रेवानुभूति - 1
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
रेवानुभूति - 1
नर्मदा परिक्रमेचे अनुभव- नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ - सुरुचि नाईक - 1 - 50
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती - भाग १
नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगताना सर्वप्रथम मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते आणि ती अशी की ही नर्मदा परिक्रमा मी केलेलीच नाही. ही नर्मदा परिक्रमा माझ्याकडून माझ्या गुरुंनी आणि माझ्या नर्मदा माईनी करवून घेतेली आहे, लहान मुलाला आई जशी हात धरून चालायला शिकवते आणि त्याच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आईचं बारीक लक्ष असतं तसच एका बाजूला गुरूमूर्ती प.पू नाना महाराज तराणेकर आणि दुसरीकडे माझी नर्मदा मैया यांच्या सुरक्षा कवचात माझी परिक्रमा पूर्ण झाली. सुरक्षा कवच असणं आवश्यक आहेच, आणि परिक्रमेतला काही भाग हा खरोखर घाबरवून सोडणारा आहे. मी भाग्यवान कारण हे सुरक्षा कवच मला मिळालं! कसं याचा उलगडा पुढे होईलच. परिक्रमेचं अनुभव कथन करताना माझ्या वाणीला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको ही प्रार्थना मी माझ्या मैया ला करेन. याच प्रार्थनेसोबत मी वाचकश्रोत्यांना एक विनंती सुद्धा करेन ती अशी की जशी मी मैयाचं लेकरू आहे तसे आपण सर्वजण ही तिची लेकरे आहात, तेव्हा जो काही भाव आपल्या मनात आहे तो तिच्याच पर्यंत थेट पोहचवावा, मी तुमच्या आणि तिच्यामधील दुआ नाही तर तुमच्यासारखीच तिची एक बालिका आहे, मी निश्चितच भाग्यवान आहे कारण ह्या परिक्रमेची संधी आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मैया आणि गुरू यांची सोबत मला लाभली. बरेचदा आपण काही तरी करावं असं आपल्या मनात असतं आणि कुणाच्या तरी प्रेरणेने आपल्या त्या कार्याची नीव ठेवल्या जाते. माझ्या अनुभव कथनाने आपल्या पैकी एखाद्याच्या जरी मनात नर्मदा माईच्या परिक्रमेची इच्छा निर्माण झाली तरी माझं हे अनुभव कथन सफ़ल झालं असं मी समजेन. संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारी ही एक तपश्चर्या आहे आणि ज्याच्या त्याच्या शक्तिनुरूप आणि प्रारब्धानुसार ती घडवून घेतल्या जात असते हेच समजून घेणं आवश्यक आहे.
*नर्मदा परिक्रमाच का करायची?तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायचा विचार कसा आला? साडेपाच महिने तुम्ही घराबाहेर राहिलात, घरच्यांनी कसं मान्य केलं?* असे अनेक प्रश्न या वेळी तुमच्या मनात असणार आहेत. त्या सर्वांची उत्तरं मी माझ्या कडून देण्याचा प्रयत्न करेनच. तुमच्याकडून कदाचित काही असेही प्रश्न येतील ज्यांचे समाधान करण्याची क्षमता माझ्याकडे नसेल, अशी प्रश्न मैयावर सोपवून देऊयात, तिचं काय समाधान करायचे ते करेल! कदाचित तेच तुमच्या परिक्रमेचं बीज ही असेल? बघूयात.
तर *नर्मदा परिक्रमाच का करायची? त्याची एक अख्यायिका आहे.*
एकदा गंगा मैया आणि नर्मदा मैया तपश्चर्येला बसल्या होत्या. ज्यावेळी गंगामैया ची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी तिने शंकराला “मला तुमच्यात सामावून घ्या” असा वर मागितला आणि म्हणून शंकरांच्या जटेमध्ये गंगामाईला स्थान मिळालं. नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी “तुम्ही तुमच्या पंचायतनां सकट माझ्या मधे सामावून जा” असा वर तिने मागितला. आणि सर्व पंचायतनांसकट शंकर नर्मदा मैयामधे सामावून गेले. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजा पासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजल्या जातो. इथे “ हर कंकर शंकर” अशी उक्ती प्रचलीत आहे. आणि म्हणूनच परिक्रमा ही फ़क्त नर्मदा मैयाचीच करायची असते. बाकी कुठल्याही नदीला तिची परिक्रमा होण्याचं भाग्य लाभलेलं नाही. तसच नर्मदा नदीचे महात्म्य सांगताना असं म्हटल्या जातं की सरस्वती मधे तीन वेळा स्नान करून पुण्य मिळतं, यमुने मधे सात वेळा स्नान करून पुण्य मिळतं, गंगेमधे एकदा स्नान करून पुण्य मिळतं मात्र तितकच पुण्य नर्मदेच्या केवळ दर्शनाने लाभतं. नर्मदा किना-यावर अनेक शक्ती अदृष्य रुपात आजही तप करीत आहे आणि तिथली पवित्र कंपने आपल्याल्या त्या त्या ठिकाणी जाणवतात देखील!!
तुम्हाला नर्मदा परिक्रमा का कराविशी वाटली असं जेव्हा मला विचारल्या जातं तेव्हा खरच जाणवतं की हा विचार मनात आला आणि पूर्ण झाला असं काही झालं नाही. त्यासाठी मधे बरीच वर्ष जावी लागली. थोडक्यात मी विचार केला आणि मी परिक्रमा केली इतकं सोपं हे गणित नाहीये, त्यासाठी गुरू आणि मैया य दोघांची ही इच्छा असावीच लागते. मी १४ वर्षांची असताना मला पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा कराविशी वाटली, मात्र आज मी परिक्रमा केली त्यावेळी मी चाळीशीला पोचलेली आहे. अर्थात त्या वयात ही परिक्रमा करणं शक्य ही नव्ह्तं , आणि भाग्यतही नव्हतं म्हणून ती तेव्हा झाली नाही, आता होतं म्हणून आता झाली. माझे गुरू प. पू नाना महाराज तराणेकर यांची पोथी मला माझी आजी वाचायला सांगत असे. मी रोज एक पान अशीच पोथी वाचायचे. त्या पोथीमधे नाना महारांजानी जेव्हा जलेरी (नर्मदा मैया सतत डोळ्यापूढे ठेवून) नर्मदा परिक्रमा केली होती त्यातले अनुभव कथा रुपात सांगितलेले आहे. ते अनुभव वाचताना अंगावर काटा यायचा, वाटायचं खरच नर्मदा असं दर्शन देते का? खूप इच्छा व्हायची, पण तो विषय तिथेच थांबून राहीला. मात्र या अनुभवातून एक अनुभव माझ्या कायम लक्षात राहीला तो इथे आपाल्याला मुद्दाम सांगतेय कारण याचा संबंध पुढे मला आलेल्या अनुभवाशी आहे. तर ज्या वेळी नाना महारांजानी परिक्रमा केली तो काळ आजच्या काळासारखा नव्हता. आजच्या सारख्या सेवा, ठिकठिकाणी आश्रम, अन्नदान किंवा अन्नछत्र ठायी ठायी नव्हते. मोबाईल सारखी व्यवस्था ही नव्हती आणि दळवळणाची साधन देखील नाही. रस्ते नाही, किना-यावरची वाट ही अतिशय बिकट आणि घनदाट जंगलाची...असा तो काळ. तर नानामहाराज जंगलातून एकटेच जात होते, संध्याकाळ व्ह्यायला आलेली, भूक तहानेनी व्याकूळ नाना महाराज थोडी विश्रांती घ्यायला म्हणून एका झाडाखाली बसलेले, भूक खूप लागलेली, तहान खूप लागालेली, आणि तोंडने नामस्मरण सुरू. नाना थकले होते, त्यांचा किंचीत डोळा लागतो न लागतो तोच त्यांना आवाज आला, “बेटा दूध पाओगे?” बघतात समोर एक गावकरी महिला सोन्याचा भला मोठा घडा घेऊन उभी. दूध म्हंटल्यावर नांनाची भूक बळावली आणि तो भला मोठा घडा तोंडाला लावून ते घटाघट दूध पिऊ लागले. दूध संपल्यावर घडा तोंडाचा काढतात आणि बघतात तो ती महिला तिथे नाहीच... आता हा सोन्याचा घडा परत कसा कारायचा? कोण असेल ती महिला जिने इतका किमती सोन्याचा घडा असा सोडून दिला असावा? नानांच्या लक्षात आलं, ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात नर्मदा माई होती. नानांनी तिचा घडा तिच्या पात्रात अर्पण केला.... असे अनेक प्रसंग या पोथी मधे आहे.
माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा ही भक्ती पोटी नव्हे तर उत्सुकतेपोटीच निर्माण झाली होती..माझी उत्सुकता माझ्या नर्मदा माईनी अशी काही शमवली की तिचं रुपांतर आता तिच्या भक्ती मधे आणि तिच्यावरच्या श्रद्धेमधे झालं आहे. मला नर्मदा परिक्रमा का करविशी वाटली याचं एक आणखी कारण आहे.किंबहूना ती अमलात कशी आली त्याचं कारण आहे असं म्हंटलं तरी चालेल. जुलै २०१७ मधे माझं पी.एच.डी चे सबमिशन होते. ते काम मला खरच खूप जड जात होतं. त्यावेळी मी जरा डिप्रेशन मधे गेले होते, मात्र नर्मदा मैयाचे अनुभव ऐकले की खूप प्रसन्न वाटायचं...एक वेळ तर अशी आली की जणू ती मैया बोलावतेय मला असं वाटू लागलं. मला माझ्या बद्दल, आयुष्याबद्दल, अध्यात्माबद्दल बरेच प्रश्न ब-याच वर्षांपासून भेडसावत होते. काहीतरी वेगळं समाधान, कसली तरी तृप्ती मला हवी होती, पण नक्की काय हे काही समजत नव्हतं. अज्ञाताचा अखंड शोध सुरु होता अणि त्याची उत्तरं मला नर्मदा परिक्रमेत मिळतील असा विश्वास मला जाणवत होता. तर असे काही माहित असलेले आणि काही माहितच नसलेले कारणं घेऊन मी परिक्रमेला निघाले.
सुरवातीला मी काही महिने घराबाहेर राहणार म्हंटल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या घरून ही विरोध झालाच, पण माझा हट्ट आणि त्याहून माझ्या मनाची होणारी घालमेल समजून घेऊन माझ्या घरच्यांनी मला परिक्रमेला जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या होकारा शिवाय मला जाता येणं शक्य नव्हतच. १ नोव्हेंबर २०१७ ला ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूरहून मी, ठाण्याहून सौ डोंगरे आणि मुंबई हून सौ मंत्री अशा तिघी जणी सोबत परिक्रमा करू असा निर्णय घेतला...पण निर्णय घेणारे आपण कुणीच नसतो खरं.... ते सगळं तीच ठरवत असते...आणि हे ती नर्मदा मैया वेळोवेळी जाणवून सुद्धा देते. कसं ते पुढच्या भागांमध्ये लक्षात येईलच.
सौ. सुरुचि नाईक
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती - भाग २
*प्रत्यक्ष परिक्रमेच्या आधीच जेव्हा आशिर्वचनांची अनुभूती येते त्यावेळी......*
परिक्रमा करण्या आधी अनिल दास महाराजांकडून संकल्प करवून घेतला. हा संकल्प केला त्यावेळी मनात खूप घालमेल होती. नर्मदा माईशी डायरेक्ट पण मनातल्या मनात बोलणं पहिल्यांदा सुरू झालं. समोर खळखळून वाहणारी नर्मदा नदी, तिचं जीव घाबरवणारच ते रूप आहे. तिच्या प्रेमाची आणि तिच्या माझ्यावरच्या ममतेची प्रचिती मला जरी आली नसली तरी आई लेकराला काय हवय हे समजून घेण्यात कधीच कमी पडत नाही. तिने माझ्या मनाची घालमेल ओळखली मला म्हणाली यथाशक्ती परिक्रमा पूर्ण करेन असा संकल्प कर.... ती म्हणाली असच वाटलं मला...जसा एखादा विचार आपला नाही हे आपल्याला अचानक समजतं तसं झालं.. कुणीतरी कानात सांगावं तसं वाटलं...परिक्रमा सुरुही झाली नाही आणि आईनी सांगितलं..तुला जिथे गरज पडेल तिथे माझ्याशी नि:संकोच बोल, मी तुला मार्ग दाखवेन. परिक्रमा सुरु होण्याच्या आधीच मला आलेला हा अनुभव...
खरं तर या ही आधी मला एक अनुभव आला, माझ्या गुरु माऊलीचा.. मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोर ला आले. माझी आत्या इंदोर ला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच....आपण काहीच ठरवत नसतो... नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं... तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच.... मला दुस-या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही... आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, “का ग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?” आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला. रात्री साडे अकरा ला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षानी जाणवू लागलं. मी माझ्या आत्येभावाला सांगितलं... त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा आशीर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासाहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. *माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं.*.
गुरुबळ पाठीशी आणि मैया भोवताली असताना माझी परिक्रमा पूर्ण आणि सुकर कशी होणार नाही?
परिक्रमा सुरु झाल्या झाल्या अनेकांच्या पायाला छाले आलेले मी पाहिले, असं म्हणतात या कालावधीत जो काय त्रास होतो ते आपले भोग असतात, आपण कुणाला तरी काही तरी त्रास दिलेला असतो आणि तो अपल्याला परत मिळणार असतो...आपलं देणं झालेलं असतं, आपण घेणं आता बाकी असतं.... तो त्रास सहन करावाच लागतो.. आणि खरोखर सोबत असलेले अनेक परिक्रमावासी वेगवेगळ्या त्रासातून जाताना मी पाहिले. मला काहिही त्रास झाला नाही. पूर्ण परिक्रमेत मला ३ दा ताप चढला, आणि त्या त्या वेळेला मैयाचे अनुभव आले, मात्र शरीराला जखम, दु:ख, पोट खराब होणे, पाय दुखणे, पायाला छाले येणे असा काहीही त्रास मला परिक्रमेत झाला नाही....मला झाला नाही म्हणण्यापेक्षा माझ्या माईनी आणि माझ्या गुरुंनी तो वरचेवर झेलून घेतला..तो माझ्यापर्यंत पोहचूच दिला नाही...आणि हे मी इतक्या खात्रीपूर्वक फ़क्त येवढ्यासाठी सांगू शकते की मी एक अत्यंत सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझ्या जीवनकालात किंवा गतजन्मांमधे मी अनेक चुका, अनेक पापं नक्कीच केले असणार आहे आणि तरीही मला त्रास झाला नाही कारण तो माझ्या गुरुंनी आणि मैयानी मला होऊ दिला नाही. अनेक पापकर्मांसोबत निस्वार्थ पणानी आणि निष्पाप मनानी एखाद तरी सत्कर्म माझ्या कडून करवून घेतल्या गेलं असलं पाहीजे की या जन्मामधे मला नाना महाराज गुरू म्ह्णून लभले, त्यांचे आशिर्वाद मला मिळाले आणि काहीही त्रास न होता परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले आहे. म्हणून सुरवातीला मी जे म्हणाले तेच खरे..ही परिक्रमा मी केलेली नाहीच.
एक महत्वाचा आणि अगदी सुरवातीचा अनुभव मी नमूद करायला विसरले आहे, त्याला कारण पण तसच आहे, ते असं की *हा अनुभव मला नागपुरात, म्हणजे परिक्रमा सुरु करण्याच्या महिनाभर आधी आला...* आश्चर्य वाटलं नं? सांगते. माझ्या घरापासून कोराडी देवस्थान हे साधारण २५ किलोमीटर आहे. पायी चालण्याचा सराव म्हणून मी इथे पायी जाण्याचं ठरवलं. नुकतेच पांढरे कपडे शिवून घेतले होते. तेही वापरून बघावेत कम्फर्टेबल आहेत की नाही म्हणून त्या दिवशी तेच घातले, दसा-याचा मुहूर्त साधला, आणि निघाले. रस्त्यात कुत्री त्रास देतात म्हणून एक काठी घेतली होती, आणि कमंडलू हातात घेऊन चालण्याचा सराव करावा म्हणून तो ही घेतला होता. पाठीवर १२-१३ किलो ची बॅग पण होतीच. साधारण १५ की. मी अंतर चालून झालं होतं. उन फार होतं. तसे सकाळचे साडे आठ नऊ झाले असतील. एका हॉटेल समोर जरा सावली होती म्हणून तिथे जरा थांबले. तेवढ्यात आतून एक मध्यम वयीन तरुण धावत बाहेर आला “ नर्मदे हर मैया जी, परीक्रमेचा सराव करता आहात का? कार्तिक द्वादशी ला उचला परिक्रमा” असं म्हणतच तो बाहेर आला. मला खूप आश्चर्य वाटलं. इथे नागपुरात मैयाजी म्हणून धावत येऊन मला हा नमस्कार करतो, याला कसं माहित मी परिक्रमा करणार ते? “मैयाजी थंड पाणी प्या, नाश्ता करा” असं म्हणत माझ्या हातातून कमंडलू ओढून घेऊन एव्हाना गरम झालेलं पाणी बदलून ठंडगार पाणी त्यात दिलं सुद्धा. त्याच्याशी छान ओळख झाली. गप्पा झाल्या. त्यांचं नाव अविनाश सोळंकी. ते दुबई ला असतात, आणि नर्मदा खंडात ७ ठिकाणी अन्नछत्र चालवतात. त्यांची सासुरवाडी नागपूर ला म्हणून ते इथे आले होते. हा माणूस मैया चा भक्त आहे. सुट्टी अभावी त्यांची परिक्रमा होऊ शकत नाही याची त्यांना फार खंत आहे आणि काहीतरी सत्कार्य म्हणून ते स्वखर्चाने आणि काही मदतीने हे ७ आणि पुढे येऊ घातलेले ३ अन्नछत्र चालवत आहेत. अविनाशजींनी माझा नंबर लिहून घेतला. दुस-या दिवशी वेळ काढून घरी आले आणि परिक्रमेची पूर्ण माहिती दिली आणि एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. संपूर्ण परिक्रमेत जिथे जिथे मला नेटवर्क असेल तिथे तिथे मला यांचा दुबईहून फोन येत. फोन करून हा माणूस मला पुढची माहिती सांगायचा आणि एक मागणी करायचा...”मैयाजी मागच्या फोन नंतर काय अनुभव आले सांगा”. नेटवर्क अभावी बरेचदा फोन होत नसत. अविनाशजींच्या माध्यमातून माई मला सतत सोबत देत होतीच. आता सांगा, कोण कुठले हे अविनाश जी...मला परिक्रमेच्या महिना भर आधी पासून सोबत करत होते, ते अगदी परिक्रमा संपे पर्यंत. माझी परिक्रमा होणे हे खरच सांगा, फक्त माझा निर्णयामुळे साध्य झालंय का? नाही. ह्या लेकराकडून परिक्रमा करवून घ्यावी हा माझ्या माईचा आशीर्वाद आणि माझ्या जन्मदात्यांची आणि पूर्वजांची पुण्याईच आहे. आणि हे जाणवून देणारे शिवाय अविनाशजींच्या मदतीचे अजूनही अनुभव आहेत.
लक्कडकोट ची झाडी, नेमावर हे अनुभव मी विसरू शकत नाही...पण अनुभव सूची मध्ये त्यांचा क्रमांक जरा नंतर आहे, पण त्या आधीचे विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव आहेत, ते पुढच्या भागांमध्ये येतीलच.संकल्प घेतल्या गेला, आता परिक्रमेला सुरवात करायची. आम्ही तिघी एकत्र होतो, आणि एकत्र राहू असं वाटत होतं. सौ मंत्री यांना चालण्याचा फ़ारसा सराव नव्हता असं त्या म्हणाल्या त्यामुळे संकल्प घेण्या आधी देखिल मोरटक्का ते ओंकारेश्वर आम्ही पायी चालून गेलो होतो, सराव करण्यासाठी. असं म्हणतात संकल्पात बळ असतं.. आणि हो, ते असतच! ते कसं याचा समजलं याचा अनुभव सांगते. पण त्या आधी एक कबूली नामा मला द्यावासा वाटतो. संकल्प झाला होता, खरं तर आता माझी मैयावर पूर्ण श्रद्धा असायला हवी होती, मनातून तशी इच्छा ही होती, पण कुठली तरी भिती मनात होतीच... ओंकारेश्वर ते मोरट्क्का मैया किनारी जाऊ नका असा सल्ला अनेकांनी दिला. तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला झेपणार नाही, वाट कठीण आहे असं ही सांगण्यात आलं...इथे माझ्या मनानी दोन कारणं पुढे केली..१ कठीण असेल, काही झालं तर? परिक्रमा पूर्ण व्हायची नाही आणि दुसरं, सौ मंत्री आणि सौ. डोंगरे या दोघीही त्या मार्गाने जाण्यास तयार नव्हत्या...मी सुद्धा हाय वे नी जायचं ठरवलं... खर तर ती मैयानी माझ्या मनाची घेतलेली परिक्षा असावी, मी त्यात नापास झाले आहे...आणि पुढे आलेल्या अनुभवांनंतर आज मला हे जाणवतय की त्या वेळी मी चूक केली. यथा शक्ती केलेला संकल्प हे माझ्या भित्रा मनाला झाकणारं आवरण ठरलं.. संकल्प कसा असावा असं सांगताना यांनी सांगीतलेली गोष्ट मुद्दाम इथे सांगतेय, आधीच सांगतेय म्हणजे संकल्प हा शब्द जरी आला तरी तो पाळल्या जाईल आणि जी चूक मी केली ती इतरांकडून होणार नाही.
गोष्ट अशी आहे, एक व्यापरी होता, त्यानी ठरवलं, आता यापुढे आपण कुणालाही पैसे द्यायचे नाही, जे काही देणं असेल ते देऊन मोकळं व्हायचं आणि मग पुढे कुणालाही एक पैसा पण द्यायचा नाही. त्यानी ठरल्याप्रमाणे जे काही देणे होते ते पूर्ण केले आणि संकल्प घेतला...पुढे काही दिवसांनी एक सन्यासी त्या व्यापा-याकडे आला, आणि म्हणाला मला तुमच्याकडून १ रुपये घेणे आहे. व्यापा-याने संकल्प घेतलेला, तो म्हणाला मी काहीही झालं तरी पैसे देणार नाही. सन्यासी निघून गेला, काही दिवसांनी परत आला, तेव्हा व्यापा-यानी त्याला दुरून बघितलं, मुलाला सांगितलं, जा बाबा झोपलेत म्हणून सांग... सन्यासाला तसं सांगितल्यावर सन्यासी म्हणाला मी वाट बघतो...पण आज मी माझे पैसे घेऊन च जाईन! बराच वेळ निघून गेला... व्यापा-यानी मुलाला सांगीतलं, जा सांग त्या संन्याशाला, बाबा आजारी आहेत, तुला आता १ रुपया मिळनार नाही. मुलाने व्यापा-याला समजवल, १ रुपया तर आहे, देऊन टाका नं.... व्यापारी आपाल्या मतावर ठाम... मुलाने सांगितलं, बाबा आजारी आहेत... सन्यासी म्हणाला “मी वाट पाहीन” अनेक दिवस निघून गेले, व्यापा-याच्या घरासमोर संन्यासी ठिय्या मारून बसलेला...एक दिवस व्यापारी मुलाला म्हणाला..जा संन्याशाला सांग बाबा वारलेत....मुलाने संन्याशाला तसाच निरोप दिला.... संन्यासी म्हणाला “ अरे रे, माझा रुपया ही गेला आणि व्यापारी ही, आता याचा अंतिम विधी झाल्यावर मी माझ्या गावी परत जाईन” मुलगा घाबरला...त्याने वडिलांना सांगितले...व्यापा-याने मुलाला अंतिम संस्कारांची तयारी करायला सांगितलं...मुलगा बिचारा नाईलाजाने तयारी करू लागला...लोक जमा झाले, व्यापा-याला चितेवर ठेवण्यात आलं, आता मात्र मुलगा घाबरला, आपल्या वडिलांना जिवंतपणीच अग्नी द्यायचा?...त्याचे हात थरथर कापू लागले...वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून तो वडिलांना विनवू लागला..”बाबा अहो एका रुपयासाठी तुम्ही मरण सुद्धा पत्करताय? काय हा मूर्खपणा?.. व्यापरी काही ऐकेच ना..म्हणाला..अग्नी दे, पेटव चिता, पण मी रूपया देणार नाही....मुलाने नाईलाजास्त्व चितेला अग्नी दिला, आणि आता चिता पेटणार तेवढ्यात त्या अग्नी चं रुपांतर फ़ुलांमधे झालं...संन्यासी चितेजवळ गेला आणि साक्षात विष्णू रुपात समोर आला...व्यापा-याला चितेवरून दूर केलं ... म्हणाला..संकल्प असावा तर असा....
मी मात्र यथा शक्ती संकल्प केला..म्हणजे कुठेतरी माझा विश्वास माझ्यावर आणि माझ्या मैयावर कमी पडला... ती कनवाळू च आहे, मला त्रास होऊ नये याची काळजी ती घेतेच आहे, पण मी तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून, काही तरी नियम ठेवून संकल्प केला असता तर तोही तिनी पूर्णत्वाला नेलाच असता...पुन्हा परिक्रमेची संधी मिळाल्यास ही चूक माझ्याकडून होऊ देऊ नको असं मी तिला आताच विनवते.परिक्रमेचे नियम नक्की काय, त्याची कारणं नक्की काय हे खरं तर अजूनही हवं तसं मला समजलेलं नाहीये, पण १००% श्रद्धा हा नियम असायलाच हवा हे नक्की. भिती वाटणे म्हणजे श्रद्धा कमी पडणे च आहे आणि काही वेळेला माझ्याकडून ही चूक झालेली आहे. मात्र काही वेळेला माझ्या नर्मदा माईनी मला अगदी अभयाचं वरदान देखिल दिलं ते कसं ते ही माझ्या अनुभव कथनामध्ये येईलच.
संकल्प करून झाला होता. कार्तिक द्वादशी, १ नोव्हेंबर २०१७ हा दिवस. मी या अनुभव कथनामधे माझी रोजनिशी सांगणार नाहीये कारण ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि प्रारब्धानुसार परिक्रमा घडत असते. मी इथे मला आलेले अनुभव कथन करणार आहे कारण माझ्या मते ते अनुभव मला मिळणं हेच महत्वाचं होतं.. तर परिक्रमेची वाटचाल प्रत्यक्ष रित्या सुरु होण्या आधीचे अनुभव मी आधीचे अनुभव मी सांगितले, आता अनुभवाला सुरवात करू पुढच्या भागापासून.....नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती -भाग ३
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हा…
नर्मदे हर.
पहिल्या दिवशी ओंकारेश्वर ते मोरटक्का, साधारण ११ कि.मी चं अंतर होतं. मी मागे सांगितलं तसं संकल्प करण्याआधी सराव म्हणून आम्ही मोरटक्का ते ओंकारेश्व पायी गेलो होतो.. आता गम्मत बघा…अंतर सारखच, पण संकल्पामधे बळ असतं याची प्रचिती अगदी पहिल्याच दिवशी आम्हाला आली. ११ कि.मी अंतर चालायला आम्हाला आधी जवळ जवळ साडे चार तास लागले. चालण्याची सवय नाही, त्यामुळे २ ते ३ कि.मी अंतरावर आम्ही थांबायचो…मात्र संकल्प केल्यावर, म्हणजे तसं पाहता २ दिवसांनी लगेच हेच अंतर ३.३० तासात पार पडले..आणि त्यातही १ तास वेळ हा जेवण्यात गेला..मधे एक रोटी आश्रम लागतो तिथे दुपारच्या जेवणाची…(आता आपण भोजन प्रसादी हा शब्द जेवणासाठी वापरू) ची व्यवस्था असते. यापुढे आपण जेवणाला भोजन प्रसादी म्हणू याचं कारण आहे. ते असं की परिक्रमेमधे आपल्याला जे काही मिळतं तो नर्मदा माईचा प्रसाद असतो. बालभोग हा ही तसाच एक शब्द, सकाळच्या न्यहारी ला बालभोग म्हणतात, तसच पूर्ण जेवण असलं की त्याला म्हणायचं राजभोग! बरं तर आता पुन्हा संकल्पाकडे वळू.
ओंकारेश्वर ते मोरटक्का, परिक्रमेचा पहिला दिवस आणि मनात खूप उत्साह होताच पण आपण इतकं मोठं ध्येय समोर ठेवलं ते पूर्ण होईल की नाही ही भीती होती. रस्त्याने चालताना त्या दिवशी आम्ही २० -२२ लोक असू. भाग्य बघा कसं असतं… थोडं ऊन होतच..ऑक्टोबर हीट संपली नव्हती मी आणि सौ डोंगरे सोबत होतो, सौ मंत्री जरा पुढे होत्या. रस्त्यात आमच्या जवळचं पाणी संपलं…अगदी आम्ही नवीन परिक्रमावासी असल्याने अजून “नर्मदे हर” ही सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या कुलुपांची किल्ली असते हे आम्हाला समजलं नव्हतं. पण स्थानीय लोकांना ते माहित असतं. तर पाणी संपलं होतं आणि आम्ही पाणी कुठे मिळेल का याचा थोडा शोध घेत होतो. इतक्यात एक सायकल वाला येऊन थांबला…. म्हणाला “ नर्मदे हर माताजी, छाछ पाओगे?” आम्ही पाणी शोधतोय, हा ताक विचारतोय….मनापासून आनंद झाला…. आम्ही म्हणालो कैसा दिया, तर म्हणे “पाप करवाओगे क्या मैया जी, पैसा नही लुंगा, आपकी पानी की बोतल खाली है न, उसमे भर लो….” खूप आग्रह करून जवळ जवळ ३ लिटर ताक त्यानी जबरदस्ती नी आम्हाला दिलच..मी आणि सौ डोंगरे भरपूर ताक पिऊन तृप्त झालो आणि वाटेत भेटणा-या परिक्रमावासियांना देऊन ते संपवलं. पण तेव्हा खूप आश्चर्य वाटलं….आणि जे भाव ताक पिऊन तृप्त झालेल्या आमच्या चेह-यावर बघून तो ताक वाला आनंदित झाला होता तोच आनंद ते ताक पुढे भेटलेल्या परिक्रमावासियांना देऊन आम्हाला झाला…त्या ताकवल्यानी आम्हाला २ गोष्टी शिकवल्या.. एक, नर्मदे हर म्हंटलं की मग कुठलाही प्रश्न शिल्लक उरत नाही, आणि दुसरं म्हण्जे सेवा घेण्यापेक्षाही सेवा देण्यात जो आनंद आहे तो जास्त रसाळ असतो. ताक तेच, ते परिक्रमावासी ही आमच्या सारखेच..पण आनंद दुहेरी.
हाच विचार करत आम्ही एक रोटी आश्रमात पोचलो…कुणीतरी म्हणालं ऊन खूप आहे, काही तरी गोड खायला हवं..त्यावर एक परिक्रमावासी म्हणाला, “रास्ते मे रबडी का दुकान था…सोचा था ले लू..भूल गया”, आणि काय आश्चर्य? जेवायला बसलो तो पनात घट्ट रबडी! एका अनुभवाच्या धक्यातून निघत नाही तर लगेच दुसरा…तिसरा देखिल…जसं काही ती मैया सांगतेय की हा केवळ संयोग नाहीये.. मी आहे आणि मी तुमच्या सोबत आहे.
एक रोटी आश्रमात जेवण झाल्यावर मी आणि सौ मंत्री थोडं मागे थांबलो… एक रोटी आश्रम हे नाव जरा वेगळं वाटत होतं म्हणून चौकशी केली. त्या साधू महाराजांनी जे सांगीतलं तो परिक्रमेतला आणखी एक मोलाचा ठेवा… ते म्हणाले “रोटी कौन खाता है?…जिसे भूक लगती है वो…. अब सोचिये, भूक क्या होती है? जिसके पूरे होने से आपको समाधान मिले वो…. फ़िर आप इच्छाओं को भूक कह सकते हो! किन्तू एक रोटी का मतलब ये है की ऐसी इच्छा जो पूरी होने पर आपको तृप्ती मिले. वही आपकी रोटी है… आप सुबह पेटभर खाना खाओगे और शामको आपको फ़िर भूक लगेगी….तो एक रोटी मे काम नही चलेगा.. फ़िर ये भूक कौनसी है जो एक रोटी मे पूरी हो जाये?तो ये भूक है इश्वर प्राप्ती की..एक बार आपको ईश्वर प्राप्ती हो जाये तो ना कोई भूक बाकी बचती है और ना ही कोई इच्छा…बेटा जी आप हमारे पुत्री समान हो, और आप हमारे माता समान भी हो.. क्युंकी आप हमारे पुत्री हो हम आपको सलाह देंगे की इस एक रोटी की खोज करो, और उसे पाने की कोशिश करो…और आप हमारे माता समान है इसलिये आपको विनंती करेंगे की आप जगत माता बनो…. इसके लिये आपको कुछ करने की जरूरत नही है, आप जैसे अपने बच्चे के गुनाह गलतीयो को प्रेम से सवारते हो इसी प्रकार जगत की आपके प्रती होने वाली वो हर गलती, मा की तरह भूला दो…इससे जगत का नही आपके मातृत्व का विकास होगा, आपकी रोटी की तरफ़ आपका ध्यान बना रहेगा.” असं म्हणून त्यांनी रुद्राक्षाची एक छोटीशी माळ माझ्या हाती दिली….
आजचा हा तिसरा अनुभव होता… आजच्या आज अजून किती अनुभव आणि अजून काय काय मैया कडून मिळणार होतं याचा अंदाजही नव्हता. असच झालं …परिक्रमेच्या अगदी पहिल्या दिवशी नर्मदा मैयांनी एका वेगळ्याच अनुभवातून मला एक शुभ संकेतही दिला आणि एक कोडं ही घातलं… कोड्याचं उत्तर शोधायचं तेवढ माझ्या साठी शिल्लक ठेवलं. तसं पहाता ते ही तिनंच सोडवून दिलं, आणि कधी माहितिये का? माझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात होती त्या वेळी… म्हणजे जवळ जवळ साडे चार महिन्यांनंतर!
या एक रोटी आश्रमाच्या किंचित आधी मला एक आजोबा दिसलेत. वय सधारण ८० च्या आसपास. मला त्यांचं कौतुक वाटलं आणि या वयात हे आजोबा पायी परिक्रमा करताहेत म्हणून आश्चर्य ही वाटलं. मीच त्यांची चौकशी करायला सुरवात केली. हे आजोबा म्ह्णजे जरा वेगळच रसायन आहे हे मला आमच्या गप्पांमधे जाणवू लागलं… आजोबा चालताना मधेच थांबायचेत, कुठेतरी शून्यात बघून नमस्कार करायचे, आणि मलाही नमस्कार करायला लावायचे…”बघ बघ, इथे इश्वराचं अस्तित्व जाणवलं तुला?” असं विचारायचे…मी पामर, मला काय जाणवणार? मी म्हणायचे “मला नाही समजत”! मग असं दोन तिन वेळा थांबून झाल्यावर त्यांनी सांगितलं, वा-याबरोबर मंद सुवास ज्या दिशेनी येतो, तिथे जाणवतो अगं ईश्वराचा वास…पण मला असा मंद सुगध ही आला नव्हता…मी आपलं आजोबांबद्दल आणि त्यांच्या साधने बद्दलच विचार करत राहिले. नक्की ह्यांची खूप साधना असणार आहे…
त्यांचं नाव त्यांनी मला नाईक असं सांगितलं…म्हणाले, मी नाईक, तू पण नाईक…काहीतरी नातं असेल आपलं! पण मला नं लेले काका म्हणतात. तूमच्या नागपूर जवळ कारंजा आहे नं? तिथे खोली आहे माझी! पण तसा मी पुण्याचा…माझे प्रश्न सुरू झाले त्यांना…मग कारंजाला कधी असता? काय करता तिथे? त्यांचं एक एक उत्तर मला अनेक प्रश्न निर्माण करून देणारं आणि नोर्मल उत्तरांपेक्षा वेगळं वाटत होतं… ते म्हणाले, तिथे मी सगळ्यांकडे लक्ष देतो. माझ्या खोलीत जाण्याची परवानगी नाही कुणाला! फ़क्त पुजारीच काय तो जाऊ शकतो…मला काही समजेना…आजोबा या वयात का उचचली परिक्रमा? यावर ते म्हणाले, अनेकांना भेट द्याय्चं मी कबूल केलं आहे…म्हणून उचलली….आणि खरी गम्मत तर शेवटी आली… त्यांनी मला कसा शुभ संकेत दिला माहितिये? मी त्यांच्या त्या बोलण्याने अक्षरश: बुचकळ्यातच पडले…सांगते..हा अनुभव पुढच्या भागात पूर्ण करते
सौ सुरुची नाईक
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षन अनुभूती- भाग ४
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हा…
नर्मदे हर.
नर्मदे हर… तर मागच्या भागात आपण मला पडलेल्या कोड्याबद्दल बोलत होतो! लेले काका असं काय म्हणाले होते? मी इतकी बुचकळ्यात का पडले? या कोड्याचा उलगडा कसा आणि कुठे झाला ते आता सांगते.
लेले काकांशी माझ्या ब-याच गप्पा झाल्यात. साधना कशी करायची? माझे गुरू कोण? कुठले श्लोक म्हणायचे, काय वाचायचं असे अनेक विषय ते माझ्याशी बोलत होते.. खरतर माझ्या बाबतीत त्यांनी फ़ार काही विचारलं नाही पण मी मात्र अनेक प्रश्न विचारू लागले. तेवढी मोकळीक तोवर बोलून निर्माण झाली होती. ते अगदीच प्रेमाने माझ्याशी बोलत होते…मधे मधे मला आशिर्वाद ही देत होते..”छान होईल बेटा तुझं सगळं”…असं ऐकून छान वाटत होतं, कुणी एक आजोबा, काही कारण नसताना, निस्वार्थ भावनेनी आशिर्वाद देतात हेच मुळात एक वेगळं फ़ीलिंग होतं. मला हे लेले आजोबा वेगळे वाटले, पण आवडले होते.
आमचं भोजन प्रसादी घेऊन झालं आणि लेले काका म्हणाले, बाळ, बरीच प्रश्न दिसतात तुझ्या मनात…बरं मी उत्तर देतो..तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतोच आता! आजोबा काय सांगतात या कडे मी कान लावून होते. त्यांनी जरा पॉज घेतला, मला थोडं बाजूला बोलावलं, आणि म्हणाले, नाही मी नाही सांगणार तुला माझ्याबद्दल…अरेच्या, अचानक काय झालं आजोबा, सांगा ना….मी आग्रह केला. त्यवर ते म्हणतात…”नको, माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी”.
मला आता मात्र फ़ारच वेगळं वाटू लागलं…पण एक शुभ संकेत मिळाला…. माझ्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात असं आजोबा म्हणाले, म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हे नक्की. आजोबांना जास्त आग्रह न करता आम्ही पुढची वाटचाल सुरु केली. मी आता मझ्या मैत्रिणीसोबत होते आणि आजोबा त्यांच्या सोबत च्या पुरुष मंडळींसोबत. ती माझी आणि आजोबांची शेवटची भेट. काय आश्चर्य न? त्या नंतर पूर्ण परिक्रमेत मला लेले काका पुन्हा दिसलेच नाही. मी मात्र प्रत्येक आश्रमात ते येऊन गेले का ही चौकशी करायचे. म्हातारा माणूस, आपल्या पेक्षा पुढे जाणार नाही कदाचित असं वाटायचं.
पुढे माझ्यासोबत मंदार वाळिंबे, सुदिन पराडकर आणि त्याचे काका, आणि तांबे बाबा असे लोक होते. सौ मंत्रींची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही आणि सौ डोंगरे काही कारणास्तव वेगळ्या गृप बरोबर होत्या…आम्ही सोबत राहयचं ठरवलं असून ते तसं झालं नव्ह्तं!.असो.. तर लेले काकांबद्दल मंदार व गृप माझ्याकडून ऐकून होते. मी लेले काकांचा शोध घेतेय हे त्यांना महित होतं. तब्बल साडे चार महिने गेलेत…मला लेले काका भेटलेच नाही, मात्र एक दिवस अचानक माझ्या समोर जे काही आलं त्याने मी धन्य धन्य झाले… माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटावा अशीच गोष्ट.
नरसिंगपूर जिल्ह्यातल्या गुरसी गावात एका मंदिरात आम्ही आश्रय घेतला. तिथून पुढच गाव रमपूरा, फ़क्त ७ किमी. मी आणि तांबे बाबा गुरसी हून थोडं उशीरा निघालो..मंदार आणि मंडळी सकाळी लवकर निघून रमपू-याला पोचली. तिथून मंदार चा फ़ोन आला, म्हणाला, “ताई आज रमपुरा ला मुक्काम करायचाय!” मी- काय? फ़क्त ७ किमी चालून मुक्काम? नाही रे, अशानी कशी पूर्ण व्हायची परिक्रमा. मी नाही मुक्काम करणार…. मंदार- पण ही रमपु-याची मंडळी जाऊच देत नाहीयेत ताई…तुला मुक्काम करायचा नसेल तर तू दुसरी कडून जा.. असं पुढच्या फ़ोन मधे मला सुदिन सुद्धा सांगत होता… त्या दोन तासात आमचे ३ ते ४ फ़ोन झाले…कुठे पोचलात, पुढचा रस्ता कसा असं आम्ही सतत कॉन्टेक मधे होतो. पुन्हा एक फ़ोन… मंदार म्हणाला, ताई नो ऑप्शन..तुला थांबायलाच लागेल..आणि आता जे मी सांगणार आहे त्याला तू नकार देऊच शकत नाही…तो म्हणाला, तुला लेले काका आठवतात?… मला वाटलं ते तिथे आहेत म्हणून मंदार आपल्याला थांबायला म्हणतोय..पण माहितिये का, ते तर नव्हते तिथे, मात्र तो आश्रम माझ्या गुरुबंधू नी तयार केलेला. माझ्या गुरुंचा वास तिथे…आता विषयच संपला होता… मंदारच्या एका वक्याने पिक्चर क्लीअर झाला..तो म्हणाला, ताई नाना महारांजाचा आश्रम आहे, तू मुक्काम करतेयेस, आणि लेले काकांबद्दल महत्वाची बातमी सांगायचीय.. लवकर ये.
साडे चार महिने, परिक्रमेचा जवळ जवळ शेवटचा टप्पा..अमरकंटक च आमचं नेक्स्ट टारगेट…. काय समजणार होतं मला लेले काकांबद्दल ???… “माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी.” मला लेले काकांच वाक्य आठवलं…. उत्सुकता शिगेला पोचली…आणि मी रमपु-याला!गेल्या गेल्या गुरुंचा प्रसाद मिळाला…आणि मग मंदार नी जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न च झाले… “ताई लेले काका कोण माहितिये का? ते साक्षात शंकर महाराज आहे” पुण्याला शंकर महाराजांचा आश्रम आहे हे आपल्याला महितच असेल. दत्त संप्रदायातले हे संत सद्गुरू! मोठे आणि भेदक डोळे, अजानुबाहू आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेले अशी यांचि मूर्ती मी पाहिली होती. हे लेले काका म्हणजे शंकर महाराज च होते..मी विचारलं मंदार ला..तुला कसं समजलं रे?
तर त्याने धनंजय नाईक नावाच्या एक नर्मदा भक्ताची गोष्ट मला सांगीतली…
धनंजय नाईक हे दर वर्षी परिक्रमा करतात. ते शंकर महाराजांचे भक्त. दर वेळी शंकर महाराज त्यांना भेट देतात, पण ह्या साक्षातकाराबद्दल धनंजय नाईकांना उशीरा कळतं…या वेळी श्री नाईकांनी शंकर महाराजांना विनवणी केली की “मीच शंकर महाराज असं स्वत: च्या तोंडून सांगा, तरच माझा विश्वास बसेल” मी रमपु-याला असताना लेले काका अमरकंटक ला पोहचले होते. धनंजय नाईंकाना त्यांनी स्वत: सांगितलं “ माझी वाट बघत होतास ना? मी च शंकर महाराज आहे” ही वार्ता वाऱ्यासारखी रमपु-याला पोचली, आणि माझ्या पर्यंत आली…परिक्रमा झाल्यावर मी धनंजय दादांना फोन करून या प्रसंगाची खात्री करून घेतली होती.
मी खरच भाग्यवान… परिक्रमेच्या आधी गुरुमाऊली मला पदरात घेते, श्री दत्तगुरू त्यांच्या अनेक रुपातून मला भेट देतात, माझी काळजी घेतात…लेले काकांनी मन भरून आशिर्वाद दिले आणि ठरवल्याप्रमाणे माझ्या कोड्याचा उलगडा माझ्याच गुरुंच्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आणला…या सगळ्या काळात एक घटना अजून घडली होती, आणि ती माझ्या नजरेतून सुटून गेली..पण मी त्यांचा नजरेतून सुटली नाही..शंकर महाराजांचं माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होतं हे मला नंतर जाणवलं.
मी गरुडेश्वर ला असतानाची गोष्ट. भालोद चे प्रतापे महाराज म्हणजे आई स्वरूप. मी त्यांची लेक..मूळचे नागपूर चे, त्यामुळे अजून थोडा सॉफ़्ट कॉर्नर…त्यांचे अनुभव पुढे सांगेनच, पण हे प्रतापे महाराज मला गरुडेश्वर ला भेटायला आले.. हो खास मला भेटायला भालोद हून नर्मदा मैया क्रॉस करून नावेतून आले होते. त्या वेळी त्या नावेत शंकर महाराजांचे भक्त त्यांची मूर्ती घेऊन आले होते. गरुडेश्वर घाटावर मी शकर महाराजांच्या आरती आणि पूजे मधे सामिल होते..पण मी अनभिज्ञ होते…..हे निम्मित्त मात्र होतं, संकेत होता, इशारा होता का काय ते माहित नाही, पण शंकर महाराज माझ्यावर लक्ष ठेवून होते हे समजायला मला साडेचार महिने लागले. नक्कीच मी पुण्यकार्य केलं असलं पाहिजे की असे संत सद्गुरू मला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेत होते. ‘गुरुकृपा हि केवलम’ म्हणतात तेच खरं. एक गुरू प्रसन्न असलेत की सुख दु:खाची तमाच जाणवत नाही.. माझ्यासारख्यांना हे समजायला वेळ लागतो…पण हळू हळू प्रचिती येतेच!गुरू आणि नर्मदा मैया यांनीच माझी परिक्रमा पूर्ण करवून घेतलीये असं मी का म्हणतेय ते आता तुमच्या लक्षात येईल. कारण जसे संत सद्गुरू माझ्या सोबत सुरवाती पासून होतेत तशीच माझी नर्मदा माई पण होती..आमचा दुसरा, म्हणजे मोरटक्क्यानंतर चा मुक्काम झाला टोकसर ला. परिक्रमा सुरू होऊन अजून आठवडा ही व्हायचा होता…पूर्ण तयारी करून मी परिक्रमेला निघाले होते.. माझ्या बाबांचे चांगले महागडे आणि सगळ्यात छान समजणारे केचूआ कंपनीचे जोडे मी घातलेले होते… आणि इतके चांगले जोडे असून ते टोकसर गावाच्या ५ कि.मी आधी फ़ाटले…अजून परिक्रमेची जेम तेम सुरवात होती…मात्र इथे सुद्धा मला वेगळाच अनुभव आला…काय तो पुढच्या भागात मधे सांगते.
सौ सुरुची नाईक
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती- भाग 5-
परिक्रमेच्या सुरवातीला केचूआ चे चांगल्या प्रतीचे जोडे पूर्ण फ़ाटतात तेव्हा…
नर्मदे हर… माझे जोडे फ़ाटले…तो अनुभव आता सांगते..मोरट्क्का ते टोकसर म्हणजे गोमुख घाट असा साधारण १० किमी चा प्रवास. यात मधे परमहंस आश्रम लागतो. इथे आमची भोजन प्रसादी झाली आणि इथून पुढे कसं काय माहित नाही पण अचानक माझा एक जोडा पूर्ण फ़ाटला, त्याचं सोल आणि वरचा जोड्याचा भाग वेगळा होऊ लागला. मी चक्क जोडे हातात घेऊन चालू लागले. पण त्यावेळी मनात जे विचार आले ते एरवी माझ्या मनात आले नसते.
नर्मदा खंड ही तपोभूमी आहे आणि या परिसराचा परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहात नाही. मुख्य म्हणजे तो इतका नकळत होतो की आपल्यासाठी सुद्धा तो एक आश्चर्याचाच भाग असतो. एरवी रस्त्यात जोडे फ़ाट्ल्यावर माझी थोडी का होईना चिडचिड झाली असती…निदान आता कसं करायचं ही घालमेल तर झालीच असती, पण या वेळी असं झालं नाही…जोडे फ़ाटले हे वास्तव माझ्या मनानी इतक चटकन स्वीकार केलं की त्याची वाच्यता सुद्धा सह प्रवाश्यांकडे झाली नाही…आपल्या सोबत या पुढे ज्या काही घटना घडणार आहेत त्या मैया ची कृपा असणार आहे असा विचार मनात आला…वाटलं, कदाचित आपण परिक्रमा अनवाणी केली पाहीजे असं काहितरी मैया ला सुचवायचं असेल. पुढच ३..४ किमी अंतर मी अनवाणी चालले. फ़ार फ़ार कठीण असतं ते. तेव्हा जे काय दगड गोटे बोचले असतील त्या प्रत्येक बोचण्यातून मला अनवाणी परिक्रमा करणा-यांचं मनोबल काय असेल याची कल्पनाच आली! नाही…मी तेवढ्या तयारीची नव्हती…मला अजून खूप खूप शिकायचं आहे हे मला तेव्हा ख-या अर्थानी उमगलं…ते फ़ाटकेच जोडे मी पुन्हा पायात घातले आणि जमेल तसं चालू लागले. टोकसर आले की चांभाराकडून शिवून घेऊ असं स्वत:ला धीर देत मी टोकसर पर्यंत तशीच फ़ाटक्या जोड्याने पोचले खरे…पण टोकसर आणि पुढच्या तीन गावात चांभार नाही असं मला तिथे समजलं…..आता काय करायचं?
अनवाणी चालण्याची क्षमता माझ्यात नाही हे मला समजलच होतं.तो विचार तिथेच सोडून मी झोपी गेले आणि मला शांत झोप लागली देखील! सकाळी गोमुख घाटावर मैया स्नानाला गेले होते. तिथे मैयाला विनवणी केली…आई योग्य तो मार्ग दाखव… मला हेच जोडे घालून परिक्रमा करायची होती, आणि याला ही कारण होतं, हे जोडे माझ्या बाबांचे.. त्यांना परिक्रमा करण्याची खूप इच्छा होती, आणि म्हणून त्यांच्या जोड्यांमधून मला या नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायची होती. भावनिक कारण हे असं होतं या जोड्यांमागचं. मैयामधे उतरले आणि तिला विनवलं, आई, शक्य असल्यास हेच जोडे सुधरवून शिवून घालता येतील असं काहितरी घडवून आण.
सकाळच्या साधारण सहा वाजताची गोष्ट असेल. मी पुढचा प्रवास थोडा अनवाणी, थोडा फ़ाटक्या जोड्यातून असा करू लागले. कांकरीया गावाच्या आधी एक छोटसं गाव लागतं पीतनगर. तिथे एक किराणा मालाचं दुकान दिसलं..सौ डोंगरेंच्या मनात आलं की फ़ेविक्विक नी जोडे चिकटवून बघावे..निदान चालायला थोडं सोपं जाईल. मी आणि सौ डोंगरे त्या दुकानासमोर बसलो, मी फ़ेविक्विक विकत घेतेलं आणि जोडा चिकटवायला म्हणून पायातून बाहेर काढायला लागले…इतक्यात एक माणूस अगदी धावत माझ्याकडे आला, त्यानी माझ्या पायातला जोडा जवळ जवळ ओढून घेतला आणि तो पळून गेला…’अरे बाबा दुसरा तरी घेऊन जा’ इतकं सुद्धा बोलायची संधी मला मिळाली नाही… आता अनवाणी च चालायचं…जोडाच नाही… मात्र त्या माणसाबद्दल माझ्या मनात राग सुद्धा उत्पन्न झाला नाही…एरवी कदाचित आपल्या जवळची वस्तू कुणी हिसकावून घेतल्यावर क्षणिक का होईना राग येईल..पण कसा काय नाही आला मैयाच जाणे… तो दुकानदार, मी आणि सौ डोंगरे आम्ही सगळेच आश्चर्य चकित झालो होतो…दुकानदारानी आम्हाला चहा पाजला… आणि आम्ही पुढे निघालो..तो उरलेला एक जोडा मी तिथेच सोडून दिला आणि आता अनवाणी चालू लागले….सधारण अर्धा किमि जाऊन झालं असेल नसेल, हा मघाचा जोडा पळवून नेणारा माणूस मैया मैया करत आमच्या मागे आला..त्याच्या हातात माझे दोन्ही जोडे होते, म्हणाला, “वो चामरदा की घरवाली को बाहर जाना था, इसलिये जूता जल्दी जल्दी लेकर गया मै. मै तो केवट हू..मुझसे जैसा बना मैने सिलवा दिया. अब आपको नंगे पैर नही चलन पडेगा”. मी काय विचार करत होते आणि तो बिचारा माझ्यासाठी किती धडपड करत होता..मी पैसे देऊ केले…आणि जबरदस्ती त्याच्या हातात ठेवलेच..तो तयार नव्हता पण पैसा हा पैसा असतो आणि गरीबाला गरज असते.. तसे मी काही फ़ार पैसे दिले नाहीत..आणि तसं करून सुद्धा त्याचे उपकार कमी ही होणार नाहीतच…पण निदान काहीतरी समाधान….तिथून पुढे एका गावात एक चांभार दिसला आणि त्याच्याकडून मग ते जोडे मी पुन्हा व्यवस्थित शिवून घेतले.
तिथून पुढे कांकरीया नावाच्या गावाला एका आश्रमात थांबलो. “आसन लगादो” असा आदेश मिळाला. आसन लावणे म्हणजे इथे विश्रांती करा, असा अर्थ होतो…त्यात भोजन प्रसादी घेणार हे येतच. इथला अनुभव मजेशीर होता. तास झाला, दिड तास झाला..पोटात भूकेनी खळ्बळ माजलेली आणि हा साधू काही भोजन प्रसादी चं नाव घेईना… शेवटी आमच्यातल्या एकाने हिम्मत करून भोजन प्रसादी चं विचारलं…तो रागवलाच..म्हणाला आप ही बना लो… आप तो बहोत पैसे वाले हो, आपको भोजन की क्या जरूरत? खरीद के खा लेना कही… “ आम्हाला काही समजेच ना, असं काय झालं एकदम? मग त्यानी सांगीतलं, “आपका सामान देखो…दुनिया भर की चिजे उठाके लाये हो..ऐसे आता है कोई मैया के घर?.. मैया पर भरोसा नही, शहर से पढ लिख कर आते हो, और परिक्रमा परिक्रमा का ढोंग रचाते हो…अरे खाना भी ले लेना था साथ मे…” तो साधू चांगलाच चिडला होता. आमच्या जवळच्या भल्या मोठ्या आणि वजनी बॅग्स पाहून त्याला आमचा वैताग आला…. मग तिथेच आम्ही प्रत्येक बॅग मधून अनावश्यक सामान, जास्तीचे कपडे वगैरे सगळं काढून गरीबांना देऊन टाकलं…आणि खरं सांगू…संचय हा त्रासदायकच…तिथे एक धडा असा मिळाला की संचय कुठला ही असो..तो वाईट..
आपण लोक नुसताच संचय करत असतो..पैशाचा, संपत्ती चा, नात्यांचा, माणसांचा, भावनांचा, आठवणींचा आणि मला वाटतं अगदी अनुभवांचा सुद्धा! ते साठवून ठेवलं की वजन होणारच! त्यापेक्षा येईल त्या प्रसंगी, मिळेल त्या परिस्थित, गाठीशी आलेले क्षण, जगणं आणि विसरून जाणं हे खरं समाधानाचं साधन आहे, आणि असं वागता येण्यासाठीचा प्रयास ही असावी साधना….
आम्ही सामान काढून टाकल्यावर त्या साधू महाराजांनी आम्हाला भोजन प्रसादी वाढली… ओझं उतरवल्याचा शरीराला आनंद झाला होता आणि मनालाही. इथून पुढे आमच्या जवळ दोन जोडी कपडे, एक पांघरूण (स्लिपिंग बॅग) आणि थोडे औषध..इतकच सामान होतं. यातलं काही हरवलं गेलं तरी त्याची तमा असणार नव्हती…मुक्त मनानी आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
पुढे रावेरखेडी ला जाताना एका परिक्रमावासी मैयाजींना तब्येती मुळे एका गाडी वाल्याचा आधार घ्यावा लागला…लोकं अनोळखी परिक्रमावासी च्या मदतीला धावून येतात इथे. परिक्रमावासीच्या रूपात नर्मदा मैया ला बघणारी इथली ही स्थानीय मंडळी आणि या अन्न्दाता स्थानीयांच्या रुपात परिक्रमा वासींना भेटणारी नर्मदा मैया, हा खरोखर विलक्षण प्रकार आहे. कोण कधी कुठे कुठल्या रूपात येईल आणि काय देऊन जाईल याचा अंदाजही बांधण कठीण आहे…आणि कधी कधी तर मैया चं अस्तित्व जाणवतं पण ती अदृष्य रुपात आपल्या सोबत असते हे अनुभावाताक येतं, सांगितलं तर विश्वास बसू नये असेही काही अनुभव येतात. असाच एक अनुभव पुढच्या भागात सांगते.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६
माझ्या नर्मदा माईनी मला आणि माझ्या मनाला जणू सांगितलं, तू फ़क्त प्रयत्न कर, बाकी माझ्यावर सोड…तुला त्रास न होण्याची जवाबदारी माझी!
नर्मदे हर. रावेर खेडी ला जाताना आज पहिल्यांदाच आमचं सतरा कि.मी चालून झालं होतं. अंग शिणून गेलं होतं. संध्यकाळी गारठा ही वाढला. मला जरा तापासारखं ही वाटू लागलं होतं. छानपैकी कढी खिचडी खाऊन झोपून जावं असं वाटत होतं. पण इथे परिक्रमेत असताना “मला कढी खिचडी द्या” असं कसं सांगणार कुणाला? खरं तर जे मिळेल ते माईचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचं आणि तसं करता आलं तरच ते तप.. असं म्हणतात परिक्रमेत तुमच्या कडून तीन प्रकारची तप होतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. सतरा किमि चालणं हे झालं कायिक तप. हो तपच म्हणेल याला मी कारण ही सुरवात होती. पुढे याहून ही जास्त चालावं लागणार होतं. सवयींच्या विरुद्ध जाऊन स्वत:ला नवीन साचामधे घडवणं हे काही तपा पेक्षा कमी असेल असं वाटत नाही. ऊन, पाऊस, थंडी, जंगल, डोंगर, द-या आणि जे जे येईल ते ते स्वीकारत, त्यानुसार स्वत: ला तयार करत पुढे जात रहाणं ह्याला मानसिक धैर्य आणि निश्चय असावा लागतो. अर्थात नर्मदा माईच हे सगळं करवून घेते, पण तरीही अनेकदा मनोबळ खचेल अशीच अवस्था तयार होत असते. इथे होतं मानसिक तप. आणि अशा मानसिक आणि शारिरीक तपातून जाताना तुमच्या व्यक्तिमत्वाची सगळ्यात मोठी आणि ठ्ळक पणे आढळून येणारी बाब असते तुमची वाणी. देह, मन आणि वाणी यांच्यावर नियंत्रण आलं की पुढचं सोपं असत असावं, पण हे नियंत्रण च तर कठीण आहे ना….या परिक्रमेत मला माझ्यावर किती नियंत्रण ठेवता आलं ते मला महित नाही, मात्र हे ठेवता येणं आणि ते कसं ठेवता येईल याचा अभ्यास करणं सुखरूप आनंदासाठी नितांत गरजेचं आहे हे मात्र लक्षात येतय! रावेर खेडी ला एक परिक्रमावासी मैया जी ना गाडीतून जावं लागलं होतं. मला दुपारपासूनच तापासारखं होऊ लागलं होतं… आपण आपल्या मनाचे इतके लाड करतो नं की फ़ार हट्टी जिद्दी बाळासारखं होतं ते. माझं मन ही मला त्रास देऊ लागलं होतं …”बरं नाहीये, जाऊ का गाडीनी?”..त्यानी मला दोन तिन दा विचारलं च…पण काय, अशा वेळी त्याला रागवून चालत नाही, त्याला समजवून चालत नाही… त्याला बडबडू देणं आणि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हाच उपाय रामबाण असतो. ती गाडी समोर होती, मैयाजी सोबत होत्या, आणि माझं वेडं मन हट्ट करत होतं…अचानक काहीतरी झाल्यासारख मी पुढे निघून गेले…गाडी दृष्टीआड होईस्तोवर मनाच्या हट्टाकडे अज्जिबात लक्ष दिलं नाही…. मात्र मग त्याला सांगितलं…गाडी आपल्यासाठी नाहीच… यथाशक्ती संकल्प घेतला की हे असं होतं….तरिही समजवलं मनाला….जेव्हा पाऊल उचलणं अशक्य होईक तेव्हा बघू काय ते…तोवर गाडी चा विचारही तुला शिवता कामा नये. समजलं त्याला ही बहुधा…पण असं हे मानसिक तप सुरू असताना मैया कशी साथ देते बघा… मला तापसारख वाटत होतं, गरम कढी खिचडी खायची इच्छा होती आणि रावेर खेडी ला संध्याकाळच्या भोजन प्रसादी ला गरमा गरम कढी भाताचा मेनू होता…काय म्हणावं या नर्मदा माईच्या प्रेमाला? इथेच अनुभव संपत नाहिये हा… मला रात्री ताप चढलाच… सकाळी ताप वाढला तर कसं चालायचं? इथेच थांबायचं का …असे प्रश्न मनाला पडू लागले….आणि तसच झालं..सकाळी ताप होताच, फ़ार नव्हता, पण एकशे एक तरी असावा! काल मला मनाकडे दुर्लक्ष करायला शिकवलं होतं मैयानी…आज तिनं माझ्या मनाचे लाड पुरवले…नाही नाही, मी गाडीत बसले नाही, तशी वेळच नर्मदा माईनी येऊ दिली नाही. खरं तर तापात चालणं आणि बॅग उचलून चालणं मला अजिबात शक्य होणार नाही असं मला वाटत होतं….म्हंटलं बघू काय होईल ते..सुरवात तर करू! क्रोसिन घेतली होती… तसा ताप ही उतरला होता…मी बॅग पाठीवर घेतली आणि काय आश्चर्य? माझ्या बॅग ला आज वजनच नसल्या सारखं वाटायला लागलं. माझी बॅग पाठीमागून कुणीतरी उचलून धरळी आहे असं वाटत होत…माझ्या नर्मदा माईनी मला आणि माझ्या मनाला जणू सांगितलं, तू फ़क्त प्रयत्न कर, बाकी माझ्यावर सोड…तुला त्रास न होण्याची जवाबदारी माझी! आणि ती सोबत आहे याची प्रचिती अशी वारंवार देते की हे अनुभव चमत्कार नसून ते नर्मदा मैयाच्या उपस्थितीचीच खूण आहे हे समजू लागतं. अहो कोइन्सिडंस एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल…सारखे होतात ते खरच कोइंन्सिडंस असतील कसे?
आता एक गम्मत सांगते. मला ताप असल्याने मी सकाळी आंघोळ न करताच निघालेले. बकावा नावाच्या गावी आंघोळ करू असं ठरवलं होतं, पण तिथे महिलांसाठी (मैया किनारी कपडे बदलण्याची) व्यवस्था नाही असं कुणितरी सांगितलं म्हणून मी पुढे निघाले. आता मी आंघोळ करून निघालेले नाही हे मला आणि माझ्या सोबतच्यांनाच माहित होतं. बकावा नंतर मर्दाना नावाचं गाव लागतं. तिथे एका घरात एका मैयाजींनी चहा ला बोलावलं. चहा घेतला..त्या मैयाजी आपणहून म्हणाल्या, “दिदी आपको स्नान करना है तो कर लो, गरम पानी करवा देती हूं”! आता सांगा, म्हणजे कायच म्हणायचं याला? असं कसं तिनी बरोबर विचारलं मला स्नानाचं? हा काही कोइंसिडंस आहे का? पण असं होतं….असच होतं…
इथून पुढे भट्ट्यान नावाचं गाव येतं…आम्ही तिथं जाईस्तोवर दूपारचे तीन वाजून गेलेले. लांबच लांब रस्ता..न संपणारा… पण तिथे गेल्यावर जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते “याचि देही याचि डोळा” अनुभवता आलं हेच भाग्य. संत साधू सत्पुरुष यांचा सहवास आणि यांची किमया काही औरच. आता मी नेमकं कशाबद्दल बोलणार आहे हे समजून घ्यायला थोडी वाट बघावी लागेल…पुढच्या भागाची..
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती – भाग ७
संत सियाराम बाबांची भेट होणे हे सौभाग्य!
नर्मदे हर!!
आजच्या सातव्या भागात आपण एका महान संत पुरुषा बद्दल ऐकणार आहोत. तेली भट्ट्य़ान गावी मैया किनारी या बाबांचा आश्रम आहे. या बाबांच दर्शन होणं हेच खूप भाग्याचं म्हणावं लागेल. या बाबांकडे केवळ बघूनच शांत आणि समाधानाची अनुभूती येते. यांच स्मितहास्य बघितलं की आतून इतकं शांत वाटतं नं की त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे. बाबांकडे पाहिलं की असं वाटतं आपले सगळे कष्ट संपून एखाद्या मोठ्या कल्पवृक्षाखाली आपण बसलेलो आहे आणि मनात मात्र कुठलीही इच्छा शिल्लक रहिली नाही. विचार करा ना, ज्या कल्पवृक्षाची कामना आपण आपल्या कल्पितांच्या पूर्ती साठी करत असतो तो कल्पवृक्ष मिळतो पण कल्पित कामनाच उरत नाही…किती आनंद निनादत असेल त्या ठिकाणी? तसं काहीसं या बाबांच्या दर्शनाने मला झालं…. काही काही मागायची इच्छाच झाली नाही!
हे बाबा फ़क्त एका लंगोटीवर असतात. यांना सियाराम बाबा असं म्हणतात. सियाराम बाबांचं वय काय यावर सूद्धा जरा दोन वेगळी मतं आहेत. आश्रमातील लोक बाबांच वय ९५ सांगतात तर गावातली लोक १३५ च्या जवळपास असेल असं सांगतात. बाबांना नजर लागू नये म्हणून त्यांच वय कमी सांगण्यात असं गावकरी म्हणतात. गावातल्या ७० वर्षाच्या आजोबां म्हणतात “या बाबांना मी माझ्या लहानपणापासून असच बघतो आहे”.
सियाराम बाबांच वय कितीही असू देत. त्यांची साधना त्यांच्या चेह-यावर दिसून येते. प्रशांत करुणेचा सागर असलेले त्यांचे डोळे बघितले की मनाला इतक शांत आणि प्रसन्न वाटतं कि माणूस तिथून उठून जाउच शकत नाही. सियाराम बाबा सकाळी लवकर उठून मैया स्नान करतात. उन पाउस थंडी काहीही असो गेली कित्येक तपं त्यांच्या या दिनचर्येत कधीही फरक पडला नाही. बाबा बाहेर पडले की भक्तांची गर्दी जमा होते. बाबा कायम एका लंगोटीवर असतात. सुर्यानमस्कार घालून ते स्नानाला जातात. स्नान झालं की मैया पूजन आणि रोज स्वत:च्या हातांनी नारळ फोडतात. एका आपटण्यात नारळ फुट्लाच पाहिजे.
सियाराम बाबांच्या बाबतीत एक अजून गोष्ट सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे बाबांच्या हातचा चहा. सियाराम बाबा सर्व भाविकांसाठी स्वत: चहा तयार करतात. पण ह्या चहाची गम्मत अशी आहे की हा चहा दिवसातून एकदाच तयार होतो आणि कितीही लोक येऊ देत, हा चहा संपतच नाही. एकदा सकाळी ज्यावेळी बाबा चहाच्या भांड्यात चहा साखर आणि दुध घालतात त्यानंतर तो चहा पुन्हा वाढवल्या जात नाही. तो आपोआप वाढत असावा कारण साधारण १०-२० लिटरच्या भांड्यातून ५०० भाविक आणि गावकरी, आश्रमातील मंडळी मनसोक्त चहा घेतात तरीही ते भांड कायम भरलेलं असतं. ही अतिशोयोक्ती नाही. हा ऐकीव प्रसंग नाही तर माझ्या डोळ्यादेखत मी हे पाहिलेलं आहे.
अजून एक गोष्ट सांगते. मागे जेव्हा मैयाला पूर आला होता तेव्हा सगळं भट्ट्यान गाव रिकाम करण्यात आलं. लोकांनी बाबानाही आश्रम सोडण्याची विनंती केली. बाबा मात्र तयार झाले नाही. “मैया को छोडके मै नाही जाउंगा” असं म्हणाले. मैया किनारी असलेल्या कडप्प्यावर ते बसून राहिले. मैया ला पूर आला, बाबांचे चरण बुडतील इतकंच पाणी आश्रमात आलं आणि आश्रमाला वळसा घालून गावाकडे निघून गेलं.. आता हे मी पाहिलं असं मी का म्हणते? तर गावातल्या घरावर चे पाण्याचे डाग मी पाहिलेत, छपरा पर्यंत भिंती पाण्यात बुडाल्याचे डाग होते आणि आश्रमाच्या भिंतीवरचे डागही मी पाहिलेत…ते जेमतेम पावलं बुडतील, किंवा काही ठिकाणी जास्तीत जास्त गुडघे भिजतील एवढेच होते. लोक सांगतात, मैया नी पुराबद्दल बाबांना चरणस्पर्श करून माफी मागितली आणि तिच्या मार्गाने आणि विधिलिखिताप्रमाणे ती पुढे निघून गेली. तर असं आहे सियाराम बाबांचं व्यक्तिमत्व..त्यांची साधना अशी की साक्षात नर्मदा माई त्यांना प्रणाम करून जाते. माई चं आणि या सियाराम बाबांचं नातं वेगळंच आहे.
एक अजून आख्यायिका यांच्या बद्दल ऐकायला मिळते ती अशी- एकदा काही परिक्रमावासी बाबांच्या आश्रमात आले असता आश्रमातलं तूप संपलं होतं. परिक्रमावासीन्ना उपाशी ठेवणं हे सियाराम बाबांच्या नियमाविरुद्ध होतं. तूप यायला अजून दोन तास तरी लागणार होते. “वो कुछ नही, मैया जिसे घी उधार लेकर आओ और खाना पकाओ” बाबांच्या सेवकांना काही समजलं नाही. ते मैया मधून दोन डब्बे भरून पाणी घेऊन आणले आणि याच पाण्यात पु-या तळून घेतल्या. अशी आहे बाबांची साधना, श्रद्धा आणि मैयाची त्यांच्यावरची कृपा. मी भाग्यवान म्हणून याची देही याची डोळा बाबांचं दर्शन झालं.
बाबांच्या आश्रमाची अजून एक कमाल सांगते. इथे येणा-या प्रत्येक परिक्रमावासी ला सुकी भेळ साधारण ३ वाट्या, ३ वाट्या डाळ आणि तांदूळ, खिचडी ला लागाणारे सर्व मसाले व तेल, केळी, उदबत्ती चा पुडा, गाईच्या तुपाची बाटली आणि भिजवलेल्या फुलवाती, आगपेटी, कापूर असं सर्व सामान देतात. तुम्ही कितीही मोठी रक्कम दान कराण्यासाठी द्या, त्यातील फक्त १० रुपये च घेऊन बाकी रक्कम तुम्हाला परत केली जाते. या सर्व सामाना सोबत पुरी भाजी ताक किंवा कढी, मसाले भात आणि पापड असे जेवण व हवा तितका चहा हे ही असतेच. आता सांगा, फक्त १० रुपयात हे सगळं कसं जमत असेल? पण जमतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे असच सुरु आहे. न कुठे वाच्यता न पोस्टर, न डोनेशन..काहीच नाही..आहे नं कमाल?..असे साधू संत भेटणं आणि त्यांचे आशीर्वाद मिळणं हा कितीतरी मोठा अनुभव आहे! आयुष्यात समाधान म्हणजे काय हे बघायचे असेल तर एकदा तरी या आश्रमाला भेट द्या. इंदोर पासून फक्त २.५ तासाच्या अंतरावर हे गाव आहे. इथे आम्ही एक रात्र होतो, सकाळी मैया स्नान करून निघायचं तर पसारकर काकांचे जोडे बदलले गेले होते. जे तिथे होते ते त्यांना अजिबात कम्फर्टेबल नव्हते. पण तो प्रश्न अगदीच लवकर सुटला …जोडे परत मिळाले नाहीत, पण अनुभव मिळाला.. कोणता ते पुढच्या भागात सांगते.
©सुरुची नाईक
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती- भाग ८
नर्मदे हर.
पसारकर काका त्यांचे जोडे शोधू लागले होते ते काही सापडेना. वयस्कर गृहस्थ, अनवाणी चालणं कठीण होतं पण इलाज नव्हता. ते अनवाणीच चालू लागले. मागून मोटर सायकलवर एक माणूस आला आणि विचारलं “काका जी कल तो जूते थे? आज क्या हुआ?” आता इतक्या परिक्रमावासिंमध्ये हे काका त्या माणसाच्या लक्षात होते खरच? की तो माणूस उगाच म्हणत होता? की अजून काही?… हो अजूनच काही होतं हे! काकांनी जोडे अदल बदल झाल्याचं सांगितलं. तो माणूस म्हणाला, “दुकान तो दो गाव दूर है, आपके रास्ते भी नही है, आईये आपको गाडीपर ले चलता हुं!” दोन गाव दूर हा माणूस स्वत:चा वेळ, पेट्रोल खर्ची घालून काकांना घेऊन जायला स्वत: हून तयार झाला… पण इथे अजून एक पंचाईत… गाडीवर बसायचं नाही असा काकांचा नियम… मग आता काय? त्यावरही त्या माणसाने उपाय काढलाच! त्याला जणू मदत करायचीच होती. काका गाडीवर बसत नाही म्हणाले तर हा माणूस म्हणतो, “ काकाजी आप चलते रहिये, मै दुकानदार को लेकर आता हुं” तो गाडीवर गेला, दुकानदाराला घेतलं आणि सोबात ३ ते ४ वेगवेगळ्या साईझ चे आणि प्रकारांचे जोडे घेऊन आला. दुकानदाराला परत सोडला आणि काकांच्या जोड्यांचे ही पैसे घेतले नाहीत, पण काकांनी काही एक रकम बळजबरी त्याला दिली.
इथे काय होतं माहितीये का? हे लोक इतका जीव लावतात नं की पैसे देऊ करणं हे सुद्धा अपमान केल्यासारखं वाटू लागतं. त्यांनी केलेलं हे प्रेम, दिलेला हा आदर आणि केलेली मदत या सगळ्यांनी आपण भूतलावर नाही हेच जाणवू लागतं. अतिशय नि:स्वार्थ प्रेम असतं हे. जीवाभावाचे आणि जन्माचे नाते जुळतात इथे. आणि खरं सांगू का, ती नर्मदा माईच त्या त्या रुपात आपल्या बरोबर येत असते.! सांगा नं हजारो परिक्रमा वासी वर्षातली ८ महिने परिक्रमा करत असतात..एकाही परीक्रमावासियाला कधीही उपाशी राहावं लागत नाही, कधी कुठलाही त्रास होत नाही आणि काहीही अडचण आली तर ती विनासायास दूर होते. हे सामर्थ्य कुणाचं? इतक्या परीक्रमा वासियांची जवाबदारी कोण घेतं? कधी कुणाच्या तर कधी कुणाच्या रुपात येऊन, कधी गतजन्माचे राहिलेलें देणेघेणे म्हणून, तर कधी कृपा म्हणून ती नर्मदा माईच हे सगळं घडवून आणते असते नं?
खरच या मोटार सायकल वाल्याने आदल्या दिवशी काकांना जोडे घालून पाहिलं असेल? काल काका जोडे घालून चालत होते आणि दुस-या दिवशी त्यांच्या पायात जोडे नाही इतकी छोटीशी गोष्ट इतक्या बारकाईने त्या माणसाने लक्षात ठेवली असेल? आणि कशासाठी? तो माणूस खरच तो माणूस असेल का? मला तरी वाटतं की ती माझी मैयाच असली पाहिजे. काकांचे जोडे सेट झाले, तो माणूस आला तसा मदत करून निघून गेला. आमच्या गाठीशी ही मैया भेट मात्र कायम देऊन गेला.
पुढे देखील असे अनेक अनुभव आलेत आणि प्रत्येक अनुभवातून मैयाची आपल्याला साथ आहे हे जाणवू लागलं. एक वेळ तर अशी आली की या मैया भेटीची ओढ लागू लागली. काहीतरी अडचण यावी म्हणजे मैया कुठल्यातरी रुपात येऊन ती दूर करेल असं वाटू लागलं आणि तिनी तशी भेट दिली की मग दुसरं काही नको असायचं त्यावेळी. बघा नं किती कमाल आहे, देवाकडे आपण काय मागतो, देवा संकट दूर कर, प्रवास सुखकर होऊदे मात्र या प्रवासात आम्ही संकट मागत होतो, “ देवा काहीतरी अडचण येऊ दे”! कारण ती दूर होणार हा विश्वास इतका प्रचंड वाढला आहे की ती दूर होण्याबद्दल ची काहीही मागणी आमच्याकडून होत नव्हती…
सियाराम बाबांच्या दर्शनानी मन प्रसन्न झालं च होतं. इथून पुढे १५ की मी वर लेपा नावाचं गाव आहे. इथे आजचा मुक्काम करायचा असं ठरलं. लेप्याला जाताना वाटेत एका दुकानात पाणी प्यायला थांबलो असता त्या बाईनी भरपूर ताक आग्रहाने प्यायला दिलं.पुढे वाटेत एका बाईनी केळी दिली आणि त्यानंतर बिस्किटाचा पुडा मिळाला. १५ किमी च्या अंतरात इतकं खायला मिळालं की भूक लागायाला सुद्धा वेळ मिळत नसे . पोट रिकामे होइच ना.
मी आणि सुरेखा ताई जरा मागेपुढे झालो. चित्रा ताई बरीच मागे होती. नाम जप करत करत चालायाचं होतं, आणि सोबत चाललं की गप्पा होत असत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला उसाची शेती होती. माणसाच्या उंचीच्या दुप्पट तरी उंच असेल. वात साधारण ४ फुट असावी. आजूबाजूचं आणि समोरचं पण काही ही दिसत नव्हतं. झाडात खुसफूस खुसफुस व्हायचं तेव्हा थोडं बिचकायला व्हायचं पण भिती अशी वाटली नाही. जेव्हा मला थोड्सं दचकायाला झालं तेव्हाच माझ्या मागून एक बाई लाकडाची मोळी डोक्यावर लादून माझ्या मागून आली आणि म्हाणाली “पंछी घर बनाते है घास मे, उनको खानेके लिये लोमडी आती है, इन्सान को तकलीफ नाही देती” आणि मग पुढे उसाची शेती संपे पर्यंत ती बाई माझ्या सोबत होती. पुढे एका मारुती मंदिरा जवळ मी थांबले आणि ती निघून गेली. त्या मंदिरापाशी कमालीची शांतता होती. बाम्बू च्या झाडांमुळे थंडही वाटत होतं. मी हनुमान चालीसा म्हंटली, थोडा आराम केला आणि पुढे निघाले. आतापर्यंत मला नेटवर्क नव्हतं मात्र थोडं पुढे गेले आणि मांगीलाल वर्मा यांचा फोन आला “दीदी कहां तक पोहोचे? हनुमान मंदिर दूर से दिख जाये तो बताना, मै लेने आ आउंगा” मी मन्दिराहून पुढे आल्याचं मी सांगितलं तसा तो तातडीनं मला घ्यायला आला. तो गाडीवर आला होता आणि मी पायी. त्यांनी मला गावापर्यंत सोबत केली आणि मग चित्रा ताई आणि सुरेखा ताईला घ्यायला गेला. लेने क्यू आये ? विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा उभा राहिला. ज्या हनुमान मंदिरा पाशी मी १५ मिनिट थांबले होते तिथेच आदल्या दिवशीच एका महिलेवर बिबट्या ने हल्ला केला होता. तो बिबट्या जखमी असावा असा गावक-यांचा अंदाज होता आणि म्हणून च एकट्या दुकट्या ने तिथून जाऊ नये असे गावक-यांचे मत होते आणि हेच सांगायला मांगीलाल मला सतत फोन करत होता. मला दचकायला झालं तेव्हा ती बाई अचानक आली होती मागून… खुसफुस पण ऐकली होती मी.. पण मैयांनी मला भिती वाटू दिली नाही आणि ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता तिथे मी अगदीच निवांतपणे बसून हनुमान चालीसा म्हंटला होता….हे सर्व काय आहे याचा विचार करण्यापेक्षा आलेला अनुभव अनुभवून मैयाला हात जोडणं मला जास्त सोपं आणि सुखकर होतं.मैया आपल्या सोबत आहे याची खात्री पटत जात होती.
मांगीलाल ला माझा फोन नंबर अविनाश कडून मिळाला. अविनाश जे अन्नछत्र चालवतो त्यातलं एक लेप्याला आहे. मांगीलाल या अन्नछत्राची पूर्ण जवाबदारी सांभाळतो आहे. इथे मांगीलाल ने जो पाहुणचार केला त्याला तोड नाही. दालाबाटी बटाटे वडा आणि भात असा हा बेत होता. इथे मध्यप्रदेशात शाही पाहुणचार म्हणजे दाल बाटी हे ठरलेलं आहे. खूप आपुलकीनी मांगीलाल आणि परिवाराने आमची सेवा केली. परिक्रमावासी म्हणूनच नाही तर आपल्या लेकी सारखं त्या माई नी आमचं केलं. माहेरवाशीण कशी बागडते माहेरी, तसं तिथे आमचं होत होतं. आता पुढे जाणं भाग होतं. दुस-या दिवशी मी आणि सुरेखा ताई पुढे निघालो. कालचा बिबट्या चा प्रसंग ऐकून चित्रा ताई फार घाबरली होती. तिनी पुढचा प्रवास गाडीनी करण्याचा निर्णय घेतला शाली वाहन पर्यंत तिला मांगीलाल नी गाडीवर सोडून दिलं. मात्र या पुढच्या प्रवासात जे अनुभव आम्हाला आले ते चित्रा ताई अनुभवू शकली नाही याचं वाईट वाटत राहिलं. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असे अनुभव येत असतात हे महत्वाचं. त्यात आपला काहीही सहभाग नसतो. पुढचे अनुभव लवकर सांगते, भाग ९ मध्ये. नर्मदे हर.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती- भाग ९
नागराज दर्शन, केवळ ८ इंचांवरून!
नर्मदे हर
मी आणि सुरेखा ताई मांगीलाल भाई कडून पुढे निघालो. वाट तशी एकट होती, पण मोठी होती. रस्त्याने अगदी अधून मधून एखादी दुचाकी जाताना दिसायची. मी आणि सुरेखा ताई मनातून तशा शांत होतो पण कालचा बिबट्याचा प्रसंग कुठे तरी मनात होताच. भीती मात्र वाटत नव्हती. पुढे वाटेत वेदा नदी लागते आणि इथे मैया चा आणि वेदा नदीचा संगम आहे म्हणून या जागेला वेदा संगम म्हणतात. लेप्याला मैया किना-याहून वाट नसल्याने जाता येणा शक्य नव्हते म्हणून २ किमी पलीकडचा रस्ता घेऊन आम्ही चालायला सुरवात केली. मात्र नदीवर पूल आल्यावर आम्ही गोंधळलो. कारण पुलावर कुठेही नदीचं नाव लिहिलेलं नव्हतं. ही मैया का वेदा हे समजण्याइतकं मैयाचं रूप अजून आम्हाला अंगवळणी पडलं नव्हतं. रस्ता तर निर्मनुष्य. आता करायचं काय? मैया ओलांडायला नको होती. आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. कुणी येता जाता दिसलं की विचारू असं म्हणून बराच वेळ होऊन गेला होता. आता तिचा पुकारा करण्याशिवाय हातात काही नव्हतं.
आम्ही दोघींनी मोठमोठ्याने नर्मदे हर च्या आरोळ्या द्यायला सुरवात केली. साधारण ५ मिनिट आमच्या नर्मदे हर ला काही उत्तर आलं नाही. मात्र मग झाडी मागून नर्मदे हर चा आवाज आला आणि एक माणुस पुढे आला. निळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी रंगाची पॅंट, आणि तपकिरी रंगाचा ओढणीवजा स्कार्फ त्याने घातलेला होता. दाढी मिशा आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला हा माणूस आपुलकीनी हसत हसत म्हणाला “जाओ जाओ ये नर्मादाजी नही है” आम्ही त्याला काहीही प्रश्न न विचारताच त्यांनी उत्तर दिलं होतं. “आप यहा क्या कर रहे हो भाई जी” विचारल्या वर दूरवर बोट दाखवत म्हणाला “रेत की खान में काम करता हु” त्याने जिकडे बोट दाखवलं ते अंतर तसं बराच लांब होतं. आमचा आवाज तिथवर जाऊन अवघ्या ५ मिनिटात हा माणूस आला आणि आम्ही न विचारताच आम्हाला जायला सांगितलं यावर आमचा विश्वास तर बसत नव्हता पण किमया असते आणि त्यावर विश्वास आपोआप बसतोच … तसे अनुभवच ती आपल्याला देत असते असा विचार करत आम्ही पुलावर चालू लागलो.
आम्ही जास्तीत जास्त ५०० मिटर चालून झालं असेल तोच पुला पलीकडून एक ट्रॅक्टर येताना दिसला. येणा जाणा-याला नर्मदे हर करायचं म्हणजे तेवढाच आपला जप होत जातो म्हणून आम्ही नर्मदे हर करण्यासाठी थांबलो मात्र दोघी आश्चर्य चकित होऊन बघत राहिलो होतो. कारणही तसच होतं. *आत्ता पाच मिनिटापूर्वी ज्या माणसाने आम्हाला जा म्हणून सांगितलं तोच माणूस समोरून ट्रॅक्टर घेऊन येत होता. असं कसं शक्य आहे? पण असं झालं आहे. आम्ही दोघीही एकाच वेळी एकमेकींकडे बघत होतो… हा माणूस आता जेमतेम ५ मिनिटापूर्वी अचानक झाडीतून आला आणि आता हाच समोरून येतो आहे? बरं पुलापलीकडे जायला दुसरा कुठलाही रस्ता नाही, हा माणूस आमच्या मागून गेला नव्हता आणि मुख्य म्हणजे हे ट्रॅक्टर येताना आम्ही बघितलं होतं, ते फार दुरून येत होतं….. आम्हाला दोघींनाही भ्रम झाला अस जरी मान्य केलं तरी आम्ही नर्मदे हर म्हणाल्यावर त्या ट्रॅक्टर वरच्या माणसाने “अभी तो नर्मदे हर किया ना?” अशा प्रकारचे भाव प्रदर्शित केले आणि गालातल्या गालात हसून पुढे गेला. आपण एखाद्याची गंमत करतो आणि समोरच्याचा उडालेला गोंधळ बघून “ क्यू कैसी रही” असं विचारतो नं तसे भाव होते त्याच्या चेह-यावर होते. आता आमची खात्री पटली होती. आम्ही दोघी आता केवळ रडायचे बाकी होतो. आमच्या कंठातून शब्दच फुटत नव्हते. तो दृष्टी आड जाई पर्यंत आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो. आणि मग पुढची वाटचाल सुरु केली. आम्हाला सावरायला तेवढा वेळ हवा होता.
पुढे निघालो आणि माकडखेर्डा गावाकडून पुढे मांडव्य ऋषींच्या अश्रमाचं आणि त्यांनी जिथे अनेक वर्ष तप केलं त्या गुहे चं दर्शन घ्यायचं होतं. सुरेखा ताईच्या पायाला छाले आले असल्याने आम्ही बरच हळू चालत होतो. गाव संपून आम्ही मैया किना-याने चालू लागलो. एकिकडे मैया, आणि दुसरी कडे जंगल असा हा रस्ता होता. वाटेत काही मध्यप्रदेशी परिक्रमावासी अम्हाला पार करून पुढे निघून गेले…”बहोत धीरे चलते हो मैया आप” असं ही म्हणाले…आणी झपाझप निघून गेले..पुढे एक ओढा येणार आहे हे आम्हाला पुढच्या परिक्रमावासिंनी फ़ोन वर सांगितलं होतं. गळाभर पाणी आहे, ओढा ओलांडून यायचं नसेल तर घनदाट जंगलातून ४ किमी चा फ़ेरा घेऊन यावं लागेल असं ही सांगितलं होतं. आम्ही खरं तर ती चार किमी दूर् ची वाट घेणार होतो, पण तशी वाट आम्हाला कुठेच दिसली नाही. आम्ही ओढयाजवळ पोहचलो त्यावेळी ते मागे भेटलेले मध्यप्रदेशी परिक्रमा वासी तिथेच बसून होते..” म्हणाले, आपके लिये रुके है एक घंटे से…आप सामान के साथ कैसे पार करोगी?, आओ हम आपकी मदद कर देते है”… ही बुद्धी त्यांना कुणी दिली असेल?
हा अनुभव इथेच संपत नाही… त्या परिक्रमावासींनी आमचं सामान घेतलं, आणि गळ्यापर्यंत पाणी असलेल्या त्या ओढ्यातून…ओढा कसला,…नालाच म्हणावा असा घाण होता तो..दलदल होती, तिथून पार करवून नाल्याच्या त्या बाजूला पोचवलं… आता आम्हाला जायचं होतं. आमच्या जवळचा दंड खाली पाण्यात खोचायचा आणि कुठे जरा ट्णक जमीन आहे याचा शोध घेवून मग तिथे पाऊल ठेवायचं..सगळी दलदल, पाऊल ठेवलं की गुडघ्यापर्यंत आत रुतायचं, आणि असं एक एक पाऊल टाकत हा ८ ते १० फ़ुटाचा नाला आम्हाला पार करायचा होता. मी पुढे आणि सुरेखाताई मागे असं आम्ही नाल्यात एक एक पाऊल चालू लागलो. आम्ही नाल्याच्या अगदी मध्य भागी होतो, पाण्याला खूप जोर होता, उभं राहणं ही कठीण होत होतं आणि अशा वेळी मझ्या समोरून एक १० १२ फ़ुटांचा नाग फ़णा काढून आमच्या दिशेने येताना जेव्हा मी बघितला तेव्हा माझ्यातले त्राण गेले…. विचार करायच्या आत तो माझ्या ४ फ़ुटावर येऊन पोहचला होता… आता फ़क्त शेवटचं नर्मदे हर म्हणायचं आणि त्या नागराजापुढे शरण जायचे, इतकेच बाकी होते…सगळं संपलेलं होतं…तो आता माझ्यापासून जेमतेम १ फ़ुटावर होता…मी फ़क्त स्तब्ध उभी होते, सुरेखाताई माझ्या मागे होती…. आधी प्राण मला सोडायचे होते… आणि माझ्यापासून साधारण ८ इंचावर येऊन या नागराजाने त्याची दिशा बदलली…आणि माझ्या बाजूने निघून गेला…त्याचा मला स्पर्श झाला नाही, मात्र पाण्याच्या हालचाली मुळे त्याच्यामधील ताकतीची कल्पना मला आली होती…तो निघून गेल्यावरही, गळ्याभर पाण्यात मी आणि सुरेखा ताई, साधारण ५ मिनिट स्तब्ध उभ्या होतो….
खरं तर हा अनुभव इथे ही संपत नाहीच……या अनुभवामागे नर्मदा मैयाचं एक प्लानिंग होतं मात्र ते आम्हाला आम्ही मांडव्य आश्रमात पोहचल्या नंतर समजलं आणि मन अक्षरश: भरून आलं. ती नर्मदा माई किती कनवाळू आहे आणि आपल्या लेकरांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी ती कसे कसे मार्ग काढते हे जेव्हा जेव्हा जाणवतं आणि आठवतं तेव्हा तेव्हा मी नर्मदामय झालेली असते… असाच तो मांडव्य आश्रमातला नागाच्या अनुभवा नंतर चा खुलासा…पण काय ते पुढच्या भागात सांगते.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती – भाग १०
गळाभर पाण्यातून आम्ही सुखरूप बाहेर आलो. हे श्रेय त्या परीक्रमावासियांना जातं जे एक तास आमच्यासाठी वाट बघत बसले होते.चिखलाने माखलेल्या ओल्या कपड्यांनी, जोडे न घालता, आम्ही पुढचे ३ किमी चालत मांडव्य ऋषींच्या् या आश्रमात पोचलो. आंघोळ केली आणि मगच भोजन प्रसादी वगैरे झालं. तिथे गेल्यावर मांडव्य ऋषी ज्या गुहेत तप करायचेत ती गुहा खाली जाऊन बघितली. इथे रांगत जावे लागते. आत गेल्यावर एका कोप-यात ब-या पैकी ऊबदार,कोमट आणि बाकी गुहेत अगदी थंड असे दोन वेग वेगळे तापमान जाणवते. मांडव्य ऋषी अजूनही तिथे अदृश्य अवस्थेत तप करत आहे असे म्हणतात.
आता मला जो नागराजांचा खुलासा झाला तो सांगते. इथे बाहेर एक महादेवाची पिंड आहे. त्या पिंडीच्या चारही बाजूनी गोल तारेचं कुंपण केलं आहे आणि या कुंपणाच्या जमिनीवर एक भलं मोठं बीळ आहे. असं देवाला तारेच्या कुंपणात का ठेवलय असं विचारल्यावर त्या साधू महाराजांनी तारे खालच्या बिळा कडे बोट दाखवलं. दिवसातून एकदा केव्हातरी त्या बिळातून ८ ते १० फुटाचा नाग येतो, पिंडीला वळसा घालून साधारण मिनिट दोन मिनिट तसाच थांबतो आणि आल्या पावली, कुणालाही त्रास नं देता नाल्याच्या दिशेला निघून जातो. हे समजल्यावर अंगावर काटाच आला. आम्हाला ज्या नागराजांनी दर्शन दिलं ते त्रास द्यायला नव्हतं, त्यांनी आम्हाला नक्कीच आशीर्वाद दिला असला पाहिजे. हा अनुभव निश्चितच वेगळा होता. ज्या अनुभवात भान शिल्लक राहत नाही त्याला दिव्य अनुभव म्हणतात ना..? मग कारण काहीही असो, त्यावेळी जी विचार शून्य मनस्थिती झाली होती कुठल्या ट्रान्स पेक्षा वेगळी नव्हतीच. काय पण मैयाची कमाल आहे नं? काही न मागता किती देते ती?
आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेऊन पुढे शालिवाहन आश्रमाला निघालो. शालिवाहन शक गणना जिथून सुरु झाला ती ही जागा. यालाच नावडा टोडी असे ही म्हणतात. इथे पोचताना आम्हाला उशीर झाला होता. कारण असं की सांगितल्याप्रमाणे ही जागा ३ किमी नसून ती जवळ जवळ ८ किमी ची निघाली. जवळ ओले कपडे होते त्यामुळे वजन वाढलेलं होतं. नाल्याच्या पाण्यामुळे सुरेखा ताई च्या पायाचे छाले फार दुखू लागल्याने वेग कमी झाला होता, दूरवर लाल भगवा झेंडा दिसत होता तिथवर जायचं होतं. हा सगळा जंगलाचा भाग. एखाद दुसरं शेत मध्ये. मैयाच्या पलीकडच्या किना-यावर महेश्वर शहर वसलेलं. तिथे मैया किनारी होणारी जी काय हालचाल होती तीच आम्हाला आधारासारखी वाटत होती. अंधार पडू लागला होता..आम्हाला अजून बरच अंतर आणि बराच वेळ पायी चालत राहावं लागणार होतं…पण मध्ये कुठेही थांबण्याची काहीही सोय नव्हती. आम्ही जीवाच्या आकान्तानी पावलं उचलत होतो. अजून किती दूर आहे आश्रम हे विचारायला सुद्धा तिथे कुणीच नव्हतं.
मैयाच्या पाण्यात अंधार मिसळू लागाला होता आणि आम्हाला कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. आम्ही दोघी मैयाचा जप करत फक्त पावलं पुढे फेकत होतो आणि तितक्यात आम्हाला आवाज आला “ बस थोडी दूर है, इधर से जाना, किनारे तराफ मत जाना” जरा नजर फिरवली तर एक २५ चा तरुण किना-याच्या वरच्या भागावर उभा राहून आम्हाला रस्ता दाखवत होता. त्यांनी दाखवलेला रस्ता जरा वस्तीकडे वळणारा होता त्यामुळे धीर आला, जरा पुढे गेल्यावर आश्रम दिसू लागला आणि हायसं वाटलं. आणि मग समजल की आम्ही किना-याने जाण्याच्या ओघात हळू हळू पात्राकडे जात होतो. जो रस्ता आम्ही धरला होता तो आम्हाला नदी च्या मध्यभागी नेऊन सोडणारा होता. हा माणूस योग्य वेळी दिसला नसता तर आमचं काय झालं असतं देव जाणे! आम्ही कदाचित बराच अंतर चालून नदीच्या मध्यभागी गेलो असतो, तिथून आम्हाला पुन्हा परत यावं लागलं असतं आणि अंधार पूर्ण पडला असता तर कदाचित तिथेच कुठेतरी जंगलात, अन्न आणि निवा-याशिवाय रात्र काढावी लागली असती. त्या किनारी चालताना आम्हाला कुत्र्या कोल्ह्याने खाल्लेले जनावरांचे सांगाडे बर्याच ठिकाणी दिसले होते..कदाचित आम्ही त्या जनावराचे सावज सुद्धा झालो असतो… पण मैया नी तसं होऊच दिलं नाही. ती तसं होऊच देत नाही.
शालिवाहन आश्रमात आल्या नंतर इथे बरेच परिक्रमावासी भेटलेत. आजच्या अनुभवाने खर तर मन धस्स झालं होतं. अशावेळी कुणीतरी आपलं माणूस जवळ असलं की खूप छान वाटत असतं. मैया सोबत होतीच पण ती आम्हाला दिसत नव्हती. मायेनं कुणीतरी डोक्यावरून हात फिरवावा अस वाटत होतं. पण इलाज नव्हता. भोजन प्रसादी ची पानं घेतली होती. आम्ही पानावर बसलो. पानात वैदर्भीय वांग्याची भाजी वैदर्भीय चवीचा कांद्याचा झुणका आणि ज्वारीच्या भाकरी होत्या. हे सगळं बघून माझं मन आपल्या माणसाची आठवण काढत होतं.. आज मला आपुलकीचे दोन शब्द ऐकायचे होते .इथे मध्यप्रदेशात ज्वारी फार मिळत नाही. म्हणजे कुणीतरी महाराष्ट्रीय व्यक्तींनी इथे सेवा दिली आहे हे स्पष्टच होतं. आम्ही जेवून घेतलं.
मी थोडावेळ देवळाबाहेर असलेल्या झाडाखाली बसले होते. माझ्या बाजूला एक म्हाता-री नऊवारी लुगडं नेसलेल्या आजी येऊन बसल्या. त्या आजींनी माझी चौकशी केली. पायी परिक्रमा करतेय याचं त्यांना फार कौतुक वाटत होतं. त्यांनी माझं गाव विचारलं. मी नागपूरची आहे म्हटल्यावर आजींनी मला मिठीच मारली. माझ्या कपाळाचा मुका घेतला….” माह्या गावची लेक हाय व तू” असं म्हणून माझी चक्क दृष्ट काढली…. मी निशब्द झाले होते, मला जे हवं होतं ते मिळालं होतं. ती माउली आपल्या लेकीची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नव्हतीच!! फक्त हे समजण्यासाठी आणि अंगवळणी पाडण्यासाठी अजून परिक्रमा पथावर वाटचाल होण गरजेचं होतं आणि अधिक अनुभूती पुढे या वाटेवर माझी वाट बघत होत्याच. पुढच्या भागात त्यांच्याबद्दल लिहेनच! नर्मदे हर.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती- भाग ११
नर्मदे हर
शालिवाहन आश्रमातून दुस-या दिवशी सकाळी सात वाजता पुढचा प्रवास सुरु केला. इथे आम्हाला सौ रेखा कुलकर्णी आणि सौ अनघा पूर्णपात्रे भेटल्यात. सौ मंत्री यांना देखील मांगीलाल भाई नी गाडीवर इथपर्यंत सोडून दिलं होतं. तसा गृप आता मोठा झाला होता पण सगळ्यांच्या चालण्याची स्पीड वेगवेगळी असल्याने आम्ही मागे पुढेच झालो होतो. आम्ही मौनी बाबा आश्रमात पोचलो तेव्हा दीड वाजला होता. आमच्यातील काहिंना तब्येतीची तक्रार असल्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅग मोटर सायकल वाल्याला देऊन पुढे पाठवून दिल्या होत्या. माझ्या मनात मात्र मैया कृपेने तशी इच्छा कधीच झाली नाही आणि तशी वेळही माझ्यावर मैय्याने कधीही येऊ दिली नाही. माझ्या पाठीवरच ओझं हे माझ्या कर्मांच ओझं आहे तेवढ तरी वाहून न्यायलाच हवं हाच विचार मनात कायम असायचा, अर्थात तो टिकवून ठेवण्याची शक्ती ही मैयाचीच होती.
तर आम्ही आज २० किमी चाललो होतो. इथे आश्रमात आल्यावर ज्यांनी सामान पुढे पाठवून दिलं होतं ती मंडळी आपापलं सामान शोधू लागली. सामान काही सापडेना. प्रत्येकाच्या मनात आलं की मोटरसायकल वाला नक्की सामान घेऊन पळून गेला. आम्ही पायी येणार, तो गाडीवर.. आम्ही शेतातून, तो रस्त्यांनी… म्हणजे तो तर आमच्या तास दोन तास आधी पोहोचायलाच हवा होता. पण इथे तो आलाच नव्हता. आता काय करायचं?
या मंडळी कडे काहीच सामान नव्हतं. अंगावरचे कपडेच फक्त काय ते होते. कुणी तरी म्हणालं भोजन प्रसादी लागलीये. निदान ती तरी घेऊयात, मग बघू काय करायचं.
माणसाचं मन खूप निगेटिव्ह असतं. हे असं का असतं ते माहित नाही. पण असतं हे मात्र खरं. काहीही झालं तरी पहिला विचार मनात येणारा हा वाईटच असतो. खर तर बरेच वेळा ह्या वाईट विचारा सारखं वाईट सभोवताली काहीच नसतं. आपणच त्याला वाईट पणाची किनार लावून त्या परिस्थितीचं रूप अधिकच ओंगळवाणं करून ठेवतो आणि नसेल त्या विचारांच्या मागे धावून दु:खी होत जातो. हा जो मानवी स्वभाव आहे तो बदलता आला तर? कदाचित सुखाचा शोध थोडा सहज होईल…पण ते काही घडवण आपल्या हातात नाही, आणि मग आपले भोग कसे भोगता यायचेत?……असो…
तेव्हाही आम्ही अशाच नकारात्मक भावनेतून त्या बिचा-या मोटारसायकल वाल्याला काहीबाही बोलत होतो, अर्थात मनातल्या मनात. आणि ज्यांचं सामान आलेलं नव्हतं त्यांच्या मनातील ती काळजी त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येणं ही स्वाभाविक होतं. साधारण तीन वाजत आले होते. आता सामान असलेले लोक पुढे निघणार आणि नसलेले इथेच थांबणार हे न सांगताच स्पष्ट झालं होतं. मी निघायची तयारी केली. एक दोन परिक्रमावासी सोबत होते पण मी त्यांना ओळखत नव्हते. आम्ही थोडं अंतर चालून गेलो असता समोरून एका सायकल वर एक माणूस या मागे राहिलेल्या मंडळी चं सामान घेऊन येताना दिसला. त्याला विचारलं असता त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आपल्या मनाचा फार फार राग आला.
त्या मोटरसायकल वाल्याची गाडी पंक्चर झाली होती. ते सामान आणि ती गाडी त्यानी बरच अंतर ओढत नेली आणि पुढे तो मोटरसायकल वाला एकटा गेला. तिथे त्यानी लोकांना गळ घातली आणि एका सायकल वाल्या माणसाला परिक्रमावासिंचं सामान नेऊन देण्याला तयार केलं. मग हे सामान त्याच्या सायकल वर लादलं आणि त्याला मौनी बाबा अश्रमात पाठवलं. इतकं सगळं करे पर्यंत त्याला निश्चितच बराच वेळ लागला असणार.. पुढे जवळ जवळ ६ लोकांचं ओझं सायकल वर वाहून आणणा-या माणसाच्या शारीरिक त्रासाचा विचार करता त्याने फार मोठे कष्ट घेतले होते. आणि आम्ही काय काय विचार करत होतो बघा! मनाचे खेळ सगळे… त्या वेळी समजलं.. रिऍक्ट व्हायचं नाही, अगदी जमेल असं नाही, पण प्रयत्न करायचा…. कारण आपण जसं व्यक्तं होतं तसं आजूबाजूला काहीच नसतं बहुतांश वेळी… हा एक धडा घेऊन मी पुढे निघाले.
पुढे कठोरा ला जाताना मी आणि सुरेखा ताई सोबत होतो. शेतातून जाणारा हा रस्ता होता. इथे आम्हाला रस्त्यात एका ने चहा आणि बिस्कीट पुडे दिले. कठो-याला अविनाश चं एक अन्न छत्र आहे, तिथेच थांबायचं असा आदेश होता. मात्र आम्ही कठो-यापर्यंत पोहचू शकलो नाही. ज्या दिवशी आम्ही अमुक ठिकाणी जायचं असं ठरवायचो त्यादिवशी आम्ही तिथवर पोहचूच शकायचो नाही. काही ना काही कारण व्हायचं आणि आम्हाला आधीच कुठेतरी मुक्काम करावा लागायचा. पुढे राजघाट नंतर आम्ही ठरवणं च सोडून दिलं. या वेळी इथे आम्ही खलघाट ला मुकाम केला. इथली राम मूर्ती इतकी बोलकी आहे की समोरून उठायची इच्छा होत नाही. रात्री १२ वाजेस्तोवर मी या मूर्तीसमोर बांधून ठेवल्यासारखी बसली होती. त्यावेळी मनात काय विचार होते ते आठवत नाही. काही विचार नव्हतेच बहुधा. इथेही थंडी फार जास्त होती पण मैया कृपेने आम्हाला एक खोली मिळाली. पुरुष मंडळी मात्र कुडकुडत बाहेर झोपली होती.
इथे येताना एक तरुण, देखणा राजबिंडा सन्यासी रस्त्यात भेटला होता. अस्खलित मराठी बोलत होता तो. झपाझप पावलं टाकत होता. त्याची भेट झाली त्या वेळी मी आणि पसारकर काकू अशा दोघी सोबत होतो. ” अभी कितना दूर है खल घाट” असं विचारल्यावर तो थांबला, म्हणाला, ” माई आपण फक्त चालत राहायचं असतं, बाकी विचार करायचा नसतो”, मग मझ्याकडे पाहून म्हणाला, प्रश्न पडतात तुम्हाला, पण विचारत नाही तुम्ही..चांगलय, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायला लागतात….आता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सुटतील लवकर…फ़क्त एक करा, राम सोडू नका.” आणि झपाझप पावलं ताकत तो पुढे निघून गेला.
पुढे खलघाट आश्रमात तो सगळ्या परिक्रमावासिंना जेवायला वाढत होता. खिचडी आणि कढी ची भोजन प्रसादी होती. मला वाढता वाढता तो मधेच माझ्याकडे बघून स्मीतहास्य करायचा, आणि जणू काही मी काय विचार करते आहे ते त्याला समजतय असे भाव मला त्याच्या चेह-यावर दिसत होते. भोजन प्रसादी झाल्यावर मी राम मंदिरा समोरा बसली होती तेव्हा तो सन्यासी तिथे आला, त्या राम मूर्ती कडे बोट दाखवलं आणि म्हणला…. “राम…….राम राम मैया जी…”असं म्हणत तो सन्यासी निघून गेला, आणि मी त्या पाठमो-या सन्याशाकडे बघत राहीले… तो आपल्या खोलीत निघून गेला आणि मग माझी नजर त्या सन्याशाने दाखवलेल्या रामाच्या मुर्तीवर स्थीर झाली. भान आलं तेव्हा १२ वाजले होते…
मला काहीही समजत नव्हतं…पण तो राम मला पुढेही अधून मधून आठवण करून देत होता स्वतःची..मात्र प्रत्येक वेळी एक वेगळा सन्यासी माझ्यापुढे येत आणि रामाची आठवण करून देत.. तीन वेगवेगळे सन्यासी, तीन वेगवेगळ्या प्रदेशात मला भेटलेत, मात्र ते जे वाक्य बोललेत ते शब्दश: सारखं होतं..खलघाट चा हा तेजस्वी सन्यासी म्हणाला, रामाला सोडू नका, आणि नंतर भेटलेले सन्यासी म्हणाले “बेटा राम को दूर मत करना कभी” आहे न आश्चर्य? इतकं सारखं वाक्य कसं काय बोललेत हे तिघं ही?
मैया किती करते आपल्यासाठी, आपल्याला जे काही आवश्यक आहे असे संदेश सुद्धा ती देते.. मात्र आपण कमी पडतो तिचे संकेत समजायला… ती आई आहे. ती प्रेमळ आहेच. पण बाळाला वळण लावायला आईला कधी कधी तिचा राग दाखवावाच पलागतो… असा राग आईने मला पण दाखवला आहे… त्या दिवशी जे झालं त्यावरून समजलं, तिच्या योजना खूप वेगळ्या असतात… त्या समजून घेण्याचा प्रयत्न ही करू नये.. ती म्हणते तसं करत रहावं, नाहीतर फ़टका दिल्याशिवाय राहयची ती..कसा फ़ट्का पडला त्या दिवशी… नेमकं काय घडलं की ती रगावली? पुढच्या अनुभवात सांगते नक्की.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १२
नर्मदे हर
नर्मदा माई ही आपली आई आहे आणि ती आपली काळजी घेते हे आता पर्यंत समजलं होतं. पण ती आपली आई आहे म्हणून ती आपल्याला वळण लावू शकते आणि गरज पडल्यास दट्ट्या पण देऊ शकते याची पण खात्री पटली सांगते..
खलघाट ते कठोरा जाताना मी आणि सुरेखा ताई पुढे आणि चित्रा ताई जरा मागे होतो. उसाच्या शेतातून जाणारी वाट होती. शेत जरी असलं तरी १०-१२ फ़ूट उंचीचा उस होता त्यामुळे शेताच्या अलीकडचं आणि पलीकडचं दिसायचं नाही, आवाज मात्र यायचा. दोन शेतांच्या मधे मात्र थोडी जागा किंवा वाट असायची, पण नेमकं कुठे जायचं आहे हे बरेचदा समजायचं नाही. मग वीजेचे टॉवर म्हंजेच आमचा “दीपस्तंभ” असायचा… टॉवर ज्या दिशेला दिसेल तिकडे जायचं…म्हणजे कुठल्यातरी गावात आपण नक्कीच जाऊन पोहोचू… तर असच एकदा आम्ही टॉवर च्या दिशेने जात होतो पण काही केल्या अंतर कापल्या जाईना… बहुधा आम्ही रस्ता चुकलो होतो… तिथे विचारायला कुणीच नव्हतं. जेव्हा कुणी नसतं तेव्हा मैया असतेच…. आम्ही नर्मदे हर च्या आरोळ्या द्यायला सुरवात केली आणि ४ ते ५ हाकानंतर अम्हाला प्रतिसाद आला… “मैया जी सीधे चलते रहो, जब मुडना होगा मै बता दुंगा”. कुणी दिसेच ना.. मग बरोबर चार ते पाच वळणं त्या आवाजानेच आम्हाला लक्षात अणून दिले..आम्ही पुढे गेलो, तरी तो आवाज मात्र व्यवस्थित ऐकू यायचा… म्हणजे दुरून आवाज येतोय असं काही वाटायचं नाही…तो आवाज आमच्या बरोबरीने चालत होता असं वाटू लागलं मात्र शोधायला जावं तर कुठे माणुस नावाच्या प्राण्याचा नामोनिशान ही नाही… मैयाला मनोमन धन्यवाद देत आम्ही पुढे गेलो, आणि गावा जवळ च्या वस्तीत पोहोचलो देखिल…
आता इथे आम्हाला मैया फ़टका देणार होती, पण हे आम्हाला माहितच नव्हतं. झालं असं की या गावा जवळच्या वस्तीत आम्हाला चहा साठी बोलावलं, पण आमची चहा घेण्याची इच्छा नव्हती, म्हणून चहा नको असं आम्ही सांगीतलं. तिथल्या मैयाजींचा आग्रह फ़ार होता… चहा नको म्हणालो तर जेऊनच जा असा आग्रह त्यांनी केलेला.. आमच्या पोटात जिथे चहा ला जागा नाही, तिथे जेवण काय जेवणार.. आम्ही पुन्हा नको असं सांगीतलं. खलघाट ला छान बालभोग झाला होता, त्यामुळे फ़ार भूक नव्हती, जेवणाची वेळ पण झाली नव्हती.. आता २-२.३० वाजता जेऊ, अता काय १० वाजता जेवायचं असा विचार करून आम्ही जेवणाला सुद्धा सपशेल नकार दिला… बिचा-या मैयाजींचं हृदय दुखावल्या गेलं असणार, पण आम्हा पामरांच्या ते लक्षातच आलं नाही…
तर गंमत अशी झाली, आम्ही पाणी पिऊन पुढे निघालो.. आणि बरच अंतर चालत गेलो… हळू थकवा येऊ लागला आणि आता काहीतरी हवं असं वाटू लागलं… म्हणजे चहा असला तरी चालेल…पण या गावात आम्हाला काळं कुत्रं विचारेना. लोक कुतूहलाने बघायचे, पण एकानेही चहा ला असं म्हंटलं नाही… आता जिथे चहाच नाही विचारत कुणी, तर जेवणाचं काय?.. बसला की फ़टका! आम्ही त्या मैयाजींचं मन दुखावलं होतं, त्यांच्या श्रद्धेला मान दिला नव्हता, मैया च्या चहा आणि भोजन प्रसादी ला चक्क नकार दिला होता..आणि आता आम्हाला न चहा मिळत होता नं जेवण..
दुपारचे तीन साडेतीन वाजून गेले तरी काही मिळेल याची शाश्वती दिसत नव्हती. आम्हाला आमची चुक कळली होती. आम्ही तिची मनापासून माफ़ी मागितली,दिलगीरी व्यक्त केली आणि मायच ती, तिचं हृदय द्रवलं… आपल्या उपाशी लेकरांना ती धडा देत होती, पण त्यांना उपाशी बघणं तरी कसं जमेल एका आईला? एका शिवंमंदिरात विसाव्याला थांबलो, तिथे चहा मिळाला.. मन भरून आलं.. तिची माफ़ी मागीतली ततक्षणी ती माऊली पावली होती! पुढे ब्राम्हण गावला जेवण तर मिळालं नाही मात्र सुरेखा ताईचे नातेवाईक भेटायला येणार होते. तिथे हि चमत्कारच घडला… गावात जेवण मिळालं नाही हे जरी खरं असलं तरी ह्या नातेवाईकांनी आमच्या साठी घरून डब्बा आणला होता. त्यात पुरी, कोबी बटात्याची भाजी, घरचं लोणचं, खूप सारी फ़ळं म्हणजे जवळ जवळ २ डझन सफ़रचंद, २ डझन केळी, २ नग अननस, ३..ते ४ नग पपया, आणि भरपूर फ़राळ, ज्यात शेव, चिवडा, नमकीन, उपासाचा चिवडा, हे सगळं तर होतच, शिवाय भरपूर औषधं सुद्धा त्यांनी आणली होती. हे सर्व सामान आम्हाला ८ दिवस पुरेल याही पेक्षा जास्त होतं. मैयानी जितकं रागवलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त कौतुक केलं होतं, माया केली होती…….कानाला खडा लावला आणि त्यनंतर कधी ही कशाला ही नाही, किंवा नको असं म्हंटलं नाही.
परिक्रमा म्हणजे खरोखरीच विलक्षण असं गारुड आहे. इथे कुठल्या क्षणी काय होईल याचा काही नेम नाही. कठो-राचा मुक्काम छानच झाला, दुसर्या दिवशी विश्वनाथ खेडा नावाच्या गावाला मुक्काम करायचा असं आम्ही ठरवलं.. इथे अजून एक धडा मैयानी दिला… तेव्हा म्हणजे त्या वेळी आम्ही खूप घाबरलो होतो, कारण ह्या विश्वनाथ खेडा गावाच्या साधारण ४ किमी आधी एक अतिशय भिती दायक घटना आमच्या सोबत घडली. केवळ चार किमी अंतर असतानाही आम्ही त्या गावात पोहचू शकत नव्हतो…आम्ही कुठल्यातरी वेगळ्याच शक्तीच्या प्रभावाखाली असल्याचं जाणवत होतं मात्र तिथून सुटायला आम्हाला तब्बल तीन तास लागलेत…. ४ किमी अंतर चालायला तीन तास इतकं साधं हे गणीत नव्हतं कारण जे घडलं ते आकलनाच्या पलिकडचं होतं भितीनी आमचं धाबं दणाणलं होतं असं म्हटलं तरी चालेल.. अनुभव जरा मोठा आहे म्हणून पुढच्या भागात सांगते …नक्की काय भयानक प्रकार घडला होता ते!
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १३
नर्मदे हर
मागच्या अनुभवात मी तुम्हाला सांगीतलं की भयानक घटना घडली.. ती काय ते आता सांगते. आता तुमच्या पैकी किती लोकांचा यावर विश्वास बसेल माहित नाही पण काही चांगल्या शक्ती असतात तशा काही वाईट शक्ती ही असतात असं वाटू लागलं, अर्थात नर्मदा मैया सोबत असल्याने आमचं काही बरं वाईट नक्कीच होणार नाही याची खात्री होतीच. तरी जीवच तो, घाबरतोच थोडाफ़ार.. आणि भिती म्हणजे सुद्धा आपल्याला काही होईल अशी भिती वाटत नव्हती, मात्र हे जे काही सुरू आहे ते वेगळं आणि अनपेक्षित आणि त्याही पेक्षा अनाकलनीय आहे हे समजत होतं, बाकी काहीही समजतच नव्हतं अशीच ती घटना.
ब्राम्हणगावातून सुरेखा ताईच्या नातेवाईकांना निरोप देऊन आम्ही पुढे निघालो. इथून अगदी १० ते १२ किमी वर विश्वनाथ खेडा गाव आहे, तिथे काशीविश्वनाथाचं मंदीर आहे, तिथे रात्री चा मुक्काम करायचा असा विचार केला. एव्हाना रोजचं १० ते १२ किमी अंतर चालत असू, त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे विश्वनाथ खेडा तसं आमच्या चालण्याच्या ट्प्प्यात होतं. पण तरीही आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही कारण मधे ही भयानक घटना आडवी आली.
तर झालं असं, आम्ही वाटेत होतो म्हणजे विश्वनाथ खेडा साधारण ४ किमी काय ते उरेलं असेल, रस्ता डोंगराळ होता आणि वस्ती नव्हती, मात्र अधुन मधून शेतं होती. रस्ता विचारत विचारत पुढे जायचं. इथे काय झालय मध्यप्रदेशात, नर्मदा नदीचं पात्र वाढवण्याचं काम सुरू आहे, म्हणजे धरणं जी बांधली आहेत ती ज्यावेळी मोकळी करणार त्यावेळी पाण्याची पातळी वाढणार आणि किना-यावरची गाव पाण्याखाली जाणार.. याला इथे “गाव डूब मे है” असं म्हणतात. आणि मग पुनर्वसित गावं तयार झाली आहेत. तर आम्हाला वाटेत तिघं तरूण मुलं दिसलीत. ती दारू गाळत होती.. त्यांना रस्ता विचारला, तर ती म्हणाली..”आप तो पुनर्वसन मे जा रहे हो, किनारे वाला गाव तो उधर है” असं म्हणत त्याने उजवी कडे आम्हाला जायला सांगितलं. त्यानी दाखवलेल्या दिशेला आम्ही साधारण ३ किमी चालून गेलो, तर तिथे एक म्हातारा माणूस बसला होता, त्याला पुढचा पत्ता विचारला, तो म्हणाला, “मंदिर तो हैम पर वो डूब मे है, इसलिये वहा कोई जाता नही, आपको न सोने को मिलेगा न खाने को.. अब तो गाव मे ३ ही मकान बचे है… गुंडो का राज चलता है वहा… कुछ हो गया तो क्या करोगे, आप तो पुनर्वसन मे ही जाओ…
आता तिथे काहीच नाही म्हंटल्यावर काय करायचं? न लाईट आहे म्हणे, आणि न काही सोय..मंदिर पण बंद, आणि स्मशान पण लागूनच आहे असं ही त्यानी संगीतलं..शिवाय “गुंडाराज चलता है” असं ही तो म्हणाला.. आमच्यात एक मोठे गृहस्थ होते, ते म्हणाले, इतक्या पोरी बाळी सोबत आहेत, आपण पुनर्वसन ला जाऊ…आम्ही पुन्हा पुनर्वसीत गावाकडे निघालो… ती दारू गाळणारी मुलं आता तिथे नव्हती, त्यांचं सामान होतं, मात्र तिथे एक आणिक म्हातारा बसला होता… त्याला विचारलं….
तो म्हणाला “किसने बताया आपको…मंदिर तो शुरू है.. मै तो अभी उधरसे ही आया हू…आपको नाले के पास बताया होगा ये बात, है ना… अरे आपको जिसने बताया वो तो आदमी नही है..चकोडा है… ऐसे ही बताता है” चकोडा म्हणजे चकवा, दिशाभूल करणारा…. बापरे, असं खरच असतं? मग आम्ही त्याला त्या तीन मुलांबद्दल विचारलं..तर म्हणाला “कौनसे लडके, यहा तो मै ही बैठता हू..आपको गलत फ़एमी हुई होगी..यहा कोई तीन लडके नही थे”
आता हे ऐकून आम्ही अजूनच दांदरलो… आम्ही त्या तीन मुलांशी बोललो होतो! आम्ही त्याला म्हंटलं “आप चलो हमारे साथ. हमे मंदिर तक छोड दो” तो हो म्हणाला… जरा हायसं वाटलं. तो पुढे आणि आम्ही मागे असं पुन्हा एकदा डूब गावाकडे चालू लागलो…वाट्लं चला, हा आहे, आता निदान निवारा तरी मिळेल, फ़राळाचं सामान आहे आपल्याकडे, त्यामुळे जेवण नसलं तर नसलं.. काही अंतर चालून तो म्हणाला, “अब यहा से सीधा सिधा जाना, मुझे घर जाना है, मै जा रहा हू” त्याला थांबायचा खूप आग्रह केला पण तो निघून गेला… मग आम्हाला एक चुन्यानी आखलेली लाईन दिसली, लाईन काय वाटच दिसली, अगदी बाणानी मार्ग पण दाखवला होता त्यावर.. वाटलं चला, परिक्रमा वासींसाठीच असावा, आम्ही त्या मार्गाने चालू लागलो, पण गाव काही येईना..मी सगळ्यात पुढे होते.. मी समोर जाऊन जरा बघायचं ठरवलं… पुढे एका ठिकाणी ती चुन्याने आखलेली वाट दिसेनाशी झाली होती…ती कुठेच जात नव्हती, मात्र तिथून पुढे बरच दूर एक छोट्सं मंदिर होतं… अगदी लहान, म्हणजे रस्त्यावर किंवा गावाबाहेर फ़क्त देवाची मूर्ती बसेल इतकं छोट्सं मंदिर नसतं का बांधलेलं… तसं.. आणी त्यामागे लाकडाचे ढीग रचले होते… ते पाहून मी मागेच वळले! आपली जबरदस्त दिशाभूल होते आहे हे समजत होतं, किंबहुना ती केली जातेय हे ही समजत होतं. आम्ही रामरक्षा आणि नर्मदाष्टक या दोन्ही चा जप सुरू केला..आणि सगळ्यानी एकत्र येऊन ठरवलं की आता पुनर्वसीत गावातच जायचं.. काही नाही तर निदान माणसं तरी दिसतील….
वाटेत पुन्हा ती तीन मुलं दिसलीत.. न विचारताच म्हणालीत “डूब मे जाओ..इधर तो पुनर्वसित गाव है” आम्ही लक्षच दिलं नाही आणि, एकदाचं पुनर्वसीत गावात येऊन पोचलो. इथे आल्यावर छान व्यवस्थित गाव दिसलं तेव्हा जिवात जीव आला. लोकांशी चर्चा केल्यावर समजलं, असा अनुभव या भागात प्रत्येक परिक्रमावासीयाला कमी जास्त प्रमाणात येतो, मात्र इजा किंवा इतर त्रास होत नाही, दिशाभूल मात्र होतेच…! मात्र माई सोबत असते, ती वाट दाखवते. कुणी तिकडे डूब मधे जातं कुणी इकडे येतं..खरं तिथेच सोयी आहेत, हे ही समजलं
इथे आलो खरं, पण पुढे निवारा मिळणं काही सोपं नव्हतं.. भरपूर त्रास झाला.. कसा ते सांगते पुढच्या अनुभवात.. एक मात्र नक्की, आजचा दिवस खूप खूप विचित्र होता. केवळ आम्ही परिक्रमावासी आणि मैयाची लेकरं म्हणूनच आमचा निभाव लागला असणार.. अर्थात पुढचा त्रास भितीदायक नसला तरी विचित्र मात्र होता, कसा ते सांगते…लवकरच
नर्मदे हर.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १४
नर्मदे हर
तर कसं बसं आम्ही त्या चकोड्या ला पार करून विश्वनाथ खेडा पुनर्वसन गावी येऊन पोहोचलो. तोवर संध्याकाळचे ६-६.३० झाले असतील. आता गरज मुक्कामाची.. तिथे एखादं देऊळ असेल ते पाहू, असं ठरवलं. देऊळ होतं, तिथे गेलो असता तिथल्या पुजा-यानी सांगीतलं आत जागा नाही. आम्ही ५ जण होतो. काका काकू. आणि आम्ही तिघी मुली, मी सुरेखा आणि स्मिता कुलकर्णी. आता जागाच नाही म्हंटल्यावर काय करणार.. सगळं सामान घेतलं आणी दुस-या निवा-याच्या शोधात निघालो. भोजन प्रसादी आज मिळेल असं काही वाटत नव्हतं आणि जणू मिळणार नाहीच याच विचारात आम्ही सोबत असलेली फ़ळं किंवा फ़राळाचं खाऊन घेऊ असं ही मनोमन ठरवून टाकलं होतं. आता निवारा मिळणं आणि प्रात:विधी साठी जागा मिळणं हे महत्वाचं, कारण आम्ही गावात होतो. एखाद्या आश्रमात, किंवा गावाबाहेर असताना वावरात प्रात:विधी ला जाणं शक्य असतं.. इथे गावात कसं काय जमणार? तेव्हा जागा अशीच हवी असणार होती जिथे निदान ही सोय तरी असेल…
मग शोधता शोधता एक अजून मंदीर सापडलं. ते छान ऐस पैस होतं. संत राम महाराज म्हणून होते, त्यांनी बांधलेलं राजाराम मंदिर हे. मंदिर म्हणजे एक मोठा वरांडा, आणि त्याला कमरेपर्यंत जाळी चारी बाजूनी, बाकी भिंत वगैरे काही नाही. म्हणजे थंडी पासून बचाव होणार नव्हताच, आणि अजून परवानगी मिळाली नव्हती. त्याच मंदिराच्या अगदी समोर एक शिवाचं मंदिर होतं, पण ते अगदीच उघडं होतं… राजाराम मंदिरात कुणीही नव्हतं म्हणून शिव मंदिरात गेलो, तिथे पुजारी होता, त्याला विचारलं… तो म्हणाला, मेरे यहा रह सकते हो पर यहा नीचे डालने के लिये कुछ नही है, और मै तो सुबह तीन बजे भजन करता हू, आपको उठना पडेगा… म्हणजे हा पण पर्याय गेला..आम्ही खूप थकलो होतो… शेवटी आता कुणी नसलं तरी राजाराम मंदीरात डेरा टाकायचं ठरवलं आणि कुणाच्याही परवानगी शिवाय आम्ही आत जाऊन आसनं लावले. अजून भोजन प्रसादी आणि प्रात:विधी चा प्रश्न होताच! पण आता निदान रात्र कुठे काढायची हे नक्की करणं गरजेचं होतं.
तेवढ्यात तिथे एक माणूस आला, तो जरा विक्षीप्त वाटत होता. खरं सांगायचं संध्याकाळ्च्या त्या चकोड्या पासून आम्हाला हे गावच विचित्र वाटू लागलं होतं. कधी एकदा रात्र सरते आणि आपण इथून निघून जातो असं वाटू लागलेलं. तो माणूस आम्हा तिघींकडे टक लावून बघत बसला… आणि काही केल्या तो तिथून जाईना.. जवळ जवळ तास भर त्यानी तिथेच असं बघत बघत घालवला असेल. मग तो निघून गेला आणि अर्ध्याच तासात परत आला. त्याच्या हातात चहाची किटली होती. त्यानी आमच्या साठी चहा आणला होता. खरं तर तो चहा प्यावा की नाही असंच वाटत होतं पण तेवढ्यात त्या देवळाचा पुजारी आला. त्यानी मात्र आमचं स्वागत केलं. आमची चौकशी केली आणि आम्हाला खाली घालायला जाड सतरंजी आणी पांघरुणं पण देवळातल्या खोलीतून काढून दिली. देव्हारा उघडून दिला आणि “ तुम्हारे मोबाईल चार्ज करके ताला लगा देना” असं म्हणून किल्ली सुद्धा आमच्याच जवळ दिली.
हे गाव न खरच काहीतरी वेगळं होतं. आधी इथे पोहोचताना झालेला गोंधळ, मग निवाऱ्या-साठिचा त्रास आणि मात्र त्या नंतर झालेली मदत, सगळच विलक्षण… काय झालं, हा पुजारी परत जात नाही तोच समोरच्या देवळातला पुजारी आला, त्यानी एक किल्ली आणून दिली, “ सामने टॉयलेट है, आप लोग जा सकते हो, बाथरुम भी है” असं सांगीतलं… बराच वेळ पासून तग धरून बसलेल्या आम्ही मुली आधी त्या दिशेला धावलो. अंधार दाट झाला, ये जा पांगली की बाजूच्या रिकाम्या प्लॉटवर नेचर्स कॉल आटोपायचं आणि तोवर तग धरायची असं च ठरलं होतं, आणि दुसरा पर्याय ही नव्हता, पण हा ही प्रश्न आपोआप सुटला होता. यानंतर मात्र कहर च झाला… तिथे एक मैयाजी आल्या आणी आम्हाला सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन गेल्या. आम्ही भोजन प्रसादीला गेलो तेव्हा समजलं, बाईचा स्वयपाक, घरच्यांची जेवणं सगळं झाल्यानंतर आम्ही आल्याची बातमी त्यांना समजली. सगळं स्वयंपाक घर आवरून बंद केल्यानंतर, पुन्हा आमच्यासाठी या मैयाजींनी स्वयंपक केला होता.. “ हमारे घर आजाओ ना सामान लेके” असं ही त्या विनवत होत्या, पण पुजा-यानी केलेल्या मदतीचा तो अपमान झाला असता म्हणून आम्ही मंदिरातच झोपायचं ठरवलं, मात्र दुस-या दिवशी सकाळी आंघोळ आणि बालभोगासाठी इथेच या असा मैयाजिंनी हट्टच धरला आणि छान गरम पाण्याची आंघोळ मिळाली. अगदी थोडावेळ आधी पर्यंत “इथून कधी जातो” असं वाटणारं गाव मैयाजींच्या आणि इतर मंडळींच्या सहकार्याने का होईना आता छानसं गाव वाटू लागलं होतं. सकाळी छानसा बालभोग करून आम्ही पुढे निघालो.
आता आम्हाला ब-यापैकी चालायची सवय लागली होती. जप होत रहावा म्हणून आम्ही मागे पुढे होऊन चालत असु. मी आणि सुरेखाताई पुढे, काका मधे आणि काकू आणि स्मिता मागे असे काहीसे आम्ही मागेपुढे झालो होतो. माझी आणि सुरेखा ताईची स्पीड ब-यापैकी मॅच होत होती, आम्ही हाकेच्या अंतरावर असायचो.
परिक्रमेत असे काही अनुभव येतात की त्यांचं नक्की कारण ठरवणं किंवा शोधून काढणं काही शक्य नसतं. असं का झालं असावं हा फ़क्त अंदाज आपण बांधत राहत असतो, आणि कालांतराने तो ही बंद होतो.. हे आपल्या बुद्धीच्या आकलना बाहेर आहे हे समजायला जितका वेळ लागेल तितकच काय ते…पण एक गोष्ट समजते.. आपलं नं काही तरी देणं घेणं जिथे कुठे शिल्लक असेल तिथे आपण न ठरवता कसे काय जाऊन पोचतो हे ती मैयाच जाणे, पण पोहोचतो मात्र नक्की. म्हणूनच परिक्रमा जरी एक असली तरी प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.
आमचा बालभोग छान झाला होता, आम्ही दोघी पुढे निघालो होतो, आणि आमची मागच्यांशी चुकामुक झाली. आमचे रस्ते बदलल्या गेले होते. फ़ोन वर जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा समजलं की ते तिघं पार वेगळ्या रस्त्याला लागलेले आहेत, आणि आम्ही वेगळ्या रस्त्याने जात आहोत.अर्थात रस्ते जरी वेगळे होते तरी पुढे आम्ही कुठेतरी भेटणार होतो, पण या वेगळ्या रस्त्यात त्यांच्या वाट्याचे अनुभव त्यांना मिळणार होता आणि आमच्या वाटचे आम्हाला…का झाल्या आमच्या वाटा वेगळ्य़ा? कशा झाल्या? काय वेगळे अनुभव आले त्यांना आणि आम्हाला..? ते पुढच्या भागात सांगतेच..
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १५
नर्मदे हर
तर मागच्या भागात आमचे मार्ग वेगळे झाल्याचे मी सांगीतले होते. ते कसे झाले ते आधी सांगते. मी आणि सुरेखा ताई पुढे होतो, आणि शेतात रस्ता विचारत आम्ही जात होतो, तर आम्हाला एका माणसाने सांगीतले, “उधर से मत जाओ, नाला है, नाले मे पानी बहोत ज्यादा है, और नाव खराब है, तुमको इंतजार करना पडेगा, इधर से जाओ, थोडा लंबा पडेगा पर सीधा सीधा रास्ता है, नवलाय को पोहोच जाओगे, चिच्ली जाने की जरूरत नही”. आम्ही न विचारता त्यानी आम्हाला हा रस्ता सांगीतला होता. खरं तर आम्ही लगेच फ़ोन करून मागच्यांना तसं सांगितलं देखिल, म्हणजे त्यांना सुद्धा हाच रस्ता घेता यावा.. पण मी मागच्या अनुभवात सांगितलं तसच असतं.. वेगवेगळे अनुभव यायचे असतात, ते जसे नशीबात असतील तसे मार्ग आपल्याला मिळतात.
ज्या ठिकाणी दोन रस्ते जात होते तिथे एक पिंपळाचं झाड होतं, तिथून पुढे गेलं की एक छोटासा नाला होता, अगदी उडी मारून पार करता येईल येवढा, आणि तो पार करून मग डाव्या बाजूला रस्त्याला लागायचं होतं. आम्ही या दोन खुणा मागच्यांना फ़ोन करून सांगितल्या आणि अडचण आल्यास पुन्हा फ़ोन करा असं ही सांगितलं. आता गंम्मत कशी झाली बघा, त्यांना त्या खुणा दिसल्याच नाहीत… आणि त्या खुणा शोधत असताना त्यांना कुणितरी माणूस रस्त्यात भेटला आणि त्याने या मंडळींना दुसरा रस्ता दाखवला. या मागच्या मंडळीनी आम्हाला फ़ोन करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दोघिंचाही फ़ोन काही लागेना. आम्ही नो नेटवर्क झोन मधे असू, आणि आम्ही काही त्यांना फ़ोन केला नाही कारण ते त्या झाडापशी आले की करतीलच फ़ोन असं आम्हाला वाटत होतं. शेवटी चुकामुक झालीच.
आता आम्हाला आणि त्यांना, वेगवेगळे अनुभव कसे आले ते सांगते. आम्ही गावागावातून जात होतो. आमचा बालभोग झाला होता. सकाळ चे १० वाजले असतील. आम्ही छोट्याश्या छान टुमदार घरांची बांधणी बघत बघत जात होतो, तिथे कुठेतरी थोडं थांबून दहा पंधरा मिनिटाची विश्रांती घ्यावी म्हणून एका घराबाहेर असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसू असं आम्ही ठरवलं.. आम्ही त्या कट्ट्याकडे जात असताना त्या घरातून एक छोटीशी, ३-४ वर्षांची मैया धावत घराबाहेर आली आणि तिला पकडायला म्हणून तिची आजी पण आली. आम्ही नर्मदे हर केलं आणि सामान खाली ठेवणार तितक्यात त्या आजी नी माझा हात धरला, आणि म्हणाली, “ माताजी इधर बाहर नही अंदर विश्राम करलो..” तिनी मला अक्षरश: ओढून नेलं म्हटलं तरी चालेल.
आम्ही आत गेलो, जोडे मोजे काढले, सामान ठेवलं, हात पाय धुतले, तेवढ्यात ही छोटी मैया आपल्या इवल्या हातात पाणी घेऊन आली, आणि म्हणते कशी, “दीदी, चाय पिओगे के छाछ, अम्मा पुछ रही है”. आम्ही थकलो होतोच थोडं, ताक पिऊ असं सांगीतलं…. तेवढ्यात घरची सून बाहेर आली, तिनी आम्हाला नमस्कार केला, आणि म्हणाली…”आप तो इधर के नही लगते? इधर का खाना बहोत टेस्टी होता है, छाछ बादमे पीना, तूअर है घर के, मक्के की रोटी बना रही हू, खाना लगा दिया है, थाली भी सजा दी है, बस आप को खाना खाकर ही जाना है, अम्मा ने आपको खीचके लाया तब ही उनके मन मे था की आपको खाना खिला के ही भेजेंगे”.. आता यावेळी भूक फ़ार नसतानाही आम्ही नकार दिला नाही कारण मागचा फ़टका आमच्या लक्षात होता… गरमा गरम मक्याच्या भाकरी, घरच्या तुरीची उसळ, सरसो चं साग, वेळेवर तळलेले बटाट्याचे भजे, असं पोटभर आणि खरोखर चविष्ट जेवण आम्ही जेवलो, वरून पुन्हा घरचं ताक ही प्यायला दिलच! ती छोटी मैया, तिची आई, आणि तिची सासू, ह्या तिघीही जणू मैया ची च रुपं होत्या…इतकी आपुलकी झाली त्या छोट्याश्या मैयाला की आम्हाला जाऊ द्यायला तयारच होईना ती..”अम्मा दिदी अपने घरमे ही सोयेंगे” असं म्हणून रडू लागली… हेच ते.. काहीतरी देणं घेणं शिल्लक असेल आमच्या मागच्या जन्मींच…म्हणून हे असं घडलं!
आता त्या मागे रहिलेल्या मंडळी चा अनुभव सांगते. सांगीतल्या प्रमाणे त्यांना तो नाला लागला, त्यात भरपूर पाणी होतं, जवळच एक खराब झालेली नाव ही होती, आणि आता तो पार करायला साधन ही नव्हते. मंडळीनी तिथे अर्धा तास वाट पाहिली आणि आता पुन्हा मागे फ़िरून दुसरा कुठल्या रस्त्याने जाऊ असं त्यांनी ठरवलं. आणि परतून मागे वळणार तितक्यात तिथे एक सन्यासी आला, आणि म्हणाला, “दुसरी नाव आ ही रही है.” त्याला कुणी सांगीतलं की नाव येतेय ते माहित नाही पण लागलीच पलीकडच्या काठावरून एक नावाडी आपली नाव ढकलत घेऊन येताना दिसला, आणि इकडे अलिकडे नाव घेऊन आला. साधू महाराज कोण होते माहित नाही, पण आमच्या, म्हणजे माझ्या आणि सुरेखा ताईच्या भाग्यात त्या महारांजाचं दर्शन घेणं नव्हतं आणि त्या मंडळीच्या भाग्यात या तिघी मैया, आणि अन्नपूर्णेच्या हातचं जेवण नव्हतं. पुढे आम्ही नलवायला भेटलो तेव्हा हे अनुभव एक मेकांना सांगितले. त्यांनी वर्णन केलेला तो सन्यासी नक्कीच कुणीतरी महान संत किंवा शक्ती असणार, कारण नाव येतेय हे त्यानी अचानक सांगीतलं… हे असच असतं..आमचे अनुभव आम्हाला मिळाले आणि त्यांचे त्यांना.. मैया मत्र आपल्या सर्वच लेकरांची व्यवस्थित काळजी घेते.
पुढे लोहा-याला जाताना एक खूप मजेशीर अनुभव आला, एक खूपच आश्चर्यकारक अनुभव आला आणि एक संकेत ही मिळाला. मैया आपल्याला वेळोवेळी संकेत देत असते. ते फ़क्त समजणं गरजेचं असतं.. ते समजलं की तुमची पुढची परिक्रमा सहज आणि सोपी होते. लोहार-या नंतर दत्तवाडा आणि मग पुढे राजघाट, या राजघाट च्या पुढे शूलपाणी ची झाडी सुरू होते, पण आमच्या साठी हा राजघाटचा प्रवास अंगावर काटे आणणारा होता..पुढच्या अनुभवात सांगते.
© सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १६
नर्मदे हर
लोहा-याला जाताना लांबच लांब रस्ता लागतो, तो काही केल्या संपेच ना. वाटेत एक छोटं मार्केट लागलं. आम्ही ब-याच दिवसांनी जरा बरं मार्केट पाहिलं. पुढे शूलपाणी ची झाडी येणार होती, काही नाही तर निदान औषधं तरी घ्यावी म्हणून आम्ही एका औषधाच्या दुकानात शिरलो. मी च आधी गेले, कारण माझ्याकडे विषेश काही औषधं नव्हते. तिथे औषधं घेतले आणि मागे वळून पाहीलं, एक बरीच म्हातारी, भगव्या रंगाची साडी नेसलेली सन्यासीण तिथे बसली होती. तिने माझी चौकशी केली, माझ्या डोक्यावरून हात फ़िरवला आणि लोहा-याला माझ्या कुटीतच थांबा असं निमंत्रण दिलं. ती पायी पायीच पुढे निघून गेली…ती म्हातारी बाई पायी चालतेय हेच आश्चर्य तेव्हा वाटत होतं. मात्र त्याही पुढे अजून एक आश्चर्य चकित करणारा प्रसंग झाला.
हा लोहा-याचा आश्रम आम्हाला सांगीतला त्यापेक्ष खूपच दूर निघाला. म्हणजे आम्हाला सांगितलं २ किमी आणि हा ६ किमी तरी असेल, आम्ही ही आपलं चलतोय, चालतोय तरी आश्रम यायचं नाव नाही. शेवटी एकदाचा आश्रम आला. कपिल मुनिंनी बांधलेला आणि त्यांनी साधना केलेला हा आश्रम. अतिशय प्रसन्न आणि रमणीय स्थान हे. आम्ही तिथे गेलो असता तिथे एक सुंदर कुटिया होती त्यातून एक मैयाजी बाहेर अल्या आणि म्हणाल्या “सब माताराम इधर आसन लगायेंगे”.. आम्ही सांगीतल्या प्रमाणे आत आसन लावलं आणि तिथल्या मुख्य माताजींच्या दर्शनाला आत गेलो. बघतो तर काय, मला मेडीकल च्या दुकानात भेटलेल्या याच त्या माऊली! त्या माऊली आमच्या जरा आधी पायी निघाल्या आणि आमच्या बरच आधी येऊन पोहोचल्या सुद्धा.. आम्ही येण्या आधी त्या माऊलींचं संध्याकाळचं मैया स्नान आणि साधना आटोपली होती. रस्ता ही एकच होता… आम्ही त्यांना त्यांचं वय विचारलं “सौ को ४ कम” असं सांगीतलं त्यांनी! म्हणजे ९६ वयाची ही बाई, तिथे मेडीकल च्या दुकानात मला भेटते, आणि आमच्या तास भर आधी पायी चालत आश्रमात येते म्हणजे काय? तिच्या पयावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि विचारांना घुटमळूच दिलं नाही.
याच रस्त्यात एक मजेशीर अनुभव आला. काय होतं नं की आपण सतत नर्मदे हर चा जप करत असतो. त्यामुळे आपल्या तोंडून बरेचदा उत्स्फूर्तपणे नर्मदे हर च बाहेर पडतं. अगदी कुणी समोर दिसलं की नर्मदे शिवाय दुसरं काहिही निघत नाही. गंमत अशी झाली की रस्त्यात माझ्या मागे एक काळं-करडं कुत्र सारखं येऊ लागलं. नुसतं आलं तर ठिक आहे, ते भुंकायचं अधुन मधून, त्याला हकलंलं की जायचं पण पुन्हा यायचं. आणि एकदा तर ते झेप घेऊन माझ्या आंगावरच आलं… मी खरं तर “आई गं” किंवा “ए अरे अरे” असं काहितरी ओरडायला हवं होतं, पण माझ्या तोंडून “नर्मदे हर” निघालं आणि हे कुत्रं “स्टॅच्य़ू” म्हणावं नं त्याला तसं एकदम भुंकायचं ही थांबल आणि आंगावर यायचं ही थांबलं… मी दोन तीनदा मग नर्मदे हर म्हणून बघायचे… ते आलं की मोठ्याने नर्मदे हर म्हणणार आणि ते लगेच भेदरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत जागच्या जागी उभं राहणार…. हे असं चार पाच दा झालं! एक तर त्याला मैया समजवत होती किंवा मैया त्याला रागवत होती … अजून काय असेल?
अजून काय असेल याचं उत्तरही त्याच प्रवासात मिळालं. गाई आणि विषेशत: म्हशी आम्हाला बघून बिथरत असत असं मी बरेच दा नोटीस केलं होतं. आम्ही समोर दिसलो की त्या सैरावैरा धावत असत..मग आम्ही ही बिथरत (भितीने, एखादीचा शींग लागलं की परिक्रमा अर्धवट सोडावी लागेल ही भिती, आता दुखायची , मरायची भिती फ़ारशी वाटायची नाही) असू! एकदा मी एका गुराख्याला विचारलं, “हमारे हाथमे जो लकडी है उससे डरते है क्या मवासी?” तर तो जे म्हणाला ते ऐकून आम्हाला खूप वेगळं आणि छान ही वाटलं. कारण आम्हाला आजवर अनुभव येत होते पण त्यामागचं कारण इतकं स्पष्टपणे समजलं नव्हतं. तो गुराखी म्हणाला, “डंडे तो इन्हे रोज ही पडते है, डंडे से ये नही डरते. आपके सफ़ेद कपडों से भी ये नही डरते. ये तो आपसे डरते ही नही है. आपके साथ बहोत सारी शक्तीया चलती रहती है जो आपकी रक्षा करती रहती है, ये उनसे डरते है. आप देखना मैया, काले जानवर ज्यादा डरते है, सफ़ेद कम डरते है, क्यो, मालूम है? इन्होने पिछले जन्म मे काले काम ज्यादा किये है इसलीये इनको काला रंग मिला.. और इनको इनके बुरे काम का दंड भी मिला है, और वो भी उन शक्तीयोंसे जो आपके साथ चल रही है. इसलिये ये ज्यादा डरते है, पर आपको डरने की कोई जरूरत नही है. मा नर्मदा आपके साथ साथ चल रही है, वो आप पर कोई संकट आने ही नही देगी”…… खरं हे असं असतं किंवा परिक्रमेबाबत असं म्हणतात हे माहीत होतं.. पुढे मला ते अनुभवायला देखिल मिळालं ..पण ती वेळ आली की मी ते लिहिनच… आत मात्र लोहा-राच्या पुढचा प्रवास आणि अनुभव आधी लिहिते.
कपिल आश्रमात ज्या मैयाजी होत्या त्या कपिलदुलारी माताजींच्या शिष्या. कपिल मुनिंची सेवा करणा-या माताजी म्हणजे कपिलदुलारी माता. इथे अजून एक गम्मत ऐकली, बघायची संधी आली नाही. असं म्हणतात की इथे सात गायी आहेत, त्यांना सात नद्यांची नावं दिली आहेत. माताजी त्यांना खोलीतूनच आवाज देतात, तशी ती ती गाय उठून माताजींजवळ येते आणि मग माताजी दूध काढतात. मात्र आम्ही कपिल आश्रम सोडून पुढे निघाल्यावर कुणीतरी ही माहिती आम्हाला दिली आणि त्यामुळे त्या गोमतांचं दर्शन काही होऊ शकलं नाही.
पुढे शेताततलाच रस्ता होता. मझ्याजवळचं पाणी संपलं होतं. तिथे एक नाग मंदिर दिसलं म्हणून मी तिथे जरा विसावले, आणि आजूबाजूला बघू लागले. २ ते तीन मिनिटातच झाडीतून एक शेतकरी बाहेर आला आणि म्हणाला “ लो, तुम्हारे लिये जल लाया हू” त्याला कसं कळलं मला पाणी हवय? बाकी कुणी कुणी आजूबाजूला नसताना हाच कसा काय होता तिथे? झाडीतून कसा आला हा, आणि पाणी भरलेली पेप्सी ची बाटली कशी आली याच्या जवळ? हे असले प्रश्न पडत राहतात, त्या प्रत्येक प्रश्नाला नर्मदे हर असं उत्तर द्यायचं.. थोडा वेळ आश्चर्य वाटतं , मग सवय होते….मात्र हे नेमकं का होतं हे आत त्या गुराख्याने सांगीतलं होतं.
पुढे कठोरा मोहिपुरा मार्गे आम्ही दत्तवाडयाला जाऊन पोचलो. तिथे फ़ार रमणीय आश्रम आहे. तिथे इतकं छान वाटलं की दोन रात्री आम्ही तिथेच मुक्कम केला. इथे अंगणात एक मोठं शिवलिंग आहे. बाजूला बसून पूजा करायला जागा आहे. त्या ठिकाणी वेगळेच व्हायब्रेशन्स जाणवतात. खूप प्रसन्न आहे. मुख्य म्हण्जे इथे आसन लावण्याची व्यवस्था पहिल्या माळ्यावर आहे आणि आजुबाजूला झाडी नसून मोकळं माळरान आहे. त्यामुळे पहिल्या माळ्यावरून नजर जाईल तितक्या दूर फ़क्त नर्मदा माईच दिसते. तिथे बसून राहावं असंच वाटू लागतं.
इथे एक गम्मत झाली बरं का… मी वरच्या माळ्यावर बसून मैयाकडे बघत होते, आणि मला माईच्या आरतीचे सूर ऐकू येऊ लागले.. आता दुपारचे चारच जेमतेम वाजत आले होते, या वेळी आरती कोण करतय म्हनून माझी नजर शोध घेऊ लागली मात्र कुणी दिसेच ना. माझी पावले आरतीच्या दिशेने, आवाजाच्या दिशेने वळू लागली, मी खाली उतरले, आश्रमाच्या मागच्या दाराने बाहेर गेले तसा आरतीचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला मात्र दिसत कुणीच नव्हतं… मी अगदी मैयाच्या पाण्यापर्यंत गेले, आजूबाजूला सगळीकडे पाहीलं, पण आता आवाज कुठून येतोय हे ही समजत नव्हतं. माझ्या चारही बाजुंनी आवाज आल्यासारख वाटत होतं. तिथेच एका दगडावर मी बसून राहीले.. आधी आरती झाली, मग अष्टक झालं, टाळ वाजवल्याचा अवाज पण येत होता… हळू हळू तो आवाज क्षीण होऊ लागला आणि नर्मदे हर चा जप ऐकू येऊ लागला… बॅग्राऊंड ला मैया ची आरती..अडीच तास कसे निघून गेले समजलं नाही… माझ्याकडून चक्क जप करवून घेण्यात आला होता!! माझं भान हरपलं होतं की काय, ते माहीत नाही… पण आरतीसाठी आश्रमात माझी शोधाशोध सुरु झाली, मी बाहेर गेल्याचं कुणीतरी माझ्या सोबतच्या मंडळी ला सांगीतलं आणि मला बोलावायला सुरेखा ताई आली तेव्हा समजलं की अडीच तास निघून गेले आहेत…. नर्मदे हर चा जप आणि आरती अजूनही हळू आवाजात ऐकूच येत होती….मग मला मोठ्या महारांजाच्या आरती मधले शब्द आठवले.. “मन हे स्थीर करूनी पहा, रेवा तीरी सद्गुरू ला”….हा अनुभव खूप वेगळा होता, आणि हवाहवासा पण! मात्र पुढच्या अनुभवात म्हणजे राजघाटच्या प्रवासात “जे याचि देही याची डोळा” बघता आलं ते काही औरच होतं… प्रवास आणि तो अनुभव, पुढच्या लेखात सांगते.
©सुरूची नाईक
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १७
नर्मदे हर
आम्ही दत्तवाड्याहून पुढे निघालो तेव्हा थोडा उशीरच झाला होता. मयूरेश दादा सकाळी लवकर उठून पुढे निघून गेले होते. आम्ही बाकी मंडळी नंतर निघालो. त्यात गंमत अशी तेव्हा आमच्या सोबत अलकाताई कुलकर्णी पण होत्या. त्यांचा दंड आश्रमातच राहिल्याचं सधारण ४ किमी अंतर पार करून झाल्यावर लक्षात आलं. आता काय करायचं? उलटं परत जाणं शक्य नाही! एकटी बाई जाईल तरी कशी आणि थांबेल तरी कशी? मग थोडं थांबलो, तिथे रस्त्यावरून एक गावकरी माणूस सायकल वर जात होता, त्यानी ओळखलं की काहीतरी अडचण या परिक्रमावासींना आलेली आहे. त्यानी विचारलं आणि लागलीच म्हणाला ‘आप चलते रहो, आपका दंड मै सायकल से ला देता हू…!’ बिचारा आमच्यासाठी चार किमी गेला आणि दंड घेऊन आला.
खरं तर गावागावातून मार्ग दिला होता तसं आम्ही दही बेडा, पिप्लोद, देदला, कसरावद मार्गे राजघाट ला जायचं ठरवलं आणि कसरावद पर्यंत आलो देखिल. इथून पुढे एकलदा आणि राजघाट. आणि राजघाट हून पुढे सुरु होणार परिक्रमामार्गातला सगळ्यात कठीण रस्ता, शूलपाणीची झाडी. पण गंमत माहितीये का, हा राजघाट पर्यंतच रस्ता काही साधा सुधा नक्कीच नव्हता. आम्हाला तरी तो शूलपाणी झाडी सारखाच कठीण वाटला.
कसरावद नंतर एक वाट शेतातून जाते. तिथे पुढे एक आश्रम लागतो. त्या आश्रमापर्यंत आम्ही नीट पोहचलो, तिथे आश्रमातले स्वामिजी नव्हते म्हणून तिथे जास्त थांबलो नाही आणि राजघाटला लवकर पोहोचता यावं हा हि एक हेतू होताच.. पण असं होत नसतं…इथून पुढचा रस्ता एकट होता, दोन्ही बाजूला बाभळीची जाळी होती आणि त्याहून गंमत म्हणजे दर पाचव्या मिनिटाला दोन फ़ाटे.. कुठे जायचय काही काळायला मार्ग नाही. मग आम्ही लोकांच्या पाऊलखूणा बघायला सुरवात केली, जिकडे जास्त चपला जाताहेत तिकडे जाऊ, असं ठरवलं आणि एक दोन दा तरी गोल चक्कर मारून परत होतो त्याच जागी आलो. तसं पाऊलखूणा बघण ही काही चांगली कल्पना नव्हती कारण या कल्पनेमुळेच पुढे आम्हाला वेगळ्य़ाच भयाला बळी पडावं लागलं. झालं असं की चपलांच्या खुणा बघता बघता मला, स्मिताला आणि पसारकर काकांना बिबट्याच्या पाऊलखुणाही दिसल्या. माणसापेक्षा त्या जास्त होत्या…आणि आम्हाला वाट सापडत नव्हती, पण तो तिथला चांगलाच जाणकार असला पाहिजे असं आमचं मत होतं. मग आता सोबत राहायचं, फ़ारसं मागेपुढे व्हायचं नाही वगैरे निर्णय घेतले.
लहानपणी आपण काही गोष्टी फ़ार मन लावून करतो. माझी वाचनाची आवड माझ्या बाबांनी अगदी जीव तोडून पुरवली होती. बाकी आय़ुष्यात त्याचा फ़ायदा ही झाला पण नेमकं नको अशा ठिकाणी मला मी लहानपणी वाचलेले “रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता” आणि जिम कॉर्बेट च्या वगैरे कथा आठवून गेल्या. मग आम्ही सगळे नर्मदे हरचा जप करत निघालो. सुदैवाने फ़ोन ला रेंज आली आणि मयुरेश दादाला फ़ोन केला… तो एकटा गेला असावा इथून या विचारांनी सुद्धा थरकाप झाला. पण त्याला देखिल सोबत मिळाली होती. त्याला जसं जसं आठवेल तसं तसं तो सांगत होता आणि तसं तसं पुढे सरकत होतो. मात्र रेंज गेली….
आता आम्ही किती दूर आहोत, कुठल्या दिशेला जायचय काहीही माहित नाही. अशा वेळी विजेचे दूरवर दिसणारे टॉवर फ़ार मदतिला धावून येत असते. आम्ही टॉवर च्या दिशेने चालू लागलो पण ते खूप दूर होते. आम्ही संध्याकळपर्यंत तिथे पोहोचू शकणार नाही असं वाटत होतं आणि रात्र इथे काढण्याबद्दल विचार करणं ही भयंकर होतं. आम्ही नर्मदे हर इतक्या मोठ्याने म्हणत होतो की जेणे करून ते त्या प्राण्याला ऐकू जावं आणि हो त्या मैयाला पण! तो येऊ नये आणि तिनी धावून यावं ह्या दोन इच्छा प्रबळ होत्या अगदी. झाली, त्यातली एक इच्छा पूर्ण झाली… तसं पाहता त्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या..
झालं असं की दूरून एक पांढऱ्या रंगाचं पण मळकट धोतर घातलेला, अतिशय काळा सावळा… अगदी दगडासारखा काळ्या रंगाचा, डोक्यावर टोपी घातलेला आणि धुळीने माखलेला एक माणूस समोरून येताना दिसला.त्याला पाहून इतकं शांत वाटलं म्हणून सांगू! तो जसजसा जवळ येत होता तसं तसं त्याच्या चेह-यावरच स्मितहास्य खूप ओळखीचं वाटत होतं.. त्याच्या डोक्यावरची टोपी ही क्षणभर मला मुकुटासारखी वाटून गेली… काही समजलं नाही मात्र मन प्रसन्न झालं. आता हा आपल्याला मदत करणार असं वाटायला लागलं. त्याच्याशी बोलावं इतका जवळ तो अजून आला नव्हता.. मात्र तो जवळ आला तो क्षण माझ्यासाठी खूप वेगळा आणि खूप अनपेक्षीत होता..
तो जवळ आला तसं आम्ही सगळेच त्याच्यावर तुटून पडतो की काय या आवेशात राजघाटचा चा रस्ता विचारू लागलो.. आम्ही ३-४ जण एकदम बोलल्यामुळे त्याला कळलच नसणार काही आणि म्हणून तो काही बोललाच नाही मात्र कमरेवर हात देऊन उभा राहिला….
तो काळा सावळासा माणूस, हात कमरेवर, डोक्यावर टोपी, जी मला काही क्षणापूर्वी मुकुटासारखी वाटली होती, तो शांत मुद्रेने हसत होता… मी अवाक होते, काकांनी त्याला पत्ता विचारला… तो म्हणाला “अगले गाव तक मै आपके साथ चलता हू”… मी पसारकर काकुंकडे पाहिलं आणि आम्ही दोघीही एकमेकिंकडे पाहून काय म्हणालो माहितीये? अगदी काहिही न ठरवता, न चर्चा करता आमच्या दोघींच्या तोंडून काय निघालं माहितिये?.. मी म्हणाले “पंढरीचा विठोबा असावा तसाच आहे गं हा….विठोबा आला धावून!” आणि पसारकर काकू काय म्हणाली माहितिये? “पांडूरंगा…आलास बाबा”! त्या माऊलीकडे पाहून आम्हा दोघींना एकाच वेळी तो आठवावा आणि एकाच वेळी हे असे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडावे! आम्ही दोघींनी फ़क्त हात जोडले, आणि त्या माऊलीच्या मागे मागे जाऊ लागलो. ठरल्या प्रमाणे त्या विठू ने आम्हाला पुढच्या पाड्यापर्यंत सोडले. पाच सहा घरं जेमतेम असतील नसतील..पुढे जंगल कायम..पण आता जंगल विरळ होतं आणि पाठिमागे माणसांची वस्ती आहे हे माहित होतं त्यामुळे घाबरायला झालं नाही. टॉवर मात्र अजूनही थोडं दूर होतं.. त्या टॉवर चा शोध घेत घेत आम्ही कसं तरी राजघाट च्या रेवाश्रय गोशाला आश्रमात एकदाचे येऊन पोचलो.
