एक व्यक्ति म्हणे "महाराज यहां थोडे ऊपर आपका ही मकान है आप वही विश्राम किजीए" थोड्या वेळात त्यांचा निर्णय बदलला. मला पूढे जायला सांगितले. एका व्यक्तीला मला रस्ता दाखवायला पाठवले .ज्यांनी मला रस्ता दाखवला त्यांचे नाव "कांतीभाई "ते म्हणाले पहाड चढकर एक पत्थर के पास मेरा घर है. मेरे ३ बच्चों को बताना मैंने भेजा है।
मी , डोंगर चढून , डाव्या बाजूला खूप वेळ चाललो, पण मला कुठेही घर दिसले नाही .मला रस्ता चूकल्याची जाणीव झाली .मी "नर्मदे हर "आवाज दिला. काही वेळाने त्या जंगलातून एक १५ ते १६ वर्षीय कन्या माझ्या कडे येताना दिसली. मी विचारले" कांतीभाई का घर कहाँ है"। तिने उत्तरेकडे बोट दाखवून ती निघून गेली .ती बोलली नाही की मला या जंगलात पाहून तिला आश्चर्य ही वाटली नाही .मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे काही वेळ पाहत राहीलो .पूढे गेल्यावर कळले की येथे कोठेही कांतीभाई म्हणून कोणी राहत नाही .मी डोंगर चढून वरती रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. व डोंगर चढून वर गेल्यावर ऊत्तर दिशेला मला ऊजेड दिसला .मी त्या दिशेने गेल्यावर, घरातील माताजीने पाणी देऊन सांगितले की .तुम्ही कांतीभाई च्या घरी आला आहात म्हणून. रात्री ८ वाजता कांतीभाई आले. मी सोबत आणलेल्या भाकरी गरम करून कांतीभाई कडून भाजी घेऊन खाल्ली व रात्री मैयाचे नामस्मरण करत झोपी गेलो
नर्मदे हर
!! उत्तर तट शुलपानी जंगलातील ७ दिवस !! ३ रा दिवस १५ फेब्रुवारी २०
सकाळी साडेसात वाजता उठलो. आजूबाजूला पाहिल्यावर समजले कि मी मैयाच्या किनाऱ्यापासून १०००फूट उंचीवर आहे .मी काल येथे पोहोचलो तेव्हा अंधार होता. सकाळचे नित्यकर्म आटोपून चहा घेतला कांतीभाई जाताना घरच्यांना सांगून गेले की "महाराजांना बालभोग देऊनच मार्गस्थ करा" सकाळीच मला बटाट्याची भाजी भाकरी (लाल कलरची) मिळाली व जाताना माताजी ने आपुलकीने एक गरम मका कणीस सोबत दिले .
कांतीभाईंच्या मुलासोबत मी मार्गस्थ झालो .वाटेत त्याने मला एक "अद्भुत विहीर "दाखवली . जी १००० फूट उंचीवर असून सुद्धा तिला १० फुटावर पाणी होते आणि विशेष गोष्ट म्हणजे हे पाणी फक्त जनावरांसाठी व जवळपासच्या ६ , ७ घरांसाठी पिण्यासाठी वापरात येत असे. पण मोटर लावून शेतीसाठी वापरले तर ते गायब होत असे .अगदी पावसाळ्यात सुद्धा. अशा त्या अद्भुत विहिरीचे दर्शन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.
पुढे दोन किलोमीटरपर्यंत कांती भाईंचा मुलगा मला रस्ता दाखवायला आला . पुढील मार्ग दाखवून तो माघारी फिरला .
मी डोंगर उतरून खाली आलो .पुढे एका ठिकाणी वीरप्पन सारखे मिशा असलेले वयस्क व्यक्ती भेटले. त्यांच्या धर्मपत्नी खाटेवर बसून बीडी पिण्याचा आनंद घेत होत्या. मी भीतीपोटी रस्ता न विचारताच पुढे निघालो .बरेच अंतर चालून गेल्यानंतर सकाळी १०.३० वाजता एका बाजूने "नर्मदे हर महाराज' यहां से आ जाओ" असा आवाज आला .ते जटाधारी साधू महाराज "नथूडीया भाई ऊकडीया" होते .ते त्या जंगलात सहपरिवार राहत होते .त्यांनी मला थोडा वेळ विश्राम करण्याची विनंती केली .चहा घेतल्यानंतर आज येथे राहा म्हणून आग्रह धरला. तसेही या जंगलात जटाधारी तपस्वी साधूंच्या सानिध्यात राहायला मिळणे म्हणजे माझे अहोभाग्य. मी आनंदाने थांबायला होकार दिला. त्यांनाही आनंद झाला .की खूप दिवसांनी परिक्रमावाल्यांची सेवा करायला मिळणार म्हणून.
नंतर महाराज मला मैया किनारी घेऊन गेले. गेली दोन दिवस मैयाचे दूरूनच दर्शन होत होते. आज मला मैयाच जवळून दर्शन लाभले होते . दर्शन करून स्थान करण्यासाठी पाण्यात उतरलो. तेव्हा जणू असे वाटले की मैयाने हळूच मला आपल्या कुशीत घेतले आहे .डोक्यावर पाणी घेतल्यानंतर वाटले की मैयाने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आहे.
स्नान ध्यान पूजापाठ केल्यानंतर महाराजांसोबत घरी आलो .माताजींनी आमच्यासाठी डाळ भात बनवला होता पोटभर जेवण केल्यानंतर, दुपारची झोप घेतली .चार वाजता उठलो .आम्ही पुन्हा किनार्यावर जाऊन स्नान ध्यान केले महाऱाज दिवसभर माझ्यासोबतच होते. ओढ्यावर कपडे धूण्यासाठी गेल्यावर महाराजांनी तेथील एक दगड स्वतःच्या हाताने स्वच्छ केला .याचे मला आश्चर्य वाटले .एवढे महान तपस्वी असून सुद्धा तिळमात्र अहंकार नव्हता .
घरी आल्यानंतर माताजीने आमच्यासाठी भाजी भाकरी बनवली होती. महाराजांसोबत थोडी आध्यात्मिक चर्चा केली. नंतर रात्रीचे भोजन प्रसाद घेऊन झोपी गेलो .सकाळी उठल्यानंतर पाहिले की मी घरात झोपल्यामुळे त्यांच्या धर्मपत्नी दोन मुली मुलगा सून सगळे बाहेर झोपले होते .मला वाईट वाटलं. माझ्यासाठी यांना खूप त्रास सहन करावा लागला. ते जरी पैशाने गरीब असले तरी त्यांच्यामध्ये मनाची श्रीमंती खूप होती. अशा उदार परिवारासोबत राहण्याचा सद्भाग्य मला प्राप्त झाले
नर्मदे हर
आजचा प्रवास "कडदा "ते "बूढणी" ।
!! ऊत्तर तट शूलपाणी जंगलातील ७ दिवस !! ४ था दिवस १६ फेब्रुवारी २०
सकाळी ७ वाजता ऊठलो .सकाळची नित्यकर्म आटोपून चहा घेतला. नंतर महाराज मला रस्ता दाखवला अर्धा किलोमीटर पर्यंत सोबत आले. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी हापेश्वरच्या दिशेने निघालो . हापेश्वर म्हणजे ऊत्तर तट शूलपाणी जंगलाचा मध्यभाग. एक पहाड उतरून जायला मला अडीच ते तीन तास लागले .सकाळी 11 वाजता हापेश्वरमध्ये पोहोचलो. स्नान पूजापाठ केल्यानंतर भोजन प्रसाद घेतला आज तीन दिवसानंतर आश्रम व परिक्रमावासी यांचे दर्शन झाल्यामुळे आनंद होता. एका माताजींनी उशिरा स्नान व पूजा पाठ करतो म्हणून उपदेश केला, मी त्यांना सांगितले की जशी परिस्थिती असेल त्यानुसार नियमांमध्ये बदल करावा लागतो .जंगलात रात्री निवासाची व्यवस्था होणे कठीण आहे. त्यात सकाळी वेळेवर स्नान करून पूढे प्रवास करणे शक्य नाही .पूढील प्रवासात मी या नियमाचे काटेकोर पालन केले .
आराम करून दुपारी तीन वाजता पुढे मार्गस्थ झालो . तीन दिवसानंतर पहील्यांदा मी डांबरी रस्याने प्रवास करत होतो. साडेपाच वाजता एका ओढ्यावर पुलाचे काम चालू होते .मला पाहिल्यावर तेथील साहेबांनी" मी रस्ता चुकलो" म्हणून सांगितले. सहा किलोमीटर उत्तरेला "माथासर " गाव आहे, तिथे तुमची सोय होईल. मी माघारी फिरलो ,जाताना विचार केला आपण जर माथासर ला गेलो तर मैयाच दर्शन होणार नाही. एक पहाड ओलांडून मी त्या माणसांना दिसणार नाही असा एका डोंगराच्या कडेने एका घराजवळून वर चढून जात असताना घरातील मातीने आवाज दिला "महाराज श्याम हो गई कहा जा रहे हो।" रूकना है ? तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते .मातेने थांबायचं विचारल्यावर जीवात जीव आला. नाहीतर आजही उघड्यावर झोपण्याची काळजी सतावत होती. पण मा नर्मदा मैया ने या जंगलात उघड्यावर झोपण्याची वेळ येऊ दिली नाही
त्यांच घर उतारावर होतं म्हणून त्या घराला ओटा नव्हता. पाणी पिल्यावर बराच वेळ त्यांच्यासोबत बाहेर बसून राहिलो. त्यांनी "घरात या" म्हणून विचारले नाही. म्हणून न राहवून मी त्यांना विचारले रात्री कुठे झोपू .त्यांनी सांगितले महाराज तुमची व्यवस्था घरामध्ये केलेली आहे .घरात अासन लावल्यानंतर तोंड हात पाय धुतले ,पूजापाठ केली. नंतर माताजी व बाबाजीं बरोबर गप्पा मारत बसलो . त्यांच्या परिवारात चार सदस्य होते बाबाजी माताजी त्यांची सून नातू त्यांचा मुलगा एका एक्सीडेंट मध्ये शांत झाला होता .ऐकून फार वाईट वाटले.
माताजी नी रात्री मकाच्या भाकरी उडीद डाळ व ताक भोजन प्रसाद म्हणून दिले .भोजन प्रसाद समोर ठेवला नंतर माझ्या समोर बसून त्यांनी प्रार्थना केली . हे माझ्यासाठी नवीन होते .म्हणून मी कुतूहलाने त्यांची प्रार्थना पाहत राहिलो .भोजन प्रसाद घेतल्यानंतर मैयाच नामस्मरण करत झोपी गेलोनर्मदे हर
आजचा प्रवास बूढणी ते सिलगदा
!! उत्तर तट शूलपाणी जंगलातील ७ दिवस !! ५ वा दिवस. १७ फेब्रुवारी २०
सकाळी ७ वाजता उठलो. सकाळची नित्यकर्म आटोपून चहा घेतला .माताजींनी दुपार साठी दोन भाकरी व उडीद डाळ बांधून दिली दुपारी भूक लागल्यावर खा म्हणे. त्या साक्षात ममतेची मूर्ती होत्या .सकाळी ८ वाजता मार्गस्थ झालो. पुढे एक व्यक्ती एक किलोमीटर पर्यंत रस्ता दाखवायला आले.ते म्हणाले पुढे "खूडांबा" या गावात जाताना डोंगराच्या मधून घळीतून जावे लागेल "जपून जा".मी "खूडंबा" गावच्या दिशेने निघालो. घळीतून जाताना खूप मोठ्या शिळा पार करून जावे लागले. दोन-अडीच किलोमीटर आत मध्ये गेल्यानंतर एके ठिकाणी पाण्याचा झरा दिसला. तेव्हा आश्चर्य वाटले त्या झर्याकडे जाताना वाटेत एक काटेरी झुडूप लागले. मी हातातील दंडाने ते बाजूला सारले. पण त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगाला खूप खाजव सुटली. दहा मिनिटे मी हात पाय खाजवत होतो .मी घाबरून मातेचा धावा केला .व एका बाजूने जाऊन त्या झर्यावर हात पाय धुतले .तेव्हा अंगाची दाह कमी होत गेली.
पुढे काही अंतरावर ६० ते ७० फूट उंच धबधब्याची भिंत होती .आता पुढे कसे जायचे .या विचाराने डोके सुन्न झाले .मी "नर्मदे हर" आवाज दिला .पण प्रतिसाद मिळाला नाही. मागे जावे तर परिक्रमा खंडित होण्याची भीती आणि समोर धबधब्याची भिंत .आता काय करावे मी पून्हा "नर्मदे हर " आवाज दिला .तेव्हा पाण्याच्या झर्याकडून एका लहान मुलाचा आवाज आला .मी आवाजाच्या दिशेने गेलो . ती मूले ७० फूट उंचीवर होती . त्या मुलाला माझी समस्या सांगितली. तेव्हा त्याने मला धबधब्याच्या भिंतीकडे यायला सांगितले.
भिंतीकडे जाताना ३ दगडांपैकी एका दगडावर पाय दिला व तो खाली सरकला सोबत ईतर २ दगडांना सोबत घेऊन आला ते ३दगड माझ्या पायावरून मला दूखापत न करता सरकत गेले त्याखाली जर माझा पाय अडकला असता तर तो नक्की मोडला असता आणि त्या जंगलात ते लहान मूले ७० फूट उतरून येऊन सूद्धा मला त्या दगडांखालून बाजूला करू शकले नसते. मैयैची कृपा म्हणून विघ्न टळले .
उजव्या बाजूने वर चढून जाताना तो मुलगा व त्याचा लहान भाऊ डाव्या बाजूने ७० फूट उंचीवरून माझे मार्गदर्शन करत होते .मी उजव्या बाजूने कडेकपारीत बोटे रुतून वर चढण्याचा प्रयत्न करत होतो .हातातील दंडा अडचण करत होता. अर्धा रस्ता चढून यायला खूप मेहनत घ्यावी लागली. पुढील रस्ता खूप अवघड होता .ती भिंत पुढच्या बाजूला झुकलेली होती .मी भीतीने घामाघूम झालो होतो .मी त्या मुलांना विचारले आता काय करू. त्यांनी मला डाव्या बाजूने सरकत यायला सांगितले. सरळ वर चढून जाणे शक्य नव्हते .कारण ती भिंत पुढच्या बाजूला झुकलेली होती .डाव्या बाजूने सरकत येण्यासाठी माझी हिम्मत होईना .थोडा जरी सरकलो तरी खाली मोठ्या शिळा स्वागतासाठी तयार होत्या. मी पुढे सरकत नाही हे पाहून तो मुलगा जोरात ओरडला "आगे बढने को बोला, तो खडा क्यू है तू । आगे रस्ता है । आगे बढो । तो मुलगा वयाने लहान होता पण त्याने मला असे फटकारले जसे मी त्याचा लहान नातू आहे. बोलण्यात तेज व तो अधिकारवाणीने मला ओरडून बोलला . मी हळूहळू सरकत त्या पाऊलवाटेवर आलो .जी त्यांना डाव्या बाजूने दिसत होती .त्या पाउल वाटेने हळूहळू वर चढून आलो .वर चढून आल्यानंतर मी त्या मुलांचे हात जोडून शतशः आभार मानले व जाताना खाऊसाठी वीस-वीस रुपये दिले .कारण ते नसते तर मी त्या घळीतून बाहेर पडूच शकलो नसतो.
पुढे एका रस्त्यावर माताजी पाणी घेऊन जाताना दिसल्या. त्यांनी मला उत्तर दिशेला जायला सांगितले. पण मी पूर्व दिशेला जाणार सांगून त्यांच्या मागे मागे चालत एका घरी गेलो . तिथे पाणी पिऊन बराच वेळ आराम केला .घरातील माताजींनी मला दुधाचा चहा बनवून दिला .चहा घेतल्यावर खूप बरे वाटले. त्या घरातील लहान मुले मला रस्ता दाखवायला सोबत आली .काही अंतरावरून ती माघारी फिरली .
पुढे एका ओढ्यावर स्नान करून पूजापाठ केले. सकाळी मातेने दिलेल्या दोन भाकरी उडीद डाळ सोबत होतीच .दुपारी तीच खाऊन आराम केला. दुपारी दोन वाजता मार्गस्थ झालो. पूढे मैया किनारी एका घरी दोन माताजी होत्या .त्यांचे वय फार कमी होते १२ ते १५ च्या दरम्यान .त्यांना प्रत्येकी ४,४ मूले होती मला ते पाहून दूख्ख झाले. काय यांचे जिवन मुलांना जन्म द्यायचा आणि शेतात राबता राबता शेवटचा श्वास घ्यायचा .
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते .डोंगर चढून गेल्यावर समोर दिसत असलेल्या घरी थांबू असा विचार करून त्या घरापर्यंत पोहोचलो .घर गृहस्ती ने आदराने स्वागत केले, पण रात्री साठी पूढे जायला सांगितले .संध्याकाळी ६.३० वाजता ८ ते १० घरे असलेल्या" सकरजा" गावात आलो. दोन तीन घरी रात्री निवासासाठी विनंती केली .पण पदरी निराशा पडली. पून्हा काळजी "उघड्यावर झोपण्याची वेळ येती की काय" त्या गावातील शेवटच्या घरी रात्री राहण्यासाठी विनंती केली .त्यांनी डोंगरापलीकडील गावात जायला सांगितले .आज नक्की उघड्यावर झोपण्याची वेळ येणार हा विचार करत मी डोंगर चढायला सुरूवात केली .आणि पाठीमागून आवाज आला "महाराज रूकना है क्या" त्याच घरातील" प्रताप "बाबांनी आवाज दिला होता. घरी गेल्यावर त्यांनी सांगितले की २ दिवसापूर्वी बाहेरगावी गेलो होतो ,आत्ताच आलो व तूम्हाला डोंगर चढून जाताना पाहीले .मी मनोमन मैयाचे आभार मानले तूझी लिला अपार आहे. रात्री भात भाजी भोजन प्रसाद मिळाला व झोपण्याची ऊत्तम सोय करण्यात आली.
