नर्मदेचा अपूर्वानंद
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदेचा अपूर्वानंद
नर्मदेचा अपूर्वानंद...
।। त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।।
ज्योतीबेन ...
भरुच च्या पुढे 25 किमी मंगलेश्वर येथे ज्योतीबेन जोशी रहातात...मैया के दोनो पे किनारे पे शायद ही ऐसा कोई महात्मा होगा जिसने ज्योतीबेन का नाम नही सुना होगा...साधूलोग तो सेवा करते ही है लेकिन यदि कोई गृहस्थी सेवा कैसे कर सकता है यह देखना हो तो ज्योतीबेन के घर जाओ... ज्योतीबेन व बोनीबेन या दोघी बहिनी...त्यांची मौसी शशिबेन यांची सेवेची परंपरा पुढे चालवली. सेवेत खंड पडू नये म्हणून त्यांनी विवाह केला नाही. आमच्या शेजारचं लग्न सोडून परिक्रमा करायला नको वाटतं स्वतः लग्न न करता आजन्म सेवा करणं ही कल्पना करणं ही तसं कठीणच...पण ज्योतीबेन व बोनीबेन या दोघींनी विवाह न करता परिक्रमा वासींची सेवा करण्याची शशिबेन मौसीची परंपरा पुढे चालवली आहे.
अतिशय सुंदर घर मोठं आंगण स्वच्छ सारवलेलं त्यावर छानशी रांगोळी तुलशी वृंदावन अन झाडांचा छोटा बगीचा...
ज्योतीबेन या शाळेत टीचर आहेत.सुखवस्तू घर घरातील सर्व सदस्य परिक्रमावासींच्या सेवेत तत्पर. त्यांचे बंधू वहिनी भाचे सर्वच तेवढेच प्रेमळ...
परिक्रमावासीला जे काही भांडे कपडे कंबल पैसे दवाई जे हवंय फक्त त्यांना सांगायचं लगेच देणार...अगदी पन्नास किमी वरुन आम्हाला एकजन म्हणाला " आपके पास कमंडल नही है तो ज्योतीबेनसे ले लो..." एवढी खात्री...
आम्ही सायंकाळी तिथे पोहचलो अन् ज्योतीबेन समोरच आल्या...
चेह-यावरील सात्विकभाव व निर्मल हास्य अंतःकरणात शब्द उमटला व मुखातून बाहेर पडला " मैया...."
आओ भैया आओ...
चेह-यावर एवढा आनंद की जणू दिवसभर आमचीच वाट पहात असाव्यात व आम्ही आलोय...
बाहेर पडवीत आसन लावले लगेच हात पाय धुवायला पाणी दिले तोपर्यंत चहा आणला चहाचा स्वाद काय सांगावा ...अगदी स्पेशल चाय..
हात पाय धुवून मी लंगडत येऊन बसलो. माझ्या उजव्या पायाच्या अंगठा व शेजारच्या बोटांना महिना भरापासून जखमा झालेल्या... रोज 2-3 वेळा ड्रेसिंग करावं व धुवून जावं... त्यातून पू यायचा रक्त वहायचं मोठंच दुखणं... परिक्रमेत काहीही व्हावं पण पायाला जखम नसावी टायर पंचर झाल्यावर चालणार कसे ? पण तुका म्हणे पापे |
येती रोगाचिया रुपे
आमचे पापं नक्कीच मोठे...
लंगडत आलो...तो पर्यंत आम्हाला नावं विचारले ...आम्ही अगदी पोरंच होतो..
मै नवनाथ ...
मै मच्छिंद्रनाथ....
मैं देवेंद्र कुलकर्णी...
अच्छा...बढिया... ज्योतीबेन म्हणाल्या...
मला लंगडताना पाहिलं
अरे पंडितजी क्या हुआ पैर को...
कुछ नही मैया छोटी चोट है
मी आपलं लपवलं
दिखाव...
नही नही मैया छोटी चोट है
अरे भैया दिखाओ तो सही...
ज्यांच्या सानिध्यात चैतन्य सळसळत जाणवत त्या साक्षात मैया स्वरुप व आपलं दुखणं का दाखवावं मी संकोच केला...
पण मैया जवळ आल्या
अरे भैया दिखाओ चोट कितनी है ?
नाईलाजाने पाय पुढे केला...
अरे पंडितजी इतनी गहरी चोट है और छोटी कहते हो?
हां मैया छोटी तो है...
रुको मैं पत्थरचट्टी लाती हूं....मैया...
नही मैया कोई आवश्यकता नही .....मी..
रुक जाओ....मैया म्हणाल्या
अंधेरे में कहा जाओगी मैया मी विचारले...
पण घरात जाऊन बॅटरी घेऊन मैया आल्या घरामागे शोधू लागल्या...
मी उठून लंगडत मागे गेलो मैयाजी रहने दो ना...
अरे आप क्यो आए इधर बैठ जाओ वही मैं लाती हूं... त्या प्रेमळ स्वरात बोलल्या...
मी जागेवर येऊन बसलो...
त्यांनी वनस्पती आणली...
ले लो ये है पुनर्नवा पीस कर लगाओ...
मी पानं घेतले जवळच एका दगडावर दुसरा दगड घेऊन रगडून रस काढू लागलो पण ते आपल्याला काय जमतंय ओबडधोबड काम...
मैयाने दूरुन पाहिलं.. अरे भैया कितने भोले हो रे तुम लाओ मैं पीस देती हूं...
नही मैया मैं पीसता हूं...
अरे रुक जावो भैया....
मैया आल्या व झटक्यात म्हणाल्या दगड हातातून घेतला व पानं वाटू लागल्या..
मला कसेसेच झाले पण खरंच प्रेमाने तो रस काढला व म्हणाल्या लाओ लगाओ ये रस...
मैं लगाता हूं
अरे रुक जाओ दिखाओ घाव ...आईच्या अधिकारात म्हणाल्या
मी पाय पुढे केला ...त्यांनी हळूवार त्यावरचं फडकं सोडलं..
अरे बेटा कितना घाव है ...
हां...
व्यवस्थित पुसून स्वतःच्या हाताने तो रस लावू लागल्या ...
मैया आप तो नर्मदा स्वरुप हो मेरे पाव को हाथ मत लगाओ हमे आपके चरण छूने चाहिए...मी म्हणालो...
अरे बेटा रुक जाव पहले ये लगा दे दो...
तो कोमल व हळुवार स्पर्श झाला अन् आईचाच स्पर्श जाणवला टचकन डोळ्यात पाणी आलं...टपकन दोन थेंब ओघळले...
अरे दर्द होता है ? त्यांनी काळजीने विचारलं...
नही मैया आपका हमारे प्रति इतना प्यार देखकर आसू आ गये...
त्यांनी हळूवार हसत पाहिलं अन तेजस्वी चेहरा अन धारदार डोळे जणू तेजाची किरणे फेकताहेत असं वाटलं ...मला रडू आवरेना...
मी तोंड फिरवलं डोळे पुसत राहिलो...
लो अब हो गया...
मैयाने पट्टी बांधली होती ..
अब जल्दी ठीक होगा...
चलो भोजन करो...बाद में आरती कर लेना...
आम्ही उठलो...
घरात तिघांनाच छान असन समोर ताटं वरण भात भाजी पोळी चटणी लोणचं व खास गुलाबजामुन...
ते पाहिलं अन् म्हणालो
मैयाजी इतना सब क्यो बनाया ? अपनी खिचडी बना लेते तो भी चलता...मी संकोचून म्हणालो...