इथे छानसं मंदिर होतं तिथेच आसन लावलं. इथून पुढे शूलपाणीची झाडी लागणार होती. आम्ही ट्रायल आताच पाहिली होती. त्यामुळे सगळ्यांनी सोबत राहयचं, गरम कपडे असू द्यायचे, औषधं असू द्यायची असं काही बाही सगळेच जण आपसात बोलत होते. माझ्याकडे स्लिपिंग बॅग तर होती मात्र सतत कोंबून ठेवल्याने ती विरळ झाली होती आणि जमिनीवर अंथरली असताना खालून पाठीला फ़ार थंड लागायचं.. अर्थात राजघाट पर्यंत मला त्याचं फ़ार वाट्लं नव्हतं मात्र झाडीत फ़ार थंडी असते, शिवाय झाडी मुळे काही मिळत नाही असाही एक विषय होता, त्यामुळे काही घ्यायचं असेल सामान तर ते इथेच किंवा बडवानी लाच घ्यावं लागणार होतं. सोबत फ़ारसा पैसा नव्हता. शिवाय झाडीत लूटमार होते, इथले आदिवासी लोक लुटून घेतात… अगदी बरेचदा अंगावर कपडा पण ठेवत नाहीत असं ही आधी वाचलं ऐकलं होतं. झाडीतून जायचं की नाही, हा ही एक विषय होताच मात्र काहिही झालं तरी झाडीतूनच जाईन असा माझा विचार पक्का होता. कोणते रस्ते उघडे आहेत आणि कोणचे बंद, हे ही अजून नक्की माहित नव्हते. धरणामुळे पाण्याची जी पातळी वाढते त्यामुळे बरेच रस्ते पाण्याखाली गेले होते असं समजलं होतं.
तसा राजघाट चा काही भाग पण डूब मधे होता, म्हणजे पुढे कधी इथे आल्यास तो दिसणार नाही हे माहित होतं. मी ज्यावेळी परिक्रमेचे इतरांचे अनुभव फ़ेसबुक किंवा इंटरनेट वर वाचायचे नं तेव्हाचे काही फ़ोटॊ माझ्या डोळ्यासमोर होते. एक दत्ताचं मंदिर मी पाहिलं होतं… ते पाण्याखाली जातानाचे फ़ोटो कुणितरी अपलोड केले होते पण मला काही केल्या त्या गावाचं नाव आठवेना. मात्र ते मंदिर आपल्याला बघायला मिळणार नाही कारण ते पाण्याखाली गेलं आहे हे मला माहित होतं. सुंदरशा पाय-या, समोर खांब, आतमधे संगमरवरी फ़रशी, गाभा-याला पण पाय-या आणि आत एकमुखी दत्ताची रेखीव मुर्ती असं ते पाण्याखाली गेलेलं मंदिर!..पण मला ते बघायला मिळनार नव्हतं आणि ते कुठे होतं ते मला अजिबात आठवत नव्हतं… जेव्हा जेव्हा डूब हा शब्द मी ऐकत असे तेव्हा तेव्हा मला ते मंदिर आठवायचं….राजघाट च्या या सगळ्या गोष्टी सुरू असतानाही डूब चा विषय निघत होता आणि ते मंदिर मला सारखं आठवत होतं…. आणि अचानक ते मंदिर आठवून मला खूप हळहळ वाटू लागली…अगदी आधी वाटली असेल नसेल त्याहीपेक्षा जास्त. मझ्या हातात हळहळण्या पलिकडे काहीही नव्हतं.
संध्याकाळी मैयापूजा करायला आम्ही मैयावर जायचं ठरवलं. अंधाराच्या बरच आधी मैयावर जायचं होतं. साधारण दोन अडीच किमी अंतर असेल, फ़ार नाही. आम्ही मैयावर जायला गेलो तेव्हा कुणीतरी म्हणालं, नागपूरची एक बस पण परिक्रमावासिंना घेऊन आली आहे आणि मैया किनारीच्या आश्रमात त्यांचा मुक्काम आहे. मनात एकदम आपुलकी ची भावना निर्माण झाली आणि त्यांना भेटायचं ठरवलं…. त्यांच्या आश्रमात जाऊन दोन चार शब्द बोलावे, छान वाटेल.. असं वाटलं आणि मनात विचार आला “ आज काहीतरी छान होणारे, आपल्या नागपूरची मंडळी भेटतात आहे हे तर आहेच पण अजूनही काही तरी नक्की होणारे छान”… कदाचित त्यात कुणी ओळ्खीचं भेटणार असेल, काय माहित नाही पण असे विचार मनात येत होते…आणि असच झालं देखील… मला तिथे गेल्यावर नागपुरची मंडळी भेटली पण अजून एक मोट्ठी भेट झाली…अगदी अशी की मी नकळत रडू लागले…. कोण भेटलं असेल तिथे मला? माझे आई वडील?.. नाही… पण तसच कुणी… खूप खूप जवळचं… सांगते पुढच्या म्हणजेच १८ व्या भागात. अजूनही अनुभव आलेत राजघाटला… सांगते सांगते…. थोडा वेळ द्या मला.. तोवर ..नर्मदे हर!
सुरूची नाईक – विदर्भ गट
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १८
नर्मदे हर.
राजाघाट ला मैया किनारी जाऊन संध्याकाळची आरती करायची होती. नागपूर हून काही मंडळी बस ने आली आहे ते समजलं , त्यांनाही भेट द्यायची होती. मी मैयाकिनारी जायला निघाली. कुणीतरी सांगीतलं होतं हा भाग पण डूब मधे जाणार आहे, इथलं मंदिर खूप छान आहे, त्याचं दर्शन घ्या, कदाचित पुढ्च्या वेळी ते दिसणार नाही. आणि असं सांगितल्यावर फेसबुक वर पाहिलेलं मंदिर मला आठवलं, जे मला आता बघायला मिळणार नव्हतं. मी मंदिरात जायचं पक्क केलं, आणि त्यादिशेने चालू लागले. ज्या क्षणी ते मंदिर माझ्या नजरेच्या ट्प्प्यात आलं त्याक्षणी माझे डोळे पाणावले. हे तेच मंदिर होतं जे पाण्याखाली गेलं असल्याचे फ़ोटॊ मी फ़ेसबुक वर पाहिले होते. राजघाट च्या पलिकडच्या तीरावर चिखलदा म्हणून गाव आहे, तिथून राजघाट ला जोडणारा एक पूल आहे, तो बराच उंच होता, तरीही त्या पुलावर पाण्याची पातळी मागच्या वर्षीपर्यंत गेली असल्याने तो पूलही, आणि ते मंदिर पाण्याखाली गेलं होतं मात्र पाणी ओसरून यावर्षी ते बघण्याची संधी आम्हाला मिळालेली होती. तोच प्रकार चिखल्दाच्या मंदिरा बाबतीतही घडला, जिथे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी चातुर्मास केला होता. तेही मंदिर डूब मधे होतं आणि अनपेक्षीत पणे दर्शन झालं.
खरं तर हा डूब प्रकार मला अजिबात आवडलेला नाहीये. आपली संस्कृती, आपली देवळं, अनेक लोकांची घरं, अनेकांच भावविश्व जिथे रमलं त्या जागा, आठवणी, आयुष्य सगळं सगळं विस्कटत जाते असे मला वाटते…असो, हा वेगळा भाग झाला. आणि हो चिखल्द्याचे अनुभव पण आपण चिखल्द्यात पोचलो ना, झाडी आणि समुद्र पार करून की मग सांगेन.
तर आता आधी राजघाट चं हे मंदिर! इथली दत्तमूर्ती बघून रडूच आलं..वाटलं आपल्याला दर्शन देण्यासाठीच महाराजांनी आणि मैयानी सोय केली आणि पाण्याखाली गेलेलं मंदिर आपल्याला बघता आलं. शूलपाणेश्वराचं मंदिर मात्र बघता आलं नाही.. त्या ठिकाणी पूर्ण पाणी आहे आणि नवीन मंदिर बांधलेलं आहे दुसरी कडे…. पण ह्या राजघाट्च्या मंदिराचं आणि दत्ताचं दर्शन मात्र
झालं….”भेटीलागी माझे मन उतावीळ, कधी मी पाऊले पाहीन डोळा” असं काहीसं मन या मंदिरासाठी विव्हळत होतं, ते फेसबुक वरचे फोटो पहिल्यापासूनच अगदी…. झालं पूर्ण!
आता त्या नागपूरच्या मंड्ळींबद्दल सांगते. कधी नागपुरात असताना त्या माऊलींचं दर्शन नाही, ओळख नाही. मी नागपूरची म्हटल्यावर सगळी मंडळी माझ्याभोवती जमा झाली, अर्थात नागपुरात कोण कुठे राहतात याची चौकशी झाली. आणि मग, “तुम्ही आता झाडीत जाणार, काही सामान नागपूरला पाठवायचं असेल तर आमच्या जवळ द्या, तुमचा पत्ता द्या, आम्ही घरपोच करून देऊ” असं आश्वासन दिलं. आमच्या नागपूरची लेक म्हणून मंडळींनी थोडे थोडे एकत्र करून ५०० रुपये दिले. आणि हे मैयासाठी आहे, यातून तुम्हाला लागेल ते खर्च करा असे सांगीतले. निरोप घेताना त्यातल्या एक मध्यमवर्गीय बाईना रडू आलं. “मला पण पायी करायची होती पण तब्ब्येतीमुळे होऊ शकत नाही तेव्हा आता तुम्ही नक्की करा असं त्या म्हणाल्या”…तेव्हा वाटलं, जाणवलं ही संधी मिळणं किती भाग्याचं आहे ते..
राजघाटला आम्ही दोन रात्री होतो. रस्ता कोणता घ्याययचा यावर चर्चा सुरू होती. पाणी कुठवर आहे, येवढ्यात पातळी वाढणार आहे का? कुणाकुणाची तब्ब्येत साथ देणार नाही असे वाटते, वगैरे अनेक गोष्टींवर चर्चा सुरू होत्या. मला लेप्याच्या मांगीलाल चा फोन आला. तो म्हणाला “ दिदी, मेरे जमाई पुलीस मै है और वो पेट्रोलिंग का काम करते है. उन्हे रास्ते की जानकारी है. वो आपसे मिलने आयेंगे, पर थोडा लेट होयेगा” आता संध्याकाळ्चे ८ वाजून गेले होते, आता कधी येणार हा माणूस? म्हंटलं ९ पर्यंत आला तर येईल, नाहीतर उद्याच येईल किंवा रस्त्यात भेटेल कुठेतरी, कारण ९ नंतर, रात्री जंगल रस्त्यातून इतक्या दूर कसं शक्य होणारे त्याला…. तसच झालं, मांगीलाल चा जावई काही ९ पर्यंत आला नाही. भोजन प्रसादी घेऊन आम्ही गाढ झोपी गेलो. आणि रात्री अकरा वाजता मला फोन आला, “ दिदी मै मांगीलाल का जमाई, वो आपसे मिलना था” मी म्हंटलं, कोई बात नही आप कल कहीं मिल लेना, या फोन पे ही बात करना, आपको बहोत दूर से आना पडता होगा, इसलिये नही आये तो भी चलेगा”..तो काय म्हणतो माहितिये? “दिदी मै आश्रम आगया हू, आप बाहर आजाते तो मिलना हो जाता”…बाई ग, रात्री अकरा वाजता हा माणूस मला भेटायला आणि रस्ता समजवऊन द्यायला आला होता. “किधरसे आये” असं विचरल्यावर समजलं, तो २५ किमी गाडी चालवून मला भेटायला आला आणि आता पुन्हा २५ किमी गाडी चालवून परत जाणार….” त्याला म्हंटलं मी “ आज यही रुक जाओ, आसन की व्यवस्था हो जायेगी” तर नाही म्हणाला, मला रस्ता समजवून सांगितला, लिहून दिला आणि जाताना साधारण किलोभर फरसाण सगळ्यांसाठी देऊन गेला…. किती जीव लावतात ही लोक? कसे उपकार फ़ेडायचे यांचे?
अरे हो, एक अनुभव सांगायचा रहिलाच. मागच्या अनुभवात आमचे रस्ते वेगळे झाल्याचं सांगितलं होतं ना, तेव्हाचा अनुभव बरं का! मी आणि सुरेखा ताई वेगळ्या रस्त्याने गेलो आणि बाकी मंडळी वेगळ्या रस्त्याने, आठवतय न? तर त्या वेगळ्या रस्त्यावर बाकी मंडळीना कुणीतरी भोजन प्रसादीला बोलावलं होतं. आमच्या पसारकर काकू म्हणजे अगदी सालस आणि प्रेमळ बाई. तर त्यांना ज्या घरी जेवायला बोलावलं तिथे त्यांच्या स्वभावामुळे की काय माहित नाही पण ते कुटुंबीय काकुंना आजी म्हणूनच संबोधू लागले..खूप जीव लावला त्यांनी..इतका की १५ किमी अंतर असेल त्यांच्या गावाहून राजघाट, इथे आम्हा सगळ्यांसाठी ते डबा घेऊन आले. वीस-एक लोकांचा डबा, त्यात उपासाचं वेगळं आणि जेवायचं वेगळं, आणि हे सगळं ताजं गरम करून गाडीवर आणलं, जेवण होईस्तोवर ते दोघं बापलेक, म्हणजे मोनिका आणि तिचे बाबा हे थांबले, आणि मग घरी गेले. अहो इतकच नाही , पुढचे ३ दिवस आणि त्यांच्या घरापासून ४० किमी पर्यंत ते आमच्यासाठी डबा आणत राहिले.. कोण हे लोक? काय संबध आमचे त्यांचे? पण नाही…काय संबध असं म्हणून चालायचे नाहीच, कारण त्याशिवाय का कुणी इतकं करतं? आणि ते आमचा आधार! ती आमची अन्नपूर्णा, आणि ती आमची नर्मदा माई… संबध कसा नाही म्हणायचा!
आता शूलपाणीच्या झाडीची तयारी करायची होती. थंडी फ़ार असणार होती. माझ्याजवळ स्लिपिंग बॅग होती खरी पण ती थोडी आतल्या आत गोळा झाली होती, झाडीच्या थंडीत तग धरणार नाही आणि जमीन थंड लागेल हे समजलं होतं, म्हणून एक स्लिपिंग शीट घेणं गरजेचं होतं. इतरांनाही तसं थोडं फ़ार सामान लागणार होतं. पण इथल्या मार्केट मधे सामान मिळालं नाही. आणि आता पुढे कुठ सामान मिळेल हे आम्हाला माहित नव्हतं. मग फोनाफोनी सुरू झाली आणि कुठून तरी हे सामान इथेच राजघाटला मागवून घेता आलं तर? असा विचार आला. स्मिताच्या मिस्टरांच्या ओळखीतून पुढे ओळख काढत काढत कुणीतरी एकजण सापडला, आणि तो सामान राजघाट पर्यंत आणून द्यायला तयारही झाला.. चला म्हणजे सामान मिळणार, पण गंमत माहितिये का, माझ्याकडे जास्त पैसेच नव्हते! आता याला त्याला मगून मला पैसे द्यावे लागणार होते, पण कुणाकडे किती असतील देवजाणे…मी मैयावर सोडून दिलं!..
सामान आलं, गरजेपेक्षा खूप चांगल्या प्रतीचं आणि रिजनेबल रेट मधे सामान आलं होतं. माझ्याकडे पुरेसे पैसे नव्ह्तेच, मी त्याला विचारलं? “आपके अकाउंट मे जमा करवा दू, मेरे पास पैसे नही है, मेरे हस्बंड आपके अकाउंट मे जमा करा देंगे” तो ही हो म्हणाला…चला काम जमलं खरं, पण असं होत नसतं.माझ्या मिस्टरांचा काही केल्या फोन लागेना.. तो दुकानदार म्हणाला “आरामसे देना दिदी कोई जल्दी नही है”.. त्याचं ठिक आहे हो पण आपलं काम आहे न देणं? हा माणूस आपल्याला ओळ्खत नाही तरीही आपाल्याला “दिदी आरामसे देना” असं म्हणतो, म्हणजे दिदी त्याचे पैसे बुड्वणार नाही हा केवढा विश्वास! पुढे तर झाडी म्हणजे किती दिवस फोन बंद असणारे माहित नाही! काय करावं सुचेना, आणि अशातच माझ्या एका सरांचा मला फोन आला. मी त्याना माझ्या मिस्टरांना निरोप द्यायला सांगितलं आणि ह्या दुकानदाराचा अंकाउंट नंबर पण दिला. आता त्याचा पैसा त्याला मिळेल म्हणून मी निश्चिंत झाले. नंतर ज्यावेळी फ़ोन लागला त्यावेळी मी “पैसे दिले का?” असं विचारलं तर सचिन (माझे मिस्टर) म्हणाले मला निरोप मिळालाच नाही… वाटलं सर विसरले असतील, म्हंटलं या दुकानदाराला सांगते असं असं झालय, मी देते तुझे पैसे, असं म्हणून फोन केला तर त्याचे पैसे त्याला त्याच दिवशी मिळाले होते… माझ्या सरांनी ते दिले होते… त्यांना फोन केला तर “माझ्याकडून काहितरी फ़ुल ना फ़ुलाची पाकळी, म्हणून मीच दिले ते पैसे” असं सरांनी सांगितलं! मला हवं असलेलं सामान असं मैयानी मला कसं दिलं बघा!
शेवटी एकदाच सगळं सामान वगैरे झालं.. आता उद्या निघायचं, बडवानी गणेशपुरा भवती असा मार्ग होता, बडवानी ला न जाण्यापेक्षा आतून पायवाटेने जाऊ वगैरे गोष्टी झाल्या… पण आपण ठरवतो तसं होत नसतं. आता हा प्रवास झाडीतून होणार होता. आम्ही काय होतं आणि काय अनुभव गाठीशी येतात यासाठी आतूर झालो होतो, कारण शूलपाणीची झाडी हे मैयाच हृदयस्थान आहे… तिथे ज्या ज्या अनुभूती येतात त्या खूप प्रभावी आणि अदभूत असतात.. या झाडीत असे खूप अनुभव आले… परिक्रमेत पहिल्यांदा २२ किमी चालून आम्ही भवती पर्यंत पोचलो, पण हा प्रवास आणि हा मुक्काम ..इथून पुढे पण झाडीचा सगळाच प्रवास आणि मुक्काम कधी अंगावर शहारे आणणारा तर कधी कृतकृत्य करून सोडणारा, आणि कधी आकलना पलिकडचे असेच आहेत.. एक एक अनुभव सांगते, पुढ्च्या भागात.
नर्मदे हर
©सुरूची नाईक – विदर्भ गट
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग १९
नर्मदे हर
राजघाट ते भवती या प्रवासात मला खूप कमी बोलावंसं वाटू लागलं. अचानक काय झालं माहित नाही पण बोलूच नये किंवा रीअॅक्ट होऊ नये कशावर, नुसतं आतल्या आत बघत राहावं असं वाटू लागलं.. कदाचित माझ्यातील आवेष, माझ्यातील नकारात्मकता, माझा माझ्यावरच्या ताबा या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पडताळून बघाव्या असं काही मैया मला सुचवत होती का माहित नाही. मीच लिहिलेल्या एका अभंगाच्या ओळी मला राहून राहून आठवू लागल्या.
अरे किती उधळण। किती आतुरले मन
जरा घालावे कुंपण। आतल्या आत॥
आता पुरे वणवण। तृप्ती पाहिलेसे का।
माझे मज समाधा। आतल्या आत॥
ब-याच चढ उतारांचा हा रस्ता होता. तसं मनाचे ही चढ उतार जाणवत होते पण समजत मात्र नक्की नव्हते. ही उदासीनता नव्हती हे मात्र नक्की. माझं मन उदास नव्हतं पण अंतर्मुख होतं हे निश्चित!एखाद्या वाटेवर अनाहूत पणे पावलं पडत राहतात तसं काहिसं होत होतं. हे वेगळं होतं काहितरी…. जेव्हा आपल्याला काही समजत नाही तेव्हा ते मैयावर सोडून द्यायचं… मी ही तेच केलं..
“खरच अहंकार हा फ़ार इतस्तत: पसरलेला रोग आहे, आणि मी यातून सुटले नाहीये..या रोगाची लागण आपल्याला सातत्याने होत असते आणि जिथे मनाला हा रोग जडला तिथे त्याची अवस्था कमकुवत होत जाते, आणि तोकड्या फ़सव्या अहंकाराच्या आधाराची वाट बघत आणि शोधत आपण कसल्याश्या खोल दलदलीत सापडत जातो” हे असे विचार माझ्या मनात रेंगाळत होते. मला अहंकार होता का? किंवा अजाणतेपणी तो गळून पडत होता का? माहित नाही, पण मैया वर सोपवलं की ती करते काहितरी… दिवसभर हे वेगळं फ़िलींग मनाला चिकटून राहिलं खरं पण मुक्कामाला आल्यावर मात्र हे अनाकलनीय वेगळं वाटण काय आहे याचा अंदाज आला. “शूलपाणी ची झाडी हे मैयाचं हृदय आहे आणि तिच्या हृदयातून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्या हृदयात हालचाल झाल्याशीवाय राहील का?” असा विचार माझ्या मनात आला आणि अचानक अनाकलनीय अनुभवाचं आकलन झालं. आणि हो, हा विचार मी केलाय असं मला वाटत नव्हतं, म्हणजे कुणीतरी हा विचार माझ्या मनात टाकलेला आहे मला समजत होतं.
भवती ला येण्या आधी आम्ही गणेशपु-राला भोजन प्रसादी घेतली.आधी तिथेच थांबायचा विचार केला होता पण सगळ्यांच्या मातानुसार पुढे आलो. इथे भवती ला एक किराणा दुकान आहे. त्याचा पत्ता आम्हाला कुणीतरी सांगितला. ह्या दुकानदाराचं दुकान आणि घर मोठं होतं. पण त्यानी आम्हाला घरात घेतलं नाही. दुकानासमोरच्या पाय-या आणि ओटा होता तिथे थांबा असं त्यानी सांगीतलं. आश्चर्य वाटलं. इतकं मोठं घर होतं की आम्ही सगळे त्यात सहज मावणार होतो, पण नाही. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदाच अशाप्रकारे उघड्यावर झोपलो होतो. ही सुरवात होती. पुढे शूलपाणीची झाडी असो की पुढची परिक्रमा, आता असं झोपावं लागू शकतं, ह्याची ही पूर्वतयारी. जेवणाचं ही तसच! तो दुकानदार म्हणाला “भोजन व्यवस्था नही है” आणि आज आम्ही तब्बल २२ किमी चाललो होतो. दुपारी गणेशपु-याला मोनिका आणि तिचे बाबा डबा घेऊन आले होते त्यातलं थोडं अन्न शिल्लक होतं, आणि गम्मत म्हणजे “मैया जी अब मै घर नही लेकर जाउंगा खाना, आप साथ रखो” असा आग्रह आज मोनिका च्या बाबांनी केला होता. गेले तीन दिवस ही दोघं जण आमच्या साठी डब्बा आणत होती (राजघाट ला पण आली होती, मागच्या अनुभवात सांगितलय, आठवतय न?), आज ती दोघेजण ४० किमी गाडी चालवून डब्बा घेऊन आली होती… आता उद्या यायचं नाही हे वचन घेउन त्या दोघांना आम्ही परत पाठवलं होतं. तर त्यानी दिलेलें थोडंसं अन्न म्हणजे काही पोळ्या आणि भाजी आम्ही कागदात गुंडाळून घेतली होती, आमच्या बरोबर एक तावसे दांपत्य पण होतं, त्यांनाही कुणीतरी भाजीपोळी बांधून दिली होती, आणि आम्ही अन्नाची जमवाजमव करतोय हे पाहून त्या दुकानादाराच्या बायकोनी त्यांच्या घरच्या सकाळ्च्या पोळ्या आणि बेसन असं अन्न आम्हाला दिलं. आजची भोजन प्रसादी अशी पार पडली… आणि अशा भोजनप्रसादीची ही पहिलीच वेळ!..आज पहिल्यांदाच आम्ही जवळ अन्न ठेवलं होतं आणि ते ही आग्रहाखातर! आम्हाला आज जेवायला मिळनार नाही हे कदाचित नर्मदा माईला माहित असावं, म्हणून तिने तसा आग्रह करवला त्या मोनिका च्या वडीलांकरवी!
आम्ही उघड्यावर झोपलो पण फ़ारशी थंडी वाजली नाही. शूलपाणी च्या झाडीतला पहिला दिवस पार पडला. खरं तर दिवस येतो आणि आल्यापावली काही अनुभव देऊन निघून जात असतो, त्या दिवसाने दिलेले अनुभव चांगले किंवा वाईटही असू शकतात, आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आणि प्रारब्ध आधीच लिहिल्या गेलेलं असतं. त्यामुळे जे समोर येइल स्वीकारणे हाच एक मार्ग असतो. मग ते आनंदानी करा का दु:खाने, स्वीकार करावच लागणार!..असो
आता पुढचा टप्पा म्हणजे बोरखेडी. हीरालाल रावत चं घर. हा आणि इथून पुढचा भाग हा आदिवासी लोकांचा. पण अनुभव सांगण्या आधी त्या आदिवासींबद्दल लोक जे ऐकून आहेत ते सांगते, आता झालेला बदल सांगते आणि आधीच्या घटनांचं कारण ही सांगते. तर हे इथेले आदिवासी म्हणजे “मामा” परिक्रमा वासींना लुटून नेतात हे आम्ही ऐकून होतो. अर्थात आधी तसं व्हायचं देखिल! अगदी अंगावरच्या कपड्यासह लोकांना लुटून नेण्याचे अनुभव ऐकलेले आहेत. मात्र पुढे या लोकांना मदतही मिळत असे. असं का व्हायचं तर हा अतिशय गरीब आणि दुर्गम भाग. इथे सगळीच कमतरता, तेव्हा येणा-या जाणा-याला लुटून पैसा मिळतो हे एक कारण आहेच! पण यामागचं आध्यात्मिक कारण वेगळं आहे असं सांगितल्या जातं.
ह्या आदिवासिंना “मामा” असं म्हणतात. मामा म्हणजे आईचा भाऊ. हे मैयाचे भाऊ, पण मग हे लूटतात कशासाठी? तर तुम्ही परिक्रमा करता म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडे आलेले असता. लहान मूल आईकडे येतं तेव्हा ते आपला लवाजमा घेऊन येत नाही कारण आपल्या सर्व गरजा आई पूर्ण करणार आहे याची त्याला खात्री असते. किंबहूना आपल्या गरजा काय आहेत हे आपल्यापेक्षा आईलाच माहित आहे हे ही त्या बाळाला महित असतं. मग तुम्ही आईकडे आला आहात, तर तिच्यावर विश्वास ठेवा, असं म्हणून हे मामा लोक तुम्हाला लुटून घेतात आणि त्यानंतर तुम्हाला जी मदत मिळते त्यामुळे तुमचा तुमच्या आईवरचा विश्वास वाढतो.. तर असं हे कारण!
तर जेव्हा आम्ही हीरालाल कडे आलो तेव्हा तिथे आधी ही बरेच परिक्रमावासी होते. म्हणजे एकूण ३० तरी लोक असतील. तसा हा हीरालाल म्हणजे मामांपैकीच एक असंही समजलं पण त्याच्याकडे पाहून असं अजिबात वाटलं नाही. त्याच्या अंगणात त्यानी मांडव घातला होता आणी सगळ्या परिक्रमा वासियांची आसन लावण्याची व्यवस्था तिथे केली होती. हिरालाल चं एक दुकानही होतं, तिथे छोट्या मोठ्या वस्तू मिळतात. ३० एक परिक्रमावासी एकत्र आल्यानंतर भजन, भक्तिगीतं , हरीपाठ असं म्हणत म्हणत भोजन प्रसादीची वेळ आली. आज भोजन प्रसादी ला चक्क दाल बाटी आणि हलवा होता! शूलपाणीच्या झाडीत, जिथे मामा लोक लुटून घेतात वगैरे कथा ऐकल्या होत्या तिथे आम्हाला पंचपक्वान्नांचं जेवण मिळत होतं. आमचे मोबाईल चार्ज करायाला भरपूर जागा होती, शिवाय कुणाला काही हवं आहे याची चौकशी पण हीरालाल भाई अगत्याने करत होते! शूलपाणीतही असा अनुभव येईल असं अजिबात वाटलं नव्हतं, विशेषत: कालच्या भवती च्या अनुभवानंतर तरी!.. पण असं होत नसतं… आपण जे ठरवू, किंवा जसा विचार करू त्यापेक्षा नक्कीच वेगळंच असं आपल्या समोर येतं… या झाडीमधे आलेले अनुभव आश्चर्य चकित करणारे होते. असं म्हणतात की इथे नर्मदा मैया दर्शन देते. असं म्हणतात की इथे सप्त चिरंजीव दर्शन देतात…. खरच असं होतं का…आठ दिवस हा झाडीचा प्रवास होता.. किती आणि कसे अनुभव आले यात?… एकदा तर एक अतिशय दैवी अनुभव आला, आणि चमत्कार च झाला… माझ्या सोबतच्या शक्तींच सोबत असणं हे मलाच नाही तर माझ्या सोबत असलेल्या स्मीता ला पण जाणवलं… त्या शक्ती नसत्या तर हे अनुभव सांगायला मी आज कदाचित शिल्लक राहिले नसते….कशीकाय? सांगते पुढच्या भागात.
©सुरूची नाईक – विदर्भ गट
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती- भाग २०
नर्मदे हर
तर मागच्या भागात मी माझ्या शिल्लक न राहण्याबद्दल बोलत होते. तो अनुभव सांगतेच मात्र त्या आधीही काही झालं, ते आधी सांगते. तर हीरालाल भाईंकडून पुढचा प्रवास अतिशय खडतर असा प्रवास आहे. त्यामुळे तिथे आजकाल लोक पोर्टर करतात. उद्देश असा की ही गावातली मंडळी आजकाल लूटमार करत नाहीत. ती पोर्टर ची कामं करतात. तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचं हे काम, म्हणजे परिक्रमावासींना वजन उचलून जड खडतर वाटेवर चालावं लागत नाही आणि या मंडळींना पण मदत होते.
हा आमुलाग्र बदल झाला एका संताच्या कार्याने. इथे लखनगिरी बाबा म्हणून एक संत होऊन गेले. मामा लोक लूटमार करू नये यासाठी त्यांनी फ़ार कष्ट घेतलेत. असं म्हणतात की ते एक परिक्रमावासी होते आणि त्यांना देखील या मामा लोकांनी लुटून घेतलं. त्यानंतर त्यानी पुढे परिक्रमा केलीच नाही, इथेच राहून ते गावक-यांना समजवू शिकवू लागले व परिक्रमावासींची सेवा ही करू लागले. घोंगसा इथे त्यांचा आश्रम आहे. आता लखनगिरी बाबा नाहीत मात्र लूट्पाट आता बंद झाली आहे.
तर इथे आमच्या सोबतच्या परिक्रमावासींनी पोर्टर केले, मला देखील इच्छा झाली, मात्र त्या क्षणी माझ्या कानात कुणीतरी बोललं “हे काय करतेयेस तू? हे वजन म्हणजे फ़क्त सामानाचं वजन नाहीये, हे तुझ्या कर्माचं ओझं आहे आणि तू असं दुस-या कुणाला देऊ शकत नाहीस”. मी दचकून आजुबाजूला पाहिलं. तिथे कुणीही नव्हतं पण मी हा आवाज ऐकला होता! आता मी पोर्टर करणं अशक्य होतं आणि म्हणून मी काही पोर्टर केला नाही. ती कठीण वाट मी बॅग घेऊनच पूर्ण केली.
घोंगस्याला लखनगिरी महारांजाच्या आश्रमात आलो तेव्हा समजलं, लूट्मार होणारा भाग आता संपला आहे. त्या अश्रमात आसन अशा ठिकाणी लावलं की डोळे उघडले की मैया दिसेल. इथेच याच आश्रमात आम्हाला एकदंत महाराज भेटलेत. एकदंत हे आम्ही ठेवलेलं नाव, ते कोण काय काही माहित नाही. पण अतिशय अवलिया माणूस.. स्वत: मध्ये मग्न असणारा..इतका मग्न की त्याला कुणाच्या अस्तित्वाची कधी काळजी ही वाटली नाही आणी कधी गरजही नाही. उंचपुरा, डोक्याला पागोटं, तोंडात फ़क्त एकच दात (म्हणून आमच्या पैकी एकानं त्यांचं नाव एकदंत ठेवलं), पांढरं धोतर आणि एक झोळी इतकच सामान. कुणी काही दिलं तर खायचं नाही तर कुठून तरी आपली व्यवस्था करून घ्यायची..काळजी नाही… एकदा त्यांना रस्त्यात एक बकरी दिसली, त्यांना भूक लागली असावी. त्यांनी त्या बकरीला पकडलं, दूध काढलं आणि सोडून दिलं.. दुध पिऊन घेतलं आणि झोपून गेले.. असा हा माणूस!
तर हे एकदंत महाराज त्या दिवशी आमच्या बरोबर होते. हे गांजा पीत असत. त्या दिवशी त्यांनी स्वत:च भोजन प्रसादी च शिजवून घेतलं आणि ते लवकर झोपले. आम्हाला झोपायला साधारण ९ तरी वाजले असतील. आमची जेम तेम पहिली झोप झाली असेल नसेल तो आम्हाला वेगळ्या भजनांचा आवाज ऐकू येऊ लागला. आमची पूर्ण झोपमोड झाली.. आम्ही बाहेर जाऊन बघतो तर या एकदंत महाराजांनी ब-याच काट्क्या गोळा करून आणल्या होत्या, त्यांची शेकोटी पेटवली होती आणि हात शेकत हा माणूस भजन गाण्यात मग्न होता. ते भजन गायचं थांबवणार नाहीत हे त्यांच्या हावभावावरून आणि एकदंरीत मग्नतेवरून स्पष्ट जाणवत होतं. आत जाऊन पुन्हा झोप लागणं अशा आवाजात शक्य नव्हतं.. मग काय आम्ही ही त्या भजनांना साथ देऊ लागलो.. करता करता ५ -६ लोक जमलीत आणि रात्री, मैया किनारी, थंडीत, शेकोटीची मजा घेत घेत भजन संध्या पार पडली.. सकाळी ४ वाजता एकदंत महाराज आंघोळी ला गेले, आणि आपलं पूजा अर्चा निपटून पुढच्या प्रवासाला गेले सुद्धा… कसलीही भीती नाही, काळजी नाही की काही काही नाही.. ख-या अर्थाने विरक्ती ला पोहचून भक्तीत मग्न असलेली ही मंडळी, साधू संतच नाही का? तर अश्या प्रकारे एकदंत महारांजाचं दर्शन झालं…पुढेही अधून मधून होत राहिलं.
आता सांगते तो शिल्लक न राहण्याचा अनुभव. रस्ता खडतर होताच. माझे पाय फ़ार घसरत होते. कारणही तसच आहे, इथे या सगळ्या भागात मुरूम आहे, छोटे छोटे गोल गोल दगड ज्याला हिंदीत कंकड असं म्हणतात ते सगळीकडेच पसरलेले, त्यामुळे पाय घसरून कितीदा तरी पडायला होत असे. अशात मी तीनदा पडले आणि दोनदा वाचले. जेव्हा जेव्हा मी पडले तेव्हा तेव्हा मला खरचटलं सुद्धा नाही, आणि त्यात काही विषेश असेल असा विचारही माझ्या मनात आला नाही मात्र ते नंतर जाणवलं की आपण पडून आपल्याला नं लागणं हा काही सर्व साधारण अनुभव नव्हताच. झालं असं की मी जेव्हा जेव्हा पडले तेव्हा तेव्हा माझ्या अंगाला जेवढी धूळ लागली असेल तेवढच काय ते लागणं…लक्षात येतेय का? धूळ लागली माझ्या अंगाला, दगड नाही.. मी ज्या ज्या वेळेला पडले ते जिथे धूळ असेल आणि दगड नसतील अश्याच ठिकाणी पडले होते!
पण नंतर जे झालं ते विलक्षण होतं. एका ठिकाणी थोडासा उतार होता आणि माझा पाय घसरला… खाली चांगली मोठाली दगडं च होती, आणि आता मी पडणार होते, माझं डोकं खाली सुळकेदार दगडावर लागून फ़ुटेल असं माझ्या मागून चालणा-या स्मीताला लक्षात आलं आणि ती कानावर हात देऊन बघत राहीली…हा क्षण होता फ़क्त… समोरचा माणूस आता पडेल हे दिसत असतं पण आपण काही करू शकत नसतो तो क्षण … मी कमरे पासून पूर्ण आडवी झाले आणि आता बस… आदळणार…इतक्यात माझ्या कमरेखाली कुणीतरी आधार दिला आणि स्प्रिंग ची बाहुली कशी झपाट्याने वर येते तशी मी आडव्याची उभी झाले! मला तर तो स्पर्श ही आठवतो, अगदी अजूनही, पण कदाचित माझा भ्रम असं म्हंटलं तरी स्मीताने जे पाहिलं त्याचं काय? ती म्हणाली, “ अग? अशी पडता पडता कशी काय तु अचानक वर झाली?” आम्हा दोघिंनाही त्या क्षणी बावचळल्या सारखं झालं मात्र लगेच अंगावर काटा आला… त्या क्षणी माझं डोकं फ़ुटेल इतका टोकदार दगड माझी वाट बघत होता… काळ आला होता, पण वेळ आली नव्हती कदाचित! माझी परिक्रमा अजून शिल्लक होती, म्हणून असेल! अन्यथा हा अनुभव लिहायला मी शिल्लक नसते हे नक्की!
खरं तर इथे अजून एक गोष्ट झाली होती.हे डोंगर चढण्याच्या आधी माझ्या मनात अहंकार आला होता. मी आधी हिमालयन ट्रेक केले आहेत, तोच विचार माझ्या मनात आला.” आपण तर ट्रेक केलेयेत, ते ही उंच उंच, हिमालयन, हे पर्वत काही इतके उंच नसतील, जमेल आपल्याला” असा विचार माझ्या मनात आला होता. तसं पाहता आत्मविश्वास असणं वेगळं आणि अहंकार असणं वेगळं. मला अहंकारच झाला होता… आणि मैया परिक्रमा करताना आपण आपल्या स्वत:बद्दल विचार न करता मैयावर सोपवून द्यायचं असतं.. मी ते न करता. “आपल्याला कठीण जाणार नाही” असा विचार केला..
अभिमानी का मान हटाती, देती जीवन दान,
मैया अमरकंट वाली, तू है भोली भाली ….
ह्या मैया भजनाची आठवण आली आणि समजलं ती कनवाळू असली अहंकारा सारखा रोग ती आपल्याला लागू द्यायची नाही आणि लागलाच तर त्याची शिक्षा म्हणजे त्याचं हरण केल्याशिवाय ती तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही.
पुढचा रस्ता याहूनही फ़ार फ़ार कठीण होता. पण मार्ग जितका कठीण तेवढा देव जास्त आठवतो ना… तसं असेल, प्रत्येक पावलावर जप करणं कसं असतं ते ह्या पुढच्या प्रवासात समजत होतं. खारा भादल, भादल खापरमाळ आणि भमाना हे तर अतिशय कठीण. आणि अशा कठीन प्रसंगी जे अनुभव येतात त्यांची तीव्रता आणि त्यांचा गोडवा दोन्ही खूप खूप अद्भूत असतात हे नक्की.
या शूलपाणीच्या झाडीत मैयाचं आणी सप्त चिरंजीवांचं दर्शन होतं असं म्हणतात असं मी मागच्या अनुभवात म्हंटलं आहे. मी आता तो अनुभव सांगेन मात्र खरोखरीच ते मैया दर्शन होतं का ते तुम्ही मला सांगायचय! हो म्हणजे मी फ़क्त अनुभव सांगणार आहे.. अंगावर काटा आणणारा… माझ्या परिक्रमेतला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा असा अनुभव म्हंटला तरी चालेल. उभ्या आयुष्यात हे असे काही अनुभव मी विसरूच शकत नाही असे आहेत. अनुभव जरा मोठाच आहे. याच भागात सांगता यायचा नाही.. तेव्हा पुढच्या भागात सांगते… पण एक नक्की…. हा अनुभव ऐकल्या वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही आणि तुम्हाला नर्मदा माईच्या दर्शनाची इच्छा झाली नाही तर नवल, असं मी म्हणेन!.. सांगतेच, पुढच्या भागात!
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २१
नर्मदे हर.
मागच्या भागानंतर या वेळी वाचकांची उत्कंठा शिगेला लावणार नाही, पट्कन अनुभव सांगेन. तर हा रस्ता अतिशय कठीण, मात्र खारा भादल आणि भादल आणि खापरमाळ ही चढाई तर भमाना हा उतार. बाकीच्यांनी पोर्टर घेतल्यानंतर ती मंड्ळी सोबत सोबत चालू लागली आणि मी नकळत थोडी पुढे गेली. मयूरेश जी माझ्याहून पुढे निघून गेले होते. हे अंतर कसं वाढलं काही समजलं नाही. एका ठिकाणी अशी वेळ आली की समोर गेलेले मयूरेश जी पण दिसेनासे झाले आणि मागे असलेले बाकीचे लोक आणि पोर्टर्स पण दूर दूर वर दिसेना. पण मी चालत राहिले.
हा रस्ता कसा आहे ते आता सांगते. मी जे काही सांगते आहे यात यत्किंचीतही वाढ्वून सांगत नाही, जसे आहे तसे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र रस्त्याचा अंदाज वाचकांना येण्यासाठी सविस्तर वर्णन करते. तर ही चढाई, आणि रस्ता जेम तेम दीड फ़ुटाचा. एका बाजूला पर्वत तर दुस-या बाजूला खोल खाली नर्मदा माई. या रस्त्यावर सगळी कडे मुरुमाची खडी पसरलेली, आधार म्हणून धरायला काहीही नाही. नाही म्हणायला बाभळीची झाडी आहे पण काटे असल्याने ती फ़ार पकडता येत नाही, आणि आता झाडीही “ झाडी” म्हणावी अशी रहिलेली नाहीये, बरीच विरळ झाली आहे.
तुमचा पाय घसरला तर तुम्ही खाली नर्मदा माईत पडाल असाच काहिसा हा मार्ग आणि पाय घसरण्याचा चान्स भरपूर. म्हणजे एक पाऊल पक्क रोवायचं आणि मग दुसरं उचलायचं..तेही पहिले रोवलेलं पाऊल पक्क असेल तर, आणि तसं झालं नाही तर घसरू शकतो आपण…असा हा रस्ता, आणि चढाईचा एन्गल ही भरपूर असावा, अगदी खडी चढाई होती…
तर मागची मंडळी मागे, पुढची मंडळी पुढे… मी मधे. प्रत्येक पाऊल टाकलं की नाना महाराज आणि मैया यांचा धावा सुरू. आणि असं असताना एका ठीकाणी ही दीड फ़ुटाची वाट सुद्धा खचलेली, साधारण पुढचे अडिच तीन फ़ूट रस्ताच नाही. टांग टाकून जाणे तेच काय करावं लागणार होतं, आणि अशा ठिकाणी पाय घसरला तर? तर मी खाली पडणार होते, इतक्या खाली की तिथे पडल्यावर माझा मृतदेह ही सापड्णार नाही, कुणी शोधूच शकणार नाही. मी जरा वेळ वाट बघितली, मागचे लोक येतील, त्या पोर्टर्स चा आधार घेऊ आणि जाऊ. जवळ जवळ पाऊण तास झाला तरी कुणी येईना… मी वाट तर चुकली नाही न असा संशय पण आला.. फ़ोन करावा कुणाला म्हणून फ़ोन काढला तर नेटवर्क नाही…
आता मात्र मी खूप घाबरले होते..नाही नाही, मृत्यूला नाही, तो एक ना एक दिवस येणारच आहे. माणूस घाबरतो ते आपल्या माणसांच्या भावनांना. मला माझा मुलगा डोळ्यासमोर दिसू लागला. मी मेले तर त्याला निदान ते समजण तरी आवश्यक आहे न? आई परिक्रमेला गेली आणि परत आलीच नाही तर तो आयुष्यभर माझी वाट बघत बसेल… त्याची इश्वरावरची श्रद्धा ..त्याचं काय होईल? हे सगळे विचार त्या वेळी मनात आले. अर्थात मैया असं होऊ देणार नाही हा विश्वासही होताच, पण तरीही समोर मृत्यू असताना इतकं शांत आणि विचारी राहता यावं येवढी मी परिपक्व नाही हे मला माहित होतं. मी इथे जंगलात थांबू ही शकत नव्हते आणि पुढे जाऊ ही शकत नव्हते. मी रस्ता चुकलेले असेन तर वाट बघण्यात अर्थच नाही आणि पुढे जायचे तर आता उडी मारून जाण्याशीवाय पर्याय नाही. मी माझे जोडे काढले आणि त्या रस्ता खचल्या च्या पुढच्या रस्त्यावर फ़ेकले, म्हणजे अडिच फ़ुट पुढे… ते तिथे पोचले, वाटलं चला, आता मी पडले तरी मागून येणा-यांना समजेल. मग मी बॅग ही फ़ेकली… ती ही गेली…. मग मला जरा हायसं वाटलं, की आता तर नक्कीच माझा शोध घेतल्या जाईल. आणि मग सगळ्यांचे चेहेरे आठवून, मैयाचा धावा करून, मुठी बंद करून, डोळे मिटून मी उडी मारलीच… दुस-या क्षणाला मी त्या गॅप च्या पलिकडे आणि सुखरुप पोहचले होते. मी जीवंत होते. माझ्या अंगाला काही लागलय का हे मी चाचपडून बघू लागले, आणि ज्या वेळेला मी माझ्या दंडाला हात लावून चाचपडत होते त्या वेळेला मला तिथे काय जाणवलं माहितिये? लहान मुलाला बखोटीला पकडून आई कशी ओअढते न? तसं माझ्या दोन्ही दंडांना कुणीतरी धरलं होतं… तो स्पर्श मला जाणवत होता.. एकिकडे माझी गुरुमाऊली आणि दुसरी कडे माझी मैया असं मला धरून ती उडी पार करवून घेतली होती.. अजूनही रस्ता कठीणच होता पण मला आता धीर आला होता.. मी झपाझप पुढे पाऊलं टाकत होती आणि मन मात्र व्यक्त व्हायला धडपडत होतं.थोडा वेळ चालून झाल्यावर एक मोकळं आणि सुरक्षीत असं छोटंसं चौकोनी आकाराचं मैदाना सारखं लागलं. मी तिथे बसले आणी ढसढसा रडले.. फ़ोन बाहेर काढला..फ़ुल नेटवर्क होतं फ़ोन ला..बाबासाहेबांना (माझ्या गुरुंचे नातू, पण गुरुंसारखेच) फ़ोन लावला.. मी एकही अक्षर बोलू शकले नाही.. मी फ़क्त “ मी सुरुचि” इतकं बोलून रडू लागले. त्यावर बाबासाहेब म्हणतात “तू रडू नकोस, आजच सकाळी नाना महारांजाना पुन्हा एकदा सांगीतलय. लेकरू परिक्रमेला जातय, लक्ष असू द्या, हे बघ तू सुरक्षीत आहेस.. काळजी करू नकोस, शांत झालीस की फ़ोन कर”…हे असं होणार हे त्यांना महित होतं!
हा अनुभव इथेच संपत नाही.. हे तर गुरुंनी दिलेलं सांत्वन! मैया चं येणं अजून बाकी आहे! याच भागात सांगते.. तर तो फ़ोन झाल्यावर मी अजून पुढे गेले. आता रस्ता जरा मोठा ही होता आणि सुरक्षीत ही होता. घसरून पडण्याची भिती नव्हती.मी या चौकोनी मैदानावर तासभर तरी बसले असेन. मी पुढे निघाले आणि जरा वर चढून अजून एक मैदाना सारखे लागले तिथे बसले. हे अंतर चालून यायला मला अर्धा तास तरी लागला असावा. तिथे मी बसते न बसते तोच एक पस्तीशी ची बाई भला मोठा हंडा घेऊन आली… मला म्हणाली “ हो गया रोना ढोना? अब जल पियेगी? एक घंटेसे तेरे लिये यहा बैठी हूं, कितने धीरे चलती हो मैया…” ती बाई तिथे एक तासापासून मला पाणी पाजायला थांबलेली. मी पाणी प्यायली.. बोलता बोलता मी तिला विचारलं “ मैया कहासे पानी लाती हो?” ती ही शांतपणे आणि सहजतेने म्हणाली “ ये नरबदा जी से”… मग मी तिला रस्ता विचारला, तिनी सांगीतला..आणि मी पुढे चालू लागले… मी पुढे गेल्यावर माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला तो असा.. मी रडतेय हे तिला कसं माहित? ती नरबदा जी हून पानी आणते म्हणाली, थोड्या वेळापूर्वी मी नर्मदा माई इतकी खोल पाहिली होती की तीत पडून केवळ मोक्षच शक्य होता! मग ही कसं पाणी आणते इतक्या खालून? मला मैयानी दर्शन दिलं होतं…साक्षात…मला तिच्या हातांनी त्या माईनी पानी पाजलं आणि मला समजलं पण नाही…माझे गुरू आणी माझी माय माझ्यासोबत आहे याची खात्री पटली, पण मी मूर्ख, तिच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार सुद्धा केला नाही मी… पुन्हा एकदा रडू आलं… पण इलाज नव्हता…हे असं होतं… त्या शक्तीचा प्रभाव इतका जास्त असतो आपली मंद बुद्धी दीपून जात असली पाहिजे.. आपल्याला काहिही समजत नाही.. असाच प्रकारचा अनुभव पुढेही आला मला, धारेश्वर च्या पुढे… तेव्हाही ही माईला ओळ्खू शकले नाही, पण तो अनुभव धारेश्वर च्या भागात सांगते. आता इथून पुढे शांतीलाल पावराचं घर आणि तिथला अनुभव ही सांगते.. पण पुढच्या भागात. हे अनुभव लिहिताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे… मला माझ्या आईची आठवण येते आहे, मला माझ्या चुकांची लाज वाटते आहे, आणि हे सर्व सोडून माझ्या आईच्या कुशीत शांतपणे जगावंसं वाटतय…आणि प्रत्येक वेळा हा अनुभव आला की ही ओढ प्रकर्षाने जाणवते. हा अनुभव तुम्ही वाचत असताना कदाचित मी माझ्या माईच्या कुशीत असेनही.. मैया जाणे… पुढचं पुढे बघून… तोवर थांबते…
पण शांतीलाल पावराच्या छोट्याश्या घरी त्याच्या घरचे ८ आणि आम्ही ११ लोक कसे राहिलो? अठरा विश्व दारिद्र्य कसं पाहिलं आणि त्या दारिद्र्यात राहणारा श्रीमंत माणूस आम्हाला कसा काय भेटला, शिवाय या वेळी मैयाने काय चमत्कार दाखवला, हे पुढच्या भागात सांगते.
नर्मदे हर.
©सुरूची नाईक- विदर्भ गट
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २२
नर्मदे हर
नर्मदा माईनी दर्शन दिल्याचं मागच्या अनुभवात सांगितलं होतंच.. तिथून पुढे आधीच निघालेले मयुरेश जी बसलेले मला दिसले. मग आम्ही सोबत पुढे निघालो. जरा अजून पुढे जात नाही तर एक म्हातारे आणि आंधळे बाबा पाणी घेऊन बसलेले दिसले. परिक्रमावासी थकून येतात आणि त्यांना पाणी मिळावं म्हणून हे आंधळे बाबा कुठुनसे पाणी भरून आणतात. बंदच काय तर उघड्या डोळ्यांनी ही जिथे चालणं कठीण तिथे हा आंधळा मटका भर पाणी आणून फ़क्त परिक्रमावासींसाठी बसलेला असतो हे बघून आपल्याला डोळे आणि हातपाय असूनही आपण काहीच करत नाही याची लाज वाटते. बाबांचा प्रसाद म्हणून आम्ही घोट घोट पाणी प्यायलो..त्या बाबांनी अंगात एक जाकिटासारखं काहितरी आणि खाली पंचा असं घातलं होतं. आम्ही पुढे निघालो आणि मयुरेश जी अचानक मागे वळले.. आपल्या अंगावरचं उपरणं काढून त्यांनी त्या अंध बाबाच्या खांद्यावर घातलं, डोळे पुसले आणि काहिही न बोलता पुढे चालू लागले….तो क्षण अंतर्मुख करणाराच होता. त्या वेळी मला फ़ारसं समजलं नव्हतं पण नंतर जाणवलं… तो मयुरेश जींना त्यावेळी कसलातरी झालेला साक्षात्कारच असला पाहिजे..
पुढे आम्ही शांतीलाल पावरा यांच्या घरी पोहचलो. एक साधारण २० फ़ुट बाय १५ फ़ूट ची जागा, म्हणजे त्या शांतीलाल चं पूर्ण घर.. कदाचित अजूनही लहान.. या घरात २-३ गायी, ८-१० बक-या, कोंबड्या, मांजरी, असंख्य उंदीर, आणि कुत्रे यांच्याशीवाय शांतीलाल, त्याची बायको, आणि ८ मुले राहात होती. शांतीलालचं सगळ्यात लहान मूल म्हण्जे २१ दिवसांची मुलगी. तिच्या अंगावर कपडा नाही. एका सिंथेटीक फ़ाटक्या साडीमधे तिला गुंडाळून ठेवली होती.बाकी मुलांच्या अंगावरचे कपडेही फ़ाटलेले होते.२१ दिवसांची बाळंत बाई कामाला लागलेली होती. ते सगळं पाहून खरं तर दारिद्र काय असतं ते समजत होतं.. पण आता आम्हाला श्रीमंती काय असते हे बघायला मिळणार होतं.
आम्ही आजची रात्र तिथे राहणार म्हनजे आमची भोजन प्रसादी तिथेच होणार. शांतीलाल कडे घरी फ़क्त ३ किलो तांदुळ आणि थोडीफ़ार चवळी ची डाळ होती. एवढ्याश्या अन्नात आम्ही ११ अणि ते ७ अश्या १८ जणांच पोटभर जेवण होणं अशक्य होतं. शिवाय परिक्रमावासी थकून आले होते, भुका लागल्या होत्या. शांतीलालच्या बायकोनी तांदुळाचा डबा आमच्यासमोर आणून ठेवला आणि म्हणाली- “मैयाजी इतनाही चावल है घर मे. आज आप भोजन पा लो, हम आज नही पायेंगे, कल पा लेंगे” – हो, आमच्यासाठी ती आणी तिची मुलं उपाशी झोपायलाही तयार होती. घासातला घास देणं वेगळं पण आपल्याकडे काहिही नसताना आपल्या समोरचं ताट समोरच्यांना आदरानी खाऊ घालून स्वत: उपाशी राहणं हे जमण्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते. ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे ही श्रीमंती असेल की नाही माहित नाही पण हा शांतीलाल मी पाहिलेला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. अंगावर घालायला कपडा नाही पण मन सोन्याहून चकचकीत आणि मोलाचं सुद्धा… मन खूप भरून आलं..
आमच्या जवळ एक कोरी ओढणी होती. त्या ओढणीचे सुरेखाताईनी झबले आणि टोपरे कापून दिले. मी सुरेखाताई आणी मयुरेश दादा आम्ही ते शिवले, अगदी हातानी, सुईदोरा घेऊन, मोबाईल च्या आणि मेणबत्तीच्या प्रकाशात. दुसर्या दिवशी सकाळी आम्ही शांतीलाल च्या बायको ला बसवलं, तिला आणि त्या छोट्या बाळाला औक्षवाण केलं. आमच्या जवळ जे काही थोडफ़ार होतं त्यातून काही पैसे जमा केले आणि हे झबलं टोपरं आणि पैसे त्या बाळाच्या अंगावर घातले.. तिचं नाव ठेवलं रेवा.. आमची रेवा…
ह्या आमच्या रेवाला आम्ही आता यापुढे केव्हा बघू आम्हाला माहित नाही. पण ह्या रेवा ला आम्ही विसरणं शक्य तरी आहे का? जीचे चे आईवडील. स्वत: उपाशी राहून, घासातला घास काढून आम्हाला भरवतात त्यांच्यापोटी रेवा च जन्म घेऊ शकते ना? काही तासांचा आमचा हा सहवास पण इथून पाय निघत नव्हता.. त्या घराशी, रात्रभर अंगाखांद्यावर नाचत असलेल्या उंदरा मांजरांशी, गुरांशी, अगदी भिंतीशी सुद्धा जन्म जन्मांतरीचं नातं आहे असं वाटू लागलं होतं. पण परिक्रमा पुढे न्यायला हवी होती आणि आम्हाला अजून मोठ्या बिकट रस्त्यावर वाटचाल करणं भाग होतं.
सकाळी लवकर निघालो, हा भला मोठा डोंगर जो चढून आलो होतो तो आता उतरायचा होता.आधी वाटलं होतं चढण्यापेक्षा उतरणं सोपं जाईल. पण तसं नव्हतं. एका वेळी अर्धेच पाऊल मावेल अशी वाट होती. मुरुमाची खडी होतीच. उतरताना सगळा तोल समोरच्या बाजूला जात होता. अशा वेळी पाय घसरला तर मोक्षच! मी बूट काढून घेतले होते, दुसरा पर्याय नव्हता. हा जवळ जवळ १२ किमी चा शेवट्चा टप्पा होता. तो कुणाचाही “शेवटचा टप्पा” ठरेल असाच होता. त्याचं नाव होतं “भमाना” आणि मी त्याला “भयाणा” म्हणू लागले होते, भयानक असाच होता तो! पडण, सावरण अधुन मधुन होत होतं पण कुणाला फ़ारसं लागलं नव्हतं. मात्र त्या पडण्यातलं एक पडणं माझ्या आणि स्मीता साठी शेवटचं ठरलं असतं.
आम्ही एक एक पाऊल उतरत होतो, इथे दोन्ही बाजूला दरी होती मात्र डावीकडे काहीच आधार नव्हता आणि उजवीकडे किंचीत उंचवटा, म्हणजे लहान मुल पलंगावर झोपलं असेल तर ते पडू नये म्हणून आपण कशी उशी लावतो न अडकण म्हणून, साधारण तसा उंचवटा होता, मग पुढे खोल. आम्ही रांगेत उतरत होतो पण एकमेकांमधे अंतर ठेवून होतो, जेणेकरून एकाचा धक्का दुस-याला लागून तोल जाऊ नये. स्मीता पुढे होती आणि मी मागे. सुरेखा ताई बरीच मागे होती आणि मयुरेश पुढे.. उतरता उतरता माझा पाय जोरात घसरला.. माझ्या पाठीला बॅग असल्याने माझी पाठ अन मान वाचली, मी जमिनीवर आडवी पडले आणि घसरू लागले, अगदी लहान मूल घसरगुंडी वर घसरतात तशी… किती प्रयत्न केले तरी मला थांबताच येईना… नशीब की मी उजव्या बाजूच्या त्या उंचवट्याचा आधारानेच घसरू लागले आणि डावीकडे माझे पाय फ़ेकल्या गेले नाही ..नाहीतर मी घसरत घसरत खाली दरीत गेले असते. मी पडलेली पाहून सगळेजण जागीच स्थीर झाले …दुसरं काहीच करता येणं शक्य नव्हतं. अगदी एक पाऊलही उचलून माझ्या दिशेला टाकणं सुद्धा कठीण.. माझा अंत सगळे बघणार पण कुणी काहीही करू शकणार नाही हे मला माहित होतं…मी पडले होतेच आणि आता मी स्मीता ला जाऊन आदळणार होते. मी जवळ जवळ १०-१२ फ़ुट घसरून स्मीता ला जाऊन आदळले… स्मीता मात्र सावध होती म्हणून बर झालं.. ती चटकन गुढघ्यावर बसली आणि मला धरलं.. तिनी धरल्यामुळे मी थांबली, नाहीतर तशीच अजून किती खोल गेली असती मैयाच जाणे! मला थांबलेलं पाहून सगळ्यांच्या जिवात जीव आला आणि मग सगळे अगदी सावध आणि बहुतांश वेळा बसून बसून च उतरत होते. मी इतकी घसरून खाली गेले पण मला फ़ारसं लागलं नाही, थोडं खरचटलं. पाणीवरच्या बॅग चा खूप फ़ायदा झाला, माझ्या पाठीच्या कण्याचं रक्षण आणि स्पीड ला थोडा अडसर हे दोन्ही फ़क्त बॅग मुळे शक्य झालं.
मी मनातून घाबरले होते. माझे हात पाय आता लटलटत होते. इथून पुढचा उतार अजूनच कठीण होता. एक पाऊलही पुढे टाकायची माझी हिम्मत होत नव्हती. इथेच बसून राहावं असं वाटू लागलं. खाली बघितलं तरी माझे डोळे फ़िरायला लगले होते, अजूनही इतकं उतरणं बाकी होतच. पण मैया कनवाळू आहेच. मागे येत असणा-या पोर्टर प्रेम नी मला बघीतलं आणि तो धावत पुढे आला. त्या मंडळीना ब-यापैकी सवय असते. त्याने मला बॅग मागितली, आणि मी नाही म्हणाले…. मग त्याने माझा हात धरून मला उठवलं आणि हात धरुन धरून १५- २० पावलांपुढे असलेल्या एका दगडावर नेऊन बसवलं… मग तो पुन्हा मागे गेला आणि मागच्यांना घेऊन आला… असं करत करत त्याने तो उरलेला भमाना मला हात धरून धरून पार करून दिला…माझी परिक्रमा पूर्ण होणार होती, कारण आज मला काहिही झालेलं नव्हतं.
भमानाला उतरल्यावर आता चालायची इच्छा होत नव्हती. जवळच आश्रम असेल असं वाटत होतं पण तसं नव्हतं. आता मुक्कामाला पोहोचायला अजूनही आठ दहा किमी चालून जाणं बाकी होतं. संध्याकाळ्च्या आत मुक्कामाला पोचणं आवश्यक होतं कारण हा सगळा कच्चा आणि जंगलातला रस्ता होता. तसं भमाना गाव होतं, पण तिथे सोय नव्हती. तावसे काका काकूंना मात्र भमाना मध्ये जागा मिळाली, आम्ही बाकीचे तसेच मजल दरमजल करत पुढे जाऊ लागलो.
प्रत्येक स्थानाला काही महत्व असतं, काही ठिकाणचे कंपनं सुखावह असतात तर काही ठिकाणचे भयाण असतात. मुख्य म्हणजे असे टप्पे जर वारंवार, अगदी एका पाठोपाठ एक आले की विचित्र आणि कन्फ़्युस्ड वाटू लागतं. तसाच हा दहा किमी चा रस्ता होता. कधी छान वाटायचं तर कधी भयाण… पण फ़ायनली आम्ही सावरीयाला नर्मदा जीवन शाळेत जाऊन पोहोचलो..मित्रांनो, इथे पोहचलो पण हा ही आदिवासी भागच बरं का! म्हणजे अजून शूलपाणी ची झाडी संपलेली नाही, मात्र आता उंच चढ आणि तार संपले होते. मैयाचं हृदय अजूनही पूर्ण पार व्हायचं होतं. नर्मदा जीवन शाळेतला मुक्काम आनंदमयी होता पण पुढे बोरी गावात आलेला अनुभव अजूनच वेगळा होता. मैया तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतेच… कसं ते सांगते बोरी गावाच्या अनुभवात, मात्र पुढच्या भागात.
नर्मदे हर
©सुरूची नाईक-विदर्भ गट
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २३
नर्मदे हर
‘ नर्मदा जीवन’ शाळेत खूपच प्रसन्न वातावरण होतं. ती आश्रम शाळा होती आणि आजूबाजूच्या अदिवासी गावातली मुलं तिथे निवास आणि शिक्षणासाठी एकत्र आली होती. माझं आयुष्यच लहान मुलांच्यात गेलं आहे म्हणून असेल, मला इथे खूप खूप छान वाटलं. माझ्यात नवीन उत्साह भरल्या गेला. आता धडगाव साठी निघायचं होतं. तसं अंतर फ़ार नव्हतं पण ऊन फ़ार जाणवत होतं. खरतर नोव्हेंबर महिना होता हा तरीही ऊन फ़ार होतं.. दिवसभर पायी चालताना त्रास होत होता.
बरच अंतर चालून झाल्यावर भूकही लागली आणि आराम करायला ही निवारा हवा असं वाटू लागलं, पण काय आश्चर्य, इथे सगळी घरं उघडी, आणि घरात कुणीच नाही. कुणाच्याही घराच्या आत कसं काय जायचं आपण.. भोजन प्रसादी तर दूरच पण सावलीची जागाही सापडत नव्हती. आज भोजन प्रसादीचं कठीणच झालं होतं. आता माधुकरी शिवाय पर्याय नाही पण मागणार कुणाकडे?
आम्ही प्रत्येक घरा घरांत डोकावून पाहात होतो.. ब-याच घरी फ़क्त लहान मुलं च होती.. आणि अनेक ठिकाणी घरं रिकामी पडलेली… शेवटी मयुरेश ला एक घर सापडलं.. तिथे एक बाई होत्यात घरी. निवा-याची जागा मिळाली आणि मयुरेश नी माधुकरी मागितली. तसं त्या बाईनी मक्याचं पीठ समोर आणून ठेवलं. आमच्याकडे न अन्न शिजवायला सामान न भांडी.. शिवाय मक्याच्या भाकरी येतात कुणाला? ते जाऊदे, नाही भाकरी तर जे होइल ते खाऊ एकवेळ, पण तवा, चूल, भांडी हे सामान? आम्ही आमचा प्रश्न मैयाजींना सांगितला… तिनी ते मक्याचं पीठ उचलं आणि आत घेऊन गेली.. आता जे पीठ होतं ते ही नव्हतं आमच्याजवळ, पण थोड्याच वेळात तिनी आवाज दिला.. “अब इतना सामान आपको दूंगी उससे अच्छा मैही आपको खाना बनाके खिला देती हू”…आयाती भोजन प्रसादी मिळावी, आणि आराम मिळावा अशीच इच्छा होती… ती मैयानी पूर्ण केली. त्या मैयाजींनी मक्याच्या गरमागरम भाकरी आणि तुरीच्या दाण्यांची आमटी असं जेवण करून खाऊ घातलं. अन्नदानाचं महत्त्व काय असतं ते तेव्हा खरं समजलं…. ज्या वेळी माणूस शीजवून, कष्ट करून खायच्या परिस्थितीत नसतो, अंग लाही लाही झालं असतं, घसा कोरडा पडला असतो, तेव्हा मिळालेली गुळ भाकरी सुद्धा अमृतासारखी असते…. किती किती म्हणून भरभरून सदिच्छा त्या मैयासाठी आमच्यामनातून निघाल्या असतील म्हणून सांगू! अर्थात हे सगळं नर्मादा माईनीच तिच्याकडून करवून घेतलं पण त्या दिवशी तृप्त मना नी आमच्या सगळ्यांकडूनच शब्द निघाले “ अन्नदाता सुखी भव”..आपल्या जगात आपण खरच किती “माजलेलो” असतो हे इथे आल्यावर समजतं आणि प्रत्यक्षात हा “माज” किंवा हा अहंकार कसा निरर्थक असतो हे समजू लागतं. परिक्रमावासींच्या सेवेची संधी मैयाने द्यावी हीच तिला विनंती आहे.
इथून पुढे राजबर्डीच्या आश्रमात थांबलो. अंगभर धूळ धूळ झालेली. हापशीच्या पाण्याने आंघोळ करून मग भोजनप्रसादी झाली. आज पहिल्यांदाच मी संध्याकाळी, थंड वेळेला, थंडगार हापशीच्या पाण्याने आंघोळ केली होती. बाधणार तर नाही अशी भिती होती, पण तसं काही झालं नाही. आज फ़ार थकलो होतो, निवांत झोपी गेलो. इथून पुढे सेल्कुवा, धडगाव, हरणखुरी, खुंटामोडी असा मार्ग होता. पुढचा मुक्काम कुठे करायचा असं काही ठरलेलं नव्हतं कारण आपल्याला ठरवता येत नाही असा अनुभव आधीच आला होता.
खरं तर असे अनेकदा अनुभव आलेत पण असं कुठे कुठे झालं ते नक्की आठवत नाही, पण काय झालं ते सांगते. आम्हाला असं वाटायचं बरेचदा की आम्ही फ़ारच हळू परिक्रमा करत आहोत. असं केल्याने आम्हाला चातुर्मास करावा लागेल.. चातुर्मासात चार महिने एका ठिकाणी राहायचं असतं, परिक्रमा करायची नसते. आणि तसं करणं मला तरी शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पुस्तकं समोर ठेऊन उद्या किती किमी चालायला हवं, किंवा रोज किती किमी चाललो तर परिक्रमा कधी पूर्ण होईल असा विचार बरेचदा करायचो. पण असं काही होत नाही, आम्ही ज्या दिवशी २० किमी चालायचं असं ठरवत असू त्या दिवशी काहीतरी होऊन आम्ही वीस किमी च्या आधीच मुक्काम करत असू. आणि ज्या दिवशी ठरवणार नाही त्या दिवशी जास्त चालून होत असे.. त्यामुळे आजकाल आम्ही ठरवणं सोडून दिलं होतं.. तो अधिकार फ़क्त मैयाचा होता.
तिनी ठरवल्याप्रमाणे पुढे आम्ही धडगावला थांबलो. इथे शूलपाणीची झाडी तशी संपली होती. म्हणजे एक भाग संपला होता असं म्हणू फ़ारतर, कारण माथासर झरवानी हा भाग अजून बाकी होताच. धडगावला आम्ही एका साधुकुटी मधे थांबलो होतो. तिथे एक दिवस थांबून विश्रांती घेऊन मग पुढे निघायचं ठरलं. आधी ते महाराज जरा कडक वाटत होते पण नंतर त्यांनी आमची छानच काळजी घेतली, आणि दुस-या दिवशी आम्ही पुढे निघालो.
तर कुठे थांबायचं हा प्रश्नच नव्हता..रस्त्याने जाता जाता एक जीप आम्हाला बघून थांबली. त्यातून धुळे जिल्ह्याचे विकास जी जोशी उतरले, सोबत श्रीपाद म्हणून एक मुलगा होता, तो पुढे वडफ़ळी नामक गावात आम्हाला सेवा देणार होता. त्यांनी सांगीतलं की कुंडल ला एका गुरुंजीकडे थांबा.ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. आम्हाला समोरच्या अंगणात आसन लावण्यास सांगितले, तसे आम्ही केले, मात्र त्या घरच्या लोकांशी गप्पा झाल्या असता त्यांनी आम्हाला स्वत:हून रात्री आपल्या घरात जागा दिली, दुस-या दिवशी ही इथेच आराम करा असे सांगितले, इतकेच नाही तर त्यांच्या दोन्ही नोकरीच्या सुनांनी पूर्ण घर आमच्यावर सोपवलं आणि दिवसभर आपल्या नोकरीवर गेल्या. नोकरीवर जाताना त्यांनी आम्हाला स्वयंपाक घरात बोलावलं, काय सामान कुठे ठेवलय ते सांगीतलं, आणि काय लागेल ते करून घ्या असं ही सांगीतलं… त्या जाताना पूर्ण स्वयंपाक करून गेल्या होत्याच, या ही उपर काही लागलं तर घ्या असं बजावून त्या गेल्या होत्या. केवढा हा विश्वास! हे परिक्रमावासी आपल्या घरची काडी ही इकडची तिकडे करणार नाहीत हा विश्वास त्यांना मैया नी नाहीतर कुणी दिला?
रात्री त्या घरचा मोठा मुलगा घरी आला. आल्या आल्या त्याने आम्हाला नमस्कार केला आणि तो रडू लागला. पसारकर काकूकडे पाहून ३ वर्षापूर्वी वारलेल्या आईची त्याला खूप आठवण येत होती. तो खूप व्याकुळ झाला होता, त्याला स्वत:ला सांभाळता येत नव्हतं. तो आमच्या कडे बघून इतकच म्हणायचा “ कैसे बताऊ, मुझे समझ नही आ रहा है… मा चली गयी मेरी.. मा चली गयी”.. पंचेचाळीशीतल्या माणसाला असं रडताना पाहून वेगळं च वाटत होतं.. आम्हा अनोळखी परिक्रमावासीं समोर रडून तो मोकळा होत होता हे महत्वाचं.
दुस-या दिवशी आम्ही जरा उशीराच निघालो, पुस्तकात खुंटामोडी हे गाव १० किमी असं काहितरी दिलं होतं. तिथे मंदिरात सोय आहे असं समजलं होतं. रस्ता चढावाचा होता आणि साधारण ३ किमी चालून झाल्यावर रस्त्यात आम्ही विश्राम करायला जागा शोधली तर एका माणसानी आम्हाला एक मंदिर दाखवलं. आम्ही तिथे गेलो, फ़्रेश झालो आणि पुढे खुंटामोडी किती दूर आहे विचारलं असता समजलं की हेच खुंटामोडी आहे! आम्ही १० किमी चालून आलो होतो? नाही नाही… पुस्तकातलं अंतर चुक दिलं असावं.. नक्की काय होतं ते माहित नाही पण आज अजिबात थकवा आला नाही. इथे आम्हाला हरेंद्र नाईक म्हणून मोलगीचे राहणारे एकजण भेटले,, “ आप भी नाईक और हम भी नाईक, अब तो आपको हमारे घर आना ही होगा” असं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि आमचा पुढचा मुक्काम मोलगी ला करण्याचं ठरलं.
खुंटामोडी ते मोलगी च्या प्रवासात आधी एक आवाज ,मग एक दूधवाला, आणि मग एक डॉक्टर भेटले. यापैकी हा आवाजाचा अनुभव जरा वेगळा आहे. मोलगीला नाईंकानी केलेलं स्वागत छानच होतं पण, मोलगी ते पांढरामाती च्या प्रवासाच्या अनुभवात असं काही आहे ज्याची वाट आपण सगळेच बघत आहोत. सप्त चिरंजीवांपैकी एक अश्वत्थामा बद्दल मी काहीतरी सांगणार आहे, हे नक्की.
नर्मदे हर
©सुरूची नाईक – विदर्भ गट
माझा नर्मदा बाबा
नर्मदे हर!
नर्मदा परिक्रमेच्या माझ्या अनुभव कथनाची मालिका आपण दर रवीवारी वाचत आहातच. मात्र या अनुभवा व्यतिरिक्त ही या परिक्रमेतून मला खूप काही मिळालं आहे. किंबहुना मला जे मिळाळं आहे ते केवळ आणि केवळ माझ्या नर्मदा माईनी दिलं आहे असच मी म्हणेन.
आज माझ्या एका अवडीबद्दल मी लिहीणार आहे. मला वाचनाची खूप आवड, अगदी लहानपणापासूनच वडीलांनी मला वाचनाची आवड लावली. आणि पुढे पुस्तकं वाचनाची ही आवड माणसं वाचण्याकडे वळली ती माझ्या आवड्त्या लेखकां मुळे, अर्थातच पुलं मुळे. कुठेही गेलं की सभोवताल दिसत असलेली माणसं माझ्याकडून नकळत वाचली जातात. ती वाचता वाचताच कामं ही होतात. कुठे कधी वाट बघण्याची गरज पडली तर ती माझ्यासाठी पर्वणी असते, कारण भरपूर रिडींग मटेरिअल चालत्या बोलत्या अवस्थेत माझ्यासमोर तयार असतं. परिक्रमेच्या कालावधीत, रोजच्या जप पूजा आणि चालणं झाल्यावर, मला ही संधी मीळत असे. माझी ही आवड सुद्धा परिक्रमेत माझ्या आईनी खूप खूप जोपासली आहे. आज अश्याच एका वाचलेल्या व्यक्तीबद्दल लिहितेय.
त्यांचं नाव बाबा. म्हणजे परिक्रमेत सगळे पुरुष हे बाबा, दादा, बाबाजी, महाराज जी असेच असतात. त्यांना इतर नावाने संबोधन करायचं नसतं कारण ती मैयास्वरूप म्हणून आपल्याला भेटलेली असतात. हे बाबा ही मला परिक्रमेत सापडले. ह्या बाबांची मला सक्त ताकिद होती.. “मला ए बाबा म्हणायचं, अहो बाबा नाही”. त्याला कारण होतं पण मी ते नंतर सांगेन.
हा बाबा दिसायला उंचपूरा, आडदांड अगदी. ६ फ़ूट उंच आणि १२० किलो वजनाचा. पायी परिक्रमा करायला निघालेला. पांढरे फ़ेक केस, तशीच पांढरी दाढी. मोठे डोळे, पीळदार मिशा, उंच कपाळ आणि त्यावर भला मोठा कुंकवाचा टिळा. अंगात पांढरी बंडी, खाली लुंगी आणि पायात स्पोर्ट्स शूज. त्या बाबासारखी त्याच्या पाठीवरची त्याची बॅगही आडदांड च. आणि तसाच भारी त्याचा नक्षीकाम केलेला दंड. एकूणच हे व्यक्तीमत्व अगदी वजनदार. प्रथमदर्शनी बघता भिती वाटावी असं. ह्या बाबाच्या रुपासारखाच त्याचा अवाजही! जाड, वचक वाटावी असा. या बाबानी नुसता आवाज जरी दिला नं तरी दम देतोय असं वाटायचं. कुणाशी बोलताना बाबा जोरात हसला तर त्याचा आवाज पुढचे एक दोन किमी वर सुद्धा स्पष्ट ऐकू येईल. मला बाबा भेटला त्यावेळी त्याच्या दाढी मिश्या वाढल्या होत्या. परिक्रमेत केस दाढी मिश्या काढता येत नाही, मात्र परिक्रमेच्या सुरवातीचा, त्याच्या प्रमाण पत्रावरचा फ़ोटो मी जेव्हा पाहिला तेव्हा मला चाचा चौधरी च्या साबू ची आठवण झाली.. तर असं हे व्यक्तीमत्व.
बाबा तसा बि एस एन एल मधून सेवनिवृत्त, मात्र बि एस एन एल तर्फ़े सात वर्ष कुपवाड्याच्या स्पेशल फ़ोर्स मधे, सैन्यात काम करत होता. त्याला सैन्याचं ही background असल्याने त्याच्या हालचालीत एक वेगळाच जरब देखिल होता. तर असा दिसणारा हा माणूस मी माझ्या नकळत वाचायला घेतला तेव्हा माझ्या जे लक्षात ते फ़ार फ़ार वेगळं होतं. देवाची करणी खूप खूप अनाकलनीय असते. हा धिप्पाड आडदांड बाबा अगदी फ़णासा सारखा. जितका तो दिसायला कठोर, तितकाच आतून मऊ. त्याच्याकडे बघितल्यावर जितकी भिती वाटावी नं त्यापेक्षाही तो खूप खूप साधा. कदाचित जास्त साधा म्हंटलं तरी चालेल. छक्के पंजे अजिबात न समजणारा. अगदीच भोळसट नाही म्हणता येणार, पण भोळा नक्कीच. अगदी कुणीपण त्यच्याकडे यावं आणि काय हवं ते मागावं याला. हा देणार! स्वत: जवळ नसलं तर कसं ही करून जमवून देणार, मिळवून देणार. वाट्टेल ती धावपळ करणार, पण आलेल्या माणसाला रिकाम्या हाती परत जाऊ देणार नाही. आता हा स्वभाव वाईट नाहीच, पण लोक यामुळे या बाबाचा बरेच दा गैरफ़ायदा घेतात, आणि या बाबाला समजत नाही असं मला अनेकदा वाटायचं. परिक्रमेत तरी असं होताना मी पाहिलं होतं.
एकदा एका अश्रमात आम्ही थांबलो असताना आम्ही कपडे धुवायला घेतले. विहीर जरा दूर. तिथून पाणी आणून आणून कपडे धुवायचे. बाबानी पाणी आणून द्यायचं, आणि सगळे कपडे मी धुवायचे अशी कामाची वाटणी झाली. त्याप्रमाणे बाबानी पाणी आणलं. मी माझे आणि त्याचे पण कपडे धुवून दिले. आमचे कपडे धूणं झाल्यावर तिथे अजून दोन पुरुष परिक्रमावासी कपडे धुवायला आले. आता ते कपडे धुणार आणि आम्ही आमचं स्वयपाकाचं बघणार, असं खरं तर करायचं होतं, मात्र मला अजिबात भूक नव्हती, त्यामुळे बाबा पुरताच स्वयपाक होता.
ही दोन परिक्रमावासी माणसं बाबाला म्हणाली, “आप हमारे मे भोजन पा लेना”. बाबाला पण ते पटलं. मात्र ही दोघं आपल्याला भोजन देतील आणि आपण आयतं खायचं हे काही बाबाला पटेना. त्याने या दोघांना पाणी आणून द्यायचं ठरवलं. आणि तो पाणी आणून देऊ लागला. आयतं पाणी आणून मिळतय म्हंटल्यावर त्या दोघांनी भरपूर आणि जास्ती चे कपडे धुवून घेतले. आणि बादल्या बादल्या पाणी आणण्याचं काम हा बाबा करू लागला. त्या वेळेला साधारण संध्याकळचे चार साडेचार झाले असतील. यांचे कपडे धुवून झाले. आता पूजा पाठ, आणि मग भोजन प्रसादी.
पण माहितिये का गम्मतच झाली. त्या दोघांनी सगळे कपडे प्लास्टिक च्या पिशवीत भरले, म्हणाले, “अगले गाव जाकर रुकेंगे अभी तो समय है, जा सकते है, वहा तयार भोजन मिलता है, हम थक गये है, अब भोजन बनाने का मन नही कर रहा” ते लोक ८- १० किमी अजून चालू शकणार होते. आम्ही मात्र २५ किमी चालून आलो होतो, आम्हाला पुढे चालणं शक्य नव्हतं. ते दोघे जेवणाचा विषय ही न काढता निघून गेले. बाबा मात्र खूप शांतपणे त्यांना निरोप देत होता. मग मी आणि बाबानी खिचडी बनवून घेतली.
त्या दोघांनी बाबाच्या जेवणाचा वीचारही केला नाही, आणि बाबा पाणी आणून देतोय हे पाहून त्यांनी जास्तीचे कपडे धुवून घेतले हे पण मी पाहिलं होतं. हे बाबानी पण पाहिलं होतं खरं तर….आणि ते थांबणार नाहीत याची कल्पना पण बाबाला आली होती असं त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं. ते तसं वागले याचा बाबाला रागच आला नाही, की त्यांनी बाबा कडून काम करवून घेतलं आणि स्वत:ची वेळ आल्यावर मात्र स्वयंपाक करायचं टाळलं, हे बाबाला समजलंच नाही की काय माहित नाही. मात्र पुढे अनेकदा मी पाहिलं, आणि त्याच्या बोलण्यातून सुद्धा मला जाणवलं की लोक त्याच्याकडून कामं काढून घेत असतात. मात्र आमच्या बाबाला चंटपणे कामाला नाही म्हणंण काही सुचत नाही. याचा हा मदत करण्याचा स्वभाव चांगला आहे पण याला काही सीमा असावी की नाही? बाबा भोळा आहेच याबद्दल वाद नाही पण मदत आणि भोळेपणा हे दोन्ही एकत्र येऊन बाबावर भारी संकट ओढवलं असतं एकदा.
एकदा नं एका आश्रमात असतानाची गोष्ट. रात्रीचं सगळं आटोपून मी नुकतेच अंथरुणावर पडले होते. त्यावेळी आमच्या सोबत त्या आश्रमात मध्य प्रदेशातले ४ परिक्रमावासी अजून होते, दोन स्त्रीया आणि दोन पुरुष होते. त्यातली एक मैया जी माझ्या जवळ आली आणि म्हणाली “आपको डोलडाल जाना है क्या” (डोलडाल म्हणजे लॅटरीन). मी म्हंटलं “नाही”. ती म्हणाली, “अब मै क्या करू, मुझे जाना है” आणि असं म्हणत ती एकटीच निघून गेली. आमच्या बाबाला काय वाटलं माहीत नाही. मिनिट दोन मिनिट नंतर हा टॉर्च घेऊन उठला आणि बाहेर जाऊ लागला. मी सहजच विचारलं, “काय झालं बाबा? कुठे जातोयेस?” तर म्हणाला, अगं त्या मैया जवळ टॉर्च पण नाहीये, तिला टॉर्च तरी देऊन येतो, बीचारी एकटी कुठे गेली असेल अंधाराची?”… मी अगदी ओर्डूनच सांगीतलं त्याला, ..असू दे, गेलीये नं ती, तू अश्या वेळी जाऊ नकोस मदतीला…..नाही गेला तो, पण त्याला काय समजलं आणि काय नाही माहित नाही बाबा! मी मात्र वीचार करूनच घाबरले. ती गेली त्या दिशेला हा गेला असता, आणि तेही टॉर्च घेऊन तर……?…….? वाचला! लोकांचे गैरसमज व्हायला वेळ लागत नाही हो! हा जायचा चांगल्या उद्देशानी, मात्र याचा उद्देश चंगला आहे हे त्या वेळेस कुणाला ही समजलं नसतं…. तर काय वाटलं असतं लोकांना?… असो..
असे एक ना दोन, अनेक किस्से आहेत बाबाचे. बाबा अतिशय बडबड्या स्वभावाचा. कधी बोलायचं, आणि कधी थांबायचं ह्याची अजिबात जाणीव नसलेला. बोलण्याच्या नादात बरेचदा तो खूप जास्त बोलत, इतका की लोक कंटाळून उठून जात. आमचा बाबा भडभडा हो अगदी. तिलकवाड्य़ाची गोष्ट. जेवणं झाली की थोडावेळ सगळे परिक्रमावासी शेकोटी जवळ बसत. मग कुणी अनुभव सांगायचे आपले, तर कुणी आपले प्रश्न विचारायचे. बराच सत्संग चालत असे. आम्ही ३ दिवस होतो तिलकवाड्याला. तर तिथे एकदा सामुहिक भजन करायचं ठरलं. बाबाला संगीताची भारी आवड. तबला छान वाजवतो तो. पण आपण परिक्रमेत अहोत आणि संगीताच्या कार्यक्रमात नाही हे काही त्याच्या लक्षात येईना.
तर झालं असं, की ज्याला जी जी भजनं येतात ती ती त्यानी गायची आणि बाकीच्यांनी साथ द्यायची असं ठरलं. सगळेच परिक्रमावासी काही गाणारे असतात का? पण या बाबाला हे समजवणार तरी कसं? बाबानी जवळचा लाकडी स्टूल घेतला आणि तबल्याची, म्हणजे ठेक्याची साथ करायला सुरवात केली. त्यानी त्या स्टूलवर जे काही वाजवलं ते छानच होतं. तबल्याची सर नव्हती तरी ठेका देता येत होता. अगदी सगळ्यांनी त्याची खूप तारीफ़ केली. झालं… नेमकं इथेच गाडं बिनसलं. आमच्या बाबाच्या अंगातला तब्बलजी जोमाने जागा झाला. इकडे भजन गायला सुरवात झाली की बाबा त्या परिक्रमावासी ला मधेच थांबवत.. “ शर्मा जी, ताल पकडीये, देखो ये ये …ऐसा” असं म्हणत, मानेला हिसका देत तो शर्मा जीं ना ताल समजवून देऊ लागला. दोन तीन भजनं असे थांबवत थांबवत गायल्यानंतर शर्मा जींना सहन होईना. ते उठून निघून गेले. बाबा मात्र अजूनही फ़ार फ़ार रंगात होता.
असे अजून दोन तीन लोक निघून गेल्यावर लोकांना रीतसर शिकायला का आवडत नाही असा प्रश्न बाबानी अगदी साधेपणाने केल्याचं मला आठवतय. उरलेल्या मंडळींनी बाबाच्या या तब्बलजींना आवरायचा एक विलक्षण उपाय शोधून काढला, पण तो उपाय पूर्णपणे फ़सला. बाबाने तबला वाजवू नये म्हणून एका तरुण परिक्रमावासी नी आपली चतुराई वापरून उपाय काढला तो असा… हा तरूण म्हणाला, “बाबा, तुम्ही वाजवण्यापेक्षा नं भजन गायलं तर जास्त छान साथ होईल, म्हणजे तुम्ही ठेक्यात गाल आणि आम्ही तुम्हाला सोबत करू”. हे ऐकून बाबा जाम खुश झाला. आणि कुणी भजन गायला सुरू केलं की त्याच्या आवाजाला दाबून आपल्या खडया आवाजात आणि ठेक्यात गायला लागला. तबला बंद झाला पण आवाज सुरू, आता उरलेली मंड्ळी पण पेंगू लागली. मी बाबाला ३-४ दा थांबावण्याचा प्रयत्न केला पण बाबा काही थांबेना. शेवटी सगळे लोक निघून गेले, आणि शेवटी मी एकटीच उरल्यावर बाबा गायचा थांबला. पण इतकं झाल्यावरही बाबाला त्यात वावगं वाटलं नाही आणि लोक आपल्याला कंटाळून उठून गेले होते हे ही त्याला समजलच नाही.
आमचा हा बाबा कमालीचा विसराळू पण होता. हो म्हणजे होतं कधी कधी विसरायला पण इतकं होतं हे मला जरा नवीन होतं. त्याच्या विसरभोळेपणाचा एक मजेशीर किस्सा सांगते. एकदा संध्याकाळी आम्ही ठरवलं की सकाळी चहा घेऊन पुढे जायचं आणि दुपारची भोजन प्रसादी अगदी कमी घ्यायची किंवा बालभोग जास्त घेतला तर दुपारी जेवायचं नाही. दुपारी पोट्भर जेवलं की चालणं होत नाही ना, म्हणून असं करायचं आम्ही दोघांनी ठरवलं. नंतर बाबा जरा फ़ेरफ़टका मारायला गेला असताना गावात कुणीतरी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायचं आमंत्रण दिल्याचं बाबाने मला दुस-या दिवशी सकाळीच सांगीतलं.. मी चट्कन म्हणाले त्याला, “ अरे पण आपण सकाळी जेवण घ्यायचं नाही असं ठरवलं होतं ना”.. तो ही म्हणाला.. “ अरे हो, प्रश्न च मिटला, आपण जेवणारच नाही आहोत”..मी:- “अरे पण तू त्यांना हो म्हणून सांगीतलय्स का?, तसं असेल तर जायला हवं आपण”..आता मात्र बाबा गोंधळला, म्हणाला मी आधी त्यांना हो म्हणालो होतो, नंतर बहुतेक मी नाही म्हणून सांगितलं, पण मला आठवत नाहीये!..आता विचारायचं तरी प्रॉब्लेम आणि नाही विचारायचं तरी प्रॉब्लेम! आणि गंमत म्हणजे कुणाकडे जेवायला बोलावलं होतं ते ही तो विसरला होता. शेवटी ज्यांच्या घरून आमंत्रण होते ते सकाळी पुन्हा आले आश्रमात, तेव्हा मला उलगडा झाला.
लोक बाबाला टाळायचे, त्याच्याकडे दूर्लक्ष करायचेत, मात्र काम असलं की त्यांना बाबा हवा असायचा. मला त्या वेळी फ़ार वाईट वाटायचं. वाटायचं बाबाला सांगावं, तुझा लोक फ़ायदा घेतात, तुला टाळतात.. पण मी तसं करूच शकेल नाही. कारण मी आतापर्यंत सांगीतलेला बाबा ही त्याची एक बाजू होती. जी दुसरी बाजू मी बाबाची पाहिली ती अजूनच वेगळी.ती आता सांगते.
दासबोधाची सतत पारायणं करणारा हा बाबा दासबोध वाचताना इतका मग्न आणि शांत होऊन जायचा की त्यानी वाचत रहावं आणि आपण ऐकत राहावं. प्रत्यक्ष रामदास स्वामीच दासबोध सांगताहेत असं वाटायचं त्या वेळी. प्रभू रामचंद्र, बजरंग बली हनुमान आणि रामदास स्वामी यांचा विषय निघाला की बाबाच्या अंगात नक्कीच कुठलीशी शक्ती संचारू लागलीये असं वाटायचं. त्याच्या डोळ्यात प्रचंड तेज चमकू लागायचं. तो तुमच्या आमच्या विश्वाच्या बाहेर असायचा कुठेसा… आणि दासबोधाचे समास अन समास तोंडपाठ असलेला हा बाबा कोड्यासारखाच वाटायचा मला! मला नेहमी म्हणायचा तो..”तुझा बाबा तुझ्यासोबत आहे, तुला कधीच कुठलाच त्रास होऊ देणार नाही”.. हे असं कसं झालं माहितिये? सांगते.
मला बाबा पहिल्यांदा नारेश्वर ला भेटला. त्या वेळी मी एकटी होते, माझ्या अंगात ताप होता ..जवळ जवळ १०३ असावा. मी आश्रमाच्या हॉलमधे कण्हत विव्हळत पडले होते. माझी काळजी घ्यायला कुणीच नव्हतं, तेव्हा माझी ओळख ही नसलेला हा आडदांड माणूस माझ्यासाठी धावपळ करत होता. एक अनोळखी मुलगी, एकटी, तापाने फ़णफ़णलेली पाहून ह्याचं हृदय पाणी पाणी झालं होतं. आपल्या जवळचं पांघरूण यानी आईच्या मायेने माझ्या अंगावर पांघरलं होतं. बापाच्या काळजीनी हा धावत गेला होता डॉक्टर ला आणायला! माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या रात्रभर ठेवणारा आणि रामरक्षेची आवर्तन करणारा हा बाबा मला ओळखत देखिल नव्हता. माझा ताप उतरल्यावर जेव्हा मी याच्या पाया पडले तेव्हा त्याच्या डोळ्यातला बाप रडताना मी पाहिला होता….”मला नर्मदा माईनी मुलगी दिली नव्हती, ती आज दिली” हे उदगार काढणारा हा बाबा त्या दिवसापासून माझा बाप म्हणून माझ्या सोबत होता तो परिक्रमा संपेपर्यंत!
त्याचं ते विसराळूपण खूप मोठं होतं ज्यात तो लोकांनी त्याच्याशी केलेली वागणुक संपूर्ण पणे विसरून जायचा. त्याचा तो हळवा स्वभाव अगदी कुणाही साठी दुखायचा तो फ़क्त सदिच्छेपोटी, निस्वार्थतेने, त्याचं ते गाणं वाजवणं दिलखुलास असायचं..कुणाचं मन मोडणं कधी आलच नसेल याला! तर असा हा बाबा, जसा होता तसा, जसा माझ्या मैयानी मला दिला होता तसाच ठेवायचं मी ठरवलं. पुढे परिक्रमेत त्याच्या भोळया व्यक्तिमत्वाचा कुणी गैरफ़ायदा घेऊ नये इतकी मी काळजी घेत गेले, माझ्यापुरती, कारण ह्या निश्पाप मनात राग द्वेश काहीही नव्हतं, आणि या विकारांची जाणिव सुद्धा त्या मनाला होऊ नये इतकं जपण हीच माझी बाबा साठीची निस्वार्थ सदिच्छा होती…आणि कायम असेल!
सौ. सुरुचि नाईक
*जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे..*
*जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे..*
समर्थांनी विचारी मनालाच जगातील सर्वसुखी प्राणी कोण हे शोध असे सांगीतले, आणि त्या प्रमाणे हे मन संपूर्ण सारासार विचार करून सुखी जीवाच्या शोधात निघाले असता वरपांगी सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्याश्या सुखाच्या शोधात आहेत आणि त्या सुखाच्या अभावामुळे त्यांना संपूर्ण पणे सुखी असे म्हणता येणे शक्य नाही असा मनाचा विचार झाला.
सुखाची परिभाषा वगैरे करणं तसं फ़ारच कठीण, कारण ज्याच्या त्याच्या दृष्टीने ज्याचं त्याचं सुख हे वेगळं असणार हे निश्चित, आणि म्हणून तो त्या सुखाच्या शोधात कायम फ़िरतीवर असणार हे ही निश्चित.. मग कसं ठरवायचं, की कोण सुखी आहे ते?
*समर्थांच्या पुढच्या ओळी मात्र सुख किंवा दु:ख कसं वाट्याला येतं ते सांगतात..*
*“मना त्वाचि रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले”* म्हणजे ज्याचे जसे काही कर्म असतील त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला सुख किंवा दु:ख येतील हे निश्चित… मात्र तुकाराम महाराज म्हणतात *“सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता येवढे..”* म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखाचं प्रमाण कमी आणि दु:खाचं च प्रमाण जास्त आहे असे समजायला हरकत नाही… मग आता करायचं काय? काराण सुख काय ते नक्की माहित नाही, ते कमी आहे, आणि प्रत्येकासाठी वेगळं देखिल आहे…आणि ते मिळवण्यसाठी काय करावं हेच समजत नाहीये.. मग मात्र समर्थांनी यावर सुचवलेला उपाय आठवला… ते म्हणतात…
*“देहे दु:ख ते सूख मानीत जावे”*… म्हणजे सुख आणि दु:ख हे मानण्यावर आहे असे समजावे का? *“मना मानसी दु:ख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे”* म्हणजेच मनालाच सुखी होणं शिकवलं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही… अर्थात ते कसं हे समर्थांनी सांगितलच आहे… पण प्रश्न इथे असा आहे की हे असं करणं सर्व सामान्य माणसाला कसं शक्य होईल? कारण हा उपाय जालिम असला तरी अत्यंत कठीण आहे.
सुखी होण्याचा असा काही कोर्स असेल का, किंवा मनाला शिकवण्याची काही शिकवणी असेल का? हो पण त्याची पूर्ण खात्री असली पाहिजे..की अमुक एक कोर्स केल्यानंतर दु:ख नावाचा प्रकार संपेल आणि सुख नावाचा प्रकार सुरु होईल.. तेही प्रत्येकाचं आपापलं बरं का… कारण याच्या त्याच्या सुखाने मी सुखी होणार नाहीये, मला माझं पर्सनल सुख हवं असणार आहे. मग अशी पर्सनल शिकवणी पण लागेल!
मला वाटतं कदाचित असाच काहिसा शोध माझा ही सुरू असणार, प्रत्येका सारखा.. आणि या सुखाच्या शोधात मला काही वेडी लोक सापडलीत. वेडात सुख असेल कदाचित… हो असेलच… आणि ह्या वेड्या मंडळींच्या वेडाचा ध्यास लागला… लागता लागता असं काही घडलं की माझं आयुष्य संपूर्ण पणे बदललं असं म्हण्टलं तरी चालेल. सुख मिळालं की नाही, मन शिकलं की नाही, ते मला सांगता येणार नाही मात्र एक नक्की समजलं.
सुख आणी दु:ख हे परस्पर विरोधी आहेत आणि एकाचा अभाव हाच दुस-याच्या अस्तित्वाचं मूळ आहे. मात्र असं असलं तरी ही याही पलीकडे काहीतरी आहे हे नक्की… म्हणजे.. जसं दिवस आणी रात्र यामधे संधि काल असतो तसं असेल कदाचित… तो दिवस ही नसतो आणि रात्र ही नसते…. ते जे काही असतं ते परिपूर्ण असतं मात्र दिवस आणि रात्र या दोन्ही पेक्षा वेगळं असतं… सुख आणि दु:ख दोन्ही नाही अशी आयुष्यातली जागा सापडली तर किती छान नं.. म्हणजे मग न सुखाची पर्वा न दु:खाचं दु:ख! अशा ज्या काही अवस्था आहेत त्याला विषेश अशी नावं आहेत, पण सध्या तो आपला विषय नाही… कारण मला आता त्या अभ्यासाबद्दल नाही तर त्या अनुभवा बद्दल लिहायला जास्त आवडेल..
*तर मंडळी, माझ्याच मते मी दु:खी नाही…* गेल्या एक वर्षात म्हणजे १ नोव्हेंबर २०१७ पासून २२ मार्च २०१८ पर्यंत चा कालावधी माझ्या अयुष्यात असा काही आला की त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला , किंवा संपलाच असं मी म्हणेन… आई नर्मदेच्या सान्निध्यात आणि त्याही नंतर आज जे काही आहे ते, ते आहे इतकच मी सांगू शकेन .. *एखादी गोष्ट आहे आणि म्हणून तिचा स्वीकार करायचा, म्हणजे त्या गोष्टीच्या असण्याचा स्वीकार करायचा तर एखादी गोष्ट नाही तर म्हणून ती नाही हे ही मान्य करायचं ..म्हणजे ठरवून नव्हे हं.. आपोआप, अगदी कुठल्याही प्रयत्ना शिवाय.. अशी काहीशी सवय लागली… चांगली की वाईट ते माहित नाही…पण लागली. त्याचे फ़ायदे तोटे माहित नाही आणि माहित करून घेण्याची इच्छा देखील नाही…आणि हे नेमकं कसं घडलं ते ही माहित नाही…
नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा योग आला, समर्थांच्या सांगण्याप्रमाणे ते पूर्वसंचित च, पण त्यामुळे आणि त्या नंतर माझ्यामधे जो काही बदल झाला त्याचा हा परिणाम… बदल कोणता, किंवा परिणाम काय असा विचार करायचा झाला तर ते मला शब्दात मांडता येणार नाही.. अनुभवता मात्र येतय…आता नेमकं कसं सांगू? प्रयत्न करून बघते….
*समोर येणा-या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीदाराच्या भुमिकेतून बघितल्या जातं*, म्हणजे कसं तर एखाद्या कोर्ट केस मधला साक्षीदार नजरेसमोर आणू… जी काही घटना घडली ती या सक्षीदाराने पाहिली.. मात्र झालेल्या घटनेत त्याचा सकर्म सहभाग नाही, तो केवळ साक्षीदार आहे आणि जे झालं ते सांगण हेच त्याचं काम आहे.. आणि ते ही गरज पडली तर.. गरज पडली नाही तर फ़क्त तो अनुभव गाठीशी कुठेतरी असतो, इतकच! जेव्हा प्रत्येकच गोष्टींकडे असं पाहिल्या जातं तेव्हा त्याचा न आनंद होतो न दु:ख कारण मुळात आनंद किंवा दु:ख हे त्या त्या अपेक्षेवर अवलंभून असते…इथे या साक्षीदाराला घडलेल्या घटने कडून कुठलीही अपेक्षा नसते.. त्यातून त्याला काहीही नको असतं… आणि म्हणूनच तो त्यावर विचार देखिल करत नाही, साक्ष देतो आणि मोकळा होतो…
“मोकळा होतो” हा शब्द च किती सूचक आहे नं…. म्हणजे तो बांधल्या जात नाही किंवा अडकून पडत नाही.. म्हणजे समोर कहिही असो… तो तिथे असतो, पण त्यात गुंतत नाही… ते जे काही आहे ते ते आहे तोवर बघायचं, आणि ते संपलं की संपलं…ते संपण्याचा आनंदही नाही आणि दु:ख तर अजिबात नाही.. मग दुसरं कहीतरी समोर येणारच.. आणि ते ही कधीतरी जाणारच.. हे माहितच आहे… या “काहीतरी” च्या मागे जाण्याची इच्छाच न होणं ही मोकळीक….मला सियाराम बाबांचे शब्द आठवले…. ते म्हणतात.. “ मै तो सिर्फ़ तमाशा देखता हू”… तसं फ़क्त मोकळेपणानी तमाशा बघायलाच आवडू लागलय… मग समोर काहिही असो… पुन्हा तसाच तमाशा असावा अशी इच्छा नाही, तसा नसावाच असं ही मत नाही…. कारण काय समोर येतय हे आपल्या हातात नसतं आणि ते आपल्याला महित ही नसतं.. आपण आपली फ़क्त गंमत बघायची….
ही गंमत बघायला मन आपोआप शिकलं ते मैयाच्या कृपे मुळे… अंगवळणी पडल्यासारखं झालं.. कुठला निर्णय घ्यायला लागला नाही का कुठलं नियंत्रण ठेवावं लागलं नाही… खरं सांगू का.. सुखरूप आनंद काय असतो ते उमगू लागलं… जी अवस्था इतर कुठल्याही अवस्थेवर किंवा घटनांवर किंवा अपेक्षांवर, व्यक्तीं वर अवलंबून नाही त्या अवस्थेला सुखरूप असं म्हणता येईल कदाचित…आणि दु:ख नाही म्ह्णून आनंद म्हणूयात…. आणि हे असं हसत खेळत, आईच्या पदराशी जसं लहान मूल घुटमळतं तसं त्या माईच्या किना-याशी घुटमळत, तिने दिलेल्या अनुभवाच्या शिक्षणातून असं काही साध्य झालं की आता दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. आयुशःयात जे काही मिळायचं होतं ते मिळून झालेलं आहे.. जे काही समोर येतय ते पानात वाढलेलं आहे, आणि जोवर ह्या जड देहाच्या पिंजर-यात हा जीव आहे तोवर ते जे काही समोर येणार आहे बघा वेच लागणार आहे.. मात्र ते बघताना एखादी फ़िल्म बघावी अशी त्रयस्थाची भूमिकाच मनाकडून आपोआप आणि कायम घेतली जाऊ शकणं हे केवढं मोठं भाग्य!
आता ह्यात दु:ख नक्कीच नाहीये.. सुख आहे का ते माहित नाही, कारण ते कसं असतं नक्की याची जाणीव च नाहीये….आणि आता ते जाणून घेण्याची इच्छा ही नाहीये, मात्र हे जे काही आहे त्याला, म्हणजे या अवस्थेला जर सुख म्हणत असतील तर माझ्या ह्या विचारी मनाला समर्थांची क्षमा मागून असच म्हणावं लागेल..
जगी सर्व सुखी अशी मी च आहे…मना शोधिले तूच हे सत्य पाहे….
सौ सुरुचि.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २४
नर्मदे हर.
खुंटामोडी ते मोलगी प्रवास मी एकटीने केला. म्हणजे मागे पुढे मंडळी होती पण अंतर बरच होतं. रस्ता गावातून, डोंगरातून असाच होता. ऊन छान पडलं होतं आणि वातावरण पण आल्हाददायक होतं. अंतर मात्र बरच होतं. काल खुंटामोडी जवळ वाटलं आणि पटकन आलं होतं तसंच आज मोलगी खूप खूप दूर जाणवत होतं.
या प्रवासात नं एक गंमत च झाली. रस्ता डोंगराळ होता त्यामुळे सरळ नव्हताच. खुप पुढे गेलेला मयुरेश दादा काही दिसत नव्हता. त्यामुळे रस्ता विचारावा लागणार होता. काही ठिकाणी रस्ता विचारायला लोक दिसत होते, मात्र काही ठिकाणी कुणीच नाही. एका ठिकाणी मला रस्ता जरा गोंधळात टाकणारा होता. मी थोडे थकले होते, म्हणून मी रस्त्याच्या कठड्याला टेकून उभे राहिले. मोठा रस्ता होता छान, पण गर्दी फ़ार नव्हती. एखादी गाडी येईल तेव्हा विचारू असं वाटून मी उभी होते. “इतक्यात माझ्या मागून आवाज आला, चक्क मराठीतून, तो समोर पूल दिसतोय तिथून खाली उतरून मग डावीकडे जा”… बाईचा आवाज होता…खूप ओळखीचा आवाज होता… मला आधी वाट्लं की मला भास होतोय, पण पुन्हा तोच आवाज आला…. दिसलं मात्र कुणीच नाही.
मागे शूलपाणीच्या झाडीत पोर्टर घेऊ नको असा आवाज आला होता नं, तसाच काहिसा, पण तो आवाज मला माझ्या आतून आल्यासारखा वाटत होता. हा आवाज कुणीतरी बाहेरून बोलल्यासारखा आला… मी पुढे चालू लागले आणि समोर गेल्यावर पुलावरून खाली उतरले. तिथे एक दुकानदार होता, त्याने पण त्या आवाजाने सांगीतलेल्याच दिशेला बोट दाखवलं…. त्या आवाजानी रस्ता बरोबर सांगितला होता…. पण तो कुणाचा आवाज होता ते काही समजलं नाही.
पुढे त्याच रस्त्यावर एक दुधवाल्या चं दुकान आणि छोटंसं होटेल होतं. त्यानी मला बोलवलं. हॉटेल अजून सुरू व्हायचं होतं, म्हणून त्यानी दुधाचं पाकिटच दिलं. आता याचं काय करणार? ते पाकिट तसच दातानी फ़ोडून पिऊन टाकलं.. छोटं २५० एम एल चं पाकिट होतं. ते संपलं तर त्याने लगेच दुसरं दिलं, आणि बस ये पी लो, फ़िर नही दुंगा असा आग्रह ही केला.. ते ही पाकिट मी प्यायले… गंमत च आहे, इथे परिक्रमेत काळा चहा मिळतो, म्हणजे इथे लोक तोच पितात, म्हणून… आणि मला चक्क अर्धा लिटर ताज दुध प्यायला मिळालं.. अगदी नाश्त्याच्या वेळेवर… राजेशाही परिक्रमाच म्हणायची ना ह्याला?पुढे वाटेत एक दोन दा चहा झाला, आणि मोलगी गावात एका चौकात अचानक मला मयुरेश दादानी आवाज दिला.. तो एका डॉक्टर कडे बसला होता. त्या वेळी माझी टाच जरा दुखत होती, पण डॉक्टरला दाखवावं असं काही नव्हतं, मी सहन करू शकत होते आणि म्हणून मी काही तो विषय त्या डॉक्टरशी बोलताना काढला नाही. आम्ही चहा प्यायलो, सर्दी खोकल्याच्या काही गोळ्या जवळ असू द्या असं म्हणत त्या डॉक्टर ने आम्हाला दिल्या. आम्ही आता निरोप घ्यायला उभं राहिलो. माझ्या उभं राहण्याकडे पाहून त्या डॉक्टरांनी अजून दोन गोळ्या माझ्या हाती दिल्या.. म्हणाले “ एडी मे दर्द है ना आपके, इसे ले लेना, कम हो जायेगा”…
आम्ही मोलगी ला नाईंकाच्या घरी पोहचलो. छानसा टूमदार बंगला होता. त्यांनी आमची व्यवस्था खूप छान केली. खूप अगत्य केलं. कुंडल नंतर इथे पुन्हा घरचं जेवण जेऊन आनंद झाला. तो दिवस मुक्कम करून आम्ही दुस-या दिवशी वडफ़ली साठी निघालो.हा भाग येतो नांदुरबार जिल्ह्यात. महाराष्ट्रात आल्याचं समाधान वाटू लागलं पण मध्य प्रदेशाच्या तुलनेत या भागात परिक्रमा वासींबद्दल बरीच उदासीनता आढळली. कारण काही कळलं नाही. मात्र सुरगस च्या शाळेत विश्रामाला थांबलो असताना अचानक एक माणूस माझ्याकडे येऊन मला नमस्कार करू लागला. परिक्रमा वासींना लोक नमस्कार करतात, त्यामुळे विषेश नाही.. पण हा म्हणाला “ तुम्ही नागपूरच्या न मॅडम?” अरेच्या, हे कसं समजलं याला? “ मॅडम ओळखलं नाही का?, मी तुमच्या शाळेत आलो होतो नं माझ्या विद्यार्थ्याला घेऊन एक्जिबीशन साठी, दिल्ली ला पण होतो आपण सोबत, इन्स्पायर अवार्ड साठी, तुम्ही त्याच आहात नं पहिलं बक्षिस मिळालेल्या..सगळ्या स्टुडंटला तुम्ही कसे उत्तरं द्यायचे ते सांगितलं होतं नं मॅडम, मी आजपण तुमच्या टिप्स मुलांना सांगत असतो.” अरे बापरे, तर हे सर मला छानच ओळखत होते, आणि या परिक्रमावासींच्या परिधानात, २०१३ नंतर म्हणजे ४ वर्षांनी यांनी मला ओळखलं होतं, खरच अशा प्रकारे आपण कुणाच्या लक्षात राहू असं वाटलं नव्हतं. या शाळेत खरं तर परिक्रमावासीं साठी सेवा वगैरे प्रकार नाहीये, पण त्या दिवशी मिड डे मिल मध्ये मुलांबरोबर आम्हा सर्व परिक्रमा वासींना या शिक्षक मंडळींनी आग्रहानी जेवायला वाढलं.
नांदुरबार मधे मात्र परिक्रमा आणि परिक्रमावासंबद्दल खूप उदासीनता आहे. सुरगस च्या शाळेतून पुढे निघालो, ब-याच वेळाने पाणी कुठे मिळतय म्हणून पाहू लागलो तर नळ किंवा हापशी दिसेना, म्हणून एका घरी पाणी मागितलं…”पानी खतम हो गया” असं उत्तर ऐकू आलं. आश्चर्य आहे नं.. निदान पाण्याला कुणीच नाही म्हणत नाही, म्हणजे परिक्रमा वासी असो का नसो.. बरं हाच अनुभव अजून दोन तिन घरीही आला…. कारण काही कळेना…मात्र पुढे इथे कुठे रात्र काढायची वेळ आली तर सोय होणं कठीण आहे हे जाणवू लागलं.
तसंच झालं. आम्ही वडफ़ळी पर्यंत पोहचू शकणार नाही समजत होतं. दुपार उलटून गेली होती. छोटे छोटे आदिवासी पाडे आहेत इथे पण तसा हा जंगलाचाच भाग. जस जशी संध्याकाळ होत आली तशी थंडी वाढू लागाली. इथे निवारा शोधायला लागणं आवश्यक होतं. निवारा सापडत नव्हता, कुणीतरी म्हणालं समोर राम मंदिर आहे तिथे जा.. वाटलं, जमलं की.. पण तसं नसतं नं! अहो समोर दोन फ़ुटाचं रस्त्याच्या कडेला बांधलेलं राम मंदिर होतं.. इथे कुठे राहणार आम्ही? पुन्हा पुढे गेलो… पुन्हा एक छोटं मंदिर.. ते राम मंदिर काही सापडेना. जो कुणी रस्ता सांगत तिथे एक छोटं मंदिर च असे… आज कदाचित उघड्यावर झोपावं लागणार होतं. मयूरेश दादा झपाझप पुढे गेला..मी आणि पसारकर काकू मागे पुढे होतो.. स्मीता आणि सुरेखा ताई मागे होत्या.
आम्ही आता पांढरा माती या गावा जवळ होतो. साधारण ४.३० झाले असावेत. एका झाडाखाली बरीच मुलं खेळत होती. आमच्या जवळ चॉकलेट होते, त्यातले काही मी त्या मुलांना दिले, आणि एक छोटासा मुलगा, ४-५ वर्षांचा असेल जेमतेम, तो माझ्याकडे पाठ करून बसला होता. त्यानी चॉकलेट घ्यावं म्हणून मी त्याला आवाज दिला. त्याच्या अंगावर कपडे आणि डोक्यावर केस नव्हते. ते रुपडं लोभस दिसत होतं.. मी त्याला आवाज दिला तसा तो माझ्याकडे वळला. त्याच्या गळ्यात तुळशी च्या माळेसारख्या पण चकत्या चकत्या च्या माळा होत्या. त्याच्या कपाळावर जखम होती आणि रक्ताचा ओघळ डोळ्यापर्यंत उतरला होता. अर्ध्या रस्त्यात येऊन थांबला, आणि “मुझे नही चाहिये टॉफ़ी, मै टॉफ़ी नही खाता असं म्हणून” म्हणून धावत धावत निघून गेला. त्या वेळी मला आश्चर्य वाटलं, इतका लहान मुलगा, इतकं लागलं असताना रडत कसा नाहीये, आणि मुलांना चॉकलेट आवडतं, मग हा नाही का म्हणाला? मला त्या वेळेला बाकी काही सुचलं नाही. मात्र पुढे गेल्यावर त्या मुलाचे तेजस्वी डोळे, उंच कपाळ, तरतरीत नाक, आणि मुख्य म्हण्जे प्रचंड आत्मविश्वास, हे सगळं मला जाणवलं.. त्याच्या डोक्यावरची भली मोठी जखम आणि त्याही अवस्थेत तो अतिशय शांत असाच होता…. नंतर जाणवलं, की कदाचित हे सप्त चिरंजीवांपैकी अश्वत्थामा तर नसतील? मला नक्की माहित नव्हतंच, पण असच वाटलं की अश्वत्थामा च होते. पुढे मी अनेक साधू महात्मे आणि पारिक्रमावासीशी हा प्रसंग शेअर केला असता मला अश्वत्थाम्याचे दर्शन झाले असा निष्कर्ष निघाला. पुढे महेश्वर ला स्वामी हृदय गिरी महाराज, आणि परिक्रमेनंतर श्री सतीश चूरी (नर्मदा परिक्रमावासी, लेखक आणि अभ्यासक) यांना ही विचारले असता त्यांनी स्थळ आणि काळ यांचा संदर्भ देऊन त्या काळात आणि साधारण त्या वेळेला व त्या पट्ट्य़ामधे अश्वत्थामा दर्शन देतात असे अनेकांचे अनुभव असल्याचे सांगितले. नर्मदा परिक्रमेत, शूलपाणी च्या झाडीत झालेले हे दर्शन म्हणजे सौभाग्याची परिसीमाच नाही का?
आम्ही निवारा शोधत असताना घडलेला हा प्रसंग, पण त्या वेळी मला मात्र काहीही सुचलं नाही. हे अश्वत्थामा असतील असा विचारही डोक्यात आला नाही, आणि असंच नर्मदा माईनी दर्शन दिलं तेव्हाही झालं होतं.इतकच काय तर अगदी पहिल्या दिवशी संकर महारांजांनी दर्शन दिलं त्या ही वेळेला असच. ह्या शक्तींच्या प्रभावामुळे असेल पण आपल्या मनावर आणि बुद्धीवर परिणाम होतोच. कदाचित ह्यांच्या तेजामुळे त्या झाकोळून आणि दिपून जात असतील.
एव्हाना निवारा शोधायला गेलेला मयुरेश दादा कुठेच दिसत नव्हता. मी आणि पसारकर काकू बरच अंतर पुढे चालून आलो तरी त्याचा काही अतापता नव्हता, आता दोन रस्ते होते, कुणी कडे जायचं? आम्ही ठरलेली किल्ली वापरली आणि मोठ्या मोठ्याने नर्मदे हर चा गजर सुरु केला, आणि खूप दुरून, खोलातून आल्यासारखं मयुरेश दादा चं नर्मदे हर ऐकू आलं. आम्ही त्या दिशेनी गेलो तर रस्त्याच्या कडेला पाय-या उतरून खोल वर एक घर होतं. त्यांच्या शेतातून पुढे गेलं की एक मंदिर होतं, त्या मंदिरात तो थांबला होता. एक व-हांडा, आणि चार खांब असच ते मंदिर, पण डोक्यावर छत मिळालं होतं आणि जेवणही मिळणार होतं. आजची रात्र चांगली जाणार होती… उद्या आम्ही वडफ़ळी आणि तिथून पुढे जाणार होतो. वडफ़ळिच्या मुक्कामात मला खूप आनंददायक असं काहितरी मिळालं आणि सोबत पुन्हा काही संकेत. मनाचा काही आजारी भाग काढून फ़ेकायची संधी आणि काही अनुभव..पण ते आता पुढच्या भागात सांगते.
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २५
*नर्मदे हर.*
सकाळी लवकर उठून आम्ही वडफ़ळी कडे निघालो. अंतर फ़ार नव्हतं पण काल संध्याकाळी नक्कीच पूर्ण झालं नसतं. वडफळी ला पोचतो तोच तिथे श्रीपाद, जो मागे आम्हाला विकास जी धुळे यांच्या सोबत भेटला होता त्याने आमचं स्वागत केलं.. तिथल्या आश्रमाच्या दारशी आले आणि पुन्हा माझं मन हळवं झालं. दाराच्या पाटीवर ” जय गुरू नाना” असं लिहिलं होतं. नाना माहाराज माझे गुरु, आणि श्रीपाद हा माझ्या नाना परिवारातलाच एक बंधू. माझं हळवं होण्याचं कारण असं की ज्या ज्या वेळेला मला काही वेगळे अनुभव आले त्या त्या वेळी माझे गुरू आजुबाजूला आहेत असा संकेत मला मिळत जात होता. मी शूलपाणीत असताना, उडी मारून जाण्याचा तो प्रसंग, त्या वेळी माझ्या दोन्ही दंडांना कुणीतरी पकडल्याचं मला जाणवलं होतं आणि नंतर लगेच मला नर्मदा माईनी दर्शन दिलं होतं. काल मला अश्वत्थामांचं दर्शन झालं आणि आज हा “ जय गुरु नाना” चा मिळालेला संकेत. खरं तसच पुढे भालोद (गुजरात) मध्ये प्रतापे महारांजाच्या कडेही अनुभव आला, पण आपण भालोद ला पोचलो की मी तो अनुभव सांगेन.
मी अगदी प्रत्येक दिवसाचे वर्णन करत नाहीये, मात्र जे जे अनुभव मला येताहेत ते आणि परिक्रमे मधे एकूण माझं बदलत गेलेलं आयुष्य आणि त्याची कल्पना येईल असे बदलत गेलेले विचार मी मंडण्याचा प्रयत्न करतेय. रोजनिशी लिहिण्याची माझी इच्छा नाही. बरेचदा वाचकांची इच्छा ही अनुभव वाचण्याची असते, मात्र त्यांचा झालेला परिणाम सुद्धा लक्षात घेणं माझ्या मते गरजेचं आहे. किंबहुना ते जास्त महत्त्वाचं आहे कारण ज्यांची परिक्रमा झाली आहे त्यांच्या अयुष्यात दु:ख का शिल्लक राहात नाही, आणि परिक्रमा केलेली मंडळी कायम त्या परिक्रमेतून बाहेर कशी येत नाही याची ही कारणं आहेत असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीची परिक्रमा झाल्यानंतरही त्या व्यक्तीला मैया किना-याची ओढ आयुष्यभर लागून राहते ते या परिणामांमुळेच.
आपली मैया आणि आपले गुरू आपल्या सोबत आहेत असे संकेत कायम मिळत राहिल्याने परिक्रमा पूर्ण होईल आणि विनाविघ्न होईल हे समजत होते, मात्र अजून आत्मपरिक्षण होणे गरजेचे होते. माझ्या पात्रते बाहेर, केवळ पूर्वजांच्या पुण्याईने ही संधी मला मिळाली होती आणि माझा प्रवास योग्य दिशेने वळावा यासाठीच हे घडते आहे असे मला वाटू लागले होते.
वडफ़ळी ला बालभोग आणि बाकी कामं आटोपून आम्ही माथासर साठी निघालो. मातासर पर्यंतचा प्रवास उत्तम झाला, गुजरात चं सौंदर्य बघून मन प्रसन्न झालं मात्र लांबच्या लांब पसरलेली खेडी संपता संपेनात. परिकथेतलं गाव असावं असं हे माथासर, डोंगर उतारावर वसलेलं आहे. मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पोहचलो. आजपर्यंतच्या रात्री आम्ही बरेच दा उंदीर मांजरासोबत एकत्रपणे, त्यांना अंगाखांद्यावर घेऊन, आनंदाने घालवल्या होत्या. आता भैरवनाथांच्या श्वानांची वेळ होती. आम्हाला आसन लावायला सांगीतलं ते एक बांधकाम सुरु असलेलं घर होतं. भिंती उभारल्या होत्या, बाकी काम अजून बाकी होतं. तिथे फ़ारसा कुणाचा वावर नसावा आणि म्हणूनच ३-४ कुत्री तिथे येऊन बसत असावीत. आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं असणार, मात्र ती कुत्री त्यांचं घर सोडायला काही तयार नव्हती… कितीदाही हाकललं तरी ती आपली आतमधे येतच.. शेवटी पर्याय नाही असं समजलं आणि आम्ही त्यांच्यासोबत रात्र घालवली. ती पण इमाने इतबारे आमच्या पायाशी लोळण घेत पडून राहिली..
तेव्हा विचार आला..”ठिक आहे, आजची एक रात्र च घालवायची आहे”… मग लक्षात आलं, गेले कित्येक दिवस आम्ही हाच विचार रात्री घालवत आहोत, आणि असं केल्याने ती रात्रही सुखाची गेली आहे आणि कसला आकसही उरलेला नाही. खरच आयुष्य असच आहे. इथे कसलाही आकस ठेवणं योग्यच नाहिये. दिवस आज चा असतो आणि तो संपतो ही आजच. तो संपणारच असतो त्याच्या स्वत:च्या गतीने. गती वाढत असते ती आपली. त्या दिवसात मावणारही नाही इतके अपेक्षांचे ओझे आपण त्या दिवसावर लादत असतो. ते ओझे वाहता वाहता तो दिवस दमलेल्या थकलेल्या अवस्थेतच येतो तसा निघून जातो, आपल्या अपेक्षांचे, आपले ओझे आपल्याला व्याजासकट परत देऊन!आणि आपण उद्या येणा-या दिवसावर पुन्हा ते ओझे लादायला तयार झालेलो असतो. आपल्याला फ़क्त हे समजत नसतं…. अरेच्या, हे असे विचार मी फ़रसे कधीच केले नाहीत, इतका वेळच कधी मिळाला नाही, आणि हो असे अनुभवही नाहीत..म्हणजे हे विचार मी केले म्हणायचेत का करवून घेतले म्हणायचेत?.. काहिही असो, मी काहितरी शिकतेय हे महत्त्वाचं आहे. आणि हे काहितरी माझ्या ह्या आणि कदाचित पुढच्या जन्मांचे मार्ग सुकर करणारं आहे असं वाटतय!
तर माथासर हून पुढे निघून आता झरवानी ला जायचं होतं. हा प्रवास साधारण वीस ते पंचवीस किमी चा असेल, पुस्तकात १६ दिलं आहे मात्र १६ नक्की नाहिये. आणि महत्त्वाचं म्हणजे या पट्ट्यात एकही गाव नाही. जंगल वाट आहे, मात्र सायकल, किंवा मोटरसायकल जात असतात अधुन मधून, पण निवा-याचं ठिकाण, पाण्यासाठी काही ठिकाण असं या भागात काहीही नाही, आणि ही वाट घनदाट जंगलातून जाते. झाडांची दाटी इतकी आहे की ब-याच ठिकाणी आकाश दिसत नाही, वर पाहिलं की फ़क्त झाडांच्या फ़ांद्यांचे लेयर दिसतात एकावर एक. आणि आजूबाजूला पाहिलं तर किर्र जंगल. हे जंगल आम्हाला एका दिवसात पूर्ण करायचं होतं. कारण रस्त्यात काहीही निवार्याची जागा आम्हाला मिळणार नव्हती आणि हे आम्हाला माहीत होतं. थोडी भीतीही होतीच कारण ले प्याला कळलेला प्रसंग थोडासा मनामध्ये होता. तरीही आता पुढे एकटं जायचं असं मी नाही तर माझ्या मनाने ठरवलं.आपण आपले आणि आपल्या मनाचे खूप लाड करतो आणि त्यामुळे ते फार लाडावलेलं आहे असा विचारही त्या वेळी माझ्या मनात आला.खरं पाहता ज्या वस्तूंना आपण माझी वस्तू असं म्हणतो त्या वस्तूंवर मालकी हक्क हा माझा असायला हवा. म्हणजे माझा मोबाईल किंवा माझी गाडी केव्हा माझी बॅग या सर्व माझ्या गोष्टी आहेत आणि यांची मालक मी आहे म्हणून त्या माझ्या मतानुसार किंवा माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी वागायला हवं असा माझा समज आहे.आणि असाच विचार करायचा झाला तर ज्यावेळी मी माझं मन असं म्हणते त्यावेळी माझ्या मनाने माझ्या मर्जीनुसार वागायला हवं हेही खरं आहे. पण असं खरंच होतं का? मी मनाची मालक असून बहुतांशवेळी किंवा नेहमीच म्हणा माझं मनच माझ्यावर मालकी हक्क गाजवत असतं.माझं मन माझ्या म्हणण्यानुसार वागत नसतं तर मला त्याच्या मर्जीनुसार वागायला भाग पाडत असतं. अतिशय वेड मन असतं हे. लहान मुलासारखं फार हट्टी असतं. आणि आपणही या मनाचे लाड पुरवून त्याला हट्टी बनवत असतो. आईने जशी लहान बाळाला सवय लावावी तशी लागते तसंच या मनाचं आहे. एकदा का आपण त्याचे हट्ट पुरवत आलो की ते आपल्या हाताबाहेर जाऊन हट्ट करू लागतं. त्याच्यावर ताबा मिळवणे कठीण मात्र त्याच्यावर ताबा मिळाला तर सगळ सोपं. असे विचार माझ्या मनात येऊ लागलेत.
थोड्याशा घाबरलेल्या मनाला ताब्यात घेऊन त्याचा हट्ट न पुरवता या जंगल वाटेतून एकटच पुढे जायचं असं मी ठरवलं. कितीही रागावल तरी मधून मधून आपलंच टुमणं लावलं नाही तर ते हट्टी मन कसं म्हणायचं?माझं मन उगाचच माझं लक्ष आजूबाजूच्या किर्र झाडी कडे ओढून ओढून नेत होत आणि मी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. कधी ते जिंकत तर कधी मी मात्र ,शेवटी इतके वर्षांच लाडावलेलं मन जेव्हा जास्त वेळा जिंकू लागलं तेव्हा मी मैयाचा धावा सुरू केला. तिला म्हटलं आई माझं मन ऐकत नाहीये मात्र त्याच्याकडून ऐकून घ्यायचं आहे हे नक्की, तेव्हा आता तूच काय करशील ते कर मात्र माझ्या सोबत तू आहेस असे संकेत मला देत राहा.मी पुढे निघाली आणि चालू लागली माझ्या मनाकडे अजिबात लक्ष न देता.
एका ठिकाणी मात्र हे मन उडी मारून बाहेर आलंच. अतिशय घनदाट जंगल, किर्र झाडी खूप थंड वातावरण, एक प्रकारचा विचित्र वास तिथे येत होता. पुढचा रस्ता हा झाडांच्या बोगद्यातून गेल्यासारखा वाटत होता. माझं मन म्हणत होतं बघ इथून पुढे जायचं का? का मागून येणाऱ्या परिक्रमावासी ची वाट बघायची? त्या बोगद्यात जायच्या आधी इथे थोडावेळ बसायचं का? मन बर्यापैकी घाबरलं होतं आणि तिथे बसण्याचा निर्णय मी घेतला. निदान थोडा वेळ तरी का होईना या मनाने मला जिंकलं होतं. मी मैयाला विचारलं, “मैया काय करू थांबू की पुढे जाऊ?” आणि तितक्यात माझ्या डोक्यावर प्रेमाने टपली मारावी तसा मला भास झाला आणि ताबडतोब मनात विचार आलेत,”इथे थांबून तू सुरक्षित आहेस असं तुला वाटतंय का? तशीही जंगलात आहेस, तेव्हा जर काही होणे असेल तर ते इथेही होऊ शकतं,मग जे होणार आहे त्याचा विचार करू नकोस, इथे बसून फक्त आणि फक्त वेळ जाईल बाकी काहीही होणार नाही. त्यापेक्षा चटकन उठ आणि चालायला लाग, मैया तुझ्या सोबत आहेच”.
आता मात्र मी जिंकले आणि मन हरलं होतं. मी पुढे चालू लागले.त्या बोगद्या सारख्या दिसणाऱ्या रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यानंतर समोरून तीन लहान मुलं माझ्या दिशेने येताना दिसली. त्यांना पाहून धीर आला, वाटलं ही लहान मुलं जर येत आहेत या रस्त्याने तर घाबरण्याचं काय कारण पुन्हा एकदा मी मनाला धीर दिला आणि मी जिंकले. मैया ने वचन दिल्याप्रमाणे ती मला दर दहा मिनिटांनी संकेत देत राहिली.पुढच्या प्रवासात मला अनेक वेगवेगळे अनुभव आलेत आणि मी या घनदाट जंगलात एकटी नाही, मैया माझ्या सोबत आहे याची खात्री पटली. आता माझं मन पूर्णपणे हरलं होतं आणि मी जिंकले होते. मला पहिल्यांदा ती तीन लहान मुलं दिसली आणि मी एकटी नाही हे समजलं. त्यानंतर आजूबाजूच्या जंगलातून कुठून तरी लाकूड तोडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त इथे कुणीतरी आहे असा आभास मला झाला.हा लाकूड तोडण्याचा आवाज बंद झाला आणि लगेच थोड्याच वेळात इतक्या घनदाट जंगलातून मला रेडिओवर जुनी गाणी ऐकू येऊ लागली. अभी ना जाओ छोडकर हे पूर्ण गाणं व्यवस्थित ऐकू आलं, मात्र आवाज कोणत्या दिशेने येतो आहे ते समजलं नाही.असं करत करत जवळ जवळ अर्धे अंतर मी येऊन पोहोचली असेल.म्हणजे आता झरवानी साधारणपणे 12 13 किलोमीटर शिल्लक असेल आणि माथासर सुद्धा साधारण तितकच मागे पडलं असेल. अशा ठिकाणी माथासर किंवा झरवानी होऊन आपली बरीच गुरं घेऊन या वेळी कुणी गुराखी बाई कशी काय थांबली असेल या घनदाट जंगलात? पण मी पुढे गेली तेव्हा ती बाई आपल्या गुरांसकट एका झाडाखाली बसलेली होती. मी तिच्याजवळ गेली तशी ती उठून उभी राहिली. तिने मला नर्मदे हर केलं आणि मी पण तिला नर्मदे हर केलं. ती म्हणाली,”झरवानी तक जाओगी? चलो मे भी उधर ही जा रही हू”.. आता तर मला खूपच छान वाटू लागलं.झरावानी च्या थोडं जवळ येईपर्यंत ही बाई माझ्या सोबतच चालत होती. झरवानी साधारण चार किलोमीटर बाकी असेल तिथपर्यंत ती माझ्यासोबत चालत होती, नंतर जंगलातल्या एका आडवाटेने ती निघून गेली.
खरं मैया सोबत आहे हे माहित असतनाही मला का भीती वाटली असा विचार मी केला असता मला त्यामागचं कारण उमगलं. भीती ही मृत्यूची वाटत नसते, कारण तो अटळ आहे हे आपल्या पैकी प्रत्येकाला जन्म झाला त्या क्षणापासून माहित असते. भीती असते ती एकतर एकटेपणाची किंवा उगाच अंगावर ओढवून घेतेलेल्या जबाबदारींची. हे एकटे चालणं कठीण असतं ते अडकणाऱ्या पायांमुळे. नाळ तुटता तुटत नाही. मग सैर भैर व्हायला लागतं. त्यासाठी काहीतरी उपाय शोधायला हवा. कदाचित आज मला तो उपाय मिळाला होता. अर्थात तो उपाय अमलात आणणं खूप कठीण आहे पण मनापासून मी प्रयत्न करणार आहे.
आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय काही फार मोठा असा नाही. किंवा मी काही जगावेगळं सांगणार आहे असंही नाही. किंबहुना मी जे सांगणार आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. मलाही माहीतच होतं. फक्त या प्रवासात मला ते मनापासून पटलं इतकच! अर्थात ते अमलात आणणं जरी कठीण असलं तरी प्रयत्न करणं तितकं कठीण नाही,हे जेव्हा समजतं तेव्हा निदान प्रयत्न करून बघण्याची इच्छा होते..वेळ खूप लागणार आहे हे मला माहीत आहे. हे पूर्णपणे होईल की नाही हेही सांगता येत नाही कारण हे होणं फार फार कठीण आहे. म्हणून एक छोटासा मंत्र आहे, आणि हा मला मिळालेला मी तुम्हाला सांगणार आहे मात्र पुढच्या भागामधे.
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २६
*नर्मदे हर.*
तर मागच्या भागात मी एका मंत्रा बद्दल बोलत होते. तसा हा मंत्र मला कुणी दिला हे आधी सांगते. झरवानी ते गोरागाव या प्रवासात मी आणि पसारकर काकू सोबत होतो. आम्ही दोघी ब-यापैकी मागे होतो. हा रस्ता उताराचा आणि जंगलाचा रस्ता होता. इथे आमच्या मागेपुढे एक साधू चालत होता. एका ठिकाणी थोडं थकलं असताना आम्ही दोघी रस्त्याच्या कठड्यावर बसलो असता हे साधू महाराजही तिथे आलेत. आम्ही दोघी बसलेल्या पाहून ते आमच्या समोर असलेल्या बाकावर बसले. पसारकर काकांच्या मागच्या परिक्रमेत ते काकांना भेटले होते, त्यामुळे त्यांची थोडीफ़ार ओळख होती. त्यानुसार त्यांनी काकांची चौकशी केली आणि काकूला विचरलं, “काकाजी आगे चले गये क्या?, आणि मग ते म्हणाले, ऐसाही होता है परिक्रमा में, कोई किसीका नही होता…आणि शेवटी ते म्हणाले, *जीवन तो एक परिक्रमा ही है*”
या सगळ्याचा मी नीट विचार केला असता या जीवनात प्रत्येक जण आपापल्या वाटेवर जातो आहे आणि इथे कुणीही कुणाचं नाही, इथे प्रत्येकाला आपला मार्ग एकट्यानेच चालायचा आहे, असा काहिसा निष्कर्ष माझ्या मनाने काढला.त्याचबरोबर इथे आपलं काहीही नाही हे ही समजलं पण ते अमलात कसं आणायचं हा प्रश्न कायम होता. तेव्हा आपण आपल्या स्वत:ला वारंवार समजावून सांगण्याशिवाय हे समजणार नाही हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे मी स्वत:ला समजवू लागले.
पुढे, म्हणजे बरच पुढे, गुजरात मधे असताना कांदरोज नंतर मला एक साधू महाराज भेटले. त्यावेळी ते माझ्या सोबत, म्हणजे थोडं फ़ार मागेपुढे होते. ते म्हणाले, “अकेले चल रही हो?”.. मी सांगितलं, अभीतक कुछ लोक साथ थे, अब मै अकेले चल रही हू.” ते म्हणाले, “बहूत अच्छा, अकेले ही चलो, वैसे भी यहा तुम्हारा कुछ नही है. एक मंत्र बताता हू, याद रखना तो आसानी होगी” मला वाटलं हा मंत्र चालताना संकट येऊ नये म्हणून असेल किंवा, तत्सम काही असेल, पण तो मंत्र होता *“इदं न मम.*
ते म्हणाले “ बेटा जी, ना ये दिन तुम्हारा है, ना रात, ना ये शरीर, ना ही कोई रिश्ता.. जो तुम्हे मिल रहा है वो तो समय का दान है, जैसे मिला है वैसे ही चले जायेगा, रहेगा नही.. तो इसलिये तुम्हे जब भी कोई भी चीज मिले, उसे जीने से पहले खुदको यकीन दिलाओ, कहो के ये मेरी नही है, जितने समय तक मेरे पास है वह मेरे लिए है, परंतु मेरा उसपर अधिकार नही है. जब तुम्हारा अधिकार ही नही है तो उसके प्रती कैसा ममत्व? कैसी ममता? बस कहते जाओ..इदं न मम..!
अगदी हाच विचार मी आधी केला होता आणि इथे या साधू महारांजानी माझ्या विचार करण्याची दिशा योग्य आहे असा संदेश दिला. तर असा हा मंत्र, इदम न मम…अगदी हातवर पडलेल्या प्रसादापासून तर अंगावरच्या दागिन्यासकट, पोटच्या गोळ्यापासून तर कपाळाच्या कुंकवापर्यंत..इदं न मम..ज्यावेळी मी पुढे महेश्वरला गेले तिथे तेव्हा पोटच्या गोळ्या बद्दलच्या जिव्हाळ्या विषयी बराच सत्संग झाला, पण तो महेश्वर च्या भागात लिहीन.
पुढे हरि धाम आश्रमात म्हणजे गोरा कॉलोनी नंतर, गुवार इथे आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. इदं न मम हे तोपर्यंत घर करून होतच. इथे विचारांनी अजून एक दिशा घेतली. ह्या “मम” बद्दलचे विचार मनात येऊ लागले. हे माझं नाही… पण माझं काय आहे हे समजून घेण्या आधी हा “मी” माहित असायला हवा! अर्थात ह्या मी पेक्षाही ह्या “मी” कडे पुरवलं जाणारं लक्ष जास्त धोकादायक असावं असं वाटलं. काय झालं, गुवार ला हरि धाम आश्रमात असताना बरेच गांजा धारी परिक्रमावासी आजूबाजू ला होते. तिथे तो गांजा चा वास पसरला होता. मला अजिबात सोयीचे वाटत नव्हते. आणि तेव्हा विचार आला, ह्या मनाचे फ़ार जास्त लाड पुरवले जात आहेत. आपल्याला वाटलं तस झालच पाहिजे हा अट्टहास कशासाठी?आणि जगावायाच्या प्रत्येक दिवशी आपण, म्हणजे आपलं मन काहितरी ठरवतं आणि त्या मागण्या पूर्ण करण्यात आपला दिवस जातो..दिवस दिवस जाता जाता आयुष्य जातं. ह्याच्या कडे त्रयस्था सारखं बघता येईल का? म्हणजे आपण अनोळखी माणसाशी कसं तेवढ्यापुरतच बोलतो, तसं करायचं.. आता नेमकं उत्तर मला पुढे मिळालंय पण ते पुढेच सांगेन. विचारांची दिशा बदलत गेली हे मात्र सांगू शकेन.
इथून पुढे आम्ही आनंद आश्रमात गेलो. काही जागा खूपच सकारात्मक असतात. तसाच हा अनंद आश्रम. तिथल्या मंदिरात माणुस हरवून जाईल अशी शांतता आणि असेच कंपंन देखिल. पंचतारांकित आश्रमांसारखा हा आश्रम, निटनेटका, पॉश, आणि भरपूर सुविधा देखिल. गुजरात मधे धनाची आणि मनाची दोन्ही श्रीमंती बघायला मिळते. मोठाले बगीचे, कारंजी आणि काय काय. जेवण सुद्धा अगदी पंचपक्वान्नांनी भरपूर होतं. जेवण झाल्यावर गरमा गरम दूध. झोपायला मोठ्याला खोल्या, आंघोळीला ऐसपैस बाथरुम. परिक्रमेत आल्यानंतर असं वैभव पहिल्यांदाच बघितलं. खरं सांगू, अगदी पहिल्यांदाच फ़ोम च्या मऊ मऊ गादीवर बसलेल्या एखाद्या गरीब लहान मुलाला जे कौतुक वाटत असेल नं तसं वाटलं तेव्हा… हे आपलं नाही हे त्या मुलाला महित असतं, मात्र तो क्षण महत्त्वाचा आणि तेवढा जगायचा, हेही त्याला माहित असतं. म्हणूनच तो कौतुकानी सगळं अनुभवत असतो मात्र हे मला मिळालं पाहिजे ही आसक्ती निदान त्या वेळी तरी त्या मुलाच्या मनाला शिवत नाही. अगदि तसं काहीसं झालं होतं.. इदं न मम, म्हणजे नक्की काय ते समजलं होतं आणि म्हणूनच जे मिळतय ते बोनस होतं सगळं. ते सुख जितका वेळ आहे तो क्षण त्या सुखाचा, इतकं महत्त्वाचं.
इथे जेवण आणि नंतर ची शेकोटी वगैरे ची मजा घेऊन आम्ही आमच्या खोलीत गेलो. आम्ही ६ जण होतो. इथे एक विचित्र अनुभव आला. इतकी सकारात्मक जागा आणि असा विचित्र अनुभव? काही समजेना.. झालं असं की रात्री बारा साडेबाराच्या सुमारास, अचानक मयुरेश दादा झोपेत मोठ्या मोठ्यांना ओरडू लागले, खूप घाबरले होते ते, त्यांना दरदरून घाम फ़ुटला. आम्ही सगळे झोपेतून जागे झालो पण मयुरेश दादा मात्र अजूनही ओरडत होते. त्यांना जागं केलं तेव्हा काहितरी भयंकर स्वप्न पडल्याचं त्यांनी सांगितलं. काहीतरी अघटित घडावं तसं..नक्की काय ते मी विचारलं नाही पण अंदाज आला मला! खूप विचित्र वाटलं त्यावेळी. इतक्या सकारात्मक जागी हे असं स्वप्न? पण असं नसतं. अश्या स्वप्नांचा आणि जागेचा संबंध नसतो. तो संबंध तुमचा आणि तुमच्या साधनेचा असतो. हे मी खात्रीपूर्वक सांगते कारण असाच अनुभव मला चिखल्दा इथे आला. अगदी वासुदेवानंद सरस्वती, म्हणजे मोठे महाराज, माझ्या गुरुंचे गुरु, यांनी ज्या ठिकाणी चातुर्मास केला तिथे मी थांबले होते, त्याच मंदिरात.. अगदी त्याच खोलीत. तरीही आला तसा अनुभव, पण मी आता सांगणार नाहीये. आपण चिखल्द्याला जाऊ न तेव्हा सांगणार आहे.
आता दुसरा अनुभव सांगते. गुवार हून पुढे नक्की कारण समजलं नाही पण आम्ही सगळेच आगे मागे होऊ लागलो. मी काका आणि काकू मागे आणि मयुरेश दादा, सुरेखा ताई आणि स्मिता पुढे. पण आम्ही इतके दिवस ब-यापैकी सोबत जात असल्याने ताटातूट होईल असं काही वाटलं नाही. मात्र तपोअवन आश्रमाच्या मुक्कामा नंतर तशी ताटातूट होईल याचे संकेत मिळू लागले. तपोवन आश्रम मैया किनारी आहे. आम्ही दत्त जयंती तिथेच केली. आणि दत्त जयंतीलाच, दत्त जन्मानंतर लगेच, मला मयुरेश दादा चा फ़ोन आला.. “ कुठे आहेस?, लवकर किना-यावर ये, लग्गेच”. मी किना-यावर गेली तर समोर पाण्यावर लांब लचक मगर मैया तरंगत होती. अगदी १० -१२ फ़ुटावरुन तिचं दर्शन झालं.का कोण जाणे पण मयुरेश दादाने इतर कुणालाही हे सांगितलं नाही, मला मात्र फ़ोन केला. तो किनारा रमणीयच आहे. तिथे जप केला असता अतिशय मन लावून जप झाला. खूप समाधान कारक वाटू लागलं. मात्र ताटातुटीचा तो अनुभव इथेच आला.
इथे जप केल्यानंतर मला कुणाच सोबत जाऊ नसे असं मनातल्या मनात वाटू लागलं, पण असं बोलून दाखवणं योग्य नव्हतं. आम्ही एका परिवारासारखे सोबत होतो, त्यामुळे असं करणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. पण परिवार म्हंटलं गुंतणं आलं.बंधनं आलीत.. आणि तीच सोडायला आपण परिक्रमेला आलो आहोत. द्वीधा मनस्थिती होऊ लागली तशी मैयाने ही काळजी घेतलीच. आता मी एकटी, काका काकू, आणि सुरेखा मयुरेश आणि स्मिता असे गृप आपोआपच पडलेत. आता आमचे मुक्कामाचे ठिकाण एक असे मात्र चालताना आम्ही वेगवेगळे चालत असू. या आधी तावसे काका काकू आमच्या पासून असेच वेगळे झाले होते. आणि असेच अनेक लोक एकत्र येतात आणि वेगळे ही होतात. याला कारण आहे. आपण माणसं आहोत. आपल्या सोबत कुत्रा मांजर जरी असलं तरी कालांतराने आपल्याला त्याचा लळा लागतो. मग हाडा मासाची माणसं सतत सोबत असतील तर लळा लागणं स्वाभाविक आहे. परिक्रमेच्या मूळ हेतू लाच जर तडा जात असेल तर अर्थ तरी काय? आणि म्हणून ती मैयाच असं काहीतरी घडवून आणत असते. जेणेकरून तुम्ही तुमच्या संकल्पासाठी योग्य पद्धतीने तयार व्हाल.
मी माझा जप झाल्यावर आश्रमात परत आली तोवर ही मंडळी पाटीवर बॅगा लावून तयार होती. मला माझं आवरून तयार व्हायला वेळ लागणार होता. मी मंडळी ना पुढे जायला सांगीतलं आणि त्याप्रमाणे मंडळी पुढे गेली. आता पुढे कोण कुठे जातं, कोण कुठे थांबतं माहित नाही. पुढचा आश्रम तसा जवळ होता. मी एकटेच निघाले. रस्त्यात मला एक म्हातारे गृहस्थ भेटलेत आणि “रामानंद आश्रम मे स्वामीजी के दर्शन करके जाना असं सांगितलं”. मी रामानंद आश्रमात पोचले. तिथे आसन लावायला म्हणून ऑफ़िस मधे गेले तर तिथे आधीच सुरेखा ताई, स्मीता आणि मयुरेश पोचले होते. ते ही इथेच थांबणार होते. आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो. हा असा खेळ भालोद पर्यंत सुरू होता, आणि तिथून पुढे मात्र आम्ही वेगवेगळे झालो.
इथे रामानंद आश्रमात खूप छान अनुभव आला. तिथे गादीवर सध्या स्वामी अभिराम दासजी त्यागी महाराज आहे. दिसायला अगदी रामदास स्वामींसारखे. अतिशय तेजस्वी. त्यांचा सत्संग खूप वेगळा असतो. तिथे आलेला अनुभव आणि सत्संग या दोन्हीबद्दल पुढच्या भागात सांगते.
*©सुरूची नाईक- विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २७
*नर्मदे हर.*
रामानंद आश्रमात जाण्या आधी रस्त्यात मला एक म्हातारे गृहस्थ भेटलेत. त्यांनी सांगीतलं रामानंद आश्रमात अवश्य जा, तिथे तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. तिथे सत्संगांची एक पद्धत आहे. तिथे एक पाळणा आहे, त्या पाळण्यावर आपण आपले प्रश्न लिहायचे आणि नाव मात्र लिहायचं नाही. स्वामी अभिराम दास महाराज आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात.आणि त्या सत्संगाला बरीच मंडळी मुद्दाम म्हणून उपस्थित राहतात म्हंटल्यावर मला तिथे जावसं वाटलं. शिवाय संत महात्म्याचं दर्शन होणार.
खरं तर काय प्रश्न विचारावा असाच प्रश्न पडला, कारण माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हळू हळू आणि आपोआप मिळत होती. म्हंटलं, बघू, वेळेवर जर वाटलं काही विचारावसं तर विचारू नाहीतर राहिलं. आमच्यापैकी अनेकांनी परिक्रमा पूर्ण होईल का असं विचारलं होतं. मला ते अजिबात विचारवासं वाटलं नाही. आमच्यातील एकाने *“गुरू कसा करावा”* असा प्रश्न केला. त्याचं उत्तर देताना ते म्हणाले, *“आपको खुद गुरू करनेकी जरूरत नही है. जब आपके नसीब मे गुरू का आना लिखा होगा, तब आपका गुरू आपको खुद ढुंढ लेगा. आप गुरु ना ढुंढ सकते है, ना आप उनकी योग्यता परख सकते है. जिस गुरू की योग्यता आप ने परख ली हो वो आपका गुरू हो ही नही सकता”*. इथे मला माझा अनुभव आठवला. परिक्रमेच्या आधी मला गुरुमंत्र मिळाला होता. हा अनुभव खरं तर मी आधी ही सांगितला आहे, आपल्या या लेखमालिकेच्या दुस-या भागात, पण संदर्भ लागावा म्हणून पुन्हा सांगते.
मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोर ला आले. माझी आत्या इंदोर ला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच….आपण काहीच ठरवत नसतो… नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं… तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच…. मला दुस-या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही… आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, “काग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?” आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला. रात्री साडे अकरा ला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षाने जाणवू लागलं. मी माझ्या आत्येभावाला सांगितलं… त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा आशिर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं..स्वामी अभिरामदास महारजांनी अगदी चपखल सांगीतलं होतं.
माझ्या मनात अचानक माझ्या आयुष्याबद्दल विचार येऊ लागले. आयुष्यात मी जे काही केलं ते अगदी मनापासून केलं. लग्न झालं तेव्हा जेमतेम बीएससी होते, तिस-या वर्षीची परिक्षा सुद्धा लग्ना नंतर दिलेली. त्या नंतर एम एस सी करायला घेतलं, दिवस राहिले, आणि मला एम एस सी बंद करावं लागलं. मग कंप्युटर कोर्स, शाळेची नोकरी, दोन विषयात एडिशनल बीए, बीएड, पुन्हा एकदा एमएससी आणि मग पी.एच.डी. हे सगळ अगदी जीव लावून केलं मी. मात्र यातली प्रत्येकच गोष्ट पूर्ण केल्यानंतर मला जाणवायचं हे आपल्या अयुष्याचं ध्येयं नव्हतच मुळी! मग आपल्या आयुष्याचं ध्येय काय आणि ते नक्की कसं सापडेल?.. हाच प्रश्न विचारायचा, बघूयात काही उत्तर मिळतय का? ठरल! मी हाच प्रश्न अभिराम दास जी त्यागी महाराजांना एका कागदावर लिहून दिला, खाली नाव लिहिलं नाही, “एक परिक्रमावासी” इतकच लिहिलं.
अभिरामदास महाराज जेव्हा मंडपात आले तेव्हा त्यांनी सगळ्या भाविकांकडे मोठ्या प्रेमाचा कटाक्ष टाकला. मी मान खाली करून बसल्या जागेवरूनच त्यांना नमस्कार केला तसा त्यांनी आश्वासक नजरा माझ्याकडे टाकल्या, “हा बच्चा, मै समझ रहा हू” असं काहीसं त्यांच्या नजरेतून मला जाणवलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी भगवद गीतेच्या १२व्या अध्यायातले अनेक दाखले दिले.
“तुम जो कुछ कर रहे हो वो दिलसे कर रहे हो, उसे ईश्वर के लिये करो, ये समझ के करो की ये तुम्हे तुम्हारे इश्वर ने दिया हुआ कार्य है जिसे तुम्हे कोई अपेक्षा ना करते हुये करना है. इस कार्य करने मे ही तुम्हारा भला है. तुम अपने सही रास्ते पर चल रहे हो. तुम परिक्रमा मे आये हो, ये भी तो एक दिशा है! परिक्रमा मे आना अपने आप मे ही आपको मार्ग दर्शन कर रहा है. आध्यात्मिक अभ्यास पर ध्यान बनाये रखे, आपका मार्ग आपको मिल रहा है, आपके उसके काफ़ी करीब है.”
जो सहज प्रश्न माझ्या मनात होता त्याचं सहज उत्तर मला मिळालं होतं. असाच एक प्रसंग भालोद गुजरात मधे पण आला. पण ते त्यावेळी सांगेन. रामानंदस्वामी आश्रम खूप छान देखरेख ठेवून अद्ययावत आहे. इथे कुणीही साधकानी यावं, आपली साधना करावी, अगदी विनामुल्य. साधकांसाठी इथे वाचनालयाची सोय आहे. सन्यास्यांसाठी वेगळी सोय आहे. साधनेला अतिशय पोषक आणि शांत वातावरण आहे. शिवाय इथे राम मंदिर खूप प्रसन्न आहे आणि स्फ़टिक लिंगांचं शिवमंदिर आहे. एकंदरीतच आश्रम खूप रमणीय आहे.स्वामी अभिरामदासजी महाराज स्वत: जातीनी लक्ष देऊन सगळ्या सोयी बघतात. त्यांच्या दिनचर्येत सकाळची पूजा अर्चा, व्यायाम अणि सत्संग असतो तर संध्याकाळी ते आश्रमा पासून २ -३ किलोमिटर असलेल्या गोशाळेत पायी जाऊन गो पूजन करतात आणि तिथेच जवळ असलेल्या शिव मंदिरात सुद्धा आरती आणि अभिषेक करतात. प्रेमळ, आणि सात्विक संत आहेत स्वामी अभिरामदास महाराज. याच महाराजांचा अजून एक अनुभव म्हणजे मी ज्यावेळी त्यांच्याशी बोलत होते, म्हणजे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्या नंतर, सत्संग झाल्यानंतर, मी नमस्कार करायला गेले त्यावेळी ते जे वाक्य मला बोलले तेच वाक्य पूर्ण परिक्रमेत अजून तीन सन्यास्यांकडून मला ऐकवायला मिळा्लं. ते वाक्य होतं “सब ठिक है बेटा, बस राम को मत छोडना”.. अगदी हेच शब्द, खलघाट ला जात असताना एका तेजस्वी सन्यास्यानी मला बोललेलं मी मागच्या अनुभवात सांगितलेलं आहे. आज ते वाक्य जेव्हा दुस-यांदा आणि जसं च्या तसं ऐकलं तेव्हा त्यात काहीतरी संकेत आहे असं वाटलं मात्र उत्तर नीट सं मिळालं नाही, कारण ते पुढे मिळणार होतं.
आज इथून पुढे खरंतर कुंभेश्वर ला जायचं होतं पण आज अजिबात ऊन नव्हतं, वातावरण थंड आणि रोगट वाटत होतं. चालायचा कंटाळा आणि आळस येत होता. याचं कारण ही होतं. ओखी नावाचं सायक्लोन येऊ घातलं होतं. आम्ही मैया किनारी चालत होतो. कधीही पाऊस पडेल असं वातावरण झालेलं. रस्त्यात छोटे छोटे पाडे दिसत पण सगळेच गरीब, तरीही मध्य प्रदेशातल्या गरीबी पेक्षा ही गरीबी जरा कमी होती. आता आज जास्त चालणं योग्य नव्हतं कारण रस्त्यात कुठे पावसाने धरलं तर आश्रय ही मिळणार नव्हता.
इथे कुणीतरी आम्हाला सांगितलं की वांदरीया नावाच्या गावाला पण रामानंद आश्रम आहे. आम्ही तो शोधत शोधत निघालो. एक छोटासा आश्रम सापडला. छानसा बगीचा एक किचन दोन खोल्या आणि व-हांडा. आम्ही वऱ्हांड्यात आसनं लावतो न लावतो तोच धो धो पावसाला सुरवात झाली. जसा काही हा पाऊस आम्ही पोहोचण्याचीच वाट बघत असावा. आम्ही सुखरूप पोहोचावं म्हणूनच की काय आम्हाला कुंभेश्वर पर्यंत न जाण्याची बुद्धी झाली असावी.
पाऊस थांबल्यावर आम्ही मैया किनारी गेलो तेव्हा समजलं, जे झालं ते योग्यच झालं. इथे किना-याचि वाट दगडांचीच होती आणि पावसात त्यांच्या खालची वाळू वाहून जाते, त्यामुळे चालणं कठीण. बरच झालं आम्ही वांदरीया ला थांबलो. असं काहीतरी संकेत ती मैया आपल्याला देतच असते. अगदी व्यवस्थित लक्ष ठेऊन असते आपल्यावर.
इथे वांदरीयाच्या आश्रमात आधी आम्हाला आसनं व-हांड्यात लावायला सांगितली होती. आत एक खोली रिकामी होती. बाहेर खूप थंडी ही होती पण तिथला गडी माणूस काही आम्हाला आत डोकावून पण बघू देईना. आम्हाला आज इथे उघड्यावर थंडीतच झोपायला लागणार होतं. आम्ही सहा सात जण होतो आणि हा गडी माणूस एकटाच होता. आम्ही स्वयंपाकाला त्याची मदत केली. कढी खिचडी आणि उपासाची बटाट्याची भाजी असं भोजन प्रसादी चं जेवण तयार झालं. त्या गडी माणसाला काय वाटलं माहित नाही, पण जेवण झाल्यावर त्याने खोलीचं दार आम्हाला उघडून दिलं, म्हणाला, “बाहर थंडा है, अंदर आसन लगा लो.” आत एक खूप मोठं मारुती रायांचं फ़्लेक्स लावलं होतं.खूप बोलकं चित्र होतं ते. असं वाटलं ते म्हणताहेत, “मला केव्हाही आवाज द्या, मी आहेच पाठीशी!” आणि असच एक मारुतीरायांचा फ़्लेक्स मला जोगी टिकरीया ते अमरकंटक रस्त्यावर असलेल्या देवरा नावाच्या गावी, जिथे आम्ही मुक्काम केला होता त्या धर्म शाळेत पण होते. तेव्हा ही हे मारुती राया “मी आहेच पाठीशी, हवं तेव्हा आवाज दे” असं म्हणताहेत असं वाटलं होतं. आणि याहूनही पुढे, म्हणजे साधारण बरगी कॉलनी च्या पुढे मला एक वेगळाच अनुभव आला. कदाचित मला मारुती रायांचं दर्शन झालं, पण नक्की माहित नाही. तो अनुभव मात्र आता इथेच सांगते. वाचकांची लागलेली लिंक सारखी तोडावी लागतेय, ते मनाला पटत नाहीये.
