शूलपाणि चे अंतरंग-अपूर्वानंद कुलकर्णी
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
शूलपाणि चे अंतरंग-अपूर्वानंद कुलकर्णी
दि.10/10/2020
( लेख मोठा असला तरी शेवटपर्यंत वाचावा ही विनंती )
नर्मदा मैयाच्या #परिक्रमेतील सर्वाधिक खडतर भाग म्हणजे #शूलपाणि झाडी... सरदार सरोवराचे बॅकवाॅटर , महाराष्ट्र गुजरात व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील भाग व कधीकाळी #परिक्रमावासींना लुटले जाणारा भाग म्हणून या भागाची वेगळीच दहशत... यातील #लूटमार संपली असली तरी पाण्याची पातळी वाढली आहे...पूर्वीचे रस्ते खरंतर पायवाटा पाण्याखाली गेल्यात , #परिक्रमेचे मार्ग बदललेत... कुठे कुठे सडकांचे निर्माण झालेय... जलाशय अधिक मोठा व गहिरा झालाय... #गूढ शांतता मात्र तशीच आहे...
#शूलपाणेश्वर म्हणजे मैयाचे #हृदय... पण आपले नशिब कमी पडले व त्या मूळ स्थानाचे दर्शन आता अशक्य झाले... मन मनाला ओढ लावणारा हा प्रदेश...
रौद्र रुपातही #सौंदर्य असते असे म्हणतात व त्याचे आकर्षण ही जबरदस्त असते. भयप्रद वाटणारा हा भाग #परिक्रमावासी शक्य तेवढे लवकर पार करतात कारण इथे खाण्या पिण्याच्या सुविधा पुरेशा नाहीत. अलीकडील काळात मैयाच्या कृपेने सेवा कार्य करणा-यांत वाढ झालीये व #शूलपाणिचा प्रवास सुखकर होतोय ही मैयाचीच कृपा आहे...
शूलपाणि म्हटलं की #बोरखेडी #कुली #घोंगसा #सेमलेट #भादल #सादरी #भवाना #खप्परमाल #साव-या व #बिलगाव हीच नावे पटकन डोळ्यापुढे तरळतात... किंबहुना मैयाचा परिक्रमा मार्ग येथूनच जातो... #बिलगाव पासून मैयाचा किनारा दुरावतो.
अगदी काही वर्षापूर्वी मार्गात असणारे #भुशा गाव ही आता बाजूला पडते.
दोन वेळेस परिक्रमेत असताना याच भागातून जाणे झाले... मनात डोंगरांचा चढ उतार व मैयाचा अफाट प्रवाह धडकी भरवतो व सुविधांच्या अभावाने काढता पाय घ्यावा लागतो.
पण त्यावेळी निर्माण झालेलं #शूलपाणि चं आकर्षण वाढतच गेलं... पण कितीही आकर्षण वाटलं तरी दुरुन डोंगर साजरे असतात या उक्तिप्रमाणे #शूलपाणि ऐकायला वाचायला जेवढा छान अनुभवायला मात्र त्यापेक्षा अवघड... भल्या भल्यांचा माज उतरवणारा... सहज फिरायला जाऊ म्हणणा-यांना नको नको करणारा हा भाग...
अनेकांना इथे #चिरंजीव_अश्वत्थामा भेटलाय अनेकांना मैयाने दर्शन दिलेय..आपापला अंतरात्मा व मैया एवढेच फक्त साक्षी... मला दोन वेळेसच्या परिक्रमेत मात्र #अश्वत्थामा काही भेटला नाही ... पुण्य कमी पडलं म्हणायचं...
अश्वत्थामा नाही पण त्याची जातकुळी सांगणारे अनेकजन मात्र भेटले ... जातकुळी म्हणजे शब्दशः नसून भळभळती जखम घेऊन वावरणारे व जो भेटेल त्याला तेल अर्थात स्निग्धता प्रेम मागणारे... आपुलकी मायेचा आधार मागणारे लोक भेटले कधी वृद्ध कधी तरुण कधी स्त्री कधी पुरुष कधी लहान मुले मुली यांच्या रुपात... आम्ही मात्र #महाभारतातीलच पात्र शोधत बसलो. असो...
