अरविंद मुळे - श्री नर्मदा परिक्रमा
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
अरविंद मुळे - श्री नर्मदा परिक्रमा
श्री नर्मदा परिक्रमा - श्री अरविंद भाऊ मुळे
|| नर्मदे हर ||
मी 1978 मध्ये मुंबईची नोकरी सोडून नागपूरला शासकीय सेवेत रुजू झालो. कार्यलतातील वातावरण चांगले असल्याने वर्षातून 2-3 वेळेस सहली निघायच्या. 1984 चे दरम्यान आमची सहल अमर कंटक, जबलपूर अशी ठरली. ते वय असे होते, की सहल म्हणजे खाओ, पीओ, मौज करो. पण घरचे संस्कार असे होते की कुठलीही वाईट सवय नव्हती. आम्ही अमर कंटक येथे रात्री पोचल्यावर सकाळी कपिलधारा पहायला निघालो.
1984 चे अमर कंटक आज आहे, तसे नव्हते. नर्मदा कुंड परिसर मात्र आहे तसाच आहे, कुंडाच्या बाहेर कम्पाउंड वाल व छोटा रोड ( जो आजही आहे ) रोड नंतर नदीची छोटी धार एखाद्या नाली सारखी वाहत असे. ( आता पाणी अडविल्याने तेथे छान घाट बांधला आहे, व दुकाने आहेत ) ती धार गावाबाहेर कपिलधारे कडे जात असे.
कपिलधारा म्हणजे एका झोपडी जवळून एक पाऊलवाट खाली उतरत असे, जी जवळपास 100-125 फूट खाली नदीच्या धारेकडे जात असे, ज्या झोपडी जवळून खाली उतरायचे ती झोपडी म्हणजे कपिल मुनींचा आश्रम. आता येथे मंदीर आहे. तेथून पुढे आम्ही नदी किनाऱ्याने दूध धारे कडे गेलो. दूध धारा येथे स्नान करीत असतांना आम्हाला काठावर थोडी धावपळ सुरु झाल्याचे जाणवले. 5-7 लोकांचा एक समूह तेथे आला, आणि बसला. काठावरील लोग त्यांना नमस्कार करून, "नर्मदे हर" म्हणत आणि बाजू होत. आम्ही ही नमस्कार केला, तेथे समजले की ते लोग मथुरा निवासी होते, व त्यांची परिक्रमा तेथे पूर्ण झाली. नर्मदा परिक्रमा हा शब्द सर्व प्रथम माझ्या कानावर आला तो असा. त्यानंतर तेथे आणखी परिक्रमा वासी पाहले. नकळत " नर्मदा परिक्रमा " हा शब्द मनात रुजला. माझे मित्र श्री प्रदीप ओगले व मी आम्ही ठरविले की आपणही परिक्रमा करायची.
नंतर मात्र लक्षात आले, की सुटी काढून परिक्रमा करणे शक्य नाही, हळूहळू सांसारिक जबाबदाऱ्या वाढल्या, आणि एक गोष्ट लक्षात आली की आपण सेवानिवृत्ती नंतरच परिक्रमा करू शकू. पण या विषयावरील पुस्तके मात्र वाचत गेलो. तो विषय मनातून गेला नाही.
2012 ला सेवानिवृत्त झालो. पण एक मोठी अडचण निर्माण झाली होती. 31 डिसेम्बर 2011 ला प. पू. वासुदेवानंद सरस्वती यांच्यावरील एक कार्यक्रम पाहून घरी येत असता, माझा छोटा अपघात झाला. गाडी स्लिप झाली. पत्नीनेच मला दवाखान्यात नेले. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते, पण डावा पाय दुखायला लागला. 31 ऑगस्ट 2012 ला सेवानिवृत्त झाल्यानंतर ते दुखणे एव्हढे वाढले कि घरातही चालणे मुश्किल झाले. काही दिवसांनी जानेवारी 2014 ला डॉ. ना दाखविले, त्यांचे औषध लागू पडले आणि 70 टक्के आराम मिळाला.
परिक्रमेचा विचार मनातून जात नव्हता. शेवटी जाण्याचे ठरले. आणि नागपुरातून एकटाच निघालो. सर्व अडचणी, त्रास मैय्यावर सोपविले आणि 11 नोव्हेम्बर 2014 ला नागपूर सोडले, ते पावसातच. 13 नोव्हेम्बर 2014 ला गुरू पुष्यामृत योगावर ओंकारेश्वर येथून परिक्रमेचा श्रीगणेशा झाला.
( क्रमश: )
। श्री नर्मदा परिक्रमा ।
सकाळी गौ घाटावर क्षौर, कन्या पूजन, संकल्प व प्रमाणपत्र घेणे वगैरे सर्व झाल्यावर मैय्याला नमस्कार करून सांगितले,
परिक्रमा करण्याची इच्छा तीव्र आहे, पण शरीर सुस्थितीत नाही, पाय दुखतोय, माझे दुःख कमी करू नकोस, पण सहन करण्याची शक्ती दे. मला काल येथे आल्यावर ( ओंकारेश्वर ) तू साथीदार मिळवून दिले. आता तूच सांभाळ कर. डोळ्यात अश्रू आपोआपच जमा झाले.
10-30 वा. भक्त निवास मध्ये येऊन, जेवण केले व आम्ही तिघांनी ( पुण्याचे श्री महाजनी काका व बडोदा येथील श्री मुश्रीफ ) श्री गजानन महाराजांना नमस्कार करून 11-35 वा. बॅग उचलली, पण माझ्या बॅगचा बंद तुटला. माझ्या सहकाऱ्यांना सांगितले, तुम्ही पुढे निघा, मी दुरुस्त करून निघतो. माझा मुलगा ऑटो ने बॅग घेऊन पुढे बस स्टँड वर गेला व मी पायी निघालो.
मी जाईस्तोवर बॅग शिवून झाली होती. या घटनेने माझ्या मनात नकारात्मक विचार सुरु झाले. सुरवातीलाच अपशकुन, पुढे कसे होईल, परिक्रमा होईल का पूर्ण, यामुळे मी हैराण झालो, रस्त्याने चालतांना नामस्मरणावर भर देण्याचा प्रयत्न सुरु होता, पण ' प्रथम ग्रासे मक्षिका पात ' असे आपल्याच बाबत का घडावे, हे कळत नव्हते. लक्षात हे ही आले की आपले मन किती कमजोर असते.
मोरटक्का आले, सहकारी भेटले, आणि आम्ही भक्तराज आश्रमात स्थिरावलो. मनातील अशांतता हळूहळू कमी झाली.
श्री सियाराम बाबा म्हणजे सत्पुरुष. आपण श्री गजानन महाराज, साई बाबा यांना पाहीले नाही, पण सियाराम बाबांना पाहिले, ही आपल्यासाठी उपलब्धीच आहे. पुढे माकडखेडा पासून पायांना फोड यायला सुरवात झाली, त्यामुळे चाल मंदावली, सहकारी पुढे, मी मागे असे सुरु झाले. खलघाट येथे त्यांना पुढे जाण्याबाबत सांगितले, खलघाट पासून मी एकटा निघालो. कसरावद येथे किनाऱ्यावरून वर आलो व वेदांत व्हिला येथे अगोदर भेटलेल्या परिक्रमा वासींनी जेवायला बसविले. कसरावद येथून राजघटला निघालो. एकटाच असल्याने नामस्मरण छान होत होते, पायाला फोड असल्याने चाल मंदावलेली होती, रस्ता म्हणजे झुडपी जंगल आणि दोन्ही बाजुंनी मातीचे उंच ढिगारे. फक्त एक बैलगाडी जाईल एवढा रस्ता. खाली मन घालून आपल्याच तंद्रीत चाललो असता, समोरून 4-5 उंट जोराने पळत येत होते. अंतर असेल अंदाजे 200-300 फ़ूट. नर्मदे हर असा जोरात आवाज दिला. " रुको आ रहा हूं " असा आवाज आला व एक राजस्थानी जोराने पळत आला, तो व उंट बरोबरच माझे जवळ पोचले, तो मला कव्हर करून समोर दोन्ही हात पसरवून उभा झाला. थोडक्यात वाचलो. पण भीती नाही वाटली. माफी मागून तो गेला व मी पुढे राजघाट ला गेलो.
त्यादिवशी तेथे जवळपास 22 ते 25 परिक्रमा वासी होते, सर्वानी शूल पाणी च्या रस्त्याने जाण्याचे ठरविले. मी एकटा पाटी बोकराटा हा मार्ग निवडला. कारण पहाडी चढणे व उतरणे यात कसा त्रास होतो हे मी नागद्वारच्या 12 यात्रा केल्या असल्याने मला माहिती होते, माझा पाय दुखावलेला असल्याने मी तो मार्ग सोडला.
पाटी मार्गाने बोकराटा येथे सकाळी 11-30 वा. पोहचलो. श्री राम मंदीरात आसन लावले. जेवण व आराम करून 3-30 वा. निघालो, गाव संपता संपता एका दुकानदाराने आवाज दिला, " कहां जा रहे हो ? आपको मालूम हैं, यहां से आगे 12 कि. मी. तक कोई गाव नही, पुरा जंगल हैं, रात को कहां रहोगे ? आज की रात मेरे यहां रह जाओ, कल सुबह निकलना । आप अकेले हैं । "
विचार केला खरोखर असे लोग आहेत, म्हणून परिक्रमा सुकर होते.
सकाळी निघाल्यावर लक्षात आले, खरेच जंगल चांगलेच आहे, थोडी हूर हूर वाटली, पण नर्मदे हर असा आवाज केला व निघालो. 9 चे दरम्यान थोडी थंडी कमी झाली व पहाडी नदी दिसली. स्नान, संध्या आटोपून पुढे निघणार, तोच मागून 8 ते 10 लोकांचा जत्था आला, नर्मदे हर झाले, तेच म्हणाले, जंगल जा मामला है, हमारे साथ चलो.
मैय्याने पुन्हा सोबत मिळवून दिली.
( क्रमश: )
। श्री नर्मदा परिक्रमा - 3 ।
बोकराटा जंगल तसे चांगले आहे, पण कुठे कुठे पहाडावर आदिवासींच्या झोपडया दिसतात. जंगल संपत आले असता एका टेकडीवर एक झोपडी दिसली, थोडा आराम केला. एका परिक्रमा वासिने विचारले, यहां चाय का दुकान मिलेंगा । उत्तर अर्थातच नकारार्थी आले. आराम करून निघालो. झोपडीतील बाईने सांगितले, ' चाय रखा हैं ' सर्वांना आनंद झाला. सर्व परिक्रमावासी खरगोंन जिल्ह्यातील होते, मी एकटा मराठी. चहा झाल्यावर त्या बाईची मुलगी 3ते4 वर्षांची असेल तिच्या हातात 40 रुपये चिल्लर होती ती ठेवली. ती बाई एकदम बोलायला लागली.
' महाराज जी पैसा ना दो, मैय्या हमे पाप देगी, वो पैसा ले लो । '
तिला समजावले, ती लहान मुलगी आहे, तिला खाऊसाठी दिले आहे, ती शांत झाली. कारण तिची झोपडी तिची परिस्थिती सांगत होती, येन केन प्रकारेण तिला थोडी मदत करावी, हा उद्देश होता. तेथून पुढे आम्ही बंदरियाबाड या गावी ' नर्मदा कुटी ' या आश्रमात मुक्काम केला.
दुसरे दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला. सकाळी मी एकटाच निघालो, बाकी सर्व जेवण झाल्यावर निघणार असे म्हणाले. थोडे पुढे गेल्यावर मागून त्याच परिक्रमावासी पैकी 3 जण आवाज देत होते. ' महाराज जी अगर हम आपके साथ आये तो चलेगा । ' असे म्हणून ते माझे बरोबर आले. आता आम्ही चार झालो. पुढे शहादा, प्रकाशा, तळोदा मार्गे गुजरात मध्ये प्रवेश.
डेडियापाडा चे अगोदर श्री सदानंद महाराज यांचा ' मैकल सुता आश्रम ' आहे, स्वतः महाराज समोर आले, तेथे जेवण झाल्यावर महाराज म्हणाले, यावर्षी अवेळी पाऊस खूप झाला आहे, तुम्ही सरळ अंकलेश्वरला जा, राजपिपला मार्गे गेलात, तर 75 कि. मी. जास्त चालावे लागेल, आणि पावसामुळे किनाऱ्याने चालता येणार नाही.
त्यामुळे आम्ही नेत्रांग मार्गे गेलो. नेत्रांगचे पुढे एका मंदीरात आम्ही आराम करीत होतो, दुपारी थोडा उन्हाचा त्रास जाणवतो. तेथे एक महाराज काही चेल्यांबरोबर आले, आम्ही मंदिरातून बाहेर एका झाडा खाली विसावलो. मंदीरात गांजाची चिलीम सुरु झाली. आम्हाला जेवण करून जा, असे सांगण्यात आले, एक चेला सायकल घेऊन गावात गेला, थोड्या वेळाने सर्व बाहेर आले, आणि म्हणाले, आम्ही दर्शन घेऊन येतो, तुम्ही जेवण करून जाणे. त्या मंदिराच्या पुजाऱ्याला विचारले, तेंव्हा तो म्हणाला, ' ये सब गंजट्टी है, ईनका कोई भरोसा नही रहता आयेंगे 3-4 बजे तक. झालेही तसेच. शेवटी निघालो. हा भाग म्हणजे हायवे आहे, पण आजूबाजूला घनदाट जंगल आहे. 5 वाजता एका आश्रमाची पाटी पाहून हायवे सोडून 1 कि. मी. जंगलात गेलो. तेथे छान हनुमान मंदिर. आणि समोर ओटा व 2 छोट्या खोल्या. रात्री थंडीत खुल्या ओट्यावर झोप.
सकाळी सर्व आटोपून निघालो. नेत्रांग ला सकाळी जेवण केले. श्री पांचाळ यांचे घरी. निघालो. हायवे असल्याने त्रास नव्हता. आज असा प्रसंग घडला, कि आपण एकटे नाही, मैय्या आहे बरोबर, याची अनुभूती आली.
सायंकाळचे 5 वाजले, तरी मुक्कामासाठी योग्य ठिकाण दिसत नव्हते. सूर्यास्त 5-40 चा असल्याने आता काळजी वाटायला लागली. शेवटी SRPF चे ट्रेनिंग सेंटर दिसले. मेन गेट वर हवालदाराला विनंती केली, जर आम्हाला गेस्ट रूम मिळाली तर मुक्काम करता येईल, यावर ' गेस्ट रूम नहीं है ' असे टिपिकल सरकारी उत्तर मिळाले. शेवटी त्यांना विनंती केली, कि गेटच्या समोर जो फुटपाथ आहे, तेथे आम्ही झोपतो. त्यावर तो हवालदार म्हणाला, ' यहां से सिधा जहां हमारा कम्पाउंड वाल खतम होता है, वहां से लेफ्ट में अंदर 1 कि. मी. एक हनुमान जी का मंदीर हैं, वहां एक तालाब भी हैं, पुरी सुविधा हैं । आप वहां जाईये
आम्हाला आनंद झाला. आम्ही त्या मंदीरात पोहचलो, आणि सूर्यास्त झाला. आता तेथेच आसन लावायचे ठरले.
साधारणतः 20X30 चा सिमेंट चा ओटा, 7-8 फुटाचे छोटे मंदीर. ओट्यावर सिमेंटचे 4-5 बाक. मंदीरात एक पणती लावलेली. तोच काय तो उजेड. बाकी लाईट नाही, ओट्यावर शेड नाही, तलाव म्हणजे एक छोटे डबके, आणि पाणी शेवाळलेले. पाय ही लावू शकणार नाही, एव्हढे घाण पाणी. आज आपण पूर्णपणे फसलो, हे लक्षात आले. मंदीराच्या एका बाजूला नजर जाईल तोवर गव्हाची शेती, दुसऱ्या बाजूला दूर हायवे, समोर दाट असे झुडपी जंगल आणि मागे दूरवर पोलीस वसाहतीतील घरे. उजेड म्हणावा तर फक्त एक पणती जी मंदीरात होती. सूर्यास्त झाल्याने सायंकाळची पूजा आरती केली. थंडी भयानक आणि ओटा एकदम खुला. खाण्यासाठी जवळ फक्त 50 ग्रॅम फरसाण व एका जवळ एका बाटलीत पाणी. असा प्रसंग आज आपल्यावर का यावा, हे कळत नव्हते. भीती नाही वाटली. 6-30चे दरम्यान 5-6 मुले दर्शनाला आली, कारण त्या दिवशी मंगळवार होता,पोलीस वसाहतीतील ती मुले दर्शन घेऊन झाल्यावर एकाने विचारले, ' यहां रहेंगे आप ? '
हां, आज तो यहीं रुकना हैं, हमे यहां का पता दिया, और सूर्यास्त के बाद हम चल नही सकते । इसलिये आज यहीं सोयेंगे ।
' और खाना ? '
' खाना नही मिला तो चलेंगा, लेकिन अगर दे सकते हो, तो पाणी ला दो '
' थोडा समय लगेंगा, मैं घर से लाऊंगा ' ।
' ठीक हैं ।'
7 चे दरम्यान सायकलवर तो 3 बाटल्या पाणी, 4-5 संत्रे, 2 बिस्किटचे पुडे आणले, आमची सगळी काळजी मिटली.
रात्री 8-30 चे दरम्यान 4 मोटरबाईक वर 8 जण दर्शनासाठी आलेत, सर्व इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर रँक चे ट्रैनी. दर्शन झाल्यावर एकाने विचारले, ' यहां सोयेंगे आप ?' ' हां ' मी उत्तरलो.
' तो आप लोग हमारे गेस्ट रूम में क्यूँ नही ठहरे ? '
' हमने तो गेट पर पूछा था, हमें यहां का पता दिया गया '
' सब बेवकुफ हैं ।' और खानेका क्या ? '
' खाने कि चिंता नही, थोडा बहुत था, पाणी भी मिला, अब चिंता नही '
' नहीं ऐसा नही चलेंगा ' असे म्हणुन ते सर्व निघून गेले. रात्री 10 चे सुमारास दोन बाईक वर 4 जण आलेत. मोठ्या आकाराचे 4 खणाचे दोन टिफीन, 10 लिटर पाण्याची कॅन, 1 लिटर चे 3 दुधाचे पुडे हे सर्व घेऊन ते आले, ' महाराजजी, चलो खाना खाने, आप लोग बैठो, हम आपको मोबाईल से टॉर्च लगाते हैं '
टिफीन उघडल्यावर डोळ्यात अश्रू जमा झाले. डब्यात दोन भाज्या, चपाती, पुरी, मसाले भात, साधा भात, दाल फ्राय, सलाद, पापड हे सर्व पाहून पोट भरले, आम्ही चौघे जेवलो, ते आम्हाला त्रास नको म्हणून ते बिचारे, उजेड दाखवीत होते. जेवणानंतर ते म्हणाले, रातको दूध पी लेना, और पाणी कि कॅन यहीं छोड देना । '
' रात को दूध पिना । ' असे म्हणून ते निघून गेले, त्यांना त्या सर्वांची नावे विचारली, तर म्हणाले,
' नाम में क्या रखा हैं काकाजी । अपनेसे जितना अच्छा होता है, काम करनेका ।'
रात्री आम्ही दगडांची चूल करून एक लिटर दुधाचा चहा केला, आणि झोपण्याचा प्रयत्न करीत होतो.
