नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी
नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी - श्री उदय नागनाथ
नर्मदा परिक्रमेची पूर्वतयारी करताना...
१...परिक्रमा आपल्याला कोणत्या हवामानात उदा : उन्हाळा/थंडीत करायची हे नक्की करावे.
२...उन्हाळ्यात सामान कमी न्यावे/ वहावे लागते. परंतु येथे मध्यप्रदेशात उन्हाळा कडाक्याचा असतो. प्रसंगी ५० डिग्रीस तोंड द्यावे लागते. उन्हामुळे तहान लागण्याचे, दमछाक होण्याचे प्रमाण जास्त असते. डासांचा प्रादुर्भाव खूप असतो.
३...थंडीमध्ये गरम कपड्यांमुळे वजन वाढते. येथे थंडी खूप असते. क्वचित ठिकाणी (अमरकंटक) शून्य डिग्री पर्यंत तापमान कमी होते. प्रसंगी उघड्यावर झोपावे लागते. त्याची तयारी करायला हवी. थंडीत उघड्यावर झोपणे तसे सोपे नाही, हे लक्षात घ्यावे.प्रत्येक ऋतूंचा अनुभव वेगळा.
४...जी बॅग किंवा सॅक आपण परिक्रमेत बरोबर नेणार असू, त्याची पुरेशी आधी खरेदी करावी आणि प्रॅक्टिस दरम्यान त्याचा कणखर व टिकाऊपणा तपासून घ्यावा. त्याचे वजन फार असू नये. फार तर एखाद्या किलोपर्यंत वजन असावे.
५...उन्हाळ्यात बरोबर नेण्यासाठी कपड्यांचे दोन जोड (लुंगी, झब्बा, साडी, ब्लाउज) असावेत. एक शाल ,टॉवेल, टोपी, झळा लागू नयेत यासाठी मोठा रुमाल, पंचा इ वस्तू वेळोवेळी वापरण्यासाठी लागतात.
६...थंडीत वर अनुक्रमांक ५ मध्ये नमूद केलेल्या वस्तूंशिवाय कानटोपी, पातळ पण उबदार स्वेटर, थर्मलवेअर, चांगल्या कंपनीचे दर्जेदार साॅक्स, कमी वजनाचे ब्लॅंकेट इत्यादी वस्तूंचे आवश्यकता भासते. ब्लॅंकेट, शाल , थर्मल वेअर यांचे वजन कमी करण्यासाठी स्लीपिंग बॅगचा पर्याय आहे. ती नेता येऊ शकते.
७...झोपण्यासाठी सतरंजी/ फोल्डिंगची चटई न वापरता, ट्रेकिंगसाठी वापरले जाणारे कॅरीमॅट वापरावे. ते अगदी कमी वजनाचे असते. त्याची गुंडाळी पण होते. ते ओले होत नाही. पटकन साफ होते. गरजेनुसार औषधे,पाण्यासाठी स्टेनलेसची दुधासाठी वापरली जाणारी स्टीलची किटली, सँडल किंवा बूट,नेलकटर, जपासाठी माळ, सुई दोरा.
८...अंगाचा किंवा कपड्याचा साबण, ग्लुकोज पावडर ,डोक्याचे तेल, सातूचे पीठ, खाण्याच्या वस्तू ,अनावश्यक औषधे, कपड्यांचे दोन पेक्षा जास्त जोड ,चप्पल-बूट याचा एक जादा जोड इत्यादी गोष्टी बरोबर नेऊ नयेत. विनाकारण वजन वाढते. त्यामुळे चालताना त्रास होतो. नकोशा झालेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो आणि फेकून देणेही जीवावर येते.
९...जी सॅक/ पिशवी आपण बरोबर नेणार आहोत त्याच्यात नेण्याचे सामान भरून, किमान दोन महिने चालण्याचा सराव करावा.
१०...हा सराव म्हणजे उन्हाळ्यात जायचे असेल तर सकाळी सहा वाजता सॅक भरून घराबाहेर पडावे. जवळच्या गावातील किंवा डोंगरातील मातीच्या वाटेवरुन चालण्याचा सराव करावा. थंडीत प्रवास करणार असाल तर उजाडल्यानंतर वरील ठिकाणी गरम कपडे घालून चालण्याचा सराव करावा. हे सर्व मी अनुभवल्यामुळे इच्छुक परिक्रमावासींना कमी शारीरिक अडचणी याव्यात व माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा, म्हणून तपशीलात माहिती देत आहे.
