नर्मदा परिक्रमा - उदय नागनाथ
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदा परिक्रमा - उदय नागनाथ
नर्मदा परिक्रमा - उदय नागनाथ
परिक्रमेविषयीचे मनोगत / पूर्वपिठीका आणि परिक्रमेची पूर्वतयारी...
नर्मदा परिक्रमेविषयी मनोगत -
माझे आई व वडील दोघेही धार्मिक.
आईने घरी धार्मिक संस्कार केले.तर वडिलांबरोबर पुण्यातील आनंदाश्रमात चालणाऱ्या अखंड गुरुचरित्र सप्ताहात वाचन करण्याची संधी मिळाली. नंतर पारायण अनेक वर्षे करीत होतो. वडील मला अनेक वर्षे पुण्यात, रास्ता पेठेतील माळी बाबांच्या मठात व रास्तेवाड्यातील दत्त मंदिरात न्यायचे. आई - वडिलांबरोबर दरवर्षी सवडीने कुलस्वामिनी व खंडोबाच्या दर्शनाला जायचो. तसेच त्यांच्या बरोबर हरिद्वार व हृषिकेश, वाराणसी, प्रयाग व इतर ठिकाणी प्रवासाचा योगही आला. या सर्वांतून कुठेतरी धार्मिक आवड निर्माण झाली.घरात येणाऱ्या थोरा मोठ्यांच्या होणाऱ्या अध्यात्मिक व धार्मिक चर्चा कानावर पडायच्या. यादरम्यान केव्हातरी नर्मदा परिक्रमा केलेल्या व घरी आलेल्या एक-दोन व्यक्तींचा अनुभवही कानावर पडला. हे काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी मनात पक्क्या होतात, असे म्हणतात. इथून नर्मदा परिक्रमा हा विषय मनात रुजला असावा.
त्याला पंचवीस वर्षांनी अंकुर फुटले, असे म्हणता येईल.
मला देशभर सहकुटुंब प्रवास करण्याची संधी मिळाली. तसेच प्रवासावरील विविध पुस्तके वाचनात आली. हळूहळू वाचनाचा व्यासंग वाढला. यातूनच केव्हातरी नर्मदा परिक्रमेची पुस्तके वाचनात आली. हळूहळू याच विषयावरची नवीन पुस्तके वाचून ज्ञानात भर पडली. यातील वेगळेपण जाणवून परिक्रमेची ओढ वाढू लागली. आपणही असे केव्हातरी करूया, या विचाराने डोक्यात घर केले.
मी विवाहित असून, घरी आई,पत्नी, मुलगा असे चौघेजण. कौटुंबिक जबाबदारीतून नर्मदापरिक्रमेसाठी केव्हातरी वेळ काढून, अनुभव गाठीशी बांधावा असे ठरवले. माझी व्यावसायिक जबाबदारी, आर्थिक नियोजन, मुलाचे शिक्षण व अन्य बांधिलकी यातून केव्हा वेळ मिळेल, याची वाट पाहत होतो. खरेतर माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले होते. ऑगस्ट २०११ मध्ये माझ्या मुलाची अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची अॅडमिशन झाली. त्यानंतर एक दिवस माझ्या पत्नीने मला सुचवले की,अजून पाच वर्षे थांबल्यास तुझे वय वाढणार. त्यावेळची शारीरिक परिस्थिती आता सांगता येणार नाही. तुझी प्रकृती आता चांगली आहे. मिहिरची ऍडमिशन झाली आहे. तेव्हा तू आत्ताच परिक्रमेला जाण्याचा विचार का करीत नाहीस. माझी पत्नी हे मनापासून बोलली आणि माझीही इच्छा होती. कोणताही नवस नाही, मागणी नाही, अपेक्षा नाही. इच्छा फक्त परिक्रमा करण्याची. आठवडाभर विचार केला. घरातील सर्वांशी, सासू-सासर्यांशी बोललो या सर्वांनी मनापासून परिक्रमेसाठी परवानगी दिली. परिक्रमेसाठी जाण्याचे ठरले. नोव्हेंबर २०११ मध्ये चातुर्मास संपल्यानंतर परिक्रमेसाठी प्रस्थान ठेवण्याचे नियोजन केले.तीन महिन्याचा कालावधी पूर्वतयारीसाठी माझ्या हातात होता. पूर्वतयारीसाठी परिक्रमा करून आलेल्या थोरामोठ्यांच्या गाठीभेटी, त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. इंटरनेटवरून माहिती मिळवली. बरोबर नेण्याच्या साहित्याची यादी व खरेदी केली. ८ नोव्हेंबर २०११ रोजी प्रदोष होता. त्या दिवशी घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वाद आणि पत्नी व मुलगा यांच्या शुभेच्छा घेऊन रेल्वेने प्रस्थान केले. माझा मित्र किरण हा न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये काम करतो, तो माझ्या बरोबर होता.
सर्वात महत्त्वाचा म्हणजे चालण्याचा सराव. मी दररोज एक ते सव्वा तास पुण्यात टेकडी चढणे, उतरणे व चालणे असा व्यायाम करतो. त्यात थोडीशी वाढ केली सकाळ-संध्याकाळ टेकडी चढणे, उतरणे, सॅक पाठीवर घेऊन चालणे असा सराव केला. परंतु हा सराव किती अपुरा होता, हे मला प्रत्यक्ष परिक्रमेदरम्यान अनुभवयास मिळाले.
माझ्या या परिक्रमेत मी माझ्या शारीरिक क्षमतेबरोबर, कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून त्या त्या वेळी योग्य वाटतील ते तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बदल केले. परिक्रमेदरम्यान कोणताही विशिष्ट अट्टाहास मी ठेवला नाही. पहाटे उठून भर थंडीत, थंड पाण्याने स्नान करणे, याला मी मुरड घातली. परिक्रमेदरम्यान कर्मकांडातबाबतचे माझे विचार कोणावर लादण्याचा प्रयत्न केला नाही आणि माझ्यावर विचार लादणाऱ्यांपासून दूर राहिलो. नर्मदामैयाच्या सहवासाचा लाभ व अनुभव घ्यावा, मैया पुत्र व पुत्रींचे मनोगत, भावना जाणून घ्याव्यात ही मुख्य भूमिका या परिक्रमेमागे होती. तसेच मैयेच्या कुशीत राहणारे सेवाभावी, सर्वांना समजावेत, तेथील सामाजिक,भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती सर्वांना माहिती व्हावी, असा प्रयत्न मी माझ्या परीने केला. काही अंशी तो यशस्वी झाल्याचे मला समाधान आहे. या सर्व परिक्रमेत नर्मदामैयाची वेगवेगळी रुपे, माणुसकीचे झरे, वेगवेगळ्या वेळी- वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवयास मिळाले. स्थानिक, सेवाभावी, लहान-थोर, संत-महात्मे, गृहस्थ, गृहिणी, दिसल्या- भेटल्या. त्यांच्याकडून अनुभव, शिकण्यास मिळाले. कदाचित ही सर्व रूपे दैनंदिन कामात पहावयास अनुभवण्यास मिळाली नसती.
माझ्या कुटुंबाने उदार अंतकरणाने दिलेल्या परवानगीने हे साध्य होऊ शकले. शहरी दैनंदिन आयुष्यात या सर्वांचा कितपत उपयोग होईल हे ज्याचे त्याने ठरवावे. ज्याला जसे जमेल तशी त्याने परिक्रमा करण्याचा प्रयत्न करावा, असे मला नम्रपणे नोंदवावेसे वाटते. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे हे केव्हाही चांगले. आपल्या सोयीने जमेल तेव्हा, जमेल तितके दिवस परिक्रमा करणारे परिक्रमावासीही असतात, असे परिक्रमेत समजले. सोयीनुसार येऊन परिक्रमा करणाऱ्यांची भावना यामुळे लक्षात आली.
प्रत्यक्ष नर्मदामैयाच्या कुशीत शिरल्याशिवाय तिच्या मायेचा ओलावा जाणवत नाही. माझे कुटुंब,मित्र हितचिंतक, सहकारी, वेळोवेळी बरोबर असलेले परिक्रमावासी, मैयैकिनारी असलेले सेवाभावी यांच्या ऋणात राहण्यात मला आनंद वाटेल, ज्यांच्यावाचून परिक्रमा पूर्ण करता येणे अवघड आहे.
सर्वसाधारणपणे गोष्टींचे किंवा कथनाचे - रोचक, भयावह आणि यथार्थ असे तीन प्रकार असतात. यातील तिसऱ्या प्रकारचे म्हणजे यथार्थ लेखन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. लोकांना आवडेल, असे लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा हा माझा प्रयत्न होता आणि तो काही अंशी यशस्वी झाला असे म्हणता येईल.
मी अजूनही कोणाकडून अनुग्रह घेतलेला नाही. यथाशक्य श्रीगुरुदत्तात्रेयांची सेवा करतो. नर्मदापरिक्रमेसाठी कोणाचाही आदेश नव्हता. या लेखनात कोणतेही चमत्कार, अद्भुत गोष्टी वाचनात येणार नाहीत. साचेबद्ध लिखाणाऐवजी आयोजित चाकोरीबाहेरचे ताजे फोटो,व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, धार्मिक स्थळे यांचे वेगळेपण वाचकांसमोर ठेवण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केलेला आहे.
माझ्या या परिक्रमेविषयी अगदी थोडक्यात सांगायचे तर, एक समृद्ध अनुभव असे म्हणता येईल. प्रतिकूल परिस्थितीत प्रवास व निवास,अनोळखी प्रदेश व व्यक्ती, भौगोलिक विषमता, आर्थिक परिस्थितीने गरीब परंतु मनाने उदार अशी भेटलेली माणसे, प्रादेशिक संस्कृती, रीतिरिवाज, प्रादेशिक असमतोल, आर्थिक विषमता, पर्णकुटी ते पंचतारांकित आश्रम, तसेच जंगल, मैयाची उगमापासून रेवासागरपर्यंतची विविध रूपे अशी ही काही मी अनुभवलेली वैशिष्ट्ये आहेत. याबद्दल वाचकांना ज्या भावना, विचार वाटतील, ते स्वागतार्ह आहेत.
सत्यनारायण म्हणा किंवा सत्यदेव, उद्दिष्ट महत्त्वाचे हा माझा विचार. या पहिल्या प्रयत्नात मला आलेले अनुभव इतरांना, त्यांचे परिक्रमेसाठीचे विचार पक्के करायला आणि मला माझ्या पुढच्या प्रयत्नात सुधारणा करण्यासाठी उपयोगाचे ठरतील अशी खात्री वाटते. नर्मदामैयाची कृपा आहे व अशीच राहो, ही गुरुदत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमेची पूर्वतयारी करताना...
१...परिक्रमा आपल्याला कोणत्या हवामानात उदा : उन्हाळा/थंडीत करायची हे नक्की करावे.
२...उन्हाळ्यात सामान कमी न्यावे/ वहावे लागते. परंतु येथे मध्यप्रदेशात उन्हाळा कडाक्याचा असतो. प्रसंगी ५० डिग्रीस तोंड द्यावे लागते. उन्हामुळे तहान लागण्याचे, दमछाक होण्याचे प्रमाण जास्त असते. डासांचा प्रादुर्भाव खूप असतो.
३...थंडीमध्ये गरम कपड्यांमुळे वजन वाढते. येथे थंडी खूप असते. क्वचित ठिकाणी (अमरकंटक) शून्य डिग्री पर्यंत तापमान कमी होते. प्रसंगी उघड्यावर झोपावे लागते. त्याची तयारी करायला हवी. थंडीत उघड्यावर झोपणे तसे सोपे नाही, हे लक्षात घ्यावे.प्रत्येक ऋतूंचा अनुभव वेगळा.
४...जी बॅग किंवा सॅक आपण परिक्रमेत बरोबर नेणार असू, त्याची पुरेशी आधी खरेदी करावी आणि प्रॅक्टिस दरम्यान त्याचा कणखर व टिकाऊपणा तपासून घ्यावा. त्याचे वजन फार असू नये. फार तर एखाद्या किलोपर्यंत वजन असावे.
५...उन्हाळ्यात बरोबर नेण्यासाठी कपड्यांचे दोन जोड (लुंगी, झब्बा, साडी, ब्लाउज) असावेत. एक शाल ,टॉवेल, टोपी, झळा लागू नयेत यासाठी मोठा रुमाल, पंचा इ वस्तू वेळोवेळी वापरण्यासाठी लागतात.
६...थंडीत वर अनुक्रमांक ५ मध्ये नमूद केलेल्या वस्तूंशिवाय कानटोपी, पातळ पण उबदार स्वेटर, थर्मलवेअर, चांगल्या कंपनीचे दर्जेदार साॅक्स, कमी वजनाचे ब्लॅंकेट इत्यादी वस्तूंचे आवश्यकता भासते. ब्लॅंकेट, शाल , थर्मल वेअर यांचे वजन कमी करण्यासाठी स्लीपिंग बॅगचा पर्याय आहे. ती नेता येऊ शकते.
७...झोपण्यासाठी सतरंजी/ फोल्डिंगची चटई न वापरता, ट्रेकिंगसाठी वापरले जाणारे कॅरीमॅट वापरावे. ते अगदी कमी वजनाचे असते. त्याची गुंडाळी पण होते. ते ओले होत नाही. पटकन साफ होते. गरजेनुसार औषधे,पाण्यासाठी स्टेनलेसची दुधासाठी वापरली जाणारी स्टीलची किटली, सँडल किंवा बूट,नेलकटर, जपासाठी माळ, सुई दोरा.
८...अंगाचा किंवा कपड्याचा साबण, ग्लुकोज पावडर ,डोक्याचे तेल, सातूचे पीठ, खाण्याच्या वस्तू ,अनावश्यक औषधे, कपड्यांचे दोन पेक्षा जास्त जोड ,चप्पल-बूट याचा एक जादा जोड इत्यादी गोष्टी बरोबर नेऊ नयेत. विनाकारण वजन वाढते. त्यामुळे चालताना त्रास होतो. नकोशा झालेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो आणि फेकून देणेही जीवावर येते.
९...जी सॅक/ पिशवी आपण बरोबर नेणार आहोत त्याच्यात नेण्याचे सामान भरून, किमान दोन महिने चालण्याचा सराव करावा.
१०...हा सराव म्हणजे उन्हाळ्यात जायचे असेल तर सकाळी सहा वाजता सॅक भरून घराबाहेर पडावे. जवळच्या गावातील किंवा डोंगरातील मातीच्या वाटेवरुन चालण्याचा सराव करावा. थंडीत प्रवास करणार असाल तर उजाडल्यानंतर वरील ठिकाणी गरम कपडे घालून चालण्याचा सराव करावा. हे सर्व मी अनुभवल्यामुळे इच्छुक परिक्रमावासींना कमी शारीरिक अडचणी याव्यात व माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा, म्हणून तपशीलात माहिती देत आहे.
११...उन्हाळ्यात/ थंडीत रात्री आपल्या घराबाहेर पार्किंग मध्ये झोपण्याचा सरावही करावा. पूर्ण रात्र घराबाहेर झोपावे. उन्हाळ्यात घराबाहेर डासांचा तर थंडीत थंडी व बोचरे वारे, दवामुळे चादर ओली होणे , इ अनुभवता येते.
१२...चालण्याचा सराव करताना बरोबर नेण्यासाठी घेतलेले चप्पल-बूट, सँडल वापरावे. ऐनवेळी खरेदी करून थेट परिक्रमेत वापरू नयेत. त्याने चालताना त्रास होण्याची शक्यता असते.
१३...बरोबर नेण्याचे कपडे शक्यतो कॉटनचे व पांढरेच असावेत. कॉटनच्या कपड्यात घाम शोषला जातो आणि पांढरे कपड्यामुळे ऊन लागत नाही. तसेच पांढरे कपडे परिक्रमावासी असल्याचे निदर्शक आहेत.
१४...परिक्रमेदरम्यान खूप वैविध्य असलेले पाणी, उदा : मैयेचे, कॅनॉलचे, विहिरीचे, बोअर वेलचे,हँड पंपाचे प्यावे लागते. प्रत्येक चवीत फरक असतो. सुरुवातीस अवघड जाते, पण नंतर सवय होत जाते. बाजारात मिळणारी पाणी शुद्धीकरणाची औषधे बरोबर नेऊ नयेत. त्याने वजन वाढते.तसेच औषध टाकून शुद्ध होण्यासाठी लागणारा कालावधी हातात नसतो. याशिवाय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा किती साठा करणार, हे ही महत्त्वाचे असते.
१५...माझ्या अनुभवानुसार कॉलरा, टॉयफाईड यांच्या लसी तर मलेरिया न होण्याची औषधे डॉक्टरी सल्ल्यानुसार परिक्रमेस निघण्यापूर्वी जरूर घ्यावीत. त्यामुळे पाण्यातून होणारे हे दोन मोठे आजार तरी किमान टाळता येतात. याचा मला उपयोग झाला. प्रवासात मला कावीळ व टाॅयफाईडचे स्थानिक रुग्ण पहावयास मिळाले.
१६...उन्हाळ्यात तापलेल्या रस्त्यांवर चालण्याचा अनुभव नसल्यामुळे तळपायाला फोड (बॉईल्स) येतात. ते टाळण्यासाठी उन्हात चालण्याचा सराव आवश्यक आहे.
१७...अनवाणी पायाने परिक्रमा करायची असल्यास त्याचाही सराव करावा. परिक्रमेदरम्यान अणुकुचीदार काटे,दगड वाटेवर असतात, हे माहितीसाठी नमूद करीत आहे.
१८...रोख रक्कम बरोबर ठेवणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही किमान आवश्यक, गरजेच्या व वेळोवेळी लागणाऱ्या वस्तू/गोष्टी (चहा,बिस्किटे) खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. परिक्रमेदरम्यान मोफत निवास, भोजन प्रसाद याची व्यवस्था होते. काही ठिकाणी सदाव्रतही मिळते. परिक्रमावासींना मोफत वस्तू वाटप केल्या जातात. हे गुजरात राज्यात जास्त प्रमाणात होते. मध्य प्रदेशातील परिक्रमेचा बराचसा भाग हा आदिवासीबहुल, जंगलाचा, मागास, गरीबीचा असा आहे. त्यामुळे किमान चहा-बिस्कीट, डाळ खरेदीसाठी पैसे लागतात. या भागातील औदार्य कल्पनातीत आहे. तरीसुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून व माणुसकी म्हणून तरी त्यांच्याकडे मागू नये, असे मला सुचवावेसे वाटते.
१९...परिक्रमावासीला स्वयंपाक करता यायला हवा. विशेषतः उत्तर तटावर नेमावरच्या (मध्यप्रदेशात) पुढे अमरकंटकपर्यंत बहुतेक ठिकाणी तयार अन्नक्षेत्र नाही. गव्हाचे पीठ व मीठ मिळते. या ठिकाणी स्वतःला स्वयंपाक करता येणे आवश्यक आहे. आश्रम/ मंदिरात भांडी, तवा, पातेले ,पळी, इंधन, लाकडे मिळतात. काही ठिकाणी लाकूडफाटा स्वतःला आणावा लागतो स्वतःकडे डाळ असेल तर वरण,रोटी किंवा बाटी (गव्हाचे अंडाकृती गोळे) निखार्यावर भाजून, भोजनप्रसाद सिद्ध करता येतो.
२०...नर्मदा मैयावर सरदार सरोवर, ओंकारेश्वर महेश्वर, पुनासा, बरगी व अमरकंटक अशी पाच-सहा धरणे आहेत. काही पूर्ण तर काहींची उंची वाढवायचे काम चालू होते. या धरणांमुळे , धरणाच्या मागील भागात मैयेला येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्या, नाले यांना बारमाही पाणी राहू लागले आहे. पायी चालताना अचानक पाण्याचा साठा समोर येतो. त्यामुळे वळसा घालून पुढे जावे लागते. याच्यामुळे हेलपाटा पडतो आणि वेळ वाया जातो. हेलपाट्यामुळे उशीर झाल्यास अंधारात रस्ता चुकण्याची शक्यता निर्माण होते. काही गावांचे मैयेपासून वरच्या बाजूला, दुसरीकडे तीन-चार किलोमीटर दूरवर पुनर्वसन झाले आहे. या सर्वांची माहिती स्थानिकांकडून घेत पुढे चालत राहावे. यामुळे मनस्ताप टाळता येतो.
२१...सर्व परिक्रमा मार्गावर हातात काठी असणे उपयोगाचे ठरते. काठीचा उपयोग हा मार्गातील छोटे नाले, उपनद्या पार करताना अंदाज घेण्यासाठी व तोल सावरण्यासाठी होतो. तसेच उताराच्या व चढाच्या रस्त्यावर तोल सावरण्यासाठी काठीचा वापर करता येतो. वाटेत अंगावर आलेली कुत्री हाकलणे हा ही काठीचा एक उपयोग आहे.
२२...परिक्रमा मार्गात कोणतेही अनाठायी धाडस करू नये. पाण्यावरून उड्या मारणे, उतारावरून पळणे व घसरून पडणे, यामुळे चालण्यावर मर्यादा येतात व उत्साहावर विरजण पडते.
२३...सकाळी उजाडल्यावर पुढील प्रवासासाठी निघावे. सायंकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत प्रवास करावा. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुक्कामी पोहोचावे. मुक्कामी पोहोचल्यावर गावातील प्रातर्विधीची जागा व पुढील गावाचा रस्ता याची माहिती घेऊन ठेवावी.
२४... मैयेच्या पाण्यात बऱ्याच ठिकाणी मगरी आहेत. शक्य असल्यास पाण्यात स्नानासाठी उतरू नये. पाणी अस्वच्छ होण्याची शक्यता असल्यामुळे, पाणी भरून घेऊन किनाऱ्यापासून दूर स्नान करावे. अपरिहार्य असल्यास पाण्यात दोन-चार दगड टाकून मगच पाण्यात उतरावे. पाण्यात दगड टाकल्याने जवळपासच्या मगरी घाबरून दूर पळतात, असे समजते. निर्मनुष्य, शांत पाणी असलेल्या ठिकाणी पाण्यात उतरून स्नान करण्याचे भलतेच धाडस करू नये. अशा ठिकाणी मगरींचा हल्ला होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२५...वरील सर्व सूचना व माहिती, गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल व्यक्तींसाठी आहेत. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवावे. फक्त कफनी व कमंडलूवर परिक्रमा करणारे संत, महात्मे यांची गोष्ट और असते.
माँ नर्मदा परिक्रमा पार्श्वभूमी आणि अनुक्रमे...असे हे लेखन केले आहे...
भारतीय प्राचीन परंपरा आणि अध्यात्मिक विश्वास आणि श्रद्धा असणाऱ्या व्यक्तिंसाठी फक्त ही लेखमाला आहे. अन्य व्यक्तिंनी यावर विश्वास ठेवावा असा आग्रह नाही. संदर्भाच्या काही चुका आढळल्यास क्षमा असावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दत्त महाराजांच्या कृपेने आणि गृहस्थाश्रमातील जबाबदा-या असूनही पत्नी सौ वर्षा हिने उदार मनाने परवानगी दिल्याने मला जो नर्मदा मैया सहवास लाभला...त्याच्या अनुभवातील पहिले पुष्प...
नर्मदा परिक्रमा -पुष्प १
भारतातील अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील...
अशा ज्या पश्चिम वाहिनी सरिता आहेत...
त्यापैकी पुराणकाळापासून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आणि पौराणिक दृष्टीने महत्वाची ...अशी माँ नर्मदा
माता नर्मदा मैकल पर्वतामध्ये अमरकंटकला उगम पावणारी... आणि
अवखळ, अल्लडपणे या धरित्रीवरुन आजूबाजूचा प्रदेश जीवनदायी आणि...
सुजलाम सुफलाम करीत...
साधू, संत, महंत व सामान्यांना अध्यात्मिक आणि आदिभौतिक बहुआयाम देणारी...
ही माँ नर्मदा...
कठपोर आणि मीठीतलई येथे...
सागरात एकरुप होते...
ते गुजरातमधील ज्ञात ठिकाण म्हणजे...
भडोच...
या माँ नर्मदा आणि सागर संगमाला...
रेवासागर असे म्हणतात....
अमरकंटक ते रेवासागर हा सुमारे दोन्ही तीरावरुन नर्मदा परिक्रमेचा मार्ग...
एकूण, सुमारे ३००० किमी चा...
मार्कंडेय ऋषी यांना माँ नर्मदा परिक्रमेचे आद्य परीक्रमावासी मानतात.
माँ नर्मदा परिक्रमा ...
सुरुवात करताना माँ नर्मदा आपल्या उजव्या हाताला असावी, असा प्रघात आहे...
अमरकंटक ते कठपोर पर्यंत दक्षिण तटावरील परिक्रमा...
कठपोरला बोटीतून रेवासागर पार करुन मिठीतलईला उतरून...
अमरकंटक पर्यंत उत्तर तटावरील परिक्रमा ...
मार्कंडेय ऋषी यांनी सुमारे पावणेचार तपाच्या ( एक तप म्हणजे १२ वर्षे ) काळाची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.
मार्कंडेय ऋषींनी केलेली ही परिक्रमा...
माँ नर्मदा आणि तिला येऊन मिळणाऱ्या व आपले जीवन समृद्ध करणा-या उपनद्या यांच्या उगमापर्यंत जाऊन परत नर्मदा तिरी येऊन पुन्हा नर्मदा काठाने वाटचाल...
अशी पूर्ण केली...
थोडक्यात, मार्कंडेय ऋषींनी , माँ नर्मदा आणि तिच्या उपनद्या कोणालाही न ओलांडता केलेली व आजपर्यंत कोणीही न करु शकलेली...
अशी एकमेवाद्वितीय नर्मदा परिक्रमा आहे, अशी धारणा आहे...
सध्या माँ नर्मदेची परिक्रमा ही...
मैया किना-याने सोयीनुसार कोठूनही उचलतात ( सुरू करतात याला परिक्रमा उचलली अशी म्हणण्याची पद्धत आहे ) ...व त्याच ठिकाणी पूर्ण करतात.
थोडक्यात... उपनद्या ओलांडून परिक्रमा केली जाते...
म्हणून मार्कंडेय ऋषी यांनी
केलेली परिक्रमा...एकमेवाद्वितीय आहे, असे मानतात...
माँ नर्मदा परिक्रमा कोठुनही सुरू केली तरी...
ती पूर्ण झाल्यावर परिक्रमावासीला...
ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाला यावेच लागते, तसा प्रघात...
याची थोडक्यात तीन कारणे अशी...
पहिले कारण ...माँ नर्मदा परिक्रमा सुरू करतांना परिक्रमावासीला एका बाटलीत माँ नर्मदेचे जल भरून सोबत ठेवावे लागते...
पूर्वी साधूसंत कमंडलू भरुन सोबत न्यायचे...
आणि सरदार सरोवर धरणामुळे बारमाही छोट्या नाल्यांमध्ये बारमाही पाणी भरून राहिल्याने व परिक्रमेचा रस्ता खंडित झाल्याने...परिक्रमावासीला माँ नर्मदा काठावरुन रस्ता नसल्याने दूरवरून प्रवास करावा लागला तर...
आपण माँ नर्मदा आपल्या सोबत आहे
ही भावना मनात राहते...
दुसरे कारण... या बाटलीतील जल परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वरला अर्पण करावे लागते...
तिसरे कारण...परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर परिक्रमावासीने ओंकारेश्वरला ममलेश्वराच्या मंदिरात प्रायश्चित्त विधी करणे अपेक्षित आहे, असे नर्मदा पुराण सांगते. परिक्रमेदरम्यान परिक्रमावासीकडून जाणते अजाणतेपणे कोणाचा मृत्यू झाला असल्यास किंवा हत्या झाली असल्यास पापक्षालन करण्यासाठी हा प्रायश्चित्त विधी ओंकारेश्वरला करतात...
भारतात एवढ्या सरिता असताना...
नर्मदा परिक्रमाच का महत्वाची...
ती केव्हा सुरू करतात...
कशी करतात...
तिचे नियम याविषयी पुढील पुष्पात...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २
माँ नर्मदा परिक्रमाच का महत्वाची...
भगवान शंकराच्या तपश्चर्येच्या वेळी घामातून निर्माण झालेली...
भगवान शंकराकडून...कधीही नष्ट होण्याचा वर प्राप्त झालेली...
म्हणून...
गंगा...केवळ कनखलमध्ये ( हरिद्वार मधील एक गाव )
सरस्वती... केवळ कुरुक्षेत्र मध्ये
तर...
माँ नर्मदा...सर्वत्र पवित्र असलेली...
म्हणून...
गंगेत एक स्नान केल्याने...
सरस्वतीमध्ये तीन स्नान केल्याने...
यमुनेत सात स्नान केल्याने...
पाप मुक्ती होते...
तर..
माँ नर्मदेच्या केवळ दर्शनाने...
पापमुक्ती होते...
म्हणून...
नर्मदा म्हणजे... नराच्या मदाचे हरण करणारी, त्याचे गर्वहरण करणारी, आणि
एवढे करुनही आईसारखे प्रेम करुन...
मोक्ष देणारी...
म्हणून...
या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांमुळे ही माँ नर्मदा च फक्त परिक्रमेसाठी योग्य आहे...
माँ नर्मदा परिक्रमेची सुरुवात...
चातुर्मास संपल्यानंतर माँ नर्मदेच्या परिक्रमेस सुरुवात करतात.
त्याचे भौगोलिक कारण असे आहे की, पावसाळा संपतो, काठचे रस्ते सुकतात,
शेतकरी शेती कामातून सवड काढू शकतात, चातुर्मासातील उपवास, व्रतवैकल्ये संपलेली असतात, माँ नर्मदा दुथडी भरुन बोलावत असते, सण वारांचे दिवस येऊ घातलेले असतात, परिक्रमावासीयांचे स्वागत करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण असते...
पावसाळ्यात सर्वत्र पाणी, चिखल, चिकचिक असते. आसन लावायला ( निवा-यासाठी जागा शोधणे याला आसन लावणे म्हणतात ) कोरडी जागा दुरापास्त असते.
यामुळेच चातुर्मास संपल्यानंतर परिक्रमेस सुरुवात करतात.
१...परिक्रमेस सुरुवात करताना पुरुषांनी शक्यतो शेंडी ठेवून मुंडण करावे.
शास्त्रीय कारण... केसांची देखभाल करणे शक्य होत नाही.
धार्मिक कारण...ऐहिक जगातून अध्यात्मिक विचारधारेकडे वाटचाल. व्यक्तिचे दिसणे हे बरेचसे त्याचा केशसंभार आणि त्याच्या रचनेवर अवलंबून असते. त्याचे ते ज्ञात व्यक्तिमत्व पुसून नवी ओळख निर्माण करणे, हा एक हेतू त्यात असतो. मुंडण करणे ऐच्छिक आहे.
२...जेथून परिक्रमा उचलायची आहे, तेथे माँ नर्मदेची पूजा करून शि-याचा नैवेद्य ( याला कढाई असे म्हणतात ) दाखवून, पाच कुमारिकांना भोजन करुन दक्षिणा देऊन परिक्रमा उचलतात.
३...परिक्रमेचा पोशाख...
पुरुषांनी शक्यतो पांढरे कपडे...पायजमा , झब्बा लुंगी, शर्ट इ. तर महिलांनी पांढरी सुती साडी, सलवार, कुडता...
पांढरी वस्त्रे ही परिक्रमावासीची ओळख आहे.
वरील अ क्र १,२,३ हे सगळे परंपरेने आलेले आहे...
यात तुम्ही सारासार विचार करून योग्य तो बदल करु शकता. कोणीही कोणताही आग्रह करीत नाही... शेवटी भावना महत्वाची...
परिक्रमा करताना...पथ्ये
माँ नर्मदा ओलांडू नये.
अभक्ष भक्षण करू नये.
अपेयपान करू नये.
सकाळी सूर्योदयाच्या वेळी सुरुवात करावी आणि सूर्यास्त होण्यापूर्वीच आसन लावावे.
अंधारात परिक्रमा करू नये.
पानात वाढलेला प्रसाद टाकू नये.
समोर आलेल्या पूर्णब्रह्मास टाळून पुढे जाऊ नये. कारण तसे केल्यास उपवास घडण्याची शक्यता अधिक.
एका जागी एक दिवसापेक्षा अधिक दिवस आसन ( मुक्काम ) लावू नये.
कशातही गुंतून पडू नये.
कुणाचीही उणी दुणी काढू नये. कुचाळक्या करु नये.
सकाळ, संध्याकाळचे स्नान मैयैतच करावे.
बरोबर घ्यावयाचे सामान...
एक पाठीवर घेण्याची सॅक, त्यामध्ये...
पोशाखाचे दोन जोड, एक सतरंजी किंवा स्लिपिंग बॅग,
पायात घालण्यासाठी नेहमीचे स्पोर्टस शूज,एकच जोड मोजे, टोपी, एक सुती पंचा, ब्रश, टूथपेस्ट, नेहमीची औषधे, उबदार स्वेटर, कानटोपी
हे सर्व कमी वजनाचे असावे...आणि अनावश्यक खाण्याच्या वस्तू घेऊ नयेत.
घेतल्यास त्या आपल्यालाच वाहायला लागणार... थोडेथोडके नाही तर...३००० किमि...
शेवटी सगळे मैया भरोसे आहे...
मग हव्यास कशाला...
जेवढा संचय कराल...
तेवढी ओझी वाहाल...
हेच शिकायचे आहे...
एकदा प्रस्थान ठेवले की...
ओळख एकच...
नर्मदे हर...
मग ती चाय की नर्मदे हर असो...
की...
प्रसाद की नर्मदे हर...
की...
आसन लावण्याची नर्मदे हर...
आपल्याला वस्तूंच्या हव्यासाची खरी ओळख पटते...ती परिक्रमेदरम्यानच
तुम्हाला चहा हवा...मिळणार
प्रसाद हवा मिळणार...
कपडे हवे...मिळणार...
चपला हव्या मिळणार...
उरलीसुरली...दक्षिणाही मिळणार...
दातृत्व... औदार्य...
खरे पाहायला मिळते... परिक्रमेतच
तुम्हाला हाक मारुन...
आग्रहाने बसवून... प्रसाद देणार...
तुमच्या अपरोक्ष... चहाचे पैसे देऊन निघून जाणार, जणू आपण त्या गावचेच नाही...
दानाची संगमरवरी पायरी नाही...
की...
नावाची पाटी नाही...
मी मोठा हा लहान नाही...
की मी गरीब ही भावनाही नाही...
परिक्रमेत न मागता तर मिळतेच...
पण...
नुसती मनात इच्छा झाली तरी...
माँ तुमचे लाड पुरविणार...
रस्ता चुकलेल्याला वाट दाखविणार...
भुकेल्याला उठवून खायला घालणार...
थकलेल्याला अलगद उचलून मुक्कामी पोहोचविणार...
परिक्रमा...अजून काय करते...
तुमचा मी पणा घालवते...
तुमचा अहंकार नष्ट करते...
तुम्हाला लुटून रंक बनवते...
तर लगेच लुटलेले परत करुन ऐहिकाची निरर्थकता पटवते...
सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवते...
अकल्पित घडवून, तुम्हाला पारलौकिक शक्तीच्या अस्तित्वाची चुणूक दाखवते...
तुमच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतेची चाचणी घेते...
तुम्हाला लढण्याचे बळही देते...
तुमच्यात परिवर्तन घडवते...
तुम्ही यकश्चित असल्याचे दर्शन घडविते...
तुम्हाला...
सगुण( मूर्ती पूजा )..आणि
निर्गुण ( मानसपूजा )
दोन्हीचा प्रत्यय घडवते...
असे म्हणतात...
माँ नर्मदेच्या किनारी राहणारा घरी नळाच्या पाण्याने स्नान करेल...
आणि...
एखादा पुण्यवान हजारो योजनांवरुन तिच्या सहवासासाठी येईल.
परिक्रमेची सुरुवात आणि पहिला दिवस....पुढील पुष्पात
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३
चातुर्मास संपताच नोव्हेंबर २०११ मध्ये माँ नर्मदा परिक्रमेसाठी प्रस्थान करायचे ठरले.तयारीला लागलो.
सर्वात आधी चालण्याचा सराव करण्यास सुरुवात केली. परिक्रमेतील चालण्याची वस्तुस्थिती आणि हा सराव किती फोल होता, हे नंतर समजले. पुण्यात तळजाईवर, रस्त्याने कात्रजचा घाट, घरापासून पायी सिंहगड...नाना त-हा झाल्या.
माझा मित्र किरण गेंगजे सुरुवातीला काही दिवस माझ्याबरोबर परिक्रमेत येणार होता. त्याने रेल्वेची पुणे ते खांडवा आगाऊ तिकिटे काढली.
४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेल्या साधक जगन्नाथजी कुंटे यांची भेट घेतली. त्यांना मनोदय सांगितला. त्यांनी शाल व धोतराचे पान देऊन परिक्रमेसाठी आशीर्वाद दिले. मैयाचा प्रसाद मिळाला.
हे धोतराचे पान मी नर्मदा मैयाचा आशीर्वाद म्हणून परिक्रमेत परिधान केले.
जसजसा नोव्हेंबर जवळ येऊ लागला तशी , सामानाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली.
एक नवीन सॅक खरेदी केली.इथेच अंदाज चुकला. त्या सॅकचे वजन अडीच किलो होते.नंतर हे वजनच अडचणीचे होणार, हे लक्षात यायला उशीर झाला होता. सॅक आणि तिच्यामुळे आलेल्या अडचणी याबद्दल नंतरच्या पुष्पात.
माझ्या परिक्रमेत आपला सहभाग म्हणून
माझे सासरे विलास कुलकर्णी यांनी, पाण्यासाठी एक दुधाची छोटी किटली पाण्यासाठी ( हा सध्याचा कमंडलू आहे ) घेऊन दिली. प्लॅस्टिकचा वापर व धोका यावर पर्याय म्हणून संन्याशाच्या पारंपरिक कमंडलूला पर्याय हा धातूचा कमंडलू...आहे की नाही गंमत.
मित्रवर्य देवेंद्र नेवासकर याने आठवण म्हणून वजनाला हलका, उबदार , उंची स्वेटर घेऊन दिला. त्याचा खूप उपयोग झाला.
टिकाऊ आणि वजनाला हलक्या अशा एक शुभ्र लुंगी आणि २ झब्बे मित्रवर्य प्रशांत शालगरांच्या दुकानातून खरेदी केले.
कपडे भरले, झोपण्यासाठी ट्रेकिंगचे कॅरी मॅट घेतले.नुकतीच दिवाळी संपली असल्याने, फराळासाठी केलेला लाडू चिवडा बरोबर घेतला.बुटांऐवजी सँडल घेतले. दैनंदिनी लिहिण्यासाठी वही, मोबाईल, कॅमेरा घेतला. वाटेत लहान मुलांना वाटायला चॉकलेट. यादीवरून लक्षात आले असेलच, माणसाचा हव्यास कमी होत नाही , हेच खरे. वीतभर पोटाची खळगी भरायला , गाडाभर अन्न...
प्रवासाचा दिवस उजाडला. पत्नीची पुन्हा परवानगी घेतली, आई, सासू सासरे व इतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
झेलम एक्स्प्रेसने सायंकाळी पुणे सोडले. दुसऱ्या दिवशी पहाटे खंडवा, मध्यप्रदेश
येथे उतरलो. बाहेर खासगी प्रवासी बसमध्ये किरण व मी येऊन बसलो. २७ सीटची बस असावी. हळूहळू प्रवासी भरत दीड तासानी सुमारे ५० प्रवाशांसह ओंकारेश्वरला निघालो. बसमध्ये तसूभरही हालायला जागा नसताना, वाटेत प्रवासी चढत होते. कंडक्टर ही जरा सरकून घ्या, असे म्हणत बेल वाजवत होता.
मध्यप्रदेश मध्ये बहुतांश ठिकाणी खासगी बससेवा आहे. मुकी बिचारी कशीही हाका...कोणी दूरवरून जरी हात दाखवला तरी बस हमरस्त्यावर त्याची वाट पाहात उभी ठेवतात. तो चढला की बस सुरु. कोणीही कुठेही चढणार कुठेही उतरणार. अगदी लहान मुले ३-४ वर्षाची त्या गर्दीत हू का चू न करता उभी राहिलेली पाहून वाईट वाटले. आपणच मग एखाद्याला मांडीवर घ्यायचे. जवळचे चॉकलेट दिले की स्वारी आणखी खूष.
किती छोटा आनंद असतो. परिक्रमेत वाटेत लहान मुलांना वाटण्यासाठी मी चॉकलेट घेतली होती. त्याची सुरुवात बसमधून झाली.खंडवा ते ओंकारेश्वर हे ७० किमि चे अंतर पार करायला बसला सव्वा दोन तास लागले.
स्टँडवरुन गौमुख घाटावर गेलो. मुंडण केले.समोर ओंकारमांधाताचा डोंगर आवाहन करीत होता. परिक्रमेत असताना पात्र ओलांडता येत नाही. सबब गौमुख घाटावर गेल्यावर मुंडणानंतर स्नान करून लगेच माँ नर्मदेवरील पुलावरून जाऊन ज्योतिर्लिंग ओंकारेश्वरचे दर्शन करून आशीर्वाद घेतले. इथेही भक्तीचा बाजार पाहायला मिळाला.
माँ नर्मदा पूजन करून, पाच कुमारींचे पूजन करून त्यांना कढाईचा प्रसाद करुन आशीर्वाद घेतले. नंतर आम्ही प्रसाद घेतला. गौमुख घाटावर इतरही परिक्रमावासींची माँ नर्मदा पूजन कढाईची
धांदल उडाली होती. सगळ्या परिक्रमावासींना परिक्रमेची ओढ लागली होती. कोणा एकट्याला गुरुजी पूजा सांगत होते, तर कोठे गोल करून बसलेल्या परीक्रमावासींना उभे राहून पूजा सांगत होते. जो तो आपल्या परीने माँ नर्मदा पूजन आणि कढाई करीत होता. सगळे वातावरण परिक्रमामय झालेले होते.
आम्ही सात जणांनी, रानडे काकू, राजवाडे काकू, जोशीकाका, मित्र किरण, दामले , वाळिंबे व मी दुपारी १ वाजता ओंकारेश्वरहून प्रस्थान ठेवले. रानडे काकू वगळता इतरांचा परिचय कढाईच्या वेळी झाला.
आयुष्यातील एका अविस्मरणीय आणि रोमांचकारी अनुभवाच्या प्रतिक्षेत...चालायला सुरुवात केली.
रस्त्यावर मागे पुढे... फक्त परिक्रमावासी दिसत होते.
कोणी निरंजन...कोणी सहकुटुंब... तर कोणी समविचारी मित्रांसोबत...कोणी सपत्नीक...
बाल...अरुण...तरुण...वृद्ध...
आपल्याच मस्तीत चाललेला तरुण सन्यासी...जथ्यातून चाललेले साधू सन्यासी...
कुणाच्या पाठीवर सॅक...कोणाच्या काखेत झोळी...महिलांच्या डोक्यावर बाचके...हातात फक्त कमंडलू घेतलेला एखादा विरळा...
जटाधारी साधू...नुकतेच मुंडण केलेले...
मुंडासे बांधलेले शेतकरी...
एक ना अनेक प्रकार...
उद्दिष्ट मात्र एकच...नर्मदा मैयाचा सहवास...
दुपारी ऊन खूप , सॅकचे ओझे याची सवय नसल्यामुळे फार वेग घेता आला नाही.
तरीही रस्त्यावर सावली देणारे खूप वृक्ष असल्याने उन्हाचा फार त्रास झाला नाही.
पावले पडत होती...मधूनच घोट दोन घोट पाणी पिऊन तृष्णा भागवत होतो.
शेतातील कापसाची बोंडे आलेली शेते, सागवानाचे वृक्ष, ओंकारेश्वरला जाणारे येणारे भक्तांच्या नर्मदे हर च्या जयघोषात वाटचाल चालू होती. निघायला उशीर झाल्यामुळे आज फार अंतर पार करणे, शक्य होणार नव्हते. थंडीत लवकर अंधार पडतो त्यापूर्वी आसन लावण्यासाठी लवकर जागा पाहणे आवश्यक होते. ओंकारेश्वर ते मोरटक्का हे १२ किमि चे अंतर आम्ही ३ तासात पार केले. पुढे २ किमिवरील भक्त निवासमध्ये आम्ही पोहोचलो. श्री नाना आणि सौ कुमुद घळसासी यांनी नर्मदा मैया किनारी या आश्रमात सेवा करतात...
नाना मूळचे सांगलीचे...प्रपंचातून वेळ काढून ते मैया किनारी परिक्रमावासींच्या सेवेसाठी येतात. आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी आसन लावायला सांगितले. आसन लावून हातपाय तोंड धुतले. घळसासी काकूंनी मस्त वाफाळलेला चहा आणून दिला. थकल्या जिवाला त्यांनी अमृतच पाजले. मस्त तरतरी आली. आग्रह करून आणखी चहा दिला. मैया लाड पुरवते म्हणतात, ते ऐकून होतो. आता प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. थोडावेळ नानांशी गप्पा मारून मैयेवर स्नान करण्यासाठी पळालो.
पहिल्या डुबकीत सगळा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. मैयेत परिक्रमावासीने स्नान लवकर आटपावे.
नर्मदा मैयेचे वाहन म्हणजे मगर. मैयेच्या पाण्यात मगरीही खूप आहेत. आपल्यासारख्या नवख्या व्यक्तिने पाण्यात खोलवर जाऊ नये व उगाच जीव धोक्यात घालू नये. त्यामुळे काठावर बसून पटकन स्नान करावे. घामाने भिजलेले कपडे मैयेपासून बाजूला जाऊन धुतले. परिक्रमेत अंगाला आणि कपड्याला साबण लावायचा नाही, असा नियम आहे. त्याचे कारण असे की, मैयेचे पाणी सर्वजण पितात, तुम्हालाही तेच पाणी प्यायचे असते. साबणाने जीवजंतू मरतात ते वेगळेच. त्यामुळे साबण वर्ज्य.
शिवाय परिक्रमेत तुमचे कपडे कसे आहेत , हे गौण आहे.
स्नान करुन पिळलेला पंचा, कपडे, बरोबर घेऊन आश्रमात आलो. कपडे वाळत टाकले. इतर परिक्रमावासिंनी मैयेची आरती केली मी आश्रमातल्या मंदिरात जाऊन डोळे मिटून बसलो. थोड्या वेळात भोजन प्रसादाचा निरोप आला. आजचा अनुभव आणि उद्याचे नियोजन याविषयी सहपरिक्रमावासींशी चर्चा झाली.डोळे मिटू लागले होते. सकाळी लवकर निघायचे होते. त्यामुळे लावलेल्या आसनावर पाठ टेकली. आजचा दिवस छान गेला. विचार करता करता निद्रादेवी कधी प्रसन्न झाली कळलेच नाही.
टीप : पहिला दिवस म्हणून दैनंदिनीत काही तपशील उदा कपडे धुणे, साबणाचा वापर न करणे, उद्याचे नियोजन, पात्रात असलेल्या मगरी इ नमूद केले आहे. येथून पुढे हा तपशील दैनंदिनीत येणार नाही. काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ त्या त्या वेळी नमूद केले जातील.
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ४
पहाटे लवकर उठून ६-३० ला आवरुन निघालो. निघण्यापूर्वी घळसासी काकूंनी ताज्या दुधाचा, गरमागरम चहा करून निरोप दिला. मैयाकिना-याने जाणारा रस्ता भक्त निवासच्या अगदी शेजारुन जातो. त्यामुळे सहजच मार्गी लागलो.
आज पूर्ण दिवस हातात होता.
किरण व मी दोघांनी पायाला गती दिली. अजून उजाडायला वेळ होता. विजेरीच्या प्रकाशात निघालो. मैयाकिनारी अंधारात चालताना थोडे लक्ष द्यावे लागते. नाहीतर पाय कशात तरी अडकून , मैयेला साष्टांग नमस्कार नक्की. कपडे भरुन रंगपंचमीचा आनंद...ठरलेला
पहाटेच्या वातावरणात... मैयेचे शांत, गंभीर पात्र...रातकिड्यांचा किर्र आवाज..
आकाशातील चांदण्यांचा प्रकाश..अनादि अनंत असे क्षितिज... आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि अंतर्मुख करते.
मनात नर्मदे हर चा जप...ओठांवर नर्मदे हर चा घोष हा परिक्रमावासीसाठी परवलीचा शब्द... समोर मैया, तिचे अथांग पात्र, मनात जप, खाली खाचखळगे, पाणी खेचण्यासाठी टाकलेल्या पाईपलाईन...प्राणी,पक्षी... त्यातून पगदंडीवर लक्ष...सगळ्यांचे भान ठेवून पायाला गती...पायवाटेला परिक्रमेत पगदंडी हा शब्द रूढ आहे.
मैया तुम्हाला अष्टावधानीच करते म्हणा ना...
या किनाऱ्याने जाणाऱ्या पगदंडीत पक्षीविश्वही तुमच्या सोबत असते. सूर्य नारायणाच्या चाहूलीने नुकतेच जागे झालेले खग, कुठेतरी लपून ताना घेत असतात. त्यांना शोधण्याच्या भानगडीत न पडता, त्यांचे ते कूजन ...
ऐकत राहावे असे...तुमचे स्वागतासाठी लावलेली सनईच जणू...
थोड्या वेळात फटफटायला लागले.
आमच्यासमोर थोड्या अंतरावर पगदंडीवर एक सुतार पक्षासारखा दिसणारा ( इंग्रजीत हुपी म्हणतात )पक्षी आम्ही जवळ येताच उडून थोडा पुढे गवतावर जाऊन टुकूटुकू चालत होता. हा थोडावेळ ही शिवणापाणी चालू होती. एका क्षणी त्याने मस्त भरारी घेतली आणि तो दृष्टीआड गेला. असे बरेच जण आपली सोबत करतात. काही वेळाने टिटव्यांनी त्यांच्या कर्कश्य आवाजाने लक्ष वेधून घेतले. टिटव्या एकदम धीट. बहुधा त्यांची घरटी जमिनीवर बिळात असावीत. त्यामुळे त्या विशिष्ट भागातच तुरुतुरु चालत ओरडत फिरत असतात.
माझा मित्र किरण एकदम काटक. चालताना एका लयीत चालणार. तोंडातून हूं की चूं नाही. आम्ही दोघांनी पायांना वेग दिल्याने, बाकीचे हळूहळू मागे पडले. मैयेचे वैशिष्ट्य म्हणा किंवा व्यायाम करताना स्त्रवणारे एन्डॉरफिन म्हणा तुम्हाला भूक लागत नाही. थांबला की भूक लागते.असाच अनुभव मला गिरनारलाही येतो.
आम्ही गौमुख घाट मार्गे जातांना गौमुख घाट येथे जरा वेळ विश्रांतीसाठी थांबलो. लगेच भुकेची जाणीव झाली. आमच्या जवळच्या पदार्थांची न्याहारी केली. पुन्हा पायाला वेग दिला.
वाटेत बिल्लूराम सावेडियां यांनी आम्हाला दोघांना चाय की नर्मदे हर साठी घरी नेले.
चहा मस्त , घट्ट दुधाचा होता. सढळ हाताने साखर घातल्याने चालताना शक्ती येण्यासाठी उपयोग नक्की... चहा पिताना पायाला आणि खांद्याला तेवढीच विश्रांती.
त्यांना नर्मदे हर करुन पायाला वेग दिला.
दुथडी भरलेले जल घेऊन सोबत नर्मदा मैया संथ वाहात होती.केवढे विशाल पात्र.
सगळ्याला सामावून घेणारे.
आता सूर्य डोक्यावर येऊन कलला होता. थंडी असूनही तहान लागत होती. कमंडलू तले पाणी कोमट व्हायचे. कोमट पाण्याने तहान भागत नव्हती. तास-दीड तास चालल्यावर एखाद्या झाडाच्या सावलीत टेकून पोटभर पाणी पिऊन थोडावेळ विश्रांती घेऊन...पुन्हा नर्मदे हर...
नंतर काकरीयाहून पुढे जाताना वाटेत एक हनुमान मंदिरात समोर आश्रम होता. तेथील साधू मूळचे गुडगाव ( हरियाणा ) येथील. ते येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी थांबवून भोजनप्रसाद घेण्याचा आग्रह केला. मैयाचा प्रसाद तो. न घेण्याचा उद्धटपणा केल्यास पश्चाताप नक्की. हो म्हणालो सामान एका बाजूला ठेवले आणि हात पाय धुवून भोजनप्रसाद घेण्यासाठी स्थानापन्न झालो.
भोजनप्रसादात टिक्कड ( गव्हाच्या पिठाच्या, चांगल्या जाडजूड चुलीवर भाजलेल्या रोट्या ) होते. सोबत दुधी भोपळ्याची भाजी, डाळ आणि भात असा बेत होता. जठराग्नीला आहुती देण्यासाठी सज्ज होऊन बसलो.भोजनप्रसादाच्या वेळी ताटे मांडल्यावर एकदा पंगतीत बसल्यावर हात धुण्यासाठी वा कोणत्याही कारणाने उठू नये. आश्रमातील सेवेकरी सन्यासी तुम्ही बसलेल्या ताटाची नोंद घेऊन, ताटात वाढत पुढे जातो. तो जेवढे वाढतो, तेवढे ग्रहण करावेच लागेल. पानात शिल्लक ठेवता येत नाही किंवा एकदा ताटात वाढलेले परत काढूनही ठेवायला परवानगी देत नाहीत किंवा वाढताना स्वतःहून घेतलेले पूर्णब्रह्म संपवायचेच, असा शिरस्ता आहे. वाढताना सन्यासी वरून वाढतात.
तुमच्या ताटात उरलेले दिसल्यास, चांगला आश्रमप्रमुख असल्यास संयमित शब्दांत ग्रहण करायचा आग्रह करतो. एखादा गरम डोक्याचा अपशब्द वापरायला कमी करत नाही.
त्याचे कारण असे आहे की, एकंदर हे सर्व आश्रम दानावर चालतात. काही ठिकाणी जवळपासच्या ८-१० गावातील लोक वर्गणी किंवा अन्नधान्य जमवून कमिटीमार्फत आश्रमातील अन्नछत्र चालवतात, असे समजले. अतिशय दुर्गम व प्रसंगी दुष्काळ असतानाही कष्टाने व्यवस्था केलेला भोजनप्रसाद मुखातच जावा, ही यामागची तळमळ असते.
काही वेळेला ताटात शिल्लक राहिलेले पूर्णब्रह्म आश्रमातील एखाद्या निर्देशित कट्ट्यावर पक्षांसाठी आपल्या हाताने ठेवायला सांगतात.
वाढताना सेवेकरी सन्यासी एकापाठोपाठ विचारत येतात....
महाराज आपको, रामरस, रोटीराम, शाकराम, चावलराम, दालराम...
गंमत वाटली ना वाचायला... आणि प्रश्नही पडला असेल.
हा रामरस काय आहे , बुवा...
आणि... प्रत्येक पदार्थाला राम शब्द का जोडलाय...
रामरस म्हणजे मीठ...
मिठात राम...विलक्षण कल्पना आहे.
ज्याला सुचली तो महानच...
मला पहिल्यांदा समजलेच नाही. हा काय हवे म्हणून विचारतो आहे. मी शेजारच्याला विचारले... यह रामरस क्या होता हैं महाराज... तेव्हा समजले रामरस म्हणजे मीठ.
इथे बहुतेक सर्व आश्रमात प्रत्येक पदार्थाला राम हा शब्द जोडायची प्रथा आहे... जणूकाही त्या प्रत्येक पदार्थात राम आहेच...हा विश्वास
आजपर्यंत हा अनुभव आधी कधीही घेतला नव्हता. मैया तुम्हाला शिक्षण देते आणि समृद्ध करते. तुम्ही घरी पण करुन बघा...छान आणि वेगळेच वाटेल.
हे काय फक्त सन्याशांनीच केले पाहिजे असे थोडेच आहे...
आम्ही दोघांनी हवे तेवढेच ताटात घेतले. सर्व ग्रहण केले. भोजनप्रसाद झाल्यावर ताट,वाटी, पाण्याचे भांडे राखेने स्वच्छ धुवून नेमलेल्या ठिकाणी ठेवायचे असते.
तुमची स्वतःची ताट वाटी असेल तर धुवून न विसरता बरोबर घ्यावी. घ्यायला विसरलात तर...हेलपाटा नाहीतर भोजनप्रसादाचे वांधे...
भोजनप्रसाद घेऊन साधूंना नर्मदे हर करून पाय उचलले....चरैवेती...चरैवेती...चालत राहा...चालत राहा...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ५
काकरीयाहून वाटेत, भोजनप्रसाद घेऊन पुढे निघाल्यावर रावेरला पुलावर पाणी आल्यामुळे खेडीमार्गे जाण्याचा सल्लाआश्रमातील महाराजश्रींनी दिला होता.
पुढे वाटेत खेडीचा रस्ता विचारीत असताना कापसाच्या शेतात काम करणाऱ्या एका माताराम नावाच्या शेतमजुराने खेडीमार्गे न जाता , रावेरमार्गे
जा असे सुचविले. त्याचे ऐकून नर्मदे हर करून रावेरमार्गे जायला पुढे निघालो.
रावेरमार्गे पोहोचलो असता, फाट्यावर दोन शेतमालक भेटले. ते म्हणाले, येथे मैयाला पाणी आहे. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. डावीकडे वळून त्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा खेडीकडे निघालो.
३-४ किमि चा हेलपाटा पडला.
महाराजश्रींचा सल्ला न ऐकल्याचा परिणाम.खेडीला पोहोचल्यावर, खेडी नदीच्या पुलावर थोडे पाणी होते. नदी पार करून बकावाला ( गावाचे नाव ) सायंकाळचे पाच वाजले.
बकावाला राममंदिरात आसन लावण्याची व्यवस्था होईल, असे गावात समजले. चौकशी करीत राम मंदिरात पोहोचलो. तेथील महाराजश्रींची आसन लावण्याची परवानगी घेऊन आम्ही दोघे मैयेवर स्नानासाठी गेलो. येथे बांधलेला व चांगला, स्वच्छ घाट आहे. स्नान करुन दिवसभर मळलेले कपडे धुवून आश्रमात परत आलो. सायंकाळी ६-३० वा भोजनप्रसादाची वेळ होती. टिक्कड, बटाट्याची भाजी, डाळ, भात अशी व्यवस्था होती. आम्ही हात धुवून येईपर्यंत सेवेक-याने ताटात वाढून ठेवले होते. एवढे ग्रहण करणे, शक्य नव्हते. कमी करावे, म्हणून विनंती केली तर...उरलेले नंतर पक्षांसाठी बाहेरच्या कट्ट्यावर ठेवायला सांगितले. तसेच परिक्रमेत नवीन आहात, हळूहळू शिकाल असेही महाराजश्रींनी सांगितले.
भोजनप्रसादानंतर सायंकाळी ७ ते ७-४५ दरम्यान रामाची आरती, हनुमान चालिसा म्हणले. आरतीनंतर महाराजश्रींनी आपले अध्यात्मिक व धार्मिक विचार मांडले. उपस्थित सन्यासी, भक्त आणि महाराजश्री यांच्यात विचारांची देवाणघेवाण झाली. महाराजश्रींनी आतील बाजूस आसन लावण्याची परवानगी दिल्यानंतर आम्ही रात्री ९ च्या दरम्यान आसन लावले. तेथेच आमच्या सोबत असलेल्या ६-७ सन्याशांची अखंड बडबड चालू होती. एकाच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात भक्ती रचना लावलेल्या होत्या. दिवसभर थकूनसुद्धा या गदारोळात झोप लागत नव्हती. परिक्रमावासींची आसनव्यवस्था नीट झाली आहे ना हे पाहण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशीची बालभोगाची व्यवस्था लावण्यासाठी अचानक महाराजश्रींचे आतमध्ये आगमध झाल्यामुळे त्या सन्यासांची बडबड कमी व्हायची. ते गेल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन.
बरेच वेळा हम सो जाए क्या , असे विचारुनही त्यांच्यावर काही परिणाम व्हायचा नाही.. रात्री उशिरा केव्हातरी निद्रादेवी प्रसन्न झाली.
सुरुवातीला मला समजले नाही, पण विचारणा केल्यावर ज्ञानात भर पडली...
नाष्ट्याला परिक्रमेत बालभोग म्हणतात...
किती भावणारा शब्द आहे हा...
बाळकृष्णाला दाखवायचा नैवेद्य.. ( भोग चढविणे )
नर्मदा सरोवराची उंची वाढून पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे बकावा गावही, पाण्याखाली जाणार होते. शासकीय यंत्रणेने वाढणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन पाण्याखाली जाणाऱ्या घरांवर नंबरपण टाकले होते.
असे शेकडो आश्रम, घरे ,मंदिरे, शाळा, हजारो वर्षांची श्रद्धास्थाने मैयात विलिन झाली असतील.
आम्हाला बकावा घाटावर मैयेत स्नानाचा आनंद घेता आला. पुढील वर्षात वेगळी परिस्थिती असणार. शासनाने विस्थापित होणाऱ्या नागरिकांना जागा देऊ केली होती. घरांच्या प्रकाराप्रमाणे ( मातीचे, दगडी, वीट, काँक्रीट इ ) पुनर्बांधणीसाठी रोख भरपाई पण दिलेली आहे. विस्थापित होणाऱ्या, झालेल्या लोकांनी पुनर्वसनासाठी देऊ केलेल्या जागेवर घरबांधणी पण केली आहे. तरीपण काहीजण अजून जुन्या गावात राहात होते. शेकडो वर्षांची मैयेशी असलेली नाळ अशी थोडीच तुटणार आहे. नंबर पडले असले तरी, प्रकल्पग्रस्त लोकांनी अजूनही दुकाने, व्यवसाय जुन्या जागेत चालू ठेवले होते. खरा प्रश्न हा होता की, ज्या दुकानांच्या, व्यवसायांच्या नुकसानभरपाईपोटी पुनर्वसन वसाहतीत जागा देऊ केल्या होत्या, तेथे मैयेच्या घाटावर मैयेच्या, तीर्थस्थानांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून होणारी खरेदी, व्यवसाय ; पुनर्वसनाच्या वसाहतीत कसा होणार ? घाटच पाण्याखाली गेल्यामुळे या घाटांवर परिक्रमावासी सोडून येणाऱ्या अन्य प्रवासी, पर्यटकांसाठी चालवली जाणारी उपहारगृहे बंद होणार. तेथील कामगार बेकार होणार, त्यांच्या कुटुंबावरही स्थल़ांतराची टांगती तलवार होतीच...
वरवर वाटणा-या प्रश्नांची मुळे खूप खोलवर गेलेली असतात.
कदाचित हे विषयांतर वाटेल , पण परिक्रमेदरम्यान समोर आलेले सामाजिक प्रश्न मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.
परिक्रमेत मन:शांती मिळवताना अस्वस्थ करणारे प्रश्नही समोर आले. डोळ्याला झापड लावलेल्या घोड्यासारखे चालणे, मला शक्य नव्हते.न्यायालयाने दीर्घकाळ स्थगिती देऊन सरदार सरोवराची उंची वाढविण्याचे काम बंद ठेवले होते. पण...कधीतरी ते सुरू होणारच.
एका जागेवरून उपटलेली झाडे नवीन जागी रुजणार का , हा प्रश्न पाठ सोडत नव्हता. असे अजूनही सामाजिक प्रश्न समोर येणार याची मला त्यावेळी पुसटशी कल्पनाही नव्हतीच. संथ वाहणाऱ्या मैयेच्या उदरात काय खळबळ चालू होती, हे समजायला वेळ लागणार होता, हे नक्की...
मोबाईल च्या गजराने पहाटे आपले काम चोख बजावले...
पहाटे ४-३० ला उठून ५ वा पाय उचलले.विजेरीच्या प्रकाशात दीड तास चाललो. सूर्योदयापूर्वी आपल्याच तंद्रीत छान चालता येते. सगळे साखरझोपेत असल्यामुळे एकांत भंग पावत नाही.
मधूनच गावातला एखादा कुक्कुट आरवून सूर्योदय झाल्याची हूल देत असतो. त्याचे ते छातीठोकपणे आरवणे चेहऱ्यावर हसू आणते.
अनोळखी माणसांची चाहूल लागून, ओसरीवर पहुडलेले एखादे श्वान
भू sssssss असा तार सप्तकातला सूर लावून भाईबंदाना आवताण देते. कुठुन कुठुन पाच सहा भाईबंद धावत गोळा होतात. आपल्या हातातल्या काठीला काम मिळते...जरा उगारून आपटली की झाले. आपण चोर नाही, एवढेच पटवून द्यायला लागते. एखादा घरमालक भुंकणे ऐकून बाहेर डोकावतो. परिक्रमावासी बघून तोच सगळ्यांना पिटाळतो.
नर्मदे हर...पाय उचला.
थंडी असूनही उन्हाचा चटका आजही खूप जाणवत होता. ३५° तापमान असावे. सकाळी ९ पासूनच ऊन जाणवत होते.
किरणलाही थंडीतही उन्हाचा चटका पाहून आश्चर्य वाटले. थोड्या थोड्या अंतरावर थांबत, पाणी पीत वाटचाल चालू होती.
वाटेत तुरीची, कापसाची शेते मध्येच एखादा उसाचा फड लागत होता. आम्ही चालत असलेला मार्ग मध्यप्रदेशातील होता. येथे वीजटंचाई भरपूर आहे. त्यामुळे सर्रास सगळीकडे यूपीएस व इन्व्हर्टर दिसतात. केव्हातरी पहाटे वीज येते. तीन तासानंतर पुन्हा भारनियमन. रात्री ९ वाजता वीज येणार ती १२ वाजेपर्यंत.२४ तासात ६ तास वीज. शेतीप्रधान देश. वीजेचा तुटवडा.मैयेचे मुबलक जल असताना, कृषीपुत्रांची रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी धावपळ.पगदंडीवर काही ठिकाणी पाईपलाईनचे जाळे दिसते. मोटारींचे कोंडाळेही. त्यातून वाट काढून पुढे जायचे. कुठे कवच खराब झालेल्या तारा. गळणारे पाणी... त्याय वीजप्रवाह... कल्पनाच केलेली बरी.परंतु मैयाकृपेने सर्व काही सुरळीत चालते. अजून तरी अपघाताची नोंद नाही.
मजल दरमजल करीत किरण व मी सकाळी १० च्या सुमारास तेलिया भट्याणला पोहोचलो. तेथे श्री सीयाराम महाराजांच्या आश्रमात गेलो.महाराजश्रींचे वय ८० पेक्षा अधिक असावे. कृश आणि काटक शरीर.अंगावर फक्त लंगोटी. सीयाराम महाराजांची आश्रमात एका कोपऱ्यात सर्व व्यवस्था, म्हणजे आवश्यक ते सामान ठेवलेले.
आम्ही आत गेल्यावर स्पर्श दर्शन म्हणजे पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेण्यास आम्हाला अनुमती दिली. भरून पावलो.
सर्वसामान्यपणे साधू स्पर्श दर्शनाला परवानगी देत नाहीत. आम्हा दोघांवर मैयेची कृपा म्हणायची.स्पर्श दर्शन करून त्यांच्या पायाशी बसलो.
त्यांचे दर्शन घेऊन दक्षिणा ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी स्थानिक भक्तांची रांग लागलेली. परिक्रमावासीयांना खास सन्मान. एक वातीचा स्टोव्ह चालू होता. आम्हाला चहा घेणार का विचारले. होय म्हणल्यावर कडीच्या डब्यात तयार करून ठेवलेला ग्लासभरून गरम चहा आम्हाला दोघांना दिला. त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने आम्हाला एक एक बिस्कीटचा पुडा दिला. दरम्यान स्टोव्हवरील दूध उतू जाऊन स्टोव्ह विझला. कपाटातून दुसरा स्टोव्ह काढून त्यावर चहाचे आधण ठेवले. दरम्यान त्यांची काहीतरी शोधाशोध चालली होती. त्यांना हवी ती पिशवी सापडली. किरण व मी आमच्या दोघांच्या हातात एक एक बिस्कीटचा पुडा सीयाराम महाराजांनी दिला. आमची नावे विचारली. आम्ही पुन्हा आशीर्वाद घेऊन प्रस्थान ठेवले. महाराजश्री पुन्हा बाहेर आले , पुन्हा आमच्या दोघांची नावे विचारली. नावे समजल्यावर समाधानानी आत गेले.
हे सर्व तपशिलात लिहिण्याचे कारण असे की...
कोण कुठले आम्ही.
आमची वये, अनुभव तो काय.
सीयाराम महाराजांची गाठी दीर्घकाळ मैयेत उभे राहून केलेल्या रामनामाच्या पुरश्चरणाची पुण्याई. त्यांचा अधिकार मोठा. भक्तांची गर्दी असताना आमचे पुरवलेले लाड. आपुलकीने केलेली चौकशी.
त्यांची कार्यशीलता, व्यवधान, आपुलकी पाहून डोळ्यात पाणी आले. आपल्याकडचे शहरातले विमान, भारी मोटारी यातून फिरणारे फाईव्ह स्टार महाराज आणि त्यांचे लाड, चोचले, आजूबाजूचे लाचार शिष्य आणि भक्त हे डोळ्यासमोर तरळले.
सीयाराम महाराजांकडे बडेजाव नाही, भपका नाही, संचय नाही, औदार्याचा आव नाही. अहो, अंगावर लंगोटीशिवाय वस्त्र नाही... यातच सगळे आले. शिवाय प्रसिद्धी परांङमुख.
तुमचा अहंकार नष्ट करण्यासाठी...ही मैयेची योजनाच म्हणायची...
अंतर्मुख व्हावेच लागते...
इच्छा असूनही थांबता येत नाही...