तर तेव्हा माझ्यासोबत सुरेखा ताई वगैरे मंडळी नव्हती. नारेश्वर ला माझ्या नर्मदा माईनी मला माझे “नर्मदा वडील” दिले. तो अनुभव मग सांगते आधी हा मारुती रायांचा अनुभव सांगते हं. हे नर्मदा वडील, त्यांना मी “बाबा” म्हणते, ते माझ्या सोबत असतानाची गोष्ट.त्यांचा पाय फ़ार दुखत होता. अगदि २ किमी चाललो ना की ते बसून जात, इतका त्रास होत होता. मग मी त्यांना म्हंटलं “ तुम्ही एखादा रिदम धरून चाललात तर कदाचित पाय कमी दुखेल” त्यांनाही ते पटलं, आणि दोघांनी हनुमान चालिसा चा रिदम ठरवला. हनुमान चालिसा एकदा म्हणायला साधारण ४ मिनिट लागतात. आम्ही ठरवलं, ११ वेळा अहुमान चालीसा होईस्तोवर थांबायचं नाही. म्हणजे साधारण ४५ मिनिटे सलग चालायचं. असं केलंलं हे तंत्र बरच उपयोगी पडलं. मग आम्ही तेच वारंवार करू लागलो. या वेळी अधुन मधून आम्हाला एक परिक्रमावासी दिसत असे. त्यांच्या जटा होत्या, काळी सावळी पण सुदृढ शरीर, ६ फ़ूट उंची, कमरेला पांढरा पंचा, हाती कमंडलू, असे बाबा दिसत होते. ते आम्हाला अधुन मधूनच दिसत. शक्यतो आम्ही जेव्हा ४५ मिनिटाचा टप्पा पार करून आराम करत असू तेव्हा ते आमच्या पुढे जात असत. मात्र आम्ही त्यांच्या पुढे गेलेलं मला आठवत नाही. तर एका ठिकाणी आम्ही आराम करत असताना ते पण तिथे आले आणि आमच्या समोरच्या खडकावर बसले. नर्मदे हर झालं. मी त्यांना विचारलं “महारज जी, परिक्रमा मे हो?, कहासे उठायी आपने परिक्रमा?” ते म्हणाले “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, मी विचारलं “कोई और भी रास्ता है क्या? आगे पिछे तो आप दिखते नही हो, बस बीच बीच मे दिखते हो?” आम्ही रस्ता मार्गाने जात होतो. मला वाटलं हे महाराज किना-यावरून जात असतील आणि अधून मधून रस्त्यावर येत असतील, म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले “रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा,अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”, मला काही कळेना, मी कधी या बाबांना बोलावलं? म्हंटलं जाऊ दे, हा कुणी ब्रम्हचारी बैरागी बाबा दिसतोय, बोलला असेल असच काहीबाही. ते साधू महाराज निघून गेले. मी आणि बाबा पण थोड्या वेळाने निघालो, मात्र मनात विचार येतच राहिला.. मी या बाबांशी तर बोलले पण नाही आधी, मग मी बोलावलं असं ते बाबा का म्हणाले? उत्तर सापडे ना.. म्हंटलं जाऊ दे, आपण आपला हनुमान चालिसा सुरू करू…. अहो काय सांगू, असा विचार मनात येतो न येतो तोच समजलं, आता पर्यंत किमान ५० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणून झाली असेल आम्हा दोघांची मिळून! इतका धावा तर आपण त्या मारुती रायांचाच करतोय…अगदी निरपेक्ष भावनेनी! ““हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा,अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”.. बाबांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले आणि समजलं…हे तर खुद्द मारुती राया! काय नशीबवान आहे हो मी? नर्मदा परिक्रमा घडते काय, अश्वत्थामा, नर्मदा माई आणि आता मारुती राया दर्शन देतात काय…अजून काय हवय सांगा? असो..
तर आता पुन्हा परत येऊ रामानंद आश्रमातल्या त्या मारुती रायांच्या फ़्लेस पाशी. तिथे खूप शांत झोप लागली. आणि दुस-या दिवशी आम्ही कुंभेश्वर ला निघालो. कुंभेश्वर हून आम्हाला पुढे जाताच येईना. आम्हाला तिथेच ३ दिवस थांबून रहावं लागलं..का? ते पुढच्या भागात सांगते.
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २८
*नर्मदे हर.*
आज आम्ही कुंभेश्वर ला पोहचणार होतो. इथे आमची राहण्याची व्यवस्था सौ जागृती सोमण यांच्या घरी केली होती. जागृती अतिशय लाघवी मुलगी, माझ्याच वयाची साधारण, किंचीत लहानच. आणि तिचे यजमान म्हणजे रवी भाऊ, ते ही अतिशय जीव लावणारे होते. आम्ही इथे पोचलो आणि पावसाला सुरवात झाली. पुन्हा एकदा जाणवलं, पाऊस आम्ही पोहोचण्याची वाट बघत होता. आम्ही मैया किना-यानी आलो होतो, त्यामुळे घाट चढून वर आलो आणि समोर आनंदी चेह-याच्या जागृती मैया नी आमचं स्वागत केलं. इथे ३ दिवस राहण्याचं महत्त्व आहे. इथे एकदा नर्मदा स्नान झालं की १०००० वर्ष काशी ला राहण्याचं पुण्य मिळतं. आमचं २ दा स्नान झालं. पण बाकी दिवस मात्र थंड वातावरण असल्याने घरातच स्नान केलं, मैयावर स्नान केलं नाही. २०००० वर्ष रहिल्याचं पुण्य मिळाल, अजून किती हवं आता? असो. इथे शनी देवाचं मंदिर तर आहेच मात्र त्यांच्या दोन्ही बायकांची पण मंदिरं आहेत. त्यांची नाव आहेत छोटी पनोती, आणि मोठी पनोती. तुमचे होत नसलेले कार्य यांच्या दर्शनाने पूर्ण होतात. आपण बरेचदा “ पनोती लागली” असं म्हणतो बहुधा त्याचं कारण हेच असावं. या पनोती देवींची कृपा कुठेतरी कमी पडत असावी नक्की.
कुंभेश्वर ला असताना ओखी वादळाचे वारे जोरात वहात होते. असं समजलं होतं की विमलेश्वर ला २०० परिक्रमावासी अडकून पडले आहेत कारण वादळामुळे नावा समुद्रात सोडल्या जात नाहियेत आणि अजून पुढचे १०- १२ दिवस नावा सोडल्या जाणार नाहीयेत. बाकी जे परिक्रमावासी आमच्या पुढे चालताहेत ते पण काही दिवसात विमलेश्वर ला पोहचणार आहेत, तेव्हा तिथे अजून जास्त परिक्रमावसी होतील आणि गर्दी खूप होईल. त्यामुळे आम्ही असू तिथेच ३ दिवस, मग पुढे पुन्हा ३ दिवस असं थांबत थांबत पुढे जायचा विचार केला. जे लोक अडकले आहेत ते आधी मोकळे झाल्याशिवाय आम्हाला नावेत बसायचा नंबर मिळणार नाही. त्यामुळे घाई करण्यात काही अर्थ नव्हता. कुंभेश्वर च्या पुढे जिथे जिथे ३ दिवस राहण्याचं महत्त्व आहे तिथे तिथे आम्ही राहिलो. ओखी वादळामुळे होणा-या नुकसानाची चर्चा सुरू होती, आम्हाला मात्र अगदी पुण्याची कमाई या वादळाच्या येण्यामुळे घडून आली. अन्यथा, चातुर्मास करायचा नाही म्हणून आम्ही ३-३ दिवस न थांबता चातुर्मासाच्या आधी परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो.
इथून पुढे शुकदेव ला जायचं होतं. शुकदेव मंदिर खूप छान आहे. इथे येऊन प्रसन्न ही वाटत आणि नकळत त्या वैराग्याची मागणी मागावी असं होऊन जातं.
*शुकासारिखे पूण वैराग्य ज्याचे*…..पूर्ण वैराग्याचे धनीच ते…लहान पणी शिकलेला श्लोक आठवून गेला. इथे ज्या मैयाजींनी आम्हाला भोजन प्रसादी खाऊ घातली तिच्या दोन लहान लहान कन्यका तिला सोडीनात, काम करू देई ना, आम्ही तीला म्हंटलं तू लेकींना बघ, आम्ही करतो प्रसादीचं, तर ते तिला पटेना, दोन लहान लहान मुली सांभाळत, चुली जवळ त्यांना बसवून मैयाजींनी स्वयंपाक केला. खरच इतकं करतात हे लोक आपल्यासाठी नं!
दुस-या दिवशी काय झालं कळेना, पण आतापर्यंत मागे पुढे, एकत्र राहणारे आम्ही ६ लोक वेगवेगळे झालो. मयूरेश, स्मीता आणि सुरेखा पुढे निघाले, मी काका आणि काकू मागून निघालो. इथे आम्हाला शेतातून रस्ता होता. मात्र इथे गम्मतच झाली. आम्ही दोन्ही ग्रुप्स रस्ता चुकलो. चुकलो म्हणजे काय, एखादी वाट धरली की बरच लांब पर्यंत जायचं आणि ती वाट अचानक कुठल्या तरी केळीच्या बागेपाशी येऊन बंद व्हायची, म्हणजे पुढे वाटच नाही, मग पुन्हा मागे यायचं, दुसरी वाट धरायची, मग ती पण अशीच बंद!, अशा ३ ते ४ वाटा करून झाल्या, चांगल १२-१३ किमी अंतर चालून सुद्धा आम्ही पुन्हा जिथून सुरू केलं तिथेच! आज मुक्कमावर पोहचू की नही असं वाटू लागलं. आता काय करावं समजेना. इथे या बागांमधे चिटपाखरू नाही, विचारायचं तरी कुणाला? एक अजून वाट होती जरा दूरून, म्हंटलं ती पण करून पाहू, आता दुसरा उपाय तर नाहीये. त्या वाटेवर पुढे गेलो, तिथे एक घर होतं. ते घर बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू, वाटलं चला, म्हणजे काही नाही मिळाली वाट पुढे तर निदान इथे मुक्कम तरी करता येईल. ते घर पाहून आम्हा तिघांनाही आधार मिळाल्यासारखं वाटलं आणि त्या दिशेने आम्ही चालू लागलो. घराजवळ पोहचलो तर घर बंद, गेल कित्येक दिवस य घरात कुणीच आलं गेलं नसावं. समोरच्या खिडक्या बंद, बाहेरून त्यावर कोळीष्टकं जमलेली, अंगणात गवत उंचं च उंच वाढलेलं,आणि सगळ्यात कमाल म्हणजे कमालीची भयाणता आणि गूढता तिथे आम्हाला तिघांनाही जाणवली. अचानक नकारात्मक लहरी यायला लागल्या असे वाटू लागले. आता इथून कसंही करून बाहेर पडायचं, बस! आम्ही पुन्हा एकदा मागे वळलो.
जिथून आम्ही त्या शेतात आलो होतो तिथपर्यंत पुन्हा मागे गेलो, आणि नर्मदे हर चा धावा सुरू केला. तिस-या मिनिटाला एक माणूस मागून आला आणि म्हणाला, जो रस्ता बंद किया दिखेगा वहा से जाओ. आता गम्मत अशी झाली होती की ५ वाटा होत्या, त्यातल्या ४ आम्ही धुंडाळून झाल्या होत्या आणि एका वाटेवर झाडं, ओंडकी टाकून ती वाट बंद केली होती, मात्र तिथे पुढे वाट आहे अशी शंका ही आम्हाला आली नाही इतकी वाट लहान होती, वाटलं पुढे एखादी बाग असेल. पण तीच वाट बरोबर होती. त्या वाटेवर पुढे केळी ची बाग होती, पण ती बाग ओलांडून मग पुढे रस्ता होता. केळींचे घड च्या घड लागलेल्या बागांतून, कमरे पर्यंत वाकून, त्या झाडांखालून गेल्या नंतर, म्हणजे साधारण अर्धा किमी असं चालल्या नंतर आम्हाला एक ओढा लागला, तो पार करून समोर चा छोटासा टेकडी सारखा उंचवटा पार करायचा होता, मग आम्ही कोटेश्वराच्या रस्त्याला लागणार होतो.
हा ओढा जरी तसा लहान असला तरी तिथे खूप चिखल होता. गुडघ्यापर्यंत अगदी. बुट काढून मी चप्पल घातली. ती फ़सली आणि तुटली, शेवटी अनवाणी चालण्याशीवाय पर्याय नव्हता. कसा बसा तो ओढा, तो डोंगर अनवाणी पार करत करत आम्ही पुढे गेलो खरं, पण तेव्हा पायात जे काटे बोचले, अगदी बाभळी चे काटे बोचले तेव्हा अनवाणी परिक्रमा करणा-यांचा धैर्याचं आणि साधनेचं सामर्थ्य काय असेल याची कल्पना आली. या काट्यांनी मल २-३ दिवस त्रास दिला. पुढची परिक्रमा अनवाणी च करायची अशी कल्पना यावेळी तिथे पहिल्यांदा सुचली. गम्मत आहे नं, मला काट्यांचा त्रास होत होता मात्र परिक्रमा करावीशीच वाटत होती. किंबहुना काटे बोचून पाय दुखत होता तरी पुढच्या वेळी अनवाणी चालण्याची तयारी मनानी कशी काय दाखवली कोण जाणे?मात्र इथेच पुढे एक गम्मत झाली. माझी चप्पल तुटली होती. आश्रमात गेल्यावर बरेच दा जिथे शौचालयाची सोय नसते तिथे बाहेर जंगलात जाव लागायचं अशा वेळी स्लीपर चं काम पडायचं. आता माझ्याजवळ स्लीपर नव्हत्या, आणि दर वेळी फ़्रेश व्हायला जायचं म्हणजे रात्री बूट घालून जावं लागणार होतं. पण ईलाज नव्हता. ज्या चपला असतील त्या घालून जायचं असं मी ठरवलं. आश्रमा बाहेर ब-याच चपला होत्या, आणि मी त्या फ़क्त च थोड्या वेळा साठी वापरणार होते, त्यामुळे खरं तर कुणी आक्षेप घ्यावा असही काही नव्हतं, मात्र इथे एक गम्मत झाली आणि एक, नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन ते चार दिवस ती गम्मत होत राहिली, कारण तो निव्वळ योगायोग नव्हता. सांगते. कुणाच्या चपला त्या व्यक्ती ला न विचारता घालून जाणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. “घालून जाऊ न कुणाच्या तरी “असा विचार मी केलाच होता खरं पण माझं मन धजलं नाही आणि त्या दिवशी अनवाणीच जंगलाच्या दिशेने गेले. मात्र रस्त्यात मला एक बाई भेटली, ती कुणी गावातली असावी, नुकतीच ती झाडीतून बाहेर आली होती, “मैयाची मेरी चप्पल पहन लो, काटे गड जायेंगे” असं म्हणत तिने तिच्या चपला दिला. दुस-या दिवशी पुजारी महारांजानी दिल्या, आणि तिस-या दिवशी एका परिक्रमावासीं नी दिल्या… मी एकदाही रात्री अनवाणी गेले नाही.
पुढे कोटेश्वरानंतर मात्र मी एकटीने चालण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बाकी लोक आगे मागे असत.. मात्र चालताना मी सर्वात पुढे असायची, अगदी साधारण ३-४ किमी पुढे. असं होतं परिक्रमेत. बरेचदा आपण आपल्या ध्येयापासून दूर जातोय, आणि अयोग्य (म्हणजे आपल्या ध्येयपूर्ती च्या दृष्टीने अयोग्य) असलेल्या लोकांमधे आपण आपले ध्येय विसरतोय असं वाटू लागलं मैया आपल्याला त्या समूहापासून दूर करते. तसच झालं, मात्र किंचितही एकटेपण किंवा भिती वाटली नाही. याऊलट जेव्हा जेव्हा मी एकटी चालायचे तेव्हा तेव्हा मला वेगळे आणि विलक्षण अनुभव मिळत जायचे.
पुढे, म्हणजे कोटेश्वराहून पुढे सिसोदरा आणि त्याहीपुढे कांदरोज नावाचं गाव होतं, आज तिथवर जाता यावं असं वाटत होतं. दुपारचे ३-३.३० वाजले असतील, कांदरोज अजून ८-१० किमी दूर होतं. पहिला टप्पा सिसोदरा, इथे आल्यावर मग पुढे जाता येईल का हा विचार करायचा. मी निघाले. थोडं अंतर चालून झाल्यावर रस्त्यात एका ठिकाणी चर बायका बसल्या होत्यात, त्यांना सिसोदरा कुठेय ते विचारलं.. ” हमारे साथ चलो, हम भी उधर ही जा रहे है” असं म्हणत त्या उठल्या आणि चालू लागल्या. जणूकाही मी आली की उठायचं असं ठरवलं होतं त्यांनी, इतक्या पटकन उठल्या त्या. गप्पांमधे समजलं, त्यातल्या एकीचं माहेर नागपूर चं होतं… ती माझ्याशी छान मराठीत, अगदी नागपूरी मराठीत बोलू लागली. मी एकटी नसून माझ्या गावचं माणूस मला सोबतीला मिळालं होतं… सिसोदरा कधी आलं समजलच नाही. तिनी मला घरी बोलावलं पण तिचं घर बरच लांब असल्याने मला ते शक्य झालं नाही..पुढे कांदरोज ची वाट दाखवून त्या चौघी आपापल्या घराकडे वळल्या.
आता रस्ता बराच एकट होता. घाट होता. इथे चौकात मला दोन माणसं दिसलीत, त्यांना विचारून मी रस्ता निश्चित करून घेतला. ती दोघं म्हणाली “ मैया जी आप १.३० घंटे मे पोहोच जाओगे, लोग छोटा रास्ता बतायेंगे तो वो मत लेना” कुणी काही सांगितलं की त्याला प्रतिप्रश्न न करता जे सांगीतलय ते ऐकायचं असं एव्हाना ठरलं होतं, कारण आपल्यापेक्षा स्थानीय लोकांना माहिती जास्त आणि चांगली असते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी चालू लागले. साधारण एखाद तासाने ही मंडळी माझ्या मागून पुन्हा आलीत आणि मला रस्त्यात थांबवलं. “ मैयाजी, बस अब थोडाही बचा है, अब थोडा विश्राम कर लो” तसा अजून अंधार पडायला वेळ होता. मी थकले पण नव्हते, आणि विश्राम करण्यासारखं ते स्थानही नव्हतं. म्हणून मी विश्राम करत नाही असं म्हणताच त्या मोटर सायकल वर मागे बसलेल्या माणसाने पिशवीतून एक छोटासा स्टूल बाहेर काढून माझ्या पुढे ठेवला. “मैयाजी पाच मिनिट तो बैठो” असं म्हणत लगेच एक थरमास आणि चहाचे तीन कप काढले, आणि आम्हा तिघांसाठी चहा ओतला… “आप को चाय पिलाना था” असं म्हणत चहा माझ्या हाती दिला. विचारलं तेव्हा समजलं, मला मघाशी ही दोघं ज्या चौकात भेटली होती, तिथून ८-१० किमी दूर आणि चौकापासून माझ्यापर्यंत ३ ते ४ किमी असे १४ किमी दुरून या दोघांनी माझ्यासाठी चहा आणि बिस्किटं आणली होती! फ़क्त चहा देण्यासाठीचा हा आटापिटा…का तर मैयाजी एकट्या चालताहेत, रस्त्यात काही नाही, त्यांची सेवा करायला हवी, ही एक सदभावना! काय म्हणावं याला?
याच रस्त्यावर पुढे एक हनुमानाचं मंदिर लागलं, आणि तिथे पण एक छानसा अनुभव आला… बरेचदा काही अनुभव फ़क्त अनुभवावे असे असतात…त्यातलाच एक…. म्हणाल तर काही झालंच नाही, आणि म्हणाल तर सारं विश्व माझं झालं, असा हा अनुभव…आणि हो,कांदरोज् ला पोहचल्याक्षणी मी आनंदाने रडूच लागले, हो, असच काहीतरी दिसलं मला तिथे…. पण या भागात नाही हं सांगणार… पुढच्या म्हणजे २९व्या भागात सांगते.. तोवर नर्मदे हर!
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग २९
*नर्मदे हर.*
तर सिसोदरा गावातल्या त्या दोन तरुणांनी दिलेला चहा पिऊन त्यांना निरोप देऊन मी पुढे निघाले. छान सोनेरी ऊन पडलं होतं. अजून सूर्यदेव व्यवस्थित दिसत होते, मात्र संध्याकाळचा गारवा हळू हळू जाणवू लागला होता. वातावरण प्रसन्न होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं आणि खुरटी झुडपं होती. अगदी प्रत्येकच झाड वेगळं असावं असं वाटत होतं. जवळ हनुमानाचं मंदिर आहे असं सांगीतलं होतं, म्हणून ते येईस्तोवर हनुमान चालीसा म्हणत जावं असा विचार मनात आला, आणि मी हनुमान चालीसा सुरू केली. तेव्हा मला एक आनंददायक अनुभव आला. आता हा अनुभव आहे की माझ्या मनातल्या प्रसन्नतेचा आणि एकरूपतेचा भाग आहे ते नाही सांगता येणार, पण आनंदाची परिसीमा काय असते आणि तो आनंद इतका तेजोमय कसा असतो हे अनुभवण्याची संधी मला मिळाली हे नक्की.
मी हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केली, मी आजूबाजूला झाडांकडे, रस्त्याकडे बघत बघत, आपल्याच नादात हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केली. एक ओळ झाली आणि मी उजवीकडे बघत असताना, माझ्या डाव्या बाजूने कुणीतरी दुसरी ओळ म्हणतय असा भास झाला, मी डावीकडे पाहीलं तर तिसरी ओळ ऐकू आल्याचा भास झाला, माझ्या समोर, थोडं अंतर दूर कुणी तरी ती म्हणतय असं वाटू लागलं….जसं कुणीतरी माझ्यासोबत हनुमान चालीसा म्हणत म्हणत जातय…मग काय, ज्या झाडाकडे बघीन ते झाड, ज्या दगडाकडे बघेन तो दगड, आभाळ, वाळलेली पानं…अगदी जिथे जिथे माझी नजर जाईल ते सगळंच माझ्याबरोबर हनुमान चालीसा म्हणतय असं वाटायला लागलं, किंवा असं जाणवायला लागलं म्हटलं तरी चालेल. अश्या परिस्थितीत मी एकटी चालतेय असं मला जाणवलं देखील नाही, किंबहुना ही सगळी सृष्टी माझ्या सोबत आहे आणि माझ्यात समरस झाली आहे असच वाटू लागलं. खरं सांगते त्या वेळेचा जो आनंद आणि उत्साह आहे तो मला शब्दात मांडताच येत नाहीये. तुम्ही विचार करा न, करून तर बघा, सगळं जग, सगळी सृष्टी जेव्हा तुम्हाला सोबत करत असते त्या वेळेला अजून दुसरं काय हवं असेल तुम्हाला? *“And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”* मला पाओलो सेलो च्या अल्केमिस्ट मधलं वाक्य आठवलं पण खरं सांगू हे त्याहीपेक्षा मोठं होतं, कारण इथे मला कुठलीही अपेक्षा नव्हती… मला काहीही नको असताना सगळी सृष्टी मला मिळाली होती.ती ही अगदी अचानक. माझा हा आनंद कशावरच अवलंबून नव्हता, आणि म्हणूनच तो अक्षय आहे असं मला वाटतं.
हा अनुभव घेत घेतच मी कांदरोज च्या आधी येणा-या हनुमान मंदिरात आले, तिथे मारुती रायाच्या दर्शनाच्या वेळेस मला पुन्हा तेच जाणवलं जे मी मागच्या एका अनुभवात लिहिलं आहे. *कधीही हाक घाल,मी तुझ्या सोबत असेन* असं मारुतीराया म्हणत होते जणू, आणि याची प्रचिती होऊन मारुती रायांचं दर्शन झाल्याचा अनुभव आपण वाचला आहेच, मात्र प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी मला असे संकेत अनेकदा मिळत गेलेत हे महत्त्वाचं. ते त्या त्या वेळेला आपल्याला समजत नाही मात्र म्हणून ते नसतात असं नाही. माझं हे आनंदाचं पर्व मी एकटी असताना जास्त तीव्रपणे जाणवत होतं…असेल, कारण तो आनंद आता शेअर होत नसावा…. आणि म्हणूनच की काय कांदरोज चा अनुभव मला आला.
कांदरोज च्या अश्रमात पाऊल ठेवत नाही तोच समोर खुर्चीवर एक सत्तरी च्या जवळपासचे गृहस्थ काहीतरी वाचन करत बसले होते. मी अजूनही माझ्या आनंद पर्वातच रममाण होते. मी माझं आसन लावलं, हातपाय धुतले आणि बाहेर पायरीवर जाऊन शांतपणे बसले. माझी परिक्रमा सुरु होण्या आधीपासून चे सगळे दॄश्य माझ्या नजरेसमोर चित्रपटासारखे येत होते. कसं माझं पीएच. डी. चं सबमिशन झालं, कसे मी लोकांचे अनुभव ऐकायला जायची, अरविंद मुळे काकांना भेटायला गेले असतानाचा आमचा संवाद सांगते. मी त्यांना भेटायला गेले त्यावेळी मी परिक्रमेला कधीतरी जावं एवढी इच्छा च फ़क्त मनात होती, मात्र ती अतिशय तीव्र होती. माझं कधी जायचं हे काहीही ठरलं नव्हतं.काकांनी विचारलं “ ताई कधी जाताय तुम्ही परिक्रमेला?” मी सांगितलं, “कदाचित ओंकारचं म्हणजे माझ्या मुलाचं बी ई झाल्याशिवाय काही जाता येणार नाही” मात्र मुळे काका बोलून गेले “ताई मला तर वाटतय तुम्ही याच वर्षी जाणार”…. आणि असे काही चक्र फ़िरले की जुलै मधे झालेल्या ह्या संवादानंतर नोव्हेंबर मी परिक्रमेला गेले देखिल!, तर असे सगळे विचार मी करत त्या आश्रमासमोरच्या पायरीवर बसले होते, तितक्यात मागून आवाज आला, “सुरुचि ताई, या या, इथे भेट होईल असं वाटलं नव्हतं हो, कशी सुरु आहे परिक्रमा?”
बापरे, माझं नाव घेऊन, चक्क मराठीतून, आणि इथे गुजरात मधे कोण मला आवाज देतय? मी मागे वळून पाहीलं आणि मला अक्षरश: रडूच आलं. समोर खुर्चीवर एक सत्तरी च्या जवळपासचे गृहस्थ काहीतरी वाचन करत बसले होते, तेच माझ्याशी बोलत होते… ते मुळे काकाच होते. नागपूरहून आजच इथे आले होते….मी त्यांना बघितले होतं पण अजिबात ओळखलं नाही..का कोण जाणे! मी त्यांना बघावं, बघूनही मला त्यांना ओळखता येऊ नये, नेमके त्यांचे विचार त्या वेळी माझ्या मनात यावेत, आणि मागून त्यांनी मला आवाज द्यावा…हे सगळं कसं एखाद्या मुद्दाम आखलेल्या योजने सारखं नाही वाटत? मी व्यक्त होण्याच्याही पलिकडे होते त्यावेळी…
*“जेव्हा आवडी भक्त जाहले।* *भक्तामाजी देव गवसले* *भजू कूणास, कुणी भजणे।* *भजनची आकळले अंती हो॥*“
अशी काहीशी माझी अवस्था झाली होती त्यावेळी. पण त्यावेळी मला एक मात्र जाणवलं. मी एकटी चालू लागले आणि त्या नर्मदा माईनी माझी जास्त काळजी घेणं सुरु केलं.मला एकटं वाटू नये याची जबाबदारी तिनी घेतली, त्यासाठी सगळी सृष्टी मला देऊ केली सोबतीला, आणि इथे माझ्या परिक्रमेची सुरवात करून देणारे मुळे काका पण भेटवलेत!..
माझ्या बरोबर पण मागून येणारी मंडळी ही रात्री इथे येऊन पोचली होती.दुस-या दिवशी सकाळी मला किंचित ताप होता. राजपरा ला जाऊन मी मुक्काम करावा असं मला वाटत होतं. तिथे जगदीश भाई परमार म्हणून एकजण सेवा करतात, तिथे चहा पाणी आणि प्रसादीची व्यवस्था आहे. हे अंतर फ़ार नाही, ७-८ किमी असेल, त्यामुळे इथे रात्री मुक्कामी थांबावं असा बाकी मंडळींचा विचार नव्हता, मात्र तब्येतीमुळे मी थांबून जाईन असं मला वाटत होतं. म्हणजे थोडक्यात निदान रात्री मुक्कामाला सोबत असणारी ही मंडळी उद्यापासून सोबत नसणारच…पण मी असा विचार केला होता, मैयाने नाही. काय झालं कुणास ठावूक, माझ्या मागोमाग, एक एक करून सगळेच इथेच थांबायचा विचार करू लागले, आणि थांबले पण!..एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी वेणूग्राम कडे जायला निघालो.
या रस्त्यात अनुभव म्हणून नाही पण राष्ट्रीय एकतेची भावना अजूनही सामान्य जनमानासत शिल्लक आहे हे जाणवलं. काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला एका मुलाने बिस्किटाचे पुढे दिले, प्रत्येकी २, मोठाले आणि अगदी आग्रहाने. यात काय राष्ट्रीय एकता? आहे ना, हा मुलगा मुस्लीम धर्माचा, मात्र त्याचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून परिक्रमा वासींना बिस्किट देतात, आणि नर्मदे हर चा गजर करून परिक्रमावासिंच्या पाया देखील पडतात. आणि तरीही या परिवाराला सेवा करण्याचं समाधान पूर्णपणे मिळत नाही. त्या मुलाशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला, “ हमे बहोत अच्छा लगता है परिक्रमावासीयों की सेवा करना, हम चाहते है की परिक्रमावासी हमारे घर मे आये, पर हम मुस्लीम है इसलिये लोग हमारे यहा नही आते. हम पहले मांस मच्छी खाते थे, पर अब नही खाते, फ़िर भी लोग घर पर खाने के लिये मना करते है, इसलिये बिस्किट देना ही ठिक है”. इथे नर्मदा सगळ्यांचीच आई आहे, हे बघून छान वाटलं.
असाच नाही पण खूप वेगळा आणि खूप रोमांचक अनुभव दमगढ च्या आधी म्हणजे दम्हेडी नंतर जे जंगल लागतं तिथे आला..पण तो आता सांगणार नाही, तो तेव्हाच सांगेन..आता मात्र एक मजेदार किस्सा सांगते.
पूर्ण परिक्रेमेत तुमच्या सोबत जर कोणी कायमरित्या चालत असतील तर त्यातली एक म्हणजे आपली नर्मदा मैया, जिला इथे या भागात “मैया जी” असं म्हणतात, आणि दुसरे म्हणजे “पारले जी”. गुजराती प्रेम हे फ़ारच गोड आहे आणि पारले जी सारखंच स्ट्रॉंग आहे. इथे इतके बिस्किटाचे पुढे रोज मिळायचे की जीव नकोसा होऊ लागला..आणि इतक्या प्रेमानी ते दिल्या जायचे की नाही म्हणायला काही वावच नाही. पुन्हा अयुष्यात पारले जी खाल्ल्या जाणार नाही इतकी बिस्किटं इथे खाल्लीत आणि जी खाल्ल्या गेली नाही ती पिशवीत जमा केली. आता वजनही सहन होईना, शेवटी माझ्याजवळची ५ पाकिटं मी रस्त्यात दिसलेल्या लहान मुलांना देऊन टाकली. पण असं करून मी बिस्किटांपासून सुटले असं मला वाटलं होतं तरी असं नव्हतं. दगडू महाराज आश्रमातून बाहेर पडत नाही तोच १० बिस्किटांच्या पुड्याचा मिळून जो एक मोठा पुडा असतो तो मला देऊ करण्यात आला..”मी दिलेली बिस्किटं तू देऊन टाकलीस काय? घे तुला दुप्पट देते, घ्यावीच लागतील तुला” असं ती मैया म्हणत असावी बहुधा…आणि खरं सांगू, यानंतर मात्र फ़ार बिस्किटं मिळालीच नाहीत…हे १० पुडे बरेच दिवस चाललेत मला…
या गुजराती लोकांच्या बोलण्यावर न अज्जीबात विश्वास ठेऊ नये… फ़ार गांभिर्याने घेऊ नका हो, एक गम्मत आठवली म्हणून लिहिलं असं. सांगते, तुम्ही कुठल्याही गुजरात्याला कुठलाही पत्ता विचारा “ अभि हयीच छे” हेच उत्तर आपल्याला मिळतं. आता खरी गम्मत या “हयी” शब्दाची आहे. हयी चा अर्थ १ किमी ते ७ किमी असा कितीही असू शकतो. अभि हयी छे म्हंटल्यावर ७-८ किमी तरी चालावं लागेल हा विचार मनात पक्का असू द्यावा लागतो. अर्थात गुजरात संपता संपता त्याची सवय होतेच…असो, हा झाला गमतीचा भाग.
पुढे “हयी” च्या नादी न लागता एका इंद्रेश्वर महादेव मंदिरात आसन लावलं. इथून पुढे वेळूग्राम आणि भावपुरा ला जायचं होतं, मात्र भावपु-याच्या ही पुढे सरसाड ला आम्ही मुक्काम केला. या मुक्कामात एका छान कुटुंबाशी ओळख झाली. पुढे वढवाणा ते मणीनागेश्वर फ़ार सुंदर म्हणजे अगदी रमणीय रस्ता आहे, तो अनुभवला. मणीनागेश्वर ला एका सन्याश्याशी सत्संग झाला, आणी भालोद ला माझ्या जीवनाला पुन्हा एक दिशा मिळाली. भालोद हे स्थान माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं, प्रेमाचं आदराचं आणि जिव्हाळ्याचं स्थान आहे कारण इथे आलेला अनुभव माझ्या परिक्रमेतला अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. पण मी तो पुढच्या म्हणजे ३० व्या भागात सांगणार…. नर्मदे हर.
*©सुरूची नाईक- विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३०
*नर्मदे हर.*
इंद्रेश्वर महादेव पासून आतापर्यंत अधून मधून सोबत असणारे पसारकर काका काकू मागे पडलेत आणि मयूरेश सुरेखा ताई पुढे आणि स्मीता आणि त्या नंतर मी असे चालू लागलो. एकट्याने चालण होत होतं तरी अजूनही या बाकी मंडळी एकतर मुक्कामावर किंवा अधे मधे सोबत भेटत असत. *मात्र अनुभव येतात ते एकट्याने जास्त, हेच खरं*. आजचं हे अंतर बरच लांबचं होतं. वाटेत चहा, ताक वगैरे काहीही आज मिळालेलं नव्हतं. लोक वस्ती गावा गावापुरती दिसत होती मात्र गावामधे बरीच अलिप्तता जाणवली.खरं तर मला भावपु-याला थांबायचं होतं पण तो रस्ता जरा डवीकडे वळून जात होता, आणि भावपु-याचा रस्ता तिकडे जातोय हे काही मला कुणी सांगितलच नाही. म्हणजे पुढे चालणारे मयुरेश सुरेखा आणि स्मिता हे नक्की कुठे गेलेत हे ही मला माहित नव्हतं, आणि जसा रस्ता जातो तस तशी मी चालत होते, वाटेत एका ठिकाणी दोन परिक्रमावासी मुक्काम करताना दिसलेत, त्यांनी सांगितलं, की भावपुरा मागे राहिलं आणि आता बरच अंतर पुढे राहण्याची सोय नाही. ते दोन परिक्रमावासी मध्यप्रदेशी होते. त्यांची चालण्याची क्षमता आणि गती माझ्यापेक्षा खूपच जास्त होती, त्यामुळे पुढे मला एकटीनेच जाणं भाग होतं.वाटेत एक नदी ओलांडून जायची आहे हे समजलं. नदीचं पात्र बरच मोठं होतं. जोडे काढून चालावं लागणार होतं. नदी कुठून उतरायची हेच समजत नव्हतं. अचानक आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस पडेल की काय अशी भिती वाटत होती. नदी मधे उतरून जायला एक बराच खोलगट रस्ता होता, पण नक्की हाच रस्ता आहे की नाही हे ही समजत नव्हतं. नदीवरचा पूल तुटलेला असल्याने कदाचित याच रस्त्याने ये जा होत असली पाहीजे. असा विचारच करत होते तो माणूस मोटर सायकल हातात घेऊन समोरच्या बाजुने नदी उतरू लागला. त्याने खुणेनेच रस्ता बरोबर असल्याचे सांगीतले आणि इतकेच नाही तर आपली गाडी एकी कडे उभी करून थोडं अंतर माझ्या सोबत चालून वळणानंतर चा रस्ता मला समजवून सांगीतला.
पुढे एका घळीतून जावं लागतं. तिथे पुन्हा रस्ता चुकेल की काय अशी भिती होती. मात्र ती ही आपोआप दूर झाली, तिथे डोक्यावर काहीतरी घेऊन दोन युवक माझ्या मागून नदी ओलांडून आले. त्यांना मी रस्ता विचारला पण त्यांना ओ म्हणता ठो कळेना. त्यांची भाषा मला काही केल्या समजेना.. आता काय करावं, आली का पंचाईत.. पण ती जिकडे जातील तिकडे जायचं, मी ठरवलं… जस्तीत जास्त काय होईल, थोडी वाकडी वाट होईल पण रात्रीचा निवारा नक्कीच मिळेल… मी त्यांच्या मागोमाग चालू लागले, अगदी काहीही माहिती नसताना. हा रस्ता म्हणजे दोन्ही बाजूला टेकड्या, त्यांच्या वर घनदाट झाडी, आणि मधून रस्ता… त्या टेकड्यांच्या पलिकडे काय आहे याचा अंदाजही येत नव्हता.कदाचित एखादी नदी, कदाचित माझी नर्मदा माई, कदाचित शेतं किंवा घनदाट जंगल.. अगदी काहिही असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.थोडं दूर गाव दिसलं तेव्हा हायसं वाटलं. गावात मात्र एका दुकानात एका बाईनी सांगीतलं, “तुम्हारे साथवाले उधर आखरी वाले घर मे गये है, वहा जाओ”…अरेच्या म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता आम्ही सगळे पुन्हा एकत्र येणार होतो… हा खेळ काही समजेना.
हे गाव होतं सरसाड. ज्या घरचा पत्ता त्या बाईनी दिला होता ते होते रमणभाई शंकरभाई. नर्मदा माईचे परम भक्त. बघा नं ती मैया आपल्याला अशा तशा कुठल्याही ठिकाणी नेतच नाही. जिथे तिच्या लेकरांची व्यवस्थित सोय होणार असेल, त्यांचा आदर होणार असेल अशाच ठिकाणी आपला दाणा पाणी तिने लिहिलेला असतो.
शंकर भाईंना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याची पुण्याई लक्षात येते. समाधान सुख काय असतं ते शंकरभाईंच्या चेह-यावर वाचावं. नर्मदा माईनी या भक्ताला स्वतःच्या किना-यावर कसं आणि का ठेवून घेतलं हे ऐकलं तेव्हा क्षणभर त्यांचा हेवा वाटून गेला, पण त्या हेव्यामागे कुठलाही वाईट विचार नव्हता, आणि एक गम्मत सांगू का, काही काळानंतर मला ही नर्मदा माईनी तेच सुख दिलं ज्या बद्दल मला शंकर भाईंचा हेवा वाटत होता. तो प्रसंग होता महेश्वर चा, पण तो जर मी आताच सांगितला तर शंकर भाईंच्या बद्दल चं बोलणं अर्धवट राहून जाईल, म्हणून तो अनुभव आपण महेश्वर च्या भागात वाचू. मात्र एक नक्की, इथे परिक्रमेते तुमची एकही इच्छा अपुरी राहात नाही हे मी सांगू शकेन.
तर आता शंकर भाई रमण भाईंबद्दल सांगते. रमण भाइंची नर्मदा परिक्रमा झाली होती. त्यामुळे त्यांना परिक्रमावासिंच्या गरजा आणि त्यांना हवं असणारं प्रेम आपुलकी याबद्दल माहिती होती. आम्हाला माईनी एका परिक्रमावासीयाच्या घरीच आणलं होतं, पण हेच काही ते विशेष नाही जे मी तुम्हाला सांगणार ते काहीतरी वेगळंच आहे. शंकर भाई रमण भाईंच्या केवळ एक नाही तर दोन परिक्रमा झाल्यात. त्या नंतरही गोर कॉलोनी इथे त्यांनी १२ वर्ष परिक्रमा वासींची सेवा केली. इतकच नाही तर त्यांचे मोठे भाऊ आणि आता त्यांचे लहान भाऊ देखिल परिक्रमा करत आहेत. घरी असलेल्या लहानग्या म्हणजे ८ महिन्याच्या बाळाला बाकी काही बोलता येत नाही मात्र नर्मदे हर करता येतं. ज्या कुटुंबातच आई नर्मदे चं वास्तव्य आहे तिथे आम्हाला रहाण्याचा योग आला हे भाग्यच नाही का?
सरसाड च्या कुटुंबानी आमची खूप मन लावून आणि खूप सेवा केली. अगदी तिथून निघताना पाय निघेना अशी अवस्था होत होती, मात्र आपलं ध्येय हे परिक्रमा करण आहे, आणि ज्या अडकून पडण्या पासून दूर जाण्यासाठी वैराग्याची देवी नर्मदेची आपण परिक्रमा करत आहोत तिच्याच भक्तांच्यात जीव लावून अडकून पडायचं? नाही नाही, इथून पुढे निघणं भागच होतं. आम्ही मोठ्या जड पावलांनी शंकरभाई रमणभाईंचा निरोप घेतला.
सरसाड ते भालोद चा प्रवास आज करायचा होता. मधे वढवणा आणि मणिनागेश्वर ही स्थानं लागतात. हा रस्ता जंगलातून जातो आणि अत्यंत रमणीय रस्ता आहे. उंच सखल वाट, आजूबाजूला जंगली फ़ुलांनी डवरलेली केशरी, जांभळी, गुलाबी फ़ुलं, वळणं घेत घेत जाणारा ओहोळ…खूपच प्रसन्न असा हा रस्ता आम्ही अगदी एन्जाॅय करत करत गेलो. वढवाणा च्या हनुमान मंदीराबद्दल सांगते. मोठी मूर्ती आणि अतिशय प्रसन्न असं हे स्थान आहे. मंदीराचं बांधकाम असं आहे की भल्या मोठा हॉल असलेल्या या मंदिराला तीन चार दालनं आहेत मात्र कुठल्याही दालनातून बघितलं तरी ही मूर्ती आपल्याकडेच बघतेय असा भास होईल. मंदिरांच्या भिंतीवर वाल्मिकी रामायण कोरलेलं आहे. मंदिराच्या आतील घंटे खाली उभं राहिलं की भान हरपल्या सारखं होतं इतके कंपन तिथे जाणवतात. आम्ही मंदिरात गेलो त्यावेळी आमच्याव्यतिरिक्त कुणीही तिथे नव्हतं. मंदीर थोडं उंचावर आणि गावापासून लांब असल्याने तिथे खूप शांताता ही होती, खरं तर इथेच राहावं असं वाटत होतं पण त्याबद्दल विचारायलाही कुणीच नसल्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालीसा ११ वेळा म्हणून मी पुढे निघाले.
इथून पुढे मणिनागेश्वराचं स्थान आहे. अत्यंत प्राचीन आणि अत्यंत जागृत. पण त्या आधी झालेली एक गम्मत सांगते. जसं जसं मणिनागेश्वर जवळ येत गेलं तस तसं लोक वस्ती तुरळक होत गेली. मात्र मधेच कुठेतरी गावातून एक कुत्रा आमच्या मागे मागे चालू लागला. आधी काही काळ तो कुत्रा अगदी शहाण्यासारखा फ़क्त मागे मागे येत होता, मधेच काय झाले कोण झाला, तो कुत्रा माझ्याकडे पाहून भुंकू लागला. अगदी दात ओठ खाऊन अंगावर आल्यासारखा करू लागला. मी घाबरले, आणि माझ्या तोंडून नर्मदे हर चा आवाज आपसुकच बाहेर पडला, आणि काय गम्मत माहितिये, हा कुत्रा बटन दाबावं तसा एक्दम खाली बसला आणि भुंकायचं थांबलाच. मला हे पहिल्या वेळेला लक्षातच आलं नाही, मात्र असाच प्रसंग तीन चार दा झाल्यावर समजलं, नर्मदे हर म्हटलं की हा थांबतो. कदाचित माझा नर्मदे हर चा जप कमी होत असेल म्हणून की काय, मणिनागेश्वर पर्यंत हा कुत्रा माझ्या मागे मागे येत राहिला, आणि माझा जप जणू माझ्याकडून या कुत्र्यानी करवूनच घेतला.
मणिनागेश्वर ला पोचल्यावर छान दर्शन झालं. इथे छोटी छोटी खूप मंदिरं आहेत. इथे मुक्कामाची छान व्यवस्था आहे. माझा बालभोग झाला नव्हता, मला थोडी भूकही लागली होती. खाली भंडा-याची तयारी सुरू होती त्यात पुरी भाजी तयार होताना दिसत होती. चला म्हणजे इथे बालभोग होईल असं वाटलं. पण गंमत माहितिये का, आज नं मला धिरडे खावेसे वाटले अचानक, आणि आपला महाराष्ट्रीयन चिवडा पण… पण इथे तर भाजी आणि पुरीची तयारी होती, अर्थात जे मैया पानात वाढेल ती प्रसादी… धिरडे आणि चिवडा जसा आला तसा माझ्या मनातून निघूनही गेला. मी तिथल्या स्थान धारी बाबांचं दर्शन घ्यायला म्हणून त्यांच्या निवासाकडे गेले हे बाबा कर्नाटकाचे होते. त्यांनी माझी चौकशी केली. मी मराठी आणि नागपूरची आहे म्हटल्यावर त्यांनी आपुलकीनी आणि मराठीत “ या या” असं म्हंटलं…” हमको थोडा थोडा मराठी आता है”, असं ही ते म्हणाले. त्यांचा छान सत्संग झाला.. आणि शेवटी जाता जाता त्यांनी मला बजावलं, “यू नीड टू गेट डिटॅच विथ एवरी थिंग, यू हॅव टू…..थोडा समय लगेगा, पर ध्यान से करोगी तो हो जायेगा”. मला भेटणारी प्रत्येकच मोठी व्यक्ती मला गुंतू नको हेच सांगतेय, मात्र ते करायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता, कारण आपण सर्व सामान्य माणसं कधी न कधी या मोहांना बळी पडतोच… मी त्यांना माझा प्रश्न विचारला तर ते म्हणतात “ मै तुम्हे जवाब नही दुंगा, क्युंकी तुम्हे कोई और इसका जवाब देने वाला है”.. मी नंतर त्यांना आग्रह केला नाही. मात्र हे कोण सन्यासी आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांचा परिचय विचारला.. ते म्हणाले “धिस इज द फ़र्स्ट स्टेप टुवर्डस अटॅचमेंट..यूर क्यूरोसिटी… क्या जरूरत है हमारे बारे मे जानने की? जो आपको जानना है वो आगे मिलेगा ये हमने बता दिया है… अब और मत सोचो.. ये लो, ये खाओ, तुम्हारे महराष्ट्र का है” असं म्हणत त्यांनी एका द्रोणामधे मला महाराष्ट्री पद्धतीचा चिवडा दिला…..आता काहीच क्षणांपूर्वी मला चिवडा हवा होता, तो मिळाला होता, पण तेव्हा वाटलेली तीव्र इच्छा आता चिवडा समोर असूनही तितकी तीव्र वाटत नव्हती… तसच काहीसं धिरड्याबद्दलही झालं… इथेच, मणिनागेश्वरालाच…. आणि हो, आजवर ज्या मगर मैयांला बघायची, तिचं दर्शन घ्यायची इच्छा होती ती पण पूर्ण झाली… पण नक्की काय झालं ते पुढच्या भागात सांगते.. हो माझ्या प्रश्नांची उत्तर पण मला पुढे मिळाली… कशी ते पुढच्या म्हणजे ३१ व्या भागात सांगते.
नर्मदे हर
*©सुरूची नाईक- विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३१
*नर्मदे हर*
मणिनागेश्वराच्या त्या संन्यास्यानी अगदी वेळीच माझी शिगेला पोहोचलेली उत्कंठा थांबवली, आणि खरच आहे, मला काय गरज त्या सन्यासाबद्दल जाणून घेण्याची न? आपण उगाच धावत असतो बरेचदा, गरज नसताना… ती धावपळ करून झाली, थकलो की मग समजतं, याची गरजच नव्हती…पण ते वेळेवर समजलं असतं तर तो वेळ, आणि ती धावपळ कुठल्यातरी गरजेच्या गोष्टीसाठी उपयोगात आणता आलं असती असं वाटतं… सत्पात्री दान कसं असतं तसं… पण हेच तर आयुष्य आहे न!.. असो
आता धिरड्याची गोष्ट. मी चिवडा खाल्ला. कुणीतरी मराठी व्यक्तिंनी तो त्यांना दिला होता, माझी इच्छा ओळखून त्यांनी तो मला दिला. आता तो खाऊन झाल्यावर माझ्या मनात धिरड्याची आठवण सुद्धा शिल्लक नव्हती. खाली बालभोगासाठी मंडळी बसली होती. मला बसायला जागा नव्हती म्हणून तिथल्या एका शिष्याने मला पाक घराच्या पायरीवर बसायला सांगीतलं. मी पाक घरात डोकावत होते, सहज म्हणूनच. एका शिष्याने मला ४ पुर-या आणि भाजी वाढलेली ताटली दिली. “चार पुरी ज्यादा हो जायेगी, हमको बस २ ही चाहिये” असं म्हणून मी त्याला ताटली परत केली, त्यानी दोन पु-या कमी करून पुन्हा मला ताटली दिली, बघते तर त्यात २ पु-या, एक धिरडं होतं, ते ही मुगाचं, आणि भाजी होती. “ये चीला तो खा लो मैया, पुरी पसंद नही है तो चीला तो पसंद होगा, वैसे कल का है, पर अच्छा है” तो म्हणाला…. आता काय म्हणू मी… मी इच्छा व्यक्त पण केली नाही, फ़क्त विचार आला माझ्या मनात, आणि पूर्ण झाली इच्छा.
बालभोग करून आम्ही पुढे भालोद च्या मर्गाने निघालो. भालोद च्या प्रतापे महाराजांबद्दल ऐकून माहित होतं. ते आपल्या नागपूरचे, म्हणून भेट व्हावीच असंही वाटत होतं. शिवाय त्यांनाही कुणीतरी माझ्याबद्दल बोललेलं आहे हे माहित होतं. मी भालोद ला पोहचले. अगदी जिथे दत्ताचं मंदिर आहे त्याच्या ४-५ घरं दूर पर्यंत उदबत्तीचा सुगंध येत होता. मंदिरात गेले आणि मला एका क्षणात रडू आलं. आनंदानी.मी मंदिरात गेले आणि आत बसते तो समोर मोठ्या महाराजांची इतकी जीवंत मूर्ती आहे की क्षणभर प्रत्यक्ष महाराजच बसले आहेत असं वाटू लागलं. त्या मूर्तीवरून काही केल्या नजर हटेच ना. मनात कसलेही विचार नव्हते मात्र डोळ्यातून पाणी घळघळा वाहात होतं. प्रतापे महाराज आतून बाहेर आले, त्यांनी सगळ्या परिक्रमावासींचं स्वागत केलं आणि “ती नागपूरची सुरुची कोण आहे हो तुमच्यापैकी” असं माझ्या नावासकट माझ्याबद्दल विचारलं.. इतकच नाही तर “ माझ्या गावाची आहे ती” असं आपुलकीचं बोलणं ऐकून गहिवरून आलं. माझी महाराजांची भेट झाली. अगदीच प्रेमळ आहेत महाराज… माझी माऊलीच ती. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फ़िरवला तेव्हा इतकं शांत वाटलं की ते मला शब्दात सांगता यायचं नाही. आता इथेच थांबायचं, निदान ३ दिवस तरी, माझ्या मनानी ठरवून टाकलं.दुपारी पुण्याची काही मंडळी आली होती, त्यांनीच भोजन प्रसादी केली होती, ती घेतली. ती घेण्या आधी प्रतापे महाराजांनी मला आत, म्हणजे जिथे भोजन प्रसादी ची व्यवस्था असते तिथे बोलावलं. म्हणाले “ हे बघ मी तुला काय दाखवतोय” असं म्हणत त्यांनी मला जे दाखवलं ते पाहून मला अजूनच भावुक व्हायला झालं. तिथे माझ्या गुरुमाऊलीचा, माझ्या नानांचा फ़ोटो होता. “तुला तुझ्या गुरुंनी पाठवलय बरका इथे” ते म्हणाले. मग आता काय, जिथे माझी गुरुमाऊली ती जागा माझ्यासाठी किती आनंदमयी असणार! भोजन प्रसादी झाली आणि पुण्याची मंडळी गाडीनी परत निघाली.आता संध्याकाळ होत आलेली. प्रतापे महाराजांनी त्यांच्या परिक्रमेच्या गोष्टी सांगीतल्यात. अगदी पत्रकारापासून तो आतापर्यंतचा प्रवास सांगीतला, आणि तिथे भालोद ला असणा-या दत्त मूर्तीची ही गोष्ट सांगीतली. ती तर सांगतेच मात्र आधी या मूर्तीबद्दल सांगते तुम्हाला.
काळ्याशार मूर्तीचं हे रूप खूप मोहक आहे. या मूर्तीची एक गम्मत आहे. या मूर्तीमधे सगळे च्या सगळे चक्र अगदी व्यवस्थीत दिसतात. शिवाय गोमुख पण दिसतं. अत्यंत बोलकी मूर्ती आहे ही. तर आता थोडक्यात ह्या मूर्तीची गोष्ट सांगते. ही मूर्ती ज्यांच्याकडे होती त्या बाई अविवाहित होत्या आणि आता म्हाता-या झाल्या होत्या. त्यांच्या वडिलांना त्यांनी वचन दिलं होतं की मी अविवाहित राहून या देवाची सेवा करीन, पण वयपरत्वे ते आता त्यांच्याकडून होत नव्हतं आणि म्हणून ती मूर्ती कुणाकडे तरी सोपवणं भाग होतं. या मूर्तीबद्दल प्रतापे महाराजांच्या कानावर आलं आणि दर्शन घेण्यासाठी तरी आपण इथे भेट देऊ असं त्यांनी ठरवलं. इकडे त्याच रात्री त्या बाईंना स्वप्न पडलं, त्यात ती मूर्ती बाईंना म्हणाली, “ उद्या जो पहिला माणूस मला भेटायला येईल त्याला मला दे”.. बाईंनी मूर्ती महाराजांच्या स्वाधीन केली आणि भालोदला मग पुढे तिची स्थापना झाली आणि तेव्हापासून प्रतापे महाराज ह्या मूर्तीची सेवा करताहेत.
भालोद ला मोठ्या महाराजांनी ज्या जागेवर बसून साधना केली तिथे आता एक खोली बांधली आहे. मी इतकी भाग्यवान आहे की त्या खोलीत बसून ध्यान करण्याची संधी मला मिळाली. तीथे खोली तयार केली आहे हे समजल्यावर “ मला ती बघता येईल का?” असं मी प्रतापे महाराजांना विचारलं.. “बघू नकोस गं नुसती, तुझी माळ घेऊन ये, बस तिथे, ध्यान कर, जप कर, बघ तुला कसं वाटतं ते” महाराजांचं हे उत्तर ऐकून आनंदाला पारावार च राहिला नाही माझ्या. खरच तिथे ज्या वेळी मी बसले आणि जप केला त्या वेळी माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. वेळ कसा गेला मला समजलच नाही. महाराजांनी आवाज दिला तेव्हा एक-दीड तास निघून गेला होता. मी शरीराने तिथे होते पण मनाने, आत्म्याने कुठे होते हे मला सांगताच येणार नाही.
बाहेर येऊन चहा कॉफ़ी झाली आणि महाराज म्हणाले “ बस आता जरा वेळ, एक गम्मत बघ” आता अजून काय दाखवणार होते महाराज? मी वाट बघत होती. त्यावेळी पर्यंत बाकी परिक्रमावासी एकतर बाहेर गेले होते, किंवा काही अजून आराम करत होते. थोड्या वेळात एक मोर मंदिरात आला. अगदी न घाबरता त्यानी महाराजांच्या हातून दाणे खाल्ले. मोठ्या महाराजांच्या मूर्ती समोर बराच वेळ रेंगाळत राहिला, आणि मग पुन्हा बाहेर निघून गेला. त्याचा हा नित्यक्रम आहे. दिवसातून तो दोन दा येतो, मोठ्या महाराजांना नमस्कार करतो, प्रतापे महाराजांच्या हातून दाणे खातो आणि जातो! कुणाचं काय नशीब आणि कुणाचं काय कर्म काही सांगता येत नाही बाबा. हा कुठला जीव या योनीत आला असेल आणि का? असा सहज प्रश्न माझ्या मनात येऊन गेला.
रात्रीची भोजन प्रसादीची वेळ झाली. आज पुण्याची मंडळी नसल्याने कामाचं बोझा एकट्या मावशींवर पडणार म्हणून “अगं जरा स्वयंपाकचं बघ, ये मी तुला सांगतो काय कुठे ठेवलय ते” असं म्हणत महाराज मला स्वयंपाक घरात घेऊन गेले..” तो फ़्रीज उघड, बघ तिथे एक वाटी आहे, ती उचल अन लाव तोंडाला, तुला सोलकढी आवडते नं, तुझ्यासाठी काढून ठेवली सकाळी” मला माझ्याबद्दलही कदाचित माहित नसेल तितकं महाराजांना कसं माहित? मला त्यांना काहीच सांगावं लागलं नाही… आणि याचा कहर म्हणजे आमचा दुस-या दिवशीचा संवाद, पण तो नंतर सांगते.. आधी आज रात्रीचा विलक्षण अनुभव सांगते.
मी माझं आसन मोठ्या महाराजांच्या मूर्ती समोर लावलं होतं. अगदी समोर.. म्हणजे डोळे उघडले की पहिले मला जर काही दिसेल तर ती मोठ्या महाराजांची मूर्ती, अगदी अश्या ठिकाणी माझं आसन लावलं होतं मी, पण काय झालं माहितीये… खरं तर मला पण माहित नाही काय झालं नक्की, जे समजलं ते असं… मी मोठ्या महाराजांच्या मूर्तीकडे बघत बघत अंथरुणावर अंग टाकलं. त्या नंतर किती तरी वेळ मी मूर्तीकडे बघतच होते. मला कधी झोप लागली, झोप लागली की नाही ते ही मला आठवत नाहीये, आणि समजत पण नाहीये, पण सकाळी चार वाजता मला प्रतापे महाराजांच्या आवाजाने भान आले, ते म्हणाले “अरे वा, जागी आहेस तू, चल मग नर्मदा स्नान आणि काकड आरती करू. कधी उठलीस?” त्यांनी मला पाहिलं तेव्हा माझे डोळे उघडे होते मात्र मी रात्री जशी अंतरुणावर पडले होते तशीच होते आताही! भिंतीला टेकून उश्या ठेवल्या होत्या मी आणि मोठ्या महाराजांकडे बघत होते रात्री, इतकच आठवतय! माझे डोळे कधी बंद झाले, पुन्हा कधी उघडले, मी झोपले की झोपलेच नाही… काही काही समजलं नाही. मात्र मी खूप फ़्रेश होते…हे असं कसं झालं असेल? नक्की काय झालं असेल?…असो
मी प्रतापे महाराजांबरोबर नर्मदा मैयावर जाऊन आले, स्नान करून आले आणि मग जे मी बघितलं ते विलक्षण च होतं. गाभा-यात मंद प्रकाश होता. गाभा-यासमोर उंबराच्या झाडाखाली मी बसले होते आणि महाराज आत पूजा करत होते. मूर्ती स्नान झालं तेव्हा महाराजांनी मला बोलावलं आणि मूलाधार चक्रापासून सहस्रकार चक्रापर्यंतची सगळी चक्र त्यांच्या वलयासकट फ़िरत असल्याचं मला जाणवलं. दोन खांदे आणि छातीवरचं गोमुख अगदी स्पष्ट जाणवलं. आणि ती मूर्ती मंद स्मीत करतेय माझ्याकडे पाहून असा भास झाला. गंमत म्हणजे यावेळी तिथे आम्ही तिघं च होतो. मी, प्रभू दत्तात्रेय आणि प्रतापे महाराज. असा पार पडला हा काकड आरतीचा सोहळा.
आज दुपारी इथेअजून काही परिक्रमावासी ही आले होते. त्यांनी दाल बाटी चा बेत बनवला होता. मात्र मला उपास असल्याने मी भगर खाल्ली. ती भगर घ्यायला सुद्धा मीच दुकानात गेले होते तेव्हा एक सरस्वतीचं मंदिर मला दिसलं. खूप जाण्याची इच्छा झाली मात्र भगरीसाठी उपास असलेली मंडळी वाट बघत असतील म्हणून मी मोह टाळला. मात्र त्याच संध्याकाळी महाराज मला त्याच मंदिरात घेऊन गेलेत. मी न मागता, न विचारता.ही संध्याकाळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण इथे झालेला संवाद हा मोलाचा संवाद आहे. “ मी भाजी घ्यायला जातोय. कोण कोण येणार?” असं महाराजांनी विचारलं.. मी चटकन “हो” म्हंटलं. मग महाराज पुढे आणि मी मागे, आम्ही भाजी बाजारात जाऊ लगलो. या वेळी माझ्या मानात जे काही प्रश्न आले त्याची उत्तरे प्रतापे महाराजांनी मी न विचारता मला दिलीत. मला समजेचना असं कसं होतय.. पण ते समजण्याची कुवत माझी नसावी, मी मात्र अनुभव गाठीशी ठेवला आहे, आणि तुम्हालाही तो सांगणार आहे मात्र पुढच्या भागात..म्हणजे ३२ व्या भागात. नर्मदे हर.
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३२
*नर्मदे हर.*
तर भालोद च्या प्रतापे महारांजाकडे मी असतानाची गोष्ट तुम्हाला मागच्या भागात सांगत होते. मी आणि महाराज भाजी घ्यायला निघालो होतो. ते पुढे आणि मी मागे. आता महाराज काय बोलतात आणि काय सांगातात याची मी वाट बघत होते. माझ्या मनात विचार आला, किती साधना असेल न महाराजांची, पण *साधना म्हणजे नक्की काय?* म्हणजे करायचं काय नेमकं? माझ्या मनात विचार आला आणि महाराज बोलू लागले, म्हणाले “तू मांजरीचं पिलू पाहिलयस का?” मी म्हंटलं हो, बघितलय, “आणि माकडाचं?” प्रतापे महाराजांनी मला विचारलं.. हो ते पण पाहिलय मी, पण त्यांचं काय..”बरं मग आता मला सांग कुणाचं पिलू जास्त सुरक्षीत असतं बरं, आणि का?”.. मी थोडा विचार करू लागले तोच प्रतापे महाराजांनी उत्तर दिलं, “मांजरीचं, कारण मांजरीच्या पिलाला आई तोंडात उचलून घेऊन जाते. या ऊलट माकडीणीचं पिलू बघ. त्याने आपल्या आईला घट्ट धरून ठेवलं असतं. म्हणजे समजा एका झाडावरून दुसरी कडे उडी मारताना ह्या पिलाने आईला धरलेला हात सुटला तर पिलू खाली पडेल नाही का, इतक्या उंचीवरून पडल्यामुळे त्याचा कदाचित कपाळमोक्ष ही होईल. पण मांजरीच्या पिलाला आई तोंडात घेऊन जात असते. पिलाला काहिही करावं लागत नाही. ते आपलं आरामात इकडे तिकडे बघत असतं. याऊलट माकडीणीचं पिलू भेदरलेलं असतं, ते जीवाचे हात करून आईला धरत असतं… बेटा, आपण मांजरीचं पिलू बनायचं माकडीणीचं नाही. म्हणजे काय करायचं माहितीये? आपली माऊली, आपली गुरुमाऊली सांगेल तितकच करायचं, काळजी करण्याची गरज नाही. आपण फ़क्त आपल्याला स्वत:ला त्या माऊलीच्या स्वाधीन करायचय. आपण कुठे जातोय, का जातोय, हे बघण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला म्हणून काहीही धरून ठेवण्याची गरज नाही. आपण आपल्याला त्या माऊलीच्या स्वाधीन केलं म्हणजे पुढचं सगळं ती बघते, आणि हो, इथे हात सुटायची अजिबात भिती नसते, कारण आपण हात धरलेलाच नसतो. तुझ्या गुरुंनी तुला काय संगितलय ते कर, बाकी साधना काय; कशी याचा विचार करू नकोस…ते सगळं तुझे गुरू तुझ्याकडून करवून घेतीलच” साधना कशी करायची याचं सरळ साधं उत्तर मला प्रतापे महाराजांनी समजवून सांगितलं… मला आता छान समजलय, साधना कशी करायची तर मांजराच्या पिलासारखी!
आम्ही भाजी घेतली, सरस्वती मंदिरात जाऊन आलो.. सकाळी मला ज्या मंदिरात जावसं वाटत होतं तेच हे मंदिर. प्रतापे महाराज म्हणाले, “ खूप छान मंदिर आहे हे.. ही सरस्वती प्रसन्न झाली नं की ज्ञान आपोआप येतच..ते घ्यावं लागत नाही, फ़क्त ते तिनी प्रसन्न होऊन दिलं पाहिजे..” मला अचानक अन्नपूर्णा स्तोत्र आठवलं. ते माझ्या रोजच्या म्हणण्यात असतं म्हणून असेल, त्याची शेवटची ओळ फ़ारच खरी आणि अर्थपूर्ण आहे. अन्न म्हणजे खाद्य, पण कशाचं खाद्य याचा उलगडा या शेवटच्या ओळीत होतो. अन्नपूर्णा म्हणा, पार्वती म्हणा, देवी म्हणा.. सर्व शक्तीचीच रूपं..आणि या स्तोत्रात दान मागितलेलं आहे..
*“भिक्षां देही कृपावलंबन करी, मतान्नपूर्णेश्वरी”* असं म्हणत या मातेला कृपेची भिक्षा मागीतली ती नेमकी कशासाठी तर
*“अन्नपूर्णे सदापूर्णे,* *शंकर प्राणवल्लभे*
*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम* *भिक्षां देही च पार्वते”*….
तर ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा या शक्तीरूपानी आपल्याला द्यावी अशीच प्रार्थना त्या सरस्वती रूपी शक्तीला आणि वैराग्याची भिक्षा मोक्षदाईनी, पापनाशीनी, वैराग्यदायीनी नर्मदेला करून आम्ही पुन्हा आश्रमात जाण्यासाठी निघालो.
चालता चालता प्रतापे महाराज पुन्हा बोलू लागले. म्हणाले *“तू लहान मूल आणि आई यांचं नीट निरिक्षण केलेय का?* आई ला खूप कामं असतात त्यावेळी आई आपल्या तान्ह्या बाळा ला खाली ठेवते आणि बाळ रडू लागतं. पण आईला कामं असतात, मग त्याचं मन रमावं म्हणून आई त्या बाळाला खेळणी देते, बाळ रमतं थोडा वेळ, मग पुन्हा रडू लागतं. मग आई बाळाला थोडे मुरमुरे किंवा असच काहीसं देतं, तेव्हा ही ते रमून जातं, मग रडलं की आई कणकीचा गोळा देते त्या बाळाला खेळायला… मग बाळ पुन्हा रमतं…मात्र एक वेळ अशी येते की जेव्हा आई त्या बाळाला कशातच रमवून ठेवू शकत नाही. तीला त्या बाळाला उचलून घ्यावच लागतं.बेटा थोडी फ़ार साधना,जप केला की आपल्याला समाधान वाटू लागतं,आपण आपल्या आईच्या जवळ आहे असं वाटू लागतं. हे थोड्यावेळेचं समाधान म्हणजे आई नी आपलं मन रमण्यासाठी दिलेल्या खेळण्यांपैकी एक आहे. एकदा त्यातून बाहेर पडलं की मग येते सिद्धी किंवा तत्सम खेळण्यांची वेळ. त्यावेळी आपण आईच्या जवळ आहोत म्हणून आपल्याला अमुक तमुक सिद्धी प्राप्त झाल्या आहेत असं साधकाला वाटू लागतं…तेही एक खेळणं च असतं… मूळात साधक आई हून दूर असतो. मग त्यानंतर येते कणकेच्या गोळ्याची वेळ, ’आपण जणू या विश्वाचा रचैताच आहोत’ या भावनेनी ते लहान मूल कणकेच्या गोळ्यातून वेगवेगळ्या वस्तूंना आकार देत असतं, तसाच प्रकार साधकाचा होतो, मात्र ज्या वेळी ह्या सगळ्यात मन रमत नाही आणि आता कुठलही खेळणं, इच्छा माणसाच्या मनाला मोहवू शकत नाही त्या वेळी ती आई आपल्याला तिचा सहवास घडवून आणते. यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आईने बाळाला जरी दूर ठेवळ असतं तरी तीचं लक्ष त्याच्याकडे असतच.. ती त्याला पडू झडू देत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? कुठल्याही गोष्टीत मन रमू न देता तीचा धावा करायचा आहे, कशातही न रमणारं मूल कायम जेव्हा “आई मला कडेवर घे” ही एकच मागणी शांतपणे, आईला त्रास न होवू देता, पण सातत्यानी आईकडे करेल त्या बाळा बद्दल आईच्या मनात लवकर करुणा उत्पन्न होईल आणि कशातही न रमणा-या बाळाला आई चटक उचलून कवेत घेईल.”*
प्रतापे महाराज बोलत होते आणि मी ऐकत होते. किती साध्या शब्दात आणि मला समजेल अशा भाषेत महाराजांनी किती मोठी गोष्ट सांगीतली होती! आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांना अनेक आमिषं मोहवत असतात. त्या आमिषांकडे धावताना आपण कधीच आपल्या ह्या गुरुस्वरूप, ईश स्वरूप आईचा विचार करतच नाही. आपण रमावं म्हनून तिने दिलेल्या खेळण्यांमागे आपण धावत राहातो. मागच्या एका अनुभवामधे मी *“इदं न मम”* चा मंत्र सांगीतला होता, आणि त्याही आधी सियाराम बाबांचं वाक्य सांगितलं होतं..” मै तो सिर्फ़ तमाशा देखता हू” म्हणजे काय तर “नो इन्व्होलव्ह्मेंट”. अर्थात प्रत्येकच आईच्या जवळ असलेलं मूल आपल्याला हेच सांगत असतं, मार्ग वेगळे असतात… इतकच!
अजूनही मी आणि महाराज रस्त्यातच होतो, आश्रमात पोहोचायला अजूनही वेळ होता. माझ्या मनातले प्रश्न कमी झाले होते पण संपले नव्हते. माझ्या मनात पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहिला. मग समाधानाचं काय? ते का मिळत नाही? कसली तरी तळमळ कायमच माझ्या मनाला का असते? *मला नक्की काय हवय?* जे हवं आहे असं वाटतं ते मिळाल्यावरही तळमळ संपत का नाही?…. एका पाठोपाठ एक प्रश्न माझे प्रश्न येत राहिले मात्र ते प्रतापे महाराजांना कसे समजत याचं ला आश्चर्यच वाटत! महाराज पुन्हा बोलू लागले “ अगं ज्या दिवशी तुला समाधान मिळेल त्या दिवशी तुझी तळमळ बंद होईल, मात्र तुला समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तुला हवी असलेली, हवी असलेली म्हणण्यापेक्षाही तुझ्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट तुला मिळेल तेव्हा खरं समाधान मिळेल की नाही तुला? *तळमळ ही फ़ार आवश्यक आहे बाळा*, *कारण जोवर तळमळ आहे तोवर आपण धडपड करू*... तोवरच आपण हालचाल करू. आता प्रश्न आहे तुला काय हवय याचा.. तुझ्या पेक्षा तुझ्या आईला जास्त आणि चांगलं माहित आहे की तुला कशाची गरज आहे.. म्हणजेच काय? तू एकदा का आई जवळ गेलीस की तुझ्या समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुला समाधानासकट सारं काही जर आईच्या जवळ गेल्यावर मिळत असेल तर तळमळ कशाची व्हायला हवी? समाधानाची का आईची? आईची तळमळ धरलीस तर सारं काही तुझं च आहे, आणि तुला समाधान मिळत नाही कारण अजून तू आईच्या कडेवर नाहीस.. तिनी तुला थोडं दूर ठेवलय! आणि तुला कशातही न गुंतता तिचा धावा करायचय, तिनी उचलून घेतलं की तळमळही संपेल आणि समाधानही मिळेल. तळमळ असणं आवश्यकच आहे. जोवर यात्रा आहे तोवर तळमळ आहे. जोवर शोध आहे तोवर यात्रा ही आहेच!
आम्ही आश्रमात पोहचलो. संध्याकाळची प्रसादी आदि आटोपून आता उद्याची तयारी करायची. उद्या इथून निघायचं होतं. मी माझी बॅग भरत होते. महाराज माझ्याजवळ आले आणि एक पिशवी माझ्या हाती दिली. त्यात एक निळ्या रंगाचं मफ़्लर होतं. आणि एक मऊसूत धोतराचं पान. म्हणाले हे घे, माझ्याकडून तुझ्यासाठी काहितरी. ते मऊसूत धोतर अंगावर पांघरलं की आजही मला माझ्या तळमळीची आठवण येते आणि ती योग्य दिशेनी वळावी यासाठी प्रयत्न होऊ लागतात.
भालोदच्या या प्रवासात मला एक माहेर मिळालं. एक माऊली मिळाली. भालोद हून निघताना आम्हाला निरोप देताना महाराज काही अंतर चालत आले. आता त्यांना नर्मदे हर करून पुढे निघायचं, पण पाऊल निघेना.. एखादं लहान मूल कसं आईला बिल्गून रडू लागतं तशी मी व्याकुळ झाले. प्रतापे महारांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला “ म्हणाले, बाळ असं नाहीनं करायचय आपल्याला? माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच.. बरं ऐक, तू समुद्रपार करून गरुडेश्वर ला आलीस नं की मला फ़ोन कर. मी तुला भेटायला येईल.” आणि खरोखर ज्या वेळी मी प्रतापे महाराजांना फ़ोन करून गरुडेश्वर ला आल्याचे सांगितले त्यावेळी सगळी कामं सोडून फ़क्त माझ्यासाठी ही माऊली नर्मदा पार करून गरुडेश्वर ला मला भेटायला आली. त्या ही वेळेची गोष्ट इथेच सांगते.
प्रतापे महाराजांना त्यांच्या कार्यासाठी समाज गौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा तो मोठ्या महारांजाच्या पायावर घालायला म्हणून गरुडेश्वर ला येताना ते तो सोबत घेऊन आले होते. मोठ्या महारांजाच्या पायाला लावून तो पुरस्कार परत घेतेवेळी महाराज तिथल्या पुजा-याला म्हणाले.. “हा पुरस्कार मोठ्या महारांजाच्या पायाला लावला आहे, आता तो माझ्या लेकीच्या हाती द्या” असं म्हणत तो पुरस्कार माझ्याकडे दिला आणि “ तुझ्या जबाबदा-या संपल्यात की तुला मालसामोट च्या आदिवासी क्षेत्रात काम करायचं आहे, तिथल्या बांधवासांठी तू काहितरी करावंस, केलं पाहिजेस” असं सुचवलं. मला एक अजून मार्ग आणि एक अजून दिशा मिळत आहे असच वाटू लागलं.
भालोद हून पुढे अविधा पर्यंत मी आणि पसारकर काका काकू सोबत होतो, मात्र पुढे माझा जगदीशमढी चा रस्ता चुकले आणि मी एकटीच गुमान देव कडे निघाले. आता माझी आणि काका काकुंची ही ताटातूट झाली. इथून पुढे नारेश्वर पर्यंत मी एकटीच होते, अगदी मागे पुढेही आतापर्यंत सोबत असलेली मंडळी नव्हती. इथल मंदीर फ़ारच सुरेख मात्र आश्रम तितकाच अव्यवस्थित होता. महिला आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था नव्हती, त्यातून मी एकटी… पण आपल्या पेक्षा आपल्या त्या आईला आपली काळजी कशी असते ते मला पुन्हा एकदा जाणवलं….
इतकच नाही तर आपल्या भेटणा-या प्रत्येक व्यक्तीचे आणि आपले ही त्या व्यक्तीला भेटण्यामागचे काहितरी कारण असतेच. कुणीच कुणाला उगाच भेटत नाही. प्रत्येकाचं काहीतरी देणं घेणं शिल्लक असतं आणि ते पूर्ण करत करत हा प्रवास तुम्हाला करायचा असतो. हे जेव्हा अनुभवातून जाणवतं तेव्हा खात्री पटते… सोपान दादा, एक परिक्रमावासी मला असेच भेटलेत..२ -३ दा, वेगवेगळ्या ठिकाणी…आणि ते का भेटले ते कारण मी तुम्हाला पुढच्या अनुभवात सांगते. शिवाय अंकलेश्वर ला आलेला मजेशीर अनुभव, आणि गुमान देव ते बिमलेश्वर चा प्रवास हेही सांगते पुढच्या म्हणजे ३३ व्या भागात.
नर्मदे हर.
*©सुरूची नाईक- विदर्भ गट*
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३३
*नर्मदे हर.*
गुमानदेव हनुमान मंदिराबद्दल मी बोलत होते. इथे मी पोहचले त्या आधी हायवे वरून चालत होते. एका पेट्रोल पंपावर पाणी भरायला थांबले तेव्हा एक गंमतच झाली.माझे कपडे मळले होते. चेहरा एव्हाना बराच काळवंडला होता. डोक्याला तेल, पाणी,शाम्पू काहीही नव्हतं. इतकच काय तर केस विस्कटले सुद्धा असावेत. मी पाणी प्यायला वॉटर कुलर पाशी गेले तसं मला चौकीदारानी हटकलं..”क्यू हात लगा रही हो, पानी चाहिये तो मांग लो ना” तो जरा ओरडूनच म्हणाला..मी अगदी विनम्रतेने पाणी मागितलं तसं त्यानी एका बाटलीत पाणी भरून मला दिलं आणि “अपनी बोटल मे भर दो” असं म्हणाला. ज्या बाटलीत त्यानी मला पाणी दिलं ती बाटली स्वच्छ नव्हती…जरा जास्तच अस्वच्छ होती..”पानी पीने के लिये चाहिये, साफ़ बोटल मे दो, नही तो मेरी बोटल मे दो” मी म्हणाले. आमचा हा संवाद ऐकून तिथेच असलेली दोन माणसं आपसात इंग्रजी मधून बोलत होती, माझ्याकडेच पाहून एक माणूस दुस-याला म्हणत होता- “her bag is branded but clothes are too dirty, either she is from better family background or must have stolen the accessesories”त्यांना वाटलं मला समजलं नसेल, आणि मी ही तसच दाखवलं. त्या चौकीदाराला माझी बॉटल देऊन पाणी मागितलं. मग ती दोघं मला विचारू लागली. “कहा से आई हो? कहा जाना है? त्यातल्या एकाने तर चक्क “इतना महंगा सामान कहा से आया” असं विचारलं. “मेरा है” मी सांगितलं… हे सगळं पाहून मला गम्मत वाटत होती. मी माझा परिचय न देण्याचं ठरवलं, आणि पुढे काय होतं ते बघावं असं ठरवलं, मात्र तेवढ्यात अजून एक माणूस आला, ज्याला परिक्रमेबद्दल माहित असावं, त्यानेच इतरांना मी परिक्रमावासी असल्याचं सांगितल्यावर ती दोघं निघून गेलीत.आपला परिचय खरच कशा कशावर अवलंबून असतो नाही? *म्हणजे कपडे, रूप, अवतार ह्या बाह्य रुपात आपण किती गुरफ़टलेले असतो!* मी इंग्रजी मधे बोलून त्यांना थांबवू शकले असते पण असं करावं असं वाटलच नाही. आणि तशाने मी नाही तर माझ्यातला अहंकार बोलला असता. नाही का? मात्र ज्यावेळी अंकलेश्वर ला पोचले त्यावेळी मला बोलावच लागलं. गुमानदेव नंतर अंकलेश्वर चा तो अनुभव पण सांगते.
तर मी गुमानदेव मंदिरात पोहचले. तिथलं मंदिर छानच आहे मात्र परिक्रमावासींसाठीची जागा बरीच अस्वच्छ होती. बहुधा साफ़ सफ़ाई करणारे लोक नसावेत इतकी अस्वच्छ. महिला पुरुषांसाठी वेगळ्या जागा नाही, बाथरूम ला आतून कडी नाही, आणि मी एकटेच.कुठे आसन लावू असा विचार करत करत मी जागा बघत होते. “अकेली है क्या, आजा, मेरे पास लगाले आसन, चिंता मत कर, मै तो हू ना तेरे साथ, सभी है” एक पन्नास पंचावनी च्या माताजी मला म्हणाल्या. त्यांनी आपलं आसन बाजूला सरकवून भिंतीकडची जागा मला दिली. माझ्या बाजूला स्वत: आसन लावून कुणी पुरुष मंडळी च्या बाजूला मला आसन लावावं लागू नये ह्याची काळजी घेतली. म्हंटल्या प्रमाणे त्यांनी मला सोबत केली. अगदी मी स्नान करत असताना त्या दाराबाहेर उभ्या होत्या, माझ्या सामानाची त्यांनी काळजी घेत होत्या. मी पयाला तेल लावत असताना “मी तेल लावून देऊ का” असं विचारलं, आणि ज्या प्रेमाने आणि हक्काने त्या माझी काळजी घेत होत्या त्याच प्रेमानी “ मेरे घुटने पे तेल मल के दे” असं अधिकारानी सांगितलं. माझी काळजी घेणारी आणि माझ्याकडून सेवा करणारी, मला अचानक पणे भेटलेली ही माताजी मैयाच नाही का? सकाळी मात्र हा गृप पहाटेच निघून गेला. मी थकले असल्याने थोडी उशीराच उठले. जाताना त्या मला सांगून गेल्यात “ आजाना अपने पैर से, मैया सोचेगी तो मिलेंगे आगे”..मात्र गुमान्देव ते अंकलेश्वर त्या मला भेटल्या नाहीत. मात्र अंकलेश्वर ते बलबला कुंड त्या मला पुन्हा भेटल्यात.
गुमानदेव ते अंकलेश्वर प्रवास हा अगदी हाय वे नी होता. अनेक लोक गाडी थांबवून “ अंकलेश्वर तक छोड दू क्या ?” असं विचारायचे. मात्र अंकलेश्वर ला मजेशीर अनुभव आला, मागे पेट्रोल पंप वर आला होता तश्या सारखाच! अंकलेश्वरची गोष्ट आहे. माझ्या जवळची पर्स तुटली होती, तिच्या बेल्ट ला गाठ मारून ती मी गळ्यात अडकवत असे. ती गाठ मानेला टोचून सोलल्या सारखं झालं होतं. मला स्लीपर ही घ्यायच्या होत्या, म्हणून मी एका दुकानात गेले आणि “नर्मदे हर” म्हणाले. “जाओ आगे, कुछ नही मिलेगा” असं उत्तर आलं. मला खरोखर वस्तू विकत घेणे गरजेचं होतं. मी म्हणाले, “मुझे मांगना नही है, खरीदना है”. “पैसे है?” त्यानी पुन्हा कन्फ़र्म केलं. “क्या चाहिये?” मला हव्या असलेल्या पर्स कडे बोट दाखवताच तो हसला… “तुम्हारे बस की नही है. महंगी है” मी म्हंटलं “दिखाओ”, त्याने दाखवली, मी बाजूला ठेवून दिली. मग त्याच्याच दुकानात मी स्लीपर पाहिल्या.. मग मी मोजे पण पाहिले, असं करत करत मी ५००-६०० रुपयापर्यंत पोचले. पर्स चाचपडली. माझ्याकडे कॅश होती, पण वाटलं ती राहू द्यावी, जिथे कार्ड चालणार नाही अशा ठिकाणी वापरावी म्हणजे पुन्हा ए.टी.एम शोधून पैसे काढण्याची गरज नाही. मी काही बोलणार इतक्यात तो म्हणाला “क्या हुआ, पैसे नही है क्या, फ़ालतू मे टाईमपास करते है, चलो निकलो यहासे”. *आजपर्यंत आयुष्यात असं कधीच झालं नव्हतं. इतकं घालून पाडून कुणी कधीही बोललं नव्हतं. खरं तर मला खूप राग यायला हवा होता, खूप वाईट वाटायला हवं होतं,पण यातलं काहीही झालं नाही. माझ्या मनानी त्याच्या या वागण्याची दखलच घेतली नाही बहुधा. “इदं न मम” चा मंत्र काम करून गेला.* मात्र मला वस्तू खरोखरीच हव्या होत्या… मी म्हंटलं… “कार्ड या नेट बॅंकिग चलेगा? तो आश्चर्या ने पाहू लागाला. मग मी परिक्रमावासी असल्याचं सांगितल्यावर मात्र त्यानी मला खूप आग्रहानी चहा पाजला!
अंकलेश्वर ला मला भेटायला माझा मानलेला भाऊ, भैरव पारेख येणार होता. २००९ मधे केलेल्या हिमालयन ट्रेक सारपास पासूनची आमची ओळख आणि अगदी घरगुती संबंध. हा भैरव ३ तास प्रवास करून फ़क्त मला भेटायला आला होता. येताना त्याने माझ्यासाठी पांढरे कुर्ते, लोणचं, चटणी आणि बराच खाऊ आणला होता. या खाउंमधे इडली सांबार आणि पिज्झा पण होता. किती तरी दिवसांनी मी हे खाल्लं असेल! अगदी सगळं सगळं लक्षात ठेवून आणलं होतं त्यानी..हो एक कॅडबरी पण… कॅडबरी म्हणजे माझा वीक पॉइंट अगदी. ती कॅडबरी मला ३-४ दिवस पुरली. खूप दिवसांनी घरचं कुणी तरी भेटलं. खूप आनंद झाला होता. मी एकटी चालत असताना मैया माझी जास्त काळजी घेते हे पुन्हा जाणवलं. भैरव काही काळ माझ्या सोबत चालला आणि पुन्हा आपल्या घरी परतला.
मी आता बलबला कुंडाच्या रस्त्यावर होते. भैरव ला नर्मदे हर करून ५ च मिनिट झाले असतील, ह्या गुमानदेव ला भेटलेल्या माताजी पुन्हा भेटल्या..म्हणाल्या ”आ गई मातारानी, मैया ने मिला दिया फ़िरसे, अब जब तक साथ है साथ रहेंगे, जब साथ छूट जायेगा तब नर्मदे हर” त्या माताजींनी कुठलीही ग्वाही दिली नाही. सोबत राहू असं आश्वासन दिलं नाही. *जब तक साथ है तब तक साथ रहेंगे* या साध्या शब्दात किती प्रवाही विचार जाणवतो…आयुष्य असं प्रवाही असावं नं, नर्मदे सारखं….जे आहे ते स्वीकारून, आत्मसात करून पुढे चालत राहायचं…..कुणाच्या कुठल्या बोलण्यातून, वागण्यातून काय शिकायला मिळेल काही सांगता येत नाही. ती रात्र आम्ही सोबत होतो. माझा आणि त्या माताजींचा साथ बलबला कुंड पर्यंतचा… पण माहितिये का, दुस-या दिवशी चालता चालता माझ्या मनात विचार आला तेव्हा एक लक्षात आलं… ”जब तक साथ है, साथ रहेंगे”… म्हणजे कदाचित जोवर मी नर्मदा मैया च्या सोबत आहे, म्हणजे माझी श्रद्धा, माझा विश्वास, माझं प्रेम, माझी भक्ती ही सगळी जोवर आहे तोवर ती माझ्या सोबत असणार आहे! कुठलीच कमिटमेंट न देता ती जन्म जन्मांची कमिटमेंट देऊन गेली, हे मला समजलच नाही…! मला माझ्याच कवीतेचा काही ओळी आठवल्या,
*हाय किती रे मी अज्ञानी.*.
*हात जोडले, धूप लावले*
*नतमस्तक मी फ़ुले वाहूनी*
*अन हृदयीच्या तम गाभारी*
*दीप लावणे गेले विसरुनी…* *हाय किती रे मी अज्ञानी!*
आता बलबला कुंडा बद्दल सांगते. तिथे एक कुंड आहे, ज्यातून बुड्बुडे निघतात म्हणून त्याला बलबला कुंड असं म्हणतात. पण हे बुडबुडे असेच निघत नाही, “नर्मदे हर” म्हंटलं की निघतात…मी कितीतरी वेळ हा खेळ खेळत होते. त्या वेळी मी कुंडावर एकटीच होते. नाही म्हणायले काही बगळे आणि काही कावळे पण आजूबाजूला होते. ते कुंडाच्या आजूबाजूला गवतात बसत. मी मोठ्याने नर्मदे हर म्हंटलं की उडून जात, अन पुन्हा येऊन बसत. बुडेबुडे आणि हे पक्षी बघणं अगदि एंजाॅय केलं मी.इथे बलबला कुंड ला एक ज्योतिर्मयी मैया म्हणून संन्यासिनी आहेत. त्यांच्याशी भेट झाली. त्या पुण्याच्या आणि मराठी भाषिक. त्यांना भेटून छान वाटलं. त्यांनी मला एक छान भेट दिली. माझे गुरू नानामहाराज तराणेकरांचा एक खूप जुना फ़ोटो आहे. नाना महाराजांची तूला करत असतानाचा. तेव्हा नाना महाराजांना मोठ्या महाराजांनी मांडीवर घेतल्याचं फ़ोटोमधे स्पष्ट दिसतय. आणि फ़ोटो एडिटींग च्या जमान्याच्या आधीच आलेला आहे. बलबलाकुंड चा मुक्काम छान झाला. बलबला कुंड ला अनेक मध्यप्रदेशी महिलांनी येऊन माझी चौकशी केली. त्या म्हणाल्या “ अरे छोरी को अकेले चलता देखा था.. पहुच गयी की नही ठिकसे पुछ लिया”… कुणी आपलं कसं चौकशी करेल तसं त्या ४ -५ अनोळखी मैया, ज्यांनी मला एकटं चालताना पाहिलं होतं त्यांनी येऊन येऊन माझी चौकशी केली.
पुढे हनुमान टेकडी, हांसोट च्या प्रवासात माझी काठी तुटली. मी ट्रेकिंग स्टिक घेतली होती, पण त्याची काही गरज नसते. आपला साधा बांबू चा दंड घ्यावा, तो उत्तम. आता ही तुटलेली काठी जोडणे नाहीतर दुसरी घेणे ..काहीतरी करावं लागणार होतं. हनुमान टेकडी ला आधी भेटलेले पाठक काका भेटलेत. त्यांनी तारे नी माझी काठी बांधून दिली. तो दिवस रात्री भजन कीर्तनात गेला..आता पुढचा टप्पा महत्त्वाचा. विमलेश्वरचा इथून पलिकडे च्या तीरावर नावेतून जावं लागतं. नावेतून जायचं; पण गेलो आणि बसलो असं होत नाही. आधीच ओखी मूळे भरपूर नंबर लागलेले. इथे किती वेळ वाट बघावी लागणार नेम नाही. लोकांना ५ दिवस सुद्धा वाट बघावी लागली होती आणि आश्रय म्हणाल तर एक मांडव घातलेला, बस… तिथे आधीच २०० ते २५० लोक होते.. आणि नुसतं वाट बघण्या पलिकडे काहिही करता येण्यासारखं नव्हतं.
कसा झाला माझा नावेतला प्रवास. छोटीशी लाकडी नाव ती.. रात्रीच्या प्रवासात काय काय झालं? किती वेळ, किती दिवस मला वाट बघावी लागली विमलेश्वर ला? कसा होता नावेतला अनुभव? भिती वाटली, की अजिबात वाटली नाही? लाईफ़ जॅकेट्स नसताना डोक्यावर उभं आभाळ घेऊन, ओलं होत होत गेले तेव्हा नक्की काय अवस्था होती? असे प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. उत्तर सांगते न.. पण पुढच्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३४
*नर्मदे हर.*
मी विमलेश्वर ला पोहचले त्यावेळी दुपार झाली होती. जेवणं नुकतीच आटोपली होती. खूप गर्दी होती तिथे. लोक सारखे नावेच्या ठेकेदाराच्या ऑफ़िसकडे डोळा लावून बसलेले. तिथे पद्धत अशी की कुणीतरी एका परिक्रमावासीनी ४० परिक्रमावासी जमवायचे, त्याची यादी द्यायची, मगच तो ठेकेदार नंबर काढेल. अनेक जण ४० चा गट तयार करायच्या मागे लागलेले. काही जण ज्यांच्याकडे जास्त नावे त्या गटांचा शोध घेताहेत…नुसता गोंधळ… मला काही समजत नव्हतं. मी आपली आसन लावायला जागा शोधतेय.
एक जागा मिळाली..टाळूच्या फ़ोडा सारखी मध्य भागी. ती ही जरा सरकवा सरकवी करतच. माझ्या एका बाजूला एक मराठी संन्यासी आणि दुस-या बाजूला एक सत्तरीच्या आजी होत्या. हे दोघे ही गाडीनी परिक्रमा करत होते. मी आसन लावलं त्यावेळी त्या संन्याश्याने माझी मदतच केली, पण खरं सांगू का…कधी कधी उगाचच मदत घेतली आपण असं वाटू लागतं नं तसच झालं. अगदी दोन्ही बाजूनी तसं झालं. झालं असं की हे संन्यासी बुवा उठता बसता मला काय काय सांगू लागले. सत्संग असता तर कदाचित बरं वाटलं असतं पण हे संन्यासी बुवा फ़राळाच्या पदार्थांच्या रेसीपी सांगू लागले, आणि दुसरी कडे असलेल्या आजी या संन्यासी बुवांचे गा-हाणे करू लागल्या.मला आता या दोघांपासून सुटका करवून
घ्यावीशी वाटत होती आणि ती मिळाली…ते मागे मणिनागेश्वर ला आणि भालोद ला मला सोपान दादा म्हणून एक मराठी परिक्रमावासी भेटले होतेत, ते ही विमलेश्वर ला होते. घडत असलेला हा प्रकार त्यांनी बघितला आणि “ताई इकडे या, इकडे आसन लावा, थोडी अडचण होईल, पण या इकडे च”. असं म्हणाले. मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेतली.
अरे हो, मागे मी मगर मैया च्या दर्शनाबद्दल बोलले होते पण लिहिण्याच्या ओघात तो अनुभव नमूद करायला विसरलेच बहुधा! आता सांगते.तर मणिनागेश्वर ला मी धिरडे आणि चिवडा मिळ्यालाचा अनुभव सांगितला होता न, तेव्हाच तिथल्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर मी मैया किनारी जाऊ असं ठरवलं. जरा पाय-या उतरत नाही तर वरच्या पाय-यांवरून सोपान दादाचा आवाज आला, “ताई मगर बघायची का, वर या, खाली नका जाऊ, एक नाही तर दोन मोठ्या मोठ्या मगरी आहेत.” मी धावत वर आले, वरून बघते तर एका चिंचोळ्या जमिनीच्या भागावर एक भूरी आणि तिच्या अगदी खलोखाल एक काळी मगर होती. आम्ही बरच वर होतो, पण तरी त्या मगरी स्पष्ट दिसत होत्या.. तरी शेपटीपासून तर डोक्या पर्यंत पूर्ण लांबीचा विचार केला तर पाच साडेपाच फ़ूट नक्की असतील….
*भूरे मगर पे करे सवारी*
*हाथ कमल का फ़ूल*
*सबको देती रिद्धी सिद्धी*
*हमे गयी क्यु भूल..*.
*मैया अमरकंठ वाली*
*तुम हो भोली भाली…*
असं एक भजन आम्ही रोजच म्हणत असू. आज या भु-या आणि काळ्या अश्या दोन्ही मगरींच दर्शन झालं. मैया च्या वाहनाचं दर्शन झालं म्हणजे तीचं ही झालच .. ती मगर म्हणजे मैया चेच रूप…. अनपेक्षीत पणे पहिल्यांदा हे दर्शन झालं मात्र मग मैया किनारी चालताना नजर सारखी मैयाच्या पाण्यावर झालेल्या हालचालींकडे असायची. पुन्हा केव्हा मगर मैया दिसेल या आशेनी का होईना मैया सतत डोळ्यांसमोर राहू लागली, आणि हो, अनेक दा पुढे मगर मैया दिसलीच हे काही वेगळं सांगायला नको, कारण नर्मदा माई कधी ही कुठलीही इच्छा अपूर्ण ठेवतच नाही. पुढे जिथे जिथे दर्शन झालं ते आठवणीनी सांगेन बरं का….आणि मी विसरली तर तुम्ही आठवण करून द्या नक्की.
असो तर आता पुन्हा विमलेश्वर ला येऊयात. तर ह्या सोपान दादांनी मला त्यांच्या बाजूला आसन लावू दिलं आणि मी संन्यासी आणी आजींच्या तावडीतून सुटले. सोपान दादा इथे येऊन दोन दिवस झाले होते, आजचा तिसरा दिवस होता. ओखी वादळा मुळे गेली काही दिवस बोटी समुद्रात सोडता आल्या नसल्याने परिक्रमावासींना इथेच मुक्काम करावा लागत होता. खरं तर सोपान दादा नंतर ३ दिवसाने मी आले होते पण सोपान दादांनी असं काय केलं माहित नाही, पण त्यांच्याच नावेत आणि त्याच दिवशी, म्हणजे रात्री च्या फ़ेरीत माझा नंबर लागला. मला इथे २४ तास देखिल वाट बघावी लागली नाही. मी जेव्हा सोपान दादांना विचारलं तर म्हणाले “माताजी हमारे गाव की है, और अकेली है, हमारे साथ रहेगी तो सहायता होगी- इतकचं बोललो मी”, कमालच झाली.. लोक ५- ५ दिवस वाट बघताहेत आणि मला एकही दिवस पूर्ण वाट बघावी लागली नाही.
आमची रात्र फ़ेरी होती. १.५ वाजता तयार असावं लागणार होतं, त्यामुळे बॅग पॅक असायला हवी, शिवाय प्लास्टिक ची बॅग घेऊन त्यात ती बांधून ठेवायची, म्हणजे मग नंतर काही घालयचं नाही, काही काढायचं नाही…. स्लीपिंग बॅग सकट मी सगळं पॅक केलं खरं, पण आता बसायला सुद्धा काही नव्हंतं, आणि पांघरायला सुद्धा… कुड्कुडण्या शिवाय पर्याय नाही…. तरीही, सोपान दादा ने कुठूनशे दोन पोते आणले आणि रात्री १० ते १.५ त्या पोत्यांवर बसून आम्ही झोपायचा प्रयत्न केला… पण झोप लागली नाही. सगळ्यांची हीच अवस्था. शेवटी भजन, मैयाची गाणी असं हळू हळू सगळेच परिक्रमावासी गाऊ लागले, काही हौशी माताजी एकत्र येऊन भजनांवर नाच करू लागल्या, देवळातली भजन मंडली पण ढोलक आणि इतर वाद्य घेऊन साथ देऊ लागली..खूप उत्साहात आणि आनंदात वेळ कसा गेला समजलं नाही.. १ वाजला..१ वाजता नावाड्याने आवाज द्यायला सुरवात केली. ४ नावा सुटतात. प्रत्येकी मधे ४० परिक्रमावासी. नाव म्हणजे काही मोठी नाही ह्मं… लाकडी, मधे पाट्या ठोकलेली, अगदी लहानशी..आम्ही सगळे एकत्र झालो आणि आता नावेकडे जायची वाट बघू लागलो… खरी कसोटी तर इथून पुढची आहे. इथे समुद्र देवात जोडे चप्पल घालून जाता येत नाही, ते किना-यावरच सोडावे लागतात. मी नुकत्याच अंकलेश्वर ला घेतलेल्या स्लीपर्स सोडून दिल्या आणि पायी चालू लागले. किर्र अंधार, त्यात पायाखाली आधी दगडं, मग कोरडी वाळू. मला अनवाणी चालण्याची सवय नाही.. तीन चारदा तरी पडले असेल मी… शेवटी एका ठिकाणी शिट्टी वाजली आणी थांबा, असा नावाड्याचा आवाज आला… अजून भरती हवी तशी आली नाही. नावा सोडता येणार नाही, वाट बघावी लागेल…सोसाट्याचा आणि गारेगार वारा, माझ्याकडे एकेमेव पोतं… बाकी सगळं बॅगेत….मला शिंका यायला लागल्या.. काही केल्या थांबेनात, डोकं धरलं, ताप येईल असं वाटू लागलं, पण करणार काय? पण मैया ची पण कमाल असते. ह्या सोपान दादानी चक्क नावाड्यालाच मागून माझ्यासाठी एक ब्लॅंकेट आणलं आणि “ ताई, इथेच गार पडल्या तुम्ही, घ्या पांघरा” असं म्हणून चक्क पांघरून पण दिलं….गारवा इतका होता की थंडी पूर्ण गेली नाही, मात्र खूप, अगदी खूपच आधार झाला मला त्या ब्लॅंकेट चा. तिथे आम्ही २.५ वाजेपर्यंत होतो, म्हणजे आम्हाला १.५ तास वाट बघावी लागली.. शेवटी एकदा नावाड्याने आमच्या नावेचा नंबर घेतला.जस्सा नावाड्याने ४ नंबर उच्चारला तस्से सगळेजण बोटीच्या दिशेने धावू लागले. सोपान दादा तर त्यांची बॅग घेऊन सर्वात आधी धावले. कदाचित जागा मिळण्यासाठी ची ही घाई असावी. मी मात्र जरा आजारी, म्हंटलं जिथे मिळेल तिथे बसेन, पण आता धाववत नाही माझ्यानी….मी हळू हळू चालत नावेपाशी पोचले. सगळ्यांची नावेत चढायची धड्पड सुरू होती कारण नावेचा काठ हा खांद्या इतका उंच.. हातावर जोर देवून चढायचं म्हणजे कसरत. त्यातून ती नाव काही स्थीर म्हणून नाही, पाण्यावर तरंगती नाव स्थीर राहील कशी? आणि हो मांडी पर्यंत पाय पाण्यात असणार होते. नावेचा धक्का लागून काही लोक पडत होते. मी चढूच कशी? काही समजेना.. मी शांत पणे उभी राहून विचार करत होते…. तेवढ्यात सोपान दादा धावत माझ्याकडे आले आणि माझी बॅग घेऊन गेले, ती नावेत ठेवून परत आले आणि मला नावेत चढायला मदत केली. मी कशीबशी नावेत चढले, चढले काय, सोपान दादांनी मला अक्षरश: ओढलं. त्यांनी माझ्यासाठी जागा पण धरून ठेवली होती, अगदी इंजिन च्या बाजूला, जेणेकरून मला इंजिनची ऊब मिळेल! ते माझ्या समोर बसले होते आणि नावाड्याचं ब्लॅंकेट मी पांघरलं होतच. मी नावेच्या कडेला होती, माझ्या डावीकडे पाणी, समोर सोपान दादा, मागे परिक्रमावासी आणि उजवी कडे इंजिन. तीन बाजुंनी माझं प्रोटेक्शन छानच जमलं होतं आणि डावीकडे समुद्र भगवान दर्शन, बसल्या जागेवरून ओटी भरायची व्यवस्था, बाटलीत पाणी बदलून घेण्याची व्यवस्था आणि शिवाय ब्लॅंकेट अशी सोय माझी करण्यात आली होती.
हा पूर्ण प्रवास खूपच वेगळा आणि “हटके” असाच होता. बोट चालू लागली तसं इंजिन गरम होऊ लागलं.. ते जास्त गरम होऊन मला पायाला चटके बसू लागले….हलायला देखिल जागा नव्हती. नाव खचाखच भरली होती. एकी कडे चटका आणि दुसरीकडे गार पाण्याच्या लाटा… अंगात ताप.. काय अवस्था झाली असेल? अजूनही भरीस भर म्हणून असे अनेक प्रकार घडलेत, लाईफ़ जॅकेट वगरे सोपस्कार काहीही नव्हते आणि अचानक एक जोराचा हिसका नावेला बसला… आम्ही सगळेच ब-यापैकी उसळलो… असं काय झालं होतं?. तो जोरदर हिसका का बसला…काय वाटलं तेव्हा… हे सगळं सांगते पुढच्या म्हणजे ३४ व्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३५
नर्मदे हर.
आम्ही नावेत बस लो होतो. माझ्या पायाला चटके बसत होते, अंगात ताप होताच. समोर सोपान दादा होते आणि त्यांचा मला खूप आधार वाटत होता. माझा नावेतला हा पहिलाच प्रवास. नक्की काय असतं ते मी पहिल्यांदाच बघणार! बघणार असं म्हणंणं चुकिचं आहे कारण लाटांशिवाय काहीच दिसत नव्हतं. आणि लाटा बघितल्या की गरगरायला होत होतं, का ते सांगते. समोरून येणारी लाट ही चांगली मोठी आणि उंच दिसायची. असं वाटायचं ही आता आपल्या अंगावर आदळणार पण पाण्याच्या फ़ोर्स मुळे की नाविकाची कमाल म्हणायची माहित नाही, ती लाट आमच्या नावे खाली जायची आणि आमची नाव चांगलीच उंच फ़ेकली जायची. ती समोरून येणारी लाट जेव्हा मागे निघून जायची त्यावेळी समोर दुसरी लाट तयार असायची मात्र आधीची लाट निघून जाता जाता आमची नाव जशी वर उचलल्या जायची नं लाटेमुळे, तशीच चांगलीच खाली पण आदळल्या सारखी व्हायची. म्हणजे, अशी कल्पना करा की ज्या वेळी समोर लाट आहे त्यावेळी नाव अशी खोलगट भागात आहे, म्हणजे आपण एखादी वस्तू पाण्यात सोडली की कसं क्षणभर ती वस्तू तळाशी जाते आणि पाणी चारी बाजूला उसळतं नं तसं काहितरी…असं वाटू लागायचं की पाणी खाली गेलय, आणि लाट आली की उसळी बसून नाव वर उचलल्या जातेय…..आकाश पाळण्यात बसल्यावर कसा पोटात गोळा येतो, तसं होत होतं… सगळी मंडळी फ़क्त आणि फ़क्त देवाचा धावा करत होती. माझा हनुमान चलीसा, नर्मदाष्टक आणि जे येत असेल नसेल ते सगळं म्हणून झालं होतं..आणि पुन्हा सुरुच होतं…आणि अशा वेळी, अचानक आमची नाव खूप जोरात हलली..हिसका बसला, आता ही नाव उलटून, भर समुद्रात जलसमाधी मिळते की काय असं वाट्लं…
झालं असं होतं की आमच्या पुढे तीन नावा होत्या. या नावाड्यांची एक पद्धत आहे नाव हाकायची. समोरचा नावाडी मागच्या नावाड्याला टाॅर्च नी वाट दाखवतो. खरंतर या वेळी परिक्रमावासिंनी आपले टाॅर्च बंद ठेवावे अशी सक्त ताकीद दिली असते. पण तरीही या सूचनेचं गांभीर्य माहित नसल्या मुळे काही परिक्रमावासी टाॅर्च लावून समुद्र बघण्याचा प्रयत्न करतातच. तसच झालं. हे नावाडी अगदी सिरियली टाॅर्च दाखवतात मागच्या नावाड्याला. म्हणजे पहिल्यानी दुस-याला दाखवल्यावर मग दुसरा तिसऱ्याला दाखवेल… असं काहीतरी आहे. जिथे कुठे थोडं वळण घ्यायचं असतं तेव्हा हा टोर्च चा सिग्नल जास्त उपयोगी पडतो. तर झालं असं की पहिल्या आणि दुस-या नावे नंतर तिसरी नाव ही वळली. आता आमची नाव वळायची होती. टाॅर्च प्रमाणे आमच्या नावाड्याने नाव वळवली देखिल. मात्र हा टाॅर्च नावाड्यानी दाखवलेला नसून तो नावेतल्या कुण्या तरी परिक्रमावासी नी सुरू केला होता. त्यामुळे आमची नाव योग्य वळणापेक्षा थोडी आधी वळली आणि त्या ठिकाणी बेटासारखं काहितरी होतं त्याला जाऊन किंचित आदळली. नशीब म्हणा की हा भाग नावाड्याच्या चटकन लक्षात आला आणि त्याने प्रसंगावधान राखून ती नाव जोरात आदळू न देता दुसरीकडे वळवली मात्र तरीही हिसका बसलाच! हा लहानसा हिसका देखील खरं तर इतका जोरात होता की जोरात नाव आदळली असती तर काय झालं असतं ही कल्पना करण्याचं धाडस माझ्याकडून आजही होत नाहीये. त्यावेळी मनात कुणी म्हणजे कुणीच नव्हतं. देवाची आठवणं काय असते ते तेव्हा अनुभवलं. देव आठवले की कुणिच कसं आठवत नाही हे ही तेव्हाच समजलं, आणि हो.. भालोद ला प्रतापे महाराज म्हणाले होते ती ईशवराला आळ्वण्याची तळमळ किती तीव्र असू शकते ते ही तेव्हा चांगलच समजलं.
तो हिसका सावरल्या नंतर नाव बर्यापैकी शांतपणे हाकल्या जात होती. एव्हाना मला चटके बसणं कमी झालं होतं कारण या हिसक्यामुळे आणि लाटांमुळे संपूर्ण नावेत पायाशी पाणी जमा झालं होतं. तापलेला भाग थोडा थंड झाला होता, किंवा हिसका, लाटा या प्रकारात मी बसणारा चटका विसरत होते.. नक्की काय होतं ते आता आठवत नाही. पण नाव थोडी शांत झाल्यावरची गंमत सांगते. माझ्या समोरचे सोपान दादा अचानक “ ताई सोडा, सोडा प्लीज” असं ओरडून मला म्हणाले.. मला कळलच नाही की ते असं काय म्हणताहेत? मात्र मग लक्षात आलं. मी माझ्या अंगावरचं ब्लॅंकेट घट्ट धरून, ओढून घेतलं होतं आणि मी सोपान दादांच्या मागे बसले होते.. अहो, त्या ब्लॅंकेट सोबत मी सोपान दादांच्या शर्टाची कॉलर अनावधाने इतकी गच्च आवळली होती की ते ओरडून म्हणत होते “ताई आता गळफ़ास लागेल,सोडा”… मी सोडल्यावर ते म्हणाले “म्हणजे आज आमचा शेवट होताच.. नर्मदा मैयात बुडून मेलो असतो एकतर नाही तर सुरुची मैयाने दुसरा मार्ग ठेवलाच होता”…वाचलो बाबा.. असो…
मग हळू हळू उजाडू लागलं तेव्हाचं दृश्य खूपच रमणीय आणि अवर्णनीय होतं. एकीकडे चंद्र होताच आणि आता सूर्य ही उगवणार.. या दोन्हीची जणू साक्ष द्यायला आमची नाव भर समुद्रात हळूवार वाहातेय..त्या वेळेला कुणीतरी मोबाईल काढून गूगल मॅप का अजून कुठलंस ऐप आहे महित नाही पण त्याच्या वर आपण कुठे आहोत ते पाहिलं.. आणि ते जेव्हा समजलं तेव्हा त्या नावाड्यांबद्दल मनात खूप आदर निर्माण झाला. हे नावाडी आपल्या कामात इतके पारंगत असतात की रात्री अंधारात नाव चालवताना सुद्धा त्यांना दिशांचं जबरदस्त भान असतं की ते आकाशातल्या ता-यांच्या पोझीशन वरून नावेची दिशा कायम करतात. त्या ऐप वर असं दिसत होतं म्हणे की आपली नाव ना समुद्रात आहे ना मैया मधे. अगदी मैया आणि समुद्र भगवानांचं पाणी जिथे एक होतय त्या पट्ट्यावर आपली नाव प्रवास करतेय. एकीकडे ४० परिक्रमावासीयांचे जीव त्या नावाड्य़ांच्या जीवावर प्रवास करत असतात. त्या चाळिसांची जबाबदारी त्यांच्यावर असतेच आणि ह्या चाळीस परिक्रमावासिंयांच्या श्रद्धेची सुद्धा जबाबदारी ते चोख निभावत असतात. इतका पायी प्रवास केल्यावर या परिक्रमावासिंची परिक्रमा खंडीत होऊ द्यायची नसते. मैयातून नाव नेल्या जात नाही आणि समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांच्या वाटेला ते नाव जाऊ देत नाही. ही नाव अगदी बरोबर मैया आणि समुद्र जिथे मिळतात तिथून जाते.
५ तासाचा हा प्रवास आता संपत आला होता. थंडी अजूनही तशीच होती. आता सगळेच थकले होते आणि त्यामुळे सगळेच शांत होते. रात्रीच्या लाटांमुळे सगळे पूर्ण ओले झाले होते. आता ते खारं पाणी अंगाला टोचल्यासारखं वाटत होतं. अंगावर रेती रेती झाली होती. कधी एकदा मिठी तलाई ला जाऊन आंघोळ करते असं झालं होतं. ताप होता की नव्हता काही माहीत नाही पण खूप थकवा आला होता. झोप झाली नव्हती, भूक लागली होती पण तोंडाला चव नव्हती. आम्ही पोचलो एकदाचं. आता उतरायचं खाली.. पण इथे पुन्हा तेच.. खाली दलदल. अगदी गुडघ्या पर्यंत पाय गचकन खाली जाईल इतकी दलद्ल होती. सोपान दादांनी मला पुन्हा मदत केली. आधी पेक्षा मी आता जास्त थकले होते. नावेतून खाली उतरणं कठीणच होतं, पण उतरले कशीबशी सोपान दादांच्या मदतीनी. काठीचा आधार घेत घेत दलदल पार केली आणि मिठी तलाई ला येऊन पोचले.
इथे प्रचंड गर्दी. सगळेच परिक्रमावासी एकच घाई करत होते. अजिबात जागा नाही. स्त्रीयांसाठी आंघोळीची वेगळी व्यवस्था नव्हती. अगदी प्रात:विधी आटोपायला पण सोय नव्हती. जी होती फ़ार अस्वच्छ होती. शेवटी आंघोळ न करता फ़क्त कपडे बदलायचं ठरवलं आणि पुढे कुठे नीट स्वच्छ आंघोळ करू असं ठरलं. कपडे बदलायला म्हणून बॅग उघडली. ती प्लास्टीक च्या पोत्यात बांधली होती म्हणून आतले कपडे कोरडे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. एकूण एक कपडा ओला गच्च होता. चादर, लुंगी, कपडे, अगदी स्लिपिंग बॅग पण पाण्यात भिजवून ठेवावी इतकी ओली झाली होती. आता कपडे सुद्धा बदलता येणार नव्हते. उपाय काही नाही. शेवटी सगळे कपडे धुतले. स्लिपिंग बॅग, सामान ठेवण्याची बॅग सगळं सगळंच धुतलं. अंगावर सुद्धा रेती रेती झालेली, त्यामुळे दोन तीन बादल्या पाणी तसच अंगावर घेतलं… आता सगळे कपडे ओले.. अंगावरचे देखिल… ते वाळेपर्यंत वाट बघून पुढचा प्रवास करायचा होता.. ईलाज नाही.
सोपान दादा आणि मंडळींची सोबत येवढीच होती. इथून पुढे जे मिळेल ते मिळेल. पण माझं नेहमीचं वाक्य मी पुन्हा एकदा म्हणेन. माई फ़ार कनवाळु आहे. ती तुम्हाला वा-यावर सोडत नाहीच. थोडी परिक्षा घेते मात्र तुम्ही तिला शरण असलात तर ती तुम्हाला कुरवाळून घेतल्याशिवाय राहात नाही.
या वेळी माझी तब्ब्येत बरीच बिघडली होती. आणि हे सांगायला सुद्धा माझ्याजवळ कुणी नव्हतं. पण माझी इतकी काळजी घेतल्या गेली की मला घरच्या मंडळींची कमतरता पण भासली नाही. सांगते कसं ते.
मला दोन ते तीन दिवस बराच ताप होता.मी तापातच नारेश्वर ला पोचले. तिथे गेल्यावर मला जेवायची देखिल ताकत नव्हती. कशीबशी बॅग ठेवली, आसन लावलं आणि झोपले. मी थंडी नी कुडकुडत होते. आश्रमाच्या हॉल मधे माझ्या खेरीज एक दोन परिक्रमावासी अजून असतील, बाकी आश्रम रिकामाच. मी बहुधा कण्हत असावे, कारण माझ्या बाजूचे एक काका मला अधून मधून “बरं वाटत नाहीये का?” असं विचारत होते. त्यांनी त्यांचं पांघरूण माझ्या अंगावर घातलं आणि म्हणाले “तुम्हाला ताप आहे बहुतेक ताई, औषध घेतलं आहे का…” मी औषध घेतलं नव्हतं.. पण घेणं गरजेचं होतं. त्या काकांनी माझ्यासाठी खालून ताट वाढून आणलं, मला औषध दिलं. माझ्यासाठी रूम सुद्धा शोधून दिली. माझं सगळं सामान रूम मधे नेऊन दिलं. मी फ़क्तच आराम केला, पण रात्री पुन्हा मला फ़णफ़ण ताप चढला. आता डॉक्टर बोलावणं भाग होतं. डॉक्टर शोधणं त्यांना बोलवणं सगळच काकांनी केलं. रात्री माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या पण ठेवल्यात. कोण कुठले हे काका, पण काय संबध असतो नाही? दुस-या दिवशी जेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी त्यांना नमस्कार केला तर रडलेच ते. म्हणाले मला देवानी मुलगी दिली नाही. ती आज नर्मदा माईनी दिली. आता इथून पुढे तुझी परिक्रमा होईस्तोवर मी तुझ्या सोबत असेन. आणि इथून पुढे तू माझी लेक आहेस..तेव्हापासून मी त्यांना “बाबा” असं च म्हणते. आणि हो, त्यांनी मला सक्त ताकिद दिलीये, की त्यांना “अहो बाबा” न म्हणता “ए बाबा” म्हणायचं. तर तेव्हा पासून हा माझा नर्मदा बाबा शेवटपर्यंत माझ्या सोबत होता.
इथून पुढे आमच्या सोबत मंदार वाळिंबे आणि वंदना ताई परांजपे हे दोघं सोबत होते.
मालसर शिनोर गुजरात चा प्रवास करत तिलकवाड्यापर्यंत आम्ही सोबत होतो. मालसर ला जाताना वाटेत आम्हाला चुडैल माता मंदिर लागलं. मी या आधी चुडैल मातेचं मंदीर बघितलं नव्हतं. गुजरात चा हा भाग तसा ब-यापैकी निसर्ग रम्य आहे आणि गुजरात मधले आश्रम सुद्धा बरेच पॉश आहेत. तसाच एक आश्रम मालसर चा. कणकेश्वरी आश्रम. खरं तर वंदना ताई आम्हाला दुस-या एका आश्रमात घेऊन जाणार होत्या, पण तिथे आम्ही गेलोच नाही. जागा बघता बघता वाटेत आम्हाला एक खूप आकर्षक, मीतभाषी आणि खरोखर प्रसन्न आणि सुंदर अशी कणकेश्वरी आश्रमाची सेवीका दीपिका भेटली. खूप आदरानी ती आम्हाला कणकेश्वरी आश्रमात घेऊन गेली. तिथे पाऊल ठेवलं आणि आम्ही चौघही अवाक होऊन बघत राहिलो… मालसर मधे आम्ही खरं तर राहणार नव्हतो, पुढे जाणार होतो, पण आम्ही चौघही एकमताने तिथे थांबून गेलो.. सकाळी साडेनऊ वाजताच मुक्काम केला … अगदी ६ ते ७ किमी चालून चक्क थांबलो! असं काय होतं तिथे? सांगते पुढच्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३६*
*नर्मदे हर.*
एकतर दीपिका च्या मनमोहक व्यक्तीमत्वाने आम्ही भारावून गेलो होतो. त्यात तिची अतिशय विनम्र विनंती आणि अतुलनीय तेज आम्हाला तिच्या आश्रमात जायला भाग पाडत होतो “भोजन प्रसादी तो कर लीजीये, फ़िर चले जाना अगर आपको रहना नही है तो” असं म्हणत ती आम्हाला घेऊन गेली. भोजन प्रसादी करून निघूयात असं म्हणत आम्ही तिथे गेलो खरे पण आत पाऊल ठेवताच चौघांनीही एकमताने आज मुक्काम करायचं ठरवलं. अतिशय प्रसन्न वातावरण. कमालीची शांतता आणि विलक्षण कंपन तिथे जाणवत होते. शिवाय सुबत्ता ही होतीच. आम्ही एका हॉल मधे आसन लावलं. भला मोठा हॉल आणि आम्ही चौघंच. गंमंत म्हणजे इतके जास्त चार्जिंग पॉईंट्स होते की सगळ्यांचे सगळे मोबाईल आणि पोवर बॅंक एकाच वेळी चार्जिंग ला लावता आले. परिक्रमेत अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसतं आणि चार्ज करण्याची पण सुविधा ब-याच ठिकाणी मिळत नाही. आम्हा चौघांनाही जाम आनंद झाला होता. खरं तर तुम्ही म्हणाल यात काय आहे असा खूप आनंद होण्या सारखं? पण हीच मजा आहे माहितिये का. एखादी छोटी जरी गोष्ट झाली नं तरी त्याचा इतका मोठा आनंद होतो की काय सांगावं! कदाचित छोट्या छोट्या गोष्टींमधे मोठा मोठा आनंद मानायला शिकतं मन, आणि मग आपण सतत आनंदीच राहतो. इथे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला मोठे मोठे आनंद देत होत्या. त्यातली एक म्हणजे टेबल खूर्चीवर बसून जेवण. जेवण चारही ठाव, अगदी लोणचं पापड कोशींबीर आणि गूळ सुद्धा. त्यात तव्यावरच्या गरमा गरम पोळ्या, आणि स्वयंपाक करणा-यांच्या आणि तो वाढणा-या कर्मचारी मंडळीच्या चेहे-यावरचं समाधान ह्या सगळ्यांनी मन खूप तृप्त झालं होतं. आम्ही जेवून विश्रांती घेतली आणि संध्याकाळी मी बाबा आणि मंदार बाहेर जाऊन आलो.माझी टाच थोडी दुखत होती, हे समजल्यावर एक म्हातार-या श्या बाई, आश्रमाच्या सेवीका तेल घेवून आल्यात. अगदी नको नको म्हणताना देखिल स्वत:च्या हाताने माझी टाच चोळून दिली. येवढी मोठी बाई आपली सेवा करतेय असं काय केलं होत् हो मी? *ही सेवा माझी नाहीये हे मला समजत होतं कारण ही सेवा होती मैयाची*, आणि मैयाच ती करत होती. मी माध्यम होते, आणि हा विचार मनात येईस्तोवरच काय तो दु:खाचा खेळ चालतो. मग काय होतं समजत नाही. आजी मला एक्यूप्रेशर देत होत्या. मी बेंबीच्या देठापासून ओरडत होते, मात्र मला बरच आराम पडला होता. इतका की संध्याकाळी मी बाहेर जाऊन मंदिरं बघून आले होते.डोंगरे महारजांची समाधी, ६०० वर्ष जुनं गणेश मंदिर, अंगारेश्वर मंदिर असं सगळं बघून आलो.
ह्या अंगारेश्वर मंदिराची एक अख्यायिका आहे. हे मंदिर अतिअप्राचीन आहे. याची निर्मिती नक्की केव्हा झाली हे काही माहित नाही मात्र हे मंदिर मुस्लीम राज्यकर्त्यांनी ते सत्ते मधे असताना जमीन दोस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. इंग्रज राजवटी मधे ही असे प्रयत्न झाले आणि त्या आधीही जेव्हा जेव्हा ह्या मंदिराकडे कुणी वक्रदृष्टी केली त्या त्यावेळी या मंदिरावर निखारे पडत आणि ह्या मंदिराला कुणी हात लावू शकलं नाही असं इथल्या पुजा-यांनी सांगितलं.. निखा-याला हिंदी मधे अंगारे म्हणतात आणि या मंदिराचं नाव अंगारेश्वर पडलं. अशी ही कथा.
अरे हो मालसर च्या आधी राणापूर चा एक अनुभव सांगायचाच राहिला. मी मंदार बाबा आणि वंदना ताई असे आम्ही सोबत होतो. बाबाचा पाय दुखत होता. शेतातली सगळी वाट होती. जिथे पोहोचणे होते तिथवर आम्ही पोहोचू शकलो नाही. आता कुठे थांबायचं? बरच अंतर काही दिसलं नाही. मग मंदार जरा पुढे झाला आणि जागा बघू लागला तो त्याला एक मंदिर दिसलं पण मंदिरात झोपायला परवानगी नव्हती. समोर पोर्च होता आणि उजव्या बाजूला एक खोली पण होती. तिथे राहता येईल असं वाटलं. आम्ही आत गेलो. पोर्च मधे झोपण्याची परवानगी मिळाली. आता भोजन व्यवस्थेचं काय ते बघायचं.
मंदिराच्या वर तिथेल्या व्यवस्थापक बाई राहात होत्या, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांचं माहेर प्रकाशा चं असल्याचं समजलं. त्या बाई मराठी होत्या मूळच्या, त्यामुळे त्यांना ही आमच्या बद्दल आपुलकी वाटली आणि कढी खिचडीच्या भोजन प्रसादीची व्यवस्था बाईंनी करून दिली. आता आम्ही निवांत झालो आणि काही मदत हवी असेल तर म्हणून त्या बाजूच्या खोलीत गेलो. गप्पा करता करता तिथेच आसन लावावं का असा विचार आला आणि लगेच गेला ही.. त्या खोलीत एक भला मोठा नाग बरेचदा येतो असं समजलं. अन्न धान्य साठवून ठेवलेली ती खोली असल्यामुळे उंदिर असतात तिथे, त्यांना खायला येतो ..असं सहज म्हणून तिथला पुजारी बोलला पण आमचा विचार मात्र बदलाच. आम्ही पोर्च मधेच आसन लावलं. संध्याकाळ पर्यंत सगळं ठिक होतं पण संध्याकाळी त्याआश्रमातल्या झाडावर माकडांनी गर्दी केली. इथवर ठिक आहे हो, पण ह्या माकडांची पिल्लं फ़ारच धिटुकली आणि चिकित्सक. “आज ही चार कोण आलीयेत राहायला इथे? यांच्याजवळ बरच सामान दिसतय?, त्यातलं काही आपल्या कामाचं आहे का?” असे अनेक प्रश्न त्यांना पडले असावेत. जरा आम्ही इकडे तिकडे गेलो की एखादं पिलू यायचंच आमच्या सामानाची झडती घ्यायला. ही पिलं हुशार हं अगदी, मंदिरातल्या आवारातला नळ उघडून पाणी प्यायचीत ती. त्यांची मर्कट लीला थोडा वेळ बरी वाटली पण ही मंडळी रात्रभर जागणार झाडावर, आणि येणार अधून मधून, आम्ही झोपलो की हे नक्की माहित होतं. आम्ही सगळं सामान बांधून झोपलो खरं, पण धाकधुक होतीच… अणि एक पिलू बराच वेळ येत राहिलं.. मी सगळ्यात कडेला झोपली होती, ते पिलू येत गेलं वारंवार आणि हळू हळू मात्र त्याची माझी मैत्री झाली… मग मात्र त्याने त्रास दिला नाही. तिथेल्या बेंच वर ते बसायचं आणि तिथूनच खाणाखुणा करायचं. त्याला बहुतेक समजलं असावं, हे लोक आणि आपण, सगळेच कसल्यातरी शोधात आहोत आणि एकमेकांना इजा पोहचवून काही होणार नाहीये. त्याला समजलं की नाही माहित नाही, पण मला खरच जाणीव झाली, ती अशी की खरोखर माणूस, किंवा कोणताही प्राणी किंवा या सृष्टी मधील काहीही असू देत, प्रत्येकामधे एक नैसर्गिक समजूतदार पणा असतो, किंवा एक असं काहीतरी टॅलेंन्ट असतं ज्या मार्फ़त समोरच्या प्राण्यामधील आणि स्वत:मधील एक कॉमन तत्त्व समजून घेता येतं. समोरचा धोकादायक नाही ही खात्री पटली की दोघांच्याही मनातील भिती जाते. तसच काहीतरी या पिलाच्या आणि माझ्या बाबतीत झालं आणि हळू हळू आम्ही दोघांनी एकमेकांकडे दूर्लक्ष केलं. मग मात्र मला शांत झोप लागली. खरंतर हा अनुभव नाहीये, पण या तत्वाचा फ़ायदा मला पुढे बरेचदा झाला.
मालसर हून पुढे शिनोर ला मिलिंदजींच्या आश्रमात बालभोग केला आणि पुढे निघालो. मिलिंद हिंगणे आणि सौ हिंगणे यांनी नवीनच आश्रम प्रस्थापित केला होता. इथून पुढे आम्ही किनारा मार्ग धरला. वाट खरोखर कठीण होती, पण खूप मजा येत होती. आमच्यात अलिखित वाटणी झाली होती कामाची. मंदार आमच्यातला सगळ्यात लहान आणि सगळ्यात फ़िट मुलगा. मग तो पुढे जाऊन वाट आहे की नाही ते सांगायचा, आणि मग आम्ही त्याच्या मागे जायचो. करत करत आम्ही बरच अंतर चालून गेलो आणि अचानक आमच्या सगळ्यांचं लक्ष मैयावर वेधल्या गेलं. मी आणि बाबा आराम करत बसलो होतो. मंदार पुढे होता आणि वंदना ताई मागे. मंदार मागे चालत आला आणि आम्ही दोघांनी एकाच ठिकाणी इशारा केला.. मैयाच्या पाण्यावर संथ पणे हालचाल होत होती. काही तरी पुढे सरकत होतं, पाण्याखाली जात होतं आणि वर येत होतं… नीट बघितलं तेव्हा समजलं..ती मगर मैया होती. या अचानक दर्शनाने आम्ही सगळेच आनंदलो होतो. आणि आता समोर येणारी कठीण वाट अचानक सहज सोपी वाटू लागली होती.दुपारच्या भोजन प्रसादिची वेळ होत आली होती. आम्हाला भुका लागल्या होत्या. जवळ एक आश्रम आहे असं समजलं. ब्राम्हणगाव बहुधा या गावाचं नाव.. नक्की आठवत नाही पण इथे पूर्वी ब्राम्हण लोकच राहात असत आणि पूर आल्यानंतर हे गाव ओसाड झालं असं समजलं. इथे एक खूप सुंदर आश्रम दिसला. सुंदर बांधकाम, बगीचा, पाण्याच्या टाक्या अगदी सगळी व्यवस्था असेल असं वाटलं. अगदी मैयाच्या काठावर. वाटलं इथे भोजन प्रसादी होईल, पण हा आश्रम बंदच होता. खूप हळहळ वाटली. या मार्गावर परिक्रमावासी फ़ार कमी येतात त्यामुळे आश्रम बंद च असतो असं समजलं. आम्ही पुढे निघालो. पुढे एका छोट्याश्या डोंगर वजा जागेवर ज्याला टीला असं म्हणता येईल, एक बंगाली बाबाची झोपडी होती, तिथे चहा घेतला, फ़रसाण खाल्लं. हेच झालं आजचं जेवण.
लोक मला अनेकदा विचारतात की काही वाईट किंवा अनैसर्गिक अनुभव येत नाहीत का? तर येत नाहीत असं नाही पण त्यांचं प्रमाण चांगल्या अनुभवांपेक्षा खूप कमी असतं आणि त्यांचा प्रभाव पण नगण्य असतो त्यामुळे अशा अनुभवांकडे आपसूकच दूर्लक्ष केल्या जातं. ते लक्षात पण राहात नाही, पण एक लक्षात आहे, तो सांगते. अर्थात याला मी वाईट नक्कीच म्हणणार नाही मात्र किंचित वेगळा किंवा अनपेक्षीत म्हणेन. यातूनही काही तरी धडा घेणे असेलच. पण त्या आधी एका अतिशय प्रसन्न जागेबद्दल सांगते जिथले कंपनं खूपच प्रभावी आणि सकारात्मक होते.
इथला आश्रम धारी बैरागी खूप प्रेमळ होता आणि कधी परिक्रमेची संधी मिळाली तर ही जागा सोडूच नये अशी ही जागा होती. चातुर्मास करण्याची इच्छा असेल तर मी तरी पहिलं प्राधान्य या जागेला देईल अशी ही जागा.
बरकाल असं या जागेचं नाव. आम्ही मैया किनारी चालत होतो. ऊन झालं होतं. इथे वाळू चा किनारा आहे. वाळूतून चालण तसं कठीण असतं कारण प्रत्येक वेळेला पाय उचालायला लागाणारी ताकत ही साध्या रस्त्यापेक्षा जास्त लागते वाळूमधे. त्यामूळे कमी वेळातही थकवा जास्त येत होता. या किना-याला मोठाली झाडं किंवा सावलीची ठिकाणं नाहीत. त्यामुळे चालत राहाणं हा मार्ग. मधे मधे इथे बरेच दगड पण आहेत. पात्रातले मऊ झालेले दगड बघण्यात, त्यातले काही वेचण्यात पण इथे माझा बराच वेळ गेला मात्र नंतर वजन झाल्यामुळे ते फ़ेकून दिले.. संचय नको.. परत एकदा समजलं.. असो, तर रस्त्याने जात असताना डावीकडे वर एक मंदिर दिसलं. खालून हे मंदिर अगदी सामान्य आणि लहानसं असं वाटलं. तिथे जाऊ, थोडा आराम करू आणि पुढे निघू असा विचार करून आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो.मंदिराच्या पाय-या मोठ्या आणि दगडी होत्या. उंच पाय-यांच्या दोन्ही बाजूला झाडं होती. साधारण २० -२५ पाय-या नंतर एक लाकडी बंद दरवाजा होता. इथवर सगळंच सामान्य होतं. मात्र त्या पायरीवर पाय ठेवला आणि मला जोडे काढण्याची तीव्र इच्छा झाली. कदाचित मंदिराच्या पाय-या आहेत म्हणून असेल. मी जोडे काढले आणि पायरीवर पाय देते तो त्या पायरीचा थंड स्पर्ष माझ्यात अचानक चेतना भरून गेला. दारापर्यंत पोहचेस्तोवर माझा थकवा जवळ जवळ नाहीसा झाला होता. मंदार माझ्या पुढे होता, तो दार उघडून आत गेला होता आणि मी आणि वंदना ताई आता दारात येत होतो. मी दारातून आत पाहिलं आणि त्या जागेकडे, त्या मंदिराकडे, तिथल्या प्रसन्नतेकडे मी इतकी आकर्षित झाले, किंवा त्याचा प्रभाव इतका पडला की दारातून पाऊल आतमधे घालता घालता माझ्या तोंडून उदगार निघाले “ आज आपण इथेच राहूयात का?”..आणि गंमत माहितिये का, मी हे शब्द एकटीने बोलले नव्हते. मी आणि वंदना ताई दोघी सोबतच दारात पोहचलो होतो आणि अगदी हेच शब्द, एकाच वेळी आम्ही दोघीही बोललो होतो…. अगदी एकाच वेळी.. इतकच नाही तर समोर असलेला मंदार पण त्याच क्षणी म्हणाला “ मी ही हाच विचार करत होतो की आज इथे राहावं का?” म्हणजे आम्ही तिघंही एकाच वेळी एकच विचार करत होतो आणि याला मी तरी केवळ योगायोग म्हणू शकत नाही. तिथे असलेल्या प्रचंड सकारात्मक शक्तीचा आमच्या सगळ्यांवरच प्रभाव पडला होता हे निश्चित.इथे राहता येईल की नाही हे बघणं आवश्यक होतं. जागा आहे की नाही, कुणाची परवानगी घ्यायची हे अजून काहीच माहित नाही पण इथे मंदिराच्या अंगणात सुद्धा झोपायची तयारी आम्हा सगळ्यांचीच होती. इथेच राहायचं हे मनानी पक्कं केलं होतं. आम्ही आलेलं पाहून इथला आश्रमधारी बाहेर आला. सडसडीत बांध्याचा, पांढरी वस्त्र म्हणजे न शिवता गाठी मारून घातलेली कफ़नी त्यानी धारण केली होती. तरूण, तेजस्वी आणि खरोखरीच रूबाबदार म्हणतात नं तसा होता. मंदार नी लगेच सांगीतलं, “ताई हे बुआ एका हिंदी नटा सारखे दिसतात, रणदीप हूडा सारखे” खरं सांगते, मंदार नी सांगितल्या नंतर मला रणदीप हूडा हे नाव समजलं. मंदार नी मला फ़ोटो पण दाखवला रणदीप हूडा चा. म्हणजे बघितलं असेल मी ह्या नटाला आधी, पण मला काही नाव वगैरे माहित नाही.. असो तर ते बुआ कसे होते हे सांगण्यासाठी ह्या नटाचा उल्लेख.. बाकी त्याचा काही संबध नाही.. आपण बरकाल मध्येच आहोत, या बैरागी बाबा पुढे बरं का! प्रसन्न मुद्रेनी त्यांनी आमचं स्वागत केलं, पाणी दिलं आणि नंतर “बालभोग तो करलो” म्हणून तो आत गेला.. त्या नंतर त्यानी बालभोगासाठी जे काही आणलं त्यावर आम्ही चौघं ही अक्षरश: तुटून पडलो. अगदी लहान मुलं आवडत्या खाऊ वर कशी तुटून पडतात नं तसं झालं… किती खाऊ अन किती नको असं व्हायला लागलं. ती अनुभूतीच वेगळी होती..
खरं तर जे मिळेल ते जेवणं हा नियमच आहे परिक्रमेत पण आज जे मिळालं होतं ते खाताना “खाण्यात देखील इतका आनंद असतो” हे समजलं होतं. इतकच नाही तर आमच्या सगळ्यांच्या चेह-यावर चा आनंद आम्ही सगळेच वाचत होतो, त्यामुळे अजूनच आनंद मिळत होता. आमचा हा आनंद पाहून तो बैरागी बाबा पण सुखावला होता, आनंदला होता. त्याच्या चेह-यावरचा आनंद ही आमचा आनंद द्विगुणित करत होता आणि दुसरं म्हणजे त्यानी आणलेली थाळी ही अक्षयपात्र च होतं… कितीही खा, संपण्याचं नावच नाही! आमच पोट भरत आलं होतं पण मन भरत नव्हतं… आम्ही खात असलेला पदार्थ देखिल नेहमीचाच… पण आनंद मात्र वेगळा… तो दिवसच मंतरलेला… ते स्थान च अगळं वेगळं.. आणि तो बैरागी पण अनोखा… बरच सांगायचय अजून.. पण मोठा होतोय हा लेख, तेव्हा बरकाल च्या या दिवसाचं वर्णन आता पुढ्च्या भागात सांगते. आम्ही काय खात होतो हे ऐकल्यावर तुम्हाला गंमत वाटणारे, आणि आश्चर्य पण… पण भाग ३६ मधे.. नर्मदे हर.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३७*
*नर्मदे हर*
बरकाल च्या त्या दिवसाचं वर्णन मला आज सांगायचं आहे. तुम्ही वाट बघताय त्या पदार्थाची ज्यावर आम्ही लहान मुलासारखे तुटून पडलो होतो, अगदी चौघही. आम्ही असं काहीच वेगळं खात नव्हतो. बरकाल च्या साधू महारांजानी आम्हाला पाणी दिलं आणि “बाल भोग तो करलो “ असं म्हणत एका ताटा मधे एक पपई चिरून आणली. पपई सारखी पपई, त्यात काय वेगळं, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, अहो पण गंमत सांगते, इतकी रसाळ, गोड आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी पपई मी पहिल्यांदाच खाल्ली. इतका अलवार घास, की ओठाला लागला की घसा ओला होऊन जाई. ओठानीच खावी अशी पपई.. आता सांगा पपई वर का उगाच तुटून पडणारे आम्ही? जेव्हा त्या साधू महारांजांनी पपई आणली तेव्हा वाटलं, “बालभोगासाठी पपई?” आम्ही कहीतरी चिवडा फ़रसाण याची अपेक्षा करत होतो, त्यामुळे ही पपई पूर्ण संपेल असं ही आम्हाला वाटलं नाही, मात्र एक फ़ोड, अहो एक घास खाताक्षणीच त्या पपईचा फ़डशा पडला, आणि मग त्या साधू ची अक्षय थाली सुरू झाली. ते ताट आमच्या पुढ्यात ठेवून तो आत गेला, त्यानी अजून एक ताट भरून पपई चिरून आणली..आम्ही ते दुसरं ताट देखिल संपवलं. खरं सांगते, हावरटासारखं केलं आम्ही… दुस-या नंतर तिसरंही खाल्लं… पोट भरलं होतं खरं, पण मन च भरत नव्हतं.
त्या ठिकाणी राहण्याबद्दल आम्ही अजून त्या साधू महाराजांशी बोललो नव्हतो, पण आता तर इथेच राहायचं होतं. आम्ही ओळख करून घेण्यासाठी त्यांचा परिचय विचारला, “माताजी साधू का आगा पिछा नही पूछा करते, आप बस सेवा बताईये” त्यांनी परिचय दिलाच नाही. मग आम्ही परिसर फ़िरलो. अरे हो, इथे जे मंदिर आम्ही खालून बघत होतो ते कुणाचं माहितीये? सूर्यप्रभेचं! मी सूर्यप्रभेचं मंदिर पहिल्यांदाच पाहिलं. सूर्यप्रभा म्हणजे सूर्याची पत्नी. मंदीर प्राचीन होतं. मंदिराचं कोरीव काम खूपच रेखीव होतं. मंदीराच्या मागे फ़ुलांचा फ़ळाचा सुंदर बगीचा होता. अंगणात बाक, आणि दगडी फ़रशी लावली होती आणि उजव्या बाजूला एक छोटासा ओटा, आणि ओट्यालगत खोली. त्या परिसराच्या कुठल्याही कोप-यातून समोर वाहणारी नर्मदा माई दिसते. कुठलाच अडसर नाही. असं पूर्ण च्या पूर्ण पात्र या तीरापासून तर त्या तीरापर्यंत बघत बसावं. मग कधी त्यात “कोटी रतन ज्योती” चं दर्शन होतं तर कधी पोर्णीमेचं चांदणं उलटून तरंगू लागतं. आम्ही गेलो तेव्हा तिथी काय होती ते आता नक्की आठवत नाही पण पोर्णीमेच्या जवळपासची असावी.कारण त्या रात्री अम्ही अंगणात बसून जो नजारा पाहिला तो अवर्णनीय आहे. पण त्या आधी बाकी राहिलेल्या दिवसाचं वर्णन सांगते.
तर आता आम्ही साधू महाराजांना राहण्याबद्दल विचारलं. ते म्हणाले “ वैसे तो कोई यहा ज्यादा रहता नही है पर एक रूम है, देख लीजीये, ठिक लगा तो साफ़ करवा देता हू” आम्हाला फ़क्त तिथे राहण्याची परवानगी हवी होती. आम्ही अंगणात सुद्धा राहयला तयार होतो आणि महाराज रूम बद्दल बोलत होते.
इथे आल्यापासून आनंदाची उधळण काय ती आमच्यावर होत होती. आनंद जेव्हा अनपेक्षीत पणे समोर येतो नं तेव्हा त्याचं रूपच वेगळं असतं बहुधा. बघा नं, एखाद्या गोष्टीची आपण खूप वाट बघतो आणि मग ती गोष्ट पूर्ण होते, यातला अनंद मोठा असतोच, पण कुठेतरी तो आनंद त्या अपेक्षेसाठी असतो, त्या फ़ळासाठी नाही. म्हणजे ती फ़लप्राप्ती तर झालेली असते मात्र “इतके दिवसांची इच्छा पूर्ण झाली” यातच माणूस जास्त समाधानी असतो, नाही का? आमचं मात्र उलटंच होत होतं. फ़राळासाठी सर्वसाधरण पणे चिवडा मिळतो, बिस्कीट मिळतात.. तशीच आमची अपेक्षा, आणि आम्हाला मिळाली रसाळ मधूर गोड पपई, अगदी अनपेक्षीतपणे ती ही भरपूर, अगदी आम्ही नको नको म्हणेस्तोवर. मग आम्ही विचार केला होता इथे राहाण्याचा, अंगणात सुद्धा चालणार होतं आम्हाला आणि आम्हाला मिळाली छान ऐसपैस खोली. अंघोळीला बाथरूम… खरं सांगते, या सगळ्या सुखसोई आहेत. यांची आपल्याला इतकी सवय लागलीये की याला आपण प्राथमिक गरजा म्हणतो. या परिक्रमेत कमितकमी गरजा ठेवून कसं जगता येतं किंबहुना किती आनंदानी जगता येतं हे शिकायला मिळालं.
हो एक कबुल नक्की करेन. मी मोबाईल मात्र वापरला, पण खरं सांगते “त्या शिवाय जमत नाही” हे कारण नाही हं मोबाईल वापरण्याचं. माझा मुलगा आणि इतर घरच्या मंडळीना माझ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि मला ही त्यांच्या संपर्कात राहायचं होतं म्हणून तो मोबाईल. पहिल्यांदाच मुलाला इतके दिवसांसाठी सोडून आले होते, तेवढ्या पुरता मोबाईल…परिक्रमेत अनेक ठिकाणी नेटवर्क नसायचं त्यामुळे रोज फ़ोन झाला असं फ़ारसं झालं नाही. पण जेव्हा नेटवर्क असायचं तेव्हा बोलणं व्हायचं… अर्थात ही लक्झरी च आहे, आणि याशिवाय ही आपण जगू शकतो हे नक्की..
तर आमची राहण्याची व्ययस्था झाली. साधू महाराजांनी आम्हाला खोली साफ़ करून दिली. दुपारचा आराम झाला आणि संध्याकाळ चा सोनेरी लाल प्रकाश पडू लागला. त्या दिवशीचा सूर्यास्त मी विसरूच शकत नाही. पश्चिम वाहिनी मैया त्या बिंबाला आपल्या कुशीत घेत होती जणू, आणि त्याच्या तेजानी पाण्याच्या लहरीवर उतरलेलं ते सोनेरी लाल जांभळं नक्षीकाम म्हणजे मैयात सोडलेल्या असंख्य दिव्यांसारखं वाटत होतं.. “कोटी रतन ज्योती” या मैयाच्या आरती मध्ये असलेल्या ओळींप्रमाणेच!
आमची संध्याकाळची आरती आणि श्लोक म्हणून झालेत. आता भोजनाची तयारी.
सकाळपासून हे साधू आमच्या सेवेत होते, म्हंटलं त्यांना मदत करावी. आम्ही विचारलं “ महाराज जी भोजन बनाने मे आपकी मदत करे?” ते म्हणाले, “ माताजी आराम किजिये, सब हो जायेगा. ते स्वत: स्वयंपाक करू लागले. वरण, भात, भेंडीची भाजी असा बेत होता. वरण भात आणि भाजी तयार झाली होती, ती घेऊन ते अंगणात आले. तिथेच उघड्या आभाळाखाली आणि मैयाच्या समोर आजची अंगत पंगत होती. कणकेचा गोळा घेऊन ते साधू महाराज अंगणात आलेत आणि सोबत निखा-याची शेगडी ही आणली. तिथे बसून त्यांनी आम्हाला गरम गरम पोळ्या वाढल्यात. खरं सांगते, एखादी बाई काय स्वयंपाक करेल इतका सुंदर स्वयंपाक होता. कुरकुरीत उभे काप केलेली भेंडीची भाजी, अतिशय चविष्ट सांबार वजा वरण, सुवासिक तांदळाचा भात आणि मऊसूत घडीच्या पातळ पोळ्या. त्या पोळ्या खाल्ल्या तेव्हा खूप लाज वाटली, वाटलं “ बरं झालं आपण स्वयंपाक केला नाही, इतका सुंदर स्वयंपाक, इतक्या तलम पोळ्या मला करताच येत नाही” आग्रह करून करून महाराज आम्हाला वाढत होते. इतका आग्रह की “माताजी ये सब खतम करना है” असं म्हणत जायचे आणि वाढत जायचे.
“महाराज जी आप भोजन नही करेंगे” मी विचारलं, आणि ते उत्तर ऐकून डोळ्यात पाणीच आलं..ते म्हणाले, “मै तो फ़रियाली हू, ये सब नही खाता” हा साधू, जो इतका चविष्ट स्वयंपाक करतो, इतक्या आग्रहानी आम्हाला खाऊ घालतो तो या सगळ्याची चव देखील घेत नाही? सेवा भाव किती काठोकाठ भरला असेल त्याच्या मनात? त्याच्या हातच्या स्वयंपाकाला त्याच्या हातची चव नव्हतीच म्हणजे, चव होती ती त्याच्या आतल्या सद्भावनेची, त्याच्या विचार प्रक्रीयेची, त्याच्या सेवा भावनेची, आणि म्हणूनच तिथलं वातावरण देखिल तितकच शुचिर्मय होतं, आल्हाददायक होतं. हा साधू खरच कुणी पुण्यात्मा होता जो काही कारणास्तव या देहात राहात होता असच वाटून गेलं.
रात्रीची पहिली झोप खूप छान लागली आणि सकाळी ३ वाजता जाग आली, खूप फ़्रेश वाटत होतं. मी बाहेर गेली तसा बाबाही बाहेर आला. मग आम्ही दोघं बाप लेक पाण्यात पडलेलं चांदणं मूक होऊन वेचत बसलो. मी मनातल्या मनात माझा जप करत होती आणि गुरुमंत्राचा प्रत्येक शब्द जणू आसमंतातून उतरून येत होता. मला पुन्हा एकदा प्रत्यय आला, “मन हे स्थीर करुनि पहा, रेवा तीरी सद्गुरूला” .. मोठ्या महाराजांच्या आरतीमधल्या या ओळी खरच किती ख-या आहेत! तासाभरानी आम्ही पुन्हा आंग टाकलं, पण झोप लागली नाही.
सकाळी उठून पूजापाठ आटोपून बालभोगाची तयारी करायला गेलो तर कालच्या पोळ्या शिल्लक असल्याचं समजलं. वंदना ताईनी त्याचे चुरम्याचे लाडू बनवून दिले आणि त्या साधू महाराजांचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पण ही जागा काही मनातून जात नाही.. अजूनही हे प्रसंग तितकेच ताजे आहेत! मंदार, बाबा आणि वंदना ताई, तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा बरकाल च्या या मंदिराच्या आणि या मंतरलेल्या दिवसाच्या दुनियेत हरवून जाल हे नक्की, आणि वाचक हो, पुन्हा एकदा सांगते, एकदा संधी मिळाली न तर इथे नक्की नक्की जाऊन या. तुम्ही जाल तेव्हा हेच महाराज इथे असतील की नाही माहीत नाही, आम्ही मात्र भाग्यवान ठरलो आहोत त्या महाराजांना भेटून!
आम्ही किनारा वाटच धरली आणि पुढे जाऊ लागलो. गावं किना-यापासून जरा दूर असतात त्यामुळे आम्ही गावांमधे गेलो नाही. इथून पुढे आता बद्रिकाश्रमात थांबायचं असा विचार केला. “तुम्हाला काही वाईट अनुभव आलेत का?” असं मला अनेक जण विचारतात, त्याचं उत्तर देते. वाईट अनुभव अगदीच येत नाही असं नाही, पण ते खूप कमी असतात आणि मुळात आपल्या अपेक्षा कमी असल्यामुळे आणि या वाईट अनुभवांचा प्रभाव पण कमी असल्यामुळे ते फ़ारसे जाणवत नाही. म्हणजे परिक्रमेत जर तुमच्या मनाला फ़क्त चांगलं तेच धरायची सवय लागली तर हे वाईट देखील वाईट आहेत हे जाणवत नाहीत मात्र एरवी चा विचार केला तर वेगळा अनुभव म्हणता येतील नक्कीच, असे अनुभव देखिल येतात. त्यातलाच एक सांगते. अर्थात हा अनुभव वाईट नाहिये, पण आनंददायक नाहीयेच मुळी, सांगते.. पण बरेच दा काय असतं नं हे असे अनुभव येणं ही गरजेचं असतं. नाहीतर चांगल्या अनुभवांची चव समजेल कशी नाही का?
बरच अंतर चालून गेल्यावर आम्ही बद्रिका आश्रमात गेलो. बद्रिकाश्रमा बद्दल जरा ऐकून होतो. जागा छान आहे, सोय़ी छान आहेत हे ही माहित होतं. आणि आता आमचं मन सोयींपेक्षा ही आनंदाच्या अनुभूतीच्या शोधात होतं. एकवेळ सोय कमी जस्त झाली तर चालेल, पण प्रसन्नता हवी, अशी मनाची अपेक्षा झालेली.. हो अपेक्षाच.. आणि जिथे अपेक्षा येते तिथे ती भंग ही होणारच नाही का? त्याचाच परिणाम म्हणजे हा पुढचा अनुभव, असं म्हंटलं तरी चालेल.बरकाल च्या मिळालेल्या आनंदा नंतर पुढेही तसाच आनंद मिळावा ही झाली इच्छा आणि बरकाल च्या आनंदा नंतर तसाच आनंद मिळाला पाहिजे, ही झाली अपेक्षा. या पाहीजे वर जेव्हा जोर येतो तेव्हा मग बाकी कुठल्या परिस्थिती ला सामोरं जायला हे मन तयार होत नाही, आणि मग या “पाहीजे” या अपेक्षेचा भंग झाला की आपण त्याला अनैसर्गिक किंवा दु:खद अनुभवाचं शीर्षक देऊन मोकळं होतो. थोडक्यात काय तर तो अनुभव जसा आहे तसाच असतो, तो वाईट का चांगला हे ठरवणं आपल्या मना वर असतं… असो, म्हणून म्हणतेय, त्या वेळी अनैसर्गिक, विचित्र वाटलेल्या त्या अनुभवावार जेव्हा मी नंतर विचार केला तेव्हा तो तितकासा विचित्र नाही वाटला मला…तरीही सांगते पण पुढच्या भागात.. म्हणजे ३८ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३८*
*नर्मदे हर.*
मागच्या अनुभवात मी फारसा सुखकारक नसलेला अनुभव आला असं सांगितलं होतं, तो अनुभव काय ते आता सांगते. आम्ही किना-याची वाट धरली होती. बरच उन होतं.आज बद्रिकाश्रम पर्यंत जाऊन मुक्काम करावा असं आम्हाला वाटत होतं. तहान देखील बरीच लागली होती. रस्त्यांनी चालत चालत आम्ही बद्रिकाश्रमा पर्यंत येऊन पोहचलो देखील, पण इथे आमचा भ्रम निरास झाला. आमच्या अपेक्षे प्रमाणे इथे आम्हाला विश्रांती ला जागा, आसन लावायला जागा आणि भोजन प्रसादी मिळायला हवी होती. ते काही होऊ शकलं नाही.
अपेक्षा केली ते चुकलच होतं आमचं खरं, पण माणूसच ना शेवटी.. केली अपेक्षा..तसंही एका परीक्रमावासियाला काय अजून हवं असणार? निवांत झोप शरीरासाठी आवश्यक म्हणून ती हवी, आणि भोजन, ते ही जे असेल, जसं असेल तसं. अहो देहाचे चोचले जरी नाही तरी अजून आम्ही इतके का पक्के झालोत की याशिवाय राहता येईल आम्हाला? बाकी काही आम्हाला नको ही होतं. हो, एक स्त्री म्हणून स्वसुरक्षे ची आणिक एक अपेक्षा. बस बाकी नाही. बरं अपेक्षा पूर्ण नाही झाली एकवेळ तरी चालेल पण प्रसन्न सकारात्मक वातावरण असलं की ते ही पुरेसं असतं. इथेच खरा अपेक्षा भंग झाला.
बरकाल ला आम्ही उघड्यावर देखील झोपायला तयार होतो कारण तिथल्या साकारात्माकतेनी आम्हाला मोहित केलंच होतं, आणि बहुधा तीच सकारात्मकता आम्ही इथे शोधली. झालं असं की आधी मंदार आश्रमाच्या कार्यालयात जाऊन आला. बाहेर येऊन “ इथे काही शक्य वाटत नाही , कारण इथला कार्याकर्ता नीट माहिती देत नाही, उलट चिडून बोलतोय” असं त्यांनी सांगितलं. कुठला तरी एक अस्वच्छ खोलीचा कोपरा आहे असं तो म्हणाला म्हणे पण तिथे न पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न आम्हा बायकांसाठी इतर व्यवस्था.. तरी हरकत नाही, आम्ही किल्ली मागितली तर म्हणे किल्ली नाहीये, ज्याच्याजवळ आहे तो कधी येईल ते माहित नाही… म्हंटल ते ही मान्य, तोवर कुठे आसन लावू ते तरी सांगा. तिथे आसन लावायला जागा विचारली असता आश्रमात जागाच नाही असं समजलं. मग आम्ही भोजन प्रसादीचं विचारलं असता जेव्हा ते ही नाही हे समजलं तेव्हा मन जरा खट्टू झालं, कारण भूक लागली होती. इथपर्यंत काही हा अनुभव वाईट नव्हताच. मात्र तिथल्या कर्मचा-याची वागणूक ही अतिशय रूक्ष आणि उद्धट होती. सर्वसाधारण व्यक्तींचं असं वागणं स्वीकारता येत होतं आम्हाला पण आश्रमधारी व्यक्ती चं असं वागणं जरा वेगळं च वाटलं. तिथे थांबण्याची इच्छाच झाली नाही. थकल्या भागल्या परिक्रमावासी ना निदान पाणी तरी विचारावं.. बरं बाबा नको विचारूस तू, पण मागितल्यावर निदान नाही तरी म्हणू नये…त्या कर्मचा-यांनी दूर वर असलेल्या नळाकडे बोट दाखवलं… “ वाहा जा के पी लो” .. वाटलं आपण तर आपल्या घरी असं कधीच कुणाशीच वागत नाही, आणि हे आश्रम धारी, परिक्रमावासी लोकांसाठी आश्रम उघडतात आणि साधं पाणी पण पाजत नाहीत? राग तर आलाच.. आश्रमाच्या नावाखाली नुसता पैसा जमा करून स्वत:ची घर भरताहेत असही वाटलं. वाटलं मला की म्हणावं त्याला जाऊन “नही कुछ कर सकते तो कम से कम ठीक से बात तो करो”.. पण दुस-या क्षणी वाटलं राहू दे.. त्याचं त्याच्यापाशी… तर असा अनुभव.
नंतर. ज्या वेळी शांततेनी या अनुभवावर विचार केला तेव्हा वाटलं, ठीक आहे नं. नसेल त्याला आपल्याला मदत करायची. आपण आश्रम आहे म्हणून गेलो तिथे, तिथे आपलं दाणा पाणी लिहिलेलं नसेल, म्हणून नाही मिळालं. मग लक्षात आलं क्रिया- प्रतिक्रिया चे सूत्र. तिथे जाताना आपली अपेक्षा इतकी तीव्र होती की त्याच्या मागे येणारी प्रतिक्रिया ही देखील तीव्र च असणार नं. बरकाल अगदीच उलट होतं अपेक्षाच नव्हती, त्यामुळे जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा होता आणि इथे मी माझ्या अपेक्षा कुणावर तरी लादणार होते, ज्याची कंपन कदाचित आधीच त्या व्यक्तीवर जाऊन आदळली आणि त्या व्यक्तीची मुळातली नकारात्मकता म्हणा किंवा त्याची चिडचिड म्हणा किंवा जी काही त्याची मानसिकता असेल, त्या वेळची परिस्थिती असेल त्यात या माझ्या अपेक्षांच्या ओझ्याची भर पडून ती नकारात्मकता अजूनच तीव्र झाली. आम्ही सगळेच तहानलेले देखील होतो, पण तरीसुद्धा त्या आश्रमातल्या त्या नळावर जाऊन पाणी प्यायची पण इच्छा झाली नाही. आम्ही तसेच भुकेले तहानलेले पुढे निघालो.
बद्रिकाश्रमातून आम्ही नाराज होऊनच निघालो. मात्र पुढे नंदेरीया ला नंदिकेश्वाराचं दर्शन घेतलं. तिथे राहण्याची व्यवस्था नव्हती मात्र तिथे काही लोक कसली तरी पूजा करत होते. तिथे मंदिरातले मुख्य पुजारी बाहेर गेले होते मात्र एक व्यवस्थापक तिथे होते. आता आम्हाला खूपच भूक लागली होती. इथे आम्ही “ चहा मिळेल का असं विचारलं” आणि इथल्या माणसाने आम्हाला भरपूर आणि चवदार चहा करून दिला. आमचं पोटाच भरलं.इथे नं ,मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते..