नर्मदे हर
आजचा प्रवास "सिलेगदा, खूडांबा ,सकरजा.
!! ऊत्तर तट शूलपाणी जंगलातील ७ दिवस !! ६ वा दिवस, भाग १ ला,१८ फेब्रूवारी २०
सकाळी सात वाजता उठलो चहा घेताना प्रताप बाबांनी आपल्या परिवाराची ओळख करून दिली.त्यांना पाच मुले पाच मुली होत्या. पुढच्या गावी जाण्यासाठी त्यांची दोन मुले शाळेत जाताना मला सोबत घेऊन जाणार होती.
सकाळी आठ वाजता त्या बाळ गोपाळांसोबत मार्गस्थ झालो .४५ मिनिटात आम्ही तो डोंगर पार करून ४ किमी दूर पुढच्या गावी पोहोचलो .मी घामाघूम झालो पण त्या मुलांच्या चेहर्यावर थकवा सुद्धा जाणवत नव्हता .मला याचं कौतुक वाटलं. "सकरजा" गावातून फक्त ही दोन मुल शिक्षणासाठी ८ किलोमीटर अनवाणी जंगल तूडवत होती .त्यांना चाॅकलेट देऊन मी मार्गस्थ झालो . पुढे एका हापशावर स्नान करून झाडाखाली पूजापाठ केली .
दुपारचे बारा वाजले होते भुकेने व्याकुळ झालो होतो .झाडाखाली आराम करण्यापेक्षा चालत राहूया कूढेतरी भोजनाची सोय होईल हा विचार करून मार्गस्थ झालो.एक टेकडी चढून गेल्यावर एका घरी विचारले "आगे कही रोटी मिलेगी" घरातील १५ वर्षाच्या कन्येने सांगीतले "आगे भी मिलेगी और यहां भी मिलेगी" . मी घरासमोर बसून एक बाजरीची भाकरी व वालवडी ची सुकी भाजी खाल्ली खूप दिवसांत बाजरीची भाकरी मिळाली म्हणून आनंदात भोजन केले .त्या बाल रूप माताजींचे मनःपूर्वक आभार मानून पुढे मार्गस्थ झालो.
मी रस्ता चुकलो असे काही लोकांनी सांगितले. दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी मी ४ किमी दूर भरकटलो होतो. तेव्हा मानसिक चिडचिड झाली . पुढे एका झाडाखाली आराम करण्यासाठी थांबलो . तर तिथे ऊन आले.व्यवस्थित आराम पण मिळाला नाही. भर दुपारी पाय आपटत पुढे निघालो . पूढे किनार्यावर सोळा सतरा वर्षाच्या मुली पाणी भरत होत्या, मला पाहून त्या घाबरून पळून गेल्या. अजून पुढे गेल्यावर दोन लहान मुलांना मी "नर्मदे हर" म्हणले .ते सुद्धा मला घाबरून पळून गेले .मला या गोष्टीचं विलक्षण कौतुक वाटलं. यात त्यांचा काहीच दोष नव्हता त्यांनी या जंगलात यापूर्वी कधी परिक्रमावासींना पाहिले नव्हते.
पुढे मी एका अशा ठिकाणी आलो जिथे दोन रस्त्यांपैकी एकाची निवड करायची होती. मी दोन्ही रस्त्यामधील डोंगरावर चढून जाण्याचा निर्णय घेतला. वर चढून गेल्यावर अजून एक उंचच ऊंच डोंगर व घनदाट जंगल, काय करावे सुचत नव्हते. त्या निर्मनुष्य जंगलात मी शेवटचा पर्याय म्हणून "नर्मदे हर" आवाज दिला .प्रतिसाद आला नाही मी अजून वर चढून गेल्यावर "नर्मदे हर "आवाज दिला. तेव्हा एका लहान मुलीचा आवाज आला. पण तिची भाषा समजत नव्हती. मी पुन्हा "नर्मदे हर" आवाज दिल्यावर ती ७ ते ८ वर्ष वयाची लहान मुलगी शेळ्या घेऊन माझ्या दिशेने येऊ लागली. एवढी लहान मुलगी या घनदाट जंगलात निर्भय होऊन माझ्या दिशेने येत आहे. हे पाहून माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही .ती कोण होती माहित नाही. पण तिच्या दर्शनाने माझी रस्ता चुकल्याने झालेली चिडचिड व थकवा कमी झाला. मन प्रसन्न होऊन मी त्यांना विचारले. आप कौन है ,आप को इस घने जंगल से डर नही लगता । माझ्या बोलण्यावर फक्त स्मितहास्य करत त्या मला मार्ग दाखवायला पुढे चालू लागल्या . मी त्यांच्या चरणांकडे पहात मागे मागे चालत गेलो. ते बालरूप जसेजसे डोंगर चढून वर गेले तसे ते घनदाट जंगल विरळ होत गेले. जसे सूर्य उगवल्यावर अंधार दूर होतो.त्या दिव्य स्वरूपावर मी सुंदर "काव्य" तयार केले आहे.
___________________________________________
"सहजा चारो और हुआ ये । कैसा अलौकिक दिव्य ऊजाला।।
सूर्य नही कही चांद नही यहां । आई कहाँ से किरणों की माला ।।
तेजोमय ईस ज्योती स्वरूप ने। मूझको अचरज मे डाला ।
भक्त को माया मोहित देखा तो।। बाल रूप मा नर्मदा लगी मूसकाने।
माता तो भक्त को पहचाने पर।। भक्त नही माता को पहचाने ।
चरणों से सिर तक रूप विलोकत।। मूरत देखत नैन जूडावे ।
सोच रहा इस निर्जन वन मे ।। कौन आया मेरा भाग्य जगाने।
भक्त को माया मोहीत देखा तो ।। बालरूप मा नर्मदा लगी मूसकाने।"
__________________________________________
पुढे त्या म्हणाल्या" मै आपके लिये रबडी बनाती हू" एवढेच काय ते शब्द माझ्या कानात कायमचे साठवले गेले .बाकी भाषा मला समजली नाही.
पुढे काही अंतर चालून गेल्यावर मी त्यांच्या घरासमोर आलो. तिथे त्यांच्या माताजी दोन भाऊ व चार बहिणी होत्या. मी सर्वांना "नर्मदे हर"म्हणल्यानंतर मा नर्मदेचे दर्शन करून द्या म्हणून विनंती केली. त्या दोन बंधूंनी मला झाडांमधून वाहत असलेली मा नर्मदा दाखवून दिली.पुढे त्या बारा वर्षे वयाच्या मूलाने मला शुद्ध हिंदी मधून विचारले "तू कहाँ से आया है रे" बोलणे जरी ऊद्धट वाटत असले तरी त्यात प्रेम आणि आपूलकी होती .मी म्हणालो" मै समुद्र से आया हूँ ! तो म्हणाला- आगे कहा जायेगा ? मी - मै अमरकंटक जाऊँगा।त्यावर तो म्हणाला - "वहा तक जाते जाते तू तो बूढा हो जाएगा। "त्याच्या बोलण्याचे मला हसू आले . खूप गप्पा मारल्या पोट धरून मनमोकळेपणाने हसलो मी त्या दिवशी . माझा थकवा आता पूर्ण निघून गेला होता . मातेने माझ्या साठी मकापासून बनवलेली रबडी बनवून दिली . मी जेवण केले होते म्हणून थोडी खाऊन बाकी परत केली . जाताना मी त्या मुलीच्या मातेला सांगितले की 'मी जंगलात रस्ता चूकल्यावर तूमची मूलगी मला. . . . बोलताना माझा कंठ दाटून आला होता मी मी पूढे नाही बोलू शकलो .
ते दोन लहान बालगोपाल मला पूढील मार्ग दाखवायला येणार होते . मी त्या दोन लहान मुलांसोबत मार्गस्थ झालो . त्यांचा निरोप घेण्याची वेळ आली माझ्या मनात भावनांचे आभाळ भरून आले होते . असे का होत होते मला माहीत नाही. मी त्यांच्या पासून दूर जाणार हा विचार करूणच माझा कंठ दाटून आला होता . मला खूप दूख्ख झाले. जसे मी माझ्या रक्ताच्या नात्यातील लोकांना सोडून जातोय .मी भावनीक होऊन त्यांना कडकडून मिठी मारली व माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले ज्यांची मी कल्पना ही केली नव्हती .
"मै आपको हमेशा याद रखूंगा कभी भूलूंगा नही" . . . . To be continue
!! उत्तर तट शूलपाणी जंगलातील ७ दिवस !! ६ वा दिवस. भाग २ रा. १८ फेब्रुवारी २०
दिव्य दर्शन
पूढे जाताना खूप वेळा मागे वळून बघितले. व मी तेथून पुढे का आलो म्हणून पच्छाताप करत एका दगडावर बसून अश्रूंना वाट मोकळी करून दिली .मला त्या बालरूपाला डोळे भरून पहायचे होते. तो दिव्य आवाज पुन्हा पुन्हा कानावर घ्यायचा होता. आता पुढे जाण्यावाचून काही पर्याय नाही .म्हणून मी जड पावलाने पूढे चाललो.
पुढे मला संध्याकाळ झाली. एक डोंगर उतरताना मला तासभर वेळ गेला .तो सरळ उतार होता, मला बसून सरकत खाली यावे लागले .पुढे मैयाच्या किनाऱ्यावर पुष्कळ घरे होती. एका व्यक्तीने किराणा दुकानवाल्याकडे थांबा म्हणून सांगितले.तिथे गेल्यावर बाहेर कोणी दिसले नाही ,म्हणून मी पुढे चालता झालो. संध्याकाळी साडेसहा वाजता किनाऱ्यावरील शेवटच्या घरच्यांनी थांबा म्हंटले .ते मछलीवाल्यांचे घर होते. किनाऱ्यावर गाळ होता म्हणून स्नान न करता हात पाय धुऊन किनाऱ्यावरच पूजा पाठ केला .परत आल्यानंतर चहा घेतला ,पाठीमागील प्रवासाबद्दल चर्चा केली. जेवणासाठी त्यांनी विचारले "महाराज मछली खाओगे "मी नाही म्हटल्यावर ,त्यांनी उडीदडाळ मकाच्या दोन भाकरी बनवल्या. त्या घरात खूप अस्वच्छता होती. चपला घालून वावर होता. जिथे मी आसन लावले ,तिथे पाठीमागे कोंबड्या होत्या. मच्छीचा सुगंध घेत बळेच एक भाकर खाल्ली .
झोपण्याची तयारी करायला लागलो .तर बाजू वाले तीन मछली वाले दारू पिऊन आले व त्या घरातील मोठा ढोल विचित्र पद्धतीने वाजवायला लागले. मला वाटले थोड्यावेळाने बंद होईल .पण रात्रीचे अकरा वाजल्यावर मी त्यांना विनंती केली .मी जंगलातून थकुन आलोय .कृपया ढोल वाजवणे बंद करा .त्यांनी ढोल वाजवणे बंद केले .आता मी शांत झोपणार होतो. झोप लागणारच होती तोच मोठे मोठे उंदीर अंगावर उड्या मारायला लागले. कोंबड्यांच्या पिसा चावत होत्या व हे कमी होत की काय म्हणून त्यात भर देण्यासाठी. बाजूला दूरवर झोपलेल्या आजीबाई खोकत होत्या व खोकताना तिथे थूकत होत्या .वाटले की "मी काय पाप केले जे या रूपात समोर आले".
रात्री २ वाजता झोपलो .तोच ३ वाजता कोंबडा पूर्ण ताकदीनिशी आरवला. झोप मोडल्याच्या रागात जवळ पडलेली चप्पल जोरात फेकून मारली ."थोडावेळ शांतता" आणि आणि त्याने पुन्हा आरवायला सुरुवात केली. मी नशिबाला दोष देऊन त्याच्या आरवण्याचा आनंद घेत बसलो. सकाळी साडेपाच वाजता मी अक्षरशः तेथून पळालो .आजचा दिवस जितका चांगला तितकाच तो वाईट पण होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नर्मदे हर
आजचा प्रवास - सकरजा ,अंजनवारा, सिरखडी व भितडा या गावी रात्री मुक्काम
!! उत्तर तट शूलपाणी जंगलातील ७ दिवस !! ७ वा दिवस , १९ फेब्रुवारी २०
आज सूर्योदयापूर्वीच मच्छीवाल्याच्या घरातून पळ काढला ते थेट डोंगरापलीकडे. जाताना दोन तीन वेळा सरकून पडलो सकाळी ६.३० वाजता ओढ्यावर अतिशय थंड पाण्याने स्नान करून, "सूगाणा" गावाकडे आलो .पाच मिनीटांचा पक्का रस्ता संपल्यानंतर पुन्हा जंगल सूरू झाले .ऊंच डोंगर चढून गेल्यावर पून्हा दोन पाऊलवाटा लागल्या. योग्य पाऊलवाट निवडताना चूक झाली व डाव्या बाजूने जाण्याची दूर्बूद्धी सूचली. बरीच झाडेझूडपे बाजूला करत मार्गक्रमण चालू होते. पून्हा पाय सरकून पडलो. शेजारी २०० फूट खोल दरी व उजव्या बाजूला समोरच्या डोंगरावर काही घरे व चांगला रस्ता होता. मी उजव्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला असता तर मी लवकर "हतणी" नदी पर्यंत पोहोचलो असतो .तेच मी चूकून डाव्या बाजूच्या डोंगरावर आल्यामुळे अडचणी वाढल्या या विचाराने चिडचिड करत बसलो. जिथे सरकून पडलो तिथच बराच वेळ बसून राहीलो .
मोबाइल काढला तिथे जिओ सिम ला रेंज होती म्हणून जरा बरे वाटले .आज ७ दिवसानंतर जीओला रेंज आली होती. मकरंद व मंदार बिल्दीकर महाराजांसोबत बोलून त्यांची विचारपूस केली व माझी व्यथा सांगितली. पूढे १२ वाजता , डोंगर उतरून खाली आलो .
एका घरी थंड पाणी पिलो. तिथे" रूपलाल" नावाचे सद्गृहस्थ होते .त्यांना काल रात्री चा वृत्तांत सांगितला. मच्छी वाल्या च्या घरी झालेले हाल त्यांना सांगितले. त्यांनी जेवणासाठी विचारपूस केली ."हतणी"नदी पार करून गेल्यानंतर शिवमंदिरामध्ये जेवण मिळणार होते. पण त्यांनी जेवणासाठी आग्रह केला व माझ्यासाठी गरमागरम बाजरीची भाकरी व बटाट्याची भाजी बनवायला सांगितली .भोजन करून तीन वाजेपर्यंत आराम केला.
जाताना त्यांनी मला सांगितले" हतणी" नदी पार केल्यानंतर पुढे "दासना" गाव लागेल .त्या गावात नायक लोकं दारू पिऊन लूटमार करतात. तुम्ही तिकडे जाऊ नका. तुम्ही "कवडा" या गावाकडे जा म्हणून सांगितले .मी त्यांचा निरोप घेऊन हतणी नदीवर आलो .एका 21 - 22 वर्षीय मुलाने वेगाने नव्या दमात होडी संगमापर्यंत आणली. त्याला 30 रुपये देऊन मी मंदिराकडे गेलो .पांडव कालीन शिव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर, मी महाराजांची भेट घेतली. दोन दिवसावर शिवरात्र होती त्यांनी थांबण्यासाठी आग्रह केला .मला महाशिवरात्र एखाद्या तीर्थस्थानावर साजरी करायची होती म्हणून मी पुढे मार्गस्थ झालो.
संध्याकाळी ७ वाजता मैया पासून 12 किलोमीटर दूर" कवडा "या गावी हनुमान मंदिरात पोहोचलो. महाराजांनी आदराने विचारपूस केली संध्याकाळी पूजापाठ करून रात्री डाळ बाटी व दहीवडे भोजन प्रसाद म्हणून मिळाले.महाराज रात्री खूप उशिरापर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही पहात होते. त्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली .पण काही उपयोग झाला नाही .शेवटी मी हॉलमध्ये जाऊन झोपलो, रात्री एक वाजता शांत झोप लागली.
नर्मदे हर
आजचा प्रवास- सूगाणा ते कवडा
! २० व २१ फेब्रुवारी २०२० !!
रात्री उशिरा झोपल्यामूळे उशिरा जाग आली. सकाळी 7:30 वाजता उठून स्नान पूजा-पाठ प्राणायाम केले. सकाळी दहा वाजता "दही" गावाकडे प्रस्थान . रस्त्याने परिक्रमावासी सोबती "नानूजी" भेटले. वयस्कर असल्याने महाराज माझ्या बरोबर चालू शकत नव्हते. मी एकटाच "दही" गावाकडे मार्गस्थ झालो. दुपारी १ वाजता "हनुमान मंदिर दही" येथे पोहोचलो .भोजन प्रसाद घेतल्यानंतर भरपूर आराम केला, दुपारनंतर नानूजी महाराज आले .पुढे प्रवास करण्याचा रद्द केला होता. संध्याकाळी पूजा पाठ भोजन व आराम.
21 फेब्रुवारी २०२० शिवरात्री
आज दुपारपर्यंत हनुमान मंदिर दही येथे होतो. दुपारी बारा वाजता भोजनासाठी चपाती भाजी समोर आली .उपवास सांगून भोजन दूर केले .नंतर महाराजांनी उपवासासाठी पुरी व बटाटा चना भाजी बनवली. वेगवेगळ्या भागांत ऊपवासासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. दुपारनंतर प्रवासाला सुरुवात केले किनाऱ्याकडे जाताना "धर्मे " गावात गावकऱ्यांनी थांबण्याची विनंती केली. ज्या मंदिरात त्यांनी रात्री ची व्यवस्था केली होती. तेथे रात्री शिवरात्री निमित्त भजन होणार होते. मला एकांत हवा होता असे मी त्यांना सांगितले .दोन दिवस प्रवासाने मी थकलो आहे व झोप पण पूर्ण मिळाली नाही म्हणून मला एकांत व शांतता हवी आहे. नंतर गावकऱ्यांनी माझी व्यवस्था नवीन हनुमान मंदिरात केली .मंदिरासमोरील किराणा दुकानातून एका भाविकांनी साबुदाणा खिचडी कढीपत्ता टाकून कोथिंबीर टाकून ताक दिले. अशा प्रकारे शिवरात्रीला उपवासाचे फराळ ग्रहण करून रात्री आराम.