रात्री 11-30 वा. एक बाईक आली, दोघे उतरले. दर्शन घेतले, मीच त्यांना विचारले,
' आप दर्शन के लिये आये क्या ? '
' नहीं, हमारे साहब ने कहा, के वो चार परिक्रमा वासी जंगल में सो रहे हैं । आज कि रात यहां के बदले आप वहां पहरा देना । आप सो जाईये, हम यहीं बैठेंगे । '
काय बोलावे ते कळत नव्हते, मैय्या, तू आपल्या लेकरांची किती काळजी करते. आज आपल्याला असा काही अनुभव येईल, असे वाटले हि नव्हते. मनोमन मैय्याला, आणि समोर असलेल्या हनुमंताला नमस्कार केला, आणि निद्राधीन झालो.
। श्री नर्मदा परिक्रमा - 4 ।
सकाळी मंदीर सोडताना हनुमंताला आणि मनोमन मैय्याला व गुरूला वंदन केले व तेथून निघालो.
त्याअगोदर काल नेत्रांगला एक घटना घडली, ती सांगतो. सकाळी आम्ही नेत्रांगला थोडी खरेदी केली व निघालो. एक युवक आवाज देत होता, ' महाराज जी रुकीये ' जवळ येऊन म्हणाला, थोडा आगे गायत्री भोजनालय है, आप लोग महात्मा हो, कृपया खाना खा कर ही जाए । मैं आपको चिट्ठी देता हूं, आप वहां सिर्फ चिट्ठी दिखा देना । '
त्याचा तो प्रेमळ आग्रह बघून ती चिट्ठी घेऊन आम्ही निघालो. समोर गायत्री भोजनालय आले, पहिल्या मजल्यावर होते, एक जण वर जाऊन आला. कळले असे की, आज एकजण फक्त कामावर आला आहे, जेवायला 1 वाजणार आहे. आम्ही निघायची तयारी केली, तेंव्हा खालचे दुकानदार श्री पांचाळ म्हणाले, ' 15 मिनिट रुको,मेरे लिए ' आणि खरोखर 15 मिनिटात म्हणाले, चलो, खाना तयार हैं । आम्हाला आश्चर्य वाटले. दुकानाच्या मागेच घर, छान स्वागत, जेवण व दक्षिणा घेऊनच निघालो. पुढे तोच मुलगा ज्याने चिट्ठी दिली होती, तो पुन्हा भेटला. त्याने आम्हाला थांबवून जी हकीकत सांगितली, ती त्याच्याच शब्दात देत आहे.
माझे नाव विनय प्रजापती आहे, वडील सेवानिवृत्त आहेत, आई आहे, लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे, प्रकृती ठीक नव्हती म्हणून डॉक्टर ला दाखविले, काही टेस्ट झाल्यावर डॉ. नी सांगितले, कि तुम्हाला किडनी ची समस्या आहे, त्यामुळे भविष्य चिंतामय आहे, ही गोष्ट फक्त आई वडिलांना माहिती आहे, घरातील वातावरण बदलले आहे, तुम्ही महात्मा आहात, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. आम्ही स्तब्ध झालो. त्याला सांगितले, कुलदेवतेची आराधना कर, मैय्यावर विश्वास ठेव, सर्व ठीक होईल. तरी त्याचे ते पालुपद चालूच तुम्ही माझ्यासाठी काही तरी करा. मैय्याला प्रार्थना करा. काय बोलावे कळत नव्हते. तो आम्हाला महात्मा म्हणतो पण आपल्याला आपली पात्रता माहिती आहे, पहिल्यांदाच, मी समोरच्या व्यक्तीसाठी काही करू शकत नाही, याची जाणीव झाली. त्याला सांगितले, आम्हीही सामान्यच आहोत, पण मी तुझ्यासाठी आता समुद्र ओलांडतांना मैय्या व समुद्र देवता, नंतर अमर कंटाकला पोहचल्यावर, उगमस्थानी, आणि ओंकारेश्वरला परिक्रमा समाप्तीचे वेळी मैय्याला व देवाला तुझ्यासाठी प्रार्थना करेल. मी फक्त एव्हढेच करू शकतो. त्याचा संपर्क नंबर घेऊन आम्ही पुढे निघालो.
अंकलेश्वरला सायंकाळी पूजा, आरती सुरु असतांनाच श्री महाजनी काका ( पहिल्या दिवसाचे माझे सहकारी ) समोर हजर. आता येथून आपण बरोबरच राहू असे म्हणाले. आम्ही पाच जण झालो.
बलबला कुंड ला मुक्काम केला. हा आश्रम खूप छान आहे. कपिल मुनींनी येथे तप केले, म्हणून मैय्या कुंडात प्रगट झाली. हे गाव नाही, फक्त आश्रम. पण वातावरण छान. तेथून हासोट. येथे काहीही व्यवस्था नाही, हनुमान टेकडी ला जाऊन मुक्काम केला.
सुर्यापेक्षा सूर्याच्या उष्णतेने तापलेली वाळू जशी त्रास देते, तसाच प्रकार हनुमान टेकडी येथे आहे, स्वामीजी शांत, पण चेले एकदम उलट स्वभावाचे. सकाळी कोटेश्वर महादेव पाहिला. हे मंदीर मला खूप आवडले, अगदी एखादे अनुष्ठान करायला चांगले ठिकाण. तेथून पुढे काठपोर. तेथे 40 लोग झाले कि यादी तयार करून आणा, असे स्वामीजी म्हणाले, आमची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट झाली. पैसे नंतर घेईन, जो वेळेवर पैसे देईल, त्याचेच नाव यादीत असेल. त्यामुळे वाट पहा. संध्याकाळी कळले की रात्री 1 वाजता बोट निघणार. त्यामुळे झोपणे शक्य नाही. रात्री 12-30 वा. आवाज दिला गेला. एका नावेत 40 याप्रमाणे 4 नावा निघणार, म्हणजे 160 लोग आम्ही खाडीच्या किनाऱ्यावर पोहचलो. थंडी खूप. पाऊस पडून गेला असल्याने पूर्ण परिसर ओला. बसायची सोय नाही. 12-30 ला गेल्यावर सांगण्यात आले, की नाव 2 वा. निघणार. 2 वा. कळले कि 4 वा. निघणार, आणि शेवटी नावा निघाल्या 5 वा. थंडी मध्ये 4-5 तास उभे राहून आम्ही तसेच थकून गेलेलो. नावेत चढण्याची घाई, त्यामुळे कपडे खराब, सर्वत्र चिखल. एकूण शिस्त व नियोजनाचा अभाव.
ज्यावेळी नाविकाने सांगितले, प्रथम समुद्र देवतेची व नंतर मैय्याची पूजा केली. जवळचे मैयत जल अर्धे समुद्रात शिरवून पुन्हा बाटली पूर्ण भरून घेतली. श्री विनय प्रजापतीच्या प्रकृतीला आराम व्हावा, अशी प्रार्थना केली.
सकाळी 9 वाजता मिठी तलाई येथे उत्तर किनाऱ्यावर परिक्रमेचा श्रीगणेशा झाला.
। नर्मदे हर । नर्मदे हर ।।
। श्री नर्मदा परिक्रमा - 5 ।
मिठी तलाई येथील अन्नपूर्णा आश्रमात, स्नान व कपडे धुतल्यावर जेवणानंतर दहेज कडे रवाना. सुवा, कलदरा नंतर किनाऱ्याने एकसाल व नंतर भार भुतेश्वर. येथे दत्त मंदीरात थांबलो. मंदीर परिसर सुंदर व येथून मैय्याचा देखावाही सुंदर दिसतो. सायंकाळी एक जोडपे आले, आणि विनंती की, आम्ही जेवढे परिक्रमा वासी आहोत, त्या सर्वांनी उद्या सकाळी आमचे घरी येणे, कारण आम्ही नवीन घर बांधले आहे, आपण लोकांनी घरी यावे, अशी आमची इच्छा आहे.
सकाळी आरामात पूजा. 11-30 वा. पुढे प्रवास सुरु. किनाऱ्याने प्रवास सुरु. 5 वा. त्रिगुणातीत ध्यान योग : शिवधाम आश्रम या ठिकाणी मुक्काम. आश्रम छान आहे, पण बांधकाम सुरु असल्याने थोडी अडचण. सकाळी भरुच कडे प्रयाण. भरुच शहर ही मोठे, आणि भृगु ऋषींनी वसवलेले असल्याने परिक्रमा वासीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पुढे नारेश्वर ला मुक्काम.
काल शुक्लतीर्थ येथे मुक्कमी होतो, त्याठिकाणी श्री रंगनाथ नावाचे परिक्रमा वासी भेटले. मूळ कर्नाटकातील असलेले श्री रंगनाथ हे सारखे फिरत असतात. त्यांनी बद्रीनाथ ते पशुपतिनाथ अशी हिमालय परिक्रमा केलेली आहे. ( माझ्या परिक्रमे दरम्यान अशी हिमालय परिक्रमा करणारे दोन सज्जन भेटले, त्यापैकी हे पहिले. )
। श्री नर्मदा परिक्रमा - 6 ।
आज सकाळी नारेश्वर सोडले. देरोली नंतर पुढे किनाऱ्याने प्रवास सुरु. किनाऱ्याने चालत असतांना आपण बिनधास्त असतो, रस्ता विसरण्याचा प्रश्नच नसतो. मढी च्या पुढे किनाऱ्यावर एक मोठा गड्डा व लगतच एक काटेरी झाड. त्या झाडावर एक प्लास्टिक टाकलेले. आम्ही बसलो, दुरून एक म्हातारे बाबा येत होते. आल्यावर म्हणाले, आराम करो, बैठो, मैं चाय बनाता हूं । ते परिक्रमा करून आलेले. त्यांनी बनविलेला चहाची चव एकदम मस्त. त्यांनीच आम्हाला किनारा सोडून वरून जाण्याचा सल्ला दिला. रस्त्याने जातांना आम्ही रस्ता विसरल्याने मालसर ऐवजी अगोदरच्या सुरासमल या गावी पोहचलो. तेथे कळले, मालसर 5 कि. मी. आणि सरळ रस्त्याने गेलात तर शिनोर 5 कि. मी. आणि मालसर ला गेलात तर तेथून शिनोरही 5 कि. मी. मग सर्वांनी विचार केला, आणि सरळ शिनोर गाठले. ( त्यामुळे मालसर हे एक चांगले क्षेत्र दर्शनाला आपण मुकलो, हे माझ्या लक्षात, जेंव्हा पुढील वर्षी मी पुन्हा कुटुंबासह गुजरात दर्शन यात्रा, म्हणजे राजपिपला ते काठपोर दोन्ही किनाऱ्यावरील क्षेत्रे अशी सहल केली, तेंव्हा समजले.)
शिनोर हे गाव ही तहसील चे गाव आहे, मोठे आहे, रणछोड दास मंदीरात आसन लावले. सकाळी किनाऱ्याने निघालो, 7 कि. मी. नंतर अनुसूया आश्रम. त्या अगोदर तीन मंदीर एकत्र असलेले ठिकाण लागले, छान नळ आणि परिसर एकांत असलेला. स्नान पूजा करून लागूनच अनुसूया आश्रमात पोहचलो.
आश्रम फारच छान आहे, एकांत प्रिय व्यक्तीला, अनुष्ठानासाठी सुंदर ठिकाण. दर्शन घेतल्यावर समोरच्या छोट्या हॉटेल मध्ये नाश्ता, चहा घेऊन पुढे निघालो. त्यामुळे आज सकाळचे जेवण नाही, दुपारी 3 चे दरम्यान आम्ही बद्रीनाथ आश्रमात पोहचलो. आश्रम एकदम छान. सुंदर बद्रीनाथाची मूर्ती, शिवाय श्रीगणेश, हनुमान आणि गायत्री मंदीरे. समोर मैय्याचे विलोभनीय दर्शन, मैय्याकडे जाण्यासाठी 25-30 पायऱ्या आणि सुंदर मैय्या. पायऱ्यांच्या एका बाजूला श्री हनुमान द दुसऱ्या बाजूला अर्धनारी नटेश्वर यांची 20 ते 25 फूट उंचीची मूर्ती. एकूणच मनभावन नजारा.
येथील मुख्य स्वामी महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंदजी यांचे दर्शन होऊ शकले नाही. पण उपस्थित आश्रमवासी पैकी 2-3 जण मराठी जाणणारे होते. मनाला भावलेला आश्रम.
सकाळी निघालो, पुढे चांदोद. चांदोद हे तीर्थक्षेत्र आहे. ऋणमुक्तेश्वर महादेव आणि पिंगलेश्वर महादेव.
मानवाला आपल्या आयुष्यात पाच ऋण चुकवावे लागतात. मातृऋण, पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण, आणि समाज ऋण, यापैकी मातृ ऋणा तुन मुक्ती नाही, बाकी चार ऋणातून मानव आपल्या आचरणातून आपल्यातील भक्ती, दान, सेवा, तप याद्वारे ऋण मुक्त होऊ शकतो. तेथील ब्राह्मनाणे माहिती दिली. पिंगलेश्वर महादेव मंदीर म्हणजे महर्षी व्यास व अरण्यदेवी यांची ही तपोभूमी. महादेवाने संतती चा आशीर्वाद देऊनही शुक मुनी मात्र आईच्या गर्भातून बाहेर आले नाही, शेवटी त्यांच्या जन्माच्या वेळी आईला जो स्राव झाला, ती ही औरा नदी. ही नदी येथे मैय्याला मिळते. औरा नदीच्या समोर कर्णाली म्हणजे कुबेर भंडारी महादेव. येथून दिसते. चांदोद आणि कर्नाळी समोरा समोर मध्ये आहे औरा नदी आणि कर्नाळी कडून येणारी मैय्या येथे छान एक छोटे वळण घेते. सुंदर दृश्य. मनावर कायमचे उमटणारे.
1 कि. मी. औराच्या किनाऱ्याने उंच सखल भागातून जाऊन, नदी ओलांडली. आणि कर्नाळी आली. कुबेर भंडारी मंदीर नावाप्रमाणेच श्रीमंत दिसणारे मंदीर. तेथे जेवण करून आम्ही तिलकवाडा रस्ता घेतला.
तिलकवाडा येथे सायंकाळी नर्मदा आश्रमला आलो. आश्रम छान, पाण्याची तात्कालिक उणीव सोडली, तर सर्व उत्तम.
सकाळी आम्ही आश्रमातून निघालो, आणि श्री राम मंदीरात आलो.
येथे 1898 मधे प. पू. थोरले महाराजांनी चातुर्मास केला होता, महाराज प्रथम श्रीराम मंदीरात आले व चातुर्मास करण्याबाबत बोलले. त्यांची जेथे व्यवस्था केली होती, ती जागा आता वासुदेव कुटी म्हणून प्रसिद्ध आहे, थोड्या अंतरावर मैय्या कडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. श्रीराम मंदिराच्या पुजाऱ्याने महाराजांना आपली व्यथा सांगितली. संतती व्हावी अशी इच्छा वर्तविली. महाराजांनी तेथेच त्याला एक मंत्र दिला तो मंत्र असा --
" पंचमी व्रत योगेन,
तिर्थेच तीलकेश्वरे ।
मळीविप्रे ददौ पुत्रं
वासुदेव नमोस्तुते । "
हा मंत्र आणि आशीर्वाद दिले. आमची 9 वी पिढी आज काम करीत आहे, मंदिराचे पुजारी सांगत होते.
त्यांनी आम्हाला स्वामींनी लिहिलेली स्तोत्रे दाखविली. प्रत्येक पानाला लॅमिनीनेशन केलेले. स्वामींनी लिहिलेले एक इंग्रजीतील पत्रही दाखविले. अट एकच दुरून बघा, हात लावायचा नाही.
हे सर्व पाहून आपली परिक्रमा सफल झाली, असे वाटले.
तेथून पूढे मणी नागेश्वर. हा सुद्धा एक सुंदर आश्रम. येथील स्वामीजी डॉक्टरही आहेत. सर्वांची तपासणी केली, जेवण झाल्यावर निघालो, आणि सायंकाळी गरुडेश्वर.
प्रत्येक परिक्रमा वासीच्या मनात येथे जाण्याची ओढ असते. पण लवकर निघायची इच्छा नसते. आज सकाळ पासून मी जे काही ठिकाणे पहिली, ती एकापेक्षा एक धार्मिक दृष्ट्या महत्वाची होती. अगदी बद्रीनाथ आश्रमापासून ते गरुडेश्वर पर्यंतचे हे पूर्ण क्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र आहे.
। श्री नर्मदा परिक्रमा - 7 ।
गरुडेश्वर. प्रत्येक मराठी परिक्रमा वासीयांचे जिव्हाळ्याचे ठिकाण. आम्ही दोन रूम घेतल्या. येथे आणखीही ओळखीचे परिक्रमा वासी भेटले. आणि सायंकाळी श्री मुश्रीफ यांची भेट झाली. पहिल्या दिवसाचे आम्ही तीन सह परिक्रमावासी ओंकारेश्वर नंतर गरुडेश्वर ला भेटलो. रात्री थोडा ताप होता, सर्दी खूप झालेली. गेले दोन दिवस एक चुटपुट मनाला लागलेली होती, दरवर्षी घरी श्री गुरुचरित्राचा सप्ताह होतो, आता परिक्रमेत कसे शक्य होईल ? श्री दत्त मंदीरात दर्शन घेऊन झाल्यावर पुजारी श्री जोशी यांना यावर काही उपाय आहे का, म्हणून विचारले. ते मला एका कपाटाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, यात फक्त सोवळे आहेत, जे आवडेल ते घ्या, व सकाळी मला भेटा, मी तुम्हाला कथासार देईल, जे दोन तासात वाचून होईल. आनंद झाला. सकाळी स्नान करून समाधी मंदीरात पोथी वाचन झाले. मनाला समाधान मिळाले. येथे एक दिवस आणखी थांबावे, असे अगोदरच ठरविले होते.
