नर्मदातटके आश्रम - वंदना परांजपे
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदातटके आश्रम - वंदना परांजपे
II नर्मदामैया तीरावरील सेवाश्रम - वंदना परांजपे II
तीर्थ जननी नर्मदा ।।नर्मदे हर।।
सेवाश्रम - ओंकारेश्वर ते रावेर खेडी
तसा सर्व रेवाखंडच देव पितृ तपोभूमि आहे आणि प्रत्येक पावलागणिक सेवाव्रती अहमहमिकेने मैयाभक्तांच्या सेवेसी तत्पर असतात. त्यातील काही आश्रमांची आपण ओळख करुन घेऊया. नर्मदे हर.
ओंकारेश्वर येथून सुरुवात करुया.श्रीगजाननमहाराज मंदिर हे मैयाच्या दक्षिणतटावर ब्रम्हपुरीत असून उत्तम पांच भक्तनिवास इमारती आहेत.पायी परिक्रमावासींसाठी नि:शुल्लक दोन तीन मोठे हॉल्स आहेत व त्यांना चहापाणी,बालभोगप्रसाद,भोजन प्रसाद आदि सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध आहेत. संस्थांमधील स्वच्छतेसह सर्व सेवा खूप वाखाणण्याजोगी आहे.
या शिवाय खूपसाऱ्या धर्मशाळाही आहेत.ओंकारेश्वरमधे ओंकारमांधाता राजा असल्यामुळे सर्वच खूप छान आहे.
ओंकारेश्वर हून पुढे निघाल्यावर किनाऱ्यावरुन जा किंवा रस्त्याने शिवकोठी,एक रोटी आश्रम,थापना येथे किनाऱ्यावर नर्मदाशंकरमहाराज यांचा आश्रम आहे.
ओंकारेश्वर रोड स्टेशन समोर जैन धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे पण भोजन व्यवस्था नाही. पुढे शामसाई सदन व पुढे आपल्या भक्तराजमहाराजांचा सेवासदन आश्रम असून तिथे निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे मैयावरील पुलाजवळ दत्त आश्रम आहे.
पुढे परमहंस हा बापूजी श्रीरंगावधूतमहाराजांचा आश्रम. कटारा गावातही सिताराम बाबांची कुटी आश्रम आहे.सितारामबाबाजी नुकतेच समाधीस्थळ झाले.अलीबुजुर्ग येथे मैया किनारी थोडा वरच्या बाजूला नर्मदामंदिर व आश्रम आहे.भावनादिदी या व्यवस्थापिका आहेत..थोडे पुढे गेल्यावर श्रीस्वामीसमर्थ सेवाकेंद्र आहे.इथेही निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.पुढे टोकसर येथे गोमुख आश्रम,गौतमेश्वर मंदिर असून इथे मैयाभेटीसाठी गोदावरीमैया गोमुखाने आलेली आहे. हा आश्रम सुंदर असून निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे कांकरिया इथे मैया किनाऱ्यावर आश्रम व मंदिर आहे. पुढे रावेर खेडी येथे थोरले बाजीराव पेशवे सरकार यांची समाधी व काशिबाईसाहेब स्थापित रामेश्वर मंदिर आहे. येथील गांवकरी सेवाकेंद्र चालवतात,निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
रावेर खेडी ते लेपा.नर्मदामैया दक्षिणतट.
तीर्थ जननी नर्मदा नर्मदा किनाऱ्यावरील आश्रम व सेवाकेंद्र…..
रावेर खेडी येथे आता नवीन सेवाकेंद्र सुरु झाले आहे. पुढे खेडी येथे गंगाश्रम सेवाकेंद्र आहे.
बकांवा येथे मैया किनाऱ्यावर सिताराम आश्रम आहे. तर गांवात डॉ.शहा यांचे सेवा केंद्रही आहे. मर्दाना गांवात मैया किनाऱ्यावर हरिहर कुटी मंदिर व आश्रम असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
भट्यान् बुजुर्ग इथे सियाराम बाबांचा आश्रम,सुंदर बांधीव घाट,निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे बिल्वकेश्वर महादेव मंदिर सुंदर ठिकाण आहे. गोधारी येथे आश्रम निवास व्यवस्था असून सदाव्रत मिळते.तेली भट्ट्यानहून पुढे ससाबडकडे जाताना साधारण एक दीड किलोमीटरवर डावीकडे रस्त्यालगतच नाशिकचे मैयापुत्र श्री.श्रीराम गायकवाड आणि त्यांचे काही साथी यांनी चालवलेला रामकृष्ण हरी सेवाश्रम(नाशिक) आहे.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे ससाबड येथे शिवमंदिरात व्यवस्था होते.गांवकरी सेवा देतात.
अमलाथा येथे श्रीराम मंदिर आहे. लेपा येथे श्रीराम मंदिर असून श्री.मांगिलाल वर्मा हा मैयाभक्त व गांवकरी सेवा देतात.निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
लेपा पुनर्वास मधे सुश्री भारतीताई ठाकुर यांची नर्मदालय ही संस्था आहे.धरणांच्या डूब क्षेत्रात आलेल्या व येणाऱ्या गावातील आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणाची व निवासाची व्यवस्था इथे उत्कृष्ट केलेली आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी केलेले काम पाहण्यासाठी आपण अवश्य भेट दिलीच पाहिजे असे ठिकाण आहे. आपणही तिथल्या सेवाकार्याला आपला हातभार लावू शकतो.
लेपा गांवात श्रीराम मंदिरात निवास व्यवस्था होते व मैयापुत्र श्री. मांगिलाल वर्मा व त्यांचे मित्र भोजन प्रसादाची व्यवस्था करतात.
लेपा ते बडगांव.नर्मदामैया दक्षिणतट.
तीर्थ जननी नर्मदा नर्मदा किनाऱ्यावरील आश्रम,सेवाकेंद्र
लेपा नंतर वेदामैया पार केल्यावर हायवेवर वेदान्त व्हिला सेवाकेंद्र आहे.पुढे कठोरा येथे शिवमंदिर आश्रम आहे. माकडखेडा येथे डोंगरे महाराज ट्रस्टचे सेवाकेंद्र असून सदाव्रत मिळते. पुढे मैयाकिनाऱ्यावरील टेकडीवर मार्कंडेय तप:स्थळ गुफा, शिवमंदिर आश्रम आहे. निवास व्यवस्था आहे.आपण स्वयंपाक करुन भोजन प्रसाद घ्यायचा.खूप छान सर्वसोयीयुक्त स्वयंपाकगृह आहे. खूप छान महाराज आहेत. आपले मैयाभक्त परिक्रमा वासी श्री.व सौ. तावसे दांपत्याने इथे छान दोन खोल्या बांधून दिल्या आहेत. सुंदर बांधीव घाट आहे इथे. सुंदर वनश्रीने नटलेले तीर्थक्षेत्र आहे. चातुर्मास करण्यासाठी खूप छान स्थान आहे.
बडगांव ते खलबुजुर्ग नर्मदामैया दक्षिणतट.
तीर्थ जननी नर्मदा नर्मदामैया किनाऱ्यावरील आश्रम,सेवाकेंद्र.
बडगांव गावाबाहेर पडल्यावर सुंदर हिरवळीच्या गालिच्यावरुन उजवीकडून वाहणाऱ्या नीलशांत मैयाचे रुपडे डोळ्यात साठवत चाललो की येतो शालिवाहन आश्रम.शककर्ता राजा शालिवाहन यांनी इथे शिवपिंडीची स्थापना करुन तपश्चर्या केली व भगवंताच्या आशिर्वादाने मातीच्या पुतळ्यांमधे प्राण फुंकून शकहुणांचा युद्धात पराभव केला व शालिवाहन शक सुरु केला.
समोर उत्तर तटावर महेश्वरचा किल्ला दिसतो. मैयावर बांधीव घाटही आहे स्नानासाठी.या आश्रमात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
चला पुढे मजल दर मजल करत ढालखेडा येथे मैया किनाऱ्यावर आश्रम आहे.गांवकरीही सेवा देतात. पुढे बलगांव येथे मैया किनाऱ्यावर भूतनाथ महादेव मंदिर व मौनिबापूंचा छान आश्रम आहे. निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे अकबरपुरा नंतर साटकमैया पुलावरुन पार करुन खलबुजुर्ग गांवात मैया किनाऱ्यावर श्रीराम मंदिर,आश्रम आहे. बांधीव घाट आहे.निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे आग्रा मुंबई महामार्ग ओलांडला की श्री बालाजी हनुमान मंदिर आहे.इथेही राहता येते. मंदिरा जवळून थोडे पश्चिमेला चालले की पुन्हा मुंबई आग्रा महामार्ग ओलांडला की मैया वरील पुलाजवळ डावीकडे आळंदीच्या जोगमहाराज यांचे शिष्य असलेल्या कुणाल पाटील यांचे अन्नपुर्णा अन्नक्षेत्र आहे. निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे. सध्या तिथे घाटाचे,व हॉलचे बांधकाम सुरु आहे. कुणाल व त्याची सौभाग्यवती,दोघं ही खूप गुणी मुलं आहेत.सेवाभावी आणि लाघवी आहेत. जणू सेवा इंद्रायणी व मैया यांचा प्रिती संगम आहे.हे सेवाकेंद्र नुकतेच सुरु झाले आहे. अवश्य सेवेचा लाभ घ्यावा. नर्मदे हर.
तीर्थ जननी नर्मदा खलबुजुर्ग ते कपालियाखेडी.
।। तीर्थ जननी नर्मदा।। नर्मदा मैया दक्षिण तटावरील सेवाव्रती
खलबुजुर्ग ते कपालियाखेडी
खलटाका गांवानंतर कच्चा रस्ता सुरु.मैयाकिनाऱ्या जवळून वाटचाल, जागोजागी भगवे झेंडे लावले आहेत.संगम नदीमैया पार केल्यावर टेकडीवर पुनर्वसित चिंचली गांवात शिवमंदिरात निवास करता येतो,समोरच सुरज निकुंभ यांचे घर आहे ते सदाव्रत देतात. पुढे चिंचली गांवात हनुमान मंदिरात निवास व भोजन व्यवस्था आहे.
गावाबाहेर पडल्यावर दोन रस्ते फुटतात उजवीकडील रस्ता ब्राह्मण गांवला जातो व तिथून पुनर्वसित विश्वनाथ खेडा येथून भोईंदा येथे जाता येते.ब्राम्हणगांवात मैयाकिनाऱ्यावरील हनुमान मंदिरात व्यवस्था आहे पण हा लांबचा मार्ग आहे.
चिंचोली गावाबाहेर पडल्यावर डावीकडचा कच्चा रस्ता भोईंदालाच जातो.हा शॉर्टकट असून जवळ जवळ सात आठ कि.मि.चालणे वाचते.
भोईंदा बऱ्यापैकी मोठे गांव आहे. येथे हनुमान मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. गावाबाहेर पडल्यावर बुराडमैया पुलावरुन पार करुन अभाली नंतर मोठा कच्चा रस्ता आहे बहूधा मोठा हायवे होणार आहे. कपालिया खेडी हे बऱ्यापैकी मोठे गांधी आहे. येथील श्रीराम मंदिरात निवास व्यवस्था आहे. गांवकरी भोजन प्रसादाची व्यवस्था करतात.श्री.विरेंद्र हे सेवाव्रती आहेत.
।। तीर्थ जननी नर्मदा।।
मैया किनाऱ्यावरील सेवाव्रती दक्षिणतट कपारिया खेडी ते तलवाडा डेब
कपालिया खेडी येथील श्रीराम मंदिराजवळून थोडे पुढे गेले की उजवीकडे छोटा डांबरी रोड आपल्याला कुआं गांवात नेतो.कुआं गावाबाहेर पडलो की हायवे सुरु होतो.समोरच जो ढाबा दिसतो तिथे बालभोगसेवा दिली जाते. उजवीकडून बडवानीकडे जायचे.
दाभड,दवाना या गांवात निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे लखनगांवफाटा येथे आश्रमात निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे सेमलदा डेब बालाजी आश्रम येथेही व्यवस्था आहे.पुढे मेहगांव डेब नंतर तलवाडा डेब इथे गावकऱ्यांनी चालवलेले सेवाकेंद्र असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
।। तीर्थ जननी नर्मदा ।।
नर्मदा किनाऱ्यावरील सेवाश्रम दक्षिणतट. तलवाडा ते बडवानी ते बोखराटा.
तलवाडाच्या पुढे ५ कि.मि. मंडवाडा येथे एक अनोखं ठिकाण आहे. शिवमंदिरात या दोन्ही बाजूंनी नदीमैया वाहात आहे. इथे निवास करु शकतो. या मंदिराच्या लगतचा रस्ता राजपुर,उपळा,पलसूद मार्गे खेतियाला जातो.ज्यांना शुलपाणिच्या झाडीतुन जायचे नसेल ते या मार्गाने खेतिया,शहादा,प्रकाशा मार्गे गोराग्रामला जाऊ शकतात.या मार्गावरही प्रत्येक गांवात व्यवस्था होते.
मंडवाडा येथून उजवीकडील हायवेने चकेरी येथे मेकलसुता आश्रम आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे अंजड येथे श्री हनुमान मंदिर,शर्माजी धर्मशाळा इथेही व्यवस्था आहे.
बडवानी जिल्हाचे ठिकाण आहे. गुरुद्वारा, जिल्हा न्यायालयाजवळ योगमायामंदिर, राजघाट रोडवर मंगल कार्यालय राजघाट येथे एकमुखी दत्त मंदिर व बरेच आश्रम आहेत पण मैयाचा जलस्तर कमी असेल तरच राहता येते.बडवानीत मात्र बऱ्याच ठिकाणी परिक्रमा वासी राहू शकतात. बडवानीहून पुढे जाण्यासाठी परत दोन मार्ग आहेत.
बडवानी,नानी बडवानी,बावनगजा,पाटी,बोखराटा मार्गे खेतिया हा त्यातल्या त्यात सोपा आहे. नाही बडवानी येथे बाबा रामदेव मंदिरात निवास व्यवस्था आहे.गांवकरी भोजनाची व्यवस्था करतात. बावनगजा इथे पहाडावर जैन मंदिर आहे. पायथ्याशी हनुमान मंदिरात व्यवस्था होते. पुढे पंधरा कि.मि.वर पाटी हे बऱ्यापैकी मोठे गांव असून साई मंदिरात सर्व व्यवस्था आहे. पुढे अठरा कि.मि. बोखराटा येथे श्रीराम मंदिरात व्यवस्था आहे. बोखराटा येथून तोरणमाळ मार्गे धडगाव असा एक मार्ग आहे.तर दुसरा बायगौर,रानीपुरा,दर्रा,धावलघाट,काकरदा,धडगांव असा एक मार्ग आहे. तर तिसरा बोखराटा,बारीफल्या,खेतिया,शहादा,प्रकाशा,हा मार्ग आहे. बोखराटा ते खेतिया
मार्गावरील भागल अंबा,आंबा पाडाव या छोट्या आदिवासी पाड्यांवरील स्थानिक बंधू भगिनी छान सेवा देतात.
शुलपाणि झाडी ते गुवार. नर्मदा मैया दक्षिणतट.
।। नर्मदे हर।। नर्मदामैया किनाऱ्यावरील सेवाश्रम
मैया किनाऱ्यावर दर किलोमीटरवर सेवाश्रम आहेत अगदी शुलपाणिच्या झाडीत ही हिरालाल रावत(बोरखेडी),कामताप्रसाद(कुली), लखनगिरीबाबा(घोंगसा), काळूराम वर्मा(भादल),सोमनाथ परमार(धडगांव),भीला ढोले(मोलगी),खुंटामोडी येथे मां नर्मदासेवाश्रम असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.श्री.प्रकाश धांडे व्यवस्थापक आहेत,कुलदीप कुलकर्णी (वडफळी), माथासर,झरवाणी इथेही सेवाश्रम आहेत.
गोराग्राम इथे बरेच आश्रम आहेत.पुढे फुलवाडी,रामपरा,मांगरोल येथेही सेवाश्रम आहेत.
गुवार येथे तपोवन आश्रम हा स्वामी पुर्णानंद यांचा नितांत सुंदर निसर्ग रम्य आश्रम असून निवास भोजन व्यवस्था आहे. एकादशी व अमावस्या सोडून प्रत्येक शुक्रवारी रात्री आपल्या दालना बाहेर येऊन पालखी सोहळ्यात सामील होतात.एरवी फक्त रात्री दालनाच्या खिडकीतून दर्शन देतात. वयोवृद्ध संत आहेत.
तपोवन आश्रमाच्या पुढे रामानंद आश्रम असून स्वामी अभिज्ञानंद हे सहा महिने केदारनाथ येथे असतात. येथे पारदेश्वरलिंग आहे. निवास भोजन व्यवस्था आहे. तिथून थोडे पुढे सिताराम आश्रम असून इथेही सर्व व्यवस्था आहे.
कुंभेश्वर ते भालोद.नर्मदामैया दक्षिणतट.
।।नर्मदे हर।। नर्मदातीरावरील सेवाश्रम
कुंभेश्वर इथेही एक आश्रम आहे तसेच कुंभेश्वर व शनिदेव मंदिरा समोर सौ.जागृति सोमण व श्री. रवि सोमण हे दांपत्यही सेवा देतात.रवि हा स्वामी समर्थ अनुग्रहित चंदुलाल महाराज यांचा पुत्र आहे. त्यांच्या कडे स्वामींच्या प्रसाद पादुका आहेत.
पुढे हनुमंतेश्वर इथे कंचनबन आश्रम आहे.ह्यालाच दिल्लीवालेका आश्रम असेही म्हणतात. पुढे पोयचा,नरखेडी इथेही आश्रम आहेत. रुंड गांव इथे करझन मैया व नर्मदामैया संगमावर ही एका टेकडीवर आश्रम आहे.
करझनमैया पार शुकदेव तीर्थ पुरातन मंदिर आहे. पुढे पाटणा नंतर ओरी कोटेश्वर इथे सुंदर मंदिर व आश्रम सर्व व्यवस्थेसह आहे. कांदरोज इथे कार्तिकेश्वर मंदिर व आश्रम निवास भोजन व्यवस्थेसह आहे.
पुढे असा येथे संत दगडूबापू आश्रम व वृद्धाश्रम सर्वसोयीयुक्त आहे. वेलूग्राम इथे हनुमान मंदिर व सदाव्रतसेवा आहे. पुढे भावपुरा येथे टेकडीवर आश्रम आहे.
सरसाड नंतर शाश्वत हनुमान मंदिर आश्रम,मणी नागेश्वर इथे मंदिर व सर्व व्यवस्था असलेला मोठा आश्रम आहे.
भालोद. इथे श्रीएकमुखी दत्त मंदिर आहे.आपले शरदचंद्र प्रतापे महाराज. यांना ही दत्तमुर्ति बडोदा येथील निखाडेमाताजींनी दिली आहे.भगवान दत्तमहाराजांनी निखाडेमाताजींना व प्रतापेमहाराजांनाही दृष्टांत देऊन दत्तमहाराज स्व इच्छेने इथे विराजमान झाले आहेत.
भालोद ते जगदीश मढी झगडिया. नर्मदा भैया दक्षिणतट.
।।नर्मदे हर।। नर्मदा तीरावरील सेवाश्रम
भालोदच्या पुढे अविधा या गांवात श्रीरामेश्वर हे पुरातन मंदिर असून तिथेच गावकरी परिक्रमा वासींची निवासव्यवस्था करतात व सदाव्रतसेवाही देतात. पुढे लाडवावड येथे श्रीजगन्नाथ मंदिर असून तिथे छोटीसी पण सुंदर निवास व भोजन व्यवस्था आहे.
पुढे जगदीश मढी हे सुंदर स्थान मैया किनाऱ्यावर च आहे. सुंदर श्रीराम मंदिर आहे.इथे परिक्रमावासींसाठी मोठे हॉल आहेत.इथे वृद्धाश्रमही आहे.
मंदिर आणि आश्रमाच्या सभोवताली घनदाट वृक्षराजी असून मैयाच्या शीतल जलवायुचा शांत निवांत पणा दमल्या थकलेल्या जीवांसाठी अतिसुखकारक असतो.
जगदीश मढी चे सर्वेसर्वा जगदीश महाराज महामंडलेश्वर आहेत. सर्वच्या आणि विसरत यांचे भोक्ते असलेले महाराज स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. आश्रम परिसरात सतत फिरत राहुन स्वच्छता,शिस्त याकडे बारीक लक्ष ठेवून असतात.
इथे चहा मिळत नाही तर स्वास्थवर्धक उकाळा म्हणजे तुळस,काळीमिरे,सुंठ,गवती चहा आणि मध घातलेले काषायपेय एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी मिळते. इथे बालभोग हा प्रकार नाही.सकाळी नऊ व संध्याकाळी सहा वाजता भोजनप्रसाद मिळतो. महाराज स्वत: सर्वांबरोबर पंगतीत भोजनप्रसाद ग्रहण करतात.
जगदीश महाराज स्पष्टवक्ते असून राजकारण समाजकारण याबद्दल स्पष्ट विचार ठेवणारे असून आधुनिक विज्ञानाचा वापर करणारे आहेत.
जगदीश मढी. जगदीश मढी पुढे सुरु.....
आश्रमात अखंड राम धून व तुलसी रामायणपाठ सुरु असतो. सकाळी व संध्याकाळी श्रीराम मंदिर ते मैयातट व परत मैयातट ते मंदिर अशी शंख,झांजा, यांच्या गजरात फेरी निघते.स्वत: महाराज त्यात सहभागी असतात.
महाराजांनी आपल्या दासबोध व मनाचे श्लोक यांचाही अभ्यास केलेला आहे. शिवाजीमहाराज, पृथ्वीराज चौहान,राणा प्रताप यांच्या बद्दल नितांत आदराने महाराज बोलतात.
महाराज आधुनिक विज्ञानाचा ही सहज वापर करतात. फर्डे इंग्लिशही बोलतात. ते अगदी स्पष्ट वक्ते आहेत.
वृद्धाश्रमा सारखे सेवाकार्य असुनही आश्रमाला कुठलेही सरकारी अनुदान नाही. लोकसहभागातून संस्थेचा कारभार सुरु आहे.
परिक्रमावासींची बस आली तर पहिले बसची चावी स्वत:चर्या ताब्यात घेतात व बस परत निघण्याच्या वेळी आधी बसव्यवस्थापका समवेत फिरुन सर्वत्र अगदी संडास बाथरुमपासुनची सर्वत्रच्या पाहून मगच ड्रायव्हरला बसची चावी देतात.
मैया किनाऱ्यावरील आश्रमातील सर्वोत्तम आश्रम आहे जगदीश महाराजांचा जगदीशमढी आश्रम.
II तीर्थ जननी नर्मदा ll नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर सेवावश्रम दक्षिण तट.
जगदीशमढी ते अंकलेश्वर, हनुमान टेकडी ते विमलेश्वर.
मोटासांझा,रानीपुरा,उचेडिया नंतर गुमानदेव येथे मोठे हनुमान मंदिर असून इथे भोजन प्रसाद व निवास व्यवस्था आहे. पुढे रेल्वे क्रॉसिंग नंतर उजवीकडील मोठ्या भरुचरोडने नानासांझा,गुवाली,भुलदचौकडी येथे फ्लायओव्हर ब्रिजखालून हायवे क्रॉस करुन डावीकडे वळून साधारण अर्धा कि.मि.वर उजवीकडील अंकलेश्वर रोड.मांडवा,नौगांव थोडे पुढे डावीकडे रोकडिया हनुमान मंदिरात सदाव्रत मिळते, सभामंडपात राहता येते.तिथेच जवळचे गावकरी गांवातील कम्युनिटी हॉल मधे निवास व्यवस्था करतात व भोजन प्रसादाची,चहापाण्याची सोय विनंती केल्यास करुन देतात.
पुढे सोमारा,काशिया GETO,अंदाडा,रेल्वे क्रॉसिंग चौकडी समोरचा रस्ता अंकलेश्वर सुरु. निरांतनगर,हस्ती तलाव,हासोट रोडने रामकुंड.येथे श्रीराम मंदिर व आश्रम आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे आश्रमावरील रस्त्याने पुढे अंदाजे पांच एक कि.मि. वर बलबलाकुंड येथे शिवमंदिर,नर्मदे हर म्हटल्यावर पाण्यात बुडबुडे येणारे बलबलाकुंड व आश्रम असून निवास व भोजन व्यवस्था आहे.
पुढे हासोट रोडवरुन तेलवा,मोटवाडा,कलम,आस्ता नंतर हासोट येथे सुर्यकुंड,आश्रम आहे. पुढे विमलेश्वर रोडने अंभेठाफाटा,वासनोली फाटा,वाडोदरा येथे उजवीकडे रस्त्यालगतच देवी मंदिर आहे. पुढे हनुमान टेकडी येथे हनुमान व शनिमंदिर व आश्रम आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे कोटेश्वर येथेही कोटेश्वर महादेव मंदिर व आश्रम असून निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुर्वी येथूनच नावा सुटत असतं.पण आता सुटत नाहीत. पण हे एक सुंदर पौराणिक तीर्थस्थळ आहे. असे सांगतात की सर्व तेहेतीस कोटी देवांची ही तपस्या स्थली आहे. नर्मदे हर.