नर्मदे हर
!! २२ फेब्रुवारी २०२० !!
सकाळचे नित्यकर्म आटोपून मी महादेव मंदिरात गेलो. जिथे रात्री भजन होते .चहा घेऊन येतो म्हणून एक बाबा गेले ते बराच वेळाने चहा घेऊन आले.
मला किनाऱ्याकडे जाऊ नका म्हणून सांगितले होते. पूराचे पाणी अस्ताव्यस्त पसरल्या मूळे तिकडे रस्ता नाही. पण मैया दर्शनाची ओढ मला किनाऱ्याकडे घेऊन गेली .एका वीटभट्टी जवळ एका यूवकाने मला डोंगरावर एक पूरातन शिवमंदिर आहे .तूम्ही येथपर्यंत आलाच आहात तर दर्शन करून पुढे मार्गस्थ व्हा. तिथे एक महाराज सेवा देतात पण ते तुम्हांला थांबण्यासाठी आग्रह करतील .
दूरून दिसत असलेल्या झेंड्याकडे पाहत मी डोंगराच्या दिशेने निघालो. डोंगर चढून वर गेल्यावर तिथे फक्त झेंडेच होते मंदिर नाही .नंतर मी "नर्मदे हर" आवाज दिला .दोन वेळा आवाज दिल्यावर डोंगरापलीकडील शेतातील घरातून एक बाबाजी "मेरा विठ्ठल आया मेरा विठ्ठल आया" म्हणत पळत आले. मी त्यांना नाराजीच्या सूरात म्हणालो .एक व्यक्ती ने मूझे झूठ बोला की यहा पूरातन शिवमंदिर है ,यहा तो कोई शिवमंदिर नही है । नंतर महाराजांनी मला आपल्या आश्रमाशेजारील पूरातन पांडवकालीन शिवमंदिर दाखवले .जे डोंगर माथ्यावरून दिसत नव्हते .
फ्रेश झाल्यावर महाराजांनी भोजनाची तयारी केली .भोजन बनवल्या वर महाराज मला म्हणाले .भोजन के बाद आराम कर लो भागदौड करने की कोई आवश्यकता नही .नंतर मी म्हणालो कि हा मूझे पता है । की आप मुझे आज रोकने वाले है। मै कही नही जा रहा हूॅ । आज यहा विश्राम करके । कल आगे चला जाऊंगा । महाराज म्हणाले की "कल नही आपको यहा दस दिन रूकना है .ऐकल्यावर मी त्यांच्या कडे पाहतच राहीलो मी म्हणालो कि दहा दिवस नाही थांबू शकत मी .
मग कशाचा आला भोजनानंतर आराम महाराजांनी आपली व्यथा सांगायला सुरुवात केली .शेजारच्या शेतकर्यांनी शेतात करंट सोडला, त्यामूळे माझी सफेद गाय दगावली मला फोटो दाखवले. मी तहसील आॅफिस मध्ये जाऊन प्रकरण करतो ज्यामूळे मला नूकसान भरपाई मिळेल .तूम्ही दहा दिवस आश्रम सांभाळा. मी तालुक्याला जाऊन नूकसान भरपाई व गोशाळा साठी प्रकरण टाकतो .नंतर मी महाराजांना सांगितले की तुम्ही इतकी वर्षे येथे राहतात .तूमच्या विश्वासाचे असे कोणी नाही का जे तुमच्या गैरहजेरीत आश्रम सांभाळू शकेल .महाराज म्हणाले माझा कोणावरही विश्वास नाही. येथे दूर्लक्ष जडीबुटी आहेत कोणीही त्या घेऊन जाऊ शकतो .
मी तर धर्म संकटात सापडलो होतो .मी मंदार बिल्दीकर महाराजांना फोन केला. व परिस्थिती समजावून सांगितली मंदार महाराज मंत्रालयात काम करत असल्याने ते या संतदास महाराजांना सरकारी योजनांबद्दल योग्य सल्ला देऊ शकतात. मंदार महाराजांबरोबर बोलणे झाले . नंतर मी आमचे परिक्रमा मार्गदर्शक अपूर्वानंद कुलकर्णी यांना फोन केला संतदास महाराज थांबण्यासाठी आग्रह करतात म्हणून ,कुलकर्णी महाराजांनी सांगितले की "साधू चलता भला "
नंतर संतदास महाराजांनी आपल्या आश्रम विषयी सांगितले या दहा दिवसांत सकाळी गाईला चारा टाकणे मंदिर साफसफाई व भोजन बनवून दिवसभर आराम करणे असा दिनक्रम सांगितला. संध्याकाळी गावातील काही तरुण आले त्यांनी चहा बनवला व साफसफाई ची सेवा करून निघून गेले .
संध्याकाळी पूजा पाठ करताना महाराज म्हणाले की माझ्या कडे बगलामूखी विद्या आहे मी ती तूला अर्पण करतो. मी म्हणालो मैयाच्या कृपेने मी सूखी आहे मेहनत करून दोन वेळा पोटाला पोटभर जेवण मिळते यातच मी समाधानी आहे .मला या तंत्र मंत्राची काही आवश्यकता नाही.
दिवसभर या महाराजांची बडबड चालूच होती दुपारी भोजनानंतर पण आराम मिळाला नाही. रात्री भोजन करून झोपलो तर रात्री १ वाजता महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून ओरडून जागे केले . त्यांच्या एका पायाचे काही वर्षांपूर्वी आॅपरेशन झाल्यामुळे पायाला वेदना होत होत्या, मी काही वेळ पाय दाबून दिले व सकाळ होण्याची प्रतिक्षा करू लागलो .
दूसरे दिवशी दुपारी फलाहारी आश्रमात गेल्यावर कळले की. संतदास महाराज एक नंबर गोडबोले बाबा आहे रात्री ओरडून ऊठले असतील ना ? . मी म्हणालो तुम्हाला कसे माहित ? तेव्हा त्या फलाहारी आश्रमातील महाराजांनी सांगितले की त्यांच्या कडे जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमा वासींंना असाच त्रास देऊन थांबवून घेतात .
!! २३ व २४ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी नित्यक्रम आटोपून संतदास महाराजांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो .सकाळी ११ वाजता किनाऱ्याने फलाहारी आश्रमात पोहोचलो. रात्री कोठे होता म्हणून महाराजांनी विचारले .संतदास महाराजांकडे होतो म्हणून सांगितले. फलाहारी महाराजांनी संतदास महाराजांबद्दल सांगितले. १२ वर्ष झाली परिक्रमा करताना संतदास महाराज या गावात आले होते. ते पुन्हा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी येथून पुढे गेलेच नाही .
फलाहारी महाराजांनी तिक्कड व एक पालेभाजी बनवली. भोजन करून लगेच मार्गस्थ झालो .दुपारी ४ वाजता "निसरपूर" येथे पोहोचलो .चहा पिण्याची इच्छा होती. समोर चहाच दुकान होते . पण पैसे नव्हते .मी दूकानाकडे पाहून पुढे चाललो. तर एका व्यक्तीने आवाज देऊन मागे बोलावले व चहा घेण्यासाठी आग्रह केला . चहा मिळाला .मैयाचे आभार मानले . मैया तू महान आहेस मनातले भावही जाणतेस. मकरंद बिल्दीकर महाराजांना फोन केला .महाराजांनी कनक बिहारी आश्रमात रात्रीची राहण्याची व्यवस्था आहे तूम्ही सूर्यास्त होण्याअगोदर तिथे पोहोच व्हा म्हणून सांगितले. संध्याकाळी ६ वाजता "कनक बिहारी आश्रमात" पोहोचलो. तिथे गुजरात राज्यातील परिक्रमा वासी dhirajlal chavda यांची भेट झाली .याअगोदर आम्ही तिलकवाडा येथे भेटलो होतो. रात्री गप्पा झाल्या रात्री ९.३० वाजता भोजन प्रसाद घेऊन आराम
२४ फेब्रुवारी २०२० happy birthday
आज माझा जन्म दिवस. आज मी निवांत होतो .सोबतचे परिक्रमा वासी मार्गस्थ झाले. पण मला कोणतीही घाई नव्हती. स्नान पूजाविधी प्राणायाम करण्यात १० वाजले .बालभोग मिळाला व मार्गस्थ झालो .साडेअकरा वाजता एक ग्रृहस्थ शेजारी येऊन थांबले "नर्मदे हर "म्हटल्यावर त्यांनी साईमंदीराशेजारी नवीन आश्रम तयार होतोय तिथे थोडा विश्राम करा व भोजन प्रसाद घेऊन जा म्हणून विनंती केली. आश्रमात पोहोचलो काही वेळाने जेवणाचा डबा आला. भोजन प्रसाद घेऊन आराम केला .दुपारनंतर मार्गस्थ झालो .रस्त्याच्या कडेला ऊसाच्या रसाचे दूकान होते .दुपारचे ३ वाजले तरी डोक्यावर सूर्य आग ओकत होता. दूकानवाल्याने "नर्मदे हर" म्हणून आवाज दिला व रस घेऊन जा म्हणाले .
हे मैयाचे आपल्या लेकरांप्रती प्रेमच आहे जे या लोकांच्या माध्यमातून मला मिळाले होते . पुढे पूरातन कोठेश्वर महादेव दर्शन घेतले .संध्याकाळी ५ वाजता "बोधवाडा "येथे पोहोचलो. मैया किनाऱ्यावर पूरातन शिवमंदिर आहे .संध्याकाळी दर्शनासाठी "पलसूद "येथून "राजदीप राठोड" व "कपील गुप्ता" तिथे आले .दर्शन झाल्यावर मला "नर्मदे हर "म्हणाले.व माझी आपूलकीने विचारपूस करू लागले .मी माझे ऊत्तरतर तट शुलपाणी जंगलातिल प्रवासाचे अनूभव त्यांना सांगितले. व त्या बालरूप नर्मदा मातेचे फोटो त्यांना दाखवले .अनूभव ऐकून व बालरूप नर्मदा दर्शन करून दोघेही मित्र भावूक झाले होते. निरोप घेताना मला २०० रूपये दिले . मलाही त्यांना भेटून आनंद झाला. त्यांनी माझी संध्याकाळ खूप आनंदी बनवली .
रात्री भोजन प्रसाद दाळ बाटी .
नर्मदे हर
!! २५ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ८.३० वाजता मार्गस्थ झालो. शेताच्या कडेकडेने तर कधी ओढ्यातून मार्ग काढत दुपारी १ वाजता" पाटीदार समाज करोली "येथे पोहोचलो. साडेबारा वाजता भोजन बंद होते, पण मला १ वाजता भोजन मिळाले .आराम करून ३ वाजता पूढे जाण्यासाठी तयारी करत होतो .एक वयस्क माताजी चहा घेऊन आल्या चहा घेऊन पुढे मार्गस्थ.
दुपारनंतर रस्ता चुकलो ."मर्दना" ला जाण्याऐवजी एका ओढ्याच्या कडेकडेने "खेदीहवेली" येथे पोहोचलो .संध्याकाळी 6 वाजता" आई जी धाम अजंडा" येथे पोहोचलो. भव्य ३ मजली देवीचे मंदिर .जवळच भंडारा चालू होता .पूजा पाठ केल्यावर भोजन प्रसाद दाळ, बाटी, गोडभात घेऊन. रात्री विश्राम.
नर्मदे हर
!! २६ फरवरी २०२० !!
सूबह स्नान पूजा पाठ के बाद बालभोग मे सूजी का हलवा और शेव मिल गयी । ९ बजे कालीबावडी की और निकल पडा । गूगल मॅप पर ठिक से रस्ता ना दिखाने से मै भटक गया । और एक खेत मे पहूंच गया । दोपहर १२ बजे एक जगह आराम करने बैठा था । तो कूछ लोगोंने बताया की मै रस्ता भटक गया हू । आगे गाव है मूझे वहा जाना चाहीए । आगे जाते हूए मूझे एक घर चाय के लिये बूलाया । जाते वक्त एक लड्डू पार्सल दिया । आगे चलकर मेरा मोबाईल भी डिस्चार्ज हो गया था । रास्ते मे एक वयस्क परिक्रमा वासी मिल गये । ऊन्हे चलने मे पिडा हो रही थी । मूझे पता चला की ऊन्हे भोजन नही मिला है । तो मैने मेरे पास जो लड्डू था ऊन्हे दे दिया । साथ मे बिस्किट पूडा भी ।
दोपहर २ बजे एक गाव से जाते हूए एक श्वान को मैने एक बिस्किट पूडा खाने के लिए दिया । तो वो तबसे साथ मे ही चलने लगा । रास्ते मे कूछ कूत्तो ने ऊसे परेशान किया । लेकीन ऊसने मेरा साथ नही छोडा । सबको पिछे छोडकर वो मेरे साथ चलने लगा ।
सूर्यास्त हो गया था । और कालिबावडी अभी बहूत दूर थी । रस्ता भटकने की बजह से मैने दिनभर भोजन ना करने का मन बना लिया था । और अब तो अंधेरा भी हो गया था । और मै कालिबावडी से बहूत दूर था । किसीने मेरी पूछताछ नही की । जिससे पूछा कालिबावडी जाना है । सबने कहा बस ५ किलोमीटर और चलीए महाराज । मै रास्ते के किनारे बैठ गया । और वही सोने का मन बना लिया । कूछ देर बैठने के बाद मैने सोचा की यहा बैठना ऊचीत नही । तो मै रात ८ बजेतक चलता रहा ।
कालिबावडी पहूंचनेपर मूझे बताया गया की । एक किराणा दुकान वाले परिक्रमा वासीयों के लिए भोजन की व्यवस्था करते है । आप अभी जाकर ऊन्हे मिल लिजीए । ताकी वो आपके लिए भोजन बना सके । मैने ऊन्हे मेरे आनेकी खबर दी और हनुमान मंदिर मे जाकर अपना आसन लगा लिया । श्वान को मंदिर मे प्रवेश नही मिल रहा था । तो मैने किराणा दुकान वाले महात्मा को बताया की । ये श्वान मेरे साथ है और मंदिर मे ये मेरे साथ ही रहेगा ।
दूकानदार के सुपूत्र ने भोजन प्रसाद मे ६ चपाती भाजी ग्रीन चटणी थाली बनाकर ले आये । जो मिला था ऊसमेसे २ चपाती मैने भैरव ( श्वान) को दे दी । और हम दोनो मैया का स्मरण करते हूए सो गये ।
नर्मदे हर
!! २७ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी ३ वाजता पूजारी मंदीरात आल्यावर भैरव त्यांच्या वर भूंकण्याने मला जाग आली. मी भैरव ला शांत केले नंतर पूजारी बडबड करायला लागले .असे तसे साडेपाच वाजले. स्नान पूजा पाठ करून मार्गस्थ झालो .रस्त्याने एका माताजींनी चहा साठी थांबवले .मला चहा व भैरव ला चपाती मिळाली .
पूढे दुपारी १२ वाजेपर्यंत चाललो. पण भोजन मिळाले नाही मांडवगढ च्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिराजवळ पोहोचलो तिथे चहा बिस्किट मिळाले . १ वाजला होता ऊन खूप होते . भैरव ऊन्हाचा दाह सहन करू शकत नव्हते. म्हणून ते पूढे पळत जाऊन झाडाच्या सावलीत मी त्यांच्या पर्यंत पोहोचेपर्यंत आराम करत होते .आता मी पण थकलो होतो. एका झाडाखाली दोघेही विसावलो .एक मोटारसायक मांढवगढ उतरून खाली आली .व ते गृहस्थ मला म्हणाले" मी तुम्हांला मांढवगढ पर्यंत सोडू शकतो. "मी अत्यंत विनम्रपणे त्यांना सांगितले" मी परिक्रमेत आहे आणि परिक्रमेत वाहन प्रवास वर्ज्य आहे ".
आराम केल्यानंतर वळणाच्या रस्त्याने जाण्याऐवजी डोंगर चढून लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला .आणि आम्ही कठीण प्रवास करून लवकर पोहोचण्यात यशस्वी झालो. अडीच वाजता ऐतिहासिक तिर्थक्षेत्र "नीलकंठ महादेव "मंदिर येथे पोहोचलो. तिथे माझी भेट परिक्रमा वासी सूनिल मालवे व त्यांच्या बंधू बरोबर झाली .मालवे बंधू भोजन प्रसाद घेऊन विसावले होते .मी भोजन केले नाही म्हणून सांगितले. त्यांनी दुपार खिचडी भात बनवला होता. शिल्लक राहिलेला मला दिला.
दुपारी आराम करून मी मांडवगढ कडे निघालो. एका कापड दूकानातील बाबांनी थांबवले. चहा दिला व साई धाम येथे रात्री साठी थांबा म्हणून सांगितले .पूढे मी राम मंदिरात गेलो मंदिरातील महात्मांनी भैरव ला बाहेर हूसकावले .मी त्यांना सांगितले ते श्वान माझ्या सोबत आहे .त्यांचा भैरव च्या प्रती व्यवहार न आवडल्या मूळ मी साईधाम कडे गेलो .तिथे सेवा करणार्या महात्मांनी भैरव ला आश्रमात राहण्याची परवानगी दिली .जिथे आमची व्यवस्था केली. तिथे दुसर्या मजल्यावर एक भैरवी व्याली होती .तिने भैरव ला पाहील्यावर ते एकमेकांवर जोरजोरात भूंकायला लागले .याचा सर्वांना त्रास झाला पण कोणीही तक्रार केली नाही.