हां यहा बहुत सारे लोग खुद ही बनाते है लेकिन आप तो बच्चे हो..क्या बना सकते...
जेवन सुरु केले अगदी मातेच्या ममतेने जेवू घातले ...
बाहेर येऊन त्यांचं जेवन होईपर्यंत आरती पूजा ध्यान ...
ज्योतीबेन बोनीबेन दोघी आल्या
बताओ कैसी चल रही परिक्रमा...
बहोत बढिया...
आणि दहा वाजल्या पासून जे गप्पा रंगल्या थेट साडेबारा पर्यंत...
मध्यंतरी खास दूधाचा चहा आणला मोठा ग्लास भरुन..
ये मेरी स्पेशल चाय है मुझे तो ऐसी ही चाय पसंद है ...आम्हालाही तो चहा...
दरम्यान पायाला थंडीने पडलेल्या भेगा बुजवायला क्रॅक नेल अशी प्रत्येकाला एकेक ट्युब दिली...
आमच्याकडे कंबल नाही हे पाहून प्रत्येकी दोन नवे कंबल दिले...अपने साथ ले जाओ...म्हणाल्या...
सकाळी आम्ही तिथेच ठेवले तर खूपच आग्रह केल्याने एकेक घेऊन निघालो...
जाताना मी त्यांच्या पाया पडलो व म्हणालो...
मैयाजी परिक्रमा में हम कई गाव में गये इतना प्रेम मिला हमे लगा हमारा ही गाव है
कई घर ऐसे मिले हमे अपना ही घर लगा लेकिन आज तो ऐसे लगा की हम अपने गाव में नही घर में नही अपने माता से ही मिले है...लोग अक्सर पुछते है नर्मदा मैया का दर्शन हुआ क्या ? मै तो कहता हूं की मेरी मैया कोई चार भुजावाली मगर पे बैठी नही होगी वो तो मेरे सामने आपके रुप में है...
अरे नही भैया...वो तो सब सेवा करवाती है...त्या म्हणाल्या..
आम्ही निघणार ...खरे तर आम्हाला यांच्याकडून कमंडल हवे होते पण एवढं प्रेम दिल्यावर कमंडल मागावेसे वाटेनातच...निघालो...
अरे आपके पास कमंडल नही है त्यांनी विचारले...
नही मैयाजी...
अरे तो बता देते मै ला के देती...
नही माताजी उसकी कोई आवश्यकता नही ...
अरे ऐसे कैसे आवश्यकता नही कमंडल तो चाहिए.. अब तो आप निकले हो लेकिन यहा से दो किमी पर मेरे मामा है वो आप तीनों को कमंडल देंगे लेकिन आप उनके पास जरुर जाना मैं फोन करती हूं...
नही माताजी ... म्हणत निघालो व मामा ला चुकवून पुढे जाऊ म्हणत पुढे निघालो दोन किमीवर मामा रोडवर येऊन आमची वाट पहात उभे... तसेच घरी नेऊन पपीता दिली नाष्टा चहा कमंडल दिले...आजही माझ्याकडे तोच कमंडलू आहे प्रेमाने पूर्ण भरलेला...
नर्मदेचा अपूर्वानंद...
ज्योतिबेन मंगलेस्वर च नंबर 02648 281538 09426536307 अनिल जहागिरदार 9926088508 मंगलेस्वर ज़िला भरूच
----------------------------------------------------------------------------------------------------------------
क्या करोगे नाम जानकर???
आमची परिक्रमा सुरु होती...उत्तर तटावर तुलनेने मागास व अविकसीत गरिब प्रदेश म्हणजेच डिंडौरी मंडला जिल्ह्यातून प्रवास सुरु होता...आम्ही पाचजन सोबत होतो...आम्ही फक्कड सारखे रहायचो...टिक्कड के फक्कड ...जिथे जसं असेल ते फुल एन्जाॅय करायचं हे ठरलेलं मग उपासमारही एन्जाॅय व पंगतही एन्जाॅयच...खायचे कधी हाल तर कधी चंगळ करायचो...पण जर कोणी दाता असेल व हाॅटेलमधे काही चहा पानी नाष्टा घ्या म्हणाले तर फक्त चहा घ्यायचो पण जर पदरमोड करुन खात असू तर मात्र यथेच्छ आडवा हात मारायचो आपल्या पैशावर आपली मजा...
मुळात हे दोन जिल्हे अतिशय गरिब ..देण्यासाठी घरात काही तरी हवं असतं ही अट ही पूर्ण न होणारा भाग... फार काही नाहीच तिकडे तरी बिचारे आपापल्या परीने सेवा करतातच...पण उपासमारीची शक्यता गृहीत धरुन इथून जाताना झोळीत टिक्कड अथवा चणे गुळ अथवा किमान पारले जी ठेवण्याचा सल्ला दिला जातो...आपुली आपण करा सोडवण...
आम्ही निघालेलो पायी रपेट सुरु ..
देवा किती चालायचंय आपल्याला मला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न...
समोर मोबाईलचा टावर दिसतोय का ?
होय ...
चला मग तिथपर्यंत टावर खाली चहा...
टावर खाली चहा हा आमचा सिद्ध मंत्र झालेला व बहुतेक कोणाला टावर दिसायचा नाही कारण त्यांची नजर माझ्यावर असायची मी तुरुतुरु पुढे पळणार मग मागच्यांची धांदल होणार हे नेहमीचेच व एकदा पुढे चाललो की मागे पहाचच नाही हा माझा नियम ...बराच वेळाने फोन यायचा मागून ...जरा टेकी घ्या...मग मागे पाहिलं की कोणीच नाही अंमळ विसावताच सारे हजर...चलो ...की परत आक्रमण...
टावर खाली चहा मिळायचाच कधी नाष्टा कधी जेवन...
त्या दिवशी बरंच चाललो दुपारी काय खाल्लं होतं आता आठवत नाही पण चार वाजता भूक लागली शहापुरा येथे पोहचलो...सारे आले ...
काही खायचं काय ? एक प्रश्न
चलो काहीतरी गरम असेल खाऊयात मस्त...
दात्याची वाट न पहाता पाच जन एका हाॅटेलात शिरलो...
काय घेऊयात?
ज्याला जे आवडेल ते ...
ठीक आहे...
मग आधी सामोसे मग जिलेबी मग गुलाबजामून आमचा दणका सुरुच होता... बिलाची काळजी नव्हती आमची झोळी रिकामी नव्हतीच मग काय खा जे हवं ते...
जिथे पाच रुपयाला समोसा तिथे कितीसं बील होणार ? पण खाताना ती चिंता नव्हती...
भरपूर खाल्लं...वर एकेक कप चहा ...नाडेकर व मी डबल कपाचे मानकरी...
यथेच्छ खाल्लं...
नाडेकर बघा किती बिल झालं आमचा नेहमीचा शिरस्ता...
नाडेकर काऊंटर वर गेले
बताओ कितने हुए?
दो सौ पैसट रुपये बाबाजी...
देवा दोनशे पासट..नाडेकरांचा मला आवाज...
मी लगेच पाचशे काढले व नाडेकरांकडे दिले...
बाबाजी रहने दो मैं देता हूं...एक आवाज...
आवाजाकडे पाहिले तर मळके कपडे केस विस्कटलेले पायात फोमची अगदी जीव गेलेली कुठल्याही क्षणी जीव सोडेल अशी चप्पल व अवताराने गबाळा वाटावा खरंतर गरीबच असा एक व्यक्ती...
मघापासून तो माणूस तिथे उभा राहून आमच्यावर लक्ष ठेऊन होता ते आमच्याही लक्षात आले होते...
नाडेकरांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले...
आता ???
मी पुढे झालो...बाबाजी आप सिर्फ चाय के पैसे दे दो आपकी इच्छा है तो बाकी हम दे देते है ...मी मार्ग काढला
नही आपके सारे पैसे मै देता हूं...
बाबाजी आपकी बात सही है लेकिन आप सिर्फ चाय के दे दो ना ...
बाबा ऐकेचनात... त्यांचा अवतार पाहून आत्ता एवढे पैसे खिशात असतील का याची शंका यावी...
आमच्या पैकी एक दोघांनी समजावयाचा प्रयत्न केला पण बाबा हट्टीच...
त्याने माझ्या हातातील पाचशे पाहून मालकाला सांगितलं इनके पैसे मैं देता हूं...
मालक आमचे पैसे घेईना...
पाच मिनिटे याच विवादात ...पण बाबापुढे माघारच घ्यावी लागली...
बाबांचा हट्ट पाहून बाबांचं नाव लिहून घ्यावं असं शास्त्रींना वाटलं...
ठीक है आप दे दो पैसे लेकिन आपका नाम बताओ...
क्या करोगे नाम जानकर ???
हमे याद रहेगा आपने हमें खिलाया ....
अरे देनेवाली मैया है मेरा नाम जानकर क्या करोगे म्हणत ते बाबा चालू लागले ...
पाठमोर्या आकृतीकडे आम्ही हताश होऊन पहात होतो पैसे तर देऊ दिले नाहीतच पण नाव ही सांगितले नाही...
आपण भरमसाठ पदार्थ खाल्ले हे आठवून अपराधी वाटू लागलं...
दोनशे रुपयात एक छान चप्पल आली असती जी त्यांना यावेळी अति आवश्यक होती पण त्या ऐवजी अनजान लोकांना खाऊ घालून त्यांना विशेष आनंद झाला होता स्वतःच्या मुलाचा हट्ट पूर्ण न करणारे लोक परिक्रमावासींना मात्र यथेच्छ खाऊ घालतात...
त्या गरीब बाबांचं दान आम्हाला हेलाऊन गेलं कोणत्या रुपात कोण भेटेल काय सांगावं... केवढं दातृत्व यांचं...ज्यांना आपण मागास समजतो तेच आपल्या किती पुढं आहेत हे जाणवलं...
ज्याला दिलंय त्यांचे नावं न जानता व विचारलं तरी स्वतःचं नाव न सांगणारा दाता ....केवढी निरपेक्षता...
आज कार्य करताना जेव्हा आपल्या नावाचा संबंध येतो आपलं कौतुक व्हावं म्हणून आपण आपलं नाव सांगतो तेव्हा जणू नामरूपापलीकडे परमहंस अवस्थेत असणार्या त्या सामान्य गरीबाचे ते शब्द आठवतात
"क्या करोगे नाम जानकर ???"
नर्मदेचा अपूर्वानंद....
तो मी नव्हेच...
आमची परिक्रमा पूर्ण होत आलेली... शेवटचे पंधरा दिवसातील घटना ...
सायंकाळची वेळ मुक्कामाचा शोध घेत होतो पुढे एक नदी संगम आहे व तिथे एक आश्रम आहे अशी माहिती मिळालेली म्हणून लगबगीने चाललेलो पण अंतराचा अंदाज नव्हता... मातीचा रस्ता उरकत नव्हता दिवस मावळतीकडे झुकलेला दोन्ही बाजूनी दाट ऊस व आमची लगबग....
अंतराचा निश्चित अंदाज व मुक्कामाचे नक्की नसल्याने जरा घाईतच... लवकर पोहचलो की सारं व्यवस्थित होतं पण इथं मुक्कामाचं गावही नक्की नव्हतं सगळच अधांतरी...
बाकीचे मला विचारायचे अजून किती दूर मी म्हणायचो आलंच आता थोड्या अंतरावर
थोड्या अंतरावर म्हणजे किती
थोड्या अंतरावर म्हणजे अगदी थोड्या अंतरावर माझं उत्तर...
बाकीचे मनातून पार वैतागायचे पण वेड्याच्या नादी लागतो कोण ?
तर आम्ही झपझप चाललोय तेवढ्यात समोरुन टुररररररर आवाज करत एक लुना आली
नरबदे हर बाबाजी तिकडची ट्यून
नरबदे हर आमचा रिप्लाय
कहा जाओगे
आगे चलेंगे
रुकोगे कहा
कही भी ...आगे कोई संगम है ना मी म्हणालो
अरे बाबाजी संगम तो भोत दूर है कब जाओगे ?
तो फिर ?
रुक जाव यही पे
यही पे मतलब
अरे बाबा पास में गाव है ना अपना घर है रुक जाव भोजन बनाओ अच्छासा सुबह चले जाव
आता? मी नाडेकरांकडे व इतरांकडे पाहिले भोजन बनवायला जरा नाराज दिसले
मी म्हणालो देखो बाबाजी हम तो अग्नि को छूते नही चेतन भी नही कर सकते
क्यों ?
हा बाबा नियम तो है बना बनाया मिले तो ही खाते है
वरना
वरना क्या चाय पिके सोते है किसीने दी तो...
ये अपूर्वानंद है चुल्हा जलाते नही नाडेकर म्हणाले
खरं तर चूल पेटवणे हे माझे आवडते काम पेटवापेटवी करणं हा लहानपणापासूनचा उद्योग पण आज अगदी तो मी नव्हेच....
अरे मतलब आप तो बडे बाबा हो
बडे नही बडी तो मैया है
आप गाव में भी नही जाते ?
नही जाते बाहर कही रुकते है
मला जरा जोरच चढला होता
तो आप मेरे खेत पे रुकिए
लेकिन वहा कोई
अरे बाबा कोई नही आप फिक्र मत करो चलो मेरे पिछे...
टुररररर करत लुना पुढे आम्ही मागे ...पास ही है म्हणता म्हणता दोन किमी आलो...
दूरवर एक मोठी झोपडी मोकळीच
शेतीतील वस्तू ठेवायची तिथे गेलो एक ड्रम मोकळा
अरे बाबा रुको पानी भरवा देते है
त्या बाबाने मोटर सुरु केली पण लाईट नव्हती
अरे लाईट तो नही
तो फिर
रुक जाव...
त्याने फोन काढला व कोणाला तरी फोन लावला
अरे राम रामजी अरे खेत पे संत लोग आये है पानी नही है पाच मिनट बिजली शुरु करो पानी भर लेते है
फोन ठेवला अन लाईट आली मोटर सुरु ड्रम भरला कमंडलू भरले हातपाय धुतले
अब मैं चाय लाता हूं
बाबा टुरररर करत गावात
तास झाला गाडीचा आवाजही नाही ...बाकीचे मला म्हणू लागले बाबा गेले दशम्या गेल्या आता काय बाबा येत नाही आपण गाठलो...
आम्ही पूजा आरती केली बाबा आले चहा घेऊन जगभर चहा व प्यायला सहा जन
एकेक दोन दोन ग्लास चहा पिलो मस्त चहा...
बाबा उस घर में चाय पिने जाना है दूरवरची लाईट दाखवली
जाणं भाग होतं मलातरी जावंच लागणार कारण मोठा बाबा...