सकाळी गरुडेश्वर सोडले. गरुडेश्वर पासून पुढील भाग हा तसा जंगली म्हणावा असा आहे, छोटी अंबाजी तर जंगलातच आहे. पुढेही रस्ता चांगला पण रहदारी विरळ असा हा मागास भाग. हा भाग पूर्ण गुजरात संपे पर्यंत आहे. नदीकाठी असलेला ' नर्मदे हर आश्रम ' हा रेणदा गावचा गुजरात मधला शेवटचा आश्रम. येथे आसन लावले. उद्या नदी ओलांडली की एम. पी. मध्ये प्रवेश.
अलिराजपुर जिल्हा. हा भाग ही आदीवासी बहुल आणि गरीब आहे. सायंकाळी आम्ही सोंडवा गावी पोहचलो. येथे आमच्यातील दोघे बसने पुढे रवाना झाले. आम्ही तिघे सायंकाळी जलबट या गावी पोहचलो. हे गाव एकदम छोटेसे, सिमेंटचे फक्त दोन रूम बाकी सर्व घरे म्हणजे कुडाच्या झोपडया. येथे राहण्याची व्यवस्था होईल का अशी विचारणा केली, तर बाजूच्या झोपडीतून एक व्यक्ती श्याम असे त्यांचे नाव, आली आणि म्हणाली, ' आप चिंता ना करे, सब इंतजाम हो जायेगा । ' त्याने त्या सिमेंटच्या खोलीत, म्हणजे शाळेत, व्यवस्था केली. बाजूची झोपडी त्याची होती, घरी मुलगी बाळंतपणासाठी आलेली, त्यांनी प्रथम चहा दिला, रात्री बाजरीची आणि ज्वारीची भाकरी, मिसळचे वरण, आणि अचार, त्या जेवणाची चव आजही जिभेवर आहे. रात्री श्याम थोडा वेळ बसला, त्याने सांगितले, बाजूच्या गावात तो शाळेवर चपराशी आहे, 2500 ₹ मिळतात, येथे थोडी शेती आहे. सेवाभाव जर मनात असेल तर परिस्थिती वगैरे सर्व गोष्टी गैरलागू असतात. त्याची परिस्थिती कशी असेल, आपण कल्पना करू शकतो. मी रात्री श्री महाजनी काकांना सहज हेच विचारले, ' आपल्या शहरी लोकांपेक्षा हे लोग बघा, किती सहकार्य करतात, तेही मान्य करते झाले. आपली परिस्थिती असो व नसो, परिक्रमा वासीयांची सेवा करण्यात ते कधीही मागे रहात नाहीत. सकाळी निघतांना श्यामला म्हणालो, मला तुमच्या घरी यायचे आहे, ते म्हणाले, ही बाजूची झोपडी माझी, त्यात काय बघायचे, त्याला म्हटले, मला तुमची नात पहायची आहे, त्याचे बरोबर गेलो.
अक्षरशः एकच मोठी कुडाची झोपडी, एका बाजूला मातीची चूल, एका बाजूला खाट उभी करून केलेला आडोसा म्हणजे बाळंतीणिची खोली तेथे ती मुलगी बाळाला आपल्या कुशीत घेऊन झोपलेली. अंगावर गोधडी. चुपचाप बाळाच्या जवळ 100 ₹ ठेवले. ती मुलगी व श्याम एकदम ' नाही ' ' नाही ' असे करायला लागले. परिक्रमा वासींकडून पैसे घेणे हे लोग पाप समजतात. त्यांना समजावून निघालो. त्यांचे हे आचरण आपल्याला लाजविते.
पुढे पिपरियापुरा आणि निरसपुर. येथे एका दुकानात सामान ठेवून कोटेश्वरला जाऊन दर्शन घेऊन आलो. आणि पुढे चिखलदा कडे वाटचाल सुरु. चिखलदाच्या अगोदर 2 कि. मी. गेहलगाव आहे हाय वे ला एक झोपडी आहे, तेथे परिक्रमा वासींना थांबवून चहा देतात, आम्ही ही थांबलो. तेथे एक गृहस्थ बसले होते, ते म्हणाले, चिखलदा हे प्रसिद्ध ठिकाण आहे, पण माझे ऐका, येथे गेहलगाव ला मी आश्रम सुरु केला आहे, सर्व व्यवस्था आहे, आज येथे मुक्काम करा, सकाळी चिखलदा येथे जा, अंतर फक्त 2 कि. मी. आहे. आम्ही मान्यता दिली, आणि गेहलगाव आश्रमकडे निघालो.
आश्रम खरोखर छान. मैय्या किनाऱ्यावर छान तीन खोल्या, प्रसाधनाची सोय, मागे मोठा पोर्च. आणि पोर्च मधून छान मैय्याचा देखावा. थोड्या अंतरावर राजघाट दिसते. मैय्या खाली 20-25 फूट आणि कमालीची शांतता. अनुष्ठानासाठी उत्तम ठिकाण. येथे येण्याचा निर्णय घेतला, याचा आनंद झाला.
। श्री नर्मदा परिक्रमा - 8 ।
गेहलगाव आश्रम छानच आहे. मैय्यानुभूती असलेला एक प्रसंग येथे ऐकायला मिळाला. आश्रमाचे मालक श्री देवराम पाटीदार, हे जवळच 3 कि. मी. अंतरावर राहतात. येथे पूर्वी त्यांची शेती होती. त्यांचा अनुभव आपण त्यांचाच शब्दात ऐकू.
" मी आज 61 वर्षांचा आहे. मला 1995 साली मला दम्याचा खूप त्रास झाला, तसा तो बालपणा पासून होताच. मला इंदूरला दवाखान्यात भरती केले गेले. डॉ. नी सांगितले, यांना काही इच्छा असल्यास खाऊ द्या, कोणाला भेटायचे असल्यास भेटू द्या, जास्तीत जास्त 6 महिने हे असे काढू शकतील. घरचे वातावरण बदलून गेले. मी सुद्धा परेशान झालो. एकदा तेथेच, जिथे आपली भेट झाली, बसलो असता, एक संन्यासी परिक्रमा वासी आला, त्याला प्रकृती बद्दल विचारले. तो अगदी स्पष्ट म्हणाला, " तेरे पास दवा हैं, और तू मुझे पुछ रहा हैं । जा, परिक्रमा कर, वैसे भी तू मर तो रहा हैं । " अवस्था अशी होती की, चालणे शक्य नव्हते, पण ते बोलून तर गेले, घरच्यांना समजावले आणि संकल्प सोडला, शक्य होईल तेव्हढे पायी चालायचे, न जमले तर गाडीत बसायचे. 80 टक्के गाडीतुन व 20 टक्के पायी अशी परिक्रमा झाली, पण फायदा हा झाला की माझी हिम्मत वाढली. 1997 ला दुसरा संकल्प मेलो तरी चालेल, पण पायीच जाणार असा केला, ती ही परिक्रमा पूर्ण झाली. तेंव्हा पासून मी दम्याची एक गोळी घेतलेली नाही. येथे शेती होती, आश्रम बांधला, रोज सकाळी घरून येतो, मैय्या मध्ये स्नान करतो, आणि आश्रमात काय हवे ते पाहतो हीच आता परिक्रमा वासींची सेवा करतो. आश्रम असा की येथे काही दिवस रहावे, असे वाटते, शांत वातावरण, समोर 2 कि. मी. वर राजघाट दिसते. सुंदरच.
सकाळी तेथून निघालो, तो सरळ चिखलदा. प. पू. थोरले महाराजांनी दोन चातुर्मास केलेले ठिकाण. सन 1900 आणि दुसरा 1912 मध्ये. येथून दुसरा चातुर्मास संपवून महाराज जेंव्हा गरुडेश्वरकडे निघाले, तेव्हा शूलपाणीच्या जंगलात रस्ता विसरल्यावर प्रत्यक्ष अश्वत्थामा त्यांना रस्ता दाखवीत होता, ही कथा त्यांच्या चरित्रात आलेली आहे. अगदी समोर राजघाट.
हा भाग आता ' नर्मदा मंदीर परिसर ' म्हणून ओळखला जातो, पूर्वी येथे एक दत्त मंदीर ही होते, पण 1985 च्या महापुरात ते वाहून गेले.श्री चाफेकर कुटुंबाने ही माहिती दिली. चहापाणी झाल्यावर पुढे प्रस्थान. मलवाडा पर्यंत किनाऱ्याने गेल्यावर पुढे रस्त्याने पंचमुखी हनुमान व बोधवाडा. देवपथ लिंगतीर्थ आश्रम. आमचा विचार दर्शन घेऊन निघायचा होता. पण स्वामीजी म्हणाले, आम्ही बनवतो, पण जेवण करून जा. श्री यंत्राच्या आकारासारखे हे मंदीर. आता पाण्याखाली जाणार, म्हणून पिंड स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केला, लक्षात आले, कि पिंड जवळपास 11 फूट खाली आहे. 5000 वर्षे हे जुने असलेले मंदीर, आता डुबीत क्षेत्रात आहे. स्वामींच्या चेहऱ्यावर पीडा आणि बोलण्यातून वेदना स्पष्ट दिसत होती. आपण तरी काय करू शकतो.
" कालाय तस्मै नमः । "
असे म्हणण्या पलीकडे.
। श्री नर्मदा परिक्रमा - 9 ।
सकाळी खूप थंडी मुळे निघायला उशीर होतो, आजही 8-30 वा. सेमलदा सोडले.
दुपारी बकानेर हे मोठे गाव. एका माईने आवाज दिला, ती एक दिवस अगोदरच बसने परिक्रमा करून आलेली. दाल बाटी चे जेवण झाले, आणि सायंकाळी लुन्हेरा गाठले. प्राचीन रुद्रेश्वर हनुमान मंदीर.
सकाळी 8 कॅअजर लुन्हेरा सोडले आणि 11-30 वा. कालिबावडी ला राम मंदीरात जेवण झाले. आता मांडुकडे प्रयाण. घाट सुरु होण्यापुर्वी रस्त्यावर असलेल्या आश्रमात चहा पाणी झाले, आणि सायंकाळी श्री निलकंठेश्वर महादेव मंदीराजवळ आलो. आणि दर्शन करून श्रीराम मंदीर कडे प्रयाण. मांडू या अगोदरही 2 वेळा पाहून झाले असल्याने नवीन असे वाटत नव्हते. फक्त अगोदर मंदिरासमोर मोकळे मैदान होते, आता भक्त निवास ची इमारत झाली आहे. भारतात क्वचितच दिसणारी चतुर्भुज श्रीराम मूर्ती येथे आहे. आज गर्दी प्रचंड. सकाळी 7 वाजता निघालो, रेवाकुंड कडे प्रयाण. रेवाकुंड म्हणजे राणी रुपमतीचा महाल. राणीची माँ नर्मदावर अपार श्रद्धा. काही नास्तिक लोकांनी शंका उपस्थित केली की कुंडातील पाणी हे नर्मदा नदीचेच कशावरून. राणीने आपल्या सेविकांना आज्ञा केली, की नदीवर जाऊन मैयताची ओटी भरावी. येथून मैय्या 15 कि. मी. आहे. सेविकांनी मैय्याची ओटी भरली, सकाळी तेच समान रेवाकुंडात दिसले.
मांडूची टेकडी उतरणे म्हणजे थोडी भीती मनात होती. कारण अगदी डेडियापाडा येथे असतांना अनुभवी परिक्रमा वासी जे होते, ते वर्णन करतांना, ' तुम्ही शांतपणे चला, एक सेकन्द जरी दुर्लक्ष झाले, कि खाली तुमचे प्रेतच. असे एका व्यक्तीने केलेले वर्णन ऐकून मनात धास्ती होती. टेकडीवरून खाली पाहतांना लहान दिसणाऱ्या गाई-म्हशी, छोटी घरे, त्यामुळे कोणाला तसे वाटत असेल ही. पण मनातील धास्ती थोडी कमी झाली. सद्गुरचे स्मरण करून हळूहळू उतरायला सुरुवात केली. साधारणतः एक ते दीड तास लागतो. आम्ही खाली आलो.
पहिले गाव हिरापूर. शाळेजवळ सावलीत थोडा आराम केला. अगोदर भेटलेले एक परिक्रमा वासी भेटले, त्यांना आवाज दिला, जवळचे फरसाण काढले, आराम आणि नाश्ता दोन्ही आटोपले. ते परिक्रमा वासी फक्त काठी घेऊन होते, मी विचारले, ' सामान कुठे आहे,' तर म्हणाले, ' काही लोग बसने गेले, त्यांच्याबरोबर समान दिले, मी एकटा टेकडी उतरलो.' आणि म्हणाले, ' अहो, जर समोर मैय्या नसेल, तर एखाद्या गध्या सारखे सामान घेऊन चालण्याला काय अर्थ आहे ? '
त्यांचे हे बोलणे ऐकून क्षणभर खूप राग आला, पण स्वतःला समजावले.
' जर विचारसरणीच विकृत असेल, तर बोलणेही असेच होईल ना ?' परिक्रमा हे तप आहे, ते शुद्ध अंतकरणाने, भावनेने, श्रद्धेने आणि सचोटीने व्हावे, असे वैयक्तिक माझे विचार आहे.
करता येईल तेव्हढी मजा करावी, शक्कतो त्रास करून घेऊ नये, अश्या तऱ्हेने फिरायला आल्या सारखे चालणे, यात मजा नाही. असो. सायंकाळी धामनोद ला हनुमान मंदीरात आसन लावले. थोडी खरेदी झाली. एक ब्लँकेट घेतले, वजन नको म्हणून घेत नव्हतो, पण थंडी सहन होत नव्हती, म्हणून घ्यावे लागले.
। श्री नर्मदा परिक्रमा - 10 ।
सकाळी 8 वा. धामनोद सोडले, 12 वा. महेश्वर. महेश्वर पाहिलेले असले तरी, घाट पुन्हा पहावा असाच आहे. कदाचित, भारतात नं १ घाट महेश्वरचाच असावा असे वाटते. माझे दोन सह परिक्रमावासी जे सोंडवा येथून पूढे गेले होते, येथे भेटणार, म्हणून घाटावर दीड तास घालवला. समोर दिसणारा शालीवाहन आश्रम व थोडा दूर वरील मांडव्य ऋषी चा आश्रम पाहिला. शेवटी आम्ही तिघेही निघालो. महेश्वरला मैय्याचे पात्र विस्तीर्ण, आणि ओढ असणारे आहे, त्यामुळे मन प्रसन्न होते.
4-30 वा. मंडलेश्वरला मैय्या किनाऱ्यावरील श्री दत्त मंदीरात आसन लावले. मराठी परिक्रमावासीं साठी हे माहेर आहे. आज कपडे धुवावे असे ठरविले, स्थल दर्शन सकाळी.
सकळी पूजा सुरु असतांना आम्हाला सोडून गेलेले 2 जण अचानक समोर आले, पूजा झाल्यावर दर्शनासाठी निघेलो. प्रथम श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री मोडक यांनी बांधलेले श्री राम मंदीर पाहिले व नंतर जवळच असलेल्या ' वासुदेव कुटी 'चे दर्शन घेतले. श्री जहागीरदार बाबा नव्हते, पण मुलीने सर्व माहिती दिली.
मंदीरात परत आलो, तर महाजनी काका निघून गेले होते. जे सकाळी आम्हाला भेटायला आले होते, ते खास आमंत्रण देण्यासाठी आले होते, त्यांचे नातेवाईक येथे जवळच आहेत, तेथे जेवण करून निघालो. श्री गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे. हे मंदीर थोडे दूर आहे.
आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा शास्रार्थ येथेच झाला. श्री शंकराचार्य यांना पराजित करण्यासाठी श्री मंडनमिश्र यांनी चर्चेचे आवाहन केले. वादाचा निकाल निष्पक्ष व्हावा यासाठी अध्यक्ष पदी श्री मंडनमिश्र यांच्या पत्नी, विपुलभारती तिचे नाव, हिला नेमले. तिला सरस्वती म्हणत असत. ती खूप विद्वान होती. तिला सरस्वतीचा अवतार समजत असत.
ब्रेचवडीवस चर्चा रंगली, आणि मंडनमिश्र पराजित झाले. परंतु पत्नी, म्हणजे सरस्वती हीच चर्चा तिच्या बरोबर सुरु ठेवण्याबाबत आग्रही होती. चर्चा पुन्हा सुरु झाली, आणि सरस्वतीच्या एका प्रश्नावर शंकराचार्य यांनी दिलेल्या उत्तरावर तिचा आक्षेप आला. स्त्री-पुरुष संबंधातील प्रश्नावर तुम्ही संन्यासी असतांना अधिकार वाणीने कसे उत्तर देऊ शकता, असा तिचा प्रश्न होता. तिच्याकडून सहा महिन्याची मुदत घेऊन, श्री शंकराचार्य यांनी बाजूच्या गुहेत आपले शरीर ठेवून पर काया प्रवेश केला. ती गुहा या मंदिराच्या बाजूला आहे.
तेथून पुढे निघालो आणि पावसाचे लक्षण दिसायला लागले. श्रीनगर म्हणजे मंडलेश्वरचे एक नगर. तेथे आमच्यातील एकाचा भाचा राहतो. तेथे गेलो, आणि पावसाला सुरवात झाली. तारीख होती 31 डिसेम्बर 2014. तेथेच आसन लावले. सायंकाळ नंतर जोरदार वादळ, तुफान गारपीट.
31 डिसेम्बर अशी साजरी झाली.
नर्मदे हर ।
। श्री नर्मदा परिक्रमा - 11 ।
सकाळी जाग आली तीच मुळी विजांच्या गडगडाटाने. पाऊस रात्रभर सुरूच होता. 9 वाजता श्रीनगर सोडले. फक्त 6 कि. मी. प्रवास झाला आणि धरगाव येथे पावसामुळे पून्हा थांबावे लागले. धरगाव चा आश्रम आणि येथील महाराज जी दोघेही छान आहेत. दुसरे दिवशी प्रवास झाला फक्त 17 कि. मी. वरलाया येथे मुक्काम करावा लागला. माझे स परिक्रमा वासी श्री रमेशभाई यांची पुतणी येथे असते, त्यांचे कडे मुक्काम. छान कुटुंब. मालव्या मध्ये श्री सिंघाजी महाराजांचे प्रस्थ आहे, जसे आपल्याकडे, साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज तसे या भागात सिंघाजी महाराज. हे सर्व कुटुंब त्यांचे अनुग्रहीत.