एका खूप म्हाता-या आजी बाईंची. इथे आम्हाला चहाबरोबर काहीतरी दिलं होतं खायला, काय ते आठवत नाहीये पण वाटीत होतं काहीसं, कारण चाहाचे पेले आणि वाटी घासायला जेव्हा मी मंदिरा मागच्या टाकी जवळ गेले तेव्हा तिथे एक आजीबाई भजन म्हणत आणि भांडी घासत बसल्या होत्या. खूप भांडी होती त्यांच्या पुढ्यात आणि त्या शांतपणे घासत होत्या. “ दे दे बेटा, मी साफ कर देती हु” असं म्हणत त्यांनी मला वाटी पेला मागितला. खरं तर मी इतकी थकले होते न की एरवी मी दिला ही नसते माझे भांडे घासायला पण या आजींकडे आणि त्यांच्या पुढ्यात असलेल्या भांड्यांकडे पाहून मला माझी लाज वाटली… आणि त्या क्षणी वाटलं बसावं इथे हिच्या जवळ आणि भांडी घासायला मदत करावी हिला. वंदाना ताई ही आली तिथे, त्या आजी कडे पाहून तिलाही वाईट वाटलं, आणि न राहवून मी त्या आजी ला विचारलं” आपकी मदद कर दु मैया जी”? तिनी जे उत्तर दिलं नं ते ऐकून आम्ही फक्त तिला नमस्कार केला आणि आम्ही आमच्या मार्गाला पुढे निघालो. ती म्हणाली “बेटा अब यही मेरा काम है.. और यही मेरा भाग भी है.. भगवान की झुटन साफ करना तेरे भाग में नही और परिक्रमा करना मेरे भाग में नही” तू जा बेटा, जा के आराम कर.” किती सहज साधे पणाने तिने तिच्या भाग्याला न्याय दिला होता, आणि माझ्याही भाग्याची ओंजळ त्याच न्यायानी तिनी भरून काढली होती. इतक्या म्हाता-या वयात मदत घेणं तिला काही गैर नव्हतं खरं तर पण मदत नको हे म्हणण्याची तिची पद्धत किती वेगळी होती नाही? आणि किती सहज आणि तितकीच सत्य!.. सत्य हे असं असत असेल.. अगदी स्फटिका सारखं पारदर्शक..अरे हो, स्फटिकावरून आठवलं पुढचं चंद्रीकेश्वराचं मंदिर..
पुढे जाऊन चंद्रीकेश्वराचं मंदिर होतं तिथे गेलो. हे मंदिर थोडं आडवाटेला आहे, खुपसे परिक्रमावासी इथे जातच नाही. आम्हाला कुणीतरी सांगितलं आणि आम्ही गेलो. इथे स्फ़टिकाचं शिवलिंग आहे आणि यातून सतत थेंब थेंब पाणी गळत असतं. या शिवलिंगामधे एका विशिष्ट कोनातून पाहीलं तर चंद्राकार चमकदार आकृती दिसते म्हणून याला चंद्रकांत म्हणतात आणि या जागेला चंद्रिकेश्वर असं म्हणतात. तिथे देखील छानसा चहा प्यायला मिळाला. आता मघाचा तो बद्रीका आश्रमातला राग वगैरे काही शिल्लक राहिलं नव्हतं. आम्ही आता इथून पुढे चांदोद च्या दिशेने पुढे जाऊ लागलो. वाटेत ऋणमुक्तेश्वाराच मंदिर होतं. ते बरच उंच होतं, भरपूर पाया-या होत्या. बाबा थकला होता. वंदना ताईचं आधी ही दर्शन झालेलं होतं. मग मी आणि मंदार आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो. परिक्रमा पहिल्यांदाच करत होतो आम्ही दोघं ही आणि इथे मिळत असलेल्या सेवा भावी लोकांच्या सेवेचं ऋण आमच्या वर होतच.. शिवाय अजूनही काही ऋण असतील तर ते लवकर फितू दे बाबा अशी प्राथना केली आणि पुढे संगमाच्या दिशेने निघालो. कारानाली च्या आधी आणि चांदोद च्या नंतर आम्ही मुक्काम केला. पण ते नंतर सांगते..आधी सांगते एक गम्मत.
इथे ओर नदीचा आणि नर्मदा मैयाचा संगम लागतो. संगम स्नान पवित्रच असतं आणि ते करायाचं असं आम्ही ठरवलं. इथे उतरण्यासाठी एक जिना तयार केला होता. त्याच्या अरुंद पाया-या होत्या. काही ठिकाणी पोती लावून पाया-या केल्या होत्या. खोल आणि अगदिच अरुंद पाया-या पाहून बाबा ला जरा भीती वाटली. मंदार उतरून खाली गेला मग मी आणि वंदना ताई देखील खाली येऊ लागलो. बाबा मात्र येईना. “मी बसतो थोडा वेळ इथेच”, असं म्हणून बसून राहिला. आधी वाटलं बरं वाटत असेल कारण वरून संगमाचा नजारा खूपच सुरेख दिसत होता, म्हणून म्हणत असेल पण तसं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी त्याला मदत करून, हात धरून खाली आणण्या चा प्रयत्न केला पण बाबा काही यायला तयार नाही. शेवटी मी पुन्हा वर गेले, आणि मी आणि बाबा फिरून येतो असं सांगितलं. पण मंदार ला राहवलं नाही. पूर्ण खाली उतरलेला मंदार पण वर आला. वंदना ताई अर्ध अंतर उतरली होती, ती पण वर आली आम्ही सगळेच फिरून म्हणजे ३ किमी चक्कर मारून संगमावर गेलो. आहे की नाही मजा, इतकं थकलेलो असताना देखील आमच्या पैकी एकानेही ३ किमी फिरून जायला मागे पुढे पाहिलं नाही… कुठून येते ही शक्ती? कुठून येतात हे विचार?
संगमावर पाउल ठेवणं च खूप आनंद दायक होतं. पायाखाली मऊ सुत वाळू तळपायाला गुदगुल्या करत होती. पाणी तसं फार नव्हतं ओर नदीलापण नर्मदा मैला भरपूर पाणी होतं. एकीकडे अगदीच पाणी नाही आणि थोडं दूर नर्मदा मैयाकडे बघावं तर नावा चालताहेत! कमाल आहे की नाही? पण आहेच.. संगमाचं स्थान असच असतंय, विलक्षण. आम्ही आंघोळ करणार होतो पण उशीर होत होता. अंधाराच्या आत मुक्कामाला जायचं होतं आणि अजून कर्नाली तसं दूर होतं. आम्ही पुन्हा एकदा चहा घेतला आणि पुढे निघालो.
आम्ही कुबेर भंडारी बद्दल ऐकून होतो. कुबेराला इथेच धन प्राप्ती झाली होती असं म्हणतात. इथलं मंदिर खूप छान आणि श्रीमंत आहे असं समजलं होतं. संपत्तीची देवता ती, तिचा थाट काय साधासुधा असणारे? आम्हाला आता ते ऐश्वर्य बघायचं होतं. पण त्या आधी आमचा मुक्काम कर्नाली ला कुठेसा असणार होता. आम्ही रस्त्याने जात असता गुजरात च्या कर्नाली चे जुने दगडी वाडे बघत बघत जात होतो. आम्ही २०१७ मध्ये नसून १६०० च्या आसपास असू असं वाटावं इतके जुने वाडे आणि मंदिर तिथे होते, आणि मग एक मंदिर पाहीलं.. बाहेर छोटंसं…काय वाटलं देव जाणे, दर्शन घ्यावस वाटलं आणि पूजा-याला बोलावून दार उघडून दर्शन घ्यावं म्हणून त्या पूजा-यांना बोलवायला त्यांच्या घरी गेलो, तिथेच अगदी, मागेच मंदिराच्या… नंतर काय झालं ते म्हणजे चमत्कारा पेक्षा कमी नाहीच. आम्ही नंतर अक्षरश: हरवून गेलो… खूप आनंद ही झाला… थोडी भीती ही वाटली.. खूप गप्पा ही केल्या.. आणि खूप काही अनुभवलं देखील.. पण काय? ते सांगते पुढच्या म्हणजे ३९ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ३९*
*नर्मदे हर.*
तर भाग ३८ मध्ये मी उल्लेख केला होता कर्नाली च्या एका मंदिरा चा. एक छोटं मंदिर होतं. ते बघण्याची इच्छा होती म्हणून तिथेच मागे राहणा-या तिथल्या पूजा-यांना विचारलं. त्यांचं नाव शौचे गुरुजी. ते नाशिकचे राहणारे. आता योगायोग बघा. आम्ही अनेक मंदिर बघत बघत जात होतो. नेमकं हेच मंदिर बघावसं वाटलं. आणि इथले पुजारी ही महाराष्ट्रीय निघाले. त्यांनी चहा ला आत बोलावलं आणि तिथून जे काय सुरु झालं ते विलक्षण आहे. लाकडी जुन्या वाड्याचं दार उघडून आम्ही आत गेलो. आत समोर बघतो तो मुरालीधराचं मंदिर. काळीशार आणि देखणी मूर्ती. असं वाटलं आता बोलेल की काय इतकी रेखीव. ते सगळं वातावरण च असं जादुई वगैरे म्हणतात नं तसं होतं. थांबा, नीट वर्णन करते म्हणजे जस च्या तसं सांगता येईल मला.
तर दारातून आम्ही आत गेलो, ती एक पडवी होती. चौकोनाकार. त्या पडवी चं छत हे जुन्या बांधणी चं होतं. उंच अगदी. वर माळया सारखं काहीतरी लाकडी पाटी लावून तयार केलेलं होतं आणि त्यावर कौलं घातलेली. खाली दगडी फरशी. साधारण ८ फुट रुंद आणि बरीच मोठी ती पडवी. अंगणाच्या चारही बाजूला, आतून चौकोन करावा तशी. मध्ये हे मुरलीधर मंदिर. मंदिरा ला मोठा गाभारा. आणि बराच मोठा सभामंडपाचा भाग. त्या सभा मंडपात आणि पडवी मध्ये भले मोठे जाड जुद खांब, त्यावर सुरेख नक्षी कोरलेली. मंदिरा समोर तुळशी वृंदावन आणि गाभा-याच्या पुढे उभं राहिलं की येणारा मंद सुगंध. अरे हो, प्रकाश व्यवस्थेकडे विषेश लक्ष या बांधकामात दिलेलं आढळलं. सभा मंडपाच्या वरच्या बाजूला एक चौकोन आकाशाकडे मोकळा सोडलेला आणि सभा मंडपाच्या वरच्या माळ्यावर आपल्या कडे बालकनी असते ना तशा बालकनी दिसत होत्या चारही बाजूनी. या आकाशाकडे उघड्या असलेल्या चौकोनातून प्रकाश आत येणार आणि एरवी पडवी ला असलेली दारं उघडली तर. पडवी आणि मंदिरा च्या मध्ये एक चार फुट जागा सोडलेली होती, ती सुद्धा आकाशाला उघडी असणारी. म्हणजे खूप भक भक असा प्रकाश नाही की मरगळ वाटेल असं कोंदट वातावरण ही नाही. प्रसन्न आणि कमालीचं शांत. ही शांतता फक्त आवाज नसल्याची शांतता नव्हती,यात एक स्थीरता आणि एक गांभीर्य होतं. इथल्या भिंतीवर अनेक फोटो लागले होते. त्यात रामदास स्वामी, श्रीधर स्वामी, शिवाजी महाराज आणि किती तरी अनेक फोटो होते. या मंदिराच्या आत आम्ही आलो तेव्हा फक्त टीव्ही वर दिसणारे जुने वाडे काय ते बघितलेल्या आम्हाला आपण घड्याळ उलट फिरवून इथे आलो की काय असं वाटावं इतकं विलक्षण चित्र डोळ्यासमोर होतं.
मंदिराच्या मागून वर जाणारा लाकडी पाय-यांचा आणि उंच जिना चढून आम्ही वर गेलो. तिथे शौचे परीवाराचं वास्तव्य. अगदी साधी राहणी. गुरुजी कुणाला तरी वेद पठण शिकवीत होते. काकुंनी चहा केला. गप्पा झाल्यात आणि कुठे राहणार असं विचारल्यावर आम्ही चौघांनी ही इथेच राहू का म्हणून विचारलं. दोघांनी आनंदानी होकार दिला आणि आम्ही खाली पडवी मध्ये आसन लावलं. या वाड्याचा नक्की इतिहास माहित नाही मात्र शौचे यांच्याकडे तो २५० वर्षांपासून आहे. त्या आधी बडोद्याचे धायबर ( तिथल्या राज्यातील सरदार ) हे इथे राहत. यांनी हाच वाडा शौचे यांना इनाम स्वरूपात दिला असं समजलं. रात्री काकुंनी बटाट्याची भाजी कढी आणि पोळ्या / भात असा स्वयंपाक केला आणि आम्ही जेवून आसनावर आलो. रात्री मंदार ला नारायण धारपांच्या अनेक गोष्टी आठवल्यात.. वाडा तसाच होता मात्र इथे अतिशय शुद्ध कंपन असल्याने तशी भीती देखील वाटली नाही.
इथला एक अनुभव नक्की सांगेन. इथे श्रीधर स्वामी यांचा एक खूप प्रेमळ फोटो आहे. या फोटो कडे बघता बघता मला अचानक माझं लहान पण आठवलं. मी हा फोटो माझ्या लहानपणी बघितलेला. अगदी जुना, श्वेत धवल. आमच्या बेडरूम मध्ये कपाटाच्या बाजूला लावलेला होता. मी असेन ५-६ वर्षांची. मी त्या फोटोकडे रोजच बघायचे. अर्थात हे सगळं मला अचानक फोटो पाहून आठवलं होतं. मला आठवत होतं की मी खालून वर त्या फोटो कडे बघत असे. त्या फोटो मध्ये मला माझ प्रतिबिंब पण दिसायचं आणि महाराजांचा फोटो पण. मग माझा हा खेळ बराच वेळ चालायचा. मला त्या वेळी श्रीधर स्वामी हे नाव माहित नव्हतं. पण मला त्यांच्या तेजस्वी आणि प्रेमळ स्मित हास्याची नेहमीच ओढ असायची. मी मनातल्या मनात त्यांना हसणारे आजोबा म्हणायचे हे ही मला आठवत होतं. लहानपणी हे आजोबा मला खूप आवडायाचेत हे ही मला आठवत होतं. आणि या वाड्यात हे सगळे जुने फोटो बघून मला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चटकन आठवल्या की जश्या काही काल घडलेल्या गोष्टी आहेत आणि न राहावून मी आईला फोन केला. आईला हे सगळं सांगितलं. सगळं आठवल्याचं ही सांगितलं, आणि आई जे म्हणाली ते ऐकून मी चार फुट वर उडालेच. आई म्हणाली “आपल्याकडे कधीच श्रीधर स्वामींचा फोटो नव्हता… अगदी कधीच नाही…”
मग मला जे इतकं स्पष्ट आठवत होतं ते काय होतं? असं होणं अशक्य आहे! माझ्या डोळ्या समोर येणारे ते प्रसंग अगदी काल घडलेल्या गोष्टी सारखे समोर आले आणि एखादी खूप जुनी आणि आपली असलेली आणि आवडती गोष्ट खूप वर्षांनी आपल्याला परत मिळाली की कसा आनंद होतो नं तसा आनंद झाला मला. काही कळत नाही कारण मी कधीच श्रीधर स्वामींच्या उपासनेला आधी गेली नव्हते की कधी कुठे हा फोटो पाहिल्याचं आठवत नव्हतं. कारण दुसरीकडे कुठे ही मी तो फोटो इतका वेळ आणि इतका निरखून आणि इतका रोज रोज कसा बघेन?…. हा नक्कीच मला काहीतरी आठवण करून देणारा संकेत होता… काहीतरी होतं या मागे… आणि वाचकहो, परिक्रमा संपवून मी नागपूरला आले तेव्हा त्याचं उत्तर मिळालं. माझा एक खूप जुना मित्र मला अचानक व्हॅटस एप वर सापडला. मधली बरीच वर्ष अगदी काहीही संबंध उरला नव्हता त्याच्याशी.आमच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी सहज मला घरी बोलावलं. त्याच्या घरात पाउल ठेवलं तसे माझे डोळे भरून आले. त्याच्या घरी श्रीधर स्वामींचा हाच फोटो लावलेला आहे. त्याच्या कडे त्या वेळी स्वामींच्या पादुका यायच्या होत्यात, मी त्याला माझा अनुभव सांगितला आणि नंतर त्याच्या सोबत श्रीधर स्वामींच्या उपासनेला पण जाऊ लागले. त्याच्या घरी मला स्वामींच्या पादुकांच दर्शन पण झालं. माझ्या नकळत पणे स्वामींचे आशीर्वाद मला मिळत राहिले होते, आणि अजूनही मिळताहेत…आणि हाच तो संकेत असेल कदाचित.. “बाळ काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आधी ही होतो, आताही आहे, आणि पुढेही असणार आहे” एवढी जाणीव फक्त मला त्यांनी करवून दिली.. तीही कुठे तर गुजरात मधल्या कर्नाली ला शौचे यांच्या वाड्यात!माझ्या मागच्या जन्मीचं काहीतरी इथे येऊन पूर्ण झालं असं मला वाटून गेलं. खरच मी किती म्हणून भाग्यवान? मला नाना महाराजांसारखे गुरु मिळालेत, मला शंकर महाराजांचं दर्शन झालं, मला श्रीधर स्वामींचा आशीर्वाद मिळतोय… ही परिक्रमा म्हणजे माझा भाग्योदय आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही..
दुस-या दिवशी मुरालीधराच दर्शन घेऊन आम्ही कुबेर भंडारी ला आलो. इथे ही एक गंम्मत झाली.. मला कुणीतरी माझ्या नावाने आवाज दिला.. “ ओ सुरुचि ताई.. ओ ताई”.. इथे गुजरात मध्ये आम्हा चौघांखेरीज मला ओळखणार आहे कोण? ते एक साठीचे परिक्रमावासी होते. “ताई आपण तुमच्या परिक्रमेच्या दुस-या दिवशी मोरटक्का च्या पुढे भेटलो होतो, तुम्ही मला तुमची कविता वाचून दाखवली होती…त्यात तुम्ही नर्मदा माई बद्दल लिहिलंय! अभंग लिहिले आहेत नं तुम्ही? छानच लिहिलेयेत! लिहा लिहा.. भरपूर लिहा, आणि पाठवा बरं का मला” त्यांनी मला ओळख देण्याचा प्रयत्न केला खरा पण मला काही केल्या आठवेना, आणि गंम्मत अशी की त्या वेळी माझ्यासोबत असलेली एकही मंडळी आता सोबत नव्हती त्यामुळे काही शहा निशा ही करता येत नव्हती. पण एक नक्की सांगते, मी माझ्या परिक्रमेच्या दुस-या दिवशी पर्यंत नर्मदा माई वर एकही कविता केलेली नव्हती… अभंग तर मुळीच नाही…आणि मला हे खात्रीपूर्वक माहितीये कारण माझ्या प्रत्येक कवितेच्या खाली मी तारीख लिहिलेली असते. मग हे कोण होते मला आवाज देणारे? मी ते मैयावर सोडलं मात्र यातून एक संकेत मिळाला, अर्थात ते ही मला नंतर समजलं…ते काका मला नर्मदे हर करून निघून गेले. न त्यांनी फोन नंबर दिला नं घेतला, न पत्ता दिला न घेतला.. मग अभंग पाठवायाचे कुठे? आणि अभंग तर मी एकही लिहिला नाहीये?…आणि हेच काहीतरी माझ्या मनात कुठेतरी फिरत असेल म्हणून की काय, पण त्याच दिवशी रात्री मला चक्क अभंग सुचला..मी तो लिहून ठेवला, आणि कदाचित हाच तो संकेत… माई वर काहीतरी लिहित राहणे, कदाचित हीच माझी माझ्या नर्मदा माउलीला शब्द पुष्पांची भेट… पण हा अभंग मी तुम्हाला आताच देणार नाहीये.. नाही नाही पुढच्या भागात पण देणार नाही, पण देईल नक्की एक दिवस.
तर आम्ही कुबेर भंडारी चं ऐश्वर्य बघून चकित झालो होतो. लख्ख चमकणा-या त्या मूर्ती डोळयासमोरून हलत नव्हत्या मात्र आम्हाला पुढे जाणं भाग होतं. आता आमच्या चालण्याचा वेगही वाढला ओता आणि अंतरही. चुडेश्वर, मोरीया वगैरे गावं करत करत आम्ही तिलकवाड्याला पोहोचलो. माझ्यासाठी तिलकवाड्याला जाणं हे हे काही खूप वेगळं नव्हतं कारण मी फारसं त्याबद्दल ऐकलं नव्हतं. आम्ही हा प्रवास ब-यापैकी किना-याने केला होता, त्यामुळे असेल, पण चालून झालं होतं तरी तितकासा थकवा जाणवत नव्हता, हं थोडं फार थकायला होणं स्वाभाविक होतं. पण जस जसं तीलकवाडा जवळ जवळ येत होतं तसं तसं मन प्रसन्न होऊ लागलं होतं. वाटलं संध्याकाळ होतेय म्हणून असेल, मैया किनारी छान च वाटतं संध्याकाळी…. पण ते कारण नव्हतं, कारण वेगळं होतं. बरं ते कारण सांगण्या आधी एक अजून सांगते. इथे नर्मदा मैया उत्तरवाहिनी झाली आहे. आणि असे असल्याने इथे या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यांना पूर्ण परिक्रमा पायी करता येत नाही त्यांनी जर उतरा वाहिनी परिक्रमा केली तर पूर्ण पायी परीक्रमेचे फळ मिळतं. ही उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्रात असते आणि असंख्य भाविक ही परिक्रमा करत असतात.
तर आता तिलकवाड्या बद्दल सांगते. इथे विष्णू गिरी महाराज असतात, पण या वेळी माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही, मात्र तरीही इथे मी जे २ दिवस राहिले ते दोन दिवस फारच आनंदाचे होते. इथे संपूर्ण मोकळीक होती. आपलाच आश्रम असल्यासारखे मी इथे वावरत होते. या वेळी इथे बरेच परिक्रमावासी तर होतेच शिवाय सेवा द्यायला येणारे अनेक लोक होते आणि जवळ जवळ सगळे मराठी होते. मोठा काळ अमराठी राज्यामध्ये घालवल्या नंतर खूप सारे मराठी लोकं भेटलेत तेव्हा जाणवलं की किती दिवसात आपण मनमोकळं मराठी बोलेलोच नाहीये…इथे मला देवेंद्र (दीक्षित) दादा सारखा भाऊ मिळाला.खूप खूप छान वाटलं, पण यासाठी मला आधीपासून प्रसन्नता जाणवत होती असं नाही… मला जे काही इथे आल्यावर मिळालं तो पुन्हा एकदा एक संकेत होता. अत्यंत महत्त्वाचा. माझी परिक्रमा, माझं अस्तित्व, माझी श्रद्धा, माझा विश्वास माझं भाग्य.. सारं सारं उजळून निघालय हे सांगणारा संकेत. भालोद पासून खरं तर मला मिळत होता मात्र मला समजायला वेळ लागला होता. कारण भालोद पासून पुढे असं काही होत होतं की हा केवळ योगायोग नाही. पुढे चीखलदा ला तर कहरच झाला, पण तो नंतर सांगेन. आधी तिलकवाड्याला मी का ओढल्या जात होते ते सांगते, पण पुढच्या भागात…नर्मदे हर.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४०*
*नर्मदे हर.*
मी मागच्या भागात तिलकवाडा या गावाबद्दल बोलत होते. इथे मी जस जशी जात होते तसं मला फारच प्रसन्न वाटू लागलं होतं. सूर्य मावळतीला आलेला होता. सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला होता. मोठा पण कच्चा रस्ता होता आणि दूर वर हे गाव दिसत होतं. किना-या वरून आल्यामुळे आम्ही जरा वस्ती च्या दूर होतो. वंदना ताईनी आधीच फोन केला होता आणि आम्हाला घ्यायला शर्मा जी स्कुटी वरून आले होते. अर्ध्या रस्त्यात येऊन त्यांनी आमचं सामान आग्रहाने स्कुटी वर घेतलं आणि रस्ता दाखवून ते पुढे निघाले. अंधार पडायला आला होता. वाटेत चहा घेऊन आम्ही आश्रमात गेलो. इथे आमच्या आगोदर बरीच मंडळी येऊन पोहोचलेली होती. त्यातली काही परिक्रमावासी होती तर काही फक्त इथे भेट देण्यासाठी आली होती. आज अंधार पडून गेल्यामुळे हॉल बंद होता, आमचं दर्शन झालं नाही. रात्री जेवून आम्ही झोपलो मात्र दुस-या दिवशी सकाळीच आधी मंदिरात जाऊ असं वाटलं. आज कोण का जाणे भालोद च्या प्रतापे महाराजांची आठवण येत होती. ते म्हणाले होते मला, तू गरुडेश्वर ला आलीस की मला फोन कर, मी येईन तुला भेटायला. तिथली मोठ्या महाराजांची मूर्ती आठवत होती. मी आंघोळ आटोपून दर्शनाला गेली आणि बघते तर इथे ही मोठ्या महाराजांची मूर्ती.. ती पाहून मला गहिवरूनच आलं. काल उशीर झाल्यामुळे मी इथे येउ शकले नाही, आज मी इथे यायच्या आधी मला प्रतापे महाराजांची आठवण झाली.. काय पण नं किमया आहे सद्गुरु ची.. मी बाबाला म्हणाले होते कालच, “बघ, काहीतरी मला ओढतय” हो अगदी असं म्हणाले होते मी.. आज आठवण ही आली मला मोठ्या महाराजांची आणि आता इथे ही मूर्ती दिसली, “मला नं आता माझ्या गुरुंची आठवण येतेय, माझ्या नानांची आठवण येतेय”.मी बाबाला म्हणाले. बाबा काही न बोलता फक्त हसला, म्हणाला “आता तू रडणार आहेस”, आणि असं म्हणत त्यांनी माझ्या पाठीमागे बोट दाखवलं, मी वळून पाहिलं आणि खरच माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिथे माझ्या नानांचा फोटो होता. मी इथे आली तेव्हा इथे काही लोक बसले होते, त्यामुळे मला तो फोटो आधी दिसला नाही, मी मात्र बराचवेळ बसून होते, अगदी आम्ही दोघं फक्त उरलो होतो आत, जवळ जवळ तासभर बसलो असू आम्ही, आणि आता इतक्या उशिरा माझ्या अगदी बरोबर पाठीमागे नानांचा फोटो होता… मी खरच रडत होते, बघा न समोर माझ्या गुरुंचे गुरु, आणि पाठीशी सद्गुरू आणि नेमकं मी मध्ये बसलेली, आणि याच वेळी मला मोठ्या महाराजांची ही आठवण आली आणि माझ्या नानांची ही… हा संकेत होता मला… माझ्या वरच्या कृपेचा, माझ्याकडे माझ्या गुरुचं आणि मोठ्या महाराजांचं किती लक्ष असतं बघा.. . इथे मोठ्या महाराजांनी चातुर्मास केलाय, किती पावन असेल ही जागा, आणि इथे मला माझ्या नकळत असा संकेत मिळावा… पाठीशी गुरु माउली आणि समोर, म्हणजे मार्ग दर्शन करायला मोठे महाराज… अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो.. आणि म्हणून मी ओढल्या जात होते…मी अजूनही इथेच बसले होते… बाबा मात्र उठून बाहेर गेला होता… आणि आता बाबाच्या रडण्याची वेळ आली होती…सांगते..
बाबा बाहेर गेला तेव्हा बाजूला एक हनुमानाचं मन्दिर आहे तिथे जाऊन आला. “खूप छान आहे हनुमानाचं मंदिर, लवकर चल, बंद होइल ते थोड्या वेळात” बाबांनी मला आग्रह केला आणि मी गेले पण. तिथेही खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही तिथे बसून वडवानल स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा म्हंटली, थोडा वेळ बसलो आणि बाहेर आलो. बाबा म्हणाला, “आज दासबोध वाचूयात का?” पण हे मंदिर दुपारला बंद होणार होतं, आम्ही अजून एक दिवस इथेच थांबणार होतो, म्हणून ठरलं उद्या वाचूयात, याच मंदिरात. असं ठरवून आम्ही बाहेर आलो, तोच ते मंदिर बंद करणारा पुजारी आला. आम्ही त्यांना विचारलं, “उद्या दासबोध वाचायचा विचार आहे थोडा उशीर झाला तर चालेल का? “ते पुजारी जे बोलले ते ऐकून आता बाबा रडू लागला.. बाबा चा दासबोधाचा बराच अभ्यास आहे आणि रामदास स्वामी हेच त्याचं आद्य दैवत. दासबोध प्रचार कार्यात बाबा कायमच असतो. आणि इथे बाबा ला दासबोध वाचावासा वाटला .. हम्म, तर ते गुरुजी काय म्हणाले माहितीये का? ते म्हणाले, “ अहो नक्की वाचा दासबोध, कितीही वेळ लागला तरी चालेल, तुम्हाला सांगतो, ह्या मारुतीची स्थापना स्वत: रामदास स्वामींनी केली आहे”.. आता सांगा का नाही रडू येणार बाबा ला? दुस-या दिवशी आम्ही दोघांनी तिथे बसून संपूर्ण दासबोध वाचला.
या तिलकवाड्याला कमालच झाली नाही? आम्हा दोघांनाही आमच्या गुरुंनी अश्या प्रकारे शुभ संकेत दिलेत आणि आमच्या कडून योग्य ते कार्य करवून घेतलं. आता दोघांनाही अश्या म्हणजे एकाच प्रकारचा अनुभव एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी येणं याला तुम्ही तरी योगायोग म्हणाल का? मी तर नक्कीच नाही म्हणू शकणार. भालोद नंतर थोड्या थोड्या दिवसांनी असे अनुभव येत राहिले, म्हणजेच गुरु आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत तेव्हा त्यांचे संकेत समजून घ्यावे, बाकी काय करायचे ते ते बघतील, आपण आपलं समोर येईल तशी परिक्रमा करत राहावी हेच आम्ही ठरवलं.
आता इथून पुढे गरुडेश्वर, म्हणजे पुन्हा मोठ्या महाराजांच स्थान!.. इथे काय नवीन पदरात वाढून ठेवलंय ते बघायला आता मन आसुसलं होतं. पुन्हा एक योगायोग झाला. माझी एक मैत्रीण गरुडेश्वर ला येतेय असा तिचा फोन आला आणि त्याच संध्याकाळी मी आणि बाबा गरुडेश्वर ला निघालो. वंदना ताई ला आणि मंदार ला पण विष्णू गिरी महाराजांची भेट घ्यायची होती म्हणून ते इथेच थांबले. मंदार ला जुने सोबती पण इथे मिळाले होते एक विष्णू राउत आणि दुस-याचं नाव आता आठवत नाहीये. त्याला सोबत होती आणि वंदना ताईचे यजमान येणार होते त्यामुळे तिला ही सोबत होतीच. इथे हा आम्हा चौघांचा गट तुटला, आम्ही पुढे निघालो.
गरुडेश्वर ला पोचलो आणि तिथल्या ऑफीस मध्ये गेलो. रूम मिळेल का विचारलं तेव्हा १५० रुपये लागतील असं सांगितलं. आम्ही तयार झालो, आता डायरीत नावं लिहिणे बाकी होतं, तोवर जरा गप्पा झाल्यात. बाबानी नाव पत्ता वगैरे लिहिला आणि मी पैसे द्यायला पर्स बाहेर काढली तर तिथले कर्मचारी म्हणाले “पैसे नकोत”… ”आताच तर १५० रुपये म्हणाला होतात तुम्ही” मी विचारलं. ते म्हणाले “ तुम्ही नाना महाराजांच्या शिष्या आहात, पुरेसं आहे”. त्यांनी आमच्या कडून एकही रुपया घेतला नाही. ती रात्र निवांत गेली.
मी प्रतापे महाराजांना फोन लावला. ते मला भेटायला येणार होते. ते येईपर्यंत मी इथून पुढे निघणारच नव्हते, कारण याच्या पुढे मला त्या माउलीची भेट पुन्हा कधी कुठे घडेल हे माहित नव्हतं आणि मी आतुरतेने वाट बघत होते. तो दिवस ही गेला. म्हणजे आता तिसरा दिवस होता आमचा गरुडेश्वर चा. मला सकाळी सकाळी प्रतापे महाराजांचा फोन आला, “ बेटा, मी येतोय आज”.. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.. अगदी लागलीच सगळी तयारी, आरती पूजा सगळं आटोपून मी मैया किनारी जाऊन महाराजांची वाट बघू लागले. आता मला त्यांच्या भेटी शिवाय काही नको होतं. पण मी निदान चहा तरी प्यावा म्हणून बाबा मला हट्टाने तिथून घेऊन गेला… माझा चहा संपत नाही तो दुरून मला नाव येताना दिसली.. कुणी तरी म्हणालं, प्रतापे महाराज येताहेत…हातातला चहाचा कप मी तसाच ठेवून अक्षरश: धावत सुटले… मी त्यावेळी कशी आणि किती जोरात धावले याचं भान मला नव्हतं मात्र मी जी धावत गेले ते महाराजांच्या पायावर डोकं ठेवूनच शांत झाले…: अगं हळू बेटा, हळू…” असं म्हणत महाराजांनी प्रेमानी मला जवळ घेतलं आणि लहान मुल आईला भेटून कसं बिलगतं तिला, आणि आनंदानी त्या बाळाला कसं रडू येतं तसं झालं होतं मला. मला कश्या कश्याच भान नव्हतं. माझी माउली फक्त माझ्यासाठी धावत आली होती. खरं तर आज महाराजांकडे भालोदला ३० लोक जेवायला यायचे होते. असं असताना देखील ते फक्त माझ्यासाठी नर्मदा माई ओलांडून मला भेटायला आले होते.
मोठ्या महाराजांच्या पायावर घालायला म्हणून त्यांना नुकताच मिळालेला “जीवन गौरव” पुरस्कार ही त्यांनी आणला होता. आम्ही मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि तो पुरस्कार प्रतापे महाराजांनी पूजा-यांकडे दिला, मोठ्या महाराजांच्या पायाला लावून तो आता परत घ्यायचा होता. तेव्हा प्रतापे महाराज पूजा-यांना म्हणाले “ हा महाराजांच्या पायावर घातलेला पुरस्कार माझ्या हाती न देता माझ्या ह्या लेकीच्या हाती द्या, तिलाही असाच पुरस्कार मिळायचा आहे असा आशीर्वादच आहे तिला” हे ऐकून तर मी खरच भाग्यवान आहे याची मला खात्रीच पटली. महाराज पुढे म्हणाले “बेटा, तुझ्या सगळ्या जवाबदा-या पूर्ण झाल्या की तुला मालासामोट ह्या आदिवासी क्षेत्रात काम करायचय, आणि तोवर तुला जितकं शक्य असेल तितकं समाजा साठी काहीतरी करावस तू.. करशील, खात्री आहे माझी” मला जाणवलं की महाराजांचा माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम खरच किती गाढ आहे, एका माउली शिवाय ते तसं असूच शकत नाही. पण मला बरेचादा खंत वाटते की अजून तरी मी काही करू शकत नाहीये, पण करेन नक्की.. नर्मदा माई, माझे गुरु, आणि ही माउली हेच मला योग्य वेळी योग्य दिशा दाखवतील हेच खरं. असो.
आता गरुडेश्वर ला काल मंदार,आणि पराडकर काका पुतण्या येऊन पोचले होते. गरुडेश्वर पासून ते पुन्हा आमच्या सोबत असणार होते. आता मंदार, सुदिन,पराडकर काका, मी आणि बाबा असे ब-यापैकी सोबत होतो. थोडंफार मागे पुढे व्हायचो पण तसे सोबतच होतो. त्या संध्याकाळी मैया किनारी आरती पूजा आटोपून आम्ही झोपी गेलो आणि सकाळी लवकर पुढच्या प्रवासाला निघालो. आता इथून पुढे गुजरात मधून पुन्हा एकदा मध्य प्रदेशात प्रवेश करायचा होता. गुजरात ची श्रीमंती सोडून आता पुन्हा एकदा या गरीब पण मनाने मोठ्या असलेल्या लोकांच्या देशात काय काय अनुभव येतात हे बघण्यासाठी आम्ही तयार होतो. या वेळी पर्यंत मैया आपल्याला आता काय दाखवते? हा एकाच प्रश्न असायचा, बाकी काहीही नाही. जे येईल ते समोर ताट मांडल्या सारखं जेवून घ्यायचं आणि त्यातून नकळत पणे मिळणा-या आनंदाच धनी व्हायचं इतकच आम्हाला माहित.
इथून पुढे वगाच ला जायचं होतं. इथे लोकांना विचारून विचारून पुढे जायचं, तर आम्ही ७ किमी वाट चुकलो आहोत हे लक्षात आलं. आता ७ किमी मागे जाणं शक्य नव्हतं म्हणून पुढे गेलो आणि एका पोलीस स्टेशन ला रस्ता विचारला. पोलिसांनी रस्ता ही सांगितला आणि चहा ही पाजला शिवाय “ माताजी आपको फ्रेश होना है तो यही हो लो, आगे जगह नही मिलेगा” असं ही सांगितलं. तिथे एक गेस्ट रूम होती तिथे मी फ्रेश झाले आणि आम्ही पुढे निघालो. परिक्रमावासी म्हटलं की लोक आपणहून पुढे येतात मदतीला हे काही आता नवीन नाही.
आम्ही पुढे निघालो. आजचा दिवस तसा प्रसन्न होता आणि आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. अजून आमचं बालाभोग करून झालं नव्हतं. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये थांबलो असताना मंदार, सुदिन आणि काका पुढे गेले होते पण फोन वर आम्ही बोलत होतो त्यामुळे ते कुठे थांबलेत याचा अंदाज मिळत होता. “ या तुम्ही लवकर, बालाभोग करून पुढे जाऊ” सुदिन चा फोन झाला होता. रस्त्यात आम्हाला एकाने क्रीम चे बिस्कीट दिले आणि तिथे एक छोटीशी मैया माझ्या हातातल्या बिस्कीटाकडे बघून रडू लागली. मी ते बिस्कीट तिला दिले आणि तिच्या आईने लगेच आम्हाला १० बिस्किटाच्या पुड्याचा एक मोठा पुडा दिला.. अगदी नाही नाही म्हणता ना देखील! मैयाचं हे असच आहे.. *तुम्ही तुमच्यातल अगदी तिळभर द्या कुणाला काढून, ती तुम्हाला मणभर परत करेल*, कितीदा तरी अनुभवलंय हे.. अगदी तिथेच पुढे पुन्हा असाच अनुभव आला. एक कुणी परिक्रमावासी रिक्षाने जाणार होता. त्याच्याजवळ सुटे पैसे नव्हते म्हणून त्याने आमच्याकडे सुटे आहेत का विचारलं. माझ्याकडे २० रुपयाची नोट होती, ती मी दिली, “तो म्हणाला मला ५ रुपयेच हवे आहेत, सुटे हवेत फक्त” मी ही त्याला म्हणाले “ चाय पी लेना बाबाजी”, आणि आम्ही पुढे निघालो. एका दुकानात आम्हाला चहा ला बोलावलं. आता आम्हाला खरच चहा नको होता, “ बोहोत चाय होगया बाबूजी, आप पानी पिला दो” असं म्हणत आम्ही चहा ला नकार दिला तर या माणसाने अर्धा लिटर दुधाचं पाकिटच आमच्या हाता ठेवलं! आम्ही त्या बाबाला चहा ला पैसे दिले होते, मैयांनी आम्हाला ते असे परत केले. अश्याच प्रकारचा एक विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव बाकानेर च्या नंतर कल्याण पुरा लागतं तिथल्या लाल पुरी महाराजांचा, पण तो आता सांगणार नाही. आपण काल्याणपुराला पोहचू तेव्हा सांगेन. मी विसरले तर आठवण करून द्या मला मंडळी. खरं सांगू का, जेव्हा मी हे अनुभव लिहिते नं तेव्हा मला तुम्ही समोर बसून ऐकताय असच वाटतं, आणि म्हणून हक्कानी तुम्हाला मी मला आठवण करून द्या असं ही सांगते.. असो.. तर कल्याण पुरा चा अनुभव नंतर..
आता आपण सुदिन आणि मंडळी थांबली तिथे बालभोगा साठी पोहोचलो. खूप भूक लागली होती. जलेबी पोहा ची ऑर्डर देऊन झाली होती. आमच्या कडचं दुधाचं पाकीट आम्ही त्या दुकानदाराला दिलं, कारण आम्ही दुध पिणार नव्हतो आणि तसं ठेवून ते नासून गेलं असतं, आम्हाला तर आता भरपूर बालभोग करायचा होता. आधी पोहे झाले २ २ प्लेट, मग जिलेबी पण खाल्ली आम्ही, आणि नंतर पैसे विचारले तर हा माणूस घेईना…अरे देवा, इथल्या इथे असा हा तिसरा अनुभव, पण त्याचे पैसे बरेच झाले असावेत, पराडकर काकांनी त्याला पोह्याचे पैसे घ्यायला लावलेत, जिलेबीचे मात्र त्याने घेतले नाहीत… आम्ही पुढे निघालो आणि आता पुढे “पैसे घेणार असशील तर ऑर्डर देतो” बाबा असं विनवून मगच ऑर्डर द्यायची असं ठरवलं आम्ही. कुणी स्वत:हून दिलं तर एकवेळ सेवा म्हणून ठीक आहे पण बिचा-या गरीबाचा धंदा असताना इतकं मोठं बिल न देणं हे काही योग्य नाही हो वाटत!..
असो आम्ही वाडिया, खापरिया, उन्डवा करत करत पुढे गेलो.. उन्डवा पासून नर्मदा केनल लागतो, याच्या काठा काठांनी जा असं आम्हाला सांगण्यात आलं, पण भला मोठा रस्ता हा, संपता संपेना.. प्रत्येक पुला पाशी पोहोचलं की कुणीतरी सांगायचं, “ये नही अगले पूल के पास गाव है, तो अगला पूल काही यायला तयार नाही. अहो संध्याकाळ होत आली तरी राहण्यासारखं काही ठिकाण सापडेच ना! इथे काहीच नव्हतं आणि, एखाद दुसरं सर्किट हाउस … बस.. आज आमचं आधीच ३७ किमी चालून झालं होतं तरीही अजून काही सोय होत नव्हती.. मग राहण्याचं ही अजून माहित नाही तर जेवणाच काय झालं असेल आमच्या? झाली असेल का काही सोय? की रस्त्यावरच झोपायला लागलं आज आम्हाला? सांगते, मात्र ४१ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४१*
*नर्मदे हर.*
मागच्या भागात मी तुम्हाला नर्मदा कँनाल बद्दल सांगितलं होतं. लांबच्या लांब काढलेला हा कँनाल काही केल्या संपेना.आमचं आधीच ३७ किमी चालून झालं होतं. अगदी रस्त्यावर झोपावं लागलं तरी चालेल पण आता अजून चालायला नको होतं आम्हाला. आम्ही सगळेच थकलो होतो. शेवटी आम्ही खोडीयार नावाच्या एका गावात थांबलो, इथे जागा शोधू लागलो. चालता चालता सुदिन ला एक मंदिर दिसलं. आता भिक्षा मागू आणि इथेच राहू असं ठरलं. पण ते मंदिर कुणाचं तरी खासगी मंदिर होतं. तेव्हा तिथे अनुमती घेणं गरजेचं होतं. सुदिन आणि मंदार पुढे गेले, त्यांनी त्या घरी चौकशी केली. वर वर पाहता हे काही शक्य होणार नाही असं वाटत होतं कारण ह्या घरासमोर बसलेले गृहस्थ आमच्या कडे बराच वेळ पासून बघत तर होते मात्र त्यांनी एकदाही आम्हाला बोलावलं नाही किंवा स्वत:हून ते बोलले देखील नाही. आम्ही जागा शोधतोय हे त्यांना माहित होतं खरं, त्यामुळे ते काही परवानगी देतील असं वाटत नव्हतं. आम्ही भोजन प्रसादीची अपेक्षा तर सोडून च दिली होती. निदान रात्र काढायला डोक्यावर छत मिळावं बस!
सुदिन आणि मंदार त्यांच्याशी काय बोलले माहित नाही पण आम्हा सगळ्यांना चहा प्यायला त्यांनी आत बोलावलं.. व चहा झाला, आता जेवण नसलं तरी चालेल, आता बस अंग टाकलं की झालं… खूप थकवा आला होता आज, पहिल्यांदाच आज ३७ किमी चालण झालं होतं. तिथल्या मंदिरात मी कुणालाही न विचारता सामान ठेवून दिलं. तेव्हा कुणी काही म्हणालं नाही. मग मात्र सरळ सरळ इथे मंदिरात राहू का असा प्रश्नच विचारला आम्ही. “ आपके भोजन का क्या?” त्या काकांनी विचारलं, त्यावर सुदिन म्हणाला “ हमे जो मिलेगा वो खा लेते है, खिचडी भी चलती है”, त्यावर ते काका म्हणाले हम भिल जाती से है… ते ऐकून समजलं की हा माणूस आम्हाला आत का बोलावत नव्हता. आम्हाला जातीपातीचं काही नाही हे समजल्यावर मात्र तो बोलका झाला. ते इथलं मोठं प्रस्थ. कांतिलाल भिल असं त्याचं नाव. पूर्व विधायक होता तो. त्याची मुलं बाळं शिकली सवरलेली होती. ऐसपैस मोठं घर होतं. मग त्यांनी आम्हाला समोरच्या खोलीत बसायला सांगितलं. माझे पाय दुखताहेत म्हटल्यावर एका बादलीत मिठाचं गरम पाणी आणून दिलं मला. गरम पाण्यात पाय शेकून होईस्तोवर घरातल्या माताजींचा स्वयंपाक पण तयार झाला. मिक्स भाजी, कढी, खिचडी, मक्याचे वडे आणि खीर असं चवदार आणि पोटभर जेवण झालं. मंदिरात आसन लावायला एक मोठी सतरंजी देखील त्यांनी दिली आणि अशा प्रकारे काहीही अडचण न येता मैयांनी आमची व्यवस्थित सोय केली. दुस-या दिवशी पोह्यांचा बालभोग करून इथून पुढे निघालो.
आज तरी वगाच ला पोहोचण गरजेचं होतं. अंतरही तसं फार नसलं तरी २५ किमी होतंच. काल आम्हाला निवा-या साठी जागा शोधावी लागली होती, ते तसं आज होऊ नये असं आमच्या मैयाला वाटत असावं. आमची कालची वणवण तिला बघवली नसावी आणि आम्ही त्या बद्दल तिला अवाक्षरानेही तक्रार केली नव्हती म्हणून असेल कदाचित, आज आम्हाला निवा-याला छान जागा मिळाली होती. सकाळ च्या चालाण्या नंतर आम्ही एका शिव मंदिरात आराम केला आणि छान चहा आणि फुटाणे खाल्ले. थोडे खारे दाणे ही होते, ते ही खाल्ले. आमचं सकाळ चं जेवण हेच. लांबच लांब रस्ता होता. वाटेत आम्हाला एका माणसानी गाडी थांबवून नर्मदे हर केलं. तो म्हणाला “ यहा आगे मंदिर है, वाहा आओ आप, मै भी पोहोचता ही हु” त्याला शेतावरून माल पाठवायचा होता पुढच्या गावात, पेरू होते त्याच्या जवळ. आम्हाला ही त्यांनी भरपूर पेरू दिलेत. त्याचं काम करून तो परतला तोवर आम्ही धोबीघाट काढला होता. आज मी सगळ्यांना कामाला लावलं होतं. मी सगळ्यांचे कपडे धुवून दिले होते आणि पिळून वाळत टाकायचं काम ज्याचं त्याचं ज्यांनी त्यांनी करायचं. एका नळावर आम्ही सगळे टीम वर्क नी कपडे धुवत होतो. खरच ते कपडे धुण्याच काम सुद्धा किती एन्जाॅय केलं आम्ही.
असं करत करत आम्ही छापरीया , कवाट करून हाफेश्वर ला जायचं ठरवलं. आज कवाट ला खूप दिवसांनी इथे खानावळीत जेवलो. दुस-या दिवशी हाफेश्वर ला गेलो. तिथे महिलांसाठी कपडे बदलायची काहीही सोय नव्हती. पण स्नान तर करायचं होतं. हाफेश्वाराचा कळसही आता दिसत नाही. हे मंदिर पूर्ण पणे पाण्याखाली गेलं आहे. आपले तीर्थ असे पाण्याखाली जाताना पाहून फार हळहळल वाटते. चीखलद्या च मंदिर, शुलपाणेश्वराच मंदिर, राजघाट चं मंदिर.. कितीतरी क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे हे खरं तर फार मोठं नुकसान आहे आपल्या संस्कृतीचं. असो
तर हाफेश्वराला स्नान केलं खरं पण आता कपडे बदलायाचे कुठे?, तिथे न झाडी न खोल्या
न काही. मी तशीच ओल्या कपड्यांनी जागा शोधात असताना मला एक जागा सापडली. एक कार उभी दिसली, त्या कारच्या मागे जाऊन कपडे बदलायचं मी ठरवलं. कार मध्ये कुणीही नव्हतं, मात्र कार च्या मागे अजिबात जागा नव्हती. तिथे खाली मैया पर्यंत फक्त खोल उतार होता. पुरुष मंडळी चं आवरणं सुरु होतं आणि त्यांचं आटोपायाच्या आत मला माझं आवरण गरजेचं होत… हा उतार बराच सरळ उतार होता, म्हणजे टेकडीच्या उतारावर थोडी उभं राहायला जागा, बाकी काही नाही. तिथली माती ही भुसभुशीत, म्हणजे जरा पाय घसरला की मैया मधेच जाणार मी….. पण तिथे एक झाड होतं, त्याची एक फांदी जमिनीवर आडवी आलेली होती. आणि एक दगड होता मोठा, त्यावर मी बसू शकत होते. ती फांदी माझे कपडे ठेवायचा स्टेन्ड झाली आणि तो दगड म्हणजे माझ्या ड्रेसिंग टेबल चा स्टूल. मला सावध असणं गरजेचं होतं. मी माझी लुंगी झाडावर टाकून आडोसा तयार केला आणि अगदी सावकाश तयार झाले. इतकं सावकाश मी या आधी कधी ही तयार झाले नसेन. इथे आरसा नव्हता, सौंदर्य प्रसाधनं नव्हती तरीही स्त्री सुलभ आनंद काही कमी झाला नाही. किंबहुना अगदी सावकाश तयार होण्यात पण मजा असते याची प्रचीती झाली……. हा झाला विनोदाचा भाग, पण खरच सांगते, त्या दगडाचा काय तो आधार होता. माझ्या ओल्या कपड्यांमुळे तिथे जरा पाणी पाणी झालंच होतं आणि अशात तोल जाणं, किंवा पाय घसरणं सहज शक्य होतं. मदतीला कुणीही नाही, मदतीलाच काय तर मी पडले तरीही कुणाला सांगू शकणार नाही इतकी मी दूर होते… मन शांत ठेवून धीराने आणि संयमाने माझं आटोपून मी जेव्हा वर आले तेव्हा एकदा खाली वाकून पाहिलं तर माझं मलाच आश्चर्य वाटलं… अश्या जागेवर ओल्या कपड्यांनी उतरण्याच धाडस माझ्यात आलच कस कोण जाणे! असो.. झालं एकदाचं.
इथून पुढे आम्ही बखतगड मार्गे मध्य प्रदेशात शिरलो. हे क्षेत्र अत्यंत गरीब आहे. पण मनाची श्रीमंती बघाल तर धनाच्या श्रीमंताना लाजवेल अशी. साकडी चा अनुभव असाच आला आम्हाला पण त्या आधी काजळ माता मंदिरा बद्दल सांगते. अनुभव म्हणून नाही पण, वाटतंय सांगावसं. इथे आश्रम तर छान होता. आजूबाजूला काही नाही. आश्रमात एक देऊळ होतं देवीचं. इथले बाबा जरा वेगळेच होते. त्यांचे नियम खूप, आणि ते पाळले जाताहेत की नाही याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. दिसायला ही हे बाबा जरा विचित्र दिसतात. त्यांचा एक डोळा मधेच बारीक होऊन जातो बोलता बोलता. आणि मुळातच त्यांच्या चेह-यावर अति चाणाक्षतेचे भाव होते. ते सतत काहीतरी प्लॅनिंग करताहेत असं वाटायचं. सुदिन नी तर त्यांना “झोल बाबा” असच नाव दिलं होतं. तिथे असलेल्या स्टाफ ला त्यांची भीती वाटते हे उघड उघड दिसत होतं. तिथे अनेक परिक्रमावासी होते, सगळे पुरुष मी एकटीच माताराम. ते बाबा मला म्हणाले “माताराम आप अंदर रूम मे आसन लगाव, बाकी लोग बाहर सोयेंगे” मी चक्क नाही म्हणून सांगितलं. “मै अकेले अंदर नही आसन लगाउन्गी, जहा मेरे साथवाले है मै वही रहूंगी” इथे त्यांच जरा गाडं अडलं. त्यांना मी बाहेर झोपलेलं नको होतं आणि मी आत एकटी आसन लावायला तयार नाही. जेवणं झाली, भजनं झाली सगळं सगळं झालं ..पण मी अडून राहिले .शेवटी त्या बाबांनी आम्हा पाचही जणांना आता आसन लावू दिलं. मैया आपलं रक्षण करतेच पण एक स्त्री म्हणून आपण जागरूक असलेलं बरं… त्या बाबांना काय वाटलं माहित नाही पण दुस-या दिवशी सकाळी त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. “ हम किसी के खोली मे नाही जाते बाबाजी, जो बोलना है यही से बोलिये” मी दारातच उभं राहून आवाज दिला. ते बाबाजी उठून बाहेर आले. मला एक टिकली च पाकीट देऊन नमस्कार केला, म्हणाले “मेरे लिये तुम माता समान ही हो, तुम्हारा सम्मान करना था इसीलिये अंदर बुला रहा था”… मला वाईट काही अनुभव आला नाही, मैयांनी मला वेळोवेळी जागरूक राहण्याची बुद्धी दिली. ते साधू नसतील ही वाईट, पण मी सावध असणं गरजेचं आहे अन होतं ही.
उमरी च्या काजल माता मंदिरातून पुढे निघालो. हा भाग जरा जास्त खडकाळ आणि रुक्ष आहे , इथे आराम करावा म्हंटल तर मोठी झाडं पण नाही. सकाळी प्रचंड थंड आणि दुपारी ब-यापैकी गरम असं काहीसं हवामान. अगदी उन्हाळ्या सारखं गरम नसलं तरी पाठीवर ओझं घेऊन चालायचं काही तितकंसं सोपं नाही. आम्ही आपलं चालतोय चालतोय सकाळ पासून काही पोटात नाहीये, जवळचं पाणी पण संपलय आणि इथे दूर दूरवर काही दिसत नाही. एखादी हापशी पण नाहीये इथे. उंच पठारासाराख्या भागावर चढत जायचं, दोन्ही भाजुला खोलगट भाग आणि मधून वरून रस्ता. असलीच एखादी झोपडी तर ती खाली खोलगट भागात.. कधी एकदा हा भाग संपतो असं वाटू लागलं. थोड्या वेळाने रस्त्यात एक बस स्टॉप लागला. आम्ही चक्क २ तास इथे झोपलो होतो. या वेळी आमची म्हणजे माझी-बाबाची आणि मंदार व कंपनीची चुकामुक झाली. त्यांना कुणीतरी जेवायला बोलावलं आणि ते थांबले, आम्हाला ते दिसले नाही म्हणून आम्ही पुढे निघून गेलो. आज आम्ही उपाशीच राहू की काय असं वाटलं, पण असं होत नाही. पुढे एका घरी आम्हाला ही भोजन प्रसादी ला बोलावलं. पण या घरी राहण्याची व्यवस्था होऊ शकणार नव्हती. आणि तसंही अजून जेमतेम दुपार होती. आम्ही जेवून पुढे निघालो आणि चालू लागलो. इथे रस्त्यात आम्हाला एक पिवळी साडी नेसलेली बाई भेटली, म्हणाली “साकडी मे रुकने की व्यवस्था है छकना भगत के घर”. ती बाई माझ्या विशेष लक्षात राहिली कारण तिचं नागाच्या आकाराचं मोठं कुंकू. नाकापासून तर अगदी केसा पर्यंत तिनी ते कुंकू लावलं होतं. तिचे डोळे अगदी गोल आणि मोठे होते आणि तिच्या साडीचा रंग अगदी भडक पिवळा असा होता. हे आता सांगायचं कारण असं की ही बाई आधीही आम्हाला रस्त्यात दिसली होती आणि हसली होती आमच्याकडे पाहून. पण तेव्हा तिची विचित्र वेशभूषा एवढं कारण पुरेसं होतं, आणि आता आम्ही जवळ जवळ १०-१२ किमी पुढे आल्यावर पुन्हा ती बाई कशी काय दिसली आम्हाला? कारण ती बाई पण पाई होती आधीच्या भेटीत आणि आमच्या विरुद्ध दिशेला चालत होती…. हे शक्य नव्हतं पण काही गोष्टी आपल्याला नाही समजत, त्या पुढे समजतात…ह्याचा उलगडा मी पुढे सांगणार आहे.
छकना भगत चं घर शोधत शोधत आम्ही निघालो. बरच अंतर चालून आल्यावर समजलं की आताशा कुठे साकडी आलंय आणि ह्या छकना भगत च घर तर अजूनही ७ किमी दूर आहे. आता पायातली ताकत संपली होती. जरा विश्राम तरी करावा म्हणून आम्ही जागा शोधात होतो तेव्हा एका घराच्या अंगणात एक गोठा दिसला. मी पुढे होऊन विचारलं, “ यहा थोडी देर विश्राम कर सकते है” एक छोटीशी, १०-१२ वर्षाची मैया होती (परिक्रमेत आपण कोणत्याही स्त्री ला मैया, माताराम, माताजी असं च संबोधतो), तिनी आपल्या भावाला बोलावलं, आणि त्यांनी तिथे विश्राम करण्याची परवानगी दिली. चहा पाजला. मला तर इथून उठावसंच वाटत नव्हतं. पराडकर काका , सुदिन आणि मंदार मागे होते, तासाभरात ते ही पोहचले. आज काही इथून पुढे जायची इच्छा होईना. घर तसं गरीब होतं. आम्ही गोठ्यात राहायला ही तयार होतो. सगळ्यांची अवस्था एकसारखी होती. शेवटी मी त्या मुलाला , मैया च्या भावाला विनवलं. आज आम्हाला इथे राहू दे. आम्हाला काही नको, फक्त एक सतरंजी दे खाली घालायला बस….नैकू सास्ते त्याचं नाव, जातीचे पावरा हे लोक. त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं, लाल्या सास्ते पावरा, त्याचं उत्तर एकून खूप वाईट वाटलं. ते म्हणाले “ रहने को कुछ नही समस्या, पर हम गरीब है, आपके लिये बोहोत नही कर पायेगे” आम्हाला काही नको होतं, फक्त आता आराम करायचा होता बस. आम्ही म्हटल, कोई बात नही, हमे कूछ नही चाहिये.
आम्ही त्या घराची अवस्था बघत होतो. त्यांच्याकडे ८ अपत्य होती. त्यातल्या मोठ्या मुलाला त्यांनी शिकायला नंदुरबार ला ठेवलेलं. आणि घरी फक्त शेती, ती ही अश्या खडकाळ भागात! वडील थोडं फार टेलरिंग चं पण काम करत. मुली होत्या ६, त्यातल्या ५ मुलींची लग्न अजून बाकी होती. मोठी मुलगी पण माहेरी आली होती काही दिवसांसाठी…आणि भरीस भर आता आम्ही ही आलो होतो. दोन वेळच जेवण कठीण आणि त्यात घरी पाहुणे, तेही न ओळखीचे न काही…आम्ही ठरवलं, रात्री फक्त चहा प्यायचा बाकी चं उद्या पाहू… पण आपल्या ठरवल्याने काय होतंय?
आमची आरती आणि श्लोक आटोपले. आम्ही आरती करत असताना घरातील सगळी आणि आजूबाजूची ही काही मंडळी जमा झाली होती. आमच्या घरात समोरच्या खोलीत आरती करा अशी नैकू नी मागणी केली होती. त्याप्रमाणे आम्ही आत आरती आणि रोज चे श्लोक म्हंटले. त्यात नर्मदाअष्टक, रामरक्षा, भीमरूपी, हनुमान चालीसा, संकटोद्धारण स्तोत्र आणि मैयाची आरती असं असायचं. हे सगळं होईस्तोवर सर्व मंडळी बसून राहिली. त्यांच्या चेहे-यावरचं समाधान स्पष्ट दिसत होतं. आता आम्ही आमचं सामान घेऊन पुन्हा बाहेर जाणार तर लाल्या जी आम्हाला म्हणाले, “ अंदर ही आसन लगाव, भोजन मी चावल बनादू?” आत आसन लावायचं ठीक, पण भोजन करायचं नाही असा विचार होता… पण लाल्या आणि लाल्याची बायको ऐकायला तयार नाही, मग फक्त थोडा थोडा भात खाऊ असं सांगितलं.. तरीही जेवणात मक्याची रोटी, शेव भाजी आणि वरण भात इतकं सगळं होतं. आम्हाला खूप लाजीरवाण झालं. त्यांच्या हातावर पैसे घालावे तर घेणार नाही हे माहित होतं, आणि काही तरी त्यांच्या हाती लागावं अशी फार इच्छा होती, म्हणून मग एक उपाय काढला, मी माझे २ ड्रेसेस लाल्या जी कडून लहान करवून घेतले, आणि भैरव नी अंकलेश्वर ला दिलेल्या ३ ड्रेसेस पैकी एक कोरा ठेवलेला होता तो त्यांच्या मुलीला दिला. अर्थात ड्रेसेस मोठे करण्याचे पैसे घ्यावे लागतील या अटीवर च काम सांगितलं. घरून निघताना तिथल्या लहान मुलांच्या हातात आम्ही प्रत्येकानी आपापल्या इच्छेप्रमाणे आणि ऐपती प्रमाणे (जवळ किती पैसे आहे तीच ऐपत) खाऊ साठी पैसे घातले. अर्थात या सर्वांनी त्यांनी केलेल्या मदतीची भरपाई होणार नव्हती, किंबहुना ती कधीच होणे शक्य नव्हते, पण त्यांनी जे प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला दिला होता त्याची फक्त पावती म्हणू याला. त्या एका रात्रीत आमच्या मध्ये इतकं प्रेम निर्माण झालं की तिथून आमचा पाय निघेना आणि त्या घराच्या मंडळीच्या डोळ्यांच्या धारा थांबेनात…. सुदिन तर अजूनही नैकू च्या सम्पर्कात आहे, आणि त्याची खुशाली तो मला कळवत असतो.
मैया कधी काय दाखवेल तेच समजत नाही. जिथे आपलं दाणापाणी तिनी लिहून ठेवलं असेल ते मिळाल्या शिवाय राहात नाही, जिथे आणि जसं तुमच्या साठी तिथे आणि तसं मिळेल.. मग कुलूप लागलेल्या घरीही कुलूप उघडवून तुमची इच्छा पूर्ण केली जाईल! मैया अनाकलनीय आहे. ती काहीही करू शकते… काय झालं माहितीये का, बाबा च्या नकळत त्याच्याकडून मैया ला चेलेंज दिल्या गेलं.. मुद्दाम नाहीच दिलं त्यानी, पण झालं असं नकळत, आणि मैया नी ते पूर्ण केलं.. तिथल्या तिथे.. दाखवून दिलं आम्हाला की ती अशक्यातली गोष्ट पण शक्य करू शकते.. तसे संकेत पण देते ती… आपण मूर्ख असतो की ते आपल्याला समजत नाही…काय चेलेंज केलं बाबा नी? कसं पूर्ण केलं तिनी ते? आणि हो, त्या पिवळ्या साडीवाल्या बाईचं काय? सांगते पुढच्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४२*
*नर्मदे हर.*
मागच्या भागात मी तुम्हाला चेलेंज बद्दल बोलले होते, पिवळ्या साडी वाल्या त्या बाई बद्दल बोलले होते, आठवतंय नं? तर आज तेच सांगणार आहे. तर आम्ही साकडी हून निघालो. आता धार जिल्ह्यातून आम्ही जात होतो. आजचा मुक्काम आम्ही कवाडा ला हनुमान मंदिरात करणार होतो. आम्ही तिथे गेलो. आजही अंतर बरंच झालं होतं. हा भाग सगळा भकास आहे.. नितळ रस्ता च काय तो दिसतो, बाकी आजूबाजूला रुक्ष आहे सगळं. एक प्रकारची भयाणता आहे या भागात. तर आम्ही या हनुमान मंदिरात गेलो. हातपाय धुतले. तिथे असलेल्या साधू नी खुणेनीच आम्हाला झाडाखाली टाकलेली चटई दाखवली. आम्ही आपलं तिथे बसून राहिलो. कुणी पाणी विचारलं नाही की कुणी चहा विचारला नाही. तास झाला, दोन तास झाले, हे साधू महाराज आपले गांजा पीत बसलेले. फक्त कुणी चप्पल घालून पाण्याच्या टाकी जवळ गेलं की ते मोठ्यांदा ओरडायचे. आमच्या पैकी प्रत्येकानी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते हुं नाही की चू नाही. आजची रात्र इथेच उघड्यावर आणि उपाश्या पोटी काढावी लागणार असं वाटत होतं. तिथे खूप डास होते. बसणं पण अशक्य झालं होतं. शिवाय नं बाथरूम न काही! अहो बाहेर जावं लागणार ते ठीक आहे पण बाहेर सुद्धा आडोसा म्हणून साधं एक झाड पण नाही. आंघोळीला टाकी, मैया पासून दुरून जातो इथून रस्ता, त्यामुळे मैया ही जवळ नाही. मी कसं काय करावं? प्रश्नच होता…रात्री अंधार झाल्याशिवाय फ्रेश होता येणार नव्हतं आणि प्रात: विधी सकाळी लवकर उठून उघड्यावरच आटोपावे लागणार होते. झोप होईल की नाही ही गाढ शंका होती आणि हे साधू महाराज अतिशय निवांत पणे खाटेवर लोळून गांजा पीत होते, ते ही कसे माहितीये का? नागाच्या फण्याखाली, कमलासनावर विष्णू जसे एक हात डोक्या खाली घेऊन आरामात पहुडलेले असतात नं अगदी तसे.
आम्ही समोरच्या दुकानात जाऊन आलो. तिथे चहा विचारला, नाही मिळाला. काही खायला आहे का विचारलं, विकत घेऊ, असं वाटलं पण फक्त पारले जी. आता पारले जी खाऊन खाऊन वीट आला होता. इतका की परिक्रमा झाल्या नंतर मी अजूनही पारले जी खात नाही, हो फक्त दुस-या परिक्रमेत मात्र नाईलाज म्हणून खाते आहे. तर आज नक्कीच उपाशी राहावं लागणार असं दिसत होतं. भूक पण लागलेली होती आणि हे बाबाजी काहीही बोलायला तयार नाही. इलाज नाही.
आता अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. खरं तर तिथे एक खोली होती, रिकामीच होती पण कुणाला नं विचारता कसं काय जायचं तिथे? काही वेळाने मंदिराच्या मागच्या बाजूला जरा हालचाल दिसली. तिथे एक छोटसं स्वयंपाकघर होतं, वाटलं चला आपल्यासाठी काहीतरी तयार होतंय. पण फारसं काही वाटलं नाही. ब-याच वेळाने एक माणूस बाहेर आला, म्हणाला “सुबह का खाना बचा है चाहो तो खा सकते हो” खरं सांगते भूक लागली की सगळं पोटात जातं. आपल्या घरी चालतात जिभेचे चोचले. जेव्हा काहीच मिळत नाही तेव्हा अन्नाची किंमत कळते आपल्याला. त्या माणसांनी आम्हाला ११ पोळ्या, एका मोठ्या पातेल्यात वरण आणि एका भांड्यात भात दिला. आमच्या जवळ ताटल्या नव्हत्या. तसं परिक्रमेला निघताना आम्ही ताट वाटी पेला घेतलं होतं, पण माझं ताट तुटल्यामुळे मी ते टाकून दिलं. बाबा कुठेतरी त्याचं ताट विसरला होता. मंदार नी एक ताटली काढली, त्यात पोळ्या घेतल्या आणि त्यावर थोड थोडं वरण घेऊन खायचं असं करत आम्हा पाचांमध्ये त्या अकरा पोळ्या आणि भात असं एकत्र जेवण झालं. वरण मला फार तिखट झालं होतं, पण इथे दुसरा उपाय नव्हता. पाण्याच्या घोटा बरोबर गीळणे हाच उपाय. तसंही चव ही फक्त जीभे पुरती असते, एकदा का अन्न पोटात गेलं की त्याचं काम शरीराला उर्जा देणं, ती मिळाली की झालं. आणि आम्हाला चवी पेक्षा ती भूक भागवण जास्त महत्त्वाचं होतं. अश्या प्रकारचं जेवण मिळणं हे एका अर्थी आम्हाला शिकवण च होती, जे मिळेल ते स्वीकारण्याची आणि हे असं जेवण ही पहिली पायरी, जिभेवर ताबा मिळवण्याची. जेव्हा एक एक करून सर्व अवयवांवर आणि इंद्रियांवर ताबा मिळवता येईल तेव्हा कुठे परम सुखाचे दरवाजे उघडले जातील, आम्ही इथे फक्त एका जेवणाने पाणी पाणी झालेलो… असो..
जेवण तर आटोपलं, आता परीक्षा नं दोन. अत्यंत थंडी, डास, वटवाघूळ, माकडं, जमिनीवरचे प्राणी या सगळ्यांमध्ये रात्र काढायची. तशी थोडीफार सवय झाली होती प्राण्यांची एव्हाना पण थंडी जरा जास्तच. आम्ही आसन लावायची तयारी केली तेव्हा पहिल्यांदा हे साधू महाराज बोलले… “वो खोली खोल लो, अंदर आसन लागा लो”.. काय म्हणून आनंद झाला…सगळा स्वर्ग मिळावा असं वाटलं. एक शिकवण आणिक मिळाली, खरतर नेहमीच मिळत आली या परिक्रमेत पण अमलांत उतरायला वेळा लागतो. ती अशी की *आपण ज्या गोष्टी च्या मागे धावतो नं ती गोष्ट आपल्या पुढे धावत असते,* *अगदी नेहमीच, आपण धावायचं थांबलो की ती गोष्ट ही धावायची थांबते, आणि जर ती आपल्या प्रारब्धात असेल तर आपण तिच्या मागे धावायची गरज नसते, तीच आपल्याकडे धावत येते.* आपण जर याकडे नीट लक्ष दिलं तर समजतं आपल्याला, आपण कायम धावतच असतो. जेव्हा थांबतो तेव्हाच खरं काय ते साध्य होतं. धावण्यावर ताबा तर मिळवता आला पाहिजे … याचं एक कारण आहे. आपलं मन.. खरं म्हणजे या मनाची एक गंमत आहे बघा. आपण कायम या मनाचे चोचले पुरवत असतो. *जिभेच्या चोचल्यांना पाण्याच्या घोटाबरोबर उडवून लावता येतं तसं मनाचं का करता येत नाही?* जिभेची व्याप्ती ही मुखा पर्यंत आहे मात्र मनाची व्याप्ती सगळीकडे आहे, आपण च दिलीये ती, आपल्या ही नकळत. आपण बोलताना माझं मन असं म्हणतो, म्हणजे मी मालक आणि हे मन माझं… खरं तर मी मालक असल्यामुळे या मनाने माझ्या हुकुमा प्रमाणे वागायला हवं, होतंय उलट.. मी या मनाच्या हुकुमाची गुलाम झालीये. मी याच्यावर ताबा मिळवायच्या आधीच याने माझ्यावर ताबा मिळवून झालेला आहे. इथे लढाई मोठी आहे, *आधी मला या मनाच्या ताब्यातून मुक्त व्हायचय आणि मग त्यावर शिरजोर होऊन त्याच्यावर ताबा मिळवायचा आहे…* कठीण आहे, पण हे केलं तरच जे साध्य करण्यासाठी हा जन्म झाला आहे ते साध्य होऊ शकेल. अन्यथा व्यर्थ. हे कसं करायचं हे मला विचारू नका हं…ते मला जमलं असतं तर मी इथे तुमच्या आमच्यात राहूनही तुमच्या आमच्यात राहिले नसते. पण निदान हे असं असतंय याची थोडी कल्पना तरी आली हे काय कमी आहे का? शिवाय माझी माय माझ्या प्रारब्धा नुसार मला काय द्यायचं ते देणार आहेच, हा विश्वास असताना हे नक्की सांगते की तिने मला जे जे दाखवलं आहे, जी जी प्रश्न आणि त्याची उत्तर तिने मला जशी जशी दिली आहेत त्यांच्या मागे काही कारणं नक्की असणारेत, आणि नेहमी प्रमाणे मला ती नंतर कळतील… त्या पिवळ्या साडी वाल्या बाई सारखी…
हो हो सांगते त्या पिवळ्या साडी वाल्या बाई बद्दल, पण आधी इथे काय झालं ते तर सांगू देत. तर आम्ही खोलीत आसन लावलं, आमचं जेवणं ही झालं होतं. थंडी पासून बचाव ही झाला होता. आणि आता आम्ही दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो. अंधारातच प्रात:विधी आटोपून घेतले. इथे चहा पाणी काहीही होणार नाही हे आम्हाला माहित होतं. माझी तर आज अंघोळ ही होणार नव्हती कारण इथे टाकी शिवाय काही सोय ही नव्हती. आम्ही निघालो. मंदार आणि मंडळी पुढे होती आणि आम्ही मागे होतो. भकास रस्ता, एखाद दुसरं घर, खूप वारा, अश्या अवस्थेत आम्ही आपलं चालतोय, पोटात काहीही नाहीये, अगदी चहा पण नाहीये सकाळपासून पोटात.. नऊ-साडे नऊ होऊन गेले, आम्ही सकाळी ६ वाजता चं निघालेलो, माझ्यातले त्राण आता संपले होते. रात्री चं जेवण झालं होतं पण नीट असं नव्हतं झालं, थंडी चा निदान चहा तरी हवा होता. आम्ही चालतच होतो, वाटेत एका घरासमोर एक ओटा दिसला, त्या ओट्यावर मी बसले, आणि बाबाला म्हणाले, “काहीतरी कर न बाबा, मला खूप भूक लागलीये” बाबा नी त्याच्या जवळ असलेले दोन पार्ले जी चे बिस्कीटं काढले.. एक मला दिलं आणि एक स्वत: घेतलं. ते कोरडं बिस्कीट घशा खाली जाणार नाही म्हणून पाण्यासोबत मी खात होते, आणि अचानक माझ्या मनात विचार आला. मी बाबाला म्हणाले, “बाबा, इथे मागे जे घर आहे नं त्यांनी दार उघडून जर आता आपल्याला चहा दिला तर किती मजा येईल नाही? काळा पण चालेल, पण आता हवाय रे जरा” बाबा जोरात हसला, म्हणाला, “ अगं मागे तरी बघ, त्या घराला केवढं मोठं कुलूप आहे?, तुला काय वाटलं, तुझी नर्मदा माई येईल, दोन तळहातावर दोन चहाचे मोठाले पेले घेऊन आपल्या समोर उभी राहील, आणि म्हणेल, बाबांनो, माझ्या दाराशी आले आहात, चहा पिऊन जा?, अगं मागण्या आधी एकदा मागे वळून बघायचं तरी, चल आता, मुकाट्याने बिस्कीट खा, हवं तर ५ मीनीट आराम कर, आणि चला मग, पुढे बघू चहाचं काय होतंय ते” त्याचं काही चूक नव्हतं म्हणा, मी मागे वळून तरी बघायला हवं होतं बोलायच्या आधी.. मी विचार करत बसले तसा मला भास झाला, ती पिवळी साडी वाली बाई बहुधा मी पुन्हा एकदा बघितली…पण मी इतकी भुकेली झाले होते की बहुधा त्या पिवळ्या साडी वाल्या बाईकडे मी लक्ष दिलच नाही. आता आम्ही निघणार तोच एक मोटारसायकल येऊन थांबली. नवरा बायको होती ती दोघं, बाई खाली उतरली, तिने कुलूप उघडलं, आणि नवरा म्हणाला “बाबाजी, मेरे चौकट पे आये हो, चाय तो पिते जाओ” इतकच नाही, तर जेव्हा घरातून ती बाई चहा घेऊन आली तेव्हा तिने दोन मोठे पेले भरून आणले होते, तळहातावर.. आमच्या समोर येऊन ती उभी राहिली, म्हणाली, काली चाय है माताजी, पर मेरे घर आये हो, चाय तो पीनी पडेगी”…. बाबा नी नर्मदा माई ला चेलेंज केलं होतं नं, तुझी नर्मदा माई, तळहातावर चहाचे कप घेऊन येईल आणि म्हणेल की माझ्या घरी आलेय, चहा पिऊन जा..? नर्मदा माईनी ते स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवलं.. त्याच कुलूप बंद घरातून मैया नी मला काळा चहा पाजला, अगदी जसा मला हवा होता तसा, आणि बाबा बोलला होता तेच शब्द तो माणूस ही बोलला, आणि बाबानी सांगितलं होतं तसंच ती बाई तळहातावर चहाचे मोठे पेले घेऊन आली….काय म्हणावं याला? योगायोग? छे.. माझी माई माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करते… आणि ती आहे हे ती दाखवून ही देते..
तुमच्या एक लक्षात आले का? जेव्हा जेव्हा माझी सोय होत नाही असं मला जाणवलं तेव्हा तेव्हा ही पिवळी साडी वाली बाई मला दिसली, आणि ती दिसल्यावर माझी सोय झाली, पण जोवर मला हे समजत नव्हतं तोवरच ती मला दिसत होती. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं त्यानंतर तिचं दिसणं बंद झालं. मग ती बाई नक्की कोण असावी बरं? हे काय मी वेगळं सांगायला हवय? पण हे असच असतं, जेव्हा ती आपल्याला दर्शन देते नं तेव्हा आपल्याला समजतच नाही. तिच्या त्या रुपात म्हणा किंवा असं काहीतरी होतं की आपली मतीच काम करत नाही. असं मारुती रायांनी दर्शन दिलेलं मी तुम्हाला २७ व्या भागात सांगितलं होतं, तेव्हाही माझी अशीच मती निकामी झाली होती. आता पुन्हा एकदा सांगते हा अनुभव, कारण हा याच भागात घडलेला आहे.
आम्ही चहा पिऊन पुढे निघालो त्यावेळी बाबा अतिशय दु:खी झाला होता. आपण माई ला चेलेंज केलं याचं त्याला फार वाईट वाटत होतं. रामदास स्वामी आणि हनुमान हे त्याचं आद्य दैवत. बाबा मारुतीरायाची करुणा भाकू लागला. आज बाबाचा पाय पण फ़ार दुखत होता. अगदी २ किमी चाललो ना की तो बसून जात, इतका त्रास होत होता. मग मी बाबाला म्हंटलं “एखादा रिदम धरून चाललास तर कदाचित पाय कमी दुखेल” त्यालाही ते पटलं, आणि दोघांनी हनुमान चालिसा चा रिदम ठरवला. हनुमान चालिसा एकदा म्हणायला साधारण ४ मिनिट लागतात. आम्ही ठरवलं, ११ वेळा अहुमान चालीसा होईस्तोवर थांबायचं नाही. म्हणजे साधारण ४५ मिनिटे सलग चालायचं. असं केलंलं हे तंत्र बरच उपयोगी पडलं. मग आम्ही तेच वारंवार करू लागलो. या वेळी अधुन मधून आम्हाला एक परिक्रमावासी दिसत असे. त्यांच्या जटा होत्या, काळी सावळी पण सुढृढ शरीरयष्टी, ६ फ़ूट उंची, कमरेला पांढरा पंचा, हाती कमंडलू, असे बाबा होते ते. ते आम्हाला अधुन मधूनच दिसत. शक्यतो आम्ही जेव्हा ४५ मिनिटाचा टप्पा पार करून आराम करत असू तेव्हा ते आमच्या पुढे जात असत. मात्र आम्ही त्यांच्या पुढे गेलेलं मला आठवत नाही.
तर धरमाराय नावाच्या गावा जवळ ची ही गोष्ट. एका ठिकाणी आम्ही आराम करत असताना ते पण तिथे आले आणि आमच्या समोरच्या खडकावर बसले. नर्मदे हर झालं. मी त्यांना विचारलं “महारज जी, परिक्रमा मे हो?, कहासे उठायी आपने परिक्रमा?” ते म्हणाले “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, मी विचारलं “कोई और भी रास्ता है क्या? आगे पिछे तो आप दिखते नही हो, बस बीच बीच मे दिखते हो?” आम्ही रस्ता मार्गाने जात होतो. मला वाटलं हे महाराज किना-यावरून जात असतील आणि अधून मधून रस्त्यावर येत असतील, म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले “रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा, अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”, मला काही कळेना, मी कधी या बाबांना बोलावलं? म्हंटलं जाऊ दे, हा कुणी ब्रम्हचारी बैरागी बाबा दिसतोय, बोलला असेल असच काहीबाही. ते साधू महाराज निघून गेले. मी आणि बाबा पण थोड्या वेळाने निघालो, मात्र मनात विचार येतच राहिला.. मी या बाबांशी तर बोलले पण नाही आधी, मग मी बोलावलं असं ते बाबा का म्हणाले? उत्तर सापडे ना.. म्हंटलं जाऊ दे, आपण आपला हनुमान चालिसा सुरू करू…. अहो काय सांगू, असा विचार मनात येतो न येतो तोच समजलं, आता पर्यंत किमान ५५ वेळा तरी हनुमान चालिसा म्हणून झाला असेल आमचा! इतका धावा तर आपण त्या मारुती रायांचाच करतोय…अगदी निरपेक्ष भावनेनी! “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा, अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”.. बाबांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले आणि समजलं…हे तर खुद्द मारुती राया! पण ते त्या वेळी काही लक्षात आलं नाही.
आम्ही डही ला नं जाता कुआ वरून धरमाराय ला गेलो. तिथे छान जेवण झालं दाल बाटी चं, मात्र सवय नसल्याने माझं पोट बिघडलं.. खूप दुखू लागलं. दोन दिवस पोट काही थांबे ना. आता डॉक्टर ला दाखवल्या शिवाय काही खरं नाही म्हणून कोटेश्वर ला गेल्यावर डॉक्टर चा शोध घेऊ लागलो, मात्र इथे मला एक अनमोल ठेवाच मिळाला, आयुष्यभराचा…आजही मी तो जपून आहे असा, काय ते सांगते पुढच्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४३*
*नर्मदे हर.*
तर मागच्या भागात मी माझं पोट दुखत होतं ते सांगत होते. आम्ही कसं बसं कोटेश्वरला पोचलो. तिथे दगडू महाराज आश्रमात गेलो. तिथे काही काही सोय नव्हती. आसन लावायची जागा पण नव्हती, जी जागा होती अतिशय अस्वच्छ होती आणि मला खूप त्रास होत होता. मला सारखं टॉयलेट ला जावं लागणार होतं. तिथे ती ही सोय नव्हती. आम्ही तिथून निघून कुणाच्या तरी घरी आश्रय घ्यायचं ठरवलं, चार किमी चालत जाऊन हे करावं लागणार होतं. ते ही मागे जावं लागणार होतं. पण त्या आधी डॉक्टर ला दाखवणं गरजेचं होतं. आम्ही चौकशी केली तेव्हा समजलं की चांगला डॉक्टर कुक्षी मधेच मिळेल, ते १४ किमी दूर होतं. मी फार फार गळून गेले होते, मला खूप अशक्तता आली होती आणि २ किमी चालून झाल्यावर मला चक्कर येऊ लागले. आता मला भरती करून घेतील की काय अशी वेळ आली होती आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात होतो, जिथे वाहन ही नाही आणि कसली सोय ही नाही. झाडाखाली मी बसून होते आणि बाबा वाहन शोधायला रस्त्यावर उभा होता. अशात मला एक फोन आला. माझ्या मैत्रिणी च्या नव-याचा. मैया पण कशी कनवाळू आहे बघा, फोन तर सहज आला होता, परिक्रमेची चौकशी करण्यासाठी, आणि माझी तब्ब्येत बरी नाही समजल्यावर मैयांनी या माझ्या मैत्रिणीच्या नव-याकरवी माझी सोय करून दिली.
माझ्या या मैत्रिणी चं सासर कुक्षी चं. नरेन जी म्हणजे माझ्या मैत्रिणी चे यजमान, त्यांनी सहज म्हणून फोन केला होता मात्र मी इतकी आजारी आहे समजल्यावर कुक्षी ला आपल्या भावाला फोन केला आणि आमच्या साठी गाडी ची व्यवस्था केली. आम्हाला घ्यायला कुक्षी हून गाडी आली. नरेन जी चे भाऊ आणि भावजय दोघंही हातातली काम सोडून आम्हाला घ्यायला आलीत. आम्ही डॉक्टर कडे गेलो. तिथे मला इंजक्शन देऊन तास भर झोपवून ठेवलं आणि मग मात्र हे भैया भाभी आम्हाला घरी घेऊन गेले.
घरी नरेनजींच्या आईनी माझ्यासाठी एक मास्टर बेड रूम तयार करून ठेवली होती. मी गेल्या गेल्या त्यांनी मला लिंबू सरबत करून दिलं, आईच्या मायेनी मला जवळ घेत त्या म्हणाल्या “बेटा अब चिंता मत करना, तुम तुम्हारे अपने घर मे, अपने मां की गोद मी है”. मला खरच तेव्हा आई जवळ असल्यासारखंच वाटू लागलं. लिंबू सरबत पिऊन मी झोपले, मां पूर्ण वेळ माझ्या खोली च्या आसपासच होत्या, मध्ये मध्ये येऊन माझ्याकडे लक्ष देत होत्या. त्यांनी बाबा ची पण खूप काळजी घेतली. घरातली सगळी लहान मुलं “बुआजी बुआजी” म्हणत मला येऊन भेटून जात. संध्याकाळ पर्यंत मला जरा बरं वाटलं. रात्री माझ्यासाठी मुगाची मऊ खिचडी केली होती. माझी औषधं मां मला स्वत:च्या हातानी देत. रात्री त्या माझ्या बाजूलाच झोपल्या होत्या. आणि सकाळी माझ्यासाठी एक सरप्राईज माझी वाट बघत होतं. नरेन जी सकाळी अचानक तिथे आले होते…
रितू भावसार आणि तिचे यजमान नरेन जी हे आमचे खूप जवळचे मित्र. माझा ओंकार आणि यांची आरुषी हे अगदी पहिली पासूनचे मित्र, त्यात मी आरुषी ची आवडती शिक्षिका, आणि आमचं राहणं अगदी शेजारी. यांची आरुषी प्रत्येक काम मला विचारून करायची, आणि रोज मला भेटल्या शिवाय तिला जमायचं नाही. आमच्या या दोन कुटुंबात खूप सख्य आहे. त्यात माझा आणि नरेन जींचा वाढदिवस एकाच दिवशी, ३० जानेवारी ला आणि सचिन म्हणजे माझा नवरा आणि रितू या दोघांचा वाढदिवस अगदीच आगेमागे, म्हणे १४ आणि १७ नोव्हेंबर चा. तेव्हा आमचे वाढदिवस पण एकत्र साजरे व्हायचे बरेचदा. आणि मग मात्र त्यांची बदली मंगलोर ला झाली, त्यानंतर कुक्षी ला त्यांची माझी ती पहिलीच भेट, ती ही अचानक… त्यांना पाहिल्यावर मला खूप भरून आलं..त्यांनाही अश्रू पुसल्यावाचून राहता आलं नाही, आणि गंमत माहितीये का, ही तारीख होती ७ जानेवारी ची. नरेन जी काही कामांनी कुक्षी ला येणार होते आणि म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी त्यांच्या घरच्यांनी करून ठेवली होती. माझा पण वाढदिवस तेव्हाच असतो हे समजल्यावर मां नी माझाही वाढदिवस साजरा केला, तो ही खूप वेगळ्या पद्धती नी.
भावसार कुटंब हे गायत्री परिवारात सक्रीय आहे. गायत्री उपासना त्यांच्या कडची प्रमुख उपासना असते. त्यांच्याकडे घरातल्या प्रत्येकाचे जन्म दिवस हे त्या त्या व्यक्तीकडून गायत्री यज्ञ करवून साजरे केले जातात. घरात गोडधोड केल्या जातं आणि त्या त्या व्यक्ती कडून घरच्या देवाची पूजा आणि नैवेद्य दाखवल्या जातो. घरची लहान मोठी सगळी मंडळी त्या व्यक्तीला औक्षवण करतात आणि आपापल्या परिने भेट वस्तू देतात. संध्याकाळी भजन ठेवल्या जातं आणि आजूबाजूच्या लोकांना बोलावून काहीतरी नाश्ता दिल्या जातो. रात्री सगळं कुटंब एकत्र देवळात जातं आणि घरी आल्यावर सगळी मंडळी रात्रीच्या स्वयंपाकाला लागतात. अगदी प्रत्येक लहान मुल सुद्धा आपापल्या परिनी मदत करतं. तीन मुलं तीन सुना आणि नातवंड असं हे कुटुंब. त्यातले नरेन आणि रितू मंगलोर ला असतात पण वाढदिवस शक्यतो कुक्षी ला केला जातो. तसं झालं नाही तरी मां यज्ञाच विडिओ रेकोर्डिंग करून त्यांना तो पाठवतात.. तर असा असतो इथला विलक्षण वाढदिवस आणि माझाही वाढदिवस असाच साजरा झाला. ते ही नरेन जीं च्या सोबत.माझ्याकडून गायत्री यज्ञ झाला, आणि नेमका त्याच दिवशी गायत्री कलश कुक्षी मध्ये आला होता, त्याचं दर्शन ही झालं.. २०१८ सालचा वाढदिवस मी कधीही विसरू शकणार नाही. इथे मला एक आई मिळाली, एक परिवार मिळाला.. यांना मी कुक्षी मां असं नाव दिलय.
माझी तब्येत पूर्ण बरी झाल्यावरच मांनी मला तिथून जाऊ दिलं. तेही नरेन जी स्वत: मला सोडायला आले होते. वाटेत थांबून माझ्या आवडीचं डेअरी मिल्क सुद्धा घेतलं. त्यांना निरोप देताना पुन्हा एकदा या घरून मला मिळालेल्या प्रेमाची, त्या आईच्या मायेची उतराई होऊ शकणार नाही हे जाणवलं आणि डोळ्याच्या कडा ओलावाल्यात. नरेन जींनी पण भरल्या डोळ्याने निरोप दिला आणि आम्ही चीखलद्याच्या वाटेने निघालो.
चीखलद्या ला आम्ही लवकर पोहोचलो. तिथल्या मंदिरात आमचा मुक्काम होता. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. मंदिरा च्या आवारात बरीच लहान मोठी मन्दिरं आहेत. इथे एक खोली आहे आणि या खोली मध्ये एक देव्हारा आहे. या खोलीत मोठ्या महाराजांनी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी चातुर्मास केला होता, तिथेच त्याच खोलीत मला आसन लावायची संधी मिळाली. इतकंच नाही तर “हे मंदिर तुम्ही असे पर्यंत तुमच्या ताब्यात आहे” असं म्हणून तिथल्या पूजा-यांनी या मंदिराच्या किल्ल्या पण माझ्याकडे दिल्या. मी देखील अतिशय आनंदानी त्या मंदिरा ची पूजा केली, तिथे जप केला. मला खूप खूप आनंद झाला कारण जिथे जिथे मोठ्या महाराजांनी चातुर्मास केला आहे तिथे तिथे त्या त्या खोलीत जप करण्याची संधी मला मिळाली आहे.
तुम्ही माझे मागचे अनुभव वाचलेत, त्यात मी दोन तीनदा चीखल्द्याचा उल्लेख केलेला आठवत असेल. इथे एक वेगळाच अनुभव आला असं मी तुम्हाला सांगितलं होतं. खरतर इथला दिवस खुपच छान गेला. चुलीवरचा स्वयंपाक करून खाण्यातली मजा, आनंद सगळं अनुभवलं आणि आम्ही आनंदाने झोपी गेलो. मात्र थोड्याच वेळाने मी ओरडू लागले, मला खूप घाम फुटला होता. ऐन जानेवारी महिन्यात मी घामाने थबथबले होते. मी बाबाला उठवलं आणि त्याला रामरक्षा म्हणायला लावली… कारण मी जे पाहिलं होतं ते खूप वेगळं होतं. माझ्या कल्पने बाहेर, खरं म्हणजे माझ्या विचाराच्या ही बाहेर होतं ते, आणि हो, एक नक्की सांगते, ते स्वप्न नव्हतं.. कारण मी ते पाहिलं तेव्हा माझे डोळे उघडे होते.. मला झोप लागली नव्हती हे मला माहित होतं कारण त्या वेळी त्या खोलीत असलेलं त्यांच वास्तव्य, त्यांचा आवाज मी स्पष्ट ऐकला होता….. पण वाचक हो या भागात नाही सांगता यायचं, बराच मोठा होईल हा भाग.. तेव्हा हा वेगळाच अनुभव सांगते पुढच्या म्हणजे ४४ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४४*
*नर्मदे हर.*
मागच्या भागात मी तुम्हाला सांगत होते तो आगळा वेगळा अनुभव, चिखलद्या चा. तर आम्ही सगळं आवरून झोपलो. अतिशय पवित्र ठिकाणी आम्ही आज राहिलो होतो. इथे, म्हणजे याच खोलीत मोठ्या महाराजांनी चातुर्मास केला होता, आणि म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की असा अनुभव इथे का यावा? सांगते. मी जप करत करत लोळत पडले होते, माझा डोळा लागतो न लागतो अशी स्थिती. मी झोपले नव्हतेच पण खूप झोप येत होती मला, आणि आता मी डोळे बंद करणार तोच माझ्या डोळ्यासमोर धूसर धूर पसरल्याचं मला जाणवलं. त्या धुरातून एक अस्पष्ट आकृती पुढे आली. तो एक मानवी आकार होता. ती आकृती स्पष्ट झाली आणि तिचं रुपांतर एका म्हाता-या बाई मध्ये झालं. त्या बाईचे केस पांढरे फेक आणि मोकळे असून हलके कुरळे आणि खांद्या एवढे लांब होते. तिनी लाल आणि काळ्या फ्रेम चा चष्मा पण लावला होता. ती विवस्त्र होती आणि रडत होती. अतिशय केविलवाणी दिसत होती. तिनी तिचे दोन्ही हात माझ्याकडे लांब केले. ते सुरकुतलेले होते. हिरव्या नसा दिसतील इतकी ती बाई म्हातारी आणि तब्ब्येतिनी खचलेली दिसत होती. दोन हात लांब करून ती मला विनवणी करत होती, गयावया करत होती. “मला खूप त्रास होतोय गं. हे लोकं मला खूप छळताहेत, मला वाचव.. माझी मदत कर, मला यातून बाहेर काढ”. तीचा आवाज खूप केविलवाणा आणि आर्त होता.. आणि मी खूप हतबल असल्यासारखं मला वाटत होतं. तो धूर पुन्हा दाट झाला. ती बाई हळू हळू आकार बदलू लागली आणि एक १५-१६ वर्षांचा मुलगा त्या धुरातून पुढे आला, ती बाई आणि तो मुलगा दिसायला बरेच सारखे होते, त्या दोघांच चरचरीत नाक आणि बोलके डोळे अगदीच एकसारखे.. आणि हा मुलगा दिसायला सुरेख मात्र अत्यंत दु:खी होता. विवस्त्र च होता, गुडघ्यात मान घालून बसला होता. त्याच्या ओठाखाली उजव्या हाताला असलेला तीळ सुद्धा मला स्पष्ट आठवतोय. तो रडत होता, त्याच्या गालावर अश्रुंचे डाग पडले होते. तो अगदीच असहाय होता, मी त्याला खुणेनीच विचारलं “काय झालं”.. त्यानी माझ्याकडे पाठ केली. त्याच्या पाठीवर शरीराच्या आत असलेल्या सगळ्या अवयांची चित्र गोंदवलेली होती.. आणि मध्ये मध्ये रक्ताचे थेंब दिसत होते.. तो म्हणाला “ मला हे सगळं खूप त्रास देतय, मला यातून मोकळ कर”.. त्याचं ते दु:ख मला बघवत नव्हतं.. मी त्याला हात लावायला हात पुढे केला तर माझ्या हाताला फक्त खूप थंड असं काहीतरी जाणवलं, स्पर्श झाला नाही.. आणि मी भानावर आले… बाबा बाबा म्हणून ओरडू लागले… मी घामानी चिंब भिजले होते..
पण एक सांगू का, मला या दोघांनी काही इजा केली नाही, मला त्यांची भीती पण वाटली नाही, पण असं माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं. मला एक एक बारकाई व्यवस्थित आठवते, एक एक संवाद व्यवस्थीत आठवतो, हे स्वप्न नव्हतं हे मी नक्की सांगू शकते. पण मला माझ्या आजूबाजूचं भान नव्हतं त्यावेळी हे ही नक्की. ही दोघं नक्की कुणीतरी होतीत. ती मला मदत मागत होतीत. त्यांचा हेतू मला त्रास देण्याचा नव्हता हे मला स्पष्ट समजत होतं, मी त्यांची मदत करू शकत नाही हे ही मला माहित होतं कारण ती वेगळ्या योनीतली आहेत हे मला समजत होतं… बाबानी रामरक्षा म्हंटली, मला झोप लागेस्तोवर तो माझ्या डोक्यावर हात ठेवून बसला होता. मी सकाळी उठले तेव्हा मी शांत झाले होते, आणि शांतपणे मी बाबाला सगळं सांगितलं देखील, पण मनातून मी अस्वस्थ होते. हे नक्की काय होतं आणि असं का झालं, आणि मलाच ते दोघं का दिसले हे मला समजत नव्हतं. मात्र ते माझ्या आजूबाजूला च आहेत असा भास मला दुस-या दिवशी सकाळी देखील होत राहिला. दुपार नंतर मात्र अचानक नाहीसा झाला. नंतर मात्र पुन्हा कधी असं झालं नाही मात्र याचा उलगडा मला पुढे महेश्वर ला झाला. मी हा अनुभव फार कुणाला सांगीतला नाही कारण लोक विश्वास ठेवत नाही, मात्र मला याचा उलगडा झाल्या नंतर तो पटला ही आणि समजला ही. मी महेश्वर आल्यावर तो सांगेन असा विचार केला होता मात्र तुमची उत्कंठा न वाढवता मी तुम्हाला आताच सांगते.
महेश्वर ला मला एक संन्यासी भेटलेत. त्यांचे पण मला बरेच अनुभव आलेत पण ते मी आपण महेश्वर ला पोहोचल्यावर सांगेन. आता फक्त या अनुभवाचा उलगडा तेव्हा सांगते. मी दोन संन्याश्यांना ह्या अनुभवा बद्दल विचारलं आणि दोघांनी ही जवळपास एकाच प्रकारचा उलगडा दिला म्हणून मी तोच ग्राह्य धरते आहे. तर कल्याणपूर नावाच्या गावाला जेव्हा मी गेले तेव्हा तिथे लाल पुरी महाराज होते, त्यांच्याशी मी या अनुभवाची चर्चा केली. त्यांनी संध्याकाळी दिवा लावाला तेव्हा मला बोलावून घेतलं आणि माझ्याकडून गीतेचा १५ वा अध्याय वाचवून घेतला. हा रोज म्हणायचा असं सांगितलं आणि त्या दोघांची आठवण करून हा अध्याय म्हणायचा आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायची असं सांगितलं. बिचारे दु:खी जीव आहेत, गती साठी यत्न करताहेत असं सांगून अजिबात भय वाटेल असे ते दोघं नाही, याची शाश्वती दिली. मात्र ते नक्कीच कुणी परायोनितले लोक आहेत हे ही खात्री पूर्वक सांगितले. महेश्वरला हृदय गिरी महाराजांनी अजूनच स्पष्ट सांगितलं. ते म्हणाले “ देखो, ये एकदम आम बात है, डरने की जरुरत नही है, तुम अब नर्मदा किनारे श्रद्धा पूर्वक चल रहे हो, साथ मे ध्यान और पूजा पाठ भी कर रहे हो, ऐसे मे तुम्हारा मन शुद्ध होता जा रहा है, जैसे जैसे तुम्हारी साधना बढेगी वैसे इस प्रकार के की अनुभव तुम्हे आयेंगे. इसका कारण मै तुम्हे बताता हु. तुम साधना मे आये हो किंतु अभी तुम नये हो, तुम्हारा मन साधना मे तो आ रहा है लेकीन अभी स्थीर नही है, लेकीन स्थीरता के पथ पर है. मनकी ऐसी स्थिती जो दोनो ही तरफ मतलब सांसारिक जीवन मे और अध्यात्म की और भी आधी आधी है वह मन थोडा कमजोर हो जाता है और परायोनीयो के लिये तुमसे संपर्क बनाना आसांन हो जाता है. जैसे तुमने कहां की वो तुम्हे तकलीफ देने के लिये नही आये थे, पर तुम्हारी मदद मांगने के लिये आये थे, वही सच है. तुम उन्हे बताओ की तुम उनकी मदद नही कर सकती, क्युं की तुम उतनी ताकतवर नही हो. लेकीन उनको उनके भोग को भोगने की क्षमता मिले इसके लिये तुम मां नर्मदा से जरूर प्रार्थना करोगी. परिक्रमा वासीयोंकी कोई इच्छा मां अधुरी नही रखती यह सब जानते है, और इसी लिये वे परायोनी के जीव भी तुम्हे संपर्क करते है. तुम्हारे मन की स्तिथी उस वक्त बोहोत ही शुद्ध रही होगी और मन ईश्वर मे विलीन रहा होगा, तभी तुम्हारा संपर्क उनसे हो पाया. ईश्वर को उनके लिये प्रार्थना करो. गीता के १५ वे अध्याय का उनके लिये रोज पाठ किया करो”. हे ऐकून मला जरा धीर आला. तेव्हा पासून रोज गीतेचा १५ वा अध्याय माझ्या वाचनात आहे.
इथून पुढे आम्ही बोधवाडा सेमारदा अचोदा असं करत काल्याणपुराला ला पोहोचलो, मात्र काल्याणपुराच्या अगोदर थोडी माहिती म्हणून सांगते. बोधवाड्याला अति प्राचीन मंदिर आहे जे श्री यंत्राच्या आकाराचं आणि बांधणी चं केलं आहे. त्याच्या वरच्या भागातून बघता आजही सात पदर दिसून पडतात. या मंदिराला आपण कोणत्याही एका बाजूने बघितलं तरीही सात पदर आपण मोजू शकतो. हे मंदिर देखील डूब क्षेत्रात येत असल्याने अश्या प्रकारची ऐतिहासिक आणि उर्जेचा विचार केला असता वैद्न्यानिक बांधकाम असलेली ठिकाण पाण्याखाली जाऊ नये असं वाटत. श्री यंत्राचा आकार आणि बांधणी अशी असते की त्याच्या मध्यवर्ती सर्व बाजूनी सकारात्मक उर्जा फिल्टर होऊन येते आणि एकत्रित होते, आणि अशा ठिकाणी इथे अतिप्राचीन शिवलिंगाची स्थापना केली आहे. इथला नंदी मात्र जुना खणल्याने नवीन लावण्यात आला आहे मात्र खणलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. बोधवाड्याला जाता रस्त्यात एक वडाचं प्राचीन आणि भलं मोठं झाड आहे. जवळ जवळ सात वडाची झाडं एकत्र येऊन हे तयार झालं आहे. इथे विलक्षण सकारात्मक उर्जा जाणवते. या झाडाची काय नक्की महती आहे माहित नाही पण हे झाड उभ्यापेक्षा आडवं वाढलेलं आहे आणि पारंब्या समोर येऊन छान जाळी तयार झाली आहे. या झाडाखाली प्रत्येक परिक्रमावासी थांबतो आणि इथे थांबल्या नंतर परिक्रमावासियांचा थकवाच जातो असं मी ऐकलं ही होतं आणि अनुभवलं ही आहे.
बोधावाडा इथे एक रात्र मुक्काम करून आम्ही सेमारादा ला गेलो तिथे षणमुखानन्दांनी बांधलेलं सुंदर नर्मदा मंदिर आहे. इथे सगळ्या सोयी आहे. या मंदिराची गंमत अशी की हे मंदिर एका रात्रीत उभं झालं असेल यावर विश्वासच बसत नाही. इथून पुढे आम्ही धनखेडी, बाकानेर करत लुनेर ला जाणार होतो पण रस्त्यात काल्याणपुराला थांबलो. बाकानेर ला त्या दिवशी काहीतरी कारणाने हिंदू मुस्लीम दंगल झाली होती, त्यामुळे वातावरण जरा तापालेलं होतं. अशात एका मन्दिरातल्या एका पूजा-यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला. काही हिंदू दुकानदारांनी आमची मदत केली आणि आम्ही त्या वातावरणातून सुखरूप बाहेर पडलो खरं, पण त्या वेळी ची परिस्थिती तणावपूर्ण च होती. संध्याकाळचे ४ वाजून गेले होते, आणि ज्या वेळी आसरा घ्यायचा त्या वेळी आम्ही पुढे निघालो होतो. मात्र काल्याणपुराच्या लाल पुरी महाराजांची भेट आणि त्या पुढचा अनुभव हे दोन्ही अविश्वसनीय आहेत. मी मागच्या भागात काल्याणपुराच्या अनुभवाचा उल्लेख केला होता. तो मी पुधःच्या भागात सांगणार आहे. शिवाय गंगा कुंडाबद्दल आणि इथे आलेल्या वेगळ्या अनुभवाबद्दल पण पुढे सांगते .. आणि हो, तो मोलाचा सल्ला आणि बाकानेर च्या दुकानादारांनी केलेली मदत पण सांगते…४५ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४५*
*नर्मदे हर.*
मागच्या भागात मी तुम्हाला बाकानेर मधल्या तणाव ग्रस्त स्तिथी बद्दल सांगत होते. तिथूनच आता पुढे जाऊयात.खरं तर आम्ही बाकानेर ला थांबायचं ठरवलं होतं, आम्ही एका मंदिरात पण गेलो होतो, पण तिथल्या पूजा-यांनी आम्हाला तिथून पुढे जायचा सल्ला दिला. ते म्हणाले, इथे तुम्ही सुरक्षित नाही असं नाही पण इथलं वातावरण आज काही ठीक नाहीये. मंदिर तसं शहराच्या मध्यभागी आहे, आणि हा भाग संवेदनशील भाग आहे. एकदा का अंधार पडला की कुणी फारसं बाहेर पडणार नाही आज, मग तुमच्या जेवणा खाण्याचं आणि सुरक्षिततेचं कोण बघणार? त्यापेक्षा तुम्ही पुढे जा. तिथल्या दोन तीन हिंदू दुकानदारांनी ही हाच सल्ला दिला. आम्हाला भरपूर गूळ दाणे, बिस्कीट, शीतपेयाच्या दोन बाटल्या असं बरच सामान दिलं, म्हणजे रात्री आम्हाला भोजन प्रसादी नाही मिळाली तरी त्या सामानावर आमचं भागू शकेल इतकं सामान देऊन आम्हाला अंधाराच्या आत बाकानेर सोडा असं सांगितलं. निदान या संवेदनशील भागाच्या तरी दूरच जा असा सल्ला दिला. आम्ही तो ऐकला आणि पुढे निघालो.पुढे बरच अंतर मुस्लीम वस्तीच होती. आमच्याकडे लोक बघत होती आणि तणाव आहे हे ही आम्हाला दिसत होतं. खरं तर माणसं वाईट नसतात हो, परिस्थिती वाईट असते. माणूस म्हटलं की त्यात माणुसकी चा अंश ही नाही असं कसं होईल? म्हणजे धर्म कोणताही असू देत, माणूस हा कुठेतरी माणूस असतो, मात्र या वेळीची परिस्थितीच वाईट होती अन्यथा काही मुस्लीम बांधवांचा दमगढ च्या आधी मला आलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. त्यावेळी मला त्यांच्यातली माणुसकीच नाही तर त्यांच्यात असलेली ईश्वरी प्रवृत्ती ही प्रकर्षाने दिसली, त्यांचं नर्मदा मैया वरचं प्रेम ही दिसलं, पण तो अनुभव आपण दमगढ ला जाऊ तेव्हा सांगेन, आधी आता बाकानेर. तर लोकांच्या चेह-यावर आम्हाला तणाव स्पष्ट जाणवत होता, आम्ही झपाझप पावलं टाकत २ तासात जवळ जवळ १२-१३ किमी चालून पुढे आलो. इथे दूर एक छोटीशी वस्ती दिसत होती. कल्याणपूरा असं या वस्तीचं नाव. ही वस्ती पूर्ण हिंदू वस्ती आणि बाकानेर पासून तशी लांब. इथे राहायाचं ठरवलं पण ठिकाण सापडेना. एक पन्नाशीच्या बाई दिसल्या, म्हणाल्या “हमारे घरमे रह सकते थे लेकीन काम शुरू है, तो जगह नही है पर भोजन कर ही सकते है.. रहने के लिये आप शिवमंदिर चले जाओ”. आम्ही शिवमंदिरात गेलो.
तिथे लालपुरी बाबा म्हणून एक साधू महाराज असतात. अगदी म्हातारेसे. त्यांच्याकडे एकच खोली. एक लहानसं हनुमान मंदिर आणि एक शिव मंदिर. आम्ही तिथे गेलो तेव्हा त्या बाबांनी आम्हाला बाहेर आसन लावायला सांगितलं. आपापला स्वयंपाक करून घ्या असं सांगितलं मात्र ते स्वयंपाकाच्या मदतीला आलेच. इथे चूल बाहेरच आहे. एक टाकी आहे आणि भांडे कुंडे ठेवायची जागा ही बाहेरच आहे. टाकी खाली एक मोठा टब ठेवलाय तिथे असतात सगळी भांडी. टाकीलाच लागून खाली दोन कप्पे केले आहेत तिथे किराण्याचं सामान असतं. असं मस्त हवेशीर स्वयंपाक घर होतं यांचं, खूप आवडलं मला. पावसात मात्र ते काय करतात ते काही माहित नाही, मी विचारलं पण नाही. मला इथे एक रात्र काय ती घालवायची होती. असो.
तर स्वयंपाक पाणी, जेवणं झाली. साधू बाबांनी रामचरित मानस चं बाल कांड वाचून समजावून सांगितलं. रात्री चे साडेबारा झाले होते. रामहृदय म्हणून आम्ही झोपणार होतो आता. आणि काय झालं माहितीये का? हे बाबा खूप अस्वस्थ वाटू लागले अचानक. आम्हाला वाटलं म्हातारे आहेत, थकले असतील, म्हणून त्यांना आराम करू देऊ आणि आपण पण आराम करू असं म्हणत आम्ही बाहेर आलो. त्यानंतरही साधू बाबांच्या खोलीतला लाईट बराच वेळ सुरूच होता. मलाही नीट झोप येत नव्हती. बाबाही तसा जागाच होता. आणि लाल पुरी बाबा खोलीतून बाहेर आले. त्यांनी आमच्याच बाजूला आसन लावलं. मी विचारलं त्यांना “क्या हुआ बाबा? भीतर क्यू नही सोये? बाहर क्यू आ गये इतनी थंडी मे?” तर त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलच नाही.
ते उठून बसले, ते पाहून मी पण उठून बसली. ते उठून माझ्या जवळ आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी खूप प्रेम होतं आणि ते जे काही आता बोलले ते ऐकून माझ्या अंगावर काटाही आला आणि माझ्या आत, खूप खोलात काहीतरी हलतंय असं मला जाणवू लागलं. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना, पण माझे डोळे मला जे दाखवत होते ते मला जास्त पटत होतं. लाल पुरी बाबांना जे बोलायचं होतं ते बोलून ते पुन्हा आपल्या जागेवर जाऊन झोपले सुद्धा मात्र मी नंतर कितीतरी वेळ तशीच तिथेच बसून राहिले. कारणही तसच होतं. सांगते.
तुम्हाला आठवतंय का? अनुभव मालिकेच्या अकराव्या भागात मी तुम्हाला एका संन्यास्याबद्दल सांगितलं होतं ते? खलघाटला मला एक राजबिंडा सन्यासी भेटला होता, आठवतंय का? खलघाट ला झालेला संवाद मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुमची लिंक लागेल नीट.
मी खलघाट ला जातानाची गोष्ट आहे बघा. “अभी कितना दूर है खल घाट” असं विचारल्यावर तो थांबला, म्हणाला, ”माई आपण फक्त चालत राहायचं असतं, बाकी विचार करायचा नसतो”, मग मझ्याकडे पाहून म्हणाला, प्रश्न पडतात तुम्हाला, पण विचारत नाही तुम्ही..चांगलय, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायला लागतात….आता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सुटतील लवकर…फ़क्त एक करा, राम सोडू नका.” आणि झपाझप पावलं टाकत तो पुढे निघून गेला.
पुढे खलघाट आश्रमात भोजन प्रसादी झाल्यावर मी राम मंदिरा समोरा बसली होती तेव्हा तो संन्यासी तिथे आला, त्या राम मूर्ती कडे बोट दाखवलं आणि म्हणला…. “राम…….राम राम मैया जी…”असं म्हणत तो संन्यासी निघून गेला, आणि मी त्या पाठमो-या संन्याशाकडे बघत राहीले… तो आपल्या खोलीत निघून गेला आणि मग माझी नजर त्या संन्याशाने दाखवलेल्या रामाच्या मुर्तीवर स्थीर झाली. भान आलं तेव्हा १२ वाजले होते…आठवतंय हे बोलणं? मला एकदम हाच प्रसंग आठवला, कारण लाल पुरी बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून हेच म्हणाले होते *“बेटा, राम को कभी मत छोडना, उनको कभी दूर मत रखना”.. तेच शब्द, फक्त भाषा वेगळी*. खलघाट चा तो राजबिंडा संन्यासी मराठीतून बोलला आणि हे लाल पुरी महाराज हिंदीतून. *असं कसं कुणी दोन संन्यासी वेगवेगळ्या ठिकाणाचे, मला एकच संदेश देतात? आणि शब्दश: सारखाच? आणि सांगू, दोन नाही, तीन संन्यासी.. पुढे मांडू ला ही हाच प्रकार घडला, हाच संदेश मिळाला.. ह्याच शब्दात! असे शब्द अन शब्द कसे एकसारखे राहू शकतात?* याचा ही उलगडा महेश्वर ला झाला, उलगडा नाही म्हणता येणार, पण संदेश समजवल्या गेला काहीसा, असं म्हणू, पण ते मी आत्ता नाहीच सांगणारे, कारण अजून इथेच म्हणजे कल्याणपुराचा एक अजून अनुभव बाकी आहे. सांगते
तर “राम को मत छोडना” असं म्हणून ते बाबा आपल्या जागेवर जाऊन झोपले, आणि मी मात्र बराच वेळ तिथेच, होती तशीच बसून राहिले.
माझ्या मनात काय सुरु होतं त्यावेळी हे काही आता आठवत नाही. बऱ्याच वेळाने मी आडवी झाले, स्लीपिंग बॅग मध्ये शिरले, पडून राहिले पण झोप काही लागेना. तरी साधारण रात्रीचे अडीच तरी वाजले असतील, माझं सगळं मन त्या लाल पुरी महाराजांकडे होतं, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, आस्था आणि आपुलकीचे भाव आणि कळकळ मला आठवत होती. मी लालपुरी बाबांकडे पाहिलं. कृष शरीर यष्टीचा हा म्हातारा साधू अंगावर एक चादर घेऊन होता फक्त, कडाक्याच्या थंडीत! कुडकुडत होता अक्षरशः आणि मी मात्र उबदार स्लीपिंग बॅग मध्ये लोळत पडले होते. मला माझी लाज वाटत होती, पण थंडीमुळे बाहेर पडायची हिम्मत होईना. मात्र एक क्षण असा आला की माझ्या थंडी पेक्षा माझी लाज मोठी होऊन गेली. मी स्लीपिंग बॅग च्या बाहेर आले, स्लीपिंग बॅग घेतेली आणि लाल पुरी महाराजांजवळ गेले, “महाराज जी, आपको बहोत सर्दी लग रही है, आप को ये मेरी स्लीपिंग बॅग दू क्या? ये मेरी ओढी हुई है पर इसके इलावा मेरे पास और कुछ नही है, मै यही आपको दे सकती हू” ते म्हणाले “ दे दो बेटी, अब इस बूढे शरीर को सच मे जरुरत है”. मी त्यांना त्या बॅग मध्ये कसं जायचं ते सांगितलं आणि त्या बॅग मध्ये शिरल्यावर त्यांना झोप पण लागली. उत्तर रात्रीचे काही तास मला थंडीत घाललावे लागले पण त्या म्हाता-या साधू ला शांततेनी झोपलेलं पाहून त्या थंडीला ही मला फार त्रास द्यावासा वाटला नसेल!
सकाळी बाबा उठल्यावर त्याला रात्रीचा हा प्रकार समजला आणि तो म्हणाला “ तू चांगलंच काम केलं गं पण आता आज आणि पुढच्या रात्री तू काय करणारेस? तुझ्या जवळ काहीही नाहीये, मी तुला एक चादर देईनही पण त्यानी भागणार आहे का?” खरं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे ही नव्हतं, आणि माझ्या मनाला हा प्रश्न शिवला पण नाही. “बघू”, असं एका शब्दात उत्तर देऊन हा विषय इथेच थांबला. बालाभोग करून, लाल पुरी बाबांचा निरोप घेऊन आणि “राम को मत छोडना” हा संदेश मनाशी पक्का करून मी पुढे निघाले. जेम तेम ३ ते ४ किमी अंतर पार करून झालं असेल नसेल, म्हणजे लाल पुरी महाराजांच्या आश्रमातून निघून जेम तेम तास भर झाला असेल नसेल तोच एक असा काही विलक्षण अनुभव आला की आजही आठवलं की शहारून यायला होतं. मैया आपल्या बरोबर चालत असते आणि ती सर्वज्ञ आहे हे माहित असूनही ती जे अनुभव देते ते त्या वेळी तिच्या कुशीत शिरून समर्पण करायलाच भाग पाडतात. आपण परिक्रमा करत रहावी आणि तिच्या लीला बघत राहाव्या, बस, बाकी काही काही नको असं आणि फक्त असं च वाटू शकतं. मला जो अनुभव आला तेव्हा माझ्या समोर एक व्यक्ती येऊन उभी राहिली, आणि त्या व्यक्ती नी जे केलं, आणि जे बोललं ते पाहून मी उभ्या जागी मटकन खालीच बसले! आनंदाने रडावं की आश्चर्याने रडावं हेच कळेना. मात्र त्यावेळी माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती अजिबात गोंधळलेली नव्हती आणि मी मात्र अजिबात भानावर नव्हते. कसं? कसं कळतं तिला? अगदी नेमकं? मला मात्र काहीच कळत नव्हतं… पण तुम्हाला जेव्हा हे कळेल तेव्हा तुमची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नसणार हे निश्चित! मी जशी मटकन खाली बसले ना, तसाच काहीसं तुम्हालाही होणारे. सांगणार आहे मी तुम्हाला सगळं, अगदी एकूण एक सविस्तर.पण पुढच्या म्हणजे ४६ व्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४६*
*नर्मदे हर.*
तर मागच्या भागात मी सांगत होते लाल पुरी बाबांच्या कडून बाहेर पडल्यावरचा अनुभव. मी स्लीपिंग बॅग लाल पुरी महाजांना दिली होती आणि आता माझ्याजवळ पांघरायला काहीही नव्हतं. आम्ही बाहेर निघालो आणि थोड्याच वेळात एक माणूस माझ्या पुढे येऊन उभा राहिला… तो जे काही बोलला ते ऐकून मी रडूच लागले, मटकन खालीच बसले असं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होत, तर असं काय झालं होतं ते आता सांगते. तर आम्ही निघालो, वाटेत एक कार आम्हाला बघून थांबली. एक पन्नास पंचावन वयाचा माणूस खाली उतरला. नर्मदे हर झालं, आणि त्याने मला प्रश्न केला “मैयाजी, मुझे आपको कुछ देना है, आप ले कर जाओगे क्या?” परिक्रमावासीयांची सेवा म्हणून बहुतेकदा लोक शिधा देतात. मागे एकदा एका भाविकाने मला खूप शिधा दिला होता त्यात २ किलो तांदूळ, एक किलो डाळ, तेल मीठ मसाले, असं सगळं दिलं आणि आमच्या सामानासोबत ते वाहून नेणं आम्हाला कठीण होऊ लागलं होतं, म्हणून तो अनुभव गाठीशी ठेवूनच मी उत्तर दिलं “बाबा जी, आपको मना नही करेंगे लेकीन ऐसा कुछ मत दिजीयेगा जो हमे लेकर जाने मे भारी हो जाये, बाकी आपकी श्रद्धा का सम्मान तो हमे करना ही है” त्याने पण लगेच सांगितलं की जे काही तो मला देणार आहे ते अगदी हलकं आहे आणि आमच्या कामात पडणार आहे. तो म्हणाला, “ नही मैयाजी, एकदम हलका है और आपको जरूर काम आयेगा, बस एक बात है, बाबाजी के लिये नाही है, सिर्फ आपके लिये है, बाबाजी को हम चाय पिलायेंगे लेकीन जो देंगे वो तो आपकेही काम की चीज है, उसे आप ही रखीयेगा”. मनात विचार केला असं काय देणारे बाबा हा? बघू, “ ठीक बाबा जी, दे दो”….. त्यांनी मला काय द्यावं हो? विश्वासच बसणार नाहीये तुमचा… आणि हे ऐकून माझी अवस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता… सांगते.. तो माणूस कार पाशी गेला, एक पांढ-या रंगाची चांगली मोठी प्लास्टिक ची पिशवी घेऊन आला आणि म्हणाला “ मैयाजी दो कम्बल है, हलकी है बोहोत, लेडीज वाली है और ल्म्बाई थोडी कम है, पार आपको आ जायेगी, बाबा जी को छोटी हो जायेगी. आप लोगे तो मन को शांती मिल जायेगी” … मी आताच लाल पुरी बाबांच्या आश्रमातून निघाले होते, माझी स्लीपिंग बॅग त्यांना देऊन.. आणि तासाभरातच कसा काय माणूस भेटावा माला, ते ही दोन फ्लीस ब्लँकेट्स घेऊन.. आणि ते ही फक्त माझ्यासाठी?…मी ती पिशवी हातात घेतली आणि मटकन खालीच बसले, रडूच लागले. कसं? कसं तिला कळतं मला कशाची गरज आहे ते? कसा हा माणूस अगदी आजच मला भेटावा? याच्या जवळ माझ्या गरजेचीच गोष्ट नेमकी कशी असावी? नेमकी माझ्याच गरजेची? मी आणि बाबा दोघं ही होतो तिथे, पण बाबा ला द्यायला ह्याच्याजवळ काही नव्हतं आणि मला देण्यासाठी होतं, तेच जे मला प्रवासात लागणारे!!
मी शांत झाले आणि ठरवलं, विचारायचं याला, कुणी सांगितलं रे बाबा तुला जा आणि हिला मदत कर म्हणून? असा कसा आलास तू अगदी देवासारखा माझ्या गरजेची वस्तू घेऊन?… विचारलं मी, तर म्हणाला, “घर के लिये लेकर जा रहा था, आपको दूर से ही देख लिया था, अचानक खयाल आया, आप परिक्रमावासी काफी कष्ट उठाते हो, सोचा आपके पास ओढने के लिये कूछ होगा भी या नही? आपको देखा मैने मैया जी और मन किया बस, ये तो आपको ही देना चाहिये, फिर क्या एक बार आपको देने का खयाल मन मे आया तो अब तो आपको देना ही था, घर के लिये और ले लुंगा बाद मे.” त्याचं हे बोलणं ऐकून मी तर निःशब्द झाले होते… हे सगळं कसं होतं ते कधीच समजत नाही आपल्याला, आणि हे असं होतं हे ती दाखवत जाते, नेहमीच… आम्ही पुढे निघालो.
खरं आता लुनेर ला थांबून आराम करावा असं वाटत होतं पण देव जाणे तिथे थांबायची इच्छाच झाली नाही. वेळही होता, पुढे निघालो तर सगळा शेतातला रस्ता. पाणी मागायला देखील कुणी नाही. आधी लुनेर पर्यंत आणि नंतर पुढे १२ किमी चालून झालं होतं आणि आता थकवा आला होता, भूकही लागली होती. संध्याकाळ असल्यामुळे शेतांमध्ये ही कुणी नाही, मात्र दूर हायवे चा आवाज येत होता. रस्त्यात मात्र मैयांनी आमची सोय केलीच. इतक्या मोठ्या परिसरात फक्त एक झोपडी आम्हाला दिसली. तिथे पाणी मागितलं, मैयाजींनी पाणी आणि सोबत ताक ही आणलं. ताक म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे माहितीये का? खूप आवडतं मला.. अगदी मी ताकावर जगू शकेन, इतकं.. आणि अश्या थकलेल्या वेळी ते मला नं मागता मिळत गेलय ! असो, तर माझी पाण्याची तहान चक्क ताकावर शमवण्यात आली. इथे नं अजून एक गम्मत झाली. “दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम “हे आपण नेहमीच म्हणतो नं? ते इथे इतकं सत्य होतं माहितीये का? इथे, या झोपडीत, म्हणजे बालीपुरा गाव बरं का हे, तर या मैयांनी कणकेचे मोठाले लाडू पण आम्हाला दिले, आणि सोबत एक लाडू एका पिशवीत भरून दिला. म्हणाली, “ मैया जी, अभी थोडी देर पहले यहाँ से एक परिक्रमावासी बाबा भी आगे निकल गये है, ज्यादा दूर नही गये होंगे, आप तेज चलते हो, पकड लेना उन्हे, और ये लड्डू उनको दे देना” ठीके, देईन मी.. असं म्हणत निरोप घेतला आणि निघालो. आता एकच ध्यास होता. हा लाडू ज्याच्या नावे लिहिला होता त्याला पोहोचवणे. कसं असतं नं, त्या वेळी मला अजून काही दिसत नव्हतं, माझ्या नजरेसमोर फक्त तो भुकेला परिक्रमा वासी येत होता, ज्याच्या नशिबात हा लाडू लिहिला होता. आणि मैयाची इच्छा होती ती, एक म्हातारा संन्यासी एका झाडाखाली बसलेला दिसला. बालीपुरा मधल्या झोपडी वाल्या मैयांनी वर्णन केला तसाच…नर्मदे हर झालं, आणि मी त्याला त्याच्या नावाचा लाडू दिला. सांगितलं, मागे जी झोपडी लागली नं, त्या मैयांनी तुम्हाला बघितलं होतं, म्हणून तुमच्या साठी पाठवलाय. तर तो संन्यासी काय म्हणतो, “मुझे तो कोई झोपडी दिखी ही नही, आप अपने खाने मे से मुझे दे रहे हो, मेरे लिये तो आप ही मैयाजी हो” असं म्हणत त्यांनी मला नमस्कार केला….. काय ही किमया तिची, जिथे आम्ही थांबलो ताक घेतलं, लाडू खाल्ले, त्याच रस्त्याने हा संन्यासी पण आला होता खरं. पण याला कशी काय नाही दिसली झोपडी? आणि त्या मैयांनी जर या संन्याश्याला पाहिलं होतं तर तेव्हाच थांबवून का नाही दिला लाडू? पाहिलं तर होतं कारण झोपडीतल्या मैया ने या संन्याश्याचं अगदी तंतोतंत वर्णन केलं होतं.. ह्या मैयाचं नं काही काळात नाही. मी मात्र फार आनंदात होते कारण काही का असेना लाडू त्याच्या पर्यंत पोहोचवण्यात माझ्या या देहाचा, आत्म्याचा थोडाफार सहभाग झाला हेच माझं भाग्य. तिच्या भक्तांची सेवा करण्यात केवढा आनंद आहे खरच… खरं तर सेवा ही नाही म्हणता येणार याला, एक लाडू पोहचवणे काही सेवा झाली का? पण तो लाडू खाताना त्या थकलेल्या जीवाच्या चेह-यावरचा आनंद जितका मौल्यवान आहे नं तितकं काही काही नाही. सहज विषय निघतोय म्हणून सांगते, मला अनेकदा लोक म्हणतात, काय मिळतं गं तुला असं भटकून… मी ही सांगते गमतीत.. जे तुम्हाला नाही मिळत ना ते.. पण गमतीचा भाग बाजूला ठेवून विचार केला तर समजतं, हे जे काही मला मिळतंय न त्याची तुलना कशाशी ही होऊ शकत नाही आणि भौतिक जगात सर्वोच्च स्थान घेतलेल्या आणि अत्यावश्यक असलेल्या “पैसा” नामक क्षणभंगुर वस्तू शी तर अजिबात होऊ शकत नाही. कारण पैशाने सर्व विकत घेता येईलही, पण समाधान आणि आत्मशोध हा विकत घेता येणार नाही. आता आत्मशोध मी घेतलाय का हे विचाराल तर मी म्हणेन तो प्रत्येकाचा वेगळा आहे. मला तो काव्यात, लिखाणात, परिक्रमेत मिळेल, तर अजून कुणाला तो कलेत, स्वयंपाक करण्यात मिळेल… हवा असतो तो फक्त एक साक्षात्कार. मला तो माझ्या मैया कडे मिळाला आणि म्हणून आज मी सर्वसुखी व्यक्ती आहे.. “जगी सर्व सुखी असे कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे” याचं उत्तर मला माझ्यात सापडतं, मी जगात सर्वसुखी आहे हे म्हणण्याचे अनुभव मला माझ्या मैयांनी दिलेत… असो..
पुढचा मुक्काम आमचा रामधाम ला होता. तिथून पुढे आमची बी जे पी चे मंडलाध्यक्ष श्री श्रीमाली यांची भेट झाली, त्यांची ही बरीच मदत झाली. त्यापुढचा मुक्काम छीतरी ला झाला, अगदी उघड्यावर.. आणि मग मांडू ला पुन्हा एकदा अनेक अनुभव आले… मागच्या भागांमध्ये सांगितलेले दोन संन्यासी आठवतात नं? “राम को मत छोडना” सांगणारे? एक खलघाट चा राजबिंडा संन्यासी, आणि एक लाल पुरी बाबा. ज्यांना मी स्लीपिंग बॅग दिली..आता तिसरा संन्यासी काय म्हणाले ते सांगणारे, आणि हो शेंगदाणे खाता खाता आमच्या हातात चांगले किलोभर रसरशीत टपोरे बदाम येऊन पडलेत माहितीये? कसे?..सांगणारे, आणि गम्मत सांगते, मंडू उतरलो नं तेव्हा बगवानिया हून कुणीतरी खास आम्हाला घ्यायला आलेलं.. कोण? अहं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे मी पण ४७ व्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४७
नर्मदे हर.
छीतरी ला उघड्यावरचा मुक्काम झाला असं मी मागच्या भागात सांगितलं. तिथे बांधकाम अजून सुरूच होतं. नाही म्हणायला डोक्यावर छत होतं पण वारा अडवायला म्हणून काही नाही. सोसाट्याचा वारा आणि जानेवारी महिना. आम्ही हळू हळू जंगलाकडे जात होतो. तिथे त्या संध्याकाळी कोल्ह्यांची फौज बघितली आम्ही. बरीच दूर होती पण रात्री ती जवळपास वावरू शकतात याची खात्री पटली होती, आणि आज आम्हाला दारं किंवा भिंती नावाचा प्रकारच मिळाला नव्हता. आम्ही जिथे झोपलो होतो तिथून समोर आणि उंचावर दिसत होतं मंडू, म्हणजेच मांडवगड. राणी रुपमतीचं राज्य! आणि हा भला मोठा पहाड आम्हाला चढून जायचा होता.
रात्री श्रीमाली साहेब आम्हाला स्वत: भेटायला आले आणि त्यांनी बराच खाऊ आमच्यासाठी आणला. आमचा सगळ्यांचा बालाभोग होईल इतका. दुस-या दिवशी सकाळी आम्ही मांडू साठी निघालो. भला मोठा घाटाचा रस्ता मजल दर मजल करत पार करेस्तोवर आम्हाला दुपारचे दोन वाजलेत. घाट चढून वर आलो ते निळकंठ महादेवाचं अतिप्राचीन मंदिर दिसलं. ब-याच पाया-या खाली उतरून पाण्याच्या झा-याखाली असलेल्या या मंदिरात गेलो तो सगळा थकवाच नाहीसा झाला. तिथे एक तरुण सन्यासी रामायण वाचत बसला होता. येणारे जाणारे त्या संन्याश्याला नमस्कार करून जात होते. तिथे एक अखंड जल कोष आहे, त्यातलं पाणी कितीही दा काढून घ्या, ते संपतच नाही.. ते पाणी पिऊन मी या सन्यासी महाराजांच्या समोर बसले. इतर लोकांसारखी मला अजिबात घाई नव्हती, किंबहुना या मंदिराची रचना आणि याचं राजकीय महत्व, तसच हा जलकोष आणि याच रहस्य मला माहित करून घ्यायचं होतं आणि अजूनही एक महत्वाची गोष्ट होती. ती म्हणजे या सान्याश्याच्या डोळ्यातले रामायण वाचाताचे भाव मला तिथून पुढे जाऊ देत नव्हते. एक एक शब्द आणि ते उच्चारताना त्यांच्या डोळ्यातलं प्रेम इतकं विलोभनीय होतं की ज्याला ते दिसेल तो पुढे जाउच शकणार नाही.
मला बसलेलं पाहून त्या सन्याश्याने हातानेच “थांबा” अशी खुण केली आणि आम्ही थांबलो. त्याचं वाचन झालं तोवर अजून अर्धा तास तरी झाला असेल. नर्मदे हर झालं. चौकश्या झाल्या आणि मग त्याने आम्हाला मागच्या बाजूला नेलं. तिथे त्यांची खोली होती. चहा झाला, भोजन प्रसादी चा आग्रह झाला, पण त्यांना आमच्यासाठी वेगळी प्रसादी तयार करावी लागेल म्हणून आम्ही नको असं सांगितलं तर जवळ जवळ किलोभर द्राक्ष आणि डझनभर संत्री आमच्या पुढ्यात आणून ठेवली. खूप सत्संग झाला. ते महाराज म्हणाले “लोग चले जा रहे थे, लेकीन आप तो बैठ ही गये? ऐसा क्यू?” मी पण जे होतं ते सांगितलं, “आप जिस प्रेम से रामायण पाठ कर रहे थे वह सुनकर और देखकर रुकने का मन किया इसलिये रुक गये” ते म्हणाले “मै तो रोज ही ऐसे ही रामायण पाठ करता हू. कितने ही परिक्रमावासी आते है, दर्शन कर के चाले जाते है, आप मे कोई तो बात होगी जो आप रुक गये, इसे समझने की कोशिश नही करोगी आप?” मी काय कोशिश करणार? मला पामराला काय समजणार? मी म्हटल “आप ही बताइये”… मी विचारण्याचीच देरी की काय, महाराज बोलू लागले. “माताजी सब कूछ जो केवल संयोग लगता है वो संयोग नही होता, उस हर क्रिया के पिछे संदेश होते है. आप को यहा रुक कर रामायण सुनने मे भी संदेश है, शायद पहले से कोई इशारा आपको मिल चुका है, और मेरे जरीये आप को याद दिलाया जा रहा है” म्हणजे मला काहीतरी संदेश मिळालाय आधीच आणि आता त्याची पुन्हा आठवण हे संन्यासी करून देणार, असं हे म्हणत होते आणि तरी मला समजत नव्हतं, की नक्की त्यांना मला काय सांगायचंय, कसली आठवण करून द्यायचीये.. मी विचारात मग्न झालेले पाहून ते मला म्हणाले “अरे माताजी कहां खो गये आप? इधर उधर खोने से कोई मतलब नही, आप को तो वही खोना है जहा पे आप बैठ कर हमे सुन रही थी. जिस प्रेम के साथ हम रामायण पढ रहे थे, उसी प्रेम से तुम रामायण सुन रही थी ना? जैसे तुमने मुझे देखा था वैसे ही मैने भी तुम्हे देखा था. हम दोनो मे दो चीजे बिलकुल एक सी थी, एक प्रेम और दुसरा राम. प्रेम की तो कोई कमी मुझे आप मे नही दिखती, क्युं की आप मा हो लेकीन आपको राम से दूर नही होना है.. उन्हे कभी नही छोडना”
त्या सान्यास्याचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटा आला आणि कालचक्र फिरावं तसं झालं. मला एकदम आठवला तो खलघाट चा राजबिंडा सन्यासी, आणि त्यांनी मला दिलेला संदेश, भाग ११ मध्ये मी सांगितलय बघा या बद्दल. या सन्याश्या कडून मी ऐकलेलं पाहिलं वाक्य होतं “फक्त एक करा, राम सोडू नका”…राम, राम राम मैयाजी असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेल्या नंतर मी रात्री बारा पर्यंत रामाच्या मूर्ती समोर बेभान होऊन बसले होते…तो, रामा ची जाणीव करून देणारा पहिला सन्यासी… दुसरा सन्यासी म्हणजे अभिराम दास त्यागी महाराज, रामानंद आश्रमातले, २८ व्या भागात मी यांच्या बदल लिहिले आहे मग लाल पुरी महाराज, हेच वाक्य फक्त हिंदीतून सांगणारे आणि राम हृदय वाचून दाखवणारे…आणि आता हा चौथा.. पुन्हा तेच वाक्य, अगदी तेच शब्द मला चवथ्यांदा सांगत होता हा.. “राम को मत छोडना…” वरून पुन्हा आधी मिळालेल्या संदेशांची आठवण ही करून देत होता… कसं शक्य आहे? चार वेगवेगळे संन्यासी, चार वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याशी बोलतात, मात्र एकच वाक्य, अगदी शब्दशः सारखं वाक्य मला सांगतात… कसं शक्य आहे? आणि राम सोडायचा नाही म्हणजे नक्की काय करायचं? त्याचं उत्तर काही सापडेना, पण हो, रामायण वाचा, जसं जमेल तसं, एकदा तरी पूर्ण, आणि शक्य असल्यास ११ दा पूर्ण , असं मला ह्या संयास्यानी सांगितलं आहे.. अजून माझं पूर्ण वाचून झालं नाहीये पण त्यात माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर असणारेत असं ही हे सन्यासी म्हणाले.. मी निर्बुद्ध आहे, जेवढं स्पष्ट सांगितलं तेवढच समजलंय मला, पण त्या मैयांनी जेव्हा चारदा मला एकच संदेश वेगवेगळ्या संन्याश्यान् करवी दिलाय त्या अर्थी त्यात काहीतरी नक्की आहे इतकच मला समजतंय.
तिथून पुढे मंडू चं निसर्ग सौंदर्य बघत बघत मुक्कामी पोचलो, भोजन प्रसादी आदी झाली आणि झोपी गेलो. दुस-या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरु. आज सकाळी लवकर निघालो खरं पण बालभोग काही झाला नव्हता. वाटलं वाटेत काही तरी खाऊ पण इच्छा च झाली नाही. बरच अंतर चालत आलो, आणि मग एका झाडाखाली बसलो. आमच्या जवळ शेंगदाणे होते. पावभर शेंगदाणे ठेवायचे कुठे म्हणून मी ते रात्रीच पाण्याच्या बाटलीत ठेवले होते, म्हटल भिजवून सकाळी खाऊयात, तर तेच खात आम्ही झाडाखाली बसलो होतो. ते भिजवलेले दाणे खाता खाता मला नं बदामांची आठवण आली. मी बाबाला म्हणाले “दाण्या ऐवजी बदाम असते तर किती मजा आली असती नाही?” बाबा ही म्हणाला मला “बेटा हे गरीबांचे बदामच आहेत, खा आता”..
आम्ही असं बोलत असतानाच आमच्या समोरून एक पांढ-या रंगाची कार गेली बरं का. त्यात बसलेली बाई खूपच सुरेख होती दिसायला. गोरी पान, लांब केस, पांढरी साडी, कुणाचं ही लक्ष वेधून घेईल अशी.. मी तिच्याकडे बघत होते आणि कार पुढे निघून गेली… आणि गम्मत माहितीये का, थोडं पुढे जाऊन ती कार थांबली, बाई खाली उतरली, डिकी उघडून एक पिशवी घेतली तिनी आणि आमच्या दिशेला येऊ लागली.. मी लगेच बाबाला म्हटलं “ ए बाबा, ती खाऊ घेऊन येतेय का रे आपल्यासाठी, किती सुंदर आहे नं ती?” भूक लागली असल्यामुळे असेल, मला तर खाउच असेल असं वाटलं. ती आली, “ मैने अगर कोई खाने की चीज दीयी तो लोगे आप?” खूप आनंदाने मी लगेच हो म्हणून सांगितलं, आणि ती पिशवी तिनी माझ्या हाती दिली. आमच्यातले दाणे पण खाल्ले तिनी, म्हणाली “मै राखी व्यास, रतलाम से हु, घुमने आई हु, इसमे रतलाम की सेव है, सोचा आपको पसंद आयेगी”… वावा तिखट शेव होती त्यात…ती बाई आमचा निरोप घेऊन गेली आणि लागलीच मी शेवेची पिशवी बाहेर काढली, पण हे काय, खाली अजून एक पिशवी होती, ती कशाची आहे हे बघण्यासाठी मी ती दुसरी पिशवी ही बाहेर काढली आणि बघते तर काय, चांगले एक किलो बदाम होते त्यात…. अहो आत्ता दाणे खाताना मी बदामाची आठवण काढली होती नं, अगदी १५ मिनिटापूर्वी…. आणि मिळाले होते मला बदाम! मला माझीच लाज वाटू लागली… किती? किती मागतेय मी मैयाला, आणि ती सुद्धा देतेय नुसती… काय हे?.. पण माणूसपणात अडकून आहोत आपण.. किती समजलं, कळलं तरी वळत नाहीच…. “ आई आता मला कसलीच इच्छा होऊ देऊ नको, हे ही मी मागितलंच तिला!..
पुढे गेलो तो अनेक परीक्रमावासियांची भेट झाली. हा चढलेला पहाड आता उतरायचा होता. कठीणच होता तसा. उतरताना गुडघे जातात अगदी असं ऐकलं होतं. पण जायचं तर होतं. आम्ही निघालो. थोडं अंतर उतरून होत नाही तर दोन लहान लहान मुलं बसलेली दिसलीत. लहान मुलं दिसालीत नं की माझ्यातली शिक्षिकाच जागी होते.. “ क्या नाम है बेटा? कहां राहते हो? स्कूल जाते हो? माझे प्रश्न सुरु झाले.. त्यांनी ही उत्तरं दिली. ते बगवानिया चे, म्हणजे उतरल्या उतरल्या लागतं ते गाव, मांडू च्या पायथ्याचं. “ यहा क्या कर रहे हो? माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, त्यावर त्यातला एक म्हणाला, बकरी चराने आया हु, तर दुसरा त्याला म्हणतो “ए तुम झूठ क्यू बोला, तेरे पास बकरी नही है? मग मी पुन्हा विचारलं, किसालीये आये हो बेटा, अपने दोस्त के साथ आये हो क्या? तर तो चटकन म्हणतो “तुमको लेने आया हू, धीरे धीरे मत चलो, मेरे पिछे चलो”… मला गंमतच वाटली त्याची, पण खाली उतरल्यावर समजलं, तो खरच आम्हाला घ्यायला आला होता. त्याच्या आईनी सांगितलं होतं, परिक्रमावासी को ले आना.. आमच्यासाठी त्याच्या घरी भोजन प्रसादी तयार होती. आणि गम्मत सांगू का, हा भला मोठा पहाड आम्ही फक्त १ तास १० मिनिटात उतरलो होतो.. काहीही त्रासाविना!
आता तो कोण होता? का त्याच्या आईनी आम्हाला घेऊन ये असं सांगितलं? आम्हीच कसे काय, इतरांना तो का घेऊन गेला नाही, ते काही काही माहित नाही.. आज दिवस भरात आलेल्या अनुभवांनी मी सुन्न झाले होते, माझ्या मनानी विचार करणं थांबवून दिलं होतं, आणि तेच कदाचित आवश्यकही होतं. कारण पुढे जे काही वाढून ठेवलं होतं अजूनच वेगळं होतं. माझ्या आयुष्याची दिशा बदलली ती महेश्वर पासून…इथे माझी भेट “साक्षी” शी झाली.. भेट काय, मीच झाले साक्षी, असं म्हणा हवं तर! आम्ही धामानोद च्या आधी मुक्काम केला आणि महेश्वर कडे निघालो. पण तिथे नेमकं काय झालं? कसं झालं याची कल्पना देते.. मी नागपूरची राहणारी हे मी तुम्हाला सांगितलंय… पण आता मी इंदोर ला असते हे ही तुम्हाला माहितीये… मी इंदोर ला कशी आली हे मात्र तुम्हाला माहित नाहीये… आणि याचं उत्तर आहे “अचानक”… मी ध्यानी मनी ही नसताना नागपूर सोडून दिलं…कायमचं सोडलं नागपूर, का? त्याचं उत्तर महेश्वर च्या अनुभवात आहे. असं काय घडलं महेश्वर ला? काय काय बदल झालेत माझ्या आयुष्यात? आणि ही साक्षी कोण? सांगते पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ४८
*नर्मदे हर*
मागच्या भागात मी माझ्या आयुष्याची दिशा बदलली असं सांगितलं होतं. कुण्या साक्षीचा ही उल्लेख केला होता. ते सगळं आता या भागात सांगते. तर महेश्वर ला पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. तिथल्या बाजारातून जाताना “श्री राधे ज्वेलर्स” म्हणून एका सराफा दुकानदाराने ने चहा ला बोलावलं. त्यालाच विचारलं आम्ही, कुठल्या आश्रमात राहावं ते. आधी त्यांनी वेगळ्याच आश्रमाचा पत्ता दिला होता, पण मग आम्ही चालू लागल्यावर तो आमच्या मागे धावत आला “ आप तो जगन्नाथ धाम जाओ, वहा आपकी व्यवस्था करा दीई है” असं सांगितलं. आपण काय परिक्रमावासी, एक रात्र थांबायचं न पुढे निघायचं, मग कुठेही थांबा..आम्ही जगन्नाथ धाम ला गेलो.तिथे समोर जगन्नाथ मंदिर आहे आणि त्यासमोर संथ वाहणारी नर्मदा माई. प्रसन्न वातावरण. मी पाय-या चढून वर गेली तो एक अतिशय तेजस्वी आणि तरूण संन्यासी बसलेला होता. नर्मदे हर झालं, चौकशी झाली आणि अचानक नजर रोखून तो संन्यासी माझ्याकडे एकटक पाहू लागला. मला संकोचल्या सारखं झालं, मी नजर दुसरीकडे वळवली आणि आत निघून गेले. आत एक माताजी स्वयंपाक करत होत्या. चहा झाला, ते मघाचे संन्यासी ही आता आमच्या समोर येऊन बसले, पण आता ते एक टक बघत नव्हते. ते मला म्हणाले “साक्षी जी आप को एक काम बताऊ?, उपर तीन सफेद चादरे रखी है, ले आओगे?” रस्ता विचारून मी वर गेले, तिथे तीन कपाटं होती, आणि एक लाकडी पेटी होती. मी काही हात लावला नाही त्या कपाटांना, ती पेटी उघडली, तीत चादरी होत्या, त्या घेऊन खाली गेले.
“अरे वा साक्षी, तुम ले आई चादरे?” ते म्हणाले.. मग मी त्यांना सांगितलं, माझं नाव साक्षी नाही सुरुचि आहे. तर म्हणाले यही तो समझाने की कोशिश कर रहा हू, तुमको साक्षी होना है. जब तुम आई थी तब हम तुम्हारे तरफ देख कर सोच रहे थे की शायद हम तुम्हे जानते है, या शायद इस वास्तू से या इस स्थान से तुम्हारा कोई पुराना रिश्ता है.. और अब हमे पता चला है की हम सही सोच रहे है. हमने तो तुम्हे नही बताया था न की चादरे कहां रखी है, और तुम ले आई… कैसे?.. मी म्हंटल त्यांना, “ आपकी अल्मारीयोको बिना पूछे कैसे हाथ लगाती मै, इसलिये पेटी मे देखा, तो वहा चादरे मिल गयी”.. ते म्हणाले, “ पेटी भी तो मेरी ही है? उसे कैसे हाथ लगा लिया? तब नही लगा की स्वामीजी से पुछना चाहिये? क्युं की तुम्हे पता था की हो न हो चादरे और कही नही है, तुम तो अल्मारियो की तरफ गयी भी नही?.. है ना?”
असं झालं होतं खरं. मी त्या कपाटा जवळ फिरकली पण नव्हती. असेलही काही संबध… असेलही मी कुणी साक्षी.. पण तरी मला आठवत नाहीये,
माझा विश्वास पण बसेना.. आणि असं असलं जरी तरी या जन्मी मी सुरुचि आहे, मग मी साक्षी का बनायचं? तुम्हे साक्षी होना है याचा अर्थ काय? मी त्या स्वामीजीं ना विचारलं तर मोठ्यांदा हसू लागले. म्हणाले “मैने तुम्हे पुराने जनम की साक्षी होने को कब कहां? तुम तुम्हारा पुराना जनम छोड के आई हो, अब इस जनम में हो, तो इस जनम की बात करो. मैने तुम्हे इस जनम मे ही साक्षी होने को कहां है.. सामाझाता हू…
मला कळत नव्हतं तरी मी ऐकायचं ठरवलं, आणि मग हळू हळू कळू लागलं. “साक्षी होना” म्हणजे नक्की काय हे समजल्यावर मात्र खूप आनंद झाला. सांगते.
ते स्वामीजी म्हणाले, तुमको हर चीज देखनी जरूर है, समझनी जरूर है, लेकीन उसपर तुम्हे प्रतिक्रिया देनी नही है. तुम्हे जो भी करना है वह तुम्हारा कार्य है यही समझ के करना है… तुम्हे द्रष्टा बनना है. चलो और आसान करके बताता हू. तुमने कभी फिल्म तो देखी होगी? उस फिल्म का तुम आनंद तो लेती हो, लेकीन क्या उसमे तुम्हारा सक्रीय सहभाग होता है? नही ना? तुम फिल्म देखती हो. कभी आनंद होता है, कभी दुख होता है, उसे वही छोडकर अपनी जिंदगी फिर से जीने लगती हो, उस आनंद या दुख को गले लगाकर नही रखती हो, क्युंकी वो सत्य नही है यह तुम्हे पता होता है. इसी प्रकार तुम्हारे आसपास होने वाली घटनाओ को तुम्हे फिल्म की तऱ्हा देखकर छोड देना है, उसे मन मे नही रखना है.
त्यांनी बोलावं आणि मी ऐकत बसावं असं मला वाटत होतं. साक्षी होणं म्हणजे काय हे शिकणं देखील मला आनंद देणारं होतं तर मग मुळात साक्षी होणं हे कितीतरी आनंद दायक असेल? आणि हे समजावताना हे स्वामीजी मला जे जे म्हणून उदाहरण देत होते ते अगदी रोजच्या जीवनातले असल्यामुळे समजण बरंच सहज होत होतं मला.
ते पुढे म्हणाले, “चलो एक और उदाहरण देता हू. कोई कोर्ट केस नजर के सामने लाओ. अब इस केस मे कोई एक गुनाहागार है, कोई पुछताछ कर रहा है, और किसी एक ने गुनाह होते हुये देखा है, और वह गवाही देने के लिये आया है. अब जो गवाही दे रहा है, उसने गुनाह किया नही है, ना ही उसका उस घटना से वास्तविकता मे कोई संबंध रहा है. ना ही उसके जीवन पर इस गुनाह का, उस गुन्हेगार का कोई प्रभाव पड रहा है, वो तो सिर्फ साक्ष दे रहा है की हा, ये घटना जब हुई थी तब मैने इसे होते हुये देखा था… यही तो साक्ष है.. तुम्हे यही तो करना है. उस गवाही देने वाले की तरह सिर्फ देखना है.. सब कुछ…जैसे तुम वहा हो, पर उनका तुमपर कोई प्रभाव है ही नही, क्यू की वास्तविकता मे तुम तो तुम हो ही नही… जैसे फिल्म मे तुम्हारा रोल नही है वैसे यहा भी नही है.
साक्षी को ना आरंभ है ना अंत है, वो तो चिरकाल है, वो तो बस है, वही तो बस सत्य है. बाकी जो चल रहा है, वो चलकर रुक जायेगा, साक्षी तो वही रहेगी. चलो एक और उदाहरण देता हू. आईना तो तुम रोज देखती हो. अब बताओ, आईने ने कभी तुम्हारी जगह किसी और का प्रतिबिंब दिखाया है? कभी ऐसा हुआ है तुम निकल आई और प्रतिबिंब वही आईने मे रहा गया? नही न? आईना तुम्हे उतनाही दिखायेगा जितना है. तब तक ही दिखायेगा जब तक तुम उसके सामने खडी हो. जैसे ही तुम चली जाओगी, आईना फिरसे साफ, चमकिला सां हो जायेगा… वो कभी कोई बिंब पकड के नही रखेगा है ना?.. तुमको उस आईने जैसा होना है मेरे बच्चे.. एकदम चमकिला, साफ, शुद्ध… और केवल साक्षी..बनोगे ना साक्षी?”
हे सगळं ऐकल्यावर मला खरच आपण साक्षी आहोत असच वाटू लागलं. आणि नसले तरी आता मला साक्षी बनायचं आहे हे मात्र मी ठरवून टाकलं. किती सरळ आणि सोपं आहे हे सगळं, फक्त ते करता आलं तर! ते करायाला कठीण मात्र. आपण किती गुंतून जातो नं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये? आपल्या आयुष्यात होणा-या अनेक गोष्टी ज्याचा खरच आपल्याशी संबंध नसतो तिथे ही गुंततो आपण, आणि इथे आपल्याला आपल्याच आयुष्यात होणा-या घटनांकडे त्रयस्थासारखं बघायचं आहे. आणि माहितीये का, प्रत्येक संत महात्मा आपल्याला वेगवेगळ्या शब्दात हेच तर सांगत असतात. सियाराम बाबा म्हणतात “मै तो बस तमाशा देखता हू, जब ये खतम हो जायेगा तो दुसरा शुरू हो जायेगा, ना इसके खत्म होने का दुख, न उसके शुरू होने का सुख.. देखते रहो बस!” म्हणजे हे साक्षी होणं च नाही का? फिल्म सारखं बघणे सगळीकडे…मागे एका अनुभवात मी तुम्हाला “इदं न मम” हा मंत्र मला एका संन्याश्याने दिलेलं सांगितलं होतं की… ते म्हणजे तरी वेगळं काय? जे काही माझ्या हातावर पडतंय ते पडतंय त्या ईश्वराच्या कृपेने, पण म्हणून ते माझं नाहीच.. तेच काय, माझं काहीच नाही… पण ते पडतंय एवढी साक्ष फक्त काय ती माझी.. साक्षी होणं याला नाही का म्हणता येणार? काय नं सुंदर अवस्था असेल ती? दु:ख ही नाही आणि सुख ही नाही…. जे आहे, जसं आहे, तसं आहे म्हणून आहे, आणि जे नाही म्हणून नाही…
हे खरं मला समजलं होतं, पटलं ही होतं पण आपल्या सारख्या साधना शून्य व्यक्तीला असं साक्षी होणं सोपं आहे का हो? मला हे आवडलं ही होतं पण अजून ही काही गोष्टीतून माझं मन निघता निघेना. त्याला कारण ही होतं म्हणा! मला अजून बरच काही समजून घ्यायचं होतं, ब-याच गोष्टींचा उलगडा व्हायचा होता. आज तर महेश्वर चा पहिलाच दिवस होता.. मात्र इथून माझ्या आयुष्याची दिशा बदलली असं मी म्हणालेय…
मी ३ दिवस होते इथे आणि हे तीनही दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. दुस-या दिवशी जो संवाद झाला त्या वेळी मी पुरती गोंधळात पडले, मला सावरायला वेळच लागला..कारण हा संवाद होता माझ्या नाळेशी जोडलेला…माझ्या आईशी आणि माझ्या बाळाशी पण…. पण तो संवाद आणि ती स्थिती, आता नाही सांगता येणार… पुढच्या भागात सांगते.
नर्मदा परिक्रमा -एक विलक्षण अनुभूती – भाग-४९
नर्मदे हर..
मागच्या भागात मी महेश्वर ला झालेल्या गोष्टींबद्दल सांगत होते.आज तर महेश्वर चा पहिलाच दिवस होता.. मात्र इथून माझ्या आयुष्याची दिशा बदलली असं मी म्हणालेय… मी ३ दिवस होते इथे आणि हे तीनही दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दुस-या दिवशी जो संवाद झाला त्या वेळी मी पुरती गोंधळात पडले, मला सावरायला वेळच लागला..कारण हा संवाद होता माझ्या नाळेशी जोडलेला…माझ्या आईशी आणि माझ्या बाळाशी पण…. पण तो संवाद आणि ती स्थिती मला मागच्या भागात सांगता आली नव्हती, ती आता सांगते, पण थोडं आधी पासून.
रात्रीचा हा “साक्षी” चा संवाद ऐकून मी झोपी गेले. बाबा कधीचाच झोपून गेला होता. मला रात्रभर व्यावस्थित अशी झोप लागली नाही मात्र थकवा ही आला नाही. साक्षी होणे या एका विचारावर माझी रात्र आनंदाने सरत गेली होती. मला स्वामीजी आणि माताजी आवर्जून साक्षी म्हणतात.. अजूनही! किंबहुना साक्षी हेच माझं नाव असावं इतकी सहजता त्यांच्या मला साक्षी बोलावण्यात असते, आणि तितकीच माझ्या प्रत्युत्तराला पण! तर दुस-या दिवशी सकाळी मला लवकर जाग आली, अगदी साडे चार ला. परिक्रमेत तशीही लवकर उठण्याची सवय होऊनच जाते.
मी खाली गेली तर माताजी आणि स्वामीजी उठले होते. माताजी स्वयंपाक घरात काहीतरी काम करत होत्या आणि स्वामी जी अंगण झाडत होते. मी सुद्धा जवळ असलेला एक खराटा घेतला आणि अंगण झाडू लागले. आमचं अंगण झाडून झाल्यावर माताजीन्नी मला बसवलं, मला ओवाळलं आणि भिजवलेले तीळ वाटून केलेलं उटण माझ्या अंगाला लावून म्हणाल्या ” जाओ अब मैयाजी मे स्नान करके आओ, तुम्हारे लिये एक काम रक्खा है” ती संक्रांत होती. मी स्नान करून आल्यावर माझ्याकडून मंदिराची साफ सफाई आणि पूजा करवून घेतली. अगदी फुलं तोडण्यापासून ते नैवेद्याचा स्वयंपाक आणि नैवेद्य सुद्धा माझ्या हाताने दाखवला आणि हे सगळं करताना कधी माताजी तर कधी स्वामीजी माझ्या सोबत होते, एखाद्या आईने बोट धरून लहान मुलाला चालायला शिकवावं तसं एक एक गोष्ट ते मला सांगत होते. “चलो आज दो चीजे हो गयी, परिक्रमावासी के हाथ से पूजा हुई और तुम्हारे कर्मो मे अगर कोई बडा भोग होगा तो भी कट गया होगा, मंदिर मे सफाई करने का मौका मिले तो कभी मत छोडना, उससे कर्म कम हो जाते है” हे ऐकून खूप समाधान वाटलं, वाटलं चला, काही भोग तर झाले बाबा कमी…आणि सगळं आटोपल्यावर मी तिथेच मंदिराच्या खाली मैयाच्या घाटावर बसले तेव्हा झाला आजचा संवाद.. माझ्या नाळेशी जोडलेला, ज्याबद्दल मी मागच्या भागात बोलत होते नं तोच..
कालचा संवाद, आज सकाळपासून झालेल्या घडामोडी, ते बगीचातून फुलं तोडण, आपल्याच धुंदीत मस्त श्लोक म्हणण, मनसोक्त पूजा करणं.. कितीतरी दिवस इतकं निवांत पणे मी हे केलंच नव्हतं. शाळेची घाई, त्यात घाई घाईत पूजा, आणि सुट्टीच्या दिवशी बाकी कामांची रीघ लागलेली. इथे मात्र मी आणि माझी मैया… आणि हा निवांत पणे स्वत:ला समजून घेण्याची संधी..मला हे सगळं हवं हवं सं वाटत होतं. काळ इथेच थांबून रहावा असं वाटत होतं. मी पायरीवर बसले होते, माझ्यासमोर मैया होती आणि अचानक मला रडू आलं.. रडू म्हणजे अगदी हलकं नाही बरं का, आवंढेच येऊ लागले. मी हमसून हमसून रडू लागले.. माझा हा निवांतपणा, माझं हे समाधान , माझी ही मैया, हे सगळं सोडून मला परत जावच लागेल या विचारांनी असेल बहुधा.. पण मला इथेच थांबून राहावंसं वाटत होतं.. परिक्रमा संपूच नये कधी असं वाटत होतं. मला रडताना ऐकून स्वामीजी तिथे आले, आणि हा संवाद सुरु झाला.