बाकीचे थांबले आम्ही दोन तीन जन गेलो म्हशीच्या दुधाचा घट्ट चहा घेतला व येताना त्यांनी बाटलीभर दूध दिलं सकाळच्या चहाला.... आलो परत
घनश्यामजी गावात गेलेले(आत्ता नाव आठवलं) जेवन घेऊन येतीलच बाकीचे म्हणाले
जरा गप्पा झाल्या अन घनश्यामजी आले वरण भात गव्हाची खीर पोळी लोणचं पापड काय थाट सांगावा
यथेच्छ जेवलो तरी स्वयंपाक शिल्लकच...
अब मैं चलता हूं भोजन करना है बाबा निघाले...
हम सुबह जल्दी चलेंगे
चाय पिके जाव
चाय बनाएंगे दूध लाया है मी बाटली दाखवली
अच्छा लेकिन दूध संभालना बिल्ली आती है ते सांगून गेले...
आजूबाजूला खूप गचपान गवत वाढलेलं उंदरांचा मुक्त वावर या उंदरामागे नागराज येऊ नये म्हणजे बास असा विचार केला पण दमलो होतो छान झोपलो ...सकाळी उठून आम्हीच चूल पेटवली चहा केला ...कालचा नियम कालपुरताच होता...
तो मी नव्हेच...
पण मैया कसंही असलो तरी सांभाळतेच एरवी गावापासून चार पाच किमी दूर ठिकाणी काय मिळणं शक्य होतं का ?
नर्मदे हर....
आमची फाटकी परिक्रमा - अनुभव...
अनुभव या शिर्षकाखाली लिहिण्यासारखं फार असलं तरी रुचेल व पचेल तेच लिहावं असं वाटतं... अनेकांची समृद्ध परिक्रमा ऐकली की आपल्या भयाण दारिद्र्याची जाणीव अधिक बोचरी होते. मुळात आमची परिक्रमाच फाटकी झोळी घेऊन झालेली. हातात झोळी घेणं व त्यातही ती फाटकी असणं अशा व्यक्तीचे अनुभव तरी कसे असतील थोडी कल्पना करा....
स्वतः बद्दल फार बोलू नये कदाचित आत्मस्तुति होऊन अहंकार वाढतो पण सत्य ते जरुर सांगावं...
आमचा पंचमातला शनि अति विलंबकारक व एवढा भयाण की समोरचा कसाही असला तरी त्याला फटका मारणारा...
आळंदीतही कधीकाळी मधुकरी मागितली पण जेव्हा मधुकरीला जायचो हमखास मधुकरी कमीच येणार. जेथे जावे तेथे कपाळ सरसे...
घराबाहेर फार कधी पोटभर लाभलं नाही ...
या शनिने फार खायला दिलं नाही उपाशी ठेवलं पण उपासमार घडली नाही तर उपवास घडला ...
आमचं प्रारब्ध एवढं भयाण की मी उपाशी तर रहाणारच पण सोबतच्या दहा लोकांना उपाशी मारण्याची ताकद आमच्यात असायची...
परिक्रमेत सुरुवातीला आम्ही नऊ जन सोबत होतो. तसे सारे जिवाभावाचेच...प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी असे.
सदाव्रत घेऊन स्वयंपाकाला भगवानजी शास्त्री व संदीप डगळे
मधुकरीला शास्त्री व रंगनाथ सातपुते
तयार जेवन असेल तर प्रश्नच नाही पण जिथे जेवन नाही मधुकरी नाही व सदाव्रतही नाही तिथे मी व नाडेकर जुगाड करायला जाणार हे ठरलेलं...
एक दिवसाचा प्रसंग...
सकाळीच रामनगरहून निघालो केरपानीत सामोसे खाल्ले व एकजन म्हणाला आपलं मधुकरीचं फडकं फाटलंय खरं तर तो पंचाच होता पण जीर्ण झाला होता...
लगेच एक सुती कपडा घेतला त्याला एका टेलर कडून गोट मारले( आपलं काम तसं फार सूत्रबद्ध ).पुढे निघालो...गाव लागलं पण नेमके शास्त्री म्हणाले मी काही आज मधुकरी आणणार नाही आणि रंगनाथ महाराजही म्हणाले मी ही नाही आणणार ...
झालं आता समजूत कशी काढायची परिक्रमेत प्रत्येकजन हट्टी होतो. नाना प्रकारे समजावलं पण कोणीच ऐकेना...
एका झाडाखाली बसलो पण मधुकरीला कोणी जायचं यावर काही ठरेना...
मी म्हणालो नवीन फडकं आणलंय चांगली सुरुवात होऊ द्या पण ते दोघे ऐकेनात...जायला तर हवंच भूक ही लागलेली...
मी सांगितलं मला जायला काहीच हरकत नाही पण मला कोणीच मधुकरी देणार नाही... पोरं ऐकेनात.. असं कुठं असतं का ? आमच्यात तुम्हीच अनुभवी आणि तुम्हाला कोण नाही म्हणतंय ?
त्यांना वाटे मला कंटाळा आलाय पण खरे त्यांना पटेना...
हो नाही हो नाही करता करता मी व नाडेकर मधुकरीला निघालो अगदी निघताना ही मी नाडेकरांना म्हणत होतो दुसरा कोणी सोबत घ्या माझ्या नादी लागू नका पण ऐकतो कोण ?
निघालो...
दुपारचं ऊन गावात शिरलो एका घरापुढे उभा राहिलो...
नर्मदे हर मैया...
मी हाक दिली... तशी आतून एक माताजी आली" नर्मदे हर बाबा" म्हणाली...
माताजी कुछ मधुकरी लाओ...
अरे तुम कैसे परिक्रमावासी हो पाव में जूते पहने परिक्रमा करते हो ? तिचा उलट सवाल...
हा क्या है ना माताजी धूप बहोत है पाव जलते है ना इसलिए...मी सारवासारव केली...
अरे बाकी सब नंगे पैर चलते है तुम्हे धूप लगती है...तीने फटकारले...
"माताजी मधुकरी" मी आपला मुद्दा रेटलाच...
अरे बाबा आज रसोई बनाई ही नही ... माता सहज बोलली ....मी नाडेकरांकडे पाहिलं... हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला चला आता पुढे...मी पुढे नाडेकर मागे...
दुसरे घर
नर्मदे हर माताजी...
नर्मदे हर...
माताजी कुछ मधुकरी मिलेगी?
बाबा आज तो हम पडोसन के यहा गई थी पुरी खाओगे क्या ?
जी हाँ...( जी ललचाए)
तीने फक्त दोन पु-या आणल्या व नव्या नुकत्याच शिवलेल्या झोळीत टाकल्या... चला उद्घाटन तर छान झालं म्हणत पुढे...
दोन तीन घरं उघडी पण बंद ...
एका घरी भाकरी संपलेली फक्त चार लोणच्याच्या फोडी दिल्या
शेवटी पटेलच्या घरी गेलो...
नेहमीचच
नर्मदे हर
नर्मदे हर
मधुकरी मिलेगी
रुक जाव बाबा...
बाबा रुक गया ...एक पोरगं माडीवरुन बोलत होतं बाबा रुक जाव...
दोन मिनिटं पाच दहा पंधरा वीस मिनिटं झाली पण कोणाचीच हालचाल नाही...
नाडेकरांना म्हणालो मला उगीच आणलंत मी आलो की तुम्ही उपाशी रहाता मी एवढा भयाण आहे...
तसं नाही हो देवा नाडेकरांनी समजावलं...
देवा मला आत्ता असं वाटतंय आपण पाकिस्तानात हवे होतो नाडेकर म्हणाले
का बरं ?मी विचारले
तेथे दरवाज्यात मागायला आलेल्याला तीन मिनटापेक्षा जास्त उभं करु नये असा नियम आहे नाडेकरांनी सांगितलं...
चालायचंच पाहू काय ते...