आज गूरूवार साईबाबांचा वार .म्हणून आज रात्री भंडारा होता .रात्री भव्य आरती पूजा झाल्यावर ,भोजन प्रसाद घेऊन आराम केला .
नर्मदे हर
!! २८ फेब्रुवारी २०२० !!
सकाळचे साडेसहा वाजले होते . "चाय की सिताराम" कानावर आवाज आल्याबरोबर खडबडून जागा झालो. स्नान पूजा पाठ करून प्राणायाम साठी बसलो. तोपर्यंत सूनिल मालवे महाराज व त्यांचे सोबती सकाळची नित्यकर्म आटोपून पूढे जाण्यासाठी निघाले होते .मला" नर्मदे हर "म्हणून ते पूढे निघून गेले .प्राणायाम झाल्यावर चहा घेतला .बाहेर आल्यावर कळले की भैरव ,सूनिल मालवे महाराजांबरोबर गेला आहे .
चतुर्भुज राम मंदिर दर्शन घेतले. तिथे दोन परिक्रमा वासी सोबती भेटले .त्यांचा निरोप घेऊन राजराजेश्वरी च्या दिशेने निघालो .मा रेवा कूंड दर्शन घेतले.मांडवगढ उतरून जातानाचा रस्ता खूप अवघड आहे. सरळ खाली डोंगर ऊतार आहे. मैयाच्या कृपेने वयस्कर परिक्रमावासी सूद्धा तो अवघड रस्ता अगदी सहज पार करून जातात.
दुपारी 3 वाजता एका गावात नाष्टा म्हणून भजी मिळाले. ६ वाजता राजराजेश्वरी येथे पोहोचलो .ओळखपत्र विचारले व आसन लावण्यासाठी रूमच्या बाहेरील जागा दाखवली. तिथे कोणी परिक्रमा वासी थांबत नसतील शक्यतो.
व्यवस्थित औपचारिकता न मिळाल्याने मी संध्याकाळी साडेसहा वाजता पूढे मार्गस्थ झालो. पूढे मनकामनेश्वर या ठिकाणी मला पोहोचायचे होते .७ वाजता पोहोचलो तेव्हा मंदिर बंद करून पूजारी जाणारच होते. मी रात्री राहण्याची सोय होईल का म्हणून विचारले .तर त्यांनी पूढे आशापूरा माता मंदिराकडे जायला सांगितलं .रात्री ८ वाजता आशापूरा माता मंदिराजवळ पोहोचलो .ते खाजगी मंदिर एक घरामध्ये बसवलेले होते. आरती झाल्यावर त्यांनी शेजारच्या महादेव मंदिरात राहण्याची व्यवस्था केली रात्री पूरी भाजी भोजन प्रसाद म्हणून दिला .
सूर्यास्त झाल्यावर चालणे थांबवावे असा परिक्रमेचा नियम आहे पण परिस्थिती अभावी कधी उशिरा चालण्याची ही वेळ येते.
नर्मदे हर
!! २९ फेब्रुवारी २०२० !!
सकाळी लवकर मंदिरातून बाहेर पडलो. एक पूल पार करून एका गवळी समाज मंदीरात आलो. टेकडीवरील त्या मंदीरात अखंड दिप चालू होता. मी तिथे स्नान पूजा पाठ केला. तोपर्यंत मंदिरातील पूजारी आले. त्यांनी मंदिर उघडले तर मंदीरात गायीची मूर्ती होती. पूजारी ने पूजा विधी करून प्रसाद म्हणून १ चपाती व भाजी मला दिली . नंतर त्या पूजारीने नाना प्रश्न विचारून वैतागून सोडले. जसे ,परिक्रमेत तूम्ही एकटेच का दिंडी मध्ये तर लोक ग्रूपमधे चालतात तसे तूम्ही परिक्रमा ग्रूपमधे का करत नाही .मी त्यांना सांगितले "परिक्रमा म्हणजे साधू जिवन अनूभव करणे आहे "आणि मी मैयाच्या भरवशावर आलो आहे तेव्हा मला भीती नाही. आणि भीती नाही म्हणून मला कोणी सोबती असणे गरजेचे नाही. मैया आहे माझ्या सोबत .याअगोदर पूजारी अजून प्रश्न विचारणार मी "नर्मदे हर" म्हणून मार्गस्थ झालो .
दुपारी १ वाजता वृद्ध कालेश्वर महादेव मंदिर महेश्वर येथे पोहोचलो .दर्शन घेऊन "सप्तमातृका आश्रम" येथे पोहोचलो. दीड वाजता भोजन प्रसाद घेतला .तोपर्यंत मांडवगढ येथे भेटलेले "सूनिल मालवे" हजर झाले. पण त्यांचे बंधू मला कोठे दिसले नाही. म्हणून मी विचारले .तेव्हा त्यांनी सांगितले "साईधाम येथून तूमचा भैरव आमच्या सोबत आला होता. माझा हात दूखत होता म्हणून मी एसटी ने प्रवास करून आलो व माझे बंधू भैरव ला पायी प्रवास करत घेऊन येत आहेत. भैरव येत आहे हे ऐकल्यावर मला आनंद झाला. तासाभरात भैरव आला आश्रमात बिस्किटे देऊन त्याचे स्वागत केले .
संध्याकाळी मैयाकिनारी ध्यान केले नंतर आश्रमात येऊन पूजापाठ व भोजन प्रसाद खिचडी भात .
नर्मदे हर
!! १ मार्च २०२० !!
सकाळचे नित्यकर्म आटोपून आम्ही अहिल्याबाई होळकर किल्ला पहायला गेलो .परत आल्यावर दुपारी भोजन प्रसाद व आराम केला. दुपारनंतर मी तूषार मोरे महाराजांबरोबर अजून दोन तीन तिर्थ स्थान पाहायला गेलो. संध्याकाळी पूजा पाठ व दाळ चपाती भोजन प्रसाद घेऊन आराम.
नर्मदे हर
!! २ मार्च २०२० !!
सकाळचे नित्यकर्म आटोपून साडेनऊ वाजता मंगलेश्वरच्या दिशेने निघालो. रस्त्याने एका भाविकांनी प्रसाद म्हणून केळे दिली. एक महाराष्ट्रातील भाविक Abha Lokhandeचारचाकी वाहनाने प्रवास करताना रस्त्याने भेटले. त्यांनी राजगीराचे लाडू व एक ब्लॅंकेट दिले .मला भेटून त्यांना आनंद झाला आपूलकीने त्यांनी माझी विचारपूस केली .
पूढे प्रवासात एक छोटे श्वान मागे लागले .त्याची विशेषता अशी की त्याला मागे हकलले की ते नाराज होऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन ऊभे राहत असे. रस्त्याने वाहने वेगाने चालू होती म्हणून मला काळजी वाटत होती .शेवटी मी त्याला काही अंतर येऊ दिले. व पुढे एका झाडाखाली मी व भैरव आरामासाठी बसलो. पण छोट्या श्वानाला पूढे जाण्याची जास्त घाइ होती ते एका सायकलचा पाठलाग करत दूर निघून गेले .
सकाळी ११.३० वाजता एका मूलाने भोजनासाठी घरी बोलावले त्याच्या वडिलांनी मा नर्मदा परिक्रमा केली होती. म्हणून तो परिवार रस्त्याने जाणाऱ्या परिक्रमावासींची सेवा करत असे. भोजन प्रसाद घेऊन मी ऊन्हाचा दाह कमी होईपर्यंत आराम केला .जाताना मला मिळालेले नविन ब्लॅंकेट त्यांना देऊ केले. व सांगितले की एखाद्या गरजू व्यक्तींना ते दान करा .
दुपारनंतर प्रवास सुरू केला. पूढे गूप्तेश्वर महादेव दर्शन घेतले. तिथे थोडा आराम करून पूढे मार्गस्थ झालो .एका ठिकाणी सात आठ कुत्र्यांनी भैरव वर हल्ला केला. गावकऱ्यांच्या मदतीने भैरव ला वाचवले. संध्याकाळी ५.३० वाजता किनाऱ्यावर एका हनुमान मंदिरात पोहोचलो. तिथे एक तरूण सन्यासी सेवा देत होते .तिथे लाईट ची व्यवस्था नव्हती. रात्री दाळ चपाती भोजन प्रसाद मिळाला .
नर्मदे हर
!! ३ मार्च २०२० !!
सकाळी स्नान पूजा पाठ करून साडेआठ वाजता मार्गस्थ झालो .काही अंतर चालल्यावर डोकेदुखी चा त्रास होऊ लागला. मी पूढील गावात थांबण्याचा निर्णय घेतला. तासभर चालल्यावर "पथराड" गाव आले .एका हनुमान मंदिराजवळून पूढे जाताना एका लहान मूलाने हनुमान मंदिरात थांबायला सांगितले .मंदिरात परिक्रमा वासींची सेवा करणार्या सेवेकर्यांना फोन करून मी मंदिरात आल्याचे सांगितले .थोड्या वेळाने सेवेकरी आले .त्यांनी एक रूम उघडून दिली. मी गावातून एक टॅब्लेट आणली व भोजन तयार होईपर्यंत आराम केला. दाळ टोमॅटो चपाती भोजन प्रसाद घेऊन गोळी खाल्ली आराम केला. तोपर्यंत अजून दोन परिक्रमा वासी आले त्यांच्या साठी भोजन बनवण्यात आले .
दीड वाजता "बेगाव "कडे निघालो. पाच वाजता "राम कृष्ण मंदिर' बेगाव "येथे पोहोचलो आल्यावर मैया किनाऱ्यावर जाऊन ध्यान करण्यासाठी बसलो तर भैरव शेजारच्या शेतातील शेळ्यांकडे धावल्यानंतर मला भैरव ला घेऊन परत यावे लागले . संध्याकाळी पूजा पाठ व मंदिरातील पूजारी यांच्या घरी भोजन प्रसाद घेऊन आराम . आज फक्त १० किमी प्रवास केला.
नर्मदे हर
!!४ मार्च २०२० !!
सकाळी ४ वाजता खूप तहान लागली होती. प्राणायाम करण्याअगोदर ३ तास अन्न पाणी घेत नाही, असे प्राणायाम चे नियम आहेत. दररोज 30 - 30 मिनिटे प्राणायाम करतो. आज फक्त दहा मिनिटे कपालभाती व दहा मिनिटे अनुलोम विलोम केले .नंतर जल प्राशन केले .
सकाळचे नित्यकर्म आटोपून ६.३० वाजता हारेश्वर कडे मार्गस्थ झालो .माझ्या बरोबर अजून दोन परिक्रमा वासी होते. एक राजस्थान चे महाराज व एक उत्तर प्रदेश चे .सकाळचे साडेअकरा वाजले आम्ही भूकेने व्याकूळ झालो होतो .एका हनुमान मंदिरात जवळ पोहोचलो. तिथे छोटा आश्रम होता व महाराज बाहेर बसलेले होते .इथे नक्की काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती .हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महाराजांजवळ बसलो .तर त्यांनी सेवेकर्यांना चहा बनवायला सांगितले .आम्ही दोघांनी चहा घ्यायला मनाई केली. मग आमच्या साठी फळे मागवली द्राक्षे व कलिंगड .महाराजांनी सोबत आलेल्या भैरव ची विचारपूस केली. मी सांगितले" काली बावडी" वरून हा भैरव माझ्या सोबत आहे .तिलकधारी व २२ नखे असलेले हे श्वान अद्वितीय आहे. मग महाराजांनी भैरव साठी दूधाची व्यवस्था केली .
पूढील प्रवासात आम्ही अखंड हनुमान भजन चालू होते त्या ठिकाणी दर्शन घेतले .पुढे मौनी बाबा आश्रमात माझ्या सोबतचे दोन महाराज थांबले ,सोबत भैरव सूद्धा मौनी बाबा आश्रमात थांबला .
मी एकटाच एक नदी पार करून हारेश्वर च्या महादेव मंदिरात पोहोचलो .तिथे पंडितजींनी भोजन प्रसाद म्हणून चपाती भाजी खायला दिली. विषेश म्हणजे त्यांच्या कडे एकाच व्यक्ती साठी भोजन शिल्लक होते .
दूपारी अडीच वाजता भैरव नदी पार करून माझ्या समोर आला. मला सोडून मागे राहीला म्हणून मी त्याच्यावर रागावलो. तसा तो गेला तो पुन्हा आलाच नाही .मी खूप वेळ त्याच्या येण्याची वाट पाहीली .हारेश्वर मंदिरातून पूढे जाताना बरेच वेळा मागे वळून पाहिले. मी रागावल्यामूळे भैरव दूरावला ही गोष्ट मनाला लागून राहिली .
दुपारनंतर फक्त सहा किमी अंतर चालून "सेमलदा "या गावी आश्रमात पोहोचलो .संध्याकाळी ७ वाजता राजस्थान चे महाराज आले. आल्याबरोबर भैरव ची विचारपूस केली .पण तो दुसर्या महाराजांसोबत थांबला समजले . रात्री भोजन प्रसाद न घेताच झोपलो .
नर्मदे हर
!! ५ मार्च २०२० !!
सकाळी ६ वाजता ऊठलो. सकाळचे नित्यकर्म आटोपून राजस्थान च्या महाराजांना सांगितले की, मी भैरव ला परत आणण्यासाठी परत जातोय. जाणे योग्य आहे का महाराज म्हणाले - परिक्रमा जल येथेच ठेऊन जाऊ शकतो .
हातात दंड घेऊन मी ५ किमी मागे हारेश्वर ला पोहोचलो. ज्यांच्या सोबत भैरव थांबला होता ते महाराज एकटेच येताना दिसले .मी विचारले तर म्हणे भैरव परत मागे निघून गेला आहे. मी नदी पार करून मौनी बाबा आश्रमात गेलो. तिथे आपल्या महाराष्ट्र चे महंत "स्वामी दत्तानंद जी सरस्वती" भेटले. तूमचा भैरव किनाऱ्यावर गेला आहे महाराजांनी सांगितले. मी किनाऱ्यावर गेल्यावर भैरव ने मला पाहीले व धावतच येऊन अंगाला बिलगला . सोबत आणलेले बिस्किट त्याला दिले रात्री काही मिळाले असेल की नाही म्हणून . मी ते सोबत आणले होते .
आश्रमात आल्यावर महाराजांनी चहा दिला. भैरव बदल महाराजांनी विचारले ,तेव्हा मी सांगितले की हा काली बावडी पासून माझ्या सोबतच आहे .भैरवला घेऊन सकाळी साडेअकरा वाजता "सेमलदा "आश्रमात पोहोचलो. भोजन प्रसाद बनवण्यासाठी तेथील महाराजांनी तांदूळ व इतर साहित्य दिले .खिचडी भात बनवला व किचनमध्येच एका बाजूला बसून भोजन घेत असताना .महाराज आले व किचनमध्येच का बसला म्हणून बडबड करू लागले. मी त्यांना सांगितले की माझी चूकही झाली असेल .माझी पहिली परिक्रमा आहे आश्रमातील नियमांबद्दल जास्त मला माहीती नाही .पण तूमची समजावून सांगण्याची पद्धत चूकीची आहे .
फोन वर मकरंद बिल्दीकर महाराजांनी मला "बरवाह" मध्ये रामकृष्ण मंदीरात परिक्रमा वासी थांबतात तूम्ही तिथे जा म्हणून सांगितले .
चार वाजता "बरवाह "मध्ये पोहोचलो .रामकृष्ण मंदीरात गेल्यावर महाराजांनी एका हाॅलमध्ये परिक्रमावासींची व्यवस्था केली आहे म्हणून सांगितले. माझ्या सोबत भैरव नावाचे श्वान आहे हे समजल्यावर त्यांनी भैरव ला मंदिरातील हाॅलमध्ये प्रवेश नाकारला. पूढे मी नागेश्वर मंदिरात गेलो. तिथे महाराजांनी भैरवला थांबण्यासाठी बाहेर दोरीने बांधण्याचा सल्ला दिला .मी मंदिरात गेल्यावर भैरव दाव्यातून सूटका करण्याचा प्रयत्न करू लागला . मी डोळ्याआड झाल्यावर तो असेच त्रास देणार. म्हणून मी भैरव ला घेऊन नागेश्वर मंदिरा जवळील " भिमेश्वर "मंदिरात आलो. तिथे मला दक्षिण तटावर सोबत असलेले परिक्रमा वासी सोबती भेटले. खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद झाला .रात्री भोजन प्रसाद म्हणून चपाती भाजी एका भाविकांनी आणून दिली .त्यातूनच भैरव साठी २ चपाती दिल्या. रात्रभर भैरव मंदिराच्या गेटजवळच बसून होता पण आम्ही त्याच्या डोळ्यासमोर होतो म्हणून शांत होता .
नर्मदे हर
!! ६ मार्च २०२० !!
सकाळी ६.३० वाजता नित्यकर्म आटोपून मार्गस्थ. साडेनऊ वाजता" सूलगाव "येथे पोहोचलो .गावातील काही व्यक्तींनी राम मंदिरात परिक्रमावासींची व्यवस्था केली जाते असे सांगितले . राम मंदिरात पंडितजींनी चहा दिल्यावर भोजन प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे म्हणून सांगितले. एका गृहस्थांनी माझ्या साठी भोजन प्रसाद बनवले . पूढील प्रवासात माझी पचन संस्था बिघडली.
"सूलगाव" वरून" कूंडी "येथे १२ वाजता पोहोचलो. तिथे एका घरासमोर काही व्यक्ती बसले होते . त्यांनी चहा दिला ,मी एका वयस्कर व्यक्ती ला पोट दूखत असल्याचे सांगितले .नळ भरले असतील अशी शंका म्हणून त्यांनी पोट चोळून दिले . पूढे एका शाळेजवळ आरामासाठी थांबलो . शिक्षकांनी भैरव साठी २ चपाती दिल्या व आम्ही बरेच वेळ परिक्रमा व इतर आध्यात्मिक विषयावर चर्चा केली. शिक्षकांनी जाताना मला दोन Eno आणून दिल्या . एक पूडी पाण्यात मिसळून पिले व पूढील प्रवास सुरू केला .