विचारातच पायांना वेग दिला.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ६
तेलिया भट्याणहून पुढे लेपाघाट शालीवाहन मार्गे किरण व मी खलघाटच्या दिशेने निघालो. अलिकडे महेश्वर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर धरणाचे काम सुरु होते. धरणाच्या महाकाय भिंती नुसत्या पाहूनच छातीत धडकी भरत होती. अजस्त्र यंत्रसामुग्री घरघर आवाज करीत अविरत आपले काम चोख बजावत होत्या. किती खुजे होतो आम्ही...त्या यंत्रांसमोर... कसदार मातीचे ढिगारे उपसून बाजूला टाकले होते. धरणाला दरवाजे बसल्यानंतर आता दिसत असलेले, वापरातील मैयाकाठचे रस्ते, पगदंडी सगळेच पाण्याखाली जाणार.
किरण म्हणाला, ही माती सरकारने काढून घेऊन उपयोगात आणली पाहिजे. किरण हा मूळचा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील. डिंभे धरणाच्या जवळचे गोहे हे त्याचे गाव. बहुतेक आदिवासी भाग. त्याची वडिलोपार्जित शेती आहे तेथे. नाळ बांधलेला एक भूमीपुत्रच काळ्या आईची व्यथा समजू शकतो. माझ्यासारख्या शहरात जन्म घेतलेल्या, वाढलेल्या व मोठ्या झालेल्याला हे दु:ख कसे समजणार. शहरी माणूसाचा अॅग्रो टूरिझम किंवा फारतर फार्म हाऊस यानिमित्ताने मातीशी जो संबंध येईल, तेवढाच काय तो. बाकी सगळा उजेडच.
किरणचा मुद्दा आणि त्यामागची काळजी खरी होती. सगळे प्रश्न .. अस्वस्थ करणारे... हजारो किलोमीटर दुतर्फा...जमिनीचे अधिग्रहण करून कामे चालली होती. धरणात पाणी भरल्यानंतर प्ररिक्रमेचा मार्ग बदलेल. पाण्याखाली गेलेल्या नैसर्गिक संपत्तीचे अस्तित्व आपल्याला कसे जाणवणार. जमिनी अधिग्रहित झालेल्या बळीराजाचा आणि आदिवासींचा आक्रोश , खूप दूरवर आणि खोल पाण्यात फक्त नर्मदा मैयालाच ऐकू येत राहील...नर्मदे हर...
डोंगरदऱ्यात राहणा-या आदिवासींना, वैद्यकीय व अन्य सेवा सुविधांसाठी जवळचे मोठे गाव गाठाण्यासाठी आधीच ३०-४० किलोमीटरचे फेरे मारावे लागतात. मैयाकाठचे असे वहिवाटीचे रस्ते पाण्याखाली गेल्यावर त्यांच्या हालात आणखी भर पडणार, हे नक्की.
त्यावेळी मध्यप्रदेश मध्ये पुरुषाला रु १०० तर स्त्रीला रु ८० एवढा शेतीकामाचा रोज होता. दोघांची एकत्रित कमाईसुद्धा सरासरी जीवनमान देऊ शकत नाही. आणि काम दररोज मिळेल याची खात्री नाही. चार माणसांच्या कुटुंबाला एवढे उत्पन्न कसे पुरणार. यातून लहान मुलांचे शिक्षण,कपडे, सणवार,आजारपण काहीच धड होऊ शकत नाही..यातून. आता एवढे असूनही बिचारे कधीही दुर्मुखलेल्या चेह-याने बसलेले दिसत नाहीत. वर, तुमचे किमान काळा चहा देऊन आदरातिथ्य करतील. उंब-यात उभे करून पाहुण्यांशी बोलण्याची आपली शहरी परंपरा. तुम्ही कितीही ठरवले तरी रिकाम्या हाताने नर्मदामैयेच्या परिक्रमेतून परत येऊ शकत नाही. तुम्हाला किमान त्यांचे औदार्य तरी घ्यावेच लागते. परिक्रमेत नुसताच देवदेव करण्यापेक्षा किंवा देवदेव करण्याबरोबरच माणसांचे दुःख जाणून घेतले नाही तर तुमच्या सारखे करंटे तुम्हीच. आपण चुकीच्या अर्थाने नर्मदेतले गोटे असे म्हणतो. प्रत्यक्षात नर्मदेतल्या गोट्याला देवघरात तरी स्थान आहे. तुम्ही जर परिक्रमेत काहीच शिकला नाहीत तर तुम्हीच गोटे आहात हे म्हणायला वाव आहे.
सरकारी योजना आदिवासींपर्यंत पोचत नाहीत हेच खरे. मग तो महाराष्ट्र असो किंवा मध्यप्रदेश. सर्वदूर एकच स्थिती आहे. अंतर वाढल्यानंतर प्रवास खर्चही वाढणार . कुठून आणणार ते पैसे खर्च करण्यासाठी.
काही अंतर चालल्यावर आम्ही खलघाट येथे पोहोचलो. तेथे हनुमान मंदिरात महाराजश्रींची परवानगी घेऊन आसन लावले. नंतर घाटावर जाऊन स्नान करून आलो. दिवसभराच्या धुळीने माखलेले कपडे धुतले. तेथे आश्रमात दहिवडीचे दोघे आणि धुळ्याचे दोघे परिक्रमावासी भेटले महाराजश्रींनी सर्वांना आग्रहाने गरम-गरम घट्ट दुधाचा चहा दिला.
मला आणि किरण ला दोन मोसंबी खाण्यासाठी दिल्या. येथील महाराजश्रींच्या पायी २ व १ गाडीने अशा तीन परिक्रमा झाल्या आहेत. त्यांच्या घरचा उज्जैन जवळ व्यवसाय असून त्यांची मुले तो सांभाळतात. आश्रमाची व्यवस्था ते स्वखर्चाने पाहतात. आमची वये व अनुभव लक्षात घेऊन महाराजश्रींनी आम्हाला परिक्रमेविषयी चार अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या. संसारी मनुष्य या मार्गात आल्यामुळे महाराजश्रींनी दोन्ही बाजूंचा म्हणजे संसारिक आणि अध्यात्मिक बाबींचा चांगला अभ्यास केल्याचे जाणवले. परिक्रमावासी वाढल्यामुळे संन्यासी सेवेकर्यांनी परिक्रमावासींपैकी दोघांच्या मदतीने वाढीव टिक्कड करून घेऊन सायंकाळची भोजनप्रसादाची व्यवस्था केली. सर्वात शेवटी महाराजश्री व गावातील एका सेवाभावी यांनी भोजन प्रसाद घेतला. सायंकाळी सहा वाजता रामाची व मारुतीची आरती, हनुमान चालीसा व हनुमान स्तुती मंदिरातील घंटेच्या सुमधुर आवाजात सर्वांनी म्हटले.
सायंकाळी नर्मदामैयेच्या दोन्ही तीरावर सर्व मंदिरात विशिष्ट वेळेला आरती सुरू होते. एरवी शांत आणि निरव असणा-या मैयेच्या त्या वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारतो. पाच वातींची निरांजने, धुपाचा घमघमाट...कोणाकडे हाताने वाजवल्या जाणाऱ्या घंटा तर कोणाकडे यांत्रिक पद्धतीने वाजणारे चौघडे व झांजा. प्रत्येकाची वेगळी लय , प्रत्येकाचा वेगळा आवाज. भाव मात्र एकच...
धुंद वातावरण असते. हळूहळू चढत जाणारे भक्तांचे आवाज हळूहळू वाढत जाणारी ती आर्जवता.
मारुतीरायाला दमदार आवाजात आवाहन,
तर महादेवाला गंभीरपणे,
प्रभू रामचंद्राला अनन्यभावे शरण जाऊन, तर
दत्त महाराजांची मोक्षासाठी प्रार्थना...
एखाद्या दमदार संन्यासी सेवेकर्याने केलेला शंखनाद आणि त्याची वेगवेगळ्या लयीतील आवर्तने, कायम लक्षात राहावी अशी. दीर्घकाळ कानात गुंजत राहतो.
शंखनाद, आरती संपल्याची ही खूणच समजावी.संध्याकाळी सहा साडेसहाला सुरू झालेली मैयेच्या दोन्ही तिरावरील आरतीची ती गडबड सुमारे तास दीड तासानंतर थांबते. आणि पुन्हा प्रस्थापित होते मैये काठची तीच निरव शांतता.
या शांततेविषयी आणखी थोडे विवेचन...पुन्हा केव्हातरी.
आज माझा मित्र किरण पुण्याकडे परत निघणार होता. त्याला बसने पुण्याला जायचे आहे व तिकीट काढण्याची व्यवस्था करायला तो निघणार, हे महाराजश्रींना समजलं तर ते म्हणाले, आप चिंता मत करो. मै इनके गाडी का टिकट करवा दूंगा और रात के भोजन प्रसादी के बाद बस छूँटने से पहिले, वहाँ तक छोड देने का इंतजाम भी करूँगा. हमे आपकी सेवा करने का इतना तो मौका जरूर दिजीये. आम्ही काय म्हणणार शब्दच नव्हते.
साठी पेक्षा जास्त वय . अजूनही तरुणाला लाजवेल असा उत्साह. सेवाभाव तर विचारूच नका.
मैया देते हे सर्वकाही. मनात आले आपण शहरात रस्त्यावरून वाहनाने जात असताना कोणी लिफ्ट मागितली तरी कानाडोळा करतो किंवा कारण सांगून घेण्याचे टाळतो. इथे मात्र अनाहूत कोणाचीही स्वतःहून जबाबदारी घ्यायची आणि ती आनंदाने पार पाडायची. मोठेपणाचा बडेजाव नाही, मोठेपणा नाही, दातृत्वाचा आव नाही, फार काय मोठे करतो असा भाव नाही.
धन्य आहे...
कसे आभार मानणार या महात्म्यांचे. त्यांची सेवाभावी वृत्ती , परिक्रमावासी यांची काळजी घेणे यापुढे आपण खुजे ठरतो. नर्मदामैयाचा हा सारा परिसर भारलेला आहे. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर ठेवू नका. पण ज्याला जमेल त्याने त्याच्या सवड काढून कधीतरी, थोडावेळ, थोडे दिवस मेय्येच्या सहवासात नक्की काढावेत. मी म्हणतोय म्हणून नाही पण एक वेगळा अनुभव म्हणून जरूर यावे.
भोजन प्रसाद झाल्यावर एक सेवाभावी ग्रामस्थ आपल्या मोटरसायकलवरून किरणला मैयेपलिकडे घेऊन गेला. बस सुटेपर्यंत थांबला बस आल्यावर त्याला बस मध्ये बसवले आणि मग आश्रमात परत आला. किरण बरोबर मी ट्रेकिंगची, होसेने घेतलेली, मोठी, अडीच किलो वजनाची सॅक जड झाली. खांदे दुखायला लागले म्हणून पुण्याला परत पाठवून दिली अनुभवाने शहाणपण आले दुसरी हलकी सॅक घेऊन उद्या सकाळपासून परिक्रमा सुरू...
आता उद्यापासून एकट्याचा प्रवास. निरंजन...
फक्त मैयाच तुमच्या सोबतीला कायम राहणार..
वाटेत परिक्रमावासी भेटतात, कोणी बरोबर येतो, कोणी थांबतो , कोणी पुढे जातो, कोणी मुक्काम करतो, हे चालूच राहणार...
रेल्वेसारखे... प्रवासी चढतात...उतरतात
रेल्वे पुढे जात राहाते...
तसेही... साठलेल्या पाण्याला दुर्गंधी येते.
खळाळत वाहणारे पाणी कसे सर्वत्र स्वच्छ ,सुमधूर, नितळ...असते
त्यामुळे था़ंबू नका...
चालत राहा... चालत रहा...
एकूण १४ परिक्रमावासी आश्रमात मुक्कामास होते. प्रत्येकाने आपल्या सोयीने आसन लावले. गार हवेत रात्री केव्हा निद्रादेवीच्या अधीन झालो ते समजलेच नाही.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ७
पहाटे साडेचारला नेहमीप्रमाणे जाग आली. मोबाईलचा गजर ही झाला. लावलेले आसन आवरून, महाराजश्रींनी दिलेला चहा घेऊन आणि महाराजश्रींचे आशीर्वाद घेऊन प्रस्थान ठेवले.
नर्मदे हर...
एकट्याने पगदंडी पकडली... कालपर्यंत सोबत किरण होता. आजपासून एकटा...निरंजन. ऊन वर यायच्या आत जमेल तेवढे अंतर पार करण्यासाठी पायाला वेग दिला... चिचली कठोरामार्गे पुढे जाताना नंदगाव च्या अलीकडे नर्मदा बाबांचा छोटा आश्रम आहे. त्याबाबत रस्ता विचारल्यावर एक गावकरी म्हणाला, रस्तेपे ध्यान रखना. नर्मदा बाबाने रस्ते पे यह झंडी लगाई है. वह झंडी देखकर चलना. झंडी छोडोंगे तो चक्कर काटोगे. ध्यान रखना.
थोडक्यात एक विशिष्ट प्रकारचा लाल रंगाचा झेंडा नर्मदा बाबांच्या सेवेकर्यांनी रस्त्यावर लावलेला होता .तो झेंडा बघत पुढे जायचे होते.
तो सेवेकरी म्हणाला तसाच रस्ता पुढे होता.चढ, पायवाट नंतर डोंगर. पायवाट मधूनच गायब. आजूबाजूला बघायचं. नर्मदाबाबांचा झेंडा दिसला की त्या दिशेने वाटचाल करत निघालो.अशा खुणा, स्थानिक लोकांशी बोलल्याशिवाय समजत नाहीत. हेलपाटा, दूरचा फेरा पडण्यापेक्षा क्षणभर थांबून रस्ता विचारणे हिताचे...
अतिशय दुर्गम भाग ना शेती ना माणूस. असह्य ऊन. ४०डिग्री तापमान असावे. तहान लागली होती. पाणी कोठे मिळणार असा विचार करत चालत होतो. आजूबाजूला कुठेच चिटपाखरूपण नव्हते. खूप तहान लागल्याने घशाला कोरड पडली होती. आता इथे पाणी कोण देणार , असा विचार करत चाललो होतो. सोबत पाण्याचा कमांडलू होता, पण त्यातले पाणी गरम झाले होते. ते पिणे शक्य नव्हते. ते पाणी उतरणार कसे घशाखाली. याचा विचार करता करता पावले टाकत होतो.
चढ चढून टेकाडावर आलो...आणि मन आनंदाने विभोर झाले...
समोर बघतो तर...पाण्याची लाईन आडवी गेलेली...आणि त्यातून पाण्याचे थुईथुई कारंजे उडत होते.
मैया काय चमत्कार घडवेल...तुम्ही कल्पनाच करू शकत नाही.
संपूर्ण निर्मनुष्य परिसर. या वैराण भागात गवत, बाभळीची झाडे, खुरटी जंगली झुडपे याशिवाय काहीच नव्हते.आणि मी एकटा...
दूर दूरवर नजर पोहोचेल तिथपर्यंत कोणीही नाही. आणि वीजटंचाईच्या वेळी पाण्याची मोटर भर दुपारी चालू आणि पाणी येतय...
काय म्हणायचे...
आंधळा मागतो एक डोळा...आणि देव देतो दोन...अशी माझी अवस्था झालेली.
थंड पाणी डोक्यावर ओतले.पोटभर पाणी प्यायलो. पाण्याचे उडणारे तुषार, अंगावर रोमांच आणत होते. तुम्हाला हवे ते मिळणार. मैया तुमच्या विश्वासाची परिक्षा पाहते. पदोपदी...घडोघडी...
पाणी पिऊन तिथेच एका बाभळीच्या झाडाच्या सावलीला बसलो. थोडी विश्रांती घेतली. बसल्यानंतर पायात शिरलेली गवताची तुसं काढली. सुईपेक्षा अणुकुचीदार अशी ती तुसं. सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत. पण पायात सारखी टोचत राहतात. थांबून, नीट बघून काढल्याशिवाय चालणे शक्य होत नाही. वाट काढत निघाल्यावर नंदगावच्या अलीकडे एक नदी बहुदा वर्खड नदी लागली. नदी कसली थोडेफार पाणी. समोरच्या किनाऱ्यावर, डोंगरावर एक झोपडी दिसली. नर्मदे हर करीत हात दिल्यावर मातारामनी हात करून रस्ता दाखवला. परिक्रमेत महिलांना माताराम म्हणतात. म्हणजे मातारामनी त्यांच्या झोपडीकडे कसे जायचे तो मार्ग दाखवला. त्याप्रमाणे तीव्र उतारावरून हात टेकवत, टेकवत पात्रात उतरलो. पात्रातील पाण्यात, एक भोला ( श्वान ) थंडाव्यासाठी बसला होता. भोला हा शब्द मला परिक्रमेत समजला. ग्रामस्थ हा शब्द वापरतात. किती वेगळा शब्दप्रयोग. माझी काठी पाहून बिचाऱ्याला नाईलाजाने पाण्यातले स्थान सोडावे लागले. पुढे पात्रात थोडे अंतर चालून चालून पुन्हा उभा चढ चढून वरती गेलो.
वरती एक झोपडी होती. झोपडी म्हणजे काय दोन चार बांबू आणि त्याच्यावर टाकलेले प्लॅस्टिकचे कापड. झाली झोपडी तयार. आपल्याकडे झोपडी पण विटांच्या भिंती, सिमेंट कॉंक्रीटची असते. कोणाला वाटणार पण नाही झोपडी आहे म्हणून. इथे ना विटांच्या भिंती, ना पत्रे. झोपडीच्या सावलीत बसलो. तेथे श्री रमेश व सौ सीताबाई असे नाव असलेले दांपत्य राहात होते. दोघांना नमस्कार केला. मातारामनी पाणी प्यायला दिले. थंड पाणी कमंडलूतही भरून दिले.
मी त्यांना सहज विचारले अशा वैराण जागी आजूबाजूला कोणी नाही. तिथे तुम्ही राहता कसे आणि काय काम करता. त्यावर ते रमेश म्हणाले , मैं यहाँ मोटार चालू करने का काम करता हुँ. मी बुचकळ्यात पडलो त्यांच्या घरापाशी पाचसहा मोटारी दिसत होत्या. नंतर लक्षात आले. काम म्हणजे काय तर यांच्या घरापाशी ज्या चार-पाच मोटारी ठेवलेल्या होत्या, त्याचा स्वीच बोर्ड शेजारी खांबावर टांगलेला होता. वीज आली की त्या मोटारी चालू बंद करण्याचे काम यांच्यावर गावकऱ्यांनी सोपवले होते. हे करायचे कारण म्हणजे गावापासून नदी तीन-चार किलोमीटर दूर. दरवेळी गावकऱ्यांना पाणी सोडायला मोटर चालू, बंद करायला यावे लागायचे. म्हणून गावातल्या चार-पाच लोकांनी यांच्याकडे ते काम सोपवले. त्यांचे त्यांना पैसे मिळायचे. ते उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. जवळचे गाव नांदगाव. ते तीन चार किलोमीटर दूर.
यांच्या दारात ती चार शेळ्या, एक बोकड, दोन-तीन कोंबड्या एक कोंबडा. हीच यांची संपत्ती. शेळीचे निघणारे दूध त्या शेळीच्या पिल्लांसाठी. पिल्ले मोठी झाल्यानंतर विकून मिळणारे पैसे , हे यांचे वाढीव उत्पन्न. तसेच कोंबड्याचे पण. जंगली जनावरांचा काही त्रास होतो का, असे विचारल्यावर श्री रमेश म्हणाले, येथे कोल्हे येतात. त्यांच्यापासून कोंबड्यांचे, शेळ्यांचे रक्षण करावे लागते. त्यामुळे त्यांनी झोपडीला तारांचा दरवाजा बसवला होता शिवाय दोन कुत्रेही पाळले होते. आमचे बोलणे चालू असतानाच माताराम म्हणाल्या, चहा करू का... मी हो म्हणाल्यावर त्या म्हणाल्या काली चाय चलेगी क्या. मी होकार दिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जवळपासच्या काटक्या गोळा करून चूल पेटवली. त्यावर आधण ठेवले. अर्धा पेलाभर काळा बिन साखरेचा चहा मला दिला. अशा दूर, वैराण भागात साखर कशी मिळणार ... त्यामुळे चहा मिळणार तो फक्त पाणी आणि चहाची पावडर घातलेला... काळा चहा. उन्हात सात-आठ किलोमीटरची चाल केल्यावर असा चहा हा अमृतच...
आपल्याकडे कोलेस्टेराॅल वाढू नये म्हणून बिनसाखरेचा, बिन दुधाचा काळा चहा पितात. येथे तर ती अंगभूत व्यवस्था आहे. आठवणीसाठी त्यांचे, झोपडीचे फोटो काढून पुढे निघालो. दुपारी दोनच्या सुमारास नंदगावात मोहब्बतज्यू या नावाच्या वृद्ध गृहस्थांनी मला पाणी देऊन, भोजन प्रसाद घेणार का असे विचारले. भूक लागली होतीच. न मागता भोजन प्रसाद समोर आला समोर होता. समोर आलेले पूर्णब्रह्म नाकारणे म्हणजे नंतर पश्चाताप नक्की. मी लगेच हो म्हणालो.
दोन रोट्या, भाजी, भात, डाळ, वरती ताक असा साग्र्यसंगीत भोजनप्रसाद मिळाला. सगळी मैया ची कृपा. पती-पत्नींनी माझी आस्थेने चौकशी केली. भोजन प्रसाद पश्चात पाच दहा मिनिटे विश्रांती घेतली. विश्रांती दरम्यान त्यांनी विचारलेली माझी माहिती सांगितली. कुठून परिक्रमा उचलली, एकट्याने करता का, इ चर्चा झाली. नंदगांवच्या पुढील ब्राह्मणगाव विश्वनाथखेडा ही मैया किनारी असलेली गावे आता पुनर्वसन झाल्यामुळे मला नव्या मार्गाने जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
वाटेत खेडा गावातील श्री महेन्द्र कुमावत भेटले. नलवा मार्गे लोहाराला पोचलो. तोपर्यंत सायंकाळचे साडेपाच वाजले होते. लोहारा म्हणजे कपिलेश्वर मुनींचे तीर्थ. गावाच्या पुढे परिक्रमावासीं साठी आश्रम आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. तेथे गेलो आश्रमामध्ये महाराजश्रींचे त्यांच्या सर्व शिष्यांसह यथेच्छ गांजा सेवन चालू होते. आसन कोठे लावू विचारल्यावर, पलीकडच्या जागेकडे बोट दाखवून तेथे आसन लावण्यास सांगितले. येथे मोठ्या संख्येने साधुसंत येतात तेव्हा आसन हलवावे लागेल, म्हणून आसन शेजारच्या जागेत लावा असे सांगितले.मी पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. तसेही या सगळ्या गांजा पिणाऱ्या गांजेकसांबरोबर बसून आपल्या फुफुसाचे बारा वाजवून आणि रात्रभर छातीत धूर भरून घेण्यापेक्षा शेजारच्या मोकळ्या आणि उघड्या हवेत झोपणे केव्हाही चांगले.
परिक्रमेतसुद्धा गांजा ओढणारे परिक्रमावासी भरपूर असतात. अशा गांजा पिणार्यांच्या बरोबर बसून गांजा ओढण्यात मिळणारा आनंद तेच जाणोत. आपल्याकडे गांजा नसला तरी, आशाळभूतपणे त्यांच्यासमोर बसून गांजा मिळेल याची वाट पाहत बसणारे काही कमी नाहीत.
ज्यांना साधनेनी एकाग्रता साधता ये नाही, ते गांज्याच्या धुंदीत एकाग्रता साधतात, म्हणे.
मी त्यांची आज्ञा घेऊन निघताना, महाराज श्रींनी आजकाल कोणीही उठतो की परिक्रमेला निघतो. आपण शिकून खूप मोठे झाल्याचे काहींना वाटते हे यातलेच आहेत अशी एक संवादफेक शिष्यांच्या कडे पाहून केली. मीही अर्थात त्याकडे दुर्लक्ष केले.
आपण एक दिवसाचे पाहुणे. आपले उद्दिष्ट परिक्रमा. त्यामध्ये अशा परिक्षा होणारच. तुमचा अभ्यास किती झालाय, यावर तुम्ही उत्तीर्ण होणार का नापास ते ठरते. जेवढा अपमान सहन करण्याची क्षमता जास्त, तेवढी उच्च श्रेणी मिळणार.
शेजारची जागा म्हणजे उघडी धर्मशाळा होती. तेथे बारा-तेरा परिक्रमावासींनी अगोदरच आसन लावले होते. मी धर्मशाळेच्या पुढील ओट्यावर एका बाजूला आसन लावले. आसन लावून, कपडे घेऊन घाटावर गेलो. घाट बरा होता तिथे स्नान केले, दिवसभराचे मळलेले कपडे धुतले. कपडे पिळून परत धर्मशाळेत आलो.
आश्रमाशेजारी रामदुलारी माता म्हणून एक वेगळा आश्रम होता. तेथे जाऊन देवाचे दर्शन घेतले. या आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या माताजींचे स्पर्श दर्शन व आशीर्वादही घेतले. या रामदुलारीमाता आश्रमात फक्त अविवाहित परिक्रमावासी महिलांची निवास व्यवस्था होते. भोजन प्रसाद मात्र शेजारील आश्रमात घ्यावा लागतो. माताजींनी मला बालभोग म्हणजे चुरमुरे, थोडी शेव, दोन उदबत्त्या प्रसाद म्हणून दिला. सायंकाळी सातच्या सुमारास मुख्य आश्रमात भंडारा म्हणजे म्हणजे मुगडाळ, दाणे, तांदुळ याची खिचडी होती. तो प्रसाद घेतला.
धर्मशाळेमध्ये रात्री उशिरापर्यंत शेजारील चार-पाच परिक्रमावासींचे यथाशक्य बिडीपान चालू होते. ते संपल्यानंतर त्यांचे खोकल्याचे संगीत सुरू झाले आलटून-पालटून एकेक परिक्रमावासी खोकून अन्य परिक्रमावासीयांना जागे ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. रात्री केव्हातरी डोळा लागला.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा पुष्प 8
सोबतच्या परिक्रमावासीयांच्या खोकल्याच्या संगीतामुळे रात्री उशिरा झोप लागली. पहाटे साडेचार वाजता गजर झालाच. सायंकाळी धुवून वाळत घातलेले कपडे गोळा करून आणले. त्यानंतर आवरून पहाटे पाचला प्रयाण केले... नर्मदे हर...
सायंकाळीच परिक्रमेच्या पुढच्या रस्त्याची चौकशी करून ठेवली होती. रात्री गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या फाट्यावरून वळून प्रवास सुरू केला. अर्धा किलोमीटर गेल्यानंतर दोन रस्ते फुटले. डाव्या रस्त्याने जायला हवे होते. उजव्या रस्त्याने गेलो. रस्ता चुकला अंधारात रस्ता सापडेना. ३-४ किलोमीटरचा फेरा पडला. वाटेत एका घराचा दरवाजा वाजवून यजमानाला उठवले. पुढचा रस्ता विचारून, झोपेतून उठवल्याबद्दल त्यांची माफी मागून मार्गस्थ झालो. नंतर रस्ता सापडत गेला.
आजचा पल्ला राजघाट पर्यंतचा होता चांदोबाच्या प्रकाशात प्रवास सुरू झाला.
सुंदर टिपूर चांदण्याचा प्रकाश रस्त्यावर पडला होता. सगळी पगदंडी पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने न्हाऊन निघालेली होती.इथे तुम्हाला विजेरीची पण गरज नाही. रस्त्यावर लाईट तर नसतातच. पण किती सुंदर वाटते चालताना...
आकाशात पांभरेशुभ्र चांदणे , त्यातून पाझरणारा पांढराशुभ्र प्रकाश, मधूनच रातकिड्यांचा आवाज, दूरवर कुठेतरी भोल्याचे भुंकणे, कुक्कुटाचे आरवणे.
मधूनच एखादा कोकीळ कु sss हू करून मस्त साद देतो. त्याचा तो गोड आवाज मोहून टाकतो. खरच, परमेश्वराने एकेकाला काय काय देणगी दिली आहे. प्रत्येक पक्षाचा रंग वेगळा, आकार वेगळा, रूप वेगळे, कंठ वेगळा,साद घालणे वेगळे परमेश्वराची लीला अगाध आहे.
एकट्याने परिक्रमा करण्यासारखा खरच आनंद नाही. कोणाशी गप्पा मारायच्या नाहीत, कोणाची उणीदुणी काढायची नाहीत, कुचाळक्या नाहीत, कोणाची वाट पाहायची नाही, वेळेचा अपव्यय नाही. सगळा संवाद आपला स्वत:शीच. देवाचे नाव घ्या, नर्मदामैय्याचे स्मरण करा, आवडत्या देवाचा जप करा, नाहीतर तुमच्या कुलदैवताला स्मरा...
खरे तर तुम्ही या अनोख्या वातावरणात हरवून जाता.
मस्त वाटते... मनमौजी असतो आपण...
मनस्वी आनंद तो हाच. मैय्या च्या कृपेने ही मिळालेली एक संधीच आहे.
आजचा आपला पल्ला राजघाटपर्यंतचा होता. सकाळी आठ पर्यंत रस्त्यात कोणी भेटले नाही. माझी एकट्याची वाटचाल, बरोबर दिशेने चालू होती. रस्त्यात काहीच विशेष अडचण आली नाही. दत्तवाड्यात एका ठिकाणी महादेव मंदिरात थांबलो. बळेच थोडासा नाष्टा केला. दरम्यान एका शेतकऱ्याने चहासाठी घरी बोलावले. आग्रह मोडवेना म्हणून गेलो. आज सकाळी चहा मिळाला नव्हता.त्यामुळे घराच्या ओसरीवर बसून ग्लासभर चहा घेतला. लगेच प्रस्थान ठेवले. सकाळी नाष्टा करावासा वाटले नव्हते. कारण काही समजले नाही पण तासाभराने पोटात मळमळू लागले. चालत राहिलो. कदाचित भूक न लागता सुद्धा बळेच खाल्ल्याचा परिणाम असावा. मनोमन मैयाला विनंती केली , मळमळ थांबू दे , बळेच खाणार नाही. काहीही औषध न घेता तासाभरात मळमळ थांबली. कानाला हात लावला. इथून पुढे बळेच खाणे नाही. वेळ झाली म्हणून खाणे तर नाहीच नाही. आज दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता दर अर्ध्या तासाने अर्धा कमंडलू पाणी प्यावे लागत होते. एकदा घाम पुसला पाच मिनिटात पुन्हा घाम. पोट, पाठ, कपाळ, मान घामाने निथळत होते. थांबले तर वेळ जाणार... चालले तर घाम येणार. पर्याय नाही... चालत राहा...चालत राहा... मैया आहेच.
काल सायंकाळपासून उजव्या पायाच्या अंगठ्या शेजारी बेचक्यात चालताना दुखत होते. आज दुखणे थोडे वाढले होते. पाय रेटत होतो. खूप ऊन असल्याने वेग कमी होत होता. एका हातात काठी, एका हातात पाण्याने भरलेला कमंडलू, पाठीवर सॅक, डोक्यावर कान व मान झाकणारा नॅपकिन त्यावर टोपी , तरी ऊन जाणवत होते. खांदे दुखत होते . खांद्याचे वजन कमी करायला दोन्ही हातानी सॅक उचलायची , सॅकचे खांद्यावरचे वजन हातावर घ्यायचे, चार पावले चालल्यावर लक्षात यायचे सॅकचे ओझे पुन्हा खांद्यावर आलेले आहे. कधी सॅकचे बंद ताणून घे तर कधी सैल कर. पर्याय शोधत वाटचाल चालू होती.
दुपारी साडेतीनच्या सुमारास कसरावदला पोहोचलो. पाणी पिण्यासाठी थांबलो. एका मातारामनी पाणी दिले. थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. एका मातारामनी चहा करू का विचारले. मी हो म्हणालो. त्यावर त्या म्हणाल्या तुम्ही पंडित (ब्राह्मण) दिसता.आम्ही केवट आहोत. मी म्हणालो, केवट म्हणजे काय आणि आमचा चहा चालेल का असे का विचारले. त्या म्हणाल्या, केवट म्हणजे नावाडी. प्रभू रामचंद्रांना ज्यांनी गंगा पार केले ते आम्ही केवट म्हणजे नावाडी. नवीनच माहिती मिळाली, भारी वाटले ऐकून. त्या म्हणाल्या, पंडित आमच्याकडे काही घेत नाहीत.
मी जात पात न पाळणारा. त्यामुळे मातारामना नि:शंकमनाने चहा करण्यास सांगितले. त्यांनी प्रेमाने बनवलेला गरमागरम, गोड , ग्लासभर चहा प्यायलो. अर्धा तास त्यांचे तिथे विश्रांती घेतली. त्यांनी स्वतःहून एक मुलगा माझ्याबरोबर वाट दाखवण्यासाठी दिला. पुढे मैया वरील नव्या बांधलेल्या शंभर फूट उंच असलेल्या पुलाखालून पुढे निघालो. केवढा भव्य पूल बांधला होता तो. मी अगदीच खुजा दिसत होतो त्याच्यासमोर. अशीच भव्य बांधकामे चालू होती सगळीकडे. कुठे धरणे, कुठे भिंती , कुठे मोठमोठे चर खणलेले, कुठे कॅनाॅल. याला विकास म्हणायचा का विनाश... माझ्याकडे खरच उत्तर नव्हते.
आणि मी उत्तर शोधून करणार तरी काय होतो. माझ्या हातात काहीच नव्हते.
कसरावद ते राजघाट चे अंतर सहा किलोमीटर. ते पार करताना दोन तास लागले. उजवा पाय जरा जास्त दुखायला लागला होता. पुढे काय मांडून ठेवले आहे हे त्यावेळी मला समजले नाही.वाटेत एका ठिकाणी थांबलो पाणी पिण्यासाठी. त्या घराच्या आवारात जायला लागलो तर आतल्या माताराम मोठ्याने म्हणाल्या, थांबा थांबा बाबाजी...मला काहीच कळले नाही. त्यांनी सांगितल्यामुळे बाहेरच थांबलो. माझ्या हातातल्या काठी मुळे आतमध्ये बांधलेल्या म्हशी बिथरल्या होत्या. ते सांगून त्यांनी मला घराच्या बाहेरच थांबायला सांगितले. दावणी तोडून त्या म्हशी पळून जायच्या. घराबाहेरच्या मातीच्या ढिगाऱ्यावर विसावलो. त्यांनी दिलेले पाणी प्यायलो आणि कमंडलू भरून घेऊन निघालो... नर्मदे हर
वाटेत शेळ्या पाळणारी मुले, आपण नर्मदे sss हर म्हणले की बोट करून रस्ता दाखवायची. त्या रस्त्याने पुढे निघायचे. निर्मनुष्य रस्ता. वाटेत एका ठिकाणी एक जोडपे भेटले. त्यांनी उजवा हात पकडून चालत राहा असे सांगितले. उजवा हात पकडणे ही तेथील रस्ता सांगण्याची भाषा आहे. एका ठिकाणी पुढे राज घाट मार्ग असा बोर्ड लागेल. तेथून तसेच पुढे जात राहा असेही त्यांनी सांगितले.
नर्मदे sss हर करून निघालो. सायंकाळी पाच वाजता राजघाटवर पोचलो. एक एक आश्रम पहात राजघाटावरील दत्त मंदिरात आलो. तेथील सेवेकऱ्यांना विचारून सामान ठेवून मैयेवर स्नानाला गेलो. धरणामुळे मैयाचे पाणी वाढल्याने संपूर्ण घाट पाण्याखाली गेला होता. पात्रात एक-दोन ठिकाणी मोठे दगड ठेवून त्यावर बसून स्नानाची सोय केली होती. तेथे स्नान करून कपडे धुऊन दत्तमंदिरात परतलो. कपडे वाळत घालायला आवारातल्या महात्मा गांधींच्या स्मारकाच्या रेलिंगपाशी गेलो असताना तेथे गाडीने आलेल्या परिक्रमावासींनी माझी चौकशी केली. तुम्ही किती मूर्ती आहात, अशी चौकशी केली. मूर्ती म्हणजे किती परिक्रमावासी. मी एकटाच आहे, असे सांगितल्यावर मला भोजनप्रसादाला बसायला सांगितले. भूक लागलीच होती मैयाची कृपा झाली. पाय दुखत असल्यामुळे भोजनप्रसादासाठी तुम्हाला आणखी कष्ट नकोत, हे मैय्याने ओळखले. तुम्हाला विनवण्याची सुद्धा गरज पडत नाही. मैया सगळे ओळखते. तुमचे कष्ट कमी करते. हे सगळं पाहून डोळ्यात पाणी येते. काय पाहिजे तुम्हाला आणखीन. पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि सायंकाळी सहा वाजताच भोजनप्रसाद घेतला. भोजन प्रसादात गव्हाच्या मस्त गरम गरम पोळ्या, वाफाळलेली टोमॅटो बटाट्याची भाजी, डाळ , मऊसूद भात, मिरचीचे लोणचे, लिंबू, रामरास.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील आठ ज्येष्ठ नागरिक गाडीने नर्मदामैयाच्या परिक्रमेसाठी निघाले होते. वाटेत राजघाटला एका मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी माझी भेट झाली. या परिक्रमावासींमधील काही माताराम, चूल लावून तव्यावर मस्त गरमागरम पोळ्या व भाजी डाळ भात हे सगळे समोरच बनवीत होत्या. त्यामुळे त्यांच्या कृपेने मला भोजनप्रसाद मिळाला. किंबहुना नर्मदापरिक्रमेत बस किंवा वाहनाने करणारे सगळे परिक्रमावासी असाच स्वयंपाक करतात. आसन लावायचे, स्नान करायचे, चूल लावायची... बरोबर स्वयंपाकाचे सर्व साहित्य असतेच. पटकन स्वयंपाक करायचा.
थोडावेळ बसून निघालो. पण पाय पुढे टाकवेना. बघतो तर मोबाईलची बॅटरी डाउन. चार्जिंगची सोय काय करायची विचार करीत हमरस्त्यावर जायला निघालो. एसटीडी पीसीओ वरून फोन करायला हवा होता. मेन रोडवर दुकान दिसले. फोन केला. पत्नी सौ वर्षाशी बोललो. दिवसभराची माहिती कळविली. पायाची परिस्थिती सांगितली पाऊल टाकले शक्य नाही, हे सांगितल्यावर तिने एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. तसेच जवळपासच्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले. माझे मित्र सुनिल काळूसकर यांना फोनवरून परिस्थिती कथन केल्यावर त्यांनी अँटिबायोटिक्स घ्यावी लागतील असे सुचविले.
एसटीडीपीसीओ चालक श्री सुरेश केवट हे बडवाणीला औषधाच्या दुकानात काम करतात, अशी माहिती त्यांच्या पत्नी माताराम सौ संध्या केवट यांनी दिली. त्यांनी पाय बघून यजमानांना फोन लावला. सुरेशजी घरी आल्यावर त्यांनी विचारपूस केली व बडवानी ला जाऊन माझ्यासाठी औषध घेऊन आले. औषध घेऊन दत्त मंदिरात परत आलो तर माझे लावलेले आसन बाजूला करून तेथे आलेल्या तीस-चाळीस परिक्रमावासींनी सर्व मंडपात आसन लावून, मंडप व्यापून टाकला होता. मला आसन लावायला जागाच शिल्लक नव्हती. सामान घेऊन निघालो.श्री सुरेशजी केवट यांच्या परवानगीने त्यांच्या दुकानाच्या बाहेर ओसरीवर आसन लावले.
औषध घेतले. पाय ठणकत होता. सवय नसल्याने इतके चालल्यामुळे पायाला फोड आल्याचे निष्पन्न झाले. फोड म्हणजे चालण्यामुळे पायाला बाॅईल्स झाले होते. चांगलेच ठणकत होते. बराच वेळ तळमळत काढली. रात्री कधीतरी गार वारा सुटला. झोप कधी लागली ते समजलेच नाही. माझ्यासमोर उद्यापासून काय मांडून ठेवलय याची कल्पना मला त्यावेळी आली नव्हती. मला दत्तमंदिरातून आसन का हलवावे लागले ,मैयाने माझी व्यवस्था येथे का केली, हे सर्व पूर्वनियोजित होते ...आणि ते मला नंतर कळले...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ९
उजवा पाय खूप ठणकत होता. सकाळी गजर झाल्यावर उठलो. चालून बघितले, तर चालता येत नव्हते. त्यामुळे अंथरुणावर पडून राहिलो. सकाळी साडेसहा वाजता माताराम संध्याजी बाहेर आल्या. त्यांनी मी झोपल्याचे बघितले. माझ्या पायाची चौकशी केली. मला चालता येत नाही हे समजल्यावर त्यांनी १-२ दिवस इथेच थांबण्यास सांगितले. किंबहुना तसा आग्रह केला. एक-दोन दिवस विश्रांती घ्या बरे वाटले की, निघा असेही त्यांनी सुचवले. थोड्या वेळाने त्यांनी चहा आणून दिला. मातारामना मनोमन हात जोडले. मनात म्हटले की, ही कुठली पुण्याई. बसल्या जागेवर सगळे मिळते आहे. परिक्रमावासींची सेवा करणे हा त्यांचा अनन्यभाव आहे. तो रक्तातून आला आहे. पाहुणचाराशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या आपल्याला मात्र याचे अप्रूप वाटते. इथे मात्र दाराशी आलेला परिक्रमावासी हा मैयाचा भक्त असून आपला पाहुणा आहे आणि त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे याची त्यांनी मनाशी खूणगाठ मारलेली असते.
बिलकुल चालता येत नसल्याने पडून राहिलो. दिवसभर दुसरे काहीच केले नाही. माताराम संध्या यांनी दुपारी एक वाजता भोजन प्रसाद दिला. गरम गरम भाकरी, पिठले, चटणी आणि वरण,भात, शिवाय ग्लासभर ताक. मनोमन सुखावलो. काहीही हालचाल न करता तुमच्यासमोर सगळा चौरस आहार.आता माझ्या लक्षात आले की माझा मुक्काम मैयाने दत्त मंदिरातून श्री सुरेशजी केवट यांच्या दरवाज्यात का हलवला ते. तिथे माझे कोण करणार होते हे सगळे. मला कोणी आणून दिले असते. मला तर चालताही येणे शक्य नव्हते. पण ही सगळी व्यवस्था येथे मैयाने विनासायास केली. किती बारीक लक्ष ठेवते मैया तुमच्यावर. डोळ्यात पाणी आले. अंतर्मुख झालो. दिवसभर तिथेच दुकानाबाहेर एका बाजूला, ओसरीवर पडून होतो. सायंकाळी ग्लास भरून चहा तोही माताराम संध्या यांनी आणून दिला.
श्री सुरेशजी केवट सकाळी आठ वाजता घरून निघतात. ते सायंकाळी सात वाजता परत येतात. जवळजवळ अकरा तास काम करतात. अकरा तास काम करून घरी आल्यावर माझ्यासाठी पुन्हा बडवानीचा फेरा काल त्यांनी मारला,
तोही हसतमुखाने. ना कटकट, ना ब्याद आल्याचा भाव. किती सेवाभावी वृत्ती.
आपल्याकडे अनाहूत मनुष्य पाहताच वेगवेगळे भाव चेहऱ्यावर येतात.
सायंकाळी उशिरा श्री सुरेश जी केवट आले. त्यांनी पायाची चौकशी केली. पाय बरा नसून मला चालता येत नाही, हे बघून त्यांना वाईट वाटले. औषधे घेतली का म्हणून माझी प्रेमाने चौकशी केली. मैया तुम्हाला लवकरच बरे करेल, असा विश्वासही दिला. आणि येथे राहाण्याचा बिलकुल संकोच करू नका, असे आवर्जून मला सांगितले. कोण कुठले आपण, कुठुन येतो. ओळखीचे ना पाळखीचे....
ही आपुलकी, जिव्हाळा शहरात आपल्याला आपल्याला जवळच्या माणसांकडून सुद्धा मिळत नाही. इथे तर कालची संध्याकाळची भेट आणि लगेच ही आपुलकी. मैयाचे पाणीच वेगळे आहे.नंतर गप्पा झाल्या. मीही त्यांची चौकशी केली. रात्री त्यांच्याबरोबरच मला त्यांनी भोजन प्रसाद दिला. मात्र परिक्रमावासीला घरात राहणे वर्ज्य असल्यामुळे मी ओसरीवर बसूनच भोजन प्रसाद घेतला. परिक्रमावासी हा सन्मानाचे, वैराग्याचे जीवन जगत असतो. त्यांची ती सन्यासीवृत्तीची छाया, वैराग्याचे वागणे याची छाप गृहस्थावर पडू नये व त्यांच्या सुखी संसारात बाधा येऊ नये, कदाचित हे कारण असावे. माझी तब्येत बरीच नसल्याने आणि दिवसभर एका जागीच पडून राहिल्यामुळे मीच मातारामना सायंकाळी जास्त भोजनप्रसाद नको असे सांगितले. ते ऐकून त्यांनी माझ्यासाठी रात्री फक्त गरम-गरम तांदळाची खिचडी, लोणचे, गुळाचा खडा असा भोजन प्रसाद दिला. हे सगळं पोटभर खाऊन धन्य झालो.
अन्नदाता सुखी भव !!
अजून किती दिवस हा पाहुणचार घ्यावा लागणार, हे माझे मलाच माहिती नव्हते. मला लवकर बरे करण्याची मैयाला प्रार्थना केली. अजून जास्तीतजास्त एखादा दिवस म्हणजे आजचा दिवसच मुक्काम करणे सोयीचे होते. एका जागी एक दिवसापेक्षा जास्त मुक्काम करू नये हेच खरे. किंबहुना परिक्रमावासीसाठी तो नियमच. कोणाला आपला त्रास होऊ नये आणि अडगळही व्हायला नको. मैया माझी प्रार्थना लवकरच ऐकणार आहे याची कल्पना नव्हती, पण तसे झाले नाही आणि मैयाने माझी प्रार्थना ऐकली.
या केवट समाजातील लोकच फक्त परिक्रमावासींचे मौल्यवान सामान ठेवून घेऊन ते उत्तर तटावर परत आल्यावर चिखलदा येथे पोहोच करतात. कारण राजघाट पासून शूलपाणीची ( जंगलाचे नाव ) झाडी सुरू होते. ज्यांना लुटालूट होईल, अशी भीती वाटते. परंतु, जंगलातूनच जायचे आहे आणि मौल्यवान सामान तर चोरीला जाऊ नये असे वाटते त्यांच्यासाठी ही विनामोबदला सेवा केवट समाज पुरवतात.
आणि हे ठेवलेले सामान समोर उत्तर तटावरील चिखलदा येथे पोहोच करायचे स्वखर्चाने. फक्त तुम्ही तिथे पोचल्यानंतर त्यांना फोन करून सांगायचे की आम्ही आलो आहोत ते पूल ओलांडून तुमचे सामान पोहोच करतात. मैयाची कृपा ही दुसरे काय.
अशा अनेक अविश्वसनीय गोष्टी समजतात परिक्रमेत !!!
मैयाची कृपा, दुसरे काय.
हे आपल्या डोळ्यात अंजनच !!!
अहंकार सोडा, सेवाभाव अंगिकारा आणि स्वत:ला बदला, हा संदेश देण्यासाठी आपली रवानगी मैया किनारी होत असावी.
मौल्यवान सामान ठेवून घेण्याचे काम सुरेश केवट यांनी वैयक्तिक कारणांमुळे बंद केले आहे.
सायंकाळी मैयेवर राजघाटावर स्नानाला गेलो असताना तेथे सोनी नावाचे एक योग शिक्षक भेटले. काय करतो, कुठुन परिक्रमा उचलली, सोबत कोण आहे, परिक्रमा करण्याचे कारण काय इ माझी त्यांनी चौकशी केली. निघताना माझ्या हातावर त्यांनी शंभर रुपये दक्षिणा ठेवली. मी नाही म्हणालो असताना, परिक्रमेत दक्षिणेला नाही म्हणत नाहीत. ठेवा म्हणाले नंतर कामी येईल. परिक्रमेत दक्षिणेच्या एक रुपयालाही नाही म्हणू नये, हे नंतर समजले. या दक्षिणेचा नंतर तुम्हाला कसा उपयोग किंवा गरज पडेल हे मैयालाच माहिती. शेवटी त्यांची भावना महत्वाची. आपल्याला परिक्रमा करायला जमत नाही. समोरचा करतोय तर त्या सेवेमध्ये आपला थोडासा हातभार म्हणून ही दक्षिणा देतात. त्यातली भावना समजून घेणे गरजेचे असते.
कमंडलू भरून आणला. औषधाची गोळी घेऊन पडून राहिलो. उद्या सकाळपर्यंत पाय बरा व्हायला हवा होता. पाय बरा झाला तरच मुक्काम हलविता येणार होता. मैयावर भरोसा. आज ठणका कमी झाला होता. दिवसभर पडून राहिल्यामुळे, दिवसा बरीच झोप झाली. आणि दिवसभर झोपल्यामुळे रात्री झोप यायला तयार नव्हती. आता झोप येत नसल्यामुळे डोळे उघडे ठेवून निद्रादेवीची आराधना करण्याशिवाय दुसरा मार्ग माझ्यासमोर नव्हता. समोर निर्मनुष्य असा बडवाणीहून चिखलदाला जाणारा राज्य महामार्ग होता. दिवसभर रोरांवत वाहने जात होती. रात्री मात्र बऱ्याच वेळाने एखादे वाहन जायचे. उद्याच्या प्रस्थानाचा विचार करीत असतानाच केव्हातरी डोळा लागला. रात्री पायाला काहीतरी जड लागले म्हणून उठून बघतो , तर एक भोला माझ्या पायाशी येऊन झोपला होता. मी उठून बघतोय म्हणल्यावर, तो उठून दुसरीकडे गेला. थोड्यावेळाने मी पुन्हा झोपलो पुन्हा पायाशी जड झाले म्हणून बघतो तर तो पुन्हा माझ्या पायाशी येऊन झोपला होता. एवढ्या थंडीत माझी चांगली ऊब मिळत होती त्याला.थंडीने बाहू पसरले होते. मैयेकिनारी थंडी जरा जास्तच. उघड्यावर तेही भर थंडीत झोपायचा हा पहिलाच अनुभव.
असे चाकोरीबाहेरचे अनुभवच, तुम्हाला समृद्ध करतात. डिसेंबरची थंडी खरा अनुभव देणार होती...ही फक्त एक चुणूक होती. उद्या मैयेपासून दूर जावे लागणार होते.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १०
राजघाटवर देशपांडे कुटुंबियांचे सुंदर दत्त मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रेयांची सुरेख मूर्ती आहे. मंदिराचा मंडप खूप मोठा आहे. तेथे परिसर खूप मोठा आहे. तेथे अजूनही काही मंदिरे आहेत. इतर आश्रमही आहेत. महात्मा गांधी यांचे स्मारक तेथेच शेजारी आहे. येथे तट वरती असून, मैयाचे पात्र खाली आणि खूप विशाल आहे.
मैयेजवळ घाट नसला तरी वरती बसून मैयेचे दर्शन आणि ती निरव शांतता अनुभवता येतेच...
माझी पत्नी सौ वर्षा हिच्या कर्करोगाच्या उपचाराच्या वेळी, तिच्या केमोथेरेपीचे उपचार करणाऱ्या डॉक्टर श्रीमती अनुराधा सोवनी असे म्हणाल्या होत्या की, या उपचारांमध्ये बऱ्याच वेळा मानसिक अस्वस्थता येते. अशावेळी तुम्ही किंवा कोणीही पाणी असलेल्या ठिकाणी तळे, नदी यापाशी जाऊन बसावे. पाण्याच्या शेजारी बसल्यानंतर तुमच्या मनातील आंदोलने कमी होतात आणि मनाला शांतता लाभते. हे आम्ही जमेल तेव्हा जरूर केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मैये किनारी मी, याचा अनुभव वेळोवेळी घेतला. त्या शांततेने मनातील विचार कमी करण्याचा मला निश्र्चित उपयोग झाला. शांततेसाठी हा उपाय कोणीही जरूर करावा.
गजराने जाग आली तेव्हा, पहाटे जवळच कोठेतरी भारद्वाज पक्षी, हू हू हू हू अशी साद घालत होता. त्याला समोरून कोणीतरी प्रत्युत्तर देत होते. परत डोळा लागला. औषध घेतल्यामुळे पायाला चांगला आराम मिळाला. सकाळी ६ वा उठल्यानंतर मला दुखण्यात फरक जाणवला. सकाळी सुरेशजी केवट घराबाहेर आल्यानंतर त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितले, आज पाय बरा आहे. मी प्रस्थान ठेवतो. मी म्हणालो, अगोदरच दोन दिवस विश्रांती झाली आहे. आता पुढचा प्रवास करणे आवश्यक आहे. आणि तसेही परिक्रमावासीने एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहू नये. अपरिहार्य कारणामुळे , पायाला फोड आल्यामुळे एक दिवस मी थांबलो, दुसरा दिवसही थांबलो. आता थांबणे सोयीचे नव्हते. त्यांना वाईट वाटले. मातारम संध्या भेटल्या. त्यांचाही निरोप घेतला. तेवढ्यात सुरेशजी केवट यांचे सासरे माताराम संध्याजी यांचे वडील श्री दयारामजी केवट तेथे आले. त्यांचाही दोन दिवसांचा सहवास होता. ते पण म्हणाले, तुमचा अजून पाय पूर्ण बरा दिसत नाही. अजून एक दिवस विश्रांती घ्या आणि उद्या तुम्ही प्रस्थान ठेवा. फक्त दोन दिवसाच्या सहवासातून किती आस्था निर्माण झाली होती. ते पण मला आग्रह करू लागले होते, राहा म्हणून. मैया तुमची परीक्षा बघते. तुम्ही कसे काय गुंतून पडता ते निघालात तर पास... थांबलात तर नापास...
लेखी परीक्षा नाही , जोड्या जुळवा नाही, निबंध नाही, टिपा द्या नाही, सविस्तर उत्तरे द्या नाही, चूक की बरोबर ओळखा नाही, दोनच पर्याय निघा किंवा थांबा...
१००% पास किंवा १००% नापास.
आहे की नाही गंमत. पेपर नाही , तपासणे नाही, निकालासाठी थांबायचे नाही. सगळे सुटसुटीत... आणि माणसेसुद्धा अशी पाठवणार मैया की तुम्ही नाही म्हणू शकणार नाही. इथेच तर गंमत आहे. त्यातून बाहेर पडता येणे अवघड असते... पण....
त्यांना म्हणालो, माझ्यासारख्या परिक्रमावासीची तुम्ही अगदी घरच्यासारखी सेवा केली. काही कमी केले नाही, हे माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि परमेश्वराची इच्छा असल्यास परत नक्की भेटू. मैयाची कृपा आहे. उभयतांचे आभार मानले. डोळ्यात पाणी आले होते. सामान आवरले. सॅक भरली. त्यांनी दिलेला ग्लासभर गरम गरम फक्त दुधाचा चहा प्यायलो. निघालो...
नर्मदे हर...
तेवढ्यात निघताना त्यांच्या शेडचा पत्रा डोक्याला लागला. बारीक खोक पडली. रक्त यायला लागले. मला वाटले, हे काय लचांड आता, थांबलो. दोघांनी उभयतांनी माझ्या डोक्याची जखम बघितली. हळद लावली.त्यांनी आग्रह करायच्या आत, मी बडवानीला थांबून औषध घेतो, टिटॅनसचे इंजेक्शन घेतो आणि मग पुढे निघतो, असे सांगितले . त्या तिघांना ते पटले.
नर्मदे हर...
हळूहळू चालायला सुरूवात केली. पाय पूर्ण बरा व्हायला वेळ लागणार होता. पण औषध काम करेल, यांची खात्री होती. उगाच सारखा मैयावर भार टाकणेही बरोबर नाही. बडवानीच्या दिशेने निघालो. थोड्यावेळाने का होईना पण पाय उचलणे गरजेचे होते. संध्याकाळच्या आत मोरकट्टाला पोचणे आवश्यक होते.
थोडेसे विषयांतर....
कपिलेश्वरहून लोहरा मार्गेचालत जात असताना, दहीबेडाच्या पुढे रस्त्यात एक मोटारसायकल माझ्याशेजारी येऊन थांबली. मागे बसलेल्या व्यक्तिने, मी परिक्रमावासी आहे का, कुठून आलो आहे अशी चौकशी केली. मी पुणे येथील आहे, असे सांगितले. त्यांनी दहिबेडा येथील आश्रमात पुण्याच्या काही मूर्ती ( परिक्रमावासीयांना परिक्रमेत मूर्ती असे संबोधतात ) उतरल्या असून तेथे थांबण्याचा आग्रह केला. मी राजघाटच्या मुक्काम विषयी त्यांना कल्पना दिली.
त्यानंतर बोरखेडी मार्गे शूलपाणीच्या जंगलाचा प्रवास याविषयी चर्चा करीत असताना त्यांनी मला बोरखेडीच्या श्री हिरालालजी रावत,सरपंच यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. हा संदर्भ पुढे आलेला आहे. मोटर सायकलवर पाठीमागे असलेल्या व्यक्तीचे नाव मी विचारला असता त्यांनीही मी पुण्याचा असून, आळंदी येथे राहतो असे सांगितले. त्यांचे नाव चंद्रकांत पवार असे सांगितल्यावर. मला लगेच त्यांच्या नमामि देवी नर्मदे या पुस्तकाची आठवण झाली. मी त्यांना न ओळखल्याबद्दल त्यांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी शूलपाणी जंगलातील लुटालूट, बंद झाली असून आता निश्चिंत मनाने जा म्हणून सांगितले. हे संदर्भ पुढे आलेले आहेत.
मूर्ती... किती छान संबोधन आहे परिक्रमावासीयांना. मूर्ती म्हटले की आपल्या डोळ्यासमोर देवाची, देवीची मूर्ती उभी राहते.
देव असो वा देवी... मूर्ती म्हटल्यानंतर एक छान, सुबक , मनोभावक अशी प्रतिमा. इथे पण त्यांच्यादृष्टीने परिक्रमावासीही एक मूर्तीच आहे. देवाचे आणखी एक मूर्त स्वरूप म्हणूनच तर एवढी सेवा केली जाते ना...परिक्रमावासीची
मी राजघाटवर आसन लावले असताना, किशोरभाई डावर यांनी सुरेशजी केवट यांच्या दुकानात येऊन माझी भेट घेतली आणि मला विचारले तुम्हाला हिरालालजी रावत यांच्याशी बोलायचे आहे का. मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, मी राजघाटवर दर मंगळवारी देवीच्या दर्शनाला येतो. बाहेर उदबत्ती घेताना सचिनने, सुरेश केवट यांचा पुतण्याने तुम्हाला बोरखेडीचे सरपंच हिरालालजी रावत यांना तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितल्यामुळे मी तुमच्याकडे आलो आहे, असे सांगितले. त्यांनी फोनवर माझा हिरालालजी रावत यांच्याशी संपर्क करून दिला. हिरालाल जी हे बोरखेडीचे स्थायिक. तेथील सरपंच. तेथे त्यांची शेतीवाडी.फोनवर बोलताना हिरालालजी म्हणाले की, मी पाटी गावाला चाललो आहे नंतर बोरखेडीला येणार आहे. तुम्ही लवकर मोरकट्टा गाठून बोरखेडीला या. तेथे आपली संध्याकाळपर्यंत भेट होईल. मी ठीक आहे म्हणालो आणि निघालो.
योगायोगाने किशोर भाई यांच्यामुळे हिरालालजी रावत यांच्याशी संपर्क झाला. मैया काय घडवून आणेल, काय सांगता येत नाही.
रस्त्यातील चंद्रकांत पवार यांच्याशी भेट. त्याच्यानंतर भेटलेले किशोर भाई. त्यांनी लावलेला हिरालालजी रावत यांना फोन.... नंतर झालेली भेट सगळेच अगम्य.
बडवानीहून निघताना मी आणखीन चॉकलेटस घेतली.कारण माझ्या लक्षात आले की मी पुण्याहून निघताना घेतलेली चॉकलेट खूपच कमी आहेत. आणि वाटेत लहान मुलांना वाटायला ती कमी पडणार.
हे असे आहे , तुम्ही संचय करणार, ओझी वाढवणार आणि ओझ्याचे बैल तुम्हीच होणार. सांगतो कोणाला.
बडवाणीला चौकशी करताना ओळख झालेल्या दुकानदार श्री शैलेंद्र सिंग यांनी मला परिक्रमावासी म्हणून आग्रहाने कॉफी पाजली. वर दोन बिस्कीटचे पुडे दिले. आता हे सगळे केल्याबद्दल आभार कसे मानायचे ते कळेना. कारण मी आभार मानेपर्यंत ते हात करून फटफटीला किक मारून निघून सुद्धा गेले. पुन्हा ओझे वाढले...
मोरकट्ट्याला जात असताना वाटेत हसीराम नावाच्या एका शेतकऱ्याशी गप्पा झाल्या. त्याच्याशी सरदार सरोवर धरण आणि पुनर्वसन याविषयी गप्पा मारल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार सरोवर धरणग्रस्त मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना मध्य प्रदेश - गुजरात सरकारने बरीच नुकसानभरपाई दिली. जमिनीच्या प्रतवारीनुसार एकरी एक लाख रुपये पर्यंत भरपाई दिली. जमीन हवी असेल त्या शेतकऱ्याला, मध्यप्रदेश मधेच जमीन दिली आहे.जर गुजरातमध्ये जमीन चालणार असेल तर मध्यप्रदेश मधील एक एकराला गुजरात मध्ये पाच एकर एवढी बागायती, कोरडवाहू, जिरायती जशी असेल त्याप्रमाणे जमीन गुजरात सरकारने दिली. याशिवाय एक बैलजोडी आणि एक घर व पाचहजार रूपये रोख याप्रमाणे भरपाई देऊ केली आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई घेतली. श्री हसीराम यांनीही मध्यप्रदेशात अन्यत्र नुकसान भरपाई पोटी जमीन घेतली आहे. वडिलोपार्जित जमीन अजून पाण्याखाली न गेल्यामुळे ते बोरखेडी जवळची पूर्वापारची शेती करीत आहेत.
एका ठिकाणी हसीराम थांबून मला म्हणाले, मी आता येथे वळतो. नर्मदे हर... त्यांना नर्मदे हर करून मीही पुढे चालू लागलो.
मनात विचार आला, ही सरकारने भरपाई म्हणून जमीन दिलेली आहे , घर दिलेले आहे, बैलजोडी दिलेली आहे शिवाय रोख रक्कमही दिलेली आहे. खरोखर ही भरपाई दिलेली आहे का आणि असेल तर त्याचा योग्य विनियोग झाला आहे का आणि शेतकरी सुखी आहेत का ...
का त्यांची अवस्था याहून वेगळी आहे... का पहिल्यापेक्षा वाईट आहे...
असंख्य प्रश्न मनात उभे राहिले पण मला माहिती नव्हते, याचे उत्तर माझ्यासमोर लवकरच मूर्त स्वरुपात उभे राहणार होते.
पुढे अनारसिंग नावाचा एक मुलगा भेटला तो आणि मी बरोबरच बोरखेडीला निघालो. बोरखेडीला त्याची जमीन आहे. पण घरची जमीन कसायला बरीच माणसे असल्यामुळे तो दुसरीकडे रोजंदारीवर शेती काम करतो. त्याचे शिक्षण विचारल्यावर, तो शाळेतच गेला नसल्याचे त्याने मला सांगितले. त्याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला , आई-वडिलांनी शाळेतच घातले नाही , मग शिक्षण कसे होणार !!!
आदिवासींची ही शिक्षणाची दुरावस्था सर्वत्र दिसून येते. ऐकून वाईट वाटले. आदिवासींचे किमान शिक्षण झाले नाही, तर त्यांच्यासाठी शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी राखीव ठेवलेल्या जागांचा त्यांना कसा उपयोग होणार हे सरकारच जाणे.. आदिवासींसाठी राखीव असलेल्या शैक्षणिक आणि नोकरीसाठीच्या राखीव जागांवर इतर लोकांचाच डोळा असतो आणि तेच डल्ला मारतात...हे म्हणजे
रोग पोटात आणि मलम पोटावर, अशी स्थिती आहे. सरकारची ही योजना म्हणजे केवळ फार्स आहे असे म्हणायला वाव आहे.
आम्ही दोघे पगदंडीने जात असताना बरेच परिक्रमावासी मागे पुढे चालले होते. आदिवासी पुरूष व स्त्रीयाही रस्त्याने दिसत होत्या. मध्यमवयीन, लहान वयात लग्न झालेल्या मुली पगदंडीवर दिसत होत्या. त्या स्त्रियांच्या अंगावर फाटके, ठिगळ लावलेले कपडे होते. त्यांची मुलेसुद्धा अर्धनग्न होती. पायात चपला नाहीत. हातापायांच्या काड्या. फार वाईट वाटले ही विदारक अवस्था बघून.
या देशाला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे झाली, अजून काही आपल्या देशात सुधारणा झालेली नाही. गरिबांचे हाल कुत्रा खात नाही. ही त्यांची दररोजचीच पायपीट असावी. बहुतेक त्या कुठून तरी कामावरून घरी परत चाललेल्या असाव्यात. न जाणो त्या कामावरून इथेपर्यंत पायी आल्या होत्या आणि अजून पुढे कुठेपर्यंत पायी जायचे होते ते.
तुटपुंजा रोजंदारीसाठी त्यांच्या आयुष्यातली ही पायपीट कधी संपणार हा प्रश्न मनात आला. मी परिक्रमावासी असल्यामुळे माझे थोडेसे रोजचे अंतर चालले आणि माझे परिक्रमेचे विशिष्ट दिवस झाले कि, मी परत जाणार होतो.
त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या पायाला लागलेली ही पायपीट कधी थांबणार हे मैयाच जाणे.
शहरांमध्ये किरकोळ कारणावरून आपण जुने कपडे, महागड्या गोष्टी फेकून देतो आणि नवीन विकत आणतो. आपल्याला पैशाचे मूल्य बिलकुल जाणवत नाही. तुमचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला येथे मैयाने आणले आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर तुमची परिक्रमा व्यर्थच म्हणा .त्यापेक्षा पर्यटन केलेले जास्त चांगले...
सहज आठवले म्हणून मी त्या लहान मुलांना माझ्याकडची चॉकलेटस दिली. किती खुश झाली ती मुलं.
डोळ्यात रडता रडता येणारे पाणी आणि चॉकलेट बघून तोंडावर दिसणारे त्यांचे ते निरागस हास्य...
अजूनही विसरणार नाही मी ते...
एका डोळ्यात हसू दुसऱ्या डोळ्यात आसू ...
आणखी येणाऱ्या भावनांना दाबून, त्यांना टाटा करून मी पुढे निघालो... नर्मदे हर
यावरील सामाजिक गोष्टींचे विवेचन हे, कदाचित आपणास विषयांतर वाटेल. कदाचित मी परिक्रमा सोडून अन्य गोष्टींच्या विषयी माहिती देतोय, असे वाटेल. पण, नर्मदामैयाच्या परिसरातील सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, पुनर्वसनविषयक या सगळया बाबींची मिळणारी माहिती जशीच्या तशी आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न मी करीत आहे. आपण यातले थोडे तरी उचलावे, अशी अपेक्षा आहे.
अगदी शेणसुद्धा माती पडले तर थोडी माती घेऊन उठतेच की...
वरती मी सांगितल्याप्रमाणे धरणग्रस्तांना दिलेल्या भरपाईचे विदारक चित्र अनारसिंगने माझ्यासमोर मांडले. पुढे आम्ही दोघे एकत्र चालत असताना तो म्हणाला, ज्या धरणग्रस्तांनी मध्य प्रदेशातील एक एकर जमिनीपोटी जमिनीतील गुजरातमधील पाच एकर जमीन एक बैलजोडी एक घर व पैसे घेतले, नुकसानभरपाई घेतली, ते शेतकरी तेथे गेले. बाजारभावाने म्हणजे एकरी एक ते सव्वा लाख एकर भावाने जमिनी, बैल, घर विकले. पैसे घेऊन मैयाकिनारी आपल्या घरी परत आले. आयुष्यात कधी एवढे पैसे पाहिलेले नाहीत एवढे पैसे त्यांच्यासमोर. कुणी मोटारसायकली घेतल्या. कुणाला दारूचे व्यसन लागले लागले. कोणी मोटरसायकलवर ड्रायव्हर ठेवले. सगळे पैसे उधळले. सगळे पैसे संपले. व्यसनात अडकले. आता ज्या जमिनी ते कसत आहेत त्या धरणात जाणाऱ्या जमिनी आहेत.
अजून काही दिवसांतच सरदार सरोवर पूर्ण झाले आणि एकदा पूर्ण उंचीच्या सर्व भिंती तयार झाल्या की या जमिनी पाण्याखाली जाणार . शेतकऱ्यांना नुसतीच भरपाई देऊन उपयोग नाही तर, सरकारची आणि आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे की त्या सर्व सर्व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनियोग ते करतील... सरदार सरोवर धरण पूर्ण झाल्यावर, पाणी वाढल्यानंतर या वडिलोपार्जित जमिनी आता पाण्याखाली जाणार आहेत.त्या जमिनी त्यांना कसता येणार नाहीत. त्यामुळे त्यांना अन्यत्र जाऊन रोज रोजंदारीवर काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तिथे भेटलेली सर्व माणसे आपल्याला विचारल्याशिवाय काहीच सांगणार नाहीत. तक्रार करणार नाहीत. आहे त्या परिस्थितीत आनंदाने,समाधानाने दिवस घालवणार... प्रतिकूल परिस्थितीत आदरातिथ्यही त्यांच्याकडूनच शिकावे. आमच्या सोसायटीतील सहनिवासी डॉ नितीन भगली यांनी मला नर्मदामैयाच्या परिसरातील आदरातिथ्याची परिस्थितीची कल्पना दिली होती. अगदी तसाच अनुभव मला पदोपदी आला आणि येतो आहे. या लोकांची आर्थिक स्थिती पाहून त्यांच्यावर आपला भोजनप्रसादाचा भार टाकताना पोटात गलबलून येते. परतफेड करावी तर त्यालाही यांची तयारी नाही. माझी पत्नी सौ वर्षा म्हणते, दरवेळी ऋणातून उतराई होण्याची गरज नाही. काहीवेळा ऋणात राहणे हे ही चांगलेच.