आमचा असा संवाद सुरु अन् नाडेकर झोळी माझ्याकडून घेणार तेवढ्यात तिचा एक पदर सुटला व त्या बिचा-या चार लोणच्याच्या फोडीतील दोन खाली मातीत पडल्या...
अरेरेरे म्हणे पर्यंत मातीत...
बघा मला आणलंत आता मूल में धूल पड जाएगी मी म्हणालो...
तिथे काही अंदाज लागेना शेवटी मागे आलो... बाकीचे वाटच पहात होते पण झोळीत पाहिलं तर काहीच दिसेना दोन पुर्या लोणचे अर्धी रोटी अन थोडा भात...
असू द्या हरकत नाही म्हणत ते बाहेर काढलं व मी समान वाटप करेपर्यंत शास्त्री म्हणाले नवंच फडकं पण लोणच्याने तेलकट झालंय दोन मिनटात पाण्यातून काढतो ... त्यांनी ते धुतलं व मागे फरशीवर वाळत घातलं इथं बेस्ट वाळेल म्हणाले...
इकडे आम्ही समान वाटप केली वाट्याला आलेले दोन दोन घास खाल्ले जरा गप्पा झाल्या व निघालो....
रस्त्यात चहा झाला अन् अचानक कसली तरी आठवण आली अरे आपलं मधुकरीचं नवं फडकं कुठयं?
कोणाकडेच नाही मग एकाने सांगितलं ते जिथे वाळत घातलंय तिथेच आहे व आपण जवळपास 5-10 कि.मी. पुढे आलोय...
शेवटी माझं मलाच हसू येऊ लागलं...
नवं फडकं पण मधुकरी तर मिळाली नाहीच पण फडकंच हरवलं ... केवढा भयाण योग असेल विचार करा....
आजही अगदी कोणालाही उपाशी मारण्याचं सामर्थ्य माझ्या सहवासात आहे...
अशी आमची फाटकी परिक्रमा...
नर्मदे हर - लबाड लांडगं...
आमची पहिली परिक्रमा सुरु होती स्थळ काळ आठवत नाही पण अमरकंटकहून परतीचा प्रवास उत्तर तट ...
दुपारचे चार वाजलेले आम्ही तिघे चालत होतो माझ्या डोक्यात पंचासारखी गोल टोपी हातात काठी व कमंडलू
मौनी बाबा पूर्ण लुंगी व बंडी छोटी दाढी मच्छिंद्र महाराज लाल हाफ स्वेटर व लाल लुंगी
लाल कपड्यातले अमर
मौनीबाबा अकबर व मी अॅन्थनी रस्त्याने मजा करत चालायचो...
दुपारीच जरा पोट बिघडले म्हणून मी थांबलो एका शेतात हौद व त्यात पाणी...जवळच सॅक ठेवली कमंडलू भरुन ठेवला बाटली घेऊन बहिर्दिशेला गेलो...बाकीचे दोघे पुढे जाऊन थांबले...
जाऊन आलो व अगदी हौदाजवळ आलो तेवढ्यात तेवढ्यात समोर नजर गेली सॅक जवळ लांडगा उभा ...फारसं अंतर नव्हतंच...पाणी प्यायला आलेला त्याची व माझी एकदमच नजरानजर झाली क्षणात दोघेही दचकलो...पण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून काठीचा हात वर व नर्मदे हर अभावितपणे मुखातून बाहेर पडले ..दुस-या क्षणाला तो जवळच्या झाडीत शिरला...
फार काही नादी न लागता मी आपली सॅक व कमंडल घेऊन चालू पडलो...उगीच का पंगा घ्यायचा...तो साधा लांडगा तर आपण लबाड लांडगा...तरातरा पाय उचलत पुढे...दोघे भेटले ...गप्पा मारत गावात आलो दूरवरचा एक झेंडा एका गावकरी बंधूने दाखवला व तिथे एक बाबा आहेत सोय होईल म्हणाला...रान तुडवत तिथे गेलो...
मोठं पिंपळाचं झाड खाली पानांचा खच पडलेला ...छोटं मंदिर समोर पडवी पण खूप कचरा बरेच दिवस झाडलेलं नसावं एकंदर दुर्लक्षित ठिकाण...
सॅक ठेवल्या नर्मदे हर नर्मदे हर म्हणालो पण प्रतिसाद नाही...
कोणी आहे की नाही आत ? म्हणत मंदिराच्या मागे गेलो...
छोटीशी कुटिया व एक बाबाजी आत चिलीम मळताहेत...डोकावलं...बाबाजी नर्मदे हर...पण बाबा कामात मग्न ...
जरा आवाज वाढवला पण बाबा ढिम्म...
शायद उंचा सुनते है म्हणत आत गेलो...
समोर पहाताच दचकले नर्मदे हर म्हणालो जरा जोरातच...
नर्मदे हर...
बाबाजी हम तीन मूर्ति है यहा रुकना चाहते है रुक सकते है क्या मी घसा ताणला...
देखो बेटा मुझे कम सुनाई देता है और रुकना चाहते हो तो रुको मै तो बूढा हूं आप बनाओ मैं भी खाऊंगा यहा दाल चावल आटा है बनाओ...बाहर चूल्हा है लकडी ढूंढो थोडी ...बाबा म्हणाले...
बाबांकडे पाहून दयाच वाटली...डबे डूबे पाहून आपण खिचडी बनवणं म्हणजे बाबांच राशन संपवणं हे लक्षात आलं...
हा बाबाजी ठीक है म्हणत बाहेर आलो...
काय करायचं ? मी विचारलं...
बाबा काही बनवणार नाहीत आपणच काही बनवू...असा विचार केला...बाबांकडे परत गेलो...
देखो बेटा कुछ बनाना है तो बनाओ खाओ मैं जल्दी सोता हूं...बर्तन बाहर रखता हूं...बाबाने लगेच तवा परात कढई बाहेर दिली...
ते सर्व चुलीजवळ ठेवले...चुल बरेच दिवस पेटली नव्हती ...अशी कशी पेटेल ? पेटवली तर पेटणार ना पण बाबांचं या चुलीवर काम नसावंच...लाकडं जमा करणे कठीण होते...
झाडणी आणून पडवी झाडली खालची पानं झाडणं कठीणच होतं फक्त रात्रीतून त्यातून विंचूकाटा येऊ नये असा विचार करत होतो...
मैया खालीच वहात होती मैयावर जाऊन हात पाय धुवून कमंडल भरुन आणण्यासाठी निघालो...
तोपर्यंत बराच अंधार पडलेला ठेचाळत खाली उतरलो मोबाईल बॅटरीचा आधार...खाली बराच चिखल उतरता येईना एवढ्या अंधारात एक जेसीबी काम करत होता...
नर्मदे हर बाबा...आवाज आला..
आवाजाकडे पाहिलं पण जेसीबीच्या लाईटमुळे डोळे चमकत होते..नर्मदे हर...
एक जन पुढे आला...
बाबा कहा रुके हो....
उपर आश्रम में...
अरे वो बाबा कम सुनता है भोजन की व्यवस्था नही है...
हा बात तो सही है लेकिन क्या करे ...
गाव में चलो पास ही है एक किमी...
नही भैया अब आसन लगाया है अब यही ठहरेंगे...
लेकिन खाओगे क्या...
मैया देखेगी...म्हणत आम्ही कमंडल भरले...
रूक जाव म्हणत तो व्यक्ती थांबला त्याने त्या घाटाचे टेंडर घेतले होते त्याने आपल्या एका कामगाराला बोलावले...