पुढे साणझाफाटा,कठपोरफाटा नंतर विमलेश्वर फाटा येथून उजवीकडील रोडने वल्लभेश्वर महादेव दर्शन करुन विमलेश्वर गावातून आश्रमात जायचे. विमलेश्वर सह पंचमहादेव आहेत.इथे सरकार तर्फे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
इथेच बोटींसाठीचे रजिस्ट्रेशन करावे लागते.
अंकलेश्वर ते विमलेश्वर. नर्मदामैया दक्षिणतट.
।।नर्मदे हर।। नर्मदा किनाऱ्यावरील सेवाश्रम
अंकलेश्वर येथे रामकुंड येथे श्रीराम मंदिर व आश्रम असून निवास व भोजन व्यवस्था आहे.
पुढे बलबलाकुंड येथे शिवमंदिर व आश्रम असून निवास व भोजन व्यवस्था आहे. इथे एका कुंडातील जलामधून नर्मदे हर असे जोरात म्हटले की बुडबुडे उठतात. नर्मदे हर.
पुढे हनुमान टेकडी इथे हनुमान,शनिदेव मंदिर असून निवास व भोजन व्यवस्था आहे. पुढे कोटेश्वर इथे कोटेश्वर मंदिर निवास भोजन व्यवस्था आहे. इथूनच थोडे दुरुन कठपोर येथून पुर्वी बोटी सुटत असतं पण आता नाही.
पुढे विमलेश्वर येथे विमलेश्वर व पंच महादेव मंदिरे असून निवास व भोजन व्यवस्था आहे. इथेच भरतीच्या वेळेप्रमाणे बोटींसाठीची नांव नोंदणी होते.शुल्क असते. इथून साधारण दीड दोन कि.मि. डांबरी रोड ने वाटचाल करत बोटी सुटण्याच्या धक्क्या पर्यंत जायचे. व बोटीत बसून रत्नसागरातील चार तासांचा चित्तथरारक प्रवास करुन मिठीतलाई येथील नवीन बांधलेल्या धक्क्यावर उतरलो की आपला मैयाच्या दक्षिण तटावरील प्रवास संपून उत्तर तटावरून प्रवास सुरु होतो. नर्मदे हर.
पुर्वी हा धक्का नव्हता तेव्हा बरेच मागे कमरे एवढ्या पाण्यात उतरुन सॅक, सामान डोक्यावर घेऊन कसातरी तोल सांभाळत एकदीड कि.मि.चालत किनाऱ्यावर यावे लागत असे.
मिठीतलाई ते नीलकंठेश्वर. नर्मदामैया उत्तरतट
।।नर्मदे हर।।
नर्मदा तटावरील सेवाश्रम - उत्तरतट
मिठीतलाई येथे गोड्या पाण्याची विहीर असलेला खूप मोठा आश्रम असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत दिले जाते. पुढे अंभेठा येथे कृष्णानंद आश्रम आहे.इथेही निवास व्यवस्था व सदाव्रत मिळते. पुढे सुवा येथे सिंगनाथमहादेव मंदिर.निवास व्यवस्था आहे.गांवकरी भोजन व्यवस्था करतात.
पुढे केसरोल गांवात श्रीराम मंदिरात सदाव्रत घेऊन व्हरांड्यात निवास करता येतो. एकलदरा नंतर भाडभूत इथे नवीनच झालेले नर्मदा मंदिर व केवट सेवाकेंद्रात छान हॉलमध्ये निवास व भोजन व्यवस्था आहे.
पुढे वडावा व दशान या दोन गावांच्या मधे श्रीमहांकालेश्वर मंदिर असून निवास व्यवस्था आहे. दशानचे गांवकरी भोजन व्यवस्था करतात. निसर्गसुंदर स्थान आहे.
दशानगांवात मंदिर व मशीद यांची एक सामायिक भिंत आहे.
पुढे कुकर वाडा गांवाच्या पुढे त्रिगुणातीतधाम शिवमंदिर, आश्रम आहे तिथे निवास भोजन व्यवस्था आहे.
भरुच शहरात अनेक मंदिरे आश्रम आहेत. शहराच्या शेवटी निलकंठेश्वर मंदिर,आश्रम,भक्तनिवास असून खूप मोठे संस्थान आहे. भोजन निवास व्यवस्था आहे.
नीलकंठेश्वर ते मंगलेश्वर नर्मदामैया उत्तरतट.
।।नर्मदे हर।। नर्मदा तटावरील सेवाश्रम
उत्तर तट
निलकंठेश्वर नंतर जुना तवरा इथे रस्त्याच्या उजवीकडे कन्नूमामा यांचा छोटासा चंद्रमौळी सेवातेजश्रीने चमकणारा सेवाश्रम आहे. आपल्याला निवास करायचा असेल तर शेजारच्या भल्यामोठ्या वृक्षराजी तळी आसन लावू शकता नाही तर चहा बिस्कीट,भोजन प्रसाद घेऊन पुढे.
कडोड येथे कोटेश्वर मंदिराच्या मागे पुरातन धर्मशाळा आहे तिथे गांवकरी सेवा देतात.
पुढे मंगलेश्वर इथे भारद्वाज आश्रम आहे तिथून मैयापात्रात कबीरवडचे दर्शन होते.येथे भोजन प्रसाद व निवास व्यवस्थाही आहे पण बहुतेक परिक्रमावासी ज्योतिबेनची सेवा स्वीकारणेच पसंत करतात.
मंगलेश्वर येथील ज्योतिबेन,बोनीबेन यांच्या घरात पन्नास एक वर्षांपासून परिक्रमावासींची सेवा केली जात आहे.
मंगलेश्वर ते अनुसया.नर्मदामैया उत्तरतट.
।।नर्मदे हर।। नर्मदा तटावरील सेवाश्रम उत्तर तट
मंगलेश्वरच्या पुढेही प्रत्येक गांवात मंदिरे आहेत,सेवाही मिळते. धरमशीला येथे मिनी शिर्डीधाम येथे साईबाबा मंदिर व सेवाश्रमही आहे. पुढे नांद या गांवात बाहेर मैयातटावर कबीर आश्रम येथे निवास व सदाव्रत सेवा मिळते. तसेच पुढच्या गांवातुनही असेच आहे.
नारेश्वर येथे श्रीरंगावधूत महाराज समाधी मंदिर,भक्त निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे. भव्य व प्रसिद्ध ठिकाण आहे.
डेरोलीच्या पुढे मैया किनारी नवीन आश्रम झाला आहे. पुढे मालसर येथे डोंगरे महाराज समाधी मंदिर,सत्यनारायण मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर,योगानंद आश्रम वगैरे बरीच ठिकाणे सेवाश्रम आहेत.
सिनोर येथे श्रीराम मंदिर, गणपती मंदिर येथे निवास भोजन व्यवस्था आहे. पुढे अनसुया येथे एरंडीमैया व नर्मदामैया संगम इथे माता अनुसया व दत्त मंदिर असून सेवाश्रमही आहे.
अनसूया ते तिलकवाडा.
।।नर्मदे हर।। नर्मदा तटावरील सेवाश्रम उत्तर तट
अनसूयाच्या पुढे झंझड इथे शंकरेश्वर महादेव,कोटेश्वर,बरकाल,इथे प्रभासेश्वर हे सुर्यपत्नी प्रभा यांची तपोभूमि आहे. इथून मैया किनाऱ्यावरील वाटचाल करत असताना दक्षिण तटावरील शुकतीर्थ व व्यासबेट यांचे दर्शन होत असते. बरकालमधे निवास,भोजन प्रसाद व्यवस्था असणारे काही आश्रम आहेत. मोलेथा,येथे आसारामबापू आश्रम आहे निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे.इथून पुढे जंगलातील पायवाटेच्या शॉर्टकटने जाताना श्रीरंगसेतूच्या अलिकडे टपकेश्वर महादेव वा गुप्तेश्वर महादेव हे ठिकाण खूप छान आहे येथील बाणलिंग हे चंद्रकांत असून त्यामधून अविरतपणे जल पाझरत असते. पुढे हायवे क्रॉस करुन डावीकडील रस्त्याने प्रथम मृत्युंजय आश्रम हा खूप मोठा आश्रम आहे पुढे बद्रिकाश्रम,येथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. नंदनाथ,गंगनाथ, साईलिला सेवाकेंद्र,इथे भोजन प्रसाद व्यवस्था आहे परंतु निवास व्यवस्था फक्त स्त्री परिक्रमावासींचीच होऊ शकते. चांदोद इथे बरीच मंदिरे,आश्रम, सेवाकेंद्र आहेत.
ओरी,मैया व गुप्त सरस्वती त्रिवेणी संगम,कर्नाली नंतर कुबेर भंडारी येथे भक्तनिवास,दुसरेही आश्रम आहेत.
पुढे मोरया इथे हनुमान मंदिरात सेवा मिळते,नडगांव चैतन्यवाडी इथे सौ. मनुबा महेंद्रसिंग वाघेला सेवाश्रम, तिलक वाडा येथे नर्मदे हर अन्नक्षेत्र इथे नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका लिहिणारे स्वामी आत्मकृष्ण असतात. निवास व्यवस्थाही आहे.पुढे पोलिस स्टेशनमागे वासुदेव कुटीर आहे. इथे श्रीसमर्थ रामदासस्वामी स्थापित मारुति मंदिर असून इथे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी चातुर्मास केला होता. त्यांच्या वापरातील काही वस्तू व हस्तलिखित पत्रे श्री.पंड्या यांच्या घरी बघायला मिळतात. वासुदेव कुटीर मधे विष्णुगिरीमहाराज आहेत.उत्तम निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते अमावास्या असा संपुर्ण चैत्र महिना उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेत चे नियोजन आपल्या या वासुदेव कुटीर मधून श्री.विष्णूगिरी महाराजांच्या तर्फे केले जाते. नर्मदे हर.
मणीनागेश्वर ते मंडलेवर. नर्मदामैया उत्तरतट.
।।नर्मदे हर।। नर्मदा तटावरील सेवाश्रम
उत्तर तट
तिलकवाडाच्या पुढे,मणी नागेश्वर,गरुडेश्वर,नानी अंबाजी,झरिया,वगाछ,भाखा,कानाबेडा, कवाट, येथून हापेश्वर येथे जाता येते नवीन मंदिर छान बांधलेले आहे.इथे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. एका शिवपिंडी भोवती आपल्या मुळांचा विळखा घालून वडाचे झाड वाढते आहे. येथेही निवास भोजन प्रसाद व्यवस्था आहे. येथून कडीपानी,बखतगढ़ मार्गे डहीला जाता येते. किंवा कवाट येथे परत येऊन रेणदा मार्गे जाता येते.सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. नर्मदे हर.
रेणदाच्या पुढे छकताल येथे मध्यप्रदेशात प्रवेश होतो. छकताल येथे गायत्री मंदिरात व्यवस्था होते.इथून पुढे सर्व परिक्रमा मध्यप्रदेशामधूनच असेल.
छकताल पासुन जंगलातील डांबरीरोडनेच वाटचाल आहे. मोठे आश्रम नाहीत पण प्रत्त्येक गांवात गावकरी छान सेवा देतात. सोंडवा इथे हनुमान मंदिरात,वालपुर शिवमंदिर,पुढे हथिनीमैया पुलावरून पार केली की लगेच डावीकडे छान आश्रम आहे.
डही येथे हनुमान मंदीरात सेवाश्रम आहे. इथे गरुडेश्वर पासुन सुरु झालेली उत्तर तटावरील शुलपाणिची झाडी समाप्त होते.
नया कोटेश्वर, मंडवाडा,बोधवाडा,एकलबाडा,सेमलदा,गांगली,बडा बडदा,बाकानेर,कालीबावडी, बडी छितरी,मतलबपुरा सर्व ठिकाणी आश्रम सेवाकेंद्र आहेत.
मजल दर मजल मांडवगड लाही श्रीराम मंदिर,सेवाश्रम आहे. मांडू उतरल्यावर धामनोद येथे गुलझारी हनुमान मंदिर,खलघाट येथे सेवाश्रम,मोरघडी येथे सेवाव्रती, सहस्त्रधारा येथे दत्त मंदिर, महेश्वर येथे सप्तमातृका मंदिर, विठ्ठल मंदिर.मंडलेश्वर इथे श्रीराम मंदिर हे गोंदवलेकर महाराजांनी बांधलेले आहे, दत्तमंदिर, येथे निवास व्यवस्था आहे.श्री.सुधाकर भालेराव हे व्यवस्थापक आहेत.राधाकृष्ण मंदिर,इथेही व्यवस्था आहे. काशिविश्वनाथ मंदिरात थोरले स्वामी श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे वास्तव्य होते व इथे त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा स्तोत्र साहित्याचे लेखन केले.
इथे श्री.अनिल जहागिरदार हे सेवा देतात.
II तीर्थ जननी नर्मदा ll
नर्मदा मैया किनाऱ्यावरील मंदिरे,सेवाव्रती आश्रम.उत्तरतट.
मंडलेश्वर ते खेडी घाट.
मंडलेश्वर गावातील रोडने प्रथम लागते छप्पन देव मंदिर.पुढे गुप्तेश्वरमहादेव गुंफा मंदिर. याच ठिकाणी आदि शंकराचार्यांनी परकाया प्रवेश केला व त्यांचा देह याच गुहेत सहा महिने सुरक्षित ठेवला होता नंतर आचार्यांनी परत स्वदेहात प्रवेश करुन मंडनमिश्र व त्यांच्या पत्नीचा शास्त्रार्थात पराभव करुन त्यांना आपले शिष्य केले होते.नर्मदे हर. इथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे खरगोन रोडवरुन थोडी वाटचाल केल्यावर डावीकडील कच्च्या रस्त्याने महेश्वर पॉवर प्रॉजेक्ट गेटजवळ रामू केवट यांची चहाची टपरी आहे.ते परिक्रमावासींना सेवा देतात.
समोरच्या रस्त्याने नानीनदीमैया पार करुन वीटभट्टी जवळून समोरच्या रस्त्याने नया सुलगांव दगडी मंदिर आहे.श्री.प्रेमचंद पाटिदार सेवा देतात.पुढे गोगांवां इथून डावीकडे वाटचाल करुन बडवाह हायवेवर जाता येते.गोगांवां नंतर कच्च्या रस्त्याने मालननदीमैया पार करुन पथराड येथे मंदिरात सदाव्रत, गांवकरी भोजन प्रसाद व्यवस्था करतात मंदिरात निवास करता येतो.पुढे कच्च्या रस्त्याने चिरागखान येथून डावीकडील रोडने कुंभियामार्गे कतरगांवला बडवाह हायवे लागतो. चिराग खान येथून उजवीकडील रोडने बेगांवा.येथे राधाकृष्ण मंदिरात निवास व्यवस्था आहे.सदाव्रत मिळते. पुढे पितामली येथे पिप्पलेश्वर महादेव व राममंदिर आहे.निवास व्यवस्था आहे.सदाव्रत मिळते,गांवकरी भोजन प्रसाद व्यवस्था करतात. पुढे धारेश्वर येथे धारेश्वर किंवा दारुकेश्वर महादेव मंदिर आहे. खुलारनदीमैया पार करुन सेमलदा येथे मनकामेश्वर महादेव मंदिर येथे साधूकुटी,भागवतानंद परमहंस सेवाश्रम असून सदाव्रत मिळते. पुढे गंगातखेडी इथे गंगादशहरामधे सप्तमीला गंगामैया इथे नर्मदामैया स्नानासाठी येते. पुढे विमलेश्वर येथे बर्फानि बाबांचा आश्रम असून तिथे आदि शंकराचार्य व महावतार बाबाजी यांच्या मुर्तीची स्थापना केली आहे. इथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. जवळच टेकडीवरील चंद्रेश्ववर मंदिरात सोळा मत वजनाची घंटा आहे.
पुढे कटघड़ा येथे नर्मदाश्रममधे व्यवस्था आहे. तसेच आपले अनय अविनाश देशमुख पंडीतजी यांचे घर, आश्रम व शिव दत्त मंदिर आहे. सदावर्ते देतात.आधुनिक सुखसोयींनी युक्त स्वयंपाकघरात स्वयंपाक करुन भोजन प्रसाद घेणे व निसर्गरम्य परिसरात नर्मदा मैयाचे जलप्रवाह मधूर संगीत ऐकत केलेले वास्तव्य खूपच आनंददायी असते.
पुढे चालू - पुढे मेहता खेडी
येथे भक्तराज महाराजांचे गुरु श्रीअनंतानंद साईश यांची तपोभूमी असून गुरुबंधू भूरानंद महाराज यांचीही तपस्या स्थलीअसून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे खेडी घाट किंवा नावघाट खेडी येथे रेल्वे पुलाजवळ श्रीराम महाराज यांचा समर्थकुटी हा आश्रम आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. या शिवाय दादा दरबार आश्रम व मोठे हॉस्पिटल आहे तसेच अनेक आश्रम आहेत.
बडवाह खांडवा हायवे ओलांडून पलिकडील रोडने गेल्यावर दगडूबापू आश्रम वृद्धाश्रम अन्नक्षेत्र आहे,आश्रमाजवळच चोरलनदीमैया व नर्मदामैया संगम आहे. रामानंद भक्तमाल आश्रम, करपात्री महाराजांच्या शिष्या असलेल्या माताजींचा आश्रम आहे.
दगडू बापू आश्रमा जवळून चोरलमैया पार करुन पुढे जाता येत नाही कारण चोरलमैयाच्या प्रवाहातुन नर्मदामैया बडवाह येथील नागेश्वर मंदिरातील कुंडामध्ये आलेली आहे. म्हणून रोडने बडवाहला जाऊन नागेश्वर मंदिरातील कुंड उजवीकडे ठेवून चोरलमैया पार करावी.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया तटावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र, उत्तर तट
खेडी घाट ते च्यवनाश्रम
चारुकेश्वर येथील दगडूबापू आश्रमात जवळून चोरलमैया पार करुन पुढे जंगलातील पायवाटेने जाता येते पण बडवाह येथील नागेश्वर मंदिरातील कुंडामध्ये चोरलमैयाच्या प्रवाहातुन नर्मदामैया आलेली आहे म्हणून दगडूबापू आश्रमात जवळ चोरलमैया पार न करता बडवाहला येऊन नागेश्वर
कुंड उजवीकडे ठेवून चोरलमैया पार करावी. चारुकेश्वर ते बडवाह चोरलमैयाच्या किनाऱ्याने कठीण असल्याने खांडवा बडवाह रोडनेच सर्वजण जातात.
बडवाह येथे नागेश्वर मंदिरा जवळ गायत्री मंदिर असून शेजारी पुरातन पुरातन धर्मशाळा आहे.सदाव्रत मिळते. पुढे उजवीकडील रस्त्याने दोन घरांमधील अगदी चिंचोळ्या गल्लीतून चोरलमैया किनाऱ्यावर पोहोचतो.इथे चोरलमैयाला लोकांनी अक्षरशः गटारगंगा करुन टाकले आहे. मानवाच्या या अक्षम्य अपराधाबद्दल मनोमन खजील होतं चोरलमैयाची क्षमा मागत घाणीपासून आपला कसातरी बचाव करत तोल सांभाळत पार होऊन वर आलो की घरांच्या अंगणातच असलेल्या म्हशींच्या गोठ्यां मधून वाट काढत आपण रोडवर यावे.उजवीकडील रस्ता पुर्वी चोवीस अवतार जैन मंदिर,पोटाला कोठावा मार्गे च्यवनाश्रम जात असे पण आता ओंकारेश्वर धरण झाल्यामुळे तो मार्ग बंद झाला आहे.
क्रमशः
च्यवनाश्रम - ही च्यवनाश्रम भूमि च्यवनॠषिंची तपोभूमि आहे.
च्यवनॠषि तप:श्चर्या करत असताना त्यांच्या अंगावर वारुळ तयार झाले होते. त्या भागातील राजा शर्याति यांची कन्या सुकन्या ही सहज तिकडे आली असता त्या वारुळातून लुकलुकणारे चमकदार डोळे पाहून हे काय आहे या बालसुलभ कुतुहलाने तिने काटा खुपसला,रक्ताची धार लागलेली पाहून ती घाबरली,राज सेवकांनी वारुळ बाजुला केले तर आतमधे असलेले तपस्वी काटा टोचल्यामुळे आंधळे झालेले पाहिल्यावर राजाने च्यवनॠषिंची क्षमा मागितली व मुनिंनी मोठ्या मनाने क्षमा केलीही पण सुकन्या ने त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला.
पुढे एका यज्ञात च्यवनमुनिंनी रुढी परंपरे विरुद्ध जाऊन देव वैद्य अश्विनीकुमारांना यज्ञयाग दिला. अश्विनी कुमार प्रसन्न झाले व त्यांनी तेथील कुंडात च्यवनमुनिंना घेऊन डुबकी मारली व च्यवनमुनिंना डोळे व तारुण्य मिळवून दिले. आयुर्वेदिक औषधी च्यवनप्राश ही च्यवनमुनिंनीच प्रथम तयार केली.
च्यवनमुनिंना तरुण केले गेलेले कुंड आश्रमाच्या अगदी प्रवेशद्वारातच असून स्वच्छ जलात कमलपुष्पे फुललेली आहेत.याच कुंडातील जल जमिनी खालुन वाहात बाहेरील गोमुखातून बारमाही वाहात असते. सतत वाहणारा जलस्रोत असूनही गोमुखा भोवतालच्या फरशीवर अजिबात शेवाळ नसते. पाणी एवढ्या थंडीतही स्नान करण्याजोगे कोमट असते. आश्रमाची छानशी गोशाला असून परिक्रमावासींना दूध देतात.
नितांतसुंदर ठिकाण आहे, सेवेसाठी तत्पर सेवेकरी आहेत परिक्रमावासींनी लवकरच पोहोचले असले तरी मुक्काम करावा असे स्थान आहे.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र उत्तर तट
च्यवनाश्रम ते कुंडी
च्यवनाश्रमच्या बाहेर पडल्यावर उजवीकडील कच्च्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर अंतरावर डांबरी रोड लागला की समोरच कुंडीतल्या जाणारा कच्चा रस्ता आहे.डांबरीरोड ओंकारेश्वर धरणाच्या कॉलनी कडे जातो व तोच पुढे कोठावा गावाकडे जातो पण त्यापुढे धरणाच्या जलसाठ्यामुळे मार्ग नाही म्हणून परिक्रमावासींनी कुंडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यानेच जावे.दुतर्फा जंगल आणि मधून लाल मुरमाचा घाट रस्ता.घाट काही फारसा अवघड नाही. साधारण दोन कि.मि.वर एक उतार लागतो तिथे सुलगांवकडून येणारा रस्ता मिळतो.उतार उतरल्यावर एका नाल्याचा सांडवा म्हणजे छोटा पुल लागतो तिथे एका ओट्यावर श्री हनुमानजी विराजमान आहेत.हे ठिकाण आहे उकाळा.पुलाच्या उजवीकडे एका मोठ्या वृक्षा खालुन एक पाण्याचा प्रवाह वाहतो,पाण्यातुन बुडबुडे येत असतात.पाणी गरम आहे.स्नान करता येण्यासारखे. अगदी पहाटे सकाळी बरेच गरम असते. पुढे याच जंगलमार्गाने साधारण तीन किलोमीटर वर कुंडी हे गांव येते.
कुंडी छोटेसे गाव आहे.गांवाच्या सुरवातीला हायस्कूल, ग्रामपंचायत आहे.थोडे पुढे गेल्यावर डावीकडे श्रीराम मंदिर आहे.इथे परिक्रमावासींची निवास व भोजन व्यवस्था आहे. मुळच्या महाराष्ट्रीय असणाऱ्या श्रीमती किरण डोंगरे या माताजी ही सेवा देतात.
किरण डोंगरे माताजी अतिशय प्रेमळ लाघवी आहेत. आजुबाजूच्या गावांमधून ॐ भवति भिक्षां देहिI करुन त्या मंदिरात पुजा अर्चा करणे, परिक्रमा वासींसाठी भोजन प्रसाद तयार करणे या सेवा हसतमुखाने करतात. त्यांचा प्रेमळ आग्रह टाळून आपण पुढे जाऊच शकत नाही कुंडीला मुक्काम होतोच.
आपल्या पतीच्या मागे त्यांनी मोठ्या हिंमतीने या गावातच राहुन आपल्या चार मुलींचे पदवी पर्यंत शिक्षण,विवाह करुन दिले आहेत.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट.
II कुंडी ते पिंपरी II
अरुणोदय समयी कुंडी हून डांबरी रोड वरुन वाटचाल सुरु केली की ती छान आनंददायी असते. अर्धा एक किलोमीटर वर डावीकडील जंगलातील पायवाट आपल्याला पावलांखाली वाळलेल्या पानांचा चूरचूर आवाज आणि पक्षी लक्ष कुजितम् हे अनुभवत शॉर्टकट ने अर्ध्या पाऊण तासातच बडेल येथे घेऊन जाते.