वरील उल्लेखाप्रमाणे माझी #शूलपाणिची मनोमन मर्यादा फक्त दक्षिण तटावरील बोरखेडी ते बिलगाव मानली गेली... उत्तर तटावरही शूलपाणि झाडी आहे हे फक्त ऐकून होतो. पण उपरोक्त ठिकाणं हे शूलपाणिच्या हिमनगाचं एक टोक आहे हे जाणवलं...
तसं तर 2011 सालापासून या परिसराचा परिचय... परिक्रमेव्यतिरिक्त या भागात जायला मिळणे तसे कठीणच... मैयाच्या कृपेनेच ते घडणार... मैयाच्या हृदयात प्रवेश करणं तिच्याच इच्छेने होऊ शकेल... तसा योग तिनेच आणला व 2015 पासून वस्त्र वितरण सेवेला जाण्याचे भाग्य लाभले. दोन वेळेस भूषा एकदा घोंगसा एकदा बोरखेडी कुली व नावेने घेता आला तेवढा प्रदेश तिथवर पोहचलो. पण शूलपाणिचे अंतरंग मात्र अनुभवता आले नाही.
मैयाने मनात एक संकल्प निर्माण केला की शूलपाणित आरोग्य सेवा करावी. चार बेड चे छोटे रुग्णालय सुरु करावे या अपूर्व संकल्पनेचा उदय झाला व एक अभ्यास दौरा ठरला...
एक अतिशय विशेष असणारी तारीख म्हणजे 10/10/2020 मैया किनारी व ते ही शूलपाणितच व्यतित करायची ठरली.
नर्मदा समग्र च्या विशेष सेवा कार्यात बोट अम्बुलन्स मधून जाण्याचे ठरवले.
ककराणा तून सकाळी आठ वाजता बोटीत बसलो व निघालो. आजूबाजला हिरवे डोंगर व मध्यभागी दूरवर पसरलेला मैयाचा अथांग प्रवाह मनाला रिझवत होता. मोबाईलला नेटवर्क नाहीच या ठाम कारणाने तो बंद करुनच ठेवला होता. पूर्ण परिवार सोबतच असल्याने मोबाईलची ओढ नव्हती.
ककराणातून हथनी नदीच्या विशाल पात्रातून बोट निघाली. मैयाचे पाणी या नदीच्या पात्रात शिरल्याने खूप मोठा भाग जलमग्न आहे. बरीचशी घरे , शेतं पाण्याखाली गेलेत. अर्धे बुडालेले झाडं पाहीले अन मनाला चुटपूट लागली. क्षणभर हथनी नदीलाच मैया समजलो.. पण नंतर मैयाच्या प्रवाहात आल्यावर मैयाची व्यापकता जाणवली.
सकाळचे कोवळे ऊन अन् मैयाच्या पाण्यावरुन येणारी थंडगार वा-याची झुळूक अंग प्रत्यंग सुखावत होती. मैयाच्या त्या रुपाकडे मुग्ध होऊन पहात होतो. इकडे आपल्याला सेवा करायचीये ही जाणीव मनाला मधूनच सावध करत होती. आजूबाजूचे पर्वत पहात व खाली पसरलेले पाणी कापत अर्धा तासातच कोट बांधणी या गावात पोहचलो... जवळ येताच सायरन वाजवला... आधीच येऊन वाट पहात थांबलेले लोक बोट पाहून उभे राहीले. नाव जवळ नेऊन थांबली. किना-यावर जायला लोखंडी शिडी लावून पाण्यातून जमीनीवर आलो अन् स्थानिकांशी बोलू लागलो...
कोटबांधणी नावाचं गाव... गाव म्हणजे डोंगर द-या जंगल अन् मैयाच्या पाण्याने व्यापलेला भूभाग... नाही म्हणायला फाॅरेस्टची एकमेव पक्की इमारत बाकी सर्व लहान मोठ्या झोपड्याच...