“क्या हुआ? क्यू रो ही हो साक्षी?” त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, आणि मला म्हणाले “मुझे बताओ, शायद तुम्हारी समस्या दूर हो जाये”. मी मला जे जे वाटत होतं ते ते सांगितलं. मी माझी द्विधा मनस्थिती सांगितली. मला इथेच राहावंसं वाटत होतं, पण माझं घर, माझा नवरा, माझा मुलगा, माझे आईवडील, माझं विश्व तिकडे माझी वाट बघत असणारे हे मला माहित होतं. माझा जीव अडकला होता माझ्या नाळेशी.. बाकी सगळ्यांचं एक वेळ ठीक होतं हो, पण माझं लेकरू? माझा एकुलता एक मुलगा? त्याच्यासाठी तरी मला जायलाच हवं होतं.. आई आहे मी त्याची आणि आज सगळ्यात जास्त जर कुणाला माझी गरज असेल तर ती माझ्या लेकराला आहे, आणि त्यामुळे माझं इथून जाणं हे निश्चित आहे… आणि इथे मी माझ्या माई ला, माझ्या आई ला सोडून जाऊ तरी कशी? काही कळत नव्हतं… अशा परिस्थितीत समोर घडेल ते साक्षी होऊन बघणं कसं जमेल मला? मी नं माझ्या मैया ला सोडू शकत होते, न माझ्या लेकराला… मी जरा शांत झाल्यावर मला स्वामीजी म्हणाले.. “बस इतनी सी बात? और तुम इतना रो राही हो? सुनो, अब तुम्हे जाना तो है ना तुम्हारे बेटे के लिये? तो जाओ ना? जो मैया तुम्हे बुला सकती है, उसे नही पता क्या तुम्हारे बेटे के बारेमे? वो नही चाहेगी की तुम उसकी मैया बनो, जैसे वो तुम्हारी मैया है? तुम्हारे फर्ज से दूर वो कभी नही करेगी तुमको साक्षी! और फिर तुम्हारे फर्ज पुरे करने के बाद तो तुम आ ही सकती हो… हे ऐकून मला जरा धीर आला, आणि मग मात्र ते जे काही बोलले तो खरा संवाद.
मी शांत झालेले पाहून ते म्हणाले, “साक्षी एक बात बोलू, यहा कोई किसीका कुछ नही होता है. हर कोई अपने अपने रास्ते चल रहा है. तुम कैसे कहती हो की ओंकार तुम्हारा बेटा है, जरा बताना तो?” हा कसा प्रश्न आहे? ९ महिने पोटात सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याला मी माझं बाळ कसं नको म्हणू? लहानाचा मोठा केलाय त्याला, माझंच बाळ आहे ते, माझा जीव की प्राण आहे तो…. मी सांगितलं त्यांना.. ते म्हणाले “हा वो तो सही है, लेकीन तुम कौन हो?” आता मात्र मला उत्तर देता येईना. जिथे मीच कोण हे माहित नाही तिथे माझं कोण, माझं काय, याबद्दल काय बोलू मी? माझा झालेला गोंधळ स्वामीजींना लक्षात आला. ते हसले, म्हणाले ” इस जनम मे तुम सुरुचि हो, हा मरे लिये तुम साक्षी हो, और आगे न जाने क्या होगी, पर ये नाम तो केवल इस देह के है, सच कहे तो तुम परमात्मा का अंश हो जो अपने मार्ग मे चल रही हो, वैसे ही तुम्हारा बच्चा है, जो अपनी मार्ग मे चल रहा है. सामाझाता हू.
समझो की तुम्हे नागपूर से मुंबई जाना है, तब तुम क्या करोगी? तुम नागपूर से मुंबई जाने वाली गाडी देखोगी, बस देखोगी, ट्रेन देखोगी या फ्लाईट देखोगी, है न? उसके बाद तुम एक कोई वाहन तय करोगी, मानो की ट्रेन! अब तुम अपने हिसाब से जानेवाली, सही समय पर, और सही जगह पर पहुचाने वाली कोई एक ट्रेन को चुनोगी जो तुम्हे तुम्हारे ध्येय के सबसे पास, और उचित समय पर पहुचा सके.. ठीक है न? तुम खुद चुनती हो ना तुम्हारे सफर का वाहन? बस इतना ही तो आसान है! हम सब एक सफर कर है, हर एक का सफर अलग है लेकीन ध्येय एक है.. मोक्ष! इस सफर मे कोई आगे है तो कोई पिछे है.. लेकीन जाना सबको वही है.. सब अपना अपना वाहन खुद चुनते है, जैसे तुम्हारे बेटे ने तुम्हे चुना है. जब एक जन्म से निकल कर दुसरे जन्म की स्ठीती मे आत्मा प्रवेश कर रहा होता है तब उसे पुरा ज्ञान होता है, लेकीन जनम मे नही होता. जब वो जन्म लेता है तब वो देह के पिंजरे मे बंद होता है जहा से उसे उस जनम के पहले और बाद का ज्ञान नही होता, वह जनम के बंधन मे इस तर्ह बांध लिया जाता है की उसे कुछ भी याद नही रहता. जब वो अपना जन्म खत्म कर मुक्त होता है तब उसे फिरसे उसके ध्येय की याद आती है और वह रास्ते खोजता है की कौनसा रास्ता उसे अपने ध्येय तक पहुचा सके. वह ऐसे माता पिता की खोज करता है जो उसका हाथ पकड कर ध्येय के सबसे करीब ले जाये. तुमने तुम्हारे माता पिता के घर शायद इसीलिये जन्म लिया की वही माता पिता तुम्हे तुम्हारी नर्मदा मैया तक पहुचा सके! और तुम्हारे बच्चे ने भी तुम्हारे कोख से अपने ध्येय के लिये ही जन्म लिया है. तुम्हारा और उसका और कोई रिश्ता है ही नही! तुम दोनो ही इस सफर यात्री हो जो थोडे समय के लिये साथ मे सफर कर रहे हो”…
माझ्यासारख्या सर्व साधारण व्यक्तीच्या भावनांवर झालेला हा आघाताच होता एक प्रमाणे. एका झटक्यात मी माझ्या आई वडिलांपासून आणि माझ्या मुलापासून वेगळे झाले होते.. एका क्षणात माझा आणि त्यांचा संबध फक्त सहप्रवाश्या इतकाच राहिला होता, आणि हे इतक्या लवकर आत्मसात करणं मला कठीण जात होतं.. आता पर्यंत चा हा सगळ्यात मोठा धडा होता मिळालेला, आणि सगळ्यात कठीण! “इदं न मम” मला समजून झालं होतं, पण अंगवळणी पडलं नव्हतं हे आज समजलं, कारण आजवर माझे आई वडील आणि माझा मुलगा ह्या दोघांना मी माझ्यापासून वेगळे समजतच नव्हते. पण आपण एकट आलेलो आहोत, आणि एकटच जायचं आहे, आपला प्रवास हा एकट्याचाच प्रवास आहे हे कित्येकदा ऐकलेलं, कित्येकदा वाचलेलं असून सुद्धा ते भिनायची सुरवात आजवर झालीच नव्हती. अनेकदा अनेक गोष्टी आपल्याला माहित असतात, समजत असतात, पण आपल्याकडून घडत नसतात… तसं काहीसं होत होतं… हळू हळू माझं एक मन या सत्याला आत्मसात करण्याची तयारी करत होतं आणि दुसरं अजूनही या धक्क्यातून बाहेर यायला तयार नव्हतं. तोंडानी बोलणं खूप सोपं असतं हो.. क्लास ला गेलेल्या मुलाला घरी यायला तासभर उशीर होऊदेत, तेव्हा आपली जी घालमेल होते ना ती या ममते पोटीच, जीव्हाळयापोटीच न? जिथे हे “माझे” पण येतं नं, गुंता होतो नं जिथे, तिथे गाठ पडणार, आणि गाठ पडली सोडवायला कठीण अगदी.. खरच कठीण असतं हे असं एकदम पटवून घेणं…. पण सांगू.. हे एकदा पटलं की मार्ग सुलभ होतात.. माझा सुन्न चेहरा आणि शून्य प्रतिसाद पाहून महाराज पुढे बोलू लागले…”होता है साक्षी, अभी अभी समझ रहा है तुमको, ये अवस्था होना स्वाभाविक है, चिंता की बात नही है. थोडा और सामाझाता हू तो तुम्हे एकदम शांती मिलेगी. हा ये सच है की वह तुम्हारा कोई नही है, लेकीन इस देह की वजह से तुम एकसाथ हो, तो इसको थोडा आसान बनाते है… देखो ,अब तुम पुरी तऱ्ह से समझ जाओगी”. खरं तर ते आता काय म्हणताहेत याची मला जरा भीतीच वाटली, पण ते जे काही बोलले त्या नंतर मात्र माझं मन अगदीच शांत झालं… पण हा संवाद देखील महत्वाचा आणि मोठा आहे. याच भागात नाही सांगता यायचा.. खरं तर हा अपूर्ण संवाद आणि अजूनही माझ्या आयुष्याच्या बदलत्या दिशेचा आणिक एक अनुभव आहे… माझं नागपूर कसं अचानक सुटलं त्याचा.. पण पुढच्या भागात आधी हा संवाद पूर्ण करेन…
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५०
नर्मदे हर..
तर मागच्या भागात मी म्हणाले होते की महेश्वर चा अजून एक संवाद आणि एक अनुभव बाकी आहे. माहं मन शांत झालं होतं. स्वामीजी बोलत होते आणि मी ऐकत होते. ते म्हणाले “तो इस जनम मे, याने की जब तक तुम्हारा और तुम्हारे बच्चे का देह है, याने की जब तक तुम दोनो ही इस पिंजरे मे बंद हो तब तक तुम चाहो या ना चाहो तुम्हे साथ रहना तो है, और जिसके लिये तुम इस जनम मे आये हो, वह कार्य भी पुरा करना है. तुम्हे माँ होने का कर्तव्य निभाना है, और उन्हे बेटा होने का… वह तो तुम अबतक निभाती आ रही हो, और आगे भी निभाओगी.. सवाल तो इसके बाद का है… तुम्हे यह सब करने के लिये मै मना नही कर रहा हू, लेकीन यह पिंजरा जब खुल जायेगा, जब तुम्हे आझादी मिलेगी, तब तुम्हे जाना होगा, आगे की ओर.. हम सब इस पिंजरे मे ही इतना खो जाते है की यहा से निकलना ही नही चाहते…और पिंजरा तो जीर्ण हो चुका है, टूट चुका है, लेकीन हम उसे छोड ही नही पाते है… तकलीफ तो तब होती है… और इसीलिये इस सत्य को समझने की जरुरत तो है ही.. अपने आप को याद दिलाने की जरुरत तो है ही.. जितना जल्दी समझ जाओगी उतना ही जल्दी आगे होने वाली तकलीफ से बच पाओगी साक्षी. यही तो है तुम्हारा “साक्षी” होना..
हे साक्षी होणं आता मला समजू लागलं होतं, आवडू ही लागलं होतं आणि माझ्या मनानी त्याचं साक्षी होणं मान्य ही केलं होतं, फक्त त्याची सवय व्हायला वेळ लागणार होता हे नक्की. आणि या साक्षी होण्यात सगळाच साक्षी भाव होता. माझं म्हणून मी जे काही म्हणते त्या सगळ्याशी माझा असलेला संबंध हा एकीकडे मान्य होत होता तर दुसरीकडे तो आहे याचा फक्त स्वीकार होत होता. इथे अमान्य असं काहीच नव्हतं. होता तो फक्त स्वीकार, मग तो कुठलाही असो, कशाचाही असो…अगदी माझी परिक्रमा एक दिवस संपून जाणार म्हणून उद्विग्न झालेल्या माझ्या मनाच्या अवस्थेपासून सुरु झालेला हा संवाद आणि ही विचार प्रकिया मला पुन्हा याच ठिकाणी आणून ठेवत होती, मात्र आता त्यात स्वीकार होता… हो माझी परिक्रमा एक दिवस संपून मला घरी परत जायचं आहे आणि जर असं घडायचं आहे तर तिथे माझा पूर्ण स्वीकार असणं म्हणजेच माझं साक्षी होणं आहे..मला साक्षी व्हायचंय आणि म्हणून मी हे स्वीकारायला हवं.. पण माहितीये का? जेव्हा तुम्ही इतक्या शुद्धतेने एखाद्या गोष्टीचा स्वीकार करता नं तेव्हा कुठेतरी तुमच्या मनाची काळजी घेणारी ती माउली तुमच्याकडे बघत असते. तुमच्याही पेक्षा तुमच्या भावनांची, तुमच्या निस्सीम प्रेमाची ती नर्मदा माय सुद्धा भुकेली असावी कदाचित की काय माहित नाही पण, तिच्या लेकरांना समाधान मिळत राहील याच्याकडे तिचं फार लक्ष असतं.. असाच हा पुढचा अनुभव.. पुन्हा त्याच सुरवातीच्या संवादा नंतरचा.
तर जेव्हा मला स्वामीजी म्हणाले की “तुम बादमे भी मैया किनारे आ सकती हो”, आणि त्या नंतर जेव्हा साक्षी होण्याचा आणि नाळेच्या संबंधांचा खुलासा झाला त्या आधीचा हा संवाद आहे, फक्त त्याचा परिणाम एका अनुभवात झाल्यामुळे तो नंतर सांगतेय. मी रडत असताना माझी समजूत काढायला स्वामीजी म्हणाले होते “रो क्यू रही हो? तुम्हे मैया किनारे आना है ना, आ जाओ…” माझं घर दार सोडून मला येता येणार नाहीये म्हणून मी अधिकच त्रस्त झाले होते तेव्हा स्वामीजी मला म्हणाले .. “उनको छोडकर नाही आ सकती तो सबको लेकर आजाओ..” मला सांत्वना द्यायला म्हणत असावे ते असं वाटलं मला.. मुलगी रडतेय, धीर द्यावा तिला म्हणून बोलले असतील ते असं वाटलं.. मात्र ते अजून एक वाक्य बोलले होते. ते म्हणाले, “साक्षी, तुम या तो १ साल मे, या तो ५ साल मे मैया के पास आ जाओगी., ५ साल के अंदर नही आयी तो दसवे साल सब छोड के आओगी..”. मी या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नव्हता कारण माझ्या मते हे मला धीर देण्यासाठी केलेलं वाच्य होतं. पण बरेचदा तसं नसतं… किंबहुना जे आपल्याला अजिबात महत्वाचं वाटत नाही तेच कधी कधी सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं. इथेही तसच झालं.
माझं महेश्वर चं दाणा पाणी संपायला आलेलं. स्वामिजींकडून अनेक टिप्स आणि खूप सारा सत्संग घेऊन मी निघाले. ते नंतरही मला फोन वर अनेक गोष्टी सांगत असत..पण ते नंतर सांगते.. आता सांगते मी महेश्वर हून निघून दहा दिवसात मला आलेला हा तो महत्वाचा अनुभव. मी महेश्वर हून पुढे निघाले आणि माझ्या यजमानांचा मला फोन आला एक दिवस. “अगं तुला एक महत्वाचा निर्णय सांगायचा आहे” ते म्हणाले. “आपल्या राहुल नी नवीन कंपनी सुरु करायचं ठरवलंय आणि मी पण त्याच्यासोबतच काम करायचं ठरवलं आहे तेव्हा तू परीक्रमेहून आलीस की आपण इंदोर ला शिफ्ट व्हायचय”.. राहुल, माझा दीर इंदोर ला असायचा तेव्हा आणि आम्ही नागपूरला, आणि आता आम्ही इंदोर ला शिफ्ट होणार होतो.. म्हणजे स्वामीजी म्हणाले ते खरं होतं तर… मी परिक्रमा पूर्ण करून आले आणि २ महिन्याच्या आत इंदोर ला शिफ्ट झाले सुद्धा… “घरवालो को छोड के नाही आ सकती तो उन्हे लेकर आजाना” हे स्वामीजी म्हणाले होते ते अगदी खरं ठरलं होतं..माझ्या मैयांनी आणि माझ्या गुरुंनी मला त्यांच्या जवळ बोलावून घेतलं होतं. इंदोर ला माझं गुरूस्थान आहे, नाना महाराज तराणेकरांच आणि इंदोर पासून फक्त ७० किमी वर माझी मैया आहे. माझ्या आयुष्याची दिशा बदलत गेली ती अशी. मी नागपूर सोडून कुठे कधी जैन हे स्वप्नातही वाटलं नव्हतं मला, पण ते झालंय.. माझ्या हातून नक्की काहीतरी करवून घेण्याची गुरुंची आणि मैयाची इच्चा दिसतेय पण मक्की काय ते अजून नीट समजलं नाही.. मला घाई नाहीच कारण जे जेव्हा करणं माझ्या भाग्यात असणार ते तेव्हा तेव्हा होणार याची मला आता खात्री आहे.
माझी परिक्रमा सुरु असताना आणि नंतर देखील या महेश्वर च्या महाराजांशी माझा संपर्क कायम होताच, आणि तसतसे अनुभव पण मला आले. त्यातला एक इथे आवर्जून सांगते, पुढचे मात्र जसं जसं आपण परिक्रमेत पुढे जाऊ तसतसे सांगेन. आम्ही म्हणजे मी आणि बाबा बरगी कॉलनी वरून पुढे निघालो तेव्हा ची गोष्ट बरं का. त्या दिवशी स्वामीजींचा मला फोन आलेला. “साक्षी कैसे हो? आज हमने एक निर्णय लिया है, तुम्हारी परिक्रमा पूर्ण होणे के बाद तुमको महेश्वर आना है, और वो भी जल्दी…तुम्हारे लिये कूछ खास है.. भाग खुलने वाले है तुम्हारे, लेकीन आज की बात सुनो आज तुम्हे तीन अलग अलग जगह पार की लोग रास्ता बतायेंगे, लेकीन जो रास्ता कोई चाय या हॉटेल वाला बातायेगा वही लेना, कल माताजी को सपना आया है, इसलिये बाता रहा हू” मला जरा आश्चर्य वाटलं पण काय हरकत आहे ऐकून घ्यायला.. म्हणून मी लक्षात ठेवलं.
आम्ही तिलावारा घाट ला जायला निघालो. फार रमणीय रस्ता, जंगलातून जाणारा, पहाड, पळसाची झाडं लागलेली.. (हा अमरकंटक हून ओमकारेश्वर ला येताना चा अनुभव आहे, पण महेश्वर च्या महराजांचा आहे म्हणून आता सांगतेय, अजून आपण अमरकंटक ला पोचायचे आहोत, या भागाचे अनुभव लिहिताना या अनुभवाची आठवण करून देईनच पुन्हा) पहाड चढून उतरून अधून मधून टुमदार कसबे वजा गावं लागायची, असा हा रस्ता. एका गावात आम्हाला एका दुकानात चाहावाल्यांनी थांबवलं…त्यांनी चहा पाजला आणि “तिलावारा घाट क्यू जा राहे हो, उलटा हो जायेगा ना.. यहासे आगे निकलके दाये मोड पे जाना, सीधा त्रिशूल घाट जाओगे” त्याच्या या सांगण्यावरून तिथेच असलेल्या एका त्याच्या गी-हाईकाच दुमत पण झालं त्याच्याशी… मात्र चहा वाल्याचं ऐक असा फोन सकाळीच झाला होता आणि म्हणून आम्ही त्याचं ऐकलं, आणि आता त्रिशूल घाटाकडे निघालो. वाटेत नाना खेडा नावाचं गाव लागतं, तिथे मुक्काम केला, तर तिथल्या माणसाने सांगितलं की तुम्ही उजवीकडे गेले असते तर तिल्वारा घाट लागला असता, आता उलटं जाऊ नका उद्या, त्रिशूल घाट जवळ आहे, तिकडे जा, पण दुस-या दिवशी सकाळी पुन्हा एका चहावाल्याच्या दुकानात असताना त्याने सांगितलं, तिकडे कशाला जाताय, एक वाट शेतातून जाते, एक दोन नाले पार करावे लागतात, पण तुम्ही सरळ जा तुम्हाला डूंडवारा नावाचं गाव लागेल, तिथून भेडाघाट ला जा सरळ. तसच झालं, आम्ही सरळ भेडाघाट ला पोचलो देखील… जवळ जवळ ३० किमी चा रस्ता कमी झाला होता आमचा…
पुढे परिक्रमा झाल्यावर मी ओंकारेश्वर ला पोहोचली तेव्हा तिथे दारात माझं स्वागत करण्यासाठी हे महेश्वर चे स्वामीजी उभे होते. मला हे अनपेक्षित होतं. माझ्या कधीची, कान्यापुजानाची सगळी व्यवस्था झाली होती आणि एक स्कोर्पियो गाडी माझी वात बघत होती. माझं सगळं आटोपून झालं आणि स्वामीजी मला महेश्वर ला घेऊन गेलेत. तिथे गेल्यावर माझ्याकडून यज्ञ करवण्यात आला. माझ्या हातून रामजन्म करवण्यात आला. तो रामानावामिचा दिवस होता. आणि नंतर नं मागता मला एक अद्भुत भेट मिळाली. मला बीजमंत्राची दीक्षा मिळाली. बीज मंत्राची दीक्षा मागूनही न मिळणारी आणि ती जेव्हा न मागता आणि सन्यासिनी कडून मिळणं हे केवढं भाग्य! त्या जपाचे अनुभव अजूनच वेगळे आहेत, पण ते सांगू केव्हातरी.
असे अजूनही अनुभव आहेत, पण ते नंतर सांगते, आधी सांगते मंडलेश्वर ला जाताना चा आणि तिथला अनुभव, गुरु कसे आपल्याकडे लक्ष ठेवून असतात आणि कशी आपल्याला सतत आठवण देतात त्याची आलेली प्रचीती आणि नर्मदा मैयाचे दुस-यांदा झालेले दर्शन….आणि ते दर्शन का झालं त्या मागचं कारण सुद्धा! हा अनुभव आहे गंगातखेडी चा, इथून आम्ही रस्ता चुकलो. जवळ जवळ २२ किमी चालून झालं असेल पण या रस्त्यात न अन्न मिळालं नं पाणी…पण तरीही आम्ही तहानलेले ही नव्हतो, आणि भुकेलेले तर अजिबात नाही? असं कसं होईल, काहीही न मिळता?.. सांगते, पण पुढच्या भागात.
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीभाषामाझीशाळा*
नर्मदा परिक्रमेचे अनुभव- नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ - सुरुचि नाईक - 51 -100
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५१*
*नर्मदे हर..*
मित्रांनो, माझ्या प्रिय वाचकांनो आज आधी तुम्हा सगळ्यांचे मला आभार मानायला हवेत. मागचा भाग म्हणजे आपल्या अनुभव कथन मालिकेचा ५० वा भाग होता. नर्मदा मैयाच्या एका लहानश्या लेकराचे बोबडे बोल हे अर्धशतका पर्यंत जाऊन पोहोचतील असं कधीही मला वाटलं नाही, मात्र तुम्ही वाचकांनी दिलेल्या प्रतिसादातून मला दर वेळी नवी उर्जा मिळत गेली आणि प्रत्येक वेळी एका नव्या भागाचं सृजन होत गेलं. त्यामुळे या अनुभवकथन मालिकेच्या वृद्धी चं सगळं सगळं श्रेय माझ्या वाचकांना, आणि माझ्याकडून तुम्हाला आवडेल अशा भाषेत, तुम्हाला आवडेल अश्या शैलीत लिहवून घेण्याचं कार्य करणा-या माझ्या नर्मदा माई ला. मला समजलेली (खर तर अजूनही नक्की माहित नाही) नर्मदा मैया तुमच्या समोर माझ्या माध्यमातून मांडून ती माई मला पुन्हा एका पुण्याकर्माशी जोडतेय आणि तिची कृपा दृष्टी माझ्यावर कायम ठेवते आहे हेच खरं. या अनुभव मालिकेचे किती भाग आहेत असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. त्याचं उत्तर अजूनही माझ्याकडे नाहीये, कारण अजूनही माझं लिखाण पूर्ण झालेलं नाहीये. ते आता त्या मैयावर सोडून मी फक्त लिहिण्याचे कार्य सुरु ठेवतेय. तिला जितकं माझ्याकडून लिहवून घ्यायचं असेल तितकं ती लिहवून घेईल, काही राहिलंच शिल्लक तर “नर्मदे हर”.. अजून काय…नाही का?
परिक्रमेच्या वाटचालीचा आढावा घेत असता ओंकारेश्वर पासून निघून, शूलपाणीची झाडी, समुद्र पार करून महेश्वर पर्यंत येणं म्हणजे जवळ जवळ अर्धी परिक्रमा होत आलीये. आणि आता महेश्वर च्या पुढे जाऊन अमरकंटक आणि मग फिरून पुन्हा ओंकारेश्वर अशी अर्धी अजून बाकी आहे. ही अनुभव मालिका मी रोजनिशी सारखी लिहिलेली नाही त्यामुळे तारीख वार वेळ यावर भर नं देता अनुभव आणि निसर्ग यावर काय तो भर दिलेला आहे. बरेचदा एका पाठोपाठ एक असे सतत अनुभव येत राहिलेत आणि बरेचदा काहीही अनुभव न येता दिवस सरत गेले. जेवढे जमतील तेवढे लिहिले आणि बाकी चे मैयार्पण झालेत. त्यामुळे आता पुढे येणारे अनुभव आणि आतापर्यंत आलेले अनुभव एकसारखेच असतील, तितकेच प्रभावी असतील किंवा काहीतरी नवीन असतीलच असं सांगता यायचं नाही. अमुक अनुभव मोठा आणि अमुक लहान हे असं वर्गीकरण परिक्रमावासी ला करताच येत नाही. कारण आलेला प्रत्येक अनुभव हा त्या त्या वेळी मिळत असलेल्या समाधानाचं प्रतिक असतो. त्या त्या परिस्थितीशी तितकाच जुळलेला असतो. अगदी रस्ता चुकणे, आणि कुणीतरी येऊन रस्ता सांगणे हा अनुभव प्रत्येकालाच येतो, तरीही त्या वेळेची परिस्थिती मात्र भिन्न असते आणि म्हणून तो अनुभव एक वेगळा अनुभव म्हणून गाठीशी राहात असतो. हे सगळं मी का सांगतेय? तर एक वाचक म्हणून तुम्ही जेव्हा माझ्या अनुभवांच्या माध्यमातून मैयाची अनुभूती घेता त्यावेळी तुमच्या जाणीवेशी मी देखील नकळत जोडली जातेच नं? तुमच्या त्या जाणीवा जश्या आतापर्यंत जपल्या गेल्या तश्या आताही जपल्या जाव्या, आणि आता पर्यंत, म्हणजे अर्ध्या वाटे पर्यंत तुम्ही जशी साथ मला करत आला आहात तशी साथ मिळत राहावी या साठी हा सगळा उहापोह. यापुढे काय असा प्रश्न तुमच्या मनात प्रत्येकच भागा अखेरीस असतो, तसाच तो माझ्याही पुढे असतोच…. अनुभव माझे असतात पण ते मांडताना प्रामाणिक पणा खेरीज दुसरं काहीही येवू नये, अहंकाराचा स्पर्श देखील येऊ नये हेच सतत मनात असतं…त्यामुळे त्या माई ला स्मरून, आणि तिच्यावर सोपवून मी फक्त कागदावर उतरवण्याचे काम करत असते… आणि म्हणूनच मी देखील तुमच्या इतकीच अजाण असते. तरीही नम्र विनंती इतकीच की हे प्रेम असं कायम राहू द्या…
आज अजून एका मैया बद्दल लिहिणार आहे. जिच्यामुळे या लेख मालिकेला सुरवात झाली ती माझी सखी अमृता. डॉ. अमृता इंदूरकर, माझी बाल मैत्रीण. मला आलेले अनुभव आले, मी अनुभवले असं म्हणून मी शांत होते. ते लिहून काढायचे वगैरे काहीही माझ्या मनात नव्हतं, मात्र ह्या माउली ने माझ्या जवळ हट्टच धरला. “ ते काही नाही सुरु, तू तुझे अनुभव लिहायलाच हवेत. तू परिक्रमा करून आलीयेस, काहीतरी मिळालय नं तुला? मग ते स्वत;पुरतं ठेवतेयस? काय अर्थ मग त्या परिक्रमेला? वाटून टाक… आणि मोकळी हो….”.. असच अजून एक हक्काचं माणूस म्हणजे माझा बालमित्र घना, श्री घनश्याम सहस्रभोजनी. तू छान लिहितेस, लिहून तर बघ… लिहिलंस का? असं सारखं विचारून पाठपुरावा करणारा घना आणि अमृ यांच्या या उद्गारांनी मला जाणवलं… जे काही मला मिळालय त्याची उजळणी जर मी करत राहिली नाही तर ते मला अंमलात कधीच आणता येणार नाही. आणि ते जर चारित्र्यात उतरलं नाही तर काय अर्थ आहे? कठीण आहे मान्य आहे… पण निदान या लिखाणामुळे मी पुन्हा पुन्हा त्या त्या अनुभवातून जाते आणि पुन्हा पुन्हा अनेक वळणावर न वळता, माझ्या मार्गाची मला आठवण होते. कारण हे अनुभवण, शिकणं आणि आपण तसं घडत जाणं ह्या तीनही वेगळ्या प्रक्रिया आहेत, आणि त्या पार पाडण्यासाठी काल नामक सहाय्याची गरज लागणार आहेच. तेव्हा या कालचक्रात मला माझ्या मैयाशी जोडून ठेवून, माझ्या मार्गाची जाणीव करून देणारे हे अनुभव या लेखमालिकेच्या स्वरूपात पुढे आणणा-या माझ्या अमृता माईचे, आणि “घनशाम बाबा” चे शतश: आभार !
आता त्या लोकांचे आभार ज्यांच्या भरवश्यावर ही परिक्रमा पूर्ण होवू शकली. नर्मदा माई ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रुपात येऊन मला जेवू खाऊ घालून गेली, ज्यांच्या ज्यांच्या म्हणून घरी माझा दाणा पाणी त्या मैयांनी लिहून ठेवलं होतं त्या सगळ्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम फक्त काय तो मी करू शकते .. आभार ही तर औपचारिकता आणि ती करावीशी वाटत नाही कारण या ऋणातून मला बाहेर पडायचं नाहीचे मुळी.
मला आठवतो तो खापारामाळचा शांतीलाल पावरा, त्याची बायको.. स्वत: उपाशी राहून आम्हाला खाऊ घालायला तयार असलेली… मी नाही विसरू शकत माझ्या बाबाला, माझी अतोनात सेवा केली होती त्याने मी आजारी असताना, नारेश्वर ला…. मोलगी चे नाईक काय किंवा बगवानीयाची ती दोन लहान मुलं काय……ते म्हातारे लाल पुरी बाबा, आमच्या साठी भर थंडी अंगावर आभाळ पांघरून झोपतात, ती कुक्षी मा.. माझा वाढदिवस साजरा करते, मला कपडे करते… त्या मध्यप्रदेशातल्या परिक्रमावासी मैया बलाबला कुंड ला येऊन माझी चौकशी करणा-या, राज घाट ला रात्री ११ वाजता फक्त मला भेटायला येणारे मांगीलाल चे जावई, ५० किमी पर्यंत जेवणाचा डबा घेऊन येणारी मोनिका, मांगीलाल, हरी ओम भाई, किती किती नावं घेऊ? ही संपता न संपणारी यादी आहे. या प्रत्येकाकडून माझी काळजी घेतली गेलीये, माझं संगोपन केलं गेलय, माझं पालन पोषण केलं गेलंय, मला योग्य वाटेवर नेऊन ठेवण्याच्या या प्रक्रियेत बहुमोलाचा वाटा या प्रत्येकाचा आहे आणि म्हणून हे श्रेय त्या प्रत्येकालाच!माझ्या आई वडिलांची पुण्याई म्हणून ही संधी मला मिळाली. माझे पाठीराखे भाऊ, माझी नवी नवेली भावजय, हे सगळे माझ्या निर्णयाच्या मागे खंबीर पणे उभे राहिले म्हणून हे शक्य झालं. परिक्रमेला जातेय म्हटल्या वर डोळ्यात पाणी आलेली आणि मायेनी डोक्यावरून हात फिरवणारी, आशीर्वाद देणारी माझी ९५ वर्षाची आजी, माझा परिवार, माझा नवरा, सासू सासरे, दीर जाऊ, माझा लेक आणि माझ्या लहानग्या पुतण्या यांचं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच घर सोडून पाच महिने मी घराबाहेर राहून हे कार्य सिद्धीस नेऊ शकले.
सरते शेवटी बोलेन ते थोरल्या मोठ्यांचे आशीर्वादाबद्दल. चितळे बाबा, आणि “तुझी वाट लागलेली आहे.. निश्चिंत रहा” असं पहिल्याच दिवशी सांगणा-या चितळेमाई, ताई तू याच वर्षी जाणार परिक्रमेला म्हणणारे अरविंद काका मुळे, या सगळ्यांच्या ऋणात मला राहू दे गं मैया … असच म्हणेन..
*गुरु गोविंद दोनो खडे, का के लागू पाय*
*बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताये….*
आणि अश्या माझ्या सद्गुरूला मी काय सांगावं? त्याच्या चरणी फक्त नतमस्तक होता येतं… आणि मग आपसूक काय घडायचं ते घडत जातं… परीक्रमा ही अशीच घडत गेली, आणि ही अनुभव मालिका ही अशीच उतरत गेलीये…याहीपुढे येणारा प्रत्येक क्षण हा असाच येत जाणारे, आपसूक.. आपण फक्त निमित्तमात्र.. आपण फक्त चालायचंय. ती मैया आणि सद्गुरू चालवतील तसं.. आपण फक्त भिनू द्यायचाय तिचा जयघोष, आपल्या देहात्म्याच्या कणाकणात… जीव, प्राण, आत्मा रोम रोम तेजाळून निघताहेत या … आई म्हणून आपण फक्त हाक माराचीये तिला….. नर्मदे हर.. अशी!
या ५१ व्या भागात मी अनुभव सांगितला नाहीये याची मला जाणीव आहे. तुम्ही वाट बघताहेत हे माहितीये आणि म्हणून हा भाग इथेच संपवतेय. पुढच्या भागात मंडळेश्वर ला जाताना चा अनुभव, आपण आपल्या गुरुस्थानाकडे कसे नकळत खेचल्या जातो तो अनुभव, आणि एक रहस्य सांगणारे….22 किमी अन्न आणि पाण्याविना आम्ही कसे चालू शकलो याचं, थोडा धीर धरा… पुढच्या रविवारी येतेय भाग ५२ घेऊन.. नर्मदे हर.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५२*
*नर्मदे हर..*
तर महेश्वर चं आमचं दाणा पाणी संपलं होतं. माताजी आणि हृदयजीं चा निरोप घेऊन आम्ही मंडलेश्वर च्या वाटेनी निघालो. हे अंतर जेम तेम सात किमी. पण इथे एक गंम्मत झाली. थोडं आधीपासून सांगते. कुबेर भंडारी ला असताना आम्ही उसाचा रस प्यायचं ठरवलं होतं, आणि स्नान करून येऊन पाहतो तो रस संपलेला. मला फार आवडतो उसाचा रस, पण नाही मिळाला. ठीक आहे, नाही तर नाही… आता काय त्याचं विशेष.. पिऊ पुन्हा केव्हा तरी… असं वाटून तो विचार निघुनंही गेला…आणि त्या नंतर न मला उसाच्या रसाची आठवण आली आणि न कुठे उसाचा रस दिसला, मात्र मंडलेश्वर ला जाताना वाटेत एक उसाच्या रसाचा ठेला होता. त्या रस वाल्यानी आम्हाला आवाज दिला आणि तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला.. “ आईये माताजी, मन की और गले की, दोनो की प्यास बुझा दिजीये, ठंडा गन्ने का रस है, मन खुश हो जायेगा आपका, पसंद तो होगा ही आपको”… तो कदाचित ते असच बोलला असेल, पण त्याच्या ह्या बोलण्यावरून मला गुजरात मध्ये रस मिळाला नव्हतं ते आठवलं… कुठेतरी सुप्त मनात असेल का ही उसाच्या रसाची इच्छा? वरपांगी पाहता मी तर विसरलेही होते… काय माहित बाबा, ह्या मनाच्या एवढ्या मोठ्या व्याप्तीत काय अडकून राहात असेल अन काय मोकळं होत असेल… कदाचित म्हणूनच तो पिंजा-यातला पक्षी उडू शकत नसेल आणि इतरांना हे अदृश्य सुप्त पाश दिसत नसतील… असो.. आम्ही उसाचा रस पीत असताना तिथे अजून दोन जण गाडीवर आले, त्यांनी आम्हाला न सांगताच उसाच्या रसाचे पैसे देऊ केले तर तो रस वाला त्या दोघांना म्हणाला “ भैया जी चाहो तो आपके भी पैसे ना लू, लेकीन परिक्रमा वासियोंको तो मै ही रस पिलाने वाला हू, जितना चाहे पिजीये माताजी, आप ही का दुकान है!” किती ही श्रद्धा! नर्मदा मैयाची सेवा करायची हा एकच भाव!
रस पिऊन आम्ही पुढे निघालो, साधारण तासाभरात पोचलो देखील. तिथे दत्त मंदिरात रहायचं असं सांगितलं होतं, पण आम्ही गेलो तेव्हा मंदिरात कुणीच नव्हतं. मग आम्ही राम मंदिरात जायचं ठरवलं, तर तिथेच एका दुकानदारांनी जहागीरदार यांच्या घरी सेवा देतात ते असं सांगीतल, आणि महाराष्टीय नाव ऐकून छानच वाटलं, आणि आम्ही तिथे गेलो. जहागीरदार काकांशी खूप गप्पा झाल्यात.. काका आणि काकू खूप प्रेमाने करतात सगळं. सगळं आटोपल्यावर संध्याकाळी त्यांनी आम्हाला मंदिरात बोलावलं, म्हणाले “चटकन डोळे बंद करून बस, अजिबात इकडे तिकडे बघू नकोस… कसं वाटतं ते सांग आणि मग मी तुला सांगेन काय गंम्मत आहे ती. मी तिथेच पायरीवरच बसले आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे डोळे बंद केलेत. खूप छान वाटत होतं मला.. तिथला मंद सुगंध खूप शांती देणारा होता, आणि अगदी ओळखीचा वाटत होता. मला आठवलं.. परिक्रमेच्या पहिल्या दिवशी लेले काका जेव्हा रस्त्यात थांबून नमस्कार करायचेत नं तेव्हा, म्हणजे त्या नंतर असा मंद सुवास देणारी झुळूक यायची… आठवतंय का? या अनुभव मालिकेच्या तिस-या आणि चवथ्या भागात मी लेले काकांविषयी बोललेय बघा…ते म्हणायचे “ बेटा असा मंद सुवास कुठे असतो माहितीये का? ज्या सुवासाने मनाला शांती मिळते नं तिथे संत सद्गुरूचा वास असतो. परमेश्वराचा वास असतो”.. मला लेले काकांच ते वाक्य आठवलं, आणि खूप समाधान वाटलं.
“कसं वाटतंय ताई?” जहागीरदार काकांनी विचारलं.. उघडा डोळे आणि मी काय दाखवतोय ते बघा. त्यांनी एका मूर्ती कडे बोट दाखवलं..” ही मूर्ती ओळखीची आहे का?.. मुर्तीवराची फुलं बाजूला करून ती मूर्ती त्यांनी मला दाखवली आणि मी गहिवरून गेले. ती मूर्ती माझ्या गुरुंची, माझ्या नानांची! मला इतकं शांत का वाटत होतं ते समजलं.. नंतर जहागीरदार काकांनी त्या मूर्तीची गंम्मत सांगितली. ती मूर्ती त्यांना मैया मध्ये स्नान करताना सापडली होती. या वास्तू मध्ये वासुदेवानंद सरस्वती ही येऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा खरच आश्चर्य वाटलं… राम मंदिरात आम्ही का गेलो नाही? दत्त मंदिरात का कुणीच नव्हतं, नेमकं आम्ही आलो तेव्हा तिथे कुणीच का भेटलं नाही? कारण मी कुठे थांबायच हे मैयांनी आणि माझ्या गुरुंनी ठरवून ठेवलं होतं. जिथे माझे गुरु विराजमान आहेत, जी वास्तू मोठ्या महाराजांच्या स्पर्शाने पावन आहे तिथेच माझं वास्तव्य निश्चित झालं असल्यावर मी दुसरीकडे कुठेही कशी जाईन हो? बघा.. म्हणाले होते न मी, आपण असे नकळत ओढल्या जातो अश्या ठिकाणी… जशी मी बरोबर तिथेच गेले .. जाहागीरदारांच्या घरी… आणि तोच सुवास येणं, तसच शांत वाटण हा देखील एक संकेतच होता नाही का?
थोड्या वेळाने जहागीरदार काका मला बोलवायला आमच्या खोलीपाशी आले. “तुम्हाला भेटायला कुणीतरी आलंय, भेटून घ्या” म्हणाले. मला काही समजेना, इथे कोण मला भेटायला येणार? बाहेर येऊन बघते तो मांगीलाल आला होता. मांगीलाल म्हणजे लेपा गावात जो अन्नछत्र चालवतो तो. ज्याच्या घरी आम्हाला त्याच्या संपूर्ण कुटुंबांनी खूप प्रेम दिलं होतं. अगदी चवथ्या पाचव्या दिवशी परिक्रमेच्या..( ७व्या की ८ व्या भागात लिहिलंय बघा) लेपा हे पलीकडच्या तटावर, कसरावद च्या जवळ. मांगीलाल फक्त मला भेटायला नर्मदा मैया पार करून आला होता. २० किमी तरी अंतर असेल. येताना माझ्यासाठी द्राक्ष, बोरं, केळं आणि आईनी केलेले कणकेचे लाडू घेऊन आला होता. जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटुंब पण आपुलकी आणि प्रेम याची जराही कमतरता नाही. त्या माउली नी माझ्यासाठी घाई घाईत कणकेचे लाडू करून दिले होते. किती प्रेम देते ही मैया आपल्याला?
दुस-या दिवशी सकाळीच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज चं अंतर बराच लांब होतं. म्हंणजे आम्ही ठरवलं काहीच नव्हतं पण एक अंदाज होता की धारेश्वर ला पोहोचता येईल. पण आम्ही धारेश्वर ला जाऊ शकलो नाही. त्या आधीच थांबावं लागलं. तरीही ३६ किमी चालून झालं पण याचं श्रेय आम्हाला नाही. एका गावातल्या शेतक-याला. आम्ही शेतातून जात असताना एक शेतकरी त्याची बैलगाडी घेऊन बसला होता. जणू काही आमच्यासाठी बसला असावा तो, कारण आम्ही त्याच्याजवळ पोचताच म्हणाला “अंधेरा होनेको है, बैठो गाडीमे” आम्ही गाडीत बसायला नकार दिला, अजून ७-८ किमी चालून जायचं बाकी होतं असं त्यांनी सांगितलं.. मग तो पुढे आणि आम्ही मागे असं चालू लागलो, आणि अचानक त्यांनी गाडी थांबवली, आमचं सामान आम्हाला त्याच्या गाडीत ठेवायला लावलं आणि तो पुढे निघाला… “आजाओ सब सुविधा हो जायेगी”.. गाडी पुढे निघून गेली होती. आमच्याजवळ काहीही सामान नव्हतं. आम्हाला त्या शेतक-याचं नाव माहित नाही, आम्हाला नक्की कुठे जायचं आहे ते ही माहित नाही…आम्ही पोहोचू शकू की नाही ही पण कल्पना नाही… पण दुसरा पर्याय नव्हता. अंधाराच्या आत गावात पोहोचणं गरजेचं होतं आणि झपाझप पावलं टाकत जवळ जवळ तासाभरातच ७ किमी अंतर आम्ही पार केलं सुद्धा. त्या शेतक-राने सांगितल्या प्रमाणे परशुराम यादव यांच्याकडे आमची व्यवस्था करण्यात आली होती. अगदी पाय धुण्याला गरम पाण्यापासून तर भोजन प्रसादी आणि अगदी अंथरूण देखील टाकून तयार होतं. त्यांचं घर तसं लहान, त्यामुळे पडवीत आसन लावलेलं, आणि परशुराम जी स्वत: आमच्या बाजूला पडवीत झोपले होते.. आमची जरा हालाचाल झाली की ते विचारत “कुछ चाहिये बाबाजी”…रात्रभर जणू आमच्या दिमतीला असावेत इतकी सेवा त्यांनी केली आमची. आणि धारेश्वर फक्त ३ किमी होतं इथून, तरीही परशुराम जी यांच्याकडे आमचं येण लिहिलं होतं… म्हणून तेवढे ३ किमी आम्ही जाऊच शकलो नाही.
परशुराम भाई नी आम्हाला एक गोष्ट सांगितली. त्यांच्या धाकट्या मुलाची. तो लहान असताना सारखा आजारी असायचा. सगळं करून झालं तरी याचं आजारपण संपेना.. मोठा आजार असा काही नव्हता मात्र सतत तब्येतीची कुरकुर सुरु असायची. कधी ताप तर कधी सर्दी पण पोरगा ठणठणीत आहे असं कधी झालं नाही. त्याच्या आजीनी मैया ला साकडं घातलं आणि परीक्रमावासींची सेवा करायला सुरवात केली. वर्षभर न चुकता येणा-या परिक्रमावासींची आपल्याच्याने होईल तशी सेवा ते करत गेले आणि मुलाची तब्ब्येत सुधारू लागली. तेव्हापासूनची सेवा आजतागायत सुरु आहे. हा मुलगा आता १५ वर्षांचा आहे. त्याची आजी वारली पण घरच्यांनी सेवा सुरूच ठेवली. परशुराम भाई म्हणतात “अब तो बच्चा अच्छां ही है, लेकीन अब हमे सेवा करने मे आनंद आता है, परिक्रमावासी जिस दिन पेट भर खाना खाते है, हमारा दिल आनंद से भर जाता है”.. ते इतके भावपूर्ण होऊन सांगत होते की आमचे ही डोळे भरून आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही धारेश्वर कडे निघालो. इथे रस्त्यात म्हणजे मैया किनारी रेती खोदण्याचं काम सुरु होतं. साधारण धारेश्वार च्या पुढे ४ किमी वरची गोष्ट असेल. आम्ही एका दगडावर आराम करत बसलो असताना खालून, म्हणजे मैया चं पात्र साधारण ८ एक फुट खाली होतं तिथे, तिथून एक म्हातारी आजी वर आली. आल्या आल्या तिनी मला मिठी मारली आणि ती रडू लागली. “बेटा परिक्रमावासी बच्चा, तुम कितने चलते हो मेरे बच्चे, माई के लिये चलते हो… बस उसके दर्शन पाने के लिये कितने कष्ट लेते हो.. भुके प्यासे चलते जाते हो मेरे बच्चे… थोडा भोजन पा लो” आजी मला कुरवाळत होती, माझ्या कपाळाचे मुके घेत होती आणि रडत होती. माझा जीव तर तिथेच पाणी पाणी झाला. एक अनोळखी म्हातारी आजी, माझ्यावर इतका वर्षाव करतेय मायेचा, काय संबंध तिचा आणि माझा? आधी कधी पाहिलं नाही, नंतर कधी भेटणार नाही, आणि ही माउली मला एकच म्हणतेय, कळवळून…”भोजन पा लो”… जेवून घ्यायला सांगतेय… आणि आता तर जेमतेम सकाळचे साडे नऊ वाजलेत… इतक्यात मला भूकही लागली नाही.. पण ही आजी काही ऐकेच ना.. समोर च्या मोठ्ठ्या टेकडी कडे बोट दाखवत म्हणायची “ उपर जा के खाना खालो… शरमाना नही, पेट भर के खाना मेरी बिटिया रानी…तुझे मेरी सौ..” आता तर तिनी शप्पथच घातली.. तिचं मन मोडून पुढे जाण्याची न माझ्यात हिम्मत होती न इच्छा..ती माझ्या जेवणासाठी स्वत:ची शपथ घालतेय? नाही, मी ऐकेन तिचं. ती भली मोठी टेकडी चढून जाईन वर आणि भोजन प्रसादी घेईन तिथे.. मी ठरवलं..आणि मी आणि बाबा तिचा निरोप घेऊन टेकडी चढून वर गेलो. आम्ही थकलो होतो.. तिथे आश्रमात पडवीत एक साधू झोपलेले होते.. आम्ही नर्मदे हर केलं पण ते काही उत्तर ही देईनात….जे नर्मदे हर ला उत्तर देत नाही ते भोजन प्रसादी तरी देतील का? मनात प्रश्न पडला आणि आता धर्म संकट उभं राहिलं.. आजी ला वाचन दिलेलं…. आणि हा माणूस ढुंकून ही बघत नाहीये… मला आजीच्या शब्दाचा मान राखायचाय… काय करावं?
एक कल्पना सुचली.. ती अंमलात ही आणली मात्र नंतर जे झालं ते फार कष्टप्रद होतं. आयुष्यात असं कधीही केलं नव्हतं ते आज करावं लागलं.
बळजबरिनी…अगदी अजिबात इच्छा नसताना… कारण कंबरेवर हात ठेऊन ते साधू महाराज जमदग्नीच्या अवतारात उभे होते समोर….करवूनच घेतलं होतं त्यांनी!… पण त्याही नंतर जे झालं तो खरा अनुभव.. काय झालं असं टेकडीवर? भोजन मिळालं? आजीनी दिलेली शप्पथ पाळू शकले मी? ते संन्यासी का उभे होते रागात माझ्या समोर? तेही दोन्ही हात कमरेवर ठेऊन? काय करवलं त्यांनी माझ्याकडून? काय कष्ट झालेत मला? आणि त्यानंतर काय झालं? सांगते पण पुढच्या भागात.
*नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५३*
*नर्मदे हर..*
तर मागच्या भागात मी सांगत होते त्या साधू बद्दल जे कंबरेवर हात देऊन माझ्या पुढे उभे होते आणि माझ्याकडे रागाने बघत होते. “उपर जाकर खाना खा लो अशी शपथ त्या आजीनी मला घातली होती. ती आजी माझ्यासाठी कळवळली होती रडली होती… तर आता सांगते काय झालं ते.
त्या आजीनी शपथ दिल्यामुळे आम्ही टेकडीवर गेलो. आम्ही टेकडी चढून दमलो होतो, म्हणून झाडाखालाच्या पारावर बसलो. समोरच हे संन्यासी छान लोळत पडले होते. आम्ही नर्मदे हर केलं पण हे काही उत्तर देईना. असं दोन तीन दा झालं… आम्हाला काही इथे भोजन मिळणार नाही कारण हे साधं नर्मदे हर ला उत्तर देखील देत नाहीयेत, मग भोजन प्रसादी काय देणार? आणि आता आजीच्या शपथे चं काय करायचं? आता मी पेचात पडले.. मग उपाय म्हणून समोर च्या पाण्याच्या टाकी मधून पोट भर पाणी आम्ही प्यायलो..अगदी १ लिटर पाणी प्यायली असेन मी. म्हणजे पोट भरेल आणि आजीची शपथ मोडणार नाही. भोजन प्रसादी मिळणारच नसेल तर करणार काय? पण तिच्या सांगण्याप्रमाणे निदान “पोटभर” असं काहीतरी आम्ही पोटात घातलं हेच समाधान. आता थोडावेळ बसायचं आणि मग पुन्हा टेकडी उतरून पुढच्या प्रवासाला निघायचं.आम्ही थोडं बसून निघालो, तेवढ्यात आतून एक अजून संन्यासी बाहेर आला. त्याच्या हातात एक ताट होतं. ते ताट त्यांनी आमच्या पुढे आणलं आणि जोरदार आपटलं…इतक्या जोरात की त्यातलं अन्न वर उसळल्या गेलं. तो रागानी आमच्या कडे बघत होता… “ ये लो खाना.. पुरा खा लेना, इतनासा भी छोडा तो देखो फिर!.. हम मेहनत से खाना बनाते है और तुम थोडासा खाकर बाकी गाय, बकरी, कुत्तो को खिलाते हो? उनके लिये मेहनत नही करते हम… एक निवाला भी कैसे छोडते है देखता हू” आणि असं म्हणत त्याने ते ताट अक्षरश: आदळलं आमच्या पुढे. बरं थोडं थोडकं काही असेल तर खाता ही आलं असतं.. पण त्यात ६ टिक्कड, भरपूर भात, पालकाची पातळभाजी, कारल्याची भाजी, भजी, वरण आणि पापड इतकं सगळं होतं. आधीच पोटभर पाणी प्यायालेलो आम्ही दोघं आणि आता हे सगळं खा म्हणतोय हा….!
बरं ही टिक्कड काय असते ते सांगते, म्हणजे आमचा जीव का दडपला ते समजेल. आपल्याकडे भाकरी असते नं जाड त्याहून मोठी आणि जाड गव्हाच्या पिठाची भाकरी म्हणजे टिक्कड. एरवी आपल्या ४ ते ५ पोळ्या होतील एवढ्या पिठाची ही एक टिक्कड असते, आणि अर्ध्या टिक्कड मध्ये माझं पूर्ण जेवण अगदी पोटभर होतं हे मला माहितीये, आणि या ६ टिक्कड आणल्यात त्या साधुनी आणि त्यातल्या ३ मला खाव्या लागणार म्ह्टल्यावर माझं काय होणार? आणि आधी पाणी प्यायलेले ते वेगळच!पण हा गडी काही ऐकेना. तो राहिला उभा तासभर आणि ३ टिक्कड मला आणि ३ बाबाला खायलाच लागल्यात. सोबत घेऊन जायची सुद्धा सोय नाही. कसं बसं, अगदी घशाशी अन्न येत असताना पोटात ढकलायचं म्हणजे कष्ट नाही का? बरं प्रेमाने आग्रह करत असेल तर काहीतरी समाधान हो? डोळे वटारून हे महाराज समोर उभे होते.. त्यातून फक्त आमच्यासाठी स्वयंपाक केलाय हे ही सांगितलं होतं त्यांनी आम्हाला’… नाईलाज.. दीड तास लागला जेवायला, हा मात्र ठाण मांडून बसला. काही बोलावं याच्याशी तर बोलायला तयार नाही… खाल्लं शेवटी… आणि ९.३० चं आलेलो आम्ही १२.३० पर्यंत हललोच नाही इथून… इतकं खाऊन झाल्यावर एक पाऊलही चालवत नव्हतं खरं तर, पण इथे जर थांबलो तर रात्री पुन्हा काय खाऊ घालेल हा, किंवा अजून काय रागावेल ती कल्पना ही करवेना… त्यामुळे इथून निघून जे पाहिलं गाव येईल तिथे थांबू असं ठरवलं.. जास्तीत जास्त ३ ते ४ किमी चालू शकू…त्यानंतर अशक्य होईल हे माहित होतं आम्हाला..पण आपण ठरवतो तसं नसतं.
आम्ही ठरवलं खरं पण आम्ही वाट चुकलो. इथे शेतातून पुढे जायचं होतं, आणि आम्ही कदाचित भलत्याच दिशेला गेलो. दुपारची वेळ असल्यामुळे कुणी रस्ता विचारायाला ही दिसेना. किना-यावर मार्ग नाही, वरून जायचय इतकंच माहित होतं. वाटेत शेतं संपलीत आणि झाडी सुरु झाली, वाटलं माळरान असेल, हे झालं की लागेल गाव. संध्याकाळचे ५ वाजलेत तरी ही झाडी काही संपेना. तशी ही झाडी म्हणजे काही जंगल वगैरे नव्हतं, पण निवा-याचं असं काही स्थान अजूनपर्यंत मिळालं नव्हतं. आता काय करावं काही समजेना कारण तासाभरात अंधार होणार. आम्हाला वाट सापडली नाही तर आम्हाला रात्र इथेच काढावी लागणार…. काही खायला नाही की प्यायला नाही… झाडाखाली बसून रात्र काढायची हा एकाच मार्ग उरणार होता, आणि ही वेळ आमच्यावर येऊ शकते हे त्या माई ला कदाचित सकाळी ९.३० लाच समजलं होतं… आम्हाला शपथेवर तिनी वर पाठवलं, आधी पाणी पाजलं आणि मग खाऊ घातलं, ते ही अगदी इतकं की दिवसभर आणि पुढे रात्रभर देखील काही मिळालं नाही तरी चालू शकेल….
आम्ही आता झपाझप चालत होतो.. अगदी धावत होतो म्ह्टलं तरी चालेल. पाउलवाट दिसत होती म्हणजे कुठेतरी ती जाणार इतकच समाधान. आणि थोड्याच वेळात डोक्यावर काटक्यांची मोळी घेऊन जाणारी एक मैया रस्त्यात भेटली. तिला विचारलं “मैयाजी कहां जाना है अब हमे?” आम्हाला आम्ही रस्ता चुकलो आहे हे समजलच होतं. ती म्हणाली “गंगा खेडी की टीले से उतरे होंगे तुम लोग.. उलटे हात उतर गये.. तुमको नवा घाट जाना चाहिये था… मैयाजी को क्यू छोड दिये तो?” आम्ही कुठल्या विचारात असताना त्या रस्त्याला लागलो माहित नाही… मैया पासून बरच लांब येऊन गेलो होतो चालत चालत.. समजलच नाही काही.. पण नंतर या मैयांनी विमलेश्वर चा रस्ता दाखवला.. आम्हाला उशीर होणार होताच पण इलाज नव्हता.
विमलेश्वर च्या आधी कुठेशी एक अति प्राचीन शिवमंदिर लागलं. अंधार झालाच होता. तिथे चौकशी केली तर एक आजी होत्यात, अगदीच थकलेल्या त्या म्हणाल्या “बेटा तुम यहा आसन तो लगा सकते हो लेकीन भोजन प्रसादी की व्यवस्था नही हो पायेगी… मेरे लिये पास के गाव से खाना आता है सुबह, रात को भोजन नही करती, चाय पिला सकती हू” आम्हाला तरी कुठे जेवायाला हवं होतं? इतकं ठासून भरलेलं होतं पोट की अजूनही भूक लागली नव्हती. मोबाईल वर किमी चं एक एप आहे माझ्याकडे, त्यात पाहिलं तर २२ किमी अंतर दाखवत होतं टेकडी नंतर… कमाल वाटली… आपण रस्ता चुकणार हे तिला समजलंच कसं… का तिनी इतक्या आग्रहानी खाऊ पिऊ घातलं? का तो संन्यासी कमरेवर हात ठेवून दटावून खाऊ घालत होता, ते आता समजलं. आमचा निवारा मिळण हे ही तिला माहित होतं. असो..
दुस-रा दिवशी इथून निघून बडवाह ला पोचलो आणि आज इथे थांबूनच गेलो. श्रीराम महाराजांची भेट झाली नाही कारण ते नाशिक ला गेले होते. त्यांची भेट घेऊन उद्या निघू असं ठरवलं पण त्यांना यायला उशीर होईल असं माताजी म्हणाल्या आणि आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही काहीच अंतर चालून होत नसेल तर वाईट बातमी वा-यासारखी पसरली. श्रीराम महाराजांचा अपघात होऊन त्यात ते अनंतात विलीन झाल्याचं समजलं.. वाईट वाटलं. त्यांच्या आश्रमात राहून तिथल्या भक्तमंडळी शी झालेल्या चर्चेनंतर, त्यांनी लिहिलेले श्लोक वाचाल्यां नंतर, अचानक अशी वार्ता आली… पण नियतीचा नियम असतो तो… आमची भेट होणं लिहिलं नव्हतच..
इथून पुढे मोठं ध्येय आणि ज्याबद्दल ऐकून होतं असं म्हणजे लक्कडकोट की झाडी. बडवाह नंतर काही वेळाने जंगलाचा भाग सुरु होतो. डोलारा, कोठावा, मोहोरी असं करत करत च्यवन आश्रमात जायचं. काही लोक म्हणायचे ते आडवाटेला आहे, जाऊ नका, आणि काही म्हणायाचेत जायलाच हव… आम्ही जायचं ठरवलं आणि चांगलच झालं आमचं जाणं झालं ते. ही जागा अतिशय रमणीय आहे. निवांत, शांत आणि खूप सकारात्मक कंपन आहेत इथे. इथे गरम पाण्याचे झरे आहेत. अगदी चुकवूच नये असं स्थान आहे हे. इथे आम्हाला भोलादास जी महाराज भेटलेत. उदासीन आखाड्याचे. त्यांनी आम्हाला सुकन्या आणि शर्तारी राजाची गोष्ट सांगितली. अश्विनी कुमारांनी दिलेल्या आशीर्वादाने च्यवन ऋषि पुन्हा कसे तरुण झाले आणि सुकन्येला आपला वर कसा प्राप्त करून घेता आला ते ही समजलं. आणीही बराच सत्संग झाला.
इथे आमची भेट अजून एका तरुण बाबा शी झाली. मागे एकदंत महाराजांची गोष्ट सांगितली होती मी आठवतेय का? घोंगश्याला, म्हणजे शुलपाणीतल्या झाडीत असताना? या अनुभव मालिकेच्या २० व्या भागात आहे बघा! तर आज भेटलेला हा बाबा पण ब-यापैकी तसाच.. म्हणजे कशाचं काही भानच नसलेला…असे लोक नं अगदी मनापासून सुखी असतात, सुखी असतात असं म्हणणं पण चूक च आहे.. मला सांगता येत नाहीये नीट पण त्यांन्ना कशा कशाचं भान नसतं.. ते त्यांच्या ध्येयात असतात फक्त.. विलीन झाले असतात.. देह आहे इतकच काय ते जिते पणाचं लक्षण… काय भाग्य म्हणावं..!
तर या बाबांबद्दल सांगेन थोडसं.. पण एक गंम्मत सांगते बरं का आधी.. इथे च्यवन आश्रमात तुम्हाला पिंजा-यात राहावं लागतं.. हो, खोटं नाही काही! घनदाट जंगल आहे इथे, आणि सगळे प्राणी पिंजा-या बाहेर असतात म्हटल्यावर तुम्हाला पिंजा-यातच राहावं लागणार नं….अहो इथे खूप माकडं आहेत… त्यांच्या चेष्टा बघण म्हणजे पोरखेळासारखं होतं अगदी…सांगेन थोडी मजा म्हणून. पण आम्ही इथून निघालो आणि तीरांन्या पर्यंत गेलो तो प्रवास, नंतर जयंती माता मंदिर च्या आधी अनुभवलेलं ते थरारक हालचालींच साम्राज्य, नदीकाठी पाहिलेलं दृश्य, आणि जयंती माता मंदिरात आलेला अनुभव, जेव्हा ऐन थंडीत मला थेंब पडतील इतका घाम आला, माझ्या हृदयाची गती थांबेल असं वाटू लागलं आणि एका भयानक दु:खद सत्याचा परिचय जवळून झाला तो अनुभव कधी सांगते तुम्हाला असं झालय… पण हा भाग मोठा होईल खूप, म्हणून थांबू इथेच…
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५४
नर्मदे हर..
मागच्या भागात मी तुम्हाला जयंती माता मंदिरात आलेला अनुभव सांगत होते जेव्हा ऐन थंडीत मला थेंब पडतील इतका घाम आला, माझ्या हृदयाची गती थांबेल असं वाटू लागलं आणि एका भयानक दु:खद सत्याचा परिचय जवळून झाला तो अनुभव आता मी तुम्हाला सांगते.
तर जयंती माता मंदिरात आम्ही गेलो तेव्हा पासून चे अनुभव सांगते. बावडी खेडा गावा नंतर जयंती माता चं जंगल सुरु होतं. तसा इथे रस्ता मोठा आहे, टू व्हीलर देखील जातात, मात्र आजूबाजूला भरपूर झाडी आणि जंगल आहे. तर इथे बावडी खेडा ला आम्ही दुपारी दोन वाजता पोहोचलो. इथून पुढे जयंती माता मंदिर साधारण ७ किमी असावं. आम्ही जायचं ठरवलं आणि पुढे निघालो. हळू हळू झाडी दाट होत गेली आणि कच्चा रस्ता लागला. वाळू चा रस्ता होता, कारण काही अंतर पुढे एक नदी लागत होती. मी आणि बाबा हळू हळू रमत गमत जात होतो. कारण सात किमी अंतर आमचं पूर्ण होईलच असं आम्हाला वाटत होतं. मी रेती मध्ये उमटलेले चाकांचे ठसे बघते होते, आणि अचानक मला काहीतरी दिसलं… मी बाबाला दाखवलं आणि मन धस्स झालं.
गाड्यांच्या येण्या जाण्यामुळे असेल, किंवा दव पडल्यामुळे असेल , वाळू ओलसर होती आणि त्या ओलसर वाळूत मोठ्या आकाराचे जनावराचे ठसे दिसत होते, ते ही अगदी नुकतेच उमटलेले. आता आम्ही फक्त ते ठसे बघत बघत पुढे जात होतो कारण पुढे जाण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. ते ठसे झाडी च्या दिशेला गेले आणि दिसेनासे झाले. तिथून पुढे जेम तें १० पावलं चाललो नसू आम्ही आणि अत्यंत वेगळा वास येऊ लागला. हा वास कशाचा आहे हे आम्हाला समजलं होतं… आम्ही झपाझप पण सावध पणे पुढे जात होतो आणि दिसेनाशी झालेली पावलं, म्हणजे पावलांचे ठसे पुन्हा दिसू लागले.. म्हणजे वाघोबा आमच्या पुढे पुढे चालत होते आणि आम्ही मागे मागे… चला हे असं आहे हे बरं आहे, आम्ही पुढे आणि वाघोबा मागे असते तर काय झालं असतं तो विचार न केलेलाच बरा.
या जंगलात वाघोबा आहेत हे तर समजलं होतं आणि पुढे नदी वर गेलो तेव्हा अजून एक गोष्ट बघायला मिळाली. इथे नदी च्या काठावर अनेदा लोक पिकनिक करायला येतात. आजही इथे लोकांची बरीच गर्दी होती. बहुधा सुटीचा दिवस असावा. तर इथे एक लाकडी पूल आहे आणि हा पूल पार करून गेलं की एक छोटासा डोंगर लागतो, या डोंगराच्या वर आहे जयंती माता मंदिर. तर इथे आम्हाला बघून अनेक लोक आमच्याशी बोलायला आले. त्यातल्या एकाने आम्हाला “ध्यान से जाना” असा सल्ला दिला, आणि एक विडीयो दाखवला… अगदी एक दोन दिवस आधी काढलेला, याच लाकडी पुलावरचा. या विडीयोमध्ये वन अधिका-यांनी एका बिबट्याला मारलं होतं कारण हा बिबट्या गावात शिरून माणसावर हल्ला करायचा. त्याला जिवंत पकडणं शक्य होऊ शकलं नव्हतं…. बापरे, म्हणजे इथे बरेच प्राणी आहेत तर.. आता लाकडी पूल पार करून वरची टेकडी चढायची होती आणि लाकडी पूल पार केला की रस्ता एकट आणि जंगलातून जाणारा होता. नदीच्या अलीकडे जितकी हालचाल होती त्यापेक्षा कितीतरी पट जास्त शांतता पलीकडे च्या टेकडीवर होती.
आम्ही टेकडी चढून वर गेलो आणि जयंती माता मंदिर परिसरात सुखरूप पोहोचलो. मंदिर परिसर छानच आहे मात्र इथे आसन लावायची व्यवस्था म्हणजे एक भिंती नसलेला वरांडा आहे फक्त. आधीच थंडी चे दिवस, त्यात जंगलाचा भाग असल्याने अजूनच थंड वातावरण होतं. आश्रमातल्या मंडळीनी सगळ्यांनाच दोन दोन जाड चादरी आणि जास्तीचे पांघरूण दिले होते. त्यामुळे थंडी आटोक्यात आली होती.. रात्री दाल बाटीची भोजन प्रसादी घेऊन आम्ही झोपी गेलो.
रात्री झोपेत मला अचानक वेगळीच भीती वाटू लागली. आज काहीतरी अघटीत होणार असं राहून राहून वाटू लागलं. झोप उघडली ती भीतीमुळेच, पण काय ते समजेना…..मला खूप बेचैन होऊ लागलं.. जीव घाबरायला लागला, खूप घाम यायला लागला.. खूप काळजी वाटायला लागली. जवळ जवळ तास भर मला अशी भीती वाटत राहिली… कारण काही समजत नव्हतं…पण खूप भीती वाटत होती.. कशाची ते ही समजेना, आणि साधारण तासाभराने मला अचानक छातीत दुखू लागलं, हाता पायाला मुंग्या येऊ लागल्या.. कुणीतरी आपला श्वास दाबून धरतय असं वाटायला लागलं. मी पांघरूण काढून बाहेर फे-या मारू लागले.. बाबाला उठवलं तोवर मी घामाघूम झाले होते.. कपाळावरून घामाच्या धारा येऊ लागल्या होत्या आणि मला काहीही सुचत नव्हतं. कधी छातीतली कळ जीव काढायची… आत… खूप आत कुठेतरी जोरात हिसका मारावा तसं व्हायचं तर कधी पोट आवळून यायचं… बाबाला वाटलं दाल बाटी मुळे झालं असेल, पण मी बाटी खाल्लीच नव्हती..बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवत होता..
माझ्या डोळ्यासमोर फक्त माझं लेकरू दिसत होतं, आणि मी आता जाणार.. यातून माझी सुटका नाही असं वाटू लागलं होतं. आता आजूबाजूचे परिक्रमावासी ही जागे झाले होते. कुणी पाठ चोळतय तर कुणी मला वारा घालतय… मी मात्र उभे होते, की बसले होते, की लोळत पडले होते ते काही आठवत नाही.. तळमळत होते मी इतकं मात्र आठवतंय. साधारण एक ते पावणे तीन (पावणे तीन नंतर ची वेळ आठवते… आणि एक वाजलेला बघितल्याचं आठवतं, झोप उघडली तेव्हा घड्याळ पाहिलं होतं मी. नक्की त्रास केव्हा सुरु झाला आणि केव्हा संपला ते आठवत नाही) हा प्रकार असाच सुरु होता. बाबा डॉक्टर चा शोध घ्यायला गेला असावा… तोवर लिंबू सरबत, पाणी पाजून झालं होतं मला..आणि अचानक मला मळमळू लागलं… मला उलटी झाली आणि थोडं बरं वाटलं… हे असं मला अपचनामुळे झालं असेल असं सगळ्यांचं मत झालं पण मी सकाळपासून फक्त वरण भात खाल्ला होता.. त्यामुळे अपचन नाही हे मला माहित होतं. शिवाय ज्या वेळी मला अस्वस्थ वाटायला लागलं त्यावेळी मला काहीही शारीरिक त्रास झाला नव्हता.. तो त्रास मला जवळ जवळ तासाभरानी सुरु झाला होता. आणि अचानक बंदही झाला.
बाबानी माझ्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हटली.. आणि कधीतरी मला झोप लागली. दुस-या दिवशी मात्र मी अगदी ठणठणीत होते, काहीही न झाल्यासारखे. २६ किमी ची लक्कडकोट ची झाडी मी पार करू शकले इतकी ठणठणीत! किती विचित्र नं.. इतका त्रास की जीव जातो की राहतो समजेना… तो अचानक झाला अन अचानक बंदही झाला. काय कारण असावं? कारण होतं.. ते मला नंतर समजलं.. सांगते.
हे असं विचित्र पणे तब्बेत खराब होण आणि पुन्हा ठीक होणं हे मला जरा वेगळच वाटत होतं. फोनला रेंज नव्हती तोवर मी शांत होते आणि नंतर लगेच मला हे माझ्या आई वडिलांना सांगावसं वाटलं म्हणून मी घरी फोन लावला. मात्र पुन्हा एक भीतीचं सावट पसरलं. घरी कुणी फोन उचलेच ना. आईला लावून झाला, बाबांना लावून झाला, भावाला लावून झाला, घरचा फोन लावून झाला… कुणीही फोन उचलेना… मग माझ्या नवा-याला लावला.. माझ्या मुलाला लावला… ते ही फोन उचलेना.. मी आता काल रात्रीपेक्षा ही जास्त घाबरले होते. आपल्या घराचं कुणीच का फोन उचलत नाहीये? काहीतरी गडबड आहे नक्की हे समजत होतं आणि काय ते जाणून घ्यायचं होतं पण अजिबात हिम्मत होत नव्हती. “सगळं ठीक आहे, तू काळजी करू नको” फक्त हेच ऐकायचं होतं मला…पण आपण ठरवतो तसं नसतं होत ….. माझ्यासाठी काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं…
काळजी पोटी की काय देव जाणे, आता माझं अंग तापांनी फणफणलं होतं.. आता मला फक्त माझ्या बाबांशी बोलायचं होतं एकदा.. मी पुन्हा एकदा फोन लावला आणि या वेळी माझ्या भावजयीनी फोन उचलला. “रेणू, काय झालय? फोन का उचलत नाहीयेत कुणी?” मी रागावलेच तिला! आणि तीनी सांगितलेल्या बातमी ने मी मला आवरू शकले नाही.. “ताई बबन काका आजोबा काल रात्री गेलेत…तुला सांगावं की नाही समजत नव्हतं, सगळे तिकडेच गेलेत, बाबा आलेत की मी सांगते तुझ्याशी बोलायला”….
माझे काका आजोबा गेले होते… मला वाटणारी भीती अवाजवी नव्हती…काल रात्री पासून ही भीती वाटत होती मला…. काहीतरी होणार असं राहून राहून वाटत होतं…..लहानपणापासून त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले मी..त्यांनाही माझं खूप कौतुक…आणि परिक्रमेत असताना मला ही अशी बातमी मिळावी? फार फार वाईट वाटत होतं मला… मात्र हा अनुभव इथेच संपत नाहीये… माझं जेव्हा माझ्या रेवती काकूशी बोलण झालं तेव्हा वेगळाच उलगडा झाला. तो असा की आजोबा गेले ती वेळ आणि मला त्रास झाला ती वेळ अगदी एक.. रात्री साधारण एक ते तीन च्या दरम्यान मला त्रास झाला.. अगदी छातीत दुखून जीव जातो की काय इथवर त्रास, आणि तिकडे नागपूर ला त्याच वेळी फक्त थोड्या वेळाच्या अस्वस्थते नंतर आजोबांनी देह ठेवला…जणू ती त्यांची आणि माझी शेवटची भेट! हे नक्की काय आहे ते मला सांगता येत नाहीये आणि आजही हे लिहिताना माझे अश्रू घळघळा वाहतात आहेत.
मी बाबाला (माझ्या सोबत च्या नर्मदा बाबाला) म्हणाले मला घरी जायचय तर मोठ्या धीराने त्यांनी मला समजवलं “ आजोबांना तू परिक्रमा सोडून आलेलं आवडणार नाही.. तू जायचं नाहीस…” मी नाही गेले परत घरी मात्र मला झालेला त्रास, आजोबांची ही बातमी, कशामुळे कोण जाणे पण माझी तब्ब्येत अधिकच बिघडली. पुढचे तीन चार दिवस ती अधिकच बिघडत गेली. मात्र पामाखेडी, फतेह गड, आणिक मध्ये एक गाव येतं तिथेले जमीनदार, आणि पुढे नेमावर या सर्व ठिकाणी मैया माझ्या सोबत आहे हे तिनी जाणवून दिलं. नेमावर ला तर कहरच झाला, पाऊलही उचलता येईना अशी अवस्था, आणि अशा वेळी जे झालं ते पुन्हा एकदा आपल्याला निशब्द करून ठेवतं… मी नेमावर मध्ये पाय ठेवताच असा विलक्षण अनुभव आला … पण आता नाही सांगत.. पुढच्या भागात सांगेन...
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५५
नर्मदे हर..
तर जयंती माता मंदिरात आलेला अनुभव मला संपूर्ण पणे हलवून टाकणारा होता. माझ्या काका आजोबांची बातमी ऐकून मला खूप कसं तरीच होत होतं. अर्थात त्या परिस्थितून मी बाहेर आले पण कदाचित या मानसिक आघाताचा माझ्या शरीरावर परिणाम झाला. मला खूप ताप चढला. लक्कड कोट ची घनदाट झाडी पार केली खरी पण नंतर पामाखेडी ला न थांबता दंठा ला मुक्काम केला. गरम पाण्याने आंघोळ करायला मिळाली इतकंच आठवतंय….. मी लगेच झोपी गेले असावे, माझा ताप थोडा वेळ उतरून पुन्हा लगेच चढायचा…असं दोन दिवस सतत सुरु होतं.
मध्ये दोन मुक्काम अजून झाले, तमखान नंतर मी फार चालू शकत नव्हते, पण का कोण जाणे नेमावर लाच थांबायचं अशीच मागणी मी मैया जवळ करत होते आणि माझी तब्ब्येत मात्र अधिकच खालावू लागली. मला नर्मदा जयंती ला नेमावर लाच असायचं होतं, हट्टच होता तो माझा, मैयाकडे. तमखान नंतर तर माझ्याने एक पाऊलही चालवेना, चक्कर आणि उलट्या देखील सुरु झाल्या. अंगावर खूप पुरळ उठलं, आग आग होऊ लागली..मात्र ती नर्मदा माई लेकराला सांभाळतेच… माझी अवस्था पाहून एक राजपूत सिंग नावाचे कुणी आम्हाला विश्राम करा, असा आग्रह धरू लागले… ते डॉक्टर आणतो म्हणून गेले ही, पण इथे त्यांना डॉक्टर मिळाला नाही…. त्यांनी घरी फोन करून जेवणाचा डब्बा, चहा आणि दोन स्कार्फ मागवलीत, त्यांचा मला फारच उपयोग झाला.. ते काही अंतर आमच्या सोबत पायी चालले देखील. आमची व्यवस्था अविनाश करत आहे हे समजल्यावर ते घरी परतले…अविनाश सोळंकी यांचा फोन आला त्या वेळी, आम्ही नेमावर च्या जवळपास असू. मी फोनवर बोलू देखील शकले नाही मात्र बाबा बोलला… मला दवाखान्यात भरती करून घ्यावं लागणार असं बाबा आणि अविनाश दोघांनाही वाटू लागलं असावं.. काय बोलणं झालं ते मला आठवतत नाही मात्र अविनाश चे ४ ते ५ फोन येऊन गेले. मी डोळे बंद करून, बाबाचा हात धरून फक्त पावलं उचलत होते..आता जिथे कुठे व्यवस्था असेल तिथे फक्त जाऊन आडवं व्ह्यायचं इतकच मला माहित होतं.. माझे पाय सुद्धा कसे उचलले जातात आहेत हे देखील माझ्या कल्पने बाहेर होतं…..आम्ही नेमावर ला पोचलो तेव्हा वर्मा जी आमच्यासाठी उभेच होते. त्यांनी आम्हला एका हॉटेल च्या खालच्या रूम मध्ये जागा दिली… कुठे थांबायचं, डॉक्टर कोण, हे सगळे निर्णय अविनाश आणि बाबा यांनी घेतले, त्या वेळी अविनाश, राम बाबू, वर्मा जी या सगळ्यांनी फोनाफोनी करून माझी व्यवस्था केली होती, आणि मी मात्र फक्त आराम करत होते.
मला संध्याकाळी जरा बरं वाटलं आणि तेव्हा सगळं बाबानी सांगितलं, पण बिचारा बाबा पूर्णवेळ हॉटेल च्या रीसेप्शन वर बसून होता. एकतर हॉटेल मध्ये राहणं त्याला पटलेलं नव्हतं, त्यात मी खोलीत आराम करत असल्याने बाबा ला पूर्ण वेळ बाहेर बसावं लागलं होतं…मला ही ते पटलं नाही आणि म्हणून आता थोडं बरं वाटतय तर आश्रमात जाऊ असं ठरवून आम्ही तयारी करायला घेतली. मी झोपून उठलेली पाहून हॉटेल च्या मालकाला हायसं वाटलं. त्याने देखील त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टर ला बोलावलं आणि “ये हमारे घर के ही डॉक्टर है, एक बार दिखा दो” असा आग्रहच केला. सत्तरी पंचहत्तरी चे डॉक्टर शर्मा मला तपासायला आले तेव्हा त्यांनी मला आपल्या दवाखान्यात येण्याचा आग्रह केला, एक इंजक्षन द्यायचं आहे आणि ब्लड टेस्ट करायची आहे असं सांगून बोलावलं. मी पण विचार केला की इतकं कुणी करतय आपल्यासाठी तर दाखवून देऊ एकदा, म्हणून आधी दवाखाना करू आणि मग आश्रमात जाऊ असं ठरवलं, आणि दवाखान्यात गेलो.
तिथे इंजक्षन देऊन, ब्लड टेस्ट साठी ब्लड देऊन झाल्यावर डॉक्टरांनी मला जाउच दिलं नाही “आज आपको यही रहना है माताजी, अंडर ओब्जर्वेशन, कल फिर चले जाना”. तुम्हाला हवं ते सगळं इथेच देतो पण माझ्याकडेच रहा असं म्हणून थांबवूनच घेतलं. आमचं सगळं सामान हॉटेल ला आणि आम्ही दोघं डॉक्टरांच्या घरी. खाली हॉस्पिटल आणि वर घर, सगळी देखरेख.. त्यांच्या घराच्या समोर च्या खोलीत आमची व्यवस्था केली होती आणि दर दोन तासांनी एक नर्स येऊन माझी तब्ब्येत पाहून जात होती. दुस-या दिवशी सकाळी डॉक्टर स्वत: जाऊन आमचं सामान घेऊन आले आणि दुस-याही दिवशी मला जाऊ दिलं नाही. या दोन दिवसांची देखभाल आणि औषधा नंतर मात्र माझी तब्ब्येत सुधारली, आणि मग आम्ही पुढे जायचं ठरवलं..पण नर्मदा जयंती नेमावर ला करायची होती. माझी तब्ब्येत सुधारली तो दिवस नर्मदा जयंतीचा. आजच्या दिवशी परिक्रमावासी ना डॉक्टर आपल्या घरून जाऊ देणार नव्हतेच, म्हणून तो ही दिवस तिहेच थांबलो.. बहुधा याही मागे कारण असावं…
नर्मदा जयंतीचा सोहळा मी नुसता बघावा असं त्या मैयाला मान्य नसावं. त्यात माझा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे अशी तिची इच्छा असावी आणि म्हणून ती माझ्या मनातही उत्पन्न झाली, आणि तसं तिनी घडवून आणलंही. सायंकाळी नर्मदा जयंती निम्मित्त आयोजित कार्यक्रमात आरतीच्या वेळी परिक्रमावासी च्या हाताने आरती व्हावी असं एका मैयाजीच्या मनात आलं आणि मी तीथे हजर होते म्हणून असेल पण ते भाग्य माझ्या पदरी येऊन पडलं. त्या आरतीच्या तेजाचं वलय पाहून मला दिवा लावण्याची इच्छा झाली आणि चितळे माईंचा ५०१ दिव्यांचा अनुभव आठवला…आणि वाटलं ५०१ नाही पण ५ तरी दिवे लावावे आपण… तिथेच एका दुकानातून मी ५ दिवे घेतले आणि विझणार नाही असं ठिकाण शोधावं म्हणून जरा अंतर लांब गेले, मी माझे दिवे लावून ठेवत होते आणि तिथेच एका पायरीवर एक आजी बसल्या होत्या, त्यांच्या समोर ५-६ ताटात भारपूर दिवे तयार करून ठेवले होते आणि अजून त्या तयार करतच होत्या. त्यांच्या हाताशी त्यांची १५- १६ वर्षांची नात एक एक ताट घेऊन ते दिवे पायरी वर मांडत होती. सगळे दिवे मांडून झाल्यावर ते लावायचे होते… “इतने दिये छोडोगी माताजी” मी विचारलं..”नही बिटिया, सारा किनारा झगमग करे आज तो….मैया मे नही छोडना है.. यही रखना है किनारे पर… मेरी मदत करदे..तू भी आजा मेरे नातीन के साथ.. वो दिये सजा रही है, तू जलाती जा पीछे पीछे”.. मी फक्त ५ दिवे लावायची इच्छा व्यक्त केली होती.. किती तरी दिवे त्यादिवशी मी लावले असतील… पण मैयांनी माझी इच्छाच पूर्ण केली नाही तर मला हवं होतं त्याही पेक्षा जास्त, खूप जास्त दिलं तिनी मला…त्याच दिवशी नाही…नेहमीच…… मैया किनारा त्या दिव्यान्नी उजळून निघाला होता… पायऱ्यावर लांब पर्यंत पसरलेले दिवे, त्यांच्या सात्विक, मंद पण प्रसन्न प्रकाशानी मन, आत्मा आनंदमय झाला होता.. “तमसोमा ज्योतिर्गमय” हा देहाचा मनाचा आणि आत्म्याचा प्रवास इथेच बसून बघत राहावा असच वाटत होतं… दिवे लावून झाल्यावर त्या आजी आपल्या नातीसह परतताना मी पहिल्या होत्या.. एकेक पाउल चालायला त्या आजींना बराच त्रास होत होता, नातीचा हा धरून त्या पाया-या चढत होत्या…इतके कष्ट घेऊन त्या आजी इथे आल्या आणि माझी इच्छा पूर्ण झाली… नेमकी मला चितळे माईची आठवण यावी, नेमका तो दिव्यांचा अनुभव आठवावा, आणि नेमकं याच वेळी ह्या आज्जी मला भेटाव्यात! योगायोग वाटतो का हा?… मला इथून जावसं वाटत नव्हतं पण डॉक्टर साहेब वाट बघत असणार होते, त्यामुळे त्या उज्वल ज्योतिर्मय मैयाचं नववधू सारखं रूप डोळ्यात साठवून आम्ही घरी परतलो.
पुढे छीपानेर ला मुक्काम केला, आणि पुढचा मुक्काम डीमावर ला. डीमावर ला जाताना बरीच वाट शेतातून जायला लागते. इथे एक खूप जागृत मंदिर आहे, तिथे मुक्काम करण्याचं ठरवलं, रस्त्यात भेटलेल्या रामसिंग दुबे जींनी आम्हाला या मंदिराची माहिती दिली. साधारण चार शे वर्ष जुनं हे मंदिर आहे, त्यामुळे इथेच मुक्काम करायचा असं ठरलं. तिथे जाईस्तोवर संध्याकाळ झाली आणि अचानक पावसाला सुरवात झाली. मंदिरात गेलो तर तिथे अजिबात जागा नसल्याचे समजले. बाहेर गावाची ४० ते ५० जणांची एक बस तिथे येऊन उभी होती. भागवत करण्यासाठी त्यांनी हे मंदिर आधीच बुक करून ठेवलं होतं. “प्रसाद के लिये आजाओ आप पर रुकने की व्यवस्था नही है” असं म्हटलं तेव्हा आता पावसात, अंधारात आम्ही जावं कुठे तेच कळेना. हे मंदिर तसं गावापासून थोडं लांब, म्हणजे आता ३ किमी चालून गावात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, आणि गावातही सोय आहे की नाही याची खात्री नव्हती…. आम्ही निघालो.
मैया प्रत्येक गोष्ट करते त्यामागे कारणं असतात, कुणाचीही भेट ती उगाच घडवत नाही, त्या मागे कारणं असतात आणि असतातच. आम्हाला ज्या रामसिंग दुबे जींनी मंदिराची माहिती दिली होती, वाटेत चहा पाजला होता, तेच रामसिंग आम्हाला पुन्हा रस्त्यात भेटले, आणि “आपको ही लेने आ रहा हू, असं सांगितलं” आम्ही तर त्यांना काहीही सांगितलं नव्हत, किंबहुना त्या भागवत कथे बद्दल ही रामसिंग यांना माहित नसावं कारण तसं असतं तर मंदिरात राहा असा सल्ला त्यांनी दिलाच नसता..मग यांना कसं समजलं आम्ही निवारा शोधतोय ते?… नाही.. त्यांना काहीही समजलं नव्हतं… ही मैयाची कृपा होती. दोन चांगल्या घरचे लोक आणि परिक्रमावासी रस्त्यात भेटल्या चं रामसिंग जी आपल्या बायको जवळ बोलले असता त्या बाई खूप भावूक झाल्या आणि “आज परिक्रमा वासी की सेवा का मन हो रहा है, आप उन्हे घर बुला लाईये, उनके पैर की मिट्टी अपने घर मे आनी चाहिये” असं इतकं कळवळून म्हणाल्या की भर पावसात,अंधारात, छत्री घेऊन हे रामसिंगजी आम्हाला शोधायला मंदिराकडे निघाले… आम्ही निवारा शोधत होतोच, पण सांगा, मी याला योगायोग कसं म्हणावं हे मला समजत नाहीये. नेमकं आम्हाला राम सिंग भेटणे, आम्हाला मंदिरात जागा न मिळणे, दुबे मैया असं कळवळून राम सिंग जी ना आम्हाला घरी आणण्याबाबत विनवणे…नेमकं कसं होतं असं?.. पण असं होतं…पुढे पाथोडा आणि होलीपुरा ला पण अश्याच प्रकारचे अनुभव आले. मात्र बुधनी आणि नांदनेर चा अनुभव अगदी हृद्य आहे…
बुधनी ला आम्ही अज्ञानात सुख कसं असतं ते अनुभवलं तर नांदनेर ला आमची चांगली कान उघडणी केली… नांदनेर ला मैया नी खूप लाड केलेत, आणि अद्भुत कंपनाच्या स्वाधीन केलं आम्हाला, इथल्या मंदिराची विशेषता आहे ती, मात्र ते तसं भाग्य असावं लागतं. माझं भाग्य मात्र जोरावर आहे बरं का… पूर्व जन्मीची पुण्याई , माय बापाची पुण्याई , पण मी भाग्यवान आहे खरी… आणि हे अनुभव त्यामुळेच येतात…कोणते?..सांगते पण पुढच्या भागात..
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५६
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला डिमांवर बद्दल सांगितलं होतं. रामसिंग दुबे यांच्याकडे आम्ही राहिलो होतो, आणि हा मुक्काम अचानक झाला होता. आता पुढे सांगते. इथून पुढे आम्ही पिथोडा होलीपुरा मार्गे नांदनेर ला गेलो. वाटेत बुधनी, सरदार नगर, जैत ही गावं लागतात.
पिथोडा ला पोहचते वेळी आम्हाला बर्यापैकी झाडी जंगल मार्ग लागला. अतिशय प्रसन्न अस वातावरण होतं दिवसभर आणि इथे आम्ही राहिलो होतो ते ठिकाण आधी जरा वेगळं वाटलं पण नंतर मात्र खूप आवडलं. किन-या किना-याने जाताना इथे खूप गमती जमती झाल्या बरं का! एक बगळ्या सारखा दिसणारा पक्षी आमच्या सोबत सोबत चालू लागला इथे, अहो म्हणजे तरी १.५- २ किमी असेल.. हा नं आमच्या समोर समोर उडत होता, थोडं समोर जाऊन अगदी वाटेवर बसायचा, आणि आम्ही त्याच्या जवळ गेलो की उडून जायचा.. मजा वाटली बघून. इथे मोकळा मोठा पण कच्चा रस्ता आणि अगदी बाजूला मैया. त्या मैयाकडून येणारं वारं आमच्यात जणू कसलीशी ताकत भरत होतं. खूप प्रसन्न आणि शांत वातावरण, आपोआप जप केल्या जात होता इथे…एका ठिकाणी तर मी चक्क खाली बसले आणि त्या मैया कडे दोन्ही हात पुढे करून तिला एक करकचून मिठी मारून घेतली…. हो न ! तिनी कवेत घेताल्यासारखं वाटलं मला. ही प्रसन्नता काहीतरी वेगळी होती बरं का, स्थान महात्म्य असेल की काय माहित नाही.. पण म्हणजे कसं सांगू? बघा जेव्हा आपली छान झोप झाली असेल आणि अगदी सकाळी सकाळी उठल्यावर खूप उत्साह वाटत असेल नं तसं, किंवा अनपेक्षित पणे काही हवं हवं सं वाटणारं मिळावं तसं काहीसं…मन नुसतं हसतच होतं आनंदानी… पावलं टाकल्या जात होती पण त्या चालण्यात कसलीही उताविळता नव्हती, उलट आहे ते सगळं अगदी पिऊन टाकावं असं वाटत होतं..
याच रस्त्यावर नं एक अजून गम्मत झाली बरं का….मैयाच्या पलीकडच्या काठावरून बक-याचा एक कळप सुद्द्धा आमच्या सोबत चालतोय की काय असा भास होत होता, आणि कुणी माणूस आहे असा भास झाला म्हणून बाबाने जोरात नर्मदे हर केलं.. इथे पात्र खूप लहान नाहीये, पण खूप मोठही नाही, त्यामुळे आवाज गेला असावा आणि सगळ्या बक-या पण ओरडल्या, त्यात त्या माणसाचा आवाज काही आला नसावा असं वाटून बाबा पुन्हा नर्मदे हर म्हणाला…पुन्हा बक-यांचा आवाज आला, आणि मग नीट पाहिलं तर तिथे कुणी माणूस नव्हताच…. त्या बक-या कदाचित असंच, म्हणजे नर्मदे हर ला प्रतिसाद म्हणून नसतील ही आवाज देत, पण आम्हाला वाटलं आमच्याच हाकेला प्रतिसाद दिला…आणि मग अजून मजा येऊ लागली….
इथे याच रस्त्यावर अजून एक गंमत पाहिली. दोन बेलाची झाडं होती.. म्हणजे त्यांची मुळं आणि बुंधे वेगळे होते. त्यांना फांद्याही वेगळ्या फुटल्या होत्या पण पुढे दोन झाडांची मिळून एक फांदी तयार झाली होती, फोटो काढलाय मी, देते इथे… सृष्टीत असं ही असतं.. आपण नाही का बघत कधी हात चिकटलेले जुळे भाऊ वगैरे, तसं…
तर अश्या अनेक गमती जमती बघत बघत अगदी आनंदात आम्ही पिथोद्याला येऊन पोचलो. इथे लोकांनी आम्हाला रामसिंग भाई चं घर दाखवलं… इथेही रामसिंग भाईच! हे एकटे इथे थांबून शेती बघतात आणि परिवार जबलपूर ला असतो. इथे यांच्याकडे यांच्या स्वयंपाक घराचा ताबा त्यांनी माझ्या हाती सोपवला. रात्री बराच वेळ गप्पा झाल्यात आणि आता आसन लावायचं तर लाईट गेले. जी खोली आमच्यासाठी तयार करायची होती त्यात सगळा भुसा भरलेला….आणि आता तो काढून दुसरीकडे नेण काही शक्य नव्हतं. बरं बाहेर झोपायाचं म्हटलं तर हवी तशी जागा नव्हती, गायी म्हशी बांधलेल्या होत्या, आणि आता रात्री अंधारात आपण कुणाला किती त्रास द्यावा असं वाटलं.. आपण टोर्च लाईट मध्ये करून घेऊ भुसा बाजूला, असं म्हणून आम्ही त्या खोलीत गेलो, आणि बाकी मंडळी पण आपापल्या घरी गेली.
आम्ही आत गेलो तर भरपूर भुसा खोलीभर पसरला होता, खोली म्हणजे व-हांडाच हो, ५ बाय ७ च्या आसपास लहानशी ती खोली, तीन बाजूनी भिंत, एका बाजून जाळी, आणि वर कौलं, ती ही काही ठिकाणी निघालेली… तर आता तो भुसा झाडू नी एका कोप-यात सरकावायाचा आणि मग तिथे अंथरूण घालायचं.. पण आम्हाला तसं करताच आलं नाही..तो भुसा जसा झाडायला सुरवात केली तसं आम्हा दोघांनाही खूप शिंका येऊ लागल्या… आम्ही बाहेर आलो आणि कुडकुडना-या थंडीत जरा वेळ बसलो, पण ते ही सहन होईना… आता काय करावं… मग जरा शोधलं काही दिसतय का तर प्लास्टिक च्या पोत्याची शिवलेली दोन मोठी कापड सापडली… तेच कापड घेऊन आत गेलो… भुसा खोलीभर पसरला होताच, अगदी बराच होता, त्यावरच हे अंथरलं आणि त्यावर आमचे अंथरूण घातलं, आणि दुसरं कापड जाळीला बांधल, आणि छांन झोप झाली.. अजिबात थंडी वाजली नाही… मैयांनी तो भुसा आमच्या थंडी साठीच अंथरून ठेवला असावा..दुसया दिवशी रामसिंग भाई नी स्वत:च्या हातांनी आमच्या साठी बालभोग तयार केला आणि तो खाऊन आम्ही पुढे निघालो.
पुढे साततुमडी निनोरा करत सप्त धारा ला आलो. ही गावं नं अगदी चित्रामधल्या पेंटिंग सारखी गावं आहेत, प्रत्येकच घर कसं सुंदर लीपाई पोताई केलेलं..एका घरातून नं खूपच खमंग वास येत होता, भूक बळावली असेल.. मला लोणचं तेल पोळी च आठवली अगदी… पण तिकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो… निनोरा ला एका घरी चहा ला बोलावलं असता तिथल्या मैया जी नी चहा सोबत खायला म्हणून चक्क पोळ्या आणल्या होत्या आणि ताटलीत आंब्याचं लोणचं! आता खरं मला इच्छा ही झाली नव्हती बरं, आठवण आली होती, आणि ती ही त्या खमंग वासामुळे… माझ्या मनात एकदाही असं आलं नाही की आपल्याला लोणचं तेल पोळी हवी आहे…आणि पुढच्याच गावात ती मिळावी ही..खरच सांगते, या वेळी मला फक्त आठवण झाली होती…इच्छा खरच झाली नाही….असो
मग आलो सप्त धाराला… हा रस्ता अगदीच एकट आहे. पण इथून दिसणारं मैयाचं रूप फारच वेगळं आहे.. अशा एका ठिकाणी तिच्या सात धारा वेग वेगळ्या दिसून पडतात अगदी.. बघत रहावसं वाटतं..इथेच एका ठीकाणी एक चौकोनी चबुतरा आहे आणि त्या वर शिवलिंग बसवलेलं आहे, बाजूलाच दुसरा छोटा सां चबुतरा ही आहे.. हे अगदी रस्त्याच्या मध्य भागी बरं का… आणि रस्त्याच्या कडेला एक झोपडी आहे, पडवी असलेली, आणि झोपडीच्या मागे सगळी शेतं…बाबा पडवीत जाऊन बसला आणि मी त्या छोट्या चबुत-यावर जाऊन बसले आणि आम्ही दोघं ही मैयाचं ते विलोभनीय बघत बसलो. अचानक कुठून आणि कसा काय माहित नाही, एक भला मोठा बैल धावत माझ्या दिशेनी येऊ लागला, तशी मी चबुत-यावर चढून उभे राहिले, मला वाटलं मी वर चढून उभी झाल्यावर तो काही करू शकणार नाही, पण हे सगळं इतक्या क्षणार्धात झालं की विचार करायला वेळ मिळाला नाही आणि हा आडवा उभा प्राणी माझ्या दिशेनी शिंग उभारू लागला, त्याचे पुढचे दोन पाय चबुत-यावर, आणि मी मात्र पलीकडच्या भागाने खाली पडले…. तसा तो ही उतरून माझ्या दिशेनी येऊ लागला… त्या महादेवाला मी ११ प्रदक्षिणा नक्कीच घातल्या असतील त्या दिवशी… अतिशयोक्ती सोडून द्या, पण बाबा या नंदी मागे दंड घेऊन धावत होता तरी याला काही परवाच नाही.. तो बाबावर धावून जात नव्हता, माझ्याच मागे येत होता, त्याच्या आणि माझ्या मध्ये तो महादेव काय तो होता बस.. जर हा नंदी त्या महादेवाच्या चबूत-यावर चढला असता तर काही माझी खैर नव्हती… पण त्याला तेवढं उंच चढता येईना बहुधा… एक क्षणभर तो नंदी जरा थांबला असेल आणि तो क्षण साधून मी झोपडीकडे धावले, एव्हाना माझा आरडा ओरडा ऐकून झोपडी चं दार उघडून तिथे राहणारा एक माणूस बाहेर आला होता आणि तो ही या नंदी ला पळवून लावण्याला मदत करत होताच..मी सरळ झोपडीत शिरले आणि दर बंद करून घेतलं… खिडकीतून बघितलं तर हा नंदी झोपडीच्या मागच्या बाजूच्या शेतांकडे निघून गेला होता.. तो खूप दूर निघून गेलाय याची खात्री झाल्यावरच मी झोपडीच्या बाहेर आले… पण असं का झालं याचं कारण मला आजवर समजलं नाही. म्हणजे आम्ही दोघं ही होतो नं तिथे, मग या नंदी ला माझ्याशीच काय वैर? पण असं होतं बहुधा, कारण माझी लहान बहिण गायत्री देशमुख हिला सुद्धा असा अनुभव आलाय..कुठे आला ते मला आता आठवत नाही, पण तिला तर अश्याच नंदी ने शिंग मारून खाली पाडलं होतं… मी तेवढी वाचले बाई.. असो..
इथून पुढे जाताना खूप शेतातून आणि उंच सखल म्हणजे कुठे चढाई तर कुठे खाली उतरून जावं लागतं. तेव्हा शेताला पाणी दिलं होतं आणि सगळीकडे नुसताच चिखल होता त्यामुळे अगदी शेताच्या किना-यावरून जावं लागत होतं. एक सांगू का, या भागातल्या प्राण्यांच माणसाशी किंवा परिक्रमा वासीशी, किंवा माझ्याशीच असेल पण काहीतरी नातं नक्की होतं, किंवा हे इथले प्राणी असेच असतील की काय देव जाणे… मागे लागणारे… कारण आता माझ्या मागे अजून एक प्राणी लागला..एका ठिकाणी अगदी दोन तीन दिवसांचं बकरीच पिलू खेळत होतं.. आम्ही जवळून गेलो आणि ते मागे मागे येऊ लागलं.. मग त्याची सोबत करायला कुठूनशी आणिक पिल्लं… ही पिल्लं आम्हाला पुढे जाऊ द्यायची, आणि मग में में करत मागून पायात पायात करायची. यात एक अगदी लहान पिल्लू होतं ते तर असं हक्कानी माझ्या पायाशी यायचं… रस्त्यात चिखल होता, आणि चढ उतार खूप होते, ह्या पिल्ला ला बरेच ठिकाणी चढता यायचं नाही, तेव्हा पिल्लू अक्षरश: मला किंवा बाबा ला आवाज द्यायचं आणि मग आम्ही त्याला कडे वरवर धरून चालायचं… जवळ जवळ २ तास ते पिलू आमच्या बरोबर होतं आणि मग बाकी पिल्लं निघून गेल्यावरही होतं.. किती हकलावं याला की “जा बाबा तुझ्या आईकडे परत” पण हे काही जायला तयार नाही, याचा मालक कोण काही माहित नाही, मग एका ठिकाणी एक ओढा पार करून जायचं होतं, तेव्हा मन कठोर करून त्याला कडेवर न घेताच पुढे निघून गेलो…काय ऋणानुबंध असतात माहित नाही… त्या नंदीला माझा भयंकर राग असावा, मला अगदी जीवानिशी संपवायला निघाला होता तो, आणि हे कोकरू मला सोडायला तयार नव्हतं… हक्क गाजवत होतं माझ्यावर.. परस्पर विरोधी… म्हणजे एक नक्की.. मी कुणाला तरी अगदी तुटेस्तोवर दुखावलंय आणि कुणावर तरी निस्सीम प्रेम पण केलंय… सगळीच कृपा तिची आहे
पण बुधनी सरदार सरोवर आणि नांदनेर ला जे काही अनुभवलं त्यात पुन्हा एकदा माईच्या असीम कृपेची पावतीच मिळाली जणू… आणि एक कान उघडणी पण झाली माझी…सौम्य शब्दात चांगलाच रागावलं त्या मैयांनी मला.. “चुकातेयेस तू बेटा, वेळीच सावर” असा संदेश दिला..सांगते ५७ व्या भागात...
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला नंदी आणि त्या बकरीच्या पिला बद्दल सांगितलं होतं ना? कसे ते माझ्या मागे लागलेले? पण इथे काही तरी जादूच आहे बहुधा. किंवा माझं काही नातं असेल ला भागाशी. कारण प्राणीच नाही, माणसाचं बाळ पण मागे लागलं माझ्या…सोडायलाच त्तायार नाही मला. पण असा अनुभव नं दोन तीन दा आला मला परिक्रमेत. बरं जेव्हाचा तेव्हा सांगेनच, आताचा आधी सांगते.
तर एका गावातून जात असताना आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. लोक विचारतातच परिक्रमावासीना तसं एका लहानश्या मैया नी आम्हाला चहा विचारला आणि अंगणात बोलावलं. ह्या घरी एक अगदी १०-११ महिन्याचं बाळ होतं, खूप गोड, इतकं की त्याला घेतल्याशिवाय मला राहवलं नाही.. आणि एक बरं का, मी पण लहान मुलांना फार आवडते. अगदी नेहमीचा अनुभव आहे हा माझा. म्हणजे शाळा न आवडणारी मुलं माझ्या केबिन मध्ये आली की न त्रास देताना छान गप्पा मारायची माझ्याशी…आणि वर्गात जायला कंटाळा करायची…असो.. तर त्या बाळाला मी कडेवर घेतलं आणि त्याच्याशी खेळू लागले… काही ओळख पाळख नसताना हे बाळ अगदी परिचित असल्यासारखं हसायला लागलं… चहा देखील मी त्याला कडेवर घेऊनच प्यायले बरं का…आणि आता त्याला त्याच्या आईजवळ देवून निघणार तर हा गोडुला काही जायला तयार नाही…चक्क रडू लागला, पण काय इलाज असतो का…? जावंच लागलं पुढे.. अहो हे बाळ तरी न बोलू शकणारं होतं.. पुढे तर एकाने गोंधळ घातला होता…सांगेन पुढे.. पण हे ठिकाण काहीतरी वेगळं.. एका दिवसात एक नंदी, बकारीचं पिलू आणि आता हे बाळ, का असं वागत होते? काय संकेत होता यात? का फक्त योगायोग? असो बाबा काही… मैयांनी दिलं, आपण घेतलं…असो…
पिथोडा नंतर लागणार मोठं शहर म्हणजे होशंगाबाद फाटा. तिथे जाताना वाटेत पिली कराल पासून पुढे मुकला गाव लागतं. इथून मग बुधनी. खरं तर होशंगाबाद फाट्या च्या नंतर कुठे तरी एका चहाच्या दुकानात आम्हाला चहा ला बोलावलं तेव्हा तिथल्या माणसाने फिरून नं जाता आतून रस्ता आहे असं सांगितलं, त्या नुसार आम्ही बुधनी गावात जाऊ असं ही सांगितलं, मात्र कदाचित आम्ही वाट चुकलो असू, कारण आम्ही बुधनी गावाच्या आधीच तालपुरा रस्त्याला येऊन पोचलो. मध्ये बरीच झाडी होती, अर्थात जंगलच होतं पण खरी मजा आता झाली.
आम्ही आतल्या रस्त्याने बरच अंतर चाललो असू. मग आम्हाला भूक लागली आणि जवळूनच हायवे चा आवाज येत होता, म्हणजे हा रस्ता कदाचित तालपुरा रस्त्याला समांतर असावा कारण झाडी बरीच असूनही आम्हाला आम्ही जंगलात असल्या सारखं अजिबात वाटलं नव्हतं, पण गम्मत माहितीये का? आम्ही चक्क जंगलात होतो.. आणि साध्या सुध्या नाही, पट्टेरी वाघांच्या! समोर एक उंच डोंगर दिसत होता, त्याच्या पलीकडे पचमढी चं जंगल होतं, आणि इथलं बुधनी चं… तर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही हायवे वर यायचं ठरवलं आणि आवाजाच्या दिशेने चालू लागलो. थोड्याच वेळात आम्ही हाय वे वर आलो सुद्धा. मी मागे आणि बाबा पुढे होता, समोर एक मोठा फलक होता, त्यावरून आम्ही कुठे आहोत ते समजणार म्हणून बाबा पुढे गेला आणि बोर्ड वाचू लागला…. तो बोर्ड वाचताना त्यांनी आश्चर्याने आणि अवाक होऊन दोन्ही हात ओम्ठावर ठेवले, आणि चक्क आ वासून तो माझ्याकडे बघत राहिला.
“अरे बाबा, असा काय बघातोयेस,काय झालं? चुकलो की काय आपण रस्ता” मी लांबूनच विचारलं… तसा तो ओरडलाच.. “लवकर येऊन बघ जरा”.. मी पुढे गेले आणि जे बघितलं त्यावर माझा विश्वास बसेना… त्या फाकालावर वाघाचं चित्र असलेलं एक बँनर होतं आणि त्यावर “इस वन क्षेत्र मे वाघ एवं अन्य हिंसक प्राणीयो की वर्तमान मी उपस्थिती पायी गायी है, प्रतिबंधित वन क्षेत्र मे जाना सख्त मना है” अशी पाटी लागली होती, आणि त्या रस्त्यावरून आम्ही बाहेर आलो होतो. नाही बसत नं विश्वास? मी फोटो पण दिलाय बघा सोबत…आणि गम्मत म्हणजे आम्हाला काही झालं नाही, काही जाणवलं ही नाही.. कदाचित आम्ही हायवे च्या जवळ च्या मार्गाला असू आणि घनदाट जंगल दूर असेल असं वाटलं क्षणभर.. हायसं वाटायला एवढं पुरेसं असतं नं! चला, आता तर आपण बाहेर आहोत, हुश्श, असं म्हणून आम्ही आनंद मानायला हवा होता, कारण अज्ञानात सुख असतं… बघा नं हा फलक वाचला नसता तर काही वाटलं नसतं आम्हाला, पण आता फाकल वाचला होता…बरं इथवर ही एकवेळ ठीक, पण माणसाला नको त्या वेळी नको ते सुचतं, आणि नसतं संकट आपण ओढावून घेतो उग्गाच…
असच झालं, या फलकावर वन विभागाचा फोन नंबर दिला होता. आणि मी त्या नंबर वर फोन केला…काही गरज होती का? पण केला… “ हा बोर्ड जुना आहे, काळजी करू नका” असं उत्तर मिळेल अशीच आशा होती मला, पण झालं वेगळच… मी फोन केल्यावर त्या माणसाने माझ्या अपेक्षेच्या अगदी उलट उत्तर दिलं.. “चलो अच्छा हुआ आप सही सलामत बाहर आये, अभी ५ दिन पहले उसी जंगल मे एक ८ साल की बच्ची पार बाघ ने हमला कर दिया, मर गयी बेचारी, अरे अभी कूछ दिन पहले तो बुधनी घाट के पास से भरी दोपहर एक गाय का बच्चा उठाकर ले गया बाघ..कोशिश जारी है पकडने की, ५ बाघ है, शायद कोई सर्कस वालो ने छोडे है, शिकार करना आता नही होगा, और इंसानो की आदत होगी उन्हे… ठीक है, अब जंगल रास्ते नही जाना”
त्याचं बोलण ऐकून मला धस्सं झालं… कल्पना ही करवली नाही कशाची, आणि आतापर्यंत बिनधास्त असलेल्या मला अचानक भीती वाटू लागली. आजची रात्र आम्हाला बुधनी मध्ये च थांबायचं होतं. हा विषय मला अजिबात ऐकायचा नवहता मात्र भेटणारा प्रत्येक जण आम्हाला वारंवार सावधानीचे इशारे देत ह्याच विषयावर बोलत होता. कधी एकदा हा पट्टा पार करते मी असं झालं होतं मला. शंकासुरांनी माझा वध करून झाला होता…
बुधनी ला एका कपड्याच्या दुकानातून मी लुंगी घेतली, आणि त्याच दुकानात आमची राहण्याची व्यवस्था ही झाली. दुस-या दिवशी “हाय वे से ही जाना माताजी” असाच निरोप मिळाला आणि आम्ही हायवे नीच जाऊ लागलो. “बांदराभान पर्यंत जंगलाचा पट्टा आहे मग नाही काही” असं लोक सांगायचे आणि शेवटी बांदराभान ओलांडलं आम्ही आणि जरा हलंक वाटू लागलं…
आपल्या लहानपणी घडलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर किती खोल परिणाम होतो हे मला त्या दिवशी जाणवलं. मी लहान असताना मला अवांतर वाचनाची खूप आवड होती. खूप पुस्तकं वाचलीयेत मी. आणि त्यावेळी खूप गुंग होऊन जायचे मी वाचताना, डोळ्या समोर चित्र उभी राहाय्चीत माझ्या… मनावर कोरल्या जायचीत ही पुस्तकं, आणि याच पुस्तकांच्या यादीत काही अशी पुस्तकं होती जी नेमकी इथे आठवायला नको होती, त्याहून त्या कालाप्निक कथा नव्हत्या तर चक्क सत्य कथा होत्या, अगदी फोटो सुद्धा दिलीयेत त्या पुस्तकांमध्ये. जिम कोर्बेट च्या सगळ्या पुस्तकांचा या यादीत समावेश होता. Man eating leaopard of Rudraorayag, Temple tiger, Man eater of Kumao, Tiger stories अशी ही सगळी पुस्तकं आणि त्यातल्या सत्यकथा माझ्या डोळ्यापुढे येत राहिल्या. हे दोन दिवस खरच मी घाबरलेच होते पण जसं सरदार नगर ला आलो तसं वन विभागापासून दूर गेलो असं वाटलं आणि भीती कमी झाली, पण मैयाला मी घाबारायालाच हवी होती बहुधा
सरदार नगर ते जैत हा रस्ता किना-याने जातो. जैत लांब असलं तरी समोर दिसत होतं, त्यामुळे एक समाधान वाटत होतं. आणि जंगल असलं तरी वाघाचं जंगल नव्हतं म्हणून जरा हायसं वाटतं न वाटतं तोच तडस, इथे याला लकडबग्घे म्हणतात त्यांचा झुंड समोरून आमच्या दिशेने येताना दिसला. तेव्हा पहिल्यांदाच मी हा प्राणी प्रत्यक्षात बघत होते, आणि जवळ जवळ १२- १३ तरी लकडबग्घे होते, मात्र आमचं अस्तित्व जाणवून त्यांनी वाट बदलली… हे काही फार धोकादायक नाही हे पुढे समजलं पण त्या वेळी असत्या भीतीत भर घालण्याचं काम या प्राण्यांनी केलं हे नक्की…..फोटो दिलाय सोबत, ते प्राणी दूर जाताना पाहून, उसनी हिम्मत आणून काढला बाबा..
मात्र माझं काय चुकत होत ते मला नांदनेर ला समजलं. मैया कुणाकडून काय करवेल याचा भरोसा नाही. चूक समजली, माझी कान उघडणी ही केली तिनी, आणि लाड ही पुरवले… सांगते सगळं, पण ५८ व्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५८
नर्मदे हर
तर मागच्या भागात मी तुम्हाला त्या वाघाच्या फलका बद्दल सांगितलं होतं. नंतर तो तडसांचा झुंड पार करून गेला आणि आम्ही जैत ला येऊन पोचलो. आता जेमतेम ३.३० झाले असतील. इथे खरं राहता येणं शक्य होतं पण आम्ही पुढे जायचं ठरवलं.
नारायणपूर नंतर येतं नांदनेर.. आता आम्ही नांदनेर ला आलो. इथे येता येता मात्र संध्याकाळ चे सहा वाजले. आता आंघोळ पूजा आणि बाकी व्यवस्था बघायला गेलो तर एक छोटंसं मंदिर होतं, त्यात आधीच बरीच गर्दी होती, म्हणून आम्ही जागा शोधू लागलो. मैया किनारी एक आश्रम होता खरा, पण तिथेही भोजन प्रसादी ची व्यवस्था नव्हती. तिथे फक्त एक माताजी होत्या, त्या ब-याच म्हाता-या होत्या..”देख लो बेटा, कही और नही मिले तो आ जाना” असं त्या म्हणाल्या.. त्या म्हाता-या जीवाला त्रास देणं काही योग्य वाटलं नाही, म्हणून गावात कुठे सोय होतेय का ते बघायला गेलो असता एक तरुण मुलगा वाटेत भेटला… “एक पाठशाला है, चाहो तो खुलवा देता हू, भोजन के लिये हमारे घर आजाओ” आम्हालाही पटलं ते…. पाठशाळेत आसन लावलं.
ही पाठशाला जुनी. आता शाळा भरत नाही इथे पण क्लासेस चालतात. गावातलेच काही शिकलेले तरुण मुलं इतरांना शिकवतात. ह्या इमारतीचं छत मधून मधून आकाशाचे तुकडे दाखवतं, कधी पावसात पाणी बरसवत, आणि मला तर चांदण्या दाखवल्यात छताने… थोडक्यात सांगायचं तर मोडकळीस आलेली ही इमारत होती, पण प्रसन्न होती. शिवाय अंकित नी चटई आणि जास्तीची पांघरूण आणून दिली होती.
इथे समोर एक हापशी आहे, तिथेच आंघोळ उरकली… आणि रात्री च्या आणि सकाळच्या साठी इथून हंडे भरून भरून पाणी शाळेत मागच्या अंगणाला असलेल्या टाकीत जमा केलं. खरच या बायका पाणी भरताना किती थकत असतील ते पहिल्यांदा जाणवलं मला… असो
भोजन प्रसादी झाल्या नंतर बराच वेळ आम्ही दोघं आणि गावातली काही तरुण मुलं शेकोटी पेटवून शाळेच्या समोरच्या अंगणात बसलेलो. तिथे पुन्हा बुधनी मधल्या वाघाचा विषय निघाला. आणि एक विषय निघाला, सांगते पण त्या आधीची एक गम्मत सांगते. सरदार नगर ते जैत या रस्त्यात आम्हाला तडस दिसले होते, पण हे वाघा चं जंगल नाही हे सांगितल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. तेवढा तडसांचा झुंड सोडला तर आम्ही अगदी रमत गमत आणि आनंदाने हा रस्ता पार करून नांदनेर मध्ये आलो होतो. मात्र इथे आल्यावर या विषयाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. गावातल्या मुलांच्या गप्पांना उत आला होता अगदी. साधारण पंधरा दिवसापूर्वी इथेच, म्हणजे जिथे आम्ही बसलो आहोत तिथून साधारण २०० फुटावर वाघ पाहिल्याचं या तरुण मुलांनी सांगितलं. एकाने तर चक्क वाघाने कुणावर तरी हल्ला केल्याची घटना महिनाभर आधी इथेच, म्हणजे याच गावात घडल्याचं ही सांगितलं. एकानी बिबट्या झाडावरून उतरून एका घराच्या छतावर बसलेला पाहिल्याचं पण सांगितलं…अज्ञानात खरच सुख असतं हे आता जाणवू लागलं…
अश्या गोष्टी सुरु असताना बाबा अचानक उठला आणि आत जाऊन आला, आल्यावर म्हणाला “पाठशाला को सामने तो दरवाजा है, लेकीन पिछे तो सिर्फ उंची दिवार है, कोई दरवाजा नही है…सुरक्षित तो होगा न?” आम्ही जिथे आसन लावलं होतं तिथे मागे फक्त एक भिंत होती कम्पाउंड ची. दार नव्हतच, आणि नुकतीच छतावरच्या बिबट्याची गोष्ट कुणीतरी सांगितली होती… आता रात्र ही बरीच झाली होती आणि सगळे घरी जाण्याच्या तयारीत होते.. न राहवून मी बोलून गेले.. “बापरे, आज ये ऐसी ही कहानिया क्यू सुनने मिल रही है? पता नही अजीब सां लग रहा है…थोडा डर तो लग ही रहा है”
माझं हे वाक्य ऐकून अंकित नावाचा २२-२५ चा तरुण उठून भा राहिला. तो बेचैन आणि रागात दिसत होता… होताच तो रागात… तो दोन्ही हात कमरेवर ठेवून माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला बोलू लागला. “मैयाजी आप वापस घर चाले जाईये, आप को परिक्रमा करनी ही नही चाहिये….आपको नही लगता आप गलत हो?” मला कळेच ना की असं हा का बोलतोय? मी विचारलं क्या हुआ अंकित बाबाजी, आप इतना नाराज क्यू हुये?” तर म्हणाला, “अपने आप को समझाईये, क्या कर रहे हो आप? गलतिया करते जा रहे हो….कृपा करके अपने मन को साफ रखिये….” मला तरीही समजे ना.. शेवटी तो स्पष्ट बोलला.. “आप जिस दिन परिक्रमा उठाये है, उस दिन से आपकी जिम्मेदारी मैया ने ले लीयी है, आपको आपकी चिंता करने की जरुरत नही.. अरे जब आपको पता है की इतने घने जंगल से आप सुरक्षित बाहर निकली है, वो भी दो बार तो इसका मतलब क्या है मा? लोग तो कूछ भी बोलेंगे…क्योंकी उन्हे डर है.. आप क्यू डर रहे है, आपके साथ तो स्वयं माताजी है.. आईये आपको एक और कहानी सुनाता हू”.. तो सांगू लागला
कूछ दिन पहले की बात है, शायद ३ महिने हो गये. आप अब कल आगे जायेगी तो एक महुआ का पेड मिलेगा. वहा औरते महुआ के फुल जमा करने जाती है. वहा एक दिन गांव की एक माताराम गयी तो उसने एक परिक्रमा वासी को वहा विश्राम करते देखा.. दोनो में काफी बातचीत हुई, वह परिक्रमा वासी वहा २ घंटे से विश्राम कर रहा था. वो बिलकुल अकेला था. अपना विश्राम होने के बाद वह चला गया और उसके कुछही देर बाद इस माताराम पर वाघ ने हमला कर दिया.. वो तो उसके पास हथियार था तो वो बच गयी लेकीन एक बात समझो, परिक्रमावासी पर हमला नही किया उसने.. अरे परीक्रमावासी को कोई परेशान कर ही नही सकता… आप बस भरोसा रखो… मा आपके साथ है, जो करेगी आपका भला ही करेगी….बस बोल दिया मैने तो”
खरच मला माझी लाज वाटली… मी दोन दा रमत गमत जात असताना देखील मला भीतीचा स्पर्श ही झाला नाही आणि अचानक तो फलक पाहून मला भीती वाटली. मला माहित होतं ही माझ्या मनाची भीती आहे… जे काही वाचलं ऐकलं असेल त्यांनी असेल, पण आहे मात्र…पण आता यापुढे भीती वाटू द्यायची नाही… मी ठरवलं.. माझा भरवसा नाही मैयावर असं नव्हतं खरं, पण भीती होती हे ही तितकच खरं.. त्यानंतर मला अशी भीती वाटली नाही, पण हुरहूर किंवा सावधता कायम राहिली हे ही खरं.. मागे सांगितलं तसं मला मृत्युची भीती नाही, पण माझा जीव अजूनही माझ्या लेकरात अडकला आहे…अगदी कुणाचं कुणाशिवाय अडत नाही, आणि हे फेरे कसे असतात, आपण साक्षी राहायचं असतं, हे सगळं माहित असून सुद्धा “माझ्या पिलाची आई” काही सुटत नाहीये… हो, कमी झालय नक्की, पण सुटलं नाहीये अजून…. कदाचित जवाबदा-या संपल्या की सुटेल…आणि तोवर मी असावी असं त्या ही वेळेस वाटलं…. पण अंकित च्या कान उघडणीचां एक परिणाम झाला.. जरा हूर हूर वाटली की मी मैयाशी डायरेक्ट बोलू लागले, आणि हळू हळू ही भीती कमी झाली…माझी मैया माझं जे काही करेल ते योग्य च असेल हे पक्क होवू लागलं आणि मैयाशी संवाद वाढत गेला…मग मात्र मी मैयाच्या जास्त जवळ गेले. आधी नव्हते असं नाही, पण विश्वासाची काच खरच नाजूक असते…एखादा ओरखडा सुद्धा घातक ठरतो.
अंकित च्या रुपात तिनी माझी कान उघडणी केली, रागावली ती मला, पण नंतर तिनी भरपूर लाड केले. त्या रात्री त्या उघड्या खोलीत झोपताना हुरहूर वाटली नाही, आणि आता उद्या निघायचं म्हणून लवकर उठलो. हा दिवस होता ३० जानेवारी चा. अंकित कडे चहा ला बोलावलं होतं, आणि मला सारखे फोन येत होते. हा माझा वाढदिवस. मागे कुक्षीला कुक्षी मा नी माझा वाढदिवस गायत्री यज्ञ करून साजरा केला होता, आणि आज मैया अजून काहीतरी करून देणार होती.
आज मैयांनी माझ्यासाठी खूपच खास काहीतरी ठेवलं होतं. माझी खूप खूप प्रेमाची माणसं करतील तसं सगळं आज अंकित च्या घरी करण्यात आलं होतं, ते ही अगदी कमी वेळात…
अंकित चं घर छान मोठं आहे, घरी आई बहिण सगळे आहेत. माझा वाढदिवस आहे हे समजल्यावर अंकित च्या आईनी माझं औक्षवण केलं. माझ्या हातापायाला तेल लावलं, गरम पाणी आंघोळी साठी दिलं आणि एक पांढरी मउ शाल पण दिली… गम्मत म्हणजे माझ्यासाठी खास खीर पुरी चं जेवण तयार करण्यात आलं, ते ही अगदी अर्ध्या तासात केलं त्यांनी. माझी आंघोळ झाली, आणि आधी मंदिरात जायचं ठरलं. इथे पण मला काहीतरी स्पेशल मिळणार होतं..
ह्या मंदिराची एक गम्मत आहे. इथे एक नव्हे तर दोन पिंडी आहेत, त्या ही आमोरा समोर, आणि तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही एका वेगळ्याच अनुभवाचे धनी व्हाल, एक चमत्कार तुम्हाला नक्की बघायला मिळेल.. माझं भाग्य तर त्या मैयानी स्वत:च बसून लिहिलं होतं. कारण जन्मदिवसाच्या दिवशी अश्या अनुभवाची प्राप्ती होण हे भाग्य… पण या भागात सांगता यायचं नाही.. सांगते,पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५९
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला नांदनेर च्या दोन पिंडी बद्दल सांगत होते. तर इथे अंकित कडे माझा वाढदिवस साजरा होत होता आणि त्या आधी नमस्कार करून येऊ म्हणून मी मंदिरात गेले होते. अंकित म्हणाला ”आपको अगर जाने की जल्दी नही हो और आपके भाग्य मी लिखा हो तो आपको एक चमत्कार दिखाता हु” आम्हाला काही घाई नव्हती आणि असेच विलक्षण अनुभव मिळणं म्हणजे तर भाग्य च होतं…
आम्ही थांबलो…अंकित नी घरी फोन करून उशीर होईल असं सांगितलं आणि म्हणाला” अब ध्यान लगाकर बैठो.. जो भी होगा उसे सिर्फ महसूस करो.. और फिर बताना…. बहोत आनंद आयेगा… लेकीन ध्यान लगना जरुरी है, तभी चमत्कार मिलेगा…
मी, अंकित, बाबा आणि मंदिराचे पुजारी असे चौघही आम्ही तिथे बसलो. इथे खूप शांतता आहे… मी फक्त काय होणार आहे याच्या विचारात होते मात्र हळू हळू डोळ्यासमोर निळ्या लाल रंगाची ज्योत मंद मंद प्रकाश देत होती आणि नंतर ती प्रखर होऊ लागली. दरम्यान किती वेळ झाला असेल माहित नाही पण ह्या ज्योतीचा हळू हळू आकार बदलत गेला आणि ओंकार उमटत गेला. यात आत निळसर रंग आत आणि लाल रंग बाहेर असं रूप दिसू लागलं. हा आकार मोठा मोठा होत गेला आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर मोठ्या रुपात येऊन स्थिर झाला.. मला आता या ओंकारा शिवाय काहीच दिसत नव्हतं…. आणि हळू हळू अगदी क्षीण असा एक ध्वनी ऐकू येतोय असं मला वाटलं…
हा ध्वनी या आकाराच्या मागून कुठूनसा येत होता आणि मागे मात्र फक्त अंधार होता. आता माझं लक्ष पूर्ण आणि पूर्ण या ध्वनिकडे गेलं आणि डोळ्या समोरचा आकार जसा पुसट पुसट होत गेला तसा तसा त्या आकारा मागचा ध्वनी हळूहळू प्रखर होत गेला.
आता माझे कान फक्त आणि फक्त तो एकमेव आवाज ऐकू शकत होते मात्र तो आवाज बाहेरून आत येत नव्हता तर आतून बाहेर येत होता असा भास होऊ लागला. त्यानंतर फक्त त्या आवाजाचं अस्तित्व जाणवू लागलं, बाकी काहीही डोळ्यासमोर येईना. हा आवाज तार सप्तकातला ओंकार ध्वनी होता. कानांना सहन होईल इतकाच हा आवाज होता मात्र अतिशय तीव्र होता. हळु हळु तो आवाज माझ्या संपूर्ण देहभर किंवा मनभर किंवा माझ्या आजूबाजूच्या सृष्टीमध्ये भिनू लागला. फक्त तोच आवाज…. अगदी घनदाट होत गेला…. त्यानंतर तो आवाज आणि दुसरं काहीही नाही…
त्यानंतरचं मला फारसं आठवतच नाही… फारसं काय काहीच आठवत नाही….. तो आवाज खोल आत रुजे पर्यंत काय ते आठवतंय… त्यानंतर बाबाने मला हात लावून, हलवून जेव्हा उठवलं तोच क्षण आठवतो आहे. डोळे उघडता क्षणी तो आवाज बटन दाबल्या सारखा बंद झाला आणि क्षणभर सगळ्या जगाची विस्मृती झाल्यासारखं झालं. डोळे उघडले त्याक्षणी माझ्यासमोर त्या दोन शिवपिंडी होत्या आणि ह्या दोन पिंडी हा मधून ओंकार स्वर निघून एकमेकांवर आपटूनएक मोठा ध्वनी तयार झाला होता असं मला वाटून गेलं.
त्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट मी एकही शब्द बोलली नसेन. मी हातानेच थांबा अशी खूण केली, मला अजून काही वेळ तिथेच त्याच अवस्थेत बसावसं वाटत होतं किंबहुना काय करावं, उठावं, बसावं, बोलावं की अजून काही करावं…. हे ही सुचतच नव्हतं. तो आवाज बंद झाला असला तरी त्याचं असणं अजून मिटलं नव्हतं… माझ्या मेंदूचा काही भाग बधिर झाल्यासारखं वाटलं आणि थेंब-थेंब पाणी जसं हळूहळू एखाद्या भांड्यात साचत जातं तसं हळूहळू आजूबाजूच्या अस्तित्व त्या बधीर झालेल्या मेंदूच्या भागात पुन्हा थेंबा थेंबा सारखं गळू लागलं. जवळ-जवळ वीस-पंचवीस मिनिटांनंतर अंकितने माझ्याकडे फक्त पाहिलं आणि म्हणाला “लगता है तुम्ही ओंकार ध्वनी सुना है……. अब मुझे आपको किसी चमत्कार के बारे में बताने की जरूरत नही…” अंकित म्हणत होता तो चमत्कार कदाचित हाच असेल किंवा अजूनही काही असेल तर मला माहित नाही परंतु माझ्यासाठी ही अनुभूती मला कुठल्यातरी शून्यात नेऊन सोडणारी होती. या शुन्याबाहेर बाहेर काही काही नसावं, आणि असेल तर ते अशाश्वत आहे किंवा ते नाहीच किंवा तो भ्रम आहे आणि हे शून्य अतिशय विलक्षण असं काहीतरी आहे.. सांगण्याच्या पलीकडचं, शब्दातीत, फक्त असं आरपार छेदून जाणारं किंवा विरघळवून टाकणारं….वेगळच, जिथे काही उरतच नाही असं कदाचित…. इतकच समजत होतं… त्याचं नक्की विश्लेषण मला करता येणार नाही कारण कदाचित ते माझ्या आकलनाच्या पलीकडचं होतं. मात्र ती बधिरता जाणवावी, म्हणजे त्या अवस्थेतून डोळे उघडून मी जरी बाहेर आली होती तरी ती बधिरता मला जाणवत होती इतकी बधीर मी झाले होते… अर्थात ज्या वेळी ती बधिरता कमी होऊ लागली त्यावेळी ती बधिरता आली आहे हे जाणवलं… तोवर मी कुठे होते..काय होत होतं …ते ही मला माहित नाही…
ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसलो होतो तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ दोन तास उलटून गेले होते. अंकित ची आई आमच्या जेवणाची वाट पाहात बसली असणार होती आणि म्हणून तिथून निघुन आम्ही अंकित कडे येऊन पोहोचलो. आमच्या मागोमाग ह्याच मंदिरातले पुजारी मसाले भाताचा डब्बा घेऊन आले, म्हणाले “ध्यान मे बैठने से पहले बना लिया था आपको देना भूल गया अब आपके लिए लेकर आया हु……” ते बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक जाणवली.. ते फक्त हसत होते, माझं गुपित समजल्यासारखे…..
हे असे अनुभव कदाचित त्या त्या जागेवरील वेगवेगळ्या शक्तींच्या प्रभावामुळे येत असतील. हा अनुभव वेगळा होता मात्र याला मिळतेजुळते असे अजून अनुभव मला येऊन गेले होते. तुम्हाला आठवत असेल तर दत्त वाड्याच्या आश्रमातून मैया किनारी मी आरतीच्या आवाजाच्या मागेमागे गेले होते होती आणि एका दगडावर बसले होते. ध्यान लागलं की माझा जप सुरु ते काही समजलं नाही पण कुठेतरी मी हरवून गेली होती हे नक्की. त्यानंतर मला सुरेखाताई शोधत-शोधत आली होती… कुठल्यातरी वरच्या भागात लिहिलय बघा मी.. पण आजचा अनुभव वेगळा होता. साम्य होतं ते माझ्या हरवण्यात. दुसऱ्या परिक्रमेत सुद्धा गोमती संगम म्हणजे येथे गोमती आणि नर्मदा माईचा संगम होतो त्या ठिकाणी किनाऱ्यावर एक आश्रम त्या आश्रमातही मला अशापैकीच एक अनुभव आला, पण तो दुसऱ्या परिक्रमेचे अनुभव लिहिल त्यावेळी लिहिल त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की या अनुभवा मागे काहीतरी प्रचंड शक्ती असते ज्याचा प्रभाव आपल्यावर पडून आपल्याला हरवायला होतं विसरायला होतं. असं काहीतरी असावं… तेव्हा त्यावेळची मनाची अवस्था असावी किंवा एकाग्रता असावी, काय ते सांगता येत नाही मात्र विलक्षण असतं…. विलक्षण असतं अगदी… इतकंच सांगू शकेन.
आमचं जेवण झालं. नर्मदामैय्या ने माझा वाढदिवस अगदी आनंदात आणि एक वेगळा अनुभव देऊन साजरा केला आणि साधारण बारा च्या सुमाराला आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
पुढे कुसुमखेडा, भारकच्छ, सनखेडा, सतरावन, करत करत आम्ही कीवली ला येऊन पोहोचलो… आणि त्या पुढचा मुक्काम अलीगंज ला केला. या मुक्कामात अनुभव म्हणून फारसा आला नाही पण आनंद मात्र खूप मिळाला. अलिगंजला मात्र गंमत झाली…सांगते पुढच्या भागात…
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती – भाग ६०
नर्मदे हर
नांदनेर होऊन पुढे निघालो आणि वाटेत अंकित ने सांगितलेलं ते मोहाच्या फुलांचं झाड लागलं. आता मात्र भीती वाटत नव्हती. त्याच झाडाखालच्या सिमेंटच्या गोल पारावर बसून दहा-पंधरा मिनिटं आराम देखील केला. पुढे निघालो तो दूर कुठून तरी नर्मदे हर हर, नर्मदे हर चा आवाज आला. आम्ही आवाजाच्या दिशेने चालू लागलो आणि नर्मदे हर असं प्रत्युत्तर देखील दिलं. हा आवाज एका झाडी मागून येत होता…आम्ही त्या झाडीच्या मागच्या बाजूला वळलो तर तिथे सुंदरशी, छोटीशी फुलबाग केलेली होती. एक पायवाट होती आणि त्या पायवाटेच्या आजूबाजूला दोन्हीकडे फुलांची झाडं लावलेली होती. एक मोठं लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबं लागली होती. त्या लिंबाच्या झाडाखाली एक खाट घातली होती. त्या खाटेवर साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा आराम करत पहुडले होते.
थोडे पुढे नजर गेली तर काटक्यांनी बनवलेली एक झोपडी होती. त्या झोपडीचं दार उघड दिसत होतं. झोपडीच्या समोर दोन तीन बकऱ्या बांधलेल्या दिसत होत्या. आतून पुन्हा नर्मदे हर असा आवाज आला. “मैया जी आओ, हम तो बैठे बैठे आपका इंतजार कर रहे थे…” एक साधारण साठीची मैया आवाज देत देतच बाहेर आली. “आज यही रुक जाना… कहा आगे जाते हो?” आम्ही जेमतेम तीन चार किलोमीटर अंतर चालून आलो असू. जेवणही नुकतच आटोपलं होतं त्यामुळे भूकही नव्हती. इतक्या लवकर थांबावं असं वाटतं ही नव्हतं. पण का कोण जाणे त्या मैयाचा आग्रह मोडवता आला नाही. मग काय आज इथेच मुक्काम केला. आम्हाला आजींनी छान ताज्या लिंबाचं सरबत करून दिलं आणि मग गप्पाटप्पा करत बसलो तिथे.
ही दोघं मैया बाबा इथे कधी असतात तर कधी नसतात. मात्र ही काट्याकुट्याची झोपडी आणि वेगवेगळ्या फळा फुलांच्या झाडांनी या आवाराला केलेलं कंपाऊंड हे इतकं छान ठेवलं आहे इथे कोणी नसेल असं वाटतच नाही. खरंतर दुरून पाहता इथे कोणी राहत असेल अशी शंकासुद्धा येत नाही. ही दोघं गावात राहायला तयार नव्हतीत. मी विचारल्यावर म्हणालेत आम्हाला जंगलातच बरं वाटतं, शांत वाटतं. इथे कसलाही ताप नाही डोक्याला. सगळं कसं व्यवस्थित निसर्गा प्रमाणे सुरू असतं. आता मात्र मला खरोखर माझी लाज वाटू लागली होती. ही दोघं म्हातारी इथे जंगलात काट्याकुट्याचा झोपडीत निर्धास्तपणे राहत होती आणि मी मात्र त्या विटा सिमेंटच्या भिंती मध्ये असून देखील घाबरत होते. अंकित चं रागावण कसं बरोबर होतं नाही? जो खरोखर श्रद्धा ठेवून असतो त्याला काहीच कसं होत नाही हे पुन्हा एकदा मला जाणवलं आणि त्या रात्री तिथे थांबून त्या बिनधास्त पणाचा, त्या निर्धास्त पणाचा मनसोक्त अनुभव मला घेता आला. इथून पुढे मात्र भीती म्हणून वाटली नाही आणि कदाचित वाटणारही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून लवकर निघालो. तिथल्या मैया जींनी छान पैकी खिचडीचा बाल भोग करून दिला.
येथून पुढे भारकच्छ, सनखेडा, मोतलसर, बागलवाडा, सतरावन अशी गाव लागलीत आणि त्यानंतरचा मुक्काम आम्ही किवली नावाच्या गावाला केला. हा प्रवास खूपच सुंदर झाला, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात . दोन्ही बाजूला शेतामधून डांबरी पण छोटासा रस्ता, अगदी घाटा सारखी नाही, पण बरीच नागमोडी वळणं घेणारा असा हा रस्ता होता. या क्षेत्रातल्या गावांमध्ये मी एक विशेष असं पाहिलं की अंगणाच्या आत मध्ये बसण्यासाठी म्हणून त्यांनी मातीचे छोटे-छोटे म्हणजे पायरी एवढे म्हणू किंवा त्यापेक्षा उंची थोडी जास्त असलेले कट्टे बांधून ठेवले होते. हे प्रत्येक घरात दिसत होते. या ठिकाणी अजून एक गोष्ट पाहिली ती अशी की आपल्याकडे कोकणा परसबाग असते तशी परसबाग ही इथल्या बहुतांश घरांना होती.
असंच एका ठिकाणी चालता-चालता एक मैया जी आणि तिची मुलगी आम्हाला रस्त्यात दिसले आणि त्यांनी आम्हाला थांबवून घेतलं. “हमारे घर भोजन कीजिए, असा आग्रह धरला, पण नुकतच आधीच्या गावांमध्ये भरपूर ताक प्यायलो होतो, त्यामुळे फारशी भूक नव्हती. तेव्हा ती मैया म्हणाली “हमारे बगीचे का फल आपको देती हू बहुत बहुत मीठा है”. त्या फळाला ती “बिही” असं म्हणत होती. हे बिहि नेमकं काय असतं हे काय मला माहिती नव्हतं. ती म्हणाली व “बाहर से हरा होता है और अंदर से लाल होता है, बहुत मीठा होता है आपने कभी खाया नही?” माझ्या डोळ्यासमोर पपई शिवाय काही येईना. शेवटी तिने आणलेले फळ चिरून आमच्यापुढे ठेवलं तेव्हा कळलं की पेरूला या भागात बिही म्हणतात त्यातही लाल पेरू म्हणजे बिही आणि पांढरा पेरूला काहीतरी वेगळंच नाव आहे….असो तिच्याकडे गप्पा करत करत भरपूर बिही खाल्ले आणि मग तिथून पुढे निघालो. ही भारकच्छ गोष्ट आहे.
पुढे रस्त्यातून जाताना एका माणसाने आम्हाला खुणावलं आणि शेतातून जायला सांगितलं, म्हणाला “रास्ता थोडा कच्चा है लेकिन छोटा है आप जल्दी पोहोच जाओगे”. आता नेमकं कुठे जायचं हेच आम्हाला माहिती नव्हतं मात्र परिक्रमा मार्गावर लोक असे रस्ते स्वतःहून सांगत असतात. इथ एक छान अनुभव आला बरका….आम्ही शेतातून जात असताना एक दहा बारा वर्षाची मुलगी सायकल वर आमच्या मागे आली. शेतातली पायवाट होती त्याच्यावरून सायकल जाऊ शकत होती. आणि ती मला म्हणते कशी “मैयाजी गाव मे मत जाना, बाजुमे आश्रम है वहा जाना. चलो मै तुमको लेकर के चलती हू, आज तुमको वही पे रुकना है” तिनी जणू आज्ञा द्यावी किंवा हुकुम सोडावा असं बोलली ती. तिच्या त्या भारदस्त हुकुमाची क्षणभर भीती वाटली आणि आश्चर्य ही झालं. राहण्याचं ठरवू मग, आधी जाऊन तर येऊ… म्हणून गेलो त्या आश्रमात.
खरं तर आताच थांबावं अशी काही वेळ झाली नव्हती म्हणजे दुपारचे दोन वाजले असतील जास्तीत जास्त. पण ही लहानगी मैया काही ऐकायला तयारच नाही, हट्टच करू लागली… तिचा हट्ट मान्य करण्यामागे एक अजून कारण होतं. मी तिला तिच्या बद्दल माहिती विचारली. तिथल्या सरपंचाची नात. “मला म्हणाली आप तो बहुत अच्छी हो, हिम्मतवाली भी हो, मेरी सायकल चला कर देखो… गिरना नही…. अभी सायकल चलाओ फिर आगे सायकल से आना परीकम्मा मे” मलाही जरा मजाच वाटली खूप वर्षांनी सायकल चालवायला! मी अगदी छान सायकल चालवली, नंतर ती मला म्हणते, अरे वा आपको तो डर भी नही लगता… आप तो आज इस आश्रम मे ही रहना… तिच्या बोलण्यावरून ती काहीतरी सुचवते असं वाटू लागलं होतं मला…, ती प्रत्येक वाक्य काहीतरी उद्देशांनी बोलतेय असं वाटत होतं. पुढे सहज गप्पा करता करता तिचं नाव विचारलं तर म्हणाली मेरा नाम “अंकिता”…. लडकी हू इसलिये अंकिता लडका होती तो मेरा नाम होता अंकित….”
मागच्याच मुक्कामाला अंकित शी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला न घाबरण्याचा मंत्र दिला होता… आता ही अंकिता मला धीर देत होती, आणि अंकित नी दिलेल्या शिकवणीची आठवण ही करून देत होती. तो अंकित आणि ही अंकिता, हा योगायोगच असेल निव्वळ?
पुढे ह्या किवली च्या आश्रमात गेलो. हा आश्रम थोडा गावा बाहेर आहे. आश्रम म्हणजे एक कटीशी खोली, आणि त्याला बाहेर एक पडवी, त्या पडवी ला एक ताडपत्री चं दार. बाहेर बरच मोठं अंगण. इथे बोराची खूप झाड आहेत. एकंदरीत छान मोकळा चाकळा आश्रम.आश्रमात गेलो तर इथेले महाराज जी मस्त पैकी चुलीवर भाकरी शेकत होते. अगदी छांन ज्वारी च्या भाकरी.. “मराठी आहात नं तुम्ही, या मग भाकरी भाजी जेवायला” त्यांनी छान मराठीतून हाक घातली आणि खरपूस अन टम्म फुगलेल्या भाकरी आणि तर्रीदार वांग्याची भाजी पाहून “यापेक्षा सुख ते काय” असं ठरवलं आणि जेवून घेतलं…. “तुम्हाला कसं माहित आम्ही मराठी आहोत ते” मी त्या महाराजांना विचारलं … “ सांगितलं होतं मैयांनी मला, मराठी पाहुणे येणार म्हणून…म्हणून तर पीठ घेतलं भिजवायला”….मला खरच आश्चर्य वाटलं ..मी पुन्हा विचारलं…”असं कसं सांगितलं तुम्हाला, सांगा न बाबाजी” तर बाबाजी म्हणाले, अंकिता नी तुम्हाला मागच्या गावातच पाहिलं होतं, आल्यावर मला सांगितलं की “परिक्रमावासी तुम्हारी भाषा बोलते है”…परवाच अमरावती चे एक गृहस्थ येऊन गेले, मला आवडतात वांगे आणि ज्वारी, म्हणून घेऊन आले होते माझ्यासाठी… म्हटलं चला, इथे तुम्हाला घरच्या सारखं वाटेल…खरच घरच्या सारखं वाटलं इथे, आणि हो, या अंकिता ची कमाल वाटली बाबा….
या आश्रमात गेल्यावर रात्री मी जे पाहिलं त्यानंतर मला मी खरोखर निडर झाल्याचा पुरावा मिळाला. अंकिता आम्हाला सोडून स्वतःच्या घरी गेली. संध्याकाळची पूजा-अर्चा आटोपल्यानंतर आम्ही बाहेरच्या अंगणात आसन लावलं, तसं तिथले महंत आम्हाला म्हणाले, “माताजी आतमध्ये आसन लावा… यह जगा हमारी नही है, यहा तो रात को लडय्ये आकर बैठते है”… त्या रात्री आम्ही आणि हे लडय्ये अगदी जवळजवळ होतो. आमच्यात सहा फूट पेक्षाही कमी अंतर होतं. खोलीचे दार हे अगदी साधी ताडपत्री होती, आणि बाहेर साधारण सहा बाय आठ च्या ओट्यावर जवळजवळ दहा-बारा लडय्ये रात्रभर बसून होते, आणि रात्रीला येऊन बोर खात होते…. त्याहुनही गंमत म्हणजे रात्री बाथरूम ला जायला उठावं लागलं त्यावेळेला दंड घेऊन या लकडबघ्यांना तेवढ्यापुरतं बाजूला करून बाथरूम ला जाऊन मी पण आले होते मी….. मला वेळेवर भीती वाटू नये म्हणून मैयाने आधी जंगलांमधून मला बाहेर काढल, त्यानंतर भीती कशी असते ते दाखवलं, तिच्यावर मात करून कसं राहता येतं याची शिकवण अंकित कडून मला दिली, त्यानंतर भीतीवर मात करून जंगलात सुद्धा ती दोन म्हातारी माणसं कशी राहतात म्हणजे ते कसं शक्य आहे ते पटवून दिलं, अंकिता म्हणून येऊन खरोखर मला ते पटलय की नाही, समजलंय की नाही याची खात्री करून घेतली, आणि मग माझ्यासमोर या लडय्याना यांना येऊ दिलं… त्यामुळे असेल पण मला अजिबात भीती वाटली नाही…..
पुढचा मुक्काम अलीगंज ला केला… ती एक मजाच आहे. आम्ही रात्रभर जागेच होतो तिथे…जागे नाही तर भर उत्साहात नाचत होतो अगदी… आणि खरं तर खूप थकलो असतानाही, मनात नसतानाही असं झालं होतं.. जीव वैतागला होता आधी, पण इलाज नव्हता काही, अगदी उत्साहा आनंदाने नाचण्या शिवाय….पण कसं? असं काय झालं होतं? सांगणारे पण ६१ व्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६१
नर्मदे हर
किवली हून साकाळी लवकर निघालो. वाटेत खाण्यासाठी किवली च्या शंकर महाराजांनी लोणच आणि भाकरी बांधून दिल्या होत्या. इथून पुढे बराच मार्ग किनारा मार्ग होता. या टप्प्यात वाटेत फारशी गावं अशी नव्हती. कीवलीच्या शंकर महाराजांनी बांधून दिलेलं लोणचं भाकरी बाल भोगामध्येच संपलं. आता भूक लागली की मगच गावाकडे वळायचं, तोवर आपण आणि मैया. मैय्याच्या काठी छानच वाटतं कायम. खरं तर नदी किनार सोडून जायची इच्छा होत नाही. तेव्हाही किनार्यावरून आत मध्ये गावात जायची इच्छा होईना. वाळूमधून चालायला तसं कठीण होऊ लागलं होतं. पण तरीही याच रस्त्याने पुढे जायची इच्छा थांबवता येत नव्हती. बराच काळ गेला होता मात्र फार अंतर कापून झालं नसावं. तरी या पट्ट्यातून दिवसभरातून आमचं फक्त पंधरा-सोळा किलोमीटर चालणं होत असे. या पट्ट्या वरचा एक अनुभव सांगते.
लोणचे भाकरी आम्ही सकाळी म्हणजे साधारण नऊ-साडेनऊला खाल्लं. त्यानंतर दीड दोन वाजता कुठल्यातरी गावात, कुठल्यातरी आश्रमात विश्रांती घेऊ असं ठरवलं होतं. तिथेच भोजन प्रसाद घेऊन मग पुन्हा किनाऱ्याला यायचं आणि पुढे जायचं असा बेत होता .पण गंमत अशी की या गावांमध्ये जायला किनारा सोडून दोन-तीन किलोमीटर आत मध्ये जावं लागायचं. म्हणजे जायचे दोन-तीन किलोमीटर, यायचे दोन-तीन, इतकं चालावं लागणार. शिवाय किनारा सोडून जायची इच्छा होईना. त्यामुळे किनार्यावरच एखादा पुढचा आश्रम बघू असं ठरवून दीड वाजता पासून तर साडेतीन वाजेपर्यंत किनार्यावर एखादा छान आश्रम येईल याची वाट बघत आम्ही पुढे पुढे चालत राहिलो….
आता मात्र खूप भूक लागली होती. अगदी पोटात खोल खोल खड्डे पडत होते, इथून गावही दूर आणि किनाऱ्यावर ही काही नाही अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यात गंमत म्हणजे कदाचित दुपारची वेळ असेल म्हणून की काय किनाऱ्यावर चिटपाखरूही दिसेना. म्हणजे कुणाला भोजन प्रसादि बद्दल विचारावं तर तेही शक्य नव्हतं. मग मात्र माझा जीव कळवळू लागला. “दुर तर दुर, जाऊया रे बाबा आपण आश्रमामध्ये गावाच्या आत” मी बाबाला विनवलं आणि त्यांनीही ते ऐकलं, पुढचं गाव लागलं की सरळ गावात जाऊ अस आमचं ठरलं… पण हे पुढचं गाव येईच ना लवकर…
शेवटी त्या मैयाला म्हटलंच मी…”किती ग परीक्षा घेशील? आता माझ्याच्याने चालवत नाहीये. डोकं दुखू लागलेलं आहे… पोटात मोठाले खड्डे पडतायत…. एकतर गाव लवकर येऊ दे नाहीतर आमच्या जेवणाची सोय कर काहीतरी”….. अर्धा तास चालत राहिलो तरीही गाव येईना… मग मी रागवले मैया वर “आज तुला जेवायला घालायचं नाहीये का? ते काही नाही पुढच्या दहा-पंधरा मिनिटात जर मला भोजन प्रसादी मिळाली नाही तर आज जेवणारच नाही मी….” खरंतर मला असं बोलायचं नव्हतं. म्हणजे मी असं बोलेल असंही मला वाटलं नव्हतं. असं आपसूक बोलल्या जात होतं बहुधा. भुकेने जीव कळवळत होता. खालची रेती तापली होती. जोडे घालून किंवा जोडे काढूनही तिथून चालणं कठीणच जात होतं. गंमत म्हणजे मोठं असं एखादं झाड देखील नव्हतं विश्रांती घ्यायला.. उन्हातच बसून विश्रांती घेउन ती घेतल्यासारखी ही वाटत नव्हती.. या सगळ्या परिस्थितीत निघालं हो तोंडून असं…. मुद्दाम म्हणून नाही बोलले मी…
खरं तर काय होतं माहिती आहे का, कालांतराने ती आपल्या इतकी जवळची होऊन जाते की आपण तिच्याशी बोलू लागतो. तुम्ही आम्ही जसं बोलतो ना शब्दात, एकमेकांशी, तसं तिच्याशी बोलल्या जातं. मग ती नदी, मैया, देवी अशी उरत नाही…आईच असते फक्त आणि मग रुसवे-फुगवे, लाडावून हट्ट करणं हे सगळे आपण करू लागतो. तसंच झालं हो माझं पण…. बोलूनच गेले मी…. पण गंमत माहिती का काय झालं ते.. मी रुसले आणि दहा मिनिटात जेवायला मिळालं नाही तर मी आज जेवणारच नाही” असं म्हणाले खरे आणि तिनेही पुरवले की माझे लाड…. नाही नाही मी कुठल्याही गावात गेले नाही. मात्र मी तसं बोलण्याच्या अवघ्या दहा-बारा मिनिटात मला एक बोराचे झाड लागलं, त्या मोठ्या बोराच्या झाडाखाली बोरांचा इतका सडा होता, की पाय ठेवायचा तरी बोरं बाजूला करून पाया ठेवावे लागणार होते. मी अगदी मांडी घालून खाली बसले आणि चांगली लाल चुटूक, टपोरी बोरं माझ्या ओढणी वर जमा केली. कमीत कमी तीनशे तरी बोरं मी खाल्ली असावी तेव्हा… इतकी मधुर बरं होतीत म्हणून सांगू!आजचं सकाळचं जेवण असं गोड गोड बोरांनी झालं. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी बोरं मी एकत्र बघितली असतील, आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतकी बोर मी एका वेळी खाल्ली देखील असतील….खातांना तर बोर खाऊन घेतली, पण सर्दी-खोकला व्हायला नको अशी प्रार्थना मैयाला केली आणि ती ही तिने ऐकली…
करत करत आम्ही अलीगंज नावाच्या गावाला येऊन पोहोचलो. इथला किनारा फार फार सुंदर आहे. मैया चं भरपूर मोठं पात्र सुकलेलं असल्यामुळे वाळवंट असल्यासारखं दिसत होतं…. असं असलं तरी बरंच मोठं पात्र पाण्याने भरलेलं सुद्धा होतं. एखादा टेबल टॉप बीच असावा असं वाटत होतं. इथे वाळूत बसून राहून मैयाच्या पाण्यात पडणारे संध्याकाळच्या आभाळाचे रंग बघत बसावसं वाटलं नाही तर नवल. निळा, जांभळा, नारिंगी, त्यांचे प्रतिबिंब मैया च्या पाण्यात पडत होतं. मी आणि बाबा बराच वेळ तिथे फक्त बसून राहिलो. पाठीमागेच आश्रम दिसत असल्यामुळे आश्रमात जाण्याची घाई आम्ही केलीच नाही. ज्यावेळी अगदी अंधार पडायला लागला त्यावेळी स्नान, आरती आणि पूजा तिथेच करून मगच आम्ही आश्रमात गेलो.
मागच्या भागात तुम्हाला जे उत्साहाने आणि आनंदाने नाचण याबद्दल सांगत होते ना, ते इथलच बरंका, अलीगंज चं. इथे आल्यानंतर खूप छान भोजन प्रसादी झाली. इथले महंत स्वतः स्वयंपाक करुन सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवायला वाढतात. एकंदर आश्रम मोठा आणि मोकळा चाकळा आहे. इथे अखंड रामायण सुरू असतं. आम्ही गेलो तेव्हाही सुरू होतं. “आसन कहा लगा सकते है” विचारल्यानंतर मात्र खऱ्या गमतीला सुरुवात झाली.
जिथे अखंड रामायण सुरू होतं त्याच हॉलमध्ये, मंदिराच्या समोर आसन लावा असं आम्हाला सांगितलं. आता जेमतेम आठ साडेआठ झाले होते. या हॉलमध्ये एकही लाईट नव्हता. जनरेटर वर फक्त देवापुढचे दिवे, माईक आणि स्पीकर्स चालू होते आणि हे स्पीकर आम्ही जिथे आसन लावलं आहे तिथेच आमच्या डोक्यावर बसवलेलं होतं. काही वेळानंतर रामायण कितीही गोड असलं तरी आम्हाला झोप लागणं अशक्य व्हायला लागलं. थोड्यावेळाने आपोआप झोप लागेल असं वाटलं परंतु तसं होईना कारण रामायण वाचणा-याची ड्युटी बदली रामायण वाचायची की त्या वाचणा-याचं वाद्य देखील बदलायचं. रात्री दहा साडेदहाला रामायण वाचायला येणाऱ्या माणसाजवळ एक मोठा ढोलक होता. हा ढोलक हा माणूस इतक्या जोरात वाजवत होता, की तिथे आलेले परिक्रमावासी सोडाच पण स्वतःची स्तुती आणि चरित्र ऐकता ऐकता जर एखादी लहानशी डुलकी जरी प्रभू रामचंद्रांना आली असेल तर ते देखील घाबरून, दचकून, खडबडून जागे व्हावे कदाचित हाच त्या माणसाचा हेतू असावा.
थोडावेळ ते देखील सहन केलं मात्र मग खरोखर डोकं दुखू लागलं. दिवसभराचं साधारण तीस बत्तीस किलोमीटर चालून झालं असेल. सकाळी बोरांच जेवण झालं आणि रात्री भरपूर छानशी जेवण प्रसादी झाली, त्यानंतर आराम मिळणं आणि झोप येण स्वाभाविक नाहीये का? बाबा ला आता वैताग येऊ लागला. त्याने जाऊन “आपण फक्त स्पीकर बंद करावा” अशी विनंती केली. पण तिथला वाचणारा काही स्पीकर बंद करायला तयार होईना. मठाचे महंत आपल्या खोलीत गाढ झोपले असावेत कारण बाबाने दोन-तीनदा दार वाजवूनही ते उठले नाहीत. झोप तर पार उडून गेली होती मात्र निदान माईक थांबला तर डोकं दुखायचं थांबेल असं वाटू लागलं. पण ते काही शक्य होईना.तास-दोन तास तेही सहन केल्यानंतर, मी आणि बाबा त्या हॉल पासून बरंच दूर पर्यंत असलेल्या एका शेड खाली येऊन बसलो. मात्र या आश्रमातलाच काय तर या गावातला सुद्धा एकही माणूस रात्रभर, एकही मिनिट झोपता कामा नये अशा पद्धतीने बारा ते चौदा स्पीकर्स या आश्रमात लावलेले होते. त्यामुळे आता आम्हाला डोकं दुखवून घेण्यापलीकडे काहीही मार्ग उरला नव्हता.
बाबा पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून घेतो म्हणून गेला, आणि आमच्या डोक्यावरचा स्पीकर वाजयचा थांबला. वाटलं चला निदान येथे थोडा वेळ तरी डोळा लागू शकेल. पण बाबा आल्या आल्या लगेच स्पिकर पुन्हा सुरू झाला. मी बाबाला विचारलं काय म्हणाले ते, “बाबा म्हणाला ते ऐकतच नव्हते मग मी स्पीकर्सच्या बटनांच्या बोर्ड पाशी जाऊन स्पीकर्स बंद करून पाहिले, आणि स्पीकर बंद करून मी परत आलो” त्या बाबांच्या ते लक्षात आलं असावं म्हणुन बाबा इथे पोहोचायच्या आतच त्यांनी पुन्हा स्पीकर चालू केले आणि आता मात्र काहीही इलाज नाही हे आम्ही समजून चुकलो.
आता साधारण तीन झाले असतील रात्रीचे, म्हणजे दोन अडीच तासात उठून तयारीला लागायचं होतं. आता झोप लागणार नव्हती आणि कदाचित येणारही नव्हती वेळ टळून गेली होती. तेवढ्यात गावातल्या काही बायका आश्रमात आल्या. त्यांनी हॉल बाहेर शेकोटी पेटवली. आता रामनाम सुरू झालं. त्या रामनामाच्या तालावर ह्या माताजींचे पाय देखील थिरकू लागले. या पंधरा वीस बायका मोठ्या उत्साहाने रामनाम च्या तालावर नाचू लागल्या. त्यावेळी मात्र त्यांचा तो भाव पाहून आपल्याला मुद्दामच जागं ठेवण्यात आलं असावं असं वाटलं. आम्ही तिथून उठून ह्या फेर धरून नाचणार्या बायकांच्या घोळक्या पुढे जाऊन त्यांचा नाच बघत बसलो, आणि कधी उठून त्यांच्यात सामील झालो ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. सीताराम सीताराम सीताराम सीताराम, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, च्या तालावर नाचता नाचता अंगातला थकवा, डोकेदुखी, मरगळ कधी निघून गेली कळलच नाही.