११...उन्हाळ्यात/ थंडीत रात्री आपल्या घराबाहेर पार्किंग मध्ये झोपण्याचा सरावही करावा. पूर्ण रात्र घराबाहेर झोपावे. उन्हाळ्यात घराबाहेर डासांचा तर थंडीत थंडी व बोचरे वारे, दवामुळे चादर ओली होणे , इ अनुभवता येते.
१२...चालण्याचा सराव करताना बरोबर नेण्यासाठी घेतलेले चप्पल-बूट, सँडल वापरावे. ऐनवेळी खरेदी करून थेट परिक्रमेत वापरू नयेत. त्याने चालताना त्रास होण्याची शक्यता असते.
१३...बरोबर नेण्याचे कपडे शक्यतो कॉटनचे व पांढरेच असावेत. कॉटनच्या कपड्यात घाम शोषला जातो आणि पांढरे कपड्यामुळे ऊन लागत नाही. तसेच पांढरे कपडे परिक्रमावासी असल्याचे निदर्शक आहेत.
१४...परिक्रमेदरम्यान खूप वैविध्य असलेले पाणी, उदा : मैयेचे, कॅनॉलचे, विहिरीचे, बोअर वेलचे,हँड पंपाचे प्यावे लागते. प्रत्येक चवीत फरक असतो. सुरुवातीस अवघड जाते, पण नंतर सवय होत जाते. बाजारात मिळणारी पाणी शुद्धीकरणाची औषधे बरोबर नेऊ नयेत. त्याने वजन वाढते.तसेच औषध टाकून शुद्ध होण्यासाठी लागणारा कालावधी हातात नसतो. याशिवाय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा किती साठा करणार, हे ही महत्त्वाचे असते.
१५...माझ्या अनुभवानुसार कॉलरा, टॉयफाईड यांच्या लसी तर मलेरिया न होण्याची औषधे डॉक्टरी सल्ल्यानुसार परिक्रमेस निघण्यापूर्वी जरूर घ्यावीत. त्यामुळे पाण्यातून होणारे हे दोन मोठे आजार तरी किमान टाळता येतात. याचा मला उपयोग झाला. प्रवासात मला कावीळ व टाॅयफाईडचे स्थानिक रुग्ण पहावयास मिळाले.
१६...उन्हाळ्यात तापलेल्या रस्त्यांवर चालण्याचा अनुभव नसल्यामुळे तळपायाला फोड (बॉईल्स) येतात. ते टाळण्यासाठी उन्हात चालण्याचा सराव आवश्यक आहे.
१७...अनवाणी पायाने परिक्रमा करायची असल्यास त्याचाही सराव करावा. परिक्रमेदरम्यान अणुकुचीदार काटे,दगड वाटेवर असतात, हे माहितीसाठी नमूद करीत आहे.
१८...रोख रक्कम बरोबर ठेवणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही किमान आवश्यक, गरजेच्या व वेळोवेळी लागणाऱ्या वस्तू/गोष्टी (चहा,बिस्किटे) खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. परिक्रमेदरम्यान मोफत निवास, भोजन प्रसाद याची व्यवस्था होते. काही ठिकाणी सदाव्रतही मिळते. परिक्रमावासींना मोफत वस्तू वाटप केल्या जातात. हे गुजरात राज्यात जास्त प्रमाणात होते. मध्य प्रदेशातील परिक्रमेचा बराचसा भाग हा आदिवासीबहुल, जंगलाचा, मागास, गरीबीचा असा आहे. त्यामुळे किमान चहा-बिस्कीट, डाळ खरेदीसाठी पैसे लागतात. या भागातील औदार्य कल्पनातीत आहे. तरीसुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून व माणुसकी म्हणून तरी त्यांच्याकडे मागू नये, असे मला सुचवावेसे वाटते.