सगळेच प्रश्न आणि उत्तरे नाहीतच.
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा - पुष्प ११
सायंकाळपूर्वी बोरखेडीला पोहोचलो. चौकशी करीत हिरालालजींच्या घरी गेलो. खरे तर ते त्यांचे जुने घर होते. तेथे त्यांनी दुकान चालू केले होते. किराणामाल व किरकोळ वस्तू ते येथे विकतात. तेथेच गिरणी ही आहे. त्यांनी नवीन घर दुसरीकडे बांधले आहे.
समोरच्या बाजूला परिक्रमावासींसाठी आसन लावण्यासाठी व्यवस्था होती.
एका बाजूला आसन लावले. दैनंदिनी लिहीत असताना आजूबाजूला अनेक व्यसनी व्यक्ती वावरताना दिसल्या. त्यांची व त्यांच्या पत्नींची भांडणे चालू होती. चौकशी केल्यानंतर समजले की ती सर्व दारु पिणारी मंडळी असून बायकांकडे दारूसाठी पैसे मागत होती. मी मागे सांगितल्याप्रमाणे शेती विकून आलेले पैसे त्यांनी उडवले. आता पैसे नाहीत आणि लागलेल्या व्यसनांसाठी पैसे कुठून आणणार. मग बायकांना मागायचे. नाही दिले तर मारून वसूल करायचे. रोजंदारीवर काम करून बायका मजुरीचे पैसे आणणार आणि हे मात्र घर बसल्या पैसे लुबाडणार...हे सर्व बघून, ऐकून सुन्न झालो.
काल माझ्या मनात सरदार सरोवर धरणाच्या पाण्यात शेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई, त्यांचे पुनर्वसन याविषयीचे जे प्रश्न निर्माण झाले होते, त्याचे उत्तर मूर्त स्वरूपात दुसऱ्या दिवशी लगेचच माझ्यासमोर उभे राहील याची मला पुसटशी कल्पना नव्हती
मी हिरालालजींच्या दुकानात पोहोचलो. तेव्हा त्यांच्या पत्नी माताराम सौ सायबीबाई कामात होत्या. त्यांनी मला थंड पाणी दिले. पाणी प्यायलो आणि तृप्त झालो. त्यांनी माझी चौकशी केली. मी त्यांना माझी सर्व माहिती सांगितली. मग त्यांनी मला ग्लास भरून चहा दिला. सोबत बिस्किटे पण दिली आणि त्या स्वयंपाकासाठी निघून गेल्या.
दरम्यान हिरालालजी येईपर्यंत थांबायचे ठरले. थोडावेळ विश्रांती घेतली.नंतर दैनंदिनी लिहायला घेतली असताना गावातील लहान मुले येत होती जात होती. मी एकाला चॉकलेट दिले, हे समजल्यानंतर एक एक बाळगोपाळांची चाॅकलेटसाठी वर्दळ सुरु झाली.आधी दारातूनच डोकावून बघायची. हात केला की पळत पळत येऊन चॉकलेटसाठी हात पुढे करायचे.
माझे दैनंदिनीचे राहिलेले लिखाण पूर्ण होईपर्यंत सायंकाळचे साडेपाच वाजले. दरम्यान हिरालालजी आले. त्यांनी पण माझी विचारपूस करून दुकान उघडले. अन्य कोणी परिक्रमावासी आले आहेत का याची माझ्याकडे चौकशी केली. पण तोपर्यंत दुसरे कोणीही परिक्रमावासी आलेले नव्हते.
संध्याछाया पसरल्या. गाई-गुरे घराकडे परतू लागल्या. त्यांच्या पायांनी धूळ उडू लागली. त्यांच्यासोबत गुराखी मुले हैक हैक करीत गुरांना घराकडे वळत होती. गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण आवाज, खुरांनी उधळणारी धूळ हे आपण गोष्टीत वाचतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घंटांचा किणकिणाट ऐकून खूप आनंद झाला. एरवी आपण कशाला खास गावाकडे जाऊन संध्याकाळी हे सगळं बघणार. इथे सगळे विनासायास उपलब्ध होते. एखादा मुलगा म्हशीच्या पाठीवर बसवून हातात काठी घेऊन म्हशी वळत चालला होता. त्यांच्याबरोबर शेळ्याही चालल्या होत्या. त्यांचेही बें sss बें करणे चालू होते. शेळ्या मध्येच थांबून , पाय वर करून झुडपांचे शेंडे खात होत्या. त्यांची करडे ( पिल्ले ) घरापाशी आल्यामुळे जोरजोरात हुंदाडत होती.
गळ्यातील घंटा, खुरांचे आवाज ,उडणारी धूळ या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. दररोज वेगळे अनुभव...मैयाची कृपा... दुसरे काय...
संध्याकाळी हिरालालजींबरोबर मैया किनारी गेलो. ग्रामीण भागात मैयाकिनारी किती शांत वाटले म्हणून सांगू. हिरालाल जींनी आरतीसाठी बरोबर पणत्या घेतल्या होत्या. त्यांनी पणत्या मैयाकिनारी प्रज्वलित केल्या. आणि एकेक दिवा मैयेत सोडला.पणत्या डोलत डोलत पुढे जात होत्या. सायंकाळ आणि रात्र यांच्या सीमेवर पणत्यांची ती आरती मी डोळ्यांत साठवून ठेवली. हा कायमचा ठेवा. असे योग केव्हा येतील ते मैयाच जाणे.
खूप छान वाटले. नर्मदामैयाची अशी केलेली आरती मी पहिल्यांदाच बघितली. तिथल्या स्थानिक लोकांच्या आयुष्यात अशी आरती हा नेहमीचा भाग आहे. आरती झाल्यावर हिरालालजी मला चला म्हणाले. मी दहा-पंधरा मिनिटे बसतो , मग येतो असे म्हणालो. ते पुढे निघाले. मी मैयाच्या किनारी शांतपणे बसून राहिलो. कुठलाही गोंधळ नाही, गडबड नाही, फक्त वाहताना मैयाचा येणाराच काय तो आवाज. सर्वत्र शांतता... मनस्वी आनंद...
अंधार आकाशाला व्यापू लागला होता. रस्ता सापडणार नाही या भीतीपोटी मला मजबुरीने पाय उचलावे लागले. मैयेला नमस्कार केला आणि हिरालालजींच्या दुकानाकडे निघालो.
हिरालालजींचा एक मुलगा धरणग्रस्त म्हणून भरपाईपोटी त्यांना गुजरात मध्ये भडोच जवळ, मैया किनारी मिळालेली वीस एकर जमीन कसतो तर एक मुलगा शिक्षक म्हणून काम करतो. त्यांचे बोरखेडीतील दुकान आणि गिरणी हे पती पत्नी बघतात. याव्यतिरिक्त परिक्रमावासींची यथाशक्य सेवाही करतात. शिवाय दररोज मोफत भोजन प्रसाद देतात. परत आल्यावर त्यांनी दुकानातील सायंकाळची पूजा अर्चा केली. दरम्यान ग्वाल्हेरचे एक हनुमानगिरी नामक साधु आले. आल्या आल्या त्यांनी त्यांची सायंकाळची पूजा सुरू केली. बरोबर असलेले फोटो, देव याची साग्र्यसंगीत पूजा करीत होते. रात्री साडेसातच्या सुमारास हिरालालजी यांच्या घरून भोजनप्रसाद आला. हनुमानगिरी भोजन प्रसाद नको म्हणाले. मग हिरालालजींनी आणि मी भोजनप्रसाद घेतला.रोटी, डाळ, भात , लोणचे असा प्रसाद होता. भोजनप्रसाद झाल्यावर आसन लावले. नंतर हिरालालजी आणि मी दोघे जण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत होतो. बोरखेडीतले समाज जीवन, पिकणारे धान्य, शेतीतले उत्पन्न, धरण बांधल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, शूलपाणीत सध्या काय वातावरण आहे, लुटालूट अजूनही चालू आहे का, पुढे आश्रम कुठे आहे, याची माहिती त्यांनी मला दिली. कामासाठी ते अर्धा तासांनी बाहेर पडले.
अनेक पुस्तकातून किंवा नर्मदामैयाची परिक्रमा केलेल्या परिक्रमावासियांकडून आपण सर्वांनी परिक्रमेतील शूलपाणीच्या जंगलाविषयी ऐकले असेल. हे शूलपाणीचे जंगल राजघाट पासून पुढे सुरू होते. आता राजघाटपासून मोरकट्ट्या पर्यंतचा पुढील , दक्षिण तटावरील किनाऱ्याचा परिसर सरदार सरोवराच्या वाढलेल्या पाण्याखाली गेल्यामुळे तुम्हाला बडवानी मोरकट्टामार्गे आणि पुढे जावे लागते.
नर्मदा मैयाची परिक्रमा करणाऱ्या सर्व परिक्रमावासीयांना मैय्या किनारी असलेल्या शूलपाणीच्या जंगलातून जावे लागते. हे जंगल नर्मदामैयाच्या दक्षिण आणि उत्तर दोन्ही तटावर आहे. दक्षिण तटावरील हे जंगल मोरकट्ट्यापासून सुरु होते. सुरवातीच्या भागाला जंगल असे म्हणता येणार नाही . कारण मोरकट्ट्यापासून बोरखेडी पर्यंतचा भाग सर्वसाधारणपणे बोडका भाग आहे. झाडे सुद्धा कमी आहेत. बोरखेडीपासून शूलपाणीचे जंगल सुरू होते असे म्हणता येईल.
आज चाल खूप झाल्यामुळे आणि दमल्यामुळे लगेच झोप लागली.
गजर होऊनही सकाळी ६ ला उठलो.
आज कुली ( गावाचे नाव ) मार्गे घोंगसाला जायचे होते. शूलपाणी जंगलातील लुटालूट कुली पासून सुरु होते. वाटेत शेतातले घर दिसले , तिथे थांबलो. ओसरीवर बसलो असताना माताराम यांनी मला चाय पियोगे क्या, असे विचारलं . मी हो म्हणालो. घाम पुसला. पाय ताणून,जमिनीवर आडवा झालो. मातारामनी काळा चहा आणून दिला. दूध नसलेला परंतु साखर घातलेला काळा चहा अमृतासमान होता. यामुळे तरतरी आली. दहा-पंधरा मिनिटे पुन्हा आडवा झालो. वाटेत कुलीला थांबून सायंकाळच्या आत घोंगसाला पोहोचायचे होते. त्यामुळे पाय उचलले... नर्मदे हर ...
मजल दर मजल करीत, वाटेत थांबत वाटचाल चालू होती. दूरवर पसरलेली घरे...हेच कुली गाव. रस्त्यात गुरे पाळणारी मुले, डोंगरावर एखाद-दुसरा बसलेला माणूस, पाणी भरून घेऊन चाललेल्या भिल्ल स्त्रीया.
डोक्यावर ओढणी, पोलके, परकर असा त्यांचा वेष. येथून मैया दूर होती. गावातल्या ओढ्याचे पाणी भरून आणायचे आणि तेच प्यायचे.
वाटेत नर्मदे हर चा कुणीतरी नारा द्यायचा, की आपणही नर्मदे हर करायचे आणि ते स्वतःहून दिशा दाखवायचे... आणि आपण पायाला रेटा द्यायचा...
थोड्यावेळाने टेकडीवरील एका कुटीत पोहोचलो. टेकडी बाहेर एक पाटी लावली होती.
रामानंद कुटी, हरिद्वार
शाखा कुली फलिया,बोराबारा ,
तहसील पाटी,
जिल्हा बडवानी
केवढा लांबलचक पत्ता !!!
गंमत वाटली.
आश्रम म्हणजे चंद्रमौळी झोपडी होती. काठ्या उभ्या आडव्या लावून छतावर कौले शाकारलेली होती. आत धुनीसाठी विटा लावून केलेली जागा. शेजारी महाराजश्रींचे आसन. येथील कुटीची व्यवस्था बालसंत श्री रामदास त्यागी महाराजश्री पाहतात. परिक्रमावासींसाठी येथे निवास,भोजन प्रसाद, चहा इत्यादी व्यवस्था होते. आम्ही कुटीत गेलो.आतमध्ये एक लहान मुलगा, बटू सारखा पांढरा पंचा ओढून, देवाचे काहीतरी म्हणत बसला होता. त्याच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर, माझे पैसे आणि मोबाईल कार्ड सिमकार्डसह कुलीत लुटून नेला, तो मिळतोय का पाहा म्हणून सांगू लागला. याचा अर्थ कुलीत अजून लुटालूट चालू होती. इथे एक सेवाभावी, साडू नावाचा मुलगा राहात होता त्याने चहा ठेवला. थोडावेळ बसून चहा प्यायलो आणि निघालो... नर्मदे हर
पाय उचलले. चालताना दूरवर कुठेतरी एखादी झोपडी दिसायची. तीही एखाद्या असायची टेकडीवर . चालताना एक टेकाड चढून गेल्यानंतर उजव्या बाजूला एक शाळुंका ठेवलेली होती. तेथून चार पावले पुढे गेल्यावर उजव्या हाताला दोन दगडांच्या बाणाच्या खुणा होत्या. त्यातून पायवाट सुरु झाली होती. या अशा प्रकारे केलेल्या खुणा शोधत घोंगसा गाठायचे होते. डोंगराच्या उतरणीवर पायवाट सुरु होती. सुमारे तासभर चालत होतो. वाटेत दोनदा घसरून पडलो, रंगपंचमी झाली. हसू आले. पहायलाही कोणी नाही आणि मदत करून उठवायलाही कुणी नाही. तुम्हीच पडायचे आणि तुम्हीच उठायचे. कसे चालायचे हे शिकलो.
मैयाच्या परिक्रमेत पाठ्यपुस्तकापेक्षाही खूप धडे. पण एकदा वाचला की, पक्का झाला.
संपूर्ण रस्त्यावर कुणी भेटले नाही. मी एकटाच चाललो होतो. इथे प्राण्यांचा, श्वापदांचा वावर आहे, हे नंतर समजले. अर्धा तासाने झाडाच्या सावलीमध्ये बसून पाणी प्यायलो. चालताना चांगलेच ऊन लागत होते. उंच दगडावर बसून दूरवर बघत होतो. कुठलीही हालचाल दिसत नव्हती. दूरवर कुठे मंदिर, एखादा झेंडा लावलेला आहे काय, याचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत होतो. पण तसे काहीच दिसले नाही. रस्त्याने मधूनच एखादी खारूताई तुरुतुरु पळताना दिसायची. तेवढीच काय ती हालचाल. तसेही आजूबाजूला सगळं रुक्ष असल्यामुळे आणि माणसांचा वावर नसल्यामुळे पक्षीही कमी होते. एखाद-दुसरा कावळा दिसला तर दिसला. खुरटी झुडपे वाढलेली. मधूनच मध्यम उंचीचे झाड. कातळातून गेलेली, उतारावरची मातीची पगदंडी. गवत भरपूर. त्यामुळे चालताना पायात गवताची तुसं घुसायची. दुर्लक्ष करून चालत राहिले तर टोचत राहायची. शेवटी मजबुरीने थांबून ती काढावी लागायची. झुडपांमध्ये रस्ता हरवून जायचा. पण बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात यायचे. अस्पष्ट खुणाही त्या सापडण्यात अडचणी. रस्ता शोधत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
एक टेकाड चढून आलो आणि उतरायला सुरुवात करणार तोच समोर एक झेंडा दिसला. झेंड्याच्या तिथेच आश्रम होता. आणि पलीकडे नर्मदा मैया. याचा अर्थ मी घोंगसाला पोहोचलो होतो. समोर असलेल्या एका मोठ्या खाईला वळसा घालून सुमारे पंधरा-वीस मिनिटात मी बहुतेक लखनगिरी महाराजांच्या आश्रमात पोचणार होतो. नर्मदामैयाच्या किनाऱ्यावरील शूलपाणीच्या जंगलात, घोंगसातील लखनगिरी महाराजांचा हा आश्रम हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे ठिकाण आहे. आश्रमाच्या एका बाजूला डोंगर, डोंगराच्या उतारावर वसलेला हा आश्रम आणि आश्रमाच्या पासून खाली वीस-पंचवीस फुटावर खूप खोली असलेली व संथपणे वाहणारी नर्मदा मैया...
आत्ता असलेला हा आश्रम मैयेच्या कुशीत जाणार होता, हे नंतर समजले.
मला हा आश्रम पाहायला मिळाला याचा आनंदही झाला पण मैयेच्या वाढलेल्या पाण्यात हा आश्रम लुप्त होणार याचे दुःखही झाले...
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा - पुष्प १२
खाईला वळसा घालून १० मिनिटात घोंगसात लखनगिरी महाराजांच्या आश्रमात पोहोचलो. आश्रमाचे नाव माँ नर्मदा आश्रम. आश्रमात तीन कुटी आहेत. एक लखनगिरी महाराजश्री यांची. एकात परिक्रमावासींची व्यवस्था आणि एकात गोशाळा. महाराजांच्या कुटीमध्येच भंडारा बनविण्याची ( स्वयंपाक व्यवस्था ) केलेली आहे. तेथे जाण्यापूर्वी तीन महिने आधी लखनगिरी महाराजांनी देह ठेवला. जवळच त्यांच्या समाधीचे काम चालू होते. लखनगिरी महाराजश्रींचे उत्तराधिकारी म्हणून सध्या नर्मदागिरी महाराजश्री गादी सांभाळतात. ते लखनगिरी महाराजांचे शिष्य. पस्तीसच्या आसपास वय, सडपातळ बांधा, दाढी राखलेली, उमदे व्यक्तिमत्व. मी प्रथमच एवढे तरुण महंत बघत होतो.
आश्रमात शिरताना गोशाळेबाहेर गाईचे वासरू जमिनीवर झोपवून ठेवलेले दिसले. त्याच्या तोंडातून फेस येत होता. चौकशी केल्यावर काल रात्री बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे समजले. घटना अशी होती की, काल रात्री केव्हातरी एक-दोन जण वासराच्या करूण हंबरण्याने जागे झाले व पळत काठ्या घेऊन गोशाळेत गेले. बिबट्या पाहून त्यांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून बिबट्या वासराला सोडून पळाला. ऐकून वाईट वाटले. बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाले. बिबट्याने गळा धरल्यामुळे बहुदा त्याची श्वासनलिका फुटली असावी. बिचारे वासरू मैया किनारी अंतिम क्षण मोजत होते. जवळपास गुरांचा डॉक्टर नाही, शहर नाही शिवाय आश्रमाची बोटही नव्हती. स्थानिक उपचार चालू होते. रात्री केव्हा तरी वासराचा आत्मा अनंतात विलीन झाला. मैया किनारी त्याला मोक्ष मिळाला म्हणायचा.
आश्रमात पोहोचलो. नर्मदागिरी महाराजश्री व तेथेच त्यांच्या शेजारी बसलेले कुलीचे रामदास त्यागीबाबा यांचे दर्शन घेतले. नमस्कार केला. आसन कुठे लावू असे त्यांना विचारले असता, त्यांनी त्यांच्या कुटीतच, एका कोपऱ्यात आसन लावायला सांगितले. त्यांच्या कुटीतच मला आसन लावायला सांगितले, म्हणून मला आश्चर्य वाटले. घोंगसामध्ये परिक्रमावासींसाठी आणि सेवेकरी यांच्यासाठी एक स्वतंत्र कुटी होती. त्या कुटीमध्येच सर्वसाधारणपणे परिक्रमावासींना आसन लावले होते.
थोडावेळ बसल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता बालभोग तयार झाल्याचा, भंडारी ( पुरूष स्वयंपाकी ) महोदयांनी आवाज दिला. बालभोग हे, नाश्त्याचे येथील धार्मिक विचारधारेने केलेले नामकरण. उकडलेली रताळी त्यात खोबरे, साखर घालून केलेला गोड पदार्थ. छोटीशी ताटली भरून बाल भोग ग्रहण केला. मैया किनारी स्नानाला गेलो. या भागात शूलपाणीमध्ये पाण्याचा फुगवटा झाल्याने मैया किनारी चिखल तयार झाला आहे. पाण्यात उतरताना पाय चिखलात खोलवर रुततात. उतारावरही चिखल झाला आहे. आश्रमाला लागूनच मैयेचे पात्र आहे. विशाल पात्र. येथे मैया खूप खोल आहे. असे म्हणतात. येथे तीन- चारशे फूट पाणी आहे. शूलपाणीचे जंगल हे सरदार सरोवर धरणाच्या जवळ असल्यामुळे पाण्याचा फुगवटा येथे खूप आहे. स्नानाला जाताना मला काय वाटले कुणास ठाऊक, मी मैया किनारी उतरून कडेला, एका दगडावर बसून स्नान केले. पाण्यात गेलो नाही. स्नान झाल्यावर तेथेच बसून कपडे स्वच्छ धुतले. पाण्यात दोन फूटही उतरलो नाही, ते बरे झाले हे मला उद्या समजले.
स्नान झाल्यानंतर तिथेच मैया किनारी थोडा वेळ बसलो. मैयेची शांतता अनुभवत होतो. इथे दिवसाही खूप शांतता भरून राहिली आहे. इथले ते अथांग जल, विशाल पात्र, संथ वाहणारी मैया, नजर पोहोचते तेथपर्यंत दूरवर दिसणारे मैयेचे पात्र, डोंगर, झाडे, किनारा हे सगळेच डोळ्यात भरून घेत होतो. थोड्यावेळानी चढ चढून आश्रमात आलो. कपडे वाळत घातले. आत बसून नर्मदा गिरी महाराजाश्रींशी चर्चा केली. माझी माहिती त्यांना सांगितली. बोलताना त्यांनी पाच-सहा दिवसांनी भंडारा असून तोपर्यंत थांबण्याचा आग्रह केला व निघण्याची घाई करू नका, असे म्हणाले. माझी थांबण्याची अडचण सांगून निघण्याची आज्ञा घेऊन ठेवली. त्यांना थांबतो असे सांगून निघून गेलो असतो तर त्यांना वाईट वाटले असतेच. शिवाय फसवणूक झाली असती ती वेगळीच. कशाला दुखवायचे उगाच. आपला सहवास एखाद्या दिवसाचा. खरे सांगून कटूपणा आला तरी परवडला. पण खोटे सांगून फसवण्याचे पाप माथी नको. आश्रमाच्या दोन बोटी आहेत.यातली एक बोट बंद होती. दुर्गम भागातून राजघाट पर्यंत व अन्यत्र जा ये करण्यासाठी त्या वापरतात. दुर्गम भाग असल्यामुळे वाहने येत नाहीत. माणसांमार्फत सामान आणणे हे खूप कष्टप्रद आणि महाग ठरू शकते.त्यापेक्षा या बोटींमुळे सामानाची, माणसांची ने आण सोयीची होते.
आसनावर येऊन मी दैनंदिनी लिहीत बसलो. मध्येच केव्हातरी येऊन त्यागी महाराजश्रींनी मी काय लिहितो आहे, ते वाचून पाहिले. नर्मदा गिरी महाराज श्री व त्यागीबाबा कामानिमित्त एका बोटीतून पाटी या गावाकडे रवाना झाले. नंतर थोड्यावेळाने वाळलेले कपडे घड्या घालून सॅकमध्ये भरून ठेवले. या सगळ्या दरम्यान दोन वेळा चहा झाला. तिथे समोरच साधूंचे कोंडाळे बनवून चिलिम फुंकणे चालू होते. नंतर सायंकाळच्या भोजन प्रसादाची तयारी सुरू झाली.
आश्रमात एक साधू भेटले. त्यांचे नाव खप्परवाले बाबा. खप्परचा अर्थ खाण्याची ताटली.भाजी चिरत असताना , त्यांच्याशी बराच वेळ, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.त्यांच्या भाषाशैलीमुळे व विविध विषयांच्या ज्ञानामुळे मला ते उच्चशिक्षित वाटले. स्वतःविषयी अधिक तपशील देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. संन्याशाचे नाव आणि गाव विचारू नये, हे सर्वप्रथम त्यांनीच मला सांगितले. ज्ञानात भर. मैयेत तुमचे शिक्षण सतत चालू राहते. एक पाठ झाला की दुसरा पाठ. दुसरा झाला की तिसरा.
बोलताना ते म्हणाले की, काही गोष्टी या डोळ्याला दिसत नाहीत. त्यांचा अनुभव घ्यावा लागतो. उदा : झाडे, आकाश, पाणी दिसते पण, वारा दिसत नाही. त्याचा अनुभव घ्यायचा. याचा अर्थ सोपा होता की परिक्रमेमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसणार नाहीत. त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. थोडक्यात पारलौकिक गोष्टी ह्या तुम्ही अनुभवानेच समजून घेऊ शकता, त्या डोळ्याला दिसत नाहीत. पुढे ते म्हणाले की, अधिकार आहे पण मर्यादा पण आहे . याचा अर्थ असा की एखादी गोष्ट, विषय याबद्दल एखाद्याला माहिती असते, पण त्याबद्दल बोलण्याचा अधिकार, भाष्य करण्याचा अधिकार अन्य व्यक्तीला असतो. त्यामुळे आपल्याला त्याविषयी बोलण्यास मर्यादा येतात. किंबहुना आपण त्या विषयावर बोलू नये. थोडक्यात मला किंवा कुणा परिक्रमावासीला एखाद्या विषयाचे ज्ञान असेल पण तुमच्यासमोर कोण व्यक्ती बसलेली आहे, त्याच्यासमोर तुमचे ज्ञान उघड करावे की करू नये याचे तुम्ही तारतम्य ठेवले पाहिजे. कारण कदाचित तो अधिकार त्या व्यक्तीला असेल. त्यामुळे परिक्रमेत तुम्ही शक्यतो तोंड बंद ठेवावे आणि जे मिळेल ते ज्ञान आणि भोजनप्रसाद, तो फक्त ग्रहण करावा. त्यावर भाष्य करू नये, हा अर्थ मी त्यातून घेतला.
खप्परवाले बाबा भंडारा ( भोजनप्रसाद किंवा स्वयंपाक ) फार उत्तम करतात, असे मला त्या आश्रमातील एका सेवाभावी सन्याशाने सांगितले. ते माझ्याबरोबर गप्पा मारत असताना,त्यांचे भाज्या चिरण्याचे कामही चालू होते. अतिशय मोजमापात, एखाद्या सुगरणीने भाजी चिरावी,असे त्यांचे चिरण्याचे काम होते. त्यांनी चिरलेली भाजी रात्री भोजन प्रसादात खाण्याचा योग आला.
थोडावेळाने चौदा-पंधरा साधूंचा एक जथ्था आश्रमात आला. त्यांचे स्वागत झाले. साधू मैयेवर जाऊन हात पाय धुवून आल्यानंतर पुन्हा चहा आला. नंतर आश्रमाच्या शेजारी बसून त्यांची चिलिमेची आवर्तने सुरू झाली. धुराची वलये एकापाठोपाठ आकाशात जात होती आणि त्यात भरलेल्या मादक औषधीचा उग्र दर्प हळूहळू सगळीकडे पसरत होता. मी तिथून उठून जरा दूर जाऊन बसलो.
संध्याछाया पसरू लागल्या. आकाशात नारिंगी रंगाचे ढग हळूहळू दिसू लागले. सूर्या देव क्षितिजाच्या पलीकडे गेले होते. थंड हवा वाहायला सुरुवात झाली. फार नसले तरी इथे भिल्लांकडे एखाद-दुसरे तरी पशुधन होतेच. जंगलात दिवसभर चारून एखादी गाय किंवा म्हैस घेऊन भिल्ल स्त्रिया डोंगरावर असलेल्या घराकडे परतत होत्या.
आणि अचानक कानावर, डोंगरावरून बासरीचे सूर ऐकू आले. स्तिमित झालो. दिसत नव्हता पण, कोणीतरी मुरलीधर सुरेख बासरी वाजवत होता. एका बाजूला मैया, समोर संध्याछाया पसरलेल्या, डोंगरावरून येणारी थंड हवा, आणि दुसर्या बाजूला मुरलीधराच्या बासरीचे गोड स्वर !!! भारी मेजवानी होती. दुर्लभ क्षण होते ते. थोड्यावेळाने रजनीने सर्व परिसर व्यापून टाकला. तिचे राज्य सुरू झाले. मात्र त्या मुरलीधराच्या बासरीचे सुरेल स्वर अजूनही ऐकू येतच होते. कालचक्र इथेच थांबावे असे वाटले. मी एकटा दूरवर बसल्यामुळे आणि आजूबाजूला कुठलाच कोलाहल नसल्यामुळे हे सगळे मनात साठवून ठेवले. प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभवावाच असा तो क्षण होता.
मैयानी स्वर्गीय अनुभवच दिला.
सायंकाळी सात वाजता भोजनप्रसाद झाला. आश्रमाच्या परिसरात वासरावर झालेला बिबट्याचा हल्ला आणि त्याचा वावर लक्षात घेता खप्परवाल्या बाबांनी काळजी घेण्याचे तीन वेळा बजावून सांगितले. इथेही आश्रमाला, गोशाळेला आश्रमाच्या मागील खोलीला दार नाही. झोपणारे खोलीत असूनही उघड्यावर आणि असुरक्षित. थोडक्यात आम्हीसुद्धा असुरक्षित होतो आणि बिबट्या महाशयांची हजेरी आमच्या कुटीतही लागू शकणार होती. छातीत धडकी भरली.
आपला सगळा भार मैयावर, ती काळजी घेईलच. मनातला घोर कमी झाला.
दिवसभर बऱ्यापैकी चढ-उतार आणि वेगात चाल झाल्यामुळे दमणूक झाली होती. अंथरूण पसरले आणि मुख्य महाराजांच्या आश्रमातच रात्री नऊच्या सुमारास निद्रादेवीच्या अधीन झालो.
रात्री एक-दोन वेळा नैसर्गिक विधीसाठी उठावे लागले. त्यावेळी चांदण्याच्या प्रकाशात दिसलेली मैया. जंगलातील नीरव शांतता. आसपास कोणीच नाही, फक्त मी एकटा. काठाच्या वरच्या बाजूस धीर करून बैठक मारली. हे असे अनुभव पुन्हा केव्हा गाठीस येतील याची कल्पना नव्हती आणि झालेही तसेच. परिक्रमेत नंतर, जंगलातील असा अगदी मैयाकिनारी असलेला एकांतातला आश्रम आणि मैयाचा सहवास खचितच अनुभवयास मिळाला. चिलिम पिऊन सगळे ढाराढूर झोपले होते. गोशाळेतील दुभत्या जनावरांच्या अस्तित्वामुळे आणि सहज साध्य अशी गाईगुरांची शिकार मिळत असल्यामुळे कदाचित बिबट्याचा वावर वाढला असावा, असे मला वाटले.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १३
बहुतेक सर्व परिक्रमावासीयांना शूलपाणीच्या जंगलात अश्वथामा व नर्मदामैया दर्शन देते, असे म्हणतात. मलाही या दोघांनीही दर्शन दिले पण वेगळ्या स्वरूपात. समजून घेऊया कसे दर्शन दिले ते.
मला अश्वत्थामा भेटला तो डोंगरसिंगच्या रूपात...डोंगरसिंग उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम आश्रमात करणारा, डोक्यावर पांढरे मुंडासे, अंगात सदरा, कमरेला लुंगीवजा अपरे वस्त्र... भिल्ल होता तो. मी तेथे जाण्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी बिबट्याने या डोंगरसिंग वर हल्ला केला होता. ही त्याची गोष्ट...
आपल्या झोपडी समोर रात्री डोंगरसिंग घरातील बकऱ्यांना बिबट्यापासून आडोसा म्हणून खाट लावून त्यांच्यापुढे झोपला होता. पहाटे केव्हातरी बिबट्या आला. बिबट्याला, उघडल्यावर झोपलेला डोंगरसिंग म्हणजे अतिशय सहज मिळालेली शिकार. बिबट्याने त्याचे डोके पकडले. बिबट्याच्या वरच्या जबड्याचे सुळे डोंगर सिंगच्या डोक्यात घुसले. पण खालच्या जबड्याचे दात खाटेमध्ये अडकले. त्यामुळे बिबट्या डोंगरसिंगला ओढून नेऊ शकला नाही. दरम्यान डोंगरसिंग जागा झाला आणि ओरडू लागला. डोंगरसिंगच्या ओरडण्याने त्याच्या घरातील इतर लोकही उठले. लोक आणि त्यांच्या ओरडण्याने बिबट्या पळून गेला. डोंगरसिंगच्या डोक्यात सुळे घुसल्यामुळे मोठी जखम झाली. खूप रक्तस्त्रावही झाला. त्याला बडवानीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. डोक्याला तीस-चाळीस टाके पडले. तो एक महिनाभर दवाखान्यात पडून होता. त्याला अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नव्हती. ती मिळणार की नाही हे त्याला माहिती नाही. या डोंगरसिंगचा कोणी वाली नाही. बरा होऊन तो परत आला. आश्रमात काम सुरू केले. हा डोंगर सिंग डोक्यावर जखमेचे व्रण घेऊन वावरत आहे. अश्वत्थाम्यासारखे हा तेल मागत नाही आणि अश्वत्थाम्यासारखे याच्या कोणी पायाही पडत नाही. या डोंगरसिंगला काय हवे तेही कोणी विचारत नाही आणि त्याचे पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नाही. आज हा डोंगरसिंग वाचला, पण पुढे काय होणार हा प्रश्न आहेच. त्याच्या कच्च्या बच्च्यांचे पुढे काय होणार... त्यांच्या पोटाला काय मिळणार... हा अंगाला काय घालणार... कुटुंब कसे पोसणार हे असे असंख्य प्रश्न डोंगरसिंगच्या रूपातील अश्वत्थाम्याने माझ्यापुढे उभे केले.
महाभारतातील अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाने, पांडवांच्या तंबूत घुसून निष्पाप, बालक वंशजांना ठार मारले म्हणून, त्याच्या डोक्यावरील दिव्य मणी काढून घेऊन, त्याची भळभळणारी जखम तशीच ठेवून त्याला तसेच काही हजार वर्षे जगण्याचा शाप दिला अशी पौराणिक कथा आहे. कदाचित खरा अश्वत्थामा हजारो वर्षांनी त्या शापातून मुक्त होईलही. पण डोंगरसिंगच्या सारखे असे अनेक मनुष्यरूपी अश्वत्थामे केव्हा मुक्त होणार ते मैयाच जाणे.
हा डोंगरसिंग दररोज जगण्याची लढाई लढत आहे. त्याच्या डोक्यावर झालेली जखम पण त्याला दररोज मरणाच्या वाटेची आठवण करून देत राहील, यात शंका नाही. तसेच यापुढेही बिबट्याच्या हल्ल्याचे भय त्याच्या मनात कायम असेल. असे अनेक डोंगरसिंग शूलपाणीच्या जंगलात आहेत. त्यातला एक मला दिसला. आश्रमात दोन पायांवर बसलेला. सर्वांचे भोजनप्रसाद झाल्यावर, मिळेल त्यावर समाधान व आनंद मानणारा. आजचा दिवस संपवून उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहणारा. कुणास ठाऊक त्याच्या आयुष्यात उद्या उगवणार आहे की नाही. तुम्ही प्रयत्न करून पहा, तुम्हालाही दिसेल असा एक अश्वत्थामा तुमच्या आजूबाजूला. मरणाचे ओझे डोक्यावर घेऊन फिरणारा. जाणून घ्या त्याचे दु:ख. आपापल्या परीने जमली तर यथाशक्य मदतही करा त्यांना... त्यांच्या दुःखात खारीचा वाटा उचलण्याचे आत्मिक समाधान आणि माणुसकी म्हणून आपले कर्तव्य पार पाडल्याचा आंतरिक आनंद.
मी त्याची विचारपूस केल्यावर आणि मदत देऊ केल्यावर काही अंशी समाधान व कसनुसे हास्य मला त्याच्या चेहऱ्यावर जाणवले. एक बोचणारी आणि सांगता न येणारी खंत मनात घर करून गेली...
राजघाट पासून मैया किनारीचे दक्षिण तटावरचे शूलपाणीचे जंगल सुरु होते. बोरखेडी कुलीपासून घोंगसा, सेमलट, भादलपासून माथासर सरदार सरोवरापर्यंत किमान ३४ गावे तरी शूलपाणीच्या जंगलात असतील. या गावांना गाडी रस्ते नाहीत केवळ पायपीट. आयुष्यभर न संपणारी. खरे आहे हे .या गरिबांना दुचाकी तरी कुठून परवडणार. दारिद्र्यामुळे भांडणे ठरलेलीच...
रस्त्यात चालताना जागोजागी मला मैयाने दर्शन दिले .शूलपाणीची झाडे त्यात मैया दर्शन देणारच. अतिशयोक्ती वाटेल पण...
परकर-पोलके डोक्यावर ओढणी असा वेश, तोही धड नाही. कुठे फाटलेले, कुठे ठिगळ लावलेले. संयम पहाल तर कल्पनाच करू शकत नाही. डोक्यावर ओझे घेऊन मैलोनमैल गाव येईपर्यंत चालत राहायचे, चेहऱ्यावर त्रागा नाही, वैताग नाही.कुठून येते हे सगळे.
गावात लहान लहान मुलींच्या स्वरूपात मला मैयानी दर्शन दिले. जुना तोकडा फ्रॉक, गुंड्या नाहीत, केसाला तेल नाही, शाळा नाही म्हणून शिक्षण नाही. शाळा असली तरी आई-वडिलांची इच्छा असेल तर शिक्षण नाहीतर अशिक्षितच राहणार, आयुष्यभर. त्यामुळे गरिबी ही पाचवीलाच पुजलेली. एखादे चॉकलेट दिले तर लाजत हसत घेऊन धूम ठोकणाऱ्या, निर्व्याज हास्य चेहऱ्यावर आणणाऱ्या, छोट्या गोष्टीतही केवढा आनंद मानणाऱ्या...
माता-भगिनींच्या रूपातील मैया पहाव्यात तर ...रापलेला चेहरा,एका कडेवर पोर, एकावर कळशी, पायात काही नाही... कुठेतरी डोंगर टेकडीवर घर. पाणी भरायला पंधरा-वीस मिनिटं डोंगर उतरून येऊन नाल्यात पाणी भरायचे आणि पुन्हा चढण चढायची. आपल्यासारख्या परिक्रमावासीने पाणी मागितले तर त्यातलेच काढून देणार आणि पुन्हा भरायला जाणार. केवढे दातृत्व मैया दाखवतात. वाईट एवढेच वाटते की ज्या नाल्यात या मैया, माताराम पाणी भरायला जातात त्याच्याच कडेला,परिक्रमावासी नैसर्गिक विधी, स्नान करतात. त्यांना कल्पना नसते की हेच पाणी परिक्रमावासीला आणि मैयेच्या या खऱ्या अपत्यांना प्यायला लागणार असते. मी हे कधीच केले नाही. पण असे करणाऱ्यांबद्दल खंत वाटली. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. गावात काही काम निघाले तर, शेतीकामासाठी, मोलमजुरीसाठी, लाकूडफाटा आणणे असो वा बाजारहाट. त्यांच्या आयुष्यातले चढ-उतार दररोजचेच. हलाखीच्या परिस्थितीतही जमेल तसा चहा, रूखी सूखी देऊन परिक्रमावासींचा आशीर्वाद घेणाऱ्या अशा अनेक मैयांनी मला दर्शन दिले. अव्यक्त पद्धतीने शिकवले. मला अंतर्मुख व्हायला लावले. मी शूलपाणीच्या जंगलात रस्ता चुकलो नसतानाही मैयाने मला तिचे खरे दर्शन दिले. डोळ्याने दिसणारा रस्ता निश्चितच बरोबर होता .पण काही वाटा दिसत नाहीत. त्यासाठी जंगलातला वाटसरू व्हावे लागते. तुम्ही अंतर्मुख व्हावे म्हणून मैयेने मला या रूपात दर्शन दिले असावे. तुम्ही शूलपाणीच्या जंगलात जा नाहीतर इतरत्र. असे अनेक मैयांचे तुम्हाला दर्शन होईल, फक्त त्यासाठी डोळे उघडे ठेवून जाणून घ्यायला हवे... नाहीतर पाठीवर ओझी घेऊन खेचऱं पण चालतातच की...
पहाटे साडेचारला जाग आली. अन्य परिक्रमावासींचा दिवस सुरू व्हायचा होता. पडून राहिलो,पुन्हा झोप लागली. साडेसहाला जाग आली, उठलो, आवरले. थोड्यावेळाने आश्रमात बलवंतसिंग नावाचे एक स्थानिक भेटले. त्यांच्याशी कुलीतील मोबाईल लुटीची आणि आश्रमातील वासरावरील हल्ल्याची घटना याविषयी बोललो. ते म्हणाले, नजीकच्या काळात बिबट्याच्या हल्ल्याच्या एक दोन घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. वासरावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी वास्तवात जे दोन जण उठल्याचे मी नमूद केले आहे. ती प्रत्यक्षात पाच-सात वर्षांची लहान मुले होती. त्यांची नावे दिनेश व मांगू त्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावले होते. काय धारिष्ट्यवान मुले होती. रात्रीच्या अंधारात दोघेजण स्वतःच हातात काठी घेऊन पळत गेली आणि बिबट्या समोर दिसून सुद्धा, न घाबरता त्याला हाकलून लावले .त्यांनी असेही सांगितले की गेल्या काही महिन्यात कुत्री पळवणे, गाय मारणे, बकऱ्या खाणे असे प्रकार बिबट्याने केले होते. हे ऐकून माझी पाचावर धारण बसली. केवढा मोठ्या धोक्याच्या सावटाखाली ही माणसे वावरत होती. येथे आश्रमालाही दरवाजे नव्हतेच. बिबट्या सारखा धोकादायक प्राणी नाही, अशी माहिती माझा सकाळ मधला पत्रकार मित्र उदय हर्डीकर याने मला दिली होती. ती माझ्या मनात आता कायमची कोरली गेली. बलवंतसिंग पुढे पुढे म्हणाले, आठ-दहा दिवसांपूर्वी मैये किनारी एक भिल्ल माताराम मासेमारी करत बसल्या होत्या. अचानक पाण्यातून मगर धाऊन आली व तिने त्या मातारामना जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्या माताराम सावध होत्या म्हणून वरच्या दिशेने पळाल्या आणि वाचल्या. ते म्हणाले, या पाण्यात वीस फुटी मगरी आहेत. आम्हीसुद्धा अंघोळ करण्यापूर्वी पाच-सात दगड पाण्यात टाकतो. पाण्यात दगडाला घाबरून मगरी दूर जातात मग आम्ही आंघोळीला पाण्यात उतरतो. शक्यतो लवकर आंघोळ करतो. पोहण्याचा प्रश्नच येत नाही. सरदार सरोवर धरणामुळे मैयेच्या दक्षिण आणि उत्तर दोन्ही तटांवर किमान वीस फूट पाणी वरती चढले आहे. मैयेचे पाणी वाढल्यामुळे मैयाला येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्या आणि नाले यांनाही आता बारमाही पाणी राहू लागले आहे.
थोडक्यात या परिसरात मैयाचे वाहन म्हणजे मगरी होत्या. आश्रमात दाखल झाल्यानंतर मी मैयेमध्ये दगडावर बसून स्नान केले, खोल पाण्यात उतरलो नाही, ही मला मैयेनी दिलेली बुद्धीच म्हणायची. माहिती नसताना पाण्यात उतरू नये हेच खरे. उगीच प्राणाशी गाठ !!!
कुणास ठाऊक पण सकाळी रव्याचा शिरा मिळावा असे मनात आले. काल बालभोगात रताळ्याचा गोड पदार्थ मिळाला होता. भंडारी महाशयांना जाऊन विचारले, तुम्ही रव्याचा हलवा करता का. त्यावर तो हो म्हणाला. रव्याचा, गव्हाचा किंवा बाजरीचाही शिरा करतो, असे त्याने सांगितले. चर्चा संपली, बाहेर येऊन बसलो. थोड्या वेळानी हाक आली, बालभोग पाओ. ताटली घेऊन पंगतीत बसलो तर समोर रव्याचा शिरा !!! काय म्हणावे याला...आपण मागावे आणि मैयाने हट्ट पुरवावेत. उपस्थित सोळा-सतरा साधू आणि परिक्रमावासी यापैकी कोणालाही गोडाची आवड नव्हती. त्यांना फक्त चहा गोड लागतो. मैयाने माझा हट्ट पुरवला. एवढेच नाही तर, ताटलीमधील शिरा पाहून मनात आले,दुपारपर्यंत याने भूक भागेल का...असा विचार करतो तोच भंडारी बाबांनी पुन्हा परातीत आणून शिरा वाढला. मैया म्हणाली, खा बाळा पोटभर खा !!! मला तुझी काळजी वाटते. वाईट वाटले. क्षुल्लक गोष्टींची इच्छा मनांत धरली. पण मैया मनकवडी आहे. तुम्ही मनात इच्छा केली तरी भैया प्रसन्न होऊन देणार.. धन्य झालो, भरल्या डोळ्याने अन्नदाता सुखी भव म्हणून उठलो. ताटली धुतली, बाहेर आलो.
खरेतर... मनात म्हणजे अव्यक्त पद्धतीने आणि बोलून म्हणजे व्यक्त पद्धतीने काय मागावे हे सर्वांनी शिकायला हवे. ते शिकण्यासाठीच परिक्रमेमध्ये तुमची रवानगी झालेली आहे. इथे यायला सुद्धा भाग्य लागते असे म्हणतात. नाहीतर नर्मदामैया किनारी राहून नळाने स्नान करणारे काही कमी नाहीत आणि समोर मैय्या असतानाही चिलमीच्या साह्याने समाधी लावणारे सुद्धा खूप आहेत. प्रारब्ध एकेकाचे !!!
दृष्य किंवा अदृष्य...लौकिक किंवा पारलौकिक कोणत्याही गोष्टींची मागणी न करणे हे जमायला पाहिजे. ते शिकणे महत्त्वाचे. तेच या परिक्रमेत जमावे, एवढीच मैयेला प्रार्थना.
तुमच्या जिभेचे आणि शरीराचे चोचले मैया तुम्ही मागून तर पुरवतेच पण न मागताही पुरवते !!! खरेतर मैया लक्ष ठेवून असते की तुम्ही या चोचल्यांपासून दूर कसे राहाल... ते जमण्यासाठी
झोपलेल्या तुम्हाला मैया उठवते, दूरवरून येथे घेऊन येते. पायी फिरवते, तुमचे डोळे उघडवते, तुमच्या डोळ्यात अंजन घालते, आणि तुम्हाला ज्ञानी करायचा प्रयत्न करते...
आसन आवरले...भरलेल्या डोळ्यांनी घोंगसातील मैयाचे दर्शन घेतले. अविस्मरणीय असा तो मुक्काम, निसर्गरम्य परिसर , डोंगरसिंग आणि मैयेची ती विविध रुपे...कधीही न विसरण्यासाठी पाय उचलले...
नर्मदे हर...
क्रमशः....
जय श्री गुरुदेव दत्त
नर्मदा परिक्रमा - पुष्प १४
सकाळी नऊ वाजता पाय उचलले. घोंगसापासून पुढे आता उत्तुंग पहाड चढून आम्ही पठारावरून चढ उतार करीत वाटचाल करणार होतो.आश्रमातील बिरजू, कलीराम व देवा या तीन मध्यप्रदेशातील मूर्तींसोबत प्रस्थान ठेवले. लवकरात लवकर सेमलेट गाठायचे होते. एकूण दोन डोंगर चढून उतरून सायंकाळच्या सुमारास सेमलेटमध्ये पोहोचलो. या भागामध्ये सर्वसाधारणपणे शाळा, मंदिराचा मंडप किंवा गावातील सरपंच यांच्याकडे आसन लावतात, असे दिसून आले होते. बरोबरच्या मूर्तींकडे सदावर्त, म्हणजे स्वयंपाकाचे साहित्य असल्यामुळे शाळेतच आसन लावून, चूल बनवून त्यावर टिक्कड आणि डाळ असा भोजनप्रसाद बनवून लवकरच निद्रादेवीच्या अधीन झालो.
पुढचा मुक्काम खापरमाळ. रात्रीच गावात चौकशी करून ठेवली होती. खापरमाळ येथे पुढचा मुक्काम करणे या दृष्टीने पायाला वेग देणे गरजेचे होते. मागे सांगितल्याप्रमाणे शूलपाणीच्या जंगलामध्ये कुलीच्या पुढे सर्व पगदंडी ही डोंगर पहाड , चढ-उतार, नाले, नद्या, जंगल अशीच आहे. तुम्हाला सरळ पगदंडी पाहायलाच मिळणार नाहीत. उतार इतके तीव्र की एकदा पाय सटकला की तुमची घसरगुंडी नक्की.. नाहीतर कपाळमोक्षच. हा सगळा भाग तसा बर्यापैकी निर्मनुष्य. तुम्हाला शोधून माणसे बघावी लागतात. झोपड्या दूरवर विखुरलेल्या.क्वचितच तुम्हाला माणूस दिसणार.
पगदंडी मध्येच गायब होणाऱ्या, त्यात रस्त्यात सांगणारे कुणी नाही, तुम्ही रस्ता चुकला की एकतर तुम्ही फिरत फिरत खोल डोंगराच्या पायथ्याशी तरी पोचणार किंवा चार पाच किमिचा फेरा पडणार आणि जंगलात चकवा लागला तर फिरत बसणार. आणि जंगलात अंधार झाला की मग विचारूच नका, पाचावर धारण बसते. त्यात येथे बिबट्यांचा वावर. मग काय विचारूच नका. अंधार पडायच्या आत मुक्कामी पोहोचणे गरजेचे. न दिवा ना उजेड.त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला वाट पाहत, दहा-पंधरा मिनिटं थांबून, नर्मदे हर चा नारा करीत थांबावे लागते. रस्ता शोधण्यासाठी तुम्हाला स्थानिकांवर अवलंबून राहावे लागते. पण मैयावर तुम्ही गाढ विश्वास ठेवल्यास मैय्या तुम्हाला कधी अडचण येऊ देत नाही. तुम्ही अतिहुशारी केली किंवा फाजील आत्मविश्वास दाखवला तर धडा किंवा हेलपाटा नक्कीच !!!
कुठून तरी कोणीतरी येतो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो हे ठरलेलेच आहे. फक्त तुम्ही दम काढायचा आणि मैयेवर विश्वास ठेवायचा !!!
वाटेत तुम्हाला झलकन नावाची नदी लागते. काय वेगळेच नाव !!!
कधी अशी नावे ऐकायला येत नाहीत. नवीन नवीन प्रदेश, नवीन नावे, नवीन अनुभव, नवीन जंगल, नवीन वाटा मैया तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव देते, ज्ञान देते आणि समृद्ध करते.
या परिसरात पगदंडीवर तुम्हाला एखादे दुसरे सोडले तर फार मोठी गावे लागत नाहीत. छोट्या छोट्या वस्त्या. त्यात दोन चार घरे, तिथेच गोठा एवढाच काय तो परिसर. त्यापैकीच कोणाकडे तरी नर्मदे हर करून आसन लावायचे. त्यांची कृपा झाली तर भोजन प्रसाद. नाहीतर बरोबरच्या सदावर्तातून टिक्कड आणि मिळाली तर गूळ भेंडी... नर्मदे हर...
दिवसभराच्या धावपळीतून, छाती फुटेल असे पहाड चढून परिक्रमा चालू ठेवायची. चढ तर इतका की छातीचा भाता फुटून जावा.थंडीतही दिवसा ऊन तर इतके की सर्वांग घामाने डबडबून जायचे. हातातल्या कमंडलूतील पाणी कोमट होते. ते पाणी पिवत नाही, पण प्यावे लागते. पर्यायच नाही इथे पाणी मिळणे मुश्किल असते. त्याच्यासाठी तुम्हाला दोन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. परिक्रमा सोडून पाण्याच्या मागे कोण पळत बसणार... पाणी वाचवा हा संदेश तुम्ही बरोबर घेऊन पुढे जाता...
खापरमाळ सोडल्यानंतर बरेच दिवसांनी परिक्रमावासींना दुरून का होईना मैयाचे दर्शन घडते...तेवढेच समाधान वाटते.
काही ठिकाणी या प्रवासात वाटेत नद्या पार करण्यासाठी परिक्रमावासीयांना नदी ओलांडण्यासाठी विनामूल्य नावे ची सेवा दिली जाते. भवाणामार्गे सावरीयातून पुढे जाताना अशीच मोफत सेवा घेतली. बिलगाव ओलांडून धडगावला आसन लावले. गावातील एका व्यापार्याने आम्हाला भोजन प्रसाद दिला... नर्मदे हर दिवसभराच्या थकव्याने रात्री गाढ झोप लागली. पुढे मोलगी मार्गे वडफळीला गेलो. वडफळीला मुक्काम करून पुढे प्रयाण... एकूणच शूलपाणीच्या या सगळ्या परिसरात आदिवासी, भिल्ल या लोकांमध्ये खूप दारिद्र्य जाणवले. आपण त्यांच्यासमोर भोजन प्रसादासाठी उभे राहायचे, याची अक्षरश: मनात लाजच वाटते. तरीसुद्धा ते बिचारे त्यांच्याकडे जे काही असेल शेंगा, गूळ,भेंडी,अर्धी भाकरी काळा चहा, बिस्कीट तुमच्यासमोर ठेवणार आणि तुमची सेवा करणार. नाही म्हणणार नाहीत पदोपदी प्रवासामध्ये अशा घडलेल्या घटनांनी माझे मन विद्ध झाले. आदरातिथ्य करताना त्यांची सारखी होणारी अडचण ही शब्दबद्ध करून, त्या घटना सारख्या तुमच्या समोर मांडणे मला प्रशस्त वाटत नाही. घरात अन्नाचा कण नाही, आई-वडील मोलमजुरीला गेलेले, लहान मुले घरात. मोठी माणसे घरात असली तरी एकूणच स्वतःच्या कुटुंबाच्या चरितार्थाची वानवा. त्याच्यामध्ये आमच्यासारखे परिक्रमावासी फुकट खायला बसलेले ... ते तरी बिचारे कुठून आणणार आणि तिथे आजूबाजूला काही कामधंदे करण्यासाठी , मोलमजुरी साठी काम तरी कुठून मिळणार...
ते जे करत आहेत ते सुद्धा खूप आहे. बरे ही काही एक दिवसाची आदरातिथ्याची गोष्ट नाही. आज एखादा, उद्या दोन-चार परिक्रमावासी, ते पुढे गेले की उद्या परत कोणीतरी उभे राहणारच आहे. ते गेले की परत कोणीतरी आहेतच. अव्याहतपणे आठ महिने आदरातिथ्य करायचे ते सुद्धा फुकट... काही अपेक्षा न ठेवता. कसे शक्य आहे हे. शहरात एवढे उत्पन्न असले तरी आपण एवढे करू का. आपण सुद्धा करत नाही एवढे ते बिचारे आनंदाने करतात. अशा वैराण भागात कुठून निर्माण करणार परिक्रमावासींची व्यवस्था. वाईट वाटते सगळे बघून. यथाशक्य आम्ही आमच्याकडच्या सदावर्तातून म्हणजे आमच्याकडे असलेल्या कोरड्या शिध्यामधून,बटाटे , मिळालेली किरकोळ भाजी याच्यातून आमचा भोजन प्रसाद केला आणि त्यांना कमी त्रास होईल याचा प्रयत्न केला. जिथे सहज शक्य होते, मिळाले, ते घेतले. परिस्थिती बघून आम्ही शक्यतो दूर राहिलो आणि त्यांना आणखीन त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मैयाची कृपा.
त्यामुळे थोड्याफार फरकाने त्यांच्या या अडचणी, समोर उभे राहिलेले साधारणपणे तसेच करूण प्रसंग, वारंवार न मांडता थोडक्यात हा प्रवास नमूद केला आहे. परंतु शूलपाणीच्या जंगलातून एकदा तरी अवश्य जावे. तो अनुभव काही वेगळाच आहे. शक्य असल्यास भोजन प्रसादाची साधनसामुग्री तरी किमान जवळ ठेवावी आणि बरोबर थोडे लोकही असावेत, म्हणजे निवास, भोजन प्रसाद आणि पुढचे नियोजन करणे तुम्हाला सोयीचे ठरते.
आता गुजरात राज्यात प्रवेश !!!
दक्षिण तटावरील परिक्रमेतले वडफळी हे महाराष्ट्रातले शेवटचे गाव. पुढे कणजी मार्गे माथासरला गेलो. नंतरचा रस्ता सगळा जंगलाचा. बरोबर मध्य प्रदेशमधल्या मूर्ती होत्याच. अनेक डोंगर पार करीत करीत, थोडी विश्रांती घेत सरदार सरोवरला पोहोचलो. वाटेत एका टपरीवर, टपरीवाल्याच्या आग्रहाने चहा-बिस्कीटे ग्रहण केली.
गुजराती लोकांचे आदरातिथ्य इथून सुरू झाले होते. त्यालाच रस्ता विचारून गोरागावाकडे जाण्याच्या दृष्टीने पाय ऊचलले....नर्मदे हर !!!
सरदार सरोवराचे खरे नांव मोकडी धरण. नंतर मोकडी धरणाचे नामकरण सरदार सरोवर असे करण्यात आले आणि आता ते सरदार सरोवर म्हणून सर्व ठिकाणी प्रचलित आहे. नर्मदामैया वर बांधलेल्या या धरणामुळे गुजरात राज्य सुजलाम सुफलाम झाले आहे. गुजरात सरकारच्या नियोजनाप्रमाणे या सरदार सरोवर धरणामध्ये साठवलेले पाणी पाट म्हणजे कालव्यांमार्फत त्यांना गुजरातच्या वाळवंटात म्हणजे कच्छ, सौराष्ट्र पर्यंत न्यावयाचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी हे नियोजन केले आहे. पर्यावरणवादी, धरणग्रस्त, त्यांचे पुनर्वसन, भरपाई या कारणाने या धरणाचे काम दीर्घकाळ रेंगाळले. राजकीय कारणे वेगळीच. मला मात्र परिक्रमेमध्ये या धरणामुळे झालेला भौगोलिक, सामाजिक बदल अनुभवास मिळाला. विपन्नता आली तसेच संपन्नताही आलेली दिसली. फायदा करून घेणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते. मिळालेली ही संधी आहे त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग हे ज्याने त्याने ठरवायचे. एक मात्र निश्चित की सरदार सरोवर धरणाची फळे आज गुजरात राज्य चाखत आहे.
इथून पुढे परिक्रमावासीयांना नर्मदामैयाचे जवळून दर्शन गोरागाव (गुजरात) मधे सरदार सरोवराजवळ होते. घोंगसानंतर तुम्ही डोंगरदऱ्यातून प्रवास करीत करीत मैयेपासून दूर जाता. नंतर मजल दर मजल प्रवास करीत करीत गोरागावला मैयैनजिक येता.
गोरागाव ला शूलपाणेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. तोपर्यंत सकाळचे साडेआठ झाले. मैयाच्या समोरच टेकडीवर गुजरात शासनाने नवीन मंदिर बांधले आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि चांगला सुशोभित केलेला आहे. शोभेची झाडे मन मोहून टाकतात. सरदार सरोवर सरोवराच्या वाढलेल्या पाण्यामुळे शूलपाणेश्वराचे मंदिर बुडणार होते. ते वाचविण्याचा गुजरात सरकारने अटोकाट प्रयत्न केला. मंदिराच्या आजूबाजूला यंत्रांच्या मदतीने ८०- ९० फूट खोल खड्डे करून मंदिर हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिर हलवता आले नाही. अखेर प्राचिन व कारागिरीचा,कलाकुसरीचा अप्रतिम नमुना असलेले शूलपाणेश्वर मंदीर व महादेवाची पिंड पाण्यात बुडाले. येथे प्रकर्षाने जाणवणारी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे धरणामागील सर्व प्रदेशात म्हणजे पूर्वेकडील भागात मैयाला भरपूर पाणी होते. येथे गोरागावला मात्र ती अगदीच रोडावली आहे. पात्र मोठे परंतु पाणी कमी... डोळ्यावर विश्वास बसेना.काठापासून दहा फूटावर असलेली मैया आता, तीस चाळीस फूट खाली उतरल्यावर लागत होती, म्हणजे पाणी खूप खाली गेले होते. धरणामुळे भौगोलिक परिस्थिती बदलल्याचे ते प्रकर्षाने जाणवले...कालाय तस्मै नमः ...
डांबरी रस्ता, कच्चा रस्ता, पायवाट, नाले, ओढे पार करीत करीत सकाळी सव्वाअकरा वाजता रामपुऱ्याला दंडी स्वामी योगानंद आश्रमात पोहोचलो. विश्रांती घेतली. बरोबरच्या मध्यप्रदेशातील मूर्तींनी येथे थांबण्याचा निर्णय घेतला. मी शुभेच्छा देऊन आभार मानले. येथे आश्रमात प्रवचन चालू होते त्याचा थोडावेळ लाभ घेतला. दुपारी दीड वाजता भोजनप्रसाद घेऊन पुढे निघालो. आश्रमाच्या शेजारी भगवान श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर आहे. संगमरवरी फरशा, रंगकाम, कलाकुसरीचे काम, कळस लक्ष वेधून घेते. मंदिराशेजारी एक मोठा सत्संगासाठी हॉल आहे. श्रीकृष्णाची स्वयंभू मूर्ती म्हणजे जमिनीतून वर आलेली, काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. यापूर्वी काळ्या पाषाणातील श्रीकृष्णाची मूर्ती मला नाथद्वारा येथे पाहायला मिळाली.असे म्हणतात की, उत्पन्नाच्या बाबतीत बालाजी नंतरचे गुजरातमधील नाथद्वारा हे, देवस्थान हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे. गुजराती समाजामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या उठण्याच्या, दुपारच्या विश्रांतीच्या, सायंकाळच्या पूजेचे विशिष्ट नियम आहेत. त्यावेळच्या पूजाअर्चा झाल्या की गर्भगृहाचा पडदा ओढला जातो. मी मंदिरात गेलो त्यावेळी, पुजार्यांचे काही पाठ चालू होते व दरवाजा बंद व्हायचे असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले.
मैयेची कृपा !!! कारण आपण परत केव्हा येणार. कृपेशिवाय इथे दर्शन होणे अवघडच.
रामपूऱ्यालाच आश्रमामध्ये मध्यप्रदेश मधील शेतकरी असलेले हुकुम धणगर नावाचे एक परिक्रमावासी भेटले. ते एकटेच होते. आमच्या दोघांची चर्चा झाली. पुढील परिक्रमा दोघांनी एकत्र करायचे ठरले.अशीच माणसं भेटतात, बरोबर निघतात, मुक्कामी थांबतात, पुन्हा वेगळी भेटतात... हे चालूच राहते... हरिॐ...
एक निरंजन दो प्रभंजन... पाय उचलले निघालो... नर्मदे हर.
वाटेत येताना धामनोद या गावी जयंतीबेन माताराम यांच्याकडे पाणी पिण्यासाठी थांबलो. त्यांनी ग्लास भरून चहा दिला. वरती दक्षिणा...मैया लाड करते...
गुवार गावी गेलो येथे रामानंद स्वामींचा आश्रम आहे. आश्रमामध्ये यज्ञशाळेत आसन लावायला सांगितले. येथील मंदिर म्हणजे एक तीन मजली इमारत होती त्यात तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व मंदिरे होती. इमारतीच्या समोर एक शेडवजा यज्ञशाळा तयार केली होती. लोखंडी शेड बांधून तीन फुटांचा भिंतवजा आडोसा, वरती छत अशी ती यज्ञशाळा होती. येथेच यज्ञशाळेसमोर एका हौदात पाण्यावर तरंगणारा एक दगड पाहायला मिळाला. काहीतरी शास्त्रीय कारण असावे. आसन लावून मैयेवर स्नानाला गेलो. मैयेवर आश्रमाने स्वखर्चाने घाटावर उतरण्यासाठी सुंदर पायऱ्या व सुंदर घाट बांधला बांधून घेतला आहे. पायर्यावरुन उतरताना वाटेत मेघडंबरी उभारून व त्यात सुंदर शिवलिंग स्थापन केलेले दिसले. त्यावर अभिषेक चालू होता. मंदिर फारच अप्रतिम आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे, पांढरे शुभ्र संगमरवरातील, सर्व बाजूंनी उघडे असे मंदीर, त्याच्यावर बांधलेली मेघडंबरी...
एकूणच भान हरपणारे... येथील स्वच्छता डोळ्यात भरणारी व मन प्रसन्न करणारी !!! गुजरातमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे परिक्रमा मार्गात मध्यप्रदेश आणि गुजरातमधील आश्रम व परिक्रमावासीं साठींची व्यवस्था यामध्ये भरपूर फरक जाणवला. येथे मैयेचे पाणी स्वच्छ व नितळ होते. पाण्यामध्ये मोठे मासे आणि पाण्याचा तळ डोळ्यांनी दिसत होता. मनसोक्त स्नान केले. बाजूला कपडे धुतले आणि शांतपणे डोळे मिटून बसून राहिलो. खूप दिवसांनी शांतता अनुभवली. मैया बघण्यासाठी डोळे आणि मन आतुर झाले होते. काही दिवस मैयाचा विरह सहन करावाच लागतो. विरहाशिवाय तुम्हाला प्रेम व ओढ जाणवत नाही. येथेही ते प्रकर्षाने जाणवले. बरेच दिवसांनी मैयाचे दर्शन झाल्यामुळे मन आनंदून गेले.
मैयाचे ते रूप डोळ्यात साठवून ठेवत आणि ती शांतता मनात भरून घेत होतो. बराच वेळ कसा निघून गेला, कळलेच नाही. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला होता. आश्रमात परतणे गरजेचे होते. हुकुमजी आवरून पुढे गेलेले होते. मी आश्रमात जाण्यासाठी जड मनाने मैयाच्या तीरावरून उठलो आणि आश्रमाकडे मार्गस्थ झालो. सायंकाळी साडेसहा वाजताच भोजन प्रसादाची घंटा झाली. परिक्रमावासी हा मैयेचा लाडका असला तरी आश्रमात तो आश्रीत...आश्रिताने भोजन प्रसादासाठी वेळेत पोहोचणे आवश्यक होते. स्वतःच्या हाताने तेथे ठेवलेली थाळी आणि वाटी घ्यायची आणि पंक्तीत बसायचे . फुलके, बटाटा कोबीची भाजी, भात, मेथी घालून केलेले वरण आणि प्रसादाची बुंदी... मैयेची कृपा. पोटभर प्रसाद ग्रहण केला. तृप्त झालो. शूलपाणीचे जंगल पार करताना मोठ मोठे पहाड, डोंगर, दऱ्या,उतार, नाले, नद्या हे सगळे पार करताना जो दम लागतो, जे श्रम होतात, त्या सगळ्याचा श्रमपरिहार मैया करते...लगेच आणि अशा स्वरूपात... अन्नदाता सुखी भव...
मातीने थाळी व वाटी धुतली,जागेवर ठेवली. सायंकाळी सव्वासात वाजता मंदीरात आरतीची वेळ होती. त्यावेळी मंदिरात पोहोचलो. मंदिरात राम व सीता मैयाची बैठी, सुंदर व सुबक संगमरवरी मूर्ती.डोळ्यातील भाव तर करुणेचा सागर जणू. त्याच्याशेजारीच गायत्री देवी व नर्मदामैयाची सुरेख मूर्ती वेगळ्या मंदिरात विराजमान झालेल्या आहेत. एका बाजूला रामानंदस्वामींची मूर्ती तर समोरच्या बाजूला स्थापन केलेल्या पारद शिवलिंगावर अभिषेक चालू होता. त्यावर छत्र ,नाग,त्रिशूळ सर्व चांदीचे आणि डमरू सर्व पहात रहावे असे.
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पारद म्हणजे पाऱ्याचे एवढे मोठे शिवलिंग बघत होतो. पायाचे शिवलिंग अतिशय जड असते. पारद शिवलिंगाची पूजा-अर्चा भाविकांना करता येते. मैयेवर स्नान करून, शुचिर्भूत होऊन आल्यानंतर कोणीही स्त्री किंवा पुरुष पारद शिवलिंगावर अभिषेक करू शकतो. स्नान करून आल्यामुळे झब्बा काढून घेऊन उघड्या अंगाने शिवलिंगाचे डोके ठेवून दर्शन घेतले. असे योग परत येत नाहीत. पारद शिवलिंग फार कमी असतात. कारण आपण माहिती घेतली तर असे लक्षात येते पारा एकत्र होत नाही. त्यामुळे पारा एकत्र करून त्याचे असे शिवलिंग बनवणे हे अतिशय किचकट आणि जिकिरीचे काम आहे. दुर्मिळ असे हे पारद शिवलिंग असावे.एका बाजूला सहा फूट उंचीची हनुमानाची शेंदूर लावलेली, हातात गदा व द्रोणागिरी धारण केलेली अशी मूर्तीपण होती. सर्वसाधारणपणे मंदिरे ही तळमजल्यावर असतात परंतु हे मंदिर दुसऱ्या मजल्यावर होते. दुसऱ्या मजल्यावर एकाच ठिकाणी ही पाच-सहा मंदिरे होती मंदिरामध्ये अतिशय स्वच्छता, टापटीप व कमालीची शांतता होती. बहुतेक सर्व सन्यासी मंदिराची व्यवस्था पाहत होते.