बोट अॅम्बुलन्स ची वेळ असल्याने अनेक रुग्ण बोटीच्या प्रतिक्षेत...खाली उतरुन स्थानिकांशी बोललो...दिवसभरातील पहिलीच व्हिजीट ...इथेच पुढचं सर्व चित्र स्पष्ट झालं...
आपल्याकडे अगदी प्राथमिक गरजेत येणारे औषधोपचार व दवाखाना म्हणजे इकडची चैन समजली जावी एवढं दुर्मिळ...
इकडचे दुखणे ही तसे लहानच थंडी ताप , सर्दी खोकला , कामात झालेली जखम यापेक्षा पुढे जास्त नाहीच...कारण हेच की रोज प्रत्येक गोष्टीसाठी होणारी पायपीट...पिण्याच्या पाण्याचा एक हंडा भरुन आणणे ही रोजचीच कसरत... जिथे आपल्यासारख्यांना हात सोडून मोकळं चालणं ही परीक्षा ठरावी पाय घसरण्याच्या भितीने अंग आखडलं जावं तीथे या माता भगिनी सहज लीलया डोक्यावर दोन हंडे हातात कळशी घेऊन चढ चढतात... खाली गहिरे पात्र , पायाखालची पाऊलवाट ही काटेकुटे अन खड्यांची तिथे चपलेची चैन ठरावी अशी परिस्थिती... अनवाणी पायाने केलेली पायपीट... आपल्या घरात बटण दाबले की टाकी भरते तिथे एकेक घोट पाणी पिताना अथवा वापरताना ती हळूवार पावले टाकत येणारी माता माऊली डोळ्यासमोर येते अन् पाण्याची उधळपट्टी थांबवा हे आपोआपच घडतं...
तर या अशा व्यायामाने कसलेली शरीर व बालवयातच लग्नामुळे अकाली प्रौढत्व आलेले स्त्री पुरुष फारसे आजार नाहीतच... बीपी शुगर अथवा जाॅईन्टस मणके वगैरे आजार तर कोसो दूर अथवा जाणीवच नाही असे...
नाही म्हणायला अस्वच्छतेने वाढलेले त्वचा विकार मात्र दिसतात... पोषक आहाराच्या अभावाने बळावलेलं कुपोषण ठायी ठायी जाणवतं...
इकडे आजारी पडणं म्हणजे गुन्हाच ठरावा अशी अवस्था... कारण कित्येक गावांपर्यंत सडक मार्ग नाही जवळपासचे सडक मार्गापर्यंत पाऊलवाटेने जाऊन मग अॅम्बुलन्स बोलवायची...ते ही अगदी एमर्जन्सी असली तरच... घरापासून सडके पर्यंत कपड्याची झोळी करुन दोघा चौघांनी उचलून डोंगरातील पाऊलवाटेने पळवत न्यायचे... नशीबाशी झुंज... इकडची एमर्जन्सी म्हणजे एकतर सर्पदंश व डिलीवरीच्या वेळेची ... जुलाबाने गळून गेलेला अथवा खूपच ताप आलेला एखादा रुग्ण... हाळी देऊन जवळ असेल तर नाव बोलवायची अथवा वल्हवत छोटी डोंगी चालवत नेऊन जवळचे सडक मार्गाचे गाव गाठायचे हा पहिला टप्पा... तिथून पुढे दवाखाना गाठणे हे दुसरा टप्पा...
नाव पुढे पुढे जात होती... आजूबाजूचे पर्वत अन् दाट झाडी मैयाचे विशाल पात्र नीरव शांततेतही एक मूक आक्रोश ऐकू येतंय असा भास होत होता...