सकाळी सहा वाजेपर्यंत हे राम नाम आणि त्याच्या तालावर आमचं सगळ्यांचं फेर धरून नाचणं, टाळ मृदुंग वाजवणे हे सुरू होतं. सकाळी सहा वाजता आरती झाली त्याच्यानंतर काळा चहा झाला. आम्ही सामान आवरलं आणि पुन्हा पुढचे तीस किलोमीट म्हणजे चौरस पर्यंत पायी गेलो. अगदी एकही मिनिट डोळा न लागता देखील दुसऱ्या दिवशीचा पूर्ण प्रवास जराही न थकता, कंटाळता पूर्ण झाला. आमची आदल्या रात्री एक मिनिटही झोप झाली नसेल असं जाणवलं सुद्धा नाही. आपण फक्त आदली रात्र म्हणतो आहे मात्र नीट विचार केला तर कालचा पूर्ण दिवस, कालची पूर्ण रात्र आणि आजचा पूर्ण दिवस असे जवळजवळ तीस तास आम्ही झोपलेलो नव्हतो.
या तीस तासात आमच्याकडून तीन तासाचं आनंदाने आणि उत्साहाने नाचण, आणि 60 किलोमीटरचा पायी प्रवास करून झाला होता. कुठून येते ही शक्ती? असं तीस तास न झोपता इतकी शारीरिक अंगमेहनत करण्याची क्षमता खरंच माझ्यात आहे का? नक्कीच नाही…. ते अखंड रामायण माईकवर इतक्या जोरात चालू असण्याचं कारणच मुळी त्या रामनामाच्या तालाच्या गोडव्याची ताकत आम्हाला जाणवून देणं हे असावं नाही का?
पुढे बोरास, चौरास, आणि अनघोरा ला जे प्रेम मिळालं ते शब्दातीत आहे. हे प्रेम काही उगाच मिळत नाही. मैयाच कुणाच्या तरी रुपात येते आणि आनंदाची ओटी भरून जाते. जयहिंद भाई आणि उन्मेशानंद महाराज यांच्या रुपात मला मैयांनी जे दिलय ते मिळण्यासाठी भाग्य लागत’ हेच खरं. आणि हो, उन्मेशांन्दाकडे आम्ही आसन लावलं ती जागा कशी होती माहितीय? तिथेच मैया नी माझ्याकडून तिची सेवा पण करवून घेतली…हक्कानी करवून घ्यावी तशी..आणि हो… मस्त भरपूर आराम आणि अतिशय मधुर असा खाऊ पण मिळाला… कुणीही परिक्रमेत हा खाऊ खाल्लाच नाहीये..कधीच…. असा खाऊ खाल्ला आम्ही…..सांगणारे, पण पुढच्या म्हणजे ६२ व्या भागात...
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला अखंड रामायणाचा किस्सा सांगितला होता. अलीगंज ऊन सकाळी काळा चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. मागचे 30 तास झोप झाली नव्हती तरीही आम्ही उत्साहात होतो. पहिले काही तास आम्हाला थकवा जाणवला नाही. मात्र हाही रस्ता नदीकिनारी असल्यामुळे हळूहळू वाळूत चालणं कठीण होऊ लागलं. काल सारखं पुन्हा भोजन प्रसादि घ्यायला जायचं तर गावात जावे लागेल आणि पुन्हा परत यावे लागेल, आज मात्र आमच्यात खरच एवढी ताकत नव्हती. पण काल जसे मैयानी आम्हाला जेवायला घातले आणि छान गोड मधुर बोरांचं जेवण झालं, तसंच आज सुद्धा त्या कनवाळु माऊलीला आमच्या जेवणाचीची काळजी वाटली असावी, आणि आजचं भोजन काल पेक्षा ही चविष्ट असं आम्हाला दिल आज तिनी.
आम्हाला भूक लागली त्यानंतर काहीच काळात एका ठिकाणी तीन दगडांची चूल पेटलेली आम्हाला दिसली. त्या चुलीच्या बाजूलाच नुकतेच शेतातून उपटून आणलेले हरभरे एका कागदावर काढून ठेवलेले दिसले. आणि काही रोपटी दिसली नुकतीच उपटून आणलेली. ती पेटलेली चूल पाहून आम्हाला असं वाटलं की इथे नक्कीच कुणीतरी असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या भोजनासाठी ही तयारी करून ठेवली असली पाहिजे. हा जो किनारा आहे अलीगंज ते चौरस पर्यंतचा हा बऱ्यापैकी निर्मनुष्य असतो. आता इथे कुणीतरी भेटेल असाच वाटलं ती चूल बघून. ज्या कोणी माणसाने स्वतःच्या जेवणाची ही तयारी केली असेल त्याच्याशी निदान दोन शब्द बोलूयात असं म्हणून आम्ही तिथे त्या व्यक्तीची वाट पाहू लागलो.
आम्ही थकलो होतो. वाटेत एका शेतकऱ्यांनी आम्हाला ताजे ताजे टमाटे दिले होते. टमाटे थोडे कच्चे होते, हिरवट होते. चूल पेटवून तयार होती तिथलीच हरभऱ्याच्या झाडाची एक फांदी उचलली आणि त्यावर टमाटे ठेवून छान भाजून घेतलेत. आणिक थोडावेळ आम्ही वाट पाहिली पण कोणी आलं नाही. मग कुणाची वाट न बघता आम्हीच ते टमाटे खाऊनही घेतलेत, तरीही कुणी आलं नाही. आमचं टमाट्याच भोजन प्रसादी झाली होती. आमची वाट बघूनही झाली होती जवळजवळ दीड तास होत आला होता.आम्ही नर्मदे हर हर नर्मदे हर हाका आपण घातल्यात तरीही कोणी शेवटी तिथून निघायचं ठरवलं.
आम्ही अगदी निघणार तेवढ्यात समोरच्या बाजूने एक मध्यमवर्गीय शेतकरी येताना दिसला. आम्ही त्याला विचारलं. “यहा किसी ने चूल्हा जलाया है पर कोई दिख नही रहा?” तर तो माणूस आम्हाला म्हणतो, हम लोग ही थोडासा चना, टमाटर, सबजी रंख देते है… चुल्हा जला देते है, परिक्रमावासीओ के लिए ही रखते है… तुमने खाया नही? आजाओ थोडा चना सेक के देता हु”…. त्यांनी आम्हाला भरपूर चणे भाजून दिले, असं वाटलं खरंच आमच्यासाठी मांडून ठेवलेलं हे अन्न या शेतकर्यांनी नाही तर कालची भुकेनी झालेली काहिली बघून मैयाला लेकराची कीव आली आणि आज अगदी बरोबर भुकेच्या वेळेला तिनी स्वत: हे भोजन मांडून ठेवलेलं. एखादं बाळ जर रात्री नं जेवताच झोपून गेलं तर आई कसं सकाळी बरोबर त्याच्या आवडीचा नाश्ता तयार करून पोटभर खाऊ घालते आपल्या बाळाला? तेव्हा तिच्या चे-यावर जे तृप्तीचे भाव असतात तसच माझ्या मैयाच्या पाण्यात झालेला बदल मी बघितला की काय असंच वाटलं क्षणभर. चुलीवर भाजलेले खमंग चणे खाऊन आम्ही पुढे निघालो.
इथून बोरास जवळ होतं “आप बोरास मे रुक जाना” असं त्या शेतक-याने सांगितलं, आणि आम्ही बोरास च्या दिशेने निघालो. मजल दर मजल करत बोरास ला पोचलो तेव्हा साडेतीन-पावणेचार झाले असतील. इथे आश्रमात जाणार तोच काही लोक जमा झाली व “आश्रम मे व्यवस्था है” असं आम्हाला सांगू लागली. त्यातला एक जण तर अती उत्साहाने म्हणाला, “अब तो हम लोग अखंड रामायण का पाठ भी करते है, आपको बहुत अच्छा लगेगा”….खरं सांगते पहिल्यांदा श्री रामाची मनापासून माफी मागितली आणि मग निर्णय घेतला की आज काही बोरासला थांबायचं नाही!! पुढे चोरास कडे जायचं. आजचा पूर्ण दिवस पकडता 42 तासांची झोप ऑलरेडी झालेली नव्हती, आणि आता मात्र अजून जागं राहण्याची आमच्यात अजिबातच क्षमता नव्हती, त्यापेक्षा चार-पाच किलोमीटर पुढे जाऊन चोरास ला थांबणं आम्हाला साधं सोपं वाटत होतं. पण आपल्याला वाटतं तसं होत नसतं.
साधारण चारच्या सुमाराला आम्ही बोरास कडून चोरास कडे निघालो. सहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचायला हवं होतं. पण इथे किन-याच्या जरी रस्ता असला तरी वाळूचा रस्ता नव्हता. इथे चक्क उंच-सखल जमीन होती, छोट्या छोट्या टेकड्या होत्या, आणि अतिशय अरुंद अशा पाऊलवाटा होत्या. भरीस भर म्हणून आभाळ भरून आलं होतं आणि सव्वा पाच साडेपाचला मिट्ट अंधार झाला होता. आम्ही चोरास ला पोचलोच नव्हतो. आता टॉर्च लावून पुढे चालत राहण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. बाबाने त्याच्याजवळचा मोठा टॉर्च काढला. तो लावायचा प्रयत्न केला. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली होती, टॉर्च फारसा वापरण्यात आलाच नसल्यामुळे त्याची बॅटरी संपली हे लक्षातच आलं नाही. माझा छोटा टॉर्च काढला. त्याचा प्रकाश म्हणजे अगदी आपले पाय दिसतील इतकाच! त्याच प्रकाशात पुढे बाबा आणि मागे मी असं हळूहळू पुढे सरकत होतो. चोरास पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल? हे अंतर खरंच तीन चार किलोमीटर आहे की त्याही पेक्षा जास्त? हे कळायला काही मार्ग नव्हता आणि रस्त्यावर कोणीही चिटपाखरू नव्हतं. अशातच पावसाला सुरुवात झाली. फार जोराने पाऊस आला नाही पण काहीच थेंब पडल्यावर आता आपण नक्की भिजणार त्यामुळे इथेच कुठेतरी आडोसा पाहून रात्र घालवावी लागणार असं वाटलं. थोडं पुढे दूरवर एक काट्याकुट्याचा आडोसा सापडला सुद्धा. तिथवर जाऊन बघतो तो त्या काट्या-कुट्याच्या झोपडीवजा आडोश्यामध्ये गाई गुरांचा चारा लादून ठेवला होता. आता इथे टेकून बसायचं आणि रात्र काढायची आम्ही ठरवलं….
आम्ही अंगावरच्या बॅगा उतरवणार तेवढ्यात डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन एक माणूस आमच्या मागून चालत येताना आम्हाला दिसला….. हायसं वाटलं…. तो आमच्या जवळ आला आणि आम्ही न विचारताच म्हणाला “अभी थोडे ही दूर है चोरास, मे भी वही जा रहा हू. आधा घंटा लगेगा चलो मेरे पीछे पीछे” .. तो पुढे आणि आम्ही मागे चालू लागलो. त्याच्याजवळ भला मोठा कंदील होता त्यामुळे सहज सोपं गेलं. एका वळणावर त्यांनी आम्हाला किनारा चढून वर जायला सांगितलं आणि उजवीकडे वळल्यावर आश्रम दिसेल असं सांगितलं. “मुझे थोडा आगे जाना है तुम ऊपर चलेजाओ” असं म्हणून तो पुढे निघून गेला. आम्ही वर गेलो, आणि आश्रमाजवळ जाताच जोरात पाऊस सुरू झाला. आता तो माणूस पावसात भिजला असेल का? आपल्या मुक्कामाला पोहोचला असेल? असं वाटू लागलं, आणि चोरास च्या आश्रमात असलेल्या जयहिंद भाईला मी सहज म्हटलं “जिस आदमी ने हमे रास्ता दिखाया वो चारा ले जाने वाला आदमी तो भीग गया होगा”… जय हिंद भाई म्हणाले, हमने आपको तो आते हुये देखा, हम काफी देर से आपको आते हुए देख रहे थे, लेकिन हमे चारा ले जाने वाला कोई आदमी नही दिखा…… सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं पण नंतर समजलं, नर्मदा मैया बरोबर काळजी घेतेच…
आश्रमात कोणी राहणार नव्हतं सगळे गावची तरुण मंडळींनी मिळून हा आश्रम तयार केला होता. इथे माझ्या खेरीज इतर कोणी बाईमाणूस नाही म्हणून जय हिंद भाई आम्हा दोघांना स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या घरची बाजूची खोली रिकामी करून दिली तिथे आम्ही आसनं लावलीत. पुरी खीर बटाट्याची भाजी असं पक्वान्नाचे जेवण आणि मागच्या काही तासांपासून न झालेली झोप यामुळे आम्ही पुरतं थकून गेलो होतो. जेवणानंतर आम्हाला लगेच झोप लागली आणि सकाळी जाग आली तो साडे सात वाजलेले होते…घरची मंडळी परिक्रमावासी झोपलेत म्हणून अगदी हळूहळू आवाज न करता आपली काम करत होती. सहा वर्षाचा लहानसा मुलगा सुद्धा शाळेत जायला आंघोळ पांघोळ करून तयार झाला होता….. जाग आली तेव्हा खूप लाज वाटली पण खरंच ही झोप होणं खूप महत्त्वाचं होतं. आंघोळीला गरम पाणी, पराठ्यांचा बालभोग, घरच्या आजी-आजोबांचं आमच्याशी येऊन येऊन गप्पा करणं, कौतुकाने आमच्या ट्रेक बँग बघणं, त्यात किती सामान मावतं ते बघणं, या सगळ्यात इतकी आपुलकी होती ना, की तिथून पाय निघत नव्हता.
ह्या जय हिंद भाईंकडे लाकडं मोजण्याचा मोठा तराजू होता. आणि या जय हिंद भाईंच्या आई खूपच लाघवी आणि गमतीदार. आम्ही बॅगा लावून जावेला पुढे निघत होतो त्या वेळेला त्यांनी मला आवाज दिला, आणि “बेग के साथ देखना तुम्हारा वजन कितना है” असं म्हणून मला चक्क तराजूवर बसायला लावलं… आणि आणि नंतर बॅग से तो ज्यादा तेरा ही वजन है असं म्हणून टाळीसुद्धा वाजवली, आणि इकडे जय हिंद भाईंच्या वडिलांनी, रात्रभर बसून आमच्यासाठी शंभर मोठ्या आकाराच्या फुलवाती बनवल्या. सकाळी सुनबाई कडून त्या भिजवून घेतल्या आणि एक किलो तूप आणि ह्या शंभर फुलवाती आम्ही निघताना आमच्या हाती दिल्या. आमच्या जवळच्या फुलवाती तशाही संपत आल्या होत्या आणि त्यानंतर पूर्ण परिक्रमेत ह्या फुलवाती आम्हाला पुरल्यात… रोज सकाळ संध्याकाळ ह्या फुलवाती लावताना जय हिंद भाईंच्या कुटुंबियांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही….
चौरास हून आम्ही पुढे अनघोरा ला निघालो. अनघोरा ला जाण्याआधीच तिथे असलेल्या उन्मेषानंद स्वामीं बद्दल ऐकून माहिती होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्रातील आहेत आणि अनघोरा इथे येऊन मुक्काम करा असं त्यांचं आग्रहाचं बोलवणं आहे म्हटल्यावर आम्हालाही त्यांना भेटण्याची ओढ लागली. चौरास हून साधारण दोन तासातच आम्ही अनघोरा इथे पोचलो… अरे हो वाटेतल्या ट्रॅक्टर वाल्या बद्दल तर मी सांगितलंच नाही! सांगते सांगते…..
या भागात रेती काढण्याचं काम सुरू होतं. इथे बरेच ट्रॅक्टर उभे असलेले दिसत होते. रस्त्यांवर म्हणजे वाळूत ट्रॅक्टरच्या चालण्यामुळे वाटा तयार झाल्या होत्या, आणि त्या वाटे मधूनच आम्हीदेखील चालत होतो. बराच वेळ पर्यंत हे असंच सुरू होतं. अचानक आम्हाला एका माणसाने आवाज दिला आणि म्हणाला, अब ट्रॅक्टर वाला रस्ता छोड दो…. अब यहासे सीधे रस्ते जावो” वाळूतून चालण्यापेक्षा या ट्रॅक्टरने बनलेल्या रस्त्यातून चालल्या थोडं सोपं जात होतं, “क्यू क्या हुआ बाबांनी विचारलं”…त्या माणसांनी काहीच उत्तर दिलं नाही मात्र तो तिकडून जा असं विनवू लागला. त्याचं बोलणं इतकं विनवणी पूर्ण आणि कळकळीचं होतं की पुढचं कुठलंही कारण न विचारता आम्ही ट्रॅक्टरच्या ने तयार झालेल्या मार्गावरून दूर झालो. दूर झाल्यानंतर बऱ्याच दुरून आम्ही तो ट्रॅक्टरचा मार्ग सहज बघितला तर दुरून एका ठिकाणी मैया ला दोन धारा फुटलेल्या दिसल्या आणि हा ट्रॅक्टरचा मार्ग चक्क मैयाची धार ओलांडल्या जाईल अशा ठिकाणी जाऊन संपत होता. थोडक्यात आमची परिक्रमा खंडित होता होता वाचली होती….. आम्ही तर दूर निघून गेलो आणि आम्हाला त्या ट्रॅक्टर वाल्याचे आभार सुद्धा मानता आले नाहीत.
आम्ही अनाघोराच्या रस्त्यावर आलो. आता अनाघोर्याच्या आश्रमाचे उंचावर असलेले भगवे झेंडे दिसत होते. रस्त्यात आम्हाला भेटणारे लोक “टीले वाले बाबाके यहा जाओ” असं सांगत होते. दुरूनच या जागेची क्म्पान्म जाणवू लागली होती. मैया च्या किना-यावर फुलबागे सारख्या फुलांची झाडाची दाटी होती, काही ठिकाणी गव्हाची शेती होती आणि वर उंचा वर भगव्या वस्त्रातला, साधारण तिशी मधला एक सन्यासी आमच्याकडे पाहून नर्मदे हर करत होता.
या जागेची आकृती समोर निमुळती आणि मागे उंचावर त्रीकोणाकार होती. वर चाद्याला सुबक श्या मातीत खोडून तयार केलेल्या पाया-या होत्या, आणि वर जाताच अतिशय प्रसन्न असं हनुमानाचं मंदिर होतं.
या जागेला एक रहस्य आहे बरं का. हे महाराज उगाच इथे येऊन राहिले नाहीत. इथे या तरुण सन्यास्याला एक दृष्टांत झाला….एका गुहेची गोष्ट आहे ही…या गुहेत जे काही घडलं, लोकांचा जो काही समज झाला, त्यातून पुढे ही जागा निर्माण झाली. इथे नर्मदा मैच्म रूप कसं दिसतं याला ही महत्व आहे, आणि आम्हाला इथे काय भाग्य लाभलं ते ही तुम्हाला सांगणारे, पण पुढच्या, म्हणजे ६३ व्या भागात.
नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६३
नर्मदे हरमागच्या भागात मी तुम्हाला अनघोरा या जागेबद्दल सांगत होते. या जागेची आकृती समोर निमुळती आणि मागे उंचावर त्रिकोणाकार आहे. इथे या टेकडीला माती खोदून केलेल्या छोट्या पायऱ्या आहेत. रमणीय ठिकाण आहे हे. मागच्या भागात मी असं सांगितलं होतं की या जागेला एक रहस्य आहे, ते आता इथून पुढे सांगते.आम्ही अगदी बोरासला होतो तेव्हापासून उन्मेशानंद यांच्याशी फोनवर बोलणं सुरू होतं. आम्ही जितकं त्यांना भेटायला उत्सुक होतो तितकच ते देखील आम्हाला भेटायला उत्सुक होते. आम्ही इथे पोहोचण्याआधीच आम्ही इथेच राहावं हा निर्णय त्यांनी त्यांच्याकडून घेतलाच होता. खरंतर सकाळी चोरास होऊन निघाल्यावर दोनच तासात अनघोरा इथे आम्ही पोचलो होतो. त्यामुळे भोजन प्रसादी घेऊन पुढे निघायचं असा एक विचार मनात येत होता. मात्र जसजसं हे स्थान नजरेच्या टप्प्यात येऊ लागलं तसतसं या स्थानाबद्दल काहीतरी विशेष जाणवू लागलं हे नक्की. हे स्थान एकदम असं नजरेसमोर दिसत नाही. इथे नर्मदा मैया ने वळण घेतलेलं आहे. त्यामुळे थोडं वळल्या नंतर दूर उंचावर भगवे झेंडे दिसलेत. तरीही इथवर पोहोचायला अजून किमान अर्धा तास तरी लागणार होता. इथे वळणा अलीकडे बराचसा खडकाळ मार्ग आहे. थोडा विश्राम म्हणून आम्ही इथे थांबलो तेव्हाचा अनुभव सांगते. खरं तर या अनुभावा नंतरच या स्थानाकडे विशेष म्हणून लक्ष गेलं.जरी हे स्थान समोर दिसत होतं तरी ते बरच लांब होतं. उंचावर असल्यामुळे आणि मैया ने वळण घेतलं असल्या मुळे ते पलीकडच्या तटावर आहे की काय असा भास होत होता. अर्थात आपल्याला जायचं आहे ते स्थान हे नसून, हे स्थान दुस-या तीरावर आहे असाच आमचा समज झाल्याने त्या आकर्षणाकडे सुरवातीला मी फारसं लक्ष दिलं नाही, मात्र आम्ही ज्या दगडाळ भागात बसलो होतो त्या दगडातून हलके हलके कंपन जाणवू लागले तेव्हा जरा नीट लक्ष दिलं तर कुठून तरी अगदी हळू पण तीव्र स्वराचा घंटा नाद येतोय हे जाणवू लागलं आणि त्या घंटा नादाच्या संपता संपता मी बसले तो खडक किंचित थरथरतोय की काय असा भास झाला. हा घंटा नाद उंचावरून येणा-या या देवळातून येत होता.शेतातून वाट काढत काढत आणि वळण पार करत जेव्हा आम्ही पुढे सरकलो तेव्हा हे स्थान पलीकडच्या तीरावर नसून इकडेच आहे आणि आपल्याला इथेच जायचं आहे हे समजलं. या स्थानाच्या खालपर्यंत आम्ही पोचलो. इथे मैय्याच्या वाळूतून पुढे उंच निघालेली लालसर मातीची एक छोटीशी टेकडी आहे त्यावर हे स्थान. आम्ही अजून स्थानावर पोहोचलो नव्हतो तरीही खाली सुद्धा आम्हाला या स्थानाची विशेष अशी कंपन जाणवत होती. आम्ही पोहोचलो त्या वेळेला इथला भाग हा जास्तच सोनेरी वाटू लागला होता. सूर्य महाराजांनी आपल्या कनक रश्मी कदाचित इथे थोड्या जास्त वेळ रेंगाळू दिल्या असतील.या छोट्याशा टेकडीच्या डाव्या बाजूला मातीत खणून तयार केलेला एक जिना होता तो चढून आम्ही वर गेलो. आमच्या स्वागतासाठी महाराज उभेच होते. नर्मदे हर झालं आणि पहिलेच वाक्य ते बोलले ते असं. “ताई सामान वगैरे ठेवा इथे आज काही तुम्हाला जायचं नाहीये”.. त्यांचं ते हक्काने सांगणं इतकं प्रेमाचं होतं की थांबण्या शिवाय पर्याय नव्हता. भोजन प्रसादी आटोपली आणि सत्संगाला सुरुवात झाली तेव्हा या जागेचे रहस्य समजलं.ते रहस्य सांगण्याआधी या महाराजांचं इथे येणं कसं झालं ते सांगते. हे महाराज अगदी तरुण. पस्तिशीच्या आतले. तसे व्यवसायाने वकील होते आधी. मात्र ह्या वकिली पेशात कराव्या लागणाऱ्या खर्या-खोट्या व्यवहारांना कंटाळून ते भ्रमंतीला निघाले. बरंच फिरल्यानंतर कधीतरी या जागी आले आणि त्यांना या जागी विशिष्ट काहीतरी आकर्षण जाणवलं. काहीतरी दृष्टांत झाला आणि त्यांनी इथेच राहायचं ठरवलं. इथेच एका छोट्याश्या गुहेत तब्बल तीन वर्ष तपस्या केली. गावातले गावकरी शंका घेऊ लागले. गावकऱ्यांना वाटायचं हा तरुण संन्यासी इथे काहीतरी खोदकाम करतोय आणि याला काहीतरी खजाना सापडला आहे, म्हणून तो इथेच राहण्याचा आग्रह धरतोय, आणि म्हणून ते बराच त्रास देखील द्यायचेत. मात्र स्वामींचा आशीर्वाद आणि मनोबल यावर ही तपस्या पूर्ण झाली असता अचानक स्वामी समर्थ उन्मेशानंद महाराजांच्या स्वप्नात आलेत. “या छोट्याशा टेकडीवर हनुमानाच्या रूपात माझी स्थापना कर” असा आदेश दिला. त्रास देणारे गावकरी देखील बदलले आणि आता महाराजांच्या मदतीला आणि मारुतीच्या दर्शनाला पूजेला, येऊ लागले. एक दिवस अचानक “इथे गोशाला करावी” असाही स्वामींचा आदेश झाला आणि स्वामींच्या आदेशाप्रमाणे गोशाला ही तयार झाली. “इथे परिक्रमावासी यांची सेवा झाली पाहिजे, तपस्या झाली ती पुरे झाली आता सेवाच कर” ,असा पुन्हा एकदा स्वामी समर्थांचा आदेश झाला आणि मग उन्मेशानंद हे संपूर्णपणे नर्मदापरिक्रमा वासियांची सेवा करू लागले.महत्वाची गोष्ट अशी की या टेकडीच्या आजूबाजूला देखील अनेक छोट्या मोठ्या टेकड्या आहेत जिथे अनेक वेळा अनेक आश्रम तयार झाले आणि अनेक वादांमध्ये आपसातल्या भांडणांमध्ये लयीला सुद्धा गेलेत. अनेकांनी उन्मेशानंदाना त्रास देऊन ही जागा बळकावण्याचा देखील प्रयत्न केला मात्र स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तयार झालेल्या या आश्रमाला आपल्या जागेवरून कुणीही हलवू देखील शकलं नाही.स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची प्रचंड कंपन इथे जाणवतात. ज्या गुहेमध्ये उन्मेशानंद महाराजांनी तपस्या केली त्या गुहेत आजही स्वामींच्या पूजा अर्चा नियमित पणे सुरु असते. त्याच गुहेच्या वरच्या अंगाला आता एक छान स्वयंपाक घर तयार केलय. स्वामी समर्थांचा आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्यासारखं हे स्वयंपाक घर! इथे कधीही कशाचीही उणीव जाणवत नाही, आणि हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.संपूर्ण परिक्रमेत कधीही आणि कुणीही खाल्ला नसेल असा खाऊ आम्हाला इथे मिळाला, आणि हा खाऊ तयार करण्यासाठीची एकही गोष्ट आश्रमात नसताना देखील हा खाऊ तयार झाला आणि आम्ही पोटभर खाल्ला देखील…. इतकंच कशाला? मैयांनी माझ्याकडूनच हा खाऊ तयार करवून घेतला.तुमची उत्सुकता फार शिगेला लावतेय का मी? सांगते. मी न्यूट्रिशन मध्ये पीएचडी केलय म्हटल्यानंतर महाराजांच्या मनातले अनेक विचार बाहेर आलेत. तिथल्या आदिवासींसाठी काही तरी करण्याची तळमळ ते मला सांगू लागलेत. निदान त्यांच्या पोषण आहारा बद्दल विशेषत:, लहान मुलीं बद्दल काही करता येईल का असा प्रश्न जेव्हा त्यांनी माझ्यापुढे मांडला तेव्हा मी त्यांना अनेक पाककृती सांगितल्या. “त्यातल्या काही पाककृति तुम्ही मला शिकवाल का”? असं म्हटल्यानंतर ह्या खाऊची वेळ आली बरं का!इथे तयार होणाऱ्या काही वनस्पतीं पैकी मोहाची फुलं ही सहज मिळणारी आणि अतिशय पौष्टिक असे मी महाराजांना सांगितलं. मोहाची काय काय पदार्थ तयार करू शकता येतील यावर विचार करताना मोहाची खीर, मोहाचे साधे लाडू आणि मोहाचे तीळ घातलेले लाडू असे तीन प्रकार मी त्यांना सुचवले. “तू तर जाशील ताई, मग मी हे कुठून शिकू? त्यामुळे तू काही जाऊ नको आणि हे पदार्थ मला शिकव” अशी गळ च् घातली महाराजांनी…. आश्रमात मोहाची फुलं नव्हता, गूळही नव्हता आणि तीळ देखील नव्हते. खरं सांगायचं तर त्या दिवशी दूध देखील नव्हतं. “तू फक्त थांब ताई आपण उद्या सगळं करूयात”, असं म्हणत महाराजांनी मला थांबूनच घेतलं… उद्या कशाला ताबडतोब दुधाची व्यवस्था झाली, मोहाची भरपूर म्हणजे ५ किलो तरी नक्की असतील, आश्रमात येऊन पडलीत, चांगले चार किलो तीळ देखील आश्रमात कोणीतरी आणून दिले. आणि हे सगळं अगदी लगोलग. म्हणजे आता फक्त करणं तेवढं काय ते शिल्लक राहिलं होतं.नुकतीच संक्रांत होऊन गेली असल्यामुळे तिळाचे लाडू हा एक महत्वाचा भाग होता. महाराजांना गेल्या काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत असल्यामुळे महाराजांसाठी खास शेंगदाणे आणि मोह घातलेले लाडू तयार करायचं मी ठरवलं होतं. आणि खीर तर करायचीच होती, मग काय लागले मी कामाला. ज्या स्वयंपाक घरात महाराजांशिवाय कोणीच जात नाही ते अख्खं स्वयंपाक घर माझ्या ताब्यात दिलं महाराजांनी. इतकंच नाही तर “तू सांग ताई तुला काय हवंय” असं म्हणत अगदी लहान भावासारखे मला हवं त्या वस्तू काढून देऊ लागले… चार किलो तिळाचे आणि मोहाचे लाडु, मोह दाणे आणि गुळ यांचे लाडू शिवाय दूध आटवून आटवून घट्टशी तयार केलेली खीर, हे सगळे प्रकार होईस्तोवर संध्याकाळ झाली. आता मुक्कामाला आलेल्या परिक्रमावासी यांची भोजन प्रसादी करायची, तीसुद्धा माझ्या हातची झाली.त्या रात्रीला कोल्हापूर, पंढरपूर, पुणे असे मिळून जवळजवळ तेरा एक परिक्रमावासी असू आम्ही. खड्या आवाजातली हनुमानाची आरती, हनुमान चालीसा आणि अखंड हरिपाठ यांच्या आवाजात आधीच पवित्र असलेल्या ते स्थान एखाद्या तेजोमय ताऱ्यासारखं पावित्र्याच्या कंपनांनी लखलखू लागलं.या सगळ्यांमध्ये मी एकटीच माताराम. मग सगळी पुरुष मंडळी जेवायला बसलेली आणि मी वाढायला हातात घेतलेलं. मी आणि महाराज आम्ही दोघं मागवून बसलोत. मात्र या सगळ्यांची भोजन प्रसादी झाल्यानंतर महाराजांनी आधी मला ताटावर बसवलं, मला हवं नको ते बघितलं आणि माझं भोजन प्रसादी जेवून होईस्तोवर ते जेवायला बसले नाहीत. या सगळ्या दिवसभरात महाराजांनी मला कितीदा तरी म्हटलं असेल, “ताई असं एक दिवस राहून चालणार नाही हं! माहेरपणाला कधी येणार आहेस? आज तुझ्याकडून खूप काम करून घेतलं, आता आराम करायला ये काही दिवस परिक्रमा झाल्यानंतर”! माझं अजून तरी जाणं झालं नाहीये पण तो गोडवा…. खाऊचा आणि प्रेमाचा, आणि हो महाराजांच्या रूपात मिळालेल्या भावाचा, तो मात्र अमिट आहे हे नक्की.अरे हो एक राहीलच की सांगायचं… इथे मी एकटी माताराम आणि बाकी सगळे पुरुष मंडळी, ही पुरुष मंडळी वर बांधलेल्या खोलीवजा जागेत आणि अंगणात अशी असं लावून झोपलेत. खरं तर आम्ही परिक्रमावासी. तेव्हा आम्ही ही तिथेच आसन लावण्याच्या तयारीत होतो. पण उन्मेशानंद माराजान्नी मला अचानक बोलावून घेतलं. “ताई इकडून मागून उतरून या खोलीत ये” असं म्हणाले. मी खोलीत गेले तो सुबक अशी स्वामींची मूर्ती तिथे होती, मित्या मूर्तीकडे बघत असताना अचानक महाराज म्हणाले, “ तुमचं आसन तुम्ही वर नका लावू, इथे लावा महाराजांच्या समोर”…अन मला बाबाला स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या समोर म्हणजेच जिथे उन्मेशानंद महाराजांनी तपस्या केली त्या खोलीमध्ये असन लावायची संधी मिळाली.दुस-या दिवशी महाराजांनी स्वत:च्या हाताने भोजन प्रसादी करून जेवू घातलं. तळहाताच्या फोडासारखं माहेरवाशिणी ला जपणा-या भावाची, आणि अंगणभर, घरभर हवं तसं बागडणा-या बहिणीच्या माहेराची भेट माझ्या पदरात घातली. अनघोरा मधले हे दिवस कसे गेले काही समजलंच नाही…. भरभरुन द्यायचं म्हटलं की देव काय काय अन किती किती देईल काही सांगता यायचं नाही बघा….दुसऱ्या दिवशी इथून जेव्हा पुढे जायला निघालो तेव्हा महाराज आमच्यासोबत काही अंतर पायी चालत आले आणि त्या वेळेला इथल्या जागेच्या त्रिकोण आकाराबद्दल त्यांनी जे दाखवलं त्यातून इथल्या जागेच्या रहस्याच्या शेवटच्या भागाचा उलगडा झाला. ही जागा नुसतीच त्रीकोणाकार नसून हिच्यात दुरून पाहिल्यानंतर गोमुखाच दर्शन होतं. कदाचित म्हणूनच इथे गोशाला करावी असा स्वामी समर्थांचा आदेश देखील महाराजांना झाला. महाराजांची तपस्या, स्वामी समर्थांचा आशीर्वाद, गोमुखा कार जागा गोशाला, नर्मदामैया, महाराजांनी नर्मदामैया मधील छोटे-छोटे दगडं गोळा करून त्यापासून स्वतःच्या हाताने बनवलेली शिवमुर्ती,हे असं इतकं भरभरून असल्यावर तिथल्या कंपन्यांमध्ये त्याची जाणीव होणार नाही असं कसं होईल?अन्घोरा गुरसी बरमान करत आम्ही रमपुरा ला आलो, मात्र बरमान चे आजोबा, गुरसी चं देऊळ आणि रमपुरा ला आलेला अनुभव हे मी पुढच्या भागात सांगणारे.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६४
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला अनघोरा आणि तिथल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल सांगितलं होतं. इथून पुढे हिरापूर झिरी गुरसी असं करत करत आम्ही रमपुरा ला पोहोचलो. अनघोरा ते हिरापूर रस्ता अगदी रमणीय आहे. या रस्त्यात वाटेत प्रत्येक विश्रांतीला ताक मिळालं. हिरापूर ला राजराजेश्वरी मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. इथेच आसन लावायचं ठरवलं. त्याप्रमाणे मंदिरात गेलो. तिथे काही विद्यार्थी वेद पठण करताना दिसले. इथे आसन कुठे लावता येईल असं विचारल्यावर एक अतिशय अस्वच्छ पडवी तिथल्या मुलांनी दाखवली. मंदिरात कार्यक्रम असल्याकारणाने इथे खोल्या किंवा सभामंडपात आसन लावता येणार नाही असं व्यवस्थापकांनी सांगितलं. याशिवाय भोजन प्रसादी ची व्यवस्था देखील आज होऊ शकत नाही शिधा मिळेल असं सांगितलं. लाकडं सुद्धा जमा करून आणावी लागतील हे सांगितल्यावर मात्र येथे भोजन प्रसादी तयार करायला बराच वेळ लागेल हे लक्षात आलं. शिवाय दाखवलेली पडवी स्वच्छ करून घेणे हे काम सुद्धा मोठं होतं. तिथे जेवणाच्या उष्ट्या पत्रावळीं पासून तर कडबा चाऱ्या पर्यंत अनेक वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. आम्ही तिथे न राहता अजून कुठे व्यवस्था होऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर, तिथला एक मुलगा आम्हाला एका जुन्या धर्मशाळेत घेऊन गेला. धर्मशाळा म्हटल्यानंतर तिथे निदान आसन लावायला व्यवस्थित जागा असेल असं वाटलं होतं. मात्र तिथे गेल्यावर वेगळेच चित्र नजरेस पडलं. ती धर्मशाळा पडकी आणि बंद होती. धर्मशाळेच्या आजुबाजूला काही अर्धवट बांधलेल्या बिल्डिंग होत्या. त्या भागात एकही विजेचा दिवा नव्हता. जवळपास पाण्याची हापशी किंवा तत्सम सोय नव्हती. धर्मशाळेच्या सगळ्या खोल्या बंद होत्या. आणि समोरची गॅलरी किंवा कॉरिडॉर फक्त उघडा होता. खरं तर एक रात्र फक्त काढायची असल्यामुळे आम्हाला तेही चालू शकणार होतं, मात्र ज्या वेळेला त्या पायर्यांवर बसून सहज म्हणुन वर लक्ष गेलं त्यावेळेला त्या कॉरिडॉरच्या छतावर वटवाघळाचे थवे लटकलेले पाहिल्यानंतर तिथे देखील राहू नये असंच आमचं मत झालं.आता अंधार पडत आला होता. आता गावातल्या एखाद्या झाडाखाली एखाद्या ओट्यावर आसन लावण्या शिवाय पर्याय दिसत नव्हता. किंवा मैया किनारी घाटावर आसन लावावं लागणार होतं. तोपर्यंत स्नानादी आटोपून घाटावरच जाऊन आरती पूजा करून घ्यावी असा विचार केला. भोजन प्रसादीचं बघू काहीतरी. असा विचार करून आम्ही मैया किनारी जाऊन पूजा आरती करू लागलो. आमची शेवटची आरती सुरू असताना तिथे एक आठ दहा वर्षाची मुलगी आली. आणि आम्हाला पैसे मागू लागली. आमच्याजवळ 10 च्या नोटा शिल्लक होत्या त्यातली एक नोट काढून तिच्या हातावर देताच ती चटकन म्हणाली, “तुम्हारा गोत्र कोनसा है?” एवढ्याश्या या मुलीला गोत्र वगैरे कळतात तर, असं वाटून मी तिला विचारलं, “क्यू गोत्र सुनकर क्या करोगी?” ती म्हणाली, “सगोत्री के घर आपकी व्यवस्था हो जायेगी गोत्र तो बताओ”. “भारद्वाज” मी उत्तर दिलं…. माझं उत्तर ऐकून ती लगेच म्हणाली “दुसरे चौराहे मे सीधे हात को जाना पाचवा घर भारद्वाज जी का है उनके घर तुम्हारी व्यवस्था हो जायेगी.”
या छोट्याशा मुलीच्या बोलण्यावर आपली व्यवस्था कशी होईल असाच विचार आम्ही करत होतो तरीही का कोण जाणे आम्ही गावाच्या दिशेने निघालो. ज्या चौकातून आम्हाला उजव्या हाताला जायचं होतं तिथेच दोन-तीन गावकऱ्यांनी आम्हाला अडवलं. त्यातला एक म्हणाला “आप हमारे घर चलो,” मी आणि बाबा एकमेकांकडे बघू लागलो, त्यावर तो म्हणाला “ऐसे क्यू देख रहे हो? हम अच्छे समाज से है, छोटी जाती के नही है, भारद्वाज गोत्र के है, पंडित है….अभी अभी किसी ने बताया के कोई पंडित परिक्रमावासी मैया किनारे पूजा कर रहे है इसलिये आपको धुंडते धुंडते वही आ रहा था.!”“किसने बताया आपको?” मी विचारलं.. “गाव के बच्चे बताने आये थे…” भारद्वाज जी म्हणाले… “उन्हे किसने बताया हम पंडित समाज के है?” मी पुन्हा विचारलं… तर “मंदिर के के बच्चों ने आपके बारे मे बताया था बाकी मुझे नही मालूम” असं उत्तर भारद्वाज यांनी दिलं….. त्यांच्या घरी आमची अगत्यपूर्वक व्यवस्था झाली. ती लहान मुलगी मात्र पुन्हा दिसली नाही. भारद्वाज जी शी बोलल्यानंतर ते म्हणाले “येतो देवी राजराजेश्वरी या नर्मदामैया दोनो मे से एक होगी”. तिथून निघून आम्ही बरमान इथे आलो.हा रस्ता लांबच लांब रस्ता आहे. इथे छान मार्केट आहे. या मार्केटमध्ये आम्हाला एक आजोबा भेटलेत. ते आम्हाला खूप आग्रह करून त्यांच्या घरी घेऊन गेलेत. तिथे गेल्यावर त्यांच्याबद्दल जे त्यांनी सांगितलं ते ऐकून आश्चर्य आणि कमाल दोन्ही वाटलं. या आजोबांना चार मुलं होती. त्यातली तीनही मुलं वयाच्या 39 व्या वर्षी अचानक वारलीत. त्यातल्या दोघांना मूलबाळ नव्हती, आणि एका मुलाला एकच मुलगी आहे. चौथ्या मुलांनी लग्न केलेलं नाही. आता ह्या आजोबांकडे जगण्याचं कारण म्हणून फक्त त्यांची नात आहे, ती नऊ वर्षांची आहे आणि अत्यंत हुशार आहे. ह्या नऊ वर्षांच्या मुलीने ज्याप्रकारे आमच्याशी संवाद साधला त्यावरून हे मुलगी नक्कीच कुठलीतरी पुण्यात्मा किंवा दिव्यशक्ती असलेली आहे असं कुणीही म्हणेल. सांगते….तिच्या आजोबांनी तिला आम्हाला नमस्कार करायला सांगितला तसा तिने आम्हाला नमस्कार केला मात्र लगेच “अब मेरे पैर पडो, मै तो कन्या हू ना” असं म्हणून आम्हाला नमस्कार करायला लावला. नमस्कार केल्यावर आमच्या डोक्यावर हात ठेवून तिने “आपकी परिक्रमा सफल पूर्ण होगी, वीना विघ्न पूर्ण होगी, और आपको इसके बाद भी परिक्रमा करनेका अवसर मिलेगा असा पूर्ण आशीर्वाद दिला… कोणीही काहीही नं सांगता ती असं बोलली. त्यानंतर तिने आमच्यासाठी काळा चहा करून आणला. आम्ही चहा पीत असताना तिने नर्मदा पुराणातील काही श्लोक आम्हाला म्हणून दाखवले, त्यांचे अर्थ देखील सांगितले. बरमान घाटाचं महत्व स्वतःच्या शब्दात सांगितलं. ब्रम्हाने कशी तपस्या केली इथपासून तर ब्रम्हांड पासून तयार झालेला अपभ्रंश बरमान हा कसा तयार झाला तेही सांगितलं. माझे आजोबा मला नर्मदामैया म्हणतात आणि म्हणून माझी आई माझे काका आणि माझे आजोबा या सगळ्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असंही ती बोलली. नऊ वर्षाच्या मुलीकडून यातली एकही गोष्ट आम्हाला अपेक्षित नव्हती. अगदीच कहर म्हणजे माझे वडील आणि माझे दोन्ही काका आपलं कार्य संपवून सदगतीला कसे लागले हे हे मी आजोबांना सांगत असते पण तरी त्यांचा जीव गुंतून राहतो असही ती लहान मुलगी बोलत होती. तिचा देह फक्त नऊ वर्षाच्या मुलीचा आहे आणि तिची वाणी, तिची बुद्धी, तिचं भाष्य हे तिच्या आतून कुणीतरी वेगळच करतय असं वारंवार जाणवत होतं..कन्या स्वरूप असल्यामुळे तिच्या हातात दहा रुपयांची नोट घालून त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो त्यावेळेला वरून आवाज देऊन ती म्हणाली “जहा मोका मिलेगा वहा नौ कन्या को भोजन खिला देना मैया”… मीसुद्धा होकारार्थी मान हलवून पुढे निघाले मात्र नऊ कन्या एकावेळी एका ठिकाणी आणि लगेचच म्हणजे दुस-याच दिवशी सापडतील आणि त्यांची भोजन प्रसादी आपल्याकडून होईल तेही अचानक पणे हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं. किंबहुना आम्हाला नउ कन्या शोधाव्या लागल्या नाही तर त्या कन्यांनी आम्हाला शोधून घेतलं होतं… कसं ते सांगणारे पण त्या आधी धुआधार बदल सांगते. करत करत आम्ही पुढे निघालो तो छोटी धुवाधार कडे जाऊ लागलो. इथे साडेतीन चार वाजता सुद्धा बरंच पावसाळी वातावरण तयार झालं होतं. बरीच मोठी वालुकामय जमीन होती आणि दूरवर मैया वाहताना दिसत होती. तिथवर पोचतो तो मैया नी एक वळण घेतलेलं होतं. मैया च्या मध्यभागी संगमरवराची मोठी टेकडीच होती. दोन्ही तटावर देखील मोठमोठ्या टेकडीवजा दगडी होत्या. या टेकड्यांवर मैया प्रचंड वेगाने आघात करत होती. इथे मयानी रौद्ररूप घेतलं होतं असंच म्हणा ना! इथे मैयाचं पाणी टेकड्यांच्या वर पर्यंत उडून धुक्यासारखी भिंत तयार झाली होती. मैय्याच्या खळखळ आवाज इतका जास्त होता की आम्हाला दोघांना एकमेकांचे बोलणे देखील ऐकू येत नव्हतं. प्रचंड वारं सुटलेलं होतं आणि आमच्यासारखे जाड जुड, वजनी माणसं सुद्धा उडून जातील की काय असं वाटू लागलेलं होतं. इथून पुढे न जाता आज इथेच थांबावं या आशेने आम्ही जवळपास आश्रम शोधू लागलो.
इथे चिटपाखरू देखील नव्हतं मात्र एका दगडी टेकड्यावर मध्यभागी एक भगवा झेंडा रोवलेला दिसत होता. तोच आश्रम असावा, निदान तिथे कुणाला तरी काहीतरी विचारता येईल असं वाटून आम्ही ती खडकाळ टेकडी चढू लागलो. त्या भगव्या झेंड्या पर्यंत पोचलो तेव्हा लक्षात आलं तिथे कोणीही नव्हतं तिथे फक्त एक झेंडा आणि एक आडोसा असा तयार केलेला होता तिथे रात्र काढणं अशक्य होतं.मात्र वरच्या बाजूला एक बाण काढलेला दिसत होता त्यावरून परिक्रमावासी मार्ग हा हे टेकाड चढून वर जातो आहे हे लक्षात आलं.
आम्ही उंचावर असल्यामुळे वाऱ्याचा वेग अतिशय वाढला होता. मैया च्या पाण्याचे तुषार आम्हाला भिजवत होते. इथे फक्त खडक असल्यामुळे चढणे कठीण जात होतं. तरीही आम्ही बाण दाखवलेल्या दिशेने चढू लागलो. बराच चढून झाल्यावर एक खूप मोठी रेतीची टेकडी लागली. तिथे रस्ता संपत होता. ही रेतीची टेकडी चढून जाणं अतिशय कठीण होत होतं कारण थोडं वर चढल्या नंतर आम्ही रेतीबरोबर घसरून खाली येत होतो. दुसरा कुठलाही रस्ता दिसत नव्हता.टेकडीच्या गोल फिरायचं म्हटलं तर बरंच अंतर होतं आणि घनदाट करवंदाच्या जाळी सारखी कसलीतरी जाळी होती, त्यातून जाता येईल असं अजिबात वाटत नव्हतं. आम्ही आजूबाजूला नजर फिरवली… खाली नावेत एक नावाडी होता, आम्ही हातवारे करून मोठ्यामोठ्याने नर्मदे हर करून त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्याला काही केल्या ऐकू जाईना.
या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला अगदीच पायथ्याशी मैया होती त्यामुळे इथून खाली उतरणं निश्चितच शक्य नव्हतं. परत जायचं म्हटलं तर बरंच अंतर दूर पर्यंत काहीही नव्हतं हे आम्हाला माहीत होतं कारण आम्ही त्याच रस्त्याने पुढे आलो होतो. आता मात्र हा रेतीचा चढाव एकतर पार करायचा किंवा इथेच बसून कोणाचीतरी वाट बघायची याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. थोडा वेळ वाट पाहिली पण कोणीही येण्याची काहीही शंका दिसत नव्हती आणि आता पावसाला सुरुवात झाली. आता मात्र आजची रात्र इथेच बसून काढावी लागेल, भिजत भिजत काढावी लागेल असं वाटत असताना एक आशेचा किरण अतिशय दुरून आमच्या पर्यंत येऊ शकतो असा भास झाला.
काय असावा तो आशेचा किरण? खूप दूर म्हणजे कुठून तर पलिकड च्या ताटावरून…. काय असेल तो आशेचा किरण, आणि जिथे आम्हाला एकमेकाम्च्म बोलनं आईकू येत नाही अश्या ठिकाणी पलीकडच्या ताटावरून काय मदत मिळणार होती आम्हाला…? की बिरबलाच्या खिचडी सारखं दूरवर आम्हाला काही दिसत राहिलं आणि त्याच्या कडे बघत बघत आम्ही मार्ग काढला? ती रेतीची टेकडी आम्ही कशी पार केली…. सांगणारे पण पुढच्या भागात
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६५
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला छोटी धुवाधार बद्दल सांगत होते. बरमान घाटच्या छोट्याश्या मात्र अतिशय तेजस्वी मैया ला भेटून आम्ही पुढे निघालो होतो. छोटी धुवाधार चा खडकाळ पहाड अर्धवट चढून झाला होता. नर्मदामैया चा आवाज आणि तिचा खळखळाट इतका जास्त होता की माझं आणि बाबाच बोलणं आम्हाला एकमेकांना सुद्धा ऐकू जात नव्हतं. अशात मैय्याच्या पाण्याचे तुषार टेकडीच्या वरपर्यंत येत होते. आम्ही अर्ध्या टेकड्यावर पोचलो होतो. इथून पुढे आम्हाला वाटच सापडत नव्हती. अतिशय खडकाळ जागा, खाली मैया खळखळतेय समोर एक मोठे संगमरवरी टेकडी आहे आणि त्याच्या पलीकडे मैया चा पलीकडचा किनारा आहे. मैया च्या पात्राच्या मध्यभागी एक मोठी संगमरवरी खडकांची टेकडी आहे. या टेकडीवर दोन्ही किनाऱ्यांकडून लाटा दणादण आदळत असतात आणि ती संपूर्ण टेकडी पाण्याने चिंब भिजलेली असते.
अशा वातावरणात आभाळ भरून आलं आणि हळूहळू पावसाला सुरुवात झाली देखील. ह्या या टेकडीवर अर्ध्यावर चढून आल्यावर रेतीचा एक मोठा डोंगर होता. या डोंगराच्या आज कदाचित मोठमोठे खडक असतीलही. ही रेती अगदी बारीकशी नसून अत्यंत जाड रेती होती आणि त्यावरून आमचे पाय घसरत होते. आम्ही अनेक प्रयत्न करून, हातातला दंड त्या रेतीत खुपसून वर चढत होतो मात्र पाच-सात पावलांवर चढल्यानंतर आम्ही खाली घसरून येत होतो. त्या टेकडीच्या आजूबाजूलाही जाऊन पाहिले. करवंदाच्या जाळी पेक्षा दाट जाळी त्या टेकडीच्या वरच्या बाजूला होती. आम्हाला रस्ता अजिबात सापडत नव्हता. अशात खाली नजर गेली तो एकच नावाडी आपली नाव घेऊन मैयाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जातांना दिसला. आम्ही त्याला बोलवायचा, आवाज द्यायचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! त्याला काही केल्या ऐकू जाईना. तो आला तसाच तो त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला आणि आम्ही मात्र हताश होऊन तिथल्याच एका दगडावर प्रार्थना करत बसलो.
अशातच एक आशेचा किरण आम्हाला दिसला. तो असा की मैया च्या पात्राच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पलीकडे दुसर्या किनार्यावर असलेल्या टेकडीवर काहीतरी हालचाल जाणवली. मैया चे तुषार हवेत उडत होते त्यामुळे धुकं असल्यासारखं वातावरण होतं. स्पष्ट दिसत देखील नव्हतं. नीट लक्ष दिल्यावर तिथे तीन मुलं बसली आहेत हे लक्षात आलं. आम्ही खूप हात वारे करण्याचा प्रयत्न केला. पण गंमत अशी की थोड्या वेळाने आम्हाला असं लक्षात आलं की त्यांची आमच्याकडे पाठ आहे. आम्ही आवाज देऊन काहीही फायदा नव्हता. आम्ही हातवारे केलेले त्यांना दिसणार नव्हते. फक्त ते तेथे आहे हाच एक जमेचा भाग होता.
आता आम्ही मैयाचा धावा करु लागलो. आता एकच आशा होती की त्यांनी आमच्याकडे बघावं. थोडा वेळ तसाच निघून गेला. आणि अचानक यातील एक मुलगा उठून उभा राहिला आणि पुढे चालू लागला. अजूनही त्याची आमच्याकडे पाठच होती. आता ही दुसरी दोघही उतरणार आणि निघून जाणार असं वाटू लागलं. पुन्हा एकदा बेंबीच्या देठापासून आरडाओरडा कर, हातवारे कर असे आमचे प्रयत्न सुरू झाले. आणि अचानक आमच्या प्रयत्नांना यश आलं.
तो सगळ्यात आधी उठलेला मुलगा समोर गेला आणि त्याच्या मित्रांनी त्याला मागून आवाज दिला असावा, म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांनी मागे वळून पहिल्या क्षणी माझी ओढणी दंडावर लावून मी उंचावली आणि झेंड्यासारखा हलवू लागली… त्याला ती दिसली आणि आमचे हातवारे करून एकमेकांना समजून घेणे सुरू झाले. खाणाखुणा करतच आम्हाला रस्ता सापडत नाही असं मी त्याला सांगितलं. त्यावर आधी वर चढा मग उजवीकडे वळा असा इशारा त्याने केला.
आम्ही आम्ही पुन्हा एकदा त्या रेतीचा टेकडीवर काही अंतर चढलो आणि तसंच पाय रोवत रोवत वर न जाता उजव्या हाताला वळलो. हा भाग म्हणजे दाट जाळीच्या थोडा वरचा भाग होता. इथली जाळी फार दाट नव्हती. इथून मी पुन्हा ओढणीचा झेंडा वर केला आमच्यासमोर मोठा खडक असल्यामुळे त्या तिघांना कदाचित आम्ही दिसत नसू मात्र आम्हाला ते दिसत होते. आमचा झेंडा वर झालेला पाहून त्यांनी त्या जाळी मधून आत जा अशी खूण केली. आम्ही कसं बसं वाकत अडकलेल्या वेली काढत जाळीमधून आत गेलो. इथे आल्यावर आपण कुठल्याश्या पिंज-यात आहोत की काय असं वाटत होतं. सरडे, पाली, साप आणि न जाणे कोण कोण आमच्या आथम अंतर वावरत असेल, मैया च जाणे.
इथून पुढे मात्र छोटी पाऊल वाट लागली आणि एक चढाव लागला. हा चढाव चढून वर आलो तो आम्ही रेतीच्या टेकडीच्या वर आलेलो होतो. इथून आम्हाला आजुबाजूच सगळच मोकळं आणि स्पष्ट दिसत होतं. ते तिघे आमच्याच दिशेने बघत होते. आता पुन्हा त्यांनी इशारा केला आणि उजव्या हाताला दूरवर आम्हाला छोटी छोटी घरांची छपरे दिसू लागली. ही घरं दूर होती पण आम्ही इथवर पोहोचणार होतो ते या तिघांमुळेच. अन्यथा येवढ्या दाट जाळीत वाकून आत शिरण्याची हिम्मत आमच्यात नव्हती, आणि अशी जाळी पार केल्यानंतर रस्ता असेल अशी कल्पना देखील आम्हाला आली नसती.
ते तिघे तिथे त्या तटावर उभे होते आणि मी इथे अलीकडे. मी खाली वाकून तिथल्या मातीवर डोकं टेकून त्या तिघांना नमस्कार केला. नर्मदे हर अशी मोठ्याने आरोळी ठोकली, त्यांना ऐकू जावो की न जाओ माझ्या भावना त्यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील या आशेने मी “टाटा” केला, हात हलवला आणि पुढील शेताच्या वाटेवर चालू लागले. चार-पाच चार पावलं चालल्यानंतर कृतज्ञतेने एकदा मागे वळून बघितलं तो तिघही तिथे नव्हती. रिमझिम पाऊस अजूनही सुरूच होता. पलिकडचा काठ संपूर्णपणे ओसाड दिसत होता. आता क्षणभरापूर्वी तिथे तिघं मुलं होती हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही इतकी शांतता दोन्ही तीरांवर जाणवत होती. त्या तिघांचे कपडेसुद्धा मला स्पष्ट आठवतात. एकाने जांभळ्या रंगाचा शर्ट घातला होता दुसऱ्याने पिवळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता आणि तिसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता. पुन्हा एकदा मैया ने तिच्या आमच्यासोबत असण्याची प्रचिती दिली होती.
छोटी धुआधार चा हा प्रसंग डोळ्यासमोरून सरकत नाही इतका ताजा वाटतो… मी एकेक पाऊल पुढे टाकत होते आणि मन मात्र मागेच मागे जात होतं. बरमान घाट च्या मैया चे शब्द आठवले, “जब मोका मिलेगा तब नौ कन्याओको भोजन खिलाना” असं ती म्हणाली होती. नर्मदा माई चे ऋण तर फेडणे अशक्य आहे, किंबहूना तिची कृपा अशीच बरसत रहावी हेच खरं! तरीही गावात गेल्यावर नऊ कन्यांना भोजन तयार करून खाऊ घालू ही इच्छा तीव्रतेने मनात आली.
अजून गाव बरंच दूर होतं. आम्हाला गावात जायला तास-दीड तास नक्की लागणार होता. त्यानंतर आसन लावायचं, अंघोळ पूजा करायची, आणि मग भोजनाची व्यवस्था होईल. आज काही नऊ कन्यांना जेवायला घालता यायचं नाही, ते उद्या सकाळ वर सोडावे असा विचार करत करत आम्ही गावाकडे जात होतो. गाव बरंच जवळ आलं होतं आणि अचानक दहा-बारा मुलं मुली नर्मदे हर हर नर्मदे हर हर करत आमच्या जवळ आलीत…
“कहा जाओगे माताजी? किसके घर रहोगी मैया जी?” असा प्रश्न त्यातील मोठ्या म्हणजे दहा-बारा वर्षाच्या मुला मुलींनी विचारला. “आश्रम कहा है गाव में?” मी पण माहिती काढायला सुरुवात केली… तेव्हा त्यातली सगळ्यात मोठी मुलगी म्हणाली “आप हमारे घर चलो…”आम्ही तिच्या मागे मागे जाऊ लागलो. गावात गेल्यावर बघू काय करायचं ते असं ठरवलं, मात्र या मुलीकडून उद्या कन्या भोजनासाठी साठी नऊ कन्या मिळवता येतील का याचा प्रयत्न मी करू लागले. “बेटा जी मुझे कल कन्या भोज करना है नौ कन्या को खाना खिलाना है, तुम तुम्हारे दोस्तो को लेकरं आओगी?” मी तिला विचारलं… ती म्हणाली “आप हमारे ही घर चलो, हमारे घर कन्याये है उनको खाना खिला दे ना… मुझे दो बहने है, और मेरे दोनो चाच को तीन-तीन बेटिया है. हमारे घर मे हम नौ बहने और एक भाई है…..” तिचं हे बोलणं ऐकून काय आनंद झाला म्हणून सांगू! बरमान च्या त्या छोट्या मैया बद्दल बोलू? की आम्हाला शोधत येणाऱ्या या आठ बहिणीबद्दल बोलू? नऊ पैकी आठ इथे माझ्या अवतीभोवती होत्या आणि एक तीन वर्षाची असल्यामुळे आपल्या आईजवळ आपल्या घरी होती. आता मात्र आम्ही तिच्याच घरी जायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणे गुरसि ला सरपंच अली ठाकूर यांच्या घरी आम्ही गेलो आणि दुसर्या दिवशी सकाळी यथेच्छ कन्यापूजन आणि कन्या भोजन केलं. त्या नऊ कन्यांनी ही अतिशय शांततेने, आनंदाने अगदी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. यापेक्षा मोठं भाग्य ते काय? एक छोटी कन्या मैया स्वतःहून सांगून जाते की तुझ्या हातून नवदुर्गा जेवणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत, तुझ्या भाग्यात हे लिहिलेलं आहे आणि जेव्हा तुला शक्य असेल तेव्हा ते कर असं सांगितल्यानंतर लागलीच म्हणजे त्याच दिवशी या नवदुर्गा स्वतःहून मला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि माझ्याकडून त्यांची पूजा आणि भोजन करवून घेतात.
सरपंच आली ठाकूर यांच्या घरचा मुक्काम हा खूप छान होता अगदी छोटसं घर त्यात बागडणार्या या नऊ मैया जी, तीन अन्नपूर्णा जी यांच्या सान्निध्यात तो दिवस खूप छान गेला. पुढे रामपुरा आणि रोहिणी ला देखील अनुभव आलेच…तसा रमपुरा चा अनुभव आपल्या अनुभव कथनाच्या सुरुवातीला मी सांगितलेला आहे. गुरूपासून तुम्ही कुठेही पळून जाऊ शकत नाही याची आलेली प्रचितीच ती… तिथून पुढे रोहणी ला खरंतर थांबायचं नव्हतं पण अंधार होत आला होता त्यामुळे थांबावं लागलं आणि ते सुद्धा एका दिव्य पुरुषाच्या आशीर्वाद अचानक पणे मिळाला….. कसं ते सांगणारे पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६६
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला धुवाधार चा अनुभव सांगितला होता. बरमान ची छोटीशी मैया जी आणि बगुरशीला सरपंच अली ठाकूर यांच्याकडे लाभलेल्या नऊ कन्या आणि त्यांचं कन्यापूजन याही बद्दल सांगितलं होतं. आता तिथून पुढे जाऊयात. मागच्याच आठवड्यात “गुरूपासून पळून जाता येत नाही”याची प्रचिती आली असंही मी सांगितलं होतं. तिथून आता पुढे सांगते.
खरंतर सरपंच अली ठाकुर कडून पुढे निघालो त्याला उशीरच झाला होता. गुरुसी च्या थोडं पुढे आम्हाला आमच्या मागे पुढे असणारे मंदार वाळींबे, सुदिन पराडकर आणि पराडकर काका हे पुन्हा एकदा भेटलेत. वाटेत थांबत हळू हळू पुढे सरकत त्यादिवशी आम्ही फार काही पुढे जाऊ शकलो नाही. त्याला एक कारणच घडलं. मंदार आणि सुदिन दोघं तरुण मुलं. ती पुढे पुढे जायची आणि कुठेतरी वाट बघत थांबायचीत. आपल्यामुळे इतरांना उशीर होऊ नये म्हणून पराडकर काका आपल्या चालीने हळूहळू पुढे सरकायचेत. या गुरसी जवळ गंमत झाली बरं का.
तीन-साडेतीन ची वेळ. मंदार आणि सुदिन पुढे होते पराडकर काका आपल्या चाली ने निघाले होते मी आणि बाबा मागे होतो. तेवढ्यात मंदार आणि सुदिन समोरून मागे आम्हाला शोधत शोधत येताना दिसले. “काय रे असे उलटे का येत आहात? आम्ही विचारलं तेव्हा म्हणाले काका कुठे दिसत नाही, काका हरवले, आता त्यांना शोधतोय!” अरे बापरे कुठे गेले असतील काका? शिवाय काका जवळ फोन सुद्धा नव्हता. आता त्यांना शोधल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. डोक्याला साईबाबां सारखा पांढरा रुमाल बांधून कुर्ता आणि लुंगी घातलेले, हातात काठी आणि पाठीला बॅग लावलेले असे परिक्रमावासी कुठे दिसतात का? असा शोध घ्यायला आम्ही सुरुवात केली. मागच्या चौकातून उजवीकडे गेले का, डावीकडे गेले का, रस्ता चुकले का, असा सगळे जण शोध घेत होते… आम्ही सगळेच खरोखर गांगरलो होतो. शेवटी ठरलं आम्ही चौकाच्या पलीकडला भाग बघायचा आणि सुदिन नी चौकाच्या मागचा भाग बघायचा मंदारने पुढे जायचं, ते पुढे गेले का आहेत का ते शोधायचं आणि तिथून सगळ्यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क ठेवायचा. सुदिन तर फारच बावरला होता, झपाझप पावले टाकत मागे पाच-सात किलोमीटर पर्यंत गेला, तिकडे दुसऱ्या दिशेला मंदार देखील दोन-तीन किलोमीटर पुढे गेलाच. आम्हीदेखील तिथल्या आसपासच्या भागात काका कुठे विश्रांती घेत बसले तर नाहीत हे शोधू लागलो.
शेवटी बराच वेळाने काका सापडले. सुदिन चा फोन आला. आम्हाला वाटलं तसंच झालं होतं, काका मागच्या चौकातून डावीकडे वळले होते आणि रस्ता चुकले होते.सुदिन काकांना घेऊन आला मंदार सुद्धा आला आणि आम्ही सुद्धा जिथून निघालो होतो तिथे परत आलो. सगळेच घाबरले ही होते आणि थकलेले ही होते. आता पुढे जाण्याची हिंमत नव्हती म्हणून तिथेच थांबायचा निर्णय घेतला. इथे कुठे व्यवस्था आहे ते शोधू लागलो तो गावात आश्रम असा नाही, राहायचं कुठे तर लोकांनी एक जुनं शिवमंदिर दाखवलं.
मंदिर फारच जुनं होतं. तीन पायऱ्या चढून आत मध्ये एक शिवाची पिंड होती आणि एक यज्ञकुंड होतं. दोन-तीन छोट्या छोट्या मुर्ती होत्या मात्र या मंदिरात नियमितपणे पूजाअर्चा होत नसावी हे स्पष्ट जाणवत होतं. गावातल्या लोकांनी तिथे बल्ब लावून लाईटची व्यवस्था केली खरी पण लाईट लावल्यावर लक्षात आलं की इथे बरीच जाळी जळमटी झाली होती. उंदीर आदि प्राणी इथे येऊन जाऊन असतात हे समजलं, त्यांची विष्ठा पडलेली दिसत होती. मग कुठून तरी झाडू फडे जमा करून त्या मंदिराची साफसफाई केली,आसनं लावली आणि आता भोजन प्रसादी ची व्यवस्था म्हणून समोरच्या दुकानात विचारलं. तशी काही व्यवस्था गावात नसल्याचं समजलं शेवटी जवळ असलेले मुरमुरे फुटाणे इत्यादी घेऊन त्यावरच आज गुजारा करायचा असं ठरवलं. पण पुन्हा तेच आपण ठरवतो तसं काहीच होत नसतं.
मंदिराच्या समोर असलेल्या एका घरातून हातपाय तोंड धुवायला आणि प्यायला पाणी आणलं होतं. त्यांच्याच घरी प्रातर्विधीसाठी व्यवस्था झाली, कारण असं की आम्ही भर गावात होतो, येथून बाहेर दिशेला जाण्यासाठी सुद्धा दोन-तीन किलोमीटर चालून जावं लागणार होतं. त्यामुळे ही व्यवस्था गावातच कोणातरी कडे होणं आवश्यक होतं. ती झाली. आणि आम्ही प्रत्येकजण दोन-तीनदा पाणी आणायला गेल्यामुळे त्या घरच्या मंडळीशी थोडी थोडी ओळख झाली. रात्री त्यांनी आम्हाला खिचडीची भोजन प्रसादी आणून दिली. चला म्हणजे थोड्यावेळापूर्वी काकांना शोधणारी आम्ही सर्वजण आता जेऊन खाऊन निवांतपणे आराम करत बसलो होतो. काका सापडले आता काही नसलं तरी चालेल हाच आमच्या सगळ्यांच्या मनात काका हरवले त्यावेळी विचार येत होता. काका काय विचार करत होते हे मात्र आजतागायत समजलेलं नाही!
असो तर सांगायचा मुद्दा असा की मी आणि बाबा सरपंच अली ठाकूर यांच्या घरून उशिराच निघालेलो, आणि आता पुन्हा गुरुसीच्या थोडसं पुढे मुक्काम केला. आज दिवसभरात आमचं काही चालून झालं नव्हतं त्यामुळे आता आम्हाला पुढे जायचं होतं.... काका, सुदीन आणि मंदार आमच्यापुढे निघाले होते आणि मी आणि बाबा मागे होतो. इथून सातच किलोमीटरवर रमपुरा नावाचं गाव आलं. तिथे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी दिसले की त्यांना बॅग घेऊन सरळ आत मध्ये घेऊन जातात आणि मुक्कामच करावा लागतो असं आम्ही ऐकून होतो. आता माझी थांबण्याची तयारी नक्कीच नव्हती.सुदिन आणि मंदार ला आश्रम धार यांनी थांबवून घेतलं होतं आणि मंदार चा मला सतत फोन येत होता. “ताई तुला इथे थांबावच लागणार आहे” आणि मी देखील तितक्याच जिद्दीने मी इथे थांबणार नाही असं म्हणणार ला वारंवार सांगत होते. मी विचार करत होते, मी न आश्रमाच्या समोरून जाणारच नाही, मी नं मागून शेतातून निघून जाईन, दुसरा कुठला रस्ता असेल तर तो शोधेन पण मी कुठल्याही परिस्थितीत आज रात्री तिथे थांबणार नाही, मी पुढे जाणार…. ही कसली आणि काय जिद्द होती ते काही माहित नाही पण त्यावेळेला मी हट्टालाच पेटले होते. आणि अशातच गुरूपासून पळून जाता येऊ शकत नाही ही प्रचिती मला आली. मंदारचा पुन्हा फोन आला.यावेळी त्याचा आवाज गंभीर होता आणि तो मला सांगत होता ताई तू इथून पळून जाऊ शकत नाहीस,आता मी तुला जे सांगणार आहे ते सांगितल्यानंतर तुला इथे यावच लागेल…. तो पुढे म्हणाला आज गुरुवार आहे म्हणून इथे तुझे गुरु नाना महाराज तराणेकर यांची पूजा आणि त्यानंतर त्रिपदी करणार आहेत. हा आश्रम नाना भक्तांनी स्थापन केलेला आश्रम आहे त्यामुळे तुला इथे येण्या व्यतिरिक्त काहीही पर्याय नाही. त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता मी कुठेही पळून जाऊ शकत नाही याची मला खात्री पटली होती. त्याला कारणही तसंच होतं तिथे गेल्यानंतर मला लेले काकांनी विषयी महत्त्वाची बातमी समजायची होती. लेले काका आठवतात न? परिक्रमेच्या पहिल्या दिवशी ऐंशी वर्षाचे आजोबा मला भेटले होते ते लेले काका…मला म्हणाले होते मी कोण हे तुला तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्याच्या जवळ असेल त्यावेळेला तुझे लोक आणि नर्मदामैय्या सांगेन! आठवतंय का? हा अनुभव मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे. तर हे लेले काका साक्षात शंकर महाराज आहेत याचा उलगडा मला जिथे झाला तेच हे ठिकाण रमपुरा. लेले काकांचा अनुभव आधी सांगितलेला आहे म्हणून तो आता पुन्हा लिहीत नाही…. मात्र गुरु पासून आपण कुठेही पडूच शकत नाही याची आलेली प्रचिती तेवढी सांगितली.
रमपुरा हून पुढे निघालो तेव्हादेखील काका सुदिन आणि मंदार थोडे पुढे होते तर आम्ही थोडं मागे होतो. इथून आम्ही मैया किनाऱ्याचा रस्ता पकडला होता. रामपूरा, केरपानी, डोंगरगाव धूम गड आणि हिरापूर असा हा रस्ता. आज हिरापूर ला थांबावं असं ठरवलं. हे अंतर तसे फारच कमी होतं मात्र नदी किनाऱ्याचा रस्ता हा जरा कठीणच जातो. आम्ही हिरापूर पर्यंत पोचू शकत नव्हतो. जिथे पाच-साडेपाच होतील तिथे थांबायचं असा अलिखित नियम होता.
रोहणी नावाचं गाव होतं. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. नदी किनारा खाली आणि गाव थोडं उंचावर त्यामुळे चढून जायला आम्हाला वेळ लागणारच होता. गावात गेल्यावर आसनं लावण्याची व्यवस्था बघायची. आम्ही गावात गेलो. इथेदेखील आश्रम म्हणून विशेष अशी काही व्यवस्था नव्हती. गुरसी सारखंच एखादं मंदिर असेल तिथे राहू असा विचार केला, पण या गावात एकही मंदिर नाही, या गावात शाळा देखील नाही,मग आता कुणाच्यातरी घराच्या बाहेर आसन लावायचं म्हणून आम्ही लोकांना विचारू लागलो. इथे परिक्रमावासी बद्दल थोडी उदासीनता जाणवली कोणीही पटकन तयार होईना. आणि आम्हाला आग्रह करून विचारणं बरं वाटेना. अगदी पाणीसुद्धा न देता लोक हापशी कडे बोट दाखवत होती. आम्ही गावातून फेरफटका मारून एखादं झाड, एखादा कडप्पा, एखादा ओटा असं काही दिसतं का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तसा आमच्या मागून पांढरी वस्त्र धारण केलेला एक परिक्रमावासी येताना दिसला. आता आम्ही तिघे जण निवारा शोधू लागलो. सोबत आलेला हा परिक्रमावासी आम्हाला आधी कुठेही भेटला नव्हता. मात्र तो सोबत आहे हा आधारच वाटला. करता करता आम्हाला एक बंद घर सापडलं. त्या घराच्या बाहेर एक रिकामी पडवी दिसली. त्या पडवीच्या खाली पाचोळ्याचा प्रचंड ढीग होता.आम्ही तिघांनीही एकमताने तिथेच आसन लावायचं ठरवलं. आम्ही आमची पूजाअर्चा केली तोवर हा परिक्रमावासी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. त्याचं ध्यान झाल्यावर मग आमचं थोडाफार बोलणं सुरू झालं.”मै बेरागी हु श्रीरामजी का हनुमानजी का भक्त हू” असं त्यांनी सांगितलं… मग म्हणाला भोजन प्रसादी के लिये तुम्हारे पास कुछ है क्या? माझ्याजवळ दोन पेरू होते, वाटेत कोणीतरी दिले होते. ते पेरू काढून मी समोर ठेवलेआणि म्हणाले “इतना है बाबाजी इसी से काम चला लेंगे”. ते बाबाजी जरा नाराजच झाले, म्हणाले आज तो मक्के की रोटी और तुअर की सब्जी खाने का मन हो रहा है… पण या गावातली उदासीनता पाहता असं होईल असं काही शक्य नव्हतं. हापशी वरची गर्दी कमी झाली होती आणि म्हणून पडवी समोरच असलेल्या हापशी वर मी माझे कपडे धुवायला घेतले. बाबा देखील मला मदत करू लागला आणि हे बाबाजी फेरफटका मारायला निघाले. पाचच मिनिटात परत आले आणि म्हणाले “चलो मक्के की रोटी खिलाता हू”… कपडे वाळत टाकून आम्ही त्याच्यापाठोपाठ जाऊ लागलो. गावाच्या अगदी टोकाला एका शेताच्या मध्यभागी एक घर होतं तिथे ते बाबाजी आम्हाला घेऊन गेले. त्यांनी बाहेरूनच आवाज दिला. “नर्मदे हर माताजी मेहमानो को भोजन दिया हो तो परिक्रमावासी यो को भी खीलादो.….”लगबगीने आतून एक माताजी बाहेर आल्या आणि आग्रहानी त्यांनी आम्हाला पानावर बसवलं. झणझणीत आंब्याचं लोणचं, गरम मक्याच्या भाकरी आणि तुरीच्या दाण्यांची उसळ असं जेवण पानात वाढलेलं बघताच आम्ही दोघही आश्चर्याने या बाबाजींनी कडे बघू लागलो. ते म्हणाले देखो मत भोजन पाओ नर्मदामैया ने इच्छा पुरी कर दी है…. अशावेळी प्रश्न पडू द्यायचे नसतात हे आतापर्यंत समजलं होतं. अशावेळी लुटायचा असतो तो फक्त तिच्या कृपेचा आनंद, पोटभर जेवून आणि मनभर आनंद लुटून आम्ही परत आपल्या पडवीत परतलो. बाबाजी पुन्हा ध्यान लावून बसले आणि आम्ही निद्राधीन झालो. मध्यरात्री एक-दोनदा झोप उघडली असता बाबाजी ध्यानातच बसलेले पाहिले होते, मात्र अगदीच पहाटे “नर्मदे हर मै आगे चलता हू” असा आवाज देऊन आम्ही उठायच्या आधीच ते बाबाजी पुढे निघून गेलेत…. कालची भोजन प्रसादी आणि आसन लावण्याची व्यवस्था बाबाजींच्या रूपात आलेल्या नर्मदा माई ने केली होती इतकं समजण्याइतके अनुभव आतापर्यंत तिने दिले आहेतच की.
रोहनी हून पुढे निघालो ते खरं मालकछारला जायचं होतं पण झासी घाटला पाऊस सुरू झाला आणि थांबावं लागलं. इथला आश्रम छानच होता मात्र तिथे बरेच नियम होतेत. आणि या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यावर चहापाणी झाल्यावर ह्या श्रमाबद्दल एक वेगळीच वार्ता समजली. अंगावर काटा आला आणि ती रात्र अतिशय कठीण गेली.. कसे ते सांगणारे पण पुढच्या भागात नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला रोहनी चा अनुभव सांगितला. काहीही सोय नसताना आम्हाला आसन लावायला पडवी मिळाली होती. शिवाय जेवणाची व्यवस्था होईल की नाही असं वाटत असताना एक बैरागी बाबा आम्हाला जेवायला घेऊन गेले आणि दाल बाटी चं जेवण मिळालं. दुस-या दिवशी ते बाबा निघून गेलेत…
आम्ही निघण्याच्या तयारीत असताना कालच्या माताजी हापशीवर आल्या. आम्ही तयारी करतोय बघून म्हणाल्या “रोटी आचार बांध के भेजती हू, खा लेना”.. आम्हाला लोणचं आणि मक्याची भाकरी असं सकाळ चं जेवण पण मिळालं. आता आम्हाला पुढे निघायचं होतं. आज झालोन पर्यंत जाऊ असं वाटलं होतं पण नदी किना-यावर चालताना पायाला वेग येत नाही. कुंडा नावाच्या गावी व्यवस्था झाली. तो दिवस ही छानच झाला, मात्र पुढे झांसी घाट ला जो अनुभव आला तो सांगते.
आम्ही साधारण ३-३.३० च्या सुमारास झांसी घाट ला पोचलो. इथे एक आश्रम दिसला. इथे चहा घेऊ, थोडा आराम करू आणि पुढच्या प्रवासाला निघू असं वाटून आत गेलो. चहा झाला. आणि अचानक पाउस सुरु झाला. आता आम्ही पुढे जाऊ शकणार नव्हतो. मग तिथेच थांबायचं ठरवलं. या आश्रमात अनेक कातेलोर नियम होते जे पालनं जरा कठीण च होतं. साधू बाबांनी भोजन प्रसादीची तयारी केली. तेवढ्यात एक कार आश्रमापुढे येऊन उभी राहिली. हा आश्रम ज्यांनी बांधला तो हा माणूस. नर्मदे हर झालं आणि गप्पा सुरु झाल्या. बोलण्या बोलण्यात जी माहिती मिळाली आणि ज्या प्रमाणे मिळाली ते ऐकल्यावर “कुठून इथे आलो” असं वाटू लागलं.
तो म्हणाला “मै बहोत पैसे वाला आदमी हू.. मेरा बहोत राज चालता है गाव मे. मुझे किसी भी चीज के लिये “नही” कोई बोल नही सकता. सब डरते है मुझसे. मै आदमी बुरा नही हू लेकीन सनकी हू.. अभी अभी जेल से छुट कर आया हू, बेल पर हू… “ त्याचं हे बोलण ऐकून आता हा गेला लवकर तर बरं होईल असं वाटत होतं.. तो ही म्हणाला मी जातो, पण आज रात्री इथेच येतो म्हणाला…. आणि तो दारू प्यायलेला आहे हे समजत होतं. या आश्रमातील नियम ही खूप वेगळे होते. साधं बाथरुमला गेलं तरी आंघोळ करायची, सगळ्या वेळा पाळायच्या. तसं नियम पाळायाला हरकत नव्हती पण तरीही बाबाला इथे रहायचं नव्हतच.
तो माणूस गेला खरा, आणि बाबा नी ठरवलं, आज इथे राहायचं नाही… आश्रमात कुणी बाई माणूस नाही, हा असा माणूस येतो म्हणतोय, पाउस येतोय, अशा परीस्थितीत जायचं तरी कुठे?
पण इथे राहायचं नाही असा हट्ट च धरला बाबाने. मग काय निघालो… मागे वस्तीत गेलो. लोक सांगायचे आश्रमात जा.. शेवटी बाबाने सांगितलच, तिथे बाई माणूस नाही, म्हणून तिथे राहत नाहीये, एका बाईनी तिच्या घरा बाजूच्या एका खोलीत आश्रय दिला… मात्र इथून पुढेही गम्मतच झाली.
रात्री च्या आत आम्ही जाऊन पोचलो. चहा झाला, पूजा पाठ झाले. स्वयंपाक घरातून खमंग वास येऊ लागलेत. आता भोजन प्रसादी करू, सकाळी लवकर उठून इथून लवकर निघून जाऊ असा विचार केला, आणि भोजन प्रसादीची वाट पाहू लागलो मात्र बराच वेळ झाला तरी भोजन प्रसादी काही येईना. मग वाटलं चहा मागावा आणि चहा पिऊन झोपावं, म्हणून त्या बाई ना आवाज दिला..
त्या म्हणाल्या “ भोजन प्रसादी नही करोगे? आम्ही म्हणालो, भूक तो लागी है, त्यावर त्या म्हणतात, मैने तो बनाया ही नही.. मग आम्ही म्हणालो, कोई बात नाही, चाय भी चलेगी, तर म्हणे, अभी भोजन के समय पर चाय क्यू पी रहे हो… तिला नक्की काय म्हणायच होतं समजेना, म्हणजे ती भोजन देणार होती, की चहा देणार होती, की काही देणार नव्हती, माहित नाही.. “आपको तकलीफ ना हो, बाकी हमे कुछ भी चलेगा” असं सांगितलं, आणि आजचं जेवण मैयावर सोडलं. थोड्या वेळाने तिनी साखर आणि २ पोळ्या आणून दिल्या.
भोजन प्रसादी झाली, आता झोपी जायचं. झोपण्या पूर्वी फ्रेश व्हायचं म्हणून बाहेर जायला निघाले तर या मैया जीं नी दार बहरून लावलेलं. नर्मदे नर्मदे हर आवाज देऊन झाला तरी कुणी काही येईना.. शेवटी रात्र तशीच गेली.. म्हणजे बघा, आश्रमात रात्री जायला लागलं असतं तर आंघोळ करावी लागली असती, आणि इथे जाताच येईना.. दार बाहेरून बंद…सकाळी मैया नी उशिरा दार उघडलं तेव्हा बाहेर पडलो. पण त्यांनी दार का लावलं हे समजलं नाही…. असो…
जबलपूर ग्वारी घाट ला संस्कृत पाठशाळेत थांबलो होतो. तिथे एक म्हातारे आजी आजोबा पण थांबले होते. ते परिक्रमेत नव्हते पण कार नी भ्रमणाला आले होते. त्या आजी खूप शांत दिसत होत्या आणि आजोबा जरा बोलके होते. आमच्या थोड्या फार गप्पा झाल्या तेव्हा समजलं की आजोबा मोठे सायंटीस्ट म्हणून सेवा निवृत्त झाले. त्यांनी ए पि जे अब्दुल कलामांबरोबर काम केलं होतं. आजोबा अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आणि तितकाच साधेपण त्यांच्या अंगी होतं. गप्पा करताना आजोबा मध्येच थांबायचे.. त्यांना काही बोलायचं आहे असं वाटलं आणि पुन्हा शांत झाले. मी विचारलं, दादाजी कुछ बोलना है आपको… तर म्हणाले “तुम्हारे आसपास के लोग, जगह, वस्तू, सब तुमसे बाते करते है, तुमको सुनाई भी देता है, तुम समझती क्यू नही हो? मला काही समजे ना… क्या हुआ दादाजी, क्या नही समझ पा रही हू मै… मी विचारलं… तेव्हा ते जे बोलले तसं च्या तसं तुम्हाला सांगते..
ते म्हणाले, दो तरीके होते है समझने के लिये… एक बंद आंखोसे, एक खुली आंखोसे.. जब तुम्हारी आंखे खुली है तब तुम्हे छोटी छोटी चीझो को देखना होगा..गीलहरी क्या कहती है, पत्ते क्या कहते है, हवा क्या कहती है..ध्यान देगी तो पता चलेगा. अगर तुम सवाल करोगी तो जवाब भी मिलेगा, तुम्हे समझाना होगा…कर के देखो, सवाल करो, सवाल करो इस बिल्ली के बच्चे से, कुछ भी, असं म्हणत त्या आजोबांनी एका मांजराच्या पिल्लाकडे पाहिलं… मी मनात येईल तो प्रश्न विचारला, मी म्हणाले, “काय रे बाबा, तुला विचारलं तर सांगशील का तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर?” ते पिलू दोन चार मिनिटात उठलं आणि माझ्या पायाशी घुटमळू लागलं…दादाजी म्हणाले, “देखा, तुम्हारी जान न पेहचान, लेकीन फिर भी ये तुमसे लगाव जाता रहा है.. तो इसके पास तुम्हारे लिये कुछ तो है…हम बस पढ नाही पाते..खरच असच असतं, आपल्या ला हवी असलेली उत्तरं बरेचदा आपल्या अवती भवतीच असतात, माध्यम मिळत नसतं इतकंच.. मी हा उपाय करून बघण्याचं ठरवलं आणि लागलीच याची प्रचीती आली सुद्धा…आणि मग मला कांदरोज चा माझा अनुभव आठवला, हनुमान चालीसा म्हणताना कसं आजूबाजूचं सगळं हनुमान चालीसा म्हणतय असं वाटलं होतं मला! ह्या उपायाने एक होतं नक्की, आपला आपल्यावरचा विश्वास फार धृड होतो, कारण आपल्या सोबत अक्ख्ख विश्व उभं आहे याची जाणीव होते. आजोबांची ही शिकवण लक्षात ठेवण्यासारखी आणि अंमलात आणण्यासार्खीच आहे.
पुढे निवास मार्गे जावं का मंडला मार्गे हा एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. इथे अनेक लोक अनेक मतं देतात. मार्ग दोन्ही आहेत, पण आम्ही निवास मार्ग धरला. मंडला मार्ग कठीण आहे असं म्हणतात, बाबाचा दुखरा पाय बघता आम्ही निवास चा मार्ग घेतला पण शक्य असल्यास मंडला मार्ग घ्यावा. कारण असं की इथे घनदाट अरण्य आणि निर्मनुष्य वनं आहेत, त्यामुळे अनेक योगी तपस्वी इथे तप करत असतात, पण आम्हाला हे कुणी सांगितलं नाही. ते आमच्या नंतर लक्षात आलं.असो.
निवास मार्गे जाताना मध्ये मणेरी नावाचं गाव लागतं. इथे एका शिव मंदिरात मुक्काम केला. इथे एक छोट मंदिर आहे. सोबत ग्राम देवतेचं मंदिर आहे. ही ग्राम देवता अतिशय जागृत आहे असं म्हणतात. इथे नवस बोललेला फळतो असं म्हणतात. याच मंदीराच्या नवसाने झालेला एक मुलगा आणि त्याची आई आम्हला भेटले. त्याच्या आईनी सांगितलं की त्यांच्या लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला, आणि त्या वेळी कुणीतरी एक साधू म्हणाला होता की ग्रामदेवतेला नवस घालायचा आणि परिक्रमा वासियांना जेवायला घालायचं, तेव्हापासून हा परिवार सेवेला हजर असतो.
आता या बाळाची गोष्ट सांगते. हा बाला साधारण एक वर्षाचा. त्याची आई स्वयंपाक करत होती आणि बाळाला मी घेतलं होतं. मी त्याच्याशी खेळत होते. तो ही आनंदाने तास दीड तास माझ्या बरोबर खेळला. मग माझ्याच हाताने जेवला देखील. आता भोजन प्रसादी करून आम्ही निघणार होतो. हे पिल्लू मला सोडायला तयारच नाही. आपल्या आईजवळ सुद्धा तो जायला तयार नव्हता. मग थोडं अंतर त्याला घेऊन गेले, वाटलं आईला दूर पाहून हा रडेल, तरी नाहीच, त्याला माझ्यापासून दूर जायचं नव्हतच…खरं तर तो अगदी झोपायला आला होता, तरीही मला सोडायला तयार नव्हता. शेवटी त्याला थोपटून निजवलं आणि मग आम्ही पुढे निघालो. काही तरी नक्की देणं घेणं असलं पाहिजे त्याचं अन माझ… मागच्या जन्मीचं.
आम्ही पुढे निघालो. आजोबांचा उपाय मी अमलांत आणत होते आणि मला अनेक उत्तरं मिळतही होते. आता पुढचा मोठा टप्पा होता विक्रमपूर आणि त्या आधी करोदि. करत करत आम्ही बिझोली च्या जवळ पोचलो. आता इथून पुढे मुंडा महा अरण्य सुरु होणार होतं, त्या आधीचा हा चढाई चा भाग. घाटातला रस्ता होता. दोन्ही बाजूने द-या आणि झाडी होती.. चालताना धाप लागेल अशी चढाई होती. रस्त्यात पाणी नाही की घर नाही… जवळचं पाणी संपल होतं..भूक लागायला आली होती…अगदी १०० मीटर चालून झालं की थकायला होत होतं.. आजोबांचा उपाय आठवला आणि मी त्या आजूबाजूच्या सगळ्या झाडांना, रस्त्याला, दोम्गाराना प्रश्न विचारू लागले…. मला उत्तर मिळालं का? काय झालं? सांगते, पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मला भेटलेल्या आजी-आजोबा बद्दल सांगितलं होतं. झांसी घाट च्या आश्रमात आलेल्या त्या गुंड माणसाचा अनुभव सांगितला होता आणि ते छोटसं बाळ कसं मला सोडत नव्हतं ते सांगितलं होतं. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती ती माझ्या भवतालच्या निसर्गाकडून. आम्ही बीझोरीच्या मार्गाने जात होतो. इथून पुढे मुंडा महाअरण्य सुरू होणार होतं. म्हणायला रस्ता मार्ग होता. अधूनमधून गाड्याही येजा करत होत्या, मात्र चढाव इतका जास्त होता की त्या गाड्या घसरून खाली येतील की काय असं त्यांच्याकडे पाहून वाटत होतं. अख्खा डोंगर चढून जाणं होतं. रस्त्याने असला तरी चढाव तो चढाव. इथं कुठे दुकान नव्हतं, घर नव्हतं, की काही व्यवस्था नव्हती. दोन्ही बाजूला जंगल. सारखी तहान लागायची. पाणी संपलं होतं, उगाच घोटभर बाटलीत पडू देऊ म्हणून काय ते शिल्लक होतं. आम्हाला भूकही लागली होती. कधी एकदा हा चढाव पार करुन पहिलं जे काय गाव येईल त्या गावातच मुक्काम करायचा असाच विचार आम्ही करत होतो. मला आजोबांचे शब्द आठवत होते. “पुछो सवाल”, त्यांनी मला प्रश्न विचारायला लावले होते आणि मला प्रश्नांची उत्तरं मिळाली देखील होती. मग मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. डोंगराला प्रश्न विचारला, रस्त्याला प्रश्न विचारला, येणा-या जाणार्या गाड्यांना प्रश्न विचारला, म्हंटलं, भूक लागलीये मला, तहान लागली रे मला, होणारे का सोय काही? निदान थोडावेळ आराम करायची इच्छा आहे, मिळेल का काही जागा? हा प्रश्न सातत्याने तीन-चार वेळा विचारल्यानंतर मला या सगळ्यांमध्ये थोडासा सकारात्मक फरक जाणवला. रस्त्याचा चढ किंचित कमी झाला, डोंगरमाथा जवळ येतोय असं वाटलं, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या धीर देऊ लागल्या, आजूबाजुच्या झाडांना सळसळवून सुखद वाऱ्याच्या झुळका आजूबाजूने वावरू लागल्या, थकवा कमी झाल्याचे जाणवू लागले, आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटांनंतर रस्त्यावर बरीच गर्दी दिसायला लागली. आतापर्यंत गेलेल्या अनेक गाड्या तिथे थांबलेल्या दिसल्या. काय झालं बाबा इथे? असा विचार करत आम्ही त्या गर्दी पर्यंत पोचलो. “परिक्रमावासी आगये, परिक्रमावासी आगये” असे म्हणत आठ-दहा लोकांनी आमच्या भोवती गराडा घातला. आम्हाला बसायला सतरंजी अंथरली. त्यातल्या दोघांनी दोन ताटल्या मध्ये गरमागरम, भरपूर तूप घातलेले मुगाची खिचडी, खीर आणि पाण्याने भरलेले मोठाले पेले आमच्या समोर ठेवले. इथे एक छोटसं देवीचं मंदिर आहे. इतकं छोट की ते गर्दीमुळे आम्हाला दिसेना. मंदिरात वाकून जावं लागतं. इथं कोणी पुजारी नाही की कुणी देखभाल करणारा नाही. मंदिराला दोन दारं, एक समोरच, एक मागचं. दारांना पल्ले नाहीच…उघडीच ती… आत देवीची मूर्ती.. लहानशी.. कुणी भक्तांनी या देवीचा भंडारा घातला होता. इथे रोजची पूजा देखील होत नाही. गावापासून अत्यंत लांब असल्याने फारशी कुणाची येजा ही नाही. वर्षा-दोन वर्षांतून एखाद वेळेस कोणी तरी भक्त असा भंडारा घालतो, अन आमच्या सारखे परिक्रमावासी तिथून तृप्त होऊन जातात… मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा मिळालं होतं. नर्मदे हर म्हणायची देखील गरज पडली नव्हती. काही बोलायलाच नको होतं. फक्त प्रामाणिक पणे मनातल्या मनात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझे नर्मदामाई या निसर्गाच्या कर्वे मला देतही होती आणि माझ्या इच्छा पूर्ण ही करत होती.
गरमागरम खिचडी चहा झाल्यानंतर आम्ही तिथे थोडा काळ विसावलो. खरंतर आज इथेच थांबावं असं वाटत होतं. पण इतक्या छोट्या मंदिरात राहता येणं शक्य नव्हतं आणि अजून जेमतेम दुपारचे दोन अडीच झाले होते. तास दोन तास सहज चालू शकणार होतो, म्हणून पुढे जायचं ठरवलं. पुढचा चढ-उतार बरंच अंतर पर्यंत सूरु होता. मध्ये काही गावं लागली देखील. पण आता थकवा नाहीसा झाल्यामुळे आम्ही पुढे चालत राहिलो.
आता सपाट रस्ता आला होता मात्र या सपाट पणा बरोबर आजूबाजूचा निसर्ग भकास झाला होता. दोन्ही बाजूला सपाट मैदान आणि मधून जाणारा कच्चा पण मोठा रस्ता. रखरख ऊन. नजर जाईल तिथपर्यंत नुसतं सपाट मैदान. इथे एक गंमत झाली बरं का. आमच्या मागून एक मोठी कार आली. गाड्या आल्या की लोक परिक्रमावासी ना काहीतरी दान करतात. त्यांनी आम्हाला थांबवलं, आम्ही थांबलो. त्यातून एक बडी असामी माणूस आणि त्याची नव्वदीच्या घरातली आई खाली उतरले. नर्मदे हर झालं. थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. हा माणूस या क्षेत्राच्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. भरपूर जमिनीचा मालक आणि कपड्याचा व्यवसायी. कशाची म्हणून कमी नाही. या काकांनी आम्हाला भरपूर बिस्किट, चिवडा आणि इतर खाऊ दिला. मात्र निघताना गंमतच झाली. ह्या आजी माझ्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, तुम्ही डोक्याला बांधलेला रुमाल मला द्या. “मै तुमको दुसरा रुमाल दिलाती हू, लेकिन ये रुमाल मुझे चाहिये. हमारा कपडो का व्यवसाय है तुम्हारे लिये नये कपडे जाती हू लेकिन मुझे रुमाल चाहिए…” आज पर्यंत आमच्याकडं कधीही कोणी काही मागितलं नव्हतं, फक्त सगळं दिलं होतं. मी डोक्यावरचा रुमाल काढला आणि आजींच्या हातावर ठेवला. त्यानंतर त्या आजींनी जे केलं ते पाहून माझे डोळे भरून आले. माझ्या डोक्यावरचा बांधलेल्या रुमाल त्या आजींनी स्वतःच्या डोळ्याला लावला छातीशी कवटाळला आणि तो रुमाल त्या काकांच्या डोक्याला बांधला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी त्यांचा एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाल्या, “अपने बेटे से ज्यादा एक मा को और क्या चाहिये? आप परिक्रमा मे हो, इसलिये मेरा रोना तुम्हारे सामने नही रोऊंगी, तुम्हारा ये रुमाल मेरे बच्चे के सर पर सुरक्षा छाया जैसा रहे यही प्रार्थना मेरे लिये करना…” त्या काकांना काय त्रास होता ते मी देखील विचारलं नाही. आजींनी मला मिठी मारली आणि त्या मिठीत असताना मनातल्या मनात नर्मदा माईला प्रार्थना केली “माऊली ह्या आईची इच्छा पूर्ण होवो….”
त्या आजी आणि काकांना निरोप दिला आणि आम्ही हळूहळू पुढे निघालो. मध्ये एक दोन गाव लागलेत पण गावांमध्ये आश्रम नव्हता आणि राहता येईल असं घर ही दिसत नव्हतं. घर बरीच लहान होतीत आणि परिक्रमावासी ना आपल्या घरी बोलण्याची फारशी इच्छा कोणाची दिसत नव्हती म्हणून आम्ही पुढे पुढे चालत राहिलो. आता संध्याकाळ होत आली होती आणि कुठेतरी निवारा शोधण गरजेचं होतं. दूर एक सुंदर बंगला दिसत होता. कदाचित या गावातलं सगळ्यात मोठं घर असावं. गावाचं नाव बिझौरी. त्या घराकडे पाहून वाटलं ह्या घरची माणसं मालमत्ते दार दिसतात. इथे अंगणात जरी राहायला मिळालं तरी हरकत नाही. बघुया पुढे काय होतंय ते असा विचार करत करत पुढे निघालो. वाटेत सायकल चालवणारी लहान मुलं दिसली. त्यातला एक मुलगा, साधारण सात आठ वर्षाचा. त्याने थांबून आम्हाला नर्मदे हर केलं आणि म्हणाला “आगे एक आटाचक्की है, परिक्रमावासी की व्यवस्था होती है.” वा कुठे का होईना आमची आजची व्यवस्था होणार होती. आम्ही त्या मुलाला विचारलं “कहा है चक्की, तर म्हणाला व सुंदर सा बडा बंगला दिख रहा है उसके बाजू में आ जाओ आप”. आम्ही ज्या बंगल्याकडे बघत होतो त्याच्याच बाजूला चक्की होती. चला सोय झाली म्हणायची! आम्ही हळूहळू त्या घरापर्यंत पोहोचलो. चक्की कुठे विचारलं आणि राहण्याची व्यवस्था होईल का ते विचारलं. त्या बंगल्यात न एक म्हातारे आजोबा बाहेर आले आणि म्हणाले ” ये चक्की भी मेरी है, बंगला भी मेरा है. चक्की मे क्यू रहोगे? हमारे घर उपर के मंजिल मे परिक्रमावासी की व्यवस्था की है. आप हमारे घर मे रहोगे. किसने बताया आपको हमारे बारे मे?” आम्ही त्या आठ वर्षाच्या मुलाचा वर्णन केलं तसं त्या आजोबांनी त्या मुलाला आवाज दिला “अमन बहार आओ..” अमन हा त्या आजोबांचा पणतु. पण आमच्या घरी या असं काही तो बोलला नाही, या घरात सोय होते किंबहुना चक्की मध्ये सोय होते असं त्यांनी आम्हाला का सांगितलं ते तोच जाणे. एक मात्र नक्की या क्षणाला मनात विचार आला की या मोठ्या घरात सोय झाली तर आपलं ओझं कुणावर येणार नाही त्या क्षणाला अमन नी आम्हाला थांबवलं आणि त्या बंगल्याची वाट दाखवली. तिथेच आमची भेट भूपेन शी झाली. भूपेन हा या आजोबांचा नातू. त्याची आई, त्याची काकी… त्यांच्यातलीच एक मी होऊन गेले थोड्याच वेळात! मग स्वयंपाक घरात बसून स्वयंपाक करता करता गप्पा झाल्या. हे म्हातारे आजोबा आमचं जेवण होईपर्यंत थांबून होते. फाइव स्टार सोय इथल्या छोट्याशा गावात झाली होती. हो आंघोळीला वॉटर हीटर पासून तर थंडी वाजू नये म्हणून रुम हिटर पर्यंत व्यवस्था इथे होती.
दुसऱ्या दिवशी तिथून पुढे निघालो. वाटेतल्या अन्नपूर्णा मंदिरात अन्नपूर्णेचा प्रसाद घेऊन निघालो. तिथेही एक गंमत झाली. तिथल्या प्रसादी ची वेळ दुपारी एक वाजता ची मात्र आम्ही सकाळी सात वाजताच निघालो असताना मंदिरातून एका गृहस्थाने आवाज दिला. चाय नाश्ता तो करलो. दर्शनाला जायचं होतं त्यामुळे मंदिरात गेलो. हे मंदिर पुरातन मंदिर आहे गणपती मंदिर, देवी मंदिर, राम मंदिर अशी काही मंदिर येथे आहेत. ते दर्शन घेऊन मंदिरातल्या देखभाल करणाऱ्या बाई कडे गेलो तो त्यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. कुणालातरी उपास होता म्हणून खिचडी बनवली आणि तो प्रसाद आम्हाला ही मिळाला अगदी पोटभर.
तिथून पुढे करोंदी मार्गे विक्रमपूर कडे जायला लागलो हा रस्ता निलगिरीच्या झाडांनी भरलेला. बरेच चढ-उतार, बरेच पूल, पण वातावरण अगदी छान होतं त्यामुळे फारसा थकवा जाणवला नाही. पुढे विक्रमपुर ला जाताना आम्हाला डॉक्टर पंकज जैन आणि डॉक्टर श्वेता जैन भेटलेत, जोगी टिकरिया च्या आधी एक छोटासा कृष्ण कन्हैया भेटला. त्याची गंमत नक्की सांगेन. मात्र अनुभव आला तो जोगी टिकरिया च्या पुढे. देवरा ते इटोर म्हणजे शेष घाट कडे तर फारच रोमांचक असा प्रवास घडला. देवराला गेलो तो आमच्या सोबत कोणीतरी शक्ती चालत असल्याचा भास झाला, आपण अगदी शब्द बोलावा किंवा विचार करावा आणि चटकन तसंच घडावं असं आठ-दहा वेळा झालं. आणि काहीतरी झालं अविश्वसनीय …सांगणारे पण पुढच्या भागात...
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६९
नर्मदे हर.
मागच्या भागात मी तुम्हाला बिझौरी च्या मुक्कामाबद्दल सांगितलं होतं. माझा रुमाल घेऊन काकांच्या डोक्याला बांधणाऱ्या आजीबद्दल सांगितलं होतं. आता पुढे चलू यात.
विक्रमपूर साधारणपणे दहा-बारा किलोमीटर दूर असेल. हा रस्ता हायवे आहे. अनेक पूल रस्त्यावर बांधलेले आहेत आणि आजूबाजूला पर्वत असल्यामुळे रस्ता निसर्गरम्य आहे. सगळीकडे नीलगिरीची झाडे कुणीतरी उभी करावी तशी रांगेत लागलेली आहेत. गंमत म्हणजे त्यांची उंची सुद्धा जवळ जवळ सारखी. त्यांच्याकडे पाहून मला शाळेत प्रार्थनेसाठी उभ्या असलेल्या मुलांची आठवण झाली.
तर या रस्त्यावरून मी आणि बाबा आम्ही रमत गमत जात होतो. एवढ्यातच आमच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची मोठी गाडी येऊन थांबली. त्यात होते डॉक्टर पंकज जैन आणि डॉक्टर श्वेता जैन. ही दोघं जबलपूर ची राहणारी. श्वेता लहान मुलांची डॉक्टर तर पंकज जी सर्जन. आम्हाला आनंदाने, रमत गमत चालताना पाहून दोघे उतरून खाली आली. नर्मदे हर झालं थोड्याफार गप्पा झाल्या. जवळच्याच एका छोट्याश्या टपरीवर त्यांनी आम्हाला चहा पाजला. आम्ही तुम्हाला जोगी टीकरिया पर्यंत सोडून देतो, आम्हाला दिंडोरी ला जायचय असा दोघांनी खूपच आग्रह धरला पण आम्ही गाडीमध्ये बसत नाही म्हंटल्यावर डॉक्टर श्वेता म्हणाल्या “मग मी देखील तुमच्यासोबत पायी चलेन”. मग मी बाबा आणि डॉक्टर श्वेता पाई चालू लागलो. डॉक्टर पंकज गाडी घेऊन थोडं अंतर पुढे जायचे आणि तिथे थांबून आमची वाट बघायचे. अगदी विक्रमपूर येईसतोवर डॉक्टर श्वेता आमच्याबरोबर पाई चालत राहिल्या. विक्रमपूरला मात्र आता उशीर होईल असं म्हणत डॉक्टर पंकज ने डॉक्टर श्वेताला गाडीत बसवून घेतलं आणि आम्हालाही आग्रह करू लागले. आम्ही नकार दिलेला पाहून निदान तुमचं सामान तरी आम्हाला द्या आम्ही ते जोगी टीकरीया ला सोडतो असा हट्टच धरला. माझ्या पाठीवरचे सामान मी कोणालाही देणार नाही हे शूलपाणी च्या झाडी पासून मी ठरवलंच होतं. त्यामुळे माझा तसा संकल्प आहे म्हटल्यावर बाबाचं सामान आम्ही गाडीत टाकलं. ठरल्याप्रमाणे पंकज आणि श्वेता जैन यांनी जोगी टिकरीयाला ललिता बाईंच्या आश्रमावर आमचं सामान नेऊन पोहोचवलं. जैन दंपत्याला मुल-बाळ नाही मात्र गरीब लहान मुलांची सेवा करण्यातच मला आनंद मिळतो हे श्वेता ताईंचे वाक्य! “श्वेता खुश असली की मी ही खुश असतो, आम्हाला दोघांना कदाचित गरीब मुलांचा सांभाळ करण्यासाठीच देवाने निर्माण केल आहे त्यामुळे आम्हाला मुल नसण्याचा त्रास आता आम्हाला होत नाही. आधी फार वाईट वाटायचं, आता उलट बरं वाटतं की कुठल्याही जबाबदारी विना आम्ही आमचा संपूर्ण वेळ, संपूर्ण लक्ष, आणि संपूर्ण पैसा गरीब मुलांच्या स्वास्थ्यासाठी खर्च करू शकतो. एकच काय, तर ही सारी सारी मुलं आमचीच आहे असं मला नेहमी वाटत असतं. देव करतो ते योग्यच करतो फक्त त्याचा निर्णय आपल्याला समजायला वेळ लागतो हे आम्हाला पक्क समजून आलय.”
खरंच आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांच्या कडून खूप खूप शिकण्यासारखं असतं. गरीब मुलांच्या स्वास्थ्याचा वसा घेणार हे दंपत्य! कुठली संस्था नाही की कुठली पब्लिसिटी नाही. औषधांच्या बॅगा च्या बॅगा यांच्या गाडीत असतात. आठवडाभर आपापल्या क्लिनिक मध्ये काम केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ही दोघं कुठल्यातरी आदिवासी गावाच्या दिशेने पुढे निघतात आणि आदिवासी गावांची किंवा गरीब मुलांची विनामूल्य सेवा सतत दोन दिवस करून रविवारी रात्री पुन्हा जबलपूरला आपल्या घरी पोहोचतात. सेवा करायला पैसा लागत नाही सेवा करणारं मन असावं लागतं सेवा करणारं हृदय असावा लागतं…. सेवा करावी हे फक्त तुमच्या मनानं घेतलं पाहिजे…खरंच डॉक्टर श्वेता डॉक्टर पंकज बरोबर घालवलेला फार थोडा वेळ मला फार मोठी गोष्ट शिकवून गेला.
पुढे ललिता बाईंकडे फार चांगली सोय झाली. तसा आश्रम सांभाळणारे अविनाश सोळंकी दुबई वासी. यांच्याबद्दल तुम्हाला मी या अनुभव मालिकेच्या सुरुवातीच्या भागांमध्ये सांगितलं होतं.
अरे हो कृष्ण कन्हैया ची गोष्ट राहिलीच नाही का सांगायची!
जोगी टिकरिया च्या साधारण तीन-चार किलोमीटर आधी असेल. एक छोटीशी चहाची टपरी आणि बाजूलाच बिस्किटे चिवडा असे मिळणारे छोटंसं दुकान होतं. आम्ही पाणी प्यायला म्हणून येथे थांबलेलो. पाणी पिऊन चार पावलं पुढे जात नाही तो दोन अडीच वर्षाचा एक छोटासा बालक धावत धावत आमच्या मागे आला. त्यांनी माझी ओढणी धरली आणि म्हणाला “आओ मैयाजी, चाय नाष्ता करलो” त्याचे बोबडेसे बोल मात्र मोठ्यांसारखे शब्द ऐकून त्याची जरा गंमत वाटली, पण तो इतक्यावर थांबला नाही. तो काही माझी ओढणी सोडायला तयार नव्हता आणि आम्हाला खेचत पुन्हा तो त्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. या एवढ्याश्या बाळाला परिक्रमेबद्दल अनेक गोष्टी माहित होत्या हे बघून आम्हाला आश्चर्यच वाटलं. “अरे मा कुछ बिछा दो मैया जी के लिये कुरसी मे थोडे ना बैठेंगे” तो बोलू लागला… “दादी गुड चाहिये” आता त्याने त्याच्या आजीला हुकुम सोडला. पाणी आणि गुळाचा खडा घेऊन त्याची आई बाहेर आली आणि आमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून म्हणाली “ये तो अपने दादाजी की कॉपी करता है; इसको सब मालूम है, पूछो आप, देखो कैसे जवाब देगा” .. बघावं विचारून, “बाबाजी जोगी टिकरीया कितना दूर है? मी गंमत म्हणून विचारून पाहिलं, “६ किलोमिटर…” त्यांनी चटकन उत्तर दिलं. काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे त्याच्यासाठी अगदी रोचेचच असलं पाहिजे. त्याच्या तोतड्या बोलातून गोडवा ओतप्रोत बाहेर पडत होता. हा काही साधासुधा बालक नसावा. इतक्या लहानपणापासून सतत येणाऱ्या जाणाऱ्या नर्मदा परिक्रमा वासींशी यांचा संपर्क. रोजच हा येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासी ना चहाला आग्रह करतो असं याचे आजोबा सांगतात. वय वर्ष जेमतेम अडीच, तीन च्या वर अगदी नक्की नाही… काय ही मैया ची कृपा… इतक्या लहान वयापासून तो मैयाच्या आणि मैया भक्तांच्या इतक्या जवळ आहे. त्याच्याशी अगदी मनभर गप्पा मारून तास-दीड तासाने आम्ही तिथून निघून मग जोगी टिकरीया ला पोहोचलो. तुमच्या साठी त्याचा फोटो पण दिलाय बघा मी.
जोगी टिकरिया पासून पुढे मैया किनाऱ्याने मार्ग आहे. शेतातून आणि पुढे छोट्या छोट्या टेकड्या चढून उतरून आम्ही अशा एका ठिकाणी आलो जिथे पुढे रस्ताच नव्हता. आम्ही अगदी मैय्याच्या किनाऱ्यावर आणि पलीकडच्या किनार्यावर दूरवर दिंडोरी गाव वसलेलं दिसत होतं. पण आता जायचं कुणीकडे? काही ठिकाणी शेतीला कुंपण लावलेली होती. एक ओढा मैया येऊन मिळत होता तो पार करूनच जाणं आवश्यक वाटत होतं. इथून खरी एक गंमत सुरू झाली.
मागच्या भागात म्हणाले होते न मी अविश्वसनीय असं काहीतरी घडलं त्याची सुरुवात म्हणजे हा ओढा.
इथे आम्ही थोडावेळ आराम करत बसलो. या ओढ्याला साधारण गुडघ्याइतके पाणी असेल. पाय ओले करायचा कंटाळा आलेला म्हणून मी बसले खरंतर. आणि तिथे बसल्या बसल्या दगडांचा छोटासा ढीग तयार केला… तो ढीग बघून बाबा बोलला, “वा काय मंदिर बांधलय ताईंनी…. चला आता नर्मदा मंदिरात जायचं पुढे, नाहीतर याच मंदिरात राहायला लागेल”… मी पण थट्टा मस्करीत बाबाला बोलून गेले, “हो मग राहील नं ह्याच मंदिरात, नाहीतर असं करेन जिथे कुठे मी राहील ना तिथे हे मंदिर पण येईल माझ्यासोबत”… या बोलण्याला काहीही अर्थ नव्हता. ही केवळ थट्टामस्करी. मात्र यानंतर आपल्यासोबत खरंच कोणीतरी चालतंय असा भास वारंवार होऊ लागला. ते लक्षात कसं आलं माहिती आहे का?
आम्ही पुढे चालू लागलो. देवरा गाव थोडं समोर होतं त्याआधी लंबे नारायण गुफा म्हणून एक गुहा लागते. शेतात काम करणाऱ्या एका माणसानं सांगितलं “वहा के दर्शन करना और वही रुक ना आज रात.” आम्ही दर्शनाला आत गेलो, मात्र गुहेच्या तोंडाशी असताना तिथल्या साधू महाराजांकडे बघताक्षणी इथे राहायचं नाही असा विचार माझ्या डोक्यात डोकावला, खरंतर काहीही कारण नव्हतं, आणि पुढच्याच क्षणी बाबा मला म्हणतो “अगं इथे नकोय राहायला हं, मला या साधू महाराजांकडे पाहून अचानक काही तरी झालं आणि वाटलं इथे नकोच राहायला, खूप स्ट्रॉंग फीलींग आलंय त्यामुळे आपण इथे राहणार नाही पुढे जाऊ”. दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच विचार आला वाटलं कोईन्सिडन्स आहे… दर्शन घेऊन पुढे निघालो.
देवरा गावाच्या तोंडावर असतानाच पुन्हा एक गंमत झाली. मी बाबाला म्हणाले आज आपल्याला निवारा शोधायला लागणार नाही सापडेल आपोआप, आणि त्याच क्षणी बाबा म्हणाला बघ गावात गेल्या गेल्या दुसऱ्या-तिसऱ्या घरातून आपल्याला बोलावणं येईल. पुन्हा एकदा आम्ही दोघांनी एकच विचार मांडला तोही एकाच वेळी… आणि गंमत अशी की हे विचार इतके इंस्टंट मनात येत होते की जणू कोणीतरी दुसरं च आपल्याला काहीतरी सांगतय…. आणि त्याहून अविश्वसनीय म्हणजे हे एक सारखे विचार आमच्या मनातत एकाच वेळी यायचे. कोइंसीडन्स काय दोनदा होत नाही? असेल कोइन्सीडन्स…असं म्हणून आम्ही पुढे निघालो. दोन-तीन घर सोडले न सोडले तोच एका माताजींनी आवाज दिला. “अरे बाबाजी, मैया जी कहा जा रहे हो? अभी तो शाम होने को है यही रुक जाओ हमारे घर”…. मी आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं… जसं आमच्या मनात आलं होतं तसं झालं होत़ं…. अगदी तिसऱ्याच नाही, पण अगदीच चौथ्याच घरातून आम्हाला आवाज देण्यात आला होता.
आम्ही घरात केलो चहापाणी झालं समोरच्या खोलीतच आमच्यासाठी सतरंजी अंथरली. घरातल्या बायका भोजन प्रसादी ची तयारी करू लागल्या. त्यांच्या घरातली एकंदर परिस्थिती पाहता मनात विचार आला, जेमतेम दोन खोल्यांचे घर आपण जर येथे यांच्या घराच्या समोरच्या खोलीत झोपलो तरी या मंडळींना स्वयंपाक घरात झोपण्या शिवाय पर्याय नाही… थोडसं वाईट वाटलं मला, आणि नेमका तेव्हा बाबा म्हणाला “घर लहान आहे यांचं, आपण अंगणात लावू आसन. मी म्हणतो त्यांना तसं”, ..अरे हे काय? पुन्हा आमच्या दोघांच्या मनात एकच विचार मात्र यावेळी हा कोइंसिडन्स नाही हे ठरवणारी अजून एक घटना घडली. ज्या मैयाजींनी आम्हाला आत बोलवलं होतं त्या आल्या आणि म्हणाल्या, “यहा पे आपको परेशानी हो रही होगी तो सामने वाला घर बंद है उसको खुलवा देती हू आप वहा सोना आराम से”, ..आतापर्यंत फक्त आमच्या दोघांच्या मनात एक सारखे विचार येत होते आता मात्र त्या माताजींनी ही आमच्या विचाराला दुजोरा दिला. आम्ही हो म्हणालो आणि समोरचं घर उघडून साफ करायला त्यांचा मुलगा किल्ली घेऊन गेला. घरात लाईट नव्हते त्यामुळे एक कंदील घेऊन त्या मुलाने एक खोली स्वच्छ करून दिली. भोजन प्रसादी झाल्यानंतर आम्ही आराम करायला समोरच्या घरी गेलो. तिथे पुन्हा गंमत झाली.
घरात पूर्ण अंधार. आमच्या जवळचा टॉर्च आणि आमचा मोबाईल. या घराच्या पायऱ्या चढताना जागा माहीतिची नसल्यामुळे थोडं डगमगले मी, ते पाहून बाबा म्हणाला, “जंगलात नाही घाबरलीस आणि अंधाराला घाबरतेय का? हनुमान चालीसा म्हण घरात भीती वाटत असेल तर…” खरंतर भीती वाटण्याचे काही कारण नव्हतं. मला भीती वाटतही नव्हती. पण तरी का कोण जाणे, बाबा असं बोलून गेला.
तसं आमच्या संध्याकाळच्या आरती पूजेमध्ये रोजच हनुमान चालीसा असायचाच, तरीही बाबा म्हणाला म्हणून आणि मी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली उगाचच…मला हनुमान चालीसा फार आवडतो, म्हणून! आम्ही आत गेलो. सतरंज्या अंथरुन ठेवलेल्या होत्याच. आमच्या स्लीपिंग मॅट आणि पांघरूणं काय ती काढायची होती. मोबाईलचा टॉर्च लावला, आणि प्रकाशाचा झोत समोरच्या भिंतीवर पडला. भिंतीकडे नजर गेली तो जे पाहिलं ते खूप विलक्षण होतं. भिंतीला टेकून खुद्द मारुतीराया उभे होते. मारुती रायांचं खूप विलोभनीय चित्र भिंतीला टेकवून उभं केलं होतं. जणू मी हनुमान चालीसा म्हटला म्हणूनच मारुतीराया समोर येवून उभे राहिले. असे एकामागोमाग एकेक प्रसंग घडत राहिले. मनात एखादा विचार येतो, कधी बाबा बोलून दाखवतो, कधी समोरच्या बाई बोलतात, कधी आम्ही दोघही एकाच वेळेस बोलतो, कधी साक्षात मारुतीराया समोर येतात आणि हे सगळं आपोआप घडत नाही सारखं कोणीतरी सुचवल्या सारखं होत असतं इतक्या सगळ्या प्रसंगानंतर खरंच हे जाणवू लागलं की नक्की, नक्कीच कुणीतरी हे करवून घेणारं, हे घडवून आणणारं असलं पाहिजे.
असे आणि याहूनही वेगळे, अजूनही अनुभव आलेच.. कंचन पूर, शिवाला घाट, दम्हेडी.. तीन ठिकाणाचे तीन अनुभव… आणि तिन्ही अगदीच वेगळे… सांगणारे, पण पुढच्या भागात..!
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७०
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मारुतीरायां च्या फ्लेक्स बद्दल सांगितलं होतं. देवराला आम्हाला कसं बोलवून घेतलं, आमच्या मनात लंबे नारायण गुहेच्या साधू महाराजांबद्दल अचानक असे नकारात्मक विचार कसे आले आणि तिथे राहू नये असं ठरवलं, आमची एकूण एक इच्छा, आमच्या मनात येणाऱ्या एकूण एक विचार हा अगदी चपखलपणे खरा कसा ठरत होता, हे मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. जणूकाही आमच्यासोबत कुणीतरी चालतय आणि कुणाचे तरी विचार आमच्या विचारांच्या माध्यमातून बाहेर येतात असं काहीच आम्हाला जाणवत होतं. आता इथून पुढे सांगते.
देवरा नंतर धुरा, लूट गाव, रामघाट असं करत करत आम्ही दुधी घाटापर्यंत आलो खरं मात्र हा सगळा रस्ता कच्चा रस्ता होता. कधी शेतातून तर कधी मैया किनाऱ्याने वाट काढत काढत जायला लागलं. शेष घाटावर पोचायच्या आधी तर ओसाड माळरान असावं की काय असाच रस्ता होता. पाऊलवाट नाही, पक्का रस्ता नाही, कुणी कडे जायचं समजत नाही… आम्ही आपलं मैया उजव्या हाताला ठेवून चालत रहायचं इतकच काय ते ठरवलं होतं. मात्र मध्ये पर्वता सारखा आकार असल्यामुळे मैया नेमकी किती दूर आहे हे दिसत नव्हतं. फक्त दिशा तेवढी कळत होती, तीदेखील सवयी मुळे.
शेष घाटाच्या अलीकडे तर मजाच आली. एक छोटंसं मंदिर दिसलं त्यात आम्ही थोडावेळ विसाव्यासाठी म्हणून थांबलो. मंदिरात कोणीही नव्हतं मात्र समोरून सायकलवर एक माणूस येताना दिसला. त्याला थांबवून पुढचा रस्ता विचारला, आणि दोन शेतं दाखवून, त्याला वळसा घालून, दूरवर ते भगव्या रंगाचे मंदिर दिसत आहे तोच शेष घाट, असं त्याने आम्हाला सांगितलं. आता ते मंदिर डोळ्यापुढे ठेवून आम्ही चालू लागलो. पाऊल वाट किंवा रस्ता नाही. एक तर शेतातून जायचं किंवा शेतांना वळसे घालत घालत जायचं.
झाडं नाही शेतात, अगदी ओसाड माळरान. रस्ते सरळ नाही खूपच उंच-सखल. अशात खूप दूरवरून आम्हाला दोन परिक्रमावासी आमच्या दिशेने येताना दिसले. म्हटलं चला यांची सोबत होईल. आम्ही त्यांची वाट पाहू लागलो. ते हळूहळू आमच्यापर्यंत येऊन पोचले. नर्मदे हर झालं. “शेष घाट जा रहे हो महाराज जी?”. मी विचारलं आणि त्यांनी होकार अर्थ मान हलवली. मात्र मजा अशी झाली की आम्हाला जो रस्ता त्या सायकल वाल्या मुलानी सांगितला होता त्याच्या अगदी विरुद्ध रस्ता या दोन परिक्रमावासी ना दुसऱ्या कोणीतरी सांगितला होता. आता तेही आणि आम्ही ही गोंधळात पडलो कारण रस्ता कन्फर्म करायला कोणीच नव्हतं. मग आम्ही आम्हाला सांगितलेल्या रस्त्याने चालू लागलो आणि ते त्यांना सांगितलेल्या रस्त्याने जाऊ लागले.
खूप भरकटत शेतातून वाट काढत काढत आम्ही जात होतो. कुठे जायचं काहीच समजत नव्हतं. अशातच अचानक चार-पाच बायका आल्या आणि त्यांनी शेष घाटचा रस्ता सांगितला. आम्ही पोहोचलो आणि पाठोपाठ ती दोघं परिक्रमावासी देखील पोहोचलेत. ते आणि आम्ही वेगवेगळ्या रस्त्याने आलो होतो का एकाच ते काही माहीत नाही, मात्र त्यांनाही रस्ता सापडत नव्हता आणि त्यांनाही चार-पाच बायकांनीच रस्ता सांगितला होता.
शेष घाटावर थोडावेळ विश्राम करून आम्ही पुढे कंडीकापा मार्गे शिवाला घाट ला जायचं ठरवलं. पण कंडी कापा पर्यंतच आम्ही जाऊ शकलो. इथे एक शेतातली झोपडी होती, इथे कसलीही सोय नव्हती. फक्त पाण्याने भरलेला एक घडा ठेवलेला होता आणि एक माणूस शेतात काम करत होता. अगदी तासाभरात अंधार पडेल अशी वेळ. तो म्हणाला “आप ईटोर चले जाओ. यहा रुकना सही नही है.” इटोर साधारण तीन-चार किलोमीटर दूर असणार. म्हणजे तिथवर पोहोचेस्तोवर आम्हाला नक्कीच अंधार होणार होता मात्र इटोरच्या शाळेत व्यवस्था होईल असं या माणसाने सांगितलं आणि आम्ही झपाझप पावलं टाकत इटोरला पोचलो. इटोर च्या शाळेत गेल्यावर शाळा बंद आहे आणि इथे आता व्यवस्था होत नाही असं समजलं. आता कोणाच्या तरी घरी, अंगणात आश्रय घ्यावा लागणार होता. वस्ती अजून थोडी दूर होती. आम्ही वस्तीत शिरलो आणि एका किराणा दुकानात व्यवस्थेसाठी चौकशी केली. दुकानासमोर उघड्यावर झोपता येईल आणि भोजन प्रसादी ची व्यवस्था आमच्याकडे होऊ शकणार नाही कारण आमच्या कुटुंबात मयत झाली आहे असं समजलं. मग इथे राहूच नयेत असं वाटलं मात्र आता अंधार पडून झाला होता. आता रस्त्यावर आसन लावण्या शिवाय पर्याय नव्हता आणि जवळ जे काही असेल ते खाऊन आजची रात्र घालवायची होती. रस्त्याच्या पलिकडे एका झाडाखाली थोडी मोकळी जागा होती तिथेच आसन लावायचं असं ठरलं.
पिण्याचं पाणी संपलं होतं म्हणून बाबा म्हणाला “मी पुढच्या घरातून प्यायचं पाणी घेऊन येतो” हे घर मयतिच्या घरापासून साधारण दोन इलेक्ट्रीकच्या पोल अंतरा इतकं दूर होतं आणि मध्ये ओसाड जागा होती. बाबा प्यायचं पाणी घ्यायला गेला तो येताना दोन तीन माणसांना घेऊनच आला. आमचं सगळं सामान उचलून घेऊन जाऊन त्या घरात नेण्यात आलं. तेही एक किरराणा दुकानच होतं, मात्र दुकानातल्या वस्तू, पोती हलवुन त्या दुकानदाराने आमची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था न विचारता केली होती. “परिक्रमावासी बाहर सोयेंगे अच्छा नही लगता. माताजी आई है तो हमारे दुकान मे ही आप सो जाओ” असं म्हणून दुकानातल्या मुलांना त्या दुकानदाराने आमचं सामान घ्यायला पाठवलं होतं. तिथे खूप छान व्यवस्था झाली. गरमागरम खिचडीची भोजन प्रसादी झाली. अगदी अनपेक्षित पणे नर्मदामैया जेवण आणि आसरा दोन्हीही देतेच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडलो आणि आज इतका उशीर लावायचा नाही, चार-साडेचार ला जिथे कुठे असू तिथे थांबून जायचं असं आम्ही ठरवलं.
पण आपण ठरवतो तसं होत नसतं. आता आम्ही इटोर होऊन तेडी संगम मार्गे शिवाला घाटला जायला निघालो होतो. शेतातले रस्ते हा प्रकार काही संपत नव्हता. शिवाला घाट पर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. चंदन घाटला तसा संकेत आम्हाला मिळाला होता पण, तेव्हा फक्त दोन वाजले होते त्यामुळे आमच्या हातात साधारण दोन-अडीच तास अजून आहेत, त्यामुळे आपण थोडं पुढे जाऊ शकतो असा विचार करून आम्ही पुढे निघालो. शिवाला घाटला पोचू शकलो नाही मात्र रस्त्यात गावं होती आणि गावात कुठेतरी व्यवस्था होईलच हे माहीतच होतं. आम्ही कन्चनपुर इथे येऊन पोचलो.
कंचनपूर ला आल्यानंतर इथलं एकंदरीत वातावरण पाहून आम्ही जरा बिचकलोच. गावातल्या चौकाचौकात व्यसनाधीन माणसं शेकोटी पेटवून बसलेली दिसत होती. घरं अतिशय गरीब. घरातल्या बायकांना विचारल्यानंतर नवऱ्याला विचारून सांगेन आणि नवरा घरी नाहीत अशी उत्तरं मिळालीत. आता अशात एखादा शाळा शिक्षक किंवा गावचा सरपंच यांचे कडे जाऊन आपला प्रश्न मांडायचा असं ठरलं. गावात देऊळ नाही त्यामुळे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
आम्ही सरपंचांच्या घरी गेलो. तिथे सरपंच यांची आई आणि बायको होत्या.त्यांनी आमची व्यवस्थित सोय केली. आम्ही गेलो त्या वेळी सरपंच बाहेर गेले होतेत. आमची भोजन प्रसादी होईस्तोवर सरपंच काही आले नाहीत. आम्ही आसनं लावली आणि झोपायची तयारी करू लागलो. बाहेरच्या ओसरीत आजींचा पलंग होता आणि खाली आम्ही दोघांनी आसन लावलीत. आम्ही झोपणार तेवढ्यात सरपंच आलेत. येऊन सरळ आमच्या पुढ्यात बसलेत. थोड्याफार गप्पा नंतर ते जातील आणि आम्ही झोपू असं आम्हाला वाटत होतं, मात्र हे सरपंच काही वेगळ्याच मूडमध्ये होते.. चंदन घाटलाच थांबलो असतो तर बरं झालं असतं असं राहून राहून आम्हाला वाटत होतं. बाबा तर फार वैतागला होता. कारणही तसंच होतं.. पण आम्हाला संयमाने घेणं आवश्यक होतं. त्या म्हाताऱ्या बाईचा आधार वाटत होता. असं काय झालं असेल? का वैतागला असेल बाबा, काय केलं त्या सरपंचांनी… सांगते.
या गावात लाईट नाही ही आमच्या साठी जमेची बाजू ठरली. हा सरपंच येऊन बसला. तास भर गप्पा झाल्यात. तो तिथेच जेवला, तोवर सगळं ठीक होतं. नंतर तो काही उठायला तयारच नाही. तास झाला, दीड तास झाला. आम्हाचे डोळे पेंगू लागले. शेवटी बाबा बोललाच, म्हणाला, “सरपंच जी अभी आप भी सो जाईये, हमे भी नींद आ रही है,” तर म्हणतो कसा, “ बाबा आप सो जाओ, हम मैयाजी से बात करेंगे” आता सगळं माझ्यावर आलेलं… मी पण म्हणाले, मुझे भी नींद आ रही है, तर म्हणाला, “इतने दिन बाद तो कोई मैयाजी मिली है, मुझे तो आपसे बाते करनी है. हे ऐकून बाबा खवळला.. डोक्यावरून पांघरूण घेऊन झोप असा मला इशारा केला, मी झोपले.. त्या आजी, सरपंचाची आई तिथेच होत्या, आणि अजून जाग्या होत्या, त्या ही आपल्या मुलाला समजावू लागल्या पण हा जाईच ना. मी डोक्यावरून पांघरूण घेतल्या नंतर ही तो बोलतच राहिला. मध्ये मध्ये “सुन तो रही हो मैयाजी” हे वाक्य असायचं. आता बाबा ही आडवा झाला. तरीही हा बोलतोच आहे. आमची आलेली सगळी झोप उडाली होती. याच्या मनात नक्की काय आहे, अशी विचित्र भीती आम्हाला वाटत होती. आम्ही निपचित पडून होतो. इथे लाईट नव्हते ही आनंदाची बाब होती आमच्यासाठी. साधारण पाऊण तासानी कंटाळून हा आत गेला. तो आत जाऊन १५ मिनिट झाले असतील, म्हणजे तो आता बाहेर येत नाही याची खात्री करून मग बाबा हळूच म्हणाला, “४ वाजताच अलार्म लाव, व्हायब्रेट मोड वर ठेव. हा उठायच्या आधी इथून निघायचं.”
ती रात्र कठीण जाणार होती, त्यातल्या त्यात थोडी सावरली गेली, असं म्हणायचं. आम्ही सकाळी अलार्म च्या आधीच उठलो. सगळं सामान सावरलं आणि बरोबर साडे चारच्या सुमाराला बाहेर पडायला तयार झालो, मात्र फाटकाला कुलूप घातलं होतं. आता पुन्हा थांबावं लागणार होतं आणि ते आम्हाला नको होतं… मग आता करायचं काय? आम्ही जाऊ शकलो, की थांबावं लागलं आम्हाला? पुन्हा त्या माणसाचा सामना करावा लागला का? रात्री पूर्ण अंधार असल्याने त्याचा चेहरा आणि हावभाव आम्हाला दिसले नव्हते पण बोलण्यावरून अंदाज येत होता, आणि आम्हाला पुनरावृत्ती नकोच होती. पण मग झालं काय नक्की? सांगणारे पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७१
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला कांचनपूरच्या सरपंचाबद्दल सांगत होते. हा सरपंच रात्री उशिरा आला आणि त्यानंतर तो काही आमच्या समोरून जायचं नाव घेई ना. “मुझे मैया जी से बाते करनी है” असा हट्ट धरून बसला होता. कसाबसा टाळला त्याला आणि तो आपल्या खोलीत गेला. आम्ही सकाळचा अलार्म लावला होता साडेचारचा, त्याआधीच आम्ही उठलो आवर सावर केली आणि तिथून सटकायचा प्रयत्न करायला फाटका पर्यंत आलो पण फाटकाला कुलूप लागलेलं होतं. आता काय करायचं? आम्हाला आता त्या माणसाचा चेहरा सुद्धा बघायचा नव्हता. खरं काल अंधारात त्याचा चेहरा आणि त्याचे हावभाव आम्हाला दिसत नव्हते पण एकंदरीत अंदाज येत होता.
मात्र फाटकाला कुलूप होतं आणि आता थांबून राहण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नव्हता. ओसरीतच कुठेतरी किल्ली ठेवली असावी असं वाटून आमच्या नजरा किल्ली चा शोध घेऊ लागल्या. आमच्या हालचालीनी आजींची झोप उघडली. “जा रहे हो माता जी? सुबह का भोजन पाकर जाओ,” त्या म्हणाल्या… भोजन काय आम्हाला साधं पाणी सुद्धा प्यायची इच्छा नव्हती. किल्ली कुठे एवढेच काय ते आम्ही आजींना विचारलं. त्या म्हणाल्या, “मेरा बेटा बुरा इन्सान नही है, दारू सब बिघाड देती है”. खरं तर नर्मदा परिक्रमावासीयांच्या बाबतीत असं घडावं असं कदाचित त्या आजीनाही पटलं नसावं, पण ती एक आई सुद्धा होती. शिवाय आपल्याकडून नर्मदा परिक्रमावासीयांची अशी गैरसोय झाली याचं तिला वाईटही वाटत असावं. ती पुढे म्हणाली, “वो दिल का बहुत साफ है, लोगो की बहुत मदद भी करता है, मेरे बहू के बारेमे बताती हू. मेरे बेटे और बहू में पंधरा साल का अंतर है. बहु पढने मे बहोत होशियार है. घर की गरीब है, मेरे बेटे ने उसको बारवी तक पढाया. फिर दोनों एक दुसरे को पसंद आये तभी शादी करी”.
आपला मुलगा कसा चांगला आहे हेच तिला सांगायचं होतं. परिक्रमावासी ने आपल्या मुलाला शाप देऊ नये अशी तिची भावना स्पष्ट दिसत होती. “कम से कम चाय पी कर जाओ. उसको एक बार मिलकर जाओ.” ती जीव तोडून आग्रह करत होती. एकीकडे तिथून लवकर निघून जावं असंही वाटत होतं आणि दुसरीकडे त्या आईची इच्छा, भावना समजत होती. बाबा म्हणाला आपण जाऊ पुढे, पण का कोण जाणे मी मी थांबायचा निर्णय घेतला. उजाडेस्तोवर थांबतो, चहापाणी नको, मग मात्र आम्ही निघू. मी आजींना सांगितलं. ऊजाडेस्तोवर आम्ही तिथेच बसून होतो. उजाडल्यावर आम्ही निघायची तयारी केली तेव्हा आतून सरपंच बाहेर आला. बाबाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला मुझे माफ कर दो. त्यांनी चुकूनही डोळे वर करून माझ्याकडे बघितलं नाही. काही न बोलता कुलुप उघडलं आणि आम्ही बाहेर पडलो.
मैया अनेकक प्रकारचे अनुभव देते. त्यांतून अनेक शिकवणी देते. अनेक प्रश्न पुढे मांडते आणि त्याची उत्तरही स्वतःच देते. हा विषय तिथेच थांबला आणि कंचनपुर चा अनुभव तसाच आणि तिथेच सोडून आम्ही पुढे शिवाला घाट ला निघालो.
शिवाला घाट हा अपभ्रंश आहे. या घाटाचं नाव शिवालय घाट असं होतं. इथे नर्मदा मैया च्या पात्रा खाली अनेक शिवलिंग आहेत. त्यातली काही दिसतात. काहींवर मंदिरा सारखं बांधलेलं आहे. काही पूर्णपणे पाण्याच्या खाली आहेत. या शिवाला घाटावर एक कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाखाली बसले असताना हा कल्पवृक्ष आहे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे त्या कल्पवृक्षाखाली बसून देखील मी काहीही कल्पिलं नाही. माझ्याकडून कसलीही इच्छा त्या कल्पवृक्षा कडे व्यक्त केल्या गेली नाही, मात्र त्या कल्पवृक्षाच्या छायेत बसल्यानंतर अतिशय प्रसन्न, शांत, आनंददायक वातावरणाची अनुभूती झाली हे निश्चित. अर्थात माहित असतं तरी कदाचित माझ्याकडून कसलीच कामना केल्या गेली नसती कारण माझ्या सगळ्या कामना आपोआपच पूर्ण होत होत्या….
“कल्पना विस्तार होतसे संहारू, आम्हा कल्पतरू चाड नाही…”. आपण कल्पतरू च्या खाली बसून देखील काहीच मागितलं नाही हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी रामदास स्वामींचा हा अभंग आठवला, आणि प्रथमच काही न मागण्याचा मनापासून आनंद झाला.
थाडपठार, देवरी करत करत आम्ही दम्हेडी ला आलो. इथे शिवमंदिरात मुक्काम केला. इथून पुढे बिलासपुर, भीमकुंडी, खाटी असा रस्ता घ्यायचा होता. हा रस्ता म्हणजे तसा जंगल मार्गच. दम्हेडी पासून आम्हाला एक तरुण अधून-मधून दिसायचा. तो ऑटोचालक होता. मध्ये त्यांनी आम्हाला पार्ले जी बिस्कीट देखील दिली. त्याचं नाव जलाल शेख. हा विलासपूर ते खाटी या अंतरात सवारी ऑटो चालवतो. तुमची बॅग खाटी ला नेऊन सोडतो असंही तो म्हणाला पण आम्ही बॅग दिल्या नाहीत. खाटी ला शाळा मास्तरांकडे राहण्याचा सल्लाही त्यांनीच दिला. इथेही सोय व्यवस्थित झाली. हा सगळा आदिवासी पाड्यांचा आणि जंगलाचा भाग. सगळे कच्चे रस्ते. रस्त्यांवर दगडंच दगड. आजूबाजूला सगळी सागवानाची झाडं. अंतर जरी फार नसलं तरी चालायला वेळच लागत होता. दुस-या दिवशी खाटी होऊन निघायला उशीर झाला. थोड्या थोड्या अंतरावर छोटे-छोटे पाडे होते. मध्ये जंगलाचा भाग. रस्त्यांवर शुकशुकाट. एखादा सायकलवाला फार तर फार दिसायचा.
खाटी नंतर तासा-दोन तासाने असेल कदाचित, ती मुसलमान तरुण आमच्या मागून चालू लागलीत, त्यांना कदाचित पुढच्या पाड्यांवर जायचं असेल असं आम्हाला वाटलं, मात्र आम्ही थांबलो की ती थांबायचीत, आणि आम्ही चालू लागलो की पुन्हा चालू लागायची. बाबाला थोडं वेगळंच वाटलं. एक-दोन पाडे झाल्यावर जरा हिम्मत करून बाबाने त्या तिघांना विचारलं,” क्यू भाई कहा जाना है”..”दमगड तक जायेंगे बाबाजी”, त्यांनी उत्तर दिलं…”यांना पुढे जाऊ देऊ आपण मागून जाऊ” बाबाने निर्णय घेतला, पण ही तिघं काही उठायचं नाव घेईना. मात्र जसं आम्ही उठून चालू लागलो तसं ती तिघं पुन्हा आमच्या मागोमाग चालू लागली. आता बाबाला खरोखर काळजी वाटत होती, सोबत मी असल्याने आणि नुकताच कांचनपूर चा अनुभव असल्याने बाबा थोडा घाबरलाच होता. बळ एकवटून बाबानी थोडं खडसावून त्या तिघांना पुन्हा विचारलं..”आप हमारे पीछे ही आ रहे हो, हमे समझ आ गया है, ऐसा क्यू कर रहे हो?” बाबाचं बोलणं अर्धवट तोडत एक तरुण म्हणाला “हा तुम्हारे पीछे आ रहे है, बाबाजी तूम बूढे हो, धीरे धीरे जा रहे हो, जंगल का रास्ता है, दिदी को लेकर जा रहे हो, कुछ हुआ तो क्या करोगे? तुम आगे चलो हम तुम्हारे पीछे पीछे दम गड तक आयेंगे.”.. ही तिघं मुलं आमच्या मदतीसाठी येत होती तर! आमच्या मनात मात्र भलतेच विचार येत होते…”ऐसा है तो साथ में चलो ना, पीछे पीछे क्यू आ रहे हो?” बाबाला थोडं हायसं वाटलं आणि त्याने असा प्रश्न केला. त्यावर “तुम परिक्रमा वासी, हम मास मच्छी खाने वाले, तुम्हारा धरम भ्रष्ट हो जायेगा, इसलिए साथ नही चल सकते… तुमको क्या लगा? हम मुसलमान है तो क्या हुआ? पानी तो नर्मदा जी का पीते हे ना? हम भी नर्मदा जी को मानते है, तो परिक्रमावासी को क्यू तकलीफ देंगे?…”
आमच्या मनातले विचार त्या तिघांनी ओळखले होते. मात्र त्यांचं हे उत्तर ऐकून जीव भांड्यात पडला होता. “कल जलाल ने बताया था तुम दोनो के बारे मे, इसलिये ये साथ चले आये”.. आम्हाला बिस्किट देणारा जलाल ऑटोवाला या मुलांना सांगून गेला होता. झालं असं की जलाल नी बिस्कीट दिले त्यावेळी आधी त्याने आम्हाला एक प्रश्न विचारला, “मै मुसलमान हू लेकिन मुझे परिक्रमा वासी की सेवा करना अच्छा लगता है, बॅग तो आपने दिया नही, मेरे हाथ से बिस्कीट खाओगे क्या?.. त्यावर “जरूर खायेंगे जलाल भाई” असं म्हणून आम्ही आनंदाने बिस्किटं खाल्ली होती…. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी कुणाच्या मनाला सुख देऊन जात असतात नाही? त्यावेळी खरंच असं वाटलं की फक्त माणूस बनून राहणं हेच योग्य आहे. ही तिघही दमगड पर्यंत आमच्यासोबत आली. खरंतर फेरी सेमल च्या पुढे अंधार पडू लागणार होता, मात्र या तिघांनी आम्हाला धीर दिला म्हणाले, फेरी सेमल तो निकल गया अब ज्यादा दूर नही है अंधेरा होने से पहले हम आपको पोहोचा देंगे… थोडा उशीर झाला, किंचीत अंधार पडला, मात्र आम्ही राम कुटीर च्या दारा पर्यंत पोहोचेपर्यंत ही तिघे आमच्या सोबत होती. आम्ही आश्रमा पर्यंत पोचलो आणि ही मुलं परत फिरलीत. आम्ही जवळच गावात राहू, उद्या जाऊ, असा निरोप दिला आणि ति मुलं निघून गेली.
इकडे आम्ही आश्रमाचं दार वाजवू लागलो. इथे किर्र अंधार, लाईट नाहीच कुठे, दूर एक दिवा आणि आत आतल्या खोलीत एक कंदील दिसत होता. म्हणजे आत कुणीतरी होतं नक्की… पण नर्मदे हर ला काही उत्तर नाही, फाटकाला कुलूप नाही, पण ते फाटक उघडताच येईना, काही दिसेही ना.. ती मुलं ही निघून गेलेली…आता अंधारात परत फिरता येणार नव्हतं… पण सद्य स्थितीला आत ही जाता येत नव्हतं… मग काय केलं आम्ही? काय झालं पुढे? कुठे निवारा झाला? भोजन प्रसादी चं काय? थंडी प्रचंड होती, त्याचं कसं?.. सांगते, पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला आमचा दमगड पर्यंतचा प्रवास सांगितला. जलाल शेखने आमची मदत कशी केली तेही सांगितलं आणि वाटेत भेटलेले तिघं मुसलमान तरुण आमच्या सोबत राम कुटिर पर्यंत कुठल्या भावनेने आले होते आणि आम्ही मात्र कुठला वेगळाच विचार करत होतो तेही मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं. आम्ही राम कुटिर पर्यंत पोहोचलो आणि तिथून मागे फिरलीत.
आता आम्ही नर्मदे हर, नर्मदे हर म्हणून आतून कुणीतरी येण्याची वाट बघत होतो. या भागात लाईट नाहीत. हा आश्रम गावापासून थोडा दूरच आणि अक्षरशः जंगलात. आम्हाला फाटक उघडता येईना, आतून कोणी बाहेर येण्याचं नाव घेईना. परत गावाकडे फिरणं केवळ अशक्य, आधीच अंधार पडून गेला होता. आश्रमाबाहेर राहणं देखील अशक्य होतं. कडाक्याची थंडी आणि शिवाय जंगल असल्याने निदान आश्रमाच्या आत तरी जाता यावं असं राहून राहून वाटत होतं. शेवटी बाबा म्हणाला, “आता जर कोणी बाहेर आलं नाही तर मला फाटकावरून आत जावं लागेल आणि मग फाटक उघडतो,मग तू आता ये”.. बाबा जसा वर चढू लागला तोच आतून नर्मदे हर असा आवाज आला. साधारण अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यानंतर आम्ही आश्रमाच्या आत दाखल झालो. आता आसन लावायचं, पूजा पाठ करायचा आणि भोजन प्रसादीचं काय ते बघायचं.
“आसन कहा लगाये बाबा”, बाबानी विचारलं.”यही लगा दो”असं म्हणत त्या साधू महाराजांनी एक गवताच्या पेंढ्या खाली असलेल्या शेडमध्ये आसन लावायला सांगितलं. इतक्या थंडीत जंगलात असं बाहेर झोपायचं म्हंटल्यावर बंद आसरा नाही का असं विचारलं…. “नाही”, अगदी एका शब्दात आणि पक्क्या आवाजात साधू महाराजांनी उत्तर दिलं. रात्र थंडी मय जाणार… जशी मैया ची ईच्छा…
“आप के भोजन का क्या?” साधू महाराजांनी विचारलं. आम्हाला काहीही चालेल असं आम्ही उत्तरलो. त्यावर मात्र साधुमहाराज आणि आमचा जो संवाद झाला तो जसाच्या तसा लिहिते आहे.
साधु महाराज- नही मैने शाम को छे बजे सारा खाना कुत्तो को खिला दिया है.. अब तुम क्या करोगे… आम्हाला भूक तर लागली होती, म्हणजे आता इतकं थकल्यावर स्वतः स्वयंपाक करावा लागेल तर… करूयात काय करणार… मी म्हणाले “अगर साधन मिल गया तो हम भोजन बना लेंगे”… साधु महाराज म्हणतात, “साधन तो सब है मैया, बर्तन धोने पडेंगे” आता इतक्या थंडीचं आधी भांडी घासायची आणि मग स्वयंपाक करायचा नंतर पुन्हा भांडी घासून ठेवायची… हे अति होणार होतं थकल्याभागल्या जीवांसाठी…., आज चहाच पिऊन झोपावं. आम्ही ठरवलं. “बाबाजी हम चाय पी के सो जायेंगे”. साधु महाराज अतिशय शांतपणे म्हणाले,”आपकी कल्पना तो अच्छी है लेकिन शक्कर खतम हो गई है”, अरे देवा!! जाऊदे!! बिना साखरेचा प्यावा आता चहा, ईलाजच नाही काही! आम्ही बिना साखरेचा चहा पिऊ असं सांगितल्यावर साधु महाराज म्हणतात, “हा वो भी सही है, बिना शक्कर की चाय अच्छी लगती है, लेकिन माताजी इतनी रात को चूल्हा जलाने के लिए सुखी लकडी कहासे लाओगे?…. भगवंता!!! म्हणजे आता चहाचं पाणी पिण्यासाठी देखील आधी लाकडं जमवावी लागतील का? मैया उपाशी ठेवत नाही असं ऐकलं होतं खरं, पण आज कदाचित आम्हाला उपाशीच झोपावं लागणार होतं. बाबाची आता खरंच चिडचिड होत होती. बाबांनी रागातच आपलं अंथरून पसरलं आणि आडवा झाला. साधु महाराज मात्र माझ्याशी सत्संग करत होते. म्हणाले, “अगर थंडी लगे तो बोल देना ब्लॅकेट ला दुंगा…” दूंगा काय द्याच बाबा वाजणारच आहे…. ब्लॅंकेट देऊन जरावेळ गप्पा करून बाबा झोपी गेले. म्हणाले सकाळी नऊ पर्यंत मी खोलीच्या बाहेर येत नाही स्वयंपाकाचं दारा बाहेर काढून ठेवतो उद्या लाकडं जमा करा भांडी घासा आणि स्वयंपाक करा. हे होईस्तोवर मी बाहेर येईलच….
राहून राहून मला एकच वाटत होतं, मैया उपाशी झोपू देत नाही म्हणतात मग असं कसं शक्य आहे? मला उपाशी झोपावं लागतं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता आणि कुणीतरी येईल आणि काहीतरी देऊन जाईल असं सारखं वाटत होतं. आता तर नऊ साडे नऊ होऊन गेले होते… कोणी येण्याची फारशी शक्यता नव्हती. मी देखील माझं अंथरूण-पांघरूण बाहेर काढलं. त्या छोट्याशा शेडमध्ये एक मेणबत्ती तेवढी लागलेली होती. बाकी इथे काहीही नाही. साधू महाराज म्हणाले होते “यहा सिर्फ एक नेटवर्क है फास्टेस्ट वाला, डायरेक्ट कनेकशन होता है कोई डिस्टर्बन्स नही, आपकी आवाज बराबर पोहोचती है, बस आपकी प्रार्थना में सच्चाई होनी चाहिये… डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड..”विचार करता करता मी माझं ब्लॅंकेट बाहेर काढलं आणि आनंदाने ओरडले च. माझा विश्वास जिंकला होता. तीन-चार दिवसांपूर्वी कुणीतरी आम्हाला दिलेले मूग डाळीचे हल्दीराम चे पाकीट हरवलेत किंवा आम्ही कुणाला तरी दिलेत असं आम्हाला वाटत होतं. ती दोन्ही पाकीटं माझ्या ब्लॅंकेट मधून बाहेर आलीत. ती ब्लॅंकेट च्या घडीच्या आत कशी काय गेली देव जाणे. हो एक मात्र खरं माझ्याकडे दोन ब्लॅंकेट होते त्यातलं हे एक मी पाच-सहा दिवसांपासून काढलं नव्हतं, ते बॅगच्या सगळ्यात खाली ठेवलेलं होतं… कदाचित ही वेळ येणार आहे हे लक्षात ठेवून ती पाकीटं वापरल्या न जाणाऱ्या ब्लॅंकेट खाली दडवून ठेवली होती मैयाने…. ती उपाशी झोपू देत नाहीच… ती आई असते.
आम्ही खाऊन पाणी पिऊन झोपलो. अगदी थोडीही थंडी वाजली नाही. थकलो होतो त्यामुळे झोपही गाढ लागली, आणि जागही उशिराच आली. उठलो तेव्हा साडेसात वाजले होते. उठून आश्रम भर फिरलो. अतिशय रमणीय स्थान आहे हे. आम्ही ज्या शेडमध्ये झोपलो होतो तिथून तीन-साडेतीन फुटावर नर्मदा माई वाहत होती, तीही अगदी बाल स्वरूपात. राम कुटीर इतकं रमणीय आणि सकारात्मक स्थान आतापर्यंत कुठलंच नव्हतं… अगदी डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड…
स्नानादी आटोपून आम्ही स्वयंपाकाला लागलो, साधुमहाराज हि आलेत. जेवण झाले आणि आम्ही साधारण तीन सव्वातीन ला चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणायला हा रस्ता ८-९किलोमीटरचा असावा. पण संपूर्ण जंगलच. कुठे झाडांवर तर कुठे दगडांवर परिक्रमा मार्गाचे चिन्ह होते. साधारण अर्ध अंतर चालून आल्यानंतर एक सुंदर स शेड दिसलं त्याखाली थोडा विश्राम घ्यायला म्हणून आम्ही बसलो. आम्ही आपसात बोलतानाच अचानक आवाज आला,”कुठले पाहुणे तुम्ही? चहा घेणार का? आणतो करून. थांबा तिथेच. इकडे येऊ नका. परिक्रमा खंडित होईल तुमची.”. इतक्या शुद्ध मराठीत कोण बोलतंय म्हणून आम्ही त्याच्याकडे धावत गेलो. पाहतो तर पलीकडच्या भागावर एक संन्यासी उभे होते. अतिशय प्रेमळ चेहरा, आणि बोलके डोळे होते त्यांचे. नर्मदे हर झालं, एकमेकांची चौकशी झाली. मी नागपूरची म्हटल्यावर ते चक्क व-हाडी भाषेत बोलायला लागले. “नागपूरची हाय कावं मावशी, म्या पांढुरन्याचा हावो”. त्यांची ती भाषा ऐकून मला इतकं छान वाटलं म्हणुन सांगु… चहा झाला गप्पा झाल्या आणि त्यांनी जे सांगितलं त्यावरून खरंच वेड काय असतं, अभ्यास काय असतो,ध्यास कसा ते लक्षात आलं. यांचं नाव रामदास महाराज. गेली बावीस वर्ष ते इथे ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण करतात आहेत. किती पारायण झाले माहित नाही. एक संपलं की दुसरं सुरू करायचं. आश्रम कसा चालतो माहीत नाही कुणीतरी येतं आणि काहीतरी देऊन जातं इतकंच काय ते माहीत मात्र परिक्रमावासी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात हे नक्की.
रामदास महाराजांचा निरोप घेऊन पुढे निघालो. कपिलधारा च अप्रतिम सौंदर्य बघून सरतेशेवटी अमरकंटक च्या रस्त्याला लागलो. माझे कपडे फाटले होते. मला नवीन कपडे घेणं भाग होतं. येईल त्या दुकानात कपडे घ्यायचे आणि पुढे मृत्युंजय आश्रमात आजचा मुक्काम करायचा हे ठरलेलंच होतं. मृत्युंजय आश्रम अजून दूर होता. एका दुकानात थांबलो मी पांढऱ्या कपड्यांची चौकशी करू लागले, तो दुकानदार मात्र मला पांढऱ्या वर डिझाईन असलेले किंवा काहीतरी भरतकाम केलेले असे कुर्ते दाखवू लागला. “अरे भाई पुरा सफेद हो तो दिखाओ हम परिक्रमावासी है” मी त्याला समजावून सांगत असतानाच मागून आवाज आला, “ओ सुरुची मैया एम्ब्रोईडरी है तो क्या हुआ? कुछ नही होता. एक कुर्ता ऐसा भी लेलो”.. माझं नाव घेवून मला कोण सांगतंय म्हणून मी मागे वळून पाहिलं तो चितळे माई उभ्या होत्या.. मोरटक्का नंतर आमची आताच भेट तेही अचानक… मी त्यांना कडकडून मिठी मारली… “दोन दिवस मृत्युंजय आश्रमात राहून आराम करा. अमरकंटक चा इकडला भाग फिरून घ्या, मग दक्षिण तटाला या. तिथे आपला आश्रम आहे तिथे तीन दिवस राहायचं आहे कमीत कमी… काही लागलं तर फोन करा तुमच्या आश्रमाच्या समोर मात्र महिन्याच्या दुसऱ्या किनाऱ्याला आपलं स्थान आहे तुम्ही येऊ शकत नाही मात्र आम्ही येऊ शकतो.” माईंचा हुकूम आणि वर तुपाने माखलेल्या पोळीवर केशर पेरलेल्या गुळाचा खडा असतो तसा वाटणारा धीर, हे दोन्ही मनाला भिडलं. आम्ही मृत्युंजय आश्रमात आराम केला. पुढे माई की बगिया फिरून माईंच्या आश्रमात आलो. तिथे आल्यावर दोन गोष्टी खूप जाणवल्या. एक म्हणजे इथे असलेला प्रत्येक जण हा माझ्या जीवा भावाचा होता, आणि दुसरं म्हणजे इथून जाऊच नये असं वाटणार हे स्थान होतं.
मोहिनी ताई, रमा,शमिका ताई,मोना ताई, देव दादा, धनंजय दादा, अश्या मैया सेवकांनी खूप सेवा केली आणि खूप आनंदात तीन दिवस गेलेत. इथून निघताना मात्र असं काही झालं की काय करावं तेच समजेना… माई पण खूप रागवल्यात मला “नाही तू जाच आता,मी तुझं सामान बाहेर आणून देते” असं म्हणाल्या मला…. असं काय झालं माझ्याकडुन? अशी कोणती समस्या पुढे आली की मला काय करावं हेच कळत नव्हतं? सांगते, पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७३
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला दम्हेडी पासून ते अमरकंठ पर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. जलाल शेख ऑटो वाला, मुसलमान मुलांनी राम कुटिर पर्यंत केलेली सोबत, राम कुटिर मध्ये भोजन प्रसादी, चहा, काहीही न मिळून सुद्धा आम्ही उपाशी झोपलो नाहीत तो अनुभव,राम कुटिर पासून ते अमरकंठ पर्यंतच्या जंगल भागात पांडुरण्याचे भेटलेले रामदास महाराज, तो अनुभव याबद्दल सांगितलं होतं. चितळे माईंची दुकानातली भेटही सांगितली होती.चितळे माईंकडे तीन दिवस कसे आनंदात गेले ते सांगितलं होतं आणि चितळे माई मला रागावू लागल्या तिथं येऊन आपण थांबलो होतो. आता तिथून पुढे सांगते.
झालं असं की आम्ही तीन दिवस थांबून झालं होतं. माईंच्या आग्रहाखातर अजून एक दिवस आम्ही अमरकंटक ला माईंच्या आश्रमात थांबलो होतो. त्यानंतरचा हा दिवस. आता मात्र पुढे जाणं भाग होतं. मी सकाळपासून कामाला लागले होते. माई अजूनही अधून मधून आग्रह करतच होत्या. मी निघते म्हंटल्यावर त्या रागावल्या. म्हणाल्या,”मी तुझी बॅग बाहेर नेऊन देते, आता काही तू आत येऊ नकोस.. जायचंय ना तुला जा मग….”… तिथून पुढे खरी गंमत सुरू झाली. आम्ही बॅग भरून बाहेर काढली, सगळ्यांचे निरोप घेतले आणि आंगणा बाहेर रस्त्याला लागतो तोच पाऊस सुरु झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही पुन्हा आत मध्ये आलो. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा बाहेर पडलो. पण हे काय! बाहेर पडताच पुन्हा पावसाला सुरुवात! हे असं कमीत कमी चार ते पाच वेळा झालं. मी आत आले की माई विचारायच्या “काय झालं जात का नाहीयेस तू”, आणि मी निरुत्तर! सकाळी सात वाजल्यापासून तर साडेदहा वाजेपर्यंत हे असंच सुरू! शेवटी मी माईंना म्हणाले, नक्की काय करावं मी? जावं का थांबावं? मनातून विचार येतो, पुढे निघावं, असं वाटतं मैयाच सांगतेय… पाऊस येतो तेव्हा वाटतं मैया म्हणते जाऊ नको…. यावर काहीतरी उपाय सांगा! मी काय करू मला काही समजत नाहीये….