१९...परिक्रमावासीला स्वयंपाक करता यायला हवा. विशेषतः उत्तर तटावर नेमावरच्या (मध्यप्रदेशात) पुढे अमरकंटकपर्यंत बहुतेक ठिकाणी तयार अन्नक्षेत्र नाही. गव्हाचे पीठ व मीठ मिळते. या ठिकाणी स्वतःला स्वयंपाक करता येणे आवश्यक आहे. आश्रम/ मंदिरात भांडी, तवा, पातेले ,पळी, इंधन, लाकडे मिळतात. काही ठिकाणी लाकूडफाटा स्वतःला आणावा लागतो स्वतःकडे डाळ असेल तर वरण,रोटी किंवा बाटी (गव्हाचे अंडाकृती गोळे) निखार्यावर भाजून, भोजनप्रसाद सिद्ध करता येतो.
२०...नर्मदा मैयावर सरदार सरोवर, ओंकारेश्वर महेश्वर, पुनासा, बरगी व अमरकंटक अशी पाच-सहा धरणे आहेत. काही पूर्ण तर काहींची उंची वाढवायचे काम चालू होते. या धरणांमुळे , धरणाच्या मागील भागात मैयेला येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्या, नाले यांना बारमाही पाणी राहू लागले आहे. पायी चालताना अचानक पाण्याचा साठा समोर येतो. त्यामुळे वळसा घालून पुढे जावे लागते. याच्यामुळे हेलपाटा पडतो आणि वेळ वाया जातो. हेलपाट्यामुळे उशीर झाल्यास अंधारात रस्ता चुकण्याची शक्यता निर्माण होते. काही गावांचे मैयेपासून वरच्या बाजूला, दुसरीकडे तीन-चार किलोमीटर दूरवर पुनर्वसन झाले आहे. या सर्वांची माहिती स्थानिकांकडून घेत पुढे चालत राहावे. यामुळे मनस्ताप टाळता येतो.
२१...सर्व परिक्रमा मार्गावर हातात काठी असणे उपयोगाचे ठरते. काठीचा उपयोग हा मार्गातील छोटे नाले, उपनद्या पार करताना अंदाज घेण्यासाठी व तोल सावरण्यासाठी होतो. तसेच उताराच्या व चढाच्या रस्त्यावर तोल सावरण्यासाठी काठीचा वापर करता येतो. वाटेत अंगावर आलेली कुत्री हाकलणे हा ही काठीचा एक उपयोग आहे.
२२...परिक्रमा मार्गात कोणतेही अनाठायी धाडस करू नये. पाण्यावरून उड्या मारणे, उतारावरून पळणे व घसरून पडणे, यामुळे चालण्यावर मर्यादा येतात व उत्साहावर विरजण पडते.
२३...सकाळी उजाडल्यावर पुढील प्रवासासाठी निघावे. सायंकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत प्रवास करावा. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुक्कामी पोहोचावे. मुक्कामी पोहोचल्यावर गावातील प्रातर्विधीची जागा व पुढील गावाचा रस्ता याची माहिती घेऊन ठेवावी.
२४... मैयेच्या पाण्यात बऱ्याच ठिकाणी मगरी आहेत. शक्य असल्यास पाण्यात स्नानासाठी उतरू नये. पाणी अस्वच्छ होण्याची शक्यता असल्यामुळे, पाणी भरून घेऊन किनाऱ्यापासून दूर स्नान करावे. अपरिहार्य असल्यास पाण्यात दोन-चार दगड टाकून मगच पाण्यात उतरावे. पाण्यात दगड टाकल्याने जवळपासच्या मगरी घाबरून दूर पळतात, असे समजते. निर्मनुष्य, शांत पाणी असलेल्या ठिकाणी पाण्यात उतरून स्नान करण्याचे भलतेच धाडस करू नये. अशा ठिकाणी मगरींचा हल्ला होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२५...वरील सर्व सूचना व माहिती, गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल व्यक्तींसाठी आहेत. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवावे. फक्त कफनी व कमंडलूवर परिक्रमा करणारे संत, महात्मे यांची गोष्ट और असते.
नर्मदे हर...
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌹
लेखक : उदय नागनाथ
Email - udaynaganath@gmail.com
मोबाइल - ९४२२०८१०८०
(Post copied from shree Manoj bapuji kulkarni maharaj facebook)