डोळ्यापुढे एक दृष्य तरळू लागलं... एक कल्पनाचित्र उभं राहीलं... बेभाम पणे वहाणारा वारा ...सांजवेळेला आकाशात काळेकुट्ट ढग जमा झालेत... सोसाट्याचा वारा या किना-यावरुन त्या किना-यावर झेपावतोय... दोन्ही किनारीचे वृक्ष त्याला साथ देताहेत... आकाशात विजांचा कडकडाट सुरु आहे... वा-यासोबत मैयाच्या पाण्याच्या लाटा झुंज देताहेत... किडा मुंगी चिमणी पाखरं जीवाच्या भितीने अंग चोरुन निवा-याला घरट्यात धडधडत्या अंतःकरणाने बसलेत अन् अचानक एखाद्या चंद्रमौळी झोपडीतून एखाद्या मातेला प्रसववेदना जाणवू लागल्यात.. एरवी या भागात सहज होणारी प्रसूति आज मात्र कठीण होतेय... . घरातील पुरुष मंडळी हाळी देऊन नाव आणण्याचा प्रयत्न करताहेत... कुठूनतरी वल्हवायची डोंगी घेऊन दोन तीन जन आलेत... अंधाराने कब्जा घेतलाय... घसरडे पाऊलवाटेचे रस्ते अन् चुकून पाय घसरलाच तर तळ ही न लागणारे किनारे तुडवत झोळीतून ती माता नेताहेत...कशीबशी नावेत बसवलीये ...आपल्या हाताने वल्हवत चालवलेली नाव पण वा-याच्या वेगाने भरकटतेय...वा-याशी झुंज करणा-या लाटांचे बेफाम नृत्य चाललेय... सर्वांचीच तारणाहार असणारी मैया शक्य तेवढी शांत राहून त्या बालिकेच्या क्षेम प्रसूतिसाठी सहाय्य करतेय... अंगावरची कांबळी ओलीचिंब झालीये... कुठे न्यावी ही नाव ? कुठून मदत मिळेल कुठून गाडी घेऊन कुठे न्यावं म्हणजे ही लवकर मोकळी होईल ...असे एक ना हजार प्रश्न घोंगावताहेत....काय असेल त्या बाळाचं भवितव्य... त्या मातेचा आक्रोश कानी येतोय असं जाणवलं... त्या मुक्या कळ्यांचं रुदन कानात गुंजत राहून मन अन शरीर अंतर्बाह्य सुन्न करत गेलं... अशा किती माता तडफडत असतील...किती निष्पाप जीव जीवनासाठी मृत्युशी झुंज देत असतील...विचारचक्रात हरवून गेलो..
.बोटीचा वेग मंदावला सायरन वाजला ...किना-यावरील पुढचं स्टेशन आलं होतं...नाव थांबली दोर टाकला...शिडी लावली... उघडी नागडी पोरं घेऊन आया आल्या अतिशय गोरीपान पोरं पण योग्य औषधोपचारांची गरज न भागल्याने चार दिवसापासून नावेची वाट पहात होती...कित्येकांना तर नावं ही नाहीत... डाॅक्टरांनीच त्यांचं नामकरण केलं... आपल्या अस्तित्वाला काही मूल्य असावं नाव असावं एवढी प्राथमिकता ही वाट्याला न आलेली ती निष्पाप बाळं पाहिली...
एक दोन आयांच्या अंगावर मागील वर्षीच्या कपडे वाटपातील साड्या दिसल्या... विचारलं तर वो लोग आये थे ना गाडी लेकर उन्होने दिये असं म्हणाल्या... ओळखलं नसलं तरी ओळख मात्र पटली... केलेल्या सेवेची पोच पावती मिळाली...
इस बालक के जन्म के समय हम यही थे... तुरंत नाव में ले लिया और हाॅस्पीटल जाते जाते रास्ते में ही डिलीवरी हो गई... इस का नाम हमने शिवा रखा है... एक वर्षाचा शिवा अन् सतरा अठरा वर्षाची त्याची आई पाहिली... खरंच यांच्या क्षेमप्रसूतीसाठी आपणच काही पावलं उचलायला हवीत असं प्रकर्षाने जाणवू लागलं....