सकाळी वरलाया सोडले आणि 12-30 वा. नागेश्वर मंदीरात बडवाह ला पोहचलो. बाजूला नर्मदा कुंड. श्री राम मंदीर जुने आहे. येथून पुढे गेल्यावर या मंदिराबाबत हकीकत कळली ती अशी की या मंदीरात परिक्रमा वासीयांची सर्व व्यवस्था होत असे. यासाठी म्हणून या मंदिराला जवळ जवळ 150 एकर शेती दान करण्यात आली आहे, 3 वर्षांपूर्वी पुजारीजी वारले, आणि त्यांचे तिनही जावई येथे रहायला आले, शेतीच्या उत्पन्नासाठी. परिक्रमा वासींकडे येथून दुर्लक्ष सुरु झाले. आमच्या एका सहकाऱ्याने त्याच्या नातलगाला फोन केला आणि 5 वा. सर्वांसाठी तयार डबे मिळाले. रात्र कशीतरी काढली. मंदिरासमोरच्या नळावर स्नान उरकून पूजा झाल्यावर बडवाह सोडले. गाव संपताच जंगल सुरु. लक्कडकोट चे जंगल येथूनच सुरु होते. फॉरेस्ट विभागाचा चौकीदार फोन वर मराठीत बोलत होता, त्याला विचारले कुठले, तर अहमदनगर चा आहे म्हणाला, मराठी म्हणून कि काय, मला थांबवून माहिती दिली, साहेब, जंगलात चित्ते आहेत, 3 तर आताच सोडले आहेत, विषारी साप खूप आहेत. आम्हाला मात्र काहीही दिसले नाही. रस्ता आहे, त्यामुळे विरळ का होईना, रहदारी आहे, मोदरी गावाच्या अगोदर ( जेथे च्यवन ऋषी आश्रम आहे ) एके ठिकाणी एक बोर्ड होता सुलगाव 2 कि. मी. आम्ही सुलगावला जावे, असे तेथे उभ्या असलेल्या स्त्रियांनी सांगितले. जेवण करून आम्ही सुलगाव मार्गे 5 वाजता बढेल गावी गेलो, शाळेची खोली घेतली. खाली मंदीरात खिचडीचा कार्यक्रम.
सकाळी मेहंदीखेडा नंतर एक पहाडी नदी पार करीत असता काही संन्यासी नदीवर कपडे धूत होते. मुख्य स्वामीजी बोलून फार प्रेमळ. त्यांचे नाव कृष्णानंद स्वामी. आम्ही सीतावन साठी प्रयाण केले. पिपरी गाव थोडे मोठे वाटले. ( येथूनच एक रास्ता धाराजी साठी जातो.) आम्ही सितावनला गेलो.
सीतावन म्हणजे वाल्मिकी ऋषींचा आश्रम. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आली, तेंव्हा पासून याचे नाव सीतावन झाले. माता सीता येथे आहे, म्हणताच माँ नर्मदा येथे अवतरली. मंदिराच्या मागे पहाडी भाग आहे, जवळजवळ 50 पायऱ्या उतरून जावे लागते, एका पहाडातून पाणी हळूहळू एका कुंडातून दुसऱ्यात अश्या पाच कुंडातून पाणी वाहते. कुंडाच्या त्या बाजूला एक मोठी गुफा दिसते, तेथे लव कुश जन्मस्थान असे लिहिले आहे. माँ नर्मदाच येथे आली असल्याने आम्ही कुंड ओलांडून गेलो नाही, काही लोग गेले. येथील वातावरण छान वाटले. सितामाताने आपले अवतार कार्य जेथे संपविले, ती जागा येथून 7 कि. मी. असल्याचे सांगितले, पण आम्ही गेलो नाही. एक मोठा गड्डा आहे, आणि तो कश्यानेही भरत नाही, असे सांगण्यात आले.
सकाळी तेथून निघालो. रतनपूर, बावडीखेडा लागले, रतनपूर चे राम मंदीर छान आहे, येथे रस्त्यावर रहदारी फार कमी. हळूहळू जंगल दाट होत जात आहे. जयंती माता मंदीर च्या अगोदर एका नदीवर कपडे धुतले. एक गुराखी जवळ आला आणि म्हणाला, जल्दी करो और आश्रम में जाओ । यहां शेर घुमते है, नदीजवळचा चढाव चढला आणि आम्ही जयंती माता मंदीरात पोहचलो.
एव्हढ्या जंगलातही हा आश्रम एकदम छान आहे. आज थंडी खूप जाणवत होती.
उद्या मात्र पूर्ण जंगल. पामाखेडी पर्यन्त एक ही गाव नाही. 21 कि. मी. चे हे जंगल सायंकाळ पर्यंत पार करायचे आहे. बघू या.
। श्री नर्मदा परिक्रमा - 12 ।
सकाळी 8 वा. जयंती माता मंदीर सोडले. काल येथे जवळपास 12 ते 15 परिक्रमा वासी होते, आम्ही चौघे सोडून सर्व सकाळी निघाले. आमच्यातील एकाला पोहे खावेसे वाटत होते, त्याने काल पिपरी हुन सर्व सामान घेतले होते. त्यानेच पोहे बनविले. आम्ही थोडे उशिरा निघालो. मध्ये हनुमान मंदीर लागेल, नंतर पामाखेडी पर्यंत वस्ती नाही, असे सांगण्यात आले. जंगल चांगले आहे. रहदारी आश्रमाच्या जवळपास जाणवली तीच नंतर नाही. हनुमान मंदीर येता येत नव्हते, दूर एक गाव दिसले, सिरकिया, गावाचे नाव. छोटेसे गाव. एकच नळ, बाजूला एक ओटा, स्नान पूजा करून जवळचे होते तेच खाल्ले. आणि पामाखेडी कडे निघालो.
आज एक गंमत झाली, सकाळ पासून आश्रमाची एक कुत्री आमचे बरोबर निघाली, तिला हाकलले, तरी ती गेली नाही, आश्रमात जाणारे एक दोघे भेटले, त्यांनी बोलावले, ती गेली नाही. ती आमच्या पुढे चालायची. आम्ही थोडे थांबलो की ती सुद्धा बसायची, आणि आम्ही निघालो की निघायची. तिला मग आम्ही जवळचे बिस्किटे दिली. 5 चे अगोदर आम्हाला डाम्बरी सडक लागली, पामाखेडी चा बस स्टॉप दिसला, आम्ही सामान ठेवून चहा सांगितला, तोपर्यंत ती आमच्या बरोबर होती, नंतर तिला जंगला कडे जाताना पाहिले, आता आम्हालाच तिची काळजी वाटायला लागली. चहावाला म्हणाला, ती लवकरच पोहचेल आश्रमात, काळजी करू नका.
पामाखेडी गावात पहिले सरपंचाचे घर, राममंदीरापेक्षा येथे व्यवस्था बरी आहे, येथेच थांबा. असे दुकांदाराकडून कळले.
सकाळी निघतांना सरपंच म्हणाले, जातांना समोर किराणा दुकान आहे, त्याच्या बाजूला जाणे आणि एक ठिकाण आहे, ते बघा. आम्ही गेलो. एक फार मोठे वडाचे झाड. छोट्या छोट्या पाट्या व त्यावर ऋषींची नावे लीहिलेली. माहिती कळली ती अशी की वाल्मिकी जेंव्हा वाल्या डाकू होता, त्यावेळी नारदाने वालह्या ला येथेच राम नामाचा मंत्र दिला होता, याच ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी झाला. नंतर येथे बऱ्याच ऋषींनी तप केले, त्या सर्वांची नावे येथे लिहिलेली आहेत.
पुढे धरमेश्वर महादेव मंदीर. काल जे जंगलात गाव लागले होते, सिरकिया, तेथून धरमेश्वर ला सरळ येता येते, पामाखेडी वगळता येते.
धरमेश्वर महादेव सुंदर मंदीर आहे, मूळ मंदीर पाण्याखाली गेलेले, पण नवीन हि छान आहे, चतुर्थी असल्याने जेवणाचा प्रश्नच नव्हता. महाराजांनी गुळा बरोबर दाणे भाजून दिले, आणि झाडावर पिकलेली एक पपई दिली, हे खावे, आराम करा व नंतर निघा. मंदीर परिसर फार प्रसन्न.
पुढे बांई आणि नमनापूर. फतेहगड 4 कि. मी. सांगितले, पण निघाले 6 कि. मी. फतेहगड येता येत नव्हते. आज पहिल्यांदा सूर्यास्त झाल्यावर चालावे लागले. 6 वाजता फतेहगड आले. मुळात फतेहगड गाव नाहीच. मोजून 4 घरे. एकूण वस्ती 16 लोकांची. विश्वातील सर्वात कमी लोक संख्या असलेले गाव पाहिल्याचे समाधान. माँ नर्मदा मंदीरात आसन लावले.
। श्री नर्मदा परिक्रमा - 13 ।
फतेहगड. येथे दूतनी नदी मैय्याला मिळते. मंदीरातून खाली उतरताच आम्ही नदी किनाऱ्यावर होतो. भाऊच्या झोपडीतून एक 12-15 वर्षाची मुलगी आली, व तिने आम्हाला दूतनी नदी नावेतून पार करून दिली.
दुपारी 3 वा. दाबडा गाव आले, माझे तिन्ही सहकारी, येथेच जेवण करु व उद्या निघू असा आग्रह करायला लागले. माझी इच्छा होती, नेमावर 7 कि. मी. आहे, नेमावरला जाऊ. कारण जर लवकर पोहचलो तर जोडे घेता येतील. माझे जोडे फाटले होते. त्यामुळे मी निघालो, ते उद्या भेटू म्हणाले.
नेमावर चा ब्रह्मचारी आश्रम म्हणजे मराठी लोकांचे केंदस्थान. येथेमला मुश्रीफ, पहिल्या दिवसाचे साथीदार गरूडेश्वर नंतर भेटले. तेथे सर्वांनी कन्याभोजनचा कार्यक्रम ठरविला. त्यामुळे उद्याचाही मुक्काम येथेच. नेमावर म्हणजे मैय्याचे नाभीस्थान. अमर कंटक आणि कठपोर याच्या बरोबर मधे नेमावर आहे. जणू एक शक्ती केंद्र. येथे ब्रह्मा चे चार पुत्र सनक, सनंदन, सनकादिक आणि सनत्कुमार या चौघांनीं मिळून येथे महादेवाची पिंड स्थापित केली. हजारो वर्षांपूर्वी ह्या घटना घडल्या असल्या तरी, त्यातील पावित्र्य, महात्म्य आणि त्यामागचा भक्तिभाव तसूभरही कमी झालेला नाही. नदीमध्ये बेट तयार झाले, व तेथे श्री महादेव स्थापित झाले. परिक्रमा वासी तेथे जात नाहीत, पण इतर लोग नावेतून जातात.
येथे अगोदर श्री गाडगीळ काका काम बघत होते, आता श्री विठ्ठल महाराज आहेत, ते आता बाहेर गावी गेलेले आहेत. सकाळी एक धोबी सर्व कपडे घेऊन गेला, सायंकाळी आणून देणार. कन्या भोजनाचा कार्यक्रमही छान झाला. हवा पावसाळी असली तरी थंडीही आहे.
सकाळी नेमावर सोडले. गौनी संगम पर्यंत किनाऱ्याने गेलो, पुढे नदी किनारा सोडण्याचा सल्ला मिळाला. समोर छिपानेर. दादाजी धुनिवाले यांच्या आश्रमात गेलो. भव्य 5 मजली भक्त निवासाची इमारत. जे कार्यकर्ते उभे होते, त्यांना विनंती केली, " जर शक्य असल्यास, खोली मिळेल का ? त्याचे काय भाडे असेल ते आम्ही देऊ. "
त्यावर ते कार्यकर्ते म्हणाले, " धर्मशाळेत झोपा ना, कशाला खोली पाहिजे. "
मी त्याला सांगितले, " शक्य असेल तर द्या, कारण थंडी थोडी कमी वाजेल. "
" आज आम्ही खोली देऊ, उद्या काय कराल ?"
त्याच्या त्या उपरोधिक बोलण्याची चीड आली, त्याला शांतपणे म्हणालो, " उद्याची काळजी आम्ही करीत नाही, तुम्ही ही करू नका, आज रूम मिळू शकेल का, ते बघा, आणि ही माझी विनंती आहे, आग्रह नाही. "
" ठीक आहे, यांना एक खोली दे रे " आणि नदी किनाऱ्याकडे बोट दाखवून म्हणाला, " आम्ही सदावर्त देतो, त्या पिंपळाखाली लाकडे जमवून, स्वयंपाक करून, जेवण झाल्यावर मगच झोपायला या. "
" आम्हाला सदावर्त नकोय. "
आता खरोखर चीड आली होती. आणि यातील सर्वात दुःखाचा म्हणा कि चीड आणणारा भाग म्हणा, माझ्याशी बोलणारे दोन्ही कार्यकर्ते मराठीच होते. रूम मध्ये गेल्यावर एक जण बाहेर गेला, काही नाश्ता आणण्यासाठी. ज्याला हॉटेलबाबत विचारले, त्याने कारण ही विचारले, त्यावर तो त्या सहकाऱ्याला त्याच्या घरी घेऊन गेला, "हे माझे घर, रात्री 8 वा. तुम्ही सर्व या. " रात्री सर्वांचे छान जेवण झाले.
सकाळी निघालो, तेंव्हा कालचे एक कार्यकर्ते उभे होते, त्यांना किल्ली दिली, भाडे विचारले, तर नाही म्हणाले, शांत वाटत होते,
" अहो, काल मी 9 वा. तुम्हा लोकांना बोलवायला आलो होतो, कुठे होता तुम्ही ?"
" कशाला ? मी विचारले. आम्ही जेवायला गेलो होतो. "
" तुम्ही कशाला बोलावले होते ?"
" अहो, कशाला म्हणजे काय, जेवायलाच ? "
" तुमच्या त्या सदावर्त व त्यासोबत च्या विलक्षण अटी ऐकल्या नंतर आम्ही वेगळी व्यवस्था बघितली."
त्यानंतर पुढे सातदेव, मंडी, सिलकंठ आणि नीलकंठ ला मुक्काम. मंडी ते नीलकंठ पूर्ण प्रवास किनाऱ्याने. मजा आला.
। श्री नर्मदा परिक्रमा - 14 ।
सकाळी 8 वा. नीलकंठ सोडले. पूढे डेमावर, पण मध्येच चिमटा गावी एकाने सांगितले, शेतातील रस्त्याने जाल, तर डेमावर सुटेल, सरळ बाबरी घाट. त्याप्रमाणे गेलो. नर्मदा मंदीरात खिचडी चा कार्यक्रम दुपारी 2 वा. पुढे प्रवास सुरु. आज आवरी घाटा पर्यंत जाऊ असे वाटत होते, पण सहकाऱ्याचे पोट दुखायला लागले, त्यामुळे रेऊ गावी मैय्या किनाऱ्यावरील नर्मदा आश्रमात मुक्काम.
सकाळी रेऊ नंतर आवरीघाट. येथे भीमकुंड आहे, नदीचे पाणी अडविण्यासाठी भीमाने येथे मोठे दगड पात्रात टाकले. मैय्याने अर्थात यातूनही मार्ग काढला.
पूढे तालपुरा म्हणजे जहाजपुरा येथे श्री शर्मा कुटुंबाने प्रेमाने स्वागत केले. मुक्कामाचा आग्रह, पण थोडा वेळ असल्याने, त्यांनीच एका आश्रमाचे नावही सांगितले. त्यानुसार 2 कि. मी. वर गाव आले, सित तुमडी, आणि मैय्या किनारी आश्रम, आश्रमाचे नाव अवधूत संन्यासाश्रम. आश्रम थोडा वरती, खाली उताराचा भाग सरळ मैय्याकडे जातो. येथे स्नानाची सोय नाही, कारण मैय्या काठावरच खोल आहे, आणि घाट बांधलेला नाही, त्यापेक्षा आश्रमात स्नानाची सोय आहे. आश्रम परिसर छान आहे, गेल्यावर समोरच एक ओटा, त्यावर महादेवाची पिंड, वाजुला फुलझाडे छान मोठ्या दोन खोल्या, आणि समोर मैय्याचे बिलोभनिय दृश्य. महाराजांना खंत एकच कि येथे परिक्रमा वासी फार कमी येतात, आम्हाला पाहून त्यांना आनंद झाला. एकांत प्रिय व्यक्तीला हा आश्रम नक्कीच आवडेल.
सकाळी महाराजांचा राहण्याचा आग्रह नम्रपणे नाकारून निघावे लागले. पुढे एक ठिकाण लागले, सतधारा. हे गाव नाही, पण आवर्जून पहावे, असे ठिकाण आहे. रस्त्यावरील हनुमान मंदीरात सामान ठेवले आणि खाली नदीकडे गेलो. मैय्याचे विशाल पात्र. पाण्याला ओढ खूप. त्यात पाच ठिकाणी छोटी बेटे तयार झालेली. त्यामुळे पाणी सात धारामधून वाहते. पाण्याला वेग खूप. चांगला आवाज वरील हनुमान मंदीरात ऐकू येईल, असा आवाज.
एखाद्या अल्लड युवती सारखी मैय्या येथे मुक्त, स्वछंद वाहते, जणू कोणालातरी चिडवून ती पळत असावी, असे वाटते. नेहमी गंभीर वाटणारी मैय्या येथे थोडी स्वैर वाटते, आणि म्हणूनच मैय्याचे हे रूप आपल्या मनावर कायमचे ठसून राहते.
प्रसन्न मनाने पुढचा प्रवास सुरु. समोर होलिपुरा. रामकथा सुरु आहे, येथे आराम आणि जेवण दोन्ही झाले.
दुपारनंतर थोड्याच वेळात लक्षात आले, किनाऱ्याने चालणे शक्य नाही, वर येऊन रस्त्यावर उज्जैन-इंदोर- भोपाळ हायवे. सरळ बुधनी कडे वाटचाल सुरु. सायंकाळी बुधनी च्या गोपाळ मंदीरात आसन लावले. विशेष भूकही नव्हती आणि येथे कोणी विचारले ही नाही. दक्षिण तटावर होशंगाबाद. पण येथून दिसत नाही.
। श्री नर्मदा परिक्रमा - 15 ।
सकाळी 8 वा. बुधनी चे गोपाल कृष्ण मंदीर सोडले. गुलजारी घाट जवळ आहे असे सांगण्यात आले व एक शॉर्टकट हि दाखविला त्या रस्त्याने निघालो, पण रास्ता पूर्ण जंगलचा होता, बाभूळीचे जंगल, चांगले दाट, जंगल आणखी दाट होत गेले, पाऊलवाट एका नाल्याकडे चालली होती, आपण रस्ता विसरलो असे वाटायला लागले. कोणी दिसतही नव्हते, हा रस्ता एकतर मैय्याकडे किंवा एखाद्या मेनरोड कडे जाईल, असे समजून चालत राहिलो. खूप खोल उतरून एक नाला ओलांडला आणि पुन्हा वर चढलो. एक व्यक्ती दिसली, तो म्हणाला, तुम्ही गुलजारी घाटाच्या 3 ते 4 कि. मी. पुढे आला। आहात. आता पुढे जबलपूर हायवे आहे.