इनके भोजन की व्यवस्था करो...
लेकिन सेठजी सब्जी कुछ नही है तो चाचरत म्हणाला...
सेठ ने ओळखलं व वीस रुपये काढून दिले..इसकी सब्जी ले लो.. इनको घर ले जाओ खाना खिलाओ... .म्हणाला...
आता ऐकणं भाग होतं...
बाबाजी मेरे साथ चलो घर ...इच्छा नसताना तो येतोय हे आम्ही जाणलं पण चला सोय तर झाली ...
भैया रुको हम कमंडल रखके आते है म्हणत मंदिरात गेलो मौनी बाबाला तिथेच थांबवून आम्ही गावात गेलो...
घरी पोहचलो तो बिचारा जणू थरथर कापत होता धोक्याची जाणीव मांजरांना लवकर होते म्हणतात याचं जणू भिजलेलं मांजर झालेलं...
चाचपडत आत गेला...अजी सुनती हो ?
आम्हीही आत गेलो...
क्या है आतला चिडका आवाज आम्ही एकमेकाकडे पाहिलं...
पानी लावो..याने उसनं अवसान आणलं...
एक ग्लास भरुन आणला तिला माहितीच नाही काही...
ये देख बाबा लोग ...सेठजी ना खाना बनाने को बोला है...
बिचारा वादळाला सावरण्याचा प्रयत्न करत होता...
अरे कोई काम धाम नही क्या तेरे सेठको मैं क्या नौकर हूं उसकी ? कपडे धो लो खाना बना लो ...समझता क्या है खुदको...तोफ कडाडली...
आम्ही भयाण अपराध्यासारखे बसून होतो...
समोर ग्लास आदळून पाय आपटत वादळ आत गेलं...हा बिचारा मागे काहीतरी खूसफूस चालू...
काय करायचं ? मी मच्छिंद्र महाराजांना विचारलं...
"बघू काय होतंय " ते म्हणाले...
तुम्ही फक्त मला सांभाळा मी पहातो...मी म्हणालो...
थोडा वेळ भयाण शांतता...पुन्हा दोघे बाहेर...हा समजावतोय व ती ऐकत नाही आमच्या समोर परत बाजा सुरु....
आता आपणच निर्णायक भूमिका घ्यावी असं मला वाटलं...
अरे बिल्कूल नही चाहिए तुम्हारी रोटी...खाओ आप ही ...मी त्या दोघांच्या वर आवाज काढला फट्कन हातात काठी घेतली कमंडल हातातच होता दाणदाण पाय आपटत निघालो...
माझ्या अचानक आवेशाने ते दोघे व माझे मित्र ही हादरले....
काय होतंय कळेपर्यंत मी थेट अंगणात...
अरे बाबा रुको बाबा रुको...म्हणत तो बिचारा मागे...माझे मित्रही मागे आले...
बाबा रुक जाव तो गयावया करु लागला...
पण मीच आक्रमक झालो होतो...
अरे कुछ नही चाहिए तुम्हारी रोटी भिखमंगा समझा है क्या हमको मी डाफरलो...
बाबा भूल हो गयी माफ करना तो हात जोडत मागे मी थेट सडकेवर ...
ते वादळ एव्हाना पार मोडून पडलं होतं या गोंधळाला आपणच जबाबदार हे जाणवलं होतं...
बाबा रुको सब व्यवस्था हो जाएगी रुक जावो...वो जो है ना मुकादम पैसे देता नही और हर रोज कुछ ना कुछ बताता है त्याने समजावणीच्या स्वरात सांगितलं...
अरे हमे क्या लेनादेना ...हम चलते है...माझा पारा खाली येईना...मच्छिंद्र महाराजांनी मला समजावलं...मग परत घरी आलो...
एकंदर खेळ सफल झाला तर....
त्या माताजीने मग छान पोळ्या व बटाटा भाजी बनवून दिली...
बाबा माफ करना भूल हुई...म्हणाली...
देखो माताजी आपका और उनका क्या है हमे क्या लेना देना हम तो परिक्रमावासी है...मी स्पष्टीकरण दिलं...
जी बाबाजी...मैया म्हणाली...
यात जवळपास एक दीड तास गेला...
तिकडे काय झालं असेल
एकतर मौनीबाबाला बोलायचं नाही व त्या बाबाला ऐकूच येत नाही काय खेळ झाला असेल मैयाला माहित ... जाताना भाजी पुरणार नाही म्हणून पाच रुपयाची शेव घेतली...तिथेही पोरांचा गोंधळ पाच रुपये दिले व शेव दे म्हणालो त्याचा पोरांबरोबर धिंगाणा चालू ...दोन वेळा म्हणालो अरे भैया जल्दी दे दो पण त्याचं दुर्लक्षच...
अरे नही देनी है तो ठीक है रहने दो पैसे मी गरजलो...
आज काय सारा रागरंगच होता...
त्याने मुकाट्याने शेव दिली ...
आलो तर म्हातारे बाबा कधीच झोपलेले व मौनी बाबा डुलकी घेताहेत ...मग बॅटरीच्या उजेडात चूल पेटवून पाणी उकळून घेतलं... तेल नव्हतंच अर्धा तासात पाणी उकळलं त्यात शेव शिजवली व बटाटा भाजी मिक्स केली ...त्या रोट्या व बटाटा शेवभाजी खावून झोपलो...
झोपताना परत तो लांडगा आठवला इथे काय कंपाऊंड नव्हतं शेजारीच शेत पण आता काही येऊ शकत नाही मनाशी म्हणालो व झोपलो...
मघाशीच्या रागाचं केलेलं नाटक आठवून हसू येत होतं लबाड लांडगं ढोंग करतय...
नर्मदेचा अपूर्वानंद...
निखळ आनंद
आज काय सांगावे हा प्रश्न पडला कारण साधे अनुभव कोणाला आवडत नाही काहीतरी चमत्कार असावा असेच अनुभव सर्वांना हवे असतात पण परिक्रमा केवळ चमत्कारांनी होत नाही तर प्रेमाने होते व प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही...जे कोणी अनुभव सांगतात एकतर झालेला त्रास आलेले संकट व मैयाने ते दूर केल्याची घटना पण हे असे क्वचित घडते बहुतेक सारी परिक्रमा शांततेतच पार पडते...पण शांत हा रस नाटकात चालत नाही तो फक्त साहित्यातच असतो...आणि शांतता अनुभवायची असेल तर नर्मदा किनारा उत्तमच...कसाही कितीही क्रोधी असला तर मैया किनारी शांत होतोच...