नावेच्या प्रत्येक स्टेशनवर चार पाच जन पेशंट... तपासून गोळ्या औषधं देऊन पुढे...स्थल व काल बदलत होता पण चित्र मात्र तेच होतं... पण नाही अजून एक भयानक चित्र पहाणं बाकी होतं..
नाव महाराष्ट्राच्या हद्दीतील गावात आली होती... तोडकी मोडकी मराठी भाषा त्या माता भगिनींना समजत होती...गर्जा महाराष्ट्र माझा...
नाव थांबली अन् एक आठ नऊ वर्षाची चिमुरडी दोर झेलायला पुढे आली...दोर खुंटीला बांधला...शिडी लावली... लगबगीनं आत आली...डाव्या हाताचे बोटं सूजले होते...मधल्या बोटाला जखम झालेली व त्यावर काळ्या रंगाची खपली... गवत कापताना विळा लागलाय व त्यावर चहापत्ती दाबून वरुन फडके बांधलेय गेली तीन दिवस ती पट्टी करण्यासाठी नावेची वाट पहातेय ...तीने सांगितले... पट्टी सोडून हात धुवायला सांगितले... तीने मैयातच हात धुतला... शेवटी सुख दुःखाची सोबती मैयाच... डाॅक्टरांनी हातावर धुण्यासाठी हायड्रोजन पॅराॅक्साईड ओतले कापसाने स्वच्छ करायला घेतले... जाडसर थर असणारी पत्ती ची पट्टी धुतली... ती मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती... डोळ्यातून घळघळ वहाणारे अश्रू मैया स्वतःच्या जलात सामावून घेत होती... खपली काढली तशी रक्ताची चिळकांडी उठाली... जखम स्वच्छ करणारा ही क्षणभर भेदरला... पहाणा-यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या...कर्तव्यकठोरपणे जखम धुवून पट्टी बांधली... अन् तिला अंगावर घालायला कपड्याचा टाॅप दिला... तो कपडा पाहून ती बाला हरखून गेली... बोटाला बांधलेलं नव्या कपड्याचं बँडेज अन् तो टाॅप यात कापलेलं बोट अन् क्षणापूर्वीची भळभळती जखम ते बाळ विसरुन गेलं...किती अद्भूत... कभी खुशी कभी गम...तेवढ्यात एक तरुण पुढे झाला ... त्याच्याही हातालाच जखम होती...लाकूड तोडताना कु-हाड लागली होती... तोच प्रयोग... मैयात हात धुवून निडर मनाने पुढे आला... मर्द को दर्द होता नही या अविर्भात होणा-या वेदना सहन करत होता... याला ही तीन दिवस वाट पहावी लागली होती... आपण सहन करु असं तीन दिवस दुखणं ? पट्टी करायला तीन दिवस वाट पाहू शकतो ? मन थरथरलं...वेळेवर मिळणारे छोटे उपचार ही किती मोलाचे असतात हे आज जाणवलं... प्रवास पुढे चालू होता... दृष्यात किरकोळ बदल होत होते.
मैयाच्या विशाल पात्रातून नाव जात होती...सभोवती सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते...पण जणू असुविधेचे रखरखते वाळवंटच भासत होते....
वाळवंटात तरी एखादे मरुस्थल असते इथे मिळेल का असा विचार मनात घोळत असतानाच नाव मंदावली... किनारा आला... दोर फेकले शिडी लावली वाट पहाणा-या स्त्रीयांनी सांगितले की मास्टर साब के पत्नी की कल ही डिलीवरी हुई तथा जुडवा बच्चे हुए... जुळी मुले ऐकून जरा उत्साह वाटला व पहायला म्हणून सारेजन निघालो... रस्ता तोच अतिशय घसरडा... स्वतःला सांभाळत कसं तरी वर गेलो ...
दूरुनच आवाज येत होता... वेगळीच धून होती...