माई म्हणाल्या “अग मग विचार मैयाला तुला नक्की काय हवय ते”. ठरलं!मैयाला विचारायचं!! मी उजव्या हाताची दोन बोटं बाहेर काढलीत. एका बोटावर ठरवलं ‘जायचं आहे’ आणि दुसऱ्या बोटावर ठरवलं ‘जायचं नाही’. आश्रमाच्या बाहेर गेले. मैया किनारी बसून तिला प्रार्थना केली. म्हटलं तू सांगशील तो शेवटचा निर्णय. मग पाऊस येऊ देत की ऊन वारा… तू जो निर्णय घेशील तो कुठल्याही परिस्थितीत मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन, अर्थात तू पाठीशी आहेस म्हटल्यावर तुझा निर्णय पूर्ण होईलच. मी दोन बोटं मैयाच्या पाण्यात बुडवलीत आणि तात्काळ पाठमोरी फिरून समोरून येणाऱ्या अनोळखी बाईला एक बोट धरायला सांगितलं. तीने जे बोट धरलं त्यावर होतं ‘जायचं आहे’. निर्णय झाला होता. कितीही पाऊस आला तरी आता मी पुढे निघणार होते. चितळे माईंना सांगितलं, त्यांचे आशीर्वाद घेतले, आणि पुन्हा एकदा बॅग घेऊन आश्रमाच्या बाहेर पडलो. मागच्या चार पाच वेळां सारखं याही वेळेस पावसाला सुरुवात झाली. मात्र अगदीच थेंब-थेंब पाऊस असल्याने आम्ही पुढे निघालो… काही अंतर पाऊस आला नाही, मात्र तेव्हा आम्ही जे अनुभवलं ते खरोखर अविश्वसनीय आहे. पाऊस पडत होता, मात्र आमच्यावर पडत नव्हता. आम्ही पावसाच्या पुढे होतो. आमच्यापासून एक-दीड किलोमीटर मागे बघितल्यावर त्या भागात पाऊस पडतो आहे हे स्पष्ट दिसत होतं. आम्ही पुढे पुढे पाऊस मागे मागे… आज आम्ही जवळजवळ तीस किलोमीटर चाललो होतो. रुषा च्या थोडं पुढे कुठेतरी एका शिवमंदिरात सोय झाली. तो अनुभव थोडा विस्तारपूर्वक पुढे सांगते मात्र मंदिरात पाऊल ठेवेपर्यंत पाऊस नव्हता आणि मंदिरात पाऊल ठेवताच धो-धो पावसाला सुरुवात झाली. ‘जायचं आहे’ हा तिने दिलेला निर्णय होता. त्याप्रमाणे आम्हाला थेंबभरही पाऊस लागणार नाही याची तिनेच काळजी घेतली. थोड्याच वेळात अमरकंटक होऊन माईंचा फोन आला, तुम्ही गेले आणि पंधरा मिनिटात गहू पाऊस सुरू झाला असं त्यांनी सांगितलं.
अमरकंटक होऊन पुढे रुषा पर्यंत येताना आम्ही सडक मार्गे आलो होतो. जप व्हावा म्हणून बाबा पुढे आणि मागे असं नेहमीप्रमाणे सुरू होतं. सडक मार्ग असल्यामुळे बाबा जरा निवांतपणे पुढे गेला आणि मीही माझ्या स्पीडने हळूहळू मागे जात राहिले. आमच्यात आता साधारण एक किलोमीटर अंतर असेल. पावसाळी वातावरण, डांबरी रस्ता आणि आजूबाजूला जंगल. प्रसन्नता होतीच. मी जप करत करत पुढे जात होते आणि अशातच रस्त्याच्या कडेवरून अचानक एक माकडांचा घोळका माझ्या बाजूने आला. ती माकडं रस्त्याच्या मध्यभागी येऊन बसली. जणू काही वाट अडवत असावीत अशा पद्धतीने. मी शांतपणे तिथेच उभे राहून त्यांच्या जायची वाट बघत होते. थोड्या वेळात माकडांचा अजून एक मोठा घोळका आला आणि तो माझ्या मागच्या बाजूने गेला. मात्र तीही माकडं रस्त्याच्या मध्यभागी बसून होती. सगळी मिळून जवळजवळ शंभर माकडं तरी नक्की होती. मी ह्या माकडांच्या मध्ये होती. यांनी मला चहूबाजूंनी घेरलं होतं आणि आता मला पुढे जायचं होतं. माझ्या हातात दंड होता मात्र या माकडांना त्याची भीती वाटेल, की मी त्यांच्या वर शस्त्र उगारलं आहे असं वाटेल याचा अंदाज मला घेता येत नव्हता. मी पुढेही जाऊ शकत नव्हते, मी मागेही जाऊ शकत होते आणि बाबा मात्र बराच पुढे निघून गेला होता. पुढे जाणं भाग होतं. मी डोळे बंद केले मैयाचं नाव घेतलं आणि एक एक पाऊल पुढे टाकू लागले. ही मर्कट मंडळी जागची हलली देखील नाहीत. त्यांच्यामधून वाट काढत काढत मी पुढे निघून गेले. या मंडळींनी माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. जणू त्यांना मी दिसतच नव्हते इतकं दुर्लक्ष. मै याची सोबत होती हे काही वेगळं सांगायला नकोच!
आता तो मंदिराचा अनुभव विस्तारपूर्वक सांगते. आम्ही रुषाच्या पुढे आलो होतो. इथे आभाळ फारच भरून आलं असल्याने आणि आम्ही थकलो असल्याने आता रुषा नंतर जे गाव येईल तिथे थांबून जाऊ असं ठरलं. मात्र पुढचं गाव लवकर येईना. हे मंदिर दिसलं आणि इथेच मुक्काम करायचा असं ठरलं. मंदिर अगदी लहान. फक्त प्रदक्षिणा करता येईल एवढीच जागा. हरकत नाही!आम्ही आपलं सामान ठेवलं. अजून अंधार पडायला वेळ होता त्यामुळे आसन काही लावलं नाही. मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला एक मोठी विहीर होती तिथेच संध्याकाळचं स्नानादी आटोपलं. या भागात घरंही अगदी मोजकीच होती कारण गाव बरच लांब होतं. संध्याकाळचं पूजापाठ करून झालं आणि आता पोटातली भूक आवाज देऊ लागली. आजूबाजूला मात्र फारसं कुणी दिसत नव्हतं दुकानं वगैरे देखील नव्हती आम्ही वाट बघायचं ठरवलं.
साधारण आठ वाजता एक बैलगाडी मंदिरासमोर येऊन थांबली. एक माणूस आत आला नमस्कार केला आणि देवासमोर आम्ही दिवा लावला आहे का असं त्यांनी विचारलं. तो आला तसा तो निघून गेला त्यानंतर थोड्यावेळाने मंदिराच्या मागच्या अंगणातून एक बाई आली आणि “महाराज भोजन कर लिजिए म्हणून आम्हाला बोलावू लागली”. मंदिराच्या मागच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात एक छोटसं फाटक होतं आणि मागे सगळी झाडी होती. त्या झाडीच्या मागे एका घराचं मागचं छोटं फाटक होतं त्यातून आम्ही त्या बंगलेवजा घरात गेलो. मंदिर आणि या घराच्या मध्ये एक छोटीशी गल्ली होती, मात्र झाडीमुळे ह्या मंदिराच्या इतक्या जवळ हे बंगलेवजा घर असेल हे कुणाला सांगता देखील येणार नाही, असं हे घर झाकल्या गेलं होतं. आम्ही मंदिरात आलो आहे याची खबर या घरातील बाईंना कशी मिळाली ते आम्हाला माहीत नाही. तसा विषयही निघाला नाही. त्यांनी भोजन प्रसादिला बोलावलं आणि आम्ही भोजन प्रसादिला गेलो एवढच. मंदिरात प्रदक्षिणा मार्गातच आम्ही आसनं लावलीत. आजचा दिवस अनपेक्षितपणे छानच झाला.
दुसर्या दिवशी सकाळी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काल आमचे कपडे धुऊन झाले नव्हते. त्यामुळेच आज कपडे धुणं आवश्यक होते. मात्र रामनगरच्या पुढच्या भागात पाण्याची टंचाई असल्याचं समजलं. कित्येक हापश्या बघितल्या पण त्यांना पाणीच नव्हतं. आम्ही कनकधारा पर्यंत पोहोचलो. इथे एका हापशी ला पाणी लागलं. मात्र खूप पंपिंग केल्यावर अगदी बारीक धार येत होती. आमच्याकडे पिण्याच्या पाण्याच्या बाटली व्यतिरिक्त साठवणीसाठी काहीही नव्हतं. असं असताना देखील इथे जो अनुभव आला ते पाहून आनंदाने रडावं का दुःखाने रडावं हेच कळेना. श्रद्धेला सीमा नाही इतकं मात्र समजलं… नक्की काय झालं ते सांगते पुढच्या भागात.. नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७४
मागच्या भागात मी तुम्हाला अमरकंटक चा पावसाचा अनुभव सांगितला. नर्मदा माईच्या निर्णयानुसार पुढे जायचं हा निर्णय घेतला होता. तिनेआम्हाला पावसात भिजू दिलं नाही.
रूषा गावाच्या पुढे एका शिवमंदिरात आजची रात्र काढली होती. इथेदेखील अनपेक्षितपणे उत्तम भोजन व्यवस्था मंदिराच्या मागच्या भागाला असलेल्या बंगल्यात झाली होती. इथून दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादि आटोपून आम्ही पुढे निघालो खरं मात्र वेळेअभावी आम्ही कपडे धुतलेले नव्हते.आज कपडे धूणं गरजेचं होतं कारण आज कपडे धुतल्या गेले नाही तर उद्या घालायला स्वच्छ कपडे आमच्याकडे नव्हते. वाटेत कुठे हापशी लागली तर तिथे थोडा विश्राम करून कपडे धुऊन घेऊ असं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे वाटेत बऱ्याच हापश्या लागल्या. मात्र एकीलाही पाणी नाही. “शे…एकाही हापशी ला पाणी नाही, मला तर वॉशिंग मशीनची आठवण येते य”..मी अगदी सहजच बाबाला हे वाक्य बोलून गेले…
या भागात पाण्याची टंचाई असल्याचं समजलं. आम्ही सडक मार्गाने निघालो होतो त्यामुळे नर्मदामैया ही फार जवळ नव्हती. आता पाणी सापडेपर्यंत वाट पाहणे याशिवाय दुसरा इलाज नव्हता. शेवटी कनकधारा ला एका मोकळ्या प्लॉटवर एक हापशी सापडली तिला पाणी होतं, मात्र खूप पंपिंग केल्यावर अगदी थोडंच पाणी यायचं. आमच्याजवळ साठवणीला देखील काही नाही. आता कपडे धुण्या पेक्षा निदान पाण्यातून काढणे महत्त्वाचे वाटू लागले. तिथेच मोकळ्या मैदानात आम्ही सामान मोकळ केलं. धुण्याचे कपडे वेगळे केले, आणि आलटून पालटून, जोर लावून, पाणी काढायला सुरुवात केली. दोन-तीन पाण्यातून कपडे काढल्या जातील की नाही ही सुद्धा शंकाच होती. आमचे प्रयत्न सुरू होते. आणि शेजारच्याच घरातली एक बावीस पंचवीस वर्षांची मुलगी आमचा हा प्रयत्न बघत होती.
कनकधारा गाव फार मोठ असं नाही. इथे लोकांकडे मोबाईल हौसेखातर घेतलेले आहे पण नेटवर्क फारसं मिळत नाही. नाही म्हणायला इलेक्ट्रिसिटी आहे पण लाईट फारच जास्त जातात. अशा छोट्याशा गावात असताना त्या दिवशीची संध्याकाळ अतिशय अनपेक्षित अनुभवातून गेली.
अम्ही सतत पाणी काढण्याचा आणि कपडे धुण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेजारच्या घरातली ती तरुणी आमच्याकडे बघत होती तिने आम्हाला आवाज दिला “मैया जी पानी नही आयेगा. हमारे घर मे पानी भर के रखा है. आप कपडे धो लीजिये”… आम्ही न मागताही आम्हाला पाणी मिळालं म्हणून आनंद झाला खरा मात्र ह्या घरच्या लोकांनी कुठून तरी पाणी भरून आणलं असेल आणि ते आपण वापरावं हे काही प्रशस्त वाटलं नाही. मी तिला म्हणाले, एक बादली पाणी दे त्यात कपडे बुचकळून काढतो. उद्या पुन्हा कुठेतरी व्यवस्थित धूवून घेऊ. आमचं हे बोलणं सुरू असतानाच आतून तिची आई बाहेर आली. आणि त्यांनी आम्हाला आग्रहाने घरात बोलावलं, अक्षरशहा हात धरून ती मला घरी घेऊन आली आणि आपल्या मुलीला जे बोलली ते ऐकून आम्ही थक्कच झालो.
ती आपल्या मुलीला म्हणाली “अरे इतना सारा पानी रखा है एक बाल्टी पानी क्यू देती हो परिक्रमावासीको? पहले एक काम करो जनरेटर सुरू करो, तब तक वो बक्सा खोलो” असं म्हणत तिने नवीन कोऱ्या वॉशिंग मशीन चा बॉक्स आमच्यासमोर उघडा केला. ती पुढे म्हणाली, “गुडिया की शादी तय हुई है, उसके लिए वॉशिंग मशीन लाया है, अभी शादी को समय है, आप इस मशीन मे पुरे कपडे धोलेना,मेरी गुडिया की मशीन अच्छी और लंबी चलेगी. अगर पहली बार परिक्रमावासीओके कपडे जायेंगे तो शुभ शगुन होगा”… किती ही श्रद्धा? मुलीच्या लग्नासाठी आणलेली नवी कोरी मशीन त्या बाईने परिक्रमावासींचे कपडे धुण्यासाठी उघडून दिली… तिच्या श्रद्धेचा मान ठेवला आणि वॉशिंग मशीन मध्ये आम्ही कपडे धुतले. इतक्या छोट्या गावात जिथे मोबाईलच नेटवर्क नाही, इलेक्ट्रिसिटी चा भरोसा नाही, अशा ठिकाणी जनरेटर सुरू करून वॉशिंग मशीन मध्ये आमचे कपडे धुतल्या जावे याला काय म्हणायचं? पण हा अनुभव इथे संपत नाहीये… कारण पुढे जे काय झालं त्याने मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि ओक्साबोक्सी रडू लागले. मीच काय तिथे हजर असलेलं प्रत्येकच जण रडत होतं. सांगते.
“आज यही सो जाओ कल सुबह निकल जाना”. त्या आईंनी खूप आग्रहाने आम्हाला तिथेच थांबवून घेतलं. समोरच ओट्यावर आम्ही आमचं आसन लावलं. संध्याकाळची आरती पूजा झाली. भोजन प्रसादी साठी आम्हाला आत बोलावल्या गेलं. पंचपक्वान्नाचे भोजन आमच्यासमोर मांडून ठेवलं होतं. बटाट्याची भाजी, पुरी, खीर, शिरा आणि सुंदर सा पुलाव असं भरलेलं ताट. चविष्ट आणि पोटभर जेवण आम्हाला खाऊ घातल्यानंतर घरची मंडळी जेवायला बसलीत. त्यांच्या ताटात मात्र फक्त वरण आणि भात… त्यांची परिस्थिती सधन दिसत होती, मग तरीही ते फक्त वरण भातच का खात असावे?
REPORT THIS AD
“दीदी, बिटिया, आपने पुरी सब्जी खीर हलवा नही लिया? भैया जी को भी नही परोसा?” मी विचारलं… त्यावेळी तिथे घरची बाई, तिची मुलगी आणि तिचा मुलगा असे तिघे जण होते. तिघांनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि ते मुकाट्याने जेऊ लागले. मला काही समजेना,मात्र तरीही त्यांचं जेवण होईस्तोवर मी शांत बसले आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर माझा प्रश्न पुन्हा विचारला? “आपको मिठा पसंद नही है क्या दीदी?”… आता मात्र घरची मैया जी ढसा ढसा रडू लागली. दोन्ही मुलं देखील कावरीबावरी झालीत. मैया जींनी माझ्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाल्या…”आज बच्चो के पिताजी को गुजर के 17 दिन हो गये है. उनके जानेके बाद आप हमारे घर पधारे पहले परिक्रमावासी हो. मेरे पती परिक्रमावासीओकी बहुत सेवा करते थे. वे हमेशा कहा करते थे की परिक्रमा वासियों की सेवा मत छोडना. हम सब बाहर गाव गये थे तब अचानक ही हार्ट अटॅक हुआ और चल बसे. जिस दिन चल बसे उस दिन भी उन्होंने अपने हाथो से परिक्रमा वासियों को चाय पिलायी थी, तब हमारी फोन पर बात हुई थी…. आज आप हमारे यहा पधारे है तो लगता है कि आपको यहा उन्होने ही रोक लिया है…. आपको देख कर लगता है हमारे पती यही आसपास है…. लेकिन हमे माफ करियेगा, यह बात हमने आपको पहले नही बताई”…
तिचं बोलणं ऐकून मला सुद्धा अश्रू थांबवता आले नाहीत. जिचा नवरा जाऊन फक्त सतरा दिवस झाले आहेत, ज्या मुलीचं लग्न वडिलांच्या निधनामुळे लांबणीवर पडलं आहे, त्या बाईची आणि त्या लेकरांची मैय्या वर आणि परिक्रमावासींवर इतकी श्रद्धा? इतका विश्वास?… नर्मदामय्याच्या परिक्रमावासींच्या येण्याने त्यांच्या कुटुंबाला मिळालेलं समाधान हे सगळ्या पेक्षा जास्त मोठं आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी तिथेच थांबण्याचा निश्चय केला. “आप कल भी रुकोगे तो हमे बहोत अच्छा लगेगा” या विनंतीला आम्ही मान देऊ शकलो आणि त्या कुटुंबात दोन समाधानाचे क्षण देण्यासाठी नर्मदामैया ने आम्हाला तिथवर पाठवलं हे आमचं भाग्य! खरंच कमाल वाटते गं मैया तुझी… कधी तू तुझं रूप माझ्यातून दाखवते तर कधी तू तुझं रूप इतरांच्यात मला दाखवतेस…. मला भरभरून समाधान देतेस आणि कुणाच्यातरी समाधानाचं कारण मला बनवतेस… ते पुण्य तू माझ्या पदरात घालतेस.. खरंच तुझी लीला नं समजण्यासारखी आहे गं!… तिथून पाय निघत नव्हता तरीही दुसऱ्या दिवशी भोजन प्रसादी आटोपून आम्ही पुढे निघालो.. फोन नंबर एक्सचेंज केलेत. आज दोन वर्षांनंतरही दीदी माझ्याशी संपर्कात आहेत. परिक्रमावासींची सेवा आधी सारखेच आताही सुरू आहे, आणि दीदी आजही म्हणतात, “माताजी उस दिन तुम आये इसलिये हम यह सेवा आगे बढा सके… मै तो तूट ही गई थी, तुम्हारे आने के कारण मुझे सही रास्ता मिल गया”… त्यांची मुलगी गाडा सराई ला स्वतःच्या घरी आता सुखाने नांदते आहे… नर्मदा माई तू तुझ्या भक्तांना कायम साथ देत असतेच, कायम सन्मार्ग दाखवतच असते…!!
दीदींचा निरोप घेऊन पुढे निघालो, तो सहा-सात किलोमीटर अंतर चालून झाल्यावर माझं स्वेटर दिदींकडे राहिल्याचं लक्षात आलं. आजवर अनेक गोष्टी मागे सुटल्यात मात्र ज्या सुटल्यात त्या सुटल्यात.. त्यासाठी परिक्रमेत असताना परत म्हणून फिरले नाही. तसंच स्वेटरचं… जे राहीलं ते मैयार्पण… त्याचा पुढे विचारही करायचा नाही. आम्ही पुढे चालत राहिलो. साधारण खरं गहनाच्या आगेमागे असताना एक बाईक वरचा माणूस आमच्या पाशी येऊन थांबला. “तुम्हारा सामान कनकधारा में छूंट गया है ना? यही रुक जाओ सामान मिल जायेगा”… दीदींनी माझं स्वेटर एका ऑटो वाल्याला दिलं होतं. ऑटो वाल्याला एक सवारी कुठेतरी सोडून मग आमच्यापर्यंत येणं शक्य होणार होतं म्हणून समोर जाणार्या एका अनोळखी गाडीवाल्याला हा निरोप देऊन त्याने पुढे पाठवलं. सात-आठ किलोमीटर तो ऑटोवाला फक्त माझं स्वेटर मला देण्यासाठी आला होता. अशावेळी नेमकं काय करावं तेच समजत नाही…. शेवटी काहीही न करता अतिशय प्रामाणिकपणे आणि आदराने नर्मदे हर करण्यापलीकडे काहीही शिल्लक उरत नाही… मी देखील तेच केलं..
खरंतर आज खर गहना होऊन देखील पुढे जाण्याची इच्छा होती. मात्र बाबाचा पाय दुखत होता, माझी लुंगी फाटली होती ती शिवून घेणं आवश्यक होतं… वाटेत लहान-लहान गावं असल्याने एखादा टेलर सापडेल असं वाटत होतं. बाबाचा आराम देखील होईल आणि लुंगीचं काम देखील होईल असा विचार करून आमचा शोध सुरू होता. मात्र ह्या सगळ्यात काहीतरी वेगळं घडायचं होतं. काहीतरी शिकवण मिळायची होती. नेमकं काय घडलं आणि नेमकी कुठली शिकवण मिळाली ते सांगणार पण पुढच्या भागात…. नर्मदे हर..
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला कनक धारा या गावातील वॉशिंग मशीनचा आलेला अनुभव सांगितला. सतराच दिवस आधी ज्या घरचा करता सवरता पुरुष काळाने ओढून नेला होता त्या घरी आम्हाला मिळालेली अतिशय प्रेमाची वागणूक आणि तशाही परिस्थितीत संयमानं वागणारी घरची मंडळी यांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथून पुढे जाऊयात.
मोहतरा, गाडा सराय, बोंदरगाव, सूनिया मार ,ही गावं पार करत करत आम्ही खरगहना येथे पोहोचणार होतो. बोंदरगाव चा एक अनुभव सांगते.मला वाटतं मागे कुठल्यातरी भागात मी या अनुभवाचा उल्लेख केलेला आहे. बोंदरगाव इथे आम्ही एका झाडाखाली विश्राम करत बसलो होतो. त्याच झाडाखाली काही लहान मुले खेळत होती. आम्ही त्या लहान मुलांचा खेळ बघत होतो. परिक्रमावासींना बघितलं की “नर्मदे हर” करायचं आणि टॉफी मागायची हा नर्मदा किनारी लहान मुलांचा चालणारा खेळच जणू. ह्या लहान मुलांनी देखील आम्हाला “नर्मदे हर” केलं आणि आमच्याकडे टॉफी मागितल्या. मात्र यातली एक लहान मुलगी आमच्याकडून टॉफी घ्यायला तयार नव्हती. ती मला पाहून ढसढसा रडू लागली. तिला असं रडताना बघून मलाही रडायला आलं. ती मला बिलगुन रडु लागली. आम्ही तिला तिच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तिच्या घरी गेलो. ती मुसलमान धर्माची. तिच्या आईने सांगितलं की गेल्या तीन दिवसांपासून ती कोणाची तरी वाट बघत होती. “मेरी मा ने वाली है” असं म्हणत होती. ह्या मुलीच्या घरी आम्ही गुळाचा खडा पाणी आणि चहा प्यायलो. तिला खूप खूप आशीर्वाद दिलेत.तिचं माझं मागच्या जन्मीचं काय नातं असावं माहित नाही, पण परिक्रमेत अशाप्रकारचे दोन-तीन अनुभव आलेत हे मात्र खरं. माझे मागे सुटलेले किंवा मला मागे सोडलेले कुठलेतरी जीव माझ्या भेटीसाठी,काही कारणास्तव असेल कदाचित, पण अडकून होतेत… कदाचित माझ्या किंवा त्यांच्या, पुढल्या जनमांतही ही एक भेट तेवढी घडून यायची होती असं असेल, पण ती भेट घडून आली आणि त्या चक्राला पूर्णविराम मिळाला हे मात्र नक्की. एक मात्र अगदीच लक्षात घेण्यासारखं आहे ते असं की असे अनुभव मला आले त्यावेळी मला भेटणाऱ्या चारही व्यक्ती या लहान मुलांच्या रूपात होत्या. एक छोटसं बकरीच पिल्लू ही होतं. स्वतःच्या आईकडे न जाणारं आणि माझ्याकडून दुसरीकडे कुठेही न जाणारं एक आठ महिन्यांचं बाळ होतं… विक्रमपूर जवळ भेटलेला साडेतीन चार वर्षाचा मुलगाही मला सोडायला तयार नव्हता… या सगळ्यांचं आणि माझं काय नातं होतं माहित नाही कारण आत्ताच्या म्हणजे ह्या जन्मात तरी त्यांची माझी पुन्हा भेट होईल याची शाश्वती देता येत नाही… असो असे प्रश्न फक्त सोडून द्यायचे असतात.
आम्ही पुढे निघालो. अगदी पुढचं गाव सुनिया मार. इथे एका बाईंनी आम्हाला चहासाठी बोलावलं. तिच्याकडे समोर छोटसं अंगण होतं तिथे विश्रामा साठी थांबलो. आतून एक सतरा-अठरा वर्षांची तरुणी बाहेर आली. आम्हाला म्हणाली “कुछ कपडा वगैरे सिलना हो तो बताओ मै टेलर हू”… मी तुम्हाला मागच्या भागातच सांगितलं होतं की मला लुंग्या शिवून घ्यायच्या आहेत आणि आज टेलर शोधून त्या शिवून घेऊ असं ठरवलं होतं. माझ्या दोन्ही लुंग्या काठापासून फाटत आल्या होत्या. त्या ताबडतोब शिवणं गरजेचं होतं. आम्हाला टेलर शोधायची गरजच पडली नाही. जिथे आम्हाला विश्रांतीसाठी, चहासाठी बोलावलं ते घरच मुळी टेलरचं निघालं… लुंग्या शिवून झाल्यात… त्या कापाव्या लागल्या त्यामुळे त्या उंचीला कमी झाल्या, म्हणून या तरुणीने लुंगीला स्वतःजवळ कापड जोडून दिलं. एरवी एखाद्या टेलर न प्रोफेशनॅलिझम चा विचार केला असता, मात्र या तरुणीने मला न विचारताच, फक्त माझी गैरसोय होऊ नये यासाठी कुठलसं कापड वरच्या काठाला जोडून , लुंगी ची उंची आधी सारखी केली आणि अशी तयार लुंगी मला दाखवायला बाहेर घेऊन आली. जेव्हा इतकी आपुलकी, इतकं प्रेम, समोर येतं तेव्हा त्याची पैशात मोजणी करणं म्हणजे शुद्ध अपमान करणं आहे…. पण त्याची किंमत ही जाणिवेतून ठेवायला हवी…. अशावेळी परिक्रमावासी हा माईच्या आणि त्या तिच्या लेकरांच्या ऋणातच राहतो… तरीही फुल ना फुलाची पाकळी.. किंवा “टोकन ऑफ लव” म्हणू हवं तर, असं काहीतरी करायची प्रचंड इच्छा होत असते. तुम्हाला इच्छा झाली आणि मैय्या ने पूर्ण केली नाही असं होतच नाही… इथेही तसंच झालं. बोलता बोलता या तरुणीचं लग्न ठरलं असल्याचं समजलं. तिचा भाऊ शहरातून खरेदी करून आला होता. मग आम्हा परिक्रमावासी ना अगदी घरातल्या सारखं वागवून लग्नाची खरेदी दाखवण्यात आली. या खरेदी मार्फत मला आणि बाबाला ह्या तरुणी साठी प्रेम भेट देण्याची संधी मिळाली. “बहोत सुंदर चूडा है ये… ये मेरी तरफ से होगा आपकी शादी के लिये…. आपने मुझे मैय्याजी कहा है बेटा, तो आप अब इनकार नही कर सकते..” माझ्याही नकळत मी बोलून गेले, अन् तिला सुद्धा नकार देता आला नाही. किंबहुना तिला इतका आनंद झाला की तो आनंद तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागला…. लग्नाचा चुडा म्हणजे सौभाग्याचा दागिना.. आणि तो नर्मदा माईच्या परिक्रमावासींकडून मिळतोय यात तिला इतका आनंद होत होता म्हणून सांगू..! आम्ही निरोप घेऊन पुढे निघालो.
आता खरं कुंडा या गावाला जायचं होतं. पण खरगहना जवळच अंधार पडेल असं वाटलं. आम्ही निवारा शोधू लागलो. एका मंदिरात डोकावलं तर तिथे कुणीही नव्हतं. आजुबाजुची घरं पाहिली. राहता येईल अशी काही ही अवस्था नव्हतीच. पुढे अजून एक मंदिर लागलं. तिथे एक संन्यासी होतेत. आम्ही नर्मदे हर केलं आणि इथे राहता येईल का अशी चौकशी केली. त्या सन्यासांचा मूड नसावा कदाचित. “यहा नही रह सकते जावो आगे”.. कारण नसतानाच ते आमच्या अंगावर खेकसलेच… जाऊदे बघू यात पुढे असं म्हणून आम्ही पुढे निघालो.. तेवढ्यात त्याच सन्याश्याने पुन्हा आवाज दिला. “परिक्रमा में हो क्या? अगर यहाँ रुकना हुआ तो कब तक रूकोगे? भोजन व्यवस्था अपने आप करना होगा… चलेगा तो आजाओ…”
तिथे गेल्यावर सर्वप्रथम चहापाणी झालं. गरम गरम चहा पिऊन संन्यासी महाराज थंड झाले असावे. आम्ही कुठून अशी त्यांनी चौकशी केली. मग ते पुन्हा गरम झाले.. “परिक्रमा मे हो तो हुकुम क्यू नही करते? मंदिर मे आये हो, किसी के बाप का घर नही है! याद रखो, जब कभी भी मंदिर जाओगे तो अधिकार के साथ वहा रहो. मंदिर किसी की जहागिरी नही है… भगवान का घर है… और तुम परिक्रमा कर रहे हो, भगवान के घर निवास करने का पूरा अधिकार है तुम्हारा. एक रात रूक के आगे जाते हो तुम… हक से बोला करो की आसन लगाना है…” ही मात्र आतापर्यंत मिळालेली नवीन शिकवण होती. अर्थात एकंदरच परिक्रमेत असताना विनम्रता आणि स्वीकार या दोन गोष्टी अंगात रुजल्या सारख्या झाल्या होत्या, मात्र गरज असताना असा अधिकार देखील गाजवायचा हे नव्याने समजलं होतं. अर्थात या अधिकारात मगरूरी नसावी फक्त गरज आहे हे भान असायला हवं.
संध्याकाळी संन्यासी महाराजांनीच स्वयंपाक केला. छान सत्संग झाला. तुम्ही परिक्रमावासी बरेचदा आपले अधिकार गाजवत नाहीत हेच तुम्हाला शिकवायचं होतं असंही महाराज म्हणाले. इथून पुढे कुकरा मठ, बीच्छिया रोड, असं करत करत दिंडोरी ला पोहोचलो. दिंडोरी ला पोहोचण्याच्या आधी वाटेत आम्हाला कन्हैया भैया म्हणून एक जण भेटलेत. ते पुन्हा दिंडोरी ला देखील भेटलेत, किंबहुना आमच्यासाठी खास म्हणून आलेत. दिंडोरी पासून ते सक्का पर्यंतच्या प्रवासात सुद्धा एक म्हातारे आजोबा भेटले होते. आणि याच प्रवासात सतीश भाई नायक भेटले होते…. याच प्रवासात पुन्हा एका अशा घरी थांबलो जो अनुभव थोडाफार कनकधारा सारखाच होता… नायक भाईंच प्रेम मात्र वाखाणण्याजोगं…कारण पहिल्याच नव्हे तर दुस-याही परिक्रमेत नायक भाईंची आणि माझी भेट झाली, तेव्हाही त्यांचं मैयाप्रेम मैया इतकंच अथांग आहे हे जाणवलं.. त्याही अनुभवाबद्दल सांगेनच पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७६
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला बोंदरगाव च्या मुली बद्दल सांगितलं होतं. अचानक पणे रस्त्यात भेटलेली टेलर मुलगी आणि तिने दिलेली सेवा ही मी तुम्हाला सांगितली होती. खरंगहना ला झालेला सत्संग देखील आपण बघितला. इथून पुढे आम्ही कुकरा मठ ला गेलो. कुकरा मठ ला एका कुत्र्याचं मंदिर आहे. कुकुर म्हणजे कुत्रा. कुत्र्याचं मंदिर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या कुत्र्याची गोष्ट थोडक्यात सांगते.
ही गोष्ट एका बंजारी जमाती मधल्या बाईच्या कुत्र्याची आहे. ही बंजारी जमात गावोगाव फिरत असते. एकदा ही जमात दिंडोरी जवळ थांबली असताना एका बंजारी बाईला कर्जाची गरज भासली. तिथल्या सावकाराकडून तिने कर्ज घेतले मात्र गाव सोडताना ते कर्ज ती परत करू शकली नाही. काहीतरी ठेव ठेवायची म्हणून त्या बंजारी बाईने आपला कुत्रा सावकाराला दिला. कुत्र्याला समजवून सांगितलं की आता तुझे मालक सावकार आहेत. त्यांची तू सेवा करायची तरच माझं कर्ज फिटेल. हा कुत्रा देखील सावकाराची प्रामाणिकपणे सेवा करू लागला.एकदा सावकाराकडे चोरी झाली मात्र कुत्र्याने प्रसंगावधान राखून चोरांना पळून लावले आणि सावकाराचा जीव वाचवला. सावकाराला अतिशय आनंद झाला आणि ह्या बंजारी बाईच्या कुत्र्याने आपले प्राण वाचवले हे पाहून त्याने त्या बंजारी बाईचे सर्व कर्ज सावकाराने माफ केले. इतकेच नव्हे तर आपल्या जवळील सर्व दागिने एका रुमालात बांधून त्यात एक चिठ्ठी ठेवली. “मी तुझ्या कुत्र्याला बंधनमुक्त करत आहे आणि या दागिन्यांसह तुझ्याकडे परत पाठवत आहे” असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं.
कुत्रा अतिशय आनंदाने आपल्या मालकिणीकडे दागिन्यांचं गाठोडं घेऊन निघाला. मालकिणीला भेटला आणि तिच्या पुढ्यात दागिन्यांचं गाठोडं ठेवलं. ते दागिने पाहून बंजारीण चिडली, रागावली, तिला वाटलं या कुत्र्यानेच सावकाराकडे चोरी केली. दिलेली चिठ्ठी न वाचताच तिने कुत्र्याला काठीने चांगलेच बदडून काढले. आणि त्यातच त्या कुत्र्याचा जीव गेला. दागिन्यांची पिशवी घेऊन बंजारीण सावकाराकडे गेली असता झालेली हकीगत तिला समजली. आपल्या कुत्र्याच्या निधनामुळे आणि स्वतःच्या कृत्यामुळे ती फार फार दुखी झाली आणि जिथे त्या कुत्र्याने देह सोडला तिथेच तिने त्याचे मंदिर बांधले व शेवटपर्यंत या मंदिरात सेवा करत राहिली.हे मंदिर बघतो त्यावेळी आणि ही कथा ऐकतो त्यावेळी मन खरोखरीच भरून येते. या कुकरा मठ चा परिसर अतिशय रमणीय आहे.
कुकरा मठ होऊन पुढे ऋणमुक्तेश्वर मंदिर बघत पुढे आलो. आम्ही नर्मदा किनाऱ्यापासून साधारण तीन ते चार किलोमीटर दूर असू. इथे पुढे गोमती नदीचा संगम आहे. आम्ही मात्र रस्त्यानेच पुढे पुढे जात होतो. वाटेत एका दुकानात आम्हाला चहा आणि फराळासाठी बोलावलं. त्याच दुकानात एक गिर्हाईक आला होता. त्याला परिक्रमावासींबद्दल फार आस्था होती. जरा विश्राम झाल्यावर जाता जाता त्याने बाबाच्या हातात एक कागदाची पुंगळी कोंबली. बरेचदा लोक दक्षिणा अशी कागदात गुंडाळून देतात. आम्हाला वाटलं त्यानेही दक्षिणा दिली असेल. तो पुढे निघून गेल्यावर बाबाने कागदाची पुंगळी म्हणून पाहिली तर त्यात पैसे नव्हते. त्यात “कृष्णा” आणि खाली फोन नंबर लिहिला होता. सोबत एक नोट लिहिली होती ती अशी- “आपको मेरी जरुरत ना पडे तो अच्छा है, लेकिन आपको मेरी जरुरत पडने वाली है तब मुझे फोन करियेगा”… मैयानी दिलेलं दान समजून तो फोन नंबर फोन मध्ये सेव करून घेतला आणि आम्ही पुढे निघालो. कृष्णा ने आमचा फोन नंबर घेतला नव्हता. तो कुठला राहणारा याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. त्याची गरज आम्हाला पडेल का? केव्हा पडेल? आणि त्याची मदत होईल का? असा कुठलाच विचार आम्ही केला नव्हता, मात्र त्याच्या मदतीची वेळ अगदीच समोर आहे हे आम्हाला तरी कसं समजणार?
आम्ही दिंडोरी ला पोहोचलो. साधारण साडेचार पाच झाले असणार. किनाऱ्यावर आश्रम आहे तिथे गेलो. आश्रमात प्रचंड गर्दी होती. अजिबात जागा नव्हती. जी जागा आम्हाला दाखवण्यात आली की अतिशय कोंदट, कुबट, धूळ ग्रस्त अशी असल्याने तिथे रहावसं वाटलं नाही. स्नान पूजादि आटोपून मग बघुयात, वाटलं तर अंगणात आसन लावूयात असं आम्ही ठरवलं.आमचं स्नानादी आटोपून झाल्यावर ठरल्याप्रमाणे अंगणात आसन लावणार तोच बाबाच्या मनात विचार आला, अजून कुठली जागा माहीत असेल तर ह्या कृष्णा ला विचाराव का? जी चिट्ठी मैया ने आपल्या हाती दिली कदाचित त्याचा उपयोग करण्याची हीच वेळ असेल? कदाचित अशी वेळ येणार आहे हे माहीत असल्यानेच मैया ने कृष्णाला त्याचा नंबर आम्हाला देण्याची बुद्धी दिली असेल?.. बाबांनी कृष्णाला फोन केला. फोन येताच कृष्णाने आम्हाला आम्ही कुठे आहे ते विचारलं आणि फोन बंद केला. मग कृष्णा चा फोन लागला नाही. मात्र थोड्याच वेळात आम्हाला शोधत शोधत दोघं मुलं आली. त्यांच्याजवळ दुकानात काढलेला आमचा आणि कृष्णाचा फोटो होता. “बाबाजी मैया जी चलो आपकी व्यवस्था दुसरी जगह कर दीयी है.. अभी अभी हमारे बडे भैया कृष्णा भैया का फोन आया था..” असं म्हणत ती दोघं मुलं आम्हाला एका मोठ्या बिल्डिंगच्या फटका समोर घेऊन आलीत. ही बिल्डिंग बहुधा काही ऑफिसेस किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखी असावी मात्र कुठलीही पाटी लिहिलेली नव्हती. “यहाँ नीचे एक रूम है, आप विश्राम कीजिए. भोजन थोडी देर मे आ जायेगा” असं म्हणून आमचं सामान रूम मध्ये ठेवून ती मुलं निघून गेलीत… सांगितल्याप्रमाणे थोड्यावेळात पुरी, भाजी, भात वरण आणि गुलाबजाम असा जेवणाचा डब्बा आला. कृष्णाचा फोन काही केल्या लागेना… मात्र ती रात्र अगदी फाइव स्टार फॅसिलिटी असल्यासारखी गेली… कोण कुठला हा कृष्णा मैयाच जाणे… पुढे अनेक दिवस कृष्णाचा फोन लावून पाहिला मात्र त्याचा फोन कधीच का लागला नाही हे कोडं उलगडत नाही. कृष्णाने देखील नंतर कधी फोन केला नाही. माझ्याकडे या व्यतिरिक्त कृष्णाबद्दल काहीही अजून माहिती नाही. इतकच काय तर आमचा आणि कृष्णाचा फोटो देखील कृष्णाने त्याच्या कॅमेरा काढला होता तो ही आमच्याकडे आलेला नाही.
दिंडोरी होऊन पुढे सलैया, किसलपुरी मार्गे नंतर आम्ही सक्का ला येउन थांबलो. हा रस्ता डोंगराळ रस्ता आहे. दूर दूर पर्यंत रस्ता आणि चढाव दिसत राहतो. आजूबाजूला शेती आहे आणि झाडं अजिबात नाहीत. दुपारच्या टळटळत्या उन्हात विसावा म्हणून असा काही नाहीच. नाही म्हणायला कुठेकुठे पाण्याचे रांजण भरून ठेवलेले. आणि वाटेत येणारे जाणारेही फार म्हणून नाही. दुपारचं टळटळ ऊन मला जाणवू लागलं होतं. मजल दरमजल करत समोर दिसणाऱ्या टेकडीच्या वर असलेल्या वस्तीमध्ये आता आपण विश्राम करू असं आम्ही ठरवलं होतं. जवळचं पाणी संपत आलं होतं. क्वचित एखादा येणारा जाणारा नर्मदे हर करायचा. असाच कुठून सा एक माणूस आमच्या पाशी येऊन थांबला. त्याच्याजवळ हिरो पुक गाडी होती. त्याच्या गाडीच्या दोन्ही बाजूला कसल्याश्या मोठाल्या बॅग बांधल्या होत्या. शेताच्या एका कोपऱ्यात, नाली च्या बाजूला, एका काटेरी झाडाखाली, थोड्याशा सावलीत मी आणि बाबा बसलेलो होतो. ती गाडी आमच्या पुढे येऊन थांबली आणि त्या गाडीवाल्या तरुणाने मागच्या बॅगा उघडून सुंदर रसरशीत लाल टमाटे बाहेर काढले. पटकन खिशातून चाकू काढला. टमाट्याच्या चार फोडी केल्या त्यावर मीठ मसाला घालून एका पेपर प्लेट मध्ये आमच्या पुढ्यात ठेवल्या. “बाबुजी अभि खेत से तोडे है टमाटर, एकदम ताजे है, मुझे नमक मसाला डालकर खाना पसंद है इसलिये साथ नमक मसाला भी रखा है..आपको देख के लगा आपको बहुत प्यास लगी होगी इसीलिए अभी काटके दिया टमाटर… और भी है रास्ते के लिए देकर रखता हु” असं म्हणत चार टमाटे बाबाला आणि चार टमाटे मला असे जबरदस्ती हातावर ठेवले. सोबतच दुसऱ्या पिशवीतून काही आवळे काढले आणि तेही आम्हाला दिले. मैय्या फक्त भुकेची काळजी घेते असं नाही. माझ्यासारख्या डायटीशियन ला त्यावेळी टमाटे आणि आवळे मिळण्याचं महत्त्व समजू शकतं. योग्यवेळी रसदार आणि पोषक विटामिन असलेलं फळ मिळणं म्हणजे काही गंमत नाही हं!
याच रस्त्यावर एक स्कूटर वाले म्हातारे आजोबा येऊन थांबले. आमची चौकशी केली. आम्हाला दहा दहा रुपयांची दक्षिणा घेऊन परत फिरले आणि म्हणाले “मै अभी आ रहा हु, आप चलते रहो मै आपको पकड लूंगा”… आम्ही पुढे निघालो. त्या आजोबांची दक्षिणा देऊन झाली होती. आता कशाला परत येतील ते? असा विचार करून आम्ही त्यांच्यासाठी थांबलो नाही. पुढेच चालत राहिलो. तासा दीड तासांनी स्कूटर वाले आजोबा पुन्हा आमच्या मागून आले आणि एक भली मोठी पिशवी आमच्या हाती दिली. त्या पिशवीचं वजन साधारण तीन-साडेतीन किलो असेल. आम्ही एवढी जड पिशवी घेऊन चालू शकणार नाही. तुम्ही दक्षिणा दिली आहे. आता यात काय ते तुम्ही परत घेऊन जा. थोडं थोडं नावापुरतं वाटल्यास आम्ही खातो. असं आम्ही त्या आजोबांना सांगितलं. आम्हाला वाटलं त्या पिशवीत नक्कीच चिवडा, फळं किंवा तत्सम सामान असेल. मात्र त्या पिशवीमध्ये जवळ जवळ एक किलो तांदूळ एक किलो मुगाची डाळ, एक पाव तेल, हळद, तिखट, मीठ, मसाला, बटाटे, वांगे, कांदे, असं खिचडीला लागणारं रीतसर सामान आमच्या दोघांसाठी वेगवेगळे पॅक करून दिलं होतं.तेलाच्या प्लास्टिकच्या बाटल्या व्यवस्थित पॉलिथिन मध्ये बंद करून रबर बैंड लावून दिल्या होत्या. आणि हे सगळ आम्ही घेऊन जावं म्हणून ते आजोबा आम्हाला आग्रह करत होते. साधारण सत्तरीच्या आसपास त्यांचं वय असेल. आम्हाला दक्षिणा दिल्यानंतर हे आजोबा 20 किलोमीटर मागे घरी जाऊन हे सगळं सामान घेऊन आले होते. “बहुत दूर से सिर्फ आपके लिये लाया हु, आप कृपया रख लीजिए और बना के पास लिजीये तो हमे अच्छा लगेगा”.. असे आग्रह मोडवण्यासाठी खूप कठोर हृदय लागतं हो! आणि मैयाच्या सान्निध्यात हृदयाची कठोरता अगदी पूर्णपणे धूवून निघालेली असते. आमचा नाईलाज झाला आणि तेवढी वजनी बॅग घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. मात्र त्या वेळी आजोबांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचे, सेवेचे भाव दिसत होते त्या आनंदापुढे तीन-साडेतीन किलो वजन म्हणजे काहीच नाही!
याच रस्त्यावर पुढे एक कार येऊन आमच्या जवळ थांबली. खिडकी खाली करून आतल्या माणसाने आम्हाला खिडकीजवळ बोलावलं. शंभर शंभर रुपये दक्षिणा आमच्या हातावर ठेवली. इतकी दक्षिणा नको असं म्हटल्यावर कार मधला साठीच्या आसपासचा माणूस आम्हाला म्हणाला “नर्मदा मैया की हम पर बहुत कृपा है. उनकी वजहसे आज मै जिंदा हू. उनके भक्तो के लिए जितना करुंगा उतना कम है, मुझे तो आपकी बहुत सेवा करनी है, वो तो हम करेंगे. यह रुपये तो कुछ भी नही”… आम्ही रात्री कुठे थांबणार आहोत अशी चौकशीही त्या माणसाने केली. आम्हालाच काही कल्पना नसल्याने “मालूम नही” असंच उत्तर आम्ही दिलं… “मै आपको धुंड लुंगा” तो म्हणाला. ते स्कूटर वाले आजोबाही असंच म्हणाले होते… पण ह्या कार वाल्या माणसाबद्दल एक शंका मनात आली. हा माणूस कार मधून उतरून खाली देखील आला नाही. त्याने आम्हाला खिडकीपाशी बोलावलं… सेवा करायची आहे असं म्हणतो मात्र वागणुकीतून तसं दिसत नाही असा विचार मनात येऊन गेला. तो तसाच ठेवून आम्ही पुढे निघालो.
आम्ही सक्का या गावाला पोहोचलो. तिथे एका चहा वाल्याने आम्हाला चहा ला बोलावलं. डावीकडे आत एक दीड किलोमीटरवर एक मंदिर आहे तिथे तुम्ही राहू शकता असं त्याने सांगितलं. मात्र एक माणूस आम्हाला बोलवायला आला. “आप हमारे घर चलीये यही सामने तो है…” हे घर श्री नायक यांचं. त्यांच्या घरी गेल्यावर जी काही सेवा मिळाली त्यामुळे मन भारावून गेलं. कोण खरंच कुठल्या परिस्थितीत असतो आणि तरीही कशी सेवा, निस्सीम भक्ती आपल्यापुढे येते याचे आलेले प्रत्येक अनुभवच वेगळे आहेत. या नायक कुटुंबातल्या मुलीची गोष्ट सांगितली तर अंगावर काटा येईल. तो कार मधला माणूस उतरून खाली का आला नाही त्याचंही उत्तर मिळालं. “मै आपको धुंड लूंगा, अभी तो बहुत सेवा करनी है” असं म्हणणारा कार मधला माणूस आम्हाला पुन्हा भेटला का? आमच्या मनात येऊन गेलेल्या विचारांच्या मागे इतकं काही असू शकतं याचा उलगडा आम्हाला झाला खरा पण तो कसा झाला हे पुढच्या भागात सांगणार आहे. तोवर नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला कुकरामठ च्या कुत्र्याची गोष्ट सांगितली होती. रस्त्यात थांबून आधी दहा दहा रुपये आणि मग भरपूर शिधा देणाऱ्या काकांबद्दल पण सांगितलं. आम्हाला गाडी जवळ बोलावून, काच खाली करून, दक्षिणा देणाऱ्या माणसाबद्दल देखील सांगितलं. त्यावेळी मनात एक विचार येऊन गेला होता. मुझे “नर्मदामैया की बहुत सेवा करनी है” असं म्हणून भरपूर दक्षिणा देणारा माणूस कारमधून खाली देखील उतरला नाही, याचं आश्चर्य वाटलं होतं. कारण नर्मदापरिक्रमा वासींविषयी प्रेम असणारी व्यक्ती, नर्मदे वर श्रद्धा असणारी व्यक्ती, विनयशील असते असा आजपर्यंतचा अनुभव…. मग ह्या माणसाने साधं खाली उतरू नये हे वेगळं वाटलं. पण आपल्याला वाटतं तसं नसतं. काय झालं होतं ते आता सांगते.
शेतातले ताजे टमाटे, रसदार आवळे खात खात आम्ही सक्का या गावापर्यंत पोहोचलो होतो. चहा वाल्याकडे असतानाच समोर राहणार्या नायक दादांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं. एक जिना खाली उतरून मग छोटसं अंगण आणि घर. नायक दादांच्या घरी आल्यानंतर घरातल्या मंडळींचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. घरातल्या मैय्या जींनी फटाफट हालचाली करून समोरची छोटी खोली आमच्यासाठी पूर्ण रिकामी करून दिली. नको नको म्हणताना सुद्धा खोलीतले जड लोखंडी पलंग मुलाबाळांना, तरूणांना बोलावून अंगणात काढून ठेवले. “आप पलंग पे नही आसन लगाते हो, हमे पता है” असं म्हणत खोली साफसूफ करून आमच्या आसनाची व्यवस्था करून दिली.
परिक्रमावासिंची सेवा करणं याहीपेक्षा नायकांच्या घरी होत असलेली सेवा ही अक्षरशहा तळहातावरच्या फोडाप्रमाणे कुणाला जपावं तशी होती. यांच्या घरी मागच्या घराचं बांधकाम सुरू होतं. पक्क बाथरूम तयार होत होतं तोवर पडदा लावलेली छोटीशी खोली बाथरूम सारखी वापरत होतेत.. मी स्नानाला जाणार म्हटल्यानंतर मैयाजींनी विहिरीतून स्वत: पाणी काढून गरम केलं आणि बाथरूम पर्यंत घेऊन आल्यात. इतकच काय तर माझं स्नान होईस्तोवर त्या बाहेरच उभ्या होत्यात.. “आप स्नान कर लो माताजी मै खडी हू यहा” … असं म्हणून पडदा उडू नये याची काळजी त्या घेत होत्या… मी बाहेर येताच तेलाची बाटली, क्रीम, कंगवा असं सगळं त्यांच्याकडे तयारच होतं… कशाची म्हणून कमी पडूच द्यायची नाही असाच जणू संकल्प होता त्यांचा… आम्ही यातलं काही आम्ही वापरत नाही म्हटल्यावर त्या थोड्या हिरमुसल्या झाल्या खऱ्या पण त्यांच्या उत्साहात कुठेही कमी झाली नाही.
त्यांच्या घरी स्वयंपाकात पंचपक्वान्न असणार हे काही वेगळं सांगायला नको. अंथरूण-पांघरूण,रात्री लागलं तर प्यायला पाण्याचा तांब्या पेला भरलेला, इतकच काय तर कछुआ छाप, काड्या पेटी, लाईट गेले आणि रात्री गरज पडली तर मेणबत्ती, टॉर्च, बाहेर जाण्या-येण्यासाठी स्लीपर, अशी सगळी तयारी आमच्या या आसन लावण्याच्या खोलीत आधीपासूनच तयारी ठेवली होती. पण भोजन प्रसादी च्या वेळेस वेगळाच अनुभव आला.
मी पहिला घास घेतला आणि मैया जी रडू लागल्या. आपल्या घरी परिक्रमावासी येऊन राहतात आहे, आपल्याला त्यांची सेवा करण्याचा अवसर मिळतो आहे याचा तो आनंद असावा असं मला वाटत होतं मात्र मूळ कारण थोडं वेगळं होतं. आम्हाला मनसोक्त जेवतांना पाहून मैया जींचे डोळे भरून आले होते याचं कारण म्हणजे मैया जींची लाडकी, एकुलती एक लेक!.. या लाडक्या कन्येला गेल्याच वर्षी नियतीने या कुटुंबापासून हिरावून नेलं होतं.
मैया जी सांगत होत्या. “हमारी बिटिया को परिक्रमावासीकी सेवा करना अच्छा लगता था. उसे तो कन्या भोज भी बहुत पसंद था. वह जब छोटी थी तब कन्या पूजा के लिए जाया करती थी. आज जब परिक्रमावासी हमारे यहा भोजन करते है तब लगता है की हमारी बिटिया भोजन कर रही है.” आम्हा परिक्रमावासीं मध्ये एक आई आपल्या मुलीला बघत होती. मी स्नानाला गेले असताना पडदा उडू नये म्हणून तो स्वत: धरून ठेवणारी एक आई होती, हातात क्रीम,तेल,कंगवा घेऊन उभी असणारी एक आई होती! आणि म्हणून ही सेवा केवळ सेवा नाही तर मातृत्वाचा वर्षाव होता आमच्यावर… या माऊलीचं हे प्रेम बघून नकळत माझ्याकडून त्यांना ‘मैया जी’ ऐवजी ‘मां’ अशी हाक गेली तर नवल ते काय?
आम्ही भोजन प्रसादिला बसलो होतो तेव्हाची एक गोष्ट अजून सांगते. आम्ही जेवायला सुरुवात केली असेल नुकतीच, आणि दोघ तरुण आत आले. त्यांच्याजवळ फळांनी भरलेल्या पिशव्या होत्या. एक मोठा डबा होता. ते सामान तिथेच ठेवून “हम आते है पाच मिनिट मे” असं म्हणून निघून गेले. पुन्हा आले तेव्हा त्यांच्यासोबत दुपारी भेटलेला कार मधला माणूस होता. खिडकीपाशी आम्हाला बोलावून दक्षिणा देणारा आणि “मै आपको ढूंड लुंगा म्हणणारा” हाच तो माणूस… हा खाली का उतरत नाही याचं कारण आता आम्हाला समजलं होतं. हा कारमधून खाली न उतरणारा माणूस दोन्ही पायांनी अधु होता. एका एक्सीडेंट मध्ये त्याचा कमरेखालचा पूर्ण भाग निकामी झाला होता. जीव तेवढा वाचला तेसुद्धा नर्मदा माईच्या कृपेमुळे, म्हणून परिक्रमावासींची मनःपूर्वक सेवा तो करत होता.
हा कार वाला माणूस काही साधासुधा माणूस नव्हता. यांचं आडनाव देखील नायक. दिंडोरीचे हे राहणारे. कपड्याचे मोठे व्यापारी. या भागात मोठं नाव असणारे. हे दिंडोरी पासून आमच्यासाठी फळं आणि गुलाबजाम घेऊन आले होते… “आपको कैसे पता चला के हम यह रुके है?” असं विचारल्यावर म्हणाले, “यहासे बीस- चालीस गाव आगे तक भी मुझे पता चल जाएगा के आप कहा हो.. हर जगह मेरे पहचान वाले लोग रहते है. जैसे ही आप दोपहर को आगे बढे वैसेही मैने अगले गावों मे फोन करके आपके बारे मे बता दिया था. आप किस गाव में, किसके घर में रुके है यह मेरे पहचान वाले लोग मुझे फोन करके बता देंगे. मैने कहा था मै, आपको ढूंड लूंगा, मैने आपको ढूंड लिया”… हा एवढा अट्टाहास फक्त सेवेसाठी! खरंच काय परिस्थितीमधून हे कारवाले नायक काका गेले असतील? पुढचे पाच-सहा दिवस, जवळ जवळ शंभर -सव्वाशे किलोमीटर पर्यंत हे काका रोज संध्याकाळी आमच्यासाठी जेवणाचा मोठा डबा घेऊन येत राहिले.
पुढे जेवणाचा प्रश्न आठ दिवस आला नाही कारण नायक काका डब्बा घेऊन येत होते मात्र चावी नावाच्या गावात जरा गंमतच झाली. मंदिरात काहीतरी कार्यक्रम सुरू असल्याने राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. खरंतर इथे स्वतःहून कोणी बोलावलं नाही नाही. तरीही सोय झाली ती अगदी फाईव्हस्टार सारखी. या फाईव्हस्टार सोयी नंतर लगेचचचा टप्पा आला मधुपुरी चा. इथे आम्ही चक्क गोठ्यात राहिलो, मात्र हा अनुभव देखील अत्यंत गोड असा होता…कसा ते सांगते पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सक्का मधल्या नायक कुटुंबाची गोष्ट सांगितली. पायांनी अधू असलेले आणि दिंडोरीचे व्यापारी दुसरे नायक काका आमच्यासाठी पुढचे काही दिवस डब्बा घेऊन येत असत. त्यांनी मोबाईल मध्ये आमचा फोटो काढला होता आणि तो फोटो पुढच्या काही गावांमध्ये सर्क्युलेट केला. हे परिक्रमावासी जिथे कुठे थांबले असतील तिथे मी डब्बा घेऊन येईल, मला तशी माहिती कळवावी असं त्यांच्या संपर्कात असलेल्या त्या त्या गावातल्या लोकांना सांगण्यात आलं होतं. शेवटी एका ठिकाणी आम्ही त्यांना अगदी विनवणी केली. तुमच्याकडून भरपूर सेवा झाली आहे, आता कष्ट घेऊ नका. तुमची श्रद्धा आणि आईची इच्छा या दोन्हींचा आदर-सन्मान ठेवून आतापर्यंत आपण आमच्यासाठी बरंच अंतर रोज कार नी प्रवास करत आहात. आम्हाला आता ते बरं वाटत नाही. आमच्या तोंडून हे शब्द कदाचित नर्मदामय्याच्या इच्छेमुळे निघत असतील असं मानून त्या नर्मदा माई साठीच आता तुम्ही डब्बा घेऊन येऊ नका असं त्यांना सविनय सांगितलं आणि नंतर आम्ही पुढे चालू लागलो.
आता चावी गावातली गोष्ट सांगते. आम्ही चावी ला गेलो असताना मंदिरात काहीतरी कार्यक्रम सुरू असल्या कारणाने आसन लावायची व्यवस्था तिथे होऊ शकत नव्हती. नायक कुटुंबाकडे घेतलेली सेवा पाहून कुणाच्या तरी घरी जाऊन राहणं मलाला तितकं प्रशस्त वाटत नव्हतं कारण इतका मान, इतकी श्रद्धा, इतकी सेवा, बघून ही आपली लायकी नाही हे मनाला आतून कळत होतं, काहीही कर्तुत्व नसताना हे असं सगळं मिळणं आणि उगाच चा मोठेपणा मिरवणं याची खरोखर लाज वाटत होती. अगदीच अशक्य असेल त्याच वेळी कोणाच्या तरी घराचा आसरा घ्यायचा असं ठरवलं. लोक मनापासून बोलवतात पण तरीही आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत नसतं का? असं म्हणतात नर्मदा मैया वैराग्य देते, नर्मदा मैया तुम्हाला तुमची पायरी दाखवते, तुमचा अहंकार गळून पडू लागतो… मात्र हे सगळं शिकवण्याची घडवून आणण्याची तिची पद्धत खरोखरच वेगळी आहे. एखादा धडा देऊन किंवा अद्दल घडवून कोणाची पायरी दाखवली तर कदाचित तो परिणाम तात्पुरता असू शकतो म्हणून नर्मदामैया वेगळाच मार्ग अवलंबत असली पाहिजे. अहंकारानी ठासून भरलेल्या पुतळ्याला ती इतकं वर नेऊन ठेवते की तिथून त्याला स्वतःची, कितीतरी खाली असलेली पायरी स्पष्ट दिसू लागते. माझ्या पायरीच्या वर असलेले अनेक लोक दिसू लागतात. माझ्याहून कितीतरी पायऱ्या वर असलेल्या लोकांमध्ये माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात सात्विकता, अहंकार शून्यता, श्रद्धा, सेवाभाव आहे हे जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघते आणि अनुभवते तेव्हा मला माझी पायरी दाखवायची गरज पडत नाही, ती मला आपोआप दिसते, हाच माझी पायरी दाखवण्याचा नर्मदामैया चा मार्ग आहे. प्रत्येक पायरी गणिक एक एक विकार सोडला किंवा सुटला की ती एकेक पायरी आपोआप वर चढल्या जाते, हे वरून दाखवून चटकन लक्षात येतं. खालून वर बघणं कठीण मात्र वरून खाली बघणं सहज आणि सोपं आहे, म्हणूनच कदाचित ही नर्मदा माई माझ्यासारख्या लायकी नसलेल्या व्यक्तीच्या भाग्यात इतका मान, इतकी सेवा, इतकं प्रेम लिहून देते की त्यानंतर मला त्या वरच्या पायरीची ओढ लागू लागते. हो पण ही ओढ लागता लागता माझ्या मधले विकार निघून जाण्याची इच्छा जरी प्रबळ असली तरीही.. म्हणजे विकार दूर होऊन माईचं सान्निध्य लाभावं ह्या केवळ ईच्छेनी देखिल ही लागणारी ओढ शुद्ध भक्तीमय ओढ होऊ लागते. मग ती सेवेसाठी, अहंकारासाठी, सन्मानासाठी लागत नाही, मात्र प्रेमासाठी, प्रेमापोटी आणि नर्मदामय्याच्या भक्तीसाठी लागते हे तिने जाणवून दिले आहे.
तर शक्यतोवर कोणाच्या घरी न थांबता मिळेल तिथे आणि मिळेल तसं आसन लावायचं असं आम्ही ठरवलं. आम्ही ठरवलं पण म्हणून असं घडत नाही. कदाचित स्वतःची पायरी स्वतःला ओळखता यावी इतकीच त्या नर्मदामय्याची इच्छा असेल. त्यानंतर मात्र स्वीकृती चा धडा द्यायला तिने सुरुवात केली. सांगते. मंदिरात जागा नव्हती त्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेल्या एका रिसॉर्टच्या अंगणात आसन लावावं असं आम्ही ठरवलं. जेवणाचा डब्बा नायक काका घेऊन आले होतेच. रिसॉर्टला छान कौलारू ओसरी होती तिथे आम्ही सामान ठेवलं. मंदिरात भजनाचा कार्यक्रम होता, तो झाला की आसनं लावू असं ठरलं… पूजा, भजनाचा कार्यक्रम, भोजन प्रसादी असं सगळं झाल्यावर तिथली जागा थोडीशी झाडून घ्यायला म्हणून मी झाडणी मागितली. रिसॉर्टच्या चौकीदारानी झाडणी आणून दिली आणि ती ओसरी मी झाडून घेतली. तोपर्यंत हा रिसॉर्टचा चौकीदार शांतपणे समोरच्या खुर्चीत बसला होता. आम्ही आसन घालणार तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. त्याने रिसॉर्टची खोली उघडून दिली आणि “हमारे साहब ने बताया है की परिक्रमावासी को रूम खोल के दो. पैसा नही लेना… उनकी सेवा करो, क्या चाहिये क्या नही पूछ लो” असं म्हणून आमचं सामान त्याने खोलीत नेऊन ठेवलं… अतिशय मोठी, एयर कंडीशन्ड, प्रशस्त अशा खोलीत आमची व्यवस्था नर्मदा माई नी केली होती. तो फोन कोणाचा होता हे आम्हाला माहित नाही. आम्ही विचारलं देखील नाही. साधारण बारा फूट बाय दहा फूट इतकं मोठं बाथरुम असलेली खोली किती मोठी असेल याचा नुसता विचार केला तरी आपण राजमहालात आहोत की काय असंच वाटेल न? वॉशिंग मशीन पासून गिझर पर्यंत इथे सगळं व्यवस्थित होतं. अर्थात यापैकी कशाचीच आम्हाला गरज भासली नाही तरीही आमच्या दिमतीला या सगळ्या वस्तू लागून होत्याच!… मात्र आता आम्हाला आमची पायरी समजली होती..अजून अंगवळणी पडली नसली तरी डोळ्यांनी दिसली मात्र नक्कीच होती.
चावी होऊन आता पुढे देवगाव संगमा ला जायचं होतं. इथे बुढनेर आणि नर्मदामय्याच्या संगम आहे. इथे जमदग्नी ऋषींच्या आश्रम आहे. त्यांनी इथे अनेक वर्ष तपस्या केली होती. हा रस्ता काही अंतरापर्यंत पळसाच्या जंगलातून जातो. मार्च महिना जवळ येत होता त्यामुळे पळसाला थोडी थोडी फुलं येऊ घातली होती. इथला पळस पिवळेपणा कडे झुकणारा पळस होता. काही भगवी झाडही होतीच.. पण भगव्या पेक्षा पिवळा रंग डोळ्यांना जास्त सौम्य दिसायचा. भगव्या पळसाबद्दल माझ्या काही वेगळ्या भावना आहेत पण त्या पुढे कधीतरी सांगेन. एका वाक्यात सांगायचं झालं तर एखादा तेजस्वी संन्यासी उंच मान करून निळ्याआकाशाकडे बघतोय असं काहीसं मला भगव्या पळसाच्या झाडाकडे पाहून वाटत असतं… असो.. तर खाले दिठोरी, मोहगाव करत करत आम्ही देवगाव ला पोचलो च.
अत्यंत पवित्र कंपन असलेली ही जागा. प्राचीन मंदिर. लहान पण अतिशय आकर्षक घाट. प्रवाहात देखील एक दोन छोटी छोटी मंदिरं, आणि एकीकडून येणारी बुढनेर आणि दुसरीकडून वाहणारी नर्मदा मैया. या वातावरणात अशी काही जादू होती की इथून जायची इच्छाच होईना. शिवाय आश्रमाचा परिसरही व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. आम्ही इथे आलो त्यावेळेला एका बैरागी बाबांनी नुकतंच इथे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. स्वच्छता, मंदिरांची पूजाअर्चा, परिक्रमावासींची ची व्यवस्था सगळंच नीटनेटकं होतं. संध्याकाळची ची पूजा आरती आटोपून भोजन प्रसादी ची वाट बघता बघता आम्ही घाटावरच बसून राहिलो, तेव्हाची एक गंमत सांगते.
इथे बुढनेर नदीला बुढी माई असेही म्हणतात. बुढी माई हा शब्द कोण का जाणे माझ्या हृदयाला भिडला होता. माझ्या डोळ्यासमोर पांढरे वस्त्र धारण केलेली कुरळे पांढरे केस असलेली, पाठीला किंचित वाक आलेली, चेहऱ्यावर अतिशय प्रेमळ भाव असलेली एक वृद्ध आजी डोळ्यासमोर आली. बुढी माईची ही प्रतिमा नकळत आणि अचानकपणे माझ्या डोळ्यासमोर तयार झाली होती. खरंतर ही बुढनेर नदी अशीच संथपणे वहात होती. अनुभव आणि वयाने आलेलं स्थैर्य, वैराग्य आणि सामंजस्य जसं असावं तसं या बुढी माईचं वाहाणं होतं… मी विचारच करत बसले होते आणि दिवेलागणी होऊन गेली होती. घाटाच्या पायऱ्यांवर मी आणि बाबा दोघजण बसलो होतो. अगदी पूर्ण शांतता. अशातच मागून काठी टेकत कोणीतरी चालतंय असा भास झाला. आम्ही मागे वळून पाहिलं.. मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या मनातल्या प्रतिमेच्या बरीच जवळ असलेली एक “बुढी माई” पायऱ्या उतरत होती. तिच्या हातात द्रोणांचे दिवे होते. ती पायऱ्या उतरून खाली आली. स्नान केलं आणि ओलेत्याने दिवे सोडले. दिवे सोडत असताना एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि अतिशय प्रेमळ असं स्मितहास्य दिलं… आली तशीच काठी टेकत टेकत, एकही शब्द न बोलता ती निघून गेली. मी मात्र हे सगळं खरं की भास याच विचारात तिथेच बसून होते… डोळ्यासमोर दिवे तरंगताना दिसत होते. बुढी माईच्या काठीचा आवाज येणे बंद झालं होतं… बाबा ही शांतच बसला होता, माझ्या मनात काहीतरी सुरू आहे याचा त्याला अंदाज असावा मात्र या बुढी माईची प्रतिमा आणि लगेच प्रत्यक्षात पाहिलेली बुढीमाई याबद्दल बाबाला काहीही माहीत नव्हतं. आजही नाही… भोजन प्रसादी साठी या असं बोलावणं आलं आणि आम्ही पुन्हा आश्रमात गेलो.
दुसऱ्या दिवशी बाबाजींनी आम्हाला सगळा आश्रम, सगळी मंदिरं दाखवली आणि खूप इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी सांगितल्या. आरस्पानी या शब्दाचा खरा अर्थ जमदग्नी आश्रमात असलेल्या अतिप्राचीन मंदिरातल्या अर्ध्या तुटलेल्या शिवलिंगाला पाहून कसा कळतो आणि या शिवलिंगाची एक चमत्कारिक गोष्ट आम्हाला कशी समजली हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. पुढे मधुपुरी च्या गोठ्यातल्या अनुभव पण सांगणार आहे… पुढच्या म्हणजे ७९ व्या भागात.. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७९
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला बुडी माई चा अनुभव सांगितला. माझ्या मनातल्या कल्पनेतल्या बुडी माई सारखीच मला भेटलेली ही बुडी माई होती. मी तिला बुढीमाई म्हणत होते, मात्र बुडणेर वरून मी तिचं नामांकन बुडी माई असं केलं नंतर. तर ह्या बुडी माई चं दर्शन घेऊन आम्ही भोजन प्रसादी साठी वर आश्रमात परतलो. आमची भोजन प्रसादी आटोपली, मात्र नंतर लक्षात आलं की आज आम्ही ज्यांचे कडून भोजन प्रसादी घेतली होती ती मंडळी कोणी दुसरीच मंडळी होती. आश्रमातल्या मंडळींनी तयार केलेली भोजन प्रसादी अजून व्हायची होती. आश्रमातले साधूमहाराज आम्हाला पुन्हा प्रसादिला बसण्याचा आग्रह करत होते. मग आम्ही मागच्या पटांगणात घेतलेली भोजन प्रसादी कुणी दिली होती? सांगते. आश्रमातल्या महाराजांना आमची भोजन प्रसादी झाली असल्याचं आम्ही सांगितलं, आणि ते थोडे नाराज झाले. म्हणाले “इतने प्यार से आपके लिए भोजन बनाया था और आप पाओगे ही नही?” महाराजांच्या आग्रहासाठी थोडी खिचडी खाल्ली खरी पण गच्च पोट भरलं असल्यामुळे पुढे काही धकेना… आमची अशी अवस्था पाहून आश्रमातले महाराज म्हणाले..”ऐसा क्या खाना पा लिया आपने? हमसे भी ज्यादा प्यार से बनाया था क्या? अब तो देखना पडेगा किस ने भोजन प्रसादी बनाई थी?” खरंतर आम्ही जेवत नाही हे पाहून बोललेलं हे वाक्य! पण अशा वाक्यांमध्ये ही काहीतरी संदेश असतो बरं का!
आश्रमातल्या बाबाजींच्या या वाक्यामुळे आम्हालाही असं वाटलं की आपण जिथे भोजन प्रसादी घेतली आहे तिथे जाऊन त्या मंडळींचे निदान धन्यवाद तरी करायला हवेत. दुसरा विचार मनात असा आला की ज्यांनी आम्हाला जेवायला वाढलं, ते किती सेवाभावी असतील,परिक्रमावासी कोण कुठले कसलीही चौकशी न करता फक्त आलेल्या परिक्रमावासी ला पोटभर खाऊ घालणं या व्यतिरिक्त त्यांच्या मनात कुठलाच विचार नव्हता हेच लक्षात आलं. कुतूहलापोटी आम्ही पुन्हा मागच्या पटांगणात गेलो. तिथल्या जेवणावळी आटोपल्या होत्या. तिथे आम्हाला जेवायला वाढणारे दोघं-तिघं तरुण एका सतरंजीवर बसले होते. मी त्यांनाच धन्यवाद दिला तर म्हणाले.. “हमने तो सिर्फ खाना परोसा था, एक अम्मा और उनका परिवार खाना लेके आये थे.” त्या मुलांनी सांगितलेल्या म्हाताऱ्या बाईचं वर्णन माझ्या बुडी माई शी तंतोतंत जुळत होतं. कोण मंडळी कुठून आली हे त्या मुलांनाही माहित नाही. “परिक्रमावासी को खाना खिलाना है तुम लोग भी खाना” असं म्हणून त्या परिवाराने या मुलांना मदतीला घेतलं होतं एवढंच!!
माझ्या बुडी माईनी मला दर्शनही दिलं आणि प्रसाद ही दिला! मलाच मात्र कळलं नाही! आता मैया ला येऊन मिळणारी ती बुडी माई नक्कीच कुणीतरी साध्वी असावी जी आता नदीच्या रुपात वाहते हे समजण्याइतकी काही मी खुळी नाही. मला कुब्जा आठवली. कुब्जेच्या कुबड असलेल्या शरीराचं रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये झालं ती श्री कृष्णा मुळे. श्रीकृष्णाने कुब्जेला अनेक युगे जिवंत राहण्याचा वर दिला आणि आपल्या तपस्या नंतर कुब्जेचे रूपांतर नदीमध्ये झालं. ही कुब्जा नदी पुढे नर्मदेला येऊन मिळते…. तशीच काही अख्यायिका या बुडी माईची असली पाहिजे असं वाटतं. मला तरी अशी अख्यायिका अजून पावेतो माहित नाही… मात्र त्या माईच्या दर्शनाची कृपा माझ्यावर झाली हे निश्चित!
आम्ही रात्री लवकरच झोपलो. पहाटे तीन-साडेतीन ला मला आपोआप जाग आली. मंदिरासमोरच्या ओट्यावरून खाली उतरून मी संगमाकडे बघत बसले होते. अंधार असल्याने मला फार काही दिसत नव्हतं. वारा वहात नव्हता, मात्र एखादी मंद झुळूक नक्कीच येत होती. थंडीही होती थोडी. या ब्रह्म मुहूर्ताला मी काहीतरी पाहिलं, पाहिलं नाही खरं डोळ्यांनी, पण अनुभवलं काहीतरी… मला नं नीटसं सांगता येणार नाही कदाचित पण प्रयत्न करते. परिक्रमा मार्गावरच ज्या रस्त्याने आम्ही आश्रमाकडे आलो होतो त्या भागाला माझी नजर गेली. तिथे नर्मदा माई बघण्यासाठी एक कंपाउंड सारखं केलेलं आहे. बसायला जागा आहे, बेंच आहे. तिथून कोणीतरी येऊन नर्मदा किनारी जातंय असं मला वाटायला लागलं. दिसत काहीच नव्हतं…. मात्र त्या दिशेने अतिशय मोहक असा सुगंध आला आणि पुढे निघून गेला हे जाणवलं. नीट सांगायचं तर आधी सुगंध अगदी मंद होता मग तो तीव्र होत गेला आणि आपोआप माझी नजर जिकडून सुगंध येतोय तेव्हा दिशेकडे गेली…. कुणीतरी आपल्या बाजूने निघून जावं तसाच सुगंध बाजूनी निघून गेल्यासारखा वाटला… लेले काकांचं वाक्य आठवलं.. सुगंध येतो ना तेव्हा कोणीतरी संत सत्पुरुष किंवा कोणी शुद्ध आत्मा आपल्या आजूबाजूला असतात.. मी चटकन नमस्कार केला… तोवर तो सुगंध नाहीसा देखील झाला होता. मग मी बराच वेळ तिथेच जप करत बसले होते.. पुन्हा तो सुगंध आला नाही.
सकाळी स्नानादी झाल्यानंतर आश्रमातल्या महाराजांनी आम्हाला मागच्या बाजूला असलेली जुनी मंदिरं दाखवली. जमदग्नी ऋषी ज्याठिकाणी बसून तपश्चर्या करत असत ते स्थान दाखवलं. मागच्या भागात बोलले ते याच शिवलिंगा बद्दल. एका दगडाच्या शिवलिंगात डोकावून पाहता तुम्हाला तुमचं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल असं कधी झालंय का? आणि शिवलिंग पॉलिश केलेले वगैरे नाही, अगदी नैसर्गिक बरं का! ह्या शिवलिंगाचा हा चमत्कार इंग्रजांना सुद्धा भुरळ पाडणारा होता. इंग्रजी राजवटीत इंग्रजांनी हे शिवलिंग उपटून मिळण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याहीआधी मुस्लिम राजवटीत देखील हे शिवलिंग तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला असं इथल्या महाराजांनी सांगितलं. आधी कितीतरी फुट उंच असलेलं हे शिवलिंग आता साधारण २ फूट उंच असेल. आम्ही शिवलिंगाला वाहण्यासाठी संगमावरचं जल आणलेलं होतच. ते वाहून झाल्यावर महाराजांनी आम्हाला एका विशिष्ट अँगलमध्ये उभे राहायला सांगितलं. त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर शिवलिंगावर डोकावून बघता आरशात बघावं इतकं लख्ख प्रतिबिंब पडतं. ह्याशिवाय लिंगात हिरे आहेत असं वाटून इंग्रजांनी ते तोडून नेण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांच्याकडून पूर्णपणे तुटलं नाही. या शिवलिंगाच्या रहस्याचा अजूनही शोध लागलेला नाही. हि-या सारखं लखलखत करणार हे शिवलिंग आजही अर्ध्या तुटल्या अवस्थेतच जमदग्नी आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या मंदिरांमध्ये बघायला मिळतं.
इथल्या महाराजांनी सकाळी आम्हाला बालभोग तयार करून दिला.काल जेवण झालं नाही आता बालभोग झाल्याशिवाय जाऊ देणार नाही असा आग्रह केला त्यांनी. बालभोग झाल्यावर बुडी माईच्या पलीकडच्या टेकडीवरून खाली उतरायचं. या गावाचं नाव बहुधा बिलगाव पण नक्की आठवत नाहीये. इथे एक हनुमानाचं मंदिर आहे. बुडी माई पार करून झाल्यावर जी एक छोटी टेकडी आहे ती एकट पण रमणीय आहे. त्या टेकडीवरून एक मोठासा ओहोळ बुडी माईला जाऊन मिळतो. त्याच्या सुकलेल्या किनार्यावरून ती टेकडी आम्ही पार केली. हनुमान मंदिरात आम्हाला पुन्हा एकदा चहा पाण्यासाठी बोलावलं… असंच थांबत थांबत आम्ही मधुपुरी ला येऊन पोहोचलो. मधुपुरी ला येत असताना अंधार झाला होता. मध्ये काही अंतर शेत होती आणि काही अंतर जंगलाचा भाग होता. वाटेत दोन तीन गुऱ्हाळ देखील होतीत. त्यातल्या एका गु-हाळ्याचा अनुभव छानच होता. वाटेत एक जंगल लागलं त्याही वेळेला एक छान सोबत मिळाली… आणि मधु पुरीला तर एक रोटी आश्रमात मजाच आली खूप… हा अनुभव खुपच गोड गोंडस होता… पुढच्या भागात नक्की सांगते…
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८०
नर्मदे हर
मागच्या भागात आपण जमदग्नीऋषींच्या आश्रमातील चमचमणाऱ्या शिवलिंगा बद्दल बोललो होतो. बुढी माईच्या दर्शना बद्दल देखील बोललो होतो. मी तुम्हाला मधुपुरी च्या गोड अनुभवाबद्दल सांगेन असं म्हणाले होते. आता पुढे सांगते.
आम्ही देवगाव सोडलं आणि टेकडी पूर्ण करून बिल गावला येऊन पोहोचलो. आता पुढे रामनगर, मधुपुरी, सुखतरा, नारा, असं करत करत महाराज पुरला पोहोचलो म्हणजे एक टप्पा पूर्ण होणार होता. खरंतर बिलगाव ते मधुपुरी हा काही फार मोठा टप्पा नाही. मात्र आज आम्ही मधुपुरी ला थांबलो. मधुपुरीला पोहोचेपर्यंतच अंधार व्हायला आला होता. खरं आज आम्ही अगदी हळूच चालत होतो. हा रस्ता अधून-मधून शेतातला, आणि मग पुढे वीरळ अशा जंगलातला होता. रस्त्यात लागणारे साइन बोर्ड आजूबाजूच्या जंगल परिसराची माहिती देत होते. आम्ही ज्या रस्त्यावरून जात होतो तो रस्ता पुढे जाऊन काली पहाडी नामक जंगलाकडे जात असल्याचं बोर्डवर दिसत होतं, आणि वाटेत आमचे मुक्कामाचे टप्पे येणार होते. वातावरण अतिशय प्रसन्न होतं. आम्ही आनंदाने मार्गक्रमण करत होतो.
वाटेत आम्हाला एका सायकल वाल्याने थांबवलं. “सामने आके रुकीये मैया जी, ताजा ताजा गुड खाईयेगा”. थोडं पुढे गेल्यावर एका फाटका समोर तो माणूस सायकल लावून आमची वाट बघत होता. त्यानी आम्हाला फाटकाच्या आत बोलावलं, म्हणाला, “गन्ने का रस पीयोगी या चाय मंगाऊ?” आम्ही एका गु-हाळ्यात आलो होतो. उसाचा रस काढून तो कढईत तापवतात तिथपासून तर सुंदर सोनेरी मधुर गुळ कसा तयार होतो याबद्दल तिथला मालक आम्हाला माहिती सांगत होता. तो गरम गरम गूळ तोंडात टाकल्या टाकल्या विरघळत होता. जाताना आम्हाला बांधून द्यावा म्हणून छान पळसाच्या पानांचा द्रोण बनवून त्या द्रोणा मध्ये तिथल्या मालकाने आम्हाला भरपूर गूळ बांधून दिला. त्याच गु-हाळ्यात आमची भेट एका संन्याश्याशी झाली. तेही परिक्रमेत होते आणि आमच्या बरोबरच पुढे येणार होते.
आमचा सत्संग सुरु झाला. ते म्हणाले, तुम्ही गूळ खाल्लात, तो कसा तयार झाला तेही बघितलं.. मग यातून तुम्ही काही शिकलात का? मी आपलं सर्वसाधारण उत्तर दिलं, उसाला पिळून त्यातला रस काढून घेतला, तो तापवला, मग गूळ तयार झाला… म्हणजे कष्टाला पर्याय नाहीत! महाराज हसले, ते म्हणालेत “बरोबर आहे मात्र आता तुमच्याकडून अशा उत्तराची मला अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला अजून थोडा वेळ देतो. तुम्ही खरंच काही शिकला असाल तर मला सांगा…” खरंतर माझ्या मनात जे सुरू होतं ते मी दिलेल्या उत्तरांपेक्षा वेगळं होतं, पण त्या विचारावर मला बोलायचं नव्हतं, निदान माझ्या मनात काहीतरी वेगळं सुरु आहे हे मी जाणवू दिलं नव्हतं कारण माझ्या मनातला हा विचार मी कोणालाही बोलून दाखवणार नव्हते. तो माझ्या पुरताच होता… पण कदाचित हे महाराज त्याबद्दलच बोलणार असतील? पण हे कळणार कसं? कारण माझ्या मनातला विचार बोलून दाखवण्याची माझी इच्छाच नव्हती.. असं काही खास कारण आता सांगता येणार नाही पण बरेचदा आपण अंतर्मुख होतो, किंवा, आत्मकोषात आत्ममग्न होऊन जातो आणि विचार मनात येत राहतात तशातलाच हा भाग असावा. हे विचार आपल्याच आतल्या अनेक पाकळ्या एक एक करून मोकळ्या करत असतात.
म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या कांद्याची आवरणंच्या आवरणं आपण जर काढत गेलो तर शेवटी एक कळी येते ज्याला आवरण असं नसतं… आणि आपण एका भरीव भागा पाशी येऊन पोहोचतो, तसंच येणारे विचार मनाच्या कोषांचे आवरण दूर काढत असतात बरेचदा, आणि मग शोध लागतो तो आतल्या त्या घट्ट भरीव भागाचा… ते विचार ज्यांनी मनाचे आवरणं निघतात, ते विचार माझ्याकडून कोणाकडेही व्यक्त झालेले त्यावेळी मला नको होते. पण म्हणून ते नव्हते असं नाही.. आता अनुभवकथना द्वारे ते सांगायला हरकत नाही म्हणून सांगते.
भल्या मोठ्या लोखंडी कढईमध्ये घातलेला उसाचा रस उकळताना मी बघत होते. त्या रसाच्या अगदी वरच्या पातळीवर बराच काडीकचरा जमला होता. उसाचा रस चांगलाच तापला होता, खालची आच जरा मंद मात्र सातत्याने सुरूच होती आणि मोठे मात्र न संपणारे उकळीचे बुडबुडे त्या उसाच्या रसाच्या खालून वर येत होते. हळू हळू उसाच्या रसातलं पाणी आटून तो रस घट्ट होत होता. रसा मधला काडीकचरा कढईच्या काठाशी जमत होता आणि सुंदर सोनेरी रंगाचा गूळ कढईच्या मध्यभागी तयार होत होता. या सगळ्यात जर महत्त्वाचा काही भाग असेल तर तो म्हणजे त्या कढईच्या खाली लावलेला विस्तव! कधी तेज तर कधी मंद असलेला विस्तव! पण हा विस्तव गूळ तयार होईपर्यंत बंद केला गेला नव्हता. गुळ तयार करणारा कारागीर हा कढईतला रस परतवत होता. माझं मन मात्र त्या विस्तवाचा कृतीवर टिकून होतं. या विस्तवानी या रसाला तापवल्यामुळे हा गूळाचा गोळा तयार झाला होता.
सुंदर सोनेरी आणि मधुर गूळ तयार होण्यासाठी उसाच्या रसाला तापवणं गरजेचं होतं.. माझ्या मनात विचारांचे हलके हलके बुडबुडे येत होते. या बुडबुड्यांना तपाच्या तापाने तापवलं तरच यांच्यापासून सुंदर सोनेरी मधुरतेची निर्मिती होणार होती. तप किंवा तपश्चर्या का करायची आणि ती सफल केव्हा होईल याचं एक प्रात्यक्षिक माझ्या डोळ्यापुढे मांडून ठेवण्यात आलं होतं. ज्या तपामुळे माझ्यामधील काडीकचरा दूर लोटल्या जाईल.. दिशाहीन तरलता किंवा वाहते पणा दूर होऊन एक स्थीरता येईल, पक्का तरीही मधुर असा आकार मिळेल आणि सोनेरी म्हणजेच दिव्यतेचा किंवा ज्ञानाचा प्रकाश निर्माण होईल तेच खरं तप… ह्या तपा मध्ये तापून निघणं हे खूप महत्त्वाचं आहे हे मला समजलं होतं… भालोदला प्रतापे महाराजांनी “साधना कशी करायची” हे मला समजावून सांगितलं होतं. या साधनेचं तपा मध्ये रूपांतर व्हायला लागणं, आणि त्यानंतर योग्य तितका वेळ पर्यंत, योग्य तो रंग, प्रकाश, आकार येईपर्यंत तपत रहाणं, तापवत राहणं आवश्यक आहे हे विचार मनात येत होते.
महाराज आमच्यासोबतच चालत होते. मी ह्या विचारांमध्ये मग्न होते कदाचित. मध्ये कुणीतरी चहा ला बोलावलं. मला चहाची अजिबात इच्छा नव्हती. अगदी नावाला घोटभर चहा पिऊन आम्ही पुढे सरकलो. महाराज मात्र तिथेच थांबणार होते. जाताना नर्मदे हर झालं त्यावेळेला महाराज म्हणाले “तुमने सोच लिया है शायद, सीख भी जाओगी धीरे धीरे, लेकीन प्रयास करो तो कुछ बात बनेगी.. गूड बनाना इतना आसान नहीं है…अभी तो बहुत समय लगेगा.. प्रयास करती रहो”..
विचारांची एकापाठोपाठ एक अशी रांगच लागून राहिली होती आणि पावलं मात्र पुढे पुढे जात होती. अंधार व्हायला आला होता. आजूबाजूला जंगलाचा पट्टा होता. अनावधानाने असेल पण मी वाजवीपेक्षा हळू चालत होते. बाबाने मला जरा स्पीड वाढवायला सांगितलं, मी स्पीड वाढवली देखील मात्र तरीही आम्हाला पोचायला उशीर होणार होता. आता गुडूप अंधार व्हायच्या थोडी आधीची वेळ. जंगलातला रस्ता असल्यामुळे स्ट्रीट लाइट वगैरे प्रकार नाहीच. आम्ही काठी टेकत टेकत पुढे जात होतो आणि रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. अजून किती अंतर जायचे याचा फारसा अंदाज नव्हता कारण बरेचदा पुस्तकात लिहिलेली अंतर तितकीच असतील असं नाही, ती कमी जास्त लिहिल्या गेली असतात. रस्त्यावरून कधी दुचाकी तर कधी चार चाकी येत जात होती. अशातच आम्हाला दोघांना पाहून एक चार चाकी गाडी थांबली. “अरे जंगल रास्ता है पचमडी का जंगल पास है, आप कहा अंधेरे मे चलते जा रहे हो, गाडी मे बैठ जाओ”. आम्हाला गाडीत बसायचं नव्हतं.. आणि हा गाडीवाला हट्ट करायचा थांबत नव्हता. शेवटी तो आमच्यासोबत उतरला आणि त्याने आपल्या ड्रायव्हरला मागे थांबून लाईट दाखवायला सांगितलं. जवळजवळ चार किलोमीटर हा माणूस आमच्यासोबत पायी चालत राहिला आणि त्याचा ड्रायव्हर आमच्या मागे हळूहळू येत राहिला. आम्ही मधुपुरी गावात येऊन पोहोचल्यानंतर निरोप घेऊन हा पुढे निघाला. कोण कुठला काही कल्पना नाही मात्र जंगलाचा अंधाराचा रस्ता पार करून देण्यासाठी नर्मदामैयानेच त्याला पाठवलं यात काहीच शंका नाही.
मधुपुरी ला आश्रमा सारखं जे काय होतं ते खरं एक घर होतं. तिथे एक परिवार राहत होता. आम्ही घरात शक्यतो राहायचं नाही असं ठरवल्याने अंगणात राहायचा निर्णय घेतला.यावेळेला प्रचंड आभाळ आलं होतं आणि थोड्याच वेळात धो-धो पाऊस सुरु झाला होता. आम्हाला अंगणात आसन लावणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही गोठ्यात आसन लावलं. गोठा बराच मोठा आणि ऐसपैस होता. त्याच्या एका कोपर्यात एक गाय आणि एक वासरू बांधून ठेवलं होतं. वासराला बागडता यावं म्हणून त्याच्या गळ्यातली दोरी गोठा भर पुरेल इतकी लांब होती. गोठ्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात थोडासा सारवलेला एक भाग होता, तिथे आम्ही आसन लावलं. भोजन प्रसादी आणि आश्रमातल्या आजींबरोबर गप्पाटप्पा होईस्तोवर हे वासरू छान पैकी बागडत होतं. त्याची आमच्याशी आणि खास करून माझ्याशी छानच गट्टी जमली होती. या वासराला एक सवय लागली होती, ती अशी की या आजी रोज त्याला थोपटवून झोपवत असत. मात्र त्या रात्री त्याला आजींच्या मांडीवर डोकं ठेवायचं नव्हतं. त्याला त्याची नवीन मैत्रीण जास्त आवडली होती कदाचित. कितीतरी वेळ ते वासरू माझ्याच जवळ येऊन माझ्याच मांडीवर डोकं ठेवून लोळत पडलं होतं… अगदी लहानसं! अंगावरची लव सुद्धा मऊ असलेलं, शींगांच्या ठिकाणी नुसताच उंचवटा असलेलं. कानांचा पानासारखा आकार चटकन वर करणारं आणि अतिशय बोलके पाणीदार डोळे इकडे तिकडे मटकवून आपले लाड पूर्ण करून घेणारं हे वासरू इतकं काही लाघवी होतं की त्याचे लाड पूर्ण केल्याशिवाय राहावयचंच नाही. रात्रभर अधून मधून हे गोंडस वासरू आपल्या आईजवळ जायचं आणि नंतर माझ्या अंथरुणा च्या बाजूला येऊन झोपायचं. हा प्रकार खूपच गोंडस होता. सकाळी त्या वासराला सोडून जावंसं वाटत नव्हतं पण पुढे जाणं गरजेचं होतं.
सुरज कुंडला पोहोचण्याआधी चा एक अनुभव सांगणार आहे. अमरकंटक हून निघाले तेव्हा मैयाची इच्छा जाणून घेतली होती. दोन बोटं तिच्या पाण्यात बुडवून मगच पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तिने आम्हाला पावसात भिजू दिले नव्हते आठवतंय का? ह्या वेळेला मैया मध्ये दोन बोटं बुडवून तिची इच्छा जाणून घेतली नव्हती मात्र आलेला अनुभव तिची इच्छा सांगणारच होता.. तसंच सुरज कुंडाच्या वातावरणाबद्दल आणि तिथल्या मारुतीराया बद्दल विशेष असं काही तरी सांगायचे… पण पुढच्या भागात सांगेन.. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८१
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला गु-हाळ्याचा अनुभव सांगितला होता. मधुपुरीच्या वासराचा अनुभव सांगीतला होता. आता इथून पुढे. मधुपुरीहून आम्ही सकाळी लवकरच निघालो. आजही वातावरण ढगाळ होतं. कधी पाऊस पडेल याचा नेम वाटत नव्हता. आम्ही ही मैया च्या दिशेने चालू लागलो. इथे घोडा घाट नावाचा सुंदर घाट आहे. तिथेच स्नानादी आटोपून व पुढे जायचं असं ठरलं. वाटेत आम्हाला अनेक जण भेटलेत. आज जाऊ नका, घोडा घाटलाच थांबा असंही काहींनी सांगितलं. ढग येत होते मात्र पाऊस पडायला सुरुवात झाली नाही तोवर चालत राहायचं असं ठरलं. घोडा घाटला छान बालभोग आणि चहा मिळाला. इथे एक अश्व प्रतिमा आहे म्हणून या घाटाला खोडा घाट असं म्हणतात. इथे योगिनी गुहा असल्याचे देखील समजलं होतं मात्र आम्ही घोडा घाटला असताना हा मुद्दा आमच्या लक्षातच राहिला नाही आणि आम्ही योगिनी गुहेची चौकशी केली नाही. पुढे गेल्यावर जेव्हा पुस्तक उघडलं तेव्हा कळलं की इथे पुस्तकात योगिनी गुहे बद्दल लिहिलेलं आहे...
खरंतर हा रस्ता सूकतरा, सीता रपटन ,बागली असं करत करत पुढे सुरज कुंडला जातो. आम्हाला मात्र बागली पासून एक फाटा असल्याचं सांगितलं. आम्ही पुढे नारा पद्मि चौराहा ला न जाता बंगाली पासून चा फाटा पकडला. हा रस्ता खरोखर रमणीय आहे. दोन्ही बाजूला झाडं आहेत. रस्ता कच्चा आहे. मध्येच एक कॅनॉल लागतो. याच्या काठाकाठाने जाताना खूप प्रसन्न वाटत होतं. सुरज कुंड च्या ५-६ किलोमीटर आधीचा एक अनुभव सांगते.
वाटेत लहान लहान दोन-तीन गाव लागले. त्यातल्या शेवटच्या गावात एका घरी पाणी मागितलं होतं आम्ही. त्या माताराम ची गोष्ट. तीने बादली भरून आणली. “हात पैर धोलो बाबाजी. चाय बना देती हू” तीनं आम्हाला घरात बोलवलं. आम्हालाही चहा हवाच होता. या बाईने गुळाचा काळा चहा केला होता आणि तो अप्रतिम लागत होता. आमचा चहा पिऊन होईस्तोवर छान गप्पा गोष्टी झाल्यात. आता निघायचं असं म्हणताच त्या माताराम ने तिथंच थांबण्याचा आग्रह केला बोलता बोलता ढसाढसा रडू लागली.
“माझी परिस्थिती खूपच वाईट आहे मैया. तुम्हीच मला यातून सोडवू शकता”. आम्ही नक्की काय करू शकतो याचा आम्ही विचार करत होतो. फार तर फार थोडी आर्थिक मदत काय ती करता येईल, त्यापुढे आपण काय करणार? असा प्रश्न मला पडला होता. ही माताराम एका पडक्या घरात राहत होती. फक्तच समोरची खोली जरा बर्या अवस्थेत होती बाकी तुटक्या भिंतींवर प्लास्टिक अंथरुन तयार केलेलं होतं. मुख्य म्हणजे अश्या घरात देखील ती भाडं घेऊन राहत होती.
अतिशय कृषी देहाची ही माताराम, जेमतेम पस्तीस चाळीस किलो वजन असेल हीचं… डोळे खोल गेलेले होते. ही बाबाच्या खुर्ची च्या बाजूला बसून रडत होती. आम्हाला तिचं रडणं बघवत नव्हतं “बाबूजी, तुम मेरे बाबूजी की उमर के हो अपनी बेटी की मदत करो” अशी गळ बाबाला घालत होती… हृदयाचं आणि पाणी झालं होतं आमच्या. तिला विचारलं… काय मदत करू शकतो आम्ही तुझी? बाबांनी तिला काही रक्कम काढून दिली. ती रक्कम खरंतर तिला घ्यायची नव्हती पण तिच्या घरी गेल्या आठ दिवसात चहा शिवाय दुसरं काहीच शिजलं नव्हतं, नाईलाजास्तव तिने ती रक्कम स्वीकारली आणि म्हणाली, “मेरे बेटे को बुलाती हुं, आप उसको समझाओ… काम धाम करता नही, मेरे काम के पैसे जादा नही मिलते. ये बस गाव भर भटकता रहता है, काम करेगा तो उसके शादी बनाके मै परिक्रमा के लिए निकल जाऊंगी”…कोण्यातरी परिक्रमावासीचं माझा मुलगा कधीतरी ऐकेल या एका आशेवर ही बाई दिवस काढत होती. स्वतः उपाशीतापाशी राहून, गरज पडल्यास शेजारीपाजारी खाऊन मुलाची वाट बघत बसायची रोज. मुलगा रात्री यायचा आणि सकाळी निघून जायचा…. आणि ही माताराम दिवसभर परिक्रमावासी ना चहा करून द्यायची आणि माझ्या मुलाला समजवा अशी त्यांच्याकडे गळ घालायची.
शेवटी तिचं म्हणणं ऐकलं, बाबा तिच्या मुलाला समजवायला झाला. तो किती ऐकेल हे माहित नव्हतं आम्हाला, मात्र तिची विनंती आम्ही मान्य केली हे बघून तिच्या डोळ्यात जो विश्वास तयार झाला होता, जी आशा बळावली होती ते पाहून आम्हाला थोडं बरं ही वाटत होतं आणि थोडी भीती ही वाटत होती. बरं यासाठी की निदान आशेच्या भरवशावर ती काही कल्पनेतले आनंदाचे क्षण बघू शकत होती आणि भीती याची की आमचा केवळ प्रयत्न होता, तो सफल झाला नाही तर तिची आशा पार धुळीला लागणार होती… आणि खरं तर तो प्रयत्न असफल होण्याची शक्यता जास्त होती कारण कोण कुठेल आम्ही, अर्ध्या दिवसाचे पाहुणे… आमचं का ऐकेल तो मुलगा? हा एक प्रश्न होताच! तरीही निदान आम्ही तिची विनवणी ऐकली हे थोडं सं समाधान तरी तिला मिळेल ह्या सद्भावानेनी आम्ही तिच्या मुलाशी बोलून बघायचं ठरवलं.
तिनी मुलाला बोलावून आणलं. त्याला मुलाला आधी बाबाने प्रेमाने विचारपूस केली. म्हणतो उर्मट उत्तर देऊ लागला. नंतर मात्र बाबाचा पारा चढला आणि आपल्या मोठ्या दमदार आवाजात बाबा ने पोराला समजवायला सुरुवात केली. काय करायचं काय नाही ते सांगितलं तरीही त्याची उत्तरं कमी होईना. शेवटी वीस-बावीस वर्षांच्या तरुण मुला पुढे हात टेकले आणि शेवटचा उपाय म्हणून त्याच्याशी काहीही न बोलता त्याच्या आईला सामान भरायला सांगितलं स्वतःचं. बाबा म्हणाला.”माता जी आप हमारे साथ चलो… क्यू इस लडके की पीछे पडे हो? तुम्हारी खाने पीने रहने की व्यवस्था कर देंगे…इसको जो करणा है करने दो..तुम हमारे साथ चलो” बाईसुद्धा आतून एक गाठोडं घेऊन आल्या आणि आमच्या बरोबर चालू लागल्या. आधी मुलाने काहीही हरकत घेतली नाही, मात्र आई खरोखरीच जाते हे पाहून तो नरमला. उद्या पासून कामावर जाईन तू जाऊ नको म्हणून आईला थांबवू लागला…. बाबाने आपला फोन नंबर त्या बाईंना दिला, आणि सांगितलं, ज्या दिवशी हा मुलगा पुन्हा काम सोडेल केव्हा गैर जबाबदार होईल तेव्हा तुम्ही मला फोन करून माझ्याकडे निघून या…. पुढे दोन तीन दिवसानंतर बाईंचा फोन आला… कोणाच्यातरी फोन वरून त्या बोलत होत्या. मुलगा कामावर जाऊ लागला होता. पुढे मात्र काही फोन आला नाही…
या परिक्रमेत आम्ही सततच घेतच आलो होतो. आज मात्र आमच्याकडून कोणाचं भलं होतं आहे हे पाहून खूप आनंद झाला. आतापर्यंत प्रेमाची एकच बाजू माहीत होती ती म्हणजे घेण्याची… आता देण्याची बाजूही समजू लागली होती…”इदम् न मम” शिकले होते मी आधी.. मात्र आता याहूनही पुढे जाण्याची वेळ होती… इदम् न मम हे म्हणताना देखील मी माझ्या मनाला “हे माझं नाही” असं समजावत होते मात्र आता हे जे काही आहे ते ज्याचं आहे त्यास मिळो ही भावना मनात येऊ लागली… आता “माझं आहे” किंवा “माझं नाही” ह्या विचारातला सुद्धा ‘माझं’ हा शब्द उतरवून काढावा कोणीतरी असं वाटू लागलं होतं.
थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते. जे उदाहरण देते आहे ते फारच वेगळं आहे पण त्यावेळेला माझ्या मनात तेच उदाहरण आलं होतं. इलेक्ट्रिक ची मेन लाईन, घरातली छोटी-मोठी बटणं, आणि विजेची उपकरणे, या तिन्ही चा विचार केला तर आपली भूमिकाही छोट्या-मोठ्या बटनांचा सारखी आहे. वीज आपल्याकडे येते आहे, आणि ज्या उपकरणाला गरज पडेल तिथे ती आपल्याकडून जात आहे इतकीच आपली भूमिका…. आता ह्या इलेक्ट्रिकच्या बटणाने वीज ‘माझी आहे’ किंवा वीज ‘माझी नाही’ या दोन्हीचा विचार करायला हवा का? मेन लाईन कडून वीज घेऊन तिला विजेच्या उपकरणाकडे वळवणं एवढंच त्या बटनांचं काम असतं. तिथे अधिकार कोणता?
या माताराम कडून निघाल्यानंतर एकच विचार मनात येत होता.. ‘जो जे वांछिल तो ते लाहो…’ ईश्वरा, माझ्यासाठी काय जे तू वाढून ठेवलं होतंस, आहेस ते माझ्यासमोर आहेसच… त्याहून जास्त किंवा कमी असं मला काहीही नको आहे. किंबहूना ज्याप्रमाणे मी समाधानी आहे त्याप्रमाणे ज्याचं त्याचं समाधान ज्याला-त्याला लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना….अर्थात कोणाच्या तरी समाधानाचं निमित्त होणं हे योगायोग म्हणून ठीक आहे हो, पण फक्त त्यासाठी केवळ झटत राहणे म्हणजे संतपण… आणि तितकी कुवत किंवा लायकी आपली नाही, मात्र आजपर्यं मी फक्त माझा विचार करत आले, माझ्या मनात माझ्या शिवाय इतर कुणाला ही कधीही माझ्या इतकी जागा मी उदार पणे देऊ केली नाही, जिथे तिथे सर्वप्रथम मी मलाच ठेवले , अशा मनात, हे ईश्वरा आधी तू ‘इदम् न मम’ हा मंत्र पेरलास, आणि नंतर यज्ञात आहुती देताना ‘स्वाहा’ म्हणतो तसं सगळं वाहतं करण्याचा एक विचार…आचरण नाही हं, फक्त विचार माझ्या मनात अगदी अलगद पणे कसा आणून सोडलास याचं मला नवल वाटतं… आणि ह्या एका विचाराने, (आचरनाणे नाहीच नव् बरं, फक्त विचाराने म्हणतेय, कारण जे झालं तो निव्वळ योगायोग होता, आम्ही काहीही केलं नव्हतं) फक्त विचाराने जर माझ्या मनाला, आत्म्याला, परमसुखाच समाधान मिळत असेल तर ते आचरण किती आनंददायी असेल नाही? अर्थात ते तसं वागण्यासाठी कमालीचं अलिप्त पण, करुणा, जिद्द, विश्वास, सद्भावना, प्रयत्न , शुचिर्भूत अंतरात्मा आणि प्रेम हे सगळचं अत्युच्च कोटीचं असावं लागतं. आणि आपण सगळेच आपली स्वत:ची पायरी पूर्णपणे ओळखून असतो. आपण कसे आहोत हे आपल्याला प्रत्येकाला व्यवस्थित माहित असतं फक्त आपण त्याचा मनापासून स्वीकार करत नाही. दुस-या समोर तर नाहीच, मात्र स्वत: समोर देखील आपण आपल्या स्वत:ला आपण जसं आहोत तसं स्वीकारत नाही, आणि तितकं जरी आपण करू शकलो तरी आपण समाधानाचे धनी होऊ हे मला समजलं …. अजून फक्त समजलंय… इम्पलीमेंट झालं नाहीये हं!
आम्ही पुढे चालत होतो तसं आभार हळूहळू भरून येत होतं. आम्हाला सूर्य कुंडला पोहोचायचं होतं. कॅनॉल पासून थोडं पुढे जाऊन उजवीकडे एक फाटा होता तिथे गेल्यावर सूर्यकुंड अजूनही तीन-साडेतीन किलोमीटर दूर आहे हे समजलं. वाटेत एक छोटसं गाव आलं. आभाळ इतकं भरून आलं होतं की कुठल्याही क्षणी ते कोसळणार. आज आम्हाला कदाचित गावातच थांबावं लागणार की काय असं आम्हाला वाटलं मात्र सूर्य कुंडला पोचलो तर बरं होईल असा विचार मनात येत होता. आम्ही एक नजर आभाळाकडे टाकली… हलके हलके तुषार बरसायला सुरुवात झाली होती. आम्ही अजूनही चालतच होतो. .. मध्ये मध्ये सर येईल आता असं वाटायचं ,दोन-चार थेंब पडले की थांबून जयची… कोणीतरी वरून या ढगांची चावी अजून पूर्ण सोडली नाहीये, धरून ठेवली आहे असं सारखं राहून राहून वाटत होतं. आणि होतही तसंच… आम्ही सूर्य कुंडला पोहोचलो, धर्मशाळेत बाहेरच्या ओट्यावर चपला काढल्या, बॅग ठेवल्या, आणि खूप वेळ धरून ठेवलेला पाऊस जोराने बरसू लागला. ढगांनी भरलेलं गाठोडं माझ्या मैयानी हाताने घट्ट धरून ठेवलं होतं आतापर्यंत आणि आम्ही पाऊल टाकताच ते गाठोडं संपूर्णपणे रितं केलं की काय असं वाटलं.
सूर्य कुंडला पोहोचण्याच्या आधीचा एक अनुभव सांगणार आहे. सूर्य कुंडाच्या महाद्वारा बाहेरचा परिसर आणि त्या परिसराशी माझा असलेला निकटचा संबंध, याबद्दलचा अनुभव… सूर्यकुंड येथील हनुमान मंदिर… आणि ह्या मंदिराचं आजपर्यंत न उलगडलेलं रहस्य.. केवळ ते बघण्यासाठी आम्ही उद्याचा संपूर्ण दिवस सूर्यकुंड ला थांबणार होतो. इथल्या मारुतीरायाची गंमतच निराळी आहे. तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही! अगदी सकाळ दुपार संध्याकाळ सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रकाराला पडताळून बघाल! असं काहीतरी इथे रोज होत असतं! आणि तेच बघण्यासाठी मी थांबले होते…. सांगणारे पण पुढच्या भागात....
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सुरज कुंड च्या आधी पर्यंत चे अनुभव सांगितले होते. गरीब माता राम आणि तिच्या मुलाला भेटल्यानंतर मनात आलेल्या विचारांची साखळी सुद्धा तुमच्या पुढे मागच्या अनुभवात ठेवली होती. आता पुढे सांगते.
सूर्यकुंड ला पोहोचण्याच्या आधी वाटेत एका गावात आम्हाला पुन्हा एकदा चहा ला बोलावलं. तो खरं तर एक जुना आश्रमच असावा मात्र आता तिथे एक कोणी बाबाजी एकटेच राहत होते. बाबाजींनी छान गूळ आणि आलं घातलेला काळा चहा केला. चहा घेऊन आम्ही निघणार तेवढ्यात बाबाला कुणाचा तरी फोन आला आणि आम्ही पुन्हा काही वेळ तिथेच विसावलो. यावेळी आलेला अनुभव फक्त माझा होता आणि म्हणून तो फक्त मलाच मिळाला.
अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात पण एक अगदीच ठरलेले असते ते म्हणजे ज्याचे त्याचे प्रारब्ध. अनेकांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेत बरेचदा रस्ते सारखे असतात, ठिकाणं सारखी असतात, अनुभव मात्र वेगळे असतात. आम्ही दोघं सहप्रवासी असून सुद्धा काही अनुभव फक्त मला मिळालेत तर काही अनुभव फक्त बाबाला मिळाले. त्यापैकी एक तुम्हाला आता सांगते आहे. या अनुभवाचा सूर्यकुंडाशी निकटचा संबंध आला तोही सांगते.
चहा घेऊन झाल्यावर बाबा फोनवर बोलत रस्त्यावर येरझारा घालत होता. मी आणि बाबाजी आश्रमाच्या पडवीत बसलेलो होतो. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि कोणत्याही क्षणी कोसळेल असं वाटत होतं.आम्हाला सूर्य कुंडला मुक्काम करण्याची इच्छा आधीपासून होती मात्र या बाबजींकडे आल्यावर ती इच्छा अधिकच बळावली. सूर्यकुंड हनुमान मंदिर अतिशय छान आहे हे मी ऐकून होते. त्या मंदिराचं एक रहस्य आहे असं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. ते आता सांगते. सूर्य कुंडाच्या हनुमान मंदिराचं एक वैशिष्ट्य असं मंदिरातील मारुतीरायां चे वेगवेगळे रूप आपल्याला दिसतात. पुस्तकात असंच लिहिलं होतं. आणि ते तीन वेगवेगळी रूपं बघण्यासाठी मला ख्खा दिवस सूर्यकुंडला घालवायचा होता. मात्र बाबाजींकडे आल्यावर ही इच्छा अधिक प्रबळ कशी झाली ते सांगते.
बाबा फोनवर बोलत असताना मी आणि बाबाजी सूर्यकुंड विषयी बोलत होतो. बोलता-बोलता बाबाजी म्हणाले, “हनुमांजी चिरंजीव है इसका प्रत्यय बहुत लोगो को आता है. शायद आपको भी ऐसा हुआ होगा, अगर नही हुआ होगा तो बहुत जल्दी हो जायेगा ऐसा मेरा विश्वास है”… त्यांच्या या बोलण्या नंतर मी मला झालेलं मारुतीरायां चं दर्शन आणि गुजरात मधल्या कांदरोज गावी जात असताना, ज्या वेळी मी एकटी होते तेव्हा आजुबाजूच्या सृष्टीने गायलेल्या हनुमान चालीसा चा अनुभव बाबाजींना सांगितला. ते ऐकून बाबाजींच्या डोळ्यात पाणी आलं… ते उठून आत गेले. त्यांनी एक भजनांचं पुस्तक आणलं आणि सुंदरकांडावर आधारित अवधी भाषेतलं एक भजन ते गाऊ लागले. मला आता शब्द आठवत नाहीत, पण अतिशय रसाळ शब्द आणि मधुर चाल असलेलं हे भजन बाबाजी खूप प्रेमाने, भक्तीने आणि गोड आवाजात गात होते. भजन गाण्यापूर्वी बाजूला एक आसन त्यांनी मांडून ठेवलेलं होतं. डोळे मिटून मी ते भजन ऐकत होते. भजन संपूच नये असं मला वाटत होतं. बंद डोळ्यात कुठे मारुतीरायांचं रूप उभं राहिलं होतं. भजन लवकरच पूर्ण झालं,बाबाजींनी बाजूच्या रिकाम्या आसनाला मनोभावे नमस्कार केला त्यावेळी अंगावर काटाच आला होता. बाबाजी रिकाम्या आसनाकडे डोकं टेकवून नमस्कार करत होते आणि क्षणभर मारुतीराया यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे की काय असा मला भास झाला…. हो हा भासच होता… पण त्यात सुद्धा एक क्षणासाठी का होईना मारुतीराया इथेच आहेत असं वाटलं होतं. मी आणि बाबाजी आम्ही दोघंही शांत बसलो होतो… बाबाचा फोन आटोपला आणि बाबा आत मध्ये आला तेव्हा कुठे आम्ही पुन्हा बोलायला सुरवात केली.
बाबाजींनी पुन्हा सुंदर गुळाचा चहा केला. “बहुत आनंद आया, बहुत आनंद आया,” असं म्हणत त्यांनी लहान मुलासारखी स्वतः भोवती गिरकी घेतली. चहा घेता घेता ते म्हणाले “मै तो पागल हू… पागल! अपनेमेही मुझे बडा मजा आता है, देखो आज तो हनुमान जी को उनका ही भजन सुना दिया….” हे बोलताना ते मनापासून हसत होते. त्यांना खूप आनंद झालेला स्पष्ट जाणवत होता. त्यावेळी फक्त एकच विचार मनात आला… एका क्षणासाठी जे काही मला वाटलं होतं, जो काही भास मला झाला होता, तो खरा तर नसेल?… खरंतर एखादा दिवा चमकावा आणि विझावा याहीपेक्षा तो काळ छोटा होता. आकाशात विजेची रेषा दिसते न दिसते तोच कशी विझून जाते त्याहीपेक्षा कमी काळ ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं… किंवा तो भास माझ्या डोळ्यासमोर होता… तो त्या भजनाचा प्रभाव होता, की भास होता की सत्य हे मला सांगताच येणार नाही.
आमचा चहा घेऊन झाला. आम्ही पुढे निघणार तोच बाबाजींनी चटकन वाकून आम्हाला नमस्कार केला. परिक्रमावासी म्हणून अनेक लोक नमस्कार करतात, तेव्हा मी देखिल वाकून समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत असते, मात्र बाबाजींनी मला वाकून नमस्कार करू दिला नाही. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले..” जा बेटा जा, प्रभू तेरे साथ है”.
अजूनही संध्याकाळ व्हायला वेळ होता. आभाळ तसंच दाटून आलेलं होतं. आम्ही सूर्य कुंडाच्या दिशेनं निघालो. मध्ये एक वाट झाडीतून जाणारी होती. त्या वाटेवरून आजूबाजूचं, पुढचं मागचं काहीही दिसत नव्हतं, मात्र जशी ती वाट पूर्ण झाली तसा डांबरी रस्ता दिसू लागला. उजव्या हाताला दूरवर सात घोडे असलेला सूर्याचा रथ स्पष्ट दिसत होता. तेच सूर्यकुंड असावं. आम्ही त्या दिशेने वळलो. थोड्याच वेळा नंतर दूरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही पाट्या लावलेल्या दिसल्या. एक मोठं द्वार दिसलं. आम्ही आता सूर्य कुंडला पोचणार. तरीही अजून अंगावर शहारा येण्यासारखं काहीतरी उरलंच होतं. बाबाजीं कडे झालेल्या प्रकारामुळे मी मंत्रमुग्धच होते अजूनही. गार वारा वाहात होता.दोन चार हलके हलके थेंब अंगावर पडतात आणि पुन्हा थांबून जात, असा हा खेळ दुपारपासूनच सुरू होता. आम्ही हळूहळू पुढे गेलो तसं तसं माझ्या मध्ये जास्त ऊर्जा भरली जात आहे असे मला जाणवू लागलं. त्या पाट्या वाचता येईल तिथवर आम्ही पोहोचलो आणि मी स्तब्ध होऊन उभे राहिले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला हनुमान चालीसा ची दोहावली प्रत्येक पाटीवर लिहिलेली होती. येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही वाटसरूंना संपूर्ण हनुमान चालीसा वाचता येईल अशा प्रकारे ह्या पाट्या एका मागे एक लिहिलेल्या होत्या. मला हनुमान चालीसा पाठ आहेच, तरीही प्रत्येक पाटील जवळ उभे राहून मोठ्या आवाजात, मोकळ्या गळ्याने हनुमान चालीसाचा एक एक दोहा मी मोठ्या आनंदाने म्हणत होते. बाबा ही खूप उत्साहाने माझ्याबरोबर लिहिलेल्या पाट्या वाचत होता. अशात आता पाऊस आला तरी आम्हाला तमा नव्हती. तो आनंद घेतल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नव्हते. पाऊस मात्र आमच्या आश्रमात पोहोचण्याची वाटच बघत असावा. आमचा हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर आणि आश्रमात पोहोचलो, खांद्यावरच्या बॅगा उतरवल्या, जोडे मोजे काढले, आणि कधीचं कोसळायला आतुर असलेलं आभाळ ओतायला सुरुवात झाली… धुवांधार पाऊस सुरु झाला… तिथेच आश्रमाच्या पडवीत बसून मंदिराच्या वर असलेल्या सात घोड्यांच्या रथाकडे मी टक लावून बघत होते…. बाबाजींचा चेहरा माझ्या डोळ्या समोरून दूर होत नव्हता… आता सूर्यकुंड च्या मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं होतं… ते रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं.. तीन वेगवेगळ्या रूपा मधले मारुतीराय अजूनही बघणं बाकी होतं… खरंतर नक्की काय आहे तिथे हेही समजलं नव्हतं. एकाच मंदिरात, कदाचित एकाच मूर्तीमध्ये, कदाचित वेगवेगळ्या मूर्तींमध्ये, कदाचित वेगवेगळ्या वेळेला…. कसे आणि कुठले रूप दिसत असेल नक्की? सांगणार आहे पण पुढच्या भागात.. नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८३
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सूर्यकुंड येथील हनुमान मंदिराच्या एका रहस्या बद्दल सांगत होते. मागच्याच भागात सूर्य कोंडा च्या आधी घेतलेल्या बाबाजींचा अनुभव मी तुम्हाला सांगितला होता. सूर्य कोंडला पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला होता. जणूकाही आम्ही मुक्कामी पोचण्याची वाटच मैया बघत होती आणि तिने वरून आभाळाची पोठली घट्ट बांधून ठेवली होती की काय असं वाटलं. आता पुढे सांगते.
इतना परिसर अतिशय रमणीय आहे. सूर्याचे सात पांढऱ्या रंगाचे घोडे असलेला हा रथ मंदिराच्या वर आरूढ आहे. बाजूलाच एक एक हॉल आहे तीच परिक्रमावासीयांची धर्मशाळा. आजूबाजूला पुजाऱ्यांची घरं आहेत. 1-2 छोटी मंदिरही आहे. पाऊस साधारण तास दीड तास सुरू होता. बाबा आसन लावून आराम करत पडला होता. मी मात्र बाहेरच्या पडवीत पावसाकडे बघत बसले होते. आमच्यासोबत धर्मशाळेत आत मध्ये अजून कोणीतरी परिक्रमावासी डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपले होते. वातावरण थंड झालं होतं, आणि अशात चहा मिळावा असं शरीराचं मागणं होतं.. आतच एका कोपर्यात चूल, एक दोन भांडी आणि काही सामान ठेवलेलं मला दिसलं. जवळच पाण्याने भरलेला माठ देखील ठेवला होता. चहा करावा म्हणून मी साहित्य पाहू लागले. तोच अंगावर पांघरूण घेतलेले हे परिक्रमावासी उठले आणि मोठ्यांदा ओरडू लागले…
” अरे छूना मत, तुम हटो वहांसे…” मी दचकले, घाबरले अन तशीच मागे झाले…. प्रश्नार्थक नजरेने त्या परिक्रमावासी बाबांकडे बघू लागले… “हमको पहले अपनी चाय बनाने दो, हम तुम्हारे हाथ से बनी चाय नही पायेंगे.. कौन समाज की हो?” असं म्हणत ते बाबाजी सामानाच्या दिशेने सरसावले आणि मी दोन पावलं मागे झाले… “पंडित समाज की हुं बाबाजी, मी उत्तर देत असतानाच बाबाजी खाली वाकले आणि सहजतेने काहीतरी काडीकचरा चुलीच्या मागचा बाजुने उचलून दाराकडे फेकला. ते चहा करू लागले… “हम किसी के हात का नही पाते है तुम पाओगे तो तुम्हारे लिए भी चाय बना देता हु” असं म्हणत त्यांनी चहा ठेवला आणि दारा कडचा फेकलेला काडीकचरा बाहेर फेकून देतो असं म्हणून दाराकडे येऊ लागले. मी निदान कचरा उचलण्याचं तरी काम करावं म्हणून त्यांच्यापाठोपाठ दाराकडे गेले… मी दाराकडे गेले आणि स्तब्ध उभे राहिले.. कारणही तसंच होतं… बाबाजींनी फेकलेला काडीकचरा हा साधासुधा काडीकचरा नव्हताच मुळी! तो चक्क हातभर लांब साप होता. धर्मशाळेत इलेक्ट्रिसिटी तर आहे मात्र फक्त एक छोटा बल्ब चालू अवस्थेत असल्याने हॉल भर बर्यापैकी अंधार होता. एका छोट्या बल्बचा काय तो उणा पुरा प्रकाश… त्यात चुली मागचा तो साप मला अजिबात दिसला नसता… बाबाजींना कसाकाय दिसला तेच जाणे… असो… प्रत्येक गोष्टी मागे कारणं असतात!
बाबाजींनी चहा केला. सोबत आम्हाला वाटेत मिळालेली पारलेजी बिस्किट होती. संध्याकाळचा नाष्टा छान झाला. आता पाऊस थांबला होता.. दिवेलागणीला अजून वेळ होता. आम्ही हात पाय धुऊन मंदिरांचं दर्शन घेतलं. त्यावेळी मारुतीराया यांचं रूप एका प्रौढ व्यक्ती सारखं दिसत होतं. चेहऱ्यावरचे हावभाव शांत से दिसत होते. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्यांनी सूर्यकुंड च्या हनुमान मंदिराचे रहस्य उलगडून सांगितलं. दिवसाच्या सुरुवातीच्या प्रहराला बालरूप, दुपारभर मध्यम वयीन, आणि रात्री वृद्ध रूप असल्यासारखे हे मारुतीराय दिसतात. मंदिराच्या वर असलेल्या जाळीतून पडणारा प्रकाशाचा कोण हा जसजसा बदलत जाईल तसतसं आरोपीला यांचं रूप बदलत जातं हे यामागचं कारण. आता मला रात्रीच ग्रुप तरू आणि दिवसाचं बाल रूप बघण्यात जास्त रस वाटू लागला. रात्री भोजन प्रसादी झाल्यानंतर मंदिर बंद करण्या आधी आम्ही पुन्हा एकदा मंदिरात गेलो. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीने बघितल्यानंतर मारुतीराया खरोखरच वृद्ध झालेली आहे असा भास होऊ लागला मात्र त्याच बरोबर दुपारचे किंचित शांत असलेले भाव बदलले आहेत असा मला भास झाला. हे वृद्ध मारुतीराय मला रागात असल्यासारखे वाटू लागले. पण मारुतीराय माझ्यावर नक्कीच रागवणार नाहीत कारण त्यांच्याप्रती माझी भक्ती ही संपूर्णपणे निस्वार्थ अशी आहे हा मला विश्वास होता. मग तरीही मला मारुतीराय रागात का दिसले असा प्रश्न क्षणभर वाटून गेला… आता पडलेल्या प्रश्नांचा विचार न करण्याची सवय एव्हाना लागली होती. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातात हे चांगलंच माहीत झालं होतं. ती उत्तरं मिळेस तोवर मनाची घालमेल न होऊ देता संयमाने फक्त वाट बघणं आपल्या हाती असतं एवढं समजलं होतं… आला तसा तो प्रश्न मी तिथेच सोडून दिला.
बाबाजींनी रात्रीची भोजन प्रसादी बनवली. आज दिवसभराचा प्रसंग डायरीत घेताना खूप समाधान वाटत होतं आणि त्या समाधानी अवस्थेतच मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी नानाजी आटोपून पुन्हा मंदिराकडे धाव घेतली आणि मला माझ्या काल सोडून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.कारण आता मारुतीराया माझ्याकडे एका गोंडस कोवळ्या मात्र तेजस्वी आणि बलवान बालकाप्रमाणे बघत होते.कालचे वृद्ध मारुतीराय कुठेतरी हरवले होते त्यांचा राग दूर निघून गेला होता आणि आता मला त्यांच्या चेहर्यावर लाघवी स्मितहास्य दिसत होतं. मारुती रायांची तिन्ही रूप पाहून झाली होतीत. सकाळचं बाल अभंग आटपून आम्ही पुढे निघायचं ठरवलं.
इथून पुढे महाराजपुर सहस्त्रधारा घाघा असा मार्ग आहे. घाघा पर्यंतचा मार्ग शहरा गावांमधून जातो. मात्र घाघाच्या पुढील जंगल मार्ग सुरू होतो. त्यामुळे संध्याकाळ होईस्तोवर आम्हाला निदान घाघा पर्यंत पोहोचायचं होतं. आज तिथून पुढे जायचं नव्हतच आम्हाला कारण घाघा पर्यंत पोहोचता पोहोचता नक्कीच संध्याकाळ होणार होती. आणि आम्हाला आज निघायला देखील उशीरच झाला होता.
आज मैया नी आमचे लाडच करायचं ठरवलं होतं बहुतेक. काल पाऊस पडला होता तरी आज वातावरण चांगलंच गरम होतं. शिवाय हवेत पाण्याचा औषध असल्यामुळे दमटपणा देखील फार होता. खरंतर सूर्यकुंड ते महाराजपूर फार अंतर नाहीये. पण तरीही महाराज पुरला पोहोचेस्तोवर थकायला झालं होतं. इथे बंजर आणि नर्मदामैया चा संगम होतो. संगमावर छान मंदिर आहे. धनीराम बाबा यांची समाधी आहे. खरंतर इथे छान धर्मशाळा आहे असं हे ऐकून होतो, मात्र थांबून जावं असं वाटलं नाही. डांबरी रस्त्याने आम्ही पुढे निघालो. रस्त्यात एक एक मध्यमवयीन माणूस आम्हाला भेटला. पाच मिनिटं थांबा तुमच्याशी काम आहे आलोच असं म्हणून निघून गेला… म्हटल्याप्रमाणे अवघ्या पाच मिनिटात तो परत आला आणि त्याने आमच्यासाठी आइस्क्रीमचे कोन आणले होते… दमट हवा आणि उकाडा यात ते आईस्क्रीम खाताना खूप आनंद होत होता आणि शरीराचा थकवा देखील कमी होत होता… तिथून पुढे निघालो तो एका बाईने दुकानातून आवाज दिला.. तिथेही मस्त गारेगार रबडी कुल्फी माताजींनी खाऊ घातली… आज नर्मदा माई च्या मनात काय होतं कोण जाणे… आज तुम्ही आमचे खूपच लाड करायचं ठरवलं होतं… थोडं पुढे जात नाही तर एका उसाच्या रसाच्या केल्यावर आम्हाला थांबवण्यात आलं… हिरवाकंच गारेगार बर्फ घातलेला उसाचा रस म्हणजे त्या थक्क करणाऱ्या वातावरणात अमृत प्यायला सारखं वाटत होतं…. आज नक्की काय झालंय महिन्याला एवढे लाड पुरवते ती….
आम्ही पुढे निघालो. इथून घाघा साधारण 13 -14 किलोमीटर असेल. आमच्याकडे वेळही भरपूर होता. आम्ही घाघालाच मुक्काम करण्याचं ठरवलं. घाघाच्या दिशेने जाताजाता हळूहळू रस्त्यावरची गर्दी विरळ होत गेल्याचं दिसत होतं. आम्ही हळू हळू गाव सोडून जंगलाच्या दिशेने पुढे सरकत होतो. लोकवस्ती कमी झालेली होती. दोन-तीन किलोमीटर नंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवळ झाडीच होती. अशात पुन्हा निसर्गाने आपलं रूप बदललं. घाघा आता आठ किलोमीटरवर होतं. मात्र आभाळ भरून येऊ लागलं. महाराजपुर ते घाघा या रस्त्यावर कुठलीही व्यवस्था नाही हे आम्ही पुस्तकामध्ये वाचलं होतं. अशा वातावरणात पुढे आठ किलोमीटर म्हणजे जवळ जवळ दोन संवाद दोन तास चालत जाणं योग्य नव्हतं. सध्या आम्ही गावाच्या थोडं तरी जवळ होतो. इथून पुढे झालो म्हणजे जंगलाच्या दिशेने जाणं होतं. त्यामुळे आम्हाला आता निवारा शोधणं गरजेचं होतं. मात्र कुठेच काही सापडत नव्हतं… मग कुठे गेलो आम्ही? घाघा ला पोहोचलो का? वाटेत कुठे थांबलो का? निवारा मिळाला का? सांगणार आहे पण पुढच्या भागात, तोवर नर्मदे हर …
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८४
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला सूर्यकुंड हनुमान मंदिर बद्दल सांगितलं होतं. तिथे भेटलेले परिक्रमावासी बाबाजी, तो साप, बाबाजींनी बनवलेला चहा आणि भोजन प्रसादी याबद्दलही सांगितलं होतं. मारुतीराया यांच्या बदललेल्या रूपाबद्दल देखील मी मागच्या भागात तुम्हाला सांगितलं होतं. महाराज पुरला मै यांनी केलेले लाड पण मी सांगितले होते. आइस्क्रीम, कुल्फी, उसाचा रस… अगदी न मागता मैयानी आम्हाला भरपूर खाऊ तिला होता. आता आम्ही घाटाच्या दिशेला निघालो होतो. इथून पुढे सांगते.
आम्ही निघालो त्या वेळेला ढगाळ वातावरण नव्हतं. मात्र अभी महाराजपुर सोडून काही अंतर होतं न होतोच वातावरण बदललं. आम्हाला उलट फिरून जाता येत नाही म्हणून जिथे आहोत तिथेच कुठेतरी निवारा शोधणं गरजेचं होतं. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी होती. फार तर फार झोपडी असायची एखादी छोटीशी, शेतात काम करताना आसरा म्हणून. आता अशाच एखाद्या झोपडीचा आसरा घेऊन आम्हाला राहणं भाग होतं. पण निदान विचारायला तर कुणी असायला हवं? आम्ही पुढे पुढे जात होतो. आभाळ भरुन आलं होतं. आता मात्र 12 किलोमीटरच्या वर जाता येईल असं वाटत नव्हतं.
थोडं पुढे गेल्यावर रस्त्यावर इलेक्ट्रिकच्या पॉलच्या बाजूला आम्हाला एक छोटा बोर्ड लागलेला दिसला. त्यावर ‘कौशिक गोशाला’ असं लिहिलं होतं. म्हणजे अजून कौशिक कशाला यायची होती. “आज आपण गोशालेतच राहणार!” बाबा म्हणाला. आता काही उपाय नव्हता. आज भरपूर खाऊ मिळाला होता, वाटलं रात्री मिळणार नसेल कदाचित म्हणूनच मैया नी आधीच तर दिला नसेल? पण मैया उपाशी झोपू देत नाही, आणि गोशाळेत जातोय म्हणजे काही नाही तर दूध तर नक्की मिळेल…
विचार करत करत आम्ही पुढे जात होतो. रस्त्यात एक सायकल वाला माणूस दिसला. त्यांना पुढच्या मुक्कामाला बद्दल विचारलं असता त्याने घाघा च्या पुढचा मौनी माताजींचा आश्रम असल्याचं सांगितलं. त्याआधी मात्र कुठलं ठिकाण आहे असं मला वाटत नाही असं तो म्हणाला. कौशिक गोशाले बद्दल विचारलं असता त्याचं दार नेहमीच बंद दिसतं त्यामुळे आपल्याला कल्पना नाही असं त्याने सांगितलं. जरा अजून पुढे चालून आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठं फाटक दिसलं. इतकं मोठं गेट पाहून गोशाळा फारच मोठी असल्याचं लक्षात आलं. मात्र दारावर कोणी चौकीदार नसल्याने विचारायचं कोणाला हा प्रश्नच पडला. आता इथे जर थांबता आलं नाही तर मात्र अवस्था कठीण होती. अजून घाघा ८- १० किलोमीटर दूर होतं.
आता दार वाजवून हाक मारण्या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही दोन-तीनदा दार वाजवलं मात्र आतून काही प्रतिसाद येईना. एक शेवटचा प्रयत्न म्हणून बाबाने जिवाच्या आकांताने दार ठोठावलं. नर्मदे हर च्या आरोळ्या ठोकल्या. तरीही कोणाचा प्रतिसाद येत नाही म्हणून आता वेळ न घालवता आम्ही पुढे चालू लागलो. या कौशिक गोशाळेचं कंपाउंड बरंच मोठं आहे असं लक्षात आलं. आत कुठे काही दिसतंय का म्हणून भिंतीवरून आम्ही कानोसा घेऊ लागलो. कसलाच अंदाज येईना. आत एक मोठं गवताचं मैदान होतं एवढं मात्र दिसत होतं. कदाचित या गवताच्या बरंच पुढे गायींचा गोठा असावा आणि तिथेच जवळपास चौकीदार असावा त्यामुळे आमचा आवाज तिथपर्यंत जात नसेल असं आम्हाला वाटलं. अजून पुढे गेल्यानंतर एक छोटं गेट देखील लागलं. हे फाटक देखील कौशिक गो शाळेचं होतं. आता हा आमच्या इथे राहण्याच्या आशेचा शेवटचा किरण.
इथे मात्र आम्ही दोघांनीही जोर-जोरात फाटक वाजवायला सुरुवात केली. फाटकाचा आवाज जोरात होताच गायी हंबरू लागल्या. गायींचा आवाज ऐकून कुणीतरी येतय अशी चाहूल लागली.. जीव भांड्यात पडला. चौकीदाराने दार उघडलं.”कौन है? क्या चाहिये?” त्याने विचारलं. आम्हाला आजची रात्र इथे राहता येईल का? आम्ही उद्या सकाळी लवकरच इथून पुढे प्रस्थान करू… जेवण खाण नसेल तरी हरकत नाही आम्ही परिक्रमावासी आहोत आम्हाला फक्त डोक्यावर छत मिळालं तरी चालेल… त्याने नाही म्हणूच नये अशा पद्धतीने आम्ही त्याच्याशी बोलत होतो. “अंदर आओ, पानी पियो, तब तक मै उपर फुटके आता हु, मेसेज तू कोई मना नही करेगा आप आही जाओ अंदर”. तो म्हणाला.
आम्ही आज जाऊन उभा राहिलो. समोर गाईंचे गोठे होते. गाईंना फिरण्यासाठी मोठमोठाले कुरण वजा गवताचे आळे बनवलेले होते. थोड्याच वेळात तो चौकीदार आला आणि आम्हाला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. गोठ्याच्या मागच्या बाजूला सुंदर इमारत होती. एका रांगेत 6-7 खोल्या आणि समोर मोठा लांब कॉरिडॉर होता. त्या खोल्यांना परपेंडीक्युलर अशा अजून तीन चार खोल्या होत्या. आणि मध्ये एक छोटसं मंदिर होतं. त्यातल्या एका खोलीकडे बोट दाखवत म्हणाला “उस रुम मे आप रुक सकते हो”
आम्ही आत गेलो..अबब.. एवढी अवाढव्य खोली… एसी, फ्रीज.. सगळं होतं तिथे. खोली च्या मागे एक अजून खोली, यात कपाटं, अंथरुणं, ड्रेसिंग टेबल असं सामान होतं. त्या मागे एक अवाढव्य बाथरूम.. अवाढव्य म्हणजे एक टब, कमोड, शोवर, असं सगळं असून दोन मोठे पलंग आरामात मावतील एवढी जागा शिल्लक होती. पंधरा बाय पंधरा नक्की होती ती बाथरूम…आम्ही आवरसावर करून बाहेर येऊन बसलो तो चौकीदाराने आमच्यासाठी चहा आणि गरम पकोडे आणले… असा सुंदर चहा की काय सांगू… भोजनाची ही अशीच व्यवस्था.. स्वयंपाकाला बाई होत्या. अतिशय प्रेमाने त्या वाढत होत्या… दोन भाज्या, सुरेख वरण, भरपूर तूप, पुरी, आणि जेवणा नंतर आटवलेलं दूध… काय म्हणून लाड सुरू होते आज! आम्ही काय विचार करत होतो आणि निघालं काय बघा ना! पण अजूनही इथल्या महंतांची आमची भेट झाली नव्हती. त्यांची भेट झाली तेव्हा आम्ही खरंच भाग्यवान आहोत हे आम्हाला समजलं. तिथल्या महंतांची भेट झाली त्यावेळी त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं त्यावरून मी मळ्यात लाडकं लेकरू आहे हे मला पटलं. जेव्हा आपल्या लेकरांचे लाड करायचे असतात तेव्हा आई त्यांच्यासमोर अनेक प्रकारचे सरप्राइजेस मांडून ठेवते आणि ते सरप्राइजेस तयार करण्यासाठी ती अनेक गोष्टी करत असते त्यातलीच ही गोष्ट असं म्हटलं तरी चालेल. महंतांनी आम्हाला असं काहीतरी सांगितलं ती त्याक्षणी अश्रू आवरणं मला कठीण व्हायला लागलं. असं काय सांगितलं होतं महंतांनी आम्हाला? त्यांची भेट झाल्यावर नक्की काय घडलं? सांगणारे पण पुढच्या भागात… नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मैयाने केलेल्या लाडांबद्दल सांगितलं होतं. आम्ही महाराजपूर, सहस्रधारा होऊन निघालो होतो. वाटेत आम्हाला उसाचा रस, आइस्क्रीम असं काय काय खाऊ देत देत मैया ने शेवटी कौशिक गोशाळेत आणून सोडलं. इथे आत येण्यासाठी सुद्धा बरेच कष्ट लागलेत मात्र आत आल्यावर झालेली फाइव्हस्टार सोय मी तुम्हाला मागच्या भागात सांगितली होती. रात्री आटवलेलं दूध प्यायल्यानंतर आम्ही निवांतपणे झोपी गेलो. सकाळी सहा च्या सुमाराला जाग आली. आम्ही समोरच्या अंगणात बसलो असतानाच चौकीदार बोलवायला आला. “स्वामी जी ने बुलाया है, बडे स्वामीजी सुबह सुबह ही आये है”
मागच्या अनुभवात मी तुम्हाला सांगितलं होतं की इथल्या मोठ्या महंतांना भेटल्यानंतर मी मैयाचं लाडकं लेकरू आहे याची मला खात्री पटली ते. त्याचं कारण आता सांगते. आम्ही स्वामीजींच्या खोलीत गेलो. एक छान साधीशी खोली. बसायला भारतीय बैठक केलेली. गंमत म्हणजे या खोलीत बाकीच्या खोल्यांसारखी फाईव्हस्टार व्यवस्था नव्हती. बाकी खोल्यांपेक्षा बहुदा आधी बांधलेली असावी ही खोली कारण या खोलीचे बांधकाम सुद्धा वेगळं होतं. खोली आकाराने लहान होती. खोलीत अवधेशानंद गिरींचं एक मोठं पोस्टर लागलेलं होतं. दुसऱ्या भिंतीवर दत्तात्रेयांचा फोटो होता. आम्ही खोलीत गेलो त्यावेळी स्वामीजी चहा सांगायला स्वयंपाक घरात गेले होते. ते आले आणि नर्मदे हर आणि इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यात.
स्वामीजी बोलायला लागले आणि आम्ही ऐकायला लागलो. ते म्हणाले “वैसे तो यह गोशाला है, परिक्रमा वासियों के लिए बनाया हुआ आश्रम नही है, फिर भी कभी कबार परिक्रमावासी आ गये तो उन्हे कोई मनाई नही है… लेकिन यहा परिक्रमावासी आते ही नही. सहस्त्रधारा मे ही रुक जाते है, लेकिन आप आने वाले थे यह अंदेशा मुझे हुआ था! आपने मुझे पहचाना नही?”.. पहिल्यांदाच भेटलेले हे स्वामीजी मला असं का विचारताहेत ते मला काही समजेना. स्वामीजी म्हणाले ” अभी २-३ दिन पहले की तो बात है. मै कुछ काम से जमदग्नी आश्रम गया था. उसके बाद मुझे लगने लगा था की परिक्रमावासी यहा आने वाले है. मैने फोन करके बताया था रहा की अगले चाल पांच दिन के भोजन पानी की व्यवस्था तयार रखो परिक्रमावासी आयेंगे… जब से जमदग्नि आश्रम से लौटा हू, आप दोनो का ही खयाल आ रहा है… आपने मुझे पहचाना नही शायद… उस दिन जमदग्नी ऋषी के आश्रम मे है भी था, आपका भोजन हो चुका था फिर भी महंत जी के आग्रह से फिर से भोजन पाने गये थे… है ना? और देखो… आज आप मेरे यहा पधारे हो… आप मानो या ना मानो, दिल से मुझे लग रहा था के परिक्रमावासी गोशाला में जरूर आयेंगे.. वो आप ही होंगे..और आप आगये यह मैया की कृपा है… पण मला मात्र त्यांना पहिल्याच अजिबात आठवत नव्हतं. आश्चर्यच आहे खरं म्हणजे… पण बघितल्यासारखं ही वाटलं नाही मला!
त्यांचं बोलणं ऐकून मला खरच रडू आलं.. माझे लाड करायचं हे प्लॅनिंग तिनी खूप आधी केलं होतं.. जशी मी माझ्या लाडक्या लेकराच्या आवडीनिवडीची काळजी सतत घेत असते, त्याला माहीत असो वा नसो माझ्या मनात सतत माझ्या लेकराचा विचार कुठल्या ना कुठल्या रुपाने असतोच… तसेच मी सुद्धा नर्मदा माईची लाडकी लेक आहे हे मला पटलं होतं. सकाळचा बालभोग आटोपून आम्ही पुढे निघालो.
आता इथून पहिल्यांदा गाठायचं होतं ते घाघा. आम्ही दुपार पर्यंत तिथे पोचणार होतो. पण आज काय झालं माहित नाही, आम्ही अवघ्या दीड तासातच घाघाला पोचलो. आज आमच्या स्पीडला नक्कीच काहीतरी झालं होतं. एकतर आम्ही फास्ट चालत होतो किंवा रस्ता लवकर लवकर संपत होता. सुरज पुरा गावी एक गंमत झाली. हा घाटाचा भाग आहे. रस्ता अगदी फिरून फिरून जातो. छोटा पण पक्का रस्ता. बस जाते या रस्त्याने. मात्र पायी चालणारा माणूस आणि बस असं एकावेळी या रस्त्यावर राहूच शकत नाही इतका जेमतेम रस्ता होता. इथे फक्त बसेस जात असल्यामुळे त्या भरधाव येत-जात. त्या मार्गावरून आम्ही जात असताना वाटेत आम्हाला एक माणूस भेटला. डोंगरावरून खाली दूरवर त्यानं एका मंदिरा कडे बोट दाखवले… ये रस्ता ले लो बाबाजी, अच्छा रहेगा… तो म्हणाला. डोंगर उतरून पाऊलवाटेने आम्ही चालू लागलो… चालता चालता एका मोठ्या विहिरीपाशी येऊन थांबलो. ही विहीर शेत विहिरी पेक्षा ही मोठी होती. वरून संपूर्ण सिमेंटचं झाकण या विहिरीला होतं. एक छोटसं कपाटा सारखं दार लावलं होतं आणि तिथे आत् रहाटगाडगं बसवलेलं होतं…. तहान लागली होती. हातपाय तोंड धुवायला म्हणून आम्ही विहिरीतून पाणी काढलं… इतकं चवदार थंड पाणी होतं म्हणून सांगू ! आम्ही तिथेच विहिरीच्या काठावर विसावतो न विसावतो तोच मागून एक गावकरी माणूस आला.. त्याच्या हातात कुठलीतरी रानफळं होती… बोरांसारखी पण थोडी लहान.. त्याने ती टोपलीच आम्हाला दिली. .. म्हणाला, सीधा पाटण ही जाओ…
आम्ही कौशिक गोशालेतून पुढे निघालो होतो खरं, आणि पुस्तकाप्रमाणे पाहता तिथून पाटण बरंच दूर होतं. साल्हेदांडा, निचली, बुधेरा, डोकरकुई आणि मग पाटण असा मार्ग होता. आता पाटण म्हणजे जाओ म्हणतो कमालच झाली… त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे पाटण फक्त दहा बारा किमी अंतर असेल… आम्ही डोकरकुई च्या आसपास कुठेतरी होतो. हा आडरस्ता आम्हाला इतकं दूर घेऊन आला होता! बाजूच्या झाडीतून दूर मैयाचा प्रवाह दिसत होता.. आम्ही नक्की किती अंतर चाललो होतो माहीत नाही मात्र मधली कुठलीही गावं आम्हाला लागली नव्हती. अजूनही आमच्याकडे बराच वेळ होता. आम्ही पाटणला पोचू शकत होतो. आम्ही पुढे निघालो.
इथे पाटण ला जाण्याआधी एक मोठा डोंगर लागतो. गावातल्या लोकांनी आम्हाला या रस्त्याबद्दल सांगितलं. हा रस्ता खूप छान होता मात्र बरीच चढाई आहे. खूप थकायला होतं. आठ किलोमीटर नुसती चढाई. मध्ये पाणी देखील नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. आणि पुढे निघालो. घनदाट झाडी आणि पूर्ण चढाई. बाबाला फारच दमायला झालं. बरोबर घेतलेलं पाणी संपायला आलं. साधारण अर्धा डोंगर चढणं अजून बाकी असेल. बाबा थकला, म्हणाला मी आता पुढे जाऊ शकत नाही… पण अशाने कसं होणार? निदान गावात पोचणं गरजेचं होतं कारण हा जंगलाचा भाग होता. थोडावेळ आराम करुन व मग निघू. बाबाला सांगितलं.. त्याप्रमाणे आम्ही तास दीड तास एका झाडाखाली बसून आराम देखिल केला. मात्र आता निघायला हवं होतं कारण संध्याकाळ होऊ घातली होती. अजून अर्धा डोंगर चढून बाकी होतं आणि त्यानंतर गाव किती दूर आहे याचा अंदाज नव्हता. हा भाग डोंगराळ असल्यामुळे आणि आम्ही घळीच्या बाजूने असल्यामुळे इथे थोडं अंधारून आल्यासारखा देखील वाटत होतं.
आम्ही चढायला सुरुवात केली पण बाबाचा थकवा अजूनही गेला नव्हता. त्याला सारखी धाप लागत होती. सामान नको असं तो सारखं सारखं म्हणत होता. हे सामान घेऊन मी चालूच शकणार नाही, असं म्हणून तो बॅग खाली ठेवून दिली. मग माझं सामान मी थोड्या अंतरावर नेऊन ठेवलं आणि पुन्हा बाबाचं सामान घ्यायला खाली उतरले. बाबाचं सामान घेऊन मी पुन्हा वर चढले. म्हणजे आता मला माझंही सामान न्यायचं होतं, आणि बाबाचं ही सामान न्यायचं होतं… शक्ती आणि वेळ दोन्ही दृष्टींनी माझ्यासाठी ते अशक्यच होतं…. पण अशाच वेळी काहीतरी होत असतं…. इथेही झालं… पण काय झालं ते सांगणार पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८६
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मैया ने आमचे कसे लाड केले आणि मी तिचं लाडकं लेकरू आहे हे मला पुन्हा एकदा कसं समजलं याबद्दल सांगितलं होतं. पुढे वाटेत लागलेली विहीर देखील मी तुम्हाला सांगितली होती. नंतर तिथून पुढे आपण पाटणच्या दिशेने निघालो होतो. आठ किलोमीटरचा हा पहाड चढताना माझी दमछाक झाली होती.आम्ही चढायला सुरुवात केली पण बाबा सारखी धाप लागत होती. सामान नको असं तो सारखं सारखं म्हणत होता. हे सामान घेऊन मी चालूच शकणार नाही, असं म्हणून तो बॅग खाली ठेवून दिली. मग माझं सामान मी थोड्या अंतरावर नेऊन ठेवलं आणि पुन्हा बाबाचं सामान घ्यायला खाली उतरले. बाबाचं सामान घेऊन मी पुन्हा वर चढले. म्हणजे आता मला माझंही सामान न्यायचं होतं, आणि बाबाचं ही सामान न्यायचं होतं… शक्ती आणि वेळ दोन्ही दृष्टींनी माझ्यासाठी ते अशक्यच होतं…. पण अशाच वेळी काहीतरी होत असतं…. इथेही झालं..
मी फार तर फार दोन चकरा मारल्या असतील. आधी मी माझं सामान घेऊन ठेवायचे आणि मग बाबाच सामान घेऊन जायचे. मी माझं सामान वर नेऊन परत येईपर्यंत बाबाचा थोडा आराम करायचा. मात्र हे करणं शक्यच नव्हतं, आणि हे मैयाला माहीत होतं. इथे जंगलात आम्ही कुणालाही साद घातली नव्हती, आवाज दिला नव्हता. मैया ची प्रार्थना तेवढी करत होतो की अंधाराच्या आत आम्हाला मुक्कामी पोहोचू दे. अशातच मी माझं सामान वर ठेवायला गेले त्यावेळी तिथे एक लाकूड तोडणारा माणूस येऊन उभा राहीला. “चलो माताजी, सामान मेरे पास दे दो तुमको गाव तक छोड देता हु तो म्हणाला..” बाबाचं सामान त्याच्याजवळ दिलं. त्याने बाबाचा हात धरला आणि झपाझप पुढे जाऊ लागला. थोड्याच वेळात आम्ही शाळेच्या कंपाऊंड पाशी पोहोचलो. आता चढाव संपला होता त्यामुळे बाबाने आपलं सामान परत घेतलं. तो माणूस तिथे असलेल्या लहान मुलीला त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला आणि आम्हाला त्या आठ-दहा वर्षांच्या मुलीकडे कडे बोट दाखवलं. “यह आपको आगे का रास्ता दिखा देगी”- तो म्हणाला.
आता ती छोटी मुलगी पुढे आणि आम्ही मागे मागे जात होतो. मला तिच्याशी बोलण्याची फारच इच्छा होत असल्याने मी तिला छोटे-मोठे प्रश्न विचारू लागले. या शाळेपाशी तू एकटीच काय करत होती? तू शाळेत जातेस का? पण ते एकाही प्रश्नाचं उत्तर देईना… तिला बहुधा माझ्याशी बोलायचंच नव्हतं. एका घराकडे तिने बोट दाखवलं आणि म्हणाली “चाय पा लो आगे जायेंगे”. त्या घरातल्या लोकांनी आमचं अगत्याने स्वागत गेलो आणि सुंदर चहा देखील पाजला. मग आम्ही पुढे निघालो. ही छोटी मुलगी आमच्या सोबत होतीच.. आम्ही तिघेही शांतपणे चालत होतो कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. अशात ती मुलगी अचानक मला म्हणाली… “रोज वही खडी रहती हुं. बहुत परिक्रमावासी आते है. रोज उनको यादव जी के घर तक छोडती हूं. मेरा तो काम ही है परिक्रमा वासियों को मार्ग दिखाना…. तिने यादव जींच्या घराकडे बोट दाखवलं आणि धावत धावत आल्यावाटेने निघून गेली. मात्र मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण कालपासून माझ्यासोबत जे घडत होतं त्यानंतर ती कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येणं होणार आहे याची मला खात्री होती. अर्थात तेही छोटी कन्या असेल हा अंदाज मला नव्हता. तसं ती मी भासवलं सुद्धा नाही. मात्र परिक्रमावासी ना मुक्कामावर सोडणं हे माझं काम आहे हे धावत धावत जाण्याच्या आधी आणि माझ्याशी बोलतानाच शेवटचं वाक्य होतं तिचं. याहीवेळी मी तिला नमस्कार केला नव्हता पण यावेळी मला खंत वाटली नाही. कारण प्रत्येक वेळी नमस्कार करूनच भावना व्यक्त होत नसतात. अधीमधी का होईना आईचं लाडकं लेकरू आईच्या गळ्यात पडत असतं. तितका हक्क तिने मला कधीच देऊ केला आहे हे मला माहीत होतं.
आम्ही यादव जीन कडे गेलो त्यावेळी यादवची घरी नव्हते. त्यांची १६-१७ वर्षांची मुलगी मात्र घरी होती. तिने आमची छान आवभगत केली. ती एकापाठोपाठ एक घरातले काम आटपत होती. विचारपूस करता तिला आई नसल्याचं समजलं. घरची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन ही लहानगी मैया स्वरूपच झाली होती. घरी कोणी परिक्रमावासी माताजी आल्या तिला फार आनंद व्हायचा. कळत नकळत त्या आलेल्या परिक्रमावासी स्त्रीकडे भक्तांना ही लहानगी आपल्या आईला शोधायची. ते तिच्या वागण्यातून बोलण्यातून डोळ्यातून आणि मिठीतून स्पष्ट जाणवायचं. तीनी तीचं पूर्ण घर आम्हाला दाखवलं. शेतातून काढून आणलेलं पीक दाखवलं. अंगणातल्या मागच्या बाजूच्या विहिरीवर ती मला घेऊन गेली. ही तीची मनातले विचार मोकळं करण्याची जागा. आणि इथेच या विहिरीच्या पारावर मी बसले असताना तीनी माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. न बोलता सगळं सगळं बोलून गेली ती! त्यावेळी खरंच खूप गजगत झालं, भरून आलं खूप… पण अनेकदा शब्द सुद्धा अपुरे पडतात व्यक्त होण्यासाठी, आणि अनेकदा अव्यक्तच राहणं योग्य असतं. तीच ही वेळ होती. काय कमाल आहे नाही नर्मदामय्याची, आम्हाला जेऊ खाऊ घालणारी आगत-स्वागत करणारी कुमारिका स्वरूपातली ही मुलगी आमच्यासाठी नर्मदामय्याचं रुप होती, तर नर्मदा मैया ची परिक्रमा करणारी जिच्या पायाला अनेक तीर्थस्थानांची माती लागलेली आहे अशी एक परिक्रमावासी स्त्री या लहानग्या मुलीसाठी तिची नर्मदामैया होती, थोड्या काळासाठी का होईना तिची आई झाली होते.. हे असं समाधान अगदी थोडावेळ मिळालं तरीदेखील त्याची किमया चिरकाल टिकणारी असते नाही?
आम्ही दोघींनी मिळून छान स्वयंपाक केला. मनातच चूल मांडलेली त्यामुळे छान गप्पा-टप्पा ही झाल्यात. ओसरीत ओले बिब्बे घातले होते. कसल्याशा लांब शेंगा देखील वाळत घातल्या होत्या. भोजन प्रसादी साठी आम्ही यादव जी आणि त्यांच्या मुलाची वाट बघत होतो. मुलींनी आपल्या वडिलांना फोन केला आणि नंतर “आप भोजन पालो मैया जी बाबूजी आज बहुत देर से आयेंगे” असं म्हणत तिने आम्हाला जेवायला वाढलं.. जेवण आटोपले यादवजी बरेच उशिरा घरी आले. त्यांचं जेवण झाल्यानंतर मग गीत माझ्या बाजूला येऊन बसली.. “आज है यही सो जाऊ मैया जी?” तिनी आर्जवी स्वरात विचारलं आणि मी होकार दिला. ती माझ्या बाजूलाच होती रात्रभर. सकाळीच पहाटेलाच आम्ही पुढे जायला निघणार तेव्हा घरातले सगळे झोपले होते. आमचं व्यवस्थित आवरून झालं होतं वाट पाहूनही झालं होतं. त्या लहानश्या मुलीच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून तिला झोपेतून उठवायची आमची अजिबात इच्छा होत नव्हती. हळू आवाजात दारापाशी येऊन नर्मदे हर म्हणावं आणि पुढे जावं असा विचार मनात आला तोच तिने डोळे उघडले आणि म्हणाली “जा रहे हो मय्या जी चाय बना दू? मी नको म्हंटलं तरीही ती उठून बाहेर आले मला मिठी मारली आणि म्हणाली “कल बाबूजी शराब पी के आये थे, मुझे अच्छा नही लग रहा था, इसलिये मै आपके पास आके सो गयी, उधर वाले कमरे में होती तो बाबूजी डाट देते, जब भी शराब पीकर आते है बहुत दाटते है” पुन्हा एकदा हृदयात खोलवर घाव झाल्यासारखं वाटलं.. पण तिचं लगेच पुढचं वाक्य ऐकून लेकीचा समजूतदारपणा आणि लेकी चे मैया होणार काय असतं त्याचा प्रत्यय आला. ती म्हणाली “आप चले जाओ फिर बाबूजी को जगाती हू, अच्छा नही लगेगा के परिक्रमावासी घर मे थे फिर भी वो शराब पीकर आये, आप आने वाले हो यह शायद उन्हे पता नही था”. तिच्या या वाक्याने एक प्रकारची मोकळीक तिने आम्हाला दिली. थांबलो असतो तर वडीलांची लाजे नी होणारी अवस्था आणि ज्या घरी थांबलो, जेवलो त्या घरच्या मुख्य व्यक्तीला न भेटता जातोय याची खंत या दोन्हीवर तिच्या या वाक्याने पांघरूण घातलं होतं… तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारून आम्ही पुढे निघालो.
पुढे केदारपुर, केवलारी, पौंडी, किंदरई, दलका घुटिया करत-करत साल्हे पाणी ला आलो. पाटण होऊन सकाळी निघालो होतो त्यावेळी आमचा चहा देखील झाला नव्हता. केदारपुर च्या पुढे आल्यानंतर थोडी भूक लागायला लागली. इथे जवळपास दुकाना नाही आणि एवढ्या सकाळी ती उघडण्याची शाश्वती पण नाही त्यामुळे आम्ही तसेच पुढे पुढे जात होतो. हे केदारपुर थोडं खाली आहे डोंगराच्या. साधारण सगळ्याच बाजूंनी डोंगर आणि मध्ये केदारपुर असा काही भाग आहे. इथून आजूबाजूच्या डोंगरावरचे मोबाईल टॉवर दिसतात. तेच बघत बघत आम्ही पुढे जात होतो. वाटेत एक पार असलेलं झाड होतं तेथे विश्रांतीसाठी बसलो असताना एक गंमत झाली. दोन कुत्रे आमच्या अंगावर भुंकायला लागले. आम्ही त्यांच्या हद्दीत, त्यांच्या मालकीच्या जागी बसलो असू कदाचित, आणि म्हणून आम्ही उठू लागलो तोच एक माणूस आमच्या दिशेने येताना दिसला.. बैठो कुछ नही करेंगे, वह तों उनका नाश्ते का समय हो गया है ना यहा रोज नाष्टा करते है” असं म्हणत त्याने पार्लेजी पुडे त्या कुत्र्यासमोर मोकळे केले.. मग सोबतची पिशवी उघडली त्यातून काळा चहा भरलेली एक थर्मास सारखी बाटली बाहेर काढली. एक पेला काढला आणि माझ्या हाती काळा चहा दिला.. खूपच आश्चर्य वाटलं यावेळी रस्त्यावर इथे असा चहा मिळतोय तरी कसा.. मग विचारलं, तर म्हणाले हे दोन माझे शेतातले कुत्रे आहे. रोज हे निमूटपणे इथे येऊन बसतात. आज हे खूप भुंकत होते तेव्हाच इथे कोणीतरी आहे हे लक्षात आलं म्हणून मागावून येताना चहा घेऊनच आलो. इथेच या शेता पलीकडे माझी छोटीशी झोपडी आहे. कसे काय कोणाच्या मनात विचार येतील मै याच जाणे बाबा.. पण कोईन्सिडन्स नसतो हे नक्की..