सन्यासी व सेवेकरी स्त्री पुरुषांसाठी मैया किनारी खोल्या बांधलेल्या होत्या. मंदिराचा सर्व परिसर, या खोल्या एकूणच सर्व काही आराखड्यानुसार आणि नियोजनपूर्वक बांधल्याचे मला जाणवले. ते सर्व करताना आर्थिक सुबत्ता हे एक कारण असावे.
सायंकाळी सव्वासात वाजता आरती सुरु झाली. आरतीसाठी नगारा,ढोल,पितळेचे मोठे तर, मोठी घंटा सेवेकरी वाजवत होते. या सगळ्याचा खूपच सुंदर नाद ऐकू येत होता. मधूनच एखादा सन्यासी मोठ्याने शंखनाद करीत होता. आरतीत फक्त या वाद्यांचा तालबद्ध आवाज. आपण उपस्थित कोणीही मोठ्याने वेगळी आरती म्हणायची नाही. आरती फक्त पुजारी म्हणतात, तीही गाभार्यात. आपण तिथे उभे राहून फक्त हे सर्व डोळ्यात, कानात साठवून ठेवायचे. हा सुद्धा आयुष्यभराचा ठेवाच म्हणता येईल. आत्तापर्यंतच्या परिक्रमेत ही आरती मला खूपच भावली. वर्णन करताना शब्द तोकडे पडावेत. आरतीचा नाद उत्तर तटावरून ऐकाल्यास आणखीन भावावा... इतका अप्रतिम ...
आरती झाल्यानंतर प्रसाद !!!
केशर घातलेली गोड बुंदी...अप्रतिम चव, बराच वेळ जिभेवर रेंगाळली. प्रसाद झाल्यानंतर एक ग्लास गरम दूध सर्वांना दिले.
येथे मंदिरात देवाला नमस्कार करताना एक वेगळी पद्धत मला शिकायला मिळाली. सर्वसाधारणपणे आपण मंदिरात मूर्ती समोर उभे राहून लोटांगण घालतो. अशा प्रकारच्या लोटांगणामध्ये तुमचे पाय पाठीमागे असलेल्या भक्तांच्या कडे होतात. इथे मात्र तुम्ही पाठीमागे असलेल्या भक्तांकडे पाय करून लोटांगण घालायचे नाही. तुम्हाला तिरके लोटांगण घालावे लागते , म्हणजे तुमचे पाय भक्तांकडे न येता मंदिराच्या भिंतीकडे येतात. हे एक नवीन शिकायला मिळाले आणि त्यानंतर आजतागायत सर्व ठिकाणी मी तसेच लोटांगण घालून नमस्कार करतो.
यज्ञशाळेत आलो रात्री साडेनऊ वाजता डोळे मिटून आसनावर पडून राहिलो.
तो शनिवार होता. थोड्यावेळाने एक पेटीवाला आणि एक गायक ...
हनुमानाच्या सेवेला हजर झाले. विचारल्यावर म्हणाले, आश्रम के नियम के अनुसार हम हर शनिवार दस बजे से बारा बजे तक हनुमानजी की भजन सेवा करते है. त्यांनी ताल धरला आणि आम्ही पांघरून ओढले. माहिती नाही रात्री केव्हातरी हनुमानजींना आमची दया आली.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १५
हुकुमजी आणि मी पाय उचलले.
रस्त्यात चालताना सोंढलीयाला भूक लागली म्हणून रस्त्याकडेला बसस्टॉपसाठी ठेवलेल्या बाकावर बसलो. जवळचे असलेले नाश्त्याचे खात असताना, एक शेतकरी असलेले ठाकूर सिंग प्रभात सिंग शेजारी येऊन बसले. आमच्याबरोबर नाश्ता करणार का विचारल्यावर, नको आत्ताच घरून रोटी आणि भाजी खाऊन निघालो आहे असे त्यांनी सांगितले. बरोबर जेवणाचा डबा घेतला आहे, त्यामुळे तुम्ही आनंदाने ग्रहण करा, असे ते म्हणाले. त्यांच्याविषयी चौकशी केल्यावर म्हणाले, सध्या मी, शंभर रुपये रोजाने, जवळच १० किमीवर बसने मजुरीसाठी जातो. तुमचे स्वतःचे शेत नाही का असे विचारल्यावर म्हणाले, स्वतःच्या शेतातील काम संपले आहे, म्हणून दुसरीकडे जातो आहे. उगाच रिकामटेकडा वेळ घालवण्यापेक्षा तेवढीच मजुरी मिळेल. निघताना हुकुमजी व मला प्रत्येकी १० रुपये दक्षिणा दिली. ती दक्षिणा घेण्यासाठी हात पुढेच करवेनात. त्यांनी फार आग्रह केल्यावर घ्यावीच लागली. तेवढ्यात त्यांची बस आली बसमध्ये बसून ते पुढे गेले.रोजंदारीतल्या शंभर रुपये मजुरीतले वीस रुपये त्यांनी दक्षिण म्हणून आम्हाला दिले. शिवाय बसचा जाण्या-येण्याचा खर्च किमान २० रुपये. म्हणजे शंभर रुपयातल्या रोजंदारीतील ४० रुपये त्यांचे असेच खर्च झाल्यात जमा. उरले फक्त साठ रुपये !!! साठ रुपयांसाठी दिवसभर किती कष्ट आणि वणवण ठाकूरसिंगना करायला लागत होती, याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.किती विशाल हृदय असू शकते माणसाचे. बोलायला शब्द कमी पडावेत. त्यांनी दिलेले दक्षिणेचे ते दहा रुपये हातात धरून, त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिलो. परिक्रमेत मैया तुम्हाला दानत म्हणजे काय ते शिकवते. शंभर रुपयातले वीस रुपये दक्षिणा म्हणजे, २० टक्के दान !!! पुन्हा एक थप्पड... आवाज येत नाही, पण बसते सणकन... सांगायचे कुणाला... कारण आजूबाजूला कोणीच नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही. आपली विचारशक्ती, मती गुंग होते. त्याच्या पलीकडे हे सगळे आहे. दरमहा एक लाख रुपये पगार असणारा सुद्धा वार्षिक कमाईच्या पाच टक्के रक्कमही कुठल्या सामाजिक संस्थेला दान करत असेल, याविषयी शंका आहे .
छोटा माणूसही तेवढाच मोठा असतो, असे मैया मनात सारखे ठसवत असते. तुम्ही काहीच करायचे नाही, सगळे घडत असते तुम्ही फक्त मूक साक्षीदार असता.
माझ्या परिक्रमेमध्ये मी किती वणवण केली, मी किती मंदिराला भेटी दिल्या, मला किती सुग्रास भोजनप्रसाद मिळाला यापेक्षा, ही अशी जी आर्थिक दृष्ट्या गरीब असणारी पण दानत मोठी असणारे मैयाचे पुत्र आणि कन्या यांच्या अशा कृतीतून आपण काहीतरी शिकले पाहिजे. परिक्रमेत वेळोवेळी मिळणारी दक्षिणा, भोजनप्रसाद,नाश्ता, इतर वस्तू, सुखदायक निवास या सगळ्या गोष्टी मूर्त पण नश्वर गोष्टी आहेत. म्हणजे त्या नष्ट होणार्या आहेत. त्याचे महत्त्व हे प्रासंगिक आहे, ते कालातीत नाही. अशी छोटी छोटी माणसे जे शिकवतात, ती या परिक्रमेचे खरी कमाई आहे. चमत्कार, आश्चर्यजनक गोष्टी या तर घडू शकतात, तुम्ही घडवू शकता, घडत राहतील. पण, या अशा घटना आपल्याला गर्वाच्या घरखला खाली करणाऱ्या आहेत, हे विसरून चालणार नाही.
कदाचित माझे हे विवेचन परिक्रमेचे वाचन करीत असताना तुमचा रसभंग करेल, विषयांतर वाटेल. पण, नुसतेच दिवसाला काही योजने अंतर चालून, काही उपयोग नाही. कारण दिवसभर कुत्री पण गल्लीबोळात, रस्त्यावर वणवण हिंडत असतात. पण, त्यांच्या हाताला काहीच लागत नाही हे जगतसत्य आहे. असो...
पुढे रुंड शुकदेव ओरीला आलो. गावापासून पुढे एक किलोमीटर उजव्या हाताला आत कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात जीवराजभाई यांनी स्वागत केले. ते मूळचे कच्छचे (गुजरात). त्यांना विचारून आसन लावले. हातपाय धुतल्यावर जीवराजभाईंनी भोजन प्रसाद घेणार का असे विचारले. सकाळी साडेआठ वाजता नाष्टा केला होता. दुपारचे अडीच वाजले होते, हो म्हणालो. त्यांनी फुलके, भोपळ्याची भाजी खिचडीचा भोजनप्रसाद दिला. अन्नदाता सुखी भव !!!
ताटे धुतली आणि जागेवर ठेवून दिली. नंतर मंदिरामागे असलेल्या हौदावर, कपडे स्वच्छ धुतले. दिवसभर घामाने व धुळीने माखलेले कपडे धुणे हा एक दैनंदिन उपचार होता. आश्रमात महादेवाचे आणि राधाकृष्णाचे दर्शन घेतले. महादेवाचे मंदिर सुंदर पांढऱ्या संगमरवरात बांधले आहे. टाईल्सची सजावटही केली आहे. गोपुराच्या आतील बाजूस वेगवेगळे पौराणिक प्रसंग चितारलेले आहेत. महादेवाची पिंड चांदीच्या पत्र्याने सजवली होती. त्यावर शंख कोरलेले होते. शाळुंकेवर चांदीचा नाग, नागाच्या गळ्यातून पिंडीवर रुद्राक्षाची माळ, पिंडीवर चांदीचे छत्र, सुंदर पांढर्या फुलांची मनमोहक सजावट केलेली होती. आत गर्भगृहात निळ्या रंगाचे छोटे दिवे लावलेले होते. त्यामुळे गर्भगृहात वेगळेच वातावरण तयार झाले होते. प्रत्येक मंदिरात वेगळी सजावट, मूर्ती, तरीही चित्ताकर्षक. पिंडीवर माथा टेकून आशीर्वाद घेतला आणि बाहेर आसन लावले होते तेथे येऊन बसलो. तेवढ्यात आश्रमाच्या व्यवस्थाक सौ कुसुमबेन आल्या. या माताजी आश्रमाची दैनंदिन व्यवस्था पाहतात. त्यांचे पती जसबिनभाई व त्या भरूच (गुजरात) येथे राहतात. पती व्यवसायिक असून या मंदिराचे ट्रस्टी आहेत. माताजी मित व मृदुभाषी होत्या. आमची त्यांनी अगदी मनापासून सर्व चौकशी केली. भोजन प्रसाद घेतला का आणखीन काही कपडे, वस्तू, पैसे हवेत म्हणून विचारले. भोजन प्रसाद घेतला असून मला अन्य काही गरज नाही असे त्यांना नम्रपणे सांगितले. कारण तुम्ही काहीही घेतले की ओझ्याला कहार होणार. जास्त झालेले ओझे कमी करायचे सोडून नवीन वस्तूंचा हव्यास बघून मैया तुमची परीक्षा बघते हेच खरे.
बरोबरचे परिक्रमावासी हुकुमजी यांना परिक्रमेत लुटल्यामुळे त्यांचे पैसे,धोतर शाल,पांघरूण, पाठीवरची सॅक, काठी सर्व काही गेले होते. त्यांना वाटेत दानशूर व्यक्तींनी बूट, अंथरूण, एक धोतर दिले होते. त्यांना लुटल्याचे कुसुमबेन यांना समजल्यावर त्यांनी हुकुमजींना एक धोतर दिले. मैयेच्या परिक्रमेत सर्वच माणसे खूप मोठी आणि मनाने उदार. केवळ शब्दाने सांत्वन न करता प्रत्यक्ष कृतीने मदत करणार. सायंकाळी मैयेकिनारी गेलो. येथे बांधलेला घाट नाही, पण मैयेकिनारी जाण्यासाठी गुजरात सरकारने प्रशस्त आणि छान पायऱ्या बांधल्या आहेत. पाण्यात वाळूची पोती टाकून स्नानाची व्यवस्था केलेली आहे. पाणी खूप खोल होते. स्नान करून मैयेकिनारी असलेल्या गवतावर बराच वेळ बसलो,छान वाटले. संध्याछाया पसरल्या. मैयावर त्याचे पडलेले प्रतिबिंब मोहवून टाकत होते. आनंद वाटला. मंदिरात परतताना वाटेत अंदाजे शंभर वर्षे वयाचे असलेले डेरेदार, वडाचे झाड दिसले. क्वचितच अशी जुनी, डेरेदार अगदी आकार देऊन वाढवल्या सारखी झाडे दिसतात. मंदिराच्या मालकीची स्वतःची शेत जमीन असून त्याचे उत्पन्न मंदिराच्या व्यवस्थेसाठी आर्थिक हातभार लावते. रात्री आरती झाली. आतापर्यंतच्या आरतीमध्ये नसलेली एका वाद्याची भर या मंदिरातील आरतीत पडली... डमरू वादन...
भोलेनाथाच्या आवडीचे डमरू वादन आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होतो. वाजवणाराही लयीत आणि तल्लीन होऊन वाजवत होता. गर्भगृहातील वातावरण ते डमरू वादन वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. डोळे मिटून मस्त ऐकत राहावे असे डमरू वादन होते. मैयाकिनारी स्थानिक पातळीवर संस्कृती, परंपरा जतन करायचा प्रयत्न केला जातो. आपण त्याचा आनंद घ्यावा आणि मनात साठवून ठेवावे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला काही बरोबर नेता येत नाहीत. आयुष्यात काही आठवणींचा ठेवाही हवाच की... नंतर परिक्रमेत कुठे डमरू वादन ऐकायला मिळाले नाही. कदाचित मी जर कोटेश्वर महादेव मंदिरामध्ये आसन लावले नसते तर डमरू वादन ऐकण्याची ही संधी हुकली असती...योग असतात.
आरतीनंतर श्रीकृष्ण स्तुतीचा कार्यक्रम होता. तो झाल्यावर भोजन प्रसाद झाला मंदिरात नंतर रात्री उशिरा बारा-तेरा मूर्ती आल्या. त्यामध्ये सत्तर वर्षांच्या एक माताजी पण होत्या. रात्री उशिरा झोपलो.
पहाटे साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्तावर जाग आली. पक्ष्यांचे कूजन चालू होते. मंदिरात देव पूजा सुरू झाली होती. हुकूमजी आणि मी आवरून सकाळी साडेसहा वाजता पाय ऊचलले. नर्मदे हर...
आज आश्चर्य म्हणजे भारद्वाज पक्षाने दर्शन दिसले. एका पाठोपाठ दुसरा दिसला. जोडी असावी... वाटेत सिसोदराला चहासाठी थांबलो. वडाच्या पारावर सामान ठेवले. तेवढ्यात तेथे कल्पेश भाई नावाचे ग्रामस्थ आले. त्यांनी चहा घेणार का विचारले, हो म्हणालो. त्यांनी टपरीवाल्याला पैसे देऊन, ते निघाले. ते शेतकरी असून महाराष्ट्रात नाशिकला कामासाठी निघाले होते. जीपने ते राजपिपला पर्यंत व पुढे बसने नाशिकला जाणार होते. चहाबरोबर आम्हाला टपरीवाल्याने बिस्किटे दिली. वाटेत चहा घेण्याचा विचार करत होतो, पण येथे मैयानी चहा तर दिलाच,वर बिस्किटे पण दिली. खाऊन निघालो. पुढील मार्गाची चौकशी केली.वाटेत बडोदा राजपिपला हायवेला लागून असलेल्या जुन्या मीटरगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम चालू होते. पुढे शुकदेव येथे दर्शन घेतले. पुढे निघालो पुढे हमरस्त्यावर गुमानदेव येथे आलो. गुमान देवला हनुमानाचे मोठे मंदिर आहे. मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे येथे हनुमानाची घडवलेली मूर्ती नसून दगडाला शेंदूर लावलेला आहे. आश्रम खूप मोठा,भरपूर जागा,अन्नछत्रासाठी स्वतंत्र जागा, दुपारच्या वेळी पोहोचल्यामुळे सेवेकर्यांनी भोजनप्रसादाचा आग्रह केला. भगर,बटाटा भाजी,कढी,पुरी असा भोजनप्रसाद होता. तो ग्रहण करून ताट घासून ठेवून, पाय उचलले.... एवढे सगळे भव्य असूनही अस्वच्छतेमुळे मला तेथे प्रसन्न वाटले नाही. प्रमाणपत्रावर शिक्का घ्यायला ऑफिसमध्ये गेलो. जबाबदार माणूस नसल्याचे ऑफिसमधून सांगितले. त्यामुळे तसेच पुढे निघालो.
तुम्ही नर्मदा परिक्रमा सुरू करता तेव्हा, तुमच्या सोबत एक प्रमाणपत्र तुमच्या नावाचे सोबत असावे. हे प्रमाणपत्र तुमचा महाराष्ट्रातला स्थानिक ओळखपत्राचा दाखला देऊन मिळवता येते. हे घेण्याचे कारण असे की, वाटेत तुम्हाला कुणीही गावकरी, शासकीय अधिकारी, पोलीस यांनी विचारले तर तुमची परिक्रमावासी म्हणून ओळख पटवून देता येते. लोकांनी असे विचारण्याचे कारण की, परिक्रमेमध्ये गुन्हे करून आलेले लोकही असतात. परिक्रमा करण्याच्या नावाखाली फिरत असतात. लपून राहणे हा त्यांचा उद्देश असतो. तुमच्याकडे ओळखपत्र नसल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असतेच. असे अनेक गुन्हेगार परिक्रमेत असल्याचे मला बऱ्याच आश्रमात सांगितले. प्रमाणपत्राच्या मागील बाजूस शिक्का घ्यावा, म्हणजे तुम्ही प्रवास परिक्रमा करीत करीत पुढे चालला आहात असे त्या शिक्क्यावरून समोरच्या व्यक्तीस पटविता येते व पुढील प्रवास सुखकर होतो.
पुढे अंकलेश्वर मार्गे रामकुंडला गेलो. राम कुंडला उघडी धर्मशाळा, सर्वत्र माशा गटाराचा वास. थांबावे असे वाटेना. माशा इतक्या की जमीन दिसत नव्हती पाय टाकले की माशांचे थवा उठायचा. नको झाले. त्या रामकुंडात बायका कपडे धूत होत्या. एका बाजूला मूर्ती स्नान करीत होत्या. हिरवे पाणी कुंडात, साबणाचा फेस. किमान अशा ठिकाणी तरी साबण वापरू नये, पण काही पथ्य पाळत नव्हते. कोण सांगणार... गुपचूप पुढे निघालो. चार वाजले होते पुढे बलबला कुंड दहा किलोमीटर वर होते. दोन तास तरी लागणार... पाय उचलले... नर्मदे हर... उन्हं तोंडावर.पाणी पीत वाटेत थांबत पुढं निघालो. चढाचा डांबरी रस्ता होता. चालताना दम लागत होता. मजल दर मजल करीत सायंकाळी सहा वाजता बलबला कुंड येथे पोहोचलो. येथे शंकराचे मंदिर आहे. तिथून कुंड थोडे दूर आहे. कुंडाच्या परिसरामध्ये परिक्रमावासींची खूपच गर्दी होती. कुंडापाशी उभे राहून तुम्ही नर्मदे हर... अशी आरोळी ठोकली की पाण्यात मोठे बुडबुडे येतात... म्हणून बलबला कुंड.
येथे हिंदुस्तान पेट्रोलियमचा सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्लांट आहे. पाण्यात बुडबुडे येण्यामागे मला जमिनीखाली असलेली नैसर्गिक वायूची उपलब्धता हे शास्त्रीय कारण वाटते. दुसरे काही कारण नसावे. कुंडाची व आश्रमाची एकूण दुरावस्था होती. एकूण पन्नास मूर्ती तेथे होत्या. मी आणि हुकूम यांनी चर्चा केली. अंधार पडू लागला होता. इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला आसन लावले. येथे प्रचंड डास होते. बाजूला स्वयंपाक करीत असलेल्या चार-पाच परिक्रमावासींपैकी एकाने विचारले, महाराज भोजन प्रसाद पाओगे क्या...मनात म्हटले मैया ची कृपा आहे. लगेच हो म्हणालो. तासाभरात आठ वाजता टिक्कड आणि डाळ असाभोजन प्रसाद मिळाला. भोजन प्रसादानंतर अर्धा तासाने आसनवर डासांचे गुणगुणणे ऐकत आणि त्यांच्या चाव्याने निद्रादेवी उशिरा प्रसन्न झाली.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १६
रात्रभर डास फेर धरून होते. अधूनमधून झोप लागत होती. सकाळी नेहमीप्रमाणे साडेचार वाजता जाग आली. चांगलीच गार हवा असल्यामुळे, आणखीन थोडे पडावे म्हणून, पुन्हा पांघरून ओढले. दोन तासाने साडेसहा वाजता उठलो. आवरून सकाळी साडेसात वाजता बलबला कुंड सोडले. हुकूम व मी निघालो. आता पुढचा मुक्काम कठपोर. येथे नर्मदामैया सागराला मिळते. याला रेवासागर असे नाव आहे. भडोच हे आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले ठिकाण. मैयेचे अतिशय विशाल असे पात्र याठिकाणी दिसते. समुद्र व आणि मैया यांचा संगम येथे होतो.कठपोर या ठिकाणाहून समोरच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर म्हणजे मिठीतलई या ठिकाणी आपण बोटीने जातो. नर्मदामैयेच्या दक्षिण तटावरील परिक्रमेत रेवा सागर पार करताना, कठपोर हा दक्षिण तटावरील शेवटचा मुक्काम. सकाळ असल्यामुळे व अल्हाददायक वातावरण असल्यामुळे पटापटा चालत होतो. सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान विमलेश्वरला पोहोचलो. इंद्राने ब्रह्महत्येचे पाप निवारण करण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती, अशी वदंता आहे. त्यामुळे बहुसंख्य परिक्रमावासी विमलेश्वरला जातात.
हिंदू धर्मातील देवस्थानांची देखभाल आणि व्यवस्था हा एक अभ्यासाचा विषय ठरावा. अस्वच्छता, ओले, निसरडे, पाणी सांडलेले व वाढवलेले नारळाच्या शेंड्या, हार, फुले हे सगळीकडेच असते. त्याच्यात माशा... मंदिरात कुत्रीसुद्धा बसलेली असतात. त्यांनी बसू नये असे नाही पण, त्यांच्यामुळे भाविक घाबरतात. विमलेश्वर चे मंदिर दुरावस्थेत होते. दर्शन घेऊन कठपोरला रवाना झालो.
कठपोरला गोपालदास त्यागी महाराजांच्या आश्रमांमध्ये परिक्रमावासींची राहायची सोय होते. तेथील गोपालदास त्यागी महाराज हे परिक्रमावासींची, बोटीतून रेवासागर पार करण्याची व्यवस्था पाहतात. सरकारी व्यवस्था काही नाही. किंबहुना त्यांनी व्यवस्था ताब्यात घेतली आहे,, असे म्हणायला हरकत नाही. आश्रमात गेलो. आश्रमांमध्ये किमान दोनशे परिक्रमावासी असावेत. खूप गर्दी होती. आश्रमात बांधलेला मोठा हॉल आहे.
हॉलमध्ये, हॉलबाहेर ओट्यावर,गच्चीवर मोकळ्या पटांगणाच्या जागेत सर्व ठिकाणी परिक्रमावासींनी जागा मिळेल तेथे आपले आसन लावलेले होते. सर्वत्र चिक चिक आणि चिखल झालेला होता. जागा शोधत गच्चीवर गेलो. तिथे एका ठिकाणी हुकूमजी आणि मला आसन लावायला जागा मिळाली. आसन लावले खाली आलो. सेवेकर्यांनी आम्हाला भंडारा घ्यायला सांगितले. तांदळाची खिचडी होती. खिचडीचा भंडारा घेतल्यानंतर आम्ही त्यागीमहाराजांना भेटलो. ते म्हणाले, उद्या सकाळच्या बोटीत जागा नाही. परवाच्या दिवशी बघू. राहा निवांत. परिक्रमावासी आहात ना कसली घाई आहे. परिक्रमा घाईघाईत करत नाहीत.हा उपदेश आम्हाला ऐकवला. नमस्कार केला आणि माघारी फिरलो.रात्री खूप थंडी होती मोकळ्या हवेत उघड्यावर झोपायची आता सवय झाल्यामुळे तसेच कुडकुडत कानटोपी घालून अंगावर पांघरून ओढले. अधून मधून झोप लागत होती. काही परिक्रमावासींच्या गप्पा, काहींची भजने बराच वेळ चालू होती. नीट झोप अशी लागलीच नाही.
एवढ्या सगळ्या परिक्रमावासींसाठी, आश्रमातील मोकळ्या जागेत दोन मोठी पिंपे पाण्यासाठी भरून ठेवलेली होती. सगळेजण आपापल्या परीने कमरेत वाकून कोपरापर्यंत हात बुडवून पाणी भरत होते. त्याच्यातच पाणी भरण्यासाठी पाईप सोडलेले होते. स्वच्छता नावाचा प्रकार नसल्यात जमा. बाजूलाच एका ठिकाणी खड्ड्यात पाणी सोडले होते. तिथेच परिक्रमावासी अंघोळ करत होते, कपडे धुत होते सगळा आनंद होता. आपण सुशिक्षित आहोत हे बघून आश्रमचालक त्यातल्या त्यात नीट बोलतात. अशिक्षित परिक्रमावासींचे हाल बघवत नाहीत.
नर्मदामैयाच्या परिक्रमेत लाखो परिक्रमावासी दरवर्षी सामील होतात, प्रवास करतात, त्यांच्यासाठी कठपोर ते मिठीतलाई हा बोटीने रेवा सागर पार करण्याचा प्रवास अपरिहार्य असतो. तरीसुद्धा गुजरात सरकारने या ठिकाणी पुरेशी, चांगली निवासाची व्यवस्था, किमान स्त्री- पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि परिक्रमावासींना बोटीत चढण्यासाठी धक्का तेवढीसुद्धा व्यवस्था केलेली नाही,
याचे मला आश्चर्य वाटले.
हे सगळे काम ठेकेदारामार्फत सुद्धा करणे शक्य आहे. बाकीच्या ठिकाणी रस्ते, धरणे याचे नियोजनबद्ध काम शासनाने केले आहे. इथे मात्र गुजरात सरकारने दुर्लक्ष केले आहे, हे मात्र खेदाने नमूद करावेसे वाटते. गुजरात सरकारने इथे सगळेच आश्रमचालकांच्या वर सोपवलेले किंवा सोडून दिलेले दिसते. आपण त्यांच्यावर अवलंबून असतो. आश्रम चालकांच्या मर्जीप्रमाणे येथे सगळे काम चालते. त्याच्या समोर कोणीच बोलत नाही. आपण तर एक दिवसाचे धनी... आपल्याकडे गपचूप ते म्हणतील त्याप्रमाणे करणे या शिवाय पर्याय नसतो.
कठपोर ते मिठीतलई रेवासागर संगम,हा प्रवास बोटीने पार करण्यामागची पार्श्वभूमी अशी...
नर्मदा परिक्रमेमध्ये परिक्रमावासीने नर्मदामैय्या ओलांडू नये असा एक संकेत आहे. नाहीतर त्याची परिक्रमा भंग पावते. यानुसार ज्या ठिकाणी नर्मदामैय्या सागराला मिळते, ते हे ठिकाण...रेवा सागर, कठपोर आणि मीठीतलईच्या दरम्यान आहे. हे अंतर पार करण्यासाठी परिक्रमावासींना बोटीतूनच जावे लागते. कठपोरच्या अलीकडेच एक पूल असून त्याच्यावरून वाहने जा-ये करतात. पण त्याच्यावरून परिक्रमावासीला नर्मदामैया पार करता येत नाही. अन्यथा त्याची परिक्रमा भंग होते. त्यामुळे सर्व परिक्रमावासी येथे येतात आणि येथूनच मैया पार करतात. थोडक्यात कठपोरला अन्य काही व्यवस्था नसल्यामुळे गोपालदास त्यागी यांच्या आश्रमाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहेे. हे लक्षात घेऊन तरी शासनाने यात लक्ष घातले पाहिजे आणि परिक्रमावासींना न्याय मिळवून दिला पाहिजे. परंतु दुर्दैवाने या विषयी कोणीही आवाज उठवत नाही वर्षानुवर्षे हे असेच चाललेले आहे. आणि हे दरवर्षीचे आहे. एका दिवसाची गोष्ट नाही. हे गुजरात सरकारच्या लक्षात आले नसेल असे नाही. पण दुर्लक्ष करायचे दुसरे काय... अजून किती दिवस चालणार, कुणास ठाऊक...
सकाळी आवरून सात वाजताच पुन्हा गोपालदास त्यागी महाराजांना भेटलो. बराच वेळ मनधरणी केल्यानंतर त्यांनी दोघांच्या तिकिटासाठी प्रत्येकी शंभर रुपये आणि वेगळी देणगी द्या सांगितले.
देणगी द्या, असे म्हटल्यानंतर मला धक्काच बसला. म्हणजे ही व्यवस्था यांच्या हातात असल्यामुळे ते म्हणतील तसे करण्यावाचून कुणालाही पर्याय नव्हता. मुकाट्याने देणगी देणे भागच होते. हे मलाच नाही तर सर्व परिक्रमावासींना लागू होते. माझ्यासमोर पर्यायच नव्हता. मी तिकिटाचे २००/- अधिक देणगीचे १२०/- दिल्यावर, एवढेच का असे मला विचारले. परिक्रमेत फार पैसे जवळ ठेवलेले नसल्यामुळे यापेक्षा अधिक पैसे देता येत नाहीत, असे कारण त्यांना सांगितले. नाराजीने पैसे घेऊन आश्रमाच्या देणगीची पावती माझ्या हातात टेकवली.बोटीचे तिकीट मागितल्यानंतर देणगीच्या पावतीवर आश्रमाचा शिक्का मारला. हेच ते बोटी चे तिकीट. मनातल्या मनात कपाळाला हात लावला... सर्व अगम्य !!!
सकाळी अकरा वाजता भरती आल्यावर बोटी सुटतील, असे आम्हाला सांगितले होते. बोटी सुटण्याचे ठिकाण आश्रमापासून सुमारे दोन किलोमीटर दूर खाडीजवळ आहे. आश्रमापासून बोटी सुटण्याच्या ठिकाणी जाण्यापर्यंत कुठलेच दिशादर्शक फलक नव्हते. सर्व परिक्रमावासी ज्यांना आज निघायचे होते ते, अंदाजपंचे रस्त्याने चालत होते. तो बांधलेला रस्ता नव्हता शेतातून काटेकुटे गवत दगडधोंडे पार करत तिथे पोचायचे होते. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हात सर्व परिक्रमावासी सामान घेऊन बोट सुटण्याच्या ठिकाणी बसले होते. आजूबाजूला तेथेही कसलीच व्यवस्था नाही. प्यायला पाणी नाही, महिला परिक्रमावासींना नैसर्गिक विधीसाठी शौचालये नाहीत, कुठला आडोसा नाही. सगळे वैराण आणि बोडके. बरं पाणी पिले तर किमान तीन-चार तास बोट थांबणार नव्हती. आणि बोटीत नैसर्गिक विधीसाठी अडचण. उन्हात घाम येत होता.घशाला कोरड पडत होती, पण पाणी पिऊ शकत नव्हतो. निवाऱ्यासाठी जागा नाही. सगळे बिचारे आशेने, भरतीच्या दिशेने वाट बघत बसले होते, कधी एकदा भरती येते आणि बोटी पाण्यात चढवल्या जातात.
येथेही गुजरात सरकारने किमान बसण्यासाठी शेड, पाण्याची व्यवस्था, शौचालये आणि परिक्रमावासींसाठी माफक दरात अल्पोपहाराची व पेयपानाची व्यवस्था केल्यास आशीर्वादच मिळतील. सगळेच परिक्रमावासी काही कफल्लक नसतात. वाटेत दक्षिणा म्हणून मिळालेले पैसे बऱ्याच परिक्रमावासींकडे असतात. त्याच्यातून ते चहा, कॉफी नाश्ता आणि भोजनप्रसाद पैसे देऊन खरेदी करू शकतात. लाखो परिक्रमावासींची वर्षानुवर्षे चाललेली गैरसोय गुजरात सरकारने दूर करणे आवश्यक आहे. लाखो रुपयांची उलाढाल गुजरात सरकारने आश्रमाच्या एका महंताकडे सोपविलेली आहे. भाविकांच्या पैशाचा योग्य विनियोग ही गुजरात सरकारची जबाबदारी नाही काय... रेवा सागर पार करणाऱ्या ज्या बोटी आहेत, त्या बोटींमध्ये गोपालदास त्यागी महाराजांच्या आश्रमाच्याही दोन बोटी आहेत.म्हणजे येथे त्यांचा धंदा चालू आहे. या आश्रमातले लोक काय काय उद्योग करतील, हे एक मैयाच जाणे.
दुपारी अकरा वाजता गोपालदास त्यागी महाराज आले. साडेअकरा वाजता भरती सुरू होऊन खाडीत पाणी वाढायला लागले. पावणे बारा वाजता बोटी पाण्यात घेतल्या गेल्या. आमची सोय ५० जणांच्या एका गटात केली गेली. बोट सुटण्याचे वेळी महाराजांनी बोट मालकाच्या एका लहान मुलीला सर्व परिक्रमावासींसमोर उभे करून तिला प्रत्येकी पाच रुपये कुमारी पूजन म्हणून देण्याचा आदेश सोडला. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, ही म्हण आठवली...चला तेवढेच पुण्यकर्म...प्रत्येकाने पाच रुपये देऊन तिच्या पाया पडून, पुण्यकर्म गाठीस बांधले.
त्याच्यानंतर त्यांनी बोटीत चढण्याचा आदेश दिला. बोटीत चढण्यासाठी ही झुंबड उडाली. तिथे धक्का न बांधल्यामुळे बोटीकडे जाताना घोट्यापर्यंत पाय चिखलात रुतत होता. तसेच पुढे चालत चालत, सटकत बोट गाठायची कसरत चालू होती. बोटीच्या कडेला अडकवलेल्या टायरमध्ये पाय टाकून बोटीत चढायचे, असा शिरस्ता होता. चिखलाचे पाय धुवून बोटीत चढायचे, ही सूचना कोणीच ऐकायला तयार नव्हते. प्रत्येकजण चिखलाचे पाय बसायच्या जागेवर ठेवून बोटीत उतरत होता.त्यामुळे बोटीत सगळीकडे बसायच्या जागेवर चिखलच चिखल झाला होता. .आणि शेवटी एकदाचे सर्वजण बोटीत विराजमान झाले .सगळ्यांनी पावन खिंड लढवली होती. बोट भरल्यामुळे हातात तिकीट असूनही जागा न मिळाल्याने काही परिक्रमावासी हिरमुसले होऊन दुसऱ्या बोटीकडे पळत होते. कदाचित त्यांना पुढच्या बोटीत जागा मिळेल या आशेने...
परिक्रमावासींनी खच्चून भरलेली बोट दुपारी बारा वाजता एकदाची प्रवासाला निघाली. नर्मदे ssss हर...चा मोठ्ठा गजर झाला. सगळ्या परिक्रमावासींनी हात जोडले आणि मैयाची प्रार्थना केली. ही प्रार्थना खरोखरच गरजेची होती, हे मला नंतर समजले.बोटीने हळूहळू वेग घेतला. माझ्या अंदाजानुसार क्षमतेपेक्षा किमान दहा प्रवासी तरी बोटीत जास्त असावेत.तीस प्रवाशांच्या बोटीमध्ये चाळीस प्रवासी बसवले होते. कसले नियम आणि कसले काय... खच्चून भरलेली बोट होती. बोट निघाली तेव्हा सर्व परत परिक्रमावासींनी प्रार्थना का केली ते मला आत्ता समजले.
अशा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरलेल्या बोटीला भर समुद्रात काही अपघात झाल्यास प्रवासी इहलोकीची यात्रा संपवून मोक्षाकडे वाटचाल करणार, हे नक्की. पण याला जबाबदार कोण. जादा ओझ्यामुळे बोट हळू मार्गक्रमणा करीत होती.
खाडी पार करून नंतर मुख्य समुद्रात मैया आणि समुद्राचा संगम होता, तेथे चालकाने बोट दहा मिनिटे उभी केली. आणि मैयाची पूजा करण्याचे आवाहन केले. पुन्हा एकदा माणसांची धांदल उडाली. आपापल्या पिशव्या काढून पूजा करण्याची गडबड सुरू झाली. कोणी उदबत्ती काढतोय, कोणी निरांजन, कोणी कापूर पेटवतोय, कोणी मैयेसाठी आणलेली साडी काढतोय, कोणी प्रसाद काढतोय, नावेमधूनच मैयेची पूजा सुरू होती. पुढे प्रवाशांनी मैयेत नारळ सोडला की, त्या चालकाचा सहाय्यक मागच्या बाजूला तो उचलून घेत होता. अशा रीतीने सर्व वस्तू त्या डोळ्यादेखत तो चालकाचा सहाय्यक उचलून परत बोटीत ठेवत होता. श्रद्धेचा बाजार डोळ्यांनी बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मैयेची अशी ही वेगळीच पूजा संपन्न झाली. लोकही पूजा करायला मिळाल्याच्या आनंदात होते. सागरातील मैयेसाठी अर्पण केलेल्या वस्तू डोळ्यादेखत काढलेल्या जात होत्या, याच्याशी त्यांना काही कर्तव्य नव्हते. बोटीच्या भाड्या व्यतिरिक्त मैयेच्या पूजेत न मिळालेले नारळ, साडी,धोतर याची कमाई त्या चालकाला चांगलीच झाली होती.
समुद्रात दूरवर पक्षी नाहीत, मासे नाहीत, फक्त मागून परिक्रमावासींना घेऊन येणाऱ्या दोन तीन बोटी, दूरवर पसरलेला अथांग सागर...इंजिनाचा आवाज आणि सोबतीला बोटीतील परिक्रमावासींची अव्याहत टकळी.या प्रवासात बोटी बंदही पडतात, असेही ऐकायला मिळाले. ऐकून धस्स झाले. परिक्रमेमध्ये रेवा सागर पार करणे हा परिक्रमावासीयांच्या दृष्टीने एकमोठा पडाव असतो. सर्वांना तेथे जाणे भागच असते. रेवासागर पार करणे, मैयाचे ते विशाल पात्र डोळ्यात साठवून घेणे, त्याचा आनंद घेणे ही परिक्रमावासीयांच्या दृष्टीने एक अनन्यसाधारण गोष्ट असते. मैयेच्या प्रवासातील प्रत्येक मुक्काम आणि प्रत्येक टप्पा हा वेगळा असला तरी रेवा सागर पार करणे, हा या सर्व टप्प्यातील परमोच्च बिंदू असे म्हणायला वाव आहे. तसेच दीर्घ पल्ल्याच्या या परिक्रमेत, व्यक्तिगत स्वच्छता ही अपरिहार्य आहे. स्वच्छता नसल्यास, पाणी चांगले न प्यायला मिळाल्यास, कावीळ, टायफाईड तसेच विविध संसर्गजन्य आजार होऊ शकतात आणि तसे लोकांना होतात असे मला परिक्रमेत दिसून आले. या दुरावस्थेत बदल करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मीठीतलई ते कठपोर या प्रवासाविषयी, येथील व्यवस्थेविषयी आणि दुरावस्थेविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. मला आशा आहे ते कंटाळवाणे न होता, यामागचे मर्म आपणांस कळेल.
मिठीतलईला बोटीतून उतरल्यानंतर मागे वळून जेव्हा परिक्रमावासी मैयेला श्रद्धेने नमस्कार करतो तेव्हा, रेवासागर पार करण्यासाठी जे काही करावे लागले, त्याचे सार्थक झाल्याचा आनंद प्रत्येक परिक्रमावासीच्या चेहर्यावर दिसून येतो. नर्मदे ssss हर च्या गजरात पुढची वाटचाल सुरू होते.
दुपारी अंदाजे साडेतीन वाजता मीठीतलईला पोहोचलो. चार तास बोटीत बसून पाय सुजले होते. उतरल्यानंतर पटकन चालता येईना. थांबल्यानंतर लगेच अर्धा ते पाऊण लिटर पाणी प्यायलो.बोटीतून उतरून पुन्हा गुडघाभर चिखलातून कसाबसा किनारा गाठला. इथेसुद्धा किनाऱ्यावर पाय धुवायला काही नाही. सगळीकडे फक्त दलदल. दोन्ही किनाऱ्यावर एकूण परिक्रमावासींच्या व्यवस्थेच्या नावाने उजेडच होता. बोटीतून उतरल्यानंतर परिक्रमावासी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघाले. आम्ही दोघे उतरलो आणि वाटेत एका कारखान्यात चिखलाचे पाय धुवून चालत चालत दोन किलोमीटरवर गायत्री देवी मंदिरात पोहोचलो. विशाल परिसर असलेल्या गायत्री देवी मंदिरात बोटीतून उतरलेल्या पैकी ५० परिक्रमावासी एकदम आले. तेथील महाराजांचे वय ६५ वर्षे .एकूण तेथील रागरंग बघून हुकूमजी आणि मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आश्रमातून बाहेर पडून आम्ही डांबरी रस्त्याने चालू लागलो. मिठीतलईला, किनाऱ्याला लागून जहाज विषयक आणि जहाज बांधण्याचे उद्योग असणारे कारखाने आहेत. उद्योगधंद्याचा हा परिसर असल्यामुळे एकूणच आश्रम तसे कमीच. त्यामुळे लवकरात लवकर आश्रम शोधणे गरजेचे होते. मीठीतलईपासून आम्ही दहा बारा किलोमीटरवरील दहेज गावात पोहोचलो. रस्त्याने जात असताना आम्हाला, एका चहाची टपरी चालवणाऱ्या मातारामनी, तुम्ही याच रस्त्यावर पुढे हरिसिद्ध अन्नक्षेत्र लागेल. त्या ठिकाणी थांबा. तेथे तुमची भोजनप्रसादाची आणि आसन लावण्याची व्यवस्था होईल, असे सांगितले. असे सांगून त्या ठिकाणचे पत्ता असलेले कार्ड आम्हाला दिले. कार्ड पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, आमच्या टपरीवर अन्नक्षेत्र चालविणाऱ्या सद्गृहस्थांनी येथे ही कार्डे ठेवलेली असून, जे कोणी परिक्रमावासी दिसतील त्यांना आमच्या आश्रमाची माहिती देऊन येथे पाठवावे, असे सांगितलेले आहे. धन्य झालो, म्हणजे आपल्या आश्रमामध्ये येऊन लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, पाहुणचार घ्यावा, आपल्याला आशीर्वाद द्यावेत म्हणून एवढा खटाटोप ते करीत होते. मैया किनारी पहावे आणि ऐकावे ते सगळे नवलच असते. एवढा सेवाभाव दुसरी कडे पाहायला मिळत नाही.
रेवा सागर पार करणे, हा परिक्रमेतील एक मोठा टप्पा...तो पार पडला.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १७
हरि सिद्धी अन्नक्षेत्र यांचे पत्त्याचे कार्ड घेऊन आम्ही पुढे निघालो. पत्ता शोधून आम्ही हरि सिद्धी अन्नक्षेत्र येथे पोहोचलो. श्रीमती मंजूलाबा उदयसिंह परमार यांनी हे अन्नक्षेत्र चालविले आहे. याची व्यवस्था छत्र सिंह गोहिल व त्यांच्या पत्नी सौ हसू बेन गोहील पाहतात. श्री उदयसिंह परमार या दानशूर उद्योगपतींनी सेवाभाव म्हणून हे कार्य सुरू केले आहे. हरि सिद्धी मातेच्या मंदिराच्या ओवरीवर निवासाची व्यवस्था होते. हसू बेन माताराम यांना विचारून आसन लावले. हसू बेन माताराम यांनी गेल्यावर लगेच गरम-गरम, घट्ट दुधाचा, मसाला घालून सुंदर चहा दिला. चहाने आज सकाळपासून आत्तापर्यंत झालेल्या पायपिटीनंतर आलेला सगळा थकवा, एका क्षणात पळाला. मैया तुम्हाला परीक्षा दिल्यानंतर पास झालात की लगेच हातामध्ये बक्षीस देते. लहान मुलांना चॉकलेट...तसा तुम्हाला चहा...
पलिकडे त्यांच्याच मालकीचा हौद होता. दिवसभरात बोटीमधील प्रवासात चिखलाने सगळे कपडे माखलेले होते. ते धुणे अपरिहार्य होते. आज मजल-दरमजल कमी, पण एका जागीच बसून आलेला घाम आणि बोटीतील आसनावरील प्रचंड चिखल यांनी कपडे खूप खराब झाले होते. हौदाच्या बाजूला दगडावर खसखसून, घसरे मारून सगळे कपडे धुतले. त्याच्या नंतर आंघोळ केली. नवीन स्वच्छ कपडे परिधान केले आणि आसनापाशी येऊन बसलो. सायंकाळचे सात वाजले मग आरती सुरु झाली देवीची, रामाची, हनुमानाची अशा दोन-तीन आरत्या झाल्यानंतर आरती संपन्न झाली.
आरती नंतर थोड्यावेळाने भोजन प्रसाद होता. भात,डाळ,गव्हाचे फुलके,भाजी आणि कौंसार. हा कौंसार म्हणजे गव्हाच्या जाड रव्यापासून तयार केलेला गोड पदार्थ. नर्मदा मैयाने पोटभरून खाऊ घातले आणि वरती कौंसार खाऊ घालून पाठीवर जणू हात फिरवला.
या कौंसार गोड पदार्थावर तूप घेतात. हा पदार्थ पानात वाढल्यानंतर सौ परमार माताराम यांनी अर्धी वाटी साजूक तूप आणून त्याच्यावर घातले आणि आम्हाला सांगितले की, कौंसार हा पदार्थ असाच भरपूर तूप घालून खातात. परिक्रमा सुरू केल्यापासून आतापर्यंत सगळ्या दिवसांचे तूप मैयाने एकाच वेळी पानात वाढले.
मैया तुमच्यासाठी काय किमया करेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. परिक्रमेत अर्धी वाटी साजूक तूप हे अमृतापेक्षाही सरस ठरते. ते साजूक तूप शिवाय घरातले, मग तर विचारायलाच नको. इथे शहरांमध्ये आपल्याला, मंगल कार्यालयांमध्ये चारशे रुपये प्रति ताट एवढे पैसे देऊन सुद्धा पुरणपोळीच्या जेवणात केटररचा माणूस चमचाभर सुद्धा तूप घालू का नको असा विचार करत पटपट पुढे जात असतो. त्याने घातले नाही तर तुम्हाला हक्काने मागावे लागते. इथे मात्र तुमच्यासमोर मैय्या वाटीभर तू घेऊन उभी राहते. आईचे प्रेम ते. वेगळेच असते, जाणवते...
मैया ची कृपा !!!
श्री व सौ परमार यांच्या दातृत्वाने पोट तृप्त झाले... अन्नदाता सुखी भव !!
भोजन प्रसादानंतर मंदिरात श्रीयुत परमार यांची भेट झाली. तेसुद्धा या मंदिरातच परिक्रमावासी यांसाठी सिद्ध केलेले भोजन घेतात. त्यांचे हे वेगळेपण निश्चितच जाणवले. श्रीयुत परमार यांनी स्वखर्चाने नवीन छान सुबक रेखीव मंदिर बांधले असून परिक्रमावासींची चांगली व्यवस्था केले असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी; अजूनही चांगली व्यवस्था करण्याचे प्रयोजन असल्याचे मला सांगितले. त्यांनी आपुलकीने आमची चौकशी केली. दोन दिवस निवांत राहून मग प्रस्थान ठेवा म्हणाले. वेळेअभावी शक्य नसल्याचे सांगून उद्या निघण्याची परवानगी मागितली.रात्री उशिरा आसनावर पाठ टेकली. डासांचे गुणगुणणे आणि अंगावर मांजरांचे पळणे, यात निद्रादेवीने कधी डोक्यावर प्रसन्न होऊन हात ठेवला हे कळले नाही. आज दिवसभर लक्षणीय अशी चाल झाली नाही. पण, बोटीतील उन्हातून प्रवास आणि डांबरी सडकेवर चालणे यामुळे थोडे दमायला झाले. शिवाय बोटीमध्ये घामाच्या धारा लागलेल्या, पण पाणी न प्यायल्यामुळे डीहायड्रेशनचा थोडा त्रास जाणवला. अशक्तपणा कदाचित आला असावा. त्यामुळेच लवकर आणि छान झोप लागली.
सकाळी निवांत उठलो कालच्या सारखाच मसाला घातलेला घट्ट दुधाचा ग्लासभर चहा माताराम हसूबेन यांनी आणून दिला. काल श्रीयुत गोहिल यांनी मला एक ग्लास भेट दिला. पाणी, चहा, ताक,दूध जे मिळेल ते घेण्यासाठी. माझ्याकडे कमंडलू सोडले तर दुसरे काहीच साधन नव्हते. सकाळी सहा वाजता मंदिरामागील मोकळ्या जागेत दात घासत गेलो असता, काहीतरी पळताना दिसले. विजेरीचा झोत टाकल्यावर दोन-तीन ससे थबकून उभे राहिले. विजेरी बंद केल्यावर सुसाट पळून गेले. घरांच्या गर्दीत सशांना बघून मला आश्चर्य वाटले !!!
सकाळी सातच्या दरम्यान प्रस्थान ठेवले.
नर्मदे हर...
निघताना श्रीयुत गोहिल यांनी आम्हाला दोघांना प्रत्येकी एक थाळी आणि ठेवायला पिशवी दिली. दोनच दिवसापूर्वी हुकुमजी धणगर यांनी भोजन प्रसादासाठी थाळी घेऊ, असा प्रस्ताव ठेवला होता. काही कारणाने घेण्याचे राहून गेले. मैयानी आता इच्छा पूर्ण केली. भोजन प्रसादासाठी थाळी मिळाली. एक दिवसाच्या मुक्कामातसुद्धा खूप स्नेह निर्माण होतो, पण तरीही थांबता येत नाही. परिक्रमेचे उद्दिष्ट तुम्हाला थांबू देत नाही. स्नेहाचे हे पाश तुमची कसोटी बघतात. तरीही दुसरीकडे मैया तुम्हाला पुढे पुढे जाण्याची आठवण करीत असते. थांबला तो अडकला, निघाला तो सुटला. त्यामुळे पाय उचलले... नर्मदे हर...
आता भरूचपर्यंतचा पुढचा सगळा रस्ता डांबरी होता. सकाळी साडेआठ वाजता रस्त्यावरील एका कंपनीच्या गेट बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा व बिस्किटे खाण्यासाठी थांबलो. टपरीचालक मातारामना बाजारासाठी जाण्याची गडबड होती. त्यांनी आम्हाला चहा दिला पण पैसे घेण्याचे नाकारले, आणि दुकान बंद करून निघून गेल्या. आम्ही चालत असलेला हा रस्ता सगळा हायवे होता. रस्त्यावर नावालाही सावलीसाठी झाड नाही. सावलीसाठी बस स्टॉपवर किंवा टपरीवर थांबावे लागत होते. थोड्यावेळाने पाणी पिण्यासाठी थांबलो असता, एका टपरीवाल्याने भोजन प्रसाद घेण्याचा आग्रह केला. त्याला वेळेची अडचण सांगितली त्यावर त्यांनी चहाचा आग्रह करून, चहा घ्यायला लावला आणि एक एक क्रिमरोलही दिला.
खाऊन झाल्यावर त्याचे आभार मानले आणि नर्मदे हर करून पायाला वेग दिला. घाई करणे गरजेचे होते. सायंकाळी लवकरात लवकर भरूचला पोहोचणे आवश्यक होते. घाईने निघालो.
नवेठानंतर वाटेत एका टपरीवर महेश भाई नावाचे रिक्षाचालक भेटले. त्यांनी आम्हाला आग्रह करून भोजनप्रसाद घ्यायला लावला. टपरीवर असलेली रोटी भाजी आणि छास ( ताक ) असा भोजन प्रसाद आम्ही ग्रहण केला. महेशभाईंचे आभार मानले, लवकर आटपून, पाय उचलले.
मजल दर मजल करीत भरूचला पोहोचलो. भरूच शहरातून आम्ही झाडेश्वरला रवाना झालो. रस्त्याने जात असताना एका दुचाकीस्वाराने थांबून आमची चौकशी केली आणि प्रत्येकी दहा रुपये दक्षिणा देऊन, त्याने नर्मदे हर केले...गडबडीत त्याचे नाव विचारायचे राहून गेले.अशी बरीच अनामिक माणसे भेटतात. चहा, भोजनप्रसाद घ्यायला लावतात, दक्षिणा देतात. आपल्याच तंद्रीत आपण असल्यामुळे त्यांची नावे विचारायचे राहून जाते. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध म्हणायचे दुसरे काय !!!
डांबरी सडकेवरून गावातला रस्ता पकडून, भरूच गावातून झाडेश्वरला पोहोचलो. मीठीतलई पासून पुढील नर्मदामैयाच्या किनारी सगळीकडे चिखल आणि दलदल आहे. तेथून चालणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला डांबरी सडकेन चालावे लागते. या डांबरी सडकेवरूनच आपण भरूच शहरात प्रवेश करतो. भरूच शहरामध्ये परिक्रमावासींसाठी आसन लावण्याची फारशी व्यवस्था नाही. तसेच परिक्रमावासींसाठी नर्मदामैयाच्या सहवासात राहणे यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडेश्वरचे मंदिर नर्मदामैयेच्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे आपण झाडेश्वरकडे प्रयाण करतो.
मैयापार करणाऱ्या नवीन झालेल्या आणि टोल आकारल्या जाणाऱ्या हायवेच्या डाव्या हाताने झाडेस्वरच्या नीलकंठेश्वर मंदिराकडे रस्ता जातो. हमरस्त्यापासून नीलकंठेश्वर मंदिर अर्धा किलोमीटर आत आहे. आम्ही मंदिरात प्रवेश करून मंदिराच्या आवारातील ऑफिसमध्ये व्यवस्थापक श्री राजूभाई यांना भेटलो व आसन लावण्याची परवानगी घेतली. त्यांनी तुमच्या सोयीने कुठेही आसन लावा असे सांगितले. आता तुम्ही लवकर आल्यामुळे तुम्हाला आत हॉलमध्ये आसन लावता येईल. नंतर मंदिरात गर्दी झाली तर बाहेर मोकळ्या जागेमध्ये आसन लावावे लागेल याची आम्हाला कल्पना दिली. तसेच आता थोड्याच वेळात चहाची घंटा होईल. तेव्हा चहा घ्या आणि नंतर स्नानासाठी मैयेवर जा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. पाचच मिनिटात चहाची घंटा झाली आम्ही हॉलमध्ये जागा बघून आसन लावले आणि त्वरेने चहाचा प्रसाद घेण्यासाठी गेलो. चहा घेऊन मैयेकर स्नान करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी रवाना झालो. मैयेवर वर जाऊन मनसोक्त स्नान केले, कपडे धुतले.
मंदिराचे आवार खूप मोठे आहे. मंदिराच्या आवारात संत निवासासाठी मोठ्या हॉलची सुविधा आहे. तसेच पिंपळ, कडूनिंब,अशोक व इतर शोभेचे वृक्षही आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश करताना समोर कारंज्यामध्ये श्रीकृष्णाची कालिया मर्दन करणारी छान मूर्ती आहे. मुख्य मंदिरात शंकराची पिंड, त्याच्यामागे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर गाभार्याबाहेर गणेश व कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत. देवळाच्या सभामंडपात वेगवेगळ्या शाळुंकेवर बारा ज्योतिर्लिंगांची नावे लिहिली आहेत. शंकराच्या मंदिरासमोर हनुमंताचे मंदिर आहे.
मंदिराला लागूनच मैया आहे. मैयेवर जाण्यासाठी मंदिराच्या ट्रस्टने सुबक पायर्या आणि घाट बांधून घेतला आहे. घाटाला लागूनच भरूचहून अंकलेश्वरला जाणारा खूप मोठा पूल आहे. येथे पाणी खूप खाली व घाट वरील बाजूस आहे. पाणी खाली असल्यामुळे पाण्यात स्नानासाठी वाळूची पोती टाकली आहेत. मैया आणि समुद्र यांचा संगम, रेवा सागर येथून जवळच असल्यामुळे मैयेला खूप पाणी आहे. दूरवर नजर टाकावी तेथपर्यंत मैयेचे विशाल पात्र आणि पाणी नजरेत भरते. उत्तर तटावर उतरल्यावर लगेच, हे रमणीय दृश्य आपल्याला दिसत नाही. उत्तर तटावर उतरल्यानंतर मिठीतलई पासून भरूचपर्यंत मैया किनारी सर्वत्र दलदल आणि चिखल आहे. परिक्रमेसाठी किनारी पगदंडी किंवा रस्ता नाही. त्यामुळे मिठीतलईपासून भरूचपर्यंत आपल्याला डांबरी सडकेने वैराण,उजाड अशा रस्त्याने धूर, धूळ खात प्रवास करावा लागतो. पण अशी विशाल मैया दिसले की त्या सगळ्या श्रमाचा परिहार होतो... मस्त वाटते.
घाटाच्या आसपास खूप अस्वच्छता दिसली. एक लक्षात आले, जेव्हा मैया शहरापासून दूर असते, तेव्हा ती खूप स्वच्छ,नितळ व शांत असते. इथे शहरात रात्री सुद्धा मैयाकिनारी शांतता नसते. वाहनांचा गदारोळ, सहलीला आलेले नागरिक , टवाळक्या,गप्पा मारायला आलेले लोक यांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत चालूच असते. रात्र संपत नाही तोच पहाट सुरू होते. पुन्हा गरोदर वर्दळ आणि गडबड आहे.
शहरात नागरिक मैयेकिनारी घाटांवर अस्वच्छता करतात. निर्माल्य,नारळ कागद, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅरी बॅग सगळे टाकलेले असते. पाण्यात तरंगत असते. इथे सुशिक्षित नागरिक मंदिरात पूजा-अर्चा करून वाहिलेले हार, फुले तसेच निर्माल्य, नारळ, हळद, कुंकू हे पाण्यात अर्पण करतात. पाण्यातले जलचर, मासे मगरी, हे हार फुले खाणार आहेत काय, हे त्यांचे अन्न आहे काय, का आपण घाण करतो जलचरांच्या आयुष्यात.. जशी जमीन तुमची आहे तसे पाणी हे जलचरांचे आहे. तुमच्या घरात कोणी कचरा टाकला तर तुम्हाला चालेल का मग पाण्यात का कचरा टाकता. थांबवा हे प्रदूषण. आम्हां सर्व परिक्रमावासींना आणि ग्रामीण भागात जेथे पाणी शुद्ध करण यंत्रणा नाही, तिथे सर्वांना खळखळ वाहणाऱ्या नर्मदामैयाचे पाणी थेट प्राशन करावे लागते आणि या प्रदूषणाचे बळी स्थानिक आणि आमच्यासारखे परिक्रमावासी होतात, हे सुज्ञास सांगणे न लगे. निसर्गातून तयार झालेला कचरा उदाहरणार्थ पाण्यातील मृत प्राणी याचा योग्य तो निचरा मैयेतील पाण्यात होतो, असा अनुभव मी घेतला आहे. परंतु मानवनिर्मित जे प्रदूषण आहे, त्याचा निचरा होत नाही, हे सर्वांना माहिती आहेच. याचे अधिक विवेचन ब्रह्मांड घाटावरील मुक्कामात केले आहे. ग्रामीण भागात मात्र शहरी व सुशिक्षित नागरिक नसल्यामुळे मैया किनारी अस्वच्छता होत नाही. मुळात इथे प्लास्टिकच नसते आणि चंगळवाद नसतो. त्यामुळे मैया किनारी घाण व अस्वच्छता होत नाही. उलट ग्रामीण भागात गावकरी मात्र पोटच्या पोरासारखी मैयेची काळजी घेतात. आपण चुकलो, घाण करू लागलो तर, गावातील खेडूत आपला कान धरतात व आपल्याला घाण करू देत नाहीत. इथे, अंकलेश्वरमध्ये व जेथून मैया शहरातून प्रवास करते, तिथे तिथे मैया अस्वच्छ केलेली आहे... काय बोलणार...
सायंकाळी साडे सहाला आरती झाली. नंतर भोजनप्रसाद घेतला मंदिराच्या समोर असलेल्या संत निवासाच्या खाली भोजनशाळा आहे. नंतर उशिरा मंदिरात अंदाजे २०० परिक्रमावासी तरी आले असावेत. त्यामुळे आवारात खूप गडबड, धावपळ होती. काहींना संत निवासात जागा मिळाली, तर काहींनी आवारात आसन लावले...
काय सांगावे वर्णन !!! आभाळाचे छप्पर मैयेची कुशी, भोलेनाथांचे आवार... सगळे स्वर्गीयच जणू...काय बरं वर्णावे.
हे प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे. सिमेंट काँक्रीटची घरे, लाकडी दिवाण, कृत्रिम सोफे आणि वातानुकूलित खोल्या यात झोपणाऱ्या आपल्यासारख्या शहरी लोकांना हे वातावरण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय, वेगळे असे काय असते, ते कळणार नाही. आपण स्वतःच्या घराच्या आवारात, बाल्कनीत, सोप्यावर,ओवरीवर ओसरीवर कुठेही, कधीतरी सतरंजी टाकून रात्री आभाळाखाली झोपून पाहावे... मग आपल्याला समजेल मला काय म्हणायचे आहे ते. स्वतःच्या घरात बाजूला, सुरक्षारक्षक असून सुद्धा असुरक्षितता जाणवणाऱ्यांना मैयाच्या खुल्या वातावरणाचे महत्त्व इथे आल्या शिवाय कळणार नाही. कधीतरी आपण लोखंडी सुरक्षा दरवाजे, खिडक्यांचे लोखंडी ग्रील याच्या बाहेर पडून मोकळा श्वास घेतला पाहिजे. विमान, रेल्वे, रस्त्यावर प्रवास करताना सुद्धा असुरक्षितता असते. तरीही आपण प्रवास करतोच ना...मग एखाद्या वेळी असा वेगळा प्रयत्न करायला काय हरकत आहे. सगळीच कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला हवी का . या अशा व्यक्त व अनेक अव्यक्त प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळावीत, म्हणून मैया आपल्याला आवाहन करते.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १८
पुढे पालेज मार्गे मोरी कोरलला गेलो. येथे पुनीत आश्रम आहे. नारेश्वरच्या अलीकडे दोन किलोमीटर, उजव्या हाताला आत पाच किलोमीटर पुनीत आश्रम आहे. थोडक्यात पुनित आश्रमात दर्शनासाठी जाण्याकरिता तुम्हाला वाकडी वाट करून पुन्हा हमरस्त्यावर येऊन मग नारेश्वरला जावे लागते.आश्रमात १० छोटी मंदिरे आहेत. मुख्य मंदिर महादेवाचे असून, बाकी इतर देवी देवतांची मंदीरे आहेत. मंदिर मैया पासून थोडे दूर आहे. येथे जाणाऱ्या परिक्रमावासीयांची आसन लावण्याची व्यवस्था आश्रमाशेजारील नर्मदामैयाच्या मंदिरात आहे. या आश्रमाचे खूप नाव असून, या मंदिरांना महत्त्वही आहे. तेथील उपस्थित सेवाभावी किंवा आश्रमसेवकांना येणाऱ्या भक्त व परिक्रमावासींविषयी काही स्वारस्य असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे..नर्मदे हर... पाय उचलले. पुढे नारेश्वर ला निघालो.
नारेश्वरला वासुदेवानंद सरस्वती म्हणजे, टेंबे स्वामी यांचे शिष्य रंगावधूत महाराजांची समाधी आहे. येथील आश्रम मोठा आहे. आश्रमाच्या प्रवेशद्वारात पिसारा फुलवलेल्या मोराची छान सजावट केली आहे. त्याची कमान असून, अतिशय मोहक असे त्याचे स्वरूप आहे. आश्रमाच्या कार्यालयात जाऊन आसन लावण्याविषयी माहिती घेतली. परिक्रमावासींसाठी असलेली निर्देशित जागा त्यांनी दाखवली. तेथे ओसरीवर आसन लावले. आसन लावून मैयेवर स्नानाला गेलो. मैयेवर छान घाट बांधलेला आहे. येथे टेंबे स्वामींचे मंदिरही बांधलेले आहे. स्नान करून आल्यानंतर रंगावधूत महाराज समाधी आणि टेंबे स्वामींच्या मंदिराचे दर्शन घेतले. अतिशय प्रसन्न वातावरण या आश्रमात आहे. समाधी मंदिर अतिशय सुंदर बांधलेले आहे. मंदिरातच एका कडेला भांड्यात खडीसाखर प्रसाद म्हणून ठेवलेली आहे स्वतःच्या हाताने जाऊन घ्यायची. चांगली व्यवस्था आणि वेगळेपण सुद्धा. अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी माझ्या या परिक्रमेतील लेखनात नमूद अशासाठी करतो आहे की, आपल्याकडे प्रसाद देण्यासाठी सुद्धा एक माणूस नेमलेला असतो. म्हणजे प्रसाद वाटपासाठी एक माणूस, तो नसला तर त्याची पर्यायी व्यवस्था, विनाकारण माणसे , सेवेकरी अडकून राहतात. हे करण्याची खरच गरज नाही... नाही का.
प्रसादाची व्यवस्था करून ठेवायची. ज्याने त्याने आपापल्या हाताने घ्यावे. पाहिजे तेवढे. झाले... त्याच्यावर नियंत्रण नको, लक्ष नको. निदान संतांच्या दारात तरी भक्तांवर विश्वास ठेवायला हवा आणि प्रसाद घेऊन घेऊन किती घेणार...
अशा विविध नवीन गोष्टी, सुधारणा ठिक ठिकाणी चालू असतात. त्या आपण पहाव्यात, दुसरीकडे सुचवाव्यात आणि त्याचा प्रसार करावा. चाकोरीबद्ध नुसते एका देवळातून दुसऱ्या देवळात, दुसर्यातून तिसऱ्या , याच्याशिवाय अश्या गोष्टी डोळे उघडे ठेवून बघणे हेही परिक्रमेचे एक इप्सित आहे, असे म्हणायला हरकत नसावी.असो.
आश्रमात रंगावधूत महाराजांच्या समाधी स्थानात त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. पांढऱ्या शुभ्र संगमरवराची,आखीव-रेखीव आणि बघत रहावे अशी मूर्ती. मूर्ती पाहिल्यानंतर रंगावधूत महाराजांची आठवण यावी, इतकी हुबेहूब मूर्ती. समाधी स्थानाच्या समोर यज्ञशाळा बांधलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा गुरुवारचा दिवस होता आणि यज्ञशाळेत दत्त याग चालू होता. भक्ती भावनेने केलेल्या यज्ञात आहुती दिल्या नंतर त्या देवतेची मूर्ती ज्वाळांच्या स्वरूपात तुम्हाला दर्शन देते. त्यानंतर तुमचा यज्ञ हा सफल झाला आहे असे समजतात...जाता जाता ही विशेष माहिती. थोडावेळ यज्ञ स्थानी बसलो आणि मंत्रोच्चारांचा लाभ घेतला.
आश्रमात स्वतंत्र भोजनप्रसाद गृह आहे. आश्रमात सत्तर-ऐंशी खोल्यांमध्ये भाविकांची निवास व्यवस्था होते. रंगावधूत महाराज मूळचे महाराष्ट्रातील सांगलीचे. परंतु त्यांचे कार्य गुजरातमध्ये. टेंबे स्वामींचे अजून एक शिष्य म्हणजे गांडाबुवा महाराज ते मूळचे गुजरातचे पण त्यांचे कार्य महाराष्ट्र. ही एक वेगळीच माहिती ऐकायला मिळाली. पुण्यातील कर्वे रोडवरील वासुदेव निवासाचे संस्थापक ,गुळवणी महाराज हे टेंबे स्वामींच्या शिष्य परंपरेतील.
आश्रमामध्ये गुजरातमधील बडोदा आणि परिसरातील खूप मराठी भाविक येथे भेटले. किंबहुना रंगावधूत महाराजांचा गुजरातमधील मराठी भक्त संप्रदाय खूप मोठा आहे व येथे भक्त मोठ्या संख्येने कायम येतात असेही समजले. आम्ही तेथे असताना गुजरातमधील मराठी भक्तांची लक्षणीय उपस्थितीही आम्हाला तेथे जाणवली. आश्रमाची एकूण परिस्थिती पाहता, नारेश्वरच्या आश्रमात सुबत्ता असल्याचे जाणवले. नारेश्वरला आम्ही असताना येथे श्री सुभाषजी अकोलकर यांची भेट झाली. ऋषीतूल्य व्यक्तिमत्व.त्यांच्या दोन नर्मदा परिक्रमा झालेल्या आहेत. एक सहा महिन्यांची आणि दुसरी तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवसांची. त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. अशीच अचानक मोठी, ऋषितुल्य माणसे भेटतात आणि आपल्या ओंजळीत भरभरून दान टाकतात. आपण घ्यायचे आणि पुढे निघायचे. मैयेची सगळी कृपा असते. अकोलकर काका पुन्हा कधी भेटणार माहिती नाही. भेटीत त्यांनी माझा पत्ता घेतला. पुण्याला येणार ,असे म्हणाले. अजून भेट झालेली नाही.