बडेलही कुंडी सारखेच छोटेसे पण नीटनेटके गांव आहे. इथे श्रीराम मंदिर आहे.हनुमान मंदिरा जवळील धर्मशाळेत साधारण निवास व्यवस्था आहे.गांवकरी सदाव्रत देतात.
बडेल ते मेहेंदी खेडाही डांबरी रोड आहे. दुतर्फा असलेली हिरवीगार शेते आणि वृक्षराजी तील विहंगगान ऐकत केलेली चार किलोमीटरची वाटचाल अगदी पटकन होते. इथे मात्र कसलीही सोय नाही.गांवकरी आपल्याकडे बघतही नाहीत. नर्मदे हर. गांवाच्या शेवटी आडवे बांबू लावलेली फॉरेस्टची हद्द सुरु होते.
घनदाट जंगल साग,साल,खैर, अर्जुन वृक्षराजीने बहरलेले आहे.पण जलस्रोत नाहीत म्हणून कुंडी हून निघताना आपल्या जवळ पिण्याचे पाणी हवेच. साधारण तीन किलोमीटर वर येते तरानिया हे छोटेसे गांव.सुरवातीलाच रस्त्याच्या डावीकडे फॉरेस्ट चौकिदाराची एक छोटीशी बंगली आहे. तिच्या समोरुन उजवीकडील हिरव्यागार शेतांच्या बांधांवरुन गेलं की येते कणाद नदीमैया. छोटीशी दरड उतरुन तिच्या जवळ जायचं.खळखळ स्वच्छ जल असलेल्या त्या नर्मदामैयाच्या छोट्या भगिनीला जलस्पर्श करुन प्रणाम करायचा आणि जपून तोल सांभाळत तिला पार करायची.कारण पात्रात खूप दगड धोंडे असून फार निसरडं आहे. मधून मधून पाणी वेली झुडपे असलेल्या कणादमैयाचे पात्र बऱ्यापैकी मोठे आहे.
ही आहे अणू,रेणू,कण यांचा शोध लावणाऱ्या कणादमुनिंची तपोभूमि. मात्र या तरानिया गांवातही कसलीच सोय नाही. हां पण पाण्यात खेळणारी मुलं आपल्याला कणादमैया पार करायला आनंदाने मदत करतात. आपण जपून तोल सांभाळत कणादमैयाचे एवढे मोठे पात्र पार करतो पण स्थानिक बंधू मात्र बिनधास्त मोटरसायकल चालवत ये जा करत असतात.नर्मदे हर.
पलिकडील तटावरील दरड चढली की परत जंगल सफारी सुरु. जा जंगलात मोठ्या वृक्षराजी बरोबरच पारिजातकाची झुडपेवजा झाडे आहेत. इथेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गरम मात्र बरेच होते.
तीन-चार किलोमीटरवर येते पिंपरी.हे गांव बऱ्यापैकी मोठे आहे. बाजारपेठ आहे. तीन वर्षांपुर्वी येथे मनकामेश्वरी नर्मदा मंदिर बांधले आहे.मोठ्या मंदिराच्या वरच्या मजल्यावर नर्मदामैया स्थानापन्न झाली आहे. व तळमजल्यावर मोठ्या हॉलमध्ये परिक्रमा वासींची निवास व्यवस्था आहे. काही पलंग,गाद्या ब्लॅकेटसह व्यवस्था आहे. बाजुलाच अन्नपुर्णा गृह आहे.तिथे भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. स्नानगृहासह सर्व व्यवस्था आहे
या पिंपरीत बऱ्याच वर्षांपासून डॉ.सुरेश पाटील हे आपले मराठी बंधू रुग्ण सेवा व परिक्रमावासींची सेवा करत आहेत. कापडदुकानदार श्री.गुप्ता कुटुंब आपल्या दोन तीन दुकाने व घरे यांमध्ये सेवा देत असतात.
पिंपरी पुढे चालू.
च्यवनाश्रम ते पिंपरी साधारणपणे पंचवीस तीस किलोमीटर अंतर आहे व संपुर्ण प्रवास घनदाट जंगलातून असल्याने जरी आपण कुंडीला अकरा साडेअकरालाच पोहोचलो तरी भोजन प्रसाद घेऊन दुपारी निघून पिंपरीला जायचे म्हणजे उशीर होणार व पुढे मेहेंदी खेडा,तरानिया इथे कसलीही सोय नसल्यामुळे व घनदाट जंगलातून वाट असल्याने उशीर होऊन अंधार पडल्यावर जंगलात भरकटण्याची शक्यता असते म्हणून परिक्रमावासी बंधू भगिनींना माझी ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी कुंडीतल्या श्रीमती किरणजी डोंगरे माताजींचा प्रेमळपणे केलेला पाहुणचार व आग्रह स्विकारुन तिथेच श्रीरामाच्या सानिध्यात सत्संग करीत एक दिवस रात्र राहावे.
पिंपरीत एक दिवस जास्तीचा मुक्काम करुन सात आठदहाजण मिळून एक जीप ठरवून आपण धावडीकुंड म्हणजेच धाराजी येथे दर्शनासाठी जाऊन येऊ शकतो.ओंकारेश्वर धरणाच्या जलसाठ्यामुळे धाराजीचे कुंड ज्यामधे बाणलिंग मिळत असायची ते डूबले असल्याने दिसत नाही पण तीर्थक्षेत्र दर्शन होते. बाणलिंग काढून देणारे श्री.रामसिंग देवडा आता नाहीत ते चार वर्षांपूर्वी कैलासवासी झाले पण त्यांचे मोठे बंधू आपल्याला त्यांच्या जवळ असलेल्या बाणलिंगांपैकी आपल्याला हवे असेल ते व हवी असतील तितकी देतात.
सकाळी बालभोग घेऊन धावडीकुंड दर्शन करुन दुपारचा भोजन प्रसाद घेऊन आपण पुढे निघून सीतावन दर्शन करुन दहा किलोमीटर वरील रतनपुरला मुक्कामाला जाऊ शकतो. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
पिंपरी ते जयंती माता
पिंपरी हून एखादं किलोमीटर चाललो की थोड्या दूरवर एका टेकडीवर एक मंदिर दिसते,रस्त्या लगतच्या शेतांच्या बांधांवरुन आपण गेलो की कच्च्या रस्त्याच्या लगतची एक छोटीशी दरड चढली की आपण मंदिराच्या आवारातील पिंपळवृक्षा जवळ पोहोचतो.हा शॉर्टकट आहे.आपण डांबरी रोडने आलो तर घाट चढावा लागतो.हेच आहे सीतावन.श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यावर लक्ष्मणाने सीतामाईला इथेच वाल्मिकी मुनिंच्या आश्रमात सोडले होते अशी आख्यायिका आहे. लोखंडी गेट उघडून आत गेलो की मंदिरातील श्रीराम सीता लक्ष्मण यांचे दर्शन होते. जवळची छोटी दरड उतरली की एक कुंड आहे हे आहे सीताकुंड सीतामाई येथूनच पाणी भरत असे.
मंदिर आश्रमात निवास व भोजन व्यवस्था सरकार तर्फे असते कारण हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. येथील महाराज आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.नर्मदे हर.
पुढे तातुखेडी,निमनपुर,कांकड नंतर येते स्वच्छ सिमेंटचे रोड व निटनेटक्या संरचनेत बांधलेली घरे असलेले रतनपुर. इथे श्रीराम मंदिराच्या ओवरीत आपण राहू शकतो पण बाकी काही व्यवस्था नाही. पुजारी पंडीत आपली दखलही घेत नाहीत.पण मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या श्रीमती अमिरीबाई नथू काग मुकाति यांचे कुटुंब आपली आस्थेवाईकपणे चौकशी करुन सेवा देते.तसेच सरपंच श्री.राजेश देवडा निरोप मिळताच भोजन प्रसादाची व्यवस्था करतात. नर्मदे हर.
पुढे तीन किलोमीटर वर येते बावडीखेडा.इथून लक्कडकोट जंगलात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. उजवीकडील रस्त्याने लागते सेमली इथे सेवाकेंद्र असून निवास व सदाव्रत व्यवस्था आहे. श्री. विनोद द्विवेदी व्यवस्थापक आहेत.इथून पुढे नया प्रेमगढ़ येथून खांड किंवा जटाशंकरी नदीमैया पार केली की आपला लक्कडकोट जंगलात प्रवेश होतो.
बावडीखेडा येथून डावीकडील वाट आपल्याला घनदाट जंगलातून जंगल सफारी चा आनंद देत खांड किंवा जटाशंकरी नदीमैयाच्या किनाऱ्यावर घेऊन जाते.पुर्वी इथून लाकडी ओंडक्यावरुन तोल सांभाळत नदीमैया पार करावी लागायची.आता लाकडी साकव बांधला असल्याने सहज खांडमैया पार करुन पुढे जाता येते. एक घाटी चढून आपण जयंती माता मंदिरात येतो. नितांतसुंदर घनदाट झाडीत वसलेले आहे जयंती माता मंदिर. निवास भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. सुंदर जयंती माता,सुबकसे मंदिर आणि ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अशी चार वैदिक द्वारे असलेली यज्ञशाला आहे.
थोडी दूर दरीत भैरवनाथ गुंफा आहे. गुंफेत शिवपिंडी व धबधबा आहे. सुंदर स्थान आहे.
इथेही मुक्काम करावा रात्री आश्रमाच्या गेट बाहेर जाऊ नये कारण जंगली जनावरांचा वावर असतो. सकाळी चांगले उजाडल्यावर मग लक्कडकोट जंगलातून वाटचाल करावी.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट
जयंती माता ते पामाखेडी
जयंती माता मंदिर घनदाट जंगलात असल्याने स्नान,नित्य पाठ,बालभोग घेऊन चांगले उजाडल्यावर मग लक्कडकोट जंगलात जाण्यासाठी निघावे. बरोबर पिण्यासाठी पुरेसे पाणी ठेवावे कारण जंगल मार्गावर पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही.
दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे आणि मधून जाणारा कच्चा रस्ता. सुंदर रंगीबिरंगी पक्षांचा मधूर किलबिलाट मन प्रसन्न करतो.एक तासभर चाललो की उजवीकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हिरव्या बांबूचा बनवलेला वॉच टॉवर येतो. थोडावेळ फोटो काढावे,एकमेकांची थट्टा मस्करी करावी आणि पुढे निघावं
थोड्याच वेळात सेमली तिकठ्ठा येतो. उजवीकडील वाट सेमली,नया प्रेमगढ़ कडून येते, डावीकडे आपल्याला जायचं असलेल्या पामाखेडीला जाणारी वाट, पामाखेडी १७ कि.मि. असे लिहिलेला धोंडिबा म्हणजे माइल स्टोन. मागे आपण आलेली जयंतीमाताची वाट.
इथे एक मोडकी फॉरेस्ट चौकिदाराची टपरीवजा शेड व बोअर हॅण्ड पंप आहे.हापशाला पाणी आहे पण अतिशय मचूळ चव आहे तोंडातही घेववत नाही.
पांच दहा मिनिटं विश्राम करावा आणि पुढे निघावे. जंगलात मधे मधे छोट्या छोट्या नाल्यांवर वनविभागाने बांधलेले वसंत बंधारे व छोटे पुल लागतात.पावसाळ्यात जर चांगला पाऊस झाला असेल तर नाल्यांमधे स्वच्छ झुळझुळ वाहणारे पाणी आणि त्यात बागडणारे सुळकन् इकडे तिकडे जाणारे छोटे छोटे मासे, आजुबाजुला असलेल्या झुडुपांवर फुललेल्या रंगीबेरंगी फुलांवर बागडणारी सुंदर रंगीत फुलपाखरे पाहात पाहात आपण जंगलाच्या मध्यभागी असलेल्या हनुमानजीं जवळ पोहोचतो.
क्रमशः
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट
जयंती माता ते पामाखेडी
पुढे सुरु.
लक्कडकोट जंगलात मध्यभागी एका ओट्यावर उघड्यावरच हे रामभक्त हनुमान वीरासन मुद्रेत उभे राहून सर्वांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत. फॉरेस्टचे काही नियम असल्याने इथे छोटेसे सुद्धा मंदिर बांधण्यात आलेले नाही.फक्त ओट्यावर पत्र्याचे छत आहे. समोरच थोडे मोकळे मैदान असून कालापानी नावाचा नाला वाहात असतो. नावाप्रमाणे पाणी दिसायला अगदी काळेकुट्ट आहे पण ओंजळीत घेतले की एकदम स्वच्छ. इथे झाडांवर लांब मोठ्या चोचींचे केशरी लाल काळा अशा मिश्र रंगाचे मोठे हॉर्नबिल पक्षी बरेच दिसतात.
इथे थोडावेळ बसावं जवळ असेल ते हनुमानजींना नैवेद्य दाखवून खाऊन पोटपुजा करावी आणि पाणी पिळून पुन्हा जंगल सफारी वर निघावं. कालापानी नाल्यावरच्या छोट्या पुलावरुन थोडे पुढे गेल्यावर डावीकडे झाडावर लावलेला परिक्रमा मार्ग लिहून बाण दाखवलेला छोटा बोर्ड दिसतो.हा आहे जगन्नाथ कुंटेजींच्या पुस्तकात सांगितलेला शॉर्टकट.हे सगळे बोर्ड आपले मराठी साधक श्री.चंद्रकांत पालकर उर्फ नवनाथ महाराज यांनी स्वतः पत्रे कापून,पेंट करुन सायकलवरुन येत झाडांवर जागोजागी लावले म्हणून आता आपण परिक्रमावासी ही जंगलातली २६ कि.मि.अवघड वाट आता तीन चार किलोमीटर कमी करुन हनुमान स्थानापासुन तासाभरात पामाखेडीला पोहोचू शकतो. आठ दहा वर्षांपुर्वी ही वाट सगळ्यांना माहीत नव्हती तेव्हा सर्वचजण रोडनेच पामाखेडीला जात.आम्ही पहिल्या दोन तीन परिक्रमेत रोडनेच गेलो होतो. २०१६/१७ मधे तरानियाच्या फॉरेस्ट चौकिदाराच्या कुटीत राहून चंदू भाऊ पालकर(नवनाथ महाराज) यांनी एकट्याने हे सर्व बोर्ड बनवले व सायकलवरुन एवढा बोजा वाहुन आणत लावले. त्यांच्या या सेवाकार्याला तोड नाही. नर्मदे हर.
या पायवाटेने पुढे छोट्या छोट्या टेकड्या चढत उतरत काही नाले पार करत आपण तासादीडतासात हायवेवर पोहोचतो. इथून आतल्या रस्त्याने पामाखेडी गांव दीड दोन किलोमीटरवर आहे. पण इथे रस्त्यालगत असलेल्या पंचमुखी हनुमानजीं समोरच एक चंद्रमौळी सेवाकेंद्र आहे.इथे साधीशीच निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. इथेच मुक्काम करावा नाही तर इथे भोजन प्रसाद घेऊन थोडी विश्रांती घेऊन पुढे निघावे. पामाखेडी गांवात श्रीराम मंदिरात निवास व्यवस्था आहे,सदाव्रत मिळते. पुढे डंठा, नंदाना मार्गे धर्मेश्वर दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे. तिथे छान व्यवस्था आहे. धर्मेश्वर येथे काशिमुनि उदासिन महाराज आहेत. त्या बद्दल पुढच्या भागात. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र, उत्तर तट - धर्मेश्वरतीर्थ
धर्मेश्वर हे एक नव निर्मित म्हणजे साधारण दहा पंधरा वर्षांपुर्वी बांधलेले स्थान आहे. मूळ पुरातन धर्मेश्वर स्थान जिथे धर्मराज यांनी तपश्चर्या केली व शिवपिंडी स्थापन केली ते स्थान ओंकारेश्वर धरण झाल्यामुळे जशी चोवीस अवतारमंदिर,प्रेमगढ़,धाराजी वगैरे स्थाने नर्मदा मैयाच्या विशाल जलसाठ्यात सामावली गेली तसेच धर्मेश्वरही बुडणार होते. धर्मेंश्वर येथील काशिमुनी उदासिन महाराजांनी सरकार दरबारी लढा देऊन धर्मेश्वर शिवपिंडी मुळ स्थानावरुन काढून नवीन ठिकाणी स्थापन करण्याची परवानगी मिळवली.आणि मग हे नवीन धर्मेश्वर मंदिर जनतेच्या व सरकारच्या सहकार्याने बांधले व मुळ पुरातन स्थाना वरुन भगवान महादेव या नवीन स्थानावर स्थानापन्न झाले. आले देवाजीच्या मना मग कसलीच अडचण नसते
धर्मेश्वर येथे सुंदर सुविधा युक्त आश्रम आहे, इथे काशिमूनि उदासिन हे महाराज आहेत.
महाराजांचा जन्म काशी येथील शांडिल्य गोत्री ब्राम्हण कुटुंबात झाला.त्यांचे वय किती माहीत नाही.तिथले एक जेष्ठ व्यवस्थापक श्री. रामभरोसे सिरोई(सारण) म्हणाले की ते लहानपणापासून महाराजांना असेच पाहात आले आहेत.
महाराजांना परिक्रमेत असताना शुलपाणिझाडीत एका मैयाने सांगितलं इकडून जाऊ नका भाऊ त्रास देतील तिकडून जा तिथे एक महात्मा आहेत.तिने सांगितल्याप्रमाणे गेल्यावर एका झोपडीत महात्मा भेटले,भोजनप्रसाद मिळाला. सकाळी उठल्यावर पाहिले तर महात्मा नव्हते. पुढे एकजण भेटला तो म्हणाला या भागात कोणीही महात्मा राहात नाहीत,वस्तीच नाही. नर्मदे हर. मैया व भगवान शिव दर्शन झाले होते.महाराज परिक्रमेत रोज साठ किलोमीटर चालत असत.
महाराजांनी निमलाय(आता हे ठिकाण बुडाले आहे.) येथे एका शेतातील मचाणावर खाली धूनि पेटवून साधना केली तेव्हा त्यांच्या शरीराचा नुसता हाडांचा सापळा झाला होता.
उदासिन म्हणजे उच्च स्थानावर असणे. सत्व, रज, तम तिन्ही गुणांना एकत्र ऊर्ध्वगामी करुन उच्च स्थानी पोहोचणे म्हणजे उर्ध्वगामी.पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्व गोष्टी खालीच येतात फक्त अग्नि आणि पाणी ऊर्ध्वगामी आहेत.
महाराज म्हणाले,ऋषि विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टी तयार करताना म्हैस,गाढव या सारखे ताकदवान कष्टाळू प्राणी मनुष्याच्या मदतीसाठी निर्माण केले पण राक्षसांच्या नाशासाठी मात्र श्रीराम व लक्ष्मण यांना आणले. महात्म्यांचा शाप किंवा वरदान परमेश्वर बदलू शकत नाही व विधी लिखित महात्मा बदलू शकत नाही. नर्मदे हर.
धर्मेश्वर या सुंदर ठिकाणी प्रत्येक परिक्रमा वासी बंधू भगिनींनी मुक्काम करून महाराजांच्या सत्संगाचा लाभ घ्यावाच. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट. - धर्मेश्वर ते डांवठां
धर्मेश्वर नंतर कलमफाटा गांवानंतर येते बाईंजगवाडा.गांवाच्या सुरवातीला डावीकडे अगदी रस्त्यालगतच सिंगाजी महाराज मंदिर आहे.या जागेचे मालक श्री.जगदीश यादव गवळी हे सेवा देतात. गांवाच्या बाजारपेठेतून वाटचाल करीत असताना प्रत्येक दुकानदार नर्मदे हर म्हणतो आणि काही ना काहीतरी देतो उदाहरणार्थ अगरबत्ती,मैयासाठी वस्त्र, बिस्किटे वगैरे बाहेर पडे पर्यंत आपल्याजवळील वजन एखाद किलोने तरी वाढतेच. नर्मदे हर.
पुढे नामनपुर येथे मंदिरात निवास व्यवस्था होते.गांवकरी खूप चांगले आहेत ते भोजन प्रसाद देतात. हवी तर राहायची सोयही करतात. आम्हाला चि. प्रिती व प्रियांका यादव या दोन छोट्या मैयांनी हात धरुन त्यांच्या घरी नेले होते.
नामनपुर नंतर येते फतेहगड. येथे नर्मदा,दंतोनी व पिपलसा असा त्रिवेणी संगम आहे. फतेहगड येथे नर्मदामैया किनाऱ्यावर शिवमंदिर व आश्रम असून निवास व्यवस्था आहे.पण बहुतेक सदाव्रत मिळते.
इथून पुढे जाण्यासाठी एक दीड किलोमीटर मागे यावे लागते व टीपरास या गावातून दंतोनीमैया किनाऱ्यावर येऊन नावेने पार व्हावे लागते. नंतर नयापुरा,मेलपिपला,रेतिया गावाबाहेर हिंगोडीमैया जुन्या पुलावरुन पार केल्यावर इमलीघाट मिर्झापुर येथे नवीन नर्मदा मंदिर बांधले आहे तिथे निवास व्यवस्था आहे. हिरालाल व्यवस्थापक आहेत.सदाव्रत मिळते. इथून पुढे गेल्यावर परिक्रमा पथ बोर्ड आहे उजवीकडील रस्त्याने तमखाना,सिराल्या रेवातीर,कोटखेडी,दुरांद नंतर राजौर येथे हनुमान मंदिर.येथे निवास व्यवस्था होऊ शकते पण गांवकरी व महाराजही फारसे सहकार्य करणारे वाटत नाहीत.नर्मदे हर. पुढे बागदीमैया पुलावरुन पार केली की येते डांवठां. येथे बलरामजी जाट,जगदीशजी जाट यांच्या भल्यामोठ्या घरात परिक्रमा वासींची निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. मोठ्या घराप्रमाणेच मोठ्या मनाचे हे मैयाचे कुटुंब आहे. नर्मदे हर.
परिक्रमा बंधूभगिनींनी जरुर येथे राहावे.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
डांवठा ते नेमावर
डांवठा नंतर येते मंडलेश्वर पुढे बजवाडा़ येथे शिवपंचायतन मंदिर आहे. थोडेसे पुढे ताटंबरीबाबाजी समाधी मंदिर आहे.छोटासाच सुंदर बगिचा आहे. आजुबाजुला वृक्षराजी आहे. पुढे नल,पुराना नवाडा, निमनपुर,गाजनपुर नंतर येते सिद्धक्षेत्र,मैयाचे नाभिस्थान असलेले नेमावर.
नेमावर बऱ्यापैकी मोठे गांव आहे. तीर्थक्षेत्र असल्याने गजबजलेले असते.श्रीराम धर्मशाळा, २०१३मधे आम्ही या श्रीराम धर्मशाळेत मुक्काम केला होता कारण, चिन्मय धामचे गाडगीळ महाराज नुकतेच निजधामाला गेले होते म्हणून माझे बंधू माझ्या बरोबर असलेले श्री. रमेश खरे व सौ.अंजली खरे हे श्री.योगेश धर्माधिकारी यांच्या बरोबर बसने परिक्रमेत आले असताना त्यांनी श्रीराम धर्मशाळा इथे मुक्काम केला होता.जैन मंदिर,लालबाई धर्मशाळा वगैरे बऱ्याच धर्मशाळा आहेत.पण आपण बहुतांशी मराठी परिक्रमावासी ग्वाल टेकडी येथील विश्वनाथ ब्रम्हचारी यांनी स्थापन केलेल्या चिन्मयधाम येथे मुक्काम करतो. २०११ घ्या आमच्या पहिल्या परिक्रमेत आम्ही उभयता प्रथम इथे मुक्काम केला होता.मला खूप ताप आला होता म्हणून घनश्याम गाडगीळ महाराजांनी आम्हाला तीन दिवस पुढे जाऊ दिले नव्हते.माझ्या कपाळावर घालण्यासाठी सुंठ वेखंड यांचा लेप स्वतः करुन दिला होता.खूप प्रेमळ शिस्तीचे होते गाडगीळ महाराज.ते ना अगदी आपल्या समर्थ रामदास स्वामीं सारखे दिसत. आता चिन्मयधाम येथे विठ्ठल ब्रम्हचारी महाराज आहेत.हे महाराजही खूप चांगले आहेत.
इथे थोरलेस्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या पादुका आहेत.प्रथम त्या बगिच्यात तुळशीवृंदावनात होत्या आता विठ्ठल ब्रम्हचारी महाराज यांनी त्यावर सुंदर मंदिर बांधले आहे. इथे दररोज सकाळी नित्य पाठ झाल्यावर सुर्य नमस्कार घालण्याची व सायंकाळी नित्य पाठ झाल्यावर मनाचे श्लोक म्हणण्याची व गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचण्याची सुंदर परंपरा आहे.
आश्रमाच्या सज्जातुन अरुणोदयी होणारे मैयादर्शन अवर्णनीय असते. इथले पुरातन सिद्धनाथ मंदिर उत्तम कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. सिद्धनाथ दर्शना नंतर हे मंदिर बघण्यासाठी दोन तीन तास तरी हवेतच. इथे मैयाला सुंदर घाट बांधलेला आहे. पुरातन किल्ला मात्र पडझड झालेला आहे.
दक्षिण तटावर रिद्धनाथ मंदिर दिसते व मैयापात्रात नाभिकुंडही दिसते पण आपण परिक्रमा वासी तिकडे जाऊ शकत नाही.
चिन्मय धाम हे स्त्री परिक्रमा वासी साठी माहेरघर व पुरुषांसाठी आपले घर आहे. म्हणून जरी
डांवठा ते नेमावर फक्त दहा बारा किलोमीटर अंतर असले व आपण लवकर पोहोचलो तरी पण सर्व परिक्रमा बंधूभगिनींनी जरुर येथे राहावे व संतसत्संग व मैया सानिध्याचा आनंद घ्यावा. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट.
नेमावर ते मोठी छिपानेर
आपल्या चिन्मय धाम ची ग्वाल टेकडी उतरुन आलो की उजवीकडील गल्लीतून मैया किनाऱ्यावर उतरुन जामनेर संगम पर्यंत आलो तर हा शॉर्टकट आहे पण पायाखाली बघत बघतच चालावं लागतं कारण जे सगळीकडे असते तेच इथेही. घाण करुन ठेवलेली,कचरा पसरलेला.नर्मदे हर.
जामनेर मैया संगमाजवळ काही वर्षांपुर्वी वाळू उपसा करत असताना एक छोटे शिवमंदिर मिळाले,नंदी जवळ हातातील काठी आपटली की झन् झन् असा घुंगरु वाजल्या सारखा आवाज येतो.पण मैयाचा जलस्तर कमी असेल तरच दिसते.इथून होडीत बसून जामनेर मैया पार करुन दरड चढली की आपण कुंडगांवला पोहोचतो.
पण हल्ली नेमावरच्या बाजारपेठेतून खातेगांव कडे जाणाऱ्या रोडने जात उजवीकडील रस्त्यानेच सर्वजण जातात. इकडून जामनेर मैयावर छोटा पुल बांधलेला आहे. कुंडगांव नंतर येते तुरनाल येथे २०१६मधे परशुराम धाम हे भगवान परशुरामाचे मंदिर राजस्थानी साधू योगी प्रसाद यांनी बांधले आहे. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
इथून उजवीकडील एक दरड उतरुन आपण गौनीसंगम येथे पोहोचतो. इथे खूप मोठ्या प्रमाणावर मैयातुन वाळू उपसा केला जात असतो त्यासाठी कच्च्या पण चांगल्या रुंद रस्त्यावर ट्रॅक्टर,डंपर यांची खूप गर्दी असते.
याच मार्गावर एका ठिकाणी वाळूत धसत चाललेली शिवपिंडी व एका खडकावर दगडाचे पांच पिंड किंवा लड्डू शेंदूर फासलेले बघायला मिळतात. भगवान परशुरामांनी आपल्या आईच्या म्हणजे रेणुकामातेचे श्राद्ध करताना केलेले हे पिंड आहेत व त्यांनीच स्थापन केलेली ही शिवपिंडी आहे.हा सर्वच भाग नेमावरला होणाऱ्या प्रस्तावित धरणाच्या डूब क्षेत्रात असल्याने या पौराणिक स्थानकाकडे असे दुर्लक्ष व भरमसाठ वाळू उपसा चालू आहे. नर्मदे हर. या कच्च्या रस्त्याने एखादं किलोमीटर गेलं की शेतातील पायवाटेने वर चढून वरच्या कच्च्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर वर येते दैय्यत हे गांव. आपल्या पुढे जाण्याच्या मार्गावर लखन यांचे किराणा जनरल दुकान आणि गिरणी आहे. खूप सेवाभावी कुटुंब आहे.
क्रमशः.
IIतीर्थ जननी नर्मदाII
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट.
नेमावर ते मोठी छिपानेर.
पुढे चालू………
दय्यत गांवाबाहेर पडलो की शेतातील पायवाटेने वाटचाल करत असताना अविट गोडीच्या बोरांची मेजवानी मिळते. थोड्याच वेळात उजवीकडे एक कच्चा रस्ता लागतो तो आपल्याला चिंचली गांवात पोहोचवतो.
श्रीराम मंदिराच्या जवळ सौ. वसू कलोना यांच्याकडे व श्री.रामसुख राठौड यांच्या कडेही भोजन प्रसाद सेवा देतात. मंदिरात निवास व्यवस्था होते.
चिंचोली गावाबाहेर पडलो की एक खूप मोठे पुरातन चिंचेचे झाड आणि त्याचा पार आपल्याला जणू काही विश्रांती घ्यावीच असा आग्रह करते.इतकी घनदाट व थंडगार सावली आहे की तिथे आपण बसतोच बसतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे.
पुढे येते करोंदमाफी,बीजलगांव नंतर पिपलनेरिया. येथे श्रीराम व पंचमुखी हनुमानाचे भव्य मंदिर आहे. ही संत गोपालदास महाराज गंगोत्री यमनोत्री यांची तपोभूमि आहे. सध्या गादीवर आहेत रामदासजी त्यागीजी महाराज.व तिथे परमेश्वर दास त्यागीजी महाराज ही आहेत. इथे निवास वभोजन प्रसाद व्यवस्था आहे.
कठेडी नंतर एक नाला पुलावरुन पार करुन दरड चढली की आपण मोठी छिपानेर मधे प्रवेश करतो. गांवाच्या सुरवातीला उजवीकडे आहे निंबार्क आश्रम. सुंदर फळाफुलांनी बहरलेला बगिचा, मागच्या बाजूला खाली होणारे नीलश्यामरुपा नर्मदा मैयाचे सुंदर दर्शन. थकला जीव नुसत्या दर्शनाने शांत होतो. इथे आहेत सनत् कुमार सरन महाराज.हे स्वतः भोजन प्रसाद तयार करतात. इथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.नर्मदे हर.
पुढे गांवातुन मैया किनाऱ्यावर गेलो की आहे दादाजी धुनिवाले यांचा भव्य मंदिर व भक्तनिवास. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट
मोठी छिपानेर ते नीलकंठ.
मोठी छिपानेर गांवातुन बाहेर पडलो की डांबरी रोड नेच चौरासाखेडी गावापर्यंत जावे लागते.
चौरासाखेडी गांवातुन मैया किनाऱ्यावर यायचे.इथून मैयापात्रातुन होडी मार्गे वाहतूक सुरु असते अगदी मोटरसायकली ही होडीतून नेतात. आपल्याला मैयाला उजव्या हाताला ठेवून साधारण अर्धा किलोमीटर जावे लागते.तिथे सीपमैया व नर्मदामैया संगम आहे. आपण सीपमैया होडीने पार करुन दरड चढली की पाताळेश्र्वर येथे पोहोचतो. हे पुरातन मंदिर आहे. काही संन्यासी राहतात निवास भोजन प्रसाद व्यवस्था होऊ शकते पण कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. नर्मदे हर.
पुढे सातदेव,टिगाली, सीलकंठ ह्या मार्गात मैयाचे दर्शन होत राहते व अनेक छोटी पुरातन मंदिरे किंवा घुमट्या दिसतात.
सीलकंठ इथे मैया किनाऱ्यावर पण थोडे वरच्या बाजूला नर्मदा मंदिर बांधले आहे.व आता दोन-चार वर्षांपुर्वी परिक्रमावासींसाठी निवास हॉल बांधला आहे. सर्व सोयी सुविधा आहेत. भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
सीलकंठ गांवातुन मंडी पर्यंत रोडने व तिथून मैया किनाऱ्यावरुन वाटचाल करताना सुंदर हिरवळीच्या गालिचा पसरलेला असतो. एक मैयाशी संगम करणारा नाला छोटा असला तरी पार करायला अवघड आहे. इकडेही वाळूचा प्रचंड उपसा चालू आहे.होड्यांमधे वाळू भरुन किनाऱ्यावर आणतात आणि ट्रॅक्टर,डंपर मधे भरुन नेतात.नर्मदे हर.
नीलकंठ हे कोलार(कौशल्या)मैया व नर्मदामैया यांच्या संगमावर असलेले पुरातन तीर्थक्षेत्र आहे. पुरातन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या नंदीचा कासरा चौसष्ट योगिनींनी धरला असून माता उमा नंदीवर चढत आहे.
नंदीच्या मागे उभे राहून आपण खोल गाभाऱ्यातील पिंडीकडे पाहिले तर पिंडी नंदी पेक्षा उंचावर दिसते व गाभाऱ्यात उतरुन पिंडी मागून नंदी कडे पाहिले की उंचावर असलेला नंदी पिंडी पेक्षा खाली दिसतो.नर्मदे हर.
मंदिराच्या मागे दत्त मंदिर असून भगवान श्री दत्तात्रेय,प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व श्रीरंगावधूत महाराज यांच्या मुर्तिंचे सुंदर दर्शन होते. तिथे बऱ्यापैकी बगिचाही आहे.
नीलकंठ येथे परिक्रमा वासी साठी हॉल बांधलेला आहे म्हणून निवास व्यवस्था आहे असे म्हणायचे.सदाव्रतही मागितले तर मिळते.बाकी व्यवस्था नाही.
मंदिराच्या सभामंडपातुन खाली कोलारमैया व नर्मदामैया संगम सुंदर दिसतो. पण इथून कोलारमैया पार करुन पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र.
नीलकंठ ते रेऊगांव.
नीलकंठ ते नसरुल्लागंजच्या रोडने साधारण अर्धा किलोमीटर वर उजवीकडील डांबरी रस्त्याने दीड-दोन किलोमीटर वर चमेटी गांव आले की उजवीकडील रस्त्याने छिंदगांवकडे वाटचाल करताना साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर डावीकडे रस्त्यालगतच इलेक्ट्रिकची डी.पी.आहे तिच्या जवळून शेतातील पायवाटेने सरळ समोरच परत डांबरी रोड लागेपर्यंत चालत राहायचे.डांबरीरोडवरुन उजवीकडे मझली हे गांव दिसते इकडून आल्यास छिंदगांव,डिमावर न लागता आपण सरळ बाबरीघाटला पोहोचतो व जवळजवळ दहा बारा किलोमीटर अंतर वाचते. मझली गांवात श्री.नर्मदागिरी,मुरतगिरी,वसंतगिरी गोस्वामी परिवार परिक्रमा वासींची निवास व भोजन प्रसाद व्यवस्था करतो. खूप सेवाभावी परिवार आहे.त्यांच्या परिवारातील लहान मुलं अगदी लांबून आपण दिसताच धावतच आपल्याला घ्यायला येतात. नीलकंठ इथे फारशी चांगली सोय नाही तेव्हा शक्यतो नीलकंठला शिवदर्शन दत्तदर्शन व संगम दर्शन करुन मझली येथेच मुक्कामाला यावे. नर्मदे हर.
मझली गावाबाहेर पडल्यावर थोड्या कच्च्या रस्त्याने वाटचाल करुन डांबरी रोड आला की उजवीकडील रस्त्याने कोलारमैया पुलावरुन पार करुन खरगांव येते त्याच रोडवरुन खरगांवाच्या बाहेर पडून दोन तीन किलोमीटर वर बाबरीनाका येतो.हायवे क्रॉस करुन समोरच्या रस्त्याने बाबरीगांव. गांवातुन मैयाकडे वाटचाल करत किनाऱ्यावर आले की उजवीकडे आहे गीतामाई यांचा आश्रम व हनुमान मंदिर. इथेही सदाव्रत मिळते व राहता येते.या गीतामाईंना परिक्रमेत तीन वेळा मैयाने दर्शन दिले आहे.
आश्रमा पुढे दरड उतरुन मैया किनाऱ्यावर आलो की उजवीकडे मैयाला ठेवत वाळूतुन जात टीमरनीमैया पार करायची पाणी घोट्याच्या थोडेसे वर असते.इथेही वाळू उपसा सुरुच असतो. नर्मदे हर.
दरड चढून थोडा कच्चा रस्ता की येते जाजनागांव नंतर मठ्ठागांव, नेहलाई नंतर येते रेऊगांव. गांवातुन मैया किनाऱ्यावर आहे सच्चिदानंद आश्रम.लक्ष्मणगिरी महाराज आहेत. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र.उत्तर तट.
रेऊगांव ते बुधनी.
रेऊगांव इथून मैया किनाऱ्यावरुन मार्ग नाही. गावांतुन बाहेर पडून डांबरीरोडने मर्दानपुरा नंतर आवलीघाट फाट्यावरुन एक किलोमीटर आत मैयाचा आवलीघाट आहे. आवलेश्वर महादेव पुरातन मंदिर आहे. आवारात राहू शकतो.इथे बरेच ढाबे आहेत.
इथून परत फाट्यावर जाऊन रोडनेही बुधनीला जाऊ शकतो पण आवली गावातील रोडने गांजीद येथून मैया किनाऱ्यावरील हिरवळीने नटलेल्या पगदंडीने चालणे सुखद आनंददायी असते. पथोडा येथे वर चढून जहाजपुरा,सुमडी,निनौर, मकौडिया,सातधाम,बालाजी धाम इथून शेतातील पायवाटेने एक अवघड दरड उतरुन भामर किंवा भागगंगामैया पार करुन दरड चढून शेतपायवाटेने जात जंगलातील कच्च्या रस्त्याने पुराना होलीपुरा येथे मौनिबापू आश्रम मैयाकिनारी आहे. निवास व्यवस्था आहे.सदाव्रत मिळते. छान शांत मोठ्या वृक्षराजीत वसलेले स्थान आहे. नर्मदे हर.
जंगलातील रस्त्याने साधारणतः दोन किलोमीटर गेल्यावर पिलीकरार या गांवी बुधनीला जाणारा हायवे लागतो. पुढे तीन किलोमीटर वर येते बुधनी. रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजखालून उजवीकडील रस्त्याने एक दीड किलोमीटर वर येतो मैयाचा बुधनी घाट.
राष्ट्रपती शंकर दयाळ शर्माजींनी उद्घाटन केलेला पंचवीस तीस पायऱ्यांचा सुंदर घाट आहे. समोर दक्षिण तटावरील होशंगाबादचा खैराघाट दिसतो. घाटाच्या पायऱ्यांवरून दोन्ही कडे मंदिरे आहेत व निवास, भोजन प्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
IIतीर्थजननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र उत्तर तट.
बुधनी ते बांदरा भान.
बुधनीच्या घाटावरील हॉटेल जवळून उजवीकडील रस्त्याने परिक्रमा मार्ग बोर्ड आहे तिथून जंगलातील पायवाटेने एक टेकडी चढून व उतरुन गडरिया नाला पार करुन परत एक टेकडी चढून शेत पायवाटेने जमनियागांव नंतर जर्रापुर हनुमान मंदिराच्या जवळ वडाच्या झाडा जवळून डावीकडील रस्त्याने एखादं किलोमीटर वर उजवीकडील शेत पायवाटेने एक नाला पार करुन माता महाकाली व हजरत कद्दरवाले बाबासाहेब दर्गा हे एकत्र असलेले सर्वधर्म समभावाचे मंदिर आहे. निवास, व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे थोडा कच्चा रस्ता आहे व जोशीपुर येथे हायवे लागतो. उजवीकडे बगवाडा,किशनपुरी, रामनगर नंतर येते बांदराभान. इथे काही मंदिरे, आश्रम आहेत.हनुमान मंदिरात स्त्रियांना परवानगी नाही. एक महिला माताजींचा आश्रम आहे.जो बंद होता. एका आश्रमात पहिले पतईघाट येथे राहणारे स्वामी स्वरूपानंद हे महान तपस्वी राहतात ते फार जास्त वयस्कर व आजारी असल्याने काही ठराविक वेळेसच दर्शन मिळते.आम्हाला एकदाच दर्शनाचा योग मैयाकृपेने आला. एकंदरीत बांदरा भानला आश्रम आहेत पण तिथे व्यवस्था होणे फार कठीण. मैयाच्या घाटावर एक हॉल बांधलेला आहे तिथे राहून घाटासमोरील ढाब्यांवर राइस प्लेट घेऊन राहू शकतो. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
बांदराभान ते सरदार नगर.
अंदाजे २०/२५ किलोमीटर.
डांबरी रोड ने हिरानी, शहागंज इथे मैया किनाऱ्यावर मंदिर आहे. निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते. इथूनच जवळच्या सिमेंट च्या रोडने वाटचाल.सुंदर आळशी,मोहरी,हरभरा यांची रंगीबिरंगी फुले फुललेली शेती मनाचा उत्साह वाढवते. बेटा नंतर येते सुढानिया येथे सिद्धी विनायक मंदिर आहे. मोरयाची मुर्ती खूप सुंदर आहे. इथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.पुढे हथनौर नंतर येते सरदारनगर येथे मोठे श्रीराम मंदिर असून इथे भोजन प्रसाद व निवास व्यवस्था आहे.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र.उत्तर तट.
सरदार नगर ते नारायणपुर किंवा नांदनेर,कुसुमखेडा.
सरदार नगरच्या श्रीराम मंदिरा समोरच मैयाचा घाट आहे. सिमेंट कॉंक्रीटचा तीस पस्तीस कमी रुंदीच्या आणि त्यामानाने उंच पायऱ्यांचा घाट पाठीवर सॅक घेऊन जपून सांभाळून उतरावा लागतो.
शेवटच्या पांच सहा पायऱ्या शिल्लक असतानाच आपल्या डाव्या हाताला पायवाट दिसते तिच्या वरुन वाटचाल सुरु करायची. गव्हाची लहरणारी शेते मधेच मटार, हरभरा लावलेला आणि उजवीकडे शांत वाहणारी नीलश्यामल मैया.सुंदर वाटचाल असते.थोड्याच वेळात एक दरड चढून वर जावे लागते कारण किनाऱ्यावरची वाट मैयाजलात लुप्त झालेली असते. दरड चढली की बाभुळ,वावडिंग, करवंदे यांच्या जाळ्यातून जाणारी पायवाट एका नाल्या पाशी येते तो पार करुन पुन्हा एक दरड चढून पायवाटेने आपण पोहोचतो मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री श्री.शिवराजसिंग चौहान यांच्या गांवात जैत मधे. टिपिकल खेडेगाव आहे. स्वच्छता नांवाची अॅलर्जीच असावी असे घाणेरडे गांव आहे. मुख्य चौकात मुख्यमंत्री महोदयांचे नवीन घर आहे पण सिमेंट कॉंक्रीटचे अंगणही पान तंबाखू खाऊन थुंकून पिचकाऱ्यांनी लालेलाल झालेले घाणेरडे आहे. हां आतून मात्र घर प्रशस्त आहे. आम्हाला मुख्यमंत्री महोदयांच्या वहिनी व सुनबाई ने बोलावले व चहा नाश्ता शाल श्रीफळ व दक्षिणा देऊन सत्कार केला. नर्मदे हर.
जैत गावाबाहेर पडल्यावर दोन किलोमीटरवर दोन रस्ते फुटतात.उजवीकडचा रस्ता जातो मैया किनाऱ्यावरील नारायणपुर येथे. राधाकृष्ण मंदिरात निवास व्यवस्था आहे.गांवकरी सदाव्रत देतात विनंती नुसार भोजन प्रसादाची सेवा देतात. तिथे रोशनसिंग ठेकेदार हे सेवाव्रती आहेत.
नारायणपुरला न जाता सरळ समोरच्या रस्त्याने नांदनेर. गांवाबाहेरील चौकात मोठा पार असलेल्या वृक्षाखाली आपण आसन लावू शकतो तिथे रमेश सिंग राजपूत यांच्या ढाब्यावर ते सेवा देतात. तिथून चार किलोमीटर वर येते कुसुमखेडा. येथील मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.
सरदार नगर ते नारायणपुर १५ किलोमीटर. व सरदार नगर ते कुसुमखेडा २५ किलोमीटर.
II तीर्थ जननी नर्मदाII
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र.उत्तर तट.
नारायणपुर किंवा नांदनेर किंवा कुसुमखेडा ते बगलवाडा
कुसुमखेडा गावाबाहेर पडल्यावर एक दीड किलोमीटर वर दुहेरी कुसुमखेडा बॉर्डर वर उजवीकडे मुन्ना महाराज यांची कुटी आहे. खूप सेवाभावी महाराज आहेत.त्यांची कुत्री परिक्रमा वासी दिसले की आठवते आणि कुटीत जायला भागच पाडते.चहा,बालभोग प्रसाद घेऊनच पुढे जायचे.
पुढे बमोली किंवा ब्रम्होरी नंतर येते भारकच्छ.ही भृगूॠषिंची तपोभूमी आहे.भारकच्छ येथे चौकातच सुंदर मंदिर आहे.निवास व्यवस्था होते व गावातील लोक सेवा देतात. मंदिराच्या डावीकडील रोडने पुढे जायचे लगेचच उजवीकडे श्री.कृष्णा मीना यांची चहा शास्त्राची टपरी आहे.इथे श्री.निसार अहमद हे बुजुर्ग मैया भक्त बसलेले असतात त्यांना मैया आणि परिक्रमा वासी बद्दल खूप प्रेम आहे. नर्मदे हर.मैया सर्वांचीच आहे अगदी सर्व जीवजंतू वनस्पती सगळ्याच सृष्टीची माता नर्मदा.
गाडरवास खरे तर गरुडवास येथे विष्णू वामन गरुडाचे तपश्चर्या केली. भैया किनाऱ्यावर एका महाराजांचा आश्रम आहे असे समजले पण मी कधी गेलेली नाही. गाडरवास गांवात पटेलजी की गढ़ी म्हणजे मोठा वाडा आहे ते सेवा देतात पण मी तिकडेही गेलेली नाही. पुढे बसेल या गांवाच्या सुरवातीला उजवीकडे श्री. विमलेश ठाकुर यांचा आश्रम असून निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे सनखेडा नंतर नारदीगंगामैया पुलावरुन पार करायची.२०१२,१३ मधे पुल नव्हता तेव्हा ही नारदीगंगा मैया खूप वेगवान खळाळत्या प्रवाहातुन पार केली होती. नर्मदे हर.
बामनवाडा,मोतलसर इथे हनुमान मंदिरात निवास व्यवस्था आहे. गांवकरी सेवा देतात. किवली येथून दोन्ही बाजूला शेतांचे उंच बांध आणि मधून कच्चा रस्ता आहे. जर पाऊस झाला असेल तर हे दोन तीन किलोमीटर आपली परीक्षाच पाहतात. सेमरी. येथे श्रीराम जानकी मंदिर आहे.निवास व्यवस्था होते.गांककरी सेवा देतात. पुढे येते वरुणामैया. हिच्यावर पुल नाही तर एक दोन्ही तीरावरील मोठ्या ओंडक्यांच्या तारांच्या बांधलेल्या आधारावरचे लोखंडी तट्टयांचे साकव आहे खाली खळाळत वाहणारी वरुणामैया आणि हा मोडका साकव. तोल सांभाळत पार होऊन दरड चढून शेतातील पायवाटेने थोडे चाललो की मोठमोठ्या वृक्षांच्या छत्र छायेत उजवीकडे बनखंडी आश्रमाचे गेट आपले स्वागत करते. सुंदर मंदिर आणि साध्या सुध्या आश्रमाच्या व्यवस्थापिका कृष्णाजीजी आपले हसतमुखाने स्वागत करतात.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
खूप छान आहे. इथे बाजुलाच संस्कृत वेद पाठशाळा आहे.अंदाजे अंतर २५/३० किलोमीटर.नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
बगलवाडा ते सीमनी २३ किलोमीटर.
भिलाडिया,तेंदोनीमैया पुलावरुन पार. २०१२/१३ मधे हिला गुडघ्याच्या वर पाण्यातुन पार केली होती. नर्मदे हर. पुढे सतरावन,मुआर,डुमर,पिपरिया,ढाबलागांवातुन उजवीकडे वळून गांवाबाहेर पडून शेतपायवाट तुरीच्या शेतातुन मांगरोलगांव मैया किनाऱ्याने चालत तीस पस्तीस पायऱ्यांचा घाट चढून मंडलेश्वर तीर्थ रेवा मंदिर भवन. मोठा आश्रम असून निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. येथे संस्कृत विद्यालय आहे.
आता डांबरी रोड ने अलीगंज मुख्यमंत्री हाट बाजारातुन मैया किनाऱ्याने वाटचाल करत सीमनी येथे श्रीराम मंदिरात निवास व्यवस्था आहे मंदिरा शेजारील गांवकरी सेवा देतात.
IIतीर्थजननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम सेवाकेंद्र.उत्तर तट.
सीमनी ते चौरास २५ किलोमीटर.
बरहाकलाॅं पर्यंत डांबरी रोड तिथून मैया किनाऱ्याने पुनिया खांडमैया पार करुन केतुधान,मोहळ दक्षिणेत काव्य दुधीमैया व नर्मदामैया संगम दिसतो व सिरसिराघाट मौनिमहाराज आश्रम दिसतो.दुधीमैया कोरडीठाक आहे. मोहड नंतर नर्मदा,मंडला, उडिया,इथून उजवीकडे कच्चा रस्ता सुलतानगंज, बोरास समोरील कच्च्या रस्त्याने खदान वीटभट्टी जवळून मैया किनाऱ्यावर उतरुन वाटचाल.चौरास घाटाच्या अलीकडे माजी सरपंच श्री.चंद्रपाल पटेल यांनी सुंदर बांबूच्या तट्टयांचे परिक्रमा निवास तयार केले आहे. सभोवती सुंदर बगिचा केला आहे. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदा किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट.
चौरास ते हिरापुर. ३० किलोमीटर.
मैया किनाऱ्यावरुन वाटचाल बाॅंसाखेडा.अवघड दरड चढून वर नर्मदा मंदिर.येथे कैलासदास महाराज आहेत.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे अंडिया नंतर कैलकच्छ गांवातुन पुढे मैया किनाऱ्यावर उतरणे दरड चढून पिपलेश्वर महादेव मंदिर. पुढे वरचे कैलकच्छ गांवातुन शेतातील पायवाटेने अंडिया गांवातुन पुन्हा किनाऱ्यावर उतरुन वाटचाल.इथे मैयापात्रात जनकराजाने स्थापन केलेली मुरकुंडी घालून बसलेल्या नंदीच्या वशिंडा सारखी आगळीवेगळी शिवपिंडी व यज्ञवेदी आहे. दरड चढून वरती आपल्या महाराष्ट्रीय उच्च विद्याविभूषित उन्मेषानंद महाराज यांचा स्वामी समर्थ मठ आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. अवश्य एक दिवस तरी राहावे असे सुंदर पवित्र स्थान आहे.
अनघोरा गांवातुन बाहेर पडून कच्चा रस्ता,शेतपायवाट,टेकड्या,घळी चढत उतरत कच्च्या रस्त्याने पतईगांव,पतईघाट शिवमंदिर निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे शुक्लपुर वाळवंटातुन वाटचाल समोर दक्षिण तटावर सोकलपुर वर चढून कच्च्या रस्त्याने रिछावर, रामपुरा,नयाखेडा, टीमरावन. सिद्धवतीमैया व नर्मदामैया संगम पार करुन अवघड चढण चढून पुन्हा मैया किनाऱ्यावरील पगदंडीने चालणे पुन्हा वर चढून शेतातील पायवाटेने हिरापुर कॉलनीतुन हिरापुर गांवात राजराजेश्वरी मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. हे सुंदर दक्षिण भारतीय पद्धतीचे मंदिर असून संस्कृत वेद पाठशाळा आहे. नर्मदे हर.
IIतीर्थ जननी नर्मदाII
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र.उत्तर तट.
हिरापुर ते रामपरा
हिरापुर गांवातुन वाटचाल सुरु करताच नर्मदे हर म्हणत लोक चहा बालभोग घेण्याचा आग्रह करतात.पुढे हायवेवर मोठी कमान आहे.आपण हायवेवर डावीकडे वाटचाल सुरू करायची. एक दीड किलोमीटरवर उजवीकडील रस्त्याने येते करोंदी. किंवा तसेच थोडे पुढे जाऊन भामा पॉवर हाऊस जवळून उजवीकडील रस्त्याने ही आपण बरमानला जाऊ शकतो.पण करोंदी येथील श्रीराम मंदिराच्या कळस वेगळाच आहे.एक यज्ञवेदीच आहे कळस म्हणजे. समोर मोठ्या बकुळीच्या झाडाला पार बांधलेला आहे.
पुढे कठई नंतर येते बेलथारी. ही बळिराजा ची तपोभूमी आहे. पुढे सीमरिया.मैया किनाऱ्यावरने पण उंचावरुन सुंदर हिरव्यागार शेतांमधील पायवाट तर उजवीकडे मैयाच्या किनाऱ्यालगत लावलेली कळकाची बेटे यामधून जेव्हा आपण चालतो ते सुख अवर्णनीय. हे शेत आहे प्रेमवती व मुकेश रामप्रसाद कहार या प्रेमळ कष्टकरी शेतकरी जोडप्याचे. बकरा म्हणजे मटार,कोवळा हरभरा, टोमॅटो असे काही ना काही देणारच.
थोडे पुढे गेल्यावर मात्र किनारा सोडून वर चढावे लागते. सीमरिया कलां,बरहांकलां,करहांकला, छत्तरपुर हा सगळा प्रवास असंख्य टेकड्या चढत उतरत घळी घळीतुन करावा लागतो.
छत्तरपुरला डांबरी रोड सुरु होतो.खैरी,पदम्, केसली या गांवांमधे ब्राह्मण वस्ती जास्त आहे. पुढे रुकवाडा नंतर डावीकडे परिक्रमा पथ असा बोर्ड आहे.तिथून चांवरपाठा येथे हरगोविंदसिंग पालीवाल यांचे सेवाकेंद्र आहे.निवास व्यवस्था आहे, सदाव्रत मिळते. गांवाच्या हेर पडल्यावर समोरच्या पायवाटेने मैया किनारा दिसतो पण डावीकडील कच्च्या रस्त्याने आपण बरमान गांवात पोहोचवतो.
बरमान म्हणजेच ब्रम्हांड घाट मोठे तीर्थक्षेत्र असून बऱ्यापैकी मोठे गांव आहे. बाजारपेठ आहे.
इथे श्री.सुधाकर तेलंग यांची महाराष्ट्र धर्मशाळा आहे.श्री.अनिल पैठणकर ह्यांचे भाऊ सुधीर पैठणकर हे नगराध्यक्ष होते.हे दोघे भाऊ व कुटुंबीयही सेवा देतात. बडा राममंदिर येथेही निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
इथे मैया दोन प्रवाहाने वाहते.मधे बेटा सारखी टेकडी असून ती ब्रम्हदेवाची तपोभूमी आहे व ब्रम्हदेवाने स्थापन केलेली शिवपिंडी ब्रम्हेश्वर महादेव आहे.परिक्रमावासी मात्र तिकडे जाऊ शकत नाही. मैयाचा घाट उंच व खूप मोठा आहे.दक्षिण ब्रम्हांड घाट अगदी जवळ दिसतो. मैया ला उजवीकडे ठेवून आपण किनाऱ्यावरील छोट्या पायवाटेने पुढे जायचे. थोड्या वरच्या बाजूला त्र्यंबकेश्वर धाम खप्परबाली ॐकारदास महाराज यांची कुटी आहे. पुढे रेवणनाथ यांची जन्मभूमी असून नवीनच आश्रम सुरु झाला आहे. किनाऱ्यावरील वाटचाल मैयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आणि मैयाचे खळाळणारे नीलश्यामल रुपडे सुखद करत असतानाच येतात सप्तधारा किंवा स्तनाला.सात ठिकाणाहून सात धारांनी खळाळत मैयाचा पश्चिमेला प्रवास सुरु असतो. नर्मदे हर.
डावीकडील दरड चढून गेलो की येतो हरीहर आश्रम. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. हरीहर महाराज ह्यांच्या बद्दल स्वतंत्र लेखात लिहावे लागेल. नर्मदे हर.
आश्रमाच्या गेटमधून बाहेर पडून हायवे क्रॉस करुन समोरच्या उजवीकडील उंचावरील डांबरीरोडने धर्मपुरी,बिकोर सुखराम यांच्या टपरी समोरील शेतातील पायवाटेने पुन्हा डांबरी रोड ने कुडी गांवाबाहेर डावीकडील पायवाटेने टेकड्या टेकड्यांमधून खडकाळ पायवाटेने आपण पोहोचतो छोटी धुवांधारला. थोड्या दुरवर छोटे छोटे धबधबे दिसतात. जंगलातील टेकडीवर नेपाळी बाबांचा आश्रम आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. तिकडे न जाता डावीकडील कच्च्या रस्त्याने आपण गुर्मी या गांवात पोहचतो.इथे लालबाबाजींचा आश्रम असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे गोकला येथे भैया किनाऱ्यावर डावीकडे शिवमंदिर व नागपुरच्या राणी माताजी यांची कुटी आहे. निवास करु शकतो.
पुढे मैया किनाऱ्यावरुन थोडे चालून डावीकडील दरड चढली की थोडावेळ एक नदीमैया आपल्या दोन्ही बाजूंनी वाहात असते आणि आपण मधल्या टेकडीवरील पायवाटेने चालत असतो.पुढे ती टेकडी उतरुन नदीमैया पार करायची.पाणी फार नसते व स्वच्छ निर्मल असते जलामृत. डावीकडील टेकडी चढून उजवीकडे शेत पायवाटेने आपण प्रवेश करतो रामपरा गांवात. छोटेसे गाव आहे. उजवीकडील रस्त्याने आपण आपल्या पुण्याच्या श्री.धनंजय नाईक आणि त्यांचे सेवा सहकारी चालवत असलेल्या सेवाकेंद्रात. समोर मोठ्या पिंपळपान आहे. एक तंबूवजा कनात लावून तयार केलेला निवारा आहे. तिथे राहू शकतो. भोजन प्रसाद व्यवस्था आहे. या सेवाकेंद्रात आपले मराठी मैयाप्रेमी आळीपाळीने संपुर्ण परिक्रमा काळात म्हणजे साधारण आक्टोबर ते एप्रिल मे पर्यंत सेवा देण्यासाठी येतात. कुणी कधी यायचे,किती दिवस राहायचे वगैरेचे सुंदर वेळापत्रकच केलेले असते. ज्यांना सेवा द्यायची असेल त्यांनी आपल्या सोयीनुसार कधी व किती दिवस सेवा देऊ शकतो ते धनंजय नाईक यांना चातुर्मासाच म्हणजे जून जुलैमध्ये कळवावे म्हणजे त्यांना नियोजन करणे सुलभ होईल. नर्मदे हर. इथे जागा लहान असली तरी सर्व सोय केलेली आहे. याच ठिकाणी काही वर्षांपुर्वी श्री.सुधीरभाऊ व सौ. प्रतिभाताई चितळे सेवा देत असत. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
रामपरा ते हिरापुर,जोगीपुरा.
रामपराहुन निघाल्यावर मैया किनाऱ्यावर छोटी छोटी रानटी फुलांची झुडपे संगमरवरी खडक यातुन जाणारी पायवाट, उजवीकडे खुदू खुदू हसत अवखळ पणे वाहात आपले रेवा हे नांव सार्थ ठरवत असलेली मैया. हतिया गांव आले तिथे मोठ्या खडकाळ टेकडीवर निरंजन महाराज व गिरिजा माता या महाराष्ट्रीय दंपतीचा शारदाश्रम आहे. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे ही अशाच छोटी छोटी झाडे झुडपे असलेल्या टेकड्या चढत उतरत येते केरपानी गांव. येथे उंच टेकडीवर राजा की गढ़ी व मार्कंडेय गुंफा आहे पण तिथले संन्यासी भिती वाटण्या सारखेच होते.
केरपानी गांवातील मंदिरात निवास व्यवस्था होऊ शकते.गांवकरी सेवा देतात. इथून पुढे मैया किनाऱ्यावरुन वाटचाल म्हणजेच आनंद असतो. गव्हाच्या शेतातील पायवाट आणि उजवीकडून शांत वाहणाऱ्या मैयाच्या जलदर्पणात आपले रुपडे न्याहाळणारी अरुण रथावर स्वार होऊन विविध रंगांची उधळण करत येणारी उषाराणी.अप्रतिम सुंदर, वर्णनातीत, नि:शब्द करणारी. नर्मदे हर.
पिठैहरा,बारुरेवा,बंधी, मुर्गाखेडा, या गांवात ही मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.गांवकरी सेवा देतात. पुढे डोंगरगांव येथे धर्मशाळा आहे.सदाव्रत मिळते.
धुमगढ़ येथे द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचा आश्रम असून निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. अमोदा गांवाच्या पुढे आदि शंकराचार्य यांचे गुरु गोविंद भगवत्पादाचार्य यांची गुंफा आहे. खूप खोल आणि संकरीत गुंफा आहे.
पुढे हिरापुर येथे हरणी किंवा हिरणमैया व नर्मदा मैया संगम आहे. हिरणमैया होडीने पार करावी लागते. हिरापुरमधे कृष्णमंदिर व संगमेश्वर मंदिर आहे. निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. पुढे जोगीपुरा येथील हरणेश्वर मंदिरातील नंदी उभा आहे. राधाकृष्ण मंदिरात निवास व्यवस्था आहे, सदाव्रत मिळते.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र, उत्तर तट.
जोगीपुरा ते भेडा घाट
बेलखेडा,कुंडा,झलोन,सुनाचर,सर्रा घाट येथे गंगा यमुना नांवाचे दोन छोटे नाले व नर्मदामैया यांचा त्रिवेणी संगम आहे. रामजानकी मंदिर, धर्मशाळा असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे चरगवाघाट इथे नर्मदा मंदिर आहे व एका साधुमहाराजांची कुटी आहे.पुढे गोराघाट येथे राम नृसिंह मंदिर आहे.झाशीघाट पुलाजवळ टेकडीवर राधाकृष्ण मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते. पुढे बेलपठार येथे बळिराजाची यज्ञभूमि व नीलकंठ महादेव मंदिर आहे. झोशी घाट येथे शिवमंदिर व एक कुटी आहे. पुढे सितलपुर येथे सिताराम आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे जलेरीघाट,सिद्धघाट येथे राममंदिर आहे व सदाव्रत मिळते. पिपरिया राजघाट राममंदिर असून धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. भेडाघाट येथे टेकडीवर हनुमान मंदिरात सदाव्रत मिळते.येथे कपिल आश्रम नर्मदा मंदिर संस्कृत पाठशाळा आहे सदाव्रत मिळते. इथे चातुर्मास करता येईल.
ज्यांना रोडने जायचे आहे त्यांनी बेलखेडा येथून पुढे हायवेने जमखार,गुनरई गुल्ला. राजमार्ग,मनखेडी,मनगवां,उमरिया,सुरुई येथे रस्त्याच्या डावीकडे केदारनाथ मंदिर आहे व सुंदर बगिचा आहे.पुढे निवारा,गंजकटंगा नंतर शाहपुरा बायपास इथे डावीकडे रस्त्यालगतच अभिषेक ठाकुर यांचे स्कुल असून ते परिक्रमा वासींसाठी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था करतात. शाहपुरा गांवात न जाता डावीकडील बायपास रोडने भिमौटिला येथे भारत गॅस,एच पी गॅस यांचे फिलिंग प्लान्ट असल्यामुळे वाहनांची भयंकर वर्दळ असते.भमटी,खिडकाखेडा,किसरोंद नंतर सहजपुर येथे सीतासरोवर शेजारी श्रीमती प्रेमा पांडे व त्यांचा पुत्र प्रवीण पांडे यांचे शनि मंदिर आहे व ते सेवाकेंद्र चालवतात. पुढे हिरापुर बंदा येथे डावीकडे पंढरपुर येथील शांतिनाथमहाराज आश्रमातील चरणदास महाराज यांचा छोटासा आश्रम आहे निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते. शाहपुरा बायपास,सहजपुर,हिरापुरबंदा यापैकी कुठेही मुक्काम करून आपण दुसऱ्या दिवशी जबलपुरला पोहोचू शकतो. भेडाघाट चौराहा नंतर थोडं पुढे गेल्यावर डावीकडे आदित्य तीर्थ असून अंजनी माता मंदिर आहे.अंजनीमातेच्या कडेवर बाल हनुमान आहे.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट.
जबलपुर ते जोगिटिकरिया राज्यमहा मार्गावरुन.
या साधारण दीडशे किलोमीटरच्या प्रवासात फारसे आश्रम नाहीतच. एखाद्या गांवातील मंदिरात किंवा कुणाच्या घरी निवास भिक्षा मागुन,भोजन भिक्षा मागुन रहावे लागते. पण हायवेवर भरपुर झाडे असल्याने हा पांच सहा दिवसांचा प्रवास घाट वगैरे असुनही फारसा कठीण नाही. नर्मदे हर.
म्हणून मी इथे फक्त गावांची नांवे व किलोमीटर लिहिणार आहे. नर्मदे हर.
जबलपुरच्याअखंड मानस यज्ञ मंदिर बजरंग मठ इथून बाहेर पडल्यावर तीनपत्ती सिग्नल वरुन उजवीकडे रेल्वे हॉस्पिटल,रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजच्या जवळून डावीकडे घमापुर,गन गॅरेज फॅक्टरी,सतपुलाबाजार,रेल्वे क्रॉसिंग डावीकडे COD नंतर गोकलपुर,रॉंझी, आयुध निर्माण खमरिया,नेव्ही ऑफिस,OKF सिक्युरिटी चेक पोस्ट, भराटिया फॉरेस्ट,खमरिया पोलिस ठाणे,पिपरिया,उमरिया,आमाखोह,घाट चढून अमझर इथे बंजारीमाता मंदिर आहे. पुढे पडरिया हे गांव. जबलपुर ते पडरिया २५ कि.मि. नर्मदे हर.
देहरीकलां,तिलसानी,खंदिया, सिन्हा,बैरागी,सदाफल, कुण्डम २१ किलोमीटर.
भोकादेवरी येथे जगदंबेश्वरीमाता मंदिर आहे.मनगवां,सुपावारा, पुढे थोडा घाट उतरला की डावीकडे रस्त्यालगतच हनुमान मंदिर आहे.इथे मुक्काम करु शकतो.सदाव्रत मिळते.पुढे चौराई,ददरगांव,मटकाफाटा,सरवाही, देवरी. २४ किलोमीटर.
डुकरीगांवफाटा,दल्कखम्हरियाफाटा,गुरैया, बडखेरा रस्त्यालगत डावीकडे मोठे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. रस्ता ओलांडून समोरच स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आहे. तर मंदिराच्या बगिचात एका मोठ्या शिवपिंडी वरच अनेक छोट्या छोट्या शिवपिंडी आहेत. लाल रंगाची कृष्णकमळाची वेल फार सुंदर दिसते. इथे मुक्काम करुन शकतो. सदाव्रत मिळते. पुढे शहपुरा हे मोठे गांव आहे. इथे श्री.अरुणकुमार श्रीवास्तव हे वैद्य, फोटोग्राफर सेवाव्रती आहेत. त्यांनी तीन परिक्रमा केल्या आहेत.
पुढे मुडकीबाकी,करोंदी नंतर सिलगीमैया पुलावरुन पार केल्यावर छोटासा घाट चढून येते बरगांव. येथे कल्याण आश्रम ही निवासी आश्रमशाळा आहे. इथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. अंतर २४ किलोमीटर.
इथून मोठा घाट चढून अमठेरा,बडझर,पलकीफाटा नंतर मोठा घाट उतरून अमेरा हे बाजारपेठ असलेले बऱ्यापैकी मोठे गांव आहे. मंदिर आहे.डुंगरिया नंतर मालपुर येथून उजवीकडील कमानीतुन आत आपण मैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रमात जाऊन शकतो. किंवा सरळ पुढे अनाखेरा, डावीकडे रस्त्यालगतच अशोक चौबे यांचे सेवाकेंद्रात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. सिलहरीफाटा,कनईमैया पुलावरुन पार करुन विक्रमपुर हे मोठे गांव आहे. अंतर २१ किलोमीटर.
दर्रीफाटा,नुनखान,गणेशपुरी,धनगांव,शाहपुरडेपो,नरिया,शाहपुरगांव इथे गुरसीमैयाच्या किनाऱ्यावर डावीकडे अंकुर स्मृती इथे परिक्रमावासींसाठी हॉल बांधलेला असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पुढे पण्डाटोला,गोरखपुरफाटा,आमचुहा,धमनगांव घाट उतरुन जोगिटिकरिया इथे मैया किनाऱ्यावर नर्मदा सेवा समितीचे सेवाकेंद्र असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. अंतर २२ किलोमीटर. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
ग्वारीघाट,जिलहरीघाट ते रिछाई २५ किलोमीटर.
जिलहरी घाटावरुन बर्गीडॅम झाल्यामुळे पुढे किनाऱ्यावरुन मार्ग नाही.
रोडवर येऊन आयुर्वेद भवन,मंडलारोड,भटौली, तिलहरी. डावीकडे वळून दुर्गानगर आंगनवाडी पुढे रेल्वे क्रॉसिंग,छिवला,तीलहरी,चौथामैल, NH12Aहायवे उजवीकडे वळणे तिथे साहू हार्डवेअर स्टोअर प्रोफेसर शंकर साहू,संजय साहू हे मंगलेश्वरच्या ज्योतिबेनचे सहकारी सेवाव्रती आहेत.
पुढे मंडलारोड फ्लायओव्हर जवळून डावीकडे NH30ने वाटचाल सुरु.सालिवाडाफाटा समोरच्या रस्त्याने जायचे.गौरमैया पुलावरुन पार करुन बरेलाकडे वाटचाल. उजवीकडे राजाबाबू पेट्रोल पंप चे मालक भाजप अध्यक्ष श्री.राजा सोनकर हे परिक्रमा वासींची भोजन प्रसाद व्यवस्था करतात.निवास व्यवस्थाही होऊ शकते.
बरेला बाजारपेठेतुन वाटचाल. ठणठणपाळ मंदिर, राधाकृष्ण मंदिर येथे सदाव्रत मिळते.निवास व्यवस्था होते.
पुढे रिछाई येथे टेकडीवर शारदा माता मंदिर आहे. गांवात जगन्नाथ मंदिर, शिवमंदिर आहे. तिन्हीही ठिकाणी निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.
पण रिछाई गांवात प्रीतम कटारे व विजय कटारे हे सेवाव्रती निवास व भोजनप्रसाद व्यवस्था करतात.त्यांच्याकडे जाणे चांगले होईल. साधारण २५ किलोमीटर.
आता रिछाईहून आपण दोन मार्गांनी जोगिटिकरियाला जाऊ शकतो.ते दोन्ही मार्ग पुढच्या भागांमध्ये सांगते.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट.
भेडाघाट ते जिलहरीघाट.
भेडाघाट येथे गुप्त बुढ़ी नर्मदा असल्याने परिक्रमा वासी तिकडे जाऊ शकत नाहीत असे म्हणतात.
गोपाल पुरा,लम्हेटाघाट सरस्वती तीर्थ तिळभांडेश्वर,पिप्पलेश्वर महादेव परमहंस आश्रम येथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. इथे मैया उत्तरवाहिनी आहे. पुढे त्रिशुलभेद तीर्थ जवळच आहे.येथून रामनगर येथे त्रिपुरसुंदरीमाता मंदिर व आश्रम आहे.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे तिलवाराघाट, पुढे एक नाला व मैया यांच्या संगमावर सुंदर पुल असून पुलाच्या पलिकडे सागाचे जंगल आहे.शेतातील पायवाटेने वाटचाल सुखद होते.ललपुर नंतर किनाऱ्यावरील रस्त्याने दरोगाघाट. उंच उंच अशा २५/३० पायऱ्या चढून वरती उजवीकडे काठियाबाबा आश्रम.महंत कैलासमुनि महाराज आहेत. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. तसेच थोडे पुढे गेल्यावर डावीकडे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त मंदिर व आश्रम आहे. निवास व्यवस्था आहे. छानसे स्वयंपाक घर असून आपण स्वयंपाक करुन भोजन प्रसाद घेऊन शकतो. पुढे ग्वारीघाट.गुजराती धर्मशाळा,झुलेलाल धर्मशाळा भोजन प्रसाद निवास व्यवस्था आहे. याच घाटावर दररोज संध्याकाळी मैयाची आरती होते.
पुढे जिलहरी किंवा जलहरीघाट येथे प्राचिन कुशावर्तेश्वर मंदिर असून जबलपुर निवासी महाराष्ट्र मंडळ आषाढी कार्तिकी वारी मंडळ सेवाकेंद्र चालवतात.सुंदर निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. श्री.संतोष गोडबोले आणि त्यांचे सहकारी आपली उत्तम व्यवस्था करतात. कुणाला काय हवे काय नको,कुणी आजारी असल्यास डॉक्टरकडे नेणे आणणे वगैरे सर्व आपुलकीने करतात. परिक्रमा वासी बंधू भगिनींनी येथे अवश्य मुक्काम करावा.
आता रोडने येणाऱ्या परिक्रमा वासीं साठी.सहजपुरहून निघाल्यावर साधारण २० किलोमीटरवर जबलपुर येते. धर्मांतरी बायपास पार करुन जबलपुर कडे वळावे व मेडिकलकॉलेजच्या पुढे सुपाताल गढ़ा येथे नागपुर रोडवरच डावीकडे अखंड मानस यज्ञ मंदिर बजरंग मठ आहे. येथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
ज्यांना हायवेनेच कुंडम,शाहपुरा मार्गे जोगिटिकरियाला जायचे असेल त्यांनी अखंड मानस यज्ञ मंदिर बजरंग मठ येथे मुक्काम करावा व दुसऱ्या दिवशी मैया किनाऱ्यावर जाऊन जिलहरीघाट येथे स्नान,कुशावर्तेश्वर दर्शन, भोजनप्रसाद घेऊन संध्याकाळी ग्वारीघाटावरील आरती करुन परत यावे. अखंड मानस यज्ञ मंदिर बजरंग मठ येथून जबलपुर मधील रसेल चौक येथील बाजारपेठेत आपण आवश्यक ती खरेदी वगैरेही करु शकतो. या मठात आपण दोन-तीन दिवसही राहू शकतो.येथे विश्वनाथ पुरी महाराज आहेत. त्यांचे गुरु साठ्ये हे देवरुख जिल्हा रत्नागिरी येथील होते.महाराज मराठी बोलतात. नर्मदे हर.
II तीर्थ जननी नर्मदा II
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र. उत्तर तट.
रिछाईहून दोन मार्गांनी जोगिटिकरिया येथे जाता येते.एक रिछाई ते शहपुरा मार्ग व तिथून पुढे दिंडोरी हायवेने जोगीटिकरिया.तर दुसरा मंडलारोडने जोगीटिकरिया. आपण प्रथम शहपुरा मार्गाने जाऊया.
रिछाई गावाबाहेर पडल्यावर दोन रस्ते फुटतात डावीकडील रस्ता शहपुराकडे जातो.चला आपण तिकडून जाऊ. नर्मदे हर.
पुर्वा नंतर येते देवरी,गाडरखेडाफाटा,सिद्धपिठ हनुमान मंदिर.नंतर येते ब्रम्हनी गांवाच्या सुरवातीला रस्त्यालगत उजवीकडे डॉ. प्रहलाद पटेल यांचे घर, ऑफिस व सेवाकेंद्र आहे. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. हे भाजपा कार्यकर्ता आहेत. पुढे श्रीश्री सितारामजी भारती श्रीजुना पंच आखाडा बनारस यांचे दत्तमंदिर आहे. इथेही निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे धनपुरी हे बऱ्यापैकी मोठे गांव आहे. येथील आश्रमात, सेवाकेंद्रात आपल्या पुण्याच्या श्री.उदय जोशी यांनी संडास, बाथरुम बांधून दिल्या आहेत. या आश्रमात गाद्या ब्लॅकेटसह निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.श्री.महेश पटेल हे व्यवस्थापक आहेत. नर्मदे हर. पुढे झालममैया पुलावरुन पार करुन डूॅंडी,पहाडी खेडा,मनेरी इथे रस्त्याच्या उजव्या कडेला खूप मोठा तलाव असून त्यात शिंगाड्यांची शेती केली जाते. येथून एक रस्ता निवास कडे जातो व तिथून पुढे कुण्डम मार्गे शहपुरा.मनेरी इंडस्ट्रीयल एरिया आहे. पुढे जंगल सुरु होते.दुतर्फा घनदाट जंगल व मधून डांबरी रोड. कोहानीगांव,भदारीगांव नंतर सकरी येथे गांवाच्या सुरवातीला उजवीकडे श्री.लम्मूलाल विश्वकर्मा यांची नर्मदा कुटी आश्रम आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. बहुतेक सर्व परिक्रमा वासी येथे मुक्काम करतात. पुढे घाट चढाई सुरु होते. वाटेत बंजारी माता नर्मदेश्वर मंदिर आहे.सेवा मिळते. हरदलीघाट चढल्यावर हरदलीगांव,ग्वारी,मलवारा,हाथीतारा,येथे हनुमान मंदिर आहे.पुढे गुंदल ई गांवाच्या शेवटी डावीकडे प्रभू किराणा स्टोअर्स भीकमपुर येथे परिक्रमावासी सेवाकेंद्र अशी पाटी आहे. त्या रस्त्याने भीकमपुर.येथे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुढे बिझौली,अमागांव,बिसौरा येथे शहपुराला जाणारा हायवे लागतो.झिकोली,माणिकपुर,जैतपुरी,देवहरा,देवरीकलां इथे श्री.व सौ. तुलसी बाई चम्मूलाल झारिया यांची नर्मदा कुटी आहे. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.बिछिया,महानदीमैया पुलावरुन पार केल्यावर घाट सुरु होतो. छोटेसे घाटनदेवी मंदिर आहे. पुढे कटंगी नंतर घुघवा राष्ट्रीय अश्म उद्यान आहे.इथे डायनासोर ची अंडी,सांगाडे वगैरे नर्मदा खंडातील उत्खननात सापडलेल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. पुढे शहपुरा हे मोठे गांव लागते. इथे वैद्य व फोटोग्राफर सेवाव्रती श्री.अरुणकुमार श्रीवास्तव हे सर्व प्रकारची सेवा देतात. रिछाई ते शहपुरा हे अंतर साधारण ९० किलोमीटर आहे.
इथून पुढचा मार्ग कसा ते जबलपुरहून हायवेने येण्याच्या भागात लिहिले आहे.
रिछाईहून मंडलामार्गे जोगिटिकरिया पुढल्या भागात.नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. उत्तर तट.
रिछाई ते जोगिटिकरिया मंडलामार्गे
रिछाई गांवाबाहेर पडल्यावर उजवीकडील हायवेने वाटचाल.डोभी,उदयपुर, मोईनीनाला,बिजादांडी येथे राधाकृष्ण मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.गांवकरी रोज रात्री भजनासाठी जमतात. प्रशस्त आवार असलेले सुंदर मनमोहक राधाकृष्ण मंदिर आहे.
पुढे खुटापडाव,धनवाई,कुडामैली इथे धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते.टिकरिया,बालाईमैया पुलावरुन पार करुन पुढे बाबादेवरी.घाट रस्ता चढल्यावर उजवीकडे बोर्ड आहे दीड किलोमीटरवर कुम्हाघाट.कुंभेश्वर मंदिर व छान बांधीव घाट आहे मैयाचा. मंदिरात सिताराम बाबा व कुटुंब राहते बाबा मध्यप्रदेश इलेक्ट्रिक सिटी बोर्ड मधे नोकरी करत आता सेवानिवृत्त.मुलीच्या स्मृती प्रित्यर्थ तिच्या इच्छेनुसार इथे राहुन सेवा देत असतात. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. गांवच्या रस्त्याने वाटचाल एका नाल्याचा मैयाशी संगम आहे छोटा लोखंडी पुलही आहे पण मैयाचे बॅक वॉटर मागे आलेले असल्याने परिक्रमा वासी त्या पुलावरुन जाऊ शकत नाहीत. वैकुंठ धाम समोरील पायवाटेने जंगलातुन वाटचाल करत चिरी,लालीपुर.जुन्या पुलावरुन नाला पार करुन डावीकडे वळून पुढे शेतपायवाटेने हायवेवर येऊन उजवीकडे वाटचाल करत भावल. उजवीकडील गांवातील रस्त्याने साधारणतः एखाद किलोमीटर अंतरावर बगिच्यात आश्रम.भूमिचैतन्य महाराज ( संजय काणे,नागपुर) येथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे हायवेवर येऊन उजवीकडे वाटचाल.शहदी,चिरी,चिरई डोंगरी,बबैहा,सदानंद आश्रम निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते. चौराहा येथे मनोज टायगर ढाबा हे सेवा देतात. उजवीकडील रस्त्याने साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर सुंदर पिकनिक स्पॉट सारखे गरमपानी हे स्थान आहे. दोन्हीही बाजूला नर्मदामैया व मधे गरमपाण्याचे कुंड आहे. सुंदर निसर्ग रम्य स्थान आहे. नर्मदे हर.
पुन्हा बबैहा चौराहावर यायचे.इथून दोन मार्ग आहेत. उजवीकडील हायवेने गाजीपुर येथे धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. पुढे सहस्त्रधाराला जाताना जलहरी घाटावर श्रीकाशिविश्वनाथ आश्रम, धर्मशाळा व नर्मदा मंदिर आहे.इथे मैया उत्तरवाहिनी आहे. सहस्त्रधाराला राम मंदिर व धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. पुढे देवरा येथे श्रीरामकृष्ण सेवाश्रमआहे व सदाव्रत मिळते. पुढे मंडला येथे मैया किनाऱ्यावर मंडला फोर्ट,किलाघाट,राजराजेश्वरी मंदिरात सहस्त्रार्जुन, नर्मदामैया आणि मार्कंडेयमुनि यांच्या सुंदर मुर्ती आहेत. रपटा घाटावर नर्मदा मंदिर, हनुमान घाटावर सियारामदासमहाराज समाधी मंदिर येथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.इथे चातुर्मास करता येईल.
पुढे छपरी,येथे शिवानंद आश्रम असून सदाव्रत मिळते. बकछरा दोंना इथे, रेवा आदेश आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पुढे सुरजमुखी घाट येथे धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते.
पुढे लिंगाघाट येथे नर्मदा मंदिर असून इथे मैया पुर्ववाहिनी आहे.बिलगड़ा शिवमंदिर धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. डुप्टासंगम ही दुर्वासमुनिंची तपोभूमी आहे.इथे शिवमंदिर आहे व तंबूमधे निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. इथले महाराज दुर्वासमुनिंप्रमाणेच रागीट आहेत पण परिक्रमावासीं बद्दल इतके प्रेम आहे आणि त्यांना खाऊ घालण्याची इतकी आवड आहे.डुप्टासंगम ही निसर्गरम्य पवित्र तपोभूमी आहे. नर्मदे हर.
चकदेही, फडकी संगम,सिवनी, कुटरई इथे सिलगीमैया व नर्मदामैया संगम आहे. सुंदर बांधीव घाट असून खूप विशाल औदुंबर वृक्ष आहे. आश्रम आहे निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
फुलवई, सारंगपुर,कछारीघाट,टाकिनघाट, राखीगांव,मालपुर इथे कन्हैया मैया व नर्मदामैया संगम आहे.शिवमंदिर असून आश्रम, धर्मशाळा असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
शृंगारपुर,कोरलसंगम इथे कोरलमैया व नर्मदामैया संगम आहे.बनजाटोला,शिवघाट,धरमपुरा,आमी,जोगीटिकरिया. पण कुटरई पासुन पुढचा मार्ग हा घनदाट जंगलातून असल्याने बहुतेक सर्व जण कुटरईहून रोडनेच जातात.नर्मदे हर.
बबैहा चौराहा ते जोगिटिकरिया दुसऱ्या मार्गाने आपण उद्या जाऊया. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र.उत्तर तट. बबैहा चौराहा ते जोगिटिकरिया.
बबैहा चौराहा वरच्या टायगर ढाबा समोरच्या रस्त्याने बकछेरा,गोंदी,बकोरी येथे टेकडीवर दुर्गा मंदिर आहे निवास व्यवस्था आहे,गांवकरी सेवा देतात.
गांवाच्या बाहेर पडल्यावर उजवीकडील रस्त्याने वाटचाल. पौडीला जाण्यासाठी उजवीकडे वळून जायचे. वावर,पटपरा,सिंगारपुर,झालपानी,पौडी. येथे श्री. अनिल यादव,मुकेश कुमार उर्फ गुड्डा यादव सेवा देतात. यांचा एक भाऊ अन्नू यादव हे दक्षिणेतटावर दिंडोरी येथे सेवा देतात. पौडीहून गांवातील रस्त्याने लिंगामाल येथे गांवच्या रंगमंचावर निवास व्यवस्था होते व गावकरी श्री. देवीप्रसाद झारिया भोजन प्रसाद व्यवस्था करतात.
पुढे गांवातील रस्त्याने सुरजमुखीघाट.इथे धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. मैया किनाऱ्यावरुन वाटचाल. खैरीमाल, बेलघाट,बिल्वेश्वर
महादेव नर्मदा कुटी, निरंजन आश्रम. निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते.पुढे खैरीरय्यत,कौआडोंगरी,खैरी उजवीकडील कच्च्या रस्त्याने जंगलमार्गाने जणू शुलपाणितील मिनी भमाना डोंगरच असा डोंगर चढून डांबरीरोडवर आलो की उजवीकडील घाटाचा तीव्र उतार उतरुन बिलगढ़ा.गांवाच्या सुरवातीलाच श्री.अमरदास महाराज या गृहस्थ साधुंचे चंद्रमौळी घर किंवा आश्रम आहे. सौ. शामवतीमाताजींच्या मोठ्या मनाच्या प्रेमळ सेवाभावाने या चंद्रमौळी झोपडीच्या मोठा महाल केलेला आहे.
गांवाच्या बाहेर खांबांची मेट लावून गुरेढोरे येऊ नये म्हणून बंदोबस्त केलेला आहे. इथे जंगलात रस्ता भरकटण्याची शक्यता असते. घनदाट जंगल महाकठीण झाडाझुडपांनी अक्षरशः झाकून टाकलेली खडकांची भलीमोठी दरड चढताना व उतरताना खूपच जपून पाय टाकावे कारण खोलवर मैयाचे तितकेच खोल पात्र आपल्या उजव्या बाजूला आणि डावीकडे झाडेझुडपे,खदाडीतुन तोल सांभाळत चालायचं.डुप्टामैया आणि नर्मदामैया यांचा संगम आहे. पंधरा वीस सिमेंटच्या पायऱ्या चढून शिवमंदिर आहे. ही दुर्वासमुनिंची तपोभूमी आहे. इथले महाराज दुर्वास मुनिंसारखेच रागीट आहेत पण परिक्रमा वासींचा पाहुणचार इतका प्रेमाने करतात.छान खाऊपिऊ घालतात. मंदिराच्या मागे प्लास्टिक लावून दोन तंबूवजा रुम तयार केलेल्या आहेत. खाली जाडजूड उबदार ब्लॅकेटस् अंथरायला आणि पांघरायला देतात. थोडक्यात छानशी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
मंदिरामागील शेतपायवाटेने डुप्टागांव डुप्टामैया पार करुन जंगलातून शेतातील पायवाटेने वाटचाल करत चिमका टोला.डावीकडे निवासला जाणारा रस्ता आहे.आपण समोरच्या पायवाटेने जंगलातुन मैया किनाऱ्यावर उतरुन पुढे दोन दऱ्या चढून उतरुन परत मैया किनाऱ्यावर उतरुन मैया लगतच्या खडकाच्या भिंतीचा आधार घेत अक्षरशः त्या भिंतीवरुनच थोडं चालत जावं लागतं नंतर घनदाट जंगलातून पगदंडीने नंतर किनाऱ्यावरील दगडधोंड्ड्यांमधून त्यांची क्षमा मागत हो कारण नर्मदा के कंकर सब शंकर म्हणून पादस्पर्शम् क्षमस्व में असं म्हणत चालायचं पुढे एका ठिकाणी एक वाट वरती आणि एक वाट खाली दिसली की वरच्या पायवाटेने बरेच चालल्यावर येते चकदेही.नाल्याच्या कडेलाच श्री. गौतम यादव हे सेवा देतात. पुढचा कापा पर्यंत चा प्रवास रोडनेच आहे. कापा गांवात रंगमंचावर निवास व्यवस्था होते. श्री.मुन्नालाल नंदा व बालचंद नंदा हे सेवा देतात.
कापा हे पुर्ण गांव ओलांडून उजवीकडील पायवाटेने, शेतांच्या बांधांवरुन अडथळे ओलांडत मैया किनाऱ्यावरील खडकांवरुन वाटचाल करत येतो फडकी संगम.इथे दोन नाले व मैयाचा त्रिवेणी संगम आहे. चैनीबाबा आश्रम झोपडीवजा आहे. निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.
पुन्हा मैया किनाऱ्यावरील खडकांमधून चालत सिवनी. इथेही साधूकुटी आहे. धर्मालाल महाराज व सौ.संपतियाबाईमाताजी आहेत.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.पुढे बसगढ़ी येथे मोहनबाबाजी आश्रम.श्रीमती कलियामाताजी व सेवाव्रती रुख्मिणी बाला आहेत. निवास व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.
पुढे जंगलातील पायवाटेने नंतर मोठमोठ्या दगडधोंड्यांवरुन वरती शेतातील पायवाटेने टेकडीवरील झाडीत नर्मदाकुटी. पुन्हा जंगलातुन पायवाटेने सिलगीमैया किनाऱ्यावर आल्यावर तिला दगडधोंड्यांतुन. पोटरीभर पाण्यातुन पार करुन कुटरई. सुंदर बांधीव घाट आहे. भलामोठा विशाल औदुंबर वृक्ष आहे.छान पार बांधलेला आहे. आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. इथून पुढे मैया किनाऱ्यावरील वाटचाल जंगल असल्याने कठीण आहे.तो मार्ग कालच्या लेखात दिला आहे. आपण आता वरच्या डांबरी रोड ने पुढे जाऊ. नर्मदे हर.
खाल्हे कुटरई, फुलवायी नंतर घाटातील रोडने सारंगपुर. इथे ग्रामपंचायतीत निवास व्यवस्था होते.सरपंच हरिदैय्या परस्ते हे व्यवस्था करतात. पुढे कनेरी,कछारी,जैतपुरी पुढे कच्च्या रस्त्याने घाटी पार करुन डांबरी रोड ने डुबामाल,पटपरा,रामपुरी,अमेरा येथे जबलपुर, शहपुरा,जोगिटिकरिया हा हायवे लागतो. अमेरा येथे मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.गांवकरीही सेवा देतात.
इथून पुढचा मार्ग मागील रोड ने जबलपुर ते जोगिटिकरिया या लेखात दिलेला आहे.
उद्यापासून जोगिटिकरिया ते अमरकंटक जाण्याचे दोन तीन मार्ग आहेत ते पाहून. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर आश्रम सेवाकेंद्र उत्तर तट.
थोडे रोडने थोडे किनाऱ्याने जोगीटिकरिया ते अमरकंटक.
जोगिटिकरिया गांवाच्या सुरवातीला रस्त्याच्या डावीकडे परिक्रमा पथ असा बोर्ड आहे.तिथून डांबरी रोडने विचारपुर,देवरा,मुडकीचौराहा,बिदयपुर,भैसलागांव, धुर्रा,उदरी, रुसामाल नंतर थोड्या अंतरावर उजवीकडे पायवाटेने शॉर्टकट आहे. त्या पुर्णपणे बंजर जमिनीवर अगदी घानामार पर्यंत सगळीकडे छोट्या मोठ्या तपकिरी, पिवळ्या दगडांचा जणू सडा पडलेला दिसतो.सगळी जमीन मुरमाड आहे.
घानामारमधे स्कूलमध्ये निवास व्यवस्था होऊ शकते.गांवकरी सदाव्रत, भोजन प्रसाद सेवा देतात.
इथून अनुपपुर जिल्हा सुरु होतो. खाल्हे दुधी, वरले दुधी,इटौरा,घुघरी इथे आठवडे बाजार भरतो.बऱ्यापैकी मोठे गांव आहे. सर्वच गांवातून गांवकरी सेवा देतात.मंदिरे,शाळा यामधे आसन लावता येते. काही गांवकरी त्यांच्या घरीही निवास भिक्षा मागितली तर राहायला जागा देतात
बराॅंज, परसू टोला,बिजापुरीफाटा आल्यावर उजवीकडे चंदन घाट रोड लागतो. तिथून बिजापुरी हे गांव येते.गांवाबाहेर पडल्यावर कच्चा रस्ता, कसराटोला नंतर शेतातील पायवाटेने चंदन घाट.डावीकडे टेढी नदीमैयाच्या पुलाजवळ उजवीकडे श्री.रामेश्वरप्रसाद चौकसे हे सेवा देतात. तिथून उजवीकडे टेढीमैया व नर्मदामैया संगम आहे. स्वच्छता नाही. घाटावर धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे. सदाव्रत मिळते.
टेढीमैया पुलावरुन पार करुन डावीकडील रस्त्याने वाटचाल करुन लालपुर नंतर कच्चा रस्ता शेतांच्या बांधांवरुन डांबरी रोड.पाखाटोला,कंचनपुर येथे पतीराम धुर्वे हे सेवाव्रती आहेत.तसेच गलीराम मन्सराम हेही सेवा देतात. पुढे शिवाला घाट येथे मैया पात्रात खूप शिवलिंग आहेत. घाटावर धर्मशाळा आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
मैया किनाऱ्यावरुन वाटचाल करत पुढे वर चढून शेतातील बांधांवरुन, पायवाटेने ठाडपथार गांव. येथे मैया किनाऱ्यावर शिवमंदिर,रंगमंच व परिक्रमा वासी सेवाश्रम आहे. शंकरपुरी महाराज आहेत. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
आश्रमा जवळील रस्त्याने पुढे देवरीमैया पार करुन देवरीगांव,नवाटोला, दमहेडी,घुईदादर,सरवाही,कस्तुरी,विलासपुर गांवाच्या शेवटी उजवीकडे सरपंच शंकरसिंग मरकाम ह्यांच्या घरी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था होते.
पुढे लगेचच घाट चढाई सुरु होते. घाट पार केल्यावर भीमकुंडीफाटा,करोंदाटोलाफाटा,पडरिया नंतर खाटी गांवात श्री.कमलसिंग राठोड यांच्या घरी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था होते.
मोहंदी,हर्रई, गांवाच्या शाळेत आसन लावता येते.गांकरी सदाव्रत देतात. गांवातुन उजवीकडे वाटचाल करत गांवदेवी मंदिर समोर मोठी वाघाची मुर्ती आहे. डावीकडील कच्च्या रस्त्याने जंगलमार्गाने फर्रीसेमल व दमगढ़. येथून दमगढ़ची घाट चढाई.घनदाट जंगलातील कच्चा रस्ता,पक्षांचा किलबिलाट, रंगीबिरंगी छोटी छोटी रानफुले सारंच खूप सुंदर आहे. दूधधारा,कपिल धारा, मीरा माताजी यांनाच पगलीमैया ही म्हणतात. इथून पुन्हा टेकड्या चढत उतरत बाबाघाट येथे बरेच ढाबे आहेत.मोठे पार्किंग झोन आहे. इथून डांबरी रोड ने अमरकंटक.
कपिलधाराला जायचे नसेल तर दमगढ़ घाटी चढायला सुरुवात केली की साधारण अर्धा एक किलोमीटर वर डावीकडे शाॅर्टकट ने थोडी अवघड चढाई चढून आपण एका मोठ्या मोकळ्या मैदानासारख्या
जागेजवळ येतो तिथून डावीकडील कच्च्या रस्त्याने वाटचाल करत बंधा नंतर अमरकंटक च्या बसस्थानका जवळ आपण येतो.
अमरकंटक मधे बरेच आश्रम आहेत. सगळीकडे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
जोगिटिकरिया ते अमरकंटक काही घाट व स्थाने. आश्रम, सेवाव्रती.
देवराच्या अलिकडे टेकडीवर लंबेनारायण गुंफा व महाकाली मंदिर आहे. देवरा गांवच्या घाटावरील मंदिरातील नर्मदामैयाची मुर्ती खूपच सुंदर आहे.मैया आपल्याकडे पाहून गोड हसताना दिसते.
देवरा गांवच्या सुरवातीला च परिक्रमा वासी निवास बांधलेला असून समोरच श्री.रामदुलारे राव,मुकुंदलाल राव,कुलदीप राव हे राव कुटुंब सेवा देते.खूप प्रेमळ सेवाव्रती कुटुंब आहे.
पुढे रुकामपुर,भैसलागांव,लुटगांव,उदरी,रुसा नंतर तिकठ्ठाहून उजवीकडे शेत पायवाटेने हनुमान घाट.येथे जगदीश महाराज आहेत.ते म्हणाले खाना कम काम ज्यादा करना चाहिये.ते फक्त लवंग खाऊन गुरुगृही काम करत असत.खूप मोठी गोशाळा सांभाळत असत. फक्त दूध पिऊन त्यांनी २०१७ मधे परिक्रमा केली. आताही ते एकभुक्त असतात. त्यांचे शिष्य बिहारी महाराज हे आहेत.
पुढे शेषघाट.ही शेषनागाची तपोभूमी आहे. इथे एक खूप मोठा शिरीष वृक्ष आहे. म्हणून या घाटाला शिरीष घाट व दूधी गांव आहे म्हणून दूधी घाट म्हणतात. येथील शिरीष वृक्षाखाली सिद्धबाबा म्हणजे आपले गजानन महाराज यांनी तपस्या केली आहे.
पुढे टेढी संगम, शिवाला घाट,ठाडपथार,इथे मैया किनाऱ्यावर आश्रम आहेत व निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे विलासपुर येथे श्री.शंकर मरकाम,खाटी येथे कमलसिंग राठोड हे सेवा देतात.
रोडने जोगिटिकरिया ते अमरकंटक या भागात बाकी सविस्तर लिहिले आहे. नर्मदे हर.
माई की बगिया ते दिंडोरी.-
माई की बगिया येथे कैलास आश्रमात साध्वी गीता पुरी माताजी आहेत.पंडित तिवारीजी आहेत. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. या शिवाय तुरीय आश्रम,मार्कंडेय आश्रम आहे.
सोनमूढा येथे शोण नदचा उगम असून शौनकमुनिंची तपोभूमी आहे.हा भाग छत्तीसगड राज्यात येतो.
पुढे बलकेश्वर आश्रम,श्रीयंत्र मंदिर नंतर येते नर्मदा कुंड. माई की बगियातुन गुप्त झालेली मैया इथे गोमुखातून प्रगट झाली आहे. या प्रांगणात नर्मदा मैया,अमरकंटकेश्वर वगैरे मंदिरे आहेत. समोर कर्णमंदिर आहे.
थोडे पुढे गेल्यावर डावीकडे सुंदर वृक्षराजीमधे पुण्याच्या यशोधनट्रॅव्हल तर्फे चालवलं जातं असलेलं सेवाकेंद्र असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
कपिला संगम नंतर मैया किनाऱ्यावरुन जाणारा मार्ग हा घनदाट जंगलातून अनेक डोंगरातुन जाणारा असून बिकट आहे. मी कधीही तिकडून गेलेली नाही म्हणून रोडने जाण्याचा मार्ग पाहू. नर्मदे हर.
यशोधनकडून निघाल्यावर एकदीड किलोमीटर जंगल, कच्चा रस्ता आहे पुढे डांबरी रोड आल्यावर डावीकडे वळून वाटचाल. दुतर्फा घनदाट वृक्षराजी,पक्षांचा किलबिलाट,माकडांची उछलकुद असा सृष्टीतला आनंद घेत सात किलोमीटर वर येतो कबीर चबुतरा.संत कबीर यांची तपोभूमि. आश्रम आहे व सदाव्रत मिळते.
पुढे जगतपुर. अंगणवाडीच्या ओट्यावर राहू शकतो.अंगणवाडी सुरु असेल तर भोजन प्रसाद मिळू शकतो. थोडे पुढे गेल्यावर डावीकडे वृक्षराजीत लपलेले एक सेवाकेंद्र आपल्या नवनाथ महाराज यांनी सुरु केले आहे. बोर्ड लावलेला आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे बोंदर रय्यत नंतर करंजिया इथे राय स्टोअर हे सेवा देतात.परिक्रमावासी निवास आहे. तरेरा,रामनगर,करोंदीफाटा,अमलदीह,रुसा येथे शाळेत राहता येते.गांवकरी सेवा देतात. पुढे पाटणगढ़, गोरखपुर येथे मंदिरात निवास व्यवस्था होते.सदाव्रत मिळते.माधोपुर,चंदना,डोंगरी टोला, रामनगर,कनकधारा,पिंजरा टोला,मोहतरा इथे रस्त्याच्या उजवीकडे नवीन सेवाकेंद्र बांधलेले असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. नवनाथ महाराज व शंकरपुरीमहाराज हे सेवाकार्य करीत आहेत. इथे एक मुस्लीम बंधू आहेत त्यांना श्रीमद्भगवद्गीता पाठ आहे.पुढे गाडा सराई येथे मंदिरात निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.गाडासराई मोठे गांव असून हॉटेल,भोजनालयेही आहेत.
पुढे बरगांव,सागरटोला चौराहा येथून उजवीकडे चरकुटिया येथे पुण्याच्या सेवाव्रती धनी चालवलेल्या सेवाकेंद्रात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पुढे केवलारी,सुनपुरी,बोंदर,बिझौरी नंतर खरगेना येथे रस्त्याच्या कडेला डावीकडे संत कबीर भोलेनाथ आश्रमात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
कारोपानीफाटा,हर्रा,गिधा इथे गोमतीमैयाच्या किनाऱ्यावर उजवीकडे एक ढाबा आहे ते सर्व सेवा देतात.
कुडा, पुढे कुकरामठला जाण्यासाठी डावीकडे एक दोन किलोमीटर आत जावे लागते. ॠणमुक्तेश्वर मंदिर, आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
बिछिया,महावीरटोला,सिमरिया फाटा,घानाघाट, दिंडोरी. मैया किनाऱ्यावर रामबाई आश्रम येथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम सेवाकेंद्र.दक्षिणतट.दिंडोरी ते देवगाव संगम.
दिंडोरी हून मंडलारोडने वाटचाल.किरहाटोला,जमुनिया,रहंगी,रयपुरा,इमलय इथे टेकडीवर मंदिर व आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.इथे लक्ष्मीमाताजी आहेत. वाटेतील सर्व गांवाच्या शाळांमधे राहता येते.शाळेच्या भोजन प्रसादातच आपल्यालाही भोजन प्रसाद मिळतो.
दिंडोरी जिल्ह्यातील हा सर्व प्रदेश उजाड रुक्ष आहे.झाड झाडोरा अजिबातच नाही.दिंडोरी शहराबाहेर तर डंपिंग एरिया असल्याने कचऱ्याचे अक्षरशः डोंगर तयार झाले आहेत.
इमलयपासुन घाट आहे. रैपुरा,छपरी,जुल्दानियाफाटा ते तलैया घाट आहे.तलैया इथे रस्त्याच्या कडेला उजवीकडे एक आश्रम, बगिचा आहे. राहता येईल. शेजारीच एक चहानास्ताची टपरी आहे. पुन्हा घाट चढला की घाटमाथ्यावर किसलपुरी हे बऱ्यापैकी मोठे गांव आहे. मंदिरात,शाळेत राहता येते व गांवकरी सेवा देतात.
पुढे सक्का हेही बऱ्यापैकी मोठे गांव आहे. इथून उजवीकडे थोडे खाली घाट उतरल्यावर देवनाला हे मोठा धबधबा व मोठ्या गुहेत शिवपिंडी असलेले सुंदर स्थान आहे. एका साधुमहाराजांची कुटी आहे. राहता येते व सदाव्रत मिळते.
सक्का येथून डावीकडील रस्त्याने अमरापुर,घुगरी मार्गे ही रामनगरला जाता येते पण तो लांबचा मार्ग होईल.
कचनारी,बरगा येथे दरीत मोठा पाझरतलाव आहे.इथून पुन्हा घाट सुरु होतो.रस्त्याच्या दुतर्फा डोंगर उतारावर दाट जंगल आहे पण वाटसरुंना सावली मिळत नाही.
पुढे राई येथे दुर्गा मंदिर आहे.राहता येईल. मंदिरात शेजारील ढाब्याचे मालक अनिल साहू हे सेवा देतात. इथून घाट उतार सुरु होतो. वाटेत मां वनदेवी मंदिर असून आनंदगिरी हे साधू राहतात. परिक्रमावासींसाठी निवास बनवले आहे. भोजन प्रसाद व्यवस्था आहे. इथे २०१५ साली नर्मदामैया प्रगट झाली आहे असे सांगतात. पहाडातुन एक जलप्रवाह वाहतो आहे.कुंडही बांधले आहे.
हर्रा टोला नंतर हर्रा गांव येते इथे शाळेत राहता येते.शाळेच्या वेळेत भोजन प्रसाद मिळतो. या शाळेत महाराजपुर येथील श्री. शारदा गोप नांवाचें शिक्षक सेवा देतात. ते महाराजपुरमधेही सेवा देतात. शाळेसमोर ढाबा आहे.
पुढे गिधलौंडी येथे छोट्या नाल्याच्या काठावर रस्त्याच्या कडेला गर्द वृक्षांच्या छायेत,पेरु सीताफळाच्या बागेत एक छोटेसे हनुमान मंदिर आहे. काशिगिरी महाराज आहेत.निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
पुढे अंडियामाल नंतर चाबी गांवाच्या सुरवातीला डावीकडे नर्मदा कुंड नांवाची विहीर आहे. आश्रम आहे निवास व्यवस्था होते सदाव्रत मिळते. चाबी गांवात दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
पुढे खैरी,गिठौरी,खाल्हे गिठौरी,अंडियादर, मोहगाव रय्यत,मोहगाव येथूनही घुगरीमार्गे रामनगरला जाता येते. पुढे इंद्रा नंतर येते देवगाव. मैया किनाऱ्यावर जमदग्नी आश्रम मंदिर आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. इथे चातुर्मास करता येईल.इथे बुढनेर(बुढी नर्मदा) व नर्मदामैया संगम आहे. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर आश्रम सेवाकेंद्र दक्षिणतट. देवगांव संगम ते महाराजपुर.
जमदग्नी आश्रम येथून पंधरा वीस पायऱ्यांचा घाट उतरुन बुढनेरमैयाला जास्त पाणी असेल तर होडीने व नसेल तर पायीच पार करुन दरड चढली की उजवीकडे परिक्रमा पथ असा बोर्ड आहे. कुडोपानि नंतर जंगलातील पायवाटेने एक घाटी चढून उतरावी लागते.ती घाटी म्हणजे मांडू उतरण्याचा मिनी वणझरी घाटच आहे.मोठमोठे दगडधोंडे, झाडेझुडपे खदाडीतुन तोल सांभाळत चालावं लागतं. घाटी उतरल्यावर डांबरी रोड क्रॉस करुन समोरच्या शेतातील बांधांवरच्या पगदंडीने वाटचाल.दुतर्फा बडिशेप शेतातुन वाऱ्यावर लहरत असते.
बिलगांव, येथे शिव मंदिर, हनुमान मंदिर येथे निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते. पुढे डांबरी रोडनेच जायचे असते. सालीवाडा,चंदवाराफाटा नंतर उजवीकडे रेवाखंडे सेकंडरी स्कूल पलेहरा ह्या बोर्ड जवळ उजव्या हाताला वळून पलेहरा गांवचा सिमेंटचा रस्ता लागला की समोरच्या पगदंडीने शेतांच्या बांधांवरुन वाटचाल करत आपण झिना या गांवी पोहोचतो. तिथून डांबरी रोडने चौगान. इथे मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे रेस्ट हाऊस आहे. इथे राहुन रामनगर,कालापहाड,मोतीमहल वगैरे पर्यटन स्थळे बघता येतात.
पुढे वाटचाल करताना चौगान की मढ़िया हा ऐतिहासिक महाल दिसतो.पुढे रामनगर हे बऱ्यापैकी मोठे गांव आहे.महाराष्ट्र बॅंकेची शाखा आहे. इथे राममंदिरात राहून रामभक्त की मढ़ी हा किल्ला,मोतीमहल वगैरे पाहू शकतो. बरीच हॉटेल वगैरे आहेत.राम मंदिरात सदाव्रत मिळते. नर्मदे हर.
पुढे मुगली हे गांव लागते.इथून कालापहाडला जाण्याचा मार्ग आहे. कालापहाड हा नावाप्रमाणेच मोठा खडकाचा डोंगर आहे. त्यामधे दगडाचेच अष्टकोनी, षटकोनी आकाराचे खांब नैसर्गिक पुणे तयार झालेले आहेत.एक गुहा असून आत शिवपिंडी आहे. या काळ्या खडकांमधून मातीचा कणही नसताना मोठे मोठे वृक्ष वाढलेले आहेत.काळापहाड डोंगरावर कुठेही मातीचा कणही नाही. पायथ्याशी असलेल्या घरात निवास व्यवस्था होऊ शकते.नर्मदे हर.
पुढे करियाटोलाचा घाट चढून येते मधुपुरी. इथे ॐ शिवमंदिर या गीताबाई होळकर यांच्या घरी परिक्रमावासींसाठी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. इथूनच मैया किनाऱ्यावरील घोडाघाट इथे जाता येते. घाटावर मोठी घोड्याची मुर्ती आहे.मार्कंडेय महादेव, हनुमान मंदिर आहे. निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.मात्र इथून पुढे किनाऱ्यावरुन जाणे अवघड आहे.मधुपुरी गांवातुन पुढे घुघरा गांवानंतर उजवीकडे तलावानंतर परिक्रमा पथ बोर्ड आहे. कनॉलरोडने अमगमा गांव,खडदेवरा इथे प्राथमिक शाळा.पुढे खडदेवरी हे गांव इथे कनॉल क्रॉस करुन शाळेजवळील पायवाटेने डांबरी रोड पर्यंत आलो की उजवीकडे सुरजकुंड.इथे पंचमुखी हनुमान मंदिर, सुंदर घाट आहे. निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.डावीकडील रोडने पुरवा चौराहा. इथून बंजर मैया पार करायचे मोठे दिव्य आहे. सांडवा होता कधीकाळी याचे अवषेश आहेत प्रवाहात.मोठी पाण्याची पाइपलाइन बंजरमैयाचा जोरदार खळाळता प्रवाह यातुन तोल सांभाळत पार व्हायचे म्हणजे खरोखरच दिव्य आहे. नर्मदे हर. आले महाराजपुर. पंवार धर्मशाळा,एक माताजींचा आश्रम आहे. पण आता घाटाजवळच महाराजपुर नागरिक सेवा समितीचे छान परिक्रमा निवास बांधले आहे. छानसा हॉल असून गाद्या ब्लॅकेटसह निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. महाराजपुरचे पार्षद श्री. रितेश रायजी आणि सहकारी सेवा देतात. या सेवेमुळे परिक्रमावासींची मोठी अडचण दुर झाली आहे. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिण तट. महाराजपुर ते बरेली.
महाराजपुरहुन दोन मार्गांनी बर्गीला जाता येते.लखनादौन हायवे ने घन्सौर व तिथून बर्गी कॉलनी.किंवा महाराजपुर शहराबाहेर पडल्यावर पुढे उजवीकडे परिक्रमा पथ बोर्ड आहे तिथून कच्च्या रस्त्याने शॉर्टकटने दोन नाले पार करुन मानादेही येथे आपण पुन्हा डांबरी रोड वर येतो. पुढे रेवा संत कुटी हा घुंगरुवाले बाबांचा आश्रम आहे.इथून सहस्त्रधारा दर्शन होते.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.घुंगरुवालेबाबाजी गेल्या वर्षी समाधीस्त झाले. पुढे वृंदावन गोशाला येथेही निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.चातुर्मास करता येतो. सुरंग देवरी. इथे टेकडीवर शिव मंदिर व उमा देवी आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. खाली हनुमान मंदिर असून शेजारीच शाळा आहे.तिथे नाशिकच्या देवळाली येथील अनाथ आश्रमात मोठे झालेले राममहाराज आहेत. निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. थोडे पुढे गेल्यावर देवबाप्पा माऊलीधाम हा त्र्यंबकेश्वर येथील फरशीवालेबाबा यांचा आश्रम आहे.सतचित्तानंदस्वामी हे व्यवस्थापक आहेत.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. सहस्त्रधाराला मैयापात्रात रावणाने बांधलेले शिवमंदिर आहे.व श्रीकृष्णाने बांधलेले छोटे शिवमंदिर आहे. इथेच सहस्त्रार्जुनने रावणाचा पराभव केला अशी आख्यायिका आहे.व सहस्त्रार्जुनाने इथेच आपल्या सहस्त्र हातांनी मैयाला अडविण्याचा प्रयत्न केला अशीही आख्यायिका आहे.पण अशीच आख्यायिका महेश्वरच्या अलिकडे जलकोटी इथेही सांगितली जाते. मंडलावासी म्हणतात इथेच आदि शंकराचार्य व मंडणमिश्र यांचा प्रसिद्ध वाद झाला व हीच खरी माहिष्मती नगरी तर मंडलेश्वर,महेश्वर इथेही असेच सांगतात.असो,नर्मदे हर.
इथून पुढे मात्र बर्गी धरणामुळे लांबून जावे लागते व फारसे आश्रम वगैरे नाहीत, जंगलातून वाटचाल करावी लागते पण वाटेत लागणाऱ्या गावांमधील गांवकरी आस्थेने विचारपूस करतात,सेवा देतात. नर्मदे हर.
पुढे सिलपुरा,रथटोला नंतर सनकुही ह्या गावाबाहेर पडल्यावर डावीकडे एक सरकारी इमारती व एक घर आहे त्या जवळूनच एक पायवाट जंगलातुन आहे पण घनदाट झाडी,नाले वगैरे असल्याने भरकटण्याची शक्यता असते. या वाटेने ठोडागांव व तिथून डांबरी रोड ने एकदम साल्हेदंडा इथे पोहोचता येते.
सुनपुरी,भैसादाह,घागा. घागा येथे शिवमंदिर व मुनिबाई आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पण घागा गांवात न जाता प्राथमिक आरोग्यकेंद्र,आयुष औषधालय केंद्रा समोरुन पायवाटेने तलावाजवळून कच्चा रस्ता अहमदपुर. इथे रंगमंचावर निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.श्री.बाबुराम यादव व मंडळी सेवा देतात.पुढे सुरजपुरा,ठोडा नंतर साल्हेदंडा इथे नौजिलाल तिलगाम हे सेवा देतात.
इथून पुढे जंगलातील कच्चा रस्ता आहे. थोडा अवघड घाटही आहे. भुमका इथून डांबरी रोड आहे.पाटण इथे गणेश मंदिर व धर्मशाळा आहे निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.पुढे केवलारी,केदारपुर या गांवात ही व्यवस्था होते. बरेली येथे नर्मदा मंदिर व ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये,हॉलमध्ये निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. श्री.विवेक नायकवार आणि मंडळी खूप छान सेवा देतात. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिणतट. बरेली ते बर्गी.
किंदरई,पौडी इथून गोकला मार्गे रोडने घन्सौर,कहानी,घुमा झालोन मार्गे एकदम गोटेगांवला जाता येते.
पौडी,कुडोठार येथे श्री. रवि यादव हे सेवा देतात. दलका येथे शाळेत राहता येते,सदाव्रत मिळते. पांडीदलका नंतर जंगलातील पायवाटेने साल्हेपानी,वरले साल्हेपानी गांव संपल्यावर उजवीकडे घाटी चढून शॉर्टकटने बिछुआ, दुर्जनपुर येथे श्रीराम मंदिरा समोर एक खोलीचा परिक्रमा वासी निवास बांधलेला आहे.व सदाव्रत मिळते.
इथून शेतातील पायवाटेने शॉर्टकटने पनारझीर,जम्होरी,दिवारा,दिवारी.या सर्व गावातील मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.पुढे संपुर्ण घाट रस्ता आहे.कलकुही,तुनिया येथे संकटमोचकधाम हनुमान मंदिरात ज्ञानलाल महाराज आहेत.निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.इथून मैयाचे दर्शन होऊ लागते. सहस्त्रधारा नंतरचे प्रथम दर्शन.खूप आनंददायी आहे.गागनदा नंतर येते बर्गी कॉलनी. बर्गी धरण अवन्तीबाई सागर नांवाचे मैयाचे विशाल नीलश्यामल स्वरुप. कॉलनीत गणेश मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. टेकडीवर नंदिकेश्वर महादेव मंदिर आहे.चौराई येथे हनुमान व साईमंदिरात राहू शकतो.
बर्गी गांवच्या बाजारपेठेत संदीप किराणा स्टोअर्स हे सेवा देतात. पुढे शंकर मंदिराजवळ सोनी धर्मशाळा येथे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिण तट. बर्गी ते होशंगाबाद.
बर्गी येथून दोन मार्गांनी जाता येते. रोडने व थोडे मैयाजवळच्या रस्त्याने. आपण आधी रोडने जाऊया.
घाटपिपरिया रोड ने महरपाठा येथे अंगणवाडीत व्यवस्था होते. पुढे पुराना पानी बडादेव(महादेव) मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.पण स्वच्छता नाही.समोरच एक नदीमैयाचा स्वच्छ जलप्रवाह खळाळत वाहात असतो.इथे रामजीसाधुमहाराज आहेत.
पुढे घाटपिपरिया इथे रोडवरच ढाबा आणि दुकान आहे ते सेवा देतात इथून समोरच्या रस्त्याने बबई, सिवनी टोला मार्गे सांकलघाट जातायेते. किंवा चंदेरी येथून जंगलातील कच्च्या रस्त्याने थाना,घाट चढून नीची इथे बजरंग मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते. अशोककुमार पटेल हे सेवा देतात. नर्मदे हर.
मंदिरासमोरील शेत पायवाटेने हिरापुर पुन्हा जंगल रस्ता घुगरी इथे हायवे लागतो. हा शॉर्टकट आहे. इथे धुर्वे जलपानगृह.श्री.शिवराज धुर्वे हे छान सेवा देतात. पुढे बढैयाखेडा नंतर चरगवां हे मोठे गांव आहे. श्री.दिलिप सेन यांचे बाजारपेठेच्या सुरवातीला सलुन आहे. ते निवास व भोजनप्रसाद सेवा मोठ्या आदरभावाने देतात. नर्मदे हर.
पुढे चरगवां गांवाच्या शेवटी रस्त्यालगत उजवीकडे एक छोटेसे मंदिर व धर्मशाळा आहे निवास व्यवस्था होते. सदाव्रत मिळते. पुढे तरवारा गांवानंतर सेमरीमैया लागते.मोठा पुल आहे.संपुर्ण घाट आहे. भरडी,रस्त्यालगत लालसिंग राजपूत यांचे घर आहे.ते सेवा देतात. पुढे कुकलाह नंतर सिमरिया रेल्वे क्रॉसिंगला मंदिर आहे व ढाबेही आहेत. डावीकडे रेल्वेच्या समांतर रोडने बगलाई नंतर येते गोटेगांव.हे रेल्वे जंक्शन असून बऱ्यापैकी मोठे शहर आहे. चौकात महाकाली मंदिर आहे. सांकल घाट रोडवर श्री. अनिल पटेल हे उत्तम सेवा देतात. सांकलघाटला जायचे नसेल तर सरळ हायवे ने कुम्हडाखेडा,रेल्वे क्रॉसिंगनंतर बोचरी येथे रस्त्याच्या कडेलाच डावीकडे एक साधू कुटी आहे.पुढे कमती नंतर उमनमैया पुलावरुन पार करुन इमालिया इथे मंदिरात राहता येते.गांवकरी सेवा देतात.
पुढे मानेगांव,गुंदरई इथे रस्त्याच्या कडेला मंदिर आहे.सुरवारी,बेलखेडीशेर हे बऱ्यापैकी मोठे गांव आहे. शेरमैयाच्या पुलालगतच लुडकानाबाबा मेहेरवाले मंदिर आहे.हॅण्डपंपही आहे. राहू शकतो.बेलखेडी गांवात सदाव्रत मिळते. किंवा अनेक हॉटेल्स आहेत.
बहोरी पार रस्त्या लगतच हनुमान मंदिर आहे.नरसिंहपुर फ्लायओव्हर ब्रिजखालून हनुमान दादा मंदिर.निवास व्यवस्था आहे.सदाव्रत मिळते. पुढे हायवेवर ग्रिनपार्क हॉटेल येथे श्री.विरुभाई मेहरा यांनी परिक्रमा वासीं साठी निवास व्यवस्था केली आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. बहुतेक सर्व परिक्रमा वासी इथेच राहतात.
नरसिंहपुर रेल्वे स्टेशन समोरून बाजारपेठेतून पुढे नरसिंह मंदिर, धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
पुढे खैरी इथून छोटाबरमानघाटला,लिंगाघाटला जाता येते.देवलीकलां,कठौतिया येथे सक्करमैयाच्या पुलाजवळ सुंदर नर्मदा मंदिर आहे. निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. सक्करमैया पुलावरुन पार करुन लिंगा रोगाने रेल्वे क्रॉसिंग फाटका जवळून वाटचाल करत दुसऱ्या रेल्वे क्रॉसिंग करुन रेल्वे लाइन जवळील पायवाटेने रेल्वे कॉलनी पार करुन विद्यासागर द्वार ओलांडून करेली. हे मोठे गांव आहे. मोठे श्रीराम मंदिर आहे पण व्यवस्था नाही. पण नर्मदा सेवा समिती कार्यरत असून देवेंद्र गोस्वामी हे सेवा देतात. पुढे बटेसरा,बंदेसर,करपगांव, येथे राजू पानीपुरीवाला हे सेवा देतात.मालनवाडा,नारगी,पनारी,पुरगवां,ब्रम्होरी,मनकवारा रेल्वे क्रॉसिंग,बरांझ येथे मोहीत कौरव ह्यांच्या घरी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पुढे बोहानी येथे छोट्या टेकडीवर राधाकृष्ण मंदिर आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.शेजारी सुंदर तलाव आहे. कौडिया,शक्ति शुगर मिल,सक्करमैया पुलावरुन पार केली की गाडरवाडा हे मोठे गांव आहे. मंदिरे, धर्मशाळा आहेत इथे भगवान रजनीश म्हणजे ओशो यांचा वडिलोपार्जित वाडा आहे.
कामती,सालीचोका,नांदनेर,बेलखेडी येथे सुंदर शिवमंदिर आहे.निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते.पुढे पनागर,माल्हनवाडा,पलिया,गोविंदनगर,पालीपिपरिया इथे भाऊसाहेब भुस्कुटे स्मृति लोकन्यास निवासी आश्रमशाळा आहे.निवास व भोजन प्रसाद व्यवस्था होऊ शकते.
ठैनी,नयाखेडा रेल्वे क्रॉसिंग,बनखेडी,बाचाबानी, अंजनीमैया पुलावरुन पार करुन बांसांखेडा रेल्वे क्रॉसिंग,रामपुर येथे बाबा जय गुरुदेव संत उमाकांतजी आश्रम इथे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
पिपरिया चौराहा.डावीकडे पिपरियागांव, उजवीकडे होशंगाबादरोड आपण रोड क्रॉस करुन समोरच्या रस्त्याने जायचे.हथवासा येथे सिताराम आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
रानी पिपरिया,शोभापुर,बरीबानी,करणपुर,सोहागपुर,येथे बावडीवाले राम मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. गांवही बऱ्यापैकी मोठे आहे. पलकमती मैया पुलावरुन पार केल्यावर बोदीफाटा,लांघामैया पुलावरुन पार केली की बाबा बालकदासजी त्यागी आश्रम आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे लांघा ब्रम्होरी,मढई, सेमरी हरचंद बऱ्यापैकी मोठे गांव आहे. दुर्गा मंदिर आहे निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते. बरेच ढाबे,हॉटेल्सही आहेत. ब्रम्होरीकलां,गडारिया,बुधवाडा,बाबई हे बऱ्यापैकी मोठे गांव आहे मंदिरात निवास व्यवस्था होते व सदाव्रत मिळते.बरेच ढाबे, हॉटेल्सही आहेत.
आंचलखेडा, तवामैयावर एकदीड किलोमीटरचा पुल आहे. पुढे देवलाखेडी,निमसांडिया, जैसलपुर,होशंगाबाद. मैयाच्या मंगलवाराघाटावर श्रीनारायणकाका ढेकणे महाराज यांनी स्थापन केलेला लोकनाथतीर्थ आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. शेठाणी घाटावर ही मंदिरे धर्मशाळा आहेत.मोठे शहर असल्याने मोठी बाजारपेठ,भोजनालये, मिष्टान्न भांडार आहेत. श्री. जयदीप पाटणकर हा मैया पुत्र सेवेसी नेहेमीच तत्पर असतो. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिणतट. बर्गी ते छोटा बरमानघाट.
मैया किनाऱ्यावरुन व मैया जवळून.
बर्गीहून मनेगांव,तिलवारा येथे मार्कंडेय आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पुढे दोन-तीन किलोमीटर रस्त्याने नंतर शेतातील पायवाटेने शिवनी गांवातुन मैया किनाऱ्यावर शिवनीघाट नाल्याकाठी मंदिर आहे. नाला पार करुन दरड चढली की त्रिशुलघाट इथे टेकडीवर त्रिशुलभेद मंदिर,वराह तीर्थ, आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.पुढे लम्हेटीगांव,लम्हेटीघाट इथे शनि कुंड,शनि,पिप्पलेश्वर,इंद्रेश्वर,कुंभेश्वर मंदिर असून इथे मैया उत्तरवाहिनी आहे. आश्रमात निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
डुंडवारा,धुवांधार,भेडाघाट,राजहंस संस्कृत पाठशाळा मैया कालव्या प्रमाणे दिसते.पुढे रस्त्याने गौरगांव.समोर सरस्वती घाट दिसतो.पुढे जंगल रस्ता.पांढऱ्या,लाल मार्गदर्शक खुणा,भगवे झेंडे लावलेले आहेत.रामघाट रामकुंड. घुगरा गांवाच्या एक किलोमीटर आधी गुजराती आश्रम निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
मैया किनाऱ्यावरुन पायवाटेने एक नाला पार करुन जंगल पायवाटेने शेतातुन भडपुरा,भिकमपुर इथे संगमेश्वर महादेव मंदिर.धर्मशाळा, विरक्त आश्रम.सदाव्रत मिळते,सनेरमैया पार.रेल्वेपुलाखालून मैया किनाऱ्यावर झाशी घाट. पुलाजवळ हनुमान मंदिर व साधुकुटी आहे.पुढे लहान मोठे नाले,चिखल यातुन वाटचाल करत बिलखेडी येथे श्री.रमेश बर्मन हे सेवा देतात.इथून रस्त्याने गोटेगांव खमरिया ला जाता येते. किंवा पुढे कंजिया, कालव्याच्या कडेने चालत मुआरघाट,जमुनिया,गांवात धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते.मैया किनाऱ्यावरुन ब्रम्हकुंड ही ब्रम्हदेवाची तपोभूमी तीर्थ असून सुंदर रमणीय स्थान आहे.इथे भोसले सरदार राममंदिर आहे.
धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
हरेरशाखा कालव्याच्या कडेने सांकलघाट ही आद्य शंकराचार्य यांची दिक्षा भूमि आहे. नर्मदा मंदिर, धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. पुढे कालव्याच्या कडेने गाडाइत,शेतपायवाटेने घुघरी,पिपरिया इथे जबरेश्वर महादेव हे विशाल शिवलिंग आहे.धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. मैया किनाऱ्याने गरारुघाट.गरुडेश्वर महादेव राम मंदिर.धर्मशाळा सदाव्रत.
ब्रम्होरी,चीनकी घाट,समनापुर येथे शिवमंदिर,आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. पुढे रस्त्याने दोन किलोमीटरवर तिठा उमरिया ग्वार नर्मदामैया संगम.ग्वारमैया होडीने पार करुन मैया किनारा एक नाला पार करुन सप्तधारा जवळ हायवे.जवळच नर्मदा सेवा समितीचे सेवाकेंद्र.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. तसेच नर्मदा मंदिर, शिवमंदिर, धर्मशाळाही आहे.
छोटा बरमानघाट.चंद्रमौलेश्वर, शारदा मंदिर,संस्कृत पाठशाळा.निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिण तट - छोटा बरमानघाट ते होशंगाबाद.
शारदा मंदिरासमोरील रस्त्याने थोडावेळ वाटचाल नंतर मैया किनाऱ्यावरुन पुढे एक टेकडी चढून जंगलातील पायवाटेने एक दोन टेकड्या चढत उतरत बरियां नंतर अंडियाघाट, राममंदिर आहे. येथे बन्सीधर केवट हे सेवा देतात.इथून थोड्या वरच्या रस्त्याने लिंगा घाट येथे नर्मदा मंदिर आहे.इथे सुखचैनमैयाचा नर्मदामैयाशी संगम आहे. सदाव्रत मिळते.गुलाब पुरी,चंदन पुरी महाराज आहेत. पुढे कोठिया मढी इथे हनुमान मंदिर आहे.निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.बहादुरसिंग ठाकुर व श्री.गोपाल नामदेव सेवा देतात. बिछुआ इथे शिवमंदिर आणि साधुकुटी आहे.सदाव्रत मिळते. अमन कुमार दुबे सेवा देतात. पुढे निवारा,गुजरखेडा,खरकिया उजवीकडे कच्चा रस्ता ककराघाट थरैरी इथे शिवमंदिर आहे, धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.इथे एरंडीमैया व नर्मदामैया यांचा संगम आहे. किनाऱ्यावरुन थोड्या अवघड वाटेने भटेरा इथे राममंदिर आहे व धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते.पुढे वरच्या शेत पायवाटेने रिछावर इथे काटजू कुटी आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
रिछावर नंतर दोन किलोमीटरवर शक्करमैया पार करुन शोकलपुर इथे गुरुकुल आश्रम, निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्थाही आहे.तसेच शिवमंदिर धर्मशाळाही आहे.
पुढे मैया किनाऱ्यावरुन शेतातील पायवाटेने वाटचाल उसरायघाट.समोर पतईघाट दिसतो. ज्योतिदर्शन आश्रम निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. शेरमैयाचा मैयाशी संगम आहे.
मैया किनाऱ्यावरुन वाटचाल करत पिपरपानी-सोनदहार भूमानंद अवधूत आश्रम, नर्मदा मंदिर, हनुमान मंदिर.मैया प्रवाहात मंदिर आहे त्याला सुवर्ण मंदिर म्हणतात.ही सिद्धभूमि असून रमणीय स्थान आहे.इथे चातुर्मास करता येईल.
टीपरास, शेतातील पायवाटेने वाटचाल झिकोली,खरैटी डांबरी रोड ने डिमावर संदुक घाट.प्राचीन मठ, धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. पुढे सिरसिरीघाट. नागेश्वर महादेव मंदिर,आश्रम इथे दुधीमैयाचा व नर्मदामैया संगम आहे. दुधीमैया कोरडीठाक आहे. संगमा पलिकडे सीताराम आश्रम, हनुमान मंदिर असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.
खैराघाट इथे संस्कृत पाठशाळा आहे.निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. शेत पायवाटेने कुंडाघाट नंतर सांडिया,ही शांडिल्य ऋषिंची तपोभूमि असून शांडिल्येश्वर महादेव मंदिर आणि धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. रामघाटावर सीताराम आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. नर्मदे हर.
मैया किनाऱ्यावरुन सिवनी घाट.नर्मदा मंदिर असून त्यागी जी आश्रमात निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. पुलाजवळ गिरनारी आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे माछा इथे राधाकृष्ण मंदिर, धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. इथे कुब्जामैयाचा मैयाशी संगम आहे. या ठिकाणी राजा रन्तिदेव यांनी यज्ञ केला होता. खूप सुंदर स्थान आहे. कुब्जा मैया पार करुन मैया किनाऱ्याने शेत पायवाटेने गौघाट आश्रम आहे. पुढे किनाऱ्यावरून गलछागांव वरच्या शेत पायवाटेने भटगांव राममंदिर, धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.इथे शिक्षक असलेले श्री. लोकेश कुमार भार्गव हे सेवा देतात. वाटेत भानपोर इथेही सदाव्रत मिळते.
गव्हाच्या शेतातील पायवाटेने रेवा वनखेडी इथे ऋणमुक्तेश्वर महादेव, राममंदिर आहे व धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. एक नाथ साधुकुटीही आहे. पुढे वाटेत रेवा मोहरी इथेही आश्रम आहे व सदाव्रत मिळते.
पुढे रायनमैयाचा मैयाशी संगम आहे.रायनमैया पार करुन इसरपुर इथे सद्गुरु मंदिरात निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. जंगलातील शेत पायवाटेने पलकमतीमैया पार करुन पामलीगांव श्रीराम मंदिर आणि धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. रामनगर- पांडुद्वीप इथे राधाकृष्ण मंदिर,पांडवेश्वर महादेव,नर्मदा मंदिर आश्रम, धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.इथे पांडवांनी यज्ञ केला त्याचे भस्म मिळते अशी आख्यायिका आहे.
पुढे किनाऱ्यावरून शेत पायवाटेने सतवाड,झालसर,सांगाखेडा खुर्द इथे राधाकृष्ण मंदिर,शिवकुटी आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.पुढे रस्त्याने वाटचाल करुन बछवाडा,नसीरबाद,भटवाडी,गणेरा,नगवाडा. पुढे कालव्याच्या कडेने शेतातील पायवाटेने गौघाट.इथे वृद्ध रेवा कुंड राम मंदिर, आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
बागलखेडी इथे स्वामी अमृतानंद(पागल बाबाजी) हे बंगाली साधू आहेत.आरी नंतर रस्त्याने वाटचाल सांगाखेडा तवामैया वाळवंटातुन पार करून वर चढून बांद्रा भान. वानरेश्वर महादेव,वानर-भालू तीर्थ,नर्मदा मंदिर, धर्मशाळा आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.सुंदर रमणीय स्थान आहे.चातुर्मास करता येईल. पुढे घानाबड़ संत रामदास बाबा जीवंतसामाधी,दादा धुनिवाले यांचे स्थान आहे. पुढे होशंगाबाद.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर,आश्रम, सेवाकेंद्र.दक्षिण तट. होशंगाबाद ते हंडिया.
होशंगाबादहूनही दोन मार्गांनी पुढे जाता येते. हरदारोडने हरदा. आणि मैया किनाऱ्यावरुन हंडिया. आपण आधी किनाऱ्यावरून हंडिया पर्यंत जाऊ व नंतर रोडवरुन हरदापर्यंत जाऊ.
होशंगाबादला लोकनाथ तीर्थ आश्रमातुन निघालो की महाकाली मंदिरा जवळून उजवीकडील रस्त्याने साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावर येतो खैराघाट. इथे गुळवणी महाराजांना लोकनाथ तीर्थ स्वामींनी दिक्षा दिली.घनदाट वृक्षराजी मधे श्रीदत्त मंदिर आहे. दिक्षा भूमि मंदिर आहे. गेटजवळ उजवीकडे शिवमंदिर असून आश्रम आहे. स्वामी नर्मदा मणी आहेत. ते मराठी आहेत. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. दत्तमंदिरातही श्री.शर्माजी हे पुजारी व्यवस्थापक आहेत. इथेही निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
इथून मैयाच्या किनाऱ्यावरील वाळवंटातुन वाटचाल करावी लागते. समोर उत्तर तटावर बुधनीघाट दिसतो.
पुढे रेल्वे पुलाजवळ वर चढून गेलो की डावीकडे रेल्वेच्या जागेत हिंगलाजमाता मंदिर आहे. इथून रेल्वेलाइन क्रॉस करुन रेल्वे गेट ओलांडून कच्च्या रस्त्याने भोपाळ हायवेने परमेशी पॅलेस जवळून ही डोंगरवाडा,हसलपुर,रंढाल,बंडरुआ इथे नर्मदा मंदिरात निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.तालनगरीफाटा इथे अगदी पुरातन वटवृक्ष,पिंपळवृक्ष आहे.त्यांच्या छायेत केशरसिंग हे एक झोपडी बांधून गेल्या तीन वर्षांपासून सेवा देत असतात.या मार्गेही कोकसरला जाता येते. किंवा रेल्वे पुलाखालून सरळ मैयाच्या वाळवंटातुन वाटचाल करत एक नाला पार करुन रंढाल, बंडरुआ, केवलारीमैया व नर्मदामैया संगमाजवळ केवलारीमैया पार करुन कोकसर. इथे श्रीगौरीशंकरमहाराज जीवंत समाधी मंदिर व परिक्रमावासी,भक्त निवास असून निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. श्री. सुमीत गौर अध्यक्ष आहेत.
समाधी मंदिराच्या समोरील डांबरी रोडने खरखेडी, टीगरिया, नानपा,कुन्तीपुर किंवा कुल्हाडा या सर्वच गावांमधील मंदिरांमध्ये राहता येते व गांवकरी सेवा देतात. हाथनापुर ह्या हायवेवरील गांवच्या हनुमान मंदिरात निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. इथून एक किलोमीटर वर आवलीघाट किंवा आवरीघाट आहे. इथे लक्ष्मी कुंड असून मैया प्रवाहातील मंदिराला सुवर्ण मंदिर म्हणतात.इथे दादा दरबार - संत दुर्गानंद महाराज यांची समाधी आहे.धर्मशाळा असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.तसेच गजानन महाराज आश्रमात उमानाथ बाबाजी आहेत. इथेही व्यवस्था आहे.
गुवाड़ी येथे चतुर्मुख महादेव मंदिर आहे. घोगरा गांवात नर्मदा मंदिर आहे. पथोडा गांवात राम मंदिर आहे. बाबरीघाट इथे नर्मदा मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर,वरती साईराम आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. पुढे चांदगढ़ चांदलाकुटी इथे बजरंगदास कुटी, नित्य चैतन्य दास स्वामी तिलक नव विवेकानंद आश्रम आहे निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.खूप मोठे ग्रंथालय आहे.
पुढे किनाऱ्यावरून थोडी अवघड वाट आहे. भिलाडिया इथे नर्मदा सत्संग आश्रम, ऋषिकेश येथील कैलास आश्रमाचे व्यवस्थापन आहे. निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे.इथे चातुर्मास करता येईल. नर्मदे हर.
शेतातील पायवाटेने हमीदपुर नंतर कालव्याच्या कडेने दोन किलोमीटरवर डावीकडे वळून रस्त्याने अर्चना गांव. गांजालमैया पार करुन गोदागांव इथे गंजालेश्वर महादेव,नर्मदा मंदिर असून सुंदर रमणीय स्थान आहे. धर्मशाळा आहे व सदाव्रत मिळते. गंगेसरी मठ. गोमती,गंजाल व नर्मदामैया यांचा त्रिवेणी संगम आहे. श्यामस्वरुप दत्त मंदिर,मठ धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
पुढे शेतपायवाट,थोडा कच्चा पक्का रस्ता.छोटी छिपानेर. इथे बजरंगदास आश्रम,राम मंदिर,कृष्ण मंदिर,नर्मदा मंदिर धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.
पुढे चिचोडकुटी हनुमान मंदिर. लच्छौरा इथे सौ. प्रतिभाताई सुधीरभाऊ चितळे यांनी यंदाच मैया किनाऱ्यावर परिक्रमावासी सेवाकेंद्र व घर बांधले आहे. तिथे निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. शामसाद मैया किनाऱ्यावर मंदिर. वरच्या रस्त्याने गोयद घाट.देवघाटावर राम मंदिर पुढे एक किलोमीटरवर मढी,शंभु-साई आश्रम निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. भमौरी बजरंग मढी, हनुमान मंदिर, धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.पुढे सडक रस्त्याने हंडिया.ऋद्धिनाथ मंदिर.समोर नेमावर.मैयाप्रवाहात नाभिकुंड.वसुंधरा सेवाश्रम,नर्मदा मंदिर, धर्मशाळा. पुलाच्या पलिकडे विवेकाश्रम, राधाकृष्ण मंदिर.निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.चातुर्मास करता येईल. हंडिया बस स्टॉप जवळ रामानंद आश्रम निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. नर्मदे हर.
पुढे पुनासा धरण असल्यामुळे इथून पुढे ओंकारेश्वर पर्यंत रोडनेच जायचे असते. नर्मदे हर.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम, सेवाकेंद्र. दक्षिण तट. होशंगाबाद ते हरदा रोडवरुन.
हरदारोडने वाटचाल. फेफरताल,रोहना,सांवलखेडा,बमुरिया,मुंगवारा,आमपुरा,डोलरिया,रतवाडा,सोनखेडा,बघवाडा,
धरमकुंडी,भीलटदेव,कटारिया, बनापुरा, सिवनी,भरलाय,धामनिया,रावण पिपला या गांवात रावणाने तप केलेले मोठे पिंपळाचे झाड आहे. बावडियाभाऊ, पगढाल,छिंदवाडा,टीमरनी, चारखेडा,उॅदा,खिडकीवाडा. या सर्वच गावांमधील मंदिरांमध्ये आपणास राहता येते व गांवकरी सेवा देतात पण आश्रम सेवाकेंद्र वगैरे नाहीत.
हरदा येथे इंदिरा वॉर्ड मधे गोंदवलेकर महाराज स्थापित पट्टाभिराम मंदिर आहे निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे.श्री.गोडबोले व्यवस्थापक आहेत.
कडोला(उबारी),पलासनेर,मसनगांव, कांकरिया,बारंगी,नागपुर रेल्वे मार्ग गेट,मांडला,मुहाल,छिपाबड (खिरकिया) इथे हंडियाकडून येणारा मार्ग आणि हरदाकडून येणारा मार्ग एक होतात आणि पुढे ओंकारेश्वरला जातात.
नर्मदामैया किनाऱ्यावरील मंदिर, आश्रम,सेवाकेंद्र.दक्षिण तट. हंडिया ते ओंकारेश्वर.
मैया जवळून मांगरोल इथे हनुमान मंदिर,सदाव्रत.रातातलाई इथे शिव मंदिर,सदाव्रत.पांचातलाई - बिचौरा इथे हनुमान मंदिर,सदाव्रत. सोनतलाई गांवात श्रीराम मंदिर.गांवकरी सेवा देतात. बाबर इथे हनुमान मंदिर, कपिलेश्वर महादेव आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. बमन गांव गांवकरी सेवा देतात. पानघाट चौकडी गांव खिरकिया ( छिपाबड ) राम मंदिर हनुमान मंदिर, नृसिंह मंदिर,सदाव्रत. पोखरनी हनुमान मंदिर.सदाव्रत.
किंवा हंडियाहून रस्त्याने डोमलायखेडा इथे श्री. गोविंद शर्मा जी सेवा देतात. अजनाय,रेलवा,धनगांव इथे प्रेमनारायण बिश्नोई सेवा देतात.इथून उजवीकडे वळून जायचे.मसनगांव, कांकरिया श्री.लखनलाल बघेल हे सेवा देतात. पुढे रोड वरुन मांडला इथे मुकेश टेलर सेवा देतात. मुहाल, छिपाबड (खिरकिया) दुर्गा प्रसाद राजपूत,अपना भोजनालय चे संदीप राठोड सेवा देतात.
पोखरनी हनुमानमंदिर, आहे.श्री.तुकाराम भैसोर सेवा देतात.
धनोरा हनुमान मंदिर. दगडखेडी,हनुमान मंदिर. पुढे धारुखेडीला जाताना वाटेत डावीकडील रस्त्याने बोथियाखुर्द गांवात सेवा देतात. धारुखेडी इथे हनुमान मंदिर.सदाव्रत मिळते.श्री. अखिलेश तिरोळे सेवा देतात. निशानिया,खेरखेडा,बेडियाखाल,साढियापानी,नया हरसूद,छनेरा राममंदिर, सरस्वती कुंड, हनुमानजी,संत बुखारदास परमहंस आश्रम.निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते.
चारखेडा.रस्त्याच्या उजवीकडे अर्ध्या किलोमीटरवर राममंदिर,संत मनरंगीबाबा समाधी मंदिर व आश्रम असून निवास व भोजनप्रसाद व्यवस्था आहे. हे मनरंगीबाबाजी संत सिंगाजीमहाराज यांचे गुरु. इथे मनरंगीबाबाजींच्या दोन रेड्यांचीही समाधी आहे. महाराज रेड्याच्या गळ्यात पिशवी व चिठ्ठी लिहून अडकवत मग दोन्ही रेडे वाण्याच्या दुकानातुन सामान आणत असे सांगतात.
पुर्वी इथून रेल्वेच्या पुलावरुन जीव मुठीत धरून तवामैया पार करावी लागत असे पण २०१४ मधे तिच्यावर खूप मोठा पुल बांधलेला आहे. मनरंगीबाबा आश्रमाजवळून चारखेडा गांवातुन दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलातून नव्या रस्त्याने तवामैया एक दीड किलोमीटर लांबीच्या पुलावरुन पार करुन सेल्दागांव. पुढे दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलातून डांबरी रोडने जात असताना दोन किलोमीटरवर डावीकडे खडेबाबांचा आश्रम आहे निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते. हे बाबाजी कायम उभेच असतात.
मांडला, बऱ्यापैकी मोठे गांव आहे.राधाकृष्ण,हनुमान,शिवजी,राम मंदिर आहे निवास व्यवस्था आहे.सितारामबाबाजी आहेत. सदाव्रत मिळते.इथून ओमगांव मार्गे सिंगाजी महाराज यांच्या पुनर्निमित समाधी स्थानाकडे जाता येते व तिथून मुंदी पांच सहा किलोमीटर अंतरावर आहे.
किंवा सरळ सेजला,भैसावां,सावनेर,मोहद,मंडी,मुंदी असे जावे.मुंदी येथे चौकात दुर्गा मंदिर आहे सदाव्रत मिळते. श्री.दिलीप सोहनी यांची नर्मदा धर्मशाळा असून निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते.मुंदीहूनही सिंगाजी महाराज यांच्या पुनर्निमित समाधी स्थानाकडे जाता येते.
पुढे भमौरी,कैनुद,जलवांबुजुर्ग इथे हनुमान मंदिर, रंगमंच असून निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.दैयतफाटा, देवला इथे श्री. चंपालाल गुजर उर्फ चंपूभाई यांच्या कडे भोजन प्रसाद व्यवस्था आहे.पुढे खुटला,डुडगांव, अटूटखास इथे श्री.सुधीर वैद्य यांनी आश्रम बांधला असून निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. तसेच इथल्या राममंदिरातही निवास व्यवस्था आहे व सदाव्रत मिळते.इथे अमाकमैया व कावेरी मैया संगम आहे. रस्त्याने चालताना आधी अमाकमैया पुलावरुन पार केल्यावर थोड्याच वेळात कावेरीमैया पुलावरुन पार करुन पुढे पुनासाफाटा. इथून पुनर्वसित पुनासाला जाता येते.धरणावर छान पर्यटन स्थळ आहे. पण परिक्रमेत तिकडे जाऊ शकत नाही. पुढे हरबन्सपुरा फाटा,दरीयतपुराफाटा, बखरगांव,कडौली, हथियाबाबा आश्रम. सिद्धिविनायक मंदिर आहे निवास व्यवस्था आहे व भोजन प्रसाद व्यवस्था आहे. सुंदर रमणीय स्थान आहे.
पुढे रोड ने दोन किलोमीटरवर गेल्यावर उजवीकडे कालव्याच्या कडेने कच्च्या रस्त्याने पांच सहा किलोमीटर चालून येते गुजली,खगवाडा.गांवकरी सेवा देतात. पुढे अंजरुद इथे वाघेश्वरीमाता,दुर्गा मंदिर. निवास व्यवस्था आहे सदाव्रत मिळते. इथून जंगलातील पायवाटेने आपण सरळ ओंकारेश्वरला जाऊ शकतो पण घनदाट जंगल आहे व भरकटण्याची शक्यता असते.कोणी माहीतगार मिळाला तरच जावे. नाहीतर धावडिया नंतर कोठी. तिथून ओंकारेश्वरला जाऊन संकल्प पुर्ती करुन आपल्या जवळील मैयाजल कुपीतले अर्धे जल आधी ममलेश्वराला अर्पण करून मग झुलत्या पुलावरुन ओंकारेश्वरला जाऊन उरलेले अर्धे जल अर्पण करून नंतर मांधाता परिक्रमा केली की आपली परिक्रमा सुफल संपन्न झाली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
वंदना परांजपे.....