हाय वे ला चहा घेतला व निघालो बांद्राबान 6 कि. मी. बांद्रबान ला मैय्याचे रूप विलोभनिय आहे. एका टेकडीच्या बाजूने तवा नदी येते व टेकडीमुळे आपल्याला फक्त मैय्याच दिसते, पुढे दोन्ही नद्यांचा संगम आहे. घाट ही छान आहे, आज एकादशी असल्याने, फक्त दाणे व गूळ हे फराळाचे झाले, चहा घेतला व निघालो शहागंज कडे, हे गाव मोठे आहे, नदी किनारी जाण्याचा सल्ला मिळाला, बनेटा गाव मैय्या किनाऱ्यावर आश्रम, मडावन आश्रम, नाव साधुकुटी.
रस्त्याने शेतातून जातांना हरणांचे 2 ते 3 कळप दिसले, प्रत्येक कळपात 5 ते 8 हरीण. रास्ता ओलांडतांना छान उंच उडी मारून पळताना छान दिसत होते.
आश्रम तसा छान आहे, पण महाराज एकदम गंजट्टी. त्यामुळे आश्रमकडे दुर्लक्ष.
सकाळी बनेटा आश्रम सोडला आणि किनाऱ्याने प्रवास सुरु. एका ठिकाणी गाव दूर, पण घाट छान होता, स्नान, पूजा करून घेतली. पुढे किनार्यानेच हतनोरा आले. आज मंदीरात रुद्राभिषेक सुरु होता. छान स्वागत झाले, पण जेवणासाठी जवळपास 3 वाजले. पुढे प्रवास अर्थात किनाऱ्यानेच. पुढे जैत. म. प्र. चे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांचे मूळ गाव. एक झोपडी म्हणजे धर्मशाळा. एक जख्ख म्हातारे बाबा झोपले होते, आज जेवायचे नव्हतेच. तरी बाजूच्या व्यक्तीने 3-4 लाडू पाठविले व चहा घेऊन ते स्वतः आले.
सकाळी निघालो, 9 वाजे पर्यन्त 3 ठिकाणी चहा झाला. थंडी मध्ये चहा घेतला कि बरे वाटते. दिवसभर चालून आज सायंकाळी भारकच्छ.
भारकच्छ ही भृगु ऋषींची तप स्थली आहे. राजा बली ने 999 यज्ञ केले, त्यातील काही याठिकाणी केले, म्हणून परिक्रमेत या गावाला महत्व. यज्ञस्थळी थोडी दूर असल्याने आम्ही गेलो नाही. गावबाहेरच श्री मीणा यांचे चहाचे दुकान. हात जोडून उभे, थांबा, चहा घ्या, मग जा, प्रत्येक परीक्रमा वासी माझ्या दुकानातून चहा घेऊन जावा, ही इच्छा. बोलणे अतिशय नम्र.
या भूमीला पौराणिक महत्त्व ही आहे.
आज येथे " माँ कृपा धर्मशाळा " या श्री नर्मदा प्रसाद शर्मा यांच्या धर्मशाळेत मुक्काम.
। श्री नर्मदा परिक्रमा - 16 ।
आज सकाळी प्रथमच थंडी थोडी कमी जाणवली. मैय्यावर स्नान व वर येऊन पूजा झाली व निघालो. पुढे गडखास, सनखेडा व बरखेडा. बरखेडा येथे टेकडीवर नर्मदा मंदीर. येथे जेवण झाल्यावर 2 वाजता निघालो. पूढे बगलवाडा आणि सतरावन, येथे हनुमान मंदिराच्या अगोदरच दोन युवक उभे होते, म्हणाले, हनुमान मंदीरात व्यवस्था काही नाही, तुम्ही आमच्याबरोबर चला. एकदम कसे जाणार, म्हणून विचार करीत होतो, तर दोन वयस्कर गृहस्थ आले, ते म्हणाले, हे बरोबरच सांगत आहेत, तुम्ही जा, गेलो. एकाच मोठ्या झोपडीचे दोन भाग केलेले. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ झोपलेले, झोपडीच्या अर्ध्या भागात तीन म्हशी बांधलेल्या. अर्थात आमच्या बाजूची जागा चांगली होती. थोड्या अंतरावर का होईना, पण म्हशींबरोबर रात्र काढली, हे खरे, यातही आनंद घेतला.
तीन-चार दिवसापासून खाण्या-पिण्यात वेळ जास्त व प्रवास कमी होत आहे, हे लक्षात येत आहे, माझे तीनही सहकारी एकाच पट्ट्यात राहणारे व हिंदी असल्याने त्यांचे आपसात पटत नव्हते. ते मला काही सांगतही नव्हते. सकाळी सतरावन सोडले, पुढे डुमर. डुमर ला सहकाऱ्यांना सांगितले, लवकर निघू, म्हणजे केतूधान पर्यंत जाता येईल, त्यावर आम्ही येथेच जेवण बनविणार व मग निघणार असे ठरविले आहे.
त्यावर त्यांची अनुमती घेऊन मी एकटा निघालो. डुमर ला मैय्या छान वळण घेऊन पुढे वाहते. 11 वा. मांगरोल आले, ब्रह्मचारी आश्रमात आसन लावले, मैय्यामध्ये स्नान व आश्रमात पूजा केली तोवर जेवण तयार झाले, येथे संस्कृत पाठशाळा आहे. जेवण झाल्यावर निघालो. पुढे केतूधान पर्यंत मैय्या किनाऱ्याने प्रवास.
फार जुने गोपालकृष्ण मंदीर. परिसर खूप मोठा. बाहेरची विहीर ही जुन्या काळातील, पण येथे जागा सोडली, तर व्यवस्था काही नाही. ना भोजन, ना सदावर्त. याबाबत माहिती अशी मिळाली कि गावकरी एकत्र आले, आपल्या गावात परिक्रमा वासींची व्यवस्था होत नाही, हे आपल्या गावाची बदनामी आहे, यावर खलबत झाले व मार्ग निघाला, रोज एकाने परिक्रमा वासींना आपल्या घरी जेवायला नेणे. पाहता पाहता 30 नावे आली, नंतर वाढून ती आता 60 झाली आहेत.
ज्या घराचा नंबर असेल, ती व्यक्ती सकाळी व सायंकाळी मंदीरात येऊन लोकांना घरी घेऊन जाईन व आणून सोडेल. आम्ही जतच्या घरी चाललो होतो, त्याने ही माहिती दिली.
सकाळी स्नान न करताच निघालो कारण, येथे नदीचे पात्र एकदम दक्षिण किनाऱ्याजवळ आहे, आणि वाळूतून जातांना त्रास होतो, पुढे मौनीबाई का आश्रम पर्यंत किनार्यानेच प्रवास. मौनी बाई का आश्रम, येथे तळघरात महादेव मंदीर आहे, स्नान व चहा घेऊन निघालो, किनाऱ्यानेच. पुढे अटल आश्रम. गाव धरमपुरी. आश्रम छानच. पिंडीच्या आकाराचे महादेव मंदीर, आणि आतील पिंड पारा धातूची. समोर मोठा श्री गजानन महाराजांचा फोटो पाहून विचारणा केली, कळले असे कि, जे स्वामी आहेत, त्यांनी गजानन महाराजांना गुरू स्थानी मानले आहे, ते बाहेरगावी गेले आहेत. जेवण करून निघालो, बोरास, चोरास व सायंकाळी अनघोरा आले. महाकालेश्वर मंदीरात आसन लावले, वरच्या मजल्यावर श्री गणेश मूर्तीव हॉल. तेथे आसन लावले. गावातील श्री शर्मा यांचेकडून सायंकाळी जेवणाचे आमंत्रण.
जेवतांना श्री शर्मा, वय 75 च्या पुढे. त्यांनी त्यांच्या परिक्रमेची आठवण सांगितली. 2007 मध्ये त्यांनी परिक्रमा केली, समुद्रात नाव बुडाली. 17 लोग मरण पावले, 23 लोकांना कसेतरी बाकीच्या नावांनी वाचविले. परिणामी परिक्रमा करू शकलो नाही.
त्यांच्या बोलण्यातून नाव बुडून काही परिक्रमा वासी गेल्याचे दुःख व परिक्रमा अर्धवट झाली, पूर्ण करू शकलो नाही, हे शल्य, ही वेदना स्पष्टपणे जाणवत होती.
तुम्ही चिंता करू नका, तुमची परिक्रमा निश्चित सफल होईल, असे आशीर्वाद पर बोलले. निघतांना त्यांचा आशीर्वाद घेतला. परिक्रमेत केंव्हा कशी वेळ उद्भवेल, हे सांगता येत नाही, यासाठी सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असोत.
। श्री नर्मदा परिक्रमा - 17 ।
सकाळी पाऊस सुरु होता, पण थांबलाही लवकरच. 8 वा. निघालो. पतई घाट 6 कि. मी. एकटाच असल्याने नामजपाच्या तंद्री मध्ये प्रवास मस्त होतो. पतई घाट येथे थोडा आराम करून निघालो. पुढे शुक्लपुर येथे नास्ता झाल्यावर टिमरावन साठी प्रस्थान. दुपारी एका नाल्यातून जातांना मलाच वाटत होते, कि रस्ता विसरलो आहोत पण नाल्यात कोणी दिसत नव्हते, आणि नाला संपत नव्हता. जवळपास 1 कि. मी. गेल्यावर एक मुलगा दिसला, त्यानेच मला थांबविले, कहा जाना है, विचारताच टिमरावन म्हणताच म्हणाला, महाराजजी आप रास्ता भूल गये है, यह रास्ता मैय्याके तरफ जा रहा है, और आगे किचड ही किचड है । चलो, मैं दिखता हूं रास्ता । असे म्हणून तो मुलगा माझ्याबरोबर जवळपास 1 कि. मी. मागे आला, व ती पाऊलवाट दाखविली व म्हणाला, यह रास्ता सिधा टिमरावन जाता है ।
टिमरावन ला भागवत कथा सुरु होती, कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती. फक्त चहा घेऊन निघायची तयारी केली. एक कार्यकर्ता म्हणाला, आज रुक जावं, कल चले जाना सुबह । त्याला नम्रपणे नाही म्हटले, चहा घेतला आणि बॅग खांद्यावर घेणार, तोच पाऊस सुरु. चांगला तासभर पाऊस झाला. सगळे म्हणायला लागले, थांबून जा, म्हणून. लवकर थांबलो म्हणून कपडे धुतले.
श्री नर्मदा प्रसाद यांच्या पुस्तकात श्री अशोक कुमार रघुवंशी यांचे नाव आहे, त्यांची चौकशी केली, ते आले, त्यांचे श्री नर्मदा प्रसादजी यांच्याबरोबर बोलणे करून दिले, मला त्यातच आनंद.
रात्री 10 नंतर मूसळधार विश्वम सुरु झाला, रात्री 1 पर्यंत आणि सकाळी 5 ते 7 पर्यंत. भागवत कथा मंडप पूर्ण तहस नहस झाला. मलाही त्यांचे हाल पाहून वाईट वाटले.
सकाळी 8 वा. माझे एक सहकारी पुनिया पटेल यांचा फोन आला, त्या तिघांमध्ये आपसातील वाद झाल्याने त्यातील दोघे डुमर च्या पुढे बसने गेले, पुनियाजी म्हणाले, आप रुको, मैं आ रहा हूं ।
किती वेळ थांबणार. शेवटी पक्की सडक पकडली आणि 5 कि. मी. फेरा परवडेल, पण आता निघू या. पुनियाला फोन करून सांगितले, करौन्दी येथे यावे, व निघालो, माझे पाहून एक साधुबाबाही निघाले.
करौन्दी ला पोहचलो. पुनियाजी आले, येथे सोय काहीही नाही, फक्त राम मंदीर आहे, झोपा. आज जवळचा बिस्किटचा पुडा हेच जेवण. आता आपली नर्मदा जयंती कोठे साजरी होईल, हा विचार यायला लागला.
बघू मैय्या कोठे बोलावते, त्या दिवशी, हे सर्व मैय्यावर सोपविले.
। श्री नर्मदा परिक्रमा - 18 ।
सकाळी 7 वा. करौन्दी सोडले. पावसामुळे पाऊलवाट किंवा किनाऱ्याने चालतांना त्रास होतो. जोड्याला माती चिकटते व ती काढण्यासाठी वेळ जातो, आणि चालण्याची गती मंदावते. बेलथरी गावी धर्मशाळेत समान ठेवून मैय्यावर स्नान व पूजा झाली व निघालो. पुढे पद्मघाट.
सकाळी वातावरण आणखी खराब झाले, 10 वाजता सूर्य पौर्णिमेच्या चंद्रा सारखा दिसत होता. अति दाट धुके, जणू आपण आकाशातून चालत आहोत, असे वाटावे, असे वातावरण. झावरी फाटा आले. एकाने चहा साठी थांबविले, आता किनाऱ्याने न जाता हायवे नी जा, बरमान घाट जवळ आहे, असे सांगितले.
जबलपूर-भोपाळ हायवे धरला. आता चालण्याचा काही त्रास नाही. बरमान घाट आले, याचे खरे नाव ब्रह्मघाट. ब्रह्मदेवाने येथे तप केले. येथे मैय्या दोन टेकड्यांमध्ये असल्याने, पात्र रुंद नाही, पण पाण्याला ओढ आहे. मैय्याची एक धार टेकडीच्या पलीकडून येते व येथे मूळ पात्रात मिळून जाते. येथे श्री तेलंग यांना भेटलो. मराठी असूनही येथे स्थायी झालेले कुटुंब. ते म्हणाले, येथे जेवण करा, व पुढे सतधारा येथे जा, उद्याची नर्मदा जयंती तेथे साजरी करा आज तेथे मुक्काम करा, उद्या कार्यक्रम पहा व परवा सकाळी पुढे निघा. जेवणानंतर किनाऱ्यानेच सतधारा गाठले. सतधारा येथे श्री हरिहर आश्रमात आसन लावले. येथे भागवत सप्ताह सुरु आहे, वृदांवन चे श्री सुमेरानंदजी महाराज आलेले आहेत. हरिहर आश्रम सोडला तर गाव म्हणावे असे सतधारा मध्ये काहीच नाही. तुम्ही नर्मदा जयंतीला ब्रह्मघाट येथे आहात, तुमचे खूप भाग्य. तेथील लोग आम्हाला म्हणत होते.
सकाळी श्री हरिस्वामी, येथील मुख्य स्वामी यांचे दर्शन घेतले, प्रेमळ वाटले. 'कब उठाई परिक्रमा ?' असे विचारताच, मी म्हटले, ' 13 नोव्हेम्बर से उठाई, 75 दिन हो गये, ' ते एकदम नाराजी चेहऱ्यावर दाखवून म्हणाले, ' जब तक मैय्या किनारे हो, दिन मत गिना करो ' हि गोष्ट मनाला एकदम पटली. आज मला परिक्रमेत इतके दिवस झालेत, असे सांगतांना मनात कुठेतरी सूक्ष्म अहंकार रुजतो ना, तो रुजायला नको, म्हणून परिक्रमेत आहे तोवर दिवस मोजू नका, असे त्यांचे सांगणे.
दुसरे दिवशी दुपारी 4 वा. वृदांवनचे श्री सुमेरानंदजी महाराज यांनी किनाऱ्यावर बसून पारा धातूच्या शिवलिंगाला रुद्राभिषेक केला. त्यानंतर लक्ष्मी सूक्त झाले, नंतर एक नाव मोठी दोरी घेऊन दक्षिण तटावर निघाली, त्या दोराला एक मोठी साडी बांधली होती, तिकडे पोचल्यावर दोर सोडून दोन्ही किनाऱ्यावर लोकांनी साडी धरून ठेवली होती. मंत्रांच्या घोषात ती साडी मैय्याला अर्पण करण्यात आली. दोन्ही काठावर गर्दी प्रचंड. त्यानंतर सुंदर नर्मदाष्टक झाले. आणि मैय्या मध्ये दिवे सोडणे सुरु झाले, दक्षिण तटावर पाणी थोडे संथ आहे, बरमानला जी एक धार टेकडीच्या मागून मूळ धारेला येऊन मिळते, ती धार येथूनच वेगळी होते. दक्षिण तटावर दिवे छान दिसत होते, पण उत्तर तटावर पाण्याचे रूपांतर धारेत येथूनच होत असल्याने, दिवे जास्त वेळ राहत नव्हते. हे दृश्य पाहून मन एव्हढे प्रसन्न झाले होते, खरोखर मैय्याने आपल्याला येथे बोलावून आपली परिक्रमा सफल झाल्याचा जणू आशीर्वाद दिला आहे, असे वाटले. दूरवर बरमान घाटाचे चित्रही दिसत होते. बरमान ला मैय्या पहाड फोडून वाहते आहे, त्यामुळे मैय्याचे येथे हे एक वेगळे रूप पहायला मिळाले.
सायंकाळी सर्व आटोपल्यावर श्री हरिस्वामी समोर बसले होते, त्यांना नमस्कार करून निघणार तेवढ्यात ते कोणावर तरी चिडले, आणि एकदम अश्लील शिवीगाळ करू लागले. त्यांचे हे रूप नवीन होते, नंतर कळले, कि त्यांचा तो स्वभाव आहे, पण ते ऐकतांना कसंतरीच वाटते. असो.
( क्रमश: )
। श्री नर्मदा परिक्रमा - 19 ।
सकाळी घाटावर स्नान व पूजा करून सतधारा सोडले. ब्रह्मदेवाची तपस्थली पाहल्याचे समाधान घेऊन निघालो. हाय वे क्रॉस करून बैलगाडीच्या रस्त्याने धरमपुरी, बिकोर, कुडी हि गावे मागे टाकली व 10-30 वा. छोटी धुवांधार येथे आलो. छोटी धुवांधार हे गाव नाही, एक रमणीय असे पाहण्यासारखे ठिकाण आहे. जबलपूरला धुवाँधारवाहे, त्यापेक्षा हे अति लहान म्हणून छोटी धुवांधार. येथे मय्याचे पाणी धबधब्याप्रमाणे कोसळत नाही, तर उतारावरून वेगाने खाली येते, म्हणून छोटी धुवांधार गे नाव मिळाले. प्रचंड खडकांना फोडून मैय्याने 4-5 ठिकाणाहून मार्ग काढला आहे. पाण्याला वेगही आहे, आणि येथे पात्र रुंद असल्याने वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाणही जास्त आहे. जेथून पाणी खाली व्हायला सुरवात होते, तेथे दगड खूप आहेत, त्यामुळे जाणे कठीण. गे दृश्य डोळा भरून पाहणे व डाव्या हाताला असलेली पाऊलवाट घेणे. ती पाऊलवाट सरळ एका शेतात असलेल्या घराजवळ येते. तेथे छान चहा झाला. शेतमालक सांगत होते, आणखी काही दिवस हे दृश्य पाहून घ्या. लवकरच येथे धरणाचे काम सुरु होईल, व मग हे काहीही दिसणार नाही.