दूपारी घनदाट जंगलात एका ठिकाणी अतिशय सुंदर हनुमान मंदिर होते ,दर्शन घेतले . ३ वाजता "बाडेल" येथे पोहोचलो . तिथून पुढे "मेंहदी खेडा " येथे साडेचार वाजता पोहोचलो . एका छोट्या शिवमंदिरात एक महाराज होते त्यांनी पूढे प्रवास करू नका म्हणून सांगितले. पूढे १३ किमी दूर "सीतावन" आहे १३ किमी जंगल रस्ता आहे व सीतावन शिवाय कोठेही लोकवस्ती नाही. मी साडेचार वाजता प्रवास थांबवला. चहा घेऊन आराम केला .मंदिरासमोर टोल नाक्यावर काही लोक दारू पिऊन वादविवाद करताना पाहीले .
रात्री महाराजांनी कारले व तिक्कड भोजन बनवले . पोट दूखत असल्याने एक तिक्कड व भाजी खाऊन रात्री आराम .
नर्मदे हर
!! ७ मार्च २०२० !!
सकाळी स्नान पूजा पाठ केला. पूढे जाण्यासाठी तयारी करत असताना भिमेश्वर मंदिरात भेटलेले परिक्रमा वासी सोबती मागून आले .चहा घेऊन आम्ही सोबत मार्गस्थ झालो . एक नितळ स्वच्छ सूंदर पाण्याची नदी पार केली. आम्ही सकाळी ११ वाजता "पिंपरी" या गावी पोहोचलो .अजूनही पोटाची समस्या काही कमी झाली नव्हती . म्हणून ४० रूपयांची द्राक्षे घेतली . तासाभरात "सीतावन" येथे पोहोचलो .
महाराष्ट्रातील राहूरी येथील लोक ट्रॅव्हल ने परिक्रमा करत सीतावन येथे आले होते. तेथील महाराजांसमोर बसून एक राहूरी चे भाविक आपली व्यथा सांगत होते. त्यांचा मुलगा मतीमंद होता पाच सहा वर्षापूर्वी ७० फूट विहीरीत या मूलाने एक ड्रम फेकला नंतर त्याने विहीरीत ऊडी मारली .त्याला बाहेर काढले ,तेव्हा त्याचे एक हाड सूद्धा मोडले नव्हते. त्या मुलाच्या ऊज्वल भविष्यासाठी ते सहपरिवार ट्रॅव्हल ने परिक्रमा करत आले होते .त्या मुलाच्या मातेने मला ५० रूपये दिले.
मी दुपारी फक्त द्राक्षे खाल्ले व दुपारनंतर पूढे प्रवास सुरू केला .संध्याकाळी ५ वाजता आम्ही "रतनपूर" येथे पोहोचलो. राममंदिरात आमची राहण्याची व्यवस्था केली. तिथे सदाव्रत व्यवस्था होती . मी संध्याकाळी पूजा पाठ करून भोजन न घेता लवकर झोपलो .
नर्मदे हर
!! ८ मार्च २०२० !!
सकाळी ५ वाजता ऊठलो नित्यक्रम आटोपून साडेसहा वाजता बाहेर पडलो. सकाळी ९ वाजता बावडी खेडा येथे पोहोचलो एका आश्रमात एक बाबाजी राहतात तिथे चहा मिळाला .जयंती माता मंदिर अजून ७ किमी दूर होते .
सकाळी साडेदहा वाजता जयंती माता येथे पोहोचलो. बालभोग म्हणून पोहे मिळाले. साडेअकरा वाजता भोजन मिळणार होते. दूपारचे दीड वाजले तरी भोजन नाही. विचारपूस केली तर कोणी व्हीआयपी पाहूणे आल्यावर भोजन मिळणार समजले. दूपारी २ वाजता मी जयंती माता येथून बाहेर पडलो. दोन पारले व दहा रूपयाचा चिवडा घेतला. गेटवर आल्यावर मंदिरातील पूजारी गेट पर्यंत आले. व पुढे जाऊ नये म्हणून विनंती केली .२० किमीचे लक्कडकोटचे जंगल तूम्ही सूर्यास्त होईपर्यंत पार करू शकत नाही .मी थांबण्याचा निर्णय घेतला. दूपारी दोन किमी दूर भैरव गूफा पाहायला गेलो. भैरव गूफा म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग आहे. निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भैरव गूफा ठिकाणी ध्यान चिंतन करण्याचा आनंद घेतला .दूपारी अडीच वाजता भोजन प्रसाद व आराम संध्याकाळी दाळ चपाती भोजन प्रसाद व आराम.
नर्मदे हर
!! ९ मार्च २०२० !! होळी सण
सकाळी ७ वाजता जयंती माता येथून लक्कडकोट जंगलाकडे मार्गस्थ झालो. कोणीही परिक्रमा वासी या घनदाट जंगलात भटकू नये ,म्हणून पावलोपावली झाडावर मार्ग दाखवण्यासाठी बोर्ड लावलेले होते . पावणेदोन तासात मी हनुमान मंदिराजवळ पोहोचलो .अर्धे जंगल पार झाले .बाकी दोन परिक्रमा वासी मागून येत होते. त्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. तोपर्यंत सोबत आणलेले पोहे पक्षांना टाकत त्यांना चारा खाताना पाहण्याचा आनंद घेतला .
बाकी दोन परिक्रमा वासी आले व अजून पण एक परिक्रमा वासी आले व पुढे निघून गेले. भैरव सूद्धा त्यांच्या बरोबर निघून गेला . सकाळी ११ वाजता जंगलातून बाहेर पडलो .बाहेर पडल्यानंतर समोरच पंचमुखी हनुमान मंदिर आहे तेथे एक नवीन आश्रम झाला आहे .तिथे रामदास महाराज सेवा देतात. दूपारी भोजन प्रसाद घेऊन आराम केला .आम्ही चार परिक्रमा वासी तेथे थांबलो होतो. रामदास महाराजांनी होळी निमीत्त थांबण्यासाठी आग्रह केला. बाकी तिघे परिक्रमा वासी निघून गेले .मी व भैरव आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला .रात्री महाराजांनी पनीर भाजी व तूप रोटी बनवली . रात्री पाऊस आला होता
नर्मदे हर
!! १० मार्च २०२० !!
सकाळचे नित्यकर्म आटोपून चहा बिस्किटे घेतली . रामदास महाराजांबरोबर बरेच वेळ चर्चा केली त्यांनी सांगितले की
परिक्रमा करताना मी लक्कडकोट जंगलातून बाहेर आलो तेव्हा प्रवासाने थकून गेलो होतो . खूप भूक लागली होती. दोन किमी पूढे गेल्यावर एका गावात दाळ तांदूळ मिळाले. नंतर दगडाची चूल बनवली व भोजन बनवले .तेव्हाच मी ठरवले की पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आपण आश्रम टाकायचा व लक्कडकोट जंगलातून थकून आलेल्या परिक्रमा वासींची सेवा करायची .स्थानीय लोकांशी चर्चा केली. तेव्हा कळले की काही वर्षापूर्वी या ठिकाणी एका बाबाजींनी लोकांच्या सहकार्याने आश्रम टाकला व एके रात्री ते बाबाजी आश्रमातील सर्व साहित्य घेऊन पसार झाले . गावकऱ्यांनी रामदास महाराजांना आश्रम टाकायला परवानगी दिली. पण आर्थिक सहयोग नाही. रामदास महाराजांनी स्वखर्चाने आश्रम उभारला व मैयाच्या कृपेने महाराज काही महिन्यांपासून येथे सेवा देतात .
सकाळी ८ वाजता मार्गस्थ झालो .दूपारी १ वाजेपर्यंत धर्मेश्वरला पोहोचलो. खूप भूक लागली होती. गेल्याबरोबर भोजन प्रसाद समोर आला .पूरी भाजी खिर. नंतर आराम केला .
दुपारी चार वाजता "बाही जगवाडा" येथे पोहोचलो .तिथे एका माताजींनी थांबवले .चहा दिल्यावर थांबण्याची विनंती केली. बाहेर पावसाचे वातावरण होते. म्हणून रात्री साठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्या माताजी व त्यांचा परिवार त्या गावातील मोठ्या जमीदारापैकी एक होते .प्रशस्त वाडा नोकर चाकर .संध्याकाळी स्नान पूजा पाठ करून बरेच वेळ ध्यान केले .नंतर माताजींनी चपाती भाजी आणून दिली. भोजनानंतर एक बाबाजी आले ते कूटूंबप्रमूख होते ."देविलाल पटेल" म्हणून त्यांनी आपली ओळख सांगितली .प्रवासाविषयी गप्पा मारल्या व नंतर आराम.
नर्मदे हर
!! ११ मार्च २०२० !!
सकाळी ८ वाजता मार्गस्थ झालो . पूढे प्रवासात मला" शुभम पांडे "नावाचे परिक्रमा वासी भेटले .बरोबर २५ ते ३० किलो वजन घेऊन प्रवास करणारे . व प्रवासात सतत बडबड करणार व्यक्तिमत्त्व म्हणजे "शुभम पांडे महाराज". आम्ही आपआपल्या प्रवासाविषयी गप्पा मारत चाललो .
सकाळी साडेदहा वाजता "फतेहगढ" येथे पोहोचलो. मा नर्मदा मंदिर येथे दर्शन घेतले .तिथे आम्हाला बालभोग म्हणून समोसे मिळाले. समोसे ग्रहण करून आम्ही"दातूणी" नदी पार केली. होडीतून प्रवास करण्याची भैरव ची ही पहिली वेळ होती. त्यामूळे त्याच्या चेहर्यावर भीती स्पष्ट जाणवत होती .
दूपारी बारा वाजता एका गृहस्थांनी ऊसाचा रस दिला. साडेबारा वाजता "इमली घाट मिर्झापूर "येथे पोहोचलो. दाळ भात भोजन प्रसाद घेऊन आराम केला .अडीच वाजता मार्गस्थ. संध्याकाळ पर्यंत "नेमावर "ला पोहोचलोच पाहीजे. म्हणून पांडे महाराजांनी खूप धावपळ केली. ६ वाजता "रेवा कूटी' बजवाडा" येथे एका कन्येने थांबण्याचा आग्रह केला. मी आज पांडे महाराजांबरोबर २८ किमी चाललो होतो .मी थांबण्याचा निर्णय घेतला . नंतर आम्ही तिघेही त्या आश्रमात थांबलो .
संध्याकाळी मैयाकिनारी स्नान ध्यान .रात्री भोजन प्रसाद चपाती भाजी .आश्रमातील सेवेकर्याने भैरव ला दूर हाकलल्यामूळे ,भैरव आश्रमातून बाहेर गेला .तो परत आश्रमात यायचे नाव घेईना .यावरून मी सेवेकर्यांकडे नाराजी व्यक्त केली .
नर्मदे हर
!! १२ मार्च २०२० !!
रात्रभर भैरव गेट बाहेर बसून होता. सकाळी ७ वाजता आम्ही नेमावर च्या दिशेने निघालो. एका ठिकाणी चहा साठी थांबवण्यात आले .चहा बिस्किटे घेऊन आम्ही पूढे मार्गस्थ झालो .
सकाळी ९ वाजता मैयाकिनारी "ब्रम्हचारी आश्रम" येथे पोहोचलो. पूण्याचे एक बाबाजी तिथे सेवा देतात. आधार कार्ड पाहून नाव नोंदणी केली. १ दिवसापेक्षा जास्त थांबू शकत नाही असे सांगण्यात आले .भैरव बद्दल मी सांगितले १५ दिवसापासून हा माझ्या सोबत आहे .आश्रमातही तो माझ्या सोबतच राहील .भैरव ला सोबत राहायला परवानगी मिळाली .
दूपारी १२ वाजता भोजन प्रसाद घेऊन आराम केला. दुपारनंतर Sunil Malve maharaj व त्यांचे बंधू आले .आम्ही मांडवगढ नंतर पुन्हा आज भेटलो होतो . दुपारनंतर पांडे महाराज व मी सिद्धेश्वर महादेव मंदिर दर्शन घ्यायला गेलो .
या मंदिराचे महात्म्य -- पांडवकालीन असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर एक मोठी शिला कोरून बनवलेले मंदिर आहे. ज्याची सुरूवात कळसापासून करण्यात आली .सुरूवातीला या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला होते. महाबली भीमाने आपल्या बाहूबलाने मंदीराच्या प्रवेशद्वाराची दिशा पश्चिमेला केली आहे.
दर्शन घेऊन पांडे महाराज मार्गस्थ झाले. मी व भैरव आश्रमात आलो .संध्याकाळी पूजा पाठ झाल्यावर मी मंदिरात ४५ मिनीटे आरती साठी सहभागी झालो .
रात्री भोजन प्रसाद घेताना मध्य प्रदेश राज्यातील परिक्रमा वासींना अपमानास्पद वागणूक देण्यात आली .भोजन करताना इतरांना ही सांगण्यात आले की .सकाळी ७ नंतर आश्रम सोडयचा म्हणून. एक परिक्रमा वासी त्यांना म्हणाले की भोजन प्रसाद घेताना वादविवाद करणार असाल तर आम्ही भोजन प्रसाद न घेताच आश्रमा बाहेर पडतो . तेव्हा कुठे आश्रमातील सेवेकरी शांत झाले .
नंतर वादविवादाचे कारण समजले .आज सकाळी मध्य प्रदेशचे गृहस्थ बाबा व माताजी परिक्रमा करताना या आश्रमात आले होते. त्यांना भेटायला दूपारी त्यांचे १५ नातेवाईक आले व जाताना भोजन प्रसाद घेऊन गेले. यावरून आश्रमातील सेवेकर्यांनी रात्री भोजन प्रसाद घेताना मध्य प्रदेश च्या परिक्रमा वासींना अपमानास्पद वागणूक दिली.
परिक्रमा करताना बरेच ठिकाणी आदर मान सन्मान मिळतो तर कधी संयमाची परिक्षा ही होते
नर्मदे हर
!! १३ मार्च २०२० !!
सकाळी नेमावर पासून ५ किमी दूर "गौनी संगम परशुराम तिर्थावर "sunil malve महाराज त्यांचे बंधू व मी पोहोचलो. संगमावर स्नान पूजा पाठ केले ,आम्हाला साडेनऊ वाजता दाळ तिक्कड भात भोजन प्रसाद मिळाले. एका साधूने भैरव वर पाणी टाकल्याने तो दूर गेला . त्याला शोधण्यासाठी बराच वेळ गेला .
पूढे आम्ही "पिपलनेरीया" येथे राममंदिरात आराम केला . दोन ठिकाणी आम्हाला चहा मिळाला. संध्याकाळी आम्ही "निम्बार्क आश्रम छीपानेर "येथे पोहोचलो. संध्याकाळी किनाऱ्यावर ध्यान केले नंतर आश्रमात पूजा पाठ व भोजन प्रसाद व आराम
नर्मदे हर
!! १४ मार्च २०२० !! रंगपंचमी
सकाळचे नित्यकर्म आटोपून" निम्बार्क आश्रमातील महाराजांकडे" जाताना आश्रमाच्या दरवाजात एक वासरू बांधले होते. मी त्याच्या जवळ गेल्यावर भैरव पण जवळ आला. भैरव ला आपल्या वासराजवळ गेलेले पाहून त्याची आई जी धावून आली. ती बरेच अंतर तिने भैरव चा पाठलाग केला. ते दृष्य पाहण्यासारखे होते.
Sunil Malve maharaj व त्यांचे बंधू आम्ही सोबतच महाराजांसोबत परिक्रमा अनूभवावर वार्तालाप करत बसलो .महाराजांनी निम्बार्क आश्रमातील नर्मदा जंयती कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ दाखवले. नंतर आम्ही साडेआठ वाजता आश्रमाबाहेर पडलो .
सकाळी साडेअकरा वाजता आम्ही" चिचली "या गावी आलो. दुपारच्या भोजनाची अपेक्षा आम्ही सोडून दिली .व तिथे एका किराणा दुकानात मी बिस्किटे व मालवे महाराजांनी चिवडा घेतला .आराम करण्यासाठी आम्ही त्याच गावातील "नर्मदा मंदिर "येथे आराम करण्यासाठी गेलो. आम्ही आराम करत असताना एक माताजी आल्या व भोजन प्रसाद घेतला का म्हणून विचारले .आम्ही नाही म्हटल्यावर त्यांनी आमच्यासाठी चपाती व भाजी आणली. भोजन प्रसाद घेऊन आम्ही आराम केला .
दूपारी २ वाजता मार्गस्थ झालो .मालवे महाराज वयानुसार कमी चालत होते .एक बंधू ६० वर्ष वयाचे व दुसरे ६२ वर्ष वयाचे होते. मी व भैरव त्यांना सोडून पूढे मार्गस्थ झालो.रंगीत कपडे घातल्यावर भैरव रागावला व प्रवासात एका ठिकाणी मागे राहीला .त्याच्या येण्याची वाट पाहत हळूहळू प्रवास करत मी निलकंठ येथे दूपारी ४ वाजता पोहोचलो. एका आश्रमातील धर्मशाळेत बसलो असता मालवे महाराज आले व पाठोपाठ भैरव सूद्धा आला. आश्रमात चहा घेऊन आम्ही यज्ञ मंदिरात थांबलो. आज फक्त १६ किमी अंतर चालून आलो होतो .रात्री सेवा देणार्या बाबांनी खिचडी भात बनवला .भैरव साठी त्यांच्या कडे दुपारच्या चपाती शिल्लक होत्या .
नर्मदे हर
!! १५ मार्च २०२०!!