परिक्रमेतला सर्वाधिक आनंदाचा क्षण कोणता असं जर कोणी विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर वेगळ असेल पण माझा आवडता क्षण म्हणजे दोन फूटावरुन झुळझुळ वहाणारी मैया आहे आणि आपण शेजारच्या हिरवळीतून चाललोय मस्त हिरवळ चिखल नाही अगदी जाड गवताचा थर लोळण घेतली तरी शंभर फूट खडाही टोचणार नाही एवढी मऊ हिरवळ...ही वाट संपूच नये असं वाटतं मैयाच्या बरोबरीने चाललोय तेव्हा खरं मैयाशी हितगुज सुरु होतं आपणच आपल्या तंद्रीत...पावलं आपोआप पडताहेत रस्त्यातील खड्डे चिखल सहजगत्या यांत्रिकपणे चुकवला जातोय मागे कोणी राहिलं का याची चिंता नाही पुढे कोणी दूर निघून जाईल याची काळजी नाही सारा आसमंत शांत आहे पक्ष्यांचा किलबिलाट आहे गजबजाट कोणताच नाही या घडीला फक्त मी व मैया दोघेच...एका जागेवर उभं राहून पाणी पहावं की पाण्यासोबत झुळझुळत चालावं असं वाटावं थांबण्याचा मोह होतो अन् असू तिथेच बैठक मारली जाते कमंडलूत पाणी भरुन आणून निवांतपणे घोट घोट प्यायचं व तनमनावर घोटागणिक नशा चढावी तसं देहभान हरपावं कोणताच आवाज नाही व आवाज येऊही नये अशी मनोमन इच्छा...या शांततेत फक्त दोनच आवाज एक मैयाचा खळाळता प्रवाह अन ह्रदयाचे आत जाणवणारे ठोके...कुठेतरी आत सरगम जुळतो ताल धरला जातो डोळे पहात असतात पण दिसत काही नाही तो दूर मध्यावर दिसणारा वेगवान प्रवाह मनाला खेचून घेतो तिथं पाण्यावरुन पळत जावं अशी अनावर ओढ निर्माण होते क्षणभर अंग प्रत्यंगातून चैतन्याची शिरशिरी येते देहभान हरपून जातं अन् उरतो तो केवळ निखळ आनंद पुढे शब्दही मुके होतात कारण तो आनंद फक्त भोगायचा असतो
नर्मदे हर....
मैया की गोद में आखरी सांस लेले….
आमची पहिली परिक्रमा सुरु होती. आम्ही तिघेजन सोबत चालत होतो. चालता चालता शूलपाणित प्रवास चालू व त्या दिवशी सकाळी सेमलेट वरून निघून दुपारी भादल येथे आलो. (रस्त्यात एक किस्सा घडला पण तो नंतर कधीतरी) त्या वेळी भादल मध्ये झरकन नदी जी एम.पी. व महाराष्ट्राची बाॅर्डर आहे ती ओलांडून तेथे एक आश्रम होता व तिथे महाजन महाराज रहात होते....छान कुटिया अगदी नदीच्या वर उंचावर असणारी बाहेर लाकूडफाटा पडलेला आत मोठी असणारी कुटीया व महाजन महाराज मोठे डेरींगबाज...त्याच दिवशी ते बोटीने किराणा घेऊन आले होते. किराणा वहायला स्थानिक लोक पण महाराजांचे कडक शब्द विशेष वाटले...
माझी अवस्था बेकार होती. पायाची जखम व तिचा ठणका व त्यामुळे अंग भरुन आले होते तिथपर्यंत कसाबसा आलो...
कुटीयात आसन लावले. तिथले एक दोघे पाणी आणायला निघाले आम्हीही सोबत गेलो. वाळूचा झरा व छान स्वच्छ पाणी भरुन आम्ही निघालो. येताना आम्हाला दोन माताजी भेटल्या. पहाताच लक्ष वेधलं जावं अशा. वय ऐंशीच्या पुढे. आम्ही चालताना आमच्या दोन पावलात जेवढं अंतर पडत होतं तेवढ्यात त्यांचे तीन पावलं पडत होते...
आम्ही त्यांच्या चालीने कुटीयात आलो. पहावं व पहातच रहावं असं व्यक्तिमत्व...एक तर विशेष छान ...अगदी गो-यापान , डोक्यावर मोत्यासारखे केस, विशेष वाटावं असे सगळे शाबूत असलेले दात चेहरा विशेष तेजस्वी डोळ्यात वत्सलता व बोलण्यात प्रेम...बघतच रहावं असं व्यक्तिमत्व...
मैया नर्मदे हर...
नर्मदे हर बेटा...
आम्ही मैयाच्या हातातील कळशी घेतली व बोलत चालू लागलो...मैयाचा स्वभाव एवढा प्रेमळ की कोणीही त्यात वाहून जावा...आमची व त्यांची खूप जवळीक निर्माण झाली....
पाणी आणून थकलेल्या दोघी जरा दम खावून भाजी चिरायला बसल्या...कुटीयात पाच सात परिक्रमावासी व स्थानिक लोक जो तो स्वयंपाकाच्या तयारीत...
आम्ही तसे लहानच पोरं म्हणून आम्हाला कामातून सुट्टी ...मी त्या मैयाजवळ बसलो...त्या भाजी चिरत होत्या...
माताजी एक पुछू ?
हा बेटा...
आप कहा से आई हो?
बेटा हम अमरकंटक से चली आ रही है...
अच्छा तो आप रहनेवाली कहा की हो ?
बेटा मैं कोलकाता की हूं पुराने जमाने की एम काॅम पढी हूं नौकरी की रिटायर के बाद अमरकंटक में एक मकान खरीदा और सोला सतरा सालों से वही रहती हूं...
अच्छा...और घरवाले ?
हां सब लोग है बच्चे बहू पोते सब लोग है अच्छी बडी फॅमिली है ...
तो आपको उन्होने परिक्रमा की परवानगी दी...?
हां ...मै तो मैया के लिए अमरकंटक रहती हूं अब ऐसा लगा की परिक्रमा करु तो निकली हम दोनो...
यहां तक कितने दिन हुए ?
अमरकंटक से निकले एक साल हुआ बेटा....
एक बात पुछू मैया ?
हा बेटा...
आपकी परिक्रमा पूरी कब होगी हमने देखा है की आप तो इतनी धीरे चलती हो तो...???
अरे बेटा परिक्रमा पूरी ही होनी चाहिए ऐसी कोई बात नही हम तो ये चाहते है की परिक्रमा पूरी होने से पहले जिंदगी पूरी हो जाए मैया की गोद में...मैया म्हणाली...
शब्द कानावर पडले अन् क्षणभर स्तब्धच झालो रोखून मैयाकडे पाहिलं...मैयाचा चेहरा अगदी तसाच हसरा निर्विकार मुखातील कळ्यांसारखे दात हास्य तेच...
अरे मैया क्या बोलती हो ? मी म्हणालो...
अरे हा बेटा परिक्रमा करते करते मैया की गोद में आखरी सांस लेले इससे बेहतर और क्या होगा ???
ते शब्द जणू अंतःकरण फाडत होते... टचकन डोळ्यात पाणी आले...अगदी अल्पकाळात एवढी ओढ एवढं प्रेम देणारी मैया सहज असं बोलते हे मनाला पटत नव्हतं...परिक्रमा पूर्ण करुन घराकडे जाण्याची ओढ असणारे आम्ही ते ऐकून अक्षरक्षः क्षणभर थिजल्यासारखे झालो...
आम्ही रसोई बनवली जेवन केलं तिथेच मुक्काम करुन दुसरे दिवशी निघालो त्या मैयाला नमस्कार करुन निघालो...
मैया फिर मिलेंगे...
हा बेटा ...मैयाने आश्वासन दिले...
चालत पुढे आलो ....
दुसरी परिक्रमा करताना तिथे गेलो तर तिथे आश्रम नव्हताच...
गेल्या वर्षीच म्हणे तो बंद झाला...पुढे त्या दोघी मैयाबद्दल अनेकांना विचारलं पण कोणीच काहीच माहिती दिली नाही... अनेकदा मैयाचा तो चेहरा पुढे येतो कुठपर्यंत आली असेल ती मैया ? भमाना पहाड चढताना भलेभले आडवे होतात या मैयाचं काय झालं असेल ? परिक्रमेत अनेक माताजी भेटतात पण एवढी आपुलकी तीही एवढ्या अल्पावधीत कधीच साधली गेली नाही. मैया समोर उभी रहाते ते मोग-याच्या कळ्याच्या दातांचं हास्य , मोत्यासारखे केस अन् प्रेमळ हास्य आजही आठवतं मन गलबलून जातं कदाचित नर्मदा मैयाने त्या मैयाच्या शब्दाला मान देऊन ते शब्द खरे केले असतील का ? काही क्षणांची लाभलेली सोबत पण आयुष्यभर स्मरते आहे आजही त्या हास्याबरोबर ते वाक्य जणू मनावर करवत फिरवतं
"मैया की गोद में आखरी सांस लेले इससे बेहतर और क्या होगा ?"