आम्ही जेव्हा बरगी कॉलनी ला गेलो त्यानंतरचा प्रवास हाईन्सिदेन्स वाटणार्या मात्र को इनसीडन्स नसणाऱ्या घटणांने भरलेला आहे. ज्याप्रमाणे एकच वाक्य मला वेगवेगळ्या चार संन्यास यांनी सांगितलं होतं तसंच काहीसं या भागात घडलं. मात्र यावेळी संन्यास यांची जागा घेतली चहावाल्यांने आणि आम्हाला जे सांगितलं त्यामुळे आम्ही कुठच्या कुठे जाऊन पोहोचलो… याच वाटेवर एका पांढऱ्या रंगाच्या कारणे आमच्या पुढ्यात एक सरप्राईज आणून ठेवलं, तेही सांगणारे पण पुढच्या भागात..
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला पाटणच्या मुक्कामाला बद्दल सांगितलं होतं. त्यानंतर केदारपूरला कुत्र्यांच्या भुंकण्याचा मुळे झालेली चहाची व्यवस्था पण मी तुम्हाला सांगितली होती. आम्ही आता केदारपुर हून देखील पुढे निघालो. चरगाव, बरेली, किंदरई पौंडी, दलका, घुटिया, साल्हेपाणी, बीच्छिया अतारिया, गोरखपुर असा हा मार्ग होता.
आजचा आमचा दिवस आळसात सुरू झाला होता. आज जणू काही घडत नाहीये असं वाटत होतं. वातावरणात किंचित उदासीनता आहे असे देखील जाणवत होतं. करत करत आम्ही किंदरई ला पोहोचलो. किंदरई तसं थोडं मोठं गाव. इथे बस स्टॉप आहे. ज्या गावात बसेस थांबतात ते गाव मोठं गाव असं समजल्या जातं. आम्ही मेन रोड वर होतो. तेवढ्यात आमच्या बाजूला एक बस येऊन थांबली. कंडक्टर खाली उतरला आणि म्हणाला “चलो आपको आगे तक छोड देता हु उतर जाना, पैसा नही लूंगा ऐसेही छोड दुंगा बैठो तो सही” आम्ही नकार दिला तेव्हा हात जोडूनच मागे लागला… म्हणाला माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे तुम्ही बसलात तर बरं होईल. आम्ही त्याला सांगितलं, आम्ही पाई परिक्रमावासी आहोत… अगदीच तब्येत बिघडली किंवा तशीच काही अडचण असेल तरच गाडीमध्ये बसण्याचा विचार करू अन्यथा नाही…. तो ड्रायव्हरशी काहीतरी बोलला आणि पुन्हा आमच्यापाशी आला, “चालू गाडी मे नही बैठ सकते तो गाडी रोक देता हू, दो मिनिट तो आके बैठ जाओ फिर उतर जाना, मेरा ड्युटी का पहला दिन है. इसे मै आपका आशीर्वाद समझूंगा”.. आता नाही म्हणवलं नाही, त्याच्या आग्रहाखातर पाच मिनिटं आम्ही बंद बसमध्ये बसलो. मात्र त्या पाच मिनिटात त्या कंडक्टर ने अशी काही आव भगत केली की काय सांगू! त्या पाचच मिनिटात कुणाला तरी फोन करून त्याने आमच्यासाठी समोसा, थोडी फळ, वेफर्सची पाकीटं, बिस्किटांची पाकीटं आणि आणि ज्युस च्या बाटल्या मागवल्या. त्यानं आम्हाला दाराजवळच्या कण्डक्टर च्या सीट वर बसवलं होतं. आमच्या हाताने शुभ म्हणून २-४ तिकीटं सुद्धा त्याने काढून घेतली. बस मध्ये नर्मदा मैया चा जयघोष केला आणि मग आम्ही खाली उतरलो. आश्चर्य म्हणजे खचाखच भरलेल्या बस मधील एकाही प्रवाशांनी याबद्दल विरोध दाखवला नाही. मोजूनच पाच मिनिटे बस थांबून होती खरी पण बस मधील प्रत्येक प्रवाशी या नर्मदा मातेच्या जयघोषात आनंदाने सामील झाला होता.
कण्डक्टर चा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. मध्ये मध्ये गावं आणि मध्ये मध्ये पहाडी चढ-उतार असा हा रस्ता साल्हेपाणी पर्यंत जातो. मधी कुठेशी एका चहावाल्याने चहा ला बोलावलं. खरं तर इथूनच चहा वाल्यांची गंमत सुरू झाली… पण ती आत्ताच समजणार नाहीये. हा चहावाला म्हणाला, “तुम्ही छोट्या रस्त्याने देखील जाऊ शकता, आणि मुख्य रस्त्याने देखील. छोटा रस्ता समजायला थोडा कठीण आहे, चढ-उतार ही भरपूर आहे. रस्ता चुकण्याची सुद्धा शक्यता आहे, तरीही का कोण जाणे मला वाटतंय तुम्ही छोटा रस्ताच घ्यावा”. आता मात्र आम्हाला प्रश्न पडला. म्हणजे छोट्या रस्त्याने इतके सारे प्रॉब्लेम्स येणार हे या चहावाल्याला माहित आहे खरं तरीही हा आम्हाला त्याच रस्त्याने जायला सांगतोय.. असं का असावं? फक्त अंतर कमी पडेल म्हणून हे असेल का? खरं पाहता बाबाचं वय बघून इतर लोक आम्हाला कच्च्या रस्त्याला जाऊ नका असं सांगायचेत, पण हा पहिलाच माणूस.. अडचणी येतील तरीही कच्च्या रस्त्याने जा असं सांगणारा… तसं मला मुख्य रस्त्याने जायला फारसा आवडायचं नाही, डोंगर दरी निसर्ग मला नेहमीच जवळचे वाटले. बाबा नाही आवड म्हटली तर कच्चा रस्ता आवडायचा पण बरेचदा चढ-उतार असले की बाबाचा गुडघा दुखायचा. मी बाबाला विचारलं, त्याचा होकार आला आणि आम्ही कच्चा रस्ता धरला.
फार निसर्गरम्य असा हा भाग नसला तरी गाड्यांच्या प्रदूषणा पेक्षा बराच म्हणायचा. कच्चा आणि छोटा रस्ता असला तरी लांब च्या लांब. या भागातला प्रवास थोडा रटाळ वाटेल असा होता. एकंदरीत पाहता हा भाग गरिबीचा. पाण्याचा सुद्धा तुटवडा. रस्त्यात पुढचा रस्ता विचारायला चिटपाखरू देखील नाही. दिवस असाच जात गेला आणि आम्ही निवारा शोधू लागलो. आम्ही गोरखपुर पर्यंत जाऊ शकू असा आम्हाला वाटलं होतं पण गोरखपुर यायला अजून बराच वेळ आणि बरच अंतर असावं. मधेच वाटेत आम्हाला एक तरुण मुलगा भेटला. “आप आगे साल्हेपानी मे रुक जाना, उसके आगे नही जा पाओगे सुरज डूब जायेगा, मेरे पीछे पीछे आओ” असं म्हणत तो थोडा पुढे जाऊन थांबायचा. साधारण साडेचार पाचच्या दरम्यान तो आम्हाला भेटला असावा. आम्ही नक्की कुठे होतो ते आठवत नाही पण साल्हेपाणी ला जायला साधारण तीन-चार किलोमीटर अंतर बाकी होतं. त्याने वस्तीकडे बोट दाखवलं आणि तो पुढे निघून गेला. आम्हाला रस्ता दाखवायला कुणीतरी भेटणार आहे असा त्या चहावाल्याला विश्वास असेल का? आम्ही साधे पाणी ला पोहोचलो पण तिथे राहायचं कुठे हा प्रश्न होताच. खरं ज्यांच्या घरी आम्ही राहिलो त्यांचं नाव लिहायला मी विसरले आहे. पण गोंड की कुठलं आदिवासी जमातीचं हे कुटुंब. अगदी फार आदरातिथ्य नाही पण भोजन व्यवस्था आणि निवारा तिथे व्यवस्थित मिळाला. गरीबी आणि पाण्याच्या तुटवड्याचा होईल कदाचित इथे घरी असलेल्या भागात पाहुण्यांना प्रती उदासीनताच असावी असं वाटतं, मात्र मैया ने आमची व्यवस्था छानच केली.
दुसर्यादिवशी लवकरच निघालो. आता गाठायचं बर्गी कॉलनी. आम्ही रस्त्याने रमत-गमत जात होतो. मागच्या भागात मी तुम्हाला एका पांढऱ्या कार बद्दल सांगितलं होतं नं, ते आता पुढे सांगते. आता मधला रस्ता सोडून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो होतो. आमच्या मागून एक पांढर्या रंगाची कार् आली आणि थोडं समोर जाऊन थांबली. गाड्या थांबल्या की लोक उतरून दक्षिणा किंवा फळ किंवा तत्सम काहीतरी देतात याची आता सवय झाली होती. कारचा ड्रायव्हर खाली उतरला आणि आम्ही त्याच्याकडे येण्याची वाट पाहू लागला. आम्ही गाडीजवळ पोहोचताच त्याने शंभर शंभर च्या दोन नोटा आमच्या हातात घातल्या आणि इतक्यात मागून कुणीतरी येऊन माझे डोळे धरलेत. अरे बापरे कोण असेल बरं इथे माझे डोळे धरणारं… ” ओळख बरं सुरुची कोण आहे मी?” आवाज ओळखीचा होता, भाषा मराठी होती.. मुख्य म्हणजे त्या माझं नाव घेत होत्या.. बाईचा आवाज होता.. इथे कोण हार मारतंय मला नावासकट? आणि मराठी बोलतंय? मला काही समजेना. छे अशक्य, हरले आता, सोडा तरी… खरंतर तिथे नावासकट मला कोणीतरी बोलवतं आहे, माझे डोळे धरतय त्यातच त्या व्यक्तीची माझ्याशी असलेली आपुलकी मला दिसून येत होती… त्या व्यक्तीने माझे डोळे सोडले आणि मी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गळ्यात पडून रडू लागले. अशी इथे अचानक भेट होईल हे कल्पनेच्याही बाहेर होतं. या व्यक्तीला पाहिल्यानंतर माझा आनंद मला आवरताच आला नाही.. किती बोलू किती नको असं मला वाटायला लागलं… किती दिवसांनी ही भेट झाली होती. आमच्या मागच्या भेटीनंतर काय काय झालं हे मला भडाभडा सांगायचं होतं. इतका वेळ मिळणार नव्हता हे मलाही माहीत होतं… पण त्यांचा आशीर्वाद मला पुन्हा एकदा मिळणार होता, आणि त्यांचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून माझ्या पाठीवरून फिरणार होता, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला माहितीये मी तुमची उत्सुकता ताणून धरली आहे. अशी कोण ही व्यक्ती असणार ज्यांना समोर पाहिल्यावर माझी ही अवस्था होते हे तुम्हाला जाणून घ्यायचंय.. सांगते.. माझे मागून डोळे धरणारी व्यक्ती म्हणजे अमरकंटक ला भेटलेली अनुताई, आणि ज्यांच्या गळ्यात पडून मिठी मारली, ज्यांना पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला ती व्यक्ती म्हणजे चितळे माई ज्यांना आपण प्रतिभाताई चितळे म्हणून ओळखतो. अर्थात बाबा ( सुधीर चितळे) होतेच तिथे. माईंचा दात दाखवण्यासाठी ते जबलपूर कडे निघाले होते, आणि आम्हाला दूरूनच पाहून असं सरप्राईज त्यांनी आमच्यापुढे आणून ठेवलं… अमरकंटक चा माईंजवळचा मुक्काम, शंकर महाराजांचा आलेला अनुभव, असं सगळं माझ्या डोळ्यापुढून सरकू लागलं… मी माईंना लहान मूल आईला मिठी मारतं तशी मिठी मारली अगदी कडकडून.. आणि माईंनी सुद्धा डोक्यावरून हात फिरवला म्हणाल्या “तुला पहिल्यांदा भेटले तेव्हा म्हणाले होते मी तुला तुझी “वाट” लागली म्हणून.. योग्य वाटेवर चालते आहेस तू, आता एक काम करायचं दक्षिणा दिलीयेना, छान पोटभर जेवून घ्यायचं कुठेतरी, अजून भरपूर प्रवास बाकी आहे..” माई बाबांनी आमचा निरोप घेतला आणि त्या दूर जाणाऱ्या कार कडे मी एकटक बघत राहिले.
पुढे चालता चालता एक वेगळाच प्रश्न आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला. आम्ही गावापासून दूर. मात्र स्थिती अशी होती की आम्हाला आता पुढे जाता येणं अशक्य होऊ लागलं होतं.. वाटेत कुठेही थांबता येण्यासारखं नव्हतं जागाच नव्हती तशी, आणि खरं सांगू थांबूनही फायदा नव्हता कारण आज थांबून आमचा हा प्रश्न सुटणारच नव्हता. त्या प्रश्नावर योग्य उपाययोजना केल्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. आम्हाला खरंतर मोठ्या गावात किंवा शहरात गेल्यावरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार होतं पण अशा अवस्थेत चालता येणं कठीण होतं… नाही नाही आमच्या तब्येती अगदी व्यवस्थित होत्या. कुठली अंगदुखी नाही की काही नाही.. तरीही चालता येणं कठीण झालं होतं. नाही, माझे आणि बाबाचे जोडे पण व्यवस्थित होते, आणि जोडे खराब झाले तर काढून टाकता येतात ना… मग काय झालं होतं? खरं सांगायचं तर बाबाला काही झालं नव्हतं, माझाच प्रॉब्लेम होता.. अर्थात कसाबसा तो प्रॉब्लेम आम्ही तात्पुरता सॉल्व केला खरा, पण त्यावर उपाययोजना झाली ती निगरी नावाच्या गावात… तोवर फारच कठीण गेलं आम्हाला… असं काय झालं असेल… सांगते पण पुढच्या भागात..
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला चितळे माई बाबांची अचानक झालेली भेट सांगितली होती.आम्ही रस्त्याने मजल-दरमजल करत जात होतो आणि अशातच आम्हाला एका वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागला असं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. हा प्रश्न नक्की काय होता? आम्हाला चालणं का अशक्य झालं होतं हे आता सांगते!
तर झालं असं होतं की बाबाची बॅग काही वेळासाठी मी घेतली होती आणि माझी बॅग बाबाला दिली होती. हे अशासाठी की रस्त्यात कोणी काहीही दिलं तरी ते आम्ही बाबाच्या सामानात ठेवत असू. माझी बॅग लहान असल्यामुळे त्यात जागाच नसायची. पण मग वजन जास्ती होऊन बरेचदा बाबाचा खांदा दुखायचा. त्याला थोडं रिलॅक्सेशन म्हणून थोडावेळ ती जड बॅग मी घ्यायचे.. अर्थात तासा-दोन तासा साठीच बरं का.. यापेक्षा जास्त बाबांनी मला कधीच जड बॅग घेऊ दिली नाही. आताही ती बॅग माझ्या जवळ होती. आम्ही रस्त्याने चालत होतो आणि अचानक माझ्या खांद्यावर असलेल्या बॅगचे वरचे दोन पट्टे निखळले. कमरेला लावण्याचा पट्टा घट्ट असल्यामुळे बॅग जमिनीवर पडली नाही मात्र खांद्यावरुन निसटून पायापर्यंत लटकली. माझ्या कमरेला एक जोराचा हिसका बसला आणि मी खाली पडले. मला फार काही इजा झाली नाही कारण पडतांना मी बॅगवर पडले होते, मात्र आता प्रश्न असा होता ही इतकी जड बॅग घेऊन जायचं तरी कसं? अजून पुढचं गावही दूर होतं आणि त्या गावात या बॅगवर काही उपचार करता येतील किंवा नाही याची माहिती देखिल आम्हाला नव्हती.
मग आमचे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. थोडावेळ बाबाने ती बॅग डोक्यावर घेतली. पण फार अंतर चालता येईना. पाच-दहा मिनिटांच्या वर आपल्यासारख्यांना एवढं वजन डोक्यावर घेऊन झाणं शक्यच नसतं. मग लहान मुलाला कडेवर घेतो तशी ती बॅग कडेवर घेऊन पुन्हा काही पावलं चालण्याचा असफल प्रयत्न आम्ही केला. नंतर दोन लुंग्या घेऊन ती बॅग पुन्हा खांद्याला बांधता येते का याचाही विचार केला आणि पुन्हा एकदा असफलता पदरात पाडून घेतली. नाही नाही म्हणता म्हणता दोन चार किलोमीटर आम्ही पुढे सरकलो असू,तेवढंच! मग आता त्या बॅग मधलं काही सामान माझ्या बॅगमध्ये अक्षरशहा कोंबलं आणि थांबत थांबत बॅग हातावर, कडेवर, सूटकेस सारखी धरून अनेक प्रकारांनी काही अंतर पुन्हा पार केलं. मग रस्त्यावरच एका ठिकाणी दोन्ही बॅगा पुन्हा मोकळ्या केल्या आणि काही सामान टाकून देता येईल का याचाही विचार केला. कपडा प्रकार सोडता येण्यासारखा नव्हता आणि बाकी दिलेलं शिध्याचं सामान सुद्धा असं रस्त्यावर सोडून देणे योग्य नव्हतं. निदान कोणाच्या तरी पोटाला लागावं म्हणून तेही तिथे टाकता आलं नाही. पुन्हा बॅगा भरल्या आणि गावापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू ठेवली.
जरा वेळाने एक कल्पना सुचली आणि ती बऱ्यापैकी अमलात आली. आता बरंच अंतर अशा पद्धतीने चालता येऊ शकतं याची खात्री पटली आणि हा उपाय व्यवस्थित लागू पडला. ह्या बॅगच्या वरच्या बाजूने बॅग उघड बंद करण्यासाठी जो झाकणा सारखा भाग असतो, त्यातून आमचा दंड आरपार घातला. त्याचं एक टोक बाबाने धरलो आणि दुसरं टोक मी धरलं. बाबा पुढे आणि मी मागे. आमच्या हातामध्ये दंड आणि दंडाच्या मधोमध लटकलेली बॅग. अर्थात यातही प्रॉब्लेम येत होताच पण तो निभावून नेण्यासारखा होता. बाबा ची उंची सहा फूट आणि माझी उंची कमी त्यामुळे आम्ही धरलेला तो दंड तिरपा व्हायचा आणि बॅग माझ्याकडे घसरायला लागायची. पण काही काळ तितके वजन मी सांभाळू शकायचे. मग यातही व्हेरिएशन्स येऊ लागले. शेवटी माझा उजवा हात आणि बाबाचा डावा हात अशा पद्धतीने तिरपा दंड धरून आम्ही चालायला लागलो… मजल दर मजल करत, थकत, थांबत आम्ही निगरी पर्यंत येऊन पोहोचलो.आता शक्य असल्यास दुकान शोधून दुसरी बॅग घेणे किंवा एखाद्या टेलर कडून ही बॅक शिवून घेणे हे उपाय.
पण प्रॉब्लेम अजून संपले नव्हते. इथे मोठं असं एकही दुकान नव्हतं जिथे नवीन बॅग खरेदी करता येईल. इथे जवळपास तरी कुठलंच टेलरचं सुद्धा दुकान नव्हतं. यासाठी आम्हाला बरगी कॉलनीलाच जाणं भाग होतं. आणि बरगी कॉलनी अजून भरपूर दूर होतं. आज आम्ही पोहोचू शकतो किंवा नाही अशी अवस्था होती. मघा सांगितल्याप्रमाणे थांबूनही फायदा नव्हताच कारण सुधारून घेतल्या शिवाय आम्हाला वेगानं चालता येणार नव्हतं. आमचं चालणं असंच हळूच होणार होतं, म्हणून आम्ही थांबायचा विचार सोडून दिला आणि थोडं थोडं का होईना पुढे चालत राहू असं ठरवलं. मग जिथे कुठे संध्याकाळी होईल तिथे थांबून जायचं..
आम्ही पुढे निघालो. आता गाव संपत येऊ लागलं. अशातच मागून एक माणूस आला आणि आम्हाला म्हणाला, “ऐसे कैसे लेकर जाओगे आप यह बॅग, चलो, पीछे मेरा दुकान है कुछ करते है”.. अरे वा,दुकान? आमच्या नजरेतून दुकान सुटलं की काय? खरं तर दुकान शोधण्यासाठी आमची इतकी तळमळ सुरू होती की दुकान आमच्या नजरेतून सुटेल ही शक्यता कठीणच होती. दुकान म्हटल्यावर आम्ही दोघही फारच सुखावलो होतो आणि म्हणून त्या माणसाच्या मागोमाग चालायला लागलो. एका झाडाखाली चार काठ्या रोऊन त्यावर एक कापड टाकलेलं त्याचं दुकान होतं. तो चांभार होता. ही बॅग तो शिवून देणार होता, हाताने! मात्र ही बॅग शिवल्यानंतर अडचण एकच होती ती अशी की नंतर ही बॅग फार काही ऍडजेस्ट करता येणार नव्हती. त्यामुळे बाबाच्या मापानेच ती बॅग शीवून घेणं गरजेचं होतं. तो चांभार सुद्धा वेगवेगळे प्रयत्न करून बघत होता, तो टेलर नव्हता मात्र त्याच्याकडे जे काही सामान होतं त्यात आमची जमेल तशी मदत करण्याची त्याची धडपड आम्हाला दिसून येत होती. त्याच्याकडे आलेल्या गिर्हाईकाला देखील त्याने थांबवून ठेवलं. मग मात्र आम्ही एक निर्णय घेतला. आज इथेच थांबायचं. बाबाने त्या चांभाराला राहण्यास योग्य जागा विचारली. “तुम तुम्हारे गिराईक पहले देखो, हम आज यही रुकेंगे, तुम्हारा काम खतम होने के बाद ये बॅग का काम करते है, यहा कहा रह सकते है वो बताओ”.. तिथूनच थोडं पुढे जवळच असलेल्या एका वस्तीत एका माताजींच्या घरी त्याने आमची व्यवस्था केली. माताजी एकट्याच होत्या. त्यांच्या घरी समोरच्या खोलीत आम्ही आमचं बस्तान बसवलं. हा चांभार बॅग घेऊन गेला आणि रात्री पर्यंत येतो असं सांगितलं. मात्र हा रात्री बॅग घेऊन आलाच नाही. अर्थात आम्हाला कुठलीही काळजी नव्हती. सकाळी तरी फार उशीर न होता निघता यावं यासाठी आम्ही त्याची वाट बघत होतो. सकाळी आमचं पूजापाठ करून झालं, थोडं आजूबाजूला फेरफटका मारून झाला. एकट्या म्हाताऱ्या माताजी ना बाल भोगा बनवण्याचा त्रास नको म्हणून वस्ती बाहेरच्या एका छोट्याशा ठेलेवजा हॉटेलवर आम्ही बाल भोगही केला. आता जवळजवळ नऊ साडेनऊ होऊन गेले होते तरीही हा चांभार काही येईना. याच्या दुकानावर ही चकरा मारून झाल्या पण आज दुकानच उघडलं नव्हतं. माताजी ना याचं घर वगैरे काही माहीत नाही. आता अजून किती वेळ थांबणार? फार तर तासभर वाट पाहू आणि मग मात्र पुढे जाऊ, असा विचार केला आणि जास्तीत जास्त सामान बॅगमध्ये भरलं आणि उरलेल्या सामानाचं व्यवस्थित गाठोडं बांधून घेतलं. माताजींचा निरोप घेतला आणि आम्ही पुढे निघालो. आता आमच्या दंडावर बॅग ऐवजी गाठोडं होतं एवढाच काय तो फरक! हो मध्येमध्ये गाठोड्याची गाठ सुटून रस्त्यावर सगळा पसारा सांडला, पण असं एक दोनदाच झालं मग ती गाठ पक्की बांधण्यात आम्हाला यश आलं. एका ऐवजी आता दोन लुंग्या घेऊन गाठोडं पक्क केलं, आणि वाटचाल पुढे सुरू ठेवली.
साधारण चार पाच किलोमीटर चालून झालं असेल, समोरून एका गाडीवरून दोघं माणसं आमच्या दिशेने येत होते आणि आम्हाला थांबा थांबा असा इशारा दुरूनच करत होते. आमच्याजवळ येऊन गाडी थांबली आणि त्यातल्या मागे बसलेल्या वीस-बावीस वर्षाच्या मुलाने आमची बॅग आम्हाला सोपवली. अरे तो चांभार कुठे गेला? ही मुलं कोण? यांच्याजवळ आमची बॅग कुठून आली? आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला त्या मुलांनी दिली. रात्रभर प्रयत्न करूनही त्या चांभाराला आमची बॅग हवी तशी शिवता आली नव्हती म्हणून सकाळीच एका मुलाला घेऊन तो चांभार बरगी कॉलनीला एका ओळखीच्या टेलर कडे आमची बॅग घेऊन गेला होता. त्याने आमची बॅग व्यवस्थित शिवून दिली होती. हा चांभार बरगी कॉलनीलाच थांबला होता. “बाबाजी आयेंगे तो मिलकर ही जाऊंगा”, असा निरोप सुद्धा आम्हाला त्याने धाडला होता. मात्र माताजी जवळ मोबाईल नसल्याने या चांभाराला आम्हाला फोनवर संपर्क करता आला नाही. पुढे बरगी कॉलनीला परिक्रमावासी मार्गावरच या चांभाराने आमची भेट घेतली. खरच किती आस्था त्या चांभाराला ! किती खर्च आला असं बाबाने विचारताच तो माणूस पाया पडला, पैसे सांगायला तयारच होईना. शेवटी तिथल्याच एका दुकानातून मिठाई घेतली आणि घरी मुलाबाळांसाठी घेऊन जा म्हणून जबरदस्तीने त्याच्या हातात घातली. असंच असतं या मैयाचं.. “माई गं याचं घर आनंदाने, समाधानाने भरु दे” हे उद्गार ती आपल्या तोंडून काढून घेतल्याशिवाय राहात नाही. आणि मग असं करत करत आपण अगदी प्रत्येकाच्या बाबतीतच आणि प्रत्येकासाठीच या मैया कडे सुखा समाधानाची मागणी करू लागतो. आता आपल्याकडे आपल्यासाठी मागायला काही उरलंच नसतं, नं मागता ती सगळ देते हे अगदी पक्कं असतं. स्वतःच्या सुखासमाधानातला आनंद आता छोटा होऊ लागतो आणि इतरांच्या सुखासमाधानात ला आनंद हळूहळू मोठा होऊ लागतो. मी माझ्यासाठी ज्या तळमळीने काही मागत असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त तळमळीने त्या चांभारा साठी माझ्याकडून हे उद्गार निघतात! संस्कार जे म्हणतो आपण ते असेच घडत असतात तिच्या किनारी.. प्रत्येकाच्या आपापल्या प्रवासातला मार्ग हा असा थोडा थोडा पुढे जात असतो…
आम्ही पुढे निघालो. बरगी कॉलनी ला पोहोचलो. तिथे धर्मशाळेच्या बाहेर एका कुटुंबाची ओळख झाली. त्या कुटुंबाबद्दल पुढच्या भागात सांगणारे, पण पुढच्या भागात चहावाल्या बद्दल सुद्धा सांगणार आहे. 86 भागाच्या शेवटी खरंतर “चहा वाल्यांनी आम्हाला काहीतरी सांगितलं आणि आम्ही कुठल्या कुठे जाऊन पोहोचलो” असं एक वाक्य लिहिलं होतं. त्याचा उलगडा पुढच्या भागात करणार नक्की… तोवर नर्मदे हर
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८९
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला अनुभव सांगितला होता बॅग तुटल्याचा. आता बर्गी कॉलनीला आम्ही येऊन पोहोचलो होतो. आम्हाला मेन रोड वरचा रूट सांगितला असल्याने आम्ही तसे आलो मात्र इथून मैयाकिनारी देखील रस्ता आहे, मात्र तिकडून जाऊ नका असं आम्हाला सांगण्यात आलं होतं…असो
आम्ही बरगी कॉलनी ला पोहोचलो. इथली धर्मशाळा मोठी होती मात्र अस्वच्छ आणि अव्यवस्थित होती. रात्र व्यवस्थित गेली. इथे आंघोळीची काहीही व्यवस्था नव्हती. बाथरूम होते पण त्यात पाणी नव्हतं. खोल्या बांधल्या होत्या पण त्या अतिशय अस्वच्छ होत्या. बाहेर अंगणात एक हापशी होती. आम्ही आंघोळीला मैया वर जायचं ठरवलं. वाटेतच आम्हाला एका परिवाराने चहासाठी बोलावलं. “अंतर बरंच लांब आहे इथेच आंघोळ करा, आमच्याकडे मागे मोठी टाकी आहे हवं तितकं पाणी वापरू शकता, बंद आणि स्वच्छ बाथरूम देखील आहे” असा आग्रहच धरला. त्या निमित्ताने तुमचा पूजापाठ आमच्या घरात होईल आणि त्याचे फळ आम्हाला मिळेल अशीही परिवाराने व घातली. त्यांची विनंती आम्ही मान्य केली आणि त्यांच्या घरी स्नानादी व पूजापाठ झाला. हे सगळं होईस्तोवर घरच्या माताजीने भोजन व्यवस्था सुद्धा तयार ठेवली होती. “भोजन पा कर ही जाना बाजी” ही गळ सुद्धा सोबत होती… या तीन ते चार तासात या कुटुंबातल्या व्यक्तींशी छानच ओळख झाली. घरातले दोघेही भाऊ अशिक्षित. दोघेही ट्रक चालक. घरी पाच सहा ट्रक होते, काही भाड्याने दिले होते तर दोन ट्रक हे दोघं भाऊ स्वतः चालवायचे. घरचं वातावरण अतिशय संस्कारी. लौकिक शिक्षण जरी नसलं तरी संस्कारांचं मोल जपलेलं हे कुटुंब. नवीन पिढीतली पोरं बाळ मात्र शिकत होती.भोजन प्रसादी आटोपून आम्ही पुढे निघालो त्यावेळी या घरातली प्रत्येक व्यक्ती आम्हाला बरंच दूरपर्यंत सोडायला आले.
त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या रस्त्या सारखा होता. अतिशय रमणीय. समोर छोटे-छोटे पहाड आणि त्यांना फोडून जाणारा हा रस्ता. इथे गुलमोहरा पळसाची खूप झाडे होती, आणि सगळी झाडं बहरून आली होती. आल्हाददायक वातावरण होतं. मनातून एक वेगळ्याच प्रकारचा आनंद ओसंडून वाहतोय असं वाटत होतं. ही किमया त्या वातावरणाची. उतार-चढाव, छोटे-छोटे पाडे, रस्त्यात ये-जा करणारी सायकल वाली लहान मुलं, हिरव्याकंच झाडीत उठून दिसणारा जर्द केशरी पळस… मनोहरच होतं सगळं काही. आणि अशा मनोहर वातावरणात नर्मदा मैया पण वेगळ्याच मूडमध्ये होती बहुदा. आज तिचा आमच्याबरोबर लपाछुपी खेळण्याचा मूड असावा. लहान बाळाशी खेळताना दारामागे लपून बाळ आपल्याला कसा शोधतोय हे बघते नं आई तसंच केलं तिनी आमच्यासोबत. सांगते सांगते..
सकाळी मला महेश्वरच्या माताजींचा फोन आला. त्यांनी सांगितलं आज तुला अनेक लोक रस्ता सांगतील, मात्र चहा वाल्या दुकानदारांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालत जा… आज सकाळी ध्यानात बसले असताना तीन चहावाले तुला रस्ता सांगतायेत असं मी बघितलं होतं. माताजीं च्या फोन प्रमाणे असेल पण आम्हाला एका चहावाल्याने चहासाठी बोलावलं. त्यानी चहा पाजला आणि “तिलावारा घाट क्यू जा राहे हो, उलटा हो जायेगा ना.. यहासे आगे निकलके दाये मोड पे जाना, सीधा त्रिशूल घाट जाओगे” त्याच्या या सांगण्यावरून तिथेच असलेल्या एका त्याच्या गी-हाईकाचं दुमत पण झालं त्याच्याशी… मात्र चहा वाल्याचं ऐक असा फोन सकाळीच झाला होता आणि म्हणून आम्ही त्याचं ऐकलं, आणि आता त्रिशूल घाटाकडे निघालो. वाटेत नाना खेडा नावाचं गाव लागतं, तिथे मुक्काम केला, तर तिथल्या माणसाने सांगितलं की तुम्ही उजवीकडे गेले असते तर तिल्वारा घाट लागला असता, आता उलटं जाऊ नका उद्या, त्रिशूल घाट जवळ आहे, तिकडे जा, पण दुस-या दिवशी सकाळी पुन्हा एका चहावाल्याच्या दुकानात असताना त्याने सांगितलं, तिकडे कशाला जाताय, एक वाट शेतातून जाते, एक दोन नाले पार करावे लागतात, पण तुम्ही सरळ जा तुम्हाला डूंडवारा नावाचं गाव लागेल, तिथून भेडाघाट ला जा सरळ. तसच झालं, आम्ही सरळ भेडाघाट ला पोचलो देखील… जवळ जवळ ३० किमी चा रस्ता कमी झाला होता आमचा…
अजूनही हा शॉर्टकट चा सिलसिला थांबला नाहीच. भेडाघाट च्या आधीच एका छोट्याशा मंदिरात आम्ही आजची रात्र घालवली. नर्मदा किनारी भोजन प्रसाद मिळत नाही असं होतच नाही. पुजाऱ्यांनी आमची छानच व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांनी आम्हाला आणिक एक रस्ता सांगितला. काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा एकदा एका चहा वाल्याची भेट झाली. आता आम्ही पुन्हा एका नवीन रस्त्यावर चालू लागलो. हा रस्ता म्हणजे गोटेगाव नर्सिंगपुर महामार्ग. हाच परिक्रमावासी मार्ग आहे इथून जा असे आम्हाला सांगण्यात आलं. मात्र मैया किनारी जाता येतं हे समजल्यावर आम्ही पुन्हा मार्ग बदलला. मात्र या मार्ग बदलण्याच्या आधी बिजोरी गावाच्या अलीकडे रजू पटेल शी झालेली भेट सांगणं महत्त्वाचं आहे.
या महामार्गावर चालत असताना एका छोट्याशा शेतातल्या एका छोट्याश्या झोपडीत आम्ही थोड्यावेळासाठी विसावलो होतो. तिथे असताना हे रजुजी पटेल आमच्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन आले होते. आम्ही झोपडी परिक्रमावासी साठी बांधून ठेवली आहे. इथे कोणी परिक्रमावासी आलेत आणि आम्ही शेतात काम करत असलो तर आम्हाला त्यांच्या सेवेचा लाभ मिळतो अशा नम्र भाषेत रजुजी आमच्याशी बोलत होते. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत हे समजल्यावर रज्जूजीं कडून एक वेगळीच विनंती ऐकायला मिळाली. “आप महाराष्ट्र से हो, मैने सुना है मराठी लोक कोई संस्कृत स्तोत्र रोज बोलते है, जो कोई कवच है, भगवान राम का श्लोक है, हम वो सीखना चाहते है. हमारे घर में आठ बच्चे बच्चिया है क्या आप वह श्लोक हमे सिखा सकते है? हमारी बडी बिटीया कुछ दिन जबल्पुर मे पढ रही थी, उसकी होस्टेल में एक महाराष्ट्रीयन बच्ची रोज यह श्लोक पढती थी.. उस बच्ची ने हमारी बिटिया को बताया के महाराष्ट्र में हर घर में रोज शाम को यह कवच पढा जाता है जिसका बहुत अनुभव मिलता है” यांच्या वर्णनावरून ते राम रक्षा बद्दल बोलत आहेत असा आम्ही अंदाज धरला, आणि तो खरा देखील ठरला. राम रक्षा शिकवण्यासाठी आपल्याला रजुजी घरी बोलवत आहेत आणि हे कार्य करायलाच हवं असा विचार करून आम्ही रज्जूजींच्या घरी गेलो. घरी जाताच तिथल्या बालगोपाल मंडळींनी आमच्या भोवती गराडा घातला. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी ईशा, आम्हाला त्या स्तोत्रा बद्दल विचारू लागली आणि, “मनोजवं मारुततुल्यवेगं”हा श्लोक म्हणून देखील दाखवला. आम्हाला राम रक्षा तोंडपाठ करावयाची आहे आणि ती तुम्ही आम्हाला लिहून द्या असा आग्रह केला.. भोजन प्रसादी झाल्यानंतर रात्री नऊ ते साडेबारापर्यंत ही मंडळी रामरक्षेचे श्लोक माझ्याकडून समजून घेत होती. एक श्लोक स्पष्ट उच्चारा सकट म्हटला गेला पाहिजे यावर या मंडळींचा जोर होता. त्यांनी माझ्या आवाजातली रामरक्षा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतली. आमच्याकडून राम रक्षा लिहून देखील घेतली. आणि गंमत म्हणजे पुढचे पंधरा ते वीस दिवस फोन करून जिथे जिथे अडचण येईल त्या अडचणी देखील या ईशाने दूर करून घेतल्या. मैया ने आमच्याकडून अशी सेवा करून घेतली.
पुढे नरसिंगपूर करेली करत करत आम्ही बरमान घाटला येऊन पोहोचलो. इथे आम्हाला एक हिमालयीन बाबा भेटले. या बाबांशी आमची ओळख झाली व त्यांच्याकडंन हिमालयातले काही किस्से ऐकायला मिळाले. या बाबांकडे 6-6 इंचाच्या कुठल्यातरी झाडाच्या छोट्या-छोट्या फांद्या होत्या. त्या औषधी तर होत्याच मात्र त्यांचे अजूनही काही फायदे आहेत ते सांगत होते. याच झाडांची सालं एका लाल कापडामध्ये बांधून तयार केलेले काही ताईत त्यांच्याकडे होते. हे ताईत बऱ्यात बांधल्यानंतर आलेली आणि त्यांचे त्यांनी आम्हाला सांगितले. मग मात्र मैया ने आमची परीक्षा देण्याचं ठरवलं आहे की काय असं वाटू लागलं..
आम्ही पुलापासून उतरून आता मैया किनारी लागलो होतो. तेव्हा एका ठिकाणी एका चहाच्या ठेल्यावर हे बाबा बसले होते. तिथेच त्यांच्याशी ओळख झाली नर्मदे हर झालं. बाबा सांगू लागले… त्यांच्याजवळ असलेल्या वनस्पतीची महिमा फार मोठी आहे असे ते म्हणाले. ही वनस्पती हुडकत ते वर्षातील काही महिने हिमालयात असतात. वनस्पती मिळाल्यावर ते वनस्पतीची रीतसर पूजा करतात. कुठल्या धातूने न कापता फक्त दगडांनी ही वनस्पती कापायची. मग हे छोटे तुकडे दूधात रात्रभर भिजत घालायचे. त्या भिजलेल्या वनस्पतींचे तुकडे आणि ते दूध यांनी शंकराला अभिषेक करायचा. अशी पूजा झाल्यानंतर बाबाजींना या वनस्पतींचे तुकडे कुणाला द्यायचे त्याचा आदेश येतो. दुधात भिजवलेल्या मुळे वनस्पतींच्या खोडाचे सालो निघतात ती सालं लाल कापडात बांधून ताईत तयार करण्यात येतात. ते ताईत सुद्धा कुणाकुणाला द्यायचे हे आदेश बाबांना येतात. त्याप्रमाणे इथे बाबा ती वनस्पती आणि ते ताईत पोहोचवण्याचं काम करतात असं बाबांनी सांगितलं. या वनस्पतीचे किंवा ताईतचे कुठलेही पैसे ते आकारत नाहीत. “मुझे बाकी कुछ नही समजता, मुझे बस अंदर से आवाज आती है, सामनेवाले के जरूरत का पता चलता है, और यह संकेत मिलता है कि उसे क्या देना है लकडी का टुकडा या गले मे बांधणे के लिए छिलटे”… असं म्हणत बाबाजींनी एक एक तुकडा मला काढून दिला. हा तुकडा फक्त स्वतःच्या पूजेच्या साहित्यामध्ये ठेवायचा आणि शक्यतोवर त्याला कधीही कुणाला दिसू द्यायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं. मला खरं तर तो तुकडा अजिबात नको होता, पण का कोण जाणे मला नाही म्हणताच आलं नाही. मी तो तुकडा माझ्या हातात धरून ठेवला. तो एका वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेला होता. तो तुकडा मी घेतला खरं पण माझं मन काही धजेना. नक्की कारण सांगता येणार नाही पण फार विचित्र अवस्था मनाची झाली होती. मला माझे गुरु आणि माझी मैया सगळं काही व्यवस्थित देत असतात. माझ्यासाठी जे गरजेचं आहे ते माझ्यापर्यंत बरोबर येऊन पोहोचतं. मग मला या वनस्पतीची काय गरज? माझं मग मला सारखं हेच सांगत होतं, तर दुसरीकडे “हे देखील मैया नेच पाठवलेलं आहे ना व याला मी कसं नाकारू “असाही विचार मनात येत होता. आणि याच विचाराच्या घात त्यांनी ती गुंडाळी माझ्या हाती दिली आणि मी ती हातात ठेवली पण बॅगमध्ये ठेवण्याची माझी इच्छाच होईना!
बाबाजी शी हिमालयातल्या ब-याच गप्पा झाल्यात. थोड्यावेळाने त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. पण माझे पाय पुढे बांधून ठेवले ती काय इतके जड होऊ लागले. म्हणजे फिजिकली नाही, पण पुढे जाण्याची इच्छा होत नव्हती. ती हातातली पुंगळी मला तिथून निघू देत नव्हती. ती वनस्पती मी फेकत हि नव्हते आणि ठेवत ही नव्हते. मी ठरवलं ही वनस्पती त्या बाबाजींना परत करायची. मी पुन्हा मागे वळले पण बाबाजी निघून गेले होते. आता माझ्यावर खूप मोठं दडपण असल्याचं मला जाणवत होतं. हे ओझं नक्की कशाचं हे समजत नव्हतं पण खूप खूप भार होता कसलासा. बाजूने वाहथ असणाऱ्या मैया कडे मी बघितलं, आणि त्या क्षणी माझी पावलं तिच्या पात्राच्या दिशेने चालू लागली. तिथेच तिच्या निर्मल जळाला मी स्पर्श केला आणि हातातली पुंगळी तिच्या पाण्यात सोडून दिली.
“माई गं ओढून ताणून आणलेलं कुठलंही सुख मला नको. कुण्या दुसऱ्याच्या तिस-याच्या वाट्याचं मला काहीही नकोच! आणि माझ्या नशिबात लिहिलेल्या वेळेच्या आधी मुद्दामून घडवून आणलेलं सुख सुद्धा मला नको.. माझ्यासाठी जे काय योग्य असेल ते तू माझ्या पदरात घालतेच आहेस यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कदाचित ही वनस्पती मला मिळावी हा तुझा संकेत असेलही, पण माझ्या अज्ञान मनाला तशी खात्री होत नाहीये, तू जसा आतून आवाज देतेस तसं ह्या वेळेला मला जाणवलच नाहीये, आणि म्हणून ही वनस्पती तुलाच अर्पण..ही वनस्पती तुला अर्पण केल्यानंतरही जर पुन्हा ती पुन्हा माझ्याकडे आलीच तर तुझा आशिर्वाद म्हणून मी त्याचा स्वीकार नक्कीच करेन, पण या क्षणाला माझं मन मला ही वनस्पती माझ्याजवळ ठेवायला अगदी स्पष्ट नकार देतंय, म्हणून की तुझ्याकडेच सोपवते”
माझ्या मनावरचं ओझं त्या वनस्पतीच्या छोट्याशा तुकड्या सोबत मैया च्या पात्रात दूर दूर वाहून गेलं. आता माझं मन खूप शांत झालं होतं. आम्ही अंडीया घाटाच्या दिशेने पुढे निघालो. हा रस्ता टेकडीवरून जातो. छोटुशी पाऊलवाट. दोन बाजूला कमरे इतकी वाढलेली झाडी,या टेकडीच्या खाली थोड्या अंतरावर वाहणारी, झाडीतून अधून मधून डोकावून पाहणारी नर्मदामैया! खूप छान आणि खूप हलकं वाटत होतं चालताना… पुढे लिंगा घाटावर देखील एका बाबाजींची भेट झाली. या बाबाजींची भेट म्हणजे आश्चर्याचे मारे करणारा एक वेगळाच अनुभव. आपल्या कानांवर आपला विश्वास बसू नये, की आपले डोळे आपल्याला अगदी वेगळं वेगळं सांगता येत कानां पेक्षा, की आपल्या बुद्धीने जे आपलं केलंय तेच खोटं? की आपल्या पात्रतेची पातळी आपल्याला समजते हेच मला समजेना…सांगणारे लिंगा घाटाच्या बंगाली बाबांचा अनुभव पण पुढच्या भागात तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९०
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला हिमालयीन बाबांच्या भेटीबद्दल सांगितलं होतं. त्यांनी दिलेल्या छोट्या वनस्पतीच्या तुकड्या नंतर माझ्या मनाची बेचैन अवस्था देखील तुम्हाला सांगितली होती. त्यातून मैया ने केलेली सुटका देखील तुम्हाला सांगितली. आता पुढे जाऊयात.
पुढे आंडिया घाट, लिंगा घाट असा जाणारा हा रस्ता एका छोट्याशा टेकडीवरून जातो. सध्या मैया ला भरपूर पाणी नव्हतं मात्र पावसाळ्यात ह्या टेकड्या म्हणजेच नदीचा किनारा झालेला असतो इतकी त्याची पातळी वाढते. करत करत आम्ही लिंगा घाटाला पोहचलो. आम्हाला इथे पोहोचेस्तोवर संध्याकाळचे पाच वाजले होते. सामान ठेवून आधी स्नान व पूजा पाठ करावयाचे होते सूर्यास्ताच्या आधी. इथला आश्रम म्हणजे एक छोटासा हॉल. बाजूला एक मंदिर आणि बाहेर खूप मोठं अंगण. इथून दोनशे-अडीचशे फुटावर खाली मैया वाहतेय. आश्रमापासून तर मैया पर्यंत छोट्या-छोट्या पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. याच घाटावर थोडं पुढे गेल्यानंतर एक छोटसं टुमदार घर आणि त्याच्याच अंगणात असलेलं मंदिर लागतं. या मंदिरात एक म्हातारे से बाबा भागवत वाचत असतात. इथे अखंड भागवताचा नेम आहे. चोवीस तासांपैकी पंधरा-सोळा तास हे म्हातारे बाबा भागवत वाचतात आणि इतर वेळेला कुणातरी कडे थोड्यावेळासाठी हे वाचन सोपवण्यात येतं. माइक वर ही भागवत कथा सुरु असते. एरवी माइक वर कथा, भजन ऐकताना कर्णकर्कश्य आवाजाचा वीट येतो मात्र ह्या बाबांचा आवाज फारच मधुर होता. आम्ही सामान आश्रमातच ठेवून लगबगीने मैया वर गेलो. हा घाट उतरताना मध्ये सिमेंटच्या पायर्या आणि दोन्ही बाजूला हिरवीकंच शेतं होती. मैयावर स्नान करतेवेळी तिच्या पाण्यात सूर्यप्रकाशामुळे चमचमणाऱ्या लाटा असंख्य दिवे लावल्या सारख्या दिसत होत्या. मैया ची आरती करताना ह्या लाटा जणू “कोटी रतन ज्योती” प्रमाणे भासत होत्या. मैया च्या आरती मध्ये ह्या रत्नांच्या ज्योतींचा उल्लेख आहे तो असा.
मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूर बाती, अमरकंठ में विराजत, घाट अन् घाट पूजावत, कोटी रतन ज्योती!
आमचं स्नान पूजा करून झालं मात्र आता सूर्य अगदीच अस्ताला आला होता. बाबाजींच्या भागवत कथेचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत होता. आजच्या कथेमध्ये सत्यभामे चा अहंकार कसा दूर झाला याबद्दल महाराज सांगत होते. नारदांनी सत्यभामेला चिथवलं याचं वर्णन, कृष्णाचं वर्णन, तुले चे वर्णन, आणि शेवटी वृंदा पत्र आणि तुलसी महात्म्य इतकं छान रंगवून, गाऊन सांगितलं की जणू हे सगळे दृश्य आमच्या पुढे तिथेच नर्मदा किनाऱ्यावर घडतायेत की काय असं वाटू लागलं. कथा ऐकता ऐकता वेळ कसा गेला समजलेच नाही. आता छान अंधार पडला होता. तरीही चांदणं आणि चंद्राचा उजेड बऱ्यापैकी जाणवत होता. आम्ही आश्रमात परतलो.
आम्ही आश्रमात आलो होतो त्या वेळेला मळकट कपडे घातलेले एक बाबाजी अंगणात असलेल्या झाडाच्या पारावर बसले होते. लिंगा घाटला आल्या आल्या आम्ही सामान कुठे ठेवावं म्हणजेच आसन कुठे लावावं व याबद्दल या महाराजांकडे विचारपूस केली असता “आ गये, क्यू आये, चलेजाव, हटो, भागो, अशी काहीशी असंबद्ध बडबड ह्या बाबांनी केली, त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य कदाचित ठीक नसेल असे वाटून आम्ही यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र ती आमची मोठी चूक होती हे नंतर लक्षात आलं!
हॉल मध्येच एका कोपऱ्यात आम्ही आसन लावलं. थोड्यावेळाने गावातील दोन मुलं आमच्या चौकशीसाठी आलीत. इथे गावकऱ्यांनी परिक्रमावासी यांची सोय वाटून घेतलेली आहे. रोज एका घरातून भोजन प्रसादी तयार करून परिक्रमावासीं साठी ही मंडळी घेऊन येतात. अशी तीस कुटुंब तयार आहेत. या नियमाप्रमाणे आज आमच्यासाठी देवेन भाई भोजन प्रसादी घेऊन येणार होते. आमची विचारपूस केल्या नंतर त्यांनी आम्हाला या बाबाजी बद्दल सांगितलं. म्हणाले “आपको देखकर चिल्लाये नही क्या स्वामीजी? दिखने मे सबको पागल जैसे लगते है, कोई ध्यान नही देता उनकी तरफ, लेकिन आप अगर चाहो तो उनकी बाते सुन सकते हो. अगर आपके भाग्य मे होगा तो उनकी दिव्यता का प्रणाम मिलेगा नही तो आपको भी वो पागल ही लगेंगे… बहुतसे परिक्रमावासी उन्हे पागल समज उनके तरफ ध्यान नही देते.. उन्हे भी कोई फरक नही पडता.. यह तो जिसको समजता है उसका भाग्य.. लेकिन इसके लिये पेशंन्स की जरुरत है.. और गॅरंटी कोई नही! अगर थके हो तो सो जावो कोई बात नही.”
खरंतर उगाचच कुठल्या गोष्टीची परीक्षा पाहणं मला पटत नव्हतं. त्यातूनही एखाद्या संत महात्म्याला पडताळून पाहणं योग्य वाटत नव्हतं. ते महाराज दिव्य असतील किंवा नसतीलही कदाचित, पण हे पडताळण्याचा मला अधिकार आहे का? असे विचार माझ्या मनात राहून राहून येत होते. माझं आणि बाबाचं यावर दुमत होतं. बाबाचा दृष्टिकोन वेगळा होता. “अगं बोलता-बोलता कदाचित आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल, बोलून बघायला काय हरकत आहे?”असं बाबाचं मत होतं मात्र मुद्दाम जाणून-बुजून परीक्षा बघायची हे माझ्या मनाला पटत नव्हतं. मी साफ नकार दिला. बाबा मात्र महाराजांशी बोलायला त्यांच्या समोर जाऊन बसला. बाबांनी त्यांना नर्मदे हरं केलं.. महाराजांनी बाबाकडे साफ दुर्लक्ष केलं. बाबा चे प्रयत्न चालूच होते. आम्ही थकलो आहोत, भागवतकार बाबा कोण आहेत, इथल्या जागेबद्दल आम्हाला काहीतरी सांगा, असे अनेक प्रश्न बाबानी विचारले मात्र या महाराजांच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलली नाही. आता बाबा उठून परत हॉल मध्ये येणार येवढ्यात लहान मूल रुसुन पाठ फिरवतो तसे महाराज बाबाकडे पाठ फिरवून काहीतरी बडबडले. बाबाने विचारल्यावर म्हणाले “भोजन आगया भोजन आगया”.
थोड्याच वेळात देवेन भाई भोजन प्रसादी घेऊन आले. घडलेला किस्सा सांगितल्यावर “आपके भाग्य मे नही है जाने दो” असं म्हणून डबा घेऊन परत निघून गेले. अजून डोळा लागायला वेळ होता. हॉल समोरच्या पायरीवर मी थोडावेळ जाऊन बसले. महाराज अजूनही झाडाच्या पारावरच बसले होते. बाबा तिथेच शतपावली घालत होता. ते महाराज एकदम बडबडू लागले, माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले “तू यहा क्यू आई है? तुझे तो आगे जाना है, किस्मत तेरा इंतजार कर रही है! तूने मेरा खाना खाया? मेरा पानी पीया तुने? अब वो तुझे बुलायेगी… मे पागल हू, तू पागल है, तू सब भूल जाती है,” असं काहीतरी असंबद्ध बडबडू लागले… मला खरंतर काही समजत नव्हतं. मी पडताळूननही पहात नव्हते. माझ्या कानावर त्यांची काही वाक्य पडत होती एवढंच.
थोडा वेळ शांत राहून बाबा पुन्हा बडबडू लागले. अर्थात बाबांनी खूप खूप वाक्य बोलली. त्यातली सगळीच माझ्या लक्षात राहिली असं नाही. मात्र जी लक्षात राहिली ती कशी लक्षात राहिली हा ही एक विलक्षण अनुभव आहे. मात्र आधी कुठली वाक्य माझ्या लक्षात राहिली ते मी तुम्हाला सांगते. हे बाबा मध्ये मध्ये बंगाली भाषेमध्ये काहीतरी बोलत होते. मधेच हिंदीमध्ये बोलायचे पण त्यांच्या हिंदीवर बंगाली भाषेचा प्रभाव होता. बोलता-बोलता मध्येच ते एखादं हिंदी वाक्य बोलायचे. त्यातलं एक वाक्य असं होतं “सबकुछ देख, सबकुछ सुन, सब कुछ याद कर, और चली जा”… मग पुन्हा काहीतरी असंबद्ध बडबड आणि नंतर एखाद्याची गंमत केल्यानंतर आपण जसं हसतो तसं हे महाराज हसायला लागले आणि म्हणाले “अभी तो जाओगे लेकिन जाओगे कहा, लौटके तो आनाही पडेगा”. खरंतर त्या महाराजांच्या अशा असंबंधित बडबडीचा अर्थ लावणं हे सोपंही नव्हतं आणि असा काहीही विचार मी केलाही नव्हता. मात्र तो उलगडा मला हळू हळू आणि नंतर झाला. आता जवळजवळ साडे अकरा बारा झाले होते. थोडीफार झोपही येऊ लागली होती. आता मी महाराजांना नमस्कार करून आसनाकडे जाणार होती.
मी महाराजांना नमस्कार करायला गेली तसं महाराजांनी मला हकलूनच लावलं.. “ए चल जा, चल हट, दुर जा, भाग यहा से, जा सो जा” असं इतक्या रागात आणि जोराने ओरडून बोलले की थोडंसं वाईटच वाटलं मला. कुत्र्या मांजराला हाड हाड करावं तसा फील आला. मला दूर गेलेलं पाहून बाबा पुन्हा बंगालीमध्ये काहीतरी 5-7 वाक्य बडबडले. त्यानंतर मला एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं ते असं “सोयेगा तो जागेगा… जागेगा तो भागेगा… भागेगा तो पायेगा.. पायेगा तो सोएगा…”असं काहीतरी ते वारंवार बोलत होते. आता मात्र मी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. मी आडवी झाले आणि मला चटकन झोप देखील लागली.
सकाळी उठले तो महाराज आमच्याच हॉलमधल्या एका भिंतीला टेकून बसलेले होते. ते कधी झोपले, कुठे झोपले, झोपले की नाही, हे मला माहीत नाही. त्यांच्या चेहर्यावर अजिबात थकवा नव्हता उलट डोळे बंद असले तरी कालच्या पेक्षा त्यांचा चेहरा सोज्वळ आणि हसरा दिसत होता. ते झोपलेले नाहीयेत हे स्पष्ट समजत होतं. पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी मैयावर स्नानासाठी गेले. मैयात स्नान करत असताना डोळे बंद करून उभे होते त्यावेळी अंगातून विजेचे लोळ बाहेर पडल्यासारखं झालं आणि काही चित्र स्पष्ट दिसू लागलीत. अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला. आतापर्यंत बेभान असलेला जीव भानावर आला की कसं होतं तसं काहीसं झालं. डोकं सुन्न झालं.. मन खूप मागे मागे फिरू लागलं… पण असं नक्की काय झालं आणि का हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९१
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला लिंगा घाटाचा अनुभव सांगितला होता. इथे एक बंगाली बाबा आम्हाला भेटले होते. ते सतत काहीतरी बडबडायचे. कधी बंगालीत. कधी हिंदीत आणि बर्यापैकी असंबद्ध रित्या त्यांची बडबड चालू असायची. त्यांनी बोललेली काही वाक्य मी तुम्हाला सांगितली होती. रात्रीला काहीवेळ मी बाहेर बसले असताना हे बाबा असंच काहीबाही बोलत होते तेव्हा ही वाक्य ऐकली होती. त्याचं त्यावेळेला मला काही विशेष असं वाटलं नव्हतं. इथवर आपलं बोलणं झालं होतं आता इथून पुढे सांगते.
सकाळी आम्ही उठलो तेव्हा महाराज आमच्याच हॉलमध्ये एका भिंतीला टेकून बसले होते. त्यांचा चेहरा कालपेक्षा जास्त सोज्वळ दिसत होता. डोळे बंद होते पण ते झोपले नव्हतेच. आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मैयावर स्नानाला गेलो. स्नान करत असताना मी डोळे बंद करून उभे होते त्यावेळी अंगातून विजेचे लोळ बाहेर पडल्यासारखं झालं. आणि काही चित्र स्पष्ट दिसू लागली. अगदी संपूर्ण परिक्रमा किंवा त्याही अजून आधीचं आयुष्य चित्रपट सरकावा डोळ्यासमोरून तसं सरकू लागलं. त्यावेळी सगळं सगळं आठवलं. अगदी माझ्या बालपणापासून चे काही प्रसंग आण आता मैया मधे स्नान करत असण्याच्या आधी पर्यंत चे क्षण. मग त्यात मला धडा शिकवणारा अंकित आठवला, राम को मत छोडना सांगणारे संन्यासी आठवले, भालोदचे प्रतापे महाराज आठवले, महेश्वर चे महाराज आठवले… अगदी काही क्षणात सगळं सगळं आठवलं तेव्हा मला. हे आत्ताच का आठवलं त्याचं प्रयोजन काही समजलं नाही. सगळ्यात शेवटी डोळ्यासमोर आली ती या इथल्या बाबांची वाक्य…
“आ गये? क्यू आये? चले जाव, हटो भागो!तू यहा क्यू आई है ? तुझे तो आगे जाना है! किस्मत तेरा इंतजार कर रही है! तूने मेरा खाना खाया? मेरा पानी पिया तूने? अब तुझे वो बुलायेगी. मै पागल हू. तू पागल है. तू सब भूल जाती है. सब कुछ देख, सब कुछ सुन, सब कुछ याद कर, और चली जा. सोएगा तो जागेगा, जागेगा तो भागेगा, भागेगा तो पायेगा, पायेगा तो सोयेगा”, अशी बाबांची वाक्य होतीत. आणि गंमत म्हणजे ही सगळी वाक्य एका पाठोपाठ एक मला आठवत गेलीत. या वाक्यांच्या आधीपर्यंत आयुष्य देखील सरसरसर आठवलं.. पण अजूनही या वाक्यांचा नक्की अर्थ काय? यातून काही संकेत मिळतो आहे का? याचा उलगडा मला झाला नव्हता. किंबहुना तसा विचार देखील माझ्या मनात आला नव्हता.
स्नानादि झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेस आश्रमात परत आलो तेव्हा हे महाराज तिथे नव्हते. आम्हीदेखील आमचं सामान घेऊन पुढे निघालो.हा रस्ता कुठे अगदी किनार्यावरून होता तर कुठे थोडंसं वर चढून टेकड्यावर जायचं असा रस्ता होता. मैया सततच समोर दिसत असायची. असंच पुढे जात असतांना समोर थोड्या अंतरावर एक छोटी टेकडी दिसली. या टेकडीवर एक खूप मोठं वडाच झाड दिसत होतं. डेरेदार झाड, जाड पारंब्या, गोलाकार, घुमटाकार आकारात पसरलेलं. टेकडीवर छोटसं पठार असावं, त्यावर हे झाड. एखाद दुसरं घरही तिथे दिसत होतं. मुख्य म्हणजे या वडाच्या झाडाखाली किंवा आजूबाजूला काहीतरी विलक्षण आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे असा विचार मनात येत होता. हळूहळू हा विचार खूप तीव्र झाला आणि काहीही असो ते वडाचं झाड आपल्याला बघायचं आहे असं वाटू लागलं. त्या वडाच्या झाडा बद्दल एक प्रकारची ओढ निर्माण झाली. फार तर फार काय होईल पुढे जायला थोडा उशीर होईल किंवा कदाचित आज तिथेच थांबायला लागेल. घाई कुणाला आहे? त्या वडाच्या झाडापाशी जायचं ठरलं. अर्थात पुढे गेल्यावर रस्ता ही तसाच होता हे महत्त्वाचं. आडवाट करून जायला लागलं नाही.
आम्ही गेलो त्या वेळी हलकीशी शिळाण आली होती. वातावरण प्रसन्न होतं. जसजसं आम्ही टेकडी चढत होतो तसं तसं अधिकच ओढ वाढल्या सारखं जाणवू लागलं. आम्ही टेकडी चढून वडाच्या झाडाखाली गेलो. पारंब्यांच्या जाळीमधून आत मध्ये जाताना एखाद्या घराला तारेचं कंपाऊंड असावं अशा काहीशा या पारंब्या पसरल्या होत्या. खूप मोठा परिसर असेल या झाडाचा. आम्ही झाडाखाली बसलो. मैया दिसत होतीच. इथे आल्यावर सगळा थकवाच गेला. डोळे बंद करून मन लावून जप करावासा वाटू लागला. जप करता करता डोळ्यासमोर एक सोनेरी रंगाचं वर्तुळ हळूहळू फिरतय असा भास झाला. सकाळी स्नान करताना आलेल्या आठवणी या परिघाच्या आत वर्तुळाकार फिरताना दिसू लागल्या. म्हणजे आतमध्ये आठवणींचं वर्तुळ आणि त्याबाहेर हे सोनेरी वर्तुळ, असं काहीसं चित्र होतं. पुढे या वर्तुळाचा वेग कमी होत गेला आणि आठवणी पुसट झाल्या मात्र त्यांच्या जागेवर सोनेरी ठिपके येऊ लागले. या पुढचं फार काही आठवत नाही मात्र थोड्याच वेळात कुणीतरी आवाज दिला. डोळे उघडले तो एक सत्तरी पंच्याहत्तरीच्या आजी समोर उभ्या होत्या.
“चलो माताजी मंदिर मे चलो” या परिसरात अनेक झाडं होती. हे वडाचे झाड अगदी मध्यभागी. झाडाच्या मागच्या बाजूला थोडं दूर एक छोटसं मारुतीचं मंदिर. जेमतेम दोघं-तिघं लोक बसू शकतील एवढंच. तिथे बसल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या.आम्ही आलोय हे आजींना कुणीतरी सांगितलं तेव्हाच आजींनी आमच्यासाठी चहा मागवला होता.आणि गरमागरम चहाचे झुरके घेत आजींशी बोलत होतो. “खूप पवित्र झाड आहे हे, तरी दोनशे वर्ष जुनं असेल, या झाडाखाली पूर्वी कोणी साधु महाराज तपस्या करायचेत” असं आजींनी सांगितलं. देवळातली मारुतीची मूर्ती या झाडाखालीच सापडली. अनेक वर्ष झाडाखालीच होती मग गावकऱ्यांनी मंदिर बांधून तिची प्राणप्रतिष्ठा केली असंही आजींनी सांगितलं. या झाडाखाली एक वेगळीच शांतता जाणवते. असं म्हणतात की जे साधू या झाडाखाली तपश्चर्या करत बसले होते त्यांच्या मागच्या जन्माची पापं त्यांना मानसिकरीत्या छळत असल्याने ते शांतता शोधत शोधत इथे आले. इथे बसून त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांच्या मागील जन्माच्या पापांच खंडन झालं. काही मानसिक ताण असेल तर तो या झाडाखाली बसल्यानंतर दूर होतो असा अनुभव आहे. नक्की कारण माहीत नाही पण ही जागाच खूप पवित्र आहे असं आजी म्हणाल्या. अर्थात त्या पवित्र पणाची कंपने देखील मला जाणवली.
पुढे बोलता बोलता मैया किनारी तपश्चर्या करणार्या मात्र अनेकांना माहीत नसणाऱ्या संतांचा विषय निघाला. आजींच्या माहितीत असलेल्या दोन-तीन संतांबद्दल आजींना सांगितलं. काही मौन संतांबद्दल ही त्या बोलल्या. आजी म्हणाल्या ” संतांच्या शब्दांना फार महत्त्व असतं. बरेचदा ते आपल्याला कळत नाही. कधी कधी तर हे शब्द आपल्यासाठी नाहीतच असं आपल्याला वाटतं पण तसं नसतं. या शब्दातून कधी संकेत मिळतात तर कधी मार्ग. आपण मात्र त्याचं चिंतन करत राहावं. चिंतन सोडता कामा नये.
आजी बोलत होत्या तसं माझ्या मनात लींगा घाट ला भेटलेल्या बंगाली बाबांचे शब्द फिरत होते. मी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं आणि पुन्हा एकदा ते शब्द मला मैया मध्ये स्नान करताना आठवले होते यात काहीतरी नक्कीच असलं पाहिजे असा माझा विचार होऊ लागला. शिवाय झाडाखाली जप करत बसले असताना त्या सगळ्या आठवणी वर्तुळाकार फेर धरून नाचताना मला दिसल्या. पुढे त्या पुसट होऊन चक्राचा सोनेरी रंग घेऊन त्या ठिकाणी फक्त एक ठिपका तयार झाला आहे असा भास झाला. आज इथून पुढे जायची इच्छाच होईना. आम्ही आज इथेच मुक्काम करायचं ठरवलं. संध्याकाळी मैयावर स्नान आरती झाली. आम्ही पुन्हा वर आलो आणि वडाच्या झाडाच्या थोडं पलीकडे जिथून मैया स्पष्ट दिसत होती तिथे शांतपणे मैया कडे बघत बसलो.
इथे खूप शांतता होती. मैया च्या पाण्यात संध्याकाळचे जांभळट केशरी रंग उठून दिसत होते. सोनेरी किनार असलेल्या छोट्या छोट्या लहरी दिसत होत्या. तो सोनेरी रंग माझ्या खूपच ओळखीचा रंग होता. या लहरींकडे बघता-बघता सोनेरी वर्तुळात फेर धरणाऱ्या आठवणी माझ्या पुन्हा डोळ्यासमोर आल्या. आता काही शब्द माझ्या आत फिरत होते ते असे.
ही परिक्रमा म्हणजे एक वर्तुळ आहे. एका बिंदू होऊन सुरू करून आपल्याला पुन्हा त्याच बिंदूवर परतायाचं आहे. तसंच हे आयुष्य एका बिंदूपासून सुरू होणार आणि पुन्हा त्या बिंदूपाशी जाऊन संपणार. ह्या आठवणी हे आयुष्याचं प्रतीक. ही सोनेरी छटा म्हणजे आयुष्यात आलेलं सुवर्ण भाग्य . या आठवणींना म्हणजेच आयुष्याचं प्रतीक असलेल्या या क्षणांना हळूहळू एका सोनेरी ठीपक्यात परावर्तित करणं म्हणजेच तर ही परिक्रमा नाही? आता मला बंगाली बाबांचे शब्द आठवू लागले “सोएगा तो जागेगा, जागेगा तो भागेगा, भागेगा तो पायेगा, पायेगा तो सोयेगा,”खरंच या वाक्यातून एक वर्तुळच तर दिसतं आहे!
“मै पागल हू. तू पागल है तू सब भूल जाती है. सब कुछ देख, सब कुछ सुन, सब कुछ याद कर, और चली जा.” या सगळ्या आठवणींचा या सगळ्या अनुभवांचा, या सगळ्या क्षणांचा तुला विसर पडला आहे. तू कुठल्या तरी अनुभवात, प्रश्नात, आकर्षणात, कुठेतरी रमलेली असल्यामुळे तू सगळं विसरते आहेस तसं न करता त्यांची आठवण ठेवून मगच पुढे जात रहा हा असं तर या शब्दातून सांगायचं नसेल त्यांना?
“किस्मत तेरा इंतजार कर रही है तुझे तो आगे जाना है… ” कदाचित अशा पद्धतीने पुढे जात गेली तर भाग्य माझे वाट बघत असेल असं तर काही बाबांना सुचवायचं नसेल? हे सगळे विचार ज्या वेळेला मनात येत होते त्या वेळेला ते एक प्रवाहीपणे, अस्खलितपणे येत राहिले. आता हा सगळा माझ्या मनाचा खेळ होता की खरच बाबांना असं काही सुचवायचं होतं हे मला माहीत नाही. या पद्धतीचे जगणं, निघून गेलेल्या क्षणांना भाग्यात परावर्तित करणं म्हणजेच तर पापांच खंडन होणं नसेल? असेल कदाचित पण मला झालेलं आकलन एवढंच.
सकाळी स्नानादी लवकर आटोपून पुढच्या प्रवासाला निघालो. शोकलपूरच्या अलीकडे एक मजेशीर अनुभव आला. एक मैया जी भेटल्यात आम्हाला… आणि त्यांनी आमचाच एक किस्सा मला सांगितला… खरंतर तसं झालंच नव्हतं पण मैया जी काही ऐकायला तयार नाही. असं काय झालं होतं? पुढच्या भागात सांगते
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला लिंगा घाटच्या बाबां बद्दल सांगितलं होतं. भटेरा च्या मोठ्या वटवृक्षा बद्दल सांगितलं होतं. आता पुढे जाऊयात.
भटेरा पासून पुढे काही अंतर रस्ता किनाऱ्यावरूनच होता. मात्र पुढे किंचीत उंचावर रस्ता होता. या रस्त्यावर बऱ्याच पाऊलवाटा होत्या. टेकडीच्या उतारावर असावा तसा हा काहीसा भाग, पण टेकडी म्हणावी इतका मोठा उंचवटा हा नव्हता. पाऊलवाट मात्र अगदी छोटी. थोडक्यात सांगायचं तर पायऱ्या पायऱ्या असाव्यात अशाप्रकारे दिसायचा तो भाग.
भटेराच्या टेकडीवरून मात्र आम्ही खाली उतरलो होतो. रमत-गमत या पाऊल वाटांवर आमची वाटचाल पुढे सुरू होती. इथली शांतता कमालीची. ती अनुभवावी, प्यावी की ऐकावी हेच कळेना. मी आणि बाबा एकही अक्षर बोलत नव्हतो. एक पाऊल पुढे टाकलं की दुसरं पुन्हा उचलायचं आणि पुढे टाकायचं इतकं फक्त माहीत आम्हाला. आपल्या मनात कुठलाच विचार येत नाही असं सहसा होत नाही. काही ना काही विचार सातत्याने मनात सुरु असतात. यावेळी मात्र मी कम्प्लिट सरेंडर मोडमध्ये होते. मनात विचार येत नसतील असं नाही पण आठवण्यासारखे काहीही नाही. सगळीकडे खूप आसुसल्या सारखं बघत होते निश्चितपणे. साठवून ठेवत होते ती दृश्य, ती शांतता, ती प्रसन्नता.. खरंच तिचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत… तुम्हाला अंदाज आहे या दुनियेचा! असो.
साधारण तीन -सव्वातीन वाजले असतील. इथेच एक वॉटर प्युरिफिकेशन प्लांट सारखं काही तरी दिसलं. मला वाटतं काजूनगर ते शोकलपूरच्या मधला भाग असावा हा. सिमेंटच्या तिरप्या तिरप्या भिंती बांधल्या होत्यात. वर पाण्याच्या टाक्या दिसत होत्या. आजूबाजूला छान झाडं लावलेली दिसत होती. सुरुवातीला वाटलं इथे वर एखादा आश्रम ही असावा.नाहीतर निदान जवळपासच्या आश्रमांची चौकशी तरी नक्की करता येईल म्हणून आम्ही त्या प्लांटचं दार शोधायला वरच्या बाजूनी चढलो. या प्रकल्पाला मोठं कंपाउंड होतं जाळीच्या भिंतीच! हा प्रकल्प बराच मोठा.. आम्ही भिंतीच्या बाजूबाजूने फाटक शोधत वर वर चढत होतो. शेवटी एकदाचं फाटक दिसलं आम्ही जिथे होतो त्याच्या बरंच वर आणि एक्झॅक्टली अपोझिट बाजूला.. जाऊदे गेट तर सापडलं. आम्ही नर्मदे हर हर, नर्मदे हर, म्हणून आवाज दिला. कुणीही येईना बाहेर. पंधरा-वीस मिनिटं वाट पाहिली, आता पुन्हा खाली उतरून पुढे जायचं ठरवलं. त्या प्लांटला एक प्रदक्षिणा झाली आमची करून… आणि आता आम्ही पुन्हा मैयाकडे उतरत होतो तेवढ्यात काळी सावळी, किंचित स्थूल असलेली, एक बाई आणि तिचा नवरा असे दोघं समोरून येताना दिसली. नर्मदे हर झालं. हे प्लांट बंद असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि पुढे अनेक आश्रम आहेत असेही सांगितलं. पण नंतर ती जे बोलली जरा वेगळंच होतं.. तिची समजूत काढली तरी ती ऐकायला तयारच नाही… सांगते.
तिचं पहिलंच वाक्य असं होतं, “अरे वा मैया जी इस साल फिर से निकल गये परिक्रमा करने?” मी म्हटलं नाही आमची पहिलीच परिक्रमा आहे, तर म्हणते “मैया जी अच्छा मजाक कर लेते हो, अब बताओ घर मे सब कैसे है?, बाबा कडे पाहून म्हणते, “दादाजी आपका पैर ठीक है ना?” तिचा बहुतेक गैरसमज झाला असावा, आम्हाला ती कोणीतरी दुसरेच समजत होती बहुधा. आम्ही तिला पुन्हा सांगितलं.. आमची पहिली परिक्रमा आहे तर म्हणाली.. “हमारे घर मे दो दिन रुके थे आप दोनो.. हमको भूल गये क्या माताजी? मैं याद दिलाती हूं देखना…असं म्हणत तिने एक-दोन आठवणी सांगितल्या तिच्या.. पण खरंच आमची पहिली परिक्रमा असल्यामुळे ते आम्ही नव्हतोच हे मला माहीत आहे. पण ही ऐकायला तयारच नाही.. आम्हाला ती आठवत नाही ऐकून अगदी रडवेली होऊन गेली. शेवटी बाबानी तिच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणाला “मेरे लिये तो तुम बेटी जैसी होना? यकीन मानो बेटा जो तुम्हारे यहा आये थे वो हम नही थे, वो लोग तुम्हे जरुर याद करते होंगे और इसके बाद हम भी तुम्ही याद ही रखेंगे. बुरा मत मानो बेटा, तुम लोगो की सेवा से ही हमारी परिक्रमा होती है. तुम तो हमारे लिये मैया हो” .. हे ऐकून तिला रडायला आलं, ती म्हणाली, “बहुत खुशी होती है परिक्रमावासीयोंकी सेवा करके.. मेरा घर तो पीछे टूट गया, यहा किसी से मिलने आये थे हम लोग, नही तो आपको घर ले करही जाते…” तिनेच पुढे आम्हाला शोकलपूर आश्रमा बद्दल सांगितलं. तिचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.
पुढे एका ठिकाणी छोटासा घाट असल्याचं दिसलं. जवळपास आश्रम दिसला नाही, एक नावाडी दिसला त्याने सांगितलं आश्रम गावात आहे. हा मैयाकिनारा सोडायची इच्छा होत नव्हती, वेळही होता अजून थोडा आम्हाला म्हणून पुढे जायचं ठरवलं. काहीच पावलं पुढे गेलो तो एक परिक्रमावासी माणूस एका दगडावर बसलेला दिसला. नर्मदे हर झालं. आम्ही कोण कुठून अशी चौकशी करू लागला. नंतर त्याचा रोख माझ्याकडे वळला. इतक्या कमी वयात परिक्रमा कशी काय करता आहात असं त्याने विचारलं. खरंतर माझं वय इतकं काही कमी दिसत नाही मात्र त्या कालावधीत माझं वजन फार कमी झालं होतं म्हणून असेल! मी कॉलेज गोइंग आहे असं वाटलं त्याला. घरून पळून आलीस का परिक्रमेत? घरी भांडून आलीस का? असं करू नको घरी परत जा, तुझे आई-वडील तुला शोधत असतील.. लग्नाचा आग्रह करता येत का तुला? असं काहीबाही विचारू लागला. माझं लग्न झालंय मला अठरा वर्षाचा मुलगा आहे हे त्याला पटतच नव्हतं… तू खोटं बोलतेस म्हणाला… असो बाबा…. काय वाद घालणार? तो आता उगाच पर्सनल गोष्टींची चर्चा करतोय हे पाहून मी आणि बाबा नर्मदे हर करून पुढे निघालो. हे सांगण्याचं कारण असं की पुढे म्हणजे तुनियापाणी ला याची पुन्हा भेट झाली. तिथे त्याने माझी रीतसर क्षमाही मागितली. म्हणाला तुम्ही गेल्यानंतर मला साक्षात्कार झाला.. पण तो अनुभव तुनियापाणी ला आपण असू तेव्हा सांगेन.
करत करत आम्ही शोकलपुरला पोहोचलो. पांढऱ्या स्वच्छ पायऱ्या असलेला हा घाट. वर गेल्यावर एक छान सं मंदिर. मंदिरा बाहेरच ओसरी. ओसरीच्या एका टोकाला पाक घर. खूप खूप सुंदर अशा छोट्या छोट्या पायऱ्या. पायर्यांच्या बाजूला फुलझाडे लावलेली. मोठे अंगण. अंगणाच्या एका कोपऱ्यात ताट्यांनी तयार केलेली एक कुटी. षटकोनी आकाराची. त्याला पिरॅमिड सारखं छत. मंदिराचा कळस असतो तसं. या कुटीचं दार मैया च्या दिशेने. दारात बसलं की मैया दिसते. कुटीच्या आत दोन चटया अंथरलेल्या. शेणाने सारवलेली ही कुटी आहे. सामान वस्तू ठेवायला दोन छोटे छोटे टेबल. पाण्याचा माठ भरून ठेवलेला. आपण कुठल्याशा मागच्या युगात आहोत की काय असं वाटायचं या कुटीत असताना. साधना करायला अगदी अशीच जागा हवी. छान जप झाला इथे. रात्री भोजन प्रसाद दिला. टिक्कड आणि तिखट वरण होतं. वरण खूपच तिखट होतं. टिक्कड पाण्यात कालवायचा, चवीला वरण घालायचं आणि खायचं असं सुरू होतं माझं. तिथल्या महंतांनी बघितलं आणि आतून चांगल्या तुपाचा डबा आणि गूळ घेऊन आले. “वो दाल मत खाना. आपको तेज हो गई है. मे लड्डू बना देता हु वो खाना.” असं म्हणत त्यांनी एक टिक्कड हाताने चुरून गुळ तूप घालून लाडू बनवलेत आणि आग्रहाने खाऊ घातले. इथलाही मुक्काम छानच झाला.
पहाटेला उठलो तो महंत आश्रमात नव्हते. दोन तीन छोटी छोटी मुलं तिथे खेळत होती. आमच्या जवळच्या आगपेट्या संपल्या होत्या. जवळपास दुकान असेल तर घेता येतील म्हणून छोट्या मुलांकडे चौकशी केली. मी आणून देतो असं एक मुलगा म्हणाला, त्याला पैसे दिले, सांगितलं तुमच्या चार-पाच जणांसाठी खाऊ देखील घेऊन या. थोड्यावेळाने त्या मुलांसोबत एक बाई सुद्धा तिथे आल्यात. त्या या आश्रमाची साफसफाई करतात. इथे खेळणारी मुलं ही त्यांचीच मुलं. माझ्याकडून काहीतरी सेवा घ्या म्हणून हट्ट करू लागल्या. शेवटी बालभोग त्यांच्या हातचा घेतला. अगदी साधे पोहे केले होते त्यांनी, पण त्या पोह्यांचा सारखे चविष्ट पोहे मी आजवर खाल्ले नाहीत. अजिबात तिखट न घालता केले होते हे महत्त्वाचं.. खरं म्हणजे कालचं वरण तिखट झालं, ते गिळवल्या जात नव्हतं याबद्दल त्या माताजी ना काहीच कल्पना नाही.. तिखट करू नका असंही सांगितलं नव्हतं त्यांना.. असं असतं मैया चं.. खरंतर कालच मैयाने लाडू खाऊ घातले होते.. तरीही पुन्हा आजचा बालभोग तिखट होऊ नये याची तीनीच काळजी घेतली.
तिचा निरोप घेऊन पुढे निघालो. आता उसराया, सोना दहर, अनघोरी असा मैया च्या किनाऱ्या किनाऱ्याचा रस्ता. आता उन वाढत होतं. इथे मध्ये मैयामध्ये कसलीशी बारीक-बारीक झाड दिसत होती. बरच शेवाळ सुद्धा होतं. त्यात किडे ही होतेत काही. मात्र स्नान तर मैयातच करायचं होतं. एवढ्यातच काहीतरी झालं आणि माझ्या अंगावर प्रचंड आग होणारं पुरळ उठलं. कुठलासा किडा चावला होता बहुतेक. अगदी अंगाची लाही लाही.. अशात घाम आला की जखमेवर मीठ चोळण्यासारखं व्हायचं.. पण मैया असे हाल होऊ देत नाहीत. जे काय भोग असतील म्हणून हा त्रास झाला खरा, पण जितक्या लवकर यातून आराम पडला ते काही मैच्या कृपेशिवाय नाही. ती स्वतःच आली होती इलाज करायला… कसं ते सांगणारे पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९३
मागच्या भागात मी तुम्हाला एका कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. तुम्ही मागच्या वेळी आमच्या घरी आले होते असं ती मैयाजी म्हणत होती. तिची समजूत घालून आम्ही पुढे निघालो होतो. मला “घरून पळून आली आहे का? भांडून आली आहे का?” असं विचारणाऱ्या परिक्रमावासी बद्दलही मी तुम्हाला सांगितलं होतं. मैया च्या पात्रामध्ये शेरा संगमा नंतर शेरा नदीवरून कसलंसं शेवाळे वाहत आलं होतं. बहुधा त्या शेवाळ्या वर काही किडे असावेत, ते मला चावले असावेत.. नक्की काय झालं माहित नाही पण माझ्या अंगावर पहिल्या दिवशी बारीक पुरळ उठलं.
सुरुवातीला अगदीच बारीक पुरळ असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर त्या पुढचं रूपांतर फोडांमध्ये झालं. आणि ही फोड अंगभर पसरलीत. अंगाची आग आग होऊ लागली. हातापायावर, पाठीवर, मानेवर, अगदी सगळीच कडे त्रास होत होता. यावेळी पहिल्यांदाच असं झालं की माझं लक्ष हे फक्त माझ्या या त्रासाकडे होतं आणि पाऊल उचलायचं आणि पुढे टाकायचं इतकच मी करत होते. मध्ये एका घरी थांबलो असताना तिथल्या मैयाजींनी एंटी फंगल पावडर चा डब्बा दिला. दोन-तीन दिवस ती पावडर वापरून पाहिली. पावडर टाकल्यावर थोडावेळ ठिक वाटत असे पण त्याचा हवा तसा फायदा झाला नाही. एका क्षणाला तर हा रस्ता सोडून आधी शहरात डॉक्टरकडे जावं असं वाटू लागलं होतं. किंबहुना आम्ही तसं करणारही होतो पण त्या आधीच एक घटना घडली. खरंतर इथून पुढे होशंगाबाद म्हणजे मोठं शहर. तोवर कसंतरी तग धरायची आणि होशंगाबाद चांगल्या डॉक्टर ना दाखवायचं असं माझ्या मनात होतं. पण म्हणावं तितकं होशंगाबाद देखील जवळ नव्हतच.. जितका सहन होईल तितकं करू सहन नाहीतर बघू काय करायचं ते, शेवटी सगळी मैयाची इच्छा.. असं ठरवून मी पुढे चालत राहिले.
उन्हाचा तडाखा वाढतच होता. आता आम्ही अनघोरा जवळ होतो. म्हणजे पलीकडच्या तटावर कुठेतरी अनघोरा होतं. मागे उन्मेशानंदांनी आम्हाला सूर्यप्रकाश नावाच्या तेलाची छोटी बाटली दिली होती. त्याने थोडाफार फरक ह्या फोडांवर पडत होता. मात्र ते तेलही संपायला आलं होतं. त्या तेलाचं वैशिष्ट्य असं की हे तेल फोडावर लावलं की भयंकर आग होत असे मात्र पाचच मिनिटात थंड वाटत असे. पण अंगभर लावावं तेवढ तेल नव्हतच मुळात. अगदी लहानशी म्हणजे आपल्या अंगठ्याएवढी छोटीशी बाटली. मग जी फोडं जास्त त्रास देत तिथं मी तेल लावत. त्याचीही एक गंमतच आहे बरं का. कुठेतरी एकट्या ठिकाणी जाऊन हे तेल मी लावत असे कारण ते लावल्या लावल्या थयथयाट व्हायचा माझा! खरं तर आम्ही भटेरा येथे असताना उन्मेशानंदांशी फोनवर बोलणं झालं होतं. पण तेव्हा मला फोडांचा त्रास झालाच नव्हता. आता मात्र खूप त्रास व्हायला लागला. पण गम्मत कशी असते बघा. उन्मेशानंदांना सांगितल्यावर त्यांच्याकडून अशी एखादी बाटली पुन्हा मिळेल अशी मला अपेक्षा होती, मात्र यावेळी काही केल्या उन्मेशानंदांना फोन लागूच शकला नाही.
माझ्याकडून नक्की काहीतरी चुकलं होतं, किंवा काहीतरी खूप मोठं संकट टळलं होतं आणि त्याचे हे भोग होते असं मला वाटू लागलं. परिस्थिती गंभीरच होती. काय करावं सुचत नव्हतं. दिवसातून तीन-चार दा मी स्नान करू लागले थंड वाटावं म्हणून. कधी कुणाच्या घरी, कधी एखाद्या मंदिरात मागच्या बाजूला, तर कधी मैया मध्ये. घाम आला की तर प्रचंड आग व्हायची. जखमेवर मीठ चोळणे नक्की कसं असतं त्याचं प्रात्यक्षिकच मिळत होतं मला. दोन दिवस हालच झालेत अगदी. मात्र तिसऱ्या दिवशी मैयाच आली माझी सेवा करायला.
पीपरपाणी नंतर कुठेतरी, मला आता गावाचं नाव आठवत नाही, आणि या कालावधीत मी बऱ्याच गोष्टी टिपून ठेवू शकलेले नाही, तर कुठल्यातरी गावी मी दुपारची मैया मध्ये स्नान करत असताना तिथे एक मैया जी आल्यात. त्यांनी माझ्या अंगावरचे फोड पाहिलेत आणि म्हणाल्यात आज इथेच मुक्काम करा. बहुधा खरेटी गाव असावं! म्हणाल्यात मी या फोडांवर औषधी लेप लावून देते. ते ऐकूनच खूप बरं वाटलं. आम्ही मान्य केलं तिथे राहणं. ही साधारण 55 च्या आसपास ची मैया होती. ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
तिचं घर तीन खोल्यांचं. तिची मुलगी आणि ती दोघीजणी घरी होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. ती मला सरळ मागच्या खोलीत घेऊन गेली. थोड्यावेळात येते म्हणून एका भांड्यात कसलं वाटण घेऊन आली. माझ्या अंगाला तीनी ते वाटण अलगद अलगद लावलं. “अब इसको सुखने दो” असं म्हणत ती तिथेच मला वारा घालत बसली होती. ते वाटण सुकायला पाऊण ते एक तास लागला. त्याच खोलीत मागच्या दाराशी पाण्याची टाकी होती. तिथे तिने मला अंघोळ घातली आणि मग मला आराम करायला सांगितलं
बाबानी बाहेरच्या खोलीत आसन लावलं होतं. बाबाचं चहापाणी मैया जींनी व्यवस्थित केलं. माझंही लेप लावून आंघोळ घालणं केलं, आणि नंतर माझ्यासाठी दहीभात कालवून घेऊन आली. एरवी दही भातामध्ये आमच्याकडे मीठच घालतात, हा दही भात म्हणजे केवळ दही आणि भात होता.. न मीठ न साखर.. “दोन दिवस साखर-मीठ खाऊ नको असं तिने मला सांगितलं” संध्याकाळी तिनं माझी दृष्ट देखील काढली. रात्री पुन्हा एकदा मला तोच लेप लावून दिला. कडू लिंबाच्या पाल्यात कसली तरी औषधी पानं घालून वाटलेला हा लेप होता. मला थोडा आराम झालाच होता. दोन दिवसात बरं वाटेल असेही तिने सांगितलं. तिच्या सेवेमुळे मला आरामही पडला आणि त्यादिवशी झोपही व्यवस्थित लागली. सकाळी जाग उशिरानेच आली. बाबानेही मला उठवलं नाही. आठ वाजून गेले होते.
मी खोलीबाहेर आली तर बाबाचा बालभोग सुरू होता. बाहेरच्या दोरीवर माझे कपडे वाळत घातलेले दिसत होते. या मैया जी च्या मुलीने माझे कपडे धुतले होते. मला खूपच गहिवरून येत होतं. माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते. मी मैयाजी ला शोधत होते. मागच्या बाजूला चुलीवर मैया आमच्यासाठी स्वयंपाक करत होती. “अब भोजन प्रसादी पाकर ही जाना मैया, शाम शाम को चलना कडी धूप मे मत चलना”. मला अशक्तपणा आलाच होता. तरीही आज अवस्था बरीच चांगली होती. थोड्या वेळाने पुन्हा मैयानी मला लेप लावून तिला आणि त्यानंतर आंघोळही घालून दिली. .. भोजन प्रसादी आणि दुपारच्या विश्रामानंतर मैया ने गळ घातली.. “अब कल सुबह ही आगे जाना”.. तिला नाही म्हणणं माझ्या साठी अशक्य होतं. तिची आज्ञा म्हणून तोही दिवस आम्ही तिथेच थांबलो.
दुसर्या दिवशी सकाळी बाहेर पडण्याआधी एका प्लास्टिकच्या डब्यात मैयाजीनी लेप दिला. दोन दिवस पुरेल एवढा तो लेप होता. परवापेक्षा मला आज खूपच बरं वाटत होतं. फोडं देखील जरा कमी झाली होती. साक्षात मैया सेवेला आल्यावर बरं कसं नाही वाटणार?
पुढे डेमावरला पण एका माताजींशी भेट झाली. मात्र ती माझी पहिली भेट नव्हती. कोण होत्या या माताजी? सांगणार आहे पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९४
मागच्या भागात मी तुम्हाला लेप देणाऱ्या मैयाबद्दल सांगितलं होतं.तीच्या प्रेमाला आणि आग्रहाला नाही म्हणू शकलो नव्हतो आणि तिच्याकडेच मुक्काम केला होता. पुढे निघताना तिने प्लास्टिकच्या डब्यामध्ये दोन दिवस पुरेल एवढा लेप दिला. दुपारी कुणाकडून तरी लावून घ्या; दोन दिवस सतत लावत राहा असं प्रेमाने सांगताना तिच्यामधली माझ्यासाठी असलेली आस्था आणि मातृत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. आम्ही पुढे निघालो.
मैया चं प्रेम म्हणा, इथल्या स्थानिक लोकांची तिच्याबद्दल आस्था म्हणा, परिक्रमावासी पोटी भक्ती म्हणा… पण या भागाला असीम स्नेहाची देणगी मिळालेली आहे हेच खरं. मैया कडून पुढे निघाल्यावर वाटेतच एका मंदिरात एका पुजाऱ्यांनी आवाज दिला. “बाल भोग करने आ जाओ बाबाजी, मंदिर के दर्शन भी करलो”. आम्ही आत गेलो. इथे किंचित चढवून वर जावं लागतं. अगदी टेकडी म्हणता येणार नाही पण थोडासा उंचवटा आहे. मंदिराच्या आजुबाजूला बरीच झाडं आहेत. शांत आणि प्रसन्न ठिकाण. इथल्या जास्वंदीच्या झाडांची कमाल वाटली. सगळीच्या सगळी झाडं फुलांनी डवरुन उठलेली. मंदिर अगदी लहानसं पण सुरेख, स्वच्छ आणि प्रसन्न. आम्ही गेलो तसं पुजारी म्हणाले, “थोडी देर और ठहर जाओगे तो मै भोग लगा देता हु, मुझे भी प्रसाद मिल जायेगा और आपको भी मिल जायेगा”. तसंही इथे इतकं थंड आणि शांत वाटत होतं, यापुढचा प्रवास कदाचित हळूहळू होणार होता म्हणून असेल पण आम्हीही थोडावेळ थांबण्याचा निर्णय घेतला.
मंदिराच्या मागच्या बाजूला बाबाजींची खोली होती. ते आत गेले. एका ताटात पुऱ्या, भाजी आणि दूध घेऊन आले. मला म्हणाले “चलो मैया जी नीचे चलते है”. परिक्रमावासींच्या हाताने नैवेद्य दाखवणे इथे काही नवीन नाही. मी आणि बाबा दोघही मैयाला नैवेद्य दाखवायला म्हणून खाली मैया वर पुजारी महाराजांसोबत आलो. पुजारी महाराजांनी माझ्या हातात नैवेद्य दाखवण्यासाठी आणलेली ताटली दिली. मैया किनारी असलेल्या ‘भोले बाबा’ जवळ दिवा आणि उदबत्ती लावली, नमस्कार केला आणि तसेच बराच वेळ उभे राहिले. तिथेच बाजूलाच मोठाली दगडं होतीत, मी आणि बाबा त्या दगडांवर बसलो होतो. पुजारी बाबांचं कदाचित काही म्हणणं सुरू असेल असं वाटून आम्ही शांत बसलो होतो. जवळजवळ दहा मिनिटांनी पुजारी बाबा वळले, माझ्याकडे बघून म्हणाले “मुझसे कुछ गलती हो गयी क्या मैया जी? किस बात का इंतजार कर रही हो”?. त्यांचा हा प्रश्न मला समजला नाही.. मी विचारलं, “पुजारी जी आपने भोग तो लगाया ही नही, हम आपके भोग लगाने का ही तो इंतजार कर रहे है.. ये लिजिये थाली” असं म्हणत मी ताटली त्यांच्याकडे देऊ लागताच ते कळवळून म्हणाले.. “अरे मेरी मैया परीक्षा ले रही हो क्या, तुमको ही तो भोग लगाया है, जब तक तुम नही खाओगी, हम प्रशाद कैसे लेंगे?”… आता मात्र मला खूपच ओशाळल्यासारखं झालं… मैया माझीच परीक्षा बघत होती काय! हे बाबाजी मैया ला नैवेद्य न दाखवता “तूच माझी मैया आहेस” असं मला म्हणत होते! मी मैया समोर ताटली ठेवली. नैवेद्य दाखवला… दोनच मिनिट हात जोडून तिच्यासमोर उभे राहिले, “बाई गं, प्रेम, आस्था, स्नेह, जिव्हाळा, हे इथवर देखील मिळण्याची माझी लायकी नाही, आणि तू हे काय एकवतेस? कदाचित तू मला माझी पायरी दाखवून देतेयस बहुधा! काय चुकतंय समजत नाहीये, तू सांगतही नाहीयेस, अशा वेळेस मी काय करावं गं? तुझ्यावर सगळं सोडलय.. फक्त परीक्षा घेऊ नकोस, मी चुकले असेल तर शिक्षा दे..”
माझ्या हाताने पुजारी बाबांना प्रसाद दिला आणि त्यांचं समाधान झालं. वर जाऊन बालभोग घेतला, थोडा आराम केला आणि पुढे निघालो. जसजसं ऊन तापत होतं तसा तसा मला त्रास जाणवत होता; पण तो आधी पेक्षा बराच कमी झाला होता. कडू लिंबाच्या पाल्याचा लेप काम करत होता. आज मी जरा शांत होते… शांतपणे हळूहळू आम्ही पुढे जात होतो. मैया च्या काठाकाठाने जाताना जो आनंद होतो तसा आनंद दुसर्या कशात म्हणून नाही! मैयाच्या प्रवाहाकडे बघत जात असताना एक छान दृश्य दिसलं. दूरवर मैयात काहीतरी तरंगत होतं. आधी वाटलं काडीकचरा आहे. मात्र नंतर लक्षात आलं, ती गुलाबाची फुलं होती. एका रांगेत एका पाठोपाठ एक अशी गुलाबाची फुलं कुठून कशी मैयात आली माहित नाही. पुढे एक छोटासा घाट लागला. गाव मला आठवत नाही, यावेळी मी डायरी लिहू शकले नव्हते. असो. तर त्या घाटाजवळ आलो असताना त्या फुलांना जवळून बघण्याचा मोह आवरता आला नाही. ती फुलं इतकी ताजी होती की जणू आताच कोणी सोडली आहे… तीसुद्धा एकामागोमाग एक! एक फुल ओंजळीत घ्यावं, नीट बघावं आणि सोडून द्यावं! मैया मध्ये तरंगताना त्या फुलांना देखील खूप समाधान वाटतय असंच वाटलं मला!
पुढे गेलो तेव्हा पलीकडच्या तीरावरचा एक भाग आकर्षित करू लागला. कारणही तसंच होतं. ते होतं अनघोरा. उन्मेषानंद महाराजांचं स्थळ. तसं आम्ही महाराजांना फोन लावण्याचा प्रयत्न एक दोन दिवस आधीपासून करत होतो पण फोन काही लागेना. पुन्हा प्रयत्न केला, फोन लागला, मात्र महाराजांकडे खूप परिक्रमावासी होते. मैया ओलांडून त्यांना आमची भेट घेणं अशक्य होतं. थोडी हुरहुर वाटली पण इलाज नव्हता. या तीरावरून त्या तीराकडे बघताना सगळ्या आठवणी येत होत्या. कसं असतं नाही, स्थान डोळ्यासमोर होतं, माझा भाऊ, माझं माहेर (म्हणजे उन्मेषानंद महाराज मला ताई म्हणतात, अनघोरा तुझं माहेर आहे असं म्हणतात) डोळ्यासमोर दिसत होतं. त्यांना येणं शक्य नव्हतं आणि मला जाणं शक्य नव्हतं…. याला त्यावेळची परिस्थिती म्हणतात फक्त!
करत करत आम्ही डेमावर ला पोहोचलो. पलीकडच्या तीरावर असताना आम्ही पोस्टमास्तरांच्या कुटुंबात राहिलो होतो. त्यांची आठवण झाली आणि सहज म्हणून चौकशी केली. डेमावरला आम्ही ज्यांच्या घरी थांबलो होतो त्यांनी पोस्ट मास्तरना फोन केला आणि बोलणं करून दिलं. आम्हाला माझ्या तब्येतीमुळे कोणाच्या तरी घरी थांबणे आवश्यक होतं. लेप लावण्यासाठी कुठल्यातरी माताजींची गरज पडणार होती. आम्ही थांबलो होतो त्या माताजींनी खूप सेवा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनपेक्षितपणे पोस्टमास्तर आणि मैयाजी भेटायला आले. खूप आनंद आणि खूप प्रेम होतं त्यांच्या डोळ्यात. खरं यापुढे पुन्हा कधी भेट होईल, होईलही की होणार नाही, काही माहीत नाही.. आता आहे तोवर आनंद आणि नंतर या निस्वार्थ आनंदाची आठवण!
पुढे निघालो ते पुढे पिटरस, खैरी, करत करत पुढे सेलवाडा ला येउन पोचलो. मध्ये सांडिया घाटला मुंबई वाल्या मैया जींची भेट झाली, तिथे परिक्रमावासी बाबाजी म्हणून एक संत झालेत, त्यांच्या या अर्धांगिनी. निर्धार आणि श्रद्धा याच्या जोरावर अनेक तपांपासून परिक्रमावासी बाबाजींचं कुटुंब एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य आनंदाने जगत होतं. आता परिक्रमावासी बाबा नाहीत, त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत, मात्र मुंबई वाल्या मैया अजूनही तसंच आयुष्य जगत आहेत. हे असं आयुष्य जगता येणं याला साधनेची फार मोठी जोड असावी लागते. असं म्हणजे कसं आयुष्य? आज कालच्या जमान्यात असं आयुष्य जगून कुटुंबाचं पालन पोषण करता येणं अशक्य असावं अशाप्रकारचं आयुष्य… व्यवस्थित सांगणारे पण पुढच्या भागात! नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला एका पुजारी बाबां बद्दल सांगितलं होतं. नर्मदा मैया ला भोग लावण्याबद्दल त्यांना विचारलं असता ते मला म्हणाले होते “मैने तो तुमको ही भोग लगाया है!” त्यानंतर मी तुम्हाला रांगेत आलेल्या गुलाबांच्या फुलांचा बद्दल देखील सांगितलं होतं. आणि नंतर अनघोरा चा भाग मला खूप आठवत होता तेही सांगितलं होतं.
आता पुढे जाऊयात. डेमावर हून पुढे निघालो. वाटेत संदूक, दुधी संगम, पासीघाट इत्यादी गावं होतीत. पासीघाट ला थोडा विश्राम करण्यासाठी थांबलो असताना आम्हाला एक बाबाजी भेटलत. ते देखील परिक्रमेतच होते. त्यांच्याजवळ अतिशय कमी सामान होतं. फक्त एक झोळी. अगदी अंथरूण-पांघरूण सुद्धा नव्हतं त्यांच्याकडे. एक सदरा एक लुंगी, तंबाखू ची डबी आणि कदाचित थोडे पैसे असतील फार तर. ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून त्यांची ही पहिली परिक्रमा नक्कीच नव्हती हे मला समजत होतं. आम्ही आधी कुठे कुठे थांबलो तिथल्या तिथल्या जवळपास सगळ्या मंडळींना हे बाबा ओळखत होते. पुढे कुठे थांबता येईल याची देखील अधून मधून माहिती देत होते. परिक्रमे व्यतिरिक्त आजूबाजूला देखील ते बरेच फिरले आहेत हे जाणवले. सहज म्हणून त्यांना विचारलं, “बाबा जी आपकी पहिली परिक्रमा तो नही है ये? इसके पहले कब परिक्रमा किये थे आप?”.. बाबाजी चटकन म्हणाली तीन साल पहले…पण तीन वर्षाच्या आधीचं बाबाजींना इतकं व्यवस्थित आठवत होतं हे पाहून मला आश्चर्य वाटलं आणि मी बाबाजींना विचारलं “तीन साल पहले का इतना सब कुछ आपको अच्छेसे कैसे याद है बाबाजी”.. तर म्हणाले “उसके पहले भी तो परिक्रमा किया था”… बापरे म्हणजे तीन वर्षापूर्वी केलेली त्यांची दुसरी परिक्रमा होती तर… त्याही आधी त्यांनी परिक्रमा केली होती… तीन परिक्रमा करणारा माणूस आपल्याला भेटतो आहे, खरंच आपण भाग्यवान आहोत… असं वाटून मी बाबाजींना नमस्कार केला…
“कहा का शरीर है बाबाजी?” मी विचारलं… “रायपूर पास का शरीर है, लेकिन अब यही मध्यप्रदेश मे हू…”.. मी विचारेन तेवढच उत्तर ते देत होते. मी पुन्हा विचारलं..
मी-मध्यप्रदेश मे कहा से?,
ते- यही नर्मदा खंड से
मी- नर्मदा खंड तो बहुत बडा है बाबाजी, अब परिक्रमा पुरी करने के बाद कहा जाओगे?
ते- कहा जाना है मैया जी? मैं तो नर्मदा खंड मे ही रहूंगा
शेवटी मी त्यांना स्पष्टच विचारलं… “आपका घर कहा है? आपकी परिक्रमा कब पुरी होने वाली है? कहा से परिक्रमा उठाई थी?” बहुधा मला काय विचारायचं आहे त्यांना आता समजलं असावं मात्र त्यांचं उत्तर ऐकून मी स्तब्ध झाले. बाबाजी म्हणाले… “देखो मै तो परिक्रमा वासी हूं. कोई संन्यासी तो मै नही हूं, लेकिन फिर भी मुझे नर्मदा खंड के लोग नर्मदा-नंदन नाम से जानते हैं. आपने पूछा परिक्रमा पुरी होने के बाद क्या करोगे? कहा जाओगे?… मै आपको यही समझाने की कोशिश कर रहा हूं की यह परिक्रमा पुरी होने के बाद में और परिक्रमा उठा लूंगा…जैसे अब तक करता आ रहा हूं…
म्हणजे या बाबाजींनी तीन वर्षाच्या एकापाठोपाठ एक अशा तीन परिक्रमा केल्या होत्या तर? म्हणजे गेली नऊ वर्ष हे बाबाजी परिक्रमेतच होते तर! नऊ वर्षापासून हे नुसतेच परिक्रमा करतात आहेत हे ऐकल्यावर आयुष्याला सोपं म्हणावं की कठीण म्हणावं तेच मला समजेना… मी बाबांना विचारलं.. “पिछले नौ साल से आप सिर्फ परिक्रमा मे हो? ते म्हणाले… “अब कितने साल हुए ये तो याद नही… लेकिन दस बारा साल से जादा हो गये है. मै अपने घर से १९९६ मे निकला था, थोडा इधर उधर भटका, समझलो एखाद साल! फिर न जाने कब मैया जी के किनारे आया.. तब से परिक्रमा ही कर रहा हू. मेरे तो घर-परिवार भी यही बने हुए है. 3 साल मे एक बार जाता हू हर घर में. बहुत अच्छे तरहसे ख्याल रखते है वह लोग.”
बाई गं! मी नऊ दहा वर्षाचा विचार करत होते आणि बाबा म्हणाले १९९६ पासून त्यांनी त्यांचं घर सोडलं.अगदी २००० पासून ते परिक्रमा करत आहेत असं जरी म्हटलं तरी अठरा वर्ष होऊन गेले. गेली १८-१९ वर्ष ते परिक्रमाच करत आहेत. एकदा एका च्या घरी गेले की मग पुढे तीन वर्षानंतर, म्हणजे पुन्हा नव्याने परिक्रमा उचलतात त्याच वेळी त्या घरी जाणं होतं. मग चातुर्मासाचं काय? मी बाबांना विचारलं.. ते म्हणाले… “मेरा कोई ठिकाना तो है नही, ना मेरे पास कोई पैसा रुपिया है… मैया किनारे बसे किसी शहर या बडे गांव चला जाता हूँ.. जो काम मिले कर लेता हूं.. अभी गये चातुर्मास मे सब्जी बेचा था. उसके पहले खेती मे काम किया… मुझे थोडासा खाना मिल जाये तो मेरे लिए काफी है… कपडा तो कोई भी दे देता हैं…. चातुर्मासा गया के फिर परिक्रमा शुरू! प्रभू के गुण गाते जाओ, आगे आगे बढते जाओ….! जिंदगी मे और क्या है? जब तक शरीर है,जीना तो पडेगा.. फिर जहाँ आनंद आता है वैसे जी लो! लेकीन इधर उधर भागना नही, तुम्हारा आनंद कहा है तुम्हे पहचानना होगा.. फिर सब आसान तो है!
बाबांजवळ एका झोळी शिवाय काहीही नव्हतं. दुसऱ्या कशाचीही त्यांना गरजही नव्हती.तरीही त्यांचं आयुष्य अत्यंत आनंदात होतं कारण त्यांच्या आयुष्याचं खरं समाधान त्यांना मिळालं होतं. कुठलेही धागे-दोरे समोर मागे नसल्यामुळे कशाचीच ओढाताण त्यांना होत नव्हती. ते खऱ्या अर्थाने मोक्षावस्था जगत होते. मोहाचा क्षय जिथे होतो तोच मोक्ष… आणि त्या अवस्थेचा सुद्धा मोह नाही.. जाणीवसुद्धा नाही. असं खडतर आयुष्य,म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तींना खडतर वाटणार असं आयुष्य, नर्मदा नंदन बाबा अतिशय आनंदाने जगत होते याचं कारण त्यांना ज्या कशाचा म्हणून शोध लागला होता तिथे संपूर्णते शिवाय किंवा परिपूर्णते शिवाय दुसरं काहीही नव्हतच मुळी.
परिक्रमेत असताना मला अशी अनेक लोक भेटलीत आणि आपापल्या परीने त्यांनी परिपूर्णतेची किंवा मोक्ष अवस्थेची जीवंत तस्वीर माझ्यापुढे मांडून ठेवली. या अवस्थेला कशाचीही गरज भासत नाही हे मला पटवून दिलं. परमानंदापेक्षा दुसरं काहीही आपल्याला या अवस्थेपर्यंत नेऊ शकत नाही हेही समजलं. याहीपुढे जाऊन संसारात कुटुंबियांबरोबर राहतांना देखील ही मोक्षावस्था मिळवणं शक्य आहे हे आता मैया माझ्या समोर ठेवणार होती. एकट्या-दुकट्याचं ठीक आहे, संन्याशाला मागेपुढे कोणी नसतं म्हणून त्याचंही ठीक आहे असं आपल्यासारख्या लोकांना वाटत असतं. आणि अशा वाटण्यावर चं एक चपखल उत्तर नर्मदा मैया ने माझ्यासमोर आणून ठेवलं ते मुंबई वाल्या मैया च्या रूपात. मागच्या भागात खरं तर मी तुम्हाला मुंबई वाल्या मैया बद्दल सांगणार होते, तसा उल्लेखही मी केला होता.. पण नर्मदानंदन बाबांच्या मोक्षावस्थेतच आजचा भाग संपवते आहे. मुंबई वाल्या मैया चा येथे नर्मदा किनारी काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडला असणार. त्याचं उत्तर देणार आहेच मी मात्र पुढच्या भागात.. तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९६
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला नर्मदा नंदन बाबां बद्दल सांगितलं होतं. नर्मदा नंदन बाबांना भेटून आम्ही पुढे निघालो. करत करत आम्ही सांडिया घाट ला येउन पोहोचलो. सांडिया ला त्यागी आश्रमामध्ये मुक्काम झाला. मैया किनारी असलेला हा आश्रम छानच आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे जे महंत होते त्यांचे सोबत राम चरित्र मानसवर छान सत्संग झाला. मागे लाल पुरी बाबांनी मला राम हृदय बद्दल सांगितलं होतं, ते सगळं मला आठवलं.पुढे महंतांनी तुलसीदास आणि श्रीराम यांच्या भेटीची कथा सांगितली ती थोडक्यात सांगते.
तुलसीदास श्री रामाचे भक्त मात्र मारुतीरायाची भक्ती करून त्यांनी मारुतीरायाला प्रसन्न करून घेतले होते. एकदा संध्याकाळच्या वेळी कुठेतरी फिरत असताना एक पर योनीतील शुद्ध आत्मा तुलसीरामांना भेटले. चित्रकूट येथे मारुतीराया यांची भेट घ्या असा संदेश दिला. तुलसीराम चित्रकूट ला गेले व मारुतीरायां ची भक्ती करू लागले. एके दिवशी पहाटेला पांढऱ्या घोड्यांवरून दोन राजकुमार आपल्या दिशेने येत असलेले तुलसीरामांना दिसले. खरंतर ते साक्षात राम लक्ष्मण होते मात्र तुलसीदास त्यांना ओळखू शकले नाहीत. हे पाहू मारुतीरायाचे हृदय विरघळले व त्यांनी तुलसीरामांना दर्शन दिले. जेव्हा साक्षात श्रीराम तुम्हाला दर्शन देतात त्यावेळी माझी तुम्हाला न भेटण्याची कृती अयोग्य राहील,असं म्हणत मारुतीरायांनी तुलसीदासांना आशीर्वाद दिला आणि ते दोघे राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण असल्याचे सांगितले.आपण आपल्या प्रभू ना ओळखू शकलो नाही याचे तुलसीदासांना फार वाईट वाटत होतं आणि म्हणून मारुतीरायांना विनवणी करून पुनश्च एकदा श्रीरामांचे दर्शन व्हावे अशी मागणी केली. उद्या सकाळी पुन्हा एकदा याच वेळी श्रीराम दर्शन देतील असे आश्वासन मारुतीरायांनी दिले. “मात्र उद्या देखील मी त्यांना ओळखू शकलो नाही तर?” असा प्रश्न तुलसीदासांच्या मनात आला,त्यावर मी तुला सहाय्य करेन असा आशीर्वाद मारुतीरायानी दिला. दुसरे दिवशी जेव्हा बाल रूपात श्रीराम तुलसीदासांना भेटावयाला आले त्यावेळेस श्रीरामचंद्रांनी तुलसीदासांकडे चंदनाची मागणी केली असता मारुतीरायांनी पोपटाचे रूप घेऊन तुलसीदाससांना “हे बालक प्रभू श्रीरामच आहेत” असे एका दोह्यातून सांगितले.
चित्रकूट के घाट पर, भइ सन्तन की भीर।तुलसिदास चन्दन घिसें, तिलक देत रघुबीर॥
असा हा दोहा आहे. तुलसीदासांना वाल्मिकी ऋषींचा अवतार समजल्या जातं. आपल्या जन्माचे रचयिते म्हणून आणि तुलसीदासांच्या श्रीराम भक्ती पुढे नतमस्तक होऊन श्रीरामाने तुलसीदास यांना बाल रूपात दर्शन दिलं.आपले प्रभू दर्शन देत आहेत आणि आपण दर्शन देत नाही असे वाटून मारुतीराया यांनी सुद्धा दर्शन दिलं…
मी खरंतर यापूर्वी कधीही तुलसीदासांबद्दल विशेष असं ऐकलं नव्हतं. मात्र आश्रमातील महंतांशी झालेल्या सत्संगानंतर रामचरितमानस वाचण्याची ओढ वाटू लागली. मागे मांडव गड येथे भेटलेल्या चौथ्या संन्याशांनी “राम को मत छोडना” हा संदेश दिला त्यावेळी ते रामचरितमानस वाचत बसले होते हेही आठवलं. दुसरे दिवशी महाराजांचा निरोप घेऊन पुढे निघालो.
खरंतर आज पुढेच जायचं होतं. पण आजही आम्ही सांडिया घाट लाच थांबलो, पण आम्ही त्यागी आश्रमात थांबलो नाही. मैया किनाऱ्याने जात असताना एका म्हाताऱ्या आजोबांनी आम्हाला नर्मदे हर केलं. आम्ही कुठून असं विचारल्यावर आम्ही महाराष्ट्र सांगताच..”महाराष्ट्र माने बॉम्बे? तो बॉम्बे वाले मैया के पास जाओगे?” असा प्रश्न त्या आजोबांनी आम्हाला विचारला. अरे वा इथे कुणीतरी महाराष्ट्रीयन आहेत असं म्हणून आम्हीही त्या माताजींची भेट घ्यायचं ठरवलं. हातातलं काम सोडून हे म्हातारे आजोबा आमच्यासोबत बॉम्बे वाली मैया कडे यायला निघाले.
आम्ही बॉम्बे वाली मैया कडे पोहोचलो त्यावेळी सकाळचे नऊ सव्वानऊ झाले असतील. एक छोटंसं अंगण. अंगणात गोठा, बाजूला दोन खोल्या.. मग तीन पायऱ्या चढल्यावर एक छोटासा हॉल. हॉलमध्ये परिक्रमावासी बाबांची समाधी. समाधी समोर बसलेली पन्नास-पंचावन्न वर्षाची ही बॉम्बे वाली मैया. जप किंवा साधना करत बसलेली. मध्यम शरीरयष्टी, गौरवर्ण, कुरळे केस, आणि अतिशय तेजस्वी मुद्रेची ही मैया मन लावून साधना करत असल्यामुळे आम्हीही तिथेच निश्चलपणे बसून राहिलो. आमच्या सोबत आलेले म्हातारे आजोबा देखील तिथेच बसले. थोड्या वेळाने मैयाने डोळे उघडले. निळसर डोळ्यांची मैया अत्यंत सात्विक आणि प्रेमळ दिसत होती. तिच्या साधनेचं तेज तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. “ये लोक बॉम्बे वाले लोग है इसलिये इनको यहा लेकर आया” म्हाताऱ्या आजोबांनी बॉम्बे वाली मैया ला सांगितलं. “या, बसा, कुणी कडचे पाहुणे तुम्ही” .. इतके दिवसानंतर मराठी ऐकून छानच वाटत होतं. आम्हीदेखील मराठी बोलायला सुरुवात केली त्यावर मैया म्हणतात.. “मै तो गुजराती हू, मुंबई मे रहती थी तब थोडी-थोडी मराठी आती थी, लेकिन अब कई सालो से मध्यप्रदेश मे ही हूं.. तो आदत नही है.. हमने स्थान संन्याससे परिक्रमा कियी, और अब बाबाजी के बाद यही बस गयी हूं”
हे स्थान संन्यास म्हणजे काय? स्थान संन्यासात परिक्रमा हा काय प्रकार असतो? आम्ही मैया जी ना विचारलं. “किसी एक स्थान पर बसना नही, 12 साल की नर्मदा परिक्रमा होती है. सहपरिवार परिक्रमा. कही एक साल तो कही तीन साल इस तरह रहकर परिक्रमा करना यहीं बाबाजी का मानस था”. बापरे दोन लहान लहान मुली, अगदी पाच सात वर्षांच्या, त्यांना घेऊन बारा वर्ष मैयाजींनी परिक्रमा केली आहे. मुलींच्या शिक्षणाचं काय? शिवाय कुठलाही प्रवास पायी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना एकतर सगळं घेऊन पायी चालणं कठीण होत असणार किंवा सगळं सोडून जावं लागत असणार! पण मी समजत होते त्याही पेक्षा कठीण नियमांची ही परिक्रमा होती. नुसतच एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाणे असं नव्हतं तर आपल्यासाठी अशक्य असतील असं जीवन मैया जी आणि परिवार जगले होते. त्यात परिक्रमावासी बाबाजींची अखंड साधना. संसाराचं ओझं या मैयांवर! दोन लहान मुली, त्यांच्या गरजा, शिक्षणं, आजारपणं… कसं केलं असणार?
पण यातला एक नियम तर इतका कठीण, की आपण पाळूच शकणार नाही, आणि तो नियम मैया अजूनही पाळत आहेत… या भागात सांगता यायचं नाही. पुढच्या भागात नक्की सांगेन.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९७
नर्मदे हर
मागच्या भागात आपण मुंबई वाल्या मैया बद्दल वाचलं होतं. त्यांनी स्थान संन्यास घेऊन परिक्रमा केली असं मी तुम्हाला सांगितलं होतं. परिक्रमा करताना चे नियम आणि मुंबई वाली मैया यांनी पाळलेले नियम अतिशय कठोर होते. त्यातला एक नियम तर आपण पाळूच शकत नाही असं मी तुम्हाला मागच्या भागात बोलले होते. आता पुढे सांगते.
मुंबई वाले मैया आणि त्यांचा परिवार असे सर्वजण परिक्रमेत होते. परिक्रमावासी बाबाजी आधी मुंबईला बिजनेस करत. त्यानंतर त्यांना मैया किनार्याची ओढ लागली. ते नक्की इकडे कसे काय आले ते आता आठवत नाहीये. पण ज्यावेळी परिक्रमावासी बाबा संन्यास घेऊन मैया किनारी येतो म्हणाले त्यावेळेस मुंबईवाली मैया देखील संन्यास घ्यायला तयार झाली. दोन लहान लहान मुलींना कुणाच्या भरोशावर सोडणं मात्र शक्य होईना म्हणून मग त्यांनाही सोबत घेतलं. आता सहकुटुंब परिक्रमेला निघायचं. पण परिक्रमावासी बाबाजींना तर संन्यास घ्यायचा होता.. मग कोणीतरी त्यांना स्थान संन्यासाबद्दल सांगितलं. अशी परिक्रमा करताना, एका गावात जास्तीत जास्त एक वर्ष थांबायचं. संपूर्ण परिक्रमेत बारा चातुर्मास करायचेत. चातुर्मासाचे सर्व नियम पाळायचेत. असं करत असताना कुठलाही संचय करायचा नाही. जीवन उपयोगी कमीत कमी वस्तूं मध्ये भागवायचं. एक गाव किंवा एक मुक्काम सोडताना फक्त अंगावरचे कपडे आणि पूजेचे साहित्य एवढच घेऊन पुढच्या मुक्कामाला जायचं. कोणाला काही मागायचं नाही आणि दिलं तर नाही म्हणायचं नाही….
मुंबई वाल्या मैयाचा हा स्थान संन्यास बघतांना मला खूप प्रश्न पडलेत…खरंतर प्रश्न पडले म्हणण्यापेक्षा उत्तरं मिळालीत असं म्हणणं जास्त रास्त राहील. बघाना, जेव्हा आपण आपल्या आवडीची मोठी वस्तू घेतो त्यावेळी मोठ्या कौतुकाने आपण सांगतो “पै पै जमवून घर केलं, पैशाला पैसा जोडत अमुक केलं” आणि मग ह्या वस्तू आपल्या मानसिक गुंतवणुकीचा चा भाग होतात. ..पण इथे तो प्रकारच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ते फक्त वापरण्यापुरतं… फक्त वर्षभरासाठी… म्हणजे जसं कार्य प्रसंगाला चार दिवस काही वस्तू आणाव्यात तसंच ह्या मैयाने बारा वर्ष संसार केला. साधी ट्रान्सफर झाली तर पुन्हा पुन्हा घर लावा, आपलं बस्थान बसवा, हेसुद्धा आपल्याला कठीण होऊ लागतं. मुंबई वाल्या मैयाचं मात्र हे दर वर्षीचं.. तरी इथवर ठिक होतं हो.. खरा नियम तर पुढे आहे!
हा अशा प्रकारचा संसार करताना “पैशाचं तोंडही पहाणार नाही” असा कठीण नियम. नियम म्हणजे नियम… दोन मुली, त्यांची शिक्षणं, त्यांची आजारपणं, अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू… अगदी कशाही साठी पैशाचा उपयोग करायचा नाही. रुपयाचं नाणं किंवा एखादी नोट सुद्धा गेली अनेक वर्ष डोळ्यांनी बघितली ही नाहीये या मैयाने!कुणाला काही मागायचं नाही आणि पैशाचा वापर करायचा नाही म्हणजे संपूर्णपणे स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन करणंच नाही का? तेही मोजके काही महिने, एखाद वर्ष, तीन वर्ष असं नाही, तर संपूर्ण एक तप.. तपच झालं खरं हे! या मैयाने सांगितलेली एक गोष्ट सांगते.. म्हणजे लक्षात येईल या कठीणतेची पातळी किती आहे ती.
हा परिवार सूर्यकुंड जवळ आला तेव्हा ची गोष्ट. नियम पुन्हा एकदा लिहितेय… कोणाला काही मागायचं नाही. पैशाला हात लावायचा नाही. संचय करायचा नाही… चातुर्मासाच्या तोंडावर हे कुटुंब सूर्यकुंडच्या जवळ आलं होतं. पहिलं बस्थान मांडलं ते झाडाच्या खाली. काही दिवस तसेच तिथेच गेले. मग कोणीतरी धर्मशाळेत या असं सांगितलं.. बोलता-बोलता तिथल्या पुजाऱ्यांची ओळख झाली आणि पुजाऱ्यांनी जमेल तसं अन्नदान केलं. आश्रम झाडून काढ, स्वच्छता ठेव, झाडांची निगा राख अशी कामं मैय्याजी स्वतःहूनच करू लागल्यात आणि लोक येऊन या परिवाराची जमेल तशी सेवा करू लागले. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत तर गंमतच झाली. मुली काडीची पेन्सिल आणि जमिनीची पाटी करून अभ्यास करत. एकदा एका शिक्षकाने मुलींना जमिनीवर तुलसी रामायणातले दोहे लिहितांना पाहिलं. त्यांचं हृदय कळवलं आणि त्यांनी मुलींना वह्या पुस्तकं तुलसी रामायणाची प्रत आणून दिली. ते मुलींना घरी येऊन विनामूल्य शिकवू लागले. या दोघी बहिणींनी संपूर्ण तुलसी रामायण गुजराती लिपी मध्ये लिहून काढलेलं आहे… याच शिक्षकांच्या मदतीने इतर अनेक शिक्षकांनी मिळून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःहून पूर्ण केली… ‘आपली काळजी मै याला आहे तर मग आपण का काळजी करायची?’ हेच सगळ्या प्रश्नांवर चं उत्तर.
करत करत बारा वर्षे निघून गेलीत. मुली आपापल्या घरी नांदू लागल्या. बाबाजी आणि मैया जी आता कुठेतरी विसावण्याचं बघू लागले. आणि अशातच परिक्रमावासी बाबाजींनी देह ठेवला. दोघी मुली मैया ला आपल्या घरी येण्याची विनवणी करतात, मात्र परिक्रमावासी बाबाजींच्या समाधी पासून दूर जायला मैया जी तयार नाही.. त्यांचे सर्व नियम अजूनही त्या निष्ठेने पाळत आहेत. मात्र आता त्या सांडिया घाट ला स्थीर आहेत.
नर्मदा मैया मला नक्कीच घडवत आहे असे वाटते. नर्मदा शंकर महाराज, या मुंबई वाल्या मैया, अनेक प्रकारचे अनेक अनुभव देऊन ती मला तयार करते आहे असं वाटतं.जे काही समोर आहे त्याचा आनंदाने स्वीकार केल्यास परिस्थितीच आपली बाजू राखेल, आपली काळजी घेईल याची आता खात्री पटू लागली आहे. या मैया कीनाऱ्याचं विश्वच वेगळं आहे. इथली माती वेगळी, यांची भक्ती वेगळी… आणि असं काही अनुभवलं की माझी मती गुंग होऊन जाते. आता या क्षणाला पुढे काहीही न लिहिता हे सगळे प्रसंग पुन्हा एकदा जगावेसे वाटतात… पुढच्या भागात तुम्हाला गुड्डा भैया ची गोष्ट सांगेन.. माझ्या ला भेटलेल्या साधु महाराजांबद्दल सांगेन. चमत्कार नाही पण विज्ञान म्हणून नाही एक गोष्ट सांगेन… पण पुढच्या भागात.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मुंबई वाली मैया बद्दल सांगितलं होतं. एकही पैसा जवळ न बाळगता मुंबई वाल्या मैयाने बारा वर्षे संसार केला होता. अजूनही त्या आश्रमात काम करतात. परिक्रमावासी बाबाजींच्या समाधी जवळच असतात.
मुंबई वाल्या मैया चा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. आता आम्हाला सेलवाडा, माछा असं करत करत होशंगाबाद ला जायचं होतं. अर्थात होशंगाबाद फारच लांब होतं. सेलवाड्याला जाता जाता एका नर्मदा भक्ताशी भेट झाली. ते कोणी व्यापारी होते. आम्ही सेलवाडा ला थांबणार असल्याची हे बाबाजी खात्री करून घेत होते. बहुधा ते त्यांच्या घरच्या मंडळींना आम्हाला भेटण्यासाठी पाठवतील असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. आम्ही नर्मदा मंदिर सेलवाडा येथे मुक्काम करण्याचं ठरवलं.
मैयापासून काहीच अंतरावर हे नर्मदा मंदिर आहे. मंदिराला सुंदर अंगण आहे. अंगणात वेगवेगळी फुले लावलेली आहेत. इथला पांढरा जास्वंद मोठा आणि जास्त तजेलदार वाटला. अंगणामध्ये नळ आहे. सभामंडपात परिक्रमावासीं च्या राहण्याची व्यवस्था असते, तिथेच आम्ही आसन लावलं. थोड्याच वेळात आमच्या भोवताली गावातली चिल्लीपिल्ली जमा झाली. त्यांच्याच पाठोपाठ काही वयोवृद्ध मंडळीही आलीत. त्यानंतर आल्यात एक मैया जी. 92 वर्ष वयाच्या. चालत्या फिरत्या. बराच वेळ त्या माझ्याशी बोलत होत्या. मी मूळची कुठली आहे, केव्हापासून परिक्रमा उचलली, याआधी कुठे थांबली होती असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. जवळ जवळ अर्धा पाऊण तास आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. आम्हाला मैया किनाऱ्यावर एक व्यापारी भेटले होते तेही काही वेळाने नर्मदा मंदिरात आले. त्यावेळी एक उलगडा झाला तो असा… या 92 वर्षाच्या माताजी ना एकही अक्षर ऐकू येत नाही. अगदी ठार बहि-या आहेत त्या! घरची मंडळी त्यांच्याशी खाणाखुणा करून बोलतात… मात्र अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यावर सुद्धा मला तीळमात्रही हे जाणवलं नाही. मग विचार केल्यावर लक्षात आलं, आजी प्रश्न विचारत होत्या, मी उत्तर देत होते, त्यावर त्या ‘अच्छा अच्छा’ असा अभिप्राय देत. त्यांनी मला अनुभव देखील विचारले आणि मी सांगितले सुद्धा. माझ्या चेहऱ्याचे हावभाव काय ते त्यांना समजले असावेत, तरीही त्या अतिशय आस्थेनी ऐकत होत्या… समोरची व्यक्ती आपल्याला नर्मदे बद्दल काहीतरी सांगते आहे एवढंच त्यांना समजलं होतं. नर्मदे बद्दल काहीतरी आपल्या ऐकू नं येणाऱ्या कानांवर पडतं आहे यातच त्यांना इतकं समाधान मिळत होतं की काय सांगावं! व्यापारी बाबा आले त्यावेळेला त्यांनी आपल्या आईला विचारलं “कुछ समझा क्या तुमको मा? त्यावर त्या आजी म्हणाल्या.. “मैया की कहानी सुन रही थी, मुझे तो कुछ कहा समझता है बेटा, लेकिन मैया की बात कर रही है इतना समझ मे आगया… मुझे समझ आये ना आये, नर्मदा मैया को समझता है कि मुझे सुनाई नही देता लेकिन दिखाई देता है… माताजी मैया की बाते कर रही है, परिक्रमा मे है, नर्मदा मैया उनके साथ है.. इसलिये परिक्रमावासी के पास आकर बैठ जाती हू.. भलेही सुनाई ना दे लेकिन नर्मदा मैया का सहवास तो मिल ही जाता है” आहे की नाही आस्थेची कमाल!
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही पुढे निघालो असता चांगलाच पाऊस झाला. आम्ही गावाच्या बाहेर पडलो होतो त्यामुळे तिथेच असलेल्या एका शेतातल्या आडोशाच्या खाली आम्ही थांबलो. तिथे आमची भेट गुड्डा भैया शी झाली. कालही भरपूर पाऊस झाला होता. कच्च्या वाटेवरून ट्रॅक्टर गेल्यावर ट्रॅक्टरच्या चाकाने खोलगट भाग तयार झाला होता, त्यात पाणी साचून भरपूर चिखल झाला होता. वाटा निसरड्या झाल्या होत्या. अशात पाच ते सात किलोमीटर नंतर माछा नावाचं गाव येतं तिथे आम्हाला आज जायचं होतं. माछा च्या पुढे कब्जा नर्मदा संगम आहे. संगम स्नान तर करणं आवश्यकच… गुड्डा भैय्या, त्याचे दोघं भाऊ आणि दोन गावकरी आम्हाला या चिखलाच्या रस्त्यावरून हात धरून तब्बल सात किलोमीटर वर असलेल्या माछा गावाला घेऊन गेले. इथे राधा कृष्ण मंदिर आहे. इथून थोडं पुढे गेल्यावर माती पायऱ्या खणून पायऱ्या तयार केल्या आहेत त्या उतरून, नावेत बसून संगमावर जाता येतं. नेहमीच असं नसतं परंतु पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली असावी. मातीने खणलेल्या पायर्या निसरड्या आणि गुळगुळीत झाल्या होत्या. तिथेसुद्धा हे पाच जण आमच्या मदतीला उभे राहिलेत… मैया कुणाच्या रूपात कशी येईल हे सांगता येत नाही. पाच पाठीराख्यांसारखे हे पंचरत्नच नाही का?
इथेच सकाळची भोजन प्रसादी झाली. भोजन प्रसादी झाल्यानंतर गुड्डा भाई आणि मंडळीने आमचा निरोप घेतला आणि आम्ही विसाव्यासाठी राधाकृष्ण मंदिराच्या पडवी मध्ये आडवं झालो. झोप अशी लागली नाही आणि म्हणून इकडेतिकडे बघत निरीक्षण सुरू झालं. तिथे एक संन्यासी होते. ते सतत मोबाईलवर बोलत होते. जवळ जवळ अर्धा पाऊण तास त्यांचं बोलणं मी ऐकत होते. गंमत अशी की हे संन्यासी वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. काही वेळाने त्यांचे फोन संपले. त्यांनी आम्हाला हिंदी मध्ये “चाय पाओगे माताजी”असा प्रश्न विचारला. माझा होकार ऐकून त्यांनी चहा मांडला. चमच्यांनी आधण ढवळता ढवळता माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले… “अचरज मत करो माताजी, इसे सिद्धी कहते है”.. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य किंवा प्रश्नचिन्ह त्यांनी ओळखलं असावं.. कदाचित ही सिद्धी देखील या महाराजांकडे असावी! मी विचारच करत होते तेवढ्यात ते म्हणाले, हो अगदी शुद्ध मराठीत म्हणाले “चमत्कार वगैरे काही नसतो हो, सिद्धी असते.. सिद्धी म्हणजे काय? काहीतरी कठीण गोष्ट सिद्ध करून घेणे, पूर्ण करून घेणे, आत्मसात करून घेणे… कष्टाचं काम आहे ते आणि म्हणून प्रत्येकाला जमेलच असं सांगता येत नाही. जमणार नाही असंही नाहीच.. आणि अशा सिद्धी प्राप्त करून घेण्याची एक अशी रेसिपी नाही. तो एक साक्षात्कार असतो, ज्याला झाला त्याला झाला.. थोतांड किंवा चमत्कार नक्कीच नसतो. आणि चमत्कार म्हणजे तरी शेवटी काय हो? अतिशय शुद्ध आणि सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पातळीच्या वरचं विज्ञान. Everything is nothing but science, but science is not limited to our knowledge. अहो मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास आहे हे आपल्याला माहीत आहे, अनेकांनी अनेक प्रयोग केलेले आहेत पण शिक्कामोर्तब होऊ शकलेला नाही.मृत्यूनंतर तो अमुक-अमुक इथेच प्रवास करतो, इथे थांबतो, तिथे जातो, हे खात्रीपूर्वक असं कोणी सांगू शकलं आहे का? पण म्हणून मृत्यू हे सत्य नाकारता येतं का? त्या आत्म्याचा त्या देहातला प्रवास संपला इतकच आपल्याला समजतं…त्या पुढचं आपल्याला समजत नाही म्हणून ते नाही असं नाही.. आणि म्हणून तो चमत्कार आहे असंही नाही. चमत्कार असा काही नसतोच.”
कदाचित हे महाराज इतक्या भाषा कसं बोलतात यावर मला झालेलं आश्चर्य त्यांनी ओळखलं आणि असं उत्तर मला दिलं. ते पुढे म्हणाले, मी महाराष्ट्रात कधीही गेलो नाही, माझ्या घरी देखील कुणी मराठी बोलत नाहीत. पण मी मराठी बोलतो. तो एक कनेक्ट असावा लागतो, तो झाला की कठीण नसतं. आता हा देह कुठला हे मात्र विचारू नका. संन्याश्याला मागचं पुढचं विचारत नसतात माई! मला आश्चर्य वाटत होतं, ते थोडावेळ वाटतच राहिलं.. सर्वसाधारण भाषेत हा चमत्कारच होता ना? पण इतकं समजवून सांगितल्यानंतर देखील मी पुन्हा या शुद्ध विज्ञानाला चमत्कारच म्हणाव? नाही नाही ते योग्यच नव्हतं.. इतकच काय आतापर्यंत मला आलेले सगळेच “चमत्कारिक” अनुभव फक्त माझ्या ज्ञानाच्या, आकलनशक्तीच्या पातळीच्या वर होते आणि म्हणून नेमकं असं कसं झालं ते मला समजत नव्हतं… यावरून एक मात्र नक्की समजलं…. कितीही शिकलं, किंवा कितीही ज्ञान आत्मसात केलं तरीही या “ज्ञान” नावाच्या समुद्राला अंत नाहीच!
बाबांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे भट गाव, तिघडा,गणेरा करत करत पुढचा प्रवास करावयाचा होता मात्र आम्ही तिघडा येथेच थांबलो. पुढच्या प्रवासात शोभापूर मार्गे पुढे निघालो, मात्र रेवा वनखेडी सारखं सुंदर स्थान मागे पडलं. खरंतर आम्हाला जायचं होतं, पण रस्ता चुकला आणि आम्ही जवळजवळ चार किलोमीटर पुढे आल्यावर ते आम्हाला समजलं. शोभापूर ला मात्र राजमहालात व्यवस्था झाली. स्वतः राजाजींनी आम्हाला जेवायला वाढलं. राणीसरकार दिमतीला उभ्या राहिल्या… अक्षरशहा राजयोग अनुभवला… सांगणारे पण पुढच्या भागात.. हो आणि अतिशय सुंदर अशा मात्र भग्नावस्थेत असलेल्या अतिप्राचीन मूर्तींचे अवशेष आणि त्यामागची कहाणी शोभापूरलाच समजली. जवळजवळ 70 फूट उंचीची बुद्धमूर्ती वीस ते पंचवीस तुकड्यांमध्ये भग्न पावलेली पहिली.. पुढच्या भागात नक्की सांगते याबद्दल, तोवर नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ९९
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मुंबई वाली मैया च्या रामायण लिहिणार्या दोन मुलींबद्दल सांगितलं होतं. गुड्डा ठाकूर सेलवाडा हून आम्हाला कुब्जा संगमापर्यंत घेऊन आले होते तेही सांगितलं होतं. अरे हो, कुब्जेची गोष्ट सांगायची राहिली. भाषा सिद्धी असलेले जे महाराज आम्हाला भेटले होते त्यांनी आम्हाला कुब्जे बद्दल माहिती सांगितली. थोडक्यात सांगते.
नयनातारा नामक एक अप्सरा इंद्राच्या राज्यात नर्तकी होती. नृत्य करत असताना आपल्या भृलीलांने तिने देवराज इंद्राला मोहित केलं. पृथ्वीवरील वज्र ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी पुढे इंद्राने नयनतारा ला पृथ्वीवर पाठवलं. वज्र ऋषींची तपस्या तर भंग झाली मात्र त्यांनी नयनातारेला “तू राक्षसी म्हणून पृथ्वीतलावर जन्म घेशील” असा शाप दिला मात्र नयनातारेच्या क्षमायाचने नंतर “याच जन्मात तुला परब्रह्माचे दर्शन होईल” असा उ:शापही दिला. या शापानुसार नयनतारेला शूर्पणखेचा जन्म मिळाला. मागील जन्माचा विसर पडल्यामुळे या जन्मात देखील शूर्पणखेने प्रभु श्रीरामांनांच वरण्याची इच्छा केली आणि सीतेला मृत्यूमुखी पाडण्याचे धाडस करू लागली. परिणामार्थ पुन्हा एकदा तिला “तुला पुढचा जन्म कुबड असलेल्या स्त्रीचा मिळेल आणि तुझ्या कुबड्या रूपावर लोक हसतील” असा शाप मिळाला. मात्र पुन्हा एकदा “या जन्मात जर तू तपश्चर्या केलीस तर तुझ्या इच्छा प्रभू पूर्ण करतील” असा उ:शाप मिळाला. शुर्पणखा पुढील जन्मी मथुरेमध्ये कुब्जा म्हणून जन्मली. कुबड असलेल्या या स्त्रीचा, कुब्जेचा श्रीकृष्णाने उद्धार केला. आता नयनातारे च्या रुपात पुन्हा एकदा कुब्जा प्रकट झाली. मात्र आता तिला अप्सरा बनून जगावयाचं नव्हतं. इतक्या जन्मांच्या नंतर तिला श्रीकृष्णांची प्राप्ती झाली होती. तिची भक्ती तुडुंब भरून वाहत होती. ती भक्ती संपूच नये अशी मागणी तिने श्रीकृष्णा जवळ केली. आणि श्रीकृष्णाने तिची इच्छा पूर्ण केली. “कुब्जेचा देह सोडल्यानंतरही तुझी भक्ती अनंत काळापर्यंत अशीच दुथडी भरून वहात राहील” असा आशीर्वाद श्रीकृष्णाने कुब्जेला दिला, तीच ही कुब्जा! तुझ्या या भक्तीचं, तुझ्या या साधनेचं फळ देखील तुला नक्की मिळेल, तुझी ही साधना तू ईश्वरापर्यंत पोहोचवू शकशील, मात्र त्यासाठी तुला नर्मदेत मिसळून जावे लागेल असेही श्रीकृष्णाने कुब्जेला सांगितले. कुब्जेला आता कसलीही इच्छा नव्हती, तिला फक्त भक्ती करावयाची होती.. म्हणून तेव्हापासून कुब्जा नदीच्या स्वरूपात वाहते आहे आणि पुढे माछा नावाच्या गावाजवळ ती नर्मदेला येऊन मिळते. तर अशीही कुब्जेची गोष्ट!
दुपारचा चहा चहा घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. वाटेत जाताना एक ऑटोवाला आम्हाला भेटला. माझ्या ओटोमध्ये बसा असा आग्रह करू लागला. मात्र आम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर आपला ऑटो पार्क करून आमच्याबरोबर पायी चालू लागला. जवळजवळ सात किलोमीटर तो आमच्या सोबत चालून तीघरीया गावापर्यंत येऊन मग परत गेला. या गावाला तिघडा असेही म्हणतात. आजचा मुक्काम इथेच करावयाचा. इथल्या राम मंदिरात आम्ही आसन लावलं. परिक्रमावासी गावात आले म्हटल्यानंतर गावातली मंडळी जमा होतात. तसंच इथेही झालं. बरीच लोक मंदिराच्या फाटकाशी येऊन उभे राहिलेत, मात्र मंदिराच्या आत कोणी येईना! पुजारी देखील दुसऱ्या कुठल्या गावाला गेला होता. आत का येत नाही असं विचारल्यावर संपूर्ण गावाला सुतक असल्याचं समजलं. अनेकांनी आम्हाला पुढच्या गावात जाण्याचा सल्ला दिला. मात्र अंधार झालेला होता, आम्ही आसनही लावलं होतं. त्यामुळे आज मुक्काम इथेच! आता प्रश्न पडला होता तो गावकऱ्यांना. संपूर्ण गाव सुतका मध्ये असल्यामुळे परिक्रमावासी ना जेवायला कसं घालायचं? सरपंचांनी उपाय शोधला. पलीकडच्या गावात फोन करून दूध मागून घेतलं. देवळाच्या स्वयंपाक घरात थोडं फार सामान असेल, निदान तांदूळ तरी असतीलच… तुम्ही दूध भात खाऊन घ्या असा सल्ला दिला. आम्हीसुद्धा स्वयंपाक घरात काय मिळतंय का ते शोधू लागलो. इथे तांदूळ संपले होते मात्र कणकेचा एक छोटा डबा सापडला. तेल, साखर, मीठ,गुळ मुबलक प्रमाणात होतं. आजची जेवणाची सोय अप्रतिम झाली. मी गाकर बनवले आणि दूध गाकर अशी भोजन प्रसादी झाली.
खरं तर आता पुढे रेवा बनखेडी ला जायचं होतं. हे ठिकाण अत्यंत रमणीय आहे असं ऐकलं होतं. येथील आश्रमाच्या तीनही बाजूने नर्मदामैया दिसते. नर्मदामय्याच्या वळणा मध्ये हा आश्रम विसावलेला आहे. इतकं सुंदर स्थान बघायचं नाही हे शक्यच नव्हतं माझ्यासाठी. पण म्हणतात ना, काही ठिकाणी जाण्यासाठी भाग्यच लागतं… ते त्यावेळी माझ्याकडे नव्हतं. शोभापूरच्या नंतर कुठेतरी रेवा वानखेडेला जाण्याचा रस्ता आहे. तो रस्ता सोडून आम्ही बरच अंतर पुढे आलो आणि मग रस्ता चुकल्याचे आम्हाला समजलं. खरंतर कुब्जासंगमा पासून किनार्याने जाण्याची इच्छा होती, मात्र स्थानीय लोकांनी जाऊ नका असे सांगितल्यामुळे तो रस्ता टाळून शोभापूर कडे जाऊ लागलो. शोभापूर च्या अगदी जवळ एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं. सांगते.
शोभापूर नगरात आत मध्ये आल्यानंतर रस्त्याच्या कडाकडा यांना अनेक भग्न मूर्ती मांडून ठेवल्याचं पाहिलं. यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती होत्या. बुद्ध मूर्तीचे देखील अवशेष होते. अत्यंत रेखीव अशा या मूर्तींना रस्त्यावर पडलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. गंमत म्हणजे या मुर्ती अनेक वर्षांपासून इथेच आहेत. याचा उलगडा राजवाड्यात झाला. हो हो तुम्ही राजवाडा असंच वाचलेलं आहे. या मूर्तींची चौकशी केल्याशिवाय मला काही राहावलं नाही. गावकऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी आम्हाला राजवाड्यात पाठवलं. राजजींना विचारा ते तुम्हाला माहिती सांगतीलं. म्हणून आम्ही राजवाड्यात गेलो. आता मात्र खरोखर राजयोग होता आमच्यापुढे मांडून ठेवलेला.
राजवाड्याचे प्रमुख द्वार अगदी मॉडर्न. आत भलंमोठं पटांगण. त्यापुढे पुरातन काळातले अनेक खांब रोवून उभारलेला राजमंडप. मला तर या राज मंडपातच रहावसं वाटू लागलं. एकेका खांबावरचं कोरीव काम म्हणजे पौराणिक कथांचं माहेरघर जणू! नुसतं बघत बसावं असं वाटत होतं. दहा पंधरा मिनिटं आम्ही तिथे विसावलो. तिथेच एका सेवकाकडे राजाजींची चौकशी केली असता थोड्यावेळात तुम्हाला राजाजी बोलवतील असं त्याने सांगितलं. म्हणल्याप्रमाणे आम्हाला थोड्यावेळात बोलावणं आलं. आत भव्य राजमहाल, जुन्या शोभिवंत वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. महाल सिमेंटचा असला तरी जुनी धाटणी कायम ठेवली होती. मोठा हॉल होता. त्याच्या एका बाजूला बंगई होती. बंगई वर मखमली गादी घातलेली होती. बाजूलाच राज दिवाण होता. आम्ही आत गेलो तसं आमची पानं मांडून ठेवलेली दिसली. आतून एक साठी पासष्टीची बाई बाहेर आली. अगदी साधीशी साडी नेसली होती मात्र अंगावर बऱ्यापैकी दागिने होते. या बाईंनी आमची ताटं वाढली. पुरी, बटाट्याची भाजी, खीर,लाडू, जीलेबी, गोड पूरी, दहीसाखर, पापड, लोणचे, कोशिंबीर, चटण्या असा सगळा थाटमाट.. “बैठो राजा जी आते ही होंगे, कहा की मुर्ती है” त्या बाईंनी विचारलं.. मी नागपूर सांगितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला.. त्या म्हणाल्या “राणी सरकारांचे माहेर नागपूर जवळचं आहे”. त्यांना मराठीत बोलताना पाहून मला आनंद झाला मी ही त्यांना विचारलं “मला राणी सरकारांशी भेटता येईल का” त्यावर त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या.. मीच राणीसरकार आहे, इथे आमच्याकडे मी असा उल्लेख न करता स्वतःचा उल्लेख आम्ही ‘राणी सरकार’ किंवा ‘राजा सरकार’ असंच आम्ही दोघ करत असतो. राज्य गेलं मात्र काही परंपरा टिकून आहेत. थोड्यावेळानी राजाजी देखील आले. राणी सरकारांना मराठीत बोलताना पाहून त्यांना आनंद झाला, ते म्हणाले “आपकी तो अच्छी मेहमान नवाजी होगी, राणीसरकार के देस वाले हो आप!”… खूप छान पाहुणचार केला आमचा. नोकराचाकरांकडून सेवा करून न घेता स्वतः राणीसरकार आम्हाला जेवायला वाढत होत्या, हवा नको बघत होत्या, मनमोकळ्या गप्पा मारत होत्या, याहून मोठा पाहुणचार काय असावा?
ज्या कारणासाठी आम्ही इथे आलो होतो तोही मुद्दा निघाला. शोभापूर च्या भग्न मूर्तींचा. इथे अनेक वर्षांपूर्वी खूप सुंदर अशी मंदिर होती जी मुस्लिम राजवटीमध्ये तोडून टाकण्यात आली. ह्या मुर्त्यांचे काही अवशेष नर्मदेत बुडवून टाकण्यात आलेत मात्र राजघराण्याच्या तत्कालीन राजांनी काही अवशेष लपवून ठेवले होते. सध्याच्या राजाजींचे आजोबांनी तह खान्यामधून या मूर्ती बाहेर काढल्यात. त्यांचे उरलेले अवशेष तयार करून पुनश्च मंदिर उभारण्याची दादा महाराजांची इच्छा होती, मात्र त्यांच्या राज्यात ते शक्य झालं नाही. राजजींच्या वडिलांनी मात्र या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. पण आता राजा जी ही मंदिर बांधणार आहेत असं त्यांनी सांगितलं. अत्यंत सुंदर अशा या मूर्ती पुनर्स्थापित झाल्या तर खरच किती छान होईल?
शोभापूरचा राज पाहुणचार आटोपून आम्ही पुढे निघालो. आता पामली रस्त्याला लागायचे होते. पुन्हा एकदा रस्ता चुकून भलत्या मार्गाला लागलो. एका ढाबे वाल्याने उलगडा केला. हाही एक मजेशीर प्रसंग आहे. पुढच्या भागात सांगेन. सोहागपुर ला जाण्याआधी अजून एका पुरातन मंदिरात भेट देण्याचा योग आला. याच दरम्यान गायत्री पुरश्चरण यज्ञात आमचा सहभाग मैयाने करवून घेतला. आम्ही गायत्री पुरश्चरण यज्ञ पर्यंत कसे पोचलो हाही एक अनुभवच आहे.. नेमकं आमच्या भाग्यात लिहून ठेवलं होतं ते घडवून आणल्या गेलं ते मात्र नाट्यमयरित्या… सांगणार आहे पण पुढच्या भागात.. तोवर नर्मदे हर .
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १००
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला राजाजींच्या घरचा अनुभव सांगितला होता. आमच्या दिमतीला राजा सरकार आणि राणी सरकार कसे आले होते तेही सांगितलं होतं. भग्नमूर्तींची कथा सांगितली होती. आपण पुढे सोहागपूरला जाणार होतो. सोहागपूर ला आम्ही गायत्री पुरश्चरण यज्ञात सामिल झालो असं मी सांगितलं होतं. आम्ही सोहागपुरला गायत्री पुरश्चरण करणाऱ्या कुटुंबाकडे कसं काय नाट्यमयरित्या पोहोचलो ते मी तुम्हाला सांगणार होते. मात्र त्याआधी आज थोडं वेगळं लिहिणार आहे.
वेगळं म्हणजे काही फार वेगळं नाही हो! आपल्या या लेखी नर्मदा परिक्रमेच्या टप्प्याचा एक महत्त्वाचा भाग. एक एक भाग लिहिता लिहिता आपण अर्धशतक गठलं होतं त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झाला होता. अर्ध शतकापर्यंत ही लेखमाला विनाविघ्न पार पडली ती नर्मदामय्याच्या आणि आपल्या वाचकांच्या आशीर्वादामुळे…. आजचा हा शंभरावा भाग आहे.. अर्धशतकावरून पुढे जाऊन एक मोठा टप्पा आज आपण गाठला आहे.. अर्धशतकानंतर येणाऱ्या प्रत्येक भागाला आपल्या वाचकांचं प्रेम वाढत वाढत गेलं आणि म्हणूनच हा प्रवास सुखकर घडलेला आहे. एव्हाना पन्नास भागाचं एक आणि 51 ते 90 अशा भागांचं दुसरं पीडीएफ रूपातील पुस्तक वाचकांपर्यंत गेलेलं आहे. यासाठी ई साहित्य प्रतिष्ठानचे शतशः आभार.
आता आपली परिक्रमा शेवटच्या टप्प्यात आहे. आपण सध्या सोहागपूर पासून ओंकारेश्वर पर्यंतचा प्रवास करणार आहोत. जसजसं आपण परिक्रमेच्या सांगते कडे येतो आहोत तसं तसं थोड्याच दिवसात मैयापासून दूर व्हावं लागणार याची जाणीव होते आहे. ही लेखमाला संपल्यानंतर काय? असा विचार तुमच्याही मनात येतो का? पण खरं सांगायचं तर आपण मैया पासून कधीही दूर नसतोच! बघा ना, आज शंभरावा भाग लिहीत असताना परिक्रमा पूर्ण होऊन अडीच वर्ष होत आले आहेत. मात्र तुम्हा सगळ्यांबरोबर माझी मानसिक परिक्रमा तसेच माझी लेखी परिक्रमा ही घडत आहेच ना? मैया पासून तिळमात्र ही मी दूर झालेली नाही याची प्रचीतीही मला येत असतेच. कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, आपण सगळेच पुन्हा मैयाच्या परिक्रमेच्या कक्षेमध्ये वावरत असूच असा मला विश्वास आहे. मात्र या टप्प्यावर गरज आहे ती या परिक्रमेच्या फलितांचा विचार करावयाची. इथे फलीत या शब्दाचा भौतिक अर्थ अपेक्षित नाही तर अध्यात्मिक अर्थ अपेक्षित आहे. हे फलित प्रत्येकाच्या प्रारब्धा प्रमाणे प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. आणि मुख्य म्हणजे याचा फक्त विचार करावयाचा आहे, कथन करणं आवश्यक नाहीच! किंबहुना तशी गरजही नाही. फक्त एक उजळणी एवढंच! उद्देश एकच काही उरलंसुरलं मागे राहिलं असेल सावडून सावरून घेता यावं… अजूनही वेळ गेलेली नाही असा हा टप्पा… चला तर मग पुढे चलूयात?
हळूहळू ऊन वाढू लागणार आहे. या भागात उन्हाचा तडाखा ही जबरदस्त. अशात माझी तब्येत या कालावधीत बरेचदा कमी-जास्त होत होती. खरं सांगायचं तर एन्जॉयमेंट या शब्दाचं पुरेपूर इम्पलेमेंटेशन माझ्याकडून होत नव्हतं. पाय चालूच ठेवायचे आणि चालत राहायचं इतकंच काय ते! तब्येतीमुळे असेल पण थकवा वाढत जात होता. माझं रोजचं लिखाण कमी होऊ लागलं होतं. अनेक गोष्टी, अनेक जागा, अनेक लोक टिपून ठेवायचे राहून गेलेत मात्र मनात जपल्या गेले हे नक्की. इतके दिवस व्यवस्थित टिप्पणी केल्यानंतर दुसरी वही घेतली आणि ती कुठेतरी राहून गेली. त्यामुळे आता जितकं आठवतं आहे तितकं तुमच्यासमोर मांडणार आहे. गंमतच आहे की नाही? वही सांभाळायची, लिहायची हे गेली चार साडेचार महिने मी करत आले पण इथून पुढे काही शक्य झालं नाही… असो…. ते महत्वाचं नाही. महत्त्वाचं म्हणजे महिन्याचं सान्नीध्य! महत्त्वाचं म्हणजे तुम्हा वाचकांचं प्रेम, तुम्हा वाचकांचा विश्वास, आणि तुम्हा वाचकांचे आशीर्वाद…. फार जास्त लिहणार नाही आता… तुमची उत्सुकता शिगेला धरणार नाही.. खरंतर इतकं सगळं बोलायची लिहायची ही गरज नव्हतीच… औपचारिकता करावी इतके काही तुम्ही परके नाहीत… तरीही शंभरी गाठल्याचा आनंद किंवा समाधान असेल कदाचित!.. असो पुढे चलूयात!
आम्ही सोहागपूरला पोहोचेपर्यंत अंधार होत आला होता. एक मारुती मंदिर समोर दिसत होतं. तिथे आसन लावू असं ठरवलं. मंदिरात गेलो तो कसलासा कार्यक्रम सुरू होता. वाटलं तासा-दीड तासात कार्यक्रम संपेल… पण आपल्याला वाटतं तसं होत नसतं. अर्ध्या-पाऊण तासातच हा कार्यक्रम रात्रभर चालणार असल्याचं आम्हाला समजलं. तिथे आसन लावायला देखील जागा नव्हती. इथून पुढे जाणं शक्य नव्हतं कारण आता अंधार पडून गेला होता. आम्ही पायरीवर बसून होतो. आता जी काय व्यवस्था करायची ती मैया करणार! अगदी फ्रेश व्हायला सुद्धा जागा नाही.. मग काय आलिया भोगासी! लोक येत होते, बोलत होते, मात्र कुठे उतरणार आहात किंवा कुठे थांबणार आहात असं काही कोणी विचारत नव्हतं. पुजारी बुवा तर व्यस्तच होते आज.. पण मै याला काळजी ना… एक वीस बावीस वर्षाचा तरुण कार घेऊन आला आणि आम्हाला कार मध्ये बसण्याचा आग्रह करू लागला. कुठे जायचय आपल्याला? हा मुलगा कोण? याला आपल्याबद्दल कसं कळलं?.. यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही… पण ते मैया कडे असतं… आम्ही त्याला सांगितलं आम्ही गाडीत येणार नाही. तू सामान गाडीत घालून घेऊन जा हवं तर… थोडं थोडं पुढे जाऊन थांब. आम्ही तुझ्या पाठोपाठ येतो… कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही त्या कार च्या मागे मागे जाऊ लागलो. एका वस्तीत एका अंगणात कार जाऊन थांबली. आतून उदबत्त्यांचा सुगंध येत होता. काहीतरी मंत्रोच्चार ऐकायला येत होता. “आप फ्रेश हो जावो और पहली मंजिल पे आ जाओ”.. असं सांगून तो मुलगा वर निघून गेला. आम्हीदेखील सांगितल्याप्रमाणे आंघोळ पूजा करून पहिल्या माळ्यावर गेलो. बघतो तर एक तरुण आणि बरेच पुरोहित गायत्री पुरश्चरण यज्ञ करत होते. साहू कुटुंब गायत्री परिवारातलं. त्यांच्या मोठ्या मुलाने गायत्री पुरश्चरण केलं आणि त्याच्या सांगतेचा हा यज्ञ होता. या यज्ञामध्ये आमचे करवी आहुती देणे हे आमच्या भाग्यात होतं… काहीही प्रश्न न विचारता, कुणीही न सांगता या मुलाला आमच्यापर्यंत पाठवण्याचं काम मैया ने केलं हे काय आता वेगळं सांगायला हवं? ते आशीर्वाद, ते पावित्र्य, आमच्या नावे तिने लिहून ठेवलं होतं हेच खरं.
आम्ही ज्या मंदिरात थांबलो होतो त्या मंदिराच्या समोर एक पुरातन शिवमंदिर होतं. अगदी लहानसं तिथल्या मूर्ती ची गंमत पुढच्या भागात सांगणार आहे. फोटो देखील देणार आहे. आणि एक कोडं घालणार आहे. सुंदर स्वयंभू आणि कोड्यात घालणारी ही मूर्ती, नक्की कुठल्या देवतेची आहे? कुठलं कोडं घालणार आहे मी? याची उत्तरं तुम्हाला मूर्तीचा फोटो बघितल्यावरच समजतील… पण या भागात नाही हो.. पुढच्या भागात.. तोवर नर्मदे हर
नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर हर हर...
*©सुरूची नाईक – विदर्भ गट*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीभाषामाझीशाळा*