ज्योतिबेन - सेवाव्रती बेनतीर्थ
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
ज्योतिबेन - सेवाव्रती बेनतीर्थ
अहर्निश सेवाव्रती बेनतीर्थ
।।नर्मदे हर।।
नर्मदे हर! तसे सर्वच रेवाखंड वासी अहर्निश सेवाव्रती आहेत.आपल्या घासातला घास काढून परिक्रमावासींची भूक भागवणारे,स्वतः थंडीत कुडकुडत परिक्रमावासींना आपल्या चंद्रमौळी झोपडीत, घरात आपल्या मायेचे उबदार पांघरुण घालणारे.
असेच एक सेवातीर्थस्थान आहे मैयाच्या उत्तर तटावर भरुच,शुक्लेश्वर नंतर येणारे मंगलेश्वर येथे.तिथे राहतात जोशी कुटुंबीय.गेल्या तीन पिढ्यांपासून हे घर परिक्रमावासींची सेवा करत आहे.चहा-पाणी, भोजन-निवास यासह परिक्रमावासीला गरज असलेली वस्तू कपडा वगैरे देण्यापर्यंत सगळी सेवा.
एकत्र कुटुंब पद्धती अवलंबणाऱ्या या घरातील लहानमोठे सर्वच सदस्य सेवेसी तत्पर आहेत.ज्योतिबेन,बोनीबेन,आणि कमलाबेन,तिघीही सेवाव्रतस्थ राहण्यासाठी अविवाहित राहिल्या आहेत.लग्न संसार यात अडकलो तर हे सेवाव्रत करणे कदाचित नीटसे जमणार नाही या विचाराने लग्नच न करण्याचा निर्धार केलेल्या या तिघी म्हणजे लोकमाताच आहेत.
तेजस्वी मनःचक्षूंची परमेश्वरी देणगी लाभलेल्या कमलाबेन लौकिकार्थाने अंध आहेत.पण एकदा एखाद्याचा आवाज ऐकला की त्या कधीच विसरत नाहीत.२०११च्या पहिल्या परिक्रमेत माझी त्यांची प्रथम भेट झाली आणि नंतरच्या प्रत्येक परिक्रमेत त्यांच्या घरी गेल्यावर मी नुसते नर्मदे हर म्हटलं की त्या,आवो वंदना,पधारो कैसी हो?असं विचारतात. कमलाबेन यांचा घरातील वावर एखाद्या डोळस व्यक्तिपेक्षाही सहज असतो.घराचा केर काढतात तेव्हा तर बघत राहावं.अगदी कानाकोपऱ्यातून स्वच्छ, एखादा कपटाही कुठे राहात नाही.
ज्योतिबेन,शुक्लेश्वर येथील स्कूल च्या प्रिन्सिपॉल आहेत.इतक्या जबाबदारीच्या पदावर राहुनही सेवेसी तत्पर.शाळेतून आल्या की लगेच उत्साहाने परिक्रमावासींची वास्तपुस्त घेणार,चहापाणी भोजनप्रसाद याची चौकशी,वाढप अशा नानाप्रकारच्या कामांना सुरवात करतात.शाळेत जाण्या अगोदरही सर्व व्यवस्था पाहुनच जाणार. त्यांनी दरवर्षी पंधराएक दिवस रजा घेत परिक्रमा पुर्ण केली आहे.नर्मदे हर!
बोनीबेन धाकटी भगिनी. सगळा स्वयंपाक स्वतः करतात. भोजनप्रसाद इतका पौष्टिक, स्वादिष्ट आणि सात्विक असतो की विचारुच नका.एकादशी वगैरे असेल तर फराळाचे विविध पदार्थ आणि एरवी निरनिराळे प्रकार असतात भोजनासाठी.
तिघीही म्हणजे मुर्तिमंत उत्साह. मैयाच त्यांच्या रुपाने आपल्या परिक्रमा करणाऱ्या लेकरांची काळजी घेत असते.म्हणूनच हे आहे बेनतीर्थ.नर्मदे हर!
सौ.वंदना परांजपे.