सकाळी स्नान पूजा पाठ करून प्राणायाम करण्यासाठी बसलो .तोपर्यंत Sunil Malve maharaj आपले नित्यकर्म आटोपून पुढील प्रवासासाठी निघाले . जाताना "नर्मदे हर "म्हणून बाहेर जाताना गेट बंद केले . भैरव गेटमधून बाहेर जाण्यासाठी धडपडत होता. म्हणून मी गेट उघडून दिले, भैरव धावत सुनिल मालवे महाराजांबरोबर प्रवास करण्यासाठी धावत गेला .
मी माझे नित्यकर्म आटोपून मार्गस्थ झालो .तासाभरात मी मालवे महाराजांपर्यंत पोहोचलो. भैरव त्यांच्या बरोबरच होता. मी मालवे महाराज व भैरव ला मागे सोडून ,एकटाच दूपारी १२ वाजता "मीठ्ठागाव "येथे" सेवा श्री आश्रम" येथे पोहचलो. तिथले महाराज तापड स्वभावाचे होते .
आश्रमापासून २ मिनिटाच्या अंतरावर धर्मशाळा आहे .तिथे मी आसन लावले .तिथे अगोदर एक परिक्रमा वासी येऊन थांबले होते. त्यांनी सांगितले महाराज खूप तापड स्वभावाचे आहेत . तूम्ही आश्रमात आल्याची माहिती त्यांना द्या . म्हणजे ते तुमच्यासाठी भोजन बनवतील. मी खांद्यावरून बॅग खाली ऊतरवली. व आश्रमात महाराजांकडे गेलो . महाराज भोजन बनवत होते. मी महाराजांना "नर्मदे हर "म्हणालो. व काही मदत करू का म्हणून आपुलकीने विचारपूस केली. माझ बोलण त्यांना आवडले बहुतेक . माझ्या वर ते काही रागावले नाहीत. भोजन तयार झाल्यावर महाराजांनी भोजन प्रसाद घेण्यासाठी बसायला सांगितले . मी बसलो. धर्मशाळेत माझ्या अगोदर थांबलेले परिक्रमा वासी अंगावर सदरा घालून बाहेर आले . तोच महाराज त्यांच्या वर रागावले. आश्रमात आल्यावर सांगता येत नाही का . मी परत परत भोजन प्रसाद नाही बनवू शकत. त्या परिक्रमा वासी ची एकच चूक झाली ते सदरा घालून आले. म्हणून महाराजांनी त्यांना ओळखले नाही. जवळ आल्यावर कळले की आपण विनाकारण या महाराजांवर ओरडलो .
मी भोजन प्रसाद घेऊन आराम करण्यासाठी गेलो. तोच सुनिल महाराज व त्यांचे बंधू व भैरव आश्रमात हजर झाले. मी त्यांना सांगितले महाराज तापड स्वभावाचे आहेत .जरा मवाळकीन बोला .दोघे मालवे बंधू महाराजांसमोर गेल्यावर महाराजांनी बोलायला सुरुवात केली. वेळेवर येता येत नाही का. आता कोण भोजन बनवणार .वयस्कर होते बिचारे ,तरीही सेवा देत होते .दोघे मालवे महाराजांनी एक एक रोटी ग्रहण केली व आराम केला.
मी किनाऱ्याकडून मार्गस्थ झालो रस्ता चूकल्याने पून्हा रस्त्यावर आलो. भैरवला सुनिल महाराजांकडे हाकलून दिले तरी तो माझ्या सोबत आलाच. शेवटी त्याची भूक भागवण्यासाठी १ पारले जी घेतला. बिचारा भूकावला होता. संध्याकाळी आम्ही "आवली घाट" येथे" शिवालय मठ" मध्ये पोहोचलो. आपल्या दोन सुपूत्रांसोबत एक महाराज तिथे सेवा देतात. मी भैरव सोबत येणार आहे हे त्यांना शुभम पांडे महाराजांनी सांगितले होते. रात्री तिक्कड भाजी भोजन प्रसाद मिळाले व नंतर आराम .
नर्मदे हर हर
!! १६ मार्च २०२० !!
"शिवालय धाम, आवली घाट" येथून सकाळी साडेसात वाजता चहा घेऊन पुढे मार्गस्थ झालो. पुढे रस्त्यावर मला भरपूर बोरे खायला मिळाले .भैरव मात्र ऊपवाशी होता. सकाळी ११ वाजता" जहाजपूर" या गावात एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबवले .चहा बरोबर भैरव साठी चपाती मागावून घेतली .
सातधारा कडे जाताना एका पूलाखाली भैरव फिरायला गेला. नेहमीप्रमाणे तो धावत परत येईल. हा विचार करून मी हळूहळू चालत होतो. एका घराच्या आडोशाला मी आराम करण्यासाठी बसलो होतो. भैरव धावत आला व मला न पाहताच पुढे निघूनही गेला . मी मागून चालत गेल्यावर पुढे ३ रस्ते होते, भैरव कोणत्या रस्त्याने गेला माहीत नाही . मी "सातधारा" कडे मार्गस्थ झालो . क्षणभर मनात एक विचार आला, की चला भैरव च्या जबाबदारीतून सूटका झाली . पण नंतर काहीतरी मोठी वस्तू गमावल्याची जाणीव झाली . भैरव सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवले. मनात भावनांचे ढग दाटून आले .
मी एका झाडाखाली बसलो .जवळच काही चार पाच लहान मूली खेळत होत्या. एका मूलीने भोजन प्रसाद विषयी चौकशी केली . मी काही बोललो नाही. नंतर दोन छोट्या मूली घरी गेल्या, पाच वर्षांच्या मूलीने माझ्या साठी पाणी आणले. व तीन वर्षांच्या मूलीने माझ्या साठी हरभर्याचे दोन झाडे उपटून आणली . माझ्या समोर धरत ती छोटी कन्या मला म्हणाली " गूरूजी भोजन ले लो " मी फक्त त्या मुलीकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले व तिला म्हणालो माझ्या सोबत एक ( श्वान ) कूत्रा होता तो रस्ता चूकून मागे राहीला आहे . एवढे बोलून मी पुढे जाण्यासाठी निघालो . भैरव शिवाय प्रवास करणे मला शक्य झाले नाही. त्याला परत घेऊनच यायचे हा विचार केला व पाच दहा पावले चालल्यावर मी पून्हा मागे वळालो. मी मागे वळल्यावर त्या लहान मुलींच्या आईने मला अधिकारवाणीने आवाज दिला ."बाबाजी पिछे कहा जा रहे हो, आगे बढो" माझा कंठ दाटून आला होता ,मी काही बोललो नाही फक्त भैरव चुकलेल्या रस्त्याकडे बोट दाखवले व माघारी सातधारा कडे मार्गस्थ झालो .
२६ फेब्रुवारी पासून भैरव माझ्या सोबत होता .दोन तीन वेळा मला सोडून तो मालवे महाराजांबरोबर गेला . पण पून्हा आमची भेट झालीच. आज आम्हाला सोबत प्रवास करताना २० दिवस पूर्ण झाले . सुरूवातीला भैरव भेटला तेव्हा त्याच्या मानेवर त्वचारोगामुळे केस कमी होते . मैयाच्या कृपेने हळूहळू त्याची त्वचा बरी होऊन दाट केस ऊगवायला सुरूवात झाली होती. "बडवाह" येथे रामकृष्ण आश्रमात भैरव ला प्रवेश न मिळाल्याने मी सुद्धा त्या आश्रमात थांबलो नाही . मौनी बाबाच्या आश्रमात भैरव थांबल्यावर मी ५ किमी मागे येऊन भैरव ला घेऊन आलो होतो. अशा भरपूर गोड आठवणी भैरव मला देऊन गेला. २० दिवसाच्या भैरवच्या सोबतीमुळे मला त्याच्या बद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता .
दूपारी दीड वाजता "सातधारा "वर पोहोचलो तिथे छोट्या आश्रमात एक महाराज होते. त्यांनी भोजन प्रसाद विषयी चौकशी केली .मला भूक नाही म्हणून सांगितले . व तासभर भैरव येण्याची वाट पाहत बसलो. पण भैरव आला नाही नंतर मी संध्याकाळी "बुधनी घाट" येथे पोहचलो. राममंदिरात राहण्याची व्यवस्था होती . संध्याकाळी स्नान व ४० मिनीटे ध्यान केले. पुजा पाठ करून झोपणारच होतो. तेच भोजनाचे ताट समोर आले. भोजन प्रसाद घेऊन झोपलो .रात्री दोन तीन वेळा झोपेतून उठून बाहेर भैरव आला तर नाही ना हे पाहण्यासाठी बाहेर आलो .
नर्मदे हर हर
!! १७ व १८ मार्च २०२० !!
बुधनी घाट येथून सकाळी ७ वाजता बाहेर पडलो. पूढे मालेगाव चे एक महाराज भेटले. आम्ही सोबतच प्रवास केला. सकाळी ११ वाजता रस्त्याने एका माताजींनी घरी येऊन भोजन प्रसाद घ्यावा म्हणून विनंती केली . आम्ही त्या माताजींच्या घरी भोजन प्रसाद घेऊन मार्गस्थ झालो. दूपारी "शाहगंज" येथे एका मंदीरात आराम केला .
दुपारनंतर प्रवासात आम्हाला एका हाॅटेलात दूध मिळाले. पूढे मी "हतनोर" येथे थांबलो. मालेगाव चे महाराज पूढे निघून गेले. मैया किनाऱ्यावर खूप सुंदर आश्रम. संध्याकाळी स्नान, ध्यान, पूजा पाठ ,रात्री चपाती भाजी भोजन प्रसाद .
नर्मदे हर हर
!! १८ मार्च २०२० !!
पहाटे ४ वाजता पाऊस सूरू झाला. ब्रम्हमूहूर्तावर "नर्मदे हर "ध्यान केले. सकाळी ६ वाजता स्नान पूजा पाठ करून ७ वाजता मार्गस्थ झालो .आश्रमातील वयस्क महाराजांनी मला मा नर्मदा चालीसा पूस्तक दिले. त्यामुळे आनंद . पूढे काही अंतरावर चहा साठी पाहूनचार . बोरे खात खात आनंदात "नर्मदे हर" नामस्मरण करत प्रवास सूरू. दूपारी १२ वाजता "भारकच्छ" येथे पोहचलो . दुपारपर्यंत २३ किमी प्रवास पूर्ण. "भारकच्छ "येथे भोजन प्रसाद मिळाला. तिथे सांगलीचे एक महाराज होते .भोजन प्रसाद घेतल्यानंतर आम्ही सोबतच प्रवास करत चाललो .त्यांनी आध्यात्मिक विषयावर तर्क वितर्क करायला सुरुवात केली . म्हणून मी त्यांना "नर्मदे हर" म्हणून किनाऱ्याकडे मार्गस्थ झालो. दोन वेळा रस्ता चूकलो. २ तास वेळ वायला गेले .संध्याकाळी "सनखेडा" येथे पोहचलो. राममंदिरात सदाव्रत ची व्यवस्था. रात्री ३ व्यक्तिंनी मिळून मोठ्या कष्टाने खिचडी भात बनवला. चूल बनवण्यापासून सरपण गोळा करून आणण्यासाठी संघर्ष. रात्री पावसाचे वातावरण विजांचा गडगडाट .
नर्मदे हर हर
!! १९ , २० , २१ मार्च २०२० !!
१९ मार्च
नित्यकर्म आटोपून सकाळी ७.३० वाजता सनखेडा येथून डूमर कडे प्रस्थान .दूपारी १ वाजता" डूमर "येथे पोहचलो. राममंदिरात भोजन प्रसाद मिळाला. दूपारी आराम करून संध्याकाळी "अलिगंज" येथे पोहचलो .मैया किनाऱ्यावर "मा नर्मदा अन्न क्षेत्र मेनघाट अलिगंज" आश्रमात राहण्याची व्यवस्था झाली .संध्या स्नान पूजा पाठ व किनाऱ्यावर आरती होताना पाहायला मिळाली .
नर्मदे हर हर
!! २० मार्च २०२० !!
आज मी अलिगंज येथे थांबणार होतो. कारण आज एकादशी होती व संध्याकाळी माझ्या हस्ते किनाऱ्यावर आरती होणार होती म्हणून ऊस्तूकता व आनंद .
दूपारी १२ वाजता भोजन प्रसाद चपाती भाजी घेऊन आराम. संध्याकाळी ५ वाजता चहा मिळाला. एक परिक्रमा वासी बाबा आले त्यांची ३ वर्ष ३महीने १३ दिवसाची परिक्रमा होती .
संध्याकाळी मैया किनाऱ्यावर माझ्या हस्ते मैयाची आरती करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले .जय हो माई .
नर्मदे हर हर
!! २१ मार्च २०२० !!
सकाळी ६ वाजता जाग आली. स्नान व नित्यकर्म आटोपून बसलो होतो .परिक्रमा वासी बाबांनी चहा बनवला व आम्ही दोघे चहा घेत परिक्रमा अनुभवावर गप्पा मारत बसलो.
बाबांनी सांगितले - चातुर्मास साठी मैया किनारी ( गावाचे नाव लक्षात नाही ) एका मंदीरात थांबलो होतो. गाव ५ किमी दूर होते .गावकरी आवश्यक साधन सामुग्री पोहोचवत होते. अशातच मुसळधार पाऊस सूरू झाला. मैया ला पूर आला व जल स्तर वाढत गेला .पूराचे पाणी केव्हाही मंदीरात येऊ शकते. तेव्हा गावकरी येऊन बाबांना ते स्थान सोडविण्यासाठी विनवू लागले .पण बाबा आपल्या निर्णयावर ठाम होते .शेवटी विधायक मॅडमला स्वत: यावे लागले .होडी मधून काही कार्यकर्ते बरोबर घेऊन विधायक जी आल्या सोबत काही फळे व मिठाई घेऊन आल्या. त्यांनी बाबांना मंदिरापासून दूर जाण्यासाठी विनंती केल्यावर ,बाबांनी गावात जाऊन राहण्याची तयारी दर्शविली .
बाबा आपल्या आठवणी सांगण्यात रमले होते. तोपर्यंत ८ वाजले. "पोहप सिंग धाकड जी "आले . त्यांनी चहा बनवला व पून्हा चहा घेऊन व मार्गस्थ झालो .
दुपारी १ वाजता किनाऱ्यावर एका भव्य यज्ञाची तयारी चालू होती . तिथे भोजन प्रसाद मिळाला. आराम करून ३ वाजता मार्गस्थ झालो .संध्याकाळी साडेसहा वाजता "अंडीया घाट" येथे पोहचलो . तिथे राजस्थान चे महाराज होते. आश्रमात खूप स्वच्छता होती. रात्री भोजन प्रसाद घेताला. माझ्या प्लेटमध्ये थोडी भाजी शिल्लक राहीली होती. ती मी आश्रमा मागिल बांधावरून मागे फेकणार होतो. त्यांनी लगेच मला अडवून डसबिन दाखवून दिले. नंतर त्यांनी अत्यंत मधूर वाणी मध्ये स्वच्छ तेचे महत्त्व समजून सांगितले .
नर्मदे हर हर
२२ , २३ , २४ मार्च २०२०
!! २२ मार्च !!
सकाळी साडेचार वाजता ऊठलो . नित्यकर्म आटोपून साडेसहा वाजता प्रस्थान. रस्त्याने टोमॅटो खाल्ले .
सकाळी साडेदहा वाजता" शुक्लपूर" येथे पोहचलो. येथे दोन तिर्थ आहेत ."संत गंगादासजी समाधी" व" शुक्लेश्वर महादेव" समाधी मंदिर समोर विश्रामगृह आआहे. तिथे आराम केला. तेथील महाराजांनी भोजन प्रसाद बनवून जेवन करा म्हणून सांगितले. प्रवासाने थकलो होतो म्हणून मी त्यांना भूक नाही म्हणून सांगितले. व पूढे जाण्यासाठी निघालो. तर महाराजांनी थांबण्यावर जोर दिला .मी स्पष्ट नकार दिला .त्यांनी भोजन करून जावे म्हणून विनंती केली. व संत गंगादासजी समाधी विषयी माहिती सांगितली. समाधी च्या १०८ परिक्रमा केल्यावर मनोवांछीत फल मिळते .
भोजन प्रसाद तयारी सुरु झाली .काही पंडित गूरूजी आपल्या परिवारासोबत तिथे आले. त्यांच्या साठी सूद्धा भोजन प्रसाद बनवण्यात आला. दूपारी १२.३० वाजता मला ४ तिक्कड व भाजी भोजन प्रसाद देऊन, महाराज दूसरे काम हाती घेण्यासाठी गेले. ते पून्हा आले नाही .मी आहे ते संपवून भोजन थाली स्वच्छ करून ,आराम करण्यासाठी निघून गेलो,तेव्हा महाराज आले. पून्हा काय हवे नाही विचारायला आलो नाही म्हणून दिलगीरी व्यक्त केली .
दूपारी २ वाजता "हिरापूर" कडे मार्गस्थ .ऊन्हामूळे चालणे शक्य झाले नाही. म्हणून मैया किनाऱ्यावर एका छोट्या झोपडीत आराम केला. तिथे एक बाबा होते त्यांनी साडेचार वाजता झोपेतून जागे केले. मी हिरापूर कडे मार्गस्थ झालो .मला १० किमी प्रवास करायचा होता. तेव्हा हिरापूर ला राहण्याची व्यवस्था होणार होती. वाटेत एका गृहस्थाने कलिंगड खायला दिले . व मधल्या रस्त्याने लवकर पोहचशाल म्हणून सांगितले .
मी मैया किनाऱा सोडून गावाकडे निघालो .रस्ता चूकलो. संध्याकाळी ६ वाजता अंधार पडला . तेव्हा एक नाला ओलांडून जंगलात आलो . "टीमरा वन " म्हणून ते वन ओळखले जाते . दूरवर शेतातून एका शेतकर्याने आवाज दिला "आप रस्ता भटक गये हो " मी वैतागलेलोच होतो मी रागाने बोललो" हिरापूर कहा है बताने का कष्ट करो " त्या शेतकर्याने हाताने दिशा दाखवून सांगितले ,तिकडे खूप दूरवर आहे हिरापूर .