तीन अधिक दोन बराबर पाच... यातील अधिक शब्दातील अ चा उच्चार अतिच -हस्व ...विशेष म्हणजे ही मराठी भाषिक शाळा होती... मोठ्या झोपडीत वीस पंचवीस मुले रंगी बेरंगी कपडे घालून खाली बसलेले... समोर बाराखडी अन पाढ्यांचे पार फाटून गेलेले तक्ते...पोरांजवळच बाज ..त्यावर गोधडीत गुंडाळलेली दोन गोरीपान बाळं... आई तर चक्क जमीनीवर बसलेली... काल प्रसूतीच्या आधी अंगावर सूज आली होती तशाच गंभीरतेत घरीच प्रसूति झाली...चेहरा हात पाय यावर सूज दिसत होती... जवळपास सर्वच मुलं कुपोषणाने ग्रस्त... अगदी शिक्षकाची मुलगी ही अपवाद नाही...बहुतेक बोलणं हिंदीतच...पण महाराष्ट्राचा भाग म्हणून मराठी माध्यम... या सरकारी शाळा नसून संस्कार केंद्र आहेत...इथे इयत्ता नाही फक्त अक्षर व अंक ओळख इथे होणार व असेल हुशार तर त्याची रवानगी भारतीताईंच्या नर्मदालयात...
प्रतिकूलतेतही शिक्षण घेणारे मुलं पाहीले...माझा भारत महान आहे असे एक गीत मुलं म्हणाली तेव्हा डोळे भरुन आले... सामूहिक उच्च स्वरात मुलांनी एक इंग्रजी कविता म्हटली... फाटके दप्तरं अनं मागील 2019 च्या वस्त्र संकनात बडोदा येथून आलेले कपडे इथल्या मुलांच्या अंगावर पाहून ओळखले... समाधानाची एक कळ अगदी हृदयापर्यंत पोहचली... महिना दोन हजारावर काम करणारे पण जीव ओतून शिकवणारे शिक्षक पाहीले...शरीरावरील हाडं वरुन दिसत होती... कविता म्हणताना ताणल्या गेलेल्या शिरा अन हाडं पाहून हाडाचे शिक्षक यांनाच म्हणावे असे वाटू लागले... भवाना डोंगराच्या पायथ्याशी उद्याची गोड स्वप्ने पहाणारी मुले व शिक्षक पाहून मन सुखावून गेले...निघावसं वाटत नव्हतं... रखरखीत वाळवंटातील ती हिरवळ सुखावत होती...व एकीकडे तेथील प्रतिकूलता मनाला कातरत होती....
प्रवास चालूच होता... रात्री डोंगरमाथ्यावरच्या एका गावात मुक्काम केला... तेथील शाळा व शिक्षकही असेच अतिशय उत्साही... श्री श्री रविशंकरजींच्या आर्ट ऑफ लिव्हींगची भजनं इथे ऐकली अन् एक वेगळेच टाॅनिक मिळाले...
बारा महिने मासेमारीवरच ज्यांची उपजीविका चालते त्यांच्याकडे धन ते काय असणार ?त्या गावातूनही चार डोंगर ओलांडून गेल्यावर सडक लागते... नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय कार्य केलेले अनेकजन भेटले...त्या आंदोलनाचा फायदा म्हणजे मधल्या काळात गावातील अनेकजन चांगले शिक्षण घेऊ शकले पण आता परत शिक्षणाचे तीन तेरा वाजले... त्याच शिकलेल्या पैकी एकजन संस्कार वर्ग चालवतोय...फाटलेलं आभाळ शिवण्याचा प्रयत्न करतोय...
एव्हाना मनात एक निश्चित झालेलं की चार बेड चं का असेना एक छोटं आरोग्य केंद्र सुरु करावं जिथे फार एक डाॅक्टर व एकच नर्स असली तरी चालेल पण ते दोघे दुर्गम भागात चोवीस तास उपलब्ध असतील... व हे केंद्र अशा ठिकाणी असेल जेथून आजूबाजूच्या कमी जास्त अंतरावरील पाच सात गावातून लोक कधीही येऊ शकतात... जिथे प्रामुख्याने डिलीवरी होतील , सर्पदंशावर इलाज होतील , जखमांवर पट्टी होईल, थंडी ताप जुलाबाने गळून गेलेल्यांना एक सलाईन देऊन तरतरी आणता येईल व मुख्य म्हणजे ही सेवा निःशुल्क असेल... परिसरातील सर्वांना सदा सर्वकाळ ही सेवा उपलब्ध होईल. प्राथमिक उपचार असतील व गंभीर केसेस साठी मोठ्या हाॅस्पीटल ला जाई पर्यंत आधार असेल. शूलपाणिच्या झाडीत पाच ते सहा केंद्र असावीत पण सुरुवात दोन केंद्रांनी होईल...
मनात आराखडा बनला गेला. जलसिंधी च्या पटेलजी सोबत बोललो ...त्यांनी जागा उपलब्ध करुन सर्व सहयोग देण्याची तयारी दाखवली. एक जुने मोठे घर उपलब्ध झाले. आता आवश्यक त्या वस्तू व नोंदणी आणि महत्वाचे म्हणजे इथे कार्य करणारे डाॅक्टर हवेत जे या प्रतिकूल अवस्थेतही राहू शकतील... कारण इथे प्राथमिक सुविधांचाच अभाव आहे... पण मैयाच्या कृपेने कोणीतरी डाॅक्टर भेटावेत... अर्थात त्यांना पुरेसे मानधन ही हवे तसेच आवश्यक असणा-या गरजेच्या वस्तू उपकरणे औषधे हवीत...
जलसिंधी येथे एका मोठ्या मोकळ्या घरात जीवनदायिनी नर्मदा आरोग्य केंद्राची स्थापना करण्याचा संकल्प 11/10/2020 ला मैयाच्या साक्षीने केला आहे.. वादळात दीप लावण्याचे कार्य करण्याचा प्रयत्न आहे...
परतीचा प्रवास सुरु झाला... रस्त्यात परत पेशंट तपासणी सुरुच... डूबखेडा येथे एक वृद्ध स्त्री हातात एक लोटा घेऊन आलेली...अतिशय आपुलकीने तो लोटा दिला त्यात ताजे व घट्ट दही ... एवढ्या दुर्गम भागात एवढ्या प्रतिकूलतेतही बोट अॅम्बुलन्सचे डाॅक्टर व सर्व सहकारी यांच्या प्रति असणारी कृतज्ञता त्या स्वादिष्ट्य दह्याद्वारे व्यक्त केली... परत जाताना हातावर दही दिले जाते...तो एक शुभ संकेत मानला जातो. अनाहूतपणे त्या वृद्ध स्त्री ने दिलेले दही या सेवा कार्यासाठी लवकर परत या असाच संदेश दिला... नर्मदा समग्र च्या बोट अॅम्बुलन्सच्या सेवा कार्याला पूरक असेच कार्य या माध्यमातून घडेल. व नर्मदा समग्र चे पूर्ण सहकार्य याकामी मिळेल अशी ग्वाही समग्रचे उच्चपदस्थ व्यक्तिंनी प्रत्यक्ष भेटून दिल्याने हा मार्ग अधिकच सुकर झाला आहे...
आता वेध शूलपाणि झाडीत आरोग्य सेवेचा श्रीगणेशा करण्याचे... मैयाचे हृदय असणारे शूलपाणित जाऊन आरोग्य सेवेचे व्रत हाती लागलेय... आता हा वसा मैयाच्या कृपेने सांभाळला जाईल हे नक्की...हे माझे एकट्याचे कार्य नाही तर मैयावर निरतिशय प्रेम करणा-या सर्वच साधकांचे आहे... आपण सर्वजन मिळून हे शूलपाणिचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करु...आपणही सहभागी व्हा...
आणि अशी ही शूलपाणि झाडीतील भ्रमंती एका अपूर्व संकल्पनेची उद्गाती ठरली...
अपूर्वानंद कुलकर्णी - 9881523208