सर्वसाधारणपणे मैयेची परिक्रमा, सर्व परिक्रमावासी सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत जितके दिवस लागतील तेवढ्या दिवसात पूर्ण करतात. विशिष्ट असे दिवस निश्चित केलेले नसतात. तीन, चार, पाच, सहा महिने, जसे जमेल तशी पूर्ण करतात. परंतु अध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या परिक्रमा करायची असेल तर, तीन वर्ष, तीन महिने, तेरा दिवसाची परिक्रमा करावी, असा एक संकेत आहे. ती अधिक फलदायी व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसांची परिक्रमा करताना तीन वर्षांत तुम्हाला, प्रतिवर्षी एक याप्रमाणे तीन चातुर्मास वेगवेगळ्या गावांमध्ये परंतु एकाच ठिकाणी थांबून करावे लागतात. चातुर्मासात स्थान सोडता येत नाही. पावसाळ्याचे चार महिने मुक्काम करावा लागतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये आपणास नर्मदामैय्या किनाऱ्यावरून आणि एकूणच पाण्यातून, चिखल, दलदलीतून चालता येत नाही. त्यामुळे परिक्रमा स्थगित असते. तर असे हे प्रति वर्षी चार महिने परिक्रमावासीला एका ठिकाणी मुक्काम करावा लागतो. या मुक्कामात परिक्रमावासी ने परमेश्वराचे नाव, कुलदेवतेचे स्मरण, धार्मिक ग्रंथ पठण, पारायण, पूजाअर्चा, यज्ञ-याग आणि ईश्वराचे चिंतन, जप जाप्य करावे असा संकेत आहे. नारेश्वरचा आश्रम खूप मोठा असल्यामुळे चातुर्मास करण्यासाठी जे परिक्रमावासी येथे थांबतात. त्यांच्यासाठी वेगळी जागा या आश्रमात आहे. यावरून या आश्रमाच्या आवाराची भव्यता आपणास आपल्या लक्षात यावी. आजपर्यंत एवढा मोठा आश्रम माझ्या पाहण्यात आलेला नव्हता म्हणून एवढे सविस्तर विवेचन केले आहे.
आश्रमात देसाई नावाचे एक सेवाभावी भेटले. त्यांनी सुद्धा एक परिक्रमा, चार महिन्यांची केली आहे. कठपोर ते मीठीतलई या प्रवासात, भर समुद्रात पहाटे दोन वाजता बोट नादुरुस्त झाल्याने परत कठपोरला आणावी लागली, दरम्यान भरतीचे पाणी ओसरल्याने बोट चिखलात ७-८ तास रुतून बसली होती. परत भरती आल्यावर निघालो. हा अनुभव त्यांनी कथन केला. विचारातच पडलो... ७-८ तास नुसते पाण्यात बसायचे... शूलपाणीच्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, एका ठिकाणी तीन रस्ते समोर आल्यामुळे ते थांबले होते. दहा मिनिटे थांबले असताना, एक शाळकरी मुलगी आली, त्या मुलीने ते तीन रस्ते कुठे जातात ते त्यांना सांगितले. ती मुलगी निघून गेली. लक्षात येईतो , मागे बघितले तर ती मुलगी अदृश्य !!! त्या दिवशी रविवार होता. रविवारी शाळकरी मुलगी कोणत्या शाळेतून आली...सर्वच कल्पनेपलिकडचे. मैयाच होती ती.हा अनुभव ऐकून अंगावर काटा आला. त्यांनाही परिक्रमा करणाऱ्यांविषयी विशेष आस्था आहे.
नारेश्वरच्या आश्रमात सेवेसाठी येणाऱ्यांना कमाल तीन दिवस खोली मिळते. त्याचे नाममात्र भाडे आहे. खोलीमध्ये अंथरूण-पांघरूण असतेच. शिवाय भोजनप्रसाद मोफत मिळतो. परिक्रमावासीयांसाठी मात्र मुक्कामाची कोणतीच मर्यादा नाही. चातुर्मास करणाऱ्यांसाठी वरती सांगितल्याप्रमाणे वेगळी व्यवस्था आहे.
रंगावधूत महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, स्वयंपाकासाठी नऊवारी लुगडे नेसणार्या दक्षिण महाराष्ट्रीयन स्त्रियांना खास मान मिळतो. पुण्याला असणार्या सौ पुणतांबेकर , त्यांच्या भगिनी, आई श्रीमती सुशीलाबेन ( या बडोद्याला असतात) पुण्यतिथीसाठी आल्या होत्या. त्यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी रंगावधूत महाराजांचे कादंबरी स्वरूपातील चरित्र, प्रवचनातील सारांश इत्यादी पुस्तके आश्रमाच्या पुस्तक भांडारातून मिळतील असे सांगितले. येथील पुस्तक भांडार खूप मोठे असून विविध विषयांची पुस्तके येथे अत्यंत माफक दरात मिळतात.
श्री अकोलकर काकांना फत्तेपुरला जायचे होते. त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. त्यांनीही पाठीवरून हात फिरवला आणि शुभेच्छा दिल्या.आमचा पुढचा मुक्काम होता मालसर. संत असो नाहीतर संतांची पूण्यभूमी...परिक्रमावासीला थांबता येत नाही...जड मनाने पाय ऊचलले. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प १९
पुण्यात्मा अकोलकर काका यांच्याविषयी मागच्या प्रकरणात थोड्या गोष्टी सांगायच्या राहिल्या. त्यांनी ज्या दोन नर्मदापरिक्रमा केल्या, त्या दोन्ही परिक्रमा त्यांनी पायाला किनतान म्हणजे पोते बांधून केल्या. वय वर्षे ७१. अजूनही मनात परिक्रमा करण्याची इच्छा ठेवून आहेत. त्यांनी आमच्याशी गप्पा मारताना काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, कोणालाही पैसे मागू नका आणि दिले तर नाही म्हणू नका. तुमची सर्व व्यवस्था मैयाच करणार आहे. तुम्ही फक्त नर्मदे हर म्हणा.
लक्ष्मी नाकारताना वृथा अभिमान बाळगू नका आणि स्वतःहून कोणाला पैसे, वस्तू मागू नकात. पैसे,वस्तू मागितल्यास ऋण वाढते. खुषीने देतील ते घ्या. चांगला बोध झाला.
परिक्रमेचा त्यांनी सांगितलेला अर्थ असा... परी म्हणजे उपर (वरती) आणि क्रमा म्हणजे क्रमाने. थोडक्यात वरच्या क्रमाने. एकानंतर दुसरे ठिकाण यानुसार परिक्रमा होते. भ्रमण म्हणजे एखादे ठिकाण वगळून, गाडीने पुढे जाणे. ज्याला जे योग्य वाटेल ते त्याने करावे. परिक्रमा करा नाहीतर भ्रमण शेवटी दोन्हीचेही महत्त्व त्या त्या ठिकाणी तेवढेच आहे. जवळ पैसे ठेवू नका म्हणजे नको त्या इच्छा होणार नाहीत. देणाऱ्याची जात-पात-धर्म याची विचारणा करू नका. भ्रमण काय किंवा परिक्रमा काय, ती होण्याची इच्छा महत्त्वाची. तुम्ही नारेश्वरला आलात, तुम्हाला येथे आश्रम, समाधी परिसर पाहायला मिळाला, संस्कृती अनुभवयास मिळाली, महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले, तुमच्या ज्ञानात, अनुभवात भर पडली हे तुमचे भाग्य आहे. प्रत्येक ठिकाणचे अनुभव, संस्कृती, मिळणारे ज्ञान हे वेगळेच असते.
तुम्ही इथे परिक्रमेसाठी आला आहात. तुमचे चित्त, भ्रमण, लक्ष या परिक्रमेत ठेवा. घरदार, नोकरी-व्यवसाय कुटुंब, मुले, पैसा हे ठेवलेलेच आहे. परिक्रमेत किंवा भ्रमण करताना, निदान आत्ता तरी याच्यात मन अडकवू नका. मैयाकिनारी, तुम्हाला मैयाकृपेने लहान- थोर माणसे भेटतील. वेगवेगळा अनुभव येईल. त्यांच्याकडून शिकता येईल. हीच तुमच्या आयुष्याची पुंजी असेल. तुम्ही अननुभवी, वयाने लहान असलात तरी, पुण्यात्म्यांना दीर्घ अनुभवाने आलेले हे ज्ञान, मैया तिच्या या खुल्या विद्यापीठात तुम्हाला अगदी सहजच प्राप्त करून देते. कोणत्याही पुस्तकात उपलब्ध नसणारे व कष्टाने मिळवलेले हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्याची वर्षे खर्च करावी लागू नयेत व ते तुम्हाला सहज प्राप्त व्हावे. तसेच ते पुढच्या पिढीकडे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवावे, हा मैयाचा उद्देश... हे संचित कर्मच.
मैयाकिनारी तुम्ही एकटे बसले असताना मैया शिकवते. जर मैया शेजारी नसेल तर दुसरे कोणीतरी तुमच्या शेजारी बसून तुमचा पाठ घेते. तुम्ही परिक्रमेत कोठेही असलात तरी शिकण्याची ही प्रक्रिया मैया चालूच ठेवते. पाटी, पुस्तके नसली तरी मैया तुमचे विद्यार्थीपण छान जपते.
नारेश्वर होऊन थेट मालसर गाठले. माझे मित्र सुनील काळूसकर (ते आता हयात नाहीत) त्यांचे गुरुबंधू पंचमुखी हनुमान मंदिरात सेवा करतात. त्यांचे नाव स्वामी मुक्तानंद गिरी. मंदिरात गेल्यावर व्यवस्थापक श्री सुरेंद्र अग्निहोत्री यांना भेटलो. सुरेंद्रजी, कॉलेजमध्ये शिकणारा व युवक. शिक्षण सांभाळून आश्रमाचे व्यवस्थापन, हिशेब सांभाळतो. कमवा आणि शिका दोन्हीही करतोय. त्यांना स्वामी मुक्तानंदगिरींविषयी विचारले. ते साधनेत आहेत व नंतर भेटतील, असे मला सांगितले. सुरेंद्रजींनी लवकरात लवकर स्नान करून येण्यास सांगितले. स्नान केले आणि कपडे स्वच्छ धुऊन, वाळत घातले. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात राम लक्ष्मण सीता, राधाकृष्ण, मारुती यांच्या सुंदर मूर्ती आहेत. सर्व मूर्तींना भरजरी वस्त्रे नेसवलेली होती. अंगावर अलंकार पण होते. उजव्या हाताला वेगळ्या मंदिरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. अशी मूर्ती मला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. छान मूर्ती होती.
रामायणामध्ये अहिरावणाने मायावी शक्तीने रामाच्या सर्व सैन्याला मूर्छित केले व तो राम आणि लक्ष्मण यांना पातळात घेऊन गेला. अहिरावणाने पाताळात आई भवानीसाठी लावलेल्या पाच दिव्यांमध्ये अहिरावणाचा प्राण होता. ते पाचही दिवे एकाच वेळी फुंकण्यासाठी हनुमानाने पाच मुखं म्हणजे नरसिंह, वराह, हनुमान, हयग्रीव गरूड अशी पाच मुखे धारण करुन ते पाच दिवे, एकाच वेळी फुंकून अहिरावणाचा वध केला. नंतर हनुमान, राम-लक्ष्मण यांना पृथ्वीवर घेऊन आला. अशी एक पौराणिक कथा आहे.
मंदिरात काही खोल्या बांधलेल्या होत्या. मंदिराचे काही भक्त साधनेसाठी येथे येतात. त्यांना येथील खोली दरमहा अठराशे रुपये एवढ्या माफक दराने उपलब्ध करून दिल्या जाते. या आकारामध्ये दोन्ही वेळच्या भोजनप्रसाद व चहाचा असा समावेश असतो. तसेच अल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य गावकऱ्यांना आश्रमातर्फे जवळच्या सिनोर या गावातून वैद्यकीय उपचार व औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातात. परिक्रमावासींना गरजेप्रमाणे धोतर,चादर, पांघरूण, चप्पल दिल्या जातात. आम्हालाही काही हवे का विचारले, पण आम्हाला काही नको असल्याने आम्ही नम्रपणे नकार दिला. परिक्रमावासियांसाठी आसन लावायला वेगळी जागा आहे. परिक्रमावासींसाठी मुक्कामाचे दिवस व आकार यांचे बंधन नसते. सर्व व्यवस्था मोफत. दरम्यान मुक्तानंद स्वामी आले. त्यांची भेट झाली. पस्तीस वर्षे वय, काळीभोर दाढी, मानेवर रुळणारे केस, उंच बांधा, कमावलेले शरीर अंगात भगवी वस्त्रे, पायात खडावा.. मूर्तिमंत सन्याशाचे प्रतीक म्हणजे स्वामी मुक्तानंद. रुबाबदार व्यक्तिमत्व. जबाबदारी बरोबर अधिकारही त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातून जाणवत होता. त्यांना भेटून आनंद वाटला. स्वामी मुक्तानंदगिरी यांनी खूपच तरुण वयात संन्यासाश्रम स्वीकारल्याचे दिसते. आम्ही परस्परांची चौकशी केली. स्वामी मुक्तानंद गिरी गुजराती हिंदी दोन्ही संवाद साधतात. त्यांना मराठीही उत्तम समजते. हवे तेवढे दिवस राहा, असे आम्हाला म्हणाले.
दुपारी साडे बारा वाजता भोजनप्रसादाची घंटा झाली. पोळी,भाजी,वरण,भात व सुकामेवा घातलेला शिरा असा प्रसाद होता. परत येऊन स्वामीजींशी पुन्हा गप्पा झाल्या. हे एक वर्षापासून या मंदिराची जबाबदारी सांभाळत आहेत. पूर्वीचे महंत श्री हरिकिशनदासजी यांनी प्रकृति अस्वास्थ्यामुळे मुक्तानंद गिरी स्वामीजींकडे कार्यभार सोपवला आणि आश्रमातच कार्यकाळ व्यतित करीत असल्याचे समजले. पुस्तक वाचताना नवीन ५-६ परिक्रमावासी आले. त्यांच्याशी गप्पा झाल्या.
त्या परिक्रमावासींचा भोजनप्रसाद झाल्यानंतर गप्पा मारत असताना, त्यापैकी एक साधू म्हणाले, आम्ही एक तास विश्रांती घेऊन नंतर निघणार आहोत. थोडावेळ विश्रांती झाली की पोटाला बरे असते आणि थोड्यावेळाने निघालो की पाच-सहा किलोमीटर अंतर पण आपण कापतो आणि भोजन प्रसाद पण पचतो. हा नवीन विचार समजला. बघूया जमते का ते. त्या साधूंनी दुपारी प्रस्थान ठेवले
येथून पुढील परिक्रमेच्या मार्गाविषयी स्वामी मुक्तानंद गिरी यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले, शूलपाणीत उत्तर तटावर सरदार सरोवरामुळे खूप आतवर पाणी शिरले आहे. दक्षिण तटावरच्या मानाने उत्तर तटावर बराच सखल भाग आहे. केवळ पावसात बारमाही वाहणारे नाले, ओढे यामध्ये आता बारमास पाणी राहु लागले आहे. नेहमीच्या मार्गाने गेल्यास हमखास हेलपाटे पडतात व अंतराचे गणित चुकते व वाट चुकल्यास, अंधार पडल्यावर रस्तेही सापडत नाहीत. मुक्काम न सापडल्यास जंगलात अडचणीत भर पडू शकते. माझ्या माहितीप्रमाणे उत्तर तटावरील शूलपाणी जंगलाबाहेरून बहुतेक परिक्रमावासी जातात. तुम्ही उचित निर्णय घ्यावा.
दुपारी परिसरातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. यामध्ये पांडवेश्वर अंगारेश्वर ( पूर्वीचे नाव मंगलनाथ ) सत्यनारायण मंदिर येथे गेलो.
मंगलनाथ मंदिर, येथे मंगळाने तपश्चर्या केली होती. त्यावेळी मंगळावर शंकर प्रसन्न झाला होता. मुघलांच्या काळात औरंगजेबाने हे मंगलनाथ मंदिर पाडण्यासाठी सैनिक पाठवले होते. त्यावेळी सैनिकांवर आकाशातून अंगारे ( निखारे ) पडू लागले. त्यामुळे सैनिक पळून गेले व मंदिर वाचले, म्हणून अंगारेश्वर असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. किती वेगळे नाव !! एखाद्या नावामागे काहीतरी कारण, संदर्भ किंवा घटना असते. तुम्हाला सहज समजत नाही. तुम्हाला चौकशी करून माहिती घ्यावी लागते.
पंचमुखी हनुमान मंदिराजवळील सत्यनारायण मंदिरात श्री डोंगरे महाराजांनी ३५ वर्षांहून अधिक काळ पौष महिन्यात, आपल्या ओघवत्या भाषेत, भागवत पारायण केल्याचे समजले. अजूनही ही परंपरा अखंड चालू आहे. डोंगरे महाराजांचा वेगळा आश्रम आहे. त्यांनी देह ठेवल्यावर नर्मदामैयेत त्यांना समाधी दिल्याचे मुक्तानंदगिरी स्वामींनी सांगितले. डोंगरे महाराज यांच्या वास्तव्यामुळे हा परिसर सिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वाहून घेणे, या शब्दप्रयोगाचा अर्थ समजायला किती वेळ द्यावा लागतो,त्यासाठी काय करावे लागते हे समजायला मैयाकिनारी जाऊन काही काळ व्यतीत केला पाहिजे. कुटुंबीयांच्या परवानगीने मला हे शक्य झाले...
केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे.
इथे नर्मदामैय्या किनारी जे हे सत्पुरुष, पुण्यात्मे, साधुसंत देह ठेवतात, त्यांचा देह नर्मदामैयामध्ये अर्पण केला जातो. त्यांच्या देहावर अग्निसंस्कार केले जात नाहीत. आणि प्रतीकात्मक म्हणून त्यांच्या देह ठेवलेल्या जागी समाधी बांधतात. नर्मदामैया किनारी अशी समाधी मंदिरे आपल्याला दिसून येतात.
सायंकाळी सहा वाजता पंचमुखी हनुमान मंदिरात आरतीच्या वेळी घंटा वाजवण्याची संधी मिळाली.आरतीत सहभागी होण्याचा बरेच दिवस मनात होते, पण तो योग आज आला. बरेच दिवसांनी आरतीत प्रत्यक्ष सहभागी झालो. मारुतीची कृपा !!!
आरतीनंतर राम स्तुति हनुमान चालीसा सर्वांनी म्हणले. आरतीनंतर प्रसाद म्हणजे बदाम, काजू, खडीसाखर असा सुकामेवा !!!
प्रत्येक ठिकाणी आरतीचा प्रसाद वेगळा. सायंकाळी सात वाजता भंडारा म्हणजे मूग खिचडी आणि भाजी होती. ग्रहण केली. खोली असूनही पडवीत आसन लावले. रात्री केव्हातरी थंडी वाढली.
पहाटे पावणे पाचला उठलो.
पहाटे पाच वाजता फक्त पाच मिनिटेच देवाचे दर्शन असते. पाच मिनिटे दर्शन झाल्यावर पडदा ओढून पुन्हा मंदिराचे दार बंद करतात. नंतर देवाला शृंगार करतात. शृंगार म्हणजे रात्रीचे देवाचेअलंकार व वस्त्रे काढून ठेवली जातात व ती पूजा करून पुन्हा घातली जातात. नंतर साडेसात वाजता आरती झाली. आरतीत देवाची स्तुती, हनुमान चालीसा म्हणले. थोडा वेळ मंदिरात बसलो. महंत श्री हरिकिशन दास जी महाराज यांची भेट घेतली. पांढरे शुभ्र केस , पांढरी दाढी,पांढरे वस्त्र, चेहऱ्यावर तेज, मृदू वाणी... दोन तीन दिवस थांबून विश्रांती घ्या म्हणाले.थोडावेळ बसून त्यांचे आशीर्वाद घेतले. आठ वाजता स्वामी मुक्तानंद गिरी आणि व्यवस्थापक अग्निहोत्री यांना प्रस्थानाची कल्पना दिली व आज्ञा घेतली. आता पुढच्या मुक्कामाचे वेध लागले होते. मालसरला मैयाने खूप कोडकौतुक केले. मुक्काम अविस्मरणीय होता. परंतु एका जागी फार थांबणे शक्य नव्हते. पाय उचलले...नर्मदे हर
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २०
काल स्वामी मुक्तानंद गिरी यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी काही श्रद्धाळू परिक्रमा कशी वेगवेगळ्या पद्धतीने करतात, याविषयी आश्चर्यजनक माहिती दिली. ते म्हणाले, दरवर्षी मुंबईहून एक, सुशिक्षित कुटुंब आठ दिवस मैया किनारी येते. मागच्या वर्षी जेथे परिक्रमा थांबवलेली आहे, तेथून पुन्हा सुरू करते आणि आठ दिवस पूर्ण झाले की तेथे परिक्रमा थांबवतात आणि परत मुंबईला जातात. पुढच्या वर्षी परत ते परिक्रमेसाठी आठ दिवसांसाठी येतात. मागील वर्षी त्यांनी माझ्या येथे परिक्रमा थांबवली होती. त्यामुळे माझी त्यांच्याशी भेट झाली.आता यावर्षी ते परत मैयाकिनारी येतील आणि येथून परिक्रमा पुन्हा उचलतील. त्यानंतर आठ दिवसांनी ते मुंबईला परत जातील. आई,वडील आणि एक दहा वर्षाची मुलगी असे ते तिघांचे कुटुंब आहे. लहान मुलीसह हे शहरी कुटुंब परिक्रमा करते आहे, हे पाहून मला अधिक आश्र्चर्य वाटले आणि त्या कटुंबाविषयीचा आदर दुणावला. स्वामींनी असेही सांगितले की, मैयेच्या प्रति भक्ती असणारी व्यक्ती मैया किनारी येण्यासाठी, तिच्या सहवासात राहण्यासाठी, शक्य असल्यास परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, विविध मार्ग शोधते. ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, जे संसारात आहेत, त्यांना एका वेळी सलग चार- सहा महिने परिक्रमेसाठी येणे शक्य नसते. रजाही मिळत नाही. विविध जबाबदाऱ्याही असतात. त्यामुळे ज्याला जसे जमेल तसा तो मार्ग शोधतो. कोणी थेट सहा महिन्याची परिक्रमा करतो, तर कोणी मी सांगितलेल्या कुटुंबाप्रमाणे जाऊन येऊन करतात. काहीजण पूर्ण अंतर पायी तर, काहीजण काही अंतर पायी व काही अंतर बसने तर, काही संपूर्ण बसने परिक्रमा करतात. शेवटी तुम्ही मैयाची परिक्रमा कशी करता त्याच्यापेक्षा ती करण्यासाठी येता, याला जास्त महत्त्व आहे. प्रत्येकाला महत्त्वाची कामे, आधुनिक काळामध्ये व्याप सांभाळून सलग वेळ देणे शक्य नसते. आनंद मिळवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. तसेच सरदार सरोवर मुळे मैयेला पाणी वाढले असल्यामुळे सर्वांनाच मैये किनाऱ्याशेजारून परिक्रमा करता येत नाही. दूरवरून करावी लागते आणि तो बदल स्वीकारून, सध्या परिक्रमावासी दूरवरूनही परिक्रमा करतात आणि हे सर्वमान्य आहे. तेव्हा परिक्रमा करण्याच्या पद्धतीतील असे सोयीनुसार केलेले बदल, हे स्वीकारार्ह आहेत. ते पुढे असेही म्हणाले की, लोक काय म्हणतील याला आजकाल फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. आपण केलेले बदल लोकांना मान्य होतील का, असा विचार करून वेळ दवडण्यापेक्षा, जे मनात आले आहे ते करून मोकळे व्हावे आणि जे मिळेल ते पुण्य पदरात पाडून घ्यावे, हे सगळ्यात सोयीचे. लोकलज्जेचा जर आपण विचार करीत बसलो तर, वेळ येत नाही आणि वेळ न आल्याने पुण्यही पदरात पडत नाही. परिक्रमा ही शेवटी एक ईश्वर चिंतनाचा मार्गच आहे. त्यामुळे हे ईश्वरचिंतन तुम्ही करता, हे महत्त्वाचे आहे. लोक हे लक्षात घेत नाहीत आणि कर्मकांड आणि रितीरिवाज, परंपरा यांच्यामागे लागून स्वतःचेच नुकसान करून घेतात.
चांगली वैचारिक बैठक असलेले साधुसंत, सन्यासी, पुण्यात्मे नर्मदामैयेच्या किनारी खूप आहेत. फक्त त्यांची तुमची गाठ पडली पाहिजे. अशा ज्ञानाचा लाभ केवळ त्यांच्यामुळेच होऊ शकतो. अन्यथा केवळ पायी वणवण... एका ठिकाणाहून दुसरीकडे...नर्मदे हर...
मालसरहून निघताना मंदिराशेजारील दुकानदार श्री उमेद ठाकूर यांनी दोघांच्या चहाची व्यवस्था केली. चहा घेऊन त्यांचे आभार मानून पुढे निघालो. नुकतेच फटफटत होते.वाटेत शिनोरला जाताना लांबवर रस्त्यावर काहीतरी हालचाल दिसली.अंधूक उजेडामुळे दूरवरून नीट दिसत नव्हते. आम्ही जसे जसे पुढे गेलो तसे भर रस्त्यात वानरे बसल्याचे दिसले. भर डांबरी रस्त्यात वानरांची टोळी...मोठे नर, तरूण, आईला बिलगलेली पोरे सगळ्या प्रकारची माकडे होती टोळीत. वाहतूक नसल्यामुळे त्यांच्या माकडचेष्टा भर रस्त्यात चालल्या होत्या. आम्ही जसे जसे त्यांच्याजवळ गेलो, तसे तसे आणि हातातली काठी पाहून, ते दात विचकत विखुरले आणि झाडावर गेले. त्यांच्यापासून आम्ही पुढे सरकलो तसे ते पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. परिक्रमेत प्राणी विश्वाचे सातत्याने दर्शन होईल असे वाटले नव्हते. पण मैयेकिनारी पक्षी, प्राणी विपुल प्रमाणात आहेत. त्यांच्या वेळेला जर तुम्ही तिथून गेलात तर ते तुम्हाला दर्शन देतील. भर उन्हात किंवा रात्री सगळेजण आपापल्या घरट्यात, घरात बसलेले असतात. नुकतेच मालसरला आम्हाला पंचमुखी हनुमानाचे दर्शन झाले होते. आता रस्त्यावर हनुमानाचे वंशज आणि आपले पूर्वज लगेच रस्त्यावर दर्शन देतील असे वाटले नव्हते. हसलो आणि पुढे निघालो. शिनोरला रस्त्याने गेल्यास लवकर पोचता येते. शिनोरला केदारेश्वर, उत्तरेश्वर, कृष्णेश्वर, धूतपापेश्वर, भोगेश्वर, रोहिणेश्वर, निष्कलंक महेश्वर यांचे दर्शन घेऊन पुढे निघालो. यातली बरीचशी नावे आपण ऐकलेली नसतात. एवढी मंदिरेही एका जागी नसतात. त्यामुळे पाहायला मिळणे दूरच. शहरातल्या माणसांना तर दुर्मिळच. नवीन पिढीला नाव वाचून नेमके काय ते कळणार नाही. धूतपापेश्वर या नावाने आयुर्वेदिक औषधे उत्पादन करणारी एक कंपनी आहे. त्यामुळे धूतपापेश्वर नाव माहिती असू शकते. मैयामुळे वेगवेगळ्या नावांची माहिती होते. एकूणच आजपर्यंत झालेल्या प्रवासात आणि नंतर सुद्धा, मैया ही शंकराची कन्या असल्यामुळे मैयाकिनारी शंकराची देवळे भरपूर आहे. त्या मानाने इतर देव देवतांची देवळे कमी आहेत. शंकराच्या देवळेही खूप आणि नावेही अपरिचित. त्याचे पौराणिक आणि आख्यायिकांनुसार संदर्भही वेगवेगळे आहेत.
कंजेडा,अंबालीमार्गे मार्गे बराचसा रस्ता रानावनातला आणि काट्याकुट्यांचा होता. घाम येत होता. कमंडलूतील पाणी पीत पीत पुढे वाटचाल चालू होती. रस्त्यात आम्हाला बराच वेळ कोणीच भेटले नाही.हुकुमजी आणि मी असे दोघेजणच चालत होतो. अनुसया येथे पोहोचलो. मैयेवर स्नान करुन मंदीरात गेलो. येथे अनुसया मातेचे, दत्तात्रेयांचे मंदिर आहे. स्नान करताना व अनुसूया मातेच्या मंदिरात पूर्ण केस काढलेली, क्षौरकर्म ( चकोट ) केलेली पाच-सात वर्षाची बरीच मुले दिसली. चौकशी केल्यावर नवसाने झालेल्या मुलांचे, पाच-सात वर्षाचे वय झाल्यानंतर असे क्षौरकर्म केले जाते, असे समजले. त्याला बाबडी म्हणतात. या मुलांचे सात वर्षे वयापर्यंत केस कमरेपर्यंत वाढतात. तोपर्यंत ते कापत नाहीत. आपण जसे जावळ करतो, तसे हे बाबडी. आपल्याकडे जावळ एवढ्या उशिरा काढत नाहीत. म्हणजे कंबरेपर्यंत केस वाढेपर्यंत मुलाचे जावळ काढण्यासाठी आपण थांबत नाही. परंतु नवस बोलल्यानंतर करायचा जो संस्कार आहे, तो थोड्याफार फरकाने सारखाच आहे.पद्धती वेगळ्या असतात. आपल्याकडे पण नवसाने झालेल्या मुलांचे जावळ, नवस बोलल्याप्रमाणे पंढरपूरला विठ्ठलाच्या समोर,कोल्हापूरला महालक्ष्मीच्या देवळात काढले जाते. तसेच हे असल्याचे मला जाणवले. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. एरवी येथे सदावर्त मिळते. म्हणजे कोरडा शिधा. तांदूळ, गव्हाचे पीठ, राम रस, मिरची, तिखट, एखादी कच्ची भाजी अशा गोष्टी. आज मात्र रविवार असल्यामुळे येथे भंडारा होता. वरण भात भाजी आणि रव्याची वडी असे नियोजन होते. परिक्रमावासींना मोफत तर भक्तांना दहा रुपये आकार होता. आम्ही परिक्रिमावासी असल्याने आम्हाला प्राधान्यक्रमाने आणि इतरांपेक्षा थोडा जास्तच भंडारा दिला. भंडाऱ्यात इतरांना एक तर आम्हाला रव्याच्या दोन वड्या दिल्या. मैया कृपेने सगळीकडे परिक्रमावासीचे लाड होतात. भंडारा घेऊन थोडावेळ टेकलो आणि लवकरच पाय उचलले.
अनुसूया माता मंदिरातून पुढे निघाल्यावर पाचच मिनिटात आमच्या शेजारी एक मारुती कार येऊन थांबली. कारमधून एक सदगृहस्थ उतरले आणि चक्क मराठीत माझ्याशी बोलले. मलाही आश्चर्य वाटले. मराठीत कसे काय बोलतात, असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, तुम्ही मराठी वाटलात म्हणून मराठीत बोललो. आमच्या परिक्रमेविषयी त्यांनी चौकशी केली. त्यांना माहिती दिली. ते बडोद्याचे होते आणि सहकुटुंब अनुसया मातेच्या दर्शनाला आलेले होते. दोन मिनिटे बोलून त्यांनी निघताना आमच्या हातात प्रत्येकी शंभर रुपये दक्षिणा दिली. नर्मदे हर करून ते गाडीत बसले. गाडी धूळ उडवीत निघून गेली, तेव्हा लक्षात आले की आपण त्यांचे नाव विचारायला विसरलो...असे प्रसंग घडत राहतात. पुढे काहीतरी खर्चाची तरतूद असावी म्हणून मैयेच्या मायेची पुंजी तुमच्याकडे जमा होत असते. पुढचा मुक्काम गाठायचा होता...नर्मदे हर...
जनकेश्वर, संकर्षण, कोटेश्वर, बरकाल मार्गे मोलेवाला आलो. याज्ञवल्क्य ऋषींची ही तपोभूमी आहे. येथे नवीन राधाकृष्ण मंदिर, आसाराम आश्रम आहे. आहे. जवळच्या रस्त्याने बद्रिकाश्रम येथे आलो. बद्रिकाश्रम मैयेवरील पुलाच्या अलीकडे डाव्या हाताला एक किलोमीटर आत आहे. या पुलाला रंग सेतू असे नाव दिले आहे. रंगावधूत महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव. किती छान नाव प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पहावयास मिळतात. रंग सेतू नाव एकदम आवडले. नाही तर आपल्याकडे नागरिकांच्या करातून गोळा झालेल्या पैशावर, उभ्या राहिलेल्या बागा, मैदान, कमानी, संग्रहालय, रस्ते, पूल याला आपल्या वाडवडिलांची आजोबांची नाव देण्यात लोकप्रतिनिधींचा हात कोणी धरणार नाही.पण इथे मात्र संतांच्या कार्याचा गौरव वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. मैया तुम्हाला रिक्त हाताने कधीही जाऊ देणार नाही. दक्षिणा देईल, भोजन प्रसाद देईल, बालभोग देईल, ज्ञान देईल. काही ना काहीतरी मैया देतच असते.
ते पण न मागता... तुम्ही मागितले तर वर्षावच होईल एवढी खात्री नक्की !!! घेशील किती दोन करांनी... हेच खरे.
पुलाच्या अलीकडे टपरीवाल्याला बद्रिकाश्रमाचा पत्ता विचारला असता, त्याने पत्ता सांगून हातात एक पाकीट ठेवले. पाकिट पाहून मला आश्चर्य वाटले. त्याला विचारले हे काय आहे.तो म्हणला ही दक्षिणा आहे. त्याच्या हातात दक्षिणांचा, पांढरा शुभ्र रंगाच्या पाकिटांचा मोठा गठ्ठा होता. त्यावर नर्मदे हर, ओम साई, ओम नमः शिवाय !!! असे लिहिले होते. चौकशी करता बिथली या जवळच्या गावातील एक दानशूर श्री सुरेशभाई त्रिभुवनभाई पटेल अशी चाळीस-पन्नास पाकिटे एकदम टपरी चालकाकडे आणुन ठेवतात आणि त्याला परिक्रमावासी आला की द्यायला सांगतात. संपत आली की पुन्हा आणून देतात. हे दानकर्म अव्याहतपणे चालू आहे. दान कसे द्यावे तेही इथे शिकून घ्यावे. प्रसिद्धीपराङमुख !!!
अगदी ज्याला दान करायचे आहे त्याच्यासमोर उभे सुद्धा राहायला नको... देताना गर्व व्हायला नको आणि वृथा अभिमानही!!! खूपच वेगळी कल्पना भावली...
अगदी या हाताचे त्या हातालाही न कळता दान द्यावे असे, आपण जे म्हणतो ना अगदी त्याप्रमाणेच. दोघेही निस्वार्थी सेवा करीत आहेत. दोघेही आपापल्या परीने परिक्रमावासींची सेवा करीत आहेत. ऐकावे ते नवलच. टपरी चालकाचे नाव रमेश दलसुखभाई वसावा. हा माणूसही निस्वार्थी सेवा करतोय. त्यांच्याकडून निघालो आणि आश्रमात आलो.
बद्रिकाश्रमात आसन लावण्याबाबत चौकशी केली. पण कुणालाही परिक्रमावासी विषयी स्वारस्य दिसले नाही. शेवटी स्वामी केशवानंद यांना अडचण सांगून आसन लावण्याविषयी विचारले, तेव्हा त्यांनी आम्हाला दोघांना आसन लावण्यासाठी एक जागा दाखवली. तेथे आसन लावले. सायंकाळी पाच वाजता मैयेवर स्नानाला गेलो. आश्रमातच पाण्यातील मैयेच्या वाहनाविषयी म्हणजे मगरींविषयी माहिती मिळाली होती. त्यामुळे मैयेच्या अगदी काठावर आणि पटकन स्नान उरकले.कपडे धुतले व नवीन कपडे परिधान केले. येथे आश्रमाने स्वखर्चाने मैयेवर जाण्यासाठी सुंदर पायऱ्या बांधल्या असून घाटही सुंदर बांधला आहे. प्रशस्त घाट असून तुम्हाला मैयेच्या नजीक बसण्याचा आनंद घेता येतो. आम्ही तेथे बराच वेळ मैये किनारी परंतु थोडे दूर बसून राहिलो. आम्ही मैया किनारी बसलो असताना एक कोळी बोट घेऊन समोरच्या तटावरून या काठावर आला. त्याला मगरींविषयी विचारले असता तो म्हणाला, पाण्यात खूप मगरी आहेत. दुपारी दक्षिण तटावर येऊन विसावतात. आजपर्यंत कधीही हल्ल्याची किंवा दुर्घटना घडलेली नाही. परंतु काळजी घेणे गरजेचे आहे. मैयेवर स्नानाला जाण्यापूर्वी माहिती मिळाली होती म्हणून त्याच्याकडेही चौकशी केली. त्याने सांगितले शक्यतो पाण्यात जाऊ नये. पटकन स्नान करून बाहेर यावे. काठापासून दूरच थांबावे सायंकाळी साडेपाचनंतर स्नानाला पाण्यात जाऊ नये. पाण्याच्या भीतीची अडचण सांगून वरती आश्रमातही स्नान करता येते. शेवटी शरीर रक्षति धर्म: ... म्हणजे तुम्ही जिवंत राहिलात तर धर्माचे रक्षण करू शकाल. कर्मकांड आणि नको त्या अट्टहासापायी जीव धोक्यात घालण्यात काही अर्थ नाही.
तसेच मैयाही तुम्हाला ते करायला सांगत नाही, हेही तितकेच खरे !!!
पहाटेच्या काळोखात, संध्याकाळ नंतर, थंडी असताना, प्रकृती ठीक नसतानाही, खोकला ताप अंगात असताना उगाच लोक लज्जेस्तव बरेचसे परिक्रमावासी स्नान करतात, असे माझ्या निदर्शनास आले. माझ्याबरोबरचा एक परिक्रमावासी बरेच दिवस खूप खोकत होता. पण तरीसुद्धा तो थंड पाण्यात स्नान करायचे काही थांबवत नव्हता. शेवटी मी त्याला सांगितले, बाबारे खोकला आणि सर्दी थंड पाण्याने वाढते. कशाला थंड पाण्यात स्नान करतोयस. बरं मैयाने कुठे असे लिहून ठेवले आहे की, माझ्या परिक्रमेत असताना काही झाले तरी तुम्ही थंड पाण्याने स्नान केले पाहिजे, बरे नसतानाही स्नान केलेच पाहिजे. शेवटी तुम्ही तुमचे प्रकृतीचे भान ठेवले पाहिजे. तुमची प्रकृती ठीक राहिली तर तुम्ही शेवटपर्यंत आणि संपूर्ण परिक्रमा पूर्ण करू शकणार. परिक्रमेत बहुसंख्य अशिक्षित माणसे असतात. त्यांच्या डोक्यात कोणीतरी ठासून कल्पना भरलेल्या असतात. आपण सांगून सुद्धा बरेच वेळा ते ऐकत नाहीत. एखाद्याला पटले तर दुसरा त्याला मागे ओढूतो. जर तुमची परिक्रमा पूर्ण झाली नाही, मधूनच घरी जावे लागले, तुमची परिक्रमा खंडित झाली तर या कर्मकांडाचा काय उपयोग आहे...हे कानीकपाळी ओरडूनही त्यांच्या दिनचर्येत काही फरक पडत नाही. ते तसेच चालू ठेवतात आणि अति आजारपणाने परिक्रमाही खंडित होते.
बद्रिकाश्रम खूपच मोठा आहे. २५ खोल्या त्यात आहेत. दोन-चार मोठे हॉल, प्रशस्त आवार, आजूबाजूला अनेक एकर मोकळी जागा, भव्य म्हणता येईल असा आश्रम.मैयेवरून आश्रमात येताना, मैयाभिमुख अशा दोन भव्य मूर्ती आहेत. एक हनुमानाची तर दुसरी अर्धनारी नटेश्वराची. दोन्हीही मूर्ती खूप सुंदर आहेत. मूर्तीकाराने मूर्तीच्या डोळ्यात भाव ओतले आहेत.त्यावर केलेली कलाकुसर, रंगकाम, हातातली आयुधे, केशरचना शरीरयष्टी, डोळ्यातले भाव सगळे काही बघत रहावे असे. मैयेवरून आश्रमात येताना मंदिराच्या कार्यालयात जाऊन प्रमाणपत्रावर शिक्का मारून घेतला. येथे आश्रमात सदाव्रत दिले जाते.आमच्याकडे पातेले, कढई काही नव्हते. त्यामुळे शिजवण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर पाहूया म्हणून मंदिरात गेलो. आश्रमात बद्रीनाथ मंदिर आहे. गणपती, हनुमानाच्या मोठ्या मूर्तीही आहेत. एक वेगळी मूर्ती पाहायला मिळाली. अर्धी मूर्ती व्याघ्रजीन नेसलेली तर अर्धी पीतांबर नेसलेली. ती हरिहराची मूर्ती होती. आश्रमाची स्वतःची गोशाळा असून त्यात सात-आठ गाई, वासरे होती. आश्रमात भोजन प्रसादासाठी मोठा हॉल आहे. परंतु सध्या स्वयंपाकी नसल्यामुळे सदाव्रत दिले जाते. आश्रमाने मैयेला लागून मोठे मोठे चौथरे बांधले असून त्याला रेलिंग बसवले आहे. त्यामुळे या चौथर्यावर बसून तुम्हाला मैयेचे विशाल पात्र पाहता येते. संध्याछाया पसरल्या, त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते, पाण्यामध्ये बोट व ती वल्हवणारा कोळी, काठावरील वृक्षांच्या पात्रात पडलेल्या सावल्या, संथ वाहणारी मैया...भान हरपणारे दृष्य... डोळ्यात साठवत होतो.
हळूहळू काळोख पसरू लागला. आश्रमामध्ये भरपूर वानरे आहेत. सायंकाळी मैयेवर येण्यापूर्वीच सॅकमध्ये सर्व सामान भरून, सॅक घट्ट बांधून ठेवली होती. वरती चौथऱ्यावर बसलो असताना मंदिराचे पुजारी आले आणि भोजन प्रसाद घेणार नाही का विचारले. हूकुमजी नाही म्हणाले, तर व मी हो म्हणून त्यांच्या सोबत गेलो. मैयेचे तिच्या बाळांकडे बारीक लक्ष असते. तुम्ही सदाव्रत घेतलेले नाही, हे मैयेला चांगलेच ठाऊक होते. आश्रमातील पुजारी तुम्हाला जेव्हा भोजनप्रसादाचे विचारायला येतात तेव्हा, ती मैयेचीच कृपा असते. हे लक्षात ठेवायला पाहिजे. मैया तिच्या बाळांना कधीच उपाशी झोपू देत नाही. तुम्ही जागे असाल तर मैया कोणाला तरी उठवून भोजन प्रसाद द्यायला लावते आणि तुम्ही झोपला असेल तर कोणीतरी तुम्हाला येऊन उठवतो आणि भोजनप्रसाद घ्यायला लावतो, अशी मैया कृपाळू आहे. विश्वास बसत नाही पण हे खरे आहे. नाहीतर मी आणि हुकुम जी दोघंही उपाशी बसलो आहोत, हे पुजाऱ्यांना सांगायला कोण गेले होते, एवढ्या मोठ्या आश्रमामध्ये हे पुजाऱ्यांच्या लक्षात येण्याचे कारण काय असावे... अशा प्रश्नांची उत्तरे शोधूनही सापडत नाहीत.
प्रसाद घेऊन चौथऱ्यावर येऊन बसलो असताना, शेजारी यशोधर प्रसाद तिवारी नावाचे गृहस्थ येऊन बसले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. ते मूळचे बद्रीनाथचे, गढवाल मधले. तिथे त्यांचे गुरुकृपा नावाचे हॉटेल आहे. ते तेथे नसताना त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा हॉटेल पाहतो. यशोधरजी हे या आश्रमाच्या मुख्य ट्रस्टींच्या म्हणजे स्वामी विश्वनाथ प्रसादजी यांच्या विश्वासातले. ट्रस्टचे चार-पाच आश्रमात आहेत. ते स्वामीजींच्या बरोबरीने काम पाहतात. एवढा मोठा आश्रम असूनही भोजनप्रसाद न देता सदाव्रत देण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, परिक्रमावासी यांची दररोजची संख्या निश्चित नसते. अन्न कमी पडते अथवा वाया जाते. अन्नाची नासाडी नको म्हणून स्वामीजींनी सर्वांना सदाव्रत देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद दुसरा परिक्रमावासी असेल तर आश्रमातील सेवेकऱ्यांच्यासोबत त्याचा भोजनप्रसाद होऊ शकतो. पण मोठ्या संख्येने आलेले असल्यास आम्ही सदाव्रतच देतो. स्वतः विषयी सांगताना पुढे ते म्हणाले मी हिमालयात राहतो. पण मला मैया किनाऱ्यासारखी शांतता कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे मी येथे दर तीन-चार महिन्यांनी येथे येऊन राहतो. बद्रीनाथ ला आल्यावर आमच्याकडे या असे मला त्यांनी निमंत्रण दिले.
रात्री उशिरा माझे मित्र सुनील काळुसकर यांचा फोन आला. त्यांनी माझ्या मालूसरच्या मुक्कामिविषयी स्वामी मुक्तानंद गिरी यांना फोन केला होता. मी तेथून प्रस्थान ठेवल्याचे त्यांना स्वामींनी सांगितले. स्वामींनी; आमच्या मालसरच्या मुक्काम मध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या असल्यास माफ करावे, असा निरोप दिलेला होता. एवढी सेवा करूनसुद्धा एवढी विनम्रता...फक्त मैया किनारीच अनुभवयास मिळते. डोळ्यात पाणी आले. नाहीतर पंढरपूरच्या वारीसाठी शहरात आलेल्या वारकऱ्यांना सेवा देण्याच्या नावाखाली मोठमोठे बॅनर लावून, फोटो काढून, प्रसिद्धी मिळवत, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले शहरी लोक. रात्री खूप उशिरा पाठ टेकली. येथे झाडी खूप असल्यामुळे डासांचे प्रमाण खूप होते. त्यामुळे डासांचे पार्श्वसंगीत चालू होते.मधूनच बाजूच्याच झाडीतून काहीतरी खुसफुस व्हायची. माकडे आलीत वाटून, झोपेतून जाग यायची. माकडांची हालचाल जाणवत होती. रात्री उशिरा केव्हातरी निद्रादेवी प्रसन्न झाली.
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा - पुष्प २१
बद्रिकाश्रम ते चाणोद (गुजराती मध्ये मी चाणोद या नावाची पाटी पाहिली आहे) आपल्याकडे चांदोद असं चुकीचा उल्लेख करतात. डांबरी सडकेने निघालो. वाटेत छोटी छोटी गावे लागत होती. म्हशींना चारा टाकलेला होता. त्यांचे दूध काढत होते. रात्रभर बांधून ठेवलेले वासरू दुधासाठी गाईला ढुसण्या मारत होते. गावाकडचे नेहमीचे दृश्य. आज सकाळी पुन्हा भारद्वाजाच्या जोडीने दर्शन दिले. आज रस्त्याने पुढे बुलबुल,सातभाई, होले (लाफिंग डव्ह), कोकिळा असे अनेक पक्षी दिसले. एखादा शहरी रस्त्यावर जॉगिंग करताना ही दिसला. चाणोद आले. चहा घेऊन थोडी विश्रांती घेऊन, पुढे निघालो. करनालीहून पुढे जाताना हायवेवर पुण्या-मुंबईची दोन कुटुंबे दोन गाड्यातून सहलीला चालली होती, ती भेटली. त्यांनी आमची चौकशी केली. परिक्रमा केव्हा सुरू झाली, पूर्ण केव्हा होणार, आत्तापर्यंतची परिक्रमा कशी झाली इ चौकशी त्यांनी केली. ते गरुडेश्वरहून पुढे बडोद्याला आणि नंतर अहमदाबादला जाणार होते. त्यांनी आम्हाला दहा रुपये प्रत्येकी दक्षिणा, शिवाय हातावर मैसूर पाकची वडी व राजगिरा वडी चे पाकिट दिले. सकाळच्या नाश्त्याची मैयाने सोय केली. त्यांचे आभार मानून पाय उचलले. गडबडीत त्यांना नाव विचारायचे विसरलो. दरवेळी गडबडीत नावे विचारायची राहून जातात. डांबरी सडकेनेच पुढे जात असताना, पिपलियाजवळ एका पोस्टमनने थांबवले आणि या रस्त्याने कुठे जात आहात, असे आम्हाला विचारले. आमचे ठिकाण सांगितल्यावर शेजारच्या कच्च्या रस्ता कडे बोट दाखवून म्हणाले हा रस्ता जवळचा आहे. मोरिया ला एक दोन किलोमीटरचा फरक पडेल त्या पोस्टमन चे नाव त्रिकमभाई कंचन भाई बारिया. ते वाडिया या गावी राहतात. दुपारी बारा वाजता मोरियाला पोहोचलो. रामानंद आश्रमात भोजनप्रसाद चालू होता. महाराजांनी हात धुवून थाळी घ्यायला सांगितली. टिक्कड व डाळ पोटभर खाल्ले. त्याच्यानंतर ग्लासभर छास (ताक) मिळाले. अन्नदाता सुखी भव. मैयाची कृपा. एक तास विश्रांती घेतली आणि पाय उचलले. पुढचा मुक्काम गाठायचा होता... ऊन मी म्हणत होते. सारखी तहान लागत होती, पाठ आणि पोट घामाने निथळत होते. डोक्यालाही खूप ऊन लागत होते. एखादे झाड दिसले की थोड्या वेळ थांबायचा मोह होत होता. जमले तर टाळून, नाही तर थांबून वाटचाल चालू होती. रस्त्यात छोट्या-छोट्या वाड्या,मधूनच विखुरलेली एक दोन घरे दिसत होती. एखादा शेतकरी दिसायचा. एखादा लहान मुलगा आपल्याला पाहून जोरात नर्मदे हर चा नारा द्यायचा.आपण त्याला जवळ बोलावून,चॉकलेट देऊन नर्मदे हर केले की गडी खूष होऊन धूम ठोकायचा. आपण त्याला काहीतरी दिलेले पाहून दूर दूरवरून आणखीन मुले पळत आपल्याकडे काय दिले या कुतुहलाने येतात. त्यांना चॉकलेट दिले की चेहर्यावर एकदम गोड हास्य उमटते. ते ही नर्मदे हर म्हणत धूम ठोकतात.चेहऱ्यावर निखळ आनंद !! निर्व्याज व गोड हास्य !! परिक्रमेत वेगळाच विरंगुळा !! आजूबाजूला कुठेही दुकान नाही. आपली पिशवी हे चालते बोलते दुकान. त्याच्यातून आनंद वाटत फिरायचा आणि मजा घ्यायची. नाहीतर या न वैराण, निर्मनुष्य रस्त्यांवर तुम्हाला दुसरे कोण भेटणार. असे छोटे छोटे आनंद त्या मुलांच्या आयुष्यात येतात हे आपले
भाग्य. मैयाने तिच्या किनारी, तुमच्या परिक्रमेच्या पगदंडीत, असे असे छोटे छोटे आनंद पेरून ठेवलेले आहेत. तुम्ही चॉकलेट दिले की हे असे आनंद उमलतात, आणि तुम्हाला आनंद देतात. तुम्ही हे असे आनंद शोधायचे असतात. मैयाच्या या कसदार, काळ्या मातीत पेरलेले उगवायला फार वेळ लागत नाही, पटकन उगवते. मैया तुमच्यासारख्या बाळांची काळजी घेते. तसे तुमच्या या लहान भावंडांकडे तुमचे,लक्ष आहे का नाही याची परीक्षा मैया वेळोवेळी घेत असते. फक्त ही परिक्षा आहे हे तुम्हाला समजत नाही. तसे हे आनंद असे सहजासहजी डोळ्याने दिसत नाहीत. त्याच्यासाठी मैयाची तुमच्यावर कृपा हवी. मैया कृपा करतेच, तुम्ही लक्ष ठेवणे महत्त्वाचे...
मोरा चुडेश्वर मार्गे तिलकवाड्याला दुपारी अडीच वाजता पोचलो. गावापासून अर्धा किलोमीटर आत आश्रम आहे. हुकुमजींना बूट दुरुस्त करायचे होते, म्हणून ते थांबले. मी कपडे धुणे व स्नानासाठी पुढे निघालो. आश्रमाचे नाव " माँ अन्नपूर्णा आश्रम ". आश्रमात एका हॉलमध्ये परिक्रमावासींची आसन लावण्याची सोय आहे. तेथील एका सेवेकऱ्यांच्या परवानगीने हॉलमध्ये आसन लावले. नंतर विश्रांती घेतली. दुपारी साडेचार वाजता चहाचा प्रसाद मिळाला. सायंकाळी साडेपाच वाजता मैयेवर स्नानाला गेलो, कपडे धुतले.
नंतर एका परिक्रमावासी सोबत स्वामीजींच्या भेटीला गेलो. त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद तेवढेच महत्त्वाचे. आश्रमाचे महंत स्वामी आत्मकृष्ण यांची निवांत भेट झाली. गोरेपान, तेजस्वी चेहरा मृदू पण अधिकारवाणी, क्षौरकर्म केलेले, भगवी वस्त्र परिधान...लांबून दर्शन देऊन आशीर्वाद दिला. स्वामी श्री आत्मकृष्ण हे, "नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका" या, श्री अवधूत साहित्य प्रकाशन, नारेश्वर यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी स्वतः परिक्रमा केलेल्या आहेत. त्यांनी परिक्रमेदरम्यान आलेल्या प्रतिकूलतेवर समाधान स्वरूपात पुस्तिका तयार केली आहे. यात नर्मदाष्टक, नर्मदा आरती, काही आचरणाच्या गोष्टी, उत्तर व दक्षिण तटावरील मार्ग, त्यावरील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे, मंदिरे, अन्नक्षेत्र- सदावर्त, सरदार सरोवरामुळे घ्यावा लागणारा पर्यायी मार्ग, वाहनाने यात्रा मार्ग, प्रत्येक गावागणिक किलोमीटर इत्यादी सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व एवढे लिहिण्याचे कारण असे की, या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शेवटची आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रसिद्ध झाली. हे पुस्तक १२७ पानांचे असून हे अवघ्या दहा रुपयात, नारेश्वर आश्रमातील पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहे. या पुस्तकाचा सर्व परिक्रमावासींना निश्चितच उपयोग होऊ होतो. योगायोगाने स्वामीजी मला भेटू शकले,हे माझे भाग्य. मलाही या पुस्तकाचा चांगला उपयोग झाला. रात्री स्वामी आत्मकृष्ण यांच्याकडे त्यांनी लिहिलेल्या, वरील पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी गेलो. त्यांनी स्वाक्षरी दिली. त्यावेळी परिक्रमेविषयी त्यांनी थोडेफार मार्गदर्शनही केले. त्यांनी मला हे करण्याची प्रेरणा कशी मिळाली, काय अनुभव आले, कुठून आलात याची चौकशी केली. मी पुण्यातून आलो असे सांगितल्यावर, त्यांनी मला मराठी येते हे आवर्जून नमूद केले. त्यांना मराठी येते, हे ऐकून आनंद वाटला.त्यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या परिक्रमेविषयीच्या काही मराठी पुस्तकांची नावे आवर्जून मला सांगितली. त्यातल्या काही पुस्तकांचे वेगळेपणे चर्चेत त्यांनी सांगितले. स्वामींचा खूप गाढा व्यासंग जाणवला. त्याव्यतिरिक्त त्यांनी मला इतर दोन पुस्तके भेट दिली व वाचण्यास सांगितले. माझ्याबरोबरचे सन्यासी, स्वामींच्याकडे शिवमहिम्नस्तोत्र, ब्लॅंकेट, लुंगी, सदरा अशा काही गोष्टींची मागणी करत होते. त्यापैकी काही वस्तू स्वामींनी त्यांना दिल्या. नंतर त्या संन्याशाच्या काही शंकांबद्दल स्वामींनी त्यांना मार्गदर्शनही केले. मार्गदर्शनादरम्यान स्वामींनी मांडलेला एक मुद्दा आवर्जून नमूद करावासा वाटतो.
स्वामीजी म्हणाले, नारळात पाणी असेपर्यंत खोबरे करवंटीला धरून राहते. जेव्हा त्यातले पाणी निघून जाते, तेव्हा आतले खोबरे वाजायला लागते. नारळातले पाणी ही माया आहे. ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. माया कमी करा तुम्हाला आत्मज्ञान जरूर होईल. खूप महत्त्वाचे आणि नेमके ज्ञान थोडक्या शब्दांत व उदाहरणाने स्वामींनी आम्हाला दिले.अशा पुण्यात्म्यांची भेट व त्यांनी स्वत:हून दिलेले हे ज्ञान...
ही मैयेची कृपा,
आपले संचित कर्म
आणि
परिक्रमेचे खरे फलित आहे,
हे लक्षात आले पाहिजे.
स्वामी आत्मकृष्ण यांची भेट, ही परिक्रमेतील अशीच एक महत्त्वाची गोष्ट. अत्यंत थोडावेळात व आयुष्यातील महत्त्वाचे अध्यात्मिक सार त्यांनी आम्हाला सांगितले. सुग्रास भोजनप्रसाद, मिठाया, चहा,बालभोग, सुखावह आदरातिथ्य या सगळ्या नश्वर , ऐहिक, मोफत गोष्टी परिक्रमेत आहेतच. परंतु, परिक्रमेत या सगळ्यांच्या उपभोगापासून आत्मा अलिप्त ठेवून, आत्मा निरिच्छ करण्याची मैयाची योजना, तुम्हाला मोक्ष मिळवून देण्यासाठी आहे, हे न समजल्यास तो करंटेपणा ठरावा. मोक्ष ही संकल्पना मेल्यानंतर आत्म्याची मुक्ती एवढीच मर्यादित नसून, जिवंतपणे तुमच्या इच्छा-आकांक्षा, वासना या लोप पावणे हा सुद्धा एक त्यातला संदर्भ आहे हे लक्षात घ्यायला हवे.
चर्चेत शेवटी त्यांनी माझे नाव व पत्ता घेऊन, पुण्याला आल्यावर संपर्क करतो असे सांगितले. मला खूप आनंद झाला. त्यांच्याकडून निघताना त्यांनी मला आश्रमातील अन्य परिक्रमावासी, ज्यांच्याकडे "नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका" हे पुस्तक नाही, त्यांना त्यांच्याकडून घेऊन जाण्याचा निरोप देण्यास सांगितले. स्वामीजींच्या चर्चेनंतर रात्री मस्त झोप लागली.
काल रात्रीपर्यंत हुकुमजी आश्रमात आले नाहीत. कदाचित त्यांना हा आश्रम सापडला नसावा. सकाळी पण त्यांची वाट बघितली, परंतु त्यांची भेट झाली नाही. सकाळी गरुडेश्वरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. निघताना आश्रमातून चहा मिळाला. रात्रीच, आश्रमात स्वयंपाक व इतर व्यवस्था पाहणाऱ्या श्रीमती सविताबेन यांनी सकाळी चहा घेऊन मगच निघा, असे सांगून ठेवले होते. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. सकाळी रस्त्यावर वर्दळ सुरु झाली होती. एक-एक परिक्रमावासी आपआपल्या वेळेवर निघत होते.
हुकुमजी न आल्यामुळे माझी एकट्याची यात्रा सुरू झाली. मैया कृपेने जेवढे दिवस एकत्र काढले त्याचा आनंद वाटून घ्यायचा. ताटातुटीचे वाईट वाटून घ्यायचे नाही. मैया तुमची भेट घडवते आणि पुन्हा दूर करते. नवीन माणसे पुन्हा भेटवते. हे एक अव्याहत चालणारे चक्र आहे. कुणीही कायमचा सोबती नाही हे या निमित्ताने मैया तुमच्या मनावर ठसवत असते. मित्र, कुटुंब, परिक्रमावासी असो वा साधुसंत पुण्यात्म्यांचा सहवास. सगळे नियतीने ठरविल्याप्रमाणे, विशिष्ट काळाचे सोबती. आपण यातून बोध घ्यायचा. याचे वाईट वाटून घ्यायचे नाही.मैया एक एक धडा देत, परिक्षा घेत असते.
सहवासाने प्रेम वाढते आणि प्रेमाने बंधने.
तुम्ही प्रेमात अडकून पडलात, गुरफटलात तर थांबणार.
तुम्ही थांबलात तर वरच्या वर्गात जाणार नाही... अनुत्तीर्ण होणार.
तुम्ही न थांबता निघालात तर,वरच्या वर्गात जाणार म्हणजे उत्तीर्ण होणार. अर्थात तुमची परिक्रमा पुढे चालू राहणार. इतका साधा, सोपा विषय. तो समजून घेतला तर सोपा नाहीतर अवघड. नकळत आपण परीक्षा उत्तीर्ण होतो...
काल जे सन्यासी आश्रमात मुक्कामी होते, त्यांच्याबरोबर निघालो. त्यांची एक गंमत सांगतो. ते काल आश्रमांच्या स्वामींकडे वस्त्र, पांघरून, शिवमहिम्नस्तोत्र अजून काही काही मागत होते. वास्तविक त्यांच्या सामानात या वस्तू होत्या. स्वामींनी दिलेले पांढरे वस्त्र रंगवून भगवे करून घेतो म्हणाले. त्यांच्याकडे सगळे सामान असताना, सन्याशाने किमान गरजा ठेवून ईश्वरासान्निध्य राहणे अपेक्षित असताना, ते न करता हे संन्यासी एवढा सगळा संसार गोळा करीत होते. मोहात अडकलेला हा खरोखर संन्यासी आहे का, असा प्रश्न मला यानिमित्ताने पडला. हा ही एक पाठ मैयानी घालून दिला. काल रात्री तेच संन्यासी अचानक, इथे परिक्रमावासींमध्ये एक चोर आहे, असे म्हणाले. सगळेजण घाबरले. सगळ्यांनी नाव विचारले, तरीही नाव सांगायला तयार नव्हते. स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी नंतर सांगतो म्हणून झोपून गेले. परिक्रमावासींमध्ये काही गुन्हेगार पण असतात, हे माहिती होते. त्यामुळे इतरांची (मी वगळून) मात्र झोप उडाली, हे सांगायला नको. चोरीच्या भीतीने रात्रभर हॉलमध्ये ट्युबलाईट जळत होती.
हे सन्यासी सकाळी सात वाजता सविताबेनकडे रोटी मागत होते. काय म्हणावे... एकेकाच्या त-हा, दुसरे काय. आपण आपले दुर्लक्ष करावे आणि पुढे निघावे... आश्रमातून बाहेर पडून काही फर्लांग चाललो नाही तोच, त्या सन्याशाने वेगळा रस्ता पकडला. मैया मनकवडी आहे. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २२
सकाळी फार छान वातावरण होते. मैया किनारी वाटेत एका बोटीच्या दुरुस्तीचे काम चालू होते. एक मुलगा आणि त्याचे वडील बोटीची डागडुजी करीत होते. त्यांच्याशी पाच मिनिटे गप्पा मारल्या. स्थानिक रहिवासी असून मासेमारी करतो, असे सांगितले. त्यांनी चहाचा आग्रह केला. पण वेळेअभावी नम्रपणे नकार देऊन, नर्मदे हर केले.
पुढे चालत जात असताना मैयेच्या पात्रात मांडव घालून काहीतरी कार्यक्रम चालू असलेला दिसला.अधिक चौकशी करता, एका स्थानिक नागरिकाने धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे समजले. इथे मैया किनारी असे धार्मिक कार्यक्रम मैयेच्या पात्रात, मांडव टाकून आयोजित केले जातात. ही त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धेबरोबरच जागेची उपलब्धता, खर्च या गोष्टीपण विचारात घेतल्या जात असाव्यात. तसेच असे कार्यक्रम मैयेच्या
किनारी करण्याची एक परंपरा येथे रूढ झालेली आहे. परिक्रमेत सतत काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी समजतात. आपल्याकडे शहरांमध्ये नद्यांचे पात्र हा आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय ठरावा,अशी परिस्थिती आहे.
गरूडेश्वरला आश्रमात पोहोचलो. आधी ऑफिसमध्ये जावे लागले. आसन कुठे लावावे, याच्या सूचना ऑफिसमधून मिळतात, असे समजले. त्यांनी ओळखपत्र मागितले. नर्मदा परिक्रमेमध्ये प्रथमच ओळखपत्राची मागणी झाली. आश्र्चर्य वाटले. त्यांना प्रमाणपत्र दिले, त्यांनी नोंद करून घेतली आणि आसन लावण्याविषयी सूचना दिली. याविषयी चौकशी करता असे समजले की काही महिन्यांपूर्वी येथे घडलेल्या घटनेमुळे, निवासासाठी येणाऱ्या परिक्रमावासी,
भक्त ,भाविक, श्रद्धाळू यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करून ते नोंदविण्याची सूचना त्यांना मिळाल्यामुळे, ही व्यवस्था चालू केली होती. त्यांना ओळखपत्र देऊन आसन लावण्यासाठी गेलो. आसन लावून मैयेवर स्नानासाठी गेलो, कपडे धुतले. मंदिराला लागूनच सुंदर घाट येथे बांधलेला आहे.
स्नान करून आल्यानंतर दत्त मंदिरात गेलो. मंदिर बऱ्यापैकी मोठे असून येथे बसून मी , परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) लिखित सप्तशती
गुरुचरित्राचा पाठ केला. एकूण अकरा वेळा पाठ केला. नंतर दत्तमाला मंत्राची आवर्तने केली. या मंदिरामध्ये त्रिमूर्ती दत्ताची, संगमरवरी, सुबक मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच दत्तात्रेयांची एक छोटी, सोन्याची मूर्तीसुद्धा आहे. गाभाऱ्यात उजव्या हाताला शंकराचार्यांची तर डाव्या हाताला सरस्वतीची बैठी मूर्ती आहे. गाभार्याबाहेर मध्यभागी वासुदेवानंद सरस्वतींची संगमरवराची, बैठक घातलेली मूर्ती आहे. छतावर आतल्या बाजूला, गुरुचरित्रातील अध्यायानुसार चित्रे रंगवलेली आहेत.येथे मंदिरात परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या हस्ताक्षरातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र पाहता येते.
मैयेवर जाताना साधारण वीस-पंचवीस पायर्या उतरल्यावर, डाव्या हाताला प पू वासुदेवानंद सरस्वतींची समाधी आहे.देह ठेवण्यापूर्वी त्यांचा येथे निवास होता.येथे स्वामींनी त्यांचे कार्य पूर्ण केले आणि अवतार संपवला. नंतर त्यांचा देहाला नर्मदामैयेमध्ये समाधी दिली गेली. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे नर्मदामैय्या किनारी देह ठेवणार्या सर्व संत-सत्पुरुष, महंत, पुण्यात्मे यांना नर्मदा मैयेत समाधी देण्याची प्रथा आहे आणि प्रतिकात्मक अशी समाधी त्यांनी देह ठेवलेल्या जागी बांधतात.त्याप्रमाणे येथे समाधी मंदिरात प पू वासुदेवानंद सरस्वतींची मध्यभागी समाधी आहे. तर एका हाताला अनुष्ठान खंड व एका हाताला स्वामींची मूर्ती आहे. सायंकाळी बराच वेळ समाधी मंदिरात बसलो व जप केला. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या साधनेने सिद्ध आणि पावन झालेल्या, या गरुडेश्वरच्या दत्तमंदिरात व समाधी मंदिरात केलेल्या साधनेचा एक वेगळाच परिमाण आहे. त्याचे तुम्हाला
चांगले समाधान लाभते. यथाशक्य सर्व दत्त भक्तांनी गरुडेश्वरच्या दर्शनाचा व तेथील साधनेचा जरूर लाभ घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
समाधी मंदिरात छताच्या वरच्या बाजूला परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे चित्रस्वरूपात जीवनचरित्र काढलेले आहे. हे एक वेगळेपण येथे पाहायला मिळाले. आजवर बऱ्याच मंदिरात देव देवतांची चित्रे, पौराणिक कथा चित्रस्वरूपात पाहायला मिळाली परंतु संतांचे चित्ररूप जीवनचरित्र असे प्रथमच आढळले. एक वेगळेपण दिसून आले. समाधी मंदिरात पुजारी राहुल नवरे यांची भेट झाली. त्यांचे आजोबा १९३० सालापासून येथे सेवेसाठी आले. त्यांची ही चौथी पिढी आहे.
समाधी स्थानावर असलेल्या वस्त्रा खाली काय आहे, ती चौकशी पुजारी राहुल नवरे यांच्याकडे केली असता, त्यांनी समाधी स्थानावरील वस्त्र काढून माहिती दिली. समाधीवर शिवलिंग असून त्यावर कमळ व पादुका कोरले आहेत. त्यावर चांदीच्या पत्र्याचे अच्छादन आहे. शिवलिंग वस्त्राने झाकून ठेवलेले असते, तशी परंपरा आहे. त्यानंतर त्यांनी समाधी मंदिरातील तीर्थ दिले. अमृत म्हणावे, अशी अप्रतिम चव. दीर्घकाळ जिभेवर रेंगाळली. परमपूज्य
वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीस्थानाचे अशाप्रकारे दुर्मिळ दर्शन मिळणे, ही दत्त महाराजांची कृपा म्हणता येईल. मी तेथे एकटा असल्यामुळे मला हे दर्शन मिळाले. गर्दी असती तर पुजारी हे करीत नाहीत. दत्तात्रयांचे आशीर्वाद पाठीशी हवेतच. प्रत्येक मंदिर, समाधीस्थळ याचे वेगळेपण असते.थोडासा चौकसपणा दाखवावा लागतो एवढेच. दिलेली माहिती आणि झालेल्या दर्शनाबद्दल पुजारी राहुल नवरे यांचे मनापासून आभार मानले.
या ठिकाणाचे महत्त्वाचे असे :
परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी एक दिवस त्यांचे शिष्य परमपूज्य गांडाबुवा महाराज व श्री योगानंद सरस्वतींना बोलवून सांगितले की, आता माझा काही भरोसा नाही. तेव्हा ही दत्तमूर्ती गाणगापूर किंवा नृसिंहवाडीला स्थापन करावी किंवा कोणी भक्ताला बोलवून मूर्ती त्याच्याकडे सोपवावी. त्याच रात्री परमपूज्य गांडाबुवा महाराजांना गुरु दत्तात्रेयांचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले की, मला इथे गरुडेश्वरी राहायचे आहे. तेव्हा कोणा भक्ताकडून मंदिर बांधून घ्यावे. या ठिकाणाचे महत्त्व हळूहळू वाढेल. परम पूज्य गांडाबुवा महाराजांनी एक पत्र लिहून सर्व भक्तांना वाचनासाठी ठेवले. आणि मंदिरासाठी पैसे न मागण्याचे सांगितले. एरवी गुरु दत्तात्रेय वासुदेवानंद सरस्वतींना सर्व गोष्टींची आधी कल्पना द्यायचे. परंतु या बाबतीत मात्र तसे झाले नाही. माझी कल्पना, गुरु दत्तात्रेयांना पसंत नसावी ,म्हणून त्यांनी गांडाबुवा महाराजांना प्रेरणा दिली असावी, असे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी म्हटले. नंतर स्वहस्ते मंदिराचा मुहूर्त केला.यथावकाश मंदिर पूर्ण झाले. गुरु संप्रदाय व गुरुपरंपरेतील एक महत्त्वाचे व जागृत देवस्थान आणि समाधी मंदिर गरुडेश्वर येथे आहे. याची प्रतीची साधकांना वेळोवेळी येते. येथे महाराष्ट्र व गुजरातमधील दत्तभक्तांची नियमित वर्दळ असते.
नेहमीप्रमाणे सायंकाळी मैयेकिनारी जाऊन बसलो. स्वच्छ, वाहते,अथांग पाणी. दूरवर पसरलेले पात्र. सूर्य हळूहळू क्षितीजापलिकडे निघाला होता. त्याचा केशरी गोळा दूरवर चालला होता.त्या केशरी गोळ्याच्या छटा पाण्यावर पसरल्या. लहानपणी मारुतीरायाला त्या केशरी गोळ्याचे का आकर्षण वाटले असावे, हे आपल्याला मैया किनारी बसल्यावर लक्षात येते. उगीच नाही मारुतीराया झेप टाकून सूर्याला पकडायला गेला. मैयाकिनारी तुम्ही बसलात की न बोलताही संवाद होतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे, शब्देविणं संवादू... मैयाशी न बोलताही तुमचा संवाद होतो. मैय्या मनकवडी आहेच. तुमच्या मनातले ती अगदी न बोलता जाणून घेत असते. गरुडेश्वरी दत्त मंदिरात करून घेतलेला पाठ, झालेली साधना, समाधी स्थानात झालेले दर्शन... हा सगळा परिसर साक्षात दत्त महाराज आणि त्यांचे अवतार परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला करून देतो.
गुरुडेश्वरी परिक्रमावासीयांना मोफत तर इतरांना दहा रुपये शुल्कात भोजन प्रसाद मिळतो. येथे सर्वांना फक्त एक वेळ म्हणजे सकाळी भोजन प्रसाद मिळतो. सायंकाळी दुसऱ्या आश्रमात भंडारा घ्यायचा. दुपारी भोजन प्रसादाच्या वेळी एका शाळेची सहल आली होती. लहान मुलांचा चिवचिवाट, धांदल, गडबड, पळापळ सुरू होती. लहान मुलांच्या सहवासात भोजनप्रसादाचा आनंद घेतला. सुमारे ६०-७० मुले असल्याने त्यांना चॉकलेट देऊन माझा आनंद द्विगुणित मात्र करता आला नाही. नंतर पुढच्या टप्प्याची चौकशी करायला गेलो असताना, श्री रमेश वळवी नावाचे टपरीचालक भेटले.त्यांनी एक किलोमीटर पुढे स्वयंभू महादेव प्रकट झाले असून हे देवस्थान हजारो वर्षे जुने व जागृत असल्याचे सांगितले. रात्री, वाळत घातलेले कपडे गोळा करून, सगळे आवरून ठेवले. सायंकाळी मंदिराच्या कार्यालयातील सर्वश्री बकुळचंद्र नवरे, बकुळचंद्र गोडबोले, मगनभाई पटेल यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले. आणि निरोप घेतला. पुनश्च भेटीचे मनोमन प्रयोजन करून ऑफिस सोडले. गरूडेश्वरला श्री प्रल्हाद पटेल नावाचे पुस्तक दुकानदार आहेत. नर्मदा परिक्रमेवरील मराठीतील पुस्तके पाहायला मिळाली. मराठीतील पुस्तकांची चांगली विक्री होते, असे त्यांनी सांगितले. समृद्ध मराठी साहित्य आणि त्याचा खप पाहून आनंद वाटला. मराठी भाषिक आपल्या लेखकांना परप्रांतात भरघोस प्रतिसाद देत आहेत, ही एक दुर्मिळ गोष्ट. नर्मदे हर...
गरूडेश्वरला मध्यप्रदेशातील एक परिक्रमावासी, श्री आशारामजी भेटले. त्यांच्यासोबत परिक्रमा करायचे ठरले. निघालो... राजघाटहून पुढे शूलपाणीच्या जंगलात जाण्यापूर्वी मी काही सामान राजघाटला श्री सुरेशजी केवट यांच्याकडे ठेवले होते. ते सामान सुरेशजी चिखलद्याला पोहोचविणार होते. आशारामजी व मी कोटेश्वर फाट्यावर पोहोचलो. कोटेश्वर फाट्यावरून उजव्या हाताला वळून कोटेश्वर कडे जायचे होते आणि सरळ चिखलद्याचा रस्ता होता. आशारामजी तेथेच एका दुकानांमध्ये थांबले. त्यांना मी चिखलद्याहून सामान व पैसे घेऊन येतो, असे सांगितले. मी चिखलद्याला निघालो. मी ठेवलेले सामान व पैसे घेऊन सुरेशजी केवट यांचे सासरे श्री दयारामजी केवट येणार होते. परंतु श्री दयारामजी केवट एका लग्नसमारंभात अडकल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. एका विवाह समारंभात अडकल्यामुळे ते वेळेवर येऊ शकले नाहीत. त्यांची वाट बघत मी एका टपरीवर थांबलो होतो. गप्पा मारताना परिक्रमावासी म्हणून त्या टपरीवाल्याने मला चहा व भेळ दिली आणि पैसे घेण्यास नकार दिला. त्यांच्या दुकानात काही वस्तू विकायला ठेवल्या होत्या. त्यात एक गुडघेदुखीवर तेल व मलम होते. माझ्या आईच्या गुडघेदुखीसाठी तेलाची बाटली व परिक्रमेत माझ्या मानेवर घामाने आलेले पुरळ यासाठी मलम घेतले. दरम्यान दयारामजी आले. त्यांच्याकडील सामान व पैसे घेतले. त्यांचे आभार मानून पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन, नर्मदे हर करून पुन्हा कोटेश्वर फाट्यापाशी आलो. येथे चौकशी केली असता एका दुकानापाशी माझी सॅक ठेवलेली दिसली. त्याच्याकडे आशारामजीं बद्दल चौकशी केली असता, ते एक दीड तासांपूर्वीच तुमची वाट पाहून निघून गेले. तुमची सॅक ठेवून हा निरोप तुम्हाला देण्यासाठी मला सांगितले आहे, कसे दुकानदार म्हणाला. त्यांचे आभार मानून पाय उचलले. संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते. पुढे जात होतो. मंदिरात मुक्कामासाठी अंधार पडण्यापूर्वी पोहोचणे आवश्यक होते. कोटेश्वर फाटा ते कोटेश्वर मंदिर हे अंतर ५ किलोमीटर होते. रस्त्यात एखादा माणूस दिसायचा. ५ किलोमीटरचे अंतर व सूर्यास्तापूर्वी मंदिरात पोचणे, हे अवघड आहे असे जाणवले. स्नान करून मंदिरातील सायंकाळच्या आरतीसाठी मंदिरात उपस्थित राहता येणार नाही, हे मला जाणवले. मी, मनातल्या मनात मैयेला विनंती केली, मला लवकरात लवकर मंदिरात पाहोचविण्याची व्यवस्था कर. शंभर पावले चालत नाही तोच, माझ्या शेजारी एक महिंद्र कंपनीची जीप येऊन थांबली. गाडीतील पुढे असलेल्या व्यक्तीने मला जीपमध्ये बसण्यास विनंती केली, जीपमध्ये बसलो आणि दहा मिनिटात कोटेश्वरला पोहोचलो. जीपमधील ते सर्वजण कोटेश्वरला गायत्री मंदिरात निघाले होते. उतरल्यावर जीपमधील व्यक्तींशी परिचय झाला. मला बसायला सांगितलेल्या व्यक्तीचे नाव श्री पवनजी यादव. मध्यप्रदेशातील, कुक्षी तालुक्यातील , सुसारी गावात राहतात. ते व्यावसायिक आहेत. त्यांच्यासोबत प्रकाश लोंढे, पवन यादव यांच्या पत्नी, यादव यांचे मित्र असे चार जण होते. गाडीत बसल्यावर मी त्यांना मैयेला केलेली विनंती सांगितली. त्याच्यावर त्यांनी जे मला सांगितले ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, तुम्ही भेटायच्या अगोदर पाच मिनिटे, मला गायत्री देवीने दृष्टांत देऊन , तुला रस्त्यात अमुक-अमुक वर्णनाचा परिक्रमावासी दिसेल. त्याला गाडीत घेऊन कोटेश्वर मंदिरात सोड असा आदेश दिला.एरवी मी एकटा असलो व गाडीत जागा असली तरीही कोणाला गाडीत बसवत नाही, असे त्यांनी मला सांगितले. ते गायत्री देवीचे भक्त आहेत आणि कोटेश्वरला गायत्री देवीच्या मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. हे ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. फुटकळ गोष्टी साठी आपण मैयेला केलेली विनंती आणि पाचच मिनिटांत मैयेनी आपल्यावर केलेल्या कृपेचा प्रत्यय हे अनुभवून डोळ्यात पाणी आले. मैयेला आपण विनंती करतो काय पाच मिनिटात गाडी येते काय आणि त्यातून आपल्याला सोडण्याची व्यवस्था होते काय सर्वच अगम्य...मैयेची लीला अगाध आहे. अतिशय क्षुल्लक गोष्टीसाठी आपण मैयेला विनंती करतो आणि मैया आपले लगेच लाड पुरवते.
कशासाठी आपण हे करतो. काय झाले असते थोडे चालण्याचे कष्ट घेतले असते तर..याची उत्तरे माझ्याकडे नव्हती. मैयेची लीला अगाध आहे हेच खरे. कोटेश्वर मंदिरात पोचल्यावर स्नान करून शेजारच्या गायत्री मंदीरातच आसन लावले, हाही एक योगायोग...
बाहेर परिक्रमावासींची आवारामध्ये भरपूर गर्दी होती. नंतर मैयेकिनारी जाऊन स्नान करून, आरती करून आवारात बसलो. या दरम्यान घडलेली अजून एक घटना.एक वृद्ध परिक्रमावासी एका बसमधून उतरून थेट माझ्याकडे आले व मला नमस्कार करून म्हणाले, आपल्याला पाहिले आणि आपल्याला भेटावे असे वाटले म्हणून लगेच आलो. हे परिक्रमावासी नरोत्तम ठाकूर. राहणार बरेली, उत्तर प्रदेश. ६० जणांसोबत बसमधून परिक्रमा करीत होते. बसमधून उतरल्यावर थेट मला भेटायला येण्याचे काय कारण असावे. सर्वसामान्य परिक्रमावासींसारखा मी एक. पण हा जिव्हाळा, हे ऋणानुबंध मैयाची कृपा. एक परिक्रमावासी दुसऱ्या परिक्रमावासीची गळाभेट घ्यायला येतो. आपल्याकडे एक वारकरी जसा दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया पडतो, तसेच हे.
त्यांचा हात हातात घेऊन गप्पा मारल्या. त्यांनाही आनंद झाला. कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे आता मी निवृत्त झालो आहे. त्यामुळे पत्नी व मी, गावकऱ्यांसोबत बसने मैयेच्या परिक्रमेसाठी निघालो आहे, असे त्यांनी मला सांगितले. या हृदयीचे त्या हृदयी...
दुसरे काय.दुसरे शब्दच नव्हते माझ्याकडे.
ते वयोवृद्ध, ज्येष्ठ तर मी तरुण आणि अननुभवी. वयातले अंतर, अनुभवही मोठा. सगळे काही वेगळेच...
नर्मदे हर...
राजघाटचे दयारामजी केवट यांचे मेहुणे नारायण केवट हे कोटेश्वरला असतात. त्यांना जाऊन भेटलो. दयारामजींनी त्यांना फोन करून ठेवला होता. त्यांच्याकडे चहा घेतला, बसून गप्पा मारल्या. नंतर त्यांच्या पत्नी माताराम सौ पुष्पा यांनी भोजनप्रसादाबद्दल विचारले, आढेवेढे न घेता हो म्हणालो. त्यांनी वीस मिनिटात खिचडी करून वाढली. गरमगरम बटाटे, टोमॅटो, शेंगदाणे घातलेली खिचडी, वरती दोन चमचे साजूक तूप... ह्याच्यापुढे पंचपक्वान्नेसुद्धा फिक्की पडावीत. त्यानंतर ताक प्यायलो. अन्नदाता सुखी भव... मैय्या म्हणजे, घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी अशी आहे. किती काळजी घेते आपल्या बाळांची.लाड पुरवते ते वेगळे. रात्री बरीच थंडी होती. चिखलद्याला दुपारी घेतलेले मलम मानेवर आलेल्या पुरळाला लावले. डबी सॅकच्या मागे ठेवली व कॅरी मॅट टाकून पाठ टेकली. क्षणभर, दिवसभर परिक्रमेत घडलेल्या घटनांचे चित्र डोळ्यासमोर तरळले. विचार करीत असतानाच थंडीने आपले बाहू पसरले होते. पांघरूण डोक्यावरून ओढून, गुरफटून घेऊन डोळे मिटले. आजूबाजूचे सगळे आवाज बंद झाले आणि सर्वत्र शांतता पसरली. मधूनच रातकिड्यांची किर्र sss किर्र. मैयाकिनारी सगळे परिक्रमावासी मैयेवर आश्वस्थ होऊन गाढ झोपी गेले होते. मैयेचा मात्र अव्याहत प्रवास चालू होता... तिला थांबणे माहिती नाही.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २३
निसरपूरहून धारला निघालो. धारच्या अलीकडे अंदाजे वीस-पंचवीस किलोमीटर असताना तिरला घाट लागला. घाट म्हणजे फक्त जंगल आणि तुरळक वाहने . याला माळवा प्रांत असे म्हणतात. इतिहासात आपण जो माळवा प्रांत अभ्यासला आणि शिकला तोच हा माळवा प्रांत म्हणतात. नजर जावी तेथपर्यंत पठार. विस्तीर्ण पठारी प्रदेश. बसमध्ये अनेक आदिवासींची चढउतार सुरू होती. सर्व आदिवासी मजुरीसाठी, कामासाठी निघाले होते. त्यांच्या बरोबर लहान मुलेही हातात डबे, विळे घेऊन बसमध्ये चढत उतरत होती. दहा-बारा वर्षांची मुले शिकण्याच्या वयात जेवणाचे डबे व शेतीचे साहित्य घेऊन कामाला निघाले होते. बसमध्ये जागा दिसत असली तरी बसू का नको या विचारांमध्ये उभीच राहायची. तेवढ्यात एखादा शहरी बाबू जागा पटवायचा. अगदी लहान मुलेही तीन चार वर्षाची उभी राहून प्रवास करताना दिसली. बस मध्ये दोन रांगांच्या मध्ये कमी गर्दी असली तरी, अशा एखाद्या लहान मुलाला मी पटकन माझ्या सीटवर बसवून घ्यायचो. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातले जे भाव दिसायचे, ते कधीही न विसरता येण्याजोगे. परिक्रमेत अनुभव देणे, शिकवणे, संस्कार करणे...ही तर मैयाची खासियतच. परिक्रमेने मला अनेक अनुभव, संस्कार, ज्ञान, माहिती दिली. त्यातले काही मी कधीही विसरू शकणार नाही. ती आयुष्यभराची पुंजी आहे. असे अनुभव परत परत मिळणे दुरापास्तच.
दुपारी साडेबारा वाजता मांडवगडावर पोहोचलो. गडावर जाताना डाव्या हाताला काकडाखव लागतो. काकडाखव म्हणजे दोन डोंगराच्या मधील खूप खोल दरी. त्याचा तळ दिसत नाही. त्याला कुंपण घातलेले आहे. चार-पाच प्रवेशद्वार पार करीत गडावरील राम मंदिराजवळ पोहोचलो. गडावर राणी रूपमती महाल, जामा मस्जिद, नीळकंठेश्वर मंदिर, हिंडोला महाल, जहाज महाल, दिल्ली दरवाजा व इको पॉईंट आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. गडावर पर्यटकांची खूप गर्दी होती. प्रेक्षणीय स्थळे टाळून परिक्रमावासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे रेवाकुंड, मी तिकडे वळलो. रेवाकुंड हे, राममंदिराच्या पुढे गडाच्या शेवटी पद्मावती महालाच्या जवळ आहे. थांबून रेवा कुंडाचे दर्शन घेतले. हे कुंड बांधलेले नसावे, असे त्याच्या सद्यस्थितीवरून वाटले. रेवा कुंड हे छोट्या तळ्यासारखे. शेजारी इतिहासकालीन बांधलेली महालवजा इमारत.
रेवा कुंडाची आख्यायिका अशी : राणी रूपमती स्नानासाठी दररोज मैयेवर जायची. तिला लग्नासाठी बाजबहादूर यांचे स्थळ आले.लग्न झाले. पण लग्नानंतर राणी रूपमतीला मैयाचे दर्शन व स्नान होत नसल्यामुळे तिने अन्न पाणी सोडले. हे नर्मदामैयाच्या लक्षात आले. तिने राणी रूपमतीच्या स्वप्नात येऊन, विशिष्ट ठिकाणी खोदल्यास मी तेथे प्रकट होईन व तुझ्या मनातली इच्छा म्हणजे माझ्या दर्शनाची व स्नानाची अडचण दूर होईल, असे सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी खोदल्यावर मैय्या तिथे प्रकट झाली. हेच ते रेवाकुंड. अशी ही रेवाकुंडाची आख्यायिका आहे. आता तुम्ही जर मांडवगडावर न येता खालच्या रस्त्याने पुढे गेलात तर नर्मदामैय्या इथे प्रकट झाल्यामुळे तुम्ही मैया ओलांडून तुमची परिक्रमा खंडित होते अशी एक वदंता आहे. त्यामुळे परिक्रमावासी ज्यांच्या मनात परिक्रमा खंड होण्याची भीती आहे, ते या मार्गाने मांडवगडावर येऊन खाली उतरून महेश्वरच्या दिशेने रवाना होतात. एकेक आख्यायिका आणि त्यानुसार ठरलेली परिक्रमा. रेवा कुंड उजव्या हाताला ठेवून पुढे गेल्यावर, डाव्याबाजूला राणी रूपमती महालाकडे जाण्याच्या रस्त्याकडेला काही दुकाने आहेत. तिथून पुढे मांडवगड उतरण्याची पायवाट सुरु होते. उजव्या हाताने पुढे जात राहा. पुढे दगडांवर पांढऱ्या रंगाच्या खुणा केलेल्या आहेत. तो मार्ग धरावा , अशी माहिती तेथील दुकानदारांनी पुरवली. त्यानुसार पाय उचलले. हा रस्ता डोंगरावरून सुरू होऊन डोंगराच्या कडेने हळूहळू खाली उतरतो. घसरगुंडी सुरू थोडक्यात...
काही ठिकाणी अगदी पाय ठेवण्या एवढीच जागा. अगदी जपून पावले टाकावी लागतात. उतारावर माती असल्यास घसरण्याची शक्यता असते. काही ठिकाणी मी घसरून पडता-पडता राहिलो, तर काही ठिकाणी घसरून पडलोच. कमंडलू पडला, पाणी सांडले. लागले नाही ही मैयाची कृपा. काही अंतर गेल्यावर दगडावरच्या पांढऱ्या खुणा गायब झालेल्या. खालचा अंदाज घेऊन हळू हळू पायवाट शोधत उतरू लागलो. एका ठिकाणी बाभळीचा काटा चपलेतून आरपार शिरला.काढताना तो तुटला पायाला टोचू लागला. चालता येईना. शेवटी थांबून चप्पल काढून काट्याने काटा काढला. लहानपणी शिकलेली म्हण उपयोगात आणली. काट्याने काटा काढणे... असे काही म्हणीनुसार करावे लागेल असे स्वप्नातही नव्हते. पण आजूबाजूला दुसरे काही साहित्यही नाही. काट्याचा छान उपयोग झाला. यात पंधरा-वीस मिनिटे गेली. पडल्यानंतर कमंडलूतले पाणी सांडले होते. थोडे पाणी शिल्लक होते ते उन्हामुळे कोमट झाले होते. ते प्यावेसे वाटेना. तसाच हळूहळू उठत-बसत ,घसरत डोंगराच्या पायथ्याशी सपाटीला पोहोचलो.
थोडे अंतर चालून समोर आलेल्या पहिल्या घरात शिरलो आणि पोटभर पाणी प्यायलो. तृप्त झालो आणि तिथेच पाठ टेकली. मोठा टप्पा पार केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता.एक वेगळा अनुभव गाठीस आला. मी असा उताणा पाठीवर पडलेला बघून त्या घरात असलेली लहान मुले माझ्याकडे बघून हसत होती. थोड्यावेळ पडल्यानंतर उठून सॅकमधील चॉकलेट लहान मुलांना वाटली. मुले तुफान खुश झाली. मी थोडा वेळ पडून राहिल्यानंतर उठून पुन्हा पाणी प्यायलो. निघणे अपरिहार्य होते. उठलो, सॅक पाठीला अडकवली आणि पाय उचलले. मांडवगड ते हीरापूर हा रस्ता अवघड, उतराचा व बिकट असा आहे. या पायवाटेवर लवकर वाटचाल सुरू करावी. त्यामुळे मुक्कामाच्या गावी वेळेवर पोहोचणे शक्य होते आणि अनाठायी उत्साह दाखवू नये, उतरण्याची घाई करू नये असा सल्ला द्यावासा वाटतो. मी पाणी पिण्यासाठी थांबलेल्या हीरापुर या गावातून निघून पुढे बगवानीया या गावी येऊन चहा घेतला. एकदम तरतरी आली. थकवा पळाला. पुढच्या चालीसाठी उत्साह आला. पुढे डौल या गावी आलो.
डौलहून पुढे पटलावद या गावी ओमकार जी पटेल यांच्याकडे आसन लावले. पटलावद हे बाराशे लोकवस्तीचे गाव. पाटील व पाटीदार समाजाची लोकसंख्या येथे सर्वाधिक आहे. गाव शेतीप्रधान. येथे मुख्यतः कापूस, तूर, गहू, सोयाबीन याची लागवड केली जाते. मिरची व ऊस यांची किरकोळ लागवड येथे होते.
मध्यप्रदेशातील खरगोन, खांडवा,बडवानी व धार या चार जिल्ह्यांचा थोडा भाग नीमाड या नावाने ओळखला जातो. नीम म्हणजे कडुलिंब. या परिसरात कडुनिंबाची झाडे जास्त आहेत,म्हणून नीमाड असे नाव पडले. आपल्याकडे जसे विदर्भ, मराठवाडा, खानदेश म्हणतो तसे. या प्रदेशात संमिश्र संस्कृती आहे. येथे राजस्थानी, गुजराती आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यातही महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव जास्त आहे. येथे कांदा, पुरणपोळी असे मराठी शब्दही दैनंदिन वापरात प्रचलित आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्य विस्तारात अनेक मराठी माणसे येथे आली व स्थायिक झाली. त्यांना पटेल म्हणले जाते. पाटील चे पटेल झाले.बोलताना सहजपणे चर्चेत मिळालेली माहिती. प्रवासामध्ये भौगोलिक रचना आणि त्या नावाची माहिती गोळा करायचा तुम्ही थोडासा जरी प्रयत्न केला तरी, वेगळी माहिती तुमच्या हाताशी लागते. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडतेच शिवाय इतरांचे ज्ञान वाढायलाही उपयोगी पडू शकते. परिक्रमेत हे वेगळेपण जपण्याचा मी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला असे म्हणायला वाव आहे.
अध्यात्मात खरेतर मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा मानली जाते. असे असून सुद्धा बहुतेक परिक्रमावासी त्यांच्यासोबत देवांचे फोटो, मुर्त्या, उदबत्त्या, धूप, नेवेद्यासाठी वस्तू बरोबर बाळगून हिंडत असतात. वेळ मिळाला की, सकाळी-संध्याकाळी पूजा-अर्चा,पाठ सुरू. एकूणच कर्मकांडावर भर दिसून आला. अशिक्षित माणसे तर हे सर्व करतातच.पण सुशिक्षित परिक्रमावासीही याला अपवाद नाहीत, हे बघून जास्त आश्चर्य वाटले. आपल्याभोवती असलेली, परिक्रमेमध्ये तुमचे हवे-नको बघणारे, तुमची काळजी घेणारे, तुमच्याशी प्रेमाने-जिव्हाळ्याने वागणारे, प्रसंगी आपल्या तोंडातला घास काढून तुम्हाला देणारे असे हे अद्वितीय, मैयाचे स्थानिक पुत्र व पुत्री यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायच्या ऐवजी, परिक्रमावासी स्वतःला कर्मकांडात अडकवून ठेवतात.
पूजा,अर्चा, भजने, स्वयंपाक, भोजनप्रसाद आणि झोप...चालू असते हे चक्र...
बरे सगळे झाल्यानंतर शांतपणे देवाचे नाव घ्यावे किंवा शांत बसावे तर तेही नाही. कोंडाळे करून चकाट्या पिटणे किंवा गप्पा मारत बसायचे, हे आणखीन वाईट. बरं आरती करावी तर ती मनातल्या मनात नाही, पाच दहा जणांनी मोठमोठ्याने, भसाड्या आवाजात. प्रत्येकाचे शब्द वेगळे, ताल ना सूर. आजूबाजूच्या परिक्रमावासींना याचा त्रास होतो, त्यांची मनःशांती ढळते आणि कशातच लक्ष लागत नाही. हे सगळं ऐकून इतर परिक्रमावासी त्यांना आशीर्वाद देत असतील याबाबत शंकाच वाटते. नुसतेच परिक्रमावासी नाही तर, आश्रमातील सेवेकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात या सगळ्यांचा अडथळा होत असतो. सेवेकरी गप्प बसा म्हणून ओरडतात, प्रसंगी अपशब्दही वापरतात. काय मिळते सगळे करून मैयाच जाणे....
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २४
पटलावदहून धामनोद मार्गे मधल्या रस्त्याने बलवाड्याजवळ आलो. पटलावदहून कपडे न वाळल्याने दुपारी उशिरा निघालो होतो. थांबूनही न वाळल्यामुळे तसेच ओले कपडे घेऊन पाय उचलले.... रस्त्यात एका शेतात मेंढ्या बसवल्या होत्या. त्यांचे बें sss बें चालू होते. मेंढपाळ निवांत झाडाखाली बसून विश्रांती घेत होता. काही शेतकरी बैलगाडीतून तर, काही मैया डोक्यावरून चारा घेऊन घरी चालल्या होत्या. सूर्य कलला होता. सूर्यास्त व्हायला अजून वेळ होता. बलवाड्याला आत्माराम पटेल यांच्या घरी आसन लावले.
आत्मारामजी यांचा मोठा परिवार आहे आसन लावल्यानंतर मी मैयेवर स्नानाला गेलो. आधी मैयाकिनारी मी एकटाच होतो. नंतर गाई म्हशी पाणी पिण्यासाठी आल्या. त्या गेल्यानंतर एक छोटा मुलगा मैयेच्या आरतीसाठी आला. दाऊ पटेल त्याचे नाव. तो दहा-बारा वर्षाचा असेल. त्याने आधी उदबत्ती लावली. नंतर द्रोणात वात ठेवली आणि ती पेटवली. त्यानंतर तो दिवा त्यांने मैयेला अर्पण करून मनोभावे नमस्कार केला. त्याची आरती झाली. हे सगळे मी दुरून बघत होतो तो दिवा हलत-डुलत हळूहळू पुढे चालला होता. त्यानंतर अजून एक गावकरी आला. त्याने पण उदबत्ती लावून, पानांच्या द्रोणात पणती ठेवून, दिवा पेटवून मैयेला अर्पण केला. त्याची पण आरती झाली.मैयेची आरती करण्याची ही सार्वत्रिक पद्धत मैये किनारी आहे. संध्याछाया पसरल्या होत्या. ते दिवे मैयाच्या त्या संथ प्रवाहाबरोबर डुलत डुलत हळूहळू दूर चालले होते. अंधार दाटू लागला होता. मैयाच्या आरतीचे ते दृश्य मी डोळ्यात साठवत होतो. परिक्रमेत शहरापासून दूर, मैयेच्या किनारी, निरव शांततेत अशी आरती नेहमी अनुभवायला मिळत नाही. परिक्रमेत एक-दोन वेळाच हा मला अनुभव आला. अंधार वाढू लागल्यामुळे पाय उचलणे आवश्यक होते. अंधारात मैयेकिनारी न बसण्याचे संकेत असल्यामुळे,दाऊबरोबर मी गावात परतलो.
आत्मारामजी पटेल यांच्या पत्नी माता राम सौ कांचन बाई यांनी सायंकाळी सात वाजता भोजन प्रसाद करून वाढला. अन्नदाता सुखी भव... नंतर त्यांच्याशी परिक्रमेविषयी गप्पा मारत बसलो. थोडे उशिरा समोर राहणारे रेवाराम पटेल आणि त्यांच्या पत्नी सौ कलाबाई माता राम भेटण्यासाठी आल्या. श्री रेवारामजी आणि त्यांचे कुटुंबीय गावातून पुढे जाणाऱ्या सर्व परिक्रमावासीयांना चहा, केळी, भोजन प्रसाद यापैकी जे काही चालणार असेल, हवे असेल त्याची नेहमी व्यवस्था करतात. त्यांनी २४ महिन्यांची परिक्रमा केली आहे. खरेतर त्यांना तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवसांची परिक्रमा करायची होती. पण कुटुंबीयांच्या आग्रहाखातर लवकर पूर्ण करण्यास भाग पडले. त्यांची मोठी परिक्रमा करण्याची इच्छा पूर्ण न झाल्याची खंत त्यांच्या बोलण्यात जाणवली. दोघेही पती-पत्नी अगदी विनयशील व सेवाभावी होते. त्यांच्या घरावर एक छान सुविचार रंगवलेला होता... धनवान नाही, चरित्रवान सुख पाते है...चांगला संदेश. रेवारामजी व त्यांच्या पत्नीने पुढील परिक्रमा मार्गाविषयी मार्गदर्शन व शंका समाधान केले. त्यांचे अनुभवही आम्हाला सांगून अंतर्मुख केले. आशारामजी घरात झोपले तर मी ओसरीवर आसन लावले. ओसरी समोरच्या गावातल्या रस्त्यावर छान पांढरा शुभ्र चंद्र प्रकाश पडला होता. गोठ्यात त्यांची एक कामधेनु होती. अधून मधून तिच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट ऐकू येत होता. दिवसभर चालून चांगली दमणूक झाली होती. कॅरी मॅट पसरले व पाठ टेकली. परिक्रमेत आता सगळीकडेच थंडी सगळीकडे वाढू लागली होती. जवळचे पांघरूण कमी पडायचे. एखादे पांघरूण मागूनही घ्यावे लागायचे. कोणी, कधी कधी स्वतःहून चादर आणून द्यायचे.
विचार करायला सवडच मिळाली नाही... झोप कधी लागली ते कळले नाही...
पहाटे साडेचार वाजता गावातील भोलेनाथ-दुर्गामाता मंदिरात लाऊडस्पीकरवर गाणी सुरु झाली. शेजारच्या घरातील म्हशीचे रेडकू डुरक्या मारू लागले. जाग आली. बोचरी थंडी जाणवू लागली. आज जलकोटीच्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन महेश्वरला मुक्कामी जायचे होते. बाजूला गावकऱ्यांनी पेटवलेल्या शेकोटीची जरा वेळ ऊब घेतली.
सकाळी निघाल्यानंतर, तिलोकचंदजी पटेल आम्हाला जवळचा रस्ता दाखवण्यासाठी बरोबर आले. जवळजवळ अर्धा तास ते आमच्याबरोबर दुपारच्या अकराच्या उन्हात चालत होते. वाटेत दोन नद्या,कारम आणि बूटी आम्हाला पार करून देऊन एका ठिकाणी आणून सोडले. चालताना त्यांच्याकडून एक नवी घोषणा समजली ती म्हणजे, नर्मदे हर...गिरदे हर !!! म्हणजे खूप सामान घेऊन जो परिक्रमा करीत आहे, त्याला, नर्मदे हर.. गिरदे हर... असा प्रतिसाद देतात. गंमत वाटली. थोडक्यात जास्त सामान घेऊन परिक्रमा करू नये हा संदेश. वाटेत तिलोकचंदजी पटेल यांनी माझी व्यक्तिगत माहिती विचारली. त्यानंतर थोड्या वेळाने ते म्हणाले, माझी एक विनंती आहे. तुमच्या मुलाचे शिक्षण झाल्यानंतर तुम्ही पती-पत्नीने नर्मदा परिक्रमा करावी. त्यांना तसे का वाटले माहिती नाही. मी त्यांना तसे प्रयोजन असल्याची कल्पना दिली. त्यावर परिक्रमेत आमच्या बाजूने जाताना, आमच्या घरी त्यावेळी जरूर मुक्काम करावा असे आवर्जून मला सांगितले. सपत्निक परिक्रमेचा विचार माझ्या मनात यापूर्वीच आला होता. पण मी तो कोणाकडे जाहीर व्यक्त केला नव्हता. यांना तो कसा समजला, त्यांच्या तोंडून हा विचार ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मैयाची जादू लक्षात आली. तिलोकचंदजींना, माझी पत्नी आणि मी एकत्रित परिक्रमा करावी असे का वाटले असावे. किंबहुना माझ्या मनात तो विचार होताच. हा विचार त्यांनी एका प्रकारे दृढ करण्यास मदत केली. मैयाचे हे वैशिष्ट्य आहे. तुमच्या मनातल्या गोष्टी तिला नुसत्याच समजत नाहीत तर, ते विचार ती पुन्हा पुन्हा हलवून घट्ट करीत असते. परिक्रमा पुन्हा आणि ती ही सपत्नीक व्हावी म्हणून मैयाचा हा एक प्रयत्न !!!
सरदार सरोवरची उंची पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या गावातील छोटे नाले, ओढे पूर्ण भरणार आहेत. त्यामुळे त्यांचा आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटणार आहे. म्हणून त्यांच्या गावाचेही पुनर्वसन होणार आहे. पुनर्वसन झाल्यावर त्यांचे बलवाडा गाव परिक्रमा मार्गावर राहणार आहे. हा त्यांचा आत्मविश्वास पाहून आनंद वाटला. त्यांनी माझा मोबाईल नंबर नाव लिहून घेतले. तसेच त्यांचे नाव व मोबाईल नंबर लिहून दिले. परस्परांनी एकमेकांना नर्मदे हर करून, परस्पर विरोधी दिशांना निघालो. वाटेत चालताना तिलोकचंदजी रस्त्यात पगदंडीवर पडलेली काट्यांची फांदी उचलून बाजूला टाकत पुढे चालत होते. निदान आपल्या मार्गात आलेले काटे, इतरांना लागू नयेत म्हणून ते बाजूला करणे, एक अनुकरणीय सवय. आपल्या पायामध्ये पादत्राणे असल्यामुळे आपल्याला काट्याकुट्यांचा त्रास होत नाही. परंतु ग्रामीण भागात बहुतेक लोक पादत्राणे वापरत नाहीत, किंबहुना त्यांना ती परवडत नाहीत म्हणून ही सवय अनुकरणीय वाटली. तिलोकचंदजी आपला कामधंदा सोडून आमच्यासाठी एक तास वाट दाखवायला आले, एवढा वेळ दिला, आमची चौकशी प्रेमाने केली, सपत्निक परिक्रमा करावी म्हणून त्यांनी आपुलकीने सल्लाही दिला, परिक्रमेत पुन्हा आल्यानंतर आवर्जून घरी या असा आग्रह केला, त्या सगळ्याच गोष्टी शहरी माणसाच्या आदरातिथ्याच्या भूमिकेला छेद देणाऱ्या आहेत. मैयेच्या पाण्यावर मोठ्या झालेल्या परिक्रमा मार्गातील सर्व गावकऱ्यांच्या रक्तातच आदरभाव, आदरातिथ्य भरून राहिलेले आहे. स्नेहभाव तर विचारूच नका. या सगळ्यांमुळे तुमचा मैयेवरचा विश्वास आणखीनच दृढ होतो. नर्मदे हर ...
रस्त्यामध्ये अधून मधून हिरवीगार शेती दिसत होती. तीन चार मुले शेळ्यांच्या कळप चारण्यासाठी मैयाकिनारी घेऊन चालली होते. त्यांनी नर्मदे हर केल्यावर त्यांना प्रत्येकी एक एक चॉकलेट दिले. खुश झाली. नर्मदे हर करून पाय उचलले. मजल दर मजल करीत, वाटेत थांबत थांबत, जलकोटीला पोहोचलो. जलकोटी येथे पुण्यातील नारायणपूरच्या नारायण महाराजांचा खूप मोठा आश्रम व दत्त मंदिर आहे.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २५
दुपारी बारा वाजता जलकोटीच्या दत्त मंदिरात पोहोचलो. हे दत्तात्रेयांचे मंदिर पुणे जिल्ह्यातील, सासवड जवळील नारायणपूर येथील, नारायण महाराज यांनी बांधले आहे. मंदिराबरोबरच आत मध्ये आश्रम व्यवस्था आहे. मंदिर भव्य असून ते अठरा एकर जागेत उभारले आहे. मंदिरात एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती आहे. मूर्तीच्या पुढे, खालील बाजूस शंकराची पिंड ही स्थापन केलेली आहे. ह्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी सारखी व्यवस्था आहे. म्हणजे मंदिराच्या डाव्या हाताने एक रस्ता तळघरात जातो तो फिरत दत्ताच्या मूर्तीखाली येतो तेथे पिंडीचे व दत्तात्रेयांचे एकाच वेळी दर्शन होते. दत्तात्रेयांच्या एकमुखी मूर्तीसमोर उभे राहिले असता, खाली तळघरात असलेल्या शंकराच्या पिंडीचे दर्शन होत नाही. या मंदिराशेजारी भृगु ऋषींचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात सोप्या सारखी जी रचना केली आहे तेथे भक्त व परिक्रमावासींची निवास व्यवस्था होते. पुढील बाजूस भक्तनिवासाचे बांधकाम चालू आहे. पुण्यातील कोणीतरी दानशूर बांधकाम व्यावसायिक हे काम मोफत करून देत आहे, असे समजले. मंदिराच्या मागे सेवाभावींची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था आहे. मंदिरात अखंड गुरुचरित्र पारायण चालते. येथे कायमस्वरूपी राहणारे सेवाभावी श्री विचारे गुरुजी मूळगाव भोर ( पुणे )भेटले. त्यांनी सविस्तर माहिती देऊन भोजन प्रसादाची विनंती केली. थोडी कढी, भात यांचा प्रसाद घेतला. पुढेमागे हे एक चांगले देवस्थान म्हणून नावारूपास येईल, अशी आशा वाटते. या आश्रमात एक-दोन परिक्रमावासींसाठी मोफत निवास व भोजनप्रसाद व्यवस्था होते.
मंदीरासमोरचा रस्ता सहस्त्रधारा या ठिकाणी जातो. हे एक पौराणिक ठिकाण आहे. अर्जुनाने सहस्त्र बाहूंनी दरवाजा मैयेला थोपवण्याचा प्रयत्न केला. पण मैयेने यातूनही मार्ग काढला. येथे तिच्या सहस्त्र (अनेक ) धारा निर्माण झाल्या व अर्जून मैयेला थोपवू शकला नाही, अशी कथा आहे. सहस्त्रधारा हे ठिकाण दत्त मंदिरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर समोरील बाजूस आहे. सहस्त्रधारा चे दर्शन घेऊन दुपारी १ ते ३ दत्त मंदिरात विश्रांती घेतली. दुपारी तीन वाजता निघालो. विश्रांती दरम्यान आम्ही चौघेजण पारावर गप्पा मारत बसलो होतो. आशारामजी, विचारे गुरुजी, सत्तर वर्षांचे एक परिक्रमावासी आणि मी. गप्पा मारताना ते वृद्ध परिक्रमावासी म्हणाले, तुम्ही हे समजू नका की, तुम्ही दोघे जण फार काळ बरोबर बरोबर रहाल. मैं आपल्या दोघांनाही वेगळे करेल. या चर्चेदरम्यान आशारामजी पटेल यांची मुलगी त्यांना शोधत मंदिरात आली. तिच्या डोळ्यात पाणी आले. या वयात वडील परिक्रमा करतायत म्हणून काळजीपोटी ती त्यांना भेटायला आलेली होती. मैया कृपेने तिथे पितापुत्रीची हृद्य भेट झाली. मुलीची वडिलांवरची माया आणि प्रेम हे वेगळेच असते. मी तिला मैयेचा भरोसा देऊन, दिलासा दिला भरल्या डोळ्यांनी ती व आम्ही दोघेही निघालो. पुढचा टप्पा महेश्वर. अंतर पाच किलोमीटर. कच्चा रस्ता. रस्त्यावर खूप वाहतूक होती. रस्त्यावर सारखी धूळ उडत होती. हा रस्ता वाहतुकीचा होता.
महेश्वर ही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्याची राजधानी. महेश्वरला मौनीबाबांच्या आश्रमात आसन लावले. आसन लावून लगेच मैयेवर स्नानाला गेलो. घाटाच्या एका बाजूला दुरुस्तीचे काम चालू होते. पादचाऱ्यांसाठी असलेल्या पुलावरून मुख्य घाटाच्या दिशेने पुढे गेलो. मुख्य घाटावर पर्यटकांची खूप गर्दी होती. त्यामुळे मुख्य घाटाच्या अलीकडेच स्नान उरकले. घाटावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, हातात शिवलिंग घेतलेला पूर्णाकृती पुतळा आहे. सूर्य अस्ताला चालला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साक्षीने, महेश्वरच्या विशाल घाटावर उभे राहून, रजनीशाला त्याच्या राज्यात वाट करून देत घरी निघालेला भानू पाहताना... मैयेचे ते भव्य आणि दिव्य स्वरूपाला आपण साक्षीदार असतो...यावर क्षणभर विश्र्वास बसत नाही.
घाटावर बहुतेक सर्व ठिकाणी अस्वच्छता आढळली. मैयाच्या पाण्यातही निर्माल्य, नारळ, कचरा आढळला. एवढ्या मोठ्या विशाल मैयेच्या पात्रातील आणि घाटावरची ही अस्वच्छता डोळ्यात चांगलीच खुपली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासह हिंदुस्थानातल्या बऱ्याच नद्यांच्या किनारी मोठमोठे घाट बांधलेले आहेत. महेश्वरचा घाट हा सुद्धा तिथेच विस्तृत, रेखीव व सुंदर बांधलेला आहे. अगदी बघत रहावे असा हा घाट आहे. मराठी माणसांची घाटावर लक्षणीय उपस्थिती जाणवली. आशारामजी व मी दोघेजण घाटावर जरा वेळ बसलो.
घाटाच्या मागील बाजूस थोड्या अंतरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा वाडा आणि त्यांचे देवघर आहे. देवघरामध्ये त्यांचे सोन्याचे देव असून ते जतन केले आहेत. आता ते सरकारच्या ताब्यात असून आपणास ते पाहायला मिळते. परंतु त्याचे फोटो काढता येत नाहीत. पुण्यश्लोक आहिल्यादेवींनी महिलांच्या सबलीकरणासाठी यंत्रमागावर महेश्वरी पातळांचे (साडी) उद्योग सुरू केले आणि महिलांना मोठ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे साधन मिळवून दिले. आजही तेथे मोठ्या प्रमाणावर महेश्वरी सुती साड्यांचे उत्पादन होते आणि महिलांचा उदरनिर्वाहावर त्याच्यावर चालू आहे हे पाहून आनंद वाटला. त्या काळात महिलांच्या सबलीकरणाचा हा दूरदर्शीपणा निश्र्चितच उल्लेखनीय आहे. तसेच त्यांनी मंदिरे, आश्रम यांना मोठ्या प्रमाणात दानधर्मही केला.
मौनी बाबांच्या आश्रमामध्ये श्रीयुत दीक्षित यांच्याशी परिचय झाला. ते मध्यप्रदेश मधील महसूल विभागातून सहाय्यक आयुक्त पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी वाहनाने भरपूर प्रवास केला. हरिद्वार, ऋषिकेश,गंगोत्री,यमुनोत्री येथील आश्रम, येथील महंत, त्यांचे महागडी राहणीमान, एकमेकांमधली स्पर्धा त्यांनी अगदी जवळून पाहिली. प्रवासादरम्यान ते मोठ्या अपघातातून ते जिवानिशी वाचले. सोबत त्यांच्या पत्नी होत्या. झालेला अपघात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. दरम्यान त्यांच्या कोणी स्नेह्याने त्यांना मौनी बाबांच्याकडे आणले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने स्वभावाने, मृदूवाणीने ते प्रभावित झाले. दीक्षित पेन्शनर आहेत. त्यांनी महेश्वरला मौनी बाबांच्या आश्रमात सपत्निक राहण्याचा निर्णय घेतला. सेवाभाववृत्तीने ते येथे राहून आश्रमाची सर्व व्यवस्था पाहतात. सर्व व्यवस्था पाहून दरमहा ते काही पैसेही आश्रमात जमा करतात.
मौनी बाबांविषयी थोडेसे... मौनीबाबांचे अंदाजे वय ९० वर्षे असावे. त्यांनी सुमारे पन्नास वर्षे मौन केले आहे. नजीकच्या काळात त्यांनी मौन सोडले. मौनी बाबा, आश्रमामध्ये अगदी छोट्याशा खोलीत राहतात. स्वतःचा स्वयंपाक,कपडे धुणे अजूनही स्वतःच करतात. आश्रमाचे स्वतःचे वाहन नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून त्यांचा प्रवास चालू असतो. गरज पडली तर दुचाकीवरून, अगदी हातगाडीवर बसूनही सायकलवर सुद्धा ते जातात. त्यांच्या दृष्टीने काम होणे महत्त्वाचे. कोण कसा चालला आहे याला ते महत्त्व देत नाहीत. आश्रमाची एकूण जागा खूप मोठी आहे. आश्रमामागे काही एकर रिकामी जागा आहे. आश्रमामध्ये नळ स्वच्छतागृहे सर्व असून परिक्रमावासी पैकी ज्याला कोणाला गरज असेल तो ती सेवा वापरू शकतो. परिक्रमावासींसाठी एका हॉलमध्ये आसन लावण्याची व्यवस्था केलेली आहे. याला लागूनच भोजन प्रसादाचे जागा असून, येथे सर्वांना भोजन प्रसाद दिला जातो. मौनी बाबांच्या बाबतीतली एक घटना सांगितली जाते ती अशी : दोन वर्षांपूर्वी आश्रमात अतिरुद्र आयोजित केला होता. मोठा खर्च होणार होता. दीक्षित यांच्याकडे सर्व आर्थिक जबाबदारी होती. लागणारे सर्व साहित्य आणून आश्रमाच्या मोकळ्या जागेमध्ये मांडवामध्ये ठेवले होते. त्या दरम्यान रात्री केव्हातरी मौनी बाबांचा श्रीयुत दीक्षितांना फोन आला. त्यांनी आश्रमात विशिष्ट ठिकाणी चोरी होत असल्याचे श्रीयुत दीक्षितांना सांगितले. आश्रमाची जागा खूप मोठी असल्याने लांब एका ठिकाणी अति रुद्राचे सामान ठेवले होते. तिथे चोर आले होते. वस्तू घेऊन पळून जायच्या बेतात होते. श्रीयुत दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बघून चोर पळून गेले. दुर्घटना टळली, नुकसान वाचले .कदाचित या घटनेवर काहींचा विश्वास बसणार नाही.असो. परिक्रमेत असताना माझी मौनी बाबांची भेट झाली नाही. परंतु मी २०१६ साली सपत्नीक मध्यप्रदेश ला पर्यटनानिमित्त गेलो असताना परिक्रमेतील काही ठिकाणी आवर्जून माझी पत्नी सौ वर्षा हिला घेऊन गेलो होतो. त्यापैकी एक जागा मध्ये महेश्वरचा घाट आणि मौनी बाबांचा आश्रम. त्यावेळी मौनी बाबांची व आम्हा उभयतांची भेट झाली. त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला व आशीर्वाद घेतले. त्यांनी आमची व कुटुंबाची आवर्जून चौकशी केली. दोन दिवस मुक्काम करा असं आग्रह पण केला. परंतु आम्ही राहणे शक्य नसल्याचे त्यांना नम्रपणे सांगून, त्यांचा निरोप घेतला. कृष शरीर, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्म लावलेले, आणि कमरेला फक्त एक वस्त्र. हातात जपाची माळ. आम्ही गेलो तेव्हा त्यांनी पुन्हा मौन धारण केले होते त्यामुळे त्यांनी आमच्याशी पाटीवर लिहून संवाद साधला. नंतर का होईना पण मौनी बाबांची भेट झाली, यात आनंद वाटला.
दुसऱ्याविषयी सकाळी पोहे व चहा घेतला. श्री दीक्षित व त्यांच्या धर्मपत्नी यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले व आश्रम सोडला. महेश्वर नंतर पुढचा मुक्काम खेडी घाट.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २६
परिक्रमेत सुरुवातीस माझ्यासोबत काही दिवस आलेला माझा मित्र, किरण गेंगजे आज पुन्हा मैया किनारी मला येऊन भेटणार होता व परत काही दिवस माझ्याबर परिक्रमेत चालणार होता. तो खेडी घाटला येणार होता. मी सकाळी महेश्वरहून प्रस्थान ठेवले. माझ्यासोबत असलेले आशारामजी यांनी महेश्वरला थांबण्याचा निर्णय घेतला. जलकोटला त्या वृद्ध परिक्रमावासींनी सांगितल्याप्रमाणे आशारामजी आणि माझा सहवास महेश्वर येथे संपन्न झाला. आता परिक्रमेत पुन्हा नवीन भेट होणार. हे चालूच राहणार. तुम्ही कुणाच्याही प्रेमात,सहवासात अडकून पडू नये, ही मैयाची इच्छा असते.
खेडीघाटला पोहोचलो. ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. त्यांनी आसन लावण्यासाठी एक खोली दिली. आश्रमातली सर्वात शेवटची व अतिशय शांतता असलेली खोली मिळाल्याचा आनंद झाला. माझा मित्र किरण पुण्याहून इंदूरला, इंदूरहून धामनोद ला उतरून बडवाह मार्गे खेडीघाटला पोहोचला. आता दोघांचा प्रवास सुरु होणार होता. किरण पुण्याहून एवढ्या लांब चे अंतर पार करून मजल-दरमजल करत खेडीघाटला आला आणि थोडे दिवसांनी परत जाणार होता. त्याच्या नशिबात टप्प्याटप्प्याने परिक्रमा असावी. मैत्री हे एक असेच अनोखे रसायन आहे. एकदा तुमची नाळ जुळली की त्याला वय आणि कशाचेच बंधन नसते. हवा फक्त एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा. नाहीतर पुण्याहून दोन तीन वाहने बदलून, परिक्रमेच्या खडतर वाटचालीत तो माझ्यासोबत राहण्यासाठी कशासाठी आला असावा. मला तरी त्याचे दुसरे काही कारण दिसत नाही. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध दुसरे काय आणि मैयाची कृपा...
दुपारी एक वाजता भोजन प्रसाद घेऊन, श्रीराम महाराजांच्या आत्मकथनाचे वाचन केले. श्रीराम महाराजांच्या आश्रमातून डिसेंबरमध्ये १५ दिवसांची बसची परिक्रमा सुरु होणार होती. श्रीराम महाराज स्वतः या परिक्रमेत, परिक्रमावासींसोबत सहभागी होणार होते. या संदर्भातली एक घटना सांगतो. आश्रमात असताना, माझ्यासोबत सुरवातीला असलेले दोन परिक्रमावासी रानडे काकू व राजवाडे काकू या चाणोदजवळ तापाने खूप आजारी होत्या. त्यावेळी त्या दोघींशी माझे बोलणे झाले. राजवाडे काकूंनी परिक्रमा थांबवून पुण्याकडे रवाना होण्याचे मला सूतोवाच केले. मी त्यांना दोन-तीन दिवस मुक्काम करावा,व मैयेची परिक्रमा पूर्ण करून घे अशी प्रार्थना करावी असे सुचविले. याबाबत श्रीराम महाराजांशी माझे बोलणे झाले. श्रीराम महाराजांनी त्यांना परिक्रमा रद्द न करता, गरुडेश्वर येथे दोन-तीन दिवस मुक्काम करण्याचे सुचवले. गरुडेश्वरपासून पुढे त्यांच्या बसमधून त्या दोघींना परिक्रमेसाठी पुढे घेऊन जाण्याचे श्रीराम महाराजांनी निश्चित केले. हे सर्व अर्ध्या तासात घडले. त्या दोघांची परिक्रमा पूर्ण होण्याची व्यवस्था झाली. फक्त तुमची इच्छा हवी. बाकी सर्व गोष्टी मैया घडवते.
श्रीराम महाराजांच्या आश्रमात मला किंगफिशर,भारद्वाज, वेडा राघू ,टिटवी अशा बऱ्याच पक्ष्यांचे दर्शन झाले. आश्रमात मोठी गोशाळा आहे. एक घोडाही आहे. महाराजांकडे दोन स्वयंचलित वाहने (मोटारी) आहेत. श्रीराम महाराजांचा आश्रमाचा विस्तार खूप मोठा असून सुमारे दहा एकर जागा असावी. आश्रम दुमजली होता. तळमजल्यावर निवास व्यवस्था तर वरील मजल्यावर मोठा हॉल असून येथे प्रवचन व सत्संगाची व्यवस्था केली जाते. मंदिराच्या तळघरामध्ये सेवेकरी अखंड नामस्मरण करत असतात. मंदिराला लागूनच रेल्वे लाईन असल्यामुळे अधून मधून जाणाऱ्या रेल्वेचे संगीत ऐकायला मिळाले. मंदिराची स्वतंत्र भोजन शाळा आहे. या भोजन शाळेमध्ये दोनशे लोक एका वेळी देऊ शकतील, एवढा मोठा कायमस्वरूपी मांडव घातलेला आहे. २०१८ साली काही महिन्यांपूर्वीच श्रीराम महाराजांचे सातारा (महाराष्ट्र) येथे रस्ता अपघातात निधन झाले.
दुपारच्या सुमारास उपवासाचे पदार्थ ग्रहण करून श्रीराम महाराज व माताजींचा आशीर्वाद घेऊन आम्ही बडवाहच्या दिशेने प्रयाण केले. लवकर पाय उचलणे आवश्यक होते. सायंकाळपर्यंत च्यवनाश्रमात पोहोचायचे होते. बडवाह नंतर जंगलमार्गाची सुरुवात होणार होती. बडवाहपासून अकरा किलोमीटरचे अंतर होते. शहर संपल्यावर लगेच जंगल सुरु झाले. डांबरी सडकेने चालत होतो. दोन्ही बाजूला सागाची झाडे. सर्व जागा वनखात्याच्या अखत्यारित. रस्त्याला वर्दळ अशी नव्हतीच. एखादी मोटरसायकल दहा-पंधरा मिनिटांनी जायची. रस्ता सामसूम. छातीवरील चढ. निशब्द म्हणजे काय ते अनुभवत होतो. आजूबाजूला कोणी नाही. हळू-हळू सूर्य कलू लागला. बडवाह पासून सुमारे अकरा किलोमीटर चालल्यानंतर उजव्या हाताला च्यवनाश्रमाची पाटी दिसेल असे सांगितले होते. त्यामुळे, ती पाटी येईपर्यंत चालण्याशिवाय पर्याय नव्हता. पाटी चुकून लक्षात आली नाही तर, हेलपाटा पडणार हे नक्की. रस्त्यात सांगायला कोणी नाही. पाटी कुठे, कशी लागेल याचा अंदाज नव्हता. किरण व मी डांबरी सडकेने व उन्हात चालत होतो. बडवाह सोडल्यानंतर शासकीय वसाहती सोडल्या की, पूर्ण जंगल सुरु झाले. न संपणारा घाट रस्ता. आम्ही दोघेच. आम्ही दर अर्ध्या तासाने थांबून पाणी पीत होतो. शेवटी एका ठिकाणी उजव्या हाताला पाटी दिसली. च्यवनाआश्रम अर्धा किलोमीटर आत... असा स्वरूपाचा त्रोटक मजकूर व बाण या अस्पष्ट पाटीवर होता. आम्ही चाललेल्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे बडवाहकडे जाणाऱ्या माणसांना दिसेल अशी पाटी लावलेली होती. कदाचित आम्हाला ती पाटी दिसलीही नसती व हेलपाटा नक्की पडला असता. परंतु मैयाची कृपा आणि पाटी दिसली.
रस्ता सोडून उजव्या हाताला खाली उतरलो. मानवी हस्तक्षेप नसलेले खरे जंगल आता सुरु झाले होते. आम्ही पायवाटेने पुढे चालू लागलो. किर्र झाडी आणि त्याच्यातून गेलेली पायवाट. या झाडांमुळे ऊन खालवर पडत नव्हते. झाडांची सावली जमिनीवर पडलेली आणि वाळलेला पालापाचोळा. पालापाचोळ्याच्या आवाजातून आम्ही पुढे निघालो. संध्याकाळ व्हायला आली होती, त्यामुळे जंगलात अंधारून आले होते. आणखीन अंधार पडायच्या आत, आम्हाला आश्रमात पोहोचणे आवश्यक होते. मैया किनारी चालणे आणि जंगलातून पायवाटेवर चालणे, यात फरक निश्चितच जाणवत होता. जंगलातील प्राण्यांचा काही भरवसा नाही. तशात घोंगसामध्ये बिबट्याचा अनुभव घेतलेला होता. येथेही प्राणी असावेत असे मनात वाटत होते. ईश्वरच जाणे. मुख्य रस्त्यापासून अर्धा तास चालत आश्रमात पोहोचलो. आश्रमाचे ठिकाण अवर्णनीय असेच होते. शब्दही अपुरे पडावेत सांगायला.आश्रमही घनदाट जंगलात आहे. शेजारी एक दोन घरे फक्त आहेत. बाकी काही नाही. आश्रमात शंकराचे मंदिर, आश्रमाचे महंत कै रामगोपाल दासजीत्यागीमहाराज यांची मूर्ती, हनुमान मंदिर आहे. सर्वात मधोमध कुंड आहे. यातून च्यवन गंगा निघते. यातील पाणी आश्रमाबाहेरील गोमुखातून २४ तास अखंड वाहत असते. थंडीतही पाणी कोमट. अगदी पहाटेही किरण व मी स्नान केले तेव्हा, गोमुखातून कोमट पाणी येत होते, असा अनुभव आम्ही घेतलेला आहे. अव्याहत वाहणारे आणि गोड पाणी. गोमुखातून २४ तास वाहणारे व भर थंडीमध्येही थंड नसलेले पाणी येते,याचा वेगळा अनुभव आजही येथे येतो. आश्रमात जे कुंड आहे त्याच्या पाण्याची पातळी खाली आहे आणि आश्रमाबाहेर गोमुखातून जे पाणी येते ते गोमुख त्या कुंडाच्या पाण्याच्या पातळीच्या वर आहे. त्यामुळे हे पाणी नक्की येते कुठून हे समजत नाही. त्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत समजवून घ्यायला लागेल . दुसऱ्या बाजूला बारा महिने, अव्याहतपणे आश्रमाबाहेर गोमुखातून हे वाया जाणारे पाणी पाहून वाईटही वाटले. कदाचित हे पाणी दुसरीकडे कुठेतरी पाईपलाईनद्वारे नेऊन त्याचा सदुपयोग तरी करता येईल. परंतु याकडे कोणी डोळसपणे बघत नाही, याचा खेदही वाटला. आश्रमाची स्वतःची मोठी गोशाळा आहे. त्यात चांगली दुभती जनावरे आहेत. त्या दुभत्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचा उपयोग, आश्रमातील पाहुणचारासाठी तसेच दैनंदिन पूजा,अर्चेसाठी व इतर कामासाठी केला जातो. तसेच शेण सारवण्यासाठी व गोवऱ्या करून भोजन शाळेत स्वयंपाक सिद्ध करण्यासाठी वापरल्या जातात, हे पाहून समाधान वाटले. दूर जंगलामध्ये तसेही स्वयंपाकाची साधने आणणे हे एक अडचणीचे व खर्चिक काम असते. त्यामुळे शेणाच्या वापराचा हा काढलेला मार्ग मला फार आवडला. परिस्थिती माणसांना त्यानुसार निर्णय घेण्यास भाग पडते हे येथे जाणवले. आश्रमाची स्वत:ची शेतजमीनही आहे. येथे वीज अजिबात नाही. सगळे जे काय आहे ते गॅसच्या किंवा रॉकेलच्या दिव्यावर चालते. परिक्रमावासींसाठी चहा, भोजन प्रसाद, भंडारा, निवास बारा महिनेही उपलब्ध आहे. आश्रम परिसर अत्यंत रम्य, शांत व मनोहरी असा आहे. बडवाह सारख्या वर्दळीच्या शहरापासून फक्त ११ किलोमीटर असूनही आश्रमाला शहरीकरणाची झळ पोहोचलेली नाही, याबद्दल मनापासून आनंद वाटला.
तरूण असलेले श्री विजयदास जी महाराज सध्या आश्रमाचा कार्यभार सांभाळतात. श्री विजयदासजी, हे सन्यासी असून अत्यंत शांत, गंभीर व दयाळू व्यक्तिमत्व आहे. आश्रमात आम्ही गेलो तेव्हा फार परिक्रमावासी नव्हते फक्त दोन जण दिसले .आम्ही गेल्यानंतर विजयदास महाराजांनी आमची चौकशी करून दोन दिवस राहा असे सांगितले. त्यांना विचारून परिक्रमावासींसाठी असलेल्या हॉलपैकी तळमजल्यावरील हॉलमध्ये आश्रम आसन लावले. आमच्या नंतर थोड्यावेळाने सात-आठ परिक्रमावासी आले. त्यांना विजयदास महाराजांनी वरच्या मजल्यावर आसन लावण्यास सांगितले. परिक्रमावासींसाठी दोन मोठे हॉल आहेत. हॉलला चारी बाजूने तीन फुटांची भिंत असून हॉल उघडे व स्वच्छ आहेत. आश्रमात स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था आहे.याचे कारण आम्हाला नंतर समजले. जागोजागी नळ असून ताटे, वाट्या, हात धुण्यासाठी जागा आहेत. प्रत्येकाने एकदा तरी या आश्रमात जरुर भेट द्यावी, असे मी आवर्जून सांगू इच्छितो. परिक्रमेनंतर पाच वर्षांनी २०१६ साली मी सपत्नीक मध्यप्रदेशमध्ये पर्यटनासाठी गेलो असताना, जी काही पर्यटन स्थळे बघितली त्याच्यासोबत ओंकारेश्वर, च्यवनाश्रम, अमरकंटक ही ठिकाणे आवर्जून बघितली. परिक्रमेत मला भावलेला हा एक आश्रम आहे. संपूर्ण परिक्रमेमध्ये अत्यंत शांत व पुन्हा पुन्हा जावे असे वाटणारे हे ठिकाण मला खूप भावले. शहरापासून जवळ असून सुद्धा च्यवन मुनींच्या आश्रमांमध्ये पावित्र्य आणि त्याचा जंगलातला जो मूळपणा आहे, तो तसाच जपलेला आहे, हे पाहून खूप आनंद झाला. व्यापारी करणाचा, चंगळवादाचा येथे स्पर्शही झालेला नाही, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. अन्यथा आपल्याकडे पिकनिक स्पॉट तयार व्हायला वेळ लागत नाही, हे कटू सत्य आहे.
आश्रमाच्या आजूबाजूला जंगल असल्यामुळे जंगली श्वापदे आश्रमातील दुभत्या जनावरांमुळे आश्रमाच्या आसपास रात्रीच्या सुमारास घुटमळत असतात. स्वामी विजयदासजी यांनी मला सांगितले की, तुम्ही येण्यापूर्वी काल सायंकाळी येथे वाघ आला होता आणि तो आश्रमाबाहेर बसून बराच वेळ डरकाळ्या फोडत होता. परंतु आश्रम बंदिस्त असल्यामुळे काही दुर्घटना घडली नाही. त्यामुळे आम्ही सर्व परिक्रमावासींना आश्रमाच्या आतच आणि सांगितलेल्या जागेवर आसन लावायला सांगतो. तसेच रात्रीच्या वेळी नैसर्गिक विधींसाठी आश्रमातील स्वच्छतागृहांचा वापर करण्यास सांगतो. रात्री-अपरात्री बाहेर जाऊन काही दुर्घटना घडल्यास न भरून येणारी हानी होऊ शकते हा आमचा अनुभव असल्यामुळे आम्ही याच्यावर काटेकोर लक्ष देतो.रात्री-अपरात्री कुठल्याही परिक्रमावासींना बाहेर जाऊ देत नाही. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून मला माझ्या अंगावर काटा आला. रात्री बाहेर पडणे किती धोक्याचे असते, हे यातून समजले. तसेच परिक्रमा सूर्यास्तानंतर करू नये, हे का सांगितले आहे याचे एक कारणही समजले. आश्रमाच्या समोर संपूर्ण मोकळा परिसर असून अतिशय निरव शांतता कायम असते.भोजन प्रसाद घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी किरण व मी बराच वेळ आश्रमाबाहेर बसलो होतो. मन रमून गेले. जंगलातील नि:शब्द वातावरण, चांदण्यांचा पडलेला प्रकाश, झाडांच्या सावल्या, गोमुखातून येणाऱ्या पाण्याचा तो लयबद्ध रव आणि मैयेवरून येणारी झुळुक हे आम्ही प्रथमच अनुभवत होतो. किरणही मूळचा ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यालाही अशा प्रकारच्या जंगलातल्या निवासाचा खूप आनंद झाला. रात्री सेवेकर्यांनी आश्रमाचे दरवाजे कुलूपबंद करण्याचे वेळी आम्हाला हाक मारून बोलाविले आणि आश्रमाचे दरवाजे बंद केले. आश्रमाची शिस्त आणि परिक्रमावासींची काळजी या दोन्ही गोष्टी, या वेळेस आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या.
सायंकाळी परिक्रमावासींचा एक गट मोठमोठ्याने आरत्या म्हणत होता. जंगलातील त्या नीरव शांततेमध्ये भसाड्या आवाजातील या आरत्याच काय तो शांतता भंग करीत होत्या. त्यावेळी आश्रमातील एक सेवेकरी तिथे येऊन त्यांना जोरात ओरडून म्हणाला, मनमे आरती करो. आरती हमारे लिये कर रहे हो क्या. मनमे आरती करो, वरना चूप बैठो. मग ते भसाड्या आवाजात आरती म्हणणारे परिक्रमावासी मनात आरती करून लागले. आम्हालाही बरे वाटले. त्यांच्या त्या आरतीचा आम्हाला आणि इतरांनाही त्रास होत होता. सोनाराने कान टोचले आणि नंतर शांतता प्रस्थापित झाली.
आश्रमात येथील भंडारी महाशयांनी आम्हाला बालभोगात कोरडी भेळ, पोहे तसेच भोजनप्रसादात डाल-बाटी वरती तूप, खीर, खिचडी सोबत कोशिंबीर असे उत्तम चवीचे पदार्थ खाऊ घातले.
खूप इच्छा असूनही किरण व मला वेळे अभावी येथे थांबता आले नाही. जड मनाने आश्रमातून निघावे लागले.
नर्मदे हर ...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २७
च्यवनाश्रमातून प्रस्थान ठेवताना विजयदास महाराजांचे आशीर्वाद घेतले. भंडारी बुवांनी निघताना सदाव्रत (गव्हाचे पीठ व वांगी) प्रेमाने हातात ठेवले.आमच्याकडे शिजवायची साधने नाहीत, हे सांगितल्यावर म्हणाले, मैया कृपेने व्यवस्था होईल. त्यांच्या विनंतीचा आदर ठेवून साडेआठ वाजता, किरण व मी नर्मदे हर केले. पुढचा टप्पा सीतावन.
च्यवनाश्रम ते सीतावन अंतर २७ किलोमीटर. आश्रमातून डांबरी सडकेवर येऊन उजव्या हाताला अंदाजे पाच मिनिटे चालल्यावर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता लागेल, तोच कुंडी या गावाकडे जाणारा रस्ता, चुकुन पुढे गेलात तर हेलपाटा पडेल, असे आश्रमात बजावून सांगितले होते. रस्ता दिसला, डाव्या हाताला वळलो. जंगलात शिरल्याची जाणिव झाली. पाय उचलले. संपूर्ण जंगलाचा रस्ता. सागाची झाडे खूप. क्वचित बहावा, पिंपळ, वड, उंबर अशी झाडे. माझा मित्र किरण याने पुरवलेल्या माहितीच्या आधारे झाडांची नावे मी नमूद करू शकलो. उंच सागाच्या झाडांमुळे ऊन लागत नव्हते. अधून मधून करवंदाची जाळी दिसायची. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. जंगलातून जाणारे आम्ही दोघेच.अधून मधून सागाच्या वाळलेल्या पानांचा जमिनीवर पडणारा आवाज आणि आमच्या पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा आवाज.... एवढाच काय तो शांतता भंग. बाकी सर्वत्र शांतता.