नर्मदेचा अपूर्वानंद....
सकाळीच नेमावरहून निघालो. रस्त्यात सलकनपूरला बीजासनी मातेचे दर्शन घेतले.
होलीपुराजवळ निर्मल झिरी आश्रमात टाटंबरी बाबांचे दर्शन घेतले. बाबा दिसायला 60-70 वर्षाचेच वाटतात पण 60-70 वर्षाचे लोक सांगतात आमच्या बालपणापासून बाबा असेच दिसतात. वयाचे गणित जुळत नाही. पण अनेक भाषा अवगत असणारे बाबा सर्वांशी प्रेमाने बोलतात. दर्शन घेऊन निघालो. बुधनीच्या पुढे हाॅटेलमधे जेवलो. आणि अतिशय खराब रस्ता सुरु झाला. ताशी वेग ताशी 15-20 किमी. जवळपास 50 किमी रस्ता उकरलेला. फुफाटा अन् दगड खड्डे चुकवताना अक्षरक्षः नको नको झाले.सायं. 8 पर्यंत रनिंग फक्त 200 किमी. मग मात्र NH 12 चांगला मिळाला. एकटाच चालक असल्याने पर्याय नव्हताच. पण रस्ता जरा बरा आल्याने सुसाट सुटलो.10 वा राजमार्ग चौराहावर चहा घ्यावा म्हटलं तर हाॅटेल शोधता शोधता थेट पुढे आलो. इथून जबलपूर 100 किमी. रस्ता सुनसान जाणारे येणारे कोणी नाही. थोडे खाच खळगे व वळणाचा रस्ता त्यामुळे शंभरी गाठून लगेच फिरावे लागे. आजूबाजूला सागाचे घनदाट जंगल रस्त्यात आडवे येणारे कोल्हे व उंदीर...बाजूला पहावं तर किर्र अंधार समोरचा काळाभोर रोड व पांढरे पट्टे नसल्याने अंदाजेच रोड धरुन चाललेली गाडी... चहाचा शोध चालूच..पण आता आशा संपल्यात जमा कारण कुठे वस्तीचे चिन्ह नाही...असतील तर छोटे सामसूम गावं व बाहेर 8 अंश तापमान त्यामुळे जो तो उबेला पडलेला...गाडीत आई आप्पा संतोषदादा व संदीपदादा पेंगलेले...नाडेकर व मी दोघे टक्क जागे...यंत्रवत चाललेली गाडी...वळण आलं की चौथा गियर व अंदाजे शंभर मीटर जरी रोड दिसला की थेट सहावा गिअर...एक तंद्री लागलेली...नाडेकरांनी जबलपूरला फोन करुन येतोय असं कळवल्याने जावंच लागणार होतं बारा एक पर्यंत पोहचणं अपेक्षित...मागील खराब रोडचं उट्ट काढत बेफाम सोडलेली गाडी...आजूबाजूच्या अंधारातही एकच मोठ्ठा दिलासा की या रोडने आपण चालत गेलोय मग चिंता कशाची? दोन्ही परिक्रमांचे अनुभव डोळ्यासमोर फिरताहेत अन् अचानक जंगल संपून गावातील घराच्या लाईट दिसल्या. एक टपरी उघडी व दोन चार लोक दिसले...शंभर फूटावरचं दृष्य... शंभरी गाठलेली... खटाखट गिअर उतरवत थेट टपरी समोर थांबलो. खाली उतरलो. बाहेरची थंडी पायापासून डोक्यापर्यंत जाणवली. नाडेकर व मी खाली उतरलो. रस्ता ओलांडून टपरीत गेलो तर एक पाय लंगडा असल्याने हातात कुबडी घेतलेला एक तरुण पाहिला. अचानक काही आठवलं. एका परिक्रमेत इथे थांबून चहा घेतला होता.
अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे तकत वर बसलो...
"नरबदे हर भैया"
"नर्मदे हर"
बतावो भैया कैसे हो ? मी विचारले
हा बिलकुल ठीक...आप कैसे हो?
"बढिया.....
क्या चल रहा है ये ?" मी विचारले
कुछ नही गुरुजी सामोसे वगैरह रखनेके लिए बना रहा हूं...त्याने उत्तर दिले...
एका हातात काठी घेऊन पोरांना सुचना देत चिखल व वीटेत चाललेलं बांधकाम....
" भैया जब हम पैदल आये थे आपका होटल छोटा था" मी आठवण सांगितली
" हां गुरुजी तब भी छोटा था आज भी छोटा ही है ...त्याने नम्रपणे सांगितले...
दो चाय बनावो भैया मी म्हणालो...
त्याने लगेच चहा ठेवला....
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या चहा आला...चहा घेतला...नाडेकर सुटे पैसे द्या मी नाडेकरांना म्हणालो....
भैया कितने हुए चाय के ?मी विचारले...
बाबा आपके पैसे नही लूंगा ...तो म्हणाला...
देखो भैया तब तो पैदल परिक्रमा में थे तो फ्री चाय पिलायी थी आज गाडी से चल रहे है तो पैसे लेने पडेंगे मी म्हणालो....
नही गुरुजी पैसे नही लूंगा बस अपनी तरफसे सेवा करता हूं मैया तो खूब देती है...
मी आग्रह केला पण व्यर्थ...
देखो भैया दान तो ऐसा चाहिए जो दाता भूल जाए और लेनेवाला याद रखे लेकिन आज तो उल्टा है...मी म्हणालो...
मैने चाय पिलायी होगी मुझे तो याद नही लेकिन अब के पैसे नही लूंगा तो निर्धाराने म्हणाला...
मी निमूटपणे निघालो...
गाडीजवळ आल्यावर आप्पा म्हणाले पैसे का दिले नाहीत ? मी म्हणालो तो माझा मित्र निघाला म्हणून पैसे घेतले नाहीत...
गाडी सुरु करुन निघालो...पण डोळ्यासमोर ते दृष्य होतं...चिखलाचा ओटा त्यावर कपाट...दिवसाला फार फार तर 200 रु धंदा होत असणार व एरवी रात्री कुठेच चहा नसताना पाच चा चहा दहा रुपयाला विकणारे लोक कुठे व दोन स्पेशल चहा फुकट देऊन सेवा करणारा तो तरुण कुठे....
अपंग असूनही जीवनाची लढाई जिद्दीने लढणारा व त्यातही नर्मदा मैयाचे प्रेम व सेवा भाव जपणारा तो तरुण ....त्या निर्जन काळ्या कभिन्न अंधारात दाट जंगलात एक मंगलतेचा दीप...पुढे जवळपास शंभर किमी गेलो पण अगदी त्या भयाण रात्री दाट जंगलात व निर्मनुष्य रस्त्यावर भिती वाटलीच नाही....हवे त्या ठिकाणी मैया कोणत्याही रुपात सदैव हजर असतेच याची खात्री पटली होती...विषय दहा रुपयाच्या चहाचा नव्हता तर लाखमोलाच्या सेवेचा होता....
अगदी स्वप्नच वाटावं असं सारं काही....
नर्मदे हर....