स्वामी मायानंद चैतन्यजीं
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
स्वामी मायानंद चैतन्यजीं
स्वामी मायानंद चैतन्यजी...(महेश आत्माराम सावंत)
नर्मदा परिक्रमे वरील पहिले पुस्तक लिहिणारे...... स्वामी मायानंद चैतन्यजींनी
नर्मदे sssssss हर .....
हा परिक्रमेतील परवलीचा शब्द ! नव्हे नव्हे अत्यंत पवित्र मंत्र!
जो सातत्याने उच्चारला जातो! येताना- जाताना-बसताना- उठताना- आनंदात- अडचणीच्या वेळी ....... अगदी सदा सर्वकाळ! परिक्रमेत आपण नर्मदे हर मयच झालेले असतो! कारण कोंबड्यांचे आरवणे, गाईचं हंबरणं, पक्षांचं मंजुळ स्वरही आपल्याला "नर्मदे हर" असंचं ऐकू येते!
नर्मदे हर हा मंत्र जरी नर्मदेच्या काठावर पूर्वी पासून प्रचलित असला तरी स्वामी मायानंद चैतन्यजींनी त्याला वेगळे स्वरुप दिले! कोणाला आशीर्वाद देताना किंवा कोणाला नमस्कार करताना त्यांनी "नर्मदे हर"चा वापर सुरू केला आणि पुढे ती रीतच बनली! या मंत्राचे सार्वत्रिकीकरण झाले ......!
' कलियुगात नर्मदा हि मुक्तिदायिनी होणार आहे .' या व्यासांच्या एका वाक्यावर प्रचंड विश्वास ठेवून ते आपल्या आयुष्यातील अधिकाधिक काळ नर्मदेच्या तीरावरच राहिले! अगदी देहाच्या अस्तापर्यंत.........
मायानंद चैतन्यजींनी एकूण दोन परिक्रमा केल्या! विचार करा शंभर वर्षांपूर्वी परिक्रमा करताना त्यांना किती अडचणींना तोंड द्यावे लागले असेल! त्यावेळी परिक्रमा करताना शारीरिक क्षमतेची परिक्षाच पाहिली जात असे! आणि परिक्रमा वासी कडे "टोकाची निर्भयता'' हा गुण आवश्यक असायचा!
स्वामीजींनी पहिली परिक्रमा केली ती दिनांक २२/१०/१९०९ ते १२/०१/१९११ या कालावधीत! हि पहिली परिक्रमा त्यांनी अमरकंटक वरून उचलली होती! त्यासाठी ते श्रावण महिन्यातच तेथे पोहचले होते. अमरकंटक येथे काही दिवस ते एका संन्यासी आश्रमात राहिले होते.मग साधना करण्यासाठी ते कपिलधारेच्या घनघोर जंगलात गेले! जंगलातील एका गुहेत त्यांनी आपल्या साधनेला प्रारंभ केला. अत्यंत कठोर साधना! साधना काळात जेव्हा त्यांना पूर्णस्थिती प्राप्त झाली तेव्हा ते तीन आठवडे आनंदोन्माद अवस्थेत होते! या साधना काळात "कोणीतरी" एक लोटा दूध नित्य नेमाने त्यांचे गुंफेच्या बाहेर ठेवित असे! कधीतरी वाघही आपली हजेरी लावून जात असे!
साधना संपन्न झाल्यानंतर ते पुन्हा अमरकंटक येथे आले आणि २२ आॅक्टोंबर १९०९ रोजी त्यांनी परिक्रमा उचलली! या परिक्रमेत त्यांनी काही नियम पाळले होते. त्यांनी कधी भिक्षा मागितली नाही. पण कोणी काही दिले तर मात्र आदराने त्याचा स्विकार करत.अन्यथा जंगलातील फळ-फूल-पाने खाऊनच रहायचे! कधी कधी धुनीतील भस्म नर्मदेच्या जलात मिसळून ते प्राशन करीत असत! नर्मदेच्या पवित्र तीर्थांवर नित्य स्नान करणे ...... तिच्या काठावरील साधुसंतांचे दर्शन घेणे ...... त्यांचे मार्गदर्शन घेणे ....... तीर्थांची माहिती मिळविणे ....... त्याचप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी धुनी पेटवून साधना करायची ........ गीता पठण करायची ...... तिचं चिंतन करायचे ....... उपलब्ध असेल तर धर्म ग्रंथांचे अवलोकन करायचं ....... असा त्यांचा दिनक्रम असायचा!
स्वामिजी पूर्व काळात उत्तम फोटोग्राफर होते! त्यामुळे त्यांच्याकडे नर्मदा खंडातील निसर्गाकडे बघायची एक वेगळी दृष्टी होती! देवभूमी उत्तराखंडातील सौंदर्य संपन्न निसर्गापेक्षाही नर्मदेच्या काठावरील निसर्ग मनभावन आहे ........ असे ते म्हणत!
त्यावेळी समुद्र पार करण्यासाठी हांसोट वरून चिठ्ठी मिळत असे! हि चिठ्ठी तेथील एक मारवाडी देत असे. समुद्र पार करून जेव्हा स्वामीजी उत्तर तटावर गेले त्यानंतर २३/०४/१९१० रोजीच्या डायरी मध्ये त्यांनी वरील नोंद केली आहे ! स्वामिंजींच्या मते शूलपाणी झाडी पेक्षाही जास्त कठीण मार्ग हा खेडी घाट ते चोबीस अवतार हा होता! पुढे चातुर्मासासाठी ते नेमावरला थांबले. नेमावरचा नर्मदा किनारा स्वामिजींना फार आवडला. नंतर जेव्हा त्यांनी दुसरी परिक्रमा केली तेव्हा देखील ते चातुर्मासासाठी नेमावरलाच थांबले होते! चातुर्मास काळात स्वामिजींनी ज्ञानेश्वरीच्या आधारे गीतेवर हिंदीत भाष्य केले. नेमावरला आपण एक आश्रम बांधावा ..... असंही त्यांच्या मनात होते.( नंतर त्यांनी आश्रम बांधला , पण तो ओंकारेश्वर येथे. आणि त्याच नाव दिले "विज्ञान शाळा"!)
स्वामिजींची पहिली परिक्रमा १२/०१/१९११ रोजी संपन्न झाली. परिक्रमेतील आपल्या अडचणी लक्षात घेऊन आणि परिक्रमा वासींच्या मार्गदर्शना साठी त्यांनी एक पुस्तक लिहायचे ठरवले. त्यासाठी स्कंद पुराण, वायु पुराण, वशिष्ठ संहिता, महाभारत, रामाश्वमेघ इत्यादी ग्रंथांचे वाचन केले! पण पुस्तक लिहीतांना काही स्थानांबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती. त्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांनी पुन्हा दुसरी परिक्रमा उचलण्याचे नक्की केले.यावेळी पुस्तकात फोटो छापण्यासाठी त्यांनी एक उत्तम कॅमेरा देखील सोबत घेतला होता! ज्याद्वारे त्यांनी काही अप्रतिम फोटो काढले होते. स्वामिजींची दुसरी परिक्रमा २४/०२/१९१२ ते १४/०२/१९१३ या कालावधीत पूर्ण झाली! या परिक्रमे नंतर मात्र त्यांनी "नर्मदा पंचांग" नावाचं पुस्तक लिहिले जे १९१५ मध्ये प्रकाशित झाले! नर्मदा पंचांग हे तीन खंडात होते. पहिल्या खंडात परिक्रमेतील प्रत्येक गावातील अंतर,नर्मदा स्तोस्त्र, नर्मदा लहरी, इत्यादी होते. तर दुसऱ्या खंडामध्ये दक्षिण तटावरील तीर्थांचे माहात्म्य वर्णन केले आहे आणि तिसऱ्या खंडात उत्तर तटावरील तीर्थांचे माहात्म्य सांगितले आहे! मात्र या पुस्तकात त्यांनी स्वताला आलेले अनुभव अथवा परिक्रमेत सुचलेले विचार मांडण्याचे जाणिव पूर्वक टाळले!
अशा प्रकारे मोठ्या कष्टाने आणि तळमळीने स्वामिजींनी परिक्रमा वासीं करीता पुस्तक लिहिले! जे हिंदीत होते. या नंतर चार वर्षांनी म्हणजे १९१९ मध्ये नर्मदा परिक्रमेची माहिती देणारे दुसरे पुस्तक आले. हे पुस्तक देखील हिंदीतच होते. " नर्मदा परिक्रमा वर्णन " नावाचे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकांचे नाव होते श्री. दामोदर मोरेश्वर लघाटे! यांनी देखील त्याकाळी पायी परिक्रमा केली होती! विशेष म्हणजे स्वामी मायानंद चैतन्यजी आणि लघाटेजी दोघेही एकत्रित परिक्रमा करणार होते. पण नंतर स्वामिजींनी त्यांना पुढे जायला सांगितले. शंभर वर्षांपूर्वी लिहीलेल्या पुस्तकांची अशी ही कथा!
महत्त्वाचे म्हणजे नर्मदा परिक्रमेविषयी पुस्तक लिहिणारे हे दोघेही मराठी होते!ज्यांचे पूर्वज पेशवे काळापासून मध्य प्रदेशात राहत होते!
नर्मदे हर!
महेश आत्माराम सावंत.
तोंडली , चिपळूण .