चालत असताना रस्त्यात एका ठिकाणी दोन नीलगायींनी रस्ता पार केला. त्यांचे फोटो काढावेत म्हणून थांबून, पाठीवरची सॅक खाली उतरवली तर, त्यांनी आम्हाला थांबलेले पाहून, जंगलात धूम ठोकली. तृण भक्षी प्राणी आढळल्यामुळे, या जंगलात मांसभक्षी प्राणीही असणार अशी शंका मनात डोकावली. थोडासा घाबरलो.
दोन तास जंगलात चालत होतो. चालताना जंगलातील नीरव शांततेचा, खूपच अनमोल असा अनुभव मिळाला. थोड्या वेळानी जंगलात एक पूल लागला. त्याच्या शेजारी साठलेले पाणी होते. प्रवासामध्ये असे साठलेले पाणी पिणे हे, धोकादायक ठरू शकते. कारण वाहत्या पाण्यामध्ये रोगराई पसरविणारे जीवजंतू नसतात. साचलेल्या पाण्यामध्ये मात्र जीवजंतू असून रोगराई होऊ शकते आणि आजारीपण पडू शकतो. त्यामुळे असे पाणी शक्यतो परिक्रमावासीयांनी पिऊ नये, असा संकेत आहे. पुलाशेजारी एक हनुमान मंदिर होते. या रस्त्यावर विश्रांतीची जागा, म्हणजे हे हनुमान मंदिर. एक चौथरा. त्यावर हनुमान म्हणजे शेंदूर फासलेला दगड. मांडव नाही आणि आच्छादनही नाही. ऊन, वारा, थंडी, पाऊस यामध्ये तग धरून हा हनुमान येणाऱ्या जाणाऱ्या आमच्यासारख्या परिक्रमावासीयांना आसरा देत होता. तेथेच दगडाची चूल व लाकडे पण होती. त्या ठिकाणी आम्हाला छोटे लालजी व श्री धनराज ठुंठा दहेलवाडा, मध्य प्रदेश हे दोन परिक्रमावासी भेटले.आम्ही पण येथे विश्रांतीसाठी थांबलो. त्यांनी चहा घेणार का विचारले, हो म्हणालो. त्यांनी अल्युमिनियमच्या भांड्यात जवळचे पाणी घालून हळद टाकून छान, काळा चहा तयार केला. आम्ही सर्वांनी चहा घेतला. हळद घालून चहा घेण्याचा आयुष्यात पहिल्यांदाच योग आला होता. आम्ही विश्रांतीसाठी थांबणार होतोच. पण एवढ्या जंगलात ना गाव ना दुकान ना वर्दळ अशा ठिकाणी चहाची व्यवस्था... मैयानी लाड पुरवावेत व आपण पुरवून घ्यावेत. अर्धा पाऊण तास विश्रांतीनंतर आम्ही चौघे निघालो. वाटेत कुंडी गावात पाण्यासाठी थांबलो. पाणी घेऊन परत पाय ऊचलले. गावातून जात असताना समोर तान्हे बाळ एका दुपट्यावर झोपवून त्याच्यासमोरच एक माता राम सायकलच्या अर्ध्या भागाच्या सहायाने मागील चाक, पेडलचा उपयोग करून त्याचा आधुनिक चरखा बनवून सूत काढत होत्या. ते बघून गंमत वाटली आणि कौतुकाने त्यांचा फोटो काढला. मग मजल दर मजल करीत बडेल या गावी पोहोचलो. येथे हनुमान मंदीरात परिक्रमावासींची व्यवस्था होते, असे समजले. सदाव्रत मिळते व निवास व्यवस्था होते. छोटेलाल व धनराज या दोघांच्या आंघोळी झालेल्या असल्यामुळे किरण व मी स्नान करण्यासाठी गावातल्या हातपंपावर गेलो. तर त्या दोघांनी टिक्कड व डाळ असे भोजन सिद्ध केले. स्वयंपाक केला याला भोजन सिद्ध करणे हा हिंदीतील पर्यायी शब्द. सिद्ध करणे याला एक वजन आहे. हनुमान मंदिरात गेंदालाल महाराज वय अंदाजे ७० वर्षे. खूप सेवाभावाने परिक्रमावासींची सेवा करतात. त्यांचा सेवाभाव, नम्रता पाहून अवघडून जायला होते. सर्वांनी भोजन प्रसाद ग्रहण केला. किरण व मला स्वयंपाक करता येत नसल्याने त्या दोघांनी सर्व व्यवस्था केली. दुपारी स्थानिक डॉक्टर यादव व व्यावसायिक संजय जयस्वाल आमच्या सर्वांच्या चौकशीसाठी आले. डॉक्टर यादव परिक्रमावासींना मोफत वैद्यकीय सेवा देऊन उपचारपण करतात. आम्ही महाराष्ट्रातून परिक्रमेसाठी आलो आहे, याचा त्यांना आनंद वाटला. त्यांना येथे असूनही परिक्रमा करता आलेली नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवली. महाराजांनी आमची व्यवस्था मंदिराशेजारी केली. आम्ही चौघांनी तेथे आसन लावले. दरम्यान आणखीन दहा-बारा परिक्रमावासी आले व मंदिर भरून गेले.
चहा पिऊन सीतावन-वाल्मिकी आश्रमाकडे प्रस्थान ठेवले. हा टप्पा सतरा किलोमीटरचा होता. सर्व जंगलचा रस्ता. आपल्याकडे जसे सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगल पाहायला मिळते, घनदाट संमिश्र झाडांची जंगले येथे नाहीत. येथे मुख्यतः सागाची झाडे दिसतात. रस्ता सुनसान. सकाळची वेळ असल्यामुळे वाहने नाहीत. छोटेलाल, धनराज, किरण व मी चौघेजण चालत होतो. मेहेंदीखेड्यात पाणी पिण्यासाठी थांबलो. पाणी पिल्यानंतर किराणा मालाच्या दुकानदाराने चहाचा आग्रह केला. वेळेअभावी त्यास नम्रपणे नकार देऊन पायाला गती दिली. तराज्या या गावात शिरण्यापूर्वी फॉरेस्ट चेक पोस्ट लागते. तेथे पाणी पिण्यासाठी थांबलो. तेथेच वनरक्षक राहतात. त्यांचे नाव विचारले पण, विसरून गेलो. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांनी सांगितले, काल जंगलात एक माताराम चुकल्या होत्या पण योगायोगाने आम्ही तेथे गेल्यामुळे त्यांना मूळ रस्त्यावर आणून सोडले. अन्यथा त्या रात्रभर जंगलात भटकत राहिल्या असत्या. या जंगलात वाघाचे ठसे मिळाले आहेत. पण प्रत्यक्ष दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले. वेळेअभावी ते कामावर निघाले. परंतु त्यांच्या पत्नीने चहा करून दिला. चहा पिताना, तराज्यातील व्यवसायाने आर्टिस्ट असलेल्या एका तरुणाने आम्हाला भोजन प्रसादासाठी घरी येण्याचा आग्रह केला. पण वेळे अभावी त्याला नम्रपणे नकार देऊन पुढे निघालो. गाव संपल्यावर कनाड नदी लागली. गुडघाभर स्वच्छ, नितळ व वाहते पाणी पार करून पुढे निघालो. उजव्या हाताला वळून पिपरीयाकडे प्रस्थान ठेवले. पाच मिनिटे चाललो नाही, तोच मांगीलाल नावाचा, एक स्थानिक तरुण भेटला. तो पिपरियाला चालला होता. जवळच्या मार्गाने लवकर पोहोचू म्हणाला. त्याच्याबरोबर निघालो त्याची चाल वेगवान होती, त्यामुळे आमची चाल पण वाढली. वाटेत थोड्या वेळाने एका ठिकाणी थांबून आम्ही बिस्किटे व दाणे खाल्ले. पाणी पिऊन नर्मदे हर केले. त्याने दीड तासात आम्हाला आठ किलोमीटर चालवले.
पिपरियात थांबून चहा पिऊन सीतावन- वाल्मिकी आश्रमाकडे निघालो. पिपरिया ते सीतावन वाल्मिकी आश्रम हे अंतर दीड किलोमीटर. येथे रामाचे व हनुमानाचे मंदीर आहे. यज्ञशाळेत परिक्रमावासींची व्यवस्था होते. आणखी सदाव्रत घेतले. छोटे लालजी आणि धनराज यांनी डाळ आणि वांगी शिजत टाकली. दरम्यान किरण व मी कुंडावर स्नान करून आलो. सीता मैया लवांकुशासह वाल्मिकी आश्रमात राहत असताना, दररोज नर्मदामैयेवर स्नानाला जात असे. हे अंतर लांब होते. ते पाहून मैया म्हणाली, तू एवढ्या लांबवर दरोज येण्याची गरज नाही. मीच आश्रमात प्रकट होते. तेच हे कुंड अशी आख्यायिका आहे. भोजन प्रसाद करून दुपारी पिपरिया गावात आलो. सकाळी भंडारी बुवांनी दिलेला सदाव्रत सीतावन येथे कामाला आला.
पिफरिया गावात श्री सुनील गुप्ता भेटले. त्यांच्याशी आसन लावण्याविषयीची माहिती घेत असताना, त्यांनी गावात शेवटी, त्यांच्या शेतातील सनातन संस्थेविषयी माहिती दिली व तेथे जाऊन आसन लावावे, असे सुचविले. सनातन संस्थेला श्री गुप्ता कुटुंबीयांनी सुमारे सव्वा एकर जमीन दान दिली आहे. त्यात नर्मदा मंदिर होणार आहे. मंदिरासमोर असलेल्या रिकाम्या जागेवर शेती करून त्याचे उत्पन्नही संस्थेला राहील, असा दृष्टिकोन यामागे होता. या आवारात एक दुमजली इमारत होती. त्या इमारतीच्या ओसरीवर आसन लावले. स्वच्छ ओसरी, समोर हिरवेगार शेत, पडलेला चंद्रप्रकाश , निरव शांतता व परिसरात फक्त आम्ही चौघे जण. न विसरता येण्याजोगा परिसर. त्यापेक्षा आणखीन काय हवे. रात्री श्री सुनील गुप्ता यांचे काका श्री गिरीधर लालजी गक्षम गरम मूगडाळ खिचडी घेऊन आले. सोबत लोणचे आणि छास. थंडीच्या या वातावरणात गरम गरम खिचडीचा हा भोजनप्रसाद याला तोड नाही. यापेक्षा स्वर्गीय सुख वेगळे काही असू शकत नाही. अन्नदाता सुखी भव. गुप्ता कुटुंबीयांचे दातृत्व पहा. आमच्यासाठी रात्री भंडारा घेऊन येणे, एवढी मोठी जमीन संस्थेला दान करूनही ती आम्ही दिली आहे, मंदिर आम्ही उभे करत आहोत, आमचे सगळे आहे असा कुठे उल्लेख नाही आणि त्याचा गर्व ही नाही. हे सर्व आम्हाला नंतर समजले. इतकी विनयशील माणसे वेळोवेळी भेटली ही मैयाची कृपाच म्हणायची.
गिरीराज गिरीधर लालजी गप्पा मारताना म्हणाले, तुम्ही जर काही लिहिणार असाल तर पिपरिया गावात आसन लावण्याची आणि अन्नक्षेत्र या दोन्हीची व्यवस्था गुप्ता कुटुंबीय करतात, हे आवर्जून नमूद करायला सांगितले. म्हणजे इथे या परिसरात कोणी आले तर त्यांची आसन लावण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था येथे होते, हे दूरवर समजावे,असा उदार दृष्टिकोन दिसून आला. हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय विश्वास बसणार नाही, अशी माणसे मैयाकिनारी सतत भेटत असतात. श्री सुनील गुप्ता यांच्या एक भगिनी या शास्त्र शाखेतील पदवीधर. त्या सध्या भारत, चीन व बांगलादेश सीमेवर हिंदू धर्म प्रसाराचे काम करतात. गिरधर लालजी थोड्यावेळाने त्यांच्या निवासस्थानी गेले. नंतर आम्ही बराच वेळ त्या शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घेत बसून होतो. रात्रीचा तो अनुभव अविस्मरणीय होता.
नर्मदे हर...
नर्मदा परिक्रमा- पुष्प २८
सनातन संस्थेची जमीन हिस्सेदारीवर कसणारे व तेथेच राहणारे शेतकरी श्री नथ्थूसिंग यांनी पहाटे साडेपाच वाजता चहा दिला. मस्त कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये ग्लासभर गरमागरम चहा पिऊन आम्हां चौघांचे कुडकुडणे कमी झाले. येथे नर्मदा मैयाचे मंदिर झाल्यावर, पूर्णवेळ सेवाकार्यास वाहून घेणार असल्याचे, ते व त्यांच्या पत्नी सविता माताराम म्हणाल्या. खूप समाधानी माणसे भेटतात. मंदिर झाल्यावर पुन्हा या, असे म्हणाले. इकडे शहरात पहाटे साडेपाच वाजता थंडीमध्ये लोक उठायचे सोडाच, पांघरूण आणखीन ओढून गुरफटून झोपून जातात आणि सकाळी सात नंतर सुर्योदय झाल्यावर उठतात.सकाळी साडेपाच वाजता उठून, कोण कुठचे, ओळखीचे ना पाळखीचे त्यांच्यासाठी चहा देणे तर दूरच... या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आदरातिथ्य हृदयात घर करते. एरवी घरामध्ये अर्धा कप चहा एका वेळेला पिणारे आम्ही. थोडा थोडा चहा दोन-तीन वेळेला घेतो. त्याच्यापेक्षा जास्त झाला तर पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी नक्की. या पार्श्वभूमीवर मैयाकिनारी तुम्ही ग्लासभर चहा प्या, कितीही वेळा प्या. काय बिशाद तुम्हाला त्रास होईल. उलट तुमच्यात जास्त तरतरी येईल, खात्री बाळगा.
त्यांचा निरोप घेऊन गावात आल्यावर एका दुकानदाराने पुन्हा घरातून चहा मागवून घ्यायला लावला. नाही म्हणवत नाही.थंडीत चहा म्हणजे टॉनिक...घेतला. सकाळी सात वाजता बसने पुंजापुराला निघालो. थोडे थोडे जंगल, थोडी शेती, मधूनच चिमण्यांच्या थव्यांचे दर्शन. शहरात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या तरी ग्रामीण भागात वळचणीच्या जागा घरट्यांसाठी मिळत असल्याने चिमण्यांचे अस्तित्व तेथे अजून आहे. प्रवास चालू होता. एरवी मध्यप्रदेशात अतिशय कूर्मगतीने गाड्या चालतात. आज मात्र गाडीचे चालक महाशय खुशीत होते. गाडी सुसाट होती. चालू गाडीतच आम्ही आमच्याकडचे नाश्त्याचे पदार्थ ग्रहण केले. किरणने पुण्याहून येताना आणलेले लाडू संपले होते. आता आपल्याला लाडू केव्हा मिळणार, अशी आमच्या दोघांची चर्चा बसमध्ये चालू होती. दरम्यान एक
माताराम अंदाजे त्यांचे वय साठ पासष्ठ असावे, साडेसातच्या दरम्यान गाडीत चढल्या. त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांना वाटेत कुठेतरी जायचे होते. तिकीट साठ रुपये. त्यांनी पन्नास रुपये दिले कंडक्टर म्हणाला साठ रुपये द्या, नाहीतर खाली उतरा. त्या दोघांचा वाद सुरू झाला. मला गाडीत सकाळीच मादक पेयाचा वास जाणवला. त्या मातारामची अडचण, मी कंडक्टरला विचारली असता तो म्हणाला, त्यांच्याकडे दहा रुपये कमी आहेत. मी म्हणालो, मी भरतो. तो म्हणाला थोडे थांबा. त्या दारू प्यायला आहेत. मग मला त्या वासाचे रहस्य कळले. दहा मिनिटे होत नाही तोच त्या मातारामनी अजून एक पन्नासची नोट काढून कंडक्टरला दिली. मला हे सर्व पाहून, ऐकून, अनुभवून धक्का बसला. नंतर त्या माताराम बसमध्ये छान बिडी ओढत बसल्या होत्या. कंडक्टर मला म्हणाला, बघा !!! मनातल्या मनात कपाळाला हात लावला. काय बोलणार...
सकाळच्या चर्चेमुळे बसच्या कंडक्टरशी जरा ओळख झाली होती. वाटेत सतवासला बस थांबली तेव्हा त्यान आग्रहाने मला आणि किरणला खाली चहा प्यायला नेले. वरती बिस्कीट पण खायला घातले. पुंजापुरा,सतवास मार्गे दुपारी दोन वाजता नेमावरला पोहोचलो. ब्रह्मचारी आश्रमात गेलो. हा आश्रम विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारी महाराजांनी स्थापन केला. त्यांनी येथे तपश्चर्या केली. श्री विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारी महाराजांचा शक्तिपात योगाचा विशेष अभ्यास. आश्रमाचे उत्तराधिकारी घनश्यामजी गाडगीळ (जोशी) चौतीस वर्षे येथे आहेत. गाडगीळ महाराज ब्रह्मचारी असून ते मूळचे सांगली (महाराष्ट्र) येथील. गाडगीळ महाराजांचे वय अंदाजे ७५ वर्षे. पोटापर्यंत दाढी, मानेवर रूळणारे केस, निळे डोळे, चेहऱ्यावर साधनेचे तेज, अंगावर कमरेस फक्त पंचा, मृदू वाणी, अधिकार व मर्यादा यांचा उत्तम मिलाफ, कल्पनातीत आदरातिथ्य,अनेक भाषांवर प्रभुत्व ही मला जाणवलेली थोडीफार वैशिष्ट्ये. अजूनही बरीच जाणून घ्यावी लागतील, इतके अथांग व्यक्तिमत्व व त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार होता. गाडगीळ महाराजांचा नेमावर क्षेत्री आदरयुक्त दबदबा आहे. गाडगीळ महाराजांचा दिवस मैया स्नानाने ब्रह्म मुहूर्तावर पहाटे तीन वाजता सुरू होतो. नंतर ते शेजारच्या सिद्धनाथ महादेव मंदिरात रोज नित्यनेमाने भस्मारतीसाठी जातात. नंतर त्यांची नित्यकर्मे सुरू होतात.
आम्ही आश्रमात गेल्या गेल्या गाडगीळ महाराजांच्या दर्शनाला गेलो. गाडगीळ महाराजांच्या कुटीत श्री विश्वनाथ प्रकाश जी ब्रह्मचारी महाराज यांची चौरंगावर तसबीर विराजमान आहे. त्याच्या समोरच धर्मग्रंथाचे वाचन चालू होते. अजूनही काही भक्तगण तिथे बसलेले होते. आमच्या नंतर एक माताराम पण तिथे येऊन बसल्या. वाचन पूर्ण झाले. त्या मातारामनी आणलेल्या डब्यातील पदार्थाचा नैवेद्य दाखवला. नंतर प्रत्येकाला क्रमाक्रमाने पुढे बोलावून, प्रत्येकाच्या हातात प्रसाद दिला. किरण व मी सुद्धा ओळीत जाऊन प्रसाद घेतला. गाडगीळ महाराजांनी आमच्या दोघांचे हातावर मोतीचुराचे, शुद्ध तुपातील दोन- दोन लाडू ठेवले. टचकन डोळ्यात पाणी आले. गाडगीळ महाराजांपासून ते लपवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते लक्षात आले असावे. शेवटी त्यांचा अनुभव दांडगा आहे.
सकाळी सात वाजता, किरण आणि मी गाडीत क्षुल्लक गोष्टीची मागणी काय ती केली आणि दुपारी दोन वाजता मैयानी आपले लाड लगेच पुरवले. अवीट गोडीचा तो प्रसाद...अवर्णनीय. तेसुद्धा एक नाही तर दोन लाडू. वेळोवेळी हे असे अनुभव येत राहतात. नंतर वाटते आपण कशासाठी असे मागतो आणि मैया ची परीक्षा बघतो. उलट, खरे सांगायचे तर मैयाच आपली परीक्षा बघत असते. तुम्ही मोहापासून दूर जात आहात का अजून त्याच्यात अडकलेला आहात. पण आपण मोहापासून दूर न जाता, त्यात अडकलेले आहोत हेच सिद्ध करतो. खरे तर जे मागायला हवे ते आपण मागतच नाही. किंबहुना तशी बुद्धीच होत नाही, हे परिक्रमेतील एक वैशिष्ट्य आहे. हे मला खूप उशिरा लक्षात आले. खरेतर मैया किनारी तुम्हाला मागण्याची गरजच नाही. तुम्ही मनातही आणण्याची गरज नाही. सगळे आपसूक होत असते. ते सगळे ठरलेले आहे. तुम्ही केवळ निमित्त आहात. येथे येणे, परिक्रमेत सहभागी होणे आणि परत जाणे सगळे काही पूर्वनियोजितच असते. तुम्ही उगीचच मी परिक्रमा करतोय म्हणून मनात गर्व करून, त्याचे डंके पिटवत असता. खरे तर त्याची काहीच गरज नाहीये.असो.
हा आश्रम अत्यंत साधा तरीही स्वच्छ.
अतुलनीय आदरातिथ्य करणारे ज्येष्ठ, अनुभवी, अधिकारी असे मनस्वी महंत. असे की येथून निघूच नये असे वाटते. निर्णय घेता येत नाही. द्विधा मनस्थिती होते. मैया तुमची परीक्षा घेते. तुम्ही थांबणार का निघणार हे मैया बघत असते. चातुर्मास आणि आजारपण या दोनच गोष्टी याला अपवाद. बाकीच्या सगळ्यांनी न थांबता, कायम पुढे निघायचे... मैयाच्या प्रवाहासारखे, अविरत न थांबता.
आश्रमात मुक्कामी असताना आश्रमातील सेवाभावी व अन्य परिक्रमावासीही नेहमी भेटत असतात. नेमावरला आश्रमात श्री अशोक जोशी, या नावाचे सेवाभावी भेटले. ते मूळचे मध्यप्रदेशातील. केंद्र सरकारमध्ये साक्षरता अभियानात नोकरीला. ते ब्रह्मचारी आहेत. आई वडिलांच्या पश्चात आश्रमात येऊन सेवाभावीवृत्तीने यथाशक्य सेवा करतात. येथेच मुंबईचे अभिजीत सावे व नंदकुमार वाघ भेटले. दोघे परिक्रमेत होते व येथे तीन-चार दिवस मुक्कामी होते. त्यांनी काही माहिती दिली. आम्ही आश्रमात येण्यापूर्वी थोडा वेळ आधी सकाळी, गुजरातचे लक्ष्मीराम जोशी नावाचे एक ८४-८५ वर्षाचे परिक्रमावासी आश्रमात आले होते. त्यांच्या १० परिक्रमा झाल्या होत्या. त्यांना अकरावी परिक्रमा करायची होती, पण दृष्टी अधू झाल्यामुळे ते गुजरातला घरी परत गेले. त्यांची आणि आमची भेट काही वेळाने चुकली. एका महात्म्याची भेट होता होता राहिली. मनाला रुखरुख लागून राहिली. मैयाची इच्छा. आश्रमाशेजारी दंडवती स्वामींचा परिक्रमा पूर्ण झाल्याचा सकाळपासून भंडारा चालू होता. यांनी दंडवत घालत परिक्रमा पूर्ण केली होती. आपण कल्पनाही करू शकत नाही. साधे चालत परिक्रमा करणे हे सोपे नाही. इथे तर दंडवत घालत परिक्रमा करणे, ही सगळी शक्ती आणि हा सगळा विश्वास मैयाच देते. दैवीकृपा असलेली ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वे. नशीब असल्यासच तुमची भेट घडते. दरवेळी वेगळी माहिती मिळते.
सायंकाळी गाडगीळ महाराजांनी सर्वांना बोलवून गरम-गरम मेदूवडे दिले. मेदूवडे खाल्ल्यानंतर किरण व मी सूर्यास्ताच्या वेळी मैयाकिनारी जरा वेळ जाऊन बसलो. त्यावेळी तिथे सायंकाळी नेहमीप्रमाणे मैयाची लेकरे तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत-जात होती. आम्ही तेथे घाटावर बसलो असताना, एका मातारामनी तीन-चार पणत्या आरती करताना मैयेत सोडल्या. त्या हळूहळू पुढे जात होत्या. थंडीमुळे दिनकराने आपली सूत्रे निशेकडे लवकरच सुपूर्त केली होती. जाता जाता दिनकर, तिच्या स्वागतासाठी आकाशात केशरी रंगाची मुक्तहस्ते उधळण करून गेला होता. आश्रमाशेजारील पूल, केशरी रंगाची क्षितिजावरील उधळण आणि सायंकाळी मातारामने मैयेच्या आरतीसाठी सोडलेल्या त्या पणत्या... विहंगम दृश्य होते. हळूहळू निशेने नभावर चांदण्यांचा पडदा ओढला.
आश्रमात श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या पाषाणातील पादुका आहेत. ते परिक्रमेत असताना येथे थांबून पुढे गेले होते. त्यांची आठवण, पादुका स्वरूपात येथे जतन करून ठेवली आहे. रात्री भोजनप्रसादात फोडणीचे वरण, पोळी, खिचडी, चटणी असा छान योग होता संपूर्ण महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण बर्याच दिवसांनी नर्मदा परिक्रमेत मिळाले. पुण्यभूमीतला प्रसाद. मैयाची कृपा.
रात्रीचे साडे नऊ वाजून गेले होते. सर्वजण केव्हाच झोपेच्या अधीन झाले होते. मी एकटाच आश्रमाच्या मैयेकिनारी असलेल्या चौथरावजा ओसरीवर उभा होतो. समोर मैया चे संथ वाहणारे आणि विशाल पात्र. फक्त रातकिड्यांचाच काय तो आवाज. पाण्यात समोरच्या किनार्यावरच्या दिव्यांचे पडलेले प्रतिबिंब, सर्वदूर चंद्र प्रकाश पसरलेला, चंद्र प्रकाशात न्हाऊन निघालेला सिद्धनाथ महादेव मंदिराचा घुमट आणि कळस, आश्रमाशेजारच्या पुलावरून जाणार्या-येणार्या गाड्यांचे लुकलुकणारे दिवे, सर्वत्र नि:शब्द शांतता... बराच वेळ हे सर्व अनुभवत, मनात साठवत होतो. ब्रह्मचारी बाबांचा हा आश्रम मला बरेच काही देऊन गेला. मनाला भावलेला अजून एक आश्रम. साधेपणा,माणुसकी, स्वच्छता, अगत्यशील महाराज व पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे पवित्र वातावरण... मैया दोन्ही हाताने देते आहे. तुमची दोन्ही हातांची ओंजळ कितीशी पुरणार... रात्र वाढत होती, पाय निघत नव्हते पण अंग टेकण्याशिवाय पर्याय नव्हता. बरोबर सर्व परिक्रमावासी केव्हाच झोपेच्या अधीन झाले होते. सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असा हा आश्रम आहे, असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. भपका , डामडौल नसला तरी साधनेतून आलेले मोठेपण काय असते, हे अनुभवण्यासाठी श्री विश्वनाथ प्रकाशजी ब्रह्मचारी यांच्या या आश्रमात जरूर जाऊन आशीर्वाद घ्यावा.
किरण, छोटेलाल व धनराज निद्रेच्या स्वाधीन झाले होते. परिक्रमावासी ने पलंगावर झोपू नये, असा संकेतअसताना सुद्धा एक परिक्रमावासीने छानपैकी दिवाणावर आसन लावले होते. त्याच्या शेजारीच खाली, पोथ्या,देवाचे फोटो, नर्मदा जलाची बाटली, नित्यकर्माची पुस्तके असा संसार प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवला होता. त्याच्या आजूबाजूला, पिशव्या-फळे-औषधे पसरून ठेवल्या होत्या. वहिवाट म्हणजे काय ते मला आत्ता समजले. उरलेल्या जागेत चौघांसाठी लावायला जागा होती. त्यातच माझे तीन सहकारी दाटीवाटीने झोपले होते. उरलेल्या जागेत मी पाठ टेकली. थंडीत जवळ झोपून तेवढीच ऊब मिळावी आणि उगीच तुम्ही उतायला मातायला नको म्हणून मैयानी, आमची जागा आम्हाला दाखवून दिली असावी...
आम्हाला एक रात्र काढून पुढे निघायचे होते. उद्या आश्रमात दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. उद्या चंद्रग्रहण असल्यामुळे आश्रमाच्या वेळापत्रकात काही बदल झालेले होते. किरण उद्या सकाळच्या गाडीने इंदूरहून पुढे पुण्याला जाणार होता. त्याचा चार दिवसाचा सहवास संपणार होता. मी परिक्रमा सुरू केली, तेव्हा व आत्ता असा दोन वेळा त्याचा येथे येण्याचा योग आला. आता परत, शेवटी ओंकारेश्वरला परिक्रमा संपन्न होताना किरण येणार होता. त्याचा हा योग होता. मैया कृपा... आला गेला, आला गेला... चालूच राहणार होते. उद्यापासून धनराज आणि छोटेलाल यांच्याबरोबर पुढचा प्रवास...नर्मदे हर.
सकाळी आश्रमातून निघताना गाडगीळ महाराजांना भेटलो. त्यांनी तीर्थप्रसाद दिला. ब्रह्मचारी महाराजांच्या तसबिरीसमोर नाममात्र दक्षिणा ठेवली. त्यावेळी त्यांनी तुम्हाला काही वस्तू, पैसे वा अन्य मदत हवी असल्यास सांगा, असे आवर्जून सांगितले.आणखी मागण्यासारखे काय होते आणि कितीही घेतले तरी ते कमीच. महाराजांचे औदार्य शब्दातीत, मग आपण मनाचा कोतेपणा का दाखवावा. त्यांना वाकून नमस्कार केला आणि फक्त आशीर्वाद द्या असे म्हणालो. त्यांना नम्रपणे काही नको असे सांगून जड मनाने आश्रम सोडला.
नर्मदामैयाचे,
अमरकंटक हे मस्तक तर
रेवा सागर हे चरण
आणि नेमावर हे नाभिस्थान आहे. नेमावरला ब्रह्मचारी आश्रमाच्या समोरच मैयेच्या मध्यभागी असलेल्या पाषाणामध्ये बेंबीच्या आकाराची अशी खोल जागा आहे. ते नर्मदामैयाचे नाभीस्थान. म्हणून नेमावर ला अमरकंटक, रेवासागर प्रमाणेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिक्रमावासींना परीक्रमाभंगाच्या संकेतामुळे मैयेच्या पात्रात, दूरवर आत जाता येत नाही. दुरूनच दर्शन घ्यावयाचे असते. आम्ही तसेच दुरूनच दर्शन घेतले.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प २९
किरण बसने पुण्याला निघणार होता. त्याला बस स्टँडवर सोडून आम्ही पुढे निघालो. नंतर केव्हातरी गाडगीळ महाराजांनी देह ठेवल्याचे समजले. त्यांचे इहलोकीचे कार्य संपन्न झाले आणि पारलौकिक प्रवास सुरू झाला. नर्मदा मैया कृपेने एका महात्म्याची भेट झाली, त्यांचा सहवास लाभला आणि आशीर्वाद मिळाले हे आपले भाग्य...
छोटेलाल धनराज आणि मी तिघे निघालो. मैया किनाऱ्यावरील पगदंडीवरून मेळघाटमार्गे पुढे जात होतो. पात्रात वाळू उपशाचे काम चालू होते. कडेला थांबलेला एक तरुण आम्हाला बघून म्हणाला, बाबाजी समोरच्या स्टाॅलवर चहा घ्या. चहा व पोहे घेतले. त्यांनी फक्त पोह्याचे पैसे घेतले. येथे पोह्याची एक गंमत आहे. येथे पोह्याला तेलाची फोडणी घालत नाहीत. पोहे गरम करून त्यात मीठ, मिरच्या आणि हळदीच्या ऐवजी पिवळा रंग घालतात. गंमत वाटली. परंतु असे पोहे खायची सवय झाली होती. हे सांगायचे राहून गेले होते. ते आठवले म्हणून लिहिले.स्टॉलचालक तरूणाने निघताना आमच्या हातात नारळ, साखर फुटाण्याची पुडी, वर अकरा रुपये दक्षिणा ठेवून नमस्कार केला. त्या तरुणाच्या पत्नीने वेगळी प्रत्येकी पाच रुपये दक्षिण आम्हाला तिघांना दिली. वाळू उपशाचे काम करून सोबत हा जोडधंदा करणारी ही मंडळी. आपण म्हणतो तसे कोंड्याचा मांडा करून दिवस ढकलायचा. वाळू उपसा करणार्या कामगारांचा नाष्टा, सकाळ-संध्याकाळचे जेवण याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह. त्या तुटपुंज्या उत्पन्नातही त्यांचे हे औदार्य, दातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करते. वेळोवेळी आपल्याला धडे मिळत असतात.तिथून पाय उचलण्यापूर्वी मी त्या मातारामच्या हातात प्रसाद म्हणून नारळ, तर लहान मुलाच्या हातात खाऊसाठी त्यांनी दिलेले दक्षिणेचे सोळा रुपये आणि माझ्याकडची दोन चॉकलेट ठेवली. छोकरा खुश झाला. चॉकलेट पाहून त्याच्या चेहर्यावरचे हास्य बरेच काही सांगून गेले. त्याच्या डोक्यावर हात ठेवून, टाटा करून त्यांचा निरोप घेतला. आपल्याला समजत नाही पण हे ऋण असते. त्याच्यातून उतराई होता येत नाही. परतफेड तर शक्यच नाही. त्यांनी दिलेल्या फुल ना फुलाच्या पाकळीचा आपण मान ठेवावा आणि आपणही ते शक्य असल्यास उतराईचा काही मार्ग दिसल्यास जरूर अवलंबावा. या हृदयीचे त्या हृदयी. नुसता हातात हात घेतला तरी पुरेसे. मैयेचे लक्ष असते तुमच्याकडे.
गौनी संगमाच्या पुढे, मैया पात्रात परशुराम मातापित्यांच्या मूर्ती व पाच पाषाणातील पिंड ( लाडू ) एका दगडावर आहेत. परशुरामाने नर्मदा परिक्रमा करून येथे पितरांचे श्राद्ध केले ,त्याचे हे पिंड अशी आख्यायिका आहे. त्याचे दर्शन घेऊन चिचली,बिजलगाममार्गे पुढे निघालो. वाटेत मैया किनारी सुतार पक्षी व हनीसकर दिसला. दुपारी बाराच्या दरम्यान पिपलनेरीयाला पोहोचलो. येथे राम मंदिरात प्रसाद भोजनप्रसादासाठी थांबलो. येथे अन्नक्षेत्र आहे.परंतु भंडारी बुवा कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे येथील रामदास महाराजांनी सदाव्रत दिले व आश्रमाच्या भोजनशाळेत अन्न सिद्ध करण्यास सांगितले. महाराजांचे वय ८० च्या दरम्यान असावे. त्यांनी, त्यांच्या भांडारातून एक पदार्थ स्वतःआणून दिले. पळी,वाट्या,तवा स्वतः धुवून आणून दिले. प्रकृती अस्वास्थ्य व वार्धक्यामुळे त्यांच्या चालण्यात सहजता नव्हती. पण तरी सुद्धा जमेल तसे ते करीत होते.तरीसुद्धा आदरातिथ्य किंचितही कमी झालेले नव्हते. छोटेलाल व धनराज यांनी अन्न सिद्ध केले, तर मी वाळलेली लाकडे आणून दिली. भांडी धुवून देणे, पाणी आणून देणे, ताटल्या धुवून, जेवणाची तयारी करणे इत्यादी कामे मी माझ्यापरीने केली. त्या दोघांचा आग्रह कायम, मी बसून राहावे असा होता. तरीसुद्धा माझ्या मनाला ते पटले नाही. मुगाची डाळ, बटाटा रस्सा भाजी, पोळपाटावर लाटून पोळ्या... चालून निर्माण झालेल्याभव अग्नीला या भोजनप्रसादाची आहुती दिली. मन तृप्त झाले.अन्नदाता सुखी भव. भोजनप्रसादोत्तर एक तास विश्रांती घेऊन, ताजेतवाने झालो. निघताना आश्रमातील रामदास महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि छिपानेरला निघालो.
छिपानेरला दादा धूनीवाले धर्मशाळेत गेलो. दादा धूनीवाले मंदिरात झंडा चढाया था. झंडा चढाया म्हणजे विशिष्ट कारणामुळे उत्सव असतो, तेव्हा झेंडा उभारतात. यामुळे दादा धूनीवाले मंदिरात तोबा गर्दी होती. परिसरात दुकाने, रहाटगाडगी, खेळ यांची जत्रा भरली होती. धर्मशाळेत पाय ठेवायला जागा नव्हती. आम्ही तेथून जवळच असलेल्या राम मंदिरात गेलो. तेथील पुजारी गृहस्थ होते .त्यामुळे घरसामान आणण्यासाठी जत्रेतील बाजारात गेले आहेत, असे कळले. येथे नवीन राम मंदिर बांधल्यामुळे जुन्या मंदिरात आश्रम केला आहे. नवीन राम मंदिरात आसन लावू देत नाहीत. जुन्या मंदिरात ओसरीवर आसन लावले. मी स्नानासाठी मैयेवर गेलो. येथे मैयेवर घाट नसल्याने, पात्रात शिरलेल्या पाषाणांवर बसून स्नान करून कपडे धुतले. सायंकाळ झाली,अंधार पडला. अजून वीज आलेली नव्हती. साडेसात वाजता वीज येणार असे समजले. दरम्यान जत्रेत जाऊन चहा पिऊन त्या दोघांसाठी कमंडलूतून चहा आणि केळी आणली. आश्रमामध्ये आम्ही आसन लावले होते, तेथे छतातून पाइपमधून पाणी गळू लागले. त्यामुळे आत मध्ये आसन लावू का असे पुजाऱ्यांना विचारले, त्यावर तेथेच सरकवून आसन लावा असे सांगितले. तेथे जागाच नव्हती. त्यामुळे आसन आवरुन ठेवले. नंतर एक, मौनात असलेले सन्यासी परिक्रमावासी आले. त्यांना पुजाऱ्यांनी आतल्या बाजूस असलेल्या खोलीमध्ये आसन लावण्यास जागा दिली. आम्हाला दुपारी उशिरा भोजन प्रसाद झाल्यामुळे भूक नव्हती,त्यामुळे तसेच झोपण्याचे ठरवले. रात्री दादा धुनिवाले आश्रमात भजने सुरू झाली. बरीच भजनी मंडळी आली होती. प्रत्येक जण आपल्या परीने काळी पाच स्वर लावत होता. आम्ही थोडे दूर असूनही आणि दमून सुद्धा भजनी मंडळांनी आम्हाला जागे ठेवण्याचा यथाशक्य प्रयत्न केला. बोचरी थंडी आणि चढाओढीने म्हणली जाणारी भजने यामुळे पहाटेपर्यंत निद्रादेवी उत्तर तटावर पोहोचू शकली नाही. वेगळा अनुभव आला. पहाटे नित्यकर्मासाठी धर्म शाळे बाहेर गेलो असताना केव्हातरी पाणी आले आणि काल छतातून जाणाऱ्या पाइपमधून जोरात पाणी उडू लागले. आमच्या तिघांची आसने पूर्णपणे भिजली. पुजारी हे सर्व शांतपणे पहात होते. दिवसभर पाणी लागणार त्यामुळे भरावे लागले, हे वर आम्हालाच ऐकवले. हा अनुभव बाकी होता, तो ही मिळाला. आजपर्यंत खूप कोडकौतुक झाले होते, लाड झाले होते, गोडधोड खायला मिळाले होते.मैयानी आम्हाला आपली जागा दाखवून दिली. संयम शिकवला. कशीही परिस्थिती आली तरी काहीही बोलायचे नाही, हा धडा दिला. अशी परिस्थिती येऊ शकते याची जाणीव करून दिली. चुपचाप आसने आवरली आणि सात वाजता तिथून बाहेर पडलो.
जत्रेतील चहाच्या दुकानात जाऊन चहा घेतला. तेथे भोपाळला राहणारे व मराठी बोलणारे भास्कर मोघे भेटले. ते दादा धुनिवाले महाराजांचे शिष्य आहेत. ते कालच गाडी करून सहकुटुंब आले होते. आज परत निघणार होते. आम्ही परस्परांचे फोन नंबर घेतले. प्रत्यक्ष नाही पण निदान फोनवर तरी संपर्क होऊ शकतो. एक नवीन मैत्री.
मैया किनाऱ्यावरील पगदंडीवरून चालताना वाटेत, बोटीमध्ये मोटरसायकल, स्कूटर घालून पैलतीरावर कामाला निघालेले बरेच कामगार दिसले. मैया पलीकडे जाण्यासाठी फेरीबोट नसल्यामुळे धोकादायक असला तरी, बोटीचा दैनंदिन उपयोग त्यांना मजबुरीने करावा लागत होता. सगळ्यांची जगण्याची लढाई चालू होती. पाय ऊचलले. नर्मदे हर...
पुढे मैया किनारी गाई-म्हशी चरायला सोडून एक शेतकरी बुवा मस्त ऊन खात गवतावर बसले होते. त्यांचे नाव साईराम. पाच मिनिटे त्यांच्यापाशी थांबून पाणी प्यायलो, गप्पा मारल्या आणि त्यांना नर्मदे हर करून पुढे निघालो.
आमचा मैया किनाऱ्याने प्रवास चालू होता. जागा नसल्यास पगदंडीपासून थोडे वर चढून शेतातून पायवाट शोधायची. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शोध घ्यायचा, रस्ता सापडतो. नाही सापडला तर नर्मदे ssss हर आहेच. वाटेत सातदेव आणि चौरसखेडी गावांदरम्यान सीप नावाच्या नदीचा मैयेशी संगम होतो. मूलचंद केवट नावाच्या नावाड्याने आम्हाला पैलतीरावर नेले. मूलचंद हे काम परिक्रमावासींसाठी मोफत तर इतरांसाठी पैसे घेऊन करतात. त्यांच्या हातात बळेच पैसे कोंबले. गरीब माणूस. असे किती पैसे मिळत असणार. त्यांचा सेवाभाव असला तरी आपल्यालाही माणुसकी दाखवण्याची गरज असते. तेथे एक सात-आठ महिन्यांचा छोटा श्वान दिसला. काठावर कुई कुई करत बसला होता. त्याच्या मागच्या उजव्या पायाला लागले होते. तो लंगडत होता. तेव्हा विचारल्यावर, मूलचंद केवट म्हणाले, एक संन्यासी याला पिल्लू असताना पिशवीत घालून येथवर आला होता. वाटेत केव्हा तरी तो हाडाचा तुकडा घेऊन सन्याशाकडे आला. त्यांनी त्याला हाकलण्यासाठी कुबडी फेकली ती त्याच्या पायाला लागली. त्यामुळे तो लंगडत होता. त्याला मी शेताच्या राखणीसाठी ठेवून घेतले. छिपानेरला जाऊन, गुराच्या डॉक्टरांना त्याला दाखवून, औषधोपचारासाठी त्यांनी चारशे रुपये खर्च केले होते. असे मैयेतून निघालेले माणुसकीचे झरे तुम्हाला जागोजागी दिसतात आणि तुम्हाला माणुसकीचे आदर्श घालून देतात.
पुढे ढिगाळी गावात आलो. तिथे गुलाबसिंग नावाच्या व्यक्तीचे चहाचे व पानाचे दुकान होते. त्यांनी आग्रहाने चहा घ्यायला लावला. सर्व परिक्रमावासींना ते मोफत चहा व गरजेनुसार साहित्य देतात. पती, पत्नी, एक मुलगा, दोन मुली एवढे त्यांचे कुटुंब. शेती नाही. गावातल्या दुकानावरती चरितार्थ चालवतात. परिक्रमावासींची यथाशक्य सेवा करून परमार्थही साधतात. छिपानेरच्या राम मंदिरात आमच्या सोबत आसन लावलेले मौनात असलेले संन्यासी, आम्ही गुलाब सिंग यांच्या दुकानात असताना तेथे आले व ते मुकाभिनय करत हातातला मोबाइल दाखवून याचे रिचार्ज कुठे मिळेल असे विचारत होते. त्यांचे आयडिया कंपनीचे सिम कार्ड होते आणि त्यांना रिचार्ज करायचे होते. गुलाबसिंग यांच्याकडे ती सुविधा नव्हती. मनात विचार आला कसला हा मौनी बाबा आणि कसली याची मौनातील परिक्रमा. मौनात असताना त्याला मोबाईलची गरज काय आणि रिचार्ज करून तो मोबाईल वर बोलणार काय. सगळे पहावे ते नवल आणि ढोंगाचा कळस. भगवे कपडे घातले म्हणजे हे झाले सन्यासी आणि यांच्या पायावर डोके ठेवायला धडपडणारी अडाणी जनता. यांच्यासारख्या ढोंगी संन्याशांमुळे खरे संन्यासी लोकांना खोटे वाटतात. दिवसभर हा मौनीबाबा आमच्या मागे पुढे चालत होता. नंतर त्याच्याशी आमचा काही संपर्क आला नाही.
परिक्रमा मार्गावर असे अनेक गुलाबसिंग भेटत राहतात. काहींची नावे लक्षात राहतात, काही विसरली जातात,काहींची विचारायची राहतात. अनेक प्रकार. ही सर्व मैयाची मुले म्हणजे आपली भावंडेच. त्यांची थोडीफार दखल घेण्याची तसदी घेणे ही मैयेप्रति आपली
कृतज्ञताच. हे सर्व जण त्यांनी स्वीकारलेल्या व्रतामध्ये एकनिष्ठ आहेत. कर्तव्यतत्पर तर आहेतच, शिवाय प्रसिद्धी पराङमुख पण आहेत. शक्य असल्यास आपण प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करावा. त्यांच्या कार्यात आपला खारीचा वाटा. देव माणसात असतो म्हणतात तो हाच. कुठे परमेश्र्वर प्राप्तीसाठी छिपानेरच्या दादा धूनी वाले आश्रमामध्ये पहाटेपर्यंत कर्णकर्कश्य आणि कानठळ्या बसणाऱ्या आवाजात चाललेली भजने आणि कुठे ही सेवा. कसा त्यांना परमेश्वर प्रसन्न व्हायचा. शहर म्हणू नका आणि ग्रामीण भाग म्हणू नका, सगळीकडे नुसता श्रद्धेचा बाजार आणि लाउडस्पीकरचा गोंगाट. जेवढा आवाज मोठा तेवढी भक्ती मोठी, असे समीकरण झाले आहे. या माणसांची सेवा मात्र कुणालाही न सांगता, कुठेही जाहिरात न करता, लाऊड स्पीकर न लावता, आरडाओरडा न करता, फ्लेक्स, बोर्ड न लावता गुपचूप चालते. दानशूरतेचा आव तर त्याहून नाही. कर्णाच्या अवताराचा भाव नाही. शक्य असेल तेव्हा, वस्तूरूपी नाही, तर आर्थिक स्वरूपात आपण यांना मदत करावी. आपल्याला पावले उचलावी लागतात.. अपरिहार्य म्हणून पुढची सेवा घेण्यासाठी. अविरत... सर्व परिक्रमेभर हेच समोर येते. काय करावे, काय कारण असावे. शोधत होतो पण अजून उत्तर सापडले नव्हते.
जर मी या मैयाच्या बाळांची दखल घेतली नाही तर...
माझी साधना,
माझे जपजाप्य,
माझी मंत्राची आवर्तने,
माझी समाधी,
माझी ब्रह्मानंदी लागलेली टाळी....
या सगळ्या मी चा काहीच उपयोग नाही. याचे नगारे पिटण्यात काहीही हशील नाही, तुमच्यासमोर झालेले चमत्कार आणि जादूचे दाखले यांचा या लेकरांना काय उपयोग आहे. परमेश्वराच्या लेखी तर ते खरोखर शून्यच आहे. कारण एकनाथांनी सुद्धा देवासाठी भरून आणलेली पाण्याची कावड वाळवंटात पाण्याने तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात ओतली. कारण खरा परमेश्वर तिथे होता. मंदिरातल्या दगडात नव्हता. तिच्या या लेकरांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर एका दृष्टीने तुम्ही परमेश्वराकडे दुर्लक्ष केल्या सारखे नाही का. यावर एका महाराजांनी वेगळा विचार सांगितला. ते म्हणाले तुम्ही जसे मैय्याच्या भक्तीने आपापल्या परीने परिक्रमा करत आहात. त्याप्रमाणे तुमची सेवा करायला भक्त लागतात. तसे हे भक्त तुमच्या सेवेसाठी मैयेने ठेवले आहेत. यात कुठेही ऋण,जमा-खर्च हा भाव कोणीही ठेवत नाही आणि तुम्ही ठेवू नका. मला हा विचार पचला नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सर्व आश्रमातील महंत,साधू,संन्यासी आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरातील श्रीमंत,धनाढ्य भंडार्यासाठी देणग्या देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समोर लाचार असतात आणि श्रद्धेने, भक्तीने आश्रमात-मंदिरात येणाऱ्या भक्तांना मात्र लुबाडतात, ही वस्तुस्थिती डोळ्याने पाहायला मिळते. संन्याशाने संचय करू नये, हे एक साधे तत्त्व या लोकांना माहिती नसावे, हे यांचे दुर्दैव आहे. धान्याची कोठारे भरून ठेवा, पैशाच्या राशी लावा, भरजरी भगवी वस्त्रे, हातात सोन्याचे कडे, बोटांत अंगठ्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या, सोन्यात गुंफलेल्या रुद्राक्षाच्या माळा, आश्रमासमोर महागड्या गाड्या... सन्यासी असूनही ऐशारामात आयुष्य जगण्याची चढाओढ पाहायला मिळते. या ढोंगी लोकांपेक्षा ही मैयेची गरीब लेकरे चांगली. ते काही घेत नाहीत, उलट देतातच. उगीच लंगडे समर्थन करत होते महाराज, वाईट वाटले. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३०
पुढे सीलकंठला दुपारी साडेअकरा वाजता मंदिरात आलो. मंदिर नवीन बांधलेले. जमीन संगमरवरी. मैयाची संगमरवरी मूर्ती. परिसर मोठा होता. आवारातच हातपंप व स्वच्छतागृहाची सोय. विचारपूर्वक सर्व बांधकाम व अंतर्गत सजावट केल्याचे आढळले. मंदिरासमोर यज्ञशाळा आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सदाव्रत विचारून, गव्हाचे पीठ, तूर व मुगडाळ काढून दिली. छोटेलाल म्हणाले, आज तवा नाही. चला दाल-बाटी करू. मी लाकडे, पाणी, गोवऱ्या आणून दिल्या. धनराजने कणिक मळली व बाटी (कणकेचे अंडाकृती मोठे गोळे) केले. दरम्यान डाळ शिजून तयार झाली. निखार्यावर मस्त बाटी भाजली. मंदिरासमोर मैयाच्या सानिध्यात दाल-बाटीचा बेत. आणखी काय पाहिजे. मैयाची कृपा. पोटभर ग्रहण केले. अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर...
मंदिराशेजारून मैयेचा रेवासागरच्या दिशेने प्रवास चालू होता. विशाल पात्र होते. भोजनानंतर ते दोघे विश्रांती घेत होते. भोजनोत्तर मी दैनंदिनी लिहायला बसलो.
दरम्यान मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील अकरा मूर्ती आल्या. त्यांची भोजनप्रसादाची गडबड सुरू झाली. त्यांच्या त्या गटामध्ये बहुतेक सर्व साठीच्या दरम्यानचे परिक्रमावासी होते.
मध्यप्रदेश, छत्तीसगड या परिसरातील गरीबी व दारिद्रय यामुळे ग्रामीण भागातील लोक सहकुटुंब परिक्रमा करण्याच्या नावाखाली बाहेर पडतात. यात लहान व तरुण मुले सुद्धा असतात. स्त्रियांच्या डोक्यावर मोठमोठी बोचकी. यामध्ये अंथरायचे प्लास्टिक, धुतलेले कपडे, तवे, भांडी, चाकू, पातेली असे सगळे साहित्य असते. पुरुष मात्र काही न घेता चालत असतो. त्याच्या हातात फक्त काठी. त्यांनी पुढे चालायचे आणि या मातारामनी डोक्यावरचे बोचके सांभाळत, पायाखालचे खाच-खळगे, काटे बघत त्यांच्यामागे चालायचे आणि पळायचे. ही सर्व कुटुंबे प्रवास करताना वाटेत मिळेल त्या वस्तू ( ब्लँकेट, धोतर, लुंगी, चपला, ताट, वाटी)आणि दक्षिणेतून पैसे गोळा करतात. शहर किंवा एखादे दुकान दिसले की त्या वस्तू विकायच्या. त्याचे पैसे करायचे. पैसे पुरुषांनी खिशात टाकायचे, परत प्रवास सुरू. असे हे अव्याहत आठ महिने चालू असते. पावसाळा संपला की परिक्रमा सुरु करायची आणि पावसाळा सुरु झाला की आपल्या घरी जायचे. घरी तुटपुंजी शेती असेल ती करायची, नसली तर दुसऱ्याच्या शेतीवर चार महिने मोलमजुरी करायची. हा यांचा वर्षानुवर्षांचा, सालाबादचा कार्यक्रम. या लोकांमुळे परिक्रमा बदनाम झाली आहे. याचा फटका प्रामाणिकपणे परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींना बसतो. नको ते ऐकून घ्यावे लागते. पण पर्याय नाही. आलिया भोगासी असावे सादर. जे भोग येथील ते भोगायचे. कोणाला काही बोलायचे नाही. त्यांना सुधारायच्या भानगडीत पडायचे नाही. मैया सगळे बघते आहे. प्रत्येकाचे प्रारब्ध तिला माहिती आहे. तिच्यासमोर तुम्ही कोण.
आम्ही आवरून दुपारी अडीच वाजता नीलकंठ गावाकडे प्रस्थान ठेवले.नर्मदे हर. दुपारी साडेचार वाजता नीलकंठला पोहोचलो. आजचा मुक्काम नीलकंठला होता. येथे पंचायतन राम मंदिरात आसन लावले. लगेच मैयेवर स्नानाला गेलो, कपडे धुतले. दुपारच्या दाल-बाटी मुळे रात्री थोडेसा भोजनप्रसाद चालणार होता. मैयेवर घाट बांधण्याचे काम येथे सुरू होते.
घाटही मोठा बांधत होते. सर्वत्र धूळ दिसत होती. सिमेंट, लोखंड पडले होते. अवाढव्य व अवजड यंत्रे, ट्रक्सची सतत ये जा, मोठ्या प्रमाणावर सिमेंट-काँक्रीटचा वापर, सळयांचे ढीग. एकूणच भव्य घाट बांधून तयार होणार होता, याची चुणूक पाहायला मिळाली. मंदिर अगदी मैये समोर आहे. मंदिराचे आवार विस्तीर्ण होते.
मैयेवरून स्नान करून परत येताना, समोरच्या धर्मशाळेतील महाराजांनी आवर्जून बोलावून घेतले. चहा घ्या म्हणाले. दूध नव्हते, त्यांनी जाऊन दूध आणले. सर्वांनी चहा घेतला, सोबत बिस्किटे पण दिली. नंतर महाराजांनी सर्वांना भेळेचा प्रसाद दिला. काय वेगवेगळे अनुभव येतात. परिक्रमावासींना बोलावून प्रेमाने चहा देणे,भोजन प्रसाद देणे, बालभोग देणे, ही त्यांची अंगभूत आवड आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद. वेळोवेळी असे प्रसंग अनुभवयास मिळतात.
नीळकंठेश्वर महादेवाचे मंदिर मैया किनारी आहे. मंदिर खूप जुने, पण नुकतीच रंगरंगोटी केलेली होती. मंदिरासमोरून कोलार नावाची नदी येऊन मैयेला मिळते. मैया येथे उत्तराभिमुख होते. उत्तराभिमुख म्हणजे मैया येथून उत्तरेच्या दिशेने वाहायला लागते. मैया ही पश्चिम वाहिनी आहे. मात्र या ठिकाणाहून ती उत्तरेकडे वाहते. काही अंतर उत्तरेकडे प्रवास केल्यानंतर तिचा प्रवास पुन्हा पश्चिमेकडे सुरू होतो. रात्री मंदिरात आरतीच्या वेळी महाराजांचा श्वानही मंडपात आला होता. आरती सुरु झाली, घंटा वाजू लागल्या, तसा तो श्वानही आकाशाकडे तोंड करून, वेगळ्याच स्वरात ऊ sss ऊ असा आवाज काढत होता. आरती थांबली तसा तोही थांबला. त्याचाही आरतीत सहभाग.गंमत वाटली.
मंदिरात आसन लावायला जागा नव्हती. सर्वसाधारणपणे परिक्रमावासींना ते समोरच्या धर्मशाळेत पाठवतात. परंतु त्यांनी आम्हाला मंदिरात आसन लावण्याची परवानगी दिली. परंतु रात्री नैसर्गिक विधीसाठी उठण्याची गरज व ते मंदिराला कुलूप लावतात ही अडचण मांडल्यावर, त्यांनी मंदिराच्या मागील बाजूस असलेली, शेणाने सारवलेली एक खोली आम्हाला तिघांना आसन लावायला दिली. मंदिरातील संगमरवरी फरशी दुपारीच गार पडली होती. थंडीमुळे ती फरशी रात्री आणखीन गार पडणार. गार पडलेल्या फरशीवर झोपणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वतंत्र व शेणाने सारवलेल्या खोलीत आसन लावण्याची सोय झाली. काल उघड्यावर, आज खोलीत... मैयेची कृपा. शेणाची जमीन असल्यामुळे गार पडायचा प्रश्न नव्हता. चंद्रमौळी झोपडी असल्यामुळे इकडून तिकडून थंड वारे आमच्या खोलीत मनसोक्तपणे शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडत होते. बाजूला असलेल्या गोशाळेतील गोमातेच्या आणि तिच्या वासराच्या गळ्यातील घंटेचे किणकिणणे व मधूनच त्यांचे हंबरणे, शेणामुळे झालेल्या डासांचे कानाशी संगीत, परिसरातील श्वानांचे भुंकणे या पार्श्वभूमीवर रात्री केव्हातरी उशिरा झोप लागली... नर्मदे हर.
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३१
सकाळी साडेसहा वाजता निघालो. थंडी खूप होती. कानटोपी,स्वेटर घालूनही थंडी वाजत होती. उजाडायला सुरुवात झाली होती. रस्त्यावर सामसूम होती. गावातील काही माताराम पाणी भरून घेण्यासाठी कळशा घेऊन मैयेवर निघाल्या होत्या. क्लोरीन नाही, फिल्टर नाही, पाणी थेट प्राशन करायचे. आम्हालाही मैयेच्या पाण्याची सवय झाली होती. पाण्याच्या हँड पंपाचे पाणी दुपारी गरम यायचं, प्यावे असे वाटायचे नाही. दुपारी हँड पंपावर अंघोळ केली तर गरम पाण्याच्या अंघोळीचा अनुभव. बरोबरचे परिक्रमावासी छोटेलाल यांनी चालताना मैयेचे आणि इतर पाणी यातला छान फरक सांगितला. ते म्हणाले, मैया का जल होता हैं और बाकी सब पानी होता हैं.
अशिक्षित असूनही छोटेलालजींनी, मैयेवर असलेली श्रद्धेतून त्यांच्या परीने केलेली व्याख्या मला खूपच भावली. जल हा शब्द पाण्यासाठी किती समृद्ध वाटतो, हे या तुलनेने लगेच जाणवले.परिक्रमेत स्थानिकांचा मैयेच्या पाण्याविषयीचा असलेला आदरही कायम जाणवला.
आम्ही बुधनी येथे पोचलो. येथे काही धर्मशाळा आहेत. चौकशी करून आम्ही गावाच्या विरूद्ध बाजूला असलेल्या त्यागी महाराजांच्या आश्रमातील यज्ञशाळेत आसन लावले. सिमेंटचे उभे केलेले खांब, त्याच्यावर साकारलेले छप्पर आणि चारी बाजूने उघडी, अशी यज्ञशाळा होती. एकदम हवेशीर. यज्ञशाळेत सामान ठेवून आश्रमाशेजारी असलेल्या पायवाटेवरून खाली उतरून मैयेवर स्नान करण्यासाठी गेलो. आम्ही गावाच्या दुसऱ्या दिशेला होतो. गावाच्या जवळ मैये वर घाट बांधलेले आहेत. घाट तांबड्या रंगाच्या घडीव दगडात बांधलेला असून, अतिशय आखीव-रेखीव आहे. येथे मैयेच्या पाण्याचे फोटो काढले असता मैयेचे पाणी निळ्या रंगाचे दिसून आले. मैयेच्या पाण्याची वेगळी छटा इथे दिसली. आजपर्यंत असा अनुभव आला नव्हता. आश्रमाशेजारून दोन पूल होशंगाबादला जातात. होशंगाबाद हे या परिसरातली महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. रात्रभर रेल्वे गाड्यांची ये-जा चालू होती. त्यामुळे शांतता नव्हती. रात्री बोचरे वारे व खूप थंडी होती.
रात्री खूप थंडी पडेल, अशी काळजी व्यक्त करून त्यागी महाराजांनी आश्रमात आसन का लावले नाही, असे आम्हाला विचारले. तसेच सदाव्रत घेण्याविषयी चौकशी केली. भूक नसल्यामुळे आम्ही नम्रपणे नकार दिला. रात्री त्यागी महाराजांनी चहा पाठवला. थंडीत चहामुळे अंगात चांगली ऊब आली. त्यागी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रात्री खूपच थंडी वाढली. अधून-मधून झोप लागत होती. पण एकूण झोपेचे खोबरे झाले. त्यागी महाराजांचे ऐकले असते तर, त्यांच्या कुटीत, शेकोटीच्या उबेत एक रात्र चांगली गेली असती. जेष्ठांचे न ऐकल्याचे परिणाम.
बुधनीहून आम्ही पतईघाटला आलो. नूतन शिवमंदिरातील आश्रमात गेलो. मंदिराशेजारून लगेच मैयाच्या घाटावर रस्ता जातो. घाट चांगला बांधलेला असून, पायऱ्यालगत पाणी आहे. पाणी फार खोल नव्हते. पतईवाले दादाजी महाराजांचा हा आश्रम असून मोठे मंदिर सुद्धा आहे. आश्रम परिसर खूपच मोठा आहे. आश्रम काही एकर जागेत पसरलेला आहे. आश्रमात खोल्या व हॉलची सुविधा आहे. चातुर्मास करण्यासाठी व साधनेसाठी येणाऱ्या भाविकांना किंवा परिक्रमावासींना खोल्या देतात. आम्ही तीनच मूर्ती असल्यामुळे आम्हाला भोजन शाळेजवळील एक खोली मिळाली. आसन लावून मैयेवर स्नान करण्यासाठी गेलो, कपडे धुतले. आल्यानंतर जरा वेळ विश्रांती घेतली. येथील पतईवाले दादाजी महाराजांचे वय अंदाजे ८० वर्षे असावे. दिवसातून एकदा त्यांच्या कुटीतून सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान बाहेर येऊन, भाविकांना भेटतात. अन्यथा दिवसभर कुटीतच साधनेत असतात. अंगावर भगवी वस्त्रे, सात्वीक चेहरा, वात्सल्यमूर्ती अशा महाराजांना भेटण्याचा योग आला, ही मैयेची कृपा. दर्शनासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खूप गर्दी होती. त्यांच्या खोलीत अनेक देवदेवतांच्या व संतांच्या तसबिरी पाहायला मिळाल्या. महाराजांच्या आसनामागे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची तसबीरी दिसल्या. माझा ऊर आनंदाने भरून आला. डोळे पाणावले. महाराष्ट्रातील संतांची ख्याती दूरवर पसरली असल्याचे मी ऐकले होते. पण त्याची खात्री या अनुभवामुळे मला झाली. पतईवाले दादाजी महाराज आश्रमात दरवर्षी हजारहून अधिक विवाहेच्छुकांचे सामुदायिक विवाह होतात. याकरता महाराज कोणाकडून काहीही घेत नाहीत. दूरवरचे दानशूर स्वतःहून आवश्यक ती व्यवस्था करतात.
या बाबतीत घडलेली एक घटना अशी:
पावसाळ्यात येथे मैयेला भरपूर पाणी असते. पहावे तिकडे पाणीच पाणी. एका सामुदायिक विवाह समारंभाच्या वेळी मैयेचे पाणी आठवडाभर कमरे एवढे कमी झाले होते. लहान-मोठी कोणीही व्यक्ती मैया पार करताना त्याला त्याच्या कमरेएवढेच पाणी लागायचे. ही घटना पाहिलेल्या आश्रमातील एका सेवाभावी व्यक्तीने, ही माहिती मला दिली.
आश्रमामध्ये एका इमारतीत तीन मंदिरे आहेत. पहिल्या मजल्यावरील मंदिरात शंकराचे लिंग असुन त्यावर ब्रम्हा विष्णू महेश आणि गणेश यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्या वरच्या मजल्यावर नर्मदामैया चे मंदिर व मूर्ती आहे. वरती हनुमानाचे मंदिर असून पंचमुखी हनुमान ची मूर्ती आहे. आश्रमात संकटमोचन हनुमान मंदिर असून हनुमानाची मूर्ती पहुडलेल्या स्वरूपात येथे पाहायला मिळते. मूर्तीचे हे एक वेगळेपण परिक्रमेत प्रथमच दिसून आले. आश्रमात महाराजांच्या कुटी शेजारी सदाव्रत ठेवले होते. प्रत्येकाने हवे त्याप्रमाणे घ्यावे, अशी व्यवस्था केलेली होती. बरेच परिक्रमावासी ठेवलेल्या सदाव्रतामधून कोरडा शिधा घेऊन जाऊन स्वतःचे अन्न सिद्ध करत होते. भोजनशाळेत गर्दी कमी दिसून आली.
ज्या परिक्रमावासींना तयार भोजन प्रसाद हवा असतो त्यांना सकाळी किंवा सायंकाळी किमान चार तास आधी, भोजन शाळेत तशी पूर्व कल्पना द्यावी लागते. मग त्यांना तयार भोजन प्रसाद मिळतो. ही एक आणखीन चांगली व्यवस्था परिक्रमेत पाहायला मिळाली. अन्नाची नासाडी नको आणि अपव्ययही नको.
पतईघाटहून पुढे निघालो. वाटेत मैयाकिनारी एका टपरी चालकाने, नर्मदे हर महाराजजी चाय पालो...अशी हाक दिली. चहा घेऊन, थोडा वेळ थांबून पुढे निघालो.
पुढचा बराच रस्ता रेतीतून होता. रेतीतून चालताना चाल मंदावली. मैयाकिनारी चालायला रस्ता नसल्याने शुकलपूरला वरचा रस्ता पकडून निघालो. पुढे रस्त्यात टिमरावन गावातून पुढे जाताना, श्री द्वारकादास गुप्ता यांनी, महाराज चाय की नर्मदे हर, अशी हाक दिली. त्यांच्या घरी थांबलो. गप्पा मारत ग्लासभर घट्ट चहा घेतला. ते सधन शेतकरी आहेत. पती,पत्नी,दोन मुले, तीन मुली असा परिवार. मुलींची लग्न झालेली. मोठा मुलगा संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. त्याला पुण्यात कंपनीत नोकरी लागण्याची शक्यता होती. लहान मुलगा वडिलांना शेतीत मदत करतो. मी पुण्याचा, हे सांगितल्यानंतर माताराम गुप्ता यांनी माझी विशेष चौकशी केली. मुलगा पुण्यात आल्यावर काही मदत लागली तर, संपर्कासाठी माझा नंबर मातारामना दिला.
पुढे निघालो. हळूहळू शेतातून पायवाटेने, दुपारी बाराच्या दरम्यान हिरापूरला पोहोचलो. तेथे राजराजेश्वर मंदिरात गेलो. येथील मुख्य षण्मुखानंद स्वामी महाराज आहेत.हिरव्या रंगाची कफनी, त्याच रंगाची लुंगी, अंगावर हिरवा पंचा, गळ्यात रुद्राक्ष व पोवळ्याची माळ, पांढरे शुभ्र केस व दाढी, कपाळी भस्म व मनस्वी बोलणारे असे महाराजांचे व्यक्तिमत्व. महाराज येथे साधारणपणे १०० मुलांची गुरुकुल पद्धतीने वेदपाठशाळा चालवतात. याशिवाय दोनशे मुलांची सर्वसाधारण शाळाही येथे चालवतात. त्या पैकी शंभर मुले निवासी आहेत. येथे राहणाऱ्या व शिकणाऱ्या मुलांची निवास भोजन व शिक्षण व्यवस्था आश्रमातर्फे मोफत केली जाते. खूप मोठे सामाजिक काम आश्रमातर्फे चालवले जात आहे. दुपारी महाराजांची भेट झाली. त्यांनी पायी महाराष्ट्रात भ्रमण केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंगे आळंदी, पंढरपुर यात्रा, ज्ञानेश्वर माउली व ज्ञानेश्वरी ग्रंथ याविषयी स्वामी महाराज मनापासून आणि भरभरून आमच्याशी बोलले. , येथेही ज्ञानेश्वर महाराज, पंढरपूरची यात्रा, ज्ञानेश्वरी ग्रंथ याविषयी त्यांच्या तोंडून कौतुक ऐकून, मला खूप आनंद झाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व या संतांच्या भूमीला भेट द्यायला देशभरातील संत, महात्मे, पुण्यात्मे आवर्जून येतात, हे यावरून अधोरेखित झाले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील आपल्या संतांची ख्याती सर्वदूर,भारतात पसरलेली आहे हे सुद्धा लक्षात आले. मला भेटलेल्या महात्म्यांशी थोडा संवाद साधून,ज्ञानाचे काही कण वेचता आले, हे माझे महतभाग्य. मैयाने या पुण्यात्म्यांची भेट घडवण्याचेही काही प्रयोजन असावे. समजेल कधीतरी. या महाराजांनी सर्व भारतभर अनवाणी भ्रमण केल्याचेही सांगितले.