मानवाच्या विकासाच्या स्वप्नांना मर्यादा नसल्याने, आपण आपल्या अध्यात्मिक व नैसर्गिक ठेवा असलेल्या किती स्थळांना मुकणार, हे येणारा काळच ठरवेल.
मैय्याच्या परिक्रमेचेच उदाहरण बघा ना. हजारो वर्षांची ही परंपरा आहे, परिक्रमेचा ज्ञात इतिहास म्हणजे मार्कंडेय ऋषींनी सुरु केलेली ही परंपरा.
अगोदरच्या काळातील लोकजीवनाचा विचार केला तर लक्षात येते, किती कठीण असेल पूर्वी परिक्रमा करणे. घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या, आणि आजच्या सारखे आश्रम, मंदीरे नव्हती. त्यामुळे परिक्रमा खऱ्या अर्थाने काठानेच व्हायची, किती त्रास होत असेल त्या वेळी. आपल्या पूर्वजांना खरोखर धन्यवाद द्यावे कि त्यांनी हा वसा जपला व पुढच्या पिढीला ते देत राहिले. ही महती अर्थात मैय्याचीच आहे. याच कारणामुळे असेल, परिक्रमा हे तप असे संबोधण्यात येते.
गोकुला गावी जेवण घेऊन सलकन मार्गे नॅशनल हायवे 12 गाठला. जबलपूर 94 कि. मी. चा दगड दिसला. 5 कि. मी. सरसला येथे एस. टी. स्टँड चे हॉटेल मध्ये रूपांतर झालेले पहिले, जागा चांगली. व्यवस्था पाहून आम्ही आसन लावले व सायंकाळची पूजा सुरु.
। श्री नर्मदा परिक्रमा - 20 ।
सरसला म्हणजेच किनाऱ्याने गेलो असतो तर केरपानी. केरपानी येथून 3 कि. मी. आत. आता हाय वे असल्याने काही त्रास नव्हता. पूढे डोंगरगाव आले, हे गाव अभयारण्यात येते. येथे कळले की पूढे घाटात, बंजारी माता मंदीर आहे, तेथे सर्व सोय आहे. हाय वे सोडला तर जंगल चांगले आहे. थोड्या वेळाने बंजारा माता मंदीर आले, येथे फक्त मंदीर, ते ही अगदी लहान, बाकी काहीच नाही, अगदी पाणी सुद्धा नाही. घाट मोठा आहे, आणि वस्ती घाट संपल्यावर आहे. चला. येथे आम्हाला एका वळणावर एक कोल्हा दिसला, त्याला बहुतेक एखाद्या गाडीने धडक दिली असावी, मागचे पाय व कंबर लुळी पडली होती. वेदनेने विव्हळत होता. त्याला पाणी पाजावे असे वाटले, पण जवळ गेलो की तो ओरडायचा. थोडे अंतर ठेवून त्याच्या तोंडावर बाटलीतून पाणी ओतले. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला वन विभागाची चौकी दिसली. तेथे पाणीही मिळाले व त्या कोल्ह्याबाबत माहिती देऊन पुढे निघालो. इंद्रनगर येथे मंदीरात महाप्रसाद सुरु होता, प्रसाद घेऊन पुढे निघालो. पावसाचे लक्षण होते. मेरागाव येथे दोन युवक उभे होते, त्यांनीच आवाज दिला, पुढचे गाव 7 कि. मी. आहे, येथेच मुक्काम करा, पाऊस येण्याची शक्यता आहे, ठीक आहे म्हणताच, तो आपल्या घरी घेऊन गेला, दोन खोल्या दिल्या. समोर नळ. पूजा झाल्यावर स्वयंपाक सुरु. लोकांची मदत करण्याची भावना अवर्णनीय आहे.
सकाळी आंघोळ पावसातच झाली. सकाळी निघताच फक्त जवळपास 300 मीटर गेलो असू, एकदम पावसाला सुरुवात. समोर ढाबा होता, त्यांनी आवाज दिला, त्यांनी एक रुम उघडून दिली, आम्ही चौघेही बसलो. पाऊस सतत सुरु होता, 11 वाजता त्यांनी दाल फ्राय, चपाती, भाजी, पापड, सलाद असे जेवण दिले, काही चिंता करू नका, आराम करा, मालक म्हणाले.
1-30 वा. पाऊस थांबला व निघालो. सायंकाळी मनखेडी आले. गावात यज्ञ सुरु होता पत्ता मिळाला ओसरी वर जा. गेलो.
एक मोठा जुना वाडा. हत्ती जाईल, असे लाकडी गेट, चारही बाजूने खोल्या व मध्ये मोठे आंगण. आता वापरात फक्त 2-3 खोल्या, बाकी बंद. दरवाज्या समोर बाहेर मोठी ओसरी. आकाराने मोठी. तेथे बॅग ठेवली व बसलो. एक व्यक्ती आली व म्हणाली, 'आपको मालक बुला रहे हैं' । मला वाटले, हा चुकून म्हणत असावा, त्याने पुन्हा मलाच म्हटले, गेलो आत. सफारी घातलेले एक वयस्कर गृहस्थ उभे होते. समोर मुनिम होते. त्यांनी मलाच विचारले, ' 'आपका नाम ?' मी नाव सांगितल्यावर लगेच, कौन समाज ? ब्राह्मण म्हटल्यावर प्रश्न बंद. मुनिमजींना म्हणाले, पंडितजी को अंदर जगा देना, नागपूर के है, और कोई तकलीफ ना हो. ते बाहेर येऊन, गाडीतून निघून गेले. मला काही लक्षात येईना, मलाच का बोलाविले यांनी. मुनिम म्हणाले, त गावत आणि बाजूला एकूण 400 एकर जमीन आहे यांची येथे. आता 15 वर्षापासून जबलपुरला राहतात. अगोदर येथेच राहत होते. स्वभावाने छान आहेत. माहेश्वरी आडनाव आहे, नागपूरला जास्त नातेवाईक असतात. पण मलाच कसे बोलावले, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
हळूहळू खंडहर होण्याच्या अवस्थेकडे जात असलेल्या त्या वाड्यात मुनिम, आम्ही चोघे, व मुनिमजींना सांगून बाहेर ओट्यावरील 4 परिक्रमा वासींनाही आत घेतले, थोडी थंडी कमी इतकाच फरक. बघू आता जबलपूर चे वेध लागलेत.
। श्री नर्मदा परिक्रमा - 21 ।
सकाळी थंडी होतीच, पण धुकेही होते, रस्त्यात उमरिया गावी हनुमान मंदीरात स्नान व पूजा झाल्यावर निघालो. शहापुरा गाव आले, मोठे गाव, थोडी औषधी खरेदी झाली. पुढे सीता सरोवर आहे, तेथे व्यवस्था होईल, असे सांगण्यात आले. पण तेथे काहीही व्यवस्था नाही, शेवटी सहजपुरा येथे हनुमान मंदीरात आसन लावले. येथे गेल्या 3 वर्षा पासून रामचरित मानस सतत वाचन चालू आहे.
सकाळी सहजपुरा सोडले, भेडाघाट येथून 10 कि. मी. भेडाघाटच्या सरस्वती घाटावर स्नान केले, या अगोदर 2-3 वेळा जबलपुरला आलो, पण सरस्वती घाट पाहिला नव्हता. घाट एकदम छान आहे, पुढे भेडाघाट. पण सरस्वती घाटा जवळ जी नदी मैय्याला येऊन मिळते, तिला बुढी नर्मदा म्हणतात, ती ओलांडायची नाही, त्यामुळे उत्तर तटावरून जातांना भेडाघाट व धुवांधार पाहता येणार नाही, हे पक्के झाले, तश्या सूचना 2ते3 दिवसापासून प्रत्येक आश्रमात मिळत होत्या. 500 मीटर मागे येऊन, त्रिपुरा सुंदरी मंदिराकडे निघालो.
कर्ण नामक राजाने इ. स. 1380 मधे बांधलेले हे मंदीर भव्य आहे. मंदिरासमोर मोकळे आवार आहे, मंदीरात नवस बोलतात व नवस फळाला आला कि लाल कपड्यात नारळ झाडाला किंवा मंदीरात जागा पाहून बांधतात. असे हजारो नारळ लाल कपड्यात बांधलेले आहेत. पुढे तीवर येथे मुक्काम केला.
आज ग्वारी घाट पर्यंत जाऊ असा विचार आहे. जबलपूर-नागपूर हाय वे वरून तीलवारा घाट येथे स्नान पूजा झाल्यावर किनाऱ्याने ग्वारी घाटाकडे निघालो. आजकाल शेतकरी किनाऱ्यावर अतिक्रमण करून काट्याच्या कम्पाउंडने रास्ता बंद करतात, त्यामुळे जाताना त्रास होतो. एके ठिकाणी 2 फुट उडी मारायची होती, पण त्यामुळे पाय दुखायला लागला. सायंकाळी ग्वारी घाटावर पोहचलो. झुलेलाल आश्रमात आसन लावले.
आज येथे महाआरती चा कार्यक्रम ठरला आहे. विश्व हिंदू परिषदेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, आणि या ठिकाणी मैय्याची आरती सुरु होऊन 1100 दिवस पूर्ण झाले, या निमित्ताने येथे आज महाआरती चे आयोजन केले आहे. त्यामुळे ग्वारी घाट छान सजविण्यात आला आहे, खासदार, आमदार व सरकारी अधिकारी जमले आहेत.
हिंदू धर्मातील जाती प्रथा विचारात घेऊन प्रत्येक जातीसाठी एक टेबल, त्यावर सफेद चादर व महा आरती, ज्यामध्ये 40 फुलवाती असाव्यात, असे एकूण 108 टेबल सजविण्यात आले होते. आणि एक मोठी आरती होती, ती दोन व्यक्ती मिळून उचलणार. वृंदावन चे एक स्वामीजी मुख्य पाहुणे होते. फुलावाती लावून झाल्यावर शंखध्वनी, व इतर वाद्ये वाजायला लागली. आणि नंतर महाआरती ला सुरुवात झाली. त्यानंतर सुंदर नर्मदाष्टक झाले. हे सर्व रोमांचित करणारे होते. मैय्या प्रति असलेला तो आदर भाव पाहून मन अगदी प्रसन्न झाले, आणि आपण या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ शकलो, हे आपले भाग्यच आहे. याबद्दल मैय्याला नमस्कार करून खूप आभार मानले. परिक्रमा सफल झाली, असेही वाटून गेले.
रात्री सूज आलेल्या डाव्या पायाची मस्त मालिश एका सह परिक्रमावासिने करून दिली. आज मन खूप आनंदी होते.
क्रमश:
। श्री नर्मदा परिक्रमा - 22 ।
ग्वारी घाट सोडतांना मनात खूप ऊर्जा भरलेली होती, आणि समाधानही. पुढे एके ठिकाणी सन्सन पूजा करून मंडला रोडला मिळणाऱ्या तीलहरी कडे निघालो, 11 वा. एका हनुमान मंदीरात जेवण झाले, आणि शारदा नगर येथे दोन रस्ते आहेत, एक मंडला तर दुसरा अमर कंटक. त्या अगोदर आम्हाला एक जगन्नाथ मंदीर दिसले. खूप मोठे आवार. तेथेच आसन लावले.
रात्रीच येथील महाराज म्हणाले, आता सरळ अमर कंटक रस्ता पकडा, कारण, मंडल्याकडून गेलात तरी किनाऱ्याने जाता येणार नाही, त्यामुळे सरळ रस्ता घ्या. आणि सकाळी पाहिले, बहुतेक जण याच रस्त्याने चालत होते. पहाडीखेडा येथे शक्तीपुंज आश्रम. जेवण करून निघालो. सायंकाळी गौराम्बा आश्रम. मनेरी गाव. टेकडीवर आश्रम व खाली धर्मशाळा. आज येथे यात्रा आहे.
सकाळी वाटचाल सुरु. घाट मोठा आहे, आणि हा भाग पठारी आहे, दूर पर्यंत रस्ता दिसतो. झाडी कमी. हरदोई, बरताला, हतनारा ही गावे मागे गेली. गदोई पासून भिकमपुर ला जाणारा कच्चा रोड घेतला, कारण पक्की सडक निवास ला जाऊन, परत भिकमपुर ला येते. एके ठिकाणी चहा पाणी झाले व लवकरच जबलपूर-अमरकंटक हा हाय वे लागला. रोड नवीन असल्याने छानच.
बिजोउली गाव नदीच्या काठी छान दुर्गा मंदीर. आसन लावले. मंदीरात थंडी वाजेल म्हणून किचन मोठे असल्याने किचन मध्ये आसन लावले.
पुजारीजी आरती नंतर आले, गप्पा सुरु झाल्या. पुजारीजी म्हणत होते, ' परिक्रमा करूनही जर आचरण बदलत नसेल, तर उपयोग काय ?'
त्यांना म्हणालो, ' ईश्वर दर्शन होत नाही, तर मग तप किंवा साधना करण्यात काय अर्थ ' असे विचारण्या सारखे हे आहे. आपल्या जीवनाला चांगले वळण लागावे म्हणून आपण लहानपणा पासून प्रयत्नशील असतोच ना. ' ईश्वर नाही भेटला तरी चालेल, पण आपल्या हातून काही वाईट कर्मे होणार नाही, किंवा कमी होतील, हे चांगले नाही का ? '
आपल्या हातून नेहमी चांगले कर्म व्हावे, म्हणून मनाला समजावत रहावे लागते. परिक्रमा केल्यावर ती व्यक्ती चांगले काम नाही करू शकली, तरी काही वाईट करण्यापूर्वी निदान विचार करेल, हे सुद्धा खूप झाले.
वाईट कर्म घडणे यात वेगळेपण नाही, कारण हा मानवी स्वभाव आहे, पतित होणे. भारताच्या इतिहासात कधी कोणी पतित होण्यासाठी तप केले का, नाही ना. कारण पतित होणे हा मानवाचा नैसर्गिक कल आहे. मनाचे उत्थान कठीण आहे. आणि यासाठी सद्गुरुंचे मार्गदर्शन हवे असते.
पुजारी जी घरी जायला निघाले व आम्ही निद्राधीन झालो.
क्रमश: ।
। श्री नर्मदा परिक्रमा - 23 ।
सकाळी 8 वा. नर्मदे हर करून निघालो. रस्ता चांगला असल्याने काही त्रास नव्हता. माणिकपूर आले, मला श्री नर्मदा प्रसाद यांच्या पुस्तकात उल्लेख असलेले श्री गर्ग आठवले. समोर दोन युवक उभे होते, त्यांना विचारले, येथे गर्ग राहतात का, तर ते म्हणाले, ते येताहेत समोरून. श्री गर्ग आले, चहा घ्यायला म्हणून त्यांचे घरी गेलो. त्यांची श्री नर्मदा प्रसाद यांचे बरोबर बोलणे करून दिले. आणि त्यांच्या पुस्तकातील उतारा त्यांना हिंदीत समजावून दिला. ते म्हणाले, आता तुम्ही माझ्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात, आता नाही म्हणायचे नाही, जेवण करून जा.
" अहो, आता फक्त 10 वाजलेत, अजून वेळ आहे, योग आला तर पून्हा येऊ."
" नाही आता तुम्ही तसे जायचे नाही".
प्रेमामुळे कधी अशी वेळ येते, जेवण करून निघायला 2 वाजले. पण त्यांची बोलण्याची पद्धती अशी होती, की आपल्या नकाराला काही अर्थ नव्हता. असो. त्यांना आनंद झाला ना. बस.
पुढे सायंकाळी घुघुवा गावी एका सहकाऱ्याची प्रकृती बिघडली. गाव एकदम छोटे. एकाला विचारले, येथे मंदीर, किंवा शाळा आहे का ? त्याने आम्हाला त्याच्या घरीच नेले. एक झोपडीआम्हाला दिली.
सकाळी घुघुवा सोडले, एका शाळेच्या अंगणात पंप पाहून स्नान पूजा झाली. पुढील गाव मोठे, शहापूर. तहसीलचे ठिकाण. श्री राम मंदीरात जेवण वगैरे झाले. पुढे सायंकाळी बरगवा. गावाबाहेर आश्रम सांगितला होता, पण तो जनजाती कल्याण आश्रम होता. गावापासून बऱ्याच अंतरावर हा आश्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघा द्वारे चालविण्यात येतो. सुरुवातीला पटांगणात डॉ. हेडगेवार यांचा पुतळा. हॉल मध्ये डॉ. हेडगेवार, श्री गोळवलकर गुरुजी व भारत मातेचे मोठे चित्र. कमालीची स्वछता, एकूण मन प्रसन्न करणारे वातावरण. आमचे जेवण झाले. आणि पावसाला सुरुवात झाली.
कर्मश:
। श्री नर्मदा परिक्रमा - 24 ।
सकाळी 8 वा. निघालो. घाट संपल्यावर अमेरा गावी चहा झाला, येथे एक गरुड सापाला पायात पकडून उडत जातांना पहिला. 11-30 वा. डुंगरिया गावी अंगणवाडी केंद्राबाहेर झाडाखाली थोडा आरामासाठी बसलो. एक सहकारी आत जाऊन पूरक पोषण आहाराचे पॅकेट्स घेऊन आला, त्याला म्हटले, हे बरोबर नाही, शासन ते मुलांसाठी देते, तरी त्याने एक फोडले, दगडाची चूल बनवून त्याचा हलवा केला. त्याची चव ही बरोबर नव्हती.
तेवढ्यात समोरून येणारी एक बस थांबली, लोग जे उतरले, त्यांनी सांगितले, पुढे विक्रमपुरला जातीय दंगल झाली आहे. बाजार बंद झाला आहे. आता आपण विक्रमपुर पर्यंत जाऊ शकणार नाही. तरी निघालो. पुढे रस्त्यावर काही युवक उभे होते, ते परिक्रमा वासींनाच थांबवत होते, " आगे, गाव बंद है, आज यहीं रुकना पडेगा ।"
रस्त्यावर डॉ. चौबे यांची धर्मशाळा. ते एक आदिवासी विद्यालय व आश्रमशाळा ही चालवितात. गाव 500 मिटर आत. येथे फक्त धर्मशाळा. समोर विक्रमपुर दिसत होते, पण अंतर 5 कि. मी. होते.