मी शरीराने व रस्ता चूकल्याने मनाने थकून गेलो होतो . एका शेतातील मंदीराच्या चौथर्यावर आरामासाठी थांबलो . दूरवर एक घर दिसत होते, त्या घरातील लोकांना मी दिसत होतो पण कोणीही विचारपूस करण्यासाठी आले नाही. मी आरती केली व दिव्याच्या प्रकाशात कोणीतरी जेवण पाणी घेऊन येते का याची वाट पाहत बसलो . रात्री ९ वाजता झोपलो कोणीही आले नाही .
रात्री ११ वाजता पाठीमागून ऊ ऊ ऊ आवाज आला. मी घाबरून ऊठलो .मोबाईल चा ऊजेड लावला, पण काही दिसले नाही . नंतर बरेच वेळ जागे होतो. दुसर्या दिवशी चौकशी केल्यावर कळले की तो "लडाकीया" प्राणी होता .
नर्मदे हर हर
!! २३ मार्च २०२० !!
सकाळी ६ वाजता प्राणायाम करून साडेआठ वाजता मार्गस्थ .तासाभरात "हिरापूर" येथे पोहचलो .स्नान पूजापाठ केला. कोणीही चौकशी करण्यासाठी आले नाही, की कोठून आले, चहा भोजन प्रसाद वगैरे . तसेही काल रात्री मैया ने ऊघड्यावर झोपवल्याने आज दिवसभर ऊपवाशी राहायचे ठरवले होते.
मी जाणारच होतो तिथे शिक्षण घेणारी नऊ दहा वयाची दोन तीन मूले माझ्या जवळ आली, व १२ वाजता भोजन प्रसाद घेऊन जावा ,म्हणून विनंती केली. मी १२ वाजेपर्यंत नाही थांबू शकत म्हणून सांगितले . तर त्यांनी बालभोग करून जा म्हणाले. मी त्यांना टाळण्यासाठी ऊपवास आहे असे खोटे कारण सांगितले . म्हटलं आता तरी हे मूल मला जाण्यासाठी परवानगी देतील. पण नाही त्यांनी गूरूजींकडे जाऊन फळे आणली व मला दिली. ती घेऊन मी मार्गस्थ झालो .
फळे जरी सोबत होता तरी ती खायची नाहीत असे मी मनोमन ठरवले. पूढे किनाऱ्याने प्रवास करत मी" ककरावट" येथे पूलाखाली एक कूटीया बनवली आहे तिथे आलो. कूटीतून आवाज आला "नर्मदे हर" मला महाराजांनी कूटीकडे बोलावले. दूपारचा प्रवास करता थोडा आराम करा म्हणून सांगितले. लाॅकडाऊन मूळ किनाऱ्यावर शुकशुकाट होता. एक दोन व्यक्ती आश्रमात आले. त्यांनाही महाराजांनी सरपंचांनी दिलेली नोटीस दाखवली व काढून दिले .
मी कूटीत बसल्या बरोबर महाराजांनी माझ्या समोर गरमागरम भाजलेले हरभारे ( हूळा ) ठेवले . मी पाहतच राहीलो . काय करणार, मोडला की संकल्प दिवसभर ऊपवाशी राहायचे ठरवले होते . नर्मदा मैया ने कूटीमध्ये बसल्या बरोबर महाराजांकरवी हरबरा खायला दिला. खाण्यावाचून पर्याय नाही. मैया की लिला अपार है .
भोजन प्रसाद बनवण्याची तयारी सुरु झाली .मी पिठ मळले .महाराजांनी तिक्कड बनवले. महाराजांच्या सेवकाने भाजी बनवली .भोजन प्रसाद घेऊन २ वाजता मार्गस्थ झालो. संध्याकाळी ५.३० वाजता मी "सिमरीया "येथे पोहचलो. किनाऱ्यावर एका झोपडीत राहण्याची व्यवस्था झाली. तिथे एक बाबाजी व माताजी सेवा देतात. काही वेळाने एक परिक्रमा वासी आले. रात्री भोजन प्रसाद भाजी चपाती. नंतर झोपी गेलो .
नर्मदे हर हर
!! २४ मार्च !!
सकाळी ४ वाजता जागे झालो . ५ वाजल्यापासून त्या परिक्रमा वासींची बडबड चालू होती. पूजा आरती पण एकदम सूर लावून गाणी गातोय असे चालू होती. त्यांच्या वर रागवावे की जे चाललय त्याचा आनंद घ्यावा. मी द्विधा मनस्थितीत होतो .
आज अमावस्या होती म्हणून मी प्रवास थांबवला होता व आज येथेच थांबणार होतो .दुपारी गावातील कृष्ण मंदीरात दर्शन घेऊन आलो. मोबाईल वर बातम्या पाहील्या आजपासून २१ दिवस लाॅकडाऊन सूरू झाले होते .संध्याकाळी भोजन प्रसाद घेऊन आराम .
नर्मदे हर हर
!! २५ मार्च व २६ मार्च २०२० !!
!! २५ मार्च !!
काल सायंकाळी Govardhan Gosavi महाराजांनी फोन केला . व Ranjana Sakhare माताजी परिक्रमा करत सकाळपर्यंत सिमरीया पर्यंत पोहोचतील, त्यांना सोबत घेऊन पूढील परिक्रमा प्रवास करा. म्हणून मला सांगितले.
सकाळी ११ वाजता "सिमरीया" गावात मी साखरे माताजींना आणायला गेलो. गावात गेल्यावर माताजींना फोन केला तर साखरे माताजी सिमरीया पासून २ किमी पूढे" झीरी "गावात पोहोचल्या होत्या. मी परत आलो. तोपर्यंत एक नाथपंथी भगवे वस्रधारी साधू त्या कूटीमध्ये आला होता. मी कूटीमध्ये आल्यावर साखरे माताजींना फोन करून सांगितले की ऊद्या सकाळी मी तुमच्यापर्यंत पोहोचतो तूम्ही निश्चिंत रहा .
भोजन प्रसाद घेऊन मोबाईल वर वेळ घालवत बसलो होतो. तर हा ऊद्धट साधू मला मोबाईल वापरण्यावरून उपदेश करायला लागला. पण मी शांत होतो वयाने मोठे आहेत म्हणून मी नमत घेतल .संध्याकाळी मी ४० मिनीटे ध्यान केले तर त्या साधूचा वेश धारण केलेल्या माणसाने शिवी देऊन म्हणाला . दिखावा क्यू करता है ध्यान ३ घंटे तक किया जाता है .आता हे सहनशक्ती च्या पलिकडे झाल्यावर मी त्याला रागावून बोललो. की माझी जसी भावना तसे मी ध्यान करेल १० मिनीटे करेल किंवा तासभर करेल तू मला कसा काय बोलू लागला. पून्हा शिवी दिल्यावर पहा शेजारी विट पडलेली आहे . तेव्हा तिथे सेवा देणार्या बाबांनी मध्यस्थी केली . व मला समजावले की ते वयाने मोठे आहेत. त्यांना असे बोलू नये. मी म्हणालो ते वयाने जरी मोठे असले. तरी ज्ञानाने शून्य आहेत. बोलायचे ज्ञान नाही. साधूचा वेश धारण केलेला गूंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हा , साधू तर गायी प्रमाणे शांत व शितल असतात .
अशाप्रकारे आज नवीन अनूभव देऊन सूर्यदेव अस्ताला गेले .
नर्मदे हर हर
!! २६ मार्च २०२० !!
सकाळी साडेचार वाजता जाग आली .नित्यकर्म आटोपून ६ वाजता सिमरीया मधून पूढे मार्गस्थ. झीरी गावानंतर ही पूढे बरेच अंतर किनाऱ्याने प्रवास केला. एक परिक्रमा वासी सोबती काही अंतरावर सोबत होते . पूढे रस्ता चूकल्याने आम्ही वेगळे झालो .
दूपारी १२ वाजता "बरमान घाट "येथे पोहचलो .लाॅकडाऊन असल्याने आश्रम बंद होते. आश्रमात थांबायला पोलीस ठाण्यात नोंद करने गरजेचे होते. मी "सिद्धेश्वर मंदिर "येथे पोहचलो . भोजन प्रसाद घेऊन लगेच पूढे मार्गस्थ व्हा म्हणून सांगण्यात आले. दूपारी १२.३० वाजता भोजन प्रसाद घेतला. थोडा आराम करून मार्गस्थ होताना , साखरे माताजी आल्या. मी त्यांना फोटो मध्ये पाहीले होते . म्हणून मी त्यांना ओळखले. पण त्यांनी मला ओळखले नाही. "नर्मदे हर" म्हणून ओळख सांगितली .नंतर आम्ही प्रवासाविषयी गप्पा मारल्या व मी पूढे मार्गस्थ झालो .
मला अमरकंटक ला लवकरात लवकर पोहचयाचे होते. व साखरे माताजी वयोमानानुसार माझ्या बरोबर चालू शकत नव्हत्या . म्हणून आम्ही दूरावलो. पण मैयाची कृपा अशी की मी अमरकंटक ला पोहोचेपर्यंत साखरे माताजी परिक्रमा पूर्ण करून घरी पोहोचल्या होत्या. मी मंडला मार्गे गेलो व लाॅकडाऊन मूळ ३ दिवस ऊपवाशी राहिल्यानंतर पोडी लिंगा येथे ७ जून पर्यंत राहण्याची वेळ आली.
"बरमान घाट" येथून साखरे माताजींचा निरोप घेऊन मी "मिनी धुवाधार" येथे पोहचलो .पूढे जंगलात एक आश्रम आहे तिथे परिक्रमा वासींना सेवा देत नाही .असे शूभम पांडे महाराजांनी सांगितले होते. म्हणून मी पूढे "गूरसी" या गावात संध्याकाळी ६ वाजता पोहचलो .संध्याकाळी एका पूजारी बाबांनी गावातील गृहस्थ च्या घरी नेले व भोजन प्रसादाची व्यवस्था केली .
नर्मदे हर हर
!! २७ मार्च २०२० !!
सकाळी साडेचार वाजता ऊठलो. नित्यक्रम आटोपून ७ वाजता मार्गस्थ झालो. किनाऱ्याने जाताना रस्ता संपला. शेतातून वर चढून आलो. एका घराजवळून जाताना एक माताजी म्हणाल्या . "मैने बोला था ना, किनारेसे रस्ता नही है फिर भी वहा चले गये ! मी विचार केला मी आत्ता या माताजींना भेटलो . या कधी मला म्हणाल्या किनाऱ्यावर रस्ता नाही. त्यांच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करून पुढे मार्गस्थ झालो .
साडेनऊ वाजता "रमपूरा" येथे आश्रमात पोहोचलो. महाराष्ट्रातील ७ परिक्रमा वासी ४ मूर्ती व ३ माताजी तेथे होते. लाॅकडाऊन मूळ त्यांना ११ दिवस आश्रमात थांबण्याची नोटीस ग्रामपंचायत व पोलीसांनी दिली होती. तिथे परिक्रमा वासी माताजींनी चहा बनवला. चहा घेऊन पुढे मार्गस्थ होताना पेपर प्लेट व ग्लास माझ्या कडे दिले. व पुढे रस्त्याने आनंद शक्तीपीठ येथे पोहोचवायला सांगितले .
आनंद शक्तीपीठ आश्रम ऊंच टेकडीवर आहे. पायथ्याशी गेल्यावर मी महाराजांना फोन केला. व आपले साहीत्य घेऊन जायला सांगितलं. ५० ते ५५ वयाचे वृद्ध महाराज डोंगर उतरून खाली येताना दिसल्यावर , मी काही अंतर वर चढून गेलो. भेट झाल्यावर महाराजांनी मी महाराष्ट्रातील आहे हे ओळखले व भोजन प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे म्हणून सांगितले .
आज नवरात्र चा दूसरा दिवस होता . आश्रमात देवीची स्थापन केली होती. भोजन प्रसाद घेतल्यावर महाराजांना नवरात्र निमीत्त परिक्रमा वासी थांबतात की नाही विचारणा केली. महाराजांनी परिक्रमा वासी थांबतात म्हटल्यावर मी बाकीचे दिवस "नवरात्र" येथे साजरी करण्याचा निर्णय घेतला .
आश्रमात वृंदावन चे महाराज व त्यांच्या बरोबर मुंबई ची एक माताजी सोबत होत्या. एका कूटीयामध्ये देवी ची स्थापना करून महाराज व माताजी दररोज कन्या भोजन चा उपक्रम राबवत होत्या .
आनंद शक्तीपीठ आश्रमात" शारदा माता मंदिर" बांधकाम चालू होते. आश्रमात सेवा देणार्या माताजी कामाची धावपळ करत होत्या. मी दूपारी भोजन प्रसाद घेऊन आराम केला .संध्याकाळी किनाऱ्यावर फिरून आलो रात्री भोजन प्रसाद व आराम.
नर्मदे हर हर
!! २८ मार्च ते २ एप्रिल २०२० !!
!! २८ मार्च !!
सकाळी प्राणायाम केले नंतर बाबाजींना बांबू तोडायला मदत केली. नंतर बाबा व मी किनाऱ्यावर जाऊन स्नान केले.किनार्यावर खूप रंगीबेरंगी दगड पाहायला मिळाले. परत आल्यावर पूजा पाठ करून वाळू वाहायला मदत केली. सोबत एक अपंग व्यक्ती होते ,जे वाळू वाहण्यासाठी मदत करत होते. "आनंद शक्तीपीठ "येथे तयार होणारे "शारदा मंदिर" एकही रूपया खर्च न करता श्रमदानातून तयार होणार होते. हे विषेश .
दूपारी भोजन प्रसाद घेऊन आराम केला. आराम केल्यानंतर पून्हा बांधकाम करणार्यांना विटा देण्याचे काम केले.
दिवसभर जर काम करावे लागले तर नवरात्र उपवास करण शक्य होणार नाही. म्हणून मी बाबाजींना सांगितले माझ्या कडून उपवास होणार नाही. तूम्ही इतर श्रमदान करणार्यांसोबत माझ्या साठी सूद्धा भाजी चपाती बनवा. रात्री मस्त चपाती बेसन खायला मिळाले. व दिवसभर श्रमदान केल्यामुळे रात्री शांत झोप लागली .
नर्मदे हर हर
२९ , ३० , ३१ मार्च
आता हा रोजचा दिनक्रम झाला की सकाळी ऊठायचे प्राणायाम करून बाबाजींना कामात मदत करायची. व सोबत मैया किनाऱ्यावर स्नान करून यायच. या चार दिवसांत कितीतरी मजूर आले व मदत करून निघून गेले.
या चार दिवसांत मी एक विषेश गोष्ट पाहीली. ती म्हणजे बाबाजी माताजी दोघेही मंदिर बांधकामासाठी दिवसभर झटत होते. पण त्यांची चूल कधी बंद पडली नाही. ना त्यांना सरपणाची चिंता ना भाजीपाला किराणा संपल्यावर परत येण्याची काळजी . सर्व मैयाच्या भरवशावर
३१ मार्च रोजी सकाळी वाळू चाळलेली नव्हती . गवंडी आल्यावर काय करायचे, एक तर तो मदत म्हणून येणार वाळूअभावी काम बंद राहील ,तर तो पून्हा येतो नाही ही मला काळजी. पण मैयाची कृपा अशी झाली , की शेजारच्या केरपानी गावातून काही माताजी भजन करण्यासाठी "आनंद शक्तीपीठ " येथे आल्या व आम्हाला काम करताना पाहून त्यांनी भजन करायचे सोडून वाळू वाहायला सुरूवात केली. लहान मूलींनी वीटा वाहायला घेतल्या व तासाभरात सर्व काम पूर्ण करून निवांत भजन करत बसल्या .
नर्मदे हर हर
१ एप्रिल
अाज गवंडी न आल्यामुळे मी येथून दोन किमी दूर केरपानी येथे अभय साधना कूटीर गूफा पाहायला गेलो मैया किनाऱ्यावर खूप सुंदर आश्रम व विलोभनीय आश्रम परीसर अद्भुत गूफा ॐकारेश्वर मंदिर दर्शन घेऊन मी परत आलो भोजन प्रसाद घेऊन आराम केला
नर्मदे हर हर
२ एप्रिल रामनवमी
रामनवमी निमीत्त "आनंद शक्तीपीठ" येथे भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. या शुभ मुहूर्तावर तीन परिक्रमा वासी पण आले होते .भोजन प्रसाद घेऊन आराम केला .
रोजच्या दिनचर्या प्रमाणे संध्याकाळी ५ वाजता मैया किनाऱ्यावर जाऊन स्नान केले. व शिवलिंगाजवळ बसून ध्यान करत बसलो होतो . एक किलोमीटर दूर गावातील कन्या दररोज संध्याकाळी दीपदान करण्यासाठी किनाऱ्यावर येत असे . काल मी त्यांना माझ्या साठी दीप आणायला सांगितले होते. त्याप्रमाणे त्या ५ कन्या माझ्या साठी दीप घेऊन किनाऱ्यावर आल्या होत्या. मला ध्यानातून जागे करत म्हणाल्या " दादाजी दीपदान किजीए । हम आपके लिए दीप लेकर आये है । कागदावर दीप ठेऊन प्रज्वलित करायला लागल्या ,तेव्हा समजले की काडीपेटी सोबत आणलीच नाही. आता पून्हा १ किमी जाऊन काडीपेटी घेऊन यायची वेळ आली. एक कन्या घराकडे निघाली ,तोपर्यंत आम्ही किनाऱ्यावर कुठे काडीपेटी सापडते का पाहू लागलो . पायाखाली दबलेल्या अवस्थेत एक काडीपेटी सापडली ही ! पण तिच्या मध्ये दोनच काड्या होत्या. पेटल की नाही याची खात्री कमी . आम्ही "नर्मदे हर" म्हणून काडी पेटवली . व मैयाच्या कृपेने एकाच काडीमध्ये सर्व दीप प्रज्वलित झाले. घराकडे जाणार्या कन्येला परत बोलावले. अशा प्रकारे आज आम्हाला मैयाची कृपा अनुभवायला मिळली .