भोजनप्रसादाच्या वेळेची घंटा झाली. आम्ही भोजन शाळेत गेलो. सर्व विद्यार्थी आजूबाजूला येऊन बसले. भोजन प्रसाद वाढून झाल्यानंतर प्रार्थना झाली व भोजन प्रसादास सुरुवात झाली. षण्मुखानंद स्वामी महाराजांनी भोजन शाळेत समक्ष चक्कर मारली.भोजन शाळेची सर्व व्यवस्था पाहिली. आम्हालाही भोजन प्रसाद सावकाश घ्या, म्हणून सांगितले. षण्मुखानंद उर्फ हिरापूरवाले महाराज हे थोडा वेळच आश्रमात असतात. आश्रमाच्या मालकीची एक मोठी बोट आहे. ती बोट कायम मैयात नांगरून ठेवलेली असते. षण्मुखानंद स्वामी महाराज बहुतांश वेळ बोटीत बसून साधना करतात. मैया कृपा व योग म्हणून आमची, त्यांच्याशी भेट झाली. या आश्रमात तळमजल्यावर शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या पिंडीवर ब्रह्मा-विष्णु-महेश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. यांच्या बरोबर वर पहिल्यावर मजल्यावर राजराजेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिरात राजराजेश्वरी देवीची संगमरवरी सुंदर व लोभस मूर्ती आहे. मूर्तीसमोर काचेच्या तावदानात श्रीयंत्र आहे. भोजन प्रसाद घेऊन आम्ही प्रस्थान ठेवले. आता पाय उचलण्याची गरज होती सायंकाळी बेलचारीला आसन लावण्याचा विचार होता.
करोंदीमार्गे पुढे निघालो. सगळीकडे तूर हरभरा यांची शेती. तुरीला शेंगा व फुले आलेली होती. दूरवर, भलामोठा हिरवा-पिवळा गालिचा घातल्यासारखे दृश्य होते. हरभरा मात्र नुकताच लावलेला होता,त्याची वीतभर रोपे.
दोन्ही बाजूला शेती आणि मधून पगदंडी, नयनरम्य दृश्य होते. जणूकाही तुमच्या स्वागतासाठी हिरवे-पिवळे शेले लेऊन शेते उभी आहेत आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलणारी त्यांची रोपे हात हलवून तुमचे स्वागत करीत आहेत. खूप छान वाटत होते. सर्वत्र असे हिरवेगार पाहून डोळे निवतात आणि त्यामुळे उन्हाचा, श्रमाचा, धुळीचा त्रास सुसह्य होतो. येथे शेतात स्प्रिंकलर्स लावलेले पहायला मिळाले. स्प्रिंकलरचे पाणी उडून पायवाटेवर आले की, तेथे चिखल व्हायचा. त्यामुळे पगदंडी सोडायला लागायची. थोडे शेतातून चालायचे. थोडे अंतर चालून पुन्हा पगदंडी पकडायची, असे चालू होते. दुपारी सव्वा चारच्या सुमारास कढई गावात थांबून,पाणी पिऊन पुढे निघालो. आपल्याकडे असतात तशीच, एक-एक गमतीदार नावे परिक्रमेत ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात.
भास्कराला त्याच्या मुक्कामी पोहोचण्याची घाई झालेली दिसत होती. थंडीमुळे भास्कराला त्याचा दिनक्रम आवरता घ्यायला लागत होता. आकाश लवकरच केशरी व्हायला लागले होते. थंडीमुळे दृष्यमानता कमी व्हायला सुरुवात झाली होती. पगदंडी अंधारात हरवण्याच्या आत मुक्कामी पोहोचण्यासाठी पाय उचलणे आवश्यक होते. वेग वाढवला आणि सायंकाळी सहाच्या सुमारास बेलचारीला पोहोचलो.
नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३२
बेलचारीला पोहोचलो. आश्रमाचा रस्ता विचारत गावातून पुढे जात होतो. वाटेमध्ये चार-पाच ग्रामस्थ बसले होते. त्यातील एका ग्रामस्थांनी घरात आसन लावून सदाव्रत घेणार का, असे विचारले. आम्ही तिघांनी चर्चा करून त्यांना हो सांगितले. त्यांचे जवळच घर होते. त्यांच्या घरी पोहोचलो. घराच्या ओसरीवर आसन लावले. यजमानांचे नाव जीवनलाल धाकड पटेल (साधू). साधू लावण्याचे कारण म्हणजे गेल्या अनेक पिढ्या ते परिक्रमावासींची सेवा करतात म्हणून त्यांना गावात साधू म्हणतात. चला, परिक्रमेत गृहस्थाश्रमातले साधू भेटले. त्यांचे कुटुंब मोठे आहे. जीवनलाल यांना दोन बंधू. मोठे बंधू प्रितमसिंग, धाकटे मानकलाल, माताजी लीलावती, पिताजी भावसिंग सर्वांच्या पत्नी, मुले असे मोठे एकत्र कुटुंब आहे. असे एकत्र मोठे कुटुंब स्वतःच्या मोठ्या वाड्यात गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे पाहून खूपच आनंद झाला. खेडेगावात एकत्र कुटुंब ही पद्धती हे लोक टिकवून आहेत. मोठा चौसोपी वाडा होता. स्वयंपाकघर, खोल्या, सोपा, ओसरी सगळे प्रशस्त. वाड्यातच गोधनासाठी मोठा गोठा होता. तेथे देशी गाई, म्हशी, वासरे दिसून आली. स्वतःची वीस पंचवीस एकर नगदी उत्पन्न देणारी शेती. स्वतःचा ट्रॅक्टर. ट्रॅक्टर चालवणे, शेतीकामे करणे, शेतीमाल बाजारात नेणे ही सर्व कामे तिघेही भाऊ करतात. सर्व व्यवहार स्वतः पाहतात. अत्यंत मनमोकळी, मनस्वी माणसे. रात्री आठ वाजता छोटेलाल व धनराज यांनी भोजनप्रसाद सिद्ध केला. टिकर, बटाटा- फ्लॉवर-वांगी घालून केलेली रस्सा भाजी, भात आणि डाळ असे पूर्णब्रह्म सिद्ध केले होते. जीवनलाल यांनी आमच्या सोबत भोजनप्रसाद घेतला. रात्री शेकोटीजवळ छान गप्पा रंगल्या. आमच्यासारख्या परिक्रमावासींची मनोभावे सेवा करणारी भक्तमंडळी आमची भावंडेच. त्यांच्याशी त्यांच्या सुखदुःखाची चर्चा करण्यात एक वेगळाच आनंद असतो. सायंकाळी स्नान करून कर्मकांड करण्याऐवजी यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे याच्यासारखा आनंद नाही. परिक्रमेत मैया कृपेने आणि परमेश्वर कृपेने अशी अनेक माणसे मला भेटली. त्यांना शोधत फिरावे लागले नाही. ती स्वतःहून सामोरी आली.लौकिक अर्थाने ही माणसे माहिती व्हावीत म्हणून, त्यांची नावे व इतर माहिती घेतली आणि यात नमूद केली. त्यांचे कार्यही सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ह्या माणसांनी पिढ्यानपिढ्या परिक्रमावासींची सेवा हे व्रत म्हणून स्वीकारलेले आहे.त्यांच्या चांगल्या कृतीचे त्यांना श्रेय मिळाले पाहिजे.
परिक्रमेत पायवाटे वर चालताना आपण वेगळ्या विचारात असलो तर, शेतातून घरातून झोपडीतून नर्मदे sss हर ऐकू येते. तुम्ही विचारात भरकटलेले असताना मैया तुम्हाला पुन्हा नामस्मरणाच्या वाटेवर आणते, हा अनुभव अनेक वेळा मी परिक्रमेत घेतला आहे. मैया जशी तुम्ही व्यक्त केलेली छोटी-मोठी इच्छा पूर्ण करते, तशी ती तुम्हाला भरकटलेल्या मनस्थितीतून पुन्हा नर्मदे हर च्या नामस्मरणाकडे परत आणते.
मैयेकडे मागणी केलेल्या इच्छापूर्तीची आणखीन एक गंमत पहा :
आज बेलचारीला येताना वाटेत एका नाथपंथी संन्याशाने हाक मारल्याने त्याच्या कुटीत चहाच्या नर्मदे हर साठी थांबलो होतो. त्यांच्या देवघरात फोटो, मूर्ती व मैयेत मिळणारे बाण ठेवले होते. नर्मदा मैयामध्ये मिळणारे जे गुळगुळीत असे पाषाण/दगड असतात त्याला आपण नर्मदेतले गोटे म्हणतो, त्याला येथे बाण असे म्हणतात. ते बाण कोणतीही पूजा, प्रतिष्ठापना न करता थेट देवघरात महादेवस्वरूप म्हणून पूजेसाठी ठेवता येतात. त्याची वेगळी प्रतिष्ठापना करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे नर्मदा मैयेच्या परिसरात नर्मदा में कंकर, जय भोले शंकर अशी म्हण प्रचलित आहे. नर्मदामैयाच्या पावित्र्यामुळे तिच्यात मिळणारे सर्व बाण हे सगळे शंकर आहेत व ते प्रसाद म्हणून आनंदाने जवळ ठेवावेत.
त्या नाथपंथी संन्याशाला मी, त्याने पूजेत ठेवलेल्या बाणाकडे निर्देश करून, असा प्रसाद (बाण)कुठे मिळेल असे विचारले असता तो म्हणाला, तुम्ही मैयेला प्रार्थना करा. तुम्हाला असा प्रसाद मैयेतच मिळेल. चर्चा तेथे थांबली. चहा पिऊन, नर्मदे हर करून निघालो. दुपारी हिरापूरला मैयाकिनारी स्नान करीत असताना मैयेत डुबी मारली आणि पाण्यात सहज हात घातला तर हातामध्ये विटकरी रंगाचा बाणाचा प्रसाद मिळाला. त्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा, त्यावर त्रिपुंड काढलेले. गंध लावल्यासारखे. फक्त चर्चा झाली होती. मी मागणी केली नव्हती. फक्त मनात असे काहीतरी मिळेल का, असा विचार आला होता. तुम्ही मागावे आणि मैयेने लगेच द्यावे. लगेच अनुभव घेतला. दरवेळी मी मनोमन ठरवतो, आता काही मागायचे नाही. पण अनवधनाने काहीतरी मागितले जातेच. उशिरा लक्षात येते. इच्छा पूर्ण होते. पुन्हा चुटपुट लागून राहते. ही आपली आई आहे. आपण मागणी केली, आणि तिने पूर्ण केली. एवढे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, असे मी मनाचे समाधान करून घेतले.
सकाळी बेलचारीहून ब्रह्मांड घाटाकडे प्रस्थान ठेवले. येथे मैयाकिनारी थंडी वाढली होती. हातापायाची बोटे थंडीने बधीर झाली होती. येथे मध्यप्रदेशात थंडी खूप असते. अगदी सकाळी अकरा वाजेपर्यंत थंडी वाजते. दुपारी चार नंतर पुन्हा थंडी वाढायला लागते. सकाळी रस्त्यावर फार वर्दळ नव्हती.मैया किनारी आम्हाला राजगिऱ्याचे एक शेत लागले. उंच उंच वाढलेली ती शेती. माझ्या उंची हून अधिक, म्हणजे सहा
फूटाहून अधिक राजगिरा वाढला होता. वाढलेले डौलदार तुरे, वाऱ्यावर छान डुलत होते. आता याचे बहुतेक बी गोळा करून राजगिरा तयार करणार असावेत. फार सुंदर दृश्य होते. न राहून तेथे एक फोटो काढला.
मैया किनारी पुढे नीट पगदंडी नसल्यामुळे व दलदल यामुळे वरचा रस्ता पकडावा लागला. रस्ता चालताना मनात विचार आला, सकाळचे साडेनऊ वाजले आहेत, पोटात काही नाही,जवळ खायला काही नाही,पुढे केव्हा गाव लागेल, काय खायला मिळेल माहिती नाही. झिरी गावानंतर छतरपूरच्या वाटेत एका उसाच्या शेतात थांबलो. ते शेत भरतसिंग बडकूर यांचे होते. आम्ही पुण्याहून आलो आहोत, असे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी पुण्याला किराड नावाचे त्यांचे नातेवाईक आहेत, असे सांगितले. शेतात त्यांनी गूळ करण्यासाठी गुऱ्हाळ लावले होते. मोठ्या, पसरट कढयांखाली उसाच्या चिपाडाचे इंधन करून, त्यात उसाचा रस रटरटत होता. उसाच्या रसापासून गूळ तयार करण्याचे काम चालू होते. तिथे बसून आम्ही पाणी प्यालो. त्यांनी आमच्या समोर एक गुळाची ढेप फोडून एका परातीत आणून ठेवली. म्हणाले पोटभर खा. एरवी कधीही मी एक खड्याच्यावर गुळ न खाणारा, आज पोटभर गुळ खाल्ला. पोट भरले आपल्याकडे उन्हातून आला की त्याला गूळपाणी का देतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चालताना भुकेचा विचार करत होतो.पंधरा मिनिटात मैयेने पोटभर खायला दिले. आयुष्यात यापूर्वी कधी नाश्त्यासाठी किंवा कधीही एवढा गुळ खाल्ला नव्हता आणि येथून पुढेही कधी खाईन असे वाटत नाही. मैया कृपेने आणि भरपूर चालल्यामुळे तो गूळ पचून गेला. अन्यथा एवढा गूळ खाऊन माझ्या पोटामध्ये काय झाले असते, हे ईश्वरच जाणे. आम्ही खाल्लेला गुळ काळसर होता. भरतसिंग बडकूर यांच्याशी गुळाच्या दर्जाबाबत चर्चा झाली. आम्हाला खायला दिलेला गूळ काळसर होता. यातली मळी थोडी कमी व्हायला हवी. तुम्ही उकळी आल्यावर थोडे भेंडीचे पाणी घाला. भेंडीच्या पाण्याने उकळी कमी होऊन अजून मळी निघेल. महाराष्ट्रात असे गुळाच्या गु-हाळात करतात. तुम्ही प्रयत्न करून बघा, असे मी भरत सिंग यांना सांगितले.
त्यांना फोन नंबर देऊन पुण्यात आल्यावर भेटण्याचे निमंत्रण दिले. त्यांचे आभार मानून, नर्मदे हर करून, आम्ही तिघांनी पाय उचलले. पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर रस्ता चुकलो. दोघेजण भेटले. आमच्याबरोबर चला म्हणाले. एक दीड किलोमीटर आमच्याबरोबर चालून, याच रस्त्याने आमच्यामागून या ,असे म्हणून ते सायकल वरून पुढे गेले. पुढे रस्ता लागला.
ब्रह्मांड घाटला पोहोचलो. इकडे ब्रह्मांड घाटाला बरमान घाट असे म्हणतात. ब्रह्मदेवाने येथे तपश्चर्या केली, म्हणून हा ब्रह्मांड घाट म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रह्मांड घाट मोठा, प्रशस्त व चांगला बांधलेला आहे. येथे मैयेचा प्रवाह विभागला गेला आहे व पुढे परत एकत्र झाला आहे. मध्यभागी टेकडी सारखा भाग असून तेथे शंकराचे मंदिर आहे. परंतु परिक्रमावासींना परिक्रमा भंगामुळे टेकडीवर शंकराच्या मंदिरात जाता येत नाही. ब्रह्मांड घाटावर खूप अस्वच्छता व भरपूर भिकारी दिसले. घाटांच्या पायऱ्यांवरील स्वच्छतेचे काम चालू होते. ती घाण पाण्यात वाहात येत होती. पुढील बाजूचे लोक त्यातच स्नान करीत होते. आम्ही घाटाच्या पूर्वेला जाऊन, तेथे स्नान केले. तेथे स्वच्छता होती व स्वच्छ पाणी होते. माणसे सगळीकडे घाण करतात, दुर्दैव आपले.
ब्रह्मांड घाटला संजय भनादिया यांच्याकडे आसन लावले. स्वभावाने शांत आणि आदरातिथ्य कमालीचे. आदिवासींच्या आश्रम शाळेत ते काम करतात. आम्ही गेलो तेव्हा, आश्रमशाळेतील मुले आवारामध्ये क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळत होती. ग्रामीण भागात पाहिलेली आणि नोंदवायची राहिलेली एक गोष्ट अशी की, परिक्रमेत सर्व ग्रामीण भागात, घराबाहेरील ओसरी शेणाने छान सारवलेली असते. त्याच्याकडेने रंगीत बॉर्डर काढलेली असते. परिक्रमेत नेहमी कुठे ना कुठे असे सारवण्याचे व रंगवण्याचे काम कायम चालू दिसले. साधे घरसुद्धा दुरून यामुळे उठून दिसते. तसेच आकर्षक व मनाला प्रसन्नता देणारे असे वाटते. असे घर पाहिले की क्षणभर त्या घराच्या सावलीत टेकण्याचा मोह होतो. येथे सुद्धा ओसरी रंगवलेली होती. त्याच्यावर नक्षी काढलेली होती. जमेल तसे नक्षी काढतात, पण दिसते ते फार सुंदर.
श्री भनादिया यांचे मित्र, श्री नवीन कनिया यांच्याशी सायंकाळी गप्पा मारत होतो. ते उत्सुकतेने मी परिक्रमा का करतो आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते. तुम्ही काही नवस बोलला आहात का, येथे येण्याचे नेमके कारण काय, असे खोदून खोदून विचारीत होते. शहरी माणूस, ग्रामीण भागात अशा खस्ता खात का फिरतोय, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.
सायंकाळी माताराम ललिता भनादिया यांनी पुरी,भाजी,वरण,भात आणि पापड असा साग्रसंगीत भोजन प्रसाद दिला. तो ग्रहण केला. रात्री चंद्र प्रकाशामध्ये, शेणाने सारवलेल्या ओसरीवर, मस्तपैकी झोप लागली. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३३
सकाळी बसने भेडा घाटला आलो. फाट्यावर उतरून पायी घाटावर पोहोचलो. येथे नर्मदा मंदिरात आसन लावले. मंदिर अतिशय साधे असून बिलकुल भपका नाही. घाटावर जाऊन स्नान करून विश्रांती घेतली. या मंदिरातील मूळ महंत हयात नाहीत. सध्या श्री लखनलाल दुबेजी परिक्रमावासींची व्यवस्था पाहतात. लखनलालजी, त्यांच्या पत्नी माताराम स्नेहलता, कन्या व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. दोन मुले वेदपाठशाळेत अध्ययन करतात, तर कन्या परिसरातील सातवीपर्यंतच्या लहान मुलांचे इंग्रजी, गणिताचे मोफत क्लासेस घेते. गरीबीच्या परिस्थितीतही सामाजिक भान पाहून आनंद वाटला. परमेश्वर एकेकाला कशी चांगली बुद्धी देतो,याचे हे एक चांगले उदाहरण.श्री लखनलालजी उदरनिर्वाहासाठी पौरोहित्य करतात. दुबे कुटुंबातील सर्वांचे वेगवेगळे पैलू.
बगासपुर, जिल्हा नरसिंगपूर येथील एक शेतकरी श्री सुधीर पटेल हे, नर्मदा मंदिरात येणाऱ्या परिक्रमावासींसाठी सदाव्रत (गव्हाचे पीठ) ठराविक दिवसांनी आणून देतात.लखनलालजी दुबे आणि त्यांचा परिवार अतिशय समाधानाने , सेवाभावी वृत्तीने परिक्रमावासींची सेवा करतात.
एक महंत दिसून आले. त्यांच्यासोबत एक शिष्या पण होत्या. साधूंना शिष्येची गरज काय, हे काही समजले नाही. मैया किनाऱ्यावरील बरेच महंत व त्यांच्या शिष्या हा अभ्यासाचा विषय ठरावा. त्यांच्याविषयी माहिती घेणे-देणे, त्याच्यावर चर्चा करणे, हे परिक्रमेचे आणि पुष्प लिहिण्याचे प्रयोजन नाही. तसेच ते लिहून आपले पुष्प व विचार अपवित्र करायला नको. ज्याचे त्याचे प्रारब्ध, असो. आपण मैयाकिनाऱ्यावरील आश्रम व त्यातील राजकारण यात कशातच लुडबूड न केलेली बरी.
आमच्यासोबतचे परिक्रमावासी छोटेलालजी यांनी भेडाघाटला परिक्रमा उचलली होती. त्यामुळे त्यांची परिक्रमा आज भेडाघाटला संपन्न होणार होती. येथे कढाई करून कुमारिकांचे पूजन करून ते उद्या ओंकारेश्वरला निघणार होते. त्यांनी जाऊन कढाईचे साहित्य रवा, तूप, बेदाणे इत्यादी घेऊन आले. हे सर्व सामान त्यांनी माताराम श्रीमती स्नेहलता दुबे यांच्याकडे दिले. छोटेलालने आणून दिलेल्या सामानात कढाईसाठी तूप कमी पडत होते. दुबे मातारामनी स्वतःच्या घरातले तूप कढाईसाठी वापरले आणि कढाई सिद्ध करून दिली. एवढ्या गरीब परिस्थितीत राहून, काटकसरीने संसार चालवत असताना, एक अवाक्षरही कोणाला न सांगता, एका अनाहूत परिक्रमावासीच्या कढाईसाठी त्यांनी घरचे तूप घालून, त्यांचे कार्य पूर्ण करून दिले. हे मला नंतर समजले.मी प्रत्येक प्रसंगावर विवेचन करण्याची आवश्यकता नाही. याबाबतीत तर नाहीच नाही. याचे अधिक स्पष्टीकरण न देता, त्याचे महत्त्व मी वाचकांच्या सारासार विवेकबुद्धीवर सोपवतो. छोटेलालना मी ही घटना सांगितली व यथाशक्य त्याची भरपाई पैशाने करून, तुम्ही त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकता, असे अप्रत्यक्षरित्या सुचवले. परंतु छोटेलालनी, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. एखादी घटना माहीत नसणे, हे समजू शकतो. परंतु सांगूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणे, याला काय म्हणावे. ज्याचे त्याचे प्रारब्ध. मैया पाहते आहे. दुपारी एकच्या सुमारास श्री.लखनलालजी दुबे यांनी छोटेलालच्या हस्ते घाटावर पूजा करवून कढाईचा नैवेद्य दाखवला व कुमारी पूजन करून घेतले आणि छोटेलाल यांची परिक्रमा संपन्न झाली.
दुपारी शेजारच्या शंकर-पार्वती मंदिरातील साध्वी महंत लक्ष्मीनंद सरस्वती भेटल्या. त्यांच्या सहा परिक्रमा झाल्या होत्या. नुकतीच त्यांची एक परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल, भंडारा व कढाई दुसरे दिवशी होती. आम्हाला तिघांना प्रसादासाठी येण्याचे आश्रमात येऊन निमंत्रण दिले. त्यांनी अठरा वर्षाची असताना पहिली पायी परिक्रमा केली. नंतर दोन-तीन वर्षांनी जमेल तशा परिक्रमा त्या करतात. अंदाजे बारा वर्षांपूर्वी मैयाकिनारी कुटी बनवून त्या येथे स्थायिक झाल्या. नंतर हळूहळू भाविक,श्रद्धाळू आणि धनिक मंडळींकडून आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले. येथे फक्त साधूंना आसन लावण्याची सुविधा उपलब्ध आहे. आश्रमात सदाव्रत मिळते. ते घेऊन भोजनप्रसाद शेजारील नर्मदामैय्या मंदिरात सिद्ध करावा लागतो. ज्या साधूंना भोजन प्रसाद सिद्ध करता येत नाही, त्यांना त्या स्वतः सिद्ध करून खाऊ घालतात. याशिवाय गुरुकृपेने आणि अंत: प्रेरणेने घाट परिसरात कोणी उपाशी असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला मंदिरात आणून भोजन प्रसाद खाऊ घालतात.
रात्री खूप थंडी होती. माझ्याकडची चादर पुरेशी नव्हती. कुडकुडत कधीतरी झोप लागायची, पुन्हा मोडायची. तीन-चार तास झोप झाली. पहाटे उठून बघितल्यावर लक्षात आले, अंगावर रात्री कोणीतरी एक शाल व चादर घातली आहे. आश्चर्य वाटले. बरोबरच्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत माताराम स्नेहलता यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी रात्री माझ्या अंगावर शाल व चादर घातल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या मी झोपलो असताना मला थंडी वाजत असल्याचे पाहून, त्यांनी माझ्या अंगावर घातली होती. मायेची पाखर अगदी वर्षानुवर्षांची, घरच्यासारखी. हे सगळे अनुभवावे मैया किनारी. ही सर्व मैयाची लेकरे अमर्याद माया करणारी. निघताना थांबा म्हणणारी, निघताना पावले जड करणारी, जणूकाही आपल्या घरातून दूरदेशी निघालो आहोत, असा अनुभव देणारी. आभाळाहून मोठी असलेली यांची मने. आग्रह करतात, पण थांबता येत नाही. कारण, पुढे जायचे आहे. परिक्रमावासीला कसे थांबता येईल.
एक वाक्य आठवले, ज्यांचा सहवास लाभावा असे वाटते, त्यांचा सहवास लाभत नाही. ज्यांचा सहवास लवकर संपावा असे वाटते त्यांचा सहवास लवकर संपत नाही... खरोखर असा अनुभव आयुष्यात पदोपदी येतो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.काही करता येत नाही.
आज शेजारच्या आश्रमातील माताजींचा भंडारा होता. आम्ही तिघांनी जाऊन भोजन प्रसाद घेतला. भंडाऱ्यात पुरी, भाजी, डाळ, रोटी, साजूक तुपातील शिरा असा बेत होता. आम्ही ग्रहण केला. मैयाची कृपा.आमच्या सोबत भंडाऱ्यामध्ये वयाने ज्येष्ठ असे साधू पण सहभागी झाले होते. असे योग फार थोड्या वेळा येतात. त्यांचे आशीर्वाद घेऊन आश्रमात परत आलो.
भेडाघाटच्या नर्मदा मंदिरामागे असलेल्या टेकडीवर कालीमातेची एक भव्य मूर्ती आहे. परिक्रमेत अशा स्वरूपाची भव्य मूर्ती मला पहिल्यांदाच पाहिला मिळाली.
येथे भेडाघाटला मैयाकिनारी बंदर कूदनी नावाची एक जागा आहे. म्हणजे मैयेच्या पात्रातील दोन पहाडांमधील अंतर माकड उडी मारून पार करू शकेल, एवढे कमी आहे. परंतु परिक्रमावासींना येथे जाता येत नाही. येथे जाताना वाटेत बूढी मैया व नर्मदा मैया पार करावी लागते. दक्षिण तटावरून या ठिकाणाचे दर्शन घेता येते.परीक्रमा पूर्ण झालेले परिक्रमावासी व पर्यटक या ठिकाणी जाऊ शकतात. जून २०११ मध्ये येथे पावसाळ्यात मैयेचे पाणी शंभर फुटापर्यंत दोन्ही किनाऱ्यावर वाढले होते, अशी माहिती येथील एका चहावाल्याने दिली. भेडाघाटला मैयेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर व इतर मंदिरे आहेत. तेथेही परिक्रमावासीयांना जाता येत नाही. याठिकाणी मैयेचे दोन प्रवाह आहेत. भेडाघाटला मैयेच्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला संगमरवराचे पहाड असून ते पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. येथील पाण्यात मगरी खूप असून, बोटीत बसल्यावर पाण्यात हात न घालण्याची सूचना नावाडी देतात. येथे मैयेत पोहता येत नाही. बोटीतून पर्यटकांना दूरवरची सफर करण्याची व्यवस्था येथे केलेली आहे. भेडाघाट हे अतिशय शांत व निसर्गरम्य असे ठिकाण आहे.
सायंकाळी धनराज आणि मी मैयेकिनारी जाऊन बसलो होतो. येथे मैयेचे पात्र घाटापासून खूप खाली आहे. घाट चढताना चांगली दमछाक होते. घाटाच्या पायऱ्या प्रशस्त आणि उंच अशा आहेत. छोटेलाल यानी ओंकारेश्वरच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. येथून पुढचा प्रवास आता धनराज व मी करणार होतो. मैयाची लीला. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३४
दुपारी पाच वाजता अमरकंटकला पोहोचलो. वाटेत येताना दूध धारा हा शंभर फुट उंचीचा आणि कपिलधारा हा एकशे दहा फूट उंचीचा धबधबा पाहिला. कपिलधारा धबधबा आधी असून, तेथून उतरून पुढे गेल्यावर दूध धारा धबधबा आहे. महर्षि दुर्वास ऋषींनी नर्मदामैयेला तपस्या करून प्रसन्न करून घेतले. तेव्हा नर्मदा मैयेने साक्षात दर्शन देऊन दुग्धपान करविले, म्हणून याचे नाव दूधधारा. धबधब्याच्या शेजारी दुर्वास ऋषींची छोटी गुहा आहे. हा परिसर घनदाट जंगलाचा असून वाहने तेथपर्यंत जातात. परिक्रमावासींसाठी येथे जाण्याकरता वेगळी पायवाट आहे. येथे उत्तर तटावरून जाता येते. परिक्रमावासीयांना दक्षिण तटावरून धबधबे पाहता येत नाहीत. तसे करताना मैया पार करावी लागते. अमरकंटक या ठिकाणापासून पासून सात-आठ किलोमीटर आहे.
अमरकंटकला स्वामी भजनानंद मृत्युंजय सेवा ट्रस्ट येथे गेलो. तेथे आसन लावले.
येथे परिक्रमावासींसाठी वेगळा व मोठा हॉल आहे. तेथे तीस-पस्तीस परिक्रमावासी होते. येथे खूप थंडी होती. तापमान तीन अंश सेल्सिअस होते. डिसेंबरमध्ये ते शून्यापर्यंत जाते.हा आश्रम खूप मोठा आहे. येथे पन्नास-साठ खोल्या असून, मोठ्या नवीन हॉलचे बांधकाम चालू होते. परिक्रमावासींसाठी मोफत निवास सुविधा असून गरजेनुसार जादा ब्लॅंकेट्सही देतात. याशिवाय परिक्रमावासींना सकाळी सात वाजता चहा, दुपारी अकरा वाजता भोजनप्रसाद व सायंकाळी सात वाजता भंडारा (खिचडी डाळ भात) मोफत दिले जाते.
आश्रमासमोर राम घाट आहे. येथे नर्मदा मैयेवर बांध घातल्यामुळे जलाशय तयार झाला आहे. बांधाचे नाव पुष्पक बांध तर, जलाशयाचे नाव संत कबीर जलाशय असे आहे. अमरकंटक येथे पर्यटकांची वर्दळ असल्यामुळे पर्यटक निवास, हॉलीडे होम्स याशिवाय काही आश्रमांमध्येही पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध आहे. संत कबीर जलाशयाजवळ उभे राहिल्यास समोर दक्षिण तटावरून कबीर चबुतऱ्याकडे जाणारा रस्ता व परिक्रमावासीही दिसतात. परिक्रमावासींना माई की बगिया, सोनगुडा, नर्मदा कुंड मार्गे,कबीर चबुतऱ्याकडे जावे लागते. मैयेचा उगम येथून फक्त दोन किलोमीटरवर आहे. यापूर्वी पाहिलेली मैया व आत्ताचा प्रवाह यावर विश्वास बसत नाही. येथे मैयाचा प्रवाह एक ते दोन फुटाचा असून एका उडीमध्ये तो पलीकडे जाता येईल एवढा छोटा आहे.आपण आतापर्यंत मैयेचे विस्तीर्ण व अथांग पात्र पाहिलेले असते, त्यामुळे हा मैयेचा प्रवाह आहे यावर विश्वास बसत नाही. अमरकंटक येथे दुपारी अकरा ते तीनच्या दरम्यान ऊबदार वातावरण असते. उर्वरित वेळेत येथे हवेत खूपच गारवा असतो. उबदार कपड्यांना तर पर्यायच नाही. कानटोपी, स्वेटर, पायमोजे शक्य तेवढे गरम कपडे घालावे लागतात. परिक्रमावासींना सुद्धा बंद खोली मध्ये आसन लावावे लागते. इतरत्र जसे उघड्यावर आसन लावतो, तसे येथे उघड्यावर आसन लावता येत नाही. उघड्यावर थंडीशी मुकाबला करता येत नाही. परिक्रमावासींसाठीचा जो हॉल आहे त्याला सुद्धा दरवाजे असून, तो घट्ट बंद करण्याची सोय केलेली आहे .रात्री प्रचंड गार वारे वाहत असतात.
आम्ही आश्रमात असताना सायंकाळी आश्रमाच्या गेटच्याजवळ परिक्रमावासींच्या हॉलशेजारी एक मोठा लाकडाचा ओंडका शेकोटीसाठी पेटवला होता. आम्ही व बरेचसे परिक्रमावासी आणि सेवाभावी तेथे शेकत बसले होते. खूप थंडी असल्यामुळे शेकोटीची आवश्यकता होती. तेथेच एक संन्यासी खुर्ची टाकून शिक्का घेऊन बसले होते. परिक्रमावासींना प्रमाणपत्रावर शिक्का देण्याचे काम तिथे चालू होते. तेथे गर्दी झाली होती. रात्री पुण्यातील आमचे सहनिवासी डॉ नितीन भगली यांचा चौकशी करण्यासाठी फोन आला. त्यांनी माझी चौकशी केली आणि पुण्यात आल्यावर एक दिवस आमच्याकरीता अनुभवकथनासाठी ठेवा असे म्हणाले.डॉ भगली हे पुण्यातील नामवंत अॉर्थोपेडिक सर्जन. १३-१४ तास व्यवसायात व्यग्र असून सुद्धा, वेळात वेळ काढून मला फोन केला. मैयाकिनारी ऋणानुबंधाचा अनुभव येतच असतो.
सकाळी लवकर उठून आश्रमात चहा घेतला आणि माईकी बगियाकडे प्रस्थान ठेवले. माईकी बगिया म्हणजे नर्मदामैया चे उगम स्थान. किती छान नाव आहे माई की बगिया. आईची बाग. नर्मदा मैयेच्या उगम स्थानाला सुद्धा, सुंदर आणि समर्पक नाव दिलेले आहे. लक्षात राहील असे. नावाचे वेगळेपण येथेही जाणवले. रस्त्यावर विचारल्यास गावकरी पुढचा रस्ता सांगून नर्मदे हर करतात. विचारत पुढे जाणे हिताचे. आम्हीही विचारत, विचारत पुढे निघालो. अमरकंटकहून माईकी बगिया हे अंतर दोन किलोमीटरचे. मुख्य रस्त्यावरून गावातली घरे, दुकाने ओलांडत आपण जंगलाकडे जातो. आता मैयाचे उगमस्थान नजरेच्या टप्प्यात आलेले असते. सर्वांना ओढ मैयेच्या उगम स्थानाचे दर्शन घेण्याची. अमरकंटक ते माई की बगिया या परिक्रमा मार्गावर पाट्या नाहीत. या मार्गावर बहुतेक करून परिक्रमावासी जास्त असतात, बाकी कोणी दिसत नाही. लहान मुले दक्षिणा मिळेल, या आशेवर रस्ता दाखवायला येतात. एक-दोन रुपये दिले की खूष होऊन तुमच्या पुढे पळत पळत रस्ता दाखवला येतात. माई की बगिया पर्यंत आणून सोडतात.
रस्त्याच्या शेवटी हनुमान नाला आहे. त्यावर दगडाचा बांध आहे. त्यावरून आपण दक्षिण तटावर प्रवेश करतो. माई की बगियातील मंदिराचे आवार मोठे व स्वच्छ आहे. सर्वत्र चांगल्या फरशा/टाइल्स घालून आजूबाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना समोर बसवून ठिकठिकाणी पूजा-अर्चा चालू होत्या. सगळीकडे श्रद्धेचा बाजार. त्याला माइकी बगिया तरी अपवाद कसा असणार. चालू द्या,आपण कुठे मध्ये पडायला नको.येथे मैयाच्या मंदिरात मैयेच्या मूर्तीसमोर एक छोटे संगमरवर व टाईल्सचे संमिश्र बांधकाम केलेले कुंड आहे. त्याच्यासमोर छोटे तसेच दुसरे कुंड आहे. परिक्रमेत आपण जवळ बाळगलेल्या मैयेच्या जलाच्या बाटलीतील काही जल या कुंडात अर्पण करायचे व कुंडातील थोडे जल पुजारी भरून देतात. अर्थात त्यांना दक्षिणेची अपेक्षा असतेच. या हिंदुस्थानात कुठेही जा मंदिरातील बडवे आणि पुजारी यांच्या ताब्यात तो देव आणि सगळी व्यवस्था असते. त्यांच्या मर्जीनुसार सगळे काम चालते. येथे काही वेगळी परिस्थिती नाही.आम्ही दक्षिणा देऊन, बाटलीत जल भरून घेतले. मैयेचे दर्शन घेऊन दक्षिण ताटावर मार्गस्थ झालो.
मैयेचे पाय म्हणजे रेवासागर, नाभिस्थान म्हणजे नेमावर आणि मस्तक मध्ये अमरकंटक. या तिन्ही ठिकाणचे दर्शन घेणे हा परिक्रमावासींचा एक अनमोल ठेवा असतो. आमचे हे तीनही टप्पे झाले. परिक्रमेमध्ये हे तीन महत्त्वाचे टप्पे होते. त्याच्या परीपूर्ततेचा खूप आनंद झाला होता.
माई की बगिया खरोखरच जंगलात आणि एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. सर्वत्र शांतता भरून राहिलेली असते. आजूबाजूला काही वनौषधी विकणारी दुकाने आणि दोन चार घरेच काय ती फक्त. बाकी वस्ती नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, धावपळ नाही, सगळे कसे निवांत. एक वेगळीच शांतता इथे भरून राहिलेली असते. पश्चिम वाहिनी असलेली ही मैकलसुता अर्थात नर्मदामैया. आपण पाहिलेले असते ते तिचे ते विशाल पात्र. त्याची सुरुवात येथून होते. एका छोट्या कुंडातून उगम पावलेली नर्मदामैया, नंतर हळूहळू विस्तारत जाते आणि विशाल रूप धारण करून रेवासागरला समुद्रात विलीन होते. हा प्रवास आपल्या डोळ्यासमोरचा आणि अविश्वसनीय असा असतो.
मंदिरात एका ठिकाणी आम्ही दोघे शांतपणे बसून राहिलो. परिक्रमा सुरू केल्यापासून या टप्प्यापर्यंतचा चित्रपट हळूहळू डोळ्या समोरून पुढे सरकला. सगळे मैया करून घेते. तुम्ही फक्त निमित्तमात्र असता. गर्व करायचा नाही, अहंकार तर नाहीच नाही. तुम्ही इथेपर्यंत आलात ही मैयाची इच्छा. इथून पुढे जाणार ही पण मैयाची इच्छा. कोण जाणे अमरकंटकला पुन्हा केव्हा येणे होईल. आता इथून पुढे आम्हाला उत्सुकता, आतुरता होती, परिक्रमा पूर्ण करण्याची. थोडा टप्पा शिल्लक होता. आपोआप पावले जोरात पडू लागली. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३५
अमरकंटकहून निघाल्यानंतर पुढे बराच रस्ता सिमेंटचा होता. सिमेंटचा रस्ता पकडून आम्ही सोनमुडाकडे प्रयाण केले. रस्त्यावर आजूबाजूला सर्व जंगल होते. निर्मनुष्य...आजूबाजूला कोणीही नाही. रस्त्यावर बहुतेक सगळी सालाची उंच उंच झाडे. सर्व भूभाग मध्यप्रदेश सरकारच्या वनखात्याच्या अखत्यारीतील. रस्त्यावर चालणारे आम्ही दोघे. क्वचित एखादे वाहन जायचे. येथे माकडे, वानरे मात्र भरपूर. आजूबाजूला त्यांचे उड्या मारणे, पळापळी, खॅक खॅक करणे चालू होते. पण आमच्या हातात काठी असल्यामुळे आमच्या जवळपास सुद्धा फिरकले नाहीत. मात्र चुकून खाद्यपदार्थ काढला की त्यांचे लक्ष वेधले जायचे.
माई की बगिया ते सोनमुडा हे अंतर अंदाजे दोन किलोमीटर. सोनमुडा येथे शोण आणि भद्र या नद्यांचा उगम आणि संगम आहे. सोनमुडा येथे डाव्या हाताला खाली बऱ्याच पायऱ्या उतरून जावे लागते. तीस-चाळीस पायऱ्या उतरल्यावर हनुमान मंदिराच्या शेजारी शोण नदीचा उगम आहे. येथे छोट्या मंदिरात दोन मूर्ती आहेत व त्यांच्या समोरच उगमाचे कुंड आहे. त्याच्या शेजारी भद्र या नदीचे उगम स्थान व मूर्ती आहे. तिथेच पलीकडे शोण व भद्र आहे संगमाचे कुंड आहे. कुंडात डाव्या बाजूने भद्र ( पुरूष स्त्रोत)तर उजव्या बाजूने शोण ( स्त्री स्त्रोत ) पडतो.पुढे जाऊन त्याचे रूपांतर जलप्रपातात होते. हा धबधबा तीनशे फूट खाली कोसळतो. त्याला रेलिंग केलेले आहे. येथे उभे राहिल्यास दूरवर हिरव्यागार जंगलाचे दर्शन होते. कोसळणारा धबधबा आणि हिरवेगार जंगल. अतिशय नयनरम्य असा परिसर. पहावे तिकडे दाट झाडी आणि अधूनमधून डोकावणारे पर्वत. मस्त वातावरण होते. परंतु फार वेळ थांबता आले नाही. आम्ही या सर्व मंदिरातील देवदेवतांचे दर्शन घेऊन, परत परिक्रमेच्या रस्त्यावर आलो.
दर्शन घेऊन आल्यावर चालायला सुरुवात करण्यापूर्वी एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. रस्त्यावर खूप माकडे बसलेली होती. आम्ही चहा पिताना हॉटेल मधल्या मुलाला दोन बिस्किटे खाण्यासाठी दिली. तो ती बिस्किटे एका माकडाला खायला घालत होता व इतर माकडांना हाकलत होता. त्यावेळी मी त्याला तसे करण्याचे विचारल्यावर तो म्हणाला, या माकडाला एक हात नाहीये. म्हणून त्याला बिस्किटे खाऊ घालतो आहे. त्याने तसे सांगितल्यावर आमच्या लक्षात आले. ते माकड लहान होते आणि त्याला एक हात नव्हता. आयुष्य त्याला एका हातावर काढावे लागणार होते. आता कुठे त्याचे आयुष्य सुरू झाले होते पण, आयुष्याची लढाई त्याला एका हातावर लढावी लागणार होती. परंतु मैयेची ही अशी छोटी छोटी मुले त्याचा हा भार हलका करून, त्याचे आयुष्य सुखकर करणार होती, हे निश्चित. एका बाळाची काळजी घ्यायला मैयेने, दुसऱ्या बाळावर जबाबदारी टाकली होती. मैयेची सर्वांवर कृपा आहे. नवीन नवीन धडे मिळतात. नवीन पाठ मिळतो. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवायचे. शिक्षण होत असते. दया-क्षमा-शांती अशा वेगवेगळ्या गोष्टींचे शिक्षण परिक्रमेत होतच राहते. पाय उचलले... नर्मदे हर...
आम्ही पुढे नर्मदा कुंडा कडे निघालो. हे कुंड रामघाटाच्या मागे आहे. परिक्रमावासींना येथे उत्तर तटावरून जाता येत नाही. नाहीतर त्यांचा परिक्रमा भंग होतो. त्यामुळे दक्षिण तटावरून येथे गेलो. येथे परिक्रमावासींना आत जाण्यासाठी वेगळे छोटे दार आहे. आत मध्ये नर्मदामाता,अमरकंटकेश्वर महादेव अशा अनेक मंदिरांचे संकुल आहे. हा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे निघालो. याच्यापुढे मैयेच्या प्रवाहावर घातलेला पुष्पक बांध व संत कबीर जलाशय आपण उत्तर तटावरून पाहिलेला आहे. जलाशय खूप खोल असून अंदाजे तीनशे फूट खोल पाणी आहे. बांधावरून पाणी खाली पडून मैयेच्या प्रवाहाला खऱ्या अर्थाने येथून सुरुवात होते तीन-चार फूट रुंदीचा प्रवाह येथून वाहात पुढे जातो. आम्ही डाव्या बाजूने कबीर चबुतऱ्याकडे प्रस्थान ठेवले. हे अंतर अंदाजे सात किलोमीटर आहे. जात असताना वाटेत एका साधूंनी चहासाठी नर्मदे हर केले. थांबून त्यांच्या बरोबर चहा घेतला. हवा तेवढा चहा. दूध मात्र पावडरचे. पण चहाची गोडी अवीट. निघताना त्या साधूंनी जवळची पायवाट सांगितली. जंगलातला हा चढाचा मार्ग चढून उतरलात की मोठा रस्ता लागेल. तेथून पुढे डांबरी रस्ता लागेल, तो पकडून पुढे कबीर कबुतराला पोहोचाल, असे त्यांनी सांगितले. जंगल पायवाटेने आम्ही दोघे निघालो. पुढे डांबरी रस्ता लागला. समोर कबीर खाते चेक पोस्ट ऑफिस लागले. तिथे डाव्या हाताला वळून मार्गस्थ झालो. चढाचा रस्ता होता. दुपारी बाराच्या सुमारास एका फाट्यावर पोहोचलो. विलासपूर कडे जाणाऱ्या रस्त्याने अंदाजे पाचशे मीटर चालल्यावर खाली डावीकडे कबीर चबुतऱ्याकडे रस्ता जातो. येथे संत कबीर यांचा आश्रम आहे.
संत कबीर यांनी या स्थानी दीर्घकाळ तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्येमुळे हा आश्रम पावन झाला आहे.
कबीर चबूतऱ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या आश्रमामध्ये संत कबीर आणि गुरुनानक देव या दोन संतांची हृद्य भेट झाली होती. चर्चेअंती त्यांनी मनुष्यजातीला जीवनविषयक नवीन तत्त्वज्ञान दिले. त्यामुळे या स्थानाला शीख धर्मीयांच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
संत कबीर आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या नर्मदा कुंडात सकाळी आठच्या दरम्यान दूधधारा प्रकट होते. आश्रमात चौकशी केल्यावर महंतांनी मागे नेऊन दाखवली.नर्मदा कुंडात बोटभर जाडीची दुधासारखी रेषा होती. त्यातून सुतासारख्या धारा वेगळ्या होऊन पाण्याच्या पृष्ठभागाकडे झेपावत होत्या. महंतांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात दूधधारा दररोज प्रकट होते. दूधधारा चे दर्शन घेतले. ही दूध धारा सकाळी फार थोडा वेळ दिसते असे समजल्यामुळे येथे मुक्काम करण्याचा विचार होता. परंतु दूधधाराचे दर्शन झाल्यामुळे, आम्ही दिंडोरी कडे प्रस्थान ठेवले. नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३६
कबीर चबुतराहून परिक्रमेचा मार्ग घनदाट जंगलातून पुढे जातो व तो बिकट आहे. वाटेत मैयेचा प्रवाह अत्यंत लहान असल्यामुळे, नाला समजून ओलांडला गेल्यास परिक्रमा खंडित होण्याचा धोका असतो. सर्वसाधारणपणे परिक्रमावासी वरच्या सडक मार्गाने दिंडोरीपर्यंत जातात. आपण अमरकंटकहून दिंडोरीला जाताना हळूहळू डोंगर माथ्याकडून घाट रस्त्याने खाली उतरत सपाटीला जातो. त्यामुळे तापमानात बदल होतो. थंडीचे प्रमाण फार नाही पण, थोडे कमी होते. दिंडोरीत शेकोटी मात्र चुकत नाही.
दिंडोरीत पोहोचल्यानंतर बस स्टँडपुढील एका हॉटेलवाल्याने हाक मारून चाय की नर्मदे हर केले. तेथे बसवून दुधाचा, स्पेशल चहा त्यांनी दिला. बरोबर बिस्किटे व बनपाव खाऊ घातले. सायंकाळी थोडा वेळ मैयेकिनारी एकटाच जाऊन बसलो. धनराजला त्याचे गाववाले भेटल्यामुळे तो त्यांच्याशी गप्पा मारत धर्मशाळेतच थांबला. मैयेवरचा घाट हा भर गर्दीत, शहरातच आहे. येथे जवळपास रस्ते,घाटासमोर झोपडपट्टी त्यामुळे खूप गोंगाट व वर्दळ होती. मैयेच्या घाटावर येथे बिलकुल शांतता नव्हती.घाट स्वच्छ व चांगला बांधलेला होता. घाटाच्या शेवटी मैयावर बांध घातलेला आहे. त्याच्या सांडव्यावरून मैयेचे पाणी खाली पडून पश्चिमेकडे प्रवाही होते. या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यातून माणसांची ये-जा चालू होती. नृसिंहवाडीच्या कृष्णेएवढे मैयेचे पात्र आहे. सायंकाळी जेष्ठ, वृद्ध, तरुण मुले मैयेची प्रार्थना व आरती करण्यासाठी घाटावर येऊ लागली. एकेक जण आपापल्या पद्धतीने मैयेची आरती करीत होता. कोणी नुसते हात जोडून तर, कोणी उदबत्ती लावून, कोणी पणत्या पाण्यात सोडून. एक माताराम अगदी अंधार होत असताना, मैयेकिनारी आल्या. उभ्या राहून,फक्त हात जोडून मैयेकडे शांतपणे पाहत, मनातल्या मनात मैयेची प्रार्थना करीत असाव्यात. मैय्या ही जशी आई आहे, अवखळ मुलगी आहे, तशीच ती सखी पण आहे. आपल्या मैत्रिणीला त्या माताराम मनातले सुखदुःख सांगत असाव्यात. प्रत्येकासाठी मैयेची भूमिका ही वेगळी आहे. वेळोवेळी प्रार्थना करणारे मैयेचे हे भक्त पाहिले की, तिचे रूप आपल्या डोळ्यासमोर क्षणभर तरळते. त्यांची ती प्रार्थना मनाला खूपच भावली.
अंधार पडू लागला. थंडी वाढू लागली. येथील थंडी बोचरी असते. मैयेवरून येणारे वारे आणि जंगल व डोंगराचा परिसर, त्यामुळे थंडी खूप. अनिच्छेने घाटावरून उठलो. येथे सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या होत्या. जागोजागी परिक्रमावासी शेकोट्या पेटवून शेकत बसले होते. शेकोटी पासून बाजूला झालो की पुन्हा थंडी वाजू लागते. थंडी घालवण्यासाठी काही उपाय केला, तरी पण उपयोग तात्पुरता...
सकाळी लवकर उठून दिंडोरी सोडले. बस प्रवासामध्ये लक्षात राहतील अशा, दोन व्यक्ती भेटल्या. एकाचे नाव गोविंद बैरागी, दुसऱ्याचे नाव राजेश नामदेव. गोविंद हे बीएससी, एमसीए झालेले आहेत. शिक्षणादरम्यान सैन्यात मिळालेल्या नोकरीला घरच्यांनी नकार दिला. तर मध्यप्रदेश शासनामधील पोलीस खात्यातील नोकरी, भ्रष्टाचारामुळे मिळाली नाही. नंतर त्यांनी बस कंडक्टरचा पेशा स्वीकारला. मध्यप्रदेशात राज्यभर खासगी बससेवा आहे. बस कंपन्यांची नावे सुद्धा मैयेच्या नावाशी निगडीत. रेवा ट्रॅव्हल्स, नर्मदा ट्रॅव्हल्स, मेकल सुता ट्रॅव्हल्स, माँ नर्मदा ट्रॅव्हल्स. त्यापैकी एका कंपनीत ते काम करतात. सकाळी पाच वाजता घर सोडतात व रात्री नऊ वाजता घरी परततात. सरकारी नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, उच्चशिक्षित असूनही त्यांनी हा पेशा स्वीकारला. त्याबद्दल त्यांना अजिबात खंत नाही. बसमध्ये एक परिक्रमावासी माताराम त्यांच्याशी अशोभनीय भाषेत बोलू लागल्यावर, गोविंद यांनी त्या मातारामना, त्या परिक्रमावासी असल्याची आठवण करून दिली. त्यावर त्या नरमल्या. दिवसाचे सोळा तास घराबाहेर राहूनही त्यांचा निर्व्यसनीपणा त्यांच्याशी बोलल्यानंतर ठळकपणे जाणवला. स्वतःच्या जबाबदारीवर ते परिक्रमावासींना तिकिटात सवलत, एखाद्या परिक्रमावासीला मोफत प्रवास, गाडी थांबल्यावर चहासाठी स्वतः निरोप देणे, ही काही त्यांची वैशिष्ट्ये मी अनुभवली. येथे कंडक्टरला कमिशनवर काम असते. त्यामुळे पंचवीस-तीस सीटच्या गाडीमध्ये पन्नास-साठ प्रवासी सुद्धा कोंबून भरले जातात. जागा नसली तरी, पुढे सरका असे सारखे कंडक्टर म्हणत असतात. लहान मुले, म्हातारी माणसे, कशीतरी दाटीवाटीच्या मधल्या जागेत गरीब बिचारी उभी राहून प्रवास करतात. महाराष्ट्रातल्या एस टी सारखी विनावाहक विनाथांबा, निम आराम गाड्या, लक्झरी गाड्या, एसी गाड्या, दर पंधरा मिनिटांनी बसेस, अशी कुठलीही सोय येथे आढळून येत नाही. इथल्या प्रवाशांचे खूप हाल पाहायला मिळतात. एसटी बस प्रवासाच्या विषयी कायम कुरकुर व तक्रारी करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेला मध्य प्रदेशातले या सेवेचा लाभ घेण्यासाठी जरूर पाठवले पाहिजे. म्हणजे त्यांचे डोळे उघडतील व आपण किती चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत याचे ज्ञान त्यांना होईल. श्री गोविंद यांच्या पत्नी सरकारी नोकरीत आहेत व ते कौटुंबिक आयुष्यात समाधानी आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
बस प्रवासात भेटलेली दुसरी व्यक्ती राजेश नामदेव. हा बसमध्ये सहायक म्हणून सोळा तास काम करतो. बस सकाळी किंवा रात्री धुणे, प्रवासी चढता-उतरताना घंटी वाजवणे, सामानाची चढ-उतार करणे, चाक पंक्चर झाल्यास चाक बदलणे,तसेच गरज पडेल ती सर्व कामे करतो. अतिशय हसतमुख, सेवाभावी मुलगा. वय वर्षे २३. घरी पत्नी (शिक्षिका), मुलगी आई-वडील. अजून बरेच काही, पण लिहिता येणार नाही. त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान त्याने ठरवले असून, तो तसे आचरण करत असल्याचे लक्षात आले. कष्ट करा आणि पैसे कमवा. महाराष्ट्रात शिर्डी, शनि शिंगणापूर येथे येऊन गेल्याचे त्याने सांगितले. आजवरच्या प्रवासात स्वीकारलेल्या पेशाशी प्रामाणिक राहून मनापासून काम करणाऱ्या या दोन व्यक्ती विशेषत्वाने नजरेत भरल्या, भावल्या, त्या दोघांनाही भेटून आनंद झाला. मला ते महाराजपूर येथे भेटले.
पुढे बर्गी धरणाच्या जवळ छोट्या टेकडीवर नंदिकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पूर्वी मैयाकिनारी असलेले हे मंदिर धरणामुळे टेकडीवर स्थलांतरीत करून नवीन व सुंदर बांधले आहे. येथून आजूबाजूचा परिसर छान दिसतो. येथेच नर्मदामैया वर २०० फुटाहून उंच धरण बांधलेले असून, त्यामुळे येथे विशाल जलाशय तयार झालेला आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे.
पुढे भेडाघाटला गेलो. उत्तर व दक्षिण दोन्हीही तटावरून हे ठिकाण भेडाघाट या नावानेच ओळखले जाते. परंतु येथे जाण्यासाठी खडकांमधील जागेतून जावे लागते. तसेच चालण्यासारखी परिस्थिती नाही आणि दूरवर आत चालत जाऊन पुन्हा चालत परत यावे लागते. एवढे कष्ट घेण्याची तयारी नसल्यामुळे बहुतेक पर्यटक उत्तर तटावरूनच भेडाघाटला भेट देतात. वरील सर्व अडचणीमुळे येथे पर्यटकांची गर्दी नसते. दक्षिण तट तसा निर्मनुष्य असतो, असे म्हणायला हरकत नाही. फेसाळती नर्मदामैय्या, खळखळ वाहणारा तिचा प्रवाह अतिशय मनोहारी असे दृश्य येथे पाहायला मिळते. ब्रह्मांड घाटाच्या उत्तर तटावर मैया किनारी रेतीचा मोठा भूभाग आहे. जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीपासून येथे मध्यप्रदेशातील मोठी जत्रा भरते. ती सुमारे महिनाभर चालते. याचे नियंत्रण राज्य सरकारमार्फत होते. कचरा काढणे, भूपृष्ठाचे सपाटीकरण, दिवे व लावणे इ ची तयारी चालू झालेली दिसली.
माझ्याबरोबर असलेले परिक्रमावासी धनराज सिंगारे यांची परिक्रमा सांडिया घाटावर संपन्न होणार होती. आम्ही सांडिया घाटावर पोहोचलो. धनराज हा मूळचा मध्यप्रदेशातील सांडिया पासून ४० किलोमीटरवर असलेल्या ठुंठादहलवाडा या गावातील आहे. सांडिया घाट जवळ असल्यामुळे, त्याचे कुटुंबीय कढाईसाठी आलेले होते. त्याचा कढाईचा कार्यक्रम येथे झाला. परिक्रमा पूर्ततेचे नर्मदामैया पूजन, कुमारीपूजन झाले. नंतर सहकुटुंब सांडीया घाटावर धनराज याचा भोजन प्रसाद झाला. तो लवकर घरी परतणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते.
सांडिया येथे मैयेवर घाट नाही. उत्तर आणि दक्षिण दोन्ही तटावर रेतीचा मोठा किनारा आहे. घाट नसलेला मैयेचा किनारा प्रथमच पहावयास मिळाला. आज येथे स्थानिक व परिसरातील रहिवाशांची मोठी गर्दी होती. रहिवाशांचे स्नान, मैया पूजन नंतर सहकुटुंब भोजन प्रसाद असे दृश्य मैया किनारी जागोजागी दिसत होते. आम्ही असलेल्या दक्षिण तटावर विविध स्टॉल्सची सुद्धा खूप गर्दी होती. उत्तर तट मात्र निर्मनुष्य होता. उत्तर तटावर थोड्या- थोड्या वेळाने पूर्वेकडे गटागटाने वाटचाल करणारे परिक्रमावासी दिसत होते. दक्षिण तटावर काही ठिकाणी पुरोहित, कुटुंबांचे धार्मिक विधी करीत होते. लहान मुले पाण्यात वाहिलेले नारळ व पैसे गोळा करीत होती. कढईच्या प्रसादाचे वाटप सुरू झाले की, लहान मुलांची गर्दी होई. प्रसाद घेऊन ते पुन्हा पांगायचे. आजूबाजूला ठिकठिकाणी नैवेद्य तयार होत होता. येथे पात्र उथळ असल्याचे जाणवले. दहा-बारा वर्षाचा एक मुलगा पाण्यातून चालत उत्तर तटावर गेला. आम्हाला निघेपर्यंत सायंकाळचे पाच वाजले. स्टॉलवाल्यांनी सामानाची बांधाबांध सुरू केली. थंड वारे वाहू लागले. आम्हीही निघालो. धनराजचे कुटुंबीय त्यांच्या घरी निघाले. धनराजच्या चेहऱ्यावर परिक्रमापूर्तीचा वेगळाच आनंद दिसत होता. तो खुशीत होता. आनंदात तो पुढे व त्याच्या पाठोपाठ मी गर्दीतून वाट काढत ओंकारेश्वरच्या दिशेने पाय उचलले.
प्रवासात रस्त्याकडेला एका शेतात पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. तेथे रामकिशन अहिरराव नावाचे शेतकरी भेटले. त्यांनी आग्रहाने चहा पाजला. ते वाटणीवर शेती करतात. गंमत अशी की, मूळ शेतमालकाने जमीन एकाला भाड्याने दिली. ज्यांनी शेत भाड्याने घेतले, त्याने यांना वाटणीवर शेती सोपवली आणि हे शेती करीत आहेत. शेतीतही दलाली. त्यांच्याशी बोलताना त्यांनी एक वेगळा विचार मांडला. ते म्हणाले मैयेत कपडे धुणे करू नये, त्याप्रमाणे स्नानही करू नये. ते पवित्र जल आहे. तुम्हाला या पाण्याने स्नान करायचे असल्यास पाणी घेऊन, थोडे दूर स्नान करावे. पुढे कोणीतरी ते जल पिण्यासाठी वापरणार असते. तुम्ही कितीही पवित्र मनाने स्नान केले तरी, तुमच्या स्नानामुळे पाण्यामध्ये अस्वच्छता होणार असते. त्यांचा विचार अगदी योग्य होता, माझ्याकडे उत्तर नव्हते. मैयेच्या प्रेमातून सर्वजण वेगवेगळे विचार मांडतात. आपल्याकडे सुटी मिळाली की धरणाच्या पाण्यात जाऊन घाण करणाऱ्यांना, हे कोण सांगणार. आपण साकल्याने विचार करून असे चांगले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.नर्मदे हर...
नर्मदे हर...
क्रमशः....
नर्मदा परिक्रमा - पुष्प ३७
दूरवरून ओंकारमांधाताचे मैयेच्या पात्रात मधोमध असलेले मंदिर दिसू लागले. थोडाच अवधी बाकी होता, ओंकारेश्वरला पोहोचण्याचा. पायाचा वेग वाढवला. धनराजची, त्याच्याकडील नर्मदा जल ओंकारमांधाताला अर्पण करून परिक्रमेची सांगता होती, तर माझी परिक्रमा संपन्न होणार होती. माझी कढाई, नर्मदापूजन आणि जल ओंकारेश्वरला अर्पण करणे, हे सर्वच ओंकारेश्वरला करायचे होते. दोघांच्याही मनात तशीच ओढ, उत्कंठा होती.
मजल दर मजल करत धनराज व मी ओंकारेश्वरला गौघाटवर पोहोचलो. येथूनच परिक्रमा उचलली होती व आज येथेच परिक्रमा पूर्ण झाली. डोळ्यात पाणी व उर भरून आले. मनोमन हात जोडले आणि दोन मिनिटे मैयाकिनारी डोळे मिटून शांत उभा राहिलो. मैयेने बरीच पुंजी दिली होती.
याच साठी केला होता अट्टाहास.
ओंकारेश्वरला पोहोचलेल्या दिवशी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी कढाई करायची होती. ओंकारेश्वरला तुलनेने थंडी कमी होती. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत होता. गेले काही दिवस हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे अंगात कणकण आली होती. औषध घेऊन झोपलो. सकाळी गौघाटावर फळे-फुले, गंध, अक्षता, दूध तूप,दही, मध इ सर्व पूजा साहित्यासह गुरुजींनी नर्मदा पूजन करून घेतले. कढाईचा नैवेद्य दाखवला. मैयेची आरती केली. नंतर नर्मदाष्टक झाले. पाच कुमारिकांचे पूजन केले.घाटावर कढाईचा प्रसाद वाटला. गुरुजींच्या सूचनेनुसार परिक्रमेदरम्यान बरोबर असलेल्या जलापैकी थोडे मैयात अर्पण केले.
ओंकारेश्वरच्या मंदिरात सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. परिक्रमेत जवळ बाळगलेले जल ओंकारेश्वर ला मंदिरात पिंडीवर अर्पण केले. येथे मंदिरात पिंडीसमोर रेलिंग आहे. त्या रेलिंग वर एक पात्र बसवले आहे. त्या पात्रात तुम्ही जल ओतले की ते पिंडीवर जाऊन पडते. प्रत्येकाला वरून पिंडीवर पाणी ओतावे लागत नाही. आठ महिने अनेक परिक्रमावासी, परिक्रमा पूर्ण करून येत असतात. त्यांच्यासाठी ही कायमस्वरूपी व्यवस्था येथे केलेली आहे.
ओंकारेश्वरचे मंदिर हे मैयाच्या प्रवाहामधील बेटावर आहे. या बेटाचा आकार ॐ या अक्षरासारखा असल्यामुळे ओंकारेश्वर असे म्हटले जात असावे. ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगाला
ओंकारमांधाता असे नाव आहे.
ओंकारेश्वर मंदिराच्या भोवतीची, बेटावरची एक परिक्रमा असून ती सात किलोमीटरची आहे. या सात किलोमीटर मार्गावर विविध मंदिरे, आश्रम आहेत. सात किलोमीटरच्या या मार्गावर चांगला रस्ता बांधलेला असून, अनेक चढ-उतार आहेत. परिक्रमा मार्गावर गीतेतील श्लोक संस्कृत आणि हिंदीमध्ये कोरलेले दिसून येतात. सर्वसाधारणपणे दोन ते अडीच तासांमध्ये ही परिक्रमा पूर्ण होते. आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो तसे याचे स्वरूप आहे. महाराष्ट्रात गणपतीपुळ्याला जसे डोंगराभोवती प्रदक्षिणा घालतात, तसेच ओंकारमांधाताच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग केला असून आपण ओंकारमांधाताला एक प्रदक्षिणा घालतो.
ओंकारेश्वरच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला मैयेचा प्रवाह आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण तटावरून परिक्रमेत असताना परिक्रमावासीयांना तेथे दर्शनासाठी जाता येत नाही. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतरच ओंकारेश्वराच्या मंदिरात जाता येते.
येथे दक्षिण तटावरून ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दोन झुलते पूल आहेत. पुलावरून ओंकारेश्वरचे धरण दिसते. धरण अगदी जवळ असल्यामुळे मैयेला पाणी खूप होते. परंतु ओंकारेश्वर गावातील सांडपाणी चॅनेल करून मैयेत सोडले होते. ओंकारेश्वरला मैयेत त्याच पाण्यात स्नान व इतर धार्मिक विधी करावे लागतात. गौघाटावर जाताना दुतर्फा तसेच परिसरात जत्रेत असतात तशी धार्मिक साहित्य, पूजा साहित्य, उपहारगृह, शिवलिंगाची दुकाने आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी फार मोकळी जागा उपलब्ध नाही. परिक्रमावासी, परिक्रमा येथून उचलतात आणि / किंवा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर मैयापूजनासाठी येथे येतात. ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने त्यासाठी येणारे यात्रेकरू, वेगवेगळ्या धार्मिक कार्यासाठी स्थानिक लोक याच घाटावर येतात. गौघाटाच्या थोडे पश्चिमेकडे काही आश्रमांचे प्रशस्त व स्वच्छ घाट आहेत. ते निर्मनुष्य होते. त्याचा उपयोग फक्त त्या आश्रमातील लोक करतात. इतरांना वापरण्यास परवानगी नाही. घाटावर जाताना तीव्र उतार आहे, त्यामुळे चढताना खूप दमछाक होते.
सायंकाळी ममलेश्वरच्या मंदिरात प्रायश्चित्त विधी केला. परिक्रमेदरम्यान कोणाची ( प्राणी, पक्षी, कीटक ) जाणता अजाणता हत्या झाली असेल तर, त्याचे प्रायश्चित्त घेण्याचा हा धार्मिक विधी असतो. एक हजार आठ मातीची शिवलिंग करून शंकर-पार्वती व गणेश यांना आवाहन केले जाते. एक दीड तासाचा हा विधी असतो. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर सर्व विधी यथासांग पार पडले. गुरुजींना दक्षिणा देऊन प्रसाद व आशीर्वाद घेतले.
आता घराकडे परतीचे वेध लागले होते. सायंकाळी ओंकारेश्वरच्या बस स्टॅन्डवर गेलो होतो. परिक्रमा पूर्ण झालेल्या परिक्रमावासींची घरी परतण्याची लगबग सुरू होती. नर्मदे sss हर च्या जयघोषात परिक्रमावासींना निरोप देणे चालू होते. रेल्वेने पुढे जाणाऱ्या परिक्रमावासींना खांडव्याला जावे लागते. खांडव्याकडे जाणाऱ्या गाड्या विशेष गर्दी होती. मी उद्या घराकडे निघणार होतो. आमच्या दोघांचाही दिवस व्यग्र गेला. गेले काही दिवस आम्ही बरोबर होतो. उद्यापासून वेगळ्या वाटा. मैयानी एकत्र आणले आणि पुन्हा वेगळे केले. सकाळी धनराज पिपरियाच्या गाडीमध्ये बसला आणि मी इंदोरला जाणाऱ्या गाडीमध्ये. आमचा दोघांचा एका दिशेने चालू असलेला प्रवास ओंकारेश्वरला संपन्न झाला होता आणि दुसरा प्रवास विरूद्ध दिशेने सुरू झाला होता.
प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संचालक ,श्री रवींद्र गोरे यांनी इंदोर पुणे बसच्या तिकिटाची पुण्याहून व्यवस्था केली होती. इंदोरहून बसने पुण्याला पोहोचलो. मैया कृपेने माझी काही अंतर चालत आणि काही अंतर बसने अशी परिक्रमा पूर्ण झाली. मैयाने करून घेतले, आपण निमित्तमात्र. नर्मदे हर...
नर्मदे हर...
अर्धविराम....परत भेटूच...
जय श्री गुरुदेव दत्त
लेखक : उदय नागनाथ
Email - udaynaganath@gmail.com
मोबाइल - ९४२२०८१०८०