पूर्ण परिक्रमेतील सर्वात वाईट रात्र, असे या रात्रीचे मी आता कारणांन करू शकतो. सध्या आम्ही दोघेच होतो. मी व पुनियाजी. त्यांना सायंकाळ पासून थंडी ताप , आणि मला ही तो हलवा पाचला नाही, रात्री, 12 वाजता खळाळून उलटी झाली. आणि रात्री 2 पासून जुलाब सुरु झाले. रात्री 2 नंतर पाऊसही सुरु, त्यामुळे आणखी हाल. सकाळ पर्यंत एकदम गळून गेलो, आणि रात्री थोडा ओला ही झालो, त्यामुळे तापासारखे वाटत होते. सकाळी सगळे ' नर्मदे हर ' करून निघाले, फक्त मी व पुनियाजी आम्ही दोघे झोपून होतो. धर्मशाळेचे मालक डॉ. चौबे 9 वाजता येतात, त्यांना दाखवून मग निघावे, असे ठरविले. 10 वाजले तरी त्यांचा पत्ता नाही, काय करावे, शेवटी पुनियाजी म्हणाले, " आप आगे निकल जाईये, मैं आपकी और मेरी दवा लेकर विक्रमपुर आता हूं, तबतक आप वहां आराम करो."
हळूहळू निघालो, आज चालतांना जोर लावावा लागत होता, पायात ताकत नव्हती. रसत्यानेही एकटा होतो. विक्रमपुर ला गेलो तर बाजार आजही बंद. एक हॉटेल उघडे होते, तेथे काही लोग व पोलीस चहा घेत होते. तेथेच पुनियाजींची वाट पाहत बसलो. पुनियाजी आले, आणि हळूहळू निघालो. आज शहापूर पर्यंत जाता आले पाहिजे, असे वाटत होते.
आज दोघांनाही थकवा खूप आलेला, शहापूर डिपो समोर दिसत आहे, आणि पाऊस सुरु झाला. एका दुकानदाराने आवाज दिला, त्याने त्याच्या दोन छोट्या झोपडयापैकी एक आम्हाला दिली. समान ठेवले व तसाच बसलो. त्याने आमच्यासाठी पोळीभाजी बनविली. इच्छा नसतांना एक पोळी खाल्ली. जवळ गोळ्या होत्या, त्या घेतल्या. पण शरीरातील पाणी कमी झाल्याने असेल, मला थकवा खूप होता. पावसामुळे झोपडी गळायला लागली. पुनियाजी तापाने परेशान व मी तर कामातूनच गेलो होतो. सकाळी 5 वाजेपर्यंत 4 वेळा जाऊन आलो, आणि नंतर मी झोपलो कि काय झाले, ते आता आठवत नाही, कपडे ओले झालेले, झोपडी थोडी ओली, सकाळी 8-30 वाजता पुनियाजींनी उठविले, हातपाय हलविण्याची ताकद नव्हती, डोळेही लवकर उघडेनात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी मनाने खूप खचलो होतो, एकच विचार मनात होता, आता मी परिक्रमा करू शकत नाही, मला येथूनच नागपूरला जावे लागेल. आणि हा विचार एव्हढा प्रभावी पणे मनात येत होता, कि आता परत जावे, असे वाटायला लागले.
मनोमन मैय्याला नमस्कार केला, सद्गुरूंना कळवळून प्रार्थना केली. झोपडीचे मालक आले, त्यांनी आमचे हाल पहिले, ते म्हणाले, प्रकृती ठीक असेल तर सगळे ठीक होते, माझे ऐका, गाव जरी येथून सुरु होते, तरी हा डेपोचा भाग आहे, गाव येथून 4 कि. मी. आहे, तुम्ही बसने जा, डॉ ला दाखवा, सगळे ठीक होईल.
11 वाजता दवाखान्या समोर उतरलो. डॉ नी तपासले, मला सलाईन लावले व त्यातूनच 4 इंजेक्शन्स दिलीत. पुनियाजींना गोळ्या दिल्या दुपारी 1 वाजता सलाईन संपले, डॉ म्हणाले, आज व उद्या येथेच रहा, उद्या सायंकाळी या, मग सांगतो. तेथून सरळ " अंकुर स्मृती" धर्मशाळेत आलो.
श्री अरुण जयस्वाल व सौ. अनिता जयस्वाल या दोघांनी परिक्रमा वासीयांची सेवा सुरु केली. त कुटुंबाला दोनच मुले, मोठा महिंद्रा कंपनीत कॅशियर आहे, तर लहान मुलगा इंजिनीअरिंग शिकत असतांना अल्प आजाराने गेला. 24-7-11 त्याच्यासाठी हि खोली बांधली होती, त्यामुळे तेथे परिक्रमा वासींची सेवा सुरु केली.
सौ अनिताजी एकदम हसतमुख, पण त्यांच्या हसण्या मागील ही दुःखाची किनार, हे सर्व ऐकल्यानंतर आपल्याला व्यथित करून जाते.
आम्ही गेलो तेंव्हा सर्व परिक्रमा वासी गेलेले होते, त्यांना सगळी हकीकत सांगितली, काळजी करू नका, आरामात रहा बरे वाटले कि जा.
थोड्या वेळाने साध्या वरणात तूप व एक पोळी बारीक करून कालवून घेऊन आल्यात. हे घ्या, महाराज जी, खाल्याशिवाय ताकद येणार नाही, हे खावेच लागेल. तुम्ही हे खा, मगच मी येथून जाईन.
त्यांचे ते प्रेम बघूनच मला थोडा धीर आला. रात्री मुगाची खिचडी बनविणार आहे, तुमच्यासाठी.
सकाळी काळा चहा घेऊन हजर. महाराज जी आता कसे वाटते ? ठीक म्हटल्यावर , साबुदाणे कि खीर बन रही है ।
आज दुपारी श्री महाजनी काका येऊन मिळाले. आता मला विश्वास वाटायला लागला होता, की आपली परिक्रमा पायीच होईल म्हणून. याला कारण सौ अनिताजी होत्या. वयाने माझ्यापेक्षा लहान असल्या तरी त्यांनी दोन दिवस आईच्या मायेने माझी सेवा केली होती, आणि जेथे मी मनाने खचलो होतो, तेथे मैय्याने माझ्या मदतीसाठी सौ अनिताजींना पाठविले होते. निघतांना त्या दोघांनाही भेटलो. आणि निघालो. पूढे जोगी टिकरिया. समोर ओट्यावर स्वामीजी उभे, "आईये, बताओ, इसके पहले हम कहा मिले थे ?"
कांदरोज आश्रमाचे श्री कृष्णानंदजी. त्यांना कुठे कुठे भेट झाली, ते सांगितले. जेवण झाल्यावर निघतांना म्हणाले, " आजारी दिसता "
हो म्हणताच म्हणाले, मैय्या किनारी आहात, सगळे विसरा आणि चला, या आमच्या आश्रमात.
यवठून मैय्या किनाऱ्याने प्रवास सुरु. पठारी म्हणावा असा हा भाग, गोटाड भाग, चालतांना खाली पाहून चालावे, एखाद्या दगडा वरून पाय वाकला तर मोच येऊ शकते. झाडी नसल्यासारखी, दूरपर्यंत सगळे दिसते. थोड्याच अंतरावर " नारायण गुफा" आश्रम. ज्याला एकांत प्रिय आहे, अश्या साठी एक सुंदर ठिकाण. महादेवाची पिंड, त्याला लागून एक गुफा, आत मध्ये नारायणाची मूर्ती. आणि आश्रम परिसर मोठा, दूर पर्यंत कोणी दिसत नाही, मस्त एकांत.
रामघाटला जाण्याचा सल्ला मिळाला होता, त्यामुळे रामघाट ची वाटचाल सुरु. हा आश्रम ही गावा पासून दूर, किनाऱ्यावर. आश्रम परिसर व देखावा सुंदर. येथे रामकथा सुरु आहे. आणि पावसाची शक्यता ही आहे.
। क्रमश: ।
। श्री नर्मदा परिक्रमा - 25 ।
काल रात्री 2 वाजे पासून विजांचा गडगडाट आणि पाऊस सुरु झाला, मात्र खोली चांगली असल्याने काही त्रास झाला नाही.
सकाळी 9 वा. निघालो. पूर्ण गोटाड भाग असल्याने व झाडे जवळजवळ नाहीतच त्यामुळे दुरपर्यंतचे दिसत होते. मैय्याच्या बाजूने प्रवास सुरु. काही अंतरावरून दोन कोल्हे आम्हाला पाहून पळत होते. मैय्या वळण घेत असल्याने, आणि दूर एक गाव दिसत असल्याने आम्ही पाऊलवाट घेतली. दुधी गाव आले, थोडा आराम करून निघालो. इटौर, घुघरी, बरांज ही गावे गेली आणि एक चांगली ग्रामीण सडक लागली. पी एम ग्राम सडक योजना या योजने खाली एम पी ने छान रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. विजापुरी आले. एक मोठी झोपडी म्हणजे धर्मशाळा, 200 फुटावर नळ, समोर दुकान, ते सदावर्त देतात. खिचडी चे समान घेतले, पाणी आणले, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री 9 वाजे पर्यंत.
सकाळी निघालो, पण रात्रीच्या पावसाने पाऊल वाटेवर चिखल झालेला, शेतातील पिकावर पाय ठेवला तर माती बुटाला लागत नाही, पण पीक किती खराब होते, ते मनाला पटत नव्हते. धुके जास्तच त्यामुळे फक्त पुढे जात होतो, पण रस्ता हाच आहे कि चुकलो हे ही माहिती नव्हते. शेवटी एक हाय वे आला, पहिले माती साफ केली, एका व्यक्तीला विचारले, तेव्हा लक्षात आले, रस्ता बरोबर आहे, हे गाव आहे त्योडी, नदीचे बाव हि त्योडी व पूढे मैय्या बरोबर नदीचा संगम आहे, मैय्या किनारी आश्रम आहे, तेथे गेलो, चहा पाणी झाले, व चंदनघाट कडे प्रयाण.
चंदनघाट छान आहे, पण आज पावसाळी हवा असल्याने येथे गर्दी नाही, पुढचा टप्पा वसंतपुर. शाळे समोर पंडितजी कडे जाण्याचा सल्ला मिळाला, तेथे जेवण करून पुढे प्रस्थान.
पुढे कंचनपूर व पुढे शिवाला घाट. येथे डोंबिवलीचे श्री रणदिवे भेटले. शिवाला घाट म्हणजे फक्त आश्रम. गाव नाही. मैय्या रुंद ही आहे, आणि छान खळखळ आवाज करीत, अल्लड युवती सारखी जणू स्वप्नात रंगलेली असल्या सारखी वाहते. घाट ही छान आहे, येथे पात्र रुंद आहे, पण खोल नाही, मोटार सायकली व इतर वाहने ये-जा करतात. आश्रम चांगला आहे, हा घाट मला व्यक्तीश: खूप आवडला. व्यावहारिक दृष्ट्या येथे अडचणी आहेत, पण वातावरण छान आहे. सकाळी सुद्धा एकदा डोळे भरून घाट पाहिला आणि मन तेथेच ठेवून निघालो.
9 वाजता टाठपठार. रस्त्यावरच श्री शिवनाथ साहू यांचे घर. चहा साठी म्हणून थांबविले, आणि जेवण करून जाण्याचा आग्रह. बोलणे एव्हढे नम्र की नाही म्हणायला जड जावे.
घरासमोर मोठा पिंपळ वृक्ष आणि पलीकडे मैय्या. श्री साहू वन विभागात गार्ड चे काम करतात. 55-56 चे वय. एक 8 वर्षांची मुलगी . " माझी नात आहे, साहू सांगत होते, ही मुलगी 9 महिन्याची असतांना मुलगा व सून एक दिवस बाहेर गेले, ते परत आलेच नाही, आज 7 वर्षे झाली, काही पत्ता नाही, ते सांगत होते. ते सध्या अमर कंटकला नोकरीवर आहेत. आम्हालाही जय बोलावे कळत नव्हते. पुढे विलासपुर. एकदम छोटे गाव, शेवटी भारत सरकार राजीव गांधी पंचायत भवन केंद्र दिसले, गार्डला विनंती केली, त्याने एक खोली उघडून दिली. रात्रीची सोय करून दिली. खिचडीचा कार्यक्रम सुरु.
क्रमश:
। श्री नर्मदा परिक्रमा - 26 ।
सकाळी 7-30 वा. विलासपुर सोडले. पडरिया, खाटी, मोहंदी, हर्रई ही गावे मागे पडली. हा भाग अतिशय दुर्गम, आदिवासी असा आहे. नागपूर हुन बालाघाट लामटा व चिराई डोंगरी मार्गे अमर कंटक ला आले, तर हा भाग लागतो, हे जंगल कपीलधारेचे जंगल म्हणून ओळखल्या जाते, आणि पलीकडे 10 ते 15 कि. मी. नंतर याला लागूनच कान्हा किसलीचे जंगल सुरु होते. कपीलधारेचे जंगल हे घनदाट असून, विपुल प्रमाणात जनावरे आहेत. हा रस्ता तसा सेफ आहे.
फेरी सेमल आले येथे फक्त छोटी दोन दुकाने. रहदारी ही विरळ. 4-30 ला दमगड ला पोहचलो. येथे दुकान नाही, सदावर्त नाही, पाणीही नाही. थोड्या वेळाने कळले कि पुढे गाव आहे, तेथे एक दुकान आहे, एक जण गेला व थोडे ( 100 ग्रॅम ) शेंगदाणे आणले, माझे जवळ गुळ होता, एकादशीचे फराळ झाले.
आता लक्ष लागले होते अमर कंटक कडे. उद्या अमर कंटक. 30 वर्षांपूर्वी पाहिलेले चित्र डोळ्यासमोर येत होते. परिक्रमेचा 3 रा टप्पा पूर्ण होणार हाही आनंद होता.
सकाळी स्नान, पूजा करून दमगड सोडले. गाव संपल्यावर डाम्बरी सडक सोडून कच्चा रस्ता पकडावा, आणि ' कपिलधारा जाने का रास्ता ' असा फलक लागेल, ते बघावे, व पुढे जावे, असे दंगडला सांगण्यात आले होते.
बराच वेळ गेल्यावर एकदाचा फलक दिसला. जंगल चांगले आहे, हळूहळू लोकांचे, गाड्यांचे आवाज यायला लागले. 12-30 वा. कपिलधारेला पोहचलो. माझे मन आनंदाने न्हाऊन निघाले. मनोमन मैय्याला, सद्गुरूंना व आई-वडिलांना नमस्कार केला. 30 वर्षा पूर्वीचे व आजचे अमर कंटक ( म्हणजे कपिलधारेचा भाग ) यात खूप फरक पडलेला लक्षात आला. त्यावेळेस अमर कंटक ते कपिलधारा वस्ती नव्हती, आज छान रोड आहे, कपिलमुनींची झोपडी होती, तेथे मंदीर झाले आहे. आणि पुढे दूध धारेकडे जाण्यासाठी रस्ता झाला आहे.
सगळ्यात जास्त आनंद होता, उद्या महाशिवरात्री. आणि या शुभ मुहूर्तावर आपण अमर कंटक ला पोहचलो, हे आपले भाग्यच म्हणायचे.
अमर कंटक. मैय्याचे उगमस्थान. महादेवाची तपोभूमी. मार्कंडेय, कपीलमुनी, दुर्वासा, भृगु, सप्तर्षी या सर्वांची तपोभूमी. येथे पौराणिक काळा पासून देव-देवता, ऋषी-मुनी,यक्ष, गंधर्व या सर्वांनी तप केले. महादेवाच्या घामाच्या बिंदू पासून निर्माण झालेली कन्या म्हणजे नर्मदा. श्री विष्णू व श्री ब्रह्मदेवाने अनेक वरदान दिलेली कन्या म्हणजे नर्मदा. या पवित्र भूमीतून नर्मदा, शोण, झुलझुला या व्यतिरिक्त आणखी दोन नद्या जवळपासच्या भागातून उगम झाल्या आहेत.
मैय्या, या पृथ्वीवर माघ शुद्ध सप्तमी, अश्विनी नक्षत्र, रविवार, मकर राशीत सूर्य असतांना मध्यान्ह काळी अवतरली.
अमर कंटक हा शब्दच स्वयंस्पष्ट आहे. मानवी जीवनातील विकार, विषय, वासनरूपी कांटे जेथे नष्ट होतात, चित्तवृत्ती जेथे शांत होते, विचार रहित मन जेथे होते, आणि अंतःकरणाची ही अवस्था झाली की अमर, सनातन व शाश्वत अश्या सुखाची प्राप्ती होते.
हा अंतरबाह्य बदल झाला की मानवी जीवन खऱ्या अर्थाने निष्कंटक होते आणि प्राप्त होतो केवळ आनंद आणि अशी दिव्य अनुभूती जेथे होते ते हेच स्थान आहे, अमर कंटक.
येथे मृत्युन्जय आश्रम एकदम छान आहे. परिसर मोठा आणि व्यवस्थाही छान आहे. उद्या महाशिवरात्री. आज उत्तर तटावरील परिक्रमा पूर्ण होणार. आता राहिलेला दक्षिण तटावरील उरलेला टप्पा.
उत्तर तटावरील आजची रात्र शेवटची. उद्या सकाळी 12 नंतर निघावे असे ठरले. दोन दिवसापूर्वी रस्त्यात भेट व ओळख झालेले श्री पटवर्धन हे अकोला येथे असतात, हि त्यांची दुसरी परिक्रमा असल्याने, त्यांना सर्व माहिती आहे. त्यामुळे आता चिंता नाही. आज मन फार प्रसन्न आहे.
क्रमश:
। श्री नर्मदा परिक्रमा - 27 ।
आज महाशीवरात्र. मैय्याला येथे बांध बांधल्यामुळे पाणी चांगले आहे, नदीचे रूप आले आहे, पूर्वी असे नव्हते, एखाद्या नाली प्रमाणे मैय्या वाहत गावाबाहेर जात असे. सकाळी स्नान, पूजा झाली. फराळ करून उगम स्थानी जाण्याचे ठरल्याने घाई नाही. मृत्युंजय आश्रमातील सर्व काम सांभाळणारे श्री दिनेश्चंद्र त्रिपाठी त्यांना दद्दाजी म्हणतात, आम्हाला म्हणाले, " भाग्यवान आहात, जो महाशिवरात्रीला येथे पोहोचतो त्याला तीन परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते."