नर्मदे हर हर
!! ३, ४ , ५ एप्रिल २०२० !!
!! ३ एप्रिल !!
आज सकाळी ८ वाजता कन्या भोजन साठी कन्या येणार होत्या. १० वाजेपर्यंत वाट पाहीली कन्या आल्या नाहीत." आनंद शक्तीपीठ" येथील माताजींनी माझ्या सोबत रवा , गूळ दिला. पूढे एखाद्या ठिकाणी कन्या भोजन बनवा म्हणून सांगितले . भोजन प्रसाद दाळ, भात खाऊन मार्गस्थ झालो .
संध्याकाळी "धूमगढ" निमखेडा येथे पोहचलो ."शंकराचार्य द्वारकापीठ आश्रम " येथे शंकराचार्यांनी "नर्मदाष्टक" लिहिले आहे. अतिशय सुंदर मंदिर . रात्री खिचडी भात भोजन प्रसाद घेऊन आराम.
नर्मदे हर हर
!! ४ एप्रिल २०२० !!
सकाळचे नित्यकर्म आटोपून "गूरू गोविंद भगवत्पाचार्यजी" यांची दर्शनिय "गूफा" पाहायला गेलो. आज एकादशी निमीत्ताने आश्रमात शाबूदाणा खिचडी बनवली होती. खिचडी प्रसाद घेतल्यावर आश्रमातील सेवकाने पूढे मार्गस्थ व्हायला सांगितले. मी एकादशी निमीत्ताने आश्रमात थांबतोय असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी लाॅकडाऊन मूळ आम्ही कोणालाही थांबू देत नाहीत म्हणून सांगितले . नाईलाजाने पूढे मार्गस्थ व्हावे लागले .
एके ठिकाणी वृंदावन चे महाराज भेटले. त्यांच्या सोबत मुंबईची माताजी व एक शिष्य होता. त्यांना रात्री भोजन मिळाले नव्हते. एका मंदीरात आराम करताना भेट झाली. आम्ही सोबतच" हिरण नदी" पार केली. पूढे मी एकटाच मार्गस्थ झालो .
एका गृहस्थाने चहा साठी आवाज दिला "बरबटी" येथे रात्री थांबायला सांगितले. संध्याकाळी "बरबटी" येथे पोहचलो. तिथे सदाव्रत ची व्यवस्था केली होती. भोजन बनवण्याची इच्छा नव्हती. सहा वाजता राधे महाराज आले त्यांनी भोजन बनवण्याची तयारी सुरु केली . मी त्यांना मदत करायला गेलो. त्यांनी आम्ही सर्व बनवतो सांगितले . त्यांनी भोजन प्रसाद बनवला जेवायला बसले , सहानुभूती म्हणून जेवायला बोलावले. भोजन बनवायला माझी मदत घेतली नाही, म्हणून मी भूक नाही म्हटल्यावर त्यांनी भोजन प्रसाद घेऊन आराम केला.
व मी भोजन प्रसाद न घेता आराम केला .
!! ५ एप्रिल २०२० !!
सकाळी ९ वाजता किनाऱ्यावर स्नान पूजा पाठ करून मार्गस्थ. शेतातून काही टोमॅटो खायला मिळाले. किनाऱ्यावर काही लहान मूली दिसल्या. त्यांच्या आईजवळ सूजी व गूळ दिला व या कन्यांना कन्या भोजन करून द्या म्हणून सांगितले. प्रत्येकी १० रूपये ७ कन्यांना देऊन दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ
दूपारी १२ वाजता "सर्रा घाट त्रिवेणी संगम" येथे पोहचलो. भूकेने व्याकूळ झालो होतो. हात पाय धुवून भोजन प्रसाद घेतला .
मध्य प्रदेश राज्यातील परिक्रमा वासी ज्या रूममध्ये थांबले होते. त्या रूममध्ये मी आसन लावले. शेजारच्या रूममध्ये महाराष्ट्रातील एक परिक्रमा वासी थांबले होते. त्यांनी माझ्या शेजारी आसन लावा म्हणून सांगितले. मी फार कमी बोलतो असे म्हणणारे . त्यांनी जे बडबड करायला सुरुवात केली बंद होण्याच नाव नाही. दुपारनंतर गंगा नदी उगम पाहायला गेलो. उजव्या बाजूला गंगा नदी ऊगम आहे व रस्त्याच्या डावीकडे यमुना नदी चा ऊगम आहे .
लाॅकडाऊन मूळ सगळे आश्रम बंद होते .म्हणून मी धावपळ न करण्याचा निर्णय घेतला. व राम जानकी मंदिर सर्रा घाट धर्मशाळेत हनुमान जयंती पर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. रात्री भोजन प्रसाद घेऊन आराम .
नर्मदे हर हर
!! ६ , ७ , ८ एप्रिल २०२० !!
६ एप्रिल
सकाळी साडेसहा वाजता जाग आली. त्रिवेणी संगम वर स्नान करून आश्रमात येऊन प्राणायाम ध्यान केले. मैया किनाऱ्यावर थोडा वेळ घालवला. दूपारी भोजन प्रसाद घेऊन आराम करण्यासाठी आलो .सोबत असलेल्या महाराजांनी गप्पा मारायला सुरुवात केली. व्यर्थ बडबड ऐकून बोर झालो होतो .
४ वाजता स्नान ध्यान शेजारच्या राम मंदीरात जाऊन एकांतवास आराम केला. भोजन प्रसाद बनवायला मदत केली. संध्याकाळी भोजन प्रसाद घेऊन आराम.
नर्मदे हर हर
!! ७ एप्रिल २०२० !!
सकाळी ६ वाजता त्रिवेणी संगम सर्रा घाट वर स्नान केले. आश्रमात येऊन प्राणायाम ध्यान केले. आश्रमातील एक भगवे वस्रधारी सेवक आले. भोजन बनवायला चल म्हणाले . मी पूजा पाठ करण्यात व्यस्त आहे म्हटल्यावर . ते भगवे वस्रधारी सेवक ऊद्धटवाणी बोलले. "साधू बनने निकला है ,काम तो नही करता और इसे खाना चाहीये" त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले .
आम्ही परिक्रमा वासींनी आश्रमात काम कराव म्हणून हे साधू लोक जर भोजन प्रसाद देत असतील , तर आश्रमात येण्याअगोदर त्यांनी तशी सूचना द्यावी, की आम्ही तुम्हाला दोन वेळा भोजन देऊ त्या बदल्यात तुम्हाला येथे काम करावे लागेल .
याअगोदर सूद्धा एका भगव्या वस्रधारी साधू बरोबर वादविवादाचा प्रसंग आला होता .त्यामुळे माझ्या मनात अशी धारणा तयार झाली की, भगवे वस्रधारी साधू म्हणजे काम, क्रोध , लोभ, मोह ,अहंकार या विकारांना धारण केलेले मूर्तिमंद स्वरूप असते.
अर्थात प्रत्येकाला असे अनुभव येत नाहीत व येऊ पण नये. पण मला आले व मी ते प्रामाणिकपणे आपल्या समोर ठेवले .
ऊद्या हनुमान जयंती निमित्त आज संध्याकाळी सूंदर कांड वाचनाचे आयोजन करण्यात आले. सूंदर कांड १०८ वेळा वाचले गेले पाहिजे असे सुचविण्यात आले. पाच वाजता मध्य प्रदेश राज्यातील काही परिक्रमा वासी व आश्रमातील काही सेवक असे आम्ही सात आठ जण सूंदर कांड वाचन करायला बसलो. एकदा वाचून पूर्ण करायला २ तास लागतात. मी दोनदा वाचन केले. नऊ वाजले .पून्हा एकदा वाचावे असे सांगण्यात आले. मी स्पष्ट नकार दिला व भूक लागली सांगून भोजन प्रसाद घ्यायला गेलो .
आज संध्याकाळी गुजरात राज्यातील परिक्रमा वासी Dhirajlal Chavda महाराज परिक्रमा करताना येथे आले होते . दिवसभर प्रवास करून थकले होते .त्यांनाही सूंदर कांड वाचन करावे म्हणून सक्ती करण्यात आली. त्यांनी स्पष्ट नकार दिला व आम्ही सोबतच भोजन प्रसाद घेऊन आराम केला .
नर्मदे हर हर
!! ८ एप्रिल २०२० !!
आज हनुमान जयंती निमित्त सर्रा घाट येथे कन्या भोजन चे आयोजन करण्यात आले होते. पण माझ्या सोबतच्या बडबडे महाराजांच्या बडबडीला कंटाळून मी पूढे जाण्याचा निर्णय घेतला .
Dhirajlal chavda महाराज व मी आम्ही सोबतच पूढे मार्गस्थ झालो. एका ठिकाणी बाबाजींनी बालभोग (नाष्टा) घेण्यासाठी आवाज दिला .बालभोग घेतल्यानंतर धीरजलाल छावडा महाराज व मी दुरावले गेलो.
पूढे बरेच अंतर चालून मी बेलपठार"र येथे पोहचलो . बेलपठार येथे दोन तिर्थ आहेत एक "बलिराजा ची यक्षभूमी" व दुसरे "निलकंठ महादेव मंदिर" तिथे एक बाबाजी सेवा देतात. त्यांनी भोजन प्रसाद बनवला. भोजन प्रसाद घेऊन आराम केला .
दुपारनंतर प्रवास करत "जलेरी धाट सितलपूर" येथे पोहचलो. मैया किनाऱ्यावर संध्या स्नान पूजा पाठ करून भोजन प्रसाद व नंतर आराम .
नर्मदे हर हर
!! ९ , १० , ११ एप्रिल २०२० !! संधी वस्र व चप्पल त्याग
!! ९ एप्रिल !!
"गुजरात आश्रम सितलपूर" येथून नित्यक्रम आटोपून ७.३० वाजता मार्गस्थ झालो. पुढे "ब्रम्ह कूंड" व "त्रिशूळभेद तिर्थ" दर्शन झाले. तिथे एक महात्मा झाडाच्या खोडात निवास करत होते. त्यांच्या सेवकाला एक टोकदार वस्तू मिळाली होती . जी जाळली तरी नष्ट होत नव्हती. तीचा फोटो घेतला व त्रिशूळभेद तिर्थ स्थान महत्त्व विचारले, त्यांनी सांगितले पण मी ते लिहायला विसरलो .आपणास माहित असेल तर कमेंट बाॅक्स मध्ये लिहून पाठवावे .
दूपारी खूप ऊशिरा मैया किनाऱ्यावर एका ग्रहस्थांकडे भोजन प्रसाद मिळाला. तिथे नानूजी महाराज यांची भेट झाली. भोजन प्रसाद घेऊन पुढे एका मंदीरात आराम केला. पुढील प्रवासात आम्हाला खूप सुंदर पाण्याचा झरा पाहायला मिळाला .
दूपारी ३ वाजता "सरस्वती घाटावर" आलो तिथे लाॅकडाऊन मूळ शुकशुकाट होता. घाटावर उघड्यावर राहावे लागेल असे सांगण्यात आले . मग मी पुढे "गोपालपूरा " येथे आलो . तिथे "मा नर्मदा सेवासंघ" म्हणून छोटा आश्रम आहे. तिथल्या महाराजांचे नाव लिहिलेले नाही . पण फोटो आहे. खूप मनमिळाऊ स्वभावाचे महाराज आहेत . आश्रमात गेल्या बरोबर पाणी दिले, बेलाचा रस बनवून दिला . संध्याकाळी मी महाराजांबरोबर मैया किनाऱ्यावर संध्या स्नान करण्यासाठी गेलो. त्यांनी मैयाच्या पाण्यात प्रवेश करण्याअगोदर मैया चे दर्शन घ्यावे सांगितले. व परत आल्यावर ही भरपूर नियमांबद्दल माहिती दिली. ती नंतर माझ्या खूप उपयोगात आली. त्या आश्रमात सोलर लाईट व्यवस्था आहे. महाराज संध्याकाळी सायकलवर भाजीपाला आणायला गेले .आल्यावर चपाती वांगे बटाटा भाजी बनवली. भोजन प्रसाद घेऊन आराम.
नर्मदे हर हर
!! १० एप्रिल २०२० !! चपला व संधी वस्र त्याग
सकाळी ५ वाजता मैया किनाऱ्यावर स्नान करण्यासाठी महारांजाबरोबर गेलो. छोटा धुवाधार धबधबा पाहायला मिळाला. महाराजांनी चपला घालून परिक्रमा करण्यात आपले किती अहीत आहे . हे समजून सांगितले. जसे मंदीराला परिक्रमा ( प्रदक्षिणा ) करताना चपला घालत नाही. तसेच मा नर्मदा परिक्रमा करताना चपला घालत नाहीत .
कितीतरी वर्षापूर्वी ज्या तपस्वी साधू संतांनी मैया किनाऱ्यावरून अनवाणी परिक्रमा केली . त्यांची स्पंदने आजही मैया किनाऱ्यावर जाणवतात. तूम्ही चपला घालून परिक्रमा केली तर तूम्ही त्या दिव्य स्पंदनांपासून वंचित राहणार .
भगवान श्रीकृष्णांचे ही उदाहरण महाराजांनी सांगितले . ज्या मातीत भगवान श्रीकृष्ण खेळले , ती माती भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्या दिव्य मातीचा एक कण जरी आपल्याला स्पर्श करायला मिळाला तर आपले जीवन धन्य होईल म्हणून गजरात हत्ती आपल्या सोंडेने माती सर्वांगावर ऊधळत असतो .
महाराजांनी खूप सुंदर उदाहरण देऊन समजावून सांगितले. मी त्या दिवशी पक्के ठरवले परिक्रमा पूर्ण होईपर्यंत चप्पल नाही घालायची म्हणजे नाही . आश्रमात येऊन आम्ही बालभोग घेतला . तोपर्यंत Dhirajlal Chavda महाराज आले. आम्ही सोबतच बालभोग घेतला. मा नर्मदा सेवासंघ येथील महाराजांनी पुढील प्रवासासाठी आशिर्वाद दिले. पुढे मी मैया किनाऱ्यावर चपला व संधी वस्र त्याग केला .
मी "लम्हेटा घाटावर" आलो. तिथे मला फोन करून मा नर्मदा सेवासंघ आश्रमातील महाराजांनी थांबायला सांगितले. ५ किमी सायकलवर धावपळ करत माझ्या पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही अंतर वस्र आश्रमात विसरले होते. आणि ते देण्यासाठी मी सायकलवर धावपळ करत येथे आलो आहे. महाराजांचा सेवाभाव खूप सुंदर होता. जसे आई काळजी घेते तसा .
पुढे मी किनाऱ्याच्या दिशेने एका शेतातून खाली उतरून मैया किनाऱ्यावर आलो . पुन्हा शेतातून अडचणीचा रस्ता पार करताना एका शेतकर्यांना विचारले. भोजन प्रसाद कोठे मिळेल ? त्यांनी पिंपळाच्या शेजारी मंदिर आहे तिथे थांबा. तुम्हाला भोजन प्रसाद पोहोच होईल. शेतातून वर चढून एका घराशेजारी पोहचलो. घरातील माताजींनी मंदिरापर्यंत आणून सोडले .
मंदिरात तासभर आराम केला. १२ वाजता एक माताजी भोजन प्रसाद पूरी भाजी भात घेऊन आल्या. व निघून गेल्या. मी भोजन प्रसाद घेऊन आराम केला. नंतरही तिथे कोणीही आले नाही .
मी पुढे मार्गस्थ झालो . पुलाजवळ काही मूले भेटली आपूलकीने विचारपूस करून १० रूपये दिले . पुढील प्रवासात काही माणसांनी भोजन प्रसादासाठी विचारपूस करून २० रूपये दिले. संध्याकाळी ५ वाजता एका घरासमोर एका गृहस्थाने चहा घेण्यासाठी थांबवले . आम्ही खूप वेळ" नर्मदा मैया भक्ती भाव" या विषयावर गप्पा मारल्या .
६ वाजता ग्वारी घाटावर पोहचलो .काही व्यक्तींनी वरती आश्रमात जायला सांगितलं. किनाऱ्यावर सर्व आश्रम बंद होते. घाट चढून गेल्यावर एका आश्रमात पोहचलो. अगोदर आश्रम बंद आहे सांगितले . नंतर सकाळी लगेच जाव लागेल या अटीवर रात्र भर थांबवले. दाळ चपाती भोजन प्रसाद नंतर आराम . फॅन चालू करून सूद्धा मच्छर चावले .
नर्मदे हर हर
!! ११ एप्रिल २०२० !!
सकाळी नित्यक्रम आटोपल्या नंतर चहा सोबत बिस्किट पुडा मिळाला. पुढे सकाळी साडेअकरा पर्यंत प्रवास केला .पण भोजन प्रसाद मिळाला नाही. ऊन जास्त होते अनवाणी पाय भाजत होते. म्हणून एका पान टपरीच्या आडोशाला आराम केला .
दूपारी २ नंतर मार्गस्थ. आज मला प्रवासात ७० रूपये मिळाले. पण भोजन प्रसाद नाही. दूपारी अडीच वाजता एक पोलीस जवळ येऊन थांबले. व "भोजन करोगे" म्हणून विचारले. मी "हो" म्हटल्यावर मला एक पॅकेट दिले. त्यात ५ पूरी व बटाटा भाजी होती . ती खाल्ली नंतर प्यायला पाणी नव्हते . बरेच अंतरावर पाणी मिळाले .
संध्याकाळी नानूजी महाराज व त्यांचे सोबती भेटले.आम्ही तिघे "रिंछाई" येथे पोहचलो. तिथे "कटारे परिवाराने" आमची राहण्याची व्यवस्था केली . रात्री भोजन प्रसाद व आराम .
नर्मदे हर हर