उगम स्थान म्हणजे " माई की बगियां " हे दक्षिण तटावर येते. त्यामुळे 2 कि. मी. चा चक्कर घेऊन, हनुमान धारा जवळून आम्ही, माई की बगिया येथे आलो. आपल्या जवळच्या बाटलीतील अर्धे पाणी उगमस्थानी ओतले, व बाटली पुन्हा भरून घेतली. आता आमच्या जवळच्या बाटलीत जे पाणी होते, त्यात ओंकारेश्वर, समुद्र देवता व उगमस्थान असे तीन ही ठिकाणचे पाणी होते. आज येथे गर्दी खूप होती. प्रसाद भाजून आणला होता, लहान कन्यांना बोलावून प्रसाद दिला, व दक्षिणा देऊन नमस्कार केला. आणि नमस्कार करून दक्षिण तटावरील राहिलेला शेवटचा टप्पा सुरु. प्रथम चहा झाला, तो चमन ऋषींची तपोभूमी . आश्रमातून उत्तर तटावरील मृत्युंजय आश्रम स्पष्ट दिसत होता. पुढे 3 ते 4 कि. मी. जंगलातून प्रवास केल्यावर डांबरी सडक लागली. हा घाट आहे, आणि जंगल चांगले आहे. पुढे कबीर चबुतरा आले. येथे महात्मा कबिराने तप केले होते. येथून उजवीकडे वळल्यास 120 कि. मी. बिलासपूर तर डावीकडे 90 कि. मी. दिंडोरी. रास्ता चांगला असल्याने काही त्रास नव्हता. पुढे 5 वा. बोन्दर गावी आलो. हनुमान मंदिरच्या बाजूची खोली पुजारी जे होते, त्यांनी उघसून दिली.
। क्रमश:।
। श्री नर्मदा परिक्रमा - 28 ।
काल सर्व बरोबरीचे करंजिया येथे होते, आणि आम्ही दोघे, मी व पूनियाजी मागे राहिलो व सूर्यास्ताची वेळ होत आली होती, म्हणून बोन्दर गावी थांबलो. रात्री तेथून नेत्रांग ला फोन करन श्री विनय प्रजापति ला सांगितले, कि तुझ्या बाबत मैय्याला अमर कंटक ला प्रार्थना केली आहे.
सकाळी बोन्दर सोडले, रस्ता चांगला असल्याने चालतांना त्रास होत नाही, रुसा गाव 7 कि. मी. असतांना एक मंदीर लागले, सर्व सोय पाहून स्नान व पूजा करून घेतली. हे मंदीर एक माई पाहते. तिचा आग्रह जेवण करून जा, दाल बाटी चा कार्यक्रम ठरला.
सायंकाळी गोरखपूर पर्यन्त जायचे असे ठरले. त्याप्रमाणे गोरखपूरला श्रीकृष्ण मंदीरात मुक्काम.
सकाळी 7 वा. गोरखपूर सोडले. मोहतरा, गाडासराय, बोन्दरगाव हि गावे गेली, आज जेवण नाही, फक्त चहा 3 ते 4 वेळा झाला. 5 वाजता हर्रा गावी भण्डारा सुरु होता, जेवणाचा आग्रह. आम्ही सगळे 12 जण जेवायला बसले आणि होता फक्त भात. कालवण नाही, भाजी नाही फक्त कोरडा भात. प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ला. मुक्कामाची सोय नव्हती, देवी मंदिरा समोर ची खोली मिळाली एका छोट्या खोलीत आम्ही 12 लोक.
परिस्थिती कशीही आली किंवा असली तरी आनंद कसा घ्यावा, हे आपल्याला परिक्रमा शिकविते.
नेमाडी भाषेत, मैय्याच्या स्वभावाचे वर्णन लोग करतात, --
" कभी घी घना ( घना म्हणजे भरपूर )
तो कभी मुट्ठी भर चना,
कभी वो भी मना "
त्यामुळे प्राप्त परिस्थिती मागे मैय्याचे काही संकेत असू शकतात, ते समजून घेता आले तर समजून घ्या, अन्यथा आहे त्या परिस्थितीत आनंद बघा. म्हणजे काहीच त्रास होत नाही.
सकाळी हर्रा सोडले. पुढे महावीर गावी स्नान पूजा झाली आणि जेवण झाल्यावर निघालो, ते 3 वा. दिंडोरी. एक हॉटेल मालकाने आवाज दिला, चहा झाला आणि ते स्वतः परिक्रमा करून आलेले असल्याने त्यांचे अनुभव ऐकले.
आमचे सहकारी श्री पटवर्धन यांची प्रकृती ठीक नसल्याने, आज दिंडोरी ला मुक्काम करावे, असे ठरले. त्यामुळे सरळ मैय्या किनारी धर्मशाळेत गेलो. येथे मैय्याचे पात्र रुंद आहे, पण पाणी छान खळखळ वाहते. दिंडोरी गाव ही मोठे असल्याने, थोडी खरेदी झाली.
कर्मश: ।
। श्री नर्मदा परिक्रमा - 29 ।
सकाळी मैय्यावर स्नान झाले, पूजा झाल्यावर सगळे निघाले. लवकरच म्हणजे केसलपुरी नंतर घाट सुरु झाला. मध्ये फक्त 2 वेळा चहा झाला. हा घाट मोठा आहे, आणि जंगल ही दाट आहे. घाट उतरल्यावर पहिले गाव हर्रा टोला. रस्त्यावरच धर्मशाळा. स्वयंपाक सुरु. सकाळी लवकर निघालो सध्या हाय वे वरून प्रवास सुरु असल्याने काही त्रास होत नाही, पण बराच पाऊस झाल्यामुळे, अजूनही किनाऱ्याने न जाण्याच्या सूचना लोग देतात. रात्री मोहगवला मुक्काम, आश्रम गावात आहे, मेन रोड पासून 1 कि. मी. आत, पण महाराज बोलके, आणि हसमुख. आज पूरी और भाजी बनाव. पूर्ण परिक्रमेत आज रात्री 10 वा. जेवायला मिळाले. पण मजा आली.
सकाळी लवकर मोहगाव सोडले, आणि 11 चे दरम्यान आम्ही देवगाव ला जमदग्नी आश्रमात पोहचलो. परिसर रमणीय आहे, आश्रमात जातांना आपल्या उजव्या हाताला मैय्या येते, आणि आश्रमाच्या समोर दिसते ती बुढानेर नदी. आश्रमाच्या पायऱ्या संगमावर जातात.
सुंदर मंदीर. आणि एक दोन जुनी मंदिरे आहेत. जमदग्नी ऋषींची तपस्थली. माता रेणुका आणि भगवान परशुराम यांचीही तपोभूमी.
परशुरामाला युद्धकला शिकविताना सोडलेला बाण आणायचे काम रेणुका मातेचे होते, उन्हाने ती थकून जात असे, म्हणून ऋषींनी सूर्याला दम दिला, सूर्याने क्षमा मागून आपली असमर्थता व्यक्त केली, यावर उपाय म्हणून वहाणा व छत्री चा वापर सुरु झाला, अशी माहिती येथील एकाने आम्हाला दिली. अर्थात ही माहिती सत्य कमी, मनोरंजन जास्त अश्या स्वरूपाची आहे.
जमदग्नी ऋषीजवल देवगुरु द्वारा प्राप्त कामधेनू गाय होती, ती सहस्रार्जुनाला हवी होती, प्रेमाने वा जबरदस्तीने. त्यामुळे त्याने ऋषींचा वध करून ती गाय नेली. परशुरामाला ही वार्ता कळली आणि त्याने त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला व त्याच्या पुत्रांना ठार केले. नंतर येथेच त्यांनी पित्याची अंतिम क्रिया, पिंडदान व तर्पण केले, आणि " जमदगनेश्वर लिंगाची " स्थापना केली. आणि " पूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करील. " अशी घोर प्रतिज्ञा केली, ते हे ठिकाण. परिसर रमणीय आहे, पण येथे आश्रमाकडून काहीही सहकार्य लवकर मिळत नाही, येथे फक्त रात्री जेवण देतात. कदाचित सेवक वर्ग कमी असावा, पण वागण्यात तुटकपणा जाणवतो, हे मात्र खरे.
मनाला भुरळ घालणारे येथील वातावरण आहे. येथे कपडे धुण्याचा कार्यक्रम झाला, तोवर खिचडी झाली, पुढे बिलगाव साठी प्रस्थान. थोडासा जंगली वाटावा असा भाग व एक मोठी टेकडी ओलांडून आम्ही बिलगाव ला आलो. येथे सदावर्त देत नाही, असे कळले, मग हनुमान मंदीरात आसन लावले, व दुकानातून सर्व सामान विकत घेऊन स्वयंपाक केला. मजा आली. येथेही रात्री 10 वा. जेवण झाले.
क्रमश:
। श्री नर्मदा परिक्रमा - 31 ।
सकाळी महाराजपुर सोडले. येथून पुढे जंगलचा भाग असल्याने, हाय वे असला तरी जंगल ही चांगले आहे, दुपारी 2 तास एका झाडाखाली आराम केला व पुढे निघालो. छोटी छोटी काही गावे गेली आणि भिलाई येथील हनुमान मंदीरात आसन लावले.
सकाळी थोडी प्रकृतीची कुरबुर वाढली, रात्री थोडा तापही होता, ऋतू ही बदलतो आहे, आता दिवस गरम आणि रात्री थंड असे वातावरण आहे, प्रकृतीच्या बाबतीत आपण मैय्यालाच प्रार्थना करावी.
पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत आहे. 4 वाजता घनसोर आले. तहसीलचे ठिकाण, येथे पहिले जोडे घेतले. आज मला थकल्यासारखे वाटत असल्याने सर्वांनीच येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळ पासूनच वाटत होते, की आज नक्कीच पाऊस येणार. आम्ही तिघे मागे व बाकी सर्व लोग पुढे चालत असत. आहे 5 वाजता रेहलान कला गाव आले व पाऊस ही सुरु झाला. मुलांनी पटकन आम्हाला थांबवून शाळेची एक खोली उघडून दिली. एक जण चहा घेऊन आला व दुसरा रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण.
पाऊस सतत सुरु होता. बाकी सर्व नागपूर - जबलपूर हाय वे वरील घुमा या गावी आमच्या गावा पासून 4 कि. मी. पुढे होते. सकाळी पाऊस सुरु होता. 11 वाजता पाऊस थांबला व निघालो. घुमा येथे पोहोचलो व पाऊस पुन्हा सुरु. त्यामुळे आज घूमा येथेच मुक्काम ठरला.
। श्री नर्मदा परिक्रमा - 32 ।
सकाळी 8 वा. घुमा सोडले. पुढे नागन देवरी गाव आले, आणि पावसाला सुरवात झाली. हॉटेल वाल्याने सर्वांना बोलावले, चहा, नाश्ता झाला तोवर पाऊस थोडा मंदावला, पण सुरु होताच. हॉटेल वाला म्हणाला, येथून पुढे एक नर्मदा मंदीर आहे, हॉल मोठा आहे, तुम्ही तेथे आराम करा, व पाऊस थांबला की मग जा.
मंदीर खरेच छान आहे, परिसर मोठा आहे, व शांतता आहे. दोन व्यक्ती आले, तुम्ही लोग पाऊस थांबायची वाट बघत आहात, तर जेवण करूनच जा, तोवर पाऊसही थांबेल. त्यांना हो म्हणताच ते तयारीला लागले.
पुरी, भाजी, पापड ते घेऊन आले, जेवण झाले व खरोखर पाऊस थांबला. 2 वा. निघालो.
पुढे देवरी गावी एका दुकानदाराने चहासाठी थांबविले. त्याच्या दुकानासमोर मोठा इलेक्ट्रिक चा वजन काटा पाहून विचारले, उभा राहू का ? त्याने हो म्हणताच, मी पहले बॅग चे वजन केले, 7.5 किलो, नंतर मी उभा राहिलो, तर 67 किलो, नागपूरहून निघतांना वजन केले होते, 85 किलो होते, म्हणजे 18 किलो कमी झाले, अजून अंदाजे 600 कि. मी. अंतर बाकी आहे, म्हणजे आणखी 1 ते 2 किलो कमी होईल.
दुकान सोडले व पावसाला सुरवात झाली. एका शाळेत आश्रय घेतला, पुढे दरगडा गाव आले, हनुमान मंदीरात मुक्काम.
श्री पटवर्धन साहेबांची ही दुसरी परिक्रमा आहे, त्यामुळे त्यांना बरीच माहिती आहे, झोतेश्वर साठी म्हणून हा रस्ता त्यांनी निवडला. झोतेश्वर हे द्वारकापिठाचे शंकराचार्य श्री स्वरूपानंदजी यांची तपोभूमी आहे. आणि हे ठिकाण जंगलात आहे, हे जंगल ही चांगले दाट आहे. आम्ही रस्त्यावरच थोडा आराम करायला बसलो तर, आमच्या समोरून 3-4 हरीण छान उड्या मारीत पळत गेली. छान दृश्य. येथे मुख्य मंदीर राजराजेश्वरी त्रिपुरा सुंदरी हे आहे, आणि इतरही मंदिरे आहेत, 3 ते 4 किलोमीटर मध्ये पसरलेला हा परिसर आहे, दर्धन घेऊन, चश घेऊन निघालो.
पुढे एक सुंदर " श्री बाबाजी धाम, मुक्तेश्वरानंद महादेव मंदीर " निराकार पंथाचे प्रचारक श्री बाबाजी यांनी उभारलेले हे मंदीर आहे, समोरच फलक आहे, प्रवेशशुल्क 20₹ फक्त.
दर्शनासाठी प्रवेश शुल्क असलेले मंदीर, निदान मी तरी प्रथमच पाहीले. त्यामुळे बहुतेकांची नाराजी दिसली, पण दारावर जे साधू बाबा होते, ते म्हणाले, परिक्रमा वासियोंसे फी नही लेते, आप आईये । श्री गणेश मंदीर, मुक्तेश्वर महादेव मंदीर, बाजूला बगीचा, लागूनच सरोवर. जे मुख्य बाबाजी आहेत, ते सकाळी 8 ते रात्री 8 साधनेच्या खोलीत असतात, त्यांचे दर्शन झाले नाही.
पुढे गोटेगाव. नर्मदा धर्मशाळा येथे आसन लावले, गाव तहसीलचे ठिकाण आहे.
सकाळी गोटेगाव सोडण्यापूर्वी रेल्वे स्टेशन वर आलुबोन्डे ( आलुवडा ) खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका, अशी सूचना मिळाली असल्याने, स्टेशन वर गेलो, आम्हाला पाहल्या बरोबर एकाने प्रत्येकी 2 प्रमाणे आलोबोन्डे मागविले नंतर चहा झाला व प्रवास सुरु. नरसींगपूर. मोठे शहर, जिल्ह्याचे ठिकाण. पण परिक्रमेच्या संदर्भात विचार केल्यास, अत्यंत गैरसोयीचे ठिकाण. एका शाळेच्या ओसरीत मुक्काम केला, लाईट नाही, फरशा उखडलेल्या, नळ होता. खाली धूळ खूप. कशीतरी रात्र काढली.
सकाळी निघालो. करेली गाव येथे साखर कारखाना असल्याने रस्त्यावर गाड्यांची लाईन, सर्व उसाचे ट्रक्स. मोजत निघालो, 250 ट्रक्स होते, नंतर कारखान्याचे गेट व तिकडे तशीच रांग. मागून एक ट्रॅव्हल ची बस आम्हाला पाहून " नर्मदे हर" असे जयकारा करत व हाथ दाखवित पुढे गेले, त्यावेळी आम्ही तिघे होतो. मी, पुण्याचे श्री महाजनी काका व अकोल्याचे श्री पटवर्धन साहेब. ट्रक्सची रांग संपल्यावर बघितले, तर ती बस आमची वाट बघत होती, ती बस मुंबईची होती, आणि श्री धर्माधिकारी ( या ग्रुप वर जे आहेत, डोंबिवलीचे ) होते. जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सर्वांना छान वाटले. आणि आम्ही पुढे करपगाव ला मुक्काम केला.
क्रमशः।
। श्री नर्मदा परिक्रमा - 33 ।
आज धुळवड. त्यामुळे आज मुक्काम येथेच करपगावला. सकाळीच गरम पोहे व चहा झाला, आज सणाचा दिवस असल्याने, आणि रंग खेळण्याचा दिवस असल्याने सकाळी न जेवता सायंकाळी जेवावे, असे ठरवले होते, त्यामुळे आमच्यासाठी त्यांच्या खेळत व्यत्यय नको, हा उद्देश होता. सकाळी 9 नंतर लोग हनुमान मंदीरात यायला लागले, हनुमानाला नमस्कार करून, आम्हालाही कपाळाला गुलाल लावला जायचा. 11 नंतर मंदीरात बरीच मंडळी जमली आणि तबला-पेटीच्या संगतीने रामाला सांगितलेल्या वनवासा पासून तर राम-रावण युद्ध व अयोध्या वापसी पर्यंतची कथा पारंपारिक गाण्यांमधून अशी काही रंगविली कि आम्ही थोडा वेळ सर्व विसरून गेलो. लोककला अजूनही जिवंत असल्याचा आनंद झाला.
दुपारी गाणी झाल्यानंतर काही वृद्ध माणसे गोष्टी सांगू लागले. त्यातील एक पंडित होते. ( एम. पी. मध्ये ब्राह्मणांना पंडित म्हणतात ) श्री कंचेरी शर्मा, वय वर्षे 90. ते सांगू लागले. 20 वर्षांचा होतो, मुंबईला गेलो, आणि सिनेमात काम करू लागलो. 1948 चा रतन, त्यानंतर अशोक कुमार चा संग्राम, किस्मत, कंगन, बंदी, झुला इत्यादी सिनेमात कामे केली. एका दिवाळीला घरी आलो, वडिलांनी सांगितले, येथेच रहा व शेती पहा. मग नाही गेलो मुंबईत.
मी त्यांना म्हणालो, तुम्ही सांगितलेल्या सिनेमांपैकी मी किस्मत, संग्राम व बंदी हे तीन सिनेमे पाहिले आहेत, त्यांना खूप आनंद झाला.
सकाळी करपगाव सोडले. एक दिवस जास्त मुक्काम झाला, पण मजा आली.
येथून पिपरिया होशंगाबाद रस्ता घेतला. गाडरवाडा च्या पूढे बर्फ़ानी बाबा आश्रम मध्ये आसन लावले.
आमच्या पैकी दोघांचे घर मैय्या किनारी असल्याने व त्यांची परिक्रमा संपत असल्याने त्यांच्या साठी किनाऱ्याने जावे व त्यांना घरी सोडून आपण पुढे निघावे असे ठरले.
क